भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय २५

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥


॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय पंचविसावा ॥

जानकीचे पाणिग्रहण

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

जानकीचे पाणिग्रहण -

श्रीराममंडपाआंत । आला चहूं वरांसमवेत ।
जनकासी आल्हाद बहुत । आला दशरथ ऋषियुक्त ॥ १ ॥
जनकें दिधला सन्मान । गाद्या पडगद्या वरासन ।
मृदुलिया लोटांगण । ऋषिससंपन्न सभेसीं ॥ २ ॥

मधुपर्क :

मधुपराचें विधिविधान । चारी पुरुषार्थ चवाई पूर्ण ।
त्यावरी समाधि सुखासन । वरासन चौघांसी ॥ ३ ॥
सदोदिता आवाहन । अधिष्ठानासी आसन ।
कर्मरहितासी आचमन । चरणक्षाळण अचरणा ॥ ४ ॥
श्रीराम भूषणां भूषण । त्यासी अलंकार आभरण ।
निरावरनासी प्रावरण । सर्वगता आगमना वाहनादिक ॥ ५ ॥
सहजासी पाठीपोट । अखंडासी वस्तिपीठ ।
निःशब्दा शब्द स्पष्ट । निरंतरा अंतःपट लग्नार्थ धरिती ॥ ६ ॥
श्रीराम परब्रह्म स्वतंत्र । तोही धरी ब्रह्मसूत्र ।
वेदविधान आचार । श्रीरामचम्द्र प्रतिपाळी ॥ ७ ॥
असो हा अगाध परमार्थ । जनक आला मधुपर्कार्थ ।
त्याचा जाणोनि भावार्थ । श्रीरघुनाथ अंगीकारी ॥ ८ ॥
सर्व समता समसमान । तेंचि श्रीरामासी आसन ।
आशानैराश्यासी अर्घ्यदान । तेणें श्रीचरण समर्घ्य जाले ॥ ९ ॥
पाद्यार्घ्यालागीं तीर्थ । त्रिगुणत्रिवेणी गुणातीत ।
चैतन्यप्रवाहें पुनीत । यथोचित चिद्‌गंगा ॥ १० ॥
स्वयें सुमेधा घाली उदक । चरण प्रक्षाळी विदेह जनक ।
तळीं तीर्थें सकळिक । आलीं आवश्यक चरणतीर्था ॥ ११ ॥
श्रीरामाचें चरणतीर्थ । सेवितां तीर्थे होती पुनीत ।
सुर नर सिद्ध आले तेथ । लग्नीं रघुनाथ पहावया ॥ १२ ॥
सुमेधा शुद्ध निजजीवन । घाली श्रीरामासी आचमन ।
चोविसां नामांसीं संपूर्ण । सर्वापोषण कर्माचें ॥ १३ ॥
परब्रह्मींचा अधिष्ठात्रा । त्यासीही देती ब्रह्मसूत्रा ।
मान देतो वृद्धाचारा । श्रुतिव्यवहारा संरक्षी ॥ १४ ॥
टिळे माळा शुद्ध सुमनें । चिद्‌रत्ना्दि दिव्यभूषणें ।
भावें पूजिलें चौघांकारणें । परिधानें पीतांबरें ॥ १५ ॥
उदक घालितां मूळांत । शाखा पल्लव टवटवित ।
तेंवी पूजिल्या रघुनाथ । सालंकृत बधु चारी ॥ १६ ॥
रसस्वाद रसना घोटी । तेणेण् इंद्रियां पुष्टितुष्टि ।
राम पूजियेल्या जगजेठी । बंधुत्रिपुटी संपूज्य ॥ १७ ॥
मुख्य स्थानी अग्नौकरण । तेणें सुखी देवब्राह्मण ।
तेंवी पूजिल्या रघुनंदन । चौघे जण संपूज्य ॥ १८ ॥
एका मनासी संबोधन । तेणें इंद्रियां समाधान ।
तैसें अधिष्ठान रघुनंदन । तेणें बंधु आपण संतुष्ट ॥ १९ ॥
दधिमधु एकत्रता । घातलें चौघांचिया हातां ।
वेहाच्या निजभावार्था । श्रीरघुनाथा आते प्रीती ॥ २० ॥
विपरीत वेदविधान । दधि मधु प्राशी रघुनंदन ।
निष्कर्मासी कर्मबंधन । विस्मित जन सुरसिद्ध ॥ २१ ॥
जनक म्हणे प्रतिगृह्यतां । प्रतिगृह्णामि म्हणविती रघुनाथा ।
विदेहें सोडिलिया अहंता । प्रतिग्राह्यता सर्वांची ॥ २२ ॥
संकल्प सांडितां नरेंद्र । दधि मधु सेवितां रामचम्द्र ।
सुमेधा घालीतसे पैं नीर । प्रक्षाळी कर श्रीराम ॥ २३ ॥
सवेंचि केलें शुद्धाचमन । सद्‌गुरू म्हणती सावधान ।
नाहीं विलंब व्यवधान । वेगीं सुलग्न साधावें ॥ २४ ॥
श्रीरामपद रितें न पडे । पूर्णता पायीं पायीं मांडे ।
दोन्ही सद्‌गुरू दोहींकडे । वरू वाडेंकोडें चालविले ॥ २५ ॥

सीतेसह चारही कन्यांचे गौरिहरपूजन :

गौरीहरीं सीता सती । गौरीहरातें शिंपिती ।
शिवासी श्रीरामाची प्रीती । आला लग्नार्थीं भवानीसीं ॥ २६ ॥
मुख्य माया अंतःपट । तिसी श्रीरामें शेवट ।
मनक निजभाग्यें वरिष्ठ । सोयरा श्रेष्ठ श्रीराम ॥ २७ ॥
श्रीरामनामाचें नित्य स्मरण । अंतःपटनिवारण ।
त्यासीही अंतःपट जाण । धरिती ब्राह्मण वेदार्थी ॥ २८ ॥
सुटावया देवांचे बंधन । मुख्य सीताचि कारण ।
तिचें साधावया सुलग्न । रवि सावधान घडी राखे ॥ २९ ॥

लग्नघटका भरताच "सावधान" म्हणून उच्चार :

घडी भरतांची न लगे क्षण । म्हणती नित्यसावधान ।
सत्य सवेंगे चाढे जीवन । नाहीं व्यवधान शब्दाचें ॥ ३० ॥
सांडाचौघींची उठाउठीं । राहा निजदृष्टीं सावधान ॥ ३१ ॥
अंतःपट आहे ज्यासी । आधीआं सावध करा त्यासी ।
अक्षर निमिष श्वासोच्छ्वासीं । भडी वेगेंसीं भरताहे ॥ ३२ ॥
यालागीं नित्यसावधान । सद्गुसरु म्हणताहे आपण ।व
चना न द्यावें प्रतिवचन । सावधान निजरूपीं ॥ ३३ ॥
शब्दार्थें महामौन । धरी तो नित्य सावधान ।
ज्यासी शब्दार्थीं अभिमान । असावधान तो सदा ॥ ३४ ॥
अंगि जाणिवेचे जाणपण । वचना न देती प्रतिवचन ।
तेणें वचनें त्यांसी दूषण । सावधानपण त्यां नाहीं ॥ ३५ ॥
अति समयो सन्निध लग्न । उभय भागीं सावधान ।
अच्युतचिंतनें राखावें मन । अति सुलग्न स्वानंदें ॥ ३६ ॥
ॐपुण्याहं वचन । पूर्णतेचें पूर्णपण ।
त्यापूर्णता रघुनंदन । निजात्मलग्न स्वयें साधी ॥ ३७ ॥

अंतरपात काढल्यानंतर वधूवर परस्परांना वरतात :

ॐपुण्याहं मुळींची गोष्टी । तेणें शब्द विरे प्रणवाच्या पोटीं ।
अंतःपट फिटला उठाउठीं । सीता गोरटी वरी राम ॥ ३८ ॥
नयनीं नयन संलग्न । एकचि जालें देखणेंपण ।
प्रानपती वरितां पूर्ण । प्रानें प्राण एक जालें ॥ ३९ ॥
वसिष्ठाच्या लग्नाक्षता । एकात्मता पंचभूता ।
श्रीरामे वरिली सीता । एकात्मता निजलग्नीं ॥ ४० ॥
एक अवयवी एक अवयव । एक जाले सीताराघव ।
एक जाले जीवभाव । लग्न अपूर्व श्रीवसिष्ठे ॥ ४१ ॥
सीतेचिये निजमाथां । श्रीराम घाली लग्नाक्षता ।
तोचि हस्त पावे सीता । सुखरूपता स्वानंदे ॥ ४२ ॥
श्रीरामाचें निजमाथां । अक्षतां घालूं जाता सीता ।
सर्वाभूतीं देखे रघुनाथा । कर्तव्यता सलज्ज ॥ ४३ ॥
पाणिग्रहणीं रघुनाथा । पावोनियां जी सर्वथा ।
क्रिया पौरुषल्या समस्ता । निष्कर्मता श्रीरामें ॥ ४४ ॥
अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी ।
श्रीरामही तैशाच परी । सीता वरी निजात्मता ॥ ४५ ॥
श्रीराम स्वयें चैतन्यमूर्ती । सीता तंव चिच्छक्ती ।
लग्न लागलें एकात्मप्रीतीं । चतुरोक्ती चहूं ठायीं ॥ ४६ ॥
सीतेने वरिला श्रीरामचंद्र । ऊर्मिलेने वरिला सौमित्र ।
मांडवीनें वरिला भरत वीर । शत्रुघ्न शूर श्रुतकीर्तीने ॥ ४७ ॥
चौघी कन्या चौघे वर । लगन लागलें सविस्तर ।
वोहरें शोभती मनोहर । जयजयकार प्रवतला ॥ ४८ ॥

जयजयकार, मंगलवाद्यवादन, संगितनृत्यादि सोहळा :

ऋषी करिती जयजयकार । सुमने वर्षती सुरवर ।
मंगळतुरांचा गजर । नादें अंबर कोंदलें ॥ ४९ ॥
सुरीं दुंदुभित्राहाटी । भीरीमृदुंग किंकाटी।
नाद न समाये नभाचे पोटीं । निधा वैकुंठी उठत ॥ ५० ॥
रंभा उर्वशी नाचणी । नाचती जनकाच्या रंगणीं ।
गंधर्व मधुर गाती गाणीं । ओंवाळणी दोहीं भागीं ॥ ५१ ॥

पाणिग्रहण, कंकणबंधन :

असो हें जालें पाणिग्रहण । वोहरां बांधावया कंकण ।
वसिष्ठ येवोनि आपण । सूत्र परिधान सूतवी ॥ ५२ ॥
गगनगभींचा सूक्ष्म तंतु । तोचि अष्टधा वेढितु ।
स्थूळाभिमानें दृश्य होतु । मग तोडितु दों ठायीं ॥ ५३ ॥
अखंड खंड केलें जाण । घालोनि त्रिगुणांए वळण ।
अर्ध स्थ्रीनामें कांकण । अर्ध परिपूर्ण पुरुषत्वें ॥ ५४ ॥
फेडिली मायेची वधूवस्त्रें । श्रीराम मेचूनि अच्छिद्रें ।
अष्टपुत्र्या पीतांबरे । नेसलीं वोहरें स्वानंदें ॥ ५५ ॥
मायामळिण वधूवस्त्रासी । न घे शतानंद उदासी ।
वसिष्ठ न घे वरवस्त्रासी । दोघे उदासी पुरोहित ॥ ५६ ॥
घ्यावया मायामळिण वासासी । कलहो सलोभ सगोत्रजांसी ।
विसरोनियां निजात्मत्वेंसीं । देह लोभासीं भांडती ॥ ५७ ॥
कोट्यानुकोटी निजधना । जनकें दिधली वरदक्षिणा ।
सौभाग्यद्रव्यें देतां वाणा । निंबलोणा उतरिती ॥ ५८ ॥
जीवीं जीवा पडली मिठी । बाह्य पालवा बांधिली गांठी ।
राम देखोनियां दृष्टीं । उल्लास पोटीं जानकीच्या ॥ ५९ ॥

विवाहहोम वगैरे :

विवाहहोम निजनिर्धारीं । वोहरें आणावीं तुम्हीं घ्यावी ॥ ६० ॥
हांसे आले रघुनाथासी । विपरीत विधि लौकिकासी ।
वसिष्ठ म्हणे श्रीरामासी । वृद्धाचारासी प्रतिपाळी ॥ ६१ ॥
स्वयें श्रीराम विचारी । माझी प्रकृति मजमाझारी ।
न घेतां बैसली कडेवरी । मजहूनि दुरी होऊं नेणे ॥ ६२ ॥
न बैसवितां बैसली कडिये । जीवें भावें मज हे पढिये ।
नांवरूपाचे मज मढिये । उभवोनि गुढिये हे नांदे ॥ ६३ ॥
हे माझेनि शोभे रूपवंती । माझेनि इसी नित्यस्थिती ।
माझेनि इसी गमनगती । लाजूं किती लौकिका ॥ ६४ ॥
तिसी न लावितां हात । नोवरी उचली रघुनाथ ।
अलिप्तपणें घेवोनि येत । तेणें विस्मित ऋषिसमूह ॥ ६५ ॥
चहूं पुरुषार्थां चारी मुक्ती । तैसी चारी वोहरें शोभती ।
कडे घेतल्या कवण्या रीतीं । तेही स्थिती अवधारा ॥ ६६ ॥
सायुज्यता सीता सती । तीसी उचली रघुपती ।
उर्मिला स्वरूपता शोभती । उचलिली प्रीतीं सौमित्रें ॥ ६७ ॥
मांडवी स्वयें समीपता । भरतें उचलिली तत्वतां ।
श्तकीर्ति सलोकता । होय उचलिता शत्रुघ्न ॥ ६८ ॥
एवं बोहरें आलीं वेदिकेप्रती । शतानंदें विधिवेदोक्तीं ।
केली विवाहहोमसमाप्ती । द्विजां देती धनधान्य ॥ ६९ ॥
जनकें केला अनुक्रम । येथें करावा चतुर्थ होम ।
चारी दिवस संभ्रम । सोहळा परम करावा ॥ ७० ॥

धेंडा नाचविणे :

धेंडा नाचवावा येथे । तें पहावया जन आर्तभूत ।
वचन न मानीच रघुनाथ । भविष्यार्थ जाणोनी ॥ ७१ ॥
धनुर्भंगाचा अनुक्रम । क्रोध पावेल परशुराम ।
दारुण होईल संग्राम । अति दुर्गम दुर्धर ॥ ७२ ॥
जमदग्नीचा क्रोधानळ । परशुरामाचा क्रोध तुंबळ ।
उभय क्रोधें गर्वप्रबळ । नगरी तत्काळ जाळील ॥ ७३ ॥
प्रजा पीडती समस्त । हें श्रीरामाचें मनोगत ।
वसिष्ठ जाणे इत्थंभूत । आणि हृद्‌गत रामाचें ॥ ७४ ॥
वर्हाठडाहूनि अधिक । पुढें कार्य आहे अधिक ।
आणि अयोध्येसी जातां आवश्यक । जाणें एकाएक वनवासा ॥ ७५ ॥
येथें जालें पाणिग्रहण । लंकेसी मारिल्या रावण ।
तैं सीतेचें माझें होईल लग्न । सोहळा संपूर्ण युद्धाचा ॥ ७६ ॥
तेथें नाचेल रणधेंडा । ओवाळनी राक्षमुंडा ।
पडतील अति उदंडा । बाणप्रचंडासमवेत ॥ ७७ ॥
जानकीविवाह अल्प सोहळा । सोडणें आतां देवांची बंदिशाळा ।
तोडणे आहे ग्रहांची शृंखला । तो आगळा उत्साह ॥ ७८ ॥
श्रीरामाच्या निजभावासी । वसिष्ठें जाणोनि सावकाशी ।
तेणें सांगितलें जनकासी । वेगीं वोहरांसी बोळवीं ॥ ७९ ॥
श्रीराम नव्हे गा प्राकृत । वाचे वचन ब्रह्मलिहित ।
जनकें मानोनि निश्चित । हर्षयुक्त बोळवी ॥ ८० ॥

वधूवरांना वस्त्रालंकारादि आंदण देणे :

वधूवरांसी आंदनें । दिव्यालंकारभूषणें ।
नानापरींचीं आभरणें । बहु सुवर्ण गजपृष्ठीं ॥ ८१ ॥
अतिसूक्ष्में रोमांबरें । पट्टकूलें पीतांबरें ।
अति मोलाची नानाकारें । वस्त्रें विचित्रें दिधलीं ॥ ८२ ॥
मुक्ताफळांच्या झालरी । दिधल्या रथांच्या हारी ।
गज गर्जती दळभारीं । अलंकारीं डुल्लती ॥ ८३ ॥
रत्नाालंकारीं मनोहर । अमित दिधले असिवार ।
पदक कंठ्या दासी अपार । नवरस हार शोभती ॥ ८४ ॥
जनकासी अति उल्लास । सेवा करावया श्रीरामास ।
मुकुटकुंडलांचे घोंस । दिधले बहुवस विश्वासीं ॥ ८५ ॥
सुमेधा बोले भाववचन । अनन्यभावें आम्ही शरण ।
जीव श्रीरामासी दिधला आंदण । बाह्य आभरणां कोण पाड ॥ ८६ ॥
जनक बोले हर्षयुक्त । देह गेह वित्त जीवित ।
केलें रामार्पण समस्त । जाण निश्चित सुमेधे ॥ ८७ ॥
ऐसीं दोघे अति उल्लासीं । आंदनें देवोनि वोहरांसीं ।
जनक बोळवीत रामासी । बहु मार्गासी स्वयें आला ॥ ८८ ॥

प्रयाणासमयी रामांचे अभिवादन, आशीर्वादग्रहण :

विश्वामित्रें तरी आपण । करूनियां वसिष्ठासी नमन ।
दोहीं रायांसी पुसोनि जाण । करी गमन स्वाश्रमा ॥ ८९ ॥
राम लक्ष्मण दोघे जण । करिती साष्टांग नमन ।
ऋषीनें देवोनि आशीर्वचन । करी गमन स्वाश्रमा ॥ ९० ॥
श्रीराम म्हणे मिथिलानाथा । येवोनि आपण राहवें आतां ।
येरें वसिष्ठचरणीं ठेविला माथा । होय पुसता व्याह्यासी ॥ ९१ ॥
दशरथें अति सन्मान । करूनि दिधलें आलिंगन ।
जनक श्रीरामासी आपण । घाली लोटांगण सद्‌भावें ॥ ९२ ॥
कुशध्वजासमवेत । आलिंगूनी चारी जामात ।
जनक अत्यंत हर्षयुक्त । निघे त्वरित निजनगरा ॥ ९३ ॥

सर्वाम्चे अयोध्येकडे गमन :

करितां अयोध्यागमन । परशुरामाचें आगमन ।
ज्याचेनि विश्व कोपायमान । अति दारुण भयानक ॥ ९४ ॥
रामें श्रीरामा पडिपाडु । रामा श्रीरामा युद्ध दृढु ।
रामें श्रीरामा प्रेम गोडु । कथाकैवाडु अवधारा ॥ ९५ ॥
एकाजनार्दना शरण । जालें जानकीपाणिग्रहण ।
श्रीरामें रामा समाधान । कथा गहन अति गोड ॥ ९६ ॥
स्वस्ति श्रीबावार्थरामायने बालकांडे एकाकारटीकायां
जानकीपाणिग्रहणं नाम पंचविंशतितोध्यायः ॥ २५ ॥
॥ ओंव्या ९६ ॥



बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.