महाराष्ट्र संस्कृती/महाराष्ट्र धर्म
मराठ्यांचे सामर्थ्य
हिंदुस्थानावर अकराव्या शतकाच्या प्रारंभापासून वायव्येकडून मुस्लिमांची आक्रमणे सुरू झाली. तेराव्या शतकाच्या प्रारंभी तर दिल्लीला मुस्लिम राज्यच स्थापन झाले आणि पुढील शतकात मुस्लिमांनी सर्व हिंदुस्थान व्यापला. या मुस्लिमसत्तेचा प्रतिकार रजपूत, विजयनगर, शीख व मराठे यांनी केला. या चौघांपैकी या मुस्लिमसत्तेची पाळेमुळे खणून काढून अखिल भारत मुक्त करण्यात मराठ्यांनाच फक्त यश आले. असे का व्हावे, मराठ्यांच्याच ठायी हे सामर्थ कोठून आले, असा प्रश्न इतिहासात नेहमी विचारला जातो. समर्थ रामदास स्वामी आणि शिवछत्रपती यांनी महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण केले. मराठ्यांना राष्ट्रधर्माची दीक्षा दिली, हे त्याचे कारण होय. रजपूत, कन्नड (विजयनगर), शीख हे पराक्रमी होते. भारत त्यांचा कायमचा ऋणी आहे. यात शंका नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे त्यांना मुस्लिमसत्ता कायमची निर्दाळून टाकण्यात यश आले नाही हे खरेच आहे. आणि याचे कारण राष्ट्रधर्माची दीक्षा त्यांना कोणी दिली नाही हे आहे. मराठ्यांना ही दीक्षा शिव-समर्थांनी दिली, म्हणूनच ते यशस्वी झाले. या दोन महापुरुषांपैकी समर्थांच्या कार्याचा या प्रकरणात विचार करावयाचा आहे.
इहवाद व राष्ट्रधर्म
युरोपात चौदाव्या शतकात राष्ट्रधर्माचा उदय झाला. तोपर्यंत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड या देशात इंग्लिश, फ्रेंच, जर्मन इ. भाषांना प्रौढता आली होती. आणि त्यामुळे त्या त्या देशांच्या स्वतंत्र अस्मिता, त्यांचे पृथगहंकार सिद्ध होत आले होते. ग्रीक विद्येचे त्याच काळात पुनरुज्जीवन झाले. आणि त्यामुळे, तोपर्यंत लोकांच्या मनावर परमार्थ, परलोक यांची जी पकड होती ती ढिली झाली. विल ड्यूरंट या थोर इतिहासपंडिताने स्पष्ट सांगून ठेवले आहे की परलोकचिंता जेथे कमी झाली तेथेच राष्ट्रसंघटना होऊ शकली. पश्चिम युरोपातील सर्वच देशांत देशभाषांचा उदय झाला होता तरी स्पेन, इटली, पोलंड या देशांतील लोकांच्या मनावरची धर्मसत्तेची पकड कमी झाली नाही. ते पुरेसे इहवादी व बुद्धिवादी झाले नाहीत. त्यामुळे तेथे राष्ट्रधर्माचा व्हावा तसा परिपोष झाला नाही. इंग्लंड, फ्रान्समध्ये तो झाला, म्हणूनच ते देश बलाढ्य होऊ शकले.
भारतात याच काळी देशभाषा प्रौढत्वाला येत होत्या. पण येथे ग्रीक विद्या किंवा दुसरी इहवादी, बुद्धिवादी विद्या आली नाही. त्यामुळे पश्चिम युरोपप्रमाणे येथे राष्ट्रनिर्मिती झाली नाही. याला अपवाद फक्त महाराष्ट्र. महाराष्ट्रात, काही प्रमाणात, इहवाद आणि बुद्धिवाद निर्माण झाला, म्हणून येथे काही प्रमाणात राष्ट्रसंघटना होऊ शकली. त्याचे श्रेय शिव-समर्थांना आहे. त्यांतील समर्थांच्या कार्याचा आता विचार करू.
संतांनी या देशाला भागवतधर्म शिकविला, तर समर्थांनी महाराष्ट्रधर्म शिकविला, असे बहुतेक सर्व पंडित म्हणतात. पण जवळ जवळ प्रत्येक पंडिताच्या मनातील महाराष्ट्रधर्म याचा अर्थ निराळा आहे. म्हणून समर्थांचा अर्थ निश्चित करणे अवश्य आहे
संरक्षक आणि आक्रमक
समर्थांच्या आधी महाराष्ट्रधर्म हा शब्द या भूमीत दोन तीनशे वर्षे रूढ होता. पण त्याचा अर्थ अगदी निराळा होता. महिकावतीच्या बखरीत (इ. स. १३७०) प्रथम याचा उल्लेख आढळतो. पण तेथे त्याचा अर्थ कुळाचार, वंशाचार (जातींचे आचार), देशाचार, वेदशास्त्राचार एवढाच आहे. स्नानसंध्या, जप, उपासना, व्रते, सण, उत्सव, सोळा संस्कार हे या आचारांत येतात. गुरुचरित्रात महाराष्ट्रधर्माचा उल्लेख आहे. पण तेथेही वेदप्रामाण्य, वर्णाश्रमधर्म, सदाचार, व्रत-वैकल्ये इतकाच अर्थ आहे. समर्थांनी उपदेशिलेला महाराष्ट्रधर्म तो हा नव्हे. न्या. मू. रानडे यांच्या मते 'पेट्रिऑटिझम' हा समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचा अर्थ आहे. मला तोच अर्थ योग्य वाटतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात, 'महाराष्ट्रधर्म राहिला काही तुम्हां कारणे', असा आणि संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात, 'आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा', असा दोनदा या धर्माचा उल्लेख केला आहे. पण त्यांनी त्याची व्याख्या किंवा त्याच्या आशयाचे स्पष्टीकरण स्वतंत्र असे कोठे केलेले नाही. त्यांचे वाङ्मय आणि त्यांचे कार्य यावरून आपल्याला त्या धर्माची लक्षणे निश्चित करावी लागतील. या रीतीने समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचे रूप निश्चित करावयाचे असल्यामुळे राजवाडे, डॉ. भांडारकर, राजारामशास्त्री भागवत, गो. स. सरदेसाई यांच्या मतांची चर्चा येथे केलेली नाही. न्या. मू. रानडे यांच्या मताचा उल्लेख वर केलाच आहे. अलीकडे डॉ. शं. दा. पेंडसे यांनी 'राजगुरु समर्थ रामदास' या नावाचा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला आहे. त्यांनी ग्रंथाच्या उत्तरार्धात समर्थांच्या कार्याचे सविस्तर वर्णन केले आहे. हा सर्व महाराष्ट्रधर्म होय, असे त्यांनी कोठे म्हटलेले नाही. पण आरंभी, 'आता प्रस्तुत खण्डात, राजगुरु समर्थ रामदास यांच्या वाङ्मयाच्या आधारे, भागवत धर्माने आतापर्यंत स्वीकारलेले संरक्षक धोरण टाकून चढाऊ व लढाऊ महाराष्ट्रधर्माचे स्वरूप कसे धारण केले, ते पाहावयाचे आहे' असे म्हटले आहे. त्यांनी ग्रंथात केलेल्या विवरणावरून महाराष्ट्रधर्म म्हणजे 'पेट्रिऑटिझम', 'नॅशनॅलिझम' किंवा राष्ट्रधर्म असाच अर्थ त्यांच्या मनात आहे असे दिसते. पुढील विवेचनात मला त्यांच्या ग्रंथाचा फारच उपयोग झाला.
(१) ऐश्वर्याकांक्षा
ऐहिक ऐश्वर्याची उत्कट आकांक्षा हे राष्ट्रधर्माचे आणि म्हणूनच समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचे पहिले लक्षण आहे. विल ड्युरंटच्या वचनाचा मागे निर्देश केलाच आहे. पश्चिम युरोपात लोक इहवादी होऊ लागले तेव्हाच त्यांच्या ठायी राष्ट्रनिष्ठा निर्माण झाली. भारतात इ. सनाच्या नवव्या दहाव्या शतकापर्यंत प्रवृत्तिप्रेरणा जिवंत होत्या. त्या काळात शक, यवन, हूण, युएची यांची लक्ष लक्ष संख्येने आलेली आक्रमणे निर्दाळून टाकणारे चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, विक्रमादित्य, हर्ष, पुलकेशी असे सम्राट सारखे उदयास येत होते. नागार्जुन, आर्यभट्ट, लल्ल, वराहमिहीर यांसारखे शास्त्रज्ञ विद्यासाधन करीत होते. काव्य, नृत्य, नाट्य, शिल्प, चित्र, संगीत इ. कलांचा सारखा उत्कर्ष होत होता. येथले व्यापारी जगभर फिरून संपत्ती आणीत होते. याच काळात जावा सुमात्रा इ. आग्नेय आशियाई देशांत भारतीयांनी साम्राज्ये स्थापिली होती. सिरिया, इराक, आरेबिया, इजिप्त इ. देशांत गणित, ज्योतिष, वैद्यक या विद्या येथले पंडित जाऊन शिकवत असत. पण सातव्या शतकात श्री शंकराचार्यांचा निवृत्तिवाद उदयास आला. कुमारिल भट्टांचा शब्दप्रामाण्यवाद पंडितांनी स्वीकारला आणि भारताच्या अवनतीस प्रारंभ झाला. ते वाद हळूहळू समाजमनात भिनू लागले आणि इ. सनाच्या अकराव्या शतकापासून भारतात जिवंतपणाची लक्षणे दिसेनाशी झाली. ती पुन्हा दिसावी, ऐहिक ऐश्वर्य पुन्हा भारताला प्राप्त व्हावे अशी समर्थांची आकांक्षा होती. म्हणूनच ते सांगू लागले - मराठ्यांनी कसे व्हावे? - भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत, यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती, विद्यावंत, कलावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, बळवंत, युक्तिवंत, धारिष्टवंत, बुद्धिवंत- या उत्तम गुणांनाच समर्थांनी सद्विद्या म्हटले आहे. 'ही सर्वत्रांपासी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्यरूप.' समर्थ म्हणतात, 'रूपलावण्य हे काही प्रयत्नाने मिळत नाही. पण हे अगांतुक गुण अभ्यासाने प्राप्त होऊ शकतात. म्हणून 'त्यांची काही तरी सोये धरावी' (दास २-८) .
नाना विद्या
श्रवणभक्तीचा महिमा सांगताना पुन्हा त्यांनी हेच उत्कट, भव्य जीवन मराठ्यांनी जगावे असा उपदेश केला आहे. 'नाना पिंडरचना, भूगोलरचना, नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी. चन्द्रसूर्य, तारामंडळे, ग्रहमंडळे, मेघमंडळे, रागज्ञान, तालज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, नाना वल्ली, नाना औषधी, धातु रसायण बुद्धी - ऐसे हे अवघेचि ऐकावे.' (दासबोध, ४-१)
उत्तम गुण
दासबोध दशक नवले, समास चवथा पाहा. प्रारंभीच समर्थ म्हणतात, पृथ्वीमध्ये कोणी संपन्न असतात, कोणी दारिद्री, कोणी सबळ, कोणी दुर्बळ, कोणी राजवैभव भाेगतात, कोणी दारिद्रय, कोणी उत्तम असतात, कोणी अधम- असे का व्हावे ? 'ऐसे काय निमित्य झाले, हे मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती.' अशी प्रस्तावना करून समर्थ म्हणतात, 'जे गुणसंपन्न आहेत ते भाग्यश्री भोगिती, अवगुणासी दरिद्रप्राती, यदर्थी संदेह नाही.' माणसांना आपापल्या गुणांप्रमाणे भाग्य किंवा दारिद्र्य प्राप्त होते. हे गुण कोणते ? मुख्य गुण विद्या, जाणपण हा होय. 'जैसी विद्या तैसे वैभव.' बुद्धी, विवेक, साक्षेप, कुशलता, व्याप करण्याचे सामर्थ्य या गुणांनी वैभव प्राप्त होते. समर्थांनी यांनाच अगांतुक गुण, प्रयत्नसाध्य गुण म्हटले आहे. हे गुण असतील तो जाणता. या जाणत्यालाच सर्व वैभव लाभते.' नेणता तो करंटा, दैन्यवाणा' विद्या अभ्यासताना 'माया, ब्रह्म, परलोक याबरोबरच राजकारणाचाही अभ्यास करावा. तो नसेल तर सर्वत्र अपमान होतो.' विद्येचा, अगांतुक गुणांचा असा महिमा आहे ! 'गुण नस्ता जिणे व्यर्थ, प्राणिमात्रांचे.' गुण नाही तर गौरव नाही, सामर्थ्य नाही, व्याप नाही. 'व्याप नाही म्हणजे वैभव नाही प्राणिमात्रासी.' 'या कारणे उत्तम गुण तेचि भाग्याचे लक्षण !'
( २ ) प्रपंच
महाराष्ट्राचा प्रपंच असा वैभवाचा, समृद्धीचा व्हावा ही समर्थांची तळमळ होती. परमार्थ, मोक्ष त्यांना कमी महत्त्वाचा वाटत होता असे नाही. पण महाभारतकारांप्रमाणे इहलोकीचे ऐश्वर्य, बल, सामर्थ्य यांवरच परलोकसिद्धी अवलंबून असते असे त्यांचे ठाम मत होते. म्हणूनच त्यांनी स्पष्टपणे सांगण्यास प्रारंभ केला की 'आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका.' ' प्रपंच सांडूनिया परमार्थ कराल, तरी तुम्ही कष्टी व्हाल.' 'प्रपंच सांडूनि परमार्थ केला, तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला, परमार्थ कैचा.' दासबोधातील बाराव्या दशकातील पहिला समास असल्या वचनांनीच भरला आहे. 'प्रपंची जो सावधान, तोचि परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थी खोटा ॥ म्हणोनि सावधपणे, प्रपंच परमार्थ करणे, ऐसे न करता भोगणे, नाना दुःखे ॥
तेव्हा, 'आधी प्रपंच', हे महाराष्ट्रधर्माचे दुसरे लक्षण होय.
मतपरिवर्तन
समर्थ रामदास स्वामी हेही वारकरीपंथीय संतांप्रमाणे प्रारंभी, संसार व परमार्थ यांत तीव्र विरोध आहे, असेच मानीत होते. त्यांची अनेक प्रकरणे, अनेक समास, संसारनिंदेने भरलेले आहेत. पण पुढे सर्व देशभर परिभ्रमण करताना, येथील अस्मानी- मुलतानी त्यांनी पाहिली तेव्हा, प्रपंचाचा पाया भक्कम असल्यावाचून परमार्थाच्या उपदेशाला कसलाच अर्थ नाही, हे त्यांच्या ध्यानी आले. आणि म्हणून त्यांनी 'आधी नेटका प्रपंच' हा सिद्धांत सांगण्यास प्रारंभ केला. रामदासस्वामींच्या मतात व तत्त्वज्ञानात हे जे परिवर्तन झाले त्याचे सविस्तर वर्णन प्रा. श्री. म. माटे यांनी आपल्या 'श्री रामदासस्वामींचे प्रपंचविज्ञान' या ग्रंथात केले आहे (प्रकरण ६ वें). डॉ. पेंडसे यांनी, प्रा. माटे यांच्या विवेचनाचा निर्देश करून, स्वतः तीर्थाटनामुळेच स्वामींच्या मनात पालट झाला, असाच अभिप्राय दिला आहे. पेंडसे यांनी याविषयी एक गंमतीचे प्रमाणही दिले आहे. प्रपंचात राहून परमार्थ साधणारा म्हणून राजा जनकाची कीर्ती आहे. समर्थांना प्रारंभी ती मान्य नव्हती. जनकाच्या आधारे, लौकिक प्रपंचाचे महत्त्व सांगणाऱ्यांवर, त्यांनी जुन्या दासबोधात टीका केली आहे (१८-३३). पण नव्या (म्हणजे प्रसिद्ध) दासबोधात, 'मागा होते जनकादिक, राज्य करि ताही अनेक, तैसेचि आता पुण्यश्लोक, कित्येक असती' असा जनकाचा गौरव केला आहे (१८-८) . (राजगुरु समर्थ रामदास, पृ. २१४-२१५ ).
गृहस्थाश्रम
वृत्तीत असा पालट झाल्यामुळेच, प्रपंचाचे महत्त्व सांगताना, समर्थांनी गृहस्थाश्रमाची महती गायिली आहे. देव, ऋषी, मुनी, योगी, तापसी हे सर्व गृहस्थाश्रमातूनच निर्माण झाले, आणि तपस्वी झाल्यावरही ते या आश्रमाच्या आधारेच जगतात, असे त्यांनी बजावले आहे (दास. १४-७). संसाराची प्रारंभी अभद्र निंदा करणाऱ्या समर्थांनीच, 'मनासारिखी सुन्दरा ते अनन्या' हे काव्य लिहून समृद्ध संसाराचे बहारीचे वर्णन केले आहे. आणि मग प्रत्येक प्रसंगी इहलोक आणि परलोक प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा विवेक राखिला पाहिजे, असे सांगितले आहे.
(३) लोकजागृती
ऐहिक ऐश्वर्य हवे, वैभव हवे तर त्यासाठी प्रपंच नेटका केला पाहिजे, यशस्वी केला पाहिजे हे खरे. पण प्रपंच, विशेषतः राष्ट्रीय प्रपंच यशस्वी कसा करावयाचा, असा प्रश्न येतो. लोकजागृती, लोकसंघटना, लोकशक्तीची उपासना हा त्यासाठी समर्थांनी मार्ग सांगितला आहे. आणि समर्थांचा अलौकिक द्रष्टेपणा, असामान्य क्रांतिकारकत्व यातच दिसून येते. राष्ट्ररचनेचे मूळ महातत्त्वच त्यांनी जाणले होते हे यावरून स्पष्ट दिसते.
नागरिक
राजसत्ता या समाजरचनेच्या तत्त्वापेक्षा राष्ट्र हे रचनातत्त्व अगदी निराळे आहे. समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जबाबादारी माझ्या शिरावर आहे, असे प्रत्येक व्यक्तीला वाटणे, ही या तत्त्वात पहिली गृहीत गोष्ट आहे. अशा नागरिकांची जी संघटना तिला राष्ट्र म्हणतात. राजसत्तेत असे काही नसते. परराष्ट्र धोरण, शेतीचा विकास, शस्त्रास्त्रांची निर्मिती, उद्योगधंद्यांची प्रगती, समाजशिक्षण यांविषयीची धोरणे राजा व त्याचे मंत्रिमंडळ आणि फारतर काही प्रमुख सरदार हे ठरवितात. प्रजेचा त्याच्याशी काही संबंध नसतो. तसा असावा अशी अपेक्षाही नसते. किंबहुना लोकांनी यात काही लुडबूड करू नये, असेच राजाला वाटत असते. याचेच नाव राजसत्ता. प्रजाजनांवर तेथे राजाज्ञा मानण्यापलीकडे कसलीच जबाबदारी नसते. त्यांना जाणीवही नसते. अशा या प्रजाजनांचे नागरिकांत रूपांतर करणे, राष्ट्ररचनेसाठी अवश्य असते. त्या रचनेत सर्व नागरिक राष्ट्रीय प्रपंचाची जबाबदारी घेण्यास सिद्ध असतात. म्हणूनच राष्ट्र ही संघटना फार बलशाली आहे.
मराठा तितुका
समर्थांनी हे तत्त्व मनोमन जाणले होते. म्हणूनच जनी जनार्दन, जनी जनार्दन हा घोष त्यांनी चालविला होता. त्यांच्या स्वप्नात जे होते ते 'महाराष्ट्र राज्य' होते, कोणा राजाचे राज्य नव्हते. 'मराठा तितुका मेळवावा' असा उपदेश ते करीत, त्यातले रहस्य हेच आहे. राष्ट्र ही लोकसंघटना आहे, हा सिद्धांत त्यांच्या मनात ठाम झाला होता; म्हणून लोकजागृती करून लोकशक्ती संघटित करावयाची, असे त्यांनी ठरविले व सह्याद्रीच्या खोप्यात येताच त्या उद्योगाला त्यांनी प्रारंभ केला. त्यांच्या या राष्ट्रसंघनेच्या उद्योगाचे स्वरूप आता पाहू.
राजकीय असंतोष
प्रथम त्यांनी राजकीय असंतोष जागृत केला. लो. टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात. येथे असंतोष या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. लोकमान्यांच्या आधी या देशात असंतोष नव्हता असे नाही. भयानक दारिद्र्य, रोगराई, दुष्काळ, जुलूम, पिळणूक यांनी लोक अगदी गांजून गेले होते. त्यांच्यात संतोष कसा असणार ? सगळा असंतोषच होता. पण तो असंतोष अगतिक होता. नशिबाला हात लावून लोक मनाशी चरफडत बसले होते. कमालीच्या निराशेने त्यांना घेरले होते. अशा स्थितीत आपले दैन्य, दारिद्र्य, दुःख हे परकी राज्यामुळे आलेले आहे, ब्रिटिश सत्ताधारी याला कारण आहेत, त्यांना आपण घालवून दिले तर येथे समृद्धी, सुख येईल, हे लोकमान्यांनी सांगितले, लोकांच्या चित्तात आशा निर्माण केली व त्यांना स्वराज्यप्राप्तीच्या उद्योगास सिद्ध केले.
म्लेंच्छ दुर्जन
अडीचशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासस्वामींनी हेच केले. म्लेच्छ सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या सुलतानीचे रूप त्यांनी अनेक प्रकारे लोकांना विवरून सांगितले. त्यांनी भागवतधर्मीय संतांच्याप्रमाणे रामाच्या, मारुतीच्या कथांतून ते अप्रत्यक्षपणे तर सांगितलेच, पण प्रत्यक्ष लोकांच्या डोळ्यांसमोर घडत असलेल्या घटनांचे वर्णन करून आणि यावनी सत्तेचा पुनः पुन्हा निर्देश करून लोकांना त्यांनी त्या अस्मानी सुलतानीची यथार्थ कल्पना दिली.
म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुता दिवसांचे माजले बंड ।
या कारणे अखंड । सावधान असावे ॥ (दासबोध, १२-६-१२)
या शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात आक्रमक शत्रूचा समर्थांनी स्पष्ट निर्देश केला आहे. राज्य नेले म्लेंच्छ क्षेत्री, गुरुत्व गेले कुपात्री । आपण अरत्री ना परत्री, काहीच नाही (दास, १४-७-३६). असा, ब्राह्मणांच्या अधःपातावर कडक टीका करताना, मुस्लिम सत्तेचा उल्लेख आलेला आहे. समर्थांचे एक शिष्य दिनकर गोसावी यांनी 'स्वानुभव दिनकर' या आपल्या ग्रंथात समर्थांनी केलेले परिस्थितीचे वर्णन दिले आहे. समर्थ म्हणतात, ज्या युगात यवन राजा आहे तेथे देव बुडाले तर नवल कसले ? सध्याचा राजा देवद्रोही आहे. त्यामुळे पृथ्वी हलकल्लोळ झाली आहे. या यवनांनी कुळस्त्रिया भ्रष्टविल्या आहेत आणि तीर्थक्षेत्रे सर्व उच्छेदिली आहेत. संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात तर, बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करूनि घसरावे, म्लेंच्छावरी, आणि जिकडे तिकडे महाराष्ट्र राज्य करावे, असा, मुस्लिमांवर प्रत्याक्रमण करावे म्हणून, उघड उपदेश केलेला आहे. आनंदवन भुवन म्हणून समर्थांचे एक काव्य प्रसिद्ध आहे. आपल्या उद्योगाच्या प्रारंभीच त्यांनी हे लिहिलेले आहे. त्यात त्यांनी आपल्याला पडलेल्या एका स्वप्नाचे वर्णन करून मनातल्या आकांक्षा व्यक्त केल्या आहेत. समर्थांची सर्वात मोठी आकांक्षा कोणती ?
बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छ संहार जाहला ।
मोडली मांडली क्षेत्रे । आनंदवन भुवनी ॥
परचक्र
'परचक्र निरूपण नाम समास' या प्रकरणात लोकांच्या हलाखीचे त्यांनी वर्णन केले आहे. 'पदार्थमात्र तितुका गेला । नुस्ता देशचि उरला । येणे कारणे बहुताला । संकट झाले ॥ माणसा खावया अन्न । नाही अंथरूण पांघरूण तेही नाही । घर कराया सामग्री नाही । काय करिती ?' दुसऱ्या एका प्रकरणात यापेक्षाही भयंकर प्रकार काय चालतात ते सांगितले आहे. हे सुलतान लोकांचे नाककान कापतात, त्यांना नदीत बुडवितात, पैशाकरता त्यांची पोटे फाडतात आणि या लूटमारीत स्त्रियांनाही भ्रष्टवितात. यांनी किती एक गुज्रिणी, ब्राह्मणी भ्रष्टविल्या, कित्येक स्त्रियांना जहाजावर नेऊन त्यांची विटंबना केली आणि कित्येक स्त्रियांना देशांतरी नेऊन विकून टाकले. दासबोधातही तिसऱ्या दशकातील पाचव्या व सातव्या समासात वारंवार परचक्राचा आणि सुलतानीचा निर्देश आहे.
अशा रीतीने परचक्र निरूपण करून, यावनी राज्यातील अस्मानी-सुलतानीचे पुनः पुन्हा वर्णन करून, समर्थांनी प्रथम लोकांमध्ये परिस्थितीची चीड निर्माण केली. सर्वांच्या समान शत्रूची जाणीव ही ऐक्याला, संघटनेला पोषक ठरते. तीतूनच राष्ट्रभावनेचा परिपोष होतो. समर्थांना या भूमीत राष्ट्र निर्माण करावयाचे असल्यामुळे त्यांनी ती जाणीव प्रथम निर्माण केली.
युद्धातून राष्ट्र
समान शत्रुत्वाची जाणीव आणि त्या शत्रूशी दिलेला लढा यातूनच राष्ट्र निर्माण होते, असा जगाचा इतिहास आहे. इंग्लंड व फ्रान्स ही दोन राष्ट्र निर्माण झाली ती त्या दोन राष्ट्रांत, चौदाव्या- पंधराव्या शतकात, जे 'शतवार्षिक युद्ध' झाले त्यातून झाली. गेल्या शतकात इटली व जर्मनी ही दोन युरोपीय राष्ट्र ऑस्ट्रिया व फ्रान्स यांशी केलेल्या युद्धातून निर्माण झाली. जपान, चीन, तुर्कस्थान, भारत ही राष्ट्रे आक्रमक, साम्राज्यवादी सत्तांशी केलेल्या लढ्यांतूनच निर्माण झाली आहेत. इतरांपासून पृथक व स्वसमाजात सामुदायिक असा अहंकार निर्माण होणे हे राष्ट्रसंघटनेस अवश्य असते. तसा तो द्विविध अहंकार निर्माण झाल्यामुळेच ही राष्ट्रे निर्माण झाली. समर्थांना महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण करावयाचे होते. त्यासाठी हा द्विविध अहंकार जागृत करणे अवश्य होते. बहामनी सुलतानांनी चालविलेल्या भयानक अत्याचारांची जाणीव देऊन त्यांनी मराठ्यांना प्रथम आपणां सर्वांचा म्लेंच्छ हा शत्रू आहे, आपण निराळे आहोत आपले देव, धर्म, जीवनतत्त्वे ही निराळी आहेत, हा पृथगहंकार जागृत केला. आणि मग या शत्रूच्या सुलतानी सत्तेचे निर्दाळण करण्यासाठी मराठ्यांनी संघटित झाले पाहिजे हे सांगून सर्व महाराष्ट्राचा सामुदायिक अहंकार दृढबंध केला. समर्थांनी महाराष्ट्रात क्रांती केली ती हीच.
लोकशक्ती
लो. टिळकांनी केसरीच्या पहिल्या अंकापासून सांगावयास प्रारंभ केला होता की लोक म्हणून एक अद्भुत शक्ती आहे. तिला राजे, सरदार, सेनापती भितात. समर्थांना नेमक्या याच शक्तीचे रहस्य कळले होते. म्हणून मठ, मंडळ्या स्थापून तेथे कार्यकुशल महंतांची नेमणूक करून त्यांनी ही शक्ती महाराष्ट्रात निर्माण करण्याचे भगीरथ प्रयत्न केले. यापूर्वी भारतात लोक या शक्तीची आराधना कोणी केली नव्हती. किंबहुना अशी एक अद्भुत नियामक शक्ती आहे हे कोणाच्या येथे गावीही नव्हते. 'मराठा तेवढा मेळवावा' या समर्थांच्या संदेशाचे हे रहस्य आहे.
यापूर्वी भारतात अशा तऱ्हेचा राष्ट्रीय अहंकार निर्मिण्याचा प्रयत्न कोठेच झाला नव्हता. रजपूत तेवढा मेळवावा, कन्नड तेवढा मेळवावा, बंगाली, बिहारी, गुर्जर तेवढा मेळवावा असा मंत्र भारतात कोणी कधी सांगितलाच नव्हता. सिंध, पंजाब, बंगाल, गुजरात येथे अशा मंत्राची, अशा राष्ट्रीय संघटनेची फार जरूर होती. पण लोक ही शक्ती आहे ही जाणीवच तेथे कोणाला झाली नव्हती. समर्थांना महाराष्ट्रात ती झाली. त्यांचे द्रष्टेपण यातच आहे. रवीलाही जे दिसत नव्हते ते त्यांना दिसले.
बहुत जन
महंतांना त्यांनी सारखा एक उपदेश चालविला होता. लोकांना जमवा, त्यांना शिकवून शहाणे करा. त्यांची संघटना करा आणि मग त्यांना राजकारणाला लावा. प्रारंभी राष्ट्र या तत्त्वाचे विवरण केले तेथे हे स्पष्ट केले आहे. देशाच्या उत्कर्षाची जबाबदारी प्रत्येकाच्या, सर्वांच्या, सर्व समाजाच्या शिरावर आहे, अशी जाणीव असलेला समाज म्हणजे राष्ट्र. हे राष्ट्र समर्थांना येथे निर्मावयाचे होते. म्हणून त्यांनी सांगितले की सर्वांना राजकारणाला लावा, राष्ट्रकार्याला लावा. आज आपण ज्यांना बहुजन समाज म्हणतो त्यांनाच समर्थ 'बहुत जन' असे म्हणत. विश्वजन, लोक, अवघे जग हेही शब्द त्यांनी वापरले आहेत. पण बहुजन हाच शब्द त्यांनी प्रामुख्याने वापरला आहे.
'बहुतांचे समाधान राखावे, बहुतांस मानेल ते बोलावे', 'शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे', 'बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे', 'जेणे बहुतांसि घडे भक्ती, ते हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती, घेतले पाहिजे.' अशा या 'बहुतांना सांगाती घ्यावे, मानत मानत शिकवावे', आणि मग त्यांचा समुदाव करावा. हा समुदाव कसा असावा ? 'अनन्य राहे समुदाव, इतर जनांस उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव, उपायाचा.' आपल्या भोवती जमलेले जन एकनिष्ठ राहावे आणि भोवतालच्या इतर जनांनाही त्या समुदायात येण्याची इच्छा व्हावी यासाठी 'संकेते लोक वेधावा.' लोक आल्यावर त्यांची सेवा करावी, त्यांचे सुखदुःख जाणावे, कारण 'जो बहुतांचे सोसीना, त्यास बहुत लोक मिळेना.' लोक महंताची, नेत्याची मनोमन परीक्षा करीत असतात. त्या कसोटीला महंताने, मठाधिपतीने टिकले पाहिजे. 'बहुती शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधले, महत्कृत्या' बहुजन समाज जर आपल्याकडे वळला तर फार मोठे कार्य साधले असे समजावे. म्हणून, 'उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊनि जनास सिकवावे । उदंड समुदाय करावे । परी गुप्तरूपे ॥'
लोक आपल्याकडे वळवावे, त्यांना शिकवावे आणि त्यांचा समुदाय करावा आणि मग - 'लोक समजोनि मग आज्ञा इच्छिती' आज्ञेची वाट पाहतात.
भूमंडळी सत्ता
असा आज्ञापालन करणाऱ्या लोकांचा समुदाय हाताशी असला तर त्याचे फळ काय ? 'जो जगदंतरे मिळाला, तो जगदंतरचि झाला, अरत्री परत्री तयाला, काय उणे ?' मग अशा पुरुषाला या लोकी व परलोकी काही उणे पडणार नाही. जो स्वतःच जगदंतर झाला अशा पुरुषाला 'सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती.' आणि अशा लोकांना तो 'कट्ट घालूनि (संघटित करून) राजकारणा । लोक लावी.' आणि अशा रीतीने समुदाय मोठा झाला की 'लोकी लोभ वाढविले, (शिष्याने शिष्य वाढविले) तेणे अमर्याद झाले, (प्रचंड संघटना झाली) की मग- भूमंडळी सत्ता चाले.'
मग काय उणे ?
लोक संघटित झाले, त्यांचा समुदाव झाला तरच भाग्य येते, ऐश्वर्य लाभते. 'राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे ।', 'जो मानला बहुतासी, कोणी बोलो न सके त्यासी, धगधगीत पुण्यराशी, महापुरुष ।' म्हणून नेत्याने, हे ओळखले पाहिजे की 'जिकडे जग तिकडे जगनायक, कळला पाहिजे विवेक, रात्रंदिवस विवेकी लोक, सांभाळित जाती,' 'जगदांतर निवळत गेले, जगदांतरी सौख्य जाले, मग जाणावे वोळले, विश्वजन,' आणि असे विश्वजन वोळल्यावर, 'जनी जनार्दन वोळला तरी काय उणे तयाला.' (दासबोध दशक १२, समास ९, १२–१०, ११–५, ११–१०, १५–१, १५-२, १९–३, १९-४, १९–७, १२-२) दासबोधाप्रमाणेच स्फुट प्रकरणांतही लोकांना संघटित करून त्यांना राष्ट्रधर्माची दीक्षा देण्याचे, म्हणजे राजकारणाला लावण्याचे महत्त्व समर्थांनी विशद केले आहे.
'सर्वही पेरणे विद्या । लोकांमध्ये हळूहळू । नेणते जाणते करणे । कथा निरुपणे सदा ॥ सर्वासि राखणे राजी । सर्व काळ मृदूत्तरे । येकची जीव सर्वांचा, कट्टबंद टळेचिका॥' (समर्थ ग्रंथभांडार, उत्तरार्ध, पृ. ४०३ )
लोकांना शिकविणे, त्यांना जाणते करणे आणि मग त्यांना एकजीव करून दृढ कट्टबंदात ठेवणे- संघटित ठेवणे- हा समर्थांचा महामंत्र आहे. अशा रीतीने लोक आपल्यामागे आले की 'लोक हे राखता राजी । सर्व राजीच होतसे । अंतरे चुकता तेथे । सर्व भाजीच होतसे ॥ जन हे वोळतु तेथे । अंतरात्माचि वोळला । जन हे खौळले जेथे | अंतरात्माचि खौळला.' अशी मोठी शक्ती निर्माण होते व कार्य साधते (कित्ता, पृ. ३९९).
यासाठी 'समर्थांपासी बहुतजन । राहिला पाहिजे साभिमान । निश्चळ करूनिया मन । लोक असती.' ही विद्या शिवछत्रपतींना अवगत होती. 'बहुत जनांसी संभाळणे, बहुत जनांचे साहणे' हे त्यांना ईश्वराचे देणेच होते. म्हणूनच समर्थ त्यांच्याविषयी म्हणाले —— 'धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । झाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचे ॥' (दास. १८-६)
यावरून महाराष्ट्रधर्मांचे तिसरे लक्षण आपणांस कळून येईल. 'लोकजागृती, लोकसंघटना, बहुतजनांसी संभाळणे !' कारण लोक संघटित झाल्यावाचून बल, सामर्थ्य, शक्ती निर्माण होत नाही. आणि शक्ती नाही म्हणजे सर्व व्यर्थ.
(४) शक्ती
भीष्म, व्यास यांनी तर धर्मापेक्षाही बल श्रेष्ठ असा सिद्धान्त मांडला आहे. समर्थांनीही जवळ जवळ तोच भावार्थ प्रगट केला आहे. तुळजा भवानीच्या एका स्तोत्रात शक्तीविषयीचे आपले सर्व तत्त्वज्ञान त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, प्रपंच हा शक्तीने यशस्वी होतो. राज्ये मिळतात ती शक्तीने मिळतात. 'शक्तीने नेटका प्राणी वैभव भोगता दिसे.' अशक्ताला विचारतो कोण ? 'शक्त तो सर्वही भोगी, शक्तीविणा दरिद्रता ।' शक्तीला युक्तीची जोड पाहिजे हे खरे. पण 'शक्ती नसता विटंबना.'
शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने यत्न होतसे ।
शक्ति युक्ति जये ठायी । तेथे श्रीमंत नांदती ॥
या शक्तीसाठीच दृढ आणि अभेद्य अशी लोकसंघटना असावी लागते. कारण, 'फितव्याने बुडती राज्ये' संघटनेत अनेक लोक चोरटे निघतात, लाचखाऊ असतात. त्यामुळे सेना बेदाद, बेकैदी होते. तेव्हा या लोकांना हाकून द्यावे आणि राजकारणी युक्तीने त्यांचा नाश करावा. सर्व लोकांची नीट परीक्षा करावी, विरोधी, कुटिल, खोचरे अशांना तांदुळातील खड्यासारखे बाजूला काढावे आणि संघटना अभेद्य राखावी. हे साधण्यासाठी युक्ती पाहिजे, राजकारण पाहिजे, पण त्या आधी शक्ती पाहिजे.
युक्तीला पाहिजे शक्ती । तस्मात् शक्ती प्रमाण हे ॥
शक्तीचे महत्त्व आणखी विशद करताना समर्थ म्हणतात,
मुक्त केल्या देव कोटी । सर्वही शक्तीच्या बळे ॥
देवांच्या ठायी अद्भुत दैवी सामर्थ्य असते. पण रावणाने त्यांना बंदीत घातले असता रामाला मानवी बलाचा, लष्करी सामर्थ्याचा, शक्तीचाच उपयोग करावा लागला ! शक्तीचे माहात्म्य असे आहे. महाराष्ट्रधर्म हा भागवतधर्माहून वेगळा झाला तो या शक्तीच्या उपासनेमुळे. डॉ. पेंडसे यांनी म्हटल्याप्रमाणे, भागवतधर्माचे केवळ संरक्षक धोरण होते ते टाकून महाराष्ट्र धर्माने चढाऊ व लढाऊ रूप धारण केले, याचा अर्थ हा आहे. त्याने शक्तीची उपासना घेतली. कारण त्याला म्लेंच्छसंहार करून राज्यस्थापना करावयाची होती प्रपंचात शक्तीचे असे अनन्य महत्त्व असल्यामुळेच समर्थांनी शक्तीच्या उपासनेला आणि त्यासाठीच धनुर्धारी श्रीरामचन्द्राच्या व हनुमंताच्या उपासनेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यांच्या महाराष्ट्रधर्माचे हे चौथे लक्षण होय.
(५) यत्नदेव
प्रयत्नवाद हे त्याचे पाचवे लक्षण होय. 'यत्न तो देव जाणावा', 'यत्नाचा लोक भाग्याचा । यत्नेवीण दरिद्रता', 'करील यत्न जीतुका । तयास लाभ तीतुका ॥' ही समर्थांची वचने प्रसिद्धच आहेत. यांवरून ते पराकाष्ठेचे प्रयत्नवादी होते हे उघडच आहे. पण त्यांच्या या वचनांचा आशय दिसतो त्यापेक्षा फार मोठा आहे. तो आपण नीट समजावून घेतला पाहिजे. प्रयत्नवाद हे समर्थांचे ऐहिक प्रपंचाचे एक व्यापक तत्त्वज्ञान आहे. आणि त्यात सावधपणा, साक्षेप, विवेक, जाणपण, प्रत्यय, प्रचीती, बुद्धियोग एवढ्या गुणांचा समावेश होतो. भागवतधर्मीय संत हे बव्हंशी प्रारब्धवादी होते. त्यांनीही कष्ट, सायास, प्रयत्न यांचा उपदेश केला आहे, नाही असे नाही. पण तो परमार्थ क्षेत्रात. 'असाध्य ते साध्य करिता सायास ।' ही तुकारामाची वाणी सर्वश्रुतच आहे. पण मोक्ष, परमार्थ हेच त्यांचे उद्दिष्ट असल्यामुळे ऐहिक प्रपंच हा बहुधा त्यांनी प्रारब्धावरच सोपविला आहे. वारकरीपंथाची कर्मतत्त्वावर पूर्ण श्रद्धा होती. पण 'कर्मरेखा, कपाळीची रेघ, प्रयत्नाने पुसता येते' असा समर्थाचा सिद्धांत आहे. ते म्हणतात, 'ही गोष्ट वेळोवेळी प्रत्ययास येत असताना तिच्याकडे डोळेझाक काय म्हणून करावी ?' (दास १५-६) आणि ती रेखा पुसण्यासाठीच साक्षेप, विवेक, बुद्धियोग इ. गुणांची आवश्यकता आहे. तेव्हा भागवतधर्मीय प्रयत्नवाद आणि समर्थांचा प्रयत्नवाद यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे. हे ध्यानी घेऊन त्यांची आपण नीट चिकित्सा केली पाहिजे.
केल्यावीण होत नाही
आपली दुःखे, आपले अपयश, आपले दारिद्र्य यांचे खापर दैवावर, प्रारब्धावर फोडावयाचे, आपले अवगुण, आपला आळस, आपला गलथानपणा यांचा क्षणमात्र विचार करावयाचा नाही, या दैववादी लोकांच्या प्रवृत्तीवर समर्थांनी प्रारंभीच कडक टीका केली आहे. (प्रयत्न निरूपण, दासबोध, १२-२) ते म्हणतात, संसारात एक सुखी होतो, एक दुःखी होतो. याचे कारण सांगताना लोक 'प्रारब्धावरी घालिती.' आपल्या हातून अचूक यत्न होत नाही, म्हणून आपल्याला यश येत नाही, आपल्या ठायी अवगुण आहेत, म्हणून 'केले ते सजेना,' हे लोक जाणत नाहीत. 'दुसऱ्यास शब्द ठेवणे, आपला कैपक्ष घेणे, पाहों जाता लौकिक लक्षणे, बहुतेक ऐसी.' आपल्या पराभवासाठी दैवाला, नाही तर दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरण्याचीच बहुतेकांची वृत्ती असते. पण हे सर्व चूक आहे. आपण पुरेसा प्रयत्न करीत नाही, हेच खरे कारण असते. गुण अनेकांच्या ठायी असतात, पण प्रयत्न नसेल तर त्यांचा उपयोग काय ? 'जेवरी चंदन झिजेना । तंवरी सुगंध कळेना.' त्यामुळे इतर वृक्ष व चंदन हे सारखेच ठरतात. म्हणून माणसाने झिजले पाहिजे. 'येत्न सिकवण' या समासात (१३,९) पुन्हा समर्थांनी हाच विचार मांडला आहे. काही माणसांना खायला अन्न नसते, वस्त्र नसते, इष्ट मित्रांचा आधार नसतो. त्यांनी काय करावे ? कसे जगावे ? असा प्रश्न करून त्यांनी स्वतः उत्तर दिले आहे-
लहान थोर काम काही । केल्यावीण होत नाही ।
करंट्या सावध पाही । सदेव होसी ॥
चातुर्य
स्वतःच्या प्रयत्नाने सद्गुण अंगी बाणविणे, अवगुण टाळणे आणि वैभवास चढणे हेच समर्थांच्या मते, चातुर्याचे लक्षण आहे (दास. १४, ६). ते म्हणतात, काळा वर्ण, मुकेपणा, आंधळेपणा, तसेच रूप लावण्य हे आपल्या हाती नाही हे खरे. पण 'अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती ॥ मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण सिकता येते, कारभार करिता उमजते, सकळ काही ॥', 'मान्यता आवडे जीवी, तरी का उपेक्षा करावी ? चातुर्येवीण उंच पदवी, कदापि नाही ॥' म्हणून लोकांनी प्रचंड व्याप उभा करावा, त्यासारखा उद्योग करावा, आणि मग - 'जितुका व्याप तितुके वैभव, हे प्रगटचि आहे.'
निवृत्तिवादी बहुसंख्य माणसे सर्वत्र आळशी, निरुद्योगी असतात. कारण बहुधा निवृत्तिवाद, कर्मवाद व प्रारब्धवाद यांची सांगडच असते. ऐहिक ऐश्वर्याच्या आकांक्षावाचून, लोभ, मोह, वासना यांवाचून, सामान्य जनांना उद्योगाची प्रेरणा मिळत नाही. म्हणून समर्थ सारखे राजवैभव, लक्ष्मी यांच्या आकांक्षा जागृत करतात. 'बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, समस्ती बरे म्हणावे, ऐसी वासना आहे ना तुम्हांला ? मग तन्हे, मने झिजावे.'
अहंकार
कीर्तीविषयीचा समर्थांचा दृष्टिकोन, भागवतधर्मीयांना कधीच मानवणार नाही. कारण कीर्तीमुळे अहंभाव पृष्ट होतो. तो तर परमार्थात सर्वस्वी त्याज्य. पण समर्थांना राजकारणासाठी, राष्ट्रकरणासाठी तो अहंकारच जागा करावयाचा आहे. म्हणून ते सतत सांगतात, 'मरावे परी कीर्तिरूपे उरावे', 'भला रे भला बोलती ते करावे,' 'चंदनासारखे झिजावे आणि भले म्हणोनि घ्यावे', 'लोकी मान्यता पावावे', 'बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे', 'धर्मस्थापनेची कीर्ती संभाळली पाहिजे', 'सामर्थ्ये यशकीर्तीची, प्रतापे सांडिली सिमा' अशी दिगंत कीर्ती व्हावी. आणि अशा कीर्तीसाठीच प्रयत्न पाहिजे ही कीर्ती, हे यश आपोआप मिळत नाही. 'बारा ओव्या शते' असे एक समर्थांचे प्रकरण आहे. त्यातील बाराव्या शतात 'प्रारब्ध-प्रयत्नी प्रयत्न-श्रेष्ठत्व' हाच विषय मांडला आहे. आक्षेप आणि उत्तर अशी त्याची रचना आहे. जे काही घडते ते प्रारब्ध, अदृष्ट, पूर्वदत्त, कर्म, कपाळाची रेखा यामुळे घडते असा पूर्व पक्ष आहे आणि त्याला पुढच्या ओळीत उत्तर आहे. कपाळीच्या रेखेविषयी समर्थ म्हणतात, ही रेखा काढणारा ब्रह्मदेव तरी प्रारंभी कोठे असतो, तो कोठे उभा राहतो ? आणि लिहितो कशाने ? यात काही अर्थ नाही. लोक मूर्खपणाने वागतात आणि मग प्रारब्धावर ढकलतात.
मनाच्या श्लोकांत एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे, 'लोक म्हणतात, माणसाला जन्म देताना ब्रह्मदेव त्याच्या कपाळी लिहितो. पण मग ब्रह्मदेवाच्या कपाळी कोण लिहितो ? संहारकाळी शंकर सर्व जाळतो म्हणता, पण मग शेवटी शंकराला कोण जाळतो ?' (१७५).
साक्षेप
यत्न, प्रयत्न, कष्ट यांच्या जोडीला अखंड सावधपण, साक्षेप, बुद्धियोग, जाणपण यांचीही समर्थांच्या धर्मात तितकीच आवश्यकता आहे. कारण, देशकालवर्तमान पाहून, समाजाचा ऐहिक उत्कर्ष डोळ्यांपुढे ठेवूनच धर्मनियम ठरवावयाचे असतात, हा श्रीकृष्ण, वेदव्यास यांचा सिद्धान्त समर्थांना पूर्णपणे मान्य होता. धर्मामुळे भूतांचा प्रभव- उत्कर्ष होतो, धर्मामुळे अर्थ आणि काम प्राप्त होतात, म्हणून धर्म आचरावा, असे व्यासमुनी सांगतात. समर्थांनी महाराष्ट्रधर्म याच पायावर उभारला असल्यामुळेच, त्यांनी सावधपण, साक्षेप यांवर सतत भर दिला आहे. दासबोधाच्या आरंभीच, या ग्रंथाच्या श्रवणाचे फल काय ते सांगताना, त्यांनी म्हटले आहे की याच्या श्रवणाने धूर्त, तार्किक, विचक्षण लोक समयो जाणती आणि आळशी तेचि साक्षेपी होती. मोक्ष, वैराग्य यांच्या लाभाबरोबरच या लाभाचा समर्थ उल्लेख करतात, यावरून त्याचे त्यांना तितकेच महत्त्व वाटत होते हे उघड आहे. हरिकथा- निरुपण आणि राजकारण यांच्याबरोबरच त्यांनी सावधपण आणि साक्षेप यांचे महत्त्व सांगितले आहे.
राजकारण हे ऐहिक ऐश्वर्याचे साधन आहे. त्यासाठी देशकालवर्तमानाचे अचूक ज्ञान असले पाहिजे. त्यासाठीच सावधता व साक्षेप यांची आवश्यकता आहे. कारण प्रयत्न, उत्तम गुण, विद्या हे सर्व साक्षेपावाचून व्यर्थ ठरते. समर्थ म्हणतात, 'विद्या उदंड सिकला ।प्रसंगमान चुकतचि गेला । तरी मग तये विद्येला । कोण पुसे ?'
चुकणे दैत्य
साक्षेप, सावधपण यांना रामदास धर्मच मानतात. त्यांनी, 'मूर्खा ऐसा पातकी कोणीच नाही,' असे म्हटले आहे. साधारणपणे, असत्य, हिंसा, चोरी, व्यभिचार यांना पातक मानतात. पण समर्थांनी ढिलेपणा, गलथानपणा यांनाही पातक मानले आहे. यावरून त्यांचा दृष्टिकोण स्पष्ट होतो. 'वन्ही तो चेतवावा रे' या त्यांच्या कवनात त्यांनी निक्षून सांगितले आहे 'अचूक यत्न तो देवो । चुकणे दैत्य जाणिजे । सावधू दव जाणावा । उन्मत्तु दैत्य बोलिजे ॥ साक्षपी वंश देवाचे । आळशी वंश दानवी ॥' हा विचार मराठीत अगदी अपूर्व असा आहे. कामात चूक करणे, बेसावध राहणे, आळस करणे हे दैत्य गुण आहेत असे पूर्वी कोणीही म्हटलेले नाही. भक्तिमार्गात भोळा भाव, भाबडी भक्ती, अज्ञान, निरागस बालभाव, याचाच उदो उदो केला जातो. पण व्यवहारात यांच्यामुळे अनर्थ होतो. अल्लाउद्दिन देवगिरीवर चाल करून आला, त्या वेळी रामदेवराव साक्षेपी असता, सावध असता, देशकालवर्तमान त्याने जाणले असते. प्रसंगमान तो चुकला नसता, तर यादवांचे राज्य बुडाले नसते. आणि ही फक्त यादवांचीच गोष्ट होती असे नाही. अकराव्या शतकापासून उत्तर दक्षिण सर्व हिंदुस्थानचीच ही गोष्ट आहे. येथे सर्व राजे आणि त्यांचे गुरू ब्राह्मण हे सर्व समर्थांच्या भाषेत दैत्यच झाले होते. हे जाणूनच समर्थांनी घोष चालविला होता. 'खबर्दार बरा राजा । विवेकी सर्वसाक्षपी', असावा. 'मोठे ते पाप लोकांचे । प्रभू तो जाणता नव्हे ॥'
,दासबोधात एक उत्तम दृष्टान्त देऊन समर्थांनी सावधपणाचे महत्त्व विशद केले आहे. झाडावरच्या पानावर आळी असते. ती पुढच्या पानावर जाताना, ती जागा सुरक्षित आहे ना हे पाहून मगच पाय उचलते. याप्रमाणे सामान्य 'जीवसृष्टी विवेके चाले' जीवजंतूसुद्धा परिस्थिती पाहतात, देशकालवर्तमान जाणून वागतात. पण मनुष्य ? हा मराठा? 'पुरुष होऊनी भ्रमले, या काय म्हणावे ?'
देशकाल - अभ्यास
आठव्या शतकाच्या अखेरीपर्यंत देशकाल वर्तमान पाहून धर्मशास्त्र रचले जात असे. पुढे शंकराचार्यांची निवृत्ती, मीमांसकांचा अदृष्टफलधर्म आणि भागवतातील भोळी भक्ती यांमुळे हिंदूंचा धर्म परिस्थितिनिरपेक्ष झाला. या आंधळ्या धर्माला कर्नाटकात विद्यारण्यांनी चौदाव्या शतकात काहीसा आळा घातला आणि महाराष्ट्रात सत राव्या शतकात समर्थांनी. हिंदूंचा अकराव्या शतकापासून जो अधःपात झाला तो त्या आंधळ्या धर्मामुळेच झाला. समर्थांनी हेच सांगितले आहे. जीवजंतू जितका देशकाल पाहतात, तितकासुद्धा माणसाने पाहू नये, याचा अर्थ काय ? सुखी कोण होतो ? जो खबरदार आहे तो, आणि दुःखी कोण होतो ? जो बेखबर आहे तो. 'चाळणेचा आळस केला तरी अवचित पडेल घाला, ते वेळे सावरायाला अवकाश कैचा.' ही अखंड चाळणा करणे भारतातील शास्त्रीपंडित व राजे यांनी सोडून दिले होते. परदेशगमन बंद, म्हणून तेथली वार्ता नाही. मुस्लिम आक्रमणाला तोंड देण्याची मुळीच तयारी नाही. त्याविषयीची अगाऊ वार्ता नाही, आक्रमकांच्या शस्त्रास्त्रांची, संघटना- शक्तीची, धार्मिक आकांक्षांची कल्पनाही येथल्या नेत्यांना नव्हती. सर्वनाश झाला तो त्यामुळे 'म्हणोनि सावधपणे । प्रपंच परमार्थ करणे । ऐसे न करता भोगणे । नाना दुःखे ॥ जो सर्व सावधान । धन्य तयाचे महिमान । जनी राखे समाधान । तोचि येक ॥' (दासबोध, १२-१).
बुद्धियोग
एक कवनात समर्थांनी बुद्धियोगाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचा भावार्थ हाच आहे. 'इहलोकी परलोकी, बुद्धियोगचि पाहिजे ॥' या बुद्धियोगाचा भावार्थ काय ? 'तार्किक असावा प्राणी, सावधान चहूकडे । हिंडता शहाणे होते, घरीच बैसता खोटे । हिंडता पारखी लोका, कार्यकर्ता जिवी धरी ॥' प्रसंगी वर्तता आले पाहिजे, यथातथ्य सुचले पाहिजे. आपला शत्रू कोण, मित्र कोण समजले पाहिजे. 'विचार जाणतो मोठा, दक्ष तो जाणता जनी । येके स्थळी स्थिरावेना, नित्यनूतन साजिरा । कीर्ती ते दिगंती धावे, नेमस्त राहता जनी ॥' (समर्थ ग्रंथभांडार, उत्तरार्ध, पृ. ३९०) या विभागातील स्फुट प्रकरणांत समर्थानी सारखा साक्षेप, सावधपण, जाणपण, बुद्धी यांचा घोष चालविलेला दिसतो. जाणता कोण ? चुकेना, ठकेना कामी. जो चुकत नाही आणि जो फसत नाही तो जाणता. अकराव्या शतकापासून फसणे हाच भारताचा इतिहास आहे. 'प्रपंच नेणता वेडा । जाणता देव बोलिजे ॥ जाणता लोक भाग्याचा, नेणता दरिद्री सदा ॥' कित्येक भाग्यशाली लोक पुढे करंटे होतात. याचे कारण काय ? 'बुद्धीचा भ्रंश होताहे । यालागी भाग्य जातसे ॥ करील व्याप तो भला । बहुत भाग्य लाधला । नसेल व्याप तो हळु । पडेल रे पळे पळू ॥ अखंड सावधानता । सभाग्य तो, नव्हे रिता । सखोल धारणा करी । उदंड चाळणा करी ॥'
समर्थांच्या या प्रतिपादनाचा भावार्थ सप्तसमासीतील पुढील दोन ओव्यांत सामावला आहे.
गयाळीपणे मूर्खपणे । संसारात दिसे उणे । विवेक जने या कारणे । आपुले स्वहित करावे ॥ इहलोकी संसार करावा । नाना यत्ने आटोपावा । लोकांमध्ये मिरवावा । पुरुषार्थ आपुला ॥
प्रचीती
समर्थांचा प्रचीतिवाद हा त्यांच्या बुद्धियोगाचाच एक भाग आहे. अलीकडे ज्याला आपण इहवाद म्हणतो त्यासारखाच हा प्रचीतिवाद आहे. बुद्धी, इतिहास, तर्क, अनुभव यांच्या आधारे प्रत्येक गोष्ट तपासून मगच तिचा स्वीकार किंवा त्याग करावयाचा, अंधश्रद्धेने, भोळ्या श्रद्धेने काहीही स्वीकारावयाचे नाही, हा इहवादाचा गाभा आहे. समर्थांच्या प्रचीतिवादाचा आशय तोच आहे. ते म्हणतात, 'ऐका प्रचीतीची लक्षणे, प्रचीत पाहतील ते शहाणे, येर वेडे दैन्यवाणे, प्रचीतीवीण ॥' असे प्रस्तावनेत सांगून पुढे रत्ने तपासून घ्यावी, सोने तपासून घ्यावे, घोडे, शस्त्रास्त्रे तपासून घ्यावी, कोणत्याही धान्याचे बी प्रथम पेरून पाहून उगवेलसे दिसले तरच घ्यावे, औषधही बरेवाईट अनुभवाने ठरवावे, असा प्रचीतीचा व्याप सांगितला आहे. आणि मग, 'शोधून पाहिल्यावीण, काहीतरी येक कारण, होणार नाही उलट निर्वाण, प्राणासि घडे ॥' प्राण मात्र जातील, असे बजावले आहे (दास, १०-८).
बुद्धिवाद
हे नित्याच्या व्यवहाराविषयी झाले. पण धर्माच्या, परलोकाच्या क्षेत्रातही त्यांनी असाच कठोर बुद्धिवाद आणि प्रचीतिवाद सांगितला आहे. श्राद्धपक्ष, स्वप्नातील दृष्टांत, पुढील जन्मावरील भरवसा हे सर्व भ्रामक आहे, असे ते म्हणतात. 'आता जे जे देइजेते । ते ते पुढे पाविजेते । मेले माणूस भोजना येते । या नाव भ्रम ॥ ये जन्मीचे पुढीलिये जन्मी । काही एक पावेन मी । प्रीति गुंतली मनुष्याचिये नामी । या नाव भ्रम ॥ मेले मनुष्य स्वप्ना आले । तेणे काही मागितले । मनी अखंड बैसले । या नाव भ्रम ॥ देहाभिमान, कर्माभिमान । जात्याभिमान, कुळाभिमान । ज्ञानाभिमान, कुळाभिमान । या नाव भ्रम ॥ ब्रह्मा लिहितो अदृष्टी । आणि वाचून जाते सटी (सटवी) | ऐसा प्रकारीच्या गोष्टी । या नाव भ्रम ॥' (दास, १०-६)
याप्रमाणे भ्रमांचा तपशील देऊन समर्थ शेवटी म्हणतात, उदंड भ्रम विस्तारला, अज्ञान जनी पैसावला । अल्पसंकेते बोलिला, कळावया कारणे ॥ सर्व लोक अज्ञानात, भ्रमात बुडून गेले आहेत. असे भ्रम अनेक आहेत. येथे मी थोडक्यात सर्व सांगितले आहे. नवव्या दशकाच्या पाचव्या समासात तर जे पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांतही प्रचीतीवाचून मानू नये असे त्यांनी सांगितले आहे. कारण 'प्रचीतीवीण जे बोलणे ते अवघेचि कंटाळवाणे । तोंड पसरूनि जैसे सुणे रडोनि गेले ॥ अवघेचि आंधळे मिळाले तेथे डोळसाचे काय चाले । अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार ॥'
मनसिक क्रांती
समर्थांना राष्ट्रनिष्ठेच्या प्रसारासाठी या भ्रांत परलोकनिष्ठ, आंधळ्या, अज्ञ समाजात फार मोठे मानसिक परिवर्तन, फार मोठी क्रांती घडवावयाची होती. म्हणून ही बुद्धियोगाची, इहवादाची, व्यवहारवादाची, वास्तववादाची शिकवण ते सारखे देत होते. समर्थांनी राजधर्म, क्षात्रधर्म, ब्राह्मणधर्म, सेवकधर्म, असे धर्म भिन्नभिन्नपणे सांगितले आहेत. त्यांचे विवेचन पुढे येईलच. पण हा बुद्धियोगाचा प्रयत्नवादाचा, वास्तववादी, इहवादी धर्म त्यांनी सर्व लोकांना सांगितला आहे. वरील पद्धतीने याला आपण 'लोकधर्म' म्हणू. महाराष्ट्रधर्माचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण, त्यांनीच म्हटल्याप्रमाणे हे सर्व अवघे आंधळे लोक डोळस झाल्यावाचून राजे, सरदार, ब्राह्मण हे काही करू शकले नसते.
लोक धूर्त व्हावे, तार्किक, दक्ष, सावध, विवेकी व्हावे, त्यांचा भोळसटपणा, अंधश्रद्धा, भाबडेपणा समूळ निपटून निघावा असे समर्थांचे प्रयत्न होते. म्हणून त्या मागल्या काळात, कुटुंबात खालच्या मानेने वडिलांचा अधिकार मानला जात असे त्या काळात, त्यांनी स्पष्टपणे परखडपणे लोकांना बजावले की माणूस लहान किंवा थोर हा बुद्धीमुळे, विवेकामुळे होतो, वयामुळे नाही. वृद्ध लोक हे आधी उपजले म्हणून त्यांना वडील म्हणतात. 'गुणेवीण वडीलपण । हे तो अवघेचि अप्रमाण ॥ वये धाकुटा नृपती । वृद्ध तयास नमस्कार करिती ॥' तेव्हा हे सर्व विवेकावर, बुद्धीवर, कर्तृत्वावर अबलंबून आहे. मनूसारखे चक्रवर्ती राजे झाले. त्यांना अवतार म्हणतात. पण त्यांचेही मोठेपण विवेकामुळे त्यांना लाभलेले होते. 'या कारणे कोणीयेके । शहाणपण सिकावे विवेके । विवेक न सिकता तुके । तुटोनि जाते ॥'
हा शहाणपणा कशाने येतो ? 'व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती । तेणे प्राणी सदेव (भाग्यवान) होती । देखत देखता ॥' (दास. १५-३) ज्याचा ज्याचा जो व्यापार । तेथे असावे खबर्दार । दुश्चितपणे (व्यापार केला) तरी पोर | वेढा ढावी (फसविते) ॥' प्रत्येकाला आपल्या प्रपंच व्यवसायाचे उत्तम ज्ञान असले पाहिजे. यासाठी रोज भोजन झाल्यावर माणसाने, 'येकांती जाऊन विवरावे । नाना ग्रंथ ॥ तरीच प्राणी शहाणा होतो । नाही तरी मूर्खचि राहतो । लोक खाती (वैभव भोगतात) आपण पहातो । दैन्यवाणा ॥'
भारतात हेच झाले. मुस्लिम आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. त्यांनी येथले सर्व वैभव भोगावयाचे आणि आपण ते दीनपणे पाहावयाचे !
हे दैन्य, दारिद्र्य नष्ट व्हावे, हिंदुस्थान बळावून येथे लोकांना राज्यवैभवाची, समृद्धीची, लक्ष्मीची, यशाची पुन्हा प्राप्ती व्हावी यासाठीच समर्थांनी महाराष्ट्रधर्म सांगितला. त्याची अनेक लक्षणे येथवर सांगितली. आता 'स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद' हे जे सर्वात महत्त्वाचे लक्षण, त्याचे वर्णन करून समर्थांच्या कार्याचे विवेचन पूर्ण करावयाचे आहे. पुढील लेखाचा तोच विषय आहे.