परिशिष्ट -१

भुलईचे गीत

  शांताबाई गायकवाड (वय सुमारे ७५) यांचे कडून मिळालेले गीत -

नागर पंचीमीच्या दिशी गोविंदा चारित होता गायी ss
गायी चारिता चारिता गेला टेकाजवळी
टेकात पाहतो तो अंडे हैती -
अंडे गोईंदान देखिले आला धावत पळत
माता मज अंडे तळून देई ....
अंडे मातानं फोडिले अंडे हैत नागिनीचे
गेली पाच उतरंडी काढल्या
चंदनचुली पेटविल्या श्रावन शेवया रांधिल्या ...
गोईंदा भोजन केला, सरसर गेला माडीवरी
घेतली खुंटीची दुशाल, गोईंदा निजला गती झाला....
नागिन गेली टेकाजवळी, टेकात पाहती अंडे नाही
नेले असतानं गोईंदान, आली धावत येशीच्या येसकरा
गोईंदाचा वाडा कोनता? ....
तुझं गोईंदापासी काय? त्याची हरपली गाय
आली गोईंदाच्या वाड्याला ....
सरसर माडीवरी गेली, डाव्यापायाची गनगोळी (करंगळी)
तिनं कडाकडा डंकिली ....
माता त्याची हाक मारी, झोप कशी रे लागली
गायी नगरीच्या सुटल्या ....
माता गेली गोईंदा जवळी, ऊर दणाणा बडविती
केस कुरले तोडिती ....
अरे अरे गोपाळा बाळा, जावे भाभीला आनाया
गेला घोड्याच्या पागला .....
झिन मोत्याचा सजविला, गेला वेशीच्या बाहेरी

एक वन वलांडिले
दोन वन वलांडिले
तीन वन वलांडिले
चार वन वलांडिले
तवा पाचव्या वनाला दिसले भाभीचं माहेर
आव आव भोवोजी, सारीजण खुशाल ?
जल्दी करा जायांची
भाभी बसली न्हायाला कापी केशाच्या गळ्याला
काय सकुन नवल झाल?
भाभी बसली कुकू लेयाला करंडा पालथा झाला
काय अपसकुन झाला?
भाभी बसली जोडवे लेयाला, जोडवे पायाचे गळाले
काय अपसकुन झाला?
वटी भाभीची भरी तिची पालथी झाली वटी
काय अपसकुन झाला?
भाभी बसली घोड्यावरी गेले येशीच्या बाहेरी
एक वन वलांडिले,
दोन वन वलांडिले.
तीन वन वलांडिले,
चार वन वलांडिले
पाचव्या वनाला धुप्पन कशाचं निघत ?
सरण कुणाचं जळत ? ....
तुमच्या गोईंदा भरताराचं ...
गेली धावत पळत केस कुरले तोडत
सरणी उडी टाकिली ...
गोईंदाची माता बोल काय गोपाळा नवल झाल
एका संग संग दोघ गेलं ....

परिशिष्ट -२

अ. अल्पना : आलिपना : रांगोळी



 संस्कृत 'अलिंपन' या शब्दापासून 'अलिपना-अल्पना'. पण काही विद्वानांच्या मते हा शब्द आर्येतर असावा. बंगालातील वन्य जमातीत गावाभोवती वेशीची भिंत उभारुन त्यावर जी तांदुळाचे पीठ भिजवून नक्षी काढतात. त्याला 'ऐलपन' असे नाव होते. त्यावरून 'अलिपना' शब्द आला असावा. या रेखांकनामुळे गाव आणि शेत यांचे रक्षण होते. अशी समजूत होती. आजही अंगणातल्या रांगोळी रेखाटनामागे तीच श्रद्धा असते. ज्या व्रतांशी व विधींशी अलिपनेचा संबंध आहे ती अतिप्राचीन आहेत. आर्यपूर्व काळापासून प्रचलित आहेत. आलिपनेतील कमळ मोहंजोदाडो येथील कलाकृतीत दिसते असे गुरूसदय रॉय सांगतात. आर्यांच्या टोळ्या भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रिक वंशाचे लोक आले. त्यांनी ही कला भारतात आणली. आणि ते शेती करणारे होते. भारतातील परंपरागत धार्मिक लोककलांचा शेतीशी संबंध आहे. मग ती महाराष्ट्रातील लावणी असो वा कर्नाटकातील यक्षगान असो. रांगोळी प्रकारांतून सूर्य, चंद्र, मोर, कमळ, लक्ष्मीची पावले, हात, कुयरी इत्यादी बरोबरच नांगर, विळा, सूर्य, मापटे, यांच्या आकृती असतात.

ब. ग्रीकमधील 'गॅमॉस' प्रथा

 श्री. ॲलन डुंडेस (Nan Dundes) यांच्या The study of Folk lore या ग्रंथात लोकसाहित्याच्या ३४ अभ्यासकांचे निबंध संग्रहित केले आहेत. त्यातील लॉर्ड रॅग्लन यांच्या 'द हिरो ट्रॅडिशन' या लेखात पान क्र. १५४ वर खालील मजकूर नोंदविला आहे.
 "Gamos is a Greek term, means a holy or sacred marriage in which usually one or both human actors represt gods. Often the marriage is consummated in a field & that by means of the principle of magic (like produces like), the fecundity inherent in the act of ritual coitus willensure agriculture ferfility"
 भूमीच्या सुफलीकरणाशी संबंधित विधी मागील भूमिका जगभर सारखीच होती. तिफणीला नवरी करून नांगराला जोडणे, इळाआवसेला घरमालकाने वा सालदाराने पत्नीसह शेतात मुक्काम करणे हे विधी जमिनीच्या सुफलीकरणाशी जोडलेले आहेत. ग्रीक मधील 'गॅमॉस' प्रथा भारतीय सुफलीकरणविधींच्या जवळची आहे.
 वरील उतारा प्रा. मंदा धर्मापुरीकर यांनी संदर्भासाहित कॅनडा येथील टोरंटो येथून पाठवला आहे.


परिशिष्ट -३

तिफणीची आरती
(महाराष्ट्रात ही आरती म्हटली जाते)



आरती ओवाळू तिफणी नंदी तुझे दोन्ही हो॥
दिवस पाहुनिया बुधवार कुनब्या काठी तोड हो
काठी तोडुनिया अवचित् कामठ्यावर नीट हो
कामठा पुजोनिया सुतारा धन्य तू कारागिरा हो
दोरा टाकुनिया दोघानं चौपट केली वाकसानं हो
तिफण टोचली अट्टंकार दांडीचा झणकार हो
तिनी खूर हे तोडले तिफनिसी भिडविले हो
तिनी दाते हे सोनेरी त्याला पाहून बेरी हो
तिनी काय कांब्या पोटी मिळवावर कायचा चुळा हो
तिनी नयाचा सुमार ओढून चाळदोर हो
आरती ओवाळू तिफणी नंदी तुझे दोन्ही हो॥
रुमनं मिळोनिया मणपोटी तिफणकऱ्याच्या मुठी हो
आगोला लावुनिया बिंड्यासी पुळे विठ्या त्यासी हो
आगोला लांबोरे दोरखंड सहा बैल कुरखंड हो
लोथा बांधुनिया तिफणीवर तिफणकऱ्याचा जोर हो
ओटी बांधोनिया अवचित् वर दोरीची गाठ हो
मांजरे लावोनिया जुवाशी मुसके लैलांशी हो
आरती ओवाळू तिफणी नंदी तुजे दोन्ही हो ॥

धारया घरोनिया पाहिल्यानं पुढे चाले ठाकून हो
तिफण जुतोनिया तिफन्यानं तासावर लावून हो
तास काढोनिया समोर वर सूर्याचे तेज हो
तिफण गेली हे सेत्यावर वरवर इचा देर हो
तिफण गेली हे सती एक डबरा इचा लेक हो
तिफण आहे हे अपार नांगर इचा भरतार हो
आगोल्या सुरल्याची आहे गाठ तिफण करी नीट हो
बैला मारू नको तू काठी तसा पडील आढी हो
उताऱ्या उतारतो जगजेठी धरतीच्या पोटी हो
आरती ओवाळू तिफणी नंदी तुझे दोन्ही हो॥
पुडी आन्तिया रंगाची बैलाच्या शिंगाशी हो
मनके बांधुनिया कपाळाला चाळगोळ बांधा त्याला हो
झुला टाकोनी नंदीवर हो त्यावर राघो मोर हो
आरती ओवाळून तिफणी नंदी तुझे दोन्ही हो ॥
खोपडी आनोनी धांड्याची दुपटा लावा त्यासी हो
पांडव करोनिया कांबीचे हळदीकुंकवाचे हो
जग्र मांडोनि हो गवऱ्याचं वर मापुल दुधाचं हो
पांडव निघाले वनात सवंदळ खाली ठान हो
नंदी चालले झपाट्यानं कासरा धरा आवरुन हो
आरती ओवाळू तिफणी नंदी तुझे दोन्ही हो ।।
हरि भला महादेवा ॥


परिशिष्ट - ४

झडती
(पोळा सणात बैलांना म्हणावयाची गाणी)

एक -
आधी पडल्या कार्तिका रोहेनी। मंग पडला मृगाचा पानी
त्या पान्यानं वापली धिमानी (जमीन)
ती निघाली दोपानी । मंग झाली चौपानी
मंग झाली वो सायेपानी ? आठपानी
बारा आली दाहे पानी । फुला आली
बारा पानी । फळा आली सोळा पानी
वर्सामासा आला पोरा (पोळा)
धावत गेला कोष्ट्याचा घरा
ओल्या सुताचा विनला दोरा
त्याच्या बनविल्या कुचाट्या
भरल्या सभेमधी दे कुचाट्यांचा झाडा
मंग जा आपल्या घरा । एक नमन गौरा
पार्वतीपते हर बोला । हरहर महादेव

दोन -

   लहानशी रिंगणी
   बैल सिंगारले
   महादेवावर होता येल

 पान पान काडे
 महादेव गेले
 येलाले लागले बैल

बेलाले लागले बेलफूल
आकाशी लागल्या चंद्रज्योती
आधी कारवाट बैलाची आरती
मंग करा बैलाच्या पोळ्याची आरती