माझ्या ब्राह्मण्याची गाथा

माझ्या ब्राह्मण्याची गाथा


 मी ब्राह्मण घरात जन्मलो. जोशी आडनावावरून हे स्पष्टच आहे. माझ्या वडिलांचे आई-वडील, ते चार-पाच वर्षांचे व्हायच्या आतच वारले. त्यांचे बघणारे दुसरे कुणीच नसल्यामुळे कोल्हापूरच्या एका मिशन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या मनावर ख्रिस्ती शिकवणुकीचा आणि बायबलचा मोठा प्रभाव होता. वृत्तीने धार्मिक असले, तरी ब्राह्मण्याचा अहंकार त्यांच्याकडे नावालाही नव्हता. माझी आई पंढरपूरची. पंढरपूरच्या बडवे मंडळींच्या वर्तनाची लहानपणापासून घृणा असलेली. तसे तिचे शाळेतील शिक्षण काहीच नाही. अगदी लहानपणच्या माझ्या आठवणीतही घरामध्ये स्पृश्यास्पृश्यता पाळली गेलेली मला आठवत नाही. नाशिकच्या शाळेतील गायकवाड नावाचा एक हरिजन वर्गमित्र पाणी प्यायचे झाले, तर फक्त आमच्या घरी येत असे, हेही मला आठवते. आईने केलेल्या स्पृश्यास्पृश्यतेची एकच आठवण अजून स्पष्ट आहे. परदेशांतील माझ्या मित्रांना ती आठवण अनेकदा सांगितली आहे आणि त्यांनाही मोठी गंमत वाटली.

 वडील सरकारी नोकरीत आणि काळ दुसऱ्या महायुद्धाचा. सगळ्याच सरकारी कामांचा संबंध कोठे ना कोठे लष्कराशी येई. वडिलांची कचेरी घरातच, एका खोलीत होती. एक दिवस एक अमेरिकन अधिकारी कामाच्या निमित्ताने त्या कचेरीत आला होता. बराच वेळ बसलाही होता. तो गेल्यानंतर आईने केवळ कचेरीची खोलीच नव्हे, तर सारे घर बादल्या बादल्या पाणी ओतून धुऊन घेतले होते.

 तरीही मनामध्ये खोल कुठेतरी ब्राह्मण्याची जाणीव त्या काळात असली पाहिजे. या जाणिवेच्या फोलपणाची कल्पना आली त्या दिवशी माझ्या विचाराच्या यात्रेतील एक मोठा टप्पा मी गाठला. त्या वेळी मी फार तर बारातेरा वर्षांचा असेन. एक दिवस बसल्याबसल्या एकाएकी माझ्या मनात विचार येऊन गेला, आपण केवढे भाग्यवान आहोत! अनेक सूर्यमालिकांच्या आणि ग्रहताऱ्यांच्या विश्वात आपण सर्वांत अनुकूल अशा पृथ्वीवर जन्मलो, पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ राष्ट्र भारत! त्यात जन्म घेतला. भारतात शिवछत्रपती आणि ज्ञानेश्वरांसारख्या पुरुषश्रेष्ठांच्या महाराष्ट्रात जन्मलो आणि त्यातही सर्वोत्तम हिंदू धर्मात आणि ब्राह्मण कुलात जन्म घेतला. जन्मत:च सर्वांत सर्वोत्तम सगळ्या गोष्टी मिळाल्या, हा मोठा दुर्लभ लाभच म्हटला पाहिजे.

 त्या वयात अशी आत्मप्रौढीची भावना अनेकांच्या मनात येते आणि बहुतेकांच्या

मनात ती कायम राहते. मला मात्र एवढ्या दुर्लभ गोष्टींचा एकत्र समुच्चय आपल्या बाबतीत झाला आहे, हे काही पटेना आणि मी जन्माने माझ्या असलेल्या गोष्टी खरोखरच सर्वोत्तम आहेत काय? याचा शोध घेऊ लागलो.

 भारत देश सर्वश्रेष्ठ कसा? त्यात काही वीरमणी, नारीरत्ने, साधुसंत झाले हे खरे; पण या सगळ्या जगात जी काही राष्ट्रे गुलाम आहेत, पारतंत्र्यात आहेत; त्यांच्यात भारताची गणना आहे. जगातील अत्यंत गरीब, दुष्काळाने गांजलेल्या देशांत भारत मोडतो. मग असे राष्ट्र सर्वश्रेष्ठ कसे असेल?

 महाराष्ट्रात शिवछत्रपती जन्मले असतील, ज्ञानेश्वरांनीही प्रतिभेचा चमत्कार मराठीत करून दाखवला असेल; पण इतर प्रदेशातही अशी माणसं जन्मतात आणि अशा नररत्नांचा अभिमान त्यांच्या त्यांच्या प्रदेशातील लोकांना पिढ्यानपिढ्या असतोच. इतर कोणत्या राज्यात जन्मलो असतो तर त्या राज्याबद्दल अशीच अभिमानाची भावना बाळगली नसती काय?

 आणि हिंदू धर्मात सर्वश्रेष्ठ असे काय आहे? माझ्या शाळेतील नकाशांचे पुस्तक दाखवत होते, की जगात जास्तीत जास्त उपासक असलेले धर्म बुद्ध आणि ख्रिस्त यांचे आहेत. इस्लामही अनेक देशांत पसरला आहे. एकाच भूखंडात मर्यादित असलेल्या या धर्माला सर्वोत्तम म्हणणे खोट्या अभिमानाचे लक्षण नाही काय?

 आणि ब्राह्मण जाती श्रेष्ठ आहे असे मानणे तर किती मूर्खपणाचे, ब्राह्मण जातीत काय सगळे गोखले, रानडे, टिळकच जन्मले? अपकृत्ये करणारे कुणी झालेच नाहीत? आणि इतर जातीत जन्मून अलौकिक कृत्ये करणाऱ्यांची केवढी तरी देदीप्यमान मालिका समोर असताना ब्राह्मण्याचा अभिमान धरावा कसा?

 या उलटतपासणीने मी अगदी हादरून गेलो. जन्माच्या अपघाताने मिळालेल्या गोष्टींचा वृथा अभिमान बाळगण्याची आपल्यात प्रवृत्ती आहे आणि ती मोडून काढली पाहिजे, याची मला मोठ्या प्रकर्षाने जाणीव झाली. त्या दिवसापासून मी एक निश्चय केला. जन्माच्या अपघाताने आपल्याला जे जे मिळाले असेल, ते अती कनिष्ठ आहे, असे समजून विचाराची सुरुवात करायची आणि जेथे सज्जड पुरावा मिळेल, तेथेच आणि त्या पुराव्याने सिद्ध होईल तेवढेच, जन्मसिद्ध गोष्टींचे बरेपण मान्य करायचे. अशी शिस्त मी बाणवून घेतली. मला वाटते, माझे विचार शुद्ध राखण्यात या बाण्याचा प्रचंड उपयोग झाला.


 अनेक वर्षे परदेशांत गेल्यामुळे कोण कोणत्या जातीचा आहे, याचा विचारही कधी माझ्या मनात येत नाही. वर्गवादी विचारसरणी मी कधी मानत नाही; पण लोहियांसारखे विचारवंतही इतिहासाचा किंवा प्रचलित घटनांचा अर्थ लावताना जातीवर आधारलेले विवेचन करतात. सध्याच्या काळात तरी हे विवेचन अगदी गैरलागू आहे, अशी माझी धारणा आहे. अगदी अलीकडे अलीकडे दिल्लीतील एका लोहियावादी विद्वानाने शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांत कोणकोणत्या जातीचे लोक आहेत असा प्रश्न विचारला होता, तेव्हा मी गडबडून गेलो. माझे निकटचे सहकारी कोणत्या जातीचे आहेत, हे जाणून घेण्याची माझ्या मनात कधी इच्छाच झाली नाही; पण माझ्याबरोबर असलेल्या सहकाऱ्याने माझी अडचणीतून सुटका केली आणि उच्चाधिकार समितीत तीन मराठा, एक माळी, एक धनगर, एक मारवाडी, एक भटक्या जमातीचा... अशी आकडेवारी देऊन माझी सुटका केली.

 निपाणीच्या आंदोलनाच्या शेवटी गोळीबार झाला. तेरा शेतकरी मारले गेले, २०२५ शेतकऱ्यांचे हातपाय मोडले. सगळ्या कार्यकर्त्यांना अटक झाली, त्या वेळी पुण्याचे काही विषमता निर्मूलनवादी तेथे भेटीसाठी गेले आणि मेलेल्यांत आणि जखमी झालेल्यांत किती कोणत्या जातीचे होते याची आकडेवारी गोळा करण्यातच त्यांनी सगळ्यात जास्त रस घेतला. त्या वेळी, इतक्या गंभीर परिस्थितीतही, मला हसू आल्याशिवाय राहिले नाही.

 प्रत्येकाच्या मनात जातीचा विचार खूप खोलवर रुजलेला अजूनही आढळतो. या जातीचा विचारही मनात न आणता, महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांनी मला आपले मानले हा खरोखरच एक चमत्कार आहे; पण या चमत्काराला गालबोट लावणारे मंबाजी काही थोडे थोडके निघाले नाहीत. या खेरीज कोणत्या ना कोणत्या निमित्ताने मधूनमधून माझ्या ब्राह्मण्याचा प्रश्न निघत असतोच.

 १९८० मध्ये भामनेरच्या रस्त्याचा मोर्चा निघाला त्या वेळी, "या बामणाच्या मागे १० शेतकरी आले तरी.." आपले पद सोडून देण्याची फुशारकी त्यावेळच्या पंचायत समितीच्या सभापतीने मारलीच होती. १० च्या ऐवजी १०,००० शेतकरी आले, तरी त्याने राजीनामा दिला नाही ही गोष्ट वेगळी.

 अगदी संघटनेबद्दल सहानुभूती असणाऱ्यांच्या मनातसुद्धा अशी भावना कधी कधी दिसून येई. कांदा आंदोलन यशस्वी झाले त्या वेळी आसपासच्या गावांपैकी अनेकांनी माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार घडवून आणला. सत्काराच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांना सरसकट फेटे बांधले जात आणि मला मात्र शाल देण्यात येई.यातील श्लेष

समजायलासुद्धा मला बराच वेळ लागला.

 ८० सालच्या उसाच्या आंदोलनाची बांधणी होत असताना राजकीय पक्षातील एका मोठ्या महिला नेत्याने “या ब्राह्मणाची कॉलर पकडून त्याला शेतीतले काय समजते ते विचारा,” असे उद्गार नगर जिल्ह्यात काढले होते. त्यानंतर नागपूर येथील त्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे जाब विचारला आणि सभा उधळली गेली. या प्रसंगाने शेतकरी संघटनेचा महाप्रचंड फायदा झाला. बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांनी अग्रलेख लिहून जातीयवादी टीकेचा निषेध केला.शेतकरी संघटना गावोगाव गाजू लागली. माधवराव खंडेराव मोऱ्यांनी म्हटले, "आंदोलन झाल्यावर या बाईंना लुगडे-चोळी नेऊन द्यायला पाहिजेत इतके संघटनेवर त्यांचे उपकार आहेत."

 सगळेच आहेर काही बाहेरचे होते असे नाही. गावोगावी आलेल्या पाहुण्यांना ओवाळण्याची पद्धत आहे. पाहुण्यांच्या हाती शुभेच्छा दर्शक नारळ ठेवण्याचीही पद्धत आहे. त्या काळात हे नारळ आम्ही वाटून टाकायचो. फार तर वाटेत फारच भूक लागली तर एखाद दुसरा नारळ फोडून त्यातील पाण्याखोबऱ्यावर तहानभूक भागवायचो; पण मी घरी नारळ कधी जाऊ देत नसे. एकदा काही नारळ गाडीत राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी साफ करणाऱ्या मुलाने नारळ घरात नेऊन ठेवले. ते नारळ पाहून माझी बायकोच मला म्हणाली. "तुमचा धंदा तसा पिढीजातच चालू आहे. कीर्तनाची कथा बदलली आहे एवढेच."

 ऊस आंदोलनाच्या ऐन भरात एक मोठी विचित्र घटना घडली. सैन्यातील एक उच्च अधिकारी मला भेटायला आले. त्यांचे वडीलही सैन्यातून निवृत्त झालेले. पुण्याच्या आसपास उसशेती करत. शेतकरी संघटनेने ३०० रु. टनाची मागणी केली तेव्हा या सज्जन गृहस्थाने उसाचा उत्पादनखर्च १८० रु. प्रतिटनापेक्षा जास्त नाही, असा लेख लिहिला होता. आंदोलन सुरू झाले, तेव्हा मेजर साहेबांच्या गावकऱ्यांनी त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांची प्रेतयात्रा काढली. आपल्याच गावकऱ्यांनी आपल्याविरुद्ध उठावे याचा म्हातारबुवांना धक्काच बसला. त्यांचे चिरंजीव मला विनंती करायला आले होते, की मी त्यांच्या गावी जाऊन गावकऱ्यांची समजूत काढावी. मेजर साहेबांची समजावणी करता करता माझी पुरेवाट झाली. मी त्यांना सांगितले, की प्रेतयात्रा काढणे ही गोष्ट फार शिष्टाचाराची नाही हे खरे; पण काळ धामधुमीचा आहे. ३०० रु.च्या मागणीसाठी ३ शेतकऱ्यांचे जीव गेले आहेत, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातून मर्यादेचे उल्लंघन होणे समजण्यासारखे आहे. फारच आग्रहावरून मी मेजरसाहेबांशी फोनवर बोलण्याचे

कबूल केले. फोनवर मला ते म्हणाले, "शरदराव, मी ब्राह्मण जातीचा आहे, म्हणून माझी अशी प्रेतयात्रा निघाली." मी त्यांना ताबडतोब उत्तर दिले, "मेजर साहेब, तुमच्यात आणि माझ्यात पुष्कळ मतभेद आहेत. त्यांतील पुष्कळ मिटतील, काही मिटणार नाहीत; पण या बाबतीत तुम्ही सपशेल चूक आहात हे मी ठामपणे सांगू शकतो. ज्या ब्राह्मणाच्या मनात ब्राह्मणगिरीचा अहंकार नाही, त्याला दुजाभावाने वागवले जाईल हे मला पटणेच शक्य नाही. कारण माझा अनुभव अगदी वेगळा आहे."

 ब्राह्मण्याचा उल्लेख काही वेळा विनोदापोटीही होतो. एकदा कुणी एक सहकारी ठरल्या वेळेपेक्षा खूप उशिरा आला. जवळच्या नातेवाइकाच्या बाराव्याला जावे लागल्यामुळे त्याला उशीर झाला. तो सांगू लागला की , "काय करावे? काही झाले तरी कावळा पिंडाला शिवेचना." मग आसपासची सगळी मंडळी या विषयांवरील त्यांचे त्यांचे अनुभव सांगू लागली. कोणाकोणाची काय इच्छा राहिली होती, ती इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिल्यावरच कावळा पिंडाला कसा शिवला, याचा व्यक्तिगत अनुभव सांगण्याची एकच गर्दी उसळली. मला मोठे आश्चर्य आणि कौतुक वाटले आणि मी म्हटले, "माझे पूर्वज खरेच भारी असले पाहिजेत. त्यांनी तुमच्या पूर्वजांना कावळ्याच्या शरीरात मृतांचा आत्मा जातो आणि मृताची इच्छा अपुरी राहिली असल्यास कावळा पिंडाला शिवत नाही असली बातारामी कथा सांगितली आणि तुमच्या पूर्वजांना ती पूर्णपणे पटली आणि मी एवढा कळवळून पुराव्याने, शास्त्रीय आधाराने शेतीमालाच्या भावाचे महत्त्व सांगतो आहे ते तुम्हाला पटायला किती त्रास पडतो आहे." गंमत अशी अजूनही ही गोष्ट कधी सांगितली तर आसपासच्या कार्यकर्त्यांपैकी सर्व, विज्ञानवाद मानला तरी कावळ्याच्या पिंडाला शिवण्यातील सत्याचा पुरस्कार करणारे निघतातच.

 संघटनेच्या प्रचारात आम्ही एक शिस्त पाळायचो. "शरद जोशी ब्राह्मण आहेत म्हणून आम्ही त्यांचे ऐकू नये असे तुम्ही म्हणता, मग पुढाऱ्यांहो! तुम्ही तर आमच्या जातीचे , रक्ताचे ना! मग शरद जोशींनी जे सत्य दोन वाक्यांत सांगितले, ते सांगायला तुमची थोबाडं काय उचकाटली होती?" हा खास आहेर माधवराव खंडेराव मोऱ्यांच्याच तोंडून यायचा. धर्मातील सर्व सणांची बांधणी आणि ब्राह्मणवर्गाने शेतकऱ्यांकडून धन उकळण्याकरिता केलेल्या योजनांचे वर्णन करण्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. जोतिबा फुल्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूडा'वर मी 'शतकाचा मुजरा' ही पुस्तिका लिहिली. त्यातील ब्राह्मणजातीवरील टीका वाचून अनेक ब्राह्मण माझ्यावर फार नाराज झाले.

 ते असे सारखे चालूच असते. मराठवाड्यातला कुणी पुढारी मला गोडशांची अवलाद

म्हणतो, कुणी मला फक्त पिढीजात भिक्षुकीचाच व्यवसाय चालू ठेवण्याचा सल्ला देतो. याउलट, काही ब्राह्मण व्यक्ती, संस्था आणि पक्ष यांना मनातून माझ्याविषयी विनाकारण आपुलकी वाटत असते. मी त्यांच्यापासून किती योजने दूर आहे याची कल्पना करण्याची कुवत त्या बापड्यांत नसते.

 पण गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या एकीची माधुकरीच मी आजही मागतो आहे, ही गोष्ट खरी आहे. केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे, तर राष्ट्राच्या मागे लागलेल्या पापग्रहांची कुंडलीच मी मांडली आहे. या ग्रहांची शांती करण्याचा महायज्ञही लक्षावधी शेतकऱ्यांच्या यजमानपणाखाली मांडला आहे.

 चोखामेळ्याला मंदिरात प्रवेश करायला ब्राह्मणांनी बंदी केली. शेतकरी कामाच्या मंदिरात प्रवेश करायला नवे ब्राह्मण नव्या चोखा मेळ्याला अडथळा आणताहेत अशी ही 'नाथाच्या घरची उलटी खूण' आहे.


(सा. ग्यानबा, २६ सप्टेंबर १९८८)

■ ■