भोवरा/खिडक्या
५
खिडक्या
"सगळं पाणी इथून तिथून एक; पाण्याला पाणी मिळालं की मग हे एक, हे दुसरं असं कसं राहील?" एक जण ठसक्यात म्हणाली.
"काय हो वैनी, सगळे डोंगरसुद्धा एकच की. हा खंडोबाचा, हा बद्रीचा, हा केदाराचा, असं कसं म्हणायचं?" दुसरीने शंका काढली.
"वा! वा! तुमचं आपलं काहीतरीच. डोंगराडोंगरांत अंतर असतं. एक डोंगर संपतो नि...... "एवढे शब्द कानावर पडतात तो बोलणाऱ्या बाया विरुद्ध दिशेने ऐकण्याच्या टप्प्याआड निघूनसुद्धा गेल्या. मागे फिरून त्यांच्या बरोबर जावे, त्यांचे बोलणे ऐकावे व ह्या मजेदार वादाचा शेवट कसा होतो ते अनुभवावे, असे मनात आले; पण ते करणे शक्य नव्हत. आम्ही बद्रीच्या वाटेवर, तर त्या दर्शन करून परत निघालेल्या. दोघांनाही वाट काटायची घाई व दुसरे म्हणजे ओळखदेख काही नाही. त्यांचा मराठी पोषाख, हातवारे करून बोलणे ह्यांनी लांबूनच माझे कुतूहल जागृत झाल होते, त्यात त्यांचे हे बोलणे कानांवरून गेले म्हणून जास्तच जिज्ञासा वाटला पण ती पुरी करणे शक्य नव्हते. यात्रेत वारंवार असा अनुभव यायचा. यात्रा रात्रंदिवस एका अरुंद रस्त्यावरून जात येत होते. कोणाची कोणास ओळख नाही; पण भेट मात्र काही क्षणांची व एकदाच, कधी परत परत मुक्कामा- मुक्कामाला, कधी काही तास अशी होई. अशा भेटीत काही बोलणे होई, कधी नुसते दर्शनच आणि तेवढ्यातच फक्त बाहेरचेच दर्शन नाही तर अभावितपणे अंतरंगाचेही दर्शन होई. बहुधा हे दर्शन ओझरतेच होई. एखाद्याच्या तोंडचे एखादे वाक्य त्याच्या मनाच्या कोपऱ्यावर लहानसा किरण टाकून जाई. कधी वाटे, उगीच ह्या खिडकीत डोकावलो. कधी कधी
अंतर्मनाचा आविष्कार मोठा हृद्य वाटे आणि कधी गोष्टी दिसत असूनही बोध न होता गुंतागुंत वाढे मात्र.
माझ्या गळ्यात दुर्बीण अडकवलेली असे. मी ती बहुधा पक्ष्यांचे निरीक्षण करावयास उपयोगात आणीत असे. पण मधूनमधून लांब दिसणाऱ्या हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांवरून मी दुर्बिणीतून नजर टाकी. एकदा अशीच उभी असताना शेजारी कोणीतरी आल्याचा भास झाला म्हणून पाहिले, तो धनसिंग, आमचा ओझेवाला, एकाग्रपणे माझ्याकडे पहात होता. "काय रे धनसिंग काय हवं आहे ?" "बाई, तुम्ही त्या नळ्यांतून काय बघता?" मी दुर्बिणीचे मळसूत्र कसे फिरवायचे हे त्याला समजावून सांगितले व दुर्बीण त्याला डोळ्यांला लावायला दिली आणि लांब अस्पष्ट दिसणाऱ्या हिमशिखरांकडे त्याचे तोंड वळवले. 'हे काय बुवा यंत्र !' अशा कुतुहलाने जरा भीतभीतच त्याने दुर्बीण डोळ्यांना लावली व तो मळसूत्र फिरवू लागला. मी त्याच्या तोंडाकडे पाहात होते. त्याच्या कपाळावर एखादे अवघड काम करताना उमटतात तशा आठ्या होत्या, ओठ दाबलेले होते; पण लौकरच त्याचे तोंड आश्चर्याने उघडले. आठ्या पार नाहीशा झाल्या. त्याने दुर्बीण काढून लांबच्या डोंगराकडे पाहिले. परत यंत्र डोळ्यांना लावले, परत काढले. नंतर परत डोळ्यांना दुर्बीण लावून चौफेर नजर टाकली. रस्त्यापलीकडे व नदीपलीकडे प्रचंड पहाड होते. तिकडे त्याने मान वळवली व एकदम हात लांब करून मान हलवली व दुर्बीण काढून तो हसू लागला. "बाई, मला वाटलं, तो डोंगर माझ्या हाताला लागेल आणि बर्फ मुठीत घेऊन खाता येईल." परत त्याने दुर्बीण डोळ्यांना लावली व खाली नदीच्या पात्राकडे दृष्टी फिरवली. खाली खोल दोन हजार फुटांवर शेतांत माणसे काम करीत होती. ती त्याला दिसली, तशी त्याने दुर्बीण काढली. एक लांब श्वास घेतला व मला म्हणतो, "हे उंच उंच डोंगर भोवती नसते तर मला दुर्बिणीतून माझं नेपाळातलं घर आणि अंगणातली मुलं दिसली असती; नाही?" धनसिंगच्या मनात केव्हाही डोकावले तरी त्याचे घर, मुले, त्याचे धान्याने भरलेले कोठार आणि त्याच्या गावचे उंच उंच पहाड मला दिसत.
आमच्याबरोबर कधी थोडे पुढे, कधी मागे चालणारा एक बंगाली बायांचा गट होता. एकाच धर्मशाळेत उतरलो म्हणजे त्यांचे न् माझे मोडक्यातोडक्या हिंदीत संभाषण चाले. त्या मेळाव्यात दोघी बहिणी होत्या.
एक मध्यम वयाची, अहेवपणाची लेणी अंगावर असलेली, भांगात शेंदूर भरलेली अशी; व दुसरी तरुण पण केस काढलेली, पांढरे वस्त्र नेसलेली, विधवा होती. कधीकधी त्या एकत्र असत. कधी ती तरुण पोर दुसऱ्या बायांत जाऊन बसे. थोरली बहीण खाऊनपिऊन सुखी होती व तिने धाकट्या बहिणीचा खर्च देऊन तिला यात्रेला बरोबर आणले होते; इतकी हकीकत मला थोरलीकडून कळली होती. यात्रा जवळजवळ संपली होती. परतणाऱ्या लोंढ्याबरोबर आम्ही पीपलकोठीला येऊन पोचलो होतो. येथून बसने प्रवास करून रेल्वेचे स्टेशन गाठायचे होते. चालणे संपले होते. एका लांबलचक छपराखाली आम्ही गटागटाने बसलो होतो. बससाठी बाऱ्या लागल्या होत्या. बंगाली बायांतील काही जणी आमच्या शेजारीच एका घोळक्यात बसल्या होत्या. काही जणी मागे राहिल्या होत्या. गरुडगंगेवर स्नान करून त्या मागून येत आहेत असे कळले. ह्या बायांना यात्रा घडवणारा बंगाली माणूस व पंड्या तिकिटाच्या खिडकीजवळ तिकिटे काढीत होते. एवढ्यात ती थोरली बहीण अडखळत धडपडत कशीबशी पाय उचलीत येताना दिसली. तिच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा चालल्या होत्या. ती आत आली तो तिने जमिनीवर लोळणच घेतली व मोठमोठ्याने रडावयास सुरुवात केली. तिच्या मागून तिच्या बरोबरच्या बाया आल्या त्याही डोळ पुशीतपुशीत. थोरली बहीण तोंडाने काही बोलत होती, हातवारे करीत होती, धाकट्या बहिणीकडे वळून परतपरत काही सांगत होती, व मधेच कपाळावर हात मारून रडत होती. एवढ्यात त्यांच्याबरोबरचा गृहस्थ तिकिटे घेऊन आला; त्यासरशी ती धावत गेली व त्याच्या पायांवर डाेके ठेवून, त्याचे पाय धरून रडू लागली. छपरात बसलेली सर्वच माणसे अगदी घाबरून गेली. झाले तरी काय? कोणी मेले की काय? थोड्या वेळाने कळले की ह्या बाया कपड्यांच्या घडीत पैसे ठेवून आंघाळीला गेल्या, परत येतात तो त्यांचे सर्व पैसे, सुमारे सहाशे रुपये- नाहीसे झाले होते. कुठे पीपलकाेठी नि कुठे कलकत्ता? पैशाशिवाय एवढा प्रवास होणार कसा? आम्ही सर्वांनी वर्गणी करून तिकिटे काढून देण्याचे ठरवले पण तो बंगाली मनुष्य म्हणाला, "तिकिटं काढली आहेत, पैशाची जरुरी नाही. काळजी करू नका तुम्ही" त्या बाईचे सांत्वन करण्याचा त्याने प्रयत्न केला पण त्याला काडीचे यश आले नाही. इतरांचे पण पैसे गेले होते. त्या नव्हत्या का स्वस्थ ? ही तर
श्रीमंतीण. पण ती सारखी म्हणत होती, "मी मेले असते तर बरं होतं." मला काही समजेचना की तिचं दुःख एवढं अनावर का?
आमचा चंडीप्रसाद इकडेतिकडे भटकत होता तो एवढ्यात आमच्यात आला. मी म्हटले, "एवढी यात्रा केलीन्, पण बघ बाबा, पैशासाठी कसा जीव टाकते आहे ती." तो माझ्याजवळ सरकला व मला खालच्या सुरात म्हणाला, "बाई, ती काही पैशासाठी नाही एवढी रडत. अहो, त्या काही लुगडी टाकून नव्हत्या स्नानाला गेल्या. ती धाकटी बहीण आहे ना, तिचं स्नान आधीच झालं होतं, सगळे कपडे तिच्याजवळ ठेवून ह्या नदीवर गेल्या. परत येतात तो ही तिथं बसलेली, तिच्या पुढ्यात लुगडी, पातळांच्या घड्या पण जशाच्या तशा, फक्त आंतले पैसे मात्र नाहीसे झाले होते.
चंडीप्रसादची हकीकत ऐकून मी चमकलेच. दोघी बहिणींना मी गेले आठदहा दिवस पाहात होते, त्यांतल्या एकीशी अधूनमधून बोलतही असे. पण काही विशेष असे जाणवले नव्हते. आज त्या दोघींच्या संबंधावर एकदम नवीन प्रकाश पडला. पण त्या प्रकाशाने काही स्पष्ट न दिसता मनाचा गोंधळ मात्र उडाला. मी परत घोळक्याकडे दृष्टी टाकली. थोरली बहीण किंचित् शांत झाली होती, पण तिच्या मनातला हलकल्लोळ तिच्या प्रत्येक हालचालीत दिसत होता. क्षणभर ती अगदी निश्चल बसे, दुसऱ्याच क्षणी मोठा सुस्कारा टाकून मान हालवी. काही वेळा तिच्या डोळ्यांतून सारख्या धारा वाहात, एरवी ती पुतळ्यासारखी बसे. काही वेळा कपाळावर हात मारी. कधी आश्चर्याने डोळे विस्फारून धाकटीकडे पाही, तर कधी पदर पसरल्यासारखे करून पाहून काही याचना करी. काही तासांपूर्वी ती किती सुखी, तिची यशस्वी कर्तबगार बाई होती. तिने धाकटीवर केवढे उपकार नव्हते का केले? ती श्रीमंतीत गरीब बहिणीला विसरली नव्हती काही. तिचे बोलणे कधी आढ्यतेखोर नव्हते; पण तिच्या बोलण्या-चालण्यात आत्मतुष्टी असे. मला ती समजून येई पण मला त्याची चीड येत नसे- मी थोडीच तिची धाकटी बहीण होते! आज विचारांनी उभे केलेले सर्व विश्व धुळीला मिळाले होते. किती आत्मप्रतिष्ठा, स्वतःबद्दलचा विश्वास, स्वतःबद्दलची चांगुलपणाची कल्पना, सगळ्या त्या पोरीने पार फाडून तोडून पायदळी तुडवल्या होत्या. तिचा बिचारीचा आत्मा तडफडत होता. मला तिच्याकडे बघवेना म्हणून मी धाकटीकडे पाहिले. तिचे डोळे कोरडे ठणठणीत होते. पापण्यांनी ते अर्धवट झाकलेले होते. माझी नजर तिला जाणवल्यामुळे
की काय, तिने वर मान करून माझ्याकडे पाहिले. तिचे डोळे टपोरे काळभोर होते. पण त्यात मला कसलीच भावना दिसली नाही. त्यांत दुःख नव्हते, सूडाचे समाधान नव्हते, गोंधळ नव्हता - अगदी काही काही नव्हते. क्षणभरच तिने माझ्याकडे पाहिले व नंतर नजर खाली वळवली. ती नजर मला निरागसही म्हणवेना, अगदी काहीच त्या दृष्टिक्षेपात नव्हते. काही तऱ्हेच्या काचा अशा असतात की बाहेरून आत प्रकाश येतो पण आतले काही बाहेर दिसत नाही. तसे होते तिचे डोळे. तिचा चेहराही अगदी स्तब्ध, निर्विकार होता. आसपास बाया फुसफुसत होत्या, थोरली बहीण मधूनमधून तिला काही म्हणत होती, पण त्याची तिला जाणीवच नव्हतीसे वाटले. चेहरा बोलतो म्हणतात- पण मला तिच्या डोळ्यांची व चेहऱ्याची भाषा कळत नव्हती. काही खिडक्या उघडल्या होत्या. पण अंतरंगातली खोली मला अंधारानेच भरलेली दिसली.
ह्या बाया काही माझ्या ओळखीच्या नव्हत्या. त्यांचे अंतरंग मला कळले नाही, तर नवल कसले ? पण अगदी दाट ओळखीचे माणूससुद्धा आपल्या माहितीचे आहे असे म्हणणे धाडसाचे होईल. माणूस निरनिराळे मुखवटे घालून निरनिराळ्या भूमिका वठवीत असतो. नाटक म्हणून नव्हे- अगदी अंतःकरणापासून प्रत्येक जण स्वतःचे म्हणून एक प्रतीक मनाशी बाळगून असते. इतरांनाही त्या प्रतीकाची प्रचीती यावी अशी धडपड असते. बरीचजणे त्या प्रतीकाबरहुकूम तंतोतंत नाही, पण मोठ्या प्रमाणात भूमिका उठवतात. एखाद्या वेळी तळाशी गाडलेले खरे बंड करून उठते- नको त्या खोलीची खिडकी उघडते व स्वतःला व इतरांना माहीत नसलेल्या व्यक्तीचे चमत्कारिक हुरहूर लावणारे दर्शन होते.
मला एक व्यक्ती आठवली. असा मनुष्य शोधून सापडणार नाही. त्यांची वृत्ती इतकी आनंदी व संतोषी होती की, त्या भेटल्या किंवा बोलल्या तर त्याचा आनंद दिवसेन्-दिवस मनात राही. जन्मभर इतरांसाठी झिजल्या, मेल्या त्याही झिजून झिजून तिळातिळाने. भेटायला गेले की म्हणत, 'नाही ग सोसवत आता, काही तरी द्या आणि सोडवा यातून.' जणू शरीराचे दुखणे कमी नव्हते म्हणून की काय, काही महिने त्यांना मधूनमधून भ्रम होई. भ्रम झाला म्हणजे मात्र त्यांच्या अंतरंगाचे एक कल्पनातीत दर्शन होई. भ्रमात त्यांना मुलगा, नातू, सून किंवा पणतवंडे मेलेली दिसायची, कधी मुलगी मेली म्हणून रडायच्या, कधी सून, तर कधी नातवंड गेले म्हणून उरी फुटत. खूप समजूत घातली, जे मनुष्य
मेले म्हणून त्या रडत, ते मनुष्य पुढे आणून उभे केले की काही वेळ स्वस्थ असत. परत आपल्या थोड्या वेळाने रडायला सुरुवात करायच्या. त्यांच्या आयुष्यात त्यांनी पुष्कळ दुःखे भोगली पण सर्व निःशब्द, मुकाट्याने. पण आजारपणाच्या भ्रमातील ह्या खोट्या दुःखांना वाचा होती. त्या मोठमोठ्याने आक्रोश करायच्या. लहान मूल जसे धाय मोकलून रडते तशा रडायच्या.
सारखे अंथरुणाला खिळलेले, सर्व व्यवहार परस्वाधीन, दिवसाकाठी काही तास मर्मांतिक वेदना सहन करता करता जागरूकपणी मन मृत्यू मागे, पण ते मन निजले म्हणजे जिवाची तडफडत का होईना, जगण्यासाठी सनातन धडपड चालू राही. आपल्याला मागितलेला मृत्यू दुसऱ्याला बहाल करून जीव दुसऱ्यांना दाखवी की मला दुःख होत आहे. पण जीवाचे खरे दुःख स्वतःबद्दलचेच होते. मृत्यूच्या दाट अंधारात भ्यालेला जीव आक्रोश करीत होता. स्वतःच स्वतःला फसवीत होता. "मी नाही मेलो, हा मेला-ती मेली-मी जिवंत आहे. मी त्यांच्यासाठी रडतो आहे."
कवीला द्रष्टा का म्हणतात? तो मुखवट्यांच्या आड पाहू शकतो. अगदी अंधारात दडवलेले त्याला दिसते. आपण वाङ्मय का वाचतो? त्याबद्दल इतकी आवड का वाटते? माणसाच्या रोजच्या मुखवट्याआड दडलेल्या भावना इच्छा, धडपड त्यात व्यक्त होतात म्हणून. पुस्तकातील काल्पनिक व्यक्तीच्या अंतःकरणाचा तो आविष्कार असतो. पदोपदी त्यात आपली स्वतःची ओळख स्वतःला पटत असते. पण आपली स्थिती त्या भ्रम झालेल्या बाईसारखी असते. सतत बंद केलेल्या आत्म्याच्या खिडक्या उघडतात. थोडे वारे, थोडे ऊन आत शिरते, मन मोकळे झाल्यासारखे वाटते, मुखवटे फाटतात, सत्यदर्शन होते. दडपलेले भारावलेले मन हलके होते. पण हे सर्व होत असता माझे स्वतःचे दर्शन मला होते आहे, ही जाणीव नसते. दुसऱ्या कोणाचे तरी अंतरंग आपण पाहतो असे वाटते. त्यावर आपण अगदी आडपडदा न ठेवता वादविवाद करतो, हसतो, रडतो, कीव करतो-पण ती स्वतःची, हे आपल्याला समजत नाही.
पाच पांडव द्रौपदीबरोबर महापंथाने निघाले होते. म्हातारपणाने, वाटेच्या श्रमाने एक एक मधेच थकून पडे; व उरलेले पुढे चालू लागत. मेलेला शेवटपर्यंत न जाता मध्येच का पडला, म्हणून भीम विचारी व धर्मराज युधिष्ठिर त्याला उत्तर देई. उत्तराच्या ह्या एकेका वाक्याने धर्मांच्या
हृदयाची एक एक खिडकी उघडी होत होती. द्रौपदी पडली, भीमाचे रांगडे प्रेमळ मन कळवळले. नकुल, सहदेव, अर्जुन प्रत्येकाबद्दल एक एक बोचक वाक्य बोलून थोरला भाऊ पुढे चालला होता; पण द्रौपदीच्या वेळेला त्या मनातली खरी तळमळ, आयुष्यभर पचवलेले विष बाहेर पडले. "द्रौपदीनं इतरांपेक्षा अर्जुनावर जास्त प्रेम केलं म्हणून ती वाटेतच पडली." उत्तर वरवर दिसायला किती सरळ, पण त्यात धर्माच्या आयुष्यातील अगतिकता आली. हा युधिष्ठिर कोणती युद्धे खेळला होता? कोणतीही नाही. ह्या धर्मराजाने कोणता धर्म पाळला होता? अर्जुनाने पांडवांसाठी द्रौपदी मिळवली; एवढेच नव्हे तर असहाय, राज्यातून वनवासी झालेल्या पांडवांना बलशाली पांचालांचे साहाय्य मिळवले व पर्यायाने हस्तिनापूरच्या राज्याचे वारस केले. सर्व पृथ्वी जिंकली. खांडववन जाळून इंद्रप्रस्थ स्थापले. युधिष्ठिराने-धर्माने- विनासायास मिळालेले राज्य व बायको पणाला लावली. त्या मानी राजकन्येची भरसभेत विटंबना होऊ दिली. तिला वनवास भोगावयास लावला. जयद्रथाच्या वासनेला तिचा बळी जायचा; पण तिला अर्जुनाने वाचवले. तिला विराटाच्या नीचकुलोत्पन्न राणीची बटीक केले. निरनिराळ्या निमित्ताने तिला अर्जुनापासून दूर केले. पहिल्याने एकांतवासाचा भंग झाल्याचे निमित्त करून अर्जुनाला तीर्थयात्रेस पाठवले. मग पाच वर्षे अस्त्रप्राप्तीसाठी पाठवले. जेव्हा तिने हट्टच घेतला तेव्हा स्वारी त्याच्या भेटीस निघाली. धर्म राज्यावर बसला पण ते राज्य व त्याची राणी अर्जुनाच्या शौर्याने त्याला मिळाली होती. स्वयंवरात अर्जुनाने तिला जिंकले होते- तिचे मन जिंकले होते. ती अर्जुनाच्या शौर्याचे प्रतीक होती, तशीच धर्माच्या व्यसनाधीनतेची, परपुष्टतेची, असहायपणाची, अतीव वैफल्याची, मूर्तिमंत सदैव डोळ्यांपुढे नाचणारी, हृदयाला जाळणारी आठवण होती. धर्माने आपल्या वाक्याने द्रौपदीचा दोष म्हणून सांगितला तो त्याच्याच आत्म्याचे उघडेवाघडे प्रदर्शन होते... युधिष्ठिर धर्माच्या भूमिकेत आपण सर्वच वावरत असतो. मला नाही का वाटत की मी आयुष्याच्या युद्धात स्थिर व अविचल राहिले म्हणून? मला नाही का वाटत की मी आयुष्यात धर्माने वागले म्हणून? महाभारताच्या वरील कथेत स्वतःच्या आत्म्याचे दर्शन घडत असते, पण ते आपले नव्हे म्हणून बिचाऱ्या धर्मराज युधिष्ठिराची कीव करीत, कवीची प्रशंसा करीत उघडलेल्या खिडकीतील मंद झुळूक अंगावर घेत रसिकपणाचा आव आणीत ही कथा मी मोठ्या आवडीने वाचते.
*