महाराष्ट्र संस्कृती/महाराष्ट्रीय राजघराणी



४.
महाराष्ट्रीय राजघराणी
 


स्वकीय राजसत्ता
 सातवाहनांनंतर पुढील हजार वर्षांच्या काळात महाराष्ट्रावर नंदिवर्धन व वत्सगुल्म ( नागपूर प्रांत ) येथील वाकाटक, बदामीचे चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव अशा पाच राजघराण्यांनी राज्य केले. इ. स. १३१८ साली दिल्लीच्या मुस्लिम सुलतानांनी यादवांची सत्ता नष्ट केली आणि महाराष्ट्राला पारतंत्र्य आले. इ. स. २३५ पासून म्हणजे सातवाहनांच्या सत्तेच्या प्रारंभापासून इ. स. १३१८ पर्यंतचा सुमारे दीडहजार वर्षांचा काल हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा पहिला कालखंड होय. हा सर्व काल स्वराज्य, स्वातंत्र्य व साम्राज्य यांचा कालखंड होता. १३१८ साली या भूमीचे स्वातंत्र्य नष्ट झाले व तेथे परकी मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाली. ती इ. स. १६४७ पर्यंत टिकली. तीनसवातीनशे वर्षांचा हा काळ म्हणजे आपल्या इतिहासाचा दुसरा कालखंड होय. तेथून पुढे पुन्हा स्वराज्याचा व साम्राज्याचा काळ येतो. हा वैभवाचा काळ इ. स. १८१८ मध्ये समाप्त झाला. तेथे तिसरा कालखंड संपला. तेथून १९४७ मध्ये भरतभू स्वतंत्र होईपर्यंतचा चौथा कालखंड होय. या ग्रंथात या चार कालखंडांचा पृथकपणे इतिहास द्यावयाचा आहे. हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास आहे. तेव्हा धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था, शिक्षण, विद्या, शास्त्रे, कला, साहित्य यांचाच प्रामुख्याने विचार यात होणार हे उघड आहे. पण मागे एका ठिकाणी सांगितल्याप्रमाणे, स्वकीय राजसत्ता, राजकीय स्वातंत्र्य हा सर्व संस्कृतीचा मूलाधार होय. ' शस्त्रेण रक्षिते राज्ये शास्त्रचिंता प्रवर्तते ।' शस्त्रबळाने, राजसत्तेने रक्षिलेल्या भूमीतच विद्याकलांचा विकास होऊ शकतो, हे व्यासवचन अक्षरशः खरे आहे. महाभारतात क्षात्रधर्माचे महत्त्व सांगितले आहे ते एवढ्यासाठीच. 'ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलांत इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्माचा अंतर्भाव होतो', 'राजा हाच लोकांच्या धर्माने मूळ आहे', 'राजा हा प्रजेचे प्रौढ असे अंतःकरणच होय', 'राजा जेव्हा योग्य प्रकारे दण्डनीतीचा अवलंब करतो तेव्हाच कृतयुग निर्माण होते', 'राजा कालस्य कारणम्' अशा तऱ्हेची शेकडो वचने महाभारतात सापडतात, त्यांतील अभिप्राय सर्वस्वी खरा आहे, हे ग्रीस, रोम, पोलंड इ. पाश्रात्य देशांच्या इतिहासावरून स्पष्ट होईल. त्यांचे स्वराज्य गेले तेव्हा त्याबरोबर त्यांची संस्कृतीही अस्तास गेली. तेव्हा संस्कृतीच्या इतिहासात राजशासनाच्या इतिहासाला व राजकीय संस्कृतीला अग्रस्थान दिलेच पाहिजे यात शंका नाही. आणि सर्व मोठमोठ्या इतिहासवेत्त्यांनी ते दिलेही आहे. पूर्वसूरींचा तोच मार्ग अनुसरून प्रत्येक कालखंडाचे विवेचन करताना प्रथम राजशासनाचा व राजकीय संस्कृतीचा विचार या ग्रंथात करण्याचे धोरण आखले आहे. त्या अन्वये इ. पू. २३५ ते इ. स. १३१८ हा जो पहिला कालखंड त्यातील महाराष्ट्रावरील राजसत्तांचा आता प्रथम विचार करावयाचा आहे. त्यांपैकी सातवाहन सत्तेचा विचार गेल्या प्रकरणात आपण केलाच आहे. आता नंतरच्या वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य व यादव यांच्या राजशासनांचा विचार करावयाचा आहे.

पाच राजघराणी
 वाकाटक घराण्याचा मूळ संस्थापक विन्ध्यशक्ती हा विष्णुवृद्धगोत्री ब्राह्मण असून तो बहुधा सातवाहनांचा एक सेनाधिकारी असावा. सातवाहन साम्राज्य विलयास गेल्यावर त्याने इ. स. २५० च्या सुमारास विदर्भामध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्याच्या या वाकाटक घराण्याने इ. स. ५५० पर्यंत म्हणजे सुमारे तीनशे वर्षे राज्य केले. उत्तरेत बुंदेलखंडापासून दक्षिणेत हैदराबादपर्यंत वाकाटक साम्राज्याचा त्याच्या वैभवाच्या काळी विस्तार झाला होता. कोसल, मेकल, मालव, कुंतल, अश्मक, मुलक एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर त्यांची सत्ता पसरली होती. कोसल म्हणजे अर्वाचीन छत्तीसगड. यात रायपूर, दुर्ग, बिलासपूर या जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो. मेकल हा अमरकंटकाच्या भोवतालचा प्रदेश. मालव हा माळवा उज्जयनी प्रांत होय. कुंतल म्हणजे सातारा, कोल्हापूर, इ. दक्षिण महाराष्ट्राचा भाग होय. अश्मक, मूलक म्हणजे औरंगाबाद, नगर हा प्रदेश होय. वाकाटकांचा शेवटचा राजा हरिषेण याचे राज्य उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतलापर्यंत आणि पूर्वपश्चिमेस गंगासागर व सिंधू- सागर यांच्यापर्यंत पसरले होते.
 वाकाटकांच्या नंतर महाराष्ट्रावर बदामीच्या चालुक्यांची सत्ता प्रस्थापित झाली. जयसिंह हा चालुक्यांचा मूळपुरुष होय. हे मानव्यगोत्री क्षत्रिय घराणे होते. बदामीच्या चालुक्यांनी इ. स. ५५० पासून इ. स. ७५३ पर्यंत राज्य केले. नर्मदेपासून थेट दक्षिणेस रामेश्वरापर्यंत यांचे अधिराज्य होते. कावेरी नदीच्या दक्षिणेचे पांड्य, चोल, केरल राजे, कांचीचे पल्लव राजे, म्हैसूरचे गंगराजे, वनवासीचे कदंब, कोकणचे मौर्य या सर्वांना चालुक्यांनी अनेक वेळा जिंकून त्यांच्यापासून करभार घेतला होता व त्यांना आपले मांडलिक बनविले होते. गुजराथ, माळवा, कोसल, चेदी (जबलपुर परिसर ) या देशांवर त्यांची अधिसत्ता प्रस्थापित झाली होती. कनोजचा हर्षवर्धन हा महत्त्वाकांक्षी होता. दक्षिणेत आपले साम्राज्य स्थापण्याची त्याची मनीषा होती. पण चालुक्यराज सत्याश्रय पुलकेशी याने नर्मदेच्या उत्तरेलाच त्याला गाठून त्याचा पराभव केला व दक्षिणेवरील आपले अधिराज्य अभंग राखले. सातवाहनाप्रमाणेच त्याचे अश्व त्रिसमुद्रपीततोय होते.
 यानंतर राष्ट्रकूटांचा उदय झाला. या घराण्याचा संस्थापक दन्तिदुर्ग हा चालुक्यांचाच एक सेनापती होता. ७५४ साली त्याने संधी साधून कोसल प्रदेशातील शिरपूर, रायपूर व नागपूरजवळील रामटेक येथील राजांचा पराभव करून तेथे आपली स्वतंत्र सत्ता स्थापिली. आणि लवकरच खानदेश, नाशिक, पुणे, सातारा या प्रांतांत तिचा विस्तार केला. दन्तिदुर्गाच्या या घराण्यात गोविन्द (३ रा), कृष्ण ( ३ रा ) असे महापराक्रमी राजे झाले. पांड्य, चेर (केरळ), चोल, पल्लव (कांची ), गंग ( कर्नाटक ), वेंगी ( चालुक्यांची पूर्वेकडील शाखा ) या दक्षिणेतील सर्व राजांना जिंकुन त्यांनी रामेश्वरापर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार तर केलाच, पण तेवढ्यावर संतुष्ट न राहता त्यांनी उत्तरेवर स्वाऱ्या करून गुजराथ, माळवा, ओरिसा हेही प्रदेश जिंकले. त्या वेळी मगधाचे वैभव नष्ट होऊन कनोज ही उत्तरेतील साम्राज्याची राजधानी झाली होती तीही राष्ट्रकूटांनी जिंकली व आपली सेना थेट हिमालयापर्यंत नेऊन भिडविली. या पराक्रमामुळे राष्ट्रकूटांची, भारताच्या इतिहासात मौर्य, गुप्त या साम्राज्यकर्त्या घराण्यांच्या इतकीच महती मानली जाते. आपली कीर्ती अशी अमर करून हे घराणे इ. ९७३ साली अस्तास गेले.
 त्यांच्यामागून चालुक्य घराणे पुन्हा उदयास आले. हे कल्याणीचे चालुक्य होत. आधीचे जे बदामीचे चालुक्य त्यांच्याशी यांचा नेमका संबंध काय हे अजून निश्चित झालेले नाही. पण ९७३ साली उदयास आलेला तैलप हा त्यापूर्वीच्या चालुक्यांच्याच दूरच्या शाखेपैकी असावा असे पंडितांचे मत आहे. तैलपाचे वंशज चालुक्य है पूर्व-चालुक्यांच्याच पदव्या घेतात व त्यांच्याप्रमाणेच आपले गोत्रही मानव्य हेच सांगतात. त्यांनी ११८९ पर्यंत महाराष्ट्रावर सत्ता चालविली. यांनीही सर्व दक्षिण जिंकली होती, आणि उत्तरेकडे स्वाऱ्या करून बंगाल, आसाम, मगध, कनोज, नेपाळ या प्रदेशांच्या राजांनाही नमविले होते. काही पंडितांच्या मते कवी बिल्हण याने केलेली ही दरबारी अतिशयोक्ती असावी. तसे काही असले तरी हे उत्तर चालुक्य बदामीच्या पूर्व चालुक्यांइतकेच पराक्रमी होते यात शंका नाही.
 ११८९ साली देवगिरीचे यादव सत्तारूढ झाले. हे सम्राटही पराक्रमी होते. दक्षिणेस कावेरीपर्यंत यांनी आपले साम्राज्य विस्तारिले होते, आणि उत्तरेस लाट (गुजराथ), माळवा या प्रदेशांवरही काही काळ आपले अधिराज्य प्रस्थापिले होते. पण हळूहळू या घराण्याचेच नव्हे, तर एकंदर महाराष्ट्राचेच ( आणि भारताचेही ) कर्तृत्व लयास जात होते. विनाशाची, विघटनेची, अधःपाताची बीजे पूर्वीच या जमिनीत पडली होती. ती रूढ होऊन त्यांना आता धुमारे फुटले होते. याची कारणमीमांसा पुढे येणारच आहे. येथे वाकाटकांपासून यादवांपर्यंतच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्या घराण्यांच्या कारकीर्दीची रूपरेखा फक्त दिली आहे. एका दृष्टिक्षेपात या हजार वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचे चित्र आकळता यावे आणि पुढील विवेचन समजण्यास सुलभ व्हावे हा यातील हेतू. येथे एवढेच सांगावयाचे की यादवांच्या अखेरच्या काळात त्यांची सत्ता व दक्षिणच्या सर्व राजसत्ता अवघ्या दहापंधरा वर्षांच्या अवधीत मुस्लिम आक्रमणाला बळी पडल्या, हा केवळ योगायोग नाही. धर्म, समाजरचना, राजनीती, यांना इतके विपरीत रूप या काळात प्राप्त झाले होते की हा विनाश अटळ होता. पण तो पुढचा भाग आहे. एक हजार वर्षे महाराष्ट्राचे स्वातंत्र्य ज्यांनी अबाधित राखले व त्याच्या संस्कृतीला मोठे वैभव प्राप्त करून दिले त्या राजघराण्यांच्या कर्तृत्वाचे प्रथम आपल्याला अवलोकन करावयाचे आहे. प्रत्येक घराण्यात थोर कर्ते राजपुरुष कोण झाले, त्यांनी कोणता विशेष पराक्रम केला, त्यांचे स्वराज्य व साम्राज्य किती विस्तृत होते, शास्ते म्हणून त्यांची योग्यता काय होती, हे सर्व जरा तपशिलाने आपणास पहावयाचे आहे. पण त्याआधी ही सर्व घराणी महाराष्ट्रीय होती की नाही याचा निश्रय आपल्याला केला पाहिजे. सातवाहन घराण्याचा याच दृष्टीने गेल्या प्रकरणात आपण विचार केला. तसाच आता वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व यादव या घराण्यांचा करावयाचा आहे. या दीड हजार वर्षांच्या काळात, महाराष्ट्राला स्वतंत्र अस्मिता होती, त्याचे स्वातंत्र्य अबाधित होते, त्याचे राजकीय कर्तृत्व असामान्य होते, ही सर्व विधाने, ही घराणी महाराष्ट्रीय होती असे सिद्ध झाले तरच सार्थ होतील. म्हणून प्रथम त्याची चर्चा करावयाची आहे. ती करताना ही घराणी डोळ्यांपुढे असणे अवश्य, म्हणून त्यांच्या इतिहासाची अगदी स्थूल रूपरेखा वर दिली आहे. त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाचा निश्चय या प्रकरणात झाला म्हणजे मग पुढील प्रकरणात या पाचही घराण्यांचे राजकीय कर्तृत्व थोड्या तपशिलाने पाहू.

महाराष्ट्रीयत्वाचा निकष
 त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाचा निश्चय करताना हे राजवंश मुळात कोठून आले, त्यांचे अगदी प्राचीन पूर्वज कोणत्या वर्णाचे होते ही चिकित्सा पंडित करतात. ऐतिहासिक जिज्ञासेच्या दृष्टीने व इतिहासलेखनाच्या परिपूर्तीसाठी हा शोध करणे अवश्य आहे. पण एकतर ही चिकित्सा बव्हंशी निष्फळ होते. कोणत्याही घराण्याच्या मूलस्थाना- विषयी निश्चित असा पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही आणि येथून पुढे होण्याची फारशी आशा नाही. शिवाय ऐश्वर्यप्राप्ती झाल्यानंतर आपल्या घराण्याचा संबंध चंद्र, सूर्य या प्राचीन वंशांशी जोडून देण्याची प्रत्येक राजघराण्याची प्रवृत्ती असल्यामुळे शिलालेख किंवा ताम्रपट यांचा पुरावाही या दृष्टीने विश्वसनीय मानता येत नाही. चालुक्य आपल्याला कधी चंद्रवंशीय तर कधी सूर्यवंशीयही म्हणवितात. राष्ट्रकूट यदुवंशी म्हणवून कधी श्रीकृष्ण तर कधी सात्यकी हा आपला मूळपुरुष असे सांगतात. यामुळे अर्थातच मथुरा, अयोध्या ही त्यांची मूळस्थाने ठरतात. या विधानांना इतिहासात स्थान देणे कठीण आहे. या दृष्टीनेही मूळस्थानशोध हा व्यर्थ आहे. पण माझ्या मते या राजघराण्यांचे महाराष्ट्रीयत्व वा इतरत्व यांचा निर्णय करण्यासाठी या चिकित्सेत शिरणेच अयुक्त होय. श्रीशिवछत्रपती यांचे भोसले घराणे मूळ राजस्थानातील होते असे मत आहे. पण त्यामुळे त्यांना कोणी अमहाराष्ट्रीय मानले नाही, मानीत नाहीत. छत्रपती होण्यापूर्वी तीनशे वर्षे हे घराणे महाराष्ट्रात आले. ही भूमी त्यांनी आपली कर्मभूमी मानली. येथल्या जनतेच्या कल्याणाची त्यांनी चिंता वाहिली, येथले राज्य ते स्वराज्य मानले आणि पराक्रम करावयाचे ते सर्व येथल्या लोकांच्या समवेत, त्यांना बरोबर घेऊन, त्यांचे नेतृत्व स्वीकारून केले आणि अशा रीतीने ते महाराष्ट्राशी एकजीव होऊन गेले. त्यामुळे ते महाराष्ट्रीय झाले. कोणताही समाज वा कोणतेही राजघराणे कर्मभूमी कोणती मानते, स्वकीय कोणाला समजते, समरस कोणाशी होते, कोणत्या समाजाच्या साह्याने पराक्रम करते, कोणत्या भूमीला स्वराज्य मानते यावर त्याचे राष्ट्रीयत्व ठरत असते. हाच न्याय मनात धरून इतिहासाचार्य राजवाडे यांनी भोसले घराणे हे महाराष्ट्राचे स्वकीय ठरविले. त्यांचे मूळस्थान, त्यांच्या मते, मथुरावृंदावनाकडे होते. पण त्यावरून त्यांनी भोसल्यांना परकीय ठरविले नाही. पण आश्चर्य असे की चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांना मात्र त्यांनी हा न्याय लागू केला नाही. अयोध्या, चेदी, मथुरा या प्रदेशांतून ते आले म्हणून त्यांना ते परकीय मानतात आणि त्यांच्या राजवटीत महाराष्ट्र दास्यात होता असे म्हणतात. भोसल्यांच्या सत्तेखाली महाराष्ट्र प्रथम स्वतंत्र झाला असे त्यांचे मत आहे (राधामाधव- विलासचंपू - प्रस्तावना पृ. १७३-७४ ) राजवाड्यांच्या या विधानात नेहमीप्रमाणेच कसलीही तर्कसंगती नाही. ही सरणी पत्करली तर आर्य लोक कायमचे अभारतीय व परकीय ठरतील. तेव्हा अत्यंत तर्कदुष्ट अशी ही उपपत्ती आपण त्याज्यच मानिली पाहिजे.
 तेव्हा आता वर सांगितलेल्या विचारसरणीचा आश्रय करून वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य व यादव ही घराणी महाराष्ट्रात स्वकीय होती की परकीय याचा विचार करू.


वाकाटक
 वाकाटकांनी इ. स. २५० ते इ. स. ५५० असे सुमारे तीनशे वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले, हे मागे सांगितलेच आहे. यांचे मूळ घराणे उत्तरभारतातील असावे असे व्हिन्सेंट स्मिथ, डॉ. जयस्वाल इ. पंडितांचे मत आहे. झाशी जिल्ह्यात सध्या बागाट नावाचे एक गाव आहे. तेच पूर्वीचे वाकाट असावे व वाकाटक घराणे तेथलेच असावे असा त्यांचा तर्क आहे. महामहोपाध्याय प्राचार्य वा. वि मिराशी यांनी 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल' या आपल्या ग्रंथात या मताचे खंडन करून वाकाटक दाक्षिणात्य होते, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याने समाधान होत नाही व हा प्रश्न अनिर्णीतच राहतो. पण वर सांगितल्याप्रमाणे प्रस्तुतच्या दृष्टीने त्याचे फारसे महत्त्व नाही. वाकाटकांची कर्मभूमी कोणती होती, ते स्वभूमी कोणत्या प्रदेशाला मानीत आणि साम्राज्यातील प्रदेश कोणत्या राज्यांना मानीत, कोणत्या जनतेशी ते एकजीव होत, इ. वर सांगितलेल्या अनेक गोष्टींना महत्त्व आहे. ते खरे निकष होत. त्यांवरून हे निर्विवाद सिद्ध होते की वाकाटक हे महाराष्ट्रीय होत.
 त्यांचा मूळपुरुष विंध्यशक्ती हा सातवाहनांच्या राज्यात एक सेनापती असून त्यांच्या पडत्या काळी त्याने स्वतंत्र राज्य स्थापले असावे असे पंडितांचे अनुमान आहे. पण शिलालेख व ताम्रपट यांच्या आधारे आज हे मात्र निश्रित सिद्ध झाले आहे की वाकाटकांच्या राज्याची स्थापना प्रथम विदर्भात झाली. रामटेकजवळील नंदिवर्धन ही त्यांची राजधानी असून वत्सगुल्म (वाशीम), प्रवरपुर ( पवनार ) या त्यांच्या नंतरच्या राजधान्या होत्या. विंध्यशक्तीचा पुत्र पहिला प्रवरसेन हा पहिला वाकाटक सम्राट होय. त्याने साठ वर्षे राज्य केले आणि बुंदेलखंडापासून हैदराबादपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर त्याच्या साम्राज्याची त्याच्या चार पुत्रांत विभागणी झाली. त्यातील एका शाखेची वाशीम ही राजधानी होती.
 सातवाहन हे प्राकृत भाषेचे अभिमानी होते व आपल्या राज्यात व साम्राज्यात त्यांनी सर्वत्र महाराष्ट्री प्राकृत भाषाच चालू करण्याचा आग्रह धरला होता, हे गेल्या प्रकरणात सांगितलेच आहे. इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकापासून पुराण- रचना करणाऱ्या वैदिक संस्कृतीच्या अभिमानी पक्षाचा प्रभाव फारच वाढला आणि संस्कृत भाषेला पुन्हा पूर्वीचे स्थान प्राप्त झाले. अखिल भारतात शास्त्री, पंडित, वैदिक, राजे, महाराजे, सेनापती या सर्वांनी तिचाच आश्रय केला आणि सर्व वाङ्मय- रचना संस्कृतातच होऊ लागली. बौद्ध, जैन यांनी जनतेत धर्मप्रचार करण्याच्या हेतूने प्रारंभी पाली, अर्धमागधी यांचा आश्रय केला होता. पण या काळात संस्कृतचे वर्चस्व एवढे झाले की त्यांनीही संस्कृतात ग्रंथरचना करण्यास प्रारंभ केला. अशा स्थितीत राजेमहाराजे यांनी आपले शिलालेख व ताम्रपट संस्कृतात लिहिले असल्यास नवल नाही. गुप्त सम्राटांनी संस्कृतलाच आश्रय दिला आणि त्यांचेच अनुकरण अकराव्या-बाराव्या शतकापर्यंत सर्व राज्यकर्त्यांनी केले. वाकाटकही त्याला अपवाद नव्हते. त्यांचे बहुतेक सर्व ताम्रपट आणि शिलालेख व त्यांच्या सचिवांचे व मांडलिकांचेही कोरीव लेख संस्कृतातच आहेत.
 आपल्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट अशी की हे सर्व लेख नागपूर, वऱ्हाड या प्रांतांतील म्हणजे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांतील काही लेख महाराष्ट्री प्राकृतात आहेत. म. म. मिराशी यांनी आपल्या ग्रंथात हे सर्व कोरीव लेख दिलेले आहेत आणि त्यांचा स्थलनिश्रयही केलेला आहे. त्यावरून असे दिसते की देवटेकजवळचे चिकमारा, हिंगणघाट, वर्धा जिल्ह्यातील मांडगाव, अमरावती जिल्ह्यातील घाटलडकी, मातुकली, कारंजा, असतपूर, अंजनवाडी, चांदा, वरदाखेट ( वरुड), नांदेड या गावचे हे ताम्रपट आहेत. ही सर्व गावे नागपूर, वऱ्हाड, मराठवाडा या प्रांतांतील आहेत हे स्पष्टच आहे. अंजठाच्या लेण्यांपैकी १६, १७ व १९ या क्रमांकाची लेणी वाकाटकांच्या कारकीर्दीत त्यांनी वा त्यांच्या सचिवांनी कोरलेली असून त्यांतील १६ व्या लेण्यात त्यांची वंशावळ दिलेली आहे. अजंठ्याच्या पश्चिमेस अकरा मैलांवर असलेल्या गुलवाडा या गावाजवळच्या घटोत्कच लेण्यात शेवटचा वाकाटक राजा हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा एक कोरीव लेख असून त्यात 'देवराजसूनुर्हरिषेणो' असा आपल्या स्वामीचा त्याने आदरपूर्वक उल्लेख केला आहे. वाकाटकांच्या सचिवांनी कोरविलेली लेणी जशी महाराष्ट्रात आहेत तशीच त्यांनी बांधलेली मंदिरेही महाराष्ट्रातच आहेत. पहिल्या प्रवरसेनाने बांधलेले प्रवरेश्वराचे देवालय, रामगिरीवरचे रामगिरी- स्वामीचे देवालय, अश्वत्थखेटकातील विष्णूचे मंदिर आणि द्वितीय प्रवरसेनाने प्रवर पूर ( पवनार ) येथे बांधलेले श्रीरामचंद्राचे मंदिर ही मंदिरे यांची साक्ष देतील. ही मंदिरे आता बहुतेक उद्ध्वस्त झाली आहेत. पण काहींचे अवशेष आहेत व काहींचा त्यांच्या ताम्रपटांत निर्देश आहे.
 वाकाटक पूर्णपणे महाराष्ट्रीय झाले होते याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांनी संस्कृतप्रमाणेच प्राकृत साहित्यालाही आश्रय दिला होता हा होय. त्यांनी प्राकृताला आश्रय दिला होता, एवढेच नव्हे, तर स्वतः प्राकृतात ग्रंथरचनाही केली होती. वत्सगुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याचे ' हरिविजय ' आणि नन्दिवर्धन शाखेचा द्वितीय प्रवरसेन याचे 'सेतुबंध' ही प्रसिद्ध काव्ये महाराष्ट्री प्राकृतात आहेत. शिवाय या राजांनी प्राकृतात सुभाषितेही रचली होती. हाल सातवाहन राजाने रचलेल्या ' गाहा सत्तसई' या ग्रंथात नंतरच्या काळात बरीच भर पडलेली आहे. त्यातील २१७, २३४, ५०४ व ५०५ या गाथा सर्वसेनाच्या म्हणून टीकाकारांनी मान्य केलेल्या आहेत. प्रवरसेनाच्याही नावावर ४५, ६४, २०२, २०८ व २४६ या गाथा नोंदलेल्या आहेत. काही टीकाकारांच्या मते आणखी ८/१० गाथा प्रवरसेनाच्या आहेत. त्यांनी त्यांचे क्रमांकही दिले आहेत. ( वाकाटक नृपती व त्यांचा काळ, मिराशी, पृ. ११५-१२९).
 वाकाटकांचे मूळ राज्य नागपूर, विदर्भ, कुन्तल, अश्मक, मूलक या महाराष्ट्रातील प्रदेशात होते व त्यांचे साम्राज्य माळवा, कोसल, लाट, कलिंग व आंध्र या प्रदेशावर होते. त्यांचे बहुतेक सर्व कोरीव लेख, त्यांनी बांधलेली मंदिरे व त्यांच्या कारकीर्दीत कोरलेली लेणी विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्रातील प्रदेशात होती. त्यांनी महाराष्ट्री प्राकृताला आश्रय देऊन त्या भाषेत स्वतः काव्यरचनाही केली. एवंच त्यांचे सर्व कर्तृत्व महाराष्ट्रात झाले व त्यांची ही कर्मभूमी होती, हे निश्रित सिद्ध झाल्यामुळे हे राजघराणे महाराष्ट्राचे होते याविषयी शंका घेण्यास जागा राहात नाही.

दृढ अस्मिता
 इ. सनापूर्वी तिसऱ्या शतकात महाराष्ट्राला पृथगात्मता आली आणि त्याच वेळी या भूमीचे स्वतंत्र राज्य प्रस्थापित करणारे सातवाहन राजघराणे त्याला लाभले. या पहिल्या घराण्याचे राज्य साडेचारशे वर्षे टिकले. त्यानंतर पन्नासपाऊणशे वर्षे महाराष्ट्रावर आभीर या शकुशाणांप्रमाणेच परकीय असलेल्या जमातीचे राज्य होते. पण सुदैवाने लवकरच वाकाटक नृपती विन्ध्यशक्ती याचा उदय झाला आणि त्याच्या घराण्याने सुमारे तीनशे वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. याचा अर्थ असा की प्रारंभापासून म्हणजे इ. स. पूर्व २३५ पासून इ. स. ५५० पर्यंत म्हणजे प्रारंभीची सुमारे ८०० वर्षे महाराष्ट्राला स्वकीय राजसत्तेखाली राहण्याचे भाग्य लाभले. महाराष्ट्राची अस्मिता यामुळे निश्चित आणि दृढ होऊन गेली.

वादग्रस्त विषय
 पुढील काळात इ. स. ११८९ पर्यंत सहाशे साडेसहाशे वर्षे या भूमीवर बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट व कल्याणीचे चालुक्य या घराण्यांची सत्ता होती. आणि यांच्या महाराष्ट्रीयत्वाविषयी तीव्र वाद आहेत. माझ्या मते ही तीनही घराणी महाराष्ट्रीयच होती, हे सिद्ध करण्यास पुरेसा पुरावा आहे. तोच आता मांडावयाचा आहे. पण त्याआधी, आधीच्या थोर अभ्यासकांची मते काय आहेत, वादाचे स्वरूप काय आहे, अनुकूलप्रतिकूल कोण आहेत, त्यांची प्रमाणे काय आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. तो सर्व करून, या पंडितांच्या मतांचा परामर्श घेऊन, नंतर माझे मत मी मांडतो.
 डॉ. रा. गो. भांडारकरांच्या मते राष्ट्रकूट हे महाराष्ट्राचे खरे स्वदेशीय राजे होत. आंध्र, चालुक्य यांना ते मूळचे परस्थ मानतात. पण यासंबंधी त्यांनी कसलीच कारणमीमांसा केलेली नाही, काही उपपत्तीही सांगितलेली नाही ( कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, पृ. ८५ ). आंध्राविषयी त्यावेळी पुरेसे संशोधन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांनी विदेशमूल मानले तर नवल नाही. पण चालुक्य परकीय कसे तेही त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मताची चर्चा करता येत नाही.
 कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांनी या विषयाची आपल्या ' मध्ययुगीन भारत' या ग्रंथाच्या पहिल्या व दुसऱ्या खंडात बरीच चर्चा करून चालुक्य, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, कांचीने पल्लव ही सर्व घराणी अस्सल मराठा घराणी होती असा सिद्धान्त मांडला आहे. चालुक्य, राष्ट्रकूट या घराण्यांचे ताम्रपट, शिलालेख संस्कृताप्रमाणेच कानडीत आहेत. काही पंडितांच्या मते त्यांची मातृभाषा कानडी होती. यामुळे ही घराणी कानडी होत, असे त्यांचे मत आहे. पण वैद्यांच्या मते हा प्रश्न भाषेचा नसून वंशाचा आहे. चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव ही घराणी आर्य क्षत्रिय आहेत. चालुक्य राजे स्वतःला प्रारंभापासून हारितीपुत्र व मानव्यगोत्री म्हणवितात. तर राष्ट्रकूट अत्रिगोत्री म्हणवितात. कदंब, पल्लव हेही त्यांच्या मते आर्यच होत. चाळके, कदम, पालवे ही शाण्णव कुळीच्या मराठ्यांत जी नावे आहेत ती चालुक्य, कदंब, पल्लव यांवरूनच आलेली आहेत. या मराठ्यांतील भाले, खंडागळे ही राष्ट्रकूटांची नावे होत. तेव्हा हे सर्व आर्यक्षत्रिय असून शाण्णव कुळीच्या मराठ्यांत त्यांची गणना होते. म्हणून ही सर्व घराणी मराठा होत असे चिंतामणराव म्हणतात ( मध्ययुगीन भारत, खंड १ ला, पुस्तक १ ले, पृ. ११२ - ११६, पुस्तक २ रे, पृ. १७५, खंड २ रा, पृ. २४९ ).
 चिंतामणराव वैद्य यांचा हा युक्तिवाद टिकण्याजोगा आहे असे वाटत नाही. ही सर्व घराणी आर्य क्षत्रिय होत याबद्दल वाद नाही. पण या क्षत्रियत्वावरून व त्यांच्या गोत्रांवरून ती मराठी कशी ठरतात ते कळत नाही. त्यांच्याच मताने ही सर्व घराणी प्राचीन काळी उत्तरेतून आलेली आहेत. यदू, मनू हे त्यांचे मूळपुरुष होत. त्यामुळे त्यांतील काही सोमवंशी तर काही सूर्यवंशी ठरतात. यावरून ती आर्य ठरतील, क्षत्रिय ठरतील. आता ती महाराष्ट्रात राहिली म्हणून जर ती महाराष्ट्रीय मराठा ठरली तर त्यांच्यांतील पल्लव, कदंब ही घराणी आणखी दक्षिणेकडे जाऊन कांची, वनवासी या प्रदेशात राहिली तर ती तामिळी, कर्नाटकी ठरली पाहिजेत. पण वैद्यांच्या मते हे सर्व वंशावर व गोत्रांवर अवलंबून आहे. पण वंशावरून व गोत्रावरून, वर म्हटल्याप्रमाणे ती आर्य व क्षत्रिय ठरतील. तेवढ्यावरून त्यांना मराठा ठरविता येईल असे वाटत नाही. शिवाय भांडारकरांच्या प्रमाणेच एके ठिकाणी राष्ट्रकूट राजवंशाची प्रस्थापना करणारा राजा दन्तिराज (दन्तिदुर्ग) याच्याविषयी त्यांनी ' महाराष्ट्र देशास स्वातंत्र्य देणारा पहिला हाच राजा होय,' असे म्हटले आहे. (खंड २ रा, पृ. २३८). याचा अर्थ चालुक्यांच्या काळी महाराष्ट्र परतंत्र होता, मांडलिक होता असा होतो ! चालुक्य मराठे असताना त्यांच्या सत्तेखाली महाराष्ट्र परतंत्र होता या म्हणण्यात तर्कसंगती काय ते कळत नाही.
 पूर्व चालुक्यांची राजधानी बदामी ही विजापूर जिल्ह्यात आहे. त्यांचे अनेक ताम्रपट कानडीत आहेत. म्हणून ते मूळचे कानडी असावे असे अनेक पंडितांचे मत आहे. भारतीय विद्या भवनाच्या 'दि हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' या प्रसिद्ध इतिहासात डॉ. डी. सी. सरकार यांनी असेच मत दिले आहे (दि क्लासिकल एज, खंड ३ रा, पृ. २२७ ). राष्ट्रकूट यांची मातृभाषा कानडी होती, त्यांचे ताम्रपट कानडीत आहेत, त्यांनी कानडी वाङ्मयाला उत्तेजन दिले, त्यांतील काही राजांनी स्वतः कानडीत ग्रंथरचनाही केली, ही कारणे देऊन डॉ. अ. स. आळतेकर यांनी हे घराणे मूळचे कानडी होते असा निष्कर्ष काढला आहे (दि राष्ट्रकूटाज अँड देअर टाइम्स, पृ. १८-२३) चालुक्य व राष्ट्रकूट यांचे ताम्रपट कानडीत होते व त्यांच्यापैकी काहींनी कानडी वाङमयाला उत्तेजन दिले ही वस्तुस्थितीच आहे. ती कोणालाही नाकारता येणार नाही. असे असतानाही ही घराणी महाराष्ट्रीय होती असे म्हणणाऱ्यांवर फारच मोठी जबाबदारी येते यात शंका नाही. ऐतिहासिक प्रमाणांच्या बळावर ती जबाबदारी पेलता येणे शक्य आहे, असे मला वाटते.
 या घराण्यातील राजे आपले स्वराज्य कोणत्या भूमीला मानीत होते, त्यांची कर्मभूमी कोणती होती, त्यांनी पराक्रम कोणत्या लोकांच्यासह केले, कोणत्या समाजाशी ते एकरूप झाले, या निकषावर निर्णय करावयाचा आहे, हे वर सांगितलेच आहे. या दृष्टीने प्रथम चालुक्यांचा विचार करू.

चालुक्य महाराष्ट्रीय
 चालुक्यांचा पहिला स्वतंत्र राजा म्हणजे पुलकेशी ( १ ला ) हा होय. इ. स. ५३५ ते ५६६ असे बत्तीस वर्षे त्याने राज्य केले. पण त्याच्या आधी त्याचा पितामह जयसिंह याने स्वराज्यस्थापनेच्या उद्योगास प्रारंभ केला होता. त्याचा मुलगा रणराग याने तो उद्योग पुरा करीत आणला होता. जयसिंह व रणराग हे मूळचे विजापूर जिल्ह्यातील बदामीच्या परिसरातील होत. पण त्यांनी प्रथम राज्य स्थापिले ते सातारा, कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्र विभागात. त्या काळी या विभागात एका राष्ट्रकूट घराण्याचे राज्य होते. हे राष्ट्रकूट म्हणजे चालुक्यानंतर सम्राटपदावर आलेले राष्ट्रकूट नव्हत. राष्ट्रकूटांची अनेक घराणी प्राचीन काळापासून महाराष्ट्रात होती. त्यांतलेच साताऱ्यातील मानपूर म्हणजे अलीकडचे जे माणगाव तेथले हे घराणे होय. वाका- टकांच्या पडत्या काळात या मानपूरच्या राष्ट्रकूट घराण्याने बराच राज्यविस्तार केला होता. या राष्ट्रकूटांचा पराभव करून चालुक्यांनी आपले राज्य स्थापिले, असे प्रथम डॉ. रा. गो. भांडारकरांनी 'अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन' या ग्रंथात सांगितले होते ( पृ. ६७ ). म्हैसूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. एम. एच. कृष्ण यांनी सध्याच्या मराठा प्रदेशात इ. स. ४७० नंतर बरीच वर्षे राष्ट्रकूट घराणे राज्य करीत होते व त्यांच्यापासून ते राज्य चालुक्यांनी घेतले असेच मत मांडले आहे ( के. व्ही. रंगास्वामी अयंगार कमेमोरेशन व्हॉल्यूम, दि अर्ली राष्ट्रकूटाज ऑफ महाराष्ट्र, पृ. ५५ ). हे राष्ट्रकूट घराणे म्हणजे मानपूरचे - माणचे - राष्ट्रकूट घराणेच होय, असे म. म. मिराशी यांनी नवीन सापडलेल्या शिलालेखांच्या आधारे सिद्ध केले आहे ( संशोधन मुक्तावली, सर ३ रा, पृ. ९५ ) आणि मिराशींचे हे मत बहुमान्य झाले आहे (दि क्लासिकल एज, विद्याभवन, पृ. २००). याचा अर्थ असा की चालुक्यांनी स्वराज्याची स्थापना महाराष्ट्रात केली आणि तेथेच त्यांच्या वैभवाचा पाया घातला गेला.

स्वराज्य आणि साम्राज्य
 मग या चालुक्यांचा कर्नाटकाशी संबंध कोणत्या प्रकारचा होता ? कर्नाटकावर चालुक्यांचे साम्राज्य होते. त्यांच्या दक्षिणेतील बहुतेक सर्व राज्यकर्त्यांशी नित्य लढाया चालु असत. कांचीचे पल्लव हे त्यांचे कायमचे वैरी. त्यांच्याशी दर पिढीला एकदा तरी लढाई व्हावयाची हा या पश्चिम चालुक्यांच्या राजवटीचा नियमच होता. पल्लवांचे राज्य आजच्या मद्रास प्रदेशात होते. त्यांच्या पलीकडे कावेरीच्या दक्षिणेस पांड्य, चोल व चेर (केरळ) ही राज्ये होती. यांनाही चालुक्यांनी अनेक वेळा जिंकून आपले मांडलिक बनविल्याचे इतिहास सांगतो. पश्चिमेच्या बाजूस कावेरीच्या उत्तरेस व तुंगभद्रेच्या दक्षिणेस गंग, वनवासी, बाण, अलूप ही राज्ये होती. हा कर्नाटक प्रांत होय. वनवासी व वैजयंती हा कदंबाचा प्रांत म्हणजे उत्तर म्हैसूर होय. आणि गंगांचा गंगवाडी म्हणजे दक्षिण म्हैसूर होय. अलूपांचे राज्य शिमोगा जिल्ह्यातील उडुपी येथे होते. या सर्व कानडी राज्यांशी चालुक्यांचे अखंड वैर होते. त्यांच्यावर स्वाऱ्या करून चालुक्य सम्राट कीर्तिवर्मा, पुलकेशी २ रा, विनयादित्य यांनी त्यांना अनेक वेळा मांडलिक बनविले होते, आणि त्यांना नमवून मांडलिक बनविण्यात चालुक्यांना भूषण वाटत असे, असे त्यांच्या कोरीव लेखांवरून दिसते. आता त्यांना नमविल्यानंतर त्यांच्याशी स्नेह जोडून त्यांच्याशी सोयरीक केल्याचेही उल्लेख इतिहासात आहेत. पण तो भाग निराळा. त्यामुळे कर्नाटक प्रदेश हे बदामीचे चालुक्य स्वराज्य मानीत नसत हे विधान बाधित होत नाही. पल्लवांच्या इतके नाही पण त्याच्या खालोखाल कदंब, गंग, अलूप यांशी चालुक्यांचे वैरच होते. याचा स्पष्ट अर्थ असा की पांड्य, चोल, केरल, पल्लव, कलिंग, आंध्र हे चालुक्यांना परके, तसेच कर्नाटकातले लोकही चालुक्यांना परके होते. ते त्यांचे स्वजन नव्हते. त्यांनी पराक्रम केला, वैभव प्राप्त करून घेतले ते सर्व महाराष्ट्रीयांसमवेत होय. इतर प्रदेशांत मूळ सत्ता स्थापून त्यांनी महाराष्ट्राला मांडलिक बनविल्याचे त्यांच्या वंशाच्या इतिहासात, एकाही कोरीव लेखात म्हटलेले नाही. त्यांचे महाराष्ट्रात स्वराज्य होते व इतर प्रांतांवर साम्राज्य होते.

उपार्जित स्वराज्य ।
 चालुक्यांच्या एका शिलालेखात याच शब्दात हा भेद स्पष्ट केला आहे. सत्याश्रय पुलकेशी २ रा, याचा पुतण्या नागवर्धन याने एक गाव ब्राह्मणाला दान दिले. त्याचा ताम्रपट डॉ. रा. गो. भांडारकर यांनी मूळ संहिता व भाषांतर यांसह दिला आहे. हा ताम्रपट गोपराराष्ट्रातला म्हणजे नाशिक जिल्ह्यातला असून इगतपुरीपासून बारा मैलांवरचे बलेग्राम हे गाव दान देण्यासाठी तो लिहिलेला आहे ( कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, पृ. ७३ व २७२ ). या ताम्रपटात पुलकेशीचे वर्णन केले आहे. हा पुलकेशी कीर्तिवर्म्याचा पुत्र. कीर्तिवर्मा मृत्यू पावला तेव्हा तो लहान होता. म्हणून कीर्तिवर्म्याचा भाऊ मंगलीश हा गादीवर आला. पण पुढे सिंहासन आपल्याच मुलाला मिळावे, पुलकेशीला बाजूला सारावे असा डाव त्याने रचला. पण आता पुलकेशी तरुण व समर्थ झाला होता. त्याने हा डाव हाणून पाडला व आपले राज्य परत मिळविले. त्याचे वर्णन करताना नागवर्धन म्हणतो की पुलकेशीने प्रथम स्वराज्य ताब्यात घेतले व नंतर चेर, चोल, पांड्य यांना जिंकले. (प्रवरतुरंगमेण उपार्जित- स्वराज्य-विजितचेरचोलपांड्यक्रमागतराज्यत्रयः ।) हे स्वराज्य कोणते ? मंगलीशाच्या राज्यविस्तारावरून याची कल्पना येईल. कारण प्रथम पुलकेशीने ते ताब्यात घेतले होते. मंगलीशाच्या राज्याचे वर्णन करताना मध्य व उत्तर मराठा मुलुख त्याचप्रमाणे कोकण हा सर्व प्रदेश त्याच्या ताब्यात होता असे 'क्लासिकल एज' या ग्रंथात म्हटले आहे ( भारतीय विद्याभवन प्रकाशन, पृ. २३३ ) पुलकेशीचे हे स्वराज्य होते. आणि चेर, चोल, पांड्य आणि वर उल्लेखिलेले गंग, वनवासी इ. प्रांत यावर त्याचे साम्राज्य होते. चालुक्यांचे ताम्रपट कानडीत असले तरी त्यांचे स्वराज्य महाराष्ट्रात होते. ही भूमी त्यांची कर्मभूमी होती. येथले लोक त्यांचे स्वजन होते. गंगवाडी, वनवासी येथले कर्नाटकी लोक त्यांना परकी होते.
 रविकीर्ती कवीने रचलेल्या ऐहोळी शिलालेखातील प्रशस्तीवरून हा विचार आणखी स्पष्ट होईल. मंगलीश व पुलकेशी यांची यादवी सुरू होऊन मंगलीश मारला गेला व चालुक्य सत्ता डळमळली. हे पाहताच त्यांच्या ताब्यातील अनेक सामंतांनी उठावणी केली. अप्पायिक व गोविंद या दोन सामंतांनी पुलकेशीवर प्रथम चाल केली. त्यांचा सामना भीमा नदीच्या उत्तरेस झाला. यातील गोविंद हा राष्ट्रकूट असून तो मानपूरचा राष्ट्रकूट होता ( म. म. मिराशी, संशोधनमुक्तावली, सर ३ ग, पृ. १०२ ). यावरून पुलकेशीने प्रथम कोणता प्रदेश जिंकला, त्याचे स्वराज्य कोणते होते याची कल्पना येईल. पुलकेशीने पुढे जे विक्रम केले त्याचे वर्णन वरील प्रशस्तीत आहे, त्यावरूनही या विचाराला पुष्टी मिळते. पुलकेशीने वनवासी, गंग, अलूप, कोकण, पुरी (दंडा- राजपुरी ), लाट, मालव, गुर्जर, कलिंग, कोसल, पिष्टपूर, कांची, चोल, पांड्य हे प्रदेश जिंकल्याचे वर्णन त्या लेखात आहे. या प्रदेशांचे भौगोलिक स्थान पाहाता महाराष्ट्राभोवतालच्या वर्तुळरेषेत ते येतात असे दिसून येईल. या वर्णनात महाराष्ट्रातले कुन्तल, नासिक्य, अश्मक, मूलक, विदर्भ हे प्रांत जिंकल्याचा उल्लेखसुद्धा नाही. याचा अर्थ ते सर्व आधीच पुलकेशीच्या ताब्यात होते असा होतो. ते त्याने जिंकलेच नव्हते, असे म्हणणे शक्य नाही. कारण भोवतालचे प्रांत जिंकीत जाऊन मधलाच हा प्रदेश तो मोकळा ठेवील हे अशक्य होय. शिवाय त्याचा भाऊ विष्णुवर्धन याचे इ. स. ६१५-१६ सालचे कोल्हापूर, सातारा प्रदेशातील दानलेख उपलब्ध झाले आहेत. त्यावरून तो प्रदेश पुलकेशीच्या ताब्यात होता याबद्दल शंका राहातच नाही. यावरून कुन्तल (कोल्हापूर, सातारा ), नाशिक, अश्मक ( मराठवाडा ), विदर्भ हा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र हेच चालुक्याचे स्वराज्य होते हे निर्विवाद होय.

तीन महाराष्ट्र
 या प्रशस्तीतील २५ व्या श्लोकात, पुलकेशी ९९००० गावे असलेल्या तीन महाराष्ट्रांचा राजा झाला, हे सुप्रसिद्ध वचन होय. वनवासी, गंग, कोकण, लाट, मालव, गुर्जर हे प्रदेश जिंकल्याचे वर्णन १८ ते २२ या श्लोकांत आहे. यावरून त्यानंतर त्याने महाराष्ट्र जिंकला असा अर्थ कोणी करतात. पण तसा अर्थ होणार नाही. कारण २३ व्या श्लोकात त्याने हर्षाचा पराभव केल्याचे वर्णन आहे. पुलकेशीचा व हर्षाचा संग्राम झाला तो इ. स. ६२९-३० साली. त्याआधीच त्याने महाराष्ट्र जिंकला होता हे आप्पायिक गोविंदाची उठावणी व विष्णुवर्धनाचे दानलेख यावरून निश्चित होते. तेव्हा वनवासी, गंग ते कांची या दिग्विजयाआधी पुलकेशीने महाराष्ट्रात आपली सत्ता दृढ केली होती म्हणजेच ते त्याचे स्वराज्य होते यात शंका नाही.
 तीन महाराष्ट्रांचा तो राजा झाला, या विधानाची मागे दुसऱ्या प्रकरणात चर्चा केली आहे. गंग, वनवासी, कोकण, लाट, मालव, गुर्जर या सर्वाचा समावेश त्या वेळी महाराष्ट्रात होत असे, असे शं. रा. शेंडे म्हणतात. त्या विधानाला अन्यत्र कोठेच पुष्टी मिळत नसल्यामुळे ते मान्य करणे कठीण आहे, असे तेथे म्हटले आहे. डॉ. डी. सी. सरकार यांच्या मते महाराष्ट्र, कोकण व कर्नाटक हे ते तीन महाराष्ट्र होत. (क्लासिकल एज, पृ २३८ ). पण येथे तीन महाराष्ट्र याचा तीन मोठी राज्ये असा अर्थ त्यांनी केला आहे. पण कर्नाटक, कोकण, लाट (गुजराथ), माळवा, गुर्जर (राजस्थान ) एवढे प्रांत जिंकल्यानंतर वरील तीन प्रदेशांचाच निराळा उल्लेख 'मोठी राज्ये ' असा करण्याचे कारण काय ते समजत नाही. गुजराथ, माळवा, राजस्थान ही राज्ये कोकणापेक्षा निश्चित मोठी आहेत, त्या वेळीही होती. तेव्हा तीन महाराष्ट्र याची नेमकी विवक्षा कवीच्या मनात काय होती ते सांगणे कठीण आहे असे वाटते. याचा विदर्भ, मराठवाडा व कुंतल असाही अर्थ कोणी करतात.

चिनी प्रवासी
 सत्याश्रय पुलकेशी २ रा हा महाराष्ट्राचा राजा होता, त्याचे स्वजन महाराष्ट्रीय होते, त्याने दिग्विजय केले ते मराठा सेनेच्या बळावर केले आणि त्यामुळे तो महाराष्ट्रीय होता, हे त्यावरून निश्चित सिद्ध होईल. त्यासाठी आणखी पुरावा हवा आहे. असे वाटत नाही. आणि हवाच असेल तर तो युएनत्संग या चिनी प्रवाशाने तो दिला आहे. हा प्रवासी इ. स. ६४१ च्या सुमारास महाराष्ट्रात आला होता. त्याने सत्याश्रय पुलकेशी याची भेटही घेतली होती. पुलकेशीची राजधानी भडोचपासून १६७ मैल आहे असे तो म्हणतो. चालुक्यांची राजधानी बदामी ही भडोचपासून ४३५ मैल आहे. तेव्हा तिचा उल्लेख असणे शक्य नाही. म्हणून हा उल्लेख वेरूळचा असावा व ती चालुक्यांची दुय्यम राजधानी असावी असे डॉ. डी. सी. सरकार यांचे अनुमान आहे. आपल्या प्रवासवर्णनात ह्यूएनत्संग याने महाराष्ट्र देश, महाराष्ट्र- जन व त्यांचा राजा पुलकेशी यांचा अतिशय गौरव केला आहे. या महाराष्ट्रीय जनांची आपल्या राजावर अनन्य भक्ती होती आणि तोही त्यांच्या बळावर भोवतालच्या राजांना तुच्छ लेखीत असे, असे तो म्हणतो. चालुक्यांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र देश असेच त्याचे मत होते ( डॉ. डी. सी. सरकार, क्लासिकल एज, पृ. २३६-४० ).
 कांचीच्या पल्लवांविषयी मागील प्रकरणी सांगितलेला विचार येथे लक्षणीय आहे. हे पल्लव मूळचे तामीळ नव्हत. त्यांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती. तरी त्यांनी तामीळनाड प्रांत स्वतःची कर्मभूमी मानली; पराक्रम त्या लोकांसमवेत केला, त्यांना स्वजन मानले. त्यामुळे ते तामीळच होत, असे तेथे म्हटले आहे. ते मूळचे कोठले हे निश्चित सांगता येत नाही. पण माझ्या मते त्याला महत्त्व नाही.
 चालुक्य हे महाराष्ट्राला स्वभूमी मानीत व मराठ्यांना स्वजन मानीत याला आणखीही एक प्रमाण मांडता येईल. ते असे की त्यांचे बहुसंख्य दानलेख महाराष्ट्रातच सापडले आहेत त्यामुळे असे दिसते की त्यांच्या दानगंगेचा ओघ महाराष्ट्रातच वहात होता. चिपळूण, वेंगुर्ले, नेरूर ( सावंतवाडी), सामनगड ( कोल्हापूर ), मिरज, सातारा, इगतपुरी, या ठिकाणी किंवा त्यांच्या आसपास चालुक्यांचे पुष्कळसे ताम्रपट सापडले आहेत ( भांडारकर, कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, प्रकरण १० वे ). या परिसरातील गावे यांनी दान दिली आहेत आणि ब्राह्मणांना अग्रहार देऊन त्यांच्या वसाहती वसविल्या आहेत. चालुक्य या भूमीशी कसे एकजीव झाले होते ते यावरून दिसून येईल.

पुलकेशीचे वारस
 सरतेशेवटी बंगालचे इतिहासपंडित रमेशचंद्र दत्त यांचे चालुक्यांच्या महाराष्ट्रीयत्वाविषयीचे मत पाहून चालुक्यांविपयीचा हा विचार संपवू. ते म्हणतात, 'शिलादित्याने ( हर्षाने ) इतर अनेक राजांचा पराभव करून त्यांना मांडलिक बनविले. पण पुलकेशीला त्याला केव्हाही जिंकता आले नाही. उलट पुलकेशीनेच त्याचा पराभव करून स्वाभिमानी मराठ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राखले एक हजार वर्षांनंतर या पुलकेशीच्याच वारसाने उत्तर हिंदुस्थानचा बादशहा जो औरंगजेब त्याला उपमर्दून मराठ्यांचे स्वातंत्र्य व वैभव त्यांना पुन्हा प्राप्त करून दिले. पुढे मोगल व राजपूत या दोघांचाही ऱ्हास झाल्यावर या पुलकेशीच्या देशजनांनीच भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लिशांशी लढा दिला ( ए हिस्टरी ऑफ सिव्हिलिझेशन ऑफ एन्शंट इंडिया, खंड २ रा, पृ. १५६ ).

राष्ट्रकूट
 चालुक्यांसंबंधीची ही विचारसरणी राष्ट्रकूटांना जशीच्या तशी लागू पडेल. राष्ट्रकूटांविषयी एक विचार वर मांडला आहे. या नावाची अनेक घराणी प्राचीन काळापासून महाराष्ट्रात बसत होती. ही सर्व घराणी परस्पर संबद्ध होती असे नाही. कारण राष्ट्रकूट हे मूळचे कुलनाम नाही. ते अधिकारपदावरून पडलेले नाव आहे. कुळकर्णी, देशपांडे, पोतदार, चिटणीस, देशमुख या अर्वाचीन नावांप्रमाणेच हे नाव आहे. राष्ट्र याचा, प्रदेशाचा, देशाचा जिल्ह्यासारखा विभाग, असा मागे अर्थ होता. त्याचा मुख्य तो राष्ट्रकूट. ग्रामाचा मुख्य तो ग्रामकूट. तसेच नाव होते. यामुळे या नावाची अनेक घराणी येथे झाली. त्यातील मानपुर अथवा साताऱ्यातील माण येथील राष्ट्रकूटांचा निर्देश वर आलाच आहे. याच घराण्याचे पुढे आठव्या शतकात महाराष्ट्रात बलाढ्य साम्राज्य झाले असे म. म. मिराशींनी एके ठिकाणी म्हटले आहे (सं. मुक्तावली, सर २ रा. पृ. ९६ ). पण नंतरच्या एका लेखात मानपूरचे राष्ट्रकूट व विदर्भाचे राष्ट्रकूट यांहून मराठवाड्यात तिसरे एक राष्ट्रकूट घराणे होते व आठव्या शतकात उदयास आले ते हे तिसरे घराणे होय असे मत त्यांनी मांडले आहे (सं. मुक्तावली, सर ५ वा, पृ. १५९). पण ही तीनही घराणी मूळची महाराष्ट्रीय होती याविषयी त्यांना शंका नाही. आठव्या शतकात उदयास आलेले साम्राज्यकर्ते राष्ट्रकूट घराणे त्या वेळी मराठवाड्यात वेरूळ, एलिचपूर येथे होते असे डॉ. अ. स. आळतेकरांचेही मत आहे. पण हे मूळचे लातूर प्रांतातील असून कानडी होते असे ते म्हणतात. इ. स. ६२५ च्या सुमारास ते वेरूळ परिसरात आले व शंभर वर्षांनी तेथूनच त्याने पराक्रमास प्रारंभ केला व पुढे लवकरच साम्राज्य स्थापिले. या चार पिढ्यांच्या काळात हे घराणे महाराष्ट्रीय झाले होते असे त्यांनी म्हटल्याचे मागल्या प्रकरणात सांगितलेच आहे. माझ्या मते हीच विचारसरणी सयुक्तिक आहे.

स्वराज्य महाराष्ट्रात
 डॉ. आळतेकर यांनी आपल्या 'राष्ट्रकूट अँड देअर टाइम्स' या ग्रंथात एक नकाशा दिला आहे. त्यात राष्ट्रकुटांच्या सत्तेखालच्या विस्तीर्ण प्रदेशाचे त्यांनी दोन विभाग करून दाखविले आहेत. त्यातील मध्यवर्ती मोठ्या विभागाला राष्ट्रकूटांच्या राज्याची प्रकृती ( मूळ प्रदेश, नॉर्मल टेरिटरी ) म्हटले असून दुसऱ्या विभागाला त्यांच्या वर्चस्वाखालील प्रदेश ( झोन ऑफ इन्फ्लुएन्स) असे म्हटले आहे. राष्ट्रकूटांच्या राज्याची प्रकृती म्हणून जो विभाग दाखविला आहे त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राचा समावेश होतो. उत्तरेस नर्मदा-तापी हा दुआब आणि दक्षिणेस कृष्णा- तुंगभद्रा हा दुआब हेही मुलूख प्रकृतीतच येतात. यांच्या पलीकडे उत्तरेस माळवा व बुंदेलखंड हा प्रदेश आणि दक्षिणेस पेन्नार - कावेरी दुआब हे प्रदेश राष्ट्रकूटांच्या साम्राज्यात, वर्चस्वात येतात. या दक्षिण विभागात म्हैसूर, चितळदुर्ग, बंगलोर, कांची, मद्रास, द्वारसमुद्र हा टापू येतो. यावरून आळतेकरांच्या मतेही राष्ट्रकूटांचे स्वराज्य महाराष्ट्रातच होते असे दिसते.
 राष्ट्रकूटांचा जो इतिहास आळतेकरांनी दिला आहे त्यावरून हा विचार जास्त स्पष्ट होतो. गुजराथ, माळवा, ओरिसा, कनोज, आंध्र, पल्लव, पांड्य, चेर, चोल यांच्याप्रमाणेच म्हैसूरच्या गंग राजांशी राष्ट्रकुटांच्या सतत लढाया चालू असत. कृष्ण १ ला, ध्रुव, धारावर्ष, गोविंद ३ रा, अमोघवर्ष या सर्वांनी म्हैसूरवर स्वारी करून गंगांना पराभूत केले आहे. केव्हा केव्हा या लढाया बारा, पंधरा, वीस वर्षेही चालत. कधी कधी गंगराजांना राष्ट्रकूटांनी कैदेत ठेवून आपले राज्यपाल म्हैसूरवर नेमले होते असेही दिसते. पण अन्यत्र राज्य स्थापून महाराष्ट्रावर त्यांनी राज्यपाल नेमून साम्राज्य चालविले असे मात्र अपवादालाही कधी झाले नाही. यावरून राष्ट्रकूटांची भाषा जरी कानडी असली तरी, कर्नाटक ही ते स्वभूमी मानीत नसत असे निश्चित दिसते. त्यांची स्वभूमी महाराष्ट्र ही होती. त्यांचे स्वराज्य महाराष्ट्रात होते व साम्राज्य कर्नाटकावर होते. त्यांच्या कित्येक ताम्रपटांत चालुक्यांच्या सैन्याला त्यांनी कर्नाटक सैन्य म्हणून उपहासाने हिणविलेले आहे. राष्ट्रकूटांचा मूळपुरुष दन्तिदुर्ग याने खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर- म्हणजे बहुतेक सर्व महाराष्ट्र चालुक्य राजा कीर्तिवर्मा याचा पराभव करून जिंकला. या त्याच्या पराक्रमाचे वर्णन करताना या ताम्रपटांत कांची, केरळ, चोल, पांड्य, या देशांचे राजे व सम्राट श्रीहर्ष यांचाही पराभव करणारे, इतरांना अजिंक्य असे कर्नाटक सैन्य दन्तिदुर्गाने जिंकले असे म्हटले आहे. हा श्लोक देऊन म. म. मिराशी म्हणतात, दन्तिदुर्ग स्वतः कर्नाटकीय असता तर त्याने पराजित केलेल्या सैन्याला 'कार्णाटक' असे विशेषण लावले नसते ( सं. मुक्तावली, ५, पृ. १५९ ).

कार्णाटकं बलम्
 राष्ट्रकूटांनी चालुक्यसेनेला ' कार्णाटकं बलं ' म्हणून का हिणविले हे एक मोठे कोडंच आहे. अनेक राष्ट्रकूट सामंत चालुक्यांच्या राज्यात सामंत म्हणून त्यांच्याच सैन्यात लढत असत. मानपूरचे, विदर्भातले व मराठवाड्यातलेही राष्ट्रकूट चालुक्यांच्या सैन्यात पराक्रम करीत होते. दन्तिदुर्ग हा प्रारंभी असाच चालुक्यसेनेत होता असा पंडितांचा तर्क आहे. या सर्व राष्ट्रकूटांना, चालुक्यराजे दर पिढीला कर्नाटकावर स्वाऱ्या करीत होते, वनवासी, गंग, अलूप, बाण यांना जिंकून त्यांना मांडलिक करीत होते, हेही माहीत असलेच पाहिजे. या पराक्रमात ते स्वतःही सहभागी होत असले पाहिजेत. म्हणजे ज्या सेनेला त्यांनी 'कार्णाटक ' म्हणून संबोधिले त्या सेनेत ते स्वतःच जातीने हजर होते. तरी त्यांनी असे का म्हणावे, हे सांगणे कठीण आहे. राष्ट्रकूटांची स्वतःची भाषा कानडी होती, त्यांचे अनेक कोरीव लेखही कानडीत होते. यामुळे हे कोडे जास्तच दुर्गम होऊन बसते. पण प्राचीन इतिहासात अशी कोडी बऱ्याच वेळा पुढे येतात. चितोडचा राजा अंबाप्रसाद क्षत्रिय असून स्वतःला 'क्षत्र- संहारकारी ' म्हणवितो हे असेच कोडे आहे, हे मागील प्रकरणी सांगितलेच आहे. अनेक शब्दांना त्या त्या काळात विशिष्ट अर्थ प्राप्त झालेले असतात, ते पुढे लुप्त होतात आणि मग ते शब्द दुर्गम होऊन बसतात. मराठा हा शब्द आज सर्व महाराष्ट्रीय समाज व शहाण्णव कुळीचे लोक या दोन्ही अर्थी वापरला जातो. वेदकाळी असुर हा शब्द इंद्र, वरुण या देवांनाही लावलेला आढळतो. चाहमान, परमार, या घराण्यांनी आपल्या कोरीव लेखांत स्वतः ब्राह्मण असल्याचे सांगितले आहे. तेव्हा ही कोडी दुर्गम म्हणून सोडून देण्याखेरीज काही गत्यंतर नाही.

कर्मभूमी
 फ्लीट, डॉ. भांडारकर, चिंतामणराव वैद्य, म. म. मिराशी यांच्या मते राष्ट्रकूट है मूळचे महाराष्ट्रातले होत. डॉ. अळतेकर यांना हे मत मान्य नाही. तसे मानल्यास, त्यांची मातृभाषा कानडी होती याचे स्पष्टीकरण करता येत नाही, असे ते म्हणतात. पण हा सगळा वाद हे घराणे मूळचे कोठले होते याबद्दलचा आहे, त्यांची कर्मभूमी कोणती होती, त्यांचे स्वराज्य कोठे होते याबद्दलचा नाही. आणि मूळ स्थान कोणते याला महत्त्व कसे नाही, हे मी वर अनेक ठिकाणी स्पष्ट केलेच आहे. भारतातली अनेक राजघराणी ज्या प्रांतात दीर्घकाळ स्थायिक होऊन राज्य करीत होती त्या प्रांतात ती मूळ अन्य प्रदेशातून आली होती, त्यांचे मूळ स्थान निराळेच होते असा इतिहासच आहे. म्हणून त्यांची कर्मभूमी कोणती, स्वराज्य कोणते या निकषांवरून निर्णय करावा असे मला वाटते. त्या दृष्टीने पाहता राष्ट्रकूट हे चालुक्यांप्रमाणेच महराष्ट्रीय ठरतात असे दिसेल.
 चालुक्यांप्रमाणेच राष्ट्रकूटांचे अनेक कोरीव लेख महाराष्ट्रातच सापडतात. वेरुळ, वर्धा, दिंडोरी, सांगली, मयूरखंडी (नाशिक जिल्हा ), संजाना ( ठाणे ), तळेगाव ढमढेरे, थांदक (चांदा जिल्हा ), पिंपेरी ( खानदेश ), तोरखेडे (खानदेश), अलास ( कुरुंदवाड ), खारेपाटण सामनगड ( कोल्हापूर ), जवरखेडा ( खानदेश ), मानोर (ठाणे) या ताम्रपटांवरून राष्ट्रकूटांची महाराष्ट्र ही कर्मभूमी व तशीच दानभूमीही होती हे दिसून येईल.

राज्यश्री केव्हा लोपली ?
 चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या सत्ता महाराष्ट्राशी कशा अविभाज्यपणे निगडित होत्या, हे आणखी एका गोष्टीवरून दिसून येईल. चालुक्यसत्तेचा अस्त इ. स. ७५० च्या सुमारास झाला व राष्ट्रकूट सत्तेचा अस्त इ. स. ९७३ साली झाला. या दोन्ही सत्तांचा अस्त झाला हे केव्हा ठरले ? महाराष्ट्रातून त्यांच्या सत्ता नष्ट झाल्या तेव्हा. या दोन्ही घराण्यांनी वर सांगितल्याप्रमाणे कर्नाटक, गुजराथ, माळवा, कोसल, आंध्र, तामिळनाड, चोल, पांड्य, चेर हे देश अनेक वेळा जिंकले होते. तेथील राजांना कधी मांडलिक बनविले होते, कधी आपल्या इतर सामंतांना नेमिले होते. पण जसे हे देश त्यांनी अनेक वेळा जिंकले तसेच अनेक वेळा त्यांची सत्ता झुगारून ते देश स्वतंत्रही झाले होते. तसे नसते तर दर पिढीला त्यांच्यावर स्वारी करण्याचे यांना कारणच पडले नसते. पण त्या प्रदेशातील सत्ता नष्ट झाली तरी या चालुक्यांची सत्ता नष्ट झाली असे कोणीच म्हटले नाही. कोणालाही तसे वाटले नाही. महाराष्ट्रातली त्यांची सत्ता गेली तेव्हाच या राजवंशाचा शेवट झाला, असे ठरले. तोपर्यंत नाही. याउलट इतर प्रदेशांत यांच्या इतर शाखांनी स्थापिलेल्या सत्ता टिकून राहिल्या तरी यांची सत्ता टिकली असेही कोणी म्हटले नाही. चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याने आपला भाऊ विष्णुवर्धन झाला आंध्र प्रांतात आपला सामंत म्हणून नेमले होते. पण थोड्याच अवधीत त्याने बदामीचे वर्चस्व झुगारून दिले व तो स्वतंत्र झाला. आंध्रातील वेंगीचे हे पूर्व- चालुक्य घराणे इ.स. १०८० पर्यंत सत्ताधीश होते. पण त्यामुळे बदामीच्या चालुक्यांची राजसत्ता टिकली असे ठरले नाही. महाराष्ट्रातली त्यांची सत्ता गेली त्याबरोबर त्यांची राज्यश्री लोपली. कारण ते महाराष्ट्राचे राजे होते. इतरत्र त्यांचे स्वराज्य असते तर, महाराष्ट्रात त्यांचे साम्राज्य गेले तरी, त्यांच्या सत्तेचा लोप झाला नसता. पण महाराष्ट्रात त्यांचे स्वराज्य होते, साम्राज्य कधीच नव्हते. त्यामुळे ते लुप्त होताच त्यांचा अस्त झाला.

महाराणा फ्रेडरिक
 बदामीच्या चालुक्यांची भाषा कानडी असताना त्यांना महाराष्ट्रीय म्हणणे पुष्कळांना विचित्र वाटते. पण इतिहासात असे कधी कधी घडत असते हे त्यांनी ध्यानी घ्यावे. प्रशियाचा महाराणा फ्रेडरिक ( १७१२-८६ ) याच्या जर्मनत्वाबद्दल कोणी शंका घेईल असे वाटत नाही. प्रशिया हा प्रदेश संघटित करून त्याने एक बलाढ्य जर्मन देश प्रस्थापित केला आणि अखिल जर्मनीच्या ऐक्याचा व उत्कर्षाचा पाया घातला. पण त्याला जर्मन भाषेचा तिटकारा होता. तो स्वतः फ्रेंच भाषेतून बोले. त्याने आपले ग्रंथ फ्रेंचमध्येच लिहिले, आपल्या दरबारी फ्रेंच ग्रंथकारांना तो आदराने बोलावी, स्वत: फ्रेंच ग्रंथकार व्हावे ही त्याची आकांक्षा होती. फ्रेंच साहित्य, फ्रेंच पोशाख, फ्रेंच रीतिरिवाज यावर त्याची भक्ती होती. जर्मन जीवनरीतीची तो उघडपणे चेष्टा करी. त्याची बहीण विल्हेमा हिची अशीच वृत्ती होती. त्या काळी जर्मन सुशिक्षित लोक आपसातही फ्रेंच बोलत व फ्रेंच संस्कृतीचे अनुकरण करण्यात धन्यता मानीत. पण असे असूनही जर्मन लोकांना संघटित करून, त्यांचे सामर्थ्य वृद्धिंगत करून, त्यांना जगात फ्रेडरिक यानेच प्रथम प्रतिष्ठा मिळवून दिली, याबद्दल जर्मनीत कोणालाही शंका नाही. लेसिंग या जर्मन साहित्यशास्त्रज्ञाने पुढे जर्मन भाषेचा अभिमान लोकांत जागृत केला. पण फ्रेडरिकने जी स्वत्वजागृती केली तिच्यामुळेच लेसिंगला ते शक्य झाले असे इतिहासपंडित सांगतात ( १ एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, २. 'फ्रॉम दीज रूट्स् ' - मेरी कोलम, पृ. ३२ ) . हाच न्याय चालुक्यांना लावणे युक्त होईल. सत्याश्रय पुलकेशी हा मराठ्यांचा, महाराष्ट्राचा राजा होता, त्यांना त्याने पराक्रमी बनविले हे ह्युएनत्संग व रमेशचंद्र दत्त यांचे म्हणजे आपण ध्यानी घ्यावे.

विजयनगर कोणाचे ?
 विजयनगरच्या संगम, सालुव, तुलुव व अरविद्व या चार सम्राट घराण्यांची भाषाविषयक वृत्ती पाहणे येथे उद्बोधक होईल. विजयनगरच्या साम्राज्याचे संस्थापक हरिहर व बुक्क हे मूळ आंध्रप्रदेशातील वरंगळच्या राज्यात सरदार होते, हे बहुतेक पंडितांना मान्य आहे. सूर्यनारायणराव, रंगाचारी, वेंकटरमणय्या यांच्या मते हे सरदार आंध्र- प्रांतीय, म्हणूनच तेलगू भाषिक होते. सालुव हे दुसरे घराणे. त्यांचे मूळपीठ निश्चित नाही. पण या घराण्यातील सर्व राजांचा तेलगूवर लोभ होता. ती भाषा त्यांना प्रिय होती. पुढले तिसरे घराणे तुलुव हे होय. हे मूळचे दक्षिण कर्नाटकातील तुलुवनाडू परगण्यातील घराणे होय. पण त्यांनी तामिळनाडमध्ये जाऊन अर्काटच्या परिसरात आपले राज्य स्थापिले होते. तेथून ते विजयनगरला येऊन सम्राटपदी आरूढ झाले. पण त्यांचा सर्व ओढा तेलगू भाषेकडे होता. या घराण्यातील अत्यंत थोर सम्राट कृष्णदेवराय हे तर निश्चितच तेलगू भाषिक होते. 'अमुक्तमाल्यदा' हा त्यांचा ग्रंथ तेलगू भाषेतच आहे. अष्ट दिग्गज म्हणून प्रसिद्ध असलेले त्याच्या राजसभेतील आठ कवी सर्व तेलगू होते. प्रसिद्ध भोजराजा हा माळव्यातला, म्हणून तो मालव भोज होय. कृष्णदेवराय तेलगूचा पुरस्कार करीत म्हणून त्यांना 'आंध्रभोज' म्हणत. सालुव नरसिंहापासून कृष्णदेवरायापर्यंत विजयनगरमध्ये तेलगूचे सुवर्णयुगच होते असे म्हणतात ( डॉ. वेंकटरमणय्या, हिस्टरी अँड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल, खंड ६ वा, प्रकरण १२ वे ). के. ईश्वरदत्त यांच्या मते प्रारंभापासून तीनशे वर्षे विजयनगरच्या दरबारात तेलगूचेच वर्चस्व होते. आणि ते केवळ भाषेचेच नव्हे, तर रीति- रिवाजांचेही (विजयनगर- स्मृतिग्रंथ, पृ. ५४ ). विजयनगरला तेलगू भाषा व संस्कृती यांचे असे वर्चस्व होते हे डॉ. बी. ए. सालेटोर यांनाही मान्य आहे ( सोशल अँड पोलिटिकल लाइफ इन् विजयनगर एंपायर, खंड १ ला, प्रस्तावना, पृ. २३, २४ ). पण असे असले तरी विजयनगरचे वैभव हे कर्नाटकीय वैभव आहे असे कन्नडिग मानतात, आणि माझ्या मते ते सयुक्तिकच आहे. ' विजयनगर दरबारात तेलगूचे वर्चस्व होते ' असे म्हणणारांनीही ' कन्नडांच्या दरबारांत ते वर्चस्व होते ' असे म्हटले आहे, तेही याच जाणिवेने होय. वर सांगितलेल्या सर्व घराण्यांनी कर्नाटक हीच आपली कर्मभूमी मानली होती. तेव्हा ती कर्नाटकीय होत यात शंका नाही. डॉ. सालेटोर यांनी हरिहर व बुक्क हे मूळचे कन्नड होते असे ठरविण्याचा अट्टाहासाने प्रयत्न केला आहे. पण त्याचे काही प्रयोजन नाही, फलही नाही. त्यांनी कर्नाटक ही स्वभूमी मानली, कर्मभूमी मानली हे पुरेसे आहे. संगम, अरविद्व ही घराणी मूळ तेलगू असली तरी ती राजघराणी कर्नाटकीय होत यात शंका नाही.


उत्तर चालुक्य
 बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट यांचा याच दृष्टीने विचार केला पाहिजे. त्यांची भाषा कानडी होती; पण कर्नाटक हा त्यांनी कधीही आपला मानला नाही. गंगवाडी, वनवासी, नोळंबवाडी, वाणवाडी या कर्नाटकातील राज्यांशी त्यांचे पिढ्यान् पिढ्या वैरच होते. तेव्हा गुजराथ, मावळा, कोसल, कांची या प्रदेशांप्रमाणेच ते कर्नाटकही परप्रांत मानीत होते, तो त्यांच्या स्वराज्यात नव्हता, है उघड आहे. राष्ट्रकूटांच्या मागून सत्ताधीश झालेले कल्याणीचे चालुक्य यांचीही हीच दृष्टी होती. तैलप २ रा हा या चालुक्यांच्या सत्तेचा संस्थापक. सत्ताधीश होताच त्याची पहिली लढाई झाली ती गंग, वनवासी, नोळंबवाडी यांचा राजा पांचालदेव याशी. कारण राष्ट्रकूटवंशीय राजा इन्द्र याला त्याने आश्रय दिला होता. या लढाईत पांचालदेव प्राणास मुकला. तेथून पुढे सत्याश्रय, सोमेश्वर पहिला, सोमेश्वर दुसरा, विक्रमादित्य यांच्या कारकीर्दीत गंग, वनवासी यांशी एकेकदा तरी चालुक्यांची लढाई झालेलीच आहे. आणि त्या राजांना मांडलिकत्व मान्य करावे लागले आहे. दहाव्या शतकात हळेबीड-द्वारसमुद्र येथे होयसळ यादवांचा उदय झाला. हे देवगिरीच्या यादवांचेच भाईबंद होते. पण प्रारंभापासूनच चालुक्यांच्या त्यांच्याशी लढाया सुरू झाल्या. विक्रमादित्य, सोमेश्वर ३ रा, जगदेक मल्ल यांच्या कारकीर्दीत हळेबीडचे होयसळ मांडलिक म्हणून आपल्या सेनेनिशी त्यांच्या साह्याला आले असल्याचे इतिहास सांगतो. या कल्याणीच्या चालुक्यांचे कोरीव लेख, त्यांच्या सत्तेचे उदयास्त यांवरून बदामीचे चालुक्य व राष्ट्रकूट यांच्याप्रमाणेच हेही घराणे महाराष्ट्रीय होते असे दिसून येईल.

देवगिरीचे यादव
 कल्याणीच्या चालुक्यांनंतर देवगिरीच्या यादवांची सत्ता महाराष्ट्रावर प्रस्थापित झाली. त्यांच्या महाराष्ट्रीयत्वाबद्दल कसलाच वाद नाही. पहिला यादव सम्राट भिल्लम याने ११८७ साली साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या पुढल्याच वर्षी मुकुन्दराजाचा 'विवेकसिंधू' हा मराठीतला आणि अभिमान धरणारा पहिला ग्रंथ अवतरला. यादवांनी मराठीला आश्रय तर दिलाच होता. पण मराठीचे व महाराष्ट्राचे निःसीम अभिमानी जे महानुभावपंथाचे संस्थापक चक्रधर त्यांचे शिष्यत्वही त्यांनी पत्करले होते. मुकुन्दराज, चक्रधर व ज्ञानेश्वर हे मराठी साहित्याचे आद्यपुरुष त्यांच्याच कारकीर्दीत उदयास आले आणि यादवांनी राजसत्तेने व त्यांनी आपल्या वाणीने महाराष्ट्राच्या सीमा व त्याची अस्मिता यांना चिरस्थायी रूप देऊन टाकले. यादवांचे लेख मराठीप्रमाणे कानडीतही आहेत. पण त्यांची राजभाषा मराठी होती. आणि त्यांची कर्मभूमी चालुक्य राष्ट्रकूटांप्रमाणे महाराष्ट्र हीच होती. चोल, पांड्य, कलिंग, तेलंगणाप्रमाणेच कर्नाटकावरही यादवांचे साम्राज्य होते. येथे एक गोष्ट लक्षणीय आहे. म्हैसूर प्रांतातील द्वारसमुद्र - हळेबीड येथील होयसळ यादव हे राजघराणे म्हणजे यादवांचीच एक शाखा होती. पण त्यांनी आपली कर्मभूमी कर्नाटक ही मानली आणि भिल्लम यादवाच्या वंशजांनी महाराष्ट्राला स्वराज्य मानले. यामुळे एकवंशीय असूनही ते कर्नाटकी झाले व हे मराठी झाले. होयसळ यादव वीर बल्लाळ व देवगिरी यादव भिल्लम यांचा उदय साधारण एकाच वेळी झाला. दोघेही एकवंशीय पण दोघांमध्ये अखंड संग्राम चालू होते. त्यात महाराष्ट्रात भिल्लमाची सत्ता दृढ झाली. आणि कर्नाटकातील द्वारसमुद्र येथे वीर बल्लाळाची झाली. आणि त्यामुळे त्यांचे राष्ट्रीयत्व अगदी भिन्न होऊन गेले.

सहा राजधान्या
 या राजघराण्यांचा स्वरूपनिश्चय करताना त्यांच्या राजधान्या कोठे होत्या या विचारालाही महत्त्व आहे. म्हणून त्या दृष्टीने विवेचन करून ही चर्चा संपवू. सात- वाहनांपासून यादवांपर्यंतच्या सहा राजघराण्यांपैकी सातवाहन यांची पैठण, वाकाटकांची नंदिवर्धन व यादवांची देवगिरी अशा तीन राजधान्या महाराष्ट्रातच होत्या. राष्ट्रकूटांची राजधानी प्रथम वेरूळच्या आसपास होती; राज्यस्थापनेनंतर सुमारे पाऊणशे वर्षांनी अमोघवर्ष पहिला याने ती मान्यखेटला नेली. हे मान्यखेट आज कानडी मुलखात असले तरी त्या वेळी मराठी भाषिक होते हे अनेक पुराव्यांवरून आता सिद्ध झाले आहे. पुष्पदंत हा अपभ्रंश महाकवी. तो राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याचा प्रधान भरत याच्या आश्रयाला होता. हा भरत 'प्राकृतकविकाव्यरसावलुब्ध' असा होता. पुष्पदंताचे काव्य जे महापुराण त्याची भाषा जवळजवळ मराठीच आहे, हे श्री. ग. वा. तगारे यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे ( सह्याद्री, एप्रिल १९४१ ) जसहर चरिऊ, णायकुमार चरिऊ हे आपले इतर ग्रंथ पुष्पदंताने मान्यखेटलाच लिहिले. राष्ट्रकुट राजे संस्कृत व कानडीप्रमाणेच महाराष्ट्री अपभ्रंशालाही उत्तेजन देत असत. पुष्पदंतासारखे कवी महाराष्ट्री अपभ्रंशात रचना करीत, कारण ती त्या वेळी लोक- भाषा - देसी भास होती हे मागे सांगितलेच आहे. तेव्हा मान्यखेट नगरी त्या काळी महाराष्ट्रातच होती असे म्हणणेच सयुक्तिक ठरेल. मान्यखेटचे आजचे नाव मालखेड असे आहे हेही आपण ध्यानी घ्यावे.
 कल्याणीचे चालुक्य यांची मान्यखेट हीच प्रारंभी राजधानी होती. बऱ्याच काळानंतर त्यांनी ती पूर्वेस कल्याणीला नेली. ही नगरी जुन्या निजामी राज्यातील कलबुर्गा शहराजवळ होती. आज ते एक तालुक्याचे लहानसे गाव आहे. त्या गावची आजची भाषासुद्धा मराठी आहे. आज ते गाव कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर आहे. तेव्हा त्या मागल्या काळी ते महाराष्ट्रात असणे पूर्ण शक्य आहे.
 राहता राहिली एक राजधानी. ती म्हणजे बदामी ह्युएनत्संगाने ज्याला मराठ्यांचा राजा असे म्हटले त्या सत्याश्रय पुलकेशीची ही राजधानी. त्याची दुसरी राजधानी नाशिक किंवा वेरूळ ही असावी असे संशोधकांचे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. पण ती दुय्यम होय. मुख्य राजधानी बदामी हीच होती. ही नगरी आजच्या विजापूर जिल्ह्यात म्हणजे कर्नाटकात जाहे. चालुक्य हे कानडी होते असे म्हणणारा पक्ष हे एक प्रमाण म्हणून देतो. आणि वर जी विचारसरणी मांडली आहे तिच्या अभावी त्या प्रमाणाला महत्त्व आलेही असते. पण आज गोवा, बेळगाव, कारवार यांबद्दल जे वाद चालू आहेत त्यांवरून प्रदेशांच्या सीमारेषा आजही किती अनिश्रित असतात ते ध्यानी येईल. पंजाब व बंगाल यांची फाळणी होऊन इकडचे अनेक जिल्हे तिकडे झाले व पूर्व पंजाबची पुन्हा फाळणी होऊन हरयाना प्रदेश निराळा झाला आणि आज राजधानी चंदीगड हिच्याविषयी वाद निर्माण झाला आहे. या घटना पाहता बदामीचा आजचा भूगोल त्या काळी ती कर्नाटकातच होती हे निश्चित ठरविण्यास पुरा पडेल असे नाही.
 महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा विचार करताना प्रथम येथील राजशासनांचा विचार करणे अवश्य होते. कारण स्वकीय राजसत्तेवाचून संस्कृतीचा उत्कर्ष होत नाही. म्हणून गेल्या प्रकरणात सातवाहनांचा व या प्रकरणात वाकाटक ते यादव या पाच राजघराण्यांचा विचार आपण केला. इतिहाससंशोधनाच्या प्रारंभी या काळात इतिहाससाधने फारशी उपलब्ध नव्हती. त्यामुळे या सहा राजघराण्यांच्या विषयी अनेक प्रकारचे वाद निर्माण झाले होते. आणि ही सर्व घराणी कोणाच्या ना कोणाच्या मते महाराष्ट्राला परकी ठरली होती. पण गेल्या तीसचाळीस वर्षांत नाणी, शिलालेख, ताम्रपट या साधनांची विपुल उपलब्धी झाली व संशोधनाला नवी दिशा लागली. ते सर्व संशोधन व इतिहासपंडितांनी त्यासंबंधी केलेली चर्चा ही ध्यानात घेऊन या घराण्यांकडे मी पाहू लागलो तेव्हा ती सर्व सहाही घराणी महाराष्ट्रीय आहेत असा माझ्या मनाशी निर्णय झाला. त्या निर्णयामागे कोणती विचारसरणी आहे त्याचेच विवेचन या प्रकरणात केले आहे. एखादे घगणे मूळ कोठून आले हा खरा निकष नसून ते स्वराज्य कोणत्या भूमीला मानते, त्याने कर्मभूमी कोणती निवडली, स्वजन कोणाला म्हटले, पराक्रम कोणासांगाती केला हा माझ्या मते खरा निकष होय. विचारवंतांना, इतिहासवेत्त्यांना हा निकष मान्य होईल असे मला वाटते. तसे झाल्यास ही सर्व घराणी महाराष्ट्रीय होती हा त्याअन्वये निघणारा निष्कर्षही त्यांना ग्राह्य वाटेल अशी आशा व्यक्त करून ही लांबलेली चर्चा संपवितो.