महाराष्ट्र संस्कृती/महाराष्ट्राची पृथगात्मता


१.
महाराष्ट्राची पृथगात्मता
 



अस्मितेतून संस्कृती
 मानव हा येथून तेथून सर्व एकच असे नेहमी म्हटले जाते. आणि याच्या उलट प्रत्येक मनुष्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते, तो इतरांहून अनेक दृष्टींनी भिन्न असतो, असेही म्हटले जाते. यात परस्परविसंगती आहे असे बाह्यतः वाटत असले तरी, या दोन्ही विधानांना अर्थ आहे. वर्ग, वंश, धर्म, भूमी, भाषा इत्यादींमुळे मानवामानवांत कितीही भेद निर्माण झाले असले तरी, या कारणांमुळे पृथक झालेल्या मानवसमूहात अनेक समानधर्म असतात. उपजतप्रवृत्ती बहुधा सर्वत्र सारख्या असतात. संघटन- विघटन-प्रवृत्तीही सर्वत्र दिसून येतात. राजशासन, धर्मशासन यांच्या पद्धतीही प्रारंभीच्या काळी बहुतेक मानवसमूहात एकरूपच होत्या, असे इतिहास सांगतो. परमेश्वर, गुरू, मातापिता यांच्याविषयी भक्ती, बंधुभगिनीप्रेम, आतिथ्यशीलता हे सांस्कृतिक गुणही बहुतेक मानवसमूहांत आढळून येतात. हे सर्व ध्यानी घेऊन सर्व मानव एकच आहे असे विधान केले जाते. पण दुसऱ्या दृष्टीने पाहता भिन्न मानवसमूहांत भेदही अनेक दिसतात. आणि त्यांचा मागोवा घेता, एक वंश दुसऱ्यापासून, एक धर्मी दुसऱ्या धर्मीयांपासून, एक भाषिक दुसऱ्या भाषिकांपासून, एक प्रादेशिक समूह दुसऱ्या प्रादेशिकांपासून, एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाहून, इतकेच नव्हे तर, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींपासून अनेक दृष्टींनी अगदी भिन्न आहे, असेही दिसून येते. या भेदामुळेच प्रत्येकाला व्यक्तित्व प्राप्त झालेले असते. हे व्यक्तित्व मनुष्यालाच असते असे नाही. राष्ट्राच्या बाबतीतही तो शब्द योजिला जातो. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड यांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे असे आपण म्हणतो. रशिया व अमेरिका यांचे व्यक्तित्व भिन्न आहे, चीन व भारत यांचे व्यक्तित्व भिन्न आहे, असे इतिहासकार सांगतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजराथ, बंगाल, राजस्थान इ. प्रदेश भारत या एकाच राष्ट्रात आहेत. तरी या प्रत्येक प्रदेशाला स्वतंत्र व्यक्तित्व आहे असे मानले जाते. इतकेच नव्हे, तर या प्रदेशांच्या अभ्यंतरातील गोवा. विदर्भ, सौराष्ट अशा भूभागांचाही, आपल्याला स्वतंत्र व्यक्तित्व आहे, असा दावा असून तो पुष्कळ लोक मान्यही करतात. हे स्वतंत्र व्यक्तित्व कशामुळे आले असे विचारता, धर्म, परंपरा, शौर्यधैर्यादी गुण, विद्या, कला यांतील वैभव या गुणसमुच्चयाचा निर्देश केला जातो. यालाच संस्कृती असे म्हणतात. आणि या अर्थाने, अखिल मानवाची संस्कृती एकच आहे, या विधानाला जसा काही अर्थ आहे, तसाच, प्रत्येक राष्ट्राची संस्कृती निराळी आहे, यालाही अर्थ आहे.
 आणि केवळ अर्थ आहे एवढेच नव्हे, तर महत्त्वही आहे. सर्व मानव तेवढा एक या भावनेला मानवाच्या प्रगतीच्या दृष्टीने जसे महत्व आहे तसेच जर्मन निराळे, इंग्लिश निराळे, बंगाली निराळे, मराठा तेवढा निराळा, गुजराथी निराळे, त्यांची स्वतंत्र संस्कृती आहे, या भावनेलाही प्रगतीच्या दृष्टीनेच महत्व आहे. इतरांहून आम्ही निराळे आहो, श्रेष्ठ आहो, या भिन्नत्वाच्या जाणिवेतूनच मानवसमूहांचे कर्तृत्व उदयास येते व जोपासले जाते. आजपर्यंत या अस्मितेतूनच अनेक जमातींचे गुण उदयास येऊन संवर्धित झाले आहेत.

संस्कृतींचा समन्वय
 धर्म, वंश, भाषा, प्रदेश यांमुळे मानवांचे नित्य पृथक समूह बनत असतात आणि आपण निर्माण केलेल्या स्वतंत्र संस्कृतीचा त्या समूहांना अतिशय अभिमान असतो. तसे असणे योग्यही असते. त्यावाचून ती संस्कृती टिकणे शक्यच नसते. इतर मानव- समूह त्यांची पृथगात्मता नष्ट करून त्या समूहांची संस्कृती उच्छेदण्यास सदैव टपलेले असतात. अशा स्थितीत प्रत्येक मानवसमूह आपल्या पृथगात्मतेचे रक्षण करण्यासाठी प्राणार्पणही करण्यास सिद्ध होतो. पण वरील कारणांमुळे पृथक झालेला मानवसमूह दरवेळी स्वयंपूर्ण होऊन स्वतंत्रपणे जगण्यास समर्थ असतोच असे नाही. शिवाय शेजारी शतकानुशतके राहिलेले समाज या पृथगात्मतेच्या भावनेने परस्परांशी नित्य संघर्ष करून तिसऱ्या दूरच्या आक्रमकापुढे बळी पडण्याचाही संभव असतो. म्हणून जगातल्या बहुतेक भूभागांत प्रत्येक मानवसमूहाला शेजारच्या अन्य मानवसमूहांशी संबंध जोडून सर्वांनी मिळून एकात्म समाज घडविणे अपरिहार्य होऊन बसते. ही एकात्मता साधताना सर्व पृथक समूहांच्या पृथक संस्कृतींचा आदर करून त्यांचा समन्वय साधणारे धुरीण लाभले तर तो समाज खरा एकात्म आणि संघटित होतो व त्यामुळेच बलशाली होतो. नाहीतर एकात्मता साधत नाही व साधली तरी तिला लवकरच तडे जाऊन समाज दुबळा होतो व ज्या दुसऱ्या समूहांनी अशी अभंग एकात्मता साधली असेल त्यांच्या भक्ष्यस्थानी पडतो.
 गेली शंभरदीडशे वर्षे अखिल भारताचे एक राष्ट्र घडविण्याचे येथील थोर समाजनेत्यांचे अखंड प्रयत्न चालू आहेत. त्यांना बरेचसे यशही लाभले आहे, भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले ते या प्रयत्नांचेच फळ आहे. पण त्याच वेळी मुस्लिम समाज हा भारताशी एकात्म न होऊ शकल्यामुळे पाकिस्तान निर्माण होऊन भारत हे राष्ट्र खंडित झाले. पण हे दुर्देव येथेच संपले नाही. आज दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ हे प्रदेश भारतापासून फुटून निघू पहात आहेत. काश्मीर, आसाम यांची हीच वृत्ती आहे. शिवाय आपापल्या प्रदेशापासून फुटून निघून सवता सुभा स्थापावा अशी गोवा, विदर्भ, सौराष्ट्र या भूविभागांची आणि जातीय मुस्लिम, नागा मिझोसारखे ख्रिश्चन समूह, तारासिंगांचे शीख अनुयायी यांची वृत्ती आहे. आमची संस्कृती भिन्न आहे, या भारतीय राष्ट्रात तिची गळचेपी होत आहे, आम्ही असेच येथे राहिलो तर ती समूळ नष्ट होऊन जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा वेळी मानवसमूह पृथक कशाने होतात, त्यांची संस्कृती भिन्न असते म्हणजे काय, भिन्न संस्कृतीची जाणीव केवळ आभास असतो की, ती सत्य असते, अशी ती असली तर तिच्या रक्षणार्थं स्वतंत्र सत्ता, स्वतंत्र शासन असणे आवश्यक असते की काय, या प्रश्नांचा खोलवर विचार होणे आवश्यक आहे. भारतातील बंगाल, बिहार, आसाम, पंजाब, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या प्रदेशांना आपल्या पृथगहंकाराची जाणीव दीर्घकाळापासून आहे. या प्रदेशांतील पंडितांनी आपापल्या प्रदेशांचे राष्ट्राचे - इतिहास लिहून ती दृढही केलेली आहे. भाषावार प्रांतरचना होऊन प्रादेशिक राज्ये झाल्यापासून या इतिहासलेखनाला पुन्हा उत्तेजन मिळून या पृथगात्मतेचे म्हणजेच आपापल्या पृथक संस्कृतीचे जे वैभव त्याचे गुणगान करावे अशी प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. या प्रवृत्तीत आक्षेपार्ह असे काहीच नाही. ती स्वागतार्हच आहे. भारताचे वैभव हे या सर्व राज्यांचे वैभव आहे. तेव्हा या वैभवात आपला अंशभाग किती, भारताच्या संस्कृतिसंवर्धनाचे आपल्या प्रदेशाला श्रेय किती हे सांगून त्याचा योग्य तो अभिमान प्रदेशराज्यांनी वाहिला तर ते श्लाध्यच आहे. पण तसे करताना आपण भारत राष्ट्राचे एक घटक आहोत या सत्याकडे कधीच दुर्लक्ष होता कामा नये. नाहीतर आधीच शिथिल होत चाललेल्या अखिल भारतनिष्ठेची हानी होईल. आपापले इतिहास लिहिताना सत्यापलाप करावा, सत्याला मुरड घालावी, काही सत्य झाकून ठेवावे असा याचा अर्थ नाही. मागल्या काळी या देशात भिन्न भाषिकांचे, वर्णांचे, वंशांचे, जातींचे अगदी प्राणांतिक संघर्ष झाले आहेत. त्यांचे इतिहास बदलून लिहावे असेही नाही. पण आपापले पृथक वैभव वर्णीत असताना आपणांला सर्वांना भारतनिष्ठा जोपासावयाची आहे याचा विसर पडू देणे इष्ट नव्हे, याबद्दल दुमत होईल असे वाटत नाही.
 'महाराष्ट्र संस्कृती' चा इतिहास या ग्रंथात जो द्यावयाचा आहे तो लिहिताना हेच तत्त्व सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि वाचकांनी ग्रंथ वाचताना ही दृष्टी ठेवूनच तो वाचावा अशी ग्रंथकर्त्याची त्यांना विनंती आहे.

*  *  *

 महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास हा या ग्रंथाचा विषय आहे. मराठ्यांच्या संस्कृतीचे दर्शन या ग्रंथात घडवावयाचे आहे. पण विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी महाराष्ट्र व संस्कृती या दोन शब्दांची विवक्षा स्पष्ट करून घेणे अवश्य आहे. या विवक्षा निश्चित झाल्या की विषयाचा पूर्ण व्याप डोळ्यांपुढे उभा राहील.

चतुःसीमा
 आज महाराष्ट्र याचा अर्थ निश्चित झालेला आहे. त्याच्या चतुःसीमा ढोबळपणे सर्वमान्य झालेल्या आहेत. बेळगाव, कारवार, गोवा यांच्याविषयी वाद असला तरी तो राजकीय क्षेत्रातला आहे; सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही. हे ध्यानात घेऊन महाराष्ट्र म्हणजे कोणता प्रदेश हे निश्चितपणे आज सांगता येईल. गोवा ते दमण ही रेषा याची पश्चिम सीमा आहे. ती सिंधुसागराने निश्चित केली आहे. सातपुडा व त्याच्या पायथ्याशी वाहणारी तापी नदी ही याची उत्तर सीमा आहे. ती साधारण ८० रेखांशापर्यंत जाते. महाराष्ट्राची पूर्व सीमा अशी सरळ नाही. गोवा-कारवारपासून ती सोपानाप्रमाणे पायरीपायरीने चढत जाते. कारवार, सोलापूर बेदर, माहूर, चांदा, भंडारा अशा त्या सोनानपरंपरेतील पायऱ्या आहेत. तेव्ह, आजच्या महाराष्ट्रभूमीच्या सीमा अशा निश्चित आहेत. पण आपल्याला इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून आजमितीपर्यंत सुमारे दोन सव्वादोन हजार वर्षाच्या संस्कृतीचा इतिहास पहावयाचा आहे. तेव्हा त्या काळी महाराष्ट्राच्या सीमा कोणत्या होत्या, त्या कशाने निश्चित झाल्या होत्या, त्या प्रारंभकाळी या भूमीला हेच नामाभिधान होता काय, असल्यास ते कशावरून पडले होते इ. प्रश्न उपस्थित होतात. त्या काळापासून इतिहास लिहावयांचा तर या प्रश्नांचा निर्णय आधी केला पाहिजे. म्हणजेच महाराष्ट्र या शब्दाची विवक्षा आधी निश्चित केली पाहिजे.

संस्कृतीची व्याख्या
 संस्कृती या शब्दाचे तसेच आहे. मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती, आध्यात्मिक व आधिभौतिक शक्तींना सामाजिक जीवनास उपयुक्त बनविण्याची कला म्हणजे संस्कृती, राष्ट्रातील विद्वानांचे, ऋषींचे, धर्मज्ञांचे विचार, त्यांची ध्येये, त्यांचे मार्ग व त्यांना अनुसरून राष्ट्रात झालेला आचार यांनी संस्कृती बनते, अशा संस्कृतीच्या निरनिराळ्या व्याख्या पंडितांनी केलेल्या आहेत. इंग्रजीत कल्चर आणि सिव्हिलिझेशन असे दोन संस्कृतिवाचक शब्द आहेत. सिव्हिलिझेशन याचा अर्थ भौतिक प्रगती असा अलीकडे केला जातो. उद्योगधंदे, गिरण्या कारखाने, शास्त्रीय शेती, वाहतुकीची साधने, सुखसोयी वाढविणारी अनेक प्रकारची यंत्रे, अनंतविध शस्त्रास्त्रे यांचा सिव्हिलिझेशनमध्ये अंतर्भाव होतो. मनोमय सृष्टी ती याहून निराळी. धर्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजनीती, साहित्य, कला, विज्ञान यांचा या सृष्टीत समावेश होतो. कल्चर याचा हा अर्थ आहे. पण वर दिलेल्या व्याख्या पाहिल्या म्हणजे कल्चर व सिव्हिलिझेशन या दोहींचाही अंतर्भाव मराठी 'संस्कृती ' या शब्दात केलेला आहे, असे दिसून येईल. त्यातल्या त्यात मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी ही व्याख्या सोपी व सुटसुटीत वाटते. तिने संस्कृती शब्दाची विवक्षा स्पष्ट होते. महाराष्ट्र संस्कृतीच्या या इतिहासात तीच अभिप्रेत आहे. या भूमीत निर्माण वा रूढ झालेले धर्मशास्त्र, येथील तत्त्वज्ञान, येथील राजपुरुषांनी अवलंबिलेली राजनीती, त्यांचे पराक्रम, त्यांची साम्राज्ये, येथे निर्माण झालेली भौतिकशास्त्रे, येथली साहित्यसृष्टी, कलासृष्टी येवढ्या व्यापक अर्थाने संस्कृती हा शब्द येथे योजिलेला आहे.

भाषातत्त्व
 आज महाराष्ट्र हा भारतीय संघराज्याचा एक घटक आहे. गुजराथ, पंजाब, उत्तर प्रदेश, बंगाल, आसाम, म्हैसूर, आंध्र याप्रमाणेच महाराष्ट्र हाही एक भारताचा प्रधान घटक आहे. आपल्या संघराज्याचे घटक असे हे जे चौदा प्रधान प्रदेश ते प्रामुख्याने भाषातत्त्वावर भिन्न झालेले आहेत. गुजराथी, बंगाली, कन्नड, तामीळ इ. चौदा प्रमुख भाषा त्या त्या प्रदेशात बोलल्या जातात. आणि एक प्रदेश दुसऱ्या प्रदेशापासून निराळा झाला आहे तो भाषेमुळेच होय. धर्म किंवा वंश या वर्गीकरणाच्या तत्त्वांचा येथे काही संबंध नाही. हे भेद त्या तत्त्वांवर केलेले नाहीत. भारतात भिन्न धर्मांचे व वंशाचे लोक आहेत. नाही असे नाही. पण बहुतेक सर्व प्रदेशांत या सर्व धर्मांचे व वंशांचे लोक राहतात. आणि ते त्या त्या प्रांताची भाषा बोलतात. तेव्हा प्रदेश- विभागणी भाषातत्त्वावर झाली आहे, हे उघड आहे. अर्थात महाराष्ट्राची ही भिन्नता याच तत्त्वावर प्रस्थापित झाली आहे. संयुक्त महाराष्ट्राची प्रस्थापना झाली त्या वेळी विदर्भ, मराठवाडा यांचा समावेश महाराष्ट्रात करण्यात आला तो तेथील लोक मराठी भाषिक आहेत म्हणूनच आणि आज बेळगाव, कारवार व गोवा यांचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा, असा महाराष्ट्रीयांचा आग्रह आहे याचेही कारण हेच आहे. त्याला विरोध होत आहे त्याची कारणे राजकीय आहेत. सांस्कृतिक नाहीत. तेव्हा मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणूनच महाराष्ट्र हा आज निराळा झाला आहे हे निर्विवाद आहे.
 पण मराठी भाषिकांची भूमी म्हणजे महाराष्ट्र हे समीकरण निश्चित झाले ते साधारणतः इ. सन १२०० च्या सुमारास मराठी भाषेची उत्पत्ती विद्वानांच्या मते इ. स. ८००-१००० च्या सुमारास झाली. तिच्यातील 'विवेकसिंधू' हा पहिला ग्रंथ इ. स. ११८८ या साली निर्माण झाला, आणि त्याच वेळी यादवांच्या साम्राज्याची स्थापना झाली. पुढील शंभर वर्षात महानुभाव पंथाचे अनेक ग्रंथ रचले गेले आणि १२९० च्या सुमारास ज्ञानेश्वरीचा अवतार झाला. म्हणजे साधारणपणे तेराव्या शतकात स्वतंत्र निराळी मातृभाषा यामुळे महाराष्ट्राची अस्मिता निश्चित झाली. तेव्हा इ. स. १२०० पासून या भूमीतील संस्कृती ती महाराष्ट्राची संस्कृती असे म्हणणे यथार्थ आहे. पण इ. स. पू. ३०० पासून या संस्कृतीचा इतिहास पाहावयाचा आहे असे वर म्हटले आहे. तेव्हा इ. स. १२०० च्या पूर्वीचा हा जो १५०० वर्षांचा काळ, त्या काळातल्या या भूमीच्या संस्कृतीला महाराष्ट्र संस्कृती असे म्हणणे कितपत युक्त होईल असा प्रश्न उद्भवतो.

पृथगात्मतेचा मागोवा
 प्राचीन काळी भारतात आर्यांची संस्कृती नांदत होती अशी वर्णने प्राचीन ग्रंथांत आहेत. प्रारंभीच्या काळात आर्य लोक विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आले नव्हते. त्यांच्या वसाहती सर्व उत्तर भारतातच झाल्या होत्या. पण त्या वेळी सर्व उत्तर भारताचा आर्यावर्त असा एक प्रदेश म्हणून उल्लेख होत असे. त्यातील भूभागांचा मगध, कोसल, कुरुपांचाल, कांबोज असा उल्लेख प्राचीन ग्रंथांत होत असे. पण त्यांपैकी कोणत्याच भूभागाला पृथगात्मता आलेली नव्हती. त्याची काही भिन्न संस्कृती आहे, प्रत्येकाची निराळी अस्मिता आहे अशी जाणीव कोणाला झाल्याचे प्राचीन ग्रंथांत दिसून येत नाही. सर्व आर्यावर्त हा येथून तेथून एक अशीच तत्कालीन लोकांची, धर्मवेत्त्यांची, ग्रंथकारांची, राज्यकर्त्यांची भावना होती. त्यानंतर इ. स. पू. १००० च्या सुमारास आर्यांचा दक्षिणेत प्रवेश झाला. पण तरीही भारताची विभागणी अशी झाली नाही. अखिल भारत हा एकच देश व त्याची सर्वव्यापक अशी एक संस्कृती अशीच सर्वांची धारणा होती. विंध्याच्या दक्षिणेच्या प्रदेशाला त्या वेळी दक्षिणापथ म्हणत. आणि मागल्या काळाप्रमाणेच या काळातही कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, आनर्त, अपरान्त, कुंतल, देवराष्ट्र, असे दक्षिणापथातील भिन्न भूभागांचे निर्देश त्या काळच्या ग्रंथांत केले जात. पण तरीही त्यांना पृथगात्मता असल्याची कोणतीही लक्षणे त्या काळच्या ग्रंथांवरून दिसून येत नाहीत.
 मग ही पृथगात्मता केव्हापासून आली ? हा महाराष्ट्र, हा कर्नाटक, हा आंध्र, हा तामिळनाडू, हा गुजराथ, हा बंगाल असा निर्देश करणे आणि त्यांची संस्कृती पृथक आहे, स्वतंत्र आहे असे विधान करणे, हे केव्हापासून युक्त ठरेल ? आम्हा भारतीयांची संस्कृती भिन्न आहे, ती फार संपन्न आहे व फार प्राचीन आहे असा अभिमान आपण वाहतो त्यावेळी भारतातल्या प्रत्येक प्रदेशाचा नागरिक आपल्या आजच्या संस्कृतीचा धागा वेदकालापर्यंत मागे नेऊन भिडवतो. संस्कृत भाषा, वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण इ. ग्रंथ, हिंदुधर्म, विवाहउपनयनादी संस्कार, चातुर्वर्ण्यसंस्था, शिव-राम कृष्णादी दैवते ही या संस्कृतीची प्रधान लक्षणे आहेत. आणि त्यांची अतूट परंपरा प्रत्येक प्रदेशाला सहज दाखविता येते. ही परंपरा एका बाजूने चीन, रशिया, इजिप्त, अरबस्थान या देशांहून भिन्न आहे, सर्वस्वी भिन्न आहे आणि दुसऱ्या बाजूने भारतातल्या सर्व प्रदेशांना समान आहे, त्यांना व्यापणारी आहे. यामुळेच ही आमची 'भारतीय संस्कृती' आहे या म्हणण्याला अर्थ प्राप्त होतो. तसा अर्थ 'महाराष्ट्र-संस्कृती' या शब्दाला प्राप्त होईल काय ? इ. स. १२००च्या सुमारास भिन्न भाषा, भिन्न राजसत्ता, भिन्न ग्रंथकार व भिन्न धर्मवेत्ते यामुळे महाराष्ट्राची अस्मिता निर्विवाद सिद्ध होते. पण त्यापूर्वीच्या १५०० वर्षांच्या काळात अशी भिन्नतेची काही लक्षणे दिसतात काय ? आजचे आम्ही जे भारतीय तेच वेदकाळी होतो असे म्हणताना आम्हाला जसा संस्कृतीचा अतूट धागा तेव्हापासून आतापर्यंत दाखविता येतो, चीन, रशिया, मिसर या देशांपासून आम्ही सर्वस्वी निराळे आहोत, आमची संस्कृती भिन्न आहे हे जसे म्हणता येते, तसे आजच्या महाराष्ट्रीयांना भारताच्या अपेक्षेने म्हणता येईल काय ? वंग, कलिंग, गुजराथ, आंध्र, कर्नाटक या प्रदेशांहून आम्ही त्या मागल्या १५०० वर्षांच्या काळातही भिन्न होतो, आमच्या आजच्या संस्कृतीचा धागा अतूटपणे त्या कालखंडाच्या प्रारंभापर्यंत नेऊन भिडविता येतो, आज आम्ही महाराष्ट्रीय आहो तसे त्या वेळीही आम्ही महाराष्ट्रीयच होतो, असे म्हणणे ऐतिहासिक प्रमाणांनी दाखविता आले तरच महाराष्ट्र संस्कृतीचा प्रारंभ इ. स. पू. तिसऱ्या शतकात झाला असे म्हणता येईल तेव्हा या प्रश्नाचा, या पृथगात्मतेच्या सिद्धतेचा प्रथम विचार केला पाहिजे.

ताम्रपाषाणयुग
 सध्या भारतात पुराणवस्तुसंशोधन चालू आहे. या खात्यातर्फे अखिल भारतात आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सर्वत्र उत्खनन चालू आहे. महाराष्ट्रात गोदावरी, प्रवरा, तापी, भीमा, कृष्णा, मुठा इ. नद्यांच्या काठी जी उत्खनने झाली त्यांच्यावरून या खात्यातील पंडितांनी महाराष्ट्राचा अतिप्राचीनकाळचा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग असे या कालाचे हे पंडित तीन खंड करतात. अश्मयुगाचा काल सुमारे दोन लाख वर्षांपूर्वीचा आहे. महाराष्ट्रातील अश्मपाषाणयुगाचा काल इ. स. पू. १५०० ते इ. स. पू. १००० असा असावा असे या पंडितांना वाटते. लोहयुगास त्यानंतर प्रारंभ होतो. कोल्हापूर, पैठण, कऱ्हाड, नेवासे, नाशिक इ. ठिकाणी या तीन युगांतील अवशेष सापडले आहेत. त्यावरून त्या काळच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे चित्र संशोधकांनी रेखाटले आहे. त्यावरून सष्ट असे दिसते की पहिल्या दोन युगांत महाराष्ट्रातील मानवाची संस्कृती इतर मानवांपेक्षा कोणत्याच दृष्टीने निराळी नव्हती. कुऱ्हाड, फरशी, अशा तऱ्हेची अश्मयुगातली दगडाची हत्यारे वरील ठिकाणी सापडली आहेत. गिरमिटा सारखे हत्यार, बाणाचे फाळ, चामडी छिलण्याचे धारदार हत्यार अशीही दगडी हत्यारे सापडतात. त्याचप्रमाणे जनावरांची अश्मीभूत हाडेही सापडतात. अश्मयुगाच्या अगदी उत्तर काळात येथील आदिमानवाने भटकी वृत्ती टाकून देऊन शेतीचा अवलंब केला असे त्या काळच्या हत्यारांवरून व धान्य, भुसा यांच्या अवशेषांवरून दिसते. यानंतर ताम्रपाषाणयुग सुरू होते. या युगातील मानव घरे बांधून राहात होता. रांजण, परात, वाडगा इ. मातीची भांडी करीत होता. त्यावर मोर, हरिण, वाघ यांची चित्रेही काढीत होता. या काळात त्याला तांब्याची हत्यारे करण्याची कलाही अवगत झाली होती. या तांब्याच्या हत्यारांमध्ये तांब्यात कथलाचे मिश्रण केलेले आढळते. धातूंचे मिश्रण करणाची विद्या हे बऱ्याच प्रगतीचे लक्षण आहे
 या युगातील उत्खननात जे अवशेष सापडले त्यांवरून त्या काळच्या मानवाच्या जड, भौतिक संस्कृतीचाच फक्त अंदाज बांधता येतो. त्याच्या मानसिक प्रगतीचा फारसा पत्ता लागत नाही. तरी मरणोत्तर जीवनावर त्याची श्रद्धा असावी असे, मृतांबरोबर गाडगी, मडकी, खेळणी, दागिने इ. वस्तू पुरलेल्या आढळतात, त्यावरून अनुमान होते. त्याचा धर्म हा जादूटोण्याच्या पायरीवरच असावा, असे काही अवशेषांवरून वाटते. यापलीकडे त्याच्या आध्यात्मिक अवस्थेविषयी, वैचारिक धनाविपयी काही ज्ञान उपलब्ध होत नाही.

त्र्यंबकेश्वर ?
 इ. स. पू. १००० वर्षांच्या मागल्या अतिप्राचीन काळातील महाराष्ट्रातील मानवी संस्कृतीचे हे चित्र आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजातील पुराणवस्तुसंशोधन व प्राचीन भारतीय इतिहास या विषयाचे प्राध्यापक डॉ. शां. भा. देव यांनी 'महाराष्ट्रातील उत्खनने ' या आपल्या व्याख्यानमालेत प्राचीन महाराष्ट्र-संस्कृतीचे वरील प्रकारे वर्णन केले आहे. हे वर्णन करताना त्या जागी त्यांनी आवर्जून सांगितले आहे की महाराष्ट्रातील त्या काळची संस्कृती दक्षिणेतील इतर प्रांतांतील संस्कृतीपेक्षा कोणत्याच प्रकारे निराळी दिसत नाही. म्हणून या संस्कृतीकडे प्रादेशिक दृष्टीने बघून चालणार नाही. अश्मयुगातील दगडी हत्यारांचे वर्णन झाल्यावर ते सांगतात की यावरून दिसणारी महाराष्ट्रातील मानवाची संस्कृती त्याच्या इतर भाऊबंदांसारखीच होती. ताम्रपाषाणयुग हे तर तीनसाडेतीन हजार वर्षांपूर्वीचेच आहे. या काळात उत्तरेकडे आर्यांची संस्कृती पुष्कळच विकसित झाली होती. त्या वेळी दक्षिणेत महाराष्ट्रातील मानव सुसंस्कृत व स्थिर जीवन जगत होता, असे स्वतः डॉ. देवांनीच म्हटले आहे. तरीही ताम्रपाषाणयुगातली ही महाराष्ट्रातील संस्कृती ताम्रपाषाणयुगातल्या इतर प्रांतांतल्या व देशांतल्या संस्कृतीपेक्षा भिन्न नव्हती, असेच त्यांनी आपले मत दिले आहे. आणि आपल्याला तर महाराष्ट्राच्या पृथगात्मतेच्या प्रारंभाचा शोध घ्यावयाचा आहे. आकाशातून पर्जन्यकाळी अनंत जलधारा वर्षत असतात. सर्व नद्यांना त्यांतूनच पाणी मिळते. पण एका नदीला आपण गंगा म्हणतो, दुसरीला यमुना म्हणतो, तिसरीला गोदावरी व चौथीला कृष्णा म्हणतो. असे का ? याचे कारण उघड आहे. प्रत्येक नदीचा प्रवाह अगदी भिन्न दिसत असतो. पण हे प्रवाह पाहिल्यामुळेच, प्रथम हे प्रवाह कोठे भिन्न झाले, हे आपल्याला पहावेसे वाटते. कारण मूळ पाणी एकच असले तरी, त्या त्या भूमीतील खनिजामुळे प्रत्येक नदीचे पाणी रंग, रुची, पाचकपणा, जडहलकेपणा, या गुणांच्या दृष्टीने भिन्नरूप झालेले असते. हे भिन्नरूप त्याला प्रथम कोठे प्राप्त झाले याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग हिमालयातील गंगोत्री, जम्नाेत्री, सह्याद्रीतील त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर ही त्या नद्यांची मूळस्थाने, हे त्यांचे उगम आपल्याला सापडतात व येथून गंगा सुरू झाली, येथून यमुना, येथून गोदा, येथून कृष्णा उगम पावली असे आपण निश्चित करतो. म्हणजे गोदा, कृष्णा यांची पृथगात्मता कोठून सुरू होते याचाच आपण शोध घेतो. या जलवाहिनींच्या प्रवाहांप्रमाणेच भिन्न संस्कृतींच्या प्रवाहाचा शोध घेण्याची आपल्याला जिज्ञासा वाटते; व तिच्यामुळेच कन्नड - संस्कृती, आंध्र-संस्कृती, महाराष्ट्र - संस्कृती यांच्या उगमाकडे आपण प्रवास करीत जातो. महाराष्ट्र - संस्कृतीविषयी तोच प्रयत्न आपल्याला करावयाचा आहे. या संस्कृतीचे त्र्यंबकेश्वर कोठे आहे ते आपल्याला हुडकून काढावयाचे आहे. पैठणनांदेडजवळ गोदावरीचा प्रवाह स्वच्छ निराळा दिसतो. तेथे शंकेला जागा राहत नाही. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात महाराष्ट्र-संस्कृतीचा प्रवाह मुकुंदराज, चक्रधर, ज्ञानेश्वर, सिंघण, कृष्णदेव, रामदेवराव यादव यांच्या रूपाने स्वच्छ निराळा दिसतो. पण त्याच्याही मागे जाऊन या नदीचा उगम कोठे आहे, त्र्यंबकेश्वरापासून ज्याप्रमाणे गोदावरी निराळी झाली, पृथक झाली, तिचा स्वतंत्र प्रवाह सुरू झाला, असे म्हणता येते, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी कोणत्या कालापासून म्हणता येईल ते. आपणास पहावयाचे आहे. आकाशातून पडणाऱ्या जलधारा प्रथम आकाशात सर्वत्र एकरूप, समगुण अशाच असतात. त्यांच्यांत परपस्परव्यवच्छेदकता नसते. त्याप्रमाणेच ताम्रपाषाणयुगाच्या अखेरपर्यंत म्हणजे इ. स. पू. १००० या काळापर्यंत महाराष्ट्रातील संस्कृतिधारा इतर भूप्रदेशांतील त्या युगातील धारांहून भिन्न नव्हत्या, त्या काळातील सर्व प्रदेशांतील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती एकरूप व समगुणच होत्या, असे उत्खननशास्त्राच्या आधारे आपण वर पाहिलेच आहे. तेव्हा त्यानंतरच्या काळात येऊन आपल्या त्र्यंबकेश्वराचा शोध कोठे लागतो का ते आता पहावयाचे आहे.

भाषा निर्णायक
 आज भारतीय संघराज्यातील प्रारंभी उल्लेखिलेले जे गुजराथ, बंगाल, कर्नाटक, आसाम, ओरिसा, महाराष्ट्र इ. प्रदेश ते भाषाभेदामुळे झाले आहेत हे आपण वर पाहिलेच आहे. या प्रत्येक प्रदेशाच्या परंपरा आता भिन्न झाल्या आहेत. आणि भाषेखेरीज इतरही अनेक कारणांमुळे त्यांना स्वतंत्र व्यक्तित्व प्राप्त झाले आहे. त्यांची भिन्न संस्कृती ती तीच. पण त्यांच्यांतील मुख्य भेदकारण भाषा हेच आहे. धर्म, वंश ही भेदकारणे याला मुळीच प्रेरक झालेली नाहीत. लो. टिळकांनी म्हटले आहे की नर्मदेच्या दक्षिणेकडे महाराष्ट्र कर्नाटक असे जे भेद झालेले दिसतात ने पिंडान्वयापेक्षा भाषान्वयानेच झालेले आहेत. कन्नड व मराठे यांच्यांत रक्तभेद-वंश- भेद मुळीच नाही. धर्मभेद तर नाहीच नाही. तीच गोष्ट उत्तरेतील प्रदेशांची आहे. त्यांच्यांतील काही प्रदेशांतील समाजात भिन्न भिन्न रक्तांचे मिश्रण असेल. पण वंशतः अगदी भिन्न असा कोणताच समाज नाही. आणि त्या भेदामुळे ते प्रदेश भिन्न झाले, असे तर केव्हाच म्हणता येणार नाही. एवंच भारतीय संघराज्यातील घटक प्रदेश हे भाषाभेदामुळेच भिन्न झालेले आहेत यात वाद नाही. कानडी भाषिकांचा तो कर्नाटक व मराठी भाषिकांचा तो महाराष्ट्र असाच भाषाप्रदेशांचा अन्वय सर्वत्र आहे. तेव्हा याच धाग्याचा मागोवा घेत आपण मागल्या काळात प्रवास करीत जाऊन महाराष्ट्र च्या पृथगात्मतेचा आरंभबिंदू शोधणे हे फलदायी ठरण्याचा संभव आहे.
 मराठी भाषेत ग्रंथरचनेला प्रारंभ झाला तो इ. स. च्या बाराव्या शतकाच्या अखेरीस आणि तेराव्याच्या प्रारंभी. अर्थात तिची उत्पत्ती बोली भाषेच्या रूपात यापूर्वी दोनतीन शतके तरी झाली असलीच पाहिजे. तशी ती झाली असल्याचे पुरावे शिलालेखांत व 'कुवलयमाला' सारख्या प्राकृत ग्रंथात सापडतातही. पण अशा रीतीने तिचा प्रारंभकाल फार तर ८ व्या, १० व्या शतकापर्यंत नेता येईल. पण समाजाला, राष्ट्राला पृथगात्मता येण्याच्या दृष्टीने आपण हा शोध घेत आहो. तेव्हा त्या दृष्टीने ग्रंथरचना झाली तोच प्रारंभकाळ आपल्याला मानला पाहिजे. कारण भाषा बोलीच्या रूपात जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला स्वतःला व तिच्यामुळे ती बोलणाऱ्या समाजाला अस्मिता प्राप्त होणे शक्य नसते. अर्थात या तिच्या स्वरूपाला नदीच्या उगमाप्रमाणे मह्त्त्व आहे यात शंका नाही. पण अशा दृष्टीने पाहिले तरी हा उगम दहाव्या शतकापलीकडे जात नाही. आणि आपल्याला तर त्याच्यापूर्वीच्या १३०० वर्षांच्या काळापर्यंत जावयाचे आहे. या मागल्या काळात महाराष्ट्राची, महाराष्ट्र समाजाची पृथगात्मता सिद्ध करण्यात भाषाभेदाचा आधार सापडेल काय ?
 सुदैवाने तसा आधार, तशी प्रमाणे आज उपलब्ध झाली आहेत.
 आजच्या भारतातील बहुतेक सर्व भाषा संस्कृतोद्भव आहेत असे ढोबळपणे मानले जाते. आणि ढोबळपणे ते खरेही आहे. म्हणजे त्यांचा मूळ उगम संस्कृतात सापडतो हे खरे आहे. पण आमची एकही भाषा प्रत्यक्ष संस्कृतातून उद्भवलेली नाही. ती संस्कृताची वंशज आहे इतकेच खरे आहे. आजची अनेक द्विजकुळे आम्ही रामाचे वंशज, कृष्णाचे, भृगूचे, भारद्वाजाचे वंशज असे सांगतात. त्याचा जो अर्थ तोच येथे घ्यावयाचा. रामाच्या कुळात ते जन्माला आले एवढाच जसा त्यांच्या विधानाचा अर्थ तसा या भाषा संस्कृतच्या कुळात जन्म पावल्या एवढाच अर्थ त्या भाषा संस्कृतोद्भव आहेत या विधानाचा आहे
 मूळभाषा संस्कृत, तिच्यापासून भिन्न प्रदेशांत महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची व मागधी या प्राकृत भाषा निर्माण झाल्या; पुढे या प्राकृतापासून देशपरत्वे महाराष्ट्री अपभ्रंश, शौरसेनी अपभ्रंश, पैशाची अपभ्रंश व मागधी अपभ्रंश अशा चार पृथक अपभ्रंश भाषा उद्भवल्या आणि या भिन्न भिन्न अपभ्रंश भाषांपासून आजच्या देशी भाषा किंवा प्रांतिक भाषा जन्मल्या असे आज सर्वसामान्यतः भाषाशास्त्रज्ञांचे मत आहे. यात्र भाषाशास्त्रज्ञांपैकी अनेकांनी असेही मत दिले आहे की मराठी ही महाराष्ट्री अपभ्रंशापासून आणि ही अपभ्रंश भाषा महाराष्ट्री - प्राकृतापासून झालेली आहे. याच्याच जोडीला महाराष्ट्री अपभ्रंश व महाराष्ट्री प्राकृत या भाषा महाराष्ट्राच्या होत्या, त्या या भूमीतच जन्मल्या व विकसित झाल्या, त्या येथील बहुजनांच्या भाषा होत्या आणि ग्रंथकारांच्याही होत्या, हेही मत भाषकोविदांमध्ये बहुमान्य झाले आहे. हे मत जर आपल्याला पटले, स्वीकार्य वाटले तर महाराष्ट्राच्या पृथगात्मतेचा उदय आपल्याला इष्ट त्या प्राचीन काळापर्यंत - इ. पू. पाचव्या सहाव्या शतकापर्यंत- नेऊन भिडविता येईल; आणि महाराष्ट्राला गेली दोन अडीच हजार वर्षे स्वतंत्र इतिहास आहे, स्वतंत्र परंपरा आहे, म्हणूनच स्वतंत्र संस्कृती आहे या म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल. म्हणून भाषाकोविदांची याविषयीची मते आता आपण विचारार्थ पुढे घेऊ.

प्राकृत-उद्भव
 आर्य हे हिंदुस्थानात सुमारे ४००० वर्षांपूर्वी आले. आणि प्रथम अनेक शतके त्यांनी आपल्या वसाहती उत्तर हिंदुस्थानातच वसविल्या. पाणिनीच्या व्याकरणात विंध्याच्या दक्षिणेकडच्या प्रदेशांचा उल्लेख नाही. त्यावरून त्या काळापर्यंत आर्य दक्षिणेत आले नव्हते, असे विद्वानांचे अनुमान आहे. पाणिनीचा काळ इ. स. पूर्व ८०० असा धरला जातो. त्यानंतर इ. पू. ४०० च्या सुमारास कात्यायन झाला. त्याच्या ग्रंथात दक्षिणेतल्या देशांचे उल्लेख विपुल आहेत. तेव्हा इ. पू. ८०० ते इ. पू. ४०० या दरम्यान आर्य दक्षिणेत येऊन स्थिर वसाहती करून राहिले, असे दिसते. ते महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या संस्कृत भाषेचा येथल्या मूळच्या समाजाच्या भाषेशी संपर्क येऊन त्यातून महाराष्ट्री ही प्राकृत भाषा निर्माण झाली, असे एक मत आहे. काहींच्या मते उत्तर हिंदुस्थानातच संस्कृताचे भिन्न अपभ्रंश होण्यास प्रारंभ झाला होता. किंबहुना वेदकाळीसुद्धा, ग्रंथाची भाषा वैदिक संस्कृत ही असताना, बहुजनांची एक तिच्याहून निराळी अशी भाषा प्रचलित असली पाहिजे. संस्कृत पंडितांचीसुद्धा प्रत्यक्ष बोलण्याची भाषा तीच असली पाहिजे. यज्ञविधी प्रत्यक्ष चालू असताना त्या काळात प्राकृतात बोलू नये असा एक दंडक होता. त्यावरून धर्मकृत्ये व शास्त्रीय चर्चा ही सोडून अन्यवेळी, वेदकाळीसुद्धा, विद्वान लोक कोठली तरी संस्कृतेतर भाषा बोलत असले पाहिजेत असे दिसते. वेदकाळची ही जी बोली भाषा तीच सर्व प्राकृत भाषांची जननी होय असे एक मत अलीकडे रूढ होत आहे आणि ते बरेचसे सयुक्तिक असावे असे वाटते. आर्य लोक जसजसे भिन्न प्रदेशांत जात आणि आपली राज्ये स्थापून आपल्या संस्कृतीचा प्रसार करीत तसतसा त्यांची जी ग्रांथिक संस्कृत व संस्कृतसम बोलीभाषा तिचा मूळ समाजाच्या भाषांशी संबंध येई आणि त्यातून प्रांतोप्रांती प्राकृत भाषा निर्माण होत. मथुरेभोवतालचा जो शूरसेन प्रांत तेथे अशा प्रकारे निर्माण झालेली ती शौरसेनी, मगधात झालेली ती मागधी व महाराष्ट्रात झालेली ती महारष्ट्री हे मत आता सर्वमान्य होत आले आहे.

महाराष्ट्री महाराष्ट्राची
 कुलगुरु चिंतामणराव वैद्य यांनी आपल्या ठाणे-ग्रंथसंग्रहालय (इ. स. १९०६ ), पुणे - ग्रंथकार संमेलन (इ. स. १९०८ ) व बडोदे - साहित्य संमेलन (१९०९) येथील भाषणात हाच सिद्धान्त मांडला आहे. त्यांनी प्राकृत व्याकरणकारांचा आधारही दिला आहे. विंध्याच्या उत्तरेस शौरशेनी व मागधी या संस्कृताचा अपभ्रंश होऊन निर्माण झाल्या व महाराष्ट्रात संस्कृताचा अपभ्रंश होऊन जी भाषा निर्माण झाली तीच महाराष्ट्री, असे प्राकृत व्याकरणकारांचे मत आहे. यांतील संस्कृताचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषा निघाल्या, हे मत आता मान्य नाही. वैदिक संस्कृत व पाणिनीय संस्कृत यांच्या काळी उत्तर भारतातही बहुजनांची निराळी भाषा होती. तिच्यावर संस्कृतचे वर्चस्व होते हे खरे. पण ती भाषा होती. चिंतामणरावांच्या मते आर्य दक्षिणेत आले तेव्हा संस्कृत भाषा मृतच होती. ती फक्त ग्रंथात चालू होती. आर्यांची बोलण्याची भाषा तिच्याहून भिन्न होती. त्या भाषेला महाराष्ट्रात विशिष्ट रूप येऊन तिची महाराष्ट्र प्राकृत भाषा झाली.
 काही पंडितांच्या मते महाराष्ट्री ही शौरसेनीवरून निघाली तर काहींच्या मते ती अर्धमागधीवरून निघाली. डॉ. हन्र्ले या पंडिताच्या मते महाराष्ट्री ही गंगायमुना यांच्या परिसरातील- म्हणजे मोठ्या देशातील भाषा होय. तिला महाराष्ट्री नाव यामुळेच पडले. तिचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. डॉ. ग्रियरसन या थोर भाषापंडिताचे प्रारंभी असेच मत होते. पण पुढे त्याचे मत बदलले. डॉ. स्टेन को नौ (ख्रिश्चानिया विद्यापीठ, नॉर्वे) यांनी आपल्या 'महाराष्ट्री व मराठी' या लेखात, प्राकृत व्याकरणकारांचे परंपरागत मत हेच सयुक्तिक आहे व महाराष्ट्र व महाराष्ट्री यांचा दृढ संबंध आहे असे मत मांडले आहे. महाराष्ट्री व मराठी यांचा पाया एकच आहे, असे सांगून डॉ. भांडारकर, गॅरेंज, जाकोबी, कुन्ह, पिशेल, इ. पंडितांचे हेच मत असल्याचे त्याने सांगितले आहे. ( इंडियन ॲंटिक्वेरी, व्हॉ. ३२, इ. १९०३ ) ग्रियरसननेही या मताला नंतर मान्यता दिली, हे वर सांगितलेच आहे.
 महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच भाषा होय, असे मत राजाराम रामकृष्ण भागवत यांनीही आपल्या 'प्राकृत भाषेची विचिकित्सा' या निबंधात मांडले आहे. त्यांच्या मते महाराष्ट्री ही संस्कृतापासून उद्भवली हे खरे, पण ती लौकिक संस्कृतापासून नव्हे, तर संस्कृतच्या पूर्वरूपापासून सूक्तांच्या ऋग्-मंत्रांच्या काळीही प्राकृत भाषा होतीच. प्राकृत हा शब्द त्यांच्या मते मूळचा नव्हे. मूळ शब्द पाअड-म्हणजे सोपे. अवघड ते संस्कृत व मूळचे सोपे ते प्राकृत. पाअडचे 'प्राकृत' हे संस्कृतीकरण होय.
 भागवत म्हणतात की, "प्राकृत भाषांची नावे त्या त्या लोकांवरून किंवा त्यांनी बनविलेल्या देशांवरून पडलेली आहेत, यात शंका नको. या दृष्टीने पाहता शालिवाहन, पैठण व महाराष्ट्र यांचा आज २२०० वर्षे अविभाज्य संबंध आहे व 'महाराष्ट्र' या शब्दाचा या भूमीवर आज २२०० वर्षे खडा पहारा आहे. " ( प्राकृत भाषेची विचिकित्सा, आवृत्ती २ री, १९३०- पृ. ५३,५५ )

महाराष्ट्री - अपभ्रंश
 डॉ. पां. दा. गुणे यांनी ' कुलगुरू चिं. वि. वैद्य व मराठी भाषेची उत्पत्ती' या आपल्या लेखमालेत 'महाराष्ट्री प्राकृत' भाषेविषयी थोड्याफार फरकाने असाच अभिप्राय दिला आहे ( वि. ज्ञा. विस्तार, जुलै १९२२, वर्ष ५३ ). ते म्हणतात, ज्या ज्या वेळी व जेथे जेथे नव्या भाषा उत्पन्न झाल्या त्या त्या वेळी तेथे तेथे दोन अगदी भिन्न संस्कृतींच्या, भिन्न भाषांच्या व भिन्न मानववंशांच्या लोकांची टक्कर होऊन त्यांपकी कोणत्याही कारणाने, हीन असतील ते प्रबळांशी मिसळून गेलेले असतात. असे होते तेव्हाच भिन्न भाषा उत्पन्न होतात. अशाच मार्गाने निरनिराळ्या प्राकृत भाषा इ. पू. १०४० पासून इ. पू. ८०२ पर्यंत उत्पन्न होत गेल्या. त्या काळी आर्य लोक बाहेरून आले व त्यांनी हीन संस्कृतीच्या जित लोकांवर आपली संस्कृती व भाषा लादली. मूळचे लोक भिन्न मानवजातीचे व बहुतेक -हीन संस्कृतीचे असल्या- मुळे त्यांच्या तोंडी संस्कृताचे मूळरूप विकृत झाले व निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळ्या प्राकृत भाषा जन्मास आल्या. डॉ. गुणे यांच्या मते हाच प्रकार पुन्हा होऊन इ. स. च्या प्रारंभापासून इ. स. ३०० पर्यंतच्या काळात अपभ्रंश भाषा निर्माण झाल्या. त्या सुमारास पल्लव, गोपाळ, शक, अहीर वगैरे अन्य भाषेचे, अन्य धर्माचे व मानव वंशाचे लोक पंजाबमार्ग हिंदुस्थानात शिरले व हीन संस्कृतीमुळे आमच्यात मिसळून जाऊन आमच्या प्राकृत भाषा बोलू लागले, तेव्हा निरनिराळ्या अपभ्रंश भाषा उत्पन्न झाल्या. पुढे दहाव्या शतकाच्या सुमारास असाच भिन्न वंश संघर्ष पुन्हा घडून सध्याच्या हिंदी, बंगाली इत्यादी आर्यभाषा जन्माला आल्या व त्याच रीतीने महाराष्ट्र अपभ्रंशापासून मराठी उत्पन्न झाली.

प्राकृत हीच महाराष्ट्री
 डॉ. ए. एम्. घाटगे - डेक्कन कॉलेज, पुणे-यांनी आपल्या 'महाराष्ट्र : लँगवेज अँड लिटरेचर' या लेखात महाराष्ट्र हेच महाराष्ट्रीचे जन्मस्थान, या मताला पुष्टी दिली आहे (जर्नल ऑफ दि युनिव्हर्सिटी ऑफ बाँबे, व्हॉ. ४, विभाग ६, मे १९३६ ). वररुची, हेमचंद्र इ. प्राकृत व्याकरणकार महाराष्ट्री, शौरसेनी, महाराष्ट्री प्राकृताला फार महत्त्व देतात. वररुचीने महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पैशाची या चार प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्यात प्रथम महाराष्ट्रीचे व्याकरण ९ अध्यायांत सविस्तर देऊन पुढे एकेका अध्यायात इतर भाषांचे व्याकरण तो देतो. या पुढील अध्यायात त्या भाषांचे काही विशेष नियम देऊन ' शेषं महाराष्ट्रीवत्'- 'बाकीचे नियम महाराष्ट्रीसारखे' असा हवाला तो देतो. हेमचंद्रही 'शेषं प्राकृवत्' असाच निर्वाळा देतो. शौरसेन्यादी भाषांचा उल्लेख त्यांच्या त्यांच्या नावाने करून महाराष्ट्रीला नुसते प्राकृत म्हणण्याची चाल मागल्या काळी होती. प्राकृत हा कधी, चारही भाषा, अशा सामान्य अर्थाने योजीत तर कधी केवळ महाराष्ट्राचा निर्देश त्याने करीत. यावरून त्या भाषेचे महत्त्व किती होते ते कळून येईल.
 पण महाराष्ट्रीचा नुसता असा 'प्राकृत' म्हणून उल्लेख केल्यामुळेच मतभेदाला जागा निर्माण होऊन महाराष्ट्री व महाराष्ट्र यांच्या अविभाज्य संबंधाविषयी व महाराष्ट्रीच्या महत्त्वाविषयी निरनिराळी मते वर मांडण्यात येऊ लागली. श्री. घोष यांच्या मते वररुचीच्या पहिल्या नऊ अध्यायांत महाराष्ट्रीचे व्याकरण नसून शौरसेनीचे आहे. डॉ. घाटगे यांनी या आक्षेपाला आपल्या लेखात सप्रमाण उत्तर दिले आहे व निष्पक्ष दृष्टीने पाहता, 'महाराष्ट्रीचे माहेर महाराष्ट्र होय हे मान्य करावे लागते' असे म्हटले आहे.
 महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच या मतावर आणखी एक आक्षेप घेण्यात येतो. तो असा : प्राचीन काळी भारतातील सर्व प्रांतांतील नाटकांत स्त्रियांच्या तोंडी महाराष्ट्री भाषा घालण्याची पद्धत होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राखेरीज इतर अनेक प्रांतांत महाराष्ट्री रूढ असल्याचे पुरावेही मिळतात. त्यामुळे ती भाषा फक्त महाराष्ट्री होती असे दिसत नाही. पण या आक्षेपात अर्थ नाही. सातवाहनाचे साम्राज्य एकदोन शतके भारतातील अनेक प्रांतांवर होते. त्यांची भाषा महाराष्ट्री होती. हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. तेव्हा मराठ्यांच्या साम्राज्यकाळी ज्याप्रमाणे मराठी भाषा तंजावर, बंगलोर, ग्वाल्हेर, उज्जयनी, इंदोर इ. प्रांतांत पसरली त्याचप्रमाणे सातवाहनाच्या साम्राज्यकाळी त्यांची महाराष्ट्री साम्राज्यातील देशात पसरली असणे पूर्ण शक्य आहे. शिवाय महाराष्ट्री भाषा सौंदर्य, सौकुमार्य, मधुरता या गुणांमुळे सर्वत्र विख्यात झाली होती. व्याकरणकारांनी, कवींनी तिचे महत्त्व गायिले होते. त्यामुळे ती स्त्रियांच्या तोंडी घालावी असे नाटककारांना वाटणे साहजिक आहे. सर्व द्रविड देशांत १८५६ पर्यंत तालुक्याचे दफ्तर मराठीत असे. सर्व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना मराठी लेखनवाचन येणे तोपर्यंत अवश्य होते. हा विचार या संदर्भात ध्यानात ठेवावा ( प्रा. श्रीनिवासाचारी, अन्नमलाई विद्यापीठ, डॉ. देवदत्त भांडारकर कमे. व्हॉल्यूम पृ. ४० ).
 महाराष्ट्री भाषा सर्व भारतभर प्रसृत होण्याचे आणखी एक कारण आहे. इ. पू. तिसऱ्या शतकात मगधप्रांती फार मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी भद्रबाहूच्या नेतृत्वाखाली हजारो जैन लोक महाराष्ट्रात येऊन राहिले. दीर्घ काळ येथे राहिल्याने यांनी येथल्या महाराष्ट्री भाषेतच ग्रंथरचना केली. जैनांचे बहुतेक सर्व कथावाङ्मय हे महाराष्ट्री भाषेतच आहे. तिला जैन महाराष्ट्री म्हणतात. पण ती महाराष्ट्रीच होय असे हर्मन जाकोबीसारख्या पंडितांनी म्हटले आहे. जैन धर्म सर्व भारतात पसरला आहे. तेव्हा महानुभवांच्या धर्मप्रसारामुळे ज्याप्रमाणे मराठीचा प्रसार महाराष्ट्राबाहेर पंजाब, काबूलपर्यंत झाला त्याचप्रमाणे जैनांच्या धर्मग्रंथांमुळे महाराष्ट्रीचा सर्व भारतात प्रसार झाला हे उघड आहे.

प्राकृत शिलालेख
 महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच भाषा होय हे सिद्ध करण्यासाठी केवळ पंडितांच्या भाषाशास्त्रीय पुराव्यावरच अवलंबून राहण्याचे कारण नाही. सातवाहन वंशाचे राज्य महाराष्ट्रावर इ. पू. २५० पासून इ. पू. दुसऱ्या शतकापर्यंत होते. आणि या सातवाहनांचे नाणेघाट, कारला, कान्हेरी, नाशिक येथील सर्व शिलालेख महाराष्ट्रीत आहेत. या लेखांतून सातवाहनांच्या पराक्रमाचे वर्णन महाराष्ट्रीत - प्राकृतात केलेले आहे. गौतमीपुत्र सातकर्णी हा 'सकयवनपल्हव निसूदन' होता, 'खखरातवस निखसेसकर' होता असे त्याचे वैभव प्राकृतात गायिले आहे. त्याची माता गौतमी बलश्री हिचेही वर्णन असेच आहे.

सत्तसई
 यापेक्षाही बलवत्तर व निःसंदेह पुरावा म्हणजे हाल सातवाहन या राजाने रचलेला गाथा सत्तसई – सप्तशती - हा ग्रंथ होय. हा ग्रंथ म्हणजे सुभाषितांचा कोश आहे. आणि हाल राजाने अनेक ग्रंथांतून व लोकांच्या पाठांतून ही सुभाषिते, या गाथा, संग्रहीत केल्या आहेत. अनेक ग्रंथांतून या गाथा वेचल्या याचा अर्थच हा की यापूर्वी महाराष्ट्री भाषेत अनेक ग्रंथ झाले असले पाहिजेत. आणि लोकांच्या पाठांतून या गाथा वेचल्या, यावरून महाराष्ट्री ही त्या वेळी लोकभाषा होती हे उघड आहे. महाराष्ट्री भाषेतील या सत्तसईमध्ये गोदावरी, सह्याद्री यांचा अनेकवार उल्लेख येतो. त्यामुळे तिची रचना महाराष्ट्रात झाली व ते त्या काळच्या महाराष्ट्रजीवनाचे वर्णन आहे यात शंका नाही. वर निर्देशिलेले शिलालेख इ. पू. दुसऱ्या, पहिल्या शतकातले आहेत. तर सत्तसईची रचना इ. स. पहिल्या शतकातली आहे. यावरून इ. पू. ३ ऱ्या ४ थ्या शतकापासून महाराष्ट्री ही महाराष्ट्राची लोकभाषा होती हे निःसंशय दिसते. वरुचीचा काळ इ. स. पू. १ ले २ रे शतक असा मानला जातो. त्या काळी त्याने प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले व त्यात महाराष्ट्रीला प्राधान्य दिले. व्याकरण लिहून त्यात या भाषेचा गौरव करावा अशी संपन्नता महाराष्ट्रीला त्या वेळी प्राप्त झाली होती, असे यावरून निश्चित दिसते. तेव्हा त्याच्या आधी दोन एक शतके तरी या भाषेची उत्पत्ती झाली असली पाहिजे, हे मान्य केले पाहिजे. अशा रीतीने महाराष्ट्री ही महाराष्ट्राची भाषा होती व ती इ. पू. ४ थ्या ५ व्या शतकापर्यंत मागे जाते याविषयी शंका राहात नाही. 'प्राकृत शब्दमहार्णव' या कोशाचे कर्ते पं. हरगोविंददास शेठ यांनी या कोशाच्या प्रस्तावनेत महाराष्ट्री प्राकृत महाराष्ट्रातच निर्माण झाली, ती अशोक पूर्वकाळात रूढ होती व पुढे त्या महाराष्ट्रीच्या अपभ्रंशापासूनच मराठी झाली असे मत दिले आहे (पृ. ३८-४६ ).
 आर. पिशेल हा जर्मन पंडित होय. त्याने भारतातील प्राकृत भाषांचा अभ्यास करून ' ए कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ दि प्राकृत लंगवेजेस' हा ग्रंथ लिहिला आहे. वर आतापर्यंत जे महाराष्ट्रीसंबंधी विवेचन केले आहे त्याचा समारोप त्याच्या वरील ग्रंथातील अवतरणांवरून उत्तम होईल असे वाटते म्हणून ती जुळवून येथे देतो. जेव्हा भारतीय पंडित 'प्राकृत' हा शब्द वापरतात तेव्हा सर्वसाधारणपणे महाराष्ट्री हीच त्यांना अभिप्रेत असते. मराठ्यांची भूमी जी महाराष्ट्र तिच्यावरूनच महाराष्ट्री हे त्यांच्या भाषेला नाव पडले आहे. अशा रीतीने महाराष्ट्रीचा मराठीशी दृढ संबंध आहे यात संदेह नाही. पुढे पुढे कवींनी आपल्या काव्यात महाराष्ट्रीला फार कृत्रिम रूप दिले. पण गाथासत्तसईचे तसे नाही. या सत्तसईवरून हे स्पष्ट होते की त्या ग्रंथापूर्वी प्राकृत साहित्य अतिशय समृद्ध होते ( पिशेलच्या व्याकरण ग्रंथाचे सुभद्र झा यांनी केलेले इंग्रजी भाषांतर. प्रकाशक, मोतीलाल बनारसीदास, दिल्ली (१९२७) पृ. १ ते १४ ).
 या गाथासत्तसईच्या आधारेच अकराव्या शतकातील राजा भोज याने आपल्या 'सरस्वती कण्ठाभरण' ग्रंथात म्हटले आहे की हाल सातवाहन राजाच्या राज्यात प्राकृत जाणीत नाही असा एकही माणूस नव्हता.
 सातवाहनांच्या नंतर महाराष्ट्रात वाकाटक घराण्याचे साम्राज्य होते. इ. स. २५० ते ५५० पर्यंत वाकाटकांनी राज्य केले. प्रारंभी यांचे राज्य विदर्भात होते. पण पुढे ते नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत पसरले होते. वाकाटक राजे प्राकृताचे अभिमानी होते, एवढेच नव्हे, तर त्या घराण्यांतील राजांनी महाराष्ट्री प्राकृतात स्वतः काव्यरचनाही केली आहे. राजा दुसरा प्रवरसेन याने 'सेतुबंध' किंवा 'रावणवहो' हे काव्य रचले आणि राजा सर्वसेन याने 'हरिविजय' हे काव्य रचले.
 वरील प्रमाणांवरून इ. पू. ५०० । ६०० पासून इ. स. ५०० । ६०० पर्यंत महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत भाषा प्रचलित होती, राज्यकर्त्यांना व लोकांना तिचा अभिमान होता आणि त्या भाषेत या भूमीमध्ये ग्रंथरचनाही होत असे, यांविषयी शंका घेण्यास जागा राहणार नाही. एखाद्या समाजाची व देशाची पृथगात्मता सिद्ध होण्यास एवढी प्रमाणे पुरेशी आहेत.
 संस्कृतातील सुप्रसिद्ध कवी दण्डी हा ७ व्या शतकात होऊन गेला. त्याने या विचारावर आपल्या ' काव्यादर्श' या ग्रंथात शिक्कामोर्तबही करून टाकले आहे. त्याचे पुढील वचन सुप्रसिद्ध आहे.
  महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः ।
  सागरः सूक्तिरत्नानां सेतुबंधादि यन्मयम् ॥
 महाराष्ट्रात प्रचलित असलेली भाषा ही पंडितांच्या मते सर्वात श्रेष्ठ प्राकृत भाष होय. कारण त्या भाषेत सेतुबंधासारखे सूक्तिरत्नांचे सागरच्या सागर आहेत. 'सेतुबंध ' हे महाराष्ट्रीतील सुप्रसिद्ध काव्य होते हे वर सांगितलेच आहे. तेव्हा महाराष्ट्राची महाराष्ट्री ही भाषा असून ती अत्यंत संपन्न होती असा दण्डी कवीचाही अभिप्राय होता असे दिसते.

अपभ्रंशापासून मराठी
 वर जिचे वर्णन केले त्या महाराष्ट्रीपासूनच मराठीची उत्पत्ती झाली असे मत बरेच दिवस रूढ होते. आजही डॉ. ए. एम. घाटगे यांच्यासारख्या पंडिताचे तेच मत आहे. डॉ. भांडारकर, स्टेन कोनौ, ग्रियरसन या जुन्या पंडितांचे निश्चितच होते. पण अलीकडे सुमारे चाळीसपन्नास वर्षापूर्वी अपभ्रंश साहित्याचा शोध लागल्यामुळे या मतात जरा बदल झाला आहे. तो असा की महाराष्ट्रीपासूनच मराठीची उत्पत्ती झाली हे जरी खरे असले तरी ती मराठीची साक्षात माता नसून मातामही होय. महाराष्ट्री प्राकृतापासून 'महाराष्ट्री अपभ्रंश ' ही भाषा निर्माण झाली व तिच्यापासून मराठीची उत्पत्ती झाली असे नवे मत आहे. कुलगुरू चिंतामणराव वैद्य, डॉ. पां. दा. गुणे, डॉ. शं. गो. तुळपुळे, डॉ. वि. भि. कोलते यांनी या मताचा पुरस्कार केला आहे. या पंडितांनी आपल्या मताच्या सिद्धयर्थ जो भरभक्कम पुरावा उभा केला आहे त्याकडे पाहता, हेच मत सर्वमान्य होईल असे वाटते.
 येथे 'अपभ्रंश' हा शब्द वापरला आहे तो महाराष्ट्रात महाराष्ट्री-प्राकृत या भाषेपासून उद्भवलेली मराठीची पूर्वगामी अशी एक स्वतंत्र भाषा या अर्थाने वापरला आहे, हे ध्यानात ठेविले पाहिजे. कारण जुन्या काळी त्याला याहून इतर अनेक अर्थ होते. संस्कृतापासून झालेली कोणतीही विकृती ही पतंजलीच्या मते अपभ्रंश होय. दण्डीने तोच अभिप्राय दिला आहे. तो म्हणतो, आभीरादी लोकांच्या भाषेला काव्यात अपभ्रंश म्हणतात; पण शास्त्रात मात्र संस्कृतापासून भिन्न ते सर्व अपभ्रंश होत. भामहाच्या मते संस्कृत व प्राकृत यांहून अपभ्रंश निराळी आहे. संस्कृत, प्राकृत, मागधी, शौरसेनी, पैशाची व अपभ्रंश अशा सहा भाषा आहेत असे चंड, रुद्रट, हेमचंद्र यांचे मत आहे. त्यात रुद्रटाच्या मते अपभ्रंशाचे देशपरत्वे अनेक प्रकार आहेत. रुद्रटाने अपभ्रंश हा शब्द सामान्य अर्थी वापरला आहे; आणि सध्याच्या पंडितांना तो मान्य आहे. म्हणून विवक्षित देशातील भाषेचा उल्लेख करताना ते शौरसेनी अपभ्रंश, मागधी अपभ्रंश, महाराष्ट्री अपभ्रंश असा निर्देश करतात. येथील विवेचनात शेवटचा अर्थ अभिप्रेत आहे हे वर सांगितलेच आहे.
 आभीरादींच्या भाषांना अपभ्रंश म्हणतात असे दण्डी म्हणतो. डॉ. पां. दा. गुणे यांचे, शक, पल्लव, आभीर इ. रानटी टोळ्या इ. सनाच्या प्रारंभी भारतात आल्या व त्या आर्यसमाजात मिसळून गेल्यामुळे येथल्या मूळच्या भाषा व त्यांच्या भाषा यांचे मिश्रण होऊन येथे निरनिराळ्या अपभ्रंश भाषा निर्माण झाल्या असे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. अपभ्रंश भाषांची ही उत्पत्ती त्यांच्या मते इ. सनाच्या ४ थ्या शतकात झाली. 'भविसयत्तकहा' या धनपालाच्या अपभ्रंश ग्रंथाला त्यांनी जी प्रस्तावना जोडली आहे तिच्यात अपभ्रंश भाषांचा त्यांनी सविस्तर विचार केला आहे. आणि विविधज्ञानविस्तारातील लेखातले मत तेथे मांडले आहे. याच लेखात त्यांनी 'महाराष्ट्री अपभ्रंश ' ही मराठीची प्रत्यक्ष जननी होय असे मत मांडून अपभ्रंशापासून मराठीने कोणते विशेष उचलले ते सविस्तर सांगून भरपूर प्रमाणांनी आपले मत सिद्ध केले आहे. त्यांतील काही महत्त्वाची प्रमाणे पुढे देतो. १. भूतकाळ- वाचकरूपे भूतकालवाचक धातुसाधितांवरून करण्याचा प्रघात. २. विध्यर्थाची रूपे कर्मणिधातुसाधितांवरून करण्याची चाल. ३. क्रियातिपत्ती हा 'ल'कारही वर्तमानकालवाचक धातुसाधितांवरून साधण्याची पद्धत. ४. वर्तमानकालवाचक धातुसाधित भूतकाल दर्शविण्यासाठी वापरण्याची रीत - हे सर्व मराठीने अपभ्रंशापासून घेतले आहे. ( विविधज्ञानविस्तार – जून १९२२ - वर्ष ५३ ) त्याचप्रमाणे १. प्रथमाविभक्ती - एक- वचनी उ, ओ प्रत्यय लावणे अगर उभयवचनी व द्वितीयेतही तो गाळणे, हा प्रकार, २. ( षष्ठी विभक्ती विशेषणरूप बनवून तिला तद्धित प्रत्यय जोडण्याचा प्रकार व ३. इतर काही विभक्ती नवे प्रत्यय लावून बनविण्याचा प्रकार - (तृतीया व पंचमी), हे सर्व प्रकार मराठीने अपभ्रंशातून स्वीकारले आहेत.
 संकृतावरून महाराष्ट्री प्राकृत, तिच्यापासूनच महाराष्ट्री अपभ्रंश आणि या अपभ्रंशा- पासून मराठी - ही परंपरा अशा रीतीने निर्विवाद सिद्ध होते असे दिसून येईल.

जैन महाकवी पुष्पदन्त
 महाराष्ट्री अपभ्रंश ही भाषा चौथ्या शतकाच्या आरंभी उत्पन्न झाली असली तरी तिला विकसित होऊन ती वाङ्मययोग्य होण्यास ४/५ शे वर्षे लागली असे दिसते. 'महापुराण', जसहरचरिऊ ', 'णायकुमारचरिऊ', हे पुष्पदंताचे ग्रंथ व 'भविसयत्तकडा', 'करकंडचरिऊ', 'पऊमचरिऊ', 'सावयधम्मदाहो' इ. आज उपलब्ध असलेले सर्व अपभ्रंश ग्रंथ हे दहाव्या अकराव्या शतकातील आहेत. पुष्पदन्त हा अपभ्रंश-साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी मानला जातो. हा कवी महाराष्ट्रातील मान्यखेटचा राष्ट्रकूट राजा कृष्ण याचा अमात्य भरत याच्या आश्रयाला होता. भरताच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र नन्न याने याला आश्रय दिला. पुष्पदन्त प्रथम शैव असून पुढे त्याने जैन धर्माचा आश्रय केला. त्याने वरील तीनही ग्रंथ जैन झाल्यानंतर लिहिलेले आहेत. पण शेवटपर्यंत तो महाराष्ट्रातच होता यात वाद नाही.


राजशेखर
 काव्यमीमांसाकार राजशेखर हा सुप्रसिद्ध कवी दहाव्या शतकात होऊन गेला. तो महाराष्ट्रीय असावा असा पंडितांचा तर्क आहे. त्याला महाराष्ट्राचा मोठा अभिमान होता हे निश्चित. आपला पणजा अकालजलद त्याचा त्याने महाराष्ट्र - चूडामणी असा उल्लेख केला आहे ( बाल रामायण १.३० ). काव्यमीमांसेत राजशेखराने कविराजांची काव्यपरीक्षेची सभा कशी असावी याचे वर्णन केले आहे. त्यावरून त्या वेळी अपभ्रंश भाषेचे स्थान काय होते ते कळून येते. या सभेत उत्तरेला संस्कृत कवी, पूर्वेला प्राकृत कवी आणि पश्चिमेला अपभ्रंश कवी बसावे असे सांगून राजशेखराने या भिन्न भाषिक कवींच्या मागे कोणी बसावे सांगितले आहे. तो म्हणतो, संस्कृत कवींच्या मागे पंडित असावे, प्राकृत कवींच्या मागे नर्तक, नट, गवई असावे आणि अपभ्रंश कवींच्या मागे मात्र वणिग्वरी, सोनार, लोहार, सुतार व त्यांसारखे इतर असावे. यावरून सामान्यजनांची बोली अपभ्रंश ही असून तिच्यात वाङ्मय निर्माण होत असावे असे डॉ. गुणे यांनी अनुमान केले आहे, ते सयुक्तिक वाटते.

पुष्पदन्त - मराठी कवी
 महापुराण, जसहरचरिऊ व णायकुमारचरिऊ या काव्यत्रयीचा कर्ता अपभ्रंश महाकवी पुष्पदन्त याचा वर उल्लेख आलाच आहे. 'राष्ट्रकूटकालीन मराठी' या आपल्या लेखात श्री. ग. वा. तगारे यांनी वरील ग्रंथांच्या भाषेतील वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया व वाक्यरचना यांची चिकित्सा करून 'ही भाषा म्हणजे ज्ञानेश्वर- पूर्वकालीन मराठीच होय ' व ' पुष्पदन्त मराठीचाच कवी होता', असे मत मांडले आहे. ( महाराष्ट्र साहित्यपत्रिका, वर्ष १४, अंक १ ला . ) हे मत सर्वमान्य झाले नाही. पण श्री. प. ल. वैद्यसंपादित 'महापुराणा'ला नाथूराम प्रेमी यांनी जे प्रास्ताविक जोडले आहे त्यात या मताचा आवर्जून उल्लेख केला आहे. याशिवाय नाथूराम यांनी अशीही माहिती दिली आहे की पुष्पदन्ताचे एक नाव खंड असे होते; आणि महाराष्ट्रात खंडूजी, खंडोबा ही नावे प्रचलित आहेतच ( प्रास्ताविक पृ. ६ ). पुष्पदन्त मूळचा महाराष्ट्रीय नव्हे. पण प्रौढपणी महाराष्ट्रीय झाल्यावर त्याने हे नाव स्वीकारले असावे.
 श्री. तगारे यांनी आपल्या सिद्धान्ताला पुढीलप्रमाणे पुरावे दिले आहेत. ते म्हणतात, पुष्पदन्ताचे लिखाण ज्ञानेश्वरपूर्वकालीन मराठीत आहे याला पुढील प्रमाणे देता येतील - ( १ ) ते वाङ्मय महाराष्ट्राची प्राचीन राजधानी मान्यखेट येथे लिहिले गेले आहे. आज निर्विवाद तऱ्हेने मराठी समजले जाणारे बरेच प्राचीन वाङ्मय मान्यखेटच्या जवळपास निर्माण झाले आहे. (२) ते वाङ्मय बहुजनसमाजाला कळून धर्मप्रसार व्हावा या उद्देशाने मान्यखेटच्या देशभाषेत लिहिले आहे. (३) ज्ञानेश्वर कालीन मराठीत ( व आजसुद्धा ) प्रचलित असलेले अनेक शब्द त्यात आढळतात. ( ४ ) वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया, वाक्यरचना इ. भाषाशास्त्रीय पुराव्यावरून त्याची भाषा म्हणजे ज्ञानेश्वरपूर्व मराठीचे रूप आहे असे ठरते. (५) त्यातील वृत्त व मराठीतील वृत्ते ( गणवृते, मात्रावृते व आधुनिक गेयवृत्तेसुद्धा ) एकच आहेत.

देसी भासा
 प्राचार्य वि. भि. कोलते यांनी आपल्या 'मराठीचे माहेर' या लेखात 'अपभ्रंशा- पासूनच साक्षात मराठी निर्माण झाली ', हे मत अनेक प्रमाणे देऊन मांडले आहे ( विक्रमस्मृती १९४६ - ग्वाल्हेर ) 'मराठी भाषा उद्गम व विकास' या आपल्या ग्रंथात प्रा. कृ. पां. कुलकर्णी यांनी 'मराठी अमुक एका विशिष्ट भाषेपासून निघाली असे म्हणता येत नाही' असे मत मांडले आहे. संस्कृत, महाराष्ट्री, अर्धमागधी इ. सर्व प्राकृत व अपभ्रंश यांचे सर्वांचे काही विशेष मराठीत दिसतात म्हणून अमुकच एक भाषा मराठीची जननी असे म्हणणे सयुक्तिक नाही, असे श्री. कुळकणीं म्हणतात. प्रा. कुळकर्णी याची या बाबतीतली सर्व विधाने खोडून काढून प्रा. कोलते यांनी 'अपभ्रंश' हीच मराठीची जननी हे आपले मत सिद्ध केले आहे. प्रा. कुळकर्णी यांची काही विधाने व त्याला प्रा. कोलते यांनी दिलेली उत्तरे खाली दिली आहेत, त्यांवरून श्री. कोलते यांचा सिद्धांत स्पष्ट होईल.
 प्रा. कुळकर्णी म्हणतात, 'तृण, प्रावृष, वृक्ष इ. संस्कृत शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली तिण, पाऊस, रुख ही व या प्रकारची रूपे पालीमध्ये आढळतात व तीच मराठीमध्ये आढळतात.' यावर श्री. कोलते यांचे उत्तर असे की, ' ही रूपे अपभ्रंश भाषेतही आढळतात. 'णायकुमारचरिऊ', 'करकंडचरिऊ' इ. अपभ्रंश ग्रंथात ही रूपे आहेत. शिवाय प्राकृत, अपभ्रंश या भाषांच्या अपेक्षेने पालीभाषा एकतर अत्यंत प्राचीन होय. आणि दुसरे म्हणजे ती उत्तर हिंदुस्थानच्या पूर्व भागात रूढ होती. त्यामुळे मराठीशी तिचा साक्षात संबंध येणे असंभवनीय आहे.'
 पैशाचीखेरीज इतर प्राकृत भाषांत 'न 'कार नाही, तेव्हा तो मराठीने पैशाचीतून घेतला आहे, हे श्री. कुळकर्णी यांचे मतही असेच चुकीचे आहे. महाराष्ट्री प्राकृतात 'न' आहे (पहा - गौडवहो ) आणि तो अपभ्रंशातही आहे ( णायकुमार चरित-प्रस्तावना - डॉ. हिरालाल जैन ). तेव्हा तो पैशाचीवरून घेण्याची मराठीला गरज नव्हती, हे उघड आहे. अर्धमागधीमध्ये दीर्घस्वर ऱ्हस्व होणे, 'द' चा 'उ' होणे, आद्य 'न' जसाच्या तसा राहणे, मृदू व्यंजनाचे कठोर व्यंजन होणे, इ. लकबा आहेत; आणि तशाच त्या मराठीत आहेत हे खरे; पण त्या अपभ्रंशातही सापडतात. तेव्हा ते अर्धमागधीचे ऋण असे मानण्याचे कारण नाही. या सर्व प्रमाणांवरून मराठीचे जननीत्व अनेक भाषांकडे देणे अयुक्त आहे व अपभ्रंशाशीच तिचा साक्षात संबंध आहे हे डॉ. कोलते यांचे मत मान्य होईल असे वाटते.
 मराठीचे जननीत्व अपभ्रंश भाषेकडेच आहे असे सिद्ध करण्यास डॉ. कोलते यांनी आणखी एक सबळ पुरावा दिला आहे. तो म्हणजे मराठी भाषेच्या नावाचा. ज्ञानेश्वरकालीन वाङ्मयात काही वेळा मऱ्हाटा हा शब्द सोपा, साधा, या अर्थी येतो व तसाच तो मराठी भाषा या अर्थीही येतो. यावरून मऱ्हाटी या शब्दाला केवळ भाषावाचक अर्थ त्या वेळी आलेला नव्हता. तो हळूहळू येत होता असे दिसते. या तर्काला पुष्टी देणारा दुसरा पुरावा असा की पुष्कळ वेळा तत्कालीन ग्रंथांत मराठीचा 'देशी' अथवा 'देशी भाषा' असा उल्लेख केलेला आढळतो. ज्ञानेश्वरी, उद्धवगीता, रुक्मिणी स्वयंवर ( नरेन्द्र ) या काव्यांत याची विपुल उदाहरणे आढळतात. आता मराठीचे 'देशी' हे नाव फार सूचक आहे. कारण अपभ्रंश भाषेला तिच्या कवींनी 'देशी' असेच नाव दिले आहे. शास्त्रीय ग्रंथांत तिला अपभ्रंश हे नाव रूढ असले तरी कवी बहुधा तिचा 'देसी भासा ', 'देसभास', ' देसिल' असा उल्लेख करतात. तेव्हा ज्ञानेश्वर, भास्कर, नरेंद्र इ. प्राचीन मराठी कवी अपभ्रंशाचेच विकसित रूप वापरीत होते, आणि ते अगदी सहजक्रमाने घडत होते, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. याच संबंधात आणखीही एक उपोद्बलक असा पुरावा सापडतो. अपभ्रंशाचे नागर, उपनागर व व्राचड असे तीन प्रमुख प्रकार मार्कंडेय या व्याकरणकाराने दिले आहेत. त्यांतील नागर अपभ्रंशापासून मराठीचा जन्म झाला असे म्हणता येईल. कारण आपली भाषा म्हणजे 'नागर बोल' आहेत असाही उल्लेख ज्ञानेश्वरी, वच्छहरण इ. ग्रंथांत कवींनी केला आहे. 'देशी' व 'नागर' अशी दोन नावे अपभ्रंश भाषेची त्या काळी रूढ होती. तीच नावे प्राचीन मराठी कवींनी मराठीला योजलेली आहेत. तेव्हा अपभ्रंश भाषेपासूनच मराठीचा जन्म झाला असे म्हणणेच जास्त सयुक्तिक आहे.

उत्क्रांत अपभ्रंश मराठी
 

यासंबंधी अखेरचे निर्णायक व निःसंदिग्ध असे मत डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी आपल्या 'यादवकालीन मराठी भाषा' या प्रबंधात दिले आहे. यादवकालीन मराठी हे मराठीचे प्रारंभीचे रूप होय. ती भाषा जर महाराष्ट्री अपभ्रंशापासून उत्पन्न झाली असे सिद्ध झाले तर संस्कृत, महाराष्ट्री, अपभ्रंश व मराठी अशी साखळी जोडली जाऊन महाराष्ट्राची पृथगात्मता इ. पू. तिसऱ्या चौथ्या शतकापासून निश्चित सिद्ध होते असे म्हणता येईल. डॉ. तुळपुळे यांनी हे महत्त्वाचे कार्य आपल्या प्रबंधात केले आहे. त्यांनी केलेले विवेचन साररूपाने पुढे देतो.
 " मराठी ही अनेक भाषांपासून निघाली असा सिद्धान्त कित्येक प्रतिपादितात; तसे नसून ती अपभ्रंशापासून निघाली हे माझे मुख्य म्हणणे आहे. यादव मराठीची वर्णप्रक्रिया व प्रत्ययप्रक्रिया या अपभ्रंश भाषेतून उत्क्रान्त झालेल्या दिसतात. म्हणजेच यादव मराठी ही अपभ्रंशापासून उत्पन्न झाली. मराठीतील काही बाबी अपभ्रंशात न आढळता महाराष्ट्रीत व काही थोड्या मागधी - शौरसेनीत आढळतात. तेवढ्यापुरते मराठीने अपभ्रंशाला सोडले असले तरी मुख्यतः अपभ्रंशाचाच सांगाडा जशाचा तसा मराठीत उतरला हे निश्चित. " ( यादवकालीन मराठी भाषा - पृ. १९ )
 या अपभ्रंश भाषेची पूर्वपीठिका सांगताना डॉ. तुळपुळे म्हणतात : आर्यलोक विध्याच्या दक्षिणेस इ. पू. ६०० च्या सुमारास येऊ लागले व त्यांनी गोपराष्ट्र महराष्ट्र, पांडुराष्ट्र, कोकण, विदर्भ व अदमक ही मुख्य राष्ट्र स्थापित केली. या सर्वांचे मिळून पुढे मोठे राष्ट्र झाले तेच महाराष्ट्र या महाराष्ट्रात आर्य जी भाषा तत्काली बोलत ती महाराष्ट्री प्राकृत. याचा अर्थ असा की इ. स. पूर्वी ६०० च्या मुमाराम महाराष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व होते है निश्चित. येथील महारटी लोक त्या वेळी जी महाराष्ट्री भाषा बोलत ती संस्कृतची उ उ अपभ्रष्ट प्रतिकृती होती. या महाराष्ट्रीचाच अपभ्रंश महाराष्ट्रात इ. स. ५०० च्या सुमारास रूढ झाला; आणि या महाराष्ट्री अपभ्रंशापासूनच इ. स. १००० च्या सुमारास मराठी उत्पन्न झाली ( यादव. पृ. २४).
 याप्रमाणे मुख्य सिद्धान्ताचे प्रतिपादन करून नंतर डॉ. तुळपुळे यांनी वर्णप्रक्रिया- प्रत्ययप्रक्रिया, शब्दसिद्धी व वाक्प्रयोग या दृष्टींनी महाराष्ट्री अपभ्रंशापासून यादव- कालीन मराठी उत्पन्न झाली व उत्कान्त झाली हे निःसंदेह रीतीने सिद्ध केले आहे. ते म्हणतात, "(१) मराठीची वर्णप्रक्रिया अपभ्रंशापासूनच झालेली असून अपभ्रंशातील सर्व उच्चार तीत आढळतात. यादव मराठीतील उच्चारप्रक्रिया म्हणजे अपभ्रंशातील उच्चारपद्धतीचीच उत्क्रांत अवस्था होय. अपभ्रंशातील स्वर व व्यंजने यादव मराठीत उतरली आहेत. अपभ्रंशातील च, छ, ज, झ यांचे दंततालव्य उच्चार यादव मराठीत आले. एतत् प्रकरणी स्थाननियत स्वरप्रक्रिया, अंत्यस्वरांचे ऱ्हस्वीकरण, स्वरभक्तीचे प्राबल्य इ. १९ बाबी यादव मराठीने साक्षात अपभ्रंशापासून घेतल्या आहेत. तात्पर्य, यादव मराठीतील उच्चार अपभ्रंशातून वर्णप्रक्रियेच्या नियमांनी उतरले आहेत. ( २ ) प्रत्ययत्रक्रिया - यातील नामविभक्तीप्रकरणावरून पुढील सिद्धांत बांधता येईल. यादव मराठीत विभक्तीची प्रत्ययी व सामासिक अशी दोन्ही रूपे जोडीने आढळतात. अपभ्रंशातील प्रत्ययी विभक्ती आणि वर्तमानमराठीतील सामासिक विभक्ती यांमधील हा एक सांधणारा दुवा आहे. आख्यात विभक्तीचा विचार करता असे दिसते की यादव मराठीने अपभ्रंशाव्यतिरिक्त कोणतेही प्रत्ययी रूप स्वतंत्रपणे बनविले नाही. अपभ्रंशातील आणि यादव मराठीतील प्रत्ययी आख्यात विभक्ती समसमान आहेत. " प्रत्ययप्रक्रियेविपयी तपशील देताना डॉ. तुळपुळे यांनी मराठीत अपभ्रंशातून नामविभक्तीच्या बाबतीत १२ लकबा आल्याचे सांगून पुढे म्हटले आहे की यादव मराठीने नामांची व सर्वनामांची प्रत्ययी विभक्तीरूपे अपभ्रंशातूनच घेतली आहेत. त्याचप्रमाणे आख्यात विभक्तीच्या बाबतीत अपभ्रंशातून यादवमराठीत आलेल्या ७ बाबींचे विवरण करून त्यांनी म्हटले आहे की यादव- मराठीने क्रियापदाची प्रत्ययी रूपे व कृदन्त रूपे साक्षात अपभ्रंशापासून घेतली. संयुक्त क्रियापदे किंवा सामासिक क्रियारूपे मात्र तिने स्वतंत्रपणे बनविली आहेत. (३) शब्दसिद्धीचे खालील प्रकार यादव मराठीने अपभ्रंशातून घेतले आहेत. बहुतेक सर्व तद्धित प्रक्रिया; पण, पें, ए, ई, इव या प्रत्ययांनी झालेली भाववाचक नामे ; ध्वन्यनुकारी शब्द; बरेचसे द्विरुक्त शब्द; नामधातू व क्रियानामे. यावरून यादव मराठीतील शब्दसिद्धीच्या ६ विशेष प्रकारांपैकी ४ प्रकार अपभ्रंशातून आलेले आहेत.
 महाराष्ट्री अपभ्रंशातून यादव मराठीत उतरलेले हे विशेष पाहिले म्हणजे एवढे स्पष्ट दिसते की यादव मराठीची उच्चारप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया आणि शब्दसिद्धी या सर्वस्वी अपभ्रंशाच्या पुढची पायरी म्हणजे उत्क्रान्त अवस्था दर्शवितात. अपभ्रंशात नसलेल्या महाराष्ट्री प्राकृताच्या सहाच बाबी यादवमराठीत आहेत. पण तेवढ्यावरून मराठी ही साक्षात महाराष्ट्रीपासून निघाली असे म्हणता येत नाही. पैशाची मागधी यांचे काही विशेष मराठीत दिसतात. पण तेवढ्यावरून मराठीच्या त्या जननी असे म्हणता येत नाही. अपभ्रंशाची वर्णप्रक्रिया व प्रत्ययप्रक्रियाच मराठीत अवतरली असता तिचा उगम दुसरीकडे शोधण्याचे कारण नाही. एतावता यादव- मराठी ही महाराष्ट्री अपभ्रंशापासून निघाली हे स्पष्ट आहे.

अखंड पृथगात्मता
 मराठीची ही पूर्वपीठिका ध्यानी घेतली तर आज आपण जिला महाराष्ट्र म्हणतो त्या भूमीला इ. स. पूर्व चौथ्या-पाचव्या शतकापासून पृथगात्मता प्राप्त झाली होती असे दिसून येईल. महाराष्ट्री या भाषेमुळे त्या वेळी हा भूप्रदेश व येथला समाज पृथगात्म झाला होता. त्या महाराष्ट्री भाषेचाच अपभ्रंश म्हणजे महाराष्ट्री अपभ्रंश होय. ही भाषा महाराष्ट्रातच इ. सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात जन्माला आली आणि तिच्यापासूनच नवव्या-दहाव्या शतकात मराठीचा जन्म झाला. म्हणजे इ. स. पूर्व पाचव्या शतकापासून पुढे या भूमीच्या पृथगात्मतेला केव्हाही खंड पडला नाही. समाजाला पृथगात्मतेची जाणीव जशी तीव्र होत जाते, तसतसे त्याचे कर्तृत्व विकसत जाते. महाराष्ट्रात हेच घडले. येथे सातवाहन घराण्यासारखे साम्राज्यकर्ते घराणे इ. पू. तिसऱ्या शतकात उदयास आले. आणि वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांनी ती पराक्रमाची परंपरा दीड हजार वर्षे टिकविली. याच काळात विद्या, कला, साहित्य या संस्कृतीच्या प्रधान अंगांचाही येथे विकास झाला. हा सर्व इतिहास आता पहावयाचा आहे पण त्यापूर्वी महाराष्ट्र हे नामाभिधान कसे पडले व ही भूमी, येथला समाज व येथले साहित्य यांचा अभिमान येथे कसा विकसत गेला हे पाहणे अवश्य आहे.