रुणझुणत्या पाखरा/भादवा : कृषि समृद्धीचा



अंगणात माझ्या
भदव्याचा मोर
आभाळी विहरे
सावळा चकोर..
 घनघोर काळ्याभोर ढगाची गर्दी दक्षिणेकडून घोंगावत येई. आणि अचानक त्यांनी वाट पाहणाऱ्या माझ्या तनामनातून या ओळी उमटल्या. त्यालाही आता ४०/४२ वर्षे उलटून गेली आहेत. तरी ते अंगणं, हिरवे..निळे..सोनसळी पंख पसरून, नाचणारा मोर, सावळ्या मेघांनी गर्द झाकलेले आभाळ अगदी तस्सेच ताजे टवटवित आहे.
 खानदेश उन्हात भाजणारा असला तरी अर्धा भाग सातपुड्याच्या डोंगरमाळा आणि तापी... तप्ती सारखी प्रसन्नपणे धावणारी नदी यांमुळे दुष्काळाचा फेरा सतत घिरट्या मारीत नसे. पण मराठवाड्यात, त्यातूनही बीड जिल्ह्यात आल्यावर जाणवले की दुष्काळ जणू बाहेरच्या ओसरीच्या कोपऱ्यात कायम टेकलेला असतो. त्यामुळे श्रावणभादव्याचे अप्रूप मनात अधिकच रूजले.
 १९७० चा काळ. पोळा आला तरी पेरण्या नव्हत्या. पण गणराया नाचत आले नि त्यांच्या तालावर पोरंसोरंही नाचली. एक दिवस खरात भाऊ सकाळीच आले. चहा घेतांना काहीशा घुटमळत्या आवाजात खाली मान घालून म्हणाले. "ताई जरा पन्नास रुपये मिळतील. लक्ष्म्या उद्याच घरला येतील त्यांच्यापुरता तरी साजाबाजा करायला हवा. ताई लक्ष्म्यांचा सण बामण, माळी, कोष्टी.. समदे अगदी आमी मांग... चांभार सुद्धा साजरा करतो. मालकीणीने सारखा तगादा लावलाय. ताईला नौकरी हाये. त्या नक्की देतील पैशे.. तुमी हे असलं काईपन करीत न्हाई पण आमाला लक्ष्मीला सजिवलं न्हाईतर अपसकुन वाटतो. मन धास्तावतं."
 ...ते शब्द मनात कायमचे रूजले. भारतीय सण, उत्सव, विधी आणि त्यांतील स्त्री प्रधानता यांचा शोध घेतांना फारपूर्वी मनात उगवलेल्या ओळी पुन्हा उलगडू लागल्या. कोकणात भाद्रपद शुद्ध षष्ठीला गौरींना आवाहन केले जाते. तर देशांवर लक्ष्म्या घरी येतात. कोकणात गौरी नदीतल्या खड्यांच्या असतात. काहींच्यात तेरड्याच्या झाडांच्या. देशावरच्या लक्ष्म्या मात्र अनेक घरी मुखवट्यांच्या.. तांब्याच्या लोट्याच्या वगैरे असतात पण लक्ष्म्या घरी येतातच. आणि तो 'कुळाचार' म्हणून श्रद्धेने साजरा होतो. बाहेरगावी असलेले मुलगे, सुना घरी येतात.
 भारतीय जीवन परंपरेने स्त्रीला सुपीकतेचे प्रतीक मानले आहे. जमीन आणि स्त्रीमधील जनन क्षमता मानवाला गूढ वाटली. स्त्रिया या क्षमतेमुळे समाजात सन्माननीय आणि स्थिर झाल्या. अन्नाचा शोध, कंदमुळे शोधणे, पालेभाजी शिजवणे... याचा त्यांनीच शोध लावला. आणि ती सुपीकतेचे प्रतीक बनली. या काळात घरातल्या लक्ष्म्या, सुना माहेरी जात नाहीत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात विधीपूर्वक हा सण आचरतात. मराठी माणूस. परप्रान्तात असला तरी धान्याच्या राशी मांडून पूजा केली जातेच. या संदर्भात स्टारबक हा समाजशास्त्रज्ञ म्हणतो हा सन्मान स्त्रीला शेतीप्रधान अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतून मिळाला आहे. बैलांचा नांगर वापरात येईपर्यन्त स्त्री समाजाच्या केन्द्रस्थानी होते. मुदगलानी ही स्वत: नांगर चालवणारी, शेती करणारी स्त्री होती. अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा हिने आपल्या बुद्धिवान परंतु आळशी पतीच्या हातात फावडे देऊन शेतीकामाला स्वत:बरोबर घेतले.
 लक्ष्म्या हा सण शेतीच्या समृद्धीसाठी असतो. सप्तमीला त्या बसवतात अष्टमीला जेवतात. नवमीला परततात. या उत्सवावर स्त्रियांनी रचलेल्या शेकडो ओव्या परंपरेने गायल्या जातात.
लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
धन्याच्या घरी लक्ष्मी आली.
 सोन्याची पावले ज्येष्ठेची की कनिष्ठेची? ज्येष्ठा कोण? अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले तेव्हा लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी, साक्षात् दारिद्रय... अशुभ... अनिष्टदायिनी बाहेर आली. नंतर लक्ष्मी. तिच्यावर नारायणराव भाळले. पण मोठीच्या आधी धाकटीचा विवाह कसा होणार? मग अलक्ष्मीचा विवाह उद्दालक मुनींशी लावला. तर तिथे आश्रमातले सात्विक वातावरण तिला सोसेना. तिने तिच्या अनिष्ट आवडी निवडी सांगितल्या. मुनी अस्वस्थ झाले. तिला एका अश्वत्थ वृक्षाखाली बसवून ते परतले. ज्येष्ठा अलक्ष्मी पतीची वाटच पहात राहिली. शेवटी आक्रोश करू लागली. तो ऐकून लक्ष्मीनारायण तिथे आले. त्यांनी तिला सांगितले तू इथेच स्थिर हो. दर शनिवारी लक्ष्मी तुला भेटायला येईल. हा वृक्ष पूज्य मानला जाईल. दूर्जनं प्रथमं वन्दे' ही मानवी प्रवृत्ती आहे. दैवत शास्त्रांचे मान्यवर अभ्यासक रा. चिं. ढेरे लिहितात, श्री सूक्तानुसार लक्ष्मी हस्तिनाद प्रबोधिनी, गजलक्ष्मीच्या रूपात आहे. गज हे पुरूषत्वाचे प्रतीक. पाऊस पाडणाऱ्या आभाळाचे प्रतीक, या काळात ज्येष्ठ आषाढात पेरलेली पिके भरात येतात. कणसात येतात. सृष्टीच्या सुफळसंपूर्णतेचे हे दिवस. गौरी बोळवतांना कोकणातली स्त्री विचारते.
आज गौरी जाशील ती कधी गौरी येशील?
पाऊस पडे, गंगा भरे येईन मी भादव्यात
पडवळीच्या फुलांवरनं येईन मी तळपत
पाच पडवळं काढा माझ्या हौशा करवी...

 देशावरची स्त्री म्हणते,
सरिला सरावन भादवा आनंदाचा
आशा पाठमोरी मुऱ्हाळी सुखाचा
पाऊस पडला चिकूल झाला
वहात आली गंगा...
पेरिला मका, धान्य लाल तुरी
पावनीला वाढा भाजी ठेचा आणि भाकरी...

 या पाहुणीला आल्या दिवशी रानातली हिरवी भाजी, ठेचा आणि ज्वारीची भाकरी करतात. दुसऱ्या दिवशी खास जेवण. १६ भाज्या, १६ चटण्या, १६ पक्वान्ने. जणू हा समृद्धीचा, कृषिलक्ष्मीचा सत्कार. अन्न देणारी अन्नदा म्हणून भरपूर पदार्थ करतात. दिवे सुद्धा ज्वारीची... मुख्य धान्याची उकड काढून करतात.
 अलक्ष्मीचे शोभन नाव शुभा आहे. 'शुभा' चा अर्थ शेण असा आहे. शेण... विशेषत: गायीचे शेण जंतुनाशक असते. भारतीय जीवनात मडके, सूप, शेणाचे सारवण, शेणाची गोवरी यांना विशेष महत्व आहे. गोवरीच्या धुराने घर शुद्ध होते.
 रा. चिं. ढेरे यांच्या मते ज्येष्ठा अलक्ष्मी आणि कनिष्ठा लक्ष्मी एकाच देवी संकल्पनेची द्वंवात्मक रूपे आहेत. त्यातून दैवत कल्पनांचा विकासक्रम जाणवतो. लक्ष्मीच्या पावलांच्या रेखाकृती प्रत्येक खोलीत, गाईच्या गोठ्यात फिरतात. ही रेखाकृती धान्याचे भरलेले मापटे, दिवा यांचे संकेत देणारी असते.
 पाणी असेल तरच जमिनीची उर्वराशक्ती सुफलित होणार म्हणून सर्वसाधारणपणे गौर पाण्याजवळ नदी वा तळ्यावर नेऊन विसर्जित करतात. मराठवाडा निजामाच्या सुलतानी सत्तेखाली होता. त्यामुळे असेल कदाचित् पण आपल्याकडे गौरीचे मुखवटे सन्मानाने उतरवून तुळशीपर्यन्त नेतात. निजामाच्या अमलाखाली असलेल्या मराठवाड्यात स्त्रिया रस्त्यावर फिरू शकत नव्हत्या. या दिवशी घरातील स्त्रियांना, सुनांना सन्मानाने प्रथम जेवायला बसवतात. आमच्या आदीम परंपरांनी स्त्री पुरूष यांच्या समान, परस्पर पूरक अस्तित्वाचा सत्कार केला होता. तिला दुय्यम मानले नव्हते.