भोवरा/विनाशाची सुरुवात?




 १६
 विनाशाची सुरुवात


 आसामला विमानाने जाणारे लोक आणि इतर ठिकाणी विमानाने जणारे लोक ह्यांच्यात फार अंतर असते. एरवी दिल्लीला किंवा मद्रासला अगदी विमानाने जायचे म्हणजे लोकांच्या हातांत एक, फार तर दोन, हलक्या पेट्या असायच्या. वजन करताना एखादा पौंड वजन जास्त नाही ना भरत इकडे प्रत्येकाचे लक्ष. कधीतरी एखादे अमेरिकन कुटुंब असे दिसते की सामानाचे वजन जास्त भरले तरी चिंता नाही- नोटांच्या लठ्ठ पुडक्यांतून भराभर नोटा काढून देत. एकदा दोनतीन हिंदी लोकसुद्धा जड सामान घेऊन जाताना पाहिले. पण एकंदरीने विमानातून जाताना प्रवास सुटसुटित करण्याकडे सर्वांचा कल. पण आसामला जाणाऱ्या उतारूंजवळ- माझ्याखेरीज सर्वांजवळच - खूपखूप सामान दिसले. कित्येकांजवळ तर पेट्यांबरोबर वळकट्यासुद्धा होत्या. जाणारे उतारूसुद्धा निरनिराळ्या पेशातले दिसले. थोडे लोक श्रीमंत किंवा माझ्यासारखे सरकारी खर्चाने जाणारे, पण बरेचसे मध्यम स्थितीतले तर काही अगदी अतिशय गरीब होते. कलकत्त्याहून गौहाटीला आगगाडीने जायचे म्हणजे इतका वेडावाकडा प्रवास आहे की बरेच लोक विमानाने जातात. कलकत्त्याहून सरळ उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याशी जावयाचे, मग पूर्व पाकिस्तानला वळसा घालून आसामात पोचावयाचे. आगगाडीचा एक मार्ग तर पाकिस्तानातून जातो. मध्येच कस्टमची पाहणी. किती वेळ पाकिस्तानी लहरीवर अवलंबून राहावे लागेल त्याची निश्चिती नव्हती. सामान चोरीला जाण्याचा किंवा जप्त होण्याचाही संभव फार. उत्तरेकडचा लोहमार्ग बराच कच्चा होता. कुठे मार्ग खचलेला असायचा तर पूल धोक्याचा असायचा. कलकत्त्याहून गौहाटीला
जायला रेल्वे टाइमटेबलाप्रमाणे ४८ तासांच्या वर लागतात, पण गाडीला कित्येक तास ते एक-एक दोन-दोन दिवससुद्धा उशीर लागतो. विमानाने तीन ते साडेतीन तासांत गौहाटीला पोचता येते. सरकारी अधिकारी, बऱ्याच ऑफिसातले कारकून व शंभराशंभराच्या टोळ्यांनी मळ्यातील मजूर विमानाने आसामात जात होते. एवढे मजूर अगदी तातडीने विमानाने पाठवणे कसे परवडते, ते काही लक्षात येईना. आसामातले मळे गौहाटीच्या उत्तरेकडे सीमेपर्यंत पसरले आहेत. तेथपर्यंत मजुरांचे कुटुंब पोचावयाचे म्हणजे ४-५ दिवसांचा प्रवासखर्च व खाण्यापिण्याचा खर्चही करावा लागतो. तेव्हा कदाचित ३ ते ५ तासांत पोचणारी विमाने परवडत असतील. का कोण जाणे, पण आगगाडीच्या प्रवासात ज्याप्रमाणे निरनिराळ्या परिस्थितीतली माणसे व सामानाचे ढीग दिसतात तसे मला आसामच्या विमानाच्या फेरीत दिसले.
 विमानाचा पहिला प्रवास अगदी सपाट पाणथळ मैदानातून होता. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पाॅद्दा (पद्मा ) ऊर्फ मेघना नदीचा विस्तीर्ण पट्टा व त्या काठाची भातशेती. कलकत्ता सोडलं म्हणजे पूर्व पाकिस्तानावरून विमान जाते ते आगरताळ्याला अर्धा-पाऊण तास थांबते. विमानतळ उदास, निर्मनुष्य असा वाटला. हा भारताचा भाग असा आहे की त्याच्या जवळजवळ सर्व बाजूंनी पाकिस्तान आहे. भारताशी व्यवहार विमानाने. फारच थोड्या लोकांना ते साध्य होते. येथली एक बाई मला ग्वाल्हेरला भेटली होती. अननस आवडीने खाताना मला पाहून ती म्हणाली होती, "आमच्याकडे या, रुपयाला २५ अननस मिळतात." मी म्हटले, "कलकत्त्याला का पाठवीत नाही?" ती म्हणाली होती, "इतक्या स्वस्त फळांसाठी लागणारे विमानभाडे परवडत नाही. आगगाडीने माल वेळेवर न कुजता पोचण्याची शाश्वती नाही." विमानातून डोकावताना कुठे अननसाची लागवड दृष्टीस पडली नव्हती. भात शेते, नारळ आणि सुपारी. पूर्व पाकिस्तानातून जाताना तागाची लागवड दिसेलसे वाटले होते. पण तीही विमानातून ओळखता आली नाही.
 आसामात आलो तो पोटपट्टे आवळण्याची सूचना आली. डोंगराळ भाग लागला होता, खालचा देखावा भव्य पण जरा भयानकच होता. कडे तुटलेल्या डोंगरांच्या माथ्यांवर उभ्या भिंती दिसत होत्या. त्यांच्या
अर्धवर्तुळातून एक प्रवाह वाहात होता. हा प्रदेश ओलांडल्यावर लगेच दुसऱ्या बाजूला डोंगरांचे उतार सौम्य होते व त्यांवर व माथ्यांवर भाजावळ चाललेली दिसली. लक्षात आले की हा विभाग गारो डोंगरांचा असणार. ह्या डोंगरांच्या माथ्यावर व उत्तरेकडच्या उतरणीवर गारो लोकांची वस्ती आहे दक्षिणेकडे कडे तुटलेले असल्यामुळे घरे करून शेती करणे अशक्य म्हणून जवळजवळ वस्ती नाहीच. ह्या डोंगरावरून जाताना विमानाला म्हणे हटकून गचके बसतात. तेवढी पाच मिनिटे गेली म्हणजे विमान परत स्थिरावते. कलकत्त्याला व आसामला बऱ्याच लोकांना विचारले…' पण ह्या प्रकाराचे कारण कोणाला सांगता आले नाही. आणि आसामची आठवण झाली की माझे मन परत परत गारो टेकड्यांशी गचके घेत राहते.
 हा हा म्हणता गौहाटी आले. मला न्यायला कोणी बाई आल्या होत्या त्यांनी मला ब्रह्मपुत्रेच्या तीरावर बांधलेल्या सुंदर आरामघरात नेऊन पोचवले. फराळाचे मागवले व मग दोघींनी मिळून माझ्या पुढच्या दोन दिवसांचा कार्यक्रम आखला. मला शब्द व त्यांचे अर्थ ह्यांचे जवळजवळ वेड आहे. आसामपासून बंगाल, ओरिसा वगैरे भागांत 'हाट' किंवा 'हाटी' प्रत्यय असलेली गावांची नावे बरीच आहेत. हाट शब्द 'बाजार' ह्या अर्थी असेल किंवा 'घाट' शब्दाचेही रूपांतर असेल. मी विचारले, "गौहाटी म्हणजे गुरांचा बाजार भरण्याचे ठिकाण का हो?" त्या बाईही सुदैवाने शब्दांच्या अर्थावर विचार करणाऱ्या निघाल्या. त्यांचे म्हणणे पडले की, गौहाटी हा शब्द गुवां किंवा गुआं-हाटी यांचे रूप आहे. गुआं म्हणजे आसामी भाषेत सुपारी. पूर्वी येथे सुपारीचा मोठा बाजार भरत असे." मला ही कल्पना फारच आवडली. कारण काही दिवसांपूर्वीच ओरिसामधील शेतकऱ्यांच्या लग्नविधीवर वाचीत असताना 'गुआंफोड' शब्द आला होता व त्याचा अर्थ समजत नाही म्हणून लेखकाने टीप दिली होती. माझ्या मनात जाचणारे शल्य एकदम नाहीसे झाले. लग्नाची सुपारी फोडण्याचा समारंभ असतो त्याचे नाव 'गुवां फोड' असणार. त्या वेळी माझे अगदी समाधान झाले. आता वाटेत जास्त चौकशी करायला हवी होती. गोघाटी कशावरून नसेल? ब्रह्मपुत्रा पार होण्याचे ठिकाण तेथून जवळ असेल तर गुरे हाकून नदीपार करण्याचे ठिकाणही हे असू शकेल.
 मार्चचे शेवटचे दिवस किंवा एप्रिलचे सुरुवातीचे दिवस असावेत.
सबंध वातावरण धुळीने इतके भरलेले होते की नदीचा पलीकडचा काठ काही स्पष्ट दिसत नव्हता. उन्याळ्यातसुद्धा बोटी नदीतून जात होत्या. त्यांच्या शिट्ट्या ऐकू येत होत्या. त्यांच्या बंबातून निघणारा धूर अगदी स्पष्ट दिसत होता. उन्हाळ्यात जवळजवळ कोरड्या होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्या पाहिलेल्या मला ब्रह्मपुत्रेचे ते दर्शन मोठे कौतुकाचे वाटले. विश्रामधामाच्या जवळच ब्रह्मपुत्रेमध्ये एक टेकाड होते. त्यावर एक लहानसे देऊळ व त्यात रात्रभर दिवा असे. त्या स्थानाचे नाव 'उमानन्द'. लग्नानंतर शिव पार्वतीला घेऊन येथे काही काळ राहिला होता म्हणे. त्या टेकडीवर जायची माझी इच्छा, पण दोन-तीन दिवस पहाटेपासून रात्रीपर्यंत इतके काम होते, की ते काही जमले नाही 'उमानन्दा'ची यात्रा वर्षातून एकदा का दोनदा असते तेव्हा लोक तिथे जातात. एरवी देऊळ पुजाऱ्याखेरीज निर्मनुष्य असते. स्थान रमणीय तर खरेच पण त्या रमणीयतेत एक प्रकारचा भयानकपणा पण वाटतो. गंगा-यमुना वगैरे मोठमोठ्या नद्या, दोन्ही काठांवर मोठी मनुष्यवस्ती, पण तिथे ब्रह्मपुत्रेच्या काठी शहरे किंवा गांवे कमीच. डोंगर आणि झाडीच जास्ती. तेथे राज्य करणारी पार्वती, एक उमानन्दाचे देऊळ सोडले तर, देवीच्या रूपाने निरनिराळ्या देवळांतून दिसते. पार्वतीचे सबंध चरित्रच अनाकलनीय आहे. आईबापांची लाडकी, रानावनातून भटकणारी, हरणांसारख्या चंचल डोळ्यांची, भुरभुरत्या केसांची अवखळ उमा, लाकडी गौरी हे एक पार्वतीचे रूप; मनाने वरलेल्या पुरुषाला वश करण्यासाठी प्रणयापासून खडतर तपापर्यंत सर्व उपाय योजणारी आणि शेवटी त्या रागीट, रानटी भोळ्या शंकराला वश करून कह्यात ठेवणारी प्रणयिनी हे दुसरे. शंकराबरोबर बैलावरून आकाशमार्गे जाताना कुणी दुःखी, अपंग असे मनुष्य दिसले तर त्याची चौकशी करून त्याचे दुःख दूर करणारी, लोकगीतांत व लोककथांतून जिची गाणी गायली आहेत, अशी वत्सल आई हे तिचे तिसरे रूप; बापाच्या यज्ञात स्वतःला जाळून घेणारी मानिनी हे चौथे रूप. ती अनन्तरूपा आहे. पण ती देवी किंवा माता म्हणून सर्व भारतभर ज्या रूपाने पूजिली जाते त्या रूपाचे मला फार कुतूहल वाटते. सर्वसंपत्तिमान, सर्व शक्तिशाली, सर्वकारुणिक आणि सर्वसंहारक असे ते रूप आहे. तिची देवस्थानेसुद्धा भीती उत्पन्न करणारी आहेत. सौंदत्तीची यल्लमा,
माहुरगडची रेणुका, गुजरातची बेचराजी, मध्यभारतातील विंध्यवासिनी उत्तरेकडील काली व आसामची कामाख्या अशी तिची अनेक स्थाने व नावे आहेत. इथे गौहत्तीतसुद्धा ब्रह्मपुत्रेच्या पात्रातील प्रणयिनी - उमेच्या देवळापासून सुमारे मैलभर अंतरावर उंच टेकडीवर बसलेले कामाख्या ऊर्फ कामाक्षीचे देऊळ आहे. ही देवी आसामची अधिष्ठात्री देवता असून जादुगारीण म्हणून प्रसिद्ध आहे.
 दुसऱ्या दिवसापासून आसामात प्रवास सुरू झाला. ब्रह्मपुत्रेच्या व कपिली नावाच्या एका उपनदीच्या खोऱ्यांत दोन दिवस हिंडत होतो. गंगा, यमुना वगैरे नद्या एकदा हिमालय सोडला म्हणजे अगदी सपाट प्रदेशातून वाहतात; पण आसामात मात्र सर्वत्र लहानलहान डोंगर पसरलेले आहेत. त्यांपैकी मुख्य म्हणजे गौहत्तीपासून उत्तरेकडे खासी व जयंति या टेकड्या. येथे खासी नावाच्या लोकांची वस्ती आहे. गौहत्तीच्या नैर्ऋत्येस गारो टेकड्या आहेत, येथे गारो लोकांची वस्ती आहे. गौहत्तीच्या दक्षिणेस लुशाई टेकड्या आहेत, तेथे लुशाई लोकांची वस्ती आहे. याशिवाय निरनिराळ्या लहानलहान टेकड्यांतून निरनिराळ्या वन्य जमातींची वस्ती आहे. आसामच्या पूर्व उत्तर विभागांत प्रसिद्ध नाग टेकड्या आहेत. तेथे सध्या लष्करी अंमल असल्याने साधारण नागरिकाला जायला मज्जाव आहे. मला पाह्यची स्थळे नाग टेकड्यांत नव्हतीच, म्हणून तिकडे जायचा प्रसंगच आला नाही. मी हिंडले त्या प्रदेशात लहान लहान खेडेगावेच बरीचशी होती. एकमजली गवती छपरांची किंवा कौलाची घरे आणि प्रत्येक खेड्यातून एक एक 'नामघर' असायचे. 'नामघर' म्हणजे एक मोठीशी एकच खोली असलेली झोपडी. यात माणसे नामसंकीर्तन करण्यास जमतात. बंगालमधून वैष्णवसंप्रदाय आसामात पोचला तेव्हा या 'नामघरां'ची स्थापना झाली. आसामध्ये ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात राहणाऱ्या आसामी लोकांखेरीज 'आहोम्' म्हणून लोक राहतात. हे लोक मोंगोलवंशीय असून त्यांनी पुष्कळ वर्षे आसामात राज्य केले. बऱ्याच लोकांची अशी कल्पना आहे की, 'आसाम' हे प्रादेशिक नाव 'आहोम' या नावावरूनच आले आहे. पुष्कळ आसामी लोक 'आसाम' या शब्दाचा उच्चार 'आहाम' असा करतात.
 मी फिरलेल्या खेडेगावांमध्ये मला एक विशेष गोष्ट जाणवली म्हणजे प्रत्येक घरातून माग असत व घरातली लहानथोर सर्व मंडळी मागावर
कापड विणीत. मी गेले त्याच सुमाराला 'बिहू' (विषुव संक्रमण) म्हणून मोठा सण यायचा होता. त्या सणानिमित्त आपल्याकडे जसे खण वगैरे देतात त्याप्रमाणे एकमेकांना घरी विणलेले लहान-लहान पंचे देण्याची इथे चाल आहे. त्यामुळे जेथे जावे तेथे पंचे विणायचे काम चालले होते. आसामात बंगाली आडनावे असलेली माणसे खूपच आहेत. बारुआ व बेझ बारुआ या नावांचे लोक खूपच आढळले, बारुआ हे नाव भट किंवा ब्राह्मण या अर्थी असावे असे मला वाटले. बेझ म्हणजे वैद्य असे तेथील लोकाना सांगितले. बंगालमध्ये ब्राह्मण व कायस्थ यांच्या खालोखाल वैद्य ही जात आहे. ती स्वतःला ब्राह्मण समजते. ते लोक इथे येऊन स्थायिक झालेले दिसतात. बारुआ, ओरिसामधले बारिआ, वन्य प्रदेशातील बढिया व पंढरपूरचे बडवे हे सगळे एकाच शब्दापासून झाले की काय कोण जाणे !
 खोऱ्यात दोन दिवस हिंडून गोहत्तीला परत आले व लगेच दुसऱ्या दिवशी गारो डोंगरांकडे निघाले. गोहत्तीला परतताना खासी डोंगराच्या पायथ्याने यावे लागते. खासी डोंगरांमध्ये सध्या एक मोठे समाजशास्त्रज्ञ राहतात. खासी लोक व त्यांची संस्कृती यांना आसाम खोऱ्यातील लोकांपासून अलिप्त ठेवण्याची हे महाशय कोशीश करून आहेत. हा टेकड्यांची रम्यपणाबद्दल फार ख्याती आहे. पण माझ्या कामाच्या क्षेत्रात त्या येत नव्हत्या; म्हणून त्यांना डावलून मला पुढे जावे लागले.
 संध्याकाळी काही असामी लोकांकडे जेवायला गेले होते. तेथे नाग टेकड्यांचा प्रश्न निघाला. ब्रिटिश राजवटीत सर्व नाग खेड्यांतून एक एक दुभाषी असे. ह्या दुभाषी लोकांना आपल्या स्वतःच्या टोळीची भाषा आसामी भाषा अशा दोन्ही येत असत. आसामी भाषा बोलता येणे व त्या भाषेतून ब्रिटिश अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करणे म्हणजे एक मोठेपणा समजला जाई. आता मात्र परिस्थिती पार उलटली आहे. नाग टेकड्यांमध्ये आसामी लोकांना- त्यातल्या त्यात बिनलष्करी आसामी लोकांना- प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. सगळा मुलुख लष्कराच्या ताब्यात आहे; लष्करातले अधिकारी हिंदी बोलतात. पूर्वीचे आसामी दुभाषी जाऊन त्या जागी हिंदी जाणणारे लोक आले आहेत. आसामचे लोक म्हणजे जणू नागांचे शत्रू. त्यांना नाग प्रदेशात येऊ देता कामा नये अशा थाटात सर्व व्यवहार चालतो. या परिस्थितीबद्दल आसामी लोकांना साहजिकच अतिशय
राग येतो; वाईटही वाटते. पण त्यांचे काही चालत नाही. जी गोष्ट नाग लोकांची तीच इतर वन्य जमातींची. सर्व वन्य टोळ्यांमध्ये वन्य संस्कृतीच्या रक्षणाच्या नावाखाली आसामी लोकांच्याबद्दल द्वेष पसरवला जात आहे. आसामी विधिमंडळावरती तर सगळ्यांना जागा हव्यात, सरकारी नोकऱ्या हव्यात. पण आम्ही आसामी नाही, हा प्रत्येकाचा घोष चालू असतो. मी गेले त्याच सुमाराला आसामचा फुटबॉल संघ बंगालच्या फुटबॉल संघाशी खेळायला जावयाचा होता. ह्या संघात एक लुशाई खेळाडू होता. ह्या खेळाडूने जायच्या आदल्या दिवशी "मी आसामी नव्हे, लुशाई आहे." असे सांगून संघातर्फे खेळण्यास साफ नकार दिला. हा प्रकार घडण्याच्याआधी एक दोन दिवसच दिल्लीतील एक बडे प्रस्थ आसाम व मणिपूरच्या दौऱ्यावर होते व त्यांनी आपल्या भाषणातून खोऱ्यातील लोकांना उद्देशून त्यांना "टेकड्यांवरील जमातीची पिळवणूक करणारे" असे संबोधन वापरले होते. या सर्व गोष्टींचा ऊहापोह त्यादिवशी झाला. चालले आहे हे बरे नाही हे साऱ्यांनाच दिसत होते. पण सर्वच त्या बाबतीत अगतिक दिसले. मीही या विचित्र समस्येबद्दल अचंबा करीत माझ्या प्रवासी बंगल्यात परतले.
 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे प्रवासाला सुरुवात झाली. गारो टेकड्या बऱ्याच दूर आहेत. माझ्या मनात शक्य तो दिवसा-उजेडी गारो प्रदेशाचे मुख्य शहर तुडा म्हणून आहे तेथे पोचायचे होते. गारो टेकड्यांच्या प्रदेशात पोचले की तुडाच्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होते. दुपारी १२ ते १ वरती जाणाऱ्या मोटारींसाठी रस्ता खुला होतो. ती वेळ चुकली की संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत प्रवेश मिळत नाही. दुर्दैवाने त्या गावाच्या अलीकडे २५-३० मैल आमच्या मोटरची टायर फुटली. ती काढून नवी टायर बसवीपर्यंत खूपच वेळ गेला व घाटाच्या पायथ्याशी येईतो एक-दीड वाजून गेला होता. काही इलाज नव्हता, जवळच्या एका प्रवासी बंगल्यात ३-४ तास घालवले व संध्याकाळी सहाला घाट चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात अंधार पडला व घाटातून जाताना मला जे सृष्टिसौन्दर्य पाहायचे होते ते पाहता येईना. वाटेने जंगल भेटेल अशी कल्पना होती पण जंगल असे कोठे दिसेना. लहान लहान बांबू असलेल्या टेकड्या, तर काही वर नुसते गवत उगवलेल्या अशा टेकड्या दिसत होत्या. काही वेळाने लांबवर भलामोठा उजेड दिसला. मला वाटले चंद्र उगवला की काय, पण
थोडी वाट गेल्यावर पाहते तो लांब डोंगरावर आगीचा डोंब उसळला होता. अवतीभवती पाहिले तर कित्येक टेकड्यांना आगी लागलेल्या दिसल्या. रान जळताना पाहिले की माझी जीव घाबराघुबरा होतो. कूर्गमध्ये अरण्यात कुठे इतकासा धूर निघाला की सारे जंगलखाते धावत सुटायचे आणि तेथे पाहते तो जिकडे तिकडे आगी लागल्या असून काहीच हालचाल दिसत नव्हती. माझा मोटरहाक्यासुद्धा जणू काही झालेच नाही, इतक्या शांतपणे मोटर हाकीत होता.
 मी त्याला म्हटले, "अरे रानाला आग लागली आहे !" तशी तो मला म्हणतो, "बाई, ही आग लागलेली नाही. भातशेती करण्यासाठी दरवर्षी गारो लोक असेच जंगल जाळीत असतात.
 आम्ही जसजसे तुडाच्या जवळ यायला लागलो तसतसा आगीचा भयानकपणा वाढूच लागला. माझ्या नजरेसमोर मोठमोठे वृक्ष धाडधाड पेटून कडाकड पडत होते. आणि माझा मोटरवाला म्हणतो, "बाई, गेल्या वर्षी एक झाड मोटरीवर पडलं होत."
 संध्याकाळच्या रम्य वेळी कुजबुजणाऱ्या झाडांच्या थंड हवेतून प्रवास करीत, आज काय बरे जनावर दिसेल, अशा विचारात मी जी होते ते हे विचित्र अनपेक्षित, रौद्र-भयानक दृश्य मात्र मला दिसले. त्या पेटत्या जंगलातून प्रवास करीत आम्ही कसेबसे तुडाला येऊन पोहोचलो. तेथे मात्र जवळपास कुठे आग दिसली नाही. प्रवासी बंगला एका टेकडीच्या माथ्यावर उंच बांधलेला होता. हवाही थंड व आल्हाददायक होती. आमची वाट पाहून लोक निघून गेल्याने खायचीही अडचण झाली. झोपेतसुद्धा मला त्या पेटत्या रानाचे चित्र दिसत होते.
 दुसऱ्या दिवशी कलेक्टर येऊन मला समाजकल्याण केंद्रावर घेऊन गेला. त्या दिवशी तुडाचा बाजार होता. आसपासच्या २०-२५ गावचे लोक जमले होते. स्त्रीपुरुषांचे बसके, मोंगल घाटाचे चेहरे, रंगीबेरंगी वस्त्रे व डोक्याला बांधलेल्या नाना तऱ्हेच्या रिबिनी यामुळे बाजार मोठा मनोहर दिसत होता. बाजाराचा दिवस असल्याने कोठच्याही केंद्रावरती ग्रामसेविका सापडणे कठीणच होते. म्हणून एका नवीन निघालेल्या केंद्राची पाहणी करून बाजारात परत आलो. आमच्या सुदैवाने २-३ गावच्या ग्रामसेविका बाजारातच भेटल्या. त्यांना मोटरीत घातले व त्यांचे गाव
पाहण्यास निघालो. त्याही मोठ्या खुशीने आमच्याबरोबर आल्या. कारण ७-८ मैल तंगड्या तोडीत गावाला जायच्या ऐवजी त्यांना जीपमधून प्रवास करायला मिळाला. मुख्य ग्रामसेविका सोनाली सेंगमा म्हणून होती. तिच्या आधी एक आसामी मुलगी मुख्य ग्रामसेविका होती. गारो लोकांनी "आम्ही आसामी नाही, आम्हांला आसामी ग्रामसेविका नको", असे सांगून त्या पोरीचे घर एका रात्रीत जाळून टाकले होते. मोठ्या प्रयासाने थोडीबहुत शिकलेली सोनाली सेंगमा त्यांना सापडली व आता तिची नेमणूक झाली होती. आम्ही खेड्याला पोचेपर्यंत सर्व ग्रामसेविका मजेत गाणी म्हणत होत्या. मीही गारो गाणी ऐकायला मिळतील म्हणून त्यांना गाणी म्हणण्याचा आग्रह करीत होते. गाणी ऐकता ऐकता माझ्या ध्यानात आले की गाण्यांच्या सर्व चाली इंग्रजी. मी त्यांना विचारले, "हे कसे? तुमच्या आया-आज्या गाणी म्हणत होत्या त्यांतली तुम्हांला काही माहीत नाहीत का?"
 सोनालीने सांगितले, "पूर्वी कधी तशी गाणी असली तर कोण जाणे, सध्या तरी आम्हांला ती बिलकुल माहीत नाहीत. सध्या आम्ही जी ही गाणी म्हणतोय ती सर्व आम्ही मिशनमध्ये शिकलो."
 अर्थातच सर्व गाण्यांच्या चाली इंग्रजी होत्या. लहानपणी मी हुजूरपागेत शिकणाऱ्या ख्रिश्चन मुलीची गाणी ऐकली होती. त्यातले एक मला आठवले.

"पाखरा प्रीय तू खाली उतर।
मला गडे आवडतोस तू फार॥
घालीन तुला मी दूधभाकऽऽर।
अन् फिरवीन साऱ्या घरऽऽर भऽऽर!"

 अशीच भयंकर हीही सारी गाणी होती की काय कोण जाणे! सोनालीच्या शब्दाने माझ्या विचारांतून मी जागी झाले. ती मला म्हणत "आमच्या या गारो टेकड्यांबद्दलचे गाणे फार सुंदर आहे. ऐकता का?" मी माझी उत्सुकता दर्शवली. गाणे सुरू झाले. त्याचे ध्रुपद खालीलप्रमाणे :
 "गॅरो हिल्स, गॅरो हिल्स, गॅ... रो हि... ल्स. जी ए आर आर ओ एच आय एल् एल् अस् गॅ... रो हिल्स."
 हे अफाट गाणे ऐकून व त्यांतून प्रतीत होणारी गारो लोकांची संस्कृती पाहून माझे मन थक्क झाले. ह्या संस्कृतीच्या संरक्षणाच्या नावाने गारो लोकांत आसामी लोकांबद्दल द्वेष पसरविला जात आहे. वन्य प्रदेशांतील अंमलदारही होता होईतो आसामी नसलेले असे असतात. ते या हुच्चपणाला प्रोत्साहन देतात. हिंदी शिकणे व दिल्लीहून आलेल्या बड्या लोकांपुढे 'जनमनगण' म्हणून दाखवणे आणि आपल्या लोकनृत्यांचे प्रदर्शन करणे हा सर्व टेकड्यांवरील प्रदेशांतून ठराविक कार्यक्रम होऊन बसला आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रेचे खोरे, खासी टेकड्या, गारो टेकड्या, लुशाई टेकड्या आणि इतर काही विभाग असे निरनिराळे विभाग पडलेले आहेत. प्रत्येक जण आपल्याला दुसऱ्यापासून वेगळा समजतो आणि ह्या वेगवेगळेपणाच्या जाणिवेची जोपासना मिशनरी, परकीय समाजशास्त्रज्ञ व अधिकारी वर्ग मोठ्या कसोशीने करीत आहे. महाराष्ट्र गुजरातपासून वेगळा होऊ पाहू लागला तर तो देशद्रोह होतो; पण ज्यांना भाषेत काडीचेही लिखित वाङ्मय नाही; ज्यांचे हल्लीचे जीवन परकीय मिशनऱ्यांनी घडवलेले आहे, अशा या चिमुकल्या वन्य जमातीच्या संस्कृतीचे मात्र दिल्लीकडून मोठ्या कटाक्षाने संरक्षण केले जाते. तीन कोटींचा महाराष्ट्र वेगळा झाला तर जणू हिंदुस्थान रसातळाला जाईल अशी भाषा बोलणारे लोक पूर्व सरहद्दीवर असलेल्या या चिमुकल्या आसामचे तुकडे तुकडे करीत आहेत हे पाहून विलक्षण आश्चर्य व उद्वेग वाटला.
 तुडा सोडण्याच्या आधी कलेक्टरकडे गेले होते. तो म्हणत होता, गेल्या काही वर्षांत तुडा गावाला पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. आसपासच्या गावातूनही पाण्याची हाकाटी आहे. डोंगरमाथ्यावरचे जंगल जाळले की पाण्याचे दुर्भिक्ष्य होणारच ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. वन्य लोकांनी डोंगरमाथा निर्वृक्ष करू नये, म्हणून म्हैसूर, गोदावरीचा प्रदेश, ओरिसा, वगैरे ठिकाणी जंगल खात्याचे भगीरथ प्रयत्न चालू असतात. येथे पाहत ता दरवर्षी राजरोसपणे सुंदर सुंदर जंगले नष्ट होत आहेत. दुसऱ्या दिवशी दिवसा-उजेडी तुडाहून निघाल्यावर सर्वत्र जळलेल्या, उघड्या बोडक्या डोंगरांचे जे दृश्य दिसले ते रात्री दिसलेल्या आगीपेक्षाही भयानक वाटले.
 धो…धो… पडत्या पावसात गोहत्तीला पोचलो. दुसऱ्या दिवशी कलकत्त्याला जायचे विमान गाठायचे होते. विमानतळावर जाताना
कामाख्येचे देऊळ ज्या टेकडीवर आहे ती लागली. मोटर हाकणारा म्हणाला, "बाई, जायला रस्ता सध्या मोकळा आहे. आपल्याला दर्शन घेऊन येण्यापुरता वेळ आहे. वर जाऊन दर्शन घ्या."
 आम्ही निघालो. देवीचे देऊळ बंगाली थाटावर बांधलेले आहे. रोज रेडा बळी देतात. त्याचे मास प्रसाद म्हणून खायला मिळते. मला तो प्रसाद नको होता, म्हणून मी एकदम देवळातच गेले. देवळात खोल खोल अर्धवट अंधारातून देवीच्या दर्शनास जावे लागते. शिरस्त्याप्रमाणे पूजामंत्र म्हणायच्या आधी पुजाऱ्याने म्हटले, "बाई, काय इच्छा असेल ती सांगा." मनात हजारो गोष्टी गर्दी करून आल्या. स्वतःसाठी देवीजवळ काही मागायचे का आसामच्या एकतेसाठी प्रार्थना करायची? सगळ्याच गोष्टी क्षुद्र वाटल्या. जे काय चालले आहे ते काय त्या जगन्मातेला माहीत नाही, असे थोडेच आहे? मी म्हटले, "बाबा, माझी काही इच्छा नाही." तो म्हणाला, "खरंच नाही?" मी पुन्हा निक्षून सांगितले, "खरंच नाही." त्याने मला देवीच्या पायांवर डोके टेकायला सांगितले व मंत्र म्हटला… "हे जगन्माते, या तुझ्या मुलीला जन्म, जरा व मृत्यू यांपासून सोडव. तिला मुक्ती दे." सकाळी प्रवासी बंगल्यात बसल्या-बसल्या रिकामपणाचा चाळा म्हणून मी देवीसाठी एक प्रार्थना रचली होती. देवीच्या पायावर डोके टेकून मनातल्या मनात मी ती म्हटली :

राजराजेश्वरी, कामरूपधारिणी । करुणामयी, विश्वजननी
पादकमलपतितायाम् । दुहितरी कृपां कुरु। दया कुरु ॥

१९५९
*