स त्य
ल प त ना ही

♣ * * * * * * ♣







 "बाबा, बागेसाठी घेणार ना जागा? कधी घेणार?" सोनीने विचारले.

 "घेणार आहे. हल्ली त्याच खटपटीत आहे." मनूबाबा म्हणाले. आणि मनूबाबा खरोखरच त्या उद्योगात होते. झोपडीच्या जवळच ते जागा बघत होते. ज्या ठिकाणी सोनीची अनाथ माता मरून पडली होती, ते ठिकाण बागेच्या मध्यभागी असावे अशी एक सुंदर उदात्त कल्पना त्या विणकराच्या मनात आली.ती साडेतीन हात जागा बागेच्या मध्यभागी पवित्र राखू. भोवती फुलांचे ताटवे लावू. जणू सोनीच्या आईची समाधीच! असे विचार मनूबाबाच्या मनात खेळत होते.

 मनूबाबाने ती जमीन खरेदी केली. पडीतच जमीन होती. फार किंमत पडली नाही आणि संपतरायाने ती जमीन कमी किंमतीत त्या म्हाताऱ्याला मिळावी म्हणून योजना केली. संपतरायाचे सोनीवर प्रेम होते. मधूनमधून तो मनूबाबाकडे पैशाच्या रूपाने मदत पाठवीत असे.

 मनूबाबांनी जी जमीन खरेदी घेतली, तिच्याभोवती दगडांचे सुंदर कुसू घालून देण्याचे संपतरायाने ठरविले. त्या जमिनीजवळच दगडांची खाण होती. तो जो खळगा होता, तेथेच ती खाण होती. मजूर तेथे कामाला लागले. दगड खणून काढू लागले. तसेच तेथे जी दलदल होती, तीही भरून काढण्याचे काम सुरू झाले. मनूबाबाच्या बागेजवळ घाण नको. गावाचे गटार नको.

 संपतरायाची माणसे काम करीत होती. परंतु तेथे काम करणारे एकदम चकित झाले. खणता खणता तेथे एकदम काही तरी सापडले. काय सापडले? त्या दोन चामड्याच्या पिशव्या सापडल्या. मोहरांनी भरलेल्या पिशव्या! आणि तेथे तो सोनेरी मुठीचा संपतरायांचा चाबूक सापडला. तेथे एक मनुष्य पुरलेला असावा. त्याची हाडे होती. कोण तो मनुष्य? परंतु तेथे एक अंगठीही होती. त्या अंगठीवर ठकसेनाचे नाव होते! ठकसेन! संपतरायाचा भाऊ ठकसेन! तो का चोर होता? त्याने का मनूबाबांच्या पिशव्या चोरल्या? आश्चर्य! पंधरा वर्षांनी गोष्ट उघडकीस आली.

 गावातील सारी मंडळी त्या खळग्याकडे धावत आली. लहान मोठी सारी माणसे तेथे जमली. मनूबाबा, सोनी, रामू, साळूबाई सारी तेथे आली.

 "माझं सोनं. माझं कष्टानं मिळविलेलं सोनं. परंतु सोनीपुढं हे सोनं फिक्कं आहे. सोनीच्या लग्नासाठी सोनं आलं." मनूबाबा म्हणाले.

 "परंतु इथं कसा दिगंबररायांचा मुलगा पडला?"

 "त्या दिवशी गारांचा पाऊस होता. गारांच्या मारानं ठेचला गेला असेल. काळोखात हा खळगा दिसला नसेल. पडला असेल खळग्यात. वरून गारांचा मारा आणि खाली दगडावर आपटला असेल. हा खळगा त्याच रात्री कोसळला. दगड-माती अंगावर पडून ठकसेन पुरला गेला. गावातील सारा गाळही पाण्याबरोबर आला असेल व तोही आणखी अंगावर साचला असेल. सृष्टीनं ठकसेनाला मूठमाती दिली."

 "आणि हा चाबूक?"

 "त्या दिवशी तो घोडी विकायला गेला होता. घोडी तिकडे मरून पडली. मग पैशासाठी इकडे येऊन त्याने चोरी केली असेल. त्या वेळेस चाबूक हातात असेल. परंतु देवाच्या मनात निराळंच होतं."

 "एवढ्या मोठ्या घराण्यात असा कसा निपजला?"

 "जगात असे अनेक प्रकार होतात."

 "मनूबाबाचे पैसे मिळाले. चांगलं झालं. म्हातारपणी आता काम करण्याची दगदग नको. मनूबाबांना त्यांच्या प्रामाणिकपणाचं, प्रेमाचं, उदारपणाचं देवानं बक्षीस दिलं." लोक म्हणाले.

                       सत्य लपत नाही * ४९  इतक्यात संपतराय तेथे आले. लोक बाजूला झाले. त्यानी तो मूर्त आकार पाहिला! इतर सर्व वस्तू पाहिल्या. ते गंभीरपणे उभे राहिले.

 "माझाच भाऊ, देव त्याला क्षमा करो. मनूबाबा, तुम्हीही क्षमा करा." संपतराय दुःखाने म्हणाले.

 संपतरायांनी त्या अवशेषांस अग्नी दिला. सारे लोक परतले. संपतरायही घरी आले. गावात चाललेली गडबड इंदुमतीच्या कानी आली. परंतु सारा वृत्तान्त नीट तिला कळला नव्हता. संपतराय आले व आपल्या खोलीत खिन्नपणे बसून राहिले.

 "काय आहे गडबड, काय आहे हकीगत? तुमचा चेहरा असा का काळवंडला? सांगा ना सारं." इंदुमतीने आस्थेने विचारले.

 "काय सांगू? त्या विणकराचं सोनं पंधरा वर्षापूर्वी चोरीस गेलं होतं, ते माझ्या भावानं चोरलं होतं.पंधरा वर्षांनी सत्य उघडकीस आलं. तुझ्या पतीचा भाऊ चोर निघाला. चोराच्या भावाशी तू लग्न लावलंस. माझ्यामुळं, आमच्यामुळं तुला कमीपणा. तुझं माहेर मोठं, घरंदाज. थोर कुळातील तू. माझ्याकडे आता तू आदराचे पाहू शकणार नाहीस. चोराचा भाऊ असं तुझ्या मनात येईल. काय करणार मी?" असे म्हणून संपतराय केविलवाण्या दृष्टीने पाहू लागले. थोडा वेळ कोणी काही बोलले नाही.

 नंतर इंदुमती पतीचा हात प्रेमाने आपल्या दोन्ही हातांनी धरून म्हणाली, "तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. तुमचा भाऊ असा निघाला त्यात तुमचा काय दोष? घराण्याला थोडा कमीपणा येतो; परंतु काय करायचं? मामंजी आज हयात नाहीत हे एका दृष्टीने बरं. नाही तर त्यांच्या जिवाला फार लागली असती ही गोष्ट, मी तुमच्याकडे भक्तिप्रेमानंच पाहीन. मला जगाशी काय करायचं आहे? माझं सारं धन म्हणजे तुम्ही. तुम्ही माझं सर्वस्व. तुम्ही निर्मळ व निष्पाप असलेत म्हणजे झालं. तुम्ही निष्कलंक असलेत म्हणजे झाले. का? अशी का करता मुद्रा? काय होतं तुम्हांला? का आले डोळे भरून? नका हो रडू. मनाला इतकं लावून नये घेऊ. बाकी भावाला असा अपघाती मृत्यू यावा याचं वाईट वाटणारच. परंतु आपला काय इलाज?"


५० *मनूबाबा  थोडा वेळ कोणी बोलले नाही.

 संपतराय गंभीरपणे म्हणाले, "इंदु, आणखीही तुला काही सांगणार आहे. सत्य जगात केव्हा ना केव्हा प्रकट होतंच. मग सारं तुला सांगून टाकतो. सांगू?"

 "सांगा. काय सांगायचं?" ती भीतभीत विचारती झाली.

 "इंदु तुझा पतीही निर्दोष नाही. हो संपतराय निष्पाप नाही. मी तुझ्याबरोबर लग्न करणं लांबणीवर टाकीत होतो. ही गोष्ट तुला आठवत असेल. मी एका मुलीच्या प्रेमपाशात अडकलो होतो. तिच्याजवळ मी गुप्तपणे लग्न लावलं होतं. एका गावी एक घर भाड्यानं घेवून तेथे तिला ठेवली होती. ती मुलगी गरीब घराण्यातली होती. आम्ही मोठ्या घराण्यातील. बाबांनी त्या मुलीजवळ लग्न लावायला कधीही संमती दिली नसती. मलाही उघडपणे त्या मुलीला माझी पत्नी म्हणून इथं आणण्याचं धाष्टर्य झालं नाही. समाजाच्या टीकेला मी भ्यालो. खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे भेद, त्यांना मी बळी पडलो. मनाने मोठा तो मोठा, तो कोठे का जन्मेना? कोठे रानातही गुलाब फुलला, तरी त्याचा सुगंध दशदिशांना धावणारच. परंतु मी भ्याड होतो. त्या माझ्या पत्नीला माझ्यापासून एक सुंदर मुलगी झाली होती. मी मधूनमधून तिच्याकडे जात असे. त्या सुंदर लहान अर्भकाला जवळ घेत असे. माझी पत्नी मला नेहमी विचारी, 'कधी नेणार घरी?' मी म्हणे, 'नेईन लवकर.' परंतु ती निराश झाली. लहान मूल कडेवर घेऊन माझ्याकडे येण्यासाठी ती निघाली असावी. पायी यायला निघाली. तुला आठवते का ती गोष्ट? पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. मनूबाबांच्या झोपडीजवळ एक अनाथ स्त्री मेलेली आढळली. इंदू, तीच माझी पहिली पत्नी आणि मनूबाबाकडे वाढणारी सोनी तीच माझी मुलगी. ती माझी पत्नी गावाच्या सीमेवर विष पिऊन मरून पडली. पतीच्या नावाला कमीपणा का येईल? तर मग मी या जगात कशाला राहू? अशा विचारानं का तिनं मरण पत्करलं? आणि ती मुलगी! त्या विणकराला मी म्हटलं, की मी त्या अनाथ मुलीला वाढवीन. परंतु तो देईना. ही माझी मुलगी आहे व ही मरून पडलेली अनाथ स्त्री माझी पत्नी आहे असं सर्व लोकांसमोर कबूल करण्याचं

                       सत्य लपत नाही * ५१ धैर्य मला झालं नाही. इंदू, असा मी आहे. तुझ्यापासून पंधरा वर्षे सत्य लपवून ठेवलं. परंतु आज सांगत आहे, या पापी पतीला क्षमा कर. तुझ्या प्रेमात आहे का इतकी शक्ती, इंदू!" असे म्हणून त्याने डोके वाकविले.

 इंदू थरथरत होती. हकीगत ऐकताच, क्षणोक्षणी तिची मुद्रा बदलत होती. परंतु शेवटी तिच्या डोळ्यांतून करूणा चमकली. तिने पतीच्या मस्तकावरून हात फिरविला. दोघे पुन्हा शांत बसली कोण बोलेना.

 "इंदू, तू माझ्याकडे प्रेमानं अतःपर पाहू शकशील का? माझा तिरस्कार नाही ना करणार? तुझं प्रेम थोर आहे. तू मला पदरात घे. घेशील?" संपतरायाने एखाद्या मुलाप्रमाणे विचारले.

 "तुम्ही इतक्या वर्षानी का होईना, परंतु मजजवळ सत्य सांगितलंत हा तुमचा मोठेपणाच आहे. नाही तर ही गोष्ट मला थोडीच कळली असती? असो. झालं ते झालं. तुम्ही व मी आता अलग नाही. पंधरा वर्षे एकत्र राहिलो. तुम्हांला कशी तुच्छ मानू? तुम्ही जणू माझे झाले आहांत. तुमचा तिरस्कार करणं मी माझाच तिरस्कार करण्यासारखं आहे. जाऊ दे; जगात निर्दोष कोण आहे? पापाचा पश्चाताप झाला म्हणजे पुरे. परंतु हे जर मला पूर्वीच सांगितलं असतं तर ती सोनी मी आपल्या घरी आणली असती. आपण तिला वाढविलं असतं. आपण तिचं कोडकौतुक केलं असतं. आपल्या घरात तिनं आनंद पसरवला असता. देवानं आपणांस मूलबाळ दिलं नाही. ते सुख आपणांस नाही. ती उणीव भरून निघाली असती, मी तिला कुशीत घेतलं असतं. तिला जेवू घातलं असतं. तिला न्हाऊमाखू घातलं असतं. मातृसुखाचा आनंद मी लुटला असता, परंतु आता काय? असो. आपलं नशीब." असे म्हणून इंदू थांबली.

 "आपण मनूबाबाकडे जाऊ व सारं सांगू, सोनीला घेऊन येऊ. ती येईल. तिला सांगितलं की ती येईल." संपतराय म्हणाला.

 "जाऊ त्यांच्याकडे." ती म्हणाली.

 "आज रात्रीच जाऊ." तो म्हणाला.