मनू बाबा/सोनीचे लग्न
ल ग्न
♣ * * * * * * ♣
मनूबाबांच्या झोपडीजवळ बाग तयार झाली. बागेला दगडांचे सुंदर कुसू घालण्यात आले होते. बागेत विहीर खणण्यात आली. तिला पाणीही भरपूर लागले. बागेची नीट आखणी करण्यात आली. फुलझाडे लावण्यात आली. लवकर फुलणाऱ्या फुलझाडांचे ताटवे शोभू लागले. लतामंडपही करण्यात आले. त्यांच्यावर वेल सोडण्यात आले. बागेच्या मध्यभागी ती पवित्र जागा होती. तिच्याभोवती फुलझाडे लावण्यात आली होती. मध्ये ती हिरवी जागा शोभे. हळूहळू बागेला रंग येत होता.
रामूला ज्या वेळी इतर ठिकाणी काम नसे, त्या वेळेस तो बागेत काम करी. कधी कधी तो पहाटे उठे व बागेत येई. तेथे तासभर खपून मग दुसऱ्यांच्या कामावर जाई. एके दिवशी सोनी बाहेर झुंजुमुंजू आहे तोच बागेत आली. तेथे येऊन पाहते, तो रामू फुलझाडांना पाणी घालत आहे !
"रामू, तू केव्हा आलास ?"
"तुझ्या आधी आलो. सोनीची बाग सुंदर झाली पाहिजे."
"ही बाग का फक्त सोनीची ? ती रामूची नाही का ?"
"दोघांची आहे."
"रामू, माझ्यासाठी तू दमतोस. माझे मनोरथ पुरावे म्हणून सारखी खटपट करतोस. दिवसभर इतर ठिकाणी काम करून पुन्हा बागेत काम करायलां येतोस." "इतर ठिकाणाचा थकवा इथं मी विसरून जातो. इथं माझा सारा आराम, इथं माझा विसावा. येथील कामानं मी दमत नाही, उलट अधिक उत्साह येतो."
"रामू त्या जागेजवळ येतोस ?"
"चल."
दोघे त्या मध्यवर्ती जागेजवळ आली. सोनी हात जोडून उभी राहिली. रामूनेही हात जोडले. कोणी बोलले नाही, थोड्या वेळाने सोनी म्हणाली, "चल, आता जाऊ."
"येथे लवकरच फुलांचे ताटवे दिसतील आणि मी मुद्दाम रंगारंगाची फुले या हिरव्या गवतातून लावणार आहे. पाहाताच डोळे सुखावतील." रामू म्हणाला.
"तुला आज कामावर नाही जायचं ?"
"जायचं आहे तर."
"मग आमच्याकडे भाकर खाऊन जा. मी करून देत्ये. येतोस ?"
"आता तुझ्याच हातची भाकर नेहमी खायची आहे."
"परंतु नेहमी खाण्याला मिळण्यापूर्वी मधूनमधून खाऊन बघ. कशी लागते बघ. माझी परीक्षा घे."
"परीक्षा कधीच घेतली आहे. परीक्षेत पास आहेस."
"कितवा नंबर ?"
"पहिला."
"आणखी कोणाची परीक्षा घेतलीस ?"
"कोणाची नाही. सोन्ये, तू चावट आहेस. चल लवकर."
सोनी व रामू घरी आली. मनूबाबा चूल पेटवून शेकत बसले होते.
"इतक्या थंडीत सोन्ये तू कशाला उठतेस.?" त्यांनी विचारले.
"आम्हांला नाही थंडीबिंडी." ती हसत म्हणाली.
"बागेत गेली होतीस. होय ग ?"
"हो. आणि आता रामूला भाकर करून देत्ये. तो ताजीताजी भाकर खाईल व कामाला जाईल. बाबा, तुम्ही जरा दूर होता ? चुलीवर तवा टाकते." मनूबाबा दूर झाले. सोनीने पीठ घेतले. तव्यावर भाकरी पडली. दुसऱ्या भाकरीला थोडे पीठ हवे होते.
"रामू, थोडे पीठ घालतोस त्यातले. ?"
"हो."
त्याने पीठ घातले. परंतु एकदम अधिक पडले.
"हे पाहा ! इतकं कशाला ? चार भाकऱ्या होतील. फार भूक लागली वाटतं ?" हसून सोनीने विचारले.
"मी एकटाच भाकर खाऊ ? माझ्याबरोबर तूही खा. दोघांसाठी पीठ. तू एकटया रामूची काळजी घेतेस. परंतु रामू दोघांची घेतो. खरे ना ?" तो हसून म्हणाला.
"बाबा, तुम्हीही थोडी कढत कढत खाल भाकर आमच्याबरोबर ? तव्यावर पिठलं करीन. आपण खाऊ." सोनीने विचारले.
"खाईन तुमच्याबरोबर. उजाडत खाण्याची मला म्हाताऱ्याला लाज वाटते. परंतु सोनीबरोबर खाण्यात गंमत आहे." मनूबाबा म्हणाले.
भाकऱ्या झाल्या. तिघे खायला बसली. इतक्यात रामूची आई साळूबाई आली.
"हे काय रामू ? कामावर नाही का जायचं ? इथं खात काय बसलास ? घरी भाकर केली आहे ना !" ती म्हणाली.
इथं खाल्लंन म्हणून काय झालं ?" मनूबाबा म्हणाले.
"तुम्ही परके नाही मनूबाबा. परंतु घरी सांगायला नको का? आपली वाट बघत्ये केव्हाची. आणि सोन्ये, इतक्या उजाडत उठून कशाला ग भाकऱ्या करीत बसलीस ?" साळूबाईने प्रेमाने विचारले.
"रामूबरोबर भातुकली करण्यासाठी ! त्याला दिवसभर असते काम. माझ्याबरोबर भातुकली खेळायला त्याला वेळ कुठं आहे ? म्हणून आज सकाळीच करू म्हटलं." सोनी हसून म्हणाली.
"भातुकली खेळायला तुम्ही का आता लहान ?" तिने विचारले.
"मग का आम्ही मोठी झालो ?" सोनीने विचारले.
"नाही वाटतं ? आता लग्न हवं करायला तुझं. समजलीस ग सोन्ये. लहान नाहीस हो आता. उद्या सासूकडे गेलीस म्हणजे स्वतःला लहान समजशील व झोपून राहाशील. सासू मग बोलेल, रागावेल." साळूबाई म्हणाली.
"मारणार नाही ना ?" हसून सोनीने विचारले.
"मारील सुद्धा. काही काही सास्वा खाष्ट असतात हो, सोन्ये. तयार रहा. लाड नाही मग तिथं चालायचे !" रामू म्हणाला.
"पण मी अशी सासू मिळवीन, जी माझी जणू आई होईल. मी थंडीत लवकर जायला लागले तर जी म्हणेल, की नीज हो जरा आणखी, लहान आहेस तू." सोनी म्हणाली.
"अशी सासू मिळायला पुण्याई लागते." रामू म्हणाला.
"आहेच माझी पुण्याई. आणि माझी पुण्याई नसली तरी मनूबाबांची आहे. माझ्या आईचा आशीर्वादही माझ्याजवळ असेल. नाही का हो बाबा ?" सद्गदित होऊन सोनीने विचारले.
"आहे हो तुझ्या आईचा आशीर्वाद." म्हातारा म्हणाला.
"रामू, जा आता कामावर. वेळ झाली." साळूबाई म्हणाली.
रामू निघाला. सोनी त्याला दारापर्यंत पोचवायला गेली. रामू मागे वळून पाहात होता. सोनी तेथेच उभी होती. रामू वळला, दिसेनासा झाला. तरी सोनी तिथेच उभी होती.
घरात साळूबाई व मनूबाबा दोघे होती. साळूबाई जायला निघाली, परंतु म्हाताऱ्याने तिला थांबवले.
"साळूबाई. जरा थांबा. थोडं बोलू आपण." तो म्हणाला.
"घरी चुलीवर दूध आहे. उतास जाईल." ती म्हणाली.
"सोनीला पाठवू. ती दूध उतरून ठेवील." म्हातारा म्हणाला.
"बरे तर. सोने. अगं सोन्ये !" तिने हाक मारली.
"काय रामूच्या आई ?" सोनीने येऊन विचारले.
"आमच्या घरी जा व तेवढं चुलीवरचं दूध तापलं म्हणजे उतरून ठेव. झाकून ठेव. भाकऱ्याही झाकल्या नसतील तर झाकून ठेव. मी लवकरच येत्ये म्हणून सांग. त्यांना थोडा चहा हवा असला तरी करून दे. अलीकडे त्यांना जरा दमा लागतो. तुला येतो की नाही करता ?" साळूबाईने विचारले.
सोनीचे लग्न * ६५ "हो. देईन करुन. जाऊ मी? जाते हं बाबा." असे म्हणून ती गेली. आता ती दोघेच तेथे होती. मोकळेपणे बोलता आले असते.
"काय बोलणार आहात मनूबाबा ?"
"सोनी आता मोठी झाली. तिचं लग्न नको का करायला ?"
"हवं करायला मी कधीच तुम्हाला म्हणणार होत्ये, पण म्हटलं की तुम्हाला वाईट वाटेल. सोनी सासरी गेली की तुम्ही एकटे राहाल. सोनीच्या दूर जाण्याचा विचारही तुम्हाला सहन होणार नाही. परंतु आता हवं हो करायला लग्न. सारं रीतीनं वेळीच झालं पाहिजे. नाही का ?"
"हो अलीकडे हाच विचार माझ्या मनात येत असतो परंतु मी म्हातारा कुठे जाऊ नवरा शोधायला? तुम्ही सांगता का एखादे स्थळ? तुमच्या आहे का माहितीत एखादा मुलगा."
"तसा डोळ्यांसमोर नाही. आणि सोनीला चांगलं स्थळ पाहायला हवं. तिला गरीबाघरी थोडी द्यायची आहे? तुमच्या मोहराही परत मिळाल्या आहेत. आता तुम्ही गरीब नाही. खर्च करू शकाल. सोनी सुस्थळी पडो. चार दागिने अंगावर पडोत. परंतु अशी स्थळं आम्हाला कुठे माहीत असणार? आम्ही गरीब माणसं, खरं ना मनूबाबा?" ती म्हणाली.
"हे पहा साळुबाई, नवरामुलगा चांगला असला म्हणजे झालं. माणसं चांगली असली म्हणजे झालं. गरीब का असेना घराणं. माणसं श्रीमंत मनाची हवीत. सोनीला मी प्रेमानं वाढवलं. जरा लडिवाळपणाने बोलते सवरते. तिचे कौतुक करणारी माणसे मिळाली म्हणजे झालं. पैसे काय चाटायचे आहेत? आणि सोनीला नाही हो दागदागिन्यांचा सोस. दोन फुले केसात घालायला असली म्हणजे झालं असं म्हणते. आहे का असं स्थळ माहित? गरीब असले तरी चालेल."
" सांगेन, लक्षात ठेवीन."
"आता नाही सांगता येणार?"
"आता एकदम कसं कोणतं सांगू मनुबाबा?"
"डोळ्यासमोर असेल ते सांगा." "तसं कसं सांगू ?"
"साळूबाई, मीच तुम्हांला एक विचारू ?"
"विचारा ना बाबा."
"तुम्हीच माझ्या सोनीला सून करून घेता का ? तुमच्या रामूला सोनी द्यावी असे माझ्या मनात आहे. परंतु तुम्हाला एकदम विचारायला धैर्य झालं नाही. विचारीन विचारीन म्हणत होतो. परंतु आज केलं धाडस. बघा. सांगा काय ते."
"काही तरीच बोलता तुम्ही."
"काही तरी नाही. खऱ्या अर्थानं विचारीत आहे. मी एकाच गोष्टीला भितो. ती म्हणजे सोनी कोणाची कोण हे तुमच्या मनात येईल कि काय ? सोनी एका अनाथ स्त्रीची मुलगी, तिच्या आईबापांची माहिती नाही. असं तुमच्या मनात येईल का असं मला वाटे आणि म्हणून तुम्हाला विचारायला धजत नव्हतो. साळूबाई, तुमच्या मनात असं काही येणार नाही असं मला वाटतं, तुमचं मन मोठं आहे. तुमचं हृदय प्रेमळ आहे. तसं नसतं तर तुम्ही सोनीला कधी हात लावला नसता. तिचे केस विंचरले नसतेत, तिला न्हाऊमाखू घातलंत नसतं, तिला जेवायला बोलावलंत नसतं. आताच तुम्ही तिला तुमच्या घरी पाठवलंत दूध उतर, भाकऱ्या झाक, चहा कर वगैरे सांगितलेत. तुम्ही सोनीला हीन समजत नसाल. परंतु साळूबाई, हे सारं करणं-सवरणं निराळं आणि प्रत्यक्ष उद्या सून म्हणून पत्करणं निराळं. कारण जग एखादे वेळेस नावं ठेवील. आप्तेष्ट नावं ठेवतील. सारं पाहावं लागतं. परंतु तुम्ही असल्या गोष्टींना महत्व देणार नाही असं मला वाटतं. सांगा, तुम्ही काय ते सांगा. रामू व सोनी यांचा जोडा अनुरूप आहे. त्यांचं परस्परांवर प्रेम आहे. त्यांचं संसार सुखाचा होईल आणि तुमच्यासारखी सासू मिळणं म्हणजे खरोखरच पुण्याई हवी. बोला. या म्हाताऱ्याचं स्वप्न खरं करा. माझ्या मनात किती तरी दिवस खेळवलेले हे मनोरथ पुरे करा. तुमच्या हातात सारं आहे. रामूचे वडील केव्हाच तयार होतील. तुम्ही तयार झाल्यात म्हणजे सारं होईल. सांगा साळूबाई." "मनूबाबा, सोनीच्या जातकुळीचा प्रश्न माझ्या डोळ्यांसमोर कधीही आला नाही. जसा माझा रामू तशी ती. खरं सांगू का, माझ्यासुद्धा मनात किती तरी वर्षे हे स्वप्न आहे. पुढंमागं सोनीला सून करून घेऊ असं मी मनात म्हणे. त्या दोघांचं परस्परांवर प्रेम आहे हीही गोष्ट खरी. ती दोघं लहानपणी भातुकली खेळत. त्यांचं खेळ मी बघे व मनात म्हणे, आज लटोपटीचा संसार करीत आहेत, ती त्याला लटोपटीची भाकर वाढीत आहे. परंतु सोनी एक दिवस रामूचा संसार करू लागेल व त्याला खरोखरची भाकरी वाढील. मघाशी इथं मी आल्ये. सोनी रामूला वाढीत होती. ते पाहून माझ्या मनात किती कल्पना आल्या. मला जरा गहिवरून आलं होतं. जणू दोघांचं देवानं लग्नच लावलं असं वाटलं. परंतु मनाला मी आवरलं. मनूबाबा, मीच तुमच्याजवळ सोनीसाठी मागणी घालणार होत्ये. परंतु ज्या दिवशी तुमच्या मोहरांच्या पिशव्या परत मिळाल्या, त्या दिवशी मला एक प्रकारचं जरा वाईट वाटलं. म्हटलं, की मनूबाबा आता श्रीमंत झाले. सोनीचं लग्न आता थाटानं होईल. तिला मोठ्या घरी देतील. आता आपण कशी सोनीला मागणी घालायची ? आपण गरीब. आपणास दागदागिने अंगावर घालता येणार नाहीत. उंची तलम लुगडी घेता येणार नाहीत. आमच्याकडे जाडेभरडे कपडे, भाजीभाकर खायला, गडीमाणसं तर कामाला मिळायची नाहीतच, उलट स्वतः गडीमाणसांप्रमाणं राबावं लागेल. कशी घालावी सोनीला मागणी ? मी स्वतःवर रागावल्ये. आपल्या रामूला चांगली बायको मिळावी हा माझा स्वार्थ. सोनी सुस्थळी पडू दे तिचे हात कशाला कामात राबायला हवेत ? तिचे हात का आमच्या हातांसारखे राठ करायचे? तिनं का भांडी खरकटी करावी, धुणी धुवावी, घरं सारवावी ? मनूबाबांना पैसे मिळाले. चांगलं झालं. सोनीचं नशीब थोर. त्याचा आनंद वाटण्याऐवजी मला जरा वाईट वाटलं. माझी मला लाज वाटली. पुन्हा असा स्वार्थी विचार मनात येऊ द्यायचा नाही, असं ठरविलं. मनूबाबा, खरोखरच का सोनी रामूला देऊ म्हणता ?"
"खरोखर. सोनीच्या आईची शपथ. लग्नासारख्या पवित्र व मंगल गोष्टी. त्यांची का मी थट्टा करीन ? मग ठरलं ना ?" "तुमची इच्छा असेल तर ठरलं. माझी ना नाही. माझ्या रामूचं भाग्य. माझीही पूर्वपुण्याई म्हणून अशी सून मला मिळत आहे."
"मग साखर घ्या व गोड तोंड करून जा."
"कुठं आहे साखर ?"
"कशाला साखर ?" सोनीने एकदम येऊन विचारले.
"तू आलीस वाटतं ? रामूच्या आईचं तोंड गोड कर." मनूबाबा म्हणाले.
"कडू कशानं झालं ? ही घ्या साखर." सोनीने साखर दिली.
"तू पण खा. मनूबाबांना दे."
"ही कशाची साखर ?"
"ते तुला कळेल. आता मी जात्ये."
साळूबाई निघून गेल्या. मनूबाबांनी सोनीला सारी हकीकत सांगितली. सोनी आनंदली, नाचली. तिचे तोंड फुलले. तिचे डोळे किती सुंदर दिसत होते !
तिन्हीसांजा झाल्या. रामू कामावरून आज घरी आला नाही. सोनी त्याच्याकडे गेली होती. परंतु रामू न दिसल्यामुळे ती हिरमुसली झाली. कोठे गेला रामू ? बागेत तर नसेल गेला ? परंतु घरी येऊन मग जातो. मलाही हाक मारून जातो. परंतु आज का एकटाच गेला? एकटाच फुले फुलविण्यासाठी गेला ? सोनीही निघाली. ती बागेत आली. रामू पाणी घालीत होता. सोनी त्याला मदत करू लागली. पाणी घालून झाले. सोनीने काही फुले वेचून घेतली.
"चल रामू, आईच्या जागी जाऊ."
"चल."
दोघे त्या पवित्र, प्रशांत स्थानी जाऊन बसली. स्तब्धता होती. मंद वारा वाहात होता. झाडे माना डोलवीत होती. तिकडे आकाशात अनंत रंग पसरले होते.
"रामू, तू आज असा का ?"
"मग कसा असू ?"
"आनंदी अस, तू हस व मला हसव." "सोने, ही बाग आपण फुलवली."
"किती छान दिसते नाही ?"
"परंतु रामूच्या जीवनाची बाग कधी फुलणार ? किती दिवस वाट बघायची ?"
"रामू !"
"काय ?"
"सांगू ? तुझं माझं लग्नं ठरलं ! आज तुझी आई व माझे बाबा यांनी निश्चित केलं. सकाळी माझा साखरपुडा झाला. ही बघ तुलाही साखर आणली आहे. तुला देण्यासाठी घरी गेल्ये होत्ये. परंतु तू इकडे आलास. ही घे साखर व तोंड गोड कर. आता लवकरच बागा फुलतील. रुसू नको. रागावू नको. घे ना."
"माझ्या तोंडात घाल."
"बरं."
सोनीने रामूच्या तोंडात साखर घातली. दोघांना अपार आनंद होत होता. सोनीचा हात त्याच्या हातात होता. कोणी बोलेना.
"रामू, आपण आईची पूजा करू."
"ये करू."
दोघांनी ती फुले त्या पवित्र स्थळी वाहिली. दोघांनी प्रणाम केले.
"आई, आम्हांला आशीर्वाद दे. आमचे प्रेम अभंग राहो." सोनी म्हणाली.
दोघे निघाली. रामूने एक फुल तोडून घेतले व सोनीच्या केसांत घातले. तिने एक तोडून घेतले व त्याच्या कानावर ठेवले. परस्परांनी परस्परांस फुले दिली. जणू निर्मळ व प्रेमळ अशी स्वतःची हृदये, स्वतःची जीवनेच त्यांनी एकमेकांस अर्पिली.
सोनी व रामू यांचे लग्न ठरले. साऱ्या रायगावात वार्ता पसरली. 'रामूचं नशीब थोर.' असे सर्वजण म्हणू लागली. संपतराय व इंदुमती यांच्याही कानी वार्ता गेली. ती दोघे पुन्हा एकदा मनूबाबांकडे गेली. सोनीने त्यांचे स्वागत केले. "सोन्ये तुझं लग्न ठरलं ना ?" इंदुमतीने विचारले.
"हो रामूशी ठरविलं." मनूबाबांनी सांगितले.
"सोन्ये, इतकी लाजतेस काय ? ये. माझ्याजवळ ये." संपतराय म्हणाले. सोनी संपतरायांजवळ गेली. त्यानी तिच्या पाठीवरून, केसांवरून हात फिरविला.
"मनूबाबा, आता माझी एक तरी प्रार्थना तुम्ही ऐकली पाहिजे. या लग्नाचा दोहोंकडचा खर्च मी करीन. हे लग्न मी लावीन. एवढी तरी या निराश पितृहृदयाची इच्छा तुम्ही नाही का पुरविणार ? सोन्ये, नाही म्हणू नको. कठोर होऊ नको." संपतराय सकंप आवाजात म्हणाले.
"जशी तुमची इच्छा." मनूबाबा म्हणाले.
"परंतु सोनीचं काय म्हणणं आहे ?" संपतरायांनी विचारले.
"माझा विरोध नाही. मी तुमचं हृदय जाणते, दुःख समजते. मनूबाबा माझे आणि तुम्हीही माझे." सोनी म्हणाली.
संपतराय व इंदुमती आनंदून गेली. मुहूर्त ठरला. मोठ्या थाटाने लग्न झाले. साऱ्या गावाला पुरणपोळीचे जेवण मिळाले. सारे धन्यवाद व आशीर्वाद देते झाले. सोनी व रामू, संपतराय व इंदुमती यांच्या पाया पडली. दोघांनी आशीर्वाद दिले. मनूबाबांनीही दोघांना पोटाशी धरले व आशीर्वाद दिले. साळूबाई व सखाराम यांनीही वधूवरांस आशीर्वाद दिले.
"सोन्ये, गावात ते वृद्ध धोंडीबा आहेत ना, त्यांनाही नमस्कार करून या. साऱ्या गावात ते अधिक वृद्ध आहेत. त्यांना आनंद होईल." सखाराम म्हणाला.
वधूवर त्या वृद्ध धोंडीबाकडे गेली. धोंडीबा दारातच होते. सोनी व रामू त्यांच्या पाया पडली. धोंडीबाने त्यांना आशीर्वाद दिला. धोंडीबा म्हणाला, "रामूच्या वडिलांना हे असं होणार म्हणून मी कधीच सांगितलं होतं. म्हाताऱ्यांचं म्हणणं खोटं होत नसतं. आमचे डोळे अधू होत चालले तरीही आम्हांला दूरचं दिसतं. हसता काय? सुखानं संसार करा. म्हाताऱ्यांना मान द्या. त्यांची सेवा करा. समजलं ना ?"
सोनी व रामू बागेत गेली. दोघे आईच्या त्या पवित्र स्थानी उभी होती. दोघांनी त्या जागेवर भक्तीने फुले वाहिली. दोघांनी प्रणाम केले. "आई, आम्हा दोघांना आशीर्वाद दे." दोघे म्हणाली.
"सोनीच्या आई, मलाही क्षमा कर." संपतराय म्हणाले. ते हळूच पाठीमागे येऊन उभे होते. त्यांनी त्या पवित्र स्थळाला साश्रू प्रणाम केला.
"सोन्ये, रामू, मला परका मानू नका. माझ्या बागेतील फुलं तुमची आहेत, फळं तुमची आहेत. माझ्या घरातील सारं तुमचंच आहे. हक्कानं मागा, नेत जा. त्यातच आम्हांला आनंद हो सोन्ये. या पवित्र ठिकाणी मी सांगत आहे." संपतराय म्हणाले.
"हो बाबा." सोनी म्हणाली.
संपतराय निघून गेले. सोनी व रामूही हळूहळू निघून गेली.
७२ * मनूबाबा