रुणझुणत्या पाखरा/आला श्वास, गेला श्वास... एक भास!
'ताई, आज बोलू का तुमाले ? इतके दिस बोललेच न्हवते. तुमचं भ्यावच वाटायचं. पन आता हितं आल्यापासून जरा भीड चेपलीया. बोलू का?"
"... अगं बोल की. काय सांगायचंय? तुला ताण पडतो का कामाचा? भाजी, आमटी तूच करतेस ना? तुझ्या हाताला छान चव आहे हं."
"ताई, सगळा जलम लोकांचा सैंपाक आन् धुणीभांडी करण्यात, खरकटी काढण्यात गेला. धुण्या-भांड्यापरीस सैपाकात मन लई रमायचं. मन लावून फोडणी घातली की भाजीला चव येणारच की...! त्याचं काय वं कौतीक? पन् चांगलं म्हटलंत तुमी. बरं वाटलं. काय सांगू? मी ओल्या हळदीची म्हायेरला. मायकडे आल्ये, ते मला परत न्हेलंच न्हाई... त्या दादापाला माजं फेंदरं, नकटं नाक, बुटकी उंची आवडली नाही. त्याची माय मला पहायला आली वती. माज्या बापांन धा हज्जार रुपये मोजून मला त्याच्या उपरन्याला बांधलं. लगीन झालं की, तिसऱ्या रोजाला मामा येती-जाती न्यायला आला. पन पुन्ना त्यांनी घरात घ्येतलंच नाई. मायनी माप प्रयत्न केला..."
"मला शानी हून बी लई वरसं झाली. आमच्या डोंगरात आभाळ फुटून पाऊस झाला वता. तवा मी शानी झाल्ये. लई लई वरसं झाली. मी नि मायच ऱ्हातो. भाऊ हायता दोन. पन ते कोन कुनाचे. तुम्ही म्हंता कस्टाची भाकर चवदार असती. खराय ते. पन माय लई थकलीय. ती किती दिस कस्ट करणार. मी तिला दूर न्हाई करनार. पण तिच्या नंतर मी एकलीच. मी म्हातारी झाले... थकले की मला कोन?...?..."
"आई माय! बोलतच बसले वो मी. अजून त्या जाधवांच्या घरची धुनी-भांडी ऱ्हाइलीत," असे म्हणत सावू उठून गेली. पण मनात रुखरुख पेरून गेली...
...आणि आचानक एक दिवस सकाळी सहा वाजताच दारावरची घंटा वाजली. दार उघडून पाहते तर सावू दारात उभी. लठ्ठपणाकडे झुकणारा उभा-आडवा बांधा. गोरा गुलाबी रंग. चेहेऱ्यावरचे गोंदवण खुलून दिसे. "ताई चहाची लई जोरात तहान लागलीय. मी चा पिते नि तुमालाबी बिन साखरेचा करून घेते,' असे म्हणत ती आत आली. हात, पाय, तोंड धुवून तिच्या जवळच्या नॅपकीनला हात, तोंड पुसत गॅसकडे गेली 'घ्या. मीबी पिते नि मग सांगते खबरबात,' असे म्हणत मग मधला चहा चवीने संपवला. कप विसळून पालथे घातले आणि ती भिंतीला टेकून बसली. "ताई परभणीच्या प्रिंसीपॉल वाकडे मॅडमकडे मला तुमी पाठवलत नि माझं लाईफच बदलंल. त्यांच्या पिताजींची मी माझे पिताजी समजून सेवा केली. हागणे मुतणे काढले. अंग पुसून घ्यायची लुळा - पांगळा जीव. डोळे लई बोलके होते. त्यांचा जीव लई खंतवायचा. डोळ्यातून पाणी व्हायचं. मी पाठीवरून हात फिरवीत मायेने विनवायची, 'लेक म्हणजे आपली मायच असते पिताजी. लहानाचं मोठं करताना आई नाही का लेकराची शी काढीत?' मग मातर ते मुकाट्यानं समदं करून देत. ताई तेच पुण्य मला उपयोगी पडलं. मॅडमनी मला सरकारी होस्टेलात हेडकुक म्हणून नोकरी लावून दिली. त्यामुळे विदर्भ, कोकणपण बघाया मिळालं. ...ताई, मी लातुरात तीन रुमचं रोहाऊस बुक केलंय. माज्या नवऱ्यांनं लई मारलं. वकील होता. पन आधीची लफडी. माज्या पाठीवरच्या तापलेल्या सळीने दिलेल्या माराच्या खुणा अजून आहेत. पन मोठ्या जावेचा पोरगा बरा आहे. त्याला लहान व्हता तवा भी माया लावली. तवा असंल चार वरसांचा. त्यानं माझा मारपन पाहिला. तो ममईत असतो. तो मला मदत करतो. त्यानंच हे रो हाऊस पाहून दिलं. पयले दोन लाख भरले. दरमहा तीन हजार देते. पुढच्या मे महिन्यात घराचा ताबा मिळंल. कागदं आनलीत, तुमी ती पाहून घ्यावा. ममईचं पिल्लू लई गोड हाय. तुमी पाठवलंत ती मानसं मानुसकीची हाईत. त्यांना लेकरु सांभाळाया बाई मिळाली म्हनून आले. आपल्या मराठवाड्यातील मानसं कशी मोकळी चाकळी. कुणाच्या खान्या-पिन्याकडे बघनार न्हाईत. तिकडे म्हंजी दोन फुलके बाईला नि दोन पुरसाला. की झालं! मला कसे पुरावेत दोन-तीन फुलके? त्यांचं काम बी झालंय. म्हणून आले परत."
"भैय्याच्या मैत्रिणीचा मुलगा स्पॅस्टिक म्हंजी डोकं पावरबाज पन अंग वाकडे तिकडे, असा हाय म्हने. तिथे बाई पायजे असे भैय्या म्हनले होते. मी जाया तयार हाय. लई मायेने करीन लेकराचं मी. ताई मी बी पन्नास वरसांची झाल्ये की. अजून बारा-पंधरा वरसं उमेदीनं काम करीन, पन फुडे काय ? मी येकटीच. ताई, म्हातारपन येकटीनंच काढायचं का हो? लई रिकामं रिकाम वाटतंय आताच. हे जगणं म्हंजी एक सपन नाहीतर भासच का वो?"
थोडा वेळ निस्तब्ध शांतता. 'येते ताई' असं म्हणून ती निघून गेली.
आला श्वास... गेला श्वास... एक भास!
हवेत विरलेले असे लक्षावधी भास...
□