भूमी आणि स्त्री/भूमी, सूर्य आणि सर्जन
भारताची सांस्कृतिक एकात्मता : जागतिक वैशिष्ट्ये, भूमी आणि भाकरीला नसते जात नसतो धर्म, सांस्कृतिक विकासक्रमातील 'वर्षगणना' हा महत्त्वाचा टप्पा, सर्जनासाठी वर्षनाइतकेच सूर्यबीजाला महत्त्व, महत्त्वाचे विधी, व्रते, सण, उत्सव, सूर्योपासनेची प्राचीन परंपरा, वेदकाळात कृषीचा विकास : नांगराचा उपयोग, अपागर्भ सूर्य, नांगराचा उपयोग : पुरुषप्रधान जीवन व्यवस्था समाजात रुजू लागली, सूर्याची उत्पत्ती, सूर्य अपाद, सूर्यबिंबाचे संकेत, धावा पृथ्वीचा विवाह कोल्हाने मोडला, सूर्योपासना जगभर, आपल्याकडची लावणी पीक वृद्धीसाठी, सूर्यपूजा कोणाच्यात?, खंडोबाचा षडात्रोत्सव : सटीचे नवरात्र , इळा + कोट : येळकोट, मल्हारी : विविध रूपे, वाघ्या व मुरळी, महाप्रभू चैतन्य आणि इंदिरा, लावणी आणि मुरळीची गाणी यातील साम्य : एक अंदाज, मल्लूखान मल्हारी, येळा आवस : मराठवाड्यात विशेष महत्व, आंबिलीचा मान, द्रौपदी आणि कुंती कोपीबाहेर, तेलंगणातील धुरपता आणि इळाआवसेतील प्रौपदी, मातृसत्ताक व्यवस्था ते पुरुषसत्ताक व्यवस्था : काही दुवे, चेटकीण आणि बुद्धिमान स्त्री, कर्नाटकातील करगाउत्सव, पौषातीलरविवारीसूर्यपूजन: संपूर्ण मराठवाड्यातील स्त्रियांचे व्रत, पौषातील महत्त्वाचा सण मकरसंक्रात, होळी : हुताशनी पौर्णिमा - फाल्गुनातील वसंतोत्सव , धुळवडीमागील भूमिका, होळीची राख आणि बीजातील सुफलता, होळी भारतभर साजरी होते, चैत्र: चैत्रगौर, गणगौर .... राजस्थानातली, भारतातील चैत्रपाडवा, अक्षय्य तृतीया : अक्षय्य आनंदाची ग्वाही, ऋतुचक्राशी जोडलेले उत्सव, शाकंभरी : वनशंकरी, कानबाई :लोकदेवता खानदेशची, दिवा : अग्नी सूर्यपूजेचे प्रतीक , आवदिशी कानबाई ठुमकती, ठळकपणे जाणवलेल्या गोष्टी.
भारताची सांस्कृतिक एकात्मता : जागतिक वैशिष्ट्य -
भारताचे भौगोलिकदृष्ट्या उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे. दोन भाग आहेत. दक्षिण भारतात बोलल्या जाणान्या तेलगु, तामिळ, कन्नड, मल्याळम् या चारही भाषा द्रविड भाषावंशातील असल्याने त्यांच्यात आंतरिक साम्य आहे. उत्तरेतील राजस्थानी, गुजराती, हिंदी, बंगाली, बिहारी, काश्मीरी, मराठी, उडिया, पंजाबी या भाषा एका भाषावंशातील आहेत. त्यांच्यातही आंतरिक साम्य आहे. या दोन भागांच्या मध्यावर, या दोहोंना जोडणारा महाराष्ट्र आहे.
आसाम, अरुणाचल, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, उदयाचल ही सात पूर्वेकडील अति लहान राज्ये. यांनाच 'सात बहिणी' 'सेव्हन सिस्टर्स' म्हटले जाते. यांतील आसाम व त्रिपुरा या राज्यांत बंगाली लोक फार पूर्वी गेले, त्यामुळे या दोन राज्यांच्या नागर भागात बंगाली भाषा बोलली जाते. मात्र डोंगर भागातील आदिवासी आपापली भाषा बोलतात. मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल, उदयाचल हे भाग डोंगरांचे, घनदाट झाडीचे, परस्पर संवादासाठी रस्ते नाहीत. कोणतीही विज्ञानसाधने नाहीत. प्रत्येक लोकवस्तीची भाषा वेगळी हा अपवाद सोडला तर उत्तरेत व दक्षिणेत एकेका भाषावंशातील भाषा नांदतात. दोहोंच्या मध्यावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील कर्नाटक, आंध्राच्या जवळच्या भागावर दाक्षिणात्य परंपरांचा प्रभाव आहे. तर मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांताजवळील जिल्ह्यांवर उत्तरेतील लोकपरंपरांचा प्रभाव आहे.
महाराष्ट्रावर दक्षिणेतील आंध्र, कर्नाटक, तामिळ संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे. केवळ या प्रांतातील तेलगु, कानडी, तामिळ भाषांतील अनेक शब्द, त्यांची रूपे मराठीने उचलली आहेत असे नाही, तर त्यांच्या भाषिक विशेषांमध्येही साम्य आहे. महाराष्ट्रातील अनेक संप्रदाय व देवता कर्नाटकातून आल्या आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सांस्कृतिक अनुबंधाविषयी 'मऱ्हाटी संस्कृती: काही समस्या' या ग्रंथात शं. वा. जोशी यांनी विस्ताराने चर्चा केली आहे. तामिळ आणि मराठी यांच्या परस्पर संबंधांची चर्चा करताना, त्याचप्रमाणे, तामिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक संबंधाची मीमांसा करताना श्री. विश्वनाथ खैरे यांची 'तामिळ महाराष्ट्र' व 'अडगुल मडगुल' ही २ पुस्तके दक्षिण भारतातील निरनिराळ्या भाषांचा परस्परांवर प्रभाव कसा पडला आहे, हे जाणून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जिज्ञासूंनी ती मुळातून पाहावीत असे सुचवावेसे वाटते.
"आंध्र- महाराष्ट्र सांस्कृतिक अनुबंध' या १डॉ. ताराबाई परांजपेंनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना दुर्गाबाई भागवत लिहितात, "जगाच्या कुठल्याही खंडात जा, युरोपात, अमेरिकेत कुठेही जा, भाषा बदलली की संस्कृती बदलते. म्हणजेच संस्कृतीचे मूळ भाषा असते, पण या विस्तीर्ण भूभागात तीन भिन्न भाषा असूनही संस्कृती एकरूपच आहे." (महाराष्ट्र, आध्र, कर्नाटक, तमिळनाडू हे तीन भूभाग) भारतीय संस्कृतीत भाषा 'गौण' आहे. तिच्यातील विविध प्रांतांतील लोकपरंपरांत भाषा वेगळ्या असल्या तरी चकित करणारी एकात्मता आहे. या संदर्भात दुर्गाताई स्पष्टपणे नोंदवितात की "आमच्याकडचे समाजशास्त्रज्ञ बहुशः पाश्चात्य सरणीचे समाजशास्त्र मानीत आले आहेत. त्यामुळे भाषा भिन्न असूनही संस्कृती समरूप असू शकते हे प्रमेय या तीन प्रांतांच्या आधारे अजून कुणी मांडायला धजत नाही' आणि म्हणूनच ताराबाईंनी 'अनुबंध' च्या रूपाने योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे असे त्यांना वाटते. डॉ. ताराबाईचे हे पाऊल किती योग्य दिशेने आहे याची जाणीव भूमीच्या सुफलनशक्तीच्या वाढीशी जोडलेल्या विधी, सण, उत्सव, व्रते आदींचा अभ्यास करताना सतत होत राहते. महाराष्ट्रातील, कर्नाटकातील चैत्रीगौर तृतीयेला विराजमान होते तर राजस्थानातली चैत्रगौर चैत्रतृतीयेला विसर्जित होते. त्यामागील हेतूही समान आहेत. चैत्रातील विधी, उत्सवांच्या चर्चेच्या वेळी त्यांचा साकल्याने विचार होईलच.
भूमी आणि भाकरीला नसते जात नसतो धर्म -
गेल्या हजारो वर्षांपासून भारतात, संस्कृति प्रधान असून भाषा गौण आहे. समन्वय हा या संस्कृतीचा आत्मा आहे. या दोनही भागांत... उत्तर दक्षिण भारतात भाषिक वेगळेपणा असला तरी लोकपरंपरांत अंगभूत सारखेपणा... साम्य आहे. या देशावर हजारो वर्षांपासून अनेक टोळ्यांनी आक्रमण केले. द्रविड, पणिन, दास, दस्यू, आर्य, शक, हूण, कुशाण... अनेक. गेल्या हजार वर्षांत मुस्लिम, ख्रिस्ती आले. परंतु आलेले समाज या भूभागातच स्थिरावले. या भूभागातील नैसर्गिक समृद्धी हे यामागचे कारण आहे. तसेच भारताच्या तीन बाजूंनी विशाल सागर आणि उत्तरेकडे पूर्वपश्चिम पसरलेल्या उत्तुंग हिमालयाच्या घनदाट रांगा, या सीमा पार करणे आलेल्या टोळ्यांना दुरापास्त होते. या नैसर्गिक एकसंधतेमुळे या भूमीत स्थिरावलेल्या टोळ्यांतील संघर्ष, स्वीकृती, समन्वय, समरसता यातून सातत्याने सुरू असलेल्या नवस्वीकृती (Agglomeration) प्रक्रियेतून सांस्कृतिक एकात्मता निर्माण झाली. इस्लाम, ख्रिश्चन लोक आपला धर्म घेऊन भारतात स्थिरावले. त्यांनी आपले धार्मिक आणि सांस्कृतिक वेगळेपण टिकविण्याचा सतत प्रयत्न केला. तरीही ही माणसे मुळची इथलीच. त्यामुळे येथील लोक परंपरेचा स्वीकार अपवादाने केला. उदा. मराठवाड्यावर निझामाचे राज्य शेकडो वर्षे होते. येथील काही जिल्ह्यांत मार्गशीर्ष अमावास्येला 'इळाआवस' साजरी होते, ती शेतीची पूजा असते. जमिनीची सुफलनशक्ती वाढावी. यासाठीचा हा विधी मुस्लिम शेतकरीही पाळतात. भूमी आणि भाकरीला नसतो धर्म आणि नसते जात.
सांस्कृतिक विकासक्रमातील 'वर्षगणना' हा महत्त्वाचा टप्पा -
भारतीय विधी, व्रते, सण, उत्सव निसर्ग नियमांशी, ऋतुचक्राशी जोडलेले आहेत. उत्तरभारतात महिन्याची सुरुवात पौर्णिमेनंतरच्या कृष्णप्रतिपदेपासून सुरू होते. महिन्याचा शेवटचा दिवस पौर्णिमा असतो. दक्षिण भारतात-महाराष्ट्रात महिन्यांची सुरुवात अमावास्येनंतरच्या शुद्धप्रतिपदेपासून होते. शेवटचा दिवस अमावास्या हा असतो. मानवाच्या सांस्कृतिक विकासात वर्षगणना हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. वर्षाचे सर्वसाधारणपणे दोन भाग पाडले जातात. एक उत्तरायण आणि दुसरा दक्षिणायन. आषाढ महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो. तेव्हापासून दक्षिणायन सुरू होते. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हापासून उत्तरायण सुरू होते. गीतेते म्हटले आहे. 'मासानां मार्गशीर्षोहम् ' बारा महिन्यांत श्रेष्ठ पवित्र मार्गशीर्ष महिना. पाऊसकाळ संपतो. थंडीला सुरुवात होते. महाभारत काळात मार्गशीर्ष महिना पहिला धरून वर्ष मोजण्याची प्रथा असावी. मार्गशीर्ष प्रतिपदेस देवदिवाळी असते. पौषात उत्तरायण सुरू होते.
सर्जनासाठी वर्षनाइतकेच सूर्यबीजाला महत्त्व -
जमिनीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी केले जाणारे विधी, व्रते, सण, उत्सवांचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, जमिनीची सुफलनशक्ती वाढण्यास सूर्याचीही मदत होते. सूर्याला बीजस्वरूप मानले आहे. सर्जनासाठी पाऊस जसा महत्त्वाचा तसेच सूर्याची ऊर्जाही महत्त्वाची. सूर्य आणि भूमी यांच्या समागमातून वाढणाऱ्या उर्वराशक्तीशी जोडलेले विधी, सण, व्रते, उत्सव हे मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख याकाळात येतात. मराठवाड्यात विशेषत्वाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या काळातील महत्त्वाचे विधी, व्रते, सण, उत्सव आणि तत्संबंधी गाण्यांचा विचार या प्रकरणात केला आहे.
महत्त्वाचे विधी, व्रते, सण, उत्सव -
१.खंडोबा ऊर्फ मार्तंडभैरवाचा षड्रसोत्सव, २.नागदिवे पूजन, ३.पौषी रविवारी केली जाणारी आदित्य राणूबाईची पूजा, ४. संक्रान्त, ५. रथसप्तमी - रथाधिष्ठित सूर्यपूजा, ६. होळी, ७. वसंत पंचमी, ८.रंगपंचमी, ९, इळा आवस, १०. शाकंभरी देवीचे नवरात्र - पौषी पौर्णिमेस समाप्ती, ११. चैत्री तृतीया - गौर मांडणी, १२. अक्षय्यतृतीया, १३. कानबाईची पूजा.
सूर्योपासनेची प्राचीन परंपरा -
या विधी-व्रतांचा मागोवा घेण्यापूर्वी या काळातील मुख्य देवता 'सूर्य' हिचा सांस्कृतिक प्रवास पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, भूमी आणि सूर्य यांच्यातील नात्याबाबत लोकमनात आणि लोक परंपरात असलेल्या प्रतिमा, संकल्पना, पाहाव्या लागतील.
सूर्य या देवतेची उपासना प्राचीन काळापासून भारतात केली जाते. ऋग्वेदात सूर्याची अनेक सूक्ते आहेत. सूर्योपासना हे वैदिकांचे नित्यकर्म होते. पुराणातील सप्तमी व्रते सूर्याचीच आहेत. त्यातही माघ शुद्ध सप्तमी, रथसप्तमी अत्यंत महत्त्वाची. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे जमीन भाजून निघते. तिच्यातील सुफलनशक्ती आणि पाणी साठवून ठेवण्याची क्षमता त्यामुळे वाढते. याची जाण कृषिजीवी समाजाला होती.
वेदकाळात कृषीचा विकास : नांगराचा उपयोग -
ऋग्वेदाचा अंतकाळ आणि यजुर्वेदकाळ यात शेतीची प्रगती होऊ लागली. अर्थववेद काळात तिचा विकास झाला. वर्षाऋतूत पेरलेले धान्य हिवाळ्यात हाती येते. तर हिवाळ्यात पेरलेले यव उन्हाळ्यात हाती येतात असे सांगणारे संदर्भ ब्राह्मणग्रंथात मिळतात. शतपथ ब्राह्मणात नांगरणी पेरणी, कापणी, झोडपणी या शेतीच्या क्रियांचे वर्णन केलेले आहे.
" हे राजा, हे राज्य तुला शेतीकरिता (ऋश्चै), सर्वांच्या हिताकरिता (क्षेमाय), पोषणाकरिता (पोषाय) दिले आहे. कारण अन्न म्हणजे कृषि (अन्नम् वै कृषिः)" असे वचन शतपथ ब्राह्मणात आहे (७/२-२-६) गाईचे शेण महत्त्वाचे खत असल्याचे लोक जाणत होते. या शेणामुळे पृथ्वीला रस प्राप्त होतो असा संदर्भ मिळतो.
'तदस्या एवैनमेतत् पृथ्विव्ये रसेव समर्घयति । तस्मादा खुकरिषम् संभरति पुरुष्यं इति । पुष्टीः पशवः ।' अशी वचने शतपथ ब्राह्मणात आहेत. उपनिषदात आत्मा अन्नमय आहे. अन्नाची निंदा करू नये अशी वचने सापडतात. ऋग्वेदात यवाचा उल्लेख आहे परंतु तांदळाचा नाही. ब्राह्मणकाळात 'शस्यम्'चे तांदळाचे संदर्भ आहेत. अथर्ववेदात प्रथिरैन्याने नांगर शोधल्याचा उल्लेख आहे. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांनीही शेतीत योगदान दिले. मात्र चक्र आणि नांगर यांचा वापर सुरू झाल्यापासून स्त्रियांचे शेती या व्यवसायातील महत्त्व कमी कमी होत गेले असावे असे वाटते. मुदगलानी या स्त्रीने स्वतःला जुंपून नांगर चालवला होता. लोपामुद्रेने अगस्ती ऋषींच्या हातात फावडे देऊन शेतात काम करण्यास प्रवृत्त केले होते. वैदिकादी गोपालक टोळ्या आणि द्रविडादी गणसत्ताक कृषिजीवी टोळ्या यांचा संकर होताना कृषि आणि पशुपालन हे दोनही व्यवसाय एकमेकांना पूरक झाले असावेत.बीजाच्या महत्त्वाची जाणीव लोकमानसात रुजली. 'लिंगपूजेत' बीजाच्या स्वयंभू महत्त्वाचे भान लोकांना नव्हते. परंतु सूर्यपूजेच्या रूपाने ते आले. बीज रुजण्यासाठी खोलात पडावे लागते. तेथे रुजावे लागते. सूर्याची उष्णता जमिनीत रुजते. किरणांच्या रूपाने सूर्य बीजरूपाने धरणीच्या गर्भाला चेतना देतो अशी श्रद्धा लोकमानसात निर्माण झाली.
अपागर्भ सूर्य -
सूर्य हा जलाचा फार मोठा साठा आहे. ही कल्पना फार प्राचीन आहे. "आप : सूर्ये समाहितकाः" (तैत्तिरीय अरण्यक, १.८.१) सूर्य हा धन्वन्तरी असून त्याचे बिंब हा त्याचा कलश आहे. सूर्य कलशातून बाहेर पडणाऱ्या जलात औषधीगुण असतात व त्याने रोग नष्ट होतात ही कल्पना फार प्राचीन आहे. सूर्याचा डोळा वर्षनशील जळाने परिपूर्ण आहे. २'सूर्यस्य चक्षू रजसैत्यावृत्तम्' (ऋ. १.१६४.१४) याचाच अर्थ असा की पृथ्वीवर अभिषिक्त होणारे वृष्टिजल हे सूर्यमंडलातून येते. या वृष्टिजलाने भूमी सुपीक होते. सूर्याला 'अपागर्भ' म्हटले आहे. (१:१६.४.५२) सायनाचार्य याचा अर्थ 'वृष्ट्युदकांना गर्भवदुत्पादकम्' असा देतात. सूर्य आपल्या स्वनिष्ठ प्रभावाने पृथ्वीला फळवितो. तिच्या ठायी बीजारोपण करतो. तिला प्रसवोन्मुख करतो. सूर्य सरस्वान् आहे. तो 'स-रस' आहे. सूर्य आणि जल यांचा निकटचा संबंध वैदिक कल्पनात रुढ होता.
नांगराचा उपयोग : पुरुषप्रधान जीवन व्यवस्था समाजात रुजू लागली -
प्राथमिक कृषिजीवी समाज मातृसत्ताक होता. शेती हाताने, कुदळ फावडे आदींच्या साहाय्याने केली जाई. शेती स्त्रिया करीत. समूहाने एकत्र येऊन एकमेकींच्या शेताला त्या सुफलित करीत असाव्यात. वर्षनाचे एक महत्त्वाचे कारण सूर्य आहे. तो बीजस्वरूपी आहे याचे भान समाजाला आले असावे आणि सूर्यपूजा भूमीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी केली जाऊ लागली असावी. पूर्ववैदिकांनी कृषिकला स्वीकारली. उत्तरोत्तर त्यात नांगराचा प्रभाव वाढला. पुरुष केन्द्री समाजव्यवस्था होऊ लागली. 'मला माझ्या आईचे नाव माहीत आहे, बापाचे नाही' असे सांगणाऱ्या सत्यकामाची परंपरा संपली. पित्याचे नाव आणि कोणत्या कुळात जन्म या बाबींना महत्त्व आले. 'दैवायत्तंकुले जन्मः मदायत्तंतु पौरुषम्' असे अभिमानाने सांगणारा कर्ण 'सूर्य पुत्र' मानला गेला. तेजस्विता आणि पौरुष यांच्यातील अनुबंध अधिक कडवा आणि स्वयंभू झाला.
मार्गशीर्ष ते वैशाख या काळातील स्त्रीव्रतांचे शोधन केल्यानंतर असे लक्षात येते की या व्रतात सूर्याची प्रत्यक्ष उपस्थिती आहे. भूमीवर्षन आणि सर्जन यांच्यातील अनुबंधातून आविष्कृत झालेली व्रते, सण, विधी, यांत 'भूमी' महत्त्वाची आहे. तिच्याबरोबर असलेला भुलोबा, भांगलोबा, वा शिव हा अध्याहृत आहे. पौष महिन्यात प्रत्येक रविवारी सूर्योदय होण्यापूर्वी स्त्रिया स्नान करतात. पाटावर सूर्याची आकृती काढून उपवास करतात. सूर्योदयानंतर केस विंचरीत नाहीत. रथसप्तमीला सूर्यपूजा करतात. संक्रान्तीलाही सूर्यपूजा केली जाते.
भूमीची सुफलनशक्ती वाढण्यासाठी वर्षनाइतकेच सूर्याच्या उष्णेतचे महत्त्वं असते. किंबहुना वर्षनाचे सामर्थ्य सूर्यात असते. जमिनीवरचे पाणी तो किरणांच्या माध्यमातून स्वतःत गोळा करतो. ते पाणी सूर्यगोलकात गेल्यावर त्यात अमृताची शक्ती येते. मार्गशीर्ष ते पौष या काळातील महत्त्वाच्या व्रतांत सूर्यपूजा ही केन्द्रस्थानी आहे. त्यांचा परामर्ष होताना त्याची सखोल चर्चा होईल. तत्पूर्वी सूर्याविषयीच्या विविध कल्पना जाणून घेणे महत्त्वाचे वाटते.
सूर्याची उत्पत्ती -
सूर्याला सविता, विवस्वान्, पूषा अशी अनेक नावे आहेत. अथर्ववेदात त्याला सात नावे असून ती सूर्याच्या सात किरणांची आहेत. महाभारतात सूर्याची बारा नावे आहेत.या नावांवरून सूर्यनमस्कार घातले जातात. सूर्याच्या उत्पत्तीविषयी भिन्नभिन्न प्रकारच्या कल्पना आढळतात.
१. तो इंद्राचा पुत्र आहे (ऋ. १०.१९०.३) पौराणिक साहित्यात तो कश्यप आणि आदितीचा कनिष्ठ पुत्र आहे. तो अवयवरहित जन्मला म्हणून मार्तंड ही संज्ञा त्याला मिळाली.
सूर्याचे रूपगुण वर्णन करताना सूर्यास आकाशाचा अलंकार म्हटले आहे. उषाही त्याचा मार्ग मोकळा करून देते. त्याच्या रथाला सात घोडे असतात. सूर्याने द्युलोक सावरून धरला आहे. सूर्य हे देवाचे सुंदर मुख आहे. तो मित्र, वरुण, अग्नी३ यांचा डोळा आहे. मराठीत एक म्हण आहे. 'जे न देखे रवि ते देखे कवी' रवि म्हणजे सूर्य तो विश्वदर्शन करणारा असतो. मनुष्याची बरीवाईट कृत्ये त्याला दिसतात. सूर्य धन्वंतरी आहे. तोमानवाच्या व्याधी दूर करतो.तो विश्वकर्ता, देवांचा पुरोहित आहे. तो स्वर्णनेत्र, स्वर्णहस्त, स्वर्णभुज (ऋ. १.१३५.६.७१) आहे. तो रक्तवेषधारी आहे. त्याचा रथ सोन्याचा असून दोन प्रकाशमान घोडे तो रथ ओढतात. तो पृथ्वी आणि आकाश यांना प्रकाशमय करतो.
या संदर्भात लोकपरंपरांच्या चिकित्सक अभ्यासक दुर्गा भागवत म्हणतात, ४सूर्य दैवतकथा वेदात उपलब्ध नाहीत. त्याची बारा नावे व काही उल्लेख मिळतात. विस्तृत कथा मिळत नाही. मात्र उत्तर काळात सूर्याच्या अपंगपणाच्या अनेक दैवतकथा उपलब्ध आहेत. परंपरांचेही विश्लेषण सापडते.
सूर्य अपाद -
पुराणात काही कथा सापडतात पण त्या त्रोटक आहेत. त्या अशा -
१. सूर्याची भार्या संज्ञा ही विश्वकर्म्याची मुलगी. तिला सूर्याचे तेज असह्य झाले म्हणून ती निघून गेली. सूर्य तिला शोधायला निघाला. ती त्याला घोडीच्या स्वरूपात दिसली. सूर्याने अश्वरूप घेऊन तिच्या नाकपुडीतून संभोग केला. त्यातून आश्विनीकुमार पुत्र झाले. (हरिवंश ब. ९)
२. त्वष्ट्याने सूर्याला रंध्याने घासून स्वच्छ केले. सुंदर केले पण पाय तेवढे घासायचे राहिले. त्यामुळे तो लंगडा राहिला. सूर्य लंगडा असल्याचा उल्लेख ऋग्वेदात मिळतो. (१.२४.८) (भविष्य पु. ब्राह्मपूर्व ७९.८४) त्यावरून वरील कथा तयार झाली असावी. संपूर्ण सूर्यपरिवार लंगडा आहे. शनी, अरुण, यम इ.
सूर्यबिंबाचे संकेत -
प्राचीन वाङ्मयात सूर्य हा एक पक्षी आहे. तो आकाशाच्या या सीमेपासून त्या सीमेपर्यंत उडतो ही कल्पना ऋग्वेदापासून ते पुराणापर्यंत आढळते. सूर्याचे किरण म्हणजे उडणारे पक्षी. याच कल्पनेतून पुढे सूर्यदेवता गायत्री ही पक्षिणी मानली गेली. मात्र ऋग्वेदात आणि नंतरच्या यज्ञीय परंपरेत सूर्याला वैश्विक अश्व मानले गेले. उषा पूर्वेकडून येताना सुंदर अश्व (सूर्य) घेऊन येते असे ऋग्वेदात म्हटले आहे. अश्व याचा अर्थ सर्वव्यापी. सर्वव्यापी अशा प्रकाशवृक्षाचे मूळ म्हणजे सूर्य. सूर्यबिंबात देव राहतात. ते मधाचे आगार आहे. सकाळी यज्ञात आहुती दिली तर देव किरणांतून यज्ञात येतात अशी कल्पना आहे. पुण्यशील मृतांचे आत्मे सूर्यात राहतात असे मानले जाते. त्याबाबत डॉ. स. अ. डांगे लिहितात, 'नियमन करणाऱ्या सूर्याचा आविष्कार म्हणजे यम, तो प्राणांचे नियमन करतो. त्याचे पाश म्हणजे सूर्य किरणे. यम हा सत्यवानाचे प्राण या सूर्यपाशांनी ग्रहण करतो, पण सूर्याची शक्ती असलेली सावित्री त्याला सोडवते. सावित्री सूर्याच्या अर्जनका रूपाची शक्ती होय. सूर्याची उपासना केल्यामुळे ती अश्वपतीची कन्या म्हणून भूमीवर आली असे महाभारत सांगते.
सर्व प्राणिमात्रांना सूर्यापासून चैतन्य मिळते. पर्जन्यवृष्टी करणारा तो. अग्नीला दिलेली आहुती त्याला मिळते. त्यामुळे तो प्रसन्न होऊन वृष्टी करतो व त्यातून अन्न मिळते. अन्नामुळे प्रजा निर्माण होते असे मनुस्मृती सांगते. रविवार हा सूर्याचा वार मानतात. नागर ब्राह्मणात वधू विवाहापूर्वी ७ दिवस सूर्यपूजा करते. राजस्थानात सूर्याचे महत्त्व खूप.बाळंतीण प्रथम सूर्य पूजा करून मग विटाळ फिटतो. हिमालयाच्या पायथ्याशी मार्गशीर्ष पौषात सूर्यपूजा करतात.
द्यावा पृथ्वीचा विवाह५ कोल्ह्याने मोडला -
ऋग्वेदाच्या काही सूक्तांत पृथ्वी आकाश यांना पतिपत्नी मानले आहे. 'द्यावापृथ्वी' चा विवाह ठरला. संपूर्ण तयारी झाली. परंतु कोल्ह्याने चलाखी करून हा विवाह मोडला पण त्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. कारण द्यावीपृथ्वी एक झाले असते तर सगळे जीव, निसर्ग त्यात चेमटून नष्ट झाले असते.
मानवाने प्रथम देवत्व कल्पिले ते स्त्रीरूपात - सर्जनाची गहन गूढ शक्ती धारण करणाऱ्या देवी रूपात. मातृदेवताही मानवी संस्कृतीच्या इतिहासातील 'आद्यशक्ती' आहे. तसेच सूर्योपासना ही मानवाच्या सांस्कृतिक विकासास सुरुवात झाली तेव्हापासूनची आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील बहुतेक देशांतील लोक सूर्यपूजक होते.
सूर्योपासना जगभर -
असिरिया व बाबिलोन या प्राचीन देशांत सूर्योपासना होती. बाबिलोन येथे सूर्यमंदिर सापडले आहे. फिनिशियन (पणीन् ) सूर्यपूजा करीत. इराणी लोक सूर्याला ६मिथ्रास (मित्र) या नावाने ओळखत. या मिथ्राबरोबर रश्न आणि नर्शेफ हे पार्श्वचर असत. मिथ्र धर्मीय इराणी भारतात आले. आल्यावर रश्नची राणी झाली. भारतीय लोक धर्मात ती रानूबाई-रांदल, राणूबाई या नावाने पूजली जाते. अलेक्झांडरच्या स्वारीचे वेळी, मूळचे मिडायतले लोक इराणातून भारतात आले. ते सूर्य आणि अग्नी यांचे उपासक होते. त्यांना मग ब्राह्मण म्हणत. शककुशाणांच्या काळातही एक लाट भारतात आली. काश्मीरात पहिले ठाणे उभारले. नंतर पंजाबात मुलतान, पूर्वकिनाऱ्यावर कोणार्क, मध्यभारतात काल्पी येथे सूर्य मंदिरे बांधली. वराहमिहिर हा मगब्राह्मण होता. सूर्यमंदिराचे पुजारी हे मगब्राह्मण असत. तसा दंडक बृहत्संहितेत वराहमिहिराने घालून दिला आहे. सूर्यपूजेशी निगडित 'राज्ञीस्नापन' हे व्रत काश्मीरात पाळले जाते. भूमी ही सूर्यपत्नी आहे अशी समजूत तेथील स्त्रियांची आहे. चैत्र किंवा फाल्गुनातल्या कृष्णपंचमीपासून ते अष्टमीपर्यन्त ती रजस्वला असते. अष्टमीला भूमी सारवून तिथे फुले वाहतात.
यादव काळात सूर्योपासनेचा प्रसार महाराष्ट्रात झाला. सिरिया इजिप्त या देशात सूर्योपासना होती. जपानमध्ये सूर्योपासना होती. मात्र तेथील सूर्य स्त्रीरूपात आहे. बौद्ध धर्म जपानमध्ये स्थिर होण्यापूर्वी तेथे शिंतोधर्म होता. जपानच्या राजघराण्याचे कुलदैवत सवितादेवी होते. अरुणाचल आदिवासींमधील तागीन जनजाती जी ७अरुणाचलाच्या अगदी वरच्या कोपऱ्यात राहते. त्यांच्यातील सर्वात महत्त्वाचा सण सिदोनी (Sidoni). हा उत्सव अलीकडे ठरवून २ ते ५ जानेवारी होतो. येथे दोनी म्हणजे सूर्य. ती आई-माता आहे आणि सी म्हणजे जमीन. सिदोनीला वेगळे व्हायचे होते. निसर्गाने त्यासाठी १० दिवसांचे व्रत सांगितले. निसर्गाची प्रार्थना सांगितली. लबाड 'तपेन' वटवाघळ याने दोनीला व्रत मोडायला लावले आणि त्यामुळे दोनीला निदोचे - आभाळाचे रूप प्राप्त झाले. या जमातीत 'न्योकुम' ही धरतीची पूजा केली जाते. या सणात सात वनस्पतींची पूजा केली जाते. पोलो म्हणजे चंद्र. तो पुरुष पिता असतो. तर दोनी - सूर्य ही आई. भारतातील ईशान्येकडील जनजातींची ठेवण ही खूपशी म्यानमार-ब्रह्मी लोकांसारखी आहे. त्या पलीकडे गेले की चीन, जपान दोन्ही देशांत बौद्धधर्म स्थिरावला आहे.
या ठिकाणी इ.स. ६०० ते ६४० या दरम्यान होऊन गेलेल्या कनोजच्या हर्षवर्धनाची आठवण येते. तो बौद्ध होता. तरीही गौरी, महेश्वर आणि सूर्य यांची उपसना करीत असे. अरुणाचलातील या जनजाती हिंदू नाहीत वा ख्रिश्चन नाहीत. परंतु त्यांची पूजा पद्धती भारतीय संस्कृतीशी मिळती आहे. धरतीच्या पूजेचे वेळी मिथुन प्राणी मारतात. ती मादी असेल तर तिचे दूध काढीत नाहीत. बळीसाठी मादी चालते.
आपल्याकडची लावणी पीक वृद्धीसाठी -
एकूण असे लक्षात येते की प्राथमिक कृषि व्यवस्थेच्या काळातील व्रते, विधी हे धरती आणि वृष्टी यांच्याशी निगडित होते. शेतीचा जसजसा विकास होऊ लागला, बीजाचे महत्त्व लक्षात आले. त्यानंतर व्रतांमध्ये सण... उत्सवामध्ये 'सूर्य' या देवतेला विशेष स्थान मिळाले. व्रतांमधील सामूहिकता, नृत्यात्मकता कमी होत गेली. या ठिकाणी दुर्गा भागवतांचे विधान आठवते' आसमामधील नागानृत्ये, दक्षिणेतील यक्षगान ही शिवपार्वती वा ८प्रकृतीपुरुषाच्या लीलांची रूपकात्मक अनुकरणे असून त्यांचा उद्देश या दैवी उपायांनी शेतीभातीची निर्मिती क्षमता कायम राखणे हेच आहे. अर्थात कालौघात हे प्रकार प्रगल्भ झाल्यामुळे त्यांना स्वतंत्र आस्तित्व आले. आपल्याकडच्या लावण्या या मूळ पिकांची वृद्धी होण्यासाठी केलेली अभिचार गीतेच व नृत्येच आहेत यात शंका नाही."
सूर्यपूजा कोणाच्यात? -
पशुपालन, शिकार हे ज्यांचे आदिम व्यवसाय होते त्यांच्यात सूर्योपासना असेल का ? पेरु देशात खूप सूर्य मंदिरे आहेत. रेड इंडियन सूर्योपासक होते. पहिली शिकार सूर्याला अर्पण केली जाई. मोहंजोदडोत स्वस्तिक, चक्र, किरणयुक्त वर्तुळ, डोळा आणि पक्षी ही प्रतीके आढळली. ती वेदांत सूर्याचे प्रतीक मानली आहेत. महाभारतात सूर्यपूजा आहे. युधिष्ठिर सूर्यपूजक होता. प्रा. र. रा. गोसावींच्या मते ग्रीक, शक, कुशाणांच्या स्वाऱ्या वायव्येकडून झाल्या. या काळात सूर्योपासनेला प्रेरणा मिळाली. मात्र वैदिक परंपरांतून चालत आलेल्या मूळ भारतीय सूर्योपासनेवर परकीय संस्कृतीतील सूर्योपासनेचा काही प्रभाव पडला नसेल असे म्हणता येणार नाही. कनिष्काच्या नाण्यावरील सूर्यदेवतेच्या पायांचा गुडघ्यापर्यन्तचा भाग बुटांनी झाकलेला आहे.
यावरून असे लक्षात येते की वैदिकांच्या दैनंदिन उपासनेतील सूर्यपूजा उत्तरोत्तर भारतभर पसरली. सौर संप्रदायही निर्माण झाला. ही सूर्यपूजा लोकपरंपरेने जमिनीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी केल्या जाणाऱ्या व्रतांत सहजपणे स्वीकारली. ही देवता अशी आहे की जी वैदिकांच्या नित्यकर्माचा एक भाग होती. परकीय आक्रमणांतून शक, कुशाण, इराण, रोम येथून आलेल्या टोळ्याही सूर्योपासक होत्या. सूर्यपूजा भारतभर रुढ झाली. भारतातील लोकसंस्कृतीनेही तिचा सुरुवातीपासून स्वीकार केला. 'सूर्य' देवतेच्या या वेगळेपणामुळे, लोकदैवतांच्या प्रकरणात या देवतेच्या स्वरूपाची चर्चा न करता, 'सूर्य : भूमी आणि सर्जन ' या प्रकरणात ती विस्तृतपणे केली आहे.
खंडोबाचा षड्रात्रोत्सव : सटीचे नवरात्र -
सटीचे नवरात्र मराठवाड्यातील सर्व जातिजमातींच्या अनेक घरांतून कुळाचार म्हणून पाळले जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यन्त हे नवरात्र बसते. हे सटीचे नवरात्र म्हणजेच जेजुरीच्या खंडोबाचा षड्रात्रोत्सव. खंडोबाची मराठवाड्यातील महत्त्वाची ठाणी अशी. नळदुर्ग व अणदूर (धाराशीव), सातारे (औरंगाबाद), साडेगाव (औरंगाबाद), मालेगाव (नांदेड), पाली (बीड). हे दैवत धनगर, हटकर, गवळी, गुरव, मांग, ब्राह्मण, कुणबी आदी सर्व जातिजमातीत पूजिले जाते. खंडोबाचे मूळ नवरात्र सटीचे असले तरी चैत्र, पौष आणि माघ या तीन महिन्यांतील शुद्ध १२ ते वद्य १ असे प्रत्येकी ५ दिवस या दैवताची आराधना केली जाते. खंडोबा ही सकाम भक्तीची देवता असल्याने विविध तऱ्हेने नवस बोलले जात आणि आजही बोलले जातात. त्या नवसाच्या परिपूर्तीनंतर मुलगा वा मुलगी देवास वाहणे, दर्शनासाठी खेटे घालणे, कावडी (पाण्याच्या) घालणे, जागरण, तळी भरणे-उचलणे, दही भाताची पूजा बांधणे, लंगर तोडणे, देवाच्या नावाने 'वारी' (भीक) मागणे, वास्तू (देवळाची दीपमाळ वा ओवरी) उभारणे, बगाड गळ मानेस वा कमरेस टोचून लाकडाला टांगून घेऊन प्रदक्षिणा घालणे, पेटत्या विस्तवावरून चालणे इत्यादी आचार केले जातात. गेल्या काही वर्षांपासून मुरळी सोडण्यास शासनाने बंदी घातली आहे कारण या मुरळ्यांना नंतर वाममार्गास लावले जाते. पूजा बांधताना 'खंडोबाचा येळकोट' सदानंदाचा येळकोट' असा गजर केला जातो. खंडोबाचे विविधतेतून एकात्म झालेले रूप अभ्यासकांपुढे प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
इळा + कोट : येळकोट -
हे नवरात्र आश्विन नवरात्राप्रमाणेच भूमीच्या सुफलनशक्तीच्या वाढीशी जोडलेले आहे. या षडरात्रोत्सवातही घट मांडले जातात. 'येळकोट'ची व्युत्पत्ती, इळा + कोट. इळा म्हणजे पृथ्वी, कोट म्हणजे पूर्णपात्र, भरपूर. पृथ्वी म्हणजेच इळा सुफलित होऊन जगरूपी कोठार अन्नधान्याने भरुन जाऊ दे ही शुभकामना या षड्रात्रोत्सवामागे आहे असे वाटते. या संदर्भात रा. चिं. ढेरे यांच्या लोकदैवतांचे विश्व या ग्रंथातील 'महाराष्ट्राची श्रद्धा केंद्रे' या लेखात ते लिहतिात, 'शिवशक्तीचा थोरला मुलगा ९स्कंद कार्तिकेय. महाराष्ट्राचा लोकदेव खंडोबा तो स्कंदच अशी आपली समजूत आहे. जुन्या काळी स्कंदाचा उत्सव ज्या दिवशी होत असे, त्या दिवसाला मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला 'स्कंदषष्ठी' असे नाव होते. त्याच दिवशी खंडोबाचा उत्सव होतो. आज आपण तो दिवस 'चंपाषष्ठी' या नावाने ओळखतो. स्कंदाला दक्षिणेत देवसेना व वल्ली अशा दोन बायका मानल्या आहेत. खंडोबाला म्हाळसा आणि बाणाई या दोन बायका आहेतच."
मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा संहार करण्यासाठी शिवाने जो अवतार धारण केला तोच मल्हारी म्हणजे खंडोबा होय. अशी कथा 'मल्हारी माहात्म्य' या ग्रंथात आहे. 'येळकोट' च्या व्युत्पत्तीबद्दल रा. चिं. ढेरे लिहितात, "मल्हारीचे सैन्य सात कोटी होते. सात या संख्येला कानडीत 'येळ'म्हणतात. हा देव मूळचा कर्नाटकताला असल्याने त्याच्या सात कोटी सैन्याचा जयजयकार 'येळकोट' या कानडी शब्दाने केला जातो."
खंडोबा ही वीर देवता आहे. घोड्यावर आरुढ होऊन हातात 'खंडा' घेऊन असुरांमागे धावणारा देव महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेस रक्षणकर्ता वाटतो. खंडोबाचा 'वार' रविवार आहे. त्याच्या नावाने उधळला जाणारा 'भंडारा' म्हणजे पिवळी धम्मक हळद. मुरळी पिवळे वस्त्र परिधान करून कपाळाला भंडारा लावून विशिष्ट पद्धतीने गिरक्या घेत नाचते. मल्लारीचे मल्हारी होते आणि त्याला 'मार्तंड' ची जोड मिळते. 'हरी आणि विठ्ठल' एकरूप झाले तद्वत 'मल्हारीमार्तंड'एक झाले. आणि मार्तंड हे सूर्याचे नाव असल्याचे भारतीय संस्कृतिकोश - खंड दहा - सूर्योपासना या टिपणात नमूद केले आहे. प्रा. र. रा. गोसावी यांच्या मते ऋग्वेदात आदित्य संघातील आणि सौरसंघातील देवता ऐकमेकांच्या संघात विलीन झाल्याचे दिसून येते. दोनही संघात समान असणारे 'तेज' हे तत्त्व या मागील कारण असावे. कश्यप प्रजापतीची पत्नी अदिती हिच्या आठ पुत्रांपैकी 'मार्तड' हा एक आहे.
मल्हारी : विविध रूपे -
खंडोबाला मल्हारी, मैराळ, मैलार, मार्तंड भैरव, मल्हारी मार्तड, खंडेराय अशी अनेक नावे आहेत. या देवाला वांग्याचे, कांदा लसूण घालून केलेले भरीत, बाजरी वा कणकेचे रोडगे विशेष करून आवडतात, पुरणावरणाचा नैवेद्यही प्रिय आहे. खंडोबाला दवणा आणि भंडारा प्रिय आहे. याच्या चार हातांत खडग, त्रिशूल, डमरु व रक्त गळणाऱ्या मुंडक्यासह पानपत्र अशा चार वस्तू असतात. हे दैवत कर्नाटकातून महाराष्ट्रात आले असावे. या दैवताला प्रसन्न करून घेण्यासाठी अघोरी उपाय करण्याची प्रथा आहे. ही वीरांची देवता आहे. शेती करणाऱ्यांची, पशुपालन करणाऱ्या धनगरांची, कोळी समाजाची ही देवता आहे. ही देवता शिवाचेच एकरूप आहे असे म्हटले जाते. जेजुरीचा खंडोबा शंकराचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय ऊर्फ स्कंद याचे रूप आहे असे मानले जाते. स्कंधाचे अपभ्रंश रूप खंडोबा असे वि. का. राजवाडे म्हणतात. हा ११ देवांचा सेनापती होता. त्यामुळे तो 'वीरदेव' आहे. महाराष्ट्रातील खंडोबा तामिळनाडूतील सुब्रह्मण्याचा'१० अवतार आहे असेही मानले जाते. खंडोबाच्या देवळात नंदी, घोडा, कुत्रा यांना महत्त्व असते. खंडोबाला तीन बायका आहेत. म्हाळसा ही प्रथम पत्नी. ती वाणी समाजाची आहे. बानू ऊर्फ बाणाई ही धनगर कन्या आहे तर पालाई ही गवळण आहे. या दैवताची भक्ती आंध्र, कर्नाटक, तामिळनाडूत काही प्रमाणावर चालते. खंडोबाची तांदाळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तीनही रूपांत पूजा होते.
वाघ्या व मुरळी -
या देवाच्या नावाने भीक मागतात. या भीक मागण्याला 'मल्लुखानाची गदा' असा पारिभाषिक शब्द आहे. हा शब्द मुस्लिम आहे. भक्त देवासमोर जातांना घोंगडीची कफनी, गळ्यात कवड्यांची माळ, हातात पोत घेऊन देवासमोर नाचत भंडारा उधळतात, कुत्र्याप्रमाणे भुंकतात. चांगभले - येळकोट - एळकोट मल्हार असा घोष करतात. विवाह, जावळ काढणे या निमित्ताने जागरण केले जाते. रात्री वाध्या मुरळी नाचून गाणी म्हणतात.
वाघ्याच्या गळ्यात व्याघ्रचर्माची भंडाऱ्याने भरलेली पिशवी अडकवलेली असते, खांद्यावर घोंगडी टाकलेली असते हातात घोळ (लहान घंट्यांचा जोड) असतो. गाणी म्हणताना घोळ मुरळीच्या हातात असतो. ती पिवळ्या रंगाचे नऊवारी पातळ नेसते. कपाळाला हळद माखलेली असते. गाताना एका हाताने घोळ वाजवीत ती गिरक्या घेत विशिष्ट पद्धतीने नृत्य करते. वाघ्या तुणतुणे वाजवीत गाणी म्हणतो. दुसरा खंजिरीवर गाण्याला साथ देतो. अनेक घरांत हा कुळाचार नेमाने पार पाडतात.
देवाला वाहिलेले मूल गुरवाच्या द्वारे भंडारा उधळून, मुलाच्या गळ्यात भंडाऱ्याची पिशवी बांधून वाहिले जाते. महार, मांग, कुणबी आदी समाजात मुले, मुली वाहण्याची प्रथा होती. माझ्या परिचयाच्या व्यक्तीचे काका खंडोबाचे भक्त होते. त्यांनी तोडलेल्या लंगराचा अत्यन्त जड अशा लोखंडी साखळीचा तुकडा त्यांच्या देवघरात पूजला जातो.
महाप्रभू चैतन्य आणि इंदिरा११ -
मुरळीची प्रथा खूप जुनी आहे. १५१०-११ च्या सुमारास बंगालचे महाप्रभू चैतन्य दक्षिण यात्रेस निघाले असता जेजुरीस आले होते. आईबाप आपल्या मुली खंडोबाच्या पत्नी म्हणून अर्पण करतात हे ऐकल्यावर ते दुःखी झाले. त्यांनी आपल्या करुणामय मधुरवाणीने मुरळ्यांसमोर परमार्थाचा उद्देश विशद करून सांगितला. त्यातील अनेक जणींना पापमय जीवनाबद्दल पश्चाताप झाला. इंदिरानामक मुरळीने जेजुरी सोडली. खंडोबाची गोष्ट नावाचे चोपडे रेव्ह. जे.मरेमिचेल याने प्रसिद्ध केले आहे. त्यात मुरळी करण्याच्या वाईट प्रथेवर टीका केली आहे.
नाथांचे समकालीन १२शेख महंमद बाबा यांनी या प्रथेवर प्रखर हल्ला चढविला, ते लिहितात -
मुरळ्या कुलस्वामिच्या दासी । त्यासी रमता कंटाळेत ना अपेशी ।
मल्हारी न करीच काही त्यांशी । कां सत्त्वे सांडवला ?
कुळकन्येस बोल लाविला मल्हारीने । ऐसे विटंबिले त्याच्या देवपणे
तो पूजिल्या केवी तुटती बंधने । लक्ष चौऱ्यांशीची ॥
लावणी आणि मुरळीची गाणी यातील साम्य : एक अंदाज -
मुरळीची गाणी खूपशी लावणीच्या जवळ जाणारी आहेत.
वय सोळा कोवळी काया, हूडपणात घुंगरू पाया
लागे नाचाया, लागे नाचाया, लागे नाचाया
पोर बावरी झाली पाहा जेजुरीला जाया ।
नव्या नव्या वाऱ्याने हिचे भारावले अंग।
या अशा वयातच बदलू पाहे दंग
उतावीळ मल्हारीसंगे लगीन लावाया॥....
बाणून करूनिया थाट
शिरी ग भरूनी दुधाचे माठ जी ।।
'मैलार' या खंडोबाच्या नावाबद्दल राजाराम हरी गायकवाड नोंदवतात, 'म' म्हणजे शिव - शुंभु, 'र' म्हणजे विष्णु आणि 'इला ' म्हणजे पृथ्वी (माती) तेव्हापासून त्याच्या मृण्मय मूर्तीला 'मैलार' म्हणतात. 'र' चा 'ळ' होऊन मैराळ म्हणतात.
श्री. बी. ए. गुप्ते लिहितात, 'मार्तंड हे सूर्याच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे. सूर्य हा प्रचंड प्रकाशपुंज आहे.' त्यामुळे ज्या शिवाने खंडोबाला शक्ती दिली, आणि शिव ही विध्वंसक देवता आहे. त्या शिवाचा खंडोबा अवतार आहे असे समजून घेणे कठीण आहे. खंडोबा हा साथींपासून लोकांचे रक्षण करणारा आहे. त्यामुळे ही गोष्ट एक 'सूर्य चमत्कार' आहे असे सुचविण्यात आले आहे.
भारतीय संस्कृतीच्या इतिहासात अनेक निसर्ग देवता, पूर्व वैदिक देवता, लोकदेवता यांच्या समन्वयातून विविध देवतांची नवी रूपे 'सिद्ध' झाली. या प्रक्रियेतून शिव, स्कंद सूर्य, इंद्र, विष्णु यांच्या प्रभावातून सिद्ध झालेली ही लोकदेवता महाराष्ट्रातील सर्व आर्थिक, सामाजिक स्तरांतून 'कुळाचार' केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या देवतांत समाविष्ट झाली असावी असे वाटते.
खंडोबाच्या नवरात्रात सुपात साळीचे तणीस ठेवतात. कणसे काढल्यावर खाली जो भाग उरतो त्याला तणीस म्हणतात. त्यावर बाजरीचे दिवे लावतात. तळी भरताना सुपाने तीनदा पाखडल्याची कृती करायची. करताना 'सदानंदाचा येळकोट, चांगभले' असे म्हणायचे, नवरात्राप्रमाणे मातीत बियाणे पेरून घट मांडतात. काहीच्या घरी नवी लहान चौकोनी गादी मांडतात. ४ कोपरे व मधोमध भंडारा ठेवतात आणि येळकोट म्हणत उधळतात. खंडोबाचे घट बसल्याच्या पाचव्या दिवशी नागदिवे असतात. हे दिवे पुरणाचे वा बाजरीचे असतात. सुपात प्रत्येक पुरुषाच्या नावाने नियुक्त केलेला पदार्थ आणि त्यावर दिवा असे मांडतात, घरातील विळा घेऊन त्या दिव्यावर धरतात. हे दिवे शुद्ध तुपाचेच असावेत असा संकेत आहे. त्या विळ्यावर धरलेल्या काजळीला तुपाचे बोट लावून ते काजळ प्रत्येकाच्या डोळ्यांत घालतात. बाजरीच्या उकडदिव्यांना बोने म्हणतात, कांद्यावांग्याचे भरित आणि रोडगा हा नैवेद्य कुत्र्याला वाढतात. भूमीच्या सुफलनशक्तीशी संबंधित व्रते वा सणांच्या नैवेद्यात भाज्यांना, धान्याच्या राशींना विशेष महत्त्व असते. काही घराण्यांत विवाहानंतर प्रथम जेजुरीला जातात. पतीने पत्नीला किमान पाच पावले उचलून न्यायचे असते. 'बेलभंडार' वाहणे ही मुख्य भक्ती असते. हळदीच्या पुडीत खोबऱ्याच्या वाट्या घोळसून तो प्रसाद देतात. घटाजवळ अखंड नंदादीप असतोच. ताटात खोबऱ्याचे तुकडे, हळद, दिवे, कुंकू, अक्षता ठेवून घरातील सर्व जण ते ताट एकाचवेळी उचलतात. त्याला तळी भरणे म्हणतात. ती तीन वेळा उचलून खाली ठेवतात.
मल्लूखान मल्हारी -
मल्हारीसाठी मल्लूखान१४ व अमजतखान ही दोन मुसलमानी नावे आली आहेत. मल्लखान नाव बीड येथे मिळालेल्या १७ व्या शतकातील एका कोरीव लेखात आहे. जैनपंथातील काहींना मल्लारी म्हणजे तीर्थंकर मल्लीनाथ असे वाटते. जेजुरीच्या मंदिरातील बाहेरच्या कोनाड्यात मल्लीनाथाचा यक्ष कपर्द याची मूर्ती आहे. तिच्याखाली संवत् १३०३ (श. ११६८ इ.स. १२४६) चा उल्लेख असून धल्लक नावाच्या भक्ताने ती मूर्ती बसविल्याचा उल्लेख आहे.
खंडोबाच्या जवळ कुत्रे असते. घोडा-अश्व असतो. अश्व सूर्याचे प्रतीक, नंदी शंकराला प्रिय, कुत्रे दत्ताला प्रिय. मानवी संस्कृतीच्या विकास - प्रक्रियेत अनेक लोकदैवतांचे एकत्रीकरण झाले. नवे दैवत त्यातून निर्माण झाले. तरीही उपासनेमागची मूळ भूमिका, विधी, अभिचार यातून व्यक्त होत राहिली.
खंडोबाच्या उपासनेत येळकोट, चांगभले, हेगडे, हाळ, बगाड, कोटंबा आदी अनेक शब्द द्रविड भाषेतील आहे. हा देव दक्षिणेतून महाराष्ट्रात आला असावा असे वाटते. खंडोबाची देवळे उत्तरेत नाहीत. जी थोडी फार आहेत ती पेशवे उत्तरेत गेल्यानंतरची आहेत. शिवाजी महाराज होळकर, पेशेव हे मार्तंडाचे उपासक होते.
येळा आवस : मराठवाड्यात विशेष महत्त्व -
मार्गशीर्ष अमावास्येस इळाआवस किंवा येळाअमावास्या असे म्हणतात. मराठवाड्याच्या लातूर, उस्मानाबाद, बीड परिसरात ही अमावास्या अत्यन्त श्रद्धेने पाळली जाते. शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब या दिवशी दशम्या-धपाटे घेऊन शेतात जाते. तेथे जेवण करतात. अनेक कुटुंबांत स्वयंपाक शेतात जाऊन शिजविण्याची प्रथा आहे. ज्यांच्या घरी शेत नाही अशांना शेतात जेवणाचे आमंत्रण दिले जाते. आमंत्रण...आवतण चुलीला असते. या जेवणात दशम्या, धपाटे पदार्थ असतातच. दूध, किंचित साखर, तुपाचे मोहन घालून दशम्या करतात. ज्वारी वा बाजरीचे पीठ, डाळीचे पीठ, थोडे गव्हाचे पीठ एकत्र करून त्यात लसूण, मीठ, मिरची, पालेभाज्या घालून धपाटे करतात. धपाटे हा प्रकार विशेष करून मराठवाड्यातलाच. धपाटे म्हणजे थालिपीठ नव्हे.
आंबिलीचा मान -
या दिवशी मान आंबिलीचा असतो. थोड्या ज्वारीचे पिठात लसूण, आद्रक, जिरे, मीठ, तिखट घालून शिजवितात. त्यात ताक घालून घुसळतात. ही आंबिल शेतीशी निगडित सर्व विधींमध्ये व सणांमध्ये महत्त्वाची असते. लक्ष्म्यांच्या पंच पक्वान्नात, पोळ्याच्या दिवशी आंबिल असतेच. मात्र इळा आवसेला मान आंबिलीचा असतो.
इळा आवसेला गाडग्याला चुना आणि काव लावून रंगवितात. त्यात ५ सुपाऱ्या, ५ खारका, ५ खोबऱ्याचे तुकडे, ५ हळकुंड घालून मडक्याच्या.... सुगड्याच्या तोंडावर नागवेलीचे पान ठेवतात. खरिपाची सुगी नुकतीच झालेली असते. कापलेल्या धान्याच्या तणसांची... काड्यांची कोप तयार करतात, त्यात पाच दगडांना चुना लावून पांडव म्हणून मांडतात. कोपीच्या बाहेर पांडवांकडे तोंड करून कुंती आणि द्रौपदी यांचे दगड मांडतात. त्यांच्या मध्यात रंगवलेले गाडगे ठेवतात. नैवेद्यात कोंडोळी... मुटके (उकडलेले) असतात. यांनाच फळ असेही म्हणतात. बाजरी वा ज्वारीच्या पिठाचे दिवे लावतात. मात्र समोरील द्रोपदी व कुंतीसमोर हे दिवे आणि नैवेद्य ठेवत नाहीत. नैवेद्य ठेवला तरी दिवा मात्र चेतवून ठेवीत नाहीत. नैवेद्यात ज्वारी बाजरीचा खिचडा आणि घुगऱ्याही असतात. इळा आवसेला मांगाला व मांगिणीला बोलावून जेवू घालतात. त्यामुळे बरकत येते. भूमीत भरपूर धान्य येते अशी श्रद्धा आहे.
द्रौपदी आणि कुंती कोपीबाहेर -
शेताची पूजा त्या त्या भागातील ऋतुमानानुसार केली जाते. या पूजेत द्रौपदी, कुंतीचे दगड मांडतातच मात्र ते दगड कोपीबाहेर का मांडतात ? हे कोडे मनात अनेक प्रश्न निर्माण करते. शिवाय त्यांना विधिपूर्वक नैवेद्य, द्रोणात आंबिल वाहत नाहीत. समोर दिवाही लावत नाहीत .असे का? वास्तविक पाहता ही पूजा भूमीची 'इळा' देवीची आहे. हजारो वर्षांच्या मानवी संस्कृतीच्या प्रवाहात, 'देवी' सर्वश्रेष्ठ देवता होती ती दुय्यम झाली. ती कुणा श्रेष्ठ देवाची पत्नी बनली. भूमीचा पती कधी आकाशाच्या रूपात तर कधी सूर्याच्या रूपात कल्पिला गेला. मात्र लोकमानसात 'पार्वती' आदिमाया, लक्ष्मी, गौरी या सर्व देवता 'भूमी' च्या रूपात रुजल्या. लक्ष्मी विष्णुची पत्नी, सरस्वती गणेशाची पत्नी म्हणून कल्पिल्या गेल्या तरी नवरात्रात त्यांची उपासना स्वतंत्रपणे होते. गौरी ही शिवाची पत्नी. तिचे आणि शंकराचे नाते लोककथांतून समान कल्पिले आहे. तिच्या पूजेतही शंकर महत्त्वाचा नसतो.
पाच पांडव शेताच्या पूजेत मांडतातच. पेरणीच्या वेळी, पेरण्या संपल्यानंतर ढवारा करतात तेव्हा पाच पांडव मांडतात. मात्र त्यावेळी कुंती आणि द्रौपदीचे दगड मांडीत नाहीत. इळा आवसेच्या मांडणीत ती भूमीची पूजा असूनही द्रौपदी, कुंती यांना पूजेत फारसे महत्त्व नाही. मात्र भूमीचे प्रतीक म्हणून त्या उपस्थित आहेत. भूमीची ओटी भरण्यासाठी आणलेले सामान द्रौपदीच्या समोर ठेवले जाते. मार्गशीष पौर्णिमेला भूमी विधवा होते अशी कल्पना कर्नाटकात रूढ आहे. या पौर्णिमेला हौर्त्सुल हुन्नवे (विधवा पौर्णिमा) असे म्हणतात. तर चैत्री पौर्णिमेस सवाष्णीची पौर्णिमा म्हणतात. मार्गशीर्षात पानगळीला प्रारंभ होतो. चैत्रात नवी पालवी फुटू लागते. इळा आवस परभणी, औरंगाबाद भागात मोठ्या प्रमाणावर साजरी होत नाही. परभणी भागात तिला 'इखण आवस' म्हणतात. इखण म्हणजे विळा. शेतीच्या अवजारांची पूजा करतात. भूमीचीही पूजा करतात.
तेलंगणातील धुरपता आणि इळाआवसेतील द्रौपदी -
तेलंगण, आंध्रातील धुरपता आणि इळा आवसेच्या मांडणीतील दगडाला चुना फासून केलेली द्रौपदी यांत काही साम्य असेल का?
गड चांदियाला जाता । धोंड्या धोंड्याला पूजिती
जोड नारळ फोडिती । धुरपता माय ǁ
सर्वसाधारणपणे धर्माचे मुख्य असे दोन भाग असतात. एक तत्त्वज्ञानाचा तर दुसरा धर्मविधींचा, हिंदुधर्माची तत्त्वज्ञानाची चौकट भारतभर एकच दिसली तरी धर्मविधीमध्ये प्रांतानुपरत्वे वेगळेपणा आहे. येथील लोकजीवनात आलेल्या टोळ्या, आदिवासी येथे रुजतांना आपल्या वैशिष्ट्यांची भर घालीत गेले. जवळच्या प्रांतांचे लोकाचार एकमेकांत मिसळून गेले. इळाआवसेतली धुरपता ही तेलंगणातून मराठवाड्यात आली असावी. दक्षिण भारतात ज्या अष्टशक्ती पूजिल्या जातात त्यात ही एक आहे. १५डॉ. तारा परांजपे नोंदवतात की नांदेड जिल्ह्यातील पूर्वास्पृश्य जमातीचे लोक या देवीला मोठ्या संख्येने पूजतात. मात्र तेलंगणातील धुरपतामाय ही अत्यन्त विक्राळ, दारूची भोक्ती आहे. महाराष्ट्रात येताना तिचे रूप द्रौपदीशी मिळते जुळते झाले असावे आणि जोडीला कुंती आली असावी असेही वाटते.
शेतात पूजेच्या वेळी मांडले जाणारे 'पाच पांडव' हा संकेतही आव्हान देणारा आहे.
सायंकाळी चार वाजता दहिभाताचा नैवेद्य दाखवतात. तिळाच्या कांड्याचा हेडगा करून पेटवतात. तो हातात घेऊन शेताला प्रदक्षिणा घालतात. भोवतालच्या प्राणिमात्रांना बोलावतात. उदा. कोल्ह्यानो या अंबिल पिऊन जा असे म्हणतात.
मातृसत्ताक व्यवस्था ते पुरुषसत्ताक व्यवस्था : काही दुवे -
भारतीय एकात्मता अंगभूत आहे. रामानी उत्तर दक्षिणेला जोडले तर कृष्णाने पूर्व पश्चिमेला जोडले. संपूर्ण भारत विविध कला, भाषा-लिपी यांच्या माध्यमातून आजही आपल्या एकात्मतेचे चकित करणारे दर्शन घडवितो असे मांडणारे १६डॉ. राम मनोहर लोहिया पांचाली ऊर्फ द्रौपदीबद्दल लिहितात, 'तिच्यापेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी हजरजबाबी ज्ञानी भारतीय स्त्री नाही' अर्जुनासह पाचही पांडव तिच्यापुढे फिके वाटतात. द्रौपदी ही अत्यन्त बुद्धिमान, हजरजबाबी स्त्री होती.
मातृसत्ताक जीवनपद्धतीचा विकास पाहता असे दिसते की, विवाहसंस्थेचा जो विकास झाला त्यात, मातृकुल संघातील सर्व स्त्रिया या त्या पिढीत असणाऱ्या सर्व स्त्रियांच्या पुत्रपुत्रिकांच्या माता मानल्या जात, त्यांचे पुत्र एकाच वेळी त्यांच्या कन्यांचे बंधू आणि हक्काचे पती असत. सर्व भगिनी हक्काच्या भार्या असत. यमयमीच्या कथेवरून हे आपल्या लक्षात येते. जमिनीवरचा हक्क मातेचा कुळातील महिलांना असे. ऋग्वेदातील एका कथेत बृहस्पतीने आपल्या बंधूची पत्नी ममता हिच्याकडे संभोग मागितला होता. ती गरोदर असल्याने नकार दिला. तेव्हा तिला तुझा पुत्र आंधळा होईल असा शाप दिला. मागणी करणारा व मागणीस नकार मिळताच शाप देणारा पुरुष आहे. आज जी पुरुषकेंद्री कुटुंबसंस्था आहे तिची घडण, मातृसत्ता तिचा जमिनीवरचा अधिकार, उत्पादनात स्त्रीचा असलेला सहभाग यांकडून पुरुषसत्तेच्या दडपणाखाली पुरुषसत्ताक समाजाकडे सुरू झाली. शेतीची मशागत (हातांनी) करण्यात नांगराचा वापर सुरू झाला. या समाजिक बदलांच्या काळात स्त्रीचे महत्त्व कमी व स्थान दुय्यम होत गेले असावे. शेतीच्या अवजारांना ग्रामीण भागात सणंग म्हणतात. नांगर हा पुरुषाच्या जननेंद्रियाचे प्रतीक आहे. स्त्रीलाही ग्रामीण भागात सणंग म्हणतात. ती जणु त्यांच्या मालकीची वस्तू. स्त्रीच्या दुय्यमतेच्या प्रवासातील हा एक टप्पा असावा. अत्यन्त बुद्धिमान स्त्री द्रौपदी, जी कृष्णा - सावळी आहे, ती स्पष्टवक्ती आहे, तिचे समाजातील महत्त्व कमी होत गेले असावे. सीता आणि सावित्री या पवित्र आणि सतीत्वाचा आदर्श असलेल्या स्त्रिया मानल्या जातात. उलट द्रौपदीने अर्जुनावर अधिक प्रेम केले या सबबीखाली ती प्रथम मृत होऊन पडली असे मानले जाते. कुंतीच्या कर्ण, धर्मराज, अर्जुन, भीम या चारही पुत्रांचे पिता वेगवेगळे आहेत. या वाटचालीत भूमीच्या पूजेत पाच पांडव कोपीत बसवले गेले असावेत का? त्यांच्या पुढ्यात दिवे लावले जाण्याची रीत आणि कुंती व द्रौपदी त्यांच्याकडे तोंड करून परंतु कोपीबाहेर मांडलेल्या या परंपरा निर्माण झाल्या असाव्यात का? या सांस्कृतिक प्रवासात 'स्त्रीशूद्रादिक' ह्या शब्दातून स्त्रीचे सामाजिक मूल्य मांडले गेले असावे.
आंध्रातील धुरपदा अत्यन्त विक्राळ, दारूचे हंडेच्या हंडे रिचवणारी आणि मांसाहारी आहे.
आई की ग धुरपताची । बईठक अवघड
पाठीमागं बकरं पडं । हिच्या ग पूजेचं
माय माझी धुरपता । तुजे चालले की बिगारी
म्होरं दारूच्या घागरी, धुरपता माय
संथाळ आदिवासींच्यातील एक कथा या ठिकाणी आठवते. पुरुष स्त्रियांना ज्ञानाच्या बळावर सतत सतावीत. स्त्रिया कंटाळल्या. त्यांचा देव डोंगरदेव हा विशिष्ट रात्री पुरुषांना ज्ञान देई. स्त्रियांनी ज्ञान मिळवण्याचे ठरवले. ज्या दिवशी डोंगरदेव...मारंग बुरंग ज्ञान देतो त्या दिवशी स्त्रियांनी पुरुषांना प्रचंड दारू पाजली. ते दारूत धुत्त झाले की पुरुषांचे कपडे घालून त्या डोंगरंदेवाकडे गेल्या. डोंगरदेव भोळा. त्याने ज्ञान पुरुषवेशातील स्त्रियांना दिले. तेव्हापासून स्त्रिया अधिक ज्ञानी व कुशल झाल्या. मग पुरुष परत डोंगरदेवाकडे गेले. देव त्यांना रागावला. म्हणाला तुमच्या चुकीमुळे तुमची ही स्थिती झाली. आता मी तुम्हाला हुशार, बुद्धिमान व कुशल स्त्रीला चेटकीण कसे ठरवायचे याची विद्या देतो. तेव्हापासून हजारो कुशल- हुशार, स्पष्टवक्त्या स्त्रियांना चेटकीण ठरवून समाजाने मारले. या अंधश्रद्ध प्रथेविरुद्ध विरसामुंडाने निकराने लढा दिला.
इळाआवसेतील द्रौपदी आणि कुंती या आव्हान देणाऱ्या देवता आहेत. लोकमानसात द्रौपदी इतकी रुजली आहे की विक्राळरूपाची धुरपता ही त्यांनी आपलीच मानली.
इळाआवसेला शेतातील सालदारांना विशेष करून मांग व्यक्तीला सन्मानाने जेवू घालतात. या दिवशी सालदारांनी वा मालकानी पत्नीसह रानात मुक्कामाला राहावे असाही रिवाज आहे.
सारे सण, 'अत्यन्त महत्त्वाचे क्षण' साजरे करण्यात पुढाकार असतो स्त्रियांचा. स्वतःच्या अखत्यारीत काही गोष्टी त्या सहजपणे त्यात समाविष्ट करतात.पुरुषप्रधान संस्कृतीत 'सौभाग्य' पुरुषकेन्द्री झाले. सवाष्णी व्रतविधीत पुढे असतात. कोपीबाहेर मांडलेल्या द्रौपदी कुंतीपुढे दिवा लावला नाही तरी भूमीच्या ओटीचे सामान मात्र ठेवतात. ही चतुराई 'कर्मठ' स्त्रियांचीच.
कर्नाटकातील करगा उत्सव -
इळाआवसेतील किंवा एकूणच शेतीच्या पूजेत ५ दगडांना चुना लावून पाच पांडव म्हणून मांडले जाते व त्यांची पूजा केली जाते. इळाआवसेत द्रौपदी आणि कुंती यांचे दगडही मांडतात. या संदर्भात डॉ. डी. डी. कोसंबी१७ यांच्या Myth and Reality या ग्रंथात गॉडेसेस ऑफ बर्थ अँड डेथ या परिच्छेदात कर्नाटकात अत्यन्त श्रद्धापूर्वक साजऱ्या होणाऱ्या 'करगा' उत्सवाची माहिती देताना डॉ. कोसंबींनी काही बाबी नोंदविल्या आहेत. १. तिगला समाजाचा हा सुफलीकरणाचा वार्षिक विधी असतो. हा समाज उत्तर अर्काट जिल्ह्यातून आला असून तो बागायती शेती करणारा समाज आहे. २. करगा हा,'कुंभ' असतो. या कुंभासमोर पूर्वी पशुबळी देत असत. अलीकडे एक पशुबळी देतात. बाकीच्या बळींचे प्रतीक म्हणून लिंबे कापली जातात आणि उकडलेले धान्य ज्याला महाराष्ट्रात घुगऱ्या म्हणतात ते समोर ठेवले जाते. शेवटच्या मिरवणुकीत मुख्य प्रतिनिधी जो तिगला पुजारी घराण्यातील असतो, तो डोक्यावर कुंभ घेऊन पुढे असतो. मात्र त्याने स्त्रीवेष परिधान केलेला असतो. त्याच्या पत्नीने त्या काळात त्याच्यापासून दूर, दृष्टीसही न पडता राहायचे असते. प्रत्येक तिगला घरातून एक प्रतिनिधी पुढे येतो आणि धारदार शस्त्राने स्वतःला जखम करून घेतो. मात्र त्यातून रक्त येता कामा नाही. ती एक सत्त्वपरीक्षाच असते. या उत्सवाच्या संदर्भात डॉ. कोसंबी मत नोंदवितात की हा उत्सव आर्यांचा नाही. परंतु गेल्या २०० वर्षांत या उत्सवाचे ब्राह्मणीकरण उन्नयन होऊन तो धर्मराज युधिष्ठिराच्या देवळाशी जोडला गेला आहे. या घटात मंत्रांनी भारलेली सुवर्णमय शक्ती असून ती द्रौपदीच्या शक्तीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. तिगला ही निम्नस्तरीय जात मानली जाते. डॉ. कोसंबींच्या मते मुळात हा उत्सव स्त्रियांचा होता. त्यांच्याकडून तो पुरुषांकडे आला असावा. हा उत्सव चैत्री पौर्णिमेनंतर नऊ दिवस चालतो. अलीकडे त्यात काही बदल झाले आहेत. पूर्वी 'करगा कुंभ' तिगला पुजारी हाताने बनवीत असे. अलीकडे तो कुंभार बनवतात. हा कुंभ शेवटच्या दिवशी तळ्यात विसर्जित करतात. मात्र त्यात ठेवलेली, द्रौपदीचे प्रतीक असलेली 'सुवर्णशक्ती' तिगला पुजारी श्रद्धापूर्वक घरी आणतो. पुढच्या वर्षी पुनश्च तिचे आवाहन करण्यासाठी. १८'करगा' कुंभात द्रौपदीची सुवर्णरूपी शक्ती असते. त्या बरोबर पाच चुन्याने रंगवलेली मडकी पांडव म्हणून मांडतात. त्यात साधे व नारळाचे पाणी ठेवतात. या सर्व बाबी 'इळाआवसे' च्या संदर्भात महत्त्वाच्या वाटतात. 'करगा' उत्सव कर्नाटकात साजरा होतो. इळाआवस मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांत विशेष करून साजरी होते. या भागात कर्नाटकातील लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर स्थिरावला आहे.
पौषातील रविवारी सूर्यपूजन :
संपूर्ण मराठवाड्यातील स्त्रियांचे व्रत -
मार्गशीर्ष, पौष महिन्यात बोरं, गाजर, आवळे, चिंचा यांचा मोसम असतो. रबीची पिके पोटऱ्यात येत असतात. या काळात शेताला ओलावा दवाच्या रूपाने मिळतो. या महिन्यात विवाह संस्कार करीत नाहीत. पायाचा दगड रोवण्यास हा महिना योग्य मानतात. या महिन्याला शून्य महिना म्हणतात. मराठवाड्यातील प्रत्येक घरातील स्त्री, सर्व जातिजमातीतील स्त्रिया या महिन्यातील दर रविवारी सूर्यपूजा करतात. खानदेशात रविवारी आदित्यराणूबाईची पूजा श्रावणात करतात. मराठवाड्यात मात्र हे व्रत, सर्व स्तरांतील स्त्रिया 'पुसातले रविवार करतात. स्त्रिया पहाटे उठून सूर्याचे पहिले किरण पृथ्वीवर येण्याआधीच नाहतात. सूर्याची रांगोळीची प्रतिमा पाटावर मांडतात. लिंगायत समाजात रांगोळीऐवजी भस्माचा वापर करतात. सूर्याशेजारी गंगा आणि गौरी काढतात. या गंगा व गौरी सूर्याशेजारी कशा हे एक कोडे आहे. सूर्याशेजारी उषा, प्रत्युषा, संज्ञा व छाया यांपैकी असाव्यात. पुराणानुसार राज्ञी व निक्षुंभा या सूर्यपत्नी आहेत. भारतीय लोकधर्मानुसार रण्णा सण्णा ही जोडनावे येतात. (राज्ञी व संज्ञा या नावाचे द्योतक) परंतु पुसातल्या पूजेत मराठवाड्यात वेगवेगळ्या जातीत वेगवेगळी रीत दिसते. मराठा समाजात पाटावर चंदनाचा सूर्यनारायण काढतात. शेजारी नागवेलीच्या पानावर राणूबाई काढतात. ब्राह्मण समाजात रांगोळीने फक्त सूर्य काढतात. बहुजन समाज, मांग समाज यात सूर्याशेजारी रांगोळीचीच राणूबाई काढतात. सूर्य प्रतिमेस हळदी-कुंकू, खोबरे, खारीक पानसुपारी वाहतात. आदित्याराणूबाईची कथा ऐकण्यासाठी जवळपासच्या महिला एकत्र येतात. कहाणी ऐकल्यावर जेवण करतात. एकवेळ निरंकार करतात. काही जणी दिवसभर उपास करतात. सूर्यास्ताच्या वेळी खडीसाखर खाऊन पाणी पितात. काही स्त्रिया दिवसभर उभ्या राहतात. जमिनीवर बसत नाही. त्यादिवशी विळीवर चिरत नाहीत. रवीने ताक घुसळीत नाहीत. सूर्याच्यावर चंद्र चांदण्या काढतात. स्त्रिया दिवसभर केस विंचरीत नाहीत. तसे केले तर केस सूर्याच्या तोंडात जातात अशी श्रद्धा ग्रामीण भागातील स्त्रीमनाची आहे. मार्गशीर्षापासून आरंभ करून प्रत्येक रविवारी सौरव्रत करावे असे हेमाद्रीने सांगितले आहे. मराठवाड्यातील अनेक स्त्रिया हे सौरव्रत मार्गशीर्ष ते फाल्गुनापर्यंत करतात. पौषाला भाकडमासही म्हणतात.
पौषातील महत्त्वाचा सण मकरसंक्रात -
संक्रान्तीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. महाराष्ट्रात संक्रान्त थाटात साजरी होते. संक्रान्तीपासून रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ थाटात केला जातो. या दिवशी स्त्रिया सवाष्णींना वाण वाटतात.
सक्रान्तीच्या आदल्या दिवशी भोगीला १२ भाज्यांची, मिसळीची भाजी, राळ्याचा भात, बाजरीला तीळ लावून केलेली भाकरी असा बेत असतो. शेतात भाज्या भरपूर असतात. गाजर, वांगी, टमाटे, मेथी, तांदूळजा, पालक, अनेक भाज्या... या खास बेताचा नैवेद्य देवाला दाखवतात.
संक्रांतीला ५ सुगडी आणतात. त्यांना काव, चुना लावून रंगवतात. झाकणी एकच असते. या सुगड्यात तीळ, तांदूळ, टहाळ, उसाचे करवे इत्यादी टाकतात. त्या सुगड्यांवर खण टाकतात. त्यांची पूजा करतात. सुगडी घेऊन वाणवसा घेऊन देवळात जातात.तिथे सवाष्णींची हळदकुंकू लावून पूजा करतात. देवीला रुक्मिणीला वाणवसा लुटतात. त्यानंतर इतर सुवासिनींना सौभाग्यवाण देतात. बरोबरची सुगडी अत्यन्त जपून न्यावी लागतात. सुगडे वेशीत फुटणे अशुभ मानले जाते. या परिसरात असे मानले जाते की महार स्त्रीच्या हातून वेशीत सुगडे फुटले म्हणून तिला हळदीकुंकू लावून वाण देत नाहीत आणि मांग स्त्रीला मात्र आवर्जून गाठले जाते व तिला वाण वंसले जाते. ही प्रथा मराठवाड्यात ऐकली. अर्थात ती सर्वत्रच असेल असे नाही. सुगड्यातील तांदूळ, टहाळ, बोरे इ. बीजरूपी१९ सूर्याचे प्रतीक असावेत.
पेरणी, इळाआवस, ढवारा शेतीशी निगडित विधींत मांग समाजाच्या व्यक्तीला विशेष मान असतो. महाराष्ट्रात संक्रान्त सणास तिळगुळास विशेष महत्त्व असले तरी हा सण दक्षिणेत विशेष उत्साहाने आणि भूमीच्या सुफलतेशी जोडून साजरा होतो. आंध्रात ज्येष्ठी पौर्णिमेचा एरुवाक् हा सण शेतीच्या उद्घाटनाचा तर संक्रान्ती हा समारोपाचा असतो. या वेळी कापणी होऊन धान्य घरात आलेले असते. साळीचा दुसरा हंगाम संपलेला असतो. ज्या चांद्रमासात सूर्याचे मकरसंक्रमण होते तो पौष महिना पहिले मकरसंक्रमण होते तेव्हा उत्तरायण सुरू होते. दुसरे कर्कसंक्रमण दक्षिणायनाचा आरंभ सूचित करते. महाराष्ट्रात संक्रान्तीला मुली मुगाची डाळ व तांदूळ एकत्र करून एकमेकींकडे जातात. प्रत्येकाच्या घरी पाट मांडलेला असतो. त्यावर ते मिश्रण मूठमूठ ठेवतात. तिळगुळ घेऊन वडील माणसांना अभिवादन करतात. राजस्थानात या दिवशी सकाळी सुस्नान होऊन देवीला जाऊन तिला वाणवसा देतात. राजस्थानात देवीसमोर वाणाच्या १३ वस्तू ठेवून पूजा केली जाते. नंतर त्या सवाष्णींना देतात. त्याला 'तेरुंडा' असे म्हणतात. महाराष्ट्रात विवाहनंतरच्या पहिल्या वर्षी नारळाचे वाण देतात. नंतर हळदीकुंकू, हिरव्या बांगड्यांचा चुडा अशा सौभाग्य वस्तू वाण म्हणून देण्याचा रिवाज आहे. आंध्रात संक्रान्तीला मुली शेणाचे गोळे करुन त्याला हळदीकुंकू वाहतात. त्याला फूल खोचतात. ते गोळे रांगोळीवर ठेवून भोवती फेर धरून नाचतात. त्याला गोब्बम्मा म्हणतात. संक्रान्तीच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी गोठा साफ करतात. गुरांना सजवतात. नव्या धान्याची खिचडी खातात.
संक्रान्तीचे शेतीशी असलेले नाते महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात फारसे जाणवत नाही. जे जाणवते ते मिसळीची भाजी, खिचडी, तिळगुळाच्या तेलाच्या, भाकरी या अन्नप्रकारातून. या दिवशी ५ सुवासिनीस गहू, तीळ कापूस, उसाचे कांडे घालून सुगडी देतात. या प्रथेतील सुगड मातीचे असून ते कुंभाकार असते आणि कुंभ हा सुफलतेचे प्रतीक आहे.
दक्षिणेत.... तामिळनाडूत यालाच पोंगल म्हणतात. भोगीला वर्षाऋतूचा देव इंद्र याची पूजा असते. संक्रान्तीला सूर्य पोंगल असे म्हणतात. दूधतांदूळ शिजवून 'पायसम्' करतात. 'पोंगल पोंगल' असे ओरडून खिर शिजली का असे एकमेकांना विचारतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. महाराष्ट्रात आम्ही 'तिळगूळ घ्या आणि गोड बोला' असे म्हणून शुभेच्छा देतो. प्रेम द्या प्रेम घ्या हे सांगणारा हा सण आहे. मकरसंक्रान्तीचे वाणवसा लुटणे, हळदीकुंकू समारंभ करणे रथसप्तमीपर्यन्त चालते. रथसप्तमीला रथात बसलेल्या सूर्याची पूजा केली जाते. रथसप्तमी महत्त्वाचे व्रत मानले जाते. मानवी जीवनाच्या विकासाचे पर्व सुरू झाले तेव्हापासून मानवी जीवनास सुखमय करणान्या तीन देवतांची पूजा होते. वर्षनाची देवता इंद्र, प्रकाश देणारा सूर्य आणि सर्जनातून अन्नसमृद्धी देणारी भूमी या त्या तीन देवता. रथसप्तमीला व्रतस्थ राहून सूर्यपूजा केली तर आरोग्य लाभते असे लोकमानस मानते. बावचा नावाची शेतात सापडणारी वनस्पती वाटून ती डोक्याला लावून संक्रान्तीला नाहतात. महाराष्ट्रात सात अश्वांचा रथ रांगोळीने काढून त्यात सूर्यनारायण बसले आहे असे दाखवितात. त्या प्रतिमेची पूजा करतात. या दिवशी गव्हल्याची खीर करतात या व्यतिरिक्त महाराष्ट्रात ती वेगळ्या रीतीने साजरी केली जात नाही. सूर्यपूजा इराणमधून शकहूणांकडून भारतात आली असे मानतात. श्रीकृष्ण पुत्र सांब याला कुष्टरोग होता. सूर्यपूजा करण्याचे त्यास सांगितले होते. सूर्यपूजा करण्यासाठी त्याने शाकद्वीपातून मग नावाचे ब्राह्मण आणविले होते. वराह मिहिर हा मग ब्राह्मण होता. रथसप्तमीला संक्रान्त सणाची समाप्ती होते.
होळी : हुताशनी पौर्णिमा -
फाल्गुनातील वसंतोत्सव -
फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. फाल्गुन हा दक्षिणेत शेवटचा महिना मानला जातो. चैत्रप्रतिपदा हा वर्षारंभाचा पहिला दिवस फाल्गुन कृष्ण प्रतिपदेस वसन्तोत्सवाला प्रारंभ होतो. पंचमीला रंगपंचमी असते. फाल्गुन महिन्यास वसंतऋतुचा पहिला महिना आणि कामदेवाचा प्रिय मित्र मानले आहे. पौषानंतर येतो माघ आणि माघानंतर फाल्गुन. 'अश्वत्थाची पाने' या ग्रंथात डॉ. स. अ. डांगे नोंदवतात, 'मकरसंक्राती हल्ली जरी पौषात येत असली तरी पूर्वी ती माघ महिन्याच्या अमावास्येस पडत असे (कौषितकी ब्रा. १९.३) दुसऱ्या गणनेनुसार ती फाल्गुनात येई (तैत्तिरीय सं. ७.४.८.१.२) फाल्गुनातील पूर्णचंद्र, वर्षाचे मुख मानला जाई... घटात वाण देण्याची प्रथा सूचक अशी आहे. तेव्हा 'घटे अर्कः' म्हणजे 'सूर्याचे पृथ्वीच्या घटयोनीतील बीजारोपण' हे समीकरण निश्चित झाले. हा काळ वर्षातील अत्यन्त महत्त्वाचा काळ मानला जाई. हा काळ सूर्याचे बीज पृथ्वीत येण्याचा काळ. बीजारोपणाचा काळ. जमीन भाजली की तिच्यातली उर्वराशक्ती, सुफलनशक्ती वाढते अशी आजही शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. (डॉ.स. अं. डांगेंनी 'होलाष्टकोपनिषद' या हस्तलिखिताचा परिचय करून देण्याच्या निमित्ताने लेख लिहिला होता.)
धुळवडीमागील भूमिका -
या हस्तलिखितात होळीच्या दुसऱ्या दिवशी चौरस्त्यावर जाऊन शिव्या देणे, विचित्र पोषाख केलेल्या माणसाला गाढवावर बसवून, त्याचे तोंड काळे करून धिंड काढणे असे प्रकार केले जातात असे लिहिले आहे. त्यामागे जमिनीच्या सुपीकतेला मारक ठरणाऱ्या दृष्ट देवतांना दूर सारण्याची कल्पना आहे. सूर्यबीज धारण करताना पृथ्वीची सुपीकता वाढावी हा हेतू आहे. हे होत असताना इडापिडा टळावी या भूमिकेतून शिव्या देणे, धिंड काढणे आदी प्रकार केले जातात. 'कुम्भ' राशीत सूर्य प्रवेश करतो तो काळ बीजरोपणाचा असून या तत्त्वाचा व्याप अश्वमेघापासून ते होलिका उत्सवापर्यन्त आहे असे डॉ. स. अं. डांगे२१ आवर्जून नोंदवतात.
होळीची राख आणि बीजातील सुफलता -
होळी शेणाच्या गोवऱ्या, लाकडे यांची पेटविली जाते. होळीची राख अत्यन्त सुफल असते. होळीची राख टोपली भरुन आणायची आणि तिच्यात चांगली कणसे विविध प्रकारच्या भाज्या, भोपळे यांच्या बिया काढून घोळसायच्या आणि त्या मडक्यात घालून ठेवायच्या. उरलेली राख मातीत मिसळून आळी तयार करून ठेवायची. सुमारे दीड महिन्यांनी अक्षय्यतृतीयेस या बिया अंगणात, परसात टोचतात. या बियांची आणि जमिनीची सुफलन शक्ती होळीच्या राखेमुळे वाढते अशी कल्पना ग्रामीण परिसरात आहे. आजही घरातील स्त्रिया अंगणात, परसात या बिया टोचतात. त्यातून भरपूर भाजीपाला येतो.
या ठिकाणी एक नोंद करावीशी वाटते. स्त्रिया आणि भाजीपाला यांचे अतूट नाते आहे. भूमीच्या सुफलनशक्तीच्या वाढीशी जोडलेल्या व्रतात भाज्यांचे, मिसळीच्या भाज्यांचे विशेष महत्त्व असते. हा उत्सव मराठवाड्यात अत्यन्त उत्साहाने साजरा होतो. होळी पौर्णिमा ते रंगपंचमी हे सहा दिवस वसंतोत्सवाचे असतात. होळीचा नैवेद्य पुरणपोळीचा असतो आणि नैवेद्य सायंकाळी दाखविला जातो. धुळवडीच्या दिवशी होळीच्या राखेने अंग घासल्यास उन्हाळा बाधत नाही असा समज ग्रामीण भागात रुढ आहे. या काळात महाराष्ट्रात 'वीर' नाचतात.
'नाच रे वीरा नाच नाच । होळीला गौऱ्या पाच पाच' असे म्हणत वीर नाचून गौऱ्या, लाकडे गोळा करतात. महाराष्ट्रात माघी पौर्णिमेस एरंडाचे झाड, ज्या जागी होळी पेटवायची असते त्याजागी रोवतात. 'वीर' हा यक्षाचे प्रतीक असतो. यक्षोपासनेचा प्रभाव भारतभर आहे. यक्ष वृक्षावर राहतात असा समज रुढ आहे. होळीप्रमाणेच 'धुळवड' सामूहिकरीतीने खेळली जाते, धूलिवंदन या नावाने त्याचे संस्कृतीकरण केले तरी प्रत्यक्षात प्राकृत पद्धतीने धुळवड खेळली जाते. होळीच्या सायंकाळी बोंबा मारणे, शिव्या देणे हे प्रकार धार्मिक परंपरेचा एक भाग म्हणून केले जातात.
होळी भारतभर साजरी होते -
अनेक परंपरांच्या मिश्रणातून संकरातून आजच्या होळीचे रूप सिद्ध झाले आहे. आदिम अवस्थेतील मानवाला 'अग्नी'चा शोध लागला आणि अनेक संकटांतून तो मार्ग काढू शकला जंगली क्रुर श्वापदांपासून, स्वतःचे रक्षण करण्यापासून ते थेट थंडी पाऊस या नैसर्गिक संकटापासून रक्षण करण्याचे काम अग्नीने केले. अग्नी हा अत्यन्त महत्त्वाचा मानला गेला. शतपथ ब्राह्मणात पृथ्वीला ग्नगर्भा' म्हटले आहे. ज्याप्रमाणे माता पुत्राला गर्भाशयात धारण करते. त्याप्रमाणे पृथ्वी अग्नीला आपल्या पोटात धारण करते. (श. ब्रा. ६-५-१-११) अग्नी आणि आदिम मातृदेवता पृथ्वी यांचा समन्वय संस्कृतीच्या विकासात घातला गेला. कारण मानवाचे जगणे अग्नीमुळे सुखकर झाले. अग्नी सान्निध्यात अपत्य निर्मितीही चांगली होते हे आदिमानवाच्या लक्षात आले. भूमी सुफलित करायची तर स्त्री-पुरुष समागमाची कृती नक्कल म्हणून करावी. पुनःपुन्हा जाणीवपूर्वक केलेल्या या कृतीला मग विधी रूप येते. हे विधी प्रतीकात्म होतात. प्रत्यक्ष स्त्री-पुरुष संयोग झाला नाही तरी तद्वाचक२२ शब्दं त्यानिमित्ताने उच्चारले जातात. कारण कृतीप्रमाणे त्या शब्दातही सामर्थ्य असते. जे भूमीच्या सुफलीकरणास साहाय्यभूत ठरते.
होळी वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी असते. वसंतात सृष्टी विविधरंगी, फुलांच्या बहराने बहरून जाते. झाडे कोवळ्या पालवीने झुलू लागतात. जणु या पुननिर्मितीच्या काळासाठी, सुफलीकरणास पोषक ठरणाऱ्या शिव्या... अश्लील शिव्या लाभदायक असतात ही भूमिका होळी उत्सवाच्या...रंगोत्सवाच्या पाठी असते. अग्नीच्या साक्षीने होणाऱ्या या सुफलीकरण विधीची स्पष्टीकरणे डॉ. देवीप्रसाद चटोपाध्याय, डी. डी. कोसंबी, फ्रेजर मॅलिनोव्हस्की आदी पौर्वात्य व पाश्चिमात्य समाज - मानव शास्त्रज्ञांनी दिली आहेत.
होळी हा विधी प्रागैतिहास काळात स्त्रीने करावयाचा स्त्रीप्रधान विधी असल्याचे डॉ.डी.डी. कोसंबींनी आपल्या 'कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ अनशंट इंडिया' या ग्रंथात नोंदविले आहे आणि त्यात काही नवल नाही. शेतीचा शोध स्त्रीने लावला. शेतीशी निगडित विधींत स्त्रीप्रधानता आहेच.आदिम काळात या विधींचे पौरोहित्य स्त्रीकडे असे. आज पुरुषप्रधान समाजात या विधींचे पौरोहित्य पुरुषांकडे आले तरी अनेक विधींत पुरुष स्त्रीवेश धारण करून ते विधी करतो.
पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा बसताना कृष्णानेच राधारूप घेतले अशी स्पष्टीकरणात्मक कथा - मिथ् - निर्माण झाली. होळी उत्सवात उत्तरेत स्त्रिया उन्मुक्तपणे सहभागी होतात. या काळात गायली जाणारी गाणी विप्रलंभशृंगाराची असतात. राधा ही स्त्रीतत्त्वाची प्रतिनिधी असते तर श्रीकृष्ण पुरुषतत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. डॉ. तारा भवाळकर नोंदवितात. 'नितांत शृंगारिक, क्वचित् अश्लीलतेच्या पातळीवर पोहोचणारी ही गीते अदिम सुफलीकरण विधीतील आज अश्लाघ्य समजल्या जाणाऱ्या उच्चारांचा उत्तरकालीन आविष्कार आहेत.'
चैत्र : चैत्रगौर -
चांद्र वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र या महिन्याच्या पौर्णिमेला वा आगे मागे चित्रा नक्षत्र लागते. त्यावरून या महिन्यास चैत्र हे नाव मिळाले आहे. या महिन्यापासून वसंत ऋतू सुरू होतो. शिशिर ऋतूत पर्णहीन झालेल्या झाडांना कोवळा मोहर फुटू लागतो. फुलझाडांचा बहर पूर्णत्वाला पोहोचतो. पृथ्वीचे 'गंधवती धरा' हे विशेषण सार्थ होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेस संवत्सरास प्रारंभ होतो. या दिवसाला महाराष्ट्रात पाडवा म्हणतात. घराघरावर गुढ्या उभारतात. या दिवशी मराठवाड्यात महाराष्ट्रात कडुलिंबाची कोवळी पाने, गूळ, गोमूत्र, हरभऱ्याची डाळ यांचा घोळाणा करतात. तो प्रसाद म्हणून घरातील वडीलधारी व्यक्ती सर्वांना देते. प्रतिपदेला जो वार असेल तो शुभ मानला जातो. त्याला वर्षेश समजतात. याच दिवशी चंडिकेचे नवरात्र सुरू होते. गार पाणी भरलेले माठ पाणपोईत ठेवण्यास सुरुवात करतात. स्त्रियांचे महत्त्वाचे व्रत चैत्रगौर तृतीयेपासून सुरू होते. अशी श्रद्धा आहे की गौरी शंकरासह माहेरी येते. तिचे शंकरासह पूजन करतात. या दिवसापासून महिनाभर दोलोत्सव सुरू होतो. तृतीयेला गौरीला देव्हाऱ्यात झोक्यावर बसवितात व तिची पूजा करतात. चैत्र तृतीया ते अक्षय्यतृतीयेच्या दरम्यान सोयीनुसार घराघरांतून चैत्रातले हळदीकुंकू केले जाते. शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी हा सोहळा सजवतात. कारण देवीचे मंगळवार आणि शुक्रवार मानले आहेत. या दिवशी सवाष्णी व कुमारिकांचा हळदीकुंकू, चंदनाचा हातावर लेप लावून, पाय धुऊन, अत्तर लावून सन्मान करतात. भिजवलेल्या हरभऱ्याची ओटी भरतात. कैरी घालून केलेली आंब्याची 'डाळ व पन्हे' देतात. गौरी या काळात माहेरी येते. गौरीची सजावट लक्ष्म्यांच्या, भाद्रपद गौरीच्या सजावटीप्रमाणे देखणी असते. विविध प्रकारची फळे, लाडू, अनारसे, करंजा, चकल्या आदी पुढ्यात सजवून मांडतात, कोकणात 'गौरीचे माहेर' नावाचे गाणे म्हणण्याची प्रथा आहे. गौर मैत्रिणीबरोबर खेळून, झोके घेऊन अक्षय्यतृतीयेला परत माहेरी जाते.
चैत्रात अंगणात एकेक कोपरा सारवून त्यावर नवनव्या रांगोळ्या घालण्याची प्रथा कोकणात अधिक आहे. त्याला चैत्रांगण म्हणतात. चैत्रांगणात गौरीची पावले, पंखा, सूर्य , चंद्र, तुळशी वृदांवन, एकमेकींचे हात धरून नाचणाऱ्या मुली इ. आकृत्या काढतात. या ठिकाणी डॉ.डी.डी. कोसंबींच्या 'मिथ अँड रिॲलिटी' या ग्रंथात पान क्र.६९ वर २.६ हे चित्र आहे. महेश्वरजवळील नावडा-टोलीजवळ भांड्याचा तुकडा मिळाला त्यावर सुमारे इ.स. पू. १६०० वर्षे रंगवलेले नृत्य करणाऱ्या मुलींचे हे चित्र आहे.
गणगौर .... राजस्थानातली -
चैत्रगौर कर्नाटकातही मांडली जाते. महाराष्ट्राप्रमाणे आरास करतात. स्त्रियांची भिजविलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरतात. राजस्थानात गणगौर सामूहिकपणे साजरी करतात. राजस्थानात होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चैत्र मास सुरू हतो. या दिवशी म्हणजेच चैत्रकृष्ण प्रतिपदेच्यादिवशी (महाराष्ट्रातील फाल्गुन कृष्ण
प्रतिपदेस) गणगौर बसते. या दिवशी होळीच्या राखेचे १६ मुटके करतात, शेणाचे १६ मुटके करतात. भिंतीला १६ हळदीचे आणि १६ कुंकवाचे टिकल्या, ठिपके काढतात. या ठिपक्यांच्या खाली राख व शेणाचे १६ मुटके मांडतात. हे मुटके गौरीचे प्रतीक. पहिल्या दिवशी या गौरीची पूजा गव्हाच्या ओंब्यांनीच करतात. दुसऱ्या दिवशी हळदीने पूजा करतात. सातव्या दिवशी काजळाचे १६ ठिपके भिंतीवर काढतात. त्याच दिवशी २ कुंड्या वा मडकी चुना व कावेने रंगवून त्यात गहू, साळ, सरकी, ज्वारी, हरभरा, तूर, जवस आदि ७ प्रकारची धान्ये पेरतात. दुसऱ्या दिवशी ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्याजवळ ते कणीस ठेवतात. त्याला शंकर म्हणतात. दुसऱ्या कणसाला केसाचा गुंता आणि मोळी (लाल पिवळ्या रंगाच्या दोऱ्याला मोळी म्हणतात) बांधतात. ती पूजेत आवश्यकच असते. ती शुभकारक असते, तिला गौर म्हणतात. ७ व्या दिवशी पाटावर गहू टाकून त्यावर कुंड्या ठेवतात. त्यांची रोज पूजा होते. जवळच्या विहिरीवर जाऊन मिरवत कळशीने पाणी आणतात. ते कुंड्यात टाकतात. या गौरीला चुर्म्याचा नैवेद्य लागतो. अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी शंकर गौरीला घ्यायला येतो. या दिवशी सर्व जणी सामूहिकपणे विहिरीवर जातात. दोन घागरीत पाणी आणतात. एक कळशी शिव तर दुसरी गौरी. त्यांचा विवाह लागतो. सात फेरे होतात. मग या कळशा कुंड्यांपाशी ठेवतात. तृतीयेला म्हणजेच महाराष्ट्रात ज्या दिवशी गौर माहेरी येते. त्या दिवशी, गणगौरीचे विसर्जन होते. पिठात गूळ घालून १६ फळ, त्रिकोणी अकाराचे छोटे छोटे मुटके तळतात. कंगवा, डबी अशी शृंगारसाधने या पिठाची करून ती तळतात. ती तळलेल्या डबीत ठेवतात. या डबीत ८ फळे ठेवतात. डबी बंद करतात. या दिवशी जेवणात हिरवी भाजी लागतेच. राजस्थानात, महाराष्ट्रातील खेड्यांत मेथी, हरभऱ्याची हिरवी भाजी वाळवून ठेवण्याची प्रथा आहे. मुलीच्या विवाहानंतर या व्रताचे उद्यापन करतात. १८ सवाष्णींना जेवण देतात. प्रत्येकीची नारळाने ओटी भरतात. या पूजेत लिंबाचे... निंबाचे महत्त्व असते. पाण्याच्या घागरीत लिंबाच्या डहाळ्या ठेवतात. राजस्थानातील स्त्रियांच्या व्रतांत लिमडी मातेला लिंबाच्या झाडाला विशेष महत्त्व असते.
राजस्थानात गणगौरीची पूजा करताना खालील गीत उच्चारतात -
गौर गौर गोमती
ईसर पूजा पारबती
म्हे पूजां आलानिला
गौर का सोना का टिका
म्हाकं हे कुकूका टिका
टिका दे टमका दे रानी
वरत करे जो राजारानी
गौरी मागे 'गण' हे विशेषण वा शब्द येतो. महाराष्ट्रात गौरीगणपती एकदम येतात. या शब्दांतून सूचित होणारे संकेतही एका दिशेने जाणारे आहेत. महाराष्ट्रातही चैत्रगौरीच्या पूजेच्या वेळी वेळणीत वा कुंडीत धान्य पेरतात. अशाच प्रकारची गणगौर राजस्थानाप्रमाणे हरियाणातही पूजीली जाते. ही पूजा सामूहिकरीतीने साजरी करतात. मातीच्या गौरी व गौरा (शंकर) यांचे मिरवत, गाणी गात, पाण्यात - नदी, विहीर, तळे - विसर्जन करतात. गणगौर मध्य प्रदेशातील निमाड भागातही अत्यन्त थाटात साजरी होते.
भारतातील चैत्रपाडवा -
चैत्र पाडवा भारतातील अनेक प्रांतातून साजरा होतो. काश्मीरमध्ये चैत्राला चिथुर म्हणतात. पाडव्याला नवरोज किंवा नवरेह म्हणतात. या दिवशी शारदेच्या मंदिरात जाऊन सरस्वतीची पूजा करतात. हिंदू-शिख-मुस्लिम सर्व जण देवीस फुले वाहतात. आदल्या रात्री एका थाळीत, तांदूळ, मीठ, बदाम, दही, फुले, रुपया, आरसा, नव्या वर्षाचे पंचांग ठेवतात. नवरेहच्या पहाटे घरातील सून पहाटे पहाटे उठून प्रत्येकला उठवते. प्रत्येक जण उठल्यावर या थाळीतील प्रत्येक वस्तू पाहतो. अन्न देवतेला प्रणाम करतो. आरसा पाहून हसतो. वर्ष हसतमुखाने जावे. वर्षाची सुरुवात धान्य लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या गृहलक्ष्मीचे दर्शन घेऊन करावी हा हेतू या परंपरेमागे असावा. थाळीतील तांदळाचा 'मीठा पुलाव' साखरभात प्रसाद म्हणून करतात.
केरळमध्ये नव्या वर्षाच्या दिवसाला 'विषु'म्हणतात. प्रातःकाळी उठल्यावर चांगल्या वस्तूवर दृष्टी पडली तर वर्ष चांगले जाते ही कल्पना काश्मीरप्रमाणे केरळातही आहे. त्यामुळे आदल्या रात्री काशाच्या भांड्यात तांदूळ पसरून त्यावर कोन्ना नावाच्या झाडाच्या पिवळ्या फुलांची आरास करतात. त्यात सुवर्णाचे अलंकार चांदीचे रुपये, मोठी पिवळी काकडी, नारळ, धूत वस्त्र ठेवतात. दोन्ही बाजूंनी समया लावून ठेवतात. या सजावटीला 'विषुकणि' म्हणतात. उठल्यावर घरातील सर्व जण विषकणीचे दर्शन घेतात. वर्ष शुभते जावे हीच या मागची भावना असते.
आसाममध्ये वैशाख प्रतिपदेस वर्षाची सुरुवात होते. या दिवसाला खूप महत्त्व असते. या दिवसाला 'बहाग बिहू' किंवा 'रंगाली बिहू' म्हणतात. कडुलिबांची डहाळी आणून घरात टांगतात. एक महिना कडुलिबांच्या पानांची चटणी खातात. कडुलिंब आरोग्यास लाभदायक उन्हाळ्यात गोवर, कांजिण्या, ज्वर या सारखे विकार होतात आणि कडुलिंब हा रक्तशुद्धी करणारा. त्याच्या पाण्यात न्हायल्यास कातडीचे रोग पळतात. भारतीय सण खानपानाच्या रीतीतून सामाजिक आरोग्याशी कसे जोडलेले आहेत याची कल्पना येते. या काळात धान्यलक्ष्मी घरी येते.
बंगालमध्येही वैशाख प्रतिपदेपासून वर्ष सुरू होते. या दिवसापासून वहीची पूजा करून नवीन खाते उघडतात.
भारत हा विशाल देश आहे. त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार वर्षाचा पहिला दिवस ठरविला गेला तरी, त्यामागे धान्यलक्ष्मीच्या आगमनाचा भूमीच्या 'सुफलीकरणाचाच सत्कार करण्याची भूमिका असते.
फाल्गुन, चैत्र, वैशाख हे प्रखर उन्हाचे महिने. या महिन्यांतील स्त्रियांची व्रते,विधी, उत्सव भूमीच्या सुफलीकरणाच्या श्रद्धेतून निर्माण झाले आहे. मात्र या व्रतांत 'वर्षन' हे कारण नसून 'सूर्य' हे कारण आहे.
अक्षय्य तृतीया : अक्षय्य आनंदाची ग्वाही -
महिनाभरचे माहेरपण संपवून लेकुरवाळी गौर, अक्षय्य-तृतीयेस परत जाते, ती घराला 'अक्षय्य आनंदा'चा, समृद्धीचा आशीर्वाद देऊन ! अक्षय्यतृतीयेला गौरीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून, आंब्याची डाळ, पन्हे, टरबूज, खरबूज, काकडी यांच्या फोडी सवाष्णी व कुमारिकांना देऊन. निरोप देतात. घर धनधान्यांनी, मुलबाळांनी भरलेले राहवे यासाठी गौरीची पूजा केली जाते. अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त. या दिवशी मोठ्या प्रमाणावर विवाह होतात. महाराष्ट्र- मराठवाड्यातील शेतकरी पेरणीचा मुहूर्त या दिवशी प्रतीकात्मक रीतीने करतात. या दिवशी प्रारंभ केलेली कामे हमखास पूर्णत्वाला पोहोचतात अशी श्रद्धा आहे. घरात साठवून ठेवलेल्या भाजी पाल्यांच्या बिया होळीच्या राखेत घोळून, मडक्यात घालून ठेवतात. हे मडके अक्षय्य तृतीयेला मोकळे करून त्यातील बिया पेरतात. अंगणात टोचून लावतात. या बियांतील सुफलनशक्ती होळीच्या राखेमुळे वाढते. होळीची राख वेलींच्या आळ्यांतही मिसळतात. भोपळा, तोंडली, दोडकी, घोसाळी, पडवळ यांसारखे भाजीचे वेल या दिवशी लावतात. त्यांना भरपूर फळे येतात अशी श्रद्धा आहे. दक्षिणेत अक्षय्य तृतीयेला त्रेतायुगाचा आरंभ झाला असे मानतात. तर उत्तर भारतात हा दिवस सत्ययुगाचा आरंभदिन मानला जातो. बंगाल ओरिसात तीन आठवडे चंदनोत्सव साजरा करतात. चंदनयात्रा भरते. चंदनाचे पंखे, तेल, अत्तर ब्राह्मणाला दान देतात. महाराष्ट्रात पुरोहितांना माठ, आंबे, पन्हे, आंब्याची डाळ देतात. या दिवशी समुद्राच्या लाटा उंचउंच उचंबळतात असा समज गुजरातेत आहे. गुजरातेत काही गावांत समुद्रकिनारी२३ प्रतीकात्मक गाव उभे करतात. त्यात जीवनोपयोगी धान्य, वस्तू, कापूस, साखर ठेवतात. तांब्याचे नाणे 'राजा' म्हणून आणि सुपारी 'दिवाण' म्हणून ठेवतात. दुसऱ्या दिवशी या गावाची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी सारे गाव लोटते. त्यातून भविष्यकाळचे अंदाज बांधतात. उदा. धान्य लाटेत वाहून गेले वा त्याला मुंग्या किडे लागले तर ते महाग होईल, कापूस ज्या दिशेने उडाला त्या दिशेने निर्यात चांगली होईल असे आडाखे बांधतात. महाराष्ट्राप्रमाणे जलकुंभावर टरबूज ठेवून दक्षिणेसह पुरोहिताला दान देतात. या दिवशी पितरांना श्रद्धांजली वाहिली जाते. त्यांच्या नावे पुरोहितास दान दिले जाते. काहींच्या मते हा दिवस पूर्ण मुहूर्ताचा आहे. या दिवशी वा या काळात कृषिसंबंधीचे भविष्य जाणून घेण्याची प्रथा आहे. ही प्रथा कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असावी. संचारी अवस्थेत भक्त हे भविष्य गुप्त भाषेत सांगतो. याला २४'हुईक' असे म्हणतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील लोणजे गावी एक प्रथा आहे. फाल्गुन पौर्णिमेस देवीच्या मंदिराशेजारी १२ लहान लहान खड्डे खणतात. १२ प्रकारची धान्ये, रूईच्या पानात ठेवून पान गुंडाळून खड्ड्यात ठेवून, खड्डा बुजवतात. दुसऱ्या दिवशी ज्या धान्याला ओल येईल त्या धान्यास पूरक असा पाऊस पडेल अशी श्रद्धा या परिसरात आहे. अशा तऱ्हेचा कृषिविधी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथेही करतात. रूईच्या पानाऐवजी धान्य छोट्या बोळक्यात ठेवतात.
ऋतुचक्राशी जोडलेले उत्सव -
भारतातील विधी, उत्सव हे ऋतुचक्राशी भूमीच्या सुफलनशक्तीच्या वाढीशी जोडलेले आहेत. भारतीय वर्ष गणनेत एकूण सहा ऋतू मानले आहेत. वसंत, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, ग्रीष्म हे ते सहा ऋतू. आषाढ, श्रावण-वर्षा, भाद्रपद, आश्विन-शरद, कार्तिक, मार्गशीर्ष-हेमंत, पौष माघ-शिशिर, फाल्गुन चौत्र- वसंत, वैशाख ज्येष्ठ-ग्रीष्म, सर्वसाधारणपणे या पद्धतीने ऋतूंचा क्रम असतो. हेमंतात पाने पिवळी होऊन गळू लागतात. गव्हाची राने, सोनेरी होतात. शिशिरात पाने गळून झाडे पर्णविहीन होतात. थंडी पराकोटीला पोहोचते, महाशिवरात्रीपासून थंडी झपाट्याने कमी होते. दवाने ओलावलेल्या भूमीला वाढत्या उन्हाचा स्पर्श होताच तिच्यातील ऊर्जा जागते आणि झाडांना कोवळी पालवी फूटू लागते. जुई, मोगरा, शिरीष, बहावा आदी झाडे कळ्यांनी मोहरून जातात. वसंतात सृष्टीला, भूमीला लाभलेले यौवन, सृष्टीच्या मातृत्वाची ग्वाही देते. हा काळ जणु भूमी आणि सूर्य यांच्या समागमाचा. माघ शुद्ध पंचमीस वसंतपंचमी म्हणतात. तर फाल्गुन कृष्णपंचमी रंगपंचमी असते. फाग चैती हे गीतांचे प्रकार उत्तर भारतात रात्र रात्र जागून गायले जातात. वैशाखात उन्हे धारदार होतात. ज्येष्ठात उष्णता पराकोटीला पोहोचते. ज्येष्ठ पौर्णिमेपासून दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या चक्री वावटळी धावू लागतात, आणि वर्षाऋतूची चाहूल देऊन जातात. ग्रीष्माच्या तलाखीने भूमी भाजली जाते. पण त्यातून तिची उर्वराशक्ती वाढते. आंध्रात ज्येष्ठी पौर्णिमेला शेतकरी नांगराची पूजा करून पेरणीच्या तयारीस सुरुवात करतात.
या लोकोत्सवांमध्ये काही सांस्कृतिक आणि राजकीय संघर्षाच्या खुणाही दिसतात. विष्णुच्या दशावतारांपैकी नृसिंह आणि परशुराम या दोहोंशी अक्षय्यतृतीयेचे नाते आहे. देव आणि दैत्य वा असुर यांच्यातील संघर्ष पुराणकथांतून नेहमीच रंगवला आहे. शंकराने असुरांना वर द्यायचा आणि विष्णुने त्यातून पळवाट काढून दैत्यांचा संहार करयाचा हा कल्पनाबंध अनेक कथांत आढळतो. खरे तर हा संघर्ष दोन प्रवृत्तींतील आहे. सण उत्सवांशी त्यांना जोडून आपण या कथा अमर करतो. उत्सवांचे मूळ नाते भूमीशी, तिच्यातून निर्माण होणाऱ्या धान्यलक्ष्मीशी, तिच्यातील सुफलनशक्ती वाढण्याशी असते.
शाकंभरी : वनशंकरी -
मोहंजोदारो हरप्पा उत्खननात सापडलेल्या शिला - प्रतिमांत एका नग्न स्त्रीची प्रतिमा आहे. तिचे पाय वरच्या बाजूला फताडलेले असून, तिच्या योनीतून झाड उगवलेले आहे. देवी माहात्म्यातील देवीचे हे शील्प असावे असे वाटते. मार्कंड्यपुराणातील देवी उद्गारते 'हे देव हो, जीवनावश्यक अशी वनस्पती सृष्टी माझ्या देहातून, पर्जन्यकाळात निर्माण होईल. तिच्या साहाय्याने या विश्वाचे मी धारण-पोषण करीन, (आत्मदेह, समुद्भव) त्यामुळेच मला शाकंभरी हे नावं प्राप्त होईल. चेरोकी जमातीच्या कल्पनेनुसार पहिल्या स्त्रीने इव्हने वनस्पतींना जन्म दिला. मानवाप्रमाणे वनस्पतींनी जन्म देण्याचे यात्वात्मक सामर्थ्य स्त्रीत असते अशी प्राचीन मानवाची श्रद्धा होती. महाराष्ट्रात मराठवाड्यात शाकंभरीचे नवरात्र अनेक घरांतून मांडले जाते. पौष शुद्ध अष्टमीपासून शाकंभरीचे नवरात्र बसते. पौषी पौर्णिमेपर्यन्त असते. पौर्णिमेस रथोत्सव असतो. सर्व जाति जमातीचे लोक शाकंभरीची पूजा करतात. शाकंभरीचे देऊळ विजापूर जिल्ह्यातील बदामीजवळ आहे. स्कंदपुराण, देवीभागवत, पदमपुराण यात शाकंभरीचे माहात्म्य रंगविले आहे. देवीच्या मंदिराजवळ १२० एकरांत हिरवेगार सौंदर्य आहे. देवीच्या कृपेने वाहणाऱ्या हरिद्रा तीर्थातून निघालेल्या ओढ्यांमुळे हे 'तिलकवन' रम्य बनले आहे. या स्थानाशी संबंधित कथा अगस्तीमुनी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांच्याशी जोडली आहे. २५अगस्तीमुनी पत्नीसह प्रवास करताना सद्युम्न राजाजवळ आले. तो ध्यानमग्न असल्याने, मुनी आल्याची दखल त्याने घेतली नाही. मुनी रागावले व उन्मत्त हत्ती होशील असा शाप दिला. त्याने परमेश्वराजवळ करुणा भाकली. नंतर त्याला उःशाप मिळाला. लोपामुद्रा ही शेतीची कला जाणणारी होती. तर अगस्ती ऋषी आळशी होते. तिने त्यांना फावडे हातात देऊन शेतीत कामाला लावले अशी मिथक कथा आहे. अगस्तीमुनींनी विंध्यपर्वतास नमवल्याची अशीच कथा आहे. लोपामुद्रा व अगस्ती वनशंकरी शाकंभरीनिर्मित तिलकवनात येऊन राहिले. तेथे त्यांच्या नावाने तीर्थ आहे. तेथून ते हरिद्रातीर्थाजवळ गेले. या तीर्थातले पाणी स्वतः देवीने झाडांना घालून हा परिसर हिरवा केला अशी श्रद्धा आहे. शाकंभरीने पाताळातून पाणी आणून या तीर्थात टाकले अशी कथा आहे.
फार पूर्वी या परिसरात प्रचंड दुष्काळ पडला. त्यावेळी स्वतःच्या शरीरातून भाजीपाला निर्माण करून तिने लोकांना आधार दिला. अशी श्रद्धा आहे. या नवरात्राच्या उद्यापनच्या दिवशी साठ भाज्या करतात. हा कुळाचार आहे.
स्त्रीने जमिनीची मशागत करून पालेभाज्या, कंदमुळे, फळभाज्या यांचा शोध लावून अन्ननिर्मिती केली. शेतीचा शोध तिनेच लावला. भूमीला सुफळ करण्याचे विविध प्रयोग तिने केले. तिच्या व्रतांमध्ये शेण, राख यांना महत्त्व आहे. ज्यांचा उपयोग आज उत्तम खत म्हणून केला जातो. आजची शास्त्रीय भाषा तिला अवगत नसली तरी प्रत्यक्ष प्रयोगांतून तिने काही गोष्टी निश्चित केल्या. शेणाला 'शुभा' असे म्हणतात हे आपण मागेच पाहिले आहे.
स्त्रीच्या यात्वात्मक सृजनसामर्थ्यांशी हे व्रत निगडित आहे.
कानबाई : लोकदेवता खानदेशची -
कानबाई ही खानदेशातील सर्व जातिजमातींत लोकप्रिय असलेली धरणीच्या सुफलनशक्तीशी नाते असलेली लोकदेवता आहे. सुफलन प्रक्रियेशी निगडित लोकदेवतांत कानबाईच्या रोटविधीची माहिती दिली आहे. रानबाई-कानबाईचा वार्षिकोत्सव वैशाख महिन्यांतील अक्षय्य तृतीये नंतरच्या कोणत्याही शुक्रवारी वा मंगळवारी संपन्न होतो. खानदेशातील काही भागात चैत्र किंवा माघ महिन्यात केला जातो. रोटविधी मात्र श्रावणातील नागपंचमीनंतरच्या कोणत्याही रविवारी साजरा करतात. तिरतची कानबाई हा नवसाविधी जातीची बंधन तोडून, पूर्ण गाव एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मराठवाड्यात कानबाईचा विधी नाही. खानदेशातील काही घराणी मराठवाड्यात स्थायिक झाली आहेत. मात्र हा विधो करण्यासाठी ही मंडळी आपल्या मूळ गावी जातात. कोकणस्थ समाजात विवाहानंतर देवीच्या नावाने बोडण घातले जाते. त्याप्रमाणे खानदेश, जळगाव, नाशिक, धुळे या अहिराणी भाषा बोलल्या जाणाऱ्या भागात विवाहानंतर कानबाईचे रोट केले जातात.
तिरतच्या कानबाईजवळ प्रथम कानबाई-कन्हेर यांचा विवाह लागतो. नंतर ज्या घराने या उत्सवाची जबाबदारी घेतलेली असते त्या घरातील मुलामुलींची लग्ने लागतात. त्यानंतर आसपासच्या गावांतील लोक येथे येतात व सामुदायिक लग्ने लागतात. जातीचे बंधन नसते. एकेका दिवशी दोनशे अडीचशे विवाह लागतात. हा उत्सव सात दिवस तर काही ठिकाणी सव्वा महिना चालतो. या वार्षिकोत्सवात स्थापना, कानबाई -कन्हेर विवाह, गवरनी पूजा, भोजन, जागरण आणि विसर्जन हे विधी महत्त्वाचे मानतात. ही देवता माघ, चैत्र वैशाखात आणि मंगळवारी वा शुक्रवारी मांडतात. त्याचे उल्लेख गीतात येतात.
चैत्र वैशाखाना ऊन व माय, वैशाखाना ऊन
खडके तापून झाले लाल व माय; तापून झाले लाल
या उन्हाने कानबाईच्या पायाला फोड आले आहेत. ती अशा उन्हात धवया... शुभ्र घोड्यावर बसून येते.
म्हावना महिना म्हावना महिना, दिन मंगयावार व।
कानबाई मायनी बैठक दिनी, दिनी शुक्रवार व।
माघ महिन्यात रथ सप्तमी असते. कानबाईच्या स्थापनेसाठी राणादेवाच्या लग्नात वा तिरतवरून परणून आणलेला नारळ आवश्यकच असतो. या पूजेसाठी आवश्यक असणारा बिजोरा व फुले, दिवठाणी व चौरंग, कानबाईची प्रतिकृती, चूल, केळी (मातीची कळशी) या वस्तू वाणी, माळी, सुतार, सोनार, कुंभार यांच्याकडून वाजतगाजत आणतात. बिजोरा हे फळ आवश्यक असते. हा उत्सव मुळात भूमीच्या सुफलन शक्तीशी जोडलेला आहे. 'लोकदेवता कानबाई' हा डॉ. प्रा, पुष्पलता करनकाळ यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी मुळांतून पाहावा. 'सरस्वती शब्द कोश' भाग १ मध्ये बिजोराचा अर्थ बिजवराशी विवाह असा होतो. आठ विवाह प्रकारांपैकी दैवविवाहात कन्येस पतीचे भाग्य निरंतर लाभावे म्हणून प्रथम प्रतीकात्मक देवा ब्राह्मणांशी लग्न लावले जाई. नंतरच नियोजित वराशी विवाह लावला जाई. या रुढीला अनुसरुन बिजवर ब्राह्मणाचे प्रतीक म्हणून या विधीत 'बिजोरा' फळ आवश्यक असते.
दिवा : अग्नी सूर्यपूजेचे प्रतीक -
हे फळ घेण्यासाठी वाजत, मिरवत माळ्याच्या मळ्यात जातात. त्या फळाची पूजा करून आंब्याच्या झाडाखाली गारगोटीच्या खड्यांत कापूस ठेवून ठिणगीच्या साहाय्याने दीपज्योत पेटवितात. आंब्याच्या, बीजोराच्या२६ झाडाखालची काळी माती, बीजोरा व दीपज्योत वाजतगाजत घरी आणतात. दिवा, सव्वा महिना घरात तेवत ठेवतात. त्यासाठी फक्त एरंडेल तेलच वापरतात. दीपपूजा ही सूर्यपूजेचे, आग्निपूजेचे प्रतीक आहे. दुपारी नदी वा विहिरीवरून वाजत गाजत पाणी आणतात. कानबाईच्या विधीत 'सव्वा' चे महत्त्व असते. सव्वा हे 'वाढी' चे प्रतीक आहे. चौरंगावर सव्वा पावशेर गहू पसरवून त्यावर कानबाईचा मुखवटा मांडतात. भोवती सात मूठी तांदूळ वेगवेगळे ढीग करून ठेवतात. मुखवट्याशेजारी तांब्या ठेवतात. त्यात तांदूळ टाकतात व त्यावर परणून आणलेला नारळ ठेवतात. नारळ ठेवलेल्या कलशाला दागिने घालतात. नारळाच्या मध्यात नथ खोचतात. नारळावर लाल खण पांघरतात. कळशीच्या बाजूला कन्हेर या वनस्पतीची फांदी रोवतात. कलशासमोर बिजोरा हे फळ टांगते ठेवतात, रांगोळीने चौरंग सुशोभित करतात. १०८ प्रकारच्या फुलापानांची आरास करतात. विविध फळे, अंजीर, मनुका आदी सुकामेवा, काळे तीळ, काळी पोत, काळा हरभरा, टिकली, बांगडी या वस्तू पूजेत ठेवतात. चौरंगाभोवती आंब्याचे तोरण बांधतात.
आवढिशी कानबाई ठुमकती -
कानदेवीची गाणी खानदेशातील प्रत्येक स्त्रीच्या ओठावर असतात. अहिराणी भाषेतील अतिशय भावात गाणी कानबाईच्या नावाने गायिली जातात. खानदेशातील खेड्यांत अक्षय्य तृतीयेला मुली गौर मांडतात व गाणी म्हणतात. ही गाणी कानबाईची असतात.
आवढिसी कानबाई ठुमकती माय ठुमकती
आंबाना बागमा येई पडती,माय येई पडती ।
आमना कन्हेर साजिंदा,माय साजिंदा ।
परणी कन्हेर आवदा , माय आवंदा ।
कानबाईच्या जेवणात गंगेवरून आणलेल्या पाण्यात तांदूळ शिजवतात त्याला मोगरा म्हणतात. राजस्थानातही तांदळाचा भात शिजवतात त्याला 'मोगर' म्हणतात.
थोरो काई काई रूप बखाण रनुबाई ।
सारेठ देश सो आई ओ ॥
ही देवी सौराष्ट्रातून महाराष्ट्रात आली आहे. आणि म्हणूनच राजस्थान निमाड भागात गणगौर मांडली जाते. तिच्याशी हिचे साम्य आहे.
कानबाई-कन्हेर विवाहात कानबाई पृथ्वीचे तर कन्हेर तिच्या सहचराचे प्रतिनिधित्व करतो. हा सहचर काळानुरूप द्यौ, शिव, विष्णु, सूर्य, नाग, गज, अश्व यांच्या रूपात येतो. तर पृथ्वी गौरी, उमा, लक्ष्मी, सीता, कानबाई या रूपात येते. मराठवाड्यात लक्ष्म्या श्रद्धापूर्वक आणि कुळाचार म्हणून, पूर्ण घर त्या निमित्ताने एकत्र येऊन साजऱ्या करतात, खानदेशात धुळे, जळगाव, चाळीसगाव, मालेगाव, भागात कानबाईचा उत्सव विधिपूर्वक आणि कुळाचार म्हणून साजरा केला जातो.
ठळकपणे जाणवलेल्या गोष्टी -
भूमी आणि सूर्य यांच्या अनुबंधातून होणाऱ्या सर्जनाशी जोडलेले विधी, उत्सव यांची सविस्तर चर्चा या प्रकरणात केली आहे. त्यातून काही गोष्टी ठळकपणे जाणवतात त्या अशा -
१. भूमी आणि वर्षन यांच्या अनुबंधातून निर्माण झालेल्या विधी, उत्सवांमध्ये सामूहिकता आहे. ही व्रते निसर्गाच्या सान्निध्यात साजरी केली जातात. नृत्यात्मक हालचाली, फेरावरची गाणी, विविध खेळ (उदा. तव्यावरची फुगडी, सूप नाचवणे इ.) झोके, जागरण यांच्याशी हे विधिउत्सव जोडलेले आहेत .ती सामूहिकता भूमी, सूर्य यांच्यातील अनुबंधाशी जोडलेल्या विधी, उत्सवांतून नाही. हे विधीउत्सव सौभाग्य अखंड राहवे या भावनेशी जोडलेले आहेत. एकत्र येऊन विधी करण्यावर भर दिलेला नाही. येळाआवस हा पूर्णतः शेतात करावयाचा सुफलता विधी आहे. त्यामुळे त्यात रानात जाऊन स्वयंपाक करणे, सायंकाळी पूर्ण शेतास हेंडगा पेटवून प्रदक्षिणा घालणे. पांडवांची विशिष्ट पद्धतीने मांडणी करणे यांना महत्त्व आहे. त्यामुळे भूमीची सुफलशक्ती वाढते ही श्रद्धा आहे.त्यात विधींना विशेष महत्त्व आहे आणि ते शेकडो वर्षांपासून नियमबद्धतेने पाळले जातात.
२. पौषातले रविवार, रथसप्तमी, चैत्र तृतीया - अक्षय्य तृतीया या उत्सवांतील सामूहिकता जाऊन ती व्यक्तिनिष्ठ व्रते झाली. त्यांतील नियम व्यक्तीने पाळावेत या भूमिकेवर विशेष भर दिला जाऊ लागला.
३. पुरुष बीज स्वरूप आहे. त्याचे वीर्य तेजाचे प्रतीक मानले जाऊ लागले. जीवन जगण्याच्या रीतीत पुरुषप्रधानता आली. स्त्री क्षेत्र स्वरूपा - स्थिर मानली गेली. अग्नी, तेज, पर्जन्य या सर्वांना तिने स्वतःत रिचवून घ्यावे. यातून सहनशीलता हा तिचा 'गुण' मानला गेला. तिचे अस्तित्व 'बीज' पेरणाऱ्याशी, तेज देणाऱ्याशी बांधले गेले. तो असेल तरच तिला असण्याचा अधिकार राहिला. सर्व व्रतांतील निसर्गाशी असलेला अनुबंध लोप पावून पतीच्या असण्याशी पर्यायाने स्त्रीच्या सौभाग्याशी जोडला गेला.
४. कालौघात कुमारी स्त्री 'सौभाग्यकांक्षिणी' झाली. एकूणच व्रते-वर्षन आणि सूर्य या दोनही प्रेरकांशी जोडलेल्या व्रतांना, कुमारिकांची असतील त्यांना, 'चांगला पती मिळावा' या सौभाग्यकांक्षेची आणि विवाहितांची असतील त्यांना सौभाग्यरक्षणाची भूमिका दिली गेली. वर्षनाशी जोडलेले विधी, उत्सव मोकळ्या आभाळाखालचे असल्याने, त्यांत मुळातच नृत्य आणि सामूहिक स्वर यांचा यात्वात्मक संबंध असल्याने, पुरुषप्रधानतेतून आलेल्या ताठरपणाला त्यात फारसा अवकाश मिळाला नाही.
५. मात्र 'सूर्य' हे बीजरूपी वीर्याचे, पौरुषाचे प्रतीक असल्याने त्याच्याशी संबंधित विधि, उत्सवांत मात्र 'सैभाग्याकांक्षा' जी पतीच्या अस्तित्वाशी पूर्णपणे जोडलेली आहे. ती महत्त्वाची भूमिका झाली. पौषातील रविवार, संक्रांतीचा वाणवंसा, चैत्रगोरीचे हळदीकुंकू ही व्रते आज पूर्णपणे ती करणाऱ्या स्त्रीच्या सौभाग्याशी जोडलेली आहेत.