महाराष्ट्र संस्कृती/विद्या आणि संशोधन



३९.
विद्या आणि संशोधन
 


भौतिक विद्या
 विद्या याचा अर्थ येथे भौतिक विद्या, पाश्चात्य विद्या असा आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी इ. भाषा, रसायन, पदार्थ विज्ञान, जीवशास्त्र, स्थापत्य, वैद्यक, गणित, अर्थशास्त्र, इ. शास्त्रे, इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान, राजकारण इ. विषय त्यात येतात. आतापर्यंत या विद्येची महती अनेक ठिकाणी वर्णिली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून टिळक, नेहरू यांच्यापर्यंत सर्व नेते व कर्ते पुरुष या विद्येचे उपासक होते. हिच्या अभ्यासानेच, प्रसारानेच, हिंदी जनता कर्तबगार होईल, स्वयंशासनास समर्थ होईल, असा इंग्रजांप्रमाणेच त्यांचाही विश्वास होता. त्यामुळे ती विद्या येथे प्रसृत करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. महाराष्ट्रात या विद्येचा प्रसार कसा झाला ते आता पाहावयाचे आहे.

मिशनरी - कार्य
 महाराष्ट्रात व अन्यत्रही प्रथम मिशनऱ्यांनी या विद्येचा प्रसार केला. धर्मप्रसार हा त्यांचा हेतू होता. पण त्यासाठी का होईना, त्यांनी शाळा स्थापन केल्या व पाठ्यपुस्तके तयार केली. नंतर येथे 'बाँबे नेटिव एज्युकेशन सोसायटी' स्थापन झाली. एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेज तिनेच स्थापन केले. ठाणे, पनवेल येथेही तिने इंग्रजी हायस्कुले काढली. इतर जिल्ह्यात तिने प्राथमिक शाळा काढल्या आणि मुंबईला स्थापत्य व वैद्यक यांच्या शाळाही स्थापन केल्या. पुण्याला १८२१ साली 'संस्कृत कॉलेज' सरकारने स्थापन केले. आरंभी हे संस्कृत विद्याच फक्त शिकवीत असे. पण पुढे त्याचे रूपांतर होऊन त्याला 'डेक्कन कॉलेज' असे अभिधान आणि संपूर्णपणे पाश्चात्य स्वरूप प्राप्त झाले.

बोर्ड
 १८४० साली मुंबईला बोर्ड ऑफ एज्युकेशन ही संस्था स्थापन झाली. तिने सर्वत्र शाळा स्थापण्याचे व मान्यतेचे नियम केले. इयत्तावार अभ्यासक्रम तयार केला. विविध विषयांवर मराठी पुस्तके तयार केली. कॅप्टन कँडी व जगन्नाथ शंकरशेट यांनी या बाबतीत बहुमोल कार्य केले. पुढे अनेक जिल्ह्यांत बोर्डाने शाळा काढल्या व मुमारे ३००० विद्यार्थ्यांची सोय केली. याच शाळांतून बाळशास्त्री, दादोबा पांडुरंग यांनी महत्त्वाची कामगिरी केली. बाळशास्त्री हे शिक्षणशास्त्रज्ञच होते. १८४५ साली सरकारी ट्रेनिंग कॉलेज निघाले. तिचे तेच प्रमुख होते. लोकहितवादी, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी याच शाळांतून कार्य केले.

महात्मा फुले
 महात्मा फुले यांची कामगिरी विशेष महत्त्वाची आहे. १८५१ साली त्यांनी मुलींसाठी शाळा काढली आणि अस्पृश्यांसाठी शाळा उघडली. या दोन क्षेत्रांत कार्यारंभ करणारे फुले हेच पहिले महाराष्ट्रीय होत.

डेक्कन कॉलेज
 १८५५ साली शिक्षणखात्याची स्थापना झाली व १८५७ साली मुंईला विद्यापीठाची स्थापना झाली व उच्च शिक्षणाची नीट व्यवस्था लागली. १८६३ साली डेक्कन कॉलेजचे दोन विभाग करण्यात आले. इंग्रजीत शिक्षण देणाऱ्या विभागाचे नाव 'डेक्कन कॉलेज' असेच राहून ते गावाबाहेर नेण्यात आले. दुसरा विभाग म्हणजे 'व्हर्नाक्युलर कॉलेज.' तेथे सर्व विषयांचे अध्यापन मराठीतून चालत असे. डॉ. भांडारकर, केरोनाना छत्रे, कृष्णशास्त्री इ. नामवंत प्राध्यापक येथे शिकवीत असत. पण दुर्दैवाने हे कॉलेज एका वर्षातच बंद करावे लागले. कारण विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजीतून शिक्षण देणाऱ्या डेक्कन कॉलेजकडेच होता. व्हर्नाक्युलर कॉलेजला विद्यार्थीच मिळेनात. मग त्याचे रूपांतर 'ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन' या संस्थेत १८६५ साली करण्यात आले.

राष्ट्रीय शिक्षण
 १८८० साली पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापना झाली व राष्ट्रीय शिक्षणास महाराष्ट्रात प्रारंभ झाला. या शाळेला सरकारी मंजुरी घेणे भागच होते. पण विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक असे राष्ट्रपुरुष येथे शिकवीत असत; त्यामुळे येथल्या शिक्षणाला निराळेच तेज चढत असे. पुढे पुण्यात प्रथम फर्ग्युसन कॉलेज व नंतर काही वर्षानी स. प. कॉलेज स्थापन झाले. तेव्हा डेक्कन कॉलेज १९३३ साली बंद करण्यात येऊन त्याचे संशोधन संस्थेत रूपांतर करण्यात आले. राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रयत्नात तळेगाव येथे विजापूरकरांनी राष्ट्रीय शाळेची स्थापना केली. पण सरकारच्या इतरजीमुळे ती लवकरच बंद पडली. पुढे १९२०-२१ च्या चळवळीत टिळक विद्यापीठाची स्थापना झाली. पण हेही फार दिवस चालले नाही. विद्यार्थ्यांचा ओढा फर्ग्युसन, स. प. यांकडेच जास्त होता.

कर्मवीर
 १९३७ साली मुंबईला काँग्रेस मंत्रिमंडळ आले. त्याने शिक्षणाची बरीच पुनर्रचना केली. वर्धा शिक्षणयोजनेप्रमाणे काही ठिकाणी मूलोद्योग- शिक्षण प्राथमिक शाळांत सुरू केले आणि प्रांतातील सात माध्यमिक शाळांत तांत्रिक शिक्षण सुरू केले व त्यात शेतकी, व्यापार, सुतारी इ. उद्योगाचे प्रत्यक्ष शिक्षण देण्यास प्रारंभ केला. याच काळात सातारा जिल्ह्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 'रयत शिक्षण संस्था' स्थापन केली व विद्यार्थ्यांना स्वावलंबी करून शिक्षण देण्याकरिता अनेक प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व अध्यापन शाळा स्थापन केल्या. या संस्थेचा पुढे खूपच विकास झाला. 'रयत शिक्षण संस्थे'ने या क्षेत्रात खूपच मोठे कार्य केले आहे.
 पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार याप्रमाणे सर्व देशांत झाला. आता तर तालुक्या- तालुक्याला माध्यमिक शाळा व महाविद्यालयेही निघाली आहेत.

स्त्रीशिक्षण
 स्त्रीशिक्षणाचाही प्रसार, पुरुष शिक्षणाच्या मानाने कमी असला तरी महाराष्ट्रात पुष्कळच झाला आहे. 'नाथीबाई दामोदर ठाकरसी' महाविद्यालयासारखी स्त्रियांची विद्यायलयेही निघाली आहेत. मोठमोठ्या शहरात मुलींच्या स्वतंत्र शाळा आहेत. पण महाविद्यालयांतून व विद्यापीठांतून एकत्रच शिक्षण दिले जाते. काही विद्यालयांत साहित्यशाखेकडे मुलींचाच भरणा जास्त असल्याचे दिसून येते. यांतून उच्चपदी गेलेल्या अनेक स्त्रिया दिसतात. शाळा, महाविद्यालये यांत, वैद्यकी व्यवसायात व इतर व्यवसायांतही अनेक महिला काम करताना दिसतात. महात्मा गांधींनी सत्याग्रह चळवळीत स्त्रियांना सामील होण्याचे आवाहन केले. त्यामुळे स्त्रीसमाजात फार मोठी क्रांती झाली. अनेक स्त्रिया राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्या. आणि स्त्रीचे समाजातील स्थान एकदम उंचावले. आता बहुतेक सर्व प्रांतात मंत्रिपदी स्त्रिया असलेल्या दिसतात व काही प्रांतात मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. तरीही अजून सर्वत्र स्त्रीपुरुष समता प्रस्थापित झाली आहे असे दिसत नाही. खेड्यापाड्यांतून तर नाहीच, पण शहरांतून उच्च विद्याविभूषित घरांतूनही नाही. यांतून कुटुंबसंस्थेचा व मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होतो. पण स्त्रीशिक्षणाबरोबर हे प्रश्न येणे अपरिहार्यच आहे.

महाराष्ट्र - मागासलेला
 या पाश्चात्य शिक्षणाने पाश्चात्य विद्येचा सर्वत्र प्रसार झाला व देशाचा कायापालट होऊन त्याचे रूप सर्वस्वी पालटले हे खरे. पण महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहता ही समाधानकारक प्रगती आहे असे दिसत नाही. आय. ए. एस. परीक्षांचाच विचार पाहा. त्यात मराठी विद्यार्थी अत्यल्प असतात. त्यामुळे उच्च प्रतीची अधिकारपदे महाराष्ट्रीयांना फारशी मिळत नाहीत. ऑडिट, रेल्वे, पोस्ट, टेलिग्राफ, इ. खात्यांत महराष्ट्रीयांची नावे अगदीच तुरळक दिसतात. बौद्धिक चढाओढीत इतर प्रांतीयांशी तुलना होते, तेव्हा महाराष्ट्रीय अगदी मागे पडलेले दिसतात. महाराष्ट्रीय उद्योगपतींचा अनुभवही अगदी खेदजनकच आहे. प्रयत्न करूनही त्यांना पुरेसे कर्तबगार महाराष्ट्रीय मिळत नाहीत. मोठमोठाल्या युरोपीय कंपन्या, बँका, कारखाने येथे महाराष्ट्रीयेतरांचा भरणा खूप असतो.
 याचे, इंग्रजीविषयीची अनास्था, हे एक कारण फार मोठे आहे. अजून मोठमोठ्या कंपन्यांचे व्यवहार व सरकारी व्यवहारही इंग्रजीतूनच चालतात. पण महाराष्ट्रात खेर मंत्रिमंडळाने व जनतेने इंग्रजीला हद्दपार करण्याचा चंग बांधला. त्याची ही फळे आहेत. इंग्रजी भाषा व्यवहाराला तर उपयोगी आहेच, पण उत्तम इंग्रजी जाणणाऱ्याच्या वाचनात जे बहुमोल ग्रंथ येतात, ते न जाणणाऱ्यांच्या येत नाहीत. त्यामुळे एकंदर पाश्चात्य विद्येतच महाराष्ट्रीय मागे राहतो.
 पण एकंदरीने पाहता पाश्चात्य विद्येमुळे प्रारंभी जे संस्कार होत असत ते आता होत नाहीत. विद्यार्थिवर्गात शिक्षणाविषयी हवी ती आस्था नाही आणि शिक्षकवर्गही हव्या तशा उंचीचा मिळत नाही. त्यामुळे कर्तबगार पुरुष जे सर्व समाजातून निर्माण व्हावयास हवे तसे होत नाहीत. राष्ट्राचा उत्कर्ष होण्यास कर्तबगार पुरुषांची किमान संख्या आवश्यक असते. तितकेही महाराष्ट्रात होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र हा मागासलेलाच राहिला आहे.
 पाश्चात्य विद्येचा महाराष्ट्रात प्रसार कसा झाला याचा येथवर विचार केला. आता संशोधनाचा विचार करावयाचा. सृष्टिविज्ञान, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, पुराणवस्तू, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांत गेली शंभर-दीडशे वर्षे महाराष्ट्रात संशोधन चालू आहे. त्या सर्वाचा त्रोटक परिचय आपल्याला करून घ्यावयाचा आहे.

हेतुपूर्वक संशोधन
 हेतुपूर्वक, काही उद्दिष्ट ठेवून, संशोधन करणे हे प्राचीन काळी गणित, ज्योतिष आणि वैद्यक या विषयांतच होत असे. बाकीच्या विषयांत अनुभवातून मिळालेले ज्ञान एवढीच सामग्री होती. भारतात नानाविध उद्योग चालत. त्यासाठी रसायन, पदार्थ- विज्ञान, पाणी, वायू यांच्या गती इ. विषयांचे अवश्य ते ज्ञान येथे त्या त्या लोकांना असलेच पाहिजे, हे मागे सांगितलेले आहेच. येथे विद्यापीठे होती. त्यांत रसायन, पदार्थविज्ञान यांचे संशोधन किती होत असे हे समजण्यास मार्ग नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की अभ्यासपूर्वक व हेतुतः संशोधन करणे ही अलीकडची पाश्चात्य देशातील विद्या आहे. भारतात तिची प्रगती मुळीच झालेली नव्हती. मध्ययुगातली येथली परिस्थिती हे कोणी कारण म्हणून सांगतात. पण ते तितकेसे खरे नाही. कारण युरोपात हीच स्थिती होती. नवे सिद्धान्त सांगणाऱ्यांना पोप तर देहान्त प्रायश्चित देत असे. आणि अराजक तर सर्वत्रच होते. तरी प्राणपणाने तेथील शास्त्रज्ञ विद्येची उपासना करीत असत. तशा तऱ्हेची वृत्तीच या देशात कधी नव्हती. आणि इ. सनाच्या आठव्या दहाव्या शतकानंतर मागे सांगितल्याप्रमाणे येथे निवृत्ती, मायावाद, परलोकनिष्ठा, शब्दप्रामाण्य, कलियुगकल्पना यांचा जोर झाल्यामुळे भारतीयांच्या अंगचे विद्याभिलाष, ईर्षा, आकांक्षा, विजिगीषू वृत्ती हे गुण अजिबातच लोपले. आणि आजही एकंदर समाजात या वैफल्याचाच प्रभाव दृष्टीस पडतो. अशा स्थितीत येथे जे संशोधन झाले ते पाश्चात्यांच्या संपर्काने व त्यांच्या अनुकरणानेच झाले यात शंका नाही.
 या संशोधनातील सृष्टिविज्ञानातील संशोधनाचा प्रथम विचार करू.
 या क्षेत्रात मुंबईचे अरदेशीर करसेटजी यांचा सर्व प्रथम उल्लेख केला पाहिजे. (१८४१). यांत्रिक व नौकानयनातील सुधारणांसाठी व वैज्ञानिक कौशल्यासाठी त्यांना इंग्लंडच्या रॉयल सोसायटीच्या फेलोशिपचा मान मिळाला. हा मान मिळविणारे करसेटजी हे भारतातलेच नव्हे, तर सर्व पौर्वात्य देशांतील पहिलेच शास्त्रज्ञ होत.

सृष्टिविज्ञान
 सृष्टिविज्ञानात संशोधन करून ज्यांनी जगाच्या शास्त्रीय ज्ञानात भर घातली अशा संशोधकांच्या नावांची विषयवार यादी मो. वा. चिपळूणकर यांनी दिली आहे. (महाराष्ट्र जीवन, खंड २ रा, पृ. ११४) त्यांतील काही नावे विषयवारीने येथे देतो.
 गणित व ज्योतिषशास्त्र- लो. टिळक, केरूनाना छत्रे, शं. बा. दीक्षित, व्यं. बा. केतकर, ग. स. महाजनी, वि. वा. नारळीकर, डी. डी. कोसांबी, पां. वा. सुखात्मे, व. शं. हुजूरबाजार, एस. एस. शिश्वेश्वरकर, इत्यादी.
 पदार्थविज्ञान- शं. ल. गोखले, एन. आर. तावडे, गो. रा. परांजपे, के. आर. दीक्षित, एच. जे. अर्णीकर, जी. एस गोखले, मो. वा. चिपळूणकर, आर. के. असुंडी, वि. वि. सोहनी, व्ही. एम. घाटगे, एस. एल. चोरघडे, व्ही. जी. भिडे, पी. बी. देव, बी. बी, देशपांडे, चंद्रशेखर अय्या, जे. डी. रानडे, एम. बी. नेवगी, पी. के. कट्टी, वाय. जी. नायक, इ.

 रसायनशास्त्र- जतकर कुळकर्णी, डी. एस. व्हीलर, जी. एस. देशमुख, डी. डी. सोळंखी, द. वा. लिमये, श्री. द. लिमये, व्ही. व्ही. असोलकर, आर. सी. शहा, आर. डी. देसाई, के. वेंकटरामन, जी. व्ही. जाधव, जी. बी. कोल्हटकर, पी. एम. बर्वे, एन. एन. गोडबोले, बी. डी. टिळक, जे. जी. काणे, डी. व्ही. ताह्मणे, के. ए. ठकार, सी. आर. तळपदे, जी. एम. नायर, इ.

 वनस्पतिशास्त्र- शं. पु. आघारकर, शं. ल. आजरेकर, एस. बी. काजळे, आर. एस. इनामदार, टी. जी. येवलेकर, बी. एन. मुळे, इ.

 प्राणिशास्त्र- द. ल. दीक्षित, टी. जी. येवलेकर, पी. आर. आवटी, कृ. र. करंदीकर, डी. व्ही. बाळ, सी. व्ही. कुळकर्णी, जी. डी. भालेराव, एन. बी. इनामदार, इ

 वैद्यक व जीवन रसायन- रणछोडदास कीर्तीकर, गज्जर, वा. रा. कोकटनूर, व्ही. आर. खानोलकर, आर. सी. चित्रे, एन. व्ही. जोशी, जी. एस. पेंडसे, इ.

 भूगर्भशास्त्र- के. पी. रोडे, क. वा. केळकर, बी. जी. देशपांडे इ.

 कृषिशास्त्र- द. ल. सहस्रबुद्धे, एस. जी. कानिटकर, पां. स. खानखोजे, एच. मॅन, जी. एस. चीमा, उ. के. कानिटकर, इ.

 स्थापत्य- निळकंठराव चावरे, जी. डी. जोगळेकर, न. स. जोशी, श्री. भि. घोटणकर.
 ही नुमती नावांची यादी दिली आहे. तीवरून फारसा काही बोध होण्याजोगा नाही. त्यांच्या कार्याचे सविस्तर वर्णन उपलब्ध झाले असते तर बरे झाले असते. पण तसे नाही. तेव्हा यातून ज्याची नावे विशेष गाजली त्यांची थोडी सविस्तरे माहिती, 'शास्त्रज्ञांचा चारत्र कोश' या डॉ. प्र. न. जोशी यांच्या ग्रंथातून, पुढे देत आहे.
 यांतले पहिले मोठे शास्त्रज्ञ अर्थातच होमी जहांगीर भाभा हे होत. शक्तिपुंजवाद (क्वांटम थिअरी), परमाणूचा सिद्धान्त, कॉस्मिक रेडिएशन हे त्यांचे संशोधनाचे विषय होते. लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते सभासद होते. भारताच्या ॲटॉमिक एनर्जी संस्थेचे ते वीस वर्षे प्रमुख होते. १९५५ साली जागतिक ॲटॉमिक एनर्जी पारषदेचे ते अध्यक्ष होते. त्यांना ॲडम्स पारितोषिक, हापकिन्स पारितोषिक, इ. पारितोषिके मिळाली होती. (१९०९-६६).
 अमेरिकेत स्थायिक झालेले महाराष्ट्रीय शास्त्रज्ञ शं. ल. गोखले हे दुसरे मोठे संशोधक होत. मॅग्नेटिझमवरील यांचा सिद्धान्त 'गोखले लॉ' म्हणून प्रसिद्ध आहे. इतका बहुमान यांना मिळाला. याशिवाय व्होल्टेजचे मापन करण्यासाठी व इतरही अनेक शास्त्रीय उपकरणे यांनी तयार केली आहेत. स्फेरिकल हारमॉनिक्स या उच्च गणितातील विषयावरही यांनी संशोधन केले आहे.

 जोशी श्रीधर सर्वोत्तम हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आहेत. पदार्थाच्या अणुमात्रावर प्रकाशाचा होणारा जो परिणाम त्याच्याविषयीचा यांचा सिद्धान्त 'जोशी इफेक्ट' म्ह्णून जगाने मान्य केला आहे. यांनी कमी खर्चाची व अधिक उष्णता देणारी विद्युत् भट्टीही तयार केली आहे.

 गोडबोले नरसिंह नारायण हे महाराष्ट्रीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. बनारस हिंदू विद्यापीठात यांनी तूप, मांस, दूध, मासे, अंडी यांवर संशोधन करून अनेक नवे सिद्धान्त मांडले आहेत.

 तळपदे शिवराज बापूजी हे गेल्या शतकातील संशोधक होत. वेदवाङ्मयातील यंत्र व तंत्र यांचा अभ्यास करून यांनी 'मरुत्सखा' नावाचे विमान तयार केले व मुंबईच्या चौपाटीवर १८९५ साली सयाजीराव गायकवाड, न्या. रानडे यांच्या समक्ष त्याचे उड्डाण यशस्वीही करून दाखविले. पुढे या प्रयत्नांचा पाठपुरावा झाला नाही.

 भिसे शंकर आबाजी हे अमेरिकेत स्थायिक झालेले दुसरे महाराष्ट्रीय होत. ॲटोमिडीन या औषधाच्या शोधामुळे यांची विशेष कीर्ती झाली. पण यंत्रविद्येत यांनी प्रामुख्याने संशोधन केलेले आहे. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सभासद होण्याचा बहुमान यांना मिळाला होता. यांच्या साठाव्या वाढदिवशी न्यू यॉर्क विद्यापीठाने त्यांना डी. एस्सी. ही पदवी देऊन यांचा गौरव केला.

 जोशी नारायण विष्णू यांचे संशोधन शेतीरसायन या विषयावरील आहे. बिहारमधील इपीरियल ॲग्रिकल्चरल इन्स्टिटयूट, पुसा, या संस्थेचे हे प्रवर्तक होते. दुधाचे दही करणारे, वनस्पतीमधील सेल्युलोजची विघटना करणारे असे जंतू यांनी शोधून काढले. संशृंग शेंगेच्या मुळावरील गाठीमधील हवेतील नायट्रोजन शोषून घेणाऱ्या जंतूंचाही शोध यांनी लावला.

 आघारकर शंकर पांडुरंग हे विख्यात महाराष्ट्रीय वनस्पतिशास्त्रज्ञ होत. 'भारतातील रुक्ष भागात उगवणाऱ्या वनस्पतींचा स्वप्रसार व त्यांचे मूलस्थान' हा यांच्या संशोधनाचा विषय, शेतीविज्ञान व वनस्पतिशास्त्र यांतील यांचे संशोधन मोलाचे आहे. आंबा, केळी, भाताचे पीक यावरही यांनी संशोधन केलेले आहे.

 खानोलकर वसंत रामजी हे महाराष्ट्रीय वैद्यकशास्त्रज्ञ होत. १९५० साली यांची इंटरनॅशनल कॅन्सर रिसर्च कमिशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. इतके कॅन्सरवरील यांचे संशोधन महत्त्वाचे मानले जाते. लंडन येथील रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनचे हे सभासद होते. युनायटेड नेशन्सच्या सायंटिफिक कमिटीचे हे सभासद होते. ॲटॉमिक रेडिएशनचे परिणाम शोधून काढण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
 अलीकडे जयंत नारळीकर यांचे नाव जगविख्यात झाले आहे. गणित, ज्योतिष, पदार्थविज्ञान या शास्त्रांतील बहुमोल कार्यामुळे त्यांना जागतिक कीर्ती मिळाली आहे.

अगदी अल्प
 या शास्त्रज्ञांचे संशोधन मौलिक असे आहे. त्यापूर्वीच जी नामावळी दिली आहे तिच्यातील विद्वानांचे संशोधनही महत्त्वाचे आहे. जगाच्या ज्ञानात त्यांनी भर घातली हे खरे आहे. पण हे सर्व संशोधन तुलनात्मक दृष्टीने पाहता अगदी अल्प असे आहे. पाश्चात्य संस्कृती येथे येऊन शंभर सवाशे वर्षे झाली. नव्या पीठिका, नवी दृष्टी येथे निर्माण झाल्यालाही आता बराच काळ लोटला. तरीही जगाच्याच नव्हे तर भारतातील इतर प्रांतांच्या तुलनेने पाहता हे संशोधन क्षुल्लक वाटते, असे मो. वा. चिपळूणकरांनी म्हटले आहे. याचे कारण हेच की विद्येची उपासना अजून महाराष्ट्रीयांच्या अंगी मुरलेली नाही. वरच्या नामावळीत तर कित्येक लोक असे आहेत की एकदा पदवी मिळून सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या विषयांकडे ढुंकूनही पाहिले नाही, मग संशोधनात आपण जगातील शास्त्रज्ञांची बरोबरी कशी करणार ? दुसरी एक गोष्ट मनाला खटकते. या संशोधकांत बहुसंख्य ब्राह्मणच आहेत. अलीकडे विद्येचा प्रसार ब्राह्मणेतरांतही झाला आहे. तरी विद्योपासनेचे व्रत घेतलेले त्यांच्यांत फार थोडे दिसतात. आणि अगदी अलीकडे तर विद्येची प्रतिष्ठाच नाहीशी होत चालली आहे. ब्राह्मणेतरांची किंवा अस्पृश्यांची बुद्धिमत्ता ब्राह्मणांपेक्षा तिळमात्र कमी नाही, हे शूद्रवर्णाच्या कर्तृत्वाचा इतिहास पाहता सहज दिसून येते. तेव्हा त्यांनी जर मनावर घेतले तर जगाच्या तुलनेला येईल असे संशोधन ते करू शकतील व महाराष्ट्राचे नाव उजळतील असा भरवसा मला वाटतो.

प्राच्यविद्या
 सृष्टिविज्ञानाप्रमाणेच प्राच्यविद्या आणि पुराणवस्तू यांचे संशोधन ब्रिटिश कालातच सुरू झाले. प्राच्यविद्या म्हणजे भारताच्या प्राचीन इतिहासाचा व संस्कृतीचा अभ्यास. येथले वेद उपनिषदे इ. प्राचीन वाङ्मय, शिलालेख, नाणी, ताम्रपट ही त्याची साधने. ही सर्व साधने ब्रिटिशकालापूर्वी येथे होतीच. पण, छांदोग्योपनिषदात म्हटल्याप्रमाणे, अज्ञानी माणसाला, तो ज्या भूमीवरून चालतो तिच्यात पुरलेले धन माहीत नसते, तशी आपली स्थिती होती. भारताची संस्कृती फार मोठी होती. पण इतिहास या कल्पनेचा उदय येथे कधी झालाच नाही, हे तिचे फार मोठे वैगुण्य होय. १७८५ साली चार्लस विल्किन्स या इंग्रज पंडितांनी स्वतः संस्कृत शिकून भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले. १७८९ साली कलकत्त्याचे न्यायाधीश विल्यम जोन्स यांनी शाकुंतलाचे भाषांतर केले. ते ग्रंथ वाचून पाश्चात्य युरोपीय विस्मित झाले व भारताची प्राचीन संस्कृती फार मोठी आहे, हे ध्यानात घेऊन त्यांनी प्राच्यविद्येच्या अभ्यासाला शास्त्रशुद्ध रीतीने प्रारंभ केला. श्लेगेल हे बंधू (जर्मन), चेझी, बॉप (फ्रेंच), कोलब्रुक, रॉय, मॅक्समुल्लर, ऱ्हीस डेव्हीस ही नावे या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत.

रॉयल एशियाटिक सोसायटी
 १७८४ साली विल्यम जोन्स यांनी प्राच्यविद्येच्या अभ्यासासाठी रॉयल एशियाटिक सोसायटी स्थापन केली. मुंबईला १८०४ साली स्थापन झालेली बाँबे लिटररी सोसायटी ही तिची शाखा होती. 'या खंडप्राय देशाचा इतिहास, येथील समाजसंस्था, लोकजीवन यांचा विद्वानांनी अभ्यास करावा, या देशातील भूमीला व येथील पाषाणांना बोलके करून त्यांनी पाहिलेली भूतकालीन सांस्कृतिक व वैचारिक आंदोलने त्यांना प्रगट करायला लावावीत', असा सोसायटीचा उद्देश होता. या संस्थांच्या द्वारे आणि युरोपात स्वतंत्रपणे, युरोपीय विद्वानांनी सायणभाष्यासह ऋग्वेदाची आवृत्ती, संस्कृतचा शब्दकोश, संस्कृत वाङ्मयाचा इतिहास, बौद्ध वाङ्मयाचा इतिहास इ. ग्रंथ प्रसिद्ध केले आणि मग त्यापासून हळूहळू भारतीय व महाराष्ट्रीय विद्वानांना स्फूर्ती होऊन ते या अभ्यासाकडे वळले.

भाऊ दाजी
 प्राच्यविद्या या क्षेत्रातले पहिले संशोधक म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे होता शिलालेखांचा अभ्यास करून त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकांतून अनेक लेख लिहिले. दुसरे मोठे पंडित म्हणजे भाऊ दाजी लाड हे होत. शिलालेख ताम्रपट, हस्तलिखिते इ. साधने देशभर हिंडून त्यांनी गोळा केली; प्रत्यक्ष लेण्यांमध्ये जाऊन तेथील शिलालेखांचे वाचन करून त्यांच्या नकला केल्या आणि त्यांचे विवेचन करणारे अनेक लेख लिहिले. त्यांचा गौरव करताना डॉक्टर भांडारकरांनी म्हटले आहे की 'त्यांच्या लेखांचा आधार घेतल्यावाचून प्राच्यविद्या संशोधकाला पुढे पाऊलच टाकता येणार नाही.'

अस्मिता
 न्या. मू तेलंग यांचे नाव या क्षेत्रात असेच प्रसिद्ध आहे. रामायण हे होमरच्य इलियडवरून भाषांतरित केलेले आहे, आणि भगवद्गीता ही ख्रिस्तोत्तरकालीन आहे असे सिद्धान्त पाश्चात्य विद्वानांनी मांडले होते. त्यांचे साधार सप्रमाण खंडण करून या दोन ग्रंथांचे खरे वैभव तेलंगांनी जगाला दाखवून दिले. त्यामुळे त्या वेळी त्यांना पाश्चात्य विद्वानांतही मोठी कीर्ती मिळाली. म. मो. कुंटे यांचा 'हिंदुस्थानातील आर्य संस्कृतीची स्थित्यंतरे' हा ग्रंथ असाच गाजलेला आहे. महाराष्ट्रीय विद्वानांच्या या संशोधनामुळे मरगळ आलेल्या येथील जनतेमध्ये पूर्वसंस्कृतीचा अभिमान जागृत झाला व त्यांच्यांतील न्यूनगंड कमी होऊ लागला. शं. पां. पंडित, प्रो. काथवटे, राजारामशास्त्री भागवत यांनी याच काळात ऋग्वेद, अथर्ववेद, उपनिषदे यांची भाषांतरे प्रसिद्ध केली. पण अस्मितेला खरा उजळा मिळाला तो लो. टिळकांच्या ग्रंथांनी. 'ओरायन' या ग्रंथात त्यांनी ऋग्वेदाचा काळ इ. पू. ४५०० असा ठरवला. याच सुमारास याकोबी या जर्मन पंडिताने असाच सिद्धान्त मांडल्यामुळे टिळकांच्या सिद्धान्ताला फार मोठा दुजोरा मिळाला. 'आर्क्टिक होम इन् दि वेदाज' हा टिळकांचा दुसरा ग्रंथ. आर्याची मूळ वस्ती उत्तर ध्रुवापाशी होती, असे त्यातील मतप्रतिपादन आहे. 'गीतारहस्य' हा त्यांचा तिसरा ग्रंथ. पाश्चात्य- पौर्वात्य देशात नीतिशास्त्राचे विवेचन करणारा इतका थोर ग्रंथ दुसरा नाही, हे त्यात सिद्ध केलेले आहे. भारतीयांच्या मनात या ग्रंथाने फारच मोठी क्रांती घडवून आणलेली आहे.

डॉ. भांडारकर
 प्राच्यविद्या संशोधनातले अग्रगण्य पंडित डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे होत. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या 'इंडियन ॲंटिक्वरी' या नियतकालिकातून त्यांनी मौलिक लेखन केले आहे. 'अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन', 'शैव व वैष्णव पंथ' हे त्यांचे ग्रंथ आजही प्रमाणभूत मानले जातात. 'विल्सन फायलालॉजिकल लेक्चरस्' या मालेत त्यांनी भाषाशास्त्रावर दिलेली व्याख्याने हा भारतीय भाषाशास्त्राचा पायाभूत ग्रंथ मानला जातो. त्यांचे नाव या क्षेत्रात इतके मोठे आहे की १९१७ साली प्रा. रा. द. रानडे, डॉ. गुणे, डॉ. बेलवलकर, प्रा वै. का. राजवाडे यांनी कार्यासाठी जी संस्था स्थापिली तिचे नाव 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर' असेच ठेवले. या संस्थेने 'ॲनल्स्' हे वार्षिक त्याच साली सुरू केले. आज चाळीस वर्षे हे वार्षिक उत्तम कार्य करीत आहे. याशिवाय आजपर्यंत संस्थेने १२५ ग्रंथ प्रसिद्ध केलेले आहेत. पण या संस्थेचे खरे मोठे कार्य म्हणजे तिने काढलेली 'महाभारताची चिकित्सक संशोधित आवृत्ती' हे होय. डॉ. वि. स. सुकथनकर यांनी या महाकार्याचा पाया घालून महाभारताची सहा पर्वे प्रसिद्ध केली त्यानंतर ते कार्य डॉ. बेलवलकर यानी पूर्ण केले. महाभारताचे असे संशोधन यापूर्वी कोठेच झाले नव्हते. त्यामुळे या आवृत्तीची जगभर कीर्ती झाली.

वैदिक संशोधन
 वेद, वेदांगे, उपनिषदे, सूत्रे या क्षेत्रात गेल्या अर्धशतकात पाठसंशोधन, दैवतेतिहास, मानवेतिहासशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र इत्यादी दृष्टींनी चिकित्सक व तुलनात्मक असे संशोधनपर लेखन महाराष्ट्रात बरेच झाले आहे. या सर्व संशोधकांत पंडित श्री. दा. सातवळेकर हे अग्रगण्य आहेत. त्यांनी चारही वेदांच्या स्वस्त, पण उत्तम आवृत्त्या प्रसिद्ध केल्या आहेत. पाठसंशोधन, अर्थनिर्णय, भाष्य या बाबतीत त्यांचे कार्य अद्वितीय असे आहे. डॉ. श्री. व्यं. केतकर यांचे कार्य निराळ्या दृष्टीने पण असेच महत्त्वाचे आहे. ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडातील दोन खंड वेदवाङ्मयाच्या संशोधनालाच वाहिलेले आहेत. त्यांनी वेदांतून दिसणारा इतिहास, त्यातील आर्य- अनार्य वाद, वैदिक शब्दसृष्टी इ. निरनिराळ्या दृष्टींनी अनेक पंडितांच्या साह्याने फार मोठा अभ्यास केला आहे. 'वैदिक संशोधन मंडळा' चे श्री. सोनटक्के व श्री. काशीकर यांनी समग्र ऋग्वेदाची उत्कृष्ट संशोधित आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. पदपाठ, भाग्य, सूची यांसहित संपादित केलेल्या अशा आवृत्तीची मोठी गरज होतीच. श्री. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ऋग्वेदाची भाषांतरासह आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. पण त्यापेक्षा त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे वेदवाङ्मयाच्या आधारे त्यांनी प्रसिद्ध केलेला चरित्रकोश हे होय. त्याच्या मागला अभ्यास निस्तुळ असाच आहे. डॉ. रा. ना. दांडेकर यांचे 'वैदिक देवतांचे अभिनव दर्शन' हे पुस्तक आणि अन्यत्र प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख यांतून त्यांनी वरुण, इंद्र, विष्णू इ. वेदांतील देवतांचा, दैवतेतिहासशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र इ. शास्त्रांच्या दृष्टीने तुलनात्मक अभ्यास केला आहे.

उपनिषदे
 उपनिषदांच्या अभ्यासात डॉ. बेलवलकर व प्रा. रा. द. रानडे यांच्या 'दि क्रिएटिव्ह पीरियड,' व रानडे यांच्या 'कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ दि उपनिषदाज्' या दोन ग्रंथांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. रानडे यांनी उपनिषदांतील विचारांचे शास्त्रीय दृष्टीने पृथक्करण करून त्यांतील विश्वोत्पत्ती, मानसशास्त्र, प्रमाणशास्त्र, नीतिशास्त्र, मरणोत्तर गती इ. विषयांची सुसूत्र मांडणी केली आहे. अशा तऱ्हेचा उपनिषदांचा अभ्यास त्यांच्या पूर्वी व नंतरही कोणी केलेला नाही. उपनिषदांच्या क्षेत्रात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालेला 'उपनिषत्कांड' हा चतुष्खंडात्मक ग्रंथ फार मोलाचा आहे. पहिल्या खंडात उपनिषदांची पार्श्वभूमी विशद केली आहे. दुसऱ्यात सर्व प्रमुख भाष्यकारांची भाष्ये दिली आहेत. ग्रंथाला लक्ष्मणशास्त्री यांनी फार उत्तम अशी विवेचनात्मक प्रस्तावना जोडली आहे. लक्ष्मणशास्त्री यांनी 'वैदिक संस्कृतीचा विकास' या आपल्या ग्रंथात वेदकालापासून आजपर्यंतच्या वैचारिक विकासाचे दर्शन घडविले आहे. 'अठरा मुख्य उपनिषदे' हा आचार्य वि. प्र. लिमये व प्रा. रं. द. वाडेकर यांचा ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. त्यात वेदवेदांगांमधील बौद्ध, जैन ग्रंथांतील उपनिषत्सदृशवचने दिलेली आहेत व उपनिषदांतील शब्दांची व वाक्यखंडांची सूची दिलेली आहे.

दर्शने
 भारतीय दर्शनांच्या क्षेत्रात वाईचे केवलानंद सरस्वती यांचा पंचखंडात्मक 'मीमांसा कोश' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. केवळ पूर्वमीमांसा दर्शनाच्याच नव्हे, तर इतर शास्त्रांच्या दृष्टीनेही हा ग्रंथ फार उपयुक्त आहे. पातंजल योगाच्या क्षेत्रात स्वामी कुवलयानंद यांचे नाव अग्रगण्य आहे. योगातील आसने, प्राणायाम यांचा अर्वाचीन शास्त्रीय दृष्टीने त्यांनी केलेला अभ्यास हा अपूर्व असाच आहे. त्यांच्या 'कैवल्यधाम' या संस्थेचे 'योगमीमांसा' हे त्रैमासिक हेच कार्य करीत आहे.

कुलगुरू वैद्य
 महाभारताचा उल्लेख मागे केलाच आहे. रामायण व महाभारत यांच्या ऐतिहासिक दृष्टीने केलेल्या अभ्यासात चिं. वि. वैद्य याचे ग्रंथ- 'महाभारताचा उपसंहार', 'दि रिडल ऑफ दि रामायण' या ग्रंथांचे महत्त्व असाधारण असे आहे. पुराणांच्या अभ्यासात डॉ. अ. द. पुसाळकर, डॉ. गो. स. घुर्ये व डॉ. अ. स. आळतेकर यांचे कार्य बहुमोल असे आहे.

डॉ. काणे
 म. म. पां. वा. काणे यांचा 'धर्मशास्त्राचा इतिहास' हा पंचखंडात्मक ग्रंथ म्हणजे सर्व संस्कृत, बौद्ध व जैन या ग्रंथांतील धर्मविचारांचा इतिहास आहे. हिंदुधर्माचे इतके शास्त्रीय, ऐतिहासिक व सप्रमाण विवेचन जगाच्या वाङ्मयात दुसरे नाही. काणे यांच्या या अभ्यासाला खरोखर तुलनाच नाही. हिंदूंच्या समाजसंस्था, तुलनात्मक कायदा, मानव समाजेतिहास यांच्या विवेचनाचा हा महाकोश आहे.

डॉ. आंबेडकर
 डॉ. आंबेडकर हे फार मोठे पुराण- इतिहास संशोधक आहेत. शूद्र, अस्पृश्य यांच्या उत्पत्तीविषयी प्राचीन इतिहासाचे संशोधन करून 'हू वेअर दि शूद्राज', 'दि अन्- टचेबल्स्' इ. ग्रंथ त्यांनी इंग्रजीत लिहिले आहेत. बौद्ध धर्मावर त्यांची निष्ठा असल्यामुळे बौद्ध वाङ्मयाचे त्यांनी खूपच संशोधन केले आहे. आणि भगवान गौतम बुद्धाचे चरित्र लिहिले आहे.
 डॉ. इरावतीबाई कर्वे यांचा 'युगान्त' हा ग्रंथ अतिशय गाजलेला आहे. महाभारतासंबंधी एक नवा दृष्टिकोण त्यांनी त्यात मांडलेला आहे. पण त्यांच्या संशोधनाचे मुख्य विषय समाजशास्त्र व मानववंशशास्त्र हे होत. त्या विषयातील 'हिंदु किन्-शिप', 'हिंदु सोसायटी- ॲन इंटरप्रिटेशन', 'महाराष्ट्र अँड पीपल' व 'मराठी संस्कृती' हे त्यांचे ग्रंथ विद्वत्मान्य झाले आहेत. सर्व भारतभर हिंडून निरनिराळ्या जमातींचा अभ्यास करून त्यांनी ते लिहिलेले आहेत.

अभिजात वाङ्मय
 अभिजात संस्कृत वाङ्मयाच्या संशोधनाच्या क्षेत्रात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे क्युरेटर डॉ. प. कृ. गोडे यांचे कार्य फार महत्त्वाचे आहे. भारतीय व पाश्चात्य मासिकांतून त्यांनी सुमारे ४५० संशोधनात्मक लेख लिहिलेले आहेत. त्यांच्यासारखेच महत्त्वाचे संशोधन नागपूरचे म. म. वा. वि. मिराशी यांचे आहे. शिलालेख, ताम्रपट, नाणी यांच्या साह्याने प्राचीन इतिहासावर त्यांनी अनेक संशोधनात्मक लेख लिहिलेले आहेत. 'संशोधन मुक्तावली' या नावाने हे त्यांचे लेख आठ खंडात प्रसिद्ध झालेले आहेत. कालिदास व भवभूती यांच्यावरचे त्यांचे ग्रंथ प्रसिद्धच आहेत. शिवाय वाकाटक, कलचूरी या राजघराण्यांचे इतिहास त्यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेले आहेत.

प्राकृत
 संस्कृताप्रमाणेच प्राकृत भाषा व वाङ्मय यांचेही महाराष्ट्रीय पंडित संशोधन करीत आहेत. त्यात डॉ. पां. दा. गुणे, ह. दा. वेलणकर, डॉ. प. ल. वैद्य, डॉ. आ. वे. उपाध्ये, प्रा. म. अ. घाटगे, स. आ. जोगळेकर यांचा प्रामुख्याने समावेश केला पाहिजे. डॉ. प. ल. वैद्य यांनी वररुची, हेमचंद्र व त्रिविक्रम यांची प्राकृत व्याकरणे संशोधित केली असून पुष्पदंताचे 'महापुराण' याची आवृत्ती आपल्या चिकित्सक प्रस्तावनेसह प्रसिद्ध केली आहे. डॉ. उपाध्ये यांनी प्राकृत व अपभ्रंश भाषेतील सुमारे चौदा ग्रंथांच्या संशोधित आवृत्त्या प्रसिद्ध केल्या असून त्यांच्या प्रस्तावनांतून भाषाविषयक व कालनिर्णयविषयक मोलाचे विवेचन केले आहे. डॉ. घाटगे यांचे 'इंट्रोडक्शन टू अर्धमागधी' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. जोगळेकर यांनी 'गाथासप्तशती'ची उत्कृष्ट आवृत्ती दीर्घ प्रस्तावना, टीपा यांसह प्रसिद्ध केली आहे.
 बौद्ध व जैन वाङ्मयाचेही असेच संशोधन मराठीत चालू आहे. या क्षेत्रात श्री. धर्मानंद कोसांबी यांनी मोठे कार्य केले आहे. 'भगवान बुद्ध', 'समाधि मार्ग', 'बुद्धसंघाचा परिचय', 'हिंदी संस्कृती व अहिंसा' हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. डॉ. पु.वि. बापट यांनी 'विसुद्धिमग्ग' याचे इंग्रजी भाषांतर केले असून त्यावर एक प्रबंधही लिहिला आहे. डॉ. प. ल. वैद्य यांच्या संपादकत्वाखाली 'बौद्ध संस्कृत ग्रंथमाला' या मालेत ललित विस्तार, दिव्यावदान, अवदानशतक इ. ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

भाषाशास्त्र
 भाषाशास्त्राच्या संशोधनात डॉ. भांडारकर हे अध्वर्यू समजले जातात. त्यांच्या 'विल्सन फायलालॉजिकल लेक्चर्स्' या ग्रंथाचा मागे उल्लेख आलाच आहे. डॉ. पां.दा. गुणे यांचा 'इंट्रोडक्शन टू फायलालजी' हा ग्रंथ भाषाशास्त्राच्या मुळाशी असलेल्या तत्त्वांच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. वि. का. राजवाडे जसे इतिहास संशोधक तसेच शाषाशास्त्र संशोधकही होते. त्यांचे संस्कृत भाषेचा उलगडा, नामादिशब्द व्युत्पत्तिकोश मराठी धातुकोश इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. डेक्कन कॉलेजातील डॉ. कत्रे, डॉ. कालेलकर यांनीही भाषाशास्त्रात महत्त्वाचे संशोधन केले आहे.

डॉ. सांकलिया
 शिलालेख, ताम्रपट, नाणी, लेणी यांच्या जोडीला पुराण वस्तूंचे उत्खनन या मार्गाने सध्या डेक्कन कॉलेजतर्फे पुराणवस्तु संशोधन चालू आहे. सुमारे ५० वर्षापूर्वी मोहंजोदारो व हराप्पा येथील उत्खननात सनपूर्व २५०० वर्षापूर्वीचे अवशेष सापडले व एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. महाराष्ट्रात डेक्कन कॉलेजतर्फे डॉ. ह. धी. सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, नाशिक, नेवासे येथे बरेच संशोधन झाले असून भांडी, हत्यारे, घरांचे भाग इ. अवशेषांवरून इतिहासपूर्वकालीन संस्कृतीची कल्पना येऊ शकते.

प्राचीन इतिहास
 या सर्व संशोधनाच्या आधारे भारताचा प्राचीन इतिहास लिहिणं आता सुलभ झाले आहे भारतीय विद्याभवनातर्फे 'ए हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' हा दशखंडात्मक इतिहास प्रसिद्ध झाला आहे. त्यात डॉ. पुसाळकर व प्रा. आपटे यांनी बरीच प्रकरणे लिहिली आहेत. या क्षेत्रात स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या पंडितां मध्ये डॉ. अ. स. आळतेकर हे अग्रगण्य आहेत. त्यांची 'स्टेट अँड गर्व्हन्मेंट इन् एन्शंट इंडिया', 'एज्युकेशन इन् एन्शंट इंडिया', 'पोझिशन ऑफ विमेन इन् हिंदू सिव्हिलिझेशन', 'हिस्टरी ऑफ व्हिलेज कम्युनिटिज इन् वेस्टर्न इंडिया' इ. ग्रंथ फार नामांकित आहेत. मार्क्सवादी दृष्टिकोनातून भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास श्री. श्री. अ. डांगे व प्रा. दा. ध. कोसंबी यांनी केला आहे. डांगे यांचा 'फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी' व प्रा. कोसंबी यांचा 'ॲन इंट्रोडक्शन टू दी स्टडी ऑफ इंडियन हिस्टरी' हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

ग्रॅण्ट डफ
 भारताच्या प्राचीन इतिहासाच्या संशोधनाविषयी हे झाले. आता अर्वाचीन इतिहाससंशोधनाचा विचार करावयाचा. मागे अनेक वेळा सांगितलेच आहे की स्थलकालनिश्चय, कालाचे पौर्वापर्य, कार्यकारणसंबंध, सत्याची चिकित्सा, साधारसप्रमाण लिहिणे ही जी इतिहासाची रचना तिची कल्पनासुद्धा ब्रिटिश कालापर्यंत कोणाला भारतात नव्हती. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे हे खरे आहे. पण ती तशी आहे हेही खरे आहे. इतिहासाची ही रचना प्रथम येथे ग्रॅण्ट डफ याने केली. आज त्याच्या इतिहासाला आपण कितीही नावे ठेवली तरी मराठ्यांच्या इतिहासाच्या लेखनाचा पाया त्यानेच घातला याबद्दल कोणाला वाद घालता येणार नाही.

मराठा इतिहास
 पाश्चात्य विद्यांचा येथे प्रसार झाल्यावर आपल्याकडे इतिहाससंशोधनास सुरुवात झाली आणि काही काळाने मराठ्यांच्या इतिहासाकडे पंडितांचे लक्ष जाऊ लागले. या क्षेत्रात प्रारंभीचे मोठे कार्य केले ते न्या. मू माधवराव रानडे यांनी. 'मराठ्यांच्या सत्तेचा उदय' हा अनमोल ग्रंथ तर त्यांनी लिहिलाच. पण कागदपत्रे जमा करून साधारसप्रमाण इतिहास लिहिण्याचा प्रारंभ महाराष्ट्रात त्यांनी केला याला विशेष महत्त्व आहे. पेशव्यांची दप्तरे पाहावयास मिळावी, असा त्यांचा प्रयत्न १८८३-८४ सालापासून चालू होता. पुढे दहा वर्षांनी त्यांच्या प्रयत्नाने रा. ब. वाड यांना तशी परवानगी मिळाली व त्यांनी त्या दप्तरांतून बऱ्याच कागदपत्रांची निवड केली, त्यांचा अभ्यास करण्यात माधवरावांनी बराच वेळ खर्ची घातला. याशिवाय, 'शिवाजी ॲज ए सिव्हिल रूलर', ' मराठ्यांच्या इतिहासातील अलिखित प्रकरणे', मराठ्यांच्या अमदानीतल्या टाकसाळी व नाणी', 'पेशव्यांच्या रोजनिश्यांची प्रस्तावना', 'एक हजार वर्षापूर्वीचे हिंदुस्थान', 'शंभर वर्षांपूर्वीचे दक्षिण हिंदुस्थान', 'वसिष्ठ व विश्वामित्र' इ. अनेक निबंध त्यांनी लिहिले व ते निरनिराळ्या परिषदांपुढे वाचले. 'मराठ्यांची सत्ता', म्हणजे एखादा वणवा पेटावा व थोड्या वेळाने विझून जावा, अशा तऱ्हेची होती, तिला आगापिछा काही नव्हता, असे ग्रँट डफ याने मत मांडलेले आहे. 'मराठी सत्तेचा उदय' या आपल्या ग्रंथात माधवरावांनी हे विधान सप्रमाण खोडून काढून 'महाराष्ट्रधर्माची प्रस्थापना' हे मराठ्यांच्या सत्तेचे उद्दिष्ट होते, हा सिद्धान्त मांडला. मराठ्यांच्या इतिहासाच्या विवेचनास येथूनच खरा प्रारंभ झाला. अशा रीतीने कागदपत्रे जमा करणे व त्यावरून इतिहास लिहून सिद्धान्त प्रस्थापित करणे या कार्याची माधवरावांनी पायाभरणीच महाराष्ट्रात केली असे दिसून येईल.
 विष्णुशास्त्री यांचा इतिहास हा अत्यंत आवडता विषय होता हे सर्वश्रुतच आहे. स्वदेशाचा पूर्वइतिहास अत्यंत उज्ज्वल होता हे त्यांना दाखवून द्यावयाचे होते. त्या दृष्टीनेच त्यांनी साने, मोडक व शाळिग्राम यांच्या साह्याने 'काव्येतिहास संग्रह' हे मासिक काढले होते. त्यात अनेक जुनी काव्ये, बखरी व इतर कागद छापीत असत. राजवाडे, पारसनीस यांना त्यांच्यापासूनच स्फूर्ती मिळाली, असे म. म. पोतदार यांनी म्हटले आहे.

राजवाडे
 यानंतरचा व सर्वात महत्त्वाचा उद्योग म्हणजे पुरातत्त्वभूषण वि. का. राजवाडे यांचा. सर्व महाराष्ट्रभर वणवण हिंडून, संस्थानिक, सरदार, इतर प्रतिष्ठित लोक यांच्या घरी जाऊन त्यांनी शेकडो ऐतिहासिक कागद मिळविले व ते बावीस खंडांत प्रसिद्ध केले. त्या खंडांना प्रस्तावना लिहून त्यांनी त्या पत्रांतून दिसणाऱ्या इतिहासाचे विवेचनही केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाला काही मूर्तरूप प्राप्त झाले आहे, त्याचे श्रेय वि. का. राजवाडे यांनाच बव्हंशी आहे.

खरे शास्त्री
 खरे शास्त्री यांचा प्रयत्न मर्यादित क्षेत्रात, पण असाच महत्त्वाचा आहे. पटवर्धन दप्तरातील कागद मिळवून त्यांचे त्यांनी तेरा खंड प्रसिद्ध केले व राजवाड्यांसारख्या त्यांना चिकित्सक प्रस्तावनाही लिहिल्या. खरे शास्त्री यांचा मराठ्यांच्या इतिहासाचा व्यासंग अतिशय गाढ असा होता. तात्यासाहेब केळकर यांच्या 'इंग्रज आणि मराठे' या नामांकित ग्रंथाला त्यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ती फारच मार्मिक अशी आहे. मराठ्यांच्या सर्व इतिहासाचे सारभूत तात्पर्य तीत आलेले आहे.

दप्तर
 यानंतर पेशवे दप्तर (सरदेसाई, भाग ४६), पुरंदरे दप्तर, भाग १-२, होळकरी पत्रव्यवहार- भागवत, मराठेशाहीतील पत्रे- भालेराव, भारतवर्ष- पारसनीस, मराठी दप्तर रुमाल, १, २, ३- भावे, ग्वाल्हेरचा पत्रव्यवहार- पारसनीस, अशी मराठ्यांच्या इतिहासासंबंधी अनेक कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत. बखरी, करीने, कैफियती या निराळ्याच. हे मराठीतले साहित्य झाले. शिवाय इंग्रजी, पोर्तुगीज, डच, फारशी, आरबी या भाषांत मराठ्यांच्या इतिहासाविषयी विपुल साहित्य उपलब्ध झालेले आहे. आणि सेन, यदुनाथ सरकार यांसारख्या परप्रांतीय इतिहासकारांनी त्याचा भरपूर उपयोग करून आपले इतिहास सजविलेले आहेत.
 इतिहाससंशोधन क्षेत्रात म. म. द. वा. पोतदार यांचे नाव महशूर आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात प्रथम सभासद, नंतर चिटणीस व शेवटी कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. 'इंडियन हिस्टरी कॉंग्रेस' च्या अलाहाबाद अधिवेशनात ते विभागाध्यक्ष होते व १९४८ साली दिल्लीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 'इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्डस् कमिशन' मध्येही त्यांनी अनेक वर्षे कार्य केले आहे. त्यांनी मोठा संशोधन ग्रंथ लिहिला नाही. पण स्फुट लेख अनेक लिहिले. 'आदिलशाही आर्थिक फर्मान', 'तंजावर मोडी ताम्रपट', 'कित्येक शिवकालीन घराणी', 'शिवकालीन राजनीती', 'वडू येथील प्राचीन अवशेष', 'दाभाड्याचे मुजुमदार', 'जयपूर येथील जुनी महाराष्ट्रीय घराणी', 'राष्ट्रसंरक्षक रामचंद्र नीळकंठ,' असे त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत.
 वा. सी. बेंद्रे हे मोठे पट्टीचे संशोधक आहेत. १९२८ साली त्यांचा 'साधन चिकित्सा' हा बहुमोल ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यानंतर 'छत्रपती संभाजी महाराज', 'मालोजीराजे आणि शहाजी महाराज' व 'छत्रपती शिवाजी महाराज' अशी तीन मोठी चरित्रे त्यांनी लिहिली. 'भारतीय इतिहास आणि संस्कृती', या त्रैमासिकाचे त्यांनी काही वर्षे संपादन केले. आणि त्याच काळात महाराष्ट्रेतिहासाच्या साधनसंग्रहाचे तीन भाग संपादित केले. याशिवाय 'गोवळकोंड्यांची कुतुबशाही', 'महाराष्ट्रातील गडकोट दुर्ग', 'राणा जयसिंग व शिवाजी महाराज' असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम महाराज यांच्यावर त्यांनी लहानमोठे अनेक संशोधनपर ग्रंथ लिहिले आहेत.
 ग. ह. खरे हे असेच नामांकित इतिहाससंशोधक आहेत. १९३० सालापासून ते भा.इ.सं.मंडळात काम करीत आहेत. निवृत्त झाले तरी अजूनही ते तेथे काम करीत आहेत. या काळात त्यांनी हजारो कागदपत्रे व दप्तरे जमा केली आहेत. इतिहास मंडळात जी एकंदर कागदपत्रे आहेत त्यांतील निम्मी तरी खरे यांनी संग्रहीत केलेली आहेत. याशिवाय सुमारे २०००० पोथ्या, ५०० नाणी, १८० चित्रे, ३० ताम्रशिला- शासने व सुमारे २०० ऐतिहांसिक वस्तू त्यांनी मंडळास मिळवून दिल्या आहेत.
 खरे यांचा फारशी भाषेचा व्यासंग दांडगा आहे. याशिवाय आरबी, कानडी, प्राकृत याही भाषांचा अभ्यास त्यांनी केला आहे. खरे यांचा मराठी व इंग्रजी लेखनसंभार मोठा आहे. ऐतिहासिक फार्सी साहित्याचे त्यांनी सहा खंड प्रसिद्ध केले आहेत. शिवचरित्र साहित्याचे असेच दहाबारा खंड त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. 'मूर्तिविज्ञान', 'महाराष्ट्राची चार दैवते', 'संशोधकांचा मित्र' हे त्यांचे ग्रंथ अतिशय नावाजलेले आहेत. पुरातत्त्व व कला, अर्वाचीन इतिहास, मुद्राशास्त्र, मध्ययुगीन इतिहास, शिल्प शास्त्र इ. विषयांवर त्यांनी मराठी व इंग्रजी सुमारे ५६ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या मराठी व इंग्रजी शोधनिबंधांची संख्या सुमारे ३६० भरेल. या कार्यामुळे त्यांचा निरनिराळ्या परिषदांत बहुमान झालेला आहे. जयपूरच्या अखिल भारतीय परिषदेत ते विभागीय अध्यक्ष होते. पुणे विद्यापीठाने पीएच. डी. चे मार्गदर्शक म्हणून त्यांस मान्यता दिलेली आहे.

मराठी साहित्य
 मराठी इतिहासाप्रमाणेच मराठी साहित्याच्या क्षेत्रातही पंडित संशोधन करीत आहेत. ल. रा. पांगारकर यांनी हा उद्योग मोठ्या कसोशीने केला आहे. ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर, मोरोपंत यांचे चरित्र व वाङ्मय यांचे संशोधन करून त्यांनी त्यांची चरित्रे लिहिली आहेत. मराठी प्राचीन वाङ्मयाचा इतिहासही त्यांनी लिहिला आहे. धुळे येथे शंकर श्रीकृष्ण देव यांनी समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचे संशोधन करण्यासाठी एक स्वतंत्र संस्थाच 'समर्थ वाग्देवता मंदिर' या नावाने स्थापन केली. इतिहास संशोधनासाठी 'राजवाडे संशोधन मंडळ' त्यांनी व भास्कर वामन भट यांनी स्थापन केले. महानुभाव वाङ्ममयाचेही असेच संशोधन चालू आहे. या संशोधकांत अग्रगण्य म्हणजे डॉ. य. खु. देशपांडे हे होत. यवतमाळला त्यांनी 'शारदाश्रम' हा संशोधनकार्यासाठीच स्थापिला. प्रारंभी राजवाडे, वि. ल. भावे यांनी महानुभावांच्या काही गुप्त लिपींचा उलगडा केला. तेच कार्य देशपांडे यांनी पुढे चालवून, 'महानुभावीय मराठी वाङ्मय' ही पुस्तिका प्रसिद्ध केली. अनेक महंतांकडून पुस्तके मिळवून त्यांचे बालबोध लिपीत रूपांतर केले. देशपांडे यांनी इतिहासक्षेत्रातही दुर्मिळ कागदपत्रे जमविण्याचा उद्योग सतत चालू ठेवला होता. १९३८ साली स्विट्झरलंड येथील प्राच्यविद्या परिषदेत त्यांनी शोधनिबंध वाचले होते. डॉ. वि. भि. कोलते, वा. ना. देशपांडे, नेने, भवाळकर यांनी त्यांचीच परंपरा पुढे चालविली आहे. डॉ. कोलते यांनी 'महानुभावांचे तत्त्वज्ञान', 'चक्रचरचरित्र' इ. अनेक संशोधनपर ग्रंथ लिहून मराठी साहित्याची बहुमोल सेवा केली आहे.
 फारशी कागदपत्रांचा सखोल अभ्यास करणारे महाराष्ट्रातले इतिहास संशोधक म्हणजे सेतुमाधवराव पगडी हे होत. 'इतिहासाचा मागोवा', 'निजाम पेशवे पत्रव्यवहार' इ. पुस्तके लिहून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे विवेचन केले आहे. अलीकडे इंग्रजीत त्यांनी शिवचरित्रही लिहिले आहे.
 मराठी व इंग्रजी साहित्याच्या, कागदपत्रांच्या व बखरींच्या आधारे मराठीत विपुल इतिहास लेखन झालेले आहे. शिवाजी, संभाजी, बाजीराव, नानासाहेब, माधवराव, नाना फडणीस, महादजी शिंदे यांची चरित्रे तर झालीच आहेत. पण याशिवाय जिवबा दादा चरित्र, बायजाबाई चरित्र, अहिल्याबाई चरित्र, कोल्हापूरचा इतिहास, इचलकरंजीचा इतिहास, श्रीरंगपट्टणची मोहीम, असे वाङ्मयही प्रसिद्ध झाले आहे.
 मुंबई, पुणे, धुळे, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये मराठी इतिहासाच्या संशोधनासाठी मंडळे स्थापन झाली आहेत. आणि तेथे संशोधनाचे कार्यही चालू आहे. या क्षेत्रात आतापर्यंत काशीनाथ नारायण साने, बाळाजी प्रभाकर मोडक, द.व. पारसनीस ग. वि. वाड, आ. भा. फाळके, डॉ. पु. म. जोशी, तात्यासाहेब केळकर, गोव्याचे ना. श्री. पिसुर्लेकर, द. वि. आपटे, प्रा. ओतुरकर, पांडोबा पटवर्धन, पांडोबा चांदोरकर इ. संशोधकांनी बहुमोल कार्य केले आहे. कागदपत्रांचे संशोधन आणि त्यांची चिकित्सा करून त्याअन्वये इतिहासविषयक लेखन असे दुहेरी कार्य यांनी केलेले आहे.

सरदेसाई
 पण या बाबतीतले सर्वश्रेष्ठ इतिहास पंडित म्हणजे गो. स. सरदेसाई हे होत. इ. स. १००० पासून महाराष्ट्राच्या इतिहासाला प्रारंभ करून इ. १८५७ पर्यंतचा इतिहास त्यांनी 'मराठी रियासत' या नावाने प्रसिद्ध केला. हे जे त्यांनी कार्य केले त्याला तोड नाही. मराठ्यांचा पहिल्यापासून शेवटपर्यंत सुसंगत असा इतिहास त्यांच्या या रियासतीवाचून दिसलाच नसता. 'मुसलमानी रियासत', 'मराठी रियासत- पूर्वार्ध, मध्यविभाग, उत्तरविभाग', 'ब्रिटिश रियासत पूर्वार्ध, उत्तरार्ध' असे त्यांच्या लेखनाचे विभाग असून हे सर्व खंड त्यांनी नवनवीन कागदपत्रे मिळताच पुन्हा लिहून काढले आणि शेवटी त्यांचे इंग्रजी भाषांतरही केले. वर उल्लेखिलेल्या सर्व कागदपत्रांचे व बखरींचे आधार त्यांनी घेतले आहेत. पण त्यांनीच एका प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हा पसारा एवढा अवाढव्य आहे की त्यातून भिन्न भिन्न प्रसंगांचे सुसंगत चित्र उभे करणे हे काम अत्यंत अवघड व जिकिरीचे आहे. पण जन्मभर त्या एकाच विषयाला वाहून घेऊन ते कार्य त्यांनी उत्तम रीतीने पार पाडले. यासाठी महाराष्ट्र त्यांचा कायमचा ऋणी राहील.
 मराठी इतिहास संशोधनाची स्थिती अशी प्रगतिपथावर असली तरी ग. ह. खरे यांच्या मते ती अत्यंत असमाधानकारक आहे. फारशी, आरबी, डच, पोर्तुगीज इ. भाषांतील कागदपत्रांचा वापर करून कोणाही महाराष्ट्रीयाने अजून मराठ्यांचा इतिहास लिहिलेला नाही. शिवाय महाराष्ट्राचा सामाजिक, धार्मिक, आर्थिक असा इतिहास अजून लिहिला गेलेला नाही. या दृष्टीने 'महाराष्ट्रजीवन' (२ खंड, संपादक - गं. बा. सरदार, प्रकाशक- जोशी लोखंडे) या ग्रंथाचा उल्लेख केला पाहिजे. या ग्रंथात महाराष्ट्रीय संस्कृतीच्या सर्व अंगांचा प्रारंभकाळापासून १९६० पर्यंतचा इतिहास अनेक विद्वानांनी दिला आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असाच आहे. पण संस्कृतीच्या प्रत्येक अंगाविषयी असे ग्रंथ झाले पाहिजेत. तरच महाराष्ट्राचे सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहील.
 महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास स्वतंत्रपणे लिहिला गेला नाही, असे वर म्हटले आहे. त्या क्षेत्रात काही प्रयत्न झाले आहेत, त्यांचा निर्देश केला पाहिजे. इंग्रज अधिकाऱ्यांनी 'कास्ट्स अँड ट्राइब्ज' यांची जवळ जवळ प्रत्येक प्रांतातील माहिती देणारे ग्रंथ लिहून ठेवले आहेत. मराठीत श्री. आत्रे यानी लिहिलेले 'गावगाडा' हे पुस्तक या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यात महाराष्ट्रीय ग्रामसंस्थेचे संपूर्ण चित्रण आलेले आहे. श्री ना गो. चापेकर याचे 'आमचा गाव' हे पुस्तक समाजशास्त्रीय दृष्टीने असेच महत्त्वाचे आहे. पण या क्षेत्रातले सर्वात मोठे कार्य म्हणजे डॉ. गो. स. घुर्ये यांचे. त्यांची बहुतेक पुस्तके अखिल भारतीय समाजशास्त्रीय प्रश्नांबद्दल आहेत. पण बहुतेकांत महाराष्ट्राबद्दल पुष्कळ माहिती आहे. जातिसंस्था, कुटुंबसंस्था, वैवाहिक जीवन, यांचे सखोल विवेचन त्यांच्या ग्रंथांत असते. शिवाय ठाकूर, कातकरी, वारली, कोळी इ. आदिवासी जमातींबद्दलही त्यांनी मौलिक संशोधन केले आहे. पण हा सर्व एकाकी प्रयत्न आहे.
 यावरून आणि आतापर्यंत एकंदर संशोधनाचा जो इतिहास वर दिला आहे त्यावरून महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रांतले संशोधन अगदी तुटपुंजे आहे, असे महाराष्ट्रीय पंडितांचे मत आहे, असे दिसते. मो. वा. चिपळूणकर यांनी सृष्टिविज्ञान या विषयातील सशोधनाविषयी हेच म्हटले आहे. भारतीय विद्याभवनाने अखिल भारताचा वेदकाळापासून आतापर्यंतचा इतिहास दहाबारा खंडात लिहिण्याचे कार्य जवळ जवळ पुरे करीत आणले आहे. तसा इतिहास लिहिण्याचा महाराष्ट्रात प्रयत्नसुद्धा झालेला नाही. मराठयांच्या इतिहासाविषयी ग. ह. खरे यांचे मत वर सांगितलेच आहे. तेव्हा या क्षेत्रात सामान्यतः निराशाच दिसते. इंग्रजीच्या व्यासंगाचा अभाव, पैशाची कमतरता आणि मुख्य म्हणजे सर्व आयुष्य वाहून टाकण्याची वृत्ती नाही, ही कारणे प्रामुख्याने याच्या मागे दिसतात.
 आता परकीयांचे साम्राज्य गेले. पण परप्रांतीयांचे आर्थिक साम्राज्य महाराष्ट्रावर जबरदस्त आहे. या सर्वाला वरील उणिवाच कारणीभूत आहेत असे दिसते. याचा अर्थ असा होतो की प्रारंभापासून महाराष्ट्र संस्कृतीत ज्या उणिवा दिसतात त्या अजून तशाच आहेत.
  ब्रिटिश कालातील संशोधनाचे विवेचन झाले. आता या कालखंडातील मराठी साहित्य व मराठी कला यांचा विचार करून महाराष्ट्र संस्कृतीचा हा दीर्घ इतिहास पुरा करावयाचा आहे. पुढील तीनचार प्रकरणांचा तोच विषय आहे.