मुसलमानी मुलखांतली मुशाफरी


मुसलमानी मुलखांतली

मुशाफरी

( केसरीच्या प्रवासी प्रतिनिधीची पत्रे )



मुशाफर

श्रीपाद रामचंद्र टिकेकर





प्रथमावृत्ति ]
[ किं. १ रुपया
१९३१

-- प्रकाशक --

सदाशिव रामचंद्र सरदेसाई,
 
बी. ए., एल्एल्. बी.

डेक्कन जिमखाना वसाहत, पुणे ४.




सर्व हक्क स्वाधीन




-- मुद्रक --

सदाशिव रामचंद्र सरदेसाई,

बी. ए., एल्एल्. बी.

नवीन समर्थ विद्यालयाचा समर्थ भारत

छापखाना, ९४७ सदाशिव, पुणे २.


केसरी-मराठा संस्थेच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त

के स री- म रा ठा सं स्था
आणि
तिचे ट्रस्टी व संचालक
श्री. नरसिंह चिंतामण केळकर
यांस
प्रेम-आदर-कृतज्ञतापूर्वक
अर्पण
प्रकाशकाचे निवेदन

प्रस्तुत पुस्तकांतील मजकूर महाराष्ट्रीय वाचकांच्या परिचयाचा असला तरी तो खंडशः वाचलेला असणार. त्याला अविभक्त वाचनाची सर येणे अशक्यच. आणि लेखकाची भाषा व वर्णनशैली अशी आहे की, पुनर्वाचनाने विषयाची जास्तच गोडी लागावी. तेव्हा हे पुस्तक वाचकांस सादर करण्यांत शिळ्या कढीस ऊत आणण्याचा प्रयत्न करण्याचा दोष येणार नाहीच. शिवाय सध्याच्या सार्वत्रिक जागृतीच्या काळांत, आपल्या मुसलमानधर्मीय शेजाऱ्यांविषयीची अगदी अलीकडची माहिती शक्य तितकी, शक्य तितक्या वेळां जनतेपुढे मांडल्याने त्या जागृतीला योग्य अशी मदतच होईल असा भरवसा आहे.

येथे एका गोष्टीचें स्पष्टीकरण करणे अवश्यक आहे, ते म्हणजे पुस्तकांत योजिलेल्या शुद्धलेखनपद्धतीविषयी. दोन वर्षांपूर्वी ' महाराष्ट्र-साहित्यसंमेलना'ने जे शुद्धलेखनमंडळ नेमलें त्याचे निर्णय प्रस्तुत पुस्तकांत ग्रथित करण्याचा शक्य तितका प्रयत्न करण्यांत आला आहे. परंतु हा प्रथम प्रयत्न असल्याने ते निर्णय पूर्णत्वाने पुस्तकांत उतरले नाहीत हे खरे. तेव्हा प्रचलित पद्धति व तिची जागा पटकावू पहाणारी नवी पद्धति या दोहींच्याही चाहत्यांस दोष काढण्यास भरपूर जागा आहे. ते त्यांनी शक्य तितक्या सूक्ष्मतेने काढून त्यांचे मंथन करावे व त्यांतून सर्वसंमत असे शुद्धलेखनरत्न काढावे, अशी अत्यंत आग्रहाची विनंती आहे.

पुणे, ता. ३-१-१९३१.

--------------

अनुक्रमणिका


पत्रेः-- मुक्काम पृष्ठें
१ - ५ .... पहिला : पेशावर .... .... १ - ३२
६ - ९ .... दुसरा : बसरा .... .... ३३ - ५८
१० .... तिसरा : आबादान .... .... ५९ - ७०
११ - १४ .... चवथा : बगदाद .... .... ७१-१०२
१५ - १७ .... पांचवा : तेहरान .... .... १०३-१४२
१८ - १९ .... सहावा : केट्टा .... .... १४३-१६५


परिशिष्टेंः--
पहिलें : मयूरासन .... १६६-१७५
दुसरें : इराणांतील अनुभव .... १७५-१८१
तिसरें : प्रवासांतील मौजा .... १८२-१८८




मुसलमानी मुलखांतली

मुशाफरी

मुक्काम पहिला : पेशावर

( १ )

 अफगाणिस्तान हा आपल्या हिंदुस्थानपेक्षाही मागसलेला देश, धार्मिक समजुती व रूढींचा पगडा तेथे विशेष, राज्यपद्धति जुन्या चालीची, आधुनिक सुधारणेचा प्रवेश तेथे फार उशीरा झालेला. असें असतांही तेथील अमिरांनी आपल्या राष्ट्राची सर्वांगीण प्रगति मोठ्या झपाट्याने व्हावी असे प्रयत्न सुरू केले. तेव्हा आपणांसही आपल्या शेजारच्या राष्ट्राकडून कांही उपयुक्त गोष्टी शिकतां येतील त्या पहाव्या म्हणून तिकडे जाण्याचें ठरविलें.
 अशा हेतूने प्रेरित होऊन दुर्योधनाचा मातुल देश पहाण्यासाठी निघावयाचें ठरलें. पण त्यांत अडचणी काही कमी नव्हत्या. पहिली अडचण परवान्याची. कारण अफगाणिस्तान हा बोलूनचालून परकीय देश. सध्याच्या नाजुक वातावरणांत त्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालें असल्याने तिकडे जाणाऱ्यायेणाऱ्यांवर सरकारचें फार कडक नियंत्रण आहे. प्रथमतः आमच्याच सरकारने परवानगी दिली तर अफगाण सरकारकडे अनुज्ञा विचारावयाला जावयाचें. तेव्हा पासपोर्ट ऑफिसांत चौकशी केली. तेथे असें कळलेंं की, युरोप किंवा अमेरिकाखंडांत प्रवास करण्याची परवानगी तत्काळ मुंबईहून मिळत असली तरी, अफगाणिस्तानला जाण्याची अनुज्ञा हिंदुस्थान सरकारच्या संमतीविना देतां येत नाही.
  जाण्याचा मार्ग व हेतु, कोणत्या गांवीं हिंडावयाचें, किती दिवस तिकडे काढणार इत्यादि सविस्तर लिहून हिंदुस्थान सरकारकडे परवानगीची मागणी केली. पण उत्तर येण्यास निदान तीन आठवडे लागतात असें कळलें. कारण अफगाणिस्तानांतील ब्रिटिश वकिलातीची आणि अफगाण परराष्ट्रीय मंत्र्यांची अशा येणाऱ्या इसमास कांही हरकत आहे काय, अशी पृच्छा करण्यांत येते व समाधानकारक उत्तर आल्यावरच पासपोर्ट दिला जातो.
  एवढ्यानेच काम भागतें असें नाही. पासपोर्टवर मुंबईत असलेल्या अफगाण वकिलाची संमतिदर्शक सही घ्यावी लागते. मुंबईला अफगाण वकिलाची एक कचेरी आहे. तेथे गेलो असतां असें कळलें की, 'रहदारी'वर ( रहदारी=पासपोर्ट ) शिक्कामोर्तब करण्यासाठी अफगाण सरकारने दोन खास अधिकारी नेमले आहेत, त्यांच्याकडे गेलों असतां काम लवकर होईल. मुंबईच्या अफगाण वकिलाकडून पुष्कळ माहिती याच भेटींत मिळाली. अफगाणिस्तानला जाण्याचे मार्ग दोन. एक पेशावरहून खैबर घाटांतून काबूलला जाणारा आणि दुसरा क्वेट्टयाहून कंदाहारला पोहोचणारा. पेशावरहून प्रतिदिवशीं सकाळीं आठ वाजतां मोटारगाड्या निघतात. सायंकाळीं जलालाबाद येथे मुक्काम होऊन दुसरे दिवशीं सकाळीं प्रवास सुरू झाला म्हणजे तिस-या प्रहरीं काबूलला पोहोचतां येतें. अशी माहिती मिळाली खरी; पण त्याच वेळी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयीं अफगाण वकिलाला विचारल्यावर फारच गंमतीचें उत्तर मिळालें. मुंबईच्या अफगाण वकिलातीसाठी येत असलेल्या तिजोरीवर सरहद्दीवरील रानटी लुटारूंनी हल्ला केला अशी ती बातमी होती. पण त्या वकिलाने तत्काळ एक नोटांचें पुडकें काढून दाखविलें आणि म्हटलें की, “ हे पहा आमचे पैसे ! ते आम्हांला बँकेतून मिळतात. आमच्या राज्यांतून एक रुपयाही बाहेर जात नाही. कारण राजेसाहेबांची सक्त ताकीदच तशी आहे."
  मी त्यावर त्यांना विचारलें की, “ मग वर्तमानपत्रांतल्या बातम्या खोट्याच तर ?" वकिलाने उत्तर केलें, “समजा, आम्हांला कांही पैसे पाठवावयाचे असले तर बरोबर रखवालदार दिल्याविना का कोण पाठवील? इतके का आमचे अधिकारी वेडे आहेत? हे पैसे कालच आले. आणखी पुढील आठवड्यांत येतील. वर्तमानपत्रें,अफगाणिस्तानची बातमी म्हटली की, कांही तरी तिखटमीठ लावून लिहितात."
  अशा प्रकारचे बोलणे झाल्यावर मी विषय बदलण्यासाठी असा प्रश्न केला की," हिंदु म्हणून मला तेथे कांही त्रास होईल काय ?" त्यास असे उत्तर मिळाले की, "मुळीच नाही. फारच प्रेमाने आमचे लोक आपलें स्वागत करतील. शिवाय आमच्या देशांत पुष्कळ पंजाबी हिंदु व शीख आहेतच. साहेबांना मात्र तेथे कोणी विशेष मानीत नाहीत."
 इतकी माहिती मला पुरी झाली. तेवढ्यावर संतुष्ट होऊन पेशावरला जावें व तेथे पुढची माहिती मिळवावी असेंं मी ठरविलें.  पेशावरचा परिचय–मुंबईहून पेशावर पंधराशें पंचेचाळीस मैल (जी. आय. पी. मार्गे) आहे. बी. बी. सी. आय.ने पंचाण्णव मैल जवळ पडतें. तेथे जाण्यास सोईच्या अशा गाड्या दोन्हीही रेल्वेंच्या आहेत. सर्वात अधिक सोईची जाणारी गाडी बी. बी. सी. आय्.ची फ्रॉंंटियर मेल असल्याने मी त्याच गाडीने आलों. सुमारे चव्वेचाळीस तासांत हा प्रवास झाला आणि पेशावरला येतांच पासपोर्ट अधिकाऱ्याकडे जाऊन माझ्या ‘ रहदारी 'वर शिक्का मारण्याविषयी विनंती केली. पण सरहद्दीवरील गडबडीमुळें तिकडे जाण्याची कोणासच परवानगी देतां येत नाही असें सांगण्यांत आलें.
 काबूलचा रस्ता जो अडला गेला तो अफगाण हद्दींंतलाच आहे. खैबर घाटापुढे डाका म्हणून अफगाणिस्तानांतलें एक गांव आहे. त्यानंतर जलालाबाद हें दुसरें शहर. आणि नंतर काबूल. अशा मार्गाने मोटारी जातात. सध्या जी गडबड चालली आहे, ती डाका व जलालाबाद यांच्यामध्ये असलेल्या भागांत आहे. सरहद्दीवरील प्रांतांत आफ्रिदी, वजिरी, महशुदी, बलुची इत्यादि अनेक रानटी जातींचे लोक आहेत. त्या सर्वांत ‘शिनवरी' म्हणून जी जात आहे ती विशेष नाठाळ आहे. त्यांच्यावर सत्ता कोणाचीच नाही. म्हणजे ते कोणालाच मानीत नाहीत आणि स्वत:पैकी कोणाला तरी मुख्य मानून त्याच्याच तंत्राने चालण्यासाठी लागणारी विचारशक्ति त्यांना नाही. थोडक्यांत सांगावयाचें तर प्रत्येकजण अगदी राजाप्रमाणे स्वतंत्र, नव्हे निस्तंत्र, आहे ! त्यांचा प्रांत अफगाणाधिपतीच्या सत्तेखाली मोडत असला तरी त्याच्यावर हुकमत गाजविणें आजपर्यंत कोणालाही शक्य झालें नाही. राजा हा त्यांचा केवल 'शब्दपति' होय असे म्हटलें तर अतिशयोक्ति होणार नाही. लूट, मारहाण, चोरी हे तर त्यांचे वडिलोपार्जित धंदे होत. तेव्हा त्यांना कोणीही लगाम घालण्याचा प्रयत्न केला की ते चवताळणारच! आणि हाच प्रकार सध्या झाला असल्याने या शिनवरी लोकांनी डाका व जलालाबादमधील रस्त्यांत पुंडाई मांडली आहे.
  ही अव्यवस्था दूर होऊन पूर्ववत् रहदारी सुरू व्हावी म्हणून अफगाण सरकारचे प्रयत्न जारीने चालू आहेत शिनवरी लोकांस वठणीवर आणण्यासाठी काबुलाधिपति जातीने जलालाबादपर्यंत आले होते; त्यांनी विमाने, मशिनगन्स यांचाही उपयोग केला; त्यामुळे तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली आहे असें म्हणतां येते. कारण तीन दिवसांपूर्वीच एक 'काफिला' काबूलहून येथे आला. काफिला म्हणजे उंटवाल्या व्यापारी लोकांचा तांडा. हा काफिला किती मोठा असतो याची कल्पना प्रत्यक्ष पाहिल्याविना यावयाची नाही. पांचशें सहाशें उंट एकामागून एक चालत असतात, बरोबर त्यांचे रक्षकही असतातच, पण अशा या मालिकेने मैल मैल रस्ता अडल्यास नवल नाही. कित्येक काफिले दहा पंधरा मैल असतात असें म्हणतात. प्रत्यक्ष पाहिलेला असा हा काफिला केवळ अडीच तीन मैल लांबीचाच होता. हा काफिला या धामधुमीत डाक्याजवळ अडकला होता. तो आला तेव्हा रस्ता खुला झाला असेल अशी साहजिक कल्पना झाली. परंतु पुन: दंगाधोपा होण्याची भीति असल्यामुळे दुसऱ्या आणखी काफिल्यांना जलालाबादवरूनच मागे फिरविलें असें त्यांनी सांगितलें. म्हणजे तेथे अद्याप पूर्ण शांतता नांदत नाही हें उघड आहे.

 येथे आल्यापासूनच्या रिकामपणाच्या काळांत पेशावर शहरासंबंधाने बरीच माहिती मिळाली. आजची ही पठाणांची वस्ती पाहून की काय कोण जाणे, येथील जुन्या परंपरेच्या हिंदु मंडळींत हिला ‘राक्षसनगरी' म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु-
" येनाक्षरसमाम्नायमधिगम्य महेश्वरात्
कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः
येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः
तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः
अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः"

असें ज्या जगांतील अद्वितीय वैयाकरणाचें वर्णन आहे, तो अष्टाध्यायीकर्ता पाणिनी येथेच जन्मला असें म्हणतात ! इतकेंच नव्हे तर एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणारा जमदग्निसुत प्रतापी परशुराम या पुरीचा जनक समजला जातो. पूर्वी परशुपुर किंवा पुरुषपूर म्हणून हे शहर विख्यात होते, असाही कित्येक जनांचा समज आहे. पुराणवस्तुसंशोधनखात्याने लाविलेल्या शोधांवरून परिक्षित राजाच्या सर्पसत्राची भूमि तक्षशिला नगरी हीही येथून जवळ असलेल्या तक्षिला गांवांतच असली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कदाचित् शिकंदराच्या (अलेक्झांडर) वेळचा ‘पौरस' राजाही हल्लीच्या पेशावरचा स्थापनकर्ता असू शकेल. इतकें मात्र निश्चितीने म्हणतां येते की, अल्बीरुणीने निर्दिष्ट केलेले 'परशुशावर' हे गांव किंवा अबुल फझलने आपल्या ग्रंथांत उल्लेखिलेले 'पेर्शावर' अथवा हल्लीचे पेशावर शहर ही सर्व एकच होत. दिल्लीपति अकबराने पेर्षावराच्या ऐवजी ‘पेशावर' हे नाव बदलून ठेवलें आणि तें यथार्थही होते, व आजही यथार्थ आहे. ‘पेशावर' याचा अर्थ सीमानगर म्हणजे सरहद्दीवरील शहर असा आहे.
 वायव्यसीमाप्रांताधिकाऱ्यांची राजधानी, सरहद्दीवरील मोठें लष्करी नाकें, वैमानिक दलाचे ठाणें, इराण, अफगाणिस्तान व मध्य आशियांतील इतर देश यांच्या सर्व व्यापाराची मोठी उतार पेठ, रेल्वेचें मोठें स्टेशन इत्यादि अनेक बाबींमुळे या शहरास महत्त्व प्राप्त झालें आहे. पाणी मुबलक असल्याने भाजीपाला विपुल व चांगला मिळतो. सर्व प्रकारचे धान्य व खाद्य वस्तू फारच स्वस्तांत मिळतात. महागाई आहे ती एका स्वच्छतेचीच ! हिंवाळ्याचा नुकताच प्रारंभ असला तरी थंडी, आपल्या पुण्याकडील मानाने बोलावयाचें तर, कडाक्याची पडते असें म्हणतां येईल. सूर्याचा प्रखरपणा असा भासतच नाही. अगदी स्वछ ऊन पडलें तरी तासच्या तास कांहीही त्रास न होतां उन्हांत बसतां येतें व बसावेंसें वाटतें ! शिवाय गेले दोन तीन दिवस पावसाची झिमझिम चालू आहे. यानंतर थंडीस अर्थातच जास्त जोर येईल.
  पठाणांची भाषा पुश्तु हीच सर्वत्र चालू आहे. पण पंजाबी बोलणारे लोकही आढळतात. लिपी उर्दू असल्याने हिंदु देवालयांवर असणारे फलकही उर्दूत लिहिलेले पाहून विचित्र वाटतें ! 'न वदेद्यावनी भाषाम् प्राणैः कण्ठगतैरपि' असा निर्बंध घालणाराने 'श्रीकृष्णमंदिर' अशी पाटी उर्दूत लिहिलेली पाहिली असती तर त्याचा कोपानल किती भडकला असता याची कल्पनाच करावी! मंदिरांत पूजेसाठी वरकोट [ओव्हरकोट] घालूनही आंत जाणारे पुजारी किंवा पठाणांच्या सारख्या रंगीत कापडाच्या पोकळ विजारी घालणाऱ्या हिंदु स्त्रिया दृष्टीस पडल्या म्हणजे एकदम धक्का बसल्यासारखें होतें. पण इकडील तो रिवाजच असें लक्षांत आल्यावर कांही वाटत नाही. कांहीही म्हटले तरी विजारी व सदरे घालणाच्या हिंदु स्त्रिया ही कल्पनां मनाला एकदम पटत नाही, डोळ्यांना रुचत नाही, हें खरें. पण हे देशदेशचे रिवाज आहेत.
 पुराणवस्तुखात्याचें संग्रहालय, सरकारी उद्यान, शहरचा बाजार व लष्करांतील नवीन धर्तीची दुकानें इत्यादि भाग प्रेक्षणीय आहेत. पेशावरचा किल्ला हल्ली ब्रिटिशांच्या ताब्यांत असून तेथे बिनतारी तारायंत्राचे मोठे स्टेशन आहे.
 अशा या पेशावर शहरीं मराठी बोलणारी मंडळी अगदी दुर्मिळ हें खरें; परंतु आश्चर्य हें की, येथे मुंबईहून चार पांच महाराष्ट्रीय मंडळी मुलामंडळींसह पेशावर पहाण्याच्या उद्देशाने आली होती ! कर्मधर्मसंयोगाने आम्ही सर्व एकाच ठिकाणी उतरलों होतों; म्हणून त्यांच्या सहवासांत चार दिवस झटकन् गेले. आता येथून क्वेट्टा गांठावयाचा व कंदाहारमार्गे काबूलला जावयाचे असा आजचा बेत आहे.

–केसरी, ता. ११ डिसेंबर, १९२८.


( २ )

 अटकेवर झेंडा लावल्याचें स्मारकः–काशी, प्रयाग, गया ही जशी धार्मिक हिंदूंची त्रिस्थळी यात्रा, तशीच मराठी इतिहासप्रेमी जनांची रायगड, रावेरखेडी आणि अटक अशी त्रिस्थळी यात्रा आहे. परंतु भेद इतकाच की, धार्मिक यात्रेकरूंची गर्दी लाखांनी मोजतां येते तशी ऐतिहासिक यात्रेकरूंची गोष्ट नाही. त्यांची गणनाच मुळी करतां येत नाही. कारण ते बहुशः नसतातच! ही परिस्थिति बदलून लवकरच ऐतिहासिक प्रसिद्ध ठिकाणी यात्रा करावयास जाणारे लोक वाढत जातील अशी आशा आहे.
 हे विचार सुचण्याचें कारण हेंच की, मराठ्यांच्या उत्कर्षाचें परमोच्च ठिकाण आणि हिंदु विजयाचा सुमंगल दिवस आज आमच्या आठवणींतून जात आहे. 'अटकेला झेंडा लावणें' ही म्हण प्रचारांतही आली; पण खुद्द अटकेला या प्रसंगाची आठवण करून देणारे स्मारक कांहीच नाही ! “ अटक' हा वास्तविक पंजाबांतला एक जिल्हा. परंतु नुकतेंच जिल्ह्याचें ठिकाण 'कॅंबेलपूर' येथे नेल्यामुळे अटकेचे महत्त्व कमी होत चालले आणि दिवसानुदिवस ते गांव ओस पडत आहे. वायव्यसरहद्दीला लागूनच हा गांव असल्याने येथे मुसलमानी पठाणांची वस्ती पुष्कळच आहे. अटक गांवांत आज पांच सहाच हिंदु घरें आहेत. यावरून मुसलमानांचे आधिक्य किती आहे हें समजेल. किल्ल्याच्या आजूबाजूची एकंदर वस्ती सुमारें तीन हजार आहे. त्यांत हिंंदूची दहांपेक्षा अधिक घरें नाहीत.
  असो. अशा परिस्थितींत मराठ्यांच्या अतुल पराक्रमाचे स्मारक केलें असतें तरी राहिलें नसतें. आमचा इतिहास पूर्वजांनी लिहून न ठेवल्यामुळे आज आम्हांला किती तरी अडचणी येत आहेत. आणि अटकेला आज जर स्मारक झाले नाही तर एकदोन पिढ्यांनंतर अटकेला मराठे गेले होते की काय याविषयीच मोठा वाद माजेल!
 अटकेचा किल्ला इ. स. १५८१ मध्ये अकबराने बांधला. त्याच्या उत्कर्षाला येथे 'अटकाव ' झाला म्हणून त्याने 'अटक' हे नांव ठेवलें, ते यथार्थच ! कारण पुढे मराठ्यांनी तो किल्ला काबीज करून मुसलमानांच्या लुटारू वृत्तीस 'अटक' केली. तसेच इ. स. १८१२ मध्ये रणजितसिंगानेही तेंच कार्य साधलें. इ. स. १८४९ मध्ये हा किल्ला जेव्हा ब्रिटिशांकडे कायमचा गेला तेव्हापासून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला अटकाव झाला हे तर प्रसिद्ध आहे. असा हा अन्वर्थक किल्ला सिंधूच्या पूर्वतीरावर असून लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. दिल्लीहून येणारा रस्ता व पेशावरचा मार्ग हे दोन्ही या अटक किल्लयांतून अशा युक्तीने रोखतां येतात की, फार सैनिकांचीही आवश्यकता लागत नाही. ज्याच्या हातांत अटक तो पेशावरचा स्वामी झालाच असें मानण्यांत मुळीच प्रत्यवाय नाही. पेशावर येथून केवळ सत्तेचाळीस मैल, म्हणजे राघो भरारीची अर्ध्या दिवसाची मजल आहे. सिंधुनद पार होण्यास एकच मार्ग त्या काळीं उपलब्ध होता आणि तो किल्ल्याच्या पायथ्याशीं असे; म्हणजे नाकेबंदी कशी पूर्ण होई हें ध्यानांत येईल. या किल्ल्यांत आजमितीसही ब्रिटिशांनी तोफा व पलटण ठेवून त्याचे महत्त्व ओळखलें आहे.
  ह्या किल्लयांत अर्थातच मराठ्यांच्या पराक्रमाचें कांहीच अवशिष्ट स्मारक नाही. पेशावरच्या रस्त्यावर ब्रिटिश सैन्याने केलेल्या बारीकसारीक कामगिरीचे वर्णन शिलांकित करून लहानसे का होईना पण स्मारक केलेलें आढळतें. पण या जगड्ड्याळ पराक्रमाचा कांही मागमूसही लागत नाही ! सरकारी गॅझेटिअरमध्ये अकबराने हा किल्ला बांधतांना कोणत्या लोकांना बळी दिले त्यांची नांवें किंवा ब्रिटिशांनी किल्ला घेतांना कामास आलेल्या क्षुल्लक अधिकाऱ्यांच्या पराक्रमाचें (?) वर्णन सांपडतें; परंतु मराठ्यांनी हा किल्ला पंधराशें मैलांची मजल मारून हस्तगत केला या पराक्रमाचा निर्देशही नसावा काय?
 ह्या किल्याच्या पायथ्याला जी वस्ती आहे ती बहुधा मुसलमानांचीच आहे आणि त्यांच्या मशिदी वगैरे धार्मिक स्थानेंही तेथे आहेत. त्यांच्या बाजूस एक शिवालय जीर्णोद्धरित असून, अटकेंंत असलेलेंं हिंदु मंदिर काय तेंं एकच ! तेथे कदाचित् मराठ्यांच्या पराक्रमाची खूण सापडेल या आशेने जावे तर वेगळाच इतिहास कळतो. किल्ला बांधला अकबराने हे खरं, पण त्याच्या बरोबर मानसिंग, तोडरमल, बिरबल ( ? ) इत्यादि हिंदु मंडळी असल्याने त्यांनी आपल्या पूजेसाठी शिवमंदिरही बांधविलें, तेंं किल्ल्याच्या अगदी द्वारासमीप होते. परंतु मध्यंतरीच्या काळांत काय झालें कोणास ठाऊक, देवालयाच्या इतर भागाचा विध्वंस होऊन तेथे सर्व मुसलमानी वस्ती आली आणि अटकेंतल्या त्या एकुलत्या एका शंकरासही कांही काल अज्ञातवास घडला!
  वीस पंचवीस वर्षांपूर्वी एक गुरुजी तेथे आले व हे दृश्य पाहून त्यांना विषाद उत्पन्न झाला. त्यांनी आपल्या एका पट्टशिष्याला आज्ञा दिली की, या शिवमंदिराचा जीर्णोद्धार करून हिंदु यात्रेकरूंची सोय लावून दे. सिंधुनदाच्या स्नानासाठी आणि मृतांच्या अस्थिसमर्पणासाठी कितीतरी यात्रेकरू तेथे येत असतात. परंतु कोठे तरी स्नान करावें व क्रियाकर्मांतर आटोपावे असा त्यांचा क्रम असे. आता त्या शिवमंदिरांत सुमारे वीस पंचवीस मंडळी मोठ्या व्यवस्थेने राहूं शकतील इतकी बांधलेली जागा आहे आणि पर्वकाळीं किंवा यात्रेच्या वेळी दोन तीन हजार यात्रेकरूंची सोय केली जाते. इतकेच नव्हे तर, एक सुंदर पण छोटासा घाट बांधून ठेवून अभ्यागतांच्या पुडीची सोयही केली आहे. हा सर्व उद्धाराचा कार्यक्रम गेल्या अठरावीस वर्षातलाच आहे. तेव्हा त्या हिंदु गुरूच्या चेल्यांना ज्यांनी हे सर्व कार्य घडवून आणलें त्यांनापूर्वीची काय माहिती असणार ? 'राघोबा पंत' अटकेंत आले होते इतके मी ऐकले आहे. पण ते कोठे होते, किती दिवस राहिले यासंबंधी कोणासच माहिती नाही असे त्यांनी सांगितलें.
 अटकेंत एकटेंच एक शिवालय, पण तेंही किल्लयाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ, सिंधूच्या पवित्र तीरावर वसलेलें; तेव्हा राघो भरारीने त्याच ठिकाणी आपला 'जरीपटका ' रोवला असावा असा तर्क करण्यास जागा आहे. निदान या काळीं आपणांस स्मारक करण्यास अन्य स्थान योग्य नाही. तें शिवालयाच्या आवारांतच व्हावें हें युक्त दिसतें. आजूबाजूची भूमि आज मुसलमानांच्या स्वामित्वाची असून अद्यापिहीं शिवालयाच्या जागेसंबंधी कोर्टात झगडे चालू आहेत.
  "बळानें काढूं ये मणि मकरदाढेंत दडला"–असे अशक्य कोटींतील एक कार्य कवीने वर्णिलेलें आहे. परंतु शिवालयाच्या महंतांनी मुसलमानांच्या ताब्यांत गेलेली आपली जागा परत मिळवून सुमारे चाळीस हजार रुपये खर्च करून स्मृतिशेष झालेले स्थान पुनः जागृत केलें व त्याला चिरस्थायी बनविलें. ही कामगिरी मकरदाढेंतून मणि काढल्यावर त्याला उचित असें कोंदण बसविण्यासारखीच प्रशंसनीय झाली आहे हे नि:संशय !
 या ठिकाणी स्मारक करण्यासाठी लागणारी जागा देण्यास महंत अनुकूल आहेत. पाहिजे असल्यास ‘भगवा झेंडा' कायमचाच सिंधूतीरावर फडकत राहील असें करावें. कारण किल्ल्यावरील ब्रिटिशनिशाण किंवा मशिदीच्या बाजूचीं हिरवीं फडकीं हींच काय ती तेथे दिसून येतात. भगव्या झेंड्याचा वार्षिक उत्सव केल्याने हा दिवसही चिरस्मरणीय होईल आणि भावी पिढीस या पराक्रमाचे महत्त्व कळेल.
  राघोबा चैत्र शु. प्रतिपदेस अटकेच्या जवळपास होते. त्यांचें एक पत्र चैत्र शु. ८ शके १६७९ चे उपलब्ध आहे, तें अटकेवर झेंडा रोवल्यानंतरचे असल्याने निश्चित मिति कोणती या वादविवादांत न पडतां ध्वजारोपणाचाच दिवस अटकेच्या उत्सवाला ठरवावा हें सर्वथैव उचित होईल.
 अटकेस आल्यावर राघोबादादांस ‘दुराणी किस झाडकी पत्ती' असे का वाटावयास लागलें हें सिंधूच्या तीरावर किंचित्क्षणमात्र उभें राहिल्यावर समजून येतें. किल्ला पिछाडीला, उजवे बाजूस काबूल नदी, पुढे दुर्लघ्य असा सिंधु इत्यादि दृश्यें पाहून आणि आपण पंधराशें मैल दूर येऊन हा किल्ला सर केला ही जाणीव झाली की, अशा आत्मविश्वासाचा वारा आपोआपच वाहूं लागतो. राघोभरारीचा विजय हा अखिल हिंदु जातीचा आहे हें लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्या वेळीं मुसलमानांच्या वाढत्या लुटारूपणास आळा घातला तो राघोबांच्या या थोर कृत्यानेच! तेव्हा हें स्मारक अखिल हिंदुमात्राकडून झाले पाहिजे !
  अटकेला उत्सव करण्यास जावें आणि घरोघर भगव्या झेंड्याच्याच गुढ्या उभाराव्या अशी सूचना कित्येकांनी केली आहे. ती या वर्षापासून अमलात आणावी आणि हरप्रयत्नेकरून अटकेस चिरकालीन स्मारकाची व्यवस्था व योजना करण्याच्या खटपटीस लागावें अशी आग्रहाची सूचना आहे.

–केसरी, ता. २५ डिसेंबर, १९२८.


( ३ )

  वायव्यसरहद्दीवरील परिस्थिति-वायव्यसीमाप्रांताचें संरक्षण करण्यासाठी विशेष लष्करी खर्च येतो तो का, याचे थोडक्यांत विवेचन आज करावयाचें आहे. वायव्यसरहद्दीचा प्रांत पूर्वी पंजाब इलाख्याचाच एक भाग होता. परंतु, तेथील अनेक भानगडी महत्त्वाच्या असल्याने खुद्द व्हाइसरॉयसाहेबांनीच तिकडे लक्ष पुरविणे आवश्यक होते, म्हणून लॉर्ड कर्झन यांनी १९०१ मध्ये हा वेगळाच प्रांत निर्माण केला. हजारा, पेशावर, कोहाट, बन्नू व डेराइस्माईलखान हे पांच जिल्हे मिळून हा प्रांत होतो. येथील सर्वाधिकार चीफ कमिशनर यांचेकडे असून त्यांचा संबंध दिल्ली येथील मध्यवर्ती सरकारशीं येतो. अफगाणिस्तानची सरहद्द याच प्रांताला अगदी लागून असल्याने हिंदुस्थानचें संरक्षण करण्याची जबाबदारी चीफ कमिशनरवर पडते; आणि लष्करी महत्त्वाचे कारणही हेंच ! पेशावर आणि कोहाट हे दोन लष्करी जिल्हे असून तेथे फौजही पुष्कळ ठेविली आहे.
 हिंदुस्थानच्या भौगोलिक रचनेमुळें थेट उत्तर सीमा रक्षण करण्यास विशेषसा त्रास किंवा खर्च पडत नाही. समुद्रकिनाऱ्यामुळेही त्या सीमाप्रांतावर लष्करी ठाणीं ठेवण्याची दगदग बरीच कमी झाली आहे. पण या सर्वांचें उट्टें वायव्यसरहद्दीचा बंदोबस्त करण्यांत निघतें.अफगाणिस्तानला दिवसानुदिवस राजकीय महत्त्व येत चाललें हें एक कारण तर खरेंच, परंतु अफगाण सरहद्द व हिंदुस्थानची सरहद्द यांमध्ये पुष्कळसा टापू कांही रानटी लोकांच्या ताब्यांत आहे हेच दुसरे महत्त्वाचे कारण वायव्यसीमाप्रांतावर लष्करी खर्च वरचेवर वाढविण्याचें आहे.
 शेतकन्यांमध्ये शेताची हद्द कोठे संपते किंवा दुसऱ्याचे शेत कोठून सुरू होतें याविषयी नेहमी तंटे चालतात. मग मोठमोठ्या राष्ट्रांच्या सीमेबद्दल रणें माजल्यास नवल कसचें? अफगाणिस्तानच्या सीमा ठरविण्याकरितां बरीच कमिशनें बसली होतीं. परंतु आपणांस इतर सीमा पहावयाच्या नसून आमच्या वायव्यसीमेविषयींच लिहावयाचें आहे. इ. स. १८९३ मध्ये ‘ड्यूरांड' नांवाच्या एका अधिकाऱ्याने अफगाण हद्दीची निश्चित आखणी करून हिंदुस्थानकडील सीमा ठरविली. तिला ड्यूरांड सीमा (ड्युरांड लाइन) असेंच म्हणतात आणि ती अफगाणिस्तानला लागून आहे. वास्तविक पहातां अफगाणिस्तानची हद्द संपते तेथूनच ब्रिटिश हिंदुस्थानच्या सीमाप्रांतास प्रारंभ व्हावयास पाहिजे होता. परंतु तसेंं नाही. म्हणूनच वायव्यसीमाप्रांताला विशेषेंकरून महत्त्व आलें आहे. ब्रिटिशांचा मुलूख व अफगाणांची ड्यूरांड सरहद्द यांमध्ये पुष्कळ रानटी लोक राहतात. यांच्यावर सत्ता ब्रिटिशांचीही चालत नाही किंवा ते अफगाणिस्तानच्या राजालाही मानीत नाहीत! लोकशाहीच्या निर्भेळ स्वातंत्र्याचा मासला किंवा नैसर्गिक राज्यपद्धति येथे या मध्यंतरींच्या प्रांतांत पहावयास मिळेल. त्यांच्याही निरनिराळ्या जाती आहेत आणि प्रत्येक जात स्वतंत्र समजली जाते.
 राजकीय सोईसाठी या स्वातंत्र्यभूमीचे तीन विभाग कल्पिले आहेत. वायव्य सीमेचा बलुचिस्तानकडील भाग मात्र अफगाण सरहद्दीशी लागूनच आहे. तेथे मध्यंतरींचा स्वतंत्र मुलुख असा मुळीच नाही. उपर्युक्त तीन काल्पनिक विभागांपैकी पहिला चित्रळपासून काबूल नदीपर्यंतचा; दुसरा काबूल व कुर्रम या दोन नद्यांमधला; आणि तिसरा वजिरिस्तान हा होय. या प्रत्येक भागांतील लोक निरनिराळे असून त्यांच्याशी ब्रिटिश सरकारचे संबंधही अगदी भिन्न भिन्न आहेत. ब्रिटिशांच्या राजकार्यधुरंधरांचे कौशल्य, त्यांची मुत्सद्देगिरी आणि नेहमीची 'दाणे टाकून कोंबडीं झुजविण्याची' व आपलें घोडे पुढे दामटण्याची वृत्ति ह्या सर्वांचे उत्तम प्रदर्शन या प्रांतांतच झालेलें दिसेल. ब्रिटिश राजकारणपटूंची ही कसोटीच आहे असें म्हणावयास प्रत्यवाय नाही.
  चित्रळ ते काबूल नदीपर्यंतच्या भागांत बरींंच लहान लहान 'स्वतंत्र' संस्थानें व त्यांवरील संस्थानिक आहेत. त्यापैकी महत्त्वाचे असे—( १ ) चित्रळचा मेहतर; (२) दीरचे नबाब; (३) स्वात लोकांचा अधिपति मियान गुल. चित्रळ आणि दीर हीं गावांचीं नांवें होत. स्वात ही एक रानटी जात आहे. स्वात नांवाची नदीही पण आहे. आफ्रिदी, मोहमंद, वजिरी, महशुदी, शिनवरी इत्यादि प्रमुख जातींचे लोक आहेत तसेच स्वात जातीचेही पण आहेत. सर्व जातींचे लोक महंमदानुयायी असें म्हणवितात आणि त्यांची मुल्लांवर (धर्मगुरूंवर) अलोट श्रद्धा असते. ते सांगतील तसें आचरण करण्यास हे रानटी लोक एका पायावर तयार असतात. त्यांची मान वाकते ती या धर्माध्यक्षांपुढेच. अस्तु.
  पहिल्या विभागांत ब्रिटिश लोकांनी आपलें वर्चस्व मोठ्या युक्तीने व खर्चाने स्थापन केलें आहे. तेथील मुख्यांना न दुखवितां, त्यांच्या वंशपरंपरा चालत आलेल्या वतनांना हात न लावतां, त्यांना मोठेपणा देऊन त्यांना आपलेसें करून घेतलें आहे. त्यांच्याकडून विशेषसा त्रास होत नाही. दुस-या विभागांत आफ्रिदी लोकांचें विशेष प्राबल्य. तसेंच, पेशावर ते काबूलचा रस्ता याच विभागांतून गेलेला आणि स्वतंत्र मुलखाचा अगदी अरुंद भाग या विभागांतच आहे म्हणन येथे संरक्षण जास्त लागतें. तिराह डोंगराची रांग या दुसऱ्या विभागांत असल्याने रानटी लोकांना लपूनछपून लुटालूट करण्यास पुष्कळच अवसर मिळतो. तिराहचे राजेसाहेब म्हणून एका स्वतंत्र भागांतील टोळीचे नायक आहेत. हेही सर्व लोक ब्रिटिशांशी सख्यत्वाने वागतात. कधी कोणाशी मिळून मिसळून न वागणारे रानटी पुंड इतके ‘नरम' कसे आले याचे कित्येकांना कोडें पडतें. पण त्यांतील मुख्य गोम ‘द्रव्येण सर्वे वशाः' ही आहे.
 इ. स. १९२५ साली उघडलेली खैबर रेल्वे याच भागांत आहे. ब्रिटिशांची हद्द जमरूद (जमदग्निपुरी?) येथे संपतें. हें गाव पेशावरपासून सात मैलांवर आहे. परंतु जमरूदच्या पुढे वीसपंचवीस मैल ही रेल्वेलाइन लंडीखान्यापर्यंत गेली आहे. लंडीखान्यापाशी ब्रिटिश व अफगाण सरहद्दी एकत्र येतात. जमरूद आणि लंडीखाना यांच्या दरम्यानचा भाग स्वतंत्र मुलखापैकी असतां त्या त्या रानटी लोकांशी गोडीगुलाबीने वागून, त्यांना कांही सवलती देऊन, त्यांच्या कांही अटी मान्य करून, इंग्रजी अधिक-यांनी रेल्वेचा फाटा नेण्यास त्यांची संमति युक्तीने मिळविली. इतकेंच नव्हे तर ठिकठिकाणीं टेहळणीचीं नाकीं व मधूनमधून फौजफाटा ठेवण्यासाठी तात्पुरते किल्ले यांची जागाही रानटी लोकांपासून भाड्याने मिळविली. लंडीकोटलचा भुईकोट किल्ला, तेथील लष्करी छावणी, इत्यादिकांसाठीही जमीन भाडोत्री घेतली आहे. हे भाडें अर्थातच जबरें असणार. तसेच, रेल्वे बांधतांना कंत्राटें द्यावयाची होती ती सर्व तेथील रानटी लोकांसच द्यावी लागलीं असें म्हणतात. मजुरी करण्यासाठी दुसऱ्या कामगारांना येऊं दिलें जाणार नाही, आमच्याकडूनच हें काम झालें पाहिजे, अशी अट या रानटी लोकांनी घातली होती असे समजतें. त्यामुळे रेल्वेचे काम साहजिकपणेंच भलत्या महागाईने झालें. रेल्वेवर इतर कामे करण्यासाठी नोकर ठेवावयाचे तेही तद्देशीयच ठेवण्याविषयीची मागणी या स्वतंत्र लोकांनी केली होती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीही तशीच आहे खरी. वरच्या अधिकाऱ्यांशिवाय बाकी सर्व नोकर हे रानटी पठाणच आहेत. या सर्व अडचणींमुळे रेल्वेलाइनच्या आसपासची थोडी जागा सोडून इतरत्र जाण्यायेण्याची मनाई आहे. कारण त्या ठिकाणी ब्रिटिश सत्ता नाही.
  "स्वस्थ बसायला काय घेशील?" असे खोडकर मुलाला विचारण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. पण ब्रिटिश सरकार खरोखरीच गप्प बसणाऱ्या आफ्रिदी, वजिरी, महशुदी इत्यादि प्रजाजनांस मासिक वेतन देतें ! लुटालूट, मारहाण, खून, दरवडे हेच ज्यांचे वंशपरंपरेने चालत आलेले धंदे, त्यांना शांततेचीं तत्त्वें शिकवून ‘माणसाळण्या'चा प्रयत्न केला तर त्यांत यश कितीसें येणार ? महिनाभर कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही तर त्या माणसाचे वर्तन चांगलें ठरतें आणि त्याच्या शक्तीप्रमाणे त्याला वेतन मिळतें, मोठमोठ्या चोऱ्या करणारा इसम महिनाभर ‘स्वस्थ' बसला तर त्याला अधिक वेतन मिळतें. अशा तऱ्हेची व्यवस्था टोळीच्या नायकांच्या वतीने केली जाते आणि त्यांना ‘सद्वर्तनाचें पारितोषिक' मिळतें.
 याच्या उलट एखाद्या टोळीपैकी कोणी इसमाने कांही गुन्हा केला असला तर सर्व टोळीला जबाबदार धरलें जातें आणि त्याच्या म्होरक्याला त्याचा तपास लावून देण्याविषयी आज्ञा होते. तपास लागला नाही तर त्या कंपूस कांही तरी दंड ठोठावण्यांत येतो आणि मासिक वेतनांतून किंवा अन्य मार्गाने तो वसूल करतात. कलागती लावून आपला कार्यभाग साधण्याची राजनीति येथे पुष्कळ वेळां लागू केलेली आढळते. कारण सरहद्दीवरील या लोकांमध्ये नेहमी भांडणें चालू असतात. राहतां राहिला तिसरा भाग वजिरिस्तानचा. तो मात्र अत्यंत कणखर व त्रासदायक प्रांत आहे. हिंदी फौज रात्री बारा वाजतांही लढाईसाठी तयार असते ती याच लोकांच्या भीतीमुळे. ब्रिटिशांनाही या लबाड लोकांपुढे हात टेकावे लागले आहेत. येवढ्याच टापूंत लढवय्ये निदान ३०,००० असावेत असा सरकारी अंदाज आहे! आणि हे योद्धे अत्यंत कडवे, क्रूर व कमालीचे शूर! त्यांचा नेम अगदी अचूक असून आधुनिक विलायती रायफल्स व पिस्तुलें त्यांचे जवळ सदैव असतात. त्यांना शांततेचे वावडें आहे. सधन व समृद्ध देशांत लटालूट करावी हीच त्यांची अत्युच्च आकांक्षा. अशा लोकांना कोणत्याही मार्गाने कह्यांत ठेवणें म्हणजे निखाऱ्याची मोट बांधण्यासारखेच आहे!
 वजिरी लोकांचा त्रास ब्रिटिश राज्यकर्त्यांना किती आहे याची कल्पना खालील आकड्यांवरून येईल. इ. स. १९१९ सालीं अफगाणिस्तानशीं हिंदुस्थान सरकारचें युद्ध चालू होतें. तेव्हा या वजिरी पुंडांना फार जोर चढला आणि एका वर्षांत सरहद्दीवर
  ६११ लहानमोठे दरवडे पडले
  २९८ इसम मारले गेले
  ३९२ ,, जखमी झाले
  ४६३ ब्रिटिश प्रजाजनांना पळवून नेलें
  ३० लाख रुपयांची मालमत्ता लुटली गेली !!
  वजिरांची वृत्तीच अशी आहे कीं, त्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रति चार वर्षांनी ब्रिटिशांना त्यांच्याशी लढाई चालू करावी लागत असे. केलेले दंड थकले, किंवा अशाच कांही अक्षम्य अपराधांसाठी वजिरी लोकांवर हल्ला करावयाचा, तर विमानांतून बाँब फेकून त्यांना जेरीस आणावयाचें आणि ते शरण (?) आले की, पुन: सलोख्याने रहावयाचें, अशी रीत आज किती तरी वर्षे चालू आहे. इ. स. १८५२ पासून आजपर्यंत १७ वेळां ब्रिटिशांना वजिरांशी लढावे लागलें! अशा नाठाळांशी गांठ असल्याने वजिरिस्तानांत ठेवावयाची फौज अगदी चलाख, शूर आणि विश्वासाची ठेवावी लागते.
  या सरहद्दीवरील सर्व जातींना 'अफगाण' अशी सर्वव्यापी संज्ञा दिली जाते. त्या सर्वात सामान्य असे गुण पुष्कळच आहेत. मनोविकासाचा अभ्यास करणारांस हें एक मासलेवाईक निसर्गसिद्ध मन अभ्यासावयास मिळेल. नीत्शे म्हणून जर्मन तत्त्वज्ञ होऊन गेला; त्याने नरश्रेष्ठाची महति सांगून त्याची योग्यता ठरविण्याचे साधनही आपल्या पुस्तकांत दिलें आहे. ' डोळ्यांतून टिपूसही न गाळतां किंवा हृदयावर कोणत्याही भावनेचा पारणाम न होऊं देतां मनुष्यजातीवर प्रहार करणें' ही शक्ति जितक्या जास्त प्रमाणांत असेल तितका तो मोठा समजावा, असें नीत्शेचें म्हणणें आहे आणि हीच कसोटी लावून पाहिली तर, हे अफगाण सरहद्दीवरील रानटी, लोक जगांतील इतर लोकांपेक्षा पुष्कळच वरचा नंबर पटकावतील!
  बंदूक ही त्यांची शब्दश: अर्धांगीच. रात्र असो, दिवस असो, निद्रा घेतांना, जेवतांना, बंदुक ही जवळ खांद्यावर असावयाचीच! कंबरेच्या पट्यांत किंवा छातीवर गोळ्या अडकवलेल्या दिसतात. नेमबाजींत यांचा हात धरणारी जात दुसरी कोणती असेल असे वाटत नाही. यांची रक्ततृष्णाही वाघासारखी. सूड घेण्याची वृत्ति सर्पापासूनच हे शिकले असावेत किंवा सर्वांनाच धडा या नरपशूंनी घालून दिला असावा! पिढीजात वैरभावामुळे आपसांत खून करण्याचे प्रमाण यांच्यामध्यें बेसुमार वाढलेलें दिसतें. पितरांना परलोकीं उत्तम गति प्राप्त व्हावी म्हणून श्राद्धादि कर्मे आपल्याकडे करितात. अफगाणी क्रूरांचे म्हणणें असें की, वडिलांच्या मृत्यूला जो इसम कारणीभूत झाला असेल त्याला ठार केल्याविना मुलगा पितृऋणांतून मुक्त होऊ शकत नाही ! अशी ही खुनांची परंपरा सारखीच चालू असते. आणि पितरांना स्वर्लोक मिळवून देणारा पुत्र नसला तर हें काम बायका देखील करतात ! लढाई करणे म्हणजे या लोकांचा नित्याचा व्यवसाय असावा असें दिसतें. आपसांतील भांडणे कधी मिटलेलीं नसतातच; आणि ही भांडाभांडी कोर्टांत किंवा तोंडांनी चालावयाची नाही. त्यांची न्यायदेवता एकच आणि ती म्हणजे बंदूक! अशा या रानटी लोकांवर राज्य करणार कोण? त्यांना कह्यांत ठेवणे जवळ जवळ अशक्य आहे. त्यांना शिक्षणाने आपलेसें करून घेणें म्हणजे भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणें--

"जो मूर्खास सुभाषिते वश करूं ऐसें झणीं बोलतो."
या प्रकारचेंच ते उदाहरण होईल. पण “शिक्षा देव तयाला करिल म्हणोनि उगाच बैसावें" अशी दुर्बल वृत्ति शिकविणारे ख्रिस्ती मिशनरी आज तीस पस्तीस वर्षें अफगाण सरहद्दीवर ठाणें देऊन येशूच्या उदाहरणाने रानटी लोकांची मनोवृत्ति पालटण्याचा प्रयत्न करीत आहेत! ‘मधुबिंदुनें मधुरता' आणण्याचाच हा प्रयत्न नव्हे काय?

 ब्रिटिश सरकारचीं सरहद्दीविषयीचीं दोन धोरणें आहेत. एक पुरोगामी ( फॉर्वर्ड पॉलिसी ) व दुसरें संतुष्ट वृत्ति ( क्लोज बॉर्डर पॉलिसी). पुरोगामीचे पुरस्कर्ते म्हणतात की, येन केन प्रकारेण मिळालेल्या ओसरीवर पाय पसरावे. आणि याच धोरणाने पुष्कळ पैसा खर्चूनही खैबर घाटांत आणि वजिरिस्तानांत ब्रिटिशांचा प्रवेश झाला आहे. संतुष्ट धोरणाचे लोक असे म्हणतात की,"आपल्या हद्दीपलीकडे जातां कशाला? तिकडले रानटी लोक आपसांत भांडून मरेनात ? तुम्हांला त्याचें काय? आपल्या हद्दीवर एक मोठें आवार (कॉंपाउंड) बांधून टाका. चीनला भिंत आहेच. तशीच पाहिजे तर बांधा आणि पलीकडे मुळीच पांहू नका." हिंदुस्थान सरकारला ही दुसरी विचारसरणी अगदी पसंत पडत नाही. याची अनेक कारणें आहेत. लुडबुडण्याला क्षेत्र नाहीसें होईल ही पहिली भीति. हिंदुस्थानांतील राज्य केवळ तरवारीच्या जोरावर प्रजेच्या इच्छेविरुद्ध चालत असल्याने तें उलथून पाडण्याचा प्रयत्न करणारे या स्वतंत्र मुलखांत येऊन सारखा त्रास सरहद्दीवर सुरू करतील ही दुसरी भीति. गोऱ्या बाळांची लागलेली वर्णी आणि लष्करी खात्याप्रीत्यर्थ विलायतेला जाणारा पैसा, ही सर्व बंद पडतील म्हणून भीति वाटतेच. अफगाणिस्तान व स्वतंत्र रानटी लोक यांचें मेतकूट जमलें तर कठीण प्रसंग ओढवेल अशीही धास्ती आहेच. आणि छूः म्हणून कोणावरही सोडण्यास हातीं कोणी तरी असावें अशी स्वार्थी मुत्सद्देगिरीची भावना नसेल कशी? या सर्वांच्या जोरावर हिंदुस्थान सरकार पुरोगामी धोरणानेच वागत आहे. यामुळे प्रजेवर कराचा बोजा पुष्कळ पडतो हें तर खरेंच. पण हल्ली चालू आहे असे अफगाणिस्तानातील बंड जरी झाले तरी बंडखोरांना कोणा तरी मोठ्या सरकारचें साह्य आहे, या संशयी वृत्तीने हिंदुस्थानकडे इतर राष्ट्रें पाहूं लागतात!

–केसरी, १ जानेवारी, १९२९.


( ४ )

 घोडा निकामी का झाला ? भाकरी का करपली ? विड्याची पानें कशाने कुजलीं? या तिन्ही प्रश्नांस 'न फिरविल्याने' असे एकच उत्तर लागू पडतें. तीच गोष्ट विमानांचीही दिसते. कारण येथे रोज सकाळी सूर्योदयाबरोबर निदान दोन विमानें तरी आकाशांत गंभीर ध्वनि करीत संचरतांना दिसतात. सध्याच्या अफगाण परिस्थतीमुळे प्रातःकालीन टेहळणीस प्रारंभ होतो, अशांतला मुळीच प्रकार नाही. कारण 'हवाई जहाज' येथील जनतेच्या इतकें आंगवळणी पडले आहे की, डोक्यावरून कितीही फेऱ्या झाल्या तरी तिकडे त्यांना पहावेसे वाटत नाही. उलट पेशावरांत आलेला परकी मनुष्य ओळखण्याची खूण म्हणजे तो आकाशांतील विमानाकडे मान वर करून पहात असतो हीच समजतात. सुभाषितकारांना 'अतिपरिचयादवज्ञा' कशी होते हें दाखविण्यास आणखी एक ताजें उदाहरण मिळालें !
 विमानांची फेरी--या आकाशयानांचा उपयोग नुकताच फार महत्त्वाचे कामीं झाला. काबुलशी दळणवळण थांबून बरेच दिवस झाले. तेथील खुशालीची खबर आणण्यासाठी येथून विमान गेल्याचें लिहिलें आहेच. त्यानंतर म्हणजे गेल्या दोन तीन दिवसांत आणखीही विमानें काबूलला गेलीं होतीं व परतही आलीं. इंग्रजी वकिलातींतील अधिकाऱ्यांची बायकापोरें हल्लीच्या धांदलीच्या काळीं काबुलला राहणें इष्ट नसल्याने त्यांना पेशावरला आणण्यासाठी या आकाशयानांचीच योजना शक्य होती व तदनुसार तें काम पूर्णपणे यशस्वी झालें. इतकेंंच नव्हे तर, फ्रेंच व जर्मन वकिलांच्या कुटुंबांतील कांही मंडळी येथे सुरक्षिततेसाठी आली आहेत. अर्थातच यांच्याकडून काबूलमधील परिस्थितीची खरी माहिती मिळण्याचा संभव होता. पण मोठ्या कडेकोट बंदोबस्तांत या सर्व राजकीय पाहुण्यांची सोय केली असल्याने त्यांचें नुसतें दर्शन होणेंच मुष्कील झालें आहे. पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून गेल्यावर त्यांना कोणाजवळ कांहीही न बोलण्याची सक्त ताकीद असल्याचें कळलें ! शिवाय त्या पडल्या जर्मन अथवा फ्रेंच स्त्रिया. त्यांना इंग्रजी पूर्णपणे येत नाही ही अडचण कशी तरी दूर करावी तर,'आळी मिळी गूप चिळी'ची धोंड मधली मुळी हलत नाहीच! बरें, इंग्रज वकिलांची पत्नी लेडी हंफ्रेस् या बाईची गांठ घ्यावी म्हटले तर, त्या येथील चीफ कमिशनरकडे उतरलेल्या! वायव्यप्रांताच्या 'राजा'कडे ह्या खाशा पाहुण्या! तेव्हा अगोदर दाद लागण्यासच वेळ लागला! चीफ कमिशनरचे सेक्रेटरी चौकशीला आले की, कोणत्या पत्राचे प्रतिनिधि पाहुण्या बाईची भेट घेऊ इच्छितात? 'केसरी'चें नांव सांगतांच त्यांना काय वाटलें कोणास ठाऊक, त्यांनी आंतून जाऊन कमिशनरचा निरोप आणला की, इंटेलिजन्स खात्याच्या (सी. आय. डी.) वरिष्ठांकडे जा व तुमच्या वर्तमानपत्रासंबंधी त्यांचे मत लिहून आणा. चीफ कमिशनरनी मागितलें आहे.   मुलाखतीचा निष्फळ प्रयत्न—सी. आय. डीच्या वरिष्ठांकडे जाताच त्यांनी कशासाठी मत पाहिजे असा प्रश्न केला. सर्व हेतु सांगतांच ते म्हणाले,'केसरी' हे दैनिक का साप्ताहिक आहे? कोठे निघतें हें वर्तमानपत्र? संपादक कोण? त्यांची शंकानिवृत्ति करण्यासाठी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरें दिली. श्री. केळकरांचे नांव घेतांच ते वरिष्ठ गुप्त पोलीसाधिकारी म्हणाले की, "ओ, मि. केळकर माझ्या परिचयाचे आहेत. त्यांना आम्ही सरहद्दीवर नेलें होतें." इतर कांही बोलणें झाल्यावर त्यांनी टेलिफोनमधून आपल्या हाताखालच्या अधिका-यांकडून केसरीसंबंधी माहिती विचारली आणि "मि. केळकरांचे 'केसरी' हे साप्ताहिक जबाबदारीने चालविले जात आहे" असे आपलें मत लिहून दिलें.
 एवढ्याने लाटांचें समाधान झालें. म्हणजे लेडी हंफ्रेस यांना मुलाखत देता का? असा प्रश्न विचारण्यास अनुज्ञा मिळाली! परंतु अस्वस्थ मन असल्याने किंवा कांही अन्य कारणाने, त्यांनी दिलगिरी प्रदर्शित करून नकार दिला! समाधानाला जागा इतकीच होती की, दुस-या कोणत्याही वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीस त्यांनी मुलाखत दिली नाही व बहुधा देणारही नाहीत!
  अफगाणिस्तानांतून तारा व टपाल सध्या कंदाहारमार्गे येत आहेत. नेहमीचा खैबर घाटामधला डाका-जलालाबाद हा रस्ता तर बंद आहेच. पण ताराही तोडल्या गेल्या असल्याचे समजतें. लंडीखाना म्हणजे ब्रिटिशांचे अखेरचें ठाणें. हे खैबर घाटांत आहे. तेथपर्यंत तार व टेलिफोन असल्यास नवल नाही. पण तेथून पुढे अफगाणिस्तानची हद्द आहे व त्या प्रांतांतून गेल्याविना तर चालत नाही. काबूलशी हिंदुस्थानचा तारायंत्रद्वारा संबंध असणें व्यापारी दृष्टीने आवश्यक नसलें तरी, लष्करी दृष्ट्या त्याला विशेष महत्त्व असल्याने इ. स. १९२२ मध्ये हिंदुस्थान सरकारने उदारपणाने अफगाण अमिरांस एक मोठी देणगी दिली, ती कोणती म्हणाल तर, लंडीखान्यापासून पुढे काबूलपर्यंत लागणाच्या तारा व खांब यांची! आणि अफगाण सरकारनेही फुकटचेॆं दान घ्यावयाचें नाही अशा वृत्तीचें प्रदर्शन करण्यापुरतेंच धोरण ठेवलें. राजकारणी प्रेमाने पुढे आलेलें बक्षिस स्विकारून अफगाण हद्दीत तारांचे खांब रोवण्यासाठी लागलेली मजुरी मात्र काबुलाधिपतींनी दिली. अशा प्रकारे या निकटवर्ति देशांत विद्युत्संदेशाचे दळणवळण इ. स. १९२२ पासून स्थापित झालें. वर्तमानपत्रासाठी इतरत्र असणाऱ्या सवलती या पेशावर-काबूलमार्गाने तारा गेल्या असतां मिळत नाहीत. प्रतिशब्दास तीन आणे हा अफगाणिस्तानास पाठवावयाच्या तारांचा दर आहे. अद्याप तेथे वर्तमानपत्रांचा प्रसार व्हावा तितका झाला नसल्याने ही सवलत मिळाली नसावी; पुढे यथाकाल अवश्य मिळेल अशी आशा आहे.
 पेशावरपासून कोहाटला जाण्याची सडक मध्यंतरी पांचसात मैल गैरमुलखांतून म्हणजे स्वतंत्र प्रदेशांतून जाते. रेल्वेने कोहाटशी दळणवळण असलें तरी सडकेचा प्रवास थोडक्यांत व जलदीने होतो. रेल्वेमार्गाने कोहाट एकशेंएकतीस मैल पडते तर मोटाररस्त्याने केवळ एक्केचाळीस मैलांचाच प्रवास करावा लागतो. या रस्त्यावरून प्रवास करतांना कांही काल स्वतंत्रतेचे वारें लागतें. त्या प्रांतावर अफगाण निशाण फडकत नाही आणि ब्रिटिशांचें यूनियन जॅक तर दृष्टीसही पडणार नाही. निशाणासारख्या चिंधोट्या मात्र ठिकठिकाणी पुष्कळशा लागलेल्या आढळतात. स्मशानभूमींत कोणा 'पुण्य' पुरुषाच्या थडग्याच्या बाजूस लोकांनी आपापली जीर्ण वस्त्रें फाडून लावलेली असतात. कारण, खेडवळ जनतेस औषधपाण्याचा उपाय म्हणजे हाच! थोर साधूच्या कापडाची चिंधी बांधणें म्हणजे नवस करण्यापैकीच प्रकार आहे. तेथील झाडास विशेषच थोरवी येते. त्या झाडाचा पाला सर्व रोगांवर किंवा हर प्रकारच्या जखमांवर रामबाण उपाय मानला जातो. अशा फाटक्या चिंध्यांशिवाय दुसरें कापड फडकतांना दिसत नाही.
 आफ्रिदी लोकांची स्वतंत्र वृत्ति--या प्रांतांत विशेष प्रामुख्याने गोष्ट दिसत असेल तर ती म्हणजे लोकांची स्वतंत्र वृत्ति. मुसलमान इसम म्हणजे अदबीने कंबर लववून सलाम करणारा असा आपणांला ठाऊक असतो. परंतु इकडील प्रांत त्यांचा नूर अगदी पालटलेला दिसतो. अत्यंत स्वतंत्र आचाराचे हे रानटी लोक पाहिले की, यांच्या बेफाम वर्तनाचे कौतुक करावेंसें वाटतें आणि आपणांस असें भाग्य कधी लाभेल काय हा विचार मनात येतो. सर्वांत मौज वाटते ती त्या वन्य पण स्वतंत्र लोकांना भिऊन वागणाऱ्या आपल्या लोकांची. ब्रिटिश अधिकारी असोत किंवा दुसरे व्यापारी अथवा इतर साधे लोक असोत, ते या स्वतंत्र प्रांतांतील लोकांना भिऊन इतके नरम येतात की, अगदी लवून सलाम करून किंवा अशाच नम्रतेने त्यांच्यापुढे हांजीहांजी करतात! रस्त्याच्या अगदी बाजूला म्हणजे दहा बारा पावलांवरच बंदुका तयार करण्याचा मोठा कारखाना आहे. ब्रिटिश मुलखांत बंदुका बाळगण्यास परवाना लागतो तर येथे ती शस्त्रे दिवसाढवळ्या अगदी भर रस्त्यावर बनवीत असतात. हें दृश्य प्रथमतः जरासे विचित्रच दिसतें. पण लष्करी अधिकारी तेथे तो कारखाना पहाण्यास येऊन अचंब्याने चकित होतात. रानटी लोक, अक्षरशत्रु, पाश्चात्य यंत्रशास्त्राची जानपछान नसलेले, अगदी नवीन प्रकारच्या रायफल्स व बंदुका तयार करतात हें आश्चर्य करण्यासारखें नाही असें कोण म्हणेल? आधुनिक सुधारणेचा थोडासा गंध या स्वतंत्र रानटी लोकांना लागलेला असेल तो या शस्त्रांचा आणि ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साध्या यंत्रांचाच! अगदी साधीं यंत्रें वापरूनही इंजिनच्या सहाय्याशिवाय उत्तम तऱ्हेचीं शस्त्रें तयार करता येतात, हें या आफ्रिदी लोकांनी जगाच्या निदर्शनास आणलें आहे! सर्वच काम माणसांकरवी चालत असल्याने अर्थातच आठ दिवसांत एक बंदूक (रायफल) तयार होते व सुमारें ऐशीं नव्वद रुपयांस ती त्या कारखानदाराला पडते. याच बंदुकीची विक्रीची किंमत सुमारे दोनशे तीनशें रुपये असते. म्हणजे बंदुकांना भारोभार रुपये मिळतात असें म्हणतां येतें.
 हा बंदुकांचा कारखाना भर रस्त्यावर आहे; आणि असे किती तरी कारखाने या स्वतंत्र मुलखांत आहेत. बंदुकांना अतिशय मागणी असल्याने दिवसभर त्यांचें काम चालू असतें. लांकडी, लोखंडी हाताचें किंवा यंत्राचे काम करणारे सर्व कारागीर पठाणच. देखरेखीसाठीही वेगळा ‘तज्ज्ञ' असा कोणी नाही ! सर्वच स्वतंत्र आणि सर्वच मालक. असा प्रकार असल्याने कारखाना फारच उत्तम व्यवस्थेने चालतो. अशा मुलखांतून येणाऱ्या दरवडेखोरांची भीति साहजिकच असावयाची.
 नाताळाचा सणः–अफगाणिस्तानचा रस्ता बंद असल्याने इकडील व्यापाऱ्यांचें फारच नुकसान झालें आहे. तशीच तिकडील लोकांची बरीच गैरसोय झाली असली पाहिजे! सुमारे दीड महिना झाला, मालाची जा-ये सर्व थांबली आहे. कालच 'बडा दिन'( नाताळ ) झाला. त्यासाठी लागणारी फळें व सुका मेवा काबूलहून आला नाही, म्हणून होता तोच माल जरा तेजीने विकला गेला. काबूलला तर नाताळांतील मेजवानीसाठी युरोपियनांना डब्यांतल्या पदार्थांचा तुटवडा पडला म्हणतात. मदिरा संपुष्टात आली असल्याने त्यांना मोठी काळजी होती की, हा मोठा वार्षिक सण ‘सुका' जाणार की काय? पण काबुलांतच दरवडेखोरांची टोळी आल्याने दुकानें वगैरे बंद होतीं आणि कित्येकांचीं आवडतीं कुटुंबांतील माणसें या नाताळाच्या आदले दिवशींच हिंदुस्थानांत निघून आलीं ! मोठ्या सणाचा हा बेरंग झाला खरा; परंतु जिवावर बेतलें होतें तें शेपटावरच बचावले असे म्हणतात तशापैकी हा प्रकार होय. येथे पेशावरला मात्र या सणाचें स्वरूप स्पष्ट दिसलें; छावणीभागांत सोजिरांची गंमत पाहून सर्व लोकांना फार मौज वाटली ! मोठमोठ्या रस्त्यावरून केवळ तास दीड तासासाठीच दुपारी हिंडावे लागले. तेवढ्यांत तीन सोजीर तीन ठिकाणी झिंगत गटारांत लोळत असलेले दिसले. मदिरेचा पूर्ण अंमल त्यांजवर बसलेला होता आणि या सणाचें माहात्म्य त्यांतच आहे!
 आपल्याकडे फाल्गुनांत पौर्णिमेला होळी करतात. तशीच इकडे संक्रांतीस होते. आतापासून सायंकाळी लहान मुले घोळका करून लांकडे गोळा करण्यासाठी गाणी म्हणत हिंडत असतात. विशेषेंकरून डोळ्यांत भरण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलींचीही वेगळी होळी होते. त्याही कंपू करून पैशासाठी किंवा लांकडांसाठी शेजाऱ्यापाजाऱ्याकडे मागणी करतात.
 थंडीचा कडाका जरा जास्त होऊं लागला आहे. दिवस तर पांच सवापांच वाजण्याचे सुमारासच मावळतो. पाऊस बरेच दिवसांत पडला नाही. दहा बारा मैलांवर दिसणा-या निळसर टेकड्यांच्या माथ्यांवर शुभ्र बर्फ पडलेलें दिसतें.

-केसरी, ८ जानेवारी, १९२९.



( ५ )

 आम्ही हिंदुस्थानचे राज्यकर्ते आहोत, ही गुर्मीची भावना इंग्रजांच्या मनांत कशी प्रबल असते हे पहाण्याचा प्रसंग आला. काबूलहून हवाई जहाजें वरचेवर येऊ लागली आणि त्यांतून बरीच मंडळी पेशावरास आली. त्यांच्या कडून मिळालेली माहिती कित्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांना असावयाची. म्हणून अशा अधिकाऱ्यांना भेटण्याचा व प्रचलित परिस्थितीसंबंधाने बोलण्याचा उपक्रम मी चालविला. याच सुमारास लाहोरच्या वातावरणांत मुरलेले आणि अँग्लो-इंडियनी धोरणाचे पुरस्कर्ते असे एक गृहस्थ भेटले. त्यांच्याशी संभाषण करतांना वरचेवर "आम्ही अगदी तटस्थ वृत्तीने सर्व हालचालीं पहात आहोंत," "शिनवरी आम्हांला मुळीच त्रास देत नाहीत," इत्यादि वाक्यांत ‘आम्ही' या शब्दाचें राहून राहून आश्चर्य वाटे. सरकारी अधिकारीही सरकार असा तृतीयपुरुषी निर्देश करीत असतां या भाडोत्री इसमांनी प्रथमपुरुषी बहुवचनाचा मान आपण होऊनच लाटावा हें विचित्र होय. पुढे आणखी बोलणे चाललें असतां ते गृहस्थ म्हणाले,"आम्ही या सर्व पाहुण्यांची आमच्या खर्चाने तजवीज करीत आहोत. त्यांची इतक्या उत्तम प्रकारे सरबराई आम्हांस आणखी बरेच दिवस करावी लागेल." या वेळी मात्र मध्ये बोलल्यावाचून राहवेना. "म्हणजे हे सर्व खास हिंदुस्थान सरकारचेच पाहुणे ना ? प्रजाजनांकडून मिळालेल्या करांतूनच यांचे आदरातिथ्य व्हावयाचे. तेव्हां पर्यायाने हिंदी प्रजाजनांनीच या पाहुणे मंडळीचे आदरातिथ्य चालविलें आहे, असेच ना आपले म्हणणे ??" असा त्याला परत प्रश्न करतांच स्वारी शुद्धीवर आली व म्हणाली की,"हो, हो, तसेच. पण हा खर्च वैमानिक खात्यांत घातला जाईल आणि तो कायदेमंडळापुढे चर्चेलाही येऊन चालणार नाही." अँग्लो-इंडियनी कुर्रा म्हणतात तो हा असला ! बाकी वरिष्ठ कायदेमंडळाच्या एखाद्या सभासदाने या खर्चाचा आंकडा प्रश्न विचारून मागवून पहावा.
 हिंदु-मुसलमानांची तेढ वायव्यसीमाप्रांतांत विशेष दिसून येते आणि ती चटकन् डोळ्यांत भरते. हिंदु हे संख्याबलाने अगदीच कमी असले तरी, समाजांत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. कोणतेही गांव घ्या, तेथील प्रमुख व्यापारी हिंदूच आढळावयाचे ! (शीख हे हिंदूंत समाविष्ट धरले आहेत). हिंदूंचा व्यापारी बाणा व तज्जन्य धन ही मुसलमानांना पहावत नाहीत आणि म्हणूनच ते हिंदूंचा द्वेष करतात. शिवाय इतिहासाने शिकविलेला अनुभव अगदी कायमचा असा हिंदूंना ठाऊक आहे. त्यामुळे मुसलमानांच्या सहवासांत कोणी हिंदु राहूं लागला की, तत्काळ स्थानिक पुढारी त्याच्या हालचालीवर पाळत ठेवतात. येथे आल्यावर एक असाच प्रसंग आला की, त्यायोगें हिंदु पुढाऱ्यांचे स्तुत्य वर्तन स्पष्टपणे दृष्टीस पडले.
 xxx शहरांतील एका चांगल्या सुस्थितीतल्या कुटुंबांतील दोन सुशिक्षित भाऊ कांही मुसलमानांनी फुसलावून पळवून इकडे आणले होते. हिंदु मुलें मुसलमानांशी इतक्या सलोख्याने वागतात हे पाहतांच पेशावरच्या हिंदु पुढाऱ्यांनी तत्संबंधी चौकशी केली. तेव्हा त्यांना असे कळले की, xxx हून त्या मुलांना एका मुसलमानाने इकडे आणून बाटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुलाच्या वडिलांची व त्या मुसलमानाची ओळख आहे, इतकेच नव्हे तर, त्यांचा आपसांत पत्रव्यवहारही चालतो असे समजले. मुसलमान बुवाजी 'धर्मगुरू 'चा आव आणून मांत्रिक व औषधी तज्ज्ञाचे सोंग घेतात. त्यांच्याकरवी ताईत, गंडे, दोरे, औषधी घेणारे पूर्वी पेशावरास बरेच हिंदु होते. परंतु त्यांना या गुरूंचा अनुभव आल्याने आता केवळ परप्रांतियांनाच ते आपल्या कळपांत ओढतात. सर्वात आश्चर्य करण्यासारखी गोष्ट म्हणजे या दोन बंधूबरोबर एक तरुणी होती. वडील बंधूची ती पत्नि असे भासविल्याने व ती देखील गुरुसेवेस जात असल्याने हिंदु लोकांनी अत्यंत करडी नजर ठेवून एके दिवशी त्या वडील बंधूस गाठले. त्यांच्या परिस्थितीविषयी चौकशी केली, तेव्हा XXX हून कॉलेजचा अभ्यासक्रम सोडून ते तेथे आले असे कळले. अर्थातच त्यांना या मुसलमान गुरूनेच इतक्या दूर आणले हे स्पष्ट झाले. त्यांना सहानुभूति दाखविणारे असे कोणीच न भेटल्याने ते मुसलमानी जाळ्यांत पूर्णपणे गुरफटणार, इतक्यांत एका भल्या हिंदु गृहस्थाने दोन्हीही भावांस नौकरी देऊन सर्व प्रकारे सहाय्य देण्याचे आश्वासन दिले व मुसलमानांचा संबंध सोडण्याची अट घातली.
 कांही दिवसांनी गुरूचे प्रताप उघडकीस आले व ही तीन तरुण मंडळी त्या तावडीतून सुटली. परंतु अद्याप त्या गुरूवरील त्यांची भक्ति पूर्णपणे उडालेली नाही. आईबापांनी या 'चुकलेल्या' मेंढरांची कांहीच वास्तपुस्त केली नाही, असा पेशावरप्रांतीय हिंदूचा ग्रह झालेला असून तो स्पष्टपणे बोलूनही दाखवितात. हिंदूनी मुसलमान गुरूपासून ताईत, गंडे इत्यादि घेतांना अतःपर दक्षता बाळगावी आणि त्यांना घरच्या मंडळींशी सलगी करू देऊ नये असा निरोप तिकडील हिंदूंचा आहे.
 उपर्युक्त मुलांची खरी परिस्थिति काय आहे, घरांतून ती बाहेर का पडलीं, ह्या गोष्टी निश्चितपणे कळल्या नसल्या तरी त्याचेबरोबर असलेली तरुणी ही विवाहित स्त्री असावी असे समजण्यास पुष्कळ जागा आहे."माझी सोडवणूक करा." अशा आशयाचे एक पत्र त्या स्त्रीने आपल्या घरी लिहिले आहे असे कळते; तेव्हा मातापित्यांनी व इष्टमित्रांनी या प्रकाराकडे अवश्य लक्ष पुरवावे अशी विनंती येथे करावीशी वाटते. कारण ती मुले मराठी बोलणारी आहेत. तेव्हा हा मजकूर त्या मुलांच्या आप्तेष्टांच्या नजरेस पडेलच,
 अफगाणिस्तानांतून सर्व वकिलातीतली बायकामुलें पेशावरला आणीत असतां तुर्कस्तानांतील लष्करी तज्ज्ञांचे एक मंडळ इस्तंबूलहून येऊन मुंबईमार्गे काबूलला जाते याचा अर्थ काय ? असे कोडे बरेच जणांना पडलें. कारण काबूलहून आलेल्या स्त्रियांत तुर्की, इराणीही स्त्रिया होत्या. परंतु खरी गोष्ट अशी आहे की, याच वेळी त्या तुर्की लष्करी मिशनची आवश्यकता काबुलाधिपतीस विशेष भासली असल्यास आश्चर्य नव्हे. स्वधर्मी म्हणून म्हणा किंवा दुसरे कांहीही कारण असो, अफगाणिस्तानांत तुर्कांचे प्राबल्य सध्या जास्त आहे. अमानुल्लाचे सगळे सल्लागार बहुधा तुर्कस्तानहून आले आहेत. कांही महिन्यांपूर्वी अफगाणी तरुण मुले व मुली तुर्कस्तानला शिक्षणासाठी गेल्याचे सर्वांस ठाऊक आहेच. या लष्करी तज्ज्ञांचा मूळ हेतु अफगाण सेनेला योग्य शिस्त लावून तिची घटना कशी करावी यासंबंधीची योजना आखून देणे हा असल्याने प्रचलित बंडाळीचे वेळीही या महत्त्वाच्या पाहुण्यांना अफगाणिस्तानांत न्यावे लागले. तेथे काय वाटाघाट होते हें अर्थातच गुलदस्तांत राहील.

-केसरी, ता. २२ जानेवारी, १९२९.




( ६ )

 काबूलचा मार्ग तर खुंटला. तेव्हा पाश्चिमात्य सुधारणेचा नवा प्रयोग नुकताच सुरू झाला आहे. त्या इराणांत जावे या हेतूने पेशावरहून कराचीस आलो. ब्रिटिश प्रजाजन म्हणून ब्रिटिश साम्राज्यांत कोठेही जाण्याचा परवाना होता, तरी इराकमध्ये जाण्यास विशेष अडचण असल्याचे समजले. कराचीहून तेहरान थेट गाठणे फारच अडचणीचे व गैरसोयीचें होतें, म्हणून इराकमधील बसरा व बगदाद हीं प्राचीन संस्कृतीची गावें पाहून तेथून पुढे जाणे हाच राजमार्ग पत्करावा लागला. लढाईच्या वेळीं मेसापोटेमिया म्हणून ज्याला म्हणत तोच प्रदेश हल्ली इराक म्हणून ओळखला जातो. इराकचे राज्य हेंव आमच्या 'माबाप' सरकारच्या साम्राज्यापैकी संरक्षित भागांत मोडते; पण त्या राज्यांत प्रवाशांना मुक्तद्वार मुळीच नाही. उलट कोणीही प्रवासी असला तर त्याला अनेक अडचणी उपस्थित करून त्याचा प्रवेश होणे मुष्कील केलें जातें. असें म्हणण्याचें कारण इतकेंच की, कांही लंगड्या सबबींवर प्रवेशास परवानगी मिळत नाही. अगोदर बगदाद येथील गुप्त पोलिस अधिकाऱ्यांची अनुज्ञा मिळाल्याविना कोणासच इराकमध्ये पाऊल टाकता येत नाही. या अडथळ्यामुळे पासपोर्ट मिळविण्यासाठी सव्यापसव्याची भानगड थोडीशी करावी लागली.
 सिंधप्रांताच्या कमिशनरकडेच इराकचे पासपोर्ट देण्याचें काम आहे. त्यांनी प्रथम सांगितले की, वर्तमानपत्रांच्या बातमीदारांसाठी इराक सरकारचे विशेष निर्बंध आहेत आणि त्यांची पूर्वसंमति असल्याशिवाय आम्हाला कोणासच तिकडे जाऊं देतां येत नाही. आम्ही पोस्टाने पत्र  मु. ३ पाठवून तुमच्याकरितां परवानगी मिळवू. पण त्याचे उत्तर येण्यास निदान दोन महिने लागतील. पण तुम्हाला जाण्याची गडबडच असेल तर तार पाठवू. खर्च अर्थातच तुम्ही द्या. कराचीहून बसण्यासाठी आठवड्यांतून एकदां बोट निघावयाची. त्यांत ही पासपोर्टची अडचण. तेव्हा अडल्या नारायणाप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांची योजना मान्य करण्यावाचन गत्यंतरच नव्हते. ब्रिटिश साम्राज्यांत जाण्यास ब्रिटिश प्रजाजनास इतका त्रास का पडावा ? बरें, ही तारेने परवानगी मिळविण्याची पद्धत नेहमीचीच आहे. रोजच्या कांही तरी तारा बगदादच्या गुप्त पोलिसांस या संबंधी जातातही. प्रस्तुत प्रतिनिधीसंबंधीची तार सरकारी अधिकाऱ्याने लिहिली. तींत पंचवीसतीस शब्द होते. इराकच्या तारांचे दर प्रतिशब्दास साडेतीन आणे, साडेपांच आणे, अकरा आणे असे चढते होते. उत्तरासाठीही पैसे भरणे आवश्यक असल्याने मध्यम मार्ग स्वीकारूनही सुमारे बारा रुपये तारखात्याच्या खिशांत भरावे लागले ! आता सरकारच्या मनांत प्रजेला खर्च कमी पडावा अशी इच्छा असती तर कांही सांकेतिक शब्द ठरवून हे कार्य भागवितां आलें असते. आणि इराक सरकारकडून आलेली अनुज्ञा तशा सांकेतिक भाषेतच होती. त्यांचे उत्तर चार शब्दांतच आलें. पण आमच्या राजकार्यधुरंधर आणि प्रजाहिततत्पर सरकारने अशी सांकेतिक भाषेची व्यवस्था का करू नये ?
 बुशायरचा मुक्काम-या अडचणींतूनही पार पड्न बगदादच्या गुप्त पोलिसांकडून अनुज्ञा आल्यावर बोटीचे तिकिट मिळविलें, शुक्रवारी विलायतेहून आलेल्या टपालासह बसऱ्याला जाणारी 'फास्ट मेल' बोट मुंबईहून निघून शनिवारी रात्री कराचीस येते. तीच रविवारी सकाळी दहा वाजतां पुढे इराणच्या आखाताकडे निघते. बसऱ्याला जाण्याचा सोईचा मार्ग हाच होय. कराचीहून निघाल्यावर चौथे दिवशीं पहिला मुक्काम बुशायर येथे झाला. बुशायर हें इराणी आखातांतील महत्त्वाचे बंदर आहे. म्हणजे येथे धक्का किंवा गोदी बांधलेली नसून इराणी सरकारला जकात मिळण्याचे ते एक मोठे नाकें आहे असे म्हणण्यास हरकत नाही. कारण बंदरांत पाणी फारच उथळ असल्याने मोठमोठ्या बोटी दूरदूर नांगर टाकतात, म्हणून लहान मचव्यांतून माल व उतारू यांची ने-आण करावी लागते, रत्नागिरी बंदरांत जी गैरसोय होते तीच पण अधिक मोठ्या प्रमाणावर बुशायर येथे होते. यंत्रसामग्रीवर कोणत्याच प्रकारची आयात जकात नसल्याने आणि आधुनिक सुधारणेकडे लोकांचा विशेष कल असल्याने मोटारींची इराणांत आयात फारच होत आहे. आपणांकडे मोटारीवर तीस टक्के कर असूनही इतका प्रसार झाला, मग इराणांत रेल्वेचा फारसा प्रवेश नसतां मोटारींची विशेष जरुरी भासली तर आश्चर्य कसचे ? या सर्व मोटारी व इतर जड यंत्रे उतरवून ती लहान बोटींवरून न्यावयाची म्हणजे किती तरी त्रास होतो. रत्नागिरीच्या आजूबाजूला फार खडक असल्याने तेथील खलाशी दर्यावर्दीपणांत मुरलेले समजले जातात. तीच गोष्ट बुशायरची आहे. खडक नसला तरी येथे समुद्र नेहमीच खवळलेला असतो आणि तुफानी हवा असली म्हणजे तर विचारावयासच नको ! नाखवे लोकांची उडालेली तारांबळ पाहून त्यांच्या चिकाटीची आणि नौकानयनाच्या कौशल्याची प्रशंसा करावी, का त्यांच्या हालअपेष्टांच्या मानाने मिळालेली कमी मजुरी पाहून त्यांची कीव करावी हेच समजेनासे होते. या सुधारलेल्या जगांतही अशा गरीब लोकांना जनावरांसारखे राबूनसुद्धां पोटभर वेतन मिळत नसेल तर मग, त्या सुधारणेचे श्रेष्ठत्व कशांत आहे, आणि तिचा उपयोग तरी काय ? असे विचार मनांत आले.  पोषाकाचा नवा कायदा---यात्रेकरूंना गाठण्यासाठी आगगाडीच्या स्टेशनवर पंडे लोक मोठ्या आतुरतेनें आणि उत्सुक दृष्टीने येतात; तशांपैकीच कांहीसा प्रकार बोटी बंदरांत येतांना होतो. मात्र पंडे पुष्कळ असतात आणि बोटींवर येणारे हे लोक अगदी शेलके असतात. इराण सरकारचा या बाबतीत विशेष कटाक्ष आहे असे दिसले. डॉक्टर, कस्टम व पोलिस अधिकारी आगबोट बंदरांत नांगर टाकण्यापूर्वीच येतात आणि बोटीवरील सर्व उतारूंची व मालाची बारकाईने पहाणी करून परत जातात. बुशायर हे पहिलेच इराणी बंदर. तेव्हां ही निरीक्षणक्रिया विशेष चिकित्सक दृष्टीने झाली. इराणांतील पोषाकासंबंधीच्या नव्या कायद्याची चुणूक या अधिकाऱ्यांच्या वेषावरून समजली. वेष यूरोपियन पद्धतीचा असून टोप्या ' पेहलवी ' होत्या. म्हणजे गोल टोप्या नेहमीसारख्या असून पुढच्या भागास गार्डाच्या टोपीसारखी पुढे आलेली दोन बोटे रुंदीची पट्टी होती. मानेच्या भागावर इराणचे निशाण काढलेले असे. इराणी झेंडा व हिंदी राष्ट्रीय सभेचा ध्वज यांत फारच थोडा फरक आहे असें दिसलें. वस्तुतः इराणी आखातांत आपण आहोंत ही पूर्वकल्पना मनांत नसती तर काँग्रेसच्या निशाणाकडे आपलेपणाने व आदरबुद्धीने दृष्टि जाते तशीच इराणच्या ध्वजाकडे गेली असती.
 लाल, पांढरा व हिरवा असे तीन रंगी पट्टे मिळून हे निशाण होतें. याच्या मध्यभागीं पिंवळसर रंगांत खड्गधर उग्र 'केसरी' असून त्याच्या पाठीवर उदय पावणारा सूर्य व त्या सहस्रकर भानूवर मुकट ठेवलेला. असे हे इराणचे राष्ट्रीय निशाण आज इराणाच्या आखातांत फार महत्त्वाचे आहे. अगोदर सिंहराजच भीतिदायक, त्यास समशेरीची आणि चंडप्रतापी सूर्यनारायणाची जोड मिळालेली. शिवाय राजाशिरोभूषणाचें सहाय्य, असा हा संयोग वास्तविक भीतिदायक नसला तरी आजच्या राजकारणांत त्याला
अफगाणिस्तानइतकेंच वरचें स्थान प्राप्त झालें आहे. मुसलमानांच्या चांदताऱ्याऐवजी सूर्यनारायणाला इराणी निशाणावर जागा कशी मिळाली, याविषयी प्रथमतः आश्चर्य वाटतें. पण इराणांतील मूळच्या फार्सी लोकांची व हल्लीच्या पारशांची अग्निपूजा पाहिली म्हणजे त्यांत आश्चर्य कांहीच नाही असे दिसून येतें. या बुशायर बंदराचा व्यापार इतका दांडगा आहे की, इतर आगबोटी असूनही मेल बोटींतील महत्त्वाचा माल उतरविण्यासाठी दोन क्रेन्स ( याऱ्या ) आठ तास सारखे गुंतले होते !
 तैग्रीस व युफ्रातीस--बुशायर सोडल्यावर थोड्या वेळांत रात्र झाली आणि पहांटे क्षारोदधींतून गोड्या पाण्याच्या नदीमुखांत बोटीचा प्रवेश झाला. तैग्रीस व युफ्रातीस या दोन नद्यांचा संगम झाल्यावर त्या इराणी आखातांत समुद्रास मिळतात. पण या दोन्ही भगिनी कांही मैलांपर्यंत मिळून वाहतात. गंगा-यमुना संगम होतो तसाच हा तैग्रीस-युफ्रातीस संगम म्हणतां येईल. पण भागीरथी नंतर पुष्कळ अंतरावर नदीपतीस वरते, तशी गोष्ट या इराकी भगिनींची नाही. बसऱ्याच्या कांही मैल उत्तरेस हा संगम घडून येतो आणि नंतर शट-अल-अरब या नवीन नांवाने ही जोडनदी लवकरच इराणी आखातांत उडी घेते.
 ज्या ठिकाणी हा सागरप्रवेश होतो तेथे 'फाउ' नांवाचे गाव आहे. तेथून गोडें पाणी लागतें. परंतु समुद्राच्या भरती ओहटीचा परिणाम मात्र होत असतो. या नदीचे पात्र मोठे नसलें तरी तीस चाळीसफूट खोलीचें असल्याने मोठमोठ्या बोटी वर जाऊं शकतात. नदींतील नौकानयन ही वेगळी बाब असल्यानें फाउ लागतांच
कर्णधाराचें उत्तदायित्व पत्करण्यास एक खास तज्ज्ञ येतो. फाउपासून दीडदोन तासांच्या अंतरावर आबादान म्हणून एक व्यापारी दृष्टया महत्त्वाचें इराणी बंदर लागतें. बुशायरचा व्यापार निराळा व आबादानचा वेगळा. आबादानच्या वैशिष्ट्याविषयी वेगळेंच लिहावयाचे आहे, तेव्हा त्यासंबंधी येथे कांही नको. फाउपासून पुढें नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर शेतें दिसूं लागलीं. नकाशावरचें इराणचें आखात टीचभर लांब व बोटभर रुंद दिसतें. पण जलयानाने प्रवास करतांना किनारा दृष्टीस पडणें मुष्किलीचें होत असे ! नदींत मात्र पाण्याचा विस्तार नैसर्गिक रीत्याच, आकुंचित होतो आणि म्हणून दोन्ही तीरांवरील शेतें दिसत. शेतें कापूस, ज्वारी, गहू इत्यादिकांची मुळीच नव्हतीं. आपल्याकडे केळीचीं बनें आढळतात, तशा प्रकारची पण अतिशय विस्तृत अशी हीं शेतें असत. संस्कृत कवींची कदलीस्तंभांना उद्देशून एक ठराविक उपमा देण्याची वहिवाट आहे. त्यासाठी शट-अल-अरबच्या काठचीं शेतें अगदीच कुचकामाचीं ठरतील. केळीचें पान म्हटले की, तें भोजनासाठी उपयोगांत आणतात ही कल्पना भोजनप्रिय माणसाच्या डोळ्यांपुढे येईल. पण त्याही कार्यांत त्या शेतांतील झाडांचा मुळीच उपयोग होणार नाही. केरसुणी करण्याकडे तीं झाडें वापरतात. म्हणजे हीं सर्व खजुराची शेतें होती !
 आबादानहून मोहमेरा हें दुसरे बंदर लागलें. ते इराणचें अखेरचें गाव असल्याने तेथेही पुनः विशेष सूक्ष्मतेने सरकारी अधिकाऱ्यांची पहाणी झाली. त्यांनी म्हणजे अधिकाऱ्यांनी बोटीवरील उतारूंची व मालाची तपासणी केली. माल व उतारू उतरल्यावर बोट पुढे निघाली आणि त्याच दिवशी ( गुरुवारी ) सायंकाळी पांच वाजण्याचे सुमारास बसरा शहराच्या ' मागील ' ( याचा
उच्चार मार्गिल किंवा ' माऽक्कील ' असाही करतात ) बंदरांत ती दाखल झाली.
 बसरा हे इराकमधील मुख्य बंदर. त्यासाठी नदीत येणाऱ्या बोटींना सोयीचा असा एक धक्का बांधला आहे. त्या भागास मागिल बंदर असे म्हणतात. शहराचा विस्तार, इतिहास व राजकारण इत्यादींची माहिती पुढील पत्रांत पाठवीन. कारण बंदरावरून पोलिस, डॉक्टर आणि कस्टम अधिकाऱ्यांच्या कचाटींतून निसटून मुक्कामी पोहोचण्यास रात्र झाली. बंदरापासून शहर सात मैल दूर आहे.

--केसरी, ता. ५ फेब्रुआरी, १९२९.


( ७ )

 राजे फैजल हे इराकच्या गादीवर आले ते स्वपराक्रमावर नव्हे. त्यांना मिळालेलें आजचें सिंहासनही त्यांचें नाही. त्यांचा या प्रांतावर कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा संबंध नाही. असें असूनही ते राज्यपदारूढ कसे झाले हें कोडें केवळ ब्रिटिश कुटिल कारस्थानाची ज्यांना पूर्ण माहिती आहे त्यांनाच उलगडेल. राज्यासनस्थ असून सर्व कारभार स्वतंत्रपणे चालविण्याची किंवा आपलें म्हणणें तडीस नेण्याची खंबीर वृत्ति या इराकाधिपतींत नाही असें म्हणावें लागतें. आपली सद्यःकालीन चैनीची जागा ज्या ब्रिटिश सत्तेच्या सहाय्याने प्राप्त झाली आणि जिच्या आधारावरच आपण ती टिकवूं शकूं अशी त्यांची समजूत, त्या बलशाली सत्तेशी इराकनरेश अगदी नमून असले तर त्यांत अस्वाभाविक असें काय आहे ?
 इतकें झाल्यावर अनेक नांवांखालीं इंग्रज अधिकाऱ्यांच्या जाड्या पगारावर कायमच्या वर्ण्या लावून दिल्या जात आहेत. ' इराक अद्याप
स्वतःचा राज्यकारभार पहाण्यास असमर्थ आहे,' अशी सबब सांगून अज्ञानाचें पालनपोषण करण्याच्या निमित्ताने इंग्लंडांतील बेकारी कमी करण्याचा हा उपाय आहे. महायुद्धानंतर तुर्की साम्राज्याची अनेक शकलें होऊन ती दोस्त राष्ट्रांनी आपसांत वाटून घेतलीं. त्यांपैकी इंग्रज सरकारच्या वाट्याला मेसोपोटेमिया ऊर्फ इराक हा भाग आला. पण राष्ट्रसंघाचें लुडबुडणारें भूत हा भाग विनाकारण कोणासच पचूं देणारें नव्हतें. तेव्हा भूतसमंधादिकांस संतुष्ट राखण्यासाठी ' इराकवरील मँडेटरी सत्ताधारी ' असें नातें अर्थातच वशिल्यानें जोडून घेऊन नंगा नाच घालण्यास प्रारंभ झाला. त्याची थोडक्यांत कल्पना यावी म्हणून एकदोन ठळक उदाहरणें देतों.
 इराकचे एकंदर बारां लिवा ( म्हणजे जिल्हे ) आहेत. या प्रत्येकावर 'मुस्तरीफ' म्हणून कलेक्टरसारखा अधिकारी असतो. त्याने सर्व कारभार पहावा, पण त्याला आपले कर्तव्य शिकविण्याकरिता सल्लागार म्हणून एक ब्रिटिश ' हफसर' दिलेला आहे. महायुद्धाचे धामधुमीत बसरा काबीज करण्यासाठी हिंदुस्थान सरकारच्या सहाय्याने केलेल्या अवाढव्य खर्चाचा सर्व बोजा आता इराकने सोसावा असें टुमणें ब्रिटिश सरकारने लावलें आहे. सरकारी जुजबी इमारती त्या महागाईच्या काळांत लढाईच्या सोयीसाठी बांधलेल्या. त्यांचा भरपूर दाम द्या अशी मागणी किती स्वार्थसाधूपणाची आहे बरें ? पक्का मारवाडी देखील इतकी अर्थलोलूपता दाखविणार नाही. पण याही पलीकडील पायरी म्हणजे लष्करी व पोलिस व्यवस्थेसाठीच इराकच्या वार्षिक उत्पन्नापैकी चतुर्थांशाहून अधिक भाग सालिना पाहिजे असें सत्ताधारी इंग्रजांचें म्हणणें आहे. शिवाय युद्धकालांत कायमचा खर्च झाला, त्यासाठी पावणेदोन कोटि रुपये पाहिजेत ते निराळेच.
 या पैशाच्या घासाघिशीत नेहमी वादविवाद होतात आणि ता. २१ जानेवारी रोजीं इराकच्या मंत्रिमंडळाने राजिनामा दिला असल्यानें चिंताजनक परिस्थिती उत्पन्न झाली आहे. नियंत्रित सत्ताधारी राजा, वीस सरकार नियुक्त सभासदांचे वरिष्ठ मंडळ आणि जनतेचे अठ्यायशी प्रतिनिधी असणारे कायदे-कौन्सिल अशी राज्यघटना इराकची आहे. प्रधानाच्या राजिनाम्याला कारणें बरींच आहेत. सर्व जगांत संचारणारें स्वातंत्र्याचें वारें कोण बंद करूं शकणार आहे ? इराकच्या प्रजेची विटंबना चालू आहे, तिचा हा प्रतिकार असून पुढील धोरण काय ठेवावें हा प्रश्न ब्रिटिश सरकार आणि इराकचे राजकीय पुढारी या दोघांपुढे आहे. तूर्त वादाचा मुद्दा असा आहे की, इराकचे संरक्षण कोणाच्या हातीं रहावें ? दयाळू माबाप सरकारचें म्हणणें असें आहे की, जोपर्यंत स्वसंरक्षणाची जबाबदारी उचलण्याची ताकद इराकी लष्करास नाही, तोपर्यंत हें महत्त्वाचें कार्य ब्रिटिश लोकांकडेच सोपविलें पाहिजे. (कारण इजिप्त, हिंदुस्थान इत्यादि मोठमोठे देश राखण्याचें काम तेच करूं शकतात, इतरांना तें साधणार नाहीं ).
 इराकी प्रजेवर मुख्यतः हल्ला होतो तो इब्न सौदच्या वहाबी लुटारूंचा किंवा हेज्दच्या अमलाखाली असणाऱ्या अखवान दरोडेखोरांचा. बाकी इतर भीति चोहो बाजूंनीच आहे. एका बाजूस इराणी सिंह हातांत नंगी समशेर उगारून बसला आहे, तर दुसरीकडे तुर्कांच्या नव्या मनूचा प्रवर्तक केमाल केव्हा हल्ला करील कोण जाणे अशा वृत्तीने इंग्रज त्याजकडे पहात आहेत. इतर लुटारू टोळ्या सोडल्या तरी, रशियाचा विळा व ब्रिटिशांचा भोपळा यांचे सख्य काय आहे तें जगास माहीत आहे. या परचक्रांपासून आपलें संरक्षण करण्याची
कुवत इराकी मंत्रिमंडळास नाही असें म्हणणें ब्रिटिशांच्या फायद्याच्या दृष्टीने इष्ट असलें तरी, इराकी जनतेचा उपमर्द करणारें असल्याने कोणीही स्वाभिमानी प्रजानन तें सहन करणार नाही.
 इब्न सौद हा कसेही झाले तरी ब्रिटिशांकडून खंडणी ( ? ) घेत होता. कांही कालपर्यंत मासिक ५००० पौंड वेतन म्हणून इंग्लंडच्या तिजोरीतून इब्न सौदला दिले जात होते, ही गोष्ट कागदोपत्रीं नमूद आहे. इराकी प्रजेची अपात्रता सिद्ध करण्यास या उपायाचा अवलंब ब्रिटिश राज्यकर्त्यांनी केला तर तो कांही नवा प्रयोग नव्हे, अशीही भाषा येथील जबाबदार पुढारी बोलतात. इतकेंच नव्हे तर प्रस्तुतच्या अफगाणिस्तानांतील अराजकतेच्या मुळाशी यांचेच कारस्थान असावें अशी समजूत बहुतेकांची इकडे झालेली दिसते !
 इ. स. १९२१ मध्ये इराकी राष्ट्रीय पक्षाच्या जोराच्या मागणीमुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपलें अंग थोडेंसें काढून घेतलें आणि राज्यव्यवस्थेंत इराकी किती वाकब झाले आहेत हें पहाण्याची इच्छा दर्शविली. काकतालीय न्यायाने अथवा अन्य कारणाने असेल, त्याच वेळेला वहावी लोकांचा इराकला फार त्रास झाला ! एक वर्षाच्या दीर्घ ( ? ) प्रयोगानंतर ठरलें की, इराक राज्यकारभाराची धुरा वहाण्यास अजून लायक नाही ! तेव्हा अशा महत्त्वाच्या प्रश्नावर आता इराकी मंत्रिमंडळाने राजिनामा दिला तर ते आश्चर्य नव्हे.
 दुसरीही एक बाब आहे. इंग्लंडचे म्हणणें असें की, “ तुमच्या संरक्षणासाठी आम्ही येथे जी व्यवस्था ठेवूं तिचा खर्च इंग्लंडमध्ये तशी सोय करण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा जास्त येतो. उदाहरणार्थ, सैनिकांना पगार जास्त द्यावा लागतो; घरीं जाण्याचा खर्च, परकी भाषा शिकण्याचें वेतन, लग्नासाठी खर्च, पोराबाळांच्या शिक्षणाची
सोय, विशेष कामाचा भत्ता, एक ना दोन हजार लचांडे मागे लागून खर्च वाढतो. तो जास्त खर्चच तुम्ही द्या. नेहमीचा खर्च आपले कर्तव्य म्हणून इंग्लंड सोसण्यास राजी आहे. परंतु इराकची प्रजा इतकी वेडी आहे की, या प्रेमळ ( सावत्र ) आईचें अगदी रास्त असें साधें म्हणणेंही ती मान्य करीत नाही ! 'आम्हाला तुमचे महागरे शिपाई नकोतच मुळी' असाच या अदूरदर्शी इराकी मंत्रिमंडळाचा हट्ट आहे ! मुलाने कांही धाडसी कृत्य करण्याचा विचार केला की, आंतड्याच्या पिळामुळे त्याची माता त्यापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. याचप्रमाणे इंग्लंडवर राष्ट्रसंघाने टाकलेल्या जबाबदारीची जाणीव त्या राष्ट्रांतील मुत्सद्दयांना असल्याने इराकी राष्ट्रीय पक्षास उतावळेपणाचा व अविचाराचा हट्ट सोडण्यासाठी त्यांना किती तरी गोड भाषेंत सांगण्यांत येत आहे. पण ते ऐकतच नाहीत त्यास काय म्हणावें ?
 मंत्रिमंडळाचा आणखीही एक वादग्रस्त प्रश्न आहे. ब्रिटिशांशी नाते जोडावयाचें तें कशा प्रकारचें ? इंग्लंडचें म्हणणें, आम्ही मँडेटरी सत्ताधारी आहोत, तेव्हा आमच्याशी इराकी प्रजाजनांनी मुलांप्रमाणे रहावें, आम्हांला 'आई' म्हणून संबोधावे. परंतु जाणत्या इराकी मंत्रिमंडळाचें मत अगदी वेगळें आहे. कांही अनपेक्षित करणांमुळे इराक व इंग्लंड यांचे नातें जुळलें असलें तरीही आम्ही तुम्हाला ' आई' म्हणून मानणार नाही, तुमचा आमचा बरोबरीचा संबंध आहे, असें ते म्हणतात ! साम्राज्यमदाने धुंद झालेल्यांना हें कसें रुचावें ? त्यांची इभ्रत आणि डामडौल या बरोबरीच्या तहाने कमी नाही का होणार ? बरें, तह केला असला तरी तो किती वर्षे चालू रहावा हेंंही ठरावयाचें रहातेंच. इंग्रजांचें म्हणणें, निदान पंचवीस वर्षें हें मँडेटरी नातें टिकावें, निदान वीस वर्षे तरी 'आपला हात जगन्नाथ' या वृत्तीने रहाण्यास
मिळावें. पण इराकी पुढाऱ्यांची यालाही मान्यता नाही. ते म्हणतात, फार तर चार वर्षे आम्ही तुमची देखरेख मान्य करू. पुढे मग आमचे आम्ही स्वतंत्र आहोंत. ह्या वादाचें भिजत घोंगडें बरीच वर्षे चालून १९२६ मध्ये झालेल्या तहान्वयें पंचवीस वर्षे मँडेटरी सत्ता रहावी असें ठरलें. पण त्यालाच एक पुस्ती अशी जोडली आहे की, इराक राष्ट्रसंघांत सामील होईपर्यंत अथवा पंचवीस वर्षे !
 या व अशाच मतभेदांमुळे राज्यकारभार चालविणे अशक्य झालें व मंत्रिमंडळाने राजिनामा दिला. तो राजेसाहेबांनी स्वीकारला असून नवीन मंत्रमंडळ निवडण्याची खटपट चालू आहे. परंतु संरक्षणाचें खातें सर्वस्वी राष्ट्रीय झाल्याविना कोणीही अधिकार घेऊं नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपल्या अनुयायांना दिली असल्याने मंत्रिमंडळ बनविणें जरा कठीणच काम आहे.

--केसरी, ता. १२ फेब्रुआरी, १९२९.


( ८ )

 देशपर्यटनाचा मोठा फायदा—देशाटन केल्यापासून होणाऱ्या अनेक लाभांपैकी एक मोठा फायदा सर्वतोमुखीं असलेल्या आर्येत गोवला गेला नाही हे आश्चर्य होय ! शास्त्रग्रंथविलोकन होवो, पंडितमैत्री घडो वा मनुष्यास चातुर्य येवो, दूरदेशीं गेल्याने स्वदेशप्रीति आणि आपलेपणा यांना जी अपूर्व भरती येते तिच्या इतके महत्त्व उपर्युक्त तिन्ही लाभांस नाही ! हिंदुस्थानांत पहावें तो हा हिंदु, तो मुसलमान, अमका खिश्चन, तमका बंगाली, एक गुजराथी, दुसरा ब्राह्मणेतर असे किती तरी पक्षोपपक्ष वाढलेले दिसतात. केवळ आपल्या पक्षाचा नव्हे म्हणून एकमेकांची तोंडें न पहाणारे लोक हिंदुस्थानांत आढळावेत ही शोचनीय स्थिति आहे खरी. परंतु आपल्या जन्मभूमीची सीमा ओलांडून जरा बाहेर येतांच मनावर काय परिणाम घडून येतो तो लक्षांत घेण्यासारखा आहे. बसऱ्याचेंच उदाहरण देऊन असें सांगतां येईल की, येथे आल्यापासून मुसलमान, खिश्चन, बंगाली व मद्रासी अशा सर्व प्रकारच्या हिंदी गृहस्थांनी इतक्या मोकळेपणाने आणि आपुलकीच्या भावनेने स्वागत केलें की, ही वृत्ति आंगीं बाणण्यासाठी तरी सर्व हिंदी मंडळींनी एकदा परदेशगमन करावें असें वाटतें ! आपण सर्व हिंदमातेचीं मुलें आहोंत, आपणा सर्वांचीं सुखदुःखें एकच आहेत, ही जाणीव झालेली स्पष्टपणें दिसून येते. आणि हें मनांत बिंबल्यावर देशोद्धाराला काय उशीर ? भिन्न भाषा व निरनिराळ्या जाती पोटजाती असूनही हिंदी प्रजेची एकी होऊं शकते हे दर्शविण्यास येथील उदाहरण पुरेसें आहे.
 लोकमान्य टिळकांवरील अलोट भक्ति–-कै. लोकमान्य टिळकांची योग्यता किती मोठी होती आणि राजकारणांत त्यांचे कार्य केवढें झालें आहे हें आता हिंदी प्रजेस ठाऊक असलें तरी इकडील प्रदेशांत रहाणाऱ्या एका खिश्चन गृहस्थाचें मत श्रवणीय, नव्हे वाचनीय आहे. "आजच्या हिंदी राजकारणाला प्राप्त झालेल्या महत्त्वाचें आदिकारण टिळक होत. हिंदुस्थानांतील खरे मुत्सद्दी तेच होत. महात्मा गांधींस फार तर मोठे साधु पुरुष म्हणतां येईल. पण राजकारणाचें वास्तविक ज्ञान त्यांना नाही असेंच म्हणावें लागेल." इत्यादि आशयाचें बोलणें ऐकून त्या गृहस्थाचे कौतुक करावें का आपल्या महाराष्ट्रांतील अत्यंत दैदीप्यमान अशा नररत्नाची थोरवी मुक्तकंठाने वानावी असें कोडें पडलें ! इराणांत वास्तव्य करीत असलेल्या एका महाराष्ट्रीय स्थापत्यविशारदाचें प्रातःकालीन वंदन 'तिलक श्री बालगंगाधरा 'ला असून रोजचे एक स्तोत्रच त्यांनी रचून ठेवलें आहे. प्रतिदिवशीं प्रात:काळीं त्याचें पठण होतें !
 इराणांत मराठी भाषा-—मंडनमिश्राच्या दारांत असलेल्या शुकसारिकांचाही आपसांत वेदान्तांतील गहन तत्त्वांचा वाद चालत असे; आणि त्याच्या घरांतील चाकरमाणसेंही अशा प्रकारचा विवाद करीत असत असें सांगण्यांत येतें. मतितार्थ हा की, मंडनमिश्राच्या घरांत सदैव वेदान्ताचा अभ्यास व चर्चा चालत असल्याने आजूबाजूच्या मंडळीवर व बोलक्या पक्ष्यांवरही त्याचा परिणाम दिसून येई. या दंतकथेत कांही सत्य असो वा नसो, एक इराणी मुलगा ' धन्य शिवाजी तो रणगाजी धन्यचि तानाजी ' हा पोवाड्याचा चरण म्हणत चाललेला पाहून तो खास कोणा तरी महाराष्ट्रीयांच्या सहवासांत आहे असें वाटलें आणि त्याच्या बरोबर जाऊन आबादान येथील मराठी भाषाभाषींचा पत्ता लागला ही गोष्ट स्वानुभवाची आहे. वास्तविक इराणी जात म्हणजे 'अर्बुद' असे इतिहासावरून कळतें. त्यांची भाषा आपल्या मराठीपेक्षा अगदी निराळी. त्यांच्या संस्कृतीशी आपली संस्कृति मिळणारी नव्हे. असें असतां केवळ उदरभरणार्थ राहिलेल्या या इराणी मुलास मराठी चांगलें बोलतां येऊं लागलें, इतकेंच नव्हे तर 'धन्य शिवाजी,' 'आनंदाचा कंद,' हीं मुलांची गाणींही मोठ्या आवडीने तो गाऊं लागला ! महाराष्ट्रीयांचे आबादानमधील घर शोधून काढण्याची खूण हीच की, त्यांच्या घरांतील काम करणारी इराणी मुलें मराठी गाणीं गात असतात !
 हिंदुस्थानबाहेर हिंदु देवालय–-स्वधर्मरक्षणार्थ इराण सोडून हिंदुस्थानांत आश्रयासाठी आलेल्या पार्शी लोकांचा इतिहास सर्वविख्यात आहेच. त्याच इराणांत मुसलमानी अंमलाच्या एका मोठ्या शहरांत श्रीकृष्ण भगवंताचें देऊळ आहे. ही गोष्ट प्रथमतः अविश्वसनीय वाटेल, पण आबादानमधील एका भागांत---
  अंतकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
  यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥
हा भगवद्गीतेंतील श्लोक शुद्ध संस्कृतमध्यें एकही चूक न करितां सोनेरी अक्षरांनीं लिहिलेला पाहून किती आनंद वाटला असेल याची कल्पना परदेशीं रहाणारांनीच करावी. अगोदर भगवद्गीता हा ग्रंथच असा की, स्वग्रामीं असतांनाही तो वाचला तर अपूर्व आनंद होऊन मन उल्हसित होतें. मग यावनी राज्यांत आपल्या धर्माचा अनुयायी देखील मिळणें दुष्प्राप्य असतां श्रीबालकृष्णाची मूर्ति, सर्व देवळाचा थाट आणि औचित्यपूर्ण असें वातावरण पाहून नाना विचार मनांत आले ! आबादान येथील घासलेट तेलाच्या कारखान्यांत काम करणारे दोनतीन हजार मजूर हिंदु आहेत आणि त्यांनीच स्वधर्माभिमानाने प्रेरित होऊन हें देवालय बांधलें आहे. नित्यशः तुलसीरामायण किंवा दुसऱ्या हिंदी कवनांचें प्रवचन येथे चालू असतें. प्रमुख सणही मोठ्या समारंभाने आणि भक्तिभावाने पार पाडले जातात.
 इराणी सरकारचा विचित्र निर्बध–-आबादानला जाऊन येण्यापुरताच इराणी प्रांताशी संबंध आला, तरी तेवढ्याच अल्पावधीत तिकडील मोंगलाईची थोडीशी कल्पना आली. पासपोर्टचे बाबतींतील निर्बंधाचें वर्णन मागील पत्रीं दिलेंच आहे. पण त्यावरही ताण करणाच्या नियंत्रणाचें हसूं आल्याशिवाय रहाणार नाही. इराणी राज्यांतून बाहेर जाणाच्या प्रवाशांची झडती घेण्यांत येऊन कांही पत्रव्यवहार त्याचेजवळ आहे की नाही हें कसोशीने पहातात. राजकीय उलाढालींना भिऊन किंवा त्यांना आळा घालण्यासाठी ही तपासणी असेल असा कोणाचा तर्क झाल्यास तो सपशेल चुकीचा ठरेल ! पोस्टाचे उत्पन्न बुडू नये म्हणून हा खटाटोप केला जातो. कोणाही प्रवाशाजवळ पोस्टाने पाठविण्याजोगा पत्रव्यवहार सापडतां कामा नये. सापडल्यास दंड द्यावा लागतो असा निबंध आहे. मेहेरबानीची गोष्ट इतकीच की, ओळखपत्र फक्त उघड्या पाकिटांतून बरोबर नेण्याची सवलत इराणी सरकारने ठेवली आहे ! असें असतांना देखील इराणी पोलिस अधिकाऱ्यांनी माझ्या सामानांतील 'केसरी'चे अधिकारपत्र ज्या कोऱ्या पण उघड्या पाकिटांत घालून ठेवलें होतें तेवढेंच काढून घेतलें आणि दंड भरण्यास अमुक ठिकाणीं जा असा अविचारी हुकूम फर्माविला ! पोलिस शिपाई तें पत्र घेऊन बसला आणि 'कसा चोर पकडला' या यशस्वी मुद्रेने मजकडे पाहून हसूं लागला. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांना भेटल्यावर माझ्या हातून काय गुन्हा घडला हें मला कळलें ! कारण पोलिस इतर कांही न बोलतां मागे फिरा असेंच सांगत होता. वरिष्ठ अधिकारी जरासा समजूतदार दिसला, म्हणून त्याला तें पत्र उघडून वाचून दाखविलें. त्याच्या वरची तारीख दाखवून त्याची खात्री करून दिली की, हे कांही इराकमधील किंवा दुसऱ्या प्रदेशांतील व्यक्तीस उद्देशून लिहिलेलें पत्र नसून माझें अधिकारपत्र आहे, तें मला सदैव बरोबरच बाळगावें लागतें. परंतु प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही हार खावयास लावणारी त्याची विद्वत्ता होती, त्याचें कांही केल्या समाधान होईना. पाकिटांत घातलें की, तें पत्र पोस्टांत जाण्यास योग्य झालें, ही त्याची ठाम समजूत दिसली. पण आणखी वाद घातल्यावर स्वारीने मोठ्या मनाने पुढे जाण्यास परवानगी दिली आणि पुनः अशीं पत्रें जवळ न ठेवण्याची सूचना मोठ्या सावधगिरीने आणि अधिकारयुक्त वाणीने दिली. पोस्टखात्याचे उत्पन्न वाढविण्याची ही खाशी युक्ति आहे खरी, पण त्यासाठी ठेवावे लागणारे पोलिस किती पगार खातात कोण जाणे! असो.
 वाहने उजव्या बाजूनें हाकावीं --इराक आणि इराण हीं क–ण–चा भेद असलेली राष्ट्रें अगदी जवळ जवळ आहेत. म्हणून त्यांचा एकमेकांशी स्नेहसंबंध तर आहेच, पण इतरही आणखी काहीं बाबींचा प्रतिध्वनी एका देशांत उठला की, तो दुसऱ्या देशांतही ऐकूं येतो. उदाहरणार्थ, इराणांत सर्वत्र वाहनें उजव्या हाताने चालवावीत असा नियम आहे. फेब्रुआरीच्या १ तारखेपूर्वी इराकांत हिंदुस्थानप्रमाणेच डाव्या बाजूने गाडी हाकण्याचा निर्बंध होता. पण नुकताच तो इराणप्रमाणेच करण्यांत आला आहे. इराणांतून इराकांत किंवा इराकांतून इराणांत प्रत्यही मोटारींची जा-ये चालू असते. रस्त्यांतून वाहनें नेण्याचे परस्परविरोधी नियम असल्याने दोन्ही देशांत अनेक अपघात होऊं लागले आणि म्हणून सर्वत्र एकच निर्बंध असणे इष्ट वाटल्याने या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इराकांत वाहनें उजव्या बाजूने जावीं असें जाहीर करण्यांत आलें.
  यांत अगदी साध्या सोईची व सुरक्षिततेची बाब असली तरी व्यापारैकदृष्टीने जगांतील लोकांना लुबाडणाऱ्या 'द्वीपस्थां'च्या नाकाला मिरची झोंबली. इंग्लंडांत बनलेल्या मोटारगाड्यांना अतःपर मुळीच मागणी येणार नाही अशी ओरड कित्येक दूरदृष्टीच्या व्यापाऱ्यांनी चालविली आहे. इंग्लंड आणि हिंदुस्थान हे दोन देश वगळल्यास जगांतील बहुतेक सुधारलेल्या राष्ट्रांत उजवे बाजूने वाहनें नेण्याची रीत असल्याने त्यांना सोईस्कर अशीच मोटारींची रचना केलेली असते. म्हणजे हाकणारा यांत्रिक डावे बाजूस बसतो. हिंदुस्थानांत डावे बाजूने जावयाची असा निर्बध असल्याने खास हिंदी राष्ट्रासाठी यांत्रिक उजव्या हातास बसावा अशी सोय अमेरिकन मोटारवाले करीत असतात. इंग्रज मोटार कारखानदार केवळ डाव्या हाताने मोटार हाकणाऱ्यांच्या सोयीच्याच गाड्या बनवितात आणि अगदी इंग्लंडच्या कृपाछत्राखाली नांदणाऱ्या इराकने हा नवीन नियम स्वीकारून अप्रत्यक्ष रीत्या इंग्रज गाड्यांवर बहिष्कारच पुकारला आहे, असें स्वार्थी व्यापारी म्हणूं लागले आहेत. तें कांहीही असो, आता मध्यआशियांत एकच नियम सर्रास चालू आहे हें जनतेच्या दृष्टीने सोईचें आहे यांत शंका नाही.
  रूक्ष प्रदेशांत प्रेक्षणीय स्थळांचा अभाव–इराकमध्ये काय पहाण्यासारखे आहे ? असा प्रश्न केल्यास पुराणवस्तुसंशोधनखात्याने उकरून काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांशिवाय दुसरें काहीं नाहीं असेंच उत्तर मिळेल. पण कोठे नयनमनोहर सृष्टिशोभा किंवा चित्ताकर्षक देखावे आढळावयाचे नाहीत. दृष्टीस साजरें होण्यास डोंगर अवश्य पाहिजेत आणि त्यांचीच येथे फार उणीव आहे. वृक्षराजीविषयी बोलावयाचें म्हणजे खजुरीशिवाय दुसरें झाड दिसेल तर शपथ ! नदीचे पात्र हिंदूंना पवित्र वाटतें आणि नुसतें नांव घेतलें तरी पुरे, अनेक धार्मिक संस्कारांचा आणि पौराणिक कथांचा संदर्भ ज्ञानचक्षूंपुढे उभा रहातो. तसा कांहीच प्रकार हिंदुस्थानबाहेरील नद्यांचा नाही. तेव्हा त्यांच्याकडे तासच्या तास पहात राहिले तरी मनावर काय परिणाम घडणार ? तैग्रीस व युफ्रातीस यांचा संगम झाल्यावर शट-अल-अरब या नवीन नांवाने त्या जोडनद्या इराणी आखातांत पडतात. तीच शट-अल-अरब बसऱ्यास आहे. नदीपासून पुष्कळ आडवे कालवे सर्व शहरभर आंत काढले आहेत आणि ठिकठिकाणी ते ओलांडण्यासाठी पूल बांधलेले आढळतात व त्यांत लहानशा होड्या असतात. नदीची मौज दोन प्रकारची आहे. एक तिची खोली आणि दुसरी म्हणजे समुद्रापासून सत्तर मैल आंत असतांही या नदीस समुद्राला येते तशी भरतीओटी रोज ठराविक वेळीं येत असते! पण नदीचें पाणी गोडेंच आहे. नदीत शार्क नांवाचे मोठमोठे मासे असल्याने आंत कोणत्याही कारणाने पडतां येत नाही. शिवाय मोठ्या कालव्यांत देखील अत्यंत गलिच्छ पाणी असतें आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरतें.  जनरीत, आरोग्य आणि स्वच्छताः- बसऱ्यांत कोठेही गटारें नाहीत! ड्रेनेजचें काम अद्यापि सुरू झालें नसून त्याच्या अभावी वातारण अस्वच्छ असते. हा इकडील प्रांतांचा पावसाळा ! मधूनमधून पाऊस पडला म्हणजे सर्व शहरांत चिखल होतो आणि मग घाणीचा सुकाळ माजतो. अरब म्हणजे अगोदरच गलिच्छ आणि अमंगळ लोक. त्यांत इकडील थंडीचें निमित्त मिळाले की, सहा सहा महिने त्यांना स्नान मिळत नाही, इतकेंच नव्हे तर एकदा आंगांत घातलेला कपडा बदलण्याससुद्धा रिकामपणापुढे फुरसत मिळत नसावी असें दिसतें. त्यांच्या निर्लज्जपणाने प्रथमतः किळस येते. पण आपला कांही इलाज चालत नसल्याने आपणही अशा कोडगेपणास रुळत जातों.
 इराकी प्रजेंत अरब, यहुदी (ज्यू) व ख्रिस्ती या तीन निरनिराळ्या लोकांचा भरणा आहे. हे तिन्ही वर्ग गौरवर्णीय आहेत आणि विशेषतः ज्यू किंवा ख्रिस्ती साहेबी पोषाकांत असले म्हणजे अगदीं विलायती दिसतात ! अफगाणिस्तानांत युरोपियन वेष सक्तीने लादण्यांत आला असतांही लोकांनी तो मानला नाही. पण इराकमध्ये कोणीही जबरदस्ती केली नसली तरी प्रजाजनांनी आपण होऊन त्या परकीय परिधानाचा स्वीकार केला आहे. अलीकडे मात्र, इराकी टोपी वेगळ्या पद्धतीची आहे ती वापरली जाते. नेपोलियन बोनापार्टची एक विशिष्ट टोपी बहुतेकांच्या परिचयाची असावी. कारण त्या टोपीवरूनच तो ओळखला जातो. तशाच प्रकारची टोपी इराकी लोक घालतात. फरक इतकाच की, नेपोलियनची टोपी आडवी होती आणि इराक्यांची उभी असते!

-केसरी, ता. २६ फेब्रुआरी, १९२९,


(९)

 बायकांचा बुरखा–इराकांत स्त्रियांच्या वेषपद्धतींतही पुष्कळ प्रकार आढळतात. बुरख्याची चाल इस्लामानुयायी स्त्रियांत पूर्वीप्रमाणेच आहे. आणि वरपासून खालपर्यंत काळ्या डगल्यांतून हिंडणारी भुतें रस्त्यांत पुष्कळ दृष्टीस पडतात. स्त्रीजात्यनुरूप विनयाचें हें द्योतक म्हणावें तर रस्त्यांत उभे रहाणारांस बेशक धक्का देऊन पुढे जाण्याचा अशा काळ्या वस्त्रांतर्गत व्यक्तींचा सराव असावा असें वाटतें. कित्येक वेळां काळ्या बुरख्यांतून गौरवर्णीय अर्धा मुखचंद्र डोकावतांना दिसतो; पण कोणाची चाहूल लागली की, लगेच तो कृष्णमेघाखाली दडतो. यहुदी लोकांतही बुरख्याची चाल आहे, पण ती कमी प्रमाणांत. गुडघ्यापर्यंतचे झगे, तलम पण कातड्याच्या रंगाचे मोजे, कापलेले केस, रंग फासलेली मुद्रा इत्यादि पाश्चिमात्य वेषशास्त्रांतील आधुनिक प्रकारांचें हुबेहूब अनुकरण ज्यू स्त्रिया करतात; पण त्यांत पौर्वात्यांचें वैशिष्टय कांही तरी असतेंच. विवाहादि समारंभप्रसंगी आपल्या स्त्रियांत बनारसी शालू पांघरण्यास घेण्याचा रिवाज असतो. तसाच एक जाडा रेशमी पण जरीचें काम केलेला शालू ज्यू स्त्रिया घेऊन रस्त्यावर हिंडत असतात. तोंडावर सावली पाडण्यासाठी एक काळ्या कापडाची चार बोटें लांबीरुंदीची पट्टी कपाळावर बांधलेली असते. हा अवशिष्ट राहिलेला काळा बुरखा होय ! बाकी त्यांचा शालूच असा असतो की, त्याखालचे इतर कोणतेही कपडे प्रेक्षकांच्या दृष्टीस पडत नाहीत.
 ख्रिस्ती स्त्रियांचाही अशाच पद्धतीचा वेष असून बुरखा जवळ जवळ नसतोच म्हटले तरी चालेल. ही बुरख्याची चाल सौंदर्य लपविण्यासाठी म्हणजे सुस्वरूप ललना कोणाच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून प्रचारांत आली असावी असा तर्क आहे. पण अगदी खास 'आफ्रिकेच्या हुंडी'लाही बुरखा का लागावा ? या प्रश्नाचे नीट उत्तर देतां येत नाही. अरबस्तानांत आणि इराणांत पूर्वी हबशी गुलामांचा फार प्रचार असे. घरगुती चाकर नोकर हे आफ्रिकन नीग्रो असावयाचे असा श्रीमंतांचा थाट ! पण सध्या गुलामगिरीचे उच्चाटन झाल्यापासून पूर्वीचे गुलाम आता स्वतंत्र नागरिक झाले आहेत. अशा नीग्रो स्त्रिया देखील बुरखा घेऊन रस्त्यांतून जातात. ते पाहून आणि मधून मधून त्यांचे तोंड अर्धवट बाहेर निघते तेव्हा बुरख्याच्या कापडाशी सामना देणारा वर्ण पाहून या चालीचे वैय्यर्थ्य लक्षांत येतें. कांही स्थानिक नागरिकांनी असे सांगितले की, लहान मुले अशा राक्षसी स्वरूपास पाहून भितात, तेव्हा इतर स्त्रियांनी पडद्याची चाल सोडली तरी चालेल, पण नीग्रो स्त्रियांनी सोडू नये असे आम्हांस वाटते !
 गौरवर्णीय लोकांत नीग्रो लोकही मिसळलेले आहेत. अरबांपेक्षा ते हुषार यात शंका नाही. तांदुळाच्या ढिगांत काळे खडे जसे स्पष्टपणे निवडून काढतां येतात तसेच इराकी प्रजाजनांपैकी नीग्रो वेचून काढणे सोपें आहे. हरतऱ्हेची उदरभंरणाची कामे मोठ्या इमानेइतबारें करण्यांत नीग्रो पुढे आले आहेत असे दिसते. शाळेंत मोठ्या शहाणपणाने त्यांनी वरच्या जागा पटकाविल्या असल्याचें दिसून आलें.
 खजूरखजुरीचा विवाह–इकडील प्रदेशांत खजुरीशिवाय झाड दिसावयाचे नाही असे मागे म्हटलेच आहे. फांद्या फाटक्या, खवल्यांनी भरलेलें खोड असे या वृक्षाचे थोडक्यांत स्वरूप वर्णन करता येईल. पण चिखलात रुतलेले असे हे रूक्ष प्रदेशांतील विद्रूप झाड प्रणयपंकांत किती खोल गेलेले असते याची बाह्यात्कारी कोणांस कल्पनाही यावयाची नाही. आपल्या रूढीनुसार दरवर्षी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावतात. संस्कृत कवींच्या संकेताप्रमाणे अशोक आणि बकुल या वृक्षांस पुष्पप्रसूतीपूर्वी डोहाळे लागतात. या गोष्टी आपल्या परिचयाच्या असल्या तरी खजुरीच्या झाडांच्या इतका रंगेलपणा दुसऱ्या कोणत्याही वनस्पतींच्या आंगीं नसावा असे वाटते ! पोपयाच्या नर व मादी अशा दोन जाती असतात. तसाच प्रकार खजुरींतही आहे. प्रतिवर्षी खजूरवृक्षाचा विवाह करावा लागतो. आणि एका खजुराला बारा बारा खजुरी स्त्रियांची आवश्यकता असते. खजुरीच्या मळ्यांत गेल्यास तेरा तेरा झाडांचा एक एक गट केलेला दिसेल, त्यांपैकी एक डझन स्त्रिया व एक पुरुष. हा विवाहकालही ठरलेला दिसतो.खजुरीला फळे येण्यापूर्वी खजुराची फुले घेऊन ती खजुरीवर शिंपावी लागतात. दोन्ही प्रकारच्या झाडांना मोहोर आला म्हणजे ती उपवर-नव्हे विवाहास योग्य-झाली असे समजतात आणि मग वर सांगितल्याप्रमाणे खजूरांवरील फुलें खजुरींवर शिंपणे हा समारंभ म्हणजेच 'खजूरखजरी' विवाह होय ! हा मंगलदायक प्रसंग घडवून आणला नाही तर खजुरीला फळेच येत नाहीत आणि आलीच तर अगदी खुरटीं व कच्चीं रहातात असे सांगतात.
 हिंदुस्थानांत जाणारा सर्व खजूर बहुधा कच्चाच काढतात. त्यामुळे चांगला खजूर कसा असतो याची यथार्थ कल्पना हिंदी लोकांना कशी येणार ? खजुरीच्या बिया अगदी मऊ असून मधांत भिजत घातल्याप्रमाणे दिसतात आणि आंतील बी फारच लहान असते. सर्वांत अधिक खजूर हिंदुस्थानांत व इतरत्र पाठविणारे बंदर म्हणजे बसऱ्याचे आहे. आपल्याकडे द्राक्षांच्या मळ्यांना जसे महत्त्व तसेच इकडील खजुरांच्या शेतांना. भाकरीबरोबर कांदा किंवा तिखट खाण्याचा आपल्या देशांत कुणबी लोकांचा प्रघात असतो, तसाच इकडे खजुराचा उपयोग केला जातो. 'कांदा-भाकर' अथवा भाजी-भाकरी म्हणण्याऐवजी इराकमध्ये 'खजूर-खबूस' असे म्हणतात. नुसत्या खजुरावरही गुजारा करणारे पुष्कळ लोक आहेत.
 अरबांचे भोजन आणि खाद्य पदार्थ–खजुराखेरीज महत्त्वाचें असे पीक इकडे नाहीच. गहू, तांदूळ येथे होतात; पण विशेष नाही. नेहमीचे अरबी खाद्य म्हणजे गव्हाची रोटी. तिला 'खबूस' म्हणतात. कणिक आंबवून भट्टीत भाजून काढलेल्या भाकऱ्या असतात, त्यांला खबूस अशी संज्ञा प्राप्त होते. तिचा आकार साधारणपणे मोठ्या ताटाएवढा असून लहान लहान फुगे वर जमलेले दिसतात. एका बाजूस पांढरे तीळ केव्हा केव्हा लावण्याचा प्रघात आहे. खबूसचा विशेष हा की, त्याच्या बरोबर दुसरें कांही तोडीं लावणे नसले तरी चालते, आणि ही रोटी दहापंधरा दिवस सहज टिकते. आंबवून केल्याने ती पचनास हलकी असते, बाजारांत हे खबूस विकत घेतांना गिऱ्हाइकाच्या मनांतच किती वेळ घोळ पडतो. कारण आपल्याकडे वर्तमानपत्र विकत घेण्यापूर्वी एखादा फुकट्या वाचक जसा सर्व उघडून महत्त्वाच्या बातम्या वाचून नंतर पूर्ववत् घडी करून ते विकणाऱ्या पोरास परत करतो, तसेच सर्व गिऱ्हाइकांचे चालते. वाटेल त्याने यावे, पसरून ठेवलेल्या खबूसांना उचलावे, हात फिरवून पहावा, वास घ्यावा आणि नको असल्यास तो टाकून चालू लागावे हा प्रकार नेहमीचाच असतो. उष्टें व खरकटें म्हणजे काय याची या प्रांतांतील लोकांस माहितीच नाही. सव्यसाची वीर आपण पुराणांतरीं ऐकतों. भोजनांत इकडे सर्वचजण सव्यसाची असतात, इतकेच नव्हे तर फक्त एकाच हाताने जेवणाराचा दुसरा हात तुटला आहे की काय अशा संशयी मुद्रेने त्याकडे इतर लोक पहातात. मुसलमानी रीतिरिवाजानुसार सर्वांचे भोजन एकाच पात्रांत होते, तेव्हा शुद्धाशुद्धतेची भावना येणार कोठून ?
 सर्वच लोक मांसाहारी आहेत. मंडईतून मेथीची किंवा कोथिंबिरीची जुडी आपण हातांत धरून आणू तसे इकडे मांस हातांतून उघडेंच्या उघडे नेतात. नदीतील मासेही रस्त्यांतून, काकड्या विकतात तशा निर्विकार मनाने विकण्यासाठी येतात. आणि ओला नारळ फोडून विकण्याकरितां ठेवतात. तसेच कोंबडीं, बदकें भाजून उकडून तयार अशी विकणारे घेऊन हिंडतात ! भाजीपाला बहुधा कच्चाच खाण्याची अरबांची रीत आहे. त्यांना मिरचीचा उपयोग लढाईनंतर कळू लागला आणि तोही हिंदी सैन्याने दाखविला तेव्हा ! किती तरी फळे, भाज्या आणि धान्ये ही युद्धोत्तर कालांत अरबी शेतकऱ्यांनी इराकांत लावण्याचा प्रघात पाडला ! दूधदुभते हे उंट, गाढवी, शेळ्या यांचे मिळेल तेवढेच ! तेव्हा लोणी, तूप असे स्निग्ध पदार्थ विपुलतेने त्यांच्या नशिबी कोठून असणार ? चहाचे व्यसन त्यांचे जबर आहे, पण तो चहा बिनदुधाचा असतो आणि तो केव्हा घ्यावयाचा याला कांहीच निर्बध नाही.
 अरबांचे अत्यंत आवडते ठिकाण म्हणजे कॉफीगृह. एखाद्या मोठ्या सभागृहाप्रमाणे विस्तृत असे हे पेयागार माणसांनी सदैव गजबजलेलें असते. नुसते चहा किंवा कॉफी पिण्यासाठींच लोक येथे येतात असे नव्हे, तर नाना प्रकारचे टेबलावरील खेळ खेळणेंं, व्यापारधंद्याच्या किंवा रोजच्या व्यवहारांतील गुजगोष्टी बोलणेंं, राजकारणाची चर्चा करणेंं, चकाट्या पिटणेंं, खलबते करणेंं इत्यादि अनेकविध हेतूंनी प्रेरित होऊन सर्व प्रकारचे नागरिक तेथे येऊन बसतात. बसऱ्याचा शेअरबाजार अशा एक पानगृहांतच आहे ! पानगृहाची विशिष्ट खूण म्हणजे तेथे फोनोग्राफचें गाणे रात्रंदिवस चालू असावयाचें.
 चहाकॉफीचे व्यसन–चहा पिण्याचे कप, बशी व चमचा ही तिन्ही उपकरणीं अरबांसाठी म्हणून मुद्दाम बनविली जातात असे दिसते. बशी चिनीमातीची असून साधारणपणे तळहातापेक्षा मोठी नसते. कप हा काचेचा असतो. पण त्यांत फार तर तीन घोट चहाचा 'काढा' मावेल इतका तो मोठा वापरतात. आणि चमचा पितळेचा असून संध्येच्या पळीत मावेल इतके पाणी काढण्यास तसे चार चमचे घ्यावे लागतील या आकाराचा तो असतो. धिप्पाड आणि बळकट अशा अरबांना हे सर्व संच मुळीच शोभत नाहीत; पण ही त्यांची फार जुनी रीत आहे. कॉफीचा कप म्हणजे लहान मुलांच्या खेळांतलाच आहे असे वाटते. कॉफी नुसतीच–दुधाशिवाय–घ्यावयाची. चहाची व कॉफीची वेळ ठरलेली असते. पण रात्रंदिवस हे सत्र चालू असतेंंच ! खाणेंं थोडेंं आणि मचमच फार अशी आपल्याकडील म्हण इकडील प्रघातावरून पडली आहे की काय अशी शंका येतेंं, खाद्यपेयांच्या पदार्थांचा या प्रांतांत दुष्काळच आहे, म्हणून काय गमतीचा संगम होतो पहा. स्वित्झर्लंडमधील गोठलेलें दूध, फ्रान्समधील साखर, हिंदुस्थानांतील चहा, जपानांतून आलेली उपकरणीं आणि पदार्थसेवन करणारे अरबस्तानांतील रहिवासी. भाजीपाल्यांचीही अडचण असल्याने हॉलंडमधील सोललेली मटार येथे अगदी ताजी अशी मिळते आणि रोजच्या जेवणांतही लिव्हरपूलच्या मिठावाचून चालत नाहीं.
 सुरापानाची चंगळ--आचारस्वातंत्र्य दिले तर इंग्रज लोक काय करतील? आकंठ मदिरासेवनाविना त्यांना दुसरें कांहीच प्रिय नसल्याने 'बाटलीवाई'चे साम्राज्य माजेल हेच त्याचे उत्तर, इराकांत या प्रकाराला पुष्टिदायक असा पुरावा मिळतो. इंग्रजी सैन्याधिकारी युद्धकालीं व तदनंतर येथे आले; तेव्हा त्यांची मनसोक्त चैन चालावी म्हणून ठिकठिकाणी विलायती दारूचे गुत्ते उघडण्यांत आले; आणि हल्लीही बसऱ्यांत बाटलीबाईचींच दुकाने अधिक आढळतील ! सुरापानाचे वेड येथे इतकें बोकाळले आहे की, घराच्या मागे परसांतल्या बागेत झाडाभोवती आळे करण्यासाठी विटा किंवा दगडांचा उपयोग करतात तसा रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा उपयोग केलेला या विभागांत दिसून येतो ! रिकाम्या बाटल्यांचा उपयोग काय करावा ही पंचाईत अजूनही इकडे सर्वत्र भासत आहे. जर्मन शास्त्रज्ञांनी विचारले पाहिजे !

–केसरी, ता. ५ मार्च, १९२९..






 "किंसुखमप्रवासगमनम् " असें भर्तृहरीने का म्हटले असावें हें बसऱ्याहून इकडे येतांना उत्तम प्रकारे मनावर बिंबलें ! बसरा व आबादान यांमधील अंतर फार तर पन्नास मैल असेल. नेहमी मोटारींची जा–ये चालू असते; तरीही त्रास व अडचणींनीच मनुष्य बेजार होतो. याचे कारण म्हणजे ही दोन्ही गावे भिन्न भिन्न राज्यसत्तेखाली आहेत हे होय. इराकी राज्यांत बसरा शहर मोडते व आबादान इराणी अमलांतले आहे. इराणमध्ये कोणाही प्रवाशास इराकांतील शहराहून जाणे झाल्यास देवी काढल्याचा व प्लेगची लस टोचून घेतल्याचा असे दोन दाखले मिळवावे लागतात. थोडक्यांत सांगावयाचे तर असे म्हणता येईल की, देवी काढवून घेऊन इनॉक्युलेशनहीं करून घ्यावे लागते ! हे दुहेरी विकतचे श्राद्ध फुकटांत पदरात पडते ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे. पण लस टोचतांना आपल्याकडे जितक्या काळजीपूर्वक स्वच्छतेची खबरदारी ठेवली जाते तितकी इकडील प्रांती घेत नाहीत असे दिसते. उदाहरणार्थ, प्लेगची लस टोचण्यापूर्वी पिचकारी व सुई उकळत्या व्हॅसलीनने इतरत्र धुतात. परंतु ही दक्षता बसन्यास मुळीच बाळगली गेली नाही. उलट गंजलेल्या सुया उपयोगात आणाव्या लागल्या ! महाराष्ट्रांत व कर्नाटकांत पूर्वी प्लेगचे वेळीं उडालेल्या कहरासही कारण अशा प्रकारचा निष्काळजीपणाच होता हे ठाऊक असल्याने आपणांवरही काय प्रसंग येईल कोण जाणे अशा भीतीनेच दोन तीन दिवस मी ग्रस्त होतो. पण सुदैवेंकरून कांहीही झालें नाहीं. दोन्ही दाखले मिळवून इराकी अधिकाऱ्यांकडे गेल्यावर त्यांनी इराणांत जाण्यासाठी इराक सरकारची संमति असल्याविना त्या परवान्यास किंमत नाही, म्हणून इराणी वकिलाचा त्यावर शिक्कामोर्तब मिळविला. दोन्ही वेळांस अर्थातच सरकारला ‘ दक्षिणा ' ही द्यावी लागलीच. इतकें होऊनही भागले नाही. मोटारींतून प्रवास करीत असतां, प्रथमतः इराक सरकारचे व नंतर इराणी सरकारचे अधिकारी येऊन त्यांनी सामानसुमान उघडून पाहून पासपोर्टवर आपापल्या सह्या केल्या.
 बसऱ्याहून आबादानला जाण्याचे रस्ते दोन; एक, शट-अल-अरब नदीतून होडयांतून जाण्याचा आणि दुसरा, भूमार्गाने मोटारीतून जाण्याचा. दुसरा मार्ग सोयीचा आहे. कारण तो प्रवास त्वरेने आटपतो. परंतु त्रास इतकाच की, दोनदा नदी ओलांडावी लागते. आबादान हे बेट आहे. बसऱ्याहून नदीपार होऊन दुसऱ्या तीरीं आल्यावर मोटारींत बसून मोहोमेऱ्याला जावयाचे होते. सुमारे पंचवीस मैलांचा प्रवास अत्यंत रूक्ष अशा वाळवंटांतून करावा लागतो. मृगजलाने हरिणांची तर फसवणूक होईलच. पण अगदी ज्ञानी मनुष्येही त्या आभासाला भुलतात हे आश्चर्य ! इतके हुबेहुब जलसंचय दृष्टीस पडतात. नदीकडे न पहातां इतर कोणत्याही दिशेला पाहिले तर अगदी सपाट मैदान आढळेल. एक हिरवी गवताची काडी देखील दृष्टिपथांत यावयाची नाही. मग वृक्षराजीची गोष्ट कशाला ? हे रण उन्हाळ्यांत रखरखीत वाटते आणि पावसाळ्यांत नेहमीचा चोखाळलेला रस्ता सोडून दुसरीकडे गेल्यास ‘महापके' निमग्न झालेल्या करतिलकाप्रमाणे अवस्था होते. या चिखलांत उंटच्या उंटे गडप होतात असे सांगतात ! मोहोमेरास आल्यावर पुनः शट-अल-अरब ओलांडून आबादान बेटांत प्रवेश करावयाचा व मोटारमधून मुकाम यावयाचे असा हा चढउताराचा प्रवास आहे. नदीवर पूल कोठेही नसला तरी, लहानमोठ्या होड्या इकडून तिकडे सारख्या येरझारा घालीत असल्याने कालक्षेप न होतां पैलतीरी जाता येतें.
 इराणांत घासलेट तेलाचा साठा विपुल आहे आणि ते खणून काढून शुद्ध करण्याचे काम एका विलायती कंपनीस मिळाले आहे. त्या सर्व प्रचंड कारखान्याचेच गाव म्हणजे आबादान होय. अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनीच्या कारखान्यामुळेच आबादान हे गाव वसले असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. कारण आबादानची वस्ती सुमारे ७०,००० असून ती बहुतेक सर्व त्या कंपनीच्याच कामगारांची व त्यांच्या कुटुंबांतील मंडळीची आहे. आगबोटींतून आबादानकडे पाहिलें म्हणजे एका मोठ्या औद्योगिक शहराजवळ आपण आहोत असे वाटते. काळा धूर निळ्या आकाशांत सदैव सोडणाच्या काळ्या उंच चिमण्या, आणि तेलाच्या मोठमोठ्या टाक्या इतकेच काय ते दुरून दिसते. भूमातेच्या गळ्यांत हा लोखंडी शृंगारसाज बिडाच्या मोठ्या नळांत ओवून घातला आहे, अशी कल्पना एखाद्या कवीची, त्या प्रचंड टाक्या व त्यांना जोडणारे नळ पाहून होईल. मुंबईला वाडीबंदरच्या बाजूस जसे रॉकेल(तेला)चे विस्तृत हौद आहेत, तसे तीनशेहून अधिक हौद एकट्या आबादान च्या कारखान्यांत आढळतील. सुमारे ३६ चिमण्या आपल्या तोंडातून काळा धूर फुकत असलेल्या पाहून कोणासही हा कारखाना पहाण्याची उत्कट इच्छा होते. या अवाढव्य विस्ताराच्या औद्योगिक शहरांत सुमारे तीन हजार हिंदी लोक आहेत. मुख्यतः - 'बाबू ' लोक, म्हणजे कारकून, यांचाच भरणा जास्त. कांही मजूरही आहेत. हिंदी वस्तीत निमगोरेच अधिक असले तरी हिंदुस्थानांतील प्रत्येक प्रांताचा व प्रत्येक भाषेचा नमुना आबादानमध्ये पहावयास मिळतो. महाराष्ट्राच्या वाट्यास आलेली मंडळी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहेत. याचे कारण आमची घरकोंबडेपणाची वृत्ति असावी. कारखान्याची सर्व व्यवस्था इंग्रज अधि कान्यांच्या हातांत असल्याने आणि सध्या रशियाच्या लाल निशाणास जॉन बुल्ल बुजत असल्याने प्रेक्षकांना प्रवेश मिळणे बहुशः दुरापास्तच होते ! कांही दिवसांपूर्वी रशियन बोल्शेव्हिकांचा उपद्रव येथेही सरू झाल्याचे दृष्टोत्पत्तीस आल्यापासून कामगारांना कामावर जाण्यासाठी परवाने दाखवून आंत जावे लागते. अशा कडक निर्वधामुळे हा कारखाना पहाण्यास मिळेल की नाही याची शंकाच होती. पण श्री. न. चिं. केळकरांचे एक निस्मीम चहाते आणि वाङ्मयप्रेमी महाराष्ट्रीय सद्हस्थ त्या कारखान्यांत मोठ्या हुद्द्याचे जागी असल्याने त्यांच्या खटपटीमुळे कारखाना पहाण्यास परवानगी मिळाली, इतकेच नव्हे तर, दोन अधिकारी बरोबर देऊन फोटो घेण्याचीही खास अनुज्ञा 'केसरी'च्या प्रतिनिधीस मिळाली. ही गोष्ट अगदी अपूर्व अशी असल्याचे तेथील कित्येक अधिकाऱ्यांनी बोलून सुद्धा दाखविलें !

 आपलें नित्योपयोगाचे घासलेट तेल खाणींतून निघते हे आता बहुतेकांस ठाऊक झाले आहे. आबादानपासून दीडशे मैलांवर मसाजदइ-सुलेमान या ठिकाणीं व आसपास तेलाच्या पुष्कळ विहिरी आहेत. पाण्याच्या मोकळ्या व उघड्या विहिरीप्रमाणे या तेलाच्या खाणी खणणे इष्ट नसते. एक तर आंतील तेल जोराने उसळी मारून वर आल्याने आजूबाजूस उडून फुकट जाते आणि दुसरे महत्त्वाचे कारण असे की, आगीची फार भीति असते. तेल ज्वालाग्राही असावयाचेच. पण तेलाबरोबरच अनेक प्रकारचे वायु भूगर्भातून बाहेर पडतात. ते विशेष ज्वालाग्राही असतात. म्हणून घासलेट (तेल) में बंद केलेल्या नलिकाकूपांमधून ( ट्यूब बेल्स ) पंपाने उपसून काढतात. उत्तम वाकबगार पानाडे विहिरीस पाणी कोठे लागेल हे सांगण्यांत पटाईत असतात, तसेच इकडे ‘तेलाडे'ही असतात आणि त्यांच्या सांगण्यावरून विहीर खणण्यास प्रारंभ होतो.
 इराणच्या भागांत विपुल खनिज तेल सापडेल असे भूगर्भवेत्ते म्हणतं. इ. स. १८७२ पासून एका साहेबाने या तेलखाणी शोधन काढण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करून पाहिले. परंतु विहिरीत तेलाचे झरे न आढळतां पाण्याचेच लागले. त्याचा प्रयत्न निष्फळ झाल्यावर इ. स. १९०१ मध्ये दुसरा भांडवलवाला आपले नशीब बलवत्तर आहे की नाही ते पहाण्यास आला. त्याने साठ वर्षांचा करार करून पृथ्वीच्या पोटाला भोके पाडून पहाण्यास सुरुवात केली. सात वर्षांच्या प्रयत्नानंतर मसजिद-इ-सुलेमान येथे एक मोठे थोरलें जोराचे कारंजें उडून आंत पुष्कळ तेलाचा साठा असल्याचे कळले. इराणी राज्यांत नैसर्गिक रीत्या सापडणाऱ्या या तेलाचा योग्य तो उपयोग इराणी राज्यास व्हावा आणि इराणी प्रजेचे हित व्हावे या उदात्त हेतूंनी प्रेरित होऊन • जगाच्या कल्याणा'चा मक्ता घेणाऱ्या इंग्रजांनी एक कंपनी स्थापन केली ! तिचे नांव 'अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनी, लिमिटेड,' असे आहे. कोटयवधि रुपयांचे भांडवल गोळा करून खाणीवर पंप बसविण्यात आले. नवीन विहिरी खोदल्या गेल्या आणि खाणींतून निघणाऱ्या तेलाची फायदेशीर विल्हेवाट लावण्याची योजना आखली गेली. खाणींतून आलेले तेल हिरवट काळसर असून दाट असते. ते प्रथमतः तापवून मग त्याचे निरनिराळे प्रकार करता येतात. मसजिद-इ-सुलेमानपासून तेल कोठे न्यावे हा प्रश्नच होता. कारण तेलाच्या शुद्धीकरणासाठी पाणी विपुल लागते आणि विलायतेस तें तेल रवाना करण्यासाठी काही तरी सोय करावी लागते. तेव्हा शट-अल-अरब या नदीच्या कांठीं आबादान हे शहर पसंत करण्यांत येऊन या ठिकाणी अत्यंत विस्तृत असा कारखाना बांधण्यात आला. खाणींतून आलेलें दाट तेल तापविले की, त्यांतील गाळ खाली बसतो. पातळ काळसर राहिलेले तेल म्हणजे आपणांकडे मिळणारे क्रूड ऑइल. आगबोटींत किंवा आगगाड्यांत हेच जाळून उष्णता उत्पन्न करतात. तसेच ऑइल एंंजनांतील क्रूड ऑइल वापरण्याचा प्रघात बरेच जणांस विदित असेल. हेच क्रूड ऑईल नाविक ज्वलन ( अॅडमिरल्टी फ्युएल ) म्हणून इंग्रजी बाजारपेठेत ओळखले जाते. या तेलाच्या वरची पायरी म्हणजे नेहमीचे घासलेट तेल; आणि त्याच्याही वरचे पेट्रोल. या मुख्य भांवडांमध्ये आणखी किती तरी प्रकार आहेत. पण मुख्य मुख्य तेवढेच आपणांस पहावयाचे आहेत. खाणींतून आलेले घट्ट तेल उष्ण केलें म्हणजे त्यांतून कांही वायु बाहेर निघतात. त्यांचा उपयोग पेट्रोल करण्याकडे विशेष होतो. ते वायु थंड केले की बेन्झीन म्हणून एक महत्त्वाचे द्रव्य तयार होते. नुसते उष्ण केल्याने शुद्ध घासलेट मिळणे कठीण असते. त्यासाठी त्या घासलेटवर पुष्कळ संस्कार करावे लागतात. एक प्रकारच्या विशिष्ट वाळूंतून ते गाळून काढले म्हणजे अगदी स्वच्छ होऊन त्यांतील साचलेली घाण निघून जाते. पेट्रोलसुद्धा अनेक औषधींच्या सहाय्याने धुवावे लागते व नंतरच ते विक्रीस योग्य होते. ही क्रिया थोडक्यांत लिहून झाली खरी. पण ती घडवून आणणे अतिशय दगदगीचे काम आहे. तेल तापवितांना त्याचे उष्णतामान सारखे ठेवावे लागते. विनाकारण उष्णता फुकट न जाईल अशी व्यवस्था करणे फायदेशीर असते. शिवाय थंड पदार्थांस प्रथम तापवून नंतर पुनः वायु सोडून थंड करणे या क्रिया आवश्यक असल्याने 'आचळाचे दूध आचळांस' लावण्यांची कमी खर्चाची युक्ति अमलांत आणणे हितावह होते. म्हणून अगदी आधुनिक शास्त्रीय उपाय अमलांत आणण्यासाठी शास्त्रज्ञांचा तांडा सारखा पोसावा लागतो. इतकेंही करून आगीची भयंकर भीति असतेच. त्यासाठी दक्षता बाळगावी लागते ती निराळीच !
 विदेही जनक राजाची अशी गोष्ट सांगतात की, त्याचा एक पाय अग्नींत असून दुसऱ्या पायास तूप चोळीत असत. अशाच प्रकारचे पण जनकावरही ताण करणारे एक यंत्र रॉकेल धुण्यासाठी उपयोगांत आणले जाते. जर्मन शास्त्रज्ञांनी ह्या साधनाचा शोध नुकताच लावला असून तसल्या तऱ्हेचे यंत्र पृथ्वीवर एकच आहे व ते जर्मनींत. तेव्हा येथे असें अद्वितीय यंत्र आणून बसविणारे व चालविणारे जर्मनच आहेत. आपल्याकडे मद्रासी लोकांनी जमाखर्चाच्या कामाचा जसा कांही मक्ता मिळविलेला दिसतो, तसाच सर्व जगतांत शास्त्रीय प्रगतीचे अग्रेसरत्व शार्मण्यदेशीयांना परमेश्वराने दिलेले आहे. या यंत्राच्या एका भागावर बर्फाचा जाडा थर असतो, तर दुसरे बाजूस जळजळीत व उष्ण वारा सोडणारे पातळ द्रव्य असते. घासलेट तेल या पद्धतीने अत्यंत थोड्या खर्चाने धुऊन निघते. या यंत्राचा विस्तार अतिशय मोठा असून गंधकाचा उपयोग यांत केला जातो; म्हणून ते पहाण्यास जाणाऱ्या मनुष्याच्या घशाला त्रास होऊन ठसके मात्र लागतात. तेथील धूर विषारी असल्यामुळे नवशिक्यास तेथे फार वेळ राहू देत नाहीत. जर्मनीने 'विषारी धूर ' या नांवाचा जो वायु गेल्या महायुद्धांत उपयोगात आणला होता त्यासारखाच हा धूर आहे असें म्हणतात.
 मु. ५  यांत्रिक कलेची पूर्णता झालेली पहावयाची असल्यास रॉकेल भरण्यासाठी पांढरे चौकोनी डबे करंतात ते खाते पहावें. चापट पत्रा घेऊन त्याचे पाहिजे त्या आकाराचे तुकडे कापून त्यांवर शिक्का मारून त्याचा डबा बनविण्याचे काम यंत्रे अगदी अचुक आणि त्वरेने करतात. माणसांनी फक्त तुकडे पुढे सरकवावे किंवा कळ दाबावी, यापलीकडे त्यांना कांही काम करावे लागत नाही. डबे तयार झाल्यावर ते झाळून त्यांना पॉलिश करण्याचे, वरील कडी लावण्याचे व नंतर त्यांत तेल भरण्याचे काम इतक्या तातडीने आपोआप होत असते की, सर्व यंत्रांपुढून नुसते चालत जाईपर्यंत प्रथमच्या यंत्रांत कापण्यासाठी घातलेल्या पत्र्याचे डबे तयार होऊन त्यांत तेलही भरले जातें ! डबे इकडून तिकडे नेण्यासाठी 'चालता पट्टा ' आहे, त्यावरून डबे पुढे जातात आणि काटकोनांतही वळतात. या ठिकाणची क्रिया फारच कुतूहलोत्पादक आहे. मागला डबा येऊन पुढल्या डब्यास अशा बेताने धक्का देतो की, त्यायोगे तो बरोबर काटकोनात वळून पुढे जात राहील. रहदारीच्या वेळी माणसांना सुद्धा इतक्या व्यवस्थेने जातां येत नाही, अशा रीतीने निर्जीव रॉकेलचे भरलेले डबे जात असतात. तेल भरण्याचेही काम असेच आपोआप होते. एकदीड मिनिटाच्या आंत दहा बारा डबे एकदम एक थेंबही न सांडतां बरोबर भरले जातात. त्यांची तोंडे बंद करून त्यांना थोडे आदळआपट करतात ते अशाकरिता की, या वेळीच गळती वगैरे दोष दृष्टोत्पत्तीस यावेत. लाकडी चौकटींत दोन दोन डबे भरून ते चालत्या पट्टयाने थेट बोटीच्या धक्क्यापर्यंत जातात.
 अशा या घासलेट तेलाच्या कारखान्याने सुमारे पाच चौरस मैल जागा व्यापिली असून पंधरा हजार लोकांना काम दिले आहे. कारकुनांव्यतिरिक्त बहुतेक मजूर रात्रंदिवस राबत असतात आणि आठ आठ तासांच्या तीन पाळ्या ठरलेल्या आहेत. रोज अदमासाने तीस लाख गॅलन तेल गाळून निघतें ! नेहमीच्या प्रचारांतला टिनचा चौकोनी डबा चार गॅलनचा असतो. असे साडेसात लाख डबे भरून रोज तेल गाळण्याची व्यवस्था आहे ! तेल गाळण्याच्या भट्टया लहानमोठ्या पंचवीस तीस आहेत. त्यांतील अगदी आधुनिक अशी जी आहे, तींतच रोज आठ लक्ष गॅलन तेल तयार होते ! निरनिराळ्या टाक्या तेलाने भरलेल्या असतात. त्यांना जोडणाऱ्या सर्व नळांची लांबी एकत्र केल्यास ती सहज शंभर मैलांहून अधिक भरेल ! कारखान्यांतील मजुरांना जळणासाठी म्हणून तेलच दिले जाते. कारण या मुलखांत सर्पणाची अडचण फार आहे. दरवर्षी सुमारे छत्तीस लाख गॅलन तेल कामगार वर्गातच फुकट वाटले जाते ! इराणी सरकारला स्वामित्वासाठी प्रतिवर्षी सुमारे दहा लाख पौंड म्हणजे दीड कोटि रुपये द्यावे लागतात, यावरून कंपनीला फायदा काय होत असेल याची कल्पना करावी.
 आबादान शहर केवळ अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनीसाठीच बसविले असल्याचे वर सांगितले आहे. अर्थातच सर्व सुखसोयी कंपनीस कराव्या लागल्या. कोणत्या सुखसोयी येथे आहेत, असे विचारण्यापेक्षा कोणत्या नाहीत असेच विचारणे बरें. पोष्ट, तार, बँक या तर अगदी महत्त्वाच्याच बाबी झाल्या. त्या तेथील सरकारने केल्या तर त्यांत आश्चर्य कसले ? पण कामगारांना रहाण्याची घरे, पाण्याचे नळ, विद्युद्दीप इत्यादि घरगुती गोष्टी देऊन खेळण्यासाठी क्रीडांगण, वाचनालय, रुग्णालय, औषधालय याही सोयी केल्या आहेत. रक्षणासाठी खास व्यवस्था असून गुप्त पोलिस खातेही कंपनीने राखले आहे हे विशेष आश्चर्य होय आणि त्यांतही मौज म्हणजे ही की, प्रस्तुत प्रतिनिधीस कारखाना दाखविण्यासाठी ज्या दोन अधिकाऱ्यांची योजना करण्यात आली होती ते गुप्त पोलिस खात्यांतील वरिष्ठच होते ! रशियन विळ्याची भीति आज काल फार वाटत असल्याने त्या खात्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. असो.
 कंपनीच्या नोकरांना सर्व प्रकारचा माल, योग्य भावाने मिळावा म्हणून, किंवा अस्सल ब्रिटिश मालच खपावा व पानस्वातंत्र्याची हौस पुरविली जावी यासाठी एक दुकान उघडलेले आहे. इतर कोणत्याही मालापेक्षा मदिरेचा खप किती तरी पटींनी अधिक असतो, हे येथील आकड्यांवरूनच सिद्ध होते ! कामगारांचीं रहाण्याची घरे मुंबईच्या सरकारी चाळींपेक्षा किती तरी चांगली आहेत. आरोग्यखात्याकडून होत असलेली साफसुफीची व स्वच्छतेची व्यवस्था पुणे शहर म्युनिसिपॅलिटीने तर शिकण्यासारखी आहेच, पण मुंबईलाही कांही धडे या व्यवस्थेपासून घेता येतील. इराणांत फॅक्टरी अॅक्ट नसला तरी कामगारांच्या नुकसानभरपाईचेंही वेगळे खाते असून अपघातामुळे पोटावर गदा येणाऱ्यांस भरपूर मोबदला देण्यात येतो.
 इराण हें स्वतंत्र राष्ट्र आहे आणि इतर जगाच्या मानाने मागे असले तरी स्वातंत्र्याची राष्ट्रीय वृत्ति आणि स्वहिततत्परता यांस ते अद्याप पारखे झाले नाही. विश्वबंधुत्वाची मोहक शिकवण अजूनही त्याच्या कर्णपथावर गेलेली दिसत नाही. कारण या प्रचंड कारखान्यांत इराणी कामगारांचे प्रमाण सालोसाल वाढलेंच पाहिजे अशी मोठी अट कंत्राट देतांना घातली गेली आहे. म्हणून शेकडा पंच्याऐशी कामगार इराणी प्रजाजनांपैकीच आहेत. वरची मलई खाण्याची कामें गोऱ्या बाळांना देऊन हमाली कामे करण्याकडे आज त्यांचा उपयोग होत आहे खरा. पण एवढ्यानेच सरकारला आपले कर्तव्य केलें असें वाटले नाही. खुद्द आबादानच्या कारखान्यांत दीडशे मुलांना पगार देऊन यांत्रिक कौशल्य शिकविण्यास इराणी सरकारने कंपनीस भाग पाडले आहे. दरवर्षी नवीन मुलें तयार होऊन बाहेर पोट भरण्यास जातात आणि अनुकूल परिस्थिति असणारी कारखान्यांतच टिकून रहातात. प्रतिवर्षी दोन इराणी विद्यार्थी कंपनीच्या खर्चाने इंग्लडमध्ये तैलशास्त्राचा उच्च अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी पाठविले जातात. आमच्या हिंदुस्थानांत अनेक धंदे आहेत. सरकारने परकीय भांडवलवाल्यांस पुष्कळ सवलती देऊन त्यांचे ठाणे मजबूत करून दिलें आहे. पण अशा प्रकारची प्रजाहितदक्षतेची कळकळ कोणत्या एका तरी करारांत दिसत असल्यास अधिकाऱ्यांनी अवश्य जगापुढे मांडावी. साधे लष्करी खाते घ्या, तेथे सुद्धा हिंदी अधिकारी ठेवण्याकरिता किती अट्टाहास करावा लागतो ! हे सारे पारतंत्र्याचे प्रताप !
 युरोपियन मनुष्य म्हटला की, त्याला देवाने जशी काही अधिक कोमल गात्रे देऊन आकाशांतून एकदम पृथ्वीवर पोचते केले आहे अशी कित्येकांची भावना असते. विशेषतः इंग्लिशांना ती विशेष आहे असे घडोघडी दिसून येतें. येथील कारखान्यांत इंग्रज अधिकारी व कामगारही आहेत, पण एशियाटिक कामगारांपेक्षा युरोपियनांस अधिक पगार, अधिक सवलती व अधिक सुखसोयी केलेल्या आढळून येतात. अगदीच प्रामुख्याने डोळ्यांत भरणारी गोष्ट म्हणजे अगदी हवाशीर जागेत त्यांच्यासाठी बसावलेले वेगळे गाव. त्यांचे बंगले निराळे, त्यांची व्यवस्था वेगळी, त्यांची वस्तीही पण अगदीच भिन्न. त्यांना एखादा डोळा अधिक असल्याचें किंवा अधिक काम करण्यासाठी तिसरा हात असल्याचें दिसत नाही. गौरवर्ण हाच एक गुण असेल तर इराणी प्रजाही तितकीच गौरकाय सापडते. पण कांही का कारणाने असेना, युरोपियनांना मेहेरनजरेखाली रहावयास मिळते. हजिरीपत्रकांतही हिंदी व युरोपियन असा भेद केलेला कारकुनांचे बाबतींत दृष्टोत्पत्तस आला.
 इतका जरी पक्षपात होत असला किंवा इराणी सरकारचा ओढा इराणी लोकांकडे असला तरी, अद्यापि महाराष्ट्रीय कार्यकर्त्यास तेथे क्षेत्र आहे. बुद्धीच्या जोरावर त्यांना कोठेही नांव कामवतां येते. पण प्रथमतः त्यांनी बाहेर पडले पाहिजे. मद्रासी, पंजाबी, बंगाली, इत्यादि प्रांतांचे किती तरी लोक परदेशी जात असतां महाराष्ट्रीयांनी स्वस्थ रहाणे इष्ट नाही. आर्थिक दृष्ट्या परदेशची कामगिरी लाभदायक असते. कारण साध्या कारकुनासही येथे दीडशे रुपये मिळतात ! स्वतःच्या कर्तबगारीस पूर्ण वाव पाहिजे असल्यास परदेशी गेले पाहिजे. एकाच ठिकाणी सर्वांनी गर्दी करून भागणार नाही हे आता स्पष्ट दिसत आहे. 'पोटासाटीं भटकत जरी दूरदेशीं' जावे लागले तरी आपले स्वतंत्र राखून बदललेल्या परिस्थितीशी तन्मय होता येते हे दर्शविण्यासाठीच की काय, येथे एक महाराष्ट्रीय कुटुंबांत रहाण्यास मला मिळाले. आबादानमध्ये मुलांमंडळींसह रहाणारे एकच महाराष्ट्रीय गृहस्थ आहेत व त्यांच्या पाहुणचारांत अगदी आपल्या घरी असल्याप्रमाणे वाटलें. केवळ मातृभाषा एक म्हणून आपलेपणा आणि अगत्य किती वाटते हे परदेशी गेल्यावरच कळते. स्वभाषेचा अभिमानही जागृत करण्यास लांब परदेशचा प्रवास फार उपयोगी पडेल ! सध्या मराठीविषयी उदासीन असणारांना जादूच्या कांडीने अन्य देशांत नेऊन ठेवतां आलें तर किती तरी इष्ट बदल घडून येईल असे वाटल्यावाचून रहात नाही.

-केसरी, १२ व २६ मार्च, १९२९.


 खलिफांच्या या प्राचीन नगरींत मुसलमानी धर्माचे प्राबल्य विशेष आहे हे सांगण्याची आवश्यकता नसली तरी, बड्या आणि छोट्या भाईंना इकडे किती मान मिळतो हे पहाणे हिंदी प्रजेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. बगदादमधील सरकारी व स्वतंत्र अशा बहुतेक विचारवंतांना भेटावयास गेल्यावर हिंदुस्थानांतील मुसलमानांच्या वेडेपणाबद्दल त्यांनी आपण होऊनच कुतूहलपूर्वक पृच्छा केली. कित्येकांनी तर अल्लीबंधुंची त्यांच्या दृष्टीने काय योग्यता आहे हे वर्तमानपत्रांतून स्पष्टपणे जनतेपुढे मांडण्यास आग्रहपूर्वक बजावलें. मौलानाबंधूची इस्लामी धर्मप्रीति पाहून हिंदी लोकांना काय वाटत असेल ते असो. पण इकडील अग्रेसर मंडळी अल्लीबंधुंना 'नसता चोंबडेपणा करणारे आगंतुक' ही पदवी देतात !

 आपल्याकडे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे अध्यक्ष श्री. पटेल आहेत, तसेच इराकी प्रतिनिधीमंडळाचे माजी अध्यक्ष श्री. रशीद बेग गिलानी म्हणून एक राष्ट्रीय गृहस्थ आहेत. त्यांनी दोन खात्यांची दिवाणगिरीही केली आहे. त्यांच्या मुलाखतीस गेलो असता त्यांनी प्रथमत:च बजावून सांगितले की, “ तुमच्या देशांतील वर्तमानपत्रांतून शौकतअल्ली आणि त्यांचे बंधु ( मौलाना ही पदवी चुकून देखील त्यांच्या तोंडी आली नाही), यांच्या लुडबुडीची माहिती लोकांना करून द्या. आमच्या देशांतील धार्मिक व्यवस्थेची त्यांना इतकी आस्था का वाटते हे कळत नाही. मण हिंदुस्थानांत बसून 'असे करा' 'तसे नको ' इत्यादि हुकूम आम्हांस सोडण्याची उठाठेव यांना सांगितली कोणी ? अशा अनाहूत ढवळाढवळीने ब्रिटिश सरकारच्या भेदनीतीस ते बळी पडतात; इतकेच नव्हे तर इंग्रजी मुत्सद्द्यांना चंचुप्रवेश करण्यास नवीं नवीं साधने ते उपलब्ध करून देतात.
  हा आरोप ऐकून कोणीही थक्कच होईल ! कारण बंधुद्वयांच्या इंग्रज राज्यकर्त्यांवरील गालिप्रदानाची प्रखरता सर्वश्रुत आहे. अर्थात मीही जास्त चौकशी करून खुलासा देण्याची विनंती केल्यावर श्री. गिलानी म्हणाले,
 "नकिबांचीच गोष्ट घ्याना. दोन वर्षांपूर्वी नकीब वारले, तेव्हा नवीन वारसासंबंधी प्रश्न निघाला. (नकीब म्हणजे बगदादमधील मुख्य धर्मगुरु. आपल्याकडील श्रीशंकराचार्यांसारखाच मान या नकिबांना मिळतो. हिंदी मुसलमान नकिबांना मानतात ). नकिबांची इस्टेट फार मोठी असून उत्पन्नही एखाद्या संस्थानाप्रमाणे असते. एवढी मोठी संपत्ति धार्मिक नांवाखाली वंशपरंपरेने एकाच व्यक्तीच्या हातीं रहाणे प्रचलित परिस्थितीत योग्य नसल्याने व त्या द्रव्याचा सदुपयोग व्हावा म्हणून येथील आम्ही सर्व मंडळींनी पंच नेमून व्यवस्था करण्याचे ठरविले. मात्र नकिबांच्या वडील मुलास या पंचायतीचा अध्यक्ष करण्याची अट होती. नकिबाची सर्व मंडळी या योजनेस अनुकूल होती आणि हा धार्मिक प्रश्न असल्याने ब्रिटिश सरकारला यांत ढवळाढवळ करतां येत नव्हती. पण शौकतअल्ली आहेतना ! त्यांनी तारांचा गोंधळ माजविला. ब्रिटिश सरकारपुढे तोंड वेंगाडून त्यांना या धार्मिक बाबतींत पडावयास लावले आणि अशा ठिकाणी लुडबुडण्यास सोकावलेल्या इंग्रजांना आयतेच फावलें ! राजे फैझल यांना अल्लीबंधूंनी तारा पाठविल्या, पुढाऱ्यांना हुकम सोडले आणि ब्रिटिशांची मनधरणी केली ! कशासाठी ? तर लक्षावधि रुपयांच्या मालमत्तेची व्यवस्था पंचांमार्फत होऊन लोकोपयोगी कार्यास सहाय्य झाले असते ते होऊ नये म्हणून ! स्थानिक अडचणी ठाऊक नसतांना यासंबंधी ढवळाढवळ करण्याविना त्यांचे काय अडले होते ?"
 अल्लीबंधूंना हा आजोळचा अहेर मिळाल्यामुळे विषयान्तर करण्यासाठी, ‘इराकांतील जनतेचे अंतिम साध्य काय आहे ?' हा प्रश्न मी विचारला. 'निर्भेळ स्वातंत्र्य ' हे उत्तर तत्काळ मिळाले आणि नंतर येथील निवडणूक, लोकमतनिदर्शन, मॅंंडेटरी सत्तेचे विरोधी प्रयत्न इत्यादिकांची माहिती सांगून इराकी 'विठ्ठलभाई ' हिंदी मुसलमानांकडे वळले. "ब्रिटिश राजनीतीचे 'भेद' हे तत्त्व आहे. तुमच्या हिंदुस्थानांत हिंदु व मुसलमान असा भेद पाडून तुम्ही स्वराज्याला योग्य नाही असे ते सिद्ध करीत आहेत; आणि वेडे अविचारी मुसलमान त्या भेदनीतीला बळी पडतात ! हिंदु-मुसलमान हा भेद विसरून एकाच राष्ट्रांतील घटक म्हणून सर्वजणांनी एकी केली तरच तुमचा तरणोपाय आहे. तुमच्याकडे प्रकार आहे तसाच आमच्याकडेही प्रयोग झाला ! येथे शिया व सुनी असे पंथ आहेत. त्यांचा फायदा घेऊन एकमेकांत वैमनस्य वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. असे भांडण सुरू झाल्यावर मग स्वातंत्र्याला आम्ही नालायक ठरावयाचेच! या सर्व प्रकारांना कोणीही बळी पडू नये. हिंदुस्थान स्वतंत्र व्हावे अशी आमची इच्छा फार आहे. कारण ब्रिटिशांचा साम्राज्यवादाचा मुख्य आधार तोच देश आहे. तुम्ही स्वतंत्र झालां म्हणजे आमच्या लढ्यांत आम्हांला जोर येईल. तुमच्याकडे आमचे डोळे लागले आहेत ते यासाठीच. पण तुम्ही आपसांतील तंटे मिटविल्याविना तुम्हांला स्वराज्य मिळणार नाही ही खात्री ठेवा."  इराकचें सरकार हिंदुस्थानपेक्षा अधिक प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. त्याचे एक मंत्रिमंडळ असून मुख्य मंत्रीही असतो. प्रचलित परिस्थतीत सर्व मंत्रिमंडळाने राजिनामा दिला असून नवीन मंडळ बनण्याची आशा दिसत नाही. तरी नवे हाय कमिशनर लवकरच येतील तेव्हा बरेच महत्त्वाचे राजकारण बाहेर पडेल असे म्हणतात. इंग्लंडशी बरोबरीच्या नात्याचा तह केला तरच मंत्रिमंडळ होऊ शकेल अशी भाषा राष्ट्रीय वृत्तीच्या लोकांत ऐकू येते. मंत्रिमंडळाने राजिनामे दिले असले आणि राजेसाहेबांनी ते स्वीकारले असले तरी, नवे प्रधान कामावर येईपर्यंत जुन्या दिवाणांनी अधिकारन्यास करूं नये असे ठरले गेले आहे. तेव्हा मुख्य मंत्र्यांची भेट घडणे मला जरा दुरापास्तच होते. एक तर अधिकारदंड खाली ठेवलेला आणि केवळ 'लोकाग्रहास्तव ' कार्यालयांत नावापुरते यावयाचे ही आजकालची रीत; आणि दुसरे म्हणजे इस्लामी धर्माप्रमाणे सर्वांचा दिवसभर उपवास असतो. तेव्हा पूर्वसंकेत केल्याने 'केसरी'च्या प्रतिनिधीस मुलाखत देण्याचे मुख्य मंत्र्यांनी ठरविले. श्री. अबदुल म्हासीन बेग सादून हें त्यांचे नांव. त्यांना इंग्रजी बोलण्याचा सराव नाही आणि नेहमीची प्रचारांतील अरबी भाषा केसरीच्या प्रवासी प्रतिनिधीस कशी अवगत असणार ? ही नवी अडचण तत्काळ दूर झाली. मुख्य मंत्र्यांचा कारभारी इंग्रजी बोलण्यांत पटाईत होता व त्याला 'इटरबटर' ( इंटरप्रिटर-दुभाषी-या इंग्रजी शब्दाचा हिंदुस्थानी अपभ्रंश ) नेमून मुलाखतीस प्रारंभ झाला.
 दरबारी आदबीचे शिष्टाचार झाल्यावर प्रधान मंत्र्यांनी पौर्वात्य राष्ट्रांतील वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींस भेटण्यांत आपणांस किती आनंद वाटतो ते बोलून दाखविलें. आणि हिंदी गृहस्थाचा परिचय घडून येण्याचा हा सुयोग आहे असें म्हटलें."इंग्रजी पंखाखाली इराक प्रगतीकडे मार्गक्रमण करीत असतां हिंदी राष्ट्राने आमच्यासाठी बरेच अधिकारी पुरविले आणि त्या सर्वांनी आपले काम इमानेइतबारे केले, हे कळविण्यास आम्हांस मोठा संतोष वाटतो. आमच्या शासनखात्यांत आजूबाजूच्या इतर बऱ्याच देशांतील परकीय अधिकारी आहेत. परंतु कर्तव्यतत्परतेंत, प्रामाणिकपणांत व मेहनतींत हिंदी लोकांच्या तोडीचे कोणीच अधिकारी आम्हांला आढळले नाहीत असे माझे आणि सर्व खात्यांतील वरिष्ठांचे मत आहे. सध्या सर्वत्र इराकी प्रजानन आम्ही कामावर नेमीत आहोत. म्हणून पूर्वीच्या हिंदी अधिकाऱ्यांना रजा देणे भाग पडत आहे. पण याचा अर्थ, आम्ही हिंदी. लोकांचा द्वेष करतों असा मुळीच करून घेऊ नका असे माझे आपणांस पुनः पुनः सांगणे आहे. इराकी सरकारांत हिंदी मंडळींनी फारच अमोलिक कामगिरी केली आहे आणि आम्हांला जेव्हा जेव्हा तज्ज्ञांची आवश्यकता लागेल तेव्हा तेव्हा इतर परकीय लोकांपेक्षा प्रथमतः आम्ही हिंदी लोकच पसंत करू हे लक्षात ठेवा. युद्धोत्तर काळांत इराकी सुशिक्षित प्रजानन बेकार हिंडू लागले, तेव्हा सरकारी जागा इराकी लोकांसाठीच आम्ही ठेवल्या तर त्यात कोणत्याही प्रकारचा असद्धेतु आमचेवर आपण लादूं नये. केवळ राष्ट्रीय वृत्तीने प्रेरित होऊनच हे काम आम्हाला करावे लागत आहे. हिंदी राष्ट्राचा आणि इराकचा संबंध आजकालचा नव्हे. शेकडो वर्षापूर्वीपासून ही दोन राष्ट्रे एकमेकांस परिचित आहेत. हिंदी राष्ट्रांत सर्वांगीण प्रगति होत आहे आणि त्यांतील लोकशाहीच्या विजयाकडे आमचे लक्ष लागले आहे."
 इतके बोलणे झाल्यावर मी काही प्रश्न विचारले. त्यांतील कांहीं निवडकच खाली उत्तरांसह दिले आहेत. प्रश्न–इराकी प्रजेचे अंतिम ध्येय साम्राज्यांतर्गत स्वराज्य असे आहे का अगदी स्वतंत्र व्हावे असे इराकी जनतेस वाटते ?
 उत्तर--कोणत्याही मनुष्याच्या अंत:करणांत निर्भेळ स्वातंत्र्याच्याच भावना असणार आणि इराकी लोकांनाही तसेच वाटते. परंतु तूर्त ब्रिटिशासारख्या बलिष्ठ राष्ट्राशी संगनमत केल्याने इराकचा फायदा होणार असल्याने काही कालपर्यंत त्यांचा संबंध तोडतां येत नाही.
 प्रश्न-ईजिप्त, हिंदुस्थान व चीन या पौर्वात्य देशांच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चाललेल्या प्रयत्नांबद्दल आपले मत काय आहे ?
 उत्तर--बल्गेरिया, स्वित्झर्लंड, युगोस्लाव्हिया, बेल्जम, डेन्मार्क इत्यादि लहान राष्ट्रे जर युरोपांत स्वातंत्र्य भोगू शकतात तर, या मोठ्या देशांना ते का नसावे ? प्रत्येक मनुष्याने स्वतंत्र व्हावें हें राष्ट्रीयत्वाचे लक्षण आहे. सर्व राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत म्हणजेच कोणी कोणावर स्वामित्व गाजविणार नाही असे मला वाटते.
 हे संभाषण चालू असतांना लहानसा कप पुढे करण्यांत आला. अशा वेळी नकार न देण्याविषयी आगाऊ सूचना मिळाली असल्याने त्याचा स्वीकार केला आणि तोंड वेंगाडत तो काफीचा कडू काढा पिऊन टाकला ! त्यांत दूध घालण्याची पद्धत नाही. भातुकली खेळताना मुली लहानसे कप घेतात त्याच आकाराचे कप कॉफीसाठी का वापरतात ते यावेळी कळलें.
 प्रश्न-मुस्तफा केमाल, अमानुल्ला आणि इराणाधिपति यांच्या देशांत पाश्चात्य सुधारणांचा प्रसार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या दृष्टीने इराकांतील सरकार काय करणार आहे ?
 उत्तर--या तीनही थोर पुरुषांचे प्रयत्न स्तुत्य आहेत यांत शंका नाही. परंतु, प्रथमतः लोकांची मनोभूमिका तयार करून मग सक्तीने सुधारणा लादाव्यात असे आम्हांस वाटतें.
 प्रश्न-स्वराज्य मिळविण्यासाठी हिंदी प्रजेने कोणत्या उपायांचा अवलंब करावा असे आपले मत आहे ?
 उत्तर--हिंदुस्थानच्या प्रश्नांची सांगोपांग माहिती नसली तरी वर्तमानपत्रांतील बातम्यांवरून हिंदु व मुसलमानांची फूट तेथे फार विकोपास गेली असे दिसते. या दोन्ही पक्षांची एकी झाल्याशिवाय आणि एक पुढारी नेमून त्याच्याच तंत्राने सर्वांनी चालल्याविना इष्ट फलसिद्ध होणार नाही असे माझे मत आहे. तुर्कस्तानांतील प्रजाजन मुस्ताफा केमालच्या आज्ञेनुसार वागतात; इराणी लोक रेझाशहाच्या शिकवणीस मान तुकवितात; म्हणून त्या देशांची प्रगति झाली. हिंदुस्थानांतही तसेच झाले पाहिजे.
 इतके बोलणे झाल्यावर मुख्य मंत्र्यांनी हिंदुस्थानकडून सर्व जगाला मार्गदर्शक ज्ञान मिळाले असल्याचे सांगितले. आणि हिंदुस्थानने लवकर स्वतंत्र होऊन इराकला स्वातंत्र्य मिळविण्यांत मदत करावी अशी इच्छा प्रगट केली. तेव्हा खाल्डिया, बाबिलोन इत्यादि ठिकाणच्या प्राचीन काळच्या राजांनी जशी जगतांत संस्कृति पसरविली तशीच हल्ली इराकने स्वतंत्र वृत्ति पौर्वात्य राष्ट्रांत स्वकृतीने पसरवावी अशी मनीषा मी दर्शविली. नंतर आभारप्रदर्शन, भेटीमुळे परस्परांना झालेला आनंद, आदबीचे हस्तांदोलन इत्यादि शिष्टाचार झाल्यावर ही मुलाखत संपली.
 अरबी पत्रकारांचे मत–पण अलीबंधु व त्यांचे मूठभर अनुयायी यांना मिळणारी शेलापागोट्यांची परंपरा कोठे थांबते ? 'स्वतंत्र' नांवाच्या वर्तमानपत्राच्या संपादकांना भेटतांच त्यांनी, "तुम्ही हिंदुस्थानहून आला काय ?" असा प्रश्न केला. होकारार्थी उत्तर देतांच, "तुमच्या देशांतले मुसलमान असे वेड्यासारखे का करतात ते सांगाल का ?" म्हणून उत्कंठेने विचारलें ! हिंदूंशी त्यांचा तंटा होतो त्याचे कारण मशिदीपुढे वाद्ये वाजतात, असे सांगतांच संपादक म्हणाले की, "वाद्ये वाजलीं म्हणजे तंटा का व्हावा हे मला कळत नाही. बगदादमध्ये किती तरी प्राचीन मशिदी आहेत. पण त्यांच्यापुढे वाद्येंं वाजविण्याची मुळीच बंदी नाही. सर्व मिरवणुकीच्या वेळीं भर रस्त्यावर असणाच्या मशिदींवरून देखील सर्व प्रकारची वाद्येंं वाजवीत जातात. आमच्या प्रार्थनेत व्यत्यय येत नाही किंवा आमचे पित्तही खवळत नाही ! असे असतां हिंदी मुसलमानांना या खोड्या का जडाव्या ?" ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.
 मशिदींपुढे वाद्ये वाजल्यामुळे मुसलमान चिडतात, हे सांगितल्यावर संपादकमहाशयांना हसू आवरेना व ते म्हणाले,"खरोखर हिंदी मुसलमानांसारखे हटवादी तेच !"
 अल्लीबंधूच्या फाजील धर्माभिमानाबद्दलही निर्देश ओघाओघानेच आला ! त्यांच्यासंबंधी येथील पुढाऱ्यांनी दिलेले मत स्पष्टपणे न लिहिलेलेच बरें ! येवढ्यावर तरी त्यांचे प्रलाप आणि चेष्टा थांबतात की नाही ते पहाणे आहे. उपर्युक्त मुलाखतीत वस्तुस्थितीचे वर्णन केले असून अल्लीबंधुंना मिळालेली शेलकी विशेषणे प्रकट केली नाहीत. हिंदुस्थानांतील त्यांच्या पराक्रमाचे वर्णन इकडे वर्तमानपत्रांतून येणें दुर्घट असल्याने त्यांची खरी चहा येथे होत नसावी !

--केसरी, १९ मार्च, १९२९.


(१२)

 "मला अत्यंत वाईट वाटते ते हिंदुस्थानांतील मुसलमानांच्या अराष्ट्रीय वर्तनाचेच." या शब्दांनी इराकमधील एका राष्ट्रीय मुसलमान पुढाऱ्याने आमच्या मुलाखतीस प्रारंभ केला ! ते पुढे म्हणाले, "धर्माने राष्ट्रांत दुही पडत असेल तर धर्मासच धाब्यावर बसविले पाहिजे आणि महमदाने इस्लाम धर्माची स्थापना केली ती निरनिराळ्या लोकांना एका माळेंत गोवण्यासाठीच. आमच्यांतही शिया आणि सुनी हे भेद आहेत, नाही असे नाही; पण आमचा तंटा हिंदुस्थानांतील वैमनस्याइतका विकोपास जात नाही. माझ्या देशबांधवांस माझें हेंच सांगणे आहे की, प्रथमतः देशहित पहा, धर्माच्या नांवाखाली विभक्त होऊन आपसांत वैर माजवूं नका."
 या 'खलिफांच्या नगरींत ' एका उच्चवर्णीय व मोठ्या अधिकारारूढ असणाऱ्या एका धनकनकसंपन्न पण विद्याविभूषिताने वरील वाक्ये अगदी प्रथमतःच तोंडांतून काढल्यामुळे पुढे काय सद्वचने बाहेर येतात हे ऐकण्यासाठी मी उत्कंठित झालो. माझे विचारावयाचे कांही प्रश्न मी मनांतच योजून ठेविले होते. ते काही काळ तरी दूर सारावे लागले. एका प्रशस्त दिवाणखान्यांत कै. लाला लजपतराय यांचे 'अनहॅपी इंडिया ' वाचीत असलेली धिप्पाड पण ऐन तारुण्यांतील ही पाणिदार व्यक्ति पाहून थोडीशी पं. जवाहरलाल नेहरूंची आठवण झाली. योग्य प्रकारे स्वागत व हस्तांदोलन इत्यादि शिष्टाचार झाल्यावर अगदी धिमा आवाज येऊ लागला.
 "कृपा करून मला खरे कारण सांगा की, हिंदी मुसलमान अशा प्रकाराने का वागतात ? त्यांना आपल्या देशाबद्दल काहीच कसे वाटत नाही ? हिंदुस्थानविषयी माझ्या मनांत काय विचार आहेत हे प्रदर्शित करतां येणार नाही ! पण एवढे मात्र खरें की, मी हिंदुस्थानांत जाण्याची इच्छा फार दिवस करीत आहे. कदाचित् आणखी दोन वर्षांनी मला त्या पूण्यभूमीचें दर्शन घेण्याचा सुयोग येईल. हिंदुस्थान म्हणजे सर्व जगांतील संस्कृतीचे आद्यस्थान असून इस्लामी, यहुदी. ख्रिस्ती इत्यादि धर्मसंस्थापकांना प्रेरणा हिंदी राष्ट्राकडूनच मिळाली आहे. हिंदुस्थानबद्दल मला अत्यंत आदर तर वाटतोच, पण त्याबरोबरच एवढे मोठे राष्ट्र इतक्या विपन्नावस्थेस का पोहोचले व ते स्वतंत्र का नाही म्हणून विषादही मनांत येतो ! सर्व जगाचे डोळे हिंदी राष्ट्रांकडे लागले असून भविष्यकाळांत लवकरच त्याचा भाग्योदय व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे."
 इतके भाषण होताच हातांतील 'अनहॅपी इंडिया'च्या प्रस्तावनेतील एक महत्त्वाचा छेदक वाचून दाखवून ते गृहस्थ म्हणाले, "खरोखर लजपतरायांनी किती यथार्थ वर्णन केले आहे ! परिस्थितीचे वास्तविक ज्ञान त्यांना होते आणि त्याची कारणपरंपरा पण कशी पटण्याजोगी त्यांनी दिली आहे ! टिळक, लालाजी, गांधी, नेहरु यांसारखे पुढारी तुमच्या देशांत होतात हे तुमचे किती मोठे भाग्य!"
 नंतर 'आर्यसमाज ' ही काय संस्था आहे ? ती लालाजींच्या आधी 'डायानंडा सारास्वाटी ' (इंग्रजी लेखनानुसार उच्चार जशाचा तसा दिला आहे ), यांनी कशासाठी काढली इत्यादि माहिती अगदी कुतूहलपूर्वक विचारून घेतल्यावर हिंदुस्थानातील राजकीय पक्षांसंबंधी त्यांनी पुष्कळ प्रश्न विचारले.
 स्वराज्य हा कोणता पक्ष ? स्वराज्य म्हणजे काय ? गांधी अजून राजकारणांत भाग घेतात का ? हे त्यांनी जाणण्याची इच्छा दर्शविली. 'पाटेल ' कोणत्या पक्षाचे आहेत ? टिळकांचे वर्तमानपत्र–ज्यांतील लेखांमुळे त्यांना कारागृहवास सोसावा लागला तें—मला वाचता येईल का ? हिंदी राजकारणाची सांगोपांग चर्चा करणारे एखादें वर्तमानपत्र कोणते ? राजकारणाची साद्यंत माहिती देणारे एखादें हिंदी पुस्तक मला सांगाल काय ? अशा विविध प्रश्नांचीं यथामति उत्तरे दिल्यावर पुनः हिंदी मुसलमानांची बाब चर्चेस ओघाओघानेच आली.
 मला आता असे सांगा की,"महंमदअल्लींचे हिंदी राजकारणांत कितीसे वजन आहे ? त्यांचे बंधु सध्या काय करतात ? त्यांचा हिंदी राष्ट्रैक्याला विरोध अजून चालूच आहे का ? माझा अनुभव आणि मत मी तुम्हांला सांगतो. महंमदअल्ली बगदादला आले तेव्हा मोठे हिंदी राजकीय पुढारी म्हणून मी त्यांना भेटण्यास गेलों; पण भेटच झाली नाही. कांही स्थानिक हिंदी मंडळी भेटावयास गेली, तर त्यांना देखील मोठ्या तिरस्कारयुक्त दृष्टीचा लाभ आणि नंतर एक उपमर्दकारक पत्र इतका प्रसाद मिळाला. हिंदुस्थानांत बसून हे बोलघेवडे पुढारी अरबस्तानांतील आणि तुर्कस्तानातील मुसलमानांना मारे हुकूम पाठवितात; यांना माझा प्रथम प्रश्न असा की, तुम्हांला दुसऱ्यांची उठाठेव सांगितली कोणीं ? अगोदर आपल्या राष्ट्रांत तुम्ही एकी करा, मग आम्हांला उपदेशाच्या गोष्टी सांगा. स्वतः आपल्या देशबांधवांशी भांडणाच्या आणि आपल्या मातृदेशाची उपेक्षा करणाऱ्या इसमाला आम्ही काडीइतकाहीं मान देत नाही, मग त्याच्या हुकमाकडे ढुंकून तरी कोण पाहील १ खरेंच, यांना अंत:करण किंवा विचारशक्ति आहे की नाही हे मला कांही कळत नाही. माझा मुलगा हिंदुस्थानांत जन्मला व तेथे त्याचे शिक्षण वगैरे झाल्यावर तो स्वत:ला हिंदी म्हणवून घेऊ लागला तर, मला वाईट वाटणार नाही. मातृदेशापुढे इतर सर्व विचार रद्द केले

मु. ६
पाहिजेत. शौकतअल्लींनी अंतस्थ यादवीची धमकी दिली हे खरें ना ? मला राहून राहून अत्यंत वाईट वाटते ते या अविचारी अराष्ट्रीय मुसलमानांचे. कोणी तिसऱ्या व्यक्तीने जरी त्यांच्या मनांत हे वेडे विचार भरवून दिले असे धरून चाललें तरी या भुलथापांना ते फसतात कसे ? त्यांना इतका का विचार नाही ?

 "हिंदुस्थानांत मला प्रथमतः भेटावेसे वाटत असेल तर ते जवाहरलाल नेहरूंना. त्यांनी साम्राज्यविरोधी संघाच्या अध्यक्षाला पाठविलेली स्वत:च्या प्रकृतीसंबंधी तार फार जोरदार भाषेत लिहिली होती. ( सायमन-सप्तकाच्या बहिष्कारामिरवणुकीत जवाहरलालना मार लागला होता, त्याची चौकशी साम्राज्यविरोधी संघाध्यक्षाने केली. तिला उत्तर म्हणून तार पाठविली तींत ‘ब्रिटिश साम्राज्याला पुरून उरण्याची इच्छा आहे,' असे जवाहारलालनी म्हटले होते; हा भाग येथे अनुसंधेय होता). स्वातंत्र्याच्या चळवळीबरोबरच सामाजिक सुधारणेचाही जो कार्यक्रम त्यांनी आंखला आहे तीच प्रगतीची योग्य दिशा आहे. नुसते राजकारण राखुन चालत नसते. जनसमाजाची अनुकूलता मिळविण्यासाठी सामाजिक व आर्थिक बाबी जनतेला तत्काळ पटतील अशा आपल्या योजनेत समाविष्ट कराव्या लागतात. पंडित जवाहरलालनी दीर्घ विचारांतीच हे धोरण ठरविलेले दिसते. त्यांचे वय काय ? ते कोठे शिकले ?" इत्यादि घरगुती माहिती विचारून सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी कशी चालते ? तिची कार्य करण्याची पद्धति कशी आहे ? कोणत्या क्षेत्रांत तिचे विशेष लक्ष आहे ? ‘सास्ट्री' (शास्त्री) कोण ? त्यांचे राजकीय मत कोणत्या पक्षाकडे झुकलेलें आहे ? या प्रश्नांचा मारा झाला. समाधानकारक उत्तरे मिळविल्यावर हिंदुस्थानचे भविष्य काय या विषयावर चर्चा सुरू झाली.
 "नेहरू रिपोर्ट मला पहावयाला मिळेल काय ?" अशी पृच्छा केल्यावर त्यांना माझ्याजवळची एक प्रत देण्याचे मी अभिवचन दिले. बंगाली पुढारी कोण ? टिळकांच्या देशांतले मोठमोठे राजकारणी हल्ली कोण आहेत ? 'सट्यामूर्टी ' कोठे असतात ? हेही चौकस बुद्धीचे प्रश्न ऐकून हिंदी राजकारणाची त्यांची जिज्ञासा व्यक्त झाली. हिंदी राजकारणावर इतक्या मोकळेपणाने बोलण्याचा प्रसंग फारा दिवसांनी आल्याने मलाही मौज वाटली.
 त्यांची प्रश्नमालिका संपल्यावर मी माझ्या शरसंधानास प्रारंभ केला. हिंदी लोक इराकमध्ये आहेत, त्यांना हिंदुस्थानांत पाठविण्याचे जे सत्र सध्या चालू आहे त्याच्या बुडाशीं काय हेतु आहे ? हा प्रश्नच प्रथम अगदी स्पष्टपणे विचारल्यावर त्याचे उत्तर असें आलें -
  "इराकी प्रजेसाठी इराकचे राज्य' अशी जर आमच्या लोकांची आकांक्षा असली तर त्यांत दोष देण्यासारखे काही नाही हे तुम्हांलाही मान्य होईलच, ही मागणी अगदी नैसर्गिक आहे आणि तीच आमच्या देशांत चालू आहे. हिंदी लोकांनाच येथून जावे लागते अशांतला प्रकार नव्हे. अगदी आमच्या धर्माचे अरब लोकही आसपासच्या असीरिया, आर्मीनिया इत्यादि प्रांतांतील असले तरी, ते काढून त्या जागी इराकी नेमावेत अशी आमची इच्छा आहे; ती रास्त आहे की नाही हे तुम्हीच ठरवा.
 "हिंदी स्वातंत्र्याच्या लढ्यास आमची पूर्ण सहानुभूति असून वारंवार हें मत प्रदर्शित करणारे लेख अरबी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असतात. ज्या देशांत टिळक, गांधी, दास, लालाजी, नेहरु इत्यादि पुढारी झाले तो देश अत्यंत भाग्यवान् म्हटला पाहिजे, आमच्या देशांत अद्याप पुढारीच कोणी नाही म्हणून आम्ही मागसलेले आहोंत, हिंदी राष्ट्र लवकरच पूर्णपणे स्वतंत्र होवो अशीच आमची इच्छा आहे. कारण सर्व राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळावे अशी वृत्तीच खरी राष्ट्रीय बाण्याची म्हणता येईल. मीही राष्ट्रीय मताचा आहे."
 या थोर व्यक्तीचे नांव सांगणे इतक्यांत इष्ट नाही. पण इराकतील ते पं. जवाहरलाल आहेत, एवढे वाचकांच्या जिज्ञासेसाठी सांगावेसे वाटते. अल्पवयांतच इंग्लंडमध्ये इराकचे वकील म्हणून ते कांही काळ रहात होते यावरून त्यांच्या योग्यतेची कल्पना येईल.

–केसरी, २ एप्रिल, १९२९.


( १३ )

 सर ससून हे ब्रिटिश वैमानिक खात्याचे दुय्यम अधिकारी नुकतेच हिंदुस्थानांत येऊन 'पहाणी ' करून गेले हे तर सर्वश्रुतच आहे. त्यांची पहाणी असावयाची कसली ? हिंदुस्थान ते इंग्लंड वैमानिक दळणवळण चालू करण्यासाठी सर ससून आले असे भासविण्यांत आले आणि ती नवीन टपालची सोयही एप्रिलच्या आरंभापासून अमलात येईल. पण त्यांचा अंतस्थ हेतु अगदी निराळा होता. हत्तीचे दाखवावयाचे दात वेगळे आणि खाण्याचे दात निराळे असतात, तशांतलाच हा प्रकार. सरसाहेब बगदाद-बसरामार्गे कराचीस आले होते. बसऱ्याला वैमानिक नौकांचे मोठे ठाणे करण्याची योचना निश्चित करणे हे त्यांचे मुख्य कार्य होते व त्यांनी ते पार पाडलेही. 'सी प्लेन बेस' असे बसऱ्याचे नवें लष्करी महत्व आहे. सिंगापूरला आरमारी ठाणे, बगदाद येथे वैमानिक दलाचे मुख्य केंद्र आणि बसऱ्यास वैमानिक नौकांचा पुरवठा अशी ही कडेकोट तयारी कोणत्या आगामी संकटासाठी चालली आहे कोण जाणे !  बसऱ्याला वैमानिक नौकांचा तळ ठेवला म्हणून कांही बिघडलें असे नव्हे; पण मुख्य गंमत आहे ती बातमी गुप्तपणे पसरविण्यांत. वैमानिक नौका इंग्लंडहून निघाल्या तेव्हा साहजिकच रूटरने तार दिली की, साम्राज्यांतील वैमानिक नौकांच्या तांड्यापैकी कांही भाग बसऱ्यास जाण्यासाठी निघाला. यांत विशेषसें कांहीच नसले आणि हिंदुस्थानांत किंवा अन्यत्र ही तार जशीच्या तशीच प्रसिद्ध झाली असली तरी, बसरा व बगदाद येथे लगेच वर्तमानपत्रांना कानमंत्र गुप्तपणे देण्यात आला. 'साम्राज्यांतील ' हा शब्द गाळून टाकण्याविषयीची ती गुप्त सूचना होती. 'इराक' हा साम्राज्याचा एक घटक असल्याचे सर्वत्र मोठ्या डौलाने सांगितले जाते. साम्राज्यांत लागू असणाऱ्या पोस्टाच्या सवलती इराकच्या बाबतींत खऱ्या ठरतात; पण इराकी जनतेस मात्र ‘आम्ही केवळ मँडेटरी सत्ताधारी आहोंत' असा सोवळेपणाचा आव आणून बजावलें जाते. तेव्हा ही समजूत कोणत्याही प्रकारे धुतली जाऊ नये म्हणून वरचेवर इंग्रजी वर्तमानपत्रांवर खासगी रीत्या नियंत्रण घालावे लागते. इराकी प्रजेला इंग्रजांनी कसे भुलविलें याचे हे अगदी क्षुल्लक उदाहरण आहे. हिंदुस्थानांतून इराकला टपाल पाठविणे झाल्यास पाकिटाला दोन आणे द्यावे लागतात. कारण इराक हा ब्रिटिश साम्राज्यांतील एक भाग आहे. पण इराकमधून हिंदुस्थानला तेवढ्याच पाकिटाकरिता तीन आणे टपालखर्च पडतो. इराकी लोकांशी बोलतांना, 'छे:, कुठले साम्राज्य अन् कुठले काय ? तुमचा आमचा संबंध फक्त राष्ट्रसंघाने आमच्यावर जबाबदारी लादली म्हणून आला. तुम्ही स्वराज्यास पात्र झालां, राष्ट्रसंघांत तुमचा प्रवेश झाला की, आम्ही आपले निघून जाऊं.' अशी भाषा वापरली जाते. नृपनीतींचे खरे स्वरूप असेंच नाही का?  आणखीही थोडे खोलांत शिरल्यास फारच मनोरंजक माहिती मिळेल. हिंदी लोकांस दोनच जाहीरनामे ठाऊक आहेत. एक १८५७ सालचा आणि दुसरा कपिलाषष्ठीप्रमाणे साठ वर्षांनी १९१७ सालीं दिलेला. या दोन्ही जाहीरनाम्यांची किंमत किती आहे हें गुलदस्तांतच राहू द्या. इराकला असे किती तरी जाहीरनामे मिळाले आहेत आणि इराकवर ब्रिटिश अंमल सुरू होऊन, नव्हे इराकच्या पालनपोषणाचें कार्य इंग्रजी राज्यकर्त्यांवर येऊन, अगदी थोडा काल झाला असली तरी, जाहीरनामे खिरापतीप्रमाणे वाटले गेले आहेत असे दिसतें.
 "ग्रेटब्रिटनची उच्च आकांक्षा तुर्कांचे साम्राज्य ( ऑटोमन एम्पायर ) अबाधित ठेवण्याचीच आहे. पण आमच्याविरुद्ध जर्मनीच्या बाजूने लढण्यास प्रवृत्त झाल्याने ते साम्राज्य सुरक्षित राखणे अशक्य आहे. अरबांना तुर्कांंचा जुलूम जाणवत आहेच. तुमची धर्म आणि तुमचे स्वातंत्र्य तुम्हांसाठीच राखण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू."
 "ब्रिटिश सत्तेखाली पुरातन कालापासून (?) लक्षावधि मुसलमान प्रजानन आहेत. जगांतील कोणत्याही राज्यकर्त्यांच्या अमलाखाली इतकी इस्लामी प्रजा नाही ( ? )." ( प्रश्नचिन्हें लेखकाची आहेत.)
 "तुम्हांला धार्मिक आणि घरगुती बाबतींत स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा आस्वाद चाखावयास मिळेल," ( भाषा बदलली. )
 "आमचे राज्य हें सन्मान्य (? ) ईस्ट इंडिया कंपनीच्या परंपरेनुसारच चालविले जाईल.” (बिचारे अरब! ईस्ट इंडिया कंपनीच्या परंपरेचा पुरावा एडमंड बर्क त्यांना देता तर फार बरे झाले असते !)
 "आम्ही बगदादला जेते म्हणून येत नसून तुमची मुक्तता करण्यासाठी येत आहोत." ( आगींतून सोडवून फुफाटयांत पाडण्यासाठी ?)  "तुमचे राजवाडे जमीनदोस्त झाले आहेत; तुमचीं उपवनें उध्वस्त झाली आहेत; तुमचे वाडवडील दास्यांत कुचंबत होते. युद्धे उकरून काढण्यांत तुमचे आंग नसतांही तुमच्या मुलांबाळांना रणांगणावर नेण्यांत आले आहे. तुमची धनदौलत सारी लुटली गेली आहे."
 "अहो बगदादचे पौरजनहो ! तुमच्या सव्वीस पिढ्या परकीय अरेरावी राजांच्या दास्यांत बद्ध होत्या व त्यांनी तुमच्या जातीजातींत कलागती लावून देऊन आपला फायदा करून घेतला हे नीट लक्षात घ्या !"
 ( कर्नल लारेन्सने काय केले आहे ? इब्न सौदला आणि मक्केच्या हुसेनला मलिदा कोण चारीत होते आणि कशासाठी ? हल्लीची पिढी काय स्वातंत्र्यसौख्यांत आहे ?)
 युफ्रातीस व तैग्रीस या दोन नद्यांमधील हा प्रदेश तीन विलायतींत विभागला गेला आहे. विलायत म्हणजे इंग्लंड किंवा परदेश असा अर्थ आपल्याकडे केवळ चुकीने झाला आहे. मूळ अर्थ स्वदेश असा असून राज्यव्यवहारकोशांत विलायत म्हणजे स्वदेश असे स्पष्ट म्हटले आहे. बसरा विलायत, बगदाद विलायत आणि मोसल विलायत अशा तीन विलायती मिळून इराकचे राज्य होते. मेसापोटेमिया यालाच म्हणतात. खाल्डिया नामक प्राचीन देशही याच भागांतला. बाबिलोन व निनेव्ह हीं, इतिहासप्रसिद्ध राजपुरें इराकांतच आहेत. जगत्संस्कृतीचा पाळणा प्रथम याच प्रदेशांत बांधला गेला असे रूपक नेहमी योजिले जाते. या तीन विलायतींत किती तरी फरक आढळतो. बगदादला राजकारणाशिवाय दुसऱ्या गोष्टी ऐकू येणार नाहीत, तर बसऱ्याला व्यापाराविना अन्य बाबींकडे लक्ष देण्यास तेथील लोकांना अवसर मिळत नाही. बगदादला व्यापार मुळीच नाही असे नव्हे, पण तेथील लोकांचे मुख्य अवधान राजकारणाकडे असते. मोसल येथे आपसांतले झगडे विशेष आढळतील. धर्माचा व जातीचा विचार बसऱ्याचे लोक करीत नाहीत, पण बगदादला मात्र अमका हिंदी, तमका यहुदी, तिसरा आर्मीनियन असे भेद मनांत आणणारे विचक्षणी जन आहेत. या तिन्ही विलायतींपैकी बसरा आणि बगदाद या दोन महत्त्वाच्या असल्याने प्रस्तुत प्रतिनिधीने तिसऱ्या विलायतेची यात्रा केली नाही.
 बसऱ्यांत 'हिंदी असोसिएशन ' म्हणून एक संघ आहे. युद्धकालीं तेथे बरीच हिंदी मंडळी होती. तेव्हा त्या संघाचे कामही जोरांत चालत असे. पण युद्धोत्तर कालांत हिंदी लोक जसजसे स्वदेशी परतले तसतसे त्या संघाच्या चळवळीचे स्वरूप आखडूंं लागले. शेवटीं तर कांही काल संघ जवळजवळ बंद झाल्यासारखाच होता. पण तेथील जनतेत थोडीशी जागृति केल्यावर पुनः ताज्या दमाने कामास प्रारंभ झाला आहे. हिंदुस्थानांतील सर्व संघांना उदाहरण घालून देण्यासारखाच प्रघात बसण्याच्या हिंदी संघाने पाडला आहे असे म्हणता येईल. 'व्यक्ति तितक्या प्रकृति ' ही म्हण अक्षरशः खरी असल्याने संघांत मतभेदाचे वारें शिरून कार्य थंडावते. या संघाची धुरा आंग्लविद्याविभूषित पदवीधर अशा स्त्रीने स्वीकारली आहे. आणि मिसेस सॅम्युएल या अध्यक्ष होतांच संघाच्या कार्यात पुढे कोण जातो अशी अहमहमिका कार्यकारी मंडळांत उत्पन्न झाली. इतकेच नव्हे, तर बसऱ्यांतील इतर हिंदी भगिनींनी आपआपल्या परींनी कार्यभाग उचलण्याची सिद्धता दर्शविली.
 हिंदुस्थानच्याच वांटयाला बॅरिस्टर सावरकरांसारखें नररत्न आलें असावें असा ग्रह होता. त्यांच्यासारखी कडक तपश्चर्या करणारे राष्ट्रसेवक आणि त्यांचा नाहक छळ करणारें खुनशी सरकार अशी जोडी बसऱ्यासही पहावयास मिळाली. अर्थातच त्यांतील एक गडी कोण हे न सांगतांचे समजण्यासारखे आहे. दुसऱ्या गड्याचें नांव कदाचित् हिंदुस्थानपर्यंत पोहोचले असावे. सय्यद तालीबु पाशा यांनी पहिल्या इराकी मंत्रिमंडळांत अंतस्थ मंत्र्याचे काम केले होते. पण त्यांनी इराकच्या स्वयंनिर्णयाची चर्चा केल्यामुळे १९२१ सालीं त्यांना 'लंकापुरी'चा तीन वर्षे वास घडला ! केवढा घोर अपराध ! तत्पूर्वी हिंदुस्थान, ईजिप्त या देशांचे हवापाणी त्यांस पहावयास मिळाले होते ! यांच्या राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी इतक्या स्फूर्तिदायक आहेत की, या लिहितांच येत नाहीत. सध्या उपरिनिर्दिष्ट इराकपुत्राला बसऱ्यापासून चारपांच मैलांवर ठेवले आहे. आणि अशा राष्ट्रभक्ताचे दर्शन घेण्यासाठीच –कारण राजकारणाची चर्चा त्यांनी करूं नये अशी आज्ञा आहे- प्रस्तुत प्रतिनिधीने खटपट केली, परंतु काही कार्यासाठी ते हिंदुस्थानला गेले असल्याचे कळलें !
 बसरा येथे एक महत्त्वाची शाळा आहे. एक अमेरिकन मिशनरी गृहस्थ अरवी भाषेचे अधिकारी समजले जातात. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ती शाळा चालू आहे. इराकमध्ये त्या तोडीची शाळा नाही तरी तिचा विस्तार फार लहान आहे. तेथील विद्यार्थी हिंदुस्थानविषयी चौकस दिसले. त्यांच्याकडे जातांक्षणीच त्यांनी 'आमच्या शाळेतही एक हिंदी गृहस्थ आहेत, चला दाखवितों,' असे म्हणून मुख्य दिवाणखान्यांतील महात्मा गांधींच्या चित्राकडे बोट केलें ! शाळेतल्या विद्यार्थ्यांपैकी एकानें महात्माजींचे नेहमीच्या आसनस्थ स्थितींतलें चित्र पेन्सिलीने काढले होते. 'सत्कीर्तीचा डंका' सर्वत्र गाजत असल्याने महात्माजींना बसऱ्याच्या शाळेत मान मिळाला. त्यांच्या जोडीला तशीच आणखी दोन चित्रे होती. एक अमेरिकन प्रेसिडेंट वुड्रो वुइल्सन यांचे, आणि दुसरे राजे फैजल यांचे. शाळेत तीनच चित्रे आणि तीन देशांतील परस्परांशी संबंध नसलेल्या थोर पुरुषांचीं. विलक्षण योगायोग म्हणतात तो असा. वुइल्सनसाहेबांना खडे चारून भुलथापांनी भुलविल्याबद्दल त्यांनी प्राण सोडतांनाही मुत्सद्देगिरींत मुरलेल्यांना शिव्याशाप दिले. राजे फैजल तर बोलून चालून बनावट राजे. नसती पीडा गळ्यांत बांधून घेतल्याबद्दल त्यांना आतां पश्चात्ताप होण्याइतकी विचारशक्ति आली असली तरी, ती मोकळेपणाने (महात्माजींप्रमाणे) कबूल करून उपरणें झटकून टाकण्याची त्यांची तयारी नाही. महात्माजींना वरचेवर ब्रिटिश राजसत्तेवर विश्वास टाकून राहिल्याचा पश्चात्ताप होतच आहे आणि आपला विश्वास अजिबात उडाल्याचे ते पुनः पुनः जाहीर करीत आहेतच. एकूण काय तर या तिन्ही व्यक्ति 'एकाच अग्नीने' भाजून निघाल्या आहेत.
 मद्रासचे ‘नील' पुतळ्याचे प्रकरण वाचकांच्या मनांत ताजे असावें असा समज आहे. उदयोन्मुख राष्ट्राची विचारसरणी सर्वत्र सारखीच असते हे दर्शविणारा बगदादमधील प्रसंग पहा. महायुद्धकाळीं जनरल मॉड या सेनानायकाने बगदादमध्ये प्रवेश केला. बगदाद जिंकलें असें म्हणतां येत नाही, कारण तुर्की फौजेने रक्तपात टाळण्यासाठी अगोदरच माघार घेतली होती. त्याचे स्मारक म्हणून एक मोठा अश्वारूढ पुतळा मॉडसाहेबांच्या नांवें उभारला आहे. इराकी प्रजेने अर्थातच त्याला आणि त्यावरील आलेखाला हरकत घेतली. पण जेथून नगरप्रवेश झाला तेथे तो पुतळा न ठेवता हाय कमिशनरच्या वास्तव्याच्या दारासमोर तो उभारला गेला आहे. त्याला मजबूत असे तारांचे कुंपण असून संरक्षणार्थ शिपाईही नेहमी ठेवले आहेत. सत्याग्रहाची लाट अद्याप इराणी आखातांत आली नाही म्हणून बरें. पण तीही दिवसमानाने पोहोचेल हे खास!  याच मॉडसाहेबांच्या नांवाने तैग्रीस नदीवर झुलता पूल बांधण्यांत आला आहे. तो तरत्या ताफ्यावर असून जहाजांच्या चाहतुकीच्या वेळीं बाजूस सारतांं यावा अशी व्यवस्था आहे. पूर्वी येथे बोटींवर रचलेला पूल असे तसा दुसराही एक आहेच. पण मॉडसाहेबांचे नांव मोठ्या पुलाला दिले आहे आणि नदीच्या पूर्व बाजूस किनाऱ्यावरून पश्चिम तीरीं जाण्यास त्याचा फार उपयोग आहे. जुने शहर पश्चिम तीरावर असून पूर्वेकडील भागांत बसरा रेल्वेचे स्टेशन व हाय् कमिशनरची कचेरी ही महत्त्वाची ठिकाणे आहेत.
 इराणांत श्रीकृष्णमंदिर असल्याचे मागे कळविलेंच आहे. बगदादमध्ये आर्यसमाजाचे एक स्थान असून प्रतिआठवड्यास हवनादि कर्मे होत असतात. नैमित्तिक उत्सवही मोठ्या समारंभाने पार पाडले जातात. आणि विशेष आश्चर्याची गोष्ट ही की, कित्येक बगदादनिवासी इस्लामी धर्मानुयायी अशा विशिष्ट प्रसंगी हजर रहातात ! आर्यसमाजाचे ठिकाण अगदी जुन्या भागांत शहरच्या मध्यावर आहे. पण गेल्या आठ वर्षांच्या अवधीत त्यांच्या वाद्यांमुळे अथवा संगीतध्वनीमुळे कोणाही मुसलमानाच्या प्रार्थनेत व्यत्यय आल्याचे किंवा अन्य कारणाने डोकें फिरल्याचे उदाहरण घडून आले नाही. अगदी धर्मलंड होत चालले हे बगदादचे लोक ! त्यांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी हिंदुस्थानांतील मौलाना-मौलवींचें एक पार्सल पाठविण्याची व्यवस्था ताबडतोब झाली पाहिजे !
 आर्यसमाजाने केलेली महत्त्वाची कामगिरी म्हणजे हिंदूंसाठी वेगळी स्मशानभूमि मिळविली ही होय. बारीक सारीक सामाजिक अडचणीत आर्यसमाजाचे कार्य प्रशंसनीय होते. हिंदुस्थानांतील धनिकांनी या संस्थेस हातभार लावणे इष्ट आहे.  एका बाबींत इराकने फार पुढे मजल मारली आहे आणि ती म्हणजे दळणवळणाचे बाबतींत. बसरा व बगदाद या शहरांमध्ये वैमानिक टपाल आज किती तरी दिवस चालू आहे. कैरोहून विलायती टपाल आणणे व कैरोला विलायती डाक पोहोचविणे ही कामें ही विमानें दर आठवड्यास करतात. कांही उतारूंची सोयही या बसरा-कैरो आकाशमार्गाने होते. पण बसरा ते बगदादपर्यंतचेच भाडे दर उतारूस नऊ पौंड म्हणजे सुमारे एकशेतीस रुपये होते. विमानांत अद्याप पहिला वर्ग, दुसरा वर्ग, साहेबी डबा असे भेदभाव निघाले नाहीत असे खात्रीलायक माहितीवरून कळते.
 या सवलतीने बगदादला टपालच्या चार पेट्या आहेत. एक इराकमधील रेल्वेने जाण्याची; दुसरी समुद्रमार्गे हिंदुस्थान, इंग्लंड इकडे टपाल पाठविण्याची; वैमानिक टपालची तिसरी पेटी आणि दमास्कस, बैरूट, हैफा या बाजूस मोटारींतून जाणाऱ्या टपालची चवथी. भूमध्यसमुद्रावरून इराकांत येणे या मोटारींमुळे फार सोयीचे झाले आहे. ही दहा चाकी मोटार म्हणजे एक आगगाडीचा पहिल्या वर्गाचा डबाच आहे. दर आठवड्यास तिची फेरी होते.
 कैरोहून विमानाने विलायती डाक आणण्याने दोन आठवड्यांची बचत होते. नेहमीचा मार्ग म्हणजे हिंदुस्थानांतून इराणी आखातांत येणाऱ्या आठवड्याच्या बोटीचा. पण वैमानिक व्यवस्था झाल्याने जातांना दोन आठवडे व येतांना दोन आठवडे अशी चार आठवड्यांची काटकसर केल्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा झाला आहे. वैमानिक टपालचे दर वेगळे आहेत. तेव्हा पोस्टालाही जादा उत्पन्न होतें.
 इराकमध्ये हिंदी नाणेच चालू आहे. फडणिसी दिवाणांनी नोटा, नाणी वगैरे मिळून सुमारे तीन कोटी रुपये इराकमध्ये खेळत असावेत असा अंदाज केला होता. परंतु इराकचे 'पुरुषोत्तमदास' सर ससून अफंदी म्हणून एक वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध गृहस्थ आहेत, त्यांच्या अदमासाने ही रक्कम पांच कोटी रुपयांची असावी. हिंदुस्थानच्या आर्थिक परिस्थितीवर याचा काय बरावाईट परिणाम होतो हे आर्थिक तज्ज्ञांनीच सांगावे. प्रस्तुत लेखकाचा तो अधिकार नव्हे. इराकी मंत्रिमंडळाची एक योजना अद्याप मूर्त स्वरूपांत आली नाही. त्यायोगे एक राष्ट्रीय पेढी निर्माण करून सुवर्णनाणे पाडण्याचा फडणिसांचा विचार आहे. नोटा काढण्याचाही अधिकार त्याच पेढीला देण्यात येईल. पण घोडे पेंड खाते ते भांडवलासंबंधी ! राष्ट्रीय कर्जाविना हे कार्य होणार नाही आणि मँडेटरी सत्तेच्या सावलीत वाढणारे धनिक कर्ज देण्यास सहसा राजी नसतात. तरीही कांही स्वतंत्र व्यवस्था करून लवकरच बँक स्थापन करण्याचा आपला निश्चय फडणिसांनी 'केसरी'च्या प्रतिनिधीस सांगितला.
 खानाकीन येथील हिंदी बंधूनी प्रस्तुत लेखकास इराणांत एकटें न जाण्याची मनापासून विनंती केली. "तिकडील लोक अशिक्षित, खेडवळ; अतएव ' हिंदु' गृहस्थास त्यांपासून साहजिकच भीति असावयाची. शिवाय वाटेंतील रस्ते बर्फमय झाल्याने मोटारी अडकून पडण्याचा संभव. मग अशा ठिकाणी तुमचे कसे होईल ? बर्फमय प्रदेशांत रहाण्याची तुम्हांस कधीच संवय नाही. मुंबईपुण्याकडील लोकांना ही हवा सोसवेल कशी ? तेहरानला तर हिंदी गृहस्थ कोणीच नाही. फार्सीचे ज्ञानही तुम्हांस पुरेसे नाही, तेव्हा तुम्ही यावेळी जाऊंच नका. आम्हांला फार काळजी वाटते." अशा अगदी आपलेपणाच्या प्रेमळ विचारजन्य भीतिप्रद शंका हिंदी बंधूस वाटल्या. लोक कितपत शिक्षित आहेत, हे पहाण्यासाठी तर आपण जावयाचें. बर्फाची सवय नाही म्हणूनच बर्फमय प्रदेशांत प्रवास करावयाचा. फार्सी भाषा अवगत नाही हें खरें, पण याच विचाराने जर चालावयाचें असेल तर, प्रथमतः त्या देशाची भाषा शिकून मग हिंडावे असा कार्यक्रम आखल्यास हिंदुस्थानांतील अर्धा भाग पहाण्यास जन्म पुरणार नाही ! जेथे माणसें रहातात तेथे दुसऱ्या कोणत्याही माणसाला जातां येते, रहातां येतें याच विचाराने मी प्रवास करीत असल्याचे सांगून त्यांची चिंता दूर करण्यासाठी त्यांना दर आठवड्यास पत्र लिहिण्याचें आश्वासन देऊन मी निघालों.
 बर्फामुळे मोटारगाड्या दोन ठिकाणीं अडल्या. रस्त्याच्या आजूबाजूंस वस्ती फ़ारच कमी असल्याने एक रात्रभर इराणी कामकऱ्यांच्या झोपडींत रहावें लागलें. त्यांचें आदरातिथ्य पहावयास मिळालें. सहभोजनाचाच काय, पण एका ताटांत भोजन करण्याचा प्रसंग आला. इत्यादि अनुभव कमी महत्त्वाचे आहेत की काय ? कोणत्याही कार्यांत विघ्नें आलीं नाहीत, संकटाचें मीठ त्यांत नसलें, तर मग मौज तीकाय राहिली ?

–केसरी, ता.१६ एप्रिल, १९२९.


(१४ )
  स्वदेशप्रीति, मातृभाषा आणि आपलेपणा यांचीं रोपटीं परदेशच्या हवापाण्याने फोफावून कशीं जोमदार होतात तें बगदादला येतांच अनुभवण्यास मिळालें. मेसापोटेमियाच्या राजनगरीेशीं मराठ्यांचा संबंध गेल्या महायुद्धापासून सुरू झाला, तो अद्यापपर्यंत कायम आहे. कदाचित् कलकत्ता नगरींत ' मराठा खंदक ' ( मराठा डिच ) म्हणून जसें -मराठी मुलुखगिरीचें स्मारक शेकड़ों वर्षे राहिलें आहे, तसेंच बगदाद मध्येंंही ' मराठा लाइन' हें नांव बरींच वर्षें उपयोगांत आणलें जाईल. केवळ पांच महिन्यांपूर्वीच बगदादची मराठी पलटण परत स्वदेशीं नेण्यांत आली. त्यांच्या छावणीच्या स्थलाचा निर्देश ' मराठी लाइन ' या नामाभिधानानेच होत आहे व पुढेही होत राहील हें खास ! बगदाद शहरीं प्रथमतः पाऊल टाकतांच तेथील हिंदी असोसिएशनमध्ये चौकशीसाठी गेल्यावर घडलेला प्रसंग स्मृतिफलकावरून जाईल असें वाटत नाही ! मी 'केसरी'चा प्रतिनिधी असें कळतांच तेथील उपस्थित मंडळींनी ' लो. टिळकांच्या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी इराकमध्ये कसा येऊं शकला ? ' याविषयी आश्चर्य प्रगट केलें. एकदोघांच्या मनांत केसरी-टिळक-देशसेवा–खडतर आयुःक्रम–कारागृहवास-या विचारांची शृंखला विद्युद्वेगाने उद्भवली आणि तिंचे चित्र त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंत पहावयास मिळालें ! पन्नास वर्षांपूर्वी ' तिलक' हा शब्द कितीदा उच्चारला तरी हृदयांत कांहीही भावना उचंबळत नसत. आजच्या पिढींत हिंदुस्थानांतच नव्हे तर प्रत्येक जिवंत राष्ट्रांत ' तिलक' या तीन अक्षरी मंत्रनादाने अंतश्चक्षुपुढे कोणते विचार खेळतात हें सांगण्याची आवश्यकता दिसत नाही ! तैग्रीस नदीच्या काठीं पाण्याचा मुळीच दुष्काळ नसला तरी हिंदी हृदयोद्भव व नेत्रांवाटे बाहेर पडलेल्या दोनच जलबिंदूंना अमोलिक महत्त्व आहे खरें !

 ब्रिटिशांचें हिंदुस्थानांतील राज्य म्हणजे वचनभंगाची परंपरा होय असें एका राजकारणपटूने वर्णन केलें आहे. इराकमध्ये हिंदी कामगार वर्गास नेऊन महायुद्धाच्या बिकट प्रसंगीं ब्रिटिश सरकारने त्यांच्या कडून जिवापाड श्रम करवून घेतले ही गोष्ट सर्वांना माहीत आहेच. पण त्यापुढील परिस्थिति उपर्युक्त वर्णनाप्रमाणेंच घडलेली दिसते. जिवावर बेतली असतां अनेक आशा दाखवून हिंदुस्थानांतून हरकार्योपयोगी मनुष्यबलाची भरती केली आणि आता संकटकाळ संपला असें वाटतांच अत्यंत निर्दयपणे भरआडांत दोर कापण्याचें सरकारास न शोभणारें वर्तन ब्रिटिश राज्यकर्ते करीत आहेत, हें या पत्रांतून जनतेच्या आणि जबाबदार मुत्सद्दयांच्या दृष्टोत्पत्तीस आणावयाचें आहे. इ. स. १९१४-१८ या काळांत इंग्रज सत्ताधिकाऱ्यांस सहाय्यक म्हणून राजनिष्ठ प्रजेपैकी किती तरी मंडळी इराकमध्ये गेली. तेथे त्यांनी समाधानकारक कार्य केलें. मॅंडेटरी सत्ताधारकांना मेसापोटेमियाची जी शासनव्यवस्था लावावयाची होती, तींतही हिंदी अधिकारीवर्गाने अत्युत्तम कामगिरी बजावल्याचें स्पष्ट आहे. साम्राज्य सरकारचे इराकमधील प्रतिनिधी हाय कमिशनर आणि प्रचलित राज्यव्यवस्थेंतील मुख्य मंत्री या दोन्ही वजनदार प्रमुखांनी प्रस्तुत प्रतिनिधीस खास मुलाखत दिली. तेव्हा त्यांनी हिंदी कार्यकारी मंडळीची स्तुति केली. - एक्सेलंट' ( अत्युत्तम ) हा शब्द दोन्ही बड्या प्रस्थांनी उपयोजिला होता. इंग्रज अधिकाऱ्यांनी हिंदी हस्तकांची इतकी प्रशंसा केल्याचें उदाहरण दुसरें आढळणार नाही.
 इराकमध्ये पोलिस, फडणिशी, हिशेब आणि रेल्वे या खात्यांत हिंदी जनतेचा भरणा आहे. हाय कमिशनरच्या कचेरींत हिंदी हस्तकांशिवाय झाडाचें पान हलत नाही हें खरें; म्हणून इराकमध्ये इंग्रज सार्वभौमाचे प्रतिनिधी जोपर्यंत ठाणें देऊन आहेत तोपर्यंत येथील हिंदी मंडळीस कशाचीही डर नाही. पण प्रश्न आहे तो इराक सरकारच्या अधिकारांतील हिंदी लोकांचा. सरकारी नोकरी असली तरी प्रॉव्हिडंट फंडासारखी किंवा पेन्शनची व्यवस्था इराकी मंत्रिमंडळाने अजून केली नाही. तुर्कांचें साम्राज्य फोडून त्याचीं शकलें युरोपियन राष्ट्रांनी आपसांत वाटून घेतलीं, तेव्हा इराकमध्ये इंग्रजी नव्या विटीने नव्या
राज्यास प्रारंभ झाला. इंग्रजी डाव खेळण्यांत कांही काळ गेला असल्याने हिंदी कामगार त्या कलेंत तरबेज झाले होते. त्यांनाच मेसापोटेमियांत पाठविणें सोयीचें होतें. रेल्वे तर बोलून चालून सर्वस्वी हिंदीच. लढाईच्या धामधुमींत युद्भकर्जासाठी हिंदुस्थान सरकारने दिलेल्या ( नव्हे हिंदुस्थान सरकारकडून घेतलेल्या ) सहाय्यांत रेल्वेचें सामान पुष्कळ होतें. अशा इकडून तिकडून मागून आणलेल्या शिधोरीची हंडी इराकी प्रजेवर लादण्याचा प्रयत्न चालू आहे. हा रेल्वेचा गाडा चालता आहे असें दाखविण्यासाठी हिंदी मजुरांचीच भरती करावी लागली. लहान कामगारांपासून तो स्टेशनमास्तर, हिशेबतपासनीस इत्यादि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व भरणा सरकारने हिंदुस्थानांतून केला. 'इराक रेल्वे' अशीं मोठीं अक्षरें इंजिनांवर आणि डब्यांवर असलीं तरी सर्व माल दोन इंजिनें वगळून जुनाचं आहे. चाकांवर बी. बी. सी, आय. रेल्वे अशीं अक्षरें आजमितीसही वरवर पहाणारास दिसतील.
 इराकी प्रजेच्या स्वाधीन ही मोडकी तोडकी रेल्वे करण्यासाठी इंग्रज मुत्सद्दी बरींच वर्षे खटपट करीत आहेत. परंतु बोळ्याने दूध पिण्याइतकें भोळे मंत्रिमंडळ मेसापोटेमियाचें नाही. पूर्वी सांगितलेल्या किमतीचा आकडा सोडून ब्रिटिश अधिकारी आता जवळ जवळ निम्या रकमेस म्हणजे अडीच कोटींवर आले आहेत. तरीही इराकी मंत्री ती स्वीकारण्यास राजी नाहीत. गेलीं पांच वर्षे रेल्वेची व्यवस्था इराकी मंत्रिमंडळापैकी एका दिवाणाकडे आली. तेव्हापासून हिंदी मंडळींना स्वदेशीं परत रवाना करण्यास प्रारंभ झाला. सध्या अरबी पत्रांतून इराकांत सरकारी खात्यांत काम करणाऱ्या प्रत्येक हिंदी मनुष्यावर नांवनिशीवार टीका होत असून अशा लोकांना हिंदुस्थानांत पाठवावें अशी ओरड चालू आहे.  इराकी लोकांसाठी इराकांतील सरकारी खात्यांतील जागा मिळाव्या हें धोरण कोणाही सुज्ञास पटेल. परंतु मोडका गाडा चालू करण्यापरतें हिंदी जनतेचें सहाय्य घेऊन कार्यभाग साधतांच त्यांची उचलबांगडी करावयाची हें वर्तन निंद्यच होय. प्रस्तुत प्रसंगीं हिंदी लोकांचें गाऱ्हाणें ऐकण्यास कोणासच सवड नाही असें दिसतें. युद्धकालीं सहाय्य करणाऱ्या राजनिष्ठांस पारितोषिक तर राहोच, पण उतारवयांत उदरंभरणार्थ दुसऱ्याच्या तोंडाकडे पहावें लागण्याची परिस्थिति यावी हें ब्रिटिश सत्तेला लांछनास्पद होय ! परदेशांत मोठमोठ्या हुद्दयांचीं कामें करणारांना हिंदुस्थानच्या मानाने वेतन थोडें अधिक मिळालें तरी खर्चही त्या मानाने तितकाच वाढला असल्याने बाकी सारखीच राहिली ! हिंदुस्थानांत प्रॉव्हिडंट फंड किंवा सेवान्तवेतन [पेन्शन] तरी मिळालें असतें तेंही यां राजनिष्ठ सेवकांस मिळणार नाही. अशी विचित्र परिस्थिति इराकमधील हिंदी अधिकारी आणि कामगार वर्गांवर आली आहे.
 याची जबाबदारी कोणावर आहे अशा दृष्टीने विचार केल्यास इंग्रज सरकारकडे बोट दाखवावें लागेल. ज्या मंडळींना परदेशीं नेलें त्यांची तेथे सर्व प्रकारची व्यवस्था लावून देण्याचें काम अर्थातच त्या सरकारवरच पडतें; आणि आपापल्या राष्ट्रांतील प्रजेचें हित, डोळ्यांत तेल घालून राखणारे अनेक वकील ठिकठिकाणी असतातच. हिंदुस्थानचा वकील इराकमध्ये नाही असें कित्येकांना वाटेल; पण हाय कमिशनरच्या विस्तृत अधिकारांत या कार्याचा समावेश होत असल्याने वेगळा प्रतिनिधी ठेवण्याची आवश्यकता नसावी.
 हाय कमिशनरशीं बोलतांना इराकमधील हिंदी जनतेच्या बिकट परिस्थितीचा विषय काढला होता. 'हा इराकी सरकारचा प्रश्न पडला, सर्वच परकीयांविरुद्ध त्यांची ओरड आहे' अशा प्रकारचे उद्गार हाय कमिशनरच्या मुखांतून बाहेर पडले. परंतु, प्रत्यक्ष कृति कांहीशी वेगळी दिसली. हिंदी अधिकाऱ्यांच्या जागीं इंग्रजांना नेमलें असल्याचें बऱ्याच वेळां दिसून आलें. आणि ब्रिटिशांचा पगार निराळा, त्यांच्या सवलती वेगळ्या, त्यांना अडचणी कमी, असा सापत्नभाव असूनही इराक रेल्वेखात्यांत केवळ ब्रिटिश अधिकारी वर्गासाठी सुमारे सव्वापांच लाख रुपये खास राखून ठेवण्यात आले आहेत. प्रॉव्हिडंट फंडाची सोय हिंदी जनतेला नको असते व केवळ गोऱ्या बाळांनाच ती आवश्यक आहे अशी ब्रिटिश सत्ताधीशांची समजूत असल्यास न कळे ! वर जी सव्वापांच लक्षांची रक्कम सांगितली, ती बाजूला काढून ठेवण्यांत दर्शविलेली हिशेबी हातचलाखी स्पष्टपणे सांगतां येत नाही. पण ती फक्त ब्रिटिशांपुरतीच आहे हे मात्र निश्चित ! आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग परदेशीं घालवून उतारवयांत बेकार होऊन स्वदेशी परतणाऱ्या हिंदी बांधवांस काय वाटत असेल बरें ? त्यांनी काय करावे ?
 इराकी सरकारच्या छत्राखालील प्रकार पाहिल्यावर साम्राज्य छत्राखालचें दुसरे चित्रही पाहिलें पाहिजे. बगदाद हें पौर्वात्य भागांतील साम्राज्यवैमानिक दलाचे मुख्य ठिकाण मानण्यांत येतें. काबूलला जाण्यासाठी कांही मोठीं विमानें येथूनच पेशावरला गेली होती हें वाचकांना विदित असेलच. या वैमानिक छावणीत बऱ्याच हिंदी मंडळींना काम आहे आणि हें खातें इंग्लंडमधील मंत्रिमंडळाच्या ताब्यात असल्याने तेथे कांही अधिक सोयी असाव्यात अशी कोणाची समजूत झाल्यास तीही सपशेल चुकीची ठरेल. उलटपक्षी 'अडल्या नारायणा'प्रमाणे अधिकाऱ्यांच्या लहरीस येतील त्या अटी मान्य केल्याविना चालत नाही, अशी अवस्था वैमानिक खात्यांत काम करणाऱ्या हिंदी कामगारांची आहे. उदाहरणासाठीं, अगदी थोडक्यांत पण विचित्र अशा अटी देणें इष्ट आहे, बगदाद शहरापासून सहासात मैलांवर ही वैमानिक छावणी आहे; तेथे काम करणारांस तेथेच रहाण्यास जागा मिळावी हें कोणालाही मान्य होईल आणि पूर्वी मोफत खोल्याही असत. पण 'कूर्मोङ्गानीव सर्वशः' याप्रमाणे हळूहळू या सवलती आपलें चंबुगवाळें आटोपूं लागल्या. खोल्यांना भाडें सुरू झालें, दिवाबत्तीचा खर्च वेगळा आला, पाणीपट्टी नवी लादली आणि त्यांवर ताण म्हणजे भंग्याची व्यवस्था ज्याची त्यानें करावी असें कलम घुसडून दिलें! कांटेकोर दृष्टीचा नमुना म्हणून असेंही फर्माविण्यांत आलें की, सपत्नीक कुटुंबांत मुलें जसजशी वाढतील त्या मानाने वरील सर्व कर वाढविले जातील!
 इराकमध्ये भंग्यांची आवश्यकता भांसू नये अशा पद्धतीचे पण घाणेरडे शौचकूप आहेत. त्यामुळे रेल्वेसाठी लागणारे भंगी हिंदुस्थानांतून आणावे लागले आणि ज्या ज्या ठिकाणीं नव्या अमलाखाली वस्ती झाली तेथील स्वच्छतेसाठी हिंदी भंग्यांची भरती करण्यांत आली. अद्यापही हिंदुस्थानांतून प्रतिवर्षी किती तरी भंगी इराकमध्ये पाठविले जातात. जंसे कांही या गलिच्छ कार्यांचे कंत्राट हिंदी राष्ट्राने घेतलें आहे! इतर खात्यांत जबाबदारीची कामें करणारे लोक स्थानिक जनतेंत आढळले, तरी भंग्यांची भरती हिंदुस्थानांतून कांही वर्षे करीत राहिलें पाहिजे असा शेरा इराक रेल्वेसंबंधी एका इंग्रजी तज्ज्ञाने दिला आहे. इराकी भंगी तयार करण्याचे प्रयत्न समाधानकारक झाले नसल्याने हिंदुस्थानांतून पुरवठा करण्याचा सल्ला इराक सरकारास त्या भल्या इंग्रज अधिकाऱ्याने दिला. या उपायाने हिंदी राष्ट्राचा लौकिक परदेशांत चांगलाच वाढेल, नव्हें काय?
 वर सांगितल्याप्रमाणे पूर्वी दिलेल्या सवलती रद्द करून किंवा दुसऱ्या शब्दांत बोलावयाचे तर नवीन अडचणी उपस्थित करून, हिंदी कामगारवर्गास सतावण्याचें काम ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आरंभलें आहें असें दिसतें. मग अशी नोकरी तत्काळ सोडून द्यावी असा ताबडतोबीचा सल्ला कित्येक जण देतील आणि एका (माजी) पुढाऱ्याने बगदादच्या हिंदी मंडळीस तो दिलाही होता! पण पुढे काय ? हिंदुस्थानांत परतावें तर बेकारीचा प्रश्न स्वदेशीच जास्त भासत आहे. आणि अशा अधिकाऱ्यांना आपली फिरती लहर गाजवावयास मिळणार, म्हणून आपल्या सरकारकडून अशा गाऱ्हाणांंची दाद लावून घेणें हाच मार्ग त्यांना जास्त श्रेयस्कर वाटतो. नाही तर सोशीक वृत्त आंगीं बाणून ही आजची परिस्थिती पुढे आधारभूत म्हणून मानली जाईल. हिंदी सरकारने आपण होऊन हा प्रश्न हातीं घेणें अशक्यच म्हणावयाचें. पण मजुरांच्या कैवाऱ्यांच्या कक्षेतील ही बाब असल्याने त्यांचें लक्ष इकडे वेधल्यास त्यांना लागेल ती सविस्तर माहिती मिळवून देतां येईल. प्रस्तुत प्रतिनिधीने हिंदी जनतेचीं गाऱ्हाणीं म्हणून इराकचे मुख्य मंत्री आणि हाय कमिशनर यांचे पुढे ‘सूत उवाच' करून ठेवलें आहे. परंतु हिंदी सरकारकडून दाब आल्याशिवाय त्याला खरें महत्त्व नाही.
 इराकांत नव्या धोरणास प्रारंभ झाल्यापासून कित्येक हिंदी लोकांनी इराकचें नागरिकत्व स्वीकारलें. हेतु हा की, या मातृदेशांतराने तरी आपलें स्थान कायम रहावें. पण इराकी सरकार सोयीसाठी राष्ट्रांतर करणाऱ्या लोकांस मुळीच मानीत नाही! हिंदु, मुसलमान, अँग्लो-इंडियन इत्यादि भेदांमुळे हिंदुस्थानांत या तीन जातींच्या लोकांतील तर-तम-भाव सरकारी नोकरीत पाळला जातो. अँग्लो-इंडियनांसाठी रेल्वेखात्यांतील राखीव कुरणें जगविख्यात आहेतच. पण अशा निवडक जातीच्या आणि वर्णसादृश्याने ब्रिटिशांना जवळच्या अशा अँग्लो-इंडियनांना इराकी राज्यांत प्राधान्य नाही. 'हिंदी' म्हटलेले सर्व लोक एकाच दर्जाचे असें समजले जाते. त्यामुळे इराकमध्ये 'हिंदी' लोक भिन्न धर्मीय असले तरी एकजुटीने आहेत, हा एक मोठा फायदा झाला आहे! वाइटांतून चांगलें निघतें ते असें.
  हिंदुस्थानांत ईजिप्तमधील अरबी पत्रें येतात आणि आपल्या वर्तमानपत्रांतून त्यांच्यांतील सारांश देण्याचा प्रघात कांही ठिकाणी आहे. पण बगदादमधील अरबी पत्रें तिकडे जात नसल्याने हिंदी लोकांविषयी मत्सरग्रस्त फूत्कार बाहेर पडत आहेत. त्यांचा प्रतिध्वनी देखील कोणाच्या कानीं पडणें शक्य नाही. हिंदी व्यापारी बगदादला फार नसले तरी महत्त्वाचे आहेत आणि सरकारी नोकरींतील हिंदी प्रजाजनावरील टीकास्त्राचा ओघ व्यापारी लोकांकडे व स्वतंत्र देशांतील लोकांकडे वळूं लागला आहे. परकीय प्रजाजनांवरच हा हल्ला होतो असें कांही काळ भासलें. ब्रिटिशांवर होणारा वाग्बाणांचा भडिमार हाय कमिशनरने तत्काळ बंद पाडला. पण हिंदुस्थानी प्रजेची दाद घेणार कोण? हिंदी वर्तमानपत्रांनी इकडे लक्ष देऊन आपल्या राष्ट्राचा परदेशीं होणारा दुर्लौकिक थांबविण्याचे उपाय योजावेत. वैयक्तिक दृष्ट्या जितकें शक्य होतें तितके 'केसरी'च्या प्रस्तुत प्रतिनिधीने केलें आहे. आफ्रिका, अमेरिका इत्यादि खंडांत हिंदी जनतेवर सध्या असलेल्या मानहानिकारक निर्बंधांची इराकमध्ये प्रस्थापना चालू आहे आणि वेळींच आमचे पुढारी सावध झाले नाहीत तर त्याच अनिष्ट प्रकारची पुनरावृत्ति होईल.

–केसरी, ता. २३ एप्रिल, १९२९.


मुक्काम पांचवा : तेहरान
(१५)

 बसरा-बगदाद रेल्वे अगदी सपाट मैदनांतून गेली आहे. ती इतकी की, सुमारे ३२५ मैलांनंतर बगदादची उंची समुद्रसपाटीपासून केवळ ११३ फूट भरते! खजुरीशिवाय दुसरें झाड दृष्टीस पडत नाही, आणि कितीही डोळे ताणले तरी एखाद्या टेकडीचा मागमूसही सापडत नाही. अशा प्रदेशांत प्रवास कंटाळवाणा होतो. मधून मधून कालवे मात्र सपाटून आढळतात. असा प्रवास केल्यानंतर तेहरानला जावयाचे तेव्हा बगदादपुढेही वाळवंट आहे की काय अशी भीति वाटूं लागली. तेहरानचा रस्ता आक्रमण्याची साधनें प्रचलित काळीं तीन उपलब्ध आहेत. 'हवाई जहाजांची फेरी' दर आठवड्यास सर्व इराणभर होते. त्या मार्गे आकाशोड्डाण करणे हे फार सोयीचें असलें तरी आर्थिक दृष्ट्या आणि देशपरिस्थित्यवलोकन करण्याच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचें होतें. दुसरा मार्ग मोटारगाड्यांचा आणि तिसरा म्हणजे खेचरें, उंट किंवा घोडी यांच्या तांड्यासमवेत जावयाचा. पैकी मध्यम पंथ स्वीकारून बगदादहून निघालों. प्रथमतः खानाकीनपर्यंत रेल्वेने प्रवास केला. बगदादहून हें गांव सुमारें १२० मैलांवर आहे. इराणी आखातांतील आबादान येथे असलेल्या घासलेट तेलाच्या कारखान्याविषयी मागे लिहिलें आहेच. तसाच पण अगदी छोटा असा कारखाना खानाकीन येथे असल्यामुळे या गावास थोडें महत्त्व प्राप्त झालें आहे.
  खानाकीन ऑइल कंपनी म्हणजे अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनीचें लहानसें पिल्लूच म्हणतां येईल. सर्व व्यवस्था 'मोठ्या' कंपनीचीच असून रेल्वेचा फाटा तेलासाठीच आणला आहे असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. इराकी रेल्वेची सांपत्तिक परिस्थिति इतकी समाधानकारक आहे की, या फाट्यासाठी खानाकीन ऑइल कंपनीकडून (म्हणजे पर्यायाने अँ. प. ऑइल कंपनीमार्फत) रेल्वे कंपनीला हजारो रुपयांचें कर्ज घ्यावें लागलें!
 खानाकीन हें इराकी सरहद्दीवरील गाव असल्याने तेथे व्यापार आहे तो शेजारच्या इराणाशींच. बहुतेक माल इराणांत पाठविण्यासाठी किंवा इराणांतून अन्यत्र रवाना करण्यासाठी येथे येतो. इराकच्या मुख्य मंत्र्यांस भेटावयास गेलो असता त्यांनी आपण होऊनच "मी आपणांसाठी काय करू?" असा प्रश्न केला. त्या वेळीं "मी इराणांत जात आहे; कांही परिचयपत्रें द्याल तर बरें." असें मी उत्तर दिलें होतें. त्यांनी ती व्यवस्था कशी केली हें खानाकीनला आल्यावर समजलें. आपल्याकडे कलेक्टर असतात, त्याच अधिकाऱ्यास अरबींत 'खाइमखाम' म्हणजे 'गव्हर्नर' अशी संज्ञा दिली जाते. खानाकीनच्या गव्हर्नरांनी माझी पुढे जाण्याची व्यवस्था इतकी उत्तम केली की, मागील खेपेस इराणी हद्दीत शिरतांना झालेला त्रास मी अजिबात विसरलों. पोलिस खात्यांतील एक बडा ऑफिसर माझ्याबरोबर इराणी सरहद्दींत पोहोचविण्यास आला असल्याने पासपोर्टची किंवा कस्टम खात्याची कसलीच अडचण झाली नाही.
 इराणी हद्द लागण्यापूर्वीच लहान मोठ्या टेकड्या क्षितिजावर दिसूं लागल्या आणि श्रावणांत आपल्याकडे जशी पृथ्वी हिरव्यागार गवती गालिचाने आच्छादिलेली दिसते तशीच नयनाल्हाददायक दृश्यें दृष्टिपथांत आली. उन्हांतून प्रवास केलेल्यासच सावलीची खरी किंमत कळते; तद्वत् रूक्ष व सपाट मैदानांतून मार्गक्रमण झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रवास विशेष चित्ताकर्षक व आनंदायी वाटल्यास नवल कोणतें?  खानाकीनपासून सुमारे पंचवीस मैलांवर दुसरा मुक्काम 'कसर-इ-शिरिन' येथे झाला. लैला आणि मज्नून या इराणी प्रणयी जोडप्याचें नांव फार्सी-मराठी कोशकारांनी मराठी वाचकांस परिचित केलेंच आहे. फरहद व शिरीन याही परस्परासक्त युगलाची रम्य कहाणी त्यांनीच सांगणें इष्ट आहे. एक तर ती फार मोठी आहे, आणि दुसरें असें की, फार्सी भाषेच्या अभ्यासकालाच तिचें स्वारस्य दुसऱ्यांस समजावून सांगतां येईल. इतकेंच आता सांगून ठेवावेंसें वाटतें की, रोमिओ आणि ज्यूलिएटप्रमाणेच आषुकमाषकांचे हें जोडपें इराणी जनतेंत सर्वतोमुखी आहे. शिरीन ही राजकन्या होती आणि तिच्याच नांवाने कसर-इ-शिरिन हे नांव ओळखलें जातें. या प्रणयी जोडप्याचें स्मारक चिरकालीन राहील असे कांही अद्भुत प्रकार इराणी लोकांच्या दंतकथेंत आहेत आणि कांही ठिकाणीं तर दगडी कोरीव व खोदकाम फरहदच्या हातून, शिरीनचे चिंतन सारखें चालू असल्यामुळे, घडलेलें म्हणून दाखवितात.
  'कसर'पासून पुढील मार्ग कर्मानशहा नगरीचा. हा दीडशें मैलांचा रस्ता कांही अंतरापर्यंत बर्फमय प्रदेशांतून गेला आहे. रस्ते साधारण असून मोटारींची वाहतूक मात्र सपाटून आहे. कारण इराणांत दळणवळणाचें मुख्य साधन काय तें हेंच! शिवाय आयात जकात यंत्रसामग्रीवर इराणी सरकारने मुळीच ठेवली नाही. म्हणून आधुनिक वाहनांचा प्रसार जारीने वाढत आहे. डोंगराळ प्रदेशांत लहानसान ओढे, नाले असावयाचेच; पण थंडीने त्यांचे सर्व पाणी गोठून जागच्या जागी राहिलेलें दिसे. जलसंचय दिसण्याऐवजी शुभ्र कापड पसरलेले सभास्थान आहे की काय असा भास होई. जागजागी बर्फाचे ढीग पडलेले दिसत आणि डोंगराचा भाग तर पांढऱ्या संगमरवरी दगडाचा आहे असें वाटे! या प्रदेशांत अर्थातच थंडी विशेष होती आणि वायुगतीने जाणाच्या मोटारीमुळे ती अधिक भासली.
  कर्मानशहा हें गांव ऐतिहासिक असून युरोपांतील जर्मन लोकांशीं या नगराचा दूरान्वय जोडतां येतो. बलुचिस्तानच्या बाजूस इराणांत 'कर्मान' म्हणून एक शहर आहे, तेथील शहाने पुरातन काळीं वसविलेलें हें कर्मानशहा गाव आज इराणांतील प्रमुख नगरांत गणलें जातें. कर्मान नांवाचा जर्मनांशीं नामसादृश्यानेच संबंध जडतो असें नव्हे, तर वर्ण व रूपसादृश्यानेही त्या भागचे लोक हे जर्मनांचे पूर्वज असावेत असें कित्येकांचें म्हणणें आहे. तेथील हवापाणी उत्तम असून व्यापारही बराच आहे. राजकीय विभागाचे कर्मानशहा हें राजधानीचें शहर आहे. चोहो बाजूस डोंगरांच्या रांगा असून सुमारे पांच हजार फूट उंचीवर तें वसले आहे. आजूबाजूच्या टेकड्यांवर बर्फ पडलेलें दिसतें. इतकेंच नव्हे तर कधी कधी हिमवृष्टीचा अनुभवही तेथील नागरिकांस मिळतो. रस्त्यावर जेथे पाणी दिसावयाचे तेथे पांढऱ्या काचा लावल्या आहेत की काय अशी भूल पडते. एक दोन तासांच्या आंत सर्व पाणी थिजून घट्ट बनते! कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या बाजूस असावयाचे त्या ठिकाणी हिमराशी दिसतात.
  डोंगरावर बर्फ कसे दिसते याचे वर्णन करण्यास जन्मसिद्ध कवीच पाहिजे. हिमालयाच्या उत्तुंग शिखरांवरील अक्षय रहाणारे बर्फ शोभादायक असते, तर थोड्या प्रमाणांत हिंवाळ्यांतच पडणाच्या स्वर्गीय गोठलेल्या पाण्याने कर्मानशहाच्या टेकड्यांस विशेष नयनमनोहरता प्राप्त होते हेंही तितकेंच सत्य आहे! लालसर छटा असणाऱ्या वनस्पतिविहीन गिरिपृष्ठभागावर आकाशांतून शुभ्र साखर पडली म्हणजे तेंं दृश्य किती आल्हादकारक दिसेल याची कल्पना करावी. पांढरें बर्फ अगदी बारीक कीस करूनच कोणी जलदेवता आकाशांतून पृथ्वीवरील डोंगरावर विखरीत आहे असें वाटते. सर्वत्र पसरलेल्या बर्फाच्या भुग्यामुळे टेकड्यांचा रंग कोणता हें कळेनासे होते.
 कर्मानशहापासून नव्वद मैलांवर हमदान लागतें. या दोन नगरांमधील प्रवास अविस्मरणीय असा झाला. प्रथमतः कर्मानशहा सोडतांक्षणीच अलेक्झांडर (शिकंदर) बादशहाने केलेले पूल व त्याच्या कारागिरांनी डोंगरावर कोरलेलीं चित्रें पहावयास मिळालीं! वरील वर्णनांत आलेल्या फरहदच्या कौशल्याचा व त्याच्या शिरीनवरील अलोट प्रेमाचा नमुना दृष्टीस पडला. नंतर हिमाच्छादित अशा पर्वतावलींची अनुपम शोभा चोहो बाजूंस दिसू लागली! समीपस्थ असलेल्या डोंगरांवर पांढऱ्या रंगाचे मोठमोठे पट्टे ओढले आहेत असें वाटे आणि दूरवर दिसणारी शिखरे रुप्याच्या पत्र्याने मढविलीं असल्यासारखीं दिसत. इराणी डोंगरावर वृक्षराजी मुळीच नसून आसमंतांतही झाडे क्वचित आढळतात. कविकुलगुरूला हिमालयाचे वर्णन करतांना बर्फामुळे पर्वतश्रेणीची शोभा कमी होते की काय अशी भीति वाटली आणि म्हणूनच-
 अनन्तरत्नप्रभवस्य तस्य हिमं न सौभाग्यविलोपि जातम् ।
 एकोहि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोः किरणेष्विवाङ्कः।।
 असें म्हणावें लागलें. परंतु इराणी डोंगरांसंबंधी लिहितांना अगदी वेगळ्या भाषेंत त्यांचें चित्र रेखाटणें प्राप्त आहे. इराणी पर्वतांना शोभा प्राप्त होते ती एका बर्फामुळेच! हिमगिरी, सह्याद्रि, विंध्याचल, नीलगिरि इत्यादि पर्वतांची नांवें घेतांक्षणीच त्यांच्याशी संलग्न अशा किती तरी पौराणिक कथांचे चित्रपट मनश्चक्षुपुढून जातात आणि त्या त्या स्थानाविषयी एक प्रकारचा आदरभाव मनांत उद्भवतो. त्या बाबतीत परकीय देशांतले डोंगर अगदी मागे पडतात. मनांत कसलीच भावना जागृत होत नाही. नीलांबराला सफेत रंग लावण्यासाठी विश्वकर्म्याने नियोजिलेल्या निष्काळजी कारागिराने पातळ चुना भरलेलें भांडें सांडून टाकल्यामुळे सर्वत्र पांढरेंच पांढरे झालें असेल काय? जलवृष्टि करण्याकरिता सहस्राक्षी इंद्राने आज्ञा दिली असतां चुकून क्षीरसागराची तोटी उघडली गेल्यामुळे आकाशांतून दुग्ध गळून तर पडलें नसेलना? अथवा आकाशाला गवसणी घालण्यासाठी लागणारें वस्त्र तयार करण्याच्या प्रचंड कारखान्यांतील हा पिंजलेल्या कापसाचा ढीग तर नव्हे? अशा नाना कल्पना मनांत येतात. मेघगर्जना होऊ लागली म्हणजे लहान मुलांची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी 'म्हातारी हरभरे भरडीत आहे' असे सांगण्यांत येतें. तीच बालसमजूत दृढ झाली असल्यास म्हातारीने हरभरे दळले, त्याचें पीठ खाली पडलें असें समजावें.असो.
  घाटांतून वर जसजसे जाऊं लागावें तसतसे क्षितिज दूर जातें आणि नवीन नवीन पर्वतशिखरे दृष्टिपथांत येतात. जिकडे पहावें तिकडे बर्फाशिवाय दुसरें कांहीच दृष्टीस पडत नाही. रस्त्यावर तर बर्फ असतेंच; पण दोन्ही बाजूंनी आठ दहा फुटांच्या बर्फाच्या भिंती दिसतात. रस्ता साफ करण्यासाठी कामगार सारखे धडपडत असतात आणि ते नसते तर मोटारींचा मार्ग बर्फमयच झाला असता. या ठिकाणी थंडी किती असेल याची कल्पनाच करावी! घाटमाथा समुद्रसपाटीपासून निदान चवदापंधरा हजार फूट उंच असावी. कारण तेथून किती तरी खाली उतरून हमदानला यावें लागतें. तरी हमदानची उंची ६२०० फुटांपेक्षा थोडी जास्त आहे. पुत्रकामेक्षु स्त्रियांच्या नवसाला पावणारा सिमल्यांंतील बालब्रह्मचारी मारुति ज्या टेकडीवर आहे ती सुमारे सात हजार फूट उंचीवर आहे. यावरून हमदानच्या हवापाण्याची कल्पना करावी. ग्रीककालीन इतिहासाशीं या शहरचा संबंध जोडतात; पण पुराणवस्तुखात्याला खात्रीलायक पुरावा मिळालेला नाही. हमदान हें इराणांतील नंदनवन म्हणतां येईल. पण ती सर्व शोभा केवळ वसंतऋतूंतच. प्रस्तुत कालीं बर्फाचे ढीग आणि घाणेरडा चिखल सर्वत्र असल्याने तेथील वास्तव्य कंटाळवाणें होतें. उन्हाळ्यांत सर्व प्रकारची फळें येथे विपुल आणि स्वस्त मिळतात. द्राक्षे तर 'पैशाला पासरी' असें म्हटल्यासच वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन होईल. त्यांच्या अनेक जाती असून उत्कृष्ट मानवी उपयोगास ठेवून बाकीच्या खेचर-अश्वादिकांना चारतात!
 हमदानहून तेहरानला जावयाचे म्हणजे मध्यंतरी काझ्वीन या गावावरून जाणें क्रमप्राप्त होते. काझ्वीनला महत्त्व आहे तें यासाठी की, हें कास्पियन समुद्राकडील व्यापाराचें ठिकाण आहे. इराणांतील प्रमुख बंदर पेहेलवी (पूर्वीचे नांव एंंझेली) आणि रेश्त हें व्यापारी शहर, या दोन्ही समीपस्थ गावांशी दळणवळण काझ्वीनमधूनच होतें. रेश्त हें समुद्रकिनाऱ्याजवळचे शहर. कास्पियन समुद्रांतील मासे उत्तर इराणांत आणि इतर सर्वत्र पाठविण्याचें काम एक रशियन कंपनी तेथून करते. त्यामुळे रेश्तचें महत्त्व विशेष आहे. जगांतील उत्तमपैकी मच्छीमाऱ्यांचा धंदा रेश्तचा असून तो फारा दिवसांपासून रशियाच्या ताब्यांत आहे. अगदी सुधारलेल्या शास्त्रीय पद्धतीने म्हणजे बर्फांत मासे गोठवून ते सर्वत्र पाठविले जातात. शाकाहारी हिंदूंना या शहरचे आणि तेथील व्यापाराचे महत्त्व कळणे शक्य नाही.
  काझ्वीन येथे येण्यापूर्वीही एक मोठा घाट लागतो आणि तोही सुमारे पंधरा हजार फूट उंचीचा आहे. हमदान ते काझ्वीन हा रस्ता केवळ बर्फमय प्रदेशांतूनच आहे. मोटार बर्फ तुडवीत जाते. रस्त्याच्या बाजूला कोठेही पहा, बर्फाविना दुसरें कांही दृष्टीस पडणार नाही. यावेळी बाहेर हिंडणें म्हणजे किती कठीण काम; पण बर्फ दूर सारणारे कामगार आपले काम करीत असतातच! रस्त्यावर चुकन कोठे पाणी सांडलें तर अर्ध्या तासाचे आंत तें थिजतें आणि एखाद्या काचेच्या तुकड्याप्रमाणे दिसूं लागतें! टेकड्या, जमिनी, रस्ते यांच्यावर बर्फाशिवाय दुसरें कांहीच दिसत नाही. क्षितिजापर्यंत पांढरेंच पांढरें दृश्य पाहून संस्कृत कवींनी ठरविलेल्या संकेताची संयुक्तता पुरेपूर पटते. सत्कीर्तीचा रंग पांढरा शुभ्र आहे असें समजलें जातें. चराचर सृष्टीच्या चालकाची चतुरता स्पष्टपणे दर्शविणारी आणि त्या प्रेमळ पित्याची कीर्ति दिगंत पसरविणारी ही हिमशोभा किती अपूर्व दिसते हें शब्दचित्रांत रेखाटतां येणें शक्य नाही. इंद्रधनुष्याचे रंग रविवर्म्याला दिले असते तरीही, यशोध्वजाचा धवल वर्ण यथातथ्य त्याच्या हातून वठता ना! कारण इंद्रधनुष्यांत पांढरा रंग मुळी नाहीच! कविसंकेतानुसार हास्याचाही रंग पांढराच आहे. सर्वत्र पसरलेलें हें बर्फ म्हणजे परमेशाचें हास्य तर नव्हे ना? आपण केलेल्या साध्या लीलांपैकी सृष्टीच्या एकाही अल्प भागाचें कोडें मानवांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या तरी उलगडत नाही हें पाहून जगन्नियंत्याने का हसूं नये? आणि तसें न मानलें तरी अखिल ब्रह्मानंदाचे हें प्रतिबिंब होऊ शकेल. आनंदाचें पर्यवसान हास्यांत आणि त्या हास्याचा हा शुभ्र प्रकाशच चोहोंकडे पसरलेला असावा. अस्तु.
 काझ्वीन येथे येतांच उत्तर इराणांतील रशियन वस्तीचें वाढतें स्वरूप एकदम दिसून येतें. व्यापारी पेठेंतल्या बहुतेक पाट्यांवर रशियन अक्षरे आढळतात. इराणांतील उत्तर भागांत सर्वत्र रशियन पसरलेले आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीचा मोटारहाक्याही रशियन होता. हें फार उशिरा कळलें. पण त्यानंतर मन:स्थिति एकदम बदलली. रशियन म्हणजे कांही तरी निराळ्या प्रकारची माणसें असावींत, वाघोबाला भिऊन जशीं लहान मुलें दूर पळतात किंवा अस्वलाला पाहून कुतूहलमिश्रित भीति त्यांना वाटते तशाच प्रकारचें मन, इंग्रजी वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून बनतें! पण प्रत्यक्ष अनुभवाने ते सर्व ग्रह दूर झाले! अगदी माणसासारखा माणूस. फार काय, हिंदी बंधु जशी आपलेपणाची भाषा बोलतात तशा प्रकारचेंच वर्तन 'लाल' रशियनांचे पहाण्यास मिळाले. खुद्द तेहरानमध्ये तर सर्व परकीय प्रजेंत रशियनांचेच अधिक प्राबल्य आहे!
 काझ्वीन ते तेहरान हा प्रवास पुन: वेगळा झाला. रस्ता सपाट मैदानांतूनच गेला होता, तरी एका बाजूस हिमाच्छादित गिरिशिखरें तर दुसरीकडे प्रखर उष्णतेमुळे दिसणारें मृगजळ असे परस्परविरोधी देखावे प्रथमपासून शेवटपर्यंत दिसत. तेहरान जवळ येतांक्षणीच थोडींशी झाडें दृष्टिपथांत आली. पण थंडीमुळे तीं सर्व पर्णविहीन झालेली असल्याने कविमनाला बोचणाऱ्या सात शल्यांत हे आठवें शल्य होईल असे वाटले.
 तेहरानचा विस्तार फार मोठा असून बर्फाच्छादित शिखरांच्या पायथ्याशी हें शहर वसलें आहे. मध्य-आशियातील राष्ट्राचें हे केंद्र आहे व इराणची राजनगरी म्हणून तर विशेष श्रेष्ठता. इतिहास, राजकारण आणि व्यापार या दृष्टींनीही तेहरानचे मोठेपण कमी नाही. युरोपांतील सर्व राष्ट्रांचा झगडा आशियांत कोठे चालू असेल तर तो येथेच!

-केसरी, ९ एप्रिल, १९२९.


(१६)

 'सलाम' या तीन अक्षरी शब्दांत कांही विशेष अर्थ असेंल असें कोणास वाटणार नाही. परंतु आज येथे पाहिलेल्या 'सलाम' समारंभावरून त्या शब्दाची यथार्थ व्याप्ति कळून आली. रस्त्यांतून जातांनाही सलाम करणारे लोक पुष्कळ भेटतात. पण अतःपर 'सलाम' हा शब्द नुसता उच्चारला तरी, जगांतील परस्परविरोधी राष्ट्रांचे एकत्र जमलेले प्रतिनिधी, चित्रविचित्र वेषभूषित सैनिक, त्यांचे नायक, इराणांतील निवडक प्रजाजन, राजसभेचें मंत्रिमंडळ, स्वबलावर राज्यपद प्राप्त करून घेणारा रेझा शहा पेहेलवी, तो गुलिस्तान राजवाडा, तें विस्तृत उद्यान, तेथील कर्णमधुर आणि वीरवृत्तिपरिपोषक वाद्यवादन ....इत्यादि सर्व गोष्टींचा चित्रपट डोळ्यांपुढे उभा राहील. 'केसरी'च्या प्रवासी प्रतिनिधीला हा समारंभ पहाण्याची संधि मिळाली, त्याचें शाब्दिक चित्र खाली देत आहे.
 आपल्याकडे ध्वजारोपणदिनाला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नूतन वर्षारंभ होतो. व्यापाऱ्यांचा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाचा आरंभ असतो. तसाच इराणी प्रजेचा २१ मार्च रोजीं नव्या वर्षाचा प्रथम दिवस असतो. याला 'नव-रोज' (नवा दिवस) असें म्हणतात. पार्शी लोकांचा हाच वर्षारंभ असल्याने हिंदुस्थानातील पार्शी वस्तीच्या शहरी या दिवशी सुट्टी असते. ख्रिस्तानुयायी देशांत नाताळानिमित्त आठवडाभर सुट्टी असून नूतन वर्षाचा समारंभ मोठ्या थाटाने सर्वत्र साजरा केला जातो. तसाच प्रकार इराणांत आहे. नवरोजपूर्वी चार दिवस व नंतर चार दिवस अशी विद्यार्थ्यांची नऊ-दहा दिवस अनध्यायाची चंगळ चालते. मनुष्यस्वभाव जगाच्या पाठीवर चोहोकडे एकच असावयाचा. त्याची उत्सवप्रियता ही सदासर्वदा कायम रहाणारी आहे. त्याप्रमाणे सर्व प्रकारचे आनंदनिदर्शक उपाय योजून हा नूतन वर्षाचा प्रथम दिवस पाळला जातो.
 'नौ-रोज' हा नव्या वर्षांतला पहिला दिवस. तेव्हा राजसभेंत सर्वांनी जमून राजदर्शन घ्यावें ही इच्छा साहजिकच होणार, आणि या मानवी इच्छेला धरूनच मोठमोठ्या सणावारांचे दिवशीं दरबार भरविण्याची चाल पडली आहे. तेहरान नगरींत तीन राजवाडे आहेत. त्यांपैकी ‘गुलिस्तान'मध्ये ह्या 'नौ-रोज' दिनानिमित्त जमाव जमतो. तेथील समारंभ पहाण्यासाठी दूरदूरचे लोक येतात. अशा दिवशी राजदर्शनाचा लाभ घडणें किती महत्त्वाचें असतें याची कल्पना रस्त्याच्या दुतर्फ जमलेल्या लोकसमुदायावरून करतां येईल. गुलिस्तान राजप्रासादांत उपस्थित होण्याचा मान फारच शेलक्या अशा महत्त्वाच्या व्यक्तींस मिळत असल्याने बहुजनसमाजास राजमार्गाच्या कडेस तिष्ठत राहून मिळेल तेवढेंच दृष्टिसुख अनुभवावें लागतें. राजसभेच्या मंत्र्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस निमंत्रणपत्रिका पाठविली. तेव्हा अशा समारंभाला हजर रहाणें हें कर्तव्य झाले! कारण त्याच अधिकाऱ्यांच्या वतीने पुढे स्वतः शहाशीं मुलाखत व्हावयाची आहे.
 राजसभा म्हटली की, तेथे नाना निर्बंध हे ठरलेलेच. वेष अमुक प्रसंगीं तमक्या रंगाचा असावा, त्याला गुंड्या विशिष्ट प्रकारें लावलेल्या असल्या पाहिजेत, शिरोवेष्टन राष्ट्रीय पद्धतीचें असणें आवश्यक आहे, वंदन करण्याचा प्रघात जसा असेल तसाच पाळला पाहिजे, अशा किती तरी बंधनांत बद्ध व्हावें लागतें. बरें, देशोदेशींचे आचार निराळे. तेव्हा प्रथमतः राजसभाचारांची ओळख करून घेतल्यावर 'वेषभूषा रचण्या'चा उद्योग आरंभिला. नूतन वर्षापासूनच 'पेहेलवी' टोपी न वापरणारास शिक्षा करण्यात येणार आहे. नव्या टोपीसह नव्या पद्धतीचे आंगरखे, विलायती फॅशनचे आंखूड कोट आणि विजारी याही प्रचारांत यावयाच्या असल्याने प्रस्तुत प्रतिनिधीजवळ असलेले उत्तम कपडेही रद्द ठरले. मोजे, बूट, गळबंद इत्यादिकांसंबंधीही विशिष्ट पद्धत ठरली असल्याने अल्पावधींतच सर्व खरेदी आटोपावी लागली.
 साडेदहा वाजतांची वेळ निमंत्रणपत्रिकेंत दिली असली तरी साधारणपणे दोन तास आधी जाणें श्रेयस्कर असा सल्ला मला एका इराणी सद्गृहस्थाने दिला होता, आदले दिवशीं पाऊस सारखा पडत असल्याने रस्त्यांत चिखल मनस्वी झाला होता. कदाचित् गतवर्षाची साठलेली घाण धुऊन काढण्यासाठीच ही इराणची साफसफाई चालली असावी असें मानण्यापलीकडे दुसरें कारण सांगतां येईना. नव्या वर्षाचा आरंभ मात्र अगदी निरभ्र आकाशांत प्रकाशणाऱ्या सूर्यकिरणांनी सर्वत्र सुवर्णछटा पसरून केला. त्याच्या स्वागतानिमित्त तोफांची सरबत्ती झाली. नियोजित अवधीपेक्षा दोन तास आधी जाऊनही तेथील अलोट जनसंमर्दाकडे पाहून निराशा होते की काय अशी भीति वाटली. प्रवेशद्वारीं गुलाली रंगाचे तंग पोषाक केलेले 'वेत्रधर' होते. आंतील विस्तृत चौकांत सेना-समुदाय जमला होता. त्यांचा वेष इतका नयनमनोहर होता की, इंद्रधनुष्यांतील सर्व रंग एकत्र आणून त्यांचा उपयोग केला आहे असे वाटे. शिस्तवार रांगांनी सशस्त्र सैनिक उभे राहून आपल्या नायकांच्या आज्ञेकडे तीक्ष्ण कान देऊन उभे होते. कोणाचा वेष अस्मानी रंगाचा तर कोणाचा लाल भडक रंगाचा. कांहींचा पोषाक पिवळा तर कित्येकांचा हिरवा, नुसत्या रंगाने गणवेष [युनिफॉर्म] इतके खुलून दिसले नसते, पण योग्यतेच्या मानाने कोणाच्या, बेषावर सुवर्णतंतूंची वेलबुट्टी काढलेली होती आणि कित्येकांच्या पोषाकावर उंची रेशमी धाग्यांची निरनिराळ्या रंगीत नक्षी होती. शिवाय त्यांच्या शिरोवेष्टनांतही तितकेच प्रकार होते. बहुतेकांना विविध रंगांच्या केसाळ पेहेलवी टोप्या देण्यांत आल्या असून, वेगवेगळ्या पलटणी ओळखतां याव्यात म्हणून निरनिराळ्या रंगांचे रेशमी तुरे त्यांवर लावलेले होते. एका पलटणीला वक्षःस्थलावरील साखळीचें चिलखत असून शिरस्त्राणासाठी जर्मन पद्धतीची टोपी होती. तिजवरील पितळी कळस नूतन वर्षाच्या आरंभीं उगवलेल्या नव्या सूर्यप्रकाशांत तळपत आणि त्यांच्या जोडीला सैनिकांच्या हातांतील बंदुकांच्या संगिनींची टोकेंहीं चकाकत. या सैनिकगणांची मौज वाटली ती त्या चौकामध्ये असलेल्या प्रशस्त जलसंचयामुळे. त्या चौकांतील हौदांत, बाजूस उभे असलेल्या योद्धयांचें प्रतिबिंब चित्रित झालेलें दिसे आणि पाण्याच्या पृष्ठभागावर थोडेंसे आंदोलन झालें की, सर्व चित्रपटच कोणीं तरी हलविल्याचा भास होई. सेनानायकांचा वेष अधिक नयनमनोहर होता. सुवर्णतंतूंचें साम्राज्य त्यांच्या वक्षःस्थलावर दिसे आणि तुमानींच्या दोन्हीही बाजूस रुंद पट्टे असत. विजारीचा रंग निळा तर उर्वरित शरीराच्छादन हिरव्या रंगाचें आणि टोपीवरील तुरा केशरी. असे वेगवेगळे रंग तेथे एकसमयावच्छेदेंकरून डोळ्यांत भरत असत.
 त्या चौकांतून आंत गेल्यावर उद्यानांत प्रवेश होतो. तेहरानमधील उपवनें सर्व आशिया खंडांत विख्यात आहेत. आणि तेहरानमधील राजाधिराजांचा हा बगीचा. तेथील व्यवस्था व शोभा काय वर्णावी? सदैव हरित रंगाचा वेष धारण करणारे वृक्ष व लहान झुडपें तेथे होतीं. हिरव्या गार गवताचीं विविध आकारांची आवारें मधून मधून असत. विटांनी भरलेल्या पायवाटांचा चौक जेथे होई तेथे पाण्याचे हौद असून त्यांत कारंजीं जलतुषारांना आकाशांत भिरकावून देत. स्वच्छ पाण्याचे पाट संथपणे अखंडित रीत्या वहात, तेव्हा त्यांकडे पाहूनच समाधान होई. जलप्रवाहाची शोभा वाढविण्यासाठी त्यांच्या खाली निरनिराळ्या रंगांचे दगड घातलेले होते. निळ्या चकाकित दगडांवरून पाट वहात होता, तेव्हा आकाशाचें इतकें स्पष्ट प्रतिबिंब कसें उमटलें याचें आश्चर्य वाटून तत्काल दृष्टि वर जाई. अशा नैसर्गिक शोभेंत जिवंत मानवांच्या चालत्या बोलत्या बाहुल्यांनी भर घातली होती. नटण्यामुरडण्याचा आणि सजण्याचा मक्ता एकट्या स्त्रीजातीसच आहे, अशी ज्या पुरुषांची समजूत असेल त्यांचें मत बदलण्याइतका स्पष्ट पुरावा एका दिवसांत गुलिस्तानमध्ये मिळाला असता. इतर प्रेक्षकांचे पोषाक एकाच काळ्या रंगाचे असले तरी, लष्करी व मुलकी खात्यांतील अधिकाऱ्यांच्या वेषांत सर्व शक्य त्या रंगांचें मीलन झालेलें दृष्टोत्पत्तीस येई.
 राजदर्शनाला केवळ प्रजाजनांनीच यावयाचें नसतें, तर इतर स्वतंत्र राष्ट्रांचे प्रतिनिधीही आपल्या सर्व सरंजामानिशी सजून येतात. हिंदी पोषाकाच्या विचित्रतेस हसणाऱ्या युरोपियनांनी इतके हास्यास्पद प्रकार राष्ट्रीय वेषांत करून त्यांचें बंधन कडक रीतीने पाळावे हे पाहून साश्चर्य कुतूहल वाटले. विशेषत: इंग्रज व इटालियन प्रतिनिधींचे पोषाक प्रेक्षणीय होते. त्यांच्या होडीच्या आकाराच्या लांबट टोप्या, त्यांवर असलेली पिसे, त्यांचे पुढे आंखूड पण मागे गुडघ्यापर्यंत लोंबणारे कोट, त्यांवरील सुवर्णतंतूंची नक्षी, खांद्यावर, मानेभोवती आणि वक्षःस्थलावर काढलेली वेलबुट्टी, विजारीच्या बाहेरच्या बाजूस रुंद सोनेरी पट्टी, बुटाखालून नेलेला तिचा भाग इत्यादि सर्वच प्रकार आम्हा हिंदवासियांनाच नव्हे तर, अखिल पौर्वात्यांना हसू आणणारा होता. हृदयस्थानावर लटकणारे बिल्ले सोन्यारुप्यांंचे असते तर त्यांना भूषणें म्हणतां आलें असते. पण दागिने घालणारांस हसणारांनी मिश्र धातूंचे तुकडे, रंगीबेरंगी कापडांच्या चिंध्यांनी आपल्या छातीवर मोठ्या फुशारकीने लावून मिरवावें यापेक्षा विचित्र प्रकार दुसरा असेल काय ? त्या मानाने अमेरिकन आणि रशियन प्रतिनिधी अगदी साधे होते. त्यांच्या उंच पण काळ्या चकाकणाऱ्या टोप्याच चटकन् डोळ्यांत भरत. पण साम्राज्यवाद्यांचा पोषाक गमतीचा होता हें मात्र खरें.
 यापेक्षाही दुसरी मौज वाटत असेल तर ती परराष्ट्रीय मंत्री एकत्र कसे येतात तें पहाण्याचीच. तेहरानमध्ये आशियांतील देशांचे, युरोपियन राष्ट्रांचे व अमेरिकेचेही वकील आहेत. जणू काय प्रत्येक देशांतील लोकांच्या नमुन्याचें इराणी राजनगरीत प्रदर्शनच मांडलें आहे असें वाटतें. या वकिलातींचीं आवारें त्या त्या वकिलातीच्या महत्त्वाच्या मानाने विस्तृत आहेत. त्यांच्या रचनेवरूनही त्यांचे आपसांतील स्नेहसंबंध सहज लक्षांत येतील. विश्वगोलावर आपले पंख पसरणाच्या जर्मन गरुडाच्या सन्निध तुर्कांचें निवासस्थान आहे. महायुद्धाचे प्रसंगीं तुर्क शिपायी जर्मन योद्धयांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते, तद्वत् तेहरानमधील या दोस्त राष्ट्रांच्या वकिलातींच्या आवारांच्या भिती एकमेकांस लागून आहेत. एकमेकाला खाऊं की गिळूं या भावनेने जगांत वावरणाच्या, साम्राज्यवादी इंग्रज व साम्राज्यविध्वंसक रशियन यांच्या ‘सिफारती’ (सिफारत=वकिलात ) इतक्या जवळजवळ आहेत की, त्यांच्या मधून फक्त एकच रस्ता जातो. मात्र छत्तिसाच्या आंकड्याप्रमाणे किंवा फार्सी अठ्याहत्तरच्या आंकड्याप्रमाणे त्यांची प्रवेशद्वारें विरुद्ध दिशेला आहेत ! पण इंग्रजी वकिलातीत उभें राहिलें असतां मागील बाजूच्या रशियन वकिलातीवर फडकणारें तांबडें निशाण व त्यावरील कोयता आणि हातोडा दृष्टीस पडतात. साम्राज्याच्या पिकाची समूळ कापणी करण्यास रशियन विळा पुढे सरसावतो अशी भीति ज्यांच्या मनांत असेल किंवा साम्राज्याच्या प्रचंड इमारतीचा नाश करणारा रशियन हातोडा टाळला पाहिजे असें ज्यांना वाटत असेल, त्यांना रशियाचें हें निशाण वाईटच दिसणार.
 असो. ठरल्या वेळीं राजेसाहेबांची स्वारी आली. वेत्रधर ललकारीत पुढे चालूं लागले. पहारेकऱ्यांची सलामी झडली. आजूबाजूंस उभे असलेल्या अधिकाऱ्यांचीं डोकीं खाली लवलीं. कॅमेऱ्यांचे क्लिक क्लिक असे आवाज झाले, तोफांची सरबत्ती कर्णपथावर आली. बागेंत रमत गमत हिंडणाऱ्या निवडक प्रजाजनांचे पाय थांबले व वाद्यें वाजेनाशीं झाली. रेझा शहा पेहेलवी ही चाळिशी उलटलेली व्यक्ति आहे. ती अगदी साध्या वेषांत होती. शीर्षभागावर इतर प्रजाजनांची असे तशाच प्रकारची पेहेलवी टोपी होती. डोळ्यांत एक विलक्षण तेज असून चर्येवरील रेखांवर ‘मदायतं तु पौरुषम्' हें कर्णाचें वाक्य अगदी स्पष्ट अक्षरांनी लिहिलेलें दिसे. रेझा शहा हे इतर नामधारी राजांप्रमाणें वंशपरंपरेने राजपुत्र नसून साध्या सैनिकापासून चढत चढत ते इराणचे शहा झाले आहेत. आशियांत अशा प्रकारचीं स्वत:च्या हिंमतीवर राज्यपद प्राप्त करून घेणारीं माणसें पुष्कळच झाली आहेत. पण पेहेलवी शहांचे श्रेष्ठत्व विशेष आहे. त्यांच्या मुद्रेवरील चिंतेची छाया आणि पिकलेले केस यांवरून 'स्वास्थ्यं कुतो मुकुटमारभृतां नराणाम्' या कविवचनाची साक्ष पटे. गजगतीने पडणारे त्यांचे पाऊल राज्यकर्त्यावरील–विशेषतः तेहरानच्या राज्यकर्त्यांवरील जबाबदारीच्या भाराची कल्पना आणून देई. उत्तरेकडून येणारे अस्वल किंवा दक्षिण दिशेला टपून बसलेला सिंह या दोघांनाच ताब्यांत ठेवणें हें किती कठीण काम आहे. मग देशांतील बखत्यारी, कुर्दी, तुर्कोमान इत्यादि नाठाळ जातींमुळे त्या राज्यकारभाराचे ओझें का वाढणार नाही? या सर्वांना पूर्णपणे कह्यांत बाळगून आपल्या देशाची प्रगति करण्यासाठी झटणारा शहा चिंताक्रांत का दिसूं नये?
 इराणच्या या बादशहाबरोबरच राजसभेचे मंत्री असून त्यांच्या मागे खाकी लष्करी पोषाक घातलेला युवराज होता. रेझा शहा हा योद्धा असल्याने राजपुत्रास लष्करी वेष का घातला हें कळण्यासारखें आहे. अद्याप दहा वर्षांचाही युवराज नसावा हें इराणी प्रजेचें दुर्दैव होय. मंद गतीने राजाधिराज, युवराज आणि इतर मंडळी चालूं लागली. सुमारें तीनशें पावलें चालून गेल्यावर एका महालांत ती मिरवणूक शिरली आणि इकडे लष्करी रणवाद्यें मोठ्या आवेशाने झडूं लागली. बाहेर चौकांत उभ्या असलेल्या पलटणी शिस्तीने तालांत पाऊल टाकीत, संगिना चमकवीत व तुरे उडवीत येऊन एका गवती गालिचाच्या मैदानावर उभ्या राहूं लागल्या. आणि कांही कालानंतर सर्व पलटणींचें ठाणें उद्यानांत बसलें. त्या सर्वांची तोंडे ज्या महालांत शहा शिरले त्या बाजूस होतीं. त्या महालापुढील दालनांत मध्यभागीं उच्च ठिकाणीं एक रत्नजडित खुर्ची ठेवली होती. आसनाच्या डाव्या अंगास मंत्रिमंडळ उभें होतें. सैनिकांची शिस्तवार मांडणी होतांच तोफांची सलामी झाली. शिपायांनी खडी ताजीम दिली आणि वाद्ये वाजूं लागलीं. शहा आसनस्थ होऊन सर्व प्रजाजनांनी दिलेल्या मानाचा स्वीकार करण्यासाठी उजवा हात भुवईपाशीं नेऊन सलाम करीत होता.
 पुनः सरबत्ती, सैनिकांचें वंदन, वाद्यवादन आणि पुनः शहाचा सलाम, असा तीनदा प्रकार घडला! शहा स्वस्थानावरून उठून आल्या मार्गे परत हळूहळू पावले टाकीत जाऊं लागला. इतका वेळ जमलेले सैनिकगण आल्या मार्गे परत त्याच शिस्तीने जाऊं लागले आणि हा अपूर्व समारंभ संपला!
 या प्रसंगी इराणी स्त्रिया मुळीच नव्हत्या! पण परराष्ट्रीय वकिलांच्या स्त्रिया चित्रयंत्रें[कॅमेरे] घेऊन उत्सुकतेने आणि कुतूहलाने चोहोकडे हिंडत होत्या. या समारंभांत स्थानिक स्त्रियांचा भाग अजिबात नसावा हें प्रचलित कालाच्या समान हक्काच्या लढ्यांत कसेंसेंच दिसतें. पण हा इराणी मुलूख आहे. येथे पडद्याची चाल कडक रीतीने पाळली जात आहे हें लक्षांत घेतलें पाहिजे. चार तासपर्यंत सलामसमारंभ होतो, तेव्हा त्याची व्याप्ति आणि मनोहारिता किती असेल? आता सलाम शब्दाला नवीन अर्थ व नवें स्वरूप प्राप्त झालें की नाही ?

-केसरी, तारीख ७ मे, १९२९


(१७)

 परदेशांत गेल्यावर, तेथील लोक कसे दिसतात? हा प्रथमचा प्रश्न कोणीही विचारील. इराणांत हिंदी मनुष्य चटकन् ओळखूं येतो. याचें कारण त्याचा वर्ण. थंड देशांत राहिल्यामुळे किंवा पडद्याच्या चालीमुळे इराणी प्रजा ही गौरवर्णीय आहे. ती इतकी की, वेष चढविला तर ‘साहेब’ कोणता हें निश्चितपणे सांगतां यावयाचे नाही. तीच गोष्ट स्त्रियांची आहे. त्यामुळे हिंदी मंडळी कोणती हें ओळख नसतांही शोधून काढण्यास त्रास मुळीच पडत नाही! आम्हा हिंदी प्रजाजनांना अशी ही देवाची देणगीच आहे! कोठेही जावें, कपाळावर चिट्ठी मारल्याप्रमाणे हिंदी मनुष्य निवडून काढणे सोपे होते!श्यामवर्णी हिंदी लोकांसच हें लागू आहे असें नव्हे तर, आपल्यांपैकी कितीही गोरा मनुष्य असला तरी तो तेथे फिक्काच पडावयाचा. इराकमधील अरब देखील इराण्यांच्या मागे पडतात.
 पोषाकासंबंधी कोणी विचारपूस केलीच तर आपण इराणी लोकांच्या मानाने फार मागसलेले आहोंत असें म्हणावें लागेल. कारण आजकाल सुधारणा म्हणून जी कांही म्हणतात ती सर्व कोट, विजार आणि बूट यांतच येऊन बसल्याप्रमाणे झाली आहे. साधारणपणे उच्च अधिकारी अथवा बडे पदवीधरच काय ते आपल्याकडे विलायती–साहेबी–वेषांत दिसतात. ते सुद्धा आपल्या कार्यक्षेत्राबाहेर स्वतःच्या राष्ट्रीय पोषाकांतच आढळतील. पण तसें इकडे नाही. प्रत्येकाला 'सूट' हा हवाच! थंडी कडाक्याची असल्याने बूट व मोजे हे पायांतून बाहेर निघतच नाहीत. गेल्या २१ मार्च पासून नवीन कायदा अमलांत आल्याने परकीय प्रजाजन आणि धर्माधिकारी मुल्ला यांना वगळून सर्वांना पेहेलवी टोपी व विलायती तऱ्हेचे आखूड कोट आणि विजारी सक्तीने घालाव्या लागतात. पेहेलवी टोपी म्हणजे साधी, गोल टोपीच आहे. पण तिला एक पुस्ती जोडलेली असते. डोळ्यांवर थोडीशी छाया पडावी म्हणून टोपीला 'अर्धचंद्र' लावलेला असतो. सदैव डोकें टोपींत खुपसलेलें असते, हा एक मुख्य दोष या शिरोभूषणाचा आहे. दुसरें असें की, साधारणपणे दोनतीन महिन्यांत एक टोपी निकामी होते. तींत साध्या कागदावर कापड चढविलेलें असल्याने टोपीवाल्यांच्या धंद्याला कायमची तेजी आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसून येतो तो असा की, टोपीवाल्यांचीं दुकाने जेथे तेथे वाढत आहेत. अशा वेळी येथे एखादे 'अनंत शिवाजी' असते तर त्यांनी छानच कामगिरी बजावली असती! कायद्याने प्रजेला 'टोपी घालणे' रास्त असो वा नसो, या नवीन नियमाचा एक फायदा झाला आहे. कापडवाले, शिंपीदादा आणि टोपीवाले यांच्या व्यापाराला चांगलीच बरकत होत आहे. हल्ली आपणांकडे गिरण्यांची हलाखी आहे. तेव्हा असा एखादा नवा कायदा अमलांत आला तर गिरणीमालक सरकारास दुवा देतील!
 स्त्रीवर्गावर कायद्याचें हत्यार अजून चाललें नसलें तरी, पाश्चात्य सुधारणेचा अंमल पडद्यांतही शिरला आहे हे सहज लक्षांत येतें. रस्त्यांत वावरत असलेली काळ्या कापडांत गुरफटलेली 'भुतें' हीं पुरुषवर्गापेक्षा अधिक भरतात असें सांगितलें तर कोणाला आश्चर्य वाटावयास नको. इराणांतील महिलावर्ग हिंदुस्थानांतील कोणत्याही सुधारलेल्या आणि सुशिक्षित अशा स्त्रीसमाजाला 'फॅशन'चे धडे देण्यास समर्थ आहे! तलम तनुवर्णीय मोजे, उंच टाचांचीं पादत्राणे आणि मुद्रारंगसाहित्य इत्यादिकांचा प्रसार आमच्या समजुतीप्रमाणे आणि अनुभवाने केवळ यूरोप, अमेरिका या खंडांतील देशांतच असावा असें होतें. परंतु इराणांत त्यांचा जारीने प्रवेश झालेला दिसला. फक्त काळा बुरखा निघण्याचाच अवकाश, मग इराणी स्त्री कोणती आणि युरोपियन स्त्री कोणती याचा संदेह पडेल! इतकें सांगितल्यावर मग रस्त्यांमधून त्यांचेंच प्राबल्य का असतें हें समजेल. केशभूषा, मौलिभूषा, वेषभूषा इत्यादि पुष्पबाण सज्ज करण्यासाठी बाजारांत स्वतःच जाणें स्त्रियांना इष्ट असते. पुरुषांना एक तर हा असला बाजार करणें प्रथमतः जिवावर यावयाचें; कारण खिसा रिकामा होतो. आणि दुसरें असें की, त्यांनी कितीही धडपड केली तरी ‘घरांत' ती निवड पसंत होईलच असा नियम नाहीं. तेव्हा 'जेनो काम तेनो थाय' हेच खरे, म्हणून इराणी ललना नेहमी बाजारांत हिंडतांना आढळतात. 'ललना स्टोअर्स,' 'वनितावस्त्रभांडार, 'महिला-साहित्यसंग्रह,' 'झनाना स्टोअर्स,' या व अशा दुकानांचाच भरणा तेहरानमधील बाजारांत अधिक आहे हे सहज एकच फेरी केली तरी दृष्टोत्पत्तीस येतें. एकदा बाजारांत बायका जाऊं लागल्या की, मग इतर खरेदी पुरुषवर्ग कशाला करील? भाजी, धान्य इत्यादि घरगुती जिनसाही घरधनिणीनेच विकत घेण्याचा परिपाठ इकडे पडला आहे. हा प्रघात अनुकरणीय आहे की नाही, हें, ज्याचें त्यानेंच ठरवावे. मात्र इतकें खरें की, भाजी, धान्य हा बाजार बायका चांगल्या कसोशीने करतील आणि भोजनांतील पदार्थ चांगले रुचकर व स्वादिष्ट लागतील. सर्व जिन्नस अगदी पारखून हवे तितकेच येतील. पण त्याचें उट्टें निघेल इतर बाजारांत! जवाहिरे 'बाईसाहेबां'ना नवीन नवीन दागिने दाखवून ते घेण्याचा मोह पाडतील आणि या बाबतींत मात्र किमतीकडे स्त्रियांचे लक्ष जाणार नाही, घासाघीस जी होईल ती भाजीवाल्या माळणीशींच. लुगडीं आणि दागिने ह्यांना नेहमी किंमत जास्त पडावयाचीच आणि ती पडेल तितकी देऊन ते जिन्नस घेतलेच पाहिजेत! खिशांत पैसे शिल्लक नसले किंवा एकादें भारीपैकी 'सणंग पाहिजे' अशी 'घरची' आज्ञा झाली म्हणजे 'रावसाहेब,' दुकानांत माल शिल्लक नाही अशी सबब सांगून, कालहरण करतात. तो प्रकार नवीन चालीमुळे अगदीच बंद पडेल. इतकेंच नव्हे तर 'अलीकडे पगार फार कमी पडूं लागला,' अशी हाकाटी वरचेवर ऐकूं येईल. तेव्हा आपली पूर्वीची पद्धत उत्तम हेंच खरें! आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला हा धडा दूरदर्शीपणाचा नाही असे कोणता पुरुष म्हणेल बरें?
 बुरख्याच्या चालीसंबंधीही थोडें सांगितलें पाहिजे. ही वाईट चाल प्रचारांत येण्याला सर्वत्र कारण एकच आहे आणि तें म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि बादशहांचा बेसुमार 'जनानखाना'. पण आता ती पद्धति नष्ट होत असल्याने तज्जन्य चालही आपोआपच दूर झाली पाहिजे. हिंदुस्थानांत 'पडदा' आणि 'बुरखा' अशा दोन चाली वेगळ्या आहेत. 'पडदा' असणा-या स्त्रिया 'बुरखा' घेत नसून त्या जेथे जातील त्या स्थानाभोवती पडदा असेल किंवा त्या भागांत पुरुषांना बंदी असेल. आंत वावरणाऱ्या स्त्रिया बुरखा न घेतां हिंडतील. बुरख्याचें तसें नाही. बुरखा घेतला की, मग पुरुषांना धक्के देऊनही जातां येतें असा इकडील रिवाज आहे. पुरुषांनीही रस्त्यावरून जातांना बुरख्याचें काळें निशाण पाहून थोडें स्त्रीदाक्षिण्य दाखवावें अशी अपेक्षा कोणी करीत नाही किंवा 'स्त्रीणां भूषा किं तु सौजन्यमेव' या न्यायाने स्त्रियाही जपून चाललेल्या दिसत नाहीत. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून 'काळा बुरखा' जाऊं लागला तर त्यांत आश्चर्य केवळ नवीन रहिवाशालाच वाटेल! हिंदुस्थानांत रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या तिकिट-ऑफिसपाशी तिकिट घेतांना जशी रेटारेटी चालते, तसाच प्रकार इराणी बाजारचे भागांत स्त्रीपुरुष हा भेद न बाळगतां नेहमी चालतो! बुरख्याचा मोठा फायदा एक आहे. त्यापासून इतरे जनांना मुळीच त्रास नाहीं. 'पडदेवाल्यां'ची सरबराई राखणें फार कठीण काम होतें आणि नेहमी निदान तीनचार नोकर चाकर बाळगावे लागतात. पडदा घेण्याची चाल असेल तर सायंकाळी फिरावयास जातांना दांपत्याला मिळून पडद्यांत जावें लागेल. पण बुरखेवाली मंडळी कांही त्रास न होतां जोडीजोडीने तें सुख अनुभवू शकतील. इराणांत बुरखा हा सर्व वयाच्या स्त्रियांना लागू आहे. म्हणजे मुलगी हिंडूं फिरूं लागली की, काळा बुरखा तिच्या पोषाखाचें एक मुख्य अंग–नव्हे अंग झाकण्याचे वस्त्र-होतें.   तेहरानची हवा फारच उत्तम आहे. हवापाणी हा जोड शब्द मुद्दाम टाळला आहे. कारण पाण्यासंबंधी समाधानास जागा मुळीच नाही. गिरण्या, कारखाने किंवा आगगाड्या यांचा संपर्क तेहरानलाच काय, पण सर्व इराणला, आबादान वगळल्यास जवळजवळ नाहीच म्हटलें तरी हरकत नाही. हिंदुस्थानच्या एकतृतीयांशाएवढा अदमासाने विस्तार असतां केवळ शंभर मैलच रेल्वे या देशांत आहे! त्यामुळे हवा गलिच्छ करण्याची कृत्रिम साधने अद्यापि प्रचलित झाली नाहीत. शिवाय, तेहरानची वस्ती अत्यंत विरल आहे असें म्हणतां येते आणि मौज ही की, गेल्या चाळीस वर्षांच्या अनुभवांत हें नगर वाढलें आहे असें म्हणणारे लोक आढळत नाहीत. या सर्व कारणांनी येथील हवा शुद्ध आहे. इराणांत सर्वच ठिकाणी पाणी भूम्यंतर्गत पाटांनी खेळविलेलें आहे. कित्येक ठिकाणीं हें वहातें जल उघडेंही दिसतें आणि पाण्याचा साठा एके जागीं नसून समीपस्थ डोंगरांतील प्रवाहांचा लाभ घेऊन ही व्यवस्था केली जाते. त्यामुळे सोय अत्यंत झाली असली तरी आरोग्याला फार हानि पोहोचण्यासारखी ही व्यवस्था आहे असें साधा 'कुणबी'ही सांगेल. प्रत्येक घराच्या मध्यभागीं हौद असतो. त्यांत पाणी अदृश्य मार्गानेंच येतें. हें वापरण्याचें पाणी व पिण्याचें पाणीही एकाच मार्गाने यावयाचें. ठिकठिकाणी हौद बांधलेले असतात. ते सर्व बाजूंनी बंद असून त्यांना एक तोटी ठेवलेली असते. तींतून पिण्याचें पाणी घ्यावयाचें. अशा हौदांना ‘अंबार' किंवा अंबारखाना म्हणतात. पिण्यास येतें तें पाणी निवळण्याचा संभव असतो आणि तें सदैव झाकलेले असतें, इतकाच काय तो फरक. कित्येक ठिकाणी मात्र हें 'पानीय' 'पेय' असतेंच असें म्हणतां येत नसलें, तरी लोक त्याचा उपयोग करतांना दिसतील. पाण्याच्या प्रवाहांतच रस्त्याचीं गटारें सोडली आहेत किंवा गटारें व पाणी नेण्याचे पाट हे प्रवाह निरनिराळे नाहीत असें पाहिजे तर म्हणावें! अशा गटारांची द्वारे रस्त्यांत हिंडतांना नेहमी लागतात आणि लक्ष दुसरीकडे असणारा त्यांत पडावयाचा देखील! कारण ज्याला 'पाणी' पाहिजे असेल त्याला ते द्वार उघडता येते. पण काम झाल्यावर तें पुनः पूर्ववत् झाकावें याविषयी विचार तो मुळीच करणार नाही. रस्त्यावर शिंपडण्यास, जनावरांना पाजण्यास किंवा पिण्याखेरीज सर्व उपयोगासाठी अगदी बिनदिक्कतपणे तें पाणी घेतांना पाहून हिंदुस्थानांतील कोठल्याही मनुष्यास साहजिकच किळस वाटेल. पण येथे ‘तीर्थदकं च वन्हिश्च नान्यतः शुद्धिमतः' हें वचन अगदी आबालवृद्धांच्या रोमरोमी भिनल्याप्रमाणे दिसतें. पाणी कधी अस्वच्छ होऊं शकतच नाही असा इराणी प्रजेचा सिद्धांत आहे, का स्वच्छता हा शब्दच त्यांना ज्ञात नाही असा प्रश्न पडतो. पण हा रिवाज आहे. रूढीविरुद्ध एक चकार शब्द काढतां कामा नये, पाण्याचा उघडा पाट असेल तर, एके ठिकाणीं बायका धुणें धुतांना दिसतील व चार पावलांवर कोणी भांडी घांसत असतील. पुढे थोड्याशा अंतरावर 'ग्रामसिंह' आपली तृषा शमन करीत असतांना दिसेल आणि लगेच एखादा चालता बोलता मनुष्य प्रार्थनेसाठी त्याच पाण्याने हस्तपादमुखप्रक्षालन करतांना दिसेल. आणि हें सर्व 'एका मोटेच्या' पाण्याइतक्या मोठ्या पाटांत, अक्षरशः चार चार पावलांवर. एखादीच वेळ अशा काकतालीय न्यायाची असते असें नव्हे, तर हीं दृश्यें नेहमीचीं-रोजचींच आहेत आणि त्यांबद्दल त्रयस्थांविना इतरांस कांहीच वाटणार नाही.
  सहभोजनें केल्याने जाती मोडतील असा कित्येकांचा ग्रह आहे आणि त्या दिशेने प्रयत्न करणारे आपल्याकडे कांही लोक आहेत हें खरे. त्यांना इतकेच दर्शवावयाचे आहे की, ज्ञातीच्या ज्ञाती एका ताटांत जेवण्याची पद्धत मुसलमानांची असून त्यांच्यांतही भेदाभेद तीव्र आहेच. इराणांत पाऊल ठेवल्यापासून आजपर्यंत मी एका मोठ्या प्रश्नाचा विचार करीत आहें की, फार्सी भाषेत उष्टें, खरकटें आणि किळस या तीन शब्दांना प्रतिशब्द आहेत किंवा नाहीत? एक महिन्यापेक्षा अधिक दिवस इराणांत राहूनही उष्टें, खरकटें किंवा किळस यांपैकी एकाही शब्दाचा उपयोग केल्याचे ऐकले नाही. उपयोग करावा लागेल असले प्रसंग मात्र क्षणोक्षणीं येत. हिंदुस्थानांतील कित्येक भागांत आपल्या भांड्यात दुसऱ्याने नुसता हात लावला एवढ्याच दोषासाठी तें भांडे चांगलें घासावें लागतें. स्वच्छतेचें तें एक टोक मानलें, तर इराणांत दुसरें टोक आहे असें म्हणावेॆ लागेल. युरोपियन देखरेखीखालचीं अगदी थोडी आहारगृहें [रेस्टोरॉं] सोडली तर माणसागणिक पाणी पिण्याचा पेला देण्याची चाल कोठेच नाही. दहाबारा माणसें असलीं तरीही 'एकच प्याला' पुरतो आणि एकाचें पाणी पिऊन झाल्यानंतर तो तसाच पुढे करावयाचा. पहिलें पाणी ओतून टाकणें किंवा विसळणें ह्या क्रिया कधीही व्हावयाच्या नाहीत. पाण्याचे उदाहरण म्हणून सांगितले. मदिरा तर पावकाचीच भगिनी! ती सर्वांनाच पुनीत करते, मग पेल्याचें काय?
  खरकट्याचा प्रश्न अगदी सोडूनच द्या. उत्तर हिंदुस्थानांतही खरकटे कित्येक प्रांतांत मानलें जात नाही. पण किळस मात्र येतो तो इकडील लोकांच्या रिवाजाचा. समजा, दूध घेण्यासाठी तुम्ही गेलां आणि दुकानदारापुढे दुधाचें भांडें भरलेलें आहे, तेथे ज्या मापाने दूध तुम्हांस मोजून मिळणार तेंच माप तोंडाला लावून तो जर पीत असेल तर लगेच तसेंच्या तसेंच तें भांड्यांत घालून तुमचें काम तो प्रथम करील आणि पुनः माप तोंडाला लावील! किंवा दूध तापलेलें असेल तर वर आलेली साय एका बोटाने चाखीत पुनः पुनः बोट दुधाच्या भांड्यात घालून (कोणचा हात तें विचारूंं नका) तो तुमच्याशीं बोलेल, तुम्हांला दूधही मोजून देईल. सर्वच कार्य अगदी निर्विकारपणे चालेल! उदाहरणार्थ दुसरी एक गोष्ट घ्या. टरोगान' म्हणून तुपासारखा पदार्थ इराणांत चोहोकडे मिळतो. त्याचा उपयोग भातावर, तळणीसाठी किंवा रोटीबरोबर खाण्याकडे करतात. त्याच्या वासावरून ती निव्वळ चरबी असावी असे वाटते. 'रोगान' याचा अर्थही चरबी असा आहे. पण ती चरबी ज्या जनावराच्या मांसापासून काढलेली असते त्याचेंच कातडे-केस न काढलेलें-जसेंच्या तसेंच घेऊन त्याची पिशवी करून त्यांत तें रोगान भरतात. पिशवी करावयाची म्हणजे काय? भराभर टाके घालून किंवा झोळी बांधतात तशा गाठी देऊन तें कातडें भरावयाचें! घाणेरडे केस बाहेरच्या बाजूस तसेच दिसत असतात. पण त्यांतील 'तूप' अगदी बिनदिक्कतपणे सर्वत्र वापरलें जातें. इतकेंच नव्हे, तर आणखीही तसलेच पदार्थ अशा कातड्यांत भरून किती तरी विकावयास येतात. पाणीवाला भिस्ती ज्यांतून 'पेय' आणतो ती पिशवीही अशीच असते. तें कातडें कधी जन्मांतरी धुतात की नाही देव जाणे! पण त्यांतील पाणी सर्वत्र पितात. निढवलेल्या इराण्यांना त्याचें कांहीच वाटत नाही. दृष्टीआड सृष्टि असती तर एक वेळ चालेल; पण सर्वच प्रकार राजरोसपणे समोर होत असल्याने कोठेही जाऊन आहार करावा किंवा तहान भागविण्यासाठी पाणी प्यावें अशी इच्छा बिलकुल होत नाही. नाही म्हणावयास चारदोन साहेबी उपाहारगृहें आहेत, त्यांच्यावरच सर्वस्वी अवलंबून येथे वास्तव्य करावें लागलें.   खाद्य पदार्थात गव्हाची रोटी ही जास्त असून अंडीं विपुल प्रमाणांत वापरतात. तांदूळ, मांस, मासे हीं तर असावयाचीच. पण दही आणि ताक हीं इकडे इतकी प्रचारांत आहेत की, वातोदकांप्रमाणे [वातोदकें = सोडावॉटर वगैरे पेयें] ताक किंवा दहीं हीं कोठेही मिळू शकतात. दूध उपयोगात आणतात, पण तें शेळीचें, गाईचें, उंटिणीचें का गाढवीचें हें कळण्यास मार्ग नाही. निर्भेळ गोक्षीर क्वचितच मिळते. (इराणी भाषेत शीर-इ-गाव म्हणजे गाईचे दूध. 'इ' हा षष्ठीचा प्रत्यय, शीर = क्षीर, गाव= गौ, हे संस्कृतशी साम्य लक्षात ठेवण्यासारखे आहे.) कांही प्रसंगीं मानवी दुधाचेंही त्यांत मिश्रण असतें असें सांगण्यांत येतें आणि तें खरें मानण्यास बरींच कारणें आहेत. फळफळावळींत द्राक्षें, नारिंगें आणि डाळिंबे इकडे विशेष आहेत आणि तीं वर्षभर मिळूं शकतात. निसर्गाने ती राखण्यासाठी हिमवृष्टीचा लाभ या देशास आपोआपच करून दिला असल्याने 'मधांत' फळें घालण्याची आवश्यकता वाटत नाही. मधही विपुल असून खाण्यासाठी त्याचा उपयोग मनस्वी केला जातो. लोणी देखील इकडे मिळतें, पण तें महाग असतें. पालेभाज्या, गाजरें, विलायती मुळे, कांदे, बटाटे. (भालाकारांचे आवडते) भोपळे इत्यादिकांची लागवड होणें सुलभ आहे. कारण पाणी सदैव खेळतें असतें. आम्रफलाची मात्र कल्पनाच इराणी प्रजेस आहे! औषधाला तर नाहीच, पण शाळेंत वस्तुपाठ देण्यासाठी आंब्याचें झाड चित्ररूपाने पाहूं म्हटलें तरीही मिळावयाचें नाही! पालेभाज्या कच्च्याच खाण्याचा प्रघात आहे. भोजनांत सर्वच वीर 'सव्यसाची' असावयाचे हें ठरलेलेंच.
  इकडे आल्यानंतर एक मोठा फरक दैनिक कार्यक्रमांत झाला असेल तर तो स्नानाचे नांव आन्हिकांतून काढून साप्ताहिकांत अथवा पाक्षिक व्यवसायांत घालावयाचे हा होय! थंडी अतिशय हें तर कारण खरेंच; पण दुसरें म्हणजे योग्य सोय नाही. येथील स्नानगृहें अगदी वेगळीं असून कोणत्याही अभ्यागतालयांत म्हणजे हॉटेलांत स्नानाची व्यवस्था नसते. त्यासाठी ‘हमाम' म्हणून स्वतंत्र स्नानगृहेंच असतात. या हमामांत जावयाचें म्हणजे एक शिक्षाच म्हणावी लागेल. पण तीनचार वेळां गेल्यावर तेथे जाणें ही एक चैनीची आवश्यकता होते. चोहो वाजूंनी अगदी बंद केलेल्या खोलीस खालून उष्णता लावलेली असून तिच्यांत मधूनमधून वाफ सोडतात. अशा ठिकाणी जाऊन प्रथमतः तेथील सेवकांकडून सर्वांग घासून, धुऊन, पुसन, रगडून घ्यावयाचे आणि मग उष्णोदकाने स्नान करावयाचें, अशी रीत आहे. अशा हमामांत एकदा स्नान केलें की, साधारणपणे शेर अधशेर वजन कमी होतें आणि नेहमीचे कपडे अगदी सैल वाटावयास लागतात. घासूनघासून शरिराचें वरचें कातडें निघून जातें, सर्व रक्तवाहिन्यांना चेतना प्राप्त होते. निदान एक तासभर हें 'रासन्हाणे' चालतें. दोनदोन तीनतीन तासही सेवा करून घेणारे 'हमामबहाद्दर' असतात. पण नवीन आलेला मनुष्य कोंडलेल्या हवेमुळे गुदमरून जातो आणि घेरी आल्याप्रमाणे त्याला वाटूं लागतें! आठवड्यांतून किंवा महिन्यांतून एकदा स्नान व्हावयाचें तें असेंच असले पाहिजे! मुंबईतील चौपाटीवरील 'चंपी'च्या जोडीला उष्णोदक स्नान दिलें म्हणजे हमामाची कल्पना येईल. इराक, इराण, तुर्कस्तान इकडे सर्वत्र अशा हमामांचीच रीत आहे. पूर्वीच्या काळीं त्या ठिकाणीं नैसर्गिक उष्णोदकाचे झरे असत. तेव्हा त्यांना औषधी गुणांमुळे महत्त्व असे. पण हल्ली अशीं उन्हाळीं इराणांत कांही ठिकाणीं असलीं तरी शहरांतील हमामांत साधेंच पाणी येतें.   कावळ्याची एक कल्पित गोष्ट आपल्याकडे मुलांना सांगतात की, बगळ्याचें पांढरें स्वरूप पाहून त्यालाही आपण गोरें व्हावें अशी इच्छा झाल्याने काकराज नदींत स्नान करून दगडावर आंग घासून घेऊं लागले. त्यामुळे अर्थातच कावळ्याला इहलोकचें वास्तव्य संपवून काळ्या शरीरयष्टीचा त्याग करावा लागला. आपल्याकडील गोष्ट अशी आहे खरी; आणि कावळ्याचा रंग काळा हा सिद्धांत वज्रलेप मानण्याचा जरी प्रघात असला तरी, इराणांतील कावळे देखील गौरवर्णीय दिसतात. धुतलेल्या तांदळाप्रमाणे त्यांचें स्वरूप नसलें तरी, राखी रंगाची प्राप्ति त्यांना कोणत्या देवाने व का करून दिली आहे हें कळत नाही. उडण्याचे पंख व मानेभोवतालचा भाग अगदी काळा असून बाकीचा धूसरवर्णीय असतो, हें पाहून हा नवीन पक्षी असावा असा तर्क चालतो. परंतु ‘का का' अशाच हाकांनी जेव्हा आकाश भरून जातें तेव्हा संशयनिवृत्ति होऊन हिमराशींच्या सान्निध्याने अथवा कडक तपश्चर्या करून कावळ्याने वर्णांतर करून घेतलें असावें असें वाटतें. कित्येकांची नुसती चोंचच पांढुंरकी असते. कावळ्यांचा वर्ण बदलणाऱ्या या देशांत आम्ही उठून दिसलों तर काय आश्चर्य? असो.
  इकडील थंडीची कल्पना कशी द्यावी हा प्रश्न पडतो. शास्त्रीय पद्धतीने उष्णतामानयंत्रांतील पारा कोणत्या अंशावर असतो हें सांगितले तर सर्वांनाच कळेल असें नव्हे. तेव्हा इतर कांही मार्गानी त्यासंबंधी कळविणें इष्ट आहे. 'लोणीकाप्या चाकू' हा आपणांकडील वाक्प्रचार येथे उलट अर्थाने योजावा लागेल. कारण लोणी इतकें घट्ट होतें की, तें कापण्यास चांगलाच चाकू लागतो. प्रातःकाळी उठून बाहेर पाहिलें असतां बर्फाचे थर दिसले तर तें मुळीच आश्चर्य नव्हे. रस्त्यावरील पाण्याचें किंवा आंगणांतील हौदाच्या पाण्याचें बर्फ होणें हा नेहमीचा प्रकार आहे. शरीराच्छादनासाठी तीन चार आवरणें असूनही कधी घर्मबिंदु येत नाहीत. उलट 'वरकोट' [ओव्हरकोट] आणि हातमोजे हा नेहमीचाच पोषाक होऊन बसलेला आहे. थंडींत साचलेलें बर्फ उन्हाळाभर वापरण्यांत येते. आइस्क्रीम करण्यास फारसे श्रम पडत नाहीत आणि ते बनविण्याची पद्धतीही अगदी साधी आहे. हलवाई खवा घोटतो त्याप्रमाणे एका लाकडी फळीने दुग्धमिश्रण पांचसात मिनिटें घोटलें की आइस्क्रीम तयार होते. मात्र हलवायाच्या कढईखाली विस्तव असतो तर, आइस्क्रीमवाला आपल्या रुंद तोंडाच्या भांड्याभोवती बर्फाचे खडे ठेवतो; इतकाच काय तो फरक. थंडीतही प्रातःकाळी उठल्यापासून तों रात्रीं दहाअकरा वाजेपर्यंत आइस्क्रीम खाण्याची रीत आहे. बर्फाला किंमतच पडत नाही. तें आणून ठेवलें तर भुश्शांत किंवा पेटींत ठेवण्याची आवश्यकता नसते. बर्फाचे तुकडे घरांतील दारापुढे उघडेच पडलेले असतात. लागतील तसतसे घ्यावे! ते वितळण्यास फार अवधि लागतो. यावरून इकडील थंडीची थोडी तरी कल्पना येईल.
 नेहमी कपड्यांचा भार खांद्यावर असतो म्हणूनच की काय, इराणी लोक धिप्पाड अरबांच्या मानाने खुजे, ठेंगू आणि अशक्त दिसतात. त्यांची शरीरसंपत्ति कितपत आहे हें इतक्या अल्पावधींत कळणें शक्य नाही. पण इतकें मात्र खरें की, इराण्यांना हिंदी जनतेच्या शुभ्र दंतपंक्तीचा हेवा वाटतो! तुमचे दात बर्फाप्रमाणे का आणि आमचे भाजलेल्या रोटीप्रमाणे पिवळसर का? असा प्रश्न प्रस्तुत प्रतिनिधीस किती तरी वेळां विचारण्यांत आला! 'दंतधावन' ही क्रियाच मुळी इराण्यांना ठाऊक नाही असें म्हणावें लागतें. मांसाहाराने दात बिघडतात, हें तर आता तज्ज्ञांचेंच मत आहे. निद्रोत्तर वा भोजनोत्तर मुखप्रक्षालन करण्याची रीतच कोठे नसल्याने मधून मधून सोनेरी दात बसविलेला मनुष्य दिसतो; आणि दंतवैद्यांच्या पाट्या वाचतां येत नसल्या तरी दंतपंक्तींच्या चित्रांवरून त्यांचें प्राबल्य कळतें! पाण्याचा गलिच्छपणा, उष्टें खाण्याची पद्धत, थंडीमुळे चोहोकडून बंद असलेल्या खोलींत पुष्कळ जणांनी शेकत बसण्याची रीत, बुरखा, दंतधावनास फाटा अशा अनेक अहितकर चालींमुळे प्रजेचें आरोग्य रहावें कसें, असा प्रश्न कोणाही खोल दृष्टीच्या समाजसेवकास पडेल. परंतु त्यासंबंधी माहिती कोठून व कशी मिळणार?
 आकडेशास्त्र हें राजकारणी पुरुषांचें आणि व्यापारी तज्ज्ञांचें होकायंत्र आहे यांत तिलप्राय संदेह नाही. इतरांना किचकट आणि डोकें उठविणारे असे वाटणारे तेच तेच आकडे आर्थिक तज्ज्ञांना व मुत्सद्दयांना किती तरी महत्त्वाच्या मनोरंजक गुजगोष्टी सांगतात. पण इराणांत कोठेही आकडा मिळावयाचा नाही. आपल्याकडे लोकसंख्या तर आता साधारणपणे र-ट-फ करणारा मनुष्य देखील सांगूं शकतो, इतका या शिरोगणतीच्या आकड्यांचा प्रसार झाला आहे. पण इराणांत अद्याप एकही प्रसंग खानेसुमारीचा आला नाही आणि तो आणखी दहा बारा वर्षात येईल असें वाटत नाही! जेथे एकंदर लोक किती आहेत याचाच मुळी अंदाज नाही, तेथे मृत्युसंख्या, बालमृत्यूचें प्रमाण, जन्मांची होणारी वाढ, रोगांचा प्रसार इत्यादि आकड्यांची अपेक्षा करणें कितपत योग्य होईल? इतकें मात्र सत्य आहे की, तेहरान, हमादान, काझ्वीन किंवा इतर कोणतेंही शहर घ्या, तेथील लोकवस्ती वाढते आहे असें मानण्यास एकही कारण दिसत नाही.
  हिंदुस्थानच्या विस्ताराने इराण एकतृतीयांश असतां लोकसंख्या अदमासे सहा कोटीच आहे असें म्हणतात! तेंव्हा आणखी किती तरी जनता या प्रदेशांत कोंबतां येईल. आणि तोच प्रकार मोठमोठ्या शहरांतून दिसतो. खुद्द तेहरानमध्ये तर जगांतील सर्व देशांच्या लोकांचें प्रदर्शन भरलें आहे असें वाटतें! जपानी, चिनी, तुर्कोमान, अफगाण, पंजाबी, फ्रेंच, इटालियन, तुर्की, इंग्रजी, जर्मन, स्वीडिश, अमेरिकन इत्यादिकांचे नमुने अगदी सहजगत्या पहावयास मिळतात. व्यापारांत आणि इतर ठिकाणीही रशियनांचे-‘लाल' बोल्शेव्हिकांचे-प्राबल्य विशेष आहे. कारकून मंडळींत खिस्तानुयायी आर्मीनियनांचा भरणा चटकन् डोळ्यांत भरतो. हिंदी 'मोटारहाके' इराणांत इतके नामांकित आहेत की, कोणी नवा हिंदी मनुष्य दिसला म्हणजे, 'तुमची स्वत:ची मोटार आहे का तुम्ही नोकर आहां?' असा प्रश्न हटकून विचारला जातो. कारण मोटारहाक्याशिवाय दुसरी हिंदी मंडळी क्वचितच इकडे येतात. आपणांकडे पहाण्याची इतर राष्ट्रांची दृष्टि लक्षात घेऊन तरी परराष्ट्रांत हिंदुस्थानसंबंधी चळवळ करण्याचें काम जारीने स्वीकारलें जावो!
 इराकांत आणि इराणांत बाजारांतील दुकानांची रचना एकसारखी असून एकदम डोळ्यांत भरणारी आहे. एकाला लागून दुसरें अशीं समोरासमोरील पडव्यांतून दुकानें मांडलेलीं असून तीं वरून आच्छादिलेलीं असतात. म्हणजे स्त्रिया जशा बुरख्यांत झाकून ठेवलेल्या असतात तशींच ही दुकानेंही वरून बंद असावयाची. सूर्यप्रकाशाचें वावड़े स्त्रियांना, तसेंच दुकानांना व दुकानदारांना सुद्धा! हवा जाण्यासाठी मधूनमधून गवाक्षे ठेवलेली असलीं तरी एकंदरीत अत्यंत हानिकारक अशीच ही पद्धति आहे असेंच कोणीही म्हणेल! मुंबईस मंगळदास मार्केटमध्ये अशा प्रकारचा थोडा अनुभव येईल. पण त्या मानाने मुंबईची दुकानें व मार्केटसुद्धा लहान पडतें! एकदा बाजारच्या हया बोगद्यांत शिरल्यावर एकदीड मैल आकाशाचें दर्शन न होतां गर्दीतूनच जावें लागतें! सर्व प्रकारची दुकानें व्यवस्थित रीतीने मांडलेलीं आढळतात. वेगवेगळ्या धंद्यांची विभागणी केलेली दिसते. दिवसा दिवे लावण्याची पाळी येत असली तरी व्यापार अगदी जोराने चाललेला असतो. जगांतील सर्व प्रदेशांचा माल इराणांत भरलेला आहे हें पाहून आश्चर्य वाटते. कारण एवढ्या मोठ्या देशांत केवळ शंभर मैल देखील रेल्वेचा प्रसार अद्याप झाला नाही! सर्व दळणवळण मोटारी, घोडे, खेचरें आणि उंट यांवरून चालतें. या बंद बाजारी पद्धतीमुळे लोकांत क्षयरोगाचा प्रसार आहे असें म्हणतात.
 धूम्रपानाचे व्यसन हिंदुस्थानांतील लोकांना जितकें आहे, त्यापेक्षा किंचित् कमी प्रमाणांत तें इराणांत आहे. मुख्यतः समाधानाची गोष्ट अशी की, इराणी जनता बहुतेक सिगारेट्स इराणांतच तयार करते. परकीय 'धुम्रसमिधां'चा प्रसार इराणांत मुळीच नाही, असें म्हणता येईल. ठिकठिकाणी सिगारेट्स तयार करण्याचीं हातयंत्रें दिसतात आणि कित्येकांना स्वहस्तें सिगारेट करून पिण्याची सवय असल्याने सुटे कागद व तंबाखू हीं खेडोखेडींही मिळतात. गुडगुडी सुद्धा क्वचित प्रसंगीं दृष्टोत्पत्तीस येते. अफू ओढण्याचें घातुक व्यसन दोन तीन वर्षांपूर्वी फारच पसरलेलें होतें. तें राष्ट्रसंघाच्या विनंतीवरून बंद होण्याच्या मार्गाला लागलें आहे. रोट्यांना ‘खसखस' लावण्याच्या नेहमीच्या चालीवरून अफूचें पीक येथे पुष्कळ असावें असा तर्क निघतो व तो खराही आहे. स्त्रियाही बुरख्यांतून धूर सोडीत रस्यांतून जातात, त्याचे प्रथम दर्शनी आश्चर्य वाटतें!
 शिराझ शहरांतील 'मदिरा' उमर खय्यामने नामांकित करून ठेवली आहे. द्राक्षांचे पीक विपुल असल्याने 'सुरासुरांचा चुरा करणाच्या' सुरेचें प्राबल्य इराणांत साहजिकच अधिक आहे. वस्तुतः मद्यसेवन हे व्यसन न मानतां मद्य हें नेहमीच्या पेयांतील एक उच्च दर्जाचें द्रव्य असेंच मानलें जातें ! साधा 'द्राक्षरस' कोणीही घरीं करावा, त्याला कायद्याची बंदी नाही. दारू न घेणारा मनुष्य क्वचितच आढळेल. विद्यार्थीदेखील तिचें सेवन सर्वांदेखत करू शकतात. परदेशी मद्याचा प्रसार नाही असे नाही. मात्र तो श्रीमंतांत आहे एवढेंच!
 बालविवाह रूढ असलेला दिसत नाही हें खरें; पण एक विचित्र विवाहपद्धति इकडील लोकांत प्रचलित आहे. तिचे स्वरूप पाहून तिला ' विवाह' असें का म्हणावें हा प्रश्न पडतो. हे सर्व कृत्य अगदी धार्मिक, न्याय्य व नैतिक मानलें जातें ही विशेष मौज! 'जुजबी ' लग्ने म्हणून इस्लामानुयायी जनांची इराणांत जी रीत आहे, तिच्या सहाय्याने तीन महिने, चार महिने किंवा आवश्यक व इष्ट असेल तितकाच वेळपर्यंत एखाद्या स्त्रीशीं विवाहबद्ध रहातां येतें ! लग्न लावणारा मुल्ला ठराविक दक्षिणा घेतो आणि त्याच वेळी हा विवाह किती कालपर्यंत टिकणारा आहे याचा निर्णय विवाहेच्छु दांपत्याच्या संमतीने ठरवितो. त्या मुदतीनंतर या जोडप्याचें नातें तुटतें. त्यांना पुनः धर्माधिका-यापुढे किंवा न्यायासनापुढे काडी मोडण्यास जावें लागत नाही. यामुळे एका वर्षांत चार चार पांच पांच वेळां विवाहबद्ध होतां येतें, व एकाच वेळीं पुष्कळ पत्न्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी पडते. भावी अडचण टाळण्यासाठी दूरदृष्टीने ती तरतूद विवाहप्रसंगाने करून ठेवली जाते. परंतु ही पद्धति सर्वत्र प्रचलित असून तिजबद्दल कोणास कांही वाटतें असें दिसत नाही. बाह्यात्कारी टोपीची आणि कोटाची सक्तीने सुधारणा करण्यापूर्वीं काळ्या पडद्यांतील ही घाण प्रथम काढली असती तर राष्ट्राचें अधिक हित झालें असतें ! या घातक पद्धतीने काय आपत्ति कोसळते यासंबंधी चर्चा करणे इष्ट नव्हे. साध्या कल्पनाशक्तीसही तिचें आकलन होण्यासारखें आहे.
  मनुष्यास भेटण्याची आपलेकडील प्राचीन पद्धति म्हणजे आलिंगन देऊन बाहूंत कवळण्याची आहे. आता चोहोकडेच हस्तांदोलन रूढ होत असल्याने जुनी रीत क्वचित् पाळतात. परंतु इकडे एकच पद्धति पूर्वीपासून चालू आहे. दोन्ही गालांचें व नंतर कपाळाचें चुंबन घेण्याची चाल इराणांत आहे. ती फक्त जुन्या मताच्या लोकांतच आढळते आणि कोणी परगावीं चालला अथवा जाऊन आला म्हणजे सर्वांनी त्याचें चुंबन घ्यावयाचें असा इकडील रिवाज आहे. हा प्रकार फक्त पुरुषांचाच चाललेला नेहमी दिसतो.
  पंचांगवाद आपलेकडेच आला आहे असें नसून या बाबतींत इराणी लोक आपले भाईबंद आहेत, ही समाधानाची गोष्ट होय. नेहमीच तीन पंचांगें (?) जवळ बाळगावीं लागावीं अशी इराणी परिस्थिति आहे. इराणी वर्ष हें सौरमानाचें असून पैगंबराच्या पलायनदिनापासून त्याची गणना होते. इतर मुसलमान देशांत वर्षगणनेचा आरंभ पैगंबरपलायनाचा दिवस असलां, तरी त्यांची वर्षे चांद्रमासाचीं असल्याने फरक पडतो. शिवाय अरबी महिन्यांची नांवें आणि इराणी महिन्यांचीं नांवें एक नाहीत. आपल्याकडे भाषाशुद्धीचा प्रयत्न कसोशीने चालू आहे, तसाच इराणांतही चार पांच वर्षांपासून सुरू असून परकी शब्दांवर त्यांचा कटाक्ष आहे. विशेषतः अरबी भाषेचें वर्चस्व त्यांना नको असल्याने अरबी शब्दांना अर्धचंद्र देण्याचें कार्य सरकारी सहाय्यानेच चालू आहे. महिन्यांचीं नांवें तर बदललींच, पण लष्करी खात्यांतील अरबी शब्दांना इराणी प्रतिशब्द योजून त्यांचा प्रचार करणें, हसन, महमद इत्यादि अरबी नांवांवर बहिष्कार घालून, रुस्तुम, जमशीर वगैरे इराणी नांवांचा प्रसार जनतेंत सक्तीने करणें या बाबी महत्त्वाच्या असून त्यांपासून पुष्कळच घेण्यासारखें आहे. 'नांवांत काय आहे ?' असा कोणीं प्रश्न केल्यास नांवांतच सर्व आहे असें स्पष्टपणें सांगावें लागेल. इराणी तारीख, महिने आणि वर्ष निराळें, अरबी कालमान अगदी वेगळें आणि ख्रिस्ती शकाचा तृतीय पंथ आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी आवश्यक असल्याने नेहमी त्रिवेणीसंगमाचें पंचांग जवळ बाळगावें लागतें. नांवांच्या व भाषेच्या शुद्धीकरणाच्या आणि नवीन वर्षमानाच्या सुधारणा केवळ राजाश्रयाच्या जोरावरच इतक्या त्वरेने लोकमान्य झाल्या हें लक्षांत ठेवणें इष्ट आहे. इंग्रजी महिन्यांच्या तारखाही कांही तरी अनुमानधक्क्यानेच ठरविल्या आहेत. आणि अमुक महिना किती दिवसांचा हें ठरविण्यासाठी हातावरील उंचवट्याचे सहाय्य घ्यावें लागतें. त्यांचे दिवस हे कसे तरी ठरविलेले आहेत, पण इराणी वर्षमानांत पहिले सहा महिने एकतीस दिवसांचे, पुढील पांच महिन्यांत तीस दिवस आणि शेवटचा महिना एकोणतीस दिवसांचा अशी सोईची विभागणी आहे. दर चार वर्षांनी अखेरचाही महिना तीस दिवसांचा असतो. ही सोय नाही असें कोण म्हणेल ? पण ती केवळ इराणांतच मान्य आहे.
  दैनिक कार्यक्रम जसा आपला तसाच इराण्यांचाही. फरक केवळ घड्याळ लावण्याचा. सूर्योदयाला साधारणपणे सहा वाजतात असें आपण मानले तर इकडे त्यावेळी घड्याळांत बारांचे ठोके पडतील. म्हणजे सूर्योदयच बारा वाजतां होतो! इराकांतही तीच पद्धति असल्याने 'इंग्रजी घड्याळ' का 'इराणी घड्याळ'? असा प्रश्न केव्हाही विचारावा लागतो. इराकांत अरबी वेळ पुष्कळ ठिकाणी मानतात तसें इराणचें नाही. मुंबईचा जसा घड्याळाचा वाद आहे, तसाच हा समजावा. मुंबईस फरक सुमारें चाळीस मिनिटांचा असतो तर हा सहा तासांचा आहे इतकेंच! आपण घटिकामापन सूर्योदयापासून करतों, तशापैकीच घड्याळाचे तास सूर्योदयापासून मोजण्याची रीत आहे. विशेष आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नव्हे.
 मुसलमान म्हटला की, त्याला दाढी हवी, ही समजूत इराणांत पार बदलली आहे. धर्मोपदेशक आणि क्वचित् एखादा इसम दाढीवाला आढळतो. बाकी सर्वांना 'नित्य श्मश्रू अभिमत' असलेली दिसते! मिशीकर्तनांत 'फ्रेंच कट' म्हणून एक प्रकार फॅशनचे जनक मानतात. त्याचा प्रसार इराणांत पुष्कळ झालेला आहे असें स्पष्ट दिसून येतें. अधरोष्ठाच्या सीमेंतच मिशांना ठेवणे हा मुख्य नियम 'फ्रेंच कटा'चा आहे. बहुधा मिशांचें माप या मताचे लोक नाकाच्या रुंदीवरून ठरवितात. नाकाच्या रुंदीइतक्या मिशा असल्यास प्रत्यवाय नाही. त्यांची किमान मर्यादाही नाकांतील मधल्या पडद्याच्या जाडीइतकी आहे. अशा पद्धतीचा अवलंब इराण्यांनी केला. यावरून फ्रेंचांचा वरचष्मा येथे किती आहे तें कळून येईल. सुगंधी द्रव्यांतही फ्रान्समधील दुकानदारांनाच प्राधान्य असल्याने फ्रेंच अत्तरें, लव्हेंडरें वगैरे केशभूषेचें साहित्य पुष्कळच खपतें. सर्वच बाबतींत फ्रेंचांचे अनुकरण इराण्यांनी केलें आहे असें म्हणतां येतें.
  इराणांत फ्रेंच संस्कृतीचा, चालीरीतींचा आणि भाषेचा पगडा अत्यंत आहे. याचे कारण नेपोलियनच्या कालापर्यंत जाऊन भिडतें. नेपोलियनच्या अनेक महत्त्वाकांक्षांपैकी हिंदुस्थानला येणें-नव्हे जिंकणें ही एक महत्त्वाकांक्षा होती. आणि ती पुरी करण्यासाठी त्याने इराणी शहाशीं संबंध लावण्याकरितां वकील पाठविले होते. त्यामुळे किंवा फ्रेंच मिशनऱ्यांच्या प्रयत्नांमुळे बोनापार्टचें नांव सर्वतोमुखी आहे. इतकेंच नव्हे, तर नेपोलियनच्या आयुष्यक्रमांतील महत्त्वाचे प्रसंग दाखविणारीं चित्रें सर्वत्र पसरलेलीं आहेत. देवादिकांची चित्रे विकतात तशी इकडे इराणांत नेपोलियनचींच चित्रे फार आढळतात ! इराणांतील तरुण पिढी बहुधा फ्रान्समध्येच शिकलेली असून इंग्रजीपेक्षा फ्रेंच भाषेशीच त्यांचा निकट संबंध असतो.
  फार्सी भाषा संस्कृतशीं बरीच जुळते. अरबीपेक्षा ती बोलण्यास आणि समजण्यास सोपी आहे. कानडी प्रांतांत हेल काढून बोलण्याची रीत आहे, तशीच इराणांत सर्वत्र आढळेल. तेहरानमध्येच नव्हे, तर इराणांत सर्वत्र फार्सी, तुर्की, रूसी किंवा फ्रेंच यांपैकी तीन भाषा जाणणारे लोक दिसून येतात. अरबीही कित्येक बोलूं शकतात. पण निदान तीन भाषा बोलतां येणारे लोक आपल्याकडे किती आहेत? साधा अशिक्षित म्हणजे लिहितांवाचतां न येणारा मनुष्य असला तरी तो तीन भाषा बोलूं शकतो हे पाहून आश्चर्य वाटते.
  घोड्यांच्या ट्रॅमगाड्या, मोटार बस आणि घोड्यांच्या बग्या हीं मुख्य वाहतुकीचीं साधनें तेहरानमध्ये आहेत. शहरातील रस्ते रुंद असून जागोजाग शहरसुधाराईसाठी चाललेली खटपट दृष्टीस पडते. डोंगराच्या पायथ्याला ही राजनगरी वसली असून रस्त्यांतून बर्फाच्छादित गिरिभाग दिसतो, इतकेंच नव्हे तर इराणांतील एल्बुर्झ पर्वतांतील अत्युच्च शिखर 'देमावांद ' हें १९,००० फूट उंचीचें असल्यानें तें तेहरानमधून दिसतें. आकाशांतील मेघमाला वरचेवर निरनिराळें स्वरूप धारण करीत असल्याकारणाने, कधी अत्यंत थंड वारे सुटून हिमवृष्टि होते, केव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश असतो, केव्हा केव्हा पावसाळ्याची आठवण करून देणारी झिमझिमही चालू असते. असे सर्व प्रकार एक दोन तासांच्या अवधींत घडून येतात! त्यामुळे निसर्गाच्या ऋतूंचा कार्यक्रम या प्रांतीं अत्यंत अनिश्चित असावा असें वाटतें.
 असें असलें तरी, एकंदर हवामानामुळे मनास सदैव आल्हादित ठेवणारें वातावरण निर्माण होतें. कारण पावसाच्या झिमझिमीमुळे धुरळा उडत नाही; आणि थंडी असल्यामुळे काम करण्यास नेहमी उल्हास वाटतो. मुंबईस किंवा उष्ण कटिबंधांतल्या देशांत मजुरांकडून काम कमी होतें त्याचें एक कारण तेथील उष्ण हवा हेंच होय. पण समशीतोष्ण कटिबंधांत गेल्यानेही कांही नुकसान होतेंच. सूर्य डोक्यावर सहसा यावयाचा नाही; क्षितिजावरून उगवून तिरपा तिरपा असाच तो मावळतो. मग कडक ऊन कोठून मिळणार? आणि सूर्यप्रकाशामुळे होणारी नैसर्गिक स्वच्छता तरी इराणी प्रजेस कोठून लाभणार? तीच गोष्ट चांदण्याची. सुंदर, शोभिवंत उपवनें, उत्तमपैकी फळफळावळ व हरप्रकारचा सुका मेवा यांची चंगळ पूर्णपणे उपभोगण्यासाठी शुभ्र चांदणें वर्षातून कांही दिवस तरी नियमितपणे मिळतें तर गुलहौशी व रंगेल इराण्यांच्या सुखास पारावार उरला नसता. पण कमालीची थंडी, मधून मधून होणारी हिमवृष्टि व स्वेच्छाचारी मेघ मध्ये विघ्नें आणून रंगाचा बेरंग करून टाकतात.

--केसरी, ता. १४, २१ व २८ मे, १९२९.






मुक्काम सहावा :क्वेट्टा
( १८ )

  इराणांतून बलुचिस्तानांत विमानांतून येणें सुखाचें होतें. तरी सदर प्रदेशाची नीट ओळख करून घेण्यासाठी मी मोटारींतूनच यावयास निघालों. तेहरानहून सकाळी निघावयाचे असें ठरलें होतें, तरी सायंकाळीं सूर्यास्ताचे सुमारास मोटार हलली! तेहरानच्या सीमेबाहेर तर दिवे लागल्यावरच पडलों. बाकी ही पद्धत नेहमीचीच असल्याचे समजले. इतकेच नव्हे तर त्याच दिवशी निघाल्यावद्दल मोटारहाक्याचे आभार माना असेही कोणी म्हणाले! बारा उतारूसाठी किंवा चाळीस मण बोजासाठी बनविलेल्या अमेरिकन यंत्रयानांत [मोटार] सुमारे पंचवीस तीस मण सामान आणि सोळा उतारू 'कोंबले' होते!
  बरें, रस्ता तरी चांगला असावा अशी अपेक्षा करावी तर तेंही मूर्खपणाचेंच! पुढे गेलेल्या मोटारच्या खुणेवरून 'पावलांवर पाऊल टाकून ' जावयाचें हा सारखा क्रम ठेवावा लागला. तेहरान–मशहद हें अंतर ५६० मैलांचे आहे. दिवसा यंत्रयान मार्ग आक्रमण करी व रात्रौ सर्व प्रवासी निद्राराधन करीत. अंधारांत मार्गही दिसत नसे आणि दिवसभराच्या शिणाने सर्वच जण थकून भागून जात. एकंदर पांच रात्री या प्रवासास लागल्या व सहाव्या मध्यरात्री उद्दिष्ट गावी आम्ही पोचलों. मोटारीच्या भानगडीही मधून मधून होत असतात. त्यासाठीही कांही अवधि खर्च होत असे. रस्त्याची परिस्थिति वर सांगितलीच आहे. त्यांत यांत्रिकांच्या अकलेची भर पडावयाची राहिली. म्हणजे प्रवासाला निघण्यापूर्वी यंत्रयानाची त्यांनी तपासणी करावयाची नाही असा निश्चयच केलेला दिसला. जेव्हा कांही मोडतोड होई तेव्हाच तिकडे त्यांचें लक्ष जाई. संसारांत राहून विरक्त रहाणारास पद्मपत्राची उपमा देतात. तो प्रघात सोडून त्या ठिकाणीं इराणांतील मोटारहाक्याची उपमेसाठी योजना करावी. मोटारींत असूनही जशी कांही मोटार आपली नव्हेच या भावनेने त्यांचे वर्तन असतें. आडरानांत किती तरी मोटारी अडकून पडल्या होत्या. कोणाजवळ हवा भरण्याचा पंप नाही, तर कित्येकांचे पेट्रोल संपलेलें. कांहींजवळ तर नेहमी आवश्यक असणारी हत्यारेंही नव्हतीं. अशा अगदी साध्या क्षुल्लक बाबींसाठी उतारूंचे हाल होत. कोठे तरी मोटार अडली म्हणजे ती पुढे जावी कशी ? उतारूंंना दुसरीकडे जातां येत नसे. तेव्हा मनोभावाने मोटारहाक्याबरोबर तेही जिवापाड परिश्रम करीत. जितकें काम लवकर होईल तितका त्यांचा प्रवास जलद संपणारा असल्याने ते धडपडत. पण यांत्रिक अगदी निर्विकार दिसे. त्याला त्याचें कांहीच वाटत नसे.
  इराणांत वाहतुकीची साधनें नुकतीच उपलब्ध झालीं असल्याने त्यांचा फायदा प्रथमतः व्यापारी घेतात हें खरें. पण बहुतेक उतारू यात्रेसाठीच हिंडत असतात. इराणी हे शिया पंथाचे मुसलमान. तेव्हा इराकमधील 'करवला' या ठिकाणीं जाण्याची त्यांची उत्कट इच्छा असणारच. मशहद ही अत्यंत महत्त्वाची यात्रेची जागा असल्याने धार्मिकांची तेथे अत्यंत गर्दी जमते. मशहदचे माझ्याबरोबरचे उतारू सर्व यात्रेकरूच होते. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे फाजील धर्मवेडाने वेडावलेली ती मंडळी होती. दिवसा तीन चार वेळ प्रार्थनेसाठी मोटार थांबविण्याची त्यांची ओरड असे. पण मोटारहाक्याशीं संगनमत करून केवळ दोन वेळच प्रार्थनेसाठी मोटार थांबविली जाईल असें ठरविलें. एकदा खाली मंडळी उतरली की, मग तो मेंढरांचा कळप पुनः कोंडवाड्यांत हाकण्यास निदान तास दीड तास जाई. शिवाय आहारासाठी एक दोन वेळा मुक्काम दिवसा करावा लागेच. इतका वेळ जाऊन मोटार सुरळीत चालल्यास आमच्या प्रवासाची प्रगति व्हावयाची!
 धर्मनिष्ठांचा उपयोग संकटहरणाचे कामीं बराच झाला. एखादा मोठा खळगा आला किंवा ओढ्यांतून पलीकडे जावयाचे असले म्हणजे सर्व यात्रेकरू एकस्वराने 'पैगंबरा'चा धावा करीत, आणि संकटांतून सोडविण्याची विनंती त्याला करीत. त्यांचा तो अल्लारसुलिल्लाचा 'इल्लागुल्ला' कर्णकटु वाटे. पण करता काय ? मुसलमानी राज्यांत असल्याने ते सर्व निमुटपणें सोसावें लागलें.
 इराणांत खनिज संपत्ति किती आहे याचा अंदाज याच प्रवासांत आला. डोंगराचे हिरवे, तांबडे, पिवळे, पांढरे असे वेगवेगळे रंग दिसत. कारण तेथील माती अथवा दगड त्या त्या रंगांचे आहेत. कित्येक ओढे अगदी खारट पाण्याचे असून त्यांच्या बाजूने शुभ्र मिठाचे मोठमोठे ढीग आढळत. जमिनीवर ठिकठिकाणी पांढरा पातळ थर पसरलेला असे तो मिठाचाच! गिरिपृष्ठभाग कांही ठिकाणी काळाकुट्ट दिसून दगडी कोळशाचे अस्तित्व सुचवी तर, मधूनमधून चम् चम् करणाऱ्या टेकड्या अभ्रक असल्याची साक्ष देत.
  आमचा प्रवास दिवसा होई आणि रात्रीं एखाद्या उपहारगृहांत वास्तव्य करावें लागे. 'काहवाखाना' असे नांव इकडील उपहारगृहांना असतें. तेथे सर्व खाद्यपेय पदार्थ तर मिळतातच, पण उतारूसाठी निजण्याबसण्याचीही सोय केलेली असते. मोटारींची वाहतुक वाढल्यामुळे अशा काहवाखान्यांस साहजिकच तेजी आली आहे. रस्ता ज्या गावांमधून जाई तेथे असे काहवाखाने असत. त्या त्या गावांतला मुख्य मार्ग आणि तेहरान-मशहद हा रस्ता हे कांही भिन्न नसत. दोन घरांमधील अरुंद भाग किती तरी ठिकाणी 'रस्ता' म्हणून उपयोगांत आणला जाई. एक मोटार कशीबशी निघून जाण्याइतकीच ती वाट असे. पण तशा अडचणींतूनही रहदारी जोराने चालते. दुसरा मार्गच नाही, मग काय करावयाचें ? पांच रात्रीं पांच वेगळ्या ठिकाणीं मुक्काम झाला. तेथे गेल्याबरोबर जे पुढे येईल त्यावर हात मारून आडवें व्हावयाचें हा ठरलेला कार्यक्रम असे. बरोबरचे प्रवासी लोक 'बिसमिल्ला'साठी निमंत्रण देत आणि मी हिंदी मुसलमान आहें, अशीच सर्वांची समजूत असल्याने ती विनंती नाकारतां येत नसे. भोजनप्रसंगीं दुसऱ्यास खाद्य पदार्थाचा आस्वाद घेण्यास विनंती करावयाची असली म्हणजे बिसमिल्ला कर असें आपल्याकडील मुसलमानही सांगतात. तशापैकीच तो प्रकार. मुसलमान मंडळींच्या हातांत असलेल्या रोटीचा थोडासा तुकडा घेऊन मला त्यांच्या मनाचे समाधान करावें लागे.
 पण अशा वेळीं घडलेली एक गमतीची गोष्ट सांगतो. दोन प्रहरच्या भोजनासाठी मी एके खेडेगावीं थांबलों असतां तेथील बाजारांतील लोकांशी मिळून मिसळून तेहरानमधील प्रचालित सुधारणे-विषयी त्यांचे काय मत आहे तें पहावें म्हणून एका दुकानांत शिरलों. मी 'नफर-इ-हिंद’ -हिंदी मनुष्य– हें न सांगतांच कळलें आणि हिंदी मनुष्य इराणांत आलेला म्हणजे तो मुसलमानच अशी समजूत सर्वत्र असे, माझ्या पथ्यावर पडे. इराण फार चांगले आहे असें मी म्हटलें. इराणी लोकांनीही हिंदुस्थानांतील ‘गॅर्मी' (उष्णता),तेथे मिळणारा पुष्कळ पैसा, कामही भरपूर इत्यादि ऐकीव गोष्टींचे वर्णन केले. दुकानदाराच्या कोटावर गुंड्या होत्या. त्या महात्मा गांधींच्या गुजराथी वेषांतील चित्रांकित असल्याने, “हा मनुष्य कोण?" असें त्याला विचारतांच 'न मीदानीम' (ठाऊक नाही ) इतके उत्तर देऊन, मला त्याने तोच प्रश्न टाकला. कोणी थोर पुरुष आहे इतकेच त्याला ठाऊक होते. त्याचे नांव 'गांधी' असे सांगून तो हिंदुस्थानांतील आहे असें मी सांगतांच दुकानदाराने, "गांधी मुसलमानच ना ?" असा सवाल केला. महात्माजींना सगळे जग कुटुंबवत् वाटत असल्याने सर्व लोक त्यांचे 'भाऊ' होत. पण हिंदी वातावरणाचा परिणाम मजवर साहजिकच झालेला होता आणि पुढील परिणामाची कल्पना नसल्याने "छे: छे:, गांधी हिंदु आहेत," असे मी सांगतांक्षणीच त्या दुकानदाराने 'का-फी–र' अशी अक्षरे डोळे मोठे करून तिरस्कारयुक्त वाणीने उच्चारली आणि ताडकन् सर्व गुंड्या तोडून फेकून दिल्या! आपली इतके दिवस वंचना झाल्याबद्दल त्याला अतिशय वाईट वाटले. कारण इतक्या दूरच्या खेडेगावी गांधीछापाच्या गुंड्या जाणें म्हणजे त्यांना बरीच किंमत पडली असली पाहिजे. "मग हिंदूही आमच्या प्रमाणे रुमाल बांधतात काय?" हा त्याचा प्रश्न कोणत्या वृत्तीने विचारला गेला असेल याची कल्पनाच करावी! गांधींनी गुजराथी रुमाल डोक्यास गुंडाळला होता व तेवढ्यावरून तेही इस्लामानुयायी असावेत अशी तेथील लोकांची समजूत होती. पेहेलवी टोपीचा कायदा त्या प्रदेशांत आणखी पांच वर्षे तरी पोहोचूं शकणार नाही असें वाटतें. त्या ठिकाणचे लोक पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे डोक्यास रुमालच गुंडाळीत. अस्तु.  प्रवासांतील 'फराळ' ही साधाच असे. 'नून' (रोटी), 'मॉस' (दही), 'असाल' ( मध ) आणि 'प्याज' (कांदा) त्याव्यतिरिक्त कोणतेही पदार्थ मी घेतले नाहीत.भाजी नेहमीच सामिष असे आणि मी पडलों शाकाहारी ! तेव्हा निरामिष पदार्थ मिळतील तेवढेच घ्यावयाचे. नूनचे प्रकार इराणांत फार आहेत. हत्तीसाठी लागणाच्या जाड रोटांपासून ते कागदाप्रमाणे पातळ पोळ्यांपर्यंतचे सर्व प्रकार मिळू शकतात. आकारांतही त्यांची विविधता असे. हातांत रोटी घेऊन चार पांच जणांचे मिळून एक दह्याचे भांडे असे, त्यांतील दही सर्वांनी मिळून सहभोजनाप्रमाणे घ्यावयाचे ही रीत आहे. या प्रचाराविरुद्ध जाणे म्हणजे मुसलमान नसल्याची ती कबुलीच होय! तेव्हा, येईल तो आपला धाकटा भाऊ समजून अक्षरश: एका ताटांत पांच सहा जण जेवत असूं.
 स्वच्छतेच्या बाबतीत बरेच नियमोल्लंघन घडलें. रोजचें स्नान साप्ताहिकांत येऊन पडल्याचे लिहिलेच आहे. पण त्याच्याही पलीकडील बाब म्हणजे पेय पाण्याची. पाणी कोठे मिळेल तेथे तें उंटाप्रमाणे पोटांत भरून घ्यावयाचें हाच प्रघात सर्व प्रवासांत पाळावा लागला. जवळ पाणी बाळगलें असतें तर असा प्रसंग आला नसता असें जर कोणास वाटेल तर ते चुकीचें आहे. कारण इतर उतारू तुमच्या कळत वा न कळत त्या भांड्याला तोंड लावून त्याला केव्हाच शुद्ध करून ठेवीत! प्रत्येकाच्या बरोबर मातीचा खुजा पाण्यासाठी असे. पण पिण्याचे भांडें एकही नव्हतें. जरूर पडेल तेव्हा बिनदिक्कतपणे खुजा तोंडाला लावला की झाले. भांड्याची आवश्यकता उरते कोठे ? बाजारांतील रोट्या विकत घ्यावयाच्या त्या तरी शुद्ध असाव्यात. पण मला वाटते एखाद्या सार्वजनिक वाचनालयांतील दैनिक पत्रांना हात लागत नसतील इतके हात भाकरी पोटांत जाण्यापूर्वी तिला लागत असत.पुण्यातल्या मंडईत्तज्या फळांनाही देखील वाटेल त्यांस हात लावूं देत नाहीत. पण इराणांतल्या रोटीस वाटेल त्याने हात लावावा. हात कसलाही असो, कोणी बोलावयाचे नाही. पण हे सर्व प्रकार दृष्टीसमोर होत असूनही डोळ्यांवर कातडें ओढून पुढे येईल त्या अन्नावर हात मारावा लागला.
 "विश्वामित्रः श्वमांसं श्वपच इव पुरा भक्षयन्यनिमित्तम् ।”
त्याच कारणासाठी स्वच्छास्वच्छतेचा, आरोग्याचा आणि पथ्यापथ्याचा विचार पार हाकून द्यावा लागला! विश्वामित्रासारखा कमालीचा प्रसंग आला नाही ही परमेश्वराची कृपाच म्हणावयाची.
  सुर्खा, सिमनान, दमगाव, शारूद, सब्झेवार, निशापूर या गावांवरून मशहदला आलों. निशापूर येथे पाश्चात्यांचा आवडता इराणी कवि उमर खय्याम याची कबर आहे आणि परकीय प्रवासी तेथे जाऊन दर्शन घेणें अगदी महत्त्वाचे समजतात. खुद्द इराणी जनतेस उमरची फारशी ओळख नाही असें म्हटल्यास वस्तुस्थितीचा विपर्यास होणार नाहीं. फिर्दोसी किंवा सादी मात्र प्रत्येकास ठाऊक आहे. खय्याम हा युरोपियन राष्ट्रांत इतका लोकप्रिय झाला याची कारणें दोन आहेत. एक तो मदिरादेवीचा नि:सीम उपासक होता; इतका की, 'तळिराम' देखील त्यापुढे फिक्का पडेल! दुसरें कारण असें की, तो पारमार्थिक सुखाविषयी बेफिकीर असून इहलोकीच्या वास्तव्यापलीकडे त्याच्या कल्पनेची मजल मुळीच जात नसे! चार्वाकाच्याही पलीकडे तो गेला आहे असे म्हणता येईल. चार्वाक फक्त 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' असे सांगतो, तर खय्यामची शिकवण 'ऋणं कृत्वा सुरां पिबेत' अशा प्रकारची आहे. नुलत्या मदिरेपर्यंतच त्याची विचारपरंपरा आहे असें नाही. 'मदिरा, काव्याचे पुस्तक, रोटी आणि तूं मजजवळ असलीस तर जंगलांतही स्वर्ग अवतरेल,' असे तो मदिराक्षीस उद्देशून म्हणतो. एके ठिकाणी तर "भर पेला–आजचा हा दिवस गतकालाच्या ढिगांत जाऊन पडण्यापूर्वी मला मदिरेचें आकंठ सेवन करू दे," असे स्पष्ट शब्दांत तो सांगतो.
 दमगावापासून रस्ता जरा बरा होता. म्हणजे पूर्वीच्या त्या मार्गावरून मोटारींची वाहतुक असल्याने तो रस्ता झाला होता की, सडक आहे म्हणून यंत्रयानें जा ये करूं लागली, हे निश्चितपणे सांगता येत नसे. पण पुढील रस्ता कोणाच्या तरी मालकीचा आहे आणि तो कधी तरी दुरुस्त करावा लागतो अशी जाणीव झाल्याचीं चिन्हें दिसत!   मोठमोठे चढउतार, नद्यानाले इत्यादिकांना ओलांडून मशहदला आलो. तेथील लोकांची गर्दी, व्यापार, मोटारींची वाहतुक पाहूनच त्या शहराच्या महत्त्वाची कल्पना आली ! अफगाणिस्तान, बलुचिस्तान, आणि रशियन तुर्कस्तान यांनी वेढलेला हा इराणचा भाग ‘खुरासान' म्हणून ओळखला जातो आणि त्या प्रांताची राजधानी मशहद येथे आहे. खुद्द मशहदलाही खुरासान असें म्हणतात. तेहरान, कंदाहार, पेशावर या मार्गांनी लुटारूंच्या ज्या स्वाऱ्या हिंदुस्थानवर झाल्या त्यांच्याच मार्गात मशहद आहे. गतकालांत हिंदुस्थानांतील किती अलोट संपत्ति लुटली गेली आहे याचें स्पष्ट प्रदर्शन आजमितीसही मशहद येथीलं मशिदींत पहावयास मिळतें. तेथील मनोरे व घुमट एवढेच सुवर्णाने मढविलेले नसून आंतील भागही रत्नें, माणकें इत्यादि मौल्यवान् जवाहिरांनी सोन्याच्या कोंदणांत बसवून शोभिवंत केला आहे! आणि इराणांत बर्फ पुष्कळ पडतें किंवा बदाम, पिस्ते, द्राक्षें विपुल आहेत एवढ्यावरून तीं रत्नें तेथेच पैदा झाली असें नव्हे. खनिज संपत्ति आहे, ती सर्व पृथ्वीच्या पोटांत असल्याने इराणांतील सर्व जडजवाहिर हे जवळच्या हिंदुस्थानांतून चोरून लुटूनच आणलेलें आहे यात शंका नाही. लुटारू जातां येतां मशहदमधून जात. आणि आपण आणलेली संपत्ति पापक्षालनाच्या हेतूने मशिदींसाठी देत! मुख्य मशीद म्हणजे हजरत इमाम रेझा यांच्या कबरीभोवती बांधली आहे. इमाम रेझा हे पैगंबराचे आठवे शिष्य होत. आणखीही बऱ्याच मोठ्या मुसलमानांच्या कबरी येथे आहेत. इस्लामेतरांस आंत जाण्याची सक्त बंदी आहे आणि मुसलमानी धर्माचे फाजील वेड व तज्जन्य रक्ततृष्णा हीं इराणांत कोठे आढळत असतील तर तीं या मशिदींतच ! हिंदुस्थानांतून आणि इतर मुसलमानी प्रदेशांतून शिया पंथाचे हजारो यात्रेकरू येथे प्रत्यही येत असतात.
 मशहदचे राजकीय दृष्ट्या महत्त्व कांही कमी नाही. हिंदुस्थानचे रक्षक मशहद येथे आहेत असें सांगितले तर वाचकांना खरे वाटणार नाही; पण ही गोष्ट अगदी सत्य आहे. फार तर वायव्य सीमाप्रांत अथवा बलुचिस्तान येथेच हिंदुस्थानचे द्वारपाल असावेत अशी अपेक्षा चुकीची होणार नाही; पण सुवर्णभूमींत प्रवेश करण्यापूर्वी पहिली देवडी लागते ती मशहद येथे. येथील संरक्षकांच्या संख्येवरून राज्यकर्त्यांना हिंदुस्थानसाठी किती दक्षता बाळगावी लागते, काय परिश्रम सोसावे लागतात याची कल्पना येईल.
 रशियाचेही वर्चस्व मशहदमध्ये कमी नाही. अफगाणिस्तानांतील हिरात या शहरी जाण्याचा रस्ता येथूनच असल्याने त्या देशचा मोठा राजकारणी वकील मशहद येथे सदैव असतो. प्रस्तुत प्रतिनिधी मशहदमध्ये असतांना अमानुल्लाची भगिनी व राणी सूरय्याची माता या हिरातहून मशहदला आल्या होत्या.
 नादिरशहा पूर्वी आपणांस नादीर--कुली म्हणजे दास नादीर ( गुलाम-बंदा ) असें म्हणवीत असें आणि लुटालूट करून आपलें वर्चस्व स्थापण्यापलिकडे त्याला विशेष महत्व आमच्यादृष्टीने नाही. एका बाल राजवंशीयास हातीं धरून त्याला निमित्तमात्र करून नादिरने तेहरानचे तख्त आपणांसाठी मिळविलें ही गोष्ट प्रशंसनीय खरी, पण त्याने अवलंबिलेल्या मार्गामुळे त्याची थोरवी कमी ठरते. इराणी राष्ट्रीय स्मृतीच्या लेखकांनी नादिरशहाला इतकें चढविलें आहे की, शाळेंत न जाणारा मुलगाही 'नादिरशहाने इराणांत हिंदुस्थानांतून पुष्कळ द्रव्य लुटून आणले,' असें मोठ्या अभिमानाने सांगतो ! 'नादिरशहाची हिंदुस्थानवर स्वारी' हे चित्र, शिवाजीमहाराजांचे अनुयायांसहितचे रविवर्म्याचे चित्र आपणांस जितकें परिचयाचे आहे, तितकेंच इराण्यांच्या नेत्रद्वयांच्या ते ओळखीचें होऊन बसलें आहे. हा परिणाम फारा दिवसांचा नसून केवळ दहा बारा वर्षांतलाच आहे, ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नव्हे का ?
 नादिरशहा सुनी पंथानुयायी असल्याने किंवा अन्य कारणाने त्याला फारसा मान नसे. पण जागृत झालेल्या इराणी जनतेस हें पहावेना. मशहदपासून कांही अंतरावर आडरानांत एका खेडेगांवीं नादिरशहा पैगंबरधामास गेला होता. त्याच्या थडग्याकडे तोंपर्यंत कोणाचें लक्षही नव्हते. आता मशहदमध्ये एक मोठें उपवन त्याच्या स्मारकाप्रीत्यर्थ बांधण्यात आलें असून मध्यभागी त्याची कबर आणण्यांत आली आहे. एक चांगले वाचनालय व एक सभागृह त्या स्मारकास जोडलें असून लोकदृष्टीपासून दूर पडलेला नादिरशहा आता राजमार्गावर येऊन मशहदमधील यात्रेकरूंच्या व प्रवाशांच्या प्रेक्षणीय भागांपैकी एका स्थळी येऊन शयन करीत आहे ! श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि नादिरशहा यांचे युद्ध होणार असें प्रसिद्ध झालें असूनही कांही अपरिहार्य कारणामुळे तें घडून आलें नाही. तेवढ्याने त्या मराठा वीराची योग्यता कमी ठरत नाही. उलट उत्तर हिंदुस्थानचे लक्ष दख्खनकडून येणा-या समरपटूकडे लागले यांतच त्यांची योग्यता दिसून येते.
  मशहद ते दुजदाब हा रस्ता इंग्रजांनी हिंदी मजुरांकरवी करविला तो का व केव्हा हें सांगण्याचें प्रस्तुत काळीं प्रयोजन नाही. इराणांतील बहुतेक मुख्य रस्ते हिंदी लोकांनीच केलेले आहेत आणि ते सर्व इराणी सरकारास दान दिल्याप्रमाणे फुकटांत मिळाले. मशहदपासून दुजदाब सुमारे ५५० मैल असून प्रथमचा रस्ता डोंगरांतून तर नंतरचा रखरखीत वाळवंटांतून गेला आहे. मैलच्या मैल गेले तरी पाण्याचा थेंब दृष्टीस पडत नाही. हा प्रवास त्रासदायक असला तरी अविस्मरणीय असाच झाला. बर्फाच्या अनुपमेय शोभेमुळे बगदाद–तेहरान रस्ता विसरणे शक्य नाही. तसेच मशहद-दुजदाब आक्रमण वाळवंटाच्या देखाव्या (?)मुळे स्मृतिफलकावरून जाणें अशक्य आहे! डोंगरांतील चढाव फारच कठीण आहेत आणि उतारही साहजिकच धोक्याचे असल्याने एकसारखें लक्ष ‘सबसे प्यारा जान' सुरक्षित कसा राहील इकडे लागते. मोटार अपघातांतून म्हणजे कोलांडून पडतांना दोनदा वाचली होती. प्रस्तुत लेखकाचा एक डोळाही कायमचा जाणार असा प्रसंग आला होता, पण सर्व थोडक्यांत बचावलें! अशा सत्त्वपरीक्षेंतून शीरसलामत बाहेर पडलों ही जगदीशाची कृपाच म्हणावयाची ! केसरीच्या वाचकांशी बोलतांना जगदीशाचे नांव घेत आहें. इराणांत असतांना कांहीही झाले की 'माशा अल्ला'(ईश्वरेच्छा) असें म्हणावें लागे किंवा 'इन्शा अल्ला' हा प्रयोग उपयोगांत आणावा लागे. "आपण तासाभराने दुजदाबला पोहोचूं" असे साधें वाक्य उच्चारतांनाही त्यांत 'इन्शा अल्ला' हें भूषण अडकविणें इष्ट व आवश्यक असे. 'परमेश्वराची कृपा असल्यास' असा त्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे.  धर्मवेड्या अडाणी आणि खेडवळ लोकांत मिसळण्यास उपवचनांचा उपयोग झाला; त्याजबरोबर 'सलामुन अलेकुम' आणि 'खुदाहाफिझ' यांचाही मुक्तकंठाने उपयोग केला. पहिलें वचन प्रथम भेटीचे वेळीं उच्चारावयाचें. त्याचा अर्थ सलाम असा आहे. दुसरें म्हणजे खुदा तुमचे कल्याण करो अशा अर्थाचें वचन निरोप घेतांना तोंडांतून काढावयाचे असते.
 पाश्चिमात्य सुधारणा स्त्रीवर्गांत चोहोकडे फैलावत आहेत. अगदी दूर अशा खेड्याच्या ठिकाणी स्त्रियांचे तलम मोजे किंवा उंच टाचांचे बूट आढळत नसले तरी मोठमोठ्या गावीं स्त्रियांची प्रगति सुधारणेकडे फार आहे हें खरें. पुरुषवर्ग त्या मानाने मागें आहे. साधी पेहेलवी टोपी देखील सर्वत्र संमत नसून कित्येक ठिकाणी तिजबद्दल तिरस्कार दिसून आला. मात्र सूत किंवा लोकर कातणें, रंगवून वस्त्रे विणणें हीं कामें ज्या त्या खेड्यासाठी तेथील लोकच करीत.
 दुजदाब हें नॉर्थ-वेस्टर्न रेल्वेचें स्टेशन आहे. क्वेटट्यापासून ४५६ मैलांवरील हें ठिकाण इराणी हद्दींत असलें तरी सर्वस्वी हिंदी जनतेने वसविलें आहे. गेल्या बारा पंधरा वर्षांतच तें उद्भवलें असल्याने अगदी नवें दिसतें. रूक्षपणांत या नवीन गावाची बरोबरी मारवाडांतील एखादें खेडें करूं शकेल. आजूबाजूस डोंगर असले तरी इतर शोभा कांहीच नाही. रेल्वेंतून इराणी व्यापारासाठी येणारा माल येथेच उतरत असल्याने इराणी सरकारचे मोठें उत्पन्न या गावीं होतें. पंजाबी व शीख व्यापारी येथे पुष्कळ आहेत. गेल्या महायुद्धांत हिंदी सैन्याचे तें एक मोठें ठाणें होतें. मी त्या गावीं असतांना टोळधाडीचा त्रास सुरू झाला होता. अगोदर गाव रूक्ष, त्यांत टोळधाड आलेली, तेव्हा जीं काय थोडीं हिरवीं पानें बागेंत असत तींही खाऊन फन्ना करून टाकणारे टोळ किती त्रासदायक वाटले असतील? किती त्रासदायक वाटले असतील ? आपणांस उद्यानाची आवश्यकता म्हणजे श्रीमंती चैन वाटते; पण मनुष्याचें मन कार्यमग्न करण्यासाठी नैसर्गिक हिरव्या रंगाचा उपयोग किती होतो हें समजण्यास अशा वाळवंटांतील वनस्पतिविहीन प्रदेशांत किंचित्काल वास्तव्य करावें. रोजचें जेवण जात नाही, कांही विचार सुचत नाही किंवा अमुक काम करावें अशी इच्छाही होत नाही ! हा प्रभाव केवळ रूक्षतेचा !
 दुजदाबहून आठवड्यांतून दोनदा क्वेट्टयास गाड्या जातात. प्रचलित समय हा मक्केच्या यात्रेचा हंगाम असल्याने अलोट गर्दी जमली होती. आणि त्या गाडीस - 'यात्रेकरूंची खास गाडी' असेंच म्हणत. कारण सबंध गाडींत तीन उतारू प्रवासी होते. बाकीचे एकजात इराणी मक्केला निघालेले असून आपण गाडी विकत घेतल्याप्रमाणे इतर कोणासही आपल्या डब्यांत शिरूं देत नसत. अल्लाचा गजर, निमाज पढण्याची आतुरता, गाडी चालू झाली तरी पैगंबराची लागलेली एकतानता न सोडण्याची वेडी बेपर्वाई, चालत्या गाडीत चढण्याची धडपड हीं सर्व प्रत्येक स्टेशनवर पहावयास मिळत! आगगाडी कधी बापजन्मींही पाहिली नसल्याने आणि धर्मावर अलोट श्रद्धा असल्याने आपण निमाज पढत आहोंत हें पाहून गाडी पुढे जाणार नाही अशी त्यांची दृढ समजूत असे. निदान ठराविक वेळीं तरी प्रार्थनेसाठी गाडी थांबेल असा त्यांचा विश्वास असे. परंतु काफरांनी बनवलेली आगगाडी पैगंबराविषयी बेफिकीर असल्यास नवल कोणते?
 अशा हाज यात्रेकरूंच्या समवेत एक हिंदी इसम प्रवास करतो याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना राहून राहून आश्चर्य वाटे! कारण तिकिट तपासण्यास किंवा अन्य कार्यासाठी ते डब्यांत शिरण्याचा प्रयत्न करू लागले की, सर्व उतारू एकत्र होऊन त्यांना खाली ढकलून देत ! बलुची शिपाई कडव्या जातीचे; पण त्यांनाही या इराणी जनावरां'पुढे हात टेकावे लागले ! कांही बलुच्यांवर अगदी कठीण प्रसंग आला असतां त्यांची सोडवणूक करण्याची पाळी प्रस्तुत लेखकावर आली. तेव्हा ही माणसें नव्हत, ती शुद्ध जनावरें होत असे उद्गार त्या बलुच्यांनी काढले. एका स्टेशनमा स्तरवरही तशी विचित्र वेळ आली असतां, तो थोडक्यांत बचावला ! इराणी अज्ञानी व दुराग्रही असले तरी त्यांनी अगदी योग्य आचरण रेल्वेवर केले. रेल्वेची व त्यांची दृष्टादृष्ट प्रथमच झालेली; पण तितक्या अल्पावधीत त्यांनी डब्यांत असलेल्या पाट्या वाचन ठराविक माणसांपेक्षा एकही अधिक उतारूस आंत घेतले नाही. स्टेशनमास्तरवर आलेला प्रसंग म्हणून म्हटलें तो याच वेळचा. अधिक उतारू डब्यांत कोंबण्याच्या प्रयत्नास यात्रेकरूंनी विरोध केला. स्टेशनाधिकारी आपण बचावलों याच आनंदांत गर्क झाला. या साडेचारशे मैलांत एकही उतारू त्या गाडीत चढला नाही हे आश्चर्य नव्हे का? आमचे यात्रेकरू मात्र ठराविक संख्येपेक्षा दुप्पट उतारू डब्यांत असले तरी चकार शब्दही काढीत नाहीत किंवा काहीच व्यवस्था करण्याचे मनांत आणीत नाहीत. इराणी अडाणी यात्रेकरूंपासून आमच्यापैकी सुशिक्षित प्रवासी कांही धडा घेतील तर रेल्वेला व्यवस्था करणे क्रमप्राप्त होईल.
 दुजदाब ते केट्टा हा तीस तासांचा प्रवास पुनः अगदी रूक्ष वाळवंटांतून झाला! वेड्याजवळ ऐशी मैल येतांच घाट लागला आणि हिरवीगार झाडे दिसू लागली. खुद्द केट्टा शहर तर उद्यानमय आहे. त्यामुळे मनाला इतकी प्रसन्नता आली की, हे शहर सोडून जाऊ नये असें वाटू लागलें.   इराणांत गेल्यापासून मला बऱ्याच अधिकाऱ्यांना व प्रमुख नागरिकांना भेटण्याचा प्रसंग आला. पण एकाही वेळीं चुकून देखील 'हिंदु का मुसलमान?' अशा प्रकारचा धर्मासंबंधी प्रश्न निघाला नव्हता. इराणी सफर संपवितांना मात्र एक गंमतीचा अनुभव आला. इंग्रज सरकारच्या बड्या वकिलास भेटावयास गेलो असता त्यांनी पहिला प्रश्न - 'तुम्ही कोण?' असा केला. नामपत्रिका पुढे पाठविली असतां आणि परिचयपत्रांत सर्व खुलासा असूनही असा प्रश्न का उद्भवला हे मला कळेना. तेव्हा स्वतःसंबंधी थोडीशी माहिती मी त्यांना सांगितली. तेवढ्याने साहेबांचे समाधान झालें नाही. म्हणून त्यांनी स्पष्टपणें खिश्चन, मुसलमान का हिंदु तें जाणण्याची इच्छा दर्शवली. त्याच्याही पुढे जाऊन हिंदूंपैकी कोणती जात हेंही त्यांना विचारावेसे वाटलें. हिंदु, त्यांतून केसरीचा हिंदु प्रतिनिधी, मुसलमानी देशांत निःशंकपणे वावरतो कसा याचें त्यांना कोडें पडलें. हिंदी परिस्थितीची ओळख पूर्णपणें असल्याने त्यांचे कुतूहल मुळीच थांबलें नाही. हिंदुस्थानांतील ‘ब्राह्मण' इतका खुलासाही त्यांना पुरेसा वाटेना. "कोणत्या भागांतील??" हा त्यांचा सवाल तत्काळ पुढें आलाच. "मुंबईकडील" हे उत्तर त्यांना समाधाकारक न वाटल्याने "कोणता जिल्हा?" म्हणून त्यांनी विचारलें. "पुणे" असे माझें उत्तर ऐकतांच इंग्रज वकील हंसत हंसत एक हात विजारीच्या गोमुखींत घालून तोंडांतील 'पाइप' सावरीत म्हणाले, "अस्सं. एकंदरीत तुम्ही पुण्याचे ब्राह्मण आहां म्हणावयाचें. ठीक, ठीक." त्यांच्या हास्यांत काय अर्थ होता हें त्यांच्या नेत्रद्वयांत स्पष्ट दिसे. वाचकांना त्याची जाणीव पाहिजे असल्यास हिंदुस्थान सरकारच्या गुप्त खात्यांत 'पुण्यांतील ब्राह्मणां'ना काय महत्त्व आहे तें पहावें. थोडीशी चुणूक रौलेट साहेबांच्या अध्यक्षतेखालीं प्रसिद्ध झालेल्या 'सेडीशन कमिटी'च्या वृत्तांताच्या प्रथम भागांत आढळेल.
 दुजदाब येथील ख्रिस्ती मिशनऱ्याकडे उपाहारास गेलों असतां प्रवासासंबंधी बऱ्याच गोष्टी निघाल्या. निरोप घेतांना मिशनरीसाहेबांनी काढलेले उद्गार पहाः-
 तुम्ही उच्चवर्णीय हिंदु - धर्मगुरु- असाल असें मला मुळीच वाटलें नाही. कारण, तुम्ही आमचे बरोबर पेयपान व उपाहार केला होता. आता तुम्हांला कोणत्याही हिंदु देवालयांत जातां येणार नाही किंवा तुमच्या घरच्या मंडळींत मिसळतां येणार नाही याबद्दल मला फार वाईट वाटतें! तुम्हाला वाळीत टाकतील ना ?
 हें ऐकून प्रथमतः मला हसूच आले. 'चहाच्या कपा' विषयी वादळ माजण्याचे दिवस पार निघून गेले असतां एका इंग्रज समाजसेवकाने अशी शंका प्रदर्शित करावी हे पाहून गंमतच वाटली. त्या शंकेचे निराकरण करतांच साहेबबहाद्दरांची हिंदुधर्माबद्दलची जिज्ञासा वाढली आणि झपाट्याने सुधारत असलेल्या हिंदुधर्माची माहिती त्यांनी कुतुहलपूर्वक विचारली.

–केसरी, तारीख ११ व १८ जून, १९२९.


(१९)

 बलुचिस्तानचे ब्रिटिश बलुचिस्तान व स्वतंत्र बलुचिस्तान असे दोन भाग असून ब्रिटिशांची राजधानी क्वेट्टा येथे आहे व 'कलात' ही स्वतंत्र बलुच्यांची राजनगरी आहे. मात्र बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा अर्थ अगदी निराळा आहे, हें सांगितले पाहिजे. कलाताधिपतीला 'खान' म्हणतात. प्रस्तुतचे खान 'धृतराष्ट्र' पदवीला पोहोचले असल्याने त्यांचा सर्व कारभार वजीर पहातो आणि वजीर हे माजी ब्रिटिश नोकरींतले असल्याने त्यांच्या कर्तबगारीचें वेगळे वर्णन नकोच. बलुचिस्तानचे धृतराष्ट्र स्वतंत्र असल्याचें इंग्रज अधिकाऱ्यांनी इ. स. १८७६ च्या तहाने मान्य केलें. आणि आम्ही ब्रिटिश सरकारच्या सहकार्याने राज्यव्यवस्था पाहूं, आणि इंग्रजांच्या तंत्राने चालू असें खानसाहेबांनी कबूल केले. ब्रिटिशांच्या वतीने गव्हर्नर-जनरलचे क्वेट्टा येथील एजंट यांनी कलातच्या खानांच्या ‘राजकीय' कारभारावर देखरेख करावी असें ठरलें आहे. मग स्वातंत्र्य उरलें कोठे ? पण पुस्तकांत आणि कागदोपत्रीं कलाताधिपति स्वतंत्र मानले जातात.
  दुसऱ्या अफगाण युद्धाने पिशिन, शोरारूद, दुकी, सिबा आणि शारीग हे जिल्हे इंग्रज निशाणाखाली आले. नंतर सुमारे तीन वर्षांनी म्हणजे इ. स. १८८४ मध्ये 'खानांनी सालिना पंचावन्न हजार रुपये घेण्याचें मान्य करून क्वेट्टा व बोलन हे दोन जिल्हे इंग्रजांना दिले. बोरी व्हॅली हा लष्करी ठाण्यासाठी एक भाग इ. स. १८८६ मध्यें आपण होऊनच ब्रिटिशांनी घेतला. आणखी एका वर्षाने खेतरान प्रांत हवासा वाटल्याने तोही लाल रंगाने रंगून गेला! झोबकाकर व खुरासान हे जिल्हे इंग्रजी अमलाखाली येणे आवश्यक झाले. इ. स. १८९९ मध्ये खानसाहेब ‘नुष्कीचा भाग घ्या' म्हणून सरकारच्या मागे लागले, तेव्हा त्यांना सालिना नऊ हजार रुपये देण्याचे मान्य करून तोही भाग आपल्या सत्तेखाली ब्रिटिश सरकारने घातला. नसिराबादचा जिल्हा इ. स. १९०३ मध्ये 'भाड्याने' घेतला. त्याला दरसाल रु. १,१७,५०० द्यावे लागतात. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे हें सर्व भाडें दरसाल आजन्म चालू रहावयाचें आहे.आणि आणि ते भाडेंच म्हणावयाचे. खानाला ती खंडणी देतात अशांतला भाग नव्हे. मात्र खानाच्या मनांत भाडोत्री जागा परत मागण्याचें आलें तर ती त्याला पहावयास तरी मिळेल की नाही कोण जाणें.
  ब्रिटिश बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा ही आहे. क्वेट्टा हें नांव उच्चारण्यास कठीण व कठोर आहे. बलुचिस्तानचा भाग हिंदुस्थानपासून दूर व तुटलेला आणि तिकडे जातांना सिंधच्या रूक्ष अशा वाळवंटांतन जावें लागतें. या सर्व कारणांमुळे क्वेट्टा कसलें तरी भिकारडें गाव असावें अशी कल्पना होते. पण ती अत्यंत चुकीची आहे, हे एका दिवसाच्या अनुभवानेही कळणारें आहे. उद्यानमय शहर, समुद्रसपाटीपासून ५८५८ फूट उंची, आजूबाजूंस वृक्षहीन टेकड्या आणि सदैव उत्तम हवा यांनी तर क्वेट्टा मनोहर ठरतेंच. पण फुलाफळांची रेलचेल पाहूनही क्वेट्ट्यासारखें दुसरें शहर नसेल असें वाटतें. उन्हाळ्याच्या प्रारंभी तेथे गुलाबांची इतकी पैदास होते की, जिकडे तिकडे पहावें तों गुलाबांशिवाय दुसरे फूल दिसत नाही. खासगी बंगल्यांना किंवा घरांना आवार म्हणून गुलाबांची झाडें लावतात, आपल्याकडे श्रावणाच्या आरंभीं लाह्या भाजून देण्यासाठी भडभुंज्यांच्या भट्टया जशा लागतात तशा गुलाबपाण्याच्या भट्टया क्वेट्टयास लागतात आणि उच्च दर्जाचें सुवासिक गुलाबपाणी, गुलाबी अत्तर आणि गुलकंद इत्यादि बादशाही पदार्थ तेथे तयार होतात. कंदाहारकडून गुलाबफुलांच्या 'वाघिणी' भरून येतात; तेव्हा तर शहरांत दुसरा वासच येत नाही. अफगाणिस्तानांतील गुलाब विशेष सुवासिक असतो.   क्वेट्टा येथे बदाम, अक्रोड, तुती यांचींही झाडें असून इतर सर्व प्रकारचीं फळें त्या त्या मोसमांत पुष्कळ मिळतात. थंडीत क्वेट्टयास सुमारे चार महिने बर्फ असते. आणि तज्जन्य होणारा त्रास मनांत ठेवला नाही तर दिसणारी शोभा अवर्णनीय असते.
 क्वेट्टा हे नांव इंग्रजी भाषापटूंनी अपभ्रष्ट केलें आहे. मूळचें नांव 'शाल' असें होतें. म्हणजे अंगावर घेण्याची शाल जशी सुंदर दिसते तसेंच हें नगर हिरव्या वृक्षराजीने विभूषित झालें म्हणजे रम्य दिसे. पूर्वी अफगाणिस्तानचा ताबा क्वेट्टयावर होता आणि अठराव्या शतकाच्या अखेरीस अफगाण अमिराची व बलुचिस्तानच्या खानाची सोयरिक झाली, त्या वेळी क्वेट्टा आंदण म्हणून कलाताधिपास मिळालें. 'क्वाता' म्हणजे किल्ला असा अर्थ तद्देशीय भाषेत आहे. 'शाल कोट' म्हणजे शाल किल्ला असें चांगलें नांव असतां शाल कोणी तरी हिरावून घेतली आणि लोक नुसते 'क्वाता' 'क्वाता' करू लागले. त्याचा इंग्रजी सोजिरांनी क्वेट्टा असा विपर्यास केला! हिंदींत आज 'कोइटा' असेंच लिहितात.
  क्वेट्टा येथे हुमायून दिल्लीहून पळून निघाला तेव्हा आला होता. अकबर बादशहा येथे असतांना एक दीड वर्षाचा होता. त्याला आपल्या नातलगाकडे ठेवून पळपुटे मोंगल बादशहा पुढे गेले !
 सर्व बलुचिस्तानची व्यवस्था ब्रिटिशच पहातात असें म्हणतां येतें. हिंदुस्थानचें प्रवेशद्वार म्हणून या प्रांताचें विशेष महत्त्व ओळखून इंग्रज मुत्सद्दयांनी तो पटकावला आहे. याच्याही पुढे जाऊन कंदाहार इंग्रजी अमलाखाली असणें हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक आहे असें प्रतिपादण्यापर्यंत कांही व्हाइसरॉयांची मजल गेली होती! आणि स्टेटसेक्रेटरींनी नको म्हणून आज्ञा दिल्यामुळे व पुनः पुनः बजावल्यामुळे कंदाहार ताब्यांत आलेलें अफगाण अमिरास परत द्यावें लागलें!  अशा डोंगराळ व रानटी लोकांनी भरलेल्या प्रांताचा राज्यकारभार करणें म्हणजे सर्वांवर राज्य चालविण्यापैकीच आहे. कोण, कोठून आणि कसा सुटून जाईल हे कळावयाचे नाही, दंश होईल तोही प्राणांतकच. तेव्हा ही बिकट परििस्थति ओळखण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी दर विचारान्तीं योजलेले उपाय अभ्यासी दृष्टीने पहाणे अयोग्य होणार नाही.  एकंदर बलुचिस्तानचें उत्पन्न सालिना सुमारें वीस लाख असून खर्च पाऊण कोटी रुपयांवर आहे. हा जास्त होणारा खर्च मध्यवर्ति सरकारच्या थैलींतून येतो. जमिनीचा सारा रुपयांत घेण्याची पद्धति हिंदुस्थानांत सर्वत्र असली तरी, बलुची शेतकरी आपापल्या शेतांतील धान्य सरकारचा भाग म्हणून सरकारी कोठारांत नेऊन भरतात! जरुरीप्रमाणें त्याची विल्हेवाट लावण्याचें काम सरकारचें असतें. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे क्वेट्टयाची एकटी म्युनिसिपालिटी. बाकी सर्व ठिकाणी सरकारचा प्रत्यक्ष अंमल चालतो. 'लेव्ही' पद्धतीने सरकारने आपला कार्यभाग मोठ्या काव्याने व धूर्ततेने पार पाडला आहे. प्रत्येक ठिकाणीं कांही लेव्ही ठरलेले असतात. त्यांना मासिक वेतन सरकारकडून मिळालें तरी ते सरकारचें काम करण्यास चोवीस तास बांधलेले नसतात. अमुक भागांतून कोणी अधिकारी जावयाचा असेल तर, त्या त्या लेव्हींना सूचना द्यावयाच्या. बाकीची सर्व व्यवस्था त्या लेव्हींकडे. टपाल पोहोचविणें, फरारी आरोपींचा शोध लावणें इत्यादि सर्व कामें लेव्हींकडे वाटून दिलेली असून प्रत्येकाचे कार्यक्षेत्र ठरविले आहे. जिल्ह्यांत चोरी झाली किंवा दरवडा पडला तर त्याबद्दल सर्वस्वी जबाबदार तेथील लेव्ही. मग त्यांनी त्या गुन्हेगारांना पकडून तरी आणावे, नाहीं तर सरकार ठरवील तो दंड तरी द्यावा. अशानें लेव्ही संपूर्ण स्वायत्त आहेत असें का म्हणूं नये?  ब्रिटिशांच्या अमलांत 'बाटलाबाई'चें साम्राज्य फार माजतें ही गोष्ट आता नव्याने कोणास सांगावयास नको. इराक व पॅलेस्टाइन या मँडेट्समध्येही दारूचा सुकाळ करून ठेविला म्हणून कित्येक जबाबदार मुत्सद्दी इंग्लंडला बरेच दोष देत आहेत. जनतेंत मद्याचा फैलाव करून त्यांची शक्ति कमी करण्याचा आणि त्यांचा विरोध मुळांतच नाहीसा करण्याचा हा हेतु आहे असेंही म्हणण्यास कांही अधिकारी गृहस्थ कमी करीत नाहीत. ब्रिटिश अमलाखालच्या बलुचिस्तानांतही तशाच प्रकारचा आरोप करतां येण्यासारखा आहे. बलुची प्रजा ही अत्यंत कडवी, राकट आणि क्रूर पडली. ती बाटलाबाईच्या आधीन बनून नि:सत्त्व होत आहे. त्यांत अफूचा खप एकदम जवळजवळ दुप्पट वाढला आहे. इ.स. १९२६-२७ सालांत केवळ ३२७ शेर अफू खपली असतां पुढील वर्षी हा खप ६२३ शेरांवर गेला. अर्थात् हा वाढता आकडा सरकारच्या लक्षांत आला नाही असें नव्हे. पूर्वी अफूचा भाव सव्वादोन ते अडीच रुपये शेर असा होता तो कायद्याने सव्वा रुपया रहावा अशी व्यवस्था केल्याने खप वाढला हे खरे; परंतु कायद्याने अफूचा भाव उतरविण्यास तरी काय कारण? हा प्रश्न शिल्लक रहातोच. त्याचें उत्तर सरकारने असें दिलें आहे की, अफगाणिस्तानांतून गैरकायदा अफू येते तिला आळा बसावा म्हणून कायद्याने किंमत ठरविणें भाग पडलें! एका वर्षांत सुमारे साडेतेरा शेर अफू गैरकायदा आयात होते. ही आपत्ति टाळण्यासाठी किंमत उतरविल्याने तीनशे शेर अफू जास्त खपूं लागली! राष्ट्रसंघाच्या बैठकींत अफूचें समूळ उच्चाटन करण्याच्या ठरावास दुजोरा द्यावयाचा आणि इकडे अशा प्रकारची कृति करावयाची, या नीतीस काय म्हणावें? सर्वात आश्चर्य वाटत असेल तें खालील बढाईचें:-
  बलुचिस्तानच्या ताज्या वार्षिक अहवालांत पृ. २७ वर सरकार म्हणतें-"आमच्या लेव्हींमार्फत व इतर अधिकाऱ्यांकरवी, अफू मुलांना दिल्याने काय दुष्परिणाम होतात याची जाणीव प्रजेला करून देण्यांत आली आहे. अशा तऱ्हेची घातुक चाल प्रचालित असावी असें समजण्यास कांही पुरावा नाही. आणि अशा प्रकारचें एकही उदाहरण आमच्या नजरेस आले नाही." मग अफूचा खप वाढला कशासाठी? व तो इष्ट आहे का? यांची चर्चा नको का करावयास?
 एकंदर खर्च कोणत्या सदराखाली काय प्रमाणांत होतो हें पहाण्यासारखें आहे. पाऊण कोटीपासून ते सुमारें एक कोटी रुपयांची विल्हेवाट अशी लागतेः-

  राजकीय खर्च शेकडा १६.४
  सरहद्दसंरक्षण " २९.९
  पोलिस " १२.३
  सरहद्दसंरक्षणाची कामें, इमारती वगैरे   " १५.४

७४.०

 म्हणजे रुपयांतील सुमारे बारा आणे अशा राजकीय खर्चांतच गेले. उरलेल्या चार आण्यांत शिक्षण, आरोग्य, जमीनमहसूल, कारभाराची व्यवस्था, किरकोळ, इतकीं खातीं पोट भरतात.
 या रीतीने खर्च चालतो आणि राष्ट्रसंवर्धनी खात्यांची गळचेपी कशी होते हें दर्शविण्यास वरील प्रमाण पुरेसें आहे.
 'बोलन घाट' हा अफगाणिस्तानांतून येण्याचा मार्ग याच भागांत असल्याने लष्करी दृष्ट्या किती महत्त्वाची नाकेबंदी तेथे आहे, हें पहाण्यास क्वेट्टयाला रेल्वेंतून गेलें म्हणजे पुरे. प्रत्येक टेकडीवरील उच्च ठिकाणीं टेहळणीचें नाकें, पूल असल्यास तो बंद करण्यासाठी लोखंडी दरवाजे व त्यांचें संरक्षण करण्यासाठी कांही लष्करी माणसे, तारांचें जाळे, गुप्त पोलिसांचा सुळसुळाट इत्यादि गोष्टींवरूनच आपण एका लष्करी छावणीत शिरलो आहों ही स्पष्ट जाणीव होते. क्वेट्टयास 'नुसतें जाऊन येऊं' म्हणून कोणी गेल्यास त्याला वाटेंतूनच परत फिरण्याची पाळी यावयाची. कारण कोण, कोठला, कशासाठी आला, राजकीय चळवळ्या आहे की कसे, या चौकशींच्या माऱ्यांतून सुटका झाल्यावर प्रवास पुरा होऊ शकतो. गाडीतच गुप्त पोलिस तपास लावतात. आणि 'नको' असतील त्यांस परस्पर परत पाठवितात. दुजदाब ते क्वेट्टा सी.आय.डी.च्या तीन अधिकाऱ्यांनी तीन वेळां पासपोर्ट तपासल्यानंतर खुद्द क्वेट्टयासही सी.आय.डी. इन्स्पेक्टर नांव टिपून घेण्यास आलाच!
 कलात हे जसे एक ब्रिटिशांच्या हातांतील स्वतंत्र बाहुलें आहे, तसेंच पण बोलून चालून संरक्षणाखाली आलेलें दुसरें एक संस्थान आहे. त्याचें नांव लासबेला आणि तेथील अधिपांस जामसाहेब म्हणतात.
 ह्या दोन्ही राजघराण्यांपूर्वी बलुचिस्तानांत हिंदु राजे राज्य करीत. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी कलातचें राज्य हिंदूंकडे होतें! नादिरशहाने हिंदुस्थानवर स्वारी केली त्याच सुमारास हिंदु राजास पदच्युत करून एका पठाणी धनगराने राज्य बळकावलें तें त्याच्याच वंशांत चालत आहे. बलुचिस्तानांतील मुख्य भाषा 'ब्रहुई' ही दक्षिणेकडील तामीलशीं फार जमते. आणि ती द्रावीड भाषांपैकी आहे असेंच तज्ज्ञ म्हणत आहेत. सिंधी, पंजाबी, फार्सी व पुश्तु भाषा 'हिंदी-इराणी' (इंडो-इराणियन) वर्गातल्या असतां मध्यंतरीच हें द्रावीड भाषेचें बेट कसें आलें याची कारणमीमांसा समाधानकारक रीत्या कोणासच देतां येत नाही. बलुचिस्तानचे पूर्वीचें नांव ‘बोलेदिस्तान' असे असावे. बोलेदी जात तेथे अजून आहे. आपल्या इच्छेविरुद्ध विश्वामित्र आपणांस मारहाण करून वसिष्ठाश्रमांतून घेऊन जातो ह्या उन्मतपणामुळे संतप्त झालेल्या 'सुरधेनु नंदिनी'ने "पुच्छापासुनि केले प्रकट तिनें म्लेंच्छ यवन शबर शक।" असे वर्णन आहे. त्यांतील 'शक' लोक हे बलुचिस्तानांतीलच असे तज्ज्ञांचे मत आहे. 'बेलू' म्हणून एक जुने अधिकारी अभ्यासी आहेत. ते म्हणतात की, 'नाग' आणि 'गरुड' अशा दोन प्रकारचे लोक हिंदु पुराणांत वर्णिलेले आहेत. त्यांपैकी 'गरुड' प्रचलित कालीं बलुचिस्तानांत बदललेल्या स्वरूपांत-म्हणजे धर्म, जात, धंदा बदलून गेल्यामुळे अगदीच निराळ्या स्वरूपांत-अवशिष्ट आहेत.
 खनिज संपत्ति या प्रांतांत विपुल आहे; पण रेल्वेच्या साधनाभावी तिची भूगर्भातून सुटका होणें कठीण झालें आहे. तरी कोळसा, क्रोमाइट हीं द्रव्यें सध्या बाहेर पडत आहेत,
 क्वेट्टा ते चमन हा नव्वद मैल लांबीचा रेल्वेचा फाटा अफगाण सरहद्दीवर जाऊन पोहोचतो आणि सुमारें दोन मैल लांबीचा एक बोगदा याच रस्त्यावर आहे. सर्व हिंदुस्थानांत सर्वात लांब असा हाच बोगदा असल्याचें अधिकारी सांगतात. मुंबईहून बोटीने कराची व नंतर क्वेट्टयाला जाणारी गाडी किंवा बी.बी.सी.आय. मार्गाने मारवाड जंक्शनवरून सिंध-हैद्राबादमार्गाने क्वेट्टा असे दोन रस्ते बलुचिस्तानच्या राजधानीस जाण्याचे आहेत.

-केसरी, ता. ९ जुलै, १९२९.
 

परिशिष्ट पहिलें : मयूरासन

 इराणी शहाचा जामदारखाना जगांत बऱ्याच श्रेष्ठ दर्जाचा ठरतो यांत शंका नाही. त्या संपत्तिभांडारांत जशी अमोल रत्नें आहेत, तशीं तर अन्यत्र कोठेच नाहीत असें म्हणतात. ही सर्व संपत्ति इराणने बहुतांशी लूट करून मिळविली हें विशेष. किंबहुना हल्ली इराणी राजनगरीत असलेले पुष्कळसे वैभवशाली जवाहिर आमच्या ‘सुवर्णभूमी'तूनच लुटून नेलेलें आहे! नादिरशहा हा इराणचा सर्वांत मोठा लुटारू. त्याने अठराव्या शतकांत हिंदुस्थानवर स्वारी करून किती अपार संपत्ति लांबविली हे इतिहासज्ञांस विदितच आहे.
 हा तेहरानमधील इराणी शहाचा जामदारखाना व तेथील पदार्थसंग्रहालय पहाण्यास सहसा कोणास परवानगी नसते. याचें कारण बहुधा असें असावें की, 'आमच्या वैभवाचे हे प्रदर्शन' दाखवीत असतां आमची लूट करण्याची सवयच प्रेक्षकांच्या मनावर अधिक ठसावयाची! पण दरबारांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राजवाडा व त्यांतील अमूल्य वस्तु पहाण्याची अनुज्ञा मिळविल्यावर कोणासही क्षणभर कृतार्थ झाल्यासारखें वाटल्यास त्यांत काय नवल?
 गुलिस्तान राजवाडा तेहरान नगराच्या मध्यावर आहे. तेथे पूर्वी 'शहान्शहा' रहात असत. अर्थात् त्यांचा दरबार तेथेच भरे. दरवर्षी 'सलाम' तेथेच होई; आणि त्यांची राजकारणी खलबतेंही तेथेच चालत. वाड्यांतील अनेक दिवाणखाने व महाल, मोठें आंगण व प्रशस्त बगीचा यांना साहजिकच विस्तीर्ण आवार लागणार आणि 'गुलिस्तान'चा विस्तार तसा प्रचंडच आहे. इराणी लोक जात्याच बागबगीच्याचे षोकी, त्यांतून ही शहानशहाची बाग पडली, मग तेथील व्यवस्थेला काय पहावयाचें आहे! ठिकठिकाणचे स्वच्छोदकाचे हौद, पाट, कारंजी आणि मनोहर व चित्रविचित्र पुष्पलता इत्यादि पहातांच आपण दुःखमय संसारांतून निघून नंदनवनांत विहार करीत आहोत की काय, अशी क्षणभर भावना झाल्याशिवाय रहात नाही!
 खुद्द राजवाड्यांत हल्ली शहाचें वास्तव्य नाही. मोठमोठ्या दरबारासाठी किंवा इतर समारंभांचे वेळीं तेवढा शहा तेथे येतो. त्यामुळे सर्वत्र कड्याकुलुपे मोहोरबंद केलेलीं दिसतात. बाहेरून इमारत पहाणारास हा राजवाडा असेल असें क्वचितच वाटेल. कारण त्याचें बाह्यांग अगदी साधारणपैकीच आहे. परंतु आंत प्रवेश केला की, राजगृहाची जाणीव क्षणोक्षणी होऊं लागते.
 इराणी दृष्टीने इमारती व दिवाणखाने सजविण्यांत गालिचे व आरसे यांचा फार उपयोग आहे. केवळ भूमिभागावर आंथरण्यासाठीच गालिचे वापरले जातात असें नव्हे, तर भिंती सुशोभित करण्याकरितांहीं गालिचे उपयोगांत आणतात. म्हणून गालिचे दोन प्रकारचे तयार करतात. एक प्रकार भिंतींवर टांगण्याचा व दुसरा जमिनीवर पसरण्याचा. यांपैकी दुसरा जास्त मजबूत असतो तर, पहिल्यांत कामगिरी व मोहकपणा हीं अधिक आढळतात.
 राजवाड्याच्या मुख्य भागांत प्रवेश केल्याबरोबर आपण सहजच चकित व सस्मित होतों! कारण समोरच आपले प्रतिबिंब दिसून कोठल्याही बाजूस पाहिलें तरी आपल्या पूर्ण परिचयाची मूर्ति आपणांकडेच स्मितयुक्त मुद्रेने पहात असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते! पुढे जिना चढूं लागतांच चढणारे नुसतेच दोन पाय दिसतात! जरा वर पाहिले तर केवळ शिरोभागच नजरेस पडतो! या सर्व विचित्र देखाव्यामुळे आपण क्षणभर भांबावून जातों यांत नवल नाही. परंतु लवकरच आपणांस 'हा सर्व आभास आहे व जिकडे तिकडे आरसे लावल्यामुळे ही चमत्कारसष्टि निर्माण झाली' हें ज्ञान होऊन, थोडा वेळ का होईना, पण आपली दिशाभूल झाली म्हणून हसू आल्याशिवाय रहात नाही. वस्तुस्थिति अशी आहे की, जिन्याच्या दोन पायऱ्यांतील भागाला आरसे लावले असून सभोवतालच्या सर्व भिंतीही आरशांनीं अगदी मढवून टाकल्या आहेत! तेव्हा ह्या आयनेमहालांत येणारा मनुष्य 'प्रज्ञाचक्षु' असेंल तरच त्याला आपल्या दृक्पथांत कांही विशेष आलें असें वाटणार नाही. किंबहुना कितीही विचारमग्न मनुष्य असला तरी, त्याचे मनोव्यापार घटकाभर स्तिमित करण्यास जिकडे तिकडे दिसणारी हीं आपलीं प्रतिबिंबें पुरेशीं होतात. राजवाडा सध्या 'निर्जन' झाला असून तो पहावयासाठी येणाऱ्या एकट्यादुकट्यांस 'एकांत'वासामुळे कंटाळा येऊ नये म्हणून ही ‘एकोऽहं बहु स्याम्'ची तरतूद केली आहे की काय, असें वाटतें. आरसा ही चीज सर्वांच्या नित्य परिचयाचीच आहे. पण त्याच्या सहाय्याने अशी करमणूक करून घेतां येईल, ही कल्पना फारच थोड्यांच्या डोक्यात येईल! अर्थात् राजवाड्याचा मुख्य कारागीर मोठा चतुर योजक असला पाहिजे यांत शंका नाही.
  येणेप्रमाणे आपल्या अनेक प्रतिबिंबांशी स्मितपूर्ण मुद्रेने मूक संभाषण करीत वर आल्यानंतर आपल्या उजवीकडे पदार्थसंग्रहालयाचा विस्तृत दिवाणखाना लागतो व डावीकडे परराष्ट्रीय वकील बसण्याचें दालन दिसतें. दरबारप्रसंगीं अथवा कांही समारंभांसाठी जेव्हा तेहरानमधील सर्व राष्ट्रांचे मुखत्यार गुलिस्तानमध्ये उपस्थित होतात, तेव्हा आपापला वैरभाव विसरून सर्कशींतील सहभोजन प्रसंगी सिंहापासून शेळी-कुत्र्यापर्यंत यच्चयावत् चतुष्पाद जसे एकत्र जमतात, तसे त्यांनाही एकाच महालांत बसावें लागतें. रशियन वकिलाकडे पाठ करून ब्रिटिश प्रतिनिधि बसतो अशी जर कोणाची समजूत असेल, तर ती चुकीची ठरेल. कारण दरबारचे रीतिरिवाज नक्की ठरलेले असून त्यांत 'घरगुती' भांडणाकडे मुळीच लक्ष दिले जात नाही. खरोखर, गेल्या महायुद्धांत एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी टपलेल्या व हल्लीही वरपांगी दोस्तीच्या गोष्टी बोलणाऱ्या, पण आंतून द्वेषाग्नि भडकत असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधि एकाच दावणीनें जेथे बांधले जातात, ती जागा पाहून मनास काय वाटलें असेल?
 पदार्थसंग्रहालयांत प्रवेश करतांच आंतून कोणी तरी आम्हांस भेटण्यासाठी आमच्या सारख्याच पोषाकाने व आमच्याच चालीने येत आहे असें दिसलें. तेथील अधिकाऱ्यांनी मोहोरबंद कुलप माझ्याच देखत उघडलें व त्यांच्या समवेतच मी आंत प्रवेश केला; असे असतां आंतून हीं माणसे कशी आली? ही भुताटकी तर नसेलना? अशा नाना शंका एका निमिषमात्रांत येऊन गेल्या. आम्ही जसजसे जवळ जाऊं लागलों, तसतशी ती अदृश्य भागांतून आलेली मंडळीही जवळ येऊं लागली; कोणी का असेनात, शिष्टाचाराप्रमाणे हस्तांदोलन करून 'प्रातमींलना'प्रीत्यर्थ आनंद प्रदर्शित करावा म्हणून हात पुढे केला. तों तो एका आरशावर खट्कन् आपटला! माझी भांबावलेली मुद्रा व झालेली फजिती पाहून बरोबरीचे अधिकारी हसत होते! त्यांना आपल्या या भुतांशी भेटण्याचा प्रसंग वारंवार यावयाचा, त्यामुळे त्याचें कांहीच वाटलें नाही.
 त्या विस्तृत दालनांत भिंतीभर आरसे लावले असल्याने ही फसगत झाली. एखाद्या प्रदर्शनांत दुकानाची मांडणी करतात त्याप्रमाणें दोन्ही बाजूंस आडवीं दुकानेंच लावली आहेत, असे आंत जातांक्षणीच दिसले. भिंतीवर काचेचीं कपाटें असून त्यांत निरनिराळ्या कप्प्यांत आजपर्यंत इराणच्या शहांना आलेल्या नजराण्यांपैकी, निवडक वस्तु शिस्तवारीने लावून ठेवल्या आहेत. प्रथमत: तख्त पहावयाचे व त्यास 'पांच कुर्निसात व सात सलाम' करून नंतर इतर भागांकडे वळावयाचें हा तेथील शिरस्ता दिसला; म्हणून प्रथमतः 'तख्त-इ-ताऊस' - मयूरासन -पहाण्यास गेलो. पुराणिकबुवांच्या व्यासपीठासारखें असें हें सिंहासन हत्तीच्या सोंडेसारख्या सहा पायांवर उभारलें असून त्याला चढण्यास समोरून दोन पायऱ्या आहेत. पायऱ्यांमधील भागावर सर्पाची आकृति काढली आहे. सिंहासन आंतून लाकडाचें असून वरती सोन्याचा जाड पत्रा मढविला आहे असें वाटतें. सोन्यावर निळ्या, हिरव्या, पांढऱ्या इत्यादि रंगांत - 'मीना'काम केलें असून रत्नांचा किंवा माणिकमोत्यांचा स्पर्शही झालेला दिसत नाही! नाही म्हणावयास मागील बाजूस म्हणजे आसनावर बसलें असतां पाठ टेकेल त्या भागावर एक मोठा तेज:पुंज हिरा टांगला असून त्याच्या किरणांचें योग्य परावर्तन व्हावें म्हणून बिल्लोरी आरशांचे तुकडे तिरपे ठेवून, हिच्याभोवती वर्तुलाकार सांधले आहेत. आवश्यक तेवढ्या शक्तीच्या विद्युत्प्रकाशाने तो सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो; आणि भर उन्हांत धरला तर साक्षात् ‘बालसूर्य' अवतरल्याचा भास होतो, असें सांगतात !
  'तख्त-इ-ताऊस' असें त्या राजासनाला का म्हणतात, याचें कारण मी बरोबरच्या अधिकाऱ्यांना विचारलें; व त्यांनी ज्या मयूराकृति त्या आसनावर दाखविल्या त्या पाहून इराणांत आल्यामुळे मोरांत काय भयंकर फरक पडला असे मला वाटलें! श्रीकृष्णाची चित्रे बंगाली, मारवाडी किंवा पंजाबी वेषांत काढलेली असली तरी तीं ओळखण्यास विशेष पंचाईत पडत नाही. पण हा इराणी शहाच्या आसनावरील मोर किती तरी रोडलेला–म्हणजे हत्ती जाऊन बोका रहावा अशापैकी झालेला! त्याला पिसारा तर मुळीच नाही, तुरा नाही, नीलकंठ नाही, कांहीच नाही! लहान मुली खेळण्यासाठी कापडाच्या तिकोनी ‘चिमण्या' करतात, तशाच ढोबळ आकाराचे दोन मोर सिंहासनाच्या मागील बाजूस बसविले होते आणि म्हणूनच त्या सिंहासनाला ‘तख्त-इ-ताऊस' (मयूराचें आसन) असें म्हणतात!
 तेथेच दुसरेंही एक राजासन होतें. त्याला ‘तख्त-इ-नादिर' ऊर्फ ‘नादिरशहाचें तख्त' असे म्हणतात. कारण नादिरशहाने १७३९त दिल्ली लुटली तेव्हा तें तेथून नेलें. त्यावर मात्र रत्नें व माणिकमोतीं खेचून भरलेलीं आहेत. दिल्लीच्या बादशहांचें मयूरासन नादिरशहाने इराणांत नेलें असे जे आपण इतिहासांत वाचतों, तें मयूरासन हेंच! याच्या मागील भागावरील नक्षींत मोठमोठे पाचू सोन्याच्या कोंदणांत बसविलेले आहेत आणि ते मयूरपिच्छावरील डोळ्याएवढे व डोळ्यासारखे दिसतात. त्याच्या अजूबाजूने वर्तुलाकार अथवा कमानी काढून लाल, हिरे व माणकें हीं बसवलेलीं दिसतात. सर्व आसन सोन्याचें असून प्रामुख्याने डोळ्यांत भरणारे एवढाले मोठे पाचू पहातांच त्याच्या बिनमोलपणाची कल्पना येते.
 हें सिंहासन म्हणजे एक मोठी उंच खुर्चीच आहे. वर चढण्यासाठी त्याला दोन पायऱ्या आहेत; आणि खालच्या पायरीवर एक सिंहाचा छावा रत्नांनी विभूषित असा काढला आहे. चित्त्याच्या आंगावर असतात तसे ठिपके या सिंहावर कसे आले हें कोडें सुटत नाही. का तें व्याघ्रासनच म्हणावे?
 ह्या आसनावरील उंची किनखापाने मढविलेल्या बसण्याच्या गाद्या, आसन ठेवण्यासाठी मखमलीची बैठक आणि रत्नांची रेलचेल व त्यांची नामी रचना पहातांच तें हिंदुस्थानांतील असल्याची खात्री पटते. ज्या दालनांत हें सिंहासन आहे, तेथे हिंदुस्थानांतील इतर लूटही ठेवली आहे. हस्तिदंती मूर्ति, पंखे, इतर कोरीव वस्तु, सुवर्णमूर्ति, जरतारी व किनखापी कापड ह्यांचे आगर हिंदुस्थानच असल्यानें त्या दुसरीकडून आल्या असतील असें संभवत नाही.
 एवढे सिंहासन पहावें की, इतके कष्ट सोसून प्रवास अंगीकृत केल्याचें श्रेय मिळालें असें वाटतें. एक तर आपलेपणामुळे त्या सिंहासनाला महत्त्व; आणि दुसरे असे की, एकसमयावच्छेदे इतका मूल्यवान रत्नसंग्रह योग्य कोंदणासह उपयोगांत आणलेला अन्यत्र कोठे दिसणार?
 'तख्त-इ-नादिर'च्या बाबतींत बऱ्याच प्रवासी लेखकांची फसगत झालेली आहे असे दिसते. इराण्यांना मोराची आवड विशेष असल्याने आणि मोर म्हणजे वैभवनिदर्शक मानण्याची त्यांची रीत असल्याने इराणांत इस्फहान येथे तयार करविलेल्या सिंहासनाला ते 'तख्त-इ-ताऊस' म्हणूं लागले; व समजुतीखातर दोन 'मोर' त्यांनी कसे लावून घेतले आहेत हें वर सांगितलेंच. नादिरखानाने हिंदुस्थानांतून आणिलेले सिंहासन हे 'मयूरासन' याच नांवाने प्रसिद्ध होतें. तेव्हा तेहरान नगरींत आल्यानंतर या दोन्ही एकाच नांवाच्या राजासनांचा घोटाळा उडून बहुतेक इंग्रजी लेखकांनी 'तख्त-इ-ताऊस'चे वर्णन करून जडजवाहिरांचे लेणे कल्पनेने चढविलेले दिसते ! इतकेच काय, पण नुकतेच ' रत्नाकरां'तून पृथ्वीप्रदक्षिणे'साठी निघालेले श्री. माटे यांचीही या सिंहासनांनी फसगत केली असें दिसतें. त्यांना त्या ठिकाणी 'मोर व सिंह' दिसले. याचें कारण असें की, हें पदार्थसंग्रहालय पहाण्याची सहसा कोणास पवानगी नसते; आणि शहरांतील पोराबाळांना सुद्धा 'तख्त-इ-ताऊस'चे वर्णन ‘तोंडपाठ' झालेलें असतें. अर्थात् अशा मुखोद्गत वर्णनांत वस्तुस्थितीपेक्षा काल्पनिक इष्टतेचा भागच अधिक असल्यामुळे जे फिरस्ते लेखक 'परप्रत्ययनेयबुद्धी'वर विसंबून राहिले त्यांची हास्यास्पद स्थिति झाली तर त्यांत आश्चर्य कसले? असो.
 इतर दालनांत कलाकौशल्याचे प्रदर्शनच मांडलें आहे असें म्हटले तर त्याचें यथार्थ वर्णन होईल. निरनिराळ्या देशांतून आलेल्या नजराण्यांत सर्वोत्कृष्ट कारागिरी दिसून येणारच. फ्रान्समधून आलेल्या चिनीमातीच्या भांड्यांवर सोनेरी रंगांत चक्रवर्ती नेपोलियनचें चरित्र चित्रित केलें आहे! इटालियन कारागिरांनी नैसर्गिक रंगांत काढलेली चित्रें टांगून ठेवलेलीं पाहिलीं, म्हणजे काय उत्तम तैलचित्र आहे असें वाटतें; पण जवळ जाऊन हात लावल्यास तें चित्र लहान लहान दगड रचून केले असल्याचे दृष्टोत्पत्तीस येतें! लहान लहान दगड निरनिराळ्या रंगांचे अशा खुबीने एकत्रित केले आहेत की, ते सांधले असल्याचें कळतही नाही व तें एकच एक तैलचित्र असल्याचा भास होतो. ‘अक्रॉपोलिस, ‘कलोसियम', ‘रस्त्यांतील देखावा' हीं व अशींच दुसरीं चित्रें दगडांची केलेलीं आहेत.
 हल्ली राज्यारुढ असलेल्या रेझाखान शहास आलेल्या कांही नजराण्यांचे महत्त्व आपल्या दृष्टीने विशेष आहे. रेझाशहाच्या राज्यारोहणप्रसंगी ब्रिटिश सम्राट् पंचम जॉर्ज यांनी दोन मोठे सुवर्ण-कलश, त्यांवर देणाराचे व घेणाराचें नांव कोरून, पाठविले आहेत. अमानुल्ला युरोपसंचार आटोपून स्वदेशीं परत जात असतां वाटेंत तेहरानमध्ये उतरला होता. तेव्हा त्यानेही रेझाशहास, चांदीचा ‘केशभूषा' रचण्याचा संच सप्रेम अर्पण केला असें दिसतें. तीच या संग्रहालयांत तेव्हा शेवटची भर होती. आतां त्यानंतर आणखीही काही वस्तु आल्या असतीलच.  मुसलमानी धर्माच्या कट्टया अनुयायांच्या नगरींत-शहाच्या शेलक्या पदार्थसंग्रहालयांत कालियामर्दन करणारा बाल श्रीकृष्ण, गणपति, सरस्वती इत्यादि हिंदु देवतांच्या मूर्ति दृष्टीस पडल्या तर आश्चर्य का वाटूं नये? मुंबईच्या पारशी समाजाने रेझाशहास मानपत्रें व अभ्यर्थनापत्रें पाठविलीं व त्यांना करंडक म्हणून चांदीच्या पेट्या घेतल्या. त्यांवर वरील मूर्ति कोरलेल्या होत्या. "आम्ही मूळचे इराणचे प्रजाजन. आम्हांस या जन्मभूमीस येऊं द्यावें व विशेष सवलती मिळाव्या," या आशयाच्या मागण्या मुंबईच्या पारशी समाजाने केल्या असल्याचें आंतील कागद वाचून कळलें.
 राजवाड्यांतील आणखीही इतर दालनें पाहिलीं. पूर्वीचे शहा कोठे रहात, त्यांचा बसण्याचा दिवाणखाना कोणता, बुरख्यांत रहाणाऱ्या राणीसाहेबांचा महाल कोठे असे, इत्यादि सर्व गोष्टी पाहून झाल्यानंतर जुने पदार्थसंग्रहालय पहाण्यासाठी तळघरांत शिरलों.
 येथे इराणांतील मूळचे तख्त दिसले. 'तख्त-इ-मर्मर' हे 'संगमरवरी' दगडाचें केलें असून तें आठ स्त्रियांच्या खांद्यांवर टेकल्याचें मूर्ति कोरून दाखविले आहे. सहा फूट लांब व चार फूट रुंद अशी एकच 'फळी' दगडाची असून साधारणपणे तीन फूट उंचीच्या दासीही त्याच दगडांत कोरल्या आहेत. मात्र हल्ली त्यांपैकी कांही दासीं छिन्नभिन्न झाल्यामुळे ते तख्त निकामी ठरविलें


 + फारसी भाषेतील खरा अर्थ कळला म्हणजे 'संगमरवरी दगड' हा शब्दप्रयोग अत्यंत कर्णकटु व विचित्र वाटतो. कारण 'संग' म्हणजेच दगड आणि 'मर्मर' ही त्याची विशिष्ट जात. अर्थात् आपण ज्याला 'संगमरवरी दगड' म्हणूं, तोच अर्थ 'संग मर्मर' या शब्दाने दर्शविला जातो. त्याच्या पुढे आणखी 'दगड' जोडणे म्हणजे 'गाईचें गोमूत्र' अशांतलाच प्रकार होय! आहे. याशिवाय नादिरशहाने हिंदुस्थानवर स्वारी केल्या वेळी दिल्लींत काय देखावा आढळला, वाटेंत लोक कसे शरण आले किंवा त्याने कत्तल कशी केली इत्यादि महत्त्वाच्या प्रसंगांची चित्रे काढलेलीं जुन्या संग्रहालयांत दिसली. पूर्वीच्या कांही शहांची मोठमोठीं रंगीत चित्रेंही होतीं.
  असो. इराणांतील हे वैभव मुख्यत्वे हिंदुस्थानांतलेच असल्याने पुनः ते परत स्वस्थानीं येईल काय याच विचारांत मी मग्न राहून राजवाड्यांतील प्रेक्षणीय भागांचें निरीक्षण संपविलें! इतर रत्नभांडार मोठें व मूल्यवान् आहे; पण तें खुद्द रेझाशहाच्या मालकीचें असून कोणासच पहावयास मिळत नाही. मग त्यांत काय काय चिजा आहेत याचे केवळ 'ऐकीव' वर्णन कशाला?

—लोकशिक्षण, ऑक्टोबर, १९२९.
 

परिशिष्ट दुसरें : इराणांतील अनुभव
  "मोराच्या पिसांची चैन करावयाची असेल तर हिंदुस्थानांत जाण्याची धमक अंगीं असली पाहिजे," या अर्थाची एक इराणी म्हण फार लोकप्रिय आहे. 'हिंदुस्थानांत जाणें' म्हणजे इराण्यांच्या दृष्टीने अटकेला झेंडा लावण्यासारखेंच आहे. मराठी भाषेंत अटक जशी पराक्रमाची सीमा मानली जाते तसेंच इराणांतही हिंदुस्थान म्हणजे ध्येयाचें परमोच्च शिखर मानतात. आणखी एक अर्थ त्या वाक्प्रचारांत अभिप्रेत आहे. 'मोराची पिसे' ही चैनीची बाब असें इराणी समजतात. आपल्याकडील फकीर किंवा 'बाळसंतोष' मयूरपिच्छांनी मढलेले असतात. याचें कारण आपण त्या पिसांना अतिपरिचयामुळे फारसें महत्त्व देत नाही हें होय. परंतु इराणांत त्याच पिसांना भारी किंमत. 'हत्ती दारांत झुलणें' हे जसे आपल्याकडील श्रीमंती वैभवाचे लक्षण, तसेच इराणी जनतेच्या मताने 'दारांत मोर नाचणें' ही ऐश्वर्याची परमावधी. आणि म्हणूनच इराणी शहान्शहाच्या तेहरानमधील राजप्रासादांत एक मोराचें जोडपें मोठ्या खटपटीने पाळण्यांत आलेलें आहे.
 मयूराला इराणी प्रजेने इतकें श्रेष्ठत्व आजकाल दिलें असें नव्हे. त्यांच्या कडील अत्यंत मूल्यवान् रत्नजडित 'सिंहासनाला'ही ‘मयूरासन' ('जांभळ्या' पीतांबरापैकींच हा प्रकार झाला!) असेंच संबोधण्याचा प्रघात आहे. इस्फाहान शहरी तयार झालेलें पुराणिकांच्या व्यासपीठासारखें एक राजासन तेहरानमधील राजवाड्यांत ठेवलें आहे. त्याला 'तख्त-इ-ताऊस' (मयूरासन) असें म्हणतात, म्हणून सांगितल्यावर "मयूर तर कोठेंच दिसत नाही हें कसें???" असा मी प्रश्न केला. तख्ताच्या कोपऱ्यावर दोन चिमण्या- लहान मुलांच्या पाळण्यावर टांगतात त्यांसारख्या-दाखवून तेथील अधिकारी मला विचारू लागला की, “हे मोर नव्हेत की काय? तुम्ही अजून मोर पाहिले नाहीत?" इराणी तख्तावरील सोन्याचे मढविलेले व वर मोहक रंग भरलेले 'चिमणी मोर' मी प्रथमच पाहिले खरे!

 इराण्यांच्या नेहमीच्या वागणुकींतही राजकीय विचार पाहून प्रथमतः आश्चर्यच वाटतें. शिक्षणाचा प्रसार नाही, वर्तमानपत्र फक्त शहरांच्या ठिकाणींच, दळणवळणाची तुटपुंजी साधनें, अशी प्रतिकूल परिस्थिति असतांही इराणी जनतेच्या दृष्टींत नेहमी राजकीय प्रश्न कसे येतात हें कोडें पडतें. तेहरानधील एका राजवाड्यांत आजपर्यंतच्या इराणी लुटारूंनी–तेथील शहा म्हणजे लुटारूच–आणलेली
नादिरशहाने नेलेलें सिंहासन

लूट एका दालनांत व्यवस्थित रीतीने मांडून ठेवलेली आहे. आणि इराणांत असलेली बहुतेक संपत्ति आमच्या सुवर्णभूमीतूनच नाही का गेली? तेव्हा तें दालन पहाण्यांत विशेष महत्त्व व उत्सुकता होती.
 गेल्याबरोबरच नयनमनोहर, रत्नजडित व सुवर्णमंडित असे एक आसन दिसलें. "चीऽस्त?"(हे काय?) असा प्रश्न बरोबरच्या अधिका-यांना विचारताच त्यांनी सांगितले की, “तुमच्या देशांतून नादिरशहाने आणलेलें तख्त! 'आमच्या देशांतील' म्हणून थोडासाच अभिमान वाटला. पण त्यापेक्षाही अधिक शरम वाटून मुकाट्याने मान खाली घालून पुढे चालूं लागलों! दिल्लीचें नामांकित मयूरासन तें हेंच. त्यास तेहरानमध्ये तख्त-इ-नादिर'-(नादिरचें सिंहासन) असे म्हणतात. त्याच्या जोडीचे मूल्यवान आसन जगांत अन्यत्र नाही!
 कोणत्याही प्रकारें अपमान करण्याच्या हेतूने ते बोलले नव्हते; कारण तेहरानमध्ये दोनतीन विद्यार्थ्यांनी मला त्याच अर्थाचे प्रश्न केले होते. “काय हो, तुम्ही हिंदुस्थानांतून आलां ना? आमच्या नादिरशहाने पुष्कळ मूल्यवान लूट आणली, ती तुमच्याच हिंदुस्थानांतली, खरें ना???" अशा प्रश्नांवरून त्यांच्या मनःस्थितीवर राजकीय गोष्टींचा परिणाम किती झाला आहे हें कळून येईल. आकड्यांवरूनच पाहिलें तर, साक्षरतेचे प्रमाण हिंदुस्थानांत इराणपेक्षा अधिक आढळेल; परंतु आपल्या पूर्व पराक्रमाची यथार्थ जाणीव व स्मृति कोणाला आहे ? 'मी हिंदी' असें म्हणण्यास कचरणारे हरीचे लाल आपणांत थोडथोडके का आहेत? असो.

  *
*

 हमादान येथील एका शाळेत गेल्यावर सहासात वर्षांचा मुलगा भेटण्यासाठी आला, "मीही हिंदी आहे. तुम्ही भेटलां म्हणून मला फार आनंद झाला,"असें त्याने सफाईने बोलून दाखविलें. मलाही अत्यानंद झाला. कुशल प्रश्न विचारल्यानंतर तो मुलगा हिंदुस्थानांत कोठे होता याची चौकशी केली. लाहोरच्या मुसलमान बॅरिस्टरांचा तो पुत्र असून त्याचें आजोळ इराणांत हमादान येथे होते. त्याची आई इराणी, म्हणून तो शिक्षणासाठी तेथे राहिला होता. लाहोरच्या प्रेक्षणीय स्थळांच्या आठवणी आम्ही एकमेकांस सांगितल्या. "पुनः हिंदुस्थानांत येईन तेव्हा अवश्य लाहोरला या," असें तो म्हणाला."मुंबईला आल्यावाचून राहू नकोस," हें मी त्याला बजावून सांगितलें. नंतर त्याने एकच प्रश्न विचारूं का?" म्हणून म्हटलें. "हो, अवश्य," असें सांगतांच तो म्हणाला, “हिंदुस्थानांतले लोक इतके शेळपट का हो असतात? बरोबर सुरा, दंडा किंवा तरवार ते का नाही बाळगीत? कोणीही त्यांना मारलें किंवा बोललें तर ते आपले मुकाट्याने सर्व सोसतात. मला हिंदुस्थान फार आवडतें; पण तेथील लोकांची ही नेभळट वृत्ति मात्र पहावत नाही. त्यांनी जवळ एखादा सुरा ठेवला तर त्यांना कोण त्रास देणार आहे? येथे पहा आम्ही कसें करतो तें?"
 लहान मुलांची टीका निर्भीड, सडेतोड आणि वास्तविक असते म्हणतात ती अशी. बोला याला कांही उत्तर आहे का ?

  *
*

  इराणी लोकांच्या संगतींत असतांना गोष्टी निघावयाच्या त्या हिंदुस्थानसंबंधीच्या. "तुमच्या देशांत हें आहे का?" "तमक्याला तुम्ही काय म्हणतां?" अशा तऱ्हेचे प्रश्न फार झाले नाहीत, तरी हिंदुस्थान कसे आहे याच्या त्यांनी आपापल्या परीने कांही खुणा सांगितल्या. मात्र सर्वांचे एकमत असें की, "हिंदुस्तान खैलेऽखैलेऽखूब अस्त," (हिंदुस्थान फार फार चांगले आहे). कोणी म्हणे की, तुमच्याकडे गॅर्मी (उष्णता) फार आहे, इथल्यासारखें बर्फ नाही, म्हणून हिंदुस्थान चांगलें. दुसरा एक म्हणाला, “छे, छे, तिकडे आबादी (वस्ती) पुष्कळ आहे." तिसरा सृष्टिसौंदर्याचा भोक्ता होता. हिंदुस्थानमध्ये जिकडेतिकडे ‘सब्ज'(हिरवें) दिसतें. मनाला आनंद होतो असें त्यानें सांगितले. पण ‘बीचमें मेरा चंदभाई'वालाही एक होता. "तुमच्या देशांत 'सुर्ख फिलफिल' मूठ मूठ भरून खातात नाही ?" हा प्रश्न ऐकून प्रथमतः मी बुचकळ्यांतच पडलो. 'सुर्ख' म्हणजे लाल किंवा तांबडे. फिलफिल हा शब्द काळीं मिरीं असतात त्यांना लावतात. इराणी आहारांत मिरची मुळीच नसते. थोडीशी मिरपूड जशी पाहिजे तशी ज्यानें त्यानें घ्यावी असा तिकडील रिवाज. तेव्हा 'लाल मिरपूड' म्हणजे 'मिरच्यांचें तिखट' भस्कापुरी-हा अर्थ अभिप्रेत होता. "येथे तुमचे 'सुर्ख फिलफिल' वाचून कसें चालतें? तुमचे जवळ असेल तर आम्हांला थोडेंसें दाखवा तर खरें?" असें म्हणून ते माझ्या मागे लागले. इतरांना तर अत्यंत आश्चर्य वाटले. चार जणांच्या एका जेवणास फार फार तर एक गुंजभर मिरपूड खपते आणि हिंदुस्थानी लोक मूठ मूठ भरून खातात हेंं काय प्रकरण आहे, असें त्यांना वाटलें. 'लाल मिरीं कशीं असतात तें पहाण्याचेंही कुतूहल होतेंच.
 त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले ते मर्मी भिडणारेंच होते. "तुमच्या कडील लोक अफू ओढतात तसेच आमच्याकडे 'सुर्ख फिलफिल' खातात." असे मी सांगतांच तो विषय बदलला! कारण इराण्यांना अफूचे व्यसन जबरें. एकेका दिवसाला तीन तीन चार चार तोळे अफू ओढणारे धूम्रपानपटू तिकडे पुष्कळ आहेत. पुरुषाच्या या व्यसनांत ‘सहधर्मचारिणी'ही भाग घेतेच. अर्भकें लहान असलीं तरी त्यांच्या तोंडावर अफूचा धूर सोडून मातापितरें पंक्तिप्रपंचाच्या दोषांतून मुक्त होतात. अफू ओढणें हें वाईट व्यसन असल्याची जाणीव इराणी जनतेला अलीकडेच होऊं लागली आहे.
 एक तुर्कोमान यात्रेकरू हें सर्व बोलणें मोठ्या उत्सुकतेने ऐकत होता. त्याला हिंदुस्थानबद्दल आपणांस काय वाटतें तें बोलून दाखविण्याची उत्कट इच्छा असल्याचें चळवळ करणाऱ्या ओठांवरून दिसे. परंतु त्याला फारसी चांगलें येत नव्हते. “अफेंदिम्, तुर्की बिलेर्शेम्?? (काय राव, तुर्की बोलतां की नाही?) असें त्याने मला विचारलें. खुणेने नाही म्हणून "फार्सी मिदानीम्" (फार्सी मला कळतें) असें मी सांगतांच मोडक्या तोडक्या भाषेंत हातवारे करून तो बोलूं लागला.
 तुमच्या हिंदुस्थानांत खजूर फार चांगला होतो. मी बगदादला खाल्ला. एवढा लांब होता आणि त्यांत बी मुळीच नव्हती. तो लोण्याप्रमाणें मऊ आणि पांढरा दिसत असे. वर पिवळट कांही तरी होते. फार फार नामी. मला तर पुष्कळ आवडला. मी बगदादला पोटभर खाल्ला." मिटक्या मारून वर्णन चाललेले पाहून इतरांच्या तोंडाला पाणी सुटलें. हे कसलें फळ? खजूर आणि त्यांत बी नाहीं? पांढरा कसा काय ? इत्यादि शंका त्यांना येऊ लागल्या. हें फळ ओळखण्यास मलाही डोके खाजवावें लागलें. 'बगदाद'चे नांव त्यानें घेतलें नसतें तर तर्कशक्ति खुंटली असती. कारण बगदादला हिंदुस्थानांतून येणाऱ्या केळ्यावर किती उड्या पडतात तें पाहिलें असल्याने तुर्कोमानाचा 'पांढरा बिनबियांचा खजूर ' म्हणजे केळींच हें दीर्घ विचारान्ती निश्चितपणें उमगतां आलें.

  *
*
 ही झाली सामान्य जनांची विचारसरणी. परंतु शिकलेल्या पुढाऱ्यांशीं बोलण्याचा जेव्हा जेव्हा म्हणून प्रसंग येई तेव्हा तेव्हा पहिला प्रश्न अगदी औपचारिक कुशल प्रश्नाप्रमाणे ठराविकच होऊन बसला होता. "हिंदुस्थान एवढा मोठा देश, इतका जुना, नामांकित, पण अद्यापि पराधीन कसा?" हीच पृच्छा बसरा, बगदाद, करमानशहा, हमादान, तेहरान इत्यादि शहरी करण्यांत आल्यामुळे इतर लोक आमचेकडे कोणत्या दृष्टीने पहातात तें समजलें! आणि समजून उमजलें नाही तर काय फायदा? अस्तु.
  *
*
  • *

 तेहरानमधील अफगाण वकिलांनी मात्र अगदीच स्पष्टपणें आमच्या वृत्तीचें वर्णन केलें. अमीर अमानुल्लाबद्दल हिंदुस्थानांतील जनतेला फार सहानभूति वाटते, असें ऐकल्यावर ते अफगाण प्रतिनिधि म्हणाले, "निदान जगाच्या कल्याणासाठी तरी स्वतंत्र व्हा. आज हिंदुस्थान स्वतंत्र असतें तर साम्राज्यसंरक्षणासाठी ब्रिटिशांना पडते इतकी दगदग पडली नसती आणि मग अमीर अमानुल्लावर राज्यत्याग करण्याची पाळी आलीच नसती. हिंदुस्थानला स्वायत्तता मिळाली की, आणखीही बरेच देश स्वातंत्र्य मिळवतील. पण हे कधी होणार?"
 सर्व हिंदी जनतेनेच या प्रश्नाचा जबाब द्यावा! एकट्यादुकट्याचें हें काम नव्हे.

-किर्लोस्कर मासिक, दिवाळी, १९२९.
 

परिशिष्ट तिसरें : प्रवासांतील मौजा

 'नांव बदलून ठेवणे ' ही जरी आपणांकडे अशक्यप्राय बाब असली तरी इराणच्या प्रवासांत ती प्रत्येक गावोगाव होत असल्याचा मला अनुभव आला. मुसलमानांना इकडील नांवांची माहिती नसल्याने व विशेषतः फार्सी लिहिण्याची पद्धत सदोष आहे म्हणूनच हा प्रसंग प्रत्येक ठिकाणीं येई. स्वरचिन्हांचा उपयोग फारसा न करतां केवळ उच्चारित व्यंजनेंच लिहिण्यामुळे प्रत्येकाच्या मर्जीनुरूप त्याचा उच्चार होऊं शकतो. माझें नांव पुढे पुढे मी लिहून घेऊं लागलों. अगदी प्रथम तर माझें मलाच हसूं येई. त्यामुळे तेथील पोलिस मात्र रागावत. नांव विचारतांच आपल्याकडील रिवाजानुसार मी सबंध नांव सांगितले. नांवाच्या लांबीमुळे व अपरिचित शब्द कानी पडल्याने तो अधिकारी तर भांबावलाच. "मेहेरबानी करून एकेक शब्द सांगा," म्हणून त्याने विनंती केली व त्याला अडचण पडूं नये. म्हणून मीही प्रत्येक अक्षर सावकाश उच्चारून सांगितलें. मुंग्यांच्या पायांप्रमाणें असलेल्या लिपींत त्याने सर्व लिहून घेतलें. आणि "इस्म-इ-पिदर?" - बापाचे नांव ?- म्हणून लगेच दुसरा प्रश्न केला. संपूर्ण नांव हें त्याला माझ्या 'पाळण्यांतल्या' नांवाप्रमाणे वाटलें. सर्व कांही त्यांत आलें, बापाचें नांव वेगळें नाही, असें सांगून त्याची समजूत करावी लागली.

  *
*
  • *

 तेहरानमध्ये माझ्या नांवाचें भाषांतर करून देण्याबद्दल तीन पोलिस अधिकारी आठवडाभर मजकडे येत. इंग्रजी नांव आम्हांला नको, 'फ्रान्सी' अथवा फार्सी भाषेंत तर्जुमा करून द्या, हीच त्यांची मागणी. इंग्रजीशिवाय मला दुसरी भाषाच येत नाही असें सांगून तें काम टाळलें.  पण त्याचा परिणाम फार मोठा झाला. तेहरान सोडून जातांना पोलिसांनी 'जासूस' (गुप्त हेर) म्हणून पांच तास मला अडकवून ठेवलें! एका गावांतून दुसऱ्या गावीं जावयाचें झाल्यास पोलिसांची लेखी परवानगी घ्यावी लागते, असा इराणी कायदा आहे. पोलिसांकडे जाऊन ती अनुज्ञा आणण्याचे काम ब्रिटिश वकिलातींतील अधिकाऱ्यांकडे सोपविलें होतें. त्याप्रमाणे त्यांनी परवानगी आणून दिली. त्यांत काय लिहिले होते हें अर्थातच मला कळणें शक्य नव्हतें. तेहरानच्या वेशीवर पोलिसानें पासपोर्ट व हा परवाना पाहिला. आणि तो लगेच मोटार थांबवून टेलिफोनकडे धांवला. ‘सेत्रीप रमचंदा तिगर' या नांवाचा इसम खोटें नांव धारण करून मशहदला चालला आहे. हिंदुस्थानांतून तो 'मुदीर-इ-रुझनामे' (वर्तमानपत्राचा बातमीदार) म्हणून आला असें आपल्या रिपोर्टांत आहे. पण परवान्यांत त्याचे नांव 'माँसिया तिककार' असें लिहिलें असून 'सिफारात-इ-इंग्लिसी' मध्ये काम करणारा असें म्हटलें आहे. त्याला मी आता नांव विचारलें तर तो कांही तिसरेंच सांगतो. 'षोक' (धंदा) 'मुदीर' असल्याचें तो कबूल करतो. तेव्हा काय करावयाचें?
 हा प्रकार काय आहे हे मला आता कळलें. आपलें नांव इतकें कठीण ठेविल्यामुळे ही अडचण उद्भवली. बड्या पोलिस अधिकाऱ्याकडे जातांच तो हसून म्हणाला, "सेत्रीप रमचंदा तिगर–? वाः, काय गोड नांव आहे? आणि तुम्हांला अडकवून ठेवणारा कोण? तुमचा पासपोर्ट इंग्रजी काँसलकडून आला होता ना? जा. काही हरकत नाही."
 त्या अधिकाऱ्याला माझ्या नांवांत गोड काय वाटलें त्याचा तपास करतां असे कळलें की, 'सेत्रीप' म्हणजे मोठी अधिकाराची, हुद्द्याची व बहुमानाची जागा आहे. प्रांतीय गव्हर्नरासारखाच सेत्रीपचा हुद्दा. तेव्हा मी 'जासूस' कसा असेन?
 यानंतर मी माझें नांव 'सेत्रीप रमचंदा तिगर' हें नीट लिहून घेतलें व कोठेंही पोलिसांनी विचारलें की, वही काढून तें सांगत असें. इराणांत पुनः जावयाचें झाल्यास नांव बदलून जावें असें मी नक्की ठरविलें आहे.

  *
*
  • *

 मुसलमान यात्रेकरूंसमवेत प्रवास करावा लागला. तेव्हा दिवसांतून तीन चार वेळां निमाज पढण्यासाठी मोटार थांबवावी लागे. माझ्याखेरीज इतर सर्व उतारू निमाज पढत आणि मी मुळीच पढत नसें. तें पाहून एका चौकस तुर्काने चौकशी केली की, "तुमचा खुदा कोणता???" "वल्ला, अल्ला" असें आकाशाकडे पाहून उत्तर देतांच तो गप्प बसला. 'वल्ला' याचा अर्थ 'अल्ला शपथ.' अल्लाची शपथ घेणारा खोटें बोलेल कसा? ही त्याची समजूत.
 मोटारमधून प्रवास करतांना कंटाळा येई. तेव्हा बरोबरीच्या उतारूंना 'एकवार सवाल बुलंद कून' असें म्हणायचा अवकाश की, 'अल्ला रसुलिल्ला'चा गजर सुरू होई. 'पुंडलीक वरदा हरि विठ्ठल' किंवा अशाच प्रकारचीं भजनी वचनें म्हणतात तसाच त्यांचा अल्लामय गिल्ला सुरू होई. केव्हा केव्हा कुराणांतील 'श्लोक'ही ते म्हणून दाखवीत. वरचेवर त्यांना सुचविण्याचें काम मी आपण होऊनच मजकडे घेत असें. तेव्हा त्यांनीही मला एकदा 'जबान-इ-हिंदुस्तानी' मध्यें (हिंदुस्थानी भाषेंत) 'अल्लाची' प्रार्थना म्हणावयास सांगितलें. थोडा वेळ विचार करून 'भज गोविंदं भज गोपालम्' ही आचार्यप्रणीत चर्पटपंजरी मी घोळून घोळून म्हटली. आणि मौज ही की, सर्वांना नादमाधुर्यामुळे ती आवडली असें दिसले. 'बजगो' 'बजगो' म्हणजे काय ? तें पुनः म्हणा, अशी त्यांची विनंती होऊं लागली की, दुसराच कोठला तरी संस्कृत श्लोक म्हणावा असा क्रम आठ दहा दिवस चालू होता. गोपाळ, गोविंद ही नांवें कोणाची होती हें त्या धर्मप्रेमी मुसलमानांना कळलें नाही व त्या पद्याचा अर्थ कळण्याइतके ते शहाणे नव्हते, म्हणूनच त्या समुदायांत चर्पटपंजरी म्हणण्याचें धारिष्ट झालें.

  *
*
  • *

 बुद्धिबळाचा खेळ इराणांत विशेष खेळतात. त्याला 'शत्रंज' (चतुरंग या संस्कृत शब्दाचे विकृत स्वरूप) असें म्हणतात. बहुतेक सुशिक्षितांस हा खेळ हिंदुस्थानांतून आल्याचे ठाऊक आहे. व 'शत्रंज' हें नांवही संस्कृत शब्दापासून झालेलें असल्याचें आमच्या शाळेंत सांगितलें असें ते म्हणतात. पण 'शत्रंज' खेळणे हे अक्ष, पान, मृगया इत्यादि व्यसनांपैकी गणलें असून धार्मिक लोक त्याकडे क्षुद्र दृष्टीनेच पहात असतात. मक्केला जाणाऱ्या एका यात्रेकरूला मी विचारलें की, "कायहो, तुम्ही 'शत्रंज' नाही का खेळत?" यावर तो उत्तरला,"छे! छे! भलतेच काय बोलतां? आम्ही आता मक्केला ना निघालों? मग शत्रंजला शिवावयाचें देखील नाही. मक्केला जाणाऱ्याने 'शत्रंज'बाजी करावयाची नसते. तो xxx गृहस्थ पक्का शत्रंजबाज आहे बरें!"

  *
*
  • *

 एका इराणी डॉक्टरने मला आपल्या घरी भोजनास बोलाविलें होतें. नित्य प्रचाराप्रमाणे त्यांनी गेल्याबरोबर (बिनदुधाचा) चहा आणला, मी घेत नसल्याचें सांगून आदरपूर्वक तो नाकारल्यावर ते म्हणाले, "मग काय, द्राक्षरस (साधी दारू) मागवूं का?" तीही नको म्हणतांच मग अतिशय उंची अशी जहाल मदिरा त्यांनी मागविली. त्यांची समजूत अशी की, नेहमीच उच्चवर्णीयांत वावरण्याची सवय असल्याने दारू अथवा चहा अशा पेयांकडे हे महाशय ढंकूनही पहात नसावेत. पण त्यांना मी समजावून सांगितलें की, दुधाशिवाय किंवा पाण्याशिवाय मी दुसरें पेय कधीच घेत नसतों. तें तर त्यांना खरे वाटेना. "छे, असें कधी झालें आहे काय? हें पहा आम्ही घेतों." असें म्हणून त्यांनी भराभर पेले घशांत ओतावेत व मी नको नको असें सांगावे. असा फार्स बराच वेळ झाल्यावर तेथे एक म्हातारा होता, त्याने मध्यस्थी करून आग्रहाचा मारा बंद पाडला. "अद्याप या पाहुण्यांना शराबाची चवच कळलेली दिसत नाही; नाही तर ते स्वस्थ कधीच बसले नसते." असें सांगून त्याने दुसरे खाद्य पदार्थ आणण्यास सांगितले. "मी शाकाहारी असल्याने इतर मांसमय पदार्थ खाणार नाही." असें सांगितल्यावर ते इतके जोराने हसले की, मला प्रथमतः मी फार्सी बोलण्यांत मोठी चूक केली असें वाटलें. म्हणून "काय चुकलें?" अशी पृच्छा करतांच डॉक्टर म्हणाले, "अहो शाकाहारी मनुष्य आम्ही आजपर्यंत पाहिला नाही. शाकाहारी म्हणजे काय? असें रहाणे शक्य तरी आहे काय?" त्यांच्या या प्रश्नास उत्तर देणें फार कठीण होतें. मोठ्या मुष्किलीने त्यांच्या समवेत दोन अडीच तास घालवून व त्यांना निराश करून मी निघालों.

  *
*
  • *

 क्वेट्टयाजवळ येत असतां वाटेंत आमच्या गाडीत सी.आय.डी.चे अधिकारी तीन चार वेळां आले व पासपोर्ट पाहून प्रत्येकाचें नांवगाव टिपून घेऊन गेले. अशांपैकीच एक अधिकारी आमच्या डब्यांत शिरला. इतर पंचवीस तीस मुसलमान यात्रेकरूंच्या समवेत मीही त्यांत होतो. ती सबंध गाडीच मक्केच्या यात्रेकरूंनी भरलेली होती. सर्वांचे पासपोर्ट तपासून झाल्यावर तो अधिकारी मजकडे आला. इतर इराणी यात्रेकरूंनी मुकाट्याने पासपोर्ट दाखविले; तसाच मीही दाखवावा ही त्याची अपेक्षा! परंतु वरचेवर अधिकारी येत. त्यांतील खरा खोटा कांही तरी तपास करावा म्हणून मी त्याला म्हटले, "तू कोण?" त्याचें उत्तर "सी.आय.डी. ऑफिसर!" असें आलें.
  "तर मग तुझे अधिकारपत्र दाखव," असे म्हणतांच "मी आणलें नाही, घरीं राहिलें," या विद्यार्थ्यांच्या शाळासबबी तो सांगूं लागला. मी पासपोर्ट दाखविण्याचे नाकारतांच त्याने एक रेल्वे पास खिशांतून काढला. त्यावर त्याचे नांव व हुद्दा लिहिला होता. त्याला नांव विचारले, पासावरील व तें नांव जमतांच मग माझा पासपोर्ट त्याला दाखविला.
 आमचे हे भाषण हिंदींत चालले असल्याने ‘सहचारी' इराण्यांना कळलें नाही. "काय झाले?" अशी त्यांची पृच्छा आल्यावर त्यांच्या पैकी एकानेच त्यांना उत्तर दिले. "आपल्या सर्वांचे पासपोर्ट त्याने पाहिले, तर त्याचा पासपोर्ट आपल्या हिंदी दोस्ताने तपासला. ठीक झालें! वः! वः! वः!"
 पण तो सी.आय.डी. अधिकारी जरा जास्त विचक्षणा करणारा दिसला. मी मुसलमान यात्रेकरूंबरोबर प्रवास करतों, तेव्हा मुसलमान असलों पाहिजे अशी त्याची भावना. आणि इतर उतारूंनाही तसेंच वाटे, पासपोर्टवरील संपूर्ण नांव लिहून घेत असतांनाच त्याच्या लक्षांत आले की, हा गृहस्थ कांही मुसलमान नव्हे. वास्तविक हिंदु वा मुसलमान हा धर्मप्रश्न त्याला लिहून घ्यावयाचा नव्हता. पण फाजील चौकसबुद्धि म्हणतात तशी त्याची होती. त्यांतून तो पडला पंजाबी. म्हणजे हिंदुमुसलमानांची तेढ जेथे विशेष आहे, त्या प्रांतांतला. त्याने तत्काळ प्रश्न केला, "तुम्ही हिंदु की काय?"
 सर्व यात्रेकरू डोळे फाकून, कान टवकारून, उत्तरासाठी अधीर झाले. गेले दहा बारा दिवस ते माझ्या बरोबर होते. मी मुसलमानच अशी त्यांची पक्की खात्री झालेली. त्यांच्या बरोबर जेवणखाण मी केलें असल्याने त्याबद्दल त्यांना शंका नव्हतीच. पण त्या अधिकाऱ्याने तसा प्रश्न केलेला पहातांच त्यांनाही विचित्र वाटले. आपणांला या हिंदी गृहस्थाने चकविलें तर नाही ना असा संशयही त्यांचे मनांत आला. मला तर मोठी पंचाईत पडली. हिंदी अधिकाऱ्याजवळ पासपोर्ट असतां खोटें बोलणें शक्य नव्हतें व तें पचलें नसते. बरें, खरें सांगावें तर तें इष्ट नव्हतें. म्हणून वेळ न दवडतां मी लगेच त्या अधिकाऱ्याला उत्तर दिलें,
 "छट् –हम् हिंदु नै है -हम् बम्मन है!"
 पंजाब्याला बम्मन या शब्दाचा अर्थच कळत नाही. पंडत, वैष्णव अथवा आर्य अशा नांवांनीच तो ब्राह्मणांना ओळखतो. माझेंही काम साधलें व सर्वच मंडळी पूर्ववत् मोकळेपणाने बोलं लागली. इराण्यांना तरी बम्मन किंवा ब्राह्मण याचा अर्थ काय कळणार?
 अशी मौज किती तरी झाली!

-मौज, दिवाळी, १९२९.