भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय २३

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥


॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय तेविसावा ॥

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीमान्तपूजन - भोजनसमारंभ

सूर्यवंशींचे भूपती । असंख्य आणि अगाधकीर्ती ।
तेर् म्यां सांगितले संकळिती । क्षमा श्रोती करावी ॥ १ ॥

एवमुक्तोऽथ जनकः तमुवाच कृतांजलेः ।
श्रोतुमर्हसि धर्मज्ञ मत्कुलं श्रृण्वतां वर ॥ १ ॥
प्रधानेश्वर वक्तव्यं कुलं निरवशेषतः ।
वक्तव्यं कुलजातेन तन्निबोध नरेश्वर ॥ २ ॥

वसिष्ठें सूर्यवंशावळी । वर्णिली अति प्रांजळी ।
जनक उठोन तये वेळीं । कृतांजळी विनवीत ॥ २ ॥

जनकाचें कुलवर्णन :

माझिये कुळींचे भूपाळ । खातिवंत अति प्रबळ ।
राउळें परिसावे सकळ । सकळकुळपर्यावो ॥ ३ ॥
कन्यादानीं सकळ कुळ । सांगावें लागे स्वयें समूळ ।
पहिले कुळीं निमी भूपाळ । त्याची कीर्ति प्रबळ तिहीं लोकीं ॥ ४ ॥
वसिष्ठाचे शापस्थितीं । जगाचें देखणें ज्याची वस्ती ।
ज्याचेनि डोळे देखणे होती । यालागे म्हणती निमी त्यातें ॥ ५ ॥
निमिषानिमिषाची गती । ज्याचेनि चाले अहोरातीं ।
यालागी त्यातें निमी म्हणती । जाण निश्चितीं नरनाथा ॥ ६ ॥
निमीचा सुत मिथी सोज्ज्वळा । नगरी वसविली स्वलीळा ।
यालागी ईतें म्हणती मिथिला । स्वनामें सोहळा निजनगरीं ॥ ७ ॥
मिथिपुत्र प्रथम जनक । जो कां अत्यंत सात्विक ।
पुत्रप्राय पाळिले लोक । यालागी नांव जनक त्यासी ॥ ८ ॥
त्याचा पुत्र धृष्टकेतु । जनकवंशी अतिविख्यातु ।
दळें बळें प्रतापवंतु । धर्मसेते निजधर्मा ॥ ९ ॥
त्यापासोनि अनेक । जनक नामाचे नृप देख ।
ते सांगतां असती असंख्य । कथा आत्यंतिक वाढेल ॥ १० ॥
बहुलाश्वजनक स्वकीर्तिजनक । स्वदेहजनक विदेहजनक ।
त्यांमाजि मीही एक जनक । निजसेवक तुमचा ॥ ११ ॥
वंशावळी वाढवितां । अपार वाढेल ही कथा ।
लग्नीं साधावें रघुनाथा । हे परमावस्था जनकासी ॥ १२ ॥
घ्यावया आमुच्या निजराज्यासी । हिरोन न्यावया सीतेसी ।
सुधन्वा आला अति क्रोधेसीं । तेणें मिथिलेसी वेढिलें ॥ १३ ॥
मग मी युद्ध केलें त्यासीं । रणी वधिलें सुधन्व्यासी ।
मग त्याचिया राज्यासीं । कुशध्वजासी म्यां स्थापिलें ॥ १४ ॥
कुशध्वज माझा धाकटा बंधू । राजाप्रतापें प्रतापसिंधू ।
त्याच्या कन्या दोघी वधू । वरसम्बंधू करूं इच्छीं ॥ १५ ॥

दशरथाच्या चार पुत्रांना आपल्या चार कन्या देण्याचा संकल्प :

सीता दिधली श्रीरामासी । ऊर्मिला दिधली लक्ष्मणासी ।
मांडवी दिधली भरतासी । शत्रुघ्नासी श्रुतकीर्ती ॥ १६ ॥
चौघे बंधू चारी वधू । ऋषी म्हणती श्लाघ्य संबंधू ।
अवघीं केला निश्चय शब्दू । लग्नविधि अवधारा ॥ १७ ॥

कुलगुरू व विश्वामित्रांचे अनुमोदन, दशरथाची संमती :

वसिष्ठ विश्वामित्र वामदेव । अवघे म्हणती अति अपूर्व ।
श्लाघ्यसंबंधगौरव । भाववैभव समसाम्य ॥ १८ ॥
आजिचे तिसरे दिवशी । उत्तराफाल्गुनी सुदिनेंसी ।
अभिजित साधून मध्यान्हेंसीं । लग्न चौघांसी लावावें ॥ १९ ॥
ससिष्ठविश्वामित्राचे वचन । दशरथें मस्तकीं वंदून ।
तुमचें वाक्य परम प्रमाण । करणें लग्न चौघांचे ॥ २० ॥
जनक कुशध्वज नृपती । दोघेही व्याही परमार्थी ।
विजयी जाला रघुपती । ते अति कीर्ति तुमचेनि ॥ २१ ॥
लग्न करणें हे प्रमाण । भेरी त्राहाटिलें निशाण ।
दोहीं रायां हर्श पूर्ण । सुहृज्जन आल्हादी ॥ २२ ॥

देवस्थापना :

दशरथें पुसोनि जनकासी । सवें घेवोनि महाऋषी ।
वेगें आला जानवशासी । देवकासी आरंभ ॥ २३ ॥
जनक बोळवीत ये सर्वांसी । हात जोडोनि ऋषिरायांसी ।
शिष्य सेवक मी तुम्हांसी । बांधवांसी ससैन्य ॥ २४ ॥
श्रीरामलग्नाचा महोत्साह । दोहीं मांडवीं उत्साह ।
मिनल ऋषिसमुदाव । नवल नव्लाव लग्नाचा ॥ २५ ॥

लग्नमंडपाचे वर्णन :

रामविवाहा मंडपस्तंभ । चारी वेद जाले स्वयंभ ।
आडवळे धैर्याचे सलंब ।वासे निकोंभ विवेकाचे ॥ २६ ॥
त्यावरी शाकार स्मृतिपुराणें । चारी पुरुषार्थ तोरनें ।
धर्मद्वारें शोभती तेणें । सलंबपनें मुक्तघोंसी ॥ २७ ॥
धर्मद्वार मित्यमुक्त । द्वारनिरोध नाहीं तेथ ।
दीनें वरापासीं पावत । सुखी होत तत्काळें ॥ २८ ॥
वसिष्ठ पुरोहित सुबुद्धी । मंडप कालडिला उपनिषदीं ।
शोभा शोभे त्रिशुद्धी । चिदानंदी मंडप ॥ २९ ॥
मंडपशोभा शोभे कैसी । पताका शोभती चिदाकाशीं ।
देखतां सुख होय दृष्टीसी । मंडपवासियां आल्हाद ॥ ३० ॥
कन्यामंडपीं स्तंभ भावाचे । आडवळे शुद्ध सत्त्वाचे ।
वरी शाकार विधीचे । सद्‌बुद्धीचे दारवंटे ॥ ३१ ॥
कन्या मंडपीं चांदवा धर्म । वरमंडपीं वितान ब्रह्म ।
कन्यागृहीं दाटुगें कर्म । कर्म निष्कर्म वरगृहीं ॥ ३२ ॥
कन्यागृहीं साधन पंक्तीं । वरगृहीं साधन शाण्ती ।
कन्यागृहीं रत्न्यंज्योती । । निजदीप्ती वरगृहीं ॥ ३३ ॥
कन्यागृहीं नवरसप्रीती । वरगृही नवविधा भक्ती ।
कन्यागृहीं विधि सर्वार्थीं । विधिनिर्मुक्ती वरगृहीं ॥ ३४ ॥
कन्यागृहीं नित्यचाचरी । वरगृहीं कीर्तनगजरी ।
कन्यागृहीं भाट कैवारी । वेदनागरी वरगृहीं ॥ ३५ ॥
कन्यागृहीं नोवर्याच चारी । वरमंडपीं मिथ्या नरनारी ।
दोहीं मंडपांमाझारी । अगाध थोरी सामर्थ्य ॥ ३६ ॥
वसिष्ठें दशरथासी बैसवोन । देवकविधि पुण्याहवाचन ।
नांदीश्राद्ध करवोन । बहु हरिण्य वांटिले ॥ ३७ ॥

स गत्वा निलयं राजा श्राद्धं कृत्वा च पुष्कलम् ।
पुत्रार्थी प्रियपुत्रस्थ चक्रे गोदानमुत्तमम् ॥ ४ ॥
सुवर्णशृंगीः सुच्छन्नाः सवत्साः कांस्यदोहनाः ।
वित्तमन्यत् बहुवलु द्विजेभ्यों रघुनंदनः ॥ ५ ॥

मंडपसंरक्षणासाठी देवता-क्षेत्रपालांचे आगमन :

श्रीवसिष्ठें आव्हानितां । नलिनी नंदिनी उमादि समस्ता ।
मंडपी समस्त मंडपदेवता । मूर्तिमंता पैं आल्या ॥ ३८ ॥
नवग्रहादि ग्रह समस्त । मंडळें सोडोनियां त्वरित ।
अवघे आले मंडपांत । श्रीरघुनाथलग्नार्थीं ॥ ३९ ॥
मंडपदेवता प्रहपरवडी । श्रीरामा वंदिती आवडीं ।
आमुदी तोडील हा बेडी । सोडवील बांधवडी लंकेची ॥ ४० ॥
क्षेत्रपाळ अहोरातीं । मंडपद्वारीं नित्य जागती ।
रावणें हरिल्या क्षेत्रवृत्ती । त्या रघुपती सोडवील ॥ ४१ ॥
देवकप्रतिष्ठा ऐसिया रीतीं । श्रीवसिष्ठें विधानोक्तीं ।
कवरिली रायाहातीं । आल्हाद चित्तीं दशरथा ॥ ४२ ॥

दशरथहस्ते गोदाने :

पाचारोनियां ब्राह्मन । शतानुशतें करी गोदान ।
श्रीरामें लक्षोनियां दान । दानविधान अवधारा ॥ ४३ ॥
नेदीच लातरिया डिवरिया । नेदीच अत्यंत बुजरिया ।
चोरपान्हा खावरिया । मरळा कुचरिया नेदीच ॥ ४४ ॥
ऐसिया गाई दान देतां । अवचटे घडे ब्रह्महत्या ।
दानीं दुभाळुवा अतिशांता । होय देता नृपनाथ ॥ ४५ ॥
नेदीच फळवटा प्रथमविताच्या । नेदीच वृद्धा बहुवितांच्या ।
तरुण सुदोही सुस्तनांच्या । बहुमोलाच्या उत्तमा ॥ ४६ ॥
सुवर्णश्रृंगी रौप्यखुरी । कांस्यदोही क्षौमांबरी ।
रत्न पुच्छा सुकुमारी । सालंकारी शोभत ॥ ४७ ॥
जैशा गाई तैशी आभरणें । तैसीच दक्षिणा संपूर्ण ।
पुत्रोद्वाहीं देतसे दान । सुखी ब्राह्मण तेणें केले ॥ ४८ ॥
तिळपात्रें घृतपात्रें । क्षीरसहित भोजनपात्रें ।
द्विजांसी दिधलीं नृपवरे । श्रीरामचम्द्रे उत्साहो ॥ ४९ ॥
श्रीरामभावना भावून । सकळ लोक करिती दान ।
प्रत्यक्ष श्रीरामें निजदान । भाग्यसंपन्न दशरथा ॥ ५० ॥

भरताचा मामा युधाजित याचे आगमन :

देवकप्रतिष्ठा अति गजर । हर्षे दान दे नृपवर ।
तेचि समयीं युधाजित शूर । आला ज्येष्ठ सहोदर कैकयीचा ॥ ५१ ॥
तो भरताचा निजमातुळ । सुहृतसंबंधी अति कुशळ ।
स्वसापुत्र स्नेहाळ । रायें तत्काळ आलिंगिला ॥ ५२ ॥
श्यालक बोले दशरथासी । भेटावया दोहीं पुत्रांसी ।
प्रीति कैकयरायासी । मज तुम्हांसी पाठविलें ॥ ५३ ॥
मी जंव आलों अयोध्येसीं । तंव तुम्हीं आलेती लग्नासी ।
ऐकोनि लग्नोत्साहासी । अति त्वरेंसीं मी आलो ॥ ५४ ॥
अवधीं केलें अभ्युत्थान । रायें दिधला अति सन्मान ।
दिधलें सुमनचंदन । वरासन बैसावया ॥ ५५ ॥
अभ्यंग करितां वरासी । मंगळतुरध्वनि आकाशीं ।
अलंकारीं दासदासी । महाऋषि पूजियेले ॥ ५६ ॥
वस्त्रें भूषणें विचित्रलीला । गंधाक्षता सुमनमाळा ।
देती परिमळतांबूला । दानलीला शोभत ॥ ५७ ॥

चार जावयांचा सत्कार :

केळवला रघुनंदन । कोणी नाहीं हीन दीन ।
अवघेची दिसती प्रसन्नवदन । सुप्रसन्न दशरथ ॥ ५८ ॥
वस्त्रें अलंकार अति चोखट । सभा बैसली घनदाट ।
रायें रचिलें वैकुंठ । अति उद्भ ट निजशोभा ॥ ५९ ॥
श्रीरामाच्या निजतेजेंसी । शोभा आली मंडपासी ।
रमेहूनि वरिष्ठ दासी । श्रीरामापासीं शोभत ॥ ६० ॥
हातीं धरोनि वसिष्ठा । रायें केली यागप्रतिष्ठा ।
होम दिधला हव्यवाटा । ज्येष्ठश्रेष्ठां पूजिले ॥ ६१ ॥
जनकें अत्यंत गजरेंसी । आणिलें सीमांतपूजेसी ।
सभा शोभताहे कैसी । वैकुंठवासी नरनृप ॥ ६२ ॥
वैकुंठींचें निजसामर्थ्य । येथें आणिलें समस्त ।
जनक निजभाग्यें समर्थ । श्रीरघुनाथ जांवई ॥ ६३ ॥
चारी मुक्ती ते चवाई । तीवरी बैसविला जांवाई ।
तेणेंचि सन्मानें तिघेही । ठायींच्या ठायीं बैसविले ६४ ॥॥
सत् चित् आनंद तिन्ही जाण । गुनातीत शोभायमान ।
तैसेचि हे तिघे जण । श्रीरामे पूर्ण शोभती ॥ ६५ ॥
मुकुट कुंडले रत्न मेखळा । करीं मुद्रिका रत्न॥माळा ।
निजभावाचें पदक गळां । हृदयकमळावरी शोभे ॥ १६ ॥
जानकीजनकें विदेहेवीरें । आणिली शुद्ध चिदांबरें ।
तीं वेष्टिलीं रामचम्द्रें ।अत्यादरें करूनियां ॥ ६७ ॥
येरही वर याचि रीतीं । गौरविले अति प्रीतीं ।
देखोनि विदेहनृपतीची भक्ती । श्रीरघुपति उल्हासे ॥ ६८ ॥

ऋषिपूजन, विश्वामित्रांना अग्रपूजेचा मान :

वरिष्ठ म्हणे गा विदेहेंद्रा । आधीं पूजावें विश्वामित्रा ।
वचन मानलें राजेंद्रा । पूजी सृषीश्वरा अग्रपूजा ॥ ६९ ॥
पूजिले वसिष्ठ वामदेव । कश्यपादी ऋषिसमुदाव ।
पूजिला मतुळ महाबाहो । पूजिला राव दशरथ ॥ ७० ॥
अत्यंतश्रद्धा जानकीजनक । तेणें पूजिला श्रीरामजनक ।
सोयरे सुहृद एक एक । सेवकें सेवक बुझाविले ॥ ७१ ॥
टुष्यशृंगाची निजकांता । मुख्य करवली ते शांता ।
जनक पूजी दिव्यांबरता । नानारत्नाृलंकारीं ॥ ७२ ॥
सुविद्या अविद्या श्रद्धा पत्नीू । तैशा वरमाया तिघी जणी ।
सुमेधा लागली त्यांचे चरणीं । रत्न भूशणीं पूजियेल्या ॥ ७३ ॥
जनकाची स्त्री पतिव्रता । सुमेधा सीतेची निजमाता ।
भावे वंदिलें रघुनाथा । चरनीं माथा ठेविला ॥ ७४ ॥
वृद्धपरंपरा पूर्ण । वोहमाय उटी वराचे चरण ।
शुद्धमेधेनें पैं आपण । श्रीरामचरण पूजियेले ॥ ७५ ॥

भोजनपंक्ती, पक्वान्नवर्णन :

लाज सांडोनि रोकडी । सुमेधा विनवी अति आवडीं ।
माझीं रुखवतपरवडी । स्वामीनें गोडी चाखावी ॥ ७६ ॥
तुझेनि उद्देशें सतत । परिपाक केले बहुत ।
भावाचा भोक्ता रघुनाथ । मनोरथ पुरवावे ॥ ७७ ॥
तिचा जाणोनि मनोरथ । भावें तुष्टला रघुनाथ ।
जनकें प्राथिला दशरथ । भोजनार्थ रुखवतीं ॥ ७८ ॥
मध्ये श्रीराम केवळ । आवरणपंक्ती राजे सकळ ।
स्वप्रकाशें दीप प्रबळ । भाग्य सुफळ सुमेधेचें ॥ ७९ ॥
चैतन्यतेजें अति चोखटें । समभावें सुवर्णताटें ।
पूर्णरसें भरिली वाटे । अपूर्ण कोठें असेना ॥ ८० ॥
एकी शाखा ते खणिवा । एकी केवळ खुडिवा ।
एकी सदेंठी तोडिवा । एकी सुरेख सोलिवा सुवास ॥ ८१ ॥
एक कडुवटे खणुवाळी । एक तिखटे तोंडाळी ।
एक सलंब सरळी । एक वाटोळे गडबडिजे ॥ ८२ ॥
एक हिरवी कर्करिते । एक टणक जारसे कचकचिते ।
एक बहुबीजें बुजबुचिते । एक हसहसिते कोरडी ॥ ८३ ॥
एक अत्यंत आंबट । एक सबाह्य तिखट ।
एक सर्वांगे कडवट । एक तरट समसमिते ॥ ८४ ॥
एक वाटोळी जारठली । एक सपुष्ट सारठली ।
एक मुरडी मुरकुठली । एक तुटली अनुवाये ॥ ८५ ॥
ऐशा फळावळीफळभारें । केलें समरस सांबारें ।
अवघ्या वाघरी वोघारे । निज थावरे श्रीरामें ॥ ८६ ॥
ऐशा नाना परींच्या शाका । परवडी केली रघुनायका ।
एकचि स्वादें जेविती देखा । अति नेटका जेवणार ॥ ८७ ॥
एक परिपाकें उतटली । स्नेह्देंठींहून सुटली ।
वनिताहातून निसटली । स्वादा आली शिखरणी ॥ ८८ ॥
झाडीं पिकलीं देंठकेणें । तरीं आंबे आंबटपणें ।
सेजे मुराल्या एकांतपणें । न चाखतां घ्राणें चवी फावे ॥ ८९ ॥
रूपें दृष्टीतें बुझावी । वाएं घ्राणातें समजावी ।
वाचा श्रवनातें बरा म्हणवी । स्पर्शे निववी त्वचेतें ॥ ९० ॥
रसना सेवितां रसमात्र । गोडिया सुखवें अंतर ।
सेवितां रामचम्द्रवीर । सबाह्याभ्यंतर सुखरूप ॥ ९१ ॥
एकलें एक चूतफळ । निववी इंद्रियें सकळ ।
श्रीरामपंक्तीं अच्युतफळ । जग सकळ सुखरूप ॥ ९२ ॥
वैराग्यतापें तापलिया । त्याचि संतप्त काचरिया ।
अनु तापतैलीं तळलिया । चवी आलिया श्रीरामें ॥ ९३ ॥
एकें भोजनीं अविचारातें । सेविती निंदेचे राइतें ।
चवी चाखतां कुसमुसितें । कपाळ हातें पिटिती ॥ ९४ ॥
नाकीं तोंडी धूर उठी । तळमळूनि कपाळ पिटी ।
राम त्यातें नातळे दृष्टीं । हे परिपाटी भोजनीं ॥ ९५ ॥
लोणचीं वाढिलीं अनेकें । रंगलीं भक्तिप्रेमरंगें ।
एकें सलवनें सर्वांगें । स्वाद श्रीरंगें सेववा ॥ ९६ ॥
अहं कडुवट कुहिरी । सोहं लोणच्यांत रंगली खारीं ।
वैराग्यभोकरें खारलीं सारीं । त्याहीमाझारी मुक्त मिरवे ॥ ९७ ॥
स्वबाध आलेंसीं आंवळा । भोजनें चवी अति आगळा ।
मुळींच्या मुळेंसीं रंगला । स्वयें सेविला श्रीरामें ॥ ९८ ॥
त्रिगुणाचें निजत्रिकूट । निर्गुणें भरिलें त्याचें पोट ।
घमघमीत उद्भनट । अति स्वादिष्ठ श्रीरामें ॥ ९९ ॥
ऐसीं लोणचीं नेणों किती । मुख्य स्मरण आले नेपतीं ।
तो स्वाद जाणे रघुपती । बैसले पांती ते धन्य ॥ १०० ॥
सूक्ष्म सेवेच्या सेवया । मोडोनि देतां सगळिया ।
क्षीरसाखरेशीं आळलिया । स्वयें सेविल्या श्रीरामें ॥ १ ॥
पोकळ वलवटें सरळीं । एके वाटोळीं लांबोळीं ।
सेवेमाजी अवधीं आलीं । ठायीं पावलीं रघुनाथा ॥ २ ॥
परम स्वादाची साखर । पंचरस पंचधार ।
घृत वाढिलें सर्वसार । स्वादें रामचम्द्र डुल्लत ॥ ३ ॥
अनुतापें सद्यस्तप्त । निजसाराचें सार घृत ।
अखंडधारा स्वयें वाढित । श्रीरघुनाथ निजभोक्ता ॥ ४ ॥
शास्त्रपरिपाडें पापड । नानायुक्ती अति तडफड ।
जळजळेचे आले फोड । तेणें कडकड मोडती ॥ ५ ॥
यालागीं घातले होते मागें । ते ओढोनि भजनमार्गें ।
विरवोनियां सर्वांगें । रामभोगें स्वादिष्ठ ॥ ६ ॥
श्रीरामसीतेची प्रीती सदा । त्यामाजी सांड्या अबद्धा ।
यालागी नकरीच सुमेधा । वृद्धानुवादा जाणोनी ॥ ७ ॥
समूळ गुंतली कुरवंडी । स्वयें नुगवेचि बापुडी ।
शांतिदांती केली कुडकुडी । आली रोकडी रामसुखा ॥ ८ ॥
विषय लालसाचे पं लाडू । विवेकें वाढिले फोडफोडूं ।
तेणें पडिपाडें तिळव्याचा जोडू । स्वाद गोडू श्रीरामें ॥ ९ ॥
वैराग्यकढें कढविली कढी । तीमाजी माया भुगवडी ।
विरोनी स्वादा आली गाडी । तिची गोडी राम जाणे ॥ ११० ॥
त्यामाजी जिरें मिरें कापुरा । तेणें सुवास चढे अंबरा ।
रसज्ञ सेविती फरफरा । श्रीरामचंद्राचेनि धर्में ॥ ११ ॥
भजनभावाच्या मांडेपुरिया । क्षीरसागरींच्या क्षीरघारिया ।
सबाह्य गोड गुळंवरिया । प्य़्र्णपुरिया परिपूर्ण ॥ १२ ॥
भजनभेदें स्फेद फेणी । प्रेमशर्करा भरली भरणी ।
अमृतफळातें लाजवोनी । वाढले आयिणी आंबवडे ॥ १३ ॥
नुसंधी गोडियेची घडियेली । तैसी खांडवी वाढिली ।
चाम्द्रबिंबींची काधिली । घडी मांडिली मांडियांची ॥ १४ ॥
मांडियांची ऐका नवलपरी । चतुर्वेद घडिया चारी ।
कर्म कानवले उत्तरी । श्रीरामचंद्रीं निजस्वाद ॥ १५ ॥
विवेकसडणी अतिसोज्ज्वळे । उभय भागीं निजतेजाळे ।
तांदुळ वेहियेले आणियाळे । भावबळें अरुवार ॥ १६ ॥
सोहं ओगराळें सनाथ । अलिप्तपणें भरिला भात ।
ठायीं वाढित न फुटत । श्रीरघुनाथ निजभोक्ता ॥ १७ ॥
अन्ना वरान्नें श्रेष्ठता । सबाह्य कोंडा सांदिला परता ।
चढलें मध्यनायकाचे माथां । प्रिय रघुनाथा यालागीं ॥ १८ ॥
सर्व स्वादीचें कारण । स्वयें श्रीराम आपण ।
यालागीं वाढिलें वरी लवण । अपूर्ण ते पूर्ण करील ॥ १९ ॥
श्रीरामपंक्ती रस पीयूष । ज्यासी श्रद्धेची अति भूक ।
ग्रासोग्रासीं चढते सुख । हे परवडी देख त्यालागीं ॥ १२० ॥
न्यून नाहीं श्रीरामपंक्तीं । जेवितां जेविते चवी जाणती ।
रुचलेपणें जाणे वाढती । जनक नृपति सावध ॥ २१ ॥
सुमेधा सदा सावधान । जाणे तृषिताचें लक्षण ।
सबाह्य निववीतसे पूर्ण । जीवा जीवन देतसे ॥ २२ ॥
सुमेधा स्वयें खुणावितीं । चारी मुक्ति स्वयें राबती ।
जें जें ज्याचे मनोगतीं । तें तें देती त्या ठायीं ॥ २३ ॥
पहिल्या नवजणी वाधत्या । चवघी जणी पूर्ण कर्त्या ।
जे पंक्तीस श्रीराम भोक्ता । तेथें अतृप्तता असेना ॥ २४ ॥
एवं तृप्त अभ्यंतर । देती द्वानंद उद्गातर ।
सानंदें कोंदलें जेवणार । श्रीरामचम्द्र निजभोक्ता ॥ २५ ॥
सुमेधा सावधान वाढी । राजे धाले निजपरवडी ।
ब्राह्मणतृप्ति जाली गाढी । धोत्रें बुडीं ढिलावती ॥ २६ ॥
तृप्ति जाली सकळिकां । उष्टावनी रघुकुळटिळका ।
रामनामी निजमुद्रिका । ठायीं देखा ठेविली ॥ २७ ॥
श्रीराम नाम मुद्रा देखतां । उल्लास सुमेधेच्या चित्ता ।
चरणी लागली रघुनाथा । लाज सर्वथा विसरली ॥ २८ ॥
संतोषोनि रघुपती । सुमनमाळा तिसी देती ।
हर्ष न समाये त्रिजगतीं । सीता सती सभाग्य ॥ २९ ॥

तांबूलवर्णन व दान :

जे जे जेविले श्रीरामपंक्तीं । ते ते संसारा आंचवती ।
श्रीरामनामें सुखीं रंगती । विडे शोभती सुरंग ॥ १३० ॥
फोडफोडूनि फळाशा । शांतिपक्वपानाची दशा ।
वासना शिरा काढोनि निःशेषा । तांबूल परेशा श्रीरामा ॥ ३१ ॥
अहं जाळोनियां कठिणपणा । सोहं गाळींव काढिला शुद्ध चुना ।
लागोनि शांति परिपक्व पाना । श्रीरामवदना सुस्वाद ॥ ३२ ॥
सर्वसाराचें निजसार । तोचि सेविती खदिरसार ।
श्रीराममुखीं रंगाकार । अधरीं सधर शोभत ॥ ३३ ॥
श्रीरामप्रसाद हाता येतां । सुमेधा लाहे उल्लासता ।
स्वयें सीतेचे हातीं देतां । तिनेंही माथां वंदिली ॥ ३४ ॥
वंदूनियां श्रीरामचम्द्रा । हृदयीं धरिली राममुद्रा ।
प्रसाद सेवितां ते भद्रा । नरा नरेंद्रा विपुलांगें ॥ ३५ ॥
श्रीरामाच्या निजदीप्तीं । उदय अस्त नाठवती ।
उपाध्ये रायातें सांगती । उदया गभस्ति येऊं पाहे ॥ ३६ ॥
मांडवा चाला लवडसवडीं । आधीं प्रतिष्ठाची घडी ।
दशरथें निजनिरवडीं । फळ तांतडीं आणावें ॥ ३७ ॥
एकाजनार्दना शरण । जालें रुखवत संपूर्ण ।
पुढें सीतापाणिग्रहण । सावधान अवधारा ॥ ३८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
सीमान्तपूजनरुखवतभोजनं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥ २३ ॥
॥ श्लोक ५ ॥ ओंव्या १३८ ॥ एवं १४३ ॥


बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.