भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय ९
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय नववा ॥
श्रीरामांचे वैराग्यनिरुपण
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
सन्मुख देखोनि श्रीराम । विश्वामित्राचा मनोधर्म ।
सुखावोनि सप्रेम । आनंदे परम बोलत ॥१॥
आजी माझें सार्थक कर्म । आजी माझा सफळ धर्म ।
आजी माझें पूर्ण काम । रायें श्रीराम यज्ञार्थ दिधला ॥२॥
ऋषि म्हणे श्रीरामासी । चाल जाऊं माझ्या आश्रमासी ।
सिद्धि पाववीं स्वधर्मासी । तूं सर्व कामासी निजमोक्ष ॥३॥
राम म्हणे ऋषि समर्था । कांही पुसेन मनोगता ।
कृपा करावी कृपावंता । मी तत्वता वचनार्थी ॥४॥
देहदोषांविषयी श्रीरामांचा विश्वामित्रांस प्रश्न :
देह तंव अत्यंत अशक्त । देहकर्म तेंही नाशवंत ।
कर्मफळ ते क्षयभूत । सुख कोण येथ देहसंगे ॥५॥
देहलोभे आर्तभूत । जो विषय सेवीत ।
तो तत्काळ विष्ठा होत । सुख कोण येथ देहसंगे ॥६॥
देहीं काळ लागला नित्य । क्षयो करी अहोरात्र ।
शेखीं भोगवी जन्ममरणावर्त । सुख कोण येथ देहसंगे ॥७॥
देहा क्षुधेचा मारा नित्य । तृष्णा पीडी जीवनार्थ ।
देहीं देहभय निभ्रांत । सुख कोण येथ देहसंगे ॥८॥
ऐकें स्वामी साचार । देह तंव दुःखाचा डोंगर ।
देह विकल्पाचा सागर । देह तो महापूर अति तृष्णेचा ॥९॥
देह तव मूत्राची न्हाणी । देह तंव नरकाची खाणी ।
देह तंव पोहणघाणी । रोगांची श्रेणी हा देह ॥१०॥
देह संदेहाचे सोलींव । देह अहंकाराचे ओतींव ।
देह विषयांचे भरींव । कृमींचे पेव तो देह ॥११॥
देह द्वंद्वाची निजधरणी । देह दुःखाची निजनिशाणी ।
देह विकल्पाची पूर्ण भरणी । अरिष्टांची तो आरणी देह ॥१२॥
देह आशेचा कळवळा । देह अहंकाराचा अमंगळा ।
देह अहंममतेचा सोहळा । विकराचा मळा तो देह ॥१३॥
देह अविद्येचे अधिष्ठान । देह संकल्पाचे साजिरें वन ।
देह मोहकाचे मोहन । मुख्यत्वें अज्ञान तो देह ॥१४॥
देह कामाचा पर्वत गूढ । देह क्रोधाचा अवघड गड ।
देह लोभाचा दुस्तर आगड । विनाशाचा मठ तो देह ॥१५॥
देह अपवित्रतेचे मूळ । देह कुश्चळा अति कुश्चळ ।
देह अमंगळा अमंगळ । मुख्य विटाळ तो देह ॥१६॥
पहा जो उत्तम पदार्थ आहे । देहलोभे तो भोक्ता खायें ।
याममात्रें विष्ठा होय । हा देहाचा पाहें परिपाक ॥१७॥
याममात्र न लागतां देख । तत्काळाची होतो वमक ।
नरकाहूनि अधिक । चिळसदायक देहसंग ॥१८॥
नित्य विषय सेवितां पूर्ण । नित्य नवी वाढे वणवण ।
कल्पांती तृप्ती नव्हे जाण । सुख कोण देहसंगे ॥१९॥
क्षुधा नित्य पीडी शरीरीं । तृषा पीडी तेचिपरी ।
निद्रा सर्वथा मूढ करी । ऐशा देहसंगा माझारी सुख कोण ॥२०॥
देहाच्या उत्पत्तिस्थितीसंबंधी घृणा :
त्या देहाची उत्पत्ती । ते मी सांगेन स्वामीप्रती ।
अपवित्रा अपवित्रमूर्ती । देहसंगती सर्वांर्थीं ॥२१॥
रजस्वलेचा लागता पालव । सचैल स्नानाचा उद्भव ।
त्या अशुद्धाचा तोतीव देह । अपवित्र पहाहो समूळीं ॥२२॥
रजस्वला शुद्ध चवथे दिवसीं । तो विटाळ राहिला गर्भासीं ।
तोची वाढोनि नवमासीं । करी गोत्रासी सूतकी ॥२३॥
विटाळे देहाची संभूती । विटाळे देहाची उत्पत्ती ।
विटाळें देहाची शांती । देहभस्मांती सूतक राहे ॥२४॥
देहाच्या अस्थि आणि राख । गंगोदक घालितां देख ।
देता पिड तिळोदक । तरी देहसूतक सुटेना ॥२५॥
गर्भदुःखाचे वर्णन :
एवं देह तो मुख्यत्वें विटाळ । देह तोची दुःख प्रबळ ।
आतां गर्भदुःखाचें कल्लोळ । विशद विकळ अवधारा ॥२६॥
रजस्वलेंचे पूर्ण रुधिर । तेथे पित्याचे रेतमात्र ।
तेंचि गोठोनि होय शरीर । मुख्य अपवित्र देहसंग ॥२७॥
जननी जठरीं अग्निमाझारीं । विष्ठेच्या दाथरावरी ।
मूत्राच्या आधणाभीतरीं । नवमासवरी उकडिजे ॥२८॥
जठराग्नीच्या तोंडीं । उकडतां गर्भाची उंडी ।
रस मुसावोनि होय पिंडी । अष्टांगांची कांडी व्यक्ती येती ॥२९॥
विष्ठालेप चहूकडे । नाकीं तोंडी जंतु किडे ।
तें दुःख भोगिता जीव रडे । अति चरफडे तळमळी ॥३०॥
त्वचा नाहीं गर्भखोळे । तंव मातेसी होती दोहळे ।
कट्वम्ललवण सेवी ते वेळे । सर्वांग होरपळे गर्भाचें ॥३१॥
त्रिकाळ भोजन मातेसी । त्रिकाळ दुःख ते गर्भासीं ।
भोगितां होय कासाविसी । कोणापासी सांगेल ॥३२॥
तेथें नाहीं वायूंचे आगमन । नाहीं मायदाईचें शांतवन ।
नाहीं स्वजनांचे समाधान । दुःखें संपूर्ण अति दुःखी ॥३३॥
ते काळची त्याची व्यथा । नेणती ते माता पिता ।
तेथें नाहीं नाभी म्हणता । आपली दुःखिता आपण भोगी ॥३४॥
प्रसूतिसमयीचा बिकट प्रसंग :
प्रसूतिकाळ अति अटक । गुदद्वारीं अधोमुख ।
योनिद्वारा आणावया देख । परम दुःख उत्पादी ॥३५॥
प्रसूतिवात अति प्रबळ । सर्वांगी लागे एकीचि कळ ।
योनिद्वारी करी तळमळ । प्रसूति तत्काळ होईना ॥३६॥
वेणेवरी येतां वेणा । दुःखा होय दोघांजणां ।
मातेसी न साहवे वेदना । गर्भघोळणा ते काळीं ॥३७॥
ते काळीं विचार करी पूर्ण । आतां जन्मल्या आपण ।
विषय सेवितां गर्भीं गमन । तें विषय सेवन करीं ना ॥३८॥
सद्गुरूसी रिघोनि शरण । निर्दोळोनियां अभिमान ।
निवारीन जन्ममरण । तेहि आठवण विसरे देही ॥३९॥
बाळपणीचं दुःख :
गर्भ जन्मे बाहरे पडे । सोहंभाव तत्काळ उडे ।
कोहंभावें दीर्घ रडे । जन्मल्यापुढें सुख काय ॥४०॥
जन्मकाळापासोनि देख । आयुष्य जातसे अमोलिक ।
यालागीं जो तो पुसे जातक । कोणी रहातक पुसेना ॥४१॥
देहासवेंचि जातक । खंड लागलें आवश्यक ।
यालागीं सकळ लोक । मरणधाक वाहती ॥४२॥
मरणा मर्यादा नाहीं देख । गर्भीं गर्भपाताची धुकधुक ।
उपजतांचि सटवीचा धाक । कोण सुख जन्माचे ॥४३॥
बाळपणींच्या दुःखशोका । संख्यत्वें न ये लेखा ।
तेंही सावधान ऐका । निजजनका स्वयें भक्षी ॥४४॥
ज्या ठायांचें घेऊं नये नांव । जो गौरव जन्माचा ॥४५॥
लाळ थुंका विष्ठा मूत्र । त्यांमाजी सदा सदा पचत ।
तोचि श्लेष्म भक्षित । बाळपणीं तेथे सुख कोण ॥४६॥
उदरव्यथा करी रुदन । माता मुखीं घाली स्तन ।
निजव्यथा न सांगवे पूर्ण । सुख कोण बालकत्वीं ॥४७॥
तांत दोन्हीं दाढा डोळे । निघती सात सात महिन्यांकाळें ।
तान्हेपणीं दुःखउमाळे । बालपणीं फळे सुख कोण ॥४८॥
बाळपणीं दुःख्ह असोस । तेथे नाहीं सुखाचा लेश ।
तैसेंचि तारुण्यही देख । दुःखदायक पुरुषासी ॥४९॥
तारुण्यात अहंमन्यता :
तारुण्याचा अति आघात । निःशेष बुडवितो निजस्वार्थ ।
कांही नाठवे परमार्थ । अति उन्मत्त विषयार्थीं ॥५०॥
शिणोनि विषय करितां पूर्ण। नित्य नवी वाढे वणवण ।
इंधनीं खवळें हुताशन । तेवीं विषय दारूण दुर्भरत्वें ॥५१॥
नित्य विषय सेविती । परी कदाकाळी नव्हे तृप्ती ।
आयुष्य गेले हातोहातीं । हे तो तारूण्याप्रति लक्षेना ॥५२॥
वाढवितां विषयसोस । नित्य आयुष्याचा होय नाश ।
परमार्थ पडे ओस । नाहीं सुखलेश तारुण्यामाजी ॥५३॥
आयुष्याचा नित्य घात । निःशेष परमार्थ ।
तो हा विषयांचा संघात । तारुण्यांत मुसमुसी ॥५४॥
तारुण्याच्या पोटीं । अनेक दुःखांचिया कोटी ।
लावी योषिता पाठी । धनधान्यदृष्टीं लोलुपत्वें ॥५५॥
तारुण्यचिया वाटा । अभिमानाचा चढे ताठा ।
अकार्मचा फुटे फांटा । गर्वाचा मोठा फुगारा ॥५६॥
मी एक चातुर्यसंपन्न । मी एक स्वयंपाकी सुब्राह्मण ।
मी एक समर्थ सधन । पवित्र पूर्ण मी एक ॥५७॥
जग अवघें अपवित्र । मीच एक श्रेष्ठ पवित्र ।
हा तारुण्यामाजी विचित्र । घातकसूत्र अभिमानें ॥५८॥
स्त्रीसंगाचा प्रभाव :
स्त्री तरी अस्थिमासांचा कोथळा । स्त्री केवळ विष्ठेचा गोळा ।
स्त्री वसतिस्थान विटाळा । नरकसोहळा विषयसंगे ॥५९॥
ऐसिया स्त्रीसंगापासीं । तारुण्य पुरुषा करी दासी ।
अखंड सेवी तियेसी । त्याची दशा ऐसी अवधारा ॥६०॥
तारुण्यमाकड स्त्रियेपुढें । ती नाचवी तैसें उडे ।
ती पाडी तेथें पडे । नाचवी रोकडे निजछंदे ॥६१॥
तारुण्यरासभ स्त्रियेपासीं । तिचा घरोबा वाहे शिसीं ।
तारुण्य श्वान स्त्रीआज्ञेसी । लाविल्या वसवसी सुहृदांते ॥६२॥
तारुण्यमांजर स्त्रीगृहासी । मियो करी पायांपासी ।
चाटावया स्त्रीअधरामृतासी । अहिर्निशीं टोकत ॥६३॥
तारुण्यउंदीर स्त्रीयेच्या घरीं । अष्टौ प्रहर छिद्र कोरी ।
देखतां लपे छिद्राभीतरी । तारुण्यवरी सुख काय ॥६४॥
तारुण्य लोलुप विषयापासीं । तारुण्य स्त्रीकामाची दासी ।
तारुण्य गर्वें मुसमुसी । तारुण्यासीं सुख काय ॥६५॥
वृद्वावस्था-व्याधिजर्जरता :
तारुण्याची ऐसी गती । सुख कैचें होईल वार्धक्याप्रती ।
त्या वार्धक्याची निजस्थिती । ऐका निश्चिती सांगेन ॥६६॥
वार्धक्यीं नाथिल्या व्याधी । वार्धक्यीं नाथिल्या आधी ।
वार्धक्यीं भ्रंशे बुद्धी । सुख त्रिशुद्धॊ तेथे कैंचें ॥६७॥
जरेचें भय बहुवस । जरा नाशी शरीराभास ।
धाकें पालटती केश । सुखाचा लेश तेथें नाहीं ॥६८॥
वार्धक्य ते केवळ पाप । तेणें सर्वांगी उठे कंप ।
भेणें बोची हाले लपलप । शब्दाचा पोंचट प्रलाप होय ॥६९॥
वार्धक्य देखोनि येतां । समूळ पळणी होय दाता ।
क्षीण होय इंद्रियसत्ता । सुखाची वार्ता तेथें नाहीं ॥७०॥
तारुण्यपासीं समस्त वित्त । जे कांता भोगी समस्त ।
तेचि विमुख होय वार्धक्यांत । हा वार्धक्याचा येथें बडिवार ॥७१॥
वार्धक्यीं जिरेना अन्न । तरी खावयाची तृष्णा गहन ।
वृद्धांचे सदा सचिंत मन । सुख कोण वार्धक्यीं ॥७२॥
वार्धक्यीं शोकसमूहु । वार्धक्यीं ममता बहु ।
वृद्धातें बाळे म्हणती बाऊ । हा सुखगौरवू वार्धक्यीं ॥७३॥
बाईल नायके बोला । बाळें दाविती वांकुल्या ।
जो तो चेष्टवी मुला । जरठा खवळविती विनोदें ॥७४॥
जरचे बळ बहुवस । वळ बैसेना माणूस ।
खोकला लागे बहुबस । भोवतें बळसचिडाणी ॥७५॥
जराजर्जरेकल्लोळें । शरीराची शक्ति पळे ।
डोळे होती सरकाळे । तोंडींहूनि लाळ गळे उरावरी ॥७६॥
मरणें व्यापिलें शरीर । तरी म्हणे माझी स्त्री माझें घर ।
माझे नातु माझे पुत्र । ही ममता फार सोडीना ॥७७॥
जरी घातला अर्धजळीं । तरी स्त्री पुत्र न्याहाळी ।
नातवंडे आणा रे मजजवळी । ममतेमेळीं देहांत ॥७८॥
विषयांच्या लोभाने नरदेह फुकट जातो :
नरदेहींचा आयुष्यसारा । विषयसारा ।
विषयलोभे केला मातेरा ।
परलोका पडला चिरा । नरकद्वारा करी गमन ॥७९॥
देहबुद्धीच्या कल्लोळीं । मोहममतेच्या महाज्वाळीं ।
परमार्थाची जाली होळी । वृथा रवंदळी नरदेहा ॥८०॥
देहीं व्यर्थ विषयसुख । देहें नाशिलें स्वर्गसुख ।
देहें वंचिलें मोक्षसुख । केवळ दुःख देहसंगे ॥८१॥
शतवर्षें विषयासक्ती । एकही इंद्रियां नव्हे तृप्ती ।
उत्तमा आयुष्या जाली माती । केवळ अधःपाती देहसंग ॥८२॥
देहसंगामाजी सुख । मानिती ते केवळ मूर्ख ।
देहसंग तें केवळ दुःख । गर्भनरक भोगवी ॥८३॥
श्रीराम म्हणे गुरुनाथा । अंगी देहअहंता नांदतां ।
सुख कोण राज्यभोगार्था । विषयस्वार्था सुख काय ॥८४॥
अहंकारमहिमा :
अहंकाराऐसा वैरी । बैसला असतां उरावरी ।
सुख नाहीं हो संसारीं । निजनिर्धारीं निश्चयो ॥८५॥
अहंकार जडला जीवीं । तो साधनीं रिघोनि गोवी ।
अहंकार हा जीवभावीं । उघड नागवी जगातें ॥८६॥
मुख्य बाधक अहंता । तिसि साह्य जालीया ममता ।
अहंममता न जिणतां । सुख सर्वथा असेना ॥८७॥
जालिया शुद्ध शास्त्रशवणें । उभय भोग ऐसा देखणें ।
जे भक्षोनियां वमनें । आतांचि का सुणें वमोनि गेलें ॥८८॥
वमनातें स्वयें भक्षी श्वान । तैसा इहभोग संपूर्ण ।
तो भोग वांछिती सज्ञान । तें ज्ञातेपण लौकिकी सटवलें ॥८९॥
अहंकारनिंदा :
अहंकार तो मुख्य बैरी । विषयलोभ चढला शिरीं ।
तेणें संसार दुस्तर भारी । निजनिर्धारीं ऋषिवर्या ॥९०॥
यालागीं न निरसे अभिमान । तंव मी न करीं रसपान ।
न करीं मिष्टान्नभोजन । न करीं परिधान दिव्यंबरें ॥९१॥
मी न करी क्रियाकर्माचार । कर्म केवळ शरीरधार ।
तेथें संचरे अहंकार । मी पवित्र अति श्रोत्री ॥९२॥
या संकटमुक्तीसाठी उपायाची प्रार्थना :
जेणें पाविजे ब्रह्मप्राती । ऐसी असेल जरी युक्ती ।
ते सांगावी मजप्रती । कृपामूर्ती ऋषिवरा ॥९३॥
मज नसेल अधिकार । तरी तुम्ही संत सर्वाधार ।
सत्संगती दीनोद्धारें । हे ब्रीद साचार संतांचे ॥९४॥
चंदनाचे संगतीं । खैर धामोडे चंदन होती ।
तेंवीं संतांचे संगतीं । ब्रह्मप्राप्ती दीनासी ॥९५॥
ऐसें बोलोनि रघुनाथ । उगाच राहिला तटस्थ ।
ऋषि राजा आणि लोक समस्त । जाले विस्मित ते काळीं ॥९६॥
सर्वांना वरील प्रश्नाचे संतोष :
श्रीरामवैराग्यसमेळीं । ऋषीश्वर दाटले भूतळीं ।
सिद्ध दाटले नभोमंडळी । मुमुक्ष ते काळीं चातक जाले ॥९७॥
वैराग्यें बोलिला रघुनाथ । तेणें जाले सुर नर तटस्थ ।
सिद्ध चाकाटले समस्त जाले विस्मित सुरवर ॥९८॥
ऐकोनि श्रीरामाची गोष्टी । सुख जालें सिद्धांच्या पोटीं ।
तिहीं केली । तिहीं केली पुष्पवृष्टी । श्रीराममुकुटीं स्वानंदें ॥९९॥
नभीं सिद्धांचा जयजयकार । भूतळीं गर्जती ऋषीश्वर ।
जयजयकार करिती नर । सुखें निर्भर सभा जाली ॥१००॥
सिद्ध बोलती स्वानंदता । ऐसी न ऐकों हे वैराग्यवार्ता ।
आम्हीं त्रैलोक्यीं हिंडतां । श्रीरामें तत्वता सुखी केलें ॥१॥
एवं सिद्ध स्वानंदेसीं । आले दशरथाचे सभेसी ।
ऋषिरामसंवादेंसी । त्या गृह्यासी परिसावया ॥२॥
वसिष्ठ विश्वामित्र दोन्ही । आणि सिद्ध साधक मुनी ।
रायें पूजिले समस्त । पूजिला दशरथ परमार्थबुद्धी ॥४॥
सुर नर ऋषि सिद्धगण । सभा बैसली सावधान ।
एका विनवी जनार्दना । श्रोते ब्रह्मज्ञान अवधारा ॥१०५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटिकायां
श्रीरामवैराग्यनिरुपणं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
॥ ओव्यां १०५ ॥