मराठी शब्दांचे उद्घाटन




डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसाएटीनें
बक्षीस दिलेलें पुस्तक.
----------
मराठी शब्दांचें उद्घाटन
----------
हा निबन्ध
विद्याधर वामन भिडे बी. ए.
ह्यांनीं रचिला
तो
"तत्त्वविवेचक " छापखाना
मुंबई
येथें छापिला.
----------
इ. स. १९०५.
----------
[ सर्व हक्क कर्त्यानें स्वाधीन ठेविले आहेत. ]
----------
किंमत आठ आणे.


मराठी शब्दांचें उद्घाटन
----------
उपोद्घात.
निधानगर्भामिव सागराम्बरां
शमीमिवाभ्यन्तरलीनपावकाम् ।
नदीमिवान्तःसलिलां स्वरस्वतीं
नृपः ससत्वां महिषममन्यत ॥
     कालिदास, रघुवंश, सर्ग ३ श्लोक ९.
निधान उदरीं जिच्या धरणि ती विराजे जशी ॥
जिच्या जठरिं अग्नि ती विलसते शमी कां जशी ॥
जलौघ उदरीं जिच्या असि सरस्वती शोभती ॥
नृपाशिं गमली तशी तंव निजा सगर्भा सती ॥
     गणेशशास्त्री लेले.

“जगास जसजशी उन्नतावस्था प्राप्त होत गेली तसतसे त्यास क्रमाक्रमानें हरएक वस्तूसंबंधाने ज्ञान व अनुभव हीं आजपर्यंत मिळत आली आहेत व तीं मुख्यत्वेंकरून ग्रंथांमध्यें सांठविलीं गेलीं आहेत; तसेंच ह्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ ग्रंथांच्याच द्वारानें मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीस प्राप्त होत गेला," हा सिद्धांत कबूल न करणारे लोक प्रायः आढळावयाचे नाहींत. परंतु पुढील निबंधांत आम्ही कांहीं वेगळाच सिद्धांत वाचकांस सादर करून तो अनेक प्रमाणांनीं समर्थिणार आहों. तो सिद्धांत हा कीं, जगाचें ज्ञान व अनुभव हीं ग्रंथांतच केवळ संचित झालेलीं असतात असें नव्हे, तर एकेकट्या शब्दांतसुद्धां हरएक प्रकारचें अमूल्य ज्ञान, अपूर्व अनुभव, चमत्कारिक ऐतिहासिक माहिती, मनोविकारांच्या नैसर्गिक व्यापारांची प्रतिबिंबे वगैरे अनेक गोष्टी प्रादुर्भूत होतात. शब्दांच्या अभ्यासापासून मोठा लाभ आहे. जें ज्ञान प्राप्त होण्यास अनेक ग्रंथांचें परिशीलन करावयास पाहिजे तें ज्ञान कधीं कधीं एकएकट्या शब्दांत दृष्टोत्पत्तीस येतें. एखाद्या अजबखान्याचें दार आपल्या डोळ्यांपुढें एकदम उघडलें असतां ज्याप्रमाणें हरएक प्रकारच्या चीजा दृग्गोचर होऊन आपणांस सानंदाश्चर्य वाटतें, त्याप्रमाणें शब्दमय अजबखान्याचें कवाड कुशळ भाषावेत्त्यानें उघडलें असतां अननुभूत अशा आनंदाश्चर्यादि भावनांच्या लाटांनीं आपलें अंत:करण जणूं काय उचंबळूं लागतें. अजबखान्यांत ठेवलेल्या प्रत्येक चीजेंत कांहींना कांहींतरी विशेष असतोच, कीं ज्या विशेषामुळें ती चीज आपल्या निरीक्षणाचा विषय होण्यास योग्य होते. कांहीं चीजा एकाद्या देशाचें किंवा एकाद्या प्रसिद्ध पुरुषाचें किंवा एखाद्या कुशळ कारागिराचें स्मरण करून देतात ; कांहीं चीजा कारागिराच्या अपूर्व कसबाची किंवा दीर्घ प्रयत्नाची साक्ष देतात; कांहीं चीजा देशविशेषांची उन्नति दाखवितात; कांहीं चीजा इतिहासांतील लक्ष्यांत धरण्यास योग्य किंवा चमत्कारिक अशा प्रस्तावांनीं अंतःकरणास प्रसन्न करतात. भाषा हा एक प्रकारचा अजबखानाच आहे. त्यांतील पाहावयाच्या चीजा म्हणजे शब्द. ह्या शब्दांचें जर आपण योग्य दिशेनें व लक्ष्यपूर्वक मनन केलें तर आपणांस असें आढळेल कीं प्रत्येक शब्दामध्यें कांहीं तरी विशेष असतोच, व त्या विशेषामुळें तो शब्द अल्प प्रमाणानें तरी आपल्या ज्ञानवृद्धीचें एक साधन होऊन जातो. अजबखान्यांत ठेविलेल्या चीजा, चर्मचक्षुस प्रसन्न करितात, त्याप्रमाणें भाषाभांडारांतील शब्दरूपी चीजा आपल्या मनश्चक्षूूस प्रसन्न करितात. पुढील निबंधांत आम्ही मराठी शब्दांचा वर निर्दिष्ट केलेल्या पद्धतीवर अभ्यास केल्यापासून आपणांस काय काय चमत्कारिक, उपयोगी व लक्ष्यांत बाळगण्याजोगी माहिती मिळण्याजोगी आहे याचें कांहीं उदाहरणांनी स्पष्टीकरण करणार आहों. आम्ही पुढें जें विवरण करणार आहों तें म्हणजे सर्वांगांनीं संपूर्ण होईल असें नाहीं, व तें संपूर्ण करण्याचा आमचा संकल्पही नाहीं. कांकीं हें विवरण सर्वांगांनीं संपूर्ण करणें हें आमच्या सारख्या शब्दमीमांसेच्या महत्त्वाची प्रथमच चर्चा करणाऱ्या ग्रंथकारास शक्य नाहीं. आतां जरी आमचें विवरण प्रत्येक शब्दामध्यें अंतर्भूत असलेलें संपूर्ण ज्ञान परिस्फुट करणार नाहीं, तरी त्यावरून वाचकांस शब्दांच्या अभ्यासाचे महत्त्व अंशतः तरी कळून येईल यांत संशय नाहीं. जे शब्द आपण नेहेमीं उच्चारतों, जे शब्द आपण घरीदारी, बाजारांत, दुकानांत, प्रेमाच्या किंवा रागाच्या भाषणांत, किंवा हरएक प्रकारचे रोजचे व्यवहार करतांना योजतों, जे शब्द आपण केवळ विचार प्रकट करण्याची साधनें म्हणून समजतों, ते शब्दसुद्धां जिज्ञासूंची जिज्ञासा तृप्त करून त्यांच्या मनास आनंदित करण्यास समर्थ असतात असें वाचकांस आढळून येईल.
 आपली मराठी भाषा अनेक भाषांच्या शब्दसंग्रहानें समृद्ध आहे. मेणाप्रमाणें वाटेल त्या तऱ्हेनें वळवितां येणारी, मनोगत विचार ओतावयास तऱ्हेतऱ्हेच्या अनंत ठशांनीं समृद्ध असलेली व अत्यंत प्रगल्भ जी जगद्वंद्य संस्कृत भाषा तिची मराठी भाषा ही एक भाग्यशाली कन्या आहे. संस्कृतीच्या इतर कन्यकांपेक्षां ( म्हणजे गुजराथी, बंगाली व हिंदी ह्या भाषांपेक्षां ) मराठीमध्यें मातेची शक्ति व सामर्थ्य, शुचिता व सरळपणा, साधनें व साधनें घडविण्याची ताकत, सौंदर्य व गांभीर्य इत्यादि गुण अधिक प्रमाणाने असून तिच्या ठायीं मातेचे प्रतिबिंब बऱ्याच साकल्यानें उमटलेलें आहे, आणि तिला फारशी व अरबी इत्यादि भाषांची उत्कृष्ट पुष्टि मिळून ती आजमितीस बऱ्याच समृद्ध दशेस येऊन पोहोचली आहे.

 अशा ह्या मराठी भाषेच्या शब्दांचा अभ्यास करणे म्हणजे शब्दांची व्युत्पत्ति शोधून काढणे, नवीन शब्द कोणच्या द्वारांनी व कोणच्या प्रसंगी प्रथम प्रचारांत आले, व ते ते शब्द आपण भाषेमध्ये कोण कोणच्या कारणांनी अंतर्भूत करून घेतले, शब्दांचे अर्थ बदलण्याची कारणे काय काय झालीं वगैरे गोष्टी सप्रमाण ठरविणें हें मेहनतीचे व दीर्घोद्योगाचे काम आहे. परंतु सृष्टीचा असा नियम आहे की, ज्या मानाने मेहनत व दीर्घोद्योग ह्यांचे कोणत्याही कामामध्ये अवलंबन करावें त्या मानानेच फलनिष्पत्ति आनंददायक असते. मराठी शब्दांचा अभ्यास आमच्या वाचकांपैकी जे कोणी करण्यास प्रवृत्त होतील त्यांस त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे लाभ व मनोरंजन हीं प्राप्त होतील. शिवाय त्यांस प्रसंगविशेषीं असेही आढळेल कीं, सबंध काव्याच्या वाचनापासून होणारें मनोरंजन एका एका शब्दानें होते; सबंध इतिहासग्रंथापासून मनावर पडणारा प्रकाश एका एका शब्दापासून पडतो, मानसशास्त्रावरील एकाद्या समग्र ग्रंथापासून मानसिक विकारांचे प्रतीतीस येणारे सापेक्ष प्राबल्य हे एका एका शब्दाने प्रतीतीस येते. असा जर शब्दांच्या अभ्यासाचा महिमा आहे, तर हा अभ्यास करू इच्छिणाऱ्या मनुष्यास निरुत्साह होण्याचे कांहीं कारण नाहीं, हें उघड आहे.

 भाषेतील शब्दांस आम्ही आस्थिनांची उपमा देतों. हजारों वर्षांमागे जे प्राणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर संचार करीत असत, किंवा ज्या वनस्पति पृथ्वीच्या पृष्ठभागास शोभायमान करीत 
     उपोद्घात.     
असत, त्यांचे सांगाडे दगडांच्या गर्भामध्ये सांपडल्यामुळे त्यांच्यावर काळाचा विध्वंसक परिणाम न होतां आज मितीस उपलब्ध होतात त्या सांगाड्यांस आस्थिनें म्हणतात. हीं आस्थिनें त्या त्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या आकारांविषयीं, आकृतींविषयीं वगैरे जिज्ञासु व शोधक पंडितांस माहिती देतात, व हजारों वर्षांमागील भूतलाचा नकाशाच जणू काय त्याच्या विस्मित व आनंदित अशा अंतश्चक्षुपुढे पसरतात. आस्थिनांचे हे महत्त्व मनांत आणून आधुनिक पंडितांनी त्यांचेवर मोठमोठाले ग्रंथ रचले आहेत. सृष्टिशास्त्रज्ञास ज्याप्रमाणे हीं आस्थिनें त्याचप्रमाणे भाषाशास्त्रज्ञांस शब्द, होत. ह्या शब्दांपासून अन्यथादुर्मिळ अशी नानाविध माहिती समजते. जे लोक पंचत्वाप्रत पावून त्यांचे नांवगांवसुद्धां आजमितीस कोणास ठाऊक नाहीं, त्या लोकांचे आचार आणि विचार, कल्पना आणि हृद्गत, ईप्सित आणि आकांक्षित वगैरे हरएक गोष्टी त्यांच्या भाषेमधील शब्दांत दृग्गोचर होतात. त्या लोकांचे कवित्व त्यांच्या काव्यांतच आढळते असे नव्हे, तर ते एकएकट्या शब्दांतसुद्धा आढळते. त्यांचा इतिहास त्यांच्या बखरींतून आढळतो तसा तो एकएकट्या शब्दांतसुद्धा आढळतें. त्यांची नीतीही त्यांच्या धर्मग्रंथांत आढळते तशी ती शब्दांतसुद्धा आढळते. भाषेतील शब्दांच्या महत्त्वाविषयी व्हिट्नी ह्या नांवाच्या एका प्रसिद्ध अमेरिकन ग्रंथकाराने म्हटले आहे:-  But language is also pregnant with information respecting races which lies quite beyond the reach of physical science: it bears within itself plain evidences of mental and moral character and capa
     मराठी शब्दांचे उद्घाटन.

city, of degree of culture attained, of the history of knowledge, philosophy and religious opinion, of intercourse among peoples, and even of the physical circumstances by which those who speak it have been surrounded. It is, in brief, a volume of the most varied historical information to those who know how to read it, and to derive the lessons it teaches.

  "Whitney's Language and Study of Language.”

 शब्दांच्या अभ्यासापासून अमूल्य ज्ञान प्राप्त होते ह्या आमच्या विधानाच्या समर्थनार्थ प्रत्येक जातीची एक एक दोन दोन उदाहरणे आम्ही देणार आहों; परंतु आधी आम्ही कोणच्या पद्धतीवर ह्या विषयाची परिस्फुटता करणार आहों हें वाचकांस कळले असतां सोईवार होईल असे जाणून प्रथम तसे करतों.

 आमच्या विषयाचे आम्ही तीन भाग करणार आहों. १. ज्या शब्दांमध्ये कवित्व दृष्टीस पडते अशा शब्दांचा उहापोह एका भागांत करू. २. ज्या शब्दांपासून मनुष्याच्या नीतीची उन्नति किंवा अवनति दृष्टीस पडते, किंवा मनुष्यास उत्कर्ष अथवा अपकर्ष प्राप्त झाला असतां तो ज्या शब्दांत प्रतिबिंबित होतो, अशा शब्दांचा उहापोह एका भागांत करू. व ३. ज्या शब्दांपासून प्राचीन इतिहास अवगत होतो अशा शब्दांचा उहापोह एका भागांत करूं. कवित्वगर्भ, नीतिगर्भ व वृत्तगर्भ हे शब्दांचे तीन विभाग न्यायशास्त्रदृष्टया यथोचित व विशिष्ट प्रदेशास व्यापणारे आहेत असे आम्ही म्हणू शकत नाहीं. एका वर्गात जो शब्द आम्ही घालूं तो दुसऱ्या वर्गातहीं जाऊ शकल. म्हणजे जो शब्द आम्ही कवित्वगर्भ ह्या वर्गात घालू त्याच्यापासून ऐतिहासिक माहितीसुद्धां जर मिळण्या
     उपोद्घात.     

जोगी असली तर तो शब्द वृत्तगर्भ शब्दांच्या वर्गामध्येही समाविष्ट करण्याजोगा असेल; परंतु आम्ही जे तीन वर्ग केले आहेत ते न्यायशास्त्रदृष्ट्या परस्परांपासून अत्यंत भिन्न नसल्याकारणाने तसे होण्याचा संभव आहे हे उघड आहे.

 एथें दुसरे असे एक सांगणे इष्ट वाटते की, जगामध्ये कवित्व, नीति व इतिहास ह्यांशिवाय दुसरें कांहीं नाहीं, असे ज्या अर्थी नाहीं, त्या अर्थी शब्दांचे कवित्वगर्भ, नीतिगर्भ व वृत्तगर्भ इतके तीनच वर्ग करता येतील, अधिक येणार नाहीत, असें नाहीं. ह्या तीन वर्गाप्रमाणेच आचारगर्भ, विचारगर्भ वगैरे आणखी अनेक वर्ग बांधतां येतील, अशा वर्गाचा पूर्ण उहापोह करण्याची सामग्रीही आमच्याजवळ थोडी बहुत आहे व तिच्या आधारावर ग्रंथरचना केल्यास वाचकांस तीही मनोरंजक होईल असे आम्हास वाटते; परंतु भाषापरिज्ञानावर ह्या नमुन्याचा हा पहिलाच ग्रंथ असल्याकारणाने विषयाचे साकल्याने निरूपण करणे इष्ट नाही, असे आमचे मते आहे. एक तर ह्या विषयाची अभिरुची मराठी वाचकांस कितपत वाटेल ह्याची आम्हास कल्पना नाहीं, व ती अभिरुचि लोकांस नसल्यास आमचे श्रम व्यर्थ जातील. दुसरे कारण हें कीं, विद्वान् लोकांच्या दृष्टीने आमच्या विवेचनांत दोष काय काय आहेत हे अगोदर समजले असतां पुढे निर्दोष विवेचन करणे हे सोपे होईल. तिसरे असे की, ज्या सामग्रीच्या आधारावर ते विवेचन करावयाचे ती सामग्री कालगतीने वाढेल व निर्दोष होईल अशी आम्हास आशा आहे. ह्या व दुसऱ्या कांहीं कारणांसाठी आम्ही आमच्या सामग्रीचा कांहीं भाग मात्र प्रस्तुतच्या विवेचनास आधारभूत घेऊन कवित्वगर्भ, नीतिगर्भ व वृत्तगर्भ असे मुख्य तीन वर्ग करून प्रत्येकाच्या उहापोहास
     मराठी शब्दांचे उद्घाटन.

एक एक भाग देण्याचे योज़लें आहे. आतां एथे पुढे येणा-या विषयाच्या स्वरूपाचे थोडक्यांत दिद्गर्शन करण्यासाठी मासल्या करितां प्रत्येक वर्गाची एक दोन उहाहरणे देतों.

 पातकपंक हे शब्द कवित्वगर्भ आहेत. ज्या पुरुषाने पापाला पातक, पंक अशी नांवे दिली तो पुरुष कवीच्या दिव्यचक्षूने उपलक्षित होता, ह्याविषयी कोणास तरी शंका वाटेल काय? पातक ह्या शब्दामध्ये अनुभवाने मनाच्या प्रतीतीस येणारा अयोग्य कृत्याचा परिणाम चर्मचक्षुस प्रत्ययास येईल अशा रीतीने वर्णिलेला आहे, तो किती जोरदार व हृदयंगम आहे बरें ? अयोग्य कर्म करणारा मनुष्य क्रमाक्रमाने समाजाच्या प्रेमापासून कसा च्युत होत जातो, पुण्यकर्माने स्वर्गामध्ये प्राप्त होणाऱ्या अक्षय्य स्थानास तो कसा मुकतो व वर्गस्थिति तर राहू द्या, तो प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्या मनाच्या आदरापासून कसा भ्रष्ट होतो, हे ज्या पुरुषाने प्रथम पाहिलें–किंवा न जाणों अनुभविलें आणि त्यावरून वाईट कृत्यांस पातक असे नांव दिले, त्याच्या दिव्यचक्षूने किती विस्तृत, किती खोल अनुभव एका शब्दामध्ये गोंविला आहे बरें ? एथे बुद्धिगोचर पदार्थाचे चक्षुर्गोचर वस्तूंशीं तादात्म्य करून पापाचे स्वरूप किती जोराने रेखिलें आहे !

 त्याचप्रमाणे ज्या पुरुषाने पापास पङ्क (चिखल) असे नांव दिले त्याला कवीचा दिव्य चक्षु नव्हता असे कोण म्हणू शकेल? आपल्या आद्य कवीने बालकांडांत अकर्दम ह्या नांवाच्या तीर्थाचे असे गोड, वर्णन केले आहे:--

  अकर्दममिदं तीर्थंं भारद्वाज निशामय ।
  रमणीयं प्रसन्नं च सजनानां मनोयथा ॥

ह्या वर्णनांतील पाण्याची रमणीयता व प्रसन्नता आणि त्या तशा 
     उपोद्घात.     

पाण्याचे सज्जनाच्या मनाशीं सादृश्य हीं आद्य कवीच्या कवित्त्वाची साक्ष देतात. वाल्मीकीनें जें कवित्व ह्या स्थळी दर्शविलें तेच कवित्व ज्या पुरुषाने पापाचा पंक ह्या शब्दानें प्रथम निर्देश केला त्याणे दाखविलें नाहीं काय?

 मागे आम्ही म्हटलेच आहे की, मनुष्याच्या मनाची उन्नति अथवा अवनति, चांगल्या गोष्टींकडे किंवा वाईट गोष्टींकडे कल वगैरे हीं शब्दांचे ठायीं प्रतिबिंबित झालेली आढळतात. तसेच शब्द कधी कधी मूळच्या चांगल्या अर्थापासून भ्रष्ट होऊन वाईट अर्थ पावतात किंवा मूळचा वाईट अर्थ सोडून नंतर चांगला अर्थ दर्शवू लागतात; शब्दाची व्याप्ति चांगल्यावर व वाईटावर समान असतां चांगल्यावरच किंवा वाईटावरच ती नियंत्रित केली जाते; आणि कार्य व कारण ह्यांचे निकट संबंध व साततिक साहचर्य यांवरून कार्यवाचक शब्द कारणवाचक होतो किंवा कारणवाचक शब्द कार्यवाचक होतो. ह्या सर्व प्रकारांची प्रतीति देणारे शब्द भाषेमध्ये अनेक असतात व मराठी भाषेमध्ये तर ते शेंकडों आहेत.

 छांदिष्ट, आर्ष, लाघवी, व्रात्य, साला इत्यादि अनेक शब्दांचे सांप्रतचे रूढ झालेले अर्थ व त्यांची व्युत्पत्ति हीं मनांत आणली असतां वरील विधानाविषयीं वाचकांची खात्री होईल. व्रात्य हा शब्द आपण द्वाड ह्या अर्थाने योजतो. परंतु त्याचा अर्थ नेहमीं समुदायांत असणारा असा आहे. संस्कृत व्रात (समुदाय ) ह्या शब्दापासून तो उत्पन्न झालेला आहे. परंतु जीं मुले घरांत बसून न राहतां नेहमी रस्त्यामध्ये पोरांच्या समुदायांत जातात ती तशा कुसंगतीच्या योगाने खोडकर होणे व आईबापांच्या योग्य नीतिमत्तेचा कित्ता उचलण्याविषयी पराङ्मुख अशी होणे हे सृष्टीच्या नियमास अनुसरूनच आहे. 
१०     मराठी शब्दांचे उद्घाटन.
मग अशा मुलांच्या अंगांत हे नियमाने असणारे दुर्गुण सतत दृष्टीस पडल्यामुळे व्रात्य शब्द, जो पूर्वी समुदायांत कालक्षपे करणारा असा अर्थ दाखवीत असे, तो द्वाड असा अर्थ दाखवू लागला ह्यांत आश्चर्य काय आहे? छांदस ह्या शब्दांत पूर्वी निंदाव्यंजक असे कांही नव्हते. छंदस् ह्याचा पद्य किंवा वेद असा मूळचा अर्थ. संस्कृत भाषा ही एकदा प्रचलित म्हणजे बोलण्याची भाषा असल्याकारणाने प्रचलित भाषेच्या नियमांप्रमाणे तींमध्ये हरएक फेरफार कालगतीने होत गेले. सजीव शरीरांत जसे फेरफार होतात, म्हणजे क्षय आणि वृद्धि हे व्यापार सदोदित चाललेले असतात, शरीरांतील कांहीं द्रव्ये नाश पावून त्याच्या जागीं नवीं द्रव्ये येतात, किंवा जुनी द्रव्ये वेगळ्या उपयोगास लागतात, त्याचप्रमाणे प्रत्येक जिवंत भाषेमध्येही हे सर्व व्यापार एक सारखे चाललेले असतात. व ह्या नियमाप्रमाणे कांहीं शब्द व रूपें वगैरे ही संस्कृत भाषेतून नाहींशी झाली तेव्हां त्यांस छांदस म्हणजे “वेदांतील" असे पाणिन्यादि वैय्याकरणांनीं नांव दिले. देवासः ( देवाः ), कर्णेभिः (कर्णेः), परिधापयित्वा ( परिधाप्य ), इतरं ( इतरत् ), पंथाः (पथान:) ससुव ( सुषुवे ), वगैरेस त्यांनी छांदस असे नांव दिले. त्यावेळेस छांदस शब्दामध्ये निंदेचा अर्थ बिलकूल नव्हता. परंतु “लोकव्यवहाराच्या बाहेरचा" असा सामान्य अर्थ घेऊन लोकांनी छांदस शब्दाचा अर्थ तऱ्हेवाईक, चमत्कारिक, जनाची पर्वा न बाळगणारा, असा निंदाव्यंजक केला. भट ह्या शब्दाचा अर्थ मुंबई वगैरे ठिकाणी आचारी अथवा पाणक्या असा झाला आहे. भट ह्या शब्दाच्या अर्थविपर्यासाविषयीं वे. शा. सं. गोविंद शंकर शास्त्री बापट ह्यांच्या व्युत्पत्तिप्रदीपांतून एथें एक मार्मिक उतारा घेतो. 
     उपोद्घात.     ११

 "इंग्रजी राज्यांत आलीकडे विश्वविद्यालये (University) स्थापित होऊन एकाद्या विद्येत पारंगत होऊन त्यांत त्याची परीक्षा उतरली म्हणजे त्यास कलास्वामी ( M. A. म्ह० Master of Arts ) अशी पदवी मिळते. त्याप्रमाणे पूर्वी न्याय, मीमांसा, व्याकरण वगैरे विषयांत महापंडित होऊन जे सर्वमान्य, चिरस्थायी, अत्युत्तम असे ग्रंथ लिहीत, त्यांस भट्ट अशी पदवी मिळे. जसे गदाधर भट्ट, नागोजी भट्ट. अलीकडे बराच कालपर्यंत विद्या ब्राह्मणच करीत असल्यामुळे भट्ट अशी पदवी धारण करणारे ब्राह्मणच असत. हल्लीं जशी मोठ्या अधिकाऱ्यास रावसाहेब वगैरे पदवी मिळाली म्हणजे त्यांच्या मुलांस अंगीं कांहीं पराक्रम नसला तरी लोक रावसाहेब म्हणू लागतात ; किंवा एखादा यज्ञाची दीक्षा घेऊन दीक्षित झाला म्हणजे त्याच्या कुलांतील सर्वांस दीक्षित म्हणू लागतात ; त्याप्रमाणे ब्राह्मणांस थोडी बहुत विद्या असली म्हणजे भट्ट म्हणण्याची चाल पडली. पुढे उत्तरोत्तर ब्राह्मणांच्या विद्येचा हास होत चालला तरी भट्ट हा शब्द चालू राहिला; परंतु पुढे त्याचा एक टकार जाऊन तो जसा रूपाने हलका झाला तसा तो अर्थानेही हलका झाला. गुजराथेकडील ब्राह्मणांत विद्येचा अगदींच लोप होऊन ते पाणी भरण्याचे काम करू लागले त्या मुळे मुंबई वगैरे शहरांत भट म्हणजे पाणक्या ब्राह्मण इतक्या अर्थावर मजल येऊन पोंचली."

 वरील उताऱ्यांत शास्त्रीबोवांनीं गुजराथेतील ब्राह्मणांच्या विद्येचा लोप झाल्यामुळे मुंबईत भट ह्याचा अर्थ हलका झाला आहे, असे म्हटले आहे. दक्षिणी ब्राह्मणांमध्येही विद्येचा असाच लोप होऊन दारिद्यामुळे ब्राह्मणांस दुसऱ्याचे घरीं मोलाने पाणी भरणे, मोलाने स्वयंपाक करणे, वगैरे हलकीं 
१२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

कामें पतकरावी लागली. त्यामुळे अर्थातच ब्राह्मण हा मोठा अभिमानव्यंजक शब्द आचारी व पाणक्ये ह्यांचा वाचक झाला आहे. ब्राह्मण शब्दाचा असा अर्थ महाराष्ट्रांत प्रचारांत आहे. ब्राह्मण शब्दाचा एक उन्नत अर्थही झाला आहे हे पुढे दाखविण्यांत येईल.

 शब्दांच्या अर्थाच्या, अवनतीचे राग हा शब्द एक उत्कृष्ट उदाहरण आहे. राग ह्या शब्दाचा संकृतांत तांबडेपणा ( लालपणा ) असा मूळचा अर्थ आहे. पुढे त्यापासून प्रीति असा अर्थ झाला. कारण अंतःकरणांत प्रेमरसाची उकळी फुटली असतां चेहऱ्यावर गुलाबी रंगाची छटा मारते. आणि कार्यवाचक शब्दाची योजना सहजच कारणाबद्दल होऊं लागून राग हा शब्द प्रेमाचा वाचक झाला. परंतु मराठींत राग ह्याचा अर्थ क्रोध असा आहे, आणि हा अर्थ मूळच्या अर्थाहून अगदीं विपरीत असा आहे. हा अर्थ त्यास कसा प्राप्त झाला ? प्रेमभराने चेहऱ्यावर जशी लाली येते तशी क्रोधानेही येते. परंतु प्रेमाच्या लालीपेक्षां क्रोधाचीच लाली चेहऱ्यावर अधिक प्रसंगीं दृष्टोत्पतीस येते, व प्रेमापेक्षां क्रोधच प्रबलतर असतो. यावरून राग हा लालीचा वाचक शब्द असून क्रोधाचा वाचक झाला, व त्याचा संस्कृतांतील प्रेम हा लाक्षणिक अर्थ नष्ट झाला. ज्या लक्षणेने राग हा लालीचा वाचक शब्द असून संस्कृतांत प्रेमाचा वाचक झाला, त्याच लक्षणेनें तो मराठीत क्रोधाचा वाचक झाला. ही त्या शब्दाच्या अर्थाची अवनति प्रत्येक मनुष्याने लक्ष्यांत बाळगण्याजोगी आहे. आपल्या चांगल्या मनोविकारांपेक्षां दुष्ट मनोविकार जसे संख्येने अधिक आहेत, तसेच ते बळानेही अधिक आहेत. ह्याची राग
     उपोद्घात.     १३

हा शब्द एक चिरस्थायी खूण आहे, व आपण आपले दुष्ट मनोविकार आपल्या आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असले पाहिजे, असा उपदेशच जणों काय तो आपणास करितो.

 वर आम्ही म्हटले आहे की, शब्द हे आस्थिनरूप इतिहास आहेत. ह्याचे उदाहरण म्हणून एक शब्द देतों, आपण फिरंगी हा शब्द यूरोपी लोकांस किंवा विशेषतः पोर्चुगीज लोकांस लावतों. हा शब्द कोठून व किती लांबची मुशाफरी करून आपणाकडे आला आहे, व ही मुशाफरी करण्यास त्याला किती काळ लागला, ह्याची कल्पना कोणास तरी आहे काय ? हा शब्द आपणामध्ये आला आहे तो अर्धी पृथ्वी वलांडून आला आहे. वाटेने येतांना त्याने पुष्कळ ठिकाणी मुक्काम केले, व ही मुशाफरी करण्यास त्याला वर्षे सुमारे दोन हजार लागलीं हैं ऐकून कोणास आश्चर्य व विस्मय वाटणार नाहीं ? परंतु इतकेच नव्हे. हा शब्द आपण त्याच्या जन्मभूमीस नेऊन पोंचवीतोंपर्यंत आपणास शेंकडों वर्षांचा, कित्येक राष्ट्रांच्या परिवर्तनाचा, अनेक देशांचा, मोठ मोठ्या युद्धांचा, अनेक क्रूर व अमानुष कृत्यांचा व अनेक साहसी पुरुपांचा इतिहास विदित होऊन आपलें अंतःकरण विस्मयाने व आश्चर्याने थक्क होऊन जाते.

 पूर्वी म्हणजे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकांत जर्मनीमध्ये एक जनसमूह असे. तो आपणास फ्रांक लोक असे म्हणवीत असे. फ्रांक ह्याचा अर्थ स्वतंत्र. हे लोक स्वतंत्रताप्रिय असून शिवाय स्वतंत्रही होते. इसवी सनाच्या पाचव्या शतकांत रोमच्या बादशाही अमलाचा ऱ्हास होऊन त्या राज्याची शकलें झाली तेव्हां गाल देशाने रोमन लोकांचे स्वामित्व झुगारून दिले. परंतु ही संधि साधून वर सांगितलेल्या फ्रांक लोकांनी 
१४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

गालदेशावर धाड घातली, व तो देश काबीज करून घेतला. त्यांनी मूळच्या रहिवाशांची पायमल्ली करून किंवा त्यांस आपल्या समाजांत सामील करून घेऊन, त्या देशांत आपली सत्ता स्थापित केली. ह्या नवीन संपादिलेल्या देशांत त्यांचे इतकें प्राबल्य वाढलें कीं, त्या देशाचे मूळचे गाल हें नांव रद्द होऊन त्यास फ्रान्स हें नांव आलें. ते नांव त्या देशास आज १५०० वर्षे चालत आहे. -

 गाल देशांत आलेले हे फ्रांक लोक गालच्या मूळच्या रहिवाशांपेक्षां व सभोवतालच्या राष्ट्रांतील लोकांपेक्षा अधिक स्वतंत्रताप्रिय, अधिक सत्याभिमानी व अधिक निस्पृह होते. हा त्यांचा सत्गुण शेजारच्या लोकांच्या अवगुणाच्या विरोधाने स्पष्टतर दृग्गोचर होत असे, तेव्हां अर्थातच साततिक साहचर्याच्या कारणाने फ्रांक हा शब्द मनाचा मोठेपणा, सरळपणा ह्या गुणांचा वाचक झाला. पुढे ह्या नव्या अर्थाने उपलक्षित असा हा शब्द नार्मन लोकांसहवर्तमान इ० स० १०६६ मध्ये इंग्लंडांत गेला. तो आजमितीसही मनाचा थोरपणा व सरळपणा ह्या अर्थाने इंग्रजी भाषेत योजला जातो. ह्याप्रमाणे हा शब्द जर्मनींतून फ्रान्सांत, व फ्रान्सांतून इग्लंडांत गेला, परंतु त्याची हिंदुस्थानाप्रत कोणच्या वाटेने कशी मुशाफरी झाली हे पाहावयाचे अद्यापि राहिले आहे. अकराव्या शतकांत यूरोपखंडामध्ये खिस्ती धर्माच्या अनुयायांत एक धर्मवेडाची प्रबल लाट आली, तिने ते सारें खंड हालवून सोडिलें, व प्रत्येक किरिस्तांवास परधर्मी लोकांचा ( विशेषेकरून महंमदी धर्माच्या अनुयायांचा ) संहार करणे हे श्रेयस्कर काम आहे असे वाटू लागले, तेव्हां मुसलमानी लोकांचा संहार करण्यासाठी सारे युरोपी किरिस्ताव लोक इ० स० १०९८ मध्ये पालेस्टाईन येथे येऊन 
     उपोद्घात.     १५
दाखल झाले. पुढे काय काय झाले याचा तपशील न देतां आम्ही थोडक्यांत इतकेच सांगतों कीं, मुसलमानांचा संहार करण्याचा हा क्रम धर्मवेडाची लाट कमी किंवा ज्यास्ती प्रबल होई त्या मानाने २०० वर्षे पुढे चालत राहिला. ह्या कृत्यामध्ये फ्रेंच लोकांनी आपल्या संख्येने, दृढनिश्चयाने आणि महत्त्वानें बाकीच्या युरोपी राष्ट्रांस मागें सारले, ते इतकें कीं, मुसलमानी लोक फ्रांक याच नांवाने सर्व धर्मयोद्धयांचा निर्देश करू लागले. अशा रीतीने फ्रांक हा शब्द जो प्रथम जर्मनीतील एका जनसमूहाचा वाचक होता, व जो पुढे सर्व फ्रान्सांतील लोकांचा वाचक झाला, तोच मुसलमानी भाषेमध्ये सर्व युरोपी लोकांचा वाचक झाला, पुढे पालेस्टाईन मधून तो शब्द अरबस्तानांत उतरला व व्यापारी अरबांसहवर्तमान हिंदुस्तानांत आला. इ०स० १५०० मध्ये पोर्चुगीज लोकांचे हिंदूस किरिस्ताव करण्याचे मिशन जेव्हां मलबारच्या किनाऱ्यावर येऊन थडकलें तेव्हां अरब लोकांस पोर्चुगीज लोक पूर्वी माहित होतेच व ते त्यांस अर्थातच फिरंगी लोक असे म्हणू लागले. कारण त्यांच्या भाषेत फिरंगी ह्या शब्दाने सर्व यूरोपी लोक असा बोध होत असे. परंतु आपणास युरोपी लोक ठाऊक नसल्यामुळे जे यूरोपी लोक पहिल्यानेच आपल्या दृष्टीस पडले त्यांचा वाचक फिरंगी हा शब्द झाला, व त्यांच्या मागून, डच, फ्रेंच व इंग्रज वगैरे यूरोपी लोक आले, त्यांसही फिरंगी हा शब्द आपण लावू लागलों. पण सर्वांसच फिरंगी म्हणण्यापासून घोंटाळा होऊन तो शब्द हल्ली ( निदान कोंकणपट्टीत तरी) चिरपरिचित अशा पोर्तुगीज लोकांस मात्र लावण्यांत येऊ लागला. घाटावर जुने लोक सर्व यूरोपी लोकांस फिरंगी म्हणतात, परंतु तेथेही हा प्रचार हल्लीं कमी होत चालला आहे.
१६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

कर्नाटकांत हा शब्द सर्व यूरोपी लोकांस व देशी किरिस्तवांस लावतात. याप्रमाणे फिरंगी ह्या शब्दाचे मूळ शोधतांना आपणास किती तरी ऐतिहासिक माहिती मिळते !

 वरील दिग्दर्शनावरून वाचकांची खात्री होईल की, ज्या विषयामध्ये आतां आपण प्रवेश करणार आहों तो कंटाळवाणा किंवा रूक्ष नाहीं. कारण ज्ञान आणि विशेषेकरून नवीन ज्ञान हे नेहमीं मनोरम असून ज्ञानप्राप्तीकडे प्रत्येक मनुष्याची थोडी तरी प्रवणता असतेच. ह्या प्रवणतेस जर योग्य दिशा मिळाली तर ज्ञानप्राप्तीचे काम मोठे सुलभ व मनोरम होते. आता आम्ही जे ज्ञानभांडार उद्धाटणार आहों ते जर वाचकांस कदाचित मनोरंजक न वाटले तर आमचेकडून उद्घाटनाचे काम योग्य रीतीने झाले नाही, असे त्यांनी समजावें ; विषयच नीरस किंवा रूक्ष आहे असे समजू नये.




प्रकरण पहिले.
----------
कवित्वगर्भ शब्द.

 आम्ही उपोद्घातांत म्हटले होते की, भाषेच्या शब्दांमध्ये कवित्व, नीति आणि वृत्त ही दृष्टीस पडतात. ह्या प्रकरणामध्ये शब्दगत कवित्वाचे अधिक खुलासेवार निरूपण करावयाचे आम्ही योजले आहे. कवित्व म्हणजे काय हे वाचकांस सांगितले पाहिजे. सामान्य जनांचा असा समज असतो की, गणमात्रादिकांच्या कांहीं विशिष्ट अनुक्रमाने व यमकांदिकांनी उपलक्षित अशी जी शब्दांची रचना तेच काव्य होय. परंतु ही छंदोबद्ध रचना काव्यास आवश्यक नाहीं. स्त्रीच्या स्त्रीत्वास जशी नथेची आवश्यकता नाहीं तशी काव्याच्या काव्यत्वास छंदोबद्ध रचनेची आवश्यकता नाहीं. काव्याचे काव्यत्व शब्दादिकांच्या कांहीं विशिष्ट रचनेवर अवलंबून नसते. ते अंतर्गत विचारांच्या चारुतेवर अवलंबून असते. प्रत्येक देशाच्या विद्वानांचे हेच मत आहे. ते छंदोबद्ध रचनेस महत्त्व देत नाहींत. ही रचना काव्याचे बाह्य स्वरूप अधिक मनोहर करते इतकेंच. आपल्या प्राचीन साहित्यशास्त्रकारांनी काव्याच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, परंतु एकाही साहित्यशास्त्रकाराने छंदोबद्ध रचना ही काव्याचा एक आवश्यक गुण आहे, म्हणजे ह्या प्रकारच्या रचनेवांचून काव्यास काव्यत्व प्राप्त व्हावयाचें नाहीं, असे म्हटलेले नाहीं. ह्याचे साहित्यशास्त्रकारांचे काव्याच्या लक्षणाचे स्वरूप मनांत आणून आम्ही कवित्वगर्भ ह्या शब्दांतील कवित्व हा शब्द योजला आहे.

 मनोहर सादृश्याच्या किंवा मनोहर आरोपाच्या किंवा मनोविकार क्षुब्ध झाले असतां सहज होणाऱ्या अतिशयोक्तीच्या 
१८     मराठी शब्दांचे उद्घाटन.
पायावर उभारलेली जी कल्पना तिला आम्ही काव्य असे म्हणतों. मग ही कल्पना वाक्यात्मक असो किंवा एक शब्दात्मक असो. ती कल्पना एका शब्दामध्येच असली तर तो शब्दसुद्धा काव्य हे अभिधान पावू शकतो. आम्ही कल्पनेला मनोहर सादृश्याचा किंवा मनोहर आरोपाचा किंवा मनोहर आतिशयोक्तीचा पाया पाहिजे असे वर म्हटले आहे, त्यांत मनोहर हा शब्द महत्त्वाचा आहे. सादृश्य जर साधे असले किंवा आरोप जर साधा असला, किंवा अतिशयोक्तिं साधी अथवा नीरस असली तर तेथे काव्य ह्या शब्दाची योजना करतां यावयाची नाहीं. 'पाकोळीचे तोंड माणसाच्या तोंडाप्रमाणे असते ' ह्या वाक्यांत पाकोळीचे तोंड व माणसाचे तोंड ह्या दोहोंमध्ये सादृश्य वर्णिलेले आहे. परंतु ह्या सादृश्यामध्ये मनोहरपणाचा अभाव असल्याकारणाने त्यास काव्य म्हणता यावयाचे नाहीं. निर्जीव वस्तूवर सजीवत्वाचा आरोप किंवा सजीव वस्तूवर निर्जीवित्वाचा आरोप जर मनोहर रीतीने केलेला असेल तर तो आरोप काव्य ह्या अभिधानास पात्र होऊ शकेल. ह्यावरून वाचकांस कळन येईल की, काव्याची निष्पत्ति होण्यास अनेक शब्दांची आवश्यकता आहे असें नाहीं. एकाएका शब्दानेसुद्धा काव्याची निष्पत्ति होऊ शकेल, आणि काव्य करणाऱ्या कवीच्या कवित्वाचा प्रादुर्भाव एका एका शब्दांतसुद्धा होऊ शकेल. सूर्याचे प्रतिबिंब विस्तीर्ण महासागरावर साकल्याने पडलेले जसे दृग्गोचर होते, तसे ते एका लहानशा जलबिंदूवरही पडलेले दृष्टीस पडते. त्याप्रमाणेच मोठमोठ्या ग्रंथांत कवींचे कवित्व जसे प्रतिबिंबित झालेले असते, तसेच ते एकएकट्या शब्दांतसुद्धां प्रतिबिंबित झालेले असते. परंतु मुक्तेश्वर, मोरोपंत इत्यादिकांच्या कृतींमधील कवित्वानें आपलें अंतःकरण जसें
     प्रकरण पहिलें.     १९
प्रसन्न होते तसे शब्दगत कवित्वानें कां होत नाहीं ? भाषेमध्ये कवित्वगर्भ शब्द पुष्कळ असतात, व प्रत्येक कवित्वगर्भ शब्दांत कमी जास्ती प्रमाणाने किंवा कमी जास्ती मनोहर प्रमाणानें कवित्व संचित झालेले असते, तथापि ह्या कवित्वगर्भ शब्दांतील कवित्वाचा आस्वाद आपणास कां प्राप्त होत नाहीं? ह्या आस्वादाचे स्वारस्य आपणास प्राप्त न होण्याची दोन कारणे आहेत. एक तर ह्या शब्दगत कवित्वाचे अस्तित्वच आपणास अवगत नसते. तें कवित्व कोणी तरी उकलून बाहेर काढून त्याची प्रतीति नजरेस आणून दिल्याखेरीज ते आपणास समजेल असे नसते. आणि दुसरे कारण असे की, ते कवित्वगर्भ शब्द आपल्या नेहमीच्या परिपाठांतले असल्याकारणाने चिरपरिचितत्वाचा परिणाम त्यांच्यावर घडून येतो. उघडच आहे की, एकादी वस्तु कितीही सुंदर असली तरी ती नेहमीं आपल्या डोळ्यापुढे असल्याकारणाने तिच्याविषयींचा आदर आपल्या मनांतून नाहीसा होतो, किंवा निदान कमी तरी होतो, आणि त्या सुंदर वस्तूच्या प्राथमिक अवलोकनाने होणाऱ्या आनंदाचा तीव्रपणा व मोहकपणा हीं कालांतराने नष्ट होतात, किंवा कमी होतात. शब्दगत कवित्वाकडे आपले लक्ष्य गेलेले नसले, किंवा त्याचे विषयींचा आदर आपल्या मनांतून नष्ट झालेला असला, तरी त्या शब्दांत कवित्व नाहीं, किंवा कवित्व नष्ट झाले, असे म्हणतां यावयाचें नाहीं. परंतु उलट पक्षी असेही म्हणण्यास काही हरकत नाहीं कीं, खरी सहृदयता ज्यास आहे त्यास अशा कवित्वगर्भ शब्दांपासून अधिक अधिकच आनंद होत जातो. एका कवीने म्हटले आहेः--

  प्रतिक्षणं यन्नवतामुपैति

  तदेव रूपं रमणीयतायाः ॥
२०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

शब्दांतर्गत जें रमणीय कवित्व तेही सहृदय पुरुषाच्या मनश्चक्षुस प्रतिक्षणी नवीन नवीन असे वाटते. याप्रमाणे काव्य व कवित्व ह्यांच्या स्वरूपाचा निर्देश करून आम्ही कवित्वगर्भ शब्दांतील कवित्वाच्या उद्घाटनाकडे वळतों.

 १. वाचणे.-वाचणे हा शब्द आपण दिवसांतून शेकडों वेळां उच्चारतों. परंतु त्या शब्दांतील कवित्वाची कल्पना फार थोड्यांसच असेल. संस्कृत भाषेमध्ये वच् ह्या धातूचा अर्थ बोलणे असा आहे. त्यापासून वाचय् असे प्रयोजक रूप होऊन त्याचा अर्थ बोलविणे, वदविणे, बोलावयास लावणे असा होतो. वाचय् या संस्कृत धातूचा अपभ्रंश मराठीत वाच असा झाला आहे. अक्षरांच्या योगाने आपल्या मनांतील विचार प्रकट करण्याची उपयुक्त व विलक्षण कल्पना जेव्हां आपल्या पूर्वजांस माहीत झाली, तेव्हां त्यांना जें आश्चर्य व आनंद ही वाटलीं तीं या शब्दांत स्पष्ट दिसत आहेत. झाडाच्या सालीसारखा एखादा निर्जीव पदार्थ, मनुष्यांच्या मनांतील विचार मुखाने स्पष्ट बोलून दाखविल्याप्रमाणे प्रकट करतो असे पाहून त्या निर्जीव पदार्थावर सजीवत्वाचा आरोप करून त्याचे ठायीं बोलण्याचे सामर्थ्य आहे अशी कल्पना लोकांनी करणे हे अत्यंत साहजिकच आहे. ही कल्पना किती मनोरम आहे बरें ? आपण आपल्या मित्राचे पत्र वाचतों तेव्हां काय करतो? आपल्या मित्राच्या मनांतील भाव कागदास बोलून दाखवायास लावतों. आणि ही कामगिरी कागद किती चोखपणाने व इमानाने बजावतो हेही आपणास ठाऊकच आहे. प्रत्यक्ष मनुष्य तोंडाने शब्द उच्चारून जे विचार बोलून दाखवितो तेच विचार तंतोतंत रीतीनें निर्जीव कागद प्रकट करतो. मुंडक्यास जादूगार लोक बोलवितांना 
     प्रकरण पहिलें.     २१
पाहून आपणास जसे आश्चर्य व कौतुक वाटते, त्याप्रमाणेच आपल्या पूर्वजांस लेखनकलेच्या उत्पत्तिसमयीं पत्रांदिकांची विचार प्रकट करण्याची अद्भुत शक्ति पाहून आश्चर्य व कौतुक वाटली असावी. दक्षिण महासागरांतील एका बेटांत राहणाऱ्या एका मनुष्यास विल्यम्स् ह्या नांवाच्या पाद्र्याने जो लांकडाचा ढलपा दिला त्याने त्याच्या बायकोस " गुण्या पाठवून द्यावा" हा मजकूर कळविला हे पाहून त्या आश्चर्यचकित रानटी मनुष्याचा उद्गार निघाला, “ काय ! ढलपे देखील बोलते करतां येतात काय ?" अशा प्रकारचे आश्चर्य आपल्या पूर्वजांस वाटून त्यांनी वाचय् असे नांव ह्या वाचण्याच्या क्रियेस दिले. आनंद व आश्चर्य ह्या मनोविकारांनी हृदयास उचंबळा आणून निर्जीव पदार्थाचे ठायीं सजीवत्वाचा साहजिक रीत्या आरोप करविणारी जी शक्ति तेच कवित्व होय असे जर आपण कबूल करतो, तर वाचंय् हा शब्द ज्या पुरुषाने प्रथम योजला त्याचे ठायीं कवित्व नव्हते असे आपणास म्हणवेले काय? त्याणे एका लहानशा शब्दामध्ये केवढे कवित्व दाखविले आहे?  २. भांगाचे पाणी.-- कोंकणामध्ये अष्टमीच्या भरतीस भांगाचे पाणी असे म्हणतात. समुद्रास भरती ओहोटी होतात त्या चंद्रसूर्याच्या आकर्षणामुळे होतात, हें ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्यांस ठाऊक आहे. पौर्णिमेस व अमावास्येस जी भरती येते ती नेहमीपेक्षा मोठी असते. कारण चंद्र व सूर्य ह्या दोघांच्याही आकर्षणशक्तीचा परिणाम पाण्यावर एकाच रेषेत घडत असतो. परंतु अष्टमीच्या दिवशी चंद्र व सूर्य ह्यांच्या आकर्षणरेषा एकमेकींवर लंब असल्यामुळे चंद्राच्या आकर्षणाचा जोर सूर्य कमी करतो व सूर्याच्या आकर्षणाचा जोर चंद्र कमी 
२२     मराठी शब्दांचे उद्घाटन.
क़रतो, ह्यामुळे पाणी अगदीं खोल जाते व लाटांचा जोरही कमी होतो. अशा पाण्यास भांगाचे पाणी म्हणतात, आणि हा शब्द यथायोग्य आहे. स्त्री आपले विखुरलेले केश फणीने विंचरून कांहीं उजवीकडे व कांहीं डावीकडे असे साफसुफी करून बसविते आणि ते केश उडेनातसे करिते, व मधोमध भांग राखते. त्याप्रमाणे अष्टमीचे दिवशीं समुद्राच्या पाण्याचा कांहीं भाग एकीकडे व कांहीं भाग दुसरीकडे केला जाऊन सर्व पृष्टभाग शांत होतो. ह्या पाण्याच्या स्थितीस भांगाची उपमा किती अनुरूप आहे ! ही उपमा ज्याने प्रथम दिली तो कवि होता हें स्पष्ट आहे. कारण वसुंधरेचेठायीं स्त्रीत्वाचा आरोप करणे, तिचे वरील कृष्णवर्ण जलाच्या लाटांस केशांची उपमा देणे, तिचे केश विंचरण्यास अर्द्धवर्तुलाकृति चंद्र हीच प्रसाधनपटु फणी अशी कल्पना करणे, त्या फणीनें कांहीं जलौघ एकीकडे व कांहीं दुसरीकडे केला जात आहे असे कल्पिणे, आणि अशा रीतीनें भूमिरूप स्त्रीच्या मस्तकावरील वाऱ्याने विखुरलेले वीचिरूप केश चापून चोपून साफ केले जात आहेत अशी सृष्टिशास्त्रास अविरुद्ध अशी कल्पना करणे, हे बुद्धीचे कांहीं लहान सहान व्यापार आहेत काय? ह्या भव्य व प्रचंड कल्पना ज्याणे भांगाचे पाणी ह्या शब्दांत गोवून ठेवल्या त्याच्या बुद्धीचे सामर्थ्य व विशाळता ही केवढी असली पाहिजेत ? समग्र पृथ्वीचा विस्तार, तिच्या पृष्ठभागावरील विस्तीर्ण जलसंचय, त्या जलसंचयावर सूर्य आणि चंद्र ह्या दोन तेजस्वी गोलांचा परिणाम ही ज्या पुरुषाने आपल्या विशाळ व समर्थ बुद्धीने ग्रहण केलीं, व ज्याने भूमीवर स्त्रीत्वाचा, जळावर केशांचा, अर्धवर्तुळाकृति चंद्रावर फणीचा, आणि दोन बाजूंस होणाऱ्या जलौघांवर कानशिलांचा आरोप केला, त्या पुरुषाच्या बुद्धीचा पोंच 
     प्रकरण पहिलें.     २३
आणि कवित्वाचे गांभिर्य ही केवढी असावी ? या पुरुषाचेठायीं कवित्व नव्हते असे कोण म्हणेल?

 एखाद्या लाक्षणिक शब्दाचा पूर्ण अर्थ जाणावयाचा असल्यास, आपण त्याच्या मूळच्या अर्थाचे नीट मनन करून त्या अर्थाचा नकाशा आपल्या चर्मचक्षुने किंवा अंतश्चक्षूने पाहण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे त्या शब्दाचा जोरदार अर्थ आपल्या मनावर चांगला ठसतो. शब्दांच्या उत्पत्तीचा चांगला अभ्यास करून प्रत्येक शब्दास हल्लीचा अर्थ कसा प्राप्त झाला हे आपण लक्षपूर्वक पाहूं लागलों, तर शब्द व त्यांचे अर्थ हे आपल्या मनांत चांगले ठसतील; आणि तेणेकरून अनमानधबक्याने, अनिश्चितपणाने व अस्पष्ट रीतीने शब्दांचा अर्थ करण्याची वाईट चाल नाहीशी होईल. तसेच त्यापासून भाषणांत व लिहिण्यांत योग्य प्रसंगी योग्य शब्द घालण्याची संवय लागेल व भाषा ही सोने जोखावयाच्या तराजूप्रमाणे सूक्ष्म भेद दाखविण्यास समर्थ होईल, शब्दाच्या हल्लीच्या अर्थाचा मूळच्या अर्थाशी कोणच्या प्रकारचा संबंध आहे हे जाणण्याचा प्रयत्न केल्यापासून आपल्या मनांतील विचारांचा अस्पष्टपणा नाहीसा होऊन त्यांस स्पष्टपणा कसा येतो हे दाखविण्यासाठी आम्ही एक उदाहरण घेतों.

 ३. उडाणटप्पू.- उडाणटप्पू हा शब्द सर्वांस ठाऊक आहे. त्याचा अर्थही सर्वांस ठाऊकच आहे. जो कोणी एका विषयावर फार वेळ गुंतून न राहतां एकावरून दुसऱ्यावर व दुसऱ्यावरून तिसऱ्यावर जातो तो, स्थिर, चंचळ, हाती घेतलेले कोणतेही काम पुरतेपणी करीत नाहीं तो, असा अर्थ उडाणटप्पू याचा आहे. परंतु ह्या शब्दाची व्याप्ति स्पष्टपणे दाखविणाऱ्या मर्यादरेषा आमच्या वाचकांस ठाऊक आहेत काय? कदाचित नसतील. मोलस्वर्थने ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयीं ‘उडाणटप्पू 
२४     मराठी शब्दांचे उद्घाटन.
हा शब्द उडणे ह्याची हेंगाडी द्विरुरक्ति आहे ( a light formation from उडणें )' असा शेरा दिला आहे.

ह्यावरून ह्या कोशकारास उडाणटप्पू या शब्दाची व्युत्पत्ति कळली नव्हती व त्याला त्याच्या अर्थाचाही स्पष्टपणे बोध झाला नव्हता असे म्हणणे भाग आहे. ह्या शब्दाची खरी व्युत्पत्ति उड्डीन तट्टू ( उड्या मारणारा तट्टू ) अशी आहे. उडाणटप्पू हा शब्द उड्या मारणाऱ्या तट्टाच्या साम्यावरून उत्पन्न झाला आहे असे एकदा आपणास समजले. म्हणजे त्या शब्दाच्या अर्थाची स्पष्ट व कधीही नाहींशी न होणारी कल्पना आपल्या मनांत येते. आपणापैकी पुष्कळांनीं शिंगरास फेरफटका करण्यासाठी मोकळे केले असेल. मोकळे झालेले शिंगरू क्षणभर तरी एके ठिकाणी स्थिर राहते काय? ते टणाटण उड्या मारतें, एकदम इकडून तिकडे वळते, मानेला हांसडे देते, दहा पावलें धांवत जाऊन पुन्हा एकदम आपली दिशा बदलते, परत येते, किंवा पुन्हा दुसरीकडे भरारी मारतें. हे अनेक अस्थिरपणाचे चाळे डोळ्यांनी पाहिले किंवा मनांत आणले म्हणजे उडाणटप्पू या शब्दाचा अर्थ किती स्पष्टपणे रेखला जातो? आणि अशा रीतीने ह्या शब्दाचा अर्थ मनांत ठसवून घेणे, हे लाभप्रद नाहीं काय ? त्या शब्दांतील आरोपमूलक साम्य किती मनोहर कवित्व प्रकट करते ? शब्दाच्या व्युत्पत्तीचा अशा प्रकारे अभ्यास केल्याने त्यांचे अर्थ आपणास स्पष्ट समजतात, इतकेच नव्हे तर कधी कधी शब्दांतील कवित्व किंवा नीति किंवा इतिहास किंवा दुसरी हरएक प्रकारची माहितीसुद्धा आपणास मिळते. *

-----
 * ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल मतभेद आहे. मोलस्वर्थने दिलेली व्युत्पत्ति वर नमूद केलेलीच आहे. आमचे मत उद्गीन तट्टू हीच व्युत्पत्ति
     प्रकरण पहिलें.     २५

 ४. अजागळ.- अजागळ हाही शब्द मोठ्या चमत्कारिक रीतीनें उत्पन्न झाला आहे. त्याचा अर्थ निरुपयोगी, बेअकली, मूर्ख मनुष्य असा आहे. संस्कृतांत एक सुभाषित श्लोक आहे.

 धर्मार्थकाममोक्षाणां यस्यैकोऽपि न विद्यते ।
 अजागलस्तनस्येव तस्य जन्म निरर्थकम् ॥

 शेळीच्या गळ्यांत लटकत असलेले स्तन निरुपयोगी, बेडौल असे असतात. त्यावरून निरुपयोगी व बेअकली मनुष्यावर अजागलस्तनत्वाची जोरदार आरोप केला जाऊन, तशा मनुष्याला अजागल म्हणण्याचा परिपाठ पडला. हा शब्द प्रथम संस्कृतज्ञांनी रूढ केला. पुढे तो आपल्या अंगच्या जोरदारपणामुळे सर्वतोमुखी झाला. तेव्हा मूळचा शब्दार्थ लोकांस न समजल्यामुळे अजागलस्तन ह्यांतील शेवटची दोन अक्षरे गळून जाऊन त्यास अजागळ असे आटपसर रूप प्राप्त झालें. अजागल शब्दाची ही व्युत्पत्ति समजली असता, त्या शब्दाचा जोरदारपणा किती स्पष्ट रीतीने मनावर ठसतो ?

-----

खरी असावी असे आहे. कारण “ चुकारतट्टू" हा "उडाणटप्पू" ह्याशी बहुतांशी समानार्थक शब्द असून तट्टाच्या अस्थिरपणावरून त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. दुसरे असे की “ उडाणटप्पू” ह्या शब्दाच्या अर्थाच्या घटक कल्पना वेगळ्या करून उडता तट्टू, उडणारा तट्टू वगैरे सारखे प्रयोग अस्थिर मनुष्याच्या संबंधाने केले जातात. आतां तचा ट कसा झाला हे सांगणे राहिले. मूर्द्धस्थानचा “ण” अगोदर उच्चारून नंतर दन्त्य “ त" उच्चारण्यास जिव्हेस कठिण पडून संध्वाननाच्या ( assimilation ) नियमाप्रमाणे “त” चा " ” झाला. परंतु एका "ट " च्या पुढे आणखी दोन “ ट” उच्चारणे हा कर्कश ध्वनि असल्याकारणानें विध्वाननाच्या नियमास अनुसरून “ट्टू” चा “प्पू' झाला. संध्वानन व विध्वानन ह्यांचे व्यापारांची उदाहरणे सर्व भाषांमध्ये विपुल आढळतात.



२६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

 ६. गयाळ. -गयाळ हा शब्द अजागळ ह्यापासून विलोमाने झाला असे कै० वा ० विष्णु कृष्ण चिपळूणकर यांचे मत आहे. गयाळ हा शब्द अजागळ शब्दापेक्षा अधिक जोरदार व अधिक निंदाव्यंजक आहे.*

 ६. लाजाळू. -पुष्कळ वनस्पतींची नांवें कवित्वगर्भ आहेत. शिबिकाकुल म्हणून वनस्पतींचा एक वर्ग आहे. त्यांत लाजाळू हे झाड आहे. लाजाळू हे झाड आमच्या वाचकांपैकी बहतेकांनी पाहिलेच असेल. ह्या झाडास लाजाळू हे नांव किती अन्वर्थक आहे बरें ? नवी नवरी घराच्या एकाद्या कोपऱ्यांत बसलेली असते. कोणी वडील माणूस जवळ आल्याबरोबर ती आपली मान वांकविते. आपलें अव्याज मनोहर असे तोंड खाली घालते आणि ते वडील माणूस दूर जाऊ लागले म्हणजे हळू हळू तोंड वर करून आपली " त्रस्तैकहायनकुरंगविलोलदृष्टी " इकडे तिकडे फेंकते, असेच वर्तन लाजाळूचे असते. कोणी मनुष्य जवळ आला असतां ती कावऱ्याबावऱ्यासारखी चळवळ करते. तिला कोणी हस्तस्पर्श केला तर नम्रपणाने अधोमुख होऊन, आपल्या नाजूक व बारीक शाखा खाली पाडते, आणि अत्यंत शालीनतेची मुद्रा दाखविते. ज्या पुरुषाच्या पाणिपीडनाने तिला अस्वस्थता प्राप्त झालेली असते, तो दूर गेल्यावर ती हळू हळू आपलीं गोजिरवाणीं पानें

-----
 * कित्येक विद्वान ह्या शब्दाची उत्पत्ति गयावळ लोकांपासून झाली आहे असे समजतात. "गयाळ" हा शब्द कोंकणांत पडीत किंवा निरुपयोगी जमीनीस लावतात. अशा जमीनीचे मूर्ख मनुष्याशी तादात्म्य सहज रीत्या केले जाऊन मूर्ख मनुष्याच्या संबंधानें “ गयाळ” शब्द योजला जाऊ लागला असावा ही कल्पना आम्हास अधिक सयुक्तिक दिसते. 
     प्रकरण पहिलें.     २७
उघडते, टवटवीत चिमुकल्या शाखा उभारते, आणि पुन्हा प्रसन्न मुद्रेनें पर्यंतभागच्या उपवनप्रदेशास शोभवू लागते. ह्या वनस्पतीच्या अशा शालीन वर्तनावरून तिचे "लाजाळू " असे नांव ज्याने ठेविलें, त्याने नवोढेशीं तिचे सादृश्य कसे चटकदार रीतीने वर्णिले आहे ? नवोढेची मुख्य खूण लाजणे ही होय. आपल्या बायका भित्र्या मुलांस नेहमी म्हणतात, " असा नव्या नवरीसारखा लाजतोस काय?"

 ७. नमस्कारी. -ह्याच वनस्पतीस संस्कृतांत नमस्कारी असे नांव आहे. हे देखील कवित्वगर्भच आहे. नमस्कार करतेवेळीं ज्याप्रमाणे आपण दोन हात जुळवून अजलि करून खाली वांकतों, त्याप्रमाणे ही वनस्पति आपली लहान लहान पाने दोन बाजूंनी आणून जुळविते, आणि शाखा वांकविते, तेणेकरून ती जणों काय नमस्कार करीत आहे असा भास होतो. उद्धट, द्वाड, भयंकर अशा निवडुंगाच्या झाडाप्रमाणे ही लाजाळू बेपर्वाई व मगरुरी दाखवीत नाही, तर उलटपक्षी नम्रपणा दाखविते. ह्या तिच्या शालीन आचरणावरून तिच्याठायीं सचेतनत्वाचा आरोप करून अति गोड नांव नमस्कारी असे ज्याणे दिलें त्याणे ह्या नांवामध्ये बरेंच कवित्व व्यक्त केले आहे. पुष्कळ वनस्पतींचे वाचक शब्द त्या त्या वनस्पतीचे, गुण, धर्म, आकार, स्वरूप इत्यादिकांची माहिती करून देणारे असतात.

 ८. दिपमाळ.-तुलसीकुलामध्ये दिपमाळ म्हणून एक झाड आहे. ते पुष्कळांनी पाहिलेले असेल. त्याला असे नांव पडण्याचे कारण हें की, देवळासमोरील दिपमाळेशी ह्या झाडाच्या मंजरीचे साम्य आहे. देवळासमोरील दिपमाळ उंच व निमूळती असून सभोंवार चक्राकार ( दिवे ठेवण्यासाठी ) लहान लहान पायऱ्यांच्या आकाराचे दगड असतात. त्याचप्र
२८     मराठी शब्दांचे उद्घाटन.
माणे सदरहू झाडाची मंजरी असते. ती उंच व निमूळती असून, तिच्या पुष्पदंडावर चक्राकार फुले असतात व तेणेकरून ती मंजरी हुबेहुब देवळासमोरच्या दिपमाळेप्रमाणे दिसते. ह्या साम्यावरून त्या झाडास दिपमाळ असे नांव पडलें आहे, दिपमाळ हे झाडाचे नांव चारुतामूलक साम्यावरून त्यास प्राप्त झालेले असल्यामुळे ते कवित्वगर्भ होय.

 ९. पादप.-पादप हा शब्द वनस्पतीचा सामान्येंकरून वाचक आहे. त्याचा अर्थ पायांनी पुष्टि पिऊन घेणारा असा आहे. वनस्पतीच्या अंगांत जीं घटक द्रव्ये असतात, त्यांपैकी बराच भाग मुळांच्या द्वारे वर चढतो हे प्रसिद्धच आहे.

 १०. न्यग्रोध.- वडाला न्यग्रोध असें नांव आहे. त्या झाडाची वाढ व विस्तार वरच्या दिशेने शाखा, पर्णे ह्यांच्या रूपाने होतो, तसा खालच्याही बाजूने पारंब्यांच्या रूपाने होतो, हे प्रसिद्धच आहे. ह्या पारंब्या, शाखा, पर्णादिकांप्रमाणे स्तंभाचे अवयव नसून, ती आगंतुक मूलें होत. परंतु ह्या पारंब्या जमिनींत शिरल्यावर स्तंभाप्रमाणेच दिसतात. ह्यावरून न्यग्रोध हा शब्द उत्पन्न झालेला आहे. अर्थात् ह्या शब्दाची खुमारी लक्ष्यांत बाळगण्याजोगी आहे. त्याचप्रमाणे दुपारी, सायंकाळी, तिरसंगी (त्रिसंन्ध्य), सदाफुली, बारामासी हेही शब्द त्या त्या वनस्पतींचे स्वरूप दाखवितात.

 ११. अक्षि.- संस्कृतांत कवडीला अक्षिन् असे म्हणतात. हें नांव डोळ्याच्या साम्यावरून कवडीस पडलेलें आहे. कवडीच्या पाठीवर डोळ्याच्या आकृतीची पिवळी रेषा असते, ती सर्वांनी पाहिलीच आहे. ही रेषा हुबेहुब डोळ्याच्या आकृतीप्रमाणे असते. डोळ्यांचीं अपांगें, वरचा उंच व गोल भाग, खालचा किंचित चपटा गोल भाग, नाकाच्या समीपचा कोपरा, बुबुळाचा 
     प्रकरण पहिलें.     २९
उंचवटा वगैरेचे कवडीच्या आकृतीशी विलक्षणं साम्य आहे. ह्या साम्यावरून कवडीस अक्षि हे नांव प्राप्त झाले. हे साम्य इतकें पूर्ण आहे की, ज्याने प्रथम कवडी पाहिली त्यास त्या पदार्थास डोळ्याचे वाचक अक्षिन् हे नांवे देणे अगदी साहजिक वाटले असावे.

 १२. माधुकरी.-खरकट्या व सोंवळ्या अन्नाची भिक्षा मागणाऱ्या मुलांस माधुकरी असे म्हणतात. हा शब्द संस्कृत मधुकर ( भ्रमर ) ह्या शब्दापासून झालेली आहे. मधुकर ज्याप्रमाणे एका फुलावरून उडून दुसऱ्या फुलावर जातात, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर जातात व प्रत्येक फुलांतून गोड मधाचे ग्रहण करितात, त्याप्रमाणे हे माधुकरी मुलगे प्रत्येक घरांतून थोडथोडे अन्न ग्रहण करीत करीत आपल्याला पुरे इतकें अन्न जमवितात. एथें माधुकरी मुलांच्या वृत्तीचे भ्रमरांच्या वृत्तीशी किती जोरदार रीतीनें साम्य वर्णिलेलें आहे ?

 १३. गुलजार.-गुलजार हे विशेषण आपण नाजूक, कोमल व रमणीय अशा वस्तूस लावतो. उदाहरणः-ह्या मुलाचा चेहरा किती गुलजार आहे ! ह्या पुस्तकाची बांधणी किती गुलजार आहे ! गुलजार हा शब्द वर्णांनी जसा मधुर आहे, तसा तो अर्थानेही आहे; व त्याचा अर्थ जसा मधुर आहे तसेच त्यांतील कवित्वहीं मधुर आहे. हा शब्द फारसींतील असून त्याचा अर्थ “फुलांचा ताटवा" असा आहे. फुलांचा ताटवा पाहून कोणाचे चित्त रमत नाहीं ? प्रपंचांतील अडचणींचा कोणास विसर पडत नाहीं ? किती रमणीयता, किती कोमलता, किती मधुरता, एकट्या फूल या शब्दानें मनांत येते ? आणि हृदयंगम वस्तूस फुलांचा ताटवा म्हणणे हे किती नाजूक कवित्वाचे व्यंजक आहे ? गुलाब हाही फारसी शब्द असून त्याचा अर्थ 
३०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

त्या भाषेत पुष्पाचा रस असा आहे. गुलाबाच्या फुलाचा सौम्य वास व साधे परंतु रमणीय स्वरूप मनांत आणले असता त्या फुलास हे नांव किती योग्य आहे हे वाचकांचे नजरेस येईल.

 १४. अश्वघाटी. -छंदःशास्त्रांत अश्वघाटी म्हणून एक वृत्त आहे. त्याचे चार चरण असून प्रत्येकांत बावीस अक्षरे असतात; चरणांची मोडणी अशी असते की, सात तगण असून शेवटी एक गुरु अक्षर असतें. यति ४, ६, ६, ६, या अक्षरांच्या शेवटी पडतात. या वृत्ताचे एक उदाहरण देतों:-

  वाचाळ मी नीट पाचारितों धीट याचा नयो वीट सोचा हरी ॥
  खोटा जरी मी चखोटामधे तूंचि मोठा, कृपेचा न तोटा धरीं ॥
  दाता सुखाचा सदा तारिता आपदा ताप हे एकदा तापटीं ॥
  या संतसेवाव्हया सपदा दे भयासंग नाशील या संकटीं ॥

 हे वृत्त जर कोणी योग्य स्थळीं यति देऊन म्हटले तर ते ऐकणारास घोड्याच्या एक प्रकारच्या चालीची आठवण होईल. घोडा समारंभाच्या प्रसंगी दुडक्या चालीवर चालत असतां ज्याप्रमाणे त्याच्या टापांचा आवाज निघतो त्याच प्रमाणे हे वृत्त म्हणत असतांना आवाज निघतो. ह्या वृत्तास ज्या कोणी अश्वघाटी असे नांव दिले, त्याने अश्वाच्या चालीशीं ह्या वृत्ताचे सादृश्य ठरवून आपल्या उच्छृखळ कल्पनाशक्तीला बरेच विलास करू दिले ह्यांत शंका नाहीं.

 १५. त्रेसष्टी व छत्तिशी. - नवराबायकोमध्ये प्रेम असल्यास त्यांच्यांत त्रेसष्टी आहे असे म्हणतात. व त्यांच्यांत प्रेम नसल्यास छत्तिशी आहे असे म्हणतात; प्रेम आणि प्रेमाभाव ह्यांस अनुक्रमें त्रेसष्टी आणि छत्तिशी हीं नांवें कशी रुजू झालीं हें वाचकांस सहज कळून येण्याजोगे आहे. आपण त्रेसष्टाचा आंकडा ६३ असा काढतों, आणि सहा आणि तीन ह्या अंकांच्या आकृति 
     प्रकरण पहिलें.     ३१
परस्परांकडे तोंडे करून बसलेल्या माणसांप्रमाणे दिसतात. याप्रमाणे त्रेसष्टी म्हणजे प्रेम या शब्दाची उत्पत्ति उघड आहे. तसेच छत्तिसाचा आंकडा आपण ३६ असा काढतों, एथें तीन व सहा या अंकांच्या आंकृति एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या माणसांप्रमाणे दिसतात. नवऱ्याचे तोंड पूर्वेकडे आणि बायकोचे पश्चिमेकडे अशी स्थिति असली म्हणजे त्यांच्यांत छत्तिशी आहे असे म्हणतात, आणि ते साहजिकच आहे. शुद्ध यदृच्छेवर ज्या आकृति अवलंबून आहेत, त्यांच्या पायांवरसुद्धा उपमेची प्रतिष्ठापना करावयास आपण सोडीत नाही, याची त्रेसष्टी व छत्तिशी हे शब्द चांगली उदाहरणे आहेत. तिहींच्या अंकाची आकृति जर नवाप्रमाणे किंवा दुसऱ्या एकाद्या अंकाप्रमाणे काढावयाची आपली चाल असती तर त्रेसष्टी व छत्तिशी हे शब्द प्रेम व प्रेमाभाव यांचे द्योतक झाले नसते हे उघड आहे. तथापि या शब्दांची उत्पत्ति ज्या अर्थी साम्यावर अवलंबून आहे आणि ज्या अर्थी हे साम्य मोठे मजेदार आहे त्या अर्थी हे शब्द कवित्वमूलक आहेत यांत शंका नाहीं.

 १६. चोहोंचा आंकडा.-सुखासीन मनुष्याचे मांडीस चोहोंचा आंकडा म्हणतात. हा शब्दही कवित्वगर्भ आहे. आसनमांडी घालून बसलेल्या मनुष्याच्या पायांची मोडणी चोहोंच्या (चार) आंकड्याप्रमाणे असते.

 १७. अर्धचंद्र. - अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी मारून हाकलून देणे. गचांडी देतांना आंगठा व पुढचे बोट हीं एकमेकांपासून लांब करून मधील बेचांगळी ताणतात. तेव्हां हा मधला भाग अर्धचंद्राच्या आकाराचा होतो. यावरून गचांडीस अर्धचंद्र असे सौम्य नांव मिळाले. 
३२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

 १८. कंगाल.- ह्या शब्दाचा आपण गरीब, दरिद्री ह्या अर्थी उपयोग करतो. परंतु संस्कृतानभिज्ञ लोकांस त्याच्या या अर्थातील जोरदारपणा समजण्याजोगा नाहीं. गरीब, दरिद्री मनुष्याच्या शरीराची स्थिति कशी असते हे आपणास ठाऊक आहे. खावयास प्यावयास न मिळाल्याकारणाने त्याचे डोळे खोल कोनाड्यांत ठेवल्याप्रमाणे दिसतात. गाल इतके खोल गेलेले असतात की, ते आहेत किंवा नाहीत याची शंकाच पडावी. पोट बखाडीस गेलेलें, हातापायांच्या काड्या झालेल्या, निस्तेज त्वचा इत्यादिकांच्या योगाने याचे शरीर हें वैद्यकी विद्यालयांत ठेवलेल्या हाडांच्या सांगाड्याप्रमाणे दिसत असते. दारियाचा हा परिणाम नेहमीं दृष्टीस पडत असल्याकारणाने दरिद्री मनुष्यास, हा कंगाल आहे, असे म्हणण्याचा परिपाठ पडला. कंगाल म्हणजे अस्थिपंजर. पुढे कार्यकारणांच्या साततिक साहचर्यावरून कंगाल हा शब्द दरिद्री ह्या अर्थाचा वाचक झाला. कंगाल शब्दाचा मूळचा अर्थ मनांत आणला असतां दारिद्याचे किती जोरदार, किती ठसठशीत किती हृदयद्रावक चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे राहतें बरें !

 १९. अग्निमुख.-उष्ण कटिबंधांतील रहिवाशांनी गलिच्छपणा केल्यास त्यांस शिक्षा करण्याकरितां म्हणून सृष्टिकर्त्याने एक अजब युक्ति केली आहे. त्याने एक अति ओंगळ आणि हिडिस असा प्राणि उत्पन्न केला आहे. तो घराच्या सर्व भागांत व घरांतील प्रत्येक पदार्थात आपलें वसतिस्थान करू शकतो. पापी मनुष्यास मरणोत्तर भोगाव्या लागणाया ज्या यातना, म्हणजे तप्त लोहस्तंभाशीं बांधले जाणे, जिवंत निखाऱ्यांवर चालणे, तापलेल्या धातूंचा रस पिणे, मळमूत्रांदिकाच्या डोहांत वास करणे, असिंधारांवर निजणे इत्यादि 
     प्रकरण पहिलें.     ३३
त्या सर्व यातनांच्या दसपट पीडा हा लहान प्राणी क्षणोक्षणी मनुष्यास देतो, व मरण येईल तर बरे होईल असे वाटवितो. तो प्राणी कोणचा असावा बरें ? तो प्राणी ढेकूण होय ! या प्राण्यास संस्कृतांत अग्निमुख असे ज्याणे अन्वर्थक नांव दिलें, त्याने किती तरी कवित्व प्रकट केले आहे.  २०. आब्रू.-मागे आलेल्या सर्व शब्दांपेक्षां आब्रू ह्या शब्दांतील कवित्व अधिक रसाळ आहे. हा शब्द फारसी भाषेतील आहे. ह्या शब्दाने दाखविला जाणारा नाजूक अर्थ दाखविणारा शब्द मराठीत नाही, म्हणून हा सोईचा शब्द आपण परभाषेंतून घेतला. सद् आणि असद् ह्यांच्यांतील भेद स्पष्टपणे मनांत आणून सद् जे आहे तदनुसार वर्तनक्रम किंवा तदनुसार वर्तनक्रम ठेवण्याकडे मनाची प्रवणता, असा आब्रू ह्या शब्दाचा अर्थ आहे. आतां ही येवढी लांब व्याख्या देऊन आब्रू ह्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, तरी ती व्याख्या पूर्ण आहे, असे आमचे आम्हासच वाटत नाहीं. तथापि ठोकळ मानाने ती बरोबर आहे असे धरून चाललें असतां विशेष हरकत नाहीं. आब्रू ह्याचा अवयवार्थ तोंडावरचे पाणी अथवा तजेला असा आहे. तजेल्याबद्दल पाणी हा शब्द जसा मराठींत मोत्याचे पाणी, हिऱ्याचे पाणी इत्यादि ठिकाणीं योजला जातो, किंवा इंग्रजीत Water of a pearl or diamond इत्यादि ठिकाणीं योजला जातो, त्याप्रमाणेच फारशींतही तो योजला जातो. यावरून चेहऱ्यावरचे पाणी म्हणजे चेहऱ्याचा तजेला असा आब्रू ह्याचा अर्थ आहे. पण व्याख्येत सांगितलेला वर्तनक्रम किंवा प्रवणता ह्यांचा चेहऱ्यावरील पाण्याशी संबंध काय ? त्यांच्यांत कार्यकारणभावाचा संबंध आहे. ज्या मनुष्याचे आचरण अत्यंत शुद्ध आहे, ज्याने कायावाचा 
३४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

मनेंकरून पाप कधीही केले नाहीं त्याची मुद्रा सदैव प्रफुल्लित असावयाची. कोणी कांहीं बोलला किंवा कोणाविषयीं बोलला, तरी त्याला लज्जित होण्याचे कारण नाही. त्याचे अंतःकरण पवित्र व निर्मळ असल्याकारणाने त्याच्या तोंडावरील अकृत्रिम तजेला नाहीसा होण्याचे कारण नाहीं. अशा प्रकारच्या शुद्ध अंत:करणाचे व चेहऱ्यावरील तजेल्याचे साततिक साहचर्य असल्यामुळे कार्यवाचक शब्द कारणाबद्दल योजला जाणे हे अत्यंत साहजिक आहे. ज्या पुरुषाने निर्मळ अंतःकरणाच्या मनुष्याच्या चेहऱ्याचा न ढळणारा तजेला प्रथम अवलोकिला, व पापी मनुष्याच्या चेहऱ्यावरील तजेला क्षणोक्षणीं नाहींसा होत असलेला अवलोकिला, आणि शुद्धवर्तनक्रमाचे चेहऱ्याच्या तजेल्याशी तादात्म्य करून सोडलें, त्याने आब्रू ह्या शब्दाने किती सूक्ष्म निरीक्षण व कार्यकारणभावाच्या निकट संबंधाचे पूर्णग्रहण ही द्योतीत केली आहेत, व किती गंभीर परंतु कोमळ कवित्व प्रकट केलें आहे बरें ?

 एथवर केलेल्या कवित्वगर्भ शब्दांच्या उद्घाटनावरून वाचकांच्या नजरेस आलेच असेल की, कवित्व हे जगांतील सर्व प्रकारच्या व्यवहारांत दृष्टीस पडते. सामान्यतः ज्यास कवित्व म्हटले जातें तें कांहीं विशिष्ट ग्रंथांत मात्र दृष्टीस पडते. परंतु कवित्व ह्याचा खरा व विस्तृत अर्थ मनांत आणला असतां आपणास असे कबूल करावे लागेल की, कवित्व रोजच्या व्यवहारांत, शास्त्रांत व तत्वप्रतिपादनांत, वगैरे सर्व ठिकाणी दृष्टीस पडते. आणि हे कवित्व सर्वत्र ठिकाणी दृष्टीस पडणारच. कारण मनुष्याचे मनोव्यापार व मनोविकार ही जोपर्यंत हल्लींच्याप्रमाणे राहतील तोंपर्यंत कवित्व त्याच्या अंगांत खिळून राहिलेले असणारच. वर वर जरी विचार केला, तरी हे कवित्व किती 
     प्रकरण पहिलें.     ३५
सर्वव्यापक आहे हे पाहून आपणाला आश्चर्य वाटल्यावांचून राहणार नाहीं.

 कवित्वगर्भ शब्द हे भाषेला भूषणाप्रमाणे होत. प्रत्येक मनुष्य जरी कवि नसला तरी त्यास कवित्वाच्या रसाचा आस्वाद घेण्याची इच्छा असते, व हा आस्वाद घेण्याला तो समर्थही असतो. कारण कवित्वगर्भ शब्द प्रथम प्रचारांत आणण्याचे श्रेय जरी एकएकाच पुरुषाकडे असले तरी त्या शब्दांचा भाषेत स्वीकार केला जाऊन साधारण लोकांच्या साधारण व्यवहारांतसुद्धा तो योजला जातो, हे मनुष्याच्या मनाची कवित्वाचा आस्वाद घेण्याकडे बलवत्तर प्रवणता असते ह्याची साक्ष देते.



प्रकरण दुसरें.
---------------
नीतिगर्भ शब्द.
 मनुष्य प्राण्याचा चांगल्याकडे कल आहे काय? त्याला चांगले आवडते काय ? चांगल्याविषयी त्याच्या मनांत पूज्यबुद्धि आहे काय? लोकांनी चांगले केले तर त्याला संतोष होतो काय ? त्याचे अंत:करण पवित्र आहे काय ? ह्या प्रश्नांचा उलगडा करावयास आपणास फार लांब जाणे नलगे. त्याच्या भाषेतील शब्दांचे अवलोकन केले म्हणजे पुरे आहे. चांगल्याची प्रशंसा करणारे, चांगल्याविषयी आवड आणि पूज्यबुद्धि दाखविणारे शब्द भाषेमध्ये पुष्कळ असतात. आणि मनुष्य प्राणी जात्या चांगला आहे, हा सिद्धांत स्वीकारल्याविना वरच्या प्रकारचे शब्द भाषेमध्ये कसे आले, ह्याचा उलगडा पडावयाचा नाहीं. शब्दांची गरज नसतां शब्द कधीं उत्पन्न होऊ शकत नाहींत. जी वस्तु आपण कधी पाहिली नाहीं, किंवा ऐकिली नाहीं, तिचा वाचक शब्द भाषेमध्ये कधी असावयाचा नाहीं; आगगाड्या, तारायंत्रे वगैरे अर्वाचीन काळच्या कलांचे वाचक शब्द प्राचीन भाषांमध्ये आढळणे अशक्य आहे; अज्ञात वस्तूंचे वाचक शब्द अस्तित्वात येणे अशक्य आहे. यावरून असे म्हणायास पाहिजे की, ज्या वस्तूंचे वाचक शब्द भाषेमध्ये आहेत, त्या वस्तु ती भाषा बोलणाऱ्या लोकांस खचित ठाऊक होत्या. आणि वर निर्दिष्ट केलेल्या प्रकारचे चांगल्याविषयी आदर, आवड वगैरे दाखविणारे शब्द जर भाषेमध्ये असतात तर मनुष्य प्राणी हा जात्या चांगला आहे, असे म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. परंतु ह्या प्रश्नाची दुसरी बाजूही मनांत आणली पाहिजे. 
     प्रकरण दुसरें.     ३७
मनुष्याचा वाईटाकडे कल नाहीं काय? मनुष्य वाईट गोष्टी करीत नाहीं काय ? दुसऱ्यास पीडून तो सुखावत नाहीं काय? ह्याही प्रश्नांचा उलगडा करावयासाठी आपणास फार लांब जाणें नलगे. आपण भाषेतील शब्दांचे पुन्हा अवलोकन केले म्हणजे पुरे आहे. भाषेमध्ये वाईटाचे वाचक जे शब्द आहेत, तेच मनुष्याची वाईटाकडे असलेली प्रवणता स्थापित करतात. कारण मनुष्याची जर वाईटाकडे प्रवणता नसती तर हे वाईटाचे वाचक शब्द भाषेमध्ये कसे आले असते? मनुष्य प्राणी हा जर चांगलाही आहे आणि वाईटही आहे, त्याची चांगल्याकडे प्रवणता आहे तशी वाईटाकडेही आहे, तर ह्या दोन्ही प्रकारचे शब्द भाषेमध्ये आढळणें हें साहजिकच आहे. भाषा ही स्वच्छ आरशाप्रमाणे आहे. तिच्यामध्ये ती बोलणाऱ्यांचा चांगलेपणा व वाईटपणा हे दोन्ही गुण प्रतिबिंबिलेले असणारच. एकाद्या मनुष्यापुढे आरसा धरला तर तो आरसा त्याच्या शरीराचा वर्ण दाखवितो, मग तो मनुष्य कोळशाप्रमाणे काळा असो किंवा लिंबाप्रमाणे पीतगौर असो. आरसा शरीराचे सर्व भाग दाखवितो, मग ते सुरेख असोत किंवा बेढब असोत त्याचप्रमाणे मनुष्याची भाषा ही त्याच्या मनाचा एक प्रकारचा आरसाच होय. त्यामध्ये मनुष्याच्या मनाचे सद्भाग व असद्भाग ह्यांचे हुबेहुब चित्र रेखलेले असते. म्हणून एकाद्या भाषेचा पूर्णपणे व लक्ष्यपूर्वक अभ्यास केला असता, ती भाषा बोलणाऱ्यांच्या मनाचे खरे स्वरूप आढळल्याविना प्रायः राहावयाचें नाहीं.  आम्ही वर म्हटले आहे की, भाषेत असलेल्या शब्दांवरून ती बोलणाऱ्यांच्या मनाचे खरे स्वरूप आपणास अवगत होते, परंतु हे म्हणणे असावे तितकें व्यापक नाहीं. असेही म्हणावयास कांहीं प्रत्यवाय नाहीं कीं, भाषेमध्ये नस
३८     मराठी शब्दांचे उद्घाटन.

लेल्या शब्दांवरूनसुद्धा ती बोलणाऱ्यांच्या मनाचे स्वरूप अवगत होते. हे विधान करणे कांहीं अंशीं साहसाचे आहे, असे वाचकांस आपाततः वाटण्याचा जरी संभव आहे, तरी खोल विचार केला असता त्यांची खात्री होईल कीं, शब्दांच्या अभावावरून वस्तूचा अभाव, किंवा तिची दुर्मिळता, किंवा तिची सार्वत्रिक विपुलता ( ती इतकी की तिचा अभाव म्हणजे काय ह्याची कल्पनासुद्धा लोकांस असू नये ) ह्या गोष्टी सिद्ध होतात. आतां शब्दांच्या अभावावरून वस्तूंचा अभाव सिद्ध करतां येतो तसा सार्वत्रिक फैलावही सिद्ध करतां येतो. तर कोणच्या प्रसंगी कोणचा सिद्धांत स्वीकारावयाचा ह्यासंबंधाने अडचण येण्याजोगती आहे खरी. तथापि मनुष्याच्या मनाच्या नैसर्गिक व्यापारांवर धोरण ठेविलें असतां, व त्या लोकांच्या दुसऱ्या विशिष्ट व्यापारांवर दृष्टि फेकली असतां ह्या अडचणीचे निरसन होण्याजोगे आहे. असो; भाषेतील शब्दांवरून ती बोलणाऱ्यांच्या मनाचे स्वरूप आपणांस ठरवितां येण्याजोगे आहे, असे आपणास म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. मनुष्याच्या मनाच्या थोरवीची साक्ष त्याच्या भाषेतील शब्द देतात, त्याचप्रमाणे त्याच्या मनाच्या नीचपणाचीही साक्ष शब्दच देतात.

 मनुष्य सर्वदा सुखी असतो काय? किंवा तो सर्वदा दुःखी असतो काय? ह्याही प्रश्नांचा उलगडा भाषेतील शब्दांच्या अवलोकनावरून होतो. सुख व सुखाच्या हरएक प्रकारचे वाचक शब्द भाषेत आहेत, त्याचप्रमाणे दुःख व दुःखाचे हरएक प्रकार ह्यांचेही वाचक शब्द भाषेमध्ये तितकेच किंबहुना त्यांहूनही अधिक आहेत. हे शब्द काय दाखवितात ? हे शब्द हे दाखवतात की, मनुष्यास सुख आहे, परंतु दुःखापासून तो मोकळा आहे असे नाही, तर त्यास दुःखही अनु 
     प्रकरण दुसरें.     ३९
भवावे लागते. तसेच सुखाचें त्याला वारें कधी मिळावयाचे नाही, असेही नाही. आपण कोशाचे कोणतेही पान उघडले तरी त्यांत कांहीं सुखाचे वाचक व कांहीं दुःखाचे वाचक असे दोन्ही प्रकारचे शब्द आढळतील. संसारांत ज्याप्रमाणें सुख आणि दुःख ही एकमेकांपासून फारशीं दूर असतात असे नाही, त्याप्रमाणेच ती कोशाच्या प्रत्येक पानांत शब्दांच्या रूपाने असावयाचीच. मनुष्याच्या मनाचे धर्म व संसारांतील सुखें आणि दुःखें हीं शब्दांवरून प्रकट होतात, त्याप्रमाणे मनुष्याची प्रापंचिक उन्नति किंवा अवनति ह्याही भाषेतील शब्दांवरून व्यक्त होतात. मनुष्याच्या स्थितीमध्ये जसा पालट पडतो तसा तो शब्दांच्या अर्थामध्येही पडतो. म्हणजे मनुष्याची प्रापंचिक, मानसिक किंवा नैतिक स्थिति जर उन्नत झाली तर शब्दांचे अर्थही उन्नत होतात व ती स्थिति अवनत झाली तर शब्दांचे अर्थसुद्धां अवनत होतात. शब्द हे ज्याअर्थी वस्तूंचीं श्रुतिगोचर चित्रे होत, त्याअर्थी वस्तु उन्नत झाल्या असतां तीं चित्रे उन्नत स्वरूपाची अशी समजली जावी, हें अगदीं साहजिक आहे. तसेच त्या वस्तु अवनत झाल्या असतां त्यांची चित्रे अवनत समजली जावी, हेही साहजिकच आहे. असो. आतां प्रथम शब्दांच्या अवनतीचीं कांहीं उदाहरणे देतों.  १. बाणीवर येणे.-अघळ पघळ बोलण्याचा व वादविवादाचा परिणाम मैत्रीची वृद्धि होणे, किंवा तत्वबोध होणे, असा अनुभवास येत नसून मैत्रीचा भंग, असत्य बोलण्याकडे निंद्य प्रवृत्ति व शिव्या देणे, असाच बहुतकरून अनुभवास येत असल्याकारणाने बाणीवर येणे ह्याचा अर्थ चिरडीस जाणे, टाकून बोलणे, त्रागा करण्यास प्रवृत्त होणे, असा झाला. 
४०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

 २. साथी. - मनुष्यांचा एकोपा झाला असता त्यांचे हातून एकादें परोपकाराचे किंवा सार्वजनिक उपयोगाचे कृत्य न होतां दुसऱ्यास फसविणे, दुसऱ्यास पीडा देणे, हेच परिणाम आधिक वेळां होत असल्याकारणाने साथी या शब्दाचा पूर्वीचा बरोबर असणारा असा अर्थ नष्ट होऊन वाईट कृत्यांतील मदतनीस असा त्याचा अर्थ होणे हे साहजिकच आहे.

 असो. तर मनुष्याच्या अवनत स्थितीमुळे अवनत झालेले शब्द मराठींत शेंकडों आहेत. आपणास असे आढळून येईल कीं, शब्दांच्या वाच्य वस्तूंस अवनति प्राप्त झाल्यावरून त्यांचे वाचक शब्दही पूर्वी चांगल्या अर्थाचे किंवा उदासीन अर्थाचे असतां क्रमाक्रमाने अवनत झालेले आहेत. आपण उदाहरणासाठी अशा प्रकारचे कांहीं शब्द घेऊ.

 ३. कळवंतीण. - हा शब्द कलावती शब्दाचा अपभ्रंश आहे. कलावती ह्याचा पूर्वीचा अर्थ नर्तन, वादन, गायन वगैरे कलांमध्ये प्रवीण अशी स्त्री, असा आहे. परंतु गायननर्तनाचा धंदा करणाऱ्या स्त्रियांच्या अंगीं साहजिकरीत्या येणाऱ्या बहुपुरुषसेवन, नीचजनसहवास वगैरे दुर्गुणांवरून कलावंतीण ह्याचा अर्थ परपुरुषलोभनार्थ प्रसाधनविधींत लक्ष देणारी स्त्री, वेश्या, किंवा धंद्याचे पांघरुणाखालीं परपुरुषसेवन करणारी, असा झाला आहे.

 ४. उचल्या. - भलत्याच ठिकाणी पडलेला पदार्थ एकादा मनुष्य उचलतो, तेव्हां तो पदार्थ योग्य स्थळीं ठेवण्यापेक्षा किंवा ज्याचा त्यास देऊन टाकण्यापेक्षा, स्वत:च्या उपयोगाकरितां तो आपल्याच जवळ ठेवण्याकडे त्याची अधिक प्रवृत्ति झालेली पाहण्यात येते. ह्या कारणाने उचल्या हा शब्द खिसेकापू किंवा हलक्या चोऱ्या करणारा ह्या अर्थाचा झाला.
     प्रकरण दुसरें.     ३७

 ५. लांबविणे.- उचल्या शब्दावरून लांबविणे ह्या शब्दाची आम्हास आठवण होते. ह्याचाही अर्थ चोरणे असा आहे. हा अर्थ त्या शब्दास कसा प्राप्त झाला हे अगदी उघड आहे. एकादी वस्तु उचलून ती दूर घेऊन जाणारा मनुष्य बहुतकरून ती ज्याची त्यास देण्याच्या उद्देशाने घेऊन जात नाहीं; तर तिचा स्वत:चे उपयोग करण्यासाठी घेऊन जातो; ह्यावरून लांबविणे म्हणजे चोरून नेणे असा त्यास अर्थ प्राप्त झाला.*

 ६. लाघवी.- लाघवी ह्याचा प्राथमिक अर्थ कुशल असा असून पुढे दुसऱ्याचे मन संतुष्ट करण्याचे कामांत कुशल असा त्याचा आकुंचित अर्थ झाला. नंतर स्वाभिमानाविषयीं फिकीर न बाळगतां दुसऱ्यास संतुष्ट करण्यांत कुशल, हांजी हांजी करणारा, असा त्याचा निंदाव्यंजक अर्थ झाला.

 ७. हांजी हांजी. - वरील विवेचनांत योजलेल्या हांजी हांजी करणे ह्या शब्दाची तरी तशीच अवनति झालेली आहे. हांजी हांजी करणे म्हणजे होय महाराज, होय महाराज, असे म्हणणे. अर्थात धन्याची किंवा वरिष्ठाची इमानाने सेवाचाकरी करण्यांत तत्पर असणे, असा त्याचा पूर्वीचा अर्थ असून, हल्ली त्यास निंद्य अर्थ प्राप्त झाला आहे.

 ८. उच्छृखल.- उच्छृखल ह्याचा अर्थ साखळीपासून मुक्त झालेला, स्वातंत्र्यसुख मिळविलेला, असा होता. परंतु ज्यास नवीनच स्वातंत्र्य प्राप्त झालेले असते त्याची गेल्या शतकांतील फ्रेंच लोकांप्रमाणे त्या स्वातंत्र्याचा कांहीं काळ दुरुपयोग करण्याकडे बहुतकरून प्रवृत्ति असते. ह्यावरून त्याचा

-----
 * इंग्रजीतील purloin हा शब्द वाचकांस आठवेलच. त्या शब्दाची व्युत्पत्ति ‘ दूर नेणे' ह्या अर्थाचीच आहे तो शब्द साक्षात फ्रेंचपासून व परंपरेने लाटिनपासून आलेला आहे. 
४२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

अर्थ जनलज्जा, मनोलज्जा वगैरे न बाळगणारा, वडिलांचा योग्य मान न ठेवणारा, असा झाला. हा त्या शब्दाचा निंदाव्यंजक अर्थ संस्कृतांतही आढळतो; तो अलीकडचा आहे असे नव्हे.

 ९. उर्मट.-उन्मत्त ह्याचा संस्कृतांतील अर्थ शरीरविषयक व मनोविषयक असा दोहों प्रकारचा असून त्याच शब्दापासून मराठींत आलेला उर्मट हा शब्द केवळ मनोविषयक मात्र उन्माद दाखवितो.

 १०, खोटे.-कूट ह्याचा मूळचा अर्थ अगम्य, गहन, न समजण्याजोगा असा आहे. गहन विषय लोकांच्या पुढे विचार करण्यासाठी मांडून त्यांचे मनोरंजन करण्यापेक्षा दुटप्पी व अतएव स्पष्ट न समजण्याजोगें बोलून आपलें निंद्य कर्म छपविण्याकडे मनुष्याचा कल अधिक वेळां दिसून येत असल्याकारणानें कूट यापासून निघालेल्या खोटे ह्या शब्दाचा अर्थ अवनत होऊन दुसऱ्यास फसविण्याच्या उद्देशाने सत्याचा अपलाप असा झाला.*

 ११. वक्कल.-वक्कल ह्या अरबी शब्दाचा अर्थ बायको, कुटुंब, खटले असा असून मराठींत राख किंवा बाळगलेली रांड असा त्याचा अर्थ झाला आहे.

 येथवर अवनत शब्दांचे सामान्य स्वरूप दाखवून तशा शब्दांचीं कांहीं उदाहरणे दिली, आतां ह्या अवनत शब्दांचे प्रकार किती आहेत हे सांगून त्यांच्या उत्पत्तीची कारणे कोणचीं ह्याचे विवेचन करतों.

-----
 * खोटें हा शब्द खवट शब्दापासून झाला असे कित्येक विद्वानांचे मत आहे. वे शा. सं. गोविंद शंकर शास्त्री बापट ह्यांचे मते खोटें हा शब्द संस्कृत कूट पासून झाला आहे. आम्हास हें दुसरे मत अधिक ग्राह्य वाटते. 
     प्रकरण दुसरें.     ४३
 अवनत शब्द दोन प्रकारचे आहेत. ज्या शब्दांच्या अर्थात कांहीं अवनति झालेली नसून जे केवळ विद्वानांच्या तोंडून नाहींसे होऊन अविद्वानांच्या तोंडीं येऊन बसले, ते शब्द एका वर्गात येतात; व अर्थाने अवनत असे शागीर्द, ब्राह्मण, मिस्कीन, वस्ताद इत्यादि शब्द दुसऱ्या वर्गात येतात. पहिल्या प्रकारच्या अवनतीचे फळार हे उत्तम उदाहरण आहे. फलाहार ह्या संस्कृत शब्दाचा फलार किंवा फळार असा प्रथम अपभ्रंश होऊन तो सर्वांच्या तोंडी झाला. परंतु पुढे विलोमक्रियेने ळ आणि र या अक्षरांची अदलाबदल होऊन फराळ असा आणखी अपभ्रंश झाला. फराळ हा शब्द मूळच्या स्वरूपापासून अधिक ढळलेला व अतएव अधिक अशुद्ध आहे, व फळार हा शब्द कमी अशुद्ध आहे. तथापि कोणीही सुशिक्षित मनुष्य हल्ली फळार असे म्हणावयाचा नाहीं. फळार हा शब्द अधिक शुद्ध आहे, तरी तो आपण ग्राम्य व हलकट समजतो. हल्ली कुणबी व हलक्या जातीचे लोक मात्र फळार करतात व सुशिक्षित लोक फराळ करतात. त्याचप्रमाणे दुसरा एक शब्द आहे. वेदाच्या ऋचा रचणाऱ्या ऋषींचा आवडता शब्द जो गवेषण तो हल्लीं गवसणे व गावणे ह्या रूपाने अस्तित्वात आहे. तोही शब्द आपण हलका समजतों, व त्याचा प्रचार आज हलक्या जातीमध्ये आहे. विराकत ( विरक्ति ), सजणा ( सज्जन), जरतारी (जरीच्या नक्षीचे ) इत्यादि शब्दांमध्ये अर्थाच्या संबंधाने किंवा नीतीच्या संबंधानें कांहीं हलकेपणा नसून, ते शब्द आपण सुशिक्षित म्हणविणारे लोक वापरीत नाही. अशा प्रकारची अवनति केवळ यद्दच्छेवर अवलंबून असते. सुशिक्षित लोक " गवसणे" हा शब्द 
४४     मराठी शब्दांचे उद्घाटन.
सोडून देऊन “ सांपडणे" ह्या शब्दाचा उपयोग करूं लागले, ह्यास कांहीं कारण नाहीं; हे शुद्ध यादृच्छिक होय.

आम्ही ह्या नीतिगर्भ शब्दाच्या विवरणांत यदृच्छावनत शब्दांविषयी कांहीं न लिहितां दुसऱ्या प्रकारच्याच म्हणजे अर्थावनत शब्दांविषयी लिहिणार आहों.

 शब्दांस ह्या दुसऱ्या प्रकारची म्हणजे अर्थाच्या संबंधाची अवनति प्राप्त होण्याची तीन कारणे आहेत. मनुष्याच्या मनाचे कांहीं निंद्य धर्म हें एक कारण, प्रापंचिक अवनति हे दुसरे कारण, व चिरपरिचय हे तिसरें कारण. आता ह्या तीन कारणांचा क्रमाने विचार करू.

 मनुष्याच्या मनाची वाईटाकडे असलेली प्रवणता, म्हणजे प्रशंसार्ह वस्तूची प्रशंसा करण्यापेक्षां निंदार्ह वस्तूची निंदा करण्याकडे आधिक कल, पदार्थाच्या ठायी असलेल्या सद्गुणापेक्षा दुर्गुणाकडे अधिक लक्ष, फार तर काय पण चांगल्या वस्तूची निंदा करणे, चांगल्या वस्तूचा उपहास करणे, चांगल्या वस्तूविषयीं लोकांच्या मनांत तिरस्कार उत्पन्न होईल असे करणे, चांगल्या वस्तूकडे कुत्सित दृष्टीने पाहणे, वगैरे जे मनुष्याच्या मनाचे धर्म आहेत, त्यांचेमुळे शब्दाच्या अर्थाची अवनति होते, आणि अर्थातच वर सांगितलेले निंद्य धर्म अवनत झालेल्या शब्दांत प्रतिबिंबित झालेले असतात. हे गर्हणीय धर्म भिन्न व्यक्तींचे ठायीं भिन्न प्रमाणाने असतातच. तरी कोणीही व्यक्ति ते धर्म आपल्याठायी आहेत असे जनांत तर काय परंतु मनांत देखील कबूल करण्यास सहसा सिद्ध होणार नाहीं. तथापि मनुष्याच्या विचारांचे द्वार जी भाषा तिच्या ठायीं त्या धर्माचे प्रतिबिंब उमटलेले असते. भाषेतील शब्द त्याच्या मनाच्या व्यापारांचे व्यंजक असतात. आतां कोणी असा पूर्वपक्ष करतील की,
     प्रकरण दुसरें.     ४५
असल्या प्रकारच्या शब्दांपैकी प्रत्येक शब्द प्रथम एकच मनुष्य प्रचारांत आणतो व त्यामुळे सर्व मनुष्यांच्या मनाची प्रवृत्ति वाईटाकडे आहे असे म्हणतां यावयाचें नाहीं. परंतु एकाद्या विशिष्ट व्यक्तीनें तो शब्द प्रथम प्रचारांत आणलेला असला तरी सर्व लोकांनी त्याचा स्वीकार करणे, संभाषणांत त्याचा उपयोग करणे, त्याच्या उपयोगाविषयीं मनांत किंतु न बाळगणे, वगैरे गोष्टींवरून प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा ठसा त्या शब्दांत उमटलेला असतो, असे म्हणण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं. असो; तर ह्या निंद्य स्वभावामुळे जे शब्द अवनत झालेले आहेत, ते शब्द पहिल्या वर्गात येतात. दारू इत्यादि शब्द या प्रकारचे आहेत.  १२. दारू.-ह्या शब्दाचा अर्थविपर्यास मनांत आणला म्हणजे मनुष्याच्या मनाचा कल स्वत:ची वाईट व्यसने छपविण्याकडे व दुसऱ्याची प्रकाशांत ओढून आणण्याकडे किती जोराचा असतो, हे आपणांस समजेल. दारू हा फारसी शब्द असून त्याचा त्या भाषेत औषध असा अर्थ आहे. मद्यप्राशन करणारे लोक आपलें व्यसन छपविण्यासाठी मद्यावर औषधाचे पांघरूण घालतात. हल्लीं ज्याप्रमाणे मद्यपी लोक रस्तोरस्ती दिसणाऱ्या दवाखान्यांपैकी एकाद्या दवाखान्यांत सुळूकदिनी शिरून मद्याचा ‘डोस' झोंकून येतात, व कोणी त्यांस आंत शिरतांना व बाहेर येतांना पाहिलेच आणि प्रश्न केलाच तर कांहीं ‘मेडिसिन' घ्यावयास गेलो होतों, असें उत्तर ठोकून देतात, त्याप्रमाणे पूर्वी मुसलमानी राज्याचे वेळीं मद्यपी लोक हकिमाचे दुकान जाऊन मद्याचा घोट झोंकून येऊन मी दारू प्यावयास गेलो होतो, असे उत्तर देत असत. परंतु मद्यपी लोकांची ही लबाडी लोकांस लवकरच कळून येऊन दारू 
४६     मराठी शब्दांचे उद्घाटन.
हा शब्द सहजच मद्य ह्या शब्दाशीं समानार्थक झाला. कांहीं वर्षांनी मेडिसीन ह्या शब्दाची अशीच दुर्दशा होईल की काय अशी भीति वाटते. देवा, आमच्या लोकांची आब्रू राख, आणि मेडिसिन शब्दास मद्याशीं समानार्थक होऊ देऊ नको !

 अवनत शब्दांची भादरणे, भादरपट्टी, वगैरे शब्द उत्तम उदाहरणे आहेत.

 १३. भादरणे. हा शब्द भद्राकरण ह्या संस्कृत शब्दापासून झालेला आहे. भद्र म्हणजे चांगले किंवा मंगळ. भद्राकरण हा शब्द आपल्या धर्मग्रंथांत प्रतिष्ठित असा समजून वापरलेला आहे. चौलादिक मंगल संस्कार करण्याच्या पूर्वी मुंडन करावे लागते. त्या विधींतील एक भाग जो मुंडनविधि त्यासच प्राधान्य येऊन भद्राकरण ह्याचा अर्थ केश काढणे असा झाला. हल्ली मुंडनाविषयी सोपहास बोलावयाचे असतां त्या शब्दाचा उपयोग करतात. म्हशी वगैरेच्या अंगावरील केश काढणे ह्यासही आपण तोच शब्द लावतों. भादरणे हा शब्द प्रचारांत आल्यावर त्यापासून भादरपट्टी असा मुंडनक्रियेचाच वाचक पण अधिक ग्राम्य असा शब्द झाला. मुसलमानी राज्यांत व पुढे मराठेशाहींत, पेशवाईत वगैरे धिंड काढतांना अपराध्याच्या डोईचे केश, मिशा, भिवया, पापण्या वगैरे काढून त्यास गाढवावर बसवून गांवभर हिंडविण्याची चाल होती. तीवरून सर्वांगावरील केश काढणे हे अप्रतिष्ठेचे लक्षण मानण्यांत येऊ लागलें, व भादरपट्टी हा सोपहास मुंडनाचा वाचक शब्द फजीती करणे, अप्रतिष्ठा करणे, रागें भरणे, खरड काढणे वगैरे गोष्टींचा वाचक झाला. ह्या अर्थाने आपण भादरपट्टी ह्या नामाचाच उपयोग करतों ; भादरणे ह्या क्रियापदाचा कधीं करीत नाहीं. 
     प्रकरण दुसरें.     ४७
माझ्याहातून एवढीशी कोठे चुकी झाली, तर त्याने गय न करितां माझी सर्व लोकांसमक्ष भादरपट्टी काढली, असे आपण म्हणतों. त्याने मला भादरले, असे म्हणत नाहीं.

 १४. शिक्षा.-ह्या गोड, रसाळ, मधुर व भाषेला भूषणावह अशा शब्दाचे तरी थोडे मातेर झाले आहे काय? शिक्षा म्हणजे शिकविणे, बुद्धीचा विकास करणे, सन्मार्गाकडे प्रवृत्ति उत्पन्न करणे, असा पूर्वीचा अर्थ असून, हल्लीं शिक्षा करणे म्हणजे मारणे, पारिपत्य करणे असा अर्थ झाला आहे. शिक्षकांचा प्रयत्न स्पेन्सरने उपदेशिलेल्या मार्गाने विद्यार्थ्यांची बुद्धि बळकट करून, तिचे सामर्थ्य वाढवून, तिला स्वावलंबी करण्याकडे नसून, जुलमाने, धाकाने त्याच्या डोक्यांत ज्ञान ठासून भरण्याकडे अधिक असल्याकारणाने शिक्षा करणे ह्याचा अर्थ पारिपत्य करणे असा झाला. परंतु दुःखांत सुख मानावयास हे आहे की, त्याच धातूपासून निघालेल्या शिक्षक ह्या शब्दाचा मूळचा चांगला अर्थ अद्याप आपण कायम राखला आहे.

 १५. शासन-शासन ह्याचाही मार्ग दाखविणे, उपदेश करणे असा संस्कृतांत अर्थ असून, मराठींत शासन करणे ह्याचा अर्थ बडविणे, पारिपत्य करणे असा झाला आहे. मार्ग दाखविण्याचे कामीं शरीरास वारंवार इजा दिली जाते ( मग ती शास्त्याच्या मूर्खपणामुळे किंवा शिष्याच्या मूर्खपणामुळे दिली जावो ) ह्यावरून शासन करणे म्हणजे पारिपत्य करणे असा अवनत अर्थ झाला.

 १६. नसीहत.-(मराठींत नश्यत ) हा शब्द अरबी असून त्याचा अर्थ पढविणे, ताकीद देणे, असा आहे. परंतु ह्या कामांत मला नश्यत लागली, वगैरे सारख्या प्रयोगांमध्ये त्याचा अर्थ ठोकर बसणे असा होतो. हा अर्थ 
४८     मराठी शब्दांचे उद्घाटन.
विपर्यास एका उत्कृष्ट इंगजी म्हणीची आठवण करून देतो. " He who will not be guided by the rudder must be guided by the rock," सुकाणुंं आणि खडक ह्यांचा जो संबंध आहे तोच उपदेश आणि ठोकर ह्यांचा आहे. शहाण्या माणसाने केलेला उपदेश न जुमानला असतां ठोकर बसावयाचीच !

 १७. राष्टाण.-हा शब्द रासस्थान ह्या संस्कृत शब्दापासून झाला आहे. रासनाहाणी ज्या पुरुषाने पाहिली आहेत त्याला राष्टाण शब्दाच्या हल्लींच्या अर्थामध्ये कांहीं अतिशयोक्ति आहे असे वाटणार नाहीं. बायकांचे मानपानाकरितां चरफडणे, मुलांची धांदल, पोरीचा गोंधळ, चिलीपिलीचे ओरडणे आणि ओरडणे आणि खिदळणे, उखाण्याचा भडिमार, पाणक्यांचा खडखडाट, कासारांची बुलबुल, आणि मोलकरणींचा कुलकुलाट, वगैरे प्रकार ज्याने आपल्या डोळ्याने अवलोकिले आहेत, त्यास राष्टण ह्याचा अर्थ गोंधळ, पसारा, असा होणे, हे अगदीं साहजिकच वाटेल.

 १८. अस्रायफट -अस्त्रायफट म्हणजे विधवा ! संध्येमध्ये अस्त्रायफट हे पद उच्चारून आपण टाळी वाजवितों, अस्त्रा ह्या शब्दाचे वस्त्रा ह्या शब्दाशी सादृश्य, फट शब्दाचा उच्चार, त्याच्या बरोबर होणाऱ्या टाळीचा आवाज, हीं वस्त्रा व चामड्यावर चटक फटक असा त्याचा आवाज ह्यांचे स्मरण करून देतात. त्यावरून अस्त्रायफट हा शब्द अनेकविध साहर्चानें क्षौरिकाच्या पुढे बसलेल्या विधवेचा वाचक झाला. हा शब्द मनुष्याचे, क्रौर्य, निर्लज्जपणा, आणि पाषाणहृदयता, ह्यांचे उत्कृष्ट निदर्शक आहे.

 १९. हेपलणे.-हेपलणे हा शब्द अति ग्राम्य अर्थाने योजला 
     प्रकरण दुसरें.     ४९
जातो. हा ग्राम्य अर्थ अलीकडच्या शंभर वर्षांतच त्या शब्दास जडला असावा. कारण हेबाळणे (हेपलणे शब्दाचे अधिक शुद्ध रूप) हा शब्द मोरोपंताने एका गंभीर व हृदयद्रावक प्रसंगी योजला आहे.

  दुःशासनासि म्हणती भीमादिक निज मनांत हेबाळ ।
  हूं सुप्त सर्पिणीतें मेली मानून ओढ हे बाळ ॥ १ ॥

 हेबाळ हा शब्द " अबल " ह्या शब्दापासून झाला आहे. ह्याचा अर्थ निःशक्त, व तो क्रियापदाप्रमाणे योजला असतां नि:शक्त करणे, वाईट रीतीने वागविणे, छळणे, हाल करणे, इत्यादि अर्थ दाखवितो. ह्याच अर्थाने मोरोपंतानें “हेबाळणे" हा शब्द वरील आर्येत योजला आहे; परंतु हल्ली हेपलणे हा शब्द सभ्य मंडळींत उच्चारण्याची कोणाची छाती होईल ?

 २०. अवलाद.-हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ मुलगे असा आहे. त्याचे एकवचन वल्लद असे आहे. वल्लद म्हणजे मुलगा. “रामा वल्लद तुका" ( रामा मुलगा तुक्याचा ) अशा परिभाषेत वल्लद ह्याचा अर्थ कांहीं वाईट नाहीं. परंतु अवलाद ह्याचा अर्थ अवनत झाला आहे. अवलाद हे अनेकवचनाचे रूप असून आपण ते एकवचनाचे समजतों, व मराठींत " अवलादी ” असे त्याचे अनेकवचन करतों. "अवलाद" ह्या शब्दाचा अर्थ किती अवनत झाला आहे हें पुढील वाक्यांवरून कळून येईल. " गोंद्या म्हणजे ह्या गांवांतील एक अवलाद आहे. गांवांत कोणाचे घर फुटले, एकादा खून झाला, एकाद्या घरास आग लागली, की त्यांत गोंद्याचें कांहीं अंग नाही, असे कधीं व्हावयाचें नाहीं. असा मिस्कीन आहे, कीं कांहीं बोलावयाची सोय नाहीं !” . “अरे तो विठ्या असे काम करील ह्याचे तुला आश्चर्य ते काय 
५०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

वाटते? त्या सावळ्या दरोडेखोराचीच ती अवलाद !” अरबी भाषेमध्ये “अवलाद" ह्याचा अर्थ अवनत नाहीं हे सांगणे नकोच.

 २१.पांडित्य.- पंडित हा शब्द आपण विद्वान् ह्या अर्थाने येाजतो; परंतु पांडित्य हा शब्द आपण चारगटपणा, वाचाळपणा, किंवा निरर्थक भाषण, अशा निंदाव्यंजक अर्थाने योजतो. वाक्पटू, वाक्पांडित्य हेही शब्द आपण निंदाव्यंजक अर्थाने योजतों. ह्या अवनतीचे कारण उघड आहे. जगामध्ये खऱ्या विद्वत्तेपेक्षां विद्वत्तेचा अभावच बहुधा आढळतो. आपण विद्वान् आहों अशी शेखी मिरविणारे लोक क्वचितच विद्वान् असतात. “न हि स्वर्णे ध्वनिस्तादृग्यादृक्कांस्ये प्रजायते" ह्या वचनाची प्रतीति आपणास नेहमी येत असते.

 २२. अद्दल.- अद्दल हा शब्द अरबी असून, त्याचा त्या भाषेत इनसाफ, न्याय असा अर्थ आहे; परंतु जे कोणी आपला तंटा तोडून घेण्यासाठी कोडतांत जातात, त्यांच्या इच्छेविरुद्ध ( निदान त्यांपैकी एकाच्या तरी इच्छेविरुद्ध ) निकाल लागावयाचाच. त्यामुळे हा असंतुष्ट मनुष्य निकालास शिव्या देऊन म्हणतो, “ मला मोठी अद्दल घडली. अशा रीतीने अद्दल याचा अर्थ मराठींत ठोकर असा झाला.

 आतां शब्दांच्या अवनतीचे जे दुसरे कारण, मनुष्याची प्रापंचिक अवनति, त्या कारणांचा आतां विस्तारें करून विचार करूं.

 मनुष्याच्या प्रापंचिक अवनतीवरूनसुद्धां शब्दांस अवनति प्राप्त होते, आणि असे होणे हे अगदी साहजिक आहे. शब्द जर वस्तूंची एक प्रकारची चित्रे आहेत असे आपण समजतों, तर त्या वस्तु आपल्या दृष्टीने अवनत झाल्या असतां त्यांची चित्रेही आपणास अवनत वाटणारच. रामचंद्र आपणास वंद्य 
     प्रकरण दुसरें.     ५१
आहेत म्हणून त्यांच्या चित्रास नमस्कार करावा, असे आपणांस वाटणे साहजिकच आहे; परंतु जर आपल्या मनांत, किंवा विचारांत, किंवा समजुतींत बदल होऊन आपली जुन्या धर्मावरील श्रद्धा नाहींशी झाली, किंवा आपण अमूर्तिपूजक झालों, तर आपण त्याच चित्रास, ( ज्यास आपण पूर्वी पूज्य मानीत असू त्यास ) नमस्कार करण्यास प्रवृत्त होणार नाहीं. आणि हीच गोष्ट वस्तूच्या उन्नतीवरून तद्वाचक शब्द उन्नत होणे किंवा वस्तूच्या अवनतीवरून तद्वाचक शब्द अवनत होणे ह्या व्यापारास लागू आहे.

 २३. उपाध्याय.-उपाध्याय हा शब्द संस्कृतांत मोठ्य संमाननीय पदवीचा वाचक आहे; परंतु उपाध्यायाच्या ठायीं उत्तरोत्तर विद्येचा लोप होत गेल्याकारणाने व द्रव्याभावामुळे समाजांत त्याचे महत्त्व कमी झालें, व तो पूर्वीच्या मानास अपात्र झाला, तेणेकरून "उपाध्या " हाच शब्द मराठीत “घंटाबडव्या" ह्या अर्थाने योजला जाऊ लागला.

 २४. मिस्कीन.-हा शब्द अरबी असून त्याचा त्या भाषेत व फारशींत गरीब असा अर्थ आहे; परंतु जे गरीब असतात त्यांचा अनीतीकडे कल असण्याची श्रीमंतापेक्षां बलवत्तर कारणे असल्यामुळे मराठींत त्याचा अर्थ लुच्चा असा झाला.

 २५. बिलंद.-बुलंद ह्या फारशी शब्दाचा "उंच " असा अर्थ असून मराठींत बिलंद ( किंवा बिलंदर ) ह्याचा अट्टल सेोदा असा अर्थ झाला आहे.

 २६. शागीर्द. - ह्या फारशी शब्दाचा मूळचा अर्थ विद्यार्थी असा असून मराठीत पाणक्या किंवा आचारी असा झाला आहे.

 २७. शिष्या. - ह्याचा मूळचा अर्थ विद्यार्थी असा असून 
५२     मराठी शब्दांचे उद्घाटन.
मराठींत पाणक्या किंवा आचारी असा अर्थ होतो. शागीर्द आणि शिष्या ह्या दोन्ही शब्दांचे एकाच कारणाने मातेरें होऊन हल्लीचा अर्थही दोघांचा एकच आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण, आचारी, भट इत्यादिकांचेही अर्थ अवनत झालेले आहेत ते वाचकांच्या नजरेस येण्याजोगे आहे. शब्दांस अवनत करणारी प्रापंचिक अवनति ब्राह्मण, शिष्या, आचारी, भट वगैरे शब्दांत दृष्टीस पडते. ह्याच प्रकारची दुसरी कांहीं उदाहरणे मागे आली आहेत ती वाचकांस आठवतीलच.

 चिरपरिचितत्वाच्या योगाने शब्दास अवनति प्राप्त होते असे आम्हीं मागे म्हटले आहे, त्याचा आतां खुलासेवार विचार करतो. |

 बीभत्स व ओंगळ वस्तूविषयी बोलण्याची मनुष्यास खंती असते, व ही खंती त्याला भूषणावहच होय. त्या वस्तूच्या विषयी त्याला बोलावयाचा प्रसंग आलाच तर तो त्या वस्तूचा दुरूनच निर्देश करतो, त्या वस्तूचा तो प्रत्यक्ष उच्चार करीत नाहीं. स्त्रियांच्या प्राथमिक रजःस्रावासंबंधाने बोलावयाचे असतां "रजःस्राव” किंवा “ऋतुदर्शन" हे शब्द घातले असतां बीभत्स वस्तूचे स्पष्ट वर्णन केले असे होते; म्हणून तिला “नाहाणे" आलें म्हणजे ठराविक समयीं स्नान करण्याचे दिवस आले असा अप्रत्यक्ष रीतीने विवक्षित वस्तूचा निर्देश करणारा "नहाण" हा शब्द प्रचारांत आला; परंतु पुढे ती बीभत्स वस्तु व तिचा वाचक “नहाण" हा शब्द ह्यांचे साततिक साहचर्य झाल्या कारणाने त्या बीभत्स वस्तूचा बीभसपणा "नहाण" ह्या शब्दास प्राप्त होऊन, तो शब्द आलिकडे प्रतिष्ठित संभाषणांत योजला जात नाही. त्याच्याबद्दल बायका "मुका मुलगा " व पुरुष " रजोदर्शन " असे म्हण
     प्रकरण दुसरें.     ५३
तात. असो, सांगावयाचे म्हणून इतकेंच कीं, बीभत्स व ओंगळ वस्तूंचे वाचक शब्द साततिक साहचर्यामुळे कालांतराने ग्राम्य ठरतात व मनुष्यांस प्रतिष्ठित संभाषणांत योजण्यास दुसरे कोणते तरी विप्रकृष्ट शब्द म्हणजे त्या वस्तूंचा दुरून दुरून निर्देश करणारे शब्द शोधावे लागतात; परंतु बीभत्स व अमंगळ वस्तूचा निर्देश करण्यासाठी प्रथम कितीही विप्रकृष्ट म्हणजे दूरचा शब्द योजला तरी कालांतराने असे होते की, ती बीभत्स वस्तु व तिचा वाचक जो विप्रकृष्ट म्हणजे अर्थात प्रतिष्ठित शब्द ह्या दोघांचे साततिक साहचर्य झाल्यामुळे त्या वस्तूचा बीभत्सपणा क्रमानें त्या शब्दाचे ठायीं येतो. असे झाले म्हणजे, हा विप्रकृष्ट व प्रतिष्ठित शब्द संनिकृष्ट व ग्राम्य ठरतो, व त्या बीभत्स वस्तूचा प्रतिष्ठितपणे निर्देश करण्यासाठी लोकांस आणखी एकादा शब्द हुडकावा लागतो. आश्चर्याची गोष्ट ही की, असा शब्द शोधण्यासाठी त्यांना कांहीं प्रसंगी तर लांब सुद्धां जावे लागत नाहीं. प्रथम प्रतिष्ठित म्हणून प्रचारांत आणलेला पण नंतर अप्रतिष्ठित ठरलेला शब्द प्रचारांत येण्याचे आधींचा जो अप्रतिष्ठित शब्द तेच बहुत काळपर्यंत कानावर न आल्याकारणाने त्याच्या ठायींचा बीभत्सपणा लोपलेला असतो व तोच आतां प्रतिष्ठा पावून प्रचारांत येतो. कुस्ती खेळतांना ज्याप्रमाणे एका मल्लास दुसरा मल्ल खालीं पाडतो, व आपण त्याच्यावर बसतो, इतक्यांत खाली पडलेला मल्ल उठून आपल्या प्रतिपक्षास खालीं पाडून आपण त्याजवर बसतो, तो पुन्हा खाली पडलेला पुन्हा उठून दुसऱ्यास पाडतो, त्याप्रमाणे शब्दांचे माहात्म्य व प्राबल्य वाढते किंवा कमी होते. एका शब्दाने दुसऱ्यास पदच्युत करावें, दुसऱ्याने पहिल्यास, पुन्हा पहिल्याने दुसऱ्यास, ह्या 
५४     मराठी शब्दांचे उद्घाटन.
प्रमाणे राहाटी चाललेली असते. ही राहाटी मनुष्याच्या अंगीं जो बीभत्स वस्तूचा प्रत्यक्ष रीतीने उल्लेख न करतां दुरून दुरून उल्लेख करण्याचा कल असतो, त्याची मोठी प्रशंसार्ह रीतीने साक्ष देते. ह्या राहाटीचे एक उत्कृष्ट उदाहरण आपणास "शौच" ह्या शब्दांत दृष्टीस पडते. कोठा साफ करण्याच्या क्रियेस जो पूर्वी शब्द होता तो लोकांस ग्राम्य वाटू लागल्यावर त्याचे जागीं “स्वच्छ करणे" ह्या अर्थाचा साधा शौच हा शब्द प्रतिष्ठित संभाषणांत वापरण्यांत येऊ लागला. कालांतराने पुढे त्या “शौच" शब्दाचे बीभत्स वस्तूशीं सदैव साहचर्य झाल्यामुळे तो अप्रतिष्ठित ठरला व त्याच्या जागीं त्याच्याही पेक्षा मोघम म्हणजे अर्थात् विप्रकृष्ट असा “परसाकडे जाणे" असा शब्द प्रतिष्ठित लोकांच्या उपयोगांत येऊ लागला, “परसाकडे " म्हणजे केवळ परसाच्या बाजूस जाणे हा सुरेख शब्द प्रचारांत आला; परंतु हल्लीं तो शब्द बीभत्स वस्तूच्या साहचर्याने अप्रतिष्ठित ठरून आपण त्याच्या जागी "शौच" हा मागे पडलेला शब्द अदबीच्या भाषणांत योजें लागलो आहों, |  २८, भद्रलक्षणी, भद्रकपाळी.- हे शब्द वाईट अर्थाने योजले जातात. त्यांचा वैयुत्पत्तिक अर्थ चांगला असून त्यांची वाईटाकडे लक्षणेने योजना होऊ लागली. “आमचा बाव्या काय शहाणा आहे म्हणून सांगू? आई देवाला गेली होती अशी संधि साधून त्याने पेटीला किल्ली चालवून पैसे चोरून त्यांचे चुरमुरे आणून खाल्ले, इतका प्रतापी" ह्या वाक्यामध्ये " शहाणा" आणि “प्रतापी" हे शब्द लक्षणेनें योजलेले आहेत, असाच लाक्षणिक उपयोग भद्रलक्षणी व भद्रकपाळी ह्यांचा प्रथम होत असे; परंतु पुढे पुढे त्यांच्या 
     प्रकरण दुसरें.     ५५
वैयुत्पत्तिक अर्थाचा लोकांस विसर पडून हल्ली ते शब्द चांगल्या अर्थाने कधीच योजले जात नाहींत. जणों काय भद्रलक्षणी आणि भद्रकपाळी हे शब्द अभद्रलक्षणी आणि अभद्रकपाळी असेच आहेत.

 २९. शष्प.- हा शब्द संस्कृतांत कोमल तृणाचा वाचक आहे; परंतु मराठीत त्याचा अर्थ कांहीं वेगळा आहे. मनुष्याच्या अंगावरील गुह्यस्थानचे केशांविषयी अप्रत्यक्ष रीतीने व प्रतिष्ठितपणाने बोलावयाचे असतां, केवळ साम्याच्या निर्देशावरून वक्तव्य वस्तूचा बोध करण्यासाठी शष्प ह्या शब्दाचा उपयोग करण्याचा प्रचार पडला. शष्प ह्या गोड शब्दाचा प्राथमिक उपयोग गुह्यस्थ केशांच्या संबंधानें जो होऊ लागला तो मनुष्याच्या मनाच्या बीभत्स शब्द उच्चारण्याच्या खंतीवरून होऊ लागला. ही खंती अर्थात भूषणावहच होय; परंतु कालांतराने चिरपरिचयाचा परिणाम त्यावर घडून तो बीभत्स ठरला, अशा प्रकारची दुसरी पुष्कळ उदाहरणे देता येतील; परंतु ग्राम्यपणाचा आरोप आमच्यावर येऊ नये, म्हणून ती उदाहरणे आम्ही देत नाहीं.

 वर आम्हीं अवनत शब्दांची उदाहरणे दिली आहेत; परंतु त्यांवरून वाचकांनी असे समजतां कामा नये की, भाषेतील शब्दांमध्ये अवनत होण्याचाच केवळ कल असतो; उन्नत झालेल्या शब्दांचीही उदाहरणे मराठीत पुष्कळ आहेत. मनुष्यप्राणी हा ज्या अर्थी सत् आणि असत् ह्यांचे मिश्रण आहे, त्याची सत् जे आहे त्याचेकडे प्रवृत्ति असते तशीच आहे त्याचेकडेही प्रवृत्ति असते, त्या अर्थी भाषेमध्ये सुद्धां सत् आणि

असत ह्यांचे वाचक शब्द असावयाचे व उन्नत आणि अवनत असे दोन्ही प्रकारचे शब्द असावयाचेच. 
५६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

 ३०. धीट.- संस्कृतांत धृष्ट शब्द नेहमी वाईट अर्थाने योजला जातो. वडिलांचा मान न ठेवणारा, आपली योग्यता आहे त्यापेक्षा अधिक समजणारा असा निंदाव्यंजक अर्थ धृष्ट ह्या शब्दाचा आहे; परंतु मराठींत धीट हा त्याच्याचपासून उत्पन्न झालेला शब्द चांगल्या अर्थाने योजला जातो. अंगीं धीटपणा असणे हे आपण चांगले समजतों.

 ३१. धारिष्ट.- धारिष्टे हा शब्द संस्कृत धाष्टर्य यापासून झालेला असून, तो धीट शब्दापेक्षा अधिक चांगल्या अर्थाचा आहे; कारण ह्या शब्दामध्ये धीटपणाचा अर्थ असून शिवाय प्राप्तसहिष्णुता ह्या उत्तम गुणाचाही समावेश होतो.

 ३२. मर्द.- मर्द हा शब्द आपण फारशींतून घेतलेला आहे. त्या भाषेमध्ये त्याचा अर्थ सामान्येंकरून पुरूष असा असून, पुरुष ह्या नांवास योग्य असा पुरूष हाही त्याचा अर्थ आहे; परंतु आपण मराठींत पहिला सामान्य अर्थ न घेतां दुसरा जोरदार अर्थ घेतला आहे. उ० “अरे तू असा मर्दासारखा मर्द असून, तुला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे काय कारण आहे ?

 ३३. हिय्या.– भित्र्या मनुष्यास हृदय असते तसे धीट मनुष्यासही हृदय असते; परंतु धीट मनुष्याचेच हृदय हिय्या शब्दामध्ये द्योतित केलेले आहे. प्राकृतांत हृदय ह्याचे रूप "हिअअ " असे असून त्यापासून मराठी " हिय्या" हा शब्द आलेला आहे.

 ३४. बालबोध.- बालबोध ह्याचा अर्थ आंत एक व बाहेर एक असे न करणारा, आपले खरे स्वरूप नैतिक धैर्याने दाखविणारा आणि म्हणून लहान मुलांस सुद्धां तो कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे हे ओळखता येण्याजोगा असा आहे; परंतु आपण बालबोध हा शब्द नेहमी चांगल्या अर्थाने 
     प्रकरण दुसरें.     ५७
योजतों. वाईट मनुष्याच्या अंगी नैतिक धैर्य असल्यास तोही आपले खरे स्वरूप जगास दाखविण्यास अनमान न करणारा असा असेल; परंतु तसा अर्थ बालबोध ह्या शब्दाचा न करतां आपण चांगल्या मनुष्याच्या संबंधानेच तो योजतों. चांगल्या चालीचा, साधा, छक्केपंजे न करणारा जो मनुष्य त्यासच आपण बालबोध म्हणतों. ह्या अर्थाने बालबोध हा शब्द आपण बालबोध लिपी व मोडी लिपी ह्यांच्यांतील भेद मनांत आणून प्रथम योजू लागलों हे सांगणे नकोच.

 ३६. त्वंपुरा.- त्वंपुरा हा शब्द निंदाव्यंजक शब्द उच्चारण्याविषयींची आपल्या मनाची खंती दाखवितो. त्वंपुरा ह्याचा अर्थ “बोंब, शंख अथवा फजीती" असा आपण करतों. ह्याचा उपयोग पुढील सारख्या प्रसंगी होतो. “मी तुला सांगत नव्हतों की तुझी परीक्षा जवळ आली आहे; पत्ते खेळण्यांत, चकाट्या पिटण्यांत आपला वेळ गमावू नको म्हणून? पण माझे ऐकतो कोण? तुझा आपला क्रम चालला होताच, आतां परीक्षेत तुझा त्वंपुरा वाजला ! वाजायचाच !" त्वंपुरा ह्या मराठी शब्दाच्या पोटांत दोन संस्कृत शब्द आहेत. ते " त्वं " आणि “पुरा” हे होत. ह्यांचा अर्थ अनुक्रमें तूं आणि पूर्वी असा आहे व त्यांपासून “शंख" असा अर्थ कसा व्हावा? आपल्या पूजेमध्ये शंखाचे वर्णन आहे ते असे:-

  त्वं पुरा सागरोत्पन्न विष्णुना विधृतः स्वयं ॥
  नमितः सर्वदेवानां पांचजन्य! नमोऽस्तु ते ॥ १ ॥

 "तू पूर्वी सागरापासून उत्पन्न झालास; विष्णूनें स्वतः तुला स्वीकारलें; सर्व देव तुला नमितात ; हे शंखा, तुला नमन असो." असा ह्या श्लोकाचा अर्थ असून, शंख शब्द न उच्चारतां त्याच्या वर्णनांतील पहिले दोन 
५८     मराठी शब्दांचे उद्घाटन.

शब्द उच्चारून आपण त्याचा निर्देश करतो; परंतु अलीकडे तो शब्द ग्राम्य ठरत चालला आहे.

 ३६. ग्वाही.- ग्वाही ही फारशी शब्द गवाह शब्दापासून झाला आहे. गवाह म्हणजे पुरावा किंवा साक्षी व गवाही म्हणजे साक्षीदार किंवा पुरावा. आपण त्याचा अर्थ पुरावा असा न करतां चांगलेपणाचा पुरावा, योग्यत्वाची खात्री करून देणारे प्रमाण असा उन्नत अर्थ करतों. "आपले मन ज्याविषयी आपणास ग्वाही देईल तेच करावे" अशा सारख्या प्रयोगांत आपण ग्वाही हा शब्द योजतों.

 ३७. घरांत आलेली.- मनुष्याच्या मनाचा कल प्रशंसेपेक्षां निंदेकडे अधिक आहे, किंवा वस्तूकडे कुत्सित नजरेनें पाहणे जरी त्याला आवडते तरी विनाकारण किंवा भलत्याच प्रसंगी तो निंदा करीत नाहीं व कुत्सित नजरेनें वस्तूंकडे पाहत नाही. ज्या वस्तूंविषयीं तो प्रसंगविशेषीं तिरस्काराचे उद्गार काढील, ज्या वस्तूंची तो प्रसंगविशेषीं निंदा करील, किंवा ज्या वस्तूकडे तो प्रसंगविशेषीं कुत्सित नजरेने पाहील त्या वस्तूविषयीं सामान्य प्रसंगीं तो सौम्यच शब्दाने बोलतो. त्यामुळे आपल्या भाषेमध्ये शेकडों वस्तूस दोन दोन नावे आहेत. र्ती अगदीं समानार्थक असून एक नांव प्रतिष्ठित समाजांत योजलें जाते. एका एका वस्तूस दोन दोन नांवें असणे ह्यावरून मनुष्यप्राणी अत्यंत शुचिर्भूत आहे असे जरी सिद्ध करितां आलें नाहीं, तरी निदान अगदीच पतित, अगदीच नीच, अगदीच निर्लज्य नाही, असे सिद्ध होते. चांडाळचौकडींत विधवेचा निर्देश जरी अस्त्रायफट किंवा बोडकी ह्या नांवांनी केला गेला तरी प्रतिष्ठित समाजांत तिला “घरांत आलेली" असे म्हणतात.
     प्रकरण दुसरें.     ५९

 ३८. जंत :-त्याच प्रमाणे दुसरी एक गोष्ट विचार करण्याजोगी आहे. ज्या वस्तु जात्या अमंगळ किंवा बीभत्स किंवा हिडिस्स त्या वस्तूंचा सामान्य शब्दांनी, किंवा विप्रकृष्ट शब्दांनी निर्देश करणे हेही मानवी स्वभावास भूषणावहच होय. फार गोड खाल्यापासून कोठ्यामध्ये एक हिडिस्स लांब प्राणी उत्पन्न होत असतो, त्याला प्राणी ह्या अर्थाचा सामान्य शब्द जंतु हा लावतात. जंतु ह्याचा अपभ्रंश "जंत.”

 ३९. जीव, जिवाणु. -सापाला सुद्धा तसाच एक सामान्य शब्द जीव किंवा जिवाणु हा लावतात. सापाला किंवा नागाला आपण लांब जनावर असेही म्हणतों. ह्यांतील तरी बीज हेच आहे. लांब जनावर हा विप्रकृष्ट शब्द होय. त्या प्राण्याचे प्रत्यक्ष नांव न घेता त्याच्या लांबपणावरून "लांब जनावर " असे वर्णनात्मक नांव आपण त्यास दिलेले आहे. त्याचप्रमाणे रक्तपितीच्या हिडिस्स दुखण्यास महारोग किंवा थोरला रोग हे नांव दिलेले आहे. दारिद्र्याबद्दल आपण अक्काबाई म्हणतों. विधवेच्या प्राथमिक क्षौरास सोंवळी करणे म्हणतात. विधवेस सोंवळी म्हणतात. गतभर्तृकेस घरांत आलेली म्हणतात, हे सर्व प्रकार दु:खकारक वस्तूंचा सौम्य शब्दांनी निर्देश करण्याची जी मनाचीं प्रवणता तिची साक्ष देतात.

 अमंगळ, किंवा हिडिस्स वस्तूचा निर्देश करावयाचा तो सौम्य शब्दांनी करण्याकडे आपली प्रवृत्ति असते. तसेच मंगल व प्रियकर वस्तूच्या नाशाविषयी बोलावयाचे असतां, किंवा त्या वस्तूच्या संबंधानें निरुपायास्तव कांहीं अप्रिय भाषण करावयाचे असतां सुद्धां विप्रकृष्ट किंवा सौम्य किंवा मंगलात्मक शब्दच आपण घालतों. आपल्या बायकांस कुंकवाइतकी प्रिय वस्तु कोणतीच नाहीं. कुंकू हा शब्द त्यांच्या दृष्टीने पति ह्या 
६०     मराठी शब्दांचे उद्घाटन.
मराठी शब्दांचे उद्धाटण. शब्दाशी समानार्थकच आहे. देव करो आणि कपाळचे कुंकू अखंड राहो, अशी इच्छा बायका रात्रंदिवस करीत असतात. इतकी जर कुंकवाची योग्यता आहे, तर ते संपले हे म्हणणे बायकांस अर्थात अप्रिय व कठोर वाटणार. यासाठी झिंगाबाईचे कुंकवाचा साठा संपला म्हणजे ती एक मंगळ शब्द योजून आपला अर्थ दाखविते. " माझे कुंकू परवां वाढलें, म्हणून किनई, मी पिंगाबाईचे कुंकू दोन नखे मागून आणलें." अशा रीतीनें “कुंकू संपलें" असें न म्हणतां “कुंकू वाढलें" असे म्हणतात. कुंकवाची जी गोष्ट तीच बांगड्यांची गोष्ट. बांगड्या फुटल्या, किंवा पिचल्या असे न म्हणतां वाढल्या असे म्हणतात. तुळस आपण पूज्य मानतों म्हणून ती मेली असतां तुळस मेली असे न म्हणतां "तुळस द्वारकेस गेली" असे म्हणतों. रामचंद्र, धर्मराज इत्यादि पुराणप्रसिद्ध पुरुषांच्या मरणाविषयी बोलावयाचे असतां ते मेले असे न म्हणतां "निजधामास गेले" असे म्हणतों. निजधाम म्हणजे स्वतःचे वसतिस्थान. ते पुराणप्रसिद्ध पुरूष देवांचेच अंश होत, असे आपण समजतों तेव्हां त्यांचे स्वतांच्या वसतिस्थानास जाणे म्हणजे स्वर्गलोकीं परत जाणे असा अर्थ होतो. तसेच मनुष्याच्या मरणाविषयीं सौम्य शब्दांनी किंवा प्रतिष्ठितपणाने बोलावयाचे असतां "तुकाराम मेला" असे न म्हणतां “तो वारला" असे म्हणतात. "वारला " म्हणजे “दृष्टीआड झाला” किंवा “पलीकडे गेला " आणि अशा रीतीने वारला, ह्या विप्रकृष्ट शब्दानें “मेला" ह्या अर्थाचा निर्देश केला जातो. थकला, आटोपला इत्यादि शब्द ह्याच प्रकारचे होत. लुगडे जळलें असें न म्हणतां लुगडे गौरवलें" असे म्हणतात. 
     प्रकरण दुसरें.     ६१

 मनुष्याचा द्वाडपणा व खोडसाळपणा हा काफरफिरंगी कावा ह्या शब्दांत दृष्टीस पडतो. अविंध लोक आपणा हिंदूंस काफर असे म्हणतात. हा शब्द अरबी असून जे महंमदी धर्माचे अनुयायी नव्हत त्यांच्या निर्भत्सनार्थ तो योजला जातो. महंमदी धर्माच्या अनुयायांनी निर्भत्सनार्थ योजलेला शब्द आपण स्वीकारला ; परंतु तो स्वतास लावून घेण्याकरितां नव्हे तर उलट त्यांसच लावण्याकरिता ! शत्रूने आपणांस दिलेली तिरस्कारव्यंजक नांवे होतां होईल तितके करून रूढ होऊ न देण्याकडे सर्वांचा प्रयत्न असतो; परंतु आपणा हिंदूस आपलाच धर्म अधिक वंद्य वाटत असल्यावरून अविंधांचा तिरस्कार मनांत न आणतां मोठ्या प्रेमळ बुद्धीने आपण काफर हा शब्द त्यांसच लावून त्यांच्या ऋणांतून उतराई झालो !!! दुसरें हेही लक्षांत बाळगण्याजोगे आहे की, काफर ह्या शब्दाचा आपण लुच्चा, क्रूर असाही अर्थ करतो. ज्याला आपण भेटावयास गेलो आहों त्याची परवानगी न घेतां परत येणें हें असभ्यपणाचे आहे. अशा परत येण्यास फ्रेंच लोक English leave म्हणतात व इंग्रज लोक French leave म्हणतात. तिरस्काराची फेड करण्यास मनुष्य किती उत्सुक असतो हे ह्यावरून उघड होते. यूरोपी लोक आपणां हिंदूंचा वाजवीपेक्षा अधिक नम्रपणा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अन्यायावर आणि जुलमावर दाद मागण्याची भीति, कोणी विनाकारण जरी दटावलें तरी चळचळां कांपणे, इत्यादि गर्हणीय गुण पाहून हिंदू हा शब्द तिरस्काराने भित्र्या माणसाबद्दल योजतात. आपण तरी त्याचे उट्टे काढावयास कांहीं कमी केलें नाहीं, फिरंगी कावा हा शब्द " Machiavellian Policy" अर्थाने आपण योजतो.

 प्रारब्धः-प्रपंचामध्ये घडणाऱ्या नानाविध चांगल्या वाईट 
६२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

गोष्टींचा कार्यकारणसंबंध स्पष्ट दाखवून मनुष्यास चांगल्या गोष्टीकडे प्रवर्तविण्याचा प्रयत्न हा " प्रारब्ध" शब्दांत आढळून येतो. प्रारब्ध म्हणजे प्रारंभिलेलें. आपणास जी सुखें किंवा दुःखें प्राप्त होतात, तीं कांहीं अगम्य शक्तीवर अवलंबून नसतात; उलटपक्षी ती आपणांवरच अवलंबून असतात, म्हणजे आपल्या स्वतांच्याच चांगल्या किंवा वाईट कृत्यांची ती फळे असतात हे मत लोकांच्या मनांत ठसल्याने सहजच ते चांगल्याकडे संमुख व वाईटापासून पराङ्मुख होतात. आपणांस जें सुख प्राप्त होते ते यदृच्छेनें प्राप्त न होतां आपणच पूर्वी केलेल्या पुण्यकर्माचे फळ असते, असा लोकांचा विश्वास बसला, म्हणजे ते स्वावलंबी होऊन चांगले करण्याकडे प्रवृत्त होतात. तसेच जे दु:ख आपल्या भोगास येते, तेही यादृच्छिक नसून आपल्याच वाईट कृत्यांचे फळ असे लोकांच्या मनांत ठसलें म्हणजे ते वाईटापासून सहजच पराङ्मुख होतात. शरीरास जे नानाविध व्याधि भोगावे लागतात तेही यादृच्छिक नसून आपल्या वाईट कृत्यांचे फळ असे लोकांच्या मनांत ठसले म्हणजे वाईटापासून ते सहजच पराङ्मुख होतात. शरीरास जे नानाविध व्याधि भोगावे लागतात ते आपल्याच गैर वर्तनामुळे किंवा दुष्ट अनादिकांचे सेवनापासून उप्तन्न होतात. तसेच भगवद्गीतेत.

  युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
  युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।

  या श्लोकांत वर्णिलेल्या पद्धतीस अनुसरून ज्याचा आयुष्यक्रम आहे, तो निरोगी शरीर व प्रफुल्लित मन ह्यांच्या योगाने सदा सुखी असतो. शरीराची सरोगता किंवा निरोगता, सुखावस्था किंवा दुःखावस्था, ह्यांचा नियमितपणा किंवा अनियमितपणा ह्यांच्याशी निकट संबंध जेव्हांच्या तेव्हांच प्रत्ययास येतो, तेणें 
     प्रकरण दुसरें.     ६३
करून नियमितपणांकडे मनुष्याची प्रवृत्ति होते; परंतु संसारांत प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांचा संबंध पूर्वीच्या काळी केलेल्या सत् किंवा असत् कृत्यांवर अवलंबून असतो हे इतकें स्पष्टपणे लोकांस दिसत नाही. तथापि सुखदुःखें हीं पूर्वीच्या आपल्या कृत्यांवर अवलंबून असतात,हे तत्व लोकांच्या मनांत पूर्णपणे बिंबून गेले असले तर परिणाम चांगला होणार नाही काय ? सुखाचे समय उच्छृखल न होतां मनाची शांत वृत्ति सदैव कायम राखण्यास पूर्वी आरंभिलेल्याचा हा परिणाम आहे, असे जर मनुष्याच्या मनाने घेतले तर ते किती इष्ट आहे बरें ? त्याच्या चित्ताची समतोलता प्रारब्धाच्या तत्त्वाने किती सुंदर रीतीने राहील बरें ? पूर्वी आरंभिलेलें कृत्यच फळास येते हे तत्व लोकांच्या मनांत बिंबून गेल्याची व हे तत्त्व नेहमी लोकांच्या डोळ्यांपुढे उभे असण्याच्या इष्टतेची “प्रारब्ध" हा शब्द साक्ष देतो; परंतु कालावधीने " प्रारब्ध" ह्या शब्दाचा मूळचा अर्थ नष्ट होऊन दैव, नशीब ह्या शब्दांशीं तो समानार्थक झाला. त्या शब्दाच्या योगानें जें तत्त्व मतांत ठसणे इष्ट होते, ते ठसेनासे झाले. मनुष्यास एकापेक्षा अधिक जन्म प्राप्त होतात ह्या सिद्धान्तापासून “प्रारब्ध" शब्दाची उप्तात्त आहे हे सांगणे नकोच.

 प्राक्तन, भवितव्यता: -वर प्रारब्ध शब्दाचे जे उद्घाटन केलें तेच प्राक्तन व भवितव्यता ह्याही शब्दांस लागू आहे. प्राक्तन शब्दाचा अर्थ " पूर्वीचा " असा आहे. " भवितव्यता " ह्याचाही अर्थ “मागील कृत्यापासून जें निश्चयाने घडून यावयाचे तें" असा आहे.

 नीतिगर्भ शब्दांचे विवरण याच्याहीपेक्षा अधिक विस्तारेंकरून करण्यास जागा आहे हे विद्वान् वाचकांच्या सहज लक्षांत येण्याजोगे आहे. आम्ही ह्या विषयांत फार खोल गेलों नाहीं याचे कारण असे की, आमचा हा साकल्येंकरून
६४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

शब्दांचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न नाहीं. भाषाशास्त्राच्या ज्या शाखेकडे अद्याप आपल्या लोकांचे मुळीच लक्ष गेलेले नाहीं तिकडे ते जाणे किती आवश्यक व इष्ट आहे व किती लाभप्रद असून मनोरंजक आहे हे दाखविण्याचा आमचा मुख्यत्वेकरून प्रयत्न आहे. भाषेच्या शब्दांचे परीक्षण केल्यापासून नानाविध माहिती कशी मिळण्याजोगी आहे हे कांहीं उदाहरणांनी वाचकांच्या प्रतीतीस आणून दिलें म्हणजे आमचा इष्ठ हेतु सिद्धीस गेला असे आम्हीं समजतों.

ह्या भागांत शब्दांचे जें उद्घाटन केले आहे, त्यावरून भाषेतील शब्दांचे ठायीं नीतीचे किंवा अनीतीचे बीज आढळते असे वाचकांस आढळून येईल. शब्द हे जगांतील सुखदुःखाच्या व मनुष्यांच्या चांगल्या किंवा वाईट मनोविकारांच्या प्रतिमाच होत. जगाची स्थिति व मनाची स्थिति ह्या तोलण्याचा तराजू म्हणजे भाषेतील शब्द. शब्दांच्या परीक्षणापासून एकाद्या देशाची नैतिकदृष्ट्या स्थिति कशी आहे, हे आपणास ठोकळ मानाने ठरवितां येते व कधी कधी तर इतर साधनांवरून मिळणाऱ्या माहितीपेक्षां शब्दाच्या अभ्यासापासूनच अधिक सूक्ष्म माहिती मिळते.




प्रकरण तिसरें.
---------------
वृत्तगर्भ शब्द.

 मागच्या दोन प्रकरणांत आम्हीं कवित्वगर्भ व नीतिगर्भ शब्दांविषयी ऊहापोह करून शब्दांचे ठायीं कवित्व म्हणजे चारुतामूलक कल्पना व लोकांचा उच्चावचस्थिति हीं कशी प्रतिबिंबित झालेली असतात याची परिस्फुटता केली. आतां ह्या प्रकरणांत वृत्तगर्भ शब्दांविषयी ऊहापोह करावयाचे आम्हीं योजले आहे. म्हणजे आम्ही शब्दांच्या परीक्षणापासून गत गोष्टींचे ज्ञान कसे प्राप्त होते, हे दाखविणार आहों. वृत्ताची व्याप्ति कवित्व व उच्चावचभाव ह्यांचेपेक्षा अधिक आहे व ती अधिक आहे हे पुढील विवरणावरून स्पष्ट होईलच. आतां ह्या प्रकरणांत कोणचा विषय येईल, हे अधिक खुलासा करून सांगणे इष्ट आहे व तशीच पुढील विषयांची सदरे आम्ही कशी पाडणार आहों याचेही थोडक्यांत दिग्दर्शन करणे आवश्यक आहे; कारण तसे केले असतां आमच्या वाचकांस ह्या भागांतील विषयाचे सुलभ रीतीनें ग्रहण करता येईल.

 वृत्त म्हणजे गतगोष्टी किंवा गतगोष्टींचे ज्ञान. वृत्त शब्दामध्ये आम्ही ज्या वस्तूंचा अंतर्भाव करतो, त्या ह्या:--प्राचीन काळचा व अर्वाचीन काळचा इतिहास, नानाविध स्थळांची माहिती, आपल्या चालीरीति, आपले आचारविचार, आपली मानलेली कर्तव्ये, आपल्या देशासंबंधी इतर प्रकारची माहिती, इत्यादि. ही वृत्त शब्दाची व्याप्ति मोठी आहे, असे वाचकांस तेव्हांच कळून येईल. ह्या प्रकरणांत प्रथम आम्हीं आर्य लोकांचे मध्य एशियांतून भरतखंडाप्रत आगमन, आपणा भारतीय 
६६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

लोकांचा युरोपी लोकांशी जातिसंबंध व भाषासंबंध इत्यादिकांविषयी शब्दांच्या परीक्षणापासून माहिती आपणास कशी मिळते हे दाखवू; (२) नंतर मुसलमानांचा व आपला संबंध कोणच्या प्रकारचा होता, हे शब्दपरीक्षणापासून कसे व्यक्त होते हे दाखवू ; ( ३ ) नंतर आपले जुने आचार कसे होते व हल्ली त्यांत कांहीं फेरफार झाला आहे किंवा नाही हे सांगू; ( ४ ) नंतर आपल्या देशाची हवा, पाणी हीं शब्दांत कशी प्रतिबिंबित झाली आहेत हे दाखवू ; (५) नंतर वृत्तगर्भ शब्दांचीं कांहीं संकीर्ण उदाहरणे देऊ; ( ६ ) मग आपल्या असत्य कल्पना शब्दांवरून कशा व्यक्त होतात हे दाखवून असत्याचे पायावर अस्तित्वात आलेल्या शब्दांस भाषेतून हाकलून लावावे किंवा कसें ह्या आगंतुक प्रश्नासंबंधाने आमचे मत काय आहे हे सांगू; आणि सरतेशेवटीं समग्र विषयाचा उपसंहार करू. आम्ही ज्या क्रमाने वृत्तगर्भ शब्दांचे उद्घाटन करणार त्याचे हे दिग्दर्शन झाले. आतां पहिल्या सदराकडे वळतो.

 अर्वाचीन हिंदू व अर्वाचीन यूरोपी लोक हे प्राचीन काळीं एकाच ठिकाणी राहत असत व एकच माषा बोलत असत; त्यांच्या मूलस्थानीं जनविस्तार झाल्यामुळे, किंवा आपसांत तंटे झाल्यामुळे, किंवा अधिक सुपीक प्रदेशांत वास्तव्य करावे असे त्यांच्या मनांत आल्यामुळे ते आपले मूलस्थान सोडून दूरदूरच्या देशांत राहावयास जाऊ लागले. त्या लोकांच्या मुख्य दोन शाखा होऊन एक आग्नेयीकडे गेली व एक वायव्येकडे निघाली. ज्या शाखेनें आग्नेयीकडे प्रयाण केले, ती शाखा अफगाणिस्तानांत व पंजाबांत कांहीं काळ राहिली. परंतु मागून येणाऱ्या त्याच लोकांच्या आणखी आणखी टोळ्यांचा पाठीवर दाब पडल्यामुळे त्यांस तेथून आणखी 
     प्रकरण तिसरें.     ६७
पूर्वेकडे जाणे भाग पडलें. कांहीं लोक तेथेच आपले वास्तव्य कायमचे करून राहिले व कांहीं पूर्वेकडे म्हणजे हिंदुस्तानांत येऊ लागले. अशा रीतीने पूर्व दिशेकडे प्रयाण करतां करता ते लोक थेट गंगा व ब्रह्मपुत्रा ह्या नद्यांच्या मुखांपर्यंत जाऊन ठेपले व अशा रीतीने सिंधु नदापासून तों तहत ब्रह्मपुत्रा नदापर्यंतचा सर्व प्रदेश त्यांनी व्यापून टाकला. वाटेत त्यांना जे मूळचे रहिवासी भेटले त्यांनी अडथळा केल्यास त्यांचा पराभव करून त्यांस डोंगरांत व रानांत, दऱ्यांत व खोऱ्यांत हांकून लावलें, व अडथळा न केल्यास त्यांना आपल्या समाजांत अंतर्भूत करून घेऊन त्यांनी कालावधीने सर्व प्रदेश आपलासा करून टाकला. त्यांचे वास्तव्य ह्या प्रदेशाने नियंत्रित असे एक हजार वर्षेपर्यंत होते. पुढे कांहीं साहसी व महत्वाकांक्षी लोकांच्या झुंडीच्या झुंडी विंध्यपर्वताचे दक्षिणेस येऊन दक्षिणेमध्ये कायमचे वास्तव्य करून राहिल्या; परंतु विंध्यपर्वताच्या उत्तरेस त्यांनी ज्याप्रमाणे मूळच्या रहिवाशांचा बहुतेक उच्छेद करून टाकला किंवा आपल्या समाजांत त्यांस अंतर्भूत करून घेतले किंवा हलक्या व रानटी स्थितीत राहावयास लावलें, त्याप्रमाणे त्यांस विंध्यपर्वताच्या दक्षिणेस करतां आलें नाहीं. मूळच्या रहिवाशांची जी मोठमोठी राज्ये होतीं तीं ह्या लोकांच्या बळापुढे टिकाव धरण्याइतकीं समर्थ असल्यामुळे म्हणा, किंवा कालगतीने ह्या आर्य लोकांचा प्राथमिक कस व कुवत नष्ट झाल्यामुळे म्हणा, किंवा त्यांच्या प्रकृति सौम्य झाल्यामुळे म्हणा, किंवा दाक्षिणात्यांच्या आरंभशूरत्वाचा प्रवाद रूढ करण्याकरितां म्हणा, हीं मूळच्या रहिवाशांची राज्ये व त्यांचे समाज व त्यांच्या भाषा ह्यांचा त्यांचे हातून उच्छेद झाला नाहीं. हीं पूर्वीप्रमाणेच कायम राहिंलीं. म्हणजे जुन्या लोकांचे समाज
६८     मराठी शब्दांचे उद्घाटन.

व राज्ये व भाषा हीं आणि नव्या लोकांचे समाज व राज्ये व भाषा हीं शेजारी शेजारीं नांदत राहिली. एतद्देशीय जुने लोक अद्यापीही दक्षिणेत आहेत; त्यांचे समाज आहेत, त्यांची राज्ये आहेत व त्यांच्या भाषाहीं जागत्या असून अभियुक्त आहेत.

 हिंदुस्तान देशांत येऊन वास्तव्य करून राहणाऱ्या लोकांचा वर जो इतिहास दिला आहे तो याच शतकांत ठरविला गेला आहे व हा इतिहास ठरविण्यास साधनीभूत होण्याचे श्रेय सर्वथैव शब्दांवर आहे. ह्या प्राचीन इतिहासाचे निरूपण करणारे ग्रंथ आपणाजवळ नाहींत. हा इतिहास केवळ शब्दांच्या अभ्यासावरून निश्चित झाला आहे व त्याचा निश्चितपणा ग्रंथांच्या आधारावरून अप्रत्यक्ष रीतीने समर्थित करता येतो. शब्दांच्या अभ्यासावरून हा इतिहास जो आपणांस मिळाला आहे तो फार महत्वाचा आहे; चार हजार वर्षांपूर्वी घडलेला वृत्तांत आज आपणांस जाणण्याची दुसरी कांहींएक साधने विद्यमान नाहींत, तथापि केवळ शब्दांच्या अभ्यासापासून तो वृत्तांत जणू काय आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याप्रमाणे आपणांस दिसत आहे! आतां शब्दांच्या अभ्यासापासून हा वरील वृत्तांत कसा समजतो हे आपण पाहूं; परंतु आधी आम्हीं हें सांगितले पाहिजे की, प्रस्तुत विषयाचे निरूपण हे आमच्या मुख्य विषयाचे एक उपांग आहे. हे निरूपण सापेक्षभाषापरिज्ञानाच्या शास्त्राचा विषय आहे व आमचा हा ग्रंथ सामान्यतः भाषापरिज्ञानावर असल्याकारणाने सापेक्षभाषापरिज्ञानामध्ये आम्ही शिरलों असतां विषयांतर केल्याचा दोष आम्हांवर येईल; परंतु अंगाचे विवरण करीत असतां उपांगाचे विवरण अगदीच अप्रस्तुत होईल असे आम्हांस वाटत नाहीं आणि दुसरे असे की, ते उपांग अतिशय महत्वाचे, उपयुक्त व 
     प्रकरण तिसरें.     ६९
मनोरंजक असल्याकारणाने त्याचे विवेचन जरी मर्यादेच्या पलीकडे थोडेसे गेलें तरी सुज्ञ वाचक आम्हांवर रुष्ट होणार नाहींत अशी आम्हांस उमेद आहे.  हिंदुस्तानांत येऊन वर सांगितलेल्या रीतीने जे लोक कायमचे वास्तव्य करून राहिले ते लोक पूर्वी एशिया-खंडाच्या मध्यभागांत राहत असत. तेथे त्यांच्या आसपास राहणारे जे लोक होते त्यांस “तुराणी" अथवा “त्युरेनियन" असे नांव असे. हा शब्द ज्या धातूपासून झाला आहे त्याच धातूपासून " त्वरा म्हणजे जलदी व “ तुरंगम" म्हणजे घोडा हेही शब्द झाले आहेत. ह्यावरून असे व्यक्त होते की, तुराणी लोक हे त्यांच्या शेजाऱ्यांपेक्षा कमी सुधारलेले असून, ते टोळ्यांटोळ्यांच्या रूपाने राहत असून त्यांचे कायमचे वास्तव्य एके ठिकाणी नसे. आज एका टोळीचा एके ठिकाणीं मुक्काम, कांही दिवसांनी दुसऱ्या ठिकाणीं ह्याप्रमाणे ते नेहमी स्थलांतर करीत असत. येणेप्रमाणे सदैव स्थलांतर करीत राहणारे लोक हे अगदी रानटी स्थितीच्या किंचित् वरचे होत व सुधारणेच्या दृष्टीने ह्या स्थितीच्या वरची स्थिति शेतकीवर चरितार्थ करून राहणाऱ्या लोकांची होय; कारण समाजघटना ही सृष्टिनियमाप्रमाणे उत्तरोत्तर स्थिरावत जाते व समाजवृद्धीमुळे कायमचे वास्तव्य एका जागी करून राहण्याची आवश्यकता उत्पन्न होते व तेणेकरून शेतकीकडे लोकांचे लक्ष्य लागते. शेतकीवर चरितार्थ करून राहणा-या लोकांची स्थिति सदैव भटकत राहणाऱ्या लोकांच्या स्थितीपेक्षां वरच्या पायरीची होय. असो, एशिया-खंडाच्या मध्यभागी राहणाऱ्या लोकांची चार हजार वर्षापूर्वी कशी समाजघटना होती, हे त्या लोकांचे वाचक शब्द आपणांस ठाऊक आहेत त्यावरून व्यक्त होते. तुराणी 
७०     मराठी शब्दांचे उद्घाटन.
लोक हे रानटी स्थितींतील असून सदैव भ्रमण करीत असत, हें "तुराणी " ह्या शब्दावरून व्यक्त होते. कारण “तुराणी" ह्याचा अर्थ भटकणारा किंवा घोड्यावर बसून धावणारा असा होतो. तुराणी लोकांची ४००० वर्षांमागची स्थिति तुराणी ह्या शब्दावरून व्यक्त होते. त्यांचे शेजारी असलेले लोक हे कृषिकर्मावर आपला चरितार्थ करीत असत, असे त्यांचा वाचक जो "आर्य " शब्द त्यावरून व्यक्त होते. हा शब्द नांगरणे ह्या अर्थाचा जो " अर्" धातु ( ल्याटिन् आरो ) त्यापासून झालेला आहे. आणि म्हणून " आर्य " ह्या शब्दाचा अर्थ शेतकी करणारे असा होतो.

 ह्याच आर्यलोकांची एक शाखा आग्नेयीकडे निघाली. तिने आफगाणिस्तान व हिंदुस्तान व्यापिलें व दुसऱ्या शाखेनें वायव्येकडे प्रयाण करून यूरोप-खंड व्यापिलें. ही गोष्ट ह्या दोन्हीं शाखांनी आपआपल्या भाषा ज्या प्रगल्भ दशेत आणल्या त्यांच्यांतील शब्दांची परस्परांशी तुलना केली असतां व्यक्त होते. आग्नेयी दिशेने आलेल्या शाखेच्या प्रगल्भ अशा प्राचीन भाषा दोनः संस्कृत आणि झेंद; तसेच वायव्य दिशेने गेलेल्या आर्य लोकांच्या प्रगल्भ अशा प्राचीन भाषा दोनः ग्रीक आणि ल्याटिन. संस्कृत, झेंद, ग्रीक आणि ल्याटिन, ह्या चार भाषांतील शब्दांची परस्परांशी तुलना केली असतां कांहीं विलक्षण सादृश्य आढळून येते व ह्या सादृश्याचा उलगडा भाषैक्याचा व जात्यैकाचा सिद्धांत स्वीकारल्याशिवाय करता येत नाहीं.

 दोन राष्ट्रांचा सांनिध्यामुळे किंवा व्यापारामुळे किंवा जेतृत्वामुळे किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने, बराच वेळ संबंध घडल्याने त्या राष्ट्रांच्या भाषांमध्ये दान आणि आदान ह्या क्रियांनी कांहीं शब्द समान होतात; परंतु हे शब्द नवीन शोधून काढ 
     प्रकरण तिसरें.     ७१
लेल्या किंवा माहीत झालेल्या पदार्थाचे किंवा कलेने बनविलेल्या नवीन पदार्थांचे वाचक असतात ; किंवा राज्यप्रकरणी योजले जाणारे ते शब्द असतात ; किंवा सूक्ष्म विचारांचे वगैरे वाचक असतात. हे शब्द समाजव्यवस्था पुष्कळ सुधारल्यावर समाजास अवश्य लागणारे असे असतात व अशा रीतीच्या शब्दसादृश्यावरून जात्यैक किंवा भाषैक्य स्थापित करतां यावयाचें नाहीं; परंतु जर हे सादृश्य अत्यंत खालच्या प्रतीच्या समाजाससुद्धां आवश्यक अशा शब्दांत दृष्टिगोचर झाले, तर ते सादृश्य आपणांस जात्यैक व भाषैक्य ह्या कारणांपासून अस्तित्वांत आले आहे, असे अवश्यमेव कबूल केले पाहिजे. अत्यंत जवळची नाती दाखविणारे शब्द जे दोन वर्षांच्या मुलाच्या बोबड्या वाचेने उच्चारले जातात, अगदी साधी संख्यावाचके ज्यांच्याशिवाय अत्यंत रानटी लोकांचा सुद्धां व्यवहार क्षणभरही चालावयाचा नाहीं ; शरीराचे अत्यंत मुख्य भाग व पंचेंद्रियें व त्यांचे व्यापार; भूतलावर सर्वत्र आढळणारे पदार्थ व अत्यंत साध्या क्रिया (ज्या क्रिया केल्यावांचून कोणाही मनुष्याला एक दिवससुद्धां जिवंत राहतां यावयाचें नाहीं, अशा क्रिया ) यांचे वाचक शब्द जर दोन भाषांत समान आढळतात, तर त्या दोन भाषा पूर्वी एकच होत्या व त्या भाषा बोलणारे लोक सुद्धा जातीने एकच होते असे आपणांस बिनधोक अनुमान करतां येईल; अनुमान करता येईल इतकेच नव्हे तर भाषैक्याचा व जात्यैक्याचा सिद्धांत आपल्या बुद्धिमंदिरांत जणों काय येऊन घुसेल. हा सिद्धांत स्वीकारल्यावांचून गत्यंतर नाहीं; कारण हा सिद्धांत स्वीकारल्यावांचून ह्या सादृश्याचा उलगडा पडावयाचाच नाहीं.  संस्कृत, झेंद, ग्रीक व ल्याटिन ह्या भाषांतील शब्दांवरून त्या भाषा बोलणारे लोक प्राचीन काळीं एकाच समाजाचे घटक 
७२     मराठी शब्दांचे उद्घाटन.
अवयव होते, हे सिद्ध होते व हे पुष्कळच शब्दांवरून सिद्ध होते. ह्या चारी भाषांमध्ये निषेधार्थक न, व धातूंचे अर्थ बदलणारे उपसर्ग सम्, परि, उपरि, प्र, अंतर्, हे समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये मास इत्यादि नेहमी प्रचारांत लागणारी कालगणनांची साधने दाखविणारे शब्द समान आहेत; ह्या चारी भाषांमध्ये दम् ( घर, दंपती ह्यांतील पहिला शब्द ) चाक वगैरे रानटी स्थितीतून वर चढून सुधारणेच्या पंथास लागलेल्या लोकांच्या व्यवहारांतील शब्द समान आहेत. ह्याशिवाय ह्या चारी भाषांमध्ये भूतलावर सर्वत्र आढळणाऱ्या पदार्थांचे व दुसरे कांहीं किरकोळ शब्द समान आहेत. पिता, माता, भ्राता, नातू, जांवई, सासरा इत्यादि अत्यंत जवळची नाती दाखविणारे शब्द समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये एक, दोन, तीन, चार, पांच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, वीस, शंभर, प्रथम, एकदां, दोनदां, सहावा, सातवा, इत्यादि हरहमेश लागणारी संख्यावाचकें समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये "देव " हा शब्द समान आहे. ह्या चारी भाषांमध्ये, अभ्र, हिम्, ( हिंव ) आप् ( पाणी ) इत्यादि सृष्टीतील स्थूल चमत्कार दाखविणारे शब्द समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये गाय, अश्व, सूकर ( डुकर ) इत्यादि मनुष्यास अति उपयोगी किंवा लवकर माणसाळणारी जी जनावरे त्यांचे वाचक शब्द समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये शिर ( डोके ) आख, हृदय, दांत, अस्थि, पाय, जानु (गुडघा ), श्रोणी ( ढुंगण ), मन, वाचा, इत्यादि शरीराचे महत्वाचे भाग व इंद्रिये दाखविणारे शब्द समान आहेत. ह्या चारी भाषांमध्ये करणें, देणे, मरणे, स्था ( उभे राहणे ), भार घेणे, होणे, असणे, जाणणे, ताणणे, जन्मणे, बस् ( पांघरणे ), ओकणे, मिह् ( शिंपडणें ), सद् ( बसणे ) 
     प्रकरण तिसरें.     ७३
पिणे, तासणे, दिश् ( दाखविणे, सांगणे ), मोजणे, युज् ( जोडणे ), पृ ( भरणे ), विद् ( जाणणे ), त्रस् ( भिवविणें ), रुच् ( शोभविणे ) इत्यादि सामान्य क्रिया दाखविणारे शब्द समान आहेत. पहाट, दिवस, रात्र, पाऊस इत्यादि सृष्टिचमत्कारांची अभिमानी जी दैवते त्यांचे वाचक शब्द समान आहेत.

 ही ह्या चार भाषेतील शब्दांची समानता त्या चारी भाषा बोलणाऱ्या लोकांचे जात्यैक व भाषैक्य व्यक्त करते. हा सिद्धांत कांहीं लहानसान आहे काय? जातिविषयक व भाषाविषयक जे सिद्धांत अर्वाचीन काळीं स्थापित झालेले आहेत, त्या सर्वांमध्ये त्याची योग्यता अधिक आहे. चार हजार वर्षांमागची वस्तुस्थिति कशी होती, हे आपणांस आज निश्चयाने सांगतां येते, आणि हे अमूल्य ज्ञान आपणांस केवळ शब्दांच्या अभ्यासापासून प्राप्त होते. असे जर आहे तर शब्दांची योग्यता कांहीं थोडीथोडकी आहे काय? साध्यत्वाच्या दृष्टीने शब्दांचा अभ्यास करणे हे मोठे लाभप्रद आहे, असे यावरून स्पष्ट होत नाहीं काय ?

 मागे आम्ही असे म्हटले आहे की, मध्य एशियांतून आर्यलोकांच्या ज्या दोन शाखा निघाल्या त्यांपैकीं आग्नेयी दिशेने जिने प्रस्थान केले, तिने कांहीं काळपर्यंत इराणांत व आफगाणिस्थानांत वास्तव्य केलें, व असा सिद्धांत ठरविण्याची प्रमाणेही शब्दसादृश्यावरूनच मिळतात. आग्नेय दिशेने आलेल्या आर्यांनीं अभियुक्त केलेल्या ज्या दोन भाषा झेंद व संस्कृत ह्यांच्यामध्ये जे समान असे शब्द आहेत, ते वायव्य दिशेने गेलेल्या आर्यांनीं अभियुक्त केलेल्या भाषा ज्या ग्रीक आणि ल्याटिन् त्यांच्याशी झेंद व संस्कृत भाषांचे जे समान शब्द आहेत, त्यापेक्षा अधिक आहेत. म्हणजे असे की ग्रीक, ल्याटिन्, झेंद 
७४     मराठी शब्दांचे उद्घाटन.
व संस्कृत ह्या चारी भाषांना समान असे जे शब्द आहेत, त्यांची संख्या झेंद व संस्कृत ह्या दोन भाषांना समान असलेल्या शब्दांच्या संख्येपेक्षा लहान आहे. आणि असे असणे हे साहजिकच आहे. कारण, वायव्यगामिनी शाखेचा व आग्नेयोगामिनी शाखेचा संबंध एकमेकींशीं कमी काळ म्हणजे मध्य एशियांत त्यांचे वास्तव्य असे तोंपर्यंतच असल्या कारणाने त्यांच्यामध्ये समान शब्दांची संख्या कमी असावयाची. व आग्नेयीगामी आर्यांचा संबंध एकमेकांशीं अधिक काळपर्यंत म्हणजे मध्य एशियांत असतांना व इराण आणि अफगाणिस्तानांत असतांनाही असल्यामुळे व भाषेमध्ये नवीन नवीन आचारविचारांचे वाचक शब्द उत्पन्न होत असल्यामुळे त्या लोकांच्या पोटशाखा झाल्या, तेव्हां त्यांच्यामध्ये समान अशा शब्दांची संख्या अधिक असणारच. झेंद आणि संस्कृत ह्या भाषांत समान असलेल्या शब्दांची संख्या पाहिली असतां वरील सिद्धांताची सत्यता स्पष्ट कळून येण्याजोगी आहे. ग्रीक, ल्याटिन् , संस्कृत व झेद ह्या चार भाषांत कोणचे शब्द समान आहेत ते वर सांगितले आहेत. आतां ह्या शब्दांखेरीज जे दुसरे कांहीं शब्द झेद व संस्कृत ह्यांत समान आहेत ते येणेप्रमाणे. पुत्र, मित्र, स्वसृ ( बहीण ) वगैरे अत्यंत जवळची नाती दाखविणारे शब्द ; साठ, सत्तर, ऐंशी, नव्वद, हजार, निमा वगैरे हरहमेश लागणारे संख्यावाचक शब्द; उंट, कासव, कृमि, खर ( गाढव ), गाय, मासा, माशी, मेंढा वगैरे मनुष्यास उपयोगी पडणारे किंवा लवकर माणसाळणारे प्राणी किंवा पृथ्वीवर प्राचुर्याने आढळणारे प्राणी, ह्यांचे वाचक शब्द ; अंगठा, मूठ, श्रवण, स्तन, अश्रु, हाड, गंध, हात, घाम, चक्षु, जिव्हा, तनु, तृष्णा, पार्ष्णि ( टांच ), मेंदु, पाठ, वगैरे शरीराचे महत्वाचे 
     प्रकरण तिसरें.     ७५
भाग, व इंद्रियें, व त्या इंद्रियांचे व्यापार ह्यांचे वाचक शब्द ; आप् ( मिळविणे ) कसणे, चालणे, तापणे, दह् ( जाळणे ), धमणे ( फुकणे ), जाणणे, नमणे, नमस् ( नमस्कार ), पचणे ( शिजविणे ), पडणे, पुसणे ( विचारणे ), पाठविणे, हन् ( मारणें ), बांधणे, मर्दणे, मरणे, रुजणे, वर्षणे, शकणे, शोधणे, स्वन् ( शब्द करणे ), स्वप् ( निजणें ), स्तविणे वगैरे सामान्य क्रिया दाखविणारे शब्द ; दार, धान्य वगैरे सुधारणेच्या पंथास लागलेल्या समाजाचे शब्द ; दारु ( लाकूड ), भूमि वगैरे सर्वत्र आढळणारे पदार्थांचे वाचक शब्द ; आभाळ, उष्णता, तेज, मेघ, वात ( वारा ), क्षपा ( रात्र ), वगैरे सष्टींतील चमत्कार व पंचमहाभूते ह्यांचे वाचक शब्द ; अयस् ( लोखंड ), हिरण्य ( सोने ), वगैरे महत्वाचे धातू ह्यांचे वाचक शब्द ; आराम, शेत, लांब, दूर, नेदिष्ट ( जवळ ), पूर्ण, भिषज्, मर्त्य, महा, यव, जादू, रास्त, श्याम, श्वेत, संगम, सर्व, स्व, क्षीर इत्यादि इतर किरकोळ शब्द ; हे ह्या दोन्ही भाषांत समान आहेत. शब्दांच्या अभ्यासापासून हें जें गत गोष्टीचे ज्ञान आपणांस प्राप्त होते ते किती मौल्यवान् आहे बरें ? येथवर आम्हीं जो विचार केला आहे, तो मुख्यत्वेकरून सापेक्षभाषापरिज्ञानाचा विषय व गौणत्वाने किंवा उपांगत्वाने भाषापरिज्ञानाचा विषय आहे; ह्या उपांगाचा विचार विस्तारें करून केलेला कोठेही आढळत नाही. ह्यासंबंधाने आमच्या वाचकांनी अगदीच अपरिचित राहू नये म्हणून आम्ही इतका विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे. आतां आम्हीं मुख्य विषयाकडे वळतो.  आर्य लोक उत्तर हिंदुस्तानांत शेकडों वर्षे राहून नंतर दक्षिणेत आले. ह्याचा पुरावा आर्यावर्तदक्षिण ह्या शब्दांत 
७६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

आहे. "आर्यावर्त " म्हणजे आर्यांच्या वसतीचे ठिकाण; विंध्य व हिमालय ह्या पर्वतांच्या ओळी ज्याच्या दक्षिणोत्तर मर्यादा आहेत, आणि सिंधु व ब्रह्मपुत्रा ह्या नद्या ज्याच्या पूर्वपश्चिम मर्यादा आहेत, असा जो देश त्याचा वाचक "आर्यावर्त " हा आहे व “आर्यावर्त " ह्याचा शब्दार्थ "आर्यांचा आवर्त " म्हणजे वसतिस्थान असा आहे. वर निर्दिष्ट केलेल्या प्रदेशांत आर्यांचे पुष्कळ दिवस वास्तव्य झाल्याकारणाने त्यास सहजच " आर्यावर्त" असे नांव प्राप्त झाले व पुढे आर्यलोक विंध्यपर्वतास ओलांडून दक्षिणेत येईतोंपर्यंत आर्यावर्त हें नांव, विंध्य व हिमालय, ह्यांच्या मधील प्रदेशास रूढ झाल्यामुळे त्याची व्याप्ति विंध्याच्या दक्षिणेकडील आर्यांच्या वसतिस्थानावर होऊ शकेना. आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील प्रदेशास म्हणजे विंध्याच्या दक्षिणेकडील प्रदेशास " दक्षिणापथ " किंवा "दक्षिण " असे नांव प्राप्त झाले. तेव्हा " दक्षिणापथ" किंवा " दक्षिण " हीं नांवें आर्यावर्ताच्या अपेक्षेने दिलेली आहेत हे उघड आहे. आर्यलोक दक्षिणेकडून हिंदुस्तानांत प्रवेशून नंतर विंध्यपर्वताच्या पलीकडे गेले असते तर विंध्याच्या खालच्या प्रदेशास “आर्यावर्त" असे नांव पडून विंध्य व हिमालय यांच्या मध्यगामी प्रदेशास “उत्तरापथ" किंवा "उत्तर" असे नांव पडले असते.

 विंध्यपर्वतास किंवा निदान त्याच्या कांहीं भागास पारियात्र असे दुसरें एक नांव आहे. याचा अर्थ “ यात्रेची मर्यादा" असा होतो. ह्यावरून सुद्धा हेच सिद्ध होते की, आर्यलोकांचा विस्तार या पर्वताने पुष्कळ काळपर्यंत मर्यादित व कुंठित झाला होता. 
     प्रकरण तिसरें.     ७७
आकाशाच्या दक्षिणगोलार्धात " नौका ” म्हणून एके तारकापुंज आहे. त्यामध्ये अगस्य म्हणून एक तारका आहे. ही तारका पहिल्या प्रतीची आहे. आर्यलोकांनीं विंध्यपर्वत ओलांडला, तेव्हां अति भव्य व अति तेजस्वी असे नवे तारकापुंज त्यांच्या दृष्टीस पडले. प्रथमच दक्षिणेकडे जे आर्य आले त्यांस अफाट अंतरिक्षांतील भव्य व मनोहर देखावा पहिल्यानेच जेव्हां दृष्टिगोचर झाला, तेव्हां त्यांच्या चित्तवृत्तीस किती आनंद झाला असेल? त्यांच्या ह्या आनंदाचे द्योतक " अगस्त्य " या नांवामध्ये आपणांस सांपडते; अत्यंत दक्षिणेकडची, अत्यंत तेजस्वी, क्षणाक्षणांत तांबडा, पिवळा, निळा, अस्मानी, हिरवा, असे वेगळे वेगळे रंग दाखविणारी व अंतरीक्षांतील असंख्य तारकांवर जणों साम्राज्य भोगणारी ही मनोहर तारका जर इहलोकींच्या मनुष्याच्या नांवाने निर्दिष्ट करावयाची होती तर तिला कोणच्या भाग्यशाली पुरुषाचे नांव देणे साहजिक होते ! ज्या साहसी पुरुषाने आर्यलोकांस ह्या नव्या व सुपीक देशाची ओळख करून दिली, त्याचेच नांव तिला देणे साहजिक होते. तर ह्या " अगस्त्य" नांवावरून असे उघड आहे की "अगस्त्य " या नांवाच्या आर्यपुरुषाने प्रथम विंध्यपर्वताच्या दक्षिणेकडे आगमन केलें. हे अनुमान खरे आहे असे दुसऱ्या अनेक प्रमाणांवरून ठरलेलें आहे.  आर्यलोक हे उत्तरेकडून दक्षिणेकडे आले, दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले नाहीत, हे ठरविण्याचे दुसरें एक साधन आहे. हिमालय आणि विंध्य ह्यांच्या मधील प्रदेशांत वर्षाच्या साऱ्या ऋतूंमध्ये हिंवाळा हा मुख्य लक्षांत धरण्यासारखा आहे. म्हणून वर्षाची गणना ह्या ऋतूवरून होऊ लागली 
७८     मराठी शब्दांचे उद्घाटन.
व सहजच " शरद् " हा शब्द वर्षाचा वाचक झाला. परंतु विंध्याच्या दक्षिणेकडे विशेष लक्षांत बाळगण्याजोगा ऋतु पावसाळा होय. त्यामुळे वर्षास त्या ऋतूचें नांव ( वर्षा ) असे पडले. आणि शरद् व वर्षा ह्या दोन शब्दांमध्ये पहिला अधिक प्राचीन शब्द आहे असे आपणांस अन्य आधारांवरून ठरविता येते. तर “ वर्षा " हा शब्द नंतरचा असल्याकारणाने आर्यलोक पूर्वी विंध्याच्या उत्तरेस असून, नंतर दक्षिणेस आले असे सिद्ध होते. आपल्या बायका, मूल शिंकलें असतां " सत्तंजी" असे म्हणतात. हा शब्द “ शतं जीव

शरदः शतं " ह्या वैदिक आशीर्वादाचा अपभ्रंश आहे. आशीर्वादांत " शरद् " शब्द वर्ष ह्या अर्थाने योजलेला आहे.

 येथवर शब्दांवरून हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास कसा कसा समजतो हे आम्हीं वाचकांस स्पष्ट करून सांगितलें. आतां अर्वाचीन काळचा इतिहास शब्दांवरून कसा समजतो हे सांगतों.

 प्रथम महाराष्ट्र शब्द आपणांस कोणचे गतवृत्त सांगतो हे पाहूं. "महाराष्ट्र" ह्या शब्दाचा लौकिक अर्थ, मोठे राष्ट्र असा आहे; परंतु खरा अर्थ तसा नाहीं. हल्लीं ज्या देशास आपण "महाराष्ट्र" असे म्हणतो, तेथे सुमारे २१५० वषीपूर्वी “रट्ठ " नांवाचे पराक्रमी लोक राहत असत. भोजलोकांनी जसे आपणांस " महाभोज " हे नांव घेतलें त्याचप्रमाणे “ रठ्ठ" लोकांनी आपले महत्व दाखविण्यासाठी आपणांस व आपल्या देशास "महारठ्ठ" असे नांव घेतलें. " महारठ्ठ" या शब्दाचे वर्णसादृश्यावरून " महाराष्ट्र" असे रूपांतर केले जाऊन हा “ महाराष्ट्र " असा शब्द ग्रंथांत व शिलालेखांत व ताम्रपटांत योजला जाऊ लागला, 
     प्रकरण तिसरें.     ७९

 भूमीच्या पृष्ठभागावर अनादिकाळापासून वेगळ्या वेगळ्या द्रव्यांचे वेगळे वेगळे थर एका मागून एक बसत गेले, त्यांच्या परीक्षणावरून भूगर्भशास्त्रवेत्त्यांस भूमीच्या विशिष्ट प्रदेशास कोणकोणत्या दशा प्राप्त झाल्या हे समजते. या दशा येण्यास कोणकोणच्या प्रेरणा किती किती अंशाने कारणीभूत झाल्या हें ठरविता येते. त्याचप्रमाणे भाषाशास्त्रवेत्त्यांस शब्दांपासून ज्ञान प्राप्त होते. आपली मराठी भाषा ही अनेक भाषांच्या संयोगापासून बनलेली आहे. ह्या भाषांतील शब्दांचे थर जे मराठी भाषेच्या पायावर एका मागून एक बसत गेले त्यांवरून आपणा मराठ्यांच्या डोक्यांवरून कोणकोणत्या राजकीय, सामाजिक, नैतिक व धार्मिक लाटा येऊन गेल्या, त्यांचे स्वरूप उत्कृष्ठ रीतीने ठरविता येईल आणि हें स्वरूप इतके हुबेहुब ठरवितां येण्याजोगे आहे की त्यावरून आपल्या महाराष्ट्र देशाचा इतिहास आपणांस रचितां येईल. आम्हीं या विषयांत फार खोल न जातां साधारण अवलोकनाने ज्या गोष्टी सिद्ध होण्याजोग्या आहेत त्यांचे थोडक्यांत दिग्दर्शन करतों.

 मराठी भाषेमध्ये जे फारशी किंवा आरबी शब्द सामील झाले आहेत, त्यांवरून आपणां मराठ्यांचा व मुसलमानांचा संबंध कोणत्या प्रकारचा होता, हे आपणांस ठरविता येईल; सर्व बखरी, इतिहास आणि इतर तज्जातीय ग्रंथ जरी ठार बुडून गेले असते, तरी आपणांस मराठी भाषेत सामील झालेल्या शब्दांवरून मुसलमानांचा व आपला संबंध काय होता, हे ठरवितां आले असते. मुसलमानी लोक कांहीं काळपर्यंत आपले राजे होते. ते आपल्या देशाचे स्वामी होते. त्यांनी राजकीय व्यवस्थेसाठी देशाचे विभाग केले होते. शेतकी जमीनीवर त्यांची मालकी होती, दिवाणी व फौजदारी खटल्यांचे 
८०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

निवाडे करण्याचा अधिकार त्यांजकडे होता व हे निवाडे करण्याची पद्धतीही त्यांचीच होती; बहुमानाच्या पदव्या तेच आपणांस देत होते, हे भाषेत सामील झालेल्या शब्दांचे अर्थ व संख्या हीं पाहिली असतां लक्षांत येण्याजोगे आहे. ह्या एकंदर शब्दांच्या बिनबाकी यादी देणे अशक्य आहे. त्या वाचकांनी कै. गोविंद शास्त्री बापट यांच्या व्युत्पत्तिंप्रदीपांत पाहाव्या. येथे कांहीं कांहीं निवडक शब्द मात्र देतो. देशाचे राजकीय विभागांचे वाचक शब्द, इलाखा, जिल्हा, तालुका, मौजे, कसबा, महाल ई०; न्याय पद्धतींतील पारिभाषिक शब्द अदालत, फिर्याद, अर्ज, इनसाफ, कज्जा, कबुलायत, कानू, कायदा, जप्ती, मंजूर, जामीन, वकील, सवाल, शाबीद, वारस, लवाद, दस्तैवज, फारखत, फैसल्ला, मुनसफ, दिवाणी, फौजदारी, सजा, कैद इ०; शेतकीच्या व्यवस्थेचे शब्द मीरास, मशागत, जमीन, कर्याद, बागाईत, जिराईत, तक्षीम, वसूल इ०; पदव्या व पदव्यांचा संमान व तत्संबंधी इतर प्रकारचे शब्द अज्जम, अदबी, अमीर, उमराव, किताब, खासास्वारी, ताजीम, तैनात, दर्जा, मरातब, हुद्दा, नाझर, फडणीस इ०.

 या वरील शब्दांच्या संग्रहाचे वरवर जरी अवलोकन केले तरी हा सिद्धांत कबूल करणे सर्वांस भाग पडेल कीं, मुसलमानी अमलाखालीं आपण कांहीं दिवस होतों; जमीनीची वाटणी करून, त्याचा वसूल घेणे, शेतकऱ्यांवर देखरेख ठेवणे, वगैरे गोष्टीं मुसलमानी पद्धतीवर होत असत, त्याचप्रमाणे बहुमानाच्या पदव्या देण्याचा अधिकारही त्यांच्याचकडे असे; वर निर्दिष्ट केलेल्या प्रकारचे शब्द आपल्या भाषेशीं मिलाफ पावून, तिच्याशी एकजीव इतके कसे झाले, ह्या प्रश्नाचा उलगडा वरचा सिद्धांत स्वीकारल्याशिवाय व्हावयाचा नाहीं. 
     प्रकरण तिसरें.     ८१

आपल्या भाषेतील अरबी व फारशी शब्द सहज वरवर जरी चाळले तरी दुसरी एक गोष्ट आपणांस कबूल केल्याविना गत्यंतर नाहीं; ती ही कीं, मुसलमानी लोक आपल्यापेक्षा अधिक ऐषआराम करीत असत. त्यांचा ऐषआरामही त्यांच्या अंगांत अगदीं खिळून गेला होता व त्यांचे ऐषआरामाचे कांहीं प्रकार तर आपणांस अगदी अश्रुतपूर्व असे होते. अत्तर, अंबारी, आषक, आषुक, माषुक, इष्की, ऐषआराम, किंतान, ख्याल, जवाहीर, नक्षी, तबक, तसबीर, तजेला, खुबसुरत, बिदागी, नजराणा, मौज, नूर, तंबुरा, मखमाल, मिना, मेहरप, महाल, इत्यादि शब्दांवरून वर सांगितलेले अनुमान आपणांस सहज करता येते. मराठी भाषेत सामील झालेल्या पारशी व आरबी शब्दांवरून दुसरे असेंही एक अनुमान आपणांस सहज करता येणारे आहे की, सरकारच्या सर्व बाबींचे दफ्तर मुसलमानीमध्ये ठेविले जात असे. कारण हे दफ्तरी शब्द आपल्या भाषेमध्ये भरपूर आहेत. दफ्तर, हिशेब, जमा, खर्च, रकाना इत्यादि. आपणांवरील मुसलमानी अंमल नाहींसा झाल्यावरसुद्धा त्याच पद्धतीवर मराठे व पेशवे ह्यांचे दफ्तर ठेविले जात असे; अजूनसुद्धां-म्हणजे इंग्रजी अमलांतसुद्धां-देशी भाषेतील दफ्तर त्याच पद्धतीवर ठेवले जात आहे. हल्ली सन मात्र येशूख्रिस्ती चालतो.

 ह्याशिवाय दुसराही एक मोठा महत्वाचा मुद्दा आपणांस कळतो; तो हा कीं, मुसलमानी लोक हे आपणांपेक्षां कांहीं प्रकारच्या कलाकौशल्यांत अधिक प्रवीण होते. कांहीं कलाकौशल्ये जी आपणांस मुळीच ठाऊक नव्हती, ती त्यांनी आपणांस शिकविलीं व बांधकामांची त्यांची शैली आपल्या शैलीपेक्षां भिन्न असून ती आपल्याइतकी व कांहीं बाबतीत आपणां
८२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

पेक्षा अधिक सुंदर होती. ह्या सिद्धांताच्या समर्थनार्थ कांहीं शब्द देतों :-रफूगार, शिकलगार, बेलदार, कशीदा, तमाशा, वस्ताद, सुतार, सनई, तासा, तंबुरा, नौबत, किंतान, संजाप, रेशीम, मुलामा, मेणा, कुलूप, कंदील, कनात, पैलू, तावदान, शिसा, बिल्लोर, बर्फी, हैवान, मेहरप, घुमट, दालन, मनोरा, बिनी, इत्यादि. ह्या शब्दांचे अवलोकनावरून वाचकांस असे आढळून येईल की, ह्यांपैकी एखाददुसरा शब्द खेरीजकरून बाकीच्या शब्दांस आपल्या भाषेमध्ये मुळींच पर्यायशब्द नाहींत, आणि नांवाच्या अभावावरून वस्तूचाही अभाव-निदान त्या वस्तूचा आपणांमध्ये कमी फैलाव-सिद्ध होतो.

 वर जीं हीं अनुमानें शब्दांच्या अवलोकनावरून निघणारी आहेत ती सारी खरी आहेत, असे इतिहासावरून आपणांस विदितच आहे.*

-----

 * पुढील उताऱ्यांतून मूर्खपणा व अतिशयोक्ति ह्यांबद्दल सावकारी कटमित बाद केली असतांसुद्धा आमच्या म्हणण्यांस पुष्टि आणणारा बराच भाग राहील असे आम्हांस वाटते.
 Baber's account is amusing, being written with all the violent prejudice still felt by persons just arrived from Kabul or from Europe. " Hindoostan is a country that has few pleasures to recommend it. The people are not handsome. They have no idea of the charms of friendly Society or frankly mixing together, or of familiar intercourse. They have no genius, no comprehension of mind, no politeness of manners, no kindness, no fellow-feeling, no ingenuity or mechanical invention in planning or executing their handicraft works: no skill or knowledge in design or architecture; they have no good horses; no good flesh, no grapes, or musk melons, no good fruits, no ice or cold water, no good food or bread in their bazaars, no baths or colleges, no candles no torches, not a candlestick." He then goes on to ridicule their clumsy substitutes for the last useful articles.

Eskin's Baber P. 333.

     प्रकरण तिसरें.     ८३

आतां आपल्या प्राचीन पद्धति व आचारविचार, अभ्यासक्रम वगैरे हीं शब्दांवरून कशी व्यक्त होतात हे पाहूं.

 श्रुति ह्या शब्दावरून प्राचीन काळचा अध्ययन व अध्यापन पद्धति ही कशी होती हे समजते. " श्रुति " म्हणजे ऐकून संपादावयाचे ज्ञान. “श्रुति " हा शब्द वेदास लावतात. यावरून प्राचीन काळीं पुस्तकावरून अध्ययन करण्याची चाल नसे असे सिद्ध होते. आपले वेद सुमारे ४००० वर्षांपूर्वी रचले गेले, तथापि त्यांत एका अक्षरासंबंधाने किंवा यःकश्चित् कान्यामात्रासंबंधाने पाठभेद नाहीं; यावरून तरी हीच गोष्ट सिद्ध होते. पुस्तकांत लिहिलेला लेख लेखकाच्या निष्काळजीपणामुळे अशुद्ध होतो; परंतु गुरूच्या मुखांतून निघालेला पाठ केवळ कानांनीच ऐकून ग्रहण करावयाचा असतो, ह्यामुळे शिष्यास चित्ताची एकाग्रता करावी लागते व एकाग्रचित्ताने ग्रहण केलेला पाठ शुद्ध असून शिवाय लवकर पदरांत पडतो. अशा रीतीने मागपासून गुरुपरंपरेनें वेदपठण आजपर्यंत चालत आले आहे. पुस्तकांतून पठण करण्याची पद्धति जुन्या लोकांनी निंदिलेली आहेः---
  गीती शीघ्री शिरःकंपी तथा लिखितपाठकः ।
  अनर्थज्ञोऽल्पकंठश्च षडेते पाठकाधमाः ॥

 उपनयन, विवाह ह्या शब्दांवरून आपल्या लोकांच्या प्राचीन सांसारिक आचारांची परिस्फुटता होते. "उपनयन " म्हणजे “ जवळ नेणे." प्राचीन काळीं मुलाची शैशवावस्था अवसित झाली म्हणजे त्यास विद्योपार्जनासाठी गुरूकडे नेत असत व हाच गुरु त्या मुलाची मुंज करीत असे. मुंज झाल्यावर गुरूचे आश्रमीच हा मुलगा कांहीं काळपर्यंत राहत असे व त्याची सेवा करून विद्योपार्जन करीत असे. ते संपूर्ण झाल्या
८४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

नंतर तो स्वगृहाप्रत परत येऊन गृहस्थाश्रमाचा स्वीकार करीत असे. " उपनयन " ह्या शब्दाने आपले प्राक्कालीन आचार कसे असत व हल्ली त्यांत किती फरक पडला आहे, हे वाचकांस कळून येर्हल. त्याचप्रमाणे विवाह, उद्वाह हेही शब्द आपले प्राक्कालीन आचार परिस्फुट करतात. ह्या शब्दांचा अर्थ “वाहून आणणे"" आहे. मुलाने स्वतः हिंडून आपल्या मनाला योग्य वाटेल ती कुमारिका स्वीकारून ती घरी आणून सहधर्मचारिणी करावी अशी चाल असे. हल्लीच्या काळी मुलीचा बाप घरोघर आणि दारोदार हिंडून लोकांचा अपमान निमूटपणे सहन करून तिला योग्य वर पाहतो व " दारिका हृदयदारिका पितुः " ह्या सुभाषित वचनाची प्रतीति अनुभवितो.

 आचार्य ह्याचा अर्थ गुरु, विद्वान् असा आहे. ह्या शब्दावरून पूर्वी विद्यार्थी लोक गुरूपासून कोणच्या रीतीने ज्ञानप्राप्ति करून घेत असत हे आपणांस स्पष्ट समजते. “चर् " धातूस "आ " हा उपसर्ग लागून सेवा करणे असा अर्थ होतो. ह्यावरून " आचार्य " ह्याचा अर्थ सेवा करावयास योग्य किंवा ज्याची सेवा करावयाची आहे तो, असा होतो. गुरूस द्रव्य देऊन त्याजपासून विद्या प्राप्त करून घ्यावयाची हा एक मार्ग आहे व आज हाच सुरू आहे. दुसरा विद्योपार्जनाचा मार्ग गुरूची सेवा करून त्याजपासून विद्यालाभ करून घेणे. हा दुसरा मार्गच प्राचीन काळी होता असे आचार्य शब्दावरून व्यक्त होते. कारण सेवा करावयास योग्य या अर्थाचा आचार्य हा शब्द गुरु ह्या शब्दाशी समानार्थक आहे.

 उपाध्याय आणि आचार्या ह्या शब्दांवरून प्राचीन काळी स्त्रिया सुद्धा विद्वान् असून विद्यादानाचे काम करीत असत असे व्यक्त होते. कारण उपाध्यायानी व आचार्यांनी ह्या शब्दांचा 
     प्रकरण तिसरें.     ८५
उपध्यायाची किंवा आचार्याची स्त्री इतका अर्थ होतो, परंतु "उपाध्याया ” आणि “ आचार्या "' हे शब्द स्वतः विद्वान् असून विद्यादान करणारी स्त्री असा अर्थ दाखवितात. स्त्रिया जर विद्वान् व विद्यादान करण्याचे काम करणाऱ्या नसत्या, तर " उपाध्याया" व " उपाध्यायानी " किंवा " आचार्या " व " आचार्यानी " हे भेदद्योतक शब्द उत्पन्न झाले नसते.

 अंकित हा शब्द संस्कृत अंक् ( खुणा करणें ) या धातूपासून आलेला आहे. आणि " अंकित" म्हणजे ज्यावर कांहीं खुणा केलेली आहे असा. हल्ली आपण " अंकित " ह्याचा मराठींत सेवक असा अर्थ करतो. यावरून पूर्वी राजादिकांच्या सेवकांच्या अंगावर कांहीं तरी सेवकपणाचे चिन्ह असे हें व्यक्त होते.

 भाषेतील शब्दांवरून आपणांस अनेक प्रकारची माहिती मिळते असे आम्हीं वारंवार मागे म्हटलेले आहे. भाषेतील शब्दांवरून देशाची हवा समजते असे आम्ही म्हटले तर कित्येक वाचकांस ते खरे सुद्धा वाटणार नाहीं; परंतु हा त्यांचा अविश्वास निरस्त करण्यास आपणांजवळ शब्दांचे साहित्य आहे. आपण सुखकर वस्तूचे ठायीं शीतता व आर्द्रता ह्या गुणांचा आरोप करतो. उदाहरणार्थ आपण असे प्रयोग करतो :" त्याचे अंतःकरण दयेने आर्द्र झालें"; " दयार्द्र अंत:करणाने त्याने त्या हतभाग्य स्त्रीस दोन आणे दिले "; " हे मूल भुकेने व्याकुळ झाले होते, परंतु त्याला थोडेसे दूध पाजल्याबरोबर ते थंडावलें "; " त्या मुलाचे ते बोबडे बोल ऐकून त्या स्त्रीच्या अंतःकरणास प्रेमाचा पाझर फुटला"; " तो राजाच्या छायेमध्ये आहे " इ०; त्याचप्रमाणे सुंदर स्त्रीच्या मुखास चंद्रबिंबाची उपमा देणे, आलिंगिलेल्या स्त्रीच्या गार अंगाची प्रशंसा करणे,
८६     मराठी शब्दांचे उद्घाटन.
इत्यादीवरूनसुद्धां वरील सिद्धान्ताची सत्यता स्थापित होते. इंग्रेजी भाषेत आपणांस ह्याच्या उलट प्रकार दृष्टीस पडतो; म्हणजे सुखकर वस्तूचे ठायीं उष्णतेचा आरोप केलेला दृष्टीस पडतो. उदाहरणार्थ पुढील प्रयोग घ्या:-Warm friendship ( कढत मैत्री ); Ardent love (ऊनऊन प्रीति); Fervid gratitude ( जळणारी कृतज्ञता ); Hot kisses ( उष्ण मुके ); Glowing embrace (कढत आलिंगन ) Sunny face (सूर्यासारखे तोंड) इ०.याचप्रमाणे पुढील प्रयोगही होतः-- " He was basking in the favour of the king" (तो राजाच्या प्रीतिरूप उन्हांत शेकत होता.) इ०. ही इंग्रेजी व मराठी प्रयोगांमध्ये भिन्नता कां असावी? आपण सुखकर वस्तूचे ठायीं शीतता व आर्द्रता ह्या गुणांचा का आरोप करावा? ह्या शंकेचा उलगडा थोडक्यांत आहे. आपणांस हिंदुस्तान व इंग्लंड ह्या दोन देशांची हवा कशी आहे हे मनांत आणलें म्हणजे पुरे आहे. आपला देश उष्ण कटिबंधांत असल्या कारणाने इकडे उष्णतेचे मान अधिक असते. ह्यामुळे आपणांस शीत व आर्द्र पदार्थ गोड वाटतात आणि त्यामुळे सुखकर वस्तूचे ठायीं ते गुण आपण आरोपितों, जी गोष्ट प्रियकर असून दुर्मिळ आहे, तिच्याविषयी आपल्या मनांत आदर उत्पन्न व्हावा हे साहजिक आहे. आपल्या इकडे सारे पदार्थ उष्ण असतात, व अंग गार करण्यासाठी पाण्याची कमतरता असते, ह्यामुळे शीतता व आर्द्रता हीं आपणांस प्रियकर वाटतात व सहजच आपण त्या गुणांचा आरोप सुखकर वस्तूंचे ठायीं करतो. “प्रेमाचा पाझर" ह्या उदाहरणामध्ये प्रेमास पाझराची उपमा आपण देतो. परंतु इंग्लंड देश हा अधिक थंडीच्या कटिबंधांत असल्या कारणाने तेथे नेहमी थंडी असते, व बहुतकरून बारा महिने 
     प्रकरण तिसरें.     ८७
पाऊस पडत असल्याकारणाने तेथे पाण्याची कांहीं वाण नसते आणि म्हणून ऊबदारपणा, उष्णता, सूर्य, इत्यादि पदार्थ तेथील लोकांस गोड वाटतात. म्हणून ते साहजिकच सुखकर वस्तूचे ठायीं उष्णतेचा आरोप करतात. इंग्रज Sunny face ह्या शब्दाने गालांचा गोडपणा, सुरेखपणा, मोहकपणा दर्शवितात; परंतु आपण त्याच्या उलटपक्षीं चंद्रानन असे म्हणतों. सूर्यानन असे म्हणण्याकडे कवी आपली प्रवृत्ति होत नाहीं.

 ह्या वरील विवेचनावरून वाचकांचे लक्षांत आलेच असेल की, देशाची हवा, पाणी ही सुद्धा भाषेच्या शब्दांस आपणांस अनुरूप असे करून घेतात. म्हणून अर्थात् शब्दांचे योग्य परीक्षण केल्यास देशाची हवा, पाणी वगैरे ही सुद्धा आपणांस समजतात. आम्हीं जी उदाहरणे दिली आहेत ती अर्थात् स्थूल आहेत. पण याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म शोध करण्यास जर कोणी मनुष्य प्रवृत्त झाला तर त्यास शब्दांमध्ये पुष्कळ उपयुक्त सामग्री मिळेल असे आम्हांस वाटते.

 नाशीकः- स्थळांची नांवे सुद्धा पुष्कळ माहितीने भरलेली असतात. हल्लीं ज्यास नाशिक असे म्हणतात, त्यास पूर्वी जनस्थान हे नांव होते. पूर्वीचे नांव माजी पडून नाशिक हें नांव रूढ होण्याचे कारण हे की रावणाची बहीण शूर्पनखा हिने राम व लक्ष्मण वनवासांत असतां त्यांस उपद्रव देण्याचा प्रयत्न केल्यावरून लक्ष्मणाने तिची नासिका (नाक) छेदिली. ह्या पुराणप्रसिद्ध गोष्टीचे नाशिक हे नांव स्मरण करून देते. काश्मीर हे नांव केशराची ( कश्मीराची ) उत्पत्ति त्या देशांत फार होते यावरून पडलेले आहे. वाराणसी ( काशी ) हे नांव “ वरुणा " आणि " असी " ह्या नद्यांचे त्या स्थळाशीं सान्निध्य असल्यावरून पडलेलें आहे. परशुरामक्षेत्र हें 
८८     मराठी शब्दांचे उद्घाटन.

कोंकणपट्टीचें नांव पुष्कळ गोष्टींची माहिती देते. परशुरामानें क्षत्रियांचा बीमोड करून भूमीचे दान कश्यप ऋषीस दिलें, व दान दिलेल्या देशांत राहणे योग्य नाही असे जाणून परशुरामाने समुद्रापासून सह्याद्रीच्या पायथ्याचा पश्चिमकडचा प्रदेश मागून घेतला, आणि तेथे तो तपश्चर्या करीत राहिला. ह्यावरून ह्या प्रदेशास परशुरामक्षेत्र हे नांव पडलें, परंतु परशुरामाने स्वतः ह्या प्रांतास जें नांव दिले ते " शूर्पारक " हे होते. ही पौराणिक कथा परशुरामक्षेत्र ह्या नांवांत दृष्टीस पडते, ह्या पौराणिक कथेचे महत्त्व बाजूला ठेवले तरी भूशास्त्रदृष्ट्या ही मनोरंजक माहिती मिळते की, कोंकणपट्टीचा प्रदेश धरणीकंपादि कारणांनीं वर उचलला जाऊन कोरडा झालेला आहे, व तोही फार प्राचीन काळी कोरडा झालेला आहे, असे नव्हे.

 साळशी हे नांव एका चमत्कारिक प्रस्तावाची आठवण करून देते. रत्नागिरी जिल्ह्यांत देवगड तालुक्यांत साळशी म्हणून एक गांव आहे. तेथील अमलदाराने सर्व आळशी लोकांस जेवायास फुकट घातले जाईल अशी दंवडी पिटविली. आयतें जेवायास मिळते तर संधि कोण दवडणार ? एक आला, दुसरा आला, तिसरा आला, या प्रमाणे हजारों लोक जमले; व जो येई तो “मी आळशी आहे " असे म्हणे. ह्या खुशालचंदांची संख्या वाढत चालली. यथेच्छ भोजन करणे, व झोंपा ताणणे हे जर श्रमावांचून मिळू लागलें तर असा कोण मायेचा पूत आहे की जो ती संधि दवडील? अशा रीतीने सरकारास अधिक अधिक त्रास होऊ लागला. तेव्हा खरे आळशी ठरविण्यासाठी त्या अम्मलदाराने एक खाशा युक्ति काढली. त्याने एके दिवशी रात्रीं सर्व आळशी 
     प्रकरण तिसरें.     ८९

निजले असता त्या घरास आग लावून दिली; घरांतून ज्वाळा भडाभडा निघू लागल्या तेव्हां जे आळशाचे ढोंग करून आले होते, ते चट सारे पळून गेले, आणि जे खरे आळशी होते, ते जळत्या घरांत तसेच पडून राहिले, आणि आतां ते खचित भस्मसात् होणार अशी जेव्हां त्या अम्मलदाराची खात्री झाली तेव्हां त्याणे त्यांस बाहेर काढावे, म्हणून आपल्या शिपायांस हुकुमाविलें. हे आळशी बाहेर निघाल्यावर त्यांसच फुकट खावयास घातले जाऊ लागले. अशा रीतीने खोगीरभरतीचे जे आळशी जमले होते, त्यांचा त्रास नाहींसा झाला; त्या दिवसापासून त्या गांवास साळशी ( सहा आळशी ) हें नांव पडले.

 तुळापुर हेही नांव एका इतिहासप्रसिद्ध प्रस्तावाची आठवण करून देते. तुळापूर म्हणून पुण्याजवळ भीमा नदीच्या कांठी एक लहानसे खेडे आहे. ह्या खेड्यास हें नांव पडण्यास कोणचा प्रस्ताव कारण झाला हे पुढील गोष्टीवरून वाचकांचे लक्षात येईल, औरंगजेब बादशाहा दक्षिणेतून प्रवास करीत असतां एका तरीजवळ आला. बादशहाचे घोडेस्वार तरीच्या पलीकडे जात असतां तो कांहीं वेळ कांठावर उभा होता. त्याची आणि तरीवाल्यांची गांठ पडली व इकडच्या तिकडच्या गोष्टी चालल्या असतां त्या तऱ्याने बादशाहास म्हटलें " मला ज्या प्राण्याचे बरोबर वजन सांगतां येणार नाही, असा प्राणीच नाही." त्यावरून अवरंगजेब बादशाहाने लागलेंच आपल्या स्वत:च्या हत्तीचे वजन सांगण्यांस तरीवाल्यास फर्माविले. त्यावरून तऱ्याने त्या हत्तीस आपल्या होडीत चढविले; मग हत्तीच्या वजनाने ती होडी जेथवर पाण्यांत बुडाली होती तेथे एक रेघ ओढून तऱ्याने 
९०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

खूण केली. नंतर त्या तऱ्याने हत्तीला होडीच्या बाहेर काढले. मग त्याच रेघेपर्यंत होडी पाण्यात बुडेतोंपर्यंत मोठमोठे धोंडे तिच्या आंत घातले. मग धोंड्यांची वेगळी वेगळीं वजने एकत्र करून हेच वजन हत्तीचे आहे असे त्याने बादशाहास सांगितले. त्याची समयसूचकता व कल्पनाशक्ति पाहून बादशाहा इतका खुष झाला की, त्याने त्याला व त्याच्या वंशजांना तो गांव इनाम दिला व त्या गांवाचे जुने नांव रद्द करून त्याचे " तुळापूर " असे नवीन नांव ठेविलें.

 कित्येक स्थळांच्या नांवांत लोकांची भ्रमात्मक कल्पना दृष्टीस पडते. हल्लींचा मद्रास हा प्रांत पुराणप्रसिद्ध शल्य राजाचा देश आहे असा वर्णसादृश्यावरून लोकांचा भ्रम होऊन त्यास मद्रदेश असे नांव दिले जाते आणि इतकेंच नव्हे तर " पुराणप्रसिद्ध मद्रदेश” किंवा “शल्याच्या राजधानीचे स्थळ" असेही प्रयोग कधी कधी वर्तमानपत्रांत दृष्टीस पडतात; परंतु भरतखंडाचा प्राचीन इतिहास ज्यास अवगत आहे, त्यास ही लोकांची चुकी सहज समजण्याजोगी आहे.

 चाणक्षः- आतां वृत्तगर्भ शब्दांची कांहीं संकीर्ण उदाहरणे देतों. चाणक्ष ( धूर्त ) हा शब्द नंदराजे व मौर्य यांच्या मधील युद्धाचे स्मरण करून देतो. चाणक्य हा मौर्याच्या पक्षाचा मंत्री असून त्याने नंदवंशीयांचा वरचष्मा कसा मोडला व प्रतिपक्षीयांचा मंत्री जो राक्षस त्यास आपल्या पक्षास कसे अनुकूळ करून घेतलें, हें मुद्राराक्षस नाटकांत वर्णिलेले वाचकांस स्मरत असेल. रांठ–राठ हा शब्द आपणांस महाराष्ट्रांत पूर्वी ज्या रट्ठ लोकांनी राज्य केले त्या लोकांचा कणखरपणा व सोशिकपणा ह्या गुणांची आठ
     प्रकरण तिसरें.     ९१
वण करून देतो. पाहारा :-पाहारा ( रखवाली ) ह्या शब्दावरून प्रहरा प्रहराने पाहारेकरी बदलण्याची चाल असे असे व्यक्त होते. "राम राम" हा मराठे लोकांची व हलक्या जातीचे लोकांची कोणाशी भेट झाली असतां उच्चारावयाचा आनंदसूचक शब्द रामदास स्वामीमहाराजांच्या वैभवाची व त्यांच्यावर शिवाजीची असलेली भक्ति यांची आठवण करून देतो.

 अटक ( मर्यादा ) हा शब्द थोरला बाजीराव ज्याणे दिगंतव्यापिनी कीर्ति मिळविली व मराठ्यांचे नांव बलाढ्य अशा यवन पादशहास सुद्धां दहशत भरविणारे केले, त्या बाजीरावाच्या पराक्रमाची आठवण करून देतो. चाळिशी शब्दावरून आपल्या लोकांस उपनेत्र लावण्याची सरासरी मानाने कोणच्या वयांत जरूर पडते, हे व्यक्त होते. भोहणी शब्दावरून आपल्या व्यापारी लोकांची भवानीचें नांव घेऊन खरेदी, विक्री करावयाची चाल समजते. गवाक्ष ( गो+अक्ष ) शब्दावरून प्राचीनकाळीं खिडक्यांचा आकार कसा असे हे समजते. बेळगांव ( वेणुग्राम ) शब्दावरून पूर्वी तेथे चिव्यांचे ( म्ह० वेळूचे) रान निबिड होते, हे समजते.

 नणंद हा शब्द निषेधार्थक “ न" व सुखी होणे ह्या अर्थाच्या “नंद् " धातूपासून उत्पन्न झाला आहे. ननंद (नणंद ) म्हणजे “सुख न पावणारी " ; नणंद ह्या शब्दावरून नणंदाभावजयांचे हल्लीचे प्रमाणे पूर्वीपासूनही वैमनस्य असे, असे व्यक्त होते. नणंदेस आपण माहेरवाशीण आहों म्हणून घरांत आपली सत्ता असावी असे वाटत असते व भावजयीस आपण नेहमी घरांत असणारी व घरच्या यजमानाची बायको म्हणून घरधनीण आहों व अतएव आपली सत्ता घरच्या 
९२     मराठी शब्दांचे उद्घाटन.
कारभारांत असावा, उफलाणू येणा-या नणंदेची सत्ता नसावी, असे वाटते; ह्याप्रमाणे नणंद व भावजय ह्यांच्यामध्ये नेहमी तेढा असतो. भावजयीचे वर्चस्व घरांत असावे हे योग्य आहे व हे वर्चस्व नणंदेने कबूल करणे हेही योग्यच आहे ; परंतु भावजयीचे वर्चस्व कबूल करण्यास नणंद नेहमी नाखुष असते. ह्यावरून तिला “ननंद " अथवा नणंद ( आनंद न पावणारी ) असे नांव मिळालें.

 लिपि हा वर्णमालेचा वाचक शब्द लेप करणे ह्या अर्थाच्या सं० " लिप्" धातूपासून आलेला आहे. यावरून असे सिद्ध होते की, अक्षराची चिन्हें ठरविली गेली तेव्हां रंगाच्या पातळ पदार्थाचा लिहिण्याचे कामीं उपयोग केला जात असे. वर्ण हा तरी अक्षरांचा वाचक शब्द वरील सिद्धांतच समर्थितो, हेही वाचकांचे लक्षात येईल.

 लेखन ( सं० लिख=ओरखडणें ) ह्या शब्दावरून प्रथम झाडाच्या साली वगैरे कठिण पदार्थांवर रेघा ओढून आपले पूर्वज अक्षरांच्या आकृति काढीत असत व रंगाने ह्या आकृति काढण्याची कला मागाहून उत्पन्न झाली असे सिद्ध होते. पोथीचे किंवा पुस्तकाचे पत्र किंवा पर्ण हे शब्द प्रथम वृक्षाच्या पानावर लेखनक्रिया घडत असे असे दाखवितात.

 राजा ह्या शब्दावरून आपण राजाचे कर्तव्य काय समजतों हें व्यक्त होते. त्याची व्युत्पत्ति “रंजयतीति राजा " ( प्रजेस सुख देईल तोच राजा ) अशी आहे. प्रजेवर जुलमी कर बसवून प्रजेच्या वेगळ्या वेगळ्या संघांत दुही उत्पन्न करून प्रजेची एकी व गुण्यागोविंदभाव नष्ट करून, आपले जुलूम बिनहरकत करता येतील अशी निंद्य इच्छा धरून राज्य करणारास आपण राजा अशी संज्ञा लावणार
     प्रकरण तिसरें.     ९३
नाहीं. प्रधान ह्या शब्दावरून राज्याची सर्व जबाबदारी प्रधानावर असे, राज्याचे जोखीम त्याच्या अंगावर असे, व राज्यांत मुख्य व खरा अमलदार तोच असे, असे व्यक्त होते.

 भाषेतील शब्दांमध्ये कधी कधी आपले खोटे ग्रह, निराधार कल्पना व भ्रांतिमूलक सिद्धांत हे कायमचे वास्तव्य करून राहिलेले दृष्टीस पडतात. अशा शब्दांची उदाहरणे मराठी भाषेत पुष्कळ आहेत. अशा जातीचा पांडवकृत्य हा एक शब्द होय. डोंगर पोखरून केलेल्या देवळास आपण पांडवकृत्य म्हणतों. हा शब्द अस्तित्वात येण्यास जी कल्पना कारण झाली ती ही कीं, पांडव अज्ञातवासांत असतां त्यांनी आपणांस राहण्याकरितां हीं वसतिस्थाने केलेली होत. ही कल्पना अर्थात् निराधार होय. ह्या पांडवकृत्यासंबंधाने एक उतारा वाचकांस सादर करितों.

 मुसलमान लोकांनी स्वाऱ्याकरून आपला अंमल ह्या देशांत बसविण्याच्यापूर्वी हिंदुस्तान देशाची स्थिति पुष्कळ अंशी फारच चांगली होती, असे अनेक गोष्टींवरून सिद्ध होते. प्राचीनकाळचे जे कांहीं ग्रंथ राहिले आहेत त्यांवरून, त्या काळाच्या व्यापारावरून, त्याकाळीं ह्या देशांत अपार संपत्ति होती असे जे यवन लोकांत लेख आहेत त्यांवरून, व त्याकाळच्या ज्या कांहीं थोड्या इमारती काळचक्राच्या व दुरभिमानी क्रूर शत्रूच्या झपाट्यांतून उरल्या आहेत त्यांवरून वर सांगितलेले अनुमान सिद्ध होते. हिंदुस्तानच्या अनेक भागीं व विशेषतः दक्षिणेत पुष्कळ ठिकाणी डोंगरांतले खडक कोरून मोठमोठी देवळे तयार केलेली हल्ली आढळतात. व ही देवळे अप्रसिद्ध ठिकाणी व निवाऱ्याच्या जागी असल्यामुळे त्यांस हिंदुधर्मद्वेष्टे, क्रूर, अज्ञान अशा मुसलमान अमलदारां
९४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

पासून व वारा, ऊन, पाऊस, ह्यांपासूनही फारसा उपद्रव झाला नाहीं, तेणेकरून ती आजपर्यंत टिकलीं आहेत. हीं देवळे कधीं व कोणी बांधिलीं, ह्याचा अद्यापि चांगला शोध लागला नाहीं. ह्यांस लेणीं असे म्हणतात. साधारण लोकांत दंतकथा अशी आहे की, ही देवळे पांडव वनवासांत होते, त्यावेळेस त्यांनी कोरली आहेत; व ह्या दंतकथेवरून त्यांस पांडवकृत्ये असेंही एक नांव पडले आहे. आता ह्या इमारती पांडवांनीं कोरल्या नाहीत हे सिद्ध करणे अगदी कठीण नाहीं. ह्या दंतकथेस पहिले विरुद्ध प्रमाण हें कीं भारत नामक ज्या पुराणांत पांडवांच्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या पुराणांत त्या राजपुत्रांनी ही देवळे कोरल्याची गोष्ट मुळीच नाहीं. व त्या पुराणावरून पाहिले असतां पांडव दक्षिणेत आले होते असेही अनुमान होत नाहीं. ह्या कोरीव देवळांपैकीं कांहीं देवळे ब्राह्मणांच्या देवांची आहेत, कांहीं जैनांच्या व बौद्धांच्या देवांची आहेत ; ह्यावरून ती भिन्न लोकांना व बहुतकरून भिन्न काळी बांधली असावी असे सिद्ध होते. ह्याप्रकारची देवळे, घारापुरी, कान्हेरी, कारले, वेरूळ, जुन्नर इत्यादि बहुत ठिकाणी आहेत.*

 असत्यमूलक शब्दांचा एक मुख्य उगम म्हटला म्हणज फलज्योतिष हे होय. ज्योतिष म्हणजे ग्रहांदिकांच्या गति, गतींचे नियम, त्यांची एकमेकांवर गुरुत्वाकर्षणाच्या योगाने घडणारी कार्ये इत्यादिकांच्या संबंधाचे शास्त्र; हे शास्त्र सत्याच्या पायावर उभारलेले असून त्याचे सिद्धांत व शोध हे खरे असतात. आणि उलटपक्षी फलज्योतिष म्हणजे ह्या ग्रहांच्या स्थितीवरून भूमीवरील प्राण्यावर घडणाऱ्या परिणामांचे शास्त्र. ग्रहांचा भूस्थ

-----
  * अनेक विद्या मूलतत्व संग्रह पान २७३-४ 
     प्रकरण तिसरें.     ९५
प्राण्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम घडू शकत नाहीं असे सर्व सुधारलेली राष्ट्रें हल्ली कबूल करतात, व आपणामधील सुशिक्षित लोकांचेही तेच मत आहे. फलज्योतिषाविषयी कै० रा ० रा ० विष्णुशास्त्री चिपळोणकर ह्यांचा एक चरचरीत लेख आहे तो वाचकांनी लक्षपूर्वक वाचला असतां फलज्योतिषाची असत्यता व अशक्यता ही त्यांस कळून येईल. त्याचा ऊहापोह आम्हांस येथे करता यावयाचा नाहीं. असो, तर ह्या फलज्योतिषावरून आपल्या भाषेत रूढ झालेले शब्द पुष्कळ आहेत. संक्रांत बसणे, राशीस येणे, शनीसारखा द्वाड, शनीश्वरासारखा खोडकर, राहु, केतु, ग्रहण लागणे, वेध लागणे, छाया पडणे, इत्यादि पुष्कळ शब्द असत्यमूलक कल्पनेवरून भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. फलज्योतिषाचा खोटेपणा जरी आतां पूर्णपणे आपल्या प्रतीतीस येत आहे तरी आपण राशीस येणे वगैरे सारखे प्रयोग बेलाशक करतो, आणि असेच पुढेही करीत राहूं. या शब्दामध्ये आपल्या भ्रांतिमूलक कल्पना चिरस्थायी होऊन राहिल्या आहेत. पूर्वी आपल्या डोक्यांत काय काय वेडे होती त्यांची हे शब्द उत्तम साक्ष देतात.  येथे एका प्रसंगोपात्त प्रश्नाचे विवेचन करणे आवश्यक आहे. कित्येक लोकांचा असा पूर्वपक्ष आहे की वस्तुस्वरूपाच्या असत्य ज्ञानावर किंवा असत्य वस्तूच्या ज्ञानावर ज्या शब्दांचा पाया आहे त्या शब्दांस भाषेमध्ये थारा द्यावा काय ज्या काळी वस्तूचे खरे स्वरूप मनुष्यास अगवत नव्हते, किंवा ज्याकाळीं वस्तूंचे ठायीं असत्य धर्माचा आरोप अज्ञानामुळे केला जात असे, तेव्हां जे शब्द मिथ्याकल्पनावरून प्रचारांत आले, ते आपण भाषेमध्ये राहू द्यावे काय? ज्या शब्दांची 
९६     मराठी शब्दांचे उद्घाटन.
व्युत्पत्ति असत्याच्या पायावर अवलंबून आहे ते शब्द त्या असत्याचा परिस्फोट झाल्यावर आपण भाषेतून हाकून लावू नयेत काय?"  असा प्रश्न कितीएक विद्वान् लोक करितात, परंतु ह्या प्रश्नाचा स्वयमेव उलगडा झालेला आहे. शब्द जरी असत्यमूलक असले तरी ते भाषेमध्ये हक्काने राहातील आणि त्यांनी राहवेही हे योग्य आहे. शब्दांचा जर भाषेवर व्युत्पत्तीच्याच द्वाराने हक्क चालत असता तर असत्यमूलक शब्द भाषेतून केव्हांच नष्ट होऊन गेले असते. परंतु शब्दांचा व्युत्पत्तीच्याच द्वाराने हक्क चालतो असे नव्हे. रूढीच्या द्वारानेही चालतो. किंबहुना व्युत्पत्तीपेक्षां रूढीवरच शब्दांची प्रतिष्टापना बलवत्तर असते. केळीचा कोंब ज्याप्रमाणे बाल्यावस्थेत असतांना मुख्य केळीपासून आपलीं पोषक द्रव्ये शोषून घेतो, परंतु तो मोठा झाला म्हणजे त्याला जमीनीत स्वतांची पाळे मूळे फुटून तो स्वत:च्या जोरावर आपलें पोषण करून घेतो, व वनस्पतीची सर्व कर्तव्ये करू शकतो, आणि मूळच्या केळीची त्यास आवश्यकता राहत नाहीं; मूळच्या केळीचा आणि त्याचा संबंध तुटला आणि ती केळ मरून गेली तरी त्याच्या जीवनक्रियेस कोणत्याही प्रकारे हरकत होत नाहीं ; त्याच प्रमाणे शब्द जरी मूळारंभी व्युत्पत्तीवर अवलंबून असले तरी कालातिक्रमानें त्यांस भाषेमध्ये स्वतःचे स्वतंत्र जीवित प्राप्त होते, व पुढे व्युत्पत्तीशी जरी त्यांचा संबंध तुटला, किंवा व्युत्पत्ति असत्यमूलक ठरली, किंवा व्युत्पत्ति नष्ट झाली तरी त्या शब्दाच्या अस्तित्वास कोणत्याही प्रकारचा बाध येऊ शकत नाहीं. सूर्य स्थिर आहे अणि पुथ्वी दैनंदिनगतीने आपल्या अक्षाभोंवती फिरत असते, हे जरी आपणास कळले
     प्रकरण तिसरें.     ९७
आहे, तरी सूर्य उगवला, सूर्य कासराभर वर आला, इत्यादि प्रयोग करण्यास काही हरकत नाही. वास्तविक पाहतां सूर्य कासराभर वर येत नाही तर पृथ्वी उलट दिशेनें कासराभर खाली जाते. तथापि सूर्य कासराभर वर आला हाच प्रयोग प्रचारांत राहील. त्याच प्रमाणे साळूबाईच्या पंचपाळ्यास सहा पाळी असली व झिंगूबाईच्या पंचपळ्यास सात पाळी असली तर झिंगूबाईने साळूबाईस तुच्छ मानावयास कांहीं हरकत नाहीं; किंवा बकूबाईने आपला चौफुला सात फुलांचा करण्यास सोनारास सांगितले तरी सोनारास हांसण्याचे कांहीं कारण नाहीं. तसेच तीन महिन्यांनी प्रसवलेल्या साठक्या साळी मोठ्या रुचकर लागतात, अशा कोंकणी शेतकऱ्यांनी खुशाल बढाई मिरवावी. लहान मुलांस सोमवार, मंगळवार, इत्यादि वारांची नांवें सांगून शेवटीं " आठवड्याचे दिवस सात " असे सांगून पंतोजी बाबांनी हे मुलांस घोकावयास लावलें तर त्या पंतोजी बाबांनीं कांहीं चुकी केली असे होत नाहीं; तसेच एकाद्या गवळ्याने सोनूबाईस पंधरवडाभर दुधाचा रतीब घातला तर सोनूबाईकडून त्यास चवदा दिवसांचे पैसे मिळाले तर आपण फसलों असें गवळ्यास वाटावयाचे कारण नाही. फौजदारी खटल्यांत दोन किंवा तीन पंच नेमले जातात. आपल्या आलीकडच्या पंचांगांत पांच त्रिक अंगे असतात. तेलंगी लोक पांच जानव्यांचा एक जोडा करितात वर निर्दिष्ट केलेले अशुद्ध शब्द व अशुद्ध प्रयोग भाषेमध्ये पाळे मुळे घालून स्थैर्य पावले आहेत, त्यांना स्थानभ्रष्ट करितां यावयाचें नाहीं व करणे इष्टही नाही. आम्हीं वर्गामध्ये एकदां मराठी कविता स्पष्ट करून सांगत असतां एका कवितेत " पीतांबर " हा शब्द आला होता. आम्ही मुलांस विचारले “ तुम्हीं कधीं पीतांबर 
९८     मराठी शब्दांचे उद्घाटन.
पाहिला आहे काय? " मुलें म्हणालीं " होय, आम्ही पाहिला आहे." त्यावरून आम्ही विचारले “ तुम्ही कोणत्या रंगाचे पीतांबर पाहिले आहेत ?" मुलांनी उत्तर दिलें "तांबड्या रंगाचे," त्यावरून आम्हीं " तांबडा पीतांबर " हा प्रयोग शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे असे विचारलें ; कांहीं जीं खोगीरभरतीची मुलें होती त्यांणीं एकदम प्रयोग अशुद्ध असे उत्तर दिले, परंतु दोघां तीघां विचारी मुलांनी म्हटलें, "पीतांबर म्हणजे पिवळे वस्त्र असा जरी मूळचा अर्थ असला व पिवळेपणावरून जरी त्या वस्त्रास पीतांबर असें नांव पूर्वी पडले असले तरी आतां पीतांबर शब्द एक प्रकारचे रेशमी कापड इतकाच अर्थ दाखवितो आणि म्हणून तांबडा पीतांबर किंवा पिवळा पीतांबर किंवा दुसऱ्या कोणत्याही रंगाचा पीतांबर असू शकेल." आदल्या वर्षीच्या कोजागरी पौर्णिमेस देव्हाऱ्यावर किंवा दारावर लटकत सोडलेले जुने " नवें " काढून टाकून त्याचे जागी नवें " नवें " घालावयाचे वेळी मुलें जर म्हणाली, "आमचे एका वर्षाचे जुने नवे असून ते नव्या नव्यापेक्षा अधिक सुरेख दिसते," तर त्यांत त्यांची कांहीं चुकी होईल असे कोणास वाटावयाचें नाहीं. -  वर आम्ही म्हटले आहे कीं असत्यमूलक शब्दांस व प्रयोगांस भाषेतून हांकून लावतां यावयाचें नाहीं, व हांकून लावणे इष्ट नाहीं. शब्द भाषेमध्ये एकदा रूढ झाले म्हणजे ते भाषेच्या जीविताची अंगें होऊन जातात व त्या अंगांचा छेद करणे म्हणजे भाषेच्या जीवितास धक्का पोंचविण्यासारखे आहे. शब्द एकदा भाषेच्या जीविताचीं अंगे ह्या स्थितीस जाऊन पोंचले म्हणजे ते मनुष्याच्या अधिकाराबाहेर जातात, 
     प्रकरण तिसरें.     ९९
म्हणजे त्यांचेवर मनुष्याची इच्छा चालू शकत नाहीं. ते भाषेच्या नियमांनी चालतात, मनुष्यकृत नियमांनी चालत नाहींत.

 एकाद्या मनुष्याच्या शरीराचे कांहीं भाग बोजड व बेडौल असले तर कधी कोणी ते कापून टाकावे अशी शिफारस करीत नाही. कारण ते भाग त्याच्या जीवच्छरीराचे कायमचे भाग असल्या कारणाने त्यांना धक्का देणे म्हणजे साच्या शरीरास धक्का पचविण्याप्रमाणे होईल. शरीराच्या व्यापारास ते भाग सर्वथैव पात्र असतात व त्यांच्या अस्तित्वावर शरीराचे जीवित कमजास्त मानाने अवलंबून असते. त्या प्रमाणेच भाषेमध्ये जरी कांहीं असत्यमूलक शब्द असले तरी ते त्या भाषेच्या जीवितास आवश्यक असतात व भाषा जर ठार मारून टाकावयाची नसेल तर त्यांस अर्धचंद्र देण्याचा प्रयत्न सिद्धीस जावयाचा नाही. तेव्हां एकंदरीत सांगावयाचे म्हणून एवढेच की शुद्धाशुद्धपणाचा वृथाभिमान बाळगून " तांबडा पीतांबर" "लाल शाई" वगैरे प्रमाणे असत्यमूलक किंवा विरोधगर्भ शब्दांस भाषामंदिरांतून अर्धचंद्र प्रदानाने बाहेर काढण्याचा प्रयत्न कोणी पंडिताने केला तर तो वायां जाऊन तो लोकांच्या उपहासास मात्र पात्र होईल. असत्यमूलक शब्दांचा उच्छेद करणे जसे शक्य नाही तसेच ते इष्टही नाहीं. तेणेकरून आपण अनवस्थाप्रसंगाच्या दोषास पात्र होऊ. असत्यमूलक शब्दांचा उच्छेद करावयाचा असे एकदा आपण ठरविलें म्हणजे भाषेच्या स्थैर्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभच नाहीसा होईल.

 मनुष्य प्राणी सर्वज्ञ नाहीं व सर्वज्ञ कधीच व्हावयाचा नाहीं. अनंत शास्त्रांचे व अनंत वस्तूचे ज्ञान मनुष्य कसा मिळवू शकेल? तसेच मनुष्याने जे ज्ञान संपादिले आहे ते तरी 
१००     मराठी शब्दांचे उद्घाटन.

असत्यमूलक, किंवा भ्रांतिमूलक नव्हे, असे कोण म्हणू शकेल? आज जे ज्ञान आपणांस सत्यमूलक असे वाटते, ते कालांतराने व दीर्घ शोधाने खोटें असें ठरण्याचा संभव आहे, किंवा अपुरते आहे असेही ठरण्याचा संभव आहे. आपले पूर्वज ज्या गोष्टी खऱ्या समजून त्यांजवर विश्वास ठेवीत त्यांचा खोटेपणा आजमितीस आपल्या प्रत्ययास येत आहे. अशी जर ज्ञानाची उत्तरोत्तर वृद्धि होत जाणें हें सृष्टिनियमांस अनुसरून आहे तर पूर्व कल्पनांच्या पायावर रूढ झालेल्या शब्दांची कोठवर शुद्ध करीत बसावें? आज कांहीं नवा शोध लागला की जुन्या कल्पनेस अनुसरून रूढ झालेल्या शब्दांस एकदम फांटा द्यावयाचा व नवीन शब्द घडवून ते प्रचारांत आणावयाचे; हा नवीन शोध चुकीचा आहे, असे जर पुढे कालांतराने सिद्ध झाले तर हे शब्द रद्द करून पुन्हा आणखी नवीन शब्दांची टांकसाळ काढावयाची. याप्रमाणे नेहमी जुने शब्द रद्द करावयाचा व नवे शब्द उप्तन्न करावयाचा कारखानाच सुरू होईल, आणि अशा कृत्यांत लोक व्याप्त झाले म्हणजे ज्ञानार्जनाचे काम कसे चालेल? व लोकव्यवहार तरी कसा चालेल? ज्ञानाच्या वृद्धीबरोबर ज्या लोकांचे पाऊल पडत नाहीं, अशा अज्ञ लोकांस तदितर लोकांचे भाषण कसे समजेल?

 जुना शब्दसंग्रह पृथग्जनांत माहीत होतो न होतो इतक्यांतच कोणी नवा शोध लावला तर पुन्हा पहिला शब्दसंग्रह माजी पडून नवा तयार होईतोंपर्यंत सर्व व्यवहार बंद पडणार, किंवा दुसरी एक कल्पना करा. एकाद्या वस्तूच्या संबंधाने दोन महापंडितांत मतभेद असला तर पृथग्जनांनी कोणाचा शब्दसंग्रह स्वीकारावा ? एकमेकांचे विचार एकमेकांस कसे कळतील १ असत्यमूलक किंवा भ्रांतिमूलक शब्दांचा उच्छेद 
     प्रकरण तिसरें.     १०१

करून टाकण्याचा ठराव केला असतां एकच ब्रह्मघोटाळा होईल. भाषेचे स्थैर्य नाहींसे होईल. वाङ्मयाची उत्पत्ति व्हावयाची नाहीं; शास्त्रे, कला ही वाढावयाची नाहीत, व लवकरच रानटी स्थिति मनुष्यास प्राप्त होईल.

 हाच मुद्दा दुसऱ्या एका उदाहरणावरून स्पष्ट करून दाखविता येईल, असे समजा का एकादा मेस्त्री आपलीं हत्यारे घेऊन कांहीं नक्षीचे काम करीत आहे; त्याच्या यजमानाने त्यास जर प्रत्येक पांच पांच मिनिटांनी नवी नवीं हत्यारे वापरावयास सांगितले तर त्याचे काम होईल काय? आणि आपल्या मुद्याचा हास्यास्पदपणा अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण आणखी अशी कल्पना करूं. दर पांच मिनिटांनी वापरावयाची जी हत्यारे ती पूर्वीच्या हत्यारांपेक्षां वजनाने, लांबीरुंदीने, धरावयाच्या धाटणीने, भिन्न आहेत; तर मग अशा हत्यारांनी अत्यंत कुशल कारागिरास तरी कांहीं काम करता येईल काय ? तर सारांश म्हणून इतकाच की, एकदा भाषेमध्ये शब्द जे विचारास साधनभूत होत ते रूढ होऊन गेले म्हणजे मग त्यांस कोणत्याही कारणाने उच्छिन्न करणे हे इष्ट नाहीं; त्यापासून हानि होईल.

 असत्यमूलक किंवा भ्रांतिमूलक जे शब्द ते भाषेमध्ये राहूं देणे हेच शहाणपणाचे काम आहे. शाई हा शब्द फारशी असून त्याचा अर्थ काळी वस्तू असा आहे. ( सीयाह=काळा, सीयाही=काळेपणा किंवा काळी वस्तु.) रुमाल हाही फारशी शब्द असून त्याचा अर्थ तोंड पुसावयाचे फडके असा आहे. (रू=तोंड, मालीदन्=पुसणे). तेल* (तैल ) हा शब्द संस्कृत

-----
  * मराठीतील “ तेल" हा शब्द संस्कृतांतील “तैल" ह्याच शब्दापासून आलेला आहे; संस्कृतांतील " तैलच्" ह्या प्रत्ययाशी " तेल" ह्याचा काही संबंध नाहीं. 
१०२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

असून त्याचा अर्थ तिळांचा स्नेह, किंवा निष्यंद असा आहे. आगगाडी हा मराठी शब्द आहे. त्याचा अर्थ विस्तवाने चालणारी गाडी असा आहे. तसेच सूतक (सुतक) याचा अर्थ कुटुंबांत मूल जन्मल्यामुळे आलेलें अशौच व शास्त्रोक्त कर्माविषयी अनधिकार असा आहे. तथापि तांबडी शाई, पुस्तकें बांधावयाचा रुमाल, डोईचा रुमाल, भुईमुगाचे तेल, विजेची आगगाडी किंवा बाप मेल्याचे सुतक इत्यादि विरोधगर्भ प्रयोग सदोष होऊ शकत नाहींत. पुणे प्रांतीं कर्नाटकांतल्याप्रमाणे पेवांचे संडास नसून त्यांस शौचकूप असे म्हणतात. करंगळी (करांगुलि) हाताचे बोट असा अर्थ असून पायाची करांगुळी असेही म्हणतात. घड्याळ ( घट्यालय) ह्याचा अर्थ घटी दाखविण्याचे साधन असा असून आपण तो “तास दाखविण्याचे साधन" ह्या अर्थी योजतों; गोमाशी हा गाईच्या अंगावर वस्ती करणारा एक किडा आहे. तथापि आपण " चालत्या घोड्यावरच्या गोमाशा " अशी म्हण वापरतों. फार्स हा इंग्रजी शब्द असून त्याचा अर्थ त्या भाषेत मजेदार किंवा विनोदात्मक किंवा उपहासात्मक लहानसे नाटक असा आहे. परंतु "नारायणरावाच्या वधाचा फार्स !" असे आपण म्हणतों.

 सदरहू प्रयोग जरी शास्त्रदृष्टया व तत्त्वदृष्ट्या अशुद्ध आहेत तथापि त्यांस भाषेतून काढून लावणे शक्य नाही. कारण भाषेमध्ये रूढीच्या द्वाराने त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे.

 ह्या भागांतील वृत्तगर्भ शब्दांच्या संबंधाने जे विवरण केले आहे त्यावरून वाचकांची खात्री झालीच असेल कीं, शब्दांचे ठायीं प्राचीन गोष्टी, इतिहास, आचार वगैरे अनेक प्रकारची उपयुक्त माहिती आढळते व शब्दांचे परीक्षणाने देशाचा इतिहास स्थूल मानाने उभारतां येतो हे म्हणणे आतिशयो
     प्रकरण तिसरें.     १०३

क्तीचे नाहीं. शब्दांचा तत्परतेने अभ्यास करणे हें व्यर्थ वेळ घालावण्याप्रमाणें नाहीं हेही वाचकांस कळून आलेच असेल.

---------------
उपसंहार

मागील भाग ज्या वाचकांनी लक्षपूर्वक वाचले असतील त्यांस कळून आलेच असेल की, शब्दांचा अभ्यास हें एक ज्ञानप्राप्तीचे साधन असून शिवाय सूक्ष्म अवलोकनाची संवय होण्यास त्याचा फार उपयोग आहे. आणि आमचे तर असे मत आहे कीं ज्ञानप्राप्तीचे एक साधन ह्या दृष्टीने शब्दांच्या अभ्यासाचे महत्त्व जे आहे त्यापेक्षां सूक्ष्म अवलोकन व सूक्ष्म परीक्षण ह्यांची संवये ही अधिक महत्त्वाची आहे. आणि शब्दांचा अभ्यास हा सूक्ष्म अवलोकनाची संवय मुलांस लावून देऊन मनोरंजक रीतीने त्यांस ज्ञानप्राप्ति करून देतो. ह्याकरितां हे अत्यंत इष्ट आहे की, शब्दांची व्युत्पत्ति, त्यांचे मूळचे अर्थ, अर्थाचा विपर्यास होण्याची कारणे, शब्दांच्या अर्थाचा संकोच, व्याकोच, आणि उत्सार, तदंतर्गत ज्ञान बाहेर काढण्याचे मार्ग, वगैरेकडे आपल्या शिक्षक वर्गाचे लक्ष बिलकूल नसते, ते तिकडे लागावे, आमच्या ह्या लहानशा निबंधांत निर्दिष्ट केलेल्या दिशेने शब्दांचा अभ्यास ज्या कोणी केला नसेल, तो मराठी भाषेमध्ये इतर बाबतींत कितीही तरबेज असला तरी त्यास मराठीचा पंडित हे नांव देणे योग्य होणार नाही. ज्या कोणास ही भाषापरिज्ञानाची शाखा अवगत नाहीं तो मराठी भाषेचा पंडित ह्या बहुमानाच्या पदवीस योग्य नाहीं.

ह्या वर सांगितलेल्या दोन उपयोगांशिवाय तिसराही एक मोठा उपयोग शब्दांच्या परीक्षणापासून होण्याजोगा आहे. तो हा की मराठी भाषेविषयीं जो तिरस्कार बहुतेक 
१०४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

इंग्रजी जाणणाऱ्यांचे ठिकाणी कायमचे वास्तव्य करून राहिलेला आढळततो, तो अशा प्रकारच्या अभ्यासापासून नष्ट होऊन मराठीची प्रौढी किती आहे, हे त्यास कळून येईल. मराठी भाषेविषयी जे तिरस्कारमूलक किंवा निदान खेदमूलक अभिप्राय त्यांच्या तोंडून एकूं येतात, ते ह्या प्रकारच्या शब्दांच्या अभ्यासापासून निरस्त होतील.






या निबंधांत उद्घाटिलेल्या शब्दांची यादी.
--------------------
उपोद्घात.   २३ तिरसंगी
पातक २४ सदाफुली
पंक २५ बारामासी
छांदिष्ट २६ अक्षिन्
आर्ष २७ माधुकरी
लाघवी २८ गुलजार
व्रात्य २९ गुलाब
साला ३० अश्वघाटी
भट ३१ त्रेसष्टी
ब्राह्मण ३२ छत्तिशी
१० फिरंगी ३३ चोहोंचा आकडा
कवित्वगर्भ ३४ अर्धचंद्र
११ वाचणे ३५ कंगाल
१२ भांगाचे पाणी ३६ अग्निमुख
१३ उडाणटप्पू ३७ आब्रू
१४ अजागळ नितिगर्भ
१५ गयाळ ३८ बाणी
१६ लाजाळू ३९ साथी
१७ नमस्कारी ४० कलावती
१८ दीपमाळ ४१ उचल्या
१९ पादप ४२ लांबविणे
२० न्यग्रोध ४३ लाघवी
२१ दुपारी ४४ हांजी हांजी
२२ सायंकाळी ४५ उत्संखळ

106     मराठी शब्दांचे उद्घाटन.
४६ उर्मट     ७२ अद्दल
४७ खोटें ७३ उपाध्या
४८ वक्कल ७४ बिलंद
४९ शागिर्द ७५ शिष्या
५० ब्राह्मण ७६ आचारी
५१ मिसकीन ७७ शौच्य
५२ वस्ताद ७८ परसाकडे
५३ फळार ७९ धीट
५४ गावणे ८० धारिष्ट
५५ गवसणे ८१ मर्द
५६ विराकत ८२ हिय्या
५७ सजणा ८३ बालबोध
५८ जरतारी ८४ त्वंपुरा
५९ दारू ८५ ग्वाही
६० भादरणे ८६ घरांत आलेली
६१ भादरपट्टी ८७ जंत
६२ शिक्षा ८८ जीव
६३ शासन ८९ जिवाणू
६४ नसीहत ( नश्यत ) ९० लांब जनावर
६५ राष्टाण ९१ महारोग
६६ अस्त्रायफट् ९२ थोरला रोग
६७ हेपळणे ९३ आक्काबाई
६८ अवलाद ९४ सोंवळी
६९ पांडित्य ९५ वाढणे
७० वाक्पटु ९६ द्वारकेस जाणे
७१ वाक्पांडित्य ९७ निजधाम
उद्घाटिलेले शब्द.     १०७
९८ वारला       १२३ आर्द्र
९९ थकला १२४ थंडावणे
१०० आटोपणे १२५ पाझर
१०१ काफर १२६ छाया
१०२ फिरंगी कावा १२७ चंद्र
१०३ प्रारब्ध १२८ गार
१०४ प्राक्तन १२९ नाशिक
१०५ भवितव्यता १३० काश्मिर
 वृत्तगर्भ १३१ वाराणशी
१०६ तुराणी १३२ परशुराम क्षेत्र
१०७ आर्य १३३ साळशी
१०८ आर्यावर्त १३४ तुळापुर
१०९ दक्षिण १३५ मद्रास
११० पारियात्र १३६ चाणक्ष
१११ अगस्त्य १३७ राठ
११२ शरद् १३८ पाहारा
११३ वर्ष १३९ राम राम
११४ महाराष्ट्र १४० अटक
११५ श्रुति १४१ चाळिशी
११६ उपनयन १४२ गवाक्ष
११७ विवाह १४३ बोहोणी
११८ आचार्य १४४ बेळगांव
११९ आचार्य १४५ नणंद
१२० उपाध्याय १४६ लिपि
१२१ उपाध्यायानी १४७ वर्ण
१२२ अंकित १४८ लेखन

१०८     मराठी शब्दांचे उद्घाटन.
१४९ पत्र        १६५ साठकें
१५० पर्ण १६६ आठवडा
१५१ राजा १६७ पंधरवडा
१५२ प्रधान १६८ जोडा
१५३ पांडवकृत्य १६९ पीतांबर
१५४ संक्रांत १७० नवें
१५५ राशीस येणे १७१ लाल शाई
१५६ शनि १७२ रुमाल
१५७ शनैश्वर १७३ तेल
१५८ राहु १७४ आगगाडी
१५९ केतु १७५ सूतक ( सुतक )
१६० ग्रहण १७६ शौचकूप
१६१ वेध १७७ करंगळी
१६२ छाया १७८ घड्याळ
१६३ पंचपाळे १७९ गोमाशी
१६४ चौफुला १८० फार्स