महाराष्ट्र संस्कृती/स्वातंत्र्ययुद्ध
२४.
स्वातंत्र्ययुद्ध
मराठा कालातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे स्वरूप आपण अभ्यासीत आहो. या मराठा कालाचे साधारणपणे तीन खंड होतात. १६४५ ते १६८० हा पहिला शिवछत्रपतींचा कालखंड होय. १६८१ ते १७०७ हा दुसरा स्वातंत्र्य युद्धाचा कालखंड होय. यालाच अलीकडे जनतायुद्ध असे म्हणतात. आणि १७०७ ते १८१८ हा तिसरा पेशवाईचा कालखंड होय.
यातील पहिल्या कालखंडातील संस्कृतीच्या विविध अंगांचा विचार आपण गेल्या पाच लेखांत केला. शिवछत्रपतींनी फार मोठे धर्मपरिवर्तन घडविले, काही नवी अर्थव्यवस्था अमलात आणली, या देशाला राष्ट्रधर्माची दीक्षा दिली आणि नवी युद्धविद्या जनतेला शिकवून या महाराष्ट्रभूमीत स्वराज्याची स्थापना केली. पण या कालातील विद्वज्जनांनी त्यांच्या कार्यामागचे नवे तत्त्वज्ञान ग्रंथरूपाने लोकांपुढे मांडण्याचे व जनमानसात ते बिंबविण्याचे कार्य केले नाही; म्हणून छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या ज्या आकांक्षा होत्या त्या व्हाव्या तशा सफल झाल्या नाहीत, असा त्या विवेचनाचा इत्यर्थ आहे.
आता 'स्वातंत्र्ययुद्ध' हा जो दुसरा कालखंड त्याचा अभ्यास करावयाचा आहे.
औरंगजेब-आकांक्षा
मोगल बादशहा औरंगजेब हा १६८२ च्या मार्च महिन्यात औरंगाबादेस येऊन पोचला. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत एकछत्री मोगल सत्ता प्रस्थापित करावयाची आणि सर्व हिंदुस्थान इस्लामधर्मी करून टाकावयाचा, अशी त्यांची आकांक्षा होती. त्याच्या बरोबर शहा आलम, अजन शहा, कामबक्ष हे त्याचे पुत्र बहादूरखान, शिवाबुद्दिनखान, हसनअल्ली, खावजहान, रणमस्तखान, रुहुल्लाखान, दिलेरखान, वजीर आसदखान यांसारखे मोठमोठे सरदार; चार पाच लाख लष्कर, भरपूर तोफा व दारूगोळा; असा प्रचंड, पोस्त सरंजाम त्याने आणला होता. शिवाजीच्या मृत्यूनंतर त्याने स्थापलेले स्वराज्य आपण चुटकीसरसे नष्ट करू, नंतर विजापूर व गोवळकोंडा येथील शियापंथी शाह्या जिंकू आणि मोगली साम्राज्याचे पूर्वजांचे स्वप्न साकार करून दाखवू, अशी फार मोठी उमेद धरून तो दक्षिणेत उतरला होता. हे सर्व कार्य अल्पावधीत, दोन चार वर्षांत, फार तर सात आठ वर्षांत उरकून, दिल्लीला परत जावयाचे असा त्याचा संकल्प होता.
पण औरंगजेब दिल्लीला परत जाऊ शकला नाही. पंचवीस वर्षे सतत युद्ध करूनही त्याला अपेक्षेच्या शतांशही यश आले नाही. त्याचे सर्व मनोरथ धुळीस मिळाले, आणि पूर्ण निराश होऊन १७०७ च्या फेब्रुवारी महिन्यात तो कालवश झाला.
तेव्हा आणि आता
या आधीच्या सातशे वर्षाच्या काळात भारतावर- उत्तर भारतावर, दक्षिण भारता वर, पूर्व भारतावर, पश्चिम भारतावर- मुस्लिमांच्या सारख्या स्वाऱ्या होतच होत्या. त्या स्वाऱ्या आणि ही औरंगजेबाची स्वारी यांची तुलना केली तर काय दिसेल ? अकराव्या शतकाच्या पहिल्या चतुर्थात गझनीच्या महंमदाने हिंदुस्थानवर सतरा स्वाऱ्या केल्या. एकदाही त्याचा पराभव झाला नाही ! पुढच्या तीनशे वर्षात मुसलमानांनी सर्व उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत केला. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी अल्लाउद्दिन व मलिककाफूर यांनी पाचसहा स्वाऱ्यांत सर्व दक्षिण हिंदुस्थान— तेथील सर्व मोठमोठी राज्ये धुळीस मिळविली. पुढे महाराष्ट्रात हसन गंगू आला आणि त्याने अगदी सहजगत्या येथे स्वतंत्र राज्य स्थापिले. आणि तीनशे वर्षे हिंदूंना, मराठ्यांना गुलामगिरीत ठेविले. अशी ही पूर्वीची स्थिती. एकेका स्वारीत एकेक दोन दोन राज्ये मुस्लिम बादशहा किंवा सेनापती सहज उद्ध्वस्त करीत असत. आणि आता ! मुस्लिमांचा सर्वात मोठा, सर्वात बलशाली बादशहा दिल्लीच्या सर्वसामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरला होता आणि पंचवीस वर्षे, पाव शतक, लढाया करीत होता. त्याला काय मिळाले ? व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो, 'महाराष्ट्राने औरंगजेबाच्या देहावरच थडगे रचले नाही तर त्याच्या साम्राज्यावरही !' यदुनाथ सरकार म्हणतात, 'महाराष्ट्राने केवळ औरंगजेबाचेच कार्य नव्हे, तर त्याच्या पूर्वजांचे कार्यही, शून्यवत करून टाकले.'
हे एवढे बळ, हे अद्भुत सामर्थ्य मराठ्यांना कोठून प्राप्त झाले ? त्या एवढ्या बलशाली शत्रूवर त्यांनी जय कसा मिळविला ? हे शिवछत्रपतींचे देणे आहेत, हा त्यांचा वारसा आहे, हे उघडच आहे. हा वारसा त्यांनी कसा चालविला हे आता पाहावयाचे आहे.
राजघराणे दुंभगले
स्वातंत्र्ययुद्धाच्या पहिल्या नऊ वर्षाच्या काळात छत्रपती संभाजी हेच मराठ्यांचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वात प्रारंभीच काही उणेपणा आला होता हे खरे. पण तरीही त्यांनी नऊ वर्षे जो पराक्रम केला तो त्यांना भूषणावह आहे. इ. स. १६७८ च्या अखेरीस शिवछत्रपती असतानाच ते दिलेरखानाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे शिवछत्रपतींना मरणप्राय दुःख झाले. कारण तो त्यांच्या सर्व कार्याचा, तत्त्वज्ञानाचा, राष्ट्रधर्माचा दारुण पराभव होता. शिवाय त्यामुळे मंत्रिमंडळाचा संभाजीराजांवरचा विश्वास उडाला आणि सत्तेच्या शिखरस्थानातच दुही निर्माण झाली. संभाजी महाराजांना काही न कळवता सोयराबाई, मोरोपंत पिंगळे आणि अनाजी दत्तो यांनी कारस्थान रचून राजारामाला राज्याभिषेक केला. संभाजीनी हा सर्व बनाव मोडून काढला आणि विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे कटातल्या सर्व लोकांना उदार मनाने माफी देऊन पुन्हा स्वपदावर नेमून टाकले. पण सोयराबाई - पक्षाने पुन्हा कारस्थान रचले. पहिले कारस्थान कितीही क्षम्य किंवा समर्थनीय असले तरी दुसरे अगदी अक्षम्य होते. सोयराबाईला नसला तरी मंत्र्यांना हा विवेक असायला हवा होता. राजाराम प्रौढ असता, कर्तबगार असता, त्याच्या ठायी नेतृत्वाचे उत्तम गुण दिसत असते तर गोष्ट वेगळी होती. पण तसे काही नसताना, अनाजी दत्तो प्रभृतींनी आपल्या सामर्थ्याचा हिशेब न करता, पुन्हा कारस्थान रचले. यामुळे राजघराणे दुभंगले आणि महाराष्ट्र कायमचा दुभंगला.
संभाजी महाराजांचा या कारस्थानामुळे तोल सुटला असला तर त्यांना दोष देता येणार नाही. तरीही एक गोष्ट खरीच आहे की मोठमोठे कर्ते पुरुष त्यांनी मारून टाकल्यामुळे, मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची झाले. पण अशाही परिस्थितीत, औरंगजेबासारख्या मोठ्या शत्रूला त्यांनी आठ वर्षे खडे चारले, ही गोष्ट प्रारंभी म्हटल्याप्रमाणे, त्यांना भूषणावह आहे.
विविध शत्रू
मोगल बादशहा औरंगजेब हा मराठ्यांचा आणि हिंदवी स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू. पण तो एकच शत्रू नव्हता. सिद्दी आणि पोर्तुगीज हेही आणखी शत्रु होते. आकारमानाने ते लहान होते, पण ते अत्यंत चिवट असून औरंगजेबाचा त्यांना सतत पाठिंबा होता. अशा या त्रिविध शत्रूंनी शिवछत्रपती कालावश होताच फार मोठी मोहीम मांडली. या मोहिमेचा थोडा तपशील समजला म्हणजे छत्रपती संभाजींच्या कर्तृत्वाची सम्यक कल्पना आपल्याला येईल व शिवछत्रपतींच्या युद्धविद्येचा वारसा त्यांनी कसा चालविला ते कळून येईल.
मोगल मोहीम
शिवछत्रपती गेल्यानंतर दोन महिन्यांतच मोगलांच्या या प्रचंड मोहिमेला प्रारंभ झाला. औरंगजेब त्या वेळी राजपुतान्यात होता. त्याने तेथून खान बहादूरखान यास दक्षिणेत पाठविले आणि खानाने आल्याबरोबर जुलै १६८० मध्येच चांदवडजवळच्या अहिवंत या किल्ल्याला वेढा घातला. तेथून पुढे त्या परिसरात त्याचा संचार सतत चालूच होता. याच वेळी औरंगजेबाचा दुसरा सरदार रणमस्तखान हा बहाद्दूरखानाच्या मदतीला होताच. १६८१ च्या नोव्हेंबर महिन्यात शहाबुद्दिनखान याने दक्षिणेत येऊन साल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. १६८१ च्या एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यात मोगलांच्या आक्रमक हालचाली सुरू झाल्या होत्या. चौथा एक सरदार हसन अल्लीखान याला १६८१ सालीच औरंगजेबाने रवाना केले होते. उत्तर कोकणात उतरून तो मुलूख काबीज करावा, असा त्याला हुकूम होता. १६८२ च्या मार्चमध्ये स्वतः बादशहा औरंगाबादेस येऊन पोचला. लगेच त्याने दिलेरखानास नगरकडे आणि शहाबुद्दिन यास नाशिककडे पाठविले. शहाबुद्दिनाने एप्रिलात रामशेज किल्ल्याला वेढा घातला आणि पुढे सरदारांच्या पुनः पुन्हा बैठकी घेऊन त्यांच्या वारंवार बदल्या करून औरंगजेबाने ही मोहीम अखंड चालू ठेवली.
सिद्दी, पोर्तुगीज
अशा रीतीने सर्व महाराष्ट्रभर मोगलांनी आक्रमणास प्रारंभ केला होता. पण मागे सांगितल्याप्रमाणे मराठ्यांचा हा एकच शत्रू नव्हता. सिद्दी आणि पोर्तुगीज हे आणखी दोन प्रबळ शत्रू होते. त्यांनीही याच काळात मराठी मुलूख उद्ध्वस्त करण्यास प्रारंभ केला. सिद्दी कासम याने तर कोकणात अगदी अनर्थ चालविला होता. तो माणसे पकडून त्यांना गुलाम म्हणून विकी, हाती सापडलेल्यांच्या कत्तलीही करी; जाळपोळ, बलात्कार हा नित्याचाच प्रकार होता. १६८० च्या ऑगस्टपासूनच त्याने या विध्वंसाला प्रारंभ केला होता १६८१ च्या डिसेंबरात पनवेलपासून चौलपर्यंतच्या मुलखात त्याने धुमाकूळ घातला होता. पोर्तुगीजांचे आक्रमणही याच वेळी सुरू झाले होते. सिंधुदुर्गाशेजारचे जे अंजदीव बेट त्यावर संभाजी महाराजांनी किल्ला बांधण्याचे ठरवून तटबंदी सुरू केली. पण पोर्तुगीजांनी त्यावर स्वारी करून अंजदीव बेट हस्तगत केले. १६८२ मध्ये रणमस्तखान उत्तर कोकणात उतरला असता संभाजी महाराजांनी त्याचा कोंडमारा केला होता. पण त्याला पोर्तुगीजांनी धान्यसामग्री पोचविली. नाही तर खानावर कठीण प्रसंग आला होता. पुढच्या वर्षी जंगी तयारी करून पोर्तुगीजांनी स्वतःच आक्रमण करून महाराजांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला (ऑक्टोबर १६८३).
शहा आलम
पोर्तुगीज आणि मराठे यांची ही फोंड्याची लढाई चालू असतानाच १६८३ च्या डिसेंबरात बादशहाने फार प्रचंड सरंजाम उभा करून शहाजादा शहा आलम यास रामघाटाने कोकणात रवाना केले. दुसरी फौज तयार करून शियाबुद्दिनखान पुण्यावर चालून गेला. आणि शहाजादा अजमशहा हा नाशिकच्या रोखाने निघाला. विजापूर गोवळकोंडा यांच्याकडून मराठ्यांना मदत येऊ नये म्हणून या बाजूला खान जहान याची नेमणूक बादशहाने केली आणि पोर्तुगीजांनाही निरोप धाडला की तुम्ही संभाजीशी कसून युद्ध करा. आमची फौज मदतीस येत आहेच. शहा आलमच्या येणाऱ्या या फौजेला धान्य व दारूगोळा पुरविण्याची जबाबदारी पोर्तुगीजांनी पत्करली.
१६८० च्या एप्रिलपासून तब्बल चार वर्षे मराठ्यांच्या लहानशा स्वराज्यावर अशी ही आक्रमणे चालू होती. एकाच वेळी दोन दोन तीन तीन ठिकाणी स्वाऱ्या होत होत्या आणि विशेष म्हणजे मोगल, पोर्तुगीज व सिद्दी हे आक्रमक एकमेकांना सामील होते. सिद्दी तर बादशहाचा नोकरच होता. पण पोर्तुगीज नोकर नसले तरी औरंगजेबाचे हुकूम मोडणे त्यांना अशक्य होते. असे हे संगनमत असल्यामुळे या आक्रमणाला फार भयानक असे रूप प्राप्त झाले होते.
या आक्रमणाला संभाजी महाराजांनी, मराठ्यांनी तोंड कसे दिले ?
कडवा प्रतिकार
१६८० मध्ये बहादूरखानाने अहिवंत किल्ल्याला वेढा घातला. पण मराठ्यांनी यशस्वीपणे तोंड दिल्यामुले त्याला तो वेढा उठवावा लागला. १६८१ च्या अखेरीस साल्हेरच्या वेढ्याची तीच गत झाली. हा किल्ला पुढे पाच वर्षे मोगलांच्या हाती लागला नाही. १६८६ च्या अखेरीस हा किल्ला पडला आणि तोही फितुरीमुळे ! १६८२ च्या एप्रिलात शहाबुद्दिनाने रामशेजला वेढा घातला होता. तोही किल्ला पडला नाही. तो पडला १६८७ साली आणि तोही फितुरीने ! पण केवळ बचावाचे धोरण अवलंबूनच मराठे स्वस्थ बसले नव्हते. बहादूरखान अहिवंताच्या परिसरात असतानाच सेनापती हंबीरराव मोहिते याने धरणगाव लुटून बऱ्हाणपुरावर चाल केली व भोवताली लुटालूट करून लाखो रुपयांची मत्ता पैदा केली. याच वेळी संभाजीमहाराजांनी दुसरी एक मोठी फौज अहमदनगर पैठण मार्गाने औरंगाबादेवर धाडली. या झाल्या मुख्य फौजा. शिवाय मराठ्यांच्या अनेक टोळया मोंगली मुलखात शिरून तो प्रदेश उद्ध्वस्त करीत होत्या. १६८१ साली नेताजी पालकर बागलाणात शिरला व तेथे उच्छेद करू लागला. दुसरी एक फौज सोलापुरावर व तिसरी साल्हेरकडे चालून आली.
१६८२ च्या प्रारंभी हसन अल्लीने कोकणात उतरून कल्याण काबीज केले. पण त्याची पाठ वळताच मराठ्यांनी ते परत घेतले. याच साली नोव्हेंबर महिन्यात रणमस्तखानाने कोकणात उतरून कल्याण पुन्हा घेतले. नाशिकच्या बाजूस खान जहान शिरला होता. दोन्ही ठिकाणी मराठ्यांनी प्रतिकार केला. पण त्यांचा पराभव झाला. तरीही गोवळकोंड्यापासून चांद्यापर्यंत मराठी फौजा या वेळी सारख्या दौडत होत्या; आणि मोगली फौजांचे अन्नपाणी तोडून, त्यांवर अचानक छापे घालून त्यांना हैराण करीत होत्या.
याच काळात सिद्दीशी मराठे लढत होते. सिद्दीचा जंजिरा घेण्यात त्यांना यश आले नाही व त्याचा पक्का बंदोबस्तही करता आला नाही हे खरे. पण त्याला त्यांनी वचक बसविला होता. पोर्तुगीजांच्या बाबतीत मराठ्यांना यापेक्षा जास्त यश आले. फोंड्याचा वेढा त्यांनी मारून काढला आणि कुंभारजुवे हे घेऊन साष्टीवारदेश त्यांनी मारला. याच वेळी गोव्यावर चालून जाण्याचा संभाजी महाराजांचा संकल्प होता. पण शहा आलमची फौज रामघाटातून येत आहे असे कळल्यामुळे त्यांना तो रद्द करावा लागला.
मोगल-नामुष्की
शहा आलमशी मराठ्यांनी कसा मुकाबला केला ते पाहिले म्हणजे मराठ्यांचे तेज मुळीच लोपले नव्हते हे ध्यानात येईल. साठ हजार पायदळ, चाळीस हजार स्वार, वीस हजार उंट व दोन हजार हत्ती अशी प्रचंड फौज घेऊन शहाजादा, गोव्याच्या अलीकडे डिचोलीजवळ उतरला (जाने. १६८४). त्या फौजेसाठी धान्यसामग्री घेऊन मोगलांची १२० गलबते गोव्यास आली. पण, संभाजी आपला सूड घेईल असे वाटल्यावरून, पोर्तुगीजांनी ती सामग्री शहा आलमला दिली नाही. तेव्हा चिडून जाऊन गोवा प्रांतात व कुडाळ, बांदा, मालवण या भागात तो नासधूस करू लागला. मार्च महिन्यात शहाबुद्दिनखान शहाजाद्याला मिळण्यासाठी उत्तर कोकणातून येऊ लागला. पण मराठ्यांनी त्या दोघांची गाठ पडू दिली नाही, तेव्हा हताश होऊन बादशहाचा हा लाडका शहाजादा परत फिरला. उन्हाळ्याचे दिवस, अन्नधान्य नाही आणि मराठे लोकांचे छुपे हल्ले. हजारो माणसे व जनावरे तडफडून मेली आणि भयंकर हाल सोसून, पदरात नामुष्की घेऊन, होते नव्हते ते सर्व घालवून, १६८४ च्या मे मध्ये अहमदनगर येथे तो बापापुढे येऊन दाखल झाला.
पागोटे काढले
चार वर्षांच्या या मोहिमेत बादशहाला महत्त्वाचा असा एकही विजय मिळाला नाही. पहिल्या दोन वर्षांतच बादशहा निराश होऊ लागला. डोक्यावरचे पागोटे त्याने जमिनीवर रागाने आपटले व 'संभाजीचा पाडाव होईपर्यंत मी हे पागोटे पुन्हा घालणार नाही' असे तो म्हणाला, १६८३ च्या पावसाळ्यात तर तो भ्रमिष्ट होण्याची वेळ आली. ही मोहीम शहाजाद्यावर किंवा मोठ्या सरदारावर सोपवून परत दिल्लीला जावे असेही त्याने एकदा ठरविले. पण कोणीच तयार होईना. त्याचा एक पुत्र अकबर मराठ्यांना येऊन मिळाला होता. शहा आलम आणि इतर अनेक सरदारही मराठ्यांस मिळून आहेत असे त्याला वाटू लागले. या संशयाने त्याने दिलेरखानास कडक शिक्षा केली. तेव्हा त्याने विष घेऊन आत्महत्या केली.
चुटकीसारखे मराठ्यांचे स्वराज्य बुडवायची आकांक्षा धरून बादशहा आला होता. त्याची मराठयांनी अशी अवस्था करून टाकली. सरदेसाई म्हणतात, औरंगाबाद, चांदा, बेदर, फलटण, कल्याण, रायगड एवढ्या विस्तृत टापूत संभाजीने जो विलक्षण सामना केला त्याला इतिहासात तोड नाही. तो विलासमग्न असून त्याने राज्यरक्षणाकडे दुर्लक्ष केले या बखरकारांच्या आरोपांचा वस्तुस्थितीशी मेळ बसत नाही.
अकबर प्रकरण
अकबर-प्रकरणातही संभाजी महाराजांच्यावर असला आरोप करता येणार नाही. अकबर हा औरंगजेबाचा मुलगा. मारवाडच्या वारसाच्या प्रकरणात औरंगजेबाविरुद्ध सर्व रजपूत उठले होते. त्या वेळी अकबर रजपुतांना मिळाला; आणि बापाविरुद्ध बंड करून उठला. त्याने बापाला पदच्युत केल्याचा जाहीरनामा काढला आणि स्वतः सिंहासनारोहण केले. पण औरंगजेबाने कपटाने भेद केला व रजपुतांना त्याच्यापासून फोडले. तेव्हा अकबर दक्षिणेत संभाजी राजांच्या आश्रयास आला (१-६-१६८१). आता ही संधी फार मोठी होती. हिचा बरोबर फायदा घेऊन संभाजी महाराज बादशहावर चालून गेले असते तर फारच फायदा झाला असता. मुख्य म्हणजे मुसलमानांत फूट पडली असती. अनेक सरदार आणि कदाचित अकबराचे भाऊही, बादशहाविरुद्ध उठले असते, अकबराला मिळाले असते आणि रजपुतांनी याच वेळी उठाव केला असता. यामुळे औरंगजेबाला दक्षिणेत उतरणेही कदाचित शक्य झाले नसते. पण छत्रपती संभाजी यांनी हे साहस केले नाही. प्रथम हे औरंगजेबाचे कपटच आहे, असा त्यांना संशय आला. अकबर कोकणात बादशहासारखा राहू लागला व त्याने फौजही उभी केली, त्यामुळे तो संशय बळावला. पुढे तो नाहीसा झाला तेव्हा, वर सांगितल्याप्रमाणे, स्वराज्यावरच आक्रमण आले होते. अशाही स्थितीत संभाजी महाराजांनी रजपुतांना उठविण्याचा प्रयत्न चालविला होता. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही.
मोगली राज्यात दुफळी पाडून बादशहाला नामोहरम करण्याची ही एक फार मोठी संधी आली होती. शिवछत्रपतींनी ती नक्कीच साधली असती. आणि त्या चढाईमुळे भारताचा सर्व इतिहासच कदाचित बदलला असता. संभाजी महाराजांना या संधीचा फायदा घेता आला नाही हे खरे; पण यातून फार तर येवढेच म्हणता येईल की शिवछत्रपतींची दूरदृष्टी, त्यांचे असामान्य साहस, मुत्सद्देगिरी हे गुण संभाजी महाराजांच्या ठायी नव्हते. हे म्हणणे निराळे, आणि सर्वस्वी नाकर्तेपणाचे, विलासीपणाचे आरोप त्यांच्यावर करणे निराळे. नव्या संशोधनाअन्वये ते आरोप टिकत नाहीत. आणि वर वर्णिल्याप्रमाणे त्यांनी आक्रमकांशी जो मुकाबला केला तो पाहता तर, संशोधनाची गरजच नाही, असे वाटते.
मराठयांच्या प्रतिकारामुळे मोगलांची दुर्दशा झाली याचा आणखी निर्णायक पुरावा म्हणजे त्यांच्यावरची मोहीम सोडून औरंगजेब विजापूर गोवळकोंड्याकडे वळला हा होय. तेथेही मराठ्यांनी त्या दोन शहांना साह्य करून वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग न होता ती दोन्ही राज्ये बुडाली. ती दोन्ही इस्लामधर्मीय होती. पण ती शियापंथी होती आणि औरंगजेब कडवा सुनी होता. तो शियांचा फार द्वेष करी. या दोन शाह्या बुडविण्याचे ते एक महत्त्वाचे कारण होते.
आक्रमक पवित्रा
१६८५ साली औरंगजेबाची पहिली मोहीम संपली आणि दोन वर्षांनी ती नव्या जोमाने सुरू झाली. या मधल्या काळात मराठे स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी लहान मोठी, बऱ्हाणपूर, धरणगाव यासारखी, सतरा धनसंपन्न शहरे लुटली. १६८२ च्या ऑक्टोबरमध्ये संभाजी महाराजांनी भडोचवर म्हणजे महाराष्ट्राबाहेरही स्वारी करून विपुल संपत्ती लुटून आणली. विजापूर गोवळकोंड्याच्या पाडावानंतर मोगल कर्नाटकात शिरले. तो प्रांत या दोन शाह्यांच्या सत्तेखाली होता. तो पडल्यावर आता हा मुलूख सहज घेता येईल असे बादशहाला वाटत होते. पण तेथे दरजी राजे व केसो त्रिमल यांनी त्यांना तोंड देऊन तेथले मराठ्यांचे राज्य वाचविले. या कामी त्यांना कासमखानाशी मोठा सामना करावा लागला. तो करून शिवाय अर्काट, कांची, चिंगलपट ही ठाणी स्वारी करून त्यांनी हस्तगत केली. वांदिवॉश येथे तर इतका मोठा संग्राम झाला की मोगलांना सबुरीचे धोरण पत्करावे लागले.
फितुरी
पण असे सर्व ठीक असूनही आता १६८६ सालानंतर मराठ्यांचा प्रतिकार ढिला पडू लागला आणि याचे मुख्य कारण म्हणजे फितुरी. प्रत्यक्ष युद्धात मराठे हरत नाहीत हे पाहून बादशहाने भेदनीतीचा अवलंब केला. त्याचे तसे प्रयत्न प्रारंभापासूनच चालू होते; आणि शिर्के, जेथे यांना वतने देऊन त्याने त्यांना वशही केले होते. पण पुढे हा प्रकार सर्रास सुरू झाला, तोच नियम झाला. १६८६ च्या अखेरीस साल्हेरचा किल्ला किल्लेदार असूजी याने मोठी मन्सब घेऊन मोगलांच्या स्वाधीन केला. रामसेजचा किल्ला असाच पडला. १६८८ च्या शेवटी हरीशगड, मदनगड, औंढा इ. सहा किल्ले मोगलांनी फितुरीने घेतले. १६८९ च्या प्रारंभी त्रिंबकगडचे किल्लेदार फितुर झाले. त्यांना मन्सब मिळाली. ठाणे जिह्यातील माहुली किल्ला द्वारकोजी या किल्लेदाराने लाच घेऊन मातबरखानाच्या स्वाधीन केला. बजाजी निंबाळकर १६८२ सालीच मोगलांकडे गेला होता. त्याचा मुलगा महादजी याला त्याची मनसब मिळाली. त्याने विजापूर गोवळकोंडा पडल्यावर वाडीकर खेम सावंताला लिहिले की बादशहा- इतका थोर कुणी नाही. विजापूर, गोवळकोंड्याप्रमाणेच संभाजीचीही गत होईल. त्याच्या आत तुम्ही बादशहाकडे यावे. शिवाजी महाराजांचा जावई अचलोजी याला १६८६ साली पंचहजारी देऊन मोगलांनी वळविले. याशिवाय निरनिराळ्या कागदपत्रांत आणखी लहानमोठ्या तीसचाळीस फितुरांची नावे सापडतात. ज्यांची नोंद नाही असे आणखी कित्येक असतील.
निष्ठा लोपली
याचा अर्थ असा की शिवछत्रपतींनी जी राष्ट्रनिष्ठा मराठ्यांच्या ठायी रुजविली होती ती आता लोपत चालली होती. छत्रपतींच्या काळी तिने वरी मुळे धरली होती. पण कोणत्याही निष्ठेला अखंड जलसिंचन हवे असते. शिवछत्रपती, समर्थ रामदास यांसारखे महापुरुषच हे काम करू शकतात. त्या दोघांच्या निर्वाणानंतर महाराष्ट्रात तसा पुरुष, तसा नेता, तस तत्त्ववेत्ता, कोणी झाला नाही. संभाजी महाराज विलासमग्न होते, कलुषाच्या आहारी गेले होते, हे प्रवाद आता खोटे ठरले आहेत. पण लोकांच्या राष्ट्रनिष्ठेला जलसिंचन करण्याचे सामार्थ्य त्याच्या ठायी नव्हते, हे खरेच आहे. ते स्वतःच एकदा मोगलांना मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या वाणीला ती महाप्रेरणा देण्याची शक्ती असणे शक्यच नव्हते. त्यामुळेच ते नवकर्तबगार पिढी निर्माण करू शकले नाहीत. हंबीरराव, हरजी राजे असे काही जुने कर्तेपुरुष होते. त्यांच्या वरच गुजराण होत होती. तानाजी, प्रतापराव गुजर, मोरोपंत, अनाजी यांसारखे तीस चाळीस लोक शिवछत्रपतींच्या भोवती होते. तसा नामांकित एकही पुरुष संभाजी महाराजांना निर्माण करता आला नाही. आणि दुसरा कोणीही राष्ट्रधर्माचा प्रणेता या काळात निर्माण झाला नाही. हे देशाचे दुर्दैव होय.
आर्थिक दुर्दशा
मराठ्यांची प्रतिकारशक्ती ढिली पडण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक धनाची टंचाई हे होय. १६८१ सालापासून सर्व महाराष्ट्रभर लष्कराचा धुमाकूळ चालू झाला. त्यामुळे शेती आणि व्यापार ही दोन्ही आर्थिक क्षेत्रे उद्ध्वस्त होऊन गेली. शेती करायला कोणाला उत्साहच राहिला नाही आणि त्यातून थोडी शेती पिकली तर मोंगल तिची अखंड लूट करीत असत. संभाजी महाराजांना सर्व आघाड्यांमिळून पंचवीस तीस हजार लष्कर ठेवावेच लागत होते. शिवाय आरमार, दारूगोळा यांचा खर्च होताच. एवढा खर्च हळूहळू भागेनासा झाला. त्यामुळे लष्कराचे पगार थकू लागले. मग ज्या त्या तुकडीने, टोळीने, पथकाने आपापले भागवावे असे झाले. त्यामुळे शिवछत्रपतींच्या वेळची शिस्त संपुष्टात आली. त्यांच्या वेळी लष्करी लुटीतला सुतळीचा तोडाही कोणाला गिळंकृत करता येत नसे. आता प्रत्यक्ष आज्ञेने नव्हे, पण अप्रत्यक्षपणे ते घडू लागले. त्यामुळे खजिन्यात पैसा जमा होईनासा झाला आणि पेचप्रसंग वाढू लागले. शेती खालावली, व्यापार मंदावला, लूट जमा होईनाशी झाली. त्यामुळे सर्व अर्थव्यवस्थाच कोसळून पडण्याची वेळ आली. अशा स्थितीत युद्धप्रयत्न ढिले पडले तर त्यात नवल कसले ?
नवे चैतन्य
फितुरीमुळे, आर्थिक विपन्नतेमुळे आणि शिस्त लोपल्यामुळे मराठ्यांचा प्रतिकार याच वेळी थंडावून औरंगजेबाचे मनोरथ पूर्ण झाले असते. पण संभाजी महाराजांनी मृत्यूसमयी जे अग्निदिव्य केले त्यामुळे गात्रे ढिली पडत चाललेल्या या देहात पुन्हा चैतन्याचा संचार झाला. 'तुझे सर्व किल्ले व खजिना आमच्या ताब्यात दे, आणि जे मोगल अधिकारी तुला फितूर झाले असतील त्यांची नावे सांग,' असे बादशहाने महाराजांना फर्माविले. पण त्यांनी या मागण्या फेटाळून लावल्या आणि अत्यंत उर्मट असा जवाब दिला. 'तू मुसलमान हो', अशी तिसरी अट बादशहाने घातली होती. त्यावर, 'तुझी बेटी आम्हाला देशील तर आम्ही मुसलमान होऊ,' असा अत्यंत जहाल व मानहानिकारक जबाब छत्रपतींनी दिला. (अलीकडे हे सर्व निराधार आहे, असे संशोधक म्हणतात) यामुळे बादशाचा तोल सुटला आणि त्याने अत्यंत क्रूरपणे महाराजांचा वध केला.
या वेळी संभाजी महाराजांनी कच खाल्ली असती, माफी मागून दयेची भीक मागितली असती, लाचारी दाखविली असती तर मराठे बहुधा येथेच संपले असते. पण तसे घडले नाही. शिवछत्रपतींचे तेज या शेवटच्या क्षणी त्यांच्या पुत्राने दाखविले धीरोदात्तपणे त्यांनी मृत्यू पत्करला. आणि जिवंतपणी जे राष्ट्रतेज ते निर्मू शकले नाहीत ते मृत्यूच्या दिव्यक्षणी त्यांनी मराठयांना दिले. सर्व महाराष्ट्र पुन्हा चैतन्याने रसरसू लागला. रामचंद्रपंत आमात्य, शंकराजी नारायण, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, परशुराम त्रिंबक आणि खंडोजी बल्लाळ असे सहा थोर कार्यकर्ते, नेते उदयास आले. हे सर्व शिवछत्रपतींच्या सहवासातच वाढले होते. तेव्हा त्यांच्या प्रेरणेचा स्फुल्लिंग तोच होता. पण मधल्या अवधीत तो विकसित होत नव्हता, मलिन झाला होता. संभाजीमहाराजांच्या त्या असीम धर्मनिष्ठेमुळे तो पुन्हा उजळला आणि त्याने स्वातंत्र्ययुद्धात विजय मिळविण्याची महनीय कामगिरी केली.
भ्रमनिरास
शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठ्यांचे स्वराज्य सहज वुडविता येईल असे बादशहास वाटत होते. पण त्या वेळी त्याचा भ्रमनिरास झाला. तसाच भ्रमनिरास शंभुछत्रपतींच्या निधनानंतर पुन्हा एकदा झाला. या वेळीही आता हे राज्य बुडाले, आपले स्वप्न साकार झाले, असे त्यास वाटू लागले. पण संभाजीमहाराजांचा त्याने वध केला त्याच साली व त्याच ठिकाणी त्याच्या छावणीवर संताजी घोरपडे यांनी छापा घालून बादशहाच्या डेऱ्याचे सोन्याचे कळस कापून नेले! आणि त्याचे स्वप्न भंगून टाकले. त्याचा भ्रम नष्ट केला.
उत्तरोत्तर मराठयांचे हे आक्रमक तेज वाढतच गेले आणि ते राज्याला तसा कर्तबगार, समर्थ नेता नसताना, हे विशेष.
राजाराम
शंभुछत्रपतींच्या नंतर राजाराम महाराज गादीवर आले. त्यांच्या अंगी तेज, कर्तृत्व काहीच नव्हते. पहिली दहा वर्षे रायगडावरच त्यांचे बालपण गेले. १६८० सालापासून १६८९ पर्यंत संभाजी महाराजांनी त्यांना नजरकैदेतच ठेवले होते. गादीवर आल्यावर लगेच ते जिंजीला गेले आणि तेथे १६९८ पर्यंत अडकून पडले होते. अशी वयाची २८ वर्षे गेली. १७०० साली त्यांना मृत्यू आला. कारकीर्द संपली.
पण असे असले तरी राजाराम मनाने मोठे होते आणि त्या मोठेपणाचा स्वराज्याला मोठा उपयोग झाला. राज्याचा खरा वारस शाहू आहे; तो कैदेत आहे म्हणून आम्ही त्याचे राज्य चालवितो, अशी भूमिका प्रथमपासूनच त्यांनी घेतली होती. यामुळेच जिंजीला जाणे, तेथे राहणे व आठ वर्षांनी परत येणे या प्रसंगी त्यांना स्वामिनिष्ठ व कर्तबगार माणसे मिळाली.
नैतिक उंची
राजधानी रायगडला मार्च १६८९ मध्ये वेढा पडला. त्या वेळी संभाजी महाराजांची राणी येसूबाई हिने सांगितले की राजारामांनी आता येथून बाहेर पडावे आणि पुढे योग्य वेळी आम्हांस सोडवून न्यावे. येसूबाईच्या या निःस्वार्थी, उदार विचारांमुळे सर्वांना धीर आला. तिने शाहूच राज्याचा मालक, हा आग्रह धरला नाही. यामुळे लोकांना ध्येयवादाची मोठी प्रेरणा मिळाली आणि रायगड ते जिंजी हा राजारामांचा प्रवास सुरक्षित पार पडला. गावोगावच्या ठाणेदारांना बादशहाने सक्त हुकूम पाठविले होते की राजारामाला पकडावे. पण त्यांना ते शक्य झाले नाही. एक सरदार किंवा हुजऱ्या जरी त्या वेळी फितूर झाला असता तरी धडगत नव्हती. पण तसे घडले नाही. सेनापती पानसंबळ, प्रल्हाद निराजी, निळो व बहिरो मोरेश्वर पिंगळे, खंडो बल्लाळ, मानसिंग मोरे, रुपाजी भोसले, बाजी व खंडोजी कदम, बहिरजी व मालोजी घोरपडे या सर्व मंडळींनी जिवास जीव देऊन, संघटित राहून, छत्रपतींना संभाळून नेले. मराठ्यांच्या नैतिक उंचीच्या दृष्टीने ही गोष्ट इतिहासात नोंद करून ठेवण्याजोगी आहे. ८-९ वर्षांनी राजाराम महाराज परत आले, त्या वेळीही त्याग, ध्येयनिष्ठा, स्वामिनिष्ठा या गुणांचा असाच प्रत्यय आला. औरंगजेबाविरुद्ध मराठ्यांनी ही एक मोठी लढाईच जिंकली, असे म्हणावे लागते.
शून्याकार
इ. १६८९ हे साल मराठ्यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाचे आणि बाह्यतः तरी सर्वनाशाचे ठरले. मार्चमध्ये संभाजीमहाराजांचा वध झाला. सप्टेंबरमध्ये राजाराम महाराज जिंजीकडे निघून गेले आणि नोव्हेंबरमध्ये राजधानी असलेला किल्ला पडला. किल्ला पडला तेव्हा येसूबाई आणि शाहू बादशहाच्या कैदेत गेले. मागे खानाने रायगड सर्व लुटून फस्त केला आणि शिवछत्रपतींचे सिंहासन फोडून टाकले. म्हणजे या एका वर्षात मराठ्यांच्या स्वराज्याचा शून्याकार झाला.
पण अशाही स्थितीत शिवछत्रपतींच्या पुण्यस्मरणाने व संभाजी महाराजांच्या प्रेरणेने या शून्यातून पुन्हा चैतन्य निर्माण झाले. आणि औरंगजेबाला गिळून स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास ते समर्थ ठरले.
षण्मुखी नेतृत्व
यावेळी महाराष्ट्राला राजा नव्हता किंवा सर्वाधिकारी असा एकही नेता नव्हता. पण रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, परशुराम त्रिंबक आणि खंडो बल्लाळ असे षण्मुखी नेतृत्व मराठ्यांना लाभले आणि या थोर कर्त्या पुरुषांनी स्वातंत्र्ययुद्ध पहिल्यापेक्षा अधिक जोमाने चालवून, मऱ्हाष्ट्र राज्य जिवंत ठेवले.
आपण प्रथम प्रत्यक्ष स्वातंत्र्यसंग्रामाचे, युद्धाचे रूप पाहात आहो. संस्कृतीच्या इतर अंगांचे विवेचन त्यानंतर करावयाचे आहे. युद्धाच्या दृष्टीने पाहता १६८९ च्या पुढच्या काळात विशेष कोणाचा पराक्रम उठून दिसत असेल तर तो संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचा आणि त्याच्या खालोखाल शंकराजी नारायण व परशुराम त्रिंबक याचा.
शंकराजी नारायण
शंकराजी नारायण हा मावळ प्रांताचा विशेष माहीतगार होता आणि मावळे लोकांवर त्याची छापही चांगली होती. संभाजी महाराजांना पकडल्यावर औरंगजेबाने मावळातील किल्ले भराभर जिंकले. पण तशाच तडफेने शंकराजी नारायण याने मोगलांचा उच्छेद करून ते परत घेतले आणि पुढे वाईपर्यंत स्वारी करून वाईचा कोट व प्रतापगड हे किल्ले त्याने रगडून घेतले. शंकराजी नारायण हा अत्यंत कजाखी व धाडशी होता. म्हणूनच या पडत्या काळात तो बहुमोल कामगिरी करू शकला.
परशुराम त्रिंबक
जसा शंकराजी नारायण तसाच परशुराम त्रिंबक. हा प्रथम कारकुनीत होता. पण लवकरच तो युद्धप्रसंग करू लागला आणि सुभालष्कर, समशेरजंग हे किताब त्याने मिळविले. मावळ - सातारा, वाई या भागात जे शंकराजी नारायणाने केले तेच परशुराम त्रिंबक याने मिरज-रांगणा या प्रदेशात केले. त्याची मुख्य कर्तबगारी दिसून आली ती औरंगजेबाने जिंकलेला पन्हाळा किल्ला परत घेण्यात. दोन वर्षे त्यासाठी त्याला लढावे लागले. पण अखेर त्याने तो गड जिंकला आणि बादशहाने जंग जंग पछाडले तरी पाच वर्षांपर्यंत तो जाऊ दिला नाही.
पण मोगलांना नामोहरम करण्याचे मोठे श्रेय कोणास द्यावयाचे तर ते संताजी व धनाजी यांना. आणि विशेषतः संताजी घोरपडे यांना. मोगलांचे सामर्थ्य पार खच्ची करून टाकण्याची महनीय कामगिरी त्यांनीच केली.
संताजी घोरपडे
पहिल्या सलामीलाच संताजी घोरपडे यांनी बादशहाच्या डेऱ्याचे कळस कापून त्याचा मुखभंग केला हे वर सांगितलेच आहे. १६९० साली बादशहाने सर्जाखान यास सातारा किल्ला घेण्यास पाठविले. पण संताजी व धनाजी यांनी त्यास हत्तीवरून ओढून कैद केले आणि एक लाख दंड घेऊन मग सोडून दिले. यानंतर बादशहाने फिरून जंगास पाठविले व त्याच्या मदतीस अब्दुल कादीर यास दिले. पण रुपाजी भोसले याने कादीरचे सर्व लष्कर लुटून फस्त केले. त्या नंतर लुत्फुल्लाखान सातारा घेण्यासाठी आला. पण म्हसवडजवळ संताजी, धनाजी, डफळे, मोरे यांनी त्याचा पराभव करून त्यास हाकलून लावले. बादशहाने विजापूर प्रांत जिंकला होता. त्यावर वारंवार झडप घालून संताजी तो प्रांत लुटून फस्त करीत असे. १६९२ साली संताजी व धनाजी यांनी बेळगाव-धारवाडवर हल्ले चढविले. बादशहाचे तीन सरदार वेदरबखखान, लुत्फुल्लाखान आणि हमीदुद्दीनखान बचावासाठी धावून आले. कासीमखानही शिऱ्याहून त्यांच्या मदतीला आला. पण ती शहरे लुटून मराठे केव्हाच पसार झाले होते.
आग्या मोहोळ
या मोठ्या लढायांच्या वार्ता झाल्या. पण मोठ्या मराठा सरदारांनी मोगलांचा ठायी ठायी असा नक्षा उतरवलेला पाहताच सर्वच शिपाईगड्यांना अंगात वारे संचारल्यासारखे झाले आणि आग्या मोहोळ उठावे तसा प्रकार झाला. गुजराथ, बागलाण, गोंडवन येथपासून कर्नाटक, जिंजीपर्यंत मराठी फौजा वाऱ्यासारख्या फिरू लागल्या. हे मराठे छापे घालीत, खंडण्या घेत, बादशहाची ठाणी उठवीत, सामान, सुमान, हत्ती घोडे, उंट लुटून घेत. अकस्मात यावे, बकाने मत्स्य उचलून न्यावा तसा घाला घालावा, खाण्यापिण्याची दरकार बाळगू नये, थंडी, वारा, ऊन, पाऊस काही पाहू नये, चटणी, भाकरी घोड्यावरच खावी आणि वाऱ्यासारखे नाहीसे व्हावे, असा त्यांचा खाक्या होता. हे मराठे किती आहेत, कोठून येतात, याचा मोंगलांना काही अदमासच लागेना. बादशहा अगदी रडकुंडीला आला. तो म्हणे, 'मराठे आदमी नव्हत, हा भूतखाना आहे.'
दिल्लीकडे
मोगल असे निस्तेज, हताश झालेले पाहून मराठ्यांना भलतीच उमेद चढली. औरंगजेबाचे सर्व राज्य उलथून टाकून दिल्ली काबीज करण्याची सुखस्वप्न ते पाहू लागले. १६९१ साली हणमंतराव घोरपडे यास लिहिलेल्या पत्रात राजाराम महाराजांनी काय सांगितले आहे पाहा. 'तुमचा संकल्प जाणून स्वामींनी फौज खर्चास सहा लक्ष होनांची नेमणूक करून दिली आहे. रायगड, विजापूर, भागानगर व औरंगाबाद हे चार प्रांत काबीज केल्यावर तीन लाख आणि प्रत्यक्ष दिल्ली काबीज केल्यावर बाकीचे तीन लाख, असा निश्चय केला आहे. महाराष्ट्रधर्म चालवावा. एकनिष्ठपणे सेवा करावी.'
जिंजीस वेढ्यात अडकून पडलेला मराठ्यांचा छत्रपती हे पत्र लिहितो, हे हास्यास्पद आहे, असे क्षणभर वाटेल. पण सरदेसायांनी वारंवार लिहिले आहे की मराठ्यांची एकजूट व निष्ठा कायम असती तर यात अवघड असे काही नव्हते.
मोगल भारी नव्हते
या पंचवीस वर्षांतील मोगली लष्कराची स्थिती, त्यांच्या सरदारांची वृत्ती आणि औरंगजेबाचा हट्टाग्रही स्वभाव यांची वर्णने वाचताना मनात येते की खरोखरच यात अववड काही नव्हते. औरंगजेबाचा एक मुलगा अकबर तर उघडपणे मराठ्यांना मिळाला होता. शहा अलमबद्दल बादशहाला तशीच शंका होती. किंबहुना बादशहाला सर्व सरदार पुत्र व नातू यांच्याबद्दल तसा संशय होता. सरदारांना कसलाच उत्साह नव्हता. कारण केल्या पराक्रमाचे बादशहा स्मरण ठेवीलच, अशी कोणालाच खात्री नव्हती. दिलेरखानने यामुळेच आत्महत्या केली. आणि शहा आलमचा मुलगा तर बादशहालाच ठार मारायला निघाला होता. शिवाय घरापासून माणसे किती दिवस दूर राहावी याला काही मर्यादाच राहिली नव्हती. दिल्ली प्रांत सोडून सतत दहा, पंधरा, वीस वर्षे, पंचवीस वर्षे मोहीमशीर राहावयाचे म्हणजे काय चेष्टा आहे ! त्यात अन्न, वस्त्र, घर यांची नित्य वानवा. आणि यावर मराठ्यांच्या भुतावळीशी गाठ. अवर्षण, अतिवर्षण, दुष्काळ, प्लेग, कॉलरा या आपत्तीही दर दोन-तीन वर्षांनी येतच होत्या. त्यामुळे नेटाने लढण्यास उत्साह कोणालाच नव्हता. तेव्हा शिवछत्रपतींच्या वेळच्या निष्ठा, जूट व ध्येयवाद टिकला असता तर मोगल हे मराठ्यांना भारी नव्हते हे सहज पटू लागते.
त्या निष्ठा, तो ध्येयवाद यांचे काय झाले याचा विचार वर थोडासा केला आहे. पुढे आणखी करावयाचा आहे. सध्या या स्वातंत्र्यसंग्रामाचे स्वरूप आपण पाहात आहो.
जिंजी - कर्नाटक
महाराष्ट्रात संग्राम कसा चालू होता हे वर आपण पाहिले. याच वेळी दक्षिणेस कर्नाटकात जिंजीपर्यंत युद्धक्षेत्र पसरले होते. १६९० च्या ऑगस्टमध्ये झुल्लिकार खानाने जिंजीस वेढा घातला आणि १६९८ च्या फेब्रूवारीत किल्ला पडला. पण ही आठ वर्षे सतत वेढा चालू होता असे नाही. जिंजीला महाराष्ट्रातून जाणारी धान्य- सामग्री, दारूगोळा आणि लष्कर यांना मराठी फौजा इतके हैराण करीत की खानाला दोनतीनदा वेढा उठवून दूर निघून जावे लागले होते. जिंजीच्या वेढ्यावरही संताजी धनाजी सारखे तुटून पडत आणि अनन्वित संहार व विध्वंस करीत. शिवाय मोगलांची अशी नामुष्की झालेली दिसताच कर्नाटकातील समस्त हिंदुसत्ताधीश मराठ्यांच्या पक्षाचे झाले. याचप्पा नाईक हा तिकडचा शूर सरदारही मराठ्यांना मिळाला आणि हे सर्व लोक अन्नधान्याची वाहतूक व लष्कराच्या हालचाली या बाबतीत मोगलांची कोंडी करू लागले. यामुळे झुल्पिकारखान एकदा इतका हताश झाला की राजाराम महाराजांच्याकडे माणूस पाठवून त्याने असे सुचविले की 'तुम्ही मागाल तो दंड देतो. पण जिंजीवरून आम्हास सुरक्षित बाहेर जाऊ द्या.' प्रत्यक्षात त्याने तसे कधी केले नसते, बादशहाने त्यास तसे करू दिले नसते, हे खरे. पण वेळ आली होती. यावरून मराठ्यांनी मोगली सेनेची किती दुर्दशा केली होती ते दिसून येते.
दुडेरीचा संग्राम
१६९५ च्या अखेरीस संताजी व धनाजी तुंगभद्रा उतरून जिंजीकडे निघाले असता बादशहाने कासिमखानास त्यांच्यावर पाठविले. आणि मागोमाग खानाजादखान या बड्या सरदारास त्याच्या मदतीस पाठविले. या बड्या सरदाराचा मोठा पाहुणचार करावा असे कासिमखानास वाटले. आणि अडोणी, चित्रदुर्ग या परिसरात मोठा भपकेबाज शामियाना त्याने उभारला. संताजीला याची खडानखडा बातमी होती. त्याने आपल्या लष्कराच्या तीन टोळ्या करून गनिमी काव्याने त्या ठाण्यावर सर्व बाजूंनी हल्ले चढविले. अन्नधान्याची नासाडी केली व सर्व गोट साफ लुटला. दोन्ही खानांना दे माय धरणी ठाय केले. शेजारीच दुडेरीची गढी होती. तिचा आश्रय त्यांनी केला. पण संताजीने गढीला वेढा घातला. तेव्हा अन्नपाण्यावाचून लष्कर तडफडू लागले. खानजादखानाने संताजीकडे तहाचे बोलणे लावले. वीस लाख दंड व सर्व सामग्री घेऊन खानाला अंगावरच्या वस्त्रानिशी सोडून दिले. कासिमखानाच्या मदतीस दुसरा एक सरदार हिंमतखान बहादूर येत होता. संताजीने बसवपट्टण येथे त्यास गाठून मैदानात त्यास ठार मारले व त्याचे सामान लुटून घेतले.
कर्नाटकातील मराठ्यांचे हे पराक्रम पाहता वरील निष्कर्षच दृढ होतो की मोगल मराठ्यांना भारी नव्हते. पण फितुरी आणि दुही या व्याधीमुळे मराठ्यांचे बळ सारखे खच्ची होत होते. दुहीचे सर्वात भयंकर उदाहरण म्हणजे संताजी आणि धनाजी यांचे वैमनस्य आणि ते इतके की त्यांच्यात आयेवार कुटी येथे १६९६ साली प्रत्यक्ष लढाईच झाली आणि त्यातूनच पुढे दुही-फितुरीमुळे संताजीचा खून झाला. त्यानंतर ही लढाया होत राहिल्या. या सर्वांची चिकित्सा पुढे करावयाची आहे. प्रथम १७०७ पर्यंत मोगलांचा प्रतिकार मराठ्यांनी कसा केला हे पाहू.
राजाराम - पुण्याई
१६९७ च्या अखेरीस राजाराम महाराज जिंजीच्या वेढ्यातून सुटून विशाळगडावर परत आले. या वेळी झुल्पिकारखानाने स्वतःच राजारामांच्या सुटकेची व्यवस्था केली होती. त्यांनी कोठून कसे सुटून जावे, हे त्यानेच महाराजांना कळविले होते. शिवाय मोगलांच्या बाजूने वेढ्याचे काम करणारे सरदार शिर्के याना खंडोजी बल्लाळ यांनी आपल्याकडे आलेले त्यांचे वतन त्यांना परत देऊन, वश करून घेतले. त्यामुळे सुटका सुलभ झाली. पण राजाराम महाराज पुढे फार दिवस जगले नाहीत. विशाळगडावरून नर्मदापार मोठी मोहीम काढावयाची, असे ठरवून ते बाहेर पडले, पण मोहिमेला प्रारंभिक यशही आले नाही. आणि नेटाने, तडफेने काही करण्याची कुवत राजारामांच्या ठायी नव्हती. त्यातच त्यांची प्रकृती बिघडली आणि इ. स. १७०० च्या मार्चमध्ये सिंहगडावर त्यांचा अंत झाला. आणि स्वराज्याला दुसरा धक्का बसला. राजारामांच्या ठायी कर्तृत्व नव्हते; पण त्या काळी राजा ही पुण्याई होती. स्वामी कसाही असला तरी स्वामिनिष्ठेने लोक बांधले जात व आपल्याला धनी आहे ही भावना प्रजेच्या मनात असे. तो दिलासा आता गेला, आणि लोक उघडे पडले.
ताराबाई
पण याहीपेक्षा मोठी हानी झाली ती म्हणजे मराठी राज्य आता दुभंगले. राज्याचा खरा मालक शाहू कैदेत होता. तो सुटेल तेव्हा तोच गादीवर यावयाचा, असा संकेत सर्वांच्या मनात होता. पण राजारामाची राणी ताराबाई हिचा आग्रह असा की आपला मुलगा शिवाजी हाच खरा राज्याचा धनी. तेव्हा त्याला अभिषेक झाला पाहिजे. रामचंद्रपंत अमात्य याचा याला विरोध होता. युद्ध संपेपर्यंत हा वाद काढू नये, दुही बाहेर दिसू नये, असे त्याला वाटे. पण शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक यांना ताराबाईने वळवून घेतले होते. तेव्हा पंतानी माघार घेतली व अभिषेकास संमती दिली. पण या वेळेपासून त्यांचे मन विटून गेले आणि त्यांचा आवेश संपुष्टात आला.
पुन्हा निराशा
संभाजी महाराज गेले, तेव्हा आता मराठ्यांचे राज्य आपण सहज बुडवू, असे बादशहाला वाटू लागले. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्याला पुन्हा तशीच आशा वाटू लागली. पण याही वेळेस त्याला निराशेचा जबर तडाखा बसला. मराठ्यांचा जोम, आवेश, प्रतिकारशक्ती, पराक्रम कमी न होता वाढतच आहे, असे त्यास दिसू लागले. राजाराम गेल्यावर ताराबाईने कारभार हाती घेतला आणि स्वातंत्र्याचा लढा पूर्वीच्याच आदेशाने, पुढे चालविला. १७०० ते १७०७ या सात वर्षातील राज्यरक्षणाचे श्रेय इतिहासकार ताराबाईला देतात. काफीखानासारख्या मुस्लिम लोकांनीसुद्धा तिचा गौरव केला आहे आणि तिने केलेल्या कार्यावरून तो खरा आहे असे दिसते.
लांडगेतोड
या सात वर्षातल्या युद्धाची कथा मागल्या काळापेक्षाही जास्त रसरशीत आहे. औरंगजेबाचा आपल्या सरदरांवर विश्वास राहिला नव्हता. त्यामुळे तो स्वतः मोहीमशीर झाला आणि मराठ्यांचे किल्ले घेण्याचा त्याने सपाटा लावला. इ. स. १७०० च्या एप्रिलपासून इ. स. १७०५ एप्रिलपर्यंत त्याने सातारा, परळी, पन्हाळा, सिंहगड, खेळणा इत्यादी मराठ्यांचे दहा किल्ले घेतले. पण हे किल्ले त्याने कसे घेतले, त्यांचे पुढे काय झाले आणि या अवधीत मराठ्यांनी मोगल फौजेची कशी लांडगेतोड केली, हे पाहिले म्हणजे मोगल साम्राज्य व त्याचा सत्ताधीश औरंगजेब यांची मृत्युपंथाकडे ही वाटचाल सुरू झाली होती, हे स्पष्ट दिसू लागते.
या दहा किल्ल्यांपैकी मोगलांनी लुटून जिंकून घेतला असा फक्त तोरणा किल्ला होय. बाकीच्या सर्व किल्लेदारांना पैसे देऊन ताब्यात घेतलेले होते. पण या वेळी मराठयांनी पैसे घेऊन किल्ले दिले. याला फितुरी असेही पण म्हणता येत नाही. कारण किल्ले घेतल्यानंतर, त्यांची व्यवस्था ठेवण्याची कुवत बादशहाला नाही, हे मराठयांनी चांगले ओळखले होते. त्यामुळे, पाचसहा महिने किल्ला लढविल्यानंतर, दमछाक झाल्यावर, ते किल्ला ताब्यात देत आणि वेढा उठवून बादशहा निघून गेला की लगेच किल्ला जिंकून घेत. या रीतीने हे सर्व किल्ले मराठ्यांनी थोड्याच अवधीत परत घेतलेले आहेत. यामुळे मोगलांचे अपरिमित नुकसान होत होते आणि बादशहाची छीथू होत होती.
पण याहीपेक्षा मोगलांची भयंकर हानी होत होती ती किल्ल्याच्या परिसरातील दहावीस मैलांच्या टापूत मराठे लांडगेतोड करीत त्यामुळे. धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, राणोजी घोरपडे, असे सरदार मोगली फौजेवर सारखे फिरते हल्ले चढवीत. त्यांचा दाणागोटा, शस्त्रास्त्रे, दारूगोळा लुटीत, सर्व प्रकारे विध्वंस करून शेकडो सैनिकांना ठार मारीत आणि सरदारांना लाख, दोन लाख दंड करून सोडून देत. ओला-सुका दुष्काळ, वारेवादळ, पूर यांमुळे आणि रोगांच्या साथीमुळे लष्कराचे हाल होत ते निराळेच. इटालियन प्रवासी मनूचीने लिहून ठेविले आहे की औरंगजेबाच्या लष्करात दरसाल एक लाख माणसे व हत्ती, घोडे, उंट, बैल अशी तीन लाख जनावरे मृत्युमुखी पडत. मोठमोठे सरदार भिकारी झाले. त्यांच्या बायका दारोदार भीक मागत हिंडू लागल्या !
उत्तरेवर आक्रमण
या काळात मराठे महाराष्ट्रातच फक्त मोगलाशी लढा करीत होते असे नाही. नेमाजी शिंदे, केसोपंत पिंगळे आणि परसोजी भोसले हे ५० हजार स्वार घेऊन नर्मदा उतरोन काळबाग पावेतो लुटीत गेले. १७०५ साली धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, दादो मल्हार, रंभाजी निंबाळकर चाळीस हजार स्वारांनिशी घोडदौड करीत सुरतेवर गेले आणि तेथून भडोचपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी फस्त केला. त्यांजवर नजर अलीखान व ख्वाजा हमीद हे चालून गेले; पण त्यांचा मराठ्यांनी फन्ना उडविला, त्या दोघांना कैद केले व त्यांच्यापासून आठ लाख रुपये दंड घेऊन त्यांना सोडून दिले. त्याच साली मराठे माळव्यातही उतरले. बऱ्हाणपूर, वऱ्हाड, खानदेश येथे त्यांच्या स्वाऱ्या नित्याच्याच होत्या. पण आता मराठ्यांनी या परगण्यात कायमचा अंमल बसविण्यास सुरुवात केली. जिंकलेल्या प्रदेशात सुभेदार, कमाविसदार असे अधिकारी नेमू लागले आणि चौथाई, दस्तुरी वसूल करू लागले. याच वेळी बुंदेलखंडात छत्रसालाने उठावणी केली होती. १७७३ साली नेमाजी शिंदे प्रथम माळव्यात व नंतर बुंदेलखंडातही शिरला होता. पण बुंदेलखंडात छत्रसाल सर्व बुंदेलांना उठवू शकला नाही. नाहीतर तेथेही माेंगली सत्ता राहिली नसती.
उत्तरेवर या चढाया चालू असताना मराठे तिकडून बादशहाकडे येणारे लमाणांचे तांडे लुटून फस्त करीत आणि खजिना घेऊन येणाऱ्या शिबंदीचाही नायनाट करीत. त्यामुळे बादशहा पूर्ण नागविला गेला. अन्नधान्य नाही, युद्धसामग्री नाही, पैसा नाही, अशी त्याची स्थिती झाली.
बादशहाचा मृत्यू
अशा स्थितीत बादशहा अहमदनगरास आला व त्याची प्रकृती जास्तच खालावली. घोर निराशेने त्यास ग्रासले होते. आपण कशाला या मराठ्यांच्या युद्धाच्या फंदात पडलो असे त्यास झाले. त्याचे पुत्र व सरदार त्याच्या मरणाची वाट पहात होते. तो मरतो केव्हा व आपण राज्य घेतो केव्हा, याचीच सर्वांना विवंचना लागली होती. आजमशहा व कामबक्ष हे दोन शहाजादे त्याच्याजवळ होते. पण एक दुसऱ्याला मारील अशी बादशहाला भीती वाटत होती. अशा रीतीने वैफल्य, निराशा, भीती यांनी तो अगदी खचून गेला आणि २० फेब्रुवारी १७०७ रोजी त्याच स्थितीत त्याचा अंत झाला.
बादशहाचा अंत्यविधी उरकल्यावर अहंमदनगर येथे पुत्र आजमशहा तखतनशीन झाला. पण अफगाणिस्तानातून मोठा मुलगा शहा आलम दिल्लीवर चालून येत आहे अशी वार्ता आली. तेव्हा आजमशहाही उत्तरेकडे निघाला. तेवढ्यात बातमी आली की ताराबाईने बहुतेक सर्व किल्ले घेतले आणि धनाजीने पुणे व चाकण ही मारली. तेव्हा सर्व सरदारांचा विचार घेऊन आजमशहाने शाहूराजांना, मराठ्यांच्यात दुही माजविण्याचा हेतू मनात धरून, मुक्त केले आणि अशा रीतीने हे स्वातंत्र्ययुद्ध संपले.
या स्वातंत्र्ययुद्धाची मीमांसा पुढील प्रकरणात करावयाची आहे. या युद्धाचे फलित काय ते प्रारंभीच सांगितले आहे. हे युद्ध मराठ्यांनी जिंकले आणि शिवछत्रपतींनी स्थापिलेले स्वराज्य त्यांनी टिकवून धरले. दुसरे मोठे फल म्हणजे मोगल बादशहा आणि मोगल साम्राज्य यांचा कणाच या युद्धात मराठ्यांनी मोडून टाकला. पुन्हा भारतात पूर्वीसारखी मुस्लिम सत्ता कधीच प्रस्थापित झाली नाही. युद्धाच्या या फलिताविषयी वाद नाही. पण याही पलीकडे जाऊन आणखी चिकित्सा करणे अवश्य आहे. शिवछत्रपतींनी दिलेल्या नव्या प्रेरणा, नवा ध्येयवाद, नवी मूल्ये ही मराठ्यांनी टिकवून धरली काय, त्यांनी शिकविलेल्या राष्ट्रधर्माचे काय झाले, त्यांच्या आर्थिक तत्त्वांचे काय झाले, हे आपल्याला पाहिले पाहिजे. कारण या युद्धात जे घडले त्याचे परिणाम पुढे मराठी साम्राज्यावर, आणि त्यामुळेच अखिल भारतावर झालेले आहेत. म्हणून महाराष्ट्र संस्कृतीच्या दृष्टीने त्याचे विवेचन केले पाहिजे. पुढील प्रकरणात ते करू.
■