१४
 मल्हार


 हवा गार होती पण सुखदायकही होती. चालता चालता मी घराच्या गल्लीला आले तो पलीकडून माझी शेजारीण त्याच गल्लीला वळताना दिसली. मला पाहिल्याबरोबर ती उद्गारली, "हे काय, तुम्ही छत्री विसरला होतात वाटते? भिजला आहात की!" मी हातमोजे काढून कोटावरून हात फिरवला तर खरेच. डोक्यावर रुमाल बांधला होता तोही भिजला होता. मी वर आकाशाकडे पाहिले तो ते नेहमीसारखेच घुंघट घातलेले होते. खालचा रस्ता भिजला होता पण वाहात नव्हता. रस्त्यावरच्या दिव्यांकडे पाहिले तर चंद्राभोवती खळे असावे तसा त्यांचा प्रकाश दिसत होता. पाऊस पडत होता म्हणण्यापेक्षा हवेत पाण्याचे कण भरून राहिल होते म्हणणे जास्त बरोबर झाले असते. ह्या पावसाचे थेंब कधी दिसायचे नाहीत; आवाज काही ऐकू यायचा नाही- अगदी चोरपावलाने येतो. शेजारणीबरोबर वाट चालता चालता मला एकदम शेक्स्पिअरच्या ओळीची आठवण झाली. "करुणा मारून मुटकून उत्पन्न होणारी नव्हे (Quality of mercy is not strained); आकाशातून अलगद पडणाऱ्या पावसाप्रमाणे ती येते." बी.ए.च्या वर्गांत ह्या ओळींवर अध्यापकांनी केलेले भाष्य अगदी मान डोलवून डोलवून ऐकले होते. त्या ओळींचा रसास्वाद घेतला होता. पण आज मला खरा अर्थ कळला. अगदी हळू म्हणजे पाऊस पडतो तरी कसा हे कळायला इंग्लंडमध्ये जावे लागले. आपल्या इकडचा पाऊस ज्यांना माहीत, त्यांना इंग्लंडमधला पाऊस म्हणजे काय, हे कळणार कसे? करुणेचा पाझर नकळत अंतःकरणातून झरतो तसा हा पाऊस वातावरण ओले करताे, जमिनीला
नकळत भिजवतो. तो इतका सौम्य की पावसातून चालणाऱ्याला समजत सुद्धा नाही. फक्त हवेत आर्द्रता असते. वाऱ्याची झुळूक ओल्या हातांनी गालाला हळूच शिवून जाते. तितक्याच नकळत खालची जमीन हळूहळू पाणी पिते. 'Quality of mercy is not strained' शेक्सपिअरची ही ओळ जणू नव्याने मी अनुभवीत होते.
 इंग्लंडची सगळीच सृष्टी मला नवी होती. मी गेले तो पानांचा रंग पालटून पानं झडायला सुरुवात झाली. केनसिंग्टन व हाइड पार्क या दोन बागांतून मी चालत जाई व मग पुढचा मार्ग बसने जात असे. वाळलेल्या पानांचे ढीगच ढीग बागेच्या कडेला जमविलेले होते. पानझड थांबल्यावर रोज त्या ढिगांना सकाळी आगी लावीत आणि सर्व वातावरण कडवट तिखट धुराने भरून जाई. सकाळच्या थंडीत तो वास व पेटणाऱ्या पाचोळ्याच्या आगट्या मोठ्या सुखदायक वाटायच्या. सगळ्यांत चमत्कार वाटे तो हा की, मोठमोठे वृक्ष पानाशिवाय उभे-कुठे हिरव्या रंगाची छटासुद्धा त्यांवर दिसायची नाही; आणि खाली मात्र थंडी असो वा बर्फ असो, गवताचा गालिचा नेहमी टवटवीत व हिरवाचार असायचा. गवत कोळपून जाईल अशी थंडी इंग्लंडमध्ये पडत नाही आणि गवत पाण्याशिवाय वाळेल असे क्वचितच होते; कारण पाऊस नाही असे काही आठ दिवस जात नाहीत.
 सप्टेंबर-ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा, आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाला शिव्या देत असायचे. मला त्या पावसाची मोठी मौज वाटे. वाटेत चिखल नाही, मजेदार गारवा आणि ४-५ मैल चालूनही थकवा नाही. घरनं वर्तमानपत्रं यायची; त्यांत महाराष्ट्रांतल्या दुष्काळाची वर्णने व नगरच्या लोकांची कधीही न संपणारी पाण्याची कटकट-कोणी म्हणाले की तुम्ही कशा पावसाला कंटाळत नाही, तर मी उत्तर देई की, जगात कोठे तरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते. त्याचे मला फार कौतुक वाटते.
 नुसता पाऊसच नाही, लंडनची सर्वच सृष्टी इकडच्या उलटी. आपल्याकडे धुके म्हटले की काही तरी मजेदार संवेदना मनाला होते. पावसाने धुऊन काढलेले प्रसन्न आकाश, सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व दहा मैल लांबचे दिसावे असे स्वच्छ वातावरण आणि
त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा, दृष्टीला चकविणारा धुक्याचा पडदा-असे आपल्याकडचे धुके. सकाळी उठून पहावे तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडावर खाली दरी धुक्याने भरलेली असते- तेवढ्यात सूर्य उगवला, की त्या धुक्यावर इंद्रधनुष्ये उमटतात आणि थोडा वेळ इतस्ततः पळून, सूर्य वर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातीपातीवर अनंत दंवबिंदू कोटिसूर्य प्रतिबिंबित करतात. संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्र निवळली की नाहीसे होते व रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांनिशी चमकत असते. पण लंडनचे धुके म्हणजे औरच असते. आधी वर्षाचे दहा दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते. तिकडचे आकाश आपल्या आकाशाइतके उंच कधी वाटतच नाही. कधीही वरती पाहा, काळसर पांढुरके छत जसे सर्व शहरावर घातलेले असते. कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो लहानमोठे कारखाने व कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकीत असतात. घरातही जरी अनवाणी चालले तरी पाय काळे होतात. कोठल्याही झाडाला हात लावला तर हात काळे होतात. या धुरकट वातावरणात धुके पसरले म्हणजे एरवी डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात. काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो. असे धुके वर्षातून एकदोनदा तरी लंडनवर पसरते. पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे व आपण त्या हवेच्या तळाशी आहोत या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या, पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव लंडनच्या धुक्यात आला. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल त्याची कल्पना येते. ह्या धुक्याने हाहाकार होतो. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात. रस्त्यावर गाड्यांचे अपघात होतात. मुले रस्ता चुकतात. म्हातारी-कोतारी, विशेषतः छातीचा विकार असलेली माणसे-बरीच मरतात; पण या विचित्र हवेमुळेच हिटलरला लंडनवर स्वारी करायला संधी मिळाली नाही, असे म्हणतात.
 लंडनमधला धूर शहरातल्या शहरात कोंडतो व झाडे आणि घरे यांवर धुराची पुटेच्या पुटे बसून सर्व इमारती काळ्याकुट्ट होतात. सर्व जगात इतक्या काळ्या पडलेल्या इमारती कोठे पाहिल्या नव्हत्या. राणीच्या राज्यारोहणानिमित्त लंडनची साफसफाई होत होती व लोक मोठाल्या इमारती
कसल्याश्या रसायनाने धुऊन साफ करीत होते. धुतलेली इमारत शुभ्र पांढरी तर शेजारीची काळीकुट्ट असा विरोध मोठा मौजेचा दिसे. ह्या काळ्याकुट्ट इमारती नेहमी धुतल्या नाहीत तरी सुंदर दिसाव्या म्हणून खटपट चाललेलीच असते. माझा रस्ता पार्लमेंट स्ट्रीटवरून असे. तेथे निरनिराळ्या सरकारी खात्यांच्या कचेऱ्या आहेत. त्यांच्या समोरून जाताना हिवाळ्याच्या उदास वातावरणात त्या अधिकच काळ्या व उदास वाटावयाच्या; पण एक दिवस पाहते तो रस्त्यावरच्या सर्व खिडक्यांतून निळसर जांभळी आयरिस फुले कुंड्यांतून भरून राहिली होती. वसंत ऋतूतली ही पहिली फुले; आणि मग दर पंधरा दिवसांनी ऋतुमानाप्रमाणे कुंड्या व फुले बदलत. आयरिसनंतर पिवळे धमक डॅफोडिल, त्यानंतर निरनिराळ्या रंगांचे हंड्रेड्स अँड थावजंड्स्, ह्याप्रमाणे वसंतातील निरनिराळ्या फुलांची हजेरी तेथे लागायची. काळ्या खिडक्या, आतील सदैव अंधाऱ्या खोल्या, त्यात भर दुपारी दिवे लावून काम करणारी माणसे व बहुधा अभ्राच्छादित असलेले आकाश, या अंधाऱ्या सृष्टीत सूर्यप्रकाशाला बांधून आणून खिडक्यांतून डांबून ठेवण्याची खटपट अजब खरीच! त्या फुलांनी खिडक्यांना शोभा येते की नाही, ह्या प्रश्नाचा निर्णय मात्र मला शेवटपर्यंत झाला नाही.
 हिवाळ्यातले कित्येक आठवडे येथला दिवस संधिप्रकाशाइतपत उजेडात असतो. ह्या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव तसाच छायेचाही. निरनिराळ्या उद्यानातून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे; पण एकाचीही सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. आमच्याकडे रखरखीत ऊन असते व त्याबरोबरच अगदी त्याला चिकटून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की दृष्टी ठरत नाही. पण प्रत्येक चालणारे माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी चालत वा धावत असते. दिव्याच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरलेली असते. प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमय तर दुसरी बाजू छायेची व निवाऱ्याची, असा विरोध सतत दिसतो. आगगाडीतून प्रवास करताना बघावे, उन्हाच्या वेळी, टेलिग्राफच्या तारांवर बसताना पक्षी नेमके खांबाची सावली पडलेली असेल तेथेच खांबाला चिकटून बसलेले आढळतात. पायी चालणारी माणसे घरांची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्याच्या बाजूने चालतात.
झाडाखाली दाट छायेच्या काळ्या चंद्रकळेवर लख्ख प्रकाशाचे गोल गोल कवडसे खडीसारखे चमकतात; पण येथे सावली पडेल इतका लख्ख प्रकाश महिनेच्या महिने पडत नाही.
 एक दिवस मी ह्या उद्यानातून त्या उद्यानात भटकत भटकत सेंट जेम्स बगीच्यात पोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहात उभी राहिले. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश पडला होता. एकाएकी मला चमत्कारिक वाटले. आपल्याकडे सर्व प्रकाशाचा उगम आकाशात होतो. येथे मला वाटले की प्रकाश खालून वर फाकला आहे. मी परत नीट भोवताली व वर पाहिले. खरेच आकाश अभ्राच्छादित होते. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा मागमूसही नव्हता. खाली तळच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचला होता व त्यातून परावर्तन पावून प्रकाश सर्वत्र फाकला होता. यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला. या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात. कधी एखाददिवशी सूर्यप्रकाश पडला, व तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेल्या ताटव्यावरून व हिरव्या कुरणावरून पडला, म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यांपुढे नाचते. पण तरीही येथल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडच्या सृष्टीतील रंग ह्यात फार फरक आहे. सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात. जसा दाट छाया व झगझगीत प्रकाश हा विरोध इंग्लंडात दिसत नाही, तशा निरनिराळ्या रंगांतील छटा पण आपापल्या भडकपणाने उठून न दिसता एकमकांना पूरक व मंद अशा भासतात. इकडच्या चित्रकारांची चित्रे मला ही सृष्टी पाहिल्यावर जास्त आवडू लागली. काळसर पांढुरके पाणावलेले आकाश, तशाच प्रकाशात दिसणारे डोंगर, नद्या व तळी, हिरवी, फुलांनी भरलेली नाजूक रंगाची कुरणे व त्यात लठ्ठ, गोऱ्या गुलाबी गालांची, निळ्या डोळ्यांची व सोनेरी केसांची माणसे. ह्याही सष्टीची मला मौज वाटे. सर्वच कसे निराळे होते. पण चित्र-मंदिरातील नामांकित चित्रकारांची चित्रे पाहून पाहून किंवा लंडनमधील उद्यानातून हिंडता हिंडत दमले व मी स्वस्थ डोळे मिळून बाकावर बसले की अनाहूतपणे घरची सृष्टी माझ्यापुढे येई.
 उन्हात भाजून निघणारी रेताड जमीन, युगानुयुगे उन्हापावसात उभे राहिलेले, वेडेवाकडे झिजलेले अरवलीचे डोंगर व शेतात काम करणाऱ्या दोन अहिर बाया-लांबून त्यांची तोंडे दिसत नव्हती, पण भडक तांबडी व
जर्द पिवळी अशा दोन रंगांच्या ओढण्या दिसत होत्या. किती तरी लांबून ते लाल व पिवळे ठिपके शेतात दिसत होते.
 ओरिसाच्या दाट अरण्यात जर्द काळसर हिरव्या पालवीच्या खाली सूर्याचे नाचणारे कवडसे. रानातील वळणावळणांनी जाणारी पाऊलवाट, शेजारच्या लहानशा झोपडीपुढे उभ्या असलेल्या जवळजवळ नागड्या बोंडो बायका व त्यांच्या गळ्यांतील बटबटीत मण्यांच्या माळा, त्यांचे सुरकुतलेले चेहरे, साफ गुळगुळीत हजामत केलेली डोकी, त्यांचे थोडे भेदरलेले, थोडे प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे लागलेले डोळे व त्यांच्या शेजारीच दारू पिऊन झिंगलेला, झुकांड्या जात असलेला, मला परत परत सलाम करणारा त्यांच्या घराचा मालक हे चित्र डोळ्यांपुढे येऊन उभे राहिले.
 नगर जिल्ह्यातल्या एका डोंगरावर आम्ही चढत होतो. सकाळचे दहा-साडेदहाच झाले होते; पण ऊन मी म्हणत होते. डोंगरावरचे काळे कातळ चटकत होते. आमच्याबरोबर वाटाडे म्हणून वारकरी पंथाचे एक बुवा होते. डोंगरावरच्या गावाहून एक बाई व दोन-तीन पुरुष खाली उतरत होते. बुवांना पाहून ही मंडळी थांबली. ती बाई फाटक्या अंगाची, तरुण, पोरसवदा, हिरवे लुगडे नेसलेली होती. रंग काळा, चेहरा व अंग इतके रेखीव, की आम्ही आश्चर्याने स्तब्ध झालो. तिचे नाक रेखीव, जिवणी कातीव, हनुवटी नाजूक, डोळे पाणीदार पिंगट, दाट काळ्या सरळ भुवया व बांधा हिरव्या कळकाच्या काठीसारखा होता. जणू शेजारच्या काळ्या कातळातून कोरून काढलेली मूर्ती सजीव होऊन आम्हांपुढे उभी राहिली होती. वरचे निळे आकाश, खालचा खडकाळ प्रदेश, कडक उन्हात पसरलेल्या वेड्यावाकड्या लांब लांब सावल्या व ती रमणीय सावळी मूर्ती आठवताच लंडनच्या गारठ्यातसुद्धा माझ्या अंगात ऊब आल्यासारखे वाटले.
 इंग्लंडचे चित्रकार आपली सजीव-निर्जीव सृष्टी जिव्हाळ्याने चित्रात जिवंत करतात; पण माझ्या घरच्या सृष्टीला अजून कोणी चित्रकारच भेटत नाही. पाहावे त्या चित्रात गोऱ्या, लुसलुशित, गुलाबी चोळ्यांच्या व फिक्या रंगांच्या साड्या नेसलेल्या बायका विलायती फुलांचे गुच्छ घेऊन हसत असतात किंवा बिलायती वाद्ये वाजवितात किंवा स्विट्झर्लंडमधील सरोवराच्या काठी बसून स्वेटर विणीत असतात. त्यांच्या तोंडाला कधी त्यांच्या आकाशातला सूर्यप्रकाश भेटलेलाच नसतो. रणरण ऊन व गार
सावली, दाट हिरवे, पिवळे, तांबडे असे भडक रंग असलेली झाडे व फुले, कातीव दगडांचे सौंदर्य असलेले काळे स्त्री-पुरुष, काळ्या म्हशी व तांबड्या गायी, निळे-काळे डोंगर यांना कागदावर जिवंत करणारा चित्रकार जन्मायचा तरी आहे, किंवा मी पाहिला तरी नाही. मी मोठ्या उद्वेगाने उठून चालू लागे. आमचे काव्य, आमचे वाङ्मय, आमची कला, काहीच का आमच्या जीवनाशी व सृष्टीशी संबंध नसलेली अशी आहे, असा मला विचार पडे. पण एक दिवस मला साक्षात्कार झाला की भारतीय कलाकार भारतीय सृष्टीचे खरे पुत्र आहेत.
 लंडनमध्ये मी एका प्रोफेसरांची हिदी संगीतावरील व्याख्याने अधून-मधून ऐकत असे. व्याख्याने मला कळत असत असे नाही, पण अर्धा तास व्याख्यान झाले म्हणजे उरलेला अर्धा तास उत्तमोत्तम गायक-वादकाच संगीत फोनोग्राफवर ऐकावयास मिळे व तो मला अपूर्व लाभ वाटत असे. असेच एक दिवस व्याख्यान ऐकत होते. बाहेर लंडनला पडतो तसा चोरून चोरून पाऊस पडत होता. प्रोफेसरमहाशय सांगत होते की, "अमका राग अमक्या वेळी किंवा ऋतूत गावा, असा संकेत आहे. या संकेताचा त्या रागाच्या आविष्कारांशी संबंध असतोच असे नाही. उदाहरणार्थ, मल्हार राग व पाऊस यांचा संबंध काय आहे, हे कळत नाही."
 मी अर्धवट कान देऊनच व्याख्यान ऐकत होते, पण त्या वाक्याबरोबर मी खडबडून जागी झाले. बाहेरच्या पावसाकडे मी पाहिले. खरेच, तो दिसेपर्यंत शोक्सपिअरच्या ओळीतील करुणेचा पाझर व पाऊस ह्यांचा संबंध तरी मला कुठे कळला होता! पाऊस, नेहमीच वरदानासारखा, पण शेक्सपिअरने दिलेली विशेषणे पावसाला कशी लागतात हे कुठे मला समजले होते? त्याचप्रमाणे ज्याने माझ्या मायभूमीचा वळवाचा पाऊस पाहिला नाही, त्याला पावसाचा व मल्हाराचा संबंध काय कळणार? वादळावर स्वार होऊन, ढगांचा नगारा वाजवीत, विजेचा लखलखाट करीत दरवर्षी जमिनीला झोडपीत येणारा पाऊस, थेंब अंगावर पडायच्या आधीच लांबून लक्षावधी माणसे चवड्यांवर धावत यावी, असा येणाऱ्या सरींचा आवाज; व छपरे उडवीत, झाडे पाडीत, गारांनी फोडीत आठ महीने तापलेल्या, उत्कंठेने होरपळलेल्या जमिनीला झोडीत, राक्षसी प्रणयाने की प्रलयाने तांडव करीत येणारा पाऊस ह्या महाशयांना काय माहीत?
सावकाश सुरुवात होऊन वक्र गतीने गिरकत गिरकत वर जाणारी मल्हाराची तान आहे, की क्षणाक्षणाला कडकडाट करणारी मेघगर्जना आहे; की ऐकणाऱ्या हृदयाची धडधड आहे, हेच मल्हार ऐकताना कळेनासे होते. प्रियकरासाठी एखाद्या माणसाचा तो टाहो नसून बैठकीच्या बाहेर सर्व सजीव निर्जीव सृष्टी प्रत्येक मेघगर्जनेबरोबर उत्कंठेने कापत असते. ती उत्कंठा, ती धडपड, ते तांडव, मल्हाराच्या तानेतानेने वाढत जाते व राग संपायच्या वेळी खरोखरच गडगडाट होऊन पाऊस पडायला लागला तर मल्हारानेच पावसाला आवाहन केले, याबद्दल मनाला शंका वाटत नाही.

*