मनू बाबा/संपतरायाचे लग्न

सं प त रा या चे
ल ग्न
'
♣ * * * * * * ♣







 "संपत, लग्नाला तयार आहेस ना? होय म्हण. मी माझी इच्छा तुझ्यावर लादीत आहे असं नाही. परंतु इंदुमतीसारखी मुलगी मिळणं कठीण. सारं तिला येतं. ती चांगला स्वयंपाक करते, चांगली चित्रं काढते. तिला शिवणं, टिपणं, कशिदा काढणं, सारं येतं. वाचते किती छान व कविताही म्हणे करते. एवढी श्रीमंताची मुलगी, परंतु आळस तिला माहीत नाही. तिला गर्व नाही. कोणाला टाकून बोलत नाही. दिसायला सुंदर, तशी मनानं सुंदर. संपत, त्या मुलीचा तू अंत पाहू नकोस. अधिक ताणल्यानं तुटतं. झाडाला वेळीच पाणी मिळालं तर ते नीट जगतं, वाढतं, फुलाफळांनी संपन्न होतं. परंतु झाडाची मुळे सुकून गेल्यावर कितीही पाणी घातलं तरी काय उपयोग? इंदुमतीचा बाप आशेनं इतकी वर्ष थांबला. शेवटी त्राग्यानं दुसरीकडे कुठं मुलीला देऊन टाकील. मुलीला पुढं जन्माचं दुःख, -- कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे. मग सांग काय ते, झाला का निश्चय?" पित्याने विचारले.

 "बाबा, लग्नाला मी तयार आहे. तुमच्या इच्छेविरूद्ध मी नाही. इतके दिवस तुमच्या मनाला त्रास झाला. त्याबद्दल क्षमा करा. परंतु काही कारणामुळं मी थांबलो होतो. इंदुमतीच्या प्रेमाचीही परीक्षा होत होती. आता तुम्ही ठरवाल तो मुहूर्त. तुम्ही हाक मारलीत की मी उभा राहीन." संपत म्हणाला.

 संपतराय व इंदुमती यांचा विवाह ठरला. मोठ्यांकडचे लग्न म्हणजे जणू साऱ्या गावाचे. सारे लोक खपत होते. मोठे मंडप घालण्यात

३२*मनूबाबा आले. ते मंडप कापडण्यात आले. हंड्या, झुंबरे वगैरे थाट होता. आणि आमचा मनूबाबा! त्याने नवरदेवासाठी हळुवार हाताने नाजूक तलम वस्त्रे विणली. नववधूसाठी वस्त्रे विणली. त्याला भरपूर मजुरी मिळाली. लहानग्या मुलीसाठी ती झाली.

 लग्नाचा दिवस आला. मोठा सोहळा झाला. लग्न लागले. वधूवरांनी परस्परांस माळा घातल्या. बार वाजले, वाजंत्री वाजली, चौघडे वाजले. रात्री मोठी वरात निघाली. घोड्यावर बसून वधूवरे जात होती. चंद्रज्योती लावल्या जात होत्या. मनूबाबा त्या लहान मुलीला वरात दाखवण्यासाठी उभा होता. ती लहान मुलगी वरात बघत होती. घोड्याकडे बोट दाखवीत होती. संपतरायाचे लक्ष त्या मुलीकडे गेले. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. आईवेगळी मुलगी. अरेरे!

 गावात मोठी मेजवानी झाली. झाडून साऱ्या गावाला लाडू मिळाले. परंतु मनूबाबा जेवायला गेला नाही. त्याच्या घरी लाडू पाठविण्यात आले. त्या लहान मुलीला सुंदर कपडे पाठविण्यात आले. बाळलेणे पाठविण्यात आले. परंतु मनूबाबाने ते बाळलेणे मुलीच्या अंगावर घातले नाही. त्याने ते कपडे तिला चढविले नाहीत. तो म्हणाला, "मी माझ्या श्रमानं पैसे मिळवीन व बाळलेणे करीन. मी स्वतः सुंदर वस्त्र विणीन व त्याची आंगडी या मुलीला करीन, लोकांची कशाला?"

 वधूवरांस सर्व गावाने दुवा दिली. वधूवरांचा नवीन संसार सुरू झाला. इंदुमती आता आपल्या सासरी रहायला आली. सासू नव्हतीच. तीच आता घरधनीण होती. घरात येताच तिने घराला कळा आणली. सारा वाडा तिने स्वच्छ झाडायला लावला. कोळिष्टके उडून गेली. वाडा आरशासारखा झाला. वरती दिवाणखाना होता. त्यात मोठमोठ्या तसबिरी होत्या. त्यांच्यावर खंडीभर धूळ बसली होती. इंदुमतीने स्वतः ती धूळ पुसून काढली. तसबिरी प्रसन्न दिसू लागल्या. दिवाणखान्यात स्वच्छ बैठक घालण्यात आली. शुभ्र असे लोड तेथे ठेवण्यात आले. फुलदाणीत फुलांचा गुच्छ ठेवण्यात आला. दिवाणखान्याला तेज चढले.

 "किती आता प्रसन्न वाटतं! पूर्वी या दिवाणखान्यात येऊ नये असं वाटे." संपतराय म्हणाला.  "स्त्रियांच्या हातांत जादू आहे. स्त्रियांच्या हातांचा स्पर्श होताच अमंगलाचं मंगल होतं. मरणाचं जीवन होतं. खरं ना?" इंदुमतीने हसून विचारले.

 "होय. स्त्री म्हणजे सौंदर्यदेवता. स्त्री म्हणजे व्यवस्था. स्त्री म्हणजे नीटनेटकेपणा. स्त्रियांना घाणेरडं आवडत नाही. भांडी स्वच्छ ठेवतील. घर स्वच्छ ठेवतील. कपडे स्वच्छ ठेवतील. स्त्रियांशिवाय स्वछता कोण ठेवणार? प्रसन्नता कोण निर्मिणार? स्त्रियांशिवाय संसार नीरस आहे. तुम्ही संसारातील संगीत, संसारातील माधुर्य. पुरूष अव्यवस्थित असतो. तुम्ही त्याच्या जीवनात व्यवस्था आणता. त्याला वारेमाप जाऊ देत नाही. आदळ-आपट करू देत नाही. इंदू, खरोखरच तुझ्या हातांत जादू आहे. तुझा स्पर्श अमृताचा आहे." संपतराय प्रेमाने म्हणाला.

 गडीमाणसे आता वेळच्या वेळी कामे करीत. पूर्वी त्यांना वाटेल तसे वागण्याचा ताम्रपट असे. आता गड्यांना उजाडले नाही तो अंगण झाडावे लागे. कारण इंदुमती स्वतः सडा घाले. सुंदर रांगोळी काढीत असे. "सूर्यनारायण दारात उभे राहाणार. त्यांचं स्वागत नको का करायला? सारं स्वच्छ व पवित्र नको का?" असे ती म्हणे.

 दिगंबररायांना सुनेचा आटोप पाहून समाधान वाटले. ते आता अशक्त झाले होते. आपण फार दिवस जगू असे त्यांना वाटत नव्हते. एके दिवशी संपत त्यांच्याजवळ बसला होता. त्याला ते म्हणाले, "संपत, मी आता दोन दिवसांचा सोबती. या जगाचा आता विसर पडू दे. देवाकडे माझं चित्त लागू दे. तुला शेवटचे दोन शब्द सांगतो; ध्यानात धर. तुला शीलवती, गुणवती, रूपवती अशी पत्नी मिळाली आहे. रत्न मिळलं आहे. ते नीट सांभाळ. तिला अनुरूप वाग. दोघांनी सुखानं संसार करा. कोणाला दुखवू नकोस. श्रींमंतीचा तोरा मिरवू नकोस. होईल ती मदत करीत जा. सत्यानं राहा. न्यायानं राहा. आपणाला श्रीमंती आहे ती गर्व करण्यासाठी नाही. दुसऱ्याच्या उपयोगी पडावं म्हणून आहे. आपली संपत्ती म्हणजे गरिबांची ठेव. ती त्यांना वेळोवेळी देत जा. व्यसनात पडू नको. आळशी राहू नको. उद्योगात राहावं, म्हणजे शरीर व मन निरोगी राहातं. समजलं ना? मला आता कसलीही इच्छा नाही. तुमचा दोघांचा जोडा पाहून डोळे कृतार्थ झाले. तो ठकसेन कुठं असेल देवाला माहीत. परंतु नको त्याची आठवण. जर कधी काळी आला, आधारासाठी आला तर त्याला जवळ घे. कसाही झाला तरी तो तुझा भाऊ. परंतु जपून वाग."

 पित्याचे शब्द ऐकता ऐकता संपतचे डोळे भरून आले. इतक्यात इंदुमती तिकडून आली. ती सासऱ्याचे पाय चेपीत बसली. सासऱ्याने तिच्याकडे पाहिले. तो म्हणाला, "इंदु, तुझ्या हातांत सारं आहे. हा संपत तुझ्या हाती दिला आहे. त्याला सांभाळ. त्याच्या जीवनाला घाण लागू देऊ नकोस. त्याचा दिवाणखाना स्वच्छ केलास. तिथं फुलांचे गुच्छ ठेवलेस. तेथील तसबिरी झाडल्यास. संपतच्या हृदयाचा दिवाणखानाही निर्मल ठेव. तिथं भक्ती, प्रेम, दया, पवित्रता यांचा सुगंध पसर. समजलीस ना? तू थोर मनाची आहेस. आता मला काळजी नाही. संपतची जीवननौका तू नीट वल्हवून नेशील. सुखी राहा. एकमेकांची इच्छा सांभाळा. ओढून धरू नका. संशय मनात वाढू देऊ नये. संशय मनात येताच तो निस्तरून घ्यावा. मोकळेपणा असावा. प्रेम हे मोकळं असत. प्रेम भीत नाही. शंका आली, विचारावी. कधी भांडण झालंच तर पुन्हा विसरा. पुन्हा हसा. जो आधी भांडण विसरून हसेल तो खरा. हसतेस काय इंदु? तुला समजतं सारं. पण मला राहावत नाही म्हणून सांगतो."

 दिगंबररायांनी पुत्राचे व सुनेचे हात आपल्या हातांत एकत्र घेतले. नंतर त्यांनी त्यांच्या डोक्यांवर आपला मंगल हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. संपत व इंदु दोघांचे डोळे भरून आले होते. दोघांचे का - तिघांचे डोळे भरून आले. तिघांची हृदये भरून आली, आणि दिगंबररायांची घटकाही भरत आली.

 एके दिवशी दिगंबरराय देवाकडे गेले! साऱ्या गावाला वाईट वाटले. अनेक स्नेही-सखे, आप्त-ईष्ट समाचारासाठी आले. हळूहळू दुःख कमी झाले. संपतराय आता धनी झाला. इंदुमती व तो दोघे सुखाने राहू लागली. वडिलांप्रमाणे नीट कारभार चालवू लागली.


                           संपतरायाचे लग्न * ३५