भोंडल्याची गाणी/कारल्याचे वेल
कारल्याचा वेल लाव ग सुने लाव ग सुने,
मग जा आपुल्या माहेरा माहेरा..
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई,
लावला हो सासूबाई अता तरी जाऊ द्या माहेरा, माहेरा
कारल्याला कारली येऊ दे ग सुने,येऊ दे ग सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा.
कारल्याला कारली आली हो सासूबाई,आली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा,माहेरा.
कारल्याची भाजी कर ग सुने, कर ग सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा.
कारल्याची भाजी केली हो सासुबाई, केली हो सासुबाई आता तरी जाऊ का माहेरा, माहेरा
कारल्याची भाजी खा ग सुने, खा ग सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा.
कारल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई, खाल्ली हो सासुबाई आता तरी जाऊ का माहेरा, माहेरा
उष्टी खरकटी काढ ग सुने, काढ ग सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा.
उष्टी खरकटी काढली हो सासुबाई, काढली हो सासुबाई आता तरी जाऊ का माहेरा, माहेरा
आणा फणी, घाला वेणी जाऊद्या राणी माहेरा, माहेरा
आणली फणी, घातली वेणी गेली राणी माहेरा,
माहेरा.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |