मी भरून पावले आहे
मी भरून पावले आहे ❖ पहिली आवृत्ती : ९ ऑगस्ट १९९५
दुसरी आवृत्ती : १ मार्च १९९७
तिसरी आवृत्ती : ८ मार्च २०००
© मेहरुन्निसा दलवाई
प्रकाशक : साधना प्रकाशन
४३१, शनिवार पेठ, पुणे ४११ ०३०
मुद्रक : अक्षररचना : साधना प्रेस
४३१, शनिवार पेठ, पुणे ४११ ०३०
मुखपृष्ठ : बाळ ठाकूर
❖
किंमत : १५० रुपये.
श्रीमती मेहरुन्निसा दलवाई यांची ही स्मृतिगाथा वाचकांच्या हाती देताना आमचे मन अनेक संमिश्र भावनांनी भरून आले आहे. श्री. हमीद दलवाईंच्या अकाली मृत्यूमुळे केवळ पुरोगामी मुस्लिम चळवळीचेच नव्हे तर साधनेसारख्या धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा पाठपुरावा करणाऱ्या अनेक संस्थांचेही नुकसान झाले. त्यांचे जीवन हा मुस्लिम समाजातील अज्ञान, रूढी, परंपरा यांना सदैव खतपाणी घालणाऱ्या धार्मिक कडवेपणाविरुद्धचा अखंड संघर्ष होता. मुस्लिम समाजात पुरोगामित्वाचे वारे वाहत राहावेत, आधुनिक शिक्षणावर त्याचा भर असावा आणि भारतीयत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये वाढत राहावी यासाठी मुस्लिम समाजातील कट्टरपंथी आणि मुल्लामौलवी यांचा रोष पत्करून आणि सर्व प्रकारच्या अडचणी सोसून ते सतत कार्यरत राहिले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची धुरा आता त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी उचलली आहे. त्यांनी साध्यासुध्या शब्दांत सांगितलेल्या आपल्या सहजीवनाच्या आठवणी अनेक ठिकाणी वाचकांना अस्वस्थ करून सोडणाऱ्या आहेत.
हमीदभाई आणि साधना साप्ताहिक यांच्यामध्ये अतूट स्नेहबंध निर्माण झाले होते. म्हणून या आठवणींवर साधनेचाच अधिकार होता. हे पुस्तक प्रकाशित करून हमीद दलवाईंच्या जीवनाची अधिक ओळख वाचकांना करून देण्याचा हा प्रयत्न आहे. तो कितपत यशस्वी झाला आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे.
-कुमुद करकरे
माझे माहेर जगावेगळं, माझं सासर जगावेगळं, माझा संसारही जगावेगळाच. या साऱ्यांबद्दल मला लिहावंसं वाटत होतं. मला असं वाटायचं की माणूस कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही मूडमध्ये, कुठेही आणि कधीही लिहू शकतो. म्हणून तर मी दलवाईंना त्यांच्या अखेरच्या गंभीर आजारपणातसुद्धा लिहायचा आग्रह करीत होते. पण जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा लक्षात आलं की लिहायचं काम इतकं सोपं नाही!
पहिल्यांदा वाटलं की आपण कुणाला तरी डिक्टेट करावं.पण माझी सांगण्याची गती आणि लिहिण्याची गती कशी जमली असती? आपण टेप करू या असंही मनात आलं. पण तेही मला जमलं नाही. या विचारात कैक वर्ष उलटून गेली. नवरा लेखक असतानासुद्धा लेखन म्हणजे काय हे मला कळलं नाही हे खरं.
आमचा संसार एकोणीस वर्ष झाला. आता त्यांना जाऊनही अठरा वर्ष झाली. मी त्यांचं काम करायला लागले तेव्हा खरा हमीद कसा होता, त्याचे विचार काय होते, हे मला कळलं. म्हणून मला त्याबद्दल खूप खूप लिहावंसं वाटू लागलं.
हुसेन जमादार आणि मी आमच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकारिणीच्या मीटिंगसाठी एकदा पुण्याला आलो. ही ब्याण्णव सालची गोष्ट आहे, मीटिंग संपल्यावर जमादार म्हणाले, 'भाभी, मी सरिता पदकींच्याकडे माझ्या पुस्तकाच्या- जिहादच्या- संदर्भात जातो आहे. तुम्ही पण येणार का?' सरिताबाईंचं नाव ऐकून मी दचकले. त्यांचं नाव माझ्या परिचयाचं होतं. 'अहो जमादार, या बाई लेखिका आहेत ना? माझी त्यांच्याशी ओळख आहे. मी दलवाईंबरोबर दोनतीनदा गेलेली आहे. त्यांच्या घरी जेवलेली आहे. मात्र दलवाई गेल्यापासून मी त्यांना भेटलेसुद्धा नाही. फार मोठी चूक केली. दलवाईंच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मी भेटलेली आहे. ह्यांनाच मी कशी विसरले? चला, चला, जाऊ या', असं मी म्हटलं आणि मी सरिताबाईंच्याकडे आले. त्यांना बघून मला खूप बरं वाटलं. त्यांच्याशी बोलताना दलवाईंची खूप आठवण आली. आणि मग बोलताबोलता माझ्या मनातल्या आठवणी लिहिण्याच्या संदर्भात मी विषय काढला. आपल्या सगळ्या अडचणी सांगितल्या. त्या ऐकून त्या चटकन म्हणाल्या 'त्यात काय कठीण आहे? मी तुम्हाला मदत करीन. केव्हा बसू या सांगा.' 'मी विचार करून सांगते.' असं मी म्हणाले. आम्ही घरी आलो. जमादार म्हणाले 'तुम्ही ह्यांची मदत जरूर घ्या, तुमचं काम होईल. आता जास्त विचार करू नका. कामाला सुरुवात करा. लिहिणं हे फार महत्त्वाचं आहे. याची काळाला गरज आहे.'
मी दलवाईंबद्दल लिहावं अशी बऱ्याच लोकांची इच्छा होती. काहींनी मला उत्साहही दिला होता. त्यात पुष्पाताई भावे, सरोजिनी वैद्य, आलू दस्तूर याही होत्या, निळूभाऊ फुलेही मला आठवणी लिहा म्हणत.
मी सरिताबाईंच्याकडे आले आणि आम्ही माझ्या आठवणी टेप करायचं ठरवलं. त्या म्हणाल्या 'दहा कॅसेटस्, दीड तासाची एक अशा, भरून लिहिण्याइतका मजकूर आहे ना तुमच्याकडे?' मी होकार दिला आणि अशा रीतीनं आमच्या कामाला सुरुवात झाली. टेप करायच्या आधी तासभर चर्चा, प्रश्नोत्तरं, घरी आल्यावर फेऱ्या मारून तासतास केलेला विचार. ते आयुष्यच जणू काही मी पुन्हा जगले. डोकं नुसतं भणाणून जायचं. अशा रीतीनं रोज दोनदोन तीनतीन तास बसून आम्ही त्या टेप तयार केल्या.
आठवणी टेप करायच्या ठरल्या खऱ्या पण आठवणी ओळीनं थोड्याच येतात? नंतरच्या आठवणी आधी आल्या, आधीच्या आठवणी नंतर आल्या.
आल्या तशा आम्ही टेप करून घेतल्या. काही वेळा वाटायचं की बस झालं आता आणि मी मुंबईला निघून जायची. थोडी शांत व्हायची. आणि बोलावंसं वाटलं की पुन्हा पुण्याला यायची. अशा किती तरी फेऱ्या झाल्या.
टेप झाल्यावर त्या लिहून काढायचं काम थोडथोडं सौ. मराठे व त्यांची मुलगी ज्ञानदा मराठे ह्यांनी केलं. मोठ्या प्रमाणात लेखन केलं ते श्रीमती वंदना कुलकर्णी यांनी. या लेखनाच्या टाइपरायटिंगला मदत 'वंचित विकास'चे संचालक श्री. विलास चाफेकर यांनी केली. सौ. ज्योती जोशी यांनी वाचनाच्या वेळी खूप मदत केली, सूचना केल्या. दहादहा वेळा वाचणं, परतपरत चुका सुधारणं हे खायचं काम नव्हे. हा सगळा त्रास बघून मी एकदा सरिताबाईंना विचारलं की तुम्ही का म्हणून त्रास घेता? त्या म्हणाल्या 'हमीद दलवाईंबद्दल खूप आस्था आहे. हे सामाजिक काम आहे. पुरोगामी विचार पुढे जावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. म्हणून मला तुम्हाला मदत करावीशी वाटते.'
या सगळ्या गोष्टीला फार मेहनत लागली, वेळही लागला. पण चिकाटी धरली म्हणून हे पुस्तक पुरं झालं. पुस्तकाबद्दल सरिताबाईंनी प्रधान सर, पु.ल. देशपांडे, नानासाहेब गोरे यांना सांगितलं. त्यांना ही कल्पना खूप आवडली. प्रधान सरांनी तर पुस्तक प्रकाशित करायची जबाबदारी अंगावर घेतली.
हे पुस्तक आज पुरं झालं याचं सगळं श्रेय सरिताबाईंना आहे असं म्हणावंसं वाटतं.
मला एका गोष्टीचं समाधान आहे. हमीद दलवाई व्यासपीठावरून जे सांगत होते आणि ते गेल्यावर जे जे मी सांगत आहे ते ते मी माझ्या घरात आचरणात आणलेलं आहे. माझ्या दोन्ही मुलींना मी मराठीतून शिक्षण दिलं. मोठी रुबिना ग्रॅज्युएट आहे, दुसरी इलाही एम.ए.बी.एड. आहे. दोघी नोकऱ्या करतात, म्हणजेच स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. दोघींची लग्न रजिस्टर्ड झाली. हुंडा न देता,न घेता. दोघींनी धर्माबाहेर लग्न केलं असलं तरी आपला धर्म सोडलेला नाही. नाव बदललं नाही. आणि कुटुंबनियोजनाच्या बाबतीतही आमच्यासारख्याच त्याही चोख आहेत.
दलवाईंच्या माझ्याजवळ किती तरी आठवणी आहेत. एकोणीस वर्ष मी दलवाईंच्याबरोबर काढली. त्या काळात मी त्यांना समजू शकले नाही. मला तेवढा वेळच नव्हता. माझा संसार, माझी मुलं,आणि माझी नोकरी.
मी काय काय सांभाळणार हो? इतकंच माहीत होतं की दलवाई सोशल वर्कर आहेत. त्यांचं काम महत्त्वाचं आहे. धोक्याचं आहे. त्यांना ते करायची संधी दिली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना आपल्याकडून होता कामा नये. हे लक्षात ठेवून मी चालण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना माझ्या सहकार्याची गरज होती म्हणून मी घरातल्या कटकटींपासून त्यांना दूर ठेवलं.
दलवाईंना अगणित मित्र होते. कुणाकुणाची म्हणून नावं घेऊ? ते त्यांच्यावर, त्यांच्या कामावर जिवापाड प्रेम करणारे होते. त्यांनी दलवाईंना चळवळीत आणि शेवटच्या गंभीर दुखण्यात खूप मदत केली, आधार दिला. किंबहुना सगळ्या महाराष्ट्रानंच त्यांना उचलून धरलं. या साऱ्यांचं ऋण माझ्यावर आहे. ते मी कशी फेडणार? दलवाईंचं काम पुढे नेऊन मी ते थोडंसं फेडू शकेन असं मला वाटतं.
तीन मे एकोणीसशे सत्याहत्तर रोजी दलवाईंचा अंत झाला. शेवटी शेवटी ते मला दोन-तीनदा म्हणाले 'मेहरू, आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच आहे.'
याच्यातच मी सगळं भरून पावले आहे.
-मेहरुन्निसा दलवाई
काय गप्पा मारत होतो आम्ही भेटत होतो तेव्हा? काहीही आठवत नाही. आठवतो तो त्यांच्या त्या सुप्रसिद्ध लकबींसह बोलण्याचा उत्साह. मुसलमानांची आर्थिक स्थिती सुधारली तर जातीय तणाव खूप कमी होतील असं त्यांचं एक मत आठवतं. पण असं फारच थोडं आठवतंय. आता नव्या संदर्भात उमगतंय की पैशाची एवढी ओढाताण असताना त्यांनी ती कधी दर्शवलीही नाही, मग हात पसरून याचना करणं तर दूरच.
पुढं ते समाजकारणात पडल्यावरही त्यांच्या काही सभांना मी गेले होते, त्यांच्या स्नेहभावाचा अनुभव घेतला होता. त्यांच्या स्पष्ट-स्पष्ट बोलण्यामुळे ते जातवाल्यांचा रोष ओढवून घेणार हे मी बोलूनही दाखवलं. तो तसा त्यांनी ओढवून घेतला आणि निर्भयपणे ते त्याला सामोरे गेले - आपल्या जमातीवरचं प्रेम किंचितही ढळू न देता - हे आता सर्वांना माहीत आहेच.
आपल्या नवपरिणीत पत्नीलाही दलवाई दोन-तीनदा आमच्याकडे घेऊन आले होते. त्या वेळी अबोल साक्षीदाराच्या भूमिकेतून मेहरुन्निसाबाई वावरल्या असं आता आठवतं. पण ते साक्षित्व किती सूक्ष्म निरीक्षण करणारं होतं याचा आता झालेल्या त्यांच्या गप्पांत प्रत्यय आला! हमीद दलवाईंचं ते अकस्मात उघडकीला आलेलं प्राणान्तिक दुखणं, त्यांनी त्या दुखण्याशी केलेला झगडा, त्यासाठी त्यांच्या मित्रांनी केलेली जिवापाड धडपड, त्या साऱ्यांना आलेलं अपयश, एका नुकत्याच बहरू लागलेल्या विचारवंत समाजकार्यकर्त्याचा तो काळजाला चटका लावणारा अंत, त्या मृतदेहालाही त्यांच्या तत्त्वासाठी द्यावी लागलेली झुंज हे आता सर्वज्ञात आहे.
मेहरुन्निसा दलवाईंबद्दल मला विशेष आस्था होती कारण त्यांनी जन्मभर नोकरी केली आणि हमीद दलवाईंना- नेहमी समाजकार्यकर्त्यांच्या भाळी जे लिहिलेलं असतं ते मिंधेपण भोगावं लागलं नाही. आपल्या तत्त्वनिष्ठेच्या जोरावर ते समाजात ताठ मानेनं वागलेच पण त्या निःस्पृहतेला मेहरुन्निसाबाईंच्या नोकरीमुळे असलेल्या आर्थिक स्वतंत्रतेचंही पाठबळ होतंच.
दलवाई गेल्यावर मेहरुन्निसाबाईंची नि माझी फार तर एखादी भेट झाली असेल. ती देखील 'साधने'च्या कार्यालयात. त्यामुळे त्यांच्याबद्दल, त्यांच्या मुलींच्याबद्दल वर्तमानपत्रांतून कधी काही तुरळक वाचण्यापलीकडे आमचा संबंध राहिला नाही.
साधारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. माझं त्या वेळी मुस्लिम सत्यशोधकचे कार्यकर्ते श्री. हुसेन जमादार यांच्या 'जिहाद'च्या संपादनाचं काम चालू होतं. त्या वेळी ते आमच्या घरी यायचे. एके दिवशी संध्याकाळी ते मेहरुन्निसाबाईंना बरोबर घेऊन आले आणि मधल्या वर्षांचं अंतर तुटून गेलं. आता आम्ही दोघीही संसारातल्या सुखदुःखांनी तावूनसुलाखून निघालेल्या प्रौढ स्त्रिया झालो होतो. अर्थात मेहरुन्निसांनी जे ताणतणाव भोगले होते ते लोकविलक्षणच होते.
आगत-स्वागत झालं आणि गप्पांना सुरुवात झाली. एके काळी अबोल असलेल्या मेहरुन्निसाबाई आता अगदी मोकळेपणी बोलू लागल्या होत्या.
बोलताबोलता विषय निघाला दलवाईंचं शेवटचं आजारपण आणि मृत्यू या बद्दलचा. कमालीच्या हालअपेष्टा सोसायला लावून आलेला तो मृत्यू. त्यानंतर स्वतःच्या जातवाल्यांशी तत्त्वनिष्ठेसाठी करावं लागलेलं घनघोर युद्ध, या साऱ्यांचं दुःख इतकी वर्षं लोटली तरी अगदी ताजं होतं मेहरुन्निसाबाईंच्या मनात.
आपले त्या वेळचे ते रुद्रभीषण अनुभव त्या जणू क्षणाक्षणानं पुन्हा जगू लागल्या. शब्दांसाठी कुठेही न अडता भराभरा सांगू लागल्या आणि ते शब्दही कसे तर त्या चरचरीत अनुभवांना घट्ट मिठी मारणारे, थेटच भिडणारे. त्या कातरवेळच्या गडद गडद होत जाणाऱ्या काळोखात मेहरुन्निसाबाईंचं जणू त्या काळात, त्या प्रसंगांत शिरून स्वतःशीच बोलणं चालू होतं आणि त्या कथनानं माझा गळा गच्च पकडला होता. चढत्या काळोखात ती पकड अधिकाधिकच गळ्यात रुतत गेली. श्वास अडकला. त्या दाम्पत्यानं भोगलेलं ते दुःख ऐकतानाही सहनशक्तीच्या पलीकडे गेलं, भानच जणू निसटून गेलं. काही वेळानं बाई बोलायच्या थांबल्या. किती तरी वेळ लागला पुन्हा या काळात, या जगात यायला. मी म्हटलं, "बाई, हे अनुभव नुसते तुमच्यामाझ्यात नकोत राहायला. हे लिहून काढा. सगळ्यांना कळू देत."
"कसं लिहिणार? मला लेखन तर सोडाच; साधी मराठी लिपीही येत नाही." त्या म्हणाल्या.
"मग कॅसेटवर रेकॉर्ड करा. आत्ता मला सांगितलंत तसं." मी मार्ग सुचवला.
“करीन, पण प्रश्न विचारायला तुम्ही पाहिजेत. किंबहुना हे सगळंच काम तुम्हीच अंगावर घ्यायला पाहिजे." बाईंनी अट घातली. माणसं जर मोकळेपणानं बोलायला लागली तर केवढं तरी महत्त्वाचं सांगून जातात याचा पुष्कळ अनुभव माझ्या गाठीशी होता. मी मेहरुन्निसाबाईंना होय म्हटलं आणि पुन्हा भेटायचं ठरवून त्या हुसेन जमादारांबरोबर निघून गेल्या.
ते धगधगते अनुभव माझ्यापर्यंत त्यांनी इतके नेमके पोचवले होते की त्या गेल्यानंतर मला अतिशय खोल अशा उदासीनतेनं गिळून टाकलं. दोन दिवस जणू माझा मुक्काम विद्युद्दाहकावरच होता!
उदासीनतेचं मनावरचं गच्च मळभ थोडं निवळल्यानंतर या दाम्पत्यानं केलेल्या संघर्षातली भव्यता माझ्या लक्षात यायला लागली. काय-काय केलं या दाम्पत्यानं? मस्तक मृत्यूच्या दाढेखाली सापडलं असतानाच आपल्या मृतदेहाची व्यवस्था कशी लावायची हे पतीनं पत्नीकडून लिहवून घेतलं आणि पत्नीनं ते तंतोतंत पाळलं. ही अंत्यव्यवस्था ज्या नातेवाईकांवर जिवापाड प्रेम केलं, ज्यांची चिंता सतत वाहिली त्यांना आवडणार नाहीच हे ओळखून, त्यांनी आपल्या पत्नीला आणि मुलींना छळू नये म्हणून त्यांच्या संरक्षणाची सोय केली. आपल्या मृत्यूनंतर कुणाकुणाला फोन करायचे याची यादी पतीनं सांगितली आणि पत्नीनं त्यात स्वतःची भर घालून ती लिहून घेतली! आपल्या मृत्यूनंतर भाषणे होऊ नयेत, फक्त इस्लामवर संशोधन करणारी एक संस्था स्थापन व्हावी अशी इच्छा मृत्युशय्येवरून पतीनं व्यक्त केली आणि संपत्ती जवळ नसतानाही पत्नीनं आपल्याच घरातली जागा त्या संस्थेसाठी देऊन टाकली. संकटांची पिसाट वृष्टी जेवढी भयंकर तेवढाच ती झेलणारा पर्वतही भक्कम आणि बेलाग. हाही अनुभव साऱ्यांसमोर यायला हवा असं मला प्रकर्षानं वाटलं.
दलवाई दाम्पत्याची दोघांचीही बालपणं, विवाह, संसार, दलवाईंचं लेखन आणि समाजकार्य, दलवाईंचं दुखणं आणि मृत्यू, त्यानंतर मेहरुन्निसाबाईंचं कार्य आणि भूमिका असं सगळं या पुस्तकात यावं असं मला वाटलं. त्या दृष्टीनं मी प्रश्न विचारत गेले. पण बाईंना स्वतःलाच सगळं सांगून डोक्यावरचं आयुष्यभराचं ओझं हलकं करण्याची एवढी मोठी ओढ होती की मला फारसे प्रश्न विचारावेच लागले नाहीत. त्या बोलत गेल्या- मोकळेपणानं, सच्चेपणानं. या सांगण्यामागे संताप नव्हता की सारवासारव नव्हती. जे घडलं, जे सुखदुःख भोगलं ते तसंच्या तसं सांगितलं अशीच पद्धत होती. मेहरुन्निसाबाईंच्या निवेदनात सलगपणा रहावा म्हणून या पुस्तकात माझे प्रश्न घातलेले नाहीत.
मेहरुन्निसा खान आणि हमीद दलवाई यांच्या कौटुंबिक पूर्वपीठिका अगदी भिन्न. पण एकदा लग्न केल्यानंतर मेहरुन्निसाबाईंनी दलवाईंचे आई-वडील, भावंडं इतर नातेवाईक या साऱ्यांना आपलं म्हटलं आणि त्यांच्यासाठी करता येईल तितकं तनमनधनानं केलं. दलवाईंच्या असंख्य मित्रमंडळींना त्यांनी आपलेपणानं धरून ठेवलं. एवढंच नव्हे तर समाजकार्याची पुसटशीही कल्पना नसलेल्या पार्श्वभूमीतून येऊनही त्यांनी पतीचे विचार आत्मसात केले. त्याच्या हयातीत तर त्याच्या कार्यात साथ दिलीच पण त्याच्या पश्चातही ते कार्य चालवण्याची त्यांची अविश्रांत धडपड चालू आहे.
हमीद दलवाईंनीही आपल्या मिळवत्या पत्नीचा मान राखला. केवळ एक अर्थार्जन करणारं यंत्र एवढीच किंमत तिला दिली नाही. दलवाईंनी स्वतः घरकाम केलं नाही पण पत्नीला त्याची तोशीस पडू नये याची काळजी घेतली, तिच्या कष्टांची जाणीव ठेवली. आपल्या कार्यात त्यांनी तिला हळूहळू समाविष्ट करून घेतलं. आपल्यासाठी तिनं जे जे केलं त्याची त्यांनी मनापासून पावती तिला दिली. त्यामुळेच मेहरुन्निसाबाई म्हणाल्या की मी भरून पावले आहे. किती समाजकार्यकर्त्यांच्या पत्नींना असे धन्योद्गार काढण्याचं भाग्य मिळतं हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे!
हे पुस्तक मेहरुन्निसाबाईंच्या आठवणींचं आहे. आठवणी सांगताना थोडं इकडं, थोडं तिकडं होतं, फापटपसारा होतो. हा फापटपसारा मी छाटून टाकला खरा पण पुस्तक छपाईला देण्याआधी आणि मुद्रितांच्या स्वरूपात आल्यावर असं दोनदा त्यांना शब्द न शब्द वाचून दाखवून त्यांची मान्यता- 'मला जे सांगायचं होतं ते सारं माझ्या शब्दांत आलं' अशी- घेतलेली आहे. या दोन्ही वाचनांत सौ. ज्योती जोशी यांनी अगदी मनापासून सहभाग घेतला.
हे मेहरुन्निसाबाईंनी सांगितलेले शब्द आहेत. त्यांची अशी मराठीची वेगळीच धाटणी आहे. मातृभाषा पुणेरी उर्दू, शिक्षणभाषा उर्दूच आणि महाराष्ट्रात राहत असल्यामुळे मराठी भाषा आपली मानली ती पतीच्या आग्रहाखातर, वयाच्या तिशीला. या साऱ्यांमुळे भाषेचं एक वेगळंच रसायन मेहरुन्निसाबाईंच्या बोलण्यात दिसून येतं. त्यात 'सुधारणा' न करता आम्ही ते जसंच्या तसं ठेवलेलं आहे. हे एक बोलपुस्तकच आहे आणि जाता-जाता हेही सांगायला हवं की मुसलमान स्त्रीचं- निदान मराठीतलं तरी- पहिलंच आत्मचरित्र आहे.
टंकलिखित प्रत प्रकाशनासाठी तयार झाल्यावर प्रकाशक म्हणून 'साधना प्रकाशनाखेरीज दुसरं कुठलंही नाव आम्हा दोघींच्याही मनात येणं शक्य नव्हतं. कारण हमीद दलवाई आणि त्यांचं कार्य ही दोन्ही साधना परिवारातच वाढली. साधनेत त्यांनी किती तरी लेखन केलं, साधनेच्या सभागृहात त्यांच्या अनेक सभा झाल्या, साधनेतील मित्रमंडळींनी त्यांना अथपासून इतिपर्यंत जिवाभावाच्या स्नेहाचा ओलावा दिला. तेव्हा साधनेतर्फे हे पुस्तक निघणं हा औचित्याचा परमबिंदू होता.
म्हणून मग मी प्रधान सरांना फोन केला. ते माझ्या घरीच आले. मी कसं कसं काम झालं आहे हे त्यांना सांगितल्यावर त्यांनी गुरुला शोभतील अशा हर्षभरित शब्दांत माझी पाठ थोपटली आणि हे पुस्तक प्रकाशित करण्याचं वचनच दिलं. कुमुद करकरे आणि कविवर्य वसंत बापट यांनीही प्रधान सरांचा हा विचार उचलून धरला आणि साधनेच्या परंपरेला साजेशा देखण्या स्वरूपात आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
आज पुरोगामी विचाराची सगळीकडून पीछेहाट होत आहे. अशा वेळी समाजकार्यकर्त्यांनी पुरतं ओळखायला हवं की ज्या लोकांत पुरोगामी विचार पोचवायचा त्यांच्याबद्दल आपल्या मनात निस्सीम ममता तर हवीच पण हे विचार त्यांच्यात नेल्याबद्दल ते देतील ती शिक्षा- मग ती कधी प्राणांतिकही असेल- भोगायची तयारीही हवी. या दोन्ही गोष्टींना हे पुस्तक साक्षीदार आहे.
आणखी एक विचार मनात येतो. हमीद दलवाईंना जितकं दुर्धर दुखणं झालं तितकं किंवा त्यापेक्षा कमी-जास्त कठीण असणारं दुखणं प्रत्येकाला होऊ शकतं. अशा वेळी तो रोगीच नव्हे तर त्याची शुश्रूषा करणारेही एकाकी पडतात हे दृश्य आपण नेहमी पाहातो. दलवाई दाम्पत्याला मात्र त्यांच्या ज्ञात-अज्ञात सखेजनांनी कधीही एकटं पडू दिलं नाही. त्यांच्यासाठी पैसा तर उभा केलाच पण दलवाईंच्या शुश्रूषेसाठीही असंख्य लोक सतत झिजले. त्यांचे डॉक्टर्स परिचारिकांसह या बाबतीत कुठेही कमी पडले नाहीत. असाध्य रोगाशी जणू एका मोठ्या समूहानं एकवटून झुंज दिली. या दाम्पत्याचं मनोधैर्य टिकायला या आधाराचं फारच मोठं साह्य झालं. प्राणांतिक संकटात सापडलेल्या व्यक्तीला समाज कशी कशी मदत करू शकतो ह्याचं हे पुस्तक हा एक वस्तुपाठच वाटतो मला.
तीन वर्षांपूर्वी अगदी ध्यानीमनी नसताना हातात घेतलेला हा प्रकल्प या पुस्तकाच्या प्रकाशनानं पुरा होत आहे. हे अवघड काम आम्हा दोघींच्या हातून खरंच पुरं झालं आहे यावर विश्वासच बसत नाही.
पण तसं झालं आहे खरं. आयुष्याच्या उतरणीवर पावलं टाकत असताना आम्हां दोघींनाही हा मोठा दिलासाच आहे.
- सरिता पदकी
आमचे आजोबा मॅट्रिक झाले होते. त्या काळात ते ऑफिसमध्ये काम करायचे, क्लार्क म्हणून. ७ रुपये पगार होता.
त्या काळात ७ रुपये म्हणजे आजच्या काळात ७००० च्या वर. ते रिटायर्ड होईपर्यंत आमची आजी सुईणीचं काम करायची. म्हणजे मी बघितलेलं नाही तिला हे काम करताना, पण नंतरच्या तिच्या बोलण्यावरून मला हे सर्व समजलं.
आमच्या घरात फारसं धार्मिक वातावरण नव्हतं. पण शुक्रवारी नमाज पढायचे. शाळेमध्ये असतानासुद्धा ते आम्हांला कंपलसरी होतं. मी जायची अँग्लोउर्दू हायस्कूलमध्ये. तिथे शुक्रवारी आम्हांला नमाज पढायला लागायची एकदाच. शुक्रवारची जुम्माची दुपारची नमाज, तिला महत्त्व असायचं, म्हणून ती नमाज पढायची. आमच्याकडे पुरुष मशिदीत जायचे. बायका घरात पढायच्या. दररोज पाच टायमाचा नमाज कोणी पढायचं नाही आणि आम्ही इतर उपास बिपास पण ठेवायचे नाही. आमचे रमजानचे महिने आले ना, की आमच्या घरात सगळे उपास ठेवायचे. तेव्हा मला मजा वाटायची. मजा वाटायची म्हणजे अशी की सैरी करायला पहाटे दोन-अडीच वाजता उठायला लागायचं. सगळे उठायचे. रात्रीची खिचडी गरम केलेली आहे. कालवण केलेलं आहे. खूप चांगलं जेवण असायचं. सगळेच उपास करतात आणि जेवायला चांगलं मिळायचं म्हणून सगळ्यांबरोबर मीही उठायची आणि ते सगळं खाऊन झोपायची. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत खाण्याच्या वस्तूच जमा करण्यात माझा वेळ जायचा. म्हणजे मला असं वाटायचं की आपला उपास आहे ना, चला आपण हे खाल्लं पाहिजे. पण हे आत्ता खायचं नाही, उपास सोडल्यावर खायचं. मग हे जमा कर, ते जमा कर, असं मी करायची. रोजा ठेवते म्हणून माझे खूप लाड व्हायचे. म्हणून तेवढ्यापुरतं मला ते आवडायचं. पण पहिल्यापासून मी कुठलीही गोष्ट सहजासहजी मान्य केलेली नाही. म्हणजे कुराणात सांगायचे की पैगंबरांच्या काळात असं-असं झालं, हसन-हुसेननं असं केलं. मोहरमच्या वेळी जे बोलतात ना की करबल्याच्या मैदानावर हजारो लोक एकीकडे होते आणि हसन हुसेन एका बाजूला होते आणि त्यांनी सगळ्यांना मारलं. हे मला पटत नसे आणि मी विचारायची, असं कसं होईल? हजारो माणसं एका बाजूला आणि दोन माणसं एका बाजूला असं लढूच शकत नाहीत. एक माणूस एका माणसाशी लढेल. इतक्या माणसांशी कसा लढेल? हे सगळं खरं नाही. पण तेव्हा आम्हांला कोणी उत्तर द्यायचं नाही.
आमची आई धार्मिक होती. माझ्या वडिलांना धर्माची जरासुद्धा माहिती नव्हती. बिचाऱ्यांना नमाजसुद्धा पढायला यायचं नाही. माझी आई ईदच्या दिवशी त्यांना मसजिदमध्ये पाठवायची. तर ते शेवटच्या रांगेत उभे राहायचे. नमाज संपली की सगळे एकमेकांना असे मिठी मारायचे ना, तर त्यांना ते आवडायचं नाही. ते मागच्या मागे निघून घरी यायचे आणि आमची आई अशी संतापायची; म्हणायची, की तुझ्या बापाला अक्कलच नाही. चार माणसांमध्ये मिक्स व्हायला नको. ते म्हणायचे, “मला हा सगळा प्रकार आवडत नाही. काय भेटायचंय? मला नमाज पढता येत नाही. लोकं पढतात तसं मी पढलो. तू म्हणाली म्हणून मी तिथं गेलो. नाही तर मी जाणार पण नाही." आमचे वडील थोडे संकोची होते. त्यामुळे ते जास्त माणसांत जायचे नाहीत, बोलायचे नाहीत आणि काय व्हायचं? आम्ही तर त्यांच्या मुलीच. पण त्यांचं कधी डोकं दुखलं ना तर त्यांनी मुलींना कधी सांगितलं नाही की माझं डोकं चेपा म्हणून. म्हणायचे, “नको नको, तू चेपू नको. तुझ्या आईला बोलाव.” मी मोठी होते ना घरात. मी वडिलांची लाडकी पण होते. त्यामुळे मला असं वाटायचं की ह्यांचं डोकं दुखतंय, आपण चेपावं. ते म्हणायचे, "नको बाबा, तू नको चेपू. आई चेपेल." म्हणजे इतके ते बायकांपासून बाजूला राहायचे. माझ्या वडिलांना पिक्चरचा शौक होता पण कधी पिक्चरला जात नसत ते. आम्हांला जाऊ द्यायचे. दर रविवारी आम्ही पिक्चरला जायचो. मला गोष्ट सांगायची खूप आवड होती. पिक्चर मी बघून आले की माझे वडील विचारायचे, तू काय बघितलंस?' पिक्चरचं वर्णन मी करीत असे. त्याच्यात गाणी कशी झाली, प्रेमाच्या गोष्टी कसे बोलले, डायलॉग कसे होते, सिनरी कशी होती, त्याची थीम काय होती, ते कसे अॅक्शन करत होते हे सगळं शब्दांत रंगून बोलण्याची मला सवय होती. माझी एक बहीण होती दौलत नावाची. तिला तर झोपताना रोज त्रास द्यायची. मी गोष्ट सांगायची आणि ती कधी झोपायची ते कळायचं पण नाही. आणि आजही तिनं विषय काढला तर ती म्हणते सुद्धा की ही फार बोअर करायची मला. मला कंटाळा यायचा आणि हिची गोष्ट काय संपायचीच नाही. लांबच्या लांब चेहऱ्याने ती काय आणि कसं बोलायची हे मला कळत पण नसे. अर्थात् तेव्हा वडिलांकडे मी राहात नव्हते. दिवाळीची सुट्टी आली, दसऱ्याची सुट्टी आली की मी त्यांच्याकडे जात असे. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेले तेव्हा मला माहिती पण नव्हतं, माझी आई कोण, माझे वडील कोण.
पहिल्यांदा म्हणजे मी ४ थी - ५ वीत वगैरे असेन तेव्हा, कधी तरी वडील लाडात आले की पैसे द्यायचे, आमच्या आईला किंवा आमच्या आजीला की हिला कपडे घ्या, हिला ते घ्या म्हणून. एकदा त्यांनी मला मुंबईला घरी आणलं, त्या वेळी आम्ही कुर्ल्याला राहात होतो वडिलांनी मला आणलं,
घरात सोडलं आणि ते निघून जायला लागले तेव्हा मी म्हटलं, "नको बाबा, या घरात मी एकटी नाही रहाणार." ते बाहेर गेले आणि त्यांना यायला वेळ लागला तेव्हा मी आईला विचारलं सुद्धा. म्हटलं, तो माणूस ज्यानं मला इथे आणलं तो कुठं गेला? शेवटी मला कळलं की ही माझी आई, हे माझे वडील. तोपर्यंत तरी हे मला माहिती नव्हतं.
आमची आई रागीट होती. माझ्या भावाला ती मारायची खूप. रागवायची खूप आणि मला त्यामुळे तिची भीती वाटायची. कारण आमच्या आजीच्या घरामध्ये चांगलं वातावरण. कोणी आम्हांला हात लावायचं नाही. डोळे मोठे केले की आम्ही घाबरायचो. त्यामुळे मला कधी मार खावा लागला नाही. आईही मला हात लावू शकत नव्हती. कारण माझी आत्या, आजी मुंबईला जातानाच म्हणायच्या आईला की हिला घेऊन जातेस पण हिला मारायचं नाही. अमुक नाही करायचं, तमुक नाही करायचं. त्यामुळे आईचा, वडिलांचा माझ्याबरोबर कधी जास्त वाद झाला नाही. एस.एस.सी. झाल्यानंतरच मी आई वडिलांना ओळखायला लागले. तरी मला तिथे राहायला आवडायचं नाही. कारण आजीकडे सगळ्या गोष्टींचे लाड व्हायचे, आणि आईकडे तर सगळं कामच करावं लागायचं. आपल्याला जर आरामाचं जीवन आवडतं, तर तिथं आपण कशाला जा? त्यामुळे मी जात नसे. म्हणून आजीकडेच राहायची. आजोबाही माझे खूप लाड करायचे. त्यांचे लाड वेगळेचं असायचे. ते जेवायचे फिकं. म्हणजे मिरचीमसाल्याचं खायचे नाहीत. त्यांचं जेवण वेगळं असायचं, त्यांची खोली वेगळी असायची. सगळं वेगळं ठेवलेलं असायचं. ते पाच वेळची नमाज पढायचे आणि असं म्हणतात की, काम करताना जरा पिण्याची सवय त्यांना लागली होती. त्यामुळे एकदा ते गटारात पडले आणि गटारात पडल्यानंतर त्यांचे दोन्ही पाय जखमी झाले. तेव्हापासून उभं राहणं त्यांना शक्य झालं नाही. बसूनच ते घरात फिरत. हे मी घरात बघितलेलं. ते कामा-बिमाला जाताना मी खूप लहान होते. तर ते लाड करायचे म्हणजे काय? जेवताना शेवटी त्यांना दूध-भात लागे आणि दूध-भाताचे शेवटचे दोन घास राहिले की ते मला हाक मारायला सुरुवात करायचे. मेहरू कुठे? मेहरू कुठे? माझी आजी-बिजी, माझी आत्या बित्या म्हणायच्या, 'किती मुलं समोर बसलेली आहेत, तीच कशाला पाहिजे तुम्हांला? ह्यांना कुणाला तरी बोलवा आणि ते खायला घाला.' पण ते म्हणायचे, "नाही, मला जेवण जात नाहीए. मेहरूच माझ्याकडे आली पाहिजे", आणि मला शोधून आणायचे आणि खायला लावायचे.
पण शेवटी शेवटी त्यांना बरं नसायचं, तिथल्या तिथेच त्यांचं सगळं व्हायचं, तेव्हा मात्र मला त्यांच्याबरोबर खावंसं वाटायचं नाही. किळस वाटायची आणि आजी मग तेव्हा समजून सांगायची त्यांना, 'कशाला बोलावता तिला? असं खाल्लं तर ती पण आजारी पडेल.' मी लहान असताना, झोपताना सुद्धा ते मला मांडीवरच घेऊन झोपणार, आपल्या अंथरुणातच मला झोपवणार. आई, आजी मला ओरडायला लागली, मारायला यायला लागली की मी धावून त्यांच्याचकडे जायची. ते आजीला लाख शिव्या देत. 'तुला कळत नाही, कशाला हात लावते?' अशा रीतीने आमच्या आजोबांची मी फार लाडकी होते. असंही ऐकलं होतं की माझ्या वडिलांवर सुद्धा ते फार खूष होते. पण वडिलांची एक सवय काय होती, तर ते मुंबईला असायचे. आजी, आजोबा पुण्याला असायचे. आई-वडिलांची आठवण त्यांना खूप यायची. पण कधी पत्रव्यवहार करायचे नाहीत. कधी जायचे नाहीत. कधी चार पैसे द्यायचे नाहीत. आणि मुळूमुळू बसल्या ठिकाणी रडायचे, की मला त्यांची आठवण येते. मग आम्ही त्यांना म्हणायचो, “कसं प्रेम आहे तुमचं? अहो, तुम्हांला आठवण येते तर पुणं जवळच आहे, जा आणि भेटून या." तर ते जायला मात्र तयार व्हायचे नाहीत.
माझ्या शिक्षणाचा प्रश्न आलाच नाही, कारण माझ्या घरात शिकलेलीच माणसं होती. माझी आत्या शिकलेली होती.बी.ए.बी.टी. होती. त्या काळामध्ये बी.ए.बी.टी. उर्दू ट्रेनिंग कॉलेजची प्रिन्सिपॉल होती. तिचे मिस्टर होते डॉक्टर. डॉक्टर शेख सुलेमान, त्या काळात फार प्रख्यात डॉक्टर होते. फार दिलदार होते. लोकांना फार मदत करणारे होते. त्यांचं नाव खूप होतं आणि पैसे चिकार होते त्यांच्याकडे. त्यामुळे आमची दुसरी आत्यासुद्धा त्यांच्याच घरी राहायची. त्यांची मुलं सांभाळायची. आम्हांला शाळेत घातलं ते होतं अँग्लो उर्दू हायस्कूल. त्या शाळेची प्रिन्सिपॉल होती आमची काकी. आता आमची ही काकी म्हणजे कोण? त्या वेळी खान-पाणंदीकर जो विवाह झाला त्यातली मालिनीबाई पाणंदीकर ती आमची काकी. म्हणजे सुलभाताई पाणंदीकर ज्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या मुख्य होत्या त्यांची मोठी बहीण. काका काकू दोघंही बी.ए.बी.टी., टी.डी. (लंडन) आणि त्या काळामध्ये म्हणजे १९२७ साली त्यांचा गाजलेला विवाह. हिंदमुस्लिमाचा पहिला गाजलेला विवाह. दगडफेक होत असे. त्रास होत असे. राहाणं कठीण केलं होतं. आमची आजी-बिजी सांगायची ना! माझी आत्या हशमन त्या वेळी हुजूरपागेच्या बोर्डिंगमध्ये शिकत होती.
काकाकाकूंच्या या लग्नामुळे तिला ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या, म्हणून शाळेनंच तिला पोलीस प्रोटेक्शनमध्ये ठेवलं. त्या वेळी माझा जन्मपण झालेला नव्हता, मी १९३० मध्ये जन्मले. माझ्यानंतर माझ्या काकीला एक वर्षाने पहिली मुलगी झाली. तर माझे लाड त्या घरामध्येही खूप केले गेले. आमच्या काकींच्याकडे फार धार्मिक वातावरण नव्हतं. म्हणजे तिला मुसलमान करून लग्न करण्यात आलेलं नव्हतं. ती टिक्की-बिक्की लावायची. मराठी, इंग्लिश, उर्दू हे चांगले विषय होते तिचे. ती घरात उर्दू बोलायची पण ती कधी नमाज-बिमाज पढायची नाही. घरात हिंदू देव देवताही काही नव्हत्या. पूजा केलेली मी पाहिलेलं नाही. नुसते आमचे जे सणवार व्हायचे, त्यांच्यासाठी शिरखुर्मा वगैरे जे व्हायचं, ते त्या घरामध्ये व्हायचं. पण काका जरा धार्मिक होते, ते कुराण वगैरे वाचायचे. नमाज पढायचे पण मसजिदमध्ये जाऊन. मुलींच्यावर सुद्धा तसे संस्कार त्यांनी केलेले नाहीत आणि मुलंसुद्धा त्यांची शिकलेली. तीन मुलं - दोन मुली अन् एक मुलगा. मुलाचं लग्न झालं ते आमच्या पद्धतीने मुसलमान मुलीशी झालं. मुली एम.ए. पर्यंत गेलेल्या. चांगल्या प्रोफेसरच्या नोकरीवर असलेल्या, फॉरिन रिटरनड़. त्यांनी दोघींनी हिंदू मुलांशी लग्नं केली आणि त्याला आमच्या घरात कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही. काकाच्या लग्नाबद्दल आमची आजीच सांगायची की त्याचं लग्न झालं; मग असा गोंधळ उडाला, मग असं झालं. आजी विरोध करून काय करणार? मुलगा एवढा शिकलेला, सवरलेला. त्याच्या विरोधात कोण जाणार होतं? ते आमचे काका इतके शिकलेले. आजी इतकी महान की आमचे काका घरात आले ना की ही बाई डोक्यावर पदर घेऊन पुढे यायची. आदबशीर उभी राहायची. तर एकदा मी तिला सांगितलं पण, की अग, तो तुझा मुलगा आहे. तो येऊन खुर्चीवर बसतो आणि तू अशी उभी का राहते? ती म्हणायची, "नाही, माझा मुलगा असला तरी किती शिकलेला आहे. केवढा मोठा आहे. हजार लोक त्याच्यासमोर झुकतात. मला अभिमान आहे या माझ्या मुलाचा. मी खाली बसणार नाही." आता सून आणि सासू म्हटल्यावर सगळीकडे एकच आहे. हिंदू-मुसलमान म्हणून भांडण नव्हे, एरवी जे होतं सासूसुनेत ना तसं होत असे. म्हणजे ऐकून माहिती आहे. आता त्या काळामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो कारण ते वेगळे राहायला लागले होते. एवढा प्रश्न यायचा नाही. तशी आमची काकी कधी तरी घरी यायची. आमची आजी कधी तरी जायची. मानाने ठेवायची काकी तिला. आजी आमची एवढं एवढं खायला केलं तर पाठवायची. काकीनं काही केलं तर तीही पाठवायची.
काका आजीला पैसे देत असे. विचारत असे. मुलं येत असत. तसं काय त्यांचं भांडण वगैरे नव्हतं. आमच्या घरात पडदा नव्हताच. आमची आई बुरखा घालत असे. पण मी आईकडे राहात नव्हते म्हणून मला काही बुरखा घालावा लागला नाही. पण नंतर काय झालं; आमची आई पडली आजारी आणि डॉ. भडकमकर जे मुंबईचे होते, त्यांनी एकदा सांगितलं आमच्या वडिलांना की या बाईचा बुरखा तुम्ही काढा, नाही तर हिला टी.बी. होईल. त्या काळामध्ये टी.बी. म्हणजे भयंकर रोग समजला जात होता. आमच्या वडिलांनी मान्य केलं आणि तिला बुरखा काढायला लावला आणि मला असं वाटतं की तिने बुरखा काढला त्यामुळे आम्हांलाही बुरखा घालायची जरूरच पडली नाही.
माझी आई धार्मिक होती. ती पाच टायमाची नमाज पढायची. तिला धर्मावर टीका केलेली चालायची नाही. मी जरा चेष्टा केली की बाबा हे कसलं आहे, जहन्नुम कसला, जन्नत कसला, तिथे कसले फरिश्ते येतात आणि विचारतात? माझे वडीलसुद्धा कधी कधी टिंगलीमध्ये बोलायचे, "हे बघ, तू फार पापं करते म्हणून तुला नमाज पढण्याची जरूर पडते. आम्ही पाप करतच नाही.” हे वडिलांचंच मी घेतलेलं होतं. मला पण असंच वाटायचं. मग ते कधी कधी चेष्टेनं तिला म्हणायचे, “हे बघ पहिल्यांदा मी मरणार. मी जन्नतमध्ये जाणार आणि जन्नतमध्ये गेल्यावर असा पाय रोवून उभा राहणार. जेव्हा तू येशील तेव्हा लाथ मारणार आणि सांगणार की तू फार पापी आहेस, तू खूप पाप केलेलं आहेस. लोकांना शिव्यागाळी केलेली आहेस. तुला जन्नतमध्ये जागा मिळणार नाही. तू जहन्नुममध्ये जाणारेस." आणि मग त माझे पाय धरणार आणि म्हणणार, “मेरे खान, मेरे को माफ करो.” असं बोलल्यावर आमची आई अशी चिडायची, भडकायची, “तुम्ही ही चेष्टा करताहात.” ते म्हणायचे, “अग ही चेष्टाच आहे, नाही तर काय बरं! कोण मेलंय? कोण गेलंय तिकडे?" मी म्हणायची, “अग, कोणी मेलंय का? जन्नत जहन्नुम बघितलंय का? काय आहे ते या जगातच आहे आणि आपण कुठलं वाईट काम केलं की आपल्याला शिक्षा होते. आपलं वाईट होतं. हे सगळं इथंच आहे की, मग जन्नत आणि जहन्नुममध्ये काय आहे तिथं? मला काही धर्माची आयडिया पटायची नाही. पण लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नाही. धर्माबद्दल आपण बोलायचं नाही. आमच्या आईच्यासमोर चालायचं नाही आणि पुण्याला आमच्यावर धर्माचा पगडाच नव्हता. त्यामुळे धर्माबद्दल काही विचारायचाही तिथे प्रश्न नव्हता. जबरदस्ती नमाज पढण्याचाही प्रश्न नव्हता. मोकळं वातावरण होतं. आमच्या घरात धर्माचं सगळं व्हायचं. नेवैद्य दाखविणं व्हायचं. ईदला नमाज पढा म्हणून सगळे नमाज पढायचे. पण सगळेच्या सगळे पढायचे. त्यात मजा यायची खाण्यापिण्याची आणि ईद आली म्हणून कपड्यांची मजा व्हायची. काका मला वेगळे कपडे द्यायचे. आत्या मला वेगळे कपडे द्यायची. आई मला वेगळे द्यायची. मामांची लाडकी म्हणून तेही द्यायचे. चार-चार, पाच-पाच जोड मला ईदला यायचे आणि माझी इतकी मजा व्हायची. त्यामुळे मला ते सगळं मजेमध्ये करायला काहीच वाटायचं नाही, आणि मी करत असे.
आमच्या घरामध्ये हिंदू-मुसलमान प्रश्न नव्हता, कारण ज्या कंपाउंडमध्ये आम्ही राहात होतो त्यात गरीब घरं जी होती ती सगळी हिंदूंची होती. म्हणजे धेड, महार, चांभार अशा लोकांची होती. ते सगळे आमच्या आजीकडे यायचे. आजी औषधं बांधून द्यायची, तिला माहिती असल्यामुळे, आणि ते लोकही जरा काही सणवार झाला, काही खायला केलं की आजीला द्यायला यायचे. आजीला त्यांच्याकडे दिवसभर बसलं तरी चालायचं. आम्ही त्यांचीच मोडकी-तोडकी भाषा बोलत होतो. आमची भाषा उर्दू आहे म्हणून खूप काही चांगली उर्दू बोलत नव्हतो. धेडगुजरी भाषाच आमच्या तोंडात होती. असं पण मानलं जायचं नाही की या लोकांत राहिल्यामुळे यांचे संस्कार खराब होणार, घाण होणार. तिथे राहिल्यामुळे आमच्यावर खराब संस्कार झाले नाहीत. आमच्याजवळ राहाणारे सगळे गरीबच होते. खालच्या जातीचेच होते. आमची काकी तर उच्चवर्णीयच होती. पण आम्हांला असा भेदभाव कधी कुणी केला नाही. खूप मोकळं वातावरण होतं. असं काही नव्हतं की हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा आदर करावा, हे गरीब आहेत म्हणून त्यांना कमी लेखावं, असं काही आमच्या घरात वातावरण नव्हतं. काकीच्या शाळेमध्ये मी शिकत असे. ती आम्हांला इंग्लिश शिकवीत असे. शेवटच्या वर्षाला ती यायची, इंग्लिश शिकवायची. तिची शिकवण्याची पद्धत इतकी चांगली असायची, “माझ्या तोंडाच्या आकारावरून" ती म्हणायची, “तुम्ही शब्दांचे - उच्चार करा म्हणजे स्पेलिंग मिस्टेक होणार नाही." आमची कधी स्पेलिंगची चूक खरंच झालेलीच नाही आणि प्रोनन्सिएशन चुकीचं कधी झालेलं नाही. इंग्लिश कसं बोलायचं? त्यांचं कसं, ती लंडनहून आलेली होती. ती भांडारकरांची नात होती. सगळी फॅमिली फार उच्च वातावरणातील होती. त्यामुळे तिच्यावरचे चांगले संस्कार ती मला देण्याचा प्रयत्न करीत होती. शाळेमध्ये असताना आम्हांला एक सवय होती, मैदानावर राउंड घ्यायला लागलो की मैत्रिणीच्या गळ्यात हात घालायचा. काकीनं पाहिलं तेव्हा तिनं मला बोलावलं आणि सांगितलं, “हात काढ तो खाली. हात का ठेवला? असं ठेवल्यामुळे जास्त प्रेम असतं असं वाटतं की काय? हे बरोबर नाहीये. हे हात असे गळ्यात घालायचे नाहीत आणि असं फिरायचं नाही. दोन वेण्या घालायच्या नाहीत. एकच वेणी घालायची. केसामध्ये फुलं घालायची नाहीत.” टीचर्सनासुद्धा सांगायची, “तुम्ही काही केलं तर तुमचे संस्कार मुलींवर होणार. त्यामुळे तुम्हीसुद्धा फॅशन करायची नाही. तुम्ही साध्या राहाल तर ह्या मुली साध्या राहणार.” तिचा अफाट दबदबा होता. शाळेमध्ये खानबाई आल्या म्हटलं की सगळे घाबरायचे. खूप शिस्तीच्या. आणि त्या स्वतः तशाच वागायच्या. मी एस्.एस्.सी.ला असताना त्यांनी माझ्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिलं. सहामाही परीक्षेमध्ये मी नापास झाले. त्यांनी घरी बोलावलं. दम दिला, लाडही केले आणि सांगितलं की तू अभ्यास केला पाहिजेस. मी फर्स्टक्लास नव्हते पण काकींना माहिती होतं की मी अभ्यास केला तर पास होणार, फेल होणार नाही. आमच्याकडे मॅट्रिकला पहिल्या वेळी कुणीच पास झालं नव्हतं. सगळे मॅट्रिकच्या आधी फर्स्ट क्लासमध्ये यायचे, पण मॅट्रिकला कुणी पहिल्या खेपेला पास झालं नाही. नवीन एस्.एस्.सी. निघाली त्या एस्.एस्.सी.ला मी बसले. काकी म्हणायच्या, “तू गरीब घराण्याची आहेस. तुला शिकलं पाहिजे. तुला नोकरी केली पाहिजे. तर तुला चांगला नवरा मिळेल. तुझं पुढचं आयुष्य चांगलं जायला पाहिजे. आपल्या लोकांमध्ये राहून तुला एवढं केलं पाहिजे.” त्यांनी आत्याला सांगितलं, गणित जरा हिचं थोडसं बघा. मग एक मास्तर यायचे, ते गणित शिकवायचे. जेव्हा परीक्षा झाली तेव्हा पेपर फुटले. पेपर फुटले आणि आम्हांला पत्ताच नाही. ते जे मास्तर होते, त्यांनी सगळे पेपर आणून, माझ्या मामे-बहिणीला देऊन सोडवून घेतले. आत्या मला म्हणाली, तिथं जायचं नाही. फुटलेले पेपर आपल्या घरात येता कामा नयेत आणि तुम्ही तशा त-हेने पास होता कामा नये. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये परीक्षेला गेले तर पहिला पेपर अकराला सुरू व्हायचा तो बारापर्यंत सुरू झाला नाही. काय झालं? तर सगळ्याजणी ग्राऊंडवर बसून पेपर सोडवत होत्या. माझ्याकडे पेपर नाही. काही नाही. मला तर वाटलं आपण फेल होणार. पण परीक्षा देऊन आले. परीक्षा झाली. पेपर वगैरे ठीक गेले आणि जेव्हा रिझल्ट निघायची पाळी आली, तेव्हा रात्रभर सगळ्यांचंच जागरण. आमची आजी आता म्हातारी होती बिचारी. तर ती म्हणायची, “काय करायचं, आता ही मुलगी पास होईल की नाही? तिचं काय होणार?" म्हणून तिला काळजी.
माझे जे डॉक्टर काका होते, ते म्हणायचे, "हिने आजीची खूप सेवा केलेली आहे. ही मुलगी नक्की पास होणार." रात्र बसून काढली, मग सकाळी रिझल्ट आला. पास झाले म्हणून सगळीकडे खूप जल्लोष झाला. “मेहरू पास झाली, मेहरू पास झाली." सगळ्यांची लाडकी असल्यामुळे कौतुक झालं. माझ्या काकींनी तर पेढे घेतले, शाळेमध्ये मला नेलं. सगळ्या टीचर्सना सांगितलं आणि मला सर्वांना पेढे द्यायला लावले. माझ्या काकांची बदली त्या वेळी ठाण्याला झाली होती. त्यांनी तिथून अभिनंदनाची तार पाठविली. माझी आत्या म्हणाली सुद्धा, “आम्ही एवढे फर्स्ट क्लासमध्ये पास झालो पण भाईंनी आम्हांला काँग्रॅच्युलेशन्स तसे समोर सुद्धा दिले नाहीत आणि हिला मात्र बघा तार पाठवली." अशी माझी कौतुकं चालली होती. मग एस्.एस्.सी. झाल्यावर मी कॉलेजला जाणार! कॉलेजला कशी जाणार त्या काळामध्ये? नुकतीच सायकलची प्रथा पडलेली होती. माझे काका आजीला म्हणाले, “हिला सायकल शिकवा. ही जाणार कशी?" काकी म्हणाली, "बघा, आपल्या मुलींची वेळ आली तेव्हा हे म्हणाले, कशाला तरुण मुलींनी शाळेमध्ये सायकलींनी जायचं? पण मेहरूची वेळ आल्यावर मात्र हे स्वतः तिला शिकवायला गेले.” असं ती थट्टेने बोलली. ती माझे लाड करत होती. पण तिला कुठं तरी खटकलं होतं. पण मी काही सायकल शिकू शकले नाही. भित्रा स्वभाव असल्यानं मी सायकलवर गेले नाही. सुट्टी पडली की काका-काकींच्याकडे जाऊन मी राहात असे. ती दोघंही फिरायला कुठे गेली तर आम्ही मुलं सगळी धम्माल करीत होतो. सगळ्या सणावारांना मी त्यांच्याकडे असायची. जेवताना, वाढताना काकी मला कौतुकानं जास्त वाढायची.सगळ्यांना न देता म्हणायची, 'तिला हे आवडतं, हे द्या. तिला ते आवडतं, ते द्या.'
सुलभाबाईंच्याकडे मी काकीबरोबर जात होते. सुलभाबाई माझे खूप लाड करीत होती आणि गंमत काय व्हायची, की ही खूप गरीब स्वभावाची, खरं बोलणारी आहे, खोटेपणा हिच्यात नाहीये आणि मनाची फार मोकळी आहे म्हणून माझ्यावर सगळेजण प्रेम करत होते. त्या काळामध्ये मी अगदी गरीबगायच होते. आज्ञाधारक होते. कोणीही मला काही सांगितलं तर हो-हो करून जात होते.
भांडारकरांना मात्र मी एकदाच बघितलंय. त्यांच्या घरी गेले होते तेव्हा मी पाहिलं होतं. माझ्या काकीला आम्ही मालिनीबाई म्हणूनच हाक मारत होतो. मालिनीबाईंच्या भाऊ-बहिणींच्या घरीही मी जात होते.
त्या सगळ्यांना माहीत होतं की बाईंची मी लाडकी आहे. त्यामुळे तेही माझे लाड करायचे आणि मी गोष्टी सांगायला गेले की ते माझं खूप कौतुक करायचे. बघ, आता हिने सुरुवात केली. मी गेल्याबरोबर विचारायचे, आज स्वैपाक काय झाला? माझे काका विचारायचे, "मेहरू, आज अम्माने क्या पकाया? आज बुबूने क्या पकाया?" आमच्या आजीला बुबू म्हणायचे. तर मी म्हणायची, 'बैंगन पकाये। बैंगन भरके पकाये। बैंगन का भरता पकाया।' 'कैसा हुआ था?'... अजून त्यांची मुलं माझी चेष्टा करतात. का आमचे वडील तुला असं चढवून बोलायचे आणि तू ते बैंगन कसं करतात, वांगी कशी शिजवतात ह्याचं वर्णन करत होतीस, त्यासाठी दहा वेळा तुला विचारत होते.
शेवटी बाई गेल्या तेव्हा मी त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या सगळ्या मुलांची लग्नं झालेली होती. त्या एकट्या होत्या. शेवटपर्यंत त्यांनी कुणाची सेवा घेतली नाही. जेव्हा खूपच थकल्या तेव्हा त्यांनी जाणूनबुजून मरण्याचा प्रयत्न केला. कसा? त्यांना ताप आला होता खूप, त्यावर त्या खूप ताक प्याल्या, जबरदस्तीने. जाम सर्दी झाली, न्यूमोनिआ झाला. डॉक्टरला बोलावलंच नाही आणि त्या अंथरुणातच गेल्या. कुणाला कळलंसुद्धा नाही. त्या गेल्यानंतरसुद्धा आम्हांला कळलं नाही. फक्त त्यांनी आपल्या मोठ्या मुलीला बोलावलं. ती मुलगी जवळ होती. तिला बोलावलं आणि त्यांच्या पद्धतीनं मग शेवटचं सगळं करण्यात आलं. विधी न करता दहन करण्यात आलं. त्यांच्यानंतर माझे काका बरेच दिवस होते. काही वर्ष होते. त्यांची मोठी मुलगी जायची. आम्ही जायचो. शेवटी शेवटी मी गेले की ते मला सोडायचेच नाहीत. माझे दोन्ही हात असे धरून बसायचे. सांगायचे, तू माझ्याकडे राहायलाच ये. त्यांची आणखीन एक गोष्ट म्हणजे दलवाईंच्यावर खूप प्रेम केलं त्यांनी. माझं लग्न त्यांनी जमवलं आणि नंतर आम्ही त्यांच्याकडे भेटायला जायचो. फार टाईमशीर होते दोघं. म्हणजे आता समजा, बाराला बोलावलं तर बारालाच गेलं पाहिजे. पहिल्याच दिवशी आम्ही बाराला बोलावल्यावर सव्वा बाराला गेल्यानंतर घड्याळ बघितलं त्यांनी आणि ह्यांना म्हणाले, “हमीद, तू बाराला आला नाहीस. सव्वा बाराला आलास." तेव्हापासून हे काय करायचे, त्यांच्याकडं जायचं असेल आणि टाईम दिला असेल तर पंधरा मिनिटं अगोदर घराजवळ जाऊन उभे राहायचे आणि बरोबर एक्झॅक्ट टाईम झाला की घरात जायचे. काका माझी खूप विचारपूस करायचे. ती ऑफिसमध्ये जाते ते ऑफिस किती लांब आहे? ती पुलावरनं जाते, पुलाच्या शिड्या किती आहेत? मी गरोदर असताना ते ह्यांना म्हणायचे, "नाही,नाही, ती आता भारीपाँव आहे. तिनं अशा शिड्या आता चढता कामा नयेत. तिने ऑफिसची दगदग सहन करता कामा नये. घरातलं सगळं काम तिच्या स्वाधीन करू नका. तिला टॅक्सीनं जायला सांगा!" म्हणजे इतकं प्रेम करायचे की हे सुद्धा म्हणायचे, “काय आहे कुणाला माहिती! मी गेलो की सगळं पुराण तुझंच!" दलवाईंच्या कामाबद्दल त्यांना खूप आदर होता. बाईंना पण खूप आदर होता. त्यामुळे गेलं की खूप रिस्पेक्ट द्यायचे. लग्नाच्या वेळी जेव्हा ते विचारायला गेले तेव्हासुद्धा त्यांनी सांगितलं की, “तुम्ही लग्न जमवलेलं आहे. आमचा काही त्याला विरोध नाही. तुम्ही खूप मोकळेपणानं बोलता. सगळं खरं बोलता. तुमच्या मनात लग्न करायचंय. तुम्ही दोघं जाऊन लग्न करा. नंतर या आमच्याकडे. आम्ही लग्न लावून दिलं तर तिच्या आईवडिलांच्यात आणि आमच्यात वाईटपणा येईल. आमचं दार तुम्हांला उघडंय, लग्न केल्यानंतर. पण एक लक्षात घ्या, या मुलीवर आम्ही खूप प्रेम केलंय. खूप लाडाने सांभाळलीय हिला. तुमच्या घरातनं कुठलीही कम्प्लेंट तिच्या बाबतीत यायला नको." इतकंच नाही तर लग्नानंतर जेव्हा मी एकटी जायची तर ते लगेच विचारायचे, "तू हमीदबरोबर भांडून आलीस? अशी भांडून आलीस तर आपण घरात घेणार नाही. तो तुझा नवरा आहे. तिथंच तू राहिलं पाहिजे."
मी शाळेमध्ये असताना गांधीजींची हत्या झाली. गांधीजींवर खूप श्रद्धा असायची आमच्या घरातसुद्धा. गांधीजी गेले, गांधीजी गेले म्हणून फार गडबड उडाली. सगळे तेच सांगायला लागले. सगळे घाबरले. मी तेव्हा माझ्या मामाकडे होते. माझे एक मावसभाऊ होते तिथं. गडबड उडाली घरातनं. “आता घरी जा. घरी जा", म्हणायला लागले. आता काय करायचं? मग त्या भावानं मला सायकलवरनं आणून घरी सोडलं. मग सगळी दारं-खिडक्या बंद केली. त्या वेळी हवा अशी होती की कुठल्या तरी मुसलमानानं खून केला, त्यामुळे भीतीने कोणी बाहेर पडत नव्हते. खरी बातमी कळत नव्हती म्हणून सगळे घाबरत होते. गांधीजी गेल्यानंतर त्यांच्यावर नवी रेकॉर्ड निघाली, 'सुनो सुनो ऐ दुनियावालो, बापू की ये अमर कहानी।' गांधींच्या एका स्मृतिदिनाला फार भावनात्मक होऊन मी ते गाणं शाळेत म्हटलं आणि माझ्या काकीलासुद्धा ते खूप आवडलं होतं. मला गाण्याची आवड होती, माझा आवाज चांगला होता आणि माझे मामा जे होते ना, त्यांच्याकडे काही कार्यक्रम झाला की ते मला बोलवायचे आणि त्यात गायला लावायचे. त्या वेळी मी सिनेमाची गाणी म्हणायची. तेव्हा लता मंगेशकर नवीनच होती.
मामा म्हणायचे, ही आमच्या घरातली दुसरी लता मंगेशकर आहे. फार छान आवाज होता पण तो टिकला नाही, का तर मी जेव्हा मुंबईला आईकडे रहायला गेले तेव्हा ती काय करायची, कोणीही आलं की मला गायला सांगायची. एकदा मी चिडले आणि म्हटलं मी गाणारच नाही. तेव्हापासून मी गाणं बंद केल्यामुळे आता माझा आवाजच फुटत नाही. त्यामुळे माझं गाणंही बंद झालं, नाहीतर माझ्याकडे संगीतकला होती. गाण्याची चांगली आवड होती.
पुण्याला असतानाच एस्.एस्.सी. परीक्षेला सुरुवात झाली तेव्हा ४९ मध्ये मी एस्.एस्.सी. झाले. मग मी वाडिया कॉलेजला गेले. आमच्या काका-काकींनी, आत्यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं की हिला पूर्ण शिकवायची आणि त्याशिवाय हिचं लग्न करायचं नाही. त्यामुळे मी कॉलेजमध्ये दोन वर्षं गेले. पण इंटरला मी फेल झाले. तिथं काय व्हायचं, मी उर्दू शिकलेली आणि कॉलेजचं मीडियम इंग्लिश. त्यामुळे जमायचंच नाही. लॉजिकमध्ये दोनदा फेल झाले. सब्जेक्ट दोन-दोन मार्कांनी गेले. नंतर मी कंटाळले आणि मी म्हटलं की बाबा, आपल्याला शिकायचं नाही. तेव्हा आमच्या आई-वडिलांना असं वाटलं की आपण हिला मुंबईला घेऊन जावं. माझे काका, आजी तयार नव्हतेच. ते म्हणाले आपण हिला नोकरी लावू. तुम्ही नोकरी लावणार काय? तिथे गेल्यानंतर नोकरी लागेल का? शेवटी मी १९५२ साली मुंबईला गेले आणि मे १९५४ ला मला खादी कमिशनमध्ये नोकरी लागली.
खादी कमिशन हा प्रकल्प गांधीजींच्या विचारावर चालणारा एक प्रकल्प. 'ऑल इंडिया खादी कमिशन' असं नाव. बरं त्याची पण मजा! मला इंटरव्ह्यूला बोलावलं, तर इंटरव्ह्यूला मी कशी गेले? खादी कमिशनचे चेअरमन वैकुंठलाल मेहता होते आणि मोरारजीभाई देसाई त्या वेळी चीफ मिनिस्टर होते. त्यांच्याकडे माझ्या आईचा मावसभाऊ काम करत होता. तर त्यानं शब्द घातला की माझ्या भाचीला नोकरी लावा. त्यांच्या ओळखीनं मी गेले. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर, किती शिकलेली आहे – तर इंटरपर्यंत. कुठल्या मीडियमनं शिकलेली आहे - उर्दू शिकलेली आहे. मराठी येतं, का? मराठी येतं, इंग्लिश? जेमतेम. टायपिंग येतं का? नाही. शॉर्टहँड येतं का? नाही. असं सगळं झालं. आता नोकरी तरी द्यायची कशी? पण शेवटी हा वशिला उपयोगी पडला. मला तिथं नोकरी मिळाली. ती नोकरी मी कायम केली. मला मर्कंटाईल बँकेत कॉल आला होता. तिथं जायचं असं ठरत होतं. कारण इथं पगार कमी होता.
पंच्याण्णव रुपये पगार मिळायचा सुरुवातीला आणि दुसऱ्या महिन्यापासून एकशे पंधरा रुपये. पंधरा रुपये इंक्रिमेंट असे. तर असं वाटत होतं की आपण दुसरीकडं जाऊन बघावं का? पण माझ्या वडिलांनी सांगितलं, “नाही, गांधीजींचं हे काम आहे ना!" गांधीजींबद्दल त्यांना खूप आदर होता. ते म्हणाले, “आपल्याला पैसे कमी मिळाले तरी चालतील. चांगलं ऑफिस सोडून आपण वाटेल तिथं जायचं नाही", आणि मी खादी कमिशनमध्ये पर्मनंट राहिले. तिथे मी ३५ वर्षे नोकरी केली.
ज्या वेळी मी नोकरीवर होते तेव्हा आमचं घर दादर मेन रोडला, सकीना बिल्डिंगमध्ये होतं. आईवडील आणि आम्ही तिथं राहात होतो. तीन मजल्यांची बिल्डिंग होती. सबंध बिल्डिंगमध्ये एकच घर मुसलमानाचं होतं. पण आम्हांला कधीच कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही. घरं लहान असली तरी गॅलरी मोठी होती. त्यामुळे सगळे रात्रीचे गॅलरीत येऊन झोपायचो. आमच्या आईचा स्वभाव तापट असल्यामुळे आईवडिलांची घरातल्या घरात भांडणं फार व्हायची. भावंडं खूप मार खायची. दोघांच्या भांडणामध्ये मुलांना मार पडायचा आणि घरात तमाशा होऊन जायचा. शेजाऱ्यांना हिंमत व्हायची नाही दुसऱ्यांच्या घरात डोकावायची. मी म्हटलं की आता हे रोज होतंय, मला तर असलं काही माहीत नव्हतं. पिणं पण बघितलेलं नव्हतं, मारही बघितलेला नव्हता. त्यामुळे मला दहशत, भीती वाटायची. मग मी आईला सांगितलं की, आपण एक युक्ती करू या. मी तुला सांगते आणि तू मान्य करायची. तू आल्याबरोबर बाबांना बोलतेस ना, तू बोलत जाऊ नको त्यांना. मग काय करायचं? वडिलांचा टाईम झाला, खाली आले वडील, की ते कुठल्या तरी नोकराबरोबर आपली बॅग, हँडबॅग वर पोचती करायचे आणि खाली दारुचा गुत्ता होता, तिथे बाटली भरून घेईपर्यंत वेळ लागायचा. तिथे ओळखीचे लोक होते, गप्पा-बिप्पा मारून वडील वर यायचे. ऑफिसातून पिऊन ते कधीही येत नसत. तर खाली बाटली भरून घ्यायचे आणि वर यायचे. एवढ्या वेळामध्ये आम्ही आधीच स्वैपाक करून ठेवलेला असायचा. सगळे जेवून घ्यायचे माझ्याशिवाय. आणि अंथरूण घालायचं, झोपायचं आणि लाईट बंद करायचा. हे सगळं साडेआठ-नऊपर्यंत व्हायचं. आणि मग वडील वर चढायचे. वडील वर चढले की मग ते पिणं, हातपाय धुणं, संडासला जाणं हे सगळं आवरून मग आम्ही दोघं जेवायचो आणि मग जेवणानंतर खिडकीमध्ये बाहेर तोंड करून बसायचो. बोलायचं नाही. मग मी त्यांना समजावून सांगायची. माझ्याशी वाद कधी नाही झाला. माझी आई बोलायची म्हणून वाद व्हायचा.
मी बोलतच नसे आणि त्यांचं सगळं झाल्यावर मी म्हणायची, "चला हां, आता झोपा तुम्ही. सकाळी आपल्याला उठायचंय. मला पण ऑफिसला जायचंय.” ते आल्याबरोबर, “जेवलीस? माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस," असे म्हणायचे. मी म्हणायची, “हे बघा, असं बोलायचं नाही. मी तुमच्याशिवाय जेवणार नाही." ते माझ्या बोलण्याप्रमाणे वागायचे. ते जरा लाडही करायचे माझे. मग ते झोपून जायचे. सकाळी उठलं की सगळं नॉर्मल. असला मी मार्ग काढला आणि मग शांतता झाली. आईचा राग इतका भयंकर, अशी मारायची की एकदा मोठ्या भावाचे गुडघे फुटले होते. कशाने तरी, फूंकणीने मार, बेलण्याने मार आणि रक्त निघायचं. धाकट्या भावाला एकदा तिने कात्री फेकून मारली तर पायाला लागलं आणि पाय रक्तबंबाळ झाला. त्यामुळे डॉक्टरकडे धावाधाव करावी लागली.
आईचा स्वभाव वेगळा होता, वडिलांचा स्वभाव वेगळा होता. तिचा स्वभावच तापट होता पण वडिलांचा काही कमी होता असं नाही. ते प्यायचे, ही बोलायची. मग ते मारायचे. सकाळी दोघंही नॉर्मल व्हायची. बरं, दुसरी गोष्ट अशी होती की आमची आई होती फार बोल्ड. मार खायलासुद्धा भ्यायची नाही. त्याचं तिला काहीच वाटायचं नाही आणि वडील थोडेसे भित्रे होते. ते काय करायचे? तिसऱ्या माळ्यावर आमचं घर होतं. रात्री खिडकीच्या बाहेर हात करून बसायचे आणि समजा मेन रोडवर मारझोड झाली, दगडफेक झाली, काही झालं तर हे भिऊन वरचे दरवाजे, खिडक्या बंद करायचे. तर आमची आई टिंगल करायची आणि खाली रस्त्यावर जायची. सगळी माहिती काढायची आणि वर येऊन सांगायची, "क्या तेरा बाप डरपोक है। यहाँ खिडकी बंद करता है। वो क्या पत्थर उपर आनेवाले है? क्या खान, वो पत्थर उपर आनेवाला है क्या?" असं म्हणायची. मग गंमत सांगायची, “तेरा बाप मालूम है क्या? बहोत डरपोक है." हे कशावरनं, तर ते मिलिटरीमध्ये होते. एकदा छावणीमध्ये बसले, रात्रीची वेळ होती, सगळ्यांनी बंदुका रोखलेल्या होत्या, शत्रू आला तर मारायचा म्हणून. जवळच्या झाडांची पानं हलली, आवाज आल्याबरोबर यांनी गोळी झाडली. नंतर जेव्हा बाहेर बघितलं तेव्हा तो कुत्रा होता. तर हेच यांनी येऊन सांगितलं असेल. आईने त्याचा इश्यू केला आणि दर वेळी बोलायची, “अरे क्या तेरा बाप। वो मिलिटरी में गया। कुत्ते को मारा। बंदूक से किस को मारा? आदमी उसे नहीं मिला। कुत्ते को मारा।" अशी ती टर उडवायची. अशा रीतीने ती सहज बोलायची. तिनं एक सांगितलं की हे दुसरं बोलायचे आणि तरीही ती दोघं एकत्र होती. एका रात्री काय झालं, पोलीस टॉर्च फिरवत होते. आमच्याच घरावर सारखा संशय होता, आणि खरोखर बिल्डिंगमधले एक 'दादा' आले आमच्याकडे. आल्याबरोबर आईने त्यांना झटकन आत घेतलं आणि वडिलांच्या शेजारी बसवलं. मग ती दारात अशी उभी राहिली. तितक्यात पोलीस वर चढले. पोलीस म्हणाले, आम्हांला घराची झडती घ्यायचीय. ती म्हणाली, "बाबा, माझी मुलं झोपलेली आहेत. मी मुसलमान बाई. रोजे-बिजे असतात. आता कुठं बघणार तुम्ही? काय पाहिजे तुम्हांला? "नाही, राजाराम पाहिजे.” “मी सांगितलं ना, नाही आहेत?" पोलिसांनी तिचं ऐकलं आणि ते निघून गेले खाली. कधी तरी नंतर पोलिसांनी त्यांना धरलं, जेलमध्ये टाकलं. आई त्यांना सोडवायला जामीन सुद्धा राहिली. त्यामुळे तिचा दबदबा फार होता. माँजी म्हणून ती मशहूर होती तिथं. सगळे माँजी म्हणून तिला मान देत असत. सगळ्यांची, शेजारच्या काकूची बाळंतपणं झाली, कोणाचं काय झालं तर ही पहिल्यांदा हजर. कुणी आजारी पडलं तर ही पहिल्यांदा हजर. दारात बसून मस्ती करतात म्हणून मुलांना लाख शिव्या दिल्या तरी लोकं बोलायची नाहीत. तोच धीटपणा माझ्याही अंगात आला. पण त्या वेळी मात्र मी भित्री होते. सगळं हे बघितलं की मी अशी कापायची. मला भीती वाटायची. आमच्या पुण्याचं वातावरण वेगळं होतं आणि या घरातलं वेगळं होतं आणि त्याच्यातसुद्धा आम्हाला घरातनं एकटं इकडं-तिकडं जाण्याची परमिशन नव्हती. आमच्या दोन खोल्या, बाहेरच्या खोलीत कुणी पाहुणा-रावळा आला की आम्हांला त्याच्यासमोर जाण्याची सुद्धा परवानगी नव्हती. गोषा नव्हता, पण मुलींनी पुढे यायचं नाही; बोलायचं नाही. आम्ही काय बुरखा घालत नव्हतो. पण कुणी आमच्याकडे यायचं नाही. माझ्या भावाला ताकीद दिली होती : तुझे मित्र खाली. मित्र एकही वर चालणार नाही. कसलेही संबंध नाहीत. पिक्चरला जायचं नाही. पिक्चरला जायचं असेल तर आईच्या बरोबर जायचं. भावाबरोबर जायचं. लग्न झाल्यानंतर जेव्हा मी हमीदना सांगितलं ना, की आईच्या बरोबर दर आठवड्याला पिक्चर बघत होते तर हे म्हणायचे, “काय गंमत करते. आईच्या बरोबर काय पिक्चर बघायचा असतो?" पण त्या वेळी कुणाला शोधणार होते? स्ट्रिक्ट वातावरण.
आता खादी कमिशनमध्ये मी लागले, तेव्हा माझी एक मैत्रीण होती उषा म्हणून. उषा वढावकर. लग्न झालेली होती. कस्टममध्ये नवरा होता. पैसेवाली होती. काळी होती पण तिच्या चेहऱ्यावर खूप तेज होतं. त्यामुळे इतकी अॅट्रॅक्टिव्ह दिसायची ती. बघतच राहावं आणि राहाणं पण टिपटॉप असायचं ना! चालायला लागली की तिच्याकडं बघत बसावं असं वाटायचं. म्हणजे बायकांना वाटायचं तर पुरुषांना किती वाटेल बघा. असं बोलणं-बिलणं जरा ठसकेदार. पण तिला बिचारीला मूल-बाळ नव्हतं. माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान. तिचं लग्न केव्हाच झालं होतं. तिला लग्न झाल्यानंतर नोकरी मिळाली आणि माझ्या थोडी अगोदर ती लागली होती. बऱ्याच मैत्रिणी होत्या पण हिच्यामुळं मला हमीद मिळाला असं बोलायला हरकत नाही. तिच्यामुळे हमीद माझा झाला. ती फार मायाळू होती. दिलदार होती. मदत कधीही करायची. पैसा खूप होता. बहिणींच्या, भावाच्या मुलांना सांभाळलं तिने. शिकवलं तिने. आपलं मूल नाही म्हणून तिने इतरांकडे दुर्लक्ष केलं नाही. माझ्या लग्नाची पण तिला खूप काळजी वाटायची. ती नेहमी म्हणायची, “नाही ग तुझी आई बघणार. तू आता नोकरी करते. पैसे कमवते. तुझ्या घरात तुझे पैसे येतात. आता वडील घरात पैसेपण देत नाहीत. त्यामुळे तू कशाला अशी अपेक्षा ठेवते की ती तुझं लग्न करेल म्हणून? तू एखाद्या हिंदू मुलाशी लग्न का नाही करत? काय हरकत आहे? तुला मुसलमानच कशाला पाहिजे? समजा आईने तुला कराचीला नेलं, पाकिस्तानला नेलं, तुझं एखाद्या दाढीवाल्याशी लग्न-बिग्न करून दिलं तर सगळं आयुष्य फुकट जाईल तुझं. कशाला विचार करते? तुझं वातावरण वेगळं आहे. तू विचारांनी वेगळी आहेस. तू डेअरिंग कर." पण माझ्यात ना डेअरिंग नव्हतं. मी आईला आणि धाकटा जो भाऊ होता त्याला घाबरत होते. तो लहान असल्यामुळे गुर्मी जरा जास्त आणि आईचा लाडका होता. त्यामुळे तो जरा कडक होता. मला भीती वाटायची. त्यामुळे मी घरात बोलायची नाही की तू माझ्यासाठी कोणी शोध. अमूक कर असं मी कधीच सांगितलं नाही.
माझं दलवाईंबरोबर लग्न होण्याआधी एक मुलगा मला बघायला आला होता. तो बी.ए.एल.एल.बी. होता. देखणा होता. परिस्थितीनेसुद्धा चांगला होता. तो रेशनिंग ऑफिसमध्ये कामाला होता. संध्याकाळची वेळ होती. आईने मला ट्रेमध्ये चहा न्यायला सांगितला. चहा नेता-नेता साडीत पाय अडकला. सगळा ट्रे खाली पडला. आई मनातल्या मनात खूप संतापली. तिने ते सगळं आवरलं. मग मी बाहेरच्या खोलीत जाऊन बसले. त्याने मला दोन-तीन प्रश्न विचारले. तुमचं नाव काय? किती शिकलात? कुठे काम करता वगैरे वगैरे. इतक्यात सगळीकडचे लाईट गेले. आईने कंदिल लावला. तो निघून गेला. काही दिवसांनी माझे पुण्याचे मामा आमच्याकडे आले. त्यांचं नाव बिरू पटेल होतं. तो पुण्यातला प्रख्यात माणूस.
सॅलिसबरी पार्कचं परवेझ हॉटेल त्यांचंच, पुण्याला जेव्हा दलवाईंच्या मीटिंग्ज व्हायच्या तेव्हा त्या मामांनी अटेन्ड केल्या आणि दलवाईंची बाजू घेऊन लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. दलवाईंची मतं त्यांना पटत होती. मला नेहमी सांगायचे 'मेहरू, लहानपणी तुझे डोळे इतके सुंदर होते की ते बघायला मी नेहमी यायचो.'
माझे मोठे मामा हाजी. ते रेल्वेत होते. जेव्हा फाळणी झाली आणि जेव्हा सरकारने असं जाहीर केलं की जो कोणी पाकिस्तानात जाईल त्याची इथली सर्व्हिस धरली जाईल, तेव्हा हाजीमामू, माझी मावशी, फातमा- जी शाळेत शिवण शिकवायची, माझा आतेभाऊ जो कस्टममध्ये होता आणि एक सख्खा भाऊ असे सगळे कराचीला निघून गेले. तर मी असं सांगत होते की माझे बिरूमामा त्या वेळी मुंबईला आले. त्या मुलाला परत बोलावलं. माझे मामा फार हुशार होते. त्यांनी त्या मुलाला विचारले, 'आज तुम्ही रेशनिंग ऑफिसमध्ये आहात. उद्या समजा हे ऑफिस बंद झालं तर तुम्ही काय करणार?' तो म्हणाला,'मी.बी.ए.एल.एल.बी. आहे. मी वकिली करीन.पण ह्यासाठी मला वीस हजार रुपये पाहिजेत.'मामा म्हणाले, 'जेव्हा तुम्ही वकिली कराल त्या वेळी जर आमच्याकडे पैसे असतील तर आम्ही तुम्हाला देऊ.' हे बोलणं झालं आणि तो निघून गेला. मी आतून सगळं ऐकलं. घरातल्या सगळ्या लोकांना तो पसंत होता. मामा म्हणाले, पैशाची व्यवस्था करू. पण पहिल्यांदा मेहरूला विचारा की तिला हा मुलगा पसंत आहे का? रात्र झाली,जेवण झाल्यानंतर मामांनी मला विचारलं. मी चटकन् म्हणाले, 'मी ह्या मुलाशी लग्न करणार नाही. जो मुलगा मला पैशाने विकत घेईल तो मला काय सांभाळेल? उद्या तो मला त्रास देणार नाही याची काय खात्री? आणि त्याने जर मला तुमच्याकडून सारखे पैसे आणायला सांगितले तर मला ते अजिबात आवडणार नाही.' हुंडा घेण्या आणि देण्याची कल्पना मला त्या काळातसुद्धा आवडत नसे.
मी आजारी होते का काय होते म्हणून दोन-चार दिवस रजेवर गेले होते. रजेवरून आल्यानंतर उषा मला भेटली आणि म्हणाली, “अग, एक न्यूज आहे तुझ्यासाठी." “काय?” "हमीद दलवाई म्हणून एक तरुण तुला भेटायला आला होता. तो लेखक आहे. आर्टिस्ट आहे. दिसायला पण चांगलाय हं मेहरू. आणि मला वाटतं की त्याच्या काही तरी मनात असलं पाहिजे." मी म्हटलं, “चल – चल कोण होता? काय होता? कुठे होता?" तेव्हा नावही ऐकलेलं नव्हतं. आणि तेव्हा असं होतं की मी खान आहे. आमच्यामध्ये खान, शेख आणि सय्यद. खानचं खानमध्ये, शेखचं शेखमध्ये आणि सय्यदचं सय्यदमध्ये लग्न होतं. त्यामुळे दुसरीकडे लग्नच करणार नाही. आणि कोकणी आणि दख्खनी यांच्यामध्ये फरक होता. हे कोकणमधले ते नंतर कळलं मला. उषा म्हणाली, "तुला भेटायला काय हरकत आहे? नाही कशाला म्हणतेस?"
त्या वेळी आमची सहा माळ्यांची बिल्डिंग होती. के. सी. कॉलेज आता आहे ना, तिथे त्या वेळी आमचं ऑफिस होतं. आणि वर गच्ची होती. ती म्हणाली, “आज तो चार वाजता येणार आहे. आपण जाऊ या गच्चीवर. काय हरकत आहे जायला?" चार वाजता मी वर गेले. वर गेल्यानंतर हे आलेले दिसले. त्यांची ओळख करून दिली, “हे हमीद दलवाई. ही मेहरू." मला म्हणाली, “मी जरा चहा घेऊन येते." असं म्हणून ती गेली. असं मी त्यांना बघितलं. बघितल्यानंतर जे माझं इंप्रेशन त्यांच्याबद्दल झालं ते मी सांगायला हवं. बारीकसा, किडकिडीत माणूस, गाल असे पडलेले, दाढी वाढलेली. म्हणजे आपण एखाद्या मुलीला बघायला जातोय तर दाढी तरी करून जावी याचं सुद्धा भान नसलेला. खादीचे कपडे अंगावर. पांढरे कपडे पण मळलेले, फाटलेले. असं वाटलं की एखादाच जोड असेल या माणसाकडे. पण डोळे मात्र घारे होते. आणि सगळ्या अवतारावर ते मात करीत होते. एक डोळा मारायची सवयही दिसली. बोलताना तर विशेषच. त्यांचा एक मित्र होता शिवाजी सावंत म्हणून. लेखक शिवाजी सावंत नव्हे. तो इन्श्युरन्सचं काम करत होता आणि त्यांनी उषाचा आणि माझा एकदा इन्श्युरन्स काढला होता. तर सगळी माहिती त्याच्यात मिळाली ना त्यांना! आणि हे पण काय मुलगी शोधत होते की काय, आणि सावंतला पण मी पसंत पडली असावी. तर त्यांनी दलवाईंना सल्ला दिला की ही मुलगी चांगली आहे. मुसलमानाची आहे. नोकरी करणारी आहे. कर ना लग्न. काय हरकत आहे तुला? असं झालं म्हणून ते बघायला आले. तर शिवाजी सावंत पण बरोबर आले होते. ते बाजूला गेले आणि त्यांनी आम्हांला बाजूला सोडलं. तर मला बघितल्यानंतर त्यांनी हसून आणि डोळा मारून विचारलं, "काय, खादी तुम्ही नेसता ती आवड आहे म्हणून नेसता का खादी कमिशनमध्ये आहे म्हणून नेसलंच पाहिजे म्हणून नेसता?" म्हटलं, “हो बाबा, एवढे जाडे भरडे असतात कपडे. कोण नेसणार? साड्या घातल्या की पोटातसुद्धा दुखतं. त्याला काय शेप नाही. रंग नाही. रूप नाही. असं कुणाला आवडेल? घालायलाच पाहिजे ना म्हणून मी घालते. माझ्या आवडीचा कुठे प्रश्न आहे? पण तुम्ही का घालता खादी?" तर म्हणाले की, "मला खादीबद्दल आदर आहे. मी गांधीवादी आहे. रुमालसुद्धा मला खादीशिवाय चालत नाही." मग माझं शिक्षण किती झालं, त्यांनी विचारलं. 'मी इंटरपर्यंत गेलेली आहे. इंटर फेल झाले म्हणून नोकरीला लागले.' चहा घेत घेत बोललो आम्ही. उषाने चहा आणून दिला आणि ती निघून गेली. त्यांनी असं सांगितलं की, “मला नोकरी नाहीये. तुम्हांला सांगतो की राहायला जागाही नाहीए. अडचण आहे. घरात भावंडं खूप आहेत आणि गरीब आहोत आम्ही. कोकणात राहाणारे आहोत आणि इतकं असूनसुद्धा मी इकडे आलो. तुमच्याबद्दल ऐकलं आणि मला वाटलं की ही मुलगी आपल्याला लग्नाला योग्य आहे. माझ्या मनात लग्न करायचं आहे. तुमच्या मनात काय आहे?" हे ऐकून मी चकित झाले की एखादा मनुष्य एवढा फ्रँक असू शकतो! एवढा प्रामाणिक एखादा पुरुष असू शकतो की तो स्वतःबद्दल सुरुवातीलाच सगळं काही सांगेल? का, तर कोणी सांगत नाही. सगळे लपवतात आणि नंतर एक एक रहस्य खुलतं आणि बाईला त्रास होतो. असं झालं नाही. तरी त्यावर मी म्हटलं, लग्न? नाही रे बाबा, पण माझ्या आईला कळलं तर माझी आई फोडून काढेल मला. तुम्हांला पाहिजे असेल तर माझ्या आईला भेटा, असं मी म्हणाले. तर ते म्हणाले, "लग्न तुम्हांला करायचंय, आईला करायचं नाहीए. तुमच्या मनात असलं तर पुढची जबाबदारी मी घेतो ना." तर मी म्हटलं की मी विचार करीन जरा. "नाही,करा विचार तुम्ही. काय हरकत आहे?" असं म्हणाले. मी खाली उतरून आले आणि उषाने विचारलं. तिला सांगितलं, बाई असं असं आहे. ती म्हणाली, हिंदूंमध्ये सुद्धा तुला असा चांगला मुलगा मिळणार नाही. इतका फ्रँक आहे. तो गरीब असला तर काय झालं? त्याला नोकरी नसली तर काय झालं? आज नाही तर उद्या काय मिळणार नाही का नोकरी? तो पण शिकलेला आहे. एस्.एस्.सी. झालेला आहे. एफ्.वाय. झालेला आहे. मग त्याला पण नोकरी मिळेल की नाही? घर काय? सगळ्यांचेच काय बंगले असतात काय? आपण कशाला असा वाद करायचा? मुलगा कसा आहे? तुला सांभाळणारा आहे का नाही? आपण हाच विचार करायचा मेहरू आता. हे बघ मेहरू, माझं लग्न झालेलं आहे. नाही तर मीच याच्याशी लग्न केलं असतं, इतका मला आवडलाय. तू माझी मैत्रीण आहेस. हरकत नाही तुझ्याशी हे बोलायला. तू नाही म्हणू नको. म्हटलं, “आईला कोण समजवणार?" "त्याची जबाबदारी घेईन ना मी. तू त्याची काळजी करू नको." आणि गंमत अशी की बोलता बोलता मी दलवाईंना विचारलं, तुम्ही पण काय खादी कमिशनमध्ये ट्राय करता की काय? तर ते म्हणाले, “माझा इथे इंटरव्ह्यू झालेला आहे. ते सातारवाला आहेत त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलाय. आणि याच्यावर चेष्टापण झाली की तुमच्यासारखीला घेतात इथं, मग मला का नाही घेणार? आणि मग अशा रीतीनं दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरलं आमचं.
हसनशेट म्हणून चुलत भाऊ होते दलवाईंचे. त्यांच्याकडे जोगेश्वरीला दलवाई राहायचे. आणि घरात जेवायचे-बिवायचे नाहीत. नोकरी नव्हती. पैसे देता येत नाही म्हणून जेवायचे नाहीत. या दिवसांमध्ये चणे खाऊनसुद्धा त्यांनी दिवस काढलेले आहेत. घरात एवढ्या जबाबदाऱ्या, त्यांना पैसे आपण पाठवू शकत नाही. बाबांची हालत खराब आहे. त्यामुळे तो फार अपसेट झालेला माणूस होता. त्यामुळे लिखाणही जेमतेम. चार महिने इथं नोकरी झाली, दोन महिने तिथे. कायम नोकरी लागली नव्हती.
तेव्हा समाजकार्य सुरू केलेलं नव्हतं. पण लोकांशी ओळख खूप होती. लिहीत होते म्हणून ओळख होती. आणि समाजकार्य करण्याचं मनात होतं. तेव्हाच मला म्हणाले, “मला आज काही नोकरी नाहीए. पण उद्या मला नोकरी लागेल. पण एक काम करायचं. आज घर जे आहे, संसार जो आहे तो तुझा. तो कसा चालवायचा ते तू ठरवायचं. मी त्याच्यात दखलसुद्धा देणार नाही. तुला विचारणार सुद्धा नाही. मला समाजकार्य करायचंय. मला लिहायचंय. माझ्या डोक्यात खूप आहे. ते मला करायची मोकळीक मिळाली पाहिजे. त्याच्यात तू अडथळा आणायचा नाही." हे आमचं आधीच ठरलेलं होतं. तेव्हा समाजकार्य काय असतं हे मला माहिती नव्हतं. लिखाण काय असतं हेही मला माहिती नव्हतं. आपण कधी हे केलेलं नाही तर कसं कळणार आपल्याला? मी कॉलेजमध्ये असताना उर्दूमध्ये एक गोष्ट लिहिली होती. ती आता मला आठवत पण नाही काय लिहिली होती ती. ते एकच लिहिलेलं होतं. त्यामुळे लिहिताना माणसाला मूड लागतो, त्याला वेळ लागतो, त्याला प्रायव्हसी लागते, हे काही आपल्याला माहीत नाही. एकांत दिला म्हणजे माणूस लिहितो अशी माझी समजूत.
आता उरला त्यांच्या भावंडांचा प्रश्न. मला वाटलं की मी त्यांची जबाबदारी घेईन. वेळ आल्यानंतर, आपण आपल्या मनाची तयारी ठेवली की आपल्याला करता येतंच सगळं. आत्तापासूनच त्याच्यावर वाद कशाला करायचा? मला लग्न करायचं होतं. माझा संसार मला हवा होता. माझी मुलं मला हवी होती. मला नवरा हवा होता. आईवडिलांमध्ये रहायचं आणि भावाची मुलं सांभाळायची त्याच्यापेक्षा आपला संसार बरा. वाटलं मला की हा मुलगा फसवणार नाही. हा मला बघेल. आता झोकून द्यावं स्वतःला. मग बघावं काय होतं ते आणि त्या हिशोबाने मग मी त्यांना होकार दिला लग्नाला.
हो म्हटल्यावर मग गेले निघून, ठीक आहे म्हणून. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला त्यांच्यासाठी पास काढावा लागला. दुपारी लंचटाईममध्ये ते माझ्या ऑफिसमध्ये यायचे. तर येणं जाणं कसं करणार? रेल्वेचा पास काढून दिला. डबा मी आणायची तर त्याच्यात दोन चपात्या जास्त आणायची. रोज जेवायला त्यांना परवडायचं नाही म्हणून असं थोडं थोडं आम्ही जेवत होतो. रोज दुपारी यायचे आणि संध्याकाळी ते मला घेऊन जायचे. घेऊन जायचे म्हणजे चर्चगेटपासून आम्ही इकडे तिकडे फिरायचो. कुठे तरी खायचो आणि संध्याकाळी एका ट्रेनने घरापर्यंत जायचं. खालून मला सोडायचे माझ्या घरी आणि ते निघून आपल्या घरी जायचे. काय करायचं, कसं करायचं अशा रीतीने आमचं बोलणं व्हायचं. मी काही घरच्या माणसांदेखत हिंडत नव्हते. चर्चगेटला नाही तर दादरला जायचं. त्यांना संशय त्यामुळे नाही आला, पण नंतर उषाने दलवाईंच्या स्थळाबद्दल जेव्हा सांगितलं तेव्हा आईला संशय आला. आता काय गाडी रोजची ठरलेली. एक गाडी जरी चुकली तरी वडील विचारायचे. तुला वेळ का झाला? त्यामुळे आणि मला खोटं बोलायची सवय नसल्यामुळे ते मला जड जात होतं. मी यांच्याशी खोटं बोलते. खरं बोलायचं डेअरिंग नाही म्हणून मी खोटं बोलते याची जाणीव मला होती. भिऊन मी घरात बोलायची नाही आणि त्याच्यानंतर उषाने आईला सांगितलं की माझ्या घरी बैठक ठेवू या. तुम्ही तिथं या, मुलगा बघा आणि मग आपण ठरवू या. दोनतीनदा त्यांनी टाळलं. त्याच काळामध्ये कराचीहून माझी एक मावशी आली होती. ती माझ्या बाजूची होती. त्यामुळे तिला पण मी सगळं सांगितलं. की असं असं आहे आणि तू आईला तयार कर. मावशीनं आईला असं नाही दाखवलं की मी तिला असं सांगितलं. ती बोलली. “काय हरकत आहे? जा बघायला." आणि आईच्या मनात जर माझ्या लग्नाचं असतं तर ती मावशीला पण बोलली असती की चल जाऊ या, नाही तर घरी बोलवू या. तसं तिने केलं नाही आणि ती टाळत गेली. नंतर मावशी निघून गेली, का तर मग त्यांच्यामध्ये जरा बोलाचाली झाली. त्यामुळे मावशी निघून गेली. तिला वाटलं की बाबा, मी काय करणार ह्या गोंधळात. आणि मग एकदा भेटायला आई गेली उषाकडे.
वडिलांना कोण मध्ये पडू देतं? आई जे करेल ते खरं ना. तसा वडिलांचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आई एकटीच गेली. मला सांगितलं नाही तिने.
दलवाईंना उषानं बोलावलं होतं बैठक ठेवली होती तिथं. आणि तिथं भेट करून दिली. गेल्यानंतर आमच्या आईचं इंप्रेशन चांगलं झालं नाही. तिला वाटलं कोणी तरी मोठा जज, वकील असेल. पैसेवाला असेल, गाडी घेऊन आला असेल अशी तिची कल्पना झाली. आणि एकीकडे तर बोलायची की मुलगी किरकोळ आहे. तिचं लग्न कसं होणार? आणि दुसरीकडे तर अशी अपेक्षा ठेवायची, हे चुकीचं होतं. तिनं तिथं क्रॉस एक्झामिन केलं त्यांना. तुमचं शिक्षण एफ.वाय. पर्यंत झालं. पुढं का नाही शिकलात? खादी घालायचं कारणच काय तुम्हांला? खादीशिवाय तुम्हांला चांगले कपडे मिळाले नाही का? असं त्यांच्या गरिबीवर सारखा रोख ठेवला.
असं केल्यामुळे त्यांना वाईट वाटलं. पण तो मनुष्य खूप सुधारलेला असल्यामुळे त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. उलट उत्तर दिलं नाही. त्यांनी पण चेष्टेनं सगळं घेतलं. कारण मी मनासमोर होते ना. लग्नानंतर ते या इंटरव्ह्यूबद्दल लोकांना आपल्या सवयीप्रमाणे खूप सांगत असत. "बापरे, माझ्या सासूने जो माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे तो ऐकण्यासारखा आहे." आणि टिंगलीला त्यांना तो एक विषय झाला.
आई उषाला म्हणाली, 'काय मुलगा बघितला? काय तरी बघायचं होतं. चांगला बघायचा होता. आता मेहरूला जर कळलं की तू असा मुलगा दाखवला आहेस तर तिला बिचारीला किती वाईट वाटेल?' उषाचा चेहरा पडला. वाईट वाटलं तिला की काय मी वाईट मुलगा दाखवलाय? तर ती आईला म्हणाली, "तुम्ही मेहरूची काळजी करू नका. मेहरूनं मुलगा बघितलेला आहे आणि तिला आवडलेला आहे. म्हणूनच तुम्हांला मी इकडे आणलंय." फाटकन् तिनं असं सांगितल्यावर आईला संताप आला. ती आली घरी. तणतण करत मला म्हणाली, तू त्या मुलाला भेटल्यावर मला सांगितलेलं नाहीस. कितीदा भेटली? कुठे गेली होती? काय तो दिसायला आहे? काय त्याच्यात आहे? काय डोळा त्याचा चकणाय. डोळेसुद्धा चांगले नाहीत त्याचे. दात बाहेर आलेले. तर मी म्हटलं, नाही बुवा, मला नाही दिसलं तसं. ती म्हणाली, 'अग काय, तुला काय वाटतंय, तुझ्यावर प्रेम करतोय तो म्हणून? तुझ्या नोकरीवर तो भाळलाय.' कशावर तरी भाळणारच कोणी तरी. असं काय आपल्यामध्ये आहे? काही नाही. त्यामुळे मी तिला काही प्रति उत्तर केलं नाही, काही केलं नाही. तिला काही बोलले नाही. सोडून दिलं मी आणि मग माझ्या लक्षात आलं की हिच्या मनात माझ्या लग्नाचं नाहीए. वडिलांकडे मग माझ्या ऑफिसमधले त्यांचे मित्र सुळे गेले. सुळेंनी सांगितलं, पटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वडील पण म्हणत होते, हो हो. आईला विचारून करू. मग म्हणाले, की फोटो आणा. फोटो दाखवा. घरात दाखवतो. आजीनं तिला सांभाळलंय. त्या आजीला विचारायला पाहिजे. मी कोण तिचं लग्न करून देणारा? त्यांच्याच सगळं हातात आहे. फोटो आणून द्या; मग ह्यांनी फोटो आणून दिले. ते फोटोसुद्धा घेतले. पण त्या काळामध्ये काय झालं, माझी दुसरी मोठी आत्या होती, तिचा नवरा वारला. ते कळल्यानंतर लगेच आम्हांला जायला जमलं नाही. आम्ही चाळीसाव्याला गेलो. आमच्याकडे एक विधी करतात. चाळीसाव्वा म्हणतात त्याला. त्याला जायलाच पाहिजे होतं. आणि मी त्यांच्याजवळ फार राहिल्यामुळे आईने सांगितलं, आपण दोघी जाऊ. पण त्याची तयारी मी अशी केली की दलवाईंनी माझ्याबरोबर यायचं पुण्याला. आई दोन दिवसांत परत येईल आणि मी चार दिवस राहायचं. आणि त्या चार दिवसांत दलवाईंनी अमूक दिवशी यायचं आणि सगळ्यांना भेटून काय ते ठरवायचं.
आईने कोंडून असं ठेवलं नाही. किंवा मारलं बिरलं नाही. कारण तिला माहिती होतं की मी इतकी भित्रट, की मी कुठे जाणारच नाही. तिला कल्पना नव्हती की मी अशी घर सोडून जाईन म्हणून. आणि मग जेव्हा आम्ही दोघी पुण्याला निघालो तेव्हा आईला जरा डाऊट आला की हा ट्रेनवर येतो की काय! ते ट्रेनवर आले होते पण त्यांनी लांबून बघितलं. हात केला. आणि मग मी ट्रेनमध्ये चढले. आईच्या हे लक्षात आलं. पण ते पुण्याला येणार, सगळ्यांना भेटणार ही काही कल्पना तिला आली नाही. दोन दिवस आम्ही राहिलो. त्या दोन दिवसांत असं ठरलं होतं वडिलांच्यासमोर की आई तिकडे जाईल, आजी-बिजी सगळ्यांना सांगेल, त्यांना विचारेल आणि येईल. तर आईने तिथे विषयच काढला नाही. ती मुंबईला निघून आली. आमचं ठरल्याप्रमाणे हे पुण्याला आले. पुण्याच्या जवळ ते मेट्रो हॉटेल आहे ना, तिकडे ते थांबले आणि त्यांनी फोन केला. फोन केल्यानंतर मी माझ्या आत्याला सांगितलं. आत्या प्रिन्सिपॉल होती ना, तिला सांगितलं की बघ हे असं असं आहे. आता पुढचं तू कर. माझ्या आईने तर काही सांगितलेलं नाही. तर ती म्हणाली तू काही काळजी करू नको. मालिनीबाईला आपण सांगू या काकीला माझ्या. आणि काकीला जाऊन सांगितलं. काकी म्हणाली, कशाला घाबरतेस? तुझ्या मनात आहे ना, करू या. आणि तिने लगेच हमीद आलेला आहे कळल्यावर दुसऱ्या दिवशी मीटिंग ठेवली. काकाला सांगितलं. काकाला सांगितल्यावर त्यांनी फार आढेवेढे घेतलेच नाहीत.
काकी म्हणाल्या, आपण भेटू या, बघू या. म्हणजे भेटलेले नव्हते ते. पण बाईंनी त्यांचं लेखन वाचलेलं होतं. वाचणं वेगळं अन् भेटणं वेगळं. त्यामुळे मग ही आत्या, आत्याचा डॉक्टर नवरा, दुसरी आत्या आणि हे दोघे असे घरात जमले. आम्ही यांना घरी बोलावलं. घरी बोलावल्यानंतर सर्वांनी मला सांगितलं, 'तू आतल्या खोलीत बसायचं. तू मध्ये बोलायचं नाही.' आणि बाहेर त्यांनी दलवाईंना विचारलं, काय आहे? तर त्यांनी सरळ सांगितलं, की मी हा असा असा आहे. मेहरूला मी सगळं सांगितलेलं आहे. आणि माझ्या मनात या मुलीशी लग्न करायचं आहे. घरच्यांना पण त्यांचा फ्रँकनेस आवडला. बरं, आम्ही जेव्हा पुण्याला आलो तेव्हा त्यांना रेल्वे मधला कॉल मिळाला होता आणि तो घेऊन ते माझ्या वडिलांच्याकडे गेले आणि म्हणाले की हे बघा मला नोकरीचा कॉल आलेला आहे. फक्त बरोड्याला आहे. वडील म्हणाले की तू जा. "तुम जाओ बरोडे को. जब तुम्हारा ट्रान्स्फर होगा बंबई को, तब देखेंगे.” तर यांनी सांगितलं की मग मला लिहून द्या तसं. ते म्हणाले, लिहून देणार नाही. मी सांगतो तेवढंच पुरेसं आहे. त्याच्यावर मग आम्ही ही युक्ती काढली आणि पुण्याला आलो. त्या वेळी पुण्याला येताना तो कॉल पण आणायला विसरले होते.
पण लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. काकी वयानं मोठ्या असल्यामुळे त्यांना कल्पना आली की हा मुलगा किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतोय. अनुभवी माणसं होती. त्यांनी परखलं ते, आणि ते म्हणाले की आता तुम्ही ठरवलंच आहे लग्न करायचं, तर तुम्ही दोघं लग्न करा. तारीख ठरवा. लग्न केल्यानंतर तुम्ही आमच्याकडे या. कारण आम्ही जर लग्न लावून दिलं तर आमचं आपसातलं रिलेशन खराब होईल. ते आम्हांला करायचं नाही. तर आम्हांला लग्न लावून द्यायला सांगू नका. पण आमचा आशीर्वाद आहे. एवढं बोलल्यानंतर आम्ही मुंबईला आलो, तारीख ठरवली. १६ जुलै १९५८ रोजी आमचं लग्न धार्मिक पद्धतीनं झालं. मुंबईचे मुख्य काझी मौलवी काझी महंमद हुसेन मुरगे काझी यांनी आमचं लग्न लावलं. साक्षीदार म्हणून महंमदखान जवाहरखान दलवाई आणि कासमखान शाहबाझखान दलवाई होते. रजिस्टर पद्धतीने माझं लग्न ४ ऑगस्ट १९५८ रोजी झालं. त्याला एम. जे. दलवाई, एम. जी. कुलकर्णी आणि जगन्नाथ जाधव हे साक्षीदार म्हणून हजर होते. भेंडीबाजारच्या इथं महंमदअली रोडला त्यांच्या ऑफिसमध्ये लग्न झालं.
आता यांची सगळी माणसं आमच्या लग्नाला तयार होती. त्यांनी मला सांगितलं, 'अग, मी तुला बघून गेलो. तुला विचारायच्या अगोदर आमच्या गावातल्या प्रत्येक माणसानं तुला बघितलंय. माझा मोठा मामा आहे यूसुफ म्हणून, त्याचं आणि माझं भांडण पण आहे. कैक वर्ष माझ्याशी बोलत नव्हते. आता या वेळी मी त्यांना बोलावणार ना. त्यांना न विचारता गाववाले कसं लग्न माझं करणार? मी त्यांच्या बहिणीचा मुलगा. त्यांनी तुझी खूप तारीफ केलीए आणि आमच्या गावात तर त्यांच्याबद्दल म्हणे असं बोललं जायचं, का उडत्या पाखरांचे पंख मोजणारा माणूस आहे. आणि बायकांच्या फार सहवासात राहिल्यामुळे कुठली बाई कशी आहे हे सांगू शकतो. हा जर म्हणत असेल की मुलगी खूप चांगली आहे, तर खरोखरच ती मुलगी चांगली आहे. काय हरकत नाही तुला लग्न करायला.' असं त्यांनी सांगितल्यावर हे लग्न ठरलं. का तर यांच्या गावामध्ये पूर्वी अशी प्रथा होती की लहानपणातच पाळण्यामध्ये लग्न ठरायचं. तर तसं दलवाईंचंही लग्न ठरलेलं होतं. ती मुलगी नंतर यांनी मला भेटवली. आम्ही गेलो होतो तिच्याकडे. तिचं पण लग्न नंतर झालं. आणि नंतर मग असं बोलायला लागले की याचा सगळा व्यवहार हिंदूंशी चाललेला आहे. हिंदूंमध्ये आहे. याच्या नजरेत सगळे हिंदू मुस्लिम ठरलेत. आता कसली मुसलमान मुलगी आणणार हा. हिंदूच आणणार. ती मुलगी आल्यानंतर आपल्याला बघणार का? असंही होतं. तर माझा फोटो तिथं गेला. त्यांनी ठरवलं का त्यांना मुलगी पसंत आहे. काही का होईना, शेवटी मुसलमान मुलगी आली ना आपल्या घरात? बाहेरची असली तरी आपण अॅक्सेप्ट करू म्हणून त्यांनी अॅक्सेप्ट केलं. लग्नाच्या वेळेला सगळे येणार असं ठरलं. त्या दृष्टीनं आमचं आपलं रोज भेटणं-बिटणं चाललं होतं.
भेटण्यात हाच विषय असायचा, दुसरं काय? आमच्याकडे दुसरा काय विषय असणार? माझ्याकडे त्या वेळी विषय नव्हता. मी काही सोशल वर्कर नव्हते. लेखिका नव्हते. आणि प्रेमाचं काही बोलण्याचा संबंध नाही. का तर प्रेम कुणाशी केलं नाही. त्यामुळे प्रेमात काय बोलायचं हेही कळलं नाही. मग ह्याच्या गप्पा, त्याच्या गप्पा, काय आता पुढं करायचं? कुणाला भेटायचं? कसं करायचं? हे सगळं आम्ही बोलत असू. त्यांना पण एक गोष्ट दहा-दहा वेळा सांगायची फार सवय होती. पण ते अशा रीतीनं मांडायचे की दहा वेळा ऐकलं तरी कंटाळा यायचा नाही. आणि मी एकदा बोललेलं दुसऱ्यांदा बोलले की 'हे काल तू बोलली होती. पुढे बोल, हेच काय बोलते?' असं म्हणायचे. असं ते त्यांचं असायचं. त्याच्यानंतर आमची तारीख ठरली. तारीख ठरल्यानंतर मी खादीच्या दोन नवीन साड्या घेतल्या. ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगितलं.
आई-वडिलांना सांगायचं नाही, सांगितलं तर लग्न होणार नाही असं मला वाटत होतं. हे पक्के होते. आपण इतका विरोध केल्यानंतर लग्न होण्याची काय शक्यता आहे, असं आईला वाटलं. मग काय झालं. मी पुण्याहून आल्यानंतर माझ्या येण्याजाण्यावर आईवडिलांनी चेकिंग ठेवलं. मी जेव्हा पुण्याहून आले ना तेव्हा माझी आजी म्हणाली की मी जाते तिच्याबरोबर आणि तिच्या आईला सगळं समजावून सांगते तर काका म्हणाले, असं करू नको. तू जाऊन सांगितलं आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं, आणि तिला डांबून ठेवलं तर ती काय करणार? तर तू तिच्याबरोबर जा, पंधरा दिवस घरात रहा. काय विषय निघतो बघ. जमवाजमवी कर. पण पंधरा दिवसांमध्ये धुसफूस धुसफूसच. आजीच्या बरोबर कोणी चांगलं वागत नव्हतं. माझ्याबरोबर कोणी चांगलं वागत नव्हतं. माझ्या वेळेवर बंधन घातलं जायचं. मला टाँटिंग-बिंटिंग सुरू केलं त्यांनी. हैराण करायला सुरुवात केली. माझ्या आजीला ते सहन व्हायचं नाही. पण बोलायचं नव्हतं. त्यामुळे ती गप्प राहिली. मी ऑफिसवरून आले की रात्री झोपताना कुजबुज कुजबुज. असं असं झालं म्हणून मी तिला रिपोर्ट द्यायची. बाकी काही नाही. तारीख तिला माहिती होती.
बाकीच्या सगळ्या नातेवाईकांना लिहून पाठवलं होतं की या तारखेला आमचं लग्न आहे म्हणून. माझ्याकडच्या. सगळं ठरल्यानंतर आता उद्या जायचं लग्नाला तर मला दुपारी लंचच्या अगोदर एका माणसाचा फोन आला की तुम्ही लग्न करणार आहात, ते विचारपूर्वक करा. का तर तो माणूस बरोबर नाहीये. तो टी.बी.चा पेशंट आहे. त्याच्यावर खूप जबाबदारी आहे. त्याच्यावर कर्ज आहे खूप. मी एक हितचिंतक तुमचा म्हणून फोन करतो. भाषेवरून मला कुणाचा फोन आहे एवढं कळलं नाही. तेव्हा मी लक्ष पण दिलं नाही. पुरुषाचा आहे एवढं मला कळलं. मग हा फोन झाल्यानंतर मी नर्व्हस झाले. दस्तुरांच्या रूममध्येच फोन घेतला. ते म्हणाले, क्या हो गया? आणि मी सगळं सांगितलं. तर ते म्हणाले, हे बघ. तू आता लग्न करायला निघाली आहेस. उद्याच तुझं लग्न होणार आहे. तर आजच तू खंबीरपणाने विचार कर. तू अशी नर्व्हस होऊ नको. घाबरू नको. हे असं चालायचंच. मग बाहेर आल्यावर उषाला सांगितलं, अग असं असं सगळं आहे. तर ती म्हणाली, "त्याच्यात काय घाबरायचं आहे? आता हमीद येणारच आहे, तर तू त्याला सगळं सांग की असं असं झालेलं आहे आणि मेहरू, बघ तुला संशय येत असेल तर त्याला डॉक्टरकडे ने. तपासून घे. तो तुला फसवणार नाही एवढी गॅरंटी मी तुला देते. ही काही तरी चाल आहे. तू असं बोलल्यानंतर तो तुला डॉक्टरकडे घेऊन पण जाईल पण तुझं इंप्रेशन मात्र त्यात राहणार नाही. त्याला असं कुठे तरी लागेल की हिनं माझ्यावर अविश्वास दाखवला." दलवाई लंचटाईममध्ये आले. माझा चेहरा साफ पडलेला होता. त्यांच्या लक्षात आलं की काही तरी झालेलं आहे. आता काय झालं? तर मी म्हटलं की असं असं झालं. तर म्हणाले, "काही हरकत नाही. चल आपण जाऊन येऊ या. कुठल्या डॉक्टरकडे जायचं? तू म्हणशील त्या. तुला जर माझ्यावर भरोसाच नसेल तर आपण लग्न करून काय करणार आहोत? आपण जाऊ या. तुझी खात्री करून घे. उद्या माझी सगळी माणसं येणार असली तरी मी बघून घेईन काय करायचं ते. पण तुला फसवून मला लग्न करायचं नाही. चल, आपण जाऊ या." त्याच्यानंतर संशय गेला सगळा माझा. मग ते म्हणाले, आपण एक काम करू या. आपण आजच लग्न करू या. समजा तुला उद्या आईनं सांगितलं की तू ऑफिसला जाऊच नको. तर मेहरू, तू येऊ शकणार नाहीस. मग कशाला एवढं रिस्क घ्यायचं? आपण आजच लग्न करून घेऊ. तर महंमद दलवाई म्हणून रेल्वेमध्ये होते. त्यांच्या आतेभावाचा मुलगा. आता माझ्या आतेबहिणीशी त्यांचं लग्न झालेलं आहे. ते जवळ होते. हे त्यांच्याकडे गेले. त्यांना आणलं.
त्यांना सगळं सांगितलं. ते लहानपणापासून वाढलेले यांच्याबरोबर. त्यामुळे त्यांची मैत्री खूप. ते म्हणाले, बरोबर, आजच जाऊ या. मी हाफ डे काढला. दस्तुरांनी उठून माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला मला. अजून आठवतंय. ते म्हणाले, “घबरा मत हां. बिलकूल फिकर मत कर हां. तुम्हे मेरा आशीर्वाद."
दलवाईंची ऑफिसमधल्या सगळ्यांशी ओळख होती. गप्पा-बिप्पा मारायचे बसून. सगळ्यांच्याकडे जायचे, भेटायचे. मुलगा चांगलाय म्हणून सगळ्यांनी सांगितलं. खादी कमिशनमध्ये माझ्यापेक्षा त्यांना ओळखणारे जास्त. सगळे म्हणाले, “अगदी डोळे मिटून लग्न कर. याच्याबद्दल अगदी काही वादच नाहीए." मी, महंमददा आणि हे आम्ही गेलो महंमदअली रोडवर. महंमदअली रोडच्या जवळपासच माझी बहीण राहात होती. तिचं आधीच लग्न झालं होतं. तरी तिने आपल्या पसंतीने दुसरं लग्न केलं होतं. ती तिथं रहात होती. तिकडे आम्ही तिला भेटायला गेलो. तिला सगळं सांगितलं. तिला पण शॉक बसला. मी असं करेन असं. कुणालाही वाटलं नव्हतं. तिला सांगितलं की तू लग्नाची साक्षीदार व्हायला चल. आणि तिला नेलं. तिने त्यातल्या त्यात माझा फायदा कसा घ्यायचा याचा विचार केला. हे जे लग्न केलेलं होतं तिने ते घरी सांगितलेलं नव्हतं. तर ती म्हणाली की आपण तुझं लग्न करू या. आणि लग्न झाल्यानंतर आईला नमस्कार करायला जोड्यांनी आपण दोघी जाऊ या. मग तिने तयारी-बियारी केली. मी त्याच कपड्यामध्ये. माझ्या अंगावर फाटके कपडे होते. मंगळसूत्र पण तिचं घेतलं मी. आणि आम्ही काझीच्या ऑफिसमध्ये गेलो. मी बाहेर बसलेली. पुरुष, मुल्लाजी आत बसलेले. आतनं मला विचारलं. मी हूँ केलं. रजिस्टरवर साईन केली. त्या लोकांनी आणून फुलाचा हार मला घातला. जिलबी सगळ्यांना वाटली आणि आम्ही खाली उतरल्यावर ही बहीण मला म्हणाली की आता आपण वडिलांच्याकडे जाऊ या हे म्हणाले, “अजिबात नाही. आम्ही लग्नाच्या अगोदर त्यांना सगळं . सांगितलेलं आहे. त्यांनी जेव्हा नाही म्हटलं तेव्हा आम्हांला हा स्टँड घेऊन असं लग्न करायला लागलं. त्यामुळे आता आम्हाला जाण्याची काही गरज नाही. मी नाही जाणार. हिने घरात सांगावं, नाही सांगावं, हिचं हिने बघून घ्यावं. हिने हिच्या घरी जावं. मी माझ्या घरी जावं." असं करून टॅक्सीने यांनी मला माझ्या घरी सोडलं. पंधरा दिवस मी त्या घरात होते लग्न झाल्यानंतर. माझ्या आजीला असं वाटलं की उद्या लग्न होणार आहे. मग रात्री मी सांगितलं का असं असं झालं. माझं लग्न झालं. अशी रडलीये माझी आजी! खूप वाईट वाटलं तिला.
मग तिला तिथं राहावेना. दुसऱ्या दिवशी मी सुट्टी घेतली होती. बहिणीची खोली होती तिकडे महंमदअली रोडला. तिने मला काय सांगितलं की किल्ली मी शेजारी ठेवेन आणि तू सुट्टी घे उद्या आणि तुम्ही तिकडे या. आम्ही तिथे जायचं ठरवलं. आजीने काय केलं? आजी असं सांगत होती नंतर की तीन दिवस ती चांगला डबा भरून देत होती. तिला वाटायचं की मी रजेवर आहे आणि ती जेवण करून बहिणीच्या हाती पाठवायची. मला देते म्हणून सांगून ती बहीण डबा घ्यायची. पण ते जेवण काही आम्हांला मिळालं नाही. बहिणीने सांगितलंच नाही. ते लोक खायचे आणि डबा परत पाठवायचे. आजीला कळलंच नाही!
मी जेव्हा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बहिणीच्या घरी गेले आणि दरवाजा उघडला तेव्हा त्या घरामध्ये चहा-साखरसुद्धा नव्हती. बहीण निघून गेली होती. आम्ही थोडा वेळ बसल्यानंतर हे म्हणाले, “कशाला आपण बसलोय या खोलीमधे? काय गरज आहे आपल्याला बसण्याची? चल मेहरू, आपण आज पिक्चर बघू या." आणि आम्ही दोघं उठून पिक्चर बघायला गेलो. आम्ही पिक्चर बघितलं, बाहेर खाल्लं थोडंफार आणि यांनी मला घरी आणून सोडलं आणि ते गेले. दुसऱ्या दिवसापासून मी ऑफिसला जायला लागले. माझ्या आजीला हे माहिती नव्हतं. तिला वाटलं की मी पंधरा दिवस रजा घेतलेली आहे आणि मी जाते कुठे तरी. आता लग्न झालेलं आहे, मुलगी कुठे जाते, काय करते हा प्रश्नच नाही. आणि अशा रीतीनं पंधरा दिवस आम्ही नुसतं ऑफिस आणि घर, घर आणि ऑफिस असं केलं. कुठे भेटणं नाही, एकत्र येणं झालंच नाही. त्याच्यानंतर आजी म्हणाली, 'मेहेरबानी कर आणि मला पुण्याला सोड नेऊन आणि तू तुझ्या घरी जा. तू अशी अजिबात राहू नको. इथं तुला राहाण्याची काही गरज नाही.' आणि घरात तर चालू होतंच सगळं, धुसफूस, धुसफूस. आजी जाणार म्हणून आम्ही आजीचे डोळे तपासायचं ठरवलं. मग हे म्हणाले, मी येणार. दवाखान्यातच आजीची नि यांची भेट झाली. आम्ही दोघांनी मिळून डॉक्टरकडे आजीला नेलं. तिचे डोळे तपासले. आणि माझा नवरा म्हणून ती खूपच तऱ्हांनी खूष झाली. पुढे सुद्धा खूपच ती कौतुक करायची. का तर हे पण तिच्या गळ्यात पडून राहायचे आजी आजी म्हणून. तर नंतर असं ठरलं का आजीने पुण्याला जायचं. तिकीट काढलं. हे म्हणाले, आपण दोघंही सोडायला जाऊ या पुण्याला. तीनच्या गाडीला आम्ही बसलो. आजीला घेतलं आणि पुण्याला गेलो. संध्याकाळी सातच्या सुमारास पोहोचते गाडी. आजीला घरी सोडलं. आत्याने आमच्या जेवण केलं. ते आम्ही जेवलो. आणि रात्री अकराच्या पॅसेंजरने परत गेलो. आमच्या स्वतःच्या घरी जायला. ह्यांना घर कुठं होतं? आम्ही महंमददांच्या घरी गेलो. महंमद दलवाईंचं घर होतं तिथं. रात्रीची गाडी. गाडीमध्ये चढल्यावर जागा नाही. मला जेमतेम बसायला जागा मिळाली आणि सामान ठेवतात तिथं जागा मिळाल्यावर हे झोपले. मला काही झोप नाही. मी अशी त्यांच्याकडे बघत होते. त्यांची हालचाल तर बघावी. काय गंमत. हात हलवायची सवय आहे. डोळे मिचकवायची सवय आहे. आणि क्षणभर मला असं वाटलं की हा माणूस वेडा तर नाही ना! असं काय तो हात पाय करतो. स्वतःची बोटं, असे हात झटकायची सवय आहे. आणि मी म्हणते, बापरे! आपलं कुठं चुकलंय की काय? हे काय आपल्याला झालंय? असं करून ती रात्र गेली आणि सकाळी गाडी मुंबईला आली. सामान घेतलं. सामान पण आमच्याकडं फार नव्हतं. एवढी पोटली. पण ह्या दरम्यान मी काय केलं होतं? लग्न झाल्यानंतर उषाने मला एक सजेशन दिलं होतं. ती म्हणाली होती की तुझे कपडे बिपडे काय आहेत ते घरातनं काढ बाहेर. का तर ह्याची परिस्थिती चांगली नाही. तो कपडे घेऊ शकणार नाही. तू ऑफिसला कशी येणार? तर तू काही तरी तुझी सोय कर. त्यामुळे मी लाँड्रीत कपडे द्यायचे म्हणून जवळ जवळ सगळे माझे कपडे त्या बास्केटमध्ये घालून उषाकडे आणून ठेवायची. थोडेसे दागिने पण अंगावर होते. चार बांगड्या होत्या, त्या चार बांगड्या माझ्याच पैशातनं केलेल्या होत्या. आणि आईच्याकडचा एक हार होता. ते सगळं घालायला कधी तरी द्यायची. कानात बिनातलं पण. तर ते मी परत दिलंच नाही. ठरवून दिलं नाही आणि घेऊन जाते म्हणूनसुद्धा सांगितलं नाही. माझ्या अडचणीला थोडीशी मदत व्हावी म्हणून घेतलं.
मग आम्ही महंमददांकडे येऊन राह्यलो. तिथं मी जवळजवळ दोन महिने होते. त्यांच्याच घरी. त्यांची जागा मोठी होती. त्यांनी आम्हांला ठेवून घेतलं. महंमददांचं लग्न झालेलं नव्हतं. मोठ्या भावाचं लग्न झालेलं होतं. ती बायको पण तिथं राहात नसे. ती गावाला होती आणि त्यांचा एक गडी होता. त्यांची बहीण आली होती माहेरपणाला दोन मुलं घेऊन आणि त्यांचा नौकर होता. तो घरच्यासारखाच होता. तो स्वैपाक करायचा. ती तीन भावंडं होती. तिकडे आम्ही राह्यलो. दुसऱ्या दिवशी माहेरी पत्र टाकलं की मी आपल्या पद्धतीप्रमाणे हमीदशी लग्न केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मी आज त्याच्या घरी आलेली आहे. तिथे दोन महिने राहिले. मग पगार घेतला. पगार घेतल्याशिवाय तर काही होत नाही. त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्याकडे कपडेही नव्हते. मग त्यांना माझ्या पगारातनं चारदोन कपडे शिवले. बाबांची सारखी पत्रं की, तुम्ही या इकडे म्हणून. बाबा म्हणजे माझे सासरे. ते म्हातारे होते. ते लग्नाला येऊ शकले नव्हते. मग आम्ही एक दिवस चिपळूणची तिकिटं काढली आणि गावी गेलो.
एस.टी.चा प्रवास मी कधी आधी केलेला नव्हता. खड्डे-खुड्डे, सगळं धुळीनं माखलेलं. आम्ही गावी गेलो तेव्हा पावसाचे दिवस होते. खूप पाऊस नव्हता पण पावसाचेच दिवस होते. आणि तिथं पोचलो तर डोंगरावर आमचं घर. डोंगरावर अशा पायऱ्या काढलेल्या आणि वर आमचं घर. काही लोकांची खाली, काही लोकांची डोंगरावर. सगळा गाव लोटलेला होता. एस.टी.तून आम्ही चिपळूणला उतरलो. चिपळूणहून मिरजोळीला जायला टॅक्सी केली. टॅक्सीमधून आम्ही उतरलो तर सगळे गाववाले गोळा झालेले. तीस घरं दलवाई फॅमिलीची तिथं होती. सगळे आपसात जोडलेले, सगळे जवळजवळ राहणारे. हमीदखानचं लग्न म्हणजे काय? गाजलेलं लग्न होतं. बाहेरची मुलगी आणि तरी सगळे कागदाच्या फुलांचे हार घेऊन आले होते. तिथं खरी फुलं मिळायची नाहीत. कागदांचे हार उतरल्याबरोबर सगळ्यांनी घातले. आम्हांला बरोबर घेतलं. वर चढलो. बाबा आणि सगळी आमची फॅमिली. तीन नणंदा. तेव्हा ही चौथी बायको होती दलवाईंच्या वडिलांची, ती होतीच. तिला तीन मुलं. तर अशी मला उभी केली बाबांनी आणि मला जवळ घेऊन सांगितलं, हे बघ ह्या माझ्या जशा मुली आहेत ना, तशी तू माझी मुलगी आहेस. तुला सून म्हणून घरात घेणार नाही, तर माझी मुलगी म्हणून घरात घेईन. तू काहीही काळजी करू नको. मी आहे ना, असं म्हणून जवळ घेतलं. ते पडलेलं शेणामेणाचं घर, लाईट नाही. मी असं घर कधी पाहिलेलं नाही. पाणी नाही. जमीन मातीची. माणसं इतकी गलिच्छ. कपडेच नाहीत अंगावर त्यांच्या. एक जोड कपडा असे. सगळं असं आणि मग थोडा वेळ ना, मला असं झालं का बापरे मी कुठल्या कुठे आले? मी घोडचूक केलेली आहे. आता मी पळून कुठे जाणार? कोण मला आसरा देणार? क्षणभर माझ्या डोक्यातली हवाच निघून गेली होती. मला वाटलं लग्न म्हणजे आपण काही तरी मोठी चूक केलेली आहे. आपण नको तिकडे आलो आहोत. संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही घरात गेलो. घरात पाली दिसतात. तिकडे झुरळं दिसतात. कोण म्हणतं विंचू येतात, साप येतात. सगळंच तसं. मी रात्र तर काढली तशीच. त्यांनी एक रूम दिली होती आम्हांला. जरा मच्छरदाणी-बिच्छरदाणी होती म्हणून घाबरायला झालं नाही. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून गावातली लोकं यायला सुरुवात झाली. इतकी माणसं आल्यानंतर कोणी एखादं कवठ म्हणजे अंडं आणून दिलं. हे तुमच्या सुनेला खायला घाला म्हणून. द्यायला काही नसायचं ना. गरिबी भयंकर पण प्रेम खूप. दोन पापड आणले, हे तळून द्या. त्यांना भाजून द्या. अशा रीतीने एवढे तांदूळ आणले. एवढी तुरी आणली, हे आमच्याकडून घ्या. तुमच्या सुनेला द्या, असं म्हणायचे. अशी लोकं यायची, बघायची. ती बसलेली कशी आहे? उठते कशी? दिसते कशी? हिचे केस कसे? हिचं नाक कसं? हिचं तोंड कसं? एवढं खोलात जाऊन ती लोकं बघायची आणि म्हणायची, "हमीदखानची बायको खूप चांगली आहे." त्या वेळी तरुण होते मी आणि पदर-बिदर घेण्याची पद्धत-बिद्धत त्यांच्यापेक्षाही चांगली होती माझी. त्यामुळे सगळ्यांना चांगलं वाटलं. पहिल्यांदा त्यांना वाटलं होतं की शहरातनं आलेली बाई कशी तरी फॅशनेबल असेल. माझा पदर डोक्यावरून घेतलेला असायचा. बाबा तर सगळ्या गावभर सांगत, "चांगल्या घराण्यातली आहे. शिकलेली आहे, नोकरी करणारी आहे. खान घराण्यातली आहे. आणि एवढ्या मोठ्या घराण्यातली आमच्या हमीदखानच्या मागे कशाला बरं आली? मुलगीच चांगली आहे. आणि आमच्या घरातसुद्धा चांगलंच घडेल आता." आणि मी गेले तर माझ्या दोन नणंदांचं लग्न जमलं. तिथलीच मुलं. आणि दलवाईंना लगेच रेल्वेमधला कॉल पण आला. म्हणजे आम्ही दोन महिन्यांची सुट्टी संपवून घरी आलो मुंबईला आणि त्यांना नोकरी लागली. म्हणजे एक महिना सुद्धा त्यांनी बसून माझ्या पगारावर खाल्लेलं मला आठवत नाही.
दोन महिने मी राहिल्यावर तिथलं वातावरण पाहून शॉक बसलेला. त्यांच्यात ती पद्धत. प्रत्येकाच्या घरी जेवायला बोलवायचं. एक रात्र ठेवायचं आणि आपले नवीन कपडे घालून द्यायचे. मग ते कपडे आपण परत करायचे त्यांना. तर बाबांनी गेल्याबरोबर सांगितलं, वजन करा हिचं. ही परत जाईल तेव्हा दहा पौंड वजन वाढलं पाहिजे हिचं. तसंच झालं होतं. लोकं म्हणाली. 'काय बाई लग्न मानवलय तुला. कसलं काय खाल्लं तू तिकडे?' रोजचं जेवण इतकं फर्स्ट क्लास. तिथं ना जेवण इतकं चांगलं करायचे आणि तिथं एक बघितलं मी की बायका साडी नेसायच्या पण पदर घेण्याची पद्धत वेगळी होती. उजव्या बाजूला घ्यायचा आणि खोचायचा कमरेला तो पदर. आमच्याकडे तसं नव्हतं. त्यांची भाषा कोकणी म्हणजे मराठीला रुळलेली. आमच्याकडे उर्दू बोलायचे. ते मुसलमान, आम्ही पण मुसलमान पण त्यांची नमाजाची पद्धत वेगळी. आमची वेगळी. आणि ह्या सगळ्यामुळे कोकणी आणि दख्खनी मुसलमान यांच्यात बेटी व्यवहार होत नसे. दोघांमध्ये सगळ्याच दृष्टींनी फरक पडला ना. बरं, ते मासे जास्त खाणारे. ते डोक्याने हुशार. घारे डोळे सगळ्यांचे पण अंगाने किरकोळ आणि आम्ही घाटावरचे. आम्ही मटण खाणारे. त्यामुळे आम्ही धडधाकट असे टणक. पण आम्हांला डोकं कमी. म्हणजे मी जे तर्क काढले त्या हिशोबाने असं. हे घारे डोळे बघून माझी आत्या म्हणाली होती, घारे डोळेवाले फार लबाड असतात हं. माझी काकी म्हणाली, तू लग्न करायला निघालीस, लग्न करायला हरकत नाही पण गावाला जाऊन बघ, त्याची दुसरी बायको नाही ना. ही खात्री केल्याशिवाय तू लग्न करू नको. आणि त्याच्यावरसुद्धा तुला ती बायको चालत असेल तर तुझा तू विचार कर! यांना मी विचारल्यावर हसले होते. म्हणाले होते, चल मी तुला दाखवतो गावात माझ्या किती बायका आहेत ते. आणि गावामधे खूप मजा आली. म्हणजे आम्ही शेतात जात असू, पाण्यात जात असू. हे आमचं शेत, ही आमची बाग. घर वाईट असलं तरी जेवण फर्स्ट क्लास मिळायचं. बाबांनी त्या वेळी खूप केलं. म्हणजे कोंबडी काय कापली. हिच्याकडे जेवण, तिच्याकडे जेवण आणि एवढा मान. माझे केस मोठे होते, एवढं कौतुक व्हायचं त्याचं. सासूबाई केसाला तेल लावायच्या. तिथं नारळ खूप. कधी नारळ खराब झालेला वाटायच्या. ते लावायच्या, रगडायच्या, सासूबाई माझी पाठ रगडून घासून आंघोळ घालायच्या. दोन महिने त्या मला आंघोळ घालीत होत्या. गरम पाणी वापरून. मी दोन महिन्यामधे एक ग्लास पाणी घेतलं नाही हाताने. बसून नुसतं. खाटेवर बसून खायचं. त्यांच्या घरामधे गहू येत नव्हता. त्या वेळी गहू माहिती नाही. का तर, पैसाच नसायचा एवढा. गहू कुठून आणणार? तांदुळाचंच सगळं. आणि आमच्या घरात तर सकाळी गव्हाच्या पिठाचे परोठे-बिरोठे असायचे. बाबांच्या तोंडात दात नव्हते तर सासू काय करायची; तांदुळाचीच भाकरी करायची आणि काय तरी कालवणाला. ते कालवणाला निसदा म्हणायचे. पाव तुकडा खायला म्हाताऱ्याला दोन तास लागायचे. रोज बघितलं. मग मी एक दिवस आमच्या सासूबाईंना सांगितलं की आपण गहू आणू. तर काय करायचं? हे आणि मी जाऊन गहू आणायचे. थोडेसे गहू आणले, दळून आणले. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं की मी स्वैपाक करणार आणि मी चपात्या केल्या. दोन चपात्या केल्या. अशा चुरल्या. साखर-दूध घातलं. आणि त्यांच्यासमोर नेऊन ठेवलं. आणि सांगितलं बाबा, तुम्ही आज हे खाऊन बघा. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते खाल्लं पाच मिनिटांत. आणि त्यांनी गावभर लोकांना सांगितलं, मेहरूने आज मला असं असं खायला दिलं. याच्यावर मी स्वैंपाक करते हे गावभर झालं. सगळं गाव बघायला आलं. मी चपात्या कशा करते. आमच्याच सारखी करते चपाती, आमच्याचसारखं तिचं वळण आहे. आमच्यासारखं अमूक आहे. आणि परत गाववाले सगळे पुरुष येऊन भेटायचे आणि सगळ्यांच्या समोर मला उभं राहू द्यायचं तर बाबा म्हणायचे की बघ शिकलेली आहे, सवरलेली आहे, पदर कसा ठेवते, कसं लोकांशी बोलते, हे घेण्यासारखं आहे. त्यांच्याकडे दुसरी पद्धत कशी, एका ताटामधे खायचं. कालवणाचं एक ताट पुढे ठेवायचे, सगळ्यांनी हातात भाकरी घ्यायची आणि असं नुसतं बुडवायचं आणि खायचं. तर पहिले दोन दिवस मला ह्यांची मोठी भावजय होती त्यांच्याबरोबर बसवलं. मला काही जेवण गेलं नाही. मला वेगळं खायची सवय. आमच्या घरात एका ताटामध्ये दोन माणसं नाही जेवायची. बोललं पण असं जायचं सगळीकडे की मुसलमानांनी एकाच ताटामध्ये खावं. मुसलमानांना चार-चार ताटं नकोत. वेगळं खायचं नाही. एकाच ताटामध्ये खातो म्हणजे आपण एकत्र राहातो अशी आमच्याकडे म्हण होती. तरी आमच्या घरामध्ये, आत्याच्या घरामध्ये कधीही आम्हांला एका ताटामध्ये बसवलं नाही. आम्हांला सवय तीच पडली. मग यांनी बाबांना सांगितलं, आईला सांगितलं का तिला कुणाच्या ताटात बसवू नको. ती लाजणारी नाही. तू तिला वेगळं दे. तिला असं आवडणार नाही. तिचा जेवणाचा टाईम अमुक आहे. तिला हे हे आवडतं, असं सगळं सांगितलं. ते मला म्हणायचे तू त्यांच्यासारखी होऊ नको. तुझ्यासारखं त्यांना करून दाखव. त्यांच्यात आणि तुझ्यात फरक आहे की नाही? त्यामुळे वेगळ्या ताटात खायचं. तिथे टी.बी.चे पेशंट बरेच. त्या काळामध्ये त्या गावामध्ये यांचे चार मामा होते. चौघांना टी.बी. होता. सीव्हियर टी.बी. होता. म्हणून मी त्यांना सांगत असे की एका ताटात जेवायचं नाही, एका भांड्यातनं पाणी प्यायचं नाही. हे सगळं वेगळं करायचं. बाबा पण म्हणायचे की ती जे सांगते ना, ते आपल्याला करायला पाहिजे. काही हरकत नाही. हे बरोबर नाही, ते बरोबर नाही असं नाही करायचं. ती शिकलेली मुलगी आहे. तुम्ही अडाणी आहात. बाबासुद्धा असं म्हणायचे, त्यामुळे मी जे बोलते ते घरात सगळ्यांनी उचलून धरलं आणि सगळ्या गावभर झालं. ती मेहरुन्निसा आली ना, ती म्हणते असं. त्या काळामध्ये माझा जो फोटो बाबांना पाठवला होता तो ओट्यावर बाबांच्या फोटोबरोबर लावलेला होता आणि येईल त्याला सांगायचे की, ही माझी सून म्हणून. म्हणजे इतका त्यांना अभिमान वाटायचा. आजपर्यंत सुद्धा मी गेले तर मला तोच मान आहे. आजपर्यंत मी एक ग्लास पाणी हातानं घेतलेलं नाही. बाबा म्हणायचे आमचा हमीदखान काय, मेहरू चांगली आहे म्हणून हमीदखान चांगलाय, बायको चांगली असेल तर नवराही चांगला . असतो. बायकोच्या हातात असतं तिने नवऱ्याला कसं ठेवायचं ते. त्यामुळे आमची मेहरूच जास्त चांगली आहे. आमचा हमीदखानही चांगलाच आहे. त्यांनी मला सून म्हणून वागवलं नाही. ते दिवसभर मला घेऊन बसायचे ओट्यावर. आपल्या जुन्या जुन्या काळाच्या गोष्टी सांगायचे. वहीखाता उघडलेला असायचा. त्याच्यात ते लिहीत असायचे. मला एकदा विचारलं, "तुझा जन्म किती साली झाला?" मी सांगितलं की माझा जन्म १९३० चा आहे. मी मे महिन्याची आहे. ते बघितलं आणि ते म्हणायला लागले, मग तू आमच्या हमीदखानपेक्षा मोठी. नंतर मी यांना सांगितलं की बाबांनी असं म्हटलं. तर हे म्हणाले तू बसते कशाला दिवसभर त्यांच्याकडे? आणि सगळं बोलतेस? त्याच्यावर मी म्हणाले, म्हातारा माणूस आहे. गोड आहे. मला त्यांच्याशी खोटं बोलायला जमत नाही. आणि मी मोठी असले तरी तुम्हांला पटलं ना. तुम्हांला नाही ना गैर वाटलं? त्या माणसाची फसवणूक मी का करू? मी मोठी आहे तर मोठी आहे. मला त्याच्यामध्ये कमीपणा वाटण्याचा भाग नाहीए पण त्यांनाही हे माहिती होतं की मी खोटं बोलत नाही, त्याची पण तारीफ ते खूप करत असत. कोणीही आलं की मला बाहेर आणायचे, गाठ घालून द्यायचे. माझी ही सून आहे म्हणून भेट करून द्यायचे. त्यांच्या घरातील माणसं सगळी पुढं नाही यायची, पण मी मात्र पुढे असायची. सगळ्यांच्या पुढे इतकंच नव्हे तर मुल्लाजींच्या पुढे सुद्धा मी जात असे. आमचे मुल्लाजी सगळ्यांना नमाज-बिमाज पढायला मसजिदीमध्ये असायचे आणि कोणी आजारी पडले तर ते पुड्या द्यायचे. कसल्या तरी पुड्या मला पण आणून द्यायचे. एक-दोनदा काय तरी झालं म्हणून पुड्या दिल्या. तो मनुष्य पण इतका चांगला होता. तो पण गावभर सांगत होता की, हमीदखानच्या बायकोसारखी या गावात बाई नाही. हमीदखानने खरोखरच चांगली बायको केली, ती वागते किती चांगलं, ती बोलते किती चांगलं. किती तिचं सगळं 'परफेक्ट' आहे. मला तिथं गेल्यानंतर असं वाटलं की खरोखरच आपण कोणी आहोत. आणि या लोकांमध्येच आपल्याला राहायचंय. मग पुढे त्यांची जबाबदारी घ्यायला फारसं जड गेलं नाही. पैसे आपल्याकडे नाहीत. बाकीचं सगळं सुख तर आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना सुख आहे का? अशा रीतीने विचार केला मी. दोन महिन्यांनंतर मला असं वाटलं की मी नाही चुकले.
आणि तिथून आल्यानंतर मी सुखानं सांगत होते की, माझं सासर खूप चांगलं आहे म्हणून.
पण आल्यानंतर आम्हांला घर कुठे होतं राहायला? घरच नव्हतं. दोघांना नोकऱ्या मिळाल्या पण राहायला घर नाही. महंमददांकडे दोन महिने राहिलो, काय करायचं? मग दुसरे एक दलवाई होते – हुसेन दलवाई. आमदार होते ते काँग्रेसचे, तर त्यांच्या ओळखीने पत्र घेऊन वडाळ्याच्या सॅनिटोरियममध्ये चार महिने काढले, तिथे टी.बी.च्या पेशंटला जागा मिळते. त्यांना खोटं सांगितलं की यांना टी.बी. झालेला आहे आणि तिथं आम्ही राह्यलो चार महिने. मी गावाहून आले तेव्हा बाबांनी सांगितलं, सासूने सांगितलं की तुझं घर नाहीए पण तुझं घर होणारे. तुला काय पाहिजे ते घे आणि मला जे जे पाहिजे होतं त्या घरातलं, ते सगळं मला दिलं. मला काय, भांडीकुंडीच पाहिजे होती, काहीच नव्हतं आमच्याकडे. थोडी भांडीकुंडी, एक गादी घेतली. चार महिने वडाळ्याला राहिलो. तेव्हा माहीमला एक बिल्डिंग नवीन झाली होती. आणि खालीच तिचा मालक रहायचा. तो कोकणीच होता, यांना ओळखणारा होता. मुस्लिम होता. तर वरच्या फ्लोअरवर एक रूम खाली होती. त्यांनी सांगितलं की दीड हजार रुपये डिपॉझिट आणि पंचेचाळीस रुपये भाडं. त्या वेळी ते सुद्धा जास्त होतं. पैसे कुठून आणायचे? त्यांच्या चुलतभावाकडे मी मागायला गेले की, एक हजार रुपये द्या, पगारातनं पैसे फेडीन म्हणून. त्यांनी सगळं गोलमाल बोलून पैसे मात्र दिले नाहीत. नाहीही म्हणाले नाहीत आणि होयही म्हणाले नाहीत. त्याच्यानंतर काय झालं, मी जेव्हा नोकरी करत होते तेव्हा माझ्या आईकडे पन्नास रुपये चिटफंडाचे म्हणून टाकत होते. त्याचे दीड हजार रुपये जमले होते. पण तिच्याकडे जायचं कसं? प्रश्न पडला. तर हे म्हणाले जाऊ या, म्हणून हे मला घेऊन गेले. हे खाली उभे राहिले आणि मी वर चढले आणि आईला सांगितलं की असं असं आहे आणि पैसे तू मला दे. तर तिने ते पैसे दिले नाहीतच. मला ती म्हणाली, आत्ता लगेच कशाला? काय करायचंय? सध्या तुम्ही काही तरी करा, बघा, मग मी देईन नंतर. असं करून तिने ते द्यायचे नाकारले. इतक्यात काय झालं, माझा जो धाकटा भाऊ होता त्याच्या लक्षात आलं की मी एकटी आले नसेन. नाक्यावर हे उभे असतील. असं समजून तो खाली उतरला. त्यानं ह्यांना बघितलं आणि तिथं खूप बाचाबाची झाली. खूप जोराची. पब्लिक जमा झाली खूप. आणि जेव्हा लोकांना कळलं की हे हमीद दलवाई आहेत तेव्हा सगळ्यांनी त्यांचीच बाजू घेतली आणि भावाची बाजू लंगडी पडली. मग हे चिडले. तडतड करून वर आले. माझा हात धरला आणि म्हणाले, चल, आपण घरी जाऊ या. मला घरी आल्यावर हे सगळं सांगितलं, हे बघ असं असं झालं. त्यांना असं वाटत असेल की मला त्रास दिला की मी तुझ्याशी वाईट वागेन, तुला सोडून देईन, तुझं नुकसान करीन. पण तसं करणारा मी माणूस नाहीये. मी स्वतःहून तुझ्याशी लग्न केलेलं आहे. त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे तूही लक्ष देऊ नको, ती शेवटी माझी सासू आहे, तो माझा मेव्हणा आहे. मी माझं बघून घेईन, तू मधे पडायचं काही कारण नाही.
पुन्हा प्रश्न पडला ना कुठे राहायचं? मग आर्मीचे क्वार्टर्स होते कुलाब्याकडे तिथं त्यांचा मित्र होता. त्याची जागा मिळाली पण त्या बाईचा भाऊ वेडा होता का काय माहिती नाही, तो सुरीचाकू घेऊन एक दिवस मारायला आला. केवढा प्रसंग ओढवला? तिथे माझी नणंद, मी आणि हे राहात होतो. काय त्याचं डोकं फिरलं माहिती नाही. दारं-खिडक्या आम्ही बंद केलेल्या आणि तो आम्हांला भीती दाखवत होता. आम्ही जीव घेऊन रात्रीच्या रात्री कसे तरी तिथून पळालो. सामान सगळं सोडून आम्ही पळालो आणि परत मी अंधेरीला महंमददांकडे आले.
आणि मग ते सामान आम्ही मिळवून घेतलं व त्याच्यानंतर आम्ही राह्यलो बांद्याला हाऊसिंग बोर्डाच्या घरामध्ये एक वर्ष करार करून. इल्लीगल होतं सगळं. पण तिथे एक वर्ष राहिलो. या काळात एक घटना घडली. आम्ही बांद्याच्या गांधीनगर हाऊसिंग बोर्डमध्ये १० महिने राहिलो. तेव्हा ही घटना घडली. नेहमीप्रमाणे दलवाई सकाळी उठले आणि पान खाऊन येतो म्हणून गेले. स्टेशनवर पानाचं दुकान होतं. तिथे उभे असताना त्यांच्या मागे काही माणसं जमा झाली. पानवाल्यानं हळूच त्यांना सांगितलं. तो म्हणाला, आज कोणी तरी गाय कापून टाकली आहे. म्हणून हे लोक तुमच्यामागे आहेत. सांभाळून घरी जा. हे ऐकून त्यांना काही भीतीबीती वाटली नाही. फारच माणूस धीराचा. घरापर्यंत जमावाने त्यांचा पाठलाग केला. त्यांनी त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. आम्ही खालीच राहत होतो. घरासमोर उघडी गॅलरी होती. तिथं ते उभे राहिले. दलवाईंना एक डोळा मारण्याची फार सवय होती. तिथे ती नडली. नेहमीप्रमाणे त्यांनी डोळा मारला आणि विचारलं, काय आहे? लोकांना वाटलं हा माणूस आपली टिंगल उडवीत आहे. म्हणून ते भडकले. अंगावर धावत आले, शिवीगाळी करू लागले. मी बाहेरच उभी होते. मला कळेना, काय चाललं आहे? हे बिनधास्त उभे, काहीही न बोलता. शेवटी मी त्यांच्या काही मित्रांना बोलावलं. त्या वेळी तिथं भाऊ पाध्ये, शोशन्ना, म्हात्रे, बापट वगैरे राहत होते. त्यांना बोलावलं. ते आल्यावर जमावातील काही लोकांना घरात या, आपण बोलू या, असं सांगून हात धरून त्यांनी आत आणलं. काय झालं विचारलं. ते म्हणाले कोणी तरी गाय मारून फेकली आहे. आमच्याबरोबर चला. सगळे ऐकून घ्या आणि मगच पेपरात बातमी द्या. काही तर विचारत होते, तुमची जात कोणती? मी म्हणाले, जातीशी तुम्हांला काय करायचं आहे? कामापुरतं बोला. ते म्हणाले, आमच्याबरोबर ह्यांना नेतो आणि सकाळी परत आणून सोडतो. हे ऐकून फार भीती वाटली. हा माणूस परत येईल ना? हे त्यांना जिवंत ठेवतील ना? असे विचार आले पण दुसरा काही पर्याय नव्हता. काही लोकांनी हमी घेतली आणि ह्यांना त्या लोकांच्या स्वाधीन केलं. रात्रभर आम्ही सगळे बसून होतो. त्यांचं काय झाले असेल ह्या भीतीने. पण सकाळी हे परत आले, तिथे काय झालं हे त्यांनी मला सांगितलं नाही. पण हे प्रकरण मिटलं असावं असं समजून मी गप्प राहिले. तिथे काय घडलं त्यापेक्षा हे सुखरूप परत आले, यावर मी समाधान मानून घेतलं.
ते घर पण गेलं. मग काय करायचं? मग आम्ही घर नाही नाही म्हणताना जोगेश्वरीला आलो. तर यांच्या नातेवाईकांनी एक खोली बघितली होती. त्याच्यात एक पलंग. पलंगावर आम्ही तीन माणसं. म्हणजे रुबीना माझी तेव्हाच झाली होती. बासष्टला रुबीना झाली. ते बाळंतपण पुण्याला आजीने केलं. आजीने तिच्याकडं पैसा नसताना पहिलं बाळंतपण म्हणून बोलावलं. त्याच्यानंतर माझ्या धाकट्या नणंदेचं लग्न जमलं आणि बाबांनी बोलावलं. महिन्या सव्वा महिन्याची मी बाळंतीण, मला गाडी करून तिथं गावाला नेली आणि तिथं तिचं लग्न उरकलं. त्याच्यानंतर आम्ही आलो जोगेश्वरीच्या खोलीमध्ये. त्या खोलीमध्ये साडेतीन वर्षे आम्ही काढली. वारा यायला जागा नाही. वर एक खुली खिडकी होती. तिच्यातनं असं पाणी पडायचं, किडे पडायचे. पावसाच्या दिवसात असं बसून राहायचं एका जागेवर. बाहेर गॅलरी होती पण ती सगळी ओपन होती. माझा दीर पण त्या वेळी माझ्याकडे शिकायला आला होता. नणंद होती. पण दीर बाहेर झोपायला जायला मागायचा नाही. म्हणजे त्याच्याकडं फारशी समजूत होती असं नाही. तर तो गॅलरीत झोपायला तयार नसायचा. ही मुलगी होती तिला बाहेर झोपवायचं कसं म्हणून आम्ही तिला पण आत घेत होतो. अशी आम्ही तिकडे साडेतीन वर्ष काढली. हाच माझा दीर हुसेन. माझं लग्न झालं तेव्हा तो चौथीत होता. बी.ए.पर्यंत तो शिकला. तो दलवाईंचा फार लाडका होता. आपल्याला परिस्थितीमुळे शिकायला मिळालं नाही. पण इतरांनी जितकं शिकता येईल तितकं जरूर शिकावं असं त्यांना वाटे. इथपर्यंत की दलवाईं मलासुद्धा कॉलेजला जा, बी.ए. हो. म्हणून सांगत होते. हुसेनचं लग्न मधुभाई आणि नलिनीबाई पंडितची मुलगी शमा हिच्याबराबेर दलवाईंच्या मुळेच झालं. त्यांनी गाववाल्यांची हमी घेतली. आणि तिला आमच्या घरी चांगली वागणूक मिळावी याची काळजी घेतली.
दोघांच्याही नोकऱ्या चालू होत्या. यांना रेल्वेमध्ये स्टोअरमध्ये जागा मिळाली. दोन वर्षे नोकरी केली. त्याच्यानंतर आम्ही कराचीला जायचं ठरवलं. बासष्टमध्ये आम्ही कराचीला गेलो. त्या वेळी दिल्ली, आग्रा असं ट्रेननं गेलो. दोघांनी रजा काढली. आमच्याकडे फार पैसे नव्हते. प्लेनने जायला जमेना म्हणून आम्ही ट्रेनने गेलो. दिल्ली बघितली, आग्रा बघितला. दोघं आणि मुलगी. मुलगी होती, ती लहान होती, दोन-एक वर्षाची होती. तिला कडेवर घेऊन गेलो. लाहोरला पोचलो तर तिथे चेकनाका लाहोरचा. बायकांचा वेगळा चेकनाका आणि पुरुषांचा वेगळा. त्या वेळी त्या चेकनाक्यावर मी गेले तेव्हा माझ्या हातात दोन बांगड्या सोन्याच्या होत्या. गळ्यातला जो हार होता तो खोटा होता. कानातली फुलं खरी होती. असा थोडासा दागदागिना होता अंगावर. आईच्याच घरातला तो. तिथे गेलो तर ती बाई जी होती ना तिला बघूनच मला कापरं भरलं. ती भयानक होती दिसायला. आणि तिने मला दम देऊन विचारलं, तुझ्या अंगावरचे दागिने खरे आहेत का? मी हो म्हणाले, म्हणजे मला कळेचना का विचारलं ते. हो म्हणाले मी. मग ती म्हणाली, किती तोळ्याचे आहेत? मी म्हणाले, मला काय माहिती तोळा म्हणजे काय? मी कशाला सोनाराकडे जातीये आणि विचारतेय आठ आहे का दहा? दहा ठोकून दिलं. ती म्हणाली, काढ सगळे दागिने. आणि सगळे दागिने काढून त्यांनी वजन केल्यानंतर दहा तोळे भरले नाहीत. तेव्हा ती म्हणाली, तू शिकलेली मुलगी, ऑफिसमध्ये जाणारी, नोकरी करणारी. तुझ्या अंगावरचे दागिने किती तोळ्याचे तुला माहिती नाही? मी म्हटलं, "बाई, तू कशाला विचारतेस, मला क्षमा कर, कशाला विचारतेस? मला माहिती नाही, मी घाबरून बोलले. मी कशाला सोनाराकडे जायला बसले? सोनं तोळाभर आहे का दोन तोळे ? आणि हे दागिने विकायला किंवा बिझनेस करायला घेऊन जावेत असा माझा हेतू नाही. तुला तसं वाटत असेल तर तू हे सगळं ठेवून घे. मी तशीच जाईन. परत येताना तू माझे मला दे." असं बोलल्यानंतर तिला ते खरं वाटलं आणि ती म्हणाली, “काय आहे, हे सगळं बघायचं आमचं काम आहे म्हणून मी तुला बोलले. सॉरी." मी भ्यायले आणि बाहेर निघाले तेव्हा माझा चेहरा पडलेला. हे म्हणाले, काय झालं. मी म्हटलं, उगाच आलो आपण पाकिस्तानात. आलो नसतो तर बरं झालं असतं. ही काय किटकिट. तेव्हा ते म्हणाले, जाऊ दे ग, त्यांचं ते काम असतं. आपल्याला काय करायचं? तू असं बोललीस ना, तिला खरं वाटलं ना? झालं तर मग! त्या वेळी आमच्याकडे पानं होती. कराचीला पानं मिळायची नाहीत म्हणून मी खायला पानं घेऊन गेले होते. एक सरदारजी भेटला अमृतसरला. तो म्हणाला की, “ये पान इतने क्यू ले जा रहे हो?" आम्ही म्हटलं, "हम क्या दूसरा बाँट सकते हैं लोगों को? हमारे जो रिश्तेदार है, वो पान खानेवाले है। वहाँ पे पान नही मिलता इसलिए ले जा रहे हैं। क्या बात है सरदारजी, आप भी थोडेसे रख ले।" त्याला थोडी पानं दिली आणि आम्ही पुढे गेलो रेल्वेने. आणि येताना आम्ही मग बोटीने आलो.
पाकिस्तानात आम्ही राह्यलो महिना दीड-महिना. राहिलो, फिरलो. त्या काळातही वातावरण तितकसं बरोबर वाटलं नाही. हिंदुस्थानामध्ये राहाणाऱ्या लोकांना तिथे चांगलं वाटेल असं नाही. मला वाटलं नाही. मला एंजॉय करून आणखी दोन महिने काढावेत असं वाटलं नाही. माझे ढीगभर नातेवाईक होते. सगळ्यांनी आम्हांला पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्या काळात माझी आई नव्हती तिथे. मोठा भाऊ होता. कस्टममध्ये आतेभाऊ होता. त्याच्याकडे आम्ही गेलो. त्याच्याकडे राहिलो आम्ही. त्यांनी फिरा-बिरायची व्यवस्था आमची केली. आतेभावानं मग यांच्या डोक्यात भरवलं की तुम्हांला जर मी इथंच बोलावलं, धंदा करायला लावलं आणि इथून बाहेर पाठवलं, लंडनला पाठवलं, अमेरिकेला पाठवलं, तर धंदा कराल का? तर म्हणाले, मी प्रयत्न करीन. असं डोक्यात घेऊन आम्ही परत फिरलो. ह्यांनी ह्यांच्या कामाच्या दृष्टीनं माणसांची ओळख-बिळख काढली. मंडळ त्यांनी त्या वेळी काढलं नव्हतं, पण सोशल वर्क करण्याच्या दृष्टीनं त्या समाजाची ओळख करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. लग्नाच्या अगोदरपासून असं काम करण्याचं त्यांच्या मनात असणार, म्हणून माझं लग्न झाल्यावर ते माहिती काढायला लागले ना, ह्या मुसलमानांत काय असतं? यांच्यात काय करतात? त्यांच्यात काय करतात? त्यांचे रिवाज काय आहेत? त्यांचं राजकारण काय आहे हे सगळं बघत होते. ही सगळी माहिती काढायची का, तर समाजात काम करता यावं. तेव्हापासून त्यांच्या डोक्यात विचार होते. त्या वेळी मला काही कळलंच नव्हतं. ते अशा रीतीने माहिती काढत होते. इथली भाषा काय आहे? इथली भांडणं काय आहेत? . पाकिस्तानात म्हणजे कराचीत- मेन कराचीत आम्ही गेलो होतो. जेव्हा निघालो तेव्हा आतेभावाने मला काय सांगितलं की तू अजून आईकडे गेलेली नाहीस. तर तू त्यांचा अजून राग मानू नको. मी सगळी मदत करणार आहे तर तू आईकडे जा. आणि त्यानं परस्पर माझ्या आईला दमाबिमाचं जरा पत्र लिहिलं आणि सांगितलं की ती तुमच्याकडे अशी अशी येणार आहे. तेव्हा तुम्ही तिला बाजूला करू नका. मी समजूत घातलेली आहे. तुम्हांला मदत करायला पाहिजे. आणि मग मी आईकडे यांना घेऊन गेले आणि आमचं नातं सरळ झालं. ते झाल्यानंतर पहिल्यांदा आई माझ्या घरी आली. त्या खोलीत आली. ती तिला आवडली नाही. पैशाचा मोह तिला जरा जास्तच होता. म्हणजे बोलतानाही, "टी.व्ही. ना, चारदा बदललाय, कपाट ना सतरादा बदललंय, मला हे आवडत नाही म्हणून असं सगळं बदलत असते", असं बोलणं. त्याच्यानंतर तिने आपल्याजवळ एक खोली आम्हांला बघून दिली. ती हिंदमाता सिनेमाच्या कॉर्नरवर होती. त्या खोलीत एक म्हातारी राहात होती. पण ती म्हातारी धंदा करत होती बायकांचा. हे आमच्या आईला इनडायरेक्टली माहिती होतं. माहिती नव्हतं असं नाही. तिच्याकडे एक मुलगी रहात असे. खोली मोठी होती. आम्ही राह्यलो. ती म्हातारी कुणाकडे तरी काम करायची आणि ज्या मुलीला तिनं राहायला दिलं होतं ती मुलगी तिथं धंदा चालवायची. हे आम्हांला माहिती नव्हतं. तिथं आम्ही सामानबिमान सगळं घेऊन गेलो. नणंद, दीर सगळे जण आम्ही पहिली खोली सोडून गेलो. तिकडे आम्ही राह्यलो रात्रीचं, तर तमाशा. ती बाई दार उघडून कुणाकुणाला घ्यायची आत. बरं नंतर आम्ही पडदा लावायला लागलो आमच्या पलंगाला तर पलंगाचा पडदा ओढून टाकायची ती. त्या वातावरणामध्ये माझ्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं झालं. दोन-चार महिने गेलेले मला. आणि त्यामध्ये, रोजच्या भांडणामध्ये झोपायला जागा नाही आणि समोरच सगळं चालल्यावर मी यांच्या बाजूला कशी झोपणार? थोडीशी गॅलरी होती त्या गॅलरीत मी झोपायची. माझ्या देखत धंदा चालायचा. रात्रीची वेळ होती. पलंग ठेवलेला तिथं धंदा चालू आहे. इथं दुसरा पलंग आणि आम्ही झोपलेलो. आणि माझी नणंद दीर पण बरोबर. ते खाली झोपलेले आणि ह्यांचा धंदा चालायचा. ते बघितल्यानंतर चिडचिड व्हायला लागली. पण जाणार कुठे आम्ही? जायला जागा नाही, मग काय करायचं? आईला सांगितलं. तिला सगळं माहिती होतं. तिनं फार लाईटली घेतलं. तिला वाटलं की त्या खोलीपेक्षा ही खोली जास्त मोठी आहे. हिचा काय संबंध त्याच्याशी आणि करेना ती बाजूला धंदा. तिने तेवढा सीरियसनेस दाखवला नाही. गॅलरीमध्ये मी झोपले असताना रात्रीच्या वेळी अॅक्सिडेंट झाला. एक लॉरी आली आणि आमच्या गॅलरीजवळ एक खांब होता त्याला आपटली. मी पटकन उठले आणि माझं अॅबॉर्शन झालं. दोन बादल्या रक्त गेलं. पहाटेची वेळ होती. घरात माझा दीर आणि नणंद होती. ती लहान होती आणि हे 'मराठा'मध्ये काम करत होते, ह्यांची रात्रपाळी होती. आणि त्याच दिवशी कसले तरी शंभर रुपये त्यांना मिळाले होते, ते घेऊन घरी येत होते. आणि यांना कळलं की के.इ.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मला. ते तिथं आले. दोन दिवस के.इ.एम. मध्ये होते. मग मी येऊन घरी राहिले. माझी रजा वाया गेली. मी वाचले मरता-मरता. त्याच्यानंतर मी म्हटलं, मला या घरात रहायचं नाही. तुम्ही काहीही करा. मग ते घर आम्ही सोडलं आणि आईच्या घरी आलो. आईच्या घरात मी राहिले, अॅबॉर्शन झालं म्हणून मी राहिले. माझी नणंद आणि माझी मुलगी माझ्याबरोबर होती. हे आणि यांचा भाऊ मग पुन्हा महंमद दलवाईंकडे! त्यांना रेल्वेतील नोकरी नकोच होती. दिवस ढकलून काढायचे. स्टोअरमध्ये ठेवलं होतं त्यांना. स्टोअरमध्ये काय त्यांना इंटरेस्ट आहे? दोन वर्षांनी त्यांनी नोकरी सोडली. त्याच्यानंतर 'मराठा'मध्ये लागले. अत्र्यांनी मात्र त्यांचं खूप कौतुक केलं.
काश्मीरला गेले होते हे 'मराठा'त असतानाच. कुणालाही न सांगता गेले होते. कुणाला सांगायला वेळ नाही आणि आपले आपण प्रतिनिधी बनून गेले. तिथून लेख पाठवायला सुरुवात केली. तेव्हा आम्हांला घरात कळलं की हे काश्मीरला गेले म्हणून. तोवर आम्हाला माहिती नव्हतं. मग हे तिथं असताना चारपाच लेख त्यांचे प्रसिद्ध झाले. अत्र्यांनी खुप पाठ थोपटली त्यांची. आणि गंमत अशी की 'मराठा'त नोकरी केली पण खूप रजा व्हायला लागली त्यांची. आम्ही आईकडे थोडे दिवस राहिलो आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की हे काही बरोबर नाही. आपल्याला घर सोडायला पाहिजे. आणि मग आम्ही अर्ज केला हाऊसिंग बोर्डाकडे. हे पत्रकार, म्हणून लोक ओळखत होते. म्हणून अंधेरीच्या हाऊसिंग बोर्डाकडे अर्ज केला. घरं चांगली मोठी होती. पण गंमत अशी होती की जंगलातून जायचं आणि त्या वेळी तिथं काहीच सोय नव्हती. खून व्हायचे रस्त्यामध्ये. मी म्हटलं, तुम्ही रात्री बेरात्री येणार. तुमची येण्याजाण्याची सोय नाही. एक तर सकाळपर्यंत तुम्हांला तिथं राहावं लागेल. रात्री कुणी मारून टाकलं तरी कळणार नाही. आपल्याला मोठी घरं नको आणि मग आम्ही हे बघितलं की ही सध्याची खोली रिकामी होती, म्हणजे कोणी तरी तिथं राहात होतं पण काही तरी भानगड झाली म्हणून ती रिकामी झाली. आम्ही तिथं राहायला लागलो. १९६५ सालची गोष्ट आहे. १९६५ मध्ये आम्ही आलो तेव्हा आम्हांला साडेतीनशे रुपये अॅडव्हान्स आणि ७० रुपये भाडं होतं. खोली मिळाली पण साडेतीनशे रुपये होते कुठं?
दोघंही नोकरी करत होतो पण घरात एवढी माणसं होती. शिवाय गावी पैसे पाठवायचे. यांना दोनशे रुपये पगार, मला दीडशे रुपये पगार. एवढ्यामध्ये पंचवीस-पन्नास रुपये गावी जायचे. घरी खाणारी मुलं होती, तेव्हा जेमतेम चालायचं. साडेतीनशे रुपये कुणाच्याकडून तरी मागून आणले आणि भरले. आणि सत्तर रुपये मेटेनन्स चार्जेस. तरी सत्तर रुपये कधी आम्ही महिन्याला दिले नाहीत. बरीच वर्षं तिथं गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की हे भाड्याचं घर नाहीये, ओनरशिप आहे आणि तुम्हांला सगळे पैसे भरावे लागणार. तेव्हा मी माझ्या ऑफिसमधले प्रॉव्हिडंट फंडातले पैसे काढून भरल्याचे मला आठवतात. तो एक एक महिना आमचा कसा जात होता हे आम्हांलाच माहीत! आम्ही नॉनव्हेज खाणारे, पण त्या काळामध्ये सुद्धा मटण आम्हांला पाव किलो सुद्धा परवडत नसे. पाव किलो मटण आणायचं, बारीक बारीक तुकडे करायचे, त्याचं कालवण करायचं, अशा रीतीने दिवस काढले. पण नोकरी होती म्हणून आमचं चाललं. तो काळ आमचा चांगला गेला. वाईट गेला अशातला भाग नाही. कारण आम्हा दोघांची खुशी होती. त्या वेळी आमच्याकडे झिगझिग कधी झाली नाही. भांडणं अशी कधी झाली नाहीत. निराशा झाली नाही. कारण माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष. घरात खूप असायचं. हे बघायचे, की मी जास्त त्रास घेऊ नये. जो काही स्वैपाक झालेला असे तो पोटभर खाऊन जाते का नाही, हे ते पाहात. तू डबा घेतला का नाही? तू चहा प्यायली का नाही, तू भाकरी खाल्ली का नाही? आम्हांला नसलं तरी चालेल, तू पोटभर खा, डबा व्यवस्थित घे, ही काळजी माझी ते करीत.
माझ्या मुलींना नणंद सांभाळायची, लहान होती ना. त्यामुळे मुलींना सांभाळायची. तिला घरकामासाठी आणलेली होती. म्हणजे दलवाईंना तीन बहिणी होत्या. ही सगळ्यांत धाकटी होती. दोघी मोठ्या यायला तयार होत्या. हे म्हणाले, नाही. त्यांचा जीव त्या धाकटीवर खूप होता आणि ती खूप चांगली होती कामात. ती माझ्याकडे होती. अशिक्षित होती. पाचवी-सहावी शिकलेली होती. म्हणजे तिला काही शिक्षणाची आवड नव्हती. नंतर मी प्रयत्न पण केला की तिने सातवीची परीक्षा द्यावी. तिला परीक्षेला बसवावं, शिकवावं असं मला वाटायचं. पण तिचं लक्ष अजिबात नसे. तिचं शिक्षण काही झालं नाही. ती घरात रमली आणि ती घरातला भार खूप उचलायची, जबाबदारीने उचलायची. ती मला आईच म्हणायची, तिला सख्खी आई नव्हती, म्हणून मलाच ती आई म्हणायची. सगळे म्हणायचे की माझ्या मुलांच्यापेक्षा मी तिच्यावर जास्त माया केली.
मला कैक वर्ष माहिती नव्हतं की हे सावत्र आहेत. कोणी सख्खं नव्हतं त्यांना. त्यांची ती हिस्ट्री विलक्षण. बाबांची जी पहिली बायको होती तिला मूल नव्हतं. आणि त्यांचा धंदा -बिंदा खूप चांगला चालायचा. आता मूल नाहीये तर त्या काळामध्ये एखादं तरी मूल पाहिजे म्हणून त्यांनी पंधरा वर्षांनी ह्यांच्या आईला करून आणली. हे सांगताना दलवाई म्हणाले, “बाबा पंचेचाळीस वर्षांचे होते आणि आई सतरा वर्षांची होती. दुसरं असं की गावातील ही सगळ्यांत देखणी मुलगी. मामा-बिमा असे देखणे. घारे-घारे डोळे. देखण्या बायका. मेहरू, मी लहान असतानाच माझी आई वारली. पण माझ्या आईला काही ते सगळं बरोबर वाटायचं नाही. एवढा म्हातारा नवरा. कधी बाबा आमच्या आईच्या खोलीत आले ना की आमच्या आईच्या कपाळावर आठ्या पडत.” १७ व्या वर्षी लग्न झालं नंतर तिला झाला टी.बी. यांना दुसरा भाऊ झाला. तो भाऊही वारला. मग आईही २४ व्या वर्षी वारली. आता या दोन बायका झाल्या. परत हे लहान. यांना सांभाळणार . कोण? म्हणून तिसरी बायको केली बाबांनी. तिला तीन मुली आणि एक मुलगा, . आणि मुलं लहान असताना ती बायको मेली. चौथी करायची गरज नव्हती. सगळ्यांनी सांगितलं काही गरज नाहीए. ह्यांची एक चुलती विधवा होती, सहाच महिने झाले होते लग्न होऊन. गरोदर राहिली आणि भाऊ वारला. ती विधवा झाली. त्या मुलालापण बाबांनी सांभाळलं. त्या भावजयीला पण सांभाळलं. सगळे म्हणत होते ही तुम्हांला रोटी करून घालेल. तुम्ही लग्न नका करू. पण नंतर काही लोकांनी पैशाच्या लालचमध्ये येऊन घाटावरची बिचारी अशिक्षित बाई लग्न करून आणली. तिला काय माहिती? आता जी माझी सासू आहे ती माझ्या वयाची असेल, किंवा वर्षा-दोनच वर्षांनी मोठी असेल. तिचं लग्न करून आणलं. मग तिला झाली ५ मुलं. अशा रीतीनं हा सगळा पसारा वाढला. ही जर बायको केली नसती तर सहा माणसं कमी झाली असती. ते झालं नाही. मग हे म्हणायचे, की ही एकाच बापाची सगळी मुलं आहेत. आणि या मुलांनी तर काही पाप केलेलं नाही. माझ्या बापाने जर चूक केली असेल तर मला बोलायचा अधिकार पण नाही. ते सांभाळ करत होते. शिवाय एवढ्या मोठ्या माणसाला आपण दुखवा कशाला? त्या काळात हे सगळं चालत होतं. त्यामुळे हे बोलायचे पण नाहीत. बाबा यांना खूप मान द्यायचे.
आजारीपणात दलवाई सारखं सांगायचे की मला माझ्या आईवर खूप लिहायचंय. हे सगळं त्यांना लिहायचं होतं. पण त्या वेळी मला लिहिता येत नसे. त्यामुळे त्यांनी सांगितलं तरी कोण लिहून घेणार? त्यांच्या चौथ्या आईच्या मुली एस.एस.सी. झालेल्या. पण तिसऱ्या आईच्या मुली तीन होत्या. त्या शिकलेल्या नव्हत्या. ४ थी - ५ वी अशाच शिकलेल्या. पण जेव्हा त्यांची लग्नं जमली तेव्हा नवऱ्या मुलाला समोर उभे करून मुलीला म्हणजे आपल्या बहिणीला ह्यांनी विचारलं की ह्याच्याशी तुझं लग्न करून दिलं तर तुला आवडेल ना? असं विचारूनच लग्न केलेलं आहे. आणि लग्न झाल्यावर सुद्धा आता 'तुम्ही जा, तुमचा संसार करा' असं नाही केलं. त्या दर आजारीपणाला आमच्या घरी यायच्या. त्यांना डॉक्टरला दाखवायचं, औषधपाणी द्यायचं, सर्व त्यांचं करायचं. सगळ्या फॅमिलीसकट आणायचं, घरी नेऊन सोडायचं. एवढंच नाही, आम्ही दर वर्षी जात होतो गावाला. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा म्हणायचे, 'घरात जा मेहरू. सामान किती आहे घरात बघा, भरून ठेवा सामान.' कारण दोघी बहिणी लग्न झालेल्या त्यांच्या फॅमिलीसकट आमच्या घरी माहेरपणाला यायच्या. हे आहेत म्हणून सामान भरायचे. तीस-चाळीस माणसं रोजची खायची, बाजारहाट आणायचा आणि दोन दिवस आम्ही राह्यलो तर दोन दिवस सगळ्यांना भरपूर खाऊ-पिऊ घालायचो. ह्यांनी मोठ्या मुलाचं कर्तव्य नेहमी पार पाडलं. कधी फूसफूस अशी केलीच नाही. या बहिणी आमच्या मुंबईच्या घरी यायच्या, त्या महिनाभर राहायच्या. आजारी असल्या तर डॉक्टर-बिक्टरला दाखवायचो. पण त्या काळामध्ये हे काय म्हणायचे, बघा, तुम्ही आलात. आता तुमच्या भाभीला आराम द्या, ती नेहमीच काम करते. त्यामुळे तिनं आता घरातलं काहीच करायचं नाही. मला म्हणायचे, "मेहरू, तू नुसतं सामान आण, बाजार आण, घरात टाक आणि मी सांगतो ते त्या करतील." असं आमचं जेवण व्हायचं आणि माझ्यासाठी ठेवलं जायचं. मी आल्याबरोबर मला सांगायचे, आयेशानं आज असं असं केलं. भाभी, मी आज असं असं केलं हं, आणि ते मग केलेलं कौतुकानं मला खायला घालायचे. त्यामुळे माझे पैसे गेले आणि खर्च झाला असं मला वाटायचं नाही. जाऊ देत. सगळे खातात माझ्या घरी आल्यानंतर. सकाळच्या नाष्ट्याला समजा एक अंडं फोडून मी त्यांना दिलं किंवा अंड्या-बटाट्याचं कालवण करताना एक अंडं सगळ्यांच्या प्लेटमध्ये घातलं तर ती माझी नणंद अजून बोलते की भाभीकडे मजा असायची, एक एक अंडं आम्हांला मिळायचं. इथं आम्ही एक अंडं चार माणसं खाताना बघतो. पण भाभी मात्र आम्हांला एक एक अंडं खायला द्यायची. म्हणजे अशी सुद्धा त्यांची प्रेमाची तऱ्हा होती. बाबांनी आणि यांनी ते मानायला लावलं की घरात ही मोठी आहे. घरातली धुसफूस कधी त्यांच्या कानावर गेली नाही. आणि कधी गेली तर ते म्हणायचे, "हे बघा, तुमच्या भाभीला विचारा. मला सांगू नका. तिचं घर आहे. माझ्यापर्यंत कुणी काही आणायचं नाही." मायलेकीसारखं हे वागणं व्हायचं. मला उलट कोणी बोलायचं नाही. माझी आज्ञा कोणी पाळलेली नाही असं झालेलं नाही. ही कर्तीधर्ती आहे. मोठी आहे, समजूतदार आहे, ही बोलेल ते खरं आणि तिच्याप्रमाणे सगळं व्हायला हवं. आणि माझं काही चुकलं तर हे मला म्हणायचे, “नाही हं मेहरू, तुझं चुकलेलं आहे हे." पण शांतपणे. आदळआपट-आरडाओरड नाही.
आमच्या घरात जरी कोणी आलं,चार माणसं, तरी उठले, आले आणि जेवायला बसवलं असं होत नसे. समजा काही माणसं आली तरी “अरे, तो गेला का, त्याला जेवायला बसवा." असं मी म्हणायची. तेव्हा, “ते डिपार्टमेंट तुझं", असं ते म्हणायचे. “तू बाहेर येऊन का नाही सांगितलं त्याला?" म्हणजे त्यांना बोलायची गरज नसे, विचारायची गरज नसे की माणसाला जेवायला बसवू का? मी सांगायचं की, 'अहो जरा त्यांना थांबवा, ते जेवून जातील.' 'ही बघा मेहरू म्हणते तुम्ही जेवून जा", असं म्हणायचे ते. प्रत्येक माणूस आला की आतून मला बोलवायचे, त्यांची भेट करून द्यायचे, लेखक मंडळी वगैरे कोण येतील त्यांची सर्वांची. त्यांच्या कामाच्या संदर्भात बरीच माणसं येत असत. कामाच्या म्हणजे समाजकार्याच्या. म्हणजे त्यांच्या डोक्यात जे होतं ना, त्या संदर्भात काही लोक येत. आणि त्यांचे विचार ऐकण्याची मला संधी मिळाली. ते त्यांची कथा ऐकायचे. कुणाला मदत करायची, काय काय करायचे. मग ते म्हणायचे, 'आत जा, बाईंशी जरा बोला.' मग ती मंडळी आत येऊन घरच्या डिफिकल्टी सांगायची. माझ्या बायकोचं असं झालं, मुलीचं तसं झालं, मुलीला सोडलं. ऐसा ऐसा हुआ. आणि मी ते सगळं ऐकायची. ऐकल्यानंतर त्यांना मग मी सल्ला द्यायची. “नाही असं नाही. तुमच्या मुलीचं असं करायचं.” मग कोणत्या अडचणी असायच्या. हे रुपये घ्या आणि जा म्हणून सांगायचं. मग ते घेतल्यावर हे चौकशी करायचे, तो माणूस आला होता तो काय म्हणत होता? इव्हन त्यांचे मामासुद्धा आले, आणि त्यांना पैशांची गरज लागली की ते आतच पाठवीत. स्वतःकडे असले तर द्यायचे ५ रुपये, आणि आत पाठवायचे. आणि मग म्हणायचे, 'तो जो इसम आला होता ना, तो काय म्हणत होता?' 'तो असं असं म्हणत होता.' 'काय केलं?' दिले ना पैसे? हे बघ मेहरू, तू दिलेले कालचे ५ रुपये मी दिले ग त्याला. त्याची अडचण होती.' 'मग माझ्याकडे का पाठवलं?' 'हे बघ आपल्याकडे रुपया असेल आणि कुणी मागायला आलं ना तर चार आण्याची तरी मदत करावी. मी खूप हालात दिवस काढलेत, अशीच लोकांनी मला मदत केली.' म्हणजे ते आता समजा डॉक्टर अवसऱ्यांकडे गेले असतील. त्यांचं औषध डॉक्टर द्यायचेच, वर खिशात दहा रुपये टाकायचे. 'जाणार कसा तू? चालत जाऊ नको. गाडी घे, बस घे आणि जा.' अशा रीतीने डॉक्टरच त्यांना पैसे द्यायचे. मित्र होते त्यांचे. त्यामुळे मित्र मंडळी असं करायची. एवढंच नाही तर कॉलेजमध्ये असताना फर्स्ट इयरला, सेकंड टर्मची फी भरायला पैसे नव्हते, म्हणून ते कॉलेज सोडून बसले होते. कोण प्रो. जोशी का कोण होते, मला आता बरोबर नाव आठवत नाही, त्यांनी म्हणे त्यांना बोलावलं, विचारलं, त्यांची फी भरली आणि ती टर्म पुरी झाली. आणि नंतर काय झालं? नंतर काही वर्षांनी परिस्थिती जरा चांगली झाली आमची. तर ते फीची रक्कम घेऊन प्रोफेसरला द्यायला गेले आणि त्यांना सांगितलं, 'सर, तुम्हांला माझी आठवणसुद्धा नसेल, पण तुम्ही मला अशी अशी मदत केली होती. ते पैसे मी आणले आहेत.' प्रोफेसरांनी ते घेतले नाहीत. ते म्हणाले, 'इतका प्रामाणिकपणा जगात नसतो. तू हे पैसे दुसऱ्या कोणाला तरी दे.' त्यांना ही जाणीव होती की आपल्यावर वेळ आल्यावर लोकं आपल्याला मदत करतात, तसं आपल्याकडे कोणी आलं की आपण मदत केली पाहिजे. एवढंच नाही, गावाला आम्ही जायचो की नाही, एक दिवस राखून ठेवायचो. ते घेऊन जायचे मला. सगळ्या घरोघर जायचे. सगळे गोरगरीब, पण सगळे हमीदखान आला, आमचा हमीदखान आला असं म्हणायचे. बायका अशा वेड्या व्हायच्या. म्हाताऱ्या कोताऱ्या सगळ्यांना असं त्यांच्याबद्दल प्रेम. सगळ्यांच्या डोक्यावरून हात फिरव, पाठीवरून हात फिरव, टिंगल कर, मस्करी कर, आणि काय काय बोलतील, त्यांना खूप आवडायचं ते. आणि मदत पण करायचे. असे घरोघर फिरायचे. सगळ्यांची परिस्थिती जाणून घ्यायची आणि जी मदत होईल ना ती करायची. ती सवय आजपर्यंत मला आहे. कुणाला चार आणे, कुणाला आठ आणे, कुणाला रुपया, आपल्याकडे पाच रुपये असतील तर पाच रुपये वाटायचे. पाच रुपयांपेक्षा आपली ऐपत नाहीए पण ते पाच रुपये देखील मोठे असायचे. ते म्हणायचे ना, 'मेहरू आली होती. रुपया देऊन गेली. किती बरं वाटलं, ती बोलून गेली. माझं आता औषध येणार.' अशा रीतीची सवय जी मला ह्यांनी लावली ना, ती अजून आहे. मी तेव्हा पाच वाटत होते, आता पन्नास वाटू शकते. आणि मला त्याची जाणीव आहे. आपल्याकडे माणसं येतात, त्यांना आपण मदत केली पाहिजे.
आमच्याकडे लेखकमंडळी यायची. कुरुंदकर यायचे. नरहर कुरुंदकर, यदुनाथ थत्ते, भाई वैद्य यायचे. मंडळाची स्थापना भाईंच्या घरीच केली. मराठा ऑफिसमधले लोकही यायचे. या सगळ्यांची नावं, ते मोठे लेखक असं मला फारसं माहीत नव्हतं. पण हे माझी ओळख करून द्यायचे. पहिल्यांदा हात धरून बाहेर आणायचे. त्यांची ओळख करून द्यायचे. बघ रे, ही माझी बायको. आता कुणाला जेवायला बोलवायचं असेल तर मला न विचारता त्यांना बोलवायचे नाहीत. घरात यायचे, मला मस्का लावायचे आणि म्हणायचे, 'मेहरू, माझ्या मनात आहे जरा काही लोकांना बोलवायचं. अमूक अमूक लोकांना बोलवायचं. काय करायचं? बोलवायचं का? बोलवू?' 'कधी बोलवायचं?' 'अमूक दिवशी बोलवू?' मग ते सांगायचे, ‘सगळे येणारेत.' 'मग मेनू काय करायचा?' 'मेहरू, माझा मेनू हा हा आहे. तुझा काय आहे? माझ्याकडे काय काम? मी कोंबडी आणून देईन.' मग ती शिजेपर्यंत ओट्यापासून बाजूला व्हायचे नाहीत. मी कशी शिजवते हे बघायचे. 'मेहरू, त्यात हळद जास्त नको हं. मीठ कमी घाल हां. याच्यात तिखट कमी घाल. याच्यात तेल एवढं घाल', असं सांगायचे. याच्यानंतर बशीत घेऊन खायचे, पाठ थोपटायचे आणि बाजूला व्हायचे. आणि मग पाहुणे आल्यानंतर सगळं बाहेर न्यायचं. सगळ्यांना परोसल्यानंतर मेहरू, चल तू पण इथे बसायचं. 'काय रे हे चांगलं झालंय ना, हे मेहरूनं केलंय.' असं खूप म्हणजे खूप कौतुक करायचे. मलाच असं वाटायचं की इतकं कशाला बोलतात! तिला खूप चांगलं येतं हे करायला. कसं झालंय? आणि सगळे बोलायचे, नाही नाही भाभी. तुम्ही खूप चांगलं केलं. सगळं उचलून ठेवायचे आणि नंतर ते गेल्यानंतर अक्षरशः पाय चेपायचे माझे. म्हणायचे, 'तुला आज किती ग त्रास झाला, ऑफिसमधून आली. तू करते सगळं मेहरू, मला जाणीव होते ग. पण मला असं वाटतं की लोकांना बोलवावं. तुला बरं वाटत नाही का?' म्हणजे ही जाणीव होत होती, की आपण हिला त्रास देतो आणि पाय चेपताना, 'कुणाला सांगू नको हं, की पाय चेपले म्हणून' असंही सांगायचे. अशा रीतीने खेळीमेळीचं वातावरण असायचं. 'बॉसिंग' स्वभावात नाही. रात्रीचे उशीरा आले की मी दार उघडायची. मला झोप यायची नाही, का तर बाबा हे वर चढेपर्यंत सुखरूप येतात की नाही अशी मनात सारखी भीती असायची. त्यामुळे एक पायरी चढली की खट व्हायचं आणि मला जाग यायची. मी दार उघडायची. 'अजून तू झोपली नाहीस. का झोपली नाहीस? फाफा, ऊठ मला जेवण दे.' ती बहीण मग गरम करून जेवायला वाढायची. तेल डोक्यावर घालायची, पायाला तेल लावायची. ते म्हणायचे, भाभीला त्रास देऊ नको. भाभीला ऑफिसला जायला लागतं. ती रात्रीची जागायची. बरं, मी त्यांच्याशिवाय रात्रीचं जेवायची नाही. सगळं जेवण करायची आणि ते येईपर्यंत मी थांबायची. तर ते मला ओरडायचे की, 'हे काय, तू जेवलीस का नाही? माझ्यासाठी थांबलीस कशाला? माझं कामामध्ये मग मन लागत नाही.' कधी कधी लवकर आले ना तर म्हणायचे, 'मेहरू ग, आज लवकर आलो. तुझ्या नावाचा फायदा घेतला. मी म्हणालो, नको बाबा, आज बायकोच्या बरोबर जेवायचंय. बायकोनं सांगितलंय, लवकर या, नाही तर भांडण होणार, असं. एक पुस्तक वाचायचंय म्हणून आलो' आणि ते पुस्तक वाचताना दहा ओळी वाचायचे आणि त्यात काय असेल तर सांगायचे, 'मेहरू, या पुस्तकामध्ये काय आहे बघ.'
'महंमद' नावाचं एक पुस्तक होतं. महंमद पैगंबरांविषयी माहिती होती. तेव्हा ते सांगायचे आणि म्हणायचे, 'अग बघ, पैगबरांबद्दल काय आहे?' आणि म्हणायचे, 'ही सगळी पुस्तकं आहेत ना, आपल्याला जर वाचायचं असेल ना मेहरू, तर आपण कुणाकडून उसनी घेऊन वाचायची नाहीत. विकत आणायची. आपल्या घरात ठेवायची आणि दहा वेळा वाचायची. एकदा वाचायचं नाही.' बरं मला पिक्चरचा शौक होता. पिक्चरला आम्ही जात असू. त्यांना इंग्लिश पिक्चर फार आवडायचे. आणि त्यावरची पुस्तकं वाचलेली असायची. सहा महिन्यांनी कधी तरी तेवढा पैसा खर्च करायला असायचा. फार कंटाळा आलाय. आज पिक्चरला जाऊ. अमूक पिक्चर म्हणून अमूक दिवशी जाऊन ते बाल्कनीची तिकिटं आणायचे आणि मग आम्हांला थाटाने न्यायचे. त्याच्यानंतर मंडळाची गाडी पण होती. तर तिनं पिक्चरला घेऊन जायचे. पिक्चरला जाताना महाग तिकिटं काढून चांगल्या जागांवर बसवायचं, बघून झाल्यानंतर जेवण चांगलं द्यायचं. १००-१५० रुपये खर्च करून घरी यायचं. पण मी काही म्हटलं आणि त्यांनी झटकन नाही म्हटलं असं नसे.'थांब हा. आपण आपल्याकडे पैसे आले ना की जाऊ' म्हणायचे. याकरता खर्च करायचा तो त्यांचा असायचा. माझ्या घरखर्चामध्ये ते जमायचंच नाही. त्यामुळे ते म्हणायचे, 'तू माझ्याचबरोबर कशाला पिक्चरला जातेस? तू एकटी जाऊ शकतेस. काय हरकत आहे मेहरू, जायला? मला वेळ होत नाही. तुला जेव्हा वाटतं तेव्हा तू जात जा. नवऱ्याच्याच बरोबर जायला पाहिजे, असं नाहीए.'
दलवाई कधी कधी प्रवासाला जायचे. प्रवासाला म्हणजे त्यांचे दौरे असले की ते जायचे, जाताना मी त्यांचं सगळं सामान म्हणजे लाँड्रीचे कपडे, दाढीचं सामान म्हणा,इतर सामान म्हणा, सगळं जमा करायची आणि पलंगावर नेऊन ठेवायची. पेटी भरायला गेले की ते म्हणायचे, "नाही नाही, तू पेटी भरायला यायचं नाही. तुझी एक गोष्ट मला सापडणार नाही. मला भरू दे." जाताना त्यांच्या दोन्ही बॅगा, न्यूज पेपर घेऊन मी त्यांच्या मागे जाई. स्टेशनवर जायचं, तिकीट काढून द्यायचं, त्यांना रेल्वेमध्ये बसवायचं, सांगायचं, तुमच्या बरोबर एवढे एवढे डाग आहेत आणि परतायचं. इतकं मी करी. हे त्यांच्यासाठी मी करायची. त्या वेळी, ते मला सांगत होते म्हणून मी करत नव्हते. पण मला असं वाटायचं की आपण अशा रीतीने त्यांचा भार थोडा तरी हलका करावा. त्याच्या उलट मला पुण्याला जायचं असेल, मी गावाला कुठे जाणार? पुण्याला. तर सकाळी सातची गाडी मी धरायची. म्हणजे ६ ला मला निघायला लागायचं. म्हणजे काळोख असायचा. माझी मी तयारी करायची. हे झोपलेले. मी बाहेर पडले तरी पांघरूण काही अंगावरचं काढायचे नाहीत. मग, 'अहो, मी निघाले हो. मला आता वेळ होतोय, निघायला हवं' असं मी म्हणायची. त्यावर हे म्हणायचे, "हो, मेहरू, तू जा हं. सांभाळून जा. काही काळजी करू नको आणि लौकर ये हं. जा." आणि परत पांघरूण डोक्यावरून घ्यायचे आणि झोपायचे. असं वाटत नव्हतं की काळोख आहे, त्यातून ती एकटी जातेय, असं त्यांना जाणवायचं नाही. म्हणजे लक्षच नसायचं आणि दुसरं असंही वाटायचं नाही की ही बाई आहे. ही एकटी कशी जाईल? तर हे अजिबात नव्हतं. का, तर लग्न झाल्यानंतर कधी कधी रात्रीचे सुद्धा मला १० ला आणि ११ ला म्हणायचे, माझं डोकं दुखतंय, जरा अॅस्पिरीनची गोळी हॉटेलातून घेऊन ये. एकदा मी म्हणाले, अहो असं काय करताय, किती वेळ झाला, किती वाजले बघा तरी! तर ते म्हणाले, “काय झालं? मी जाऊ शकतो तर तू का जाऊ शकत नाही? असं काही नाहीये की बायकांनी जाऊ नये आणि पुरुषांनी जावं. सगळं काम तुझं तुला करावं लागेल.” एकदा काय झालं, माझा अन् त्यांचा काही तरी वाद झाला, भांडण झालं आणि मला खूप राग आला त्यांचा. मी कधी तशी घरातून बाहेर जात नसे. पण त्या दिवशी रागाच्या भरात मी तयारी-बियारी केली. ते म्हणाले, "काय? कसली तयारी करतेस?" मग त्यांनी पुन्हा विचारलं, “मधेच जातेस? काय झालं तुला?" म्हणजे लक्षात नाही राहिलं की आपण असं भांडलोय. मी म्हटलं, “मला जायचंय म्हणून.” “किती दिवसांनी येणार?” “बघीन.” अन् पेटी घेतली आणि मी पुण्याला पोचले. पुण्याला गेल्यानंतर माझी आत्या म्हणाली, "तू एकटीच आलीस. हमीद आला नाही तुझ्याबरोबर? काय तरी झालेलं दिसतंय दोघांचं.' आणि तिने मला तासडलं रागात. "नाही" म्हणाली, "हे चुकीचं आहे. तू त्याला बरोबर न घेता रागवून आलीस कशी? तू अशी रागानं का निघून आलीस? बायकांनी असं करायचं नाही.”
म्हणजे ही गोष्ट घडली तेव्हा लग्नाला फार दिवस झाले नव्हते. मोठी रुबीना होती. धाकटी नव्हती. नंतर काय झालं, संध्याकाळ झाली. ते लोक पिक्चरला जायला निघाले. आत्या म्हणाली, 'चल तू पण आमच्या बरोबर. घरात बसून काय करणारेस?' आणि तिकीट-बिकीट काढलं. आम्ही सगळे तयार झालो आणि निघायचं तर हे समोर. म्हणाले, हे काय? आत्यांनी त्यांना विचारलं, 'हे काय? तू इकडे?' तर मला डोळा मारला. म्हणाले, "तू काही जायचं नाही पिक्चरला." आणि म्हणाले, “हिला सांगा जरा. जरा काही वाद झाला तर रागाने निघून आलेली आहे. तिला कळत नाहीये मला किती मनःस्ताप झालेलाय. तिथून मी इथे कशा रीतीने आलोय हे हिला कळलेलं नाहीये. तुम्ही हिला समजून सांगा. हिने अशा रीतीने घर सोडून यायचं नाही. हे बरोबर नाहीये. वाद काय होत नाहीत का माणसांत?" असं म्हणून ते लोक गेल्यानंतर हे म्हणाले, “मेहेरबानी करत जा. चिडून रागावून कधी तू माझ्यापासून लांब जात जाऊ नको. मला नंतर तू चिडव. अग, मी चेष्टा केली. वाद होत नाही का? कोणाचं कधी भांडण होत नाही का?" अशा रीतीनं ते एक भांडण मिटलं.
मग दुसऱ्यांदा प्रश्न आमच्या रुबीनाच्या शाळेचा आला. तिचं वय साडेतीनचार झाल्यानंतर तिला शाळेमध्ये घालायचं होतं. आधी आम्ही माँटेसरीमध्ये घातली होती आमच्या कॉलनीमध्ये. तिथे इंग्लिश पण असायचं, मराठी पण असायचं, तेव्हा काही वाद झाला नाही. पण आता पहिलीमध्ये घालायचं. तेव्हा वाद झाला कुठल्या भाषेच्या शाळेमध्ये घालायचं? माध्यम कुठलं घ्यायचं? मी उर्दूमध्ये शिकलेली होते. ते मराठीमध्ये शिकलेले होते. त्यांना मराठीचा फार अभिमान होता आणि मला उर्दूचा अभिमान होता. त्या वेळी मला पण असं वाटायचं ना, की मुलीला उर्दू शाळेत घालावं. हे म्हणाले की आपण मराठी शाळेमध्ये घालू या का? मराठी शाळेमध्ये का म्हणून? तर आपल्या मुलांना मराठी आलं पाहिजे. चांगली भाषा आहे, महाराष्ट्रामध्ये राहतो, हे म्हणायला लागले. तर म्हटलं, अहो, हे सगळं हिंदूंचं चांगलंच म्हणून घ्यायचं की काय? आपण मुसलमान. शेवटी आपली भाषा उर्दु आहे. आता जशी लोकं करतात तशी आरर्ग्युमेंट मी त्या वेळी करत असे. 'नाही, नाही. आपल्याला नाही बुवा आवडणार आपल्या मुलीनं हिंदूंचा अभ्यास शिकलेला.' असा वाद झाला आमच्याकडे. पण ते म्हणाले, 'नाही, माझी मुलगी मराठीमध्येच मला शिकवायची.' आणि जाऊ दे, यांचं भांडण नको म्हणून मी सोडून दिलं.
हे आमच्या घरात पण मराठीच बोलायचे. मी माझ्या आईच्या घरात उर्दू बोलायची. आमच्या घरी मराठी बोलल्यामुळे ते आमच्या माहेरच्या लोकांना आवडायचं नाही. ते म्हणायचे, की काय आहे तुझा नवरा? मराठी भाषा काय आपली आहे? आपल्या घरात का बोलली पाहिजे? असा वाद व्हायचा. मग आमच्या इथे कर्व्यांची शाळा होती. तिच्यात रुबीनाला घातलं. ४ थी पर्यंत खूप चांगलं शिक्षण झालं. पण आता मराठी शाळेमध्ये घातलं तर घरी अभ्यास कोण घेणार? ह्यांना वेळ नाही. मराठी येतं पण वेळ नाही. मला वेळ असला तरी मराठी येत नाही. कसं करणार? माझी धाकटी नणंद होती. १६-१७ वर्षांची. मी घेऊन आले होते तिला बरोबर. ती काही फार शिकलेली नव्हती. ५ वी - ६ वी जेमतेम शिकलेली. गावचं शिक्षण ते. तिच्या भरोशावर आम्हांला रुबीनाला शिकवणं मान्य पण नव्हतं. आणि परवडण्यासारखं पण नव्हतं. पण शाळा चांगली असल्यामुळे आणि दलवाईंची मुलगी म्हणून सगळे मानत पण होते म्हणून तिचा खूप चांगला अभ्यास शाळेने करून घेतला. तिसरी-चौथी अशी ती यायची. आता ४ थी नंतर शाळा बदलायचा प्रश्न आला. शाळा बदलायची म्हणजे कुठं बदलायची? आम्ही अंधेरीला राहतो. पार्ल्याच्या टिळक विद्यालयामध्ये घालावं म्हटलं, तर खूप गाजलेली शाळा आहे. खूप चांगलं नाव आहे. म्हणून मी म्हटलं, “अहो, आपण त्या शाळेमध्ये आपल्या मुलीला घालू या." हे म्हणाले, "नको." म्हटलं, “का? तुमची दोनतीन भाषणं पण झालेली आहेत तिकडे. तुम्हांला लोक ओळखतात. तुमच्या मुलीला चटकन जागा मिळेल.” असं करून त्यांना, रुबीनाला मी जबरदस्तीनं तिकडे पाठवलं. चार तास तो माणूस लाईनीत उभा राहिला. दलवाई म्हणून त्याला कोणी ओळखलं नाही. आणि त्यांच्या मुलीला तिथे प्रवेश मिळाला नाही. आणि ते एवढंसं तोंड करून मला म्हणाले, 'तुझ्यामुळे मी तिथं गेलो.' तर मी म्हटलं, 'भाषणं करायला अशा ठिकाणी का जाता तुम्ही? जिथे तुमच्या मुलीलासुद्धा प्रवेश मिळू शकत नाही. तर काय कारण आहे जायचं?' तर ते म्हणाले, 'ती वेगळी गोष्ट आहे, ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्यावर वाद करायचा नाही.' मग आम्ही महिलासंघाच्या शाळेमध्ये तिला घातलं. त्या शाळेचा फारसा चांगला अनुभव आला नाही. तिथं काय व्हायचं? ही जरा लाजायची तिला काही कळलं नाही तर. मी म्हणायची, काही कळलं नाही, तर उठून विचारावं. तर ती म्हणायची, ममा, अग, बाईंना उठून विचारायचं काय? उभं राहूच देत नाहीत. खाली बसवतात. काही विचारायचं नाही. त्यामुळे तिचा अभ्यास मागे पडला. मग म्हटलं, ट्यूशन ठेवली पाहिजे. आमच्या कॉलनीमध्येच एक बाई होती. तिला आम्ही सांगितलं की गणित-बिणीत हिचं घे आणि नेमकी गणितात ती नापास झाली. खरं म्हटलं तर ती हुशार मुलगी. कुठल्या विषयामध्ये नापास व्हायची नाही. मराठी तर तिचं इतकं चांगलं की सगळे म्हणायचे की मोठी झाल्यानंतर दलवाईंसारखं लिहिणार ही. इतकं मराठी सुंदर तिचं आणि तिथं ती फेल झाली सातवीमध्ये. तोपर्यंत धाकटी माझी पाच वर्षांची झाली. सहा सात वर्षांचं अंतर मुलींमध्ये. त्याच वेळी माझी नणंद फातिमा हिचं आम्ही महंमद खडसशी लग्न करून दिलं. आता प्रश्न पडला मुलींना सांभाळणार कोण? बाई ठेवली. बाई दोन दिवस यायची; चार दिवस यायची नाही. काय व्हायचं? मला ऑफिसातून सुट्टी घेऊन घरात राहायला लागायचं. तेव्हा भांडणं सुरू झाली मुलांच्यावरनं. मला त्रास व्हायला लागला. पण राग कोणावर काढणार? ह्यांच्यावर काढणार. त्यामुळे घरातलं वातावरणच बिघडून गेलं. काय करायचं ही चिंता लागली. त्या काळामध्ये जी. एल. चंदावरकरांनी मदत केली. त्यांनी मला बरेच वेळा कॉन्टॅक्ट केलं होतं. ह्यांच्या ओळखीचे होते. लोणावळ्याला 'गुरुकुल' हे त्यांचं फार चांगलं होस्टेल होतं. मुलामुलींचं. तर ते मागे लागले होते की तुमची मुलं माझी समजून मी ठेवीन. तुम्ही काही काळजी करू नका. हमीदभाई असे बाहेर जातात. तुम्हांला त्रास होतो. तर तुम्ही मुलींना ठेवा. तर मी म्हटलं की नको बाबा. बिनवारशी मुलांसारखं कशाला आपण मुलांना होस्टेलमध्ये घालायचं? आपल्यापासून मुलं लांब राहिलेली आपल्याला नाही आवडणार. अशा रीतीने मी विचार करायची. मग हे दोन-चारदा चंदावरकरांना भेटले. होस्टेलमध्ये गेले. त्या होस्टेलची सगळी माहिती काढली आणि नंतर त्यांनी ठरवलं की हे होस्टेल बरंय आपल्याला. काय हरकत आहे मुलींना ठेवायला? मला त्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “हे बघ, मेहरू तू दिवसभर ऑफिसात राहतेस. मुली शाळेमध्ये जातात. घरी मुली एकट्याच राहतात. मुलींवर संस्कार चांगले होणार नाहीत. आपण नसताना मुली उनाडक्या करणार आणि काहीही करणार. मग त्याला जबाबदार कोण रहाणार? असे आपण किती वेळा समज देणार मुलींना? तू घरी आल्यानंतर मुलं झोपणार आणि त्यांच्याकडे जेवढं लक्ष तू द्यायला पाहिजे तेवढं तू देऊ शकणार नाहीस. त्यामुळे मुलांचं तू नुकसान का करतेस? भावनाप्रधान होऊन चालणार नाही. जरा मुलांच्या दृष्टीने बघ. आपण ठेवून बघू या. ती माणसं खूप चांगली आहेत. माझ्या ओळखीची आहेत.” असं करून मग आम्ही चंदावरकरांकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर बोलणं-बिलणं झाल्यानंतर प्रश्न आला फीचा. तर किती फी असेल? तेव्हा ७५ रुपये एका मुलीची फी होती. आता आम्हांला पगार दोन-चारशे रुपये. ७५ रुपये एकीचे दिले तर खाणार काय? प्रश्न पडला. ते म्हणाले, तुम्ही एकीचीही फी देऊ नका. मी दोन्ही मुलींना सांभाळतो. तुम्ही काही काळजी करू नका. हमीदभाईंसाठी मी एवढं करायला तयार आहे. मी म्हणाले, 'नाही बुवा, मला नाही पटणार हे. त्यांना पटलं असेल तरी मला नाही पटणार.' मग असं ठरलं की एकीच्या फी मध्ये दोन्ही मुली आम्ही ठेवायच्या. तर दोन्ही मुलींना घेऊन आम्ही सोडायला गेलो. सोडून हे निघून आले. मी दिवसभर थांबले तिथे. आणि मला आठवतंय, रुबीना १२ वर्षांची आणि इला ५ वर्षांची. इलाबद्दल बाईंनी सांगितलं की हुशार आहे मुलगी ही. आम्ही पहिलीला घालू. माँटेसरीत घालायला नको. का तर ती इंग्लिश माँटेसरीमध्ये गेली होती. लहानच होती. तर नंतर मला त्या सोडायला निघाल्या. मला अजून आठवतंय ते. त्या दोघी हातात हात घालून मला सोडायला आल्या. मी पुढे, त्या मागे. गेटपर्यंत आल्या. रुबीना आमची समजूतदार होती. त्यामुळे ती रडली नाही. तोंडावरून गलबलल्यासारखी वाटत होती. पण इला आमची एवढीशी लहान असतानाही कंट्रोल करत होती की आपले अश्रू बाहेर पडायला नकोत आणि माझ्या मम्माला हे अश्रू दिसायला नकोत. आणि मीही स्वतःला कंट्रोल करून बाहेर पडले पण घरी येईपर्यंत माझ्या डोळ्यांचं पाणी थांबलं नाही. अजून ती आठवण आली तरी मला भरून येतं. दोन महिने मी अपसेट होते. मला अन्न गोड लागायचं नाही. घास उचलला की मुलींची आठवण. हे घरात शिरले की यांच्यावर चिडायची आणि यांच्याशी भांडण व्हायचं. इतकं म्हणजे घरात असह्य झालं सगळं, की नको असा संसार. मुलं सोडून कसला आपण संसार करणार आहोत? इतकं वाईट वाटायचं की नको बाबा, आपल्याला अशा रीतीनं मुलांना नाही ठेवता येणार. दोन महिने हे बघितल्यानंतर ह्यांना पण कंटाळा आला. ते म्हणाले की असं काही चालणार नाही. रोज समजूत घालायचे की अग, तुला विचारून टाकलंय. मी माझ्या मतानं टाकलेलं नाहीये. तू पण हो म्हणालीस. आपल्या मुलांच्या भल्यासाठी केलंय. आपल्याला गरज होती मेहरू, म्हणून केलंय. पण माझी समजूत पटायची नाही. एकदा माझ्यावर रागावले. म्हणाले, “हे बघ, मी घरात आलो आणि तुझा रडवा चेहरा दिसला ना, तर पुन्हा मी या घरात येणार नाही." असा जेव्हा दम दिला तेव्हा थोडं मी कंट्रोल केलं. नंतर मला असं वाटत राहिलं की मुलींना आपण चांगल्या करताच लांब ठेवलं आहे. तिथून माझ्या दोघी मुली एस.एस.सी.होऊनच बाहेर पडल्या.
जेव्हा रूबीना आणि इला लोणावळ्याच्या बोर्डिंगमध्ये होत्या तेव्हा दलवाई त्यांना भेटण्याच्या निमित्ताने वारंवार पुण्याला दौरा काढायचे. मी खाऊ करून द्यायची. ते घेऊन जायचे. पाच मिनिटं मुलींना मांडीवर घेऊन बसायचे. त्यांच्या हातात खाऊ द्यायचे आणि मग इतरांशी बोलण्यात त्यांचा तास जायचा. ते तिथून मुलींना न सांगता कधी निघून जायचे ते कळायचंसुद्धा नाही. पुण्याला पोचल्यावर ताबडतोब ते मला मुंबईला फोन करायचे आणि मुलींची खुशाली कळवायचे. त्यांना सवय होती, दोन दिवस जरी मुंबईबाहेर गेले तरी ते फोन करून माझी चौकशी करायचे. मी जर त्यांना म्हटलं, 'कशासाठी त्रास घेता?' तर म्हणायचे मी बाहेर गेलो की मला तुझी फार काळजी वाटते. पण ते दिल्लीला गेलेले असताना मी पाठविलेलं चार-पाच पानी पत्र त्यांनी उघडूनसुद्धा वाचलं नव्हतं. कारण ते उर्दूत लिहिलेलं होतं ना!
यांना रात्री घरी यायला नेहमी वेळ व्हायचा. कामाला हे जायचे दुपारी जेवूनखाऊन साडेबाराला आणि यायला बारा-एक वाजायचे रात्रीचे. त्यांच्या कामाच्या निमित्ताने जायचे. मराठामध्ये तर पाळ्याच असायच्या. पाळी असल्यावर प्रश्न यायचा नाही. पण जेव्हा सोशल वर्क सुरू केलं त्यांनी आणि कामाच्या निमित्ताने जायला लागले तेव्हा वेळ झाल्याबद्दल काही नाही म्हणायचं. कारण दुपारी आम्ही घरातच नसायचो. त्या वेळी डबे असायचे आमचे. मी डबा घेऊन जायची. हे जेवून जायचे. पण रात्रीचं मला वाटायचं की आपण बरोबर बसावं, बोलावं, खावं. मी थांबायची आणि यांना यायला वेळ व्हायचा. वेळ होतो म्हणून मी चिडायची पण नाही त्यांच्यावर. पण गंमत काय व्हायची? वेळाने आले आणि आपण त्यांना ताट वाढून दिलं की, 'तू जेवली नाहीस?' असं विचारायचे, पण माझं ताट वाढेपर्यंत त्यांचं जेवण संपायचं आणि मी पुन्हा एकटीच जेवत बसायची. हे त्यांच्या कधी लक्षात आलं नाही. दुसरं असं की ते मला म्हणायचे की तू माझ्यासाठी जेवायची थांबतेस कशाला? तुला वेळ होतो. तुझी भूक मरून जात असेल. एक तर तू दुपारी जेवत नसशील ऑफिसात. डब्यामध्ये काय जेवण जातं असं? त्यामुळे तू माझी वाटच बघत जाऊ नको. पण असं वाटायचं की आपण त्यांच्याबरोबर जेवावं. एक बायकांना वाटत असतं म्हणून. मग ते काय करायला लागले. चर्चगेटला समजा कुठे कामाला आले, ९ वाजले असले की फोन करायचे आणि सांगायचे की मेहरू, माझं आता सगळं काम झालेलंय. मी निघतोच. तू जेवून घे. “अहो, सगळं झालेलंय ना, मग एका तासात तुम्ही येता. मी थांबते." की पुन्हा तेवढाच वेळ व्हायचा. आणि ते यायचे नाहीत. नंतर नंतर म्हणायचे की तुझ्यामुळे मी काम करू शकत नाही. मला तुझं टेंशन येतं की ९ वाजून गेले. मेहरू माझ्यासाठी थांबली असेल. ती जेवली नसेल आणि अशा रीतीने आपण बाहेर राहावं का? मी काम करू का नको करू? त्यामुळे तू मला असं मोकळं सोड. तू तुझ्या मनात येईल तेव्हा जेव. मनात येईल तेव्हा झोप. तुझा प्रोग्रॅम आखून घे आणि कर. माझ्यासाठी तू असं केलंस तरी मला टेंशन येतं. असं बोलले तरी मी कधीही ते आल्याशिवाय जेवले नाही. नव्हतं मला जेवण जात. मी काय करणार? मला त्या वेळी असं वाटायचंच नाही की जेवावं म्हणून. त्यांच्याबरोबरच जेवायची. ते कितीही उशीरा आले तरी बसायचे, दिवसाचा रिपोर्ट द्यायचे. आज मी असं केलं. हे काम केलं. ते काम केलं. सगळं मोकळेपणाने सांगायचे. त्याच्यात आडपडदा नसायचा. मग जेवतानाची गंमत अशी की कधी लवकर आले, जेवायला बसले, जेवून-बिवून घेतलं आणि नंतर आपण काहीतरी फळं वगैरे खायला समोर दिलं तर लगेच जेवल्या-जेवल्या हातात पुस्तक घ्यायचं. पुस्तक कधी सुटायचं नाही. समोर असायचं. समजा द्राक्ष-बिक्षं दिलं तर पटापट खायचे. मुलं समोर बसलेली आहेत याचं त्यांना भानच रहायचं नाही. मुली समोर बसलेल्या असल्या तरी हात नाही लावायच्या. आणि थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं की मी बाहेर यायची आणि म्हणायची की काय हे, तुम्ही वाचत बसला? या मुली समोर बसल्या ना तुमच्या. त्यांना न देता तुम्ही खाताय. “अरे, मेहरू मी बघितलं नाही त्यांना. सॉरी, सॉरी. अरे काय बाब्या, समोर ठेवलं म्हणजे खायचं. बाबांनी देण्याची काही जरुरी आहे का? समोर ठेवलं म्हणजे सगळ्यांनी खायचं असतं. थांबता कशाला? घे. घे." अमूक घे असं म्हणून त्यांना घाईघाईने द्यायचे आणि मग त्यांच्या लक्षात यायचं की एकटे आपणच खातोय. आणखीन एक म्हणजे त्यांना कुठलीही गोष्ट पाहिजे, चहा साधा पाहिजे तर ऑर्डर सोडण्याची त्यांना सवय नव्हती. माझंच काम आहे चहा करण्याचं, मीच केला पाहिजे, त्यांना आल्याबरोबर विचारलं पाहिजे, त्यांना दिला पाहिजे असं काही नव्हतं. त्यांना चहा जरी मागायचा असेल तरी म्हणायचे, “मेहरू, तू चहा घेणार आहेस का? घेतला नाहीस ना? घ्यायचाय का तुला? तुझ्यासाठी तू करत असशील तर अर्धा कप मला कर. मीही घेतलेला आहे. पण मला हवाय ग थोडा. तू केलास तर मला दे. तुला नको असेल तर नको", असं. मडक्याच्या समोर उभे रहायचे आणि म्हणायचे, "मेहरू, जरा पाणी दे." पाणी दे म्हटल्यावर, “अहो तिथं मडकं आहे. मडक्यासमोर उभे आहात. पाणी आहे. ग्लास आहे. पाणी काढायचं आणि प्यायचं. पाणी काय मागता तुम्ही?" तर डोळा मारून परत म्हणायचे, "नाही ग. तू दिल्यानंतर गोडी वेगळी वाटते. गोडी वाढते ग. त्यामुळे तूच दे ना पाणी." आणि खूष करण्यासाठी मग दिलेलं सगळं पाणी प्यायचे.
एखादे वेळी मी जेवत बसले ना की म्हणायचे “तुला पाणी पाहिजे? बघ मेहरू, मी तुला पाणी दिलं का नाही. तू मागितलंसुद्धा नाहीस. पण मी दिलं तुला. मी मागितलं की तू बोलतेस, पण मी बोललो का तुला असं? हे घे." आणि असं करून पाणी द्यायचे.
माझ्यावर त्यांनी कधी संशय घेतला नाही. समजा ऑफिसातनं यायला वेळ झाला असेल, कितीही वेळ झाला असेल, मी न सांगता कुठे गेली असेन तरी आल्याबरोबर असे तापायचे नाहीत. कुणाबरोबर गेली होतीस, कुठे गेली होतीस असलं ते काही विचारायचे नाहीत. म्हणायचे, "दमलीस. खूप काम होतं वाटतं. बस, बस जरा. पाणी-बिणी पी, आराम कर. खूप काम पडलं ना. त्रास झाला ना आज तुला. आराम कर. जरा उशीरा जेवू. आपल्याला काही हरकत नाही." असं म्हणायचे. माझा पगार किती आहे हे त्यांना माहीत नव्हतं. कधी कधी गंमत म्हणून म्हणायचे, “अग, नवऱ्याला तरी सांग ना तुला पगार किती आहे हे. काय नवरा घेणार आहे का?" तरीही मी सांगितलेलं नाही.
काम करते, काही नाही. हा संसार तुझा आहे. तू कुठूनही पैसा आण. आणि त्यांना गरज लागली तरी मी पैसे नेऊन दिल्यावरसुद्धा त्यांनी कधी विचारलं नाही की, हे पैसे कुणाकडनं आणले. माझ्याकडे काही दागिने होते, ते मी माझ्या आईकडून आणले होते. एक सोनार जवळ बघितलेला होता. मी नेहमी ते त्याच्याकडे गहाण ठेवायची आणि पैसे आणायची. हे त्यांना माहीतही नसायचं. पण त्यांनी कधी मला संशयाने विचारलं नाही की हे पैसे तू कुठून आणलेस! उलट मी त्यांना म्हणायची, "बाहेरचं कर्ज करायचं नाही हं. लोकांचं कर्ज मी फेडणार नाही. जे काही लागेल ते माझ्याकडून घ्यायचं आणि मला परत फेडायचं." आता माझ्याकडून घेत असत ते कधी फेडलं नाही, ही बाब वेगळी. मी मागितलं पण नाही.
जेवणाचं ताट त्यांना वाढल्यानंतर पहिला प्रश्न ते विचारायचे, 'हे मला जे दिलंय ते सगळ्यांनी खालंय का? बाब्या, तू खाल्लं का? फाफा, तू खाल्लं का? मेहरू, तू हे खाल्लेलं आहे ना? मला एकट्याला नको.' जे काही असेल ते सगळ्यांना द्यायचं. कधी कधी काही नसलं तरी त्यांनी काही विचारलेलं नाही की आज असं जेवण का? उलट असं असे की मटणाचं कालवण केलं आणि ते चांगलं झालं नाही तर म्हणायचे, 'तुम्हांला येत नसेल ना, तर करायचं नाही. हे जे सगळं नाश करता ना त्यापेक्षा डाळ शिजवा. मी खाईन. पण असं करायचं आणि वेस्ट करायचं नाही. हे चांगलं का नाही झालं तुमचं? कारण तुम्ही लक्ष देऊन नाही केलं.' म्हणून ते बहिणीला बोलायचे.
जेव्हा मंडळावरती काम करायला लागले तेव्हा मंडळाची गाडी होती बऱ्याच वर्षांपूर्वी. तर गाडी आमच्या दारात उभी राहायची. रोज काही पेट्रोल परवडायचं नाही. कुठे नेण्याचा प्रश्न यायचा नाही. कधीतरी आठ दिवसांनी, पंधरा दिवसांनी हे चर्चगेटला जाणार आहेत, त्यांचं काही काम आहे, तेव्हा ती गाडी काढायची. पण रोज चालू करून ठेवायला तर पाहिजे. आता चालू करायची म्हणजे कुठे फिरवायची? माझं ऑफिस एक मैलावर होतं. त्यामुळे ते काय करायचे. मला रोज सोडायचे स्वतः चालवत. ते शिकले होते. शिकले पण कसे माहितेय का? ते म्हणाले, गाडी शिकायची असेल तर क्लासमध्ये, मोटार क्लासमध्ये वगैरे नाही शिकायची. टॅक्सीवाल्याच्या बाजूला बसायचं आणि प्रवास करायचा. टॅक्सीवाल्याला सगळं विचारायचं की असं सिग्नल आलं तर काय करायचं? ते सगळं बरोबर सांगतात. ते शिकलेले असतात. आणि त्यांचा पुतण्या अली आणि हसनखान यांच्यामुळे ते गाडी खूप चांगली चालवायला शिकले. म्हणजे गाडी चांगली चालवणं म्हणजे काय ते हसनखाननी मला सांगितलं, “भाभी, आपण ज्याच्या गाडीमध्ये बसल्यानंतर कशी गाडी चालतेय ते कधी कळत नाही आणि आपल्याला भीती वाटत नाही तो माणूस खरा चांगला चालवणारा असतो." तर ह्याच्यावरनं कल्पना करायची. आणि सगळे म्हणायचे, आमची आत्यासुद्धा, 'हमीदनी मला नेलं होतं गाडीमध्ये तर माझा जीव आधी असा होत होता की ह्याला गाडी चालवता येत नाही, हा कसा नेईल? पण खूपच चांगली चालवतो ग गाडी', असं म्हणाली. तर गाडीनं मला ते ऑफिसमध्ये सोडायचे. काय करायचे? उशिरा उठायचे, दाढी वाढलेली. कधी उठल्याबरोबर दाढी करायचे नाहीत. आंघोळ करायचे नाहीत. नुस्त तोंड धुवायचं. संडासला जायचं. चहा-बिहा प्यायचा, पेपर वाचायचा आणि माझी वेळ झाली म्हणून चटकन खाली उतरायचे. गाडी-बिडी चकाचक करायचे. आपल्या अंगावर तेच खादीचे फाटके कपडे असायचे आणि मला ते सोडायला ऑफिसपर्यत यायचे. तिथे त्यांच्या ओळखीचे बरेच निघायचे, तर मी ओरडायची, 'काय हे? मी केवढी पॉश जाते. सगळे म्हणतात, 'वा, खान काय पॉश असते आणि तिचा नवरा बघा, फाटक्या कपड्यांमध्ये असतो, दाढी वाढलेली असते.' हे बाबा आपल्याला आवडत नाही, आपल्याला कमीपणा वाटतो. लोकांनी म्हटलं पाहिजे, 'वा, खानचा नवरा काय उठून दिसतो.' एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं आणि तिसऱ्यांदा म्हणाले, "तुला कशाची जाणीव नाही. मी उठल्याबरोबर खाली जातो, गाडी साफ करतो. तुला त्रास होतो? तुला गाडीत कधी बसायला मिळणार? तुझा त्रास वाचावा, आपल्या हातून जेवढा तुझा त्रास कमी करता येईल तेवढा करावा, त्यासाठी तुला तिथे सोडायला येतो. तुझा नवरा म्हणून सोडायला येतो; का लोक काय म्हणतात म्हणून सोडायला येतो, याचा कधी तरी विचार कर." तेव्हा माझ्या लक्षात आलं, की नाही, आपलं हे कुठे तरी चुकतं आहे. गावाबिवाला कधी जायचं असेल तरी जाताना ते लोकांना जमा करायचे. हिशोब कसा असायचा, एस.टी.ने किती खर्च येतो? दहा रुपये. किती माणसं आपल्या गाडीत बसतात? पाच माणसं. मग एस.टी.ने आपण गेलो तर खर्च आपल्याला जास्त येईल ना. मग खाण्याचं सामान घरनं घेऊन जायचं. चपाती-भाजी. सगळ्यांना घेऊन जायचं. गावात गेलं की हमीदखानची टॅक्सी आली, हमीदखानची टॅक्सी आली म्हणत सगळं गाव जमा व्हायचं. मग तिथे म्हातारे-कोतारे आहेत ते सगळे गोळा व्हायचे. 'कायरे हमीदखान, गाडी आणलीस, टॅक्सी आणलीस?'
'हो, चल मामा, तुला नेऊन पोचवतो. चल डॉक्टरकडे चल', असं म्हणून सगळ्यांना गाडीमध्ये फिरवून आणायचे. त्यांना असं वाटायचं, माझी गाडी आहे का? गाडी मंडळाची आहे, पण किती कौतुकाने येतात माझ्याकडे. अशा रीतीने त्या गाडीचा आम्ही वापर करत असू.
सिनेमाचा आम्हांला फार षौक असायचा. जी पुस्तकं वाचायची ती डिटेक्टिव्ह वाचायची, हिस्टॉरिकल वाचायची आणि वाचल्यानंतर त्याच्यावर जी पिक्चर्स निघालेली असायची ती बघायची. आधी मीच बोलायची की आपण पिक्चर बघू या. 'हो, बघू या हं. जाऊ या, जरा दोन दिवस थांब.' दोन दिवस अगोदर बाल्कनीचं तिकीट काढायचे. इंग्लिश पिक्चर बघायचा. मग त्या दिवशी, 'मेहरू आज तू स्वैपाक करू नको हं. आज आपण बाहेर जेवू', असं म्हणायचे. मग बाहेर जेवायचं. पण सिनेमामध्ये बसल्यानंतर त्यांना कॅडबरी खायची फार हौस. खूप खायचे. तर कॅडबरी हातात असायची आणि आणल्यानंतर १-२ तुकडे मोडायचे आणि माझ्या हातात द्यायचे. चणे खाल्ल्यासारखी एक-एक करत सगळी कॅडबरी खायचे. माझे दोन तुकडे संपेपर्यंत सगळी खायचे. आपण म्हणायचं, "काय हे, सगळी खाल्लीत?” “अरे, आधी नाही का सांगायचं. मला वाटलं तुला आवडत नाही, म्हणून सगळी खाल्ली.” एक गंमत की आम्ही घरातनं बाहेर पडलो की एक शब्द रस्त्यात बोलायचा नाही. थिएटरमध्ये बसलोय तर पिक्चर संपेपर्यंत काहीही विचारायचं नाही. काही आपल्याला कळलं नाही तरी जेवताना म्हणजे हॉटेलमध्ये गेलो तिथे बोलायचं नाही. परत आलो आम्ही घरी तरी बोलायचं नाही. घरी आल्यानंतर सगळं आटपायचं. विश्रांती घेण्यासाठी गाद्या-बिद्या टाकायच्या. पडल्यानंतर मग दोन तास त्या पिक्चरवर चर्चा करायची. 'तुला काय कळलं नाही त्या पिक्चरमधलं, ते विचार. का कळलं नाही? वाचत नाही ना. वाचायला पाहिजे. तू वाचलं नाही. हे वाचलं नाही. ह्या पुस्तकावरून केलेलंय. हे असं लिहिलंय.' असं पिक्चर बघून मग त्याच्यावर चर्चा करायची. कुठलंही पुस्तक ते वाचायला काढायचे आणि मग, मेहरू, जरा इकडं ये बघ. या पुस्तकात काय लिहिलंय. अमूक अमूक लिहिलंय. “अहो, जाऊ द्या. ते माझं जळतंय सगळं चुलीवरचं. तुम्हीच वाचा ना. मला काय करायचंय त्याचं?" असं म्हणून मी ते कानाबाहेर टाकायची.
एकदा काय झालं, आमची रुबीना लहान होती. शाळेमध्ये होती. शाळेमध्ये म्हणजे मला वाटतं महिला संघाच्या शाळेमध्ये होती. ह्यांची पँट टांगलेली असायची. सुट्टे पैसे त्यात असायचे. तर दोनदा मला म्हणाले, 'माझे सुट्टे पैसे कोण काढतं? मेहरू, तू काढते का?' मला माहिती होतं, यांच्याकडे काय असणार? यांच्या खिशात घालायला माझ्याच पाकिटामध्ये पैसे नसायचे. तर मी म्हटलं, 'मी नाही बा काढले आणि मला सवय पण नाही.' दोन दिवसांनंतर रुबीनाच्या कंपासबॉक्समध्ये मला सुट्टे पैसे सापडले. मी हिला पैसे दिलेले नाहीत, ह्यांनी तिला पैसे दिलेले नाहीत, तर हे पैसे आले कुठून? मग मला डाउट आला. मी म्हटलं, असं असं वाटतंय. त्याच्यानंतर त्यांनी तिला विचारलं, 'तुझ्या बॉक्समधे सुट्टे पैसे कुठून?" पहिल्यांदा हो-नाही, हो-नाही केलं. मग दम दिल्यानंतर सांगितलं, "बाबा, दोन दिवस तुमच्या पँटमधनं काढले." "का काढले?" "नाही. त्या मुली पैसे आणतात. खातात.” "मग तू आम्हांला का नाही सांगितलं? मम्माला सांगितलं? तुला काय कमी पडत होतं घरात खायला? म्हणाल ते आणून देतो का नाही? पैसे आम्ही देणार नाही. तुम्ही बाहेरचं खायचं नाही. तुम्हांला जे काही पाहिजे ते सांगा, तुम्हांला घरात आणून खायला देईन."
त्यांना खूप राग आला. एक चापटी तिच्या कुल्ल्यावर दिली. आणि ते म्हणाले, "उद्या सकाळी मी तुझ्या शाळेमध्ये येणार. तुझ्या बाईंना सांगणार, हिने चोरी केलेली आहे. हिला बेंचवर उभी करा आणि सगळ्यांच्या समोर हिला शिक्षा करा. हे तुझ्यासाठी मी करणार आहे." एवढं ऐकलं आणि ती त्या धसक्याने खूप घाबरली. आणि मला पण वाटलं की अरे बापरे, हे जातील सकाळी उठून. तर रात्री मी समजूत घातली. “हे पहा, असा स्टँड आपण मुलांच्या बाबतीत घ्यायचा नाही." मग त्यांना वाईट वाटलं तिला मारल्याबद्दल. चार दिवस ते नीट जेवले नाहीत. आणि "मी, मेहरू, बाब्याला मारलं. मी, मेहरू, बाब्याला मारलं. हात माझा उचलला कसा? बाई, मी एक चापटी कधी माझ्या वडिलांच्याकडनं खाल्लेली नाही. त्या पोरीला मारण्यासारखं काय होतं? तिला दम दिला तरी ती ऐकण्यासारखी होती आणि मी तिला मारलं. हे मी चांगलं केलं नाही." असं म्हणत राहिले. मग तिने माफी मागितली. तिला शाळेमध्ये नेली. नंतर तिने कधी चोरीमारी केलेली नाही. पण ते म्हणाले, झालं ते बरोबर नव्हतं म्हणून.
गावाला आम्ही गेलो नवीन नवीन, तर आमच्या त्या गावामध्ये तो ग्रामोफोन- तो ओल्ड फॅशन्ड भोंग्याचा - दलवाईंकडे होता. महंमद दलवाईंकडून तो आणला होता. मग तो घरात लावला की सगळा गाव लोटायचा बघायला. ती सैगलची गाणी. त्यांना पिक्चर आवडायचे. सैगल-बियगलचे पिक्चर त्यांना जास्त आवडायचे. जुन्या पिक्चरला जायचं असेल ना तर वीस-पंचवीस मित्र जमा करायचे. सगळ्यांना घेऊन जायचे. आणि ते ओळीनं लागायचे बघा. आठवडाभर सैगलचं पिक्चर, अमूक अमूक लागणार आहे. ते जाहिरात बघतच असायचे. सगळ्या गावाला जमा करून ते पिक्चर बघायचे. मुंबईला पण बघायचे. पुण्याला प्रभातला पण बघायचे. एक पिक्चर पन्नास-पन्नास वेळा बघायचे. सगळी गाणी पाठ होती. गाण्याचा षौक होता. सगळ्या रेकॉर्डस् जमा केल्या होत्या. कुठून कुठून जमा केल्या होत्या. आणि रात्ररात्रभर अशा मैफिली जमायच्या घरात. एकदा तर म्हणाले, तुझी झोपमोड होईल. तुला सकाळी ऑफिसला जायचंय. सगळ्या रेकॉर्डस् उचलतो आणि महंमद दलवाईकडे जातो. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर हा गृहस्थ रात्रभर आला नाही. मी जागीच, हे आता येतील म्हणून. सकाळी ६ ला आले. तर मला म्हणाले, “अग, चहा करत होतो. खात होतो. रेकॉर्डस् लावत होतो. सकाळ कधी झाली कळलंच नाही." आणि त्यांची मित्रमंडळी जमा झालं की खाणंपिणं व्हायचं. आणि मौज करायचे. रेकॉर्डस् सुद्धा खूप चांगलं चांगलं सिलेक्शन करून त्यांनी जमा करून ठेवल्या होत्या.
मी लग्न झाल्यानंतर त्यांना नवीन कपडे शिवले होते. चार-पाच ड्रेस. त्या माणसाकडे एका जोडीपेक्षा कधी दुसरा जोड नव्हता. लग्न झाल्याबरोबर इतके कपडे! आम्ही गावी गेलो. पेटी भरलेली होती. गावामधल्या, जवळ जवळ सगळ्या माणसांना जमा केलं. जसे जसे आले तसे प्रदर्शनाला कपडे ठेवल्यासारखं केलं. मेहरूने चार जोड कपडे शिवले मला. हे असं शिवलं, तसं शिवलं. लोकांनी काय कौतुक केलं असेल! मेहरूचा एक पगार गेला याच्यात, मला तिने आधी कपडे शिवले, असं सारखं सांगायचे.
काय होतं त्यांच्याकडे? लग्न झालं. नोकरी नाही. काही नाही. मी सगळे कपडे घेऊन आले होते त्यामुळे माझ्याकडे चांगले कपडे होते. त्यांच्याकडे नव्हते. त्यांना ते कौतुक वाटलं. कारण नोकरी लगेच मिळाली. आम्ही दोन महिने तिथे राहिलो आणि परत आल्याबरोबर त्यांना नोकरी मिळाली. तसं काय, मी त्यांना खायला घातलं असं म्हणू शकत नाही. पण त्या काळामध्ये मी घेतलं तर ते कौतुकाने लोकांना दाखवलं त्यांनी, की माझ्यासाठी तिने असं असं केलेलं आहे. मग सगळे म्हणाले की चांगल्या घरातनं ती मुलगी आलेली आहे. तिच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. बाबा म्हणायचे, “नाही तर आमच्या हमीदखानमध्ये काय आहे म्हणून ती आलेली आहे? तिच्यावर संस्कार चांगले झालेले आहेत म्हणून ती आमच्याकडे आलेली आहे. त्यामुळे आपण तिला त्रास देऊ नये. तिची नोकरी आहे." मला हे म्हणायचे, "बाबांच्याकडे पैसा असता तर नोकरीसुद्धा करू दिली नसती. तुला घरात बसून खायला घातली असती. आम्हांला वाईट वाटतं ग, तुला नोकरी करताना बघून.” त्या काळामध्ये फारशा बायका नोकरी करत नव्हत्या. त्या वेळी त्यांना वाटायचं की हे बरोबर नाहीये. हिने इतकी मेहनत घेऊ नये म्हणून. मला घरात त्रास होऊ नये म्हणून बहिणीला आणून ठेवलं होतं. तिने पण आई म्हणून खूप माझी सेवा केली आणि मी मुलगी म्हणून तिचं पालन केलं.
हां, आणखीन एक म्हणजे त्यांच्यामध्ये अशी एक कला होती की एक गोष्ट, एखादा जोक सांगायचा असेल तर तो पन्नास वेळा सांगायचा. पण पन्नासाव्या वेळीसुद्धा तो जोक आपण कधी ऐकला नाही असं वाटायचं. आणि मी जर का एकदा एखादा जोक सांगितला आणि दुसऱ्या वेळी सांगायला गेले की म्हणायचे, "काय मेहरू, कालच सांगितलास." मी म्हणायची, "काय हो. तुम्ही पन्नास वेळा सांगता ते जोक!” “मी पन्नासाव्या वेळी सांगूनसुद्धा तू एन्जॉय करते ना. अग, तू पहिल्यांदा सांगितला तरी मी हा जोक एन्जॉय करू शकत नाही. सांगताना असं नाही सांगायचं. ही कला आहे. तू मला सांगून दाखव."
आमचं घर लहान आणि घरामध्ये आमच्या जागा नाही. त्यामुळे आम्हांला कधी मनासारखं बोलायला मिळायचं नाही. कधी बसायला मिळायचं नाही, प्रेमाच्या गोष्टी तर जाऊच देत. कसलीच प्रायव्हसी नव्हती. मग मला कधी कधी चीड यायची. एकदा मी म्हटलं, काय हो आपलं घर आहे? साधी प्रायव्हसीसुद्धा नाही.” तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं, “प्रायव्हसीचा अर्थ काय होतो, मेहरू? घरातली माणसं हाकलून देऊन प्रायव्हसी आपल्याला हवीय का? ही माणसं कुठे जाणारेत?" आणि त्यानंतर मी माझी मुलं होस्टेलमध्ये घातली. नणंद गेली लग्न होऊन. आम्ही दोघंच. घर खाली. तासभर आम्ही सोफ्यावर. एका टोकावर हे आणि एका टोकावर मी बसलो. आणि तासाभरात आम्ही एक शब्दही बोललो नाही. तेव्हा हे म्हणाले, “काय ग. तुला प्रायव्हसी पाहिजे होती ना? मग आता तासभर मी तुझ्याजवळ बसलोय. तू एक शब्दही बोलली नाहीस. तू बोलणार काय? तुझ्याकडे विषय काय आहे? माझ्याकडे सतरा विषय आहेत. तुला बोलून दाखवतो. आपल्याकडे दुसऱ्याशी बोलायलासुद्धा विषय लागतात.” म्हटलं, “आहे की माझ्याकडे विषय.” "तुझ्या ऑफिसचे विषय नकोत. तुझ्या मैत्रिणीचे विषय नकोत. घरातले विषय नको. मग जे विषय मला पाहिजेत ते तुझ्याकडे आहेत का? नाही.” त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की या माणसाचे इंटरेस्ट वेगळ्या ठिकाणी आहेत. आपण त्याला इथं ओढून काय उपयोग होणार? आपल्या कुठल्याच गोष्टीत ते दखल घेत नाहीत. आपला सहवास तर चाललेलाच आहे. पण थोडंसं त्यांचं मन आपल्याकडे वळण्यासाठी आपण त्यांच्या कामामध्ये इंटरेस्ट घेऊ या. मग मी वाचायची नाही पण त्यांना अधूनमधून विचारायची प्रश्न. “अहो, तुम्ही असं म्हणालात ना. मग त्याचा अर्थ काय आहे?" मग राजकारणावर बोलायचे. इंदिरा गांधींचं राजकारण काय आहे? अमूक काय म्हणाले? नेहरू काय म्हणाले? गांधी काय म्हणाले? मग असं हळूहळू विचारायला लागले आणि त्यांना इंटरेस्ट वाटायचा आणि मग ते माझ्या जवळ यायला लागले. त्यांना असं वाटायचं की ही इंटरेस्ट घेतेय ना, हिला कळतंय ना. मग आपण सगळंच हिला सांगावं.
पण गंमत अशी आहे की, मला खूप गोष्टी नंतर कळायला लागल्या. आता मराठी शाळेमध्ये मुलांना घालणं. आता प्रचार तसाच होतो ना की महाराष्ट्रात रहाणाऱ्या माणसांनी मराठी शिकलं पाहिजे. ज्या प्रांतामध्ये आहे माणूस त्या प्रांताची भाषा त्याची आहे. तो कुठल्याही जातिधर्माचा असला तरी, हे आता मला कळलंय ना मी काम करते म्हणून. नाहीतर मला कसं कळणार? मी वेगळ्याच दृष्टीने बघत होते. आज मला वाटतंय की जे काही लोकांना ते सांगत होते ते सगळं आपल्या घरात त्यांनी केलेलं आहे. माझा विरोध झाला तरी त्यांनी केलेलं आहे. की नाही, हिला कधी तरी कळेल आणि नंतर मला अभिमान वाटायला लागला. रुबीना आमची मराठीमध्ये खूप चांगली लिहिते. तिला आता कसं, बिचारीला वेळ नाही किंवा घरच्या वातावरणात होत नाही. पण तिच्यात बापाची कला आहे. स्वभाव तसा आहे.
हे दोघींना मांडीवर घेऊन बसायचे दोन्ही बाजूला आणि विचारायचे मोठीला, "बाब्या, तू कुणाची?" ती म्हणायची, "बाबा, मी तुमची. ममा, मी बाबांची." आणि दुसरीला विचारलं की ती माझ्याकडे बघायची आणि म्हणायची,"बाबा मी तुमची पण आणि मम्माची पण." तर म्हणायचे,"हा बघ दोघींतला फरक. ही बाब्या माझ्यासारखी आहे. भोळी, साधी, मनाची चांगली समजदार. आणि ही जी आहे ना, ही मेहरू, तुझ्यासारखी आहे. नाही नाही, म्हणजे तू काही वाईट आहेस अशा अर्थाने नाही, पण ही तुझ्यासारखी आहे आणि ही माझ्यासारखी आहे. तर कधी बाब्याला त्रास देऊ नको. कधी मार देऊ नको. कधी बोलू नको. लक्षात ठेव. तिच्यात माझं रूप आलेलं आहे." आणि हे खरोखर आहे. मोठ्या मुलीला माझ्या तुम्ही लाख शिव्या द्या. खालची मान वर नाही करणार. एक सेकंद घेईल ती ममा म्हणून हाक मारायला. मनातसुद्धा ठेवणार नाही. आणि धाकटीला तुम्ही एक शब्द बोलला तर ती पहिल्यांदा तर आठ-आठ दिवस बोलायचीच नाही. आता बोलते. पण ती फुगून बसणार. मानीपणा. बघणारच नाही. 'माझी कुठे चूक आहे? तीच मला असं बोलली.' म्हणजे दोन्ही मुलींमध्ये सुद्धा फरक आहे.
एकदा बाबा, बाबा म्हणजे माझे सासरे, ते ऐंशी वर्षांचे असताना त्यांना आम्ही मुंबईला आणलं. त्यांना हर्निया झालेला होता. आणि तीस वर्षं त्या हर्नियाच्या त्रासानं ते आजारी होते. पण डॉक्टरची भीती. इंजेक्शन घ्यायचं नाही. दवाखान्यात जायचं नाही. औषध घ्यायचं नाही. त्यामुळे प्रश्न पडायचा ना, काय करायचं म्हणून. तर एकदा यांनी आणलं. “नाही बाबा चला, माझा संसार बघायला चला म्हणून." बाबांची यांनी खूप सेवा केली आहे. बाबांचे हे खूप लाडके होते. त्यांची मतं बाबांना पटलेली नाहीत. ते वाद घालायचे, बोलायचे, शिव्या पण द्यायचे. पण हे एक शब्द बोलायचे नाहीत. देऊ दे ना. काय आपल्याला भोकं पडतात का शिव्या खाल्ल्या म्हणून? तो मोठा माणूस आहे, आपण त्यांच्या चुका दाखवायच्या नाहीत.
तर आमच्याकडे त्यांना आणलं होतं. दोन महिने ते आमच्याकडे होते. सुरुवातीला आणलं तेव्हा गंमत झाली. संडासात गेले तर आमच्याकडे डालडाचा डबा ठेवला होता संडासात पाण्याला. कारण टिनपॉटलासुद्धा दोन-चार रुपये पडायचे. तेवढी आमची ऐपत नव्हती. आणि कशाला पाहिजे चार रुपयांचा टिनपॉट आणायला. डबा काम करतो. उपयोगी पडतो. बाबा संडासला गेले ते म्हणाले, हमीदखान, संडासचा पॉट कुठे? मी संडासला जाणार नाही. अडून बसले आणि यांनी बाजारात जाऊन दोन रुपयांचा संडासचा पॉट आणला तेव्हा संडासला गेले. 'अरे, इतकं कमावता, मुंबईमध्ये रहाता आणि थोड्याशा पैशांमध्ये घर चालविता? तुम्हांला एवढा पगार मिळतो तर एक पॉट तुम्ही आणू शकत नाही?' बाबांना कल्पना नसायची की मुंबईचा खर्च काय? किती लोकं आम्ही इथे घेऊन आलोय!
मग त्यांना दवाखान्यात नेलं, औषध आणलं. डॉक्टरांनी सांगितलं अॅडमिट करा, हर्नियाचं ऑपरेशन फार सिरीयस नसतं. करून टाकू. आता फार त्रास होतोय. तीनदा गेले. अॅडमिट व्हायलाच तयार झाले नाही. टॅक्सीने नेलं. के.ई.एम. मध्ये. तर तिथं जायला तयार नाहीत. नंतर हे म्हणाले, “मेहरू, आपल्या आटोक्यातलं नाही बुवा. हे बाबा काही कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना बोलणार कोण?" नंतर चार दिवस गेल्यानंतर मी समजूत घातली. माझा खूप मान ठेवायचे आणि मी रागाने जरी बोलले तरी कौतुकाने घ्यायचे. त्या वेळी मी सगळं समजावून सांगितलं आणि म्हटलं, 'बाबा, हे बरोबर नाहीये. किती त्रास होतो. तुमच्यामुळे दुसऱ्याला पण त्रास होतो की नाही? असं नाही करायचं. तुम्ही उद्या जायचं हॉस्पिटलमध्ये.' आणि यांना म्हटलं, उद्या टॅक्सी घेऊन या, बाबांना घेऊन जा. टॅक्सीमध्ये बसवलं आणि म्हटलं, "बाबा, मी काही येत नाहीये. तुम्ही तिथं अॅडमिट न होता घरी आलात तर मी काही तुम्हांला घरात घेणार नाही. दार बंद करणार. घेणार नाही. तुम्ही जायचं गावाकडे, माझ्याकडे नको. आणि मी गावाला पण येणार नाही.” त्यांना थोडंसं काही तरी वाटलं. मग गेल्यानंतर अॅडमिट झाले. आणि मी यांना सांगितलं की, "तुम्ही तिथं थांबू नका. तुम्हाला बघितलं की फार लाडात येतात ते. तुम्ही थांबूच नका.” रात्री अॅडमिट केलं आणि काही तरी पहाटे ऑपरेशन होतं. ऑपरेशन झाल्यानंतर हे गेले. आधी गेलेच नाहीत. ते चांगले उठून बसले होते. “काहीच त्रास झाला नाही रे मला.” दहा पंधरा दिवस होते हॉस्पिटलमध्ये. दलवाई सतत त्यांच्याकडे असायचे. त्यांना जेवण भरवणं वगैरे सगळं. इतकं कुणी करणार नाही. मग घरी आल्यानंतर बेडवर होते. सासू काही माझी आली नव्हती. ते एकटेच आले होते. तर बेडवर संडास, लघवी व्हायची आणि ते सगळं मी काढलेलं आहे. मी धुतलेलं आहे. मग ते गावाला गेल्यानंतर सगळ्यांना सांगायचे की मरियमसुद्धा – माझ्या सासूचं नाव मरियम – करणार नाही एवढं मेहरूने केलं. मेहरूने माझी हिराकत उचलली. माझं सगळं केलं. तिला काही वाटलं नाही. मला लाज वाटायची पण ती म्हणायची, बाबा मी तुमचं सगळ करते. मुलीसारखं तिने सगळं केलेलं आहे. कुठे मी फेडणार आहे? एवढी सेवा ही मुलगी करू शकते? दलवाईंनी पण खूप केली त्यांची सेवा. त्यांनी बोलवल्यानंतर ते बेचैन व्हायचे. पत्र आलं ना की म्हणायचे, "बाबांचं पत्र आलंय. बाबांनी बोलावलंय.” “जा ना तुम्ही." खूष. बाबांना सांगायचे, बाबा, मी मेहरूला पत्र आल्याचं सांगितलं. मेहरूने सांगितलं बाबांना बघायला जा म्हणून. मेहरूने मला पैसे दिले. बाबांच्या तोंडातनं निघालं आणि ह्यांनी केलं नाही असं झालं नाही.
माझ्याकडे राहिल्यानंतर बरे झाल्यावर बाबा म्हणाले, “मेहरू, एक गोष्ट सांगू का तुला? मला गावाला जायच्या अगोदर ना – हमीदखानला सांगू नको, हमीदखान करणार नाही आणि तो ओरडेल – त्या माहीमच्या दर्ग्यावर जायचंय." दर्ग्यावर आमच्या घरी कधी कोणी गेलेलं नाही. दर्ग्यावर जायचं म्हटल्यावर प्रश्न पडला आणि यांना तर सांगायचं नाही. आता काय करायचं? जायचं म्हणजे टॅक्सीने जायचं. पैशाचाही प्रॉब्लेम होता. कसं यांना नेणार? कारण टॅक्सीशिवाय तर यांना नेता येत नाही. माझी आई दादरला रहायची. माझ्या आईला असं दर्गाबिर्गा ह्याचं खूप. आणि तिला माहिती पण खूप असायची. तिला सांगितलं की आमच्या बाबांना घेऊन जायचं आहे आणि बाबांची अट अशी होती की तू माझ्याबरोबर यायला पाहिजेस. म्हटलं, आता काय करायचं? यांना दुसऱ्या कुणाच्या स्वाधीन करून चालणार नाही. रस्त्यात काय झालं तर जबाबदार कोण? त्या वेळी मग आईला बोलावलं. ऑफिसातून मी हाफ डे रजा घेऊन आले. यांना काही सांगितलं नाही. माझी नणंद, बाबा, आई आणि मी एवढे टॅक्सीमध्ये बसलो आणि दर्ग्यामध्ये गेलो. तर दर्ग्याभोवती फेरी मारावी लागते. तिथे उभा राहाणारा जो मुजावर होता तो हात पसरून समोर उभा होता. तिथे पेटी ठेवलेली होती. बंद. लॉक केलेली. पण सगळे पैसे ठेवत होते त्याच्या हातावर. माझी जेव्हा पाळी आली तेव्हा मी म्हटलं, 'बाबा, तिथं लाकडाची पेटी टाळा मारून बाजूला ठेवलेली आहे. या माणसाच्या हातात का पैसे देता? ते पेटीमध्ये घातले पाहिजेत.' तर आमच्या आईला हे आवडलं नाही आणि तिने मला डोळे दाखविले. पण जेव्हा फिरताना माझी पाळी आली तेव्हा मी त्या मुजावरला विचारलं, “तू हात का बाबा पसरले? ती पेटी कशाला ठेवली आहे ? बाजूला हो आणि मला पेटीत पैसे टाकू दे." तिथं माझा आणि आईचा खूप वाद झाला. आणि ती म्हणाली की, “तुझं दर वेळेला असं असतं. म्हणून तुझ्याबरोबर यायला मला आवडत नाही. तुला वाद करायची गरज काय? इतक्या लोकांनी दिलेलं आहे. द्यायचं आणि मुकाट्याने बाहेर व्हायचं." म्हटलं, असं करूनच आपण लोकांना सवय लावतो. मग म्हणतो, पैसे खातात, अमूक करतात, तमुक करतात. हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. अशा पीर-पैगंबरांच्या ठिकाणी तरी असं कधी होऊ नये असं मला वाटतं. हे बरोबर नाही. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो. बाबांना वाटेत चहा पाजला. बिस्किटं खाल्ली. आणि मग टॅक्सी करून घरी परत आलो. घरी परतलो. संध्याकाळ झाली आम्हांला. हे रात्री आले. आल्यानंतर बाबांनी कौतुकानं त्यांना सांगितलं की मेहरूने आज मला माहीमच्या दर्ग्यावर नेलं होतं. त्यांना ते आवडलं नाही. बाबांना काय बोलणार? मग मला म्हणाले, “काय मेहरू, बाबा बोलतात आणि तू वागते. हे काही बरोबर नाही. तुला हे पटलं का? तू कशाला घेऊन गेली? एवढी टॅक्सी करून, एवढे पैसे खर्च करून जाण्यासारखं काय होतं?" तर मी म्हटलं, “जाऊ दे हो. म्हातारा मनुष्य आहे आणि त्यांचं मन आपण राखलं पाहिजे. आपले विचार आपल्याबरोबर. त्यांना कशाला आपण दुखवा? जाऊ दे. त्यांचं समाधान व्हावं म्हणून मी गप्प बसले. त्यांना बरं वाटलं की नाही?" आणि ह्याच्यानंतर बाबांनी गावाला गेल्यानंतर सगळ्यांना सांगितलं, "माझ्या हमीदखानचे विचार काहीही असू दे, पण मेहरूने मला दर्ग्यावर नेऊन आणलं की नाही?" त्यांना समाधान वाटलं.
आम्हांला दोनच मुली असल्यामुळे आम्ही गावात गेलो की बायकांमध्ये चर्चा व्हायची, 'आमच्या हमीदखानला एखादा मुलगा हवा. त्याचं नाव कोण चालवणार?' हे मला डोळा मारायचे आणि सांगायचे 'मेहरू, आपण विचार करू या.' सुरुवातीला मला हे ऐकल्यावर राग येत असे. पण हे माझी समजूत घालायचे की ‘ह्या बायका अडाणी आहेत. ह्यांच्या बोलण्याचं तू वाईट वाटून घेऊ नको, आपल्याला जे हवे तेच आपण करू या.'
या बायकांमध्ये माझी सासू मरियम पण होती. एक दोनदा ऐकलं आणि मग मी मरियमला सांगितलं. 'तुला पाच मुलं आहेत, जर मला मुलगा पाहिजे म्हणून मला आणखी काही मुलं झाली तर मी माझ्या पगारात तुझी आणि माझी मुलं कशी सांभाळणार? मला कमी मुलं असली तर तुझाच फायदा आहे. मी तुझ्या मुलांना आपलं मानेन. परत तू ह्या विषयावर बोलू नकोस.' तिच्या हे लक्षात आलं आणि तिने तो विषय परत कधी काढला नाही.
त्याच्यानंतर आणखीन एक आठवण. रविवारचा सुट्टीचा दिवस असायचा. तेव्हा बाजार आणायचं ह्यांचं काम असायचं. म्हणजे कोंबडी किंवा मटण. ते सुद्धा सावकाश दहापर्यंत निघायचं आणि बारापर्यंत परत यायचं. सगळी लोकं रस्त्यामध्ये भेटणार, बोलणार. प्रत्येकाला सांगणार, ए, कोंबडी आणलीय; चल जेवायला. सुट्टीचा दिवस असल्यानं कोणी यायचं नाही. सगळ्यांना माहीत होता यांचा स्वभाव. घरी काही लोक यांची वाट बघत बसलेले असायचे. ते विचारायचे, साहेब कुठे गेले. मी सांगायची मटण आणायला मार्केटमध्ये गेले. “काय बाई, साहेबांना मटण आणायला पाठवता? भाजी आणायला पाठवता? पिशवी घेऊन पाठवता? काही बरोबर नाही." आणि इतक्यात हे आल्यानंतर काय म्हणायचे, "कायें करायचं बाबा? खायला लागतं म्हणजे काम करायला पाहिजे." असं आणि डोळा मारायचे मला. आणि मग मी आत गेल्यानंतर सांगायचे, "काय करायचं? माझं काम तेवढंच असतं. मी काही जास्त काम करत नाही. पण माझ्या वाट्याला जेवढं येतं तेवढं मी करतो. नाहीतर तिलाच सगळं करावं लागतं. त्यामुळे मी थोडसं काम करतो."
रविवार असला तर दुपारी सगळेच घरात असतात. साधी गोष्ट असते की आपण दुपारी घरात जेवायला थांबलं पाहिजे. सुरुवातीला ह्यांच्या लक्षातच यायचं नाही. हे बाहेर गेले आणि कुणी म्हटलं की हमीदभाई दुपार झालीय. इथंच जेवून जा. तर हमीदभाई जेवून यायचे. आम्ही आपले स्वयंपाक करून वाट बघत बसायचो. हे आले की म्हणायचे, “मेहरू, तू जेवून घे. मी अमूककडे जेवून आलोय." दोनदा असं झाल्यानंतर मला राग आला आणि मी म्हटलं. "तुम्हांला हेही समजून सांगितलं पाहिजे का? साधी गोष्ट आहे. सुट्टीचा दिवस असतो. तर आपल्या फॅमिलीबरोबर आपण जेवावं. काहीच नसतं का तुम्हांला?" "काय झालं त्यांनी आग्रह केला तर? समजा ती माणसं आपल्याकडे आली असती, आपण आग्रह केला असता, तर तो माणूस आपल्याकडे जेवला असता? तो म्हणाला असता, "बाबारे, माझ्या बायकोला आज सुट्टी आहे. मी जेवायला घरी जातो." "तुम्हांला नाही नं बोलता आलं?" तर “नाही, मला एवढं सुचलं नाही." याच्यापुढे दुपारी, सुट्टी असल्यानंतर तुम्ही कुठे जेवायचं नाही. आपल्याचकडे यायचं आणि असं काही ठरलं असेल तर आपण बरोबर जायचं. नाही तर जायचं नाही हे मला सांगावं लागलं. मुद्दाम करायचे नाहीत, पण सांगितल्यावर म्हणाले, "तू असं म्हणतेस नं. माझी चूक झाली. मला नाही कळलं." असं मान्य करायचे ते. तो वाद तिथंच मिटायचा. त्यानंतर कुठंही बाहेर दौऱ्यावर गेले, कामासाठी गेले बाहेरगावी, तर येताना साडी आणायचे आणि दाखवायचे. म्हणायचे, "मेहरू, हे बघ मी साडी आणलीय. खूप चांगली आहे. ओळख बघू ती कोणासाठी आणलीय?" तर मला माहिती असायचं. माझ्या धाकट्या नणंदेवर त्यांचं खूप प्रेम होतं. तिचं नाव फातमा होतं. फाफा, फा-फा करायचे. तर बघ ही मी फा-फा साठी आणली. तिला कोण आणणार ग? तिचं कोणंय आपल्याशिवाय? आपणच आणायला पाहिजे. ती लहान आहे. तर तू असं कर, ही साडी घे, तिला तूच सांग की तुझ्यातर्फे तिला साडी दिली म्हणून. एवढं करून ते साडी माझ्या हातात द्यायचे. त्या वेळी माझ्या डोक्यात असं यायचं की मला का नाही आणत हे साडी? पण ते म्हणायचे, "तू घेऊ शकते ना, तू कमावतेस. तुला काही बंदी नाहीये. त्यामुळे तू कधीही घेऊ शकते. तिला कोण आणून देणार? त्यामुळे आपण तिला दिलं पाहिजे." हे माझ्या नणंदेच्याही लक्षात यायचं की भाभीला न आणताना दादा आपल्यासाठी करतोय. त्यामुळे तिला खूप भरून यायचं. मी साडी दिल्यानंतर ती ठेवायची. पण ती काय करायची हुशारी मग, मी यांच्याबरोबर कधी फिरायला निघाले की म्हणायची, "भाभी, त्या दिवशी दादानं ती साडी आणलेली ती घडी मोडा नं. ती घडी तुम्ही दादांच्या बरोबर जाताना मोडा, मग मी नेसेन." आणि असं करून ती मला घडी मोडायला साडी देत असे. ती मी घालून यांच्याबरोबर मिरवून यायची. नि मग ती पेटीमध्ये घालून ठेवायची. कधी दोघं बरोबर जायचो. कधी पिक्चरला, कधी नातेवाईकांकडे, जोगेश्वरीला. विजय तेंडुलकरांकडे आम्ही सारखे जात असू. त्यांच्या काही मित्रांकडे जात असू. असं काही ठरलेलं नसायचं की अमूक ठिकाणी जायचं. रविवार आहे, दिवस कुठं घालवायचा? संध्याकाळी एक फेरी मारून यायची. कंटाळा आला म्हणून जात असू गप्पा मारायला.
बरं, आपण अंगावर कधी नवीन साडी घातली तर ते कधी विचारायचे नाहीत, की ही कुठून आणली? केवढ्याला आणली? कशाला आणली? असं कधीच विचारायचे नाहीत ते. पूर्ण स्वातंत्र्य होतं, पण त्याच्यावर असं वाटायचंही नाही का आपल्याकडे पैसे नाहीत, हिनं कुठून आणलीय अशी शंका बाळगली असंही नाही. एखाद्या वेळी खादीची साडी आहे, आवडली तर कौतुकानं विचारायचे की, मेहरू ही साडी कुठून घेतली? की समजायचं की यांना खूप आवडलीए. “छान आहे हं." एवढंच म्हणायचे. गप्प बसायचे.
एकदा काय झालं, ते म्हणाले, 'कपाटातले माझे सगळे कपडे काढ बुवा. सगळे मिक्सअप झाले. मला कळत नाही का बाहेर जाताना कुठले घालायचे." मग सगळे कपडे आम्ही काढले. ते म्हणाले की, “सगळे असे वेगळे वेगळे बांधायचे, म्हणजे मी प्रोग्रॅमला जाताना कुठले कपडे घालायचे? मी मुंबईत असताना कुठले, दौऱ्यावर असताना कुठले कपडे घालावेत?" असं करून पोटल्या आम्ही बांधल्या. मुंबईचा जो गठ्ठा होता. त्यात फाटलेले कपडे होते. इकडे कॉलरला फाटलेला, हाताला, पायाला फाटलेला. इथल्या इथं जायला चालतंय म्हणून बांधून ठेवला. पण नंतर गंमत काय व्हायला लागली. आम्ही बरोबर कुठे गेलो तर मी चांगल्यातली चांगली साडी काढायची. चांगली नटून थटून जायची. सगळ्याच बायका करतात तसं नवऱ्याबरोबर जायचं म्हणजे. आपण पण उठून दिसलं पाहिजे असं मला वाटायचं. पण ते काय करायचे, नेमका तो फाटलेला गठ्ठा असायचा त्यातले कपडे घालायचे. कारण मुंबईतल्या मुंबईमध्ये जायचं. इथल्या इथं जायचंय. मेहरूबरोबर. असं कधी डोक्यात नाही आलं, ही चांगलं घालते. अपटुडेट राहायला पाहिजे. एकदा मी मार्क केलं. दुसऱ्या वेळेला माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, “हे काय, इतके घाणेरडे कपडे, माझ्याबरोबर येण्यासाठी? समजता काय स्वतःला? तुम्ही काय स्वतःला फार हुशार समजता का काय? अजिबात खपणार नाही म्हटलं. मी तुमच्याबरोबर अजिबात येणार नाही कुठेही. मलाही असं वाटतं की माझा नवरा सगळ्यात उठून चांगला दिसावा म्हणून. तुम्हांला जर तेवढी किंमत नसेल तर मला तुमच्याबरोबर यायचं नाही.” ते म्हणायचे, "नाही ग, मी मुद्दाम असं नाही करत. पण आपण त्या दिवशी काढले की नाही? ठीकाय, मी हे घालत नाही. आता तू मला काढून दे कपडे. ते मी घालत जाईन. असं म्हटल्यावर मी दुसऱ्या गठ्ठ्यातले चांगले कपडे काढले.
पुण्याला एकदा आम्ही गेलो. तिथं आम्हांला प्रोग्रॅमला जायचं होतं. पन्नालाल सुराणा वगैरे येणार होते. तर मी जाताना माझ्या तीन-चार साड्या काढल्या आणि त्यांना विचारलं, “अहो, मी तुमच्या बरोबर येणाराय. कुठली साडी घालू?" ते भडकले माझ्यावर. म्हणाले, "हे काय, इतका सिली प्रश्न मला विचारते. तुझ्या मनात असेल ते घाल की. मी काय तुला सांगितलंय हे घाल, ते घालू नको म्हणून?" मला खूप वाईट वाटलं. कौतुकानं विचारलं तर हे असं बोलले. म्हणाले, “अग, मला काय विचारतेस? मी तुला विचारतो का कधी? आणि तू पण मला सांगत जाऊ नको का अमूक घाला नि तमूक घाला म्हणून. तुझं स्वातंत्र्य तुला राहू दे. माझं स्वातंत्र्य मला राहू दे. वाटेल ते तू कर. कोणतंही घातलं तरी मी ऑब्जेक्शन घेणाराय का?" मी म्हणायची, "अहो, तुम्ही झब्बा आणि पायजमा घातला ना, तुम्हांला खूप छान दिसतो." तर वाद घालायचे, "नको मी हेच घालतो, शर्टपॅट." "शर्टपँट नाही चांगली दिसत हो, तो खोचता ना शर्ट, तुम्हांला खोचता पण नाही येत.” मी म्हणायची. नि मग महंमद दलवाई वगैरे सांगायचे नं त्यांना, झब्बा घाल रे, तुला छान दिसतो. मग काय करायचे? घालायचे नि मला म्हणायचे, “मेहरू, महंमददा मला आज म्हणाला झब्बा घाल." “अहो, महंमददा नाही म्हणाले, मीच म्हणाले. मी जेव्हा म्हणते तेव्हा महंमददांचं नाव कशाला घेता? त्यांनी म्हटलं ते पटलं काय तुम्हांला? नि मी सांगत होते तेव्हा पटलं नाही. जो माणूस बारीक असतो त्याने ढगळ सैल कपडे घातले म्हणजे तो चांगला दिसतो. तरी अशा इच्छेने तुम्हाला सांगते, तर नाही. म्हटलं दाढी करा, तर नाही. महंमददांनी सांगितलं म्हणून मी दाढी केली, असं कशाला तुम्ही बोलायला पाहिजे?" असाही आमचा वाद व्हायचा. आता गावात बरीच उनाड मुलं असायची, अडाणी. ती घरात बरोबर वागायची नाहीत. तर त्या सगळ्यांची जबाबदारी यांनी घेतली होती. सगळ्यांना बरोबर घ्यायचे. गळ्यात हात घालून फिरायचे. आपली कामं सांगायचे. आणि सगळे म्हणायचे, काय हमीदखान आहे? त्या मुलांना घेऊन फिरतो. पण त्या मुलांना असं वाटायचं का हमीदखान एवढा मोठा आहे तरी तो आम्हांला घेऊन फिरतो. आमच्या गळ्यात हात घालतो. आमच्याशी मैत्री ठेवतो. पण ह्यांचा हेतू वेगळा असायचा. मग त्यांना नोकऱ्या लावायचे. कोणाला मुंबईमध्ये लावली, कोणाला गावामध्ये लावली. कुणाला बँकेमध्ये लावली आणि पहिली तारीख झाली ना की त्यांचा पगार घ्यायला उभे राहायचे. चल, एवढे पैसे दे. कशाला? तुझ्या घरी तुझ्या आई-वडिलांना पाठवायला. असे पैसे घ्यायचे. स्वतः एम.ओ. करून पोचते करायचे. आणि त्यांना विचारायचे अमूकने पैसे पाठवले ना? तुम्हांला मिळाले ना? आणि दर महिन्याला हे बघण्याचं काम माझं. म्हणायचे, “गावाची जबाबदारी माझी आहे. मेहरू, ही मुलं उनाड वागतात. त्यांना सुधारण्याचं काम केलं नाही तर काही उपयोग नाही."
जास्त करून मुसलमान मुलंच भोवती. कारण त्यांचं काम त्यांच्यातच होतं ना? हिंदूंमध्ये काम करणारे खूपजण होते. मुसलमानात काम करणारं कोणी नसायचं. त्यामुळे अशा त-हेनं ते काम करायचे. सगळी त्यांची ऐट खपवून घ्यायची, कोणाला वाईट बोलायचे नाहीत. आमच्याकडे महंमददांचा धाकटा भाऊ अमीर यायचा नं, त्याला तर थोडीशी चोरीमारी सुद्धा करायची सवय होती. तो असा बसलेला असायचा नंतर हे असे घड्याळ काढून ठेवायचे. मग म्हणायचे, "बघ, हे घड्याळ मी असं इथं काढून ठेवलेलं आहे. मी जरा संडासला जाऊन येतो.” तो म्हणायचा, 'बघा काकी, हमीदकाका कसे माझं नाव घेतात. मी काय घड्याळ घेणारे का?' असा त्यांचा जोक पण व्हायचा. त्याच्या गळ्यात हात घालून फिरायचे. खूप लोभ असायचा त्याच्यावर. तो उनाडक्या करायचा. काही कामधंदा करायचा नाही. फॅमिली बघायचा नाही. असं असलं तरी त्याला यांनी खूप जवळ केलं. त्याच्या घरात खाटेवर मळके कपडे पडलेले असत. तिथं मुलं हागायची, मुतायची. पण हे कुठंही जायचं नसेल न तर मी अमीरच्या घरी जातो म्हणायचे. दिवसभर त्याच्या घरी त्या पलंगावर लोळायचे. त्याच्या बायकोला सांगायचे. हे घे पैसे. म्हावरा आण. चांगली हलदोनी कर. चांगलं जेवण कर. आपण जेवू या. जेवण केल्यानंतर त्या मुलांना, त्याला घेऊन जेवायचे नि घरी आल्यावर मला सांगायचे, आज मला बरं वाटलं. मी त्याच्या घरी गेलो होतो म्हणून. त्याच्या फॅमिलीबरोबर मी जेवलो. तर मी म्हणायची नं, अहो, किती घाण असते तिकडे. ते म्हणायचे, “मेहरू, मला ती घाण वाटत नाही ग. ती त्यांच्यात गुरफटलेली माणसं, मला त्यांच्यात झोपल्याशिवाय कशी कळणार? घाणीमध्ये ही माणसं कशी राहतात, हे कसं कळणार?" त्या प्रेमाने ते तिकडं जात असत.
६२ मध्ये आम्ही पाकिस्तानला गेलो. गेल्यानंतर त्यांनी तिथं मुसलमानांची माहिती काढायला सुरुवात केली. तिथले मुसलमान खातात, पितात काय, संस्कृती कशी आहे? राहातात कसे? कसला षौक आहे? कसलं पॉलिटिक्स त्यांचं आहे? बायकांना किती स्वातंत्र्य आहे? ही सगळी माहिती काढायची त्यांना सवयच लागलेली. त्याच्यावर त्यांनी मुंबईला आल्यावर लेख लिहिले. तेव्हा ते मराठामध्ये छापले. मला कुणी तरी असं सांगितलं की चीफ एडिटर त्यांना असं म्हणाला, "हमीद, हा विषय तुझा फार चांगला आहे. तू खूप चांगला रंगवून लिहिलेला आहेस. तुला याच्यात रुची दिसतेय. तू जर हा विषय घेऊन पुढे गेलास तर तुझं भाग्य उजळेल.” असं त्यांनी तीन-चार वेळा सांगितलं. काश्मीरला जेव्हा गडबड झाली तेव्हा गेले काश्मीरला, असे न विचारता न सांगता. चार-पाच लेख त्याच्यावर लिहिले. खूप गाजले ते लेख. आम्हांला ते काश्मीरला गेलेले माहितीही नाही. त्यांचे लेख आल्यावर सगळे म्हणायला लागले, हमीद काश्मीरला गेला आहे. घरात आम्हांला काळजी. आम्हांला समजेना हा माणूस कुठे गेला. दंगल सुरू झाली तर काय करायचं? आणि आले. तेव्हा मी म्हटलं, “बाबा, तुम्ही हे लेख-बिख लिहिले. पण अत्रे काय तुम्हांला ठेवणार नाहीत." पण अत्रे त्यांना खूप चांगले म्हणायचे. त्यांनी काय केलं? असं मानलंच नाही की हमीदनं मला विचारलं नाही. मला न विचारताच, परमिशन न घेता तो गेला आणि मारे मोठेपणानं लिहिलं. असं त्यांनी केलं नाही. त्यांनी कौतुकच केलं, की हा आमचा प्रतिनिधी आहे. तो तिकडे गेला. एवढी छान माहिती काढली. एवढी रिस्क घेऊन, म्हणून मग त्यांनी ह्यांना अशीही ऑफर दिली की तू इथंच काम कर. नि काम करायचं नसलं तरी मी तुला पगारी रजा देईन. तू तुझं काम कर. असं अत्रेंनी खूप सांभाळून घेतलं. पाच वर्षं त्यांनी काम केलं, म्हणजे अत्रेंनी त्यांना सांभाळलं म्हणून केलं. ह्यांचं लक्ष काय त्यांच्या कामाकडे नव्हतं. ते सारखे धावायचे. इकडे धाव, तिकडे धाव. ही माहिती काढ, ती माहिती काढ. पण अत्रेही त्याच क्षेत्रातले होते. कौतुक करणारे होते. मराठात काम करताना हे सारखे लिहायचे, पेपर आपल्या हातातच, त्यांना कोणी बंदी घातली होती? त्यांना प्रोत्साहन देणारे पण तिथं बरेच होते. विजय तेंडुलकर वगैरे. शिरीष पै - तिथं होती. सगळ्यांनी कौतुक केलं त्यांचं तिकडे.
भाई वैद्य राष्ट्र सेवादलात काम करणारे होते. यदुनाथ थत्ते, बाबा आढाव असे सगळे व आज आमचे जे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सभासद आहेत ती सगळी मुसलमान मुलं भाईंच्या माहितीतली होती. तर हमीद असं म्हणायचे, “मला काही तरी करावंसं वाटतंय. पण मला काही सुचत नाही. मला दिशा पाहिजे." तर हे लोक म्हणायचे, "तू हा विषय बोलतोस तो बरोबर आहे. ही मांडणी करतोस ती बरोबरच आहे. मग आपण काय करायचं?" भाईंनी पहिली मीटिंग घेतली. ते म्हणाले, "हमीद लेखक म्हणून चांगला आहे. पण त्याला बोलायला जमत नाही. आमची जेव्हा पहिली मीटिंग झाली तेव्हा या मुलांना आम्ही जमा केलं. मीटिंग घेतली, तर हमीदना काही बोलता येईना.” हमीद म्हणाले, "मी काय बोलू? मला काही सुचत नाही." त्यावर भाईंनी सांगितलं की तुझ्या जे मनात येईल ते सांग आणि त्यांनी ते सांगितलं. अशा ३-४ मीटिंग घेतल्या. तेव्हा त्यांनी आपल्या पुढचा प्रश्न चांगल्या रीतीने मांडायला सुरुवात केली. त्यानंतर काही तरी करायचंय, काहीतरी प्रोग्रॅम घ्यायचाय, काय घ्यायचा? प्रत्येकाच्या सजेशन्स वेगळ्या आल्या. मग असं ठरलं की आपण एक मोर्चा काढू या महिलांसाठी. यात मागणी काय घालायची? तर समान नागरी कायद्याची. सवत बंदीचा कायदा झालाच पाहिजे, जबानी तलाक रद्द करायला पाहिजे अशी. खरं म्हटलं तर या मागणीच्या मागे त्यांची एक प्रमुख भूमिका होती ती अशी की, आपल्या सार्वजनिक जीवनात, सामाजिक क्षेत्रामध्ये धर्माला फार महत्त्व आहे. हा जो धर्माचा प्रभाव आहे आपल्या जीवनावर, तो हळूहळू कमी केला पाहिजे. तो कसा कमी करायचा? कुरुंदकर पण हेच म्हणायचे. सेक्युलॅरिझमचं उद्दिष्ट काय आहे? धर्माचा आपल्या जीवनावर जो परिणाम आहे तो हळूहळू कसा कमी करायचा? तर त्या दृष्टीनं हा जो मोर्चा आहे तो पहिली पायरी समजला गेला पाहिजे. आता हे मी जे बोलतेय ते मला आज कळतंय. त्या वेळेला कळत नव्हतं. त्या वेळी असं झालं की मोर्चा काढायचा, मोर्चा काढायचा. पण मोर्चा म्हणजे काय? कशाला काढतात? बायकांचा काढतात. मुसलमान बायकांचा काढतात? तर त्या वेळी असं होतं की बायकांचा मोर्चा म्हणजे बायकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं. ही फार मोठी गोष्ट आहे. इतिहासामध्ये घडलेली पहिली ऐतिहासिक बाब आहे. कुठलाही मुस्लिम इतिहास तुम्ही घेतला तर कुठल्याही मुसलमानांनी असा बायकांचा महत्त्वाचा मुद्दा घेऊन मोर्चा काढलेला दिसणार नाही. हमीद दलवाई असं संगठन करणारा पहिलाच आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व आम्हांला त्या काळामध्ये माहीत नव्हतं. समान नागरी कायदा आम्हांला त्या काळामध्ये माहिती नव्हता. कधी मला असं वाटलंही नाही की आपण मोर्चात जातो तर त्याची माहिती आपण काढू या. लोकांनी आपल्याला विचारल्यानंतर काय माहिती नाही म्हणायचं? मग दलवाई म्हणाले, बायकांचा मोर्चा निघतो तर तूही चल. मी पण तयार झाले.
आमच्या हातात फलक होते. आता आठवत पण नाही, कुठून आम्ही मोर्चा काढला. फलक काय होते? “समान नागरी कायदा झाला पाहिजे", "जबानी तलाक बंद झाला पाहिजे", "मुल्लांचा धिक्कार असो". असे फलक नुसते घ्यायचे. गुपचूप. मृणाल गोरे आमच्या बरोबर होत्या. बाकी कोणी लोक नव्हते. भाई वैद्य म्हणायला लागले की तू आम्हांला घेऊन मोर्चेबिर्चे काढू नको. हिंदूंना बरोबर घेऊन तू कसलंही काम करू नकोस. आम्ही तुझ्या मागं राहू. तुला पाहिजे ती मदत करू. पण हे तुझं काम मुस्लिमांपुरतंच मर्यादित ठेव. मग दोन माणसं असली तरी त्या दोन माणसांना घेऊन तू मोर्चा काढ. मग मोर्चात किती स्त्रिया? सात. सात स्त्रिया म्हणजे खूप झालं. त्या काळामध्ये हा ऐतिहासिक मोर्चा समजला गेला. मला वाटतं आम्ही मंत्रालयामध्ये गेलो. वसंतराव नाईक चीफ मिनिस्टर होते. ते निवेदन आम्ही दिलं. घरी आलो. सगळ्यांनी वाहवा केली. तरी कळलं नाही. 'अरे, तुम्ही मोर्चामध्ये जाऊन आलात! कशाला गेलात?' आपल्याला काहीही कळलं नाही. अशी मी मोर्चामध्ये जाऊन आले. पहिला मोर्चा आणि समजूत अशी झाली की मोर्चा म्हणजे काहीच नसतं. जायचं नि यायचं. गडबड नाही, काही नाही.
या मोर्चाबद्दल पेपरमध्ये लिहून खूप आलं. पण मला मराठी येत नसल्यामुळे मी पेपर वाचलेला नव्हता. पण खूप गाजावाजा झाला. लोकांनी शाब्बासकी दिली आणि वाटायला लागलं की दलवाई काही तरी काम करतात. गंमत एकच माझ्या लक्षात यायची. माझ्या माहेरी मला फ्रीडम नव्हतं. अन् या माणसानं मला फुलफ्रीडम दिलं होतं. हा माणूस बायकांच्या फेवरमध्ये आहे. किंवा बायकोला गुलाम म्हणून वागवणारा नाहीये. त्यामुळे आपल्यालाही फायदा होतो. आणि इतर बायकांचाही काही फायदा होत असेल. म्हणून येणारी जाणारी जी माणसं होती त्यांच्याशी सिंपथीनं बोलायचं, घरगुती प्रश्न मिटवायचे, हे काम मी करत होते. तेवढंच मला कळत होतं, तेवढंच काम मी करत होते. का, तर माझ्याकडे वेळ पण नव्हता तेवढं करायला. मग 'मराठा'मध्ये हे काम करत असताना सामाजिक काम जेव्हा खूप वाढायला लागलं तेव्हा असं वाटलं का आता काय करायचं? ६६ मधल्या मोर्चात मी दोन तीन महिन्यांची धाकट्या मुलीच्या वेळेला प्रेग्नंट होते. यानंतर ७-८ महिन्यांनी बाबूराव सामंत त्यांच्याबरोबर कोणीतरी ३/४ माणसं आणखी घेऊन आमच्याकडे आले. आणि त्यांनी असं सांगितलं की, भाभी, आम्हांला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. हमीद आता सामाजिक कामामध्ये जाणार आहे. तर तुमची संमती पाहिजे. हमीद तुमच्याशी आधी याबद्दल बोलला नव्हता का काही? 'नाही', त्यांना असं वाटलं असेल, की चार लोकांनी मेहरूला सांगितलं असं तर ती ऐकेल. नाहीतर वाद होणारच ना! पण त्यांनी मांडताना चांगलं मांडलं. ते म्हणाले, "बघा, तुमच्या घराला खर्च भागावायला किती रुपये हवेत? तुमच्याकडे जो पगार येतो तो पुरतो का?" 'नाही.' 'आम्ही पुरवतो.' तुमच्याकडे जबाबदारी खूप आहे. तर हमीदकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? किती पैसे मिळवले पाहिजेत त्याने? हमीद होतेच तिथे. सगळेच होते. मी म्हटलं माझं घर चालवायला माझा पगार ठीकाय. त्यांच्या घरी मदत जेबढी करता येईल तेवढी मी करेन. आणि यांना जर नोकरी सोडून हे काम करायचं असेल तर निदान त्यांचा खर्च त्यांनी काढावा. माझ्या पगारातून त्यांचा खर्च वेगळा देता येईल याची शक्यता नाही, मग उगाच वाद होतो. भांडणं होतात. आणि त्यांनाही असं वाटायला नको का मी बायकोवर अवलंबून आहे. त्यांनीही हे कबूल केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी 'मराठा'तली नोकरी सोडली. पण त्यांना पैसे द्यायची काय सोय केली होती बाबूराव सामंत. वगैरेंनी? ते मी विचारलेलं नाही. एकदा तर गंमत झाली. हे झाल्यानंतर काही दिवसांनी कपाटात मी बघताना मला थोडेसे पैसे मिळाले! त्यांच्या ड्रॉवरमध्ये. माझ्या डोक्यात असं आलं की हे एवढे पैसे इथं आले कुठून? आपल्याला दोनशे पगार मिळतो. हे तर जास्त दिसतात. कुठून आले? मी यांना विचारलं, तर यांनी काही मला सांगितलं नाही. सगळं काही सांगितलंच पाहिजे असं नाही, म्हणाले. पण मला काही बरोबर वाटलं नाही. मी शहासाहेबांकडे धावत गेले. त्या वेळी शहासाहेबांची, नगरकरांची- माझी ओळख झालेली होती, ह्यांच्या एका मीटिंगमध्ये. त्यांनी पण ही खटपट केली की हमीद हे प्रश्न घेऊन तू पुढे जा. तेव्हापासून त्यांची ओळख होती. तर शहासाहेबांच्याकडे गेले. नि त्यांना सांगितलं की त्यांच्या ड्रॉवरमध्ये मला असे पैसे मिळालेले आहेत. आमच्या घरात तर दारिद्य असतं, नेहमी पैशाची गरज लागते. चुकून मी ते पैसे घेतले, खर्च केले नि मला देता नाही आले तर घरात उगाच भांडणं नकोत. तर त्यांना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगा की हे पैसे घरामध्ये ठेवायचे नाहीत. ते पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आणि हिशोब करा. आणि त्यांना तुम्ही जाब विचारा हं. असं सोडू नका. असं बोलून मी घरी आले. शहासाहेब हसले मला. पण ह्यांना म्हणाले, 'नको ठेवू. तुझ्या बायकोला बरोबर नाही वाटत. मग हा वाद नको.' त्यानंतर आमच्या घरात पैसे आणून ठेवलेले नाहीत. शहांकडे सगळ्याचा हिशोब असायचा. त्यांना माहिती असायचं, पैसे कुठून आलेत, किती आले. सगळा हिशोब शहासाहेबांना माहिती असायचा.
एकदा इंडियन सेक्युलर सोसायटीची मीटिंग होती. दलवाईंना काही दुसरं महत्त्वाचं काम असल्यामुळे ते त्या मीटिंगला जाऊ शकत नव्हते. त्यांनी मला सांगितलं, आज तू जा. तिथं माझ्या ओळखीचे ए.ए.सॉलोमन, सी.आर.दळवी, मे.पुं. रेगे, इनामदार, सिन्हा असे खूप लोक होते. दलवाईंनी सांगितल्याप्रमाणे मी तिथे गेले.दुपार झाली, लंचची वेळ झाली. त्या सोसायटीची स्टेनो गोवानीज् होती. सारखी म्हणत होती, 'जेवायला आज दलवाई नाहीत. मी त्यांच्यासाठी डुकराचं मटण आणलं होतं. त्यांनी खावं अशी माझी इच्छा होती. पण आज ते आलेच नाहीत.' शहासाहेब म्हणाले, 'दलवाई नसले तरी काय झालं? त्यांची बायको तर आहे? काय झालं? तिला दे.'आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी कधी ते खाल्लं नव्हतं.तिला म्हटलं, 'वाढ मला. मला आवडलं तर मी खाईन.' मला ते खूपच आवडलं. मी ते खाल्लं.सगळे खूष झाले.शहासाहेब म्हणाले, 'ती हमीदची बायको आहे.'
घरातले सगळे फोन मी अटेंड करायची. एखाद्या ओळखीच्या माणसाचा फोन आला आणि तो फोनवर माझ्याशी न बोलता, 'हमीदभाईला फोन द्या.' असं म्हणाला आणि त्याने दलवाईंना जर आपल्या घरी गप्पा मारायला आणि जेवायला बोलावलं तर ते माझ्याकडे बघायचे आणि त्यांना सांगायचे, 'थांबा हं, मी मेहरूला विचारतो.' मग मी रागात म्हणायची की मला ओळखत असून ते माझ्याशी का बोलले नाहीत? मला त्यांच्याकडे यायचं नाही. तर माझ्या ते विनवण्या करायचे, मनवायचे. मी जायला तयार झाले की मग बोलावलेल्या माणसाच्या घराजवळच्या एखाद्या थिएटरमध्ये पिक्चर दाखवायचे. चांगल्या हॉटेलमध्ये खायला घालायचे. आणि मग त्यांच्या घरी मला न्यायचे. मी तिथं जाऊन बोअर होते, त्यांच्या चर्चेत भाग घेऊ शकत नाही ह्याची त्यांना जाणीव होती.
इंडियन सेक्युलर सोसायटीचे शहासाहेब प्रेसिडेंट होते आणि दलवाई व्हाईस प्रेसिडेंट होते. तेव्हा नगरकर होते. तेसुद्धा थोडी मदत करायचे. नगरकर, शहा हे शरद पवारांचे मित्र. म्हणून पवार ह्यांचे मित्र. असा सगळा मेळ जमला होता. आणि सगळ्यांना वाटायचं का दलवाईंनी हे काम करावं. आणि त्या निमित्तानं हे काम सुरू झालं. तेव्हा ते समाजकार्य करायला लागले. आणि त्यांचं वाचन वाढलं. पुस्तकं जमा करायची. ते झाल्यानंतर मग असा विचार आला, एखादी संघटना उभी करायची का? मग ती कशी करायची? त्याच्यावर बसून डिस्कशन केलं. २२ मार्च १९७० ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना भाईंच्या घरी झाली. माडीची खोली होती त्यांची. तिथं जोतिबा फुलेंच्या मंडळावरून नाव ठेवायचं ठरलं. सत्यशोधक समाज ठेवा. पण म्हणजे गोंधळच होतो. कोणी म्हणाले प्रोग्रेसिव्ह मुस्लिम असं हवं. अमूक ठेवा, असं. तर त्यांच्यानंतर हमीद म्हणाले, मुस्लिम सत्यशोधक ठेवा. याच्यावर वाद बराच झाला. मुसलमान यांच्यावर बरेच चिडले. मुस्लिम कशाला? मुसलमानांमध्ये काय हे सत्य शोधणार आहेत? मुस्लिम सोडा. आणि मग सत्यशोधक काय? आणखीन कुणाचं काय? नुसतंच सत्यशोधक याच्याकडे लक्ष वेधलं नसतं. पण मुस्लिम सत्यशोधक ठेवल्याने संघटनेकडे लक्ष वेधलं गेलं आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली.
मुसलमानांचा दलवाईंच्यावर आरोप होता, की तो आमच्यासमोर येत नाही. आमच्याशी बोलत नाही. आमच्याशी चर्चा करत नाही. तो नुस्ता हिंदूंच्या समोरच बोलतो. तो कोण आहे आमच्यात सुधारणा करणारा? आम्ही त्याला मुसलमानच समजत नाही. त्याला काय अधिकार आहे धर्माविरुद्ध आपली अशी मतं मांडण्याचा? तो कसला सत्यशोधक आहे? त्याचे विचार आम्हांला ऐकून घ्यायचे नाहीत. तो किती शिकलेला आहे? वगैरे... वगैरे... मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली २२ मार्च १९७० या दिवशी. जून महिन्याची गोष्ट आहे. दलवाईंनी असा विचार केला की आपण लीडरांशी बोलायचं नाही. आपण आता सामान्य मुसलमानांशी बोलायचं. त्यांच्यासमोर आपली मतं मांडायची. समाजामध्ये काय काय सुधारणा करावीशी आपल्याला वाटते त्यावर चर्चा करायची. हा विचार मनात घेऊन त्यांनी काही लोकांना आपल्याबरोबर घेतलं. आणि ते मोमीनपुऱ्यामध्ये जिथे मुसलमानांची वस्ती जास्त आहे तिथे गेले. पण तिथल्या लोकांनी त्यांच्याशी बोलणं तर लांबच राहिलं पण काठ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्यावर हल्ला केला, दगडफेक केली. तिथे जवळच पोलिसचौकी होती. दलवाईंना जखमी अवस्थेत तिथे नेलं गेलं. त्या वेळी मी मुंबईला होते. सकाळी उठल्याबरोबर पुण्याहून फोन आला, "तुम्ही पेपर वाचला असेलच तर घाबरू नका. हमीदभाई चांगले आहेत. काळजी करायची गरज नाही.” मला काही कळेना. अहो, इतक्या सकाळी पेपर वाचायला कुणाला वेळ असतो? घरातली कामं आवरायची की पेपर वाचत बसायचं, सावकाश पेपर वाचण्याची सवय. त्यामुळे ते काय बोलतात? काही वेळ कळलंच नाही. मग त्यांनाच मी विचारलं. काय आहे पेपरात? त्यांनी डोक्याला हात लावला असेल! पण मी तरी काय करणार? 'हमीदभाईंनी तुम्हांला फोन करायला सांगितला आहे.' मी म्हणाले, त्यांना जर काही झालं नाही तर हे स्वतः फोनवर का आले नाहीत. 'मेहेरबानी करून तुम्ही मुंबई सोडून पुण्याला येण्याचा प्रयत्न करू नका. यासाठी फोन केला आहे.' फोन ठेवला. काय झालं ते पेपर वाचून कळलं. हे सगळं थंड झाल्यावर मुंबईला आले. पण या विषयावर फारशी चर्चा झाली नाही.
नोकरी सोडल्यानंतर फुल टाईम काम हेच सुरू झालं. तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांची परिषद पुण्यामध्ये झाली. ७३ मध्ये. त्यात मी होते. त्यांच्या जवळजवळ सगळ्या प्रोग्रॅम्समध्ये मी होते. पहिली मीटिंग बांद्रयाला झाली. विषयाची माहिती नाही. कसं बोलतात माहिती नाही. महंमद दलवाई म्हणजे ह्यांच्या आतेभावाचा मुलगा, माझ्या आत्तेबहिणीचा नवरा. (त्या वेळी नव्हता असा संबंध.) हे दोघे लहानपणापासून बरोबर वाढलेले. शिक्षण दोघांचं बरोबरीनं झालं. सगळे हाल दोघांनी बरोबर काढले. मित्र पण होते. नातेवाईक होते, हितचिंतक होते. महंमददांनी ह्यांना खूप मदत केली. पहिल्या मीटिंगमध्ये ते मला घेऊन गेले. बांद्रयाला. स्टेजवर दलवाई उभे राहिले. आम्ही खाली सतरंजीवर. नुसती मुस्लिमांची मीटिंग ठेवता येत नाही. आताही नाही. कारण त्यामध्येही हितचिंतक हिंदू असतात, त्या काळात हिंदू जास्त, मुस्लिम कमी. पण मुसलमान असायचे. काही बोलायचे. टीका करायचे. तर तशी मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये हे बोलले, बोलताना ह्यांना घाम फुटला. हे घाबरतात, हे पण माझ्या लक्षात आलं. वेळीसुद्धा. मीटिंग झाली. लोकं म्हणायला लागले, काय छान बोलतो रे, काय हा माणूस चांगलं बोलतो रे! आम्ही मागं बसलेले असल्यामुळे महंमददा म्हणाले बघा, काकी बघा, काय लोक हमीदबद्दल बोलतात. त्यांना पण खूप कौतुक वाटायचं. त्या मीटिंगनंतर दलवाईंनी मला विचारलं, 'मेहरू, कशी झाली ग मीटिंग? म्हटलं, खूप चांगली झाली. लोक असं असं म्हणत होते. पण मला एक अक्षरही कळलं नाही, तुम्ही काय बोलता त्यातलं. कशाबद्दल बोलला काही कळलं नाही, तुम्ही बोलत होता खूप चांगलं. लोक तुमची तारीफ करत होते. त्यावरून तुम्ही चांगलंच बोलत असाल असं मला वाटलं.' मग आम्ही रस्त्यानं गेल्यानंतर लोक म्हणायचे, 'बघ, बघ, हमीद दलवाई चाललेत, काय छान बोलतात.' हे म्हणायचे, 'बघ तुझ्या नवऱ्याची कशी तारीफ करताहेत, ऐक तू. तुला काहीच वाटत नाही?' असं ते चेष्टा बिष्टा करत विचारायचे.
त्यांचा विषय असे मुस्लिम समाज. मुसलमानांचे राजकारण, समाजकारण हे काय आहे, त्यांचा इतिहास काय आहे, भूगोल काय आहे? ते म्हणत, ज्या माणसाला भूगोल समजत नाही, त्याला इतिहासही कळणार नाही. मुसलमानांची चूक इथंच आहे की त्यांना भूगोल कळलेला नाही. त्यांनी त्याच काळामध्ये पुस्तक पण लिहिलं. अजून ते पुस्तक प्रकाशित झाले नाही.
'इंधन' कादंबरी छापली गेली. महाराष्ट्र सरकारचं पहिलं बक्षीस तिला मिळालं. आणि त्यानंतर गाववाल्यांनी यांना वाळीत टाकलं आणि तिथं गोंधळ घातला, कुळवाडी लोकांना भडकवलं तिकडे. तुमच्याबद्दल हमीदखाननी असं असं लिहिलेलं आहे. त्यामुळे तिथे वाद झाला. दंगल झाली. दोन महिने आमच्या घरावर बहिष्कार टाकला. आमच्या बाबांची दाढी करायला न्हावी येत नसे. डोंगरावर घर होतं. खालून आमच्या बायका पाणी वर न्यायच्या. तर त्यांना गडी मिळत नसे. बायकांचे आमच्या हालच झाले. खूप त्रास झाला. इथे आमच्या घरावर दगडफेक झाली. निनावी पत्रं आली. म्हणजे मारण्याच्या धमक्या आल्या. त्या वेळी मला हे सगळं कळलं ना!
पहिला 'लाट' कथासंग्रह निघाला. रूबीनाच्या वेळेला, ५८-५९ मध्ये. ६६ ला 'इंधन' निघाली. इलाच्या वेळेला. तर तेव्हा मी पुण्याला येणार होते डिलिव्हरीला. ती आलेच नाही. मुंबईत राहिले. घरावर दगडफेक झाली. मारण्याच्या धमक्यांची निनावी पत्रं मला आली. त्याच्यात माझी डिलिव्हरी झाली. गावाची परिस्थिती खूप खराब झाली. मग काय करायचं? मग इथल्या २०० पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन इथून गेले तिकडे. तिथं मग काही लोकांनी मिळून त्यांचा मोठा सत्कार केला. नि तो वाद मिटला मिरजोळीला.
पहिलं ‘लाट' पुस्तकं निघालं ना तेव्हाही त्याच्यावर असाच वाद झाला. त्यात 'कफनचोर' गोष्ट होती. हमीदखाननी वाटेल ते लिहिलेलं आहे असं म्हणून खूप वाद झाला. त्याच्यावर बहिष्कार वगैरे टाकला. आपल्या समाजाच्या विरुद्ध लिहितोय. खोटी गोष्ट आहे. कोण असा कफन चोरी करणार आहे!' अहो सगळ्यांकडे सगळं चालत असतं. पण काय खरं म्हटलं तर हिस्टॉरिकल फॅक्टस् नको असतात लोकांना. फॅक्टस् तुम्ही जर सांगायला गेलात तर त्याचा वाद होतो. पण आपण ते बोल्डली लिहिलं पाहिजे ना, की हे असं घडतं म्हणून. त्या पुस्तकावर खूप वाद झाला. 'लाट'सुद्धा खूप गाजली तेव्हा. सगळे म्हणाले, त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत्या. चांगल्या समजल्या गेल्या आहेत. नंतर दलवाईंनी साधना, सत्यकथा, मराठवाडा, माणूसमध्ये आणखी लिहिलं. पुष्कळ अजून गोष्टी आहेत. त्यांचं संकलन करायला पाहिजे. साधनामध्ये खूप आलेलं आहे. लाट हे तर छोटंसं पुस्तक १३ गोष्टीचं. तेवढ्याच मिळालेल्या आहेत.
वर्ष आठवत नाही. पण मुस्लिम पर्सनल लॉ वर दुसरा मोर्चा झाला. ऑल इंडिया लेव्हलवर मुंबईच्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये गुप्त मीटिंग घेतलेली होती मुस्लिमांची. तिथं फोटोग्राफर्स, रिपोर्टर्स अलाऊड नव्हते. मुसलमानांनी घेतलेली मीटिंग हो. त्यामध्ये दलवाईंना बंदी. त्यामुळं आमची माणसं गुप्तपणे आत शिरू शकली नाहीत. काही ठिकाणी मीटिंगमध्ये आमची माणसं अशी गुप्तपणे जाऊन रिपोर्ट आणत असत. त्या वेळी हे झालं नाही. त्या मीटिंगला प्रोटेस्ट म्हणून आम्ही मोर्चा काढला... बॉम्बे सेंट्रलला एस.टी.चा डेपो आहे. त्याच्याजवळच बी.ई.एस.टी.चा डेपो आहे. मग महाराष्ट्र कॉलेज आहे. एस.टी.च्या डेपोच्या बाहेर सगळ्यांनी जमा व्हायचं... युवादलाची काही मुलं होती. राष्ट्र सेवा दलाची काही आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाची काही होती. तर याच्यामध्ये २५ जण होतो. बायका थोड्याच होत्या. बायकांचा संबंध तिथं नव्हता. प्रोटेस्ट म्हणजे बायकांच्यासाठी नव्हता. तो मोर्चा काढायचा होता प्रोटेस्ट म्हणून, त्याच्यात आम्ही दोन-तीनच बायका होतो. मी आणि अॅडव्होकेट नजमा होती. एक-दोन अजून बायका होत्या. तर आम्ही तिथं जमा झालो. दुपारपर्यंत, मोर्चाला ये, असं यांनी मला सांगितलं नाही. मोर्चा आहे असं मला माहिती होतं. आमच्याकडे सगळे जमा झाले, जेवणं झाली, सगळे निघाले तेव्हा हे मला म्हणाले, 'असा असा मोर्चा आहे. तुला यायचं असेल तर ये. तुला ऑफिसला सुट्टी घ्यावी लागेल.' मी म्हटलं, 'मी येणारच.' ऑफिसला अर्धा दिवस सुट्टी घेतली आणि मी तिथं मोर्चाला गेले. पहिल्या मोर्चाचा अनुभव होता ना, चुपचाप गेलो, आलो, काहीच झालं नाही, ही कल्पना घेऊन या मोर्चात गेले. तिथं गेल्यानंतर आमची लोकं उभी सगळी लायनीत. हातात फलक घेऊन. तिथं, त्या एरियात मुसलमानांची २००० घरं आहेत. आणि जागोजागी चार-पाच माणसं जमा झालेली मला दिसली. गट असे जमा झालेले. ते बघून मी थोडी घाबरले. अब्दुल कादीर मुकादम आमचे एक कार्यकर्ते होते. ते आधी बी.ई.एस.टी.मध्ये होते. त्यांना मी म्हटलं, 'मुकादम, हे लोक का हो जमा झाले आहेत?' ते म्हणाले, 'भाभी, तुम्ही लक्ष नका देऊ त्याकडे.' यांनी मुकादमला सांगितले होतं का तू भाभीला सांभाळ, तिला कसलीच कल्पना नाहीये. आणि ते पुढे आले. मी म्हटलं बोलता बोलता, इथे गडबड झाली मुकादम, तर जायला जागा कुठली? आपण कुठल्याही घरात शिरलो तरी मुसलमानांच्याच घरात शिरणार. तो तर आपल्याला ठेवणार नाही. मग आपण काय करायचं अशा प्रसंगात? तर त्यांनी सांगितलं, 'पुढे बेस्टचा डेपो आहे. तिथं आमचा चौकीदार बसलेला आहे. त्याला मी सांगितलं आहे आमचं कोणी आलं तर त्याला प्रोटेक्शन द्यायचं. तुम्ही काही घाबरू नका.
आता मोर्चा सुरू झाला. आजूबाजूंनी २०० पोलिसांचा पहारा उभा, आणि समोर २००० चा मॉब उभा. मॉब आम्हाला मारण्यासाठी, लोकांची गर्दी मोर्चावर हल्ला करायचा नि तुटून पडायचं म्हणून आणि आमच्याजवळ थोडीशी माणसं आली. जेव्हा आम्ही स्लोगन्स द्यायला सुरुवात केली, तेव्हा येऊन अंगावर तुटून पडायला लागली. तेव्हा पोलिसांनी खूप प्रोटेक्शन दिलं. म्हणजे बेस्टचा डेपो येईपर्यंत पोलीस त्यांना बाजूलाबाजूला करत गेले. आणि मॉब जमा झाला खूप. पोलिसांच्या आटोक्यात राहिला नाही. सगळे इकडे तिकडे झाले. नजमा शेख जी होती ती ४-५ महिन्याची प्रेग्नंट होती. तिनं माझा हात घट्ट धरलेला होता, गंमत अशी की दलवाई असे चाललेले होते, त्यांच्याबरोबर प्लेन क्लोथ्समध्ये सी.आय.डी. पोलीस ऑफिसर चाललेले होते. आणि ते समोरचे जे लोक होते त्यांना हे माहिती नाही की हमीद कोण? हे पुढे चालले सिग्रेट फुंकत. त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा भीती नाही. अजून त्यांचा तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर आहे. पोलीस त्यांना मागे ओढतील तर हे पुढे. पोलिसांना मागं सारून हा मनुष्य बेफिकीरपणे पुढेच चाललेला आहे. पोलिसांना जड जात होतं त्यांना थोपवणं. पण पोलीस चांगले होते, त्यांनी खूप चांगलं प्रोटेक्शन दिलं. हे लोक जेव्हा आमच्यावर तुटून पडले, तेव्हा मी व नजमा धावून बेस्टच्या डेपोमध्ये गेलो. त्यानंतर इथं बाहेर काठ्या, लाठ्या, तलवारी, सोडावॉटरच्या बाटल्या असा धुमाकूळ घातला. आम्हांला वाटलं, आमच्या सगळ्या लोकांच्या कत्तली झाल्या. आम्ही आत लपून बसलो दोन तास. इथं लढाई चालू होती. तिथं काय झालं? असं म्हणतात का तिथं पोलिसांची व्हॅन आली. त्यांनी आमच्या सगळ्या लोकांना भराभर आत बसवलं. बंद व्हॅन असते. व्हॅन बंद केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मी व नजमा दिसत नाही. हे म्हणाले, 'बाबा रे, या दोघी बाहेर राहिलेल्या. मी काही जात नाही. मला खाली उतरू द्या, मला त्यांना शोधायला पाहिजे.' सगळे म्हणाले, तुम्हांला तर मारायला लोकं जमा झाली आहेत खाली. अब्दुल कादीर मुकादम म्हणाले, भाभींनी असं असं विचारलं होतं. भाभी नक्कीच डेपोमध्ये गेल्या असतील आणि मग ते उतरले. पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये आत आले. मग पायधुणीला मोर्चा नेण्यात आला. आम्हांला मागच्या दाराने प्रायव्हेट गाडीतून पायधुणीला नेण्यात आलं. मधुभाई पंडित वगैरेंना किरकोळ मार लागला होता. आणि मग तिथं विचारपूस झाली. रात्री १२ ला आम्हांला घरी आणून सोडलं. नंतर २/३ महिने आमच्या घरावर पोलिसांचा पहारा असायचा. आणि मला अशी दहशत बसलेली होती. पहिला मोर्चा आणि दुसरा मोर्चा एकदम विरुद्ध. इतकी दहशत बसली की बाहेर जाताना भीती वाटायची की कोणी आपल्याला मारेल का, आणि मग माझ्या लक्षात यांच्या कामाचं स्वरूप आलं. हे जे करतात ते अशा टाइपचं कामच. बोहरा लोकांचा, त्यांचा धर्मगुरू सय्यदनांच्या विरोधात, जो व्हीटीला मोर्चा काढण्यात आला होता त्यात दलवाईंनी पुढाकार घेतला होता. त्या मोर्च्यात मीसुद्धा होते. मला आठवतंय, खूप गडबड झाली होती. ही चळवळ जवळजवळ दलवाईंनीच सुरू केली असं म्हणायला हरकत नाही. याबद्दल त्यांनी मारही खाल्ला आहे.
ए. बी. शहा इंडियन सेक्यूलर सोसायटीचं काम करत होते. प्रेसिडेंट होते. व्हाईस प्रेसिडेंट दलवाई होते. हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं काम करत होते. पैशाची अडचण असायची. नेहमी दोघांचे प्रोग्रॅम जॉईंटली व्हायचे. शहासाहेब ह्यांच्या कामात खूपच रस घ्यायचे. चार-पाच डिसेंबर १९७१ ला All India Forward looking Muslims Conference दिल्लीत झाली. त्यात जवळ जवळ १०० डेलिगेटस् आले होते, सगळ्या प्रांतांचे. त्यात रेझोल्यूशन पास केले गेले. समान नागरी कायद्याचा, फॅमिली प्लॅनिंगचा. आणि त्या वेळी बांगला देशमध्ये जी स्वातंत्र्यासाठी चळवळ झाली तिला आम्ही सपोर्ट केला होता. अशा रीतीनं ही कॉन्फरन्स झाली. ही पहिली कॉन्फरन्स होती. मी पण त्यांच्या बरोबर गेले होते. कॉन्फरन्स काय हे मला काही माहिती नव्हतं. तिथं आम्ही नगरकरांच्या घरी राहिलो. दोन दिवसांची ही कॉन्फरन्स झाली. तिला नगरकरवहिनी आणि मी बरोबर गेलो होतो.
तिथं माझ्या काकाची मुलगी पण भेटली. धाकटी. तिनं सांगितलं का जाताना एक ब्लँकेट माझ्या वडिलांसाठी घेऊन जाशील का? हो म्हटल्यावर त्या हॉलमध्ये तिनं मला ते आणून दिलं. हॉलमध्ये दिवसभर आम्ही बसलो. बघितलं. लोकं आलेली. शिकलेला वर्ग होता. कॉन्फरन्स खूप चांगली झाली. एवढंच मला कळलं. बाकी काय मला कळत नव्हतं. संध्याकाळी सगळं संपल्यानंतर मी जेव्हा निघाले तेव्हा ह्यांचं त्या लोकांमधून लगेच घरी निघायला मन होईना. मला म्हणाले, "तू कुमुदवहिनींबरोबर जा. मी येतो नंतर." मी जरा चिडले. म्हटलं, "दिवसभर झालं ना, आता बास झालं. आता घरी चला. आपण दमलोय की नाही?" ते म्हणाले, "चल, चल तू घरी. मी येतो." तर वहिनी म्हणाली, “जाऊ दे. आज एवढी कॉन्फरन्स झाली, तो किती खुषीत आहे. सगळ्या लोकांना सोडून त्याला जाता येत नाही. तू कशाला लक्ष देतेस? चल आपण जाऊ." माझ्या हातात ते ब्लँकेट होतं. ते जड होत होतं. आणि मला एकटीलाच ते घ्यायला लागलं म्हणून मी आणखीनच चिडले. ते वहिनीच्या लक्षात आलं. तिनं ते ब्लँकेट घरी आणलं. घरी आल्याबरोबर नगरकरांना सांगितलं का "भाभी जरा फुगलीए. हमीद आला नाही ना, म्हणून तिला थोडासा राग आला आहे." तर ते मला चिडवायला लागले. "काय तुझा नवरा, एवढा मोठा सोशल वर्कर आहे. त्याने केवढी कॉन्फरन्स घेतली. तू खुषीत यायचं तर आपली फुगून बसलीस." सगळे जणच थट्टा करायला लागले. मी म्हटलं, “मी तर सोडून आलेलीच आहे ना. त्यांना कुठं इथं यावंसं वाटतंय. ते गप्पा मारण्यात मशगुल." नगरकर म्हणाले, "असं काही नाहीये. तुझी समजूत आहे ती." तितक्यात फोन आला, मला म्हणाले, “जा, जा, जा. तुझाच फोन आहे. हमीदचाच फोन आहे." मी म्हटलं, "नाही. मला फोन करायचं काय कारण? त्यांना तर आता माझी आठवणसुद्धा नसेल. मी काही फोन घ्यायला जाणार नाही." ते म्हणाले, "हे बघ, भाभी तू फोन घे. हमीदने तुला हे विचारायला फोन केलेला आहे की ही कॉन्फरन्स कशी झाली?" मी म्हटलं, “मला काय समजतं?" “अग, तू बघ आणि मग सांग. आणि तू खरं तेच सांग त्याला. चांगल्या शब्दांत सांग. त्याला नाराज करू नको." नगरकर ह्यांना फार जपत होते. मी फोन घेतला. यांचाच फोन. मला म्हणाले, "काय मेहरू, तू घरी पोचली ना? चांगली पोचली ना? आपली कॉन्फरन्स कशी झाली? तू मला सांग तुला कसं वाटलं?" म्हटलं, “मला काही कळत नाही." "तुला जेवढं कळतं तेवढं मला पुष्कळ आहे. लोक तर सांगतात, खूप छान झाली. तुला कसं वाटलं?" आणि मग मला असं वाटलं का हा माणूस माझ्यासारखीचं मत का घेत असेल? मला कळत नाही म्हटल्यावरसुद्धा तो पुन्हा विचारतो नि माझं मत घेतो म्हणजे त्याच्या नजरेमध्ये मी पण कोणतरी आहे. तर मी म्हटलं, "खरं सांगू, खूपच चांगली झाली. मला पण खूपच आनंद झाला. तुम्ही एवढं काम केलेलं आहे. मला फारसं कळलेलं नसलं तरी मला ही कॉन्फरन्स आवडली. खूप लोकं आलेली. एवढ्या मोठ्या लोकांना आपण भेटलो आणि सगळ्यांना तुम्ही मला इंट्रोड्यूस करून दिलं, ही माझी बायको आहे म्हणून.” मी एका कोपऱ्यात बसले नि माझ्याकडे लक्षच दिलं नाही असं काही झालेलं नव्हतं आणि एवढं सगळं झाल्यानंतर मला म्हणाले, "थोड्या वेळाने मी येतो. तू काय राग धरू नको. तुम्ही जेवून घ्या. माझ्यासाठी काही थांबू नका." हे आपला वेळ काढून घरी आले. घरी आल्यानंतर रागवायचं काही कारणच नव्हतं राहिलं. नगरकर म्हणाले, "बघ, मी काय सांगत होतो? हमीदच्या मनात काय आहे? उगाचच आपलं रुसायचं, रागवायचं. नवऱ्याला त्रास द्यायचा.” म्हणून परत चिडवायला लागले. आम्ही तिथं दोन दिवस होतो. वहिनी म्हणाली की, “तू हमीदच्यावर डिपेंडंट राहू नको. दिल्लीला इतक्या वर्षांनी आली आहेस. तुला फिरायला कुठे मिळणार? तर तुला टूरिस्ट गाडीमध्ये बसवते. तू एकटी जाऊन फिरून ये. मला वेळ नाही आणि मला झेपत पण नाही. मला घरात सगळं करायचंय. तर तू जा ना. गाडीमध्ये खूप लोकं असतात. तुला काय हरकत आहे?" असं करून दुसऱ्या दिवशी त्यांनी मला गाडीत बसवलं. मी जाऊन फिरूनबिरून आले. मला एकटंच फिरायला थोडंसं वाईट वाटलं. असंही वाटलं की नवरा असून आपण एकटं जातो. आपल्याबरोबर एंजॉय करायला तो नाही. पण मग माझ्या लक्षात आलं की आपण नवरा-नवरा करता कामा नये. वहिनीसुद्धा म्हणाल्या, “तू नवरा-नवरा करू नको. असं केल्यानंतर तो जखडून राहील. तो काम कसा करेल? तुझ्याकडून फुल् को-ऑपरेशन मिळालं नाही तर तो काहीही करू शकणार नाही. एवढं लक्षात ठेव. ह्या लोकांचं असंच असतं. हे मलाही आवडत नाही. पण मी असं बघितलंय. माझाही नवरा असाच आहे." नगरकर मला सकाळी न्यायचे फिरायला. तिथं दलवाईंबद्दल बोलायचे, 'तू असं कर भाभी, तसं कर. हमीद असा आहे.' त्यांना इतकं प्रेम होतं. त्यांच्या कामावर इतके खूष होते की ते मला दलवाईंबद्दल सारखं कौतुकाने सांगायचे. वहिनी वेगळं सांगायची, ते वेगळं सांगायचे.
नंतर आम्ही दोन दिवसांनी गाडीनं आलो परत. फर्स्टक्लासचं तिकीट होतं. कूपेचं. कूपे म्हणजे काय, आपल्याला माहीत नव्हतं. तर मी म्हणाले, “आपल्या डब्यात दोनच सीट कशा आहेत?" हे म्हणाले, “याला कूपे म्हणतात आणि नुसते नवरा-बायकोसाठी असतात. तिसरा कोणी इथं येणारच नाही." आणि असं त्यांनी मला खूष केलं. परत जाताना मला असं वाटलंसुद्धा नाही की काही घडलंय नि आपण रागावलो होतो. अशा त-हेने आमचा तो पहिला मोठा प्रोग्रॅम झाला.
१९७३ च्या मार्चमध्ये मुंबईत मुस्लिम सोशल रिफॉर्म्स कॉन्फरन्स अशी एक कॉन्फरन्स झाली. त्याच्यात जवळजवळ २५० महिला-पुरुष सगळे मिळून होते. त्याच्यामध्ये ए.ए.ए. फैजी आलेले होते. फार महत्त्वाची गोष्ट आहे हं ही. त्यांच्यासारखा माणूस आपल्या कॉन्फरन्सला येतो! कुलसुम पारेख होत्या. ए.बी. शहा होते. मी पण ह्या कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता. एक ठराव इंग्रजीमध्ये लिहिलेला होता. आणि मला सांगण्यात आलं होतं की हे वाचून दाखव. तो वाचायला मला किती जड गेलं! माझं इंग्लिश चांगलं होतं. टाईप केलेला कागद बघून वाचायला काय लागतं? पण मला ते वाचतानासुद्धा घाम फुटला. कारण स्टेजवर जायची सवय नव्हती. नंतर माझी लोकांनी इतकी टिंगल केली. आमच्याच लोकांनी. काय, एवढं सुद्धा तुला वाचता आलं नाही? हे पण होते. गालातल्या गालात हसत होते. प्रो. मोइन शाकीर यांनी ती इनॉगरेट केली होती कॉन्फरन्स. दलवाई तिचे अध्यक्ष होते. ही कॉन्फरन्स सुद्धा खूप चांगली झाली.
१९७३ डिसेंबरला कोल्हापूरला कॉन्फरन्स झाली. शैक्षणिक. ७५० मुस्लिम्स आलेले होते. २०० स्त्रिया होत्या. सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या होत्या. त्यामध्येही काही रेझोल्यूशन्स पास केले गेले. ते काय होते? वक्फचा जो पैसा आहे तो मिसयूज कसा होतो? तो स्वतःच्या पर्सनल खर्चासाठी कसा खर्च होतो? राजकारणासाठी कसा होतो? त्याचा ट्रस्टींनी हिशोब द्यावा अशी मागणी केली होती. त्याच्यानंतर हा वक्फचा पैसा कशासाठी खर्च करावा? तर आम्ही त्यांना सुचवलं होतं मॉडर्न सायन्स बेस्ड एज्युकेशन, म्हणजेच विज्ञानावर आधारलेलं शिक्षण. असं शिक्षण मुलांना दिलं तर ती आपोआप आपल्या पायावर उभं राहू शकतील. आणि दुसऱ्याच्या बरोबर काँपिटिशनमध्ये उतरू शकतील. मग त्या कॉन्फरन्समध्ये असंही ठरलं की मुस्लिमांनीही त्या त्या प्रांतांची भाषा शिकावी. म्हणजे मी महाराष्ट्रात राहात असेन तर माझी भाषा मराठी झाली पाहिजे, गुजरातमध्ये असेन तर गुजराती झाली पाहिजे, बंगालमध्ये असेन तर बंगाली. मी उर्दू शिकू नये असं नाही. उर्दू ज्यांना शिकायचं त्या सर्वांनी शिकावं पण असं म्हणून चालणार नाहीए की मी मुस्लिम आहे तर माझी भाषा उर्दूच आहे. आणि मी दुसरी भाषा शिकणार नाही. का, तर असं करण्यामुळे आपल्याला नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळणार नाही. म्हणून प्रादेशिक भाषांमध्ये सगळ्यांनी शिक्षण घ्यावं. आणि या कॉन्फरन्समध्ये असंही ठरलं, जी टेक्स्ट बुक्स आहेत शाळांमधली, त्यांचं क्रिटिकल अॅनॅलिसिस झालं पाहिजे, एक्झामिनेशन झालं पाहिजे. त्या पुस्तकांमध्ये काय काय आहे? म्हणजे नुसत्या धार्मिक गोष्टी लिहून मुलांचा ब्रेनवॉश करण्यापेक्षा सगळ्या धर्मांची जर माहिती दिली तर ते मूल बाहेर गेल्यावर सेक्यूलर बनेल. मदरसामध्ये नुसतं धार्मिक शिक्षण दिलं जातं, तर ही मदरसा सिस्टिम बंद करावी. म्युनिसिपालिटीच्या शाळेत गेला तरी मुलगा सेक्यूलर होईल. दुसऱ्या समाजाबरोबर कसं वागायचं ते त्याला समजेल. तर मदरसेवर जास्त भर देऊ नये, असा दलवाईंचा पहिल्यापासून विश्वास होता. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची भूमिकाच ही आहे. त्याचा एकच हेतू असा होता की आपल्या रोजच्या जीवनामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये धर्माला फार महत्त्व असतं. ते हळूहळू कमी करायचं. धर्माचा प्रभाव आपल्या सार्वजनिक जीवनामधून हळूहळू बाजूला करायचा. सगळ्या गोष्टी आपण धर्मावर ठेवून देतो. धर्मावरच जर आपण डिपेंडंट राहिलो तर दुसऱ्या समाजाबरोबर आपण जाणार नाही. वेगळा धर्म म्हणून वेगळी आयडेंटिटी ठेवण्याचं आपल्याला कारण काय आहे? जर भारतामध्ये राहायचं असेल तर सगळ्यांची आयडेंटिटी एक झाली पाहिजे, हा उद्देश ठेवूनच सगळ्या कॉन्फरन्स पार पडल्या.
महिलांच्या जिथे कॉन्फरन्स झाल्या ना, तिथं त्यांनी उठायचं आणि आपले अनुभव सांगायचे, अशाच झाल्या. आता अमरावतीलासुद्धा कॉन्फरन्स झाली. तिथं बायकाच बोलल्या नि ते खूप प्रभावी झालं. त्याच सांगत होत्या की आम्हांला तलाक कसा दिला, नवऱ्यांनी कसं सोडलं, आम्ही कसं बाहेर पडलो. या कॉन्फरन्समागे एकच हेतू होता की, लोक म्हणायचे की तलाकचा प्रश्नच नाहीए. एरवी महिला बोलत नाहीत, त्यांना बोलतं करण्यासाठी खास कॉन्फरन्स घेऊन त्यांना चान्स दिला होता. मुस्लिम महिला बाहेर येऊन बोलल्या असंही पहिल्यांदाच झालं. कारण आपलं दुःख चारचौघांत सांगायची त्यांना संधीच नसायची. ही संधी या मुस्लिम सत्यशोधकांनी दिली. तलाकपीडित महिलांचे अनुभव ऐकून थक्क झाले होते सगळे लोक.
ह्या सगळ्या कॉन्फरन्सेस यांच्या हयातीत झाल्या. आता गंमत काय, हा माणूस जगला किती? तेवढ्याच आयुष्यात हे काम त्यांनी केलं. कामाच्या प्रेशरमुळे सुद्धा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला असेल. कसं? रात्री-बेरात्री येणं-जाणं, भाषणं करणं, बोलणं, डिस्कशन्स करणं याच्यात सगळी एनर्जी जातच होती.
कोल्हापूरला तीन दिवसांची शैक्षणिक परिषद घेतली तर ती फार मोठ्या प्रमाणात घेतली होती. मुसलमानांत शिक्षणाबाबत प्रसार करण्याचं काम योजलं होतं. ही परिषद यशस्वी करण्याकरता हुसेन जमादार, सोलापुरे, शिपुरकर आणि श्याम पटवर्धन यांनी खूप मेहनत घेतली.
कोल्हापूरला ह्यांची तब्येत बिघडली. टूरिस्ट हॉटेलमध्ये राहिलो होतो. तिथंच तब्येत बिघडली, म्हणजे ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागला. काही खाल्लं की उलटी व्हायची. गेल्याबरोबर हे सुरू झालं आणि इतकं प्रकरण वाढलं की डॉक्टर बोलावले. औषध दिलं.
तिकडे परिषद सुरू झाली. त्यातला पहिला दिवस ह्यांना परिषदेला जाताच आलं नाही आणि मग काही मुसलमानांनी बोलायला सुरुवात केली, "हा भ्याला. त्याची तब्येत बरी नाही असं नाहीए. तो आपल्याला घाबरला आहे. म्हणून तो आपल्यासमोर येत नाही." अमुकतमूक खूप गोष्टी बोलू लागले. आणि तिथले रिपोर्ट हॉटेलमध्ये यायला लागले. मग मी म्हटलं, "आपण जाऊन येऊ या. बघू दे त्यांना.” “पण उभं राहवत नाही. बोलू शकत नाही. मग काय करायचं?" आम्ही त्यांना टॅक्सीमध्ये घालून त्या जागेवर नेलं. तिथं स्टेजवर नेऊन बसवलं. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की खरोखरच त्यांची तब्येत बिघडली आहे. या वेळी त्यांनी थोडंसं भाषण केलं. म्हणजे नावाला ते बोलले. बोलायला त्यांना ताकदच नव्हती. बोलता येत नव्हतं. पण शहासाहेब होते. सुरेश शिपुरकर, श्याम पटवर्धन, सोलापुरे या सगळ्यांनी ती परिषद सांभाळून घेतली. खूप गाजली ती परिषद.
त्याच्यानंतर काय झालं, हे दौऱ्यावर जायचे. जागरणं व्हायची. खाण्यापिण्याची आबाळ व्हायची. त्यामुळे किरकोळ गोष्टी सुरू झाल्या. ॲसिडिटीचा त्रास खूप वाढला. डॉक्टर गोखले म्हणून होते, माटुंग्याला दवाखाना त्यांचा. फार चांगले मित्र होते ह्यांचे. सुरुवातीपासून त्यांचंच औषध हे घ्यायचे. त्यांनी औषध चालू केलं. पण दुखणं खूप वाढत गेलं. म्हणजे प्रत्येक वेळी टूरवरून आले की दोन दिवस ते आजारी असायचे. डॉक्टरचं औषध घेतलं की तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. परत त्रास व्हायचा. जळजळ, खाल्लेलं न पचणं, काही खावंसं न वाटणं. म्हणजे नुसती उलटीच होते असं नाही. जळजळ होणं आणि दूध घेतलं की बरं वाटणं. जरासुद्धा तेलकट नको, तुपकट नको, काही नको असं. उलटीचं सेन्सेशन होणं, हे सगळं सुरू झालं होतं. जयसिंगपूरचे सा.रे.पाटील हे दलवाईंचे मित्र होते. त्यांनी दलवाईंना हवापालटाकरता बोलावलं. आपल्या गावात एक घर घेऊन दोन महिने तिथं आम्हा दोघांना ठेवलं. भांड्याकुंड्यांची, नोकरचाकरांची औषधपाण्याची व्यवस्था केली. अतिशय आपुलकीनं त्यांनी हे सारं केलं. मग एक दिवस तर असं झालं की, त्यांची तब्येत फारच बिघडली. त्या वेळी माझी धाकटी नणंद आली होती. आयेशा. आणि घरात सगळी होती. हुसेन होता, त्याची बायको होती. मी ऑफिसात गेले होते आणि हे फोन घ्यायला गेले. फोनवर बोलता बोलता चक्कर आली आणि ते पडले खाली. खाली पडले तर घरातल्या लोकांनी उचलून घातलं पलंगावर. पण कोणी घरी डॉक्टर बोलावला नाही. मी संध्याकाळी आले जेव्हा घरी, तेव्हा ह्यांच्याभोवती सगळे जमा झालेले दिसले. म्हणून मी विचारलं, "काय झालं?" तर दादांचं असं असं झालं." "झालं ना. मग इथं डॉक्टर आहे, कोणी डॉक्टर आणला का?" "नाही." "मग सगळ्यांनी काय केलं? म्हटलं, त्यांनी लाख सांगितलं असेल, पण तुम्ही नको का डॉक्टरला बोलवायला?" मग मी गेले. डॉक्टर भटना घेऊन आले. त्यांनी तपासलं. औषध दिलं. औषध दिल्यानंतर ते म्हणाले की हे औषध घेऊन बघा. पण दलवाईंचं दुखणं काही बरोबर वाटत नाहीये. तुम्हांला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल त्यांना. ते झाल्यानंतर एक दिवस लघवी बंद झाली. लघवी बंद झाल्याबरोबर त्रास व्हायला लागला. ते सकाळपासून बेचैन झाले. महंमद दलवाईंना मी बोलावून आणलं. तेच जवळ राहत होते. मग मी डॉ. प्रधानांना बोलावलं. विचारल्यानंतर ते म्हणाले, "ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा." "कुठल्या हॉस्पिटलमध्ये घालायचं?" ते म्हणाले, "नानावटी हॉस्पिटल चांगलं आहे. आपल्या घराजवळ पडेल.” तर मी म्हटलं, "नको बाबा, नानावटी हॉस्पिटलचा रिपोर्ट काही चांगला नाहीये. आमच्या ऑफिसमधली किती माणसं गेलेली परत आली नाहीत. आपल्याला ते नको. चांगला दवाखाना पाहिजे. लांब असला, मला त्रास झाला तरी चालेल." मी फार घाबरून गेले असं नाही. का तर संयम कुणाला तरी ठेवावा लागतो. आणि माझ्यात तो होता. मी पहिल्यापासून लेचीपेची, घाबरणारी अशी नव्हते. स्वतः दलवाई पण तसे नव्हते. मग नंतर डॉ. गोखल्यांना फोन केला. डॉ. गोखले म्हणाले की भाटियामध्ये ॲडमिट करू या. भाटियामध्ये ॲडमिट करण्याआधी आम्ही डॉ. गोखल्यांकडे त्यांना नेलं. तिथं त्यांनी दलवाईंना तपासलं. औषध दिलं, लघवी तपासली. तिथं लॅबोरेटरीमधील माणसं बदलली असल्यामुळे रिपोर्ट चुकीचा आला. लघवीमध्ये युरिया असूनसुद्धा रिपोर्टमध्ये आलं नाही. म्हणून थोडासा घोळ झाला. पण ती नवी माणसं होती म्हणून आम्ही डॉक्टरला काही दोष दिला नाही. डॉक्टर खूपच चांगले होते. लहानपणापासून ह्यांना बघत होते. त्यांच्यावर आमचा काहीच संशय नव्हता. शिवाय भाटिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यामुळेच अॅडमिट झालो. जनरल वॉर्ड मिळाला. कारण स्पेशल वॉर्डमध्ये जागाच नव्हती. जनरल वॉर्ड मिळाला तर तो पुरुषांचा वॉर्ड, त्यामुळे मला रात्रीचं रहाता यायचं नाही. दिवसभर मी रहायची, मग रात्री महंमद दलवाई रहायचे. नाही तर हुसेनशेठ रहायचे, नाही तर महंमददांचा भाऊ अमीर रहायचा आणि मी सकाळी जायची. तसं ते हॉस्पिटल चांगलं होतं. डॉक्टर चांगले होते. औषधं चांगली होती. पण दलवाईंच्यावर त्याचा काही परिणाम होईना. सुधारणा होईना. आणि माझेसुद्धा असे हाल झाले की दिवसभरात मला रिलीव्ह करायला कोणी नव्हतं. माझ्या घरातलं असं कोणी नव्हतं. म्हणजे जे यायचे ते संध्याकाळी यायचे. थोडा वेळ बसायचे आणि निघून जायचे. शहासाहेबांनी काही लोकांना सांगितलं होतं, की भाभीला त्रास होतो. दुपारी कोणी बसत जा. पण कोणाला ते जमलं नाही. मला पण त्रास व्हायला लागला. मला रात्रीचे अकरा व्हायचे घरी जायला. त्यांचं सगळं आटपल्याखेरीज मी घरी जाऊ शकत नसे. भाटियामध्ये वीस दिवस राहिले. पण काही उपयोग झाला नाही. रोज शहासाहेबांना रिपोर्ट द्यायचा. शहासाहेब रोज यायचे भेटायला. नगरकरांना सांगायचे.
लघवी यांना चांगली होत होती. पण लघवी जास्त होते की कमी होते यावर किडनीचं काम कसं आहे हे ठरवता येत नाही. काही लोकांच्या तर दोन्ही किडन्या खराब झालेल्या असतात, तरी त्यांना लघवी चांगली होते. पण जे युरिया नावाचे विष लघवीद्वारे बाहेर पडायला पाहिजे ते पडत नाही. तेव्हा लघवीवरनं काही कळत नाही. किंवा आपण म्हणतो की पाणी नाही पीत म्हणून किडनी बिघडते. असंही काही नसतं. त्यानंतर वीस दिवस झाले तरी त्यांची तब्येत सुधारेना. आता काय करायचं? सबंध अंगावर सूज आली. पाणीसुद्धा जाईना. सगळ्यांना चिंता पडली. काही लोक म्हणायला लागले की इथली ट्रीटमेंट चांगली नाही म्हणून सुधारणा होईना. नंतर काय झालं की, डॉक्टरांची बैठक झाली. शेवटच्या दिवशी सगळ्या डॉक्टरांची बैठक. त्याच्यात मग शहासाहेब, नगरकर, शरद पवारसाहेब, गोविंद तळवलकर सुद्धा होते. डॉक्टरांनी सांगितलं की, दलवाईंना किडनीचा ट्रबल झालाय. किडनीचा ट्रबल म्हणजे काय, हे तेव्हा आम्हांला कळलं. दोन्ही किडन्या खराब झाल्यावर हा ट्रबल चालू होतो. माणसाला एक किडनी असते का दोन असतात हे सुद्धा पेशंटला माहीत नसतं. ते एक्स-रे सुद्धा फार भयंकर आहेत. ते काढल्यानंतर कळतं. सगळ्यांच्या किडन्या सारख्या नसतात. एक किडनी खराब झाली तर ती ते काढू शकतात आणि दुसऱ्या किडनीवर माणूस जगू शकतो. पण दोन्ही किडन्या खराब झाल्यानंतर ही परिस्थिती येते. हिला ट्रान्सप्लांटच करायला पाहिजे.
किडनीशिवाय तर चालणार नाही. खराब झालेली किडनी ठेवून चालणार नाही आणि दोन्ही काढून टाकूनही चालणार नाही. आता काय करायचं? कुठल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं? तर त्याला एक इलाज आहे - डायलिसिस. त्या मशिनवर बसायचं. दहा तास डायलिसिस करायचं. दुसरा इलाज आहे काय? तर दुसरा इलाज आहे. ऑपरेशनचा इलाज आहे. पण समजा भावाची किडनी, आईची किडनी, वडिलांची किडनी, बहिणीची किडनी दिली तर पुस्तकी ज्ञानाप्रमाणे पेशंट दहा वर्षं जगू शकतो. आणि ही सगळी नसतील अन् दुसऱ्या नातेवाईकाची दिली किंवा परक्या माणसाची दिली तर पेशंट पाच वर्षं जगू शकतो. ही पुस्तकातील गॅरंटी. मग आता काय करायचं? तर पुढचं सगळं करण्यासाठी हॉस्पिटल बदलावं लागेल. दलवाईंना चांगली ट्रीटमेंट द्यायचीय. त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं, असं ठरलं. जसलोक हॉस्पिटल तेव्हा नवीनच झालेलं होतं. चांगलीचांगली मशिनरी तिथं आलेली होती. डॉ. कुरुव्हिला सारखे स्पेशालिस्ट होते. कामतांसारखे सर्जन होते. ते फार प्रसिद्ध होते म्हणून सगळ्यांनी सूचना केली की जसलोक हॉस्पिटलमध्ये उद्या या माणसाला अॅडमिट करायचं. हे सगळं ठरलं आणि नगरकर बाहेर पडले त्या रूममधून. मी बाकड्यावर बसले होते. मला काही माहीत नव्हतं. ते आले. त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, डॉक्टरांनी असं असं सांगितलं आहे. आपण किडनी मिळवून देऊ. काही हरकत नाही. भावाची किडनी चालते. दलवाईंना सख्खा भाऊ नव्हता आणि किडनी घातली तरी जुळली पाहिजे ना. बाहेर किडन्या ७५ हजार, एक लाख, पन्नास हजार रुपये अशा विकत मिळत होत्या. तर यांची आपण ही सोय करू असं नगरकरांना वाटलं. ठीक आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं, जसलोकमध्ये ॲडमिट करायचं. दुसऱ्या दिवशी दलवाईंना तिथून उचललं अन् जसलोकमध्ये ॲडमिट केलं.
ट्रान्स्प्लांट अजून खूप लांब आहे. ट्रान्स्प्लांट ही गोष्ट शेवटची. मनुष्य जगेल का मरेल हा शेवटचा निर्णय आहे. ट्रान्सप्लांट लगेच आज केलं असं नाही. जसलोकमध्ये गेलो तर एका रूमचे रोजचे शंभर रुपये पडत होते. पॉश रूम होती. दोन कॉट होत्या. शहासाहेब म्हणाले, नगरकर म्हणाले की मेहरू रहाणार आहे बरोबर, तिची पण सोय केली पाहिजे. ती त्रास घेणार आहे, तिला त्रास होऊन कसं चालेल, ती धडधाकट राहील तर हमीदचं बघेल. असा त्यांनी माझा खूप विचार केला. खाण्याची तिथं सोय केली आणि ॲडमिट करून ते गेले. गेल्यानंतर मी आणि हेच राहिलो. तर मला हे म्हणाले, "मेहरू, हे काय झालं?" मी म्हटलं, "काही नाही. आता आपली टेस्ट होणार आहे. अजून कन्फर्म झालेलं नाही. टेस्ट झाल्यानंतर आपण विचार करायचा, काय आहे ते." त्यामुळे तिथं आम्ही राहिलो ते पंधरा दिवस त्यांनी टेस्ट घेण्यात घालवले. लघवी घेतली, अमुक घेतलं, तमुक घेतलं. बाहेरचे रिपोर्ट त्यांना चालत नाहीत ना. रक्त टेस्ट केलं, ब्लडप्रेशर नव्हतं, हार्ट ट्रबल नव्हता, डायबेटिस नव्हता, असा काही विशेष रोग नव्हता. त्या टेस्टस् सगळ्या घेतल्या अन् टेस्टस् घेतल्यानंतर कन्फर्म झालं की किडन्या खराब झाल्या आहेत. आता काय करायचं, हा प्रश्न पडला. डॉक्टरांनी हे सांगितल्यावर आम्ही दोघं खूप अपसेट झालो. काही समजेना. लाख रुपयांचा खर्च. आपल्याकडे तर तेवढे पैसे नाहीत. कुठून एवढे पैसे आणणार? अन् हा रोग जाईल कसा? काय ट्रीटमेंट असेल? ट्रीटमेंटचे सुद्धा एवढे पैसे! नावसुद्धा ऐकलेलं नाही. कुठून एवढे पैसे येणार? यांनी माझे दोन्ही हात घट्ट धरले न् म्हणाले, “मेहरू, हे काय झालं ग. काय झालं हे!" मी म्हटलं, "घाबरायचं काही कारण नाही. आपण करू ना. माझ्या प्रॉव्हिडंट फंडातून मी पैसे काढीन. कुठे कुठे ठेवलेले काढीन. जितकं होईल तितकं आपण करू. तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही हा विचार करायचा नाही. तुम्ही हा विचार केलात, घाबरलात, तर रोग कसा बरा होईल? अन् मी कुणाच्याकडे बघणार?"
आता या अगोदरची एक गोष्ट सांगायची आहे. हे जेव्हा भाटियामध्ये होते तेव्हा यांचे एक चुलतभाऊ हसनशेठ म्हणून होते. यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते आणि ह्यांना आपल्या मुलासारखं सांभाळायचे. ते तिकडे येऊन बसायचे. दिवसाचे येऊन बसायचे. औषधपाणी आणायचे. तिथनं डिस्चार्ज मिळाला तेव्हा हजार रुपये बिल आलं होतं. ते त्यांनी भरलं. आणि सांगितलं की हमीदखान हा माझा मुलगा मी समजतो अन् कधी काही लागलं तर माझ्याकडे मागायचं, भाभी. अशा रीतीनं त्यांनी ते पार पाडलं, एवढं त्यांनी केलं.
जसलोकचा मुक्काम सुरू झाल्यानंतर आता ट्रीटमेंट काय सुरू होणार आहे, याच्याकडे लक्ष दिलं. एक पारसी डॉक्टरीणबाई होती तिथं. ती म्हणाली, चल माझ्याबरोबर. अन तिनं मला बरोबर नेलं. आम्ही दहाव्या फ्लोअरवर होतो, तिनं मला एकोणीसाव्या फ्लोअरवर नेलं. तिथं डायलिसीसचं मशीन ठेवलेलं होतं. तिनं थोडंसं दार उघडून सांगितलं, 'बघ ते पेशंट कसे बसलेत.' बघितलं, तिला विचारलं, 'हे काय आहे?' तिनं सांगितलं, “हे मशीन आहे, इथं रक्त प्यूरिफाय होतं. एका नळीतनं रक्त काढतात, दुसऱ्या नळीतनं भरतात." मी म्हटलं, "एवढंच ना." मला वाटलं की एखाद्या वेळेला करावं लागत असेल. रोज बसतात हे कुणाला माहिती? मी विचारलं, "केव्हा केव्हा बसायला लागतं?" ती म्हणाली, "दहा तास बसायला लागतं. एक दिवसाआड. आणि माणूस जिवंत आहे तोपर्यंत.” हे ऐकलं अन् माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. अन् म्हटलं, बाप रे, ही ट्रीटमेंट कशी काय होणार? आणि याच्यामध्ये मनुष्य जगेल कसा? हे एवढं मी बोलले तिला आणि मी सोडलं तिला. मला काही सुचलं नाही. अन् अशी मी दलवाईंच्या रूममध्ये आले. माझ्या चेहऱ्यावरचं हा माणूस वाचत होता. त्यांना लगेच कळायचं की हिच्या मनात काहीतरी हालचाल चालू आहे. मला म्हणाले, “खरं सांग मेहरू. तू एकही गोष्ट माझ्यापासून लपवू नकोस. तू जशी सारं घट्टपणे घेतेस की नाही, तसं मी पण घेणार आहे. मी पण घाबरणार नाही. आपण दोघांनी मिळून हे सहन करू या. पण तू मला खरं-खरं सांग आणि मी त्यांना सांगितलं. त्यांनी ते ऐकलं. त्यानंतर त्यांना पण खूप वाईट वाटलं त्या वेळी. पण मला म्हणाले, "बरं झालं. कशी तुला शिक्षा झाली. आता मी गेलो की बस तू. मग कुणाशी भांडणार आहेस बघू तू." असं करून तो विषय त्यांनी टाळला.
नंतर ट्रीटमेंट अशी सुरू झाली. पैसा कुठून आणायचा? तर नगरकर म्हणाले, पैशाची काळजी करायला नको. मी व्यवस्था करतो भाभी. भाभींनी नुसती रजा घ्यायची, हमीदची देखभाल करायची. भाभीनं हमीदकडे बघायचं. नवरा आहे. बायकोच त्याचं सगळं करू शकते. भाभीनं तसं करायचं. चार माणसांची कमिटी नेमली. नगरकर, शहासाहेब, मी आणि शरद पवार. शहा होते पुण्याला. मी होते मुंबईला. नगरकर होते दिल्लीला आणि पवार येऊन-जाऊन. कुठलाही हमीदचा निर्णय घ्यायचा तर या चौघांना विचारा आणि चौघांना नाही जमलं तर जो त्या वेळी असेल त्याला विचारून करा. पण पाचवा माणूस मध्ये घेऊ नका. आणि बायको सतत आहे ना? मग भाभीनं निर्णय घेतला तरी आम्हांला चालेल. तिनं आपल्या नवऱ्याचा निर्णय खुशाल घ्यावा आणि त्यांना पण असं वाटत होतं की मी निर्णय घेऊ शकेन. शहासाहेब म्हणाले की ती निर्णय घेऊ शकेल. काही हरकत नाही. का, की मी दररोजचा रिपोर्ट सगळ्यांना द्यायची.
जसलोक हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी आम्ही भाटिया हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा मी शहासाहेबांच्या घरी होते. भाटिया हॉस्पिटल जवळ पडतं म्हणून. जेवायला झोपायला मी शहासाहेबांकडे असायची. रात्री घरी गेल्यानंतर सगळे रिपोर्टस् त्यांना द्यायची. दुसऱ्या दिवशीचा त्यांचा अॅडव्हाइस घेऊन मी दवाखान्यात यायची. जसलोकमध्ये आल्यानंतर रात्रीचे अकरा वाजल्याशिवाय मला घरी जाता यायचं नाही. रात्रीचे रहायला अब्दुल कादीर मुकादम असायचे. त्यांनी दलवाईंची खूप सेवा केली. ते नाही तर कोणी तरी रात्री त्यांच्याबरोबर असायचे. अमीर असायचा, महंमददा असायचे. कोणी तरी असायचे. पण त्यांना यायला वेळ लागायचा. एके दिवशी अशीच रात्रीची शहांकडे यायला निघाले. रस्ता क्रॉस करायला लागले. थोड्या अंतरावर बसस्टॉप. मी बसनं जायची. टॅक्सीनं एवढ्या रात्रीची कशी जाणार? आणि रोज एवढे टॅक्सीचे पैसे कशाला खर्च करायचे? ती बस अगदी घराजवळ उभी राहायची. म्हणून त्या बसनं जायची. तर रस्ता क्रॉस करताना एक टॅक्सी माझ्या मागे लागली. चार माणसं तिच्यात बसलेली. सगळ्यांनी मला घेराव घातला. मी जीव घेऊन धावत सुटले. रस्त्यावर कोणी नव्हतं. मी कसाबसा रस्ता क्रॉस केला. बसस्टॉपवर एकच माणूस उभा होता. त्याच्याकडे गेले आणि म्हटलं, "मला जरा वाचवा. ही टॅक्सी माझ्या मागे लागलीय." त्यानं असं बोलायला सुरुवात केली की जशी मी त्याच्याच बरोबर आहे. ते टॅक्सीवाले थोडा वेळ तिथं उभं राहिले आणि निघून गेले. बस आली आणि आम्ही तिच्यात चढलो. त्या माणसानं मला विचारलं, 'तुम्ही इथं कशाला आलात?' तर म्हटलं, 'माझा नवरा आजारी आहे.' 'नाव काय आहे त्यांचं?' मी म्हटलं, 'हमीद दलवाई.' तर तो म्हणाला, 'पाय पकडतो तुमचे. मी त्यांचा फॅन आहे. मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे. फार चांगलं झालं की आज मला तुमची सेवा करायचा चान्स मिळाला.' त्यानं सगळी विचारपूस केली. माझा स्टॉप आल्यावर मी खाली उतरल्यावर म्हणाला, 'नाही नाही, मी घरी सोडतो तुम्हांला.' त्यानं मला घरी सोडलं. शहासाहेबांना सांगितलं की असा असा माणूस मला घरी सोडून गेला. शहासाहेब म्हणाले, नाही. आजपासून तुम्ही असं रात्रीचं एकटीनं यायचं नाही. मग ते टॅक्सी घेऊन माझ्यासाठी यायचे. मला घेऊन घरी जायचे. माझ्याबरोबर जेवायचे. शहासाहेबांनी खूप केलं. का तर ह्यांना आपल्या मुलासारखे समजत होते ते. इतकं प्रेम एखाद्या माणसाला असू शकतं याची मला कल्पनाच नाही. सख्खं नातं नाही, एक रक्त नाही. ते म्हणतात ना, रक्ताचं नातंबितं, असं काही नसतं. त्यांनी मग निर्णय असा घेतला की भाभीनं इथं रहायला नको. व्यवस्था जवळ करू. सोय कुठं करायची? तर रामटेकला पवारसाहेब होते. तिथं गेस्टहाऊस बरीच होती. त्यांनी मला तिथं नेलं न् विचारलं की इथं रहाणार का? तर पवारवहिनी म्हणाल्या की, 'जेवणखाण सगळं या वेगळं कुठं करीत बसणारेत? मीच सगळं करीन.' मी म्हटलं, "नाही, मला तुम्ही सगळं वेगळं द्या. माझं मीच सगळं करून घेईन. एवढा भात टाकीन. माझी मुलं इथं नाहीयेत. हे हॉस्पिटलमध्ये. मी एकटी आहे. माझं मी कसंही करून घेईन. डोकं टेकायला जागा पाहिजे." ते घर हॉस्पिटलपासून जवळ होतं. म्हणजे बसनंच जावं लागायचं, पण फार लांब नव्हतं. शहासाहेबांच्या घरापेक्षा हे जरा बरं पडत होतं. कधी कधी टॅक्सीनं गेलं तरी परवडायचं. त्या वेळी शरद पवार एक साधेच मिनिस्टर होते.
ठरलं तसं आम्ही तिथं रहायला आलो. सामानबिमान आमचं सगळं आणलं. सामान मांडलं सगळं. पण हे हॉस्पिटलमध्ये जास्त रहायचे न घरी तर कमीच रहायचे. मला घरी आल्यानंतरसुद्धा काय करायचं हा प्रश्नच पडायचा. मग मी काय ठरवलं? रोज मी नाहीच घरी यायची, रात्रीचंसुद्धा तिथंच रहायची. दोन दिवसांनी घरी यायची. आंघोळ करायची. कपडे बदलायची. माझ्या जेवणाखाणाचे खूप हाल व्हायचे. हॉस्पिटल खूप महाग. नुसत्या नास्त्याला पाच रुपये पडायचे. त्या काळात पाच रुपये म्हणजे खूप होते. आज पाच रुपयांना किंमत नाही. जवळपास उडप्यांची हॉटेलं. डोसा खा, इडली खा, सांबार खा. पैसे जास्त पडतात म्हणून कमी खा. मला कुणी असं सांगितलेलं नव्हतं की कमी खा. उलट शहासाहेब, नगरकर असे म्हणायचे की तुम्ही तुमच्या खाण्याची आबाळ करायची नाही. हमीदसाठी जो पैसा उभा होईल त्यातच तुमचा हा खर्च मांडला जाणार आहे. तुम्ही बिनपगारी रजेवर आहात तर तुम्हांला पगार मिळणार नाही हे गृहीत धरलेलं आहे. तुम्ही तुमचे हाल करायचे नाहीत. दलवाईंना खाण्याचा, हॉटेलचा, फार षौक होता. कुठल्या हॉटेलमध्ये काय चांगलं मिळतं ते पण माहीत असायचं. दुपार झाली की मला सांगायचे की, “मेहरू, तू अमुकअमुक हॉटेलात जा. ते अमुक अमुक ठिकाणी आहे. तिथं अमुक अमुक वस्तू मिळते, ती खाऊन ये." अन् कधी कधी मी जाऊन खाऊन आले की म्हणायचे; "कसं होतं? मी काय म्हटलं होतं? कशी चव लागली?" त्यांना खायला हॉस्पिटलचं जेवण होतं. ते चांगलं होतं. तिथं स्वयंपाक करणाऱ्यांपैकी एक मुसलमान होता, एक पारसी होता, एक ख्रिश्चन होता. मग सगळ्या त-हेची जेवणं मिळायची. त्यांना एकच होतं की मीठ खायचं नाही आणि पाणी प्यायचं नाही. मीठ अजिबात नाही आणि पाणी लिमिटेड. एक माप होतं, ते नर्स घेऊन यायची तिकडे. ग्लासभर पाणी घेतलं, प्यायले, असं नाही. जेवणबिवण फर्स्टक्लास आणायचे. चिकनबिकनचे असे पीसेस. सगळं चांगलं असायचं. सुरुवातीला ते खायचे. पण नंतर नंतर जेव्हा जाईनासं झालं तेव्हा एका प्लेटीत वेगळं काढायचे. ते मी खायची. त्यांचं उष्ट खायचं नाही. त्यांचं वेगळ्या प्लेटीत काढून ठेवायचं आणि बाकीचं आपण खायचं. एकोणीस का वीस रुपये एका टायमाचे होते तेव्हा. आता पन्नास रुपयांना तसलं जेवण मिळणार नाही. इतकं मस्त जेवण असायचं. फ्रूट, गोड वगैरे त्यांना सांगितलं असेल तसं असायचं. माझे मात्र खूप हाल झाले. खूप खायला नको वाटायचं. दुसरे देतात म्हणून फुकट खायला नको वाटायचं. कशाला आपण त्यांचा खर्च वाढवायचा, असं वाटायचं. एकदा कुमार सप्तर्षीने मला काहीतरी हजार-बाराशे रुपये आणून दिले. म्हणाला, भाभी हमीदचा तर सगळा खर्च निभतो. त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुमच्याकडे कुणाचं लक्ष कसं असणार? तुमचं घरात कसं चाललेलं आहे हे मी समजू शकतो. म्हणून मी प्रोग्रॅम घेऊन हे पैसे जमा केलेले आहेत. आमच्याकडनं ही तुम्हांला मदत. कुमार सप्तर्षी ह्यांचे चांगले मित्र होते. युक्रांदमधले होते. काम बरोबरीनं करायचे. असे पुष्कळ मित्र होते त्यांचे. कोणी पाय मागे ओढणारा नव्हता. हा आजारी पडला म्हणून त्या सगळ्यांना असं वाटत होतं की हा आजार वाईट, त्यांना त्रास होऊ नये.
शेवटी डायलिसिस सुरू झालं. डायलिसिस ही भयंकर गोष्ट आहे. डायलिसिस रूममध्ये नेतात. हातावर दोन्ही नसा- रक्त आत आणणारी अन् बाहेर प्रवाह नेणारी अशा जोडल्या जातात. फिश्चुलाचं ऑपरेशन असतं आणि मग दोन्ही नसांमध्ये सुया टोचायच्या, बेडवर झोपायचं, मशीन लावलेलं आहे, त्या मशीनचा आवाजसुद्धा इतका भयंकर, कुठं असा आवाज आला ना, की मला अजून वाटतं की मी डायलिसिसच्या रूममध्ये आहे. इतका तो आवाज माझ्या डोक्यात गेलेला आहे. नळ्या दोन्ही हाताला लावतात, सहज नस मिळत नाही. पन्नास वेळा टोचावं लागतं. हाताला नाही मिळालं तर पायाला टोचतात. काही नळ्या लावूनच ठेवलेल्या असतात, कायमच्या. त्याला नुसती सुई जोडायची आणि थोड्या वेळाने एका नसेमधनं सबंध रक्त शरीराबाहेर काढलं जातं, शुद्ध होतं आणि शरीरात जातं. ह्याच्यात रक्त कमी होतं. क्लॉट होण्याची भीती असते. क्लॉट झाला की मनुष्य खल्लास. त्याला वारंवार रक्त द्यावं लागतं. त्या माणसाचं ब्लड प्रेशर अप अँड डाऊन कधीही होऊ शकतं. त्यांचा हात धरून मी दहा तास बसायची, तोंडाकडे बघत. की हा माणूस जिवंत आहे का मेलाय, हे मुठीत हात धरून बघायचं. त्यांना त्या १० तासांमध्ये पाण्याचा एक घोट सुद्धा देत नसत. जेवणसुद्धा लिमिटेड असे. ते १० तास त्यांनाच नाही मलाही शिक्षा असायची.
बाथरूमला गेले तरी नर्सला सांगायची, जायची, चटकन परत यायची. हात धरूनच बसायची. का तर ते सोडायचे नाही हात आणि मला पण जावंसं वाटायचं नाही. असं वाटायचं, इथं काही झालं तर काय करायचं? आपण जर जवळ बसलो काही झालं तर असं सांगता येतं, बघा नर्स, काय झालं ते बघा. क्लॉट झाला का बघा, अमूक झालं का बघा. मशीनवर नजर ठेवून बसायची. म्हणजे आपलं पण दिवसभराचं अन्न-पाणी नाही. विश्रांती नाही. सारखं टेंशन. खुर्चीवर बसून टेंशन घालवायचं आणि आसपास सगळे तसलेच रोगी. लहान मोठे, कोणाशी तुम्हांला बोलायला नको. काही बोलणारा एकही मनुष्य नाही. बाहेर उठून जाण्याची सोय नाही आणि त्यातच उलट्या पण व्हायच्या. उलटी झाली का ताबडतोब आपण ट्रे घेऊन जायचं. उलटी पुसून काढायची. हे आपण करायचं किंवा नर्सला सांगायचं, तिनं करायचं. नर्स येईपर्यंत अंगावर होऊ नये म्हणून जपायचं. त्यानंतर सगळं आटपल्यावर पेशंटला - असा मुडद्यासारखा झालेला पेशंट - स्ट्रेचरवर नेऊन त्याच्या रूममध्ये टाकायचा. एकदा खोलीत गेला का तो झोपलाच. पण दुसऱ्या दिवशी मात्र तो फ्रेश व्हायचा. दुसरा दिवस नॉर्मल जायचा. नॉर्मल दिवशी मग खाणं-पिणं, बोलणं, हासणं-बिसणं व्हायचं. ताकद वाटायची. पण तेवढ्यापुरतीच. रात्र गेली का दुसऱ्या दिवशी डायलिसिस आहे याचं टेंशन यायचं. संध्याकाळ झाली का मलूल व्हायचे. उद्या परत डायलिसिस. त्यांना डायलिसिस प्रकार आवडायचा नाही. दहा तास पडून राहाणं आवडायचं नाही. पण गरज असायचीच. त्याच्याशिवाय तो जगणारच नव्हता. दोन दिवस नाही केलं तर तिसऱ्या दिवशी हाताला पेशंट लागत नसे. एक दिवस जगवण्यासाठी दहा तासांचं डायलिसिस तेव्हा करावं लागे. आता म्हणतात दोन तासांचं आहे. तीन तासांचं डायलिसिस आहे. घरी मशीन घेऊन जा, असं सगळं निघालेलं आहे. औषधांमध्ये फरक झालेला आहे. त्या वेळी तसं नव्हतं. डायलिसिसच्या दिवशी कुणीही भेटायला येऊ नका, असं सांगण्यात आलेलं होतं. त्या रूममध्ये कोणालाही जाऊ दिलं जायचं नाही.
दुसरा दिवस चांगला जायचा. तेव्हा लोकांची रांग लागायची. रोज येणारी माणसं होती. पाळीपाळीनं एक दिवस येणारी माणसं होती. माणसांची अशी झुंडच्या झुंड असायची. मग विनोद, हसणं, बोलणं. मग त्यांच्यासमोर बसायला कॉट, खुर्च्या. उभं रहायला परवानगी, जागा होती. आणि दलवाई म्हणजे मोठा माणूस समजत होते. कोणी ऑर्डिनरी माणूस नाहीये. कोणी तरी मोठा. समोरच्या बेडवर सकाळी अशी सतराशे साठ पेपर्सची रांग लावलेली. ते दोन तास मी सगळे पेपर्स वाचून दाखवायची. फक्त इंग्लिश. मराठी मला वाचता यायचं नाही. त्यावर ते कॉमेंट करायचे. मला बोलायचे ही अमूक न्यूज, तमूक रिपोर्ट वाच. ते सांगायचे आणि मी वाचायची. डॉक्टर म्हणायचे, चांगला तुम्हांला मिळालेला आहे माणूस, सगळं तुमचं करतो. अशी चेष्टा-बिष्टा करायचे. ते डॉक्टरसुद्धा खूप चांगले होते. डॉ. कुरुव्हिला नि डॉ. कामत. दोघेही खूप चांगले होते. डॉ. कामत फॉरेनला जाऊन आलेले. इंग्लिश फ्ल्यूअंट बोलणारे. काय कपडे असायचे! तरुण होते. तेव्हा हे म्हणायचे, काय सुंदर दिसतो ग. कपडे बघ. त्याच्या पँटची किंमत काय असेल, टायची किंमत काय असेल. अशी थट्टा मस्करी. ते डॉक्टरसुद्धा मिक्सअप होणारे होते. जरासुद्धा मिजास नव्हती. माणसांशी कसं बोलावं ते त्यांना चांगलं माहीत होतं. यायचे, बोलायचे, विनोद करायचे. मला काही डिफिकल्टी असली तर डॉ. कुरुव्हिलांचे क्वार्टर्स तिकडेच होते. तिथं जायची. प्रायव्हेटली काही गोष्टी विचारायची. ते सगळे माझं समाधान करायचे. हिला काय कळतंय, हिला आपण कशाला सांगायचं, असं काही नव्हतं.
डायलिसिस चालू असताना पेशंटच्या जवळ एक माणूस असायचाच. पेशंट गेला तर सांगणार कुणाला तुम्ही? ही भीती होती. एरवी नसलं तरी डायलिसिसच्या वेळेला माणूस असायलाच पाहिजे. त्यामुळे माणसं तिथं असायचीच.
डायलिसिस चालू असताना फार त्रास व्हायचा. अंग थंड पडायचं. सगळं अंगचं रक्तच बाहेर निघून गेल्यावर अंगात गर्मी येणार कशी तुमच्या? रक्त बाहेर पडून मग हळूहळू शुद्ध होत होत आपल्या शरीरात शिरणार. त्यात कैक रक्त कमी व्हायचं. ते भरून कसं काढणार? मग २-४ दिवसांनी रक्ताच्या बाटल्या लावा. ते ब्लड चांगलं असलं पाहिजे. मॅच झालं पाहिजे. खूप प्रोसिजर असायची. त्यांची औषधं खूप महाग असायची.
सुरुवात झाली तीच मुळी एक दिवसाआड डायलिसिस अशी. मग पैशाचा प्रॉब्लेम आला. मग सगळ्या पेपरमध्ये जाहीर केलं, दलवाईंना असं झालेलं आहे. कोणाला मदत करायची आहे त्या प्रत्येकाने चेक पाठवायचे. जसलोक हॉस्पिटलची बँक होती. त्या नावावर चेक यायचे. ते तिथं भरले जायचे. सगळ्या पैशाचा हिशेब शहासाहेब बघायचे. त्यांनी मला सांगितलं होतं, तुम्ही हिशेब घ्या. मी त्यांना म्हटलं होतं, मला पैशाचा हिशेब नको. मी पैसे सोडून सगळं काम करीन. मला पैशाचं काम जमणार नाही.
सर्व महाराष्ट्रातून पैसे आले. लाख रुपये जमा झाले. पन्नास हजार सरकारचे म्हणजे उरलेले पन्नास हजार लोकांचे. दलवाईंच्या औषधपाण्याला पैसे कमी पडले असं नाही. बिलं जी यायची ती शहासाहेबांना द्यायची. शहासाहेब पेड करायचे. आठवड्याची बिलं तेव्हा २-३ हजार. म्हणजे त्या काळात २-३ हजार किती झालं? इतकं महाग पडायचं ते. डायलिसिसचा खर्च ४०० रुपये आणि रूमचा १०० रुपये. त्या दिवशी आम्ही रूम सोडून वर जायचे ना, तरी रूमचा १०० रुपये खर्च. त्या काळात ५०० रुपये स्वस्त नव्हते. पण आम्हांला त्रास झाला नाही. डोक्याला तसा ताप झाला नाही. आणि हे जेव्हा सुरू झालं, पैसे जेव्हा यायला लागले, तेव्हा हे म्हणाले, "मेहरू, हे सगळं काय?" म्हटलं, “हे तुम्ही कमावलेलं आहे. माणूस पैसा कमावतो. तुम्ही हे कमावलंय. एवढी माणसं तुमच्या पाठीशी उभी आहेत. तुम्हांला जिवंत ठेवण्यासाठी. तुमची वाहवा करण्यासाठी. हे सगळं कशासाठी आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, हे तुम्ही कमावलेलं आहे." मग चियरफुल असायचे.
उगाचच रडारड असं काही नव्हतं. त्या वेळी जगायची आशा नव्हती तरी लगेच मरणार असं पण नव्हतं. सुरुवातीला हे सगळं असताना बरीच काँप्लिकेशन्स पण येत गेली; नाही असं नाही. कावीळ होणं, टी.बी. होणं, सारखीच अशी भीती असायची त्यामुळे. हे हॉस्पिटलमध्ये जायच्या आधीसुद्धा एका डोळ्याला ग्लॅकोमा झालेला होता. त्याचं ऑपरेशन पण झालेलं होतं.
डॉ. उर्सेकरांनी मोठं ऑपरेशन केलेलं होतं. दुसऱ्या डोळ्यामध्ये सारखे ड्रॉप्स घालायचे होते. कारण त्या डोळ्याचंही ऑपरेशन करायचं चाललं होतं. पण त्या परिस्थितीमध्ये त्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं का नाही करायचं? नाही, असा निर्णय घेतला. शेवट शेवट तर तो डोळा भयंकर लागला दिसायला. एक दिवस मी उठले नि हा डोळा फिरलेला दिसला तर मी म्हटलं, आता हा माणूस काही जगणार नाही. मी सारखं बघायला लागले. तर म्हणाले, आरसा आण. आरसा बघितल्यानंतर मी म्हटलं तुमच्या डोळ्यावर परिणाम झालाय. डॉक्टरना सांगितलं. त्यांच्याही ते लक्षात आलं. मग ऑपरेशन करायचं का? तर म्हटलं, नाही करायचं. आता पुष्कळ झालं हे सगळं, ऑपरेशन अमुकतमूक. मग या किडन्या. डायलिसिसवर किती दिवस ठेवणार? किडन्या तर तुम्हांला काढायलाच पाहिजेत. दोन्ही किडन्या काढण्याचं मोठं ऑपरेशन होतं. महिन्या का दोन महिन्यांची मुदत असते. त्या काळात दुसरी किडनी बसवावी लागते. त्या काळात डायलिसिसवर काम भागवायचं. पण तो कायमचा उपाय नव्हता. हे सहा महिने डायलिसिसवर होते. आता किडनीचा शोध. पेपरमध्ये प्रसिद्ध झालं. पण डॉ. कुरुव्हिलांचं मत असं झालं का तुम्ही जर पैसे देऊन किडनी लावली तर ती टिकत नाही. का तर तिला भावना नसते, माणसाची लागणी नसते. ते जरा स्पष्ट बोलले. खरं तर ते डॉक्टर आहेत. त्यांनी असं सांगायला नको. पण म्हणाले, माझं असं मत आहे की जर तुम्ही पैसे देऊन किडनी घेतली तर ती तुम्हांला जुळेल असं नाही. तुम्ही घाई करू नका.
पण मग किडनी देणार कोण? माझी प्रकृती तपासायला घेतली. माझा खूप मोठा चेकअप झाला. मला ब्लडप्रेशर निघालं. म्हणाले, एवढ्या लहान वयात हिला ब्लडप्रेशर झालं कसं? किडनी तपासली. पण मला बी.पी. असल्यानं माझी किडनी लावता येणार नाही असं सांगितलं. सगळ्यांनी असं सांगितलं की हिची आपण किडनी काढून हिला अधू केली तर हिची सेवा कोण करणार? म्हणून माणूस बाहेरचा पाहिजे. मग आमची रुबीना अठरा वर्षांच्या आत होती. हॉस्टेलमध्ये होती पुण्याला, फर्ग्युसन कॉलेजच्या. तिनं बाबांना पत्र लिहिलं, की बाबा, मी तुम्हाला किडनी देईन. डॉक्टर म्हणाले की पूर्ण अठरा वर्षांचं वय झाल्याशिवाय आपण तिची किडनी घेऊ शकत नाही. अठरा वर्षांची झाल्यावर तिची किडनी लावायची असं ठाम मत झालं. तर तिला बोलावून हे पण समजावून सांगण्यात आलं का "बेटा तू किडनी देणं खाऊ नाही. तुझी किडनी काढली तर तुझ्याशी कोणी लग्न करणार नाही.” तर ती म्हणाली, “मी लग्न करणार नाही. जन्मभर मी बाबांची सेवा करेन. ते मला परवडेल." त्या वेळी ती खूप लहान होती. इला तर खूपच लहान होती. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये यायलाही नको-नकोसं व्हायचं. रुबीना सारखी पळून यायची हॉस्टेलमधून. चार दिवस रहायची. मग मी म्हणायची, "अभ्यासाचं नुकसान होतं. वर्ष वाया जातं. तुम्ही जा." म्हणून ढकलून काढायची. तिनं एक वर्ष कसं तरी काढलं. म्हणाली, माझं डोकं चालतच नाही. मी पढणारच नाही. त्यामुळे ती मुंबईला आली. नणंदेकडं रहायची. तिथूनच ती हॉस्पिटलमध्ये यायची. ती आल्यावर मला मदत करायची. ती बाबांचं सगळं करायची. मग ते माझ्या हातून काहीच करून घ्यायचे नाहीत, तिच्याच हातून सगळं करून घ्यायचे."बाब्या, तू अमुक कर. बाब्या, तू तमुक कर." ती सगळं करायची. अशीच्या अशी उभी रहायची. जरा सुद्धा बाबांना सोडून ती जायची नाही. रात्रीचे आठ वाजायचे तेव्हा ती जायची. आता तर बिछान्यात पडूनच होते ना. लघवीचं पॉट द्यावं लागायचं. पाणी द्यावं लागायचं. नर्सला बोलवायचं, औषध द्यायला सांगायला लागायचं. आणखी काही करायला सांगायचं, हे काम तर असायचंच ना. स्पंजिंग वगैरे नर्सच करायची. ते काही करावं लागायचं नाही. पण नर्सला बोलावून करवून घ्यायचं. आपण फक्त पेशंटसमोर बसायचं, बोलायचं, जेवण-बिवण, कपडे बदलणे वगैरे सगळं नर्स करायची. त्यांनी स्पेशल नर्सेस ठेवलेल्या होत्या. मला खरं तर त्यांनी काहीही काम ठेवलेलं नव्हतं. पण मी स्वतःहून आपलं काही तरी करायची. खाणं मीच आणून घ्यायची. नर्सची मदत तर खूपच व्हायची. सगळ्याच बाबतीत. नखं वाढायची, नखं कापली की दुखायचे त्यांचे हात. मी कापायची नेहमीच. पण ते खूप बोंबाबोंब करायचे. नखं मोठी झालेली असली ना की मी म्हणायची, "काय हो तुमची नखं वाढलीत!" तर हे म्हणायचे की, “हे बघ मेहरू, हे काम माझं नाही. हे काम तुझं. हे तुझं काम आहे की नाही? तू कापलेली नाहीत म्हणून ती वाढलीत की नाही? मला कापता येत नाही. माझी नखं दुखतात." हॉस्पिटलमध्ये असताना एकदा त्यांची नखं खूप वाढलेली होती. माझं लक्ष काही गेलं नाही. संडासला त्रास व्हायचा त्यांना. त्या दिवशी खूप झाला. तर त्यांनी नखांनी खडा ओढून काढला. त्यामुळे जखमा तर झाल्याच त्यांना. पण सगळी नखं कापून घाण काढावी लागली. स्वच्छ धुवावं लागलं. खूप मला त्रास झाला. त्या रागात मी खूप बडबडले पण, “कसली म्हटलं कामं मला करायला लागतात बघा तुमच्यामुळे." त्यांना ते फील झालं फार. ते म्हणाले, "सॉरी हं. माझ्यामुळे तुला त्रास होतो. अशी चूक मी कधी करणार नाही. मला खूप त्रास झाला ग म्हणून माझ्या लक्षातसुद्धा आलं नाही." मग हे काम तर मी करायचीच, नर्सला न सांगता. त्यांना जरा ऑकवर्ड वाटायचं. म्हणून मीच करायची किंवा मग महंमददा यायचे. नेहमी ऑफिसमधून यायचे. ते म्हणायचे, हे हमीदचं काम ही माझी ड्यूटी. आणि रात्री परत जाईपर्यंत तेच सगळं करायचे. मला काही करावं लागायचं नाही. तेच सगळं बघून घ्यायचे. रात्री येणाऱ्यांपैकी अमीर होता. हे सगळे दलवाईच. मग कादीर एक होता त्यांच्या नात्यापैकीच. मुकादम होते. अशी सगळी माणसं येत होती. रोजची झोपायला यायची. सगळे जे नातेवाईक होते त्यांचे गावामधले, ते सगळे पाळीपाळीने बघून जायचे. खाण्यापिण्यासाठी आणायचे. पैशाबद्दल त्यांना विचारायचे. कुणीही असं दाखवलं नाही, का बरं झालं, याला हे झालं. सगळ्यांना असं वाटत होतं का हमीदखानला हे काय झालेलं आहे? त्याला लवकर बरं वाटलं तर बरं होईल. रोज येणारी अशी माणसं होती. त्यात पाटणकर म्हणून एकजण होते यांचे मित्र. आर.टी.ओ.मध्ये होते. ते एका दिवसाआड रेग्युलर यायचे. नेहमी यायचे. विचारपूस करायचे. मुंबईतच राहायला होते. आधीचीच ओळख होती. आम्ही गाडी घेतलेली होती. हे काय शिकलेले नव्हते ना गाडी. त्यामुळे आर.टी.ओ.ला दाखवायला सर्टिफिकेट, लायसेन्स मिळवायचं हे सगळं त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांची खूप मैत्री. घरी-बिरी जायचं, जेवण-बिवण करायचं. खूप चांगली मैत्री. ते नेहमी यायचे. एक दिवस ते आले. त्या दिवशी दलवाईंचा मूड खराब होता. कशावरून तरी रागात त्यांनी फटकन मला एक शिवी दिली. मी अशी पलंगावर बसलेली. खरं तर कधीही यांच्या तोंडात शिवी नव्हती. फटकन शिवी दिल्यानंतर पाटणकर समोर बसलेले असल्यानं मी एकदम खालीच मान घातली. तेव्हा पाटणकर झटकन उठले आणि म्हणाले, 'हमीद, तुझ्या तोंडून असले शब्द ऐकायला नकोत. हे जर तू बोलणार असशील भाभीबद्दल तर मी तुझं तोंडसुद्धा बघायला येणार नाही.' दलवाईंनी लगेच त्यांचा हात धरला. ते गेल्यानंतर मला म्हणाले, 'मेहरू, मला क्षमा कर. मी कुठल्या मूडमध्ये होतो आणि का माझ्या तोंडातून असं निघालं, मला माहिती नाही. तू मला आता समजून घे. का तर, मी लोकांच्यासमोर काही न बोलता राहातो. मला खूप त्रास होतो, पण मी कुणाला दाखवत नाही, येणारी लोकं नर्व्हस होऊ नयेत म्हणून. मी किती सीरियस आहे, याची जाणीव मी त्यांना मुद्दाम करून देत नाही. पण तुझ्यासमोर मी तसा राहू शकत नाही. कोणी तरी माझं माणूस आहे. तुला बोललं का मला बरं वाटतं. म्हणून जो काय त्रास द्यायला जातो तो तुलाच. म्हणजे तुला त्रास दिल्यानंतर मला थोडं असं वाटतं का मला कोणी तरी आहे, म्हणून मी करतो. जाणूनबुजून तुझा अपमान करायचाय असं माझ्या मनात कधी नसतं." आमची रुबीना जेव्हा शाळा-बिळा, कॉलेज-बिलेज सोडून आली आणि त्यांच्याजवळ राहिली, तेव्हा मी त्यांच्याजवळ जास्त राहायचीच नाही. मी दारामागे बसलेली असायची. तरी ते दहा वेळा दाराच्या मागे बघायचे, म्हणायचे, "कुठंय तुझी आई, गेली वाटतं कुठं तरी. तिथं नाहीये दिसत, ती गेली वाटतं." तेव्हा रुबीना म्हणायची, "काय बाबा, तुम्ही ममाच्या फार मागं लागताय. बिचारी एवढं करते. जवळ असली तरी तुम्ही बोलता. आता ती गेली असेल तर जाऊ दे नं तिला. काय हरकत आहे? मी समोर बसलेली आहे तरी तुम्हांला तीच हवी. तुम्ही ममाला असा त्रास देत जाऊ नका. ती रडत असते दिवसभर. ममाला खूप फील होतं. ती कुणाला दाखवणारै? ममाला काय वाईट वाटत नाही का?" असं करून ती समजूत घालायची.
या काळामध्ये हे जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा जयप्रकाश नारायणजी पण किडनीच्या रोगानेच ॲडमिट झाले होते. ते सोळाव्या मजल्यावर, आम्ही दहाव्या मजल्यावर. रोज त्यांना बघायला काही माणसं यायची आणि त्यांना बघून झालं की दलवाईंना बघायला यायची. त्यांच्यात एसेम, प्रभुभाई संघवी वगैरे रेग्युलर येणारी अशी खूप मंडळी – समाजवादी – यांना पण बघायला यायची. मी पण सारखंसारखं जरा वेळ मिळाला की, जेपींना असं डोकावून बघायची, त्यांना नमस्कार करायची, 'कैसे है आप?' असं विचारायची. मला ते बरं वाटायचं. इतका मोठा माणूस आपल्याशी बोलतो. म्हणून मला ते बरं वाटायचं. त्या दोघांचं डायलिसिसही एकाच दिवशी, बरोबर व्हायचं. सुरुवातीला जेपींना ते जनरल वॉर्डमध्ये सगळ्यांचं डायलिसिस जिथं व्हायचं तिथं आणायचे. मग ह्यांनी डॉक्टरांना कंप्लेंट केली आणि सांगितलं की, "एवढा मोठा माणूस आणि तुम्ही डायलिसिस जनरल वॉर्डमध्ये करता? त्या माणसाला वेगळी रूम द्या. मला तुम्ही दिली नाही तरी चालेल." असं करून ह्यांनी त्यांना परस्पर वेगळी रूम द्यायला लावली. जेपी मात्र म्हणायचे, ‘सगळ्या पेशंटस् बरोबर मी डायलिसिसला जाईन. मला वेगळी रूम नकोय.' जाताना असे बरोबरच कॉरिडोर मधून जायचे ना. नेहमी भेट व्हायची, “कैसे है", अशी नेहमी विचारपूस व्हायची. स्ट्रेचरवर हे झोपलेले आहेत, ते झोपलेले आहेत आणि बोलताहेत आणि आम्ही स्ट्रेचरबरोबर चालत जायचो. मग एक दिवस काय झालं, जेपींना डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्यानंतर तिथं गर्दी जमली, आता संध्याकाळी त्यांना नेणार, तर त्यांचं एक पुस्तक त्या वेळी प्रसिद्ध झालेलं होतं, जाण्याआधी ते पुस्तक त्यांनी तिथं वाटलं काही लोकांना. मला ते जरा उशीरा कळलं. नंतर मी ह्यांना म्हटलं, "अहो, जेपींचं पुस्तक निघालं आणि सर्वांना ते वाटताहेत. मी पण जाते." ते म्हणाले, 'तुला काय कळतंय.' मी म्हटलं, "तुम्ही वाचा की, मला काय करायचंय? आपल्याला पण मिळायला पाहिजे की." आणि पुस्तकं संपली नि मी पोचले. बरं, रोज वेगळी माणसं बाहेर बसायची. मला कोणी आत जाऊ देई ना रूममध्ये त्यांच्या.मी म्हणाले, "मुझे जेपीजीके रूम में जाने दो जरा। मैं नीचे से आई हूँ। जेपी को बोलो जरा मै आई हूँ। मुझे भी किताब चाहिए।" कोणी आत जाऊ देईना मला. शेवटी मी ओरडायला सुरुवात केली. स्टंट केला. आणि जेपींनी ते आतून ऐकलं. ते म्हणाले, 'किसकी आवाज आ रही है? कोई महिला की आवाज आ रही है। उसको मत रोको, उसको अंदर आने दो।' आणि असं करून मी आत आले. तर बोलले,'क्या हुआ?" मी बोलले, "देखो ना, ये लोग मुझे अंदर आने नही दे रहे है। रोक रहे है वहाँ पे। सबको इन्होंने किताबे दी। मैने माँगी तो नही है बोलते। खतम हो गई है। जेपीजी, तो आप मुझे किताब दो। मै लिये बिना नही जाऊंगी।" मग त्यांनी माझ्याकडे बघितलं, हसले, नि एका माणसाला सांगितलं,'नही नही ऐसा मत करो। तुम ऐसा करो - अभी मै डिस्चार्ज होके घर पे जाता हूँ। कल इनके हाथसे तुम्हारे लिए किताब भेजूंगा। वो तुमको तुम्हारे रूम मे ला के देगा।" आणि त्या माणसाला म्हणाले, 'ला के देना इनको जरूर." 'थँक्यू', बोलले मी आणि आले आणि ह्यांना सांगितलं. हे म्हणाले,'कशाला तू असं करायला गेली होतीस?' मी म्हटलं की,"सगळ्या लोकांनी नेलं.मला ते पुस्तक नको होतं काय? मी वाचते किंवा वाचत नाही हा प्रश्न वेगळा आहे." दुसऱ्या दिवशी आणून दिलं त्यांनी ते पुस्तक.
डायलिसिस करायच्या अगोदर बायोप्सी म्हणून करायची असते आणि बघायचं असतं की, किडनीचा कुठला भाग किती खराब झालाय. किडनी खराब खरंच झालेली आहे, का आपल्यालाच तसं वाटतंय, हे बायोप्सीनं कळायचं. तर बायोप्सी काय आहे, आम्हांला काही माहिती नव्हतं. एक दिवशी म्हणाले की चला, आपल्याला बायोप्सी करायचीये. हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या महिनाभर काय तर त्यांच्या टेस्टच झाल्या. गेल्या गेल्या डायलिसिस वगैरे काहीच होत नाही. चेकिंगच चाललं महिनाभर, बायोप्सी करायची तर रूममध्येच करायची. ह्यांनी सांगितलं, का काही झालं तरी तुम्ही मेहरूला बाहेर काढायचं नाही. तिला रूममध्येच राहू दे. तिला बाजूला राहू दे. मी म्हटलं, “मी काही इतकी वीक माइंडेड नाहीये, त्यामुळे तुम्ही मला बाजूला वगैरे काढायचा प्रश्नच ठेवू नका आणि तुम्ही बायोप्सी करा." मग काय झालं? बायोप्सीसाठी डॉक्टर आले. मी ते बघितलं. असं त्यांना पालथं झोपवलेलं. ज्या बाजूला आपली किडनी असते तिथं मार्क केलं त्यांनी पेन्सिलने. आणि कुठल्या भागाची किडनी खराब झाली असेल त्याचा अंदाज घेतला त्यांनी. मग सुई आतपर्यंत घातली आणि किडनीतला तुकडा ओढून घेतला. खूप त्रास झाला. बोंबाबोंब. कारण त्या वेळी अॅनेस्थेशिया देत नाहीत. आणि एवढं करून तो भाग बरोबर निघाला नाही तर दोन-तीन ठिकाणी परत तेच करावं लागलं. दलवाई खूपच हैराण झाले. आणि मग तो तुकडा काढला. त्यात कळलं की किडनी खराब. मग एक्स-रे काढले. दोन्ही किडन्यांची खात्री झाली तेव्हा मग ते डायलिसिस वगैरे. पहिल्या डायलिसिसच्या वेळी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा दलवाई असे घाबरट नव्हते. मला भीती वाटायची डॉक्टरांची, इंजेक्शनची, ऑपरेशनची. का तर मला कधी सवय नव्हती ना! त्यामुळे मला तशी भीती वाटायची. हे लाइटली घ्यायचे. “हे केलं तर त्यात काय झालं? ते केलं तर त्यात काय झालं." असं बोलत बसलेले असायचे. मी तिथं बघितलं. डायलिसिसच्या सुया टोचतानासुद्धा लोकं बोंबा मारायची. एका ठिकाणातून काढा, दुसऱ्या ठिकाणी घाला. दुसऱ्या ठिकाणातनं काढा तिसऱ्या ठिकाणी घाला. इथं फ्लो बरोबर येत नाही, तिथं घाला. तिथं फ्लो आहे इथं घाला, असं डॉक्टर करायचे. आता इतकी बोंबाबोंब व्हायची त्या पेशंटची. पण ह्यांना काहीही वाटायचं नाही. त्यामुळं तो डायलिसिसचा त्रास तसा त्यांनी वाटून घेतला नाही. त्यांना डायलिसिस आवडायचं नाही. त्यांना असं वाटायचं की, मी झोपून राहातो, काहीही काम करू शकत नाही. त्या काळामध्ये ऑपरेशनला कोणी तयार व्हायचं नाही. डॉक्टर काय म्हणायचे, ५०% रिजेक्शन आहे. ऑपरेशनचा पेशंट जगेल याची गॅरंटी नसली तरी ऑपरेशन हे एकच सोल्यूशन आहे याला. तुम्ही इतक्या त्रासदायक ट्रीटमेंटमधून जाण्यापेक्षा एकदाच मुक्त झालात तर ते बरं, असा डॉक्टर सल्ला द्यायचे आणि यांना ते पटायचं. ते काय म्हणाले, “मला ऑपरेशन चालेल. मी मरेन किंवा जगेन. पण मला ही रोजची कटकट नको. दहा-दहा तास मला हे डायलिसिस नकोय.” त्या काळामध्ये टी.ए. पै म्हणून जे रेल्वे मिनिस्टर होते त्यांचा एक चुलतभाऊ यांच्या बाजूच्या कॉटवर आला होता. तो सात-आठ वर्ष डायलिसिस करत होता. यांच्याच वयाचा होता. पंचेचाळीस-सेहेचाळीस वर्षांचा. सगळं अंग झिजलेलं होतं त्याचं. अॅनिमिक कंडिशन खूपच वाढलेली होती. चेहरा नुसता दिसायचा. हातपाय असे वाकडेतिकडे झालेले - एवढे एवढे झालेले, असा मोटकाच. इथून उचलायचा. तिथे ठेवायचा. आणि त्याची बायको, मुलं बघितली तर काय देखणी. पण तो बोलायचा बिलायचा खणखणीत. हे जेवण चांगलं नाही, हे वाईटेय, याच्यातच त्याचं लक्ष असायचं. जेव्हा यांच्या ऑपरेशनची तारीख ठरली आणि डॉक्टरनी त्यांना सांगितलं, तेव्हा म्हणाला, 'दलवाई, ही तारीख चांगली नाहीये. डॉक्टरला सांगा आणि ही तारीख बदलून घ्या.' पण हे म्हणाले, 'नको, नको तशा गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. त्यामुळे ते तुम्ही काही मला सांगू नका. डॉक्टर जे ठरवतात ते बरोबर ठरवतात. डॉक्टरच्या सल्लयानेच जे काय व्हायचंय ते होऊ दे.'
आता किडनी कुठे मिळणार, हा प्रश्न. किडनी घ्यायची तर त्यांना चार मामा होते. एक सख्खी मावशी होती. पण ते सगळे वयस्क होते आणि रोगी होते. त्या काळामध्ये गावात टी.बी.चे रोगी जास्त असायचे. जवळजवळ त्या सर्वांना टी.बी. होता आणि त्यांना त्याबाबत सीरियसनेस नव्हता. त्या काळामध्ये टी.बी.चा रोग म्हणजे खूपच भयानक समजला जायचा. सगळ्यांनाच होतो ना, काय त्याच्यात आहे एवढं, असं म्हणून गप्प रहायचे. औषध घ्यायला पैसा नाही, खायला अन्न नाही, अशा रीतीने ते वाढतच जायचं. त्यामुळे त्यांची किडनी घेण्याचा प्रश्नच आला नाही. बरं, सख्खं भावंडं नसल्यामुळे तोही प्रश्न आला नाही. कुणाला सांगणार? जबरदस्तीने किडनी द्या असं सांगून होत नाही. म्हणून त्या काळामध्ये बाहेरची किडनी घ्यायची असं ठरलं. पेपरमध्ये अनाऊन्समेंट दिली आणि कोणाचं उत्तर येतं का बघितलं. जोरात शोधणं चालू होतं. काय करायचं? कोण देणार? कुणाची जुळेल? नगरकर वगैरे खूप अपसेट झाले. ते म्हणाले, पैशांची कमी नाहीये, आपण रस्त्यावर जाऊन झोळी पसरून उभे राहिलो तरी हमीदच्या नावाने मदत करणारे तुम्हांला हजारो लोक भेटतील. पैशांची कमी नाहीये. असंही होतं की कोणाचीही किडनी तुम्ही मॅच होते म्हणून घेऊ नका. का तर तो माणूस मग तुम्हांला आयुष्यभर प्रेशराइज करतो. समजा एक माणूस आला. त्याची किडनी तुम्ही घेतली, तर तो म्हणणार, "माझ्या किडनीवर तू जगलेला आहेस, माझ्या किडनीवर जगतो आहेस. माझ्यासाठी हे कर, ते कर." आणि त्यानं जगवलेलं आहे म्हणून माणूस प्रेशराइज होतो. म्हणून तशी सुद्धा किडनी घ्यायची काही गरज नाही. त्या माणसानं परत ह्याला तोंड दाखवायला नको, असा माणूस पाहिजे असे सगळे विचार करीत होते. त्यामुळे किडनी शोधणं सोपं नव्हतं. त्या काळामध्ये फिरोज दारुवाला हा पिक्चरमध्ये आला. येरवड्याच्या जेलमध्ये तो होता. तिथपर्यंत बातमी सगळ्या पेपरमधून गेली. त्याच्या डोक्यात आलं आणि त्याचे आई-वडीलसुद्धा पेपर वाचून भेटायला आले. त्यांनी किडनी मिळेल असं सजेस्ट केलं. फिरोजला असं वाटत होतं की मला आता फाशीची शिक्षा होणार, मी आता एका भल्या माणसाला किडनी दिली तर त्याच्याबद्दल कदाचित एखाद्या वेळेला माझी सजा माफ होईल. हा हेतू होता त्याचा खरा. तो आम्हांला नंतर कळला. तर त्यानं घरी पत्रव्यवहार केला आणि सांगितलं का असं असं आहे. म्हणून मग त्याचे आई-वडील आमच्याकडे आले. आई-वडील बिचारे खूप चांगले. त्याची बायको, एक मुलगी हे सगळे आले. आम्ही भेटलो त्यांना सगळ्यांना. बाप तर म्हणाला, "हा मुलगा असला निघेल, चार-पाच खून करणारा, अशी मला कल्पना सुद्धा सहन होत नाही. वाटलंसुद्धा नव्हतं की हा मुलगा असा निघेल म्हणून." मग सगळं ठरल्यानंतर पेपरवाले माझ्या खूप मागं होते त्या वेळी. त्यांनी माझे बरेच इंटरव्ह्यू वगैरे घेतले. त्यांनी मला नंतर प्रेशराइज करायला सुरुवात केली, दारुवालाला सोडवा. आपण त्याची किडनी घेतलेली आहे. तर त्याची शिक्षा कमी करा. म्हणजे त्याला फाशीची शिक्षा होती ती देऊ नका असा आग्रह धरा. पण आम्ही त्याला बळी पडलो नाही. का तर सरकारचा मामला होता. हे म्हणाले, 'सरकार करील ते खरं. आपण मध्ये बोलायचं नाही.' का दवाखान्यात फिरोज दारुवालाला अॅडमिट केलं. तो हॉस्पिटलमध्ये आला. त्याला एका फ्लोअरवर ठेवला. आमच्या फ्लोअरवर नव्हता तो. दुसऱ्या फ्लोअरवर त्याला नेलं. पोलिसांचा जंगी पहारा आणि मग माझ्याशी बोलायला तो मागत होता, म्हणून मला परमिशन दिली, की त्याच्या रूममध्ये जा. तेव्हा मी बघितलं, तर काय? ३२-३३ वर्षांचा मुलगा. बारीक. चांगला दिसायला. पण त्याचे डोळे बरोबर नव्हते. असे मोठे मोठे म्हणजे खुन्याचे डोळे दिसतच होते. बघितल्यानंतर माणसाला भीती वाटावी असा होता तो. मला काय तिथं जास्त बोलायचंच नव्हतं. बघायचं आणि यायचं. मी दोन-तीनदा त्याच्या रूममध्ये जाऊन आले. का तर मला असं वाटत होतं की हा मनुष्य किडनी देणाराय. माझा नवरा वाचणाराय. मला त्याच्याबद्दल तशी सिंपथीही वाटत होती. वाटत होतं की याची सजा कमी व्हावी. पण हे म्हणाले की आपण मध्ये पडायचे नाही. हा गव्हर्नमेंटचा मामला आहे. त्याची टेस्ट झाली. ३० टक्के किडनी बरोबर आहे असं दिसलं आणि सगळीकडे बातमी पसरली का ही किडनी बसू शकते. दलवाई याच्यात जगतील. ही किडनी दलवाईंना फिट होते. कोणाचीही असू दे. मग काही लोकांनी विनोद पण केला, खुन्याची किडनी बसवली तर दलवाई खून नाही ना करणार? ऑपरेशनला खर्च किती तर पंचवीस हजारच्यावर. त्या काळात एवढा खर्च म्हणजे थोडा नाही झाला. आणि बाकीचे औषध-बिवषधांचे वेगळेच. त्यामुळे पैशाचा प्रश्न आला. तर एवढे पैसे जमा करायचे कसे? मग पवारसाहेब, ए.बी. शहा, नगरकर असे सगळे विचार करायला लागले. का पैसे कुठून आणायचे? मग त्यांनी गणित काढलं. अमक्याकडून आपण किती घ्यायचे ५,०००/- तमक्याकडून २,०००/-, याच्याकडून किती १०,०००/-, फलाण्याकडून किती घ्यायचे. त्या वेळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असल्यामुळे आता गव्हर्नमेंटकडून किती घ्यायचे? ठीकय. ते ५,०००/- आपल्याला देतील असा आकडा घातला आणि पवारसाहेब मागायला गेले. शहासाहेबांना पैशांचा व्यवहार समजायचा नाही. म्हणजे त्यांना जमायचं नाही बिचाऱ्यांना. ते म्हणायचे पैसे माझ्याकडे दिल्यानंतर हिशेब ठेवायचं काम मी करीन. पण मिळवायचं मला नाही जमणार. तर नगरकर आणि पवार या दोघांनी ते काम हातात घेतलं आणि ते चालू झालं. एके दिवशी सकाळी उठल्याबरोबर पेपरात वाचते तो काय बातमी! सरकारतर्फे रुपये ५०,०००/- दलवाईंच्या किडनीच्या ऑपरेशनकरता बहाल केलेले. आणि अशी बातमी पसरली सगळीकडे. थक्क झालो आम्ही. मी तो पेपर घेतला आणि हॉस्पिटलमध्ये गेले. मी घरी आले होते. दोन दिवसांनी, तीन दिवसांनी मी घरी यायची. कपडे बदलायची. आंघोळ करायची. पवारवहिनी मला पटकन खायला-प्यायला करून घालायची. का तर रोज हाल व्हायचे. त्यामुळे आल्याबरोबर ती करायची. तर त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेले. ५०,०००/- रुपये देणगी! सगळ्यांना असं वाटलं का सगळं कर्ज निघून गेलं. आणि ही बातमी तेव्हा मुसलमानांना कळली, म्हणजे जातीयवादी मुसलमानांना. ज्यांना हे सगळं नको होतं आणि जे मानत होते का हा कसला मुस्लिम? याला कशाला जगवायला हवं? ह्याच्यावर त्या सगळ्यांनी लेखही लिहिले. त्यांनी असंही सांगितलं, किडनीचे हजारो पेशंटस इथे मरतात. सरकारने सगळ्यांनाच मदत करावी. या माणसाला जिवंत ठेवायची गरजच काय? सरकारच याला त्याच्या कामामध्ये मदत करत आहे. हा माणूस धर्माच्या विरुद्ध, समाजाच्या विरुद्ध काम करतो. तरी याला सरकार जगवतं, असं उलट त्यांनी म्हटलं. पण सरकारने त्याची काही पर्वा केली नाही. आणि ते ५०,०००/- रुपये जसलोक हॉस्पिटलच्या बँकेत जमा झाले. आता प्रश्नच मिटला ना! मग किडनीच्या ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायला काहीच हरकत उरली नाही. आणि अशा रीतीनं. ते सगळं वातावरण जुळून आलं. मग डॉक्टर काय म्हणाले, डॉक्युमेंट वगैरे करायला पाहिजे. हा मनुष्य जगेल का नाही हे नक्की नाहीये. आणि मग ऑपरेशनचा दिवस ठरवला गेला. दोन्ही पेशंट्स एका बेडवर घेतात. एकाची किडनी काढायची आणि ठराविक तासांमध्ये दुसऱ्याला लावायची. दोघांना एकाच रूममध्ये ठेवलं होतं.
संध्याकाळी हा जमाव! हॉलच्या हॉल भरला. खालून वरपर्यंत. का तर दलवाईंचं ऑपरेशन आहे. आणि ते सक्सेसफुल होईल याची गॅरंटी कुणाला नाही. एवढं मोठं ऑपरेशन. किडनीचं एरवी कोणी ऑपरेशन करत नाही. आणि दलवाईंचं ऑपरेशन होणार आहे. म्हणून सगळे त्यांचे सिंपथायझर्स जमा झाले होते. सगळ्यांना असं वाटत होतं का हा माणूस आपल्याला परत भेटेल का नाही? सगळे मला येऊन भेटत होते. त्यांना येऊन भेटत होते. तेवढ्या सगळ्यांच्या समोर डॉक्टरांनी डॉक्युमेंटस् आणली. त्यात लिहिलं होतं का आम्ही खुषीनं ऑपरेशनला परवानगी देतोय. कुठल्याही गोष्टीला डॉक्टर किंवा हॉस्पिटल जबाबदार नाही. माझी सही घेतली, काही विटनेसेस. असे सगळे डॉक्युमेंटस तयार केले.
दलवाईंनी जरासुद्धा असं दाखवलं नाही, का मी आता मरणाच्या तोंडात जातोय आणि तिथून परत येणार नाही. झोपून नव्हते. चांगले बसून गप्पा मारत होते. हास्य-विनोद डोळा मारून-बिरून. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं. आणि सगळे लोक जमलेले असे. म्हणजे बायका-पुरुषपण सगळे असे त्यांना बिदा करायला आलेले.
ऑपरेशनची वेळ झाली. स्ट्रेचरवर दलवाईंना घातलं. निरोप घेतला आणि लिफ्टपर्यंत सगळे गेले. पवारसाहेब तिथं आलेले होते. त्यांनी मला बाजूला घेतलं. त्यांनी मला विचारलं, "आपण ठरवलंय ते बरोबर आहे ना? आपण ऑपरेशन करायचं ना? आम्ही हा डिसीजन घेतला असं असेल तर तुम्हांला ते मंजूर आहे न? आपल्या मनाची तयारी दोन्हीची ठेवली पाहिजे." अशी समजूत घातली त्याना लहान मुलासारखी. खरं तर मी त्यांच्यापेक्षा खूप मोठी. आणि खरं म्हटलं तर त्या लोकांनाच वाईट जास्त वाटत होतं. नगरकरांना, पवारसाहेबांना, सगळ्यांनाच माझ्याकडे बघून जास्त फील होत होतं. का तर ही बाई काय करणार? भाभीच काय होणार? असं सगळं त्यांच्या तोंडावरनं कळत होतं. आणि अशा वातावरणात मी ह्यांना लिफ्टमध्ये सोडलं. टाटा केला. थोड्या वेळानं सगळ्यांच्या जाण्याची वेळ झाली. सगळे निघून गेले. मी विचार केला रात्रीचं तिथंच राहायचं. का तर आपण हॉस्पिटलमधून जर घरी आलो तर ती रात्र काय आपल्याला चांगली जाणार नाही. म्हणून मी रूममध्येच थांबले. इतके सगळे माझे नातेवाईक होते. पण कोणालाही असं वाटलं नाही का हिच्याबरोबर रात्रीचं रहावं. कोणीच आलं नाही आणि मी पण कोणाला म्हटलं नाही, की तुम्ही माझ्याबरोबर थांबा म्हणून. सकाळी उठल्याबरोबर बच्चूबेन आणि पालेकर या माझ्या मैत्रिणी दोघी धावत हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे आल्या. माझ्या सोबतीला म्हणून. आणि रात्री मी एकटी असताना बाजूच्या रूममध्ये जो पेशंट होता त्या पेशंटने आपल्या बायकोला सांगितलं की, 'जा, तिचा नवरा वर गेलाय ऑपरेशनसाठी आणि ती बाई एकटी आहे. ती रात्र एकटी काढू शकणार नाही. तर तू तिच्या सोबतीला जा.' ती बाई माझ्या ओळखीची नाही, पाळखीची नाही, नातं नाही, गोतं नाही. ती माझ्याजवळ २-३ तास थांबली. नंतर मी पडले. पडल्यानंतर सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर बातमी तर मिळायला पाहिजे ना. काय झालं? ऑपरेशनला ह्यांना रात्री घेऊन गेले ती स्टरलाइझ्ड रूम असते, पॅकबंद रूम असते. ज्याच्यात बाहेरचा वारासुद्धा जाऊ शकत नाही. तिथं दोन नर्सेस वेगळ्या, मास्क बांधलेल्या आणि ते डॉक्टरही मास्कमध्येच. कोणालाही आत येऊ देत नाहीत. त्या खोलीमध्ये ह्यांना त्यांनी नेलं. ऑपरेशन झालं. सक्सेसफुल झालं. दलवाईंना लघवीही झाली. ही बातमी इतकी दणकून आली का सगळं हॉस्पिटल गरजलं. या पेशंटला लघवी झाली. याचा अर्थ किडनी अॅक्सेप्ट झालेली आहे. मी आता त्या वेळी वाटलेलं सगळं एक्स्प्रेस करू शकत नाही. मी खाली आले. ग्राउंड फ्लोअरला त्यांची सिटिंगरूम होती. सगळे आलेले. हजारो माणसं तिथं येऊन भेटून गेली. हा आला भेटला, तो आला भेटला. काँग्रॅच्युलेशन्स हं भाभी. म्हणजे इतका सगळ्यांना आनंद झाला.
तिथं मग १०-१५ दिवस त्या रूममध्ये ठेवायचं असतं. कोणी भेटायचंच नाही. ऑपरेशन झाल्याला २-३ दिवस झाले. मी तिथं त्या रूमच्या बाहेरच असायची. दर्शनसुद्धा नाही. दर्शन कसलं? रूमच्या बाहेर मी उभी रहायची. थोडीशी डोकवायची. मला सांगायची नर्स, अशी अशी तब्येत आहे. आणि मी बाहेर बसलेली असायची. खाली नाही, वर नाही. खालची रूम सोडून दिली होती. त्यामुळे तिथंच थोडा वेळ बसायची. घरी जायची. दोन-तीन दिवसांनंतर मग काय झालं? डॉक्टर म्हणाले, फोनवर बोलायला हरकत नाही. मग तिथल्याच इंटरनल फोनवर मला दलवाईंशी बोलायला मिळालं. असे ८ दिवस गेल्यानंतर मी अशीच रूमच्या बाहेर उभी होते तर डॉ. कामत आले. मला म्हणाले, 'काय, बघावंसं वाटतं ना, भेटावंसं वाटतं ना?' मी म्हटलं, 'हो. पण काय करणार डॉक्टर? नाही ना मी जाऊ शकत?' त्यांच्या ते थोडंसं लक्षात आलं. ते म्हणाले, 'थांबा.' आणि आत जाऊन त्यांनी नर्सला सांगितलं त्या बाईला गुपचूप आत घे आणि तिचा ड्रेसबिस चेंज कर. अगदी तुमच्यासारखा कर म्हणाले. आणि दलवाईंना भेटव तिला. तिनं मग मला आत घेतलं. सगळं काय काय करतात ते मला केलं. नर्स बनवली. टोपी लावून बिवून. आणि मग डॉक्टर रूममध्ये आत गेले. आणि ह्यांना सांगितलं, 'हे बघा दलवाई. तुमच्यासाठी एक तरुण नवीन नर्स आणलेली आहे. तुम्हांला ठेवायची का तिला? आवडेल बघा.' तर मी ड्रेसमध्ये असल्याने त्यांनी मला ओळखलं नाही. कसे ओळखणार? तर मग डॉक्टर म्हणाले, 'काय हो दलवाई, तुम्ही स्वतःच्या बायकोला सुद्धा विसरलात की काय?' हे म्हणाले, 'काय मेहरू, तू? मी नाही ओळखलं. कशी आली?' म्हणून त्यांचा चेहरा खुलला अगदी. मी म्हटलं, काय म्हणता तुम्ही? बरे आहात नं? 'हो बरा आहे, म्हणाले. हसले बिसले. पण तो माणूस, सांगते, सायन्स डिपार्टमेंटमध्ये ते स्केलेटन - सापळा ठेवतात नं माणसाचा, तसे दिसत होते. सगळ्या अंगातली शक्तीच जाते हो ऑपरेशनने. हा किडनी ट्रबल ज्यांना असतो त्यांचं शरीर पुढे पुढे चंद्रासारखं गोल होतं. नुसतं तोंड नाही. सगळं शरीर चंद्रासारखं गोल होतं. तो नॉर्मल राहातच नाही. तर अशा रीतीनं १०-१२ दिवस तिथं ठेवलं. मग म्हणाले का घरी न्यायला हरकत नाही. पण मास्क लावायचा, रूममध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. फार स्ट्रिक्टली वागायचं. तुम्ही तेवढं त्या रूममध्ये जायचं. बाकी कुणी नाही. पवारांच्या घराच्या तिथं आम्ही राहात होतो. तिथं वहिनींनी सगळं धुवून-बिवून पुसून रूम स्वच्छ केली. पलंग-बिलंग व्यवस्थित केला. मग दलवाईंना तिथं नेलं आणि तिकडे ठेवलं. कोणी आलं भेटायला का एक फट दाराची उघडी ठेवायची. खुर्ची बाहेर ठेवायची आणि तिथून बोलायचं. ते गप्पा मारू शकत होते. एवढ्या बंदोबस्तात नगरकर तर चोरासारखे यायचे. कधीकधी मी किचनमध्ये असायची. गाडीने हा माणूस यायचा. गाडी कधी ठेवायचे, आत माझ्या पाठीमागे येऊन कधी उभे राहायचे ते मला समजायचं नाही. आणि मी एकदा म्हणाले, 'दादा, तुम्ही सी.आय.डी. ऑफिसर शोभता बाबा. अहो, तुमच्या गाडीचा आवाजसुद्धा येत नाही. आणि तुम्ही माझ्या मागे येऊन उभे राहिलात म्हणजे खरोखर तुम्ही त्या डिपार्टमेंटच्या लायकीचा माणूस आहात.' आणि ते काय करायचे, त्यांना इतकं असायचं का नेहमी आले ना की दलवाईंच्या कानामध्ये काही तरी बोलायचे. त्यांना ती सवयच होती. कधी त्या रूममध्ये घुसायचे, पत्ता लागायचा नाही. 'दादा, काय हे?' असं मी म्हणायची. तर म्हणायचे, 'काय बोलतेस बाई. काही बोलू नकोस. जरा मला बोलू दे ना त्याच्याशी.' 'नाही हो दादा, असं करू नका. अलाऊड नाही.' 'बरं, तू सांग, मी हे लावू? मी मास्क लावतो. तू जे सांगशील ते मी करेन. पण हमीदच्या जवळ जायला मला परवानगी दे. त्याच्याशी बोलल्याशिवाय मला चैन पडत नाही.' अन् तसे ते मास्क लावून बोलायचे. सकाळी जायच्या अगोदर पवारसाहेब खोलीमध्ये यायचे. म्हणायचे, 'काय म्हणतो पेशंट?' मी म्हणायची, 'बघा, तुम्हीच आत येऊन काय म्हणतोय तो.' मग आत यायचे. त्यांच्याबरोबर बोलायचे. मी पण असायची. दोघं बोलणार राजकारणावर. त्यांना सल्ला द्यायचा. 'शरदराव, हे बरोबर नाही. शरदराव ते बरोबर नाही.' दलवाई सांगणार त्यांना. शरदराव लहानच होते वयानं. दलवाई मोठेच होते. आणि ते मान पण द्यायचे ह्यांना. दोघांच्या राजकारणाच्या गोष्टी व्हायच्या. आणि ते निघून जायचे. त्याच्यानंतर जी माणसं पवारांकडे यायची ती सगळी ह्यांच्याशी आत जाऊन बोलायची नि जायची. संध्याकाळी पवार परत आले की पहिल्यांदा ह्यांच्या रूममध्ये यायचे. त्यांच्याशी बोलायचे नि मग आपल्या खोलीत जायचे नि आपल्या बायकोला विचारायचे, काय चाललेलं आहे? त्यांचं बारीक लक्ष असायचं. ते माझ्याशी काही फार मोकळेपणाने बोलायचे नाहीत. पण बायकोला बोलायचे, 'आज त्या काकींचा चेहरा काही बरोबर दिसला नाही.' त्यांची मुलगी मला काकी नि ह्यांना काका म्हणायची. सगळ्या घरातले लोक आम्हांला काका-काकीच म्हणायचे. तर 'काकींचा चेहरा काही आज मला बरोबर दिसलेला नाही. काही तरी त्रास होत असेल. जाऊन विचार', ते बायकोला म्हणायचे. मग ती येऊन विचारायची, 'काय हो काकी, काय झालं?' 'अहो तुम्हांला कोणी सांगितलं?' 'अहो, साहेब बोलत होते. तुम्हांला त्यांनी विचारायचं की नाही? काकी, मोकळ्या मनाने सांगत जा हां! आम्ही तुम्हांला इथं आणलेलं आहे. आणि आम्हांला जेवढं करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत तुमच्यासाठी.' त्यांच्या गार्डनमध्ये त्या बाईंनी भाज्या लावल्या होत्या. कोबी, फ्लॉवर, वांगी अशा बघण्यासारख्या भाज्या हिरव्यागार. नवरा-बायको रोज सकाळी जायची, ताटभर भाज्या भरायची. आणि पहिल्यांदा ताट माझ्या घरी घेऊन यायची. दलवाईंना सगळ्या भाज्या खायची परवानगी होती. मिठाशिवाय सगळं खायला परवानगी होती. तसा काही प्रश्न नव्हता. मीठ खायचं नाही आणि पाणी जास्त प्यायचं नाही. लिमिट होतं. एवढंच पाणी प्यायचं. लघवी जमा करायची रोज आणि ती तपासायला पाठवायची. नि मग ते बघायचे किती झाली, पुरी झाली की नाही. हे, ते आहे का? त्यात किती अंश युरियाचा आहे, वगैरे. त्याच्यावरनं कळायचं सगळं. दर दिवशी मी ते तपासून आणायला जायची. खूप माणसं आमच्याकडे यायची. दुपारची वेळ दलवाईंच्या विश्रांतीची. कारण सगळे आपापल्या कामावर जायचे. संध्याकाळी सगळे आले की मी भाकऱ्या भाजायचं काम करायची. काही तरी कालवण करायची. टेबलावर नेऊन ठेवायची. आणि सगळे जमले की माणसं बसायची. मग मी हातात प्लेटी द्यायची. थोडा थोडा भाकरीचा तुकडा अन् कालवण घालायची. 'मला जेवण जात नाही. माझ्याबरोबर तुम्ही खा', हे म्हणायचे. दुसऱ्यांना खायला घालायचा षौक फार होता त्यांना. काही दिवसांनी फिरायची त्यांना परमिशन मिळाली. तेव्हा ते गाडी पण चालवत होते. तिथल्या तिथे. एकदा तर खूप मोठा अॅक्सिडेंट झाला. वाचलो आम्ही. डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं का गाडी चालवत असताना इथं पोटाजवळ तुम्ही उशी ठेवायची. म्हणजे समजा ब्रेक लागला तर हँडल-बिंडल तुमच्या पोटावर बसता कामा नये. उशी असली तर डायरेक्ट ते बसणार नाही. म्हणून उशी ठेवून गाडी चालवायची. ते सकाळचे कुणाला तरी घेऊन मार्केटला जायचे. कोंबडी-बिंबडी घरी आणायची. हुशारी आली त्यांना. तब्येत सुधारली चांगली. तर जायचे, बाजार घेऊन यायचे. मस्त जेवायचे. सगळे मिळून खायचे. आमच्या घरी जे व्हायचं ते पवारांच्या घरी जायचं आणि पवारांच्या घरी जरा काही झालं की ते आमच्या घरी यायचं. आम्हांला दिल्याशिवाय त्या माणसानं कधी काही खाल्लं नाही. मग वहिनी असं सारखी विचारायची, 'काय दलवाईसाहेब, आज तुम्हाला काय करून देऊ?' तर हे म्हणायचे, 'आज मला थालिपीठ खायचंय, आज मला भजी खायचीत.' त्या बाई आपल्या हातांनी करून घालायच्या ह्यांना.' म्हणजे इतकं प्रेम. एकदा तर ह्यांची तब्येत बिघडली म्हणून यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. नंतर वहिनीला कळलं, वहिनी म्हणाली, 'आत्ता तर बरे होते. आत्ता काय झालं?' म्हणून ती बिचारी बघायला आली. बघायला आली तर यांनी ओळखलं नाही तिला. त्या म्हणाल्या, 'दलवाईसाहेब, मी काय आणू तुम्हांला खायला? भजी-बिजी आणू का?' तर हे माझ्या तोंडाकडे बघून मला विचारताहेत, ही कोणय ग? म्हणजे मध्ये क्षणभरच त्यांना असं झालं. त्या निघून गेल्यानंतर हे शुद्धीत आल्यानंतर मी म्हटलं, 'वहिनींना खूप वाईट वाटलं हो. तुम्ही त्यांना ओळखलं सुद्धा नाही.' ते म्हणाले, 'नाही, माझ्या लक्षात नाही राहिलं. का मला असं क्षणभर झालं?' पण वहिनी खूप समजूतदार होती. तशी लहान होती. वयानं खूप लहान होती. पण खूपच समजूतदार होती. त्या वेळी ती म्हणाली, 'नाही हो, त्यांना बरं नसताना असा कसा मी त्यांच्यावर आरोप करीन की त्यांनी मला मुद्दाम ओळखलं नाही?'
दारुवालाला हॉस्पिटलमध्ये थोडे दिवस ठेवलं नि मग डिस्चार्ज केलं प्रोसिजरप्रमाणे. तो कुठे गेला, कधी गेला काहीच कळलं नाही. कारण तो जाताना निरोप घेऊन गेला वगैरे असंही काही नाही. काही संबंधच नाही हो. त्या दोघांचे फोटो काढलेले माझ्याकडे आहेत. ऑपरेशन झाल्यानंतरचा फोटो काढलेला आहे. जेव्हा त्या रूममधून बाहेर पडले ना, ऑपरेशन थिएटरच्या, तर त्या दोन नर्सेस, वॉर्डबॉय जो होता त्यांना ह्यांनी ५०-५० रुपये दिले. घेत नव्हते ते. डोळे भरून आले त्या नर्सेसचे. हे म्हणाले “नाही, मी बरा झालो ना, या खुषीनं तुम्हांला देतोय." आणि मला म्हणाले, "त्या नर्सेसनी माझी इतकी सेवा चांगली केली. असं कोणी करणार नाही. मी खुषीनं त्यांना दिले." कधीही हे दिसले की ते स्टाफचे सगळे लोक धावत यायचे, बोलायचे त्यांच्याशी. सगळ्या नर्सेस खूष असायच्या त्यांच्यावर. का तर चेष्टा-मस्करी चालूच असायची त्यांची. बोलणं-बिलणं म्हणजे जोक तर चालूच असायचे. विनोदी स्वभावच ना. त्यामुळे कुणाशी काय बोलायचं ते त्यांना बरोबर माहिती होतं.
हे डायलिसिसवर असताना यांच्या दोन बहिणी आयेषा आणि भाना भेटायला आल्या. भाना म्हणजे मोठीचं नाव आबीद. तिला आम्ही भाना म्हणायचो. मोठी म्हणजे यांच्यापेक्षा लहानच. तर त्या भेटायल्या आल्या. त्या वर चढल्या आणि मी खाली उतरले. तेव्हा रुबीना होती ह्यांच्याजवळ. मला भेटल्या तेव्हा म्हणाल्या, 'कशीये दादाची तब्येत?' म्हटलं, 'तुम्हीच बघा, जा वर. मी जरा घरी जाऊन येते. तुम्ही जरा बसा.' त्या आल्या-बिल्या. त्यांचं काय बोलणं झालं, मला काही माहिती नाही. त्या निघून गेल्या. मी संध्याकाळी आले, तेव्हा मी रुबीनाला म्हणाले, 'आयेषा, भाना आल्या होत्या ना ग?' तर 'हो' म्हणाली. विचारलं, 'काय झालं?' 'त्या आल्यानंतर मी बाहेर निघून गेले. मी काही थांबले नाही. का तर त्यांच्या मनात काही बोलायचं असेल आणि मी समोर असले तर त्यांना मोकळेपणानं बोलता येणार नाही. म्हणून मी समोर थांबलेच नाही', असं रुबीना म्हणाली. हे झाल्यानंतर मी ह्यांना विचारलं, 'काय! स्वारी आज खुषीत आहे. आज आयेषा, भाना आल्या होत्या ना? काय बोलत होत्या?' ते म्हणाले, 'काही नाही ग. मेहरू, त्या खूप रडत होत्या. त्या म्हणत होत्या, ‘दादा तुम्हांलाच आता बरं नाहीए. आमच्याकडे आता कोण बघणार? आमचं कोण करणार? कोणाला आम्ही दादा म्हणून हाक मारू? आणि दादा म्हणून मदत करायला आम्हांला कोण येणार? तर तुम्ही तुमची तब्येत सुधारा. आमचं सगळं आयुष्य आम्ही तुम्हांला द्यायला तयार आहोत. पण तुम्ही चांगले व्हा याच्यातनं.' आणि खूप रडल्या. अशा ढसाढसा रडत होत्या ग मला जवळ घेऊन. मला सुचेना काय बोलायचं ते. पण मेहरू, त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे हं. त्यांचं कोणी नाहीये.' एवढ्या आजारपणात सुद्धा त्यांना माहिती होतं का मी बिनपगारी रजेवर आहे, पैशाची सोय नाही, तरी ते म्हणायचे, 'मेहरू पहिली तारीख झाली. आपल्या घरी पैसे गेले? पोरं उपाशी असणार.' त्या काळात सव्वाशे रुपये जायचे आमच्याकडून. मी ऑफिसमध्ये असताना पगाराच्या दिवशी मनीऑर्डर करायची नि घरी येऊन सांगायची मला पगार मिळाला, घरी बाबांना सव्वाशे रुपयांची मनीऑर्डर केली की हे खूष असायचे. त्यांना दुसरं काही नको असायचं. म्हणायचे, 'आपण कसं तरी चालवू या. पण तिकडं पोरं उपाशी असतील. एवढी लहान लहान पोरं. बाबा बिचारे काय करणार ग?' आणि आजारीपणात सुद्धा त्यांना असं वाटायचं, की आपले पैसे गेले पाहिजेत. म्हणायचे की, 'मेहरू, पैसे घे आणि तू पाठवून दे हं. नाही म्हणू नको.' चंदावरकरांकडे मुली असताना सहा महिने आम्ही पैसे पाठवलेच नव्हते. पैसेच नव्हते माझ्याकडे. मला पगार नव्हता. त्यामुळे काय करणार? चंदावरकर तीनदा येऊन गेले, पण काय करणार? त्यांनी सांगितलं की, तुम्ही काळजी करायची नाही, त्या मुली माझ्या आहेत. जे पैसे तुम्ही या मुलींना पाठवता ते पाठवू नका. ते दलवाईंच्या औषधांसाठी मी दिले असं समजा. पण मला ते बरोबर वाटायचं नाही. मग मी थोडे थोडे शंभर, दोनशे असे करून ते पैसे फेडले त्यांचे. सहा महिन्यांचे पैसे हळूहळू फेडले. माझी धाकटी मुलगी तिथं असायची. सुट्टीला ती नणंदेकडं यायची. नि मोठी कॉलेज-बिलेज सोडून आली होती. मी शिकणारच नाहीये म्हणायची. तू बाबांपासून आम्हांला मुद्दाम लांब ठेवते. बाबा आम्हांला नकोयेत का? आम्ही बाबांना सोडून मुळीच जाणार नाही. आम्ही तुझं ऐकणारच नाही, म्हणायची. बाबांना धरून राहायची. म्हणायची, 'बाबा, तुम्ही सांगा तिला. ममा अशीच करते.' रुबीना त्यांचं खूप करायची. दिवस-रात्र ध्यास घेऊन सेवा करायची. हे गेल्यानंतर तिला फिटस् यायला लागल्या. अशी उभ्या उभ्या पडायची. इतका डोक्यावर परिणाम झालेला होता. आणि मग जसलोकमध्ये नेलं मी तिला. डॉ. कामतनी तपासलं तिला. पैसे घेतले नाहीत त्यांनी. स्क्रीनिंग वगैरे सगळं करून घेतलं. ते म्हणाले, 'नाही, बाबांच्याकडे ही असायची ना, ते सगळं बघून हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. तसं काही नाहीये. हिला तुम्ही कॉलेजमध्ये घाला. लग्न करून द्या हिचं. लग्न झालं की ही बरी होईल.' अशी चेष्टाही त्यांनी केली. म्हणाले, 'काहीही या मुलीला रोग नाहीये. पण बाबांच्या दुखण्याचा परिणाम आहे म्हणून थोडे दिवस हे होणार.'
आणखी एक गोष्ट. त्यांना ऑपरेशनला पोचवताना मी लिफ्टमध्ये सोडलं . त्यांना आणि मी येऊन अशी बसले. तेवढ्यात माझा फोन आलाय म्हणून कुणी तरी सांगितलं. मी फोन बाहेर येऊन घेतला. माझ्या आतेबहिणीचा, इशरतचा फोन होता. तिनं सांगितलं का अशी अशी तार आलेली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी तुझे वडील गेले. पाकिस्तानमध्ये. बरं, माझे वडील ७० वर्षांचे होते. पण आमच्याकडे ९० नि १०० च्या खाली कोणी मेलंच नाही. वडील आमचे इतक्या लवकर गेले, का, तर त्यांच्या मनात नसताना ते कराचीला गेले होते. एकटे पडल्यामुळे त्यांना तिथं त्रास झाला. मला धस्स झालं, की बापरे, आज ही बातमी आली. आपण बघा कैक गोष्टी मानत नाही आणि मी तर त्याच्यातील अजिबात नाही. तरी पटकन माझ्या मनात असा विचार आला की एक राहायचा होता म्हणून दुसरा गेला.
☯
त्याच वेळेस एक पत्र आलं. त्यात लिहिलेलं खूप वाईट वाईट होतं. ते पत्र उर्दूमध्ये होतं. आणि खाली काय कुणाचा पत्ता नाही, नाव नाही, गाव नाही, आणि चक्क लिहिलेलं होतं 'ये आदमी ने बहुत गुन्हा किया है।अल्ला के खिलाफ काम किया है. मजहब के खिलाफ काम कर रहा है।तो ये आदमी कभी भी इससे बच नही सकता।अल्ला करे ये मर जाय।अल्ला करे उसका बुरा हो जाय।' म्हणजे कर्सिंग होतं सगळं. किती वेळ मी ते पत्र वाचत होते. आणि मला तिटकारा सुद्धा आला, की माणूस जातानासुद्धा आपण त्याच्याबद्दल वाईट विचार करतो. म्हणजे किती क्रूरपणा आहे आपला ! लोकं एवढं तरी जाताना म्हणतात ना. 'बाबा बिचारा गेला. त्यानं काय केलं असेल आयुष्यात?' पण निदान असं तरी त्या वेळी वाईट बोलत नाहीत. कुणी तरी मुसलमानानंच ते पत्र लिहिलेलं असणार. कर्मठ मुसलमानानं, म्हणजे बघा तुम्ही पाच टाइम नमाज पढता. तुम्ही रोझे ठेवता, सगळं करता पण हे सगळं आपल्यापुरतंच असतं का मग? दुसऱ्याशी वागताना तुम्हांला लक्षात नाही राहात?
आणि यांची काय परिस्थिती होती? ते पत्र वाचून त्यांना काय झालं असेल?
ते पत्र मी बऱ्याच लोकांना दाखवलं. ते आता कुठं आहे, मला माहीत नाही. शोधावं लागेल. पण ते कुणी पाठवलं कळलं नाही... ते कळणार पण नाही.
दलवाई आजारी असताना, ऑपरेशनच्या अगोदर, पैशाची गरज आहे असं जे चाललं होतं त्या काळामध्ये त्यांना कुलकर्णींच्या फाय फौंडेशनचं पंधरा हजाराचं बक्षीस मिळालं. पेपरमध्ये डिक्लेअर झालं. ह्यांना बातमी कळली. फंक्शन होणार होतं मुंबईला. पण हे जाऊ शकले नाहीत. तेव्हा शहासाहेब म्हणाले, 'आपण असं करू या, भाभी जाऊन घेऊन येतील. भाभी, तुम्ही जा आणि घेऊन या.' तर मी म्हटलं, 'नाही, शहासाहेब तुम्ही जा नं.' ते म्हणाले, 'तुमच्या जाण्यात आणि माझ्या जाण्यात फार फरक आहे.' मग त्यांनी मला नेलं आणि स्टेजवर जाऊन मी ते पाकीट घेतलं आणि ताबडतोब शहा साहेबांच्या हातात दिलं, की हे त्यांच्या खात्यामध्ये घाला. हॉस्पिटलच्या. म्हणजे त्यांना मिळालेला तो चेक त्यांच्याचसाठी वापरला गेला.
आणखी त्याच वेळी असं व्हायचं की हॉस्पिटलमध्ये बडबडायचे एकटे. आपण विचारलं, काय हो बडबडताय एकटे? तर म्हणायचे की, “मेहरू, मी असे डोळे बंद केले की मला वाटतं खूप लोकं माझ्यासमोर उभे आहेत आणि मी भाषण करतोय."
म्हणजे असं सारखं त्यांचं काम त्यांना मिस होत होतं. कुठे तरी भास होत होते. आणि वाटायचं की ही सगळी संधी आपण घालवली की काय? मी तेव्हा असंसुद्धा सांगायची, 'अहो, तुम्हाला बरं असतं ना तेव्हा आपण रेकॉर्ड बिकॉर्ड करू या. कोणाला तरी बोलावू या. तुम्ही लिहायला सुरुवात करा. तुमच्या आईबद्दल लिहायचं होतं तुम्हांला. हे सगळं करा.' पण त्यांना मूड यायचाच नाही. म्हणजे आज मला कळतं की माणसाला मूड आल्याशिवाय माणूस लिहू शकत नाही. ज्या माणसाला आपलं मरण समोर दिसतं तो या सगळ्या गोष्टींचा विचार कसा करील? त्यामुळं त्यांनी ते लिहिलं पण नाही. बरे झाले असते ते तर एखादे वेळी असं वाटलं असतं, की परत तब्येत बिघडायच्या अगोदर आपण सगळं आटपू या. असं त्यांचं झालेलं नाही. आणि आपण काम करू शकत नाही हे फील व्हायचं त्यांना. कितीदा तरी असं व्हायचं की आता जरा बरं वाटतंय, बरं वाटतंय, पण डिसचार्ज मिळाला की लगेच हॉस्पिटलमध्ये यायला लागायचं. चार दिवस हॉस्पिटलचे, दोन दिवस घराचे. पंधरा दिवस हॉस्पिटलचे एक दिवस घरी. असं पण झालेलं आहे बरेच वेळा तर जेव्हा घरी यायचे तेव्हा आम्ही बोलायचो हे पोस्टकार्ड घ्या आणि सगळ्यांना पत्रं टाका. आपण मीटिंग घेऊ या. चार दिवसानंतरची मीटिंग घेऊ या. चार दिवसांत काय तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात नाही. असं करून डेट फिक्स करायचे ताबडतोब ते सगळ्यांना पत्र लिहायचे. मी टाकून यायची. पण एकएक वेळी असं झालं की ज्या दिवशी मीटिंग आहे त्याच्या आदल्याच दिवशी ह्यांना अॅडमिट करण्यात आलं. आता उद्या मीटिंग आहे, काय करायचं? प्रश्न पडायचा. 'काय करायचं मेहरू?' मी म्हटलं, काही नाही करायचं. थांबा जरा. मग मी युक्ती काढली. हे दोन डॉक्टर इतके हाताशी चांगले होते की काहीही बोललं की ते ऐकायचे.
डॉ. कुरुव्हिला आणि डॉ. कामत. फार मोठे डॉक्टर. त्यामुळे काहीही त्यांच्या कानावर घातलं तरी ते नाही म्हणून म्हणायचे नाहीत. मोठे मोठे लोक ह्यांच्या मागे असल्याने डॉक्टर नाही म्हणायचे नाहीत. तर मी त्यांना सांगायची की उद्या मीटिंग आहे. डिसचार्ज पाहिजे. मी सकाळी नेणार, संध्याकाळी परत आणणार. असं करून सकाळी उठल्यानंतर डिसचार्ज घेऊन घरी जायचं, म्हणजे टॅक्सी आणायला मी जायच्या अगोदर त्यांची इथे तयारी बियारी करून सगळी प्रोसिजर संपेपर्यंत मी खाली जाऊन जसलोकच्या तिथूनच भाजीपाला सगळं काय काय पाहिजे ते घ्यायची, वर चढायची. यांना घेऊन घरी यायची. घरी आल्यानंतर यांना ठेवायचं आणि स्वयंपाकाला लागायचं. का तर आत्ता माणसं येणारेत. त्यांना जेवायला वाढायचंय. पुष्कळ वेळा, मुकादम खूप मदत करायचे. भाभी, तुम्ही काळजी करू नका म्हणायचे. त्यांच्या फॅमिलीला घेऊन यायचे. ते घरून करून आणायचे. असं चालायचं. आणि मग मीटिंग व्हायची. सगळे जमा व्हायचे कार्यकारिणीचे. त्याच्यात बाबूमिया बँडवाले नेहमी असायचे. बाबूमिया बँडवाले खूप वृद्ध माणूस. म्हणजे आता ८५-८६ त्यांचं वय आहे. यांच्यापेक्षा डबल वयाचे होते ते. पण यांना ते खूप मानायचे. दोघांची आवड एक – गाण्याची.
बाबूमियांचा बँडवाल्याचा धंदा होता. त्यांची मुलं, त्यांची सगळी फॅमिली नाटकात काम करत असे. आणि ते फ्रीडम फायटर होते. काँग्रेसचे कार्यकर्ते होते. पण त्यांना पेन्शन गव्हर्नमेंटने जी दिली होती ना, फ्रीडम फायटरची, त्यांनी घेतली नाही. सांगितलं- 'मी याच्यासाठी काम केलेलं नाहीए. मला त्याचा मोबदला नकोय.' त्यांची मुलंबिलं सगळी बँडची कामं करायची. हे पण ते वाजवायचे. श्रीगोंद्याचे ते राहणारे. दलवाईंवर खूप प्रेम. पत्र गेलं की बाबूमिया आलेच. आणि मीटिंग झाली की दोन दिवस राहायचे. मग मी बाबूमियांना पोहोचवायची. एस.टी.त नेऊन बसवायची. आणि यांना नेऊन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायची. मीटिंग झाली की तो दिवस खूप चांगला जायचा. सगळे जमा व्हायचे. हे बोलायचे. पडल्यापडल्याच बोलायचे.
हे पलंगावर, एका खोलीमध्ये मीटिंग व्हायची. कामात मन तेवढंच होतं. तिथं काही हॉल, आणि पन्नास माणसं नव्हती. दहा माणसं जमा व्हायची. दहाबारा माणसं, एवढ्याशा खोलीमध्ये बसवायची. आणि त्यांना बोलायला काय? खाणंपिणं, मौजमजा, बोलणं त्या निमित्तानं. ती लोकं आली की तेवढंच आपल्याला बरं वाटायचं. म्हणायचे, की काय बरं वाटतंय मेहरू, हे लोक आले की. आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी त्यांना ॲडमिट करायची. असं कैकदा झालंय. आणि एकदा तर इंदिरा गांधींचं ते इलेक्शन होतं ना, आणीबाणीनंतरचं. त्या इलेक्शनची तर खूप धूमधाम सगळीकडे होती, की कोणता पक्ष येणार? आणि काँग्रेस न येता जनता पक्ष निवडून आला. त्यामुळे सगळे जण खुषीतच होते. ह्यांचं तर हॉस्पिटलमध्ये बसल्या बसल्या कौंटिंग चालू. हा डॉक्टर आला, तो डॉक्टर आला. म्हणायचे, ह्याला इथे बरोबर इतकी मतं पडतील. सगळी बघायला लागली. तोंडात बोटं घालून. आणि रिझल्ट जेव्हा रात्रीचा लागणार होता त्या दिवशी डिसचार्ज घेऊन आम्ही घरी गेलो. सबंध रात्र जागलो. किती माणसं होती घरात. रात्रभर बसून, आणि विचारायची ‘दलवाई, हा उभा आहे, याची कौंटिंग किती?' दलवाई सांगायचे, आणि ते बरोबर निघायचं. म्हणजं इतकं ॲक्युरेट त्यांचं रीडिंग होतं, का या माणसाला इतकी मतं मिळणार आहेत. सगळ्या भारतभरचं ठाऊक होतं. याला किती मिळणार, अमक्याला किती मिळणार. आणि सकाळी तो डिक्लेअर झाला रिझल्ट तेव्हा म्हणाले, 'मी काय म्हणत होतो!' हे रिझल्ट आम्ही ऐकले आणि पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. म्हणजे अशा रीतीनं हे सगळं चाललेलं होतं.
काही ना काही काँप्लिकेशन्स असायचीच. काँप्लिकेशन्सना तिथं तोटाच नव्हता. कुठे होणार, काय होणार, कधी होणार? काही सांगता यायचं नाही.
तो हातावर फिश्चुला केलेला होता ना. दोन नसा बसवण्यासाठी, तिथे धगधग आवाज यायचा, त्याला फार जपायला लागायचं. मला एक सवय होती. मी डॉक्टरांना सगळं खोदून खोदून विचारायची, की तुम्ही हे करून ठेवलेलं आहे. ते फुटतंबिटतं का? तर डॉक्टर म्हणाले, हो. मग मी म्हटलं, काय करायचं मग? काय होतं? तर म्हणाले, बाई, सगळ्या शरीराचं रक्त बाहेर पडतं. याला फार जपायचं असतं. कुठे धक्का लागता कामा नाही. त्याची फार भीती असते. पण दलवाई प्रत्येकाला कुणी आलं ना, की ये ये गंमत दाखवतो असं म्हणून ते सगळ्यांना दाखवायचे. थडथड थडथड उडायचं ते. ते फुटलं की ऑपरेशन करावं लागतं आणि मग ते पुन्हा जोडावं लागतं. _ एके दिवशी काय झालं, आम्ही घरीच होतो. हे मला म्हणाले, ‘मासेबिसे चांगले आणतो.' यांनी जाऊन मासे आणले. मासेबिसे केले. संध्याकाळची वेळ. आम्ही मस्त दोघंही जेवलो. त्यांना मासे आवडायचे खूप. जेवण झालं. गप्पाबिप्पा झाल्या. तब्येत खूप चांगली होती. आणि रात्री अकरा-साडेअकरानंतर ते झोपले. १५ मिनिटं झाली बत्ती विझवून. तेवढ्यात ते म्हणाले, 'मेहरू ऊठ. काय ओलं लागतंय सगळं.' आणि बत्ती लावल्यावर बघितलं तर सगळं रक्त फिश्चुलातून वाहत होतं. कसा तो फुटला कळलंच नाही. काय करायचं आता? मी तसाच त्यांचा शर्ट गुंडाळला हातावर आणि बाहेर आले. हवालदार सगळे बसलेले असायचे, पवार साहेबांचे. नुकतेच पवारसाहेब येऊन आपल्या रूममध्ये वर गेलेले मला माहीत होतं. गाडी आलेली ऐकली होती. हे बोललेसुद्धा, 'शरद आला वाटतं. आत्ता आला. बघ किती वेळ झाली. आता यानंतर तो जेवणार बिवणार.' हे आम्ही बोलतोय. ते आपल्या रूममध्ये गेले होते. मी हवालदारांना बोलवून सांगितलं ताबडतोब गाडीची व्यवस्था करा. टॅक्सी आणा नाही तर आपली गाडी काढा. काहीही करा. गाडी आणली. चार लोकं आली. दलवाईना असं गुंडाळलं. मी डॉ. कुरुव्हिलांना आणि डॉ. कामतांना ताबडतोब फोन केला, हे असं असं झालेलं आहे, काय करू? ते म्हणाले, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या, आम्ही येतो. आम्ही ह्यांना घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर रूम बुक केली. त्यांना स्ट्रेचरवर घेतलं नि तिथून परत डॉक्टरांना फोन केला. मी हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. आता काय करू? आम्ही येतो म्हणाले. ते आले. डॉ. रायबागी म्हणून एकजण होते त्यांनी लगेच अटेंड केलं. ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. नेल्यानंतर अॅनेस्थेशिया दिल्याशिवाय तर होत नाही ऑपरेशन! आता हे जेवलेले. सगळं झालं. चांगलं झालं पण मग ओकाऱ्या सुरू झाल्या. जेवलेलं अन्न सगळं बाहेर पडलं, त्यांना त्रास झाला. एरवी असं रिकामं पोट असलं तर त्रास होत नाही. आणि ऑपरेशन थिएटरमधून रूमपर्यंत आणीपर्यंत असा आवाज जोरात ओकाऱ्यांचा की सगळं हॉस्पिटल हादरलं. रात्रीच्या दोन अडीचचा टाइम. आणि मी? मला काही सुचेना, काय करायचं? काय झालं असेल यांचं? नि का बोंबाबोंब होतेय? काही समजेना. सगळे पेशंट बाहेर येऊन उभे राहिलेले बाजूबिजूचे. काय या पेशंटला झालंय, कोणाला काही कळेना. ते रूममध्ये आले स्ट्रेचरवरून. दलवाईंना त्यांनी पलंगावर ठेवलं, आणि ह्यांनी मला जवळ ओढली. माझे केस ओढले नि दोन्ही हातांनी धरले आणि मला म्हणाले, 'माझे आई. मी मेलो तर तू सुटणार. तू काय काय माझं बघणार आहेस? आणि किती सहन करणार आहेस?' डोळे असे लाल लाल भडक झालेले. म्हणजे या माणसाला काय झालं हे किती वेळ कळेना. मी म्हटलं, 'डॉक्टर काय झालं यांना? काय केलं तुम्ही यांचं? का हा माणूस असं करतोय?' तर ते म्हणाले, 'घाबरू नका. ॲनॅस्थेशिया दिल्यामुळे हे असं असं झालेलं आहे. घाबरायचं कारण नाही.' खूप रक्त गेलं. मग दुसऱ्या दिवशी रूममध्येच आणून रक्तबिक्त दिलं, खूप गेलं म्हणून. मग सकाळी त्यांना बरं वाटलं. मग म्हणाले. 'बाप रे, आपण ते जेवलोबिवलो होतो ना, त्यामुळे मला असा त्रास झाला.' तो एक प्रसंग अगदी अंगावर काटा उभा करण्यासारखा आहे. आणि त्याच्यातनं हे वाचले. म्हणजे हॉस्पिटलमध्ये असताना किती वेळा हा माणूस मेला आणि मरणाच्या तोंडातनं डॉक्टरांनी याला किती वेळा बाहेर ओढलं असेल, याची गणतीच नाही.
डायलिसिसवर होते ना तेव्हा एक दिवस जो बरा जायचा तेव्हासुद्धा आम्ही इकडेतिकडे फिरायला जात असू. फिरायला म्हणजे हात धरून धरून एकमेकांचा, गाडीत बसून. हे गाडी चालवायचे आणि हॉटेलात जायचे. त्यांना चायनीज जेवण खूप आवडायचं. मला पण त्या वेळी खूप आवडायचं आणि कुठं काय चांगलं मिळतं ते पण त्यांना बरोबर माहिती असायचं. त्यामुळं त्या बाजूच्या हॉटेलात जायचं,
ऑर्डर करायची. आपण तर फार खायचे नाहीत, दोन घास खायचे. आणि सगळं माझ्यासमोर ढकलायचे. आणि म्हणायचे, 'खाऊन घे. मी गेल्यानंतर कोण तुला आणणारे? कोण तुझे चोचले करणारे? कोण तुला प्रेमानं खायला घालणारे? असं तुला मिळणार नाही, खाऊन घे.' त्यांना मरणाची कल्पना होतीच. पहिल्यापासूनच कल्पना होती का आज नाही तर वर्षांनी दोन वर्षांनी, सहा महिन्यांनी आपण जाणार. आपण काही फार काळ राहातच नाही. प्रश्नच नाही. याची दोघांनाही कल्पना होती.
एक दिवस काय झालं, आम्ही चर्चगेटला ते कॅमलिंग हॉटेल आहे, चायनीज, तिथं जायचं ठरवलं, आणि जाताना पवारवहिनींनी आम्हांला सांगितलं, मी गाडी देते. तुम्हाला गाडीनं ड्रायव्हर सोडेल. आम्हांला त्यांने कॅमलिंगला सोडलं. सोडताना आम्ही त्याला सांगितलं, आम्हाला परत न्यायला काही तू येऊ नकोस, आम्ही टॅक्सीनं जाऊ. आम्ही तिथं जेवलोबिवलो. आणि बाहेर पडलो. टॅक्सी दिसेना. काय झालं? तर टॅक्सीचा संप होता. रात्रीचे दहा साडेदहा- चर्चगेटला उभे राह्यलोय, आणि गाड्यांचा संप आणि हे काय म्हणाले, 'नको बाबा, पवारांकडे फोन करायचा आणि गाडी मागवायची ही किती वाईट गोष्ट आहे. ते म्हणतील हे आजारी आहेत, आपण यांचं सगळं करतो नि यांना एवढाही सेन्स नाही का, अशा वेळी बाहेर जाऊ नये. आपल्याला माहिती असतं तर निघालोही नसतो. किती त्या लोकांना आपण त्रास देणार? हे काय बरोबर नाही.' काय करायचं? गाडी तर मागवायची नाही. टॅक्सी तर मिळत नाही. आता आपण काय करणार? मला इतकी काळजी लागून राहिली की या पेशंटला आता काही झालं तर मी काहीच करू शकणार नाही. माझीच चूक. की हे बोलले नि मी त्यांच्याबरोबर निघाले. आपण म्हणायला हवं होतं, की आपण जायचं नाही एकटं म्हणून. पण काय करणार? तिथं उभं राहिले आणि मी म्हटलं कुठल्यातरी प्रायव्हेट गाडीला आपण हात करायचा- किती वेळ थांबवण्याचा प्रयत्न केला, कुणी थांबायला तयार नाही. एक गाडी थांबली, तीन चार माणसं त्यात होती. आणि एक कोण तरी त्यांच्यातला यांच्या ओळखीचा. 'हमीदभाई, काय इकडे कुठे? काही हरकत नाही. चला, आम्ही तुम्हांला पोचवतो.' आणि त्या लोकांनी आम्हांला घरी आणून पोचवलं. त्याच्यानंतर मी ठरवलं, रात्रीबेरात्री एकटं आपण यापुढे कुठंही जायचं नाही. खाणं-पिणं ठीकय. घरात जेव्हा वहिनीला सांगितलं, तेव्हा वहिनी म्हणाली, 'इतकं सगळं ओढवून घेण्यापेक्षा तुम्ही फोन करायचा होता. तुम्ही बाहेर गेलात ते मला माहिती होतं की नाही? असे प्रसंग तर येणारच. मग तुम्ही असं वाटून घेतलं तर काय उपयोगाचं? अशा वेळी आम्ही तुम्हांला मदत नाही करायची तर कधी करायची? कशाला तुम्हाला काकी, असं वाटलं? त्या वेळी काही झालं असतं दलवाई काकांना, तर तुम्ही काय केलं असतं? साहेबांनी मला तासडलं असतं, बोलले असते मला, की तुझं लक्ष नाही. त्यांना जाऊ कसं दिलंस? तर हे सगळं तुम्ही करायचं नाही. आणि यापुढं कधीही जरूर लागली तर तुम्ही आम्हांला सांगायचं.'
आणखी एक आठवतंय मला, जेव्हा यांना ऑपरेशन करायला थिएटरमध्ये नेलं ना, तेव्हा यशवंतराव चव्हाण डॉक्टरांना भेटले आणि त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की माझी एक इच्छा आहे. मी हमीदच्या ऑपरेशनच्या वेळेला त्याच्याजवळ असावं. त्यांनी खूप आग्रह केला. पण डॉक्टर म्हणाले, ते शक्य होणारच नाही. इन्फेक्शनची इतकी भीती असते की तिऱ्हाईत माणूस ठेवला तर ऑपरेशन होऊच शकणार नाही. तर आम्ही तुम्हांला परवानगी देऊ शकत नाही. त्या बिचाऱ्यांना आत जाऊ दिलं नाही. यशवंतराव चव्हाणांची नि दलवाईंची सुद्धा खूप गट्टी होती. नेहमी येणं-जाणं बोलणं. वसंतराव नाईकांची पण गट्टी होती. शंकरराव चव्हाणांची पण होती म्हणजे भेटणंबिटणं असायचं त्यांच्याशी. सर्वांशी त्यांनी चांगले संबंध जोडले होते. एवढ्या सगळ्यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे. त्यांनी मित्रमंडळी खूप चांगली जमा केली होती भोवती. आता काय होतं, चांगले दिवस असले का माणूस चांगलं बोलतोच, चांगलं वागतोच. तीच वेळ खराब आल्यावर कोणी विचारेल असं नाही. आपल्या नात्यागोत्यामध्ये, मुलाबाळांमध्येसुद्धा हे व्हायला लागलेलं आहे. पण ह्यांनी जी मित्रमंडळी जमा केलेली होती ती इतकी चांगली होती की त्यातला एकसुद्धा मला असा सापडलेला नाही, की ज्याला वाटलं असेल, दलवाई जातोय ते बरं आहे. आपण कशाला भेटायला जावं, असं कुणाला वाटलेलं नाही. सगळे म्हणायचे, आमच्या हयातीपेक्षा त्याचं जिवंत राहणं फार जरुरीचं आहे. काळाला फार गरजाय त्याची. आणि या माणसाला कुठल्याही परिस्थितीत आम्हांला वाचवायचंय. नगरकर वगैरे तर हे सारखं सांगायचे. ऑपरेशन जेव्हा झालं ना, त्या वेळी माझा भाऊ कराचीला, त्यामुळे नगरकर दादा तेव्हा म्हणाले, का त्याला कळवू या. पण त्याला कळलेलं होतं अगोदर. कसं कळलेलं होतं मला माहिती नाही. या काळात माझी आई कराचीला होती. सगळी कराचीला होती. नंतर माझे वडील आईला सारखं सांगायचे तू जा, तिची सोबत कर. तेव्हा ती आली होती. हे जायच्या आधी वर्षभर आई माझ्याकडेच होती पण मनात जी दलवाईंबद्दल आढी होती ना, ती ते मरेपर्यंत गेली नाही. आणि भावाला ऑपरेशन करायचं कळल्यानंतर, भावाने फोन केला. सांगितलं का हमीदभाईंना इकडे घेऊन ये. आम्ही त्यांचं बघू. नगरकरांना हे कळलं. ते म्हणाले, काही हरकत नाही. इथं ऑपरेशन नाही करायचं. फॉरेनला जाऊन करायचं. मी म्हटलं, 'अजिबात नाही करायचं. तुमच्यापेक्षा आणखी जवळचं कोण आहे मला? माझ्या लोकांच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. आणि त्यांच्या पैशावर तर माझ्या नवऱ्यानं न जगलेलं बरं, तो गेला तरी चालेल. पण त्यांच्या पैशावर तर त्याला जगवायचं नाहीये. तुम्ही जे काय त्याचं करणार आहात, ते करा. तुम्ही सगळे माझ्याबरोबर असल्यामुळे मी इथे उभी आहे. मी एकटी जाऊन काय करणार? मला काही समजणार नाही. आणि हा माणूस जो काही चार दिवस जगणार ना, तो एका दिवसामध्ये आटपेल. मेहेरबानी करून असं काही करू नका. त्यांच्या स्वाधीन मला करू नका.' ते म्हणाले, तसं नाही. मी म्हणाले, मी ऐकणारच नाही तुमचं. आणि मग ते म्हणाले, 'जाऊ दे, असं जर असेल ना तर आजपासून मी तुझा भाऊ. तू मला भाऊ समजायचं.' आणि गंमत अशी की वारंवार माझ्याकडे यायचे. म्हणायचे, "तू रड, मला शिव्या दे. मला बोल, पण मन मोकळं कर तुझं. कोणी तरी आहे तुझं असं समज. आम्ही तुझेच आहोत की नाही? कशाला मेहरू, तू संकोच करते? जसा आमचा हमीद, तशी तू आहेस आम्हांला. फार लांबची नाहीयेस.” फार फारच इमोशनल व्हायचे ते. खरं तर शहा साहेबांना सगळे खूप घाबरून असायचे. पण माझे त्यांनी खूप लाड केले आणि मी काही बोलले ना, तर खूप कौतुकानं घ्यायचे. उलट ह्यांनाच ते बोलायचे 'नाही, नाही. ती बोलते ना ते बरोबर आहे. तुझंच काही तरी चुकत असेल बघ. तू असं नाही तर तसं कर ना, हमीद!' अशी ते समजूत घालण्याचा प्रयत्न करायचे आम्हा दोघांची. पवारांचं काय व्हायचं? पवारसाहेब जरा शाय होते, फार फ्रीली काही बोलायचे नाहीत. पण मनापासून त्यांना खूप वाटायचं, माझ्या मुलीबिलींना जवळ घ्यायचे, खूप लाड करायचे. त्यांची मुलगी तर इतकी प्रेमळ होती का तिला जर खायला दिलं ना, तर सगळाच्या सगळा खाऊ ती आमच्या घरी घेऊन यायची. दोघी मुलींना ती माझ्यासमोर घेऊन बसवायची आणि पोटभर खायला घालायची. मोठी जी रुबीना होती ना तिच्याशी तिची गट्टी होती. आणि धाकटीशी नेहमी तिचं भांडण व्हायचं. माझी धाकटी मुलगी म्हणायची, 'मिनिस्टरची मुलगी असली तर काय झालं? म्हणून तिनं असं करायचं का काय? मला नाही आवडलं, वहिनी नेहमी तिचीच बाजू घेतात. मला नाही आवडत.' आणि वहिनी नेहमी चिडवायच्या 'ही ना रुबीना, आमची आहे. आमच्यासारखी आहे. ही इला ही तुमच्यासारखी आहे. ही अशीच करते. बघा, तिला नाही आवडत. ती तुसडी आहे. तुमची लाडकी आहे' असं उगाचच घरातल्या घरात आमचं हे चालायचंच. कुठली ना कुठली गोष्ट बाहेर दिसली ना, का वहिनी प्रेमाने रुबीनाला आणून देणार, मुलींनी खाल्लं की नाही, मुलींना कपडे आहेत का नाहीत, मुलींना अमुक आहे का नाही हे पवार जातीनं बघायचे. आणि ते वारंवार बायकोला असंही बोलायचे की भाभीचा खर्च कसा चालतो, ती खाते का नाही ते बघ.
ऑपरेशनमधून बरं झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं का यांना हवा बदलायची. कुठंतरी पाठवायचंय. तर हवा बदलायला कुठं जाणार? त्या वेळी मला आठवण आली का आमच्या घरी दोनएक वर्षांआधी दलवाई आजारी पडायच्या अगोदर फिलाडेल्फियाचा कॉल आला होता. दलवाई तिथं जाणार होते.
सगळ्या मुस्लिम देशांची कॉन्फरन्स होती. कुठल्याही कॉन्फरन्समध्ये आपली बाजू, आपला प्रश्न मांडता येतो, जाणार म्हणून तयारीत होते आणि आजारी पडले. मी म्हटलं, 'हे सगळे पेपर पडलेले आहेत. अजून कॉन्फरन्स आहे. ते जाण्यायेण्याचा खर्च देणार आहेत.' आणि मग तयारी झाली त्यांची सगळी, पासपोर्ट काढणं वगैरे. म्हणजे सगळं एका दिवसामध्ये होत होतं. सगळे ओळखीचेच होते. त्यामुळे, आणि औषधपाण्याचा प्रश्नच नव्हता. कारण सगळी औषधं तिकडेच सहजपणे मिळायची. डॉक्टर म्हणाले, 'आता खा, मौज मजा करा. फक्त इनफेक्शन होऊ देऊ नका.' साधारणपणे कशाने इनफेक्शन होतं ते पेशंटला माहिती असायला हवं. अशी सगळी तयारी झाली. तयारी झाली तर नगरकरांना वाटत होतं, हमीदला एकट्याला कशाला पाठवा? तिथं कोण बघणार त्याला? तर ही पण जाईल. भाभी पण जाईल बरोबर. म्हणून 'तुमची पण तयारी करा. तुम्ही पण त्याच्याबरोबर जा हं.' असं मला म्हणाले पण नगरकर वहिनी म्हणाली, 'कशाला भाभीला पाठवता? त्यांना नका पाठवू. भाभी खूप कंटाळलेली आहे. ऑफिस सोडून दोन वर्षं बसलेली आहे घरी. आणि तिची रजा पण तेवढी झालेली आहे. दोघांना जरा बाजूला करा. म्हणजे ती पण जरा फिरेल बिरेल. मैत्रिणींमध्ये मजा करेल. हमीदचं सगळं करून ती नाही का कंटाळलेली? तिचा कोण विचार करणार? तिला तुम्ही पाठवूच नका.' हे पण म्हणाले की नको ही माझ्या बरोबर. मी एकटाच जाणार. मला खूप राग आला यांचा. कारण हे असं नाही म्हणाले, की मी जाताना मेहरूला बरोबर घेऊन जातो म्हणून. मला खूप वाईट पण वाटलं आणि राग पण आला की यांचं इथं करायला मी हवी पण बाहेर जायला नको, मी गेले असते कॉन्फरन्समध्ये यांच्या बरोबर तर काय झालं असतं? असं मला वाटलं पण नाही गेले मी. यांची सगळी तयारी केली. म्हणजे लोकांनीच यांची तयारी केली. कपडे शिवले. खादीच्या शिवाय तर कपडे घालत नव्हते. खादीचाच पँट-शर्ट. मग कोट आणि पँट मात्र खादीची नाही शिवली. म्हणाले, एवढा कॉस्टली कशाला? आल्यानंतर तर मी घालणार नाही. कशाला एवढं कॉस्टली शिवायचं? मग नाईलाजाने बिनखादीचे कपडे शिवले. सगळी तयारी लोकांनीच केली त्यांची. आणि त्यांना पाठवून दिलं. तिथं गेल्यानंतर पन्नास ठिकाणी ते गेले असतील. सगळ्या मित्रमंडळींना माहीत, आजारी माणूस इकडे येणार आहे. प्रत्येकानं त्याला सांभाळून घेतलं. कॉन्फरन्सला हजर राहिले. कॉन्फरन्स संपल्यावर एकानं बोलवायचं, येण्या-जाण्याचा खर्च संपूर्ण द्यायचा, दोन दिवस ठेवायचं,सगळीकडे फिरवायचं आणि परत थोडेसे पैसे खिशात घालून दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं. असं करून त्यांच्या फिरण्याची सोय केली.असे अमेरिकेत तीन-साडेतीन महिने राहिले. एकूण सगळ्यांकडे राहिले. कॉन्फरन्स खूप चांगली झाली. बोलले. म्हणजे इंग्लिशमधून भाषण.मोडकी तोडकी इंग्लिश. असं नाही मला हे येत नाही, ते येत नाही. हिंदी, उर्दू पण तशीच बोलायचे. मराठी फक्त फ्ल्युएंट असायची. बाकी सगळं कामचलाऊ. मुद्दे बरोबर मांडायचे आणि बोलण्याची टॅक्ट असल्यामुळे अडायचं नाही त्यांचं काही. बोल्ड होते तसे.
लंडनला मावसबहीण होती त्यांची, सगीरा. तिच्याकडे, तिनं जबरदस्तीने दोन महिने ठेवून घेतलं. चांगलं सांभाळलं. म्हणून ते तिच्याकडे राहिले. आमचं लग्न जेव्हा झालं ना तेव्हा बाहेरगावी गेले तर पत्र लिहायचे ते. भावांना लिहायचे आणि त्याच्यात मजकूर लिहायचे, भाभीला हे सांगा म्हणून. मला डायरेक्ट पत्र लिहायचे नाहीत. मी एकदा म्हणाले, काय हे, तुमची बायको शिकली सवरलेली आहे, नोकरी करणारी आहे. भावाच्या पत्रात मला का निरोप? मला एक वेगळं पत्र लिहू शकत नाही? हे त्यांच्या लक्षातच यायचं नाही. त्यानंतर ते काय करायचे माहिती आहे का? पोस्टकार्ड लिहायचे, मला वेगळं. मी म्हटलं, बायकोला पत्र लिहिताना पोस्टकार्ड वापरतात का? म्हणायचे, 'काय लिहायचं असतं त्याच्यात? मी काय प्रेमपत्र तुला लिहिणार होतो का? मला प्रेम तसं करता येतं का? तुला काय वाटलं प्रेम जसं सिनेमा-नाटकमध्ये चाललंय, तसंच प्रेम मी तुझ्यावर करणारे? हे काय मला जमणार नाही'. पण मी म्हटल्यानंतर मग इनलँड लेटर एवढं मोठं घ्यायचे नि दोन ओळी लिहायच्या नि बंद करून पाठवायचं. अशी पन्नास इनलँड लेटर अमेरिकेतून, लंडनमधून पाठवली. प्रत्येक पत्रात दोनच ओळी, काय तर, 'मेहरू, मी अमूक ठिकाणाहून तमूक ठिकाणी गेलो. तब्येत बरी आहे. काळजी करू नको.' सगळ्या पत्रांत हेच. आणि मला राग आला होता म्हणून मी एकाही पत्राचं उत्तर दिलं नाही. दिलंच नाही. नंतर ते झाले खूप अपसेट. खूपच अपसेट झाले. लंडनला आल्यानंतर त्यांनी महंमददांना दोनदा पत्र लिहिलं ना डिटेलमध्ये. आणि सांगितलं, काय झालंय मेहरूला? तिच्याकडे जाऊन बघ, तिला बरं नाहीये का? ती रागावली आहे का? तिनं मला का नाही पत्र लिहिलं? आणि महंमददा अगदी इमोशनल होऊन आले माझ्याकडे आणि मला म्हणाले, काकी, का हो त्रास देता त्याला तुम्ही? तुम्ही एकही पत्र लिहिलं नाही? तुम्हांला काय राग आहे? असं करू नका. मी तुम्हांला हात जोडतो. तुम्ही सांगा. मी मजकूर लिहितो. तुम्ही साईन करून पाठवा. पण हमीदला तुम्ही पत्र पाठवा.' आणि तेव्हा मी एक पत्र लिहिलं. दोन ओळींचं पत्र आणि पाठवलं. काय लिहिलं हे पण आता लक्षात नाही. पण त्यांच्या लक्षात आलं की ही रागात आहे म्हणून तिनं पत्र नाही लिहिलं.
लंडनला माझी बहीण राहत होती. तेव्हा तिचा पत्ता दिला होता आणि सांगितलं होतं की तुम्ही तिकडे गेल्यानंतर माझं एक काम करायचं. मला हातातलं घड्याळ नाहीये. ते पाठवायचं. बरं म्हणाले. आणि मला वाटतं बहिणीला त्यांनी फोन केला. तिथं गेले आणि बाय चान्स माझी वासवानी म्हणून सिंधी मैत्रीण होती. ती त्या वेळी तिकडे गेली होती, ती जाताना मी तिला म्हटलं, बहिणीचा पत्ता असा असा घे. दलवाई तुला तिथं भेटतील. काय माझ्या नवऱ्याला गरज लागली तर तू द्यायचं. आल्यावर मी बघेन, त्या परक्या गावात त्याचं कोणी नाहीए. तर तू देखरेख करायची. ती फार चांगली मैत्रीण होती माझी. म्हणजे सुरुवातीपासूनची. ती म्हणाली, 'तू काही काळजी करू नको. मी बघेन, आणि तिकडे गेल्यावर तिनं दलवाईंचा शोध घेतला. बहिणीकडे नेलं. तिनंच नेलं. आणि यांनी सांगितलं का मेहरूनं घड्याळ मागितलंय असं असं. तिनं फारसं लक्षच नाही दिलं. आणि ती फारसं चांगलं वागलीही नाही असं त्यांचं म्हणणं. त्यांना एक सवय होती ना, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. पण मला माझ्या मैत्रिणीनं थोडीशी हिंट दिली की तू तुझ्या नवऱ्याला याबद्दल काहीही विचारू नको. तिथं काही बरोबर पाहुणचार झालेला नाही. त्यामुळे मी काही बोलले नाही. तुला वाईट वाटेल म्हणून ते सांगणार पण नाहीत. मला तू विचारू नको. त्यांनी मला पण सांगितलं की, मेहरूला तू हे बोलू नको. वाईट वाटेल. म्हणून ते सांगणार पण नाहीत.
ते जेव्हा परत आले तेव्हा एअरपोर्टवर त्यांना घ्यायला गाडीभर माणसं. पवारांची गाडी घेऊन आम्ही गेलो तिथं. सगळे पुढे गेले. मी मात्र काचेच्या मागे उभी राहिले. ह्यांनी बघितलं येताना. तब्येत बिब्येत चांगली मस्त झाली होती. आल्यानंतर माझ्याकडे नुसतं बघितलं. काही बोलले नाहीत. आम्ही गाडीत बसलो. यांच्या हातात दोन घड्याळं होती. त्यांच्या हातात एक घड्याळ होतं तरीही त्या मावसबहिणीनी त्यांना घड्याळ दिलं होतं. ते म्हणाले पण, हे बघ माझ्याकडे एक घड्याळ आहे, काय करणार मी याचं? मला देऊ नको. ती म्हणाली, 'काही नाही, एक घड्याळ अन् एक शर्ट घ्या' ते म्हणाले, 'खादीशिवाय मी काही घालत नाही, कोण घालणार तुझा हा शर्ट?' 'तुम्ही कोणालाही द्या. पण आम्हांला तुम्हाला द्यावासा वाटतोय म्हणून मी आणलाय.' यांनी आल्याबरोबर घड्याळ माझ्या हातात घालत मला सांगितलं, 'माझे आई, याच्यापुढे कोणतीही वस्तू मला आणायला सांगू नकोस, तुझ्यासाठी एअरपोर्टवर मला खोटं बोलायला लागलं.' मी म्हटलं, 'काय झालं?' 'मला विचारलं, तुम्ही काही आणलंय का? मी नाही म्हणून सांगितलं. समजा त्यांनी माझी तपासणी केली असती आणि ही दोन घड्याळं निघाली असती तर कुठं राहिलो असतो? असं काम आयुष्यात कधी केलेलं नाही आणि तू म्हणालीस म्हणून मी तुझ्या बहिणीला घड्याळ आणायला सांगितलं होतं. नाही तर माझ्या मनात होतं तुला घड्याळ आणायचं. तू हे बोलली नसतीस तरी मला माहिती होतं तुझ्याकडे घड्याळ नाही. मी तुला घड्याळ आणून दिलं असतं.' एवढं हे गाडीमध्येच बोलणं झालं, घरी गेलो मग.
तेव्हा घरात कोणी नव्हतं, नंतर मुलीबिलीपण आल्या. मुली आपापल्या हॉस्टेलला वगैरे होत्या ना. नंतर त्या आल्या, भेटल्या. चॉकलेट बिकलेट आणलं होतं. एवढे लिपस्टिक, पावडर तिथं काय लावतात, इथं काय लावतात. सगळं आणलं. मी म्हटलं हे काय? ते म्हणाले कोणाला माहिती कुठं काय लावायचं असतं? आणि म्हणाले की, मेहरू, तू काही लावू नकोस हे. आपण आपलं बाब्यालाच देऊ या. ती कॉलेजला जाते ना. करू दे तिला जरा नट्टापट्टा. हेच तर दिवस असतात मजा करायचे, आम्ही खूप केली मजा. तू केली का? मी तर कॉलेजमध्ये खूप मजा केली. हे आपण बाब्याला देऊ या. ती लावेल. तिनं लावलं तर मला आवडतं. म्हणून ते सगळं तिला दिलं. जर्मनीमध्ये, एक बाई कॉन्फरन्समध्ये आली होती, तिनं त्यांना आपल्या घरी नेलं होतं. आणि तिनं एक साडी दिली होती. ही साडी तुमच्या बायकोला द्या म्हणून. ती साडी अजून माझ्याकडे आहे. मी नेसली पण नाही. इतकी सुंदर की विचारायला नको. तिची उंची तर डोक्यापासून खाली पायापर्यंत अशी स्ट्रेच होते. आणि बारीक बारीक फुलांची इतकी सुंदर होती. ते म्हणाले, इतकी छान साडी तिनं तुला दिलेली आहे. तिने तुला पाहिलं पण नाही. तुझी ओळख पण नाही. पण तिनं सांगितलं की तुमच्या बायकोला माझ्याकडून द्या. जातील तिथं तिथं व्याख्यानं दिलीच त्यांनी.
व्याख्यानांसाठीच गेले होते ते जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये. ते काम नसताना कधी कुठे गेलेलेच नाहीत. नुसत्या फिरायसाठी ते कधी गेलेच नाहीत. आणि गंमत अशी होते की अशी माणसंच कुठे गेली ना, की आपोआप माणसं त्यांना बोलवतात. बोलवतात म्हणजे कशाला? बोलायला, सभेत भाग घ्यायला. आपले प्रश्न मांडायला. याच्यासाठीच बोलवतात. त्यामुळे तसे ते फिरले. आणि ती ट्रीप त्यांची खूप छान झाली. चांगले सुधारले आणि डॉक्टरनी सांगितलं की आता तुमचं वजन जरा कमी करा. खूप वाढलेलं आहे. तब्येत खूप चांगली झालेली आहे. थोडं खाण्यापिण्यावर लक्ष द्या. आणि इथं आल्यावर तेवढा हवेमध्ये फरक पडतोच ना? एक वर्ष विदाऊट डायलिसिस खूप छान मिळालं त्यांना. त्याच्यातच मीटिंगा बिटिंगा घरात घेतल्या गेल्या. बाहेर तर फारसं जात नसत ते. गाडीतनं थोडं फिरायला गेलं तर, नाही तर कुठं नाही. किडनी सव्वा वर्ष चांगली चालली. ऑपरेशनच्या अगोदरची एक आठवण आहे, काय झालं? आम्ही पुण्याला गेलो. शहासाहेबांनी बोलावलं होतं. दोन दिवस पुण्याला राहिलो. त्या वेळी पण डायलिसिस होत होतं. तर शनिवारचा डायलिसिस होता तो. सोमवारपर्यंत घेऊ या असं ठरवलं. शनिवार, रविवार सुट्टी घेतली आणि आम्ही पुण्याला आलो. गाडीनेच आलो. शहांकडे आलो. शहांनी केवढी तयारी घरी केली होती, त्यांच्यासाठी फुलं मांडून ठेवली होती. फ्रूटस् आणली होती. मी म्हणालेसुद्धा ‘काय शहासाहेब किती तयारी केली!' नाही, नाही त्याला हे फ्रूट लागणार आणि मग तो हे खाणार. मग तो अमूक करणार, तमुक करणार असा विचार करून सगळी तयारी केली होती. आणि दोन दिवस सगळी पुण्याची माणसं लोटली भेटायला. पहिला दिवस तर चांगला गेला. दुसऱ्याही दिवशी रात्री अकरापर्यंत हाच गोंधळ. उद्या सकाळी आम्ही मुंबईला जायला निघणार गाडीने. सगळे झोपले आणि मी बत्ती बंद केली. हॉलमध्ये आम्ही झोपलो होतो. थोड्या वेळाने उठले, म्हणाले, 'मेहरू जरा बत्ती पेटव,' 'काय झालं?' 'कसं तरी होतंय. मला श्वास लागलाय.' त्यांना ज्या गोळ्या देत असत त्यातल्या एका गोळीचा इफेक्ट असा होतो का त्यानं घाबरायला होतं. मी विचारले, 'का हो तुम्ही गोळी खाल्ली का ती? त्यानं असंच होतं. मी म्हटलं होतं आज गोळी खाऊ नका तुम्ही. आणि तुम्ही खाल्ली गोळी.' आणि थोड्या वेळाने बेशुद्धी आली त्यांना. ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं, जवळपासच्या. तपासल्यानंतर मग त्यांनी सांगितलं का हॉस्पिटलमध्ये रिमूव्ह करा. एवढा गोंधळ उडाला. सगळ्यांना वाईट वाटलं. हार्टबिर्ट बंद झालं की काय? अँब्युलन्स बोलावली. नगरकरांना बोलावलं. सगळे आले. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. ॲडमिट केलं त्यांना, झोपवलं. हार्टबीटस् बघायला दोन वाजले रात्रीचे. मग शहा आणि नगरकर गेले. जाताना माझी समजूत घालून म्हणाले, 'काही घाबरू नका. आम्ही घरात फोनजवळ आहोत. तुमच्याजवळ फोन आहे. तुम्हाला काहीही जरी वाटलं तरी आम्हांला ताबडतोब फोन करून बोलवायचं,' आणि मी आपली रात्रभर अशीच बसलेली. सकाळपर्यंत तब्येत नॉर्मल झाली थोडीशी. पु.ल. देशपांडे वगैरे होते. त्या वेळी पु.लं.च्याच गाडीनं आम्ही गेलो. सकाळी ते आले. जवळच्या हॉटेलात नेलं. मला त्यांनी नाष्टाबिष्टा, चहापाणी दिलं, मग गाडी आणली. गाडीमध्ये कुमार होता, कुमार सप्तर्षी, त्याला बरोबर घेऊन आम्ही तिथून सुटलो. मला त्या हॉस्पिटलमध्ये काही गोष्टी विचारण्यात आल्या, का यांना कोणत्या गोळ्या देता? मी म्हटलं 'हा या गोळीचा इफेक्ट असणार.' ते म्हणाले, बरोबर आहे. मी म्हणाले, 'हे बघा, तुम्ही कोणतं तरी औषध इथं तुमच्या परीनं द्यायचं नाही. त्यांची औषधं सगळी इथं आहेत. किडनी पेशंट आहे. तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन्स पाहिजे असतील तर जसलोकला फोन करायचा, या या डॉक्टरला बोलावयाचं. त्यांना विचारल्याशिवाय एकही ट्रीटमेंट मी इथं करू देणार नाही. म्हटलं, बाहेरची ट्रीटमेंट करायचीच नाहीये त्यांना.' असं मी सांगितल्यामुळे तिथे एक सरदारजी होते त्यांनी फोन केला. तिथं अॅडमिटकार्ड केलं. सांगितलं, घेऊन येतो पेशंटला. मग इथून गाडीमध्ये घालून आम्ही घेऊन गेलो जसलोकला. आणि मग जसलोकमध्ये नेऊन त्यांना टाकलं. त्या दिवशी डायलिसिसचा दिवस होता. केलं नाही पण दुसऱ्या दिवशी डायलेसिस केलं. मग ते नॉर्मल आले. असे प्रसंग किती तरी आहेत.
दलवाई जेव्हा जेव्हा पुण्याला जायचे, तेव्हा तेव्हा ते पूनम हॉटेलात थांबायचे. ही व्यवस्था निळूभाऊ लिमये यांनी केलेली होती. येथे सगळी मंडळी जमा व्हायची. अन्वर शेख, अमीर शेख, सय्यदभाई, मुनीर सय्यद, रफिक शेख, फैज शेख, रसुलभाई, मकबूल तांबोळी आणि युक्रांदचे विवेक पुरंदरे, दिलीप भंडारे, माधव साठे आणि इतर काही लोक. विवेक पुरंदरे, दिलीप भंडारे व अरुण केळकर ह्यांनी तर दलवाई आजारी असताना हॉस्पिटलात ह्यांची खूप सेवा केली होती. त्यांच्यामुळे मला रिलीफ मिळायचा. दलवाईंचं ऑपरेशन झाल्यानंतर ते पुण्याला गेले होते. पूनम हॉटेलात थांबले. सगळी मंडळी आनंदाने त्यांना भेटायला आली. त्यांना आशा वाटली की चला, हमीदभाई बरे झाले आता. परत कामाला गती येईल. इथे अन्वर शेख आपल्या बायकोसहित आले होते. ते दलवाईंच्या फार जवळचे होते. त्यांना वाटले आज आपण दलवाईंशी खूप खूप बोलू या. पण दलवाई अपसेट झालेले दिसले. अन्वर शेखशी ते बोलले नाहीत. त्यांना वाईट वाटलं, ते निघून गेले. त्यांनी गैरसमज करून घेतला नाही. पण का आपल्याशी हमीदभाई बोलले नाहीत, या विचारात रात्रभर झोपलेही नाहीत. येथे दलवाईंनासुद्धा त्याची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी अन्वर शेखला बोलावले. आणि म्हणाले, 'अरे, मी तुझ्याशी काल बोललो नाही. तुझ्या बायकोशी मला खूप बोलायचं होतं. पण मी असा का वागलो ते मलाच कळत नाही. मला तू क्षमा कर.' अन्वर शेखचे डोळे भरून आले आणि त्यांना खूप बरे वाटले. दलवाईंनी आपल्या मित्रांना खूप जपले होते.
तब्येतीमध्ये चढउतार सारखेच. म्हणजे आता बोलता बोलता या माणसाला काय होईल याची गॅरंटी नसायची. खूपच टेन्शनमध्ये दिवस जायचे. का बाबा हा मनुष्य आहे, चार दिवस चांगला राहणार आहे असं कधीच झालं नाही. आमच्याकडे एक म्हातारी बाई होती कामाला. त्या वेळी ती पवारांकडे होती; स्वयंपाकाला आणली होती. पण कामचोर होती फार, त्यामुळं फार काम करायची नाही. हे काय म्हणायचे, 'तुला खूप त्रास होतो. असू दे ना. करते ते करू दे. तू फार लक्ष देऊ नकोस. तू माझ्याकडे आपलं बघ, तिला करायचं ते करू दे.' असं बोलायचे. पण व्हायचं काय? आम्ही आता जेवण केलं, समजा कोंबडी केली, तर मी काय करायची? टोपच उचलून मी असा टेबलावर ठेवायची. त्यांची कॉट अशी शेजारीच. टेबल असं इथे ठेवायची. प्लेट अशी, चमचा असा. तुम्हांला काय लागतं ते घ्या म्हणायची. म्हणजे ते उष्टं होतं का? आपण असं चमच्यानंच काढून घेतो ना! तुम्ही काढलं काय, नि मी काढलं काय? त्या चमच्याने काही आपण खात नाही. हातानं घेत नाही. चमच्यानं आपण घेतो नि बाजूला ठेवतो. सगळ्यांना वाढतो. पण नंतर नंतर ती बाई हात लावायची नाही त्या टोपाला. त्यांच्या ते लक्षात आलं. मुसलमान म्हणून नाही. हे आजारी होते म्हणून. मुसलमान म्हणून काय? काम तर ती करत होतीच ना, इतकी वर्ष. २-३ वर्षं ती होतीच आमच्याकडे ! मी समजावून सांगायची, हा पेशंट आहे. अग, आम्ही पण तेच खातो ना. त्यांच्यासमोर टोप का ठेवते? तर जी वस्तू त्यांना आवडते ती ते आपल्या हातानं पहिल्यापासूनच घेत आलेत. आमच्याकडे जेवणाची पद्धत पहिल्यापासून अशीच होती. त्यांच्या बाबतीत अमूक घाल, तमूक घाल असं मी शोधत बसायची. मग म्हणायचे 'दे ना टोप माझ्याकडे, मी शोधून माझं घेतो.' त्यांनी घेतलं की मग आम्ही घ्यायला मोकळे व्हायचे. म्हणून मग त्यांच्यासमोर आधी मी ठेवायची आणि मग सगळ्यांनी वाटून घ्यायचं. खायचं. पण ती बाई खात नसे. नंतर मी काढून टाकली तिला. कारण नंतर नंतर मला असं वाटलं की या बाईला जर रोगाची भीती वाटत असेल तर ही बाई आपल्या घरात नको. पेशंटला वाईट वाटेल. त्यांना वाटेल, माझा काय असा रोग आहे, का कुणाला लागण्यासारखा?
नंतर नंतर, सुट्टीमध्ये मुली घरी आल्या का त्या मुलींना घेऊन खूप रडायचे ते. असे दोन्ही बाजूंना त्यांना घ्यायचे, मिठी मारायचे आणि म्हणायचे, 'मेहरू, मी मुलींसाठी काहीच केलं नाही. मी काय करायला पाहिजे होतं? मी सगळ्या जगासाठी झटलो ग. पण मी आपल्या मुलींचा कधी विचारच केला नाही. माझी पाखरं कशी ग मोठी होणार? त्यांना आठवण येणार का? बाब्या, तुम्हांला आठवण येईल का रे बाबांची?' आणि ते बिचारे न कळत रडायचे असे ढसाढसा. दोन्ही पोरींसमोर. पोरींना कळायचं नाही.'बाबा, असं का बोलता तुम्ही?' कळवळून कधी कधी पोरी विचारायच्या.मी म्हणायची, 'काय हो तुम्ही, मोठे असून मुलींना घेऊन रडता, मुलींच्यावर काय परिणाम होईल? आता सगळं काही आपल्याला माहिती आहे. तरी तुम्ही असं करायला लागल्यावर काय होणार? तुम्ही असं रडू नका. मुलींना असं भासवू नका, का तुम्ही जाणार.'कधी कधी विनोद सुद्धा व्हायचा. काही खायचं असेल ना, 'मेहरू, तू अमूक वस्तू मला खायला दिली नाहीस. का खायला दिली नाहीस? हे बघ, मेल्यानंतर मुनकिर नकीर असे दोन फरिश्ते येतात. फरिश्ते म्हणजे एंजलस्. ते मेल्यानंतर येतात असं लिहिलेलं आहे. आणि ते विचारतात, 'अमुक अमुक केलंस? तमुक तमुक केलंस?' तर हे म्हणायचे मला, 'ते विचारणार मला, हमीदखान, तू अमुक अमुक खाल्लं? तमुक तमुक नाही खाल्लं? मी म्हणणार, मेहरूने मला हे नाही दिलं. माझी काय चूक आहे? तेव्हा तुझ्याही नावाला पाप नको. तू पण वर जाणारेस. तू हे असं करू नको. तुला शिक्षा भोगायला लागेल. तू आपली मला हे खायला दे.' म्हणजे विनोद पण त्याच्यात असायचा आणि जाणार ही जाणीव पण त्यात असायची. नंतर नंतर त्यांना वाटायचं पण, की आपल्याला जायला नकोय. पण जबरदस्तीन जाव लागतंय. हे वय आहे का मरायचं आपलं? म्हणजे कामाची उमेद केवढी! काम आता वाढलेलं आहे. मी अमुक करणार होतो, तमुक करणार होतो. मी काहीच करू शकलो नाही. हे काय वय आहे जाण्यासारखं? काय मी असं केलेलं आहे, का मला एवढी मोठी शिक्षा मिळायला पाहिजे, असं सतत म्हणत. शेवटी शेवटी तर झोपून झोपून बेडसोअर्स झालेले होते त्यांना, पाठीवर. पायाला तर ते डायलिसिसच मशीन लावायचे ना, तिथे एवढा मोठा खड्डा पडला होता. असे बोंबा मारायचे हात लावला तर ते! ड्रेसिंग करायला ती नर्स आली की दोन्ही हात माझे घट्ट दाबायचे आणि म्हणायचे 'तिला जाऊ दे. मला हात नको लावू देऊ. मला दुखवते. इतका दुखवते ती की मला नको वाटतं साफ करायला. नंतर तर कुशीलाही वळायचे बंद झाले ते. उताणेच असत आणि त्यामुळे बेडसोअर्स खुप झाले. शेवटी शेवटी मला म्हणायचे. 'मला घरी घेऊन चल. मला घरी घेऊन चल.'
आमचे नातेवाईक बरेच यायचे. आता जोगेश्वरीलासुद्धा यांचे चुलतभाऊ वगैरे राहायचे. ते, भावजय-बिवजय यायची. ते भाऊबिऊ यायचे. तर हे सांगायचे ना, त्यांना घरी घेऊन जायला, तर ते भाऊ म्हणायचे चला आपल्या घरी. मी म्हणायची, 'नाही बाबा, तो पेशंट उचलण्यासारखा आहे का? पेशंटला हलवायची सोय नाहीये. आपल्या घरी सोय नाहीये. तिसऱ्याकडे मी कुठं यांना नेऊ? मी परमिशन देणार नाही. मी तुम्हांला जाऊ देणार नाही. तुम्हांला एखादे दिवशी बरं वाटेल. पण एखाद्या दिवशी बिघडलं तर ते काय करणारेत?' आणि मला ही धास्ती की तिथं कुठं गेले, त्यांना काय झालं, तर नातेवाईकांना तेच पाहिजे. आमच्याकडे पद्धत काय? की कुणी मेला तर त्याला घ्यायचं आणि मयतीला गावात घेऊन जायचं, नि तिथं पुरायचं कबरस्तानमध्ये. आणि ह्यांना तर हे करायचं नव्हतं. त्यामुळे मी जाऊ दिलं नाही.
त्यानंतर ह्यांच्या डोक्यात आलं का आपण आपलं विल लिहिलं पाहिजे. एकदा रात्री दोन वाजता त्यांची तब्येत एकदम खराब व्हायला लागली, तर म्हणाले, 'उठ मेहरू, कागद पेन्सिल काढ. आणि मी सांगतो तसं लिही.' मला तर काय इंग्लिश शिवाय काही लिहिताच येत नव्हतं ना. त्यांनी सांगितलेलं मराठी मी लिहू शकत नव्हते. मग त्यांनी तीन पत्रं अशी माझ्याकडून लिहून घेतली. एकामध्ये असं, की मी मेल्यानंतर मला दहनही करायला नको, की दफनही नको. म्हणजे हिंदू पद्धतही नको नि मुसलमान पद्धतही नको. मला चंदनवाडीमध्ये नेण्यात यावं. भाषणबिषणं तिथे होऊ नयेत. कुठलाही विधी करता कामा नये. असं एक विल होतं. दुसरं एक महंमददा आणि त्यांचा मेहुणा खडस होता त्यांच्यासाठी. की तुम्ही दोघांनी भाभीच्या पाठीशी राहावं, लोक जे येतील गाववाले विरोध करायला त्यांना तोंड देण्यासाठी तिला मदत करावी. आणि तिसरं एक होतं शहांच्या नावानं की माझं सगळं झालं की माझ्या बायकोमुलांना ताबडतोब आपल्या घरी पुण्याला प्रोटेक्शन म्हणून न्यावं. ही तीन विल लिहिलेली होती. यामध्ये किती पुढचा विचार होता ! हे आज कळतंय मला. हे विल केलं नसतं आणि त्या वेळी मी तिथं राहिले असते तर आमच्या लोकांनी, मला जिवंत ठेवलं नसतं. काही तरी आमचा घात झाला असता आणि ते पवारांना जड गेलं असतं. त्यांच्या घरी प्रोटेक्शन होतं आम्हांला, त्यांच्या घरी नेण्याचं कारण हेच होतं की सगळ्या बाजूंनी प्रोटेक्शन असावं आम्हांला. यांच्या जीवाला भीती असे. आम्हांला त्रास होऊ नये म्हणून ते केलेलं होतं.
सकाळ झाली. महंमददा आले. नेहमीप्रमाणे हे विल त्यांना वाचायला दिलं. त्यांनी ते इंग्लिश करेक्ट करून घेतलं. टाईप करून घेतलं, स्टँँप केलं. आणि ते ९ एप्रिलला सगळ्यांना दिलं. सगळ्यांना म्हणजे कुणाला? एक पवारांना दिलं, एक शहासाहेबांना गेलं, एक नगरकरांना, एक तळवलकरांना आणि एक विल आमच्याकडे राहिलं. ऑफिशिअली झालं सगळं हे. आता हे विल जे झालं त्याची अफवा फैलली गावापर्यंत. आणि वाद चालला की हमीदखानकडे पैसा नसताना विल करण्याचा त्याला अधिकारच नाही. प्रॉपर्टी असल्याशिवाय माणसाला विल करण्याचा अधिकारच नाही, आणि सगळ्यांना माहिती होतं की तो विल वेगळं काही तरी करेल. आणि त्यांना ते नको होतं. त्यामुळे त्यावर खूप वाद झाले.
ते जिवंत असतानाच वाद चालले होते की हे विल तो करू शकणार नाही. त्यांच्यासमोर कोणी बोलत नव्हतं. मागून प्रेशर यायचं का हे विल काढून घ्या. महंमददा आमच्या बाजूचे होते, म्हणून लोकं त्यांच्यावर चिडले होते. हमीदचा चमचा आहे, काकीचा चमचा आहे, असं म्हणायचे. त्याच्यानंतर परत लोकं यायची गाववाली, खायला आणायची, प्रेम होतं त्यांच्यावर, सगळेच काही विरोधक होते असं मला म्हणायचं नाही. आणि काही २-४ लोकं होती ती जमात बसवायची वारंवार. त्यांची नावं मी सांगत नाही, पण तिचं काम अजूनसुद्धा आहे. त्याचं कामच ते. जमातीमध्ये काही तरी असेच प्रॉब्लेम आणायचे. याला वाळीत टाक, त्याला वाळीत टाक. ही जमात वेगळी कर, ती जमात वेगळी कर. याच्याविरुद्ध कर, त्याच्याविरुद्ध कर, हे धंदेच त्यांचे. त्यामुळे यांच्यावर कारवाई करणार. त्यांना पाहावत नसे. हे पुढारलेले त्यामुळे ते त्याच पद्धतीने ह्यांच्याशी वागायचे. आणि हे ह्यांना माहिती होतं. पण ते त्यांना वाईटही म्हणायचे नाहीत. समोर आल्यावर एका ताटातसुद्धा खायचे ते. गावात हे पॉलिटिक्स नेहमीच चालू असतं. गावात आमचे प्रोग्रॅमपण व्हायचे. एकदा तर हे असताना एक प्रोग्रॅम झाला होता चिपळूणला काळे हॉलमध्ये. सकाळी प्रोग्रॅमला आम्ही जाणार, तर रात्री दगडफेक झाली आमच्या घरी, पोलिसचा पहारा ठेवायला लागला, घरातून निघायची मारामार झाली आम्हांला. अशी दगडफेक, असा त्रास दिला आम्हांला त्यांनी, का ती मीटिंग-प्रोग्रॅम सुरू होईपर्यंत आम्हांला बस बस झालं. तरी तशा परिस्थितीत काही लोक आले. प्रोग्रॅम झाला. घरी आले. तसंसुद्धा गावामध्ये होत होतं. सगळे पॉलिटिक्स खेळायचे अशा रीतीनं. हेतू होता, की त्यांना गावाला न्यायचं, त्यांना पुरायचं आणि त्यांच्या कामावर बंधन घालायचं, असं असणार काही तरी. पण विलला त्या खूप विरोध झाला.
दोन महिने अगोदर मी म्हणाले, का बाबा, तुमचं काही झालं तर कुणाला फोन करून बोलवायचं? असा आमचा विषयच हा होता. जगातल्या दुसऱ्या कोणत्या विषयावर तुम्ही बोलणार? त्यामुळे मी लिस्ट केली होती त्यांच्यादेखत, सगळ्यांचे फोननंबर काढून माझ्या पर्समध्ये तयार असायचे. की अर्ध्या रात्री काही झालं तर आपण इथंच बसायचं आणि फोन करायचे. आपण धावणार कुठे आणि कोण मदतीला येणार? आणि एवढं करायची आपल्याला गरज काय, मयत सोडून? जवळच्या माणसांना माहिती होतं, हे सगळं चालू आहे आमचं म्हणून. मनाची सगळी तयारी झाली होती माझ्याही आणि त्यांच्याही. आणि शेवट शेवट त्यांचा त्रास बघवत नव्हता ना, तर मला कधी कधी असं वाटायचं, की देव कुठं आहे का? असलास तर बाबा ने यांना. मला आता बघवत नाही. या सगळ्या जखमा म्हणजे त्रास नाही? बेडसोअर्स झालेले आहेत. आत्ता श्वास चालतो, आत्ता बंद होतो हे काय कमी होतं का? काय कमी होतं? रात्रभर मी झोपायची तर अशी तळमळायची. सतरांदा उठून त्यांच्या नाकाला हात लावून बघायची की हा मनुष्य आहे का गेला? काय होतंय त्याला कळायला काय मार्ग होता दुसरा? इतका जवळ होता मृत्यू. आणि किती वर्षं असायला पाहिजे? रोजचंच चालू होतं. तिथं माझं तोंड असं सुजलेलं होतं. मला ब्लडप्रेशरचा त्रास व्हायला लागला. खायचं नि तिथं बसायचं. वर त्यांना अन्न जात नसे. शेवटी शेवटी तर अन्न जातच नसे त्यांना. आणि मला तर जरा वेळ गेली भुकेची, की मी तळमळायची. आणि मग कोणी तरी चोरून मला खायला द्यायचं. पवार वहिनी काय करायची, हवालदारांना पाठवायची ना, तर हवालदार असे आपल्या वर्दीमध्ये लपवून, डबा आणायचे. आणि एक डहाणूकरबाई होत्या, त्यांची आणि मिस्टर डहाणूकरांची ओळख करून दिलेली होती आमच्याशी नगरकरांनी. त्या बाई नेहमी यायच्या गाडी घेऊन आणि डबा मला द्यायच्या, खायला घालायच्या आणि मग म्हणायच्या माझी गाडी आहे. जा, फिरून ये. मी दोन तास बसते. मी बघते दलवाईंकडे. तुम्ही जा. तुमच्या मैत्रिणीकडे जा. ती बाई मदत करायची. माहीमला राहणारी होती. तर अशा रीतीने लोक मदत करायला हाेते. कोणी तरी डबा चोरून आणायचे- का तर वर परमिशन नव्हती- आणि मला खायला घालायचे. मग कधी हे चेष्टा करायचे. मला म्हणायचे, 'कुणाचं काहीही होऊ दे, मेहरू, तू पोटभर खा, तुला भूक लागणार. तू पोटभर खा.' अहा, पण मी काय करू? पोटभर खाऊ नको, तर काय करू? तुमच्याकडे जर बघायच असेल तर मला धडधाकट राह्यलाच पाहिजे.' जे मिळायचं ते गिळायची ना मी! मला काय मिळत होतं तेव्हा खायला, असं बोलायला? पण लोकं म्हणजे यांची भावजय बिवजय गावाहून आली की हसनशेठ, त्यांचे घरवाले चांगला डबा यांना पाठवायचे. हे काय, एवढं एवढं खायचे. त्यांनी नाही खाल्लं की आम्हीच खात होतो ना ते सगळं? त्यामुळे असं जेवण अधूनमधून मिळायचं. सुट्टीचा दिवस असेल तर अधूनमधून मिळायचं, नाही असं नाही.
आणि त्या काळामध्ये एकदा, सगळे भेटायला येणार होते. म्हणजे यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि पवारसाहेब. हे मला आधी कळलं होतं की ते भेटायला येणार आहेत. जसलोक हॉस्पिटलमध्ये सकाळपासून सफाई सुरू. ते लोक संध्याकाळी येणार, भेटणार म्हणून. मी दलवाईंना म्हटलं, 'हे बघा, हे सगळे येणार आहेत तुम्हांला बघायला. मनमोकळेपणानं त्यांच्याशी बोला, तुम्हाला काय वाटतंय ते. तुम्ही त्यांच्याशी बोलणार ना? तुमच्यासाठी ते येणार आहेत भेटायला. पवारसाहेब त्यांना घेऊन येणार आहेत.' त्या वेळी पवारसाहेबांची कल्पना पण अशी होती की हमीदशी जरा बोलावं. माझ्यासाठी त्यांनी काय करावं आता पुढे? त्यांच्या फॅमिलीसाठी काय करावं? त्यांची फॅमिली खूप मोठी होती ना! काय करावं आम्ही? त्यांच्या मनात काय आहे? तर ते सगळं विचारायला म्हणून ते आले. जेव्हा ते आले ना, खाली बातमी आली, ते आलेत. मी म्हटलं, 'हे बघा, ते येतात त्यांच्याशी तुम्ही आता चांगलं बोलायचं. 'हो' म्हणाले. पण ते आल्यानंतर जे फिरून झोपले, ते डोळे बंद करून. एकही अक्षर ते जाईपर्यंत बोलले नाहीत. कुणाशीच बोलले नाही. ते सगळे आले आणि मला म्हणायला लागले, काय झालं? त्यांना मी म्हटलं, मला माहिती नाही, तुम्ही मला काही विचारू नका. ते इतके डेस्परेट झालेले आहेत की कुणाशीच बोलण्याची त्यांना इच्छा राहिलेली नाही. सॉरी हं. तुम्ही क्षमा करा. त्यांच्या वतीनं मी क्षमा मागते. ते म्हणाले, 'नाही नाही, तुम्ही असं बोलू नका. तो पेशंट आहे, आम्ही बघायला आलो.' पवारसाहेबांना असं वाटलं की, हा माणूस असं काय करतोय? पण बोललेच नाहीत हे. त्यानंतर त्यांच्या मीटिंगा झाल्या, आणि मग पवारांनी मुद्दा मांडला का, आता हा गेल्यानंतर आपण याच्यासाठी काय करायला पाहिजे? याची सगळी फॅमिली उघडी पडेल. याची बायको नोकरी करते, पण घर कसं चालणार याचं? तर काही तरी हवं म्हणून मानधनाची जी कल्पना होती ती पवारांची होती. पाचशे रुपये म्हणा, ते गेल्यानंतर लेखक म्हणून मानधन मिळायला लागलं, ती मानधनाची सोय त्यांनी केली. देना बँकेचे मॅनेजर होते मोठे, गुल महंमद रशीद असं नाव होतं त्यांचं. खूप येणं जाणं होतं त्यांचं. त्यांनी पण त्यावेळी पाच हजाराची मदत केली होती. आणि मग पुन्हा शहांना विचारलं होतं मी हमीदसाठी काय करू? मला आणखीन काही करायचंय, तर ते म्हणाले एक काम करा, त्यांचा एक भाऊ आहे, तो आता एस.एस.सी. झालेला आहे. त्याला तुमच्याकडे बँकेमध्ये नोकरी मिळाली तर मिसेस दलवाईंना काही बघायला लागणार नाही. इथे नोकरी करून गावाकडच्यांना पोसणं आता शक्य होणार नाही. हमीद करत होता कसं तरी, त्या कसं करणार? मग हे असतानाच, त्यांचा भाऊ फिरोज आला, तर त्याची कशी टिंगल करायचे. एवढी मोठी पिशवी आणि त्याच्यात एक एस.एस.सी.चं सर्टिफिकेट. असं हलवत आणलं. ते म्हणाले, "फिरोज वेड्या, एवढ्या मोठ्या पिशवीमध्ये काय आणलंस? तर एक एस.एस.सीचं सर्टिफिकेट! थर्डक्लास मिळालेलं! तो हुशार बिशार मुलगा नव्हता, पण त्याचा नॉमिनल इंटरव्यू घेतला आणि चिपळूणला त्यांची देना बँकेची ब्रँँच उघडल्याबरोबर त्याला लावून घेतलं.
☯
फिरोजचा त्या देना बँकेमध्ये इंटरव्ह्यू झाला. जेमतेमच. त्याला काही येत नव्हतं. तिथं त्याला खूप मदत केली असं म्हणतात. इंटरव्ह्यू नॉमिनल झाला. त्याला तिथं घ्यायचं असं ठरलेलंच होतं. मग त्याला दलवाईंनी जवळ बसवलं. त्याला सांगितलं, तुला पगार किती मिळेल? इतका इतका मिळेल अंदाजाने. त्या पगाराचं तू काय करणार? मग सगळा हिशेब लिहून दिला त्याला. या पैशाचं अमुक करायचं. तमुक पैसा याच्यासाठी खर्च करायचा. अमुक पैसे असे खर्च करायचे. एवढं सगळं लिहून दिलं त्याला. हातात कागद दिला. मग मी जाऊन त्याला एस.टी. मध्ये बसवून आले. दोन दिवसांनी हे हॉस्पिटलमध्ये परत आले. चेकअपबिकप असायचंच. त्या वेळी तो नोकरीवर लागल्याची बातमी मिळाली त्यांना. फिरोज आता नोकरीवर जायला लागला तेव्हा जरा रिलीफ झाला त्यांना. ते म्हणाले, 'बरं झालं. नाही तर तू काय केलं असतंस एकटी राहून? एवढं पुरं पडलं नसतं. इतकी मुलं आहेत खायला-प्यायला. आता माझी काळजी मिटली.' आणि ते खूष झाले आपल्या मित्रांवर. कारण त्या सगळ्या मित्रांनी त्यांचा विचारच असा केला होता की जाता जाता तरी त्याला समाधान होऊ दे की माझ्या पाठीमागे माझ्या लोकांना त्रास होणार नाही. अशा रीतीनं सगळ्यांनी त्यांना मदत केली.
एक दिवस काय झालं – तशी तब्येत बरी काय, वाईट काय असं चाललेलंच होतं – सकाळी हे उठले आणि म्हणाले, 'आज आपल्याला चेकअप करायला जायचंय.' ठीकय म्हटलं. म्हणून गंजिफ्रॉक काढून ठेवला आणि दाढी करायला लागले. दाढी करायला लागले तेव्हा मी बघितलं एक लाल रेघ अशी पाठीवरून पुढच्या छातीपर्यंत आलेली. तर मी म्हटलं, 'काय हो, हे काय उठलेलं? मच्छर चावला की काय?' पण मच्छर चावलेला नव्हता. ते म्हणाले, 'काय हे, चुरचुरतंय मला. काय आहे हे?' मी म्हटलं, 'आज जाणार आहात तिथं दाखवा बाबा. हे काय आणखी नवीन आहे?' आणि मग आम्ही हॉस्पिटलला चेकअपला गेलो. दाखवल्यानंतर लक्षात आलं की ती नागीण आहे. आम्हांला तोपर्यंत माहिती नव्हतं नागीण काय रोग असतो. तिथं डॉक्टरांनी सांगितलं हे असं असं असतं.
तब्येत बिघडलेली होती तर आम्ही पुढचा विचार त्या पद्धतीनेच करत होतो. म्हणजे विचार करताना, आता हे गेल्यानंतर आपण काय करायचं हा विचार फार असायचा माझ्या डोक्यात. आणि जाणार हे नक्की होतं. त्यातून वाचणं शक्य नव्हतं. किडनी ट्रान्सप्लांट केलेलं असलं की २-३ वर्षांवर जात नाहीत हे माहिती होतं आणि हे दिसत पण होतं की दोन वर्षं पण हे जगणार नाहीत. इतकी धडधाकट यांची प्रकृतीही नव्हती. ते विचारायचे हे तू काय लिहितेस? तू काय करतेस? तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगायची, 'हे असं असं करते, फोन नंबरांची यादी करते, काय करू मग?' ते मिष्कीलपणे हसायचे. तुला शिक्षा आहे बघ. बरं झालं. बघ, आता मी जातो. त्यांना वाईट वाटायचं खरं. पण अशी चेष्टा वगैरे करून टेन्शन घालवायचे ते. आणि गंमत काय व्हायची, दिवसभर रुबीना हॉस्पिटलमध्येच येऊन थांबलेली असायची. तिला जवळ घेऊन म्हणायचे, बाब्या तू माझं सगळं कर. तिला हलायला द्यायचे नाहीत. तिच्याच हातून सगळं खाणंपिणं सगळं काय व्हायचं आणि मला बघितलं की राग यायचा त्यांना. का माहिती नाही. असा उगाच. म्हणजे स्वतःचा राग ते माझ्यावर काढायचे. दुखण्याचा राग, असा की, नको असताना आपल्याला जायला लागतंय. तर मी दाराच्या मागे बसायची. रुबीनाला म्हणायचे, 'गेली वाटतं तुझी आई कुठं तरी.' ती म्हणायची, 'काय बाबा, जवळ बसली की तुम्हांला नको असते आणि ती लांब गेली की तुम्ही विचारता. असं बोलू नका. तिला किती वाईट वाटतं बघा. असं बोलत जाऊ नका.' संध्याकाळ झाली की रूबीना जायची नि मी आत यायची. जवळ बसून असं डोक्यावरून हातबित फिरवला की म्हणायचे, 'किती ग बरं वाटलं! दिवसभर कुठं होतीस?' मी चिडायची, म्हणायची, 'हो, मी असताना तुम्हांला बरं वाटत नाही, तुम्ही सगळ्यांशी चांगले बोलता आणि मला मात्र दुखवता तुम्ही खूप. तेव्हा तुम्हांला काही वाटत नाही.' तर ते म्हणायचे, 'अग, सगळे मला बघायला येतात. त्यांच्यासमोर मी रडून दुःख दाखवू? ते बिच्चारे दुःखी होऊन जातील आणि परत येताना त्यांना विचार पडेल का परत कशाला आपण या माणसाकडे जायचं? तर तसं नको व्हायला. त्यांना आनंदात जाऊ दे. त्यांना दुखवू नको आणि तू शेवटी माझी आहेस ना? इतकं जवळ माझ्या कोणंय? त्यामुळे सगळा राग, रुसवा सगळं मी तुझ्यावर काढतो. तर तू मला समजून घे. तू असं करू नकोस. तू जवळ आलीस की मला किती बरं वाटतं हे तुला माहिती नाहीये. पण मला हा त्रास सहन होत नाही ग. म्हणून मी तो राग तुझ्यावर काढतो.'
बेडसोअर्स झालेल्या होत्या. एवढे मोठे मोठे खड्डे हो. ठणकायचे ते दिवसभर - पाठीवर आणि त्यात सुया टोचलेल्या – ते दुखायचं. औषध-बिवषध असायचंच ना. त्यामुळे चिडचिड व्हायची दिवसभर. हे ठणकतंय, ते दुखतंय. कुशीवर होता येत नाहीये. अमूक करता येत नाहीय, आणि दिवसभर सतरा औषधं चालू आहेत. सतरा इंजक्शनं चालू आहेत. तो माणूस वैतागणार नाही का? तर वाटायचं काय हे आयुष्य आहे? पण संध्याकाळी सगळे आले की ते खुषीत वाट बघत असायचे. त्यांच्या मित्रापैकी बरेच यायचे. एक त्यांचा मित्र होता – लाला लजपतराय म्हणून. हे चांगले असताना तो नेहमी यायचा, म्हणजे कसं? तर हे रात्रपाळीतून यायचे तेव्हा त्यांना उशीर व्हायचा. वेळ झाला का मी वाट बघायची. कॉलनीत शिरले का झेंड्याखाली आमच्या कॉलनीतले सगळे लोक बसलेले दिसायचे. कोणी टाईमपास करायला, कोणी झोप येत नाही म्हणून. कोणी असंच भेटायला. आणि हे भेटले की त्यांना सोडायचे नाहीत. तर हे सगळं आटपून घरी यायला उशीर व्हायचा. मला ऑफिसला जायचं असायचं. माझी झोप व्हायची नाही. हा लाला लजपतराय यायचा ना, त्याचा येण्याचा टाइम रात्रीचा १२-१ चा असायचा. ती घरी आला ना की भाभीजान-भाभीजान करून अगदी चुलीच्या खोलीपर्यंत यायचा आणि खाणं-पिणं. म्हणजे खूपच तो यांच्यासाठी जीव टाकायचा. तो यायचा रात्रीचा. आणि त्याची बोलायची पद्धत पण प्यायलेला माणूस जसा बोलता ना तशी. तर तो आला की घरात गोंधळ नको म्हणून हे त्याच्याबरोबर उतरून खाली हॉटेलात जाऊन चहा पीत बसायचे. दोन तासांनी वर चढायचे. एकदा काय झाल! मला राग आला. म्हटलं काय माणूसय! इतक्या रात्रीचा येतो! आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना म्हणाले, 'काय हो तुमचा लाला! तो पिऊन-बिऊन येतो का काय? इतक्या रात्रीचा येतो. इतक्या रात्री दुसऱ्याच्या घरी जायचं असतं का? मला अजिबात आवडत नाही.' तो माणूस आवडत नाही असं नव्हतं माझं. पण तो रात्रीचा यायचा ते मला आवडायचं नाही. एवढं मी बोलल्यावर दोन दिवस माझ्याशी बोलले नाहीत हे. राग आला. जेवले नाहीत, बोलले नाहीत. मला काही कळेना. मग मी म्हटलं, काय झालं? मग एवढंच म्हणाले, 'जी बाई आपल्या नवऱ्याच्या मित्राबद्दल वाईट बोलते ती नालायक असते.' असे शब्द त्यांनी मला कधी वापरलेले नव्हते. तर त्याच्यावर मी म्हटलं काय झालं? ते म्हणाले, 'तू काय म्हणालीस? त्याला काय शब्द वापरलास? प्यायलेला आहे का नाही हे तुला कसं कळलं? त्याच्याबद्दल असं बोललेलं मला खपणार नाही.' तर मी म्हटलं, 'सॉरी, मी त्या अर्थानं म्हणाले नव्हते. तो माणूस मला आवडत नाही अशातला भागच नाही. आपल्या घरी त्यानं येऊ नये अशातला पण भाग नाही. फक्त तो रात्री बेरात्री येतो याच्यावरून मी बोलले. मला त्रास होतो म्हणून. पाहिजे तर मी त्याची क्षमा मागेन. म्हणून तो येत नाही का आपल्याकडे?' तर नाही. त्याला तर माहितीच नव्हतं. मग बघितलं मी हाच लाला लजपतराय जेव्हा हे आजारी पडले तेव्हा उशाशी बसून असायचा. पैशांची मदत करायचा, औषधं आणून द्यायचा. भाभीजान, आपने खाना नही खाया, चलो, म्हणून मला सतरादा घेऊन जाऊन जेवायला घालायचा. म्हणजे खरं म्हटलं तर मलाच त्यांचा मित्र काय आहे कळलेलं नव्हतं. आणि मग मी म्हटलं, बाप रे, या माणसाबद्दल माझ्या मनात असं आलं तरी कशाला? आणि मी असं का बोलले असेन?
दलवाई फर्स्ट ईअरला असताना जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये शिकत होते. त्या वेळी कुलसुम पारेख त्यांना शिकवायला होत्या. हे मला सुरुवातीला माहीत नव्हतं. पुढे दलवाई अडचणीमुळे शिकू शकले नाहीत. आणि त्यांना कॉलेज सोडावं लागलं. लग्नानंतरची गोष्ट. दलवाई सारखे कुलसूम पारेखांकडे जात असत. बाहेर पडत असताना मी विचारलं की सांगायचे, मी जरा कुलसूम पारेखांच्याकडे जातो. तू माझी वाट पाहू नको. एखाद्या वेळी मी त्यांच्याकडे जेवूनसुद्धा येईन. मी कुलसुम पारेखांना कधी भेटले नव्हते. त्यांच्याबद्दल मला काही माहिती नव्हती. या कोण आहेत? दलवाई का सारखे त्यांच्याकडे जातात? म्हणून नंतर नंतर मला संशय यायला लागला. पण दलवाईंना कशी विचारणार? मला धीर झाला नाही. दलवाई आजारी पडले. आम्ही रामटेकला होतो. एक दिवस कुलसुम पारेख या आमच्याकडे दलवाईंना बघायला येणार असं कळलं. यांनी मला सांगितलं. त्या दालगोश्त फार चांगलं करतात. ते आज माझ्यासाठी करून आणणार आहेत. तू आज जेवण करू नको. दुपार झाली, मी वाट बघत होते. त्या आल्या, मी त्यांना बघून थक्क झाले. आपल्या थोबाडीत मारून घ्यावं असं वाटलं. ही सगळी दलवाईंचीच चूक होती. त्यांनी जर तिच्याशी भेट करून दिली असती तर हे डोक्यात माझ्या आलं नसतं. तरीसुद्धा दलवाईंसारख्या माणसावर आपण संशय घेतला याची खंत वाटली. जो माणूस आपल्याला नको तेसुद्धा सांगतो, त्याच्यावर संशय घेणं आपल्याला शोभत नाही असं वाटलं. एक वयस्कर बाई हातात जेवणाचा डबा, जो त्यांना पेलवतसुद्धा नव्हता, उचलून आणत होत्या. आत येताच पुढे होऊन त्यांनी माझा हात धरला, आणि म्हणाल्या, 'मेहरुन्निसा, मै तुम्हे पहिली बार देख रही हू. हमीदने कभी मिलायाही नही. लेकिन तुम्हारी तारीफ हमीदसे बहोत सुनी है. जैसा सुना है वैसीही हो तुम.' मग त्या दलवाईंच्याजवळ गेल्या. त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. आणि फार प्रेमाने आपल्या हातांनी त्यांनी त्यांना जेवण वाढलं. मी बघतच राहिले. मग कुलसुम आपानी सगळी आपली माहिती मला दिली. त्या दलवाईंना खूप मानत होत्या. लोकांच्यासमोर त्यांची तारीफ करायच्या. सांगायच्या, हाच माझा शिक्षक आहे. त्या हयात आहेत. माझ्यावर खूपच त्यांचा लोभ आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये त्या असतात.
पुढं तब्येत बिघडली, हॉस्पिटलमध्ये पुन्हा किडनीचा प्रश्न आला, ही किडनी काढून आता दुसरी बसवायला पाहिजे, नाही तर हा मनुष्य जाणार इतकं झालं । होतं. किडनी रिजेक्शन म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यात. लघवी होतच नाही. लघवीद्वारे जे विष बाहेर पडतं ते शरीरात साठतं. म्हणजे इथं पाणी साठलंय, तिथं पाणी साठलंय आणि ते विष निघत नाही. त्यामुळं त्याचा त्रास होतो ना तब्येतीला. शरीरामध्ये पाणी साठलेलं असतं. हात लावला की कळायचं इथे पाणी साठलंय. म्हणजे असं फुगून यायचं आणि डॉक्टर सांगायचे ना की तुम्ही पाणी कमी प्या, अमुक करा. लघवीचं भांडं जे आहे नंबर असायचे त्याच्यावर. किती लघवी झाली ते मोजमाप करायचे. हे तसे भित्रे नव्हते. कसलीही त्या माणसाला भीती नव्हती. मी बघितलंय, आमच्या गावामध्ये जंगल आहे. जंगलाची तिथं राहणाऱ्या लोकांना भीती नको असं म्हणतात. तिथं राहाणारे आमच्या घरातले बाकीचे लोक भित्रेच होते. रात्र झाली का बाहेरचं दार बंद करून ठेवायचे. जंगलात जायचं नाही. पण यांना काही वाटायचं नाही त्याचं. वाटेल तेव्हा हे बाहेर निघून लघवीला, संडासला जा असं करायचे. वाघाची, सापाची कसलीच भीती वाटायची नाही. निर्भय वृत्ती. माणसाची सुद्धा भीती वाटायची नाही. जेव्हा हे मॉबमध्ये जायचे तेव्हा कुणी अंगावर धावत आला तर मागे सरकणं त्यांना माहिती नव्हतं, किंवा दुसऱ्याला मारतायत तर मारू देत त्यांना; आपण पळ काढावा असंही नव्हतं त्यांचं. एकदा गंमत झाली. हे चर्चगेटला गाडीत बसले अंधेरीला उतरायचं म्हणून. रात्रीची दीडची गाडी. शेवटची गाडी त्या वेळची. आणि मग काही तास गाडी बंद असायची आणि मग साडेचार-पाच वाजता पुन्हा सुरू व्हायची. गाडीत बसले, ती गाडी बोरिवलीची होती. अंधेरीला न उतरता हा माणूस थेट गेला बोरिवलीपर्यंत. म्हणजे झोप लागली म्हणा, का गप्पा मारत होते म्हणा. कळलंच नाही. गाडी बोरिवलीला जाऊन थांबली. सगळे उतरले. पण हे कुठे जाणार? गाड्या नाहीत. बोरिवलीला आपलं कोणी नाही. इतक्या रात्री २ वाजता कोणाकडे जाणार? हा माणूस तिथून चालत अंधेरीला आला. आणि त्या काळात चांगलं हे एवढं जंगल. आता काहीच नाही. माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. ४-५ स्टेशनचं अंतर, तेवढं ते चालत आले घरी, जंगलातनं नि रात्रीचे दोन-तीन वाजता. काहीही त्यांना भीती वाटली नाही. मराठामधूनही सुटले ना रात्री बारा-एकला, तर घरी येईपर्यंत माझ्या जीवात जीव नसायचा, का यांना कुणी मारून फेकतं की काय! कारण यांचं मरण तसंच यायचं ठरलेलं होतं. कोणी तरी यांना मारणार आणि हे मरणार. पण हा रोग कसा लागला आणि मध्येच हे कसं झालं! हे निर्भय. रोगाची सुद्धा भीती नाही. इंजेक्शन घेतलं काय, इथं टोचलं काय, काहीही वाटायचं नाही. कुठल्याही गोष्टीला पुढेच. मला ते बघवत नसे. मला ते बघण्याची हिंमत नव्हती. पण मी त्यांना सोडून जायची नाही. त्यांना काहीही झालं तरी त्यांच्या हातात माझा हात असायचाच आणि समोर डॉक्टर त्यांचं काम करायचे. हळूहळू ते सगळं पाहण्याइतकी धीट झाले. मला असं वाटायचं नाही का यांना सोडून जावं. बाहेर चैन पडायचं नाही. यांचं कण्हणं, किंचाळणं काही नसायचं. काहीही केलं डॉक्टरनी तरी यांचा आवाज यायचा नाही. कधीही नाही. पण जेव्हा बेडसोअर्स झाले तेव्हा शेवटी, हलवा-हलवी करायची नव्हती तेव्हा, नर्स जरी दिसली तरी ते म्हणायचे, 'मेहरू, ती बया आली बघ. माझ्या पायांना हात लावेल, ती दुखवेल. तिला हात लावू देऊ नको. तू माझं कर. तुला त्रास होतो ग, पण तू माझं कर.' आणि मी म्हणायचे, 'अहो मला ते धुता येत नाही. मी डॉक्टर नाही, मी नर्स नाही, तिला करू दे.' मग ती नर्स म्हणायची, 'तुम्ही इथं थांबा आणि मला करू द्या.' त्या वेळी नर्स जबरदस्तीनं सगळं करायची. त्यांना ते सहन व्हायचं नाही. औषध-बिवषध खाण्याचं वगैरे काहीच वाटायचं नाही. म्हणजे आम्हांला जर औषध खायचं असलं तर कंटाळा येतो. हे कडू आहे, हे गोड आहे. याच्याबरोबर साखर खा. याच्याबरोबर गोड खा, पाणी घे. गुळणी करा. असे नखरे असायचे. पण हे असे फटाफटा घ्यायचे. डोळ्याचं औषध चालूच होतं. त्यांच्या एका डोळ्यामध्ये ग्ल्युकोमा झालेला होता. त्याचं पण ऑपरेशन झालेलं होतं. बसवलेली किडनीही आता खराब झाली. तेव्हा असं ठरलं की रुबीनाची किडनी घ्यायची. मग सगळं चेकअप झालं, तारीख फिक्स झाली पण त्यातच त्यांना कावीळ झाली. त्यामुळे पथ्य पाळणं सुरू झालं. डोळे पिवळे झाले. ताप यायला लागला. जेवण जाईना. असं सगळं झालं. नगरकर एक दिवस आले आणि मला कँटीनमध्ये घेऊन गेले आणि मला म्हणाले, 'रुबीनाची किडनी घेता यायची नाही.' 'का नाही?' 'डॉक्टर म्हणतात आता तिची किडनी घेतली तर काय उपयोग? तिची किडनी आता घेऊ नये. आपण आता आणखीन तिसऱ्या माणसाची किडनी घ्यावी, लावावी आणि ती रिजेक्ट झाल्यानंतर रुबीनाची घ्यावी. अशी प्रोसिजर चालणारच. दोन-दोन वर्षांनी.' असेच पेशंट होते ना. ऑपरेशनला एक तर कोणी तयार नसे. आणि तयार झाले तरी २-३ वर्षंच टिकायची किडनी. त्यामुळं असं ठरलं की दुसऱ्या कुणाची तरी किडनी घ्यायची. पण ही किडनी मिळेपर्यंतच यांची तब्येत डाऊन होत राहिली. ते जाणार असं सगळ्यांच्या लक्षात आलं. दुसरी किडनी मिळते का नाही, हा प्रश्न होताच. पण ती लावायला तरी चांगला असला पाहिजे ना माणूस? किडनीचं ऑपरेशन करायला तो माणूस तेवढा चांगला फिट तरी असला पाहिजे ना. किडनी मिळण्याची गोष्ट दुसरीच, पैसे देऊन घ्यायची तयारी आहे, पण त्या माणसालाच जर झेपत नसेल तर दुसरी किडनी लावून काय करणार होतो? डॉक्टर म्हणाले किडनीचा आता फारसा काही उपयोग होणार नाही. आणि हा माणूस डायलिसिस वर राह्यला तयार नाही. काय करायचं मग? हे खचले ना त्यामुळे. त्यांना असं वाटत होतं का दोन-चार वर्षं तरी जातील. तर तसं झालं नाही. सव्वा वर्षामध्ये तो माणूस सगळा आटपत गेला. त्यामुळे आता परत तीच प्रोसिजर, त्याला ते कंटाळले होते. कारण याला अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. अशक्तपणा आलेला, बेडसोअर्स असे झाले होते की हलायला होत नव्हतं. आणि हॉस्पिटलमध्ये राहायला तयार नव्हते. चार दिवस अगोदर मला म्हणत होते मला घरी ने. तू सगळं माझं करू शकतेस मेहरू. काही नर्सची गरज नाही. तू मला घरी ने. मला इथं नको मरायला. आता कुठं न्यायचं, शेवट कसा करायचा हे विलमध्ये होतं. पण काही डिसीजन ऐन टायमाला मलाच घ्यावे लागणार होते. ते आधी ठरलेलं नव्हतं आणि तो डिसीजन घ्यायला मी हॉस्पिटलमध्येच राहायला पाहिजे होतं. प्रत्येक जण आला का त्याला हे सांगायचे, मला घेऊन चल म्हणून आणि मी सांगायची, 'नाही हं, डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय या माणसाला इथून हलवायचं नाही.' ते माझ्यावर चिडायचे नंतर. पण मी म्हटलं, 'नाही, मी तुम्हांला कुठेही जाऊ देणार नाही. मी पण नाही येणार आणि तुम्हांला पण कुठे जाऊ देणार नाही.' आणि ती रात्र आली शेवटची. दलवाईंच्या नात्यातला कादीर दलवाई म्हणून एक होता. उनाड मुलगा होता. पण त्याला इथे चांगल्या बँकेत-बिंकेत लावलेला होता. त्याने खूप चांगली सेवा केलेली होती. तो हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेस माझ्याबरोबर झोपायला असायचा. मला त्रास होऊ नये म्हणून एका बाजूला असा झोपलेला असायचा, रात्रभर जागायचा म्हणून मी उठायची नाही. तो उठायचा रात्री.
ती जी शेवटची रात्र होती तिच्या दोन-तीन दिवस आधी हे मी सगळं त्यांचं बघितलं आणि बेचैन झाले. तेव्हा संध्याकाळ झाली की व्हिजिटिंग अवर्स संपल्यानंतर सगळे जायचे. मग त्यांच्या रूमला बाल्कनी होती मोठी. तिथं उभं राहिलं का रस्त्यावरचं सगळं दिसायचं. कादीर आला म्हणून मी त्याला म्हटलं तू जरा बस, मी जरा बाहेर वाऱ्याशी उभी राहते आणि बाल्कनीत उभी राहिले. पण मला इतकं भरून भरून येत होतं. रडण्याची सोय नाही कुणाच्या समोर. आणि मग माझ्या तोंडातनं असं निघालं, की 'अरे बाप रे, ह्यांना एवढा त्रास होतो. हा माणूस सहन करू शकत नाही आणि आता माझ्यात बघण्याची सुद्धा ताकद उरली नाही. तर हा माणूस गेलेला बरा.' आता मला गिल्टी वाटतं. का तर मी एका माणसाचं मरण मागितलं. पण त्या वेळी मला असं वाटलं की नको रे बाबा हे सगळं बघायला. त्यांना सहन होत नाही आणि मला बघून सहन होत नाही. तर हा माणूस गेला तर बरं होईल. आणि आता काही उपाय राहिलेला नाहीये. हे चाललेलं आहे ते काही फार दिवस राहाणार नाही. तर हा माणूस गेलेलाच बरा. या माणसाचा जगून काय उपयोग आहे? हे माझ्या मनात येऊन दोन दिवस नाही झाले, तर हा शेवटचा दिवस आला. ती रात्र अशी बेचैनीत गेली. सारखं आम्ही नर्सला बोलावत होतो. सारखी बघत होती नर्स. पुन्हा गेली, अर्धा तास झोपली का पुन्हा ते असे खाली सरकायचे अन्ईझी होऊन. पुन्हा आम्ही त्यांना जागेवर सरकवत होतो. कादीर जागा, मी जागी, नर्स जाग्या. रात्रभर आम्ही जागेच होतो. आणि सकाळी असा जरा डोळा लागला ना माझा, त्यात ते कधी गेले कळलंच नाही. कसा माझा डोळा लागला कळलं नाही. पण मी अशी धाडकन उठले आणि जाऊन बघितलं. कादीरला म्हटलं, 'अरे बाबा उठ. डॉक्टरला बोलव. काही तरी घात झालाय, उठ.' डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं. सारं संपलं आहे. साडेपाच-सहाची वेळ होती सकाळची. मग मीच कादीरला सांगितलं, तू इथं बैस जरा. मी जाऊन जरा तोंडबिंड धुवून आले आणि पहिलं काम, डॉक्टरांना सांगितलं मला जरा काही फोन करायचेत. आणि ती लिस्ट काढली. पहिला फोन मी घरी केला. पवारांच्या घरी. तर मला कळलं का रात्रीच दोघं कारने बारामतीला गेले. ताबडतोब तिथे ट्रंककॉल केला आणि मला कळलं की ते तिथून निघालेले आहेत. दुपारी १२-१ पर्यंत ते इथं येतील. 'तुम्ही काही काळजी करायची नाही. ते येऊन सगळं करणार आहेत, असा निरोप होता. माझी आई घरी होती. मग हवालदाराला सांगितलं का माझ्या आईला हे सांग, तिला घेऊन ये. मग हवालदार गाडीमध्ये आईला घालून घेऊन आले. आमची आई आल्यावर भोकाड पसरायला लागली. लगेच तिला सांगितलं, की हे हॉस्पिटल आहे. इथं सभ्यतेनं वागायचं, हे घर नाहीये. आणि अशा रीतीनं कुणी मेला म्हणून गोंधळ करायची काही गरज नाही. का, तर तिचं पण पुराण बरंच आहे. वर्षभर राहिली ती. पण तिने यांना जावई म्हणून अॅक्सेप्ट केलेलंच नव्हतं. कधी असं झालं नाही की ती दवाखान्यात आली, तिने मला असं सांगितलं की तू जा घरी. मी जरा २-३ तास बघते. आराम कर. काय लागलं हमीदला तर मी देईन. असं झालेलं नाही. एवढंच नाही तर घरी जेव्हा चार दिवस येऊन राहात होतो तेव्हा मी बाहेर कुठं तरी गेले तर एक कप चहा करून दिला असं झालेलं नाही. आमची धुणं-भांड्याची बाई यायची ना, ती चहा करून द्यायची, पण आईनं काही दिला नाही.
आईची एक आठवण सांगते, आई आमच्या घरी होती. तेव्हा पवारवहिनींनी एकदा विचारलं का माँजी, तुमच्याकडे काय रिवाज आहे? समजा, एखाद्या मुलीचं लग्न ठरलं तर काय काय करावं लागतं? ती म्हणाली, आमच्या एका मुलीच्या लग्नाला २५,०००/- रुपये खर्च येतो. समजलं? सगळं द्यावं लागतं. तिनं मला डोळा मारला. वहिनी मला म्हणाल्या, 'काकी, तुम्ही आता पन्नास हजार रुपये तयार ठेवा. नाही तर तुमच्या मुलींची लग्न होणार नाहीत.' तर मी म्हटलं, 'जाऊ दे हो. हे पन्नास हजार कुठून आणायचे? हा पेशंट आहे. त्याला औषधाला माझ्याजवळ पैसा नाही. बघू, काय होतंय मुलींचं.' हा होऊन गेला विषय. त्या वेळी हे कुठं तरी फिरायला बाहेर गेले होते. मग रात्रीच्या वेळी आम्ही जरा असं बसत होतो गप्पा मारायला. हे, मी आणि आई. हे बोलायचे, 'क्या माँजी, याह्याखानका क्या हुआ?' तर माँजीचं आपलं राजकारण गमतीनं सुरू व्हायचं सगळं. याला शिव्या दे, त्याला शिव्या दे असं व्हायचं. मग म्हटलं, आज गंमत झाली. माँजी म्हणते हो, एका मुलीच्या लग्नाला २५,०००/- पाहिजेत. तर तुम्ही जाण्याविण्याच्या गोष्टी करू नका हो. तुम्ही आधी इथं ५८,०००/- रुपये तयार ठेवा. मी कुठून आणू?' ही गंमत चाललेली. ते काय म्हणाले, 'नाही माँजी, हमारे शादीको पाच रुपये लगे न. तो हमारे बच्चोंकी शादी के लिए दस रुपये लगेंगे. इससे जादा क्या लगनेवाला है?' 'नहीं नहीं सब लोग देते है. वैसे तो देना पडेगा. लोग पिछले दरवाजेसे देते है.' तर हे काय म्हणाले, 'माझ्या घराला मागचं दारच नाहीये. तर मला काळजी नाही.' पण तिने तो जोक म्हणून घेतला नाही आणि ती भडकली. म्हणाली, 'म्हणून तर असला रोग झालाय तुला.' मला तिचं हे असलं बोलणं आवडलं नाही. एक पेशंट बसलेला. त्यांचा सुद्धा चेहरा बदलला. त्यांनी माझा हात असा दाबला. त्यांच्या लक्षात आलं, मला खूप वाईट वाटलं म्हणून. मी म्हटलं, 'माँजी, असं बोलायचं नसतं आणि तुला शोभत नाही असलं बोलणं. तू २५,०००/- चा हिशेब करते. तुझ्या किती मुलांची तू लग्न केली. आणि किती मुलांसाठी तू २५,०००/- खर्च केले? तू २५,०००/- खर्च केले असते तर आम्हा चार भावंडांसाठी तू एक लाख रुपये खर्च केले असते. तुझे लाख रुपये वाचले नं? त एका मुलीचं सुद्धा लग्न केलं नाही.' हे मी तोंडानं बोलले. हे मी बोलल्यावर तिला राग आला. रात्रभर झोपली नाही. आणि सकाळी बोऱ्याबिस्तरा बांधून 'मी इथं राहाणार नाही' म्हणून निघाली. मी पाया पडले, माफीसुद्धा मागितली. पण ती झटक्यानं पुण्याला निघून गेली. म्हणजे इतकं अंडरस्टैंडिंग सुद्धा तिच्यात नव्हतं. हा शेवट आला तेव्हा रडायला तेवढं सोपं पडलं. चार माणसं आल्यावर नुसता तमाशा दिसतो. तेव्हा मीच तिला सांगितलं का आता रडायचं काही काम नाहीये. सगळं आटपलेलं आहे आणि तू तमाशा करू नको. मग माझ्या नणंदेकडे फोन केला. तिच्याकडे माझ्या दोन मुली. ती घेऊन आली. रुबीना माझी फार समजूतदार म्हणून फुसफुस करत उभी राहिली. इला माझ्या मांडीवर बसलेली. लहान होती. घळाघळा डोळ्यांतून पाणी आलं. बाबा गेले म्हणून कळत पण नव्हतं तिला. खूप लहान होती. रुबीना १८-१९ वर्षांची, इला तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होती. हॉस्पिटलमध्ये यायची पण नाही. आली की रडत जायची. काही कळत नव्हतं. त्यांचं बघवत नसे. ती बाबांना बघते, माझ्याकडे बघते. माझे डोळे पुसते आणि सांगते, 'बाबांना आवडत नसे नं रडलेलं? बाबा मला सांगायचे – मला कोणी रडलेलं आवडत नाही. कोणी घरात रडायचं नाही. तुला पण म्हणायचे, मला पण म्हणायचे. आता रडायला नको हं. बाबा गेले म्हणजे काय झालं ग, ममा? काय झालं? तू कशाला ग रडते?' आणि तिच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते. म्हणजे तिला कळत नव्हतं का आपण हे काय बोलतो म्हणून. थोड्याच वेळात सगळे जमा झाले. माझ्या मैत्रिणी आल्या. हॉस्पिटलमध्ये ८-९ वाजेपर्यंत सगळी लोकं जमली. तो सुट्टीचा दिवस होता. काही लोकांना कळलं, काहींना कळलं नाही. ३ मे १९७७. ज्यांना कळलं ते आले. पेपरमध्ये आलं. रेडिओवर सांगितलं त्यामुळं लोकांना कळलं. सगळे गावातले जमा झाले. आता चला. डिस्चार्ज द्या. आम्ही घेऊन जातो. सगळेच नातेवाईक, सख्खे - जवळचे. सगळेच गाववाले. तिथं काय आहे, तीस फॅमिलीज दलवाईंच्या आणि सगळे भाऊबंद. सगळे मुंबईलाच होते. एकाला फोन केला की कळलंच भराभर सगळ्यांना! आणि हा माणूस जाणार म्हणून चार दिवसांपूर्वी येऊनच बसलेले मुंबईला अनेक. मयत गावाला न्यायची होती त्यांना. म्हणून येऊन बसले होते. येरझाऱ्या घालत होते. बघत होते थोड्या थोड्या वेळानं, या माणसाचं काय होतं म्हणून. हे गेल्यानंतर सगळे जमा झाले आणि चला म्हणाले आता ही मयत घेऊन. इतक्यात डॉ. कुरुव्हिला आणि डॉ. कामत आले आणि ते म्हणाले का, 'बघा मिसेस दलवाई, पोस्टमॉर्टेम करावं असं आम्हांला वाटतं.' तर म्हटलं, 'कशासाठी पोस्टमॉर्टेम करायचं?' 'यांना आम्ही आता औषधं दिली, आमचे उपचार कुठे काही चुकले का? किंवा कुठलं औषध यांना लागू झालं नाही? आणि कुठलं औषध द्यायला आम्ही चुकलो का? दुसऱ्या पेशंटला ते उपयोगी पडेल. दुसऱ्या पेशंटला ही चूक केली नाही तर तो कसा वाचेल हे आम्हांला बघायचंय, म्हणून पोस्टमॉर्टम करायचंय.' तर आमच्या नातेवाईकांना हे जेव्हा कळलं - पोस्टमॉर्टेमचं – तेव्हा ते सगळे म्हणाले, 'नाही, हे धर्माच्या विरुद्ध आहे. पोस्टमॉर्टेम करायचं नाही त्या माणसाचं. आम्हांला मयत अशीच द्या.' खूप त्याच्यावर झिकझिक झाली. काय करायचं? त्या वेळी पवारसाहेब बारामतीला, शहासाहेब पुण्याहून निघालेले, नगरकर दिल्लीहून येणार. म्हणजे मी एकटीच होते आणि ह्या सगळ्यांना तोंड द्यायचं. म्हणजे माझं दुःख बाजूला राहिलं आणि हे प्रश्न मिटवण्यात माझा तो वळ जाणार होता. काय माझी परिस्थिती झाली असेल? अशी झिकझिक केल्यानंतर मी म्हटलं, 'नाही, त्यांना करू दे पोस्टमॉर्टेम.' कोणालाही आवडला नाही माझा डिसीजन. तोपर्यंत ते बसून राहिले. पोस्टमॉर्टेम होतंय तर कुठं नेणार मयत याच्यावर वाद झाला होता माझ्याशीच. आपापसात चर्चा करून म्हणाले, भाभीला विचारा. कारण शेवटचा माझाच निर्णय. हॉस्पिटलवाले कुणाला विचारणार? माझंच ऐकणार नं. यांचं थोडंच ऐकणार ते? त्यांना सांगितलेलं होतं, कुणी नसेल तर हिला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. डॉक्टरनी सांगितल्याशिवाय हॉस्पिटल कसं रिलीव्ह करेल तुम्हांला? मग त्यांनी विचारलं. म्हटलं, नाही बाबा कुठेही नेण्याचा प्रश्न नाहीये. लिहून ठेवलेल्याची तोपर्यंत कल्पनाच नव्हती डॉक्टरांना कसलीच. हा माणूस, पेशंट पवारांचा. माझी आर्ग्युमेंट अशी होती की मी जर उपचार केला असता या माणसाचा तर माझ्या परिस्थितीनुसार या माणसाला मी पंधरा दिवस सुद्धा जगवू शकले नसते. औषधाला पैसे नव्हते. माझी ताकद कमी पडली असती. ज्या लोकांनी जिवंत ठेवलं त्या लोकांचा या मयतीवर अधिकार जास्त आहे. तर ही मयत पवारांच्याच घरी जाईल. आणि पवारांनाच ठरवू दे काय करायचं ते. त्याचा अधिकार कुठल्याही नातेवाईकाला नाही. आईला नाही, वडिलांना नाही, बायकोलासुद्धा नाही. असा निर्णय माझा असल्यामुळे ही मयत मला त्यांच्या स्वाधीन करायची आहे. ते नाहीत तोपर्यंत मला पहारा करायचा आहे. असा माझा विचार होता आणि तो सुद्धा या लोकांना आवडला नाही. पण थांबावं लागलं त्यांना. एक वाजला – मी डॉक्टरांना सांगितलं, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तुम्ही मयत तयार करा. तिथं आंघोळबिंघोळ न्हाणंबिणं सगळं करायचं नाही. अजिबात करायचं नाही. कारण पेशंटमध्ये काही राहिलेलंच नाही. सतरा रोगांचा तो पेशंट आहे. कशाला ती इन्फेक्शन्सची भीती? आणि ते करायची गरज काय आहे? तुम्ही आम्हांला मयत तयार करून द्या आता. नुसतं तिथून उचलून नेता येईल अशी.
आणि मग पवार आले म्हणून कळलं. मग आम्हांला घरी नेलं. घरी हॉलमध्ये त्यांच्या. सगळा हॉल त्यांचा रिकामा केला होता. आणि तिथं हजारो लोक जमा झाले. इतका मोठा हॉल होता त्यांचा. आतून-बाहेरून बायका-बियका सगळे जमा झाले तिकडे. गाववाले सगळे आणि ज्यांना माहिती होतं ते. ऑफिसला सुट्टी असल्यामुळे ज्यांना कळू शकलं नाही ते आलेले नव्हते. मी आतल्या खोलीमध्ये मुलींना घेऊन बसले होते. हे झाल्यानंतर ते विलचं प्रकरण झालं. शहासाहेब आले. नगरकर आले. शहासाहेबांनी विल वाचून दाखवलं. ते म्हणाले, हमीदनं विल लिहिलेलं आहे. आता ते आम्हांला वाचायचं आहे. त्यावर गोंधळ खूप झाला. विलबिल काही नाही. त्याच्याकडे प्रॉपर्टी नाही. त्याला अधिकार नाही. अमुक-तमुक. असा स्टंट करणारे लोक होते तिथं. त्या वेळी पवार बोलले. आम्हांला हमीदने विल दिलेलं आहे ते आम्ही वाचणार. काय लिहिलेलं आहे बघा. आणि त्यांनी ते विल वाचून दाखवलं. पहिलं विल – का माझा कुठलाही विधी करायचा नाही. मला मुसलमान पद्धत नको, हिंदू पद्धतीनंही दहन नको. मला चंदनवाडीतच नेण्यात यावं. तिथं भाषणंबिषणं नकोत. काहीही माझं केलेलं मला आवडणार नाही. मग रीसर्च सेंटर वगैरे उघडा. असं सगळं त्यांनी ते लिहून ठेवलेलं वाचलं. वाचल्याबरोबर गोंधळ सुरू झाला. लोक म्हणाले हे विल नाही. हे आम्हांला मंजूर नाही. यांनी आमच्या भावना दुखावतात. आणि शेवटी पवारसाहेब, शहासाहेब असं म्हणाले की, 'तो आमचा मित्र होता. त्याच्या इच्छेविरुद्ध जर गेलं तर आमची भावना दुखावेल आणि या वेळी आम्ही आमच्या भावना दुखावून घेणार नाही.' हे बोलायच्या अगोदर शहासाहेब माझ्याकडे आत आले आणि मला म्हणाले, 'काय करायचं? तुम्ही सांगा. तसं आम्ही करू. यांच्या स्वाधीन करायचं का?' मी म्हटलं, 'नाही शहासाहेब, हे विल मी लिहिलेलं आहे. दलवाईंच्या मनात जे असेल ते करायला मी तयार आहे. तुम्ही माझ्या पाठीशी रहा. एवढीच माझी तुम्हांला विनंती आहे.' त्या वेळेस दंगल वगैरे होईल अशी भीती वाटली. चंदनवाडीत न्यायचं म्हटल्यावर भराभर सगळे गाववाले निघून गेले. बायकांसकट. ह्यांची मावशी आना होती, आई होती, मामा होते. का गेले? गावात राहायचंय, वाळीत टाकतील, म्हणून हे लोक नाईलाजानं गेले. त्यांना कळलंच नाही काय करायचं ते. जावंसं वाटत नसतानासुद्धा ओढूून ओढून नेल्यासारखे गेले. काही मुलं जी स्टंट करणारी होती ती इथं राहिली. का हमीदकाकाच्या मयतीला आम्ही आहोत. अशी पण होती त्याच्यात मुलं ज्यांच्यावर यांचे संस्कार होते. ती थांबली असावीत. मला काही माहिती नाही. मी आतल्या खोलीत बसलेली होते.
त्याच्यानंतर मला नेऊन बाहेर मुलांसकट बसवलं. तिथं डॉ. कुरुव्हिला आणि डॉ. कामत आले. मयतीला ते पण आले होते. त्यांनी मला सांगितलं की बाई, पोस्टमॉर्टेमचे रिपोर्ट एकदम ठीक आहेत. काही चूक झालेली नाही. आपल्या पेशंटमध्ये काही दमच नव्हता. ते इतके चांगले डॉक्टर होते. त्यांनी इतकं चांगल मन लावून सांभाळलं. इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं की कुठल्या हॉस्पिटलमध्ये राहिल्यासारखं वाटलंच नाही मला. नंतर मित्रमंडळी होतीच. घर भरलेलं होतं. काही करायचंच नव्हतं. ते फोटोबिटो काढणं झालं. पत्रकार आले. काय काय त्यांचं झालं आणि त्याच्यानंतर इंदूताई पारीख, सौ. तळवलकर आल्या आणि मला म्हणाल्या 'भाभी, कशाला तुम्ही चंदनवाडीमध्ये येता? तुम्ही येऊ नका, तुम्हाला ते सगळं काही बघवायचं नाही, आम्ही जातो.' म्हटलं, 'नाही. इथपर्यंत सोबत केली आहे नं, शेवटपर्यंत येऊ दे मला. मला तरी चंदनवाडी कुठे माहितीये? मला शेवट बघू दे त्यांचा. तुम्ही मला अडवू नका. मी बघू शकेन. तुम्ही काळजी करू नका.' आणि गाड्या केल्या भराभर आणि त्या गाड्यांमधून आम्हांला नेण्यात आलं.
चंदनवाडीमध्ये गेलो. त्या हॉलमध्ये सगळे थांबले. सगळे तिथे जमा झाले. काही लोक डायरेक्ट चंदनवाडीतच आले होते. मला भेटले नव्हते. माझे ऑफिसर वगैरे, दस्तूर, पालेकर, माझी मैत्रीण तुंगारे, ते सगळे आले होते. मला भेटलेबिटले. आणि तिथं बघितलं. त्या विद्युतदाहिनीमध्ये कसं माणसाला घालतात. इलेक्ट्रिकचे शॉक देऊन कसा तो देह खाली गेला हे सगळं मी बघितलं. त्यांनी दार बंद केलं आणि मग मला आवरेना. मुलींना जवळ घेतलं. असं वाटलं का हा मनुष्य खरोखर आता आपल्याला सोडून गेला. गंमत अशी की ह्या माणसाला 'आपलं वय झालेलं नाही, आपल्याला जबरदस्तीने मरण येतंय आणि कोणीतरी ओढून नेतंय' असं सारखं वाटायचं. हे मी इतक्या जवळून बघितलेलं आहे की मला वाटले असं कसं होऊ शकतं? तुम्ही म्हणता ना, देव आहे. सगळं आहे. कुठं गेला होता तो? आम्ही मानतो का नाही मानतो तो प्रश्न नव्हता. पण हे सगळं इतकं लवकर व्हायला नको होतं. असा काय यांनी गुन्हा केला होता ज्याची एवढी मोठी शिक्षा त्यांना मिळावी? ज्याला वाटतंय मी काम करावं, माझं वय अजून झालेलं नाहीये, मी पण लोकांच्यासारखं जगावं, पण मला मरताही येत नाही. जगताही येत नाही. इतकं मरण जवळ. अशा पद्धतीचं मरण, फार क्लेश क्लेश. अशा पद्धतीचं ते मरण नको होतं.
घरी सगळे येणारे जाणारे. तळवलकरांची बायकोही सतत असायची. जशोदताई - म्हणजे मिसेस शहा. नगरकर, कुमुदवहिनी - नगरकरांची बायको - हे सगळे असायचेच येऊन जाऊन माझ्याकडे. माझी समजूत घालायला. महंमद दलवाई हे किती जवळचे होते. पावलापावलाला मदत केलेली आहे मला त्यांनी. माझी साथ सोडली नाही. एक विल त्यांच्या शेवटच्या क्रियेचं होतं. दुसरं विल असं होतं की, महंमद खडस नि हे महंमददा दोघांनीही जे गाववाले करतील त्याला सामोरं जावं. म्हणजे माझी सुरक्षा त्यांनी करावी. त्यांनी काही केलं तरी मला त्रास होऊ नये याची काळजी त्या दोघांनी घ्यावी असंही होतं. आणि तिसरी विलची जी कॉपी होती ती शहासाहेबांच्या नावावर होती. की, मला चंदनवाडीमध्ये नेल्याबरोबर शहासाहेबांनी माझ्या फॅमिलीला आपल्या घरी न्यावं. संरक्षण म्हणून.' हे महत्त्वाचं होतं. दलवाईंना माहिती होतं की आम्हांला तिथं ठेवल्यानंतर समाज आम्हांला राहू देणार नाही, त्रास देणार. समाजापेक्षा आमचे गाववाले, आमचे नातेवाईकच आम्हांला काय करतील? ते होऊ नये म्हणून आम्हाला ताबडतोब नेण्यात यावं, असं लिहिलं होतं. शहासाहेबांनी येऊन मला विचारलं, 'मेहरुन्निसाबाई, काय करायचं?' म्हटलं, 'तुम्ही मला न्यायचं. त्यांनी तुमच्या स्वाधीन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मला न्यायचं. एवढंच.'
हे मरायच्या अगोदर काही दिवस, एक १५-२० दिवस आधी अशीच त्यांची तब्येत बिघडलेली होती. श्वासोच्छ्वासाचा खूप त्रास झाला आणि त्यांना इंटेंसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं. तेव्हा असं वाटलं का हा माणूस आता जाणार. तिथं आय.सी.यू. मध्ये ते सारखी आठवण काढत होते की शहांना बोलवा म्हणून. फोन करून शहांना बोलावलं. मी आणि शहा त्यांच्या बेडजवळ होतो. शहांच्या कानात काहीतरी बोलले-बिलले. आणि मग मी लांब होते ना तर शहांनी मला जवळ घेतलं अन् म्हणाले, 'अरे त्यांची काळजी अशी का करतोस तू? मी आहे ना. मी सांभाळेन. मी सोडणार नाही रे तिला. तू काही काळजी करू नको. मी असताना तिला कोण हात लावणारे? मी सगळं प्रोटेक्शन तिला देईन.' त्यांना काळजी वाटायची. पण असं कधी बोलून दाखवलं नव्हतं.
आणि मग चंदनवाडीतून आलो तेव्हा पवारवहिनींनी पोहे केले. सगळ्यांना खायला दिले. मला तोंड धुवायला सांगितलं. कपडे बदलले मी. माझी बॅग पवारवहिनींनी नीट भरली. आई व माझी आत्या घरात होत्या. त्यांना हे सगळं नवंच होतं. म्हाताऱ्या होत्या पण दोघींनी गोंधळ केला नाही. त्या वेळी गुपचूप होत्या. त्यांच्या मनात होतं चंदनवाडीत यायचं. पण म्हाताऱ्या आहेत बघवायचं नाही, असं मला वाटलं. म्हणून माझी आत्येबहीण दौलत आली होती म्हणजे महंमददांची बायको, तिच्याबरोबर मी दोघींना तिच्या घरी पाठवलं. मग महंमददा म्हणाले, 'यांची काळजी तुम्ही करू नका. मी घरी घेऊन जातो यांना माझ्या. तुम्ही नाही नं काकी – तोवर मी यांना सांभाळीन.' आपले व्हाइस-चॅन्सेलर दाभोळकर आले होते गाडी घेऊन. शहांनी गाडी आणली होती. पवारांनी १-२ गाड्या काढल्या. प्रोटेक्शनसकट आम्हाला त्या गाड्यांत बसवलं. पोलीस प्रोटेक्शन. सगळं होतं. गाड्या भरून माणसं होती. त्याच्यात आम्हांला पुण्याला शिफ्ट करण्यात आलं.
पुण्याला आम्ही आलो. मी १९ दिवस पुण्याला होते. तिथे माझे मामा-बिमा येऊन भेटले. पण काही नातेवाईक मला भेटायलाही आले नाहीत आणि त्यांनी मला घरीसुद्धा नेलं नाही. थोडासा धार्मिक विचारांचा पगडा त्यांच्यावर बसलेला होता. दलवाईंच्या चाहत्यांची खूप पत्रं आली. भेटणं झालं. सगळ्या महाराष्ट्रातील लोक येऊन मला भेटून गेले. पत्रांचं एवढं मोठं बंडल माझ्याकडे आहे. कोणालाही मी ओळखत नाही. पण दलवाईंचे चाहते एवढे होते! त्याची फाइल मी करून ठेवलेली आहे आणि मिसेस शहा – जशोदताई ती पत्रं मला वाचून दाखवायची. तिनं माझ्याकरता खूप मेहनत घेतली. त्यांची वरची खोली आम्हांला दिलेली होती. का तर मोकळेपणानं आम्ही राहावं तिथं. एकोणीस दिवस तिनं खूप आमचा पाहुणचार केला. आणि मग यदुनाथ थत्ते म्हणाले, 'आता तुमच्या मनात काय आहे ते लिहा. साधनामध्ये आपण ते छापू या. भाभी तुम्हांला लिहिता येत नाही असं म्हणू नका. जसं तुम्हांला येईल तसं लिहा.' आणि त्या वेळेला आम्ही एक एक लेख तिघींनी बसून लिहिला होता. त्यातला रुबीनाचा लेख खूप चांगला होता, तिला बाबांची कला होती. त्यामुळे तिचा लेख खूप गाजला.
नंतर काही दिवस गेले आणि आम्ही कामाबद्दल बोलायला लागलो. महंमददा यायचे तिथे. शहासाहेब महंमददांना म्हणाले, 'हमीद गेला. त्याची जागा तर कोणी घेऊ शकत नाही. पण तुला आम्ही थोडसं मानधन देऊ, कामाचं चीज म्हणून. तर तू हमीदच्या जागेवर काम करशील का?' 'कोण करणार काम? मी? नाही नाही', महंमददा म्हणाले, 'हमीद तो हमीदच. मी काही स्टेजवर उभा राहू शकत नाही. माझ्याकडे कितीही बुद्धी असली तरी मी काही हमीदची बरोबरी करू शकत नाही. मला हे काम झेपण्यासारखं नाही. मला पैसे नकोत. पण मला हे कामही होणार नाही.' मग थोडे दिवस मी विचार केला. मी असा विचार केला की कशा तऱ्हेनं मी हे काम करावं? काय करावं? जेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती त्या वेळी एकदा काय झालं, अंधेरीचे ते मुल्लानी आमच्याकडे आले. त्या वेळी ते मंडळाच्या बायका-बियका जमा करण्याचं काम करत होते. त्या वेळी ते आले आणि म्हणाले, 'दलवाई आपा, तुम आएगी क्या अंधेरीमे? मै औरतों को जमा करता. तुम जरा बात करो.' आणि दलवाईंना सांगितलं, 'मै जरा आपाको लेके जाता हूँ.' आणि मी तिकडे गेले. तिकडे एका खोलीमध्ये गेलो. खिडक्या, दरवाजे सगळे पॅक. गच्च भरलेले बायकांनी, पुरुषांनी. बायका सगळ्या हॉलमध्ये बसलेल्या नि पुरुष सगळे बाहेर. भीती अशी की पहिली सभा आहे. हे उधळून लावतात, ऐकतात का काय करतात? पण काहीही गडबड तिथं न होताना ती मीटिंग खूप चांगली झाली. मग त्यांनी येऊन सांगितलं, 'आपाला नेलं ते किती बरं झालं. कितना अच्छा बात आपा करती है.' हे हसले गालातल्या गालात. तेव्हा आजारीच होते. मग हे सारख्या मीटिंगा घ्यायचे. त्यांची शेवटची मीटिंग पण घरातच झाली. त्यांना जेव्हा असं कळलं का आपण जगणार नाही, काही करू शकणार नाही तेव्हा यांनी सांगितलं, 'आपण लोकांना, कार्यकर्त्यांना जमा करू या.' महाराष्ट्रभर कार्यकर्ते होते. सगळ्यांना पत्र टाकली. घरी बोलावलं. त्या दिवशी त्यांची तब्येत फार खराब होती. पाणी पण घेता येत नव्हतं त्यांना. पण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन मी त्यांना घरी आणलं होतं. दिल्ली दरबारची बिर्याणी मागवली होती. आणि सांगितलं होतं की शेवटची माझी बिर्याणी कार्यकर्त्यांना नेऊन दे. हॉलमध्ये सगळे जण जमले होते. पलंगावर यांना झोपवलेलं होतं. बाबूमियाँ बँडवाले पण आले होते. ते ह्यांच्या पलंगावर बसले होते. मला हे म्हणाले, 'तू या हॉलमध्ये बसायचं नाही. हे दार आहे, याची एक फळी बंद करायची. खुर्ची तिथं लावून त्यावर बसून नुसतं तू ऐकायचंस. तू या खोलीत यायचं नाहीस. एकही शब्द तू आत येऊन बोलायचा नाहीस. शेवटची मीटिंग आहे.' आणि ती मीटिंग झाली. ते म्हणाले, 'जनरल सेक्रेटरीचं पद मी सोडतो.' किती त्रास झाला असेल हे सांगताना! सगळं कामाचं सांगितल्यानंतर हे शेवटी सांगितलं. लोक म्हणाले, 'तुम्ही अजून आहात नं? बरे व्हाल.' ते म्हणाले, 'मी याच्यातनं बरा होणार नाही. आणि कामाचा खोळंबा व्हायला नको. त्यामुळे तुमच्यापैकी पुढे येऊन कोण काम करणार? त्यानं पुढं यावं. हे पद त्याला जावं.' हे त्यांनी निश्चित केलं. ही शेवटची मीटिंग. सगळे लोक निघून गेले. त्या दिवशी हे जेवले नाहीत. सगळे लोक खाऊन-पिऊन निघून गेल्यानंतर बाबूमियाँना मिठी मारून ते खूप रडले. बाबूमियाँ बिचारे दर वेळी त्यांच्या बरोबर असायचे. हॉस्पिटलमधून घरी आणलं का बाबूमियाँ यायलाच पाहिजेत. हॉस्पिटलमध्ये गेले का बाबूमियाँ जायचे. असं सारखं चालू असायच. बाबूमियाँचं इतकं प्रेम होतं. त्यांना रेकॉर्ड-बिकॉर्ड ऐकायची सवय होती. मग ते आले का हे लावायचे. ऐकत बसायचे. दोघांच्या गप्पा मग रेकॉर्ड लावताना. त्या गाणाऱ्याच्या पिढीच्या पिढीची माहिती द्यायचे. इतक्या त्यांच्या गप्पा चालायच्या. हे सगळं आटपलं.
कामाचं बोलायला सुरुवात केली. तेव्हा हे सगळं डोक्यात होतं. मी शहासाहेबांना असं विचारलं भीत भीत, का तर ते मोठे होते. 'शहासाहेब, मी एक गोष्ट सांगू का? माझ्या मनात काम करायचं आहे. मी इथं निश्चित करून जाणार आहे. पण मला काहीच येणार नाही करायला. मला स्टेजवर उभं राहता येणार नाही, भाषण करता येणार नाही. माझं वाचन नाही, माझे विचार नाहीत. मला हे प्रश्न काय आहेत, माहिती नाहीयेत. पण मला तुम्ही गाईड करा नीट सगळ्यांनी. बायकांशी संबंधित अशाच विषयाशी काम करू शकेन असं वाटतं. मी बायकांमध्ये घरापर्यंत पोचू शकेन. एवढं काम मी करू शकेन. घरातली आतली माहिती मी तुम्हांला आणून देऊ शकते- एखाद्या घरात काय चाललेलं आहे. आणि या बाईला काय त्रास आहे. बायकांमध्ये मी काम करू शकेन असं मला वाटतं, तर मी करू का? जमेल का मला?' त्यावर महंमददा म्हणाले, 'काकी जर काम करणार असल्या तर मी त्यांना आपल्या लीडर समजून सगळी मदत करीन.' खूष झाले शहासाहेब. एक माणूस भेटला आपल्याला काम करायला म्हणून ते खूष झाले. म्हणाले, काही हरकत नाही.' मग त्यांनी एक मीटिंग घेतली. 'साधना'मध्ये. मी असतानाच. यदुनाथजी तिथं होते. आणि सगळ्यांना सांगितलं, 'आता या मिसेस दलवाई आपल्याबरोबर काम करणार आहेत.' मग यदुनाथजींनी मला विचारलं, 'भाभी, आता परत कधी येणार तुम्ही पुण्याला?' तर मी म्हटलं, 'बघू या.' म्हणाले, 'तुम्ही काम करणार नं. तुमच्या कामाचा एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही वारंवार यायचं, वारंवार लोकांना भेटायचं, संपर्क साधायचा, बोलायचं, हा कामातला तुमच्या एक भाग आहे. इथपासून तुम्ही काम सुरू करायचं.' पुण्यात एक मोठी कंडोलन्स मीटिंग झाली. सय्यदभाई वगैरे बोलले होते. मला घेऊन गेले होते. मला बोलायला सांगितलं. पण मला काहीच बोलायचं नव्हतं. मला काय येत होतं बोलायला? मी कशाला स्टेजवर जाऊन बोलू? मुलींना घेऊन तिथं फक्त गेले.
दलवाई गेल्यानंतर प्रभुभाईंच्या घरी अण्णा (एस.एम.जोशी) यांनी मला बोलावलं. आणि विचारलं, भाबी, तुमच्यावर पुष्कळ जबाबदाऱ्या आहेत. त्यासाठी आम्ही काय करायचं? मोकळेपणाने सांगा. माझे डोळे भरून आले. माझ्या घरातील लोकांपैकी कुणालाही हा प्रश्न विचारावासा वाटला नाही. तो अण्णांनी मला विचारला. मी स्वतःला सावरलं. आणि त्यांना सांगितलं, अण्णा, मी नोकरी करते. माझ्या जबाबदाऱ्या मी उचलू शकेन. त्यासाठी कुणाकडून काहीही मदत घ्यायला मला आवडणार नाही. तुम्ही मला विचारलं, फार बरं वाटलं. माझं कोणी तरी आहे. त्याचं समाधान वाटलं. तुम्ही माझ्यासाठी एकच गोष्ट करावी असं मला वाटतं. ती अशी की मी दलवाईंचं काम करणार आहे. त्यासाठी तुमचा सल्ला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही द्या. खरं म्हणजे मी दलवाईंच्या सगळ्या मित्रांना धरून ठेवल्यामुळे त्यांची सहानुभूती मला मिळत गेली. १९८३ मध्ये माईसाहेब पारखे एक आदर्श माता, हा पुरस्कार मला मिळाला. राजश्री शाहू छत्रपती स्मारक हा पुरस्कार मला जुलै १९८५ साली मिळाला. रुपये पाच हजार आणि प्रमाणपत्र असा हा पुरस्कार होता. मुसलमानांमध्ये सोशल रिफॉर्मेच्या या कामासाठी.
रुबीनावर अण्णांचं खूप लक्ष होतं. तिची जुळी मुलं सहा वर्षांची झाली. ती नोकरी करत नव्हती. मी एकदा अण्णांना भेटायला गेले असताना त्यांनी मला सांगितलं. आता रुबीनाची मुलं पूर्ण दिवस शाळेत जातात. तिने आपला सर्व वेळ घरात काढू नये. तिथे नोकरी करावी असं मला वाटतं. अण्णांची तब्येत त्या वेळी फारशी बरी नसायची. मला म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, ती जबाबदारी माझी आहे. अण्णा जायच्या अगोदर त्यांनी रुबीनाला 'अपना सहकारी बँकेत' नोकरीला लावले.
सी.डी.चपटवाला हे खादी कमिशनमध्ये माझे ऑफिसर होते. त्यांनी दलवाईंना आवडत नसतानासुद्धा त्यांचा पाच हजार रुपयांचा विमा काढला. त्यांच्या मनात तर दलवाईंचा अपघात विमा काढायचं होतं. त्यांना असं वाटायचं की हा माणूस असं काम करतो आणि त्याच्या जिवाला केव्हाही धोका होऊ शकतो. पण त्यासाठी दलवाई तयार झाले नाहीत. दलवाई गेल्यानंतर जसलोक हॉस्पिटलचे अकरा हजार एक महिन्याच्या मुदतीत भरायचे होते. त्या वेळी शहासाहेब म्हणाले, 'आपण आता लोकांच्याकडे पैसे मागणं बरोबर नाही.' त्या वेळी हे विम्याचे पाच हजार रुपये कामाला आले. शिवाय शहासाहेबांच्या सांगण्यावरून मंडळाची गाडी विकून बाकीचे पैसे उभे केले.
☯
एकोणीस दिवस पुण्याला राहून काम करण्याचा निश्चय करून मी मुंबईला परत आले. शहासाहेबांनी मला घरी आणूस सोडलं. पवारांच्या घरी. दोन-चार महिने राहिले मी. मला जाऊ देत नव्हत्या पवारवहिनी. 'नाही, नाही तुम्ही लवकर जाऊ नका. तुमचं मन रमेपर्यंत इथं रहा. तुम्हांला काही काळजी करायला नको. तुम्हांला सगळं प्रोटेक्शन इथं मिळेल.' असं त्या म्हणायच्या. अशा रीतीनं त्यांनी माझं खूप केलं. आणि नंतर नंतर सुद्धा जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा प्रोटेक्शन होतंच. दलवाईंना सुद्धा होतं. पण गंमत अशी की घरात कोचावर हे बसलेले असले का तो गार्ड असा उभा, नाही तर गॅलरीत दारामध्ये तो उभा. किंवा खाली दोन माणसं उभी आहेत वर दोन माणसं उभी आहेत. जड जायला लागलं हो. प्रोटेक्शनखाली बोलायची चोरी घरात. गंमत काय व्हायची – रात्री आम्ही झोपलेले असायचे नं तेव्हा खाली बसलेले असायचे गार्ड. कोणी आलं का मी उठायची नि धाडकन् दार उघडायची आणि बोलायची. तेव्हा पोलीस येऊन मला म्हणायचे, 'अहो बाई, आम्हांला इथे का बसवलेलं आहे? दार उघडून तुम्ही बोलू नका.' मी म्हणायची, 'अहो, पण ही आमचीच माणसं आहेत. असं करू नका. तुम्हांला कळत नसलं तरी मला भीती वाटत नाही. ही माणसं काय खून करणारैत?' मग यांनी सांगितलं की मला प्रोटेक्शन नको. मला या लोकांत जर काम करायचं असेल तर माझ्या मागं-पुढं पोलीस बघितल्यानंतर माझ्याकडे कोण येणार? यांनी मला मारलं तरी चालेल पण मला असं प्रोटेक्शन नको आहे. फोन येणं, निनावी पत्र येणं, कामाच्या बाबतीत धाकदपटशा हे सुरुवातीपासून होत असे. मी पण जेव्हा मीटिंगला जात होते, तिथं मी काही बोलले का मला लगेच फोन यायचे. दमबाजीचे. आणि मग मी त्यांना फोनवर सांगायची का असं फोनवर डिस्कस करू नका. मी तिथं काय बोलले हे तुम्हांला डिस्कस करायचं असेल तर माझं दार उघडं आहे. तुम्ही इथं या आणि माझ्याशी बोला. 'नहीं, नहीं, आपके गुंडे होंगे ना नीचे बैठे हुए.' तर मी म्हणाले, 'आपभी उनमे शामील हो जाइए.' असा मला खूप त्रास झाला सुरुवातीला. म्हणजे लोकांनी खूप त्रास दिला. त्यांनी असा प्रयत्न केला की मी काम करू नये. पण माझ्या मंडळाची जी माणसं होती, म्हणजे हुसेन जमादार त्याच्यात होते. सय्यदभाई, अन्वर शेख त्यांच्यात होते. अमीरभाई होते. आणि बरीच लोकं होती. त्या सगळ्यांनी साथ दिली ना! बाई कोणी नव्हती हो आमच्यामध्ये. अॅडव्होकेट नजमा शेख आणि मरियम रिफाय अशा दोन बायकांना तयार केलं होतं. पण व्यक्तिगत कारणामुळे त्या काय शेवटपर्यंत टिकल्या नाहीत. त्या कामाला आल्या नाहीत. मग कसं काम करणार? काय करणार? त्यामुळे प्रश्न यायला लागला. मग पुढच्या काळामध्ये महंमद दलवाईंनी मला खूप मदत केली. कशी? ते स्वतः आधी वाचायचे. त्यांना प्रश्न माहिती होते. मग कसे मांडायचे, ते त्यांनी सांगितलं. त्यांनी मेहनत खूप घेतली. ते काही भाषणं करायचे नाहीत पण दलवाईंना काही भाषणासाठी मदत करायचे. आणि इंग्लिशमध्ये असलं की मदत जास्त व्हायची. ते पुस्तकं वाचायचे इंग्लिश. महंमददांचं इंग्लिश चांगलं होतं. त्यामुळे इंग्लिशची मदत त्यांना व्हायची, विचारांची मदत व्हायची. चर्चा करण्यात मदत व्हायची. या सर्वांमुळे हे तयार झालेले होते. माझ्यावर मात्र मेहनत महंमददांना खूप करावी लागली. का तर मी खूपच अडाणी होते. मी दलवाईंची व्याख्यानं ऐकली होती. पण ते सगळं मला समजत होतं असं नाही. पण त्या वेळी मला काही प्रश्न माहिती होते. काही प्रश्नांवर हे बोलतात हे माहिती होतं. कुठच्या? तर तलाकबद्दल, जबानी तलाकबद्दल. तीनदा तलाक म्हटल्यावर बाईला त्रास काय होतो? त्याचे पुढचे परिणाम काय होतात? नवरा बाईला का सोडतो? काय काय होतं... हे इश्यू मला माहिती होते ना. आणि आसपासच्या बायकांचे प्रश्न दिसत होतेच. आमच्याकडे अशा बायका यायच्याच ना घरी. त्यामुळे मला त्यांचे प्रश्न माहिती असायचे.
सुरुवातीला भाषणं करायची तेव्हा मला खूप घाबरायला व्हायचं. वाटायचं की भाषणं करू नयेत बाबा. बाकीचं सगळं काम करावं. पण भाषणं करू नयेत. महंमददा म्हणायचे, 'का नाही, भाषणं जिथं जरुरी आहे तिथं तुम्हांला करावीच लागणार आहेत. तुम्ही भाषणं सोडून काम कसं करणार? त्यासाठी तुम्हांला बोललंच पाहिजे.' आणि ते मला म्हणायचे, 'मराठीतूनच बोलायचं. तुम्ही लेखकाची बायको आहात. तुम्हांला मराठी आलं पाहिजे.' आणि आम्ही असं म्हणतो, का बाबा मराठीमध्ये का बोलायचं? तर मराठीमध्ये बोलायचं, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहातो. मुसलमानांची भाषा उर्दूच आहे, असं आपण मान्य करायचं नाही. का तर तेव्हा लोकं असं बोलायचे, 'आम्ही मुसलमान. आमची भाषा उर्दू.' तर दलवाई म्हणायचे 'नाही, आपण ज्या प्रांतामध्ये राहातो ती आपली भाषा. आणि ती भाषा आपल्याला येणं जरुरीचं आहे.' आमच्या घरामध्ये आम्ही जेव्हा मराठी बोलायला लागलो तेव्हा या हेतूनं मराठी बोलत होतो. का तर, मी मुसलमान असले तरी मी महाराष्ट्रात राहाणारी आहे. मला मराठी आली पाहिजे. मला मराठी का येत नाही? जशी येतेय तशी मी मराठीमध्ये पुटअप करून मराठीतच मी बोलेन. अशा तहेने मीटिंग्जमध्ये मी मराठीत बोलायला सुरुवात केली. काय व्हायला लागलं? महंमददा लिहून द्यायचे, लिहून दिल्यावर ते मला मराठीत वाचता यायचं नाही. बोलताना सोपं आहे, बोलणं मला जमायचं. आणि कोण काय बोलतात हेही मला कळायचं. पण गंमत अशी का लिहिणं येत नव्हतं. लिपी येत नव्हती. मग मी माझं डोकं जरा चालवलं. मग मी काय करायची, त्यांना सांगायची तुम्ही मराठीमध्ये हळूहळू बोला आणि मी उर्दू लिपीत मराठी लिहून घ्यायची. ते वाचून काढायची. मला मराठी बोलायला येत असल्यामुळे ते वाचायला यायचं. आणि मला काही समजलं नाही तर मी त्यांना विचारायची. त्यांची भाषा फार कठीण होती. त्यांना यायचं म्हणून ते फार कठीण शब्द वापरायचे. त्या कठीण शब्दांचे अर्थ काय? मी हे लिहिलेले आहे याचा अर्थ काय? समजा मी मीटिंगमध्ये गेले आणि मला प्रश्न विचारला, तर मला उत्तर देता आलं पाहिजे. नाहीतर लोकं माझी टर उडवणार. मला वाचतासुद्धा सुरुवातीला यायचं नाही. पण मी ते लिहिलेलं हातात घेतलं का मला मी स्टेजवर उभी राहिल्यावर जरा धीर यायचा.
नंतर नंतर महिला मंडळं मला बोलवायला लागली. तिथं आमचे प्रश्न काय आहेत ते मी मांडायची. आमचे जे काय प्रोग्रॅम व्हायचे तिथं आम्हांला बोलायचं होतं. तिथं मी भाग घ्यायची, बोलायची. जसे सय्यदभाई बोलायचे. बाकी सगळे बोलायचे. तशी मी पण बोलायला सुरुवात केली. मला मुस्लिम महिलांसाठी काम केल्याबद्दल १९८० साली आंतरभारतीचा सूसन बी. अँथनी अॅवार्ड' मिळाला. तो प्रोग्राम जनता केंद्र, मुंबई येथे झाला. न्यायाधीश नाथवानी साहेबांच्या हस्ते तो पुरस्कार मला दिला गेला. त्या वेळी एस.एम.जोशी म्हणजे अण्णा आणि यदुनाथ थत्तेजी पण तिथे होते. सगळ्यांची भाषणं झाली. मी जेव्हा भाषण करायला उठले त्या वेळी माझ्या हातात लिहिलेलं माझं भाषण होतं. मी बोलत होते मराठीमध्ये आणि पन्ने फिरत होते उलटे. हॉलमध्ये बऱ्याच लोकांना किती घेळ कळेचना की हा काय प्रकार आहे. कुजबूज सुरू झाली. आणि लोक एकमेकाला विचारायला लागले. अण्णांनासुद्धा आश्चर्य वाटलं. माझं बोलणं संपल्यानंतर त्यांनी हात पुढे केला. आणि तो पेपर मागितला. मी हसले आणि त्यांना सांगितले. तुम्हांला ते कळणार नाही. उर्दू बघून काही उपयोग नाही. अण्णा म्हणाले, मी हैदराबादला होतो. मला उर्दू भाषा चांगली येते. मी त्यांना ते पेपर दिले. पण त्यांना काही कळलं नाही. मग त्यांनी मला विचारलं हा काय प्रकार आहे? त्यावर मी म्हणाले मराठी भाषा उर्दू लिपीमध्ये आहे. ते हसले. आणि त्यांनी माझं कौतुक केलं. हा पुरस्कार एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र असा होता.
.
७८ मध्ये अमरावतीला कॉन्फरन्स झाली मोठी. वजीर पटेलनी घेतली होती, कुलसुम पारेख आलेल्या होत्या. तिथं आम्हीही गेलेलो होतो. तेव्हा काही महंमददांनी लिहून दिलेलं नव्हतं आणि तिथं हिंदीमध्येच बोलायचं होतं. त्यामुळं माझं भाषण मी स्वतः उर्दूमध्ये पूर्ण लिहिलेलं होतं. मला मुद्दे माहिती होते. त्यावर मी भाषण केलं. बरं होतं. मला असं वाटत नाही का आपल्याला अजिबात बोलता येत नाही, पण ते लिहिलेलं मला वाचता आलं. त्यानंतर त्यांनी २-३ ठिकाणी आम्हांला नेलं. तर मी तिथं बोलू शकले नाही. मुमताज रहिमतपुरे होती. जनार्दन वाघमारे होते. त्यांनी आमच्याबरोबर एक मीटिंग घेतली. तिथं मुमताज रहिमतपुरेनं भाषण केलं. भाषणाला दोघींना बोलावलं होतं. मी तिथं बोलले नाही. मला बोलायला येणार नाही म्हटलं इथं आणि तिनं जे भाषण केलं त्या भाषणामध्ये एक असा मुद्दा मांडला होता की कुराण हे अस्मानी किताब नाहीये. कुठलंही पुस्तक अस्मानी कसं असू शकेल? ते काही वरून पडत नाही. त्याच्यावर खूप वाद झाला. मारामारी करण्यापर्यंत वेळ आली. आम्हांला दोघींना धरून मग गच्चीवर नेऊन एका खोलीमध्ये नेलं आणि तिथं आमची मीटिंग झाली. मी बोललेच नव्हते. तीच बोलली होती. मी घाबरले होते. मी. बोलले नव्हते तरी त्यांनी मला भाषणाचे पैसे देऊ केले. पण मी ते घेतले नाही. नुसतं चहापाणी घेऊन बाहेर पडलो तिथून. ती माझी पहिली मीटिंग. त्यामुळं कळलं लोक कसे दुखावले जातात. कुठला मुद्दा मांडायचा. हिस्टॉरिकल फॅक्ट्स बोलायचेच नाहीत, का तर त्यावर वाद होतो. असे अनुभव पुढेही मला आले.
१९७८ मध्ये अलिगढला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. त्या वेळी मी तिथं गेले होते. मी, महंमददा नि जमादार. तिघं असे ठरवून त्या दंगलीच्या काळामध्ये गेलो. पहिल्यांदा दिल्लीला गेलो. तिथं नगरकर होते. त्यांना विचारलं. ते म्हणाले, तुम्ही दंगलीच्या एरियात फिरा. काही बायका जमा करा, हिंदू मुसलमान सगळ्या. त्यांना थोडी मदत पण करा. त्यांनी काही पैसेही दिले होते माझ्याजवळ. रिसीट बुक वगैरे आम्ही घेऊन गेलो होतो. तिकडं गेलो तेव्हा युनिव्हर्सिटीच्या कँपसमध्ये त्यांचे मित्र डॉ. बिलग्रामी होते. त्यांना भेटलो. यांच्या ओळखीची बरीच माणसं होती प्रोफेसरकीमध्ये. हे एकदा गेले होते तिकडे. म्हणजे यांना बोलावण्यात आलं होतं. पण तिथे त्यांचं भाषण होऊ शकलं नाही. स्टेजवर गेले तर मारायला लोक उठले. तर त्यांना बिलग्रामी आणि त्यांच्या मित्रांनी मागच्या दारातून बाहेर काढून मुंबईपर्यंत कसं पोचवलं, हे आम्ही ऐकून होतो. पण लोकांनी का असं केलं ते आम्हांला माहिती नव्हतं. जिथं त्यांना येऊ दिलं नव्हतं तिथं आम्ही राहिलो. काश्मीरचे शेख अब्दुल्ला तिथं आले होते. त्यांचा प्रोग्रॅमही बघितला एक दिवस. त्यांचं भाषण ऐकलं. तिथं एक गंमत बघितली. शुक्रवारचा दिवस होता. नमाजाची वेळ झाली. ते अर्धवट मीटिंग सोडून नमाजाला गेले आणि ते नमाज पढून आल्यानंतर परत मीटिंग सुरू झाली. हे माझ्या लक्षात आलं. मग तिथं प्रत्येक प्रोफेसरला भेटून डीटेल चर्चा झाली. त्या चर्चेत मी खूप भाग घेत नसे. पण महंमद दलवाई भाग घेत. मला कळत होतं पुष्कळसं काय चाललंय ते. नाही कळलं तर त्यांना विचारायचं. त्यामुळे तर त्यांनी मला नेलं होतं आणि गंमत काय, युनिव्हर्सिटीची जी बाजू होती तिथे गडबड काही नाही. पण सिटीमध्ये गडबड होती. तिथं गरीब मुसलमानांची वस्ती होती. तेव्हा तिथं कर्फ्यू होता. कर्फ्यू उठला का आम्ही तिकडे हिंडून यायचो गावातून. तिथं दोन-तीन लोकांनी मदत केली आम्हांला. त्यांनी गाडीतून फिरवलं. सामान्य लोकांशी बोलणं झालं. घरी मग सगळ्या बायकांना एकत्र केलं. त्यांना मदत केली. त्यांची रिसीट घेतली. सिग्नेचर घेतली. शेवटच्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो तिकडे तेव्हा आम्हांला मारायला काही माणसं टपलेली होती. माझ्या लक्षात नाही आलं तेव्हा ते. पण ज्यांनी आम्हांला तिकडं नेलं होतं ना, त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी बघितलं का माझ्या बाजूलाच एक माणूस चाकू घेऊन उभा होता. 'भाभी इकडे या' म्हणून माझा हात धरला त्यांनी नि गाडीत घातलं आणि गाडी जोरात पळवली. ते म्हणाले, 'तुमचा खून झाला असता. त्याला आवडलं नाही तुम्ही इकडे आलात आणि सगळी चौकशी करता आहात.' आणि मला कल्पना पण नव्हती नि मला भीती पण नाही वाटली. नऊ दिवस तिथं राहिलो. जी युनिव्हर्सिटीची माणसं होती ती तिथंच राहाणारी माणसं होती. त्यांचे गावामध्ये संबंध चांगले होते. त्यांना ही मंडळी जेवणखाण नेऊन द्यायची, पोचतं करायची आणि त्यांच्याविरुद्ध जे होते त्यांना काहीही मदत करायचे नाहीत. ते मुसलमानच होते. म्हणजे असं की एकाला देतात, दुसऱ्याला नाही. आपल्याच लोकांना मदत करायची आणि दुसऱ्यांना करायची नाही असा त्यांचा ट्रेंड दिसला आणि या लोकांना गावामध्ये काय चाललंय आहे हे माहिती नव्हतं. दंगल होतेय, याची जरासुद्धा खंत नाही. 'मालूम नही, वहाँ पे क्या चला है. हम तो वहा जाते भी नहीं. क्यू जाना वहापे? क्या जरूरत है?' असं बोलून ते टाळू शकत होते. आम्हांला मुंबईला बसून असं वाटलं की, इकडे जाऊन हे सगळं बघावं, त्यांना मदत करावी. काय हकीकत आहे, कळावं म्हणून आम्ही इकडं आलो. पण इथल्यांना कसलीच खंत नाही. ज्यांना आम्ही युनिव्हर्सिटीत भेटलो ते सगळे मुसलमानच होते. मग आम्हांला नसीमा अन्सारी नावाची बाई भेटली तिथं. सोशलवर्कर होती. तिथं तिनं आम्हांला खूप साथ दिली. ती म्हणाली, 'हमीदभाई आल्यानंतर मी मीटिंगा घेतलेल्या आहेत इथे.' तिनं बायकांची मीटिंग तिथं घेतली. पुरुष कोणी नव्हते. सगळा शिकलेला वर्ग आला होता मुसलमान बायकांचा. सगळा ग्रूप गोळा झाल्यानंतर तिथं माझं भाषण झालं. मी एकटीच अडाणी त्या शिकलेल्या बायकांत. सगळ्यांना आवडलं ते. हे जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा अन्सारी बाईला इतकं आवडलं की ती म्हणाली, बरोबरच आहे. हमीदभाई पण हेच प्रश्न घेऊन आलेले होते. पण हमीदभाईंचं कोणी ऐकलेलं नव्हतं. ऐकायच्या तयारीमध्ये नव्हते. त्यांना मारायच्याच मागे होते. रायटमध्ये सुद्धा कर्फ्यू उठल्यावर तिनं ते भाषण ठेवलं होतं. आपल्याला बोलायला येतं असा कॉन्फिडन्स मला यायला लागला. तरी पण सगळे प्रश्न आपल्याला मांडता येत नाहीत, आपल्याला माहिती नाही, याची जाणीव मला होती. महंमद दलवाईंनी खूप भाषणं लिहिली होती. मग व्याख्यानमालांमध्ये मी भाषणांना जायला लागले. जेव्हा मला चांगलं बोलता येत होतं, वाचता येत होतं तेव्हा मी व्याख्यानमालेत सुद्धा चांगली बोलू लागले. वसंत व्याख्यानमालेत वाईला 'भारतीय मुसलमान – राजकीय आणि सामाजिक विश्लेषण' अशा विषयावर मी भाषण केलंय. किती सुंदर लिहिलेलं होतं. सगळी माहिती त्यात दिलेली होती. मग काही कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये व्याख्यानं अशी आयोजित केलेली. विषय घेऊन तयारी करून, जाऊन बोलावं. विषय मुस्लिम महिलांचे प्रश्न. हा विषय सगळ्यांशी जोडलेला आहे. हा विषय इतरांपासून वेगळा होऊच शकत नाही.
मीनाक्षीपुरम्मध्ये धर्मांतर जेव्हा झालं नं, तेव्हा सातारला मी सात दिवस होते. तेव्हा कॉलेजमध्ये मी धर्मांतरावर बोललेली आहे. जेव्हा केरळ, तामीळनाडूमध्ये जबरदस्तीने हिंदूंना मुसलमान करत होते, तेव्हा लुंग्या, टोप्या वाटल्या. त्या काळामध्ये सुद्धा त्याचा प्रतिकार करायला, विरोध करायला मी साताऱ्यात फिरलेली आहे. मला लोक घेऊन जायचे. मी फक्त भाषण वाचून दाखवायची. ते वाचलेलं सगळं भाषण मला कळत सुद्धा नव्हतं. मुद्दा तेवढा कळत होता की धर्मांतराविरुद्ध आपण बोलत आहोत. मुसलमानांचं त्यात मत काय आहे हे सगळं त्या भाषणामध्ये होतं. काही ठिकाणी मग प्रश्नोत्तरं पण व्हायची आणि मग पुरुषोत्तम सेठभाईंनी मला तयार केलं. ते बरोबर यायला लागले आणि प्रश्नांना उत्तरं द्यायला लागले. सात दिवस होते. मी पहिल्यांदा गेलेली. कोणी बरोबर नाही. एकटीच. त्यांच्या घरी मी राहिले. मला बाहेर ठेवलेलं नव्हतं, कारण भीती. या एकट्या बाईला काही झालं तर? दलवाईंचे आणि त्यांचे संबंध फार चांगले असल्याने त्यांनी कॉलेज-कॉलेजमध्ये फिरवलं. बोलता आलं. म्हणजे मी बोल्ड होते तशी. आणि तशी बोलण्याची स्टाइल माझी आवडायची लोकांना. प्रश्न कळलेले होते. त्यामुळे मला बोलता यायचं. माझ्या परीने मी तयारी करायची.
ठाण्याला व्यायामशाळा चालवणारे कृष्णा व्यवहारे यांनी माझी २-३ भाषणं ठेवली. तिसऱ्या भाषणाच्या वेळी ते मला म्हणाले,'बाई खरोखरच आता मुरल्यात याच्यात.' पहिल्या नि तिसऱ्या भाषणात जमीन अस्मानाचा फरक होता. पहिलं भाषण १० मिनिटांचंही झालं नाही. महंमददा म्हणाले, 'मी एवढं लिहून दिलं होतं. एवढंच कसं झालं हो?' मी म्हटलं, “एवढंच होतं. मला येई ना.' मग त्यांनी सांगितलं,'असं सुरू करायचं. असं खुलवायचं, असं संपवायचं. लोकांना सांगायचं,प्रश्न विचारा म्हणजे उत्तरं देता येतात.' मग प्रश्न आल्यावर ते आणि मी मिळून उत्तर द्यायला लागलो. तेव्हा तो विषय चांगला खुलला. मग प्रश्नांची मांडणी कशी करायची ते लक्षात आलं. सभांतून विरोधही व्हायचा खूप.
तीन मे चा प्रोग्रॅम आम्ही घ्यायचो. ३ मे ७७ ला दलवाई गेले, म्हणून ३ मे ला आम्ही पहिली व्याख्यानमाला घेतली, दादरला. तीन दिवसांची व्याख्यानमाला करायची असं काही लोकांनी ठरवलं. त्यांच्यात आर.एस.एस. चा एक विषय ठेवला होता. वाद उठला तो ठेवू नका म्हणून. कशाला ठेवायचा आणि उगीच वाद उकरायचा म्हणून. माझा दीर होता ना हुसेन तो म्हणाला- नाही, ठेवायचाय. काही लोकं त्याला सामील झाली आणि तो प्रोग्रॅम झाला. पहिल्या दिवशी मी भाषण केलं. लिहून आणलेलं होतं थोडंसं. थोडंसं वाचलं. पहिल्याच पुण्यतिथीचा हा कार्यक्रम होता. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी तो आर.एस.एस. चा विषय होता. तो भडकला. सत्यशोधक मंडळातील नाहीत, बाहेरची लोकं बोलायला बोलावली होती. मला त्या वेळी फारसं काही कळत नव्हतं. ही संघटना काय आहे, तिचं काम काय चालू आहे. पण काही तरी विरोध असणार असं वाटलं. मी समोर बसलेली, भाषणं झालेली. युक्रांदची काही मंडळी होती त्यांच्यात. हुसेन दलवाई आणि अरुण केळकर वगैरे होते. त्यांना भेटायला म्हणून मी मागच्या बाजूने स्टेजवर आले, तर सगळी माणसं उठून जायला लागलेली आणि स्टेजवर अरुणला खूप मारायला लागलेली लोकं. मी अशी उभी. कोणी बाकीचं दिसलं नाही मला. आणि मी वाचवा, वाचवा म्हणून ओरडले. सगळे बसून. मी हात धरून धरून बाजूला काढले त्यांना. शेवटी मी बाहेर गेले. पोलीस बसले होते. त्यांना घेऊन आत आले आणि त्या लोकांना धरायला लावलं. एवढं काम केलं मी. अरुण आत होता तिथंच मी उभी होते. तेवढ्यात महंमददाच्या लक्षात आलं काय झालं ते. आले आणि मला बाजूला घेऊन उभे झाले. म्हणाले, 'तुम्ही इथं उभं राहायचं नाही.' त्यांनी मला लपवलं. थोड्या वेळानं मी त्यांना म्हटलं, 'अरुणला खूप मारलं हो, मला जरा त्याला भेटू द्या.' तर अरुणने निरोप पाठवला २-३ माणसांबरोबर की भाभींना म्हणावं तुम्ही जितक्या लवकर इथून जाता येईल तितक्या लवकर निघून जा. थांबू नका. मी म्हटलं, 'मी जाणार नाही. अरुणला बाहेर काढा. माझ्याशी त्याला बोलू दे. त्याच्याशी बोलल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी का जाईन? म्हटलं, त्यांनी मार खावा आणि मी घरी जाऊन बसावं हे मला पटणार नाही.' तो माझा पहिलाच प्रसंग होता मारबीर बघण्याचा. इतका मार बघायची ती पहिलीच वेळ होती. मग अरुण आला, भेटला आणि त्यानं सगळं समजावून सांगितलं. म्हटलं, 'आपण सगळे मिळून जाऊ. तू पण चल आमच्या बरोबर. मला काळजी वाटेल रे तू इथं राहिलास तर.' तर आम्ही सगळे चालत स्टेशनपर्यंत आलो.
त्यानंतर ३ मेचा आणखी एक प्रोग्रॅम आम्ही घेतला. आम्ही तो मराठा मंदिरच्या हॉलमध्ये घेतला होता. त्या वेळी मृणालताई गोरे, प्रमिलाताई दंडवते वगैरे सगळ्या आल्या होत्या आणि ती शहाबानू केस झाली की नाही, त्या बाईचा सत्कार ठेवलेला होता. त्या वेळी अहिल्याबाई रांगणेकर मला म्हणाल्या, 'काही बायका पाठवेन मी कार्यक्रमाला. पण बुरख्यामध्ये असतील, चालतील नं तुला?' म्हटलं, ‘असू दे.' बुरखेवाल्या आल्या पण त्यांनी पाठवून दिलेल्या नव्हत्या. आम्हांला कळलंच नाही आणि गंमत बघा, ज्या दिवशी प्रोग्रॅम त्या दिवशी मी एकटी आले हॉलवर, दोन तास अगोदर. आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या बायकांना व्यवस्थित गाडीबिडी करून त्यांची व्यवस्था करा. बायकांनी मारबीर खाल्ला तर परत आपल्या बरोबर येणार नाहीत. म्हणून मी सगळी व्यवस्था केली. मी आले तिकडे. सगळा पोलिसांचा पहारा खूप. मग मी पोलीस ऑफिसरांना विचारलं, इथं काय आहे? तर म्हणाले इथं मेहरुन्निसाबाईंचा प्रोग्रॅम आहे. त्यांना माहिती नाही मीच ती. मागच्या लिफ्टमधून मी वर चढले. कारण मला मागची लिफ्ट मराठा मंदिरचे संचालक गावडे यांनी दाखवली होती. ते म्हणाले की, बाई, येताना या लिफ्टने वर चढायचं. इथं कुणाला परमिशन नाही. ही माझ्यासाठी लिफ्ट आहे. तुला धोका आहे म्हणून पुढच्या दारातून तू कधी यायचं नाही. म्हणून मी तिथून गेले. केअर-टेकरला भेटले. ते म्हणाले, पुढच्या दारामध्ये खूप मुलं जमा झालेली आहेत आणि गोंधळ घालत आहेत. त्यामुळे तुम्ही या रूमच्या बाहेर निघू नका. तुम्ही आलेलं कोणाला माहिती नाही. म्हणून तर म्हटलं, मी दोन तास अगोदर आलेली आहे. 'सगळी व्यवस्था झालेली आहे. तुम्ही कसली काळजी करायची नाही', म्हणाले, पण एवढं आहे की तुम्ही ज्या दारातनं एंट्री करणार आहात, त्या दारावर आपली माणसं उभी करा. कसं कळणार, कोण कुठे घुसलाय म्हणून? या बुरखावाल्या बायका कोण आहेत? त्यांना अडवणार कोण? त्या सगळ्या आत आल्या. मी समजते, अहिल्याबाईंनी पाठवल्या म्हणून. पहिल्या रो मध्ये बसलेल्या. हॉल पॅक्ड. खाली बोंबाबोंब चालू आहे. आमच्या बायका आम्ही मागच्या दारातून आणून पुढे बसवल्या. का तर त्यांना पण तिथं जायला त्रास नको म्हणून. खाली पोलिसांचा पहारा उभा आहे. दोनएकशे पोलीस जमा. प्रत्येक प्रोग्रॅम तसाच व्हायचा तिकडे. दोन एक लोकं बोलले आणि मी बोलायला उभी राहिले. मी आपला पेपर वाचते. पेपर वाचायला लागल्याबरोबर धडाधड बायका उठल्या. 'नाही, काय बोलते ही. हिला बोलू देणारच नाही', असं म्हणाल्या म्हणे. त्या पुढे आल्या. धक्काबुक्की, अशी चलबिचल झाली सगळ्या सभेमध्ये. स्टेजवर चढले सगळे. मृणालताईंनी मला बाजूला बसवलं. म्हणाल्या, 'तू बैस.' त्यांनी धीर केला, बाहेर जाऊन लेडी-पोलीस बोलावली आणि त्या बायकांना बाहेर काढण्यात आलं. मृणालताईंना स्टेशनवर सोडायला सुद्धा इतकी माणसं गेली तर चपला फेकल्या त्यांच्यावर. त्यांनासुद्धा त्रास दिला. शहाबानू बाई घरी गेल्या. मग मी सगळं आटपलं. नंतर मागच्या लिफ्टमधून खाली उतरले. आमची गाडी भरलेली होती. गाडीत मला बसवलं आणि आम्ही घरी आलो. हे अनुभव प्रत्येक वेळी घेत होतो. साधी मीटिंग आमच्या दारात घ्यायची- आमच्या समोर एक हॉल आहे तिथं जर मीटिंग घ्यायची असेल तर पहिल्यांदा पोलिसांना कळवायचं. त्यांचं प्रोटेक्शन कॉलनीच्या बाहेर घ्यायचं. तेव्हा माणसं आत सोडायची, असं चाललं होतं. तीन मे च्या सर्व प्रोग्रॅम्सना प्रा. मे. पु. रेगे ह्यांनी आम्हांला नेहमीच खूप मदत केलेली आहे.
असं मी दलवाईंचं काम पुढे सुरू ठेवलं.
दलवाई गेल्यावर कॅनडाहून माझा धाकटा भाऊ अफझल आला. आम्ही अंधेरीच्या हाऊसिंग बोर्डाच्या ३०० स्केअर फूटच्या जागेत राहत होतो तिथं आला. घर खालून वरपर्यंत पाहिले. आणि म्हणाला, 'अरेरे, तुझ्या घरी पंखासुद्धा नाही. बिचारे हमीदभाई'. त्याचं हे बोलणं मला अजिबात आवडलं नाही. आमच्याकडे बरीच लोकं यायची, काही लोकं असंही म्हणायची, हमीदभाई इथे राहतात होय, आम्हाला वाटत होतं की, ते कुलाब्याच्या चांगल्या बंगल्यात राहत असतील. त्यांची तर खूप मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे.
माझा भाऊ माझ्याकडे काही दिवस राहिला. एक दिवस मी ऑफिसात गेले असता, मला न विचारता मुलींना बाजारात घेऊन गेला आणि घरात टी.व्ही., फ्रीज व पंखा त्याने आणला. हेही मला फारसं आवडलं नाही. हे सर्व केल्यावर तो असं म्हणाला, आपल्या नातेवाईकांकडे सर्व काही आहे. तुमच्याकडे काही नाही. आता बघ तुझं कसं स्टेटस वाढलं आहे. मला त्याचा राग आला. मी म्हणाले, अरे घरातल्या सामानामुळे माणसाला स्टेटस येतं हे तुला कोणी सांगितलं? माझ्या नवऱ्यासारखा एक तरी माणूस आपल्या साऱ्या खानदानात असेल तर मला दाखव. मी खाली रस्त्यावरून जाताना, माझ्याकडे बोट दाखवून जेव्हा लोक म्हणतात, बघा हमीद दलवाईंची बायको चालली आहे. तेव्हा ते माझं खरं स्टेटस.' तो माझ्याकडे बघतच राहिला.
तो जेव्हा परत कॅनडाला गेला तेव्हा मी त्याला सोडायला एअरपोर्टवर गेले. त्याने मला जवळ घेतलं आणि सांगितलं, 'आपा, आय अॅम व्हेरी प्राऊड ऑफ यू. तुझं राहणं, तुझे विचार मला खूप आवडले. अर्ध्या रात्री जरी तू मला हाक मारलीस तरी मी तुझ्या मदतीला धावेन, याची खात्री बाळग.' यानंतर मात्र तो जसं बोलला, तसाच वागला.
☯
दलवाई गेल्यानंतर माझीही सोय पूनम हॉटेलात केली गेली. मी दुपारच्या गाडीने पुण्याला जायची. गेल्याबरोबर शहासाहेबांना भेटून सर्व कामाचा रिपोर्ट द्यायची. पण जेव्हा शहासाहेब गेले त्या वेळी मी त्यांना भेटू शकले नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी एका प्रोग्रॅमला जाणार होतो. मी नेहमीप्रमाणे आल्याबरोबर त्यांना फोन केला नाही. मी असा विचार केला की सकाळी आपण भेटू या. प्रोग्रॅमला बरोबर जायचंच आहे. मी सकाळी तयार झाले आणि त्यांच्याकडे गेले. तो काय बघते, बाहेरपर्यंत लोकांची गर्दी जमा होती. असा विचार केला की, हे सर्व लोक प्रोग्रॅमला जाणार असतील म्हणून जमा झाले असतील. मी तिथेच थांबले. किती तरी वेळ मला कळेचना. रेगेसरांनी मला पाहिले. आणि कोणाला तरी सांगितलं, भाबी आल्यात, त्यांना बाजूला घेऊन सांगा. मी आत गेले. आणि शहासाहेबांचं प्रेत बघून थक्क झाले. ही कल्पनाच नव्हती. मला किती वेळ समजेना. शेवटी धीर केला आणि जशोदताईंना भेटले. त्यांनी माझा हात जोरात पकडला. काय बोलावं सुचेना. थोड्या वेळानं सगळे म्हणाले, आपण प्रोग्रॅमला जाऊन येऊ या. आम्ही तिथे गेलो, मला तिथे भाषण करायचं होतं. ते केलं आणि ताबडतोब निघून आलो. त्यानंतर शहासाहेबांचं दहन केलं गेलं. ते दलवाई गेल्यानंतर ११ ऑक्टोबर १९८१ ला गेले.
मला आठवतंय, शहासाहेबांचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. 'रिलीजन अँड सोसायटी' (दलवाईंना अर्पण केलेलं) त्याचवेळी मी त्यांना भेटायला गेले असताना ते उठून उभे राहिले, मला नमस्कार केला आणि ते पुस्तक माझ्या हातात दिलं. म्हणाले, हमीदच्या जागेवर तुम्ही आहात. हे माहीत असताना की हमीदनं पुस्तक वाचलं असतं, या बाई पुस्तक वाचणार नाहीत. पण तरीही त्यांनी मला मान दिला.
सावित्रीबाई फुल्यांची १५० वी जयंती सगळ्या महाराष्ट्रभर साजरी झाली. त्या निमित्ताने बरेचसे प्रोग्रॅम झाले. मुंबईला सुद्धा सबंध महाराष्ट्रातील मुलींच्या शाळांचे सुमारे ५०-६० प्रिन्सिपॉलस्, टीचर्स यांचं दोन दिवसांचं शिबीर घेण्यात आलं. त्याच्यात प्रमिलाताई संघवी वगैरे होत्या. वेगवेगळ्या समाजामध्ये ज्या महिला कामं करतात त्यांना त्या वेळी बोलावलं होतं. महिलांच्याकडे जास्त लक्ष होतं त्यांचं आणि त्यात पुरुष पण होते. ऐकणाऱ्यांत सगळे होते. मुस्लिम महिलांमध्ये, मुसलमान समाजामध्ये कोण काम करतं, तर दलवाईभाभी करते. त्यांच्यात असं ठरलं का आपण त्यांना बोलवू. तर तिकडे मला बोलावलं. दोन दिवसांचं शिबीर होतं. तेव्हा माझं भाषण होतं. त्या वेळी मी तिथं गेले. तिथं गेले असताना हॉल असा भरलेला होता. खाली बसले होते लोक. मला कोचावर बसायला दिलं होतं. सहज माझी नजर बाजूला गेली तर चार मुसलमान बायका वेगळा ग्रुप करून बसलेल्या होत्या. त्यातल्या एकीला मी ओळखत होते. ती एका शाळेची प्रिन्सिपॉल होती. तेव्हाच मला थोडं स्ट्राइक झालं की आज सभा काही बरोबर होणार नाही. मी प्रमिलाताईंना सांगितलं की आपण माझं भाषण नको ठेवायला. तुम्ही प्रश्न विचारा म्हणजे बरं पडेल. त्या दिवशी मी भाषण असं लिहून नेलं नव्हतं. पण काही मुद्दे आपल्याला बोलायला पाहिजेत, ते आपल्या लक्षात राहिले पाहिजेत म्हणून एक एक वाक्य असं लिहिलेलं होतं. कागद माझ्याकडे होता. प्रश्नांना सुरुवात झाली. तर असं विचारलं की तुमच्याकडे चार लग्नं होतात, ती कशाकरिता होतात? त्याची जरा आम्हांला माहिती द्या. यावर मी माहिती दिली ती अशी की, त्या काळामध्ये पुरुष लढाईमध्ये जास्त मरत होते आणि बाई मुलांसकट विधवा व्हायची. त्यांना सांभाळायला कोणी नसायचं, तर त्यांची देखभाल कोण करणार? तसा पुरुष ठेवला तर समाज नावं ठेवायचा. मग त्यांना आसरा कसा द्यायचा? म्हणून पैगंबरसाहेबांनी ही युक्ती काढली. पण त्यांनी असंही सांगितलं होतं की लग्न करायला हरकत नाही. पण चौघींना बरोबरीचा दर्जा द्यायला हवा. असं जर होणार नसेल तर एकच बायको राहिलेली बरी. मग त्यांनी मला पैगंबरसाहेबांच्या बालविवाहासंबंधी, दत्तक घेण्याबद्दल आणि विधवाविवाहाबाबत प्रश्न विचारले. त्यांना मी आपल्या परीनं उत्तरं दिली. एक प्रश्न असा होता की तुमच्याकडे शिकलेले लोक आहेत ते तुम्हांला कसे वाटतात? तर मी म्हटलं, ते खूप कडवे धर्मवेडे असतात. त्यांच्या डोक्यामध्ये वैचारिक गोंधळ फार असतो. कुठलीही गोष्ट अशिक्षित माणसाला पटवणं सोपं जातं पण शिकलेल्या माणसाला पटवणं सोपं जात नाही. ह्या उत्तरावर त्या चारांमधली एक चिडली. तिने सांगितलं की, मेहरुन्निसाबाईंनी आम्हांला फॅनॅटिक म्हटलं. त्यांनी आमची माफी मागावी. आणि हा मुद्दा घेऊन त्या चौघीच्या चौघी उठून भांडायला लागल्या. त्या सगळ्या शिकलेल्या होत्या. सगळ्या प्रिन्सिपॉल्सची ती सभा. सामान्य माणसं नाहीत. अशिक्षित असायचा काय प्रश्न आहे? आणि त्या असं बोलायला लागल्या. इतका गोंगाट केला त्यांनी, की आवरायला कठीण गेलं. मला बोलायला दिलंच नाही. आणि त्यांच्यातल्या जिला मी ओळखत होते ती आली, बोलायला उभी राहिली. म्हणाली की, यांनी असं असं सांगितलं ते तसं नाही. यांना मुद्दे माहीत नाहीत. यांनी सगळं चुकीचं सांगितलं आहे. आणि असं कुठेही लिहिलेलं नाही. पैगंबरांनी असं केलेलंच नाही. ही सगळी विधानं खोटी आहेत. यांना कुणीतरी खोटंच लिहून दिलेलं आहे. 'पैगंबरांची बदनामी का करतात?' असं तिने खूप वेळा सांगितल्यानंतर मी उठले आणि म्हटलं, आत्ता मी जे सुशिक्षित स्त्रियांबद्दल विधान केलं त्याचाच हा पुरावा आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या बाईला बाजूला केलं. मी म्हटलं, यांना हिस्टॉरिकल फॅक्टस नको असतात, हे जे काय आहे ते खरं आहे आणि तेच मी सांगितलेलं आहे. माझ्या मनात पैगंबरांची बदनामी करायची नव्हती, बेअदबी करायची नव्हती. तुम्ही प्रश्न विचारलात त्या संदर्भात मी हे उत्तर दिलं आहे. हे सगळं झाल्यानंतर संयोजकांच्या लक्षात आलं की ह्या हुल्लडबाजीसाठीच उठलेल्या आहेत. मीटिंग पार पाडू देणार नाहीत. तेव्हा सगळ्यांनी येऊन, 'तुम्ही फार चांगलं काम करता', असं म्हणून माझ्या गळ्यात हार घातला. माझे आभार मानले. ती मीटिंग संपली. सगळे बाहेर गेले. मग जे निवडक लोक होते, ज्यांना याविषयी ऐकायचं होतं ते म्हणाले की, आपण बाजूच्या रूममध्ये चर्चा करू या. आणि आम्ही बाजूच्या रूममध्ये रूम लॉक करून चर्चा केली. हे झाल्यानंतर आम्ही घरी आलो.
त्यानंतर दोन महिने पोलिसांच्या सी.आय.डी. डिपार्टमेंटकडून सारखे घरी फोन यायचे. नंतर उर्दू पेपरमध्ये त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी दिली. त्यात त्यांनी लिहिलं की, त्या हिंदू बायका, मेहरुन्निसाबाईंसारख्या बाईला बोलवतात आणि आमच्या धर्माची बदनामी करतात. त्यांची चौकशी व्हावी. असं सगळं मी वाचलं आणि सोडून दिलं. रुबीना म्हणायची, 'सारखा फोन येतो. पण तू नसताना येतो. तू असताना येत नाही.' तर म्हटलं, 'तू त्यांना सांग की माझी आई इतका वेळ घरी असते त्या वेळेला तुम्ही फोन करा. काय काम आहे विचार.' तसं तिने सांगितल्यानंतर एक दिवस फोन आला. म्हटलं, 'काय साहेब? इतके दोन महिने तुम्ही फोन करताय. कशासाठी करत होतात?' 'नाही, तुम्हांला इकडे पोलीस स्टेशनवर यावं लागेल.' तर म्हटलं, 'काय काम आहे?' 'सांगता येणार नाही', म्हणाले. 'ठीक आहे.' तर मी महंमददांना सांगितलं, असं असं आहे. तर ते म्हणाले, 'आपण जायचं.' मला त्या वेळी वाटलं की पोलिसवाले कशाला बोलावतात? त्या वेळी मी नगरकरांना आणि पोलीस कमिशनर कसबेकर यांना फोन केला. 'कोल-डोंगरी पोलीस चौकीतून मला बोलावलं आहे. मी काय करू?' तर ते म्हणाले, 'बोलावलं आहे तर जायचं. भिण्यासारखं काय आहे? कशाला बोलावलं आहे ते तुम्ही जाऊन बघा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही एकटं जायचं नाही. तुमच्या मंडळाची काही माणसं तुम्ही बरोबर घेऊन जायची. नि दुसरं, तिथं भ्यायचं नाही. हळू बोलायचं नाही. जोरात बोलायचं, जे काय बोलायचं ते.' या दोन हिंट घेतल्या नि महंमददांना घेऊन मी पोलीस-चौकीत गेले. गेल्यानंतर, तिथे मुसलमान पोलीस ऑफिसर होते, हे नंतर कळलं. आधी माझा काही संबंध आला नव्हता. तिथं गेल्यानंतर टेबलावरचे पेपर्स बघितल्याबरोबर मी म्हटलं, 'महंमददा, मी त्या दिवशी एकटीच गेले होते ना त्या प्रोग्रॅमला, तिथलं काही तरी लफडं लागलेलं आहे मागे.' माझ्या काही लक्षात येईना. ते म्हणाले, 'नाही हो. काकी, काही तरीच काय.' म्हटलं, 'शक्यच नाही. आता माझ्या लक्षात आलं.' नंतर ते ऑफिसर मला म्हणाले, 'काय बाई, तुम्ही कुठल्या प्रोग्रॅमला गेला होतात?' तर म्हटलं, 'हो, अशा अशा प्रोग्रॅमला मी गेले होते.' 'तिथं काय सांगितलंत?' म्हटलं, 'जे सांगायला पाहिजे होतं तेच सांगितलं. काय झालं?' तर 'नाही, ते तुमच्याकडे लिहिलेलं आहे का?' मी म्हटलं, 'का माझ्याकडे असं पूर्ण भाषण नाही. पण असे मुद्दे लिहिलेले आहेत.' 'तुम्ही आणलेत का?' म्हटलं, 'तुम्ही आणा असं नाही सांगितलंत आणि माझ्या लक्षात आलं असतं तर घेऊन आले असते.' ते म्हणाले, 'आत्ता जाऊन आणता का?' तर 'नाही' म्हटलं. 'आता मी जाणार नाही. तुम्ही आत्ता माझी अपॉइंटमेंट घ्या. आपण ठरवू या, मी ते घेऊन येऊन तुम्हांला दाखवते' आणि दोन दिवसांनंतर जायचं असं ठरवून मी महंमददांना घेऊन आले. मी तो पेपर काढला. 'काय लिहिलेलं आहे?' महंमदानी विचारलं. तर म्हटलं, 'काही नाही, हे असे असे मुद्दे आहेत. आणि हेच मी सांगितलेले आहेत. पुस्तकातलेच आहेत.' आणि मी पुस्तक काढलं, त्याला फ्लॅग लावला नि म्हटलं चला आता चार लोक. आम्ही गेलो त्या दिवशी. गेल्यानंतर अर्धा-पाऊण तास त्या ऑफिसरचा पत्ताच नाही. तो बाहेर पान खात, सिगरेट पित उभा होता. असं टाळलं त्याने. त्यानंतर बराच वेळाने तो आला. आल्यानंतर म्हणाला, 'हे कोण सगळे बसलेले आहेत? त्यांचं काय काम आहे?' म्हटलं, 'माझं काम आहे तेच त्यांचं काम आहे.' तर 'नाही' म्हणाले. 'तुमचं मला स्टेटमेंट लिहायचं आहे.' मी म्हणाले, 'मी स्टेटमेंट देणार नाही. ही माझ्या मंडळाची माणसं आहेत. मी मंडळासाठी काम करते. माझं पर्सनल काहीच नाही. त्यामुळे मी एकटी देणारच नाही. मी लोकांच्या समोरच स्टेटमेंट देणार. आणि आधी देणारच नाही.' 'नाही, नाही, चालणारच नाही. या लोकांना आधी बाहेर काढा', असं ते म्हणाले. हे बघा, म्हटलं, 'मी अपराधी नाही. मी कुठला अपराध केलेलाच नाही. मी अपराध केलाय म्हणून तुम्ही धरून आणलंय का मला? नाही ना? मग ही भाषा बोलायची नाही. यांच्या समोर स्टेटमेंट घ्यायचं असेल तरच घ्यायचं, नाही तर चला म्हटलं, उठा, आपल्याला काय गरज आहे? गरज असेल यांना, तर धक्के खातील सतरा.' जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी ऐकत नाही. तेव्हा म्हणाले, 'बाई, मला माफ करा. क्षमा करा. माझी नोकरी जाईल. मला म्हणतील एका बाईचं स्टेटमेंट घेऊ शकला नाही.' महंमददा म्हणाले, 'ही बाई काय आहे तुम्हाला माहिती नाही, म्हणून तुम्ही बोलता. हरकत नाही, घ्या स्टेटमेंट.' आणि मग मी काय लिहिलेलं होतं, कोणते मुद्दे बोलले ते सांगितलं. बोलता बोलता हा मुद्दा आला बालविवाहाचा. गंमत काय झाली माहिती आहे? का मी उर्दूमध्ये मराठी लिहिलेलं होतं. त्यांना उर्दू येत नाही आणि मराठीपण जेमतेम होतं त्यांचं. तर मी म्हटल, 'आता काय कराल मग? मला या दोन्ही भाषा येतात. बरं, म्हटलं तुम्हांला इंग्लिश समजतं का? हे पुस्तक घ्या. यातलं अमुक पान काढा नि पेज वाचा. वाचल्यानंतर म्हणाले, बराच अभ्यास केलेला दिसतो. होय म्हटलं. तुमच्यासारख्या माणसाला तोंड द्यायचं असेल तर असा अभ्यास पाहिजेच. तर म्हटलं, जर हे विधान चुकीचं असलं तर हे पुस्तक बॅन करा. मी त्यातलं उदाहरण देणार नाही. ज्या अर्थी, बॅन झालं नाही त्या अर्थी त्यातलं उदाहरण द्यायला हरकत नाही. लोकांची समजूत आहे का, मुसलमानांनी लिहिलेलं तेच बरोबर. इतरांनी लिहिलेलं ते बरोबर नाही. अशा भानगडी असतात. ते पुस्तक माझ्याकडे होतं. मी ते वाचलेलं होतं म्हणून मी ते दिलं. सगळ्यांना माहिती होतं की ही खरी गोष्ट आहे. माझ्या मनात बेअदबी करायची होती म्हणून काही मी ती गोष्ट सांगितली नाही. तर म्हटलं बॅन करा हे पुस्तक. वापरणार नाही मी हे पुस्तक. तर मग त्यांनी सगळे स्टेटमेंट लिहून घेतले. मी म्हटलं, कोणी तुम्हांला कंप्लेंट केलेली आहे. कोणाच्या बोलण्यावर तुम्ही मला त्रास दिला हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यांना सुद्धा, म्हटलं, चार खेपा घालायला लावा आणि मग कंपॅरिझन करा. कोण बरोबर आहे, कोण नाही. असं कोणालाही बोलावून तुम्ही त्रास देऊ नका. अशा रीतीने मी घरी आले. त्यानंतर मला कशाही रीतीने त्रास झाला नाही. त्या बाईने पुन्हा त्रास दिला नाही. तसा प्रश्न आला नाही. कारण तिला मी जास्त जवळ केलं नाही.
मी जेव्हा मंडळाचं काम करायला लागले तेव्हा प्रभाकर पाध्ये यांनी मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, तलाकपीडित महिलांचा प्रश्न हा स्त्रीमुक्ती चळवळीतील एक नस आहे. आणि हे खरं आहे. ही नस धरून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. पाध्येंनी आणि कमलताईंनी माझ्या रुबीनाला आपल्याकडे कॉलेजच्या शिक्षणासाठी ठेवावं असा आग्रह धरला. पण ती तयार झाली नाही.
आता मुक्तिमोर्चाचं. मुक्तिमोर्चाची कल्पना हुसेन जमादारची. शहाबानू केस झाली. त्या केसमध्ये आम्ही तिला पुण्याला बोलावून तिचा सत्कार वगैरे केला. आणि नंतर मी कोल्हापूरला गेले असताना हुसेन म्हणाला, आपण मोर्चा काढू एक. त्या वेळी मुक्तिमोर्चा हे नाव ठेवलेलं नव्हतं. त्याच्यासाठी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली. डिक्लेअर केलं की आम्ही मोर्चा असा कोल्हापूरहून अशा अशा गावांमध्ये नेणार आहोत. आणि मग त्याच्या तयारीला लागलो.
तर या मोर्चाचा खरा हेतू काय होता? शहाबानू केस कोणाला माहिती नाही? शहाबानू ६५ वर्षांची बाई. तिला नवऱ्याने सोडली. मुलांनी केस घातली की, आपल्या आईला पोटगी मिळावी. आणि तो सुप्रीम कोर्टपर्यंत गेला. नवरा वकील. असल्या केसेस जिंकून महिन्याला ५-७ हजार रुपये कमावणारा. आपल्यावर पाळी आल्यावर तो हादरला आणि केस लढल्यानंतर ती बाई जिंकली. ऐतिहासिक निर्णय लागल्याबद्दल आम्ही खूष झालो आणि तिचा सत्कार केला. हे सगळं झाल्यानंतर धर्मवादी मुसलमानांच्या मनात आलं की हे शरीयतच्या विरुद्ध आहे. तसं म्हटलं तर हे खरं कारण नाहीये त्याला. मला जे कळतंय ते कारण असं की कोर्टाचे जे जजेस होते ते एक तर मुस्लिम नव्हते. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जेव्हा १२५ कलमाची छानबीन केली, बघितलं की त्या कलमामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या आणि कुराणातल्या आयता म्हणजे श्लोक जे असतात त्यांच्यात काही तफावत नाहीये. बाईला पोटगी देऊ नये असं कुठेही लिहिलेलं नाही. चार बायकांना बरोबरीचा दर्जा द्या, याचा अर्थ काय होतो? त्यामुळे हा खुलासा केलेला नव्हता. बायकोला सोडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे असं कुठेही लिहिलेलं नाहीये. म्हणून पोटगी द्यायला काही हरकत नाहीये. मुसलमान चिडले याचं कारण, हे कोण आहेत आमच्यामध्ये ढवळाढवळ करणारे? ह्यांना कुणी ऑथॉरिटी दिली कुराण बघण्याची? हे मुल्लामौलवी, मुस्लिम धर्मपंडितांचं काम आहे, असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी विरोध केला आणि दुसरं, हा अभ्यास करताना समान नागरी कायद्याचा पुरस्कार केला गेला. दोन्ही गोष्टी त्यांना नको होत्या. म्हणून त्यांनी असं म्हटलं की ही जी पोटगी आहे ती आमच्या शरीयतच्या विरुद्ध आहे. पोटगी काही देता येणार नाही. आणि मग काही मुसलमानांनी शहाबानूला आपल्या कंट्रोलमध्ये घेऊन मिसगाईड केलं. ती बिचारी घाबरली हो. तिला काय माहितीये, सगळं काय आहे? मुलं पण घाबरली. त्यामुळे सगळी केस उलटली. लोकांना जागृत करायला हवं होतं म्हणून आम्ही म्हटलं की आपण ही केस लोकांना सांगावी आणि दुसरं पण असं की, मुस्लिम सत्यशोधक मंडळाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहे. सगळ्यांना असं वाटतं की हे धर्माच्या विरुद्धच बोलतात. पण कोणी दलवाईंना ऐकलं नाही. कोणी हा विचार केला नाही की बाबा, मुस्लिम सत्यशोधक मंडळ खरं काय काम करतं? धर्माच्या कुठल्या बाबींच्या विरुद्ध बोलतं? तर हे सगळं सांगण्यासाठी तो तलाक मुक्तिमोर्चा काढण्यात आला.
त्या अगोदर काही गोष्टी आम्हांला कराव्या लागल्या. एक तर पैशाचा प्रश्न होता. पैसे कुठून आणायचे, मोर्चा काढायला? मोर्चात किती माणसं जायची ते ठरलेलं होतं. कुठं कुठं जायचं ते ठरलेलं होतं. कसं जायचं? एस.टी. करायची तर त्याच्यासाठी आधी पैसे किती लागणार आहेत? ट्रान्स्पोर्ट ऑफिसचे मिनिस्टर अनंतराव थोपटे होते. त्यांची माझी काही ओळख नव्हती. कोणाच्या तरी थ्रू मी तिथं जाण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही अॅप्लिकेशन केलं. नंतर कळलं की एस.टी. जर तुम्हांला हवी असेल तर २०,०००/- रुपये आधी भरावे लागतील. बरं आमची तत्त्वं अशी होती की वाटेल त्याच्याकडून काही पैसे घ्यायचे नाहीत. असं म्हटलं तर अडचण येते. लिमिटेड लोकांकडून किती पैसे घेणार? कोण देणार? मुसलमानांच्या रिवाजाविरुद्ध आमचा विचार आहे. मुसलमान देणार नाहीत आणि हिंदू हितचिंतक जे आहेत तेच मदत करणार. त्यांच्याकडे पैसे असले तर. त्यामुळे ही सगळी आमच्याकडे अडचण अशी होती. तर आम्ही सॉवेनिअर काढायचं ठरवलं. मी नि महंमददा खूप फिरलो. जाहिराती आम्हांला मिळाल्या. दोन महिन्यांत ५० खेपा मारल्या एकेकाकडे. तेव्हा त्या जाहिराती मिळाल्या. चेकही मिळाले. पण चेक खूप लेट मिळाले. २ नोव्हेंबर १९८५ ला हा मोर्चा निघणार होता कोल्हापूरहून. दोन-चार दिवस राहिले तरी एस.टी.चं काम झालेलं नव्हतं. का तर हाती कॅश पैसे नव्हते. हे चेक मिळाले ते कॅश कसे करायचे. नि कॅश करेपर्यंत कोण थांबणार आहे? त्यामुळे माझं डोकं चालेना. पहिल्यांदाच मी प्रोग्रॅम घेतला. पहिल्यांदाच मी पैसे उभे करायला म्हणून बाहेर पडले होते. त्यामुळे मला मानसिक त्रास खूप झाला. मी काय केलं? माझ्या प्रॉव्हिडंट फंडामधून २५,०००/- रुपये काढले. ते हँडी ठेवले घरात. का तर, जर हे चेक वटले नाहीत तर आपण हे भरायचे. चेक वटल्यावर परत काढून घ्यायचे. तो एक व्याप झाला. सगळ्यांनी मला मूर्खात काढलं ऑफिसमध्ये. माझ्या मैत्रिणी विमलबेन, सुशीलाबेन आणि मीना मला म्हणाल्या, 'अशा रीतीनं काम करणार असशील तर करूच नको. कशासाठी करायचं? काय गरज आहे तुला हे सगळं करायची? अन् तुझ्या फ्यूचरचं काय होणारेय? तू भीक मागणारेस. तू असली कामं करू नकोस', म्हणून मला सगळ्यांनी विरोध केला. पण मी काही ऐकलं नाही.
त्याच्यानंतर थोपटेसाहेबांकडे चार दिवस मी जात होते. अपॉइंटमेंट घेण्यासाठी. आत जायची वेळ यायची नि ऐन टायमाला ते बाहेर निघायचे की माझी मीटिंग आहे मी चाललो. तीन दिवस असं बघितलं. दिवसभर बसून ही तऱ्हा! आणि नंतर मला असं वाटलं की काय करावं आता? दोन-चारच दिवस राहिलेले आहेत. यांनी काम नाही केलं तर प्रोग्रॅम कँसल करावा लागेल. चौथ्या दिवशी माझं डोकं जरा फिरल्यासारखं झालं. मी तिथं गेले. आत चिट्ठी पाठवली. दोन तास गेल्यानंतर ते आले नेहमीसारखे. बाहेर आल्यानंतर मी दरवाजात जाऊन आडवा हात केला नि उभी राहिले. त्यांच्यामागे ५० माणसं होती उभी, बाहेर आत अशी. मी म्हटलं, 'साहेब, मी आज तुम्हाला अशी जाऊ देणार नाही. अॅप्लिकेशन लिहिलं, माझा चार दिवसांवर प्रोग्रॅम आला तरी तुम्ही मला एस.टी. दिलेली नाहीये की तुम्ही मला एकदा सुद्धा भेटला नाहीये. मी तुम्हांला जाऊ देणार नाही.' मीटिंग आहे म्हणाले. 'मी ऐकणार नाही. तुम्हांला मीटिंगला सुद्धा जाऊ देणार नाही. माझं ऐकून घ्या. माझा निर्णय लावा. माझं काय ते ठरवा नि मग मीटिंगला जा', मी म्हटलं. जेव्हा त्यांना कळलं की सगळे बघायला लागले आहेत तेव्हा ते म्हणाले, 'बरं आत चला.' आत गेल्यानंतर त्यांनी माझं सगळं ऐकलं. म्हटलं, साहेब, असं असं आहे. चार दिवस राहिलेत. तेव्हा ते म्हणाले, मोर्चा बिर्चाला आम्ही, गव्हर्नमेंट नाही मदत करत. म्हटलं, मग तुम्ही निमित्त काहीही सांगा. तुम्हांला मी खरं
निमित्त सांगितलं. खरं लिहून दिलं. मला खोटं सांगायचं नाहीये. तुम्ही कशासाठी पैसा देता? कशासाठी तुम्ही गाडी देता? त्याला तुम्ही द्या. मला मदत पाहिजे. मला हे काम महत्त्वाचं आहे. आत्ताच करायला पाहिजे. असं त्यांना बजावल्यावर ते हसले माझ्याकडे बघून. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं जरा. मग त्यांनी त्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांना बोलावलं, त्यांना सांगितलं की या बाईंना मदत करा. अधिकारी म्हणाले की, बाई, मोडकी-तोडकी अशी तशी बस देऊन चालणार नाही तुम्हांला. रस्त्यात बंद पडली, पंक्चर झाली, तुम्हांला कोणी मारहाण केली तर आमची नोकरी जाईल इकडे. आम्ही तुम्हांला प्रोटेक्शन तरी कसं देणार? तुम्हांला कोरीकरकरीत बस द्यायला पाहिजे. म्हटलं तुम्ही काहीही करा मला एस.टी. दोन तारखेला सकाळी पाहिजे. मोर्चा म्हणजे शांत मोर्चा आहे. असे असे प्रोग्रॅम ठरवलेले आहेत. कलेक्टरला निवेदन द्यायचं, काही लोकांना भेटायचं तिकडे आणि रात्री एक पब्लिक मीटिंग घ्यायची नि मीटिंग सुद्धा अशा अशा कारणासाठी घ्यायचीय. आम्हांला काहीही दंगा-धोपा करायचा नाहीये नि आमच्यातर्फे असं काही होणार पण नाही. कोणी करणार नाही, तर तुम्ही आम्हांला एस.टी. द्याच. तर ते म्हणाले, २०,०००/- रुपये तुम्हांला कॅश भरावे लागणार आहेत. नंतर तुमचा हिशोब होईल. पण आधी तुम्हांला पूर्ण पैसे भरावे लागतील. मी म्हटलं पण पैसेही नाहीयेत. ते म्हणाले, आता ते काही मी करू शकणार नाही. तेवढं तुम्ही करा. मी जे पैसे काढलेले होते, ते घेऊन २ तारखेला सकाळीच कोल्हापूरला पोचले. हुसेन जमादारला घेतलं नि पैसे भरले आधी. पैसे भरल्यानंतर आमची एस.टी.ची सोय झाली. लगेच दुपारी आमचा प्रोग्रॅम सुरू होणार होता. त्यांनी विचारलं की, ड्रायव्हर कुठला? म्हटलं, आमचा. आमची माणसं, ड्रायव्हर पण आमचाच असेल. तर सय्यदभाई कोल्हापूरचे आहेत. ते एस.टी. वर ड्रायव्हरच होते. ते आमचे कार्यकर्तेच होते. ते म्हणाले, मी करतो काम. नि असा आम्हाला डायव्हरसुद्धा खूप चांगला मिळाला. ते पहिल्यापासूनच आमच्या बरोबर होत. त्यामुळे खुषीने ते आले.
आमच्या प्रवासामध्ये ८० वर्षांच्या बाबूमियाँ बँडवालेंपासून ९ महिन्यांच्या लहान मुलापर्यंत असे ४२ जण होते. आणि हा प्रवास आम्ही केला. परभणी नांदेडपासून गडबड सुरू झाली. जळगावला आम्ही आल्यानंतर एक गोष्ट घडली तिकडे. सकाळचा मोर्चा वगैरे काढून आम्ही निवेदन दिलं. रात्रीची सभा जिथं झाली तिथं स्टेजवर आम्ही बसलो. एकेक जण बोलायला लागला. दोघातिघांचं झाल्यानंतर धाडकन लोकं स्टेजवर आली मारण्यासाठी. मी अशी बसलेली. पर्स खांद्यावर होती. चप्पल काढून ठेवलेली. थोड्या वेळात काही कळेनासं झालं. पण तेवढ्या वेळामध्ये दोन-तीन माणसं मागून आली. त्यांनी असं मला उचललं नि धावले मला घेऊन. मला काहीच कळेना. ते म्हणाले, 'बाईजी आप घबराओ मत. अल्ला आपके साथ है, आप बहुत अच्छा काम कर रही है.' ते मुसलमान असतील असं वाटलं. त्यांनी मला एका बाजूला लपवलं. पोलीस आले. नंतर सगळं शांत झालं. आम्ही जाऊन स्टेजवर बसलो. मग लोक बोलायला लागले. 'नही नही, आप बोलिए. हम सुनना चाहते है आपको. आप लोग क्यूं आए है यहाँ पे.' अशा रीतीने आमचा प्रोग्रॅम झाला तिथं. दंगलीची पहिली वेळ होती ती. नंतर आम्ही नगरला गेलो. मधला मालेगावचा प्रोग्रॅम कॅन्सल झाला. बंदी घातली होती. सकाळी सातला निघालो. आमची गाडी अशी जातेय. पुढे दोन-तीन गाड्या, बाजूला दोनतीन गाड्या, मागे पोलिसांच्या. म्हणजे प्राईम मिनिस्टरला सुद्धा प्रोटेक्शन नव्हतं इतकं गव्हर्मेटने आम्हांला प्रोटेक्शन दिलेलं होतं. खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. पोलीस ऑफिसर पण इतके चांगले दिले होते की सगळे रिस्पेक्ट देऊन माझ्याशी बोलत होते. आमचा सल्ला घेऊनच पुढे जात होते. कुठेही आमच्या लोकांना त्रास झाला नाही. आरामात आम्ही प्रवास करू शकलो. नगरला जेव्हा पोचलो तेव्हा आत जातानाच दगडफेक खूप झाली. पोलिसांनी सांगितलं का इथं बुरखेवाल्या बायका आहेत, तुमची फजिती करणार आहेत. मोर्चा काढून नेलात की ते तुम्हांला पकडणार आहेत. तर तुम्ही ठरवा मोर्चा काढायचा का नाही. आमच्या बरोबरची जी लोकं होती ती पण असं म्हणायला लागली की भाभी, आता निर्णय तुम्ही घ्यायचाय. आम्ही खूप दमलोय. आम्हांला आता पुढं यायचं नाहीये. इथं धोका दिसतोय. इथपर्यंत आपण बरोबर आलो. एकच शेवटचा टप्पा आहे नाशिकचा. तो आपण गाठूू असं काही नाहीये. इथून आपण आता परत जायला पाहिजे. हा निर्णय घ्यायलाच पाहिजे. हुसेन जमादार वगैरे म्हणायला लागले, 'आम्ही दगड खाऊ, काय हरकत आहे?' मी म्हटलं, 'हे बोलणं सोपं असतं. मी खाईन, तू खाशील. एवढी लोकं आली आहेत आपल्याबरोबर. यांनी एक दगड खाल्ला तर परत येणार नाहीत आपल्याबरोबर. यांच्या सेफ्टीसाठी आपल्याला विचार करावा लागेल.' आणि असं करून आम्ही ऑफिसरना सांगितलं की आम्ही इथला प्रोग्रॅम रद्द करतो.
तिथून गाडी निघाली. जेवणसुद्धा नाही घेतलं. गाडीत त्यांना भरलं. मला पोलिसांच्या गाडीत गुपचूप घेतलं. कोणाला कळलं नाही. त्या गाडीवर दगडफेक खूप झाली. हळूच पोलिसांनी मला लपवलं. मुमताज रहिमतपुरेनी ते बघितल्यानंतर ती म्हणाली, मी भाभीबरोबर रहाते. तिला एकटीला नेऊ नका तुम्ही. आणि मुमताज नि मी पोलिसांच्या गाडीत खाली बसून होतो. एस.टी.वर दगडफेक खूप झाली. जेमतेम ती पोलीस ठाण्याच्या आवारात गेली. नंतर परभणीहून, नांदेडहून मॉब जमा झाला होता. १४-१५ हजारांचा मॉब होता नगरमध्ये. असा उभाच्या उभा. तिथं पोलीस कमिशनर अरविंद इनामदारसाहेब यांना भेटून मी व मुमताज रहिमतपुरेनं निवेदन दिलं. ते म्हणाले, 'बाहेर सगळी गर्दी जमलेली आहे. तुमची गाडी समोरच आहे. तुम्हांला आता बाहेर कसं जाता येईल, बघू या.' आमच्या गाडीच्या सगळ्या काचा फुटलेल्या होत्या. ड्रायव्हरला पण असं गुंडाळून ठेवलं होतं, का तर ड्रायव्हर तटला नि थांबला तर सगळी बस जाळून टाकतील. त्यांचा काही भरवसा नाही. पण इनामदार साहेबांची सुद्धा कमाल की एवढ्या मॉबमध्ये पुढे जाऊन सगळ्यांना त्यांनी एका बाजूला केलं नि आमची एस.टी. तिथून बाहेर पडली. कुठं जायचं? थारा नाही. म्हटलं, इथून बाहेर पडा. मीटिंग कसली होतेय? हा सगळा तमाशा झाल्यावर मीटिंग म्हणजे मेलो असतो सगळे. मग बाहेर पडलो ते थेट पुणं गाठलं. पुण्याला काही प्रोग्रॅम नव्हता. ११ ला पोहोचलो रात्री. मग पोलीस आवारातच थांबलो. थोडा वेळ. ते म्हणाले, रात्रभर थांबता येणार नाही तुम्हांला. मग बाहेर जाऊन लोकांनी चपाती-भाजी काय काय आणलं, खाल्लं. राष्ट्र सेवादलाचं साने गुरुजी स्मारक आहे नं, तिथं गेलो. थांबलो रात्रभर. अर्ध्या रात्री उठलो. म्हटलं, आपण एस.टी. बदलूया. डेपोवर गेलो. त्यांनी सांगितलं, 'नाही, ही एस.टी. तुम्हाला दिलेली आहे. काचा फुटल्या असल्या तरी चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आमच्या गाड्या चांगल्या कंडिशनमध्ये नाहीत. कोल्हापूरपर्यंत जाणार नाहीत. तुम्हांला अडकायला होईल. मग सगळ्या कोल्हापूरवाल्यांना त्याच्यात भरलं. मुंबईचे ३-४ लोक होते. बाबूमियाँ होते. त्यांच्याबरोबर २-४ माणसं. त्यांना मग श्रीगोंद्याला वेगळ्या एस.टी.ने पोचवलं. नि मी म्हटलं आपण साध्या ट्रेननं जाऊ या. कोण ओळखणारे आपल्याला? पण पोलीस आमच्याबरोबर होते. त्यांच्याबरोबर आम्ही घरापर्यंत गेलो. घरी गेल्यानंतर पोलीस कमिशनरला फोन केला. माझ्याशी ते फोनवर बोलले आणि लिहून घेतलं माझ्याकडून की आम्ही सुखरूप पोचलो म्हणून.
आता ह्या मोर्चामध्ये काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मी भाषण लिहून घेत होते, वाचत होते. तिथे एक-दोनदा वाचलं का तर स्टेजवर गेल्यावर मला नर्व्हसनेस यायचा ना. बोलायचं कसं? मला सगळ्यांनी सांगितलं, 'नाही नाही भाभी, तुम्ही बोलता छान. वाचता ते बरोबर नाही वाटत. बोला ना तुम्ही. मुद्दे माहिती असतात ना तुम्हाला? मांडा नं तुम्ही. का नाही मांडत?' तर मी म्हटलं, मग ठरवू या असं की मी जे मुद्दे मांडणार आहे ते तुम्ही मांडायचे नाहीत. तुम्ही जे मांडणार ते मी मांडणार नाही. सगळ्यांनी आधी बोलून सगळे मुद्दे संपतात. बोलायला मला काही उरत नाही. तसं नाही करायचं. मी पहिल्यांदा बोलणार पण नाही. असं ठरवल्यानंतर माझे मुद्दे कोणीच बोलायचं नाही. अशा रीतीनं मॉबसमोर स्टेजवर कसं बोलायचं ही गोष्ट मी शिकले. दुसरं असं की मोर्चा म्हणजे काय माहिती नव्हतं. प्रोग्रॅम म्हणजे काय समजत नव्हतं. त्या वेळी मी बाहेर पडले तर बाहेरचं वातावरण, बाहेरचं पब्लिक, बाहेरची लोकं पाहिली. प्रोग्रॅम करताना काय काय अडचणी येतात हे सगळं माझ्या लक्षात आलं. आणखी एक, भीती कमी झाली लोकांची. मॉब असा अंगावर यायला लागला की भीती वाटायची. नाही असं नाही. कारण मी काही इतकी बोल्ड नव्हते. पण लोकांना कनव्हिन्स करायचं असेल तर आपण भिऊन चालत नाही. तेव्हा असंही वाटलं का एवढ्या गडबडीमध्ये आपल्यावर एखादी काठी-लाठी पडली असती तर आपण जास्त हुशार झालो असतो, मजबूत झालो असतो आणि आपल्याला लोकांची जरासुद्धा भीती वाटली नसती. या गोष्टी मी त्या मोर्चामध्ये शिकले. काय तो दोन-तीन महिन्यांचा काळ गाजलाय! आम्हांला ज्यांनी ज्यांनी मदत केली होती त्या सगळ्यांनी सांगितलं की हे तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे. तो मोर्चा खूप सक्सेसफुल असा झाला. कोणी म्हणाले, '१९६६ साली ७ महिलांचा मोर्चा गेला होता. त्यानंतर हा हिस्टॉरिकल मोर्चा म्हणायला हरकत नाही.' अशा रीतीने तो मोर्चा ८५ साली पार पडला.
या मुक्ति मोर्चाहून परत आल्यावर. सी.आर.दळवींनी- हाय कोर्टात वकिली करतात- मला आपल्या ऑफिसात बोलावून सगळ्यांशी ओळख करून दिली. आणि या मोर्चामध्ये मी काय कामगिरी केली याचं वर्णन करून माझं खूप कौतुक केलं. त्यांच्या लीगल अॅडवाईजचा मला वारंवार फायदा झालेला आहे. ते इंडियन सेक्युलर सोसायटीमध्ये दलवाईंच्या बरोबर होते.
मुक्ति मोर्चाच्या वेळी आमच्या बरोबर असलेले नवीन कार्यकर्ते फार जोमाने कार्य करत आहेत. कोल्हापूरचे काझी, निपाणीचे बेग व नाईक, शामकाका (पटवर्धन) हे राष्ट्र सेवादलातील, मुक्तिमोर्चात आमच्याबरोबर होते. पुण्याचे अन्वर राजन, शमसुद्दीन तांबोळी, श्रीगोंद्याचे समीर मणियार आणि फलटणचे विलायत शेख ही मंडळी शिकलेली त्यामुळे मंडळाच्या कामाला जोर आला आहे. वजीर पटेल हे आमचे खूप जुने कार्यकर्ते. अमरावतीला फॅमिली प्लॅनिंगचं काम खूप जोरात चाललंय. असं जे म्हटलं जातं की मुसलमानांमध्ये फॅमिली प्लॅनिंग होतच नाही, हे खरं नाही हे वजीर पटेल यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. हाही माणूस दलवाईंचा खूप जवळचा होता.
आमच्या लक्षात आलं की काही मुसलमान शहाबानूवर केस मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. आणि सरकार ‘मुस्लिम महिला विधेयक' पास करणार अशीही बातमी आमच्या कानावर आली. आम्ही बेचैन झालो. तलाकमुक्ती मोर्चामधील काही माणसं, इतर काही लोक आणि तलाकपीडित महिला घेऊन आम्ही दिल्लीला आलो. तिथे प्रमिलाताई दंडवते यांनी आम्हांला खूप मदत केली. त्यांच्याच मदतीमुळे आम्ही पंतप्रधान राजीव गांधींना भेटलो. ते म्हणाले, 'आप अपने मुल्ला-मौलवीयोंसे मिले, उनसे बातचीत करे, अपने समाजको अपने साथ लाये, जब तक वो आपके साथ नहीं आते हम कुछ नहीं कर सकते.'
समाजसुधारकांच्या मागे समाज कधीच नसतो हे फक्त आम्हांलाच माहीत होतं!
मग आम्ही राष्ट्रपती झैलसिंगजींना भेटलो. त्यांनी आमची चांगली विचारपूस केली. तलाकपीडित महिलांची दुःखं ऐकून घेतली. मग ते म्हणाले, 'आप बिलकुल फिकर न करे, मैं सब लोगोंको समझाऊंगा, आपने बहुत अच्छा सवाल हाथमे लिया है.' त्याच वेळी आम्ही इतर काही लोकांनाही भेटलो. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ते विधेयक पास झालं आणि आमच्या बायकांची दुर्दशा झाली. ह्यामुळे आमची चळवळ १०० वर्षं मागे गेली. दलवाई नव्हते त्या वेळी. डिसीजन घेणारे मी नि जमादारच होतो नं. आमच्या बरोबरची जी माणसं होती ती सुद्धा खूप बोल्ड होती. बाबूमियाँ इतके म्हातारे तरी सुद्धा त्यांना जरादेखील घाबरलेलं मी बघितलं नाही. बायका आल्या होत्या बरोबर. जे पुरुष होते त्यांनी पण आम्हांला रस्त्यावर त्रास नाही दिला. नऊ महिन्यांचा तो मुलगा सुद्धा रडला नाही, दिवसभर त्याला दूध नाही मिळालं तरी. तेव्हा माझ्या मनात एक विचार असा घोळत राहिला की आपण देवाला मानत नाही. म्हणजे धर्माचं काही करत नाही. नमाज पढत नाही. रोजे ठेवत नाही. काही लोक अल्ला, ख़ुदा, देव-देव करतात तसं आपण करत नाही. मंदिर-मस्जिदमध्ये जात नाही. आपण नास्तिक आहोत असंही नाही. आस्तिक आहोत असंही नाही. असं असताना सुद्धा एवढा प्रसंग येऊनसुद्धा कुणाला एक दगड सुद्धा न लागता ही माणसं परत आली कशी? कोण आहे यांना वाचवणारा? मग असं वाटतं की, आपण वाईट काम केलं नाही तर आपण वाचतोय. कुदरत किंवा निसर्ग कुठं तरी आहे. आणि तो आपल्याला या प्रसंगात मदत करतो.
या संबंधात दुसरी गोष्ट अशी सांगण्यासारखी : कराचीला मी दोन वेळा जाऊन आले. तिथे मी बऱ्याच लोकांना पाहिलं. नमाज, पाच टायमाचे नमाज, रोजे, देव-देव करणारी माणसं भेटली. पण त्याचबरोबर ती माणसं स्मगलिंगचं काम करतात, खोटं बोलतात, चीटिंगची कामं करतात, लोकांना फसवतात. तर मी एकदा विचारलं लोकांना, की हे दोन्ही बरोबर कसं जातं? म्हटलं, माझी चांगल्या माणसाची व्याख्या काय सांगते? जो खोटं बोलत नाही, दुसऱ्याचं वाईट चिंतत नाही, भांडत नाही, मग तो देव-देव करणारा असू दे किंवा नसू दे. अल्लाखुदाला मानणारा असू दे किंवा नसू दे. तो नमाज पढणारा असो किंवा नसो. जो आयुष्यात कधीच वाईट काम करत नाही तो माझ्या दृष्टीनं चांगला माणूस. देवाला भजणारा माणूस जर चांगला असं आपण मानत असाल तर त्याच्याबरोबर त्याने वाईट काम केलं तर चालतं का? तर ते म्हणाले, 'वो उसके अमाल है. वो उसका देख लेगा. उसकी सजा उसे वहाँ मिलेगी.' तर हे सुद्धा बरोबर वाटत नाही. आता वर कुणी जाऊन बघितलं आहे का सजा मिळेल का काय? मी म्हणते, आपण या जगात रहातो, तर इथंच आपल्याला सजा का मिळत नाही? पण तसंही होत नाहीये, बघा. काही माणसं इतकी वाईट वागतात. त्यांना शिक्षा होतच नाही आणि जी चांगली माणसं असतात ती झिजून झिजून मरतात. म्हणजे याच्यात सुद्धा अर्थ काय ते मला अजून कळलेलं नाही. याचा मी सारखा विचार करत असते की असं का होतं? आपण बाबा गुन्हा करूच नये. म्हणजे तोबा करण्याचा प्रश्न आपल्याला येणारच नाही. आपल्याला असं वाटलं की इथं खोटं बोलून आपलं काम साधतंय; तरी खोटं बोलायचं नाही. माझं काम नाही झालं तरी चालेल. म्हणून मी म्हणते मी नमाज नाही पढत, रोजा नाही पाळत. पण मी वाईट काम करताना भिते.
मी व दलवाई एकदा पुण्याला गेलो होतो. पुण्यात अतुर संगतानी म्हणून फार मोठा बिल्डर होता. त्याच्या अनेक बिल्डिंग बनत होत्या. सय्यदभाई ह्यांना म्हणाले, हमीदभाई, तुम्ही आता भाबींचा आणि मुलींचा पुढचा विचार केला पाहिजे. असं कसं चालेल? मी काय करावं असे तुला वाटतं असे दलवाईंनी विचारलं. सय्यदभाई म्हणाले, आपण एखादा फ्लॅट भाबींच्या नावावर घेऊ या. ते हसले, आणि म्हणाले हे कसं शक्य आहे? इथे खाण्याचे वांधे आणि म्हणे घर घेऊ या. पण सय्यदभाईंनी त्यांची पाठ सोडली नाही. अतुर संगतानी दलवाईंना चागंले ओळखत होते. त्यांनी सुद्धा दलवाईंची खूप समजूत घातली. फ्लॅट घ्यायचं ठरलं. ५०० स्क्वेअर फूटची जागा २ रूम किचन, जवळ जवळ २८००० पर्यंत पडेल. पूलगेटजवळ कृष्णकुंजमध्ये. पाचव्या मजल्यावर, लिफ्टची सोय होईल. सारं ठरलं. पहिला हप्ता ५००० रुपयांचा होता. कुठून तरी कर्ज घ्यायचं असं ठरलं. काही ठिकाणी गेलो पण जमलं नाही. मी आमच्या आत्याकडे गेले. तिची परिस्थिती चांगली होती. पण ती म्हणाली, हमीदला काही कळत नाही. इतक्या घाणेरड्या वस्तीत ती जागा आहे. आणि पाचवा मजला म्हणजे काय? घेऊ नको त्याला सांगा. अशा रीतीने तिने ते पैसे नाकारले. या पैशाची व्यवस्था सय्यदभाईंनी केली. ५-६ वर्षांमध्ये हजार, पाचशे करून इकडून तिकडून घेऊन पुढचे पैसे देण्यात आले. शेवटचे पुन्हा ५००० भरायचे होते. माझ्या मामेभावाने- अर्शद याने आपल्या मित्राकडून घेऊन दिले आणि सांगितलं, पैसे फिटेपर्यंत तो इथेच राहील. आम्ही ते मान्य केलं. यांच्या किडनीच्या ऑपरेशननंतर आम्ही दोघे पुण्याला गेलो असता त्या घरात गेलो. मित्र आम्हाला भेटला. तो खूष झाला आणि त्याने आपल्या बायकोला सांगितलं, 'बघ, घराची मालकीण आली आहे. तिने बिचारीने आपलं घरही अजून पाहिलं नाही. तू तिला आत ने आणि घर दाखव.' मी पाहिलं, खूपच चांगलं वाटलं. तीन खोल्या. जेमतेम दोन खोल्यांत राहिलेली आम्ही माणसं, हा आमच्यासारख्यांना स्वर्गच की. मित्र म्हणाला, 'हमीदभाईंना बरं नाही, तुम्हाला वाटलं तर आम्ही घर रिकामे करतो. पैशाची काळजी करू नका. तुम्ही इथेच येऊन रहा.' आमची त्याच्याशी फारशी ओळख नसतानासुद्धा त्याने असं सांगावं, धन्य वाटलं. आम्ही म्हणालो, डॉक्टर मुंबईचे आहेत. येथे राहून चालणार नाही. पैसे फिटेपर्यंत तुम्हीच रहा.
दलवाई गेल्यानंतर ते घर हातात आलं. आम्ही त्या घरात जाऊ शकलो नाही. मी ऑफिसात रिझ्यूम झाले, पहिलं काम केलं, माझी ही पुण्याची प्रॉपर्टी आहे हे मी डिक्लेअर केले. सगळ्या मित्रमंडळींनी मला मूर्खात काढलं. पण मी दुर्लक्ष केलं. ऑफिसमध्ये यासाठी मला त्रास देण्यात आला. माझी चौकशी करण्यात आली, की मी इतका पैसा कुठून आणला, कोणाकडून आणला. रिसीट वगैरे दाखवाव्या लागल्या. त्या त्या लोकांकडे जाऊन विचारपूस करण्यात आली. हे सगळं व्हिजिलन्स खात्यात झालं. हे होत असताना तिथे आर.यू.चंद्रचूड हे डायरेक्टर आले. ते मला व दलवाईंना ओळखत होते. केस बघितली आणि मला बोलावलं. विचारलं, तुम्ही किती दिवस इथे काम करता? मी म्हणाले, जवळ जवळ २५ वर्षं. 'हा फ्लॅट कितीचा आहे ?' '२८००० रुपयांचा.' इतक्या वर्षांत इतकी बचत होऊ शकत नाही का? मग मला मेमो देऊन इतकं हैराण करण्याची काय गरज होती?' मी विचारलं. ते हसले आणि म्हणाले दलवाई बाई, आपल्या पैशाचा खराखुरा हिशोब कोणालाही कधीच द्यायचा नसतो. लाख दोन लाखाची बाब असती तर प्रश्न वेगळा होता. पुढे लक्षात ठेवा. आणि त्यांनी ती केस बंद केली. मी दलवाईंच्या इस्लामिक रीसर्च सेंटरसाठी या घराचा हॉल व दलवाईंची सगळी पुस्तकं देऊ केली आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे हे सेंटर चालवण्यात येणार आहे.
दुसरी गोष्ट अशी की आमच्या घरामध्ये फार धार्मिक वातावरण नव्हतं. सुरुवातीला मी कधीतरी म्हणजे ईदेबिदेला नमाज पढायची, शिरखुर्मा करायची. नवे कपडे वगैरे घालायची. ईद साजरी करायची. नंतर आमच्या मुली गेल्या होस्टेलमध्ये. हे नसायचे. हे दौऱ्यावर. मग एकट्याने कशी ईद करायची? म्हणून हळूहळू ईद पण बंद झाली. मुलींना होस्टेलवर ठेवल्यावर मलासुद्धा ईद करणं जड जायला लागलं. शिरखुर्मा खाताना आठवण यायची मुलींची. तेव्हा मी यांना सांगितलं का, मुली घरात असतील तर शिरखुर्मा, ईद वगैरे. नाही तर नाही. काही करणार नाही मी. हे म्हणाले, 'ठीकय. तुझा संसार आहे नं? तू म्हणशील तसं. मला काही नाही.' पण मुली आल्यानंतर ते म्हणायचे, चला, आता मुली आलेल्या आहेत. शिरखुर्मा खायचा. मग आम्ही दोन-चार वेळेला सुद्धा खात असू. त्या वेळी ईद आमची. पण दलवाई गेल्यानंतर मी घरात ईद करायची नाही असं ठरवलं. का ठरवलं सांगते. कारण प्रत्येक ईदला मुली घरात असतातच असं नाही. पण महिलांमध्ये मी जेव्हा काम करायला लागले, तेव्हा ईदच्या दिवशी मी त्या महिलांच्या घरी जायची. कोणी आजारी असे त्यांच्याकडे जायची आणि त्यांनी शिरखुर्मा वगैरे केलेला असायचा. त्या म्हणायच्या, आपा आयी. अन एका प्याल्यामध्ये चार चमचे ठेवायच्या आणि सगळ्या घरातल्या लोकांनी एकेक चमचा खायचा. त्यांच्याबरोबर मी खायची आणि अशा रीतीने त्या बायकांबरोबर मी ईद मनवून यायची. ही प्रथा मी अजून चालू ठेवलेली आहे. त्यामुळे काही घरांत काही केलेलं नसलं तरी ती लोकं म्हणायची, 'नही, आपा आएगी. बोलेगी ना, की मेरे लिए शिरखुर्मा भी नहीं बनाया. आपा अपने घरमें कुछ नहीं करती.' अशा रीतीने सुद्धा त्या बायका माझी वाट बघतात.
आम्ही मंडळाचं काम करतो म्हणून त्यांना काही आम्ही असं सांगत नाही की नमाज पढू नका, रोजे ठेवू नका, देवाची प्रार्थना करू नका ! का, तर आम्ही काय करतो? धर्माचे दोन भाग करतो. एक इबादतचा. यात या सगळ्या गोष्टी येतात; ज्या, मला वाटतं की पर्सनल आहेत. आपल्याला दुसऱ्याला बोलण्याचा काही अधिकार नाही आणि मला सुद्धा कोणाला विचारण्याचा अधिकार नाही की मी नमाज पढते का नाही! हा माझा प्रश्न आहे. तो तुमचा प्रश्न. पण दुसरी बाजू आहे आदतची. समाजाबरोबर जायचं असेल तर ती बदलायची का नाही बदलायची? बरं, एक गोष्ट आणखी आहे, हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे, ते धर्माच्या विरुद्ध आहे असं म्हणून कसं चालेल? एखादी गोष्ट जर मुसलमानांच्या धर्माच्या कल्पनेत बसत नसेल, म्हणजे विरुद्ध जात असेल तर मग ती हाती घ्यायची की नाही घ्यायची? आणि जर ते बायकांवर अन्याय करणारं असेल तर धर्माला बाजूला ठेवायचं की नाही ठेवायचं? मला वाटतं, धर्म हे क्षेत्र आमचं नाहीये. मुल्ला मौलवींचं आहे. पंडितांचं आहे. तर त्यांनी त्याबद्दल बोलावं. त्यांना त्याच्यात काय करायचं आहे ते ठरवावं त्यांनी. पण लोकांना प्रेशराईज करू नये. त्यांच्यावर लादू नये. त्यांनी धर्माच्या नावावर अन्याय करू नये. धर्माच्या नावावर आम्हांला न्याय सुद्धा नको, का तर धर्माच्या मध्ये एकदा का आपण शिरलो तर इतकं खोलवर जाऊ! जसं चिखलात आपण रुतलो तर निघणं कठीण होईल तसं होणार. म्हणून धर्म आपलं क्षेत्र नाही. त्याची बेअदबी जर करायची नसेल तर धर्म बाजूला ठेवावा नि आपण सामाजिक न्याय मागावा. किंवा आपल्या घटनेत जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत ते का आपल्याला मिळू नयेत? आपण भारतीय आहोत की नाही? मग आपल्या धर्माच्या आधारावरच आपल्याला न्याय मागायची काय गरज आहे?
६ डिसेंबर १९९२ ला आणि नंतर जानेवारीमध्ये जी दंगल झाली आणि जे बाँबस्फोट झाले, त्या वेळी मी मिरजोळीस, माझ्या सासरी गेले होते. तिथे माझ्या मोठ्या नणंदेच्या मुलीचं लग्न सकाळी १० वाजता होतं. तऱ्हेतऱ्हेच्या बातम्या येत होत्या. हे सर्व ऐकून ताबडतोब मुंबईला जावं, तेथील लोकांची बातमी घ्यावी, असं फार वाटत होतं. अशा वेळी आपलं तिथे असणं जरुरीचं आहे. आणि तोंड लपवून बसणं काही खरं नाही. पण एस.टी. बंद. येण्याजाण्याचं काही साधन नसल्यामुळे अडकून रहावं लागलं. शेवटी १४ डिसेंबरला रात्रीच्या ११ वाजता एशियाडने मी मुंबईला आले. गाडीत फक्त ८ ते १० पॅसेंजर होते. सकाळी साडेचारच्या सुमारास दादर टी.टी. येथे एशियाड थांबली. खूप काळोख होता. रस्त्यावर कुत्रंसुद्धा दिसत नव्हतं. माझ्याबरोबर २-३ पॅसेंजर उतरले. आणि कुठे तरी नाहीसे झाले. मी एकटीच होते. दाऊदच्या दुकानाला लागलेली आग लांबूनसुद्धा दिसत होती. मी कसंबसं रेल्वेस्टेशन गाठलं. विरार गाडी लागली होती. पण मूठभर पॅसेंजर दिसले. गाड्या बरोबर चालत नव्हत्या. पाच नंतरची गाडी मिळाली. मी पुरुषांच्या डब्यात चढले. पण सबंध डब्यात ४-५ पॅसेंजर होते. मी अंधेरीला उतरले. पुलावरून खाली गल्लीत आले. पाहिलं तर दोन्ही बाजूंची दुकानं जळून खाक झालेली होती. आग धुमसत होती. आणि एकही माणस रस्त्यावर दिसत नव्हता. माझी काॅॅलनी जवळच होती. मी कशीबशी घरी आले. सगळीकडे सामसूम होती. सकाळी शेजारी-पाजाऱ्यांची चौकशी केली. बाजूवाली म्हणाली, तुमची इला इथेच होती. कधी गेली आम्हांला कळलंच नाही. मी दुसऱ्या दिवशी १४ तारखेला अंधेरी वेस्टला आंबोली व्हिलेजमध्ये गेले. तिथे आमच्या मंडळाचा एक ग्रूप रहात होता. १५-२० वर्ष माझं तिथे जाणं-येणं होतं. तिथल्या बऱ्याच लोकांना मी ओळखत होते. आमच्या मंडळाचे मुसा, इस्माईल, महमुदभाई, हसेनभाई, इक्बाल आणि त्यांच्या घरातील बायका, आम्ही प्रोग्रामच्या निमित्ताने भेटत असू. तिथे सेवादलाची काही मंडळी आहेत. तीसुद्धा नेहमी भेटणारी. दंगलीमध्ये या सगळ्यांचं काय झाल असेल, हे पाहण्यासाठी मी संध्याकाळी ५ च्या सुमारास तिथे गेले. मुसाच्या घरी आले. हा आमचा मुख्य कार्यकर्ता आहे. तिथे पाहाते तो काय, घरची लोक सामान बांधून गावी जाण्यासाठी तयार बसलेत. मला पाहून मुसाची आई म्हणाली, तुम्ही कशाला आलात? इथलं वातावरण अजिबात चांगलं नाही. मी विचारलं, मुसा कोठे गेला? ती म्हणाली, येथे शिवसेनावाल्यांनी मीटिंग ठेवली आहे. तो तिथे गेला आहे. मी त्याला बोलावलं. तो आल्यावर त्याला मी म्हणाले, तू मला त्या मीटिंगला नेे. मी बघते काय करायचं ते. आम्ही तिथे गेलो, खूप लोकं जमा झाली होती. चार-पाच खुर्च्या ठेवल्या होत्या. वर कोणीच बसायला मागत नाही. एका खुर्चीवर एक मुलगासा, गलिच्छ कपड्यात बसलेला दिसला. केस वाढलेले, दाढी बऱ्याच दिवस न काढलेली, भाषा तर भयंकर. कुठल्याही सभ्य लोकांशी संबंध नसलेला असा एक तरुण मी तिथे पाहिला. हा कोण होता, शिवसेनेचा शाखाप्रमुख. मी त्याच्याबद्दल ऐकलेलं होतं. पण कधी पाहण्याची किंवा बोलण्याची संधी मिळाली नव्हती. मी कोण आहे, हेही त्याला माहीत नसावं. मीटिंग सुरू झाली. हा तरुण उठला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. तो मुसलमानांना उद्देशून बोलत होता. 'ही लोकं काय समजतात स्वतःला? आमच्याकडे आले पाहिजे होते. आमचे पाय धरायला हवे होते, आमच्याशी आपल्या जीवनाची भीक मागायला हवी होती.' दमबाजीने तो बोलत होता. वाटेल ते बकत होता. लोकं त्याला घाबरून गप्प बसली होती. तो काय बोलत होता, त्याचं त्यालाच कळत नसावं. त्याचे बोलणे संपल्यावर दुसरं कोणी उठत नाही असं बघून मी उठले. मी त्यांना म्हणाले, तुम्ही कैक वर्ष इथे राहत आहात, एकमेकांशी तुमचे संबंधही चांगले आहेत. एका ताटात तुम्ही खाता, एकमेकांच्या सुख-दुःखात उपयोगी पडता, मग आता एकदम काय झालं? वरून आदेश आला म्हणून काय झालं? आपण आपलं डोकं शाबूत ठेवून विचार करावा आणि मग काय ते ठरवावं. मी आदेश हा शब्द उच्चारला आणि भडका उडाला. सगळे शिवसैनिक तुटून पडले, वाटेल ते बोलायला लागले. मग माझ्या लक्षात आलं की हा शब्द बाळासाहेब ठाकरेंचा आहे, मी थोडं स्वतःला सावरून घेतले आणि म्हणाले, मी हा शब्द त्यांच्या संदर्भात वापरलेला नाही. माझ्या बोलण्याचा उद्देश असा होता की, आमच्या वर जी विद्वान मंडळी बसली आहेत, ती अशी आदेश देतात. त्यांचं काय जातं? त्यांची घरं जाळली जात नाहीत. त्यांना मार खावा लागत नाही. पण आपल्यासारख्या गरिबांची मात्र वाट लागते. आताच पहा ना कोणाचं नुकसान झालं ते? कोण बेघर झालं आहे? आपण याचा विचार करणार आहोत की नाही? खरं म्हटलं तर माझं तिथलं येणं कोणाला आवडलं नव्हतं. जे ओळखत नव्हते त्यांनी मुसाला विचारले ह्या कोण आहेत? मुसा म्हणाला, “ह्या मुस्लिम सत्यशोधक मंडळा'च्या कार्याध्यक्षा आहेत. आमची माहिती घेण्यासाठी आल्या आहेत. मी त्यांना असंही सांगितलं, तुम्ही बाळासाहेबांना विचारा, मी कोण आहे? मग मी तिथून उठून आले. मुसाने मला घरापर्यंत आणून सोडलं, आणि म्हणाला, “तुम्ही आता बाहेर पडू नका. आम्ही घर सोडून कुठेही जाणार नाही." मग शहाजहाँ, लैला मला सारखे दोन-दोन दिवसांनी येऊन बातम्या देऊ लागले. इलाला भेटले, ती म्हणाली, आम्ही अंधेरीलाच होतो. पण वातावरण फार भीतीचं होते. एकदा तर मागच्या बाजूला रात्री १२-१ च्या सुमारास १००-२०० माणसं हातात मशाली, लाठ्या-काठ्या घेऊन धावताना पाहिलं. असं वाटलं, खिडकी फोडून ते घरात शिरतात की काय? त्या दिवशी मी व महेशने रात्र बसून काढली. भीतीनं मी रडायला लागले. लहानपणापासून मुंबईत अशी परिस्थिती कधीच पाहिली नव्हती. पुढे काय घडेल याची कल्पनाच नव्हती. आम्ही दोघे दुसऱ्या दिवशी पळून वसईत निघून आलो. तिथे गेल्यावर मुंबईत काय चाललं आहे, जरासुद्धा कळलं नाही."
आता मंडळाचं काम करायचं असं मी जेव्हा ठरवलं ना, तेव्हा कशा प्रकारे सुरुवात करावी असा विचार पडला. अंधेरीला बायकांचा जो ग्रूप आहे तो माझ्या ओळखीचा होता. तिथं मी आठ दिवसांनी, पंधरा दिवसांनी ऑफिस सांभाळून जायची. त्यांना जमा करायची. त्यांचे घरगुती प्रश्न समजून घ्यायची. या घराच्या आसपास नाही पण जवळ राहाणारा अंधेरीचाच आम्ही एक वकील नेमला होता. त्या वेळी काही शहाबानू केस झालेली नव्हती. त्यामुळे कोर्टामध्ये केस चालू व्हायची पोटगीसाठी. काही बायकांना मध्ये असं ठेवलं होतं की कोणी अडचणीत सापडलेली बाई आली तर तिला माझ्याकडे घेऊन यायचं. नंतर विचारपूस करायची. तिच्या नवऱ्याच्या घरच्या लोकांना भेटायचं. दोघांची बाजू समजून घ्यायची. आणि मग त्यांना मी सांगायची की वकिलाकडे जा. ते वकील आम्हांला फ्री सल्ला देत होते. पुरुष वकील होते एक. त्यांचं नाव तिरोडकर. त्यांच्याकडे पाठवायची. बायकांना ते प्रश्न विचारायचे ना, तर बायका बोलायच्याच नाहीत. वर्ष गेलं, दोन वर्षे गेली. मग एकदा त्यांनी सांगितलं की, बाई, या तुमच्या बायका तोंडातून शब्दपण काढत नाहीत. मी कसं काम करू? वकील हिंदूच. आमच्या केसेस मुस्लिम वकील घेतच नाहीत. धर्माच्या विरुद्ध बोलल्यानंतर ते केसेस लढवणार कसे? ते घेतच नव्हते. तिरोडकर म्हणाले, 'तुम्हांला एक बाई वकील देतो.' ओवळेकर बाई म्हणून होती, तिची भेट घालून दिली. अंधेरीलाच रहायची. अंधेरीच्याच कोर्टात काम करायची. तिच्याकडे बायका मी पाठवायची. अशीच लैला पटेल म्हणून होती. तिची केस सांगते. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. तिला तीन मुलं. तिला नवरा नांदवत नव्हता. देखणी हं, फार वयाची नाही. गोरी गोरी पान. छान दिसायला. स्वयंपाक उत्तम करायची. भाकऱ्या-बिकऱ्या तिच्या हातच्या बघण्यासारख्या. संसार तिनं खूप चांगला केला असेल. मी तिच्याबरोबर असल्यामुळे माझ्या लक्षात यायचं. ती माझ्या घरी यायची कधी कधी आणि मला आई, ममा ममा म्हणायची. कधी भाकरी भाज, कधी मटणाचं कालवण कर, हे सगळं करून घालायची. तर हे सगळं टेस्टी लागायचं. बरं घरकामात सुद्धा चांगली. साधं ती झाडू-फडका मारताना सुद्धा आपण तिचं बघून शिकावंसं वाटे. इतकं चांगलं तिचं काम असे. घरगुतीच काम. ती काही बाहेर जायची नाही. शिकलेली बिकलेली अजिबात नाही. नंतर तिला मी सिग्नेचर कशी करायची हे दाखवली. का तर बँकेचा अकाउंट मी उघडला होता. ती आमच्याकडे यायच्या आधी कोर्टात गेली होती. आणि त्या नवऱ्याला तंबी पण मिळाली होती बायकोला सोडल्याबद्दल. तर त्यानं काय केलं? दुसरी बायको केली. तिला पण चार मुलं. तो करोना शू कंपनीत कामाला होता. पगार चांगला मिळायचा. त्या बाईला तो पोसायचा म्हणजे ती गावालाच मुलं घेऊन असायची. आणि हा इकडं असायचा. तोही चांगला देखणा होता. सासूचं घर-बिर मोठं होतं. २-४ रूम्स अशा भाड्यानं दिलेल्या होत्या. पैशाची कमी नव्हती. पण हिला त्रास द्यायचा तो आणि हिला ठेवायलाच तयार नव्हता. तेव्हा ही एकटी वेगळी काय करणार? तिला तेव्हा कामधंदा पण काही नव्हता. नंतर ती बाटल्या धुण्याच्या कामाला टेंपररी लागली. नंतर आमच्याकडे आली. राजू अली मुल्लानी नावाचा एक जण होता. त्यानं तिला आमच्याकडे आणली. आम्ही सगळ्या केसचा अभ्यास केला. ती पहिली केस आमच्याकडे आलेली होती. लैला भित्री होती, इतकी की बाहेर निघायचं पण माहिती नव्हतं. बोलायचं माहिती नव्हतं. माझ्याकडे आल्यानंतर मी शिकवायला लागले सगळं तिला. तर ती थोडीशी हुशार झाली. कोर्टामध्ये केस दाखल केली. कोर्टामध्ये नवरा यायचाच नाही. मी तिला काय म्हणायची की, पोलिसाला घेऊन जा आणि हात धरून आण त्याला. तिथंच जवळपास राहात होती ना, म्हणून ती पोलिसांना घेऊन जाऊन त्याची कॉलर धरून आणायची. म्हणजे नंतर ती इतकी बोल्ड झाली होती. मग पोटगीची केस झाली. तिला पोटगी द्यायला नको म्हणून त्या माणसानं नोकरीचा राजीनामा दिला! तो म्हणाला की, मी नोकरीच करत नाही. माझ्याकडे पैसाच नाही. तर मी हिला पोटगी देणार कुठून? असं करून त्यानं नोकरी सोडली. दोन हजार रुपये पगार कमवत होता त्या काळामध्ये. १५-१७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तिला खूप त्रास दिला. लहान लहान मुलं तिची शाळेत जाणारी. मग आमच्याकडे आल्यानंतर मी म्हटलं, आता आपण इथपासून काम सुरू करायला पाहिजे. ही एक बाई आपल्याकडे आली. हिला आपण कशी पुढे नेणार? ह्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल ना बायकांची. तिची मुलं शाळेत जायला लागली म्युनिसिपालिटीच्याच. त्यांना कपडे, पुस्तकं वगैरे दिली. झोपडी तिथंच होती. शाळेच्या जवळच. घर-बिर काही मोठं नव्हतं. भावाची झोपडी होती. तो शिवणकाम करायचा. गरिबी होती पण भाऊ फार चांगला होता. लहान होता हिच्यापेक्षा. आई पण चांगली होती. भाऊ म्हणाला जाऊ दे, सोडलं तर काय झालं? मी सांभाळेन हिला, तीन मुलांसकट. भावाने घरी ठेवली हिला. असं कुणी ठेवत नाही. नंतर कोर्टाचा डिसीजन लागला. त्या माणसाच्या डोंगरावर दोन खोल्या होत्या, त्याच्या मालकीच्या. पण हिच्या ताब्यात होत्या. मी म्हटलं तू ही जागा सोडायची नाहीस. त्याला दोन खोल्या आहेत नं, तुझ्या नावाची एक करून दे म्हणून सांग पण जाऊ नको तिथं राहायला. का तर आजूबाजूची वस्ती फार खराब, वाईट होती. सगळे भ्यायचे का तिथं मारून फेकलं तरी कळणार नाही कोणाला म्हणून. गुंडांची वस्ती असं लोक म्हणायचे. आम्ही कोर्टात ती केस जिंकली. पोटगीचा तर प्रश्न नाही आणि तो देणार पण नाही. पोटगी जरी कोर्टानं मंजूर केली तरी नवरे देतातच असं नाही. दर महिन्याला झिकझिक किंवा चार महिने झाले का पुन्हा कोर्ट. त्याला काही अर्थ नाही. पण एवढं मात्र खरं की प्रोटेक्शन बाईला आज नाहीये कायद्याचं, ते मिळालं पाहिजे. म्हणजे तिला जेव्हा जावंसं वाटतं कोर्टात तेव्हा जाता आलं पाहिजे. तिला सेफ्टी तेवढी एकच आहे नं? तिला असं वाटत असेल की, नाही दिली तर नाही दिली पोटगी, पण मला पोटगीचा अधिकार तर आहे ना? मी कोर्टात जाऊ शकते ना? मी सुरुवातीला तिच्या बरोबर कोर्टात जायची. सुनावणी ऐकायची. म्हणजे माझा असा किती तरी वेळ जायचा आणि ती माझ्याकडेच यायची. त्यामुळे मला खूप सिंपथी वाटायला लागली. हे सगळं झालं. त्या खोलीला टाळा ठोकून ऑफिशिअली तिला त्या घराचा ताबा मिळाला. ते घर अजूनपर्यंत होतं. आत्ता तिनं ते २५,०००/- रुपयांना विकलं. मोडकं तोडकंच होतं, म्हणजे पत्र्याचं. तिनं मुलांच्यासाठी ठेवलं होतं. तीन मुलं सांभाळणार कशी ती बाई? पण पाचवी - सहावी पर्यंत एक मुलगा शिकला. एक सातवीपर्यंत शिकला. एका मुलाला आम्ही वसतिगृहात ठेवलं होतं कोल्हापूरला. हुसेन जमादारांनी तिथं ठेवलेलं होतं. थोडेसे पैसे दरमहा द्यायचे. तो मुलगा तिथून एस.एस.सी. होऊन निघाला. दुसरा मुलगा होता. माझ्या दोन्ही मुली लोणावळ्याच्या गुरुकुलमध्ये शिकलेल्या. आमची धाकटी एस.एस.सी. होऊन निघाली तेव्हा मी चंदावरकरांना सांगितलं का हा माझा मुलगा समजून तुम्ही ठेवून घ्या. त्याला फी माफ करा. नॉमिनल देईन मी पाहिजे तर. त्यांनी त्याला ठेवलं. तोही एस.एस.सी. होऊन निघाला. तो मला म्हणाला, का मला कॉलेज शिकायचं. म्हणून दोन्ही मुलांना मी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला घातलं. पैसे भरून घातलं. पण दोघेही पुढे जाऊ शकले नाहीत. मग माझ्या लक्षात आलं, उगाच पैसे घालवले आणि ग्रॅज्युएट होऊन तरी काय लगेच नोकरी मिळणार आहे का? मग त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आता धंदा करा. काहीही करा. मला ती खूप मान देतात मुलं. लैला सांगत होती, 'ममा, आमच्या घरात कॅलेंडर नाही. पण हमीदभाईंचा एक फोटो आहे. राष्ट्र सेवा दलाच्या कॅलेंडरवरचा. माझ्या मुलांनी तो फ्रेम करून लावलाय आणि सांगितलंय का या घरात दलवाईंशिवाय कोणाचाही फोटो लावायचा नाही. निदान तो एवढं तरी तुम्हाला मानतो.' आणि प्रोग्रॅम असला का त्याला मदत करतो. काहीही काम सांगितलं का नाही म्हणत नाही. उलट, ‘आपा, तुम बैठो, तुम कुछ नही करनेका, हमको बोलो', असं म्हणतात. ही लैलाच आता इतर बायकांना समजावून सांगते, आमच्याकडे यायला सांगते. म्हणजे हीच कार्यकर्ती झाली. सगळे तिला म्हणतात की आपांनी तुझं भलं केलं. तर ती म्हणते, 'तुम्ही पण जा. तुम्ही तिला सांगा. म्हणजे ती तुमच्यासाठीही येईल. तुम्हांला घरी बसून सगळा फायदा पाहिजे.'
प्रत्येक प्रोग्रॅम जेव्हा असायचा ना, तेव्हा सारखं सारखं जायचं नि बायकांना बोलवायचं काम माझं. पूर्वी माझ्या दोन्ही मुली हे काम करायच्या. समजा हॉल घेतला. बायकांना प्रोग्रॅमला आणायचं असेल तर एकदा बोलावून चालायचं नाही. दोन-तीन-चार खेपा जाऊन मी आमंत्रणं देऊन यायची. नंतर माझ्या मुली इला नि रुबीना, दोघी जाऊन बायकांना तयार करून, हात धरून हॉलमध्ये आणण्यापासून परत नेण्यापर्यंत जबाबदारी घ्यायच्या. तेव्हा तिथं एवढ्या मोठ्या संख्येनं बायका यायच्या. पण माझ्या मुली नंतर म्हणायला लागल्या, 'बाप रे, तुझा एक कार्यक्रम म्हणजे आमची कंबर ढिली होते. आम्ही आमचं करिअर करायचं का नाही, संसार करायचा का नाही? का तुझंच काम करायचं?' तर सुरुवातीला मुलींची मला भरपूर मदत व्हायची, लिहिण्याच्या कामात. विशेषतः मराठीमध्ये लिहिणं सोपं पडायचं. बातमी लिहून देणं. बायकांना आणणं. ही कामं त्या करायच्या. विद्याविकास नावाची शाळा होती. तिथं शेख म्हणून एक प्रिन्सिपॉल होते. ते आमच्या विचारांचेच होते - पण बिचारे किती मुसलमान असे आहेत जे आमच्या विचारांचेच असून खुल्या मनाने आम्हांला मदत करू शकत नाहीत - तर ते म्हणायचे का तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या एक-दोन मुलांना दर वर्षाला अॅडमिशन मिळेल. अशा तऱ्हेने आमच्या एखाद्या मुलाला वर्षातून एकदा अॅडमिशन मिळायची. चांगला मुलगा आहे, मुलगी आहे. हुशार आहे. मुलींकडं मुलांपेक्षा आम्ही जास्त लक्ष दिलं नि नंतर नंतर काय झालं? तर हा आमचा मुलगा आहे, उनाड आहे, काम करत नाही. याला नोकरी द्या, अशी गळ घालायला लागल्या बायका. आम्ही कुठून नोकरी देणार? आम्ही पुरे पडलो नाही त्यांना. आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ शकलो नाही.
शहाबानू केस झाली नि आमच्या बायकांचं नुकसानच झालं. मुस्लिम महिला विधेयक पास करून आमच्या बायकांना वक्फ बोर्डाच्या स्वाधीन केलं. पण वक्फ बोर्ड कुठे आहे? मराठवाड्याला एक आहे असं बोलतात. पण ते चालत नाही. वक्फ बोर्डकडे पैसा पण नाही आणि जो असेल तो मशिदींची डागडुजी वगैरेंसाठी खर्च केला जातो. पैसा असला तरी तो बायकांसाठी कशाला देतील? ते तर म्हणतातच का हे धर्माच्या विरुद्धच आहे. मग ते मदत कशी करणार? धर्म पाळणाऱ्या बायकांना तरी ते मदत करतात का? ते म्हणतात, अशा केसेस नाहीतच. एखादीच असेल. त्यांनी येऊन आमच्याकडे बघितलं असतं तर त्यांना कळलं असतं ना त्या केसेस काय आहेत? आणखीन एका बाईची केस. तिनं नवऱ्याला कोर्टामध्ये खेचलं. तिला पहिली मुलगी होती. तो नांदवत नव्हता बरोबर. मारायचा, झोडायचा, टाकायचा, त्रास द्यायचा. ती कंप्लेंट घेऊन माझ्याकडे आली. कोर्ट केस झाली. त्याला एकदा-दोनदा बोलवण्यात आल्यामुळे त्याचे डोळे उघडले. तर मी त्या मुलीला सांगितलं तू बोलव नवऱ्याला माझ्याकडे. आल्यानंतर समजूत घातली. तो म्हणाला, 'मी नांदवेन.' तर म्हटलं, 'आम्हांला केसेस चालवून नवरे सोडायला लावायचे नाहीयेत. आम्हांला काँप्रमाइझ करून संसार कसे चालतात तुमचे हे पाहायचंय.' मग हिला आत नेऊन मी सांगितलं. बघ शेजारीपाजारी ओळख काढ. मित्र-मैत्रिणी कर. त्यांच्या थ्रू मला पत्र पाठव. म्हणजे मला कळेल त्या घरामध्ये काय आहे. त्या घरामध्ये गोषा, पडदा लावलेला आहे. मुलींनी संडासात जाताना सुद्धा एकटं जायचं नाही. बाजूला संडास असला तरी सासू बरोबर जाणार. नणंद बरोबर जाणार. घरात हिला मारहाण व्हायची. आई नि भाऊ येऊन रडायचे की आम्हांला तिथं गेलो ना, तर थारा नसतो. मुलीशी मोकळेपणानं बोलता येत नाही. इथं सासू बसलेली आहे, इथं मुलगी बसलेली आहे. काय ती मुलगी बोलणार? त्यामुळे तिला भयंकर त्रास दिला. एक-दोन वर्षं खूप रडली आणि त्यात ती परत प्रेग्नंट राहिली. बरं असंही नाही, की हिला कोण सांभाळणार? आई चांगली होती. भाऊ चांगला होता. दोघेही सांभाळायला तयार होते. काही जमलं नाही. दुसरी मुलगी झाल्यावर खूप त्रास झाला. तेव्हा मी तिला सांगितलं का तू त्यांच्याकडं राहातेस कशाला? तुला शिवणकाम येतं. मग तू तिथं राहू नको. ती तिथून पळून आली. आईला समजून सांगितलं का तू हिला ठेव आसऱ्यानं. तू मुलगी सोडलीस तर ही वाईट कामाला लागेल. मग आपण बोलतो का बायका वाईट आहेत. ऐन वेळेला समजा त्यांना कसलाच सपोर्ट मिळाला नाही तर कुठली जागा आहे? पोट तर भरायला पाहिजे नं? तर सगळ्या बायका काय तिथं वाईट अर्थानं जात नाहीत. आपण त्यांना जायला भाग पाडतो, म्हणून त्या तसं करतात. मग ती पळून मुलं सोडून आली. नवऱ्यानं सांगितलं, 'तुला घरात घेणार नाही.' म्हटलं जाऊ दे. मुलं पण आणू नकोस. तू इथं आता एकटीच रहा. तिच्या आईकडे मशीन होती. त्यामुळं मशीनवर शिलाईचं काम घेऊन ती करत होती. बरं, आपली मुलं तिथं आहेत, तो चांगला सांभाळत असेल की नाही, हा विचार सुद्धा बाईला टॉर्चर करतो. सोपं नाही. आता बायकांना मी हेच सांगते. चार-चार मुलं घेऊन तुम्ही बाहेर पडता तर पडताच कशाला? त्यालाच बाहेर काढा. नाहीतर तुम्ही बेघर होता आणि त्याला घर मिळाल्यामुळे दुसरी बायको सोपेपणानं आत येते. तुम्ही आता मुलांना सोडून या. म्हणजे दुसरी बायको जी घरात येणारी असेल ती काय म्हणेल? ही चार मुलं कोण सांभाळणार? पहिल्यांदा मुलांची व्यवस्था करा. त्यानं तिच्याजवळ आणून टाकली म्हणजे? तो प्रश्न वेगळा आहे. हा वेगळा आहे. तसे पण करणारे असतात. आई सोडून देईल का मुलांना? नवऱ्यानं सोडलं तरी? मग काय मार्ग काढणार तुम्ही? त्यांच्यावर बेततंय हे मी बघते. माझ्यावर बेतलेलं नाहीये. माझा मार्ग मी कसा ठरवते? आपण एक ट्रायल घेतो ना, असं केलं तर होईल का, तसं केलं तर होईल का? तसं सगळ्यांना काही एकच लॉजिक लावून चालणार नाहीये. वेगळ्या वेगळ्या तहांनी प्रत्येकाचेच प्रश्न आपल्याला सोडवायला पाहिजेत. हे झालं. मग आम्ही काय केलं? तिथल्या बायकांचा जो ग्रूप होता त्याच्यात दोन मशिनी आम्हांला मिळाल्या होत्या. पवारवहिनींच्या हातच्या चांगल्या दोन मेरिटच्या मशिनी आम्हाला मिळाल्या होत्या. तर मी त्या ग्रूपमध्ये मशीन दिली. त्यांना सांगितलं की तुम्ही शिवणकाम करा. घरात. त्यांच्या झोपड्यांमध्येच. जागा कुठून मिळवणार? मला स्वतःला जागा नव्हती राहायला. माझ्या दोन खोल्या एवढ्या लहान आहेत की तिथं मी एक मशीनही ठेवू शकत नाही. मी तिथं क्लास कशी घेणार? नि दुसऱ्या कुणाच्या घरात कशी घेणार? तर त्यांच्यातल्या ज्यांनी सांगितलं की आमच्या घरात ठेवा, त्यांच्या घरात ठेवल्या मशिनी. एका बाईंचं घर जरा मोठं होतं. ती सांगायची की इथं मीटिंगा घ्या, तिथं मी घ्यायची. चहा करायची. मी म्हणायची की दूध, चहा, साखरेचे हे पैसे घे नि सगळ्यांसाठी चहा कर. १०-१५ बायका यायच्या, घरचे प्रॉब्लेम असायचे ना. त्या सोडलेल्या होत्या असं नाही. पण नवरा नोकरी करत नाही, तरी चांगला आहे. मारहाण करणारा नाही. पिणारा, खाणारा नाही. नवऱ्याची परमिशन असल्याशिवाय बाई बाहेर निघत नाही. त्यांचे नवरे मला ओळखणारे होते. मी पण त्यांच्यामध्ये जायची नं. त्यांना समजून सांगायची. 'चलो, उसको भेजो, महमूदभाई उनको भेजो', असं म्हणून सगळ्यांना बाहेर काढत असे. त्यामुळे “आई आपा, तुम जाओ” असा रिस्पेक्ट देणारे पुरुष पण तिथं होते. गरीबच, शिकलेले नाहीत, त्यांना मदत व्हावी म्हणूनच बायकांना काही सांगायचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे त्यांना असं वाटायचं नाही की मी गैर शिकवते म्हणून. तर तिथं धर्माचं आम्ही सांगतच नव्हतो. तर तू तुझ्या स्वतःच्या पायावर कशी उभी राहशील? तुझ्या घरातल्या मुलांना जेवण कसं दिलं पाहिजे. तुझ्या नवऱ्याला तू कसं सांभाळशील, हेच मी सांगत असे. मी नंतर नंतर तर असंही म्हणाले की दर महिन्याला एक विषय ठेवायचा घरगुती. मी येते नि तुम्हांला सांगते. तुम्ही नवऱ्याबरोबर, मुलांबरोबर कसं रहायचं? घरातलं काम तुम्हांला झेपत नाही. कशा रीतीने करायचं? अमुक रीतीने करा. भांडी चारदा घासता, धुणं दोनदा. सगळा वेळ त्याच्यात घालवता. तर असं सगळं. आम्ही एवढं सुद्धा शिकवलं.
साने गुरुजींची सांताक्रूझची शाळा आहे लीलाधर हेगडेंची. एकदा मी त्यांच्याकडे गेले. म्हटलं, तुम्ही मला मदत करा. माझ्या काही बायका मी इथे ट्रेनिंगला पाठवते तीन-चार. आणि ट्रेनिंग झाल्यावर त्या बायकांनी घरगुती बायकांना शिकवावं असं आपण ठरवू या. तर त्यांनी सांगितलं कन्सेशन देतो. सहा महिन्यांची चार बायकांची फी भरली जायची तिथे. कपडा बिपडा सगळं. सुई, दोरा, कात्री मी दिली त्यांना. तुमच्या दारात बस आहे. तिथं दारात थांबते. आठ दिवससुद्धा त्या बायका गेल्या नाहीत. त्यांच्यातल्याच तरुण मुली शोधल्या. शिकलेली बाई नसली तर शिवणकाम करू शकत नाही. ती मोजमापं कशी घेणार? तर त्या म्हणाल्या, 'नही आपा गर्दी बहुत लगती है, धक्के बहुत लगते है, नही आपा ऐसा लगता है, पैसा लगता है.' गेल्याच नाही त्या बायका. ऐदीपणा असतो ना. काम न करता खाण्याचा. वातावरण असेल तशी मुलं तयार होतात. त्यांना शिकवणार कोण? आपल्या घरात सकाळी काठी घेऊन पहिल्यांदा सांगणार, शाळेत जा. तर आपल्याला शाळेची सवय लागते. त्यांना तशी काही जाणीवच नाही. 'उसको दिमागच नही है. वो सीखनेमे हुशार नही, उनका दिमागच नही चलता. काय को डालने का आपा?” हजार सबबी. अरे बाबा, सबको दिमाग नही रहता. एक फर्स्टक्लास रहता और बाकी सारे थर्डक्लास रहते. लेकिन डालो. उनको जबरदस्ती करो. उनको सिखाओ. असं म्हटलं तर मुलांना जाऊ दे, मुलीला कशाला? सातवीपर्यंत मुलगी शिकली, बस झालं. तिला कशाला शिकवायचं. लग्न करून द्यायचं. एक लडका देखेंगे और उसने छोड दिया तो उसे संभालते बैठेंगे. नही तो आपा के पास जाएंगे केस लढाव करके. हे सुद्धा व्हायचं. हसायचे, मी जे बोलायची ना, ते सगळं पटायचं त्यांना. 'आपा बहुत अच्छी बात करती. आपा को सब समझता है हमारा. इसलिए हमारे पास आती है ना, उसका क्या स्वार्थ है?' म्हणजे अशा रीतीने त्या बायका मला बघायला लागल्या. हा एक प्रयोग केला. आत्तापर्यंत त्यांच्याकडे त्या मशिनी पडलेल्या आहेत. काहींनी आपल्यासाठीच वापर करून घेतला. शिकवायचं नाही. आपणच शिवणकाम करायचं नि आपण कमवून खायचं. दुसरं म्हणजे, आम्ही काय करायला लागलो. कॉप्या जमा करायला लागलो. कुणाला तरी सांगायचं की आम्हांला १००-२०० कॉपीज द्या. कॉपीबुक वह्या जमा करायच्या. पुस्तकं जमा करायची. आमचा मुसा, इकबाल, इस्माईल, शहाजहाँ काय करायचे, प्रत्येक मुलाकडे जायचे. तिसरीची पुस्तकं, चौथीची पुस्तकं, सेकंडहँड पुस्तकं अशी सगळी आम्ही जमा करत होतो. असा वर्षातून एक कार्यक्रम आम्ही घ्यायचो. सगळ्या मुलांना जमा करायचं आणि त्यांना ती वह्या पुस्तकं वाटायची. पेन्सिली, कोऱ्या वह्या. वह्या नाहीत, पुस्तकं नाहीत म्हणून शाळेत जात नाहीत असं व्हायला नको म्हणून ३-४ वर्षं हे सगळं केलं. आम्हांला खूप त्रास व्हायचा. पण करत होतो. ३-४ वर्षं दिली नि मग म्हटलं की हे लोक स्वतःहून येऊन आपल्याकडे मागत नाहीत. आपण या वर्षी वह्या-पुस्तके वाटायचीच नाहीत. हो, विचारू दे की आपा, तुम्ही दर वर्षी हे देत होतात. या वर्षी का देत नाही, आम्हांला पाहिजे होतं आणि आम्हांला पुढे शिकता येत नाही असं म्हणत जरी आले असते तर जेवढे आले तेवढ्यांना तरी आपली स्वतःची मदत करून कोणाकडेही न मागता दिले असते. पण तसंही झालं नाही. म्हणजे आता तुम्ही कशा रीतीने यांच्यासाठी काम करायचं? हे काय मुद्दाम करतात असं नाही. पण मुलींकडे जास्त जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं घरची माणसं देत नाहीत, असा अर्थ आहे.
आता बाईवर अन्याय होतो, बाईवर का, तर हिंदूंची परंपरा १५० वर्षांची आहे. महात्मा फुल्यांपासून. त्या मानानं या १५० वर्षांत हिंदू महिला इतक्या पुढं गेलेल्या आहेत का? काळाच्या अनुषंगानं? मग आमच्या तर जास्त अडाणी असल्यामुळे, शिक्षण, पैसा नसल्यामुळे, गरिबीमुळे, घरच्या वातावरणामुळे २०० वर्षे घेतील. आणि मी नाही म्हणत का मी मरायच्या आधी सगळं होईल. असं कोणी नाही म्हणत. परंपरा चालू करायला पाहिजे. आमच्याकडे परंपरा कुठे आहे? तर सर सय्यद अहमद खान होते शिक्षणक्षेत्रामध्ये, ज्यांनी अलिगढ युनिव्हर्सिटी काढली. पण ती ज्या हेतूनं काढली तो काही साध्य झाला नाही. त्यांना असं वाटलं का, दुसऱ्या समाजाबरोबर आपला मुसलमान समाज जावा, त्यानं चांगलं शिक्षण घ्यावं. पण त्यांचा हेतू काही साध्य झालाच नाही. अलिगढला त्यांनी वुमेन्स कॉलेज काढलं. तिथं महिला आहेत. शिकतात. बड्या डिग्र्या घेतात. पण तिथं सुद्धा त्या महिला चार भिंतींच्या आतच आहेत. तिथून बाहेर पडलेल्याच नाहीत. बाहेरचं जग त्यांना माहितीच नाहीये. त्यांना गरज पण नाहीये. नसीमा अन्सारी सोशल वर्कर. आम्ही तिला भेटलो होतो ना, तिनं हे सगळं सांगितलं. तिनं हे आम्हांला दाखवलं नेऊन. शिक्षण मिळालं तरी वृत्ती बदलली नाही.
आम्ही जे काम करतो ना, ते लोकांचे विचार बदलण्याचं काम करतो. आमची मुस्लिम सत्यशोधक संघटना ही विचारावर चालणारी आहे. मेजॉरिटीवर, संख्येवर चालणारी नाही. त्यामुळे आमच्या मागे संख्या नसणारच. घरातली चार माणसं तरी एकाच विचाराची असतात का? आपली मुलं तरी आपल्या विचारांची असतात का? मग परक्यांना जमा करायचं, त्यांचे विचार बदलायचे, सोपं काम नसतं. बरं, याच्यात त्यांना काही पैसा मिळणार आहे का? इलेक्शन आहे, ५-५ रुपये दिले, माझ्या नावावर व्होट टाक म्हणून? तसं नाहीये. त्यामुळं विचारांनी आपल्या मागं येणारी पाच माणसं जरी असली तरी ती माणसं आपण शिकवू शकलो याचं समाधान आम्हांला आहे. त्यामुळे आमच्या मागे खूप संख्या नाही. पण काम आम्ही केलेलं आहे. एखाद्या वेळेस दलवाई असते तर चित्र वेगळं असतं. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी होती. आम्ही पुरे पडू शकलो नाही, का तर त्यांच्या सारखं डोकं पण आमच्याजवळ नाही. हुशारी नाही. शिक्षण त्यांच्याजवळ खूप नव्हतं. फर्स्ट इयर पर्यंत शिकले होते. पण वाचन खूप होतं. माहिती खूप होती. मुसलमान लोकं म्हणायचे डिग्री होल्डर आहे का तो? तो ग्रॅज्युएट आहे का? त्याला काय आहे ऑथॉरिटी आमच्यावर बोलायची? पण ते अपुरे पढायचे नाहीत. दलवाईंना धार्मिक शिक्षण पण खूप होतं. नमाज कसे पडायचे माहिती होतं. कुराण सगळं वाचलेलं होतं. कुराणामध्ये कुठल्या आयतीत काय आहे हे दलवाई बोलत होते. गरबीबिरवी आमच्याकडे पढतात ना, ते काही आमच्याकडे सगळ्या लोकांना येत नाही. पण हे हॉस्पिटलमध्ये असताना आमचे नातेवाईक यायचे ना तेव्हा हे टिंगल करून हसत हसत डोळा इकडे मारायचे नि गरवी पढून दाखवायचे. असं किती वेळा झालेलं आहे. धर्माचा सगळा अभ्यास करून मग बोलायचे. मुल्लामौलवींपुढे बोलायची हिंमत होती. दोन-तीन गुप्त मीटिंगा झाल्या मुसलमानांच्या आणि त्याच्यात ते बोलले. ओपनली इतर मुस्लिम त्यांच्याबरोबर बोलायला बसायला तयार नव्हते. आज जे आम्हांला लोक सांगतात ना तुम्ही मुल्लामौलवींच्याबरोबर बसा. तर आम्ही काय म्हणतो, धर्म आमचं क्षेत्र नाही. आणि आम्हांला त्याच्यात घुसायचं नाही. बोलायचं पण नाही आणि आम्हांला काही गरज पण नाहीये ते करायची. पण दलवाईंनी तसा प्रयत्न केला होता. मीटिंग घेतली तरी ते मुसलमान कोणी बोलायला तयार नव्हते. बोलायला तर हवं नं?
'याला काय समजतंय. हा कोण बोलणारा?' चर्चा अशा झाल्या नाहीत. ह्या चर्चा त्या वेळी झाल्या पाहिजे होत्या की नाहीत? पण झाल्या नाहीत. म्हणजे दलवाईंनी या पद्धतीनं काम केलं असतं. पण आम्हांला ते जमत नाहीये. आमची ताकद कमी पडते हे आम्हांला मान्य करायलाच पाहिजे. पण आम्हांला जिद्द आहे. आम्हांला वाटतेय आमच्या समाजाबद्दल आस्था. हे आम्ही का करतो? मुसलमानांचे शत्रू आहोत म्हणून करतो काय? मी मुसलमान आहे. मला अभिमान आहे का माझा समाज माझा आहे. मला त्याची चिंता वाटते. समाजाला मदत करावी म्हणून मी काम करते, का मला त्याचा द्वेष वाटतो म्हणून मी काम करते? प्रेमापोटी करतेय, नि दुसरी गोष्ट अशी आहे का समाजामध्ये मेजॉरिटी आहे ती गरिबांची आहे. त्यांचा धर्माशी काही संबंध नाही. धर्म किती पाळतात? नमाज पढणं, रोजे ठेवणं, जकात देणे, ईद आली का नवे कपडे शिवणं, शिरखुर्मा खाणं एवढाच धर्म सगळ्यांचा!
मला काही लोकं असं विचारतात की हमीद दलवाईंनी दहन का करून घेतलं? दहन करून घेतलं म्हणून ते हिंदूच होते असाही प्रचार केला जातो. दलवाईंनी दहन करून का घेतलं हे त्यांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये लिहिलेलं आहे. ते नास्तिक होते. कोणत्याही धार्मिक संप्रदायावर त्यांचा विश्वास नव्हता. कुठलाही पारंपरिक धर्म ते पाळत नव्हते.
दहन केल्यामुळे ते हिंदू कसे होतात? दहनक्रियेच्या आधी किंवा नंतर कुठलाही धार्मिक विधी झाला नाही. शिवाय दहन करवून घेणारा हिंदूच असतो हे खरं नाही. बऱ्याच मुसलमानांनी दहन करवून घेतल्याची उदाहरणं आहेत. जसे छगलासाहेब, इस्मत चुगताईबाई, एम.आय.ए.बेगसाहेब, हिदायतुल्लासाहेब इत्यादी.
दुसरी गोष्ट अशी, मेल्यानंतर दहन करायचं का दफन करायचं किंवा आपलं शरीर हॉस्पिटलला दान द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे आणि तो अधिकार आम्ही मानतो.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते नमाज पढणारे आहेत, रोजे ठेवणारे आहेत, कुराणाचे पठण करणारे आहेत, आस्तिक आहेत. आमच्या घटनेमध्ये मंडळाचा सभासद होण्याकरता नास्तिक असण्याची जरुरी नाही. शरीयत कायदा टाकाऊ म्हणणारे प्रा. फैजी हे धार्मिक होते. पण ते आपला धर्म आपल्या घरात आणि मशिदीत पाळीत.
तेव्हा हमीद दलवाईंनी दहन करून घेतलं हे त्यांच्या वैयक्तिक मताप्रमाणे झालं. कारण त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीमुळे सर्वच पारंपरिक धर्मांनी सांगितलेल्या स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या कल्पना किंवा मरणोत्तर जीवन यावर दलवाईंनी कधीही विश्वास ठेवलेला नाही आणि ते स्वतःला मुसलमानच म्हणवून घेत असल्यामुळे पारंपरिक इस्लाममधील दफन करण्यामागे असलेली भूमिका त्यांना नाकारायची होती. म्हणून त्यांनी त्या पद्धतीने आपलं शरीर कबरीमध्ये न पुरता त्याचं दहन करावं असा निर्णय घेतला. मात्र मला असं वाटतं की दलवाईंची मानवतावादी भूमिका पाहाता त्यांना अजून काही आयुष्य लाभलं असतं तर त्यांनी आपलं शरीर दफन वा दहन न करता देहदानच केलं असतं. दुर्दैवानं त्यांना ती संधी मिळाली नाही.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाची, दहन करून घ्यावं किंवा घेऊ नये अशी कोठलीच भूमिका नाही. या बाबतीत प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क आम्ही मान्य करतो. दलवाईंच्या दहनाचा उपयोग आम्हांला बदनाम करण्याकरता केला जातो म्हणून हा खुलासा.
दलवाई राजकारणी माणूस नव्हता. पण त्यांना राजकारण चांगलं समजत होतं. त्या क्षेत्रात गेले असते तर त्यांनी उत्तम राजकारण केलं असतं. पण त्यांना समाजकार्याची आवड होती. त्याचं महत्त्व त्यांना कळत होतं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं होतं की आपले राजकीय विचार मंडळाच्या कामामध्ये आणता कामा नयेत. म्हणून ते राजकारणापासून स्वतःही दूर राहिले.
आम्ही मुसलमानांमध्ये प्रबोधनाचं काम करतो. मुस्लिम महिलांचे प्रश्न म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा, दत्तक घेण्याचा, वारसा हक्काचा, कुटुंब नियोजनाचा, त्यांना पायावर उभे करण्याचा आणि विशेष म्हणजे तलाकपीडित महिलांच्या पुनर्वसनाचा. आम्ही लोकांचे विचार बदलण्याचं काम करतो. त्या करता आम्ही वर्कशॉप, शिबिरं, परिषदा घेतो आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे कार्यक्रम घेतो. साऱ्या महाराष्ट्रभर आमची मोफत सल्लाकेंद्रं चालू आहेत. आमचं काम आता ऑल इंडिया लेव्हलवर चालतं. आम्ही लोकांना आमचे विचार पटविण्याचा प्रयत्न करतो. चौदाशे वर्षांपूर्वी जे कायदेकानून झाले ते त्या काळाच्या अनुषंगाने बरोबर होते, यात वादच नाही. पण आता काळ बदलला आहे, रीतीरिवाज बदलले आहेत. समाज बदलत आहे. जग बदलत चाललं आहे आणि म्हणूनच आपल्या घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्या आधारावर आम्ही मागण्यांचं समर्थन करीत आहोत. त्याचा आधार समता आणि न्याय ही मूल्यं आहेत. धर्माच्या आधारावर आम्हांला न्याय नको.
आम्हाला वाटतं, धर्माची चिकित्सा झाली पाहिजे. जे चांगलं आहे ते घेऊ या. पण जे वाईट आहे, जे अन्यायकारक आहे ते टाकून देण्याची तयारी पाहिजे. आम्ही भारतात राहतो. इथे इतर धर्माचे लोक राहतात. त्यांना जे कायदेकानून आहेत ते आम्हांलाही असले पाहिजेत. म्हणजे कायद्याचं संरक्षण आम्हांलाही मिळायला पाहिजे. वेगळी वागणूक आम्हांला नको. आम्ही हा देश आपला मानतो. त्याचा इतिहास, त्याचा निसर्ग, त्याचं ग्रंथभांडार, इथले नाना भाषिक लोक हे आमचे आहेत असं आम्ही मानतो. भारतात राहणाऱ्या प्रत्येक धर्माच्या लोकांनी जर आपापला धर्म डोक्यावर घेतला तर देशाचं काय होईल? म्हणूनच प्रत्येकानं आपला धर्म आपल्या घरात आणि मसजिद-मंदिरात ठेवला पाहिजे आणि 'माणुसकी' हा एकच धर्म मानला पाहिजे.
१९७० साली मंडळाची स्थापना झाली. एप्रिल १९७५ मध्ये दलवाई आजारी पडले. ३ मे १९७७ ला ते गेले. दलवाईंना काम करायला वेळच मिळाला नाही. पाच-सहा वर्षांच्या अवधीमध्ये जितकं जमेल तेवढंच त्यांनी केलं. कामाला गती यायला आणि आजारी पडायला एकच गाठ पडली. दलवाई गेल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी जितकं जमेल तेवढं मंडळाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. पण आज जर दलवाई असते तर ती परिस्थिती वेगळी असती. आम्ही दुसरा हमीद उभा करू शकलो नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आम्ही शेवटपर्यंत काम करू याची खात्री देतो.
☯☯☯
याच्यातच मी सगळं भरून पावले आहे."