महाराष्ट्र संस्कृती/शिवछत्रपतींची युद्धविद्या



२२.
शिवछत्रपतींची युद्धविद्या
 


महत्त्व
 समाजाच्या संस्कृतीच्या अभ्यासात त्या समाजाची धर्मनिष्ठा, त्याची अर्थव्यवस्था, त्याचे स्वातंत्र्यप्रेम या घटकांचा जसा समावेश होतो तसाच युद्धविद्येचाही होतो, झाला पाहिजे. कारण ही विद्या नसेल तर संस्कृतीचे इतर सर्व घटक फोल ठरतात. 'शस्त्रेण रक्षिते राज्ये शास्त्रचिंता प्रवर्तते ।' हे व्यासवचन मागे दिले आहे. त्याचा अर्थ हाच आहे. शस्त्रबलाने राज्याचे, समाजाचे रक्षण होत असेल तरच त्या समाजात शास्त्रे, विद्या, धर्म यांचा विजय होतो आणि तसे रक्षण झाले नाही तर विकसित झालेली शास्त्र, प्रौढ झालेला धर्म यांचाही लय होतो. शिवछत्रपतींच्या आधीच्या तीनशे वर्षांच्या कालात महाराष्ट्रात हेच घडत होते. मराठ्यांना शस्त्राने आपल्या राज्याचे- स्वराज्याचे- रक्षण करता येत नव्हते. आणि त्यामुळे येथला धर्म, येथली लक्ष्मी, येथल्या विद्या, कला, येथली शास्त्रे यांचा लोप होण्याची वेळ आली होती. संतांनी आपल्या वाणीने धर्मरक्षणाची पराकाष्ठा चालविली होती. पण सरदारांनी, मुत्सद्दयांनी युद्धविद्येची साथ तिला दिली नाही. म्हणून संतांच्या प्रयत्नांना यावे तसे यश येत नव्हते. शिवाजी महाराजांनी हे जाणले आणि युद्धविद्येची जोपासना करून महाराष्ट्र संस्कृतीचे रक्षण केले.
 सरदारांनी युद्धविद्येची साथ दिली नाही, असे वर म्हटले आहे. त्या सरदारांच्याजवळ ती विद्या नव्हतीच. ते सरदार युद्धे करीत होते, युद्धात पराक्रम गाजवीत होते; पण याला युद्धविद्या म्हणत नाहीत. महाभारतात म्हटले आहे की 'ज्या उपायाने शत्रूचा नाश होतो त्या उपायालाच शस्त्र (म्हणजे शस्त्रविद्या व युद्धविद्या) असे म्हणतात. नुसते हातपाय तोडणे किंवा माना कापणे याला शस्त्र म्हणत नाहीत. 'न शस्त्रं छेदनं स्मृतम्।' (२,५५,९) मराठा सरदार शत्रूचा नाश करण्याचे उद्दिष्टही मनापुढे ठेवीत नव्हते. उलट ते त्याच्या राज्याचा विकास घडवीत होते. तेव्हा त्यांचा पराक्रम म्हणजे युद्धविद्या नव्हे. आणि त्यांचा धर्म हा क्षात्रधर्मही नव्हे. तो लुप्त झालेला क्षात्रधर्म महाराजांनी जागृत केला आणि युद्धविद्येची जोपासना करून हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती, हिंदुपरंपरा यांचे रक्षण केले.

मोठी प्रेरणा
 अशी ही जी युद्धविद्या तिचे पहिले लक्षण म्हणजे ध्येयवाद हे होय. थोर, उदात्त अशा ध्येयवादावाचून लष्कराच्या हातून अद्भुत असे पराक्रम होत नाहीत. युद्ध हा मरणमारणाचा संग्राम आहे. दरघडीला त्यात मृत्यू समोर उभा असतो. तो मृत्यू पत्करूनही मिळविण्याजोगे काही आहे, असे वाटल्यावाचून, तशी निष्ठा, तशी श्रद्धा असल्यावाचून, माणसे अंतिम त्यागाला सिद्ध होत नाहीत. धर्मनिष्ठा, स्वामिनिष्ठा, राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यप्रेम अशी कोणती तरी प्रेरणा मागे असल्यावाचून बलाढ्य शत्रूवर विजय मिळविणे शक्य होत नाही. वॉशिंग्टनच्या लढाया, गॅरीबाल्डीच्या लढाया, माओत्से तुंगच्या लढाया, जपान-चीन, जपान - रशिया या लढाया, परवाच्या व्हिएटनाममधील लढाया यांचा इतिहास हेच सांगतो. डॉ. सुरेन्द्रनाथ सेन यांनी असा सिद्धांतच सांगितला आहे. ते म्हणतात, 'लष्कर कार्यक्षम व्हावे यासाठी, प्रथम त्यात शिस्त असली पाहिजे; पण त्यापेक्षाही त्या लष्करापुढे काही ध्येय असले पाहिजे, ज्यासाठी लढावे असे उदात्त उद्दिष्ट असले पाहिजे. असे ध्येय मराठा वतनदार, सरदार यांच्यापुढे नव्हते. ते स्वार्थी, वतनासक्त होते. अशा वेळी लोकांच्यापुढे शिवाजी महाराजांनी 'हिंदवी स्वराज्य' हे ध्येय ठेवले. त्यामुळेच मराठी जनतेच्या अंगी नवे तेज आले आणि स्वराज्याच्या कार्याला ती सिद्ध झाली.' (मिलिटरी सिस्टिम ऑफ दि मराठाज्, प्रकरण १ ले, शिवाजी व त्याचे अनुयायी )
 'हिंदवी स्वराज्य' हे छत्रपतींचे ध्येय होते आणि मुख्यतः त्यांना धर्मराज्य स्थापावयाचे होते असे डॉ. सेन यांनी म्हटले आहे. गो. स. सरदेसाई, डॉ. बाळकृष्ण या इतिहासपंडितांचे हेच मत आहे; आणि आता हे सर्वमान्य झाले आहे.

मुद्गल रामायण
 शिवछत्रपती म्हणजे मूर्तिमंत ध्येयवाद होते ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. हिंदुधर्माचे रक्षण, हिंदुसंस्कृतीचे पुनरुज्जीवन हे त्यांचे ध्येय तेराव्या चौदाव्या वर्षीच निश्चित झाले होते, याविषयी आजच्या सर्व इतिहासपंडितांचे एकमत आहे. हाच जाज्ज्वल्य ध्येयवाद मराठी सामान्य जनांच्या चित्तात रुजवून त्यांनी त्यांना, 'मारता मारता मरावे, मारूनी आपण उरावे,' यासाठी सिद्ध केले. महाराजांना या क्षात्रधर्माची स्फूर्ती रामायण-महाभारतापासून झाली. म्हणूनच या ग्रंथांचे पठण गडागडावर, आणि लष्करातही व्हावे, अशी योजना त्यांनी केली होती. गो. स. सरदेसाई म्हणतात, महाराष्ट्रात जी राज्यस्थापना झाली तिचे बीज ऐतिहासिक कवींनी पेरले, असे म्हणण्यास चिंता नाही. असे कळते की शिवाजीच्या प्रत्येक किल्ल्यावर मुद्गल कवीचे रामायण असे. या कवीने मुसलमान व मराठे यांची कित्येक चित्रे काढिली आहेत. प्रत्येक किल्ल्यावर रात्री भोजन झाल्यावर हे रामायण वाचीत. तसेच फौजेतही मुद्दाम वाचवीत.' (नेताजी सुभाषचंद्र हे आझाद हिंद सेनेत सावरकरांचे 'सत्तावनचे स्वातंत्र्यसमर' असेच वाचीत असत.) हा मुद्गल कवी म्हणजे सतराव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेला कृष्णदास मुद्गल होय. त्याने फक्त युद्धकांडच रचले आहे. त्याच्या या युद्धकांडाची पारायणे मराठेशाहीत किल्ल्यांकिल्ल्यांवरून नेहमी होत. (असे वि. ल. भावे व ल. रा. पांगारकर यांनी म्हटले आहे.) यामुळेच मराठ्यांचा क्षात्रधर्म जागृत झाला.

कठोर शिस्त
 अत्यंत कडक, कठोर, चोख शिस्त हे महाराजांच्या युद्धविद्येचे दुसरे लक्षण होय. त्या शिस्तीचे स्वरूप आपण पाहिले तर, वरील प्रकारच्या ध्येयवादावाचून असल्या शिस्तीचे पालन करून घेणे सर्वथा अशक्य आहे, हे आपल्या ध्यानात येईल. लष्कराचा तळ पडेल त्याच्या भोवतालचा परिसर उजाड, उद्ध्वस्त होणे हा मागल्या काळी नियमच होता. मुस्लिम लष्करातील शिपाई उभी पिके कापून नेत. घराच्या छपरातील गवत उपसून नेत, धनधान्याची लूट करीत, गावकऱ्यांना वेठीला धरीत आणि स्त्रियांची वाटेल ती विटंबना करीत. त्यांच्या लष्करी छावणीत दासी, बटकी, नर्तकी वारांगना शेकड्यांनी असत, नाचरंग, भोग, धुंदी हेच त्या लष्कराचे नित्याचे जीवन होते. मराठा सरदारांनी सुलतानासाठी लष्करे उभारली त्यांचीही हीच रीत होती. असा भोवतालचा रीतिरिवाज, आणि नित्यक्रम असताना लष्करात, स्त्री केव्हाही दिसता कामा नये, कोणीही बरोबर स्त्री आणता कामा नये, असा दण्डक घालून तो कसून अमलात आणणे हा विचार कोणालाही वेडेपणाचा, विपरीत आणि दुर्घट असाच वाटला असता. पण मोगलांच्या बलाढ्य सत्तेला नामोहरम करून स्वराज्याची स्थापना करण्याचे अती दुर्घट कार्य शिरी घेतल्यानंतर अशा अनंत दुर्घट गोष्टी महाराजांना कराव्या लागल्या आणि त्या त्यांनी करून दाखविल्या. त्यांनी निर्माण केलेली धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वराज्यप्रेम यांमुळेच ते शक्य झाले.

लष्कराची रीत
 महाराजांचे लष्कर पावसाळा सोडून राहिलेले आठ महिने स्वराज्याबाहेर मुलखगिरीवर असे. सभासद लिहितो, 'दसरा होताच छावणीहून लष्कर कूच करून जावे. आठ महिने बाहेर लष्करांनी परमुलखात पोट भरावे. खंडण्या घ्याव्या. लष्करात बायको, बटकी, कलावंतीण नसावी. जो बाळगील त्याची गर्दन मारावी. परमुलखात पोर, बायको न धरावी. मर्दाना सापडला तरी धरावा. गाई न धरावी. बैल ओझ्यास मात्र धरावा. ब्राह्मणांस उपद्रव न द्यावा. खंडणी केल्या जागा बोलीप्रमाणे पैका घ्यावा. कोणी बदअंमल न करावा. आठ महिने परमुलखात स्वारी करावी. वैशाख मासी परतोन छावणीस येताच आपले मुलखाचे सरदेस (सरहद्दीवर) कुल लष्कराचा झाडा घ्यावा. पूर्वील बिशादीचे (लुटीतील सामानाचे) जायते रुजू घालावे. कोणी वस्तू चोरून ठेवील आणि दाखल सरदारांस जाहलियाने शासन करावे अशी लष्कराची रीत.' (सभासद बखर, कलम २९)
 लष्करातील लुटीसंबंधीचा हा नियम दासी-बटकीसंबंधीच्या नियमाप्रमाणेच कटोर आणि विपरीत (!) होता. स्त्री आणि धन यासाठीच माणसे लष्करात जातात. आणि ही नेमकी विलोभनेच छत्रपतींनी नष्ट करून टाकली. मग मराठा माणूस त्यांच्या लष्करात का आला? मराठा मनाची सांस्कृतिक उंची महाराजांनी वाढविली होती. क्षुद्र वासनांच्या पलीकडे त्यांना दृष्टी फेकण्यास शिकविले म्हणून!

कडक राहणी
 काटक, कडक जीवन, ऐषआरामशून्य राहणी, अत्यंत मर्यादित गरजा हे छत्रपतींच्या युद्धविद्येचे तिसरे लक्षण होते. मराठा शिपायाजवळ बोजा, लवाजमा असा मुळी नसेच. त्यामुळेच लष्कराच्या हालचाली अत्यंत चपलतेने होत असत. भाला, धनुष्यवाण, तलवार आणि फार तर बंदुक ही त्याची हत्यारे. अवजड तोफखाना मराठा लष्कर प्रारंभी कधी ठेवीत नसे. कारण मावळी डोंगरी मुलखात त्याचा तसा उपयोगही नसे. या हत्यारांशिवाय मराठा शिपायांचे सामान म्हणजे थोडीशी भाकरी, घोड्याच्या तोबऱ्याचे हरभरे आणि एखादे घोंगडे ! जमिनीवरच ते घोंगडे खालीवर घेऊन ते निजत. घोड्याचा लगाम मनगटालाच बांधून ठेवीत. स्वारी मोठी असली तरी महाराजांसाठी व मंत्र्यांसाठी एक दोन तंबू असत. बाकी सर्व लष्कर उघड्यावरच राहात, झोपत असे. त्यामुळे विद्युत् वेगाने वाटेल तशा हालचाली करून शत्रूला गाठणे, झोडपणे आणि क्षणार्धात नाहीसे होणे हे मराठ्यांना सहज शक्य होत असे.

मोगल मिजास
 या उलट मोगल लष्कराची ऐषआरामी मिजास पाहा. प्रत्येक मोगल शिपायावरोवर एक उंटभर सामान असे. म्हणजे एका मोगल शिपायाच्या सामानातून मराठ्यांच्या एका तुकडीचा निर्वाह व्हावयाचा. मोगल छावणी म्हणजे एक वैभवनगरच असे. सरदारांचा जनानखाना नेहमी बरोबरच असावयाचा. त्यांना हत्यारे नेण्यास माणसे लागत. छापा घालण्यापेक्षा त्यांना जेवणाची काळजी जास्त असे. नाचरंग, विलास हा त्यांचा नित्यक्रम होता. यामुळे मराठे एका दिवसात जी दौड करीत तितकी करण्यास मोगल लष्करास तीन दिवस लागत. (फॉरिन बायॉग्रफीज् ऑफ शिवाजी, या ग्रंथात ही वर्णने आलेली आहेत.) यामुळे मराठ्यांच्या व मोगलांच्या कार्यक्षमतेत जमीन-अस्मानाचा फरक पडे.
 मराठ्यांचे सामर्थ्य कशात होते ते यावरून कळेल. प्रत्यक्ष युद्धातले डावपेच, रणनीती, त्यांचा गनिमी कावा यांचा विचार आपल्याला करावयाचा आहेच, पण त्यांना जे यश मिळाले त्याचे बव्हंशी श्रेय त्यांचा ध्येयवाद, त्यांची करडी शिस्त आणि त्यांची कडक राहणी यांना आहे, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.

एकहुकमी सेना
 शिवछत्रपतींनी शेवटपर्यंत लष्करात उत्तम शिस्त राखता आली याचे महत्त्वाचे कारण हे की त्यांची सेना ही, डॉ. सेन यांच्या म्हणण्याप्रमाणे, राष्ट्रीय सेना होती. ती वतनदारांची किंवा सरंजामदारांची सेना नव्हती. पेशवाईत तिला तसे रूप आले. शिंदे, होळकर, पवार, पटवर्धन अशा भिन्न सरदारांच्या सेना मिळून मराठ्यांचे लष्कर होई. अगदी प्रारंभीच्या काळी काही दिवस महाराजांनीही देशमुख, वतनदार यांच्या सेना जमा करून काम चालविले. पण लवकरच त्यांनी सेनेचे रूप पालटून ती सर्व एका हुकमतीखाली चालणारी राजसेना करून टाकली. त्यामुळे भिन्न हुकमतीमुळे जो घोळ पडावयाचा तो त्यांच्या लष्करात कधीही पडला नाही. प्रारंभी शिलेदारांचे प्रमाण लष्करात बरेच मोठे होते. मराठा लष्करात दोन प्रकारचे घोडेस्वार असत. बारगीर आणि शिलेदार. शिलेदाराजवळ स्वतःच्या मालकीचा घोडा, हत्यारे व सामान असे. बारगिराचा घोडा व सामान सरकारी असे. या फरकामुळे शिलेदार थोडा स्वतंत्र वृत्तीचा सहजच होई. आणि हेच छत्रपतींना नको होते. त्यामुळे थोड्या प्रमाणात तरी एकमुखी हुकमतीला बाध येई. म्हणून शिलेदारांचे प्रमाण त्यांनी कमी करण्याचे धोरण ठेवले. प्रारंभी सरनोबत माणकोजी दहातोडे यांच्या सेनेत तीन हजारांपैकी दोन हजार शिलेदार होते. पण १६५९ सालापर्यंत दहा हजारांत तीन हजार येथवर ते प्रमाण खाली आणण्यात आले. सरकारी घोडदळाला पागा म्हणत. सभासद लिहितो की राजांनी पागेचे प्रमाण हळूहळू वाढविले आणि शिलेदारांना पागेच्या हुकमतीत कायम ठेवले. त्यामुळे लष्कर एकहुकमी झाले आणि करडी शिस्त संभाळणे अगदी सोपे झाले. मोगली किंवा विजापुरी सैन्यात अशी शिस्त कधीच नसल्यामुळे महाराजांना भराभर विजय मिळत गेला.
 युद्धविद्येतल्या मानवी गुणांचा, मनोबलाचा, अंतःसामर्थ्याचा असा विचार झाल्यावर आता मराठ्यांच्या प्रत्यक्ष रणनीतीचा, प्रत्यक्ष युद्धपद्धतीचा विचार करावयाचा.

वृकयुद्ध
 शिवदिग्विजयकारांनी महाराजांच्या युद्धपद्धतीस वृकयुद्ध असे म्हटले आहे. मराठ्यांचा सुप्रसिद्ध गनिमी कावा तो हाच. त्याला कूटयुद्ध किंवा वृकयुद्ध असे भारतातील प्राचीन नीतिशास्त्रज्ञ म्हणत असत. शुक्रनीती या ग्रंथात कूटयुद्धाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. शुक्रमुनी म्हणतात, 'शत्रूचा नाश करण्यास युक्त असे कूटयुद्धासारखे दुसरे युद्ध- म्हणजे युद्धपद्धती- नाही. विजयेच्छू राजाने शत्रूशी गोड बोलावे, आपल्या अपराधाची कबुली द्यावी, सेवा, स्तुती इ. उपायांनी त्याचा विश्वास संपादावा आणि मग त्याचा संहार करावा. प्रबळ राजाने शत्रूस पाणी, दाणागोटा, घास कडबा मिळण्याचे बंद करून त्याला अडचणीचे प्रदेशात घालावा आणि मग त्याचा नाश करावा. शत्रुपक्षातील लोकांना देणग्या द्याव्या, सोनेरुपे द्यावे आणि ते गाफील होऊन निद्रावश झाल्यावर त्यांच्यावर छापा घालावा. नेहमी युद्ध एकाकी अकस्मात मुरू करावे. शत्रूवर एकदम हल्ला करावा आणि क्षणार्धात नाहीसे व्हावे.' (शुक्रनीती अ. ४) शिवदिग्विजयकारांनी वृकयुद्धाचे किंवा गनिमी काव्याचे असेच वर्णन केले आहे, 'वृकयुद्ध म्हणजे पाचचार फौजेच्या टोळ्या कराव्या, शत्रुस समजो न देता, संकेतांनी चालावे, एकाने तोंड लावावे. तो परसैन्य अल्पसैन्यावर घे घे मार करीत उठते, मग त्या लोकांनी पळ काढावा, म्हणजे सैन्य मोडले म्हणून पाठी लागणारांस इतर टोळ्यांनी चहूकडून घेरावे. अल्पसैन्य मोठे सैन्यास मारते होऊन, मोठे सैन्यास किती फौज आहे तिची गणती न सापडता, हतवीर्य होते. तेणे करून फत्तेह वृकयुद्धी जाणावी.'
 शिवछत्रपतींच्या रणनीतीचे हे उत्कृष्ट वर्णन आहे. त्यांना या रणनीतीचा आश्रय करण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. आदिलशाही किंवा मोगल यांचे सेनाबल इतके अफाट होते की त्यांच्या समोरासमोर युद्ध करणे, प्रारंमीच नव्हे तर, पुढेही मराठ्यांना अशक्य होते. साल्हेर किंवा वणीदिंडोरी ही युद्धे त्यांनी मैदानात समोरासमोर केली आणि मोठे विजयही मिळविले हे खरे, पण ते अपवाद होत. बाकी सर्वत्र शिवछत्रपती गनिमी काव्यानेच लढले. कारण मोगलांइतके माणूसबल त्यांच्याजवळ नव्हते आणि तितके सैन्य उभारण्यास पुरेल इतका पैसाही त्यांच्याजवळ नव्हता. शिवाय सह्याद्रीची दऱ्याखोरी त्यांच्या पाठीशी उभी होती. वृकयुद्धाला अत्यंत अनुकूल असा हा भू- प्रदेश असल्याने महाराजांनी त्याच पद्धतीचा आश्रय करण्याचे ठरवून अनेक शत्रूंना तेथेच गारद केले.
 नम्र बोलून, भ्यालोसे दाखवून अफजलखानाचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि हव्या त्या ठिकाणी आणून, त्याचा वध केला. आणि मग सह्याद्रीच्या दऱ्यांत लपून बसलेल्या मराठा सैन्याच्या अनेक टोळ्यांनी खानाच्या सैन्यावर अचानक हल्ला करून, त्याची लांडगेतोड केली. शास्ताखानाचा सरदार उंबर खिंडीतून कोकणात उतरत असताना मराठ्यांनी त्यांची अशीच लांडगेतोड केली. प्रथम हेराकरवी त्याची सर्व माहिती छत्रपतींनी आणवली, मग त्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडीत लष्कर लपवून ठेवले आणि तो अडचणीच्या जागी येताच त्याच्यावर एकदम हल्ला केला आणि त्याचे सर्व सामान, घोडे, तोफखाना लुटून घेऊन त्याची शरणागती पतकरून त्याला हाकलून दिले. पन्हाळ्याला सिद्दी जोहार याने वेढा घातला होता. महाराजांनी किल्ला खाली करतो व स्वतः स्वाधीन होतो, असे त्याला प्रत्यक्ष भेटून सांगितले. त्यामुळे बेटा गाफील झाला आणि महाराज निसटून गेले. शास्ताखानावरील हल्ला हा वृकयुद्धाचाच प्रकार. छावणीत शिरण्यास सशस्त्र मराठ्यांना बंदी होती. तेव्हा दोन ब्राह्मण पाठवून छत्रपतींनी सर्व बातमी काढली; आणि मग, आम्ही पहारेकरी पहारा बदलीत आहोत, अशी थाप देऊन चारशे (केवळ चारशे) लोकांनिशी ते आत शिरले व खानावर त्यांनी हल्ला केला. 'महत्समुदायाशी किंचित् समुदाय सैन्यानी लढून यश संपादावे, हाही प्रकार असाच.' असे शिवदिग्विजयकारांनी म्हटले आहे, ते या शास्ताखानाच्या प्रसंगावरूनच म्हटले असेल. उंबराणीच्या लढाईत प्रतापराव गुजर याने बदलोकखानाचा असाच पाडाव केला.
 मैदानी लढाया, समोरासमोरचे युद्ध छत्रपतींनी केलेच नाही असे नाही. पण तशी उदाहरणे फार थोडी. बव्हंशी ते कूटयुद्धाचाच अवलंब करीत. त्याची कारणे वर दिलीच आहेत. मात्र मैदानी लढाईस त्यांची तयारी मात्र केव्हाही असे. उत्तर- काळात, सभासद, मल्हारराव रामराव यांच्या मते, छत्रपतींचे लष्कर लाखापर्यंत गेले होते. त्याचा सरंजामही खूप वाढला होता. लष्करी शिक्षणाची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. त्यामुळे मैदानी लढाईचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी बेधडक तशी लढाईही केली.

साल्हेर
 मैदानी लढायांत साल्हेरचा संग्राम फार प्रसिद्ध आहे. १६७० च्या ऑक्टोबरात मोरोपंत पिंगळे पेशवा हा बागलाणात शिरला आणि त्याने त्रिंबक, रावळा जवळा हे किल्ले घेतले. प्रतापराव गुजर याने वऱ्हाडात शिरूर, बहादरपुरा व कारंजा इ. शहरे लुटून बऱ्हाड प्रांत साफ नागविला. या आधी सुरतेची लूट झालीच होती आणि ती घेऊन महाराज रायगडास जात असताना दाऊदखान खुरेशी याने त्यांना वणी-दिंडोरीपाशी गाठले. तेव्हा तेथे मोठी लढाई होऊन औरंगजेबाचा हा नामांकित सरदार सपशेल पराभव पावला. यामुळे धास्ती घेऊन बादशहाने महाबतखान, दिलीरखान आणि बहादुरखान असे तीन मोठे सरदार दक्षिणेत पाठविले. १६७१ च्या जानेवारीत मराठ्यांनी साल्हेरचा किल्ला घेतला होता. तो उठविण्यासाठी जूनमध्ये महाबतखान व दिलीखान यांनी त्याला वेढा घातला. त्यावर मोरोपंत पिंगळे व प्रतापराव गुजर चालून आले, तेव्हा १६७२ च्या फेब्रुवारीत घनघोर संग्राम होऊन मोगलांचा पार धुव्वा झाला. त्यांचे तीस सरदार व दहा हजार लोक कामास आले. आणि मराठ्यांना सहा हजार घोडे, हजारो उंट, सवाशे हत्ती, मालमत्ता, जवाहीर, कापड अशी अगणित लूट मिळाली. या वेळी मोगलांचे चार मातब्बर सरदार चालून आले असून मोरोपंत पिंगळ्याने उत्कृष्ट व्यूह रचून त्यांना नामोहरम केले. यामुळे या संग्रामाचे मह्त्त्व फार मानले जाते. मराठे ही एक नवी मोठी शक्ती दक्षिणेत उदयास आली, हे या लढाईमुळे औरंगजेबाला आणि इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या पाश्चात्यांनाही कळून आले. आणि हेही कळून आले की मैदानी लढायांतही मराठे भारी सामान असलेल्या शत्रूला पराभूत करू शकतात.

आक्रमण (पर-आक्रम)
 शिवछत्रपतींच्या रणनीतीचा आपण विचार करीत आहो. त्यांच्या वृकयुद्धपद्धतीचा वर विचार केला. अलीकडे, 'आक्रमण हेच संरक्षण', या तत्त्वाची बरीच चर्चा सर्वत्र चालते. महाराजांच्या रणनीतीत या तत्त्वाचा निश्चित समावेश केलेला होता. एका लहानशा जहागिरीपासून हिंदवी स्वराज्यापर्यंत त्यांना पल्ला गाठावयाचा होता. अबे कॅरेने म्हटल्याप्रमाणे, सिंधू ते गंगा या विस्तीर्ण भूभागात छत्रपतींना स्वराज्य स्थापावयाचे होते. तेव्हा सतत, अखंड, आक्रमण या धोरणाचा अवलंब करण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हते. शिवाय, या धोरणामुळे उपक्रम आपल्या हाती राहून, युद्धाची भूमी व युद्धाची वेळ आपल्याला ठरविता येते, हे नेहमीचे फायदे आहेतच. अर्थात यासाठी कमालीचे साहस, समयज्ञता, कुशल नेतृत्व इ. दुर्मिळ गुण यांची गरज असते. पण ते गुण घेऊनच महाराज जन्माला आले होते. चौदाव्या पंधराव्या वर्षी आपली मुद्रा विश्ववंदिता करण्याची आकांक्षा आणि हिंदवी स्वराज्याची घोषणा या गोष्टी साहसी वृत्तीवाचून शक्यच झाल्या नसत्या.

साहसे श्रीः ।
 १३५७ च्या एप्रिलात छत्रपतींनी जुन्नर, अहंमदनगर या मोगली मुलखावर हल्ला केला. हे साहस म्हणजे इतिहासपंडितांच्या मते अगदी वेडेपणाच होता. कोकणातील कल्याण, भिवंडी या विजापुरी मुलखावर महाराजांचे छापे घालण्याचे काम चालूच होते. अशा वेळी आदिलशाहीपेक्षा शतपट बलिष्ठ अशा मोगलांशी त्यांनी वैर ओढवून घेतले, आणि तसे काही कारण नसताना, हा वेडेपणा नाही तर काय ? डॉ. देवपुजारी यांनी 'शिवाजी अँड दि मराठा आर्ट ऑफ वॉर' या आपल्या ग्रंथात, तसे स्पष्ट शब्दांत म्हटलेही आहे. (पृ. ६३, ७०). पण आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की अशा वेड्या साहसावाचून छत्रपतींना काहीच साध्य झाले नसते. चारशे स्वारांनिशी लाख दीडलाख लष्कर असलेल्या शास्ताखानाच्या तळावर छापा घालणे हा कोणत्या दृष्टीने शहाणपणा होता ? सुरतेची स्वारी ही कोणत्या सावधगिरीच्या हिशेबात बसते ? महाराष्ट्रात स्वराज्याचा बंदोबस्त पुरता लागलेला नसताना जिंजीवेलोर इकडे स्वारी करण्याचे काय कारण होते ? महाराजांच्या आयुष्यातील एकही मुकाबला असा नाही की जेव्हा मृत्यू त्यांना चाटून गेलेला नाही. आणि हे महाराजांच्याच जीवनातले आहे असे नाही. नेपोलियन, वॉशिंग्टन, चर्चिल, लेनिन, सन्यत सेन, कोणताही थोर क्रांतिकारक किंवा राज्यकर्ता घ्या. वेड्या साहसावाचून त्याला मिळाले ते यश कधीच मिळाले नसते.

राजनीतीची जोड
 जुन्नरवर छत्रपतींनी छापा घातला, तेव्हा औरंगजेब विजापूरची आदिलशाही खलास- करण्याच्या उद्योगात गुंतला होता. बिदर, कल्याणी, परिंडा हे किल्ले त्याने घेतले होते आणि हा संग्राम बरेच दिवस चालणार होता. ही संधी छत्रपतींनी साधली. इतक्यात शहाजहानचा हुकूम आला आणि विजापूर- मोगलयुद्ध थांबले. त्यामुळे त्यांच्यावर बाका प्रसंग आला होता. दोन शत्रू- दोन बलाढ्य शत्रू- एकदम दुखवले गेले होते. तेव्हा रणनीतीला राजनीतीची जोड देऊन, त्यांनी औरंगजेबाकडे वकील धाडून, माफीची याचना केली. बादशहांच्या सेवेत येण्यास आपण तयार आहोत, असे कळविले आणि माघार घेतली. तरीही या वेळी एवढ्याने भागले नसते. शिवाजीचा नायनाट करून टाका, अशी आपल्या अधिकाऱ्यांना औरंगजेबाने पत्रे लिहिली होती. इतक्यात शहाजहान आजारी पडला आणि गादी बळकावण्यासाठी त्याला तिकडे जावे लागले आणि महाराजांना श्वास टाकायला वेळ मिळाला. मोगल- विजापूर युद्ध थांबले. त्यामुळे फासा प्रतिकूल पडला. पण शहाजहान आजारी पडल्यामुळे तो सुलटा झाला आणि औरंगजेब पंचवीस वर्ष दक्षिणेत येऊ शकला नाही. तोपर्यंत महाराजांनी त्यालाही दुर्जय अशी शक्ती महाराष्ट्रात निर्माण करून ठेवली होती.

चौफेर चढाई
 अफजलखानाला मारल्यावर आदिलशाहीवर महाराजांनी सर्व दिशांनी आक्रमण सुरू केले, हे मागे सांगितलेच होते. याच वेळी शास्ताखान दक्षिणेत आला व पुण्याला तळ ठोकून बसला. तरी महाराजांनी आक्रमणाचे धोरण सोडले नाही. मोगलांच्या तोंडावर नेताजीस ठेवून ते स्वतः दक्षिण कोकणात उतरले. तेथे पालवणचा राजा यशवंतराव, शृंगारपूरचा राजा सुर्वे यांना नामोहरम करून त्या प्रांतावर त्यांनी आपली सत्ता वसविली. मग राजापूरच्या इंग्रजांकडे ते वळले. पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी त्यांनी सिद्दी जोहाराला दारूगोळ्याची मदत केली होती. याची त्यांना चांगली अद्दल घडवून महाराज परत आले. १६६३ च्या एप्रिलात शास्ताखानावर छापा घातल्यावर सर्व मुस्लिम विश्वाला क्षणभर घेरी आल्यासारखे झाले. ती संधी साधून छत्रपतींनी चहूकडे चढाई सुरू केली. कोकणात उतरून त्यांनी कुडाळ प्रांत परत घेतला आणि तो पुन्हा परत घेण्यासाठी खवासखान व मुधोळकर बाजी घोरपडे चालून येतात असे कळताच त्यांनी स्वतःच मुधोळवर चाल केली, बाजी घोरपड्यास ठार मारले आणि खवासखान पुढे येताच त्यास खराब करून विजापूरकडे पळवून लावले. या निरनिराळ्या चढायांतूनच मध्ये वेळ काढून जाने. १६६४ मध्ये त्यांनी सुरतेवर छापा घालून अपार द्रव्य रायगडला आणले.

राजे - किताब
 आग्र्याहून सुटून आल्यावर दोन-अडीच वर्षे ते स्वस्थ बसले होते. त्या काळात औरंगजेबाला ते आर्जवाची, माफीची, शरणागतीची पत्रे पाठवीतच होते. औरंगाबादेस त्यांनी संभाजीला मनसबदार म्हणून ठेवले. त्याला पाच हजाराची मनसबदारी होती. त्याच्या दिमतीला प्रतापराव गुजर व आनंदराव यांना ठेवले होते. ही राजनीती इतकी यशस्वी झाली की औरंगजेबाने महाराजांना 'राजे' असा किताब देऊन मराठ्यांच्या स्वतंत्र राज्यास जवळजवळ मान्यताच दिली. तीन एक वर्षे तयारी करण्यात घालविल्यानंतर महाराजांनी पुन्हा चढाई आक्रमण सुरू केले. या वेळी आक्रमणे सिद्धीस जातील अशी परिस्थितीच निर्माण झाली होती.
 अफगाणयुद्धात औरंगजेब गुंतला होता. त्यातच १६६९ साली त्याने रजपुतांशी युद्ध सुरू केले आणि समस्त राज्यातील हिंदूंची मंदिरे पाडण्याचा एकसहा हुकूम जारी केला. याच सुमारास शहाजादा मुअज्जम हा दक्षिणचा सुभेदार आणि त्याचा सरदार दिलेरखान यांच्यात सडकून वाकडे आले. इतके की खानाला पकडण्यासाठी शहाजादा व जसवंतसिंह चालूनही गेले. स्वातंत्र्याची आकांक्षा धरणाऱ्या वीरपुरुपाला यापेक्षा मोठी संधी ती काय असणार ? महाराजांनी पूर्वी जशी आदिलशाहीवर चढाई केली होती तशीच आता मोगली मुलखावर चढाई सुरू केली. प्रथम सिंहगड, मग सुरत, मग बागलाण- साल्हेर, मुल्हेर- बऱ्हाड, पन्हाळा, आणि राज्याभिषेकानंतर फाेंडा किल्ला, सांधे, बिदनूर आणि मग कर्नाटक ! या आक्रमक लढायांतूनच मराठ्यांचे राष्ट्र तयार झाले, असे सरदेसाई यांनी म्हटल्याचे मागे सांगितलेच आहे.

चौथाई
 शत्रूच्या प्रदेशातील व्यापारी पेठांवर, धनाढ्य शहरांवर स्वारी करून, धाड घालून, त्यांच्याकडून चौथाई वसूल करणे हा शिवछत्रपतींच्या युद्धपद्धतीतला आणखी एक महत्त्वाचा विशेष होता. यालाच इंग्रज, पोर्तुगीज, मुस्लिम इतिहासकारांनी लूट म्हटले आहे, आणि याचसाठी छत्रपतींना ते लुटारू म्हणत असत. पण महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या योजनेतली ही पहिली पायरी होती. शत्रूंनी आक्रमिलेल्या प्रदेशातून चौथाई वसूल करणे याचा अर्थ, शत्रूची सत्ता तेथून नष्ट करण्यास आरंभ करणे, असा होतो. आणि तेच महाराजांना करावयाचे होते. शिवाय स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी लागणारा पैसा मिळविण्याचा तो एक राजमार्ग होता. महाभारत आणि शुक्रनीती यांत राजाने हा मार्ग अवलंबिणे अवश्य आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. महाभारतकार म्हणतात, 'सैन्य हे धर्माच्या प्रवृत्तीस मुख्य आधार असून धर्म हाच प्रजेचा आधार आहे. आणि कोश (धन) हा तर सैन्याचा आधारस्तंभ होय. हा कोश शत्रूला पीडा दिल्यावाचून कधी समृद्ध होत नाही. म्हणून प्रजापालनाच्या कामी द्रव्य संपादण्यासाठी हिंसा करावी लागली तरी राजाला त्यामुळे दोष लागत नाही.' (शांति. अ. १३०) शुक्रनीतीतही म्हटले आहे की 'राजाने वाटेल ती भयंकर कर्मे करून आपले गेलेले राज्य परत मिळवावे. आणि यासाठी शत्रूची सर्व संपत्ती लुटून आणावी.' (शुक्र. अ. १)

द्रव्यसंचय
 ही प्राचीन राजनीती अनुसरूनच महाराजांनी शत्रुप्रदेशातील धनाढ्य शहरांवर छापे घालून अपार द्रव्यसंचय केला. असे छापे घालण्यापूर्वी, त्या त्या शहरातील अधिकाऱ्यांना, व्यापाऱ्यांना, सावकारांना ते पत्रे धाडून कळवीत असत की तुम्ही आम्हांस सरकारी वसुलाच्या चौथ्या हिश्शाइतकी रक्कम, म्हणजेच चौथाई, जर बिनतक्रार दिली तर तुम्हांला आम्ही कसलाच त्रास देणार नाही. 'इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी' या ग्रंथात सुरत, हुबळी, नंदुरबार येथील अधिकाऱ्यांना शिवाजीने अशी पत्रे पाठविली होती, हे नमूद केलेले आहे. ज्या शहरचे लोक त्यास चौथाई देण्याचे कबूल करतात, त्या शहरांना शिवाजी कधीही उपसर्ग देत नाही, असेही तेथे सांगितलेले आहे (भाग १, पृ. २१९, २२१. भाग २, पृ. २९७). मोगल, आदिलशाही यांनी आक्रमिलेला जो मुलूख सोडवून महाराज तेथे स्वतःची सत्ता स्थापन करीत तेथे तत्काळ उत्तम राज्यकारभार चालू करण्याची ते व्यवस्था करीत. कल्याण-भिवंडी या परगण्यांत त्यांनी तसे केल्याचे पाश्चात्य लेखकांनीच नमूद केले आहे. आणि जे त्यांनी कल्याण-भिवंडी येथे केले तेच सर्व महाराष्ट्रात आणि पुढे सर्व हिंदुस्थानात करावयाचे हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते. याचाच अर्थ हिंदवी स्वराज्य ! अशा महत्कार्यासाठी सर्व प्रकारे साह्य करणे हे सर्व नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे, सावकारांचे आद्य कर्तव्य होते. ते ज्यांनी केले नाही, त्यांच्याकडून बळाने धन वसूल करणे हे प्राप्तच होते. १६६४ साली महाराजांनी सुरतेतून प्रथम अशी वसुली केली आणि पुढच्या पंधरा वर्षात बऱ्हाणपूर, कारंजा, कारवार, हुबळी, नासिक, अथणी, धरणगाव, औरंगाबाद अशा सुमारे वीस शहरांवर छापे घालून स्वराज्यस्थापनेसाठी त्यांनी अपार धन मिळविले. आणि त्या धनाच्या साह्याने मोठी सेना उभारून स्वराज्याची स्थापना केली.

लुटारू कोण ?
 हे उदात्त उद्दिष्ट ज्यांचे नव्हते त्यांनी जो द्रव्याचा अपहार केला, तो मात्र शुद्ध लुटारूपणा होता. पोर्तुगीज, इंग्रज, आदिलशाही, मोगल या सत्ता या कायमच असा लुटारूपणा करीत असत. आदिलशाही किंवा मोगल यांना सैन्य ठेवण्यासाठी इतका पैसा लागत नसे. कारण ते सरदारांना सरंजाम देत आणि त्यांना सैन्य उभारावयास सांगत. ते सरदार स्वतःच्याच प्रजेची कशी लूट करीत असत हे मागे सांगितलेच आहे. याचा अर्थ असा की या सत्ता परकी मुलखात तर लुटारूपणा करीतच, पण स्वतःच्या प्रजेलाही लुटून सैन्याचा खर्च भागवीत असत. या तुलनेने छत्रपतींनी सुरू केलेली चौथाईची पद्धत ही फारच सोज्ज्वळ व न्याय्य दिसते. याच दृष्टीने, प्राचीन राजनीति- शास्त्रज्ञांनी कोश या रीतीने समृद्ध करणे हा राजाचा धर्मच होय, असे म्हटले आहे.

रजपूत - तुलना
 महाराजांच्या रणनीतीचे स्वरूप वरील वर्णनावरून कळून येईल. रजपूत राणे- महाराणे यांनी जी युद्धपद्धती अवलंबिली होती, तिच्याशी तुलना करताना युद्धविद्येत शिवछत्रपतींनी केवढी क्रांती केली होती हे कळून येईल. रणात माघार घ्यावयाची नाही, शत्रूला पाठ दाखवावयाची नाही हे रजपूतांचे मुख्य तत्त्व. त्यामुळेच त्यांचा नाश झाला. कारण खिलजीच्या लष्कराइतके प्रचंड लष्कर त्यांना कधीच उभारता आले नाही. तेव्हा दर वेळी रणांगणात हजारो वीरांचा नाश, आणि हजारो रजपूत रमणींचा जोहार, हाच तेथे नियम होऊन बसला. महाराजांनी ती धर्मयुद्धपद्धती अवलंबिली असती तर त्यांना कधीच विजय मिळाला नसता. मायावी शत्रूशी जे मायावी पद्धतीने वागत नाहीत ते मूढ लोक पराभूत होतात असे, भारवीने म्हटले आहे. कपटनीती, कूटयुद्ध यांचा आश्रय केल्यावाचून विजय मिळत नसतो, असे श्रीकृष्णांनी अनेक वेळा सांगितले आहे. रजपुतांनी या प्राचीन तत्त्वाकडे, नसत्या मोठेपणाच्या कल्पनेमुळे, दुर्लक्ष केले आणि स्वतःचा आणि भारताचा नाश करून घेतला.

पडत्या प्रसंगी
 रजपूत ठकाशी कधी ठक झाले नाहीत आणि पडता प्रसंग ओळखून शरणागती पत्करावी, हेही त्यांनी केले नाही. जयसिंगाची स्वारी आली तेव्हा महाराजांनी रजपुती अभिमान धरून रणात धारातीर्थी आत्मबलिदान केले असते तर ते हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती व हिंदुसमाज यांचेच बलिदान ठरले असते. रजपुतांच्या तसल्या अभिमानामुळे ती वेळ आलीच होती. सर्व राजस्थान परतंत्र झाला, प्रत्येक रजपूत राजाला मोगलांचा चाकर व्हावे लागले आणि आपल्या मुलीबाळी मोगलांना अर्पण कराव्या लागल्या. छत्रपतींनी श्रीकृष्णप्रणीत युद्धनीतीचा अवलंब केला नसता तर महाराष्ट्राच्या, आणि नंतर सर्व हिंदुस्थानाच्या कपाळी हेच आले असते.

आक्रमणाअभावी
 पण रजपुतांच्या अंगचे खरे क्षात्रतेज, गझनीच्या महंमदाच्या स्वाऱ्यांपासून लोपले होते, हेच खरे. ठकाशी ठक होणे, पडता काळ ओळखून तात्पुरती शरणागती पत्करणे, हे त्यांच्या धर्मयुद्धात बसत नसेल, पण शत्रूवर आक्रमण हे तर त्यात बसत होते ना ? पण रजपूत राजांनी एकट्याने किंवा मिळून दिल्लीवर आक्रमण असे कधी केलेच नाही. दिल्लीला मुस्लिमसत्ता स्थापन झाल्यानंतर पुढल्या चारशे वर्षांत किती तरी वेळा भाऊबंदकीमुळे, वायव्येकडच्या स्वाऱ्यांमुळे, सुलतानाच्या नालायकीमुळे दिल्ली अगदी दुबळी झालेली होती. कोणीही येऊन दिल्लीला राज्य स्थापावे असे अशी स्थिती अनेक वेळा झालेली होती; आणि तसे अनेक वेळा घडतही होते. पण असा पराक्रम रजपुतांनी एकदाही केला नाही. रजपूत आपल्या संस्थानी डबक्यातून बाहेर कधी पडलेच नाहीत. उलट शिवाजी महाराजांनी पहिल्यापासून जहागिरीच्या बाहेरच दृष्टी टाकलेली होती. आणि पुढील काळात, वर सांगितल्याप्रमाणे, आक्रमण हीच रणनीती त्यांनी अंगीकारलेली होती. ते आणखी जगते तर दिल्लीवरहीगे ले असते. या आक्रमक रणनीतीमुळेच त्यांना विजय मिळत गेले. रजपुतांनी हीच नीती अनुसरली तसती तर अफगाणिस्थानातच मुस्लिमांना पायबंद बसून दिल्लीपर्यंत मुस्लिम पोचलेच नसते. पण त्यासाठी हिंदवी स्वराज्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवावे लागते !

संस्थानी डबकी
 आणि रजपुतांच्या युद्धविद्येतली खरी उणीव हीच होती. असा विशाल ध्येयवाद त्यांच्या ठायी केव्हाच नव्हता. मराठे सरदार जसे वतनासक्त होते तसेच रजपूतही होते. जोधपूर, बिकानेर, जेसलमीर, चितोडं अशी निरनिराळी संस्थाने राजस्थानात होती. त्यांच्या राजांना आपल्या संस्थानापलीकडे सर्व 'राजस्थान' पाहण्याची दृष्टी कधी आलीच नाही. सर्व राजस्थान राष्ट्र एकछत्री करण्याचा तेथे कोणी कधी प्रयत्नही केला नाही. ज्याला त्याला आपल्या अल्पशा जयपूर, जोधपूरचा अभिमान आणि आपलेच कुल श्रेष्ठ, हा दुरभिमान. जयपूर हे जोधपूर वंशापुढे वाकणार नाही, जोधपूर हे बिकानेरपुढे वाकणार नाही. मात्र हे सर्व वंश मुस्लिमांपुढे वाकण्यास कमीपणा मानीत नसत. भूषणच मानीत असत. ते अल्प अभिमान आणि हे वृथा वंशाभिमान त्यांनी टाकले असते, 'रजपूत तेवढा मिळवावा' हे उदात्त ध्येय डोळ्यापुढे ठेवले असते, आणि मऱ्हाष्ट्र राज्याप्रमाणे 'राजस्थान राज्य' स्थापिले असते तर दिल्लीला मुस्लिम सत्ता प्रस्थापित झालीच नसती. ती तशी होऊन अगदी दृढमूल झाल्यावरही ती समूळ नष्ट करण्यात मराठ्यांना यश आले, त्याचे कारण म्हणजे शिवछत्रपती प्रणीत युद्धविद्या हे होय.

गिरिदुर्ग
 शिवछत्रपतींच्या युद्धविद्येतले आणखी दोन महत्त्वाचे भाग म्हणजे त्यांचे गिरिदुर्ग, किल्ले आणि आरमार हे होत. त्यांचा विचार करून हे प्रकरण संपवू. स्वराज्याची स्थापना, त्याचे संरक्षण आणि त्याचा विस्तार या दृष्टीने रामचंद्रपंत अमात्य यांनी या दोहींचे उत्तम विवेचन केले आहे. त्यांच्या मते, 'गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी ! संपूर्ण राज्याचे सार म्हणजे दुर्ग; दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रभाभग्न, उद्ध्वस्त होतो.' प्राचीन राज्यशास्त्रज्ञांनीही दुर्गाचे असेच महत्त्व सांगितले आहे. 'दुर्गाच्या आश्रयाने एक सशस्त्र मनुष्य शंभरांशी लढूशक तो. शंभर माणसे दहा हजारांशी लढू शकतात. यास्तव राजाने किल्ल्यांचा आश्रय करावा.' असे शुक्रनीतीत म्हटले आहे.

तीनशे साठ
 किल्ल्यांचे हे महत्त्व जाणूनच महाराजांनी त्यावर अमाप पैसा खर्च केला. आदिलशाही, निजामशाही, सुलतान सरदारांना जहागिरी देत. पण त्या जहागिरीतील किल्ले स्वतःच्या ताब्यात ठेवीत. यातील मर्म ध्यानात घेऊन महाराजांनी प्रथम सिंहगड, तोरणा, पुरंदर, हे किल्ले हस्तगत करण्याचा उद्योग आरंभिला; आणि कल्याण, भिवंडी, चिपळूण असा कोणताही नवा प्रदेश हाती आला की प्रथम ते तेथील किल्ले ताब्यात घेत, मोडलेले किल्ले पुन्हा बांधून काढीत आणि मोक्याची ठिकाणे हेरून, तेथे नवे किल्ले बांधीत. यावर इतका अमाप पैसा खर्च होई की मोरोपंत पेशवे, निराजीपंत मुजुमदार यांना सुद्धा चिंता वाटू लागली. तसे त्यांनी महाराजांना सांगितलेही. त्यावर महाराज म्हणाले, 'जे करवणे ते समजोनच करीत आहो. आपणांस धर्मस्थापना करणे व राज्य संपादणे. सर्वांस अन्न लावून शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यामुळे होते. दिल्लीद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे जुने तीनशेसाठ किल्ले हजरीस आहेत. एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत.' (शिवदिग्विजय, पृ. १९०)

स्थापत्यकला
 चित्रगुप्ताने महाराजांच्या एकंदर किल्ल्यांची संख्या अशीच दिली आहे. डोंगरी दुर्ग २४०, मैदानी १०८ आणि जलदुर्ग १३. हे सर्व किल्ले दुर्भेद्य करून टाकण्यासाठी, अगणित पैसा तर अवश्य होताच; पण असामान्य असे शिल्पज्ञानही आवश्यक होते. आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की महाराज स्वतःच अगदी असामान्य असे स्थापत्यविशारद म्हणजे इंजिनियर होते, असे पाश्चात्यांनीच लिहून ठेवले आहे. जिंजी किल्ला घेतल्यावर त्याची नवी बांधणी करण्यासाठी त्यांना इंजिनियर हवे होते, ते त्यांनी इंग्रज, फ्रेंच यांच्याकडे मागितले. ते त्यांनी दिले नाहीत, तेव्हा स्वतःच आखणी व देखरेख करून, छत्रपतींनी तो किल्ला इतका उत्तम बांधला की तसा पाश्चात्य इंजिनियरांनाही बांधता आला नसता, असे फ्रेंच कागदपत्रांत म्हटले आहे. मोरोपंत, अनाजी दत्तो हेही पुढे या स्थापत्यविद्येत निष्णात झाले.
 रामचंद्र पंत म्हणतात, 'हे राज्य तर तीर्थरूप कैलासवासी थोरले स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश न होय त्या त्या देशी स्थल विशेष पाहून गड बांधले, तसेच जलदुर्ग बांधले. त्यावरून आक्रम करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महाशत्रू चालून आला असताना...राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले.'

आरमार
 गडकोट किल्ल्याप्रमाणेच नौदल किंवा आरमार हेही एक महत्त्वाचे राज्यांग आहे. 'ज्यांच्याजवळ आरमार त्यांचा समुद्र' असे अमात्यांनी म्हटले आहे आणि त्याचा प्रत्यय छत्रपतींना हरघडीस येत होता. इ. स. १५०० पासून पोर्तुगीजांची अप्रतिहत सत्ता पश्चिम समुद्रावर स्थापन झाली होती. निजामशाही, आदिलशाही एवढेच नव्हे, तर दिल्लीचे मोगलसुद्धा त्या सत्तेला आव्हान देऊ शकत नव्हते. त्यांची व्यापारी आणि यात्रेकरू जहाजे यांना समुद्रात शिरताना पोर्तुगिजांचा परवाना काढावा लागे. हे फार अपमानास्पद होते. पण त्या मोठ्या सत्तांचाही काही इलाज चालत नव्हता. याच किनाऱ्यावर राजापूरच्या समोर, जंजिरा किल्ल्यात सिद्दीने हळूहळू जम बसविला. आणि थोड्याच अवधीत इंग्रज व डच यांनीही आपल्या वखारी तेथे घालून त्यांच्या संरक्षणासाठी लहानशी आरमारेही सज्ज केली. यामुळे कारवारपासून सुरतेपर्यंतचा समुद्रकिनारा पाश्चात्यांच्या ताब्यात गेला.
 व्यापारी व यात्रेकरू जहाजे यांना अडवणे, त्रास देणे एवढाच पोर्तुगीज आणि सिद्दी यांचा उपद्रव नव्हता. सर्व कोकणपट्टीत ते हिंदूंचा अनन्वित छळ करीत. ते घरेदारे लुटीत स्त्रियांवर अत्याचार करीत, हजारो लोकांना पकडून अरबस्थानात नेऊन गुलाम म्हणून विकीत आणि हजारोंना सक्तीने बाटवीत. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची घोषणा केली, तेव्हा कोकणची स्थिती अशी होती. साहजिकच आपले स्वतंत्र नौदल स्थापण्याचा त्यांनी तेव्हापासूनच निश्चय केला होता. सरदेसाई यांच्या मताप्रमाणे १६५३ सालीच महाराजांनी पद्मदुर्ग बांधला आणि त्यांनी स्वतःच एका पत्रात म्हटल्याप्रमाणे, 'पद्मदुर्ग बसवून राजापुराच्या उरावरी दुसरी राजापुरी केली.' पुढे मालवण येथे सिंधुदुर्ग बांधला. त्याचे वर्णन चित्रगुप्ताने असेच केले आहे, 'चौऱ्याऐंशी बंदरांत हा जंजिरा मोठा. अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला.'

सिद्दी
 साधारणपणे १६५७ पासून सिद्दीवर चढाई करण्यास महाराजांनी प्रारंभ केला. पहिली मोहीम यशस्वी झाली नाही. पण १६५८ साली रघुनाथ बल्लाळ याने सिद्दीचा पराभव केला आणि त्याच्या अत्याचारांना आळा घातला. अफजलखानाच्या वधानंतर महाराज कोकणात कल्याण-भिवंडी येथे उतरले. तो प्रदेश त्यांनी काबीज केला आणि लगेच आरमाराच्या उभारणीस त्यांनी प्रारंभ केला. सिद्दी हा मराठ्यांचा मोठा वैरी. त्याच्यावर स्वाऱ्या करून १६६० पर्यंत व्यंकोजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांनी दंडा किल्ला काबीज केला आणि जमिनीवरची सिद्दीची सर्व सत्ता नष्ट केली. जंजिरा फक्त त्याच्याकडे राहिला. तो मात्र मराठ्यांना कधीच घेता आला नाही आणि त्यामुळे सिद्दीचा उपद्रव काही प्रमाणात चालूच राहिला. तो छत्रपतींच्या मुलखात शिरून वाटेल ते अत्याचार करी. त्याला मोगल, पोर्तुगीज, इंग्रज यांचा पाठिंबा असे. एकदा त्याने राजापुरी परत घेतली होती. पण मराठ्यांनी ती पुन्हा जिंकली. सिद्दीचा संपूर्ण पाडाव केव्हाच झाला नाही, पण त्याच्यावर वचक बसला हे निश्चित.

पोर्तुगीज
 पोर्तुगीज हे शिवछत्रपतींचे खरे शत्रू. पश्चिम समुद्रावर आपली सार्वभौम सत्ता आहे, असा ते अभिमान बाळगीत आणि वर सांगितल्याप्रमाणे परवान्यावाचून येथे कोणाला फिरकू देत नसत. पण महाराजांनी कोकणातील कल्याण-भिवंडी हे प्रदेश जिंकले, माहुली, तळे घोसाळे, चौल हे किल्ले घेतले आणि आरमारही बांधले; तेव्हा परिस्थिती ओळखून त्यांनी होऊन छत्रपतींच्याकडे वकील पाठविला आणि तह केला. त्यांनी पोर्तुगीज मुलखात उपद्रव देऊ नये आणि पोर्तुगीजांनी छत्रपतींना तोफा, दारूगोळा वगैरे सामान पुरवावे, अशा तहाच्या अटी होत्या. आरमाराच्या केवळ स्थापनेमुळे हा पहिला विजय मिळाला. पुढे लखम सावंत, केशव नाईक, केशव प्रभू हे कोकणचे देसाई पोर्तुगीज प्रदेशात राहून महाराजांच्या मुलखात उपद्रव करीत. तेव्हा १६६७ साली त्यांनी बारदेशावर स्वारी करून पोर्तुगिजांची खोड मोडली आणि पुन्हा एकदा हवा तसा तह करून घेतला. १६७२ साली रामनगरचे राज्य मोरोपंत पिंगळे याने खालसा केले. त्या कोळी राजाला पोर्तुगीज चौथाई देत असत. आता छत्रपतींनी तीच मागणी त्यांच्याकडे केली. पोर्तुगिजांनी खळखळ फार केली पण शेवटी १६७९ साली त्यांना ती मागणी मान्य करावी लागली. परवानापद्धती त्यांना आधीच रद्द करावी लागली होती.

इंग्रज
 मुंबई बंदर इंग्रजांच्या ताब्यात गेले. तेव्हा त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी, छत्रपतींनी खांदेरी व उंदेरी या बेटांवर तटबंदी उभारून तेथे आपले ठाणे १६७९ साली निर्माण केले. इंग्रजांचा याला सक्त विरोध होता. त्यांनी खांदेरीवर आरमारी हल्लाही केला. पण मराठा आरमाराने त्यांचा व त्यांच्या मदतीस आलेल्या सिद्दीचा निखालस पराभव केला. तेव्हा शरणागती पत्करून इंग्रजांनी छत्रपतींशी तह केला.

फलश्रुती
 अशा रीतीने जलदुर्ग बांधून आणि नौदलाची उभारणी करून महाराजांनी स्वराज्याचा पाया भक्कम केला. पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज यांना ते अजिबात नष्ट करू शकले नाहीत. पण त्यांच्यावर वचक बसवून कोकणातील हिंदूचे जीवन त्यांनी पुष्कळ सुरक्षित केले आणि कारवारपासून सुरतेपर्यंतच्या प्रदेशापैकी निम्म्यावर प्रदेश स्वराज्यात आणला. याखेरीज आणखी एक मोठा फायदा म्हणजे समुद्रपार मराठ्यांचा व्यापार सुरू झाला. बाराव्या शतकानंतर हिंदूंची राज्ये बुडाली आणि समुद्रगमन बंद झाल्यामुळे व्यापारही बुडाला. शिवछत्रपतींनी हिंदवी राज्य स्थापन केले आणि व्यापारालाही चालना दिली. इ. स. १६६४ मध्ये कोकण किनाऱ्यावरची आठनऊ बंदरे त्यांच्या ताब्यात होती. त्या प्रत्येक बंदरातून दोनतीन व्यापारी जहाजे इराण, बसरा, मक्का, मोचा, एडन या ठिकाणी माल घेऊन जात. या व्यापाराचे महत्त्व अमात्यांनी उत्तम वर्णिले आहे. आपला व्यापार चालवून, इतर देशांच्या व्यापारालाही उत्तेजन द्यावे, त्याचे संरक्षण करावे, म्हणजे त्यापासून जकातीचे विपुल उत्पन्न मिळते, असे ते म्हणतात. छत्रपतींनी त्याच धोरणाचा अवलंब करून स्वराज्याचा खजिना पुष्कळच समृद्ध केला, ही फलश्रुती लहान नाही.

सेना संघटना
 पायदळ, घोडदळ आणि नौदल अशी तीन दले छत्रपतींनी उभारली आणि त्या तीनही दलांना अत्यंत बांधीव असे रूप देऊन टाकले. पायदळात दहा शिपायांची एक तुकडी असे. तिच्या मुख्याला नाईक म्हणत. पाच नाइकांवर एक हवालदार, दोन हवालदारांवर एक जुमलेदार, दहा जुमलेदारांवर एक एकहजारी आणि पाच एकहजारींवर म्हणजे पाच हजार फौजेवर एक सरनौबत असे. अष्टप्रधान मंडळातील सेनापतीच्या हुकमतीखाली असे अनेक सरनौबत असत. घोडदळाची बांधणी साधारण अशीच असे. पंचवीस घोडेस्वारांच्या तुकडीवर हवालदार, पाच हवालदारांवर एक जुमलेदार, दहा जुमलेदारांवर एक सुभेदार व दहा सुभेदारांवर एक पंचहजारी असे चढत्या श्रेणीचे अंमलदार असत. नौदलातही अशीच श्रेणी होती. त्या दलाच्या मुख्याला दर्यासारंग म्हणत.

नवी पद्धत
 पायदळ, घोडदळ, नौदल आणि गडकोट असे महाराजांचे चतुरंग दल होते. पहिल्या तीन अंगांची बांधणी कशी होती ते वर सांगितले. गडकोटांची व्यवस्थाही अशीच आखीवरेखीव होती, मुख्य गडकरी किल्लेदार त्याला हवालदार म्हणत. तो नेहमी मराठा असे. दुसरा अधिकारी सबनीस. मुलकी जमाखर्च तो पाही. हा जातीने ब्राह्मण असे. कारखानीस हा तिसरा अधिकारी. किल्ल्यावरील घासदाणा, दारूगोळा यांचा पुरवठा आणि तटबंदीची डागडुजी हे काम त्याच्याकडे असे- हा जातीने प्रभू असे. सभासद म्हणतो असे तीन जातीचे अधिकारी 'एकास एक प्रतिमेळ ठेवावे. एका हवालदाराचे हाती किल्ला नाही. जो कारभार करणे तो तीघानी एका प्रतीचा करावा. ये रीतीने बंदोबस्तीने गडकोटाचे मामले केले. नवी पद्धत घातली.'
 लष्करातील शिपायापासून सरनौबतापर्यंत सर्वांना रोख पगार असे आणि तो भरपूर असे. डॉ. सेन यांनी त्या वेळचे मोगल, आदिलशाही लप्कर आणि पोर्तुगीज व इंग्रज लष्कर यांची तुलना करून म्हटले आहे की मराठा लष्करातील पगार निश्चितच जास्त असत.

हद्द झाली
 शिवछत्रपतींची युद्धविद्या ही अशी होती. त्यांनी ध्येयवादाचे संस्कार करून मराठा समाजात नवचैतन्य निर्माण केले. पायदळ, घोडदळ, नौदल आणि किल्ले असे चतुरंग दल उभारले. आणि वृकयुद्धपद्धतीचा अवलंब करून आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगल यांच्या सत्ता पायासकट हादरून टाकल्या. प्रारंभी शिवाजीला नेस्तनाबूत करण्याच्या वल्गना या सत्ता करीत असत. पण अखेरीस त्या शिवछत्रपतींना खंडणी देऊ लागल्या. आदिलशहा आणि कुतुबशहा तर प्रत्यक्षच खंडणी देऊ लागले. मोगलांनी खंडणी दिली नाही. पण ती वेळ येणार ही धास्ती त्यांच्या मनात निर्माण झाली. महाराज सिंहासनारूढ झाल्याची बातमी दिल्लीस पोचली, तेव्हा औरंगजेबाची स्थिती काय झाली ? सभासद लिहितो, 'पातशहा तक्तावरून उतरून अंतःपुरात गेले आणि दोन्ही हात भुईस घासून, आपले देवाचे नाव घेऊन, परम खेद केला. दोन दिवस अन्न, उदक घेतले नाही. आणि बोलले की 'खुदाने मुसलमानांची पादशाही दूर करून तक्त बुडवून मराठीयास तक्त दिले. आता हद्द जाली !' विजापूरचे पादशहास व भागापूरचे पादशहास असा खेद झाला. रूमशाम, इराण, दुराण व दर्यातील पातशहा खबर कळून मनात खेद करू लागले. ये जातीचे वर्तमान जाहाले.'
 या शेवटच्या वाक्यात छत्रपतींच्या अवतारकार्याचे स्वरूप नेमके सांगितलेले आहे. त्यांनी प्रथम महाभारतप्रणीत धर्माचे पुनरुज्जीवन केले, अर्थव्यवस्थेत फार मोठे परिवर्तन घडवून आणले, मराठ्यांना राष्ट्रतत्त्वावर संघटित केले आणि त्यांना नवी युद्धविद्या शिकवून, मुस्लिम सत्ता नामोहरम करून, स्वराज्याची स्थापना केली. मराठा राजा सिंहासनाधीश्वर झाला. यामुळे जे हिंदू या कलियुगात हिंदुराजा होणे नाही, मुसलमानच आता राज्य करणार, असे मानण्याइतके मरगळले होते, त्यांच्या मनापुढे इराण, रूमशाम येथपर्यंत स्वराज्यस्थापना करण्याची स्वप्ने तरळू लागली ! छत्रपतींचे अवतारकार्य ते हेच.
 आता छत्रपतींच्या आयुष्याच्या पन्नास वर्षाच्या काळात महाराष्ट्रात, ज्या घडामोडी झाल्या, जी परिवर्तने झाली त्यांचे, युरोपात याच काळात जे समाजप्रबोधन चालू होते त्याच्याशी तुलना करून, थोडे मूल्यमापन पुढील लेखात करू आणि क्षत्रिय- कुलावंतस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांच्या या कार्याचे हे विवेचन संपवू.