१. विद्या












शतपत्रांचा इत्यर्थ

पत्र नंबर : १००

 मी आपले श्रम या पत्रांत संपूर्ण करणार. यास्तव या लिखित पत्रशतकाविषयी काही सुचवतो.
 आज दोन वर्षे मी लोकांस त्यांची स्थिती, रीती कशी आहे ती अगदी भीड न धरितां उघड करून सुचविली. त्यात एखादे अक्षर अधिकउणे, शुद्ध-अशुद्ध, कोणास वाटले तर त्यांनी क्षमा करावी. माझे जिवाची पक्की खात्री आहे की, जो कोणी पत्रांचे अवलोकन करील आणि विचार करून पाहील, त्यास प्रत्येक शब्द खरा आहे असे वाटेल. लोकहितवादीने कोणाची मजुरी पत्करली नाही, कशाची अपेक्षा; आशा किंवा इच्छा धरली नाही. कोणाचे सांगण्यावरून किंवा शिकविल्यावरून कृत्रिम वर्णन केले नाही. लाभावर किंवा द्रव्यावर नजर ठेवून कीर्ती व्हावी या हेतूने लिहिले नाही. इतके श्रम जे केले ते लोकांस त्यांची वास्तविक स्थिती कशी आहे ती कळावी. त्यांनी सुधारावे, त्यास इहलोकी सुखवृद्धी व्हावी. परलोकाचे साधन घडावे, व आपले बहुत काळापासून दृढ ग्रह झाले आहेत यांपैकी काही अविचाराने व काही मूर्खपणाने जडलेले आहेत ते कमी व्हावे; किंवा नाहीसे व्हावे, इतक्याच हेतूने मी यथामतीने व स्वइच्छेने वेतनावाचून श्रम केले आहेत व जितके लिहिले आहे तितके अक्षरशः खरे खरे निवडून विचार करून काळजीने लिहिले आहे. हे सर्व लोकांस नजर आहे.
 हे लिखित शतक कोणी बाळबोध अथवा मोडी छापून मुलास लिखितासारखे वाचनास दिले तर बहुत नफा होईल. यास्तव या ग्रंथावर लोकहितवादी आपली सत्ता ठेवीत नाही. पाहिजे त्यांनी ही पत्रे छापून प्रगट करावी. किती एक प्राचीन काळचे लोकांस किती एक लोकहितवादीची मते विपरीत व हिंदुधर्मास विरुद्ध भासतील, परंतु हा त्यांचा मिथ्या भास आहे; कारण की, त्यात हिंदुधर्मास काही विपरीत नाही. फक्त मूर्खपणास मात्र विपरीत आहे. याविषयी विचार केला तर खात्री होईल. यापुढे काही दिवसांनी लोकहितवादी दुसऱ्या शतकास आरंभ करील; परंतु ही गोष्ट ईश्वराचे स्वाधीन आहे. मला वारंवार इतकेच लोकांस सुचवावयाचे की, मी काही व्यर्थ, मिथ्या किंवा असत्य, लिहिले नाही. जे लिहिले ते यथार्थ आहे, असे मला तर खचित वाटते. जे सारासार विचार करणारे, व ज्यांची मने पंडितांसारखी कुत्सित नसून विस्तीर्ण झाली आहेत त्यांस हे समजेल.
 माझी सर्व जनांस एवढीच विनंती आहे की, तुम्ही सर्व जण विचार करण्यास लागा, वाचावयास लागा, नवीन ग्रंथ व वर्तमानपत्रे वाचा व तुमचे शेजारी काय होत आहे याचा विचार करा. इंग्रजांमध्ये किती एक चांगले गुण आहेत व ते तुम्हांस प्राप्त व्हावे म्हणून ईश्वराने त्यांची तुमची संगत घातली आहे हे लक्षात आणा. सारासार पहा, परंपरा आंधळ्याची माळ लावली म्हणून तीच चालवू नका, धर्मशील ईश्वरतत्पर व्हा. या गुणांवाचून सर्व व्यर्थ आहे. सत्य बोला, दुष्ट वासना सोडा, धर्मसुधारणा करा, म्हणजे धर्म टाकू नका. परंतु त्याचा अर्थ घ्यावयाचा तसा काळ पाहून घ्या. व ईश्वरासंबंधी व जगासंबंधी ज्ञान सर्व लोकांस वृद्धिंगत करा. आळस सोडा, तुमच्यामध्ये वास्तविक बुद्धिमान असेल त्यांस पुढारी करा. त्याचे अनुमताने चाला. सर्व लोकांची जूट असू द्या, आपसांत फूट नसावी हे ध्यानात वागवा. विद्या अधिक होऊन तुमचे पाऊल पुढे पडू द्या. सर्व देशाची काळजी प्रत्येक जणाने करावी. राज्य कसे चालले आहे व राजा कोण, त्याची वर्तणूक कशी हे पाहत जा. माहीतगार व्हा.
 तुमच्या प्राचीन काळच्या विद्या, ग्रंथ, तर्क व कल्पना यांचे शंभरपट आता चांगल्या विद्या व अधिक कल्पना निघालेल्या आहेत, त्या सर्व पहा. तुमचे संपत्तीवर तुम्ही लक्ष देऊन आळसात राहू नका. भट व पंडित हे केवळ मूर्ख हे पक्के समजा. खरी नीती कोणती ते पहा. पैसा खाऊ नका, रांडबाजी करू नका. प्रपंच, संसार भलाईने करा, आपले शत्रूसदेखील वाईट इच्छू नका, शरीराने व मनानेदेखील पाप करू नका. प्राणिमात्रावर दया करा, अपराध क्षमा होतील तितके करा, परंतु क्षमा न करण्याचा प्रसंग येईल तेथे क्षमा करू नका, एकमेकांवर प्रीती करा, नित्य उठून ईश्वराचे भजन व प्रातः काळी चिंतन करीत जा, त्याजवळ क्षमा मागा, आपले हातून पापे व अपराध बहुत घडतात. त्यांची क्षमा भगवंताशिवाय करणार समर्थ कोणी नाही. ढोंग, सोंग करू नका, लबाडी सर्वदा ईश्वरास दिसती, यास्तव कदापि करू नका. कोणचेही पाप करू नये, ते फार वाईट, इहलोकी क्षणभर सुख वाटेल, परंतु त्याचा झाडा द्यावा लागेल. मरावयाचे आहे, हे नित्य मनात आणा.
 तुम्ही आपले मुलांची काळजी करून त्यास शहाणी करा, व सर्व लोकांची काळजी करा. नित्य काही तरी सर्व देशाचे कल्याण केल्याशिवाय एक दिवस जाऊ देऊ नका. मुख्य ईश्वरभजन करण्याचा मार्गच आहे की, कोणास दुःख देऊ नये, व सर्व लोकांचे हित करावे, स्वदेशाचे हित इच्छावे, आणि परदेशाची हानि इच्छावी असे नाही. परंतु सांप्रत आपले लोक फार वाईट अवस्थेत आहेत, सबब फार खबरदारी ठेवली की, या लोकांचे कल्याण होईल, तुम्ही आपल्यास योग्य करा, अब्रू वाढवा. पैका मिळाला तर अब्रू वाढते, असे नाही. अब्रू, खरेपणा व निर्मळपणा यापासून उत्पन्न होते.
 विद्या केली तर त्याप्रमाणे वागणूक पाहिजे. नाही तर विद्या व्यर्थ आहे. विद्येचे सार्थक रोजगार नव्हे. ज्यांस विद्येचा अर्थ ठाऊक नाही, ते असे म्हणतात. परंतु फक्त पोटच भरणारी विद्या नव्हे, ती मजुरी आहे. विद्या म्हणजे ज्ञान, जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो, विचारी होतो, समर्थ होतो; उनाड जे लोक आहेत ते विद्येचे तात्पर्य द्रव्य मिळविण्याचे असे समजतात, परंतु विद्येपासून द्रव्यलाभही होतो व दुसरे अनेक लाभ होतात.
 याप्रमाणे तात्पर्य मी निरूपण केले. याप्रमाणे सर्वांनी चालावे आणि असे होण्यास माझे श्रम काही उपयोगी पडले असे दृष्टोत्पत्तीत आल्यास माझे श्रम परिहार होतील. माझे मागणे सर्व लोकांस आहे की, मी जे लिहिले आहे त्याचा विचार करून पहा. तुमच्या चांगल्यावाचून त्या लिहिण्याचा हेतू नाही. तुमचे कल्याण व्हावे म्हणून मी झटतो व तुमच्या चुका वगैरे उघड करून दाखविण्यात तुम्हास रागरोष येईल हे मी मनात आणले नाही. कारण की, माझी उत्कंठा तुमच्या सुधारण्याकडे फार आहे. माझे अंतःकरण सर्व तिकडे आहे. यास्तव मी जे लिहिले आहे, त्याचा तुम्ही विचार करावा. कारण की, जाणे तुमची सेवा एकनिष्ठेने व निष्कपटपणाने केली त्याजवर तुमची इतराजी नसावी. किंबहुना तो काय बोलतो, हे तरी मनन करावे. अस्तु. तुमची आमची गाठ आज दोन वर्षे सतत होती याचा मला मोठा आनंद सर्व काळ वाटेल. सर्वांनी कृपा लोभ असो द्यावा, ही विनंती.

♦ ♦

पुण्यात लायब्ररीची स्थापना


पत्र नंबर ३ : २६ मार्च १८४८

 पुणे येथील पुस्तकगृहाविषयी वर्तमान आपल्यास लिहितो.
 पुण्यासारखे शहरात विद्याशाळा वगैरे बऱ्याच आहेत. परंतु ग्रंथ वाचण्याची जागा अद्याप लोकांस माहीत नव्हती व तिचा उपयोग कोणा नेटीव लोकांस माहीत नव्हता; परंतु सांप्रतचे गवरनरसाहेब सर जार्ज क्लार्क यांनी लोकांचे सुधारणेकडे लक्ष देऊन जड्ज साहेब हेनरी ब्रौन यास सुचविले की, पुण्यात लायब्ररी स्थापण्याचा बेत करावा. त्याजवरून त्यांनी तारीख २८ जानेवारी, साल मजकुरी सर्व लोकांची सभा जमवून त्यास हा मजकूर निवेदन केला. तेव्हा बुधवारचे वाड्यातील इंग्रजी शाळेतील अभ्यासी लोकही पुष्कळ हजर होते, त्या सर्वांनी अनुमोदन दिले व अदालतीकडील चाकरमंडळी व सरदार लोक यांनीही बरे आहे, असे म्हटले. पुण्यातील किती एक आळशी लोकांनी उदारपणाने पैसा दिला नाही. तथापि अजमासे दीड हजार रुपये जमले आहेत.
 सभेपैकी दहा असामी कमिटीत नेमून लायब्ररीचे कायदे ठरविल्यानंतर पुनरपि तारीख ४ थी फेब्रुवारीस दुसरी सभा भरली. त्यावेळेस कमिटीपैकी एके गृहस्थाने विद्येचे उपयोगाविषयी महाराष्ट्रभाषेत एक निबंध केला होता तो वाचून दाखविला. पुण्यातील बहुत गृहस्थांस सांप्रत काळी विद्या आणि ज्ञान काय आहे, याविषयी समजूत नाही व ते आज बहुत वर्षे स्वस्थ घरी बसून इंग्रज सरकारची देणगी खात आहेत. याजमुळे अशा कामात ते झटून पडत नाहीत व त्यांस कितीही समजून सांगितले, तरी त्यांच्या ज्या जुन्या व पोकळ समजुती आहेत, त्याच ते खऱ्या धरतात व त्या बदलण्यास बहुत दिवस पाहिजेत. याच कारणाने दुसरे सभेत आणखी जास्त पैसा जमला नाही; परंतु असे ठरविले की, लायब्ररीचे काम पाहण्यास एक धाकटी कमिटी असावी व तिची नावे त्याच वेळेस लिहिली आणि लायब्ररीयन एक असामी नेमून बुधवारचे वाड्यात कलेक्टरसाहेब यांनी कृपा करून जागा दिली आहे, त्या ठिकाणी तारीख ७ फेब्रुवारीपासून लायब्ररी सुरू झाली.
 अद्याप गृहस्थांपैकी कोणी ग्रंथ वाचावयास व ज्ञान संपादन करावयास येत नाहीत. शाळेतील विद्वान मंडळी, ज्ञानेच्छू व विद्याभ्यासी मात्र येतात. सरदार लोक येत नाहीत. त्याविषयी मला असे वाटते की, आम्ही थोर, चार शिपाई, घोडे, अबदागरी बरोबर घेतल्याशिवाय बाहेर कधी पडत नाही. तेव्हा या लायब्ररीत मुलांसारखे शिकण्यास जावयाची त्यांस लज्जा वाटत असेल; परंतु अज्ञानामुळे आणि अनश्रुतपणामुळे त्यांची अशी अवस्था जहाली. तथापि तिचा परिहारोपाय ते ग्रहण करीत नाहीत, हे आश्चर्य आहे. ज्यांस अन्नवस्त्र मिळते, ते म्हणतात की, आम्हास विद्येची काय गरज आहे व ज्यांस मिळत नाही ते पोटापाठीमागे लागतात. तात्पर्य, अक्कल वाढविण्याचे काम कोणाच्याने होत नाही. असो. या अडचणी काही दिवसांनी दूर होतील व ज्ञानाचे संपादन नेटीव लोकांत चालू होईल.
 सांप्रत काळी तर आपले शास्त्रात व देशात काय आहे व इंग्रज लोक हे कोठून येऊन राज्य करतात व याची व्यवस्था काय आहे, हे कोणास माहीत आहे का ? म्हणून विचारले, तर नाही म्हणून बहुतेक शपथ करतील; तेव्हा कोणाचे अमलात आपण आहो, हे ज्यांस कळत नाही; त्यांचे अज्ञान काय वर्णावे ? परंतु हे दूर होण्याचे साधन गवरनरसाहेबांनी लायब्ररी चालू केली, याबद्दल त्यांची कीर्ती बहुत काळपर्यंत राहील आणि आज नेटीव लोक तिचा लाभ समजत नाहीत, तरी पुढे कधी काळी समजून स्तुती करतील व पुणे येथे मेहरबान ब्रौनसाहेब जड्ज होते, त्यांनी या कामास फार आश्रय दिला, त्यांचे योगाने हे काम सिद्धीस गेले; असे लोक आठवतील, अशी आशा आहे.
 गवरनरसाहेब यांनी हिंदू लोकांचे अज्ञान दूर होण्याचा उपाय पुण्यात केला असे नाही; परंतु नगरासही केला आहे. व इतर ठिकाणी जागोजागचे रेसिडेंट वगैरे अधिकारी यास तसेच करण्याविषयी हुकूम पाठविले आहेत. गवरनरसाहेबांचे प्राइव्हेट सेक्रेटरी कप्तान फ्रेंच यांनी ही प्रवृत्ती चालू करविली, याबद्दल त्यांचेही मोठे उपकार समजले पाहिजेत; परंतु मला फार दुःख वाटते की, आपले लोक ज्ञान संपादन करणे, हे लहान मुलांचे काम असे समजतात, आणि शिकत नाहीत. आता जे असे म्हणणारे आहेत, ते काही जाणतात, असे असते, तर मी क्षमा केली असती; परंतु ते केवळ अडणीवरचे किंवा सांबापुढचे असून, विद्येस असे तुच्छ मानितात व थोडे खावयास मिळू लागले, म्हणजे आपली अप्रतिष्ठा होईल, असे समजून वाचणे व अभ्यास करणे सोडून देतात, याबद्दल वाईट वाटून त्यांचा फार राग येतो. दुसरे, ज्याच्याजवळ द्रव्य आहे, ते मदांध; त्यांस असे वाटते की, आम्हासारखे कोणीच नाहीत. विद्या काय आहे ? विद्येचे सार जे द्रव्य ते आम्हाजवळ आहे, असे त्यांस वाटते व ते आपल्यास सूर्यचंद्राइतके उंच समजतात. ही खोडी नेटीव लोक लवकर टाकतील, तर बरे आहे; पूर्वी यांची हीच खोडी होती; परंतु ती बाहेर व्यंगोर्मीसारखी दिसत नव्हती. कारण पुण्यात पेशव्यांचे राज्य होते व त्यामुळे किती एक प्रतिष्ठेने पैका मिळवीत होते, म्हणून त्यांचे ज्ञान व अज्ञान आजपर्यंत दिसले नाही.
 परंतु आता तो समय नाही. आता बाहेर काय आहे, हे समजून आपली नीट अवस्था कशाने होईल, हे पाहण्याची वेळ आहे. म्हणून नेटीव लोक आळस व गर्व न करतील, तर फार चांगले होईल. अस्तु. हल्ली लायब्ररीत ३०० बुके आहेत व अखबारा चार आहेत. बरेच चालले आहे व पुढे सुधारेल, अशी आशा आहे.

♦ ♦


छापण्याची कला आणि म्हातारपणी लग्न

पत्र नंबर : ७

 छापण्याचे कलेचा उपयोग आता बहुत लोकांस कळू लागला आहे तेणेकरून बहुत लोकांचे डोळे उघडू लागले आहेत. जसे दोन मनुष्य जवळ जवळ बसून भाषण करतात, त्याचप्रमाणे सांप्रत सर्व देशांतील मनुष्ये, स्नेह असो अथवा नसो; परंतु त्यांचे मनोभाव बहुत अंतरावर दृष्टीस पडतात व आपले पत्रद्वारे लोकांची संभाषणे उघडपणी चालतात.
 आमचे मुखांतील ही लघुजिव्हा व आपले पत्र हे बृहत्तर जिव्हा असे समजले पाहिजे. कारण की, त्यांचे द्वारे दूर देशीचे भाषण ऐकावयास येते व प्रतिउत्तर देता येते. असे हे परस्परे मनातील अन्वय कळविण्याचे द्वार आहे. याचा उपयोग जसा इंग्रज लोक करतात, तसा आपले लोक करून शहाणपणा वाढवतील तर फार चांगले होईल. आणि हा समय असा आहे की, आता आपले मनातील गोष्ट उघडपणी निर्भयपणाने सांगता व कळवता येते. असे पूर्वी नव्हते. मागील राजे असे लोकांचे भाषणास मोकळीक देत नव्हते; परंतु राज्याविषयी, धर्माविषयी व आणखी किती एक प्रकरणांविषयी लोकांस बोलण्याचा प्रतिबंध होता. कितीकांच्या जिव्हा व हात तोडले जात होते. पेशवाई कारकीर्दीत कोकणात एक मामलेदार होता; त्याचे कर्म असे ऐकण्यात आहे की, एक स्त्री त्याचा जुलूम पाहून, तुझे अमलाला आग लागो, असे म्हणाली. तेव्हा त्या ब्राह्मण सुभेदाराने त्या स्त्रीचे अंगास लोकर वैगैरे जळावयाजोगे पदार्थ बांधून त्याला आग लावली. अशी क्षुल्लक अपराधाकरिता स्त्री- हत्या केली. ही एकच गोष्ट नाही. अशा मी किती एक सांगेन; परंतु सांगण्याचे प्रयोजन नाही. आपल्या लोकांस त्या चाली माहीत आहेत. तेव्हा त्या दृष्टान्तावरून हल्ली छापखान्याचा किती फायदा आहे की, त्या द्वाराने वाजवी गोष्ट पाहिजे त्याने लिहून कळवावी, वाईट चालीची निंदा करावी, चांगल्या गोष्टी सुचवाव्या. सरकारविषयी व इतर कारभाराविषयी सुलभपणाने व मोकळिकेने बोलावे. अशी मोकळीक मागे कधी तरी होती काय ?
 पूर्व सर्व गोष्टी चोरीने व गुप्तपणाने होत होत्या व सरकारच्या गोष्टीविषयी कोणी बोलता कामास नये. बाजीराव पेशव्याचे अमलात दप्तरातील काही बातमी फुटली, म्हणून तीस कारकून एकदा किल्ल्यावर टाकले. असा प्रतिबंध होता. तेव्हा आता लोकांचे हिताचा समय आहे, परंतु सर्वांनी असे मनात आणिले पाहिजे की, 'तापी- तीरवासी' यांने तारीख १९ वी मार्च रविवारचे पत्रांत मजकूर कळविला, तो पाहून मला वाटते की, याने जे लिहिले आहे, ते सर्व यथास्थित आहे. लग्नासारखे स्वसत्तेतील कामात सरकारचा उपद्रव येणे, हे अगदी ठीक नाही. पूर्वीपासून लग्नाविषयी जो मजकूर आपले पत्रात छापत आहे, त्याजवरून लोकांची खात्री होईल व पुढेही खात्री करण्याकरिता उद्योग चालवून स्वइच्छेने अशा सुधारणा व्हाव्या, हे चांगले. केवळ जबरदस्तीने लोकांकडून पूर्वीपासून चालत आलेली चाल मोडवून नवी रीती काढणे, हे योग्य नाही, अशा गोष्टी लोकांनी समजुतीने मोडाव्या हेच बरे; परंतु कोणी असे म्हणतील की, हिंदु लोक इतके शहाणे नाहीत. तर काय चिंता आहे ? आजचे उद्या होईल; पण आणखी आणखी सरकारचे हातात जाणे, हे त्या उशिरापेक्षा वाईट व जे जबरीने चालू झाले, त्याचा खचितपणा नाही. जा काळी जबरी एकीकडे होईल, तेव्हा पुन्हा लोक पूर्वीप्रमाणेच करू लागतील. तेव्हा उत्तम मार्ग हाच आहे की, ही गोष्ट लोकांच्या मनात अनेक तऱ्हेने भरवून द्यावी आणि हे काम समंजस पंडित आहेत, त्यांचे आहे आणि स्वसंतोषाने लोक समजू लागले, म्हणजे पहिली चाल मोडून नवी चालू करतील. आणि किती एक देशांत असे झाले नाही काय ? पुष्कळ ठिकाणी झाले आहे.
 असे करण्याविषयी मी एक सूचना अशी करतो की, मोठे मोठे शास्त्री अगदी सुज्ञ नाहीत, असे नाही. त्यांनी बरे ही गोष्ट डोकीवर घेऊन सभा जमवून ठरवावी. लग्नकार्य झाले म्हणजे दोन पैशाचे आशेने शेकडो ब्राह्मण जमतात व उड्या घालतात. मग असे लोकहिताकरिता द्रव्याशा सोडून वर्षात एक दिवस का जमत नाहीत ? जर असे चार सभ्य जमतील, तर अशी गोष्ट ठरावात सहज येईल; परंतु मला वाटते की, सांप्रत काळी धैर्यवान लोक थोडे आहेत. सर्व आपले पोटाचा विचार पाहतात. हल्ली पुण्यात किती एक लग्ने होत आहेत, त्यात असे पाहण्यात येते की, पन्नास साठ वर्षांचे पुरुष मरणोन्मुख व गंतुकाम झाले तरी तरुण स्त्री करावयाची इच्छा करतात, व आर्जवी जोशी त्यांस सांगतात की, अमकी मुलगी करा, तिचे जातकात वैधव्य नाही व तुमचे आयुष्य शहाण्णव वर्षे आहे. असे हे जोशी नादी लावून मुलीचा घात करतात. असल्या कर्मास काय म्हणावे ? त्या लग्न करणाऱ्यास, मुलीचा विक्रय करणाऱ्यांस व भटास धिक्कार असो. मागाहून आणखी लिहिण्यात येईल.

♦ ♦


जुन्या समजुती

पत्र नंबर ८ : ७ मे १८६३ (?) १८४८

 आमचे लोकांच्या पुष्कळ मूर्खपणाच्या समजुती आहेत व इतकी ज्ञानाची प्रसृती झाली आहे, तरी लोकांचा वेडेपणा अद्यापि दूर झाला नाही. माझे आढळण्यात ज्या समजुती आल्या आहेत, त्यांची आपले पत्रद्वारे एक यादी प्रसिद्ध करून असे इच्छितो की, कोणी समजदार मनुष्य असेल, त्याने त्याविषयी प्रतिपादन किंवा निषेध करावा. मला वाटते की, या समजुती मूर्खपणाच्या आहेत, किंवा शहाणपणाच्या आहेत, याचा निश्चय झाला म्हणजे संशय जाईल.
 (१) ब्राह्मणाशिवाय अन्य वर्णाने विद्या करू नये. संस्कृत विद्या एकीकडेच आहे. परंतु एकादा मराठा किंवा इतर जातीचा कारकून ब्राह्मणांनी पाहिला म्हणजे त्यांचे अंगाचे तिळपापड होतात, हे काय ?
 (२) ज्ञान व विद्या वाढवू नये. कारण शहाणे व वेडे एका दराने विकतील असे भय बाळगतात.
 (३) जरी कोणी अपराध करूनही ब्राह्मणांची घरे भरली, तरी त्यांस पुण्यवान असे जाणतात, याचे उदाहरण बाजीराव पेशवे यांचे अपराध कोणी मनात आणीत नाहीत. व ब्राह्मण प्रजा त्यांस योग्य मानितात.
 (४) देव ब्राह्मणांकरिता कशीही कर्मे केली तरी चिंता नाही. यास उदाहरणे, कबीराने साधूस जेवण देण्याकरिता चोरी केली, इत्यादि.
 (५) ज्या यंत्राने बहुत लोकांचे काम थोडे माणसांचे हातून करतात, ते चालू करू नये. म्हणजे डाक, छापखाना, टंकसाळ हे कारखाने लोकांचे पोटिस्त बुडविणारे म्हणून त्यांना द्वेष करतात.
 (६)सरकार करील ते करील, सत्तेपुढे शहाणपण नाही.
 (७) सर्व गोष्टी नशिबाने घडतात. शहाणपण व उद्योग यांचा उपयोग नाही.
 (८) सर्व सुख द्रव्यापासून आहे. त्यापलीकडे सुख नाही व सर्व गुणांचेही अधिष्ठान तेच आहे.
 (९) विद्या पोट भरावयाकरिता शिकावी व ती श्रीमंतांनी शिकणे जरूर नाही.
 (१०) देशाचार, वृद्धाचार, शिष्टाचार इत्यादिक जुन्या चालीविरुद्ध आचरण करू नये. मागील चाल चालत आली ती चालवावी. याविषयी आग्रह धरितात.
 (११) वाईट गोष्ट असेल आणि ती चार लोकांचे पोट भरण्याचे साधन असेल तर मोडू नये.
 (१२) घर सोडून बाहेर जात नाहीत व मुलांस वगैरे घरी बाळगण्याविषयी फार उत्कंठा धरितात.
 (१३) मुले, नातवंडे झाली म्हणजे जन्माचे सार्थक झाले, असे वडिलांस वाटते. यास्तव मुलांची लवकर लग्ने करतात.
 (१४) इंग्रजांचे राज्यात पैशास बरकत नाही. पाऊस कमी व जरीमरी फार म्हणतात. व याचे कारण देवताक्षोभ झाला आहे व इंग्रजांचे कायदे व रीती वाईट आहेत म्हणून समजतात.
 (१५) ब्राह्मणाने अपराध केला तरी त्यांस शासन करू नये व त्याचे सर्वस्वी चालविण्यात महापुण्य आहे, असे मानतात.
 (१६) धष्टपुष्ट ब्राह्मणास केला तरी तो धर्म; परंतु आंधळ्या कुळंब्यास किंवा लंगड्या महारास दिले तर तो धर्म नव्हे.
 (१७) पहिल्या लढाया व दंगे वगैरे होते, तेव्हा शिपायांचे पोट भरत होते. आता जिकडे पहावे तिकडे सामसूम झाले आहे, हे वाईट, असे कित्येकांस वाटते. कुळंबी माजले व ब्राह्मण त्यांचेबरोबर झाले, हे वाईट वाटते.
 (१८) उद्योग न करावा, हे थोरपणाचे चिन्ह व थोरांनी वेडे, भोळसर असावे; द्रव्याचा उपयोग इतकाच की, चार लोकांचे चालवावे. स्वस्थ खावे व निजण्यात व स्नान-संध्येत आयुष्य घालवावे हाच थोरपणा असे समजतात.
 (१९) संस्कृत विद्येखेरीज बाकीच्या विद्या व भाषा नरकाचे साधन

आहेत.
 (२०) स्नान-संध्येचा डामडौल करील तो धर्मशील आणि पुण्यवान; मग त्याची वर्तणूक कशीही असो.
 (२१) स्त्रियांना विद्या शिकवू नये; कारण व्यभिचार अधिक वाढेल.
 (२२) थोडा पराक्रम व थोडीसी ब्राह्मणावर भक्ती केली की, ईश्वराचा अवतार म्हणोन त्यांची लोकांत प्रसिद्धी होते. जसे शिवाजी भवानीचा अवतार, माधवराव पेशवे विष्णूचा अवतार, इत्यादी.
 (२३) मुलगा झाला संतोष, मुलीचा संतोष नाही, अशी रूढी आहे.
 (२४) स्त्रियांचा पुनर्विवाह करू नये. कारण की, जिच्या पारब्धी सुख असेल तिचा नवरा मरणार नाही. जी अभागी तिचा मरतो.
 (२५) नवसाने देव पावतो. व मनुष्याचे सुखदुःखावर नवग्रहाचा अमल चालतो; म्हणून त्याचे नावाने ब्राह्मणास दाने वगैरे केली म्हणजे पीडा दूर होते. तसेच दुःशकुन मानणे इत्यादी.
 (२६) स्वार्थ पहावा. लोकांची काळजी करू नये. या अर्थाची म्हण आहे की, 'लष्कराच्या भाकऱ्या कोण भाजतो?' राजाची लेकरे काय खातात, त्यांची चौकशी कशास ? या समजुतीत हिंदु लोक सांप्रत परदेशातील व स्वदेशातील वर्तमानास गैर माहीत. पलीकडचे घरी काय होते, त्याची काळजी शेजारी करीत नाही.
 (२७) आपल्या पाठीमागे कसे होईल, याची काळजी करू नये. 'आपण मेला जग बुडाला' इत्यादी म्हणी आहेत.
 (२८) पुष्कळ पैसा उधळला म्हणजे लोकांत कीर्ती होते मग तो पैसा कोठूनही येवो.
 (२९) यत्किंचित कारणाकरिता खळवाद करतात; आणि भिकारी होतात; पण त्यांस सोडीत नाहीत.
 (३०) परक्याजवळ हात जोडून राहतात; पण आपले स्वकीयाशी लढाई करतात; अशी चाल आपले लोकांची आहे. आपसांत प्राण देऊन भांडतात, पण परक्याच्या लाथा सोसून नम्र राहतात.
 एकूण तीस प्रश्न मी घातले आहेत. हे ज्यांस अमान्य असतील त्याने लिहून कळविल्यास मला फार संतोष होईल. परंतु या समयी मूर्खपणाच्या समजुती इतक्या दृढ आहेत की, त्यांस असे वाटेल की, काय हे प्रश्न ? यांची उत्तरे काय द्यावयाची आहेत ? पण तसे नव्हे. या गोष्टी मोठ्या आहेत व लोकाच्या गैर समजुती जाव्या व त्यांनी सुज्ञ व्हावे अशी इच्छा ज्यांस असेल त्यासच हे पत्र आहे. इतर जे लक्ष्मीचे बंधू आहेत, त्यांचा हिशेब व गणना आमचे मनात मुळीच नाही. ते बोलले सारखे, न बोलले सारखे.

♦ ♦


हिंदु लोकांचा आळशी स्वभाव

पत्र नंबर १९ : २ जुलाई १८४८

 पूर्वी इंग्रज लोक रूमचे बादशाहाचे अमलात होते, त्या वेळेस हे फार दरिद्री व हल्ली हिंदु लोक दिसतात याहूनही मूर्ख होते. यांस राज्यनीती, कायदा, शास्त्र, नेमधर्म काही चांगले नव्हते. व ते रूमचे लोक इंग्रजांची बेटे घेऊन जेव्हा तेथे राज्य करीत होते, तेव्हा गुलाम खरेदी करण्याची चाल होती; परंतु रूम शहरात गुलाम विकावयास आणले म्हणजे लोकांनी पुसावे की, 'हा मुलगा कोणाचा आहे ?' आणि जर विकणाराने सांगितले की, हा इंग्रजाचे बेटातील, तर घेणारे म्हणत, 'अरे छीः ! फुकट दिला तरी नको.' कारण इंग्रज लोक जसे मूर्ख व कुबुद्ध आहेत, तसे कोणत्याही देशातील लोक नाहीत, असे हे लोक म्हणत होते. अशा गोष्टी ग्रंथांतरी वाचितो.
 परंतु आता इंग्रज लोकांकडे पाहिले, म्हणजे ईश्वराचा मोठा चमत्कारिक खेळ आहे, असे वाटते. दोन हजार वर्षांपूर्वी इतक्या मूर्खपणाचे स्थितीत जे लोक होते, ते हल्ली केवढे शहाणपणाचे स्थितीत आहेत ? व हिंदुस्थानातील लोक दोन हजार वर्षांपूर्वी मोठे पराक्रमी होते, त्यांची अवस्था काय झाली आहे ? तेव्हा या दोन्ही गोष्टींचा शोध करणे अवश्य आहे. असे असून आपले लोक किती भ्रांतीत आहेत ?
 दिवसेंदिवस आपले लोकांतील थोरपणा जात चालला आहे. शहाणपण पूर्वीच गेले; नंतर द्रव्यही गेले. म्हण आहे की, 'आधीं शहाणपण जाते, मग भांडवल जाते.' तसेच या लोकांचे झाले आहे. अद्यापि या लोकांस कोण कोठे आहे. पृथ्वीवर रचना कशी आहे, किती प्रकारचे लोक आहेत व राष्ट्र किती आहेत, याविषयी काही कळत नाही. लिहिणे आणि वाचणे झाले म्हणजे मोठी विद्या झाली, असा सांप्रत काळचा घाट आहे; परंतु लिहिणे व वाचणे हे विद्येचे द्वार मात्र आहे, विद्या नव्हे, विद्या पुढेच आहे. परंतु लोकांच्या समजुती इतक्या आखूड झाल्या आहेत की, ते अंधेरात गर्क आहेत.
 इंग्रज लोक इकडे येऊन राज्य करतात व त्यांजकडे आमचे लोक तोंडात बोट घालून चमत्काराने पाहत राहतात. आणि खावयास मिळत नाही, म्हणून चरफडतात. ऐश्वर्य गेले, असे त्यांस वाटते; परंतु याचे कारण काय ? आपले देशाची अवस्था अशी कशाने झाली ? इंग्रज कोठून आले? त्यांचे राज्य कसे आहे व आपण चांगले होण्यास काय उपाय करावा ? या गोष्टींचा विचार कोणी करीत नाहीत. केवळ जनावरांप्रमाणे मारले तर लागते; परंतु पुढे बुद्धी चालत नाही. तद्वत् हे लोक शुद्ध बैल व विचारशून्य आहेत, गर्वाने आपले ब्राह्मण लोक जळतात व इतर लोकांस तर ज्ञानच नाही. व हे असे होणे, तरी ब्राह्मणांचेच कपट आहे, तेव्हा आता इतकाच उपाय आहे की, यांणीं आपले राजे इंग्रज यांचा शोध करावा व त्यांचे देशात जावयाचे नाही, वगैरे ज्या समजुती आहेत, त्या सोडाव्या, म्हणजे त्यांचे शहाणपण यांस येईल.
 एक गोष्ट आठवली आहे, ती अशी- कोणी एक ब्राह्मण आताचे मूर्ख ब्राह्मणांसारिखा होता. त्याचे घरात एक चोर शिरून दागिने उचलून घेऊन चालला; तो ब्राह्मणाचे बायकोने त्यांस पाहून, नवऱ्यास हाक मारून सांगितले की, 'चोरास धरा.' तेव्हा तो म्हणू लागला की, "मी ब्राह्मण आहे, व चोराची जात कोण आहे, याचा मला ठिकाण नाही. तेव्हा मी त्यांस शिवू कसा ? त्याणें कांही नेले तरी चिंता नाही." असे म्हणून त्या ब्राह्मणाने आपले सर्वस्व गमावले, व चोराने ते भाषण ऐकून सावधगिरीने अधिक लाभ करून घेतला.
 आता पहा, या भटाप्रमाणे आमचे लोकांची अवस्था आहे. परदेशचे लोक येऊन इकडे राज्य करतात. आणि हिंदू लोकांचे सारथी ब्राह्मण लोक, ते म्हणतात की, आमचा धर्म अरबांचे व इंग्रजांचे देशांत जावयाचा नाही; व त्याविषयी आम्ही मनात आणणार नाही. सारांश, ते अपवित्र असे म्हणून परकी लोकांस मात्र स्वस्थपणे राज्य करावयास सापडते व आमचा सर्व व्यापार त्यांचे हस्तगत झाला आहे. जर आपले लोक विलायतेत जाऊन तेथील माहितगारी करून घेते, तर आता जसे इंग्रजास भित तसे न भिते. सामान्यतः इंग्रज लोक इकडे आले, म्हणजे स्वर्गाहून इंद्र खाली आल्याप्रमाणे लोकांस वाटून, त्यांजविषयी भय उत्पन्न होते. असा हिंदू लोकांचा गरीब स्वभाव, यामुळे ते हतवीर्य झाले आहेत. त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही व मूर्खपणा फार वाढला आहे.
 सगळे लोक आपले ठिकाणी शहाणे म्हणवितात; परंतु यांस इंजिनियर इंग्रज पाहिजेत, प्रोफेसर इंग्रज पाहिजेत. डॉक्टर इंग्रजच पाहिजेत, जड्ज (जज्ज) व बारिस्टर तेच पाहिजेत, सर्व कारखाने त्यांचेच हाती. आमचे लोक त्यांचे दास्यत्व करण्यास देखील योग्य नाहीत. हे काय ? पाचशे वर्षे मुसलमानांची गुलामगिरी केली व आता शंभर-दीडशे वर्षे इंग्रजांची गुलामगिरी करतात, परंतु अद्यापि आमचे लोकांस काही ठाऊक झाले नाही.
 तथापि इंग्रजांनी आपली विद्या प्रगट केली, हा त्यांचा मोठा उपकार आहे. व येणे करून लोक शहाणे होतील. हिंदू लोक इतके मूर्ख आहेत की, इराण, तुर्कस्तान व अरबस्तान येथून मुसलमान लोक हिंदुस्थानात येऊन घरे बांधून राहिले, परंतु हिंदू लोकांस त्यांचे काही वर्तमान ठाऊक नाही व हिंदू दुसरे एखादे मुलखात गेले आहेत, असे कधी आढळणार नाही. परमुलखाचे लोक येऊन हिंदू लोकांचे हातचे हिसकावून घेऊन खातात व मानेवर जोखड ठेवून राज्य करतात; पण इतके सर्व सहन करून आहेत. यांच्या मध्ये बळ, शूरत्व किवा शक्ती कमी आहे असे नाही; पहिल्याने याणीं सर्व हिंदुस्थान जिंकले होते; परंतु यांस राखावयाचे शहाणपण नाही; याजमुळे हे गमावून बसले.
 शास्त्रात अटक, गंड व पापनाशी इतक्या नद्यांविषयी असे लिहिले आहे की, पापनाशी नदीस स्पर्श करू नये; गंडकीत चालू नये; व अटक नदी उतरून पलीकडे जाऊ नये व याचा हेतू इतकाच दिसतो की, त्या नद्या अवघड व जरा भयंकर आहेत. याजमुळे कोणी धीर करून त्यात जाईल आणि मरेल तर ते न व्हावे. यास्तव त्याणी हे शास्त्रार्थ लिहिले; परंतु दुसरे मुलखात जाऊ नये, असा त्याचा अर्थ नसेल असे वाटते. आणि जर कदाचित असला, तर ती शास्त्राज्ञा मानण्याची काही जरूर नाही. ज्या वेळेस ते शास्त्र झाले, त्या वेळेस दुसरे लोक इकडे आले नव्हते, याजमुळे ते शास्त्र योग्य, पण आताचे अवस्थेत ते मानून मूर्खाप्रमाणे उगेच बसणे, याचे कारण काय ?
 जेव्हा ही मते मोडून हिंदू लोक परदेशात जाण्यास सिद्ध होऊन मूर्खपणाचे कायद्यातून खुले होतील, तेव्हाच त्यांचे हातून काही पराक्रम होईल. युगपरत्वे करून शास्त्रही फिरले, असे समजले पाहिजे. आणि सर्व शास्त्रांचा मतलब हाच की, धर्म रक्षावा. सिंधू नदीपलीकडे जाऊ नये, हे कशाकरिता ? धर्म रक्षावा आणि म्लेंच्छांचा स्पर्श होऊ नये म्हणून; परंतु म्लेंच्छच इकडे आले, तेव्हा आपण पलीकडे जाण्याचे कामी शास्त्र एकीकडे ठेवले, तरी चिंता नाही, असे मला वाटते.

♦ ♦


नशिबावर हवाला


पत्र नंबर २४ : ३० जुलाई १८४८

 जे सोंगट्या व बुदबळे खेळतात त्यांस माहीत असेल की, सोंगट्याचे खेळात काही बुद्धी नाही. फाशास दान पडेल त्याप्रमाणे जय किंवा अपजय होतो. खेळणार मोठा बुद्धिमान असला तरी त्याचे बुद्धीचा काही उपयोग नाही. फाशाचे स्वाधीन तो असतो. तसे बुदबळाचे खेळात नाही. त्यात बुद्धीचा उपयोग आहे. जो शहाणा असेल, तो जिंकील, असा निश्चय करता येतो. सोंगट्यात कोणाचा निश्चय होत नाही.
 तद्वत् ज्या देशांत लोक शहाणे व राज्य शहाणपणाने चाललेले असते तेथे शहाणपणा वाढेल, असा निश्चय आहे. क्वचित न होईल तर ती गोष्ट खेरीज आहे. अस्तु. बहुधा नियम असा आहे की, जे लोक शहाणे आहेत ते उद्योगवादी असतात. व मूर्ख आहेत ते प्रारब्धवादी असतात. कारण उद्योगाने सिद्धी होते, हे ते जाणत नाहीत. हिंदू लोक जेव्हा तेव्हा नशीब व प्रारब्ध म्हणतात. आणि हे वास्तविक पाहिले तर खरेच आहे. कारण लोक मूर्ख असले म्हणजे तेथे शहाण्याने अशी उमेद धरू नये की, माझी अब्रू वाढेल व वेड्याने असे म्हणू नये की, मी नेहमी वेड्याचे योग्यतेनेच राहीन. एका पुरुषास दोन स्त्रिया असल्या म्हणजे त्या स्त्रिया आपल्या युक्तीने त्याचे अंतःकरण हरण करतात. परंतु तो जर वेडा असेल तर गुणी स्त्री असेल तिजवर प्रीती करीलच याचा नेम नाही. तो आपले अंतःकरण मूर्ख स्त्रीकडूनही वश करून घेईल, सांप्रत काळी हैदराबाद मुसलमानांची राजधानी आहे व पुणे ही ब्राह्मणांची राजधानी होती. परंतु दोहो ठिकाणी असे होते की, कोणाची चहा होईल आणि कोणाला लोक चांगले म्हणतील याचा नेम नाही. चांगल्या-वाईटाची परीक्षा नाही. ज्याचे प्रारब्ध उघडेल त्याची अब्रू एकदम वाढेल. तेव्हा कोण कोणास लुटतील व कोण कोणाची अब्रू घेतील, याचा भरवसा नाही. शहाणपणा व वेडेपणा याचा काही उपयोग नसे. फक्त नशिबावर हवाला.
 बाजीराव पुण्यात होता, त्यावेळी अशी अवस्था होती की, जे आज भाकऱ्या भाजीत होते, ते उद्या पालखीत बसले आणि आज पालखीत होते उद्या भिकेस लागले. तसेच ब्राह्मण व भट यांना दानधर्म करण्यास तो कर्णाचा अवतार होता. परंतु सत्पात्राचा विचार नाही. म्हणून ज्याचे नशीब उघडे त्यांस मिळत होते. तस्मात् अशा अनियमित राज्यांत राहणे मोठे दुर्भाग्य होय. व यावरून असे दिसे की मुख्य नशीब म्हणण्यास कारण हेच आहे. जर व्यवस्था सारखी होईल व योग्यतेनुरूप प्रतिष्ठा वाढेल तर नेम झाला. मग कोणी प्रारब्ध म्हणणार नाही. जोपर्यंत राज्य बेबंद आहे तोपर्यंत नशीब हा शब्द लोक उच्चारतील. कारण त्यांस त्याचा दाखला प्रत्यक्ष येतो की, शहाण्याचा वेडा आणि वेड्याचा शहाणा घटकेत होतो. यास्तव असे होऊ नये म्हणून कायदे व शास्त्र असले पाहिजे. मनुष्याचा धर्म हाच आहे की, जोपर्यंत आपली अक्कल चालेल तोपर्यंत त्याने चांगले होण्याचा मार्ग स्थापन करावा. उद्योग सोडू नये. उद्योगाने फळ येत नाही, असे होण्यास कारण मनुष्यच आहेत. राजा चांगला असेल तर वाईट कोण, चांगला कोण, याची निवड होईल.
 वर्तमानपत्रे असावी, याचे कारण हेच आहे की, सरकारांनी किंवा कोणीही अन्याय केला तर तो प्रकट होतो व येणेकरून त्याचा काही बंदोबस्त होतो. ज्याची चूक त्यांस कळली म्हणजे तो दुसऱ्याने ती करीत नाही. याजकरिता लोकांचे मत प्रगट व्हावे, हा उत्तम मार्ग आहे. ज्यांस थोरपणा मिळतो त्यांस असे वाटत नाही की मी कमी शहाणा आहे. त्यांस सगळा शहाणा मी व अर्धे शहाणे बाकीचे सर्व जग आहे, असे वाटते. याजमुळे लोकांची स्तुती तो पसंत करतो. यास्तव वर्तमानपत्र असले म्हणजे तसे न होता मोठी सुधारणा होते.
 तात्पर्य, नशिबाचे कारण लोकच आहेत. व ही घालमेल त्याचे मूर्खपणामुळे होते. गहू आणि जोंधळे सारखे विकू लागले म्हणजे अर्थातच लोक नशिब म्हणू लागतात. आणि यापासून आळस उत्पन्न होतो व उमेद खचते. व कोणी योग्यता मिळविण्याची काळजी ठेवीत नाही. त्यांस असे वाटते की, मी व्यर्थ इतकी विद्या केली व शहाणपण शिकलो. येथे सकट घोडे बारा टक्के आहेत. त्यापेक्षा कोणी काही शिकू नये व विद्या करू नये, असे मनात येते. आणि मग यत्नाची अशी प्रवृत्ती पडते की, कोणाचे आर्जव, कोणाची गुलामगिरी करावी, म्हणजे काही पोटाची सोय होईल. वास्तविक थोरपणा मिळवावयाचा जो यत्न तो सोडून नीच कर्मास निर्वाहाकरिता लोक लागतात. याप्रमाणे हा सर्व अनर्थ लोकांचे अज्ञानामुळे किंवा राजाचे मूर्खपणाने होतो, याचा निश्चय होत नाही.
 तथापि आमचा अभिप्राय असा आहे की, याचे कारण लोकांचे अज्ञानच आहे. जर लोक शहाणे आहेत, तेच राज्यावर बसतात, हा निश्चय आहे. कसेही लोक मूर्ख असोत परंतु जे राज्यावर बसतात ते त्या वेड्यातील शहाणे असतात. पहिल्याने जो राज्य मिळवतो तो शहाणा व मग त्याचे वंशात मूर्ख निपजतात आणि राजवंशातील म्हणून लोक त्यांस मानितात; हा त्यांचा मूर्खपणा आहे. प्रथम राज्य संपादन होणे ते त्या राष्ट्रातील जे शहाणे असतात त्यांसच होते. संपादकांस काही तरी विशेष शहाणपण असल्याशिवाय राज्य मिळावयाचे नाही. लोक शहाणे असतील तर बहुतेक अनर्थ टळतील.
 परंतु हिंदुस्थानातील लोक अगदी गयाळी आहेत. त्यांस काही कळत नाही. अद्याप हे झोपेत आहेत. वास्तविक पाहिले तर लोकांमध्ये गुणावरून किंवा विद्येवरून कोणाची योग्यता व मान्यता नसते. जो अमलावर आहे किंवा मोठ्या द्रव्याचे मालकीवर आहे, त्यांस लोक शहाणा समजतात. कवीने वास्तविकच म्हटले आहे की, 'सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते ।' हे उदाहरण या लोकांस बरोबर लागू आहे. जर मोठे विद्वान असले आणि गरीब असले तर त्यांस कोणी विद्वान म्हणत नाही. मध्यम असला तरी चिंता नाही, त्याजवळ द्रव्य किंवा अधिकार असला म्हणजे त्याएवढा मोठा कोणी नाही. व त्याची प्रशंसा लोक करतात. असा संप्रदाय आहे. या इतक्या अज्ञानास कारण पाहिले तर मला एक असे दिसते की संस्कृत भाषेत जे ग्रंथ आहेत ते सर्वांस कळत नाहीत. आता संस्कृत भाषेत पाहिजे ते सर्व आहे असे नाहीच. पण आहे तितके कळले तरी लोक शहाणे असते.
 संस्कृत भाषेत ग्रंथ थोडे, भूगोल आणि इतिहास हे मुळीच नाहीत. पुराणात किती एक ठिकाणी असे लिहिले आहे की, हिमालयाचे पलीकडेस किती एक देश आहेत. तेथे अमुक अमुक लोक आहेत. याजवरून तेव्हाचे लोक आताचे सारखे कैदेत नव्हते असे समजते. जरी या ग्रंथास बहुत दिवस झाले व त्यात लिहिले आहे त्याशी आता किती एक गोष्टी मिळत नाहीत, तत्रापि ही गोष्ट खरी आहे की, त्या वेळेस हिंदू लोक सर्वत्र जाऊन विद्या, वाढवीत होते. विद्या म्हणजे स्वदेशात व जे इतर देशात आहे ते सर्व आपल्यास कळावे, याचेच नाव विद्या. अलीकडे किती एक मूर्खपणाचे समजुतीमुळे लोक कैदेत आहेत. म्हणजे त्यांच्या पायात बिड्या आहेत. त्यांस इकडचे इकडे हलवत नाही. जागच्या जागी श्रमी होतात आणि बिड्या तोडावयाजोग्या असूनही ते स्वस्थ दुःख भोगितात, हे आश्चर्य आहे. तात्पर्य बहुत दिवस एखादी गोष्ट चालली, म्हणजे ती सोडवत नाही. विचार असला तरी अंध होतात. आपली सुधारणा कोणते रीतीने होईल, याचा विचार करीत नाहीत. त्यात एकमेकांचे द्वेष व मत्सर फार; याजमुळे कोणी कोणास पुसत नाही. व अशी स्थिती जोपर्यंत आहे, तोपर्यंत यांचे कल्याण होणे दिसत नाही. जोपर्यंत उत्तर देशचे लोक इकडे येत नव्हते. तोपर्यंत हे चालले. आता चालणार नाही.

♦ ♦


इंग्रजी विद्या


पत्र नंबर ३१ : १५ ऑगस्ट १८४८

 पुणे शहरात प्रथम १८३२ साली इंग्रजी शाळा घातली, तेव्हा लोकांची अशी समजूत होती की, इंग्रजांचा स्पर्श झाला तर स्नान करावे व इंग्रजांची भाषा शिकली, तर ब्राह्मणपणा जातो. याजमुळे त्या समयी रॉबर्टसनसाहेब कलेक्टर यांनी आर्जवाने गृहस्थांची मुले थोडीशी जमविली. नंतर काही दिवसांनी पुष्कळ लोकांच्या समजुती बदलल्या आणि खुषीने मुले पाठवू लागले; परंतु पहिल्या समजुतीचे ब्राह्मण अद्यापि बहुत आहेत. त्यांच्याने लोकांस इंग्रजी शिकण्यापासून तर बंद करवत नाही; परंतु आपल्या मंडळींत ते असे बोलतात की, जे इंग्रजी शिकले आहेत, ते नास्तिक, निर्दय, अधर्मी, अमर्याद आहेत. परंतु त्यांची योग्यता पाहिली, तर ते केवळ मूर्खाचे शिरोमणी आहेत. जरी त्यांस लिहिता वाचता येते, तरी ते पंडित नाहीत. त्यांची समजूत इतकी क्षुद्र आहे की, लिहिणे आणि वाचणे ही तमाम विद्या, यापुढे त्यांस काही कळत नाही. तत्रापि त्यांस वाटते की, आम्ही सर्वज्ञ आहो. आता असे गर्विष्ट मूर्ख लोक आहेत, त्यांना उत्तर देणे योग्य नाही. कारण की, शुद्ध वेड्यांशी वाद करणे निर्फळ आहे. जरी माझे म्हणणे असे नाही की, केवळ इंग्रजी लिहितात आणि बोलतात ते विद्वान, असे मी म्हणत नाही. कारण की जे कुलकर्णी असतात ते लिहितात. त्यांस पंडित कोणी म्हणावे ? तसेच जे केवळ 'रायटर'च आहेत त्यांस विद्वान म्हणणे अयोग्य आहे; परंतु ज्यांनी विद्येचे रहस्य जाणले आहे व बहुश्रुत आहेत, त्यांचा मात्र पक्ष आम्ही घेतो. आणि आम्हांस ठाऊक आहे की, एक इंग्रजीतील विद्वान आणि शंभर संस्कृतांतील पंडित आणि एक लक्ष कारकून व दोन लक्ष भट हे सारखे कदाचित होणार नाहीत. भटांचे वर्णन आम्ही एके ठिकाणी केले आहे. हल्ली कारकुनांचे थोडेसे करितो.
 ब्राह्मण लोक कारकुनीचा धंदा फार करतात, आणि गृहस्थ म्हणवितात. परंतु वास्तविक पाहिले, तर त्यांस कळते काय ? संध्येची अक्षरे साळुंखीसारखी किंवा राघूसारखी पाठ करतात. मोडीचे लिहितात, वाचतात. साधारण कामकाज कारकुनीचे करता येते. परंतु हे मोठे प्रतीचे मजूरदार, जसे सुतार, न्हावी, धोबी तसेच ब्राह्मण कारकून; यांत त्यांचा विद्वानपणा काहीच नाही. हजारो कारकून आहेत; परंतु एकाने एक ग्रंथ तरी जन्मादारभ्य रचला आहे ? शहाणपणाची गोष्ट बोलण्यास एक क्षण घालविला आहे ? असे शुभ जे आहेत, त्यांची योग्यता किती ? ज्यांनी चार शास्त्रे अध्ययन केली आहेत. त्यांचीदेखील योग्यता इंग्रजीतील पंडिताशी बरोबर नाही. कारण की, मुळी आधी संस्कृत भाषेत ग्रंथ आहेत किती ? ग्रंथांचे संख्येवरून विद्येची तुलना होते, हा नेम आहे. सर्व पुस्तके जर जमा केली, तर फार झाले तर एक कोठडी भरेल. तेव्हा तितकी वाचली किंवा अवलोकन केली, त्याचे शहाणपण सारखे कसे होईल ? जितके बीज तितके पीक. ज्याने पायलीभर दाणे पेरले आणि ज्याने खंडीभर पेरले, त्याचे उत्पन्न सारखे कसे होईल ?
 इंग्रजीमध्ये तर कोट्यवधी ग्रंथ आहेत. त्यांत अनेक विद्या आहेत. तितक्या संस्कृतात नाहीत. चौदा विद्या आणि चौसष्ट कला इतकी संख्या जेव्हा हिंदू लोक फार शहाणे व पराक्रमी व विद्येवर लक्ष देणारे होते व जेव्हा व्यासवाल्मीकी होते, तेव्हा इतकी गणना झाली आहे. परंतु इंग्रजीत एक हजार विद्या आहेत. प्रत्येक विद्येवर हजारोंच ग्रंथ आहेत. संस्कृतात काही विद्या इतक्या सूक्ष्म आहेत की, एक विद्येवर एक ग्रंथ, जसा युद्धविद्येवर धनुर्वेद. दुसरा ग्रंथ नाही व धनुर्वेदही नाहीसा झाला. कोणी वाचीन म्हणेल, तर मिळावयाचा नाही. आणि इंग्रजीत जसे म्हटले तसे आहेत.
 याचे कारण संस्कृतातील विद्येचे चाहाणारे ब्राह्मण होऊन गेल्यास दोन तीन हजार वर्षे झाली. तेव्हापासून ब्राह्मण मूर्ख झाले. विद्या म्हणजे काय, हे देखील विसरले. त्या शब्दाचा अर्थही त्यांस कळत नाही आणि जसे हिंदू लोक व्यासाचे वेळी विद्याप्रवीण होते, तद्वत इंग्रज आता आहेत. त्यांचे चित्त विद्येवर फार व ते ज्ञानी बहुत झाले व त्यांचे ग्रंथ फार उपयोगी आहेत. हिंदू लोकांचे ग्रंथ जेवणावळीचे आहेत. तर इंग्रजी पंडित तो संस्कृतातील पंडितांशी सारखा कसा होईल ? अशी जेव्हा पंडितांची गती, तेव्हा कारकून आणि भट हे काय पदार्थ ? हे तर कसपटे दिसतात. जो इंग्रजीतील पंडित आहे, त्यांस किती विद्येचे ज्ञान असते ? त्याची समजूत केवढी विस्तीर्ण ? आणि त्याचा विद्वानपणा केवढा? त्याची योग्यता लोक समजत नाहीत. त्यांस दूषण लावितात. इंग्रजीतील विद्वानांची अशी योग्यता आहे की, त्यांस कोणताही विषय सांगा, त्याविशी तो ग्रंथ लिहू शकेल, कोणत्याही विषयावर बोलू शकेल. जे जे या पृथ्वीत आणि आकाशांत आले, ते सर्व त्यांस ठाकठीक दिसते. आणि चंद्र फिरतो; याचे आश्चर्य त्यांस वाटत नाही. दगड वरती उडविला, म्हणजे खाली पडतो, याचेदेखील कारण त्यांस माहीत आहे. तात्पर्य त्यांस कोणत्याही विषयी आश्चर्य वाटत नाही.
 कारकून हे भटाचे पंक्तीचे आहेत. मूळ हिंदू लोकांमध्ये विद्येचे मान इतके कमी आहे की, त्यांस विद्या म्हणजे काय, हे अश्रुत आहे. जर कोणाची विद्या वर्णन करणे झाल्यास म्हणतात की, अमका केवढा शहाणा ! पत्र लिहितो ! मजकूर जुळून लिहितो. अक्षण चांगले सुंदर. आता हे काही विद्वानाचे वर्णन झाले नाही, विद्वान म्हणजे काय, ज्याची बुद्धी विशाल, ज्याने नवीन ग्रंथ ऋषीसारखे लिहावे, ते विद्वान. हल्ली गृहस्थास यातील काही ज्ञान नाही. त्यांस धर्म म्हणजे काय, याचा अर्थ पाच हजार कारकून गोळा केले आणि पुसला तर सांगू शकणार नाहीत व संध्या कशाकरिता करतात, हेही कोणास ठाऊक नाही. असे अंधारात जे लोक आहेत, त्यांस विद्येचे मूळ काय ठाऊक ?
 इंग्रजी विद्वान पूर्वी हिंदुस्थानात एक असता, तर राज्य न जाते. हे भट कारकून असे मूर्ख जमा झाले. म्हणूनच हे राज्य बुडाले. विद्या पहिल्यासारखी असती, तर हिंदू लोकांची अशी अवस्था न होती; परंतु ही जनावरे पाहिजे तेथे दोरीने बांधावी अशी गरीब, म्हणून असे झाले. पुढे जरी हिंदू लोकांचे कल्याण झाले, तर इंग्रजी पंडितांचे हातून होईल, यात संशय नाही. कारकून व भट हे क्षीण झाले म्हणजे इंग्रजी विद्या वृद्धिंगत झाली म्हणजे हिंदू लोक पूर्वस्थितीवर येण्यास उशीर नाही. हल्लीचे गृहस्थ व इंग्रजी शिकणारे विद्वान यांचे वैमनस्य असण्याचे कारण असे आहे की, त्यांची यांची मते मिळत नाहीत. कारकुनास असे वाटते की, अंगरखा घालणे व गंध लावणे व आणीचा जोडा घालणे, हाच आमचा धर्म. तसे इंग्रजी विद्वानास वाटत नाही. कारण की, हे ज्ञानी आहेत. तेव्हा त्यांची मते वास्तविक आहेत. ते म्हणतील डावे हाताने गरिबास पैसा दिला, तरी सारखाच, उजवे हाताने दिला तरी सारखाच; परंतु कारकुनास वाटते की, ज्या हल्ली चाली आहेत, तोच धर्म. चाली व रीती आणि धर्म यांचा भेद त्यांस कळत नाही. चालीस व रीतीस व धर्मास सारखेच मानतात; कारण ते अक्षरशत्रू आहेत व चालीविरुद्ध कोणी बोलेल, तर त्यांस नास्तिक म्हणतात. नास्तिक म्हणजे काय, हेही त्यांस कळत नाही, परंतु ऐकीव शब्द माहीत आहेत. तसेच निर्दय म्हणण्याचे कारण असे आहे की, गरिबास व विद्वानास धर्म करावा, ते जाऊन दुसऱ्यास देणे यास धर्म समजतात. शहाणे आहेत ते तसे करीत नाहीत. म्हणून त्यांस असे वाटते की, हे निर्दय आहेत. जो विद्वान आहे, तो गरिबास धर्म करितो; परंतु ब्राह्मण, कारकून व भट यांच्या अशा समजुती आहेत की, दांडग्या व मूर्ख भटास धर्म करावा. अधर्मी म्हणतात की, यांचे कारण असे आहे की, धर्म म्हणजे काय, हे यांस ठाऊक नाही, म्हणून असे म्हणतात.
 वास्तविक पाहिले, तर इंग्रजी विद्वानांप्रमाणे मला धर्मिष्ट कोणीच दिसत नाही. तो अनुभवेकरून व ज्ञानेकरून ईश्वराचे प्रतिपादन करितो. सर्वत्र तो आहे असे त्यांस वाटते. त्यांस सर्वत्र ईश्वर दिसतो. ते त्याचे भजनात तत्पर असतात, व जे कर्म करतात, ते सर्व ईश्वरार्पण करतात व त्याची स्तुती करून कायावाचामनेकरून ईश्वरास भजतात. कारण की, इंग्रजीत ईश्वराविषयी अनेक ग्रंथ आहेत. व इतर देशांतील जे सर्व ईश्वरी ज्ञान आहे ते सर्व इंग्रजीत आहे, व त्या ग्रंथांचे तर्जुमे त्या भाषेत आहेत. याजमुळे शंभरपट जास्ती ज्ञान इंग्रजीत आहे. आणि अमर्याद म्हणण्याचे कारण असे आहे की, हिंदू लोकांची त्यात कारकून व भट यांची मुख्यत्वेकरून अशी चाल आहे की, गुलामगिरी करावी. तोंडदेखले बोलावे. खुशामत करावी. दुसऱ्यास बुडवावे. उगाच या- बसा इत्यादी फसविण्याकरिता मानपान करतात, आणि त्यांस मर्यादा असे म्हणतात; परंतु ही मर्यादा नव्हे. वास्तविक ज्ञानी आहेत, ते लबाडीचा व्यवहार करणार नाहीत, व गुलामाप्रमाणे कोणाची मर्यादा करणार नाहीत. ते खरेपणानेच चालणारे. त्यांस हे कपट कशास पाहिजे ?
 कारकून हे बहुधा भडवेपणात असतात. जसा वरिष्ठ असेल व बोलेल तसे बोलावे. कोणीकडून तरी आपले पोट भरावे. लाज राहू न राहू ! ईश्वराचे नाव तर त्याचे मनात मुळीच नाही. ईश्वर आहे याची खात्री असेल, तर त्याचे भय मानतील. बहुधा हिंदू लोकांमध्ये मर्यादा हा गुण नाहीच. कपटाशिवाय कोणाची कोणी मर्यादा करीत नाहीत. एखादा मोठे कामावर असला, म्हणजे त्यांस पुष्कळ लोक चांगले म्हणतात. मेजवान्या करतात; परंतु ते सर्व मायावी मनापासून नाही, परंतु जे विद्वान आहेत, त्यांचा स्नेह, मर्यादा आणि मायाही अशी नसते. ते निष्कपटाने, निर्मळ अंतःकरणाने वागणारे असतात. यामुळे लोकांस अमर्यादा वाटते. त्यांची अशी समजूत आहे की, कोणी लबाडलुच्चा असला, तर त्याचा मान करावा, त्यांस थोर म्हणावे; परंतु विद्वान हे कसे करील ? तसल्या थोरास तर लाथ मारणार. म्हणून अमर्याद म्हणतात, परंतु तसे नाही. आपण गर्दभ असले तरी घोड्यास ओळखावे, हे चांगले.
 तात्पर्य, पुण्यातील व बाहेर ठिकाणच्या ब्राह्मणाच्या मूढपणाच्या समजुती लवकर जातील, तर बरे होईल. सारांश, इंग्रजी विद्वान यांचा पक्ष आम्ही सिद्ध केला आहे. आणि तो वास्तविक आहे, परंतु ब्राह्मणाच्या मूर्ख समजुती, याजमुळे ते भलतेच समजतात.

♦ ♦


अर्थशून्य ब्राह्मणविद्या


पत्र नंबर ३३ : २९ आक्टोबर १८४८

 आपले लोकांत ज्ञानशून्यता जहाली आहे. तिचे प्रबळ कारण असे आहे की, लोक अर्थाखेरीज विद्या शिकवतात. ब्राह्मण लोक वेद पाठ करतात. परंतु अर्थशत्रू असतात. तसेच गृहस्थ सहस्रनामे, स्तोत्रे इत्यादी म्हणणारे पुष्कळ आहेत, परंतु अर्थाविषयी शून्य. येणेकरून फक्त तोंडाची मात्र मजुरी करतात आणि मनाचा काही उपयोग करीत नाहीत.
 कोठे कीर्तन व पुराण असले म्हणजे लोक जातात; परंतु कोणी मौज पहावयास जातो, कोणी उगाच दिवे पहावयास जातो, कोणी तंबाखू खात बसतो; कोणी अर्वाच्य भाषणे बोलत असतो; परंतु देवालय पवित्र जागा हे कोणाचे लक्षातच नसते. तसेच भट वेदपाठास जमले, म्हणजे याचप्रमाणे अवस्था होते. व स्वतः म्हणणारे तेही आपले लक्ष देवाकडे लावीत नाहीत. तंबाखू व भांग ओढीत असतात. तसेच लोक पूजा व संध्या करतात; परंतु पुष्कळ गृहस्थांचे येथेही मी असे पाहिले की, पूजेची खटपट रूप्याचे देव्हारे शोभेकरिता मांडतात व ढोंगाकरिता रुद्राक्षाच्या माळा व सोंगाकरिता भस्म लावितात; परंतु मनात तर काही एक नाही; आणि संपूर्ण दरबार कारभार तो रिकामा वेळ समजून करतात. तेव्हा सांप्रत काळचे लोकांमध्ये वास्तविक देवाचे भजन नाही. अक्षरे मात्र पाठ म्हणतात; परंतु अक्षरांनी काही उपयोग आहे काय ? नुसते पाठ म्हणण्याने पुण्य आहे. असे समजतात हेच सर्व धर्म बुडवावयास, व अज्ञानास मूळ झाले आहे. ब्राह्मण मोठा दशग्रंथी म्हणवितो, परंतु त्यांस एका शब्दाचा अर्थ समजत नाही. ज्योतिष, छंद व व्याकरणाचे सूत्र इत्यादी पाठ म्हणतो. आता यासारखा मूर्खपणा कोठे आहे ? व्याकरण, अष्टाध्यायी पाठ म्हणून त्याचा काही उपयोग नाही. जर समजले तर त्याचा उपयोग. ते न होता फक्त पाठ म्हणतात आणि आम्ही विद्वान ब्राह्मण म्हणवितात. त्यांची विद्या कोठे आहे ? जर मनुष्य अर्थ समजणार नाही आणि शब्दांची ध्वनी मात्र करील तर म्हैस रेकली तद्वत मनुष्याने आक्रोश केला, इतकेच झाले. मनुष्याचा भाषणाचा गौरव काय तो अर्थावर आहे. तो अर्थ समजला नाही तर पशु, पक्षी ध्वनी करतात, तसाच तो मनुष्य ओरडतो. परंतु ज्ञानाने बोलत नाही.
 सांप्रतचे ब्राह्मण विद्येविषयी केवळ जनावरे आहेत. त्यांस अर्थज्ञान नाही. येणेकरून धर्मावरील भाव व आस्तिक बुद्धी भ्रष्ट झाली. आणि वेद, शास्त्र, पुराणे ही परवाच किंवा लमाणाचे गाणे यासारखी झाली. देवाचे प्रार्थनेस बसले, म्हणजे जी मर्यादा, निष्ठा व मनाची तत्परता असावी ती नाही, कारण की, हे सर्व गुण ध्वनीपासून येत नाही. अर्थज्ञानापासून येतात व देवांचे महत्त्व हृदयात वागले, म्हणजे सहजच तशी वर्तणूक होते. ज्या शब्दांनी ईश्वराचे वर्णन झाले, ते शब्द जर आपल्यास कळले, तर मात्र त्यासारखी वर्तणूक उत्पन्न होईल. आणि ते शब्द जर अर्थविरहित ऐकले तर तसे होणार नाही. ब्राह्मणांची पढणी आमचे कानी पडतात. त्यांचा अर्थ म्हणणारास कळत नाही व ऐकणारास कळत नाही. उभयता शंख आणि एक मान डोलवितो, व वाः वाः म्हणतो आणि भटांना शाबासकी देतो. जे पाठ म्हणतात आणि अर्थ जाणत नाहीत, त्यांच्यासारखे मूर्ख व व्यर्थ आयुष्य घालविणारे पृथ्वीत थोडेच असतील. मागील युगांत असे वेडे ब्राह्मण नव्हते. ते म्हणत होते. सार्थ म्हणण्याची पद्धती ज्या दिवसापासून बुडाली, तोच दुर्भाग्याचा फेरा, या लोकांस खचित आला. कारण की, याजमुळे ब्राह्मणांचे तेज गेले. भट मूर्ख झाले व त्यांजपासून गृहस्थ असेच करू लागले. जो उठला तो पाठ म्हणतो. 'अरे मूर्खा, पाठ म्हणून फळ काय ?' असे सांगणारा कोणीच नाहीसा झाला.
 मला वाटते की, पहिले ब्राह्मण ज्ञानी होते. परंतु पुढे काही काळाने त्यांची प्रजा ही मूर्ख झाली. पूर्वी सर्व ब्राह्मण पोथीवरून म्हणत असत. आणि पोथीशिवाय म्हणू नये, असे शास्त्र आहे. पुढे ईर्ष्येने म्हणता म्हणता पोथीशिवाय किरकोळ अनुष्ठाने करू लागले. नंतर कोणी त्यांजवर चढ करून सर्व वेद पाठ म्हणू लागले. मग भट वेगळे व श्रौतकर्म चालविणारे ब्राह्मण वेगळे, असे दोन पर्याय झाले; परंतु दोघेही अर्थशून्य, संस्कृत भाषेत पाठ म्हणतात. नमस्कार करावा, विष्णुस्मरण करावे, तांब्यात पाणी ओता, हे देखील शब्द मंत्रात मोडतात. ब्राह्मण संस्कार पाठ करतात. हा मूर्खपणा पाहून चमत्कार वाटतो की, अर्थ जाऊन हे ज्ञानशून्य म्हणणे आले कसे ? आणि हे लोकांस इतके प्रिय झाले कसे ?
 अर्थ म्हणजे शब्दामध्ये जसा जीव. तो जर नाही तर ते शब्द प्रेतवत आहेत. छत्तीस अक्षरांवर हजारो भाषा आणि हजारो शास्त्रे झाली आहेत. म्हणून अक्षरांची मातबरी नाही; परंतु भटमंडळी हे मनात आणीत नाहीत. त्यांनी आता विरखडे ठेवावी, आणि पाठ म्हणावयाचा गर्व सोडून द्यावा व चौसष्टी उलटण्यात काही अर्थ नाही, हे खचित जाणावे. पोथी घेणे यात लज्जा नाही; परंतु सार्थ वेद म्हणावा. येणेकरून फार चांगले आहे. मनाची सुधारणा होईल, ते करावे. स्मृतीची सुधारणा हे पोपटाचे कर्म. तशीच सहस्रनामे, स्तोत्रे व पूजा ही सार्थ म्हणावी. उगीच मजुरी करू नये. म्हणजे त्यातील अर्थ कळून त्याप्रमाणे वागणूक होईल. बाहेरचे ढोंग दाखवून उपयोग काय ? देवपूजा कंठाळभर मांडली आणि मनात काही नाही, तर ती व्यर्थ आहे.

♦ ♦


स्वराज्यातील विद्वान

पत्र नंबर ५० : ४ मार्च १८४९

 हिंदू लोकांचे राजधानीत काही विद्या वाढविण्याचा प्रयत्न होत नाही. पेशव्यांचे राज्य दक्षिणेत होते; परंतु काही विद्यावृद्धी झाली नाही व विद्यावृद्धी करणे, हा सरकारचा धर्म आहे, असे इकडील लोक मानीत नाहीत.
 जेथे जेथे हिंदू लोकांच्या व मुसलमान लोकांच्या राजधान्या आहेत, तेथे शास्त्री, पंडित, वैदिक, गवई इत्यादी विद्वानांचा समुच्चय असतो; परंतु त्यांच्या विद्येचा लोकांमध्ये काही उपयोग होण्यासारखी तजवीज होत नाही. कशी म्हणाल तर शास्त्री चार शास्त्रपारंगत विद्वान असला, म्हणजे राजाने त्यांस गाव वर्षासने द्यावी, आणि मग शास्त्रीबाची गाठदेखील पडायची मुष्कील. सर्व दिवस घरात बसून असावयाचे आणि सरकारचे वेतन खाऊन स्नान, संध्या, देवपूजा करावयाची. तीत सकाळपासून दोन प्रहरपावेतो सोवळे व दुपारून निद्रा आणि संध्याकाळी क्षणभर बाहेर पडले तर पडले. वर्षासहामासी जेव्हा कचेरीत बोलवणे येईल, तेव्हा मात्र त्यांची विद्या बाहेर पडावयाची; पण तीही नेमलेल्या लोकांतच. तेथे भलत्याचा प्रवेश व्हायचा नाही. असे करून त्यांनी आपले आयुष्य घालविले.
 तसेच वैद्यबाबा. मोठे कीर्तिमान पण गरिबाचे घरी औषध द्यावयास जावयाचे नाहीत व त्यांची गाठ पडावयाची नाही. त्यात दूतचिन्हे वगैरे पाहून वार, तिथी इत्यादी सुलक्षणे मिळतील, तेव्हा वैद्याची पुडी सुटावयाची. तोपर्यंत रोगी मरून जाईल. परंतु वैद्य बाहेर पडणार नाही. त्यांस असे वाटते की; मला सरकारातून पैसा मिळतो, तितक्यापुरते मी राजास मात्र औषध देईन. इतरांस काय म्हणून देऊ ? इत्यादी गर्वाच्या समजुती व निर्दयपणा त्यांचे अंगी आहे. तसाच गवई मोठा प्रख्यात जो आहे तो राज्याचे येथे पाचशे रुपये दर महा खात असतो; परंतु कधी प्राण गेला, तरी तो लोकांस शिकवावयाचा नाही. दोन शेर भांग ओढून घरी बसलेला असेल. आणि राजाचे बलावणे येईल, तेव्हा मात्र त्याकडे जाईल नाही तर तो कोणाजवळ कधी आपला गुण दाखवील, असे होत नाही. व त्यांस असे वाटते की, गरीब लोकांपुढे मी काय गाऊ ? माझी योग्यता केवढी ? मी महान थोर व हे भिकारी. यांचा हिशोब काय ? असे त्यांस वाटते; परंतु विद्वानांचे अंगी इतके दुर्गुण लागण्याचे कारण, जे त्यांस खावयास देतात, ते होत. जर करता राजांनी त्यांस मार्गास लाविले, तर ते लागतील; परंतु राजे त्यांस बळेच मूर्ख व गर्विष्ठ करतात.
 जो कोणी विद्वान आहे, त्यांस राजाने सांगावे की, तुम्हांस दोनशे रुपये (किवा किती त्याची योग्यता असेल तो) दर महा पावत जाईल; परंतु घरी आळसात बसून पावावयाचा नाही, काही शिष्य मिळवा, त्यांस तयार करा, नवीन ग्रंथ लिहा; व ज्यास संस्कृत भाषा येत नाही, त्यासही शास्त्राचे मर्म समजावे, यास्तव संस्कृत ग्रंथाची भाषांतरे करून लोकांसं ज्ञानी करा, तरच तुम्हास पगार मिळेल. असे जर सांगतील तर विद्यावृद्धी होईल. तेवढ्याच खर्चात लोकांचा फायदा होईल, ज्ञान वाढेल, जे विद्वान आहेत, त्यांचे गुण सर्वाचे दृष्टीस पडतील व त्यांचे हातून शिष्य तयार होतील, व येणेकरून विद्वानास गर्व राहणार नाही. व हल्ली जसे विद्वान आहेत, तितक्यास काही तरी लांच्छन असते, तसे असणार नाही.
 परंतु ही गोष्ट राजे वगैरे अमीर लोक आहेत, त्यांस कळत नाही. विद्वानांचे पोषण करावयाचे इच्छेने लाखो रुपये ते खर्च करतात; परंतु ते मातीत टाकीतात. जो विद्वान व थोर असेल, त्यांस पुष्कळ पैसा देऊन राजाने आश्रित करावे; परंतु त्यांस ताकीद असावी की, जे कोणी येतील त्यांस फुकट शिकवीत जावे, औषध देत जावे. त्यास खर्च लागेल तो आम्ही देऊ. आणखी त्याजकडे काही कारखाना सांगावा की, जेणेकरून गरिबांचे हित होईल व विद्वानांचा सर्वांस उपयोग होईल; परंतु हिंदुस्थानांतील राजे बहुधा मूर्ख आहेत. व राजा हा शब्द नेहमी म्हणीत मूर्ख या अर्थावर योजिलेला आहे. याचे कारण असे की, राजे बहुधा मूर्ख असतात. रयतेपासून वसूल करून पैसा घेतात, त्याचा त्यांस बरोबर व्यय करता येत नाही त्यांस असे वाटते की, उत्तम माणसे आमच्या मात्र उपयोगी पडावी व इतर लोकांस त्यांचा काही फायदा नसावा; परंतु राजाने किंवा त्यांचा पिता किंवा प्रपितामहाने द्रव्य आणिले नसते. जे राजाजवळ द्रव्य, ते रयतेपासून सर्व घेतलेले असते. याजकरिता त्या द्रव्याचा उपयोग असे दांडगाईने न करावा, परंतु हे मर्म राजे विसरतात आणि विद्वानही विसरतात.
 राजाचे आश्रयाचे विद्वान जे असतात, ते शतमूर्ख होतात आणि विद्या बळेच लपवितात. त्यांस ती बाहेर काढावयाची लाज वाटते. मग इतिहासांत कथा आहे की, शिकंदर बादशाहास जो गुरू होता, त्यांस त्याची अशी प्रार्थना होती की, जी विद्या त्यांस सांगितली, ती त्याने लोकांत प्रकट करू नये. कारण की तेणेकरून राजाचा अपमान होईल. म्हणून त्याचे गुरूने आपली पुस्तके ठेविली आणि प्रकट केली नाही. याच समजुती इकडील लोकांच्या आहेत.
 आता प्रत्यक्ष पहा की, जे विद्वान आहेत, त्याणी विद्या उघड जहाली, असे पाहिले, म्हणजे त्यांचे अंगाची लाही होते. कोणी शास्त्र्यास दाखवा की हा धर्मशास्त्राचा मराठीत तर्जुमा केला आहे. म्हणजे लागलाच तो म्हणेल की, अरेरे! विद्वानांचा थोरपणा गेला ! इंग्रजांनी हे ग्रंथ प्रगट केले. आता शास्त्री व उपाध्ये कशास पाहिजेत ! असे त्यांस वाटते.
 याचप्रमाणे गवईलोक यास म्हणावे की, आपली थोडी विद्या अमक्याला शिकवा. म्हणजे त्याचे घर बुडाले. कोणी म्हणतो, अरे, गुरूचे आर्जव करावे तेव्हा विद्या प्राप्त होते ? विद्या फुकटची नाही. इतका विद्वानांस गर्व आणण्यास व विद्या बुडविण्यास कारण राजे आहेत. त्यांस विद्वानास कोणत्या रीतीने आश्रित करावे, हे समजत नाही. सर्व मूर्खपणा करतात. त्याचा परिणाम असा जहाला आहे की, जे प्राचीन ग्रंथ आहेत, त्याजवर लोक भरवसा ठेवतात, नवीन कल्पना सर्व राहिल्या.
 जी जी औषधे पाच हजार वर्षांचे पाठीमागे लिहून ठेवली आहेत, तीच आज घ्यावयाची. याचे कारण कोणी पुसले, तर शास्त्रांत आहे, म्हणून सांगतात. तशी गायनकलाही बुडाली. राग म्हणजे काय, हेही कोणास समजत नाही, आणि नवीन राग कोणी करीत नाहीत. जे एकदा ग्रंथात मागील काळी ऋषींनी शोध करून ठरविले आहेत, तितकेच. त्याजवर काही एक नाही. सर्व विद्येचा ओघ अटकावला आहे. कोणी विचार करीत नाहीत. काही झाले म्हणजे ही गोष्ट वाजवी किंवा अयोग्य, असे कोणी म्हणत नाही; परंतु शास्त्रांत आहे इतकेच म्हणतात आणि विचार वाढवीत नाहीत. अस्तु.
 हा काळ लवकरच क्षीण होत चालला आहे. लोक शुद्धीवर येतील, तेव्हा याचा विचार बरोबर करतील. सांप्रतकाली ते मूर्ख आहेत. यास्तव त्यांस एखादी गोष्ट सांगितली, तर तिचा अर्थही करता येत नाही. मग वर्तणूक दूरच आहे.

♦ ♦


पुराणातील ज्ञान

पत्र नंबर ५५ : ८ मे १८४९

 हरएक कोणतेही गोष्टीचे गुणदोष पहावे लागतात. छापखान्याचे हुन्नरापासून किती एक गोष्टी चांगल्या व किती एक वाईट झाल्या आहेत. तसेच दारूपासूनही झाले आहे. तसेच जर कोणते पुस्तक लिहिले गेले, म्हणजे त्यापासून काही गोष्टी चांगल्या व काही वाईट होत असतात. याचा विचार करून चांगली मात्र घ्यावी. हे वाचणाराकडे आहे.
 यावरून मी विचार करितो की, व्यासांनी पुराणे लिहिली, त्यांचे गुणदोष काय आहेत ? व त्यापासून लोकांचा फायदा काय झाला ? ज्या काळी हे ग्रंथ लिहिले त्या काळी हे ग्रंथ लिहिणारास असे वाटले नसेल की, असे आता लोक त्यांस समजतात, तसे समजतील व लोक त्यांची पूजा करतील व घरोघर ते ग्रंथ होतील. त्या वेळी छापखानाही नव्हता. याजमुळे हे ग्रंथ प्रसिद्ध व्हावयास बहुत काळ लागला. आज पाच हजार वर्षे झाली. तरी किती एक पुराणे मिळत नाहीत; कारण त्यांच्या प्रती झाल्या नाहीत. एक प्रत करावयास एक वर्ष पाहिजे. त्याची प्रत दुसरी व्हावयास तसाच पुष्कळ काळ लागतो. अस्तु.
 पुराणे ही माझे मते काव्ये आहेत. त्यांचा आधार बहुतकरून वास्तविक गोष्टीवरून धरला आहे; परंतु त्यात कर्मे आणि बहूक्ती फार केली आहे. कोठे १० श्लोक देवांच्या स्तुतीचे लिहिले, म्हणजे लागलीच त्याची फलश्रुति व त्यांचा न्यास, ध्यान, कवच, छंद, दगड, धोंडे असे पुष्कळ आणून जोडले आहे. मुख्य पुराण करणारांची इतकीच बुद्धी होती की, रमणीय कथा आश्चर्य वाटावयाजोग्या लिहून, त्यात भक्तिज्ञान जागोजाग मिळवून ग्रंथ सुलभ व मौजेचे करावे; परंतु त्या काळी भूगोल, खगोल या विद्या पुरतेपणी वृद्धिंगत झाल्या नव्हत्या. म्हणून भूगोलाविषयी त्यात पुष्कळ चुका आहेत व पृथ्वीची वर्णने मनास येतील तशी कवींनी केली आहेत. भारत, भागवत यातील दृष्टांत लोक फार देतात; परंतु संपूर्ण ठिकाणी ते यथास्थित लागत नाहीत. कारण की, वास्तविक इतिहास जर असेल, तर त्याजपासून ते राज्य कशाने गेले व लोक शहाण्याचे वेडे कसे झाले व वेड्याचे शहाणे कसे झाले हे कळते व ते दृष्टान्त आपणास लागू करता येतात.
 परंतु पुराणातील तसे लागू करता येत नाहीत; कारण की, पुराणातील सर्व गोष्टी प्रारब्धावर आणि देवाचे सामर्थ्यावर रचिल्या आहेत. असा गजेंद्रास शाप होता म्हणून नक्र झाला; अहिल्येस वर होता, म्हणून उद्धरली. रावणास वानरांनी मारला. दुर्योधनास मारून भूभार कमी करावा, म्हणून युद्ध केले. हिरण्यकश्यपूस मारावयास खांबातून देव निघाला. वामनाने पायाने बळीस पाताळी घातला. या गोष्टी व अस्त्रयुद्ध, रथ-वाहन, धर्मयुद्ध, प्रतिज्ञा, शाप, वरदान, तात्काळ ईश्वराची प्राप्ती, या गोष्टीस आता लागू करणे यासारखा मूर्खपणा, कोठे आहे ? कोण म्हणतो, 'पेशव्यांचे राज्य कसे बुडाले हो ?' दुसरा उत्तर देतो, 'अहो, ते अवतारी पुरुष होऊन गेले. जे होणार ते झाले. त्यांस उपाय काय ? सद्दी फिरली म्हणजे क्षण लागत नाही. देव देणार त्याला देतो. त्याचे मनात आले, म्हणजे पाहिजे तसे घडते.' या प्रकारच्या समजुती लोकांच्या आहेत.
 वास्तविक इतिहास पाहत नाहीत व कारण लक्ष्यांत आणीत नाहीत. कोणी म्हणतात प्रारब्ध, कोणी म्हणतात सद्दी; दुसरे म्हणतात ईश्वर करील तसे होईल. म्हणून उद्योग करण्याची गरज नाही. अशा समजुती या सर्व पुराणांतील आहेत. पुराणे यांस मूळ आहेत तसेच व्रतमहात्म्ये व क्षेत्रमहात्म्ये, येणेकरून पुष्कळ वाईट समजुती झाल्या आहेत. पुराणिक व्रत सांगत बसला, म्हणजे अडाणी बायका व चार मूर्ख पुरुष बसलेले असतात. त्यांस व जनावरास काही फरक नाही. यांजमुळे जे पुराणिक सांगतो ते त्यांस खरे वाटते आणि पुराणिक म्हणतो, दोन हजार वाती करून देवापुढे जाळल्या असता महापुण्य आहे; म्हणजे लागल्याच बायका घरी येऊन नवऱ्यासह तगादा करतात की, आमची तुपाची व कापसाची तयारी करावी. आम्हांस पुराणिकबाबांनी सांगितले की, कापूर, वाती व तूप जाळले असता फार पुण्य आहे. मग दोनचार रुपयांचा जिन्नस व दोन महिन्यांची मेहनत खरीखुरीच जाळतात. पुराणिक व भट यांचे सांगितल्यावरूनच बायका आपल्या नवऱ्याच्या प्रेताशी जिवंत जाळून घेत, त्या दोन-चार रुपयांचा जिन्नस जाळावयास कमी करतील काय ?
 याचे कारण काय म्हणाल, तर अज्ञान फार. आम्ही जर आता कोणास सांगितले की, तुमची बायको मेली, तिच्याशी तुम्ही जाळून घ्यावे, तर कोणी ऐकेल काय ? पुरुष कोणी ऐकणार नाहीत. कारण की, त्यांना बायकांपेक्षा काही तरी थोडेसे अधिक कळते. परंतु बायका अंधकारात. त्यांस जसे सांगितले तसे वर्ततात. याजमुळे सती जाण्याचा पाठ पडला. जर बायका शहाण्या व त्यांस विद्या वगैरे शिकवावयाची चाल असती, तर ज्यांनी त्यांस प्रथम सती जाण्यास सांगितले त्यांच्या त्यांनी शेंड्या उपटून टाकल्या असत्या. अजूनही जर स्त्रियांस विद्या वगैरे शिकविल्या तर त्या आपला पुनर्विवाह करतील आणि शास्त्री वगैरे जे त्यांस आडवे येतील, त्यांस पुसतील की, पुरुषांनी पाहिजे तितकी लग्ने करावी. मग स्त्रीने नवरा मेल्यावरही दुसरा नवरा का करू नये ? आणि आपण शास्त्रार्थ देऊन चालू करतील.
 परंतु असे होत नाही, कारण की, स्त्रियांस फार अज्ञानात ठेविल्या आहेत यास्तव जे पुराणिक सांगतो, ते त्यांस खरे वाटते. परंतु पुराणात चुका काय आहेत याचा विचार करता येत नाही व लाक्षणिक अर्थ काय आहे व बहूक्ती कोठे काय आहे हे काहीच समजत नाही. परंतु हल्ली म्हणतात की; ज्यांनी पुराणे केली ते देव होते. वास्तविक पाहिले तर ते मनुष्यच होते. व त्यासही वाटले असेल की, आणखी पाच हजार वर्षांनी आमची योग्यता देवासारखी होईल व आम्ही जे जे लिहिले ते त्यातील अर्थ मनात न आणता सर्वच खरे म्हणतील. हे त्यांसही ठाऊक नाही. हिंदू लोक खराखुरा इतिहास एखादे देशाचा वाचून व्यवस्था मनात आणतील तर बरे होईल. म्हणजे त्यांस हे सर्व कळेल, पुराणे ही केवळ कवींची काव्ये आहेत. जो जो संस्कृत भाषा बुडाली, तो तो त्याचे स्तोम वाढत चालले; नाही तर तसे तुकारामाचे अभंग, दोहोरे वगैरे आहेत तद्वतच पुराणांची योग्यता असती. यास्तव पुराणातील मतांमुळे लोक फार मूर्ख व सुस्त झाले आहेत, हे त्यांस अद्याप कळत नाही.

♦ ♦


नादविद्या

पत्र नंबर ५६ : १५ एप्रिल १८४९

 हिंदू लोकांमध्ये नादविद्या व तिच्या शाखा गायन, वाद्य, नृत्य इत्यादीक यास वाईट म्हणतात. याचे कारण मला दुसरे काही दिसत नाही. परंतु या लोकांमध्ये शहाणपण नाहीसे झाले आहे. व विद्या अगदी बुडाली आहे. नाही तर नादविद्येस असे सदोष न मानते.
 वास्तविक पाहिले तर नादविद्या बहुधा निर्दोष आहे व या विद्येपासून जे सुख म्हणजे इंद्रियसुख होते, ते ज्ञानसुखाचे जवळ जवळ आहे. विद्वान यांनी असे म्हटले आहे की, ज्ञानसुखापुढे सर्व इंद्रियसुखे तुच्छ आहेत. ते खरे; परंतु नादविद्येचे सुख ज्ञानसुखासारखे आहे. कारण हे विकाररहित आहे. यात दोष नाहीत व येणेकरून चित्ताचे समाधान, मनाचा संतोष, इंद्रियात उल्हास आणि जिवास विश्रांती होऊन कंटाळा जातो. व पूर्वी याचा अंगीकार नारदासारखे देवऋषी, शंकरासारखे अवतारी यांनी केला होता. तस्मात् या विद्येचे वर्णन काय करावयाचे आहे ? या विद्येने दया, प्रीती, भक्ती इत्यादीकांचा उत्कर्ष करता येतो व "गायन: पंचमो वेदः" असे व्यासांनी म्हटले आहे. कोणी स्वर्गसुखाची प्रतिमा म्हटले आहे व मुसलमान लोक तर गायनविद्येकरून मृत प्राणी जिवंत झाले आहेत, असे म्हणतात व हिंदू लोक गायनाचे वर्णन करण्यात कमी नाहीत.
 भागवतात गोष्ट आहे की नारदास गर्व फार होता, तेव्हा तो गर्व हरण करण्याकरिता सांगितले की, तुम्ही जाऊन एक जांबुवंत नामे अस्वल श्रीरामाचा सेवक आहे, त्यांस भेटावे. याजवरून नारद तेथे गेले. तो जांबुवंत गात बसला आहे. आणि दगड पाषाण आसमंतांत भागी विरघळून रस झाले आहेत. नारदांनी आपला वीणा ठेवला. तो त्या रसात पडला आणि गायन बंद होताच पूर्ववत पाषाण झाले, आणि वीणा आत अडकला. तेव्हा जांबुवंताने नारदास सांगितले की, तुम्ही गावयास बसावे आणि दगडाचे पाणी करून वीणा काढावा. ते नारदाच्याने होईना; तेव्हा तो जांबुवंतास शरण गेला अशी पुराणात कथा आहे. अस्तु.
 गायनेकरून निर्जीव पदार्थ द्रवतील, हे खरे म्हणवत नाही. परंतु सजीव प्राणी द्रवतात हे खरे. जे क्रोधी असतात, त्यांचा क्रोध जातो. निर्दय दयाळू होतात व भांडखोर शांत होतात. हे खरे आहे. याचा अनुभव मनुष्यांस आहे. असेच नाही; परंतु इतर जनावरांसही आहे. मोर, हरणे, सर्प इत्यादी गायन ऐकतात. येविषयी गोष्टी या देशात पुष्कळ आहेत. व तानसेन गवई गाऊन दिवे लावी, असे म्हणतात. अशा गोष्टी चमत्कारिक या विद्येच्या आहेत. व प्राचीन काळी रावणादिक राक्षसांनी गायनेकरून शिवाची प्रसन्नता केली असेही आहे व संस्कृत भाषेत पुष्कळ पुस्तके याजवर आहेत. परंतु ती सर्व आता लोकांनी बांधून ठेवली आहेत. व जयदेवासारखे पंडित यांनी ग्रंथ केले आहेत व कवने केली आहेत.
 परंतु सांप्रत काळी हिंदू लोक म्हणतात की, गायनाची विद्या मुसलमान लोकांची. परंतु त्यांचे लक्षात असे येत नाही की, हिंदू लोकांच्या विद्या मुसलमान शिकले आणि हिंदू लोक विसरले, म्हणून ती विद्या त्यांची झाली असे नाही. परंतु सांप्रत काळी दोन लांच्छने या विद्येस प्राप्त झाली आहेत. एक जे गाणार व नादविद्येत प्रवीण असतात, ते मूर्ख व्यसनी, व भांगे असतात. लोकांस शिकवीत नाहीत, ग्रंथ पहात नाहीत. व मदोन्मत्त होऊन थोडकेसे आले, म्हणजे स्वच्छंद होतात. आणि (दुसरे) दुर्जनांनी या विद्येचा अंगीकार केला आहे व व्यभिचारिणी बहुधा या विद्येस लोकांस लुब्ध करून नादी लावण्याकरिता अंगीकारितात. याजमुळे या विद्येचा हलकेपणा लोकांस झाला आहे. आणि गाणी वाजविणे म्हटले की, लागलेच म्हणतात की अरेरे! छंद वाईट व हलका आहे. सारंगी हातात घेतली किंवा मृदंग हातात घेतला, म्हणजे साजिंदेपणा ठरतो व वीणा घेतला म्हणजे गोसावीपणा ठरतो.
 याप्रमाणे लोकांच्या मूर्ख समजुती पडल्या आहेत. परंतु जर गणित-विद्या चोरटे लोक शिकले किंवा बंडवाले युद्धविद्या शिकले, तर विद्या वाईट झाल्या की काय ? व त्या त्याग करण्यास योग्य आहेत की काय ? स्वर्गसुखाची प्रतिमा नादविद्या आहे, असा असता भांगट लोक व दुष्ट स्त्रिया यांणी तिचा अंगीकार करून चांगल्या लोकांनी त्याग करून, विद्या वाईट असे ठरविले आहे. परंतु हा मूर्खपणा आहे. जर्मन देशांत नादविद्या सरकारी शाळेत शिकवितात. फ्रेंच व इंग्रज म्हणतात की, संभावित गृहस्थ याणी ही विद्या शिकल्याशिवाय त्यांची विद्या परिपूर्ण होत नाही. जसे देशाटण हा विद्याभ्यासाचा भाग आहे, तद्वत् ही विद्या आहे. व बायकांस अवश्य शिकवितात. संभावित गृहस्थांचे स्त्रियांस नादविद्येत प्रवीणता नाही, असे आढळत नाही. अशा शहाणे लोकांच्या चाली आहेत व याप्रमाणे हिंदू लोकांच्या युगांतरी होत्या. कारण की विराट राजाचे कन्येस गायन व नृत्य शिकविण्यास अर्जुन बृहन्नडा या वेषाने राहिला, ही कथा भारती प्रसिद्ध आहे. तेव्हा याविषयी संशय नाही.
 परंतु आताचे हिंदू लोक फार रानटी झाले आहेत. त्यांस निर्मळ ज्ञान, सुख, याचा अनुभव नाही. व त्यांच्या स्त्रियांस ते कुत्र्याप्रमाणेही मान देत नाहीत. मग त्यांस या रमणीय विद्या कोठून शिकविणार ? नवरा म्हणतो माझी बायको कुळंबिणीपेक्षा अधिक. मी मेलो तर इणे जाळून घ्यावे. व माझे पायाचे तीर्थ घ्यावे व माझी पूजा करावी. इला दुसरा देव नाही. याप्रमाणे वर्तणूक करतात. यांस सुधारावयास बहुत दिवस पाहिजेत. घरून उठून गाणे ऐकावयास कसबिणीच्या इथे बहुत लोक सांप्रत जातात. व गाण्याचे, वाद्याचे बहुत लोक इष्की म्हणवितात. यांनी जर आपल्या स्त्रियांस विद्वान केल्या, तर असे अनाचार करण्याची जरुरी नाही. परंतु हे त्यांस मोठे विरुद्ध वाटते. कारण हे लोक अगदी वेडे झाले आहेत. व त्यांस नीट गोष्ट सांगणारा देशात एकही राहिला नही. सर्व एका राशीचे झाले आहेत.
 सर्व देशांत जितके लोक आहेत, तितके विद्वान नसतात. परंतु काही असतात व त्यांचे आधाराने इतर लोक चालतात. परंतु देशांत दोनशे चारशे तरी शहाणे व लोकांचे हितकर्ते पाहिजेत. मग बाकीचे अडाणी लोक असले तरी चिंता नाही. परंतु जे विद्वान आहेत त्यांस विद्वान समजून त्यांचे मार्गाने वागण्याची इतरांस बुद्धी पाहिजे. सांप्रत हिंदू लोकांमध्ये वास्तविक विद्वान किती एक होत चालले आहेत. परंतु पुष्कळ लोक यांचे सांगितले ऐकावे, असे मानीत नाहीत. यास्तव त्या विद्वानांचा बुद्धिचा उपयोग होत नाही. परंतु मोत्यांची हेळणा कावळे करतात. त्या दृष्टांताप्रमाणे हे आहे. हल्ली जे विद्या शिकून विद्वान झाले आहेत, त्यांचे सांगितल्याप्रमाणे लोकांनी चालावे. अशी लोकांस बुद्धी देण्यास अवकाश आहे.
 ही गोष्ट ज्या दिवशी होईल, त्या दिवसापासून पंचवीस वर्षांत हिंदुस्थानाचा रंग फिरेल. सर्व लोकांस उत्कंठा अशी झाली पाहिजे, की, आम्हांमध्ये विद्वान कोण आहे ? चला त्याची बोलणी ऐकू, त्याचा बुद्धिवाद घेऊ; हे लोकांच्या दुर्भाग्यामुळे झाले नाही; परंतु होईल, यात संशय नाही. परंतु हे होण्यास ब्राह्मणांचा गर्व अगदी निस्तोष गेला पाहिजे. ते अद्याप आपले धुंदीत आहेत. आणि मूर्खपणा आपले जवळ असून, वास्तविक विद्वानांची बोलणी ऐकत नाहीत. प्राचीन काळी आम्हांस देव असे लोक मानीत होते. तसेच आता मानावे असे ते इच्छितात. परंतु आता ते लौकर माणसांसारखे होण्याचा समय आला आहे. आता लोक अज्ञानात नाहीत, हे त्यांणी पुरते समजावे.

♦ ♦


लोकांची समजूत व पुराणादिकांचे सौरस्य


पत्र नंबर ५९ : ६ मे १८४९

 हिंदू लोकांमध्ये स्वधर्माचा विचार कोणी करीत नाहीत. देवळात अमर्यादा करतात.
 पुणे येथे व इतर ठिकाणी देवांची नावे लोकांनी भांग्या मारुती, छिनाल बालाजी, खुन्या मुरलीधर, चिमण्या गणपती इत्यादी ठेविली आहेत. याजवरून असे वाटते की, देवाचा मान करावा आणि देवास भीत जावे, हा भाव अगदी नाहीसा झाला. देवळे ही पवित्र जागा; त्यात अनाचार असू नये, हे लोक अगदी जाणत नाहीत.
 मला वाटते की इंग्रजांचा धर्म कसाही असो, परंतु त्यांस देव आणि त्याचा मान करणे हे समजते. पहा की आठ दिवसांनी देवळात ते जातात परंतु भक्तीने व मर्यादेने भजन करून माघारे येतात. आणि हिंदू लोकांचे देवळात पहा. कसबिणी बिराडास असतात; सोदे, लुच्चे, संध्याकाळी तमाशे, पहावयास वगैरे येऊन बसतात. त्यांचे मनात देवळांचा मान अगदी नसतो आणि तसे चावडीवर तमाशांत लोक जमतात, किंवा चौथऱ्यांवर पान सुपारी खात बसतात, घरच्या कारभाराच्या गोष्टी सांगत बसतात; तद्वत व्यवस्था आहे. पुण्यात तुळशीबागेत गेले किंवा हिंदू लोकांचे कोणतेही जत्रेस गेले, म्हणजे हेच सर्व दृष्टीस पडते. देवाकरिता भक्तीने येऊन मर्यादेने व पवित्रपणाने वागतात, असा शंभरांत एक मनुष्य असतो.
 स्वधर्म म्हणजे काय, तो या लोकांस अवश्य सांगितला पाहिजे. कित्येक मूर्खास असे वाटते की, पुराणांत जितक्या गोष्टी लिहिल्या आहेत, तितक्या खऱ्या आहेत; परंतु व्यासांनी असेच लिहिले आहे की, स्त्री, शूद्र, वैश्य इत्यादी मूर्ख जनांकरिता पुराणे लिहिली आहेत. ज्ञानी यांस कर्मे व पुराणे यांची गरज नाही, ही गोष्ट खरी आहे.
 कारण पुराणांत कित्येक गोष्टी केवळ मूर्खाचे शासनार्थच सांगितल्या आहेत. जसे वाती करून लावाव्या, याचा वास्तविक अर्थ इतकाच की, अंधेरात उजेड करावा; परंतु ही सोपी गोष्ट सांगण्याकरिता पुराण लिहिणाराने नाना प्रकारच्या गोष्टी लिहिल्या आहेत की, जसा एक उंदीर होता, त्याचे शेपूट एक बाई वाती करीत असता चातीस लागून, त्याने चाती फिरून एक वात झाली. ती जेव्हा देवळात जळाली, तेव्हात त्या उंदरास न्यावयास विमान आले. त्याने पुसले का ? तेव्हा देवदूत म्हणाले की, तुझ्या पुच्छाने धाग्याने एक वात झाली; ती आज देवळात जळाली; त्याचे श्रेय तुला आले. म्हणून हे विमान तुला आणले आहे. याजकरिता वाती लावतील त्यांस मोक्ष होतो.
 तसेच वांग्याचे धुराने विमान पडल्याची कथा आहे. इत्यादी लक्षावधि कथा आहेत; परंतु त्यांचा खरा अर्थ सोडून लोकांनी त्या गोष्टीच खऱ्या मानिल्या आहेत. आणि बायका ऐशी वर्षेपर्यंत वाती करतात; आणि जाळितात. दुसरा काही उद्योगच नाही. हा मूर्खपणा पुराणांचे गोष्टींनी शिरला. जर पुराणे करणारांनी खूळ लावावयाच्या गोष्टी न लिहिता साधेपणाने सांगितले असते की, गरिबांस धर्म करावा; अंधेर असेल तेथे दिवा लावावा; परंतु असे न सांगता त्यांनी दर एक कलमास मोक्ष आणि स्वर्ग सांगितला आहे.
 त्यांस असे दिसते की, या गोष्टी लिहिणारास पुढे लोक मूर्ख होतील या गोष्टी सर्व खऱ्या म्हणतील, असे वाटले नव्हते; परंतु तशी गोष्ट झाली. आता पुराणिकबाबांच्या गोष्टी ऐकणारे ज्ञानी पुरुष नाहीत; परंतु बायका व पुरुष खुळे, वेडे, अज्ञान, मूर्ख ज्यांस काहीच समजत नाही, असे बसतात आणि सर्व गोष्टी खऱ्या म्हणतात. येणेकरून लोक मूर्ख झाले आहेत.
 'याजकरिता या सर्व पुराणांतील कोणी रहस्य काढून नवीन ग्रंथ लिहिला तर फार हित होईल. उनाड गोष्टींनी लोकांस भ्रांतीत घालणे हे योग्य नाही. आणि वास्तविक पाहिले तर धर्मशास्त्र, वैद्यशास्त्र व ज्योतिषशास्त्र ही सर्व प्राचीन काळी लिहिली गेली, आणि सांप्रत काळास फरक पडला आहे, त्याजमुळे धर्मशास्त्र जे फेरफार करावयाचे ते केले पाहिजेत. जसे ज्योतिष काळेकरून चाळावे लागते, तेव्हा त्यांस मेळ पडतो; आणि वैद्यक ही शास्त्रांत एक आहे आणि कृतीत वेगळेच असते. वैद्य चार रोगांची औषधे जाणतो; परंतु जर एका मनुष्यास चार रोग झाले, तर त्याने कल्पना बसवून योजना केली पाहिजे. आणि हजार औषधे एका रोगास लिहितात; परंतु वैद्याने प्रसंग पाहून दिले पाहिजे.
 तसेच धर्मशास्त्र अनेक मते आहेत व पुराणांत अनेक गोष्टी आहेत; परंतु लोकांची स्थिती पाहून व तारतम्य पाहून त्यांचे रहस्य जाणावे. केवळ अर्थाचा अनर्थ करू नये; परंतु हे लोक शुद्धीवर नाहीत. अगदी भकले आहेत. त्यांस शिकवणारा शंकराचार्य कोण ? ईश्वर करील ते करो, परंतु लोक फारच अज्ञान झाले. धर्म म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, हे अगदीच जाणत नाहीत. मोडक्या घराचे कुजके वासे राहतात, तसे हिंदू धर्म शास्त्र व विद्-प्राचीन काळचे शब्द लोकांचे तोंडात मात्र आहेत; परंतु अर्थ ठाऊक नाही. आणि काही विद्या फारच मूर्खपणास नेऊन पोचविल्या आहेत. त्या कोणत्या म्हणाल तर ऐका.
 एक वैद्यकी. रसायनशास्त्र हे चांगले शास्त्र आहे; परंतु त्यामध्ये या लोकांनी किमया काढली आहे. तसेच ज्योतिषशास्त्र चांगले; परंतु त्याजवरून भविष्ये पाहण्याची रीती व नियम काढले आहेत, ते अगदी खोटे. आकाशातील जे तारे, त्याच्याने पृथ्वीवरचे मनुष्याचे नशिबाचा फेरफार कसा होईल ? शनी पाहिजे तिकडे गेला व गुरु कोणत्याही राशीस आला, तरी मी पृथ्वीवर राहणारा माझे तो काय करील ? व माझ्याशी व त्याशी संबंध काय ? परंतु प्राचीन काळचे भटांनी अडाणी लोकांवर कर बसविण्याकरिता ही युक्ती केली आहे. तसेच नीतिशास्त्र याचे पर्यवसान तप आणि योगशास्त्राकडे गेले आहे; परंतु त्यातही काही अर्थ नाही. शास्त्रकारांनी नीती सांगण्याकरिता ही युक्ती केली आहे. म्हणजे पुरुषास तीन वेळा स्नान वगैरे सांगितले. येणेकरून शास्त्रकाराचा हा हेतू की, त्या पुरुषाचा काळ त्या खटपटीत जाऊन त्याकडून काही दुराचार घडू नये.
 ब्राह्मण चोरी करतील, म्हणून मुळीच द्रव्य बाळगू नये, असे सांगितले. संन्याशी स्त्रीशी जातील, म्हणून त्यांस सांगितले की, तुम्ही घरी राहू नये व दूध वगैरे खाऊ नये. तात्पर्य, त्यांची नीती रक्षण होण्याकरिता इतक्या युक्ती सांगितल्या. तसेच विधवा स्त्रियांचे हाल त्यानिमित्तच आहेत. परंतु नीती स्पष्ट करून सांगते, तर बरे होते. ही इतकी बहूक्ती केली, त्याने लोक मूर्ख झाले. गायनविद्या आहेत. त्यांचा राग अमका चांगला आहे, असे म्हणावयाचे सोडून, या रागाने पाऊस पडतो, त्या रागाने दिवे लागतात, इत्यादी अतिशयोक्ती केली आहे. ती न समजता लोक आता खरेच म्हणतात, आणि म्हणतात की, तशी विद्या कोठेच नाही. आणि मंत्राचे सामर्थ्य गेले; परंतु होते कधी ? कधी नव्हते. ही बहूक्ती आहे. याजवर भरवसा ठेवू नये.
 तसेच, योगशास्त्राची अवस्था आहे. मला असे वाटत नाही की, मनुष्य योगाने हजार वर्षे वाचेल, किंवा प्राण ब्रह्मांडी नेईल आणि सुखदुःखांचा त्याग करील. मग त्यांस तोडला तरी सारखा, मारला तरी सारखा. अशा स्थितीचे वर्णन पुराणात बहुत आहे; परंतु ही स्थिती पुराणांतील इतर गोष्टीसारखीच मला अमानुष व अशक्य दिसते. किंबहुना अतिशयोक्ती असेल. म्हणजे मनुष्याने सुखदुःखाविषयी शांती धरावी, म्हणजे चित्त स्थिर रहाते, हे स्पष्ट लिहिल्यावाचून बळेच अवघड रीतीने लिहिले असेल, हेच अनुमान दिसते.
 जर योगशास्त्र खरे असते, तर नाहीसे का होते ? लोक अवश्य योग करते. कारण ते मोठे सुख आहे; परंतु ही गोष्ट किमयेप्रमाणे व्यर्थ आहे. म्हणून या अशा वक्त्यावर भरवसा ठेवू नये. नीट अर्थ करीत जावा आणि विद्येचे दुसरे भाग मात्र घ्यावे आणि भविष्य ज्योतिष टाकून द्यावे. हिशेबांचे मात्र ज्योतिष घ्यावे, हे बरे. यथानीती वर्तणूक केली, म्हणजे त्यात मोक्ष आहे. हजार आचारांच्या खटपटी केल्या, तरी त्यात काही नाही आणि शास्त्राचा अर्थ युक्तीने घेतला पाहिजे. याविषयी वाक्य -

श्रुतिस्मृतिविरोधे तु युक्तिरेव बलीयसी ।

 या वाक्याने ह्याचा निर्णय होतो. परंतु ज्या दिवशी हिंदू लोक आपल्या बुद्धीचा उपयोग करू लागतील, त्या दिवशी त्यांस हा भेद समजेल.

♦ ♦


संस्कृत आणि इंग्रजी विद्या

पत्र नंबर ६९ : २९ जुलाई १८४९

 लोकांमध्ये अशी समजूत आहे की, शहाणपण हे अंगस्वभावाने येते. परंतु ही जरी थोडीशी खरी गोष्ट आहे; तत्रापि सर्व शहाणपण अंगस्वभावात असते, असे नाही.
 शहाणपण पुष्कळ मिळवावे लागते. लोकांमध्ये समजूत अशी आहे व ज्ञान मिळणे हे संसारकृत्य आहे; याजकरिता किती एक जण इंग्रजी शिकतात. त्यांस लोक पुसतात की, तुम्हांस रोजगार लागला. आता विद्या शिकता कशाला ? शहाणपणा व ज्ञान म्हणजे काय, याचा अर्थच त्यांस कळत नाही. मनुष्याने ग्रंथ वाचले पाहिजेत; पुष्कळ विद्या व भाषा शिकल्या पाहिजेत; म्हणजे बहुत गोष्टी कानावर पडून माहितगारी होते; केवळ संस्कृत वाचूनच होणार नाही. मला निश्चयेकरून वाटते की, ज्यास शहाणपण व ज्ञान मिळवावयाचे असेल, त्याने इंग्रजी भाषा किंवा त्या भाषेतील ग्रंथांचे तर्जुमे तरी वाचावे, म्हणजे त्यांस पुष्कळ गोष्टी कळतील.
 आता इंग्रजी विद्या फार सुधारली आहे. याजमुळे त्यातील भूगोलावर एक ग्रंथ पढलेला आणि जितके संस्कृत किंवा इतर भाषेत ग्रंथ आहेत, ते सर्व जमा केले, तर त्या एकाची बरोबरी व्हायची नाही, असे आहे; कारण इंग्रज लोकांनी विद्या फार सुधारल्या, याजमुळे त्या शुद्ध आहेत, आणि पूर्वीच्या काळी शोध कमी होते. याजमुळे विद्या अर्धवट झाल्या, तितक्या राहिल्या आहेत, केवळ संस्कृतानेच मनुष्य शहाणा व ज्ञानी होईल, असे नाही. शास्त्रे इत्यादीक पढले आहेत, त्यांच्या बहुत वाकड्या समजुती आहेत. व हे एक संस्कृताचे धोरण आहे. आणखी बहुधा पाहण्यात आहे की, संस्कृत पढलेले भ्रमिष्ट, मताभिमानी, अर्थाचे अनर्थ करणारे आणि वाकड्या रीतीने भलतेच दृष्टांत देऊन विचार करणारे असे असतात. जुन्या काळच्या विचाराच्या रीती अलीकडे अगदी काढून टाकल्या आहेत. व सुमार्गाने विचार करण्याच्या पद्धती व नेम लावून शास्त्रे केली आहेत. ती इंग्रजीत आहेत; पण ती संस्कृतापेक्षा हजारपट चांगली आहेत. हे मी निष्पक्षपाताने सांगतो.
 आता आमचा स्वधर्म संस्कृतात आहे, याजकरिता त्याचे ज्ञान असणे जरूर आहे. परंतु तितक्यापुरतेच संस्कृत शिकावे. त्यातील शास्त्रे पाहणे किंवा त्याजवर फार विश्वास ठेवणे, उपयोगी नाही. बुद्धीस विपर्यास येतो. त्यापेक्षा एखादा इंग्रजी ग्रंथाचा तर्जुमा पाहून विचार केला, तर कार्य होईल व ते संस्कृतद्वारा पाचपट आयुष्य खर्च करून होणार नाही. शहाणपण ही फार दुर्लभ वस्तू आहे. बहुत वाचले पाहिजे, बहुत गोष्टींचा विचार केला पाहिजे, व बहुत ऐकले पाहिजे.
 अलीकडेस माझ्या पाहण्यात काही पोरे आली आहेत. त्यातील कितीएकांस इंग्रजी जरा वाचता लिहिता येऊन पोट भरू लागले, म्हणजे त्यांस वाटते की, आम्ही परिपूर्ण झालो. तसेच संस्कृत पढलेले पुष्कळ आहेत. त्यांच्या तर विलक्षण समजुती असतात. मुख्य त्यांचे मनाची अशी स्थिती असते की, ज्या ज्या मूर्खपणाच्या समजुती म्हणजे प्रारब्धावर विश्वास व ज्योतिषावरून दैव पाहणे व मंत्रांचे सामर्थ्य वगैरे त्यांस खरे वाटते. हा सर्व मूर्खपणा संस्कृत विद्येत भरला आहे. जो पढतो त्यांस त्या पिशाच्चाप्रमाणे लागतात. याजकरिता ही मोठी सावधगिरी ठेवली पाहिजे.
 आजचे काळी इंग्रजांसारखे शहाणे, पराक्रमी, ऐश्वर्यवान व विद्वान कोठे नाहीत. व त्यांच्या विद्या हिंदूंस अश्रुत आहेत. याजकरिता सर्वांनी त्यातील ज्ञान घ्यावे व त्याचा धिक्कार करू नये. आम्ही ब्राह्मण सर्वांहून श्रेष्ठ, आम्ही भूदेव, या म्लेंच्छांनी आम्हापुढे काय शेखी मिरवावयाची आहे ? व यांचा पदार्थ काय? आमचे नशीब अनुकूल होईल, तेव्हा आम्हास विद्या लागणार नाही. जे चिंतू ते मिळेल, ही समजूत विसरावी. असे मागे कधी झाले नाही व पुढेही होणार नाही. पुराणांतल्या गोष्टी पुराणांत ठेवाव्या. भलतेच अर्थ मूर्ख पुराणिक असतात ते करतात, व भलतीच समजूत पाडितात.
 

याजकरिता सांप्रत इंग्रजीत ज्या ज्या विद्या भूगोल, खगोल, राज्यनीती इत्यादीक आहेत, त्यांचा विचार करावा व त्यातील समजुती करून घ्याव्यात, म्हणजे तुम्हास फार संतोष होईल. असे केल्याशिवाय लोकांस कोणतेही कार्य नीट करता येणार नाही. सरकारने लोकांस मोठी कामे दिली, तर ते अनर्थ व जुलूम करतील, लाच खातील, डौल करतील व लोकांचे कल्याणार्थ झटावयाचे नाहीत. याचे प्रत्यंतर सांप्रत जे लोक रोजगारावर आहेत, त्यांजकडे पाहिले म्हणजे मिळेल.
 तात्पर्य, ज्यांस ईश्वराचे भय नाही व विद्या काय हे ज्यांनी ऐकलेही नाही, त्यांस नीती येईल कोठून ? व शहाणपणही कसे येईल ? बहुत लोक संध्या झाल्यावर स्तोत्रपठण करतात, परंतु केवळ सडकेवर माती वाहण्याची मजुरी आणि स्तोत्रपाठ सारखाच आहे; कारण की त्यात अर्थ नाही. पाठ करण्याने पुण्य होते, असे समजून व्यर्थ आयुष्य कशास घालवितात?

♦ ♦


पाठ करण्याची चाल

पत्र नंबर ७७ : ३० सप्टेंबर १८४९

 श्रीमंत आणि विद्वान या दोन लोकांच्या हातून लोकांचे व देशाचे सुधारणेकरिता प्रयत्न व्हावयाचे. या दोघांशिवाय कोणी करणार नाही. एक श्रीकडून बलवान आणि दुसरे ज्ञानेकरून बलवान.
 परंतु आमचे देशांत या दोघांची अवस्था पाहून मला फार शोक होतो. पूर्वीचे श्रीमंत आणि विद्वान असे नव्हते, असे मागील पुस्तकी पाहता समजते. त्याकाळी त्यांनी चांगली व उत्तम प्रकारची पुस्तके लिहिली असे नाही; परंतु त्या लोकांचा जिकडे बुद्धिप्रवाह होता, तिकडे त्यांनी लिहिण्यास कमी केले नाही. पूर्वी ग्रंथ मोठाले झाले आहेत. याजवरून विद्येस उत्तेजन आणि बक्षिसी मोठी मिळत असेलसे ठरत आहे.
 संस्कृतांत ग्रंथ बहुत आहेत. पहा की, एकट्या व्यास कवीने अठरा पुराणे व अठरा उपपुराणे, शिवाय सूत्रे लिहिली. तेव्हा हजारो व लक्षावधी श्लोकांचे एक पुराण अशी किती एक लिहिली. तेव्हा एवढे काव्य करण्यास त्याने केवढी मेहनत केली असेल ? आणि किती एक वर्षे घालविली असतील ? तसेच अलीकडे व्याकरणावर व धर्मशास्त्रावर निर्णयसिंधू, मनोरमा, कौमुदी इत्यादीक मोठाले ग्रंथ ज्या पंडितांनी लिहिले, ते पंडित आतांचासारखे असते, तर न लिहिते, हे उघड आहे व आता विद्येची माती होत आहे. हेच अनुमान खरे की प्राचीन राजे हे विद्वानांस मोठा आश्रय देत होते, म्हणजे ते आपला जन्म त्यात घालवून योग्यता मिळविण्याकरिता श्रम करीत होते. अस्तु.
 तो काळ आज पाहिजे होता व इंग्रज लोकांची विद्या तशात यावयाची होती. म्हणजे फारच चमत्कार होऊन त्या विद्येची कदर सर्व लोकांनी केली असती; परंतु जे गेले ते येत नाही. यास्तव सांप्रत आहे त्याजविषयीच आपण नजर पुरवावी हे बरे. हल्ली श्रीमंत लोक व विद्वान लोक विद्येचे शत्रू झालेले आहेत व विद्येशी अपरिचित होऊन भलत्याच कामास विद्या म्हणून आणि वेद पाठ करणारे मूर्ख भट यांस विद्वान असे समजतात. इतका अंधार या देशांत झाला आहे. सांप्रत काळी फक्त वेद पाठ करतात आणि तो उलटासुलटा म्हणतात. क्रमपाठी तीन तीन वेळा तीच अक्षरे म्हणतात; परंतु या कार्यास विद्या कोण म्हणेल? यापेक्षा रस्त्यावर मजुरी करतात ते लोक बरे.
 पण भट फार अमंगळ व अनर्थास विद्या म्हणतात. अहो, विद्या या शब्दाचा अर्थ तरी काय होतो, तो पहा ! पाठ म्हणणे ही विद्या केली कोणी ? यात फळ काय ? हा मूर्खपणा उत्पन्न कसा झाला असेल तो असो ! परंतु एवढा मूर्खपणा कधी कोणत्याही देशांत झाला नसेल. लोक असे समजतात की, श्राद्ध, पक्ष, हव्य, कव्य, श्रावणी, लग्न, मुंज, संस्कार इत्यादी कर्मात भट पाहिजेत; परंतु भट जर विद्वान होतील व हे पाठ म्हणणे सोडून देतील, तर त्यांच्याने श्राद्धे होणार नाहीत काय ? पाठ म्हणणारे मूर्ख, यांस धर्मादाय करावा. ते वेद म्हणतात आणि जाग्रणे करतात परंतु जसे गुजराथी लोकांत मजूरदारांकरवी शोक करवितात, तद्वत हे भट मजूरदार अक्षरे मात्र म्हणतात. यांचे अंतःकरणास काही भेद होत नाही. परकी ढोंग करून रडतात, ते रडणे कोणी मायेचे म्हणेल काय ? तद्वत् पाठ म्हणतात, यास कोणी देवांची स्तुती करतात, असे म्हणावे की काय ?
 परंतु किती एक लोक मूर्ख असे आहेत की, वेदपाठास पैसा देतात व म्हणणारास आणि ऐकणारास काही समजले नाही तरी धन्य मानून धर्म झाला असे समजतात. असो. याप्रमाणे भट आहेत. आणि शास्त्री, पंडित पाहिले, तर हे भटांपेक्षा मूर्ख व गर्विष्ठ असतात; परंतु यांस काही समजते खरे; समजत नाही असे नाही. तथापि त्यांच्या वाकड्या समजुती व अज्ञान जे प्राचीन काळचे संस्कृत ग्रंथांत भरले आहे. ते त्यांचे मनात येऊन दृढ निश्चय असा झाला असतो की, यापलीकडे विद्या नाही. सर्व जातीचे लोक ब्राह्मणांहून कमी व त्यांच्या भूगोलाविषयी अनर्थकारक समजुती असतात व त्यांचा इतका दृढ निश्चय असतो की, ते बरी गोष्ट ऐकत देखील नाहीत. व त्यांस आणखी विद्या पुष्कळ आहे म्हटले, तर खोटे वाटते. मागील सर्व ग्रंथकर्ते देव होते; म्हणून आता ग्रंथ करणे प्रशस्त नाही, असे त्यांस वाटते.
 नवीन रीती व नवीन विद्या पढणे याचे ते शत्रू असतात. पहा की, पाच हजार वर्षांमागे जी रीती, आणि जे ग्रंथ संस्कृत पढावयाचे असतील, तेच आता आहेत. त्यांची सुधारणा त्याजला नको व अक्कल तर्क आणि शहाणपण ही त्यांस कमी असतात व प्राकृत भाषा त्यांस तुच्छ वाटून प्राकृतात हे काही कधी लेखणी उचलीत नाहीत. पोथ्याची वेष्टणे प्राचीन काळाप्रमाणेच आहेत, ती आवडतात. प्राकृत भाषा सर्व लोकांची आहे. याजकरिता प्राकृत ग्रंथ असल्याखेरीज उपयोग नाही, हे मनांत आणीत नाहीत व शूद्र व इंग्रज वाचतील, हे त्यांस भय असते. व्याकरण हे कोणी वाचू नये, वेद कोणी नीच जातीने वाचू नयेत, असे वचन आहे, त्याजवर सर्व आणतात. भारतही वाचू नये म्हणतात; कारण की, "भारतः पंचमो वेदः" अशी नाना प्रकारची कुत्सित वाक्ये बोलून विद्येची दुर्दशा करतात.
 आणखी एक शास्त्री लोकांस सांगा की, कैकाडी वगैरे नीच जातीचे लोक आहेत, त्यांस चांगले लोक करण्याकरिता अमुक एक तजवीज चालवावी, म्हणजे त्यांचा प्राण जाईल, आणि ते म्हणतील की, जे तुम्हांस द्यावयाचे असेल, ते ब्राह्मणांस द्या. यात मोक्ष आहे. नीचास धर्म करणे अशास्त्र आहे. त्यांस ईश्वराने नीच जातीत जन्म दिला. त्यांनी त्यातच रहावे असे सांगून कधी चांगले कामास मदत करावयाचे नाहीत व ब्राह्मणांचा मान वाढवतील. इंग्रजी राज्य झाले, हे एक ब्राह्मणांचे महत्त्व नाहीसे होण्यास मूळ झाले आहे, यात संशय नाही. ब्राह्मणांनी बहुत वर्षेपर्यंत थोरपणा व अधिकार भोगिला. ब्राह्मणांचा मंत्राने मुक्ती व वचनाने शुद्धी होत होती. तेच लोक खरे मानीत होते; परंतु तो काळ गेला. बरे झाले की, लोक आता पाहू लागले.
 ब्राह्मण व आपण कोण, यात अंतर काय ? ब्राह्मणास वीस हात आहेत की काय ? किंवा आपल्यास काही कमी आहेत काय ? अशा समयी ब्राह्मणांनी आपल्या मूर्ख समजुती सोडून द्याव्या आणि सर्व लोकांस सारखे मानून विद्या शिकण्याचा सर्वांचा हक्क आहे, हे कबूल करावे. उगेच भांडू नये. अस्तु. याप्रमाणे विद्वानांची अवस्था झाली. दुसरे श्रीमंत जर पाहिले तर, शुद्ध पशूप्रमाणे आहेत. पहा मोठमोठाले लोक किती मूर्ख आहेत, व त्यांस द्रव्य मिळाले म्हणजे असा अभिमान होतो की, मी आपले बापाचे श्राद्ध मोठे करीन, हजारो रुपये उडवीन व मुलाचे लग्न मोठे करीन, याप्रमाणे पैसा श्रीमंत लोक उधळतात. मग त्यांचे पाऊल कसे पुढे पडेल ?
 वर्षश्राद्धास लाखो रुपये खर्च केलेले लोक आहेत. तशीच कार्येही करतात व अहिल्याबाईने सोळा कोट रुपये धर्मादाय केला, तो कोठे आहे? तो जर इतका पैसा शहाणपणाने सार्थकी लावला असता, तर लोक किती शहाणे झाले असते ? व किती आबादानी झाली असती ? या धर्मकृत्याने मूर्खपणा वृद्धिंगत आला, आळस वाढला. मृत्यू चार दिवसांनी यावयाचा असतो. परंतु कुपथ्य केले तर दुसरेच दिवशी येतो. तस्मात् या धर्मकृत्याने सर्वांस वेड लावून मूर्ख केले व श्रीमंत दीनवाणे होऊन रोगी व अविद्वान झाले आणि उद्या बुडाले असते, ते आजच बुडून गेले. अद्यापि लोकांस काय तजवीज करावी, ते समजत नाही. पहिल्याच मार्गाने ते चालत आहेत. ईश्वर जरी प्रतिकूल झाला, तरी अजून हट्ट करतात; परंतु ईश्वरेच्छा प्रमाण.

♦ ♦


कमती कशाची ?

पत्र नंबर ८० : ४ नोवेंबर १८४९

 आमचे लोकांची अद्याप अशी खात्री झाली नाही की, आम्ही मूर्ख आहो, आम्हास विद्या नाही, आम्हास काही कळत नाही, आम्ही गुणाने रिकामे झालो, आपल्या समजुती फार वाकड्या आहेत.
 आम्हास स्वदेशाची, पृथ्वीची, व्यापाराची व कलाकौशल्याची माहितगारी नाही, आम्हास सावधपणा नाही; आमच्या समजुती प्राचीन काळचे ग्रंथाचे आधाराने ज्या पडल्या आहेत, त्या उपयोगी नाहीत; पुराणे वगैरे पोथ्यांत वेड लागावयाच्या गोष्टी पुष्कळ आहेत, त्यापासून भलतीच मते उत्पन्न झाली. आमच्या रीती व चाली वाईट आहेत, आमच्या स्त्रिया अज्ञान आहेत. जोपर्यंत आम्ही आपल्या देशात बायकांस शहाण्या करणार नाही, तोपर्यंत आम्ही मूर्ख राहू. कारण की, बायकांचे हाती प्रथम मुलास रीतभात लावणे आहे. तेथेच जर बिबा पडला, तर पुढे सुधारत नाही, लहानपणी जी बुद्धी ती शेवटपर्यंत राहते. याजकरिता बायका शहाण्या पाहिजेत. म्हणजे मुलेही नीट होतात. आणि नवऱ्यास वगैरे स्वकीयांस सुख होते. आणि आळशी खोड्या सोडल्या पाहिजेत.
 भट वगैरे मूर्ख लोकांस फारसा आधार देऊ नये. भट हे जरी अज्ञान आणि मूर्ख आहेत, तरी त्यांस एकदम अन्न घालू नये; असे मी इच्छीत नाही. परंतु त्यांस त्याचे अज्ञान माहीत करावे. भटाची उत्पत्ती मोडावी, वाचण्याकडे लक्ष द्यावे, विद्येचे मूळ वाचणे आहे, याचा विचार करावा. गर्विष्ठपणाने ब्राह्मण लोक बहुधा फुगलेले असतात, तसे असू नयेत. या सर्व गोष्टी जरी खऱ्या आहेत, तरी अद्याप हिंदू लोकांत या गोष्टी खऱ्या म्हणणारे व मानणारे मूर्ख व त्यांस सुधारणे हे अगदीच उपयोगी नाही. ते मेल्याशिवाय त्यांची हरकत दूर व्हावयाची नाही.
 परंतु जे पुढे होतकरू लोक आहेत याणी मनात आणावे की, वृद्ध व म्हातारे यांच्या समजुती आपण घेऊ नयेत. आपण विद्येचे शोधास लागून खरे कोणते व खोटे कोणते ते काढावे; पृथ्वीचा शोध करावा; राज्याचा शोध करावा. ते सोडून ब्राह्मण लोक वगैरे असे आळशी आहेत की, ते विपरीत व विलक्षण गोष्टी सांगत बसतात. कोणी रूमच्या, कोणी स्त्रीराज्याच्या, कोणी रावणाचे तपश्चर्येच्या, कोणी कृष्णाच्या, कोणी शुंभनिशुंभ दैत्यांच्या सांगतात. पण अशा गोष्टींपासून काय फायदा होणार आहे ?
 ज्या कल्याणाच्या गोष्टी आहेत, त्या पाहून नंतर ही पुराणे वाचून टाकीली तर चिंता नाही. परंतु सर्व काळ त्यात काय आहे ? खोट्या गोष्टी म्हणजे चवदा रत्ने व सात समुद्र असे मानणे, केवळ मूर्खपणा आहे. मूर्खपणात दिवस घालवून परिणाम काय ? या गोष्टी इसापनीतीतील गोष्टीप्रमाणे समजून, वाचल्या तर वाचल्या, नाही तर नाही. मुख्य व वास्तविक जे ज्ञान त्याचा शोध करून ते शिकले पाहिजे. पंचम स्कंदांतील भूगोल काढून काय उपयोग ? पुराणिकास तांदूळ मिळतात, म्हणून तो काढतो. परंतु आता या चुका पुरे झाल्या. या चुकांनी लोकांस भ्रांती पडून लोक पृथ्वीचे खरे वर्णन ऐकत नाहीत इतकी दृढ भ्रांती पडली आहे.
 याजकरिता या भ्रांतीतून काढण्यास प्रयत्न करावा व खरी पृथ्वी कशी आहे हे पहावे, व देशांतर करावे, बखरी लिहून आणून त्या छापून लोकांत प्रसिद्ध कराव्या. म्हणजे पाहून आलेल्यांचे वर्तमान लोक खरे मानून पुराणांत खोटे लिहिले आहे, असे समजतील. या प्रकारचा यत्न श्रीमंत लोकांनी करून या लोकांस अज्ञानांधकारातून काढले पाहिजे. आपले लोक केवळ मूर्ख झाले आहेत. राज्यरीती, धर्मनीती व कर्मनीती ही काहीच समजत नाहीत. भट, पंडित व ब्राह्मण हे त्यांचे पदरी मूर्खशिरोमणि असतात; ते नाना प्रकारचे वेडेचार समजावितात. फक्त पुराणांवर भरवसा ठेवून खरे मानतात, याजकरिता प्रत्यक्ष शोध पहावा.
 या लोकांनी असे केल्याशिवाय व ब्राह्मणांचा नाद सोडल्याशिवाय यास धडगती लागणार नाही. श्राद्ध केले म्हणजे बाप तृप्त होतो म्हणून मनापासून खपतात व बायकांस तर असे वाटते की, ब्राह्मण जेवतात हे प्रत्यक्ष पितरच आहेत. वृषोत्सर्ग केला म्हणजे मोक्ष होतो. उसाची नाव केली म्हणजे जो मरतो त्याचे ती उपयोगी पडते. या प्रकारची ब्राह्मणांची फायद्याची कर्मे आहेत. ब्राह्मणांनी जे लिहून ठेविले आहे त्यांत एकही खरे नाही. हा सर्व लबाड नाद आहे. यज्ञयागदेखील ब्राह्मणांनीच निर्माण केले आहेत. अडाणी मनुष्य असला आणि त्याचे पिंडास कावळा शिवला नाही तर त्याचे मनास केवढी खवखव वाटते, आणि किती दुःख होते ? याप्रमाणे मूर्खपण भरले आहे.
 पहा, जर ब्राह्मणांनी असा नियम केला की, जितके पोथीत लिहिले आहे तितके तसेच आचरण करावयाचे, तर त्या ब्राह्मणांची वर्तणूक कशी होईल की, सर्व दिवस त्यांस उद्योग व खटपट पुरवेल. दर्भ व समिधा तोडून आणाव्या आणि होम करावे. तर्पण, दगड, धोंडे नाना प्रकारच्या खटपटी संध्याकाळपर्यंत करता करता त्यांचा जीव थकून तो शेवटी निजतो. याप्रमाणे जन्म घालविणारे ब्राह्मणात अद्यापि आहेत. ते ओवळे होत नाहीत आणि असले ब्राह्मण चांगले म्हणून त्यांस लोक समजतात.
 परंतु मी तर त्यांस मूर्ख समजतो. त्याचे जन्माचा उपयोग काय झाला ? आणि त्याणी सार्थक काय केले ? या खटपटीपासून फायदा ईश्वरही देईल, असे वाटत नाही. दया, धर्म, लोकहित व क्षमा केली, तर मात्र सार्थक होईल. नाही तर तांदूळ शिजविले आणि भात करून तो जाळला व दोन घटका मेहनत करून दर्भाची दोरी केली व ती जाळून होम केला आणि समिधा जाळून यज्ञ केला, तर फायदा कोणत्याही लोकी होणार नाही. मला वाटते की, ही खटपट सर्व ब्राह्मणांनी आपले महत्त्वाकरिता व लोकांस सोंगढोंग दिसण्याकरता लिहिली आहे, किंवा मूर्खपणाने एकाने केली त्याजवर आणखी दोन गोष्टी चढवून दुसऱ्याने लिहिल्या. असे वाढत वाढत आजपर्यंत आले व त्यांस मोडणारा कोणी मिळाला नाही.
 क्षत्रिय वगैरे राजे होते, ते ब्राह्मणास थोर मानीत, म्हणून ब्राह्मण पाहिजे तसे लिहीत गेले. परंतु त्याजमुळे त्यांचा व लोकांचाही नाश झाला; आणि मूर्खपणा वाढला व विद्या वाढवावयाची राहिली. या लोकांनी जास्ती वाद करू नये, म्हणून प्रयत्न करून ग्रंथ लिहिले. खोटे असले तरी विचार केल्याशिवाय भाव ठेवावा म्हणजे धर्म, असा मूर्खपणा सांगतात. परंतु यातून लवकर सुटतील, तर बरे होईल.

♦ ♦


प्राचीन ग्रंथांचे अर्थ

पत्र नंबर ८१ : ११ नवंबर १८४९

 पुण्यातील तारीख २२ आक्टोबरचे 'ज्ञानप्रकाश' पत्रांत 'यथार्थवादी' याणीं एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्याणी इकडील पत्रांचे उत्तर देण्याचा अनुक्रम चालविला आहे. त्यात ज्या ज्या गोष्टी उत्तर लिहिण्यासारख्या आहेत, त्या खाली कलमवार लिहितो.
 (१) प्रथम — 'यथार्थवादी' आपले पत्राचे प्रस्तावनेत लिहितात की, ब्राह्मण जातीचे सर्व लोक मूर्ख नाहीत, किती एक सूज्ञ आहेत. या मतास आम्ही कबूल आहो. व आम्ही कधी असे लिहिले नाही की, सर्व मूर्ख आहेत; परंतु कोठे सर्व असा शब्द योजला असेल, तरी त्याचा अर्थ हाच की, बहुतकरून शंभरांत किंवा हजारांत एकदोन क्वचित शहाणे असले, तत्रापि इतरांस बोध करू नये, असे होत नाही. ज्यास बोध करावयाचा असतो, त्याने बहुत जण मूर्ख पाहिले, म्हणजे त्यांस सर्व असे म्हणावे लागते. हा एक भाषणाचा अलंकार आहे. तत्रापि एक सूज्ञ असला, म्हणजे बहुत लोकांचे दुर्गुण असतील. ते एक सूज्ञ त्यामध्ये आहे, म्हणून झाकावे असा अर्थ यथार्थवादीचा नसेल, असे वाटते.
 (२) 'यथार्थवादी' एक वाक्याचा आम्ही संग्रह केला, म्हणून त्याविषयी तक्रार करतात; परंतु आम्ही पंडितांसारखे चुकवाचुकव करणारे नव्हे, हे त्याणी समजावे. एक वाक्याचे दोन अर्थ तर काय, परंतु जितके पंडित असतील तितके विलक्षणपणे अर्थाचे अनर्थ करून दाखवतील व त्यात सद्विचार लक्षात न ठेवता मनास येईल तशी पदे पाडून सरासरी मिळवून देतील; परंतु ही रीती योग्य नाही, कारण जो वाक्य लिहितो त्याचा हेतू असा नसतो. एकाच अर्थाविषयी तो बोध करितो. पंडितांचे विलक्षण अर्थ उपयोगी नाहीत, आणि ते आम्ही मानीत नाही; कारण की, आम्ही लोकांशी बोलतो, तेव्हा सरळ अर्थ असेल तोच दाखवावा. जेव्हा आम्हास पंडितांशी व्याकरण, काव्य, अलंकार यासंबंधी बोलावयाचे असेल, तेव्हा त्याचे अर्थ अमुक होतात, याविषयी वाद करू.
 तूर्त आमचा हा प्रसंग नाही. जसे एकाने एकास मूर्ख असे दुरुत्तर केले आणि तो पुरुष फौजदाराकडे फिर्याद घेऊन गेला, तर फौजदाराने मूर्ख या शब्दाचा कपटी अर्थ किंवा पदे फिरवून किती अर्थ निघतात, ते पहाणे योग्य नाही. ज्या अर्थानि तो शब्द लोकांत प्रसिद्ध आहे, आणि ज्या अर्थाने तो शब्द उच्चारला, तोच अर्थ मनांत आणून शिक्षा करावी. यास्तव 'लोकहितवादी' याने संस्कृत वाक्याचा सरळ व प्रसिद्ध आहे, तोच अर्थ केला. ब्राह्मण लोकांमध्ये क्वचित सूज्ञ आहेत, असे आम्ही समजतो व 'यथार्थवादीत' त्यातीलच एक सूज्ञ आहेत असे आम्ही समजतो, परंतु रीतीचा वाद सोडून त्यांनी पंडिताच्या कोट्या घेऊन वाकडे रस्त्यात शिरू नये.
 (३) रे कलमांत ते लिहितात की, ब्राह्मण जन्मात मात्र मोक्ष आहे व ब्राह्मण या शब्दाचा अर्थ फिरवून लिहितात, त्यासही सदर्हू कलम लागू आहे. 'यथार्थवादी'ने हे पहावे की, सांप्रत गुण, कर्म, स्वभाव येणेकरून युक्त असे ब्राह्मण किती आहेत? आणि जर बहुतांमध्ये हे नाही, तर त्यांस पूर्वापार जे महत्त्व दिले आहे, ते भोगण्यास ते योग्य आहेत की काय ?
 (४) 'यथार्थवादी' यांचे म्हणणे की, पुराणांतील बाष्कळ कथा कल्पभेदाने समजाव्या व विषयपर वचने ज्ञानपर आहेत, परंतु हे ओढूनताणून जबरदस्तीने, सरळ अर्थ सोडून उलटा अर्थ करणे प्रशस्त नाही. एखादी असंभाव्य कथा कल्पांतरीची म्हणून मानिली, तर त्याच अध्यायांत विधिनिषेध येतात, तेही कल्पांतरीचे असे मानले पाहिजे. आणि या प्रमाणे सर्व उडविले म्हणजे या कल्पांतील कोणते विधी याचा मुळीच ठिकाण नाहीसा होईल. त्याप्रमाणे भागवतातील विषयपर कथा असता ज्ञानपर लाविल्या. तर कथेचा ओघ फिरेल आणि संजोग बिघडेल. यास्तव या कोट्या व्यर्थ आहेत, जे उघड अर्थ दिसतात, ते खरे, असे सर्व प्रामाणिक व सूज्ञ कबूल करतील.
 (५) पुराणांत पुष्कळ म्हणी चांगल्या आहेत, हे आम्ही जाणतो; परंतु सर्व निर्बाध आहेत, असे प्रतिपादन करणे 'यथार्थवादी'स योग्य नाही, असे वाटते. यास्तव त्याणी विचार करून याविषयीचा जबाब वास्तविकपणाने द्यावा.

♦ ♦


प्राचीन ग्रंथांचे महत्त्व

पत्र नंबर ८२ : १८ नवंबर १८४९

 सांप्रत हिंदुस्थानातील लोकांचे जे नियम, शास्त्र व समजुती आहेत, त्यांचा गुण असा आहे की, या लोकांचे पाऊल पुढे पडू नये, विद्या होऊ नये व कलाकसबे वाढू नयेत. या प्रकारचे सर्वांचे तात्पर्य आहे. आणि यामुळे आजपर्यंत तीन हजार वर्षांत तसेच झाले आहे. जे सुज्ञ असतील त्याणी विचार करून पहावा की, प्राचीन काळी म्हणजे तीन हजार वर्षांचे पूर्वी मोठे मोठे ऋषिवर्य विचारशील होते. त्यांनी रानात बसून ग्रंथ लिहिले. आकाशात नक्षत्रे पाहून त्यांचे नियम लक्षात आणिले; रानातील औषधी शोधून त्यांचे गुण लक्षात आणले; आणि त्याविषयी शेकडे ग्रंथ लिहिले. तसेच त्याणी भाषेसंबंधी विचार करून व्याकरण लिहिले. स्वयंपाक कसा करतात ते देखील लक्षांत आणून नळपाक व भीमपाक लिहिला. या प्रकारे नाना प्रकारचे ग्रंथ पूर्वी नवीन बुद्धिबळाने उत्पन्न झाले. तत्रापि भूगोलविद्या वगैरे यात त्यांनी बहुत चुका केल्या. अस्तु.
 शोध जे करतात ते चुकले म्हणून त्यात त्यांचा अपराध नाही. त्याप्रमाणे शास्त्र लिहिणारे यांनी पाहिजे तशी न्यायमीमांसा इत्यादी मते वेगळाली लिहिली. त्यानंतर या लोकांस पुढे अवदशेचा पाया येणार म्हणून अशी समजूत पडली की, पहिले ऋषि जाणी हे ग्रंथ लिहिले, ते सर्व देवअवतारच होते व त्याणीं केले तसे मनुष्यजातीच्याने होणार नाही. व आपला धर्म इतकाच की, पूर्वीच्यांनी जे करून ठेवले, तितके मात्र शिकावे; त्याजवर काही नवीन कल्पना काढू नये. काढली तर देवांचा अपमान होतो. व जे काय पाहिजे, ते त्यात सर्व आहे. अशी समजूत पडून लोक अगदी मूर्ख झाले.
 अशी समजूत का पडावी, याची कारणे शोधिली असता अशी सांपडतात की, पहिले पांडवांचे अखेरीपर्यंत ब्राह्मण आपले धर्माचे ठायी रत होते, विद्येविषयी मेहनत करीत होते व उद्योगी होते. आणि दुसरे जातीचे लोक जो विद्वान असेल त्यांस मात्र द्रव्य देत होते. पुढे ब्राह्मणांची विद्या वाढली. ते ग्रहणे सांगू लागले, हिशेब करू लागले, ज्योतिषभविष्ये सांगू लागले, यामुळे लोक त्यांस देवासारखे मानू लागले आणि त्या वेळेस राज्य चांगले होते व खावयास पुष्कळ होते, यामुळे ब्राह्मण लोकांस पुष्कळ मिळत होते. पुढे काही राजे बाजीरावासारखे मनास येईल तसे ब्राह्मणांस द्रव्य देऊ लागले, योग्यता पहावयाची सोडली व ब्राह्मणांचे पायाचे तीर्थ घेऊन त्यांस अगदी ईश्वर मानू लागले.
 तेव्हा ब्राह्मणांनी अशी तजवीज केली हीच समजूत लोकांची रहावी व ब्राह्मणांचा अधिकार कधीही मोडू नये, अशी पुराणे व महात्म्ये लिहिली. त्यात येऊन जाऊन गोष्टी, अमुक राजाने अमुक क्षेत्री ब्राह्मणांस अशी तशी दाने केली आणि तो स्वर्गास गेला; म्हणून ब्राह्मणांस अमुक द्यावे, सहस्रभोजन घालावे, त्याच्या मुखांत पडले म्हणजे देवास पोचते. ब्राह्मण काय ते मुख्य; सर्वांनी त्यांस मानावे; हीच मते पुढे प्रबळ झाली; आणि ब्राह्मण वंशपरंपरेचे झाले. लोक म्हणू लागले की, मूर्ख जरी असला, तरी ब्राह्मण जातीचा व ब्राह्मणाचे पोटचा तस्मात त्यांस धर्म करावा. परंतु पहिले असे होते की, मूर्ख ब्राह्मणांची गणना शूद्रांत होती; व उत्तम शूद्र ब्राह्मणांत येत होता. ते जाऊन सर्व ब्राह्मण वंशाचा मान वाढला. तेव्हा अर्थातच ब्राह्मणांनी पाहिले की, आम्हांस मृत्युलोकांचे देवत्व आले, आता विद्या कशास करावी ? नवीन कल्पना कशास काढाव्या ? प्राचीन काळचे देव होते, त्यांचे वंशिक आम्ही, इतकेच म्हणावे म्हणजे पुरे. याप्रमाणे ते बेत करून गावात येऊन राहू लागले, सुख भोगू लागले व फक्त ग्रंथ पाठ करू लागले.
 तत्रापि लोक ही गोष्ट मनात न आणता त्यांस विद्वान मानू लागले; शास्त्री, पंडित व भट हे याप्रमाणे विद्या पाठ करण्यात वेळ घालवू लागले; कोणी व्याकरणी जो होता, तो इतकेच करू लागला की, अष्टाध्यायी सूत्र पाठ म्हणावे व त्यांची टीकाही पाठ करावी. हीच रीती चांगली असे वाटू लागले. जे नवीन ग्रंथ क्वचित काही करणारे झाले, त्यांस तरी असे वाटते की, प्राचीन काळच्या ग्रंथांच्या आधाराने ग्रंथ केले तर चांगले. प्राचीन काळच्या ग्रंथांतीलच गोष्टी कायम ठेवाव्या. नवीन सर्व गोष्टी अपवित्र व पहिल्या सर्व गोष्टी पवित्र व ग्रंथही पवित्र; याप्रमाणे समजूत पडून कोणी विचार करीतनासे झाले.
 यामुळे लोक होते तसे राहिले व नुसते पंडितच राहिले, असे नाही. सर्व कसबी लोक, लोहार, सुतार, तांबट, वगैरेसुद्धा आपले बापाचे कसबात मात्र हात घालतात आणि त्यांचे इतकीच विद्या शिकतात. यामुळे नवीन कल्पना वगैरे काही होत नाहीत. जी रीती पूर्वी तीन हजार वर्षांमागे होती, तीच आहे. जसा तांब्या पूर्वी करीत होते, तसाच आता करतात. पोथी जशी पूर्वी लिहीत होते, तशीच आता लिहितात. नवीन युक्ती वगैरे काही नाही. यामुळे छापणे, यंत्रे करणे, तारवे बांधणे वगैरे अनेक विद्या आहेत. त्याचे ज्ञान या लोकांस नाही. त्याणी काही अधिक कल्पना चालविली नाही. जी पूर्वी बुद्धी चालली, तितकीच चालून स्थिर झाली. पूर्वीच्या इतकेच वैद्यशास्त्र, तितकेच गणित, तितकाच भूगोल, तितकाच खगोल याप्रमाणे सर्व तितकेच राहिले, पुढे चालले नाही. मला वाटते फार तर काय, ज्या वस्तऱ्याने हल्ली हजामत करतात, तोच वस्तरा पूर्वी चारपाच हजार वर्षांमागे होता. जसे आज धोतर नेसतो, तेच धोतर पाच हजार वर्षांपूर्वी नेसत होते. नवीन कायदा किंवा राज्यरीती व बंदोबस्त काही एक नाही. सांप्रत फार तर काय परंतु प्राचीन काळाविरुद्ध काही गोष्ट बोलले तर त्यांस अधर्म म्हणतात. ज्या रस्त्याने मागे लोक गेले, त्याच रस्त्याने पुढे जावे, अशी रीती पडून तीस धर्म असे म्हणतात. त्यात काही नवीन कल्पना नको.
 यास्तव ही समजूत मोडून सर्व लोकांस अशी इच्छा उत्पन्न झाली पाहिजे की आम्ही आणखी शोध करू, पूर्वीचे लोकांनी शोध केला. तो पक्का नाही. त्यातील चुका सर्व काढून आपली शास्त्रे शुद्ध करावी हे चांगले. मूर्खपणाने त्यासच चांगले म्हणून त्याचेंच प्रतिपादन करावे हे नीट नाही; परंतु हे सांप्रतचे लोकांचे मनात येत नाही आणि प्राचीन कालचे लोकांचे शोधापेक्षा आणखी पुष्कळ शोध लागावयाचा आहे तो लावू, अशी इच्छा उत्पन्न झाली, म्हणजे शास्त्री, पंडित, भट जे आता निरुपयोगी आहेत, तेच पुढे उपयोगी होतील; परंतु ही मूर्खपणाची दृढ समजूत लोकांची सोडविण्याची युक्ती व प्रयत्न काय करावा याचा विचार मोठा अवघड आहे. तथापि तो सर्वांनी केला पाहिजे.
 सांप्रत ब्राह्मण लोक भ्रमात आहेत. याजकरिता त्यांची समजूत पाडणे फार अवघड आहे; परंतु कालेकरून पुढची प्रजा जी आहे, तिजमध्ये ज्ञानवृद्धी अधिक होत आहे, त्या योगाने काही समजूत सुटून मोकळे मन करून विचार करतील आणि विचारास प्रतिबंध आहेत, ते मानणार नाहीत. याप्रमाणे हे लोक सुधारल्यावाचून सुखी होण्याचा रस्ता मला दिसत नाही, तेथपर्यंत हे अधिक अधिक भिकारी होतील आणि द्रव्यहीन होतील. हे पुष्कळ मूर्खपणाचे कामास द्रव्य लावतात.
 आमचे श्रीमंत लोक वगैरे अद्याप पुष्कळ आहेत; परंतु त्यांचे या कामात चित्त नाही. ते येथून उठून काशीस जातात आणि शेकडो रुपये धर्मास बरोबर नेतात व देवळे बांधतात; परंतु त्या रुपयांनी जर एखादे कापड किंवा कापूस किंवा काच करण्याची यंत्रे आणून कारखाना घातला, तर हजारो माणसांचा रोजगार उत्पन्न होऊन खावयास मिळेल आणि सुख होईल. नंतर काशीयात्रेपेक्षा ते रुपये सार्थकी गेले, असे म्हणावे की नाही ? परंतु हे लोकांस कळत नाही. मनास येईल तसे खर्च करीतात. यात्रा वगैरे कराव्या; परंतु जिवंत लोकांस सुखी करण्याचे टाकून यात्रा कराव्या, हे उचित नाही व याने काही हित होत नाही. फक्त मूर्खपणा, आळस व अनुद्योगीपणा मात्र वाढतो. यास्तव ही गोष्ट सर्वांनी मनात आणून लोकांचे हिताचे धोरणास लागावे, हे चांगले. आजपर्यंत मागील वहिवाट होती, म्हणून जरी खचित आहे, तरी या काळास हे लागू नाही. आजपर्यंत जरी कसेही झाले, तरी त्याचा उपयोग नाही. काळ पाहून कालमानाने व्यवहार चालवावा, हे उत्तम आहे; परंतु या विचारावर लोक येतील तो किती एक काळ पाहिजे व भट भिक्षुक वगैरे यांस विचार व विद्या काय आहे, याचा अर्थ कळणे हे अवघड काम आहे व प्राकृत भाषा सुधारून त्या भाषेत ग्रंथ बहुत होऊन सर्व लोकांस कळले पाहिजेत.
 यास्तव जे लोक या देशाचे कल्याण इच्छिणारे असतील, त्यांनी लोकांची सदरील समजूत दूर करण्याची मेहनत केली पाहिजे व स्त्रियांस शहाण्या केल्या पाहिजेत, म्हणजे लोक ज्ञानचक्षूने पाहू लागतील.

♦ ♦


संस्कृत विद्या

पत्र नंबर ८४ : १ डिसेंबर १८४९

 संस्कृत विद्या मोठी गहन आहे व तिचा उपयोग मोठा आहे, असे लोकांस वाटते. याजमुळे शास्त्री, पंडित वगैरे संस्कृतचे विद्वान यांस लोक मानतात. व वैदिक हे जरी ग्रंथ नुसते पाठ करीतात, तरी निदान पक्ष ते ग्रंथाचे रक्षण तरी करतात. म्हणून त्यांस लोक मानतात.
 परंतु संस्कृत विद्येचे तात्पर्य पाहिले तर त्यात व्यावहारिक उपयोग काहीच नाही, संस्कृत भाषा फार प्राचीन आहे; आणि देव म्हणजे जुने हिंदू त्यांची ती भाषा आहे. व तिजला बहुतांनी शोधून संस्कार देऊन सुधारली आहे, म्हणून तीस संस्कृत म्हणतात, हे खरे; परंतु तिजमध्ये जे ज्ञान वाढले, ते कोणाचेही उपयोगी नसोन तिचा विद्यार्थी केवळ भट होईल किंवा विलक्षण तऱ्हेचा मनुष्य होईल. याचे कारण त्यातील ग्रंथात फारसे ज्ञान मुळीच नाही. जे आहे ते केवल जुन्या काळचे. त्याचा आता उपयोग काहीही नाही.
 प्रथम या भाषेतील ग्रंथाचे अनुक्रमाने निवेदन करू. प्रथम वेदांतील मंत्रसंहिता आहेत. त्यात पाहिले तर अग्नी, मित्र, वरुण यांच्या प्रार्थनेची सूक्ते म्हणजे प्रबंध आहेत. ते नाना प्रकारचे छंदांनी रचले आहेत. पुढे ब्राह्मणे म्हणून बखरीसारखे ग्रंथ आहेत, त्यात या मंत्राचा उपयोग कसा करावा, या मंत्राने जनावरे मारून यज्ञ कसे करावे, कोणता मंत्र म्हटला तर काय फळ होते, हे सांगितले आहे. या ग्रंथाचे आधाराने ब्राह्मण हे मोठे योग्यतेस पावले. किती एक काळपर्यंत त्यांचे आशीर्वाद, त्यांचे शाप, त्यांची अनुष्ठाने ही मोठी सामर्थ्यवान आहेत, असे लोकांत प्रसिद्ध झाले होते. याजमुळे ब्राह्मण हे हल्ली जसे पंचाक्षरी, औसर अंगास आणणारे, देवाचे साक्षात्कारी, मंत्री, जादूगार, करामती करणारे, अवलिया वगैरे ढोंगी यास लोक मानतात व भितात, त्याप्रमाणे सर्व लोक ब्राह्मणास भीत आहेत.
 राजे राज्य घेण्याकरिता, निपुत्रिक पुत्र होण्याकरिता, गरीब धनप्राप्तीकरिता, रोगनाशनार्थ, शत्रुनाशनार्थ ब्राह्मणास बोलावून त्यांस अनुष्ठाने, जप, तप, मंत्रसाधने करावयास सांगत. 'लोकांस असे वाटत होते की, ब्राह्मणाचे हाती सर्व आहे व वेदाचे मंत्रास सामर्थ्य आहे. देवांपेक्षा ब्राह्मणांचे मंत्र जबरदस्त. ब्राह्मण हाक मारतील, तेव्हा देव हात जोडून येतात; राक्षस मंत्रांनी पळतात. ही समजूत अद्यापि लोकांमध्ये आहे.
 परंतु ब्राह्मणांनी पूर्वीचे तापसस्वरूप व जटा, व्याघ्रांबरे, दाढ्या, भस्म, दर्भ, वनवास इत्यादी भयंकर प्रकरणे सोडल्यामुळे त्यांचे तेज कमी झाले. लोकांस असे वाटू लागले की, हे आपल्यासारखेच आहेत; परंतु पहिले हे मोठे उग्र होते. आताही असे उग्र कोणी आहेत, त्यांस अडाणी लोक भितात याप्रमाणे हे जादू प्रकरण माजले. पुढे तो काळ जाऊन शास्त्रे उत्पन्न झाली. त्यात वेदान्त मत निघाले. त्याणे हे पूर्वीचे ढोंग सर्व खोटे असे ठरविले. अनेक देवांची अनुष्ठाने खोटी, असे प्रसिद्ध केले. एकच परमेश्वर व त्याचे मनन करणे हेच श्रेयस्कर, असे सांगितले.
 त्याजवर बौद्ध मत झाले, त्याणे तर वेदाचा अगदीच उपहास केला व त्यातील उग्र म्हणजे हिंसा, वपा, याग इत्यादिक कर्मांची निर्भर्त्सना करून दयाधर्माची प्रसिद्धी केली. त्यानंतर ते मत रद्द होऊन पुनः ब्राह्मण-मत उभारले. ते पूर्वीप्रमाणे तर कोठून होईल ? त्यांस जखमा फार लागल्या म्हणून थोडेसे उभे राहिले. त्याची भर जवानी गेली. पुराणे म्हणून ग्रंथ झाले. त्यात काही वेदान्त, काही भक्ती, काही वैदिक कर्मे, काही नवीन देवता, नवीन व्रते, दाने वगैरे लिहिली. या पुराणकर्त्यांचा हेतू असा होता की सर्व वाद तोडून कोणी कोणत्याही मताने वागला, तरी चिंता नाही. यास्तव सर्व मतांचा संग्रह त्याणी केला.
 त्यानंतर काही काळ गेल्यावर निबंधग्रंथ झाले. त्याने पूर्वीचे सर्वच ग्रंथ ईश्वरी असे मानून, सर्व ओझे डोकीवर घेतले. तेव्हा आता संस्कृत शिकणाऱ्याचे हाती कोणते ज्ञान येते, हे पाहिले पाहिजे. तर हा विचार या ज्ञानाने तीनचार हजार वर्षांचा जुना होता, त्याचा हल्लीचे काळात जन्मलेलेपणा जातो. कसा म्हणाल तर त्यांस म्हटले की, लंकेत कोलंबो शहर आहे, तर हा म्हणतो की, लंका कोणास सापडावयाची नाही. तिच्या सभोवते सुदर्शन फिरत आहे. त्यांस विचारले की, तापी नदीचा उगम कोठे आहे ? तर तो म्हणतो की, ती यमाची बहीण असे पुराणांत लिहिलेच आहे. याप्रमाणे पुराणे वाचून त्याचे मनात अनेक कल्पित कादंबऱ्या भरून, त्यांस हल्ली सृष्टी आहे, त्याहून वेगळी दिसते. संक्रांत हे सूर्याचे राशिक्रमण हे तो जाणतच नाही. एक म्हणतो ती रेड्यावर बसून दक्षिणेस जाते आहे. आणि ती दीडशे कोस लांब आहे. आणि तिच्या पाठीमागे एक दुसरी बाई किंकरान्त आहे. तेव्हा या मनुष्यास असे वाटते की, अलौकिक ज्ञान जे कोणास ठाऊक नाही, ते मला या पुराणामुळे ठाऊक झाले आहे. या अभिमानात तो असतो. वास्तविक पाहिले, तर त्याचे ज्ञान एक कपर्दिकेच्या किंमतीचे नसोन त्याचे व इतर लोकांच्या नाशास कारण झाले.
 त्यानंतर दुसरा भाग म्हणजे मंत्रशास्त्र. हे जर त्याणें पाहिले, तर नाना प्रकारची अनुष्ठाने, नरसिंह, शरभ, वेताळ, योगेश्वरी इत्यादी देवता व त्यांस बोलावण्याची रीत व त्यांस प्रसन्न करण्याचे जप, त्यांस माहीत होतात. आणि तो आपले अंगी असा ताठा आणितो की, मी काय तो मोठा, मजमध्ये मोठे सामर्थ्य आहे. मी पाहिजे त्यांस पुत्र देईन, दौलत देईन, शत्रू मारीन; पण त्याचे हाती काही नसते. हा स्वप्नासारखा भ्रमात असतो. ते ग्रंथ वाचून त्यांस भ्रम पडतो. करावयास जातो, तो त्यात काही नाही ! बरे, आणखी संस्कृतविद्येच्या दुसऱ्या भागात जाऊ. जर तिचा अभ्यासी याज्ञिक झाला तर त्यांस असे वाटते की, मला अमुक शास्त्र म्हणता येते, तमुक शास्त्र म्हणता येते, पशू मारावे कसे, त्यांची अंगे कशी काढावी, हा खाटिकपणा येतो. यज्ञाचे मंडप कसे घालावे, त्याचे मागेपुढे मंत्र कसे ओरडून म्हणावे, हे ठाऊक आहे. त्याचे प्रमाणास हा ग्रंथ, तो ग्रंथ, प्रत्यक्ष श्रुति, स्मृती अशा तो काढून दाखवितो व यज्ञ करणारास थेट स्वर्गात नेऊन पोचविणारा तो मीच असे मानतो.
 बरे, आता संस्कृताचे चौथे भागात जाऊ. कोरी धर्मशास्त्र पढला. तर त्यात शंभर ग्रंथ श्राद्धाबद्दल, पन्नास ग्रंथ शौचनिर्णयाबद्दल, पंचवीस ग्रंथ संस्काराबद्दल, असे अनेक निरुपयोगी विषयांविषयी वादविवाद पाहून, त्यात तो आपणांस मोठा धन्य मानितो. श्राद्धास पदार्थ किती असावे नसावे, कोणते भट किती असावे, दक्षणा किती असावी, तीथ कोणती, काळ कोणता, तीळ किंवा तांदूळ असावे, दर्भ किंवा दुर्वा, द्रोण पालथा ठेवावा की उताणा, कोणत्या दिशेस बसावे, आधी देवास की आधी पितरांस गंध लावावे ही सर्व कवाईत त्यांस पाठ होते. आणि त्यातील वाद त्यांस ठाऊक होतात. त्याविषयी बोलण्यास तो मोठा उत्सुक होतो, त्याची त्यांस मोठी हौस येते. कोठे श्राद्ध असले तर तेथे आपली तो शेखी मिरवितो आणि दोनचार आणे मिळवून घरास आणितो.
 बरे, संस्कृतविद्येच्या पाचवे भागात आपण शिरू, विद्यार्थी न्याय, व्याकरण, मीमांसा पढला तर मग हे जग दिसते हे खरे किंवा खोटे, याचीच भ्रांती त्यांस पडून त्याविषयी तो वाद घालीत बसतो. कोणी म्हणतो, दहा पदार्थांनी सृष्टी घडली तर कोणी म्हणतो चोवीस, कोणी म्हणतो सात; कोणी म्हणतो मी आणि ईश्वर एकच जातीचे, मध्ये भाषा मात्र आहे. कोणी म्हणतो सुखदुःख हे मनातही आणू नये, आळसात बसावे. प्रारब्धी आहे ते घडतच आहे. या मानसिक कल्पनेच्या जालात तो सापडून वेडा होतो.
 बरे, सहावे भागात पाहू. जर तो ज्योतिष शिकला, तर म्हणू लागतो, अमुक ग्रह आला तो पीडा करील. मंगळास अमुक दान पाहिजे. शनी सूर्याचा मुलगा, परंतु मोठा द्वाड ग्रह, त्याचा जप केला असता शांती होते. त्याचे डोकीवर तेल ओतावे किंवा ब्राह्मणास लोखंड द्यावे; परंतु हे मोठे उग्र दान आहे. कोणी घेणार नाही. प्रश्न सांगतो, पुढले भविष्य, आयुष्य, रोग, शत्रुसंप्रदायाविषयी नाना प्रकारचे भ्रम लावितो.
 याप्रमाणे कोणतेही भागात जरी पाहिले. तरी संस्कृतविद्या निरुपयोगी व नाना प्रकारचे कुतर्क उत्पन्न करणारी व संसारावरील चित्त उडवून आळशी करणारी, निरुपयोगी कर्मे करणारी आहे. सांप्रत काळी जे ज्ञान पाहिजे, ते त्यात मुळीच नाही. सांप्रत काळचे देश, तेथील राज्ये व फौजा व व्यापारी इत्यादिकांची माहिती, यंत्राची उत्पत्ती, कायदेकानू कसे असावे, गैरचाली कोणत्या आहेत, टाकाव्या कोणत्या ठेवाव्या कोणत्या, हे त्यांस माहीत नसते. दोनचार हजार वर्षांपाठीमागे पिकलेले वेड वगैरे समजुती व वाकडे तर्क हेच आता काढून त्यांची वाटाघाट करीत आयुष्य घालवितात. जोपर्यंत बाहेरचे देशांतील वर्तमान लोकांस ठाऊक नव्हते, तोपर्यंत याच ज्ञानाचा थोरपणा होता व हे ज्ञान ज्यापाशी होते, त्यांस थोर मानून त्याचे पायाचे तीर्थ घ्यावे, येथपर्यंत मजल आली.
 परंतु आता बाहेरचे ज्ञान या देशात शिरले. त्याचे पुराने हे जुने ज्ञान वाहून गेले. त्याची तुच्छता अगदी स्पष्ट झाली. पाठीमागून हे पोकळ ढोंग चालत आले. त्याचा पोकळपणा उघडकीस येऊन त्या ढोंगावर पोट भरणारे त्यांचे महात्म्य कमी झाले. तर आता ज्यांस थोरपणा पाहिजे असेल, त्याणीं सांप्रत काळचे ज्ञानाची संपदा मिळविण्याचा प्रयत्न करावा. ज्या ज्ञानाने आपल्यावर इतर लोकांनी सरशी केली, ते ज्ञान आपण धिक्कारू नये; कारण की, त्याचा आपणास अनुभवच आला आहे. याजकरिता सावधगिरीचे लक्षण हेच की, काळास ओळखून त्याप्रमाणे चालावे. असे न केले तर फार फजीत होऊन दुर्दशा झाली आहे, त्यापेक्षा अधिक होण्याचा संभव आहे. पूर्वी जुन्या काळचे ब्राह्मण म्हणजे ऋषी वगैरे यांनी अपुरती कामे ठेविली ती आपण पुरती करावी. त्यांनी वैद्यकत्व पूर्णत्वास आणले नाही. तर आता आपण अनेक देशच्या कल्पना एके ठाई करून ते सुधारावे म्हणजे खरा थोरपणा मिळेल. व लोकांचे हित होईल. असे न होईल तर लोक वैद्यास सोडून नवे डॉक्टर व नवीन इस्पितळे यांचा आश्रय करतील; आणि पुराणे वैद्य बिचारे उपाशी मरतील. याप्रमाणे सर्व विद्येचे आहे.

♦ ♦


ज्ञान हाच पराक्रम

पत्र नंबर ८५ : ९ डिसेंबर १८४९

 सांप्रत काळी हिंदू लोक गरीब आहेत व अज्ञानी आहेत, तद्विषयी मी सिद्धान्त लिहितो की, संपदा आणि ज्ञान ही दोन्ही, जोपर्यंत यास आपली स्थिती कळली नाही तोपर्यंत प्राप्त होणार नाहीत. जरी हा देश उत्तम प्रकारचे उत्पन्न करणारा व धनधान्यसमृद्धिकर्ता आहे, तरी या लोकांस त्याचे फळ नाही.
 आता पृथ्वीवर दुसरे अनेक देश आहेत. त्याची अवस्थाही फार वाईट आहे. रयत लोक इकडल्यापेक्षा तेथे दरिद्री आहेत; परंतु हे उदाहरण या देशास उपयोगी नाही. कारण की, हा देश पूर्वी कसा होता व हल्ली कसा आहे, ते पाहून विचार केला पाहिजे. किती एक लोक असे आहेत की, मुसलमानांचे राज्यास नाव ठेवीत नाहीत; परंतु इंग्रजांचे राज्य विशेषेकरून दरिद्रास कारण समजातात व त्यांस काही नवीन शहाणपणाची युक्ती सांगितली, तर ऐकत नाहीत आणि म्हणतात की आम्हास आजपर्यंत या युक्ती कोठे होत्या? आजपर्यंत आम्ही दुःखी नव्हतो; आता मात्र झालो, ते इंग्रजांमुळे झालो. यास्तव या युक्तीने आमचे दरिद्र जाणार नाही, इंग्रज जातील तर मात्र जाईल, असे समजून युक्तीस बहुत लोक अगदी मानीत नाहीत. फक्त हे राज्य वाईट, असे म्हणून संध्याकाळपासून उजाडेपर्यंत आणि उजाडल्यापासून सारा दिवसभर जप करतात.
 या प्रकारचे लोक आम्ही नित्य पाहतो. तेव्हा अशा लोकांची समजूत पाडणे हे सर्वांहून अवघड आहे. परंतु पहा की, असा विचार करीत बसणे मूर्खपणाचे आहे. उद्योगास झटणे हा शहाणपणा आहे. दरिद्र आहे खरे व ते पदोपदी वृद्धिंगत होत चालले आहे. द्रव्याचे साधन कमी होत चालले आहे; परंतु अशा जपाने उपाय होणार नाही. जर विद्या व ज्ञान येणेकरून आपले दरिद्र कमी केले, तरच होईल. ज्ञान जेथे आहे, तेथे सर्व पराक्रम आहे. परंतु हिंदू लोकांमध्ये एकमत असेल तर या गोष्टी घडतील. आपलेपासून आपली कंठाळ एखादा घेऊन गेला, तर जाग्यावर बसून शिव्या दिल्या तर कंठाळ येईल की काय ? यास्तव जे नेणारे आहेत, ते परत देण्यास अनुकूल करण्याचे जे प्रयत्न असतील, ते करावे. ते तरी शहाणपणाखेरीज कसे सापडतील, यास्तव शहाणपण मुख्य पाहिजे. त्याचे योगाने दरिद्र कमी होईल.
 या देशातील लोकांनी विलायतेस जावे, तेथे वस्ती करावी. विद्या शिकावी. जे श्रीमान आहेत, त्याणीं या कामात द्रव्य खर्चावे, तिकडील ज्ञानाची वृद्धी करावी. तिकडील कलाकौशल्य इकडे आणावे; आपल्या दुष्ट चाली सोडाव्या, हेच शहाणपण आहे. या शहाणपणाने या लोकांस समर्थता येईल. आणि समर्थतेनंतर दरिद्र जाईल. मुख्य ज्ञानापासून सर्व पराक्रम आहेत. कधी कधी ज्ञानाबरोबर लागलेच पराक्रम दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. कारण की, किती एक मूर्ख असून, अधिकार पावतात, तेव्हा त्यास अधिकार कसा मिळाला ? हा प्रश्न बहुतेक हिंदू लोक करतात; परंतु हा केवळ पोरकट प्रश्न आहे. पराक्रमाची रीती अशी आहे की, जो कोणी घरात प्रमुख शहाणा असतो, तो बहुत द्रव्य संपादन करतो. नंतर त्याचे विभाग पश्चात किंवा केव्हा तरी होतात. तेव्हा त्यातील एक विभाग अयोग्य पुरुषाच्या हाती लागतो, म्हणून कोणी जर असे म्हटले की, हे सर्व मूर्खपणाने संपादन केले आहे, तर ही गोष्ट सत्य नाही.
 कारण की वाटणीत ही चूक आहे; परंतु संपादनात मूर्खपणा नाही. मिळविणाराने शहाणपणानेच मिळविले आहे. तसे इंग्रज लोकांनी सर्वांनीच पराक्रम केला असे नाही किंवा सर्व शहाणे आहेत, असेही नाही; परंतु त्यांच्यातून जे शहाणे निघाले, त्याणी पुढारी होऊन कवाईत व युद्धविद्या काढली आणि पुढे हिंदुस्थानात आले. त्यात जे शहाणे पुरुष एलफिस्तनसाहेबाप्रमाणे किंवा हेस्टिंगसाहेबाप्रमाणे झाले, त्याणीं पराक्रम केला. आणि जातेसमयी आपले लोकांचे हाती अधिकार दिला आणि सांगितले की, तुम्ही आता याची वहिवाट करा. त्या वहिवाटीवर कोर्ट डैरेक्टर व गवरनरादिक आहेत ते त्या पराक्रमाचे फलाचे लोकांस हिस्से देत आहेत. कोणास जड्ज, कोणास कलेक्टर नेमतात. त्यांनी एखादा हिस्सा भिडेने मूर्खास दिला. म्हणून मूर्खपणाने हा पराक्रम मिळविला, असे सिद्ध होत नाही. याजकरिता ही समजूत आमचे लोकांची मुख्य पडली पाहिजे. शहाणपणाशिवाय काही पराक्रम नाही.
 यास्तव हिंदुस्थानात असे कोणी लोक प्रमुख होऊन त्याणीं सर्व आपले लोकांस बलवान व शहाणे करून ठेविले पाहिजेत. त्यांस नवीन द्रव्योत्पत्तीचे मार्ग दाखविले पाहिजेत. इंग्रजांनी राज्य बलात्काराने घेतले, असे असले तर असो; परंतु व्यापार तर बलात्काराने घेतला नाही ? त्यातच हे लोक का शहाणे होत नाहीत ? इकडे काच करता येईल व तारवे करता येतील. लोखंडाचा रस करता येइल. भूमीतला कोळसा सापडेल. कापड करिता येईल. इतक्या गोष्टी समजून आल्या म्हणजे किती कार्य झाले ? व हे लोक किती बलवान होतील ? याप्रमाणे प्रथम असेच होऊ द्या की, सर्व व्यापाराचा माल इकडेच व्हावा. विलायती नको. इंग्रजास इकडील कच्चा माल खरेदी केल्याशिवाय निर्वाह नाही. यास्तव अशी गोष्ट केल्यानंतर राज्य मात्र त्यांचे हाती राहील. राहिले तर काय चिंता आहे ? जो पैसा तिकडे नेतील तो आपण जिन्नस देऊन खरेदी करून परत आणू; परंतु या गोष्टीस शहाणपण असून सर्व लोकांचे काम डोकीवर घेणारे पाहिजेत. असे लोकांचा फार तोटा आहे.

♦ ♦


सांप्रतचे पंडितांचे ज्ञान


पत्र नंबर ८६

 सांप्रत काळचे पंडितांचे ज्ञान असे असते की, त्याचा जिवास, शरीरास, प्रपंचास काहीच उपयोग पडत नाही, केवळ वादविवादच करण्यास व लोकांस तमाशा दाखविण्यास मात्र उपयोगी आहे.
 यास्तव मला हे पंडित बहुरूपी, सोंगाडी व चित्रकथी याहून बरे दिसत नाहीत. बारा-पंधरा वर्षेपर्यंत व्याकरण किंवा न्याय यांचे अध्ययन करतात. म्हणजे त्यांस पंडितपणा प्राप्त होतो. परंतु त्यांची विद्या अशी असते की, एकाने म्हणावे या शब्दाचे अंती 'च' असावा; दुसऱ्याने म्हणावे 'चा' असावा. याजविषयींचा वाद शेकडो प्रमाणे दाखवून सर्व दिवसभर करतात. शेवटी निश्चय एकाचाही होत नाही. तसेच नैय्यायिक हेही भांडतात. एक म्हणतो ईश्वर आणि जीव एक आहे. दुसरा म्हणतो, दोन्ही विभक्त आहेत. तिसरा म्हणतो, ईश्वर गुणी आहे. चवथा म्हणतो निराकार आहे. याप्रमाणे रिकामा वाद चालविण्यात जन्म घालवितात आणि त्यांस वादातील सत्य काय आहे, हे समजण्याची इच्छा नसते. परंतु परस्परांपेक्षा श्रेष्ठ कोण होतो, हे पाहण्याकरिता भांडतात आणि मग त्या वादात सत्यानेच भाषण करतात, असे नाही. मनास येईल तशी कल्पना, कपट, युक्ती, मूर्खपणा इत्यादी योजून सरासरी फार बोललेसे करतात. त्यांस कोणी म्हणतात, असे निर्फळ वाद घालण्याच्या ज्या ज्या विद्या शास्त्री शिकतात, त्यापासून इहलोकी व परलोकी हित नाही. आपले जिवाचेही कल्याण नाही व दुसऱ्याचे जिवाचेही नाही.
 एक व्याकरण म्हणावयास बारा-चवदा वर्षे लागतात. त्याचे कारण हेच आहे की, त्या प्रकरणी वाद करण्यास शिकतात; ग्रंथ पाठ करतात व प्रतिष्ठेकरिता वाद करतात. हे सर्व शास्त्री, पंडित या प्रकारचे आहेत. त्यांस व्यावहारिक ज्ञान नाही. त्यांस मोडीचे लिहितादेखील येत नाही व कोणतेही काम करावयाचे हे उपयोगी नाहीत. बरे, इतके असून यांची वर्तणूक पाहिली तर फारच वाईट. सामान्यतः हे गोंधळी, भट याप्रमाणेच व्याजस्तुती करून गृहस्थास भुलवून पैका काढणारे लोक आहेत. प्रातःकाळी उठले, म्हणजे यांचा प्रथम उद्योग हाच आहे की, गृहस्थाचे घरी जाऊन त्यांची स्तुती करावी. त्यामध्ये त्याचे जसे वर्णन पाहिजे तसे करून दोन पैसे निघाले, म्हणजे त्यांचे कार्य झाले, पैशाकरिता महापातकी असला तरी त्यांस शुद्ध म्हणतील, महा नीच असला, तरी त्यांस सन्मान देतील. पापाने द्रव्य मिळविले तरी, त्यांस दिले म्हणजे तो सद्व्यय झाला अशी समजूत करून आणखी तसेच मिळीव, म्हणून सांगतील.
 याचे उदाहरणास फार लांब जावयास नको. बाजीराव पेशव्याने पुण्यात ब्राह्मणांचे मनोरथाप्रमाणे दाने केली व बहुत शास्त्री, पंडित जवळ बाळगिले; परंतु त्याणीं त्यांस सत्कर्मास किंवा आपले राज्य रक्षिण्यास किंवा नीतीने चालविण्यास समजूत दिली नाही. ते त्याणें केले, त्याजविषयी त्याची स्तुतीच करीत गेले व महाराज सर्वत्र विजयी होतील, असे आशीर्वाद देत गेले. आपण ब्राह्मण परभू आपले तेज सर्वांहून अधिक; आपलेकडून एक शिपाई गेला तर सर्वांचा पराजय होईल, याप्रमाणे बोलून, त्याजकडून राज्यकारभार सोडून देववून त्यांस पंडितांचे आर्जव करणारा असा मूर्ख केला व शेवटी आपण आणि तो असे दोघेही भीक मागत गेले. यास्तव हे पंडित जरी पुष्कळ पढलेले असले तरी ते मूर्ख समजावे; कारण ही लोकहितकारक ज्ञान त्यांस नाही. त्यांचे ज्ञान भाटांचे व तमासगिरांचे बोलण्याप्रमाणे आहे. त्यापासून मोक्ष व्हावयाचा नाही व इहलोकी सुखोत्पत्तीही व्हावयाची नाही.
 सारांश, हल्लीचे पंडित हे महामूर्ख असे मी म्हणतो. हे नाना प्रकारचे अर्थ फिरवितात. नानाप्रकारचे असत्य सिद्धान्त करतात आणि क्षणांत मुक्तीचा मार्ग, क्षणात नरकात जाण्याचा मार्ग दाखवितात. यांस मुख्य ज्या गोष्टी त्याचे ज्ञान नसते. मनुष्य जन्मला कशाकरिता ? त्याचे सार्थक काय ? व आपले कर्तव्य काय ? याचा विचार त्याचे मनात क्षणभरही वसत नाही. द्रव्याचा व मानाचा लोभ धरून हे असतात. यांचा आश्रय जो कोणी करील, त्यांस वेड लागेल यात संशय नाही व त्यांची बुद्धी स्थिर नाही.
 अमुक सत्य, अमुक असत्य, हेही त्यांस भासत नाही. सत्याचा व असत्याचा भाव यांस समजत नाही. धर्माचा, अधर्माचा भेद त्यांस ठाऊक नाही. जो पाहिजे तो शास्त्रार्थ काढून देतील; जे पाहिजे ते प्रायश्चित्त देतील. फक्त पैसा मिळाला म्हणजे झाले. अशा पंडितांचा संग्रह करून कोणास काय फायदा होणार आहे ? राजास होणार नाही व प्रजेसही होणार नाही. व ज्या प्रजेचे पुढारी असले लोक विनाकारण आपल्यास विद्वान म्हणवितात, त्या प्रजेचा सर्वस्वी नाशच होईल याप्रमाणे हिंदू लोकांची व्यवस्था झाली आहे. या लोकांस शास्त्रीपंडितांखेरीज दुसरे कोणी पुढारी मिळतील, तेव्हा या लोकांमध्ये व्यवस्था चांगली होईल व शास्त्री, पंडित पुष्कळ असावे, अशी जे इच्छा धरतात, ते महामूर्ख समजावे. या लोकांपासून या देशाचे किमपि हित होणार नाही; अधिक मूर्खपणा मात्र वाढेल व भ्रांती वृद्धिंगत होईल. आणि ती ज्यांचे मनात शिरेल, त्यांचा प्राण गेल्यावाचून निघणार नाही. यास्तव हे शास्त्री, पंडित अगदी निरुपयोगी आहेत, हा सिद्धान्त होतो.
 ही विद्या काही उपयोगी नाही. जर असे नसेल, तर मला कोणी उत्तर द्यावे की, व्याकरणाचे पंधरा वर्षे अध्ययन केले, त्यापासून अमुक उपयोग होतो. असे मला दाखवून द्यावे, म्हणजे मी वास्तविक म्हणेन; परंतु मी शोध केला आहे, त्याजवरून मला तर वाटते की, मनुष्यास लाकडे तोडावयाचे कसब शिकविले तर बरे; परंतु हे व्याकरण नको. यात काहीच अर्थ नाही. केवळ मूर्ख होण्याची विद्या आहे. आणि इतकेही असून ज्याचा त्यांस असा गर्व असतो की, मी केवढा विद्वान, माझ्यासारखा विद्वान त्रैलोक्यात नाही पाहिला तर तो सर्वांहून मूर्ख असतो.
 याप्रमाणेच ज्ञान, मीमांसा, अलंकार या शास्त्रांची व्यवस्था आहे. केवळ असत्य सिद्धान्ताचे प्रतिपादन करून, विलक्षण कुतर्क करून भलतेच अविचार लोकांत स्थापन करतात. आणि वास्तविक पाहिले तर ब्राह्मणांमध्ये चार रोजगार आहेत. सराफ, भट, पंडित व हरदास. या सर्वांपेक्षा पंडित हे महामूर्ख होत. सराफ, भट, हरदास हे बरे. हे यत्किंचित पढलेले असतात. याजमुळे हे दुराग्रहीं नसतात व यांस अभिमान नसतो. सांगितलेली गोष्ट ऐकतात व ह्यांचे लक्ष व्यावहारिक मार्गावर फार असते. याजकरिता काही सुधारण्याचा रस्ता यात आहे. परंतु हे विधिज आहेत, म्हणून पंडित यांची समजूत फार दृढ होती की आमचे मत खरे आहे व इतर सर्व मूर्ख आहेत. याजकरिता यांचा दुराग्रह फार होतो, तो हे सोडीत नाहीत, अतिशय आग्रह धरितात. याजमुळे हे लोक अगदीच उपयोगी नाहीत.
 हिंदू लोक यांचे महान दुर्भाग्य म्हणून हे पंडित व शास्त्री या लोकांचे पुढारी झाले व यांस लोक समजतात की, हे धर्मरक्षक आहेत; परंतु हे अधर्मवृद्धी करणारे होत. व हे सोनार, परभू, ब्राह्मण वगैरे यांचा यत्किंचित निमित्ताने वाद लावून दोहोंकडून पैसा खाणार व खोटी मते आणि नाना प्रकारची खोटी कर्मे प्रसिद्ध करून भोळ्या लोकांस ठकविणार; यास्तव त्यांस आवडतही नाही की, आपली शास्त्रे बहुत लोकांस ठाऊक व्हावी; कारण तेणे करून आपली उघडीक होते व दगाबाजी व लबाड्या बाहेर पडतात. हे त्यांस फार भय आहे. जोपर्यंत आच्छादित आहे, तोपर्यंत यांच्या प्रतिष्ठेचे आयुष्य आहे, मग किरकोळ लोक यांस पुसतील की तुम्ही आम्हास सांगता; परंतु ही सर्व लबाडी आहे. तुम्ही लबाडीवरच पोट भरता, तस्मात् आम्ही तुमचा त्याग करितो. अशी अवस्था होईल, यात संशय नाही.
 हा मूर्खपणा बहुत काळपर्यंत निभला, कारण की गौप्य होते. आजपर्यंत महान प्रयत्नाने झाकून झाकून चालविले; परंतु आता चालणार नाही. अडाणी लोकांकडे एखादी पंचाईत न्या, तर ते लागलाच न्याय सांगतील. बरे तीच पंचाईत चार पंडिताकडे न्या, म्हणजे अतोनात वाद करतील आणि नाना प्रकारच्या मसलती काढून असत्य प्रतिपादन करतील, अशी त्यांची अवस्था आहे. त्यांची मने बिघडून जातात आणि भ्रांती उत्पन्न होऊन त्यांस विवेचन करता येत नाही. खोट्यांस स्थापन करण्याकरिता प्रमाणे दाखवितील आणि त्याचा पक्ष धरून भांडत बसतील. याचा अनुभव, कोणीही विचार करून, त्याची वर्तणूक पाहिली तर लक्षात येईल.
 जेथे बहुत पंडित, तेथे मूर्खपणा वाढून भ्रष्टाकार होतो. अधर्मप्रवृत्ती होते व इतर लोकांवर दया करणे, हे त्याजपासून घडत नाही. त्यांची समजूत अशी आहे की सर्वांनी दुःख भोगिले, तर चिंता नाही; परंतु आम्ही मात्र सुखी असावे. तदनुसार उदाहरण पहा. शास्त्री यांचे मताने ज्या ज्या गृहस्थांनी अन्नछत्रे घातली तेथे शूद्र गेला तर त्यांस अन्न मिळत नाही आणि ब्राह्मण श्रीमंत झाला, तरी त्यांस जेवावयांस बोलावितात ! असाच चमत्कार आहे.
 अस्तु. सर्व लोकांस ज्ञानप्राप्ती होईल, तेव्हा हे सर्व पंडितांचे गुण बाहेर पडतील.

♦ ♦


नवीन ग्रंथांची आवश्यकता

पत्र नंबर ९३

 आमचे लोकांस विचार अगदी नाही. विद्या वाढवणे व बुद्धी वाढवणे हे तर त्यांस माहीत नाही. सांप्रत सुधारलेले लोक विद्यावृद्धी करण्याकरिता पुष्कळ झटत आहेत; परंतु हे इतर कोणाचे मनात देखील येत नाही. मराठी भाषेत ग्रंथ अनेक छापिले आहेत व आणखीही वरचेवर छापत आहेत. वर्तमानपत्रात अनेक तऱ्हेचे मजकूर व माहितगारी लिहून छापतात; परंतु त्यांचा कोणी वाचणारा नाही. जे आहेत ते गरीब आहेत. श्रीमंत व थोर जुन्या काळचे. यांस असे वाटते की, हा कागद व्यर्थ खर्च कशाकरिता करतात ? व यात उपयोग काय ?
 परंतु त्यांचे लक्षात असे येत नाही की, आम्ही केवळ मूर्ख आहो व आम्हांस काही समजत नाही. पहा की, या लोकांस आमचा देश कोठे आहे व आणखी देश कोठे आहेत, व तेथे कोण आहेत, व या देशात सुधारणा काय पाहिजेत, व जर कोणी करू लागला, तर त्यांस अनुकूल व्हावे, हे समजत नाही. नाना प्रकारच्या विद्या आहेत, त्यापासून लाभ बहुत आहेत. समुद्रात नावा चालविण्याची विद्या आमच्या लोकांत कोठे आहे ? रसायन शास्त्र व त्यापासून लाभ होतात, हे कोठे माहीत आहे ? यंत्रज्ञान कोठे समजते ? निदान चांगले कोणते व वाईट कोणते, याचा देखील भेद समजत नाही. जर कोणी चांगल्या कामास आरंभ केला, तर त्यांस वाईट म्हणतात. कोणी वाईटास केला, तर त्यांस चांगले म्हणतात. असे विलक्षण लोक आहेत.
 कोणी उपयोगी ग्रंथ केला, तर तो कोणी घेत नाहीत, व त्यात काय आहे, हे देखील पहात नाहीत. त्यांस असे कळत नाही की, ज्या मनुष्याने ग्रंथ लिहिला, त्याचा काही तरी हेतू असेल, व त्यांस असे वाटत असेल की, लोकांस ज्ञान नाही, तेव्हा ते या ग्रंथाच्या द्वारे त्यांस मिळावे; परंतु लोक ही गोष्ट समजत नाहीत. ग्रंथात काही असो, कोणी काही म्हणो, ते जुन्या रीतीने सर्व गोष्टी घडाव्या असे पाहतात. त्यांस अद्यापि इतके देखील समजत नाही की, आमचे लोकांस काही कळत नाही. त्यांस बहुत ग्रंथ झाले असता उपयोग होईल, व देशातील लोक शहाणे होतील.
 त्यांची समजूत अशी आहे की, संक्रांत आली तर चार आणे खर्चून, एक तांब्याची तबकडी घेऊन, आत तीळ घालून दक्षणेसहित एखाद्या मूर्ख ब्राह्मणाच्या हाती देतील. आणि आम्ही धर्म केला, धन्य झालो, असे म्हणतील; परंतु हेच चार आणे देऊन अमुक एक नवीन ग्रंथ झाला आहे, तो घेणार नाहीत. बरे, तिळपात्र दिले, त्यात दोन आणे ब्राह्मणाच्या पदरी पडतात व दोन आणे तांबटास मिळतात, तद्वत् चार आण्याचे एक पुस्तक घेतले तर दोन आणे कागदाबद्दल जातील व दोन आणे मजुरीबद्दल ब्राह्मणास मिळतील, तेव्हा हाही त्याचे रीतीप्रमाणे धर्मच झाला.
 वामन द्वादशीचे व्रत करतात; त्यांस बारा लहान पोरे मुंज जहालेली आणून त्यांस दोन तीन रुपयांचा विषय देतात; परंतु तो विषय असा असतो की, त्याचा उपयोग काही पडत नाही. परंतु लोकांस असे वाटते की, हे पुराणात सांगितले आहे, त्याप्रमाणे आहे. म्हणून हेच पुण्य; परंतु त्या रुपयांची पुस्तके आणून मुलांस दिली किंवा त्या रुपयांत ब्राह्मणाचे मुलास एखादी विद्या शिकविली, शाळेत आठचार आणे देऊन त्यांस पाठविले, तर त्यांस फायदा होईल. सोन्याच्या प्रतिमा करून ऊस, मडके यात पूजा करून द्याव्या, त्यापेक्षा ग्रंथ दिले तर मुले जन्मपर्यंत वाचतील; शहाणी होतील, आणि उपयोग फार पडेल.
 तसेच लोक मरतेसमयी तुला करतात. त्यात पाच चार हजार रुपये भरतात व मग ते मनास येईल तसे उडवितात; त्यांस काही अनुक्रम नसतो. त्या पाच हजार रुपयांचे काही तरी चिरकाल राहण्याजोगे काम केले, तर किती लोक शहाणे होतील ? लोक असे म्हणतात की, पुष्कळ ग्रंथ लिहितात परंतु पैसा कोणापाशी आहे ? विकत घ्यावे कोणी ? आणि इकडे तर असा अनिर्वाच्य खर्च करतात. आणि जे उपयोगी ते करीत नाहीत.
 आता वृद्ध लोक जे आहेत, ते तर सुधरतील, हे घडतच नाही. कारण की, जो मनुष्य पंचवीस वर्षांवर जहाला, त्याची समजूत लहानपणी जी पडते, तीच त्याची कायम होते व त्यांस असे वाटते की, मी शहाणा, मला शिकवितात काय? याच शहाणपणावर मी पैसा मिळविला, संसार केला. आता जरी दरिद्र आले, तरी मी वेडा आहे, हे त्याला कदापि वाटत नाही, यास्तव त्याची सुधारणा व्हावयाची नाही. म्हणून या देशात जितके पंचवीस वर्षांवरचे जुने काळच्या समजुतीचे माणूस आहेत, त्यांची आशा अगदी नको. ते जातील तेव्हा पक्की सुधारणा होईल.
 परंतु जे लहान आहेत व ज्यांस शहाणपण मिळवावयाचे आहे, त्यांजवर आमची आशा आहे. आणि त्यांचे हातून काही सुधारणा झाली, तर होईल; याजकरिता विद्याभ्यास जो करविणे, तो चांगली समजूत पडेल, लोक विचार करणारे होतील, अशा प्रकारचे त्यांस पंतोजी व शाळा पाहिजेत. व जी भाषा व जे ग्रंथ प्रथम मुलांचे हाती पडतात व ज्या मनुष्याची संगत त्यांस असते, तशी त्याची समजूत होते. जर संस्कृत भाषा प्रथम मुलास समजाविली, तर त्याच्या समजुती तशाच होतील. जर इंग्रजी शिकविले तर तशा होतील. जर मराठी शिकविले तर तशाच होतील. यास्तव मुलास ग्रंथ वाचावयास द्यावयाचे ते प्रथम चांगले पाहिजेत. त्यांस सुबुद्धी होऊन त्यांची समजूत चांगली पडावी व त्याणी बहुत वाचण्यावर लक्ष द्यावे व त्यांच्या मनातून जुन्या काळच्या भटांकडून ज्या समजुती येतात त्या सर्व खोट्या, असे त्यांस भासले पाहिजे व त्यांस ग्रंथांची गोडी लागून ग्रंथ वाचावे असे वाटले पाहिजेत.
 आमचे लोक सांप्रत काळी अगदी अज्ञानी आहेत. त्यांस ग्रंथ म्हणजे काय हेही समजत नाही व कोणी वाचीत नाहीत व विकतही घेत नाहीत. जर कोणी म्हटले की, मी ग्रंथ करण्यावर पोट भरीन, तर त्यांस काही मिळावयाचे नाही; व कोणी शास्त्री, पंडित, भटे जरी मूर्खशिरोमणि असली, तरी त्यांस लोक चार रुपये देतील; परंतु ग्रंथकर्ता, वर्तमानपत्र छापणारा व छापखाना घालणारा विचारशीलही असला, तरी त्यांस कोणी पैसा देणार नाहीत व त्याचा माल अगदी घेणार नाहीत. शिवाय त्यांस मूर्ख म्हणतील. हाच काय शहाणा ? जनावरांची वर्णने व इतर देशांची वर्णने यात काय आहे ? असे उपहास करतील.
 केवढे आश्चर्य आहे की, या लोकांस इतकी भ्रांत अजून आहे ? ग्रंथ करणाऱ्यास खप नाही. ग्रंथ करून त्यांस विकत घेणारे मिळविणे म्हणजे मोठा प्रयत्न पडतो. जुलुमाने व भिडेने ते लोकांचे गळी बांधावे लागतात, त्याजबद्दल किंमत देणे म्हणजे लोकांस असे वाटते की, हा पैसा व्यर्थ आहे. यात पुण्य नाही व धर्मही नाही. वैदिक ब्राह्मणाचे घरी जात नाही, हा धर्म कशाचा ? हे व्रत नाही, दान नाही. तेव्हा ग्रंथ घेण्यास पैसा कशाचा द्यावा ? याप्रमाणे हे लोक दुर्भाग्य आहेत. याचा काळ विपरीत, म्हणून यांस अशी बुद्धी झाली आहे, हे तर उघड आहे.
 परंतु लोक असे समजतील तर बरे- ग्रंथ छापणारे यांस पैसा द्यावा हे सर्वांपेक्षा उत्तम आहे व या देशांत तर अति उत्कृष्ट हाच धर्म आहे. हे मूर्खास शहाणे करण्याचे काम आहे; म्हणून हाच धर्म सर्वांहून श्रेष्ठ आहे. अशी समजूत यांची पडेल तर त्वरित लोक सुधारतील, यात संशय नाही. व असे झाल्यावाचून ग्रंथही पुष्कळ होणार नाहीत; परंतु ईश्वरी इच्छा प्रमाण.

♦ ♦


अभिमान

पत्र नंबर ९५

 एका पत्रात सरकारास मदत मिळत नाही, म्हणून लोकांच्या वेडेपणाचा स्वभाव वर्णन केला; परंतु आणखीही लिहितो की, आमचे लोक सरकारास मदत कोठून देणार? आमच्या पैकी एक शहाणा होऊन पुढारी झाला, तर त्याणे जे काही सांगितले, ते देखील ऐकावयाचे नाहीत. व त्यांस शहाणा असे मानणार नाहीत. दुसऱ्यास शहाणा म्हणणे हे मोठे अपमानाचे कारण आहे, असे सर्व लोक समजतात. ब्राह्मण तर मुख्यत्वेकरून असे समजतातच.
 जर एक पंडित दुसऱ्यापेक्षा शहाणा असेल, तर त्याशी शत्रुत्व करून व त्याजवर कुतर्क करून, त्यांस सभेत निरुत्तर करावे म्हणजे त्याचा अपमान करण्यात आपला मान वृद्धिंगत झाला असे समजतात. दुसऱ्यास प्राण गेला तरी शहाणा म्हणत नाहीत. सांप्रत कोणत्याही ब्राह्मणास पुसा की, इंग्रज शहाणे आहेत की काय ? तर ते म्हणतील 'छिः छिः' शहाणे कशाने ? त्यांस काय येत आहे ? त्याची विद्या व शास्त्रे, ज्ञाने सर्व आमच्याहून कमी आहेत, परंतु ते श्रीमान आहेत म्हणून त्यांचे शहाणपणाचे प्रगटीकरण होते आणि आमचे शहाणपणाचे प्रगटीकरण होत नाही.' साधारण वैद्यास पुसा की, इंग्रजांचे वैद्यक व शारीर तुमच्यापेक्षा अधिक आहे की काय ? तर मूर्ख वैद्यही म्हणेल की 'छिः ! कशाचे वैद्यक व कशाचे शारीर ? आमच्यामध्ये सर्व आहे. किंबहुना जास्ती आहे. परंतु हे सांगण्यास त्याने इंग्रजी वैद्यक पहावयास नको. ते पाहिल्याशिवाय व अनुभव घेतल्याशिवाय तो म्हणेल की, छिः ! यात काही नाही. हा त्याचा स्वभावच.
 ब्राह्मणास आपलेहून वरिष्ठ कोणीच वाटत नाही. व कोणाचाही ग्रंथ त्याचे हातात द्याल तर ते म्हणतील की, 'दगड आहे यात.' नाव देखील वाचून पहावयाचे नाहीत. आणि म्हणतील की, यात गोष्टी आहेत. जळल्या त्या गोष्टी. ही बुके आपली उगाच छापतात. त्यात काही नाही. प्राण गेला तरी त्या बुकात काय आहे, ते पाहणार नाहीत; व त्याचे एक पानही उलटून पाहणार नाहीत. भट वैदिक हे सगळे संहिता पाठ करतील, पण वर्तमानपत्राची एक ओळ वाचणार नाहीत.
 तसेच शास्त्री, पंडित यांस तर सर्व तुच्छ वाटते. आपले ठिकाणी गर्व करून ते बसतात आणि आपल्यास ते व्याकरणी म्हणवितात. परंतु त्यांस साधारण गोष्टीचे देखील ज्ञान नसते. पुणे शहर येथील मोठे कामदार व मोठे पंडित यांस आणून पुसा की, येथे लष्कर किती आहे ? व साहेब व मुख्य कोण आहे ? तर त्यांस समजणार नाही. आणि पाहिले तर साठ हजार कौमुदी पाठ करतात व साधारण नित्यातील ज्या जरुरीच्या गोष्टी त्याविषयी मूर्ख असतात. जर कोणी शहाणे मनुष्याने त्यांचे बोलणे ऐकले, तर त्यांस असे वाटेल की, हा काय वेडा आहे? किंवा मूर्ख आहे ? किंवा भ्रांतिवट आहे ? असे मूर्ख असोन आणखी प्रतिष्ठा लोकांत मिरवितात आणि लोकांस तर कोणाची प्रतिष्ठा करावी, हे समजत नाही. असे असोन मोठ्या शालजोड्या अंगावर घेऊन आचार्यबुवा, भटजीबुवा म्हणवितात. परंतु ही सर्व ढोंगे आहेत हे लोक जाणत नाहीत. आणि त्यांचे नादी लागून त्यांस पैसा देतात. परंतु स्वतः विचार पहात नाहीत. बरे-वाईट दुसऱ्याने दाखविले तरी पहात नाहीत. त्यांस मूर्ख म्हणून त्याची फजिती करतात.
 अलीकडे नवे ग्रंथ बहुत झाले आहेत. रसायनशास्त्र, यंत्रज्ञान, शिल्प इत्यादिक. परंतु त्यांतील गोष्ट कोणी एकही पहात नाही व लोकांचे स्वभाव असे विलक्षण आहेत की पुढारी होईल त्यांस पाडाव करतात. त्याचे रक्षण कोणी करीत नाही. त्याचा एकत्रपणा मुळीच नाही. जर त्यांस लग्नास, मुंजीस वगैरे बोलाविले तर पाच हजार लोक येऊन चार घटिका उगेच बसतात; परंतु अमुक विचार करावयाचा आहे तेथे या म्हणून बोलाविले तर येणार नाहीत; व आले तरी त्यांस बोलता येणार नाही. त्यांच्याने विचार करवत नाही. त्यांची चित्ते विचाराकडे नाहीत. मागील चाल पडली आहे, म्हणून लग्नास वगैरे तरी जमतात. परंतु चालीविरुद्ध अमुक एक तळे नीट करावयाचे आहे, त्यांस पट्टी करण्यास बोलाविले. तर कदापि येत नाहीत.
 बरे, हे पैसा देण्याचे काम आहे, म्हणून असो. परंतु लोक दारू पितात, त्यांचा बंदोबस्त कोणत्या रीतीने करावा. याजकरिता फुकट बोलाविले तरीही बहुत करून जमणार नाहीत व शास्त्री, पंडित त्यात असले तर एकही गोष्ट सिद्धीस जावयाची नाही. कोणी कुतर्क करील. दुसरा पंडित बोलला म्हणजे त्यांस उगेच उत्तर करावे, म्हणजे श्रेष्ठत्व झाले, भलतेच बोलतात या प्रकारची यांची व्यवस्था आहे. मग मोठाले विचार करणार कोठून ? यांस माहितगारी नाही. बरे, जे दुसरे सांगतात ते तरी ऐकावे; तेही करीत नाहीत. ग्रहण चंद्राच्या छायेने पडते, हे कदापि खरे मानीत नाहीत. व त्याचा पुरावा पहात नाहीत. पुराणातील वेड मनात भरलेले असते, ते जातच नाही. या प्रकारचे लोक मूर्ख आहेत, आणि सरकारास मदत करणारे लोक पारशी मात्र आहेत. त्यामध्येच मात्र काही सुधारणा झाल्या आहेत.
 ग्रंथाचे तर्जुमे स्वभाषेत करावे, त्यांस पैसा द्यावा, गरिबांकरिता धर्मशाळा कराव्या व गरिबांकरिता औषधपाणी देण्याकरिता वैद्यखाने, दवाखाने करावे, ही धर्मकृत्ये आहेत असे ते जाणतात. व सरकारने एकाही एक कामात पैसा दिला, तर आपण बाकीचा देऊन सरकारचा मनोदय पुरता करीतात. व लग्नकार्यास पैसा उडवीत नाहीत. ज्याचे घरी लग्न होईल, तो पन्नास रुपये धर्म करावयाचा तो कारखान्यास देतो. जर ब्राह्मणांमध्ये ही गोष्ट कोणी पुढे काढील आणि लग्नप्रयोजनातील दक्षणा बंद करील, तर ब्राह्मणांचे मोठे शत्रुत्व होईल. त्यांस असाच पैसा उडवावा, गरीब, आंधळे यांनी औषधाशिवाय, घराशिवाय मरावे, हेच बरे वाटते. व उद्धट, दांडगे, आगंतुक यांस पैसा मिळाला, म्हणजे मोठे कार्य झाले असे वाटते. यास्तव जसे पारशी लोक आपले जातीत व्यापारवृद्धीचे व विद्यावृद्धीचे उदाहरण दाखवीत आहेत, तसे ब्राह्मणांनी करून सरकारास मदत करावी. म्हणजे सरकार सर्व बेत सिद्धीस नेईल. ते न करून रडत बसतात. आणि सरकारास नाव ठेवितात. हे मूर्ख आहेत की नाही, याचा हे पत्र वाचणारे याणी विचार करावा.

♦ ♦


सुशिक्षा व पंतोजी आणि संस्कृत व इंग्रजी भाषा

पत्र नंबर ९७

 आमचे लोकांस सांप्रत काळी ही मोठी कुदशा प्राप्त झाली आहे. त्याचे मनात सुधारणा येत नाही. त्यांस पूर्वीच्या चाली ज्या आहेत त्या तशा रहाव्या हे फार चांगले वाटते. व बाजीरावासारखा धनी भटांची समृद्धी करण्याकरिता यावा असे वाटते.
 परंतु त्यांस अजून असा बोध झाला नाही की, या मागील चालीपैकी बहुतेक चाली वाईट आहेत; येणे करून लोक बुडाले. त्यांस काही कळत नाही. साधारण गोष्टीविषयी देखील त्याचे अज्ञान जात नाही. त्यांस मुळी शिक्षा नाही व सुसंगत नाही. ज्या संगतीत माणूस असते, तसे तयार होते, परंतु आमचे लोकांस खरी गोष्ट सांगणारे देखील जवळ नसतात. घरात भट असतो, तो पोरांस अगदी मूर्ख करतो. मूर्खपणाच्या गोष्टी लहानपणी मनात आल्या, म्हणजे त्या जात नाहीत. याकरिता लोकांनी प्रथम सुशिक्षा लागावी, याजकरिता चांगला बेत केला पाहिजे.
 सरकारी शाळा आहेत, त्यादेखील अजून चांगल्या झाल्या नाहीत, कारण पंतोजी जुनेच आहेत, ते भटाहून शहाणे नाहीत. याजकरिता मुख्य पंतोजी चांगले सुधारलेले व ज्ञानी पाहिजेत, तेव्हा सरकारच्या शाळा दुरुस्त चालतील. हल्ली जुने पंतोजी आहेत, ते केवळ अज्ञानाच्या राशी आहेत. त्यापासून कदापि लाभ होणार नाही. याकरिता मुख्य पंतोजी व ग्रंथ हे तयार झाले पाहिजेत. ज्याकडे विद्यावृद्धीचे काम आहे. त्याणी म्हणजे बोर्ड ऑफ एज्युकेशन याणीं मराठी पंतोजी तयार होण्याची एक शाळा केली पाहिजे व चांगले ग्रंथ तयार करण्याकरिता तर्जुमे करणाऱ्याची एक मंडळी बसविली पाहिजे.
 आता पहा की, केवळ पगाराकरिता पंतोजी बुके उघडितात; परंतु त्यांस पुसले की, पृथ्वीची छाया पडून ग्रहण होते की काय ? तर म्हणतात, 'छिः ! हे आपले उगाच इंग्रजांचे मत आहे. हे आम्ही पोटाकरिता शिकवतो. दुसरा काही रोजगार नाही; मग करावे काय ?' ही अवस्था पंतोजीची आहे. मग मुले तरबेज कशी होतील ? या जुन्या पंतोजीच्या हाती रसायनविद्या दिली तर काय उपयोग ? त्यांस त्यांतील एक अक्षरदेखील समजत नाही; म्हणून पोरांकडून परीक्षेस हजरी देण्याकरिता उत्तर पाठ करून मात्र ठेवितात; परंतु स्वतः समजून देण्याचे ज्ञान नाही. नवीन निबंध करण्याचे ज्ञान नाही व बुकातील गोष्टी समजून देण्याचे कळत नाही.
 नवे बुक छापून आले, म्हणजे म्हणतात की, 'आली ही पीडा, यात काय आहे ?' असा कंटाळा करून पोरांस शिकविणारे जे लोक त्यांच्या हातून ज्ञान कसे मिळेल ? व्यर्थ पोरांना मात्र मेहनत पडते. वास्तव जशी बुके तयार होतात, तसे पंतोजी तयार झाले पाहिजेत. हे प्रथम काम आहे. ज्याचे मन मुळापासून संस्कृत भाषेतील ग्रंथ वाचून विपरीत ज्ञानाने भरले आहे. ते लोक तर अगदीच उपयोगी नाहीत. त्यांचे हातून फारच अनर्थ होईल. एकदा या विपरीत ज्ञानाची प्रथम समजूत झाली, म्हणजे मन बिघडून जाते, ते ताळ्यावर येणे कठीण पडते. यास्तव त्यापेक्षा अडाणी मनुष्य बरा.
 यास्तव प्रथम जो इंग्रजी शिकलेला विद्यार्थी असेल, तोच पंतोजीचे उपयोगी पडेल. असे तयार होण्याकरिता एक नवीन शाळा व त्याजवर यथायोग्य शिकणारे पाहिजेत, तेव्हा असे लोक तयार होतील. जे संस्कृतचा अभिमान धरतात ते अगदी अज्ञानात आहेत. ते सुधारणेस हरकत मात्र करतील. दुसरी गोष्ट त्यांच्याने व्हावयाची नाही. यास्तव असे पंतोजी तयार करून जुने असतील त्यांस पेनशिने देऊन मुक्त करावे, हे बरे. संस्कृत आजच्या काळी काही उपयोगी नाही व त्यांतील ग्रंथही उपयोगी नाहीत. तेणेकरून लोक अधिक मूर्ख होतील. संस्कृतची योग्यता इतकीच आहे की, ती भाषा सुधारलेली आहे. याजकरिता पंतोजीस ती यावी, हे चांगले.
 परंतु भाषा येऊन अज्ञानवृद्धी झाली, तर उपयोग काय ? याजकरिता हे ना होईल तितके बरे. भाषा चांगली न आली; आणि मन साफ असून समजूत चांगली असली, तर ती पतकरेल व त्याचा उपयोग अधिक पडेल. चांगल्या समजुतीने भाषादेखील सुधारेल; परंतु मुळी एकदा संस्कृताच्या झऱ्याचे पाणी जो प्याला, त्यांची भ्रांती जावयास नव्वद वर्षे शिकविले, तरी उपयोग नाही, हे निश्चित आहे. याविषयी कोणी भ्रांतीच धरू नये. सुधारलेल्या संस्कृत भाषेचा मात्र उपयोग पडावा इतके करावे, अधिक नको. त्यांतील ज्ञान अगदी उपयोगी नाही. जी भाषा प्रथम मुलास शिकवावी, त्या भाषेतील ग्रंथाप्रमाणे त्याचे मन होते.
 याकरिता फार सुधारलेली इंग्रजी भाषा किंवा तीतील ग्रंथ शिकलेला माणूस ठेवून, त्याचे हातून इंग्रजी ग्रंथाचे ज्ञान मुलास शिकवून तसे पंतोजी तयार करावे, म्हणजे फार उपयोग होईल. संस्कृताने आधी अनर्थ केला आहे. व याने आणखी अधिक अनर्थ होईल, हे पक्के मनात वागवावे आणि खोटा अभिमान धरू नये. संस्कृत भाषेतील ग्रंथ व इंग्रजी भाषेतील ग्रंथ यांची तुलना करून पाहावी, म्हणजे संस्कृताचा अभिमान जाईल.

♦ ♦


संस्कृत विद्या

पत्र नंबर १०१

 पुण्यातील 'कल्याणोन्नायक मंडळी'त लोक आहेत, व त्याचे ज्ञान कसे आहे, हे मला आजपर्यंत ऐकून ठाऊक होते, व मला फार आशा होती की, हे लोक आपली योग्यता जाणून आपले उत्कृष्ट ज्ञान बाहेर काढणार नाहीत; परंतु आपली फजिती करून घेण्यास तेच प्रथम प्रवर्तले, यास्तव त्यांस उत्तर दिले पाहिजे. नाही तर ते असे समजतील की, पृथ्वी निःक्षत्रिय झाली आणि जरी त्याचे लिहिणे उघड वेडेपणाचे आहे, तत्रापि सूज्ञ जनांनी त्याचा धिक्कार करू नये.
 (२) 'कल्याणोन्नायक मंडळी'तील सभासद संस्कृत विद्येचा पक्ष घेतात; परंतु हा पक्ष व्यर्थ आहे. कारण की, संस्कृतात फार विद्या आहे. असा सांगून लोकांस पंडित प्राचीन काळी फसवीत होते; परंतु आजचा काळ असा आहे की, संस्कृताची उघडीक होऊन पंडितांचे सर्व ज्ञान बाहेर पडले आहे. असे असता हे सभासद बापडे सर्व पाठशाळेतील पंडित आहेत; परंतु त्यांस वास्तविक ज्ञान काही नाही. संस्कृत भाषेतील खुळे याचे मनात भरली आहेत. ती झाकून ठेवतील तर फार बरे होईल.
 (३) संस्कृताचा इतकाच उपयोग आहे की, लोकांमध्ये भ्रांती उत्पन्न व्हावी. व जो जो मनुष्य त्यात प्रवीण होतो, तो तो अज्ञानसमुद्रात खोल खोल जात असतो; असे अजून कोणी म्हणेल, पाठशाळा सरकारने कशास चालविली आहे ? तर शाळेपासून जे फळ आता दृष्टीस पडू लागले आहे, तेच येईल, असे पूर्वी वाटले नवते. तेवहा असे वाटत होते की, कोणीकडून तरी विद्येची गोडी या लोकांस लागेल, नंतर लोकांस जी विद्या म्हणून वाटते, त्यातच अनुपान करून चांगली विद्या शिकवावी. अशा बुद्धीने हे बीज घातले. त्यांस दक्षिणादिकेकरून जलसिंचन केले. परंतु या वृक्षास इच्छिले फळ आले नाही. उलटे आणखी अज्ञान वाढले. अस्तु. साधारण संस्कृताविषयी बोलण्याचा प्रसंग आहे, यात इतर गोष्ट नको.
 (४) संस्कृतात चांगली विद्या नाही व उपयुक्त ज्ञान नाही, हे सर्व विद्वानांनी ठरविले आहे. परंतु सभासदांची खातरजम करण्याकरिता लिहिणे जरूर आहे. प्रथम संस्कृतात इतिहास नाही. मागाहून राज्ये कशी झाली ? व ती बुडाली कोणत्या कारणाने ? राज्ये किती होती ? मुसलमान आले कधी ? त्याचे पूर्वी राज्य कोणी केले ? येविषयी पंडितांचे ज्ञान व नांगरहाक्याचे ज्ञान सारखे आहे. कलियुगास पाच हजार वर्षे सरासरी होत आला. त्याचा इतिहास आहे कोठे ? याचे उत्तर पंडित काय देतील ?
 दुसरे, संस्कृतात भूगोल नाही. पंडितास पुसा की, रूम कोठे आहे ? व अरबस्तान कोठे आहे ? व हिंदुस्थानची हद्द कशी व लोक किती ? व लांबीरुंदी किती ? तर तो हातच जोडील, आणि ठाऊक नाही म्हणेल. पंडितांचे ज्ञान इतकेच की, मेरू भूमीच्यामध्ये आहे. लक्ष योजने उंच आहे. सिद्धपूर आहे. स्वर्गाची वाट हिमालयावर आहे. गंगा ही देवता जिवंत आहे, तशीच यमुनाही आहे. हे त्याचे भूगोलसंबंधी ज्ञान आहे.
 तिसरे, संस्कृतात यंत्रज्ञान नाही. आजपर्यंत कालिदासासारिखे पंडित झाले, मग या 'कल्याणोन्नायक' गरिबाची कथा काय ? परंतु कोणी पंडिताने यंत्र कधी केले आहे ? यंत्राची सुधारणा केली आहे ? जे जाते व्यासाचे वेळेस होते, तेच आता आहे. जो नांगर पांडवांचे राज्यात होता, तोच आता आहे. पंडितांनी कोणता ग्रंथ यंत्रावर विचार करून लिहिला आहे ? पंडितांनी कधी ग्रंथ छापले आहेत ? कागद करीतात, त्यापेक्षा चांगले करण्याची युक्ती लोकांस दाखविली आहे? कर्नाटकात ताडपत्रावर रामराज्यापासून लिहीत आले, तसेच आजपर्यंत लिहितात.
 कोणत्या दशग्रंथी ब्राह्मणाने व कोणत्या षड्शास्त्री पंडिताने यंत्राविषयी विचार केला आहे ? फार झाले तर शिल्पाविषयी एक जुने पुस्तक काढतील आणि म्हणतील की, हे पहा आमचे यंत्रज्ञान. आत पाहिले तर दुसरे काही नसते. परंतु मंगळवारी घर बांधू नये, बुधवारी मोरी उकरू नये, त्रिकोण आला तर जागा टाकावी, जेथे समभाग येईल, तेथे घर बांधावे, रोहिणी नक्षत्रावर लाकडे तोडावी, हेच ज्ञान त्यात सापडेल. त्या ज्ञानाप्रमाणे त्यांनी लोकांस वेड लावून दिले आहे व जो तो मुहूर्त पहाता पहात दमतो. मुलास बायको कशी का असेना, परंतु मुहूर्त चांगला पाहिजे. जे अज्ञान लोकांत पंडितांनी पसरून दिले आहे.
 चवथे, राज्यप्रकरणी ज्ञान पाहिले तर मनास येईल तसे राज्य करावे. या नियमावाचून कोणता नियम त्यांस ठाऊक आहे ? लोकांमध्ये बंदोबस्त व उद्योग कसा होतो व त्यांची वृद्धि, उत्पत्ती व नाश कोणत्या कारणाने होतात व फौजेचे नियम कसे असावे, येविषयी ज्ञान कोणत्या पंडितास आहे ? हे ज्ञान नाही म्हणून पंडित उद्योग करावयास प्रतिकूल आहेत, व विचार करावयासही प्रतिकूल आहेत व देशात द्रव्य कसे येईल, याविषयी तर त्यांस धुळाक्षर शिकविले पाहिजे. कोणत्या पंडिताने राज्याविषयी ग्रंथ लिहिला आहे ? व राज्य करण्याची युक्ती अमुक चांगली, असे दाखविले आहे ? फक्त पंडितांनी इतकेच लिहिले आहे की, जे जे राजे झाले; त्यांची खुशामत करून त्यांस आकाशांत नेले आहे.
 या गोष्टीची प्रचीत पहावयास दूर जावयास नको. बाजीराव याने पुण्यात शास्त्रांचा एक मोठा कळप बाळगिला होता; परंतु त्याने कोणते कल्याण केले ? द्वादशीचे ब्राह्मणभोजन वाढविले. कोणतेही पाप केले, तर पैका घेऊन निर्मळ म्हणून सांगत होते. "सर्वत्र विजयी भव" म्हणून आशीर्वाद देत होते. त्याणी कांठाळे बसले. रोज पाच- चार स्नाने घालीत होते. एवढीच गोष्ट त्याणी केली, धर्म सांगितला नाही. राज्यव्यवहार सांगितला नाही, विद्या सांगितली नाही, लोकांस लुटून त्यांस शालजोड्या द्याव्या, म्हणजे खंडीभर आशीर्वाद व दोन लाख कोट्या करून वाद करीत होते.
 पाचवी गोष्ट, परदेशात प्रवास करून, तेथील खबर लोकांत प्रसिद्ध केली पाहिजे, तर लोकांचे ज्ञान वाढते. याविषयी लक्षावधी ग्रंथ इंग्रजीत आहेत. त्यांपैकी एखादा तरी त्यासारखा संस्कतात आहे की काय ? पंडितांस फार झाले तर शे पन्नास कोसांतील प्रवास घडला असतो. बाकी त्यांच्या डोळ्यांपुढे अंधकार असतो. पृथ्वीविषयी व समुद्राविषयी हे पंडित लोक बोलत असले, म्हणजे जसे इस्पितळातील लोक बडबडतात, त्याप्रमाणे त्यांचे ज्ञान नजरेस येते.
 सहावे पदार्थज्ञानही बराबर संस्कृतात नाही. भलत्याचा गुण भलताच व भलतीच उत्पत्ती सांगितली आहे. सोने जंबुनद आहे, म्हणून सांगितले, ते कोठे आहे ? पंडितांनी त्यांची आंगठी कधी केली आहे काय ? तसेच सिंह, शार्दूल, शरभ या जनावरांची वर्णने मनास येईल तशी केली आहेत; परंतु ती पंडितास खरी वाटून खरा शोध करण्यास देखील ते प्रतिकूल आहेत. याप्रमाणेच ज्योतिष, वैद्यक, रसायन या सर्व ज्ञानाची व्यवस्था आहे. फक्त संस्कृतात शब्दशास्त्र मात्र आहे. म्हणजे व्याकरण, अलंकार, न्याय इत्यादी.
 परंतु जे इंग्रजी भाषेत ज्ञान व विद्या आहे त्यातला या भाषेत एक गुंजदेखील अंश नाही आणि या शब्दज्ञानाचा उपयोग कोणता की, पंडित सभेत जमून बडबड करतात. त्यापासून लोकांस काही उपयोग नाही, अर्थ नाही, धर्म नाही, हा वितंडवाद. परंतु पंडितास हीच मोठी विद्या वाटते व तिजवर ते मिरवितात. परंतु त्यांस असे वाटत नाही की, आमचे ज्ञान निरुपयुक्त व पोकळ आहे, व याजवर लोकांस आता फसवू नये. लोकांस आपले कल्याणाकरिता उपयुक्त ज्ञान मिळवू द्यावे, असे वाटत नाही. बुडत्याबरोबर काठावरच्यानेही आत पडावे, असा त्यांचा बेत आहे.
 परंतु हा वेडेपणा सोडून द्यावा व पुनर्विवाहादि विषयावर मूर्खासारखे बरळू नये. पंडितांनी या हिंदू लोकांचे आजपर्यंत इतके खाऊन त्यांचे कल्याण काय केले ? राहू चंद्रास खातो. ब्राह्मणास दिले म्हणजे पुण्य, ब्राह्मण हेच देव, हेच त्यांस सांगून आपल्यासारखे मूर्ख केले.

♦ ♦