लोक संस्कृतीचा गाभारा

लोक संस्कृतीचा गाभारा


डॉ. राजेंद्र माने

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (धोरले) नगर वाचनालय, सातारा.

श्री.छ. प्रतापसिंह महाराजो (थोरले) नगर वाचनालय, सातारा.


लोकसंस्कृतीचा गाभारा
डॉ. राजेंद्र माने




अक्षरयात्रा प्रकाशन
________________

प्रकाशक । मिलिंद माने, अक्षरयात्रा प्रकाशन, ६८६, सदाशिव पेठ, गौरी-गणेश अपार्टमेंट,
पोस्ट ऑफिसजवळ, पुणे - ४११ ०३०. मो. ९८२२४५२०१२


© सौ. रोहिणी राजेंद्र माने, गौरी ड्युप्लेक्स, विसावा पार्क, सातारा
मुखपृष्ठ । आतील चित्रे । घन:श्याम देशमुख, पुणे.
अक्षरजुळणी । गणराज कॉम्प्युटर्स, पुणे.
मुद्रक । एक्सेल प्रिंटर्स, पुणे.
प्रथमावृत्ती । २६ जानेवारी २००९
मूल्य । १३० रुपये श्री. छ. प्रतापसिंह महाराज (धोरले) नगर वाचनालय, सातारा.





ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण

यांच्या स्मृतीस...
गाभाऱ्यात प्रवेश करताना

 खजिना हा फक्त सोनं नाणं संपत्ती याचाच असतो असं नव्हे. त्यापेक्षाही खूप काही मौल्यवान असं असू शकतं. ते माणसानं प्राणापलीकडे जपावं लागतं. आपली लोकसंस्कृती हाही असाच मौल्यवान ठेवा आहे. मागं वळून पाहिलं, की लक्षात येतं या लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यातही अमाप संपत्ती आहे. ही कोणा एकाची मालकी नक्कीच नाही. तो आपल्या सर्वांचा दस्तऐवज आहे.
 हा लोकसंस्कृतीचा गाभारा कुबेराला लाजवील असा आहे आणि चिरंजीवही आहे. काय नाही यात! आया-मायांनी गायिलेल्या ओव्या आहेत. ज्यात त्यांच्या जगण्याचं, सुख दुःखाचं प्रतिबिंब आहे. नातेसंबंधाविषयीच गुज आहे. सणांची वर्णनं आहेत. हे सण कुठे कसे साजरे होतात, त्यात तिथल्या लोकजीवनाचा कसा सहभाग आहे, सणांच्या वेळी कोणते विधी असतात, कोणती गाणी म्हटली जातात. या सगळ्याची नोंद यातून सामोरी येते. मराठमोळा माणूस जितका भाबडा तितकाच भाविकही. त्याची वेगवेगळ्या ठिकाणी असणारी कुलदैवते. खंडोबा, ज्योतिबा, महालक्ष्मी कितीतरी ठिकाणची देवस्थानं. त्यांचे रीतीरिवाज पूजाअर्चा, गाणी, गोंधळ यातून प्रतीत आणि व्यक्त होणारी भक्तिभावना याच लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यात सामावलेली आहे. लावणी तर मराठी मनाची राणी. तिला तिची खास परंपरा. कितीतरी असामान्य लोकांनी शाहिरीच्या भक्तार माध्यमातून या लावणीला जिवंत ठेवली. शृंगराच्या तालावर ही लावणी त्या त्या कालाचं प्रतिबिंब साजरूपाने लेवून जिवंत राहिली. कित्येक लोककथा यांच्याकडून त्याच्याकडे अशा रूपानं - वर्षानुवर्षे चालत राहिल्या. कोणीतरी मग लिहिले. त्या याच लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यात सामावल्या गेल्या. याचा कोणी एक नक्की लेखक नाही. कथन करणारे आणि ऐकणारे मात्र अनेक आहेत; पण यासुद्धा आमच्या संस्कृतीचा एका अनमोल ठेवा आहेत.

 या लग्नाच्या वेळी घेतले जाणारे अनेक उखाणेसुद्धा मोठे रंजक तर असतातच; पण त्यात सुद्धा त्या-त्या काळातल्या जनसमाजाची छबी दिसून येते.

 देवदैवतांचे मानुषीकरण करून त्या सर्वांना जनसामान्यांच्या भावनेतून विचार करायला ... लावण्याची ताकद आमच्या माय भगिनीमध्ये होती. जात्यावर बसल्यावर जात्याच्याबरोबर गरगरत त्यांची प्रतिभा फुलत होती. महाभारत, रामायण यासारख्या ग्रंथावर अनेक जाणकार समीक्षकांनी टीका-टिपण्या केल्या. त्यात घडणाऱ्या घटनांवर, व्यक्तींवर या जाणकारांनी त्यांची सुज्ञ मते नोंदवली; पण त्याही पलीकडे जाऊन पहाण्याची नजर या लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये सापडते. इथे मग कोणी मोठा-कोणी लहान नाही. देव असला तरी एकदा मानवी रूप घेतले, की त्याच्या चुका परखडपणे सांगणारी रोखठोक वाणी आहे. हे सांगताना आमच्या आयामाया भगिनींना कोणती भीती वाटत नाही. प्रत्यक्ष प्रभूरामाच्या चुकासुद्धा सीतामाईची बाजू घेऊन त्या दाखवू शकतात. त्या वेळी जाणवतं नारी ही अबला कधीच नव्हती, एक सुप्त शक्ती तिच्यात प्रथमपासून आहे. पोवाडा घ्या, अभंग घ्या, किती प्रकार या गाभाऱ्यात विसावले आहेत. ओंजळी भरभरून ही संपत्ती लुटायची म्हटली तरी ही संपणार नाही. वेगळ्या अर्थाने माणूस समृद्ध होत जाईल, हे मात्र नक्की.

 चातुर्मासात रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर त्या-त्या दिवशीची कहाणी आई किंवा आजी सांगायची. कधी वाचायची. लहानपणी आपण सर्वही मोठ्या भक्तिभावाने अशा कहाण्या ऐकायचो, त्यात रमून जायचो. त्यातले राजाराणी त्यांचं राज्य त्यांना मिळालेले, शाप ही सगळं चित्रच जणू. मग डोळ्यांसमोर उभं रहायचं. ते वयही गोष्टी वेल्हाळ असतं. ते सगळं खरं खरं वाटतं. वाईट वागलं तर वाईट घडतं. देव शिक्षा देतो. यातून मग चांगलं वागायची शिकवण मनावर आपसुक ठसली जायची. जणू तो वसा त्या कहाण्यातून मिळून जायचा. या कहाण्यासुद्धा लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यातील एक मौल्यवान ऐवजच आहेत.

 आम्ही खेड्यात असताना जुन्या जाणत्या स्त्रियांकडून अनेक लोकगीतं ऐकलेली आहेत. बऱ्याचवेळा या बायका त्यांची वैयक्तिक दुःख गाण्यात ओवायच्या. कदाचित अशा प्रकारच्या प्रकटनामुळं त्यांचं ते दु:ख हलकं होत असेलही. जगण्यात असणाऱ्या अनेक नात्यांचं वर्णन त्यात यायचं. नवरा, भाऊ, मैत्रीण, आई, सासू, कोणतं नातं त्यातून सुटायचं नाही. त्या गायला लागल्या, की तो त्यांचा जणू छंदच बनायचा. सादाला प्रतिसाद मिळाल्याप्रमाणे एकीनंतर दुसरी गायला लागायची. हा सगळा त्यांच्या प्रसन्न हृदयाचा एक आविष्कारच असायचा. असं म्हटलं जातं, की ओवी नुसती ऐकायची नसते तर ती गायची सुद्धा असते. या सगळ्या लोकगीतांमधल्या ओव्यांच्याकडे पाहिलं, की जाणवतं संगीतातले सगळे प्रकार जणू यात सामावलेत. सगळे राग आळवले गेलेत. एक अत्यंत सुंदर नादब्रह्मच या ओव्यांनी निर्माण केलेय. लोकगीतं हा ग्रामीण स्त्रियांच्या सुखदुःख प्रकटीकरणातून निर्माण झालेला मनोहारी छंद आहे, म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

 वाघ्या-मुरळी हा प्रकार आता कमी झालाय. खेडोपाड्यात अजुनी मुरळी दिसते. खंडोबाची मल्हारीची गाणी गाते. भंडारा उधळीत हातातली घंटी वाजवत गिरक्या घेत नाचताना मध्येच बसकण घेत वाघ्याबरोबर ताल धरते. खेड्यात रविवारी वाघ्या-मुरळी आमच्या वाड्याच्या चौकात येत. कपाळाला भंडारा लावलेला वाघ्या आणि त्याच्याबरोबर गर्द रंगाचं लुगडं नेसलेली मुरळी अजुनी लख्ख आठवते. त्यांनी त्या वेळी उधळलेल्या भंडाऱ्याचा पिवळट गंध नाकाशी साचून येतो. रविवार हा खंडोबाचा वार त्यामुळे दर रविवारी ती दोघं वाड्यावर येऊन मल्हारीची गाणी म्हणत. मल्हारीचं प्रेमप्रकरणही मोठ्या खुबीनं त्या गाण्यात ओवलेलं असायचं. जणू ती ही तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसंच.

 जातं, तुणतुणं, डफ, डुंगरू, ढोलकी, घंटा, समई, कवड्याची माळ अशांमधूनही आपली लोकसंस्कृती आपलं नातं प्रस्थापित करत राहाते. कीर्तन, प्रवचनातून फिरवलं जाणारं आरतीचं ताट सुद्धा तुम्हा आम्हाशी काही नातं सांगून जातं. कर्पूरारतीवरून फिरवलेला हात माथ्यावरून फिरवताना होणारी अनुभूती शब्दातून सांगता येणारी नाही; पण ती आपली लोकसंस्कृती आहे, प्रथा आहे. हे सगळं जगण्याला बळ देणारं धन आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर मन जसं आश्वस्त होतं, तसंच लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यात डोकावताना ते प्रसन्न होतं. तुमच्या आमच्या दिग्गजानी, लेखक, कवींनी हे धन जपलं आहे. लिखित स्वरूपात साठवण्याचा प्रयत्न केला आहे.

 मी या सर्वांकडे फक्त आस्वादक दृष्टीने पहाण्याचा प्रयत्न केला. या सर्व लेखांचा जन्म त्याच भावनेतून झाला आहे. हे लेख लिहिताना मला एक समाधानही मिळालं. त्या निमित्ताने संदर्भासाठी अनेक ग्रंथांचं वाचन घडलं.

 डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. द. ता. भोसले, डॉ. सरोजिनी बाबर, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. शिवाजीराव चव्हाण, डॉ. विश्वनाथ शिंदे वगैरे लेखकांनी लोकसंस्कृतीचा सखोल अभ्यास करून विपुल ग्रंथलेखन केले अहे. त्या ग्रंथांचा उपयोग संदर्भासाठी झाला. माझे लहानपण खेड्यात गेल्याने तिथं प्रत्यक्ष पाहिलेल्या, अनुभवलेल्या ग्राम्य संस्कृतीचाही उपयोग हे लेख लिहिताना झाला.

 माझ्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी हे लेख वाचून या पुस्तकासाठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली. त्यातून या लेखकाकडे पाहण्याची, वाचण्याची वाचकांची एक दृष्टी तयार झाली.

 माझे मित्र व दै. 'ऐक्य'चे उपसंपादक श्री. वासुदेवराव कुलकर्णी व श्री. मधुसुदन पतकी यांच्यामुळे दै. 'ऐक्य'च्या साप्ताहिक झुंबर पुरवणीतून ही लेखमाला वाचकांसमोर आली. सातारा आकाशवाणीचे श्री. सचिन प्रभुणे यांचीही लेखमालेसाठी मदत झाली.

 ही लेखमाला प्रकाशित होताना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद हा मनाला आनंद देणारा होता. काही कॉलेजमधून या लेखांचा संग्रहही करण्यात आला. हे सगळं विलक्षण सुखावणारं व प्रेरणा देणारं ठरलं.

 आमचे मित्र श्री. विश्वास दांडेकर, श्री. अभिराम भडकमकर, डॉ. यशवंत पाटणे, अरुणराव गोडबोले, श्री. मधू नेने, प्रा. श्रीधर साळुखे, प्रा. एम. बी. भोसले, कै. दत्ता मारुलकर, डॉ. सौ. ज्योत्स्ना कोल्हटकर, श्री. शिरीष चिटणीस, श्री. प्रदीप कांबळे, श्री. सी. व्ही. दोशी, डॉ. श्रीकांत कारखानीस, डॉ. प्रसन्न व्हनकवरे, श्री. प्रशांत कुलकर्णी, श्री. हेमंत गुजर, डॉ. संजय देवी यांनी ही लेखमाला प्रकाशित होताना अभिप्राय दिले, त्यामुळे लेखणी लिहिती राहिली.

 त्याचबरोबर श्री. छ. प्रतापसिंहमहाराज (थोरले) नगरवाचनालय सातारा येथील ग्रंथपाल सौ. रूपा मुळ्ये व सौ. कोडगुले व सर्व स्टाफ आणि शिपाई या सर्वांचीही खूप मदत झाली. आमचे प्रकाशक मित्र श्री. मिलिंद माने यांनी अक्षरयात्रा प्रकाशनातर्फे हा लेखसंग्रह वाचकासमोर आणला आहे.

 चित्रकार घन:श्याम देशमुख यांनी सुंदर, कलात्मक मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे काढून पुस्तकाच्या सौंदर्यात भर घातली आहे. मुद्रितशोधनाचे काम श्री. विश्वास सुतार यांनी केले, या सर्वांमुळे हा ग्रंथ दर्जेदार स्वरूपात प्रकाशित होतो आहे.

 वरील सर्वांचाच मी मनापासून कृतज्ञ व ऋणी आहे. मराठी वाचकांना हा लोकसंस्कृतीचा गाभारा' आवडेल, अशी आशा आहे.

डॉ. राजेंद्र माने
आविष्कार, गौरी ज्युप्लेक्स
विसावा पार्क, पिरवाडी रोड,
सातारा
मो. ९४२२६०००३५ प्रस्तावना  विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी केलेली कल्पनातीत आणि आश्चर्यकारक प्रगती आणि जागतिकीकरण, खाजगीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्था यामुळे सारे जग आता एका गावाप्रमाणे झालेले आहे. जगातली सारी राष्ट्रे परस्परांच्या जवळ आलेली आहेत. त्यातूनच विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये व्यवहार, व्यापार आणि अन्य क्षेत्रातील आदान-प्रदान यांना गती प्राप्त झालेली असली, तरी विषमतेची दरीही झपाट्याने वाढत चाललेली आहे. एकीकडे जगामध्ये दररोज तीनशे अब्ज डॉलर म्हणजे बारा हजार अब्ज रुपये युद्धसाहित्यावर खर्च केले जातात, तर दुसरीकडे आफ्रिका आणि आशिया खंडातील अतिशय गरीब देशांतील तीन हजार बालके अन्नावाचून मृत्युमुखी पावतात. भारतातल्या चौदा लोकांना जेवढी विजेची गरज असते, तेवढी वीज अमेरिकेतील नागरिक दररोज वापरत असतो. सारांश इतकाच, की राजकारण, अर्थकारण, तंत्रज्ञान आणि प्रगत उद्योगधंदे यांच्यातून आलेल्या शक्तीतून एक दुसऱ्या प्रकारची गुलामगिरी जगातली प्रगत आणि श्रीमंत राष्ट्रे या मागासलेल्या राष्ट्रांवर लादत आहेत. आर्थिक गुलामगिरी आणि औद्योगिक दास्य हे कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्याची गळचेपी करीत असते. वेगळ्या स्वरूपात ते इतर राष्ट्रांवर अधिराज गाजवित असतात. त्यातूनच मग युद्धाचा आगडोंब उसळण्यास निमित्त मिळत असते. तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण होत असते.

 जगातले काही विचारवंत असे भाकीत करीत असतात, की उद्या कदाचित तिसरे महायुद्ध झालेच तर ते तीन कारणांमुळे होऊ शकेल. एक पाण्यावरून तरी महायुद्ध घडेल, पेट्रोलवरून तरी ते होऊ शकेल किंवा संस्कृतीच्या स्वामित्वावरून तरी ते घडू शकेल. ही तीनही कारणे आजच्या घडीला जगासमोरचे तीन ज्वलंत प्रश्न असले, तरी त्यातूनही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे सागराच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यामध्ये संशोधकांना यश आलेले आहे. उद्या ते अतिशय कमी खर्चात सर्वांना उपलब्ध होऊ शकेल. तीच गोष्ट पेट्रोलची म्हणता येईल. पाणी, सूर्यप्रकाश, वारा आणि वनस्पती यांच्या आधारे पर्यायी ऊर्जा निर्माण करण्यात फार मोठी प्रगती झालेली आहे आणि होतही आहे. त्यामुळे काही काळाने पेट्रोलचे साठे कमी झाले वा संपुष्टात आले, तरी मानवजातीजवळ पर्यायी ऊर्जास्त्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला असेल. त्यामुळे वरील दोन कारणे तिसऱ्या महायुद्धाला कारणीभूत होतील असे वाटत नाही. मात्र, जगातल्या देशांवर कोणत्या आणि कुणाच्या संस्कृतीचे स्वामित्व असावे, यावरून महायुद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचाच एक भाग म्हणून आज ख्रिस्त धर्म आणि इस्लाम यांच्यामध्ये कडवट भावना उत्पन्न झालेली आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अभिमानी देश आमचा धर्म, आमची संस्कृती, आमची जीवनशैली हीच श्रेष्ठ, आदर्श आणि अनुकरणीय असल्याने त्यांचा स्वीकार या मागासलेल्या राष्ट्रांनी करावा, अशी एक सुप्त भावना मनात ठेवून हालचाली करीत असतात. त्यातच जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आणि आंधळे अनुकरण यामुळे आपली प्राचीन भारतीय संस्कृती विशेषतः लोकसंस्कृती झपाट्याने लोप पावत चाललेली आहे. विस्मरणाच्या खोल गर्तेत ढकलली जात आहे. आणखी काही वर्षांनी आपल्या संस्कृतीची नामोनिशाणी शिल्लक राहणार का, असाच प्रश्न जाणकारांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही, असे वाटते.

 आपल्या संस्कृतीमधील साऱ्याच गोष्टी गौरवशाली आहेत, म्हणून त्यांचे जतन केले पाहिजे अशातली बाब नाही. आपल्या संस्कृतीमध्येही काल प्रवाहाबरोबर अनेक हीन नि निंद्य गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्यांचा आधार घेऊन अघोरी शोषण झाले आहे. माणसाला एक माणूस म्हणून मिळणारी वागणूक इथे विसरली गेली अहे. धार्मिक कर्मकांडांचा अतिरेक, त्यातून होणारे शोषण वर्णाश्रम व्यवस्था, जातीयता, स्त्रियांना दिली जाणारी अमानुष वागणूक, तिच्यावर घातलेली बंधने, सामान्य माणसाच्या नशिबी आणली गेलेली गुलामगिरी, ज्ञान व धर्मकृत्यविषयीचे काटेकोर नियम, पापपुण्याच्या स्वार्थी आणि भ्रामक कल्पना, स्पृश्यास्पृश्यभाव आणि या सर्वांमधून सामान्य माणसाची होणारी लूट, होणारी कुचंबणा; होणारी मानहानी यासारख्या अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीत निर्माण झाल्या आहेत. या साऱ्या गोष्टी त्याज्य आहेत. निंद्य आहेत. म्हणून आजही त्यांचे जतन करणे, त्यांचा अभिमानाने उल्लेख करणे सर्वथा गैर म्हटले पाहिजे. मात्र, आपल्या या संस्कृतीमध्ये जतन करण्यासारखे आणि मिरवण्यासारखेसुद्धा खूप आहे. आपल्या संस्कृतीने पंचमहाभूतांचा केलेला गौरव, भूमी आणि निसर्ग यांच्याशी जोडलेले आत्मीय नाते, एकत्वात अनेकत्व आणि अनेकत्वात एकत्व पाहण्याची विशाल दृष्टी, सहजीवन आणि सहकार्य या गोष्टींना संस्कृतीत असणारे स्थान, पशू, पक्षी, प्राणी, कीटक, पाणी, पाषाण यांच्या ठायी कल्पिलेले देवत्व, संवर्धन, सर्जन अणि संगोपन यांच्या अधिष्ठानावर साकार केलेले आचार-विचार आणि भौतिक सुखापेक्षा आत्मिक समाधानाला आपल्या संस्कृतीने दिलेले श्रेष्ठ स्थान या गोष्टी चिरंतन स्वरूपाच्या, जीवनाला उन्नत करणाऱ्या, तसेच सार्वकालिक महत्त्वाच्या आहेत. या साऱ्यांचे जतन आणि आणि जोपासना करणे आज आपल्या अस्मितेसाठी नितांत गरजेचे आहे. माणसाचा 'आतून' आणि 'बाहेरून' असा सर्वस्पर्शी समग्र नि चिरस्थायी विकास करण्याचे सामर्थ्य आपल्या संस्कृतीच्या गाभाऱ्यामधे ओतप्रोत भरलेले अहे. असा हा ओतप्रोत भरलेला अमृताचा गाभारा डॉ. राजेंद्र माने यांनी आपणासमोर ठेवलेला आहे. त्यांनी घडवलेल्या संस्कृतीच्या गाभाऱ्याचे दर्शन आपणाला तृप्त करून जाते. मुक्तीची प्रेरणा देते आणि नव्या नजरेने या गाभाऱ्याकडे पाहिले पाहिजे, असा संदेशही देऊन जाते. डॉ. राजेंद्र माने यांनी लिहिलेले हे चौदा लेख म्हणजे लखलखती चौदा रत्ने आहेत. ज्यांचा प्रकाश कधीही मिटणारा नाही. कधीही आटणारा नाही आणि तो विकृतीच्या अंधाराला गिळून टाकणारा आहे. माणसाच्या आसक्तीला विरक्तीचे कुंपण घालण्याचे काम किंबहुना सदैव फणा काढून दंश करणाऱ्या वासनेचे विवेकात रूपांतर करण्याचे काम डॉ. राजेंद्र माने यांनी जी लोकसंस्कृतीची चौदा दालने आपणासमोर खुली केली आहेत, त्यातून साध्य होऊन जाते. आपली लोकसंस्कृती किती श्रीमंत आहे, किती समृद्ध आहे आणि किती सर्वसमावेशक आहे, याचे मनोज्ञ दर्शन डॉ. राजेंद्र माने यांनी “लोकसंस्कृतीचा गाभारा" या ग्रंथात आपणाला घडविले आहे. त्यांनी घडविलेल्या या दर्शनाने आपल्याही मनाचा गाभारा भरून जातो, यात शंका नाही.

 एखाद्या राष्ट्राची खरी ओळख आपणाला कोणत्या गोष्टींतून होते? ती ओळख त्या राष्ट्रात असलेल्या सोन्याच्या खाणीवरून होत नसते. हिरे-माणकांच्या राशी आणि मोत्या-पोवळ्यांचे ढिगारे यातून होत नसते. किंवा शरीर सुखोपभोगांची साधने तेथील माणसाच्या पायाशी किती लोळतात, यावरूनही त्या राष्ट्राची खरी ओळख होत नसते. त्या राष्ट्राची समृद्ध आणि गौरवशाली संस्कृती किती वंदनीय आहे, यावरून त्या देशाची ओळख होत असते. ज्या देशाच्या संस्कृतीला प्रदीर्घ आणि वैभवशाली परंपरा आहे. ज्या देशाची संस्कृती सर्वसमावेशक. प्रवाही आणि उबदार आहे. भौतिक आणि आधिभौतिक या दोन्ही क्षेत्रात अत्युच्च पदाला गेलेली आहे, माणूस, समाज आणि निसर्ग यांना कवेत घेऊन सर्वांचा चिरस्थायी अभ्युदय घडविण्यात जी संस्कृती अजोड आहे, ती संस्कृती आणि तो देश स्वत:ची ओळख करून देण्यात यशस्वी ठरत असतो. आपली पाच हजार वर्षांपासून नांदणारी संस्कृती तथा लोकसंस्कृती या कसोट्यांना उतरणारी आहे.

 एखाद्या संस्कृतीला किंवा लोकसंस्कृतीला अशी अजोड आणि समृद्ध परंपरा अनेक कारणांनी प्राप्त होत असते. अनेक घटकांनी ती श्रीमंत बनत असते. त्या संस्कृतीमधील धर्मविचार, तत्त्वज्ञान, दैवते, जीवनविषयक मूल्ये; उपासना पद्धती, धार्मिक विधी, श्रद्धा, धारणा, संकेत, सण, सोहळे, यात्रा, जत्रा, कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध, जीवनशैली, खेळ, उद्योग, मंत्रतंत्र, शास्त्र, भाषा, साहित्य, शिल्प, कलोपासना, उपजीविकेची साधने, वस्त्रे, प्रावरणे, दागिने, पाप-पुण्याविषयीच्या धारणा, जन्म, मृत्यू आणि मृत्यूनंतरची धारणा; भूमी, निसर्ग, पंचमहाभुते, पशू, पक्षी इतर प्राणीसृष्टी याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक बाबींच्या एकात्म रूपांतून लोकसंस्कृतीची ओळख होत असते आणि लोकसंस्कृतीची समृद्धीही समजत असते. जीवित संरक्षणाची धारणा, श्रमाची बचत, सुखाची साधने, सर्जनाविषयीची भूमिका आणि अदृश्य शक्तीची उपासना पद्धती या पाच गोष्टींवर कोणत्याही लोकसंस्कृतीची श्रेष्ठता अवलंबून असते, या महत्त्वाच्या पाच गोष्टींतून तिला वेगळेपण प्राप्त होत असते. डॉ. राजेंद्र माने यांनी लोकजीवनाला व्यापून उरणाऱ्या आणि समाजधारणेला, व्यक्ती उन्नतीवर भर देणाऱ्या इतर काही बाबींचा परिचय करून दिलेला असल्याने लोकजीवन व लोकसंस्कृती यांचे व्यापकत्त्व अधोरेखित केलेले आहे. धर्म, उपासना आणि माणसाचे लौकिक जीवन या बाबींवर त्यांनी विशेष प्रकाश टाकलेला आहे. त्यामुळे आपल्या लोकसंस्कृतीचा गाभारा उजळून निघालेला आहे, यात शंका नाही.

 डॉ. राजेंद्र माने यांच्या या ग्रंथाचे प्रथमदर्शनी जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे नव्या पिढीला आपल्या लोकसंस्कृतीचा परिचय करून द्यावा, अशी भूमिका घेऊन त्यांनी हे लेखन केलेले आहे. त्यांची ही भूमिका आजच्या काळाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची वाटते. कारण लोककला, लोकसाहित्य आणि आपला सांस्कृतिक वारसा यांच्याविषयी नवी पिढी अतिशय उदासीन आहे. त्यातच वाचन संस्कृतीचा झपाट्याने होत चाललेला लोप, खून, मारामाऱ्या, बलात्कार आणि स्त्री-पुरुषांचे भडक स्वरूपातील संबंधांचे आघात, चंगळवादाच्या आहारी गेल्याने निष्क्रिय किया बनलेल्या नव्या पिढीला जगण्याचा आलेला उबग, चावून चोथा झालेल्या साचेबंद प्रेमाच्या त्रिकोणाचे स्वप्नरंजनपर चित्रण करणाऱ्या दूरदर्शन मालिका आणि ऊर फुटेपर्यंत पैशाच्या पाठीमागे लागलेला आजचा माणूस यांना फक्त वर्तमान ठाऊक असतो. भूतकाळाचा त्याला परिचय नसतो आणि भविष्यकाळाची त्याला स्वप्ने पडत नसतात. याशिवाय अप-टू-डेट होण्याच्या हव्यासापोटी पाश्चात्त्य संस्कृतीची गुलामी पत्करण्यात धन्यता मानणाऱ्या या नव्या पिढीला आपला समृद्ध वारसा ठाऊकच नाही; ही आजची शोकांतिका आहे. अशा या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला लोकसंस्कृतीचा परिचय करून देणे, ही एक मौलिक कामगिरी म्हणावी लागेल. ही कामगिरी या ग्रंथाने उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. त्यांनी या ग्रंथात जे-जे विषय निवडले आहेत; त्यांची समग्र, सर्वांगीण अशी विस्तृत माहिती दिली आहे. वासुदेव, जोगती, पोतराज, वाघ्या-मुरळी अशा लोककलावंतांचे मूळ सांगून त्याविषयीच्या विविध पुराणकथा परिचित करून दिल्या आहेत. त्यांचे विधी, पोशाख, धारणा इ. विषयीची विस्तृत माहिती डॉ. राजेंद्र माने यांनी दिलेली असल्याने पाश्चात्त्य व पौर्वात्य अशा दोन्हीही संस्कृतींची अर्धवट ओळख असलेल्या नव्या पिढीला हा ग्रंथ अतिशय मोलाचा वाटेल, असे वाटते. यातून त्यांना आपल्या परंपरेची आवड उत्पन्न होईल. आपला सांस्कृतिक वारसा जाणून घ्यावासा वाटेल. तो जाणून घेतल्यावर त्याचे असणारे वेगळेपण त्याला जाणवेल. त्यातून या वारशाचे संवर्धन करावे, अशी त्याला प्रेरणा मिळेल आणि त्यातूनच आपल्या लोकसंस्कृतीच्या पाथेयाचा त्याला अभिमानही वाटेल म्हणून डॉ. राजेंद्र माने यांचे हे. लेखन या दृष्टीने मौलिक व उपयुक्त स्वरूपाचे म्हणावे लागेल.

 डॉ. राजेंद्र माने यांचा हा 'लोकसंस्कृतीचा गाभारा' वाचल्यावर कुणाही अपरिचित वाचकाला जाणवणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीने लौकिक आणि पारलौकिकाचा फार सुरेख समन्वय साधलेला आहे. इथे माणसातल्या 'देवत्वा'ला आवाहन केले आहे आणि देवतांना मानवाच्या पातळीवर आणलेले आहे. इथे प्रपंचाची महत्ता कथन केली आहे; पण जोडीला परमार्थही आणून ठेवला आहे. इथे जसे भोगाला स्थान आहे, तसेच त्यागालाही अधोरेखित केले आहे. भक्ती आणि आसक्ती, प्रीती आणि विरक्ती, संग्रह आणि समर्पण, उत्सव आणि उपासना, धर्म आणि कर्म, मोह आणि मुक्ती आणि व्यष्टी नि समष्टी या सर्वांचा सुरेख समन्वय आपल्या लोकजीवनात आपल्या लोकसंस्कृतीत झालेला आहे; हे त्यांनी दिलेल्या देवतांविषयक विधीमध्ये आणि देवदेवतांच्या गीतांमधून आपणास उत्तम प्रकारे जाणवतो. प्रपंचाचे स्मरण करीत असतानाही ईश्वराचे विस्मरण होता कामा नये; हा एक सनातन आणि मौलिक विचार डॉ. माने यांचे लेख वाचल्यावर आपल्या मनावर कोरला जातो आणि आजच्या देहनिष्ठ इहवादाचा स्वीकार केलेल्या समाजाच्या दृष्टीने तो आवश्यक वाटतो. त्यांचा हा ग्रंथ आपल्या लोकसंस्कृतीची सर्वंकष ओळख करून तर देतोच; पण सफल आणि कृतार्थ जीवनाचा एक मूलमंत्रही ध्वनित करून टाकतो. माणसाने कसे जगावे आणि कुणासाठी जगावे, हा विचार या ग्रंथाचा खास विशेष म्हणावा लागेल.

 हा विचार मनात बाळगून जेव्हा आपण या ग्रंथातील वाघ्या-मुरळी, पोतराज, जोगतीण, गोंधळी, वासुदेव, भारूड सादर करणाऱ्या कलावंतांकडे पाहतो, तेव्हा आपणास त्यांची वेगळीच ओळख होते. ही मंडळी म्हणजे कष्ट न करता भीक मागून जगणारी ऐतखाऊ मंडळी नव्हेत, भिक्षेकरी नव्हेत, याची आपणास कल्पना येते. अथवा देवादिकांची चार गाणी म्हणून आपले मनोरंजन करणारी कलाकार मंडळी नव्हेत. ते लोककलावंत आहेत. ते आपल्या उपास्य देवतांचे प्रतिनिधी आहेत. त्या देवतांना आयुष्य समर्पित केलेले व्रतस्थ भक्त आहेत. आपल्या प्रापंचिक जीवनाला लागलेली आसक्तीची माती धुऊन टाकणारे सेवक आहेत, हे जाणवल्याशिवाय राहात नाही. भक्ती, नामस्मरण, उपासना या गोष्टींचे स्मरण देणारे ते प्रबोधनकारही आहेत. त्यांच्यामुळेच कुलाचार, कुलधर्म व उपासना यांना सातत्य प्राप्त होते. आज आपण या मंडळींकडे ज्या दृष्टीने पाहतो; ते योग्य नव्हे हा विचार या ग्रंथाच्या वाचनातून आपल्या मनात सखोलतेने रुजतो, यात शंका नाही. एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात जशी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, तसेच लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यात या मंडळींचे स्थान आहे, असे लेखकाला सूचित करावयाचे असावे.

 डॉ. राजेंद्र माने यांनी या सर्व कलावंतांचे जे रूपदर्शन घडविले आहे, ते कमालीचे प्रत्ययकारी, चित्रमय आणि जिवंत स्वरूपाचे झालेले आहे. एखाद्या कथेत किंवा कादंबरीमध्ये लेखक जसा त्यातील पात्रांना सजीव करतो, तसाच प्रकार इथे दिसतो. डॉ. राजेंद्र माने हे यशस्वी कादंबरीकार आणि निष्णात व्यक्तिचित्रण करणारे लेखक असल्याने आपल्या प्रतिभेच्या स्पर्शाने हे सारे लोककलावंत त्यांनी जिवंत केले आहेत. वासुदेव, पोतराज, जोगती-जोगतीण यांचे त्यांनी केलेले वर्णन इतके तपशीलवार, इतके सूक्ष्म आणि वास्तव आहे, की ते वर्णन वाचताच तो कलावंत मूर्तिमंत आपल्या समोर साकार होतो. नुसता साकार होत नाही, तर त्याच्या वाद्ये आणि गाण्यासह नाचत असलेल्या रूपात साकार होतो. या वर्णनामध्ये सूक्ष्म निरीक्षणाबरोबरच संशोधनाची प्रज्ञा आणि साहित्यासाठीची लागणारी रम्योज्वल प्रतिभा यांचा मनोज्ञ मिलाफ पार झालेला आहे. एखाद्या चित्रकाराने हलक्या हाताने हुकमत असलेल्या रेषांच्या आधारे एखादे रेखाचित्र काढावे आणि ते पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनात उतरावे; अशी निपुणता डॉ. राजेंद्र माने यांनी चित्रित केलेल्या या लोककलावंतांच्या चित्रणात साधलेली आहे. एकूणच लोकसंस्कृतीचा ऐवज कसाही असो, त्याचा दूत म्हणून आपणासमोर उभा केलेला कलावंत एक व्यक्तिचित्रण म्हणून खचितच वाचनीय झालेला आहे. स्मरणात राहणारा झाला आहे.

 हे देवदेवतांचे उपासक असलेले कलावंत त्यांच्या वेष-परिवेष आणि उपासना - विधी यांच्यासह चित्रित केलेले आहेतच; पण डॉ. राजेंद्र माने यांनी आणखी एक चांगली गोष्ट इथे केलेली आहे ती म्हणजे या कलावंतांनी म्हणलेली गाणी / गीते / ओव्या, काव्यरचना उधृत केलेल्या आहेत. उपास्य देवतांचे चरित्र व महात्म्य सांगणाऱ्या त्या अनुषंगाने भक्ती आणि धर्माचरण यांचे प्रबोधन करणारी गाणी लोकसंस्कृतीच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आणि तितकीच महत्त्वाची वाटतात. या गाण्यांना वाङ्मयीन गुणवत्ता कमी असली, तरी सांस्कृतिक गुणवत्ता भरपूर आढळते. त्यातून देवदेवतांचा परिचय होतो; त्यांच्या जन्मकथा समजतात, पुराणकथांची तोंडओळख होते आणि देवतांचे उपासना विधीही लक्षात येतात. ही गीते गाणारे लोककलावंत आता काळाच्या ओघात झपाट्याने कमी होत चाललेले असल्याने त्यांच्या जोर मुखातली ही सांस्कृतिक धनसंपदा शब्दांकित करून ठेवणे आवश्यक दस्तऐवज ठरणार आहे. असा हा दस्तऐवज डॉ. राजेंद्र माने यांनी अधिकाधिक प्रमाणात संग्रहित केलेला आहे. त्यामुळे या ग्रंथाची गुणवत्ता खचितच उंचावली आहे, असे वाटते. याबरोबरच आणखी एक गोष्ट नव्या पिढीसमोर आपोआप आली अहे. ती म्हणजे अलीकडे होणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात लोकगीतांचे सादरीकरण होत असते. भारूड, गौळण, लावणी यांची आवड निर्माण झालेल्या प्रेक्षकांसमोर हे प्रकार सादर केले जातात. त्यामुळे लोकसाहित्य आणि लोकगीते हा आपल्या परंपरेचा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे, अशी आपली भावना निर्माण होते. म्हणजे चार-सहा कवींच्या जशा कविता वा गीते असतात तसा हा प्रकार आहे, असे आजच्या श्रोत्यांना-प्रेक्षकांना वाटते; पण लोकगीते ही लोकसंस्कृतीच्या गाभ्याला फुटलेली फांदी आहे, याची कल्पना या ग्रंथातील विवेचनामुळे नव्या पिढीतील वाचकांना होईल. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल, की लोकसंस्कृतीच्या सशक्त अधिष्ठानामुळेच लोकगीते जन्माला आलेली आहेत. लोकसंस्कृती आणि दैवत उपासना यांच्यासाठी या गीतांची निर्मिती झालेली आहे. तसेच महाकाव्ये, पुराणे आणि देवादिकांच्या चरित्रांचा अडाणी माणसांना परिचय करून द्यावा आणि त्यांना धर्मोपासक बनवावे, त्यांच्या श्रद्धेला आवाहन करावे, यासाठी ही गीते निर्माण झाली आहेत. या विधानाचा आणि विचाराची सत्यता पाहावयाची झाली तर आपली मराठी लावणी पाहावी. शृंगारप्रधान असलेल्या रचना म्हणजे केवळ लावणी नव्हे, तर आपल्या परंपरेत सर्व प्रकारच्या लावण्याची निर्मिती झालेली आहे. रामायणावर लावणी आहे. पुराणांवर लावणी आहे. व्यक्तीवर लावणी आहे. दुष्काळावर लावणी आहे. एवढेच नव्हे तर पंढरपूर, काशी, पैठण, आळंदी, कोल्हापूर इ. तीर्थक्षेत्रांवरही लावण्या निर्माण झालेल्या आहेत. एवढी लावणीची विविधता कशामुळे आली? लोकसंस्कृतीच्या दर्शनासाठी आणि दैवत उपासनेसाठी ही विविधता आली. सामान्य माणसाला धर्मप्रवण नि भक्तिप्रवण बनवावे, यासाठी तीर्थक्षेत्रांवरच्या लावण्या निर्माण झाल्या. म्हणून लोकसंस्कृती हा या गीतांचा प्राण आहे, पाया आहे, प्रेरणास्थान आहे. लोकसंस्कृतीच्या सुपीक मातीतून रोपाच्या रूपाने वर आलेली हिरवी जादू म्हणजे ही गीते होत, ही कवने होत. ही जाणीव जुन्या जाणत्या अभ्यासकांना पूर्वीपासून असतेच; पण या शतकातल्या तरुण वयातील वाचकाला या दोहोंचा परस्पर संबंध दाखवून देण्याची कामगिरी डॉ. राजेंद्र माने यांनी उधृत केलेल्या नानाविध रचनांमुळे सफल झालेली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

 याबरोबरच समाधानाची बाब अशी, की लोकसंस्कृतीने म्हणजे तिच्या भक्त असलेल्या गीतकाराने किती नवे, देशीय, विविध आणि लवचिक वाङ्मय प्रकार निर्माण करून लोकसाहित्याला समृद्ध केले अहे. इथे ओवी आहे. अभंग आहे, पोवाडे आहे, लावणी आहे, कथागीते आहेत, स्तोत्ररचना आहे, भारूड रचना आहे, गौळण आहे आणि या वाङ्मय प्रकाराच्या जवळपास जाणारी रचनाही आहे. उदा. पोतराजाची बरीच गाणी लावणी रचनेशी साधर्म्य सांगणारी अशी आहेत. म्हणून साहित्याच्या दृष्टिकोनातून लोकसंस्कृतीने अनेक विविध काव्यप्रकार अथवा रचनाबंध आपल्या वाङ्मय परंपरेला बहाल केलेले आहेत, हे या ग्रंथातील लेखकांनी केलेल्या विवेचनातून जाणवून जाते.

 या ग्रंथातील प्रत्येक लेखाचा स्वतंत्रपणे रसोत्कट आणि सांस्कृतिक अंगाने परामर्श घेता येणे शक्य असले, तरी विस्तार भयास्तव तसे करणे टाळले आहे. शिवाय खुद्द लेखकानेच एकेका विषयाची सर्वांगीण स्वरूपात मांडणी करून त्या-त्या विषयाला पूर्णत्वाप्रत नेले अहे. त्या विषयाची उत्तम ओळख करून दिलेली आहे; पण तरीही 'ओळख माझं हुमाण अर्थात् कोडं' या एका विषयाची स्वतंत्रपणे नोंद करतो. नोंद करण्याचे कारण असे, की हा लेख काही देवता उपासनेचा दैवतविधीचा अंगभूत घटक नाही. हा काही पुण्यप्राप्तीसाठी संस्कृतीने दिलेला पाठ नाही किंवा श्रमपरिहारासाठी अन् स्वप्नपूर्तीसाठी गायलेली जात्यावरची ओवी नव्हे किंवा एखाद्या माऊलीने आयुष्यभर घेतलेल्या कडवट अनुभवाचा हा काही नि:श्वास नव्हे. पतीचं नाव घेणं, हुमाण वा कोडं घालणं, बाळाच्या नामकरण विधीवेळी पाळणा म्हणणं, हातावर नवऱ्याचं नाव गोंदून घेणं आणि डोहाळे लागल्यावर आवडलेल्या पदार्थाची चोरून पतीकडे मागणी करणं ही या लोकसंस्कृतीची, तसेच लोकमानसाची खास बात आहे - खासियत आहे. बाकीच्या गोष्टींचा इथे विचार करण्याचे कारण नाही; पण हुमाण अथवा कोडं याचे स्वरूप पूर्णत: वेगळे आहे. इथे ग्रांथिक ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान अधिक उपयोगी पडते. सूक्ष्म सृष्टीनिरीक्षण इथे आवश्यक असते. एखाद्या वस्तूचे वेगळेपण सहजपणे लक्षात घेणे गरजेचे असते आणि विचारलेल्या कोड्याचं झटकन उत्तर देण्याइतकी स्मरणाची तल्लखता आवश्यक असते. त्याबरोबरच या कोड्यातून आपली जीवनशैली समजण्यास मदत होते, जगरहाटीचे रूप लक्षात येते, बहुविध विषयांची ओळख होते. उद्दाम कल्पकतेचे लखलखते दर्शन घडते आणि निखळ स्वरूपाचे मनोरंजनही घडत असते. म्हणून ज्या संस्कृतीत ग्रामीण जीवनाशी निगडित म्हणी आणि वाक्प्रचार अधिक प्रमाणात आढळतात, चकित करून टाकणारी कोडी खूप संख्येने प्रचलित असतात. व्यावहारिक ज्ञानाने ठासून भरलेली सूत्रे अधिक असतात. ती संस्कृती म्हणजे ती लोकसंस्कृती शहाणपण शिकविणारी आदर्श पाठशाला असते. सृष्टी, माणूस, वस्तू, पदार्थ आणि चराचर वाचता आल्याशिवाय या पाठशालेतून पास होता येत नाही. आजच्या जमान्यात माणसाजवळ वेळच नसल्याने अशा हुमाण वा कोडी घालून विरंगुळा करून घेण्याची सोय उरलेली नाही आणि थोडाफार वेळ असला, तरी जीवनाच्या पाठशाळेतून लाभणारे शहाणपण आज आम्हा विद्याविभूषित पदवीधरांकडे फारसे नसल्यामुळे खेड्यातील निरक्षर आजीबाई आपला पराभव करून टाकते हे एक कडवट सत्य आपणाला नाकारता येणार नाही. डॉ. राजेंद्र माने यांनी आपल्या या ग्रंथात उपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या पैलूचा प्रसन्न परिचय करून दिलेला आहे. याबद्दल ते खरोखर अभिनंदनास पात्र आहेत.

 डॉ. राजेंद्र माने यांच्या या चौदा लेखांतून आपल्या लोकसंस्कृतीचे अतिशय सशक्त, सर्वसमावेशक आणि जिज्ञासापूर्ती करणारे लेखन केलेले आहे. या विषयांसंबंधी त्यांनी काही नवे विचार वा संशोधन सांगितले नसले, तरी पूर्वसुरींच्या अभ्यासाचा पुरेपूर वापर केला अहे. लोकसंस्कृती विषयीची उदासीनता, आपल्या संस्कृतीविषयी असणारी तुटलेपणाची भावना, लोकमानस आणि त्यांची जीवनशैली याविषयी असणारे आमचे अज्ञान दूर करण्याचे कार्य अशा ग्रंथामुळेच होऊ शकते. हे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी या ग्रंथातून आपल्या लोकसंस्कृतीचे जे दर्शन घडविले अहे, ते वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल! डॉ. राजेंद्र माने यांनी या ग्रंथात कोणती वैशिष्ट्ये ठळक केली आहेत? किंवा अधोरेखित केली आहेत? किंवा त्यांची लोकसंस्कृतीचे कोणते दर्शन आपणास घडवले आहे? थोडक्यात असे म्हणता येईल, की

 १. आमच्या या संस्कृतीची धर्म आणि देवदेवतांची विधी-उपासना ही एक प्रबळ प्रेरणा आढळते.

 २. आमच्या या संस्कृतीने संसार आणि संन्यास अथवा प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधलेला आहे.

 ३. संसारी माणूसही भक्ती, कुळाचार, उपासना, नामस्मरण, दानधर्म याद्वारे संसारापासून देवत्वापर्यंत जाऊ शकतो.

 ४. आमच्या कला आणि साहित्य, संगीत यांचा उदय मंदिर उपासनेतून झालेला आहे.

 ५. लोकसंस्कृतीत निम्नस्तरीय देवतांचीच अधिक उपासना होत असते.

 ६. श्रमाची उपासना ही या संस्कृतीची पूजा असते. पूजा मानली आहे.

 ७. मनोविनोदन, स्वप्नपूर्तीचा आनंद, सहजीवन यांनाही इथे स्थान आहे.

 ८. इष्ट देवतांचे उपासक आपल्या दैवत श्रद्धेला घट्ट करीत असतात.

 ९. लोकसंस्कृती ही परंपरा प्रिय, नैसर्गिक वृत्तीची आणि श्रद्धेवर जगणारी अशी संस्कृती आहे.

 १०. गीते-गाणी, ओव्या, भारूडे यातून मनोरंजनाबरोबरच भक्तीची भावना दृढ करण्यावर इथे भर दिलेला आढळतो.

 ११. आणि या आपल्या लोकसंस्कृतीत अतिशय अर्थपूर्ण अशा प्रतीकांचा उदंड वापर केलेला जाणवतो (आणि लेखकांनी त्या-त्या लेखातील प्रतीकांचा अर्थ उलगडूनही दाखविला आहे.)

 अशी ही आपली संस्कृती मानवी जीवनाला अंतर्बाह्य फुलविणारी, विकसित करणारी आणि उन्नत बनविणारी असल्याने पाश्चात्य संस्कृतीच्या बहिरंगाला भुलून आपण त्या संस्कृतीची गुलामगिरी स्वीकारणे माणूस, समाज आणि राष्ट्र या तिन्हीच्या दृष्टीने आत्मघातकी ठरते. कारण धर्म, तत्त्वज्ञान, भाषा, साहित्य, कला, परंपरा आणि इतिहास यांच्यातून साकार होणारी संस्कृतीच अस्मिता आणि आत्मभान देत असते. अस्मितासंपन्न राष्ट्रच अरिष्टाचा पराभव करू शकते. गुलामगिरी अव्हेरत असते आणि गुलामगिरी अव्हेरणारा माणूसच 'माणूस' म्हणून ताठ मानेनं जगू शकतो. ज्याची संस्कृती पराभूत झालेली नसते; तो जगालासुद्धा पराभूत करू शकतो. पण केव्हा? परकीय संस्कृतीला आंधळे अलिंगन देण्याचे आपण टाळले तर. कारण रसरशीत व देखण्या असलेल्या दाईपेक्षा सामान्य रूपाची सेवाभावी आई केव्हाही श्रेष्ठ मानावी लागेल. या दोन्ही संस्कृतीमध्ये तुलना केली तर आपणाला काय दिसते? थोडक्यात असे उत्तर देता येईल, की पाश्चात्य संस्कृती शरीरसुखाला अधिक महत्त्व देते, तर आपली संस्कृती आत्मिक सुखाला अधिक महत्त्व देते. पाश्चात्त्य संस्कृती पंचेद्रियांची पूजा करते, तर आपली संस्कृती पंचमहाभूतांची उपासना करते. पाश्चात्त्य संस्कृती क्षणाचा विचार करते, तर आपली संस्कृती युगाचा विचार करते. पाश्चात्त्य संस्कृती क्षणिक सुखाला मौलिक मानते; तर आपली संस्कृती चिरस्थायी आनंदाला महत्त्व देते. (सुख व आनंद यात खूप फरक आहे, हेही आपण ओळखले पाहिजे.) पाश्चात्त्य संस्कृती सुखोपभोगांना ओरबाडून घेते; तर आपली संस्कृती सुखांना वाटत जाते. पाश्चात्त्य संस्कृती जीवनाला चवदार बनविते; तर आपली संस्कृती जीवनाला अर्थपूर्ण करीत असते. थोर लेखक श्री. पु. ल. देशपांडे यांच्या शब्दात बोलायचे झाले तर पाश्चात्त्य संस्कृती ही द्राक्षसंस्कृती आहे; तर आपली संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती आहे. दोन संस्कृतीमधील मूलभूत फरक आपण लक्षात घेतला, तर आपणाला आपल्या संस्कृतीची महत्ता जाणवल्याशिवाय राहणार नाही, असे वाटते.

 ही महत्ता दाखवून देण्याचे काम डॉ. राजेंद्र माने यांच्या लोकसंस्कृतीचा गाभारा' यासारख्या माहितीपूर्ण ग्रंथातून उत्तम प्रकारे झालेले आहे. गाभाऱ्यापर्यंत प्रवास केलेल्या त्यांच्या लेखणीने आता ललित साहित्याच्या निर्मितीबरोबरच संस्कृतीच्या कळसाकडेही गेले पाहिजे. कळस मंदिराचा असो वा संस्कृतीचा असो, त्याच्या दर्शनात अपार तृप्ती असते. अपार समाधान असते नि जीवन कृतार्थतेची अपार भावना दाटलेली असते. म्हणून त्याच्या दर्शनासाठी आपण अनावर होऊन जातो. विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी अनावर झालेल्या वारकऱ्याप्रमाणे!

 हे वारकरीपण डॉ. मानेंनी स्वीकारले पाहिजे! शब्दातून व्यक्त केले पाहिजे, असे वाटते! त्यासाठी त्यांना शुभेच्छा!

डॉ. द. ता. भोसले



अनुक्रमणिका


जात्यावरची ओवी। २१
लावणी । ३५
यल्लमाचा जग, जोगती व जोगतीणी । ४९
दान पावलं । ६१
लोकसंस्कृतीतलं सासर-माहेर । ६९
लोककथा गीतं । ७९
मराठी मनावरचे गारूड : भारूड । ९१
येळकोट । १०९
दार उघड बया! । ११९
वारियाने कुंडल हाले । १२७
आई भवानी गोंधळा ये... । १३७
ओळख माझं हुमाण अर्थात कोडं । १४७
ऐलमा - पैलमा : हादगा । १५३
लोकसंस्कृतीमधील दिवाळी । १६१
जात्यावरची ओवी


जात्या ईसवरा  तुला वड्नी पाहिलं
मावलीचं दूध  तुझ्या कारनी लावीलं
जात्या ईसवरा  तिळा तांदळाचा घास
माझ्या प्रेमायाचा  नवरा मोतियाचा घोस
जात्या ईसवरा  जड जाशी दाटयीनी
तुझ्या शिनयीची  आनूं सौंगड कुठूयीनी

 खरंच आता अशी जात्यावरची ओवी कानी पडण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. जवळ-जवळ संपत आलंय म्हटलं तरी चालेल; पण खेड्यापाड्यात अजून कुठंतरी ओवीची जाग शाबीत आहे. पहाटेचा प्रहर... उजेड पडायला नुकतीच कुठं सुरवात झालीय अशा वेळी जात्याला ईश्वर मानून, एक पाय लांब करून व दुसरा पाय गुडघ्यात दुमडून जात्यावर कोणीतरी स्त्री दळण दळत असते. जात जड येत असतं. ते फिरवताना जीव दमगीर होत असतो. पहाटेच्या वेळी सुद्धा कपाळावर घामाचे थेंब गोळा झालेले असतात. मधूनच पदराच्या शेवाने ती कपाळावरचे घामाचे थेंब टिपत असते. हे श्रम कमी वाटावेत. जाणवू नयेत म्हणून मग तिच्या मनातल्या भावना आपसुक तिच्या ओठातून बाहेर पडू लागतात. आठवणींचा ओघ तिच्या मनात रुंजी घालू लागतो. सुखदुःख, अपेक्षा ओवीच्या रूपाने ओठातून बाहेर पडू लागतात. जात्याच्या घरघरीत, ओवी एक वेगळा भोवताल निर्माण करते. त्या नादात तिला ओढायला लागणाऱ्या जात्याचे श्रम जाणवत नाहीत. ईश्वर मानलेल्या जात्याला ती सुख दुःख सांगून मोकळी होते. कुठंतरी त्या दिवसापुरतं तरी तिचं मन हलकं हलकं होतं.

 खरं तर ओवी म्हटलं तर एक प्रकारची कविताच. जात्यावरची ओवी ही वर्षानुवर्षे गायली जात आहे. एकीनं गायली दुसरीनं ऐकली असा प्रवास चालत ती जिवंत आहे. या ओव्यावर कोणा एकाचा मालकी हक्क नाही. या कोणी रचल्या हे सांगता येत नाही. अशिक्षित स्त्रीच्या मनातील जाणिवांचं.' भावभावनांचं हे एक सशक्त प्रकटीकरण आहे. हे पूर्वांपार जपलं गेलेलं स्त्री धन आहे.

 ओवीचे चरण तीन - आदि चरण, मध्य चरण आणि अंती प्रसाद. असे ग्रंथातील लक्षण आहे; पण नंतरच्या काळात साडेतीन व साडेचार चरणाची ओवी ही आढळून येते.

 जात्यावरची ओवी ज्या माय-भगिनींनी रचली, गायली त्या खरं तर अशिक्षित; पण त्यांची प्रतिभा पाहिली की मात्र अचंबित व्हायला होतं. त्या काळातली समाजरचना, रीत-भात, परंपरा, पुरुषी वर्चस्व, वेगवेगळे नातेबंध, निसर्गाची वेगवेगळी रूपं सगळं सगळं या जात्यावरच्या ओव्यात जणू त्यांनी बांधून ठेवलं आहे आणि जिवापाड सांभाळलंही आहे. तरल भावना जपणं, त्या तितक्याच ताकदीने उपमांच्या, रूपकांच्या आधारानं व्यक्त करणं हे जणू स्त्रीच करू जाणे. म्हणूनच काय एका ठिकाणी कवी इंद्रजित भालेरावांनी म्हटलंय

पुरुषापासूनच इतिहासात
कवितेला कायम भीती राहिली होती
म्हणून फक्त जात्याभोवतीच
कविता जिती राहिली होती.

 आणि खरोखरच इतकी वर्षे जात्याच्या आधारानं या ओव्या अजून जिवंत आहेत.

 या जात्यावरच्या ओव्या वाचल्या, ऐकल्या की जाणवतं ही रचना तशी मुक्त आहे. आपसुक ओठातून बाहेर पडलेली ही एक कथाच अहे. कुठंतरी ती स्त्री स्वत:च्या आयुष्यातले प्रसंग त्यातून व्यक्त करते आहे. स्वत:ची सुख दुःख त्यातून हे तिचं तिलाही समजत नाही. त्या स्त्रीला, 'बये!, तू ही ओवी कशी रचलीस?' असा प्रश्न विचारला तर तिला या प्रश्नाचं उत्तर देता येईल का नाही, ही शंकाच आहे. कारण असं काही ठरवून ती ते गात नाही. बहिणाबाईंनी या ओव्या कशा सुचतात हे सांगताना

अरे घरोटा घरोटा
तुह्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येतं व्होटी

 असं म्हटलंय... हे सगळं प्रकटीकरण इतकं सहज होतं, की तिचं तिलाही कळत नाही; पण या जात्यावरच्या ओव्या या मराठीतलं अनमोल धन आहेत. स्त्री जीवनाचा एक इतिहास त्या सगळ्या ओव्यांत लपून राहिला आहे.

 जात्यावरच्या ओव्यामधलं विषयांचं वैविध्य पाहिलं, की जाणवतं या पाठी स्त्रीची वेदना लपून राहिली आहे. एक दुःख आहे, जगण्यातलं भान आहे.

 पूर्वीच्या काळी मुलींची लवकर लग्न होत. अंगणात भातुकली खेळता खेळता कधी खऱ्या संसाराला सुरवात झाली हे त्यांनाही कळत नसे. आई वडिलांचा भावाबहिणींचा दुरावा त्यांना सासरी गेल्यावर सहन करावा लागे. तिथं नवीन माणसं, नवीन वातावरण या सर्वात मिसळून जाणं तितकं सोपं नसायचं. माहेरातून पाय उचलायचा नाही. आई, बाप, भाऊ सगळी नाती आठवून मन भरून यायचं.

सासरी जाती लेक तिच्या डोळ्यात आलं पाणी
बाप म्हणतो माझी तान्ही
सासरी जाती लेक तिच्या डोळ्यात आल्या गंगा
एक महिन्याची बोली सांगा

 सासरी गेल्यावर लवकरात लवकर माहेर भेटावं म्हणून ओटीतले चार तांदळाचे दाणे माहेरच्या ताटात परत ठेवायची पद्धत ही पूर्वापार आहे. त्यामुळे लवकर माहेर भेटतं असा समज आहे.
 मुलगी सासरी जातानाच वर्णन अनेक जात्यावरच्या ओव्यात आहे. तो प्रसंग, त्या प्रसंगातील भावना वर्णन करताना त्या पाठीमागे विरहाचा जीवघेणा चटका आहे, हेही त्यातून सतत जाणवत राहातं. ही त्या ओवीतील ताकद म्हणावी लागेल.

सासरी जाते लेक पाणी लागलं डगरीला
देती निरोप गडणीला
सासरी जाते लेक, लेक बघती मागं पुढं
जीव गुंतला आईकडं
सासरी जाते लेक घोडं लागलं माळावरी,
लिंबू फुटलं गालावरी

 ही सासरी मुलगी जाताना तिचं वय लहान. त्यामुळं तिथं कसं वागावं हेही तिला सांगितलं जायचं. कारण नवीन गोतावळ्यात आपली मुलगी गोंधळून जाऊ नये. माहेरी लाडात वाढलेली, तिथं हवं तसं वागता येणार नाही. तिथल्या रीती-भाती, मान-पान हे तिला सांभाळावं लागणार. तिच्या हातून तिथं काही चूक होऊ नये. म्हणून मग जाणती माणसं उपदेश करत असत. हे उपदेश मग वेगवेगळ्या नात्यांकडून होत. कधी आई सांगे कधी बाप, कधी भाऊ कधी मोठी नणंद. त्यांचे उल्लेख जात्यावरच्या ओव्यांत अनेक ठिकाणी जागोजागी सापडतात.
 एखादी नणंद सांगते

सासरी जाताना पाय टाकावा जपून
मान सासूचा राहून
जोडव्याचा पाय हळू टाकावा वैनीबाई
पांची पांडव माझे भाई ओटीवरी

 आपली भोळी लेक कोणापाशीही काही मनातलं बोलेल आणि ते सगळीकडे पसरून गहजब होईल, या भीतीनं आई सांगते.

अंतरीच गुज सांगू नकोस कोणापाशी
यील वाकडं एक दिवशी सोमुताई
हासू नको नारी हासू कुन्या परकाराचं
पानी जाईल भरताराचं
भरतारासंग नारी येळी घ्यावं गं मोडतं
पाणी मोलाला चढतं.
याला भरताराला नारी, नको बोलूस अजंदुजं
आपल्या जलमाच त्येनं उचललं वझं
फाटला पाटव, घे ग निरीला झाकून
आब कंथाचा राखून

 असं सगळं मोठ्यांचं ऐकून सासरी पाऊल पडलेलं असतं. जात्यावर दळण दळताना मनात सगळा आठवणींचा उत्सव चाललेला असतो. थोडक्यात आता सासर हेच तुझं खरं घर आहे. तिथली माणसं ही आता तुझी आहेत. त्यांचा मान राखणं, सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे. महत्त्वाचा म्हणजे नवरा, त्याचा शब्द मोडू नको. त्याचं अजं दुजं कोणाजवळ बोलू नकोस. वेळप्रसंग कसेही येतील. पैसा असेल नसेल; पण म्हणून चारचौघाला ते कळू देऊ नको. नवऱ्याची प्रतिष्ठा चारचौघांत जप. कारण तीच तुझीपण प्रतिष्ठा आहे, ही शिकवण तिला सतत दिली जात असे आणि हे सांगताना मग कुठंतरी या घराला तू आता पाहुणी झालीस हेही सांगणं येतं. आई-बाप असतात तोवर सणासुदीला मानपान होईल. हक्कानं जाता येईल.

ज्या गावात मायबाप. त्या गावाच मला याड
सयानू किती सांगू तिथं गारव्याचं झाड

 हा मनातला विसावा, गारवा आईबाप आहेत तोपर्यंत शाबूत राहतो. म्हणून मग ओवी येते

जोवरी माय बाप, लेकी येऊद्या जाऊ द्या
आंब्याची आंबराई, एवढी बाळाला घेऊ द्या
जोवरी मायबाप, लेकी माहेराची हवा
भाऊ भावजयांचं राज्य, मग अम्मल आला नवा

 जोपर्यंत माहेरी आईवडील आहेत, तोवर देणं घेणं होईल. मुराळी पाठवून तुला बोलावणं होईल. जावयाचा मान राखला जाईल. पोरांचं कोडकौतुक होईल. त्यांच्या माघारी मात्र तेवढी ओढ उरणार नाही. भावजयांच्या राज्यात हे सगळं होईल याची खात्री नाही. अशा अर्थाची ओवी जातं ओढताना, गाताना कित्येक बायकांचे डोळे नक्की पाणवत असतील. ज्यांचे आईवडील नाहीत त्यांचा तर हुंदका सुद्धा घशात अडकत असेल.

 जात्यावरच्या अशा ओव्या या एक प्रकारची भावगीतच आहेत, असं सतत जाणवत राहतं. भाव-भावनांचं इतकं वैविध्यीकरण खचितच इतर कुठं दिसून येतं.
पायली-पायलीचं दळण पहाटेच्या प्रहरी दळणं हे शक्तीचच काम असायचं; पण या शक्तीबाहेरच्या कामाचे श्रम न जाणवता पार पडण्यासाठी ओवी गाण्याची प्रथा खूपच विलोभनीय आहे, यात शंका नाही.

 आपली आई इतकं दळण एकटी दळते आहे, हे पाहून तिची छोटी मुलगी हौसेने तिला मदत करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिच्याशी ओवीतच तिची आई कानगोष्ट करते. मुलीची शक्ती बेताची आहे याची तिला जाणीव आहे; पण आपल्यावर प्रेम किती आहे हे पाहावे या भावनेनं ती तिला हलका हात लाव म्हणते आणि तिला हे झेपत नाही पाहून तिच्या कोवळ्या हातावर मायेची फुकर घालत म्हणते

नको तू दळू लागू   बस माझ्या ग जवळी
लाडके प्रेमाताई   तुजी मनगटं कवळी
नको तू दळू लागू  मला उलीसा हात लाव
लाडके बाळाबाई  तुज्या मयाचा अंत पाहू

 त्या मुलीला पुढं दळण यायला पाहिजे म्हणून कदाचित ही आई तिला हात लावण्याची संधी देत असावी. कारण मुलीला वळण लागण्याचाही तो एक भाग असावा.
 मुल पोटी असणं हे स्त्रीजन्माचं सार्थक अशी भावना रूढ आहे. बाळ हे स्त्रीचं उभे आयुष्य. त्याचं सगळं करण्यात तिला विलक्षण आनंद होतो. त्याला अंघोळ घालणं, झोपवणं यात तिला श्रम वाटत नाहीत. त्याच्या सहवासाची तिला ओढ असते.

सदर सोप्यामंदी  नारूशंकर तांब्या लोळे
लाडका बाळराजा  बाई जावळाचा खेळे
बारीक बांगडी  गोऱ्या हातात चमक मारी
लाडक्या बाळराजा  जावळ कुरळं मागं सारी

 सदर ओवीत जावळ असणारा बाळराजा खेळतो आहे. त्याचे कुरळे केस मागे सारताना गोऱ्या नाजूक हातातली राजवर्खी बांगडी चमकत आहे. असं सुंदर वर्णन या ओवीत आहे. बाळलीलांचं वर्णन तर काय करावं? ओवीत या बाळलीलांवरची खूपशी वर्णन मोठ्या मोहकतेनं येतात. जणू दृष्टीच्या चौथऱ्यासमोर त्या बाळलीला घडत आहेत असं वाटतं. याचं मुख्य कारण म्हणजे त्या पाठीमागचा त्या स्त्रीचा खरा अनुभव हेच आहे.

अवकाळ बाळराज  केळी नारळीवर चड
लाडक्या बाळराजा  तुजी मावशी पाया पड
माळ्याच्या मळ्यामंदी  माळी मळ्यात येऊ दीना
लाडका बाळराजा  फुलं जाईला ऱ्हाऊ दीना
समोरल्या सोप्या  कुनी सांडिली तूपपोळी
लाडकी बाळाबाई  माजी जेवली चापेकळी
शेजीच्या घरी गेले  बस म्हनीना जोत्यावरी
लाडका बाळराज  हाई अवकाळ कडवरी
माज्या ग अंगनात  काळी निळी दोन घोडी
रामचंदर दौलती  भीम अर्जुनाची जोडी
रांग रांगत  बाळ गेलया उंबऱ्यात
लाडका बाळराज  हिरा झळकतो बंगल्यात

 या ओवीत तूपपोळी सांडण्याच्या निमित्ताने मुलीचा मोठा सुंदर उल्लेख येतो. मुलीला तिनं चाफेकळीची उपमा दिली आहे. शेवटी उंबऱ्यावरील रांगेत बाळ घरामधली हिऱ्यासारखा शोभून दिसतो असं ती म्हणते. या बाळकौतुकाच्या ओव्या कदाचित पहाटेच्या प्रहरी बाळाला मांडीवर झोपवतही त्याच्या आईनं म्हटल्या असतील. जात्याचा लयबद्ध आवाज आणि आईच्या परिचित आवाजातली ओवी यानं त्या बाळराजाला छान गाढ झोप लागत असेल.

 पूर्वीच्या काळी जिथं मुलीला द्यायची, तिथं तिनं सुख मानून जगलं पाहिजे, असं तिला सांगितलं जायचं; पण माणसांचे स्वभाव वेगळे. कुठंतरी काही व्हायचं. पटायचं नाही, सासुरवास या नावाखाली मग ते मांडलं जायचं. प्रत्येक घरात थोड्या फार प्रमाणात सासुरवास असायचाच. कोणाकडून उडत उडत बातम्या त्या स्त्रीच्या माहेरी पोचायच्या. मग खरच पोरगी कशी आहे, सुखात आहे ना! या भावनेनं माहेरच्या माणसांचा जीव कासावीस व्हायचा आणि मग भावाला बहिणीची परिस्थिती कशी आहे ते पहायला पाठवलं जायचं. भाऊ बहिणीच्या दारी येई त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन जे ओवीत केलं आहे ते ऐकलं, की ऐकणाऱ्याच्या काळजाचं पाणी होतं.

भाऊ भैनीच्या गं दारी  भर उनाचा कहर
दोन पहाट दुपार
भाऊ भैनीच्या गं दारी  उबा ऱ्हाईला अंगनी
न्हाई घंगाळात पाणी
भाऊ भैनीच्या गं  दारी सासुरवास ये कानी
झालं काळजाचं पाणी
भैनीचा गं सासुरवास  न्हाई ऐकवला कानी
जीन घोड्यावरी आनी
शेवया बोटव्यांनी  उतरंड्या आगाशी
भाऊ चालला उपाशी
घरी वासाचे तांदूळ  काय करता असून
सासुरवाशी गं भैन
घराच्या वळचणीत  उभी हाईली भैन
म्हणे दादा जा भेटून

 घरात सगळं आहे; पण सासुरवास असल्यामुळं तिला भावासाठी काही करता येत नाही. घंगाळ्यात पाणी देता येत नाही, शेवया बोटव्याची खीर करता येत नाही, वासाच्या तांदळाचा भात करता येत नाही. बहिणीची ही अवस्था भावाच्या लक्षात येते, तोही मग मुकाट परततो. घराच्या वळचणीला उभी राहून डोळे पुसत बहीण भावाला निरोप देते. पुन्हा भेटून जा म्हणते. जिनं ही ओवी रचली असेल, ती अशाच परिस्थितीतून गेली असेल त्यामुळे ती वेदना या ओवीत जिवंत झाली आहे. सासुरवाशिणीचा आणखी प्रकार एका ओवीतून सामोरी येते. बहिणीची खुशाली पुसायला एक भाऊ तिच्या घरी गेला आहे. तिची त्यानं विचारपूस केली आहे. तेव्हा बहीण त्याला म्हणते त्याची ओवी ही विलक्षण वेदना सांगून जाणारी आहे आणि ही वेदना तिनं उपमेनं सूचित केली आहे.

बंधुजी विचारीतो  भैना सासुरवास कसा
सावळ्या बंदुराया  बरम्या लिवून गेला तसा
बंधुजी विचारीतो  भैना सासुरवास कसा
चिताकाचा फासा   गळी रूतला सांगू कसा

 घरच्या सासरवासाबद्दल प्रत्यक्ष न सागंता ती म्हणते ब्रह्मदेवाने कपाळावर ओढलेल्या रेषेप्रमाणे सगळं चाललं आहे. पुढं ती सांगते सोन्याचा दागिना ज्याला तिनं 'चिताक' म्हटलं आहे. ते गळ्यात घातलेवर रुतून नकोसा वाटावा तसं माझं चाललं आहे. सासुरवास हा जात्यावरच्या ओवीचा जिव्हाळ्याचा विषय असावा कारण रोज काही ना काही घडतं ते सगळं सागायचं कोणाला तर ईश्वर, सखी, सुहृद मानलेल्या जात्याला. सासुरवास हा सहन करणाऱ्याला कळतो. लांबून पहाणाऱ्याला बऱ्याचवेळा तिचं सगळं साजरं चाललय वाटतं; पण प्रत्यक्षात ते तसं नसतं. एका ओवीत त्याचं सुंदर वर्णन येतं. वर्णन सुंदर असलं तरी त्यामागचं दु:ख मात्र मनाची कासावीस करणारं आहे.

राजबन्सी गं पाखरू/ चोचीमंदी दुखावलं
मोत्या नि पोवळ्याचा / चारा खानं इसरलं
उन्हाळ्याचं उन / झाडाला नाही पान
जंगल पाखराचं/ उदास झालं मन
हासून खेळून। नार चालली वनाला
अंतरीचं दु:ख। काय कळे गवाराला
देहाला भिरूड। सांगून काय सार
जगाला दिसतं । झाड गं हिरवंगार
सुख माझं दुःख। दोघं मांडले दुकानी
सुखाला मिळे धनी। दुःखाला नाही कोणी।

 देह मनाला आतून लागणारं 'भिरूड', म्हणजे दुःख सांगता येत नाही. सुखाला सगळे वाटेकरी असतात; पण दुःख मात्र ज्याचं त्याला सोसावं लागतं.
 अशा वेळी हे मनातलं दुःख जवळच्या मैत्रिणीजवळ उघड करता यायचं. त्या सुखदुःख वाटून घ्यायच्या. कारण बऱ्याच वेळा बरीच दुःख ही सारखी असतात. या मैत्रिणीच्या प्रेमाची ओवी दोघींच्यातला मन ओलावा प्रगट करते

तुजा माजा भावपना  जना जायीरी नसावा
माजे तूं गड्यीनी  बोल हुरदी नटावा
तुजा माजा भावपना  घडी जाईना पारायाची
माजे तू गड्यीनी  कडी उगड दारायाची
तुजा माजा भावपना  कुनी कालीयील राळं
माजे तू गड्यीनी  नगं मनात आनू काळं

 तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही. आपल्या दोघींचे इतके जीवाभावाचे संबंध पाहून कोणीतरी काही किल्मिष निर्माण करण्याचा प्रयत्न करेल; पण तू मात्र मनात काही आणू नको आणि पुढं ओवीत ती म्हणते.

सुक सांगताना  दुक माग उचमळ
माजे तू गड्यीनी  नको पाण्यानं भरू डोळं
गडन म्या बी केली  मी गं तिला काय देऊ
माजे तू गड्यीनी  एक लवंग दोगी खाऊ

 एक लवंग दोघीत वाटून घेणारी एकजीव मैत्री दोघीत अनामिक नातेबंध निर्माण करते.
 जात्यावरच्या ओव्यांमध्ये येणारे बरेचसे शब्द ग्राम्य बोलीतील आहेत; पण त्यातही एक गोडवा आहे. मैत्रिणीला ‘गडणी' हा शब्द कानाला गोड वाटणारा हवाहवासा वाटणारा आहे. सलगी दाखवणारा आहे.
 मैत्रिणींच्या मधील निष्काम आणि जिव्हाळ्याच्या प्रेमाने नटलेल्या या ओव्या एक फार सुंदर कल्पना सर्वांसमोर ठेवतात. खेड्यापाड्यातली माणसं श्रद्धाळू अशी तिथली स्त्री तर देवावर हवाला ठेवून आयुष्य कंठणारी. हातून चांगली कर्मे घडावीत, त्यातून गाठीला पुण्य व्हावं मुलंबाळ सुखात राहावीत, संकट येऊ नयेत, आली तर त्या परमेश्वरानं त्यातून तारून न्यावं; अशी इच्छा करणारी. श्रद्धा जपणारी भाविकतेनं परमेश्वराचं स्मरण करणारी. हे स्मरण करण्यासाठी रोजच्या कामात खास वेगळा वेळ तिला काढता यायचा नाही. मग श्रमातच ओवीच्या रूपात परमेश्वराला साद घालणारी ही स्त्री वेगवेगळ्या ओव्यात त्याला गुंतवून ठेवते.

पहिली माझी ओवी  पहिला माझा नेम
तुळशी जवळी राम  पोथी वाची
दुसरी माझी ओवी  दुधाची भावना
लक्ष्मी नारायणा  विनंती माझी
तिसरी माझी ओवी  तिरकुटाच्या परी
ब्रह्मा विष्णुवरी  बेलपत्री
चवथी माझी ओवी   चवथीच्या चांदा
मोतीयाच्या भांगा  अंबाबाई
पाचवी माझी ओवी  पाची पांडवासी
पूजा आरंभीसी  विठोबाची.

 देवाचं मानुषीकरण करणं हे तर अनेक ओव्यांत दिसून येतं. देवांतले एकमेकातले संवाद मोठ्या विलोभनीयरीत्या ओवीत गुंफले आहे. विठ्ठल रखुमाई यांच्यातला संवाद अतिशय सुंदर रीतीनं एका जात्यावरच्या ओवीत आढळून येतो.

इठ्ठलाचे पाय रुखमिन मर्जीती लोण्यानं
खरं सांगा मही आण जनी तुमची कोण
इठ्ठल मनितो रुखमिनी नको पाप धरू
आपल्या आसऱ्याला जनी सुखाचं पाखरू
रुखमिन मनिती देवा तुम्हा लाज थोडी
गादी फुलाची सोडून वाकळाची काय गोडी
रुखमिन मनिती देवा तुमचा येतो राग
तुमच्या धोतराला जनिच्या काजळाचा डाग

 स्त्रीमधला मत्सर, नवऱ्यासंबंधीचं प्रेम हे जितकं सर्वसामान्य संसारात दिसतं, तसेच ते देवांच्या संसारातही मांडण्याचा प्रयत्न ही ओवी गाणारी स्त्री करते. जनीबद्दल विठ्ठलाला वाटणारं प्रेम आणि त्या प्रेमामुळे रुक्मिणीला वाटणारा मत्सर हे विकार माणसाप्रमाणं देवांनाही अशा ओव्या बहाल करतात. आणखी अशाच एका ओवीत वर्णन येतं

तुळशी गं बाई, तुला न्हाई नाक डोळे
अशा सावळ्या रूपाला कसे गोविंद भुलले
मापस तुळशी गं बाई, काय हे तुजं जिणं
गोविंदाच्या संगे वसविर्साला लगीन.

 अशा ओव्या मानवी मनाची देवाशी असणारी आगळी सलगी व्यक्त करतात. देवावर जशी श्रद्धा ठेवतात. तशीच त्याला सखा मानून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न जात्यावरच्या ओवीतून होतो.

 पूर्वी खेडोपाड्यातल्या स्त्रियांना शेतावर जायला लागायचं. तिथला निसर्ग, पेरण्या, कापण्या, बैल या विषयीची भावनाही मग ओवीचा पदर धरून व्यक्त व्हायची

ज्येष्ठ गं महिन्यात  ईज झालीया कावयीरी
बंदु राजाच्या हातात गं  कुरी झालीया नवयीरी
शेताला गेली कुरी   आडवी लागली माजी निरी
ताईता बंदू माज्या   तुमची पिकू द्या शेतसरी
शेताला गेली कुरी  ताशी लावून उबी केली
लाडक्या बाळायानी  बैलबाबाला हाक दिली
शेताला गेली कुरी  बी नेलंया उडीदाचं
माजा ग बाळराज  पेरं पेरीतो मिरगाचं

 मृग नक्षत्रातला पेरणीचा थाट या ओवीतून सामोरी येतो. सासरी गेल्यावरही भाऊ, माहेर स्त्रीच्या मनातून विसरत नाही. तिथल्या आठवणी, त्याचं कुशल चिंतन हे सगळं अशा प्रकारे ती व्यक्त करत राहते. बऱ्याचवेळा जात्यावरची ओवी ही स्त्रीच्या आठवणींचा उत्सव बनते.

 तिला आयुष्यात अनेक नातेबंध सांभाळावे लागतात. सासू, सासरा, नणंद, नवरा, माहेरचा गोतावळा तर वेगळाच. आयुष्यात अनेकवेळा या नातेसंबंधांत तिची घुसमट होते; पण तरी शेवटी प्रसंगी नमतं घेऊन का होईना तिला सगळं सांभाळावं लागतं. आईवडिलांच्या बद्दल तर तिला अपार स्नेह. वयाच्या बारा-तेराव्या वर्षी तिला त्यांना दुरावावं लागतं. त्यामुळं ती ओढ आयुष्यभर तिला राहते.

बापाजी समींदर  बया मालन व्हाती गंगा
दोगांच्या सावलीत  कर आंगूळ शिरीरंगा
काशी बनारसी  बनारसीचा डोंगूर
मायबाप माजी बाई  सर्व तीर्थांचा आगर
वपी मी गाते  काशीतल्या काशिनाथा
रामचंदर माजा पिता  सीता रानी माजी माता

 आईवडिलांची सावली जण माज्यावर असणारी देवाधिकांची सावली आहे. आई-वडील हच माझं तीर्थ आहे. या श्रद्धेतून अशी ओवी येत राहते.

 आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगलं सासर बघून दिलं म्हणून सुख आपल्या दारी आल याची तिला जाणीव आहे. ते सांगताना ती म्हणते-

जागा बगुनी दिल्या पागा  वतन बगुनी दिल्या लेकी
पित्या माज्या दौलताला  शाना चातुर म्हनू किती

इतरही नात्यांचा मागोवा जात्यावरच्या ओवीमधून येत राहतो.

नदीच्या पल्याड गं  काडी हालती लव्हाळ्याची
तयार तितं माजी हैती बाई  मामा मावशी जिव्हाळ्याची
हिरव्या चोळीवरी   कुणी काढिली गवळण
ह्या ग नारीला सांगू किती  हाय हौसची मावळण
उचकी लागीयिली  का गं उचकी तुजी गाई
मायेच्या मावशीनं   सई काडीली कशापाई

 स्त्रीच्या विशेष आवडी निवडी दर्शवणारा हा भावनाविष्कार मोठा आकर्षक आहे. मावशी, आत्या, मामा ही माहेरकडची नाती एक खासा ओलावा देणारी असतात.
 स्त्रीच्या आयुष्यात आईचं नातं जितकं महत्त्वाचं तितकच वेगळ्या रीतीनं सासूचंही. सासूबरोबर आईपेक्षा जास्त आयुष्याचा कालावधी काढावा लागतो. मग सासूवरची ओवी जात्यावर न गायली तर नवल

सासू आत्याबाई  हात जोडीते तुम्हाला
दिवाळीचं मूळ   नका परतवू रामाला
सासू आत्याबाई  हात जोडीते बसुनी
दिवाळीचं मूळ   राम चालले रूसुनी
सासू आत्याबाई  सोनियाच्या तुमच्या निऱ्या
जलमाला जावो  आमच्या कुंकवाच्या चिऱ्या
सासू आत्याबाई  सोनियाचे तुमचे गोट
जलमाला जावो  आमचे कुंकवाचे बोट
अशा जन्माचे सौभाग्य सासूकडून मागितले जाते. अनेक नातेबंधाचे वस्त्र जपणारी स्त्री तिच्या सगळ्या भावभावना जात्यावरच्या ओवीत कित्येक वर्षे गुंफत आली आहे. कालचक्राबरोबर इतकी वर्षे जणू हे दगडाचे जातेही घरघर फिरत आले आहे; पण स्त्री नमतं घेते, सावरून घेते ते संसारासाठी पोराबाळांसाठी; पण याचा अर्थ ती दुबळी मुळीच नाही. वेळ प्रसंगाला तोंड देण्याची तिच्या ठिकाणी ताकद आहे. कोणी वेडंवाकडं बोललं, तर धमकावण्याची तिच्या ठिकाणी ताकद आहे.
थोराच्या आम्ही लेकी, आम्ही फार शिरजोर
सर्पाचे केले दोर, वाघ नेले पाण्यावर
बोलशील बोल, बोलू देते एक दोन
तिसऱ्या बोलाला, उतरीन भारीपण

 असं आगळंवेगळं धारिष्ट्यही तिच्या ठिकाणी आहे. प्रसंगी ती दुर्गा, कालीमाता बनू शकते याची जाणीवही या ओव्यातून मिळते; पण ही दुर्लभ प्रतिभा सरस्वतीनं या अशिक्षित स्त्रियांना बहाल केली आहे. दळण दळणं ही सुद्धा एक कला आहे. लहान-लहान घास घातले, तर जातं नीट ओढता येत नाही. ते जड जाते म्हणून त्याला एकसारखा घास घालावा लागतो

जात्याला वैरण गं  घालू नये लई थोडी
कष्टी होतो ईसवर  मूठ घ्यावी एक जोडी

 इथं ती धान्याच्या घासाला वैरण म्हणते, तर जात्याला ईश्वर म्हणते या दोन्ही शेतकऱ्याच्या घरातल्या सुंदर अशा कल्पना आहेत. हे दळण दळून झाल्याचंही एक वेगळं समाधान असतं.

सरीलं दळायानू  सूप सारीते पलीकडं
सासरी म्हायेरी  राज मागीते दहीकडं
सरीलं दळायानून  पदर मी घेते डोई
आऊक्षाची ओवी  तुला गाते बयाबाई
सरीलं दळायानू  निघळनं चंदनाचं
हळदीवर कुंकू  मार माज जडीव कोंदनाचं
सरीलं दळायानू  माज्या सोन्याच्या हातानं
लाडक्या बाळराजा  भाग्यवंताच्या जात्यानं

 दळण संपलेलं सूप बाजूला सारताना सासर-माहेर दोन्हीकडचं राज्य ही स्त्री मागते. याचा अर्थ दोन्ही घरी संपत्ती, सुबत्ता, समाधान राहावं अशी तिची इच्छा आहे आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे घामानं वल्लाकिच्च झालेला पदर डोक्यावरून घेताना ती आपल्या आईला आयुष्य मागते. बरंच दळण दळण्यानं ती घामाघूम झाली आहे. घामाचे ओघळ कपाळावरून निथळत आहेत. तो कपाळावरचा घाम टिपताना कुंकू अखंड टिकावं म्हणून त्यास जडीव कोंदणाची उपमा दिली आहे आणि सान्याच्या लक्ष्मीच्या हातान दळलेलं हे दळण चंदनासारखं बारीक निघालं आहे. असं ती म्हणते. हे सगळं वर्णनच एखाद्या तालेवार कवीच्या लेखनीला शोभेल इतकं शोभिवंत आहे. जात्यावर बसल, का आवा सुचत अस म्हटल जातं; पण जर काही वेळा जात्यावर बसल्यावर कोणी ओवी म्हणेना, तर ओवीतूनच समजही दिली जाते.

मुक्यान दळान  गिरजा नारीला हईना
माता चांगुनाच्या घरी  ऋषी भोजन करिना
मुक्यानं दळान  तूला कसं ग व्हतं नारी
भाऊभाचीयाच दल्लं  तुझ्या उतरलं दारी
जात्यावर बसावं  तवर जात्याशी बोलावं
सव्वाशेराचं लुगडं  आपल्या ध्याईव तोलावं

 बाईने दळावयाचे तर आनंदानं प्रसन्नपणे ओवी म्हणत दळायला पाहिजे, असं सांगताना चांगुणेचे सत्त्व ऋषीने पाहिले याची आठवण इथे दिली आहे.
 जोपर्यंत आपण जात्यावर बसतो, तोपर्यंत त्याच्याशी बोलले पाहिजे म्हणजे मग सव्वाशेर वजनाचे रेशमी लुगडे अंगावर यायला हरकत पडत नाही.
 शेवटी जातं हे बाईच्या जातीला अत्यंत जवळच आहे. मनातली सुख दुःख त्याच्याशी बोलता येतात. मनीचं गुज त्याला सांगता येतं. म्हणून त्या जात्याविषयी त्या बाईला अपरंपार आपुलकी आहे.

सरलं गं दळान  माजं पायली पायली
विसाव्याची जागा  बाई माजी ती माऊली

 जशी आई ही विसाव्याची जागा आहे. तिच्या कुशीत बाईला मन मोकळं करता येतं तसंच जातं हे सुद्धा तिच्या मनाच्या विसाव्याची जागा आहे.

 या जात्यावरच्या ओव्या ऐकल्या, की जाणवतं अशिक्षित स्त्रीचा हा मन-उमाळ्याचा हुंकार आहे. कधी हंदका सुद्धा आहे. या ओव्यात दिल्या गेलेल्या उपमा या त्याच्या नित्यनियमाच्या आयुष्यातील आहेत. इथे आईला ती गारव्याचं झाड व जात्याला विसाव्याची जागा म्हणते. दळलेल्या बारीक पिठाला चंदनाची उपमा देते. चिताकाचा फासाची उपमा नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला देते. हा एक प्रकारचा सुंदर प्रतिभाविष्कार आहे. उन्हाळ्याच्या उन्हात झाडाचं पान करपून जातं तसं सासुरवाशीणीचं मन बऱ्याच वेळा उदास झालेलं असतं. असं ती ओवीत म्हणते. त्यावेळी ती वेदना ऐकणाऱ्याच्या मनात त्या दु:खाची तीव्र जाणून करून देते. जात्यावरच्या ओवीत हृदयाला भिडण्याची ती शक्ती आहे.

ग्राम्य बोलीतील शब्दांचा वापर ओवीत प्रामुख्यानं येतो. ध्याई, भिरूड, शीनगार, सौंगड यासारखे अनेक शब्द त्या विशिष्ट प्रादेशिकतेची जाणीव करून देतात.

पाची परकारनं ताट वर कुल्लई बारीक
बहीनना घर करी जेवनना तारीफ
 यासारखी ओवी विदर्भातल्या अनेक शब्दांना घेऊन येते. 'कुल्लई' म्हणजे कुरवडी तो विदर्भाचा शब्द. अशी प्रादेशिकता ओवीतून जाणवते. प्रादेशिक शब्द, सण, परंपरा त्यातून डोकावत राहतात. प्रदेश कोणताही असला, तरी बाईचं दुःख हे सगळीकडे एकसारखं हे या सगळ्या ओव्यांतून जाणवत राहतं. या पूर्वापार परंपरा, जाणिवा जपणारी जात्यावरची ओवी हे मराठीतलं अस्सल स्त्री धन आहे. सरोजिनी बाबर, अरुणा ढेरे, शांताबाई शेळके वगैरे सारख्या लेखिकांनी हे धन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. यात सरोजिनी बाबर यांचा सिंहाचा वाटा आहे. विखरून राहिलेली ही रत्नं माणिकं त्यांनी एकत्रित केली. त्यामुळं मराठी भाषेचं एक दालन समृद्ध झालं. दिवस बदलत आहेत. आता 'जातं' हा प्रकार शहरात फारसा दिसत नाही. खेड्यात आहेत; पण त्याचं अस्तित्व आणखी किती काळ शाबीत राहील हा प्रश्नच आहे. जात्यावरची ओवी जात्याभोवती रुंजी घालत राहिली होती; पण आता ती मराठी वाङ्मयाचा एक भाग झाल्याने लिखित स्वरूपात का होईना टिकून राहिली; पण जात्याच्या साहाय्यानं ती खऱ्या अर्थी जिवंत होते हे विसरता येणार नाही. पहाटेचा प्रहर, लयीत घरघरणारं जातं आणि वातावरणात पसरणारे ओवीचे बोल हे जिवंतपण किती काळ टिकेल, याची मात्र शंका आहे.
लावणी

 बऱ्याच वर्षांपासून मराठी माणूस व लावणी यांचं जिवाभावाचं नातं आहे. लावणी ही मराठी माणसाच्या काळजाचा तुकडा आहे म्हटलं तरी फारसं वावगं होणार नाही. ढोलकीचा तोडा कानावर पडल्यावर मऱ्हाठी माणूस क्षणात उत्तेजित होऊन ताजातवाना होतो. त्याच्या मनपावलांना लावणाचा आढ लागून राहते. म्हणूनच वेगळ्या अर्थानं लावणी ही मराठी मनाची राणी समजली जाते.

 कितीतरी वर्षे लावणीनं मराठी मनावर राज्य केलं आहे आणि अजूनही करते आहे. अशा लावणीच कूळ शोधणं वा उगम शोधणं हा ऋषीचं कूळ शोधण्याचा प्रकार होईल; पण फार पूर्वीपासून लावणी लिहिली गेली आहे. मन्मथ शिवलिंग यांनी लावणी लिहिलेली आढळली आहे आणि मन्मथ शिवलिंग यांचा जन्म इ. स. १५६० चा व मृत्यू इ. स. १६१३ म्हणजे त्या काळापासून लावणी सापडते; पण हे जरी असलं तरी लावणीला भरभराट लाभली ती उत्तर पेशवाईच्या काळात त्या काळात खऱ्या अर्थानं लावणीला राजाश्रय मिळाला. लावणी महाराष्ट्राच्या सर्व भागांत निर्माण होत होती. जत्रा किंवा उत्सवाच्या काळात गावोगावी लावणीचे फड उभे राहात. लोक उत्साहानं लावणी ऐकण्यासाठी गर्दी करत. सातारा, कोल्हापूर, बालेघाट, संगमनेर, मराठवाडा, तुळजापूर, मुंबई वगैरे भागांत लावणीची निर्मिती झालेली आढळून येते.

 या लावणीच्या रचना पाहता लक्षात येतं, की लावणी रचना करणारे शाहीर हे तसे सर्वसामान्य जनसमुदायातील होते. त्याचमुळे लावणीची रचना सर्वसामान्य जनसमुदायाच्या मनोरंजनासाठी व उद्बोधनासाठी केली जात होती. बऱ्याच वेळा लावणी ही अश्लील वा बीभत्स असते असा समज दिसतो; पण तो सर्वार्थानं खरा नाही.

 आत्तापर्यंतच्या लावणीकडे पाहिलं, की लक्षात येतं लावणीमध्ये त्या त्या लावणीकारांच्या काळातील समाजजीवन, रीतिरिवाज, भाषा, लकबी या सर्वांचा समावेश आहे. त्यावेळची जीवनपद्धती त्या काळातल्या लावण्यातून सामोरी येते. त्या मागचा आशय हा मराठी मातीतून जन्माला आलेला आणि अस्सल आहे, हे मात्र नक्की.

 लावणी म्हटलं की सर्वसामान्यपणे तमाशात म्हणली जाणारी शृंगारिक, नृत्य, गान, नाट्ययुक्त लावणीरचना असाच अर्थ घेतला जातो. लावणीच्या उपलब्ध स्वरूपावरून तसा अर्थ घेतला असावा; पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तमाशाचे जे फड उभे राहतात. त्यांचे निरीक्षण केल्यास आणि लावणीच्या सादरीकरणाचे स्वरूप पाहिल्यास लावणी सर्वथैव शृंगारिक असते आणि नृत्य करून गाणारी स्त्री तिच्यात असते असे चित्र दिसत नाही, तसेच शृंगारिक विषयावरील रचनला जसे लावणी म्हटले जाते, तसेच पारमार्थिक, आध्यात्मिक विषयावरील रचनेलासुद्धा लावणा म्हणतात. शक्यतो वीररसात्मक, वीरगाथा, पराक्रमवर्णन हे विषय वगळता लावणीला अन्य विषय वज्ये नाहीत. शाहिरी रचनेत लावणी येत असली, तरी लावणीशिवाय शाहिरी रचनेत अनेक वेगळे प्रकार येतात. आत्तापर्यंत प्रसिद्ध असलेल्या लावण्यांच्या संग्रहात किंवा काही अप्रसिद्ध असलेल्या लावण्यांच्या हस्तलिखितांमध्ये भेदिक, शृंगारिक, प्रवासवर्णनपर, व्यक्तिवर्णनपर, क्षेत्रवर्णनपर, विधवेचे दुःख सांगणाऱ्या, कटकथात्मक, सणवर्णनपर अशा अनेक विषयांवरच्या लावण्या पाहायला मिळतात.

 लावणीमधील आशय हा मराठी माणसाच्या जगण्यातून आलेला अहे. लावणीत येणारे नाट्य गोंधळी, भराडी, वाघ्यामुरळी, भांड, वासुदेव यांच्या सादरीकरणाच्या पद्धतीवरून थोडेफार स्वीकारले आहे. पूर्वी बहुजनसमाजासमोर तमाशात सादर केली जाणारी ही लावणी लोकगीतातील तालठेक्यावर, डफ, एकतारी सारख्या वाद्यांच्या साहाय्याने गायिली जायची. नंतर हळूहळू ढोलकी, तुणतुणं, कडे ही वाद्ये लावणीच्या साथीसाठी स्वीकारली गेली. लोकगीतांमधील पद्मावर्तनी वा भृगावर्तनी ज्या रचना आहेत त्यांच्याशी मिळतीजुळती अशी लावणीची रचना आहे. त्यामुळे लावणी ही पूर्णपणे 'मऱ्हाटी' मनाची राणी आहे म्हटलेस वावगे ठरणार नाही.

 खरं तर क्षणभर मनोरंजन व्हावे मनाला विरंगुळा मिळावा, हीच प्रेरणा लावणीरचनेमागे असलेली दिसते. आपले व इतरांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने लावणी लिहिली जात होती. लावणीकारांनी रचलेल्या रचनांकडे पाहिले तर ते करमणुकीसाठी कधी सुभग रचना करत, तर कधी परंपरेने चालत आलेली पौराणिक कथा, वेताळपंचविशी कथा, सिंहासनबत्तीशीमधील कथा, कूटकथा व आध्यात्मिक लौकिक कटप्रश्न त्यात रंगवत. मात्र, लावणी रचना करताना ती रचना लोकांना आवडावी याची खबरदारी ते घेत. ती रचना गायिली जाताना ताल धरता येईल, याची काळजी रचनाकार घेत. काव्यातील आशयापेक्षा रचनेतील खटका, यमक, अनुप्रास यांच्यामुळं लावणी कशी रंजक व यशस्वी होईल, याची ते काळजी घेत.

 लावणी शब्दाचा अर्थ किंवा व्युत्पत्तीबाबत अनेकांनी वेगवेगळी मतं सांगितली आहेत. काहींच्या मते लापनिका या संस्कृत शब्दावरून लावणी हा शब्द आला आहे. काहींच्या मते 'लावण्य' या नामावरून लावणी असं म्हटलं जात असावं. काहींच्या मते हृदयाला चटका लावते ती लावणी. काही जण शोभिवंत वा सुभग रचना या अर्थानं लावणी शब्द योजला असावा असंही म्हणतात. काही लोक नृत्याच्या प्रकारावरून हा शब्द आला असावा कारण लावणी नाचणारी नर्तकी कंबर हलवी शंभर जागी लवून' म्हणून ती लवणी अशी लावणी असाही करतात.
अर्थाबद्दल कितीही भेद कळले, तरी लावणीचं मराठी माणसाच्या मनातील स्थान पूर्वापार अढळ टिकून आहे.

 लावणी म्हणजे फक्त नर्तकीने चाळ बांधून नाचणे नव्हे. लावणी ही खूप अंगाने विस्तारित अहे. सध्या जत्रेच्या निमित्तानं तमाशातून सामोरी येणारी किंवा मध्यंतरीच्या काही काळात मराठी चित्रपटांमधून सामोरी आलेली लावणी आपणा सर्वांना माहीत आहे; पण एकेकाळी मराठी शाहिरांनी डफावर थाप मारून ही लावणी गायिली आहे. या शाहीर लावणीकारांची एक समृद्ध परंपरा आहे. अनंत फंदी, परशुराम, रामजोशी, प्रभाकर, सगनभाऊ यांनी समृद्ध लावणी महाराष्ट्राला दिली आहे.

 लावणीचे बैठकीची लावणी, खडी लावणी, छकडी लावणी, फडाची लावणी असे वेगवेगळे प्रकार बोलीभाषेत वर्णिले जातात. विदर्भात वही नावाचाही एक प्रकार लावणीचा मानला जातो. उत्तर पेशवाईत प्रथम बैठकीची लावणी गायिली गेली. ही बैठकीची लावणी रागदारीवर आधारित होती. एका अर्थानं बैठकीत गायिली गेल्यामुळे लावणीची प्रतिष्ठा त्या काळात वाढली. तमाशाला आज दिसत असलेले रूप उत्तर पेशवाईत प्राप्त झालेले दिसते.

 असे जरी असले तरी उपलब्ध लावण्या पाहिल्या, की लावणी स्थूलमानाने तीन प्रकारांत विभागली जाते.

 आध्यात्मिक भेदिक लावणी, शृंगारिक लावणी, विविध विषयपर लावणी. आध्यात्मिक व भेदिक लावणी ही मानवी मनाला जी आध्यात्मिक ओढ असते त्यातून येते, तर भेदिक लावणी बौद्धिक आणि वैचारिक भूक भागविण्यासाठी रचली गेली आहे.
 आध्यात्मिक लावणी ही संताच्या स्फूट रचना, पंथीय वाङ्मय या परंपरेतून आलेली जाणवते. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यात आलेल्या दु:खातून माणूस आध्यात्माचा आधार घेत राहतो. विश्वाचा अर्थ, भक्ती, ज्ञान, वैराग्य, आत्मज्ञान यांचे स्वरूप अशा प्रकारच्या लावणीतून सामोरी येते.

 निखळ आध्यात्मिक लावण्यांचे प्रमाण कमी आहे; पण प्रामुख्याने जोतिराम, मद्धनाथ, महिपती यांनी अशा प्रकारच्या लावण्या रचल्या. उदाहरणच द्यायचे झाले, तर जोतिरामाने वर्णिलेल्या गीता माहात्म्यात तो म्हणतो.

भगवद्गीता हेची थोर । येणे चुके जन्म वेरझारा
वैकुंठवासी निरंतर। भवसागर उतरेल

 असे म्हणून ज्ञानेश्वर मुक्त झाल्याचे वर्णन करतो.

ज्ञानदेव कर्म अकर्ता । पावन जाला श्रीअनंता
सुखदुःखाचा हरी भोक्ता। सर्वकाळ आम्हा आला॥
ही रचना आध्यात्मिक ज्ञान सांगणारी व निवेदन स्वरूपाची आहे. हैबतीसुद्धा त्याच्या आध्यात्मिक लावणीत म्हणतो
मजला मनी धरती ते निश्चळ धरिती।
म्हणोनी ही शद्धमति स्मरणी वागावी।
लक्षस्वरूपी लावन धुरंधर वाचा त्यागावी।
मोक्षयिष्यामि मा शुच मोक्ष झाला।
तद्रुपता लादली पहा गेला निज ठाया।।

 लावणीकारांची या रचना संतांच्या शिकवण सांगणाऱ्या आहेत. त्या काळातील समाजावर धार्मिक विचारांचा पगडा होता. त्याची साक्ष या रचनातून दिसते.

 कुटात्मक आणि भेदिक लावण्यातही आध्यात्मिक विषय असतो. अशा लावण्यात उखाणेवजा कूटप्रश्न रूपकात्मक प्रश्न विचारले जातात. या कुटात्मक लावण्यांचे आध्यात्मिक कूट, पौराणिक कूट व लौकिक कूट असे तीन प्रकार पडतात.

 आध्यात्मिक कुटात विश्वाचे रूप, आत्मा, परमेश्वराचे अस्तित्व, द्वैत-अद्वैत या स्वरूपाबद्दल प्रश्नोत्तरे असतात.

 पौराणिक कूट प्रकारच्या लावण्यात रामायण, महाभारत व पौराणिक कथांच्या अनुषंगाने प्रश्नोत्तरे असतात.

 लौकिक कुटामध्ये पृथ्वीचे वजन, घरबांधणीचे प्रश्न पावसासंबंधी भविष्य असे लौकिक व्यवहारातील प्रश्न असतात.

 भेदिक लावण्यातही तीन प्रकार आढळतात. त्यात चढाच्या उताराच्या भेदिक लावण्या किंवा सवाल जवाब. यात दोन पक्ष असतात. एका पक्षाने प्रश्न विचारायचा तिला चढाची लावणी म्हणतात. दुसऱ्यानं उत्तर द्यायचे त्याला उताराची लावणी म्हणतात.

 याच्यातच कलगी तुरा हाही प्रकार असतो. एका पक्षाला कलगी पक्ष, तर दुसऱ्याला तुरा पक्ष म्हटलं जातं.

 भेदिक चवसर प्रकारामध्ये योगशास्त्रातील अनेक अवस्थांचे, चक्राचे व योगपद्धतीचे वर्णन असते. विरुद्ध पक्षाला या माहितीच्या आधारे प्रश्न विचारले जातात.

 भेदिक लावण्यात भेदिक वीर-कंगण-टोणपे हाही प्रकार येतो. यामध्ये शाब्दिक प्रश्नांची चढाओढ संपली, की शाहीर एकेरीवर येतात. बौद्धिक पातळीवर प्रश्नोत्तराचे काम भागेनासे झाले म्हणजे शारीरिक क्लेश देण्याचे ते प्रयत्न करतात.

 याचे एक उदाहरण म्हणजे तुळजापूर भागात 'टोणप्याची लावणी' नावाचा प्रकार आहे.

कोपरखिळे सांभाळ आता हो रे हुशार।
छाती धरुनी देतो टोले करितो बजार
मान मोडीन कंबर तोडीन नको करू वैर।

 अशा प्रकारचे वर्णन येते.  पूर्वी सवाल जवाब वा चढ उतारीच्या लावण्यावर प्रेक्षक खूष असे. त्यांची ती बौद्धिक करमणूक असायची. तमाशाच्या फडात रात्र रात्र सवाल-जवाब रंगायचे. जिंकलेल्या पक्षाला बक्षीसी दिली जायची. शिवाय विजयामुळे त्या शाहिराची प्रतिष्ठाही वाढायची.
 शाहीर हैबतीने अशी एक सुंदर रचना केली आहे.
 चढ लावणीत अथवा सवालात तो लिहितो

एक अचंबा असा दिसाचे चंद्र पाहिले चार।
चारी चंद्र सारखे सारखा नामाचा उच्चार।
चार चंद्र कोणते तयाचा करा मनी विचार।
निजी आहे सत्य नसे असत्य।
वाल्मिक मुनिचे कृत्य कथिले भविष्य स्वत:नं।

 या प्रश्नाला उत्तर देताना हैबती म्हणतो,

लंकापति रावण वधिला पहा श्रीरामानी।
ही रामायणी कथा असे कथिली वाल्मिकानी।
सीता सह निर्जर बंदीचे सोडवले त्यांनी।
बह्मा शिव आदि करून सुवेळा स्थानी।
दिव्य सीतेने घ्यावे ऐसे सर्वांचे वदनी॥१॥
चेतवून महा अग्नि टाकिली उडी कुंडामाजी।
निघे अग्नितून तेव्हा पडतो आप शब्दांची मांजी।
इंद्र चंद्र साक्षीस कोयी तेहतीस त्या समाजी
धन्य धन्य ते सीता माय म्हणती सर्व नामाजी
चार चंद्र त्या वेळी जमले असे ग्रंथ कथनी॥
रामचंद्र तो एक, सीता मुखचंद्र दुजा जाण।
शिव मस्तकी तिजा, अत्रीनंदन चवथा जाण।

 शाहिरांनी भोदिके रचली; पण संताच्या तोडीची प्रतिभासंपन्न रचना लावणीत कमी प्रमाणात आहे. संतांचे कूटही प्रभावी जाणवते. ज्ञानेश्वरांच्या रचनेवरून ते लक्षात येते.

निशिचिये भरी भानु प्रतिबिंबी बिंबला
बिंबची गिळून ठेवला बिंबामाजी॥१॥
रात्री सूर्य वाहे दिनू चंद्र जाये।
विपरीत गे माये देखियले॥२॥
उदय ना अस्तु तेथे कैसेनि त्रिगुण
आपणच दर्पण होऊन वेला॥३॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवी तोचि जाणे
संत ये खुणे संतोषले॥४॥

 एकंदरित भेदिक लावण्यांचं फार मोठ समृद्ध दालन पाहायला मिळतं. प्रश्नांचा शोध घेत मराठी माणूस या भेदिकामध्ये वर्षोनवर्षे रमत आला आहे.

 माणसाच्या आयुष्यात शृंगारालाही स्थान आहे. जीवनात वीररस जितका महत्त्वाचा तितकाच शृंगाररसही. त्यामुळे लावणीचा विचार करता शृंगारिक लावण्याचेही वेगळे दालन आहे.
 या शृंगारिक लावणीमध्ये कृष्ण-गोपींच्या शृंगारिक लावण्या आणि लौकिक शृंगारिक लावण्या असे प्रकार पाहायला मिळतात. कृष्णगोपीच्या संभोग शृंगाराच्या लावण्या लिहिण्यात होनाजी, रामजोशी, प्रभाकर हे आघाडीवर आहेत. या रचना बऱ्याचवेळा रूपकात्मक स्वरूपाच्या असतात. गोपींच्या कृष्णाबद्दलच्या तक्रारी यात वर्णिल्या आहेत. पण या तक्रारीमधूनही गोपींना कृष्णाबद्दल वाटणारे सुप्त आकर्षणच सामोरी येते; वाटेत गाठून अलिंगणारा कृष्ण त्यांना मोहवणारा आहे. त्यांचे चुंबन घेणारा आहे. रामजोशी लावणीत म्हणतो.

कारटा तुझा हा द्वाड यशोदेबाई।
का पडला अमुचे ठायी? ॥धृ॥
बैसुनियां यमुनेकाठी डोळे मोडी।
भलतीची घागर फोडी।
गरतीला गल्लीत गाठुनि खोडी काढी।
माजोरी ढंग ना सोडी।
रांडेच्याला काय शिकवल्या खोडी।
या वयात भलतीच गोडी।
कुंजामध्ये बैसुनि नाजुक मुलगी ओढी।
चुचकारून लुगडे फेडी।
गेली उलथून याची मस्ती

ही नित्य काय गे कुस्ती
सोसावी कुठवर तस्ती
कशी टिकल अशाने वस्ती।
कर याची बंदोबस्ती, ठायिंचा ठायी
कारटा तुजा हा द्वाड यशोदेबाई॥

 कृष्णगोपीच्या या शृंगाराचे चित्र रंगवताना या लावण्यामध्ये पुरुष म्हणजे कृष्ण आक्रमक असलेला दिसतो. कृष्णगोपींच्या विप्रलभ शंगारपर लावण्यात मात्र कृष्ण विरहामुळे गोपिकाच्या मनावस्थेचे चित्रण येते. विरह येतो.
 कृष्णासाठी वेडी झालेली राधा म्हणते.

या हरीसाठी मी जाहले पहा वेडी।
वाटे घनःश्याम माझ्या डोळ्यापुढे बाई।
प्रपंचात जीव नाही करू तरी काई।
लौकिकाची रीत सारी गेली त्याचे पाई।
गेला बाई सोडून पाह खेडी॥१॥

 कृष्णाचा विरह गोपिकांनाही सोसत नाही. त्याच्याबद्दल यशोदेजवळ तक्रार करणाऱ्या गोपी त्याच्या दर्शनाला आसुसतात. संताच्या विराण्यातही ही भावना दिसते. ज्ञानेश्वर लिहितात.

धनुवाजे घुणघुणा वारा वाजे रुणझुणा
भवतारकु हा कान्हा वेगी भेटवा की
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
कान्हा वनमाळी वेगी भेटवा की।

 यामध्ये सुद्धा विप्रलभ शृंगारभावनाच, डोकावते; पण ही जास्त लावण्यात्मक आहे.

 लौकिक शंगारिक लावण्या बऱ्याच शाहिरांनी लिहिल्या आहेत. शृंगारीक लावण्यांचा मोठा श्रोतृवर्ग त्याकाळी लाभला असावा. या लावणीतील स्त्री अधिक कामुक, आक्रमक व परुषी थाटाची आहे. पण ती स्त्री घरची गृहिणी नाही, तर वेश्याव्यवसाय करणारी किंवा व्यभिचारिणी आहे. कारण स्त्रियांच्या तोंडचे उद्गार पाहिले की त्याची खात्री होते. होनाजी बाळाची लावणी

तुझी माझी प्रीत येकदा कधी घडल घडल घडल।
भरनवती आगरास भोगायास न्या गरास।
पाणी विषय सागरास चढल चढल चढल।
कुचकंचुकीत तटतटीत। मंद अंतरी धडधडीत।

जसे नवनीत कडकडीत। कढल कढल कढल॥२॥
या गोष्टी अवघडा। जाल्यावर सावघडा।
नावाचा चौघडा। झडल झडल झडल॥३॥
होनाजी बाळा मंथन । करिता होय विरह पतन।
अहेरनी मधी उंच रतन। जडल जडल जडल॥४॥

 लौकिक शृंगाराची साथ देणारी आहे.

 अंधारातील लावण्यांच्या संग्रहात अशा बऱ्याच लावण्या सापडतात.

 'तुम्ही नित माझे घरी यावे, सुखशयनी सुख व्हावे', अशासारखी वा 'नको टाक ओळख तुझी माझी बहुत दिसाची।आण तुला माये मासाची' या लावण्या वास्तवापेक्षा पुरुषाने स्त्रीमनाची रंगवलेली दिवास्वप्ने आहेत. त्यावेळची सामाजिक परिस्थिती यातून थोडीफार ध्यानात येते. त्याकाळी प्रत्येकाची एक दोन अंगवस्त्रे असावीत. थोरामोठ्यांच्या नाटकशाळा असत. त्यामुळे त्या काळात ही लावणी जास्त लोकप्रिय होती.

 निपुत्रिकेची तक्रार, बिजवर पती, पतीची निर्भत्सना, पेहेलवान पती, परस्त्रीरत पुरुष, व्याभिचारिणीचा शृंगार असे अनेक विषय लौकिक शृंगारिक लावण्यात पाहायला मिळतात.
 लावण्याचे विषय पाहायला गेले, तर कितीतरी आढळतात. विविध विषयावर प्रसंगापरत्वे शाहिरांनी लावणी रचना केली आहे. तमाशाचा फडात लावणीकार सुरवातीला गण किंवा गणाची लावणी म्हणत. ते दैवताला नमन असे. त्याशिवाय कार्यक्रमाची सुरवात होत नसे.

 लावणीकार कोणत्याही पंथाचा असला, तरी गणेशवर्णनपर गण म्हटल्याशिवाय कार्यक्रम सुरू करत नसत. प्रत्येक शाहिराने अशा गण रचना केल्या आहेत. त्यात इतर देवतांचे उल्लेखही येत. होनाजीचा गण प्रसिद्ध आहे.

श्री वक्रतुंड गणपती, गणाधिपती, तुझी जे स्तुति
नर निशिदिनी करती, ते नर निरविघ्न प्रपंची जग विचरती
चौदा विद्येचा सिंधू प्रबळ हा अक्षय अचल दिनबंधु
अढळ हा स्वानंदनभीचा इंदू अढळ हा लागता लक्ष त्त्वारूपी
नाम साक्ष की, भाव साक्षपी, जड मूढ उद्धरती
शिवपुत्र चरित्र चोखटे, नित्य जो पढे, सकळ संकटे हरती

 या गणापासन सुरू झालेला तमाशा मग इतर लावण्याकडे वळतो. देवतांची स्तोत्रे गाताना शाहिरांनी स्वत: त्यांच्या वर्णनपरही लावण्यांची रचना केली आहे. देवतांच्या स्तुतींची वर्णने केली आहेत. परशुराम शाहिरांनी तर दहा अवतारांची लावणी सादर केली. दहावा कलंकी अवतार असे भविष्यही सांगते. संतमहात्म्यपर लावणीही आढळते.

पतीत पावन ब्रीद हरी तो नांदे पंढरीला
भक्तकाज कैवारी बहुतांच्या कामी आला
चहुयुगाचा भक्तीनामया पात्री जेऊनिया
विठ्ठलवाणी होऊन लोढी सुवर्णगोणीया
जनीसवे दळी कांडी लोटी आणि सेणी जाय धुया

 या जोतिरामाने लिहिलेल्या लावणीत नामदेव, जनी, दामाजी, गोरा कुंभार, रोहिदास, सेनान्हावी, ज्ञानदेव, मीराबाई, तुकाराम या संतांच्या कार्याची स्तुती केली आहे.

 पौराणिक कथा सांगणाऱ्या लावण्या खूपच आहेत. होनाजीने नळराजाची कथा लावणीत वर्णली आहे. कृष्णाने आपले हरण करावे, अशा आशयाचे पत्र रुक्मिणीने कृष्णाला लिहिले होते. त्याची लावणी प्रसिद्ध आहे. त्यात लावणीकार लिहितो

माझा बंधु रूक्मया खल परम चांडाळ।
त्याने शिशुपाल वर योजिला।।
भीमकाचे राहिले बळ जाला निर्बळ पुत्र मातला।

 याशिवाय सुलोचनेची लावणी, चंद्रावळीची कथा, द्रौपदीवस्त्र हरण कथा, दुर्वास भोजन, कालियामर्दन, सुदामा चरित्र, सुभद्रा हरण यासारख्या पौराणिक कथेवरील लावण्या प्रसिद्ध आहेत.

 लौकिक कथा सांगणाऱ्या लावण्यांमध्ये वेताळ पंचविशीवर आधारित लावणी, कमळजेची लावणी प्रसिद्ध आहेत. मध्यंतरी काही मराठी चित्रपटांत त्या चित्रपटातील खलनायकाची कथा सांगणाऱ्या लावण्या होत्या. एक गाव बारा भानगडी नावाची त्याच नावाच्या चित्रपटातील लावणी प्रसिद्ध आहे.

 काही प्रसिद्ध क्षेत्रांच्या वर्णन करणाऱ्या लावण्याही शाहिरांनी रचल्या आहेत. पंढरपूर, काशी, पैठण, आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या वर्णनपर लावण्या आहेत. प्रभाकराने पंढरपूर वर्णनाची लिहिलेली लावणी प्रासादिक तर आहेच; पण माहितीपूर्णही आहे.

मृत्यूलोकि वैकुंठ वसविले पवित्र पंढरपूर
मंदाकिनी प्रत्यक्ष भीमातट न्याहारी जगदांबुवर
वाळवंट विस्तीर्ण हवाशिर मुक्त सदा गोपुर
आठ प्रहर नाही उसंत नावा उभय तिरी भरपूर
जिकडे तिकडे विठ्ठल विठ्ठल गर्जती मूढ चातुर
स्नान दान दर्शने पातके अपाप पळती दूर

कळेल तिथे द्यापाल नाही कर मानेल ती ती मुभा चंद्रभागेच्या तीरा।
ध्वज पताका सोडून साधु नाचतात देवळी।
चरण रूळ करि चिपळ्या वदती गरवाने नामावली।

 दोन मनोऱ्यांची माहिती सांगणारी लावणीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिल्या अली आदिलशहाच वेळची इब्राहिम खानाने बांधलेली मशिद व बाजूचे १०६ फूट उंचीच्या मनोऱ्यांचे वर्णन तिच्यात आहे.

 पेशवाईच्या काळात गंगाघाटाची लावणी ही खूप प्रसिद्ध होती. संतांनी त्याच्या 'अभंगांमधून जसे उपदेश केले तसा उपदेश लावणीकरांनीही त्यांच्या रचनांमधून केला आहे. रामजोशी, प्रभाकर, होनाजी अशा लावणीकारांनी अशा रचना केल्या आहेत. रामजोशींनी त्यांच्या 'मला जन्म' या लावणीत म्हटले आहे.

हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिसी का शिरी।
मठाची उठाठेव का तरी।
वनात अथवा जनात हो का मनांत व्हावे परी।
हरीचे नाव भवंबधी तरी।
काय गळ्यात घालुनी तुळशीची लाकडे।
ही काय भवाला दूर करतील माकडे।

 लावणीकारांनी वैराग्यपर वा उपदेशपर लावण्यामधून लोकांनी भक्ती करावी; पण भक्ती करण्याआधी हितकर अशा गुरूला भेटावे, त्याशिवाय दुसरा धंदा करू नये. गुरूला भजतात तेच मुक्तीला जातात. जे गुरूला भजत नाहीत ते लाथा खातात, असं मत व्यक्त करतात.
 अनेक वेळा प्रासंगिक लावण्या लिहिल्या गेल्या आहेत. समाजात जे घडतं त्याचं प्रतिबिंब लावण्यामधील रचनेत जाणवत राहिलं अहे. अनंत फंदीनी त्या काळात पडलेल्या दुष्काळाचे चित्र त्यांच्या लावण्यांत रेखाटले आहे. दुष्काळात माणसातला माणूस उरला नाही. दुष्काळानं चोरी लुटेरीगिरी वाढली, हे सांगताना तो लिहितो.

जिकडे तिकडे टोळ माजले दुनियेचे केले वाटोळे
मुलखकूल उजाड हलकल्लोळ अंगावरचे चमड्याचे ओळ
कुठवर घालती हळदीबोळ जी सापडली तिलाच घोळ
घरे दारे जाळुनिया कोळ गरिबाभोवते माजलेत पोळ

 या प्रासंगिक लावण्यामधून तत्कालीन परिस्थितीचे चित्र समजते. सर्वच वर्णन खरं मानता येत नसलं, तरी काय घडले असेल, याची कल्पना येण्यासाठी ते पुरेसं आहे.
 व्यक्तिवर्णनपर लावण्याही त्या व्यक्तींचे वैशिष्ट सांगताना दिसतात. जवळच्या व्यक्तीचं तिच्या गुण वैशिष्ट्यांसकट वर्णन करणाऱ्या लावणी रचना त्या वेळच्या शाहिरांनी केल्या आहेत. काही वेळा त्या व्यक्तीचे उदात्तीकरण केलेलेही आढळते. कधी अतिशयोक्तीपूर्ण लिहिले गेलेय.
 रामजोशी बयाबाईचे चित्र रेखाटताना म्हणतो,

कविता इजसंगे रंगा आली नानाविध चाली
लीकाका वाणी काय परिक्षा झाली गाणार धाली।

 तर दुसऱ्या बाजीरावाविषयी लिहिताना तो म्हणतो,

दाता शूर गुणज्ञ, दयार्णव, सत्यशील त्यापरी
नृपोत्तम कैचा पृथ्वीवरी
सदैव धर्म समृद्धी प्रतियुगी जो खलजन संहारी
तोच हा जाणा हर की हरी
दाता भगवद्भक्त, शूर हा गुणत्रये शोभला
धुंडिता याला मिळेना तुला
मग त्या भारत पुरुष तिघे त्या माजि भीष्म योजिला
परंतु न याचे उपमे दिला

 या अशा लावणी रचनांमधून त्या विशिष्ट व्यक्तीविषयी माहिती उपलब्ध होते.

 काही शाहिरांनी वेगवेगळ्या भाषेत लावण्यांची रचना केली आहे. रामजोशींनी संस्कृत, मराठी, हिंदी, कानडी भाषेत लावणी रचना केली अहे. भिन्न भाषांमधील शब्द त्यातील उच्चार वैचित्र्य एकत्र आणूनसुद्धा तालदृष्ट्या लावणी बिघडली नाही.
 लावणी हा प्रकार प्रामुख्याने लोकरंजनासाठी असल्यामुळे त्यात विनोद येणंही स्वाभाविकच आहे. परशुरामाने दोन सवतीमधील भांडणं त्याच्या लावणीत रंगवली आहेत. 'दोन सवती भांडती पती भंगड भुंगा' यात त्यांचे काळे-गोरेपण वगैरेचा उल्लेख करून रंजकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी मुजऱ्याची लावणी लिहिली अहे. लावणीकारांनी परंपरा कळण्याच्या दृष्टीनं त्या उपयोगी पडतात. प्रादेशिकदृष्ट्या लावणी कुठे-कुठे निर्माण होत होती यांचे उल्लेख यात आढळतात.

 या सगळ्या लावण्याच्या प्रकारांकडे पाहिले, तर त्यामधील वैविध्य लक्षात येते.

 तरीसुद्धा लोकहो त्या काळी संतांना, पुराणिकांना, पंडित कवींना कीर्तनकारांना समाजात प्रतिष्ठा होती. तितकी प्रतिष्ठा नटाला वा लावणीकाराला कुणी दिली नाही. मनोरंजन इतकाच हेतू मानून लावणी थोडी खालच्या पायरीची मानली गेली.
 पेशव्यांच्या काळात लावणी बहरली असं जरी मानलं, तरी त्या वेळी सुद्धा हरदास कीर्तनकाराला दिलेलं मानधन लावणीकार शाहीर यांच्यापेक्षा चढे असायचे.
 कदाचित यामुळेच साधारणपणे लावणीकारांचे लावणीरचना हे उपजीविकेचे साधन नव्हते. परशराम शिंपी होता, सगनभाऊ शिकलगार होता. प्रभाकर रास्त्यांकडे नोकरी करत होता. होनाजी पेशव्यांकडे होता; पण पिढीजात गवळी होता.

 रामजोशी व अनंत फंदी ब्राह्मण कुळातील होते. त्यांनी काही काळ लावणीवर चरितार्थ केला; पण शेवटच्या आयुष्यात ते कीर्तनकार बनले.

 कालानुसार तमाशातील लावणीचे रूप बदलत गेले. गण, गौळण, संगीत बारी, पदे, रंगबाजीचा फार्स असं सादरीकरण होत गेलं. तमाशात वगनाट्य आले. वेगळा बाज तमाशाला निर्माण झाला.

 तसं एका अर्थानं पाहायला गेलं तर लोकगीत आणि लावणीत खूपशा गोष्टी मेळ घेणाऱ्या आहेत; पण तरीसुद्धा लोकगीतापेक्षा लावणीत आशयभिन्नता आहे. लावणीला तिचा असा खास बाज आहे. लोकांच्या तन-मनाला बांधून ठेवण्याची असामान्य ताकद तिच्यात आहे. कालांतराने लावणीची भाषा उच्चवर्गीयांची होत गेली. लावणीनं संगीताच्या दृष्टीनं विकसित रागदारीत प्रवेश केला.

 एकेकाळी ‘पंचकल्याणी लावणी' 'गंगाघाटची लावणी' या लावण्या प्रसिद्ध होत्या. 'पिकल्या पानाचा देठ' ही लावणी काही जुन्या लावणी गायिका अजूनही गातात.

 मन्मथ शिवलिंगापासून, जोतिराम, मध्वनाथ, गंगाधर, साताप्पा, बाळाबहिरू, परशराम, अनंत फंदी, रामजोशी, होनाजी, प्रभाकर, सगनभाऊ, महिपती, राजा सरफोजी, शाहीर हैबती यासारख्या लावणीकारांची लावणी काळाच्या ओघात अजूनही जिवंत आहे.
 पिंजरा चित्रपटातील एका लावणीत जगदीश खेबुडकरांनी मोठी सुंदर शब्दरचना केली आहे.

निंदा करी तुणतुण्याची तिला 'बिन' म्हणू नये
नाही ऐकली लावणी त्याला 'कान' म्हणू नये

 मराठी माणस आणि लावणी माहिती नाही असं कधीच होणार नाही. लावणी कितीही ऐकली, पाहिली, तरीही मराठी मनाची तृप्ती होणार नाही. इतकी या प्रांतात वैविध्यता आहे.

 मध्यंतरी 'बैठकीची लावणी' या विषयावर एक कार्यक्रम सादर केला गेला. फैय्याज, कीर्ती शिलेदार, श्रुती सडोलीकर वगैरे नामवंत गायिकांनी वेगवेगळी लावणी गायिली. लावणी टिकण्याच्या दृष्टीनं अशा कार्यक्रमांची गरज आहेच. हल्ली लावणीला पुन्हा बहर आलाय. लावणीला प्रतिष्ठा निर्माण होऊ लागलीय. खास स्त्रियांसाठी लावणीचे कार्यक्रम होऊ लागलेत. रंगमंचावर जाणत्यांसमोर लावणी नव्या उत्साहात पेश होऊ लागलीय. इतकंच काय पण परदेशातही जाऊन पोचली आहे. मधू कांबीकर, माया जाधव, सुरेखा पुणेकर वगैरेसारख्या नृत्यनिपुण कार्यक्रमातून लावणी वेगळ्या दमात पेश होऊ लागलीय. सरकारचाही आश्रय तिला मिळालाय. यमुनाबाई वाईकरांच्या सारख्या बुजुर्गांनी परंपरागत जुनी लावणी जपून ठेवली. पुढच्या पिढीपर्यंत पोचवली. पंढरपूरच्या उत्पात घराण्यांचाही लावणी जपण्यात मोलाचा वाटा अहे. लावणीरूपी दैवाघरचं देणं काळाच्या ओघात पदराआड दिवा जपावा आणि तो सतत तेवता ठेवावा, अशा रीतीनं या लोकांनी जपलं. तो खजिना लोप पावू दिला नाही, हे त्यांचे या पिढीवर मोठे ऋण आहे.

 हे लावणीचं लावण्य जपणं ही रंजनाबरोबर जबाबदारी आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे.

यल्लमाचा जग, जोगती व जोगतीणी

 रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही मुलं वाड्याच्या चौकात खेळत होतो. तेवढ्यात दरवाजातून डोक्यावर पाटीत देवीचा मुखवटा घेऊन एक बाई आत आली. तिच्या पाठीमागून लुगडं नेसलेला, कपाळाला भंडारा त्यावर रुपायाएवढं कुंकू, अंगात चोळी घातलेला एक माणूस आत आला, त्याच्या हातात चौंडकं होतं. त्याच्या गालावरच्या थोड्याशा दाढीमुळ व हातावरच्या केसामुळं तो पुरुष आहे हे लक्षात येत होतं; पण त्याचं चालणं वागणं थोडंफार बाईसारखंच होतं. ती दोघं आत आल्यावर आम्ही त्यांच्या भोवतीनं जमा झालो. त्या बाईनं डोक्यावरची पाटी खाली ठेवली. तेवढ्यात आजी बाहेर सोप्यात आली म्हणाली 'जोगतीण आली वाटतं' हे त्या वयात मला घडलेलं जोगती आणि जोगतीणीचं पहिलं दर्शन.

 बाईच्या लुगड्यातल्या त्या पुरुषाला जोगती म्हणतात, हेही कोणी तरी सांगितलं. त्याचा जाडा भरडा आवाज त्यावेळी कसातरी वाटला. वाड्यातल्या बायकांनी बाहेर येऊन रेणुका देवीचा मुखवटा, जो त्या मोठ्या पाटीत होता, त्याला हळदीकुंकू वाहिलं. त्या मुखवटा ठेवलेल्या पाटीला 'जग' म्हणतात हेही कळलं. कपाळावर भंडारा, कुंकू लावलेल्या जोगतीणीनं गाणं म्हणायला सुरवात केली. देवीच्या महात्म्याचीच काही गाणी तिनं म्हटली. सोबतीच्या जोगत्यानं चौंडकं वाजवून त्या गाण्याला साथ दिली. मधून-मधून तोही गाण्याला साथ द्यायचा. नंतर धान्याची भिक्षा घेऊन ती दोघं निघून गेली; पण त्यावेळपासून जोगती आणि जोगतीण या विषयीची उत्सुकता मनात निर्माण झाली होती.

 जोगती आणि जोगतीणी हे यल्लमाचे म्हणजेच रेणुका देवीचे उपासक असतात. रेणुका म्हणजेच यल्लमा देवी. रेणुकेच्या जन्माविषयी वेगळी मतांतरे आहेत. महाभारतानुसार रेणुका कमळातून जन्मली आणि सोमेय तिचा पिता (महाभारत अनुशासन पर्व अध्याय ५३) आणि 'प्रसेनजित' हा तिचा पिता हे दुसरे मत. हाही उल्लेख महाभारताच्याच (वनपर्व ११६) मध्ये येतो. 'एकविरा महात्म्य'नसार रण' नावाच्या राजाने पुत्रकामेष्ट यज्ञ केला; पण त्याला 'कमळी' नावाची मुलगी जन्माला आली पढे तिचे जमदग्नीशी लग्न झाल्याचा उल्लेख येतो, तर स्कंदपुराणामध्ये रेणु नावाच्या राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला व नंतर त्याला 'आदिती' नावाची मुलगी झाली तीच पुढे रेणुका बनली.

 असे वेगवेगळे उल्लेख येतात; पण यात जरी वेगळी मते असली, तरी रेणुका जमदग्नीशी विवाहबद्ध झाली यात मात्र कुठेही प्रवाद नाही.

 रेणुका लग्नानंतर रोज जमदग्नीसाठी पाणी आणायला जात असे. एकदा ती पाणी आणण्यासाठी गेली असता; तिथे चित्ररथ गंधर्व आपल्या स्त्रियासमवेत क्रीडा करताना तिने पाहिले आणि तिच्या मनात कामवासना निर्माण झाली. त्यामुळे तिच्या डोक्यावरील घडा भंग झाला. तिच्या मनातले दिव्यदृष्टीने जमदग्नीला कळले व ते क्रोधीत झाले. त्यांनी आपल्या पाचही पुत्रांना बोलावले. रेणुकेकडून जो अपराध घडला आहे, त्याबद्दल तिचा वध करण्यास त्यांना सांगितले. पहिल्या चार पुत्रांनी आईचा वध करण्यास नकार दिला. पाचव्या परशुरामाने मात्र पित्याची आज्ञा मानली. रेणुकेचा शिरच्छेद केला. परशुरामाने आज्ञा पालन केली म्हणून मग पुन्हा जमदग्नींनी त्याला वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करा' असा वर मागितला. मुलावर प्रसन्न होऊन जमदग्नीने दुसऱ्या स्त्रीचे मस्तक रेणुकेच्या धडावर ठेवायला सांगितले. परशुरामाने येणाऱ्या एका मातंगीचा शिरच्छेद केला व ते शिर रेणुकेच्या धडाला लावले. रेणुका पुन्हा जिवंत झाली; पण तिला मातंगीचे शिर मिळाले म्हणून तिने अग्निसेवन करून देह शुद्ध केला.

 काही ठिकाणी परशुराम रेणुकेला वधासाठी नेत असताना रेणुकेला अस्पृश्य (मातंग जातीतील) स्त्री दिसली. रेणुकेने (इथे रेणुकेस उल्लेख मरिअम्मा असा येतो) आपली दया यावी म्हणून तिला मिठी मारली. तेव्हा परशुरामाने दोघींचेही शीर उडवले. पुढे जमदग्नीने जेव्हा मंतरलेले पाणी व एक छडी देऊन मातेला जिवंत करण्यास परशुरामाला सांगितले, तेव्हा मातेला जिवंत करण्याच्या घाईत परशुरामाने अस्पृश्य स्त्रीचे डोके आईला लावले व आईचे डोके अस्पृश्य स्त्रीच्या धडाला लावले. मंतरलेले पाणी शिंपडून दोघींना जिवंत केले. अस्पृश्य स्त्रीचे धड व रेणुकेचे डोके असलेल्या स्त्रीला मग, मरिअम्मा म्हणून पुजले गेले, तर रेणुकेचे धड व अस्पृश्य स्त्री डोके असलेल्या स्त्रीला यल्लमा म्हणून पुजले गेले असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो.

 काही ठिकाणी जेव्हा रेणुका (मातंगीचे शीर लाभलेली) पुन्हा जिवंत झाली, तेव्हा जमदग्नी तिला म्हणाले, 'तुला जरी जीवदान मिळाले असले, तरी इतःपर मी तुझे तोंड पाहणार नाही. तुला वाट दिसेल तिकडे तू चालती हो.'

 यावर रेणुकेने पतीचे पाय धरले व विनवले 'कृपा करून मला उ:शाप द्या' यावर जमदग्नी म्हणाले, 'ठीक आहेत जिथे जाशील, तेथे मोठ्या प्रमाणात तुला भक्त लाभतील.' याच कथेत जेव्हा परशुराम रेणकेचे शीर उडवतो. ते शीर आकाशमार्गे कैलासास जाऊन शंकराच्या गळ्यातील नरमुंड्यांमध्ये ओविले गेल्याचा उल्लेख आहे.

 त्यामुळे ज्या मांगाच्या (मातंगी) बाईचे शीर रेणुकेला लावले गेले तिचे फक्त धडच उरले आहे. ते धड जमदग्नीना विचारते 'माझी वाट काय?' त्यावर जमदग्नी म्हणतात रेणुकेबरोबर तुझीही पूजा लोक भक्तिभावाने करतील.' या बोलण्यानंतर जमदग्नी नंदिकाश्रमाला तपश्चर्येसाठी निघून गेले.
 परशुरामास व मातंगीला बरोबर घेऊन रेणुका हिमालय सोडून दक्षिणेला येऊ लागली. महाराष्ट्रातील हा तिच्या भक्तांनी तिला ओळखले व 'तू का इकडे आलीस असे विचारले तेव्हापासून रेणुकेला तेथील लोक 'तुकाई' म्हणू लागले व तिची यात्रा भरवू लागले'.

 महाराष्ट्रातून देवी रेणुका कर्नाटकात आली. धारवाड जिल्ह्यात सौंदत्ती गावाजवळ तिच्या कानडी भक्तांनी यल्ल अम्मा' असं कानडीत विचारलं. इथं 'यल्ल' म्हणजे कोणीकडे व 'अम्मा' म्हणजे आई यावरून मग तिला ‘यल्लम्मा' म्हणून ओळखले जाऊ लागले.

 काही जण रेणुका, एकवीरा व यल्लम्मा ही एकाच देवीची नावे मानतात. रेणुका सहस्त्रनामात याचा उल्लेख सापडतो. एकवीरा देवीच्या माहिती अनुरोधाने

एकवीरेति विख्याता सर्वकाम प्रदायिनी
अदितिर्यामदंबा सा संभविष्यति भूतले
जनिस्यमि न संदेहः पंचपुत्रान्मनोरथान',

(सह्याद्रि खंड ले. जे. नी. डिकुन्हा)

 हा श्लोक येतो. यानुसार
 आदितीने तप केल्यानंतर शंकराने तिला वर दिला. त्यानुसार तुझा अवतार भूतलावर इश्वाकू वंशातील रेणुराजाचे घरी होईल. त्यावेळी तुझे मूळ नाव रेणुका असे असेल; परंतु भूतलावर मात्र तू 'एकवीरा' या नावाने विख्यात होशील, तसेच तुला पाच पुत्र होतील.

 रेणुकेलाही पुढे जमदग्नीपासून पाच पुत्र झाल्याचा उल्लेख आहे.

 हे सगळं ध्यानात घेतलं तरी सौंदत्तीचे यल्लम्माचे देवस्थान खूप प्रसिद्ध पावलेले असे आहे. जमदग्नींच्या म्हणण्याप्रमाणे देवीला इथं खूप भक्तगण लाभले. सौंदत्ती कोल्हापूरपासून दक्षिणेस साधारण ११० मैलावर आहे. सौंदत्ती या प्राचीन राजधानीच्या शहराच्या आग्नेय दिशेला पाचसहा मैलावर या टेकड्या आहेत. या टेकड्यांच्या माथ्यावरून सरस्वती नदी उगम पावते. पुढे ही नदी मलप्रभेला मिळते. हिलाच ‘मनोळी' म्हणतात.

 यल्लमाचे मंदिर नक्की कोणी स्थापन केले हे समजत नाही; पण कोणी भूमाप्पा नायकाने मंडपाचा वरील भाग बांधलेचा उल्लेख तिथल्या शिलालेखात आहे. हा शिलालेख 'शके १४३६ भावनाम संवत्सरे' अशी वर्षाची नोंद असलेला आहे. यल्लमा देवीचा जो उपासक वर्ग आहे. त्याला 'जोगती' आणि 'जोगतीण' असे म्हणतात.

 हे जोगती आणि जोगतीण म्हणजे खरं तर लोकांनी देवीला नवस बोलून ते पूर्ण झाल्यावर, नवस पूर्ण करण्यासाठी देवीला सोडलेली मुलं व मुली असतात. देवीला वाहिलेला मुलगा जोगती' बनतो, तर देवीला सोडलेली मुलगी ‘जोगतीण' बनते.

 जोगता हा यल्लमाचा उपासक त्याला 'जोग्या' असंही म्हणतात. जोग्याचे देवीशी लग्न लावतात व त्या लग्नानंतर तो देवीच्याच वेशात म्हणजे चोळी-लुगडं नेसतो. हातात चौंडकं गेऊन तो जोगतीणींच्या बरोबर फिरत असतो. तो स्त्री वेश धारण करून हातात बांगड्या भरतो. केस लांब वाढवतो. बाईसारखा वागतो बोलतो. देवदासीच्या विवाहात या जोगत्यांना काही विधीत महत्त्व असते.

 ज्या मुली देवीला नवसाची पूर्ती म्हणून सोडल्या जातात त्यांना जोगतीणी म्हणतात. त्यांना देवदासी म्हणतात. या देवदासीनी किंवा जोगतीणींना देवीशी विवाह झाल्यावर समाजात प्रतिष्ठा असते. यांच्याजवळ देवीचा 'जग' असतो.

 हा 'जग' म्हणजे मोठी परडी असते, त्यातला मधोमधी देवीचा मोठा पितळी मुखवटा असतो. त्याला हळद कुंकू लावलेले असते. त्याच्या गळ्यात कवड्यांची माळ घातलेली असते. मोरपिसे व आरसेही भोवती लावलेले असतात.

 डोक्यावर हा जग घेऊन जोगत्याच्या बरोबर जोगतीणी फिरत असतात.

 यल्लमाच्या जोगतीणीचे तीन प्रकार मानले जातात. एक बाळ जोगतीण, दुसरी गरती जोगतीण व तिसरी विधवा जोगतीण. बाळ जोगतीण म्हणजे जिला बालवयातच देवीसाठी सोडलेली असते. हिला पवित्र मानतात. यल्लमाच्या नवसपूर्तीत वा लिंब नेसणे वगैरे सारख्या विधीमध्ये हिला मान दिला जातो. गरती जोगतीण म्हणजे ज्या स्त्रिला लग्नानंतर देवाला सोडले जाते. यात्रेचे बंधन तिला असते. पाच घरी जोगवा मागून त्यावर ती प्रतिष्ठेने राहते.

 विधवा जोगतीण म्हणजे नवरा वारल्यानंतर जी स्त्री जोगतीण बनते. तिला जोगवा मागता येतो.
 या जोगतीणीजवळ असणाऱ्या देवीच्या पवित्र वस्तू ती प्राणपणाने सांभाळत असते. त्यात जग, परडी, चौरी किंवा चामर, चौंडकं, टाळ, तुणतुणं वा सुती, भंडाऱ्याची पिशवी, कवड्यांची माळ, दर्शन यांचा समावेश असतो.

 जग म्हणजे देवीचा मुखवटा हा घेऊन जोगवा मागितला जातो. लोक त्याची पूजा करतात. लिंब नेसण्यावेळी हा जग घेऊन जोगतीणी त्या-त्या घरी जात असतात.

 ज्या मोठ्या टोपलीत हा जग ठेवलेला असतो त्याला परडी म्हणतात. या परडीत एक छोटी परडी ही असते. जोगतीणीच्या लग्नसमारंभात या परड्यांचे पूजन केले जाते.

 चौरी किंवा चामर हे यल्लमाच्या बाबतीत तिबेटी बैलाच्या शेपटाचे बनवतात असा उल्लेख येतो. देवीवर ढाळण्यासाठी चौरीचा उपयोग होतो. घरच्या देव्हाऱ्यात ते अडकवून ठेवतात. चौरी घराबाहेर नेत नाहीत.

 चौंडकं हे एक वाद्य आहे. त्याचा 'टाँग टुंग टंगा डग' असा आवाज येतो. ही पवित्र वस्तूच मानली जाते.
 भेटासूर आख्यानामध्ये  'भेटासूर आला चालून, यल्लुआई म्हनली परसुरामा, उडवू डोस्कं परसुरामानं डोस्कं उडावलं, कवटीच्या वरच्या कपचीचं टाळं केलं, उरल्या कपचीचं चौंडकं केलं. त्याला आतड्याची तार बसविली.'

 असं वर्णन चौंडक्याबद्दल येतं.
 तुणतुणं हे तंतुवाद्यच असतं. लाकडी भांड्याला एका बाजूला कातडी बसवलेली असते. लाकडी भांड्याला तिरकस दांडी असते. कातड्यामधून तार ओवून वर दांड्याला जोडली असते. ज्या खुंटीला वर तार जोडली असते ती खुंटी पिळून तारेला हवा तसा ताण देता येतो

 जोगवा मागायला जाताना चौंडकं, तुणतुणं, टाळ या वाद्यांच्या साहाय्याने यल्लमाची गाणी म्हणून जोगवा मागितला जातो.

 यल्लमाची गाणी म्हटल्यावर भंडाऱ्याच्या पिशवीतून भंडारा काढून जोगता किंवा जोगतीण तो इतरांच्या कपाळावर लावतात.

येलू तुझी महिमा मोठी
चला घेऊ भंडार वाटी

 अशी ओळ गाण्यात आढळते. कोणी आजारी पडलं वा नवस बोललं, की भंडारा उधळला जातो. मग त्या नवसातून मुलं मुली देवीला सोडू बोललं जातं. यातून देवदासी प्रथा निर्माण झाली. ज्या वेळी जेंव्हा सोडलेल्या मुलीचं देवीशी लग्न लावतात, त्या वेळी लाल-पांढऱ्या मण्याची माळ तिच्या गळ्यात घालतात तिला दर्शन म्हणतात. यात लाल मणी वासनेच्या उद्वेगाचे, तर पांढरे मणी निर्मलत्वाचे प्रतीक मानले जातात. मरतेवेळी जोगतीण हे दर्शन दुसऱ्या मुलीच्या गळ्यात घालते म्हणजे थोडक्यात पुन्हा एक जोगतीण निर्माण करते. त्याशिवाय तिला मोक्ष मिळत नाही, अशी कल्पना आहे. त्यामुळे देवदासी प्रथा चालू राहील, अशी सोय झाली आहे.

 या देवदासी झालेल्या जोगतीणींच्या गळ्यात कवड्याची माळ असते. जग व परडीही अशा माळांनी सजवली जाते. कवडी हे योनीचे, जीवन सातत्याचे प्रतीक मानले जाते. रा. चिं. ढेरे यांनी लज्जागौरीत जोगतीणी विषयी एक गाणं दिलं आहे.

यल्लु मंगळवारा दिशी। यल्लु शुक्रवारा दिशी।
आली डोंगर उतरूनीया
भंडार इभुतीचा मळवट भरती
वर कुंकवाचा टिळा लेती
माळ, परडी शिक्का घेती
यल्लु जोगवा मागती

 या जोगतीणी नृत्य केल्यासारख्या हालचाली करत गाणी म्हणतात. लोकं जोगवा म्हणून धान्य, पैसे देत असतात. लिंब नेसण्यासारख्या विधीवेळी जोगतीणीला बोलवतात. या मिळणाऱ्या द्रव्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. हे जोगती किंवा जोगतीणी जी वेगवेगळी गाणी म्हणतात त्यातून देवीचे माहात्म्य किंवा देवीने कोणाला कसे बरे केले वगैरे कहाण्या विशद होतात. या गीताच्या मधनच ही गाणी ज्यांनी तयार केली त्यांची नावे आढळतात. सरोजिनी बाबर यांनी संकलित केलेल्या एक होता राजा' मध्ये काही गाणी दिली आहेत.

यल्लुबाई ग माझी आई गं महिमा तुझी थ्वार।
चहु देशाला तुझा कडाका परडी घरोघर॥१॥
सत्ती सौंदत्ती गड देवा अवघड डोंगर
तिथं देवि उमटली पाण्याचा झरा हाई समोर ॥२॥
पाण्यामध्ये उभी रेणूका नेसुन पितांबर।।
परशराम बाजुला मातंगी होई हो समोर॥३॥
पुजाऱ्यांनी पूजा बांधली
झेंडू फुलाच्या माळा गळ्यामधि फुलांचा गजवार॥४॥
माहेरघराला पालखी निघाली आनंद अवतार
बहु दूरचे लोक येती करती नमस्कार॥५॥

 अशा पद्धतीची गाणी म्हणत देवी माहात्म्य वर्णन करत ‘कडाका' म्हणजे चौंडकं वाजवत घरोघरी परडी जग फिरवला जातो. देवी रोगराई बरं करते, संकटातून मुक्तता करते. ज्यांना कसं मुक्त केलं त्याचं वर्णनही येतं. एकाला महारोग झाला, अंगावर कोड फुटलं, नाकातोंडाच्या भिंती बसल्या, माणसातून महारोग झाल्यानं उठला, घरच्या बायका पोरांनी त्याला टाकला. मित्र, पैपाहुणे, बहीण सगळ्याकडे तो गेला; पण कोणी त्याला विचारले नाही अणि मग तो देवीच्या डोंगराला गेला .

डोंगराचा रस्ता धरला। पू बंद झाला
त्यानं जाऊन अंघोळ केली। खलु तीर्थाला॥
सव्वा रूपयची भोगि वाहिली यल्लुबाईला
माळपरडी घेऊन बसला। उजव्या बाजूला॥

 असं देवी माहात्म्य कोणी मानू परसू नावाच्या भक्तानं गाण्यातून गायिलं आहे.
 जोगवा मागण्याच्या माहात्म्याचं ही एक गाणं आढळतं

जोगवा मागेल देवीचा जोगवा मागेल

दैत्य सारून माळ मी घालीन
हाती बोधाचा झेंडा मी घेईन
भेदरहित वारीला जाईन
जोगवा अनाथ निरगुण प्रकटली भवानी
मोह महिषासूर मर्दाना लागूनी
जोगवा नवविध भक्तिच्या भक्तिच्या नवरात्रा
तरुण पोटी मागेल ज्ञानपुत्रा
धरून सद्भाव अंतरीच्या मित्रा
दंभ सासरा सारीन कुपात्रा
जोहाती बोधाची भरीन परडी
आशा निष्ठाच्या पाडील दरडी
मन विकार करीन कुरवंडी
अद्भूत रसाची भरीन दुरडी
काम क्रोध झोडियेले मग केला मोकळा मार्ग सुरंग
देविचा जोगवा मागून ठेविला

.

 देवीला विशिष्ट नवस बोलले जात. ते पूर्ण झाले की मग माया भगिनी हे जोगवा मागण्याचं व्रत करत. अजूनही खेड्यात काही बायका मंगळवारी, शुक्रवारी पाच घरं जोगवा मागतात. ते एक प्रकारच व्रत मानतात. यल्लम्मा देवी ही उग्र मानली आहे. कडक देवस्थान म्हणून तिची ख्याती अहे.
ती जर कोपली तर काय होतं सांगताना

आदिमाया शक्ति जगदंबा कारी
सुंडी मुंडी रुंडी भुटकी महामारी
पिलीक पटकी यापैकी देवी हाई विष्णु अवतारी
आदिमाया शक्ति रेणुका जगदंबाकारी

 असं वर्णन एका गीतात येतं. तिनं कोप धारण केला, तर साथीचे रोग निर्माण होतात. महामारी येते, पटकी येते, अशी लोकांची समजूत गीतातून जाणवते.

 यल्लम्मा देवी काही वेळा भक्तांची परीक्षा घेत असते. त्यात तो सफल झाला, तर त्याचं कल्याण करते. त्याच्याकडून चूक झाली तर कोपिष्ट होते; पण परत तिचा धावा केला तर मदतीलाही जाते. ही यल्लुमाता परशुरामाबरोबर एका माळ्याची परीक्षा घ्यायला जाते, याची कथा एका गीतात येते. ती एका माळ्याच्या घरी जाते. त्याच्या मळ्यात जाऊन त्याच्याकडे कांद्याची चिंगळी मागते. माळी तिला ओळखत नाही. तो चिंगळी देण्यास नकार देतो. तरी यल्लुमाता त्याच्या मळ्यात घुसू पाहाते. माळी नोकरांना तिला बाहेर काढायला सांगतो. यल्लुमाता ते पाहून कोपिष्ट होते. प्रचंड रूप धारण करते आणि कवडीतला अंगारा काढून माळ्याच्या अंगावर टाकून त्याला शाप देते.

'कवडीच्या माळेतला भंडारा काडला। त्याचे अंगावरनं झोकला।
आगीन जोडली त्याच्या अंगाला। राळ्याच्या कणीसारखं फोड उठलं त्याच्या अंगाला।
बचकत माईनासारखं फोड तेंच्या आंगाला। आणि रगात पू लागलं धरनीला गळायला।
वाटेची माणसं लागली नाक धरायला।'

 अशी माळ्याची परिस्थिती यल्लुमातेच्या शापानं झाली. देवी गुप्त झाली. माळीण सात्विक होती. ती माळ्याची सेवा करू लागली व देवीचा धावाही करू लागली. त्या धाव्याने यल्लुमाता शांत झाली जणू पुन्हा माळीणीवर प्रसन्न झाली. माळ्याच्या घरी आली

माळ्याच्या गुंफेत उदेकार जागला
कानी श्रवण केला
माळी लोळत घोळत आला चरण धरायला
'माझी यलारी! करतो तुझी भक्ती
आलो शरण, धरतो चरणागती'

 असं म्हणून देवीची करुणा भाकू लागला. यल्लुमाता भक्ताच्या भक्तीला जागली भावभोळी झाली. मनातला राग नाहीसा झाला. तिनं बेलभांडार शिववला. माळ्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याच्या अंगाला तोंड लावलं त्याचं दूषित रक्त जणू शोषून घेतलं.

तोंड लावलं तेच्या अंगाला
रगत ओढून घेतली मागं सरली
डर्र! करून ढेकर दिली
माळी साजिवंत केला

 अशा रीतीने यल्लमाच्या अनेक भक्तांनी तिचा महिमा गीतांतून गायिला आहे. हे सगळे भक्त ग्रामीण भागातील आहेत. त्यांची भाषाही तशीच आहे. जणू बोलल्याप्रमाणं त्यांनी गीतात भाव-शब्द गुंफले आहेत. त्या गीतात शेवटी स्वत:चे नावही जोडले आहे. यल्लू परसू, कृष्णाजी, आबा हरी, यशोदा, तानू, भागू, सत्तू अशा त्या रचनाकारांची नावे 'एक होता राजा' मधील यल्लमाच्या गाण्यात आढळतात. देवीचं सौंदत्ती देवस्थान असल्यामुळे त्या आजूबाजूच्या गावात तिचे जास्त भक्त असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा व धारवाड, बेळगाव वगैरेच्या जवळ यांची गावे आहेत. त्याचीही नावे गाण्यातून येतात. या गाण्यामध्ये बरेच वेळा कानडी भाषेचा बाजही जाणवतो.
 देवीचा भक्तपरिवार मोठा आहे. दर माघी पौर्णिमा आणि चैत्री पौर्णिमेला देवीच्या महत्त्वाच्या यात्रा असतात. यातही माघी पौर्णिमा ही रांडा पुनव व चैत्री पौर्णिमा ही अहेव पुनव मानली जाते.

 या सगळ्याच्या एक वेगळा अर्थ असाही लावला जातो, की रेणूकेची पूजा ही भूमीची पूजा आहे, निसर्गाची पूजा आहे. मार्गशीर्षात पिकांची कापणी होते या अर्थानं भूमीचं सौभाग्य नष्ट होते, तर पुन्हा चैत्रात वसंत ऋतू आल्यानं भूमी हिरवीगार होते. वृक्षांना पालवी फुटते. भूमी त्या अर्थानं पुन्हा सौभाग्यशालीनी बनते.

 देवीच्या पूजेत लिंब नेसणे नावाचा विधी येतो. तोही सृजनाशी, निसर्गाशी संबंधितच असावा.

 यल्लमाच्या जोगतीणी म्हणजे देवदासी. यांना काही नियम पाळावे लागतात. जेव्हा दर्शन त्यांच्या गळ्यात घालून त्यांना दीक्षा दिली जाते, त्या वेळी या नियमांचे पालन करावे, असा मंत्र गुरव वा गुरू त्यांना सांगतो.

 यात भक्तांशी विश्वासार्ह वर्तन करावं, असत्य बोलू नये, जोगवा मागून आणलेल्यातलं थोडंतरी शिल्लक ठेवावं, गावातील कोणी मृत झाल्यास त्याचे संस्कार झाल्याशिवाय तिथे जेवू नये, बाळंत स्त्रीच्या घरी सव्वा महिना जेवू नये, श्राद्धाचे जेवण जेवू नये, लग्न करण्याचा विचार मनात आणू नये, हे सांगितले जाते.

 त्याचप्रमाणे जोगतीणींनी सौंदत्तीला यात्रेला जाऊन परतल्यावर आंबिल यात्रा करणे म्हणून विधी सांगितला जातो. त्याशिवाय यात्रेला गेल्याचे पुण्य पदरात पडत नाही. ज्यांना काही कारणामुळे यात्रेतल्या सौंदत्तीला जाता येत नाही, ते या आंबिल यात्रेत सामील होतात. यात देवीला अभिषेक करतात तिची पूजा आरती करून नैवेद्य वाटला जातो.

 ज्या घरात यल्लमा हे कुलदैवत असते त्या घरी जेव्हा शुभकाम असेल, तेव्हा जोगतीणी लिंब नेसवण्यासाठी जातात. त्या विधीसाठी पाच देवदासी लागतात. चार तांदळाच्या रेघा मारून त्यावर त्या जग ठेवतात. पाचही जग दोऱ्याने गुंतवतात. त्यावर प्रसाद ठेवला जातो व लिंब नेसून त्याला प्रदक्षिणा घातल्या जातात.

 प्रत्येक जोगतीणीला पाच घरी जोगवा मागावाच लातो. दरवर्षी सौंदत्तीला यात्रेसाठी जावेच लागते.

 या सर्वाचे पालन शक्यतो जोगतीणीने करावे लागते.

 लोकसंस्कृतीमध्ये यल्लमाचे महत्त्व व तिचे उपासक म्हणून जोगती व जोगतीणीचे महत्त्व सांगितले गेले आहे; पण काळानुसार जोगतीणी वा देवदासी प्रथेचे बरे-वाईट परिणाम समाजासमोर येत राहिले. त्यावर प्रबोधन होत राहिले. या विषयावर नाटके, कादंबऱ्या कथा लिहिल्या गेल्या. त्यातून देवदासीच्या स्वातंत्र्याचा, तिच्यावर लादलेल्या धार्मिक मानसिक गुलामगिरीचा, तिच्या झालेल्या कोंडीचा आणि त्यातून सुटण्यास ती करत असलेल्या धडपडीचा प्रयत्न शब्दबद्ध झालेला आहे. खूपदा ही धार्मिक प्रथा समाजातल्या संधिसाधू लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी वापरलेली दिसते. यातून तिची सुटका व्हावी म्हणून अनेक सामाजिक कार्यकर्ते व संस्थाही काम करत आहेत. सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेच्या मनात मात्र यल्लमाविषयी भक्ती आणि श्रद्धा मात्र चिरंजीव आहेत. अजूनही लाखोंच्या संख्येने सौंदत्तीची यात्रा भरते, ही त्याचीच साक्ष आहे.
दान पावलं

 सकाळचा प्रहर. घराघरांतून पहाटेची जाग, अशावेळी अंगणातून गाणं ऐकायला येऊ लागतं...

जगजीवन रामा
लामा बहारबंबा
गोविंद रामा
बाजीराव नाना
तुमडीभर दिना
शंकराच्या नावानी
पांडुरंगाच्या नावानी
हरिभाऊच्या नावानी
भाग्यीवंत माऊली
सकाळच्या रामपाऱ्यामंदी
वासुदेवाचं लेकरू आलं
माइला धर्म पावला, दान पावलं...

 या गाण्याबरोबर घुगराचा आवाज, टाळ-चिपळ्यांचा आवाजही. वासुदेव आला गंऽऽ' म्हणत कोणी वृद्ध स्त्री मग लेकीबाळींना आवाज देते.
 हे दृश्य खेड्यापुरतेच मर्यादित राहिले. काही दिवसांनी ते सुद्धा नष्ट होते की काय, अशी भीती आहे.
 वासुदेव पहाटेचा दारात आला, की त्याला पाहायला आम्ही पहाटेचे उठून दारात अंगणात जायचो. त्याचा वेषही आम्हाला पाहायचा असायचा. सलवार, अंगात घोळदार अंगरखा, गळ्यातून वेगळ्या लाल-हिरवा रंगाचा थोडी जर असणारा जुनापुराणा शेला, काखेला पांढऱ्या कापडाची झोळी. मिळालेल्या धान्यानं ती थोडी फुगलेली असायची. कपाळाला उभा गंध रेखलेला असायचा. कानाच्या पाळीला आणि डोळ्यांलगत कानाच्या जवळ गंधाचे बोट लावलेले असायचे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डोक्याला मोरपीसं लावलेली शंकूच्या आकाराची टोपी असायची. एका हातात चिपळ्या आणि दुसऱ्या हातात टाळ असायचे. कमरेला बासरी बांधलेली असायची. आम्ही मुलं त्याचं ते साजरं रूप पाहायला भोवतीनं गोळा झालो, की दोन्ही हात उंचावून टाळ-चिपळ्या वाजवत गोल गिरक्या घेत तो नाचायचा. पायही तिथल्या तिथं नाचवल्यासारखा करायचा. त्याच्या पायालाही छोटी घुगरं बांधलेली असायची. नाचताना त्याचा आवाजही टाळ-चिपळ्यांच्या आवाजात मिसळायचा. त्याच्या गळ्यातून स्त्रवणारं गाणं, टाळ-चिपळ्या-पुंगरांचा आवाज यानं एक छानसं नादब्रह्म निर्माण झाल्यासारखं व्हायचं.

 'घरातली स्त्री सुपामधून काही धान्य घेऊन यायची. त्याच्या झोळीत ते सूप रिकामं व्हायचं. मोठ्या भक्तिभावाने त्या वासुदेवाच्या कृष्णरूपी रूपाला ती नमस्कार करायची. मग आम्हीपण नमस्कारासाठी झुकायचो. दोन्ही हात उंचावून तो आशीर्वाद दिल्यासारखा करायचा. त्याला दान मिळालेलं असायचं. ते दान महाराष्ट्रातल्या सगळ्या देवांना तोपोचवल्यासारखे गाणं म्हणायला सुरवात करायचा...

दान पावलं  दान पावलं
पंढरपुरात  इठोबारायाला
कोंढणपुरात  तुक्काऽ बाईला
जेजुरीमंदी  खंडोबा देवाला
सासवडामंदी  सोपानदेवाला
आळंदीमंदी  ग्यानुबादेवाला
देहुमंदी  तुकारामबाबाला
शिंगनापूरच्या   महादेवाला..

.

 अशा या दैवतांची यादी मोठी असायची. नाचताना तो डोकं हलवायचा. त्याबरोबर त्याच्या डोक्यावरची मोरपिसाची टोपी हलायची. कधी नाचताना टोपीतलं एखादं मोरपिस गळून पडायचं. आम्ही ते चटकन उचलायचो. कधीकधी एखादं मोरपिस वासुदेवाकडून मागूनही घ्यायचो. त्या लहान वयात मोरपिसाचं खूप अप्रुप वाटायचं.

 वासुदेव हे खूप पूर्वीपासून असे गाणी म्हणत दारोदारी फिरत असावेत. हे किती जुने आहेत, कधीपासून वंशपरंपरागत रीतीने हे व्यवसाय ते करतात- हे सांगणे अवघड असले, तरी रा. चिं. ढेरे यांनी लिहिल्याप्रमाणे ते हजार-बाराशे वर्षांहून पूर्वीपासून हे काम करत असावेत. ज्ञानदेव-नामदेव यांच्या ओव्यात वासुदेवाची रूपके आढळतात. महानुभाव वाङ्मयातही वासुदेव असल्याचे पुरावे आहेत. महानुभाव पंथ संस्थापक चक्रधरस्वामी यांनी त्या काळात म्हटलेले एक गीत थेट वासुदेवाच्या गीत पद्धतीशी साम्य दर्शविणारे आहे.
 चक्रधरस्वामींचे गुरू गोविंदप्रभू यांच्या चरित्रातही 'भ्रीडी' या नावाने वासुदेवाचा उल्लेख येतो.

डोइये मोरपीसांची वेंठी : पीलीचे नेसला होता
माथां दौडी : आंगी नीलवर्ण उटि : हातीं चीपोळी

 असंजे वर्णन येते ते वासुदेवाशी साम्य असणारे असेच आहे. या सगळ्यावरून फार पूर्वीपासूनची 'वासदेव' ही संस्था आहे, हे लक्षात येते.

 वासुदेव वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी जी गाणी म्हणतात त्याचा अभ्यास केला. तर लक्षात येते, की त्यात बरीचशी गाणी ही कृष्णलीलेशी संबंधित असतात. त्याचं रूपही कृष्णाशी साधर्म्य असल्याने तो कृष्णभक्त असणे स्वाभाविक आहे. कदाचित त्यामळेच कष्णासंबंधी लीला वर्णण्यात तो रमत असेल. त्याच्या गाण्यातून तो कृष्णासंबंधीच्या. विठोबासंबंधीच्या कथाही सागंतो. जनाबाईच्या मदतीला धावणारा विठ्ठल, तिची सेवा करणारा प्रसंगी तिचं अंग रगडतो. तिच्याबरोबर फगडी खेळतो हे सगळं सांगताना...

अवो जनाबाईच्या भक्ती देव गुंतला॥
आला वैकुंठाचा हरी
येऊन जगाला तारी
जनामातेचं आंग रगडी
धुऊन आणत्यात लूगडी
भीम राऊळामध्ये घाली फुगडी

 असं म्हणत त्या कथेत स्वत:बरोबर ऐकणाऱ्यालाही गुंगवून टाकतो अणि मग जनाबाईवर चोरीचा आळ आला तेव्हा...

काढणी लावा दंडाशी
जनीला नेली सुळाशी
ताकीत केली सर्वांशी

असं म्हणत तो ते वातावरण निर्माण करतो. मग देव धावून आले कसे ते सांगताना वासुदेव म्हणतो...

देव होती गरूडावर स्वार
सूळ पाहिला देवांनी
सूळाचे हून गेले पाणी
तारिली नामदेवाची जनी
अवो जनाबाईच्या भक्ती देव गुंतला॥

 वासुदेव हा वैष्णव आहे. विष्णूंनी घेतलेल्या वेगवेगळ्या अवतारांतली गाणी तो म्हणत असावा. असे त्याच्या वेगवेगळ्या गाण्याकडे पाहिलं कीवाटत राहतं.खरंतर ही गाणी आया-बायांनी खेड्यातल्या वेगवेगळ्या काळातील लोकांनी ऐकली. तशी ती आठवून शब्दबद्ध झाली.

 वासुदेवाच्या गाण्यात रामकथाही येते. सीतामाईला सुवर्णमृग दिसणं, तिनं रामाकडे हट्ट धरणं, रावणानं तिचं हरण करणं,

रामानी रामकथा सांगितली
गुफा बांधला बिकट जंगलात
सुवर्णाचा मृग हून रावण फिरऽ कुपा भवतीन

 अशा कथांमधून रावणानंच मृगाचं रूप घेतलं, असं येतं तेव्हा सांगण्या-ऐकण्यात काहीतरी गोंधळ झालाय का, अशी शंकाही येते; पण शेवटी वासुदेव हा ज्या कालावधीपासून आहे त्या वेळी असणारं समाजजीवन, साक्षरता या सगळ्याचा विचार केला तर गाण्यातून असे फरक होणं स्वाभाविक आहे, हे ध्यानात येतं.
 त्यामानानं कृष्णकथेवरची वासुदेवाची गाणी उल्हासपूर्ण व जवळची वाटतात. यशोदा-कृष्णावरचं वासुदेवाचं एक गाणं सापडतं. त्यात कृष्णाच्या सर्वांगावर देवी उठल्याचा उल्लेख आहे, त्यामुळं यशोदा बेचैन झाली आहे.

श्रीकृष्णाला देवी निघाल्या यश्वदा तळमळी
किती बाळाला जतन करू मी सावळा वनमाळी

 तिच्या या बेचैनीतून तिला वाटते, कोणाची तरी याला दृष्ट लागली असावी. त्यासाठी मीठमोहऱ्या, लिंबू उतरून टाकायला पाहिजे. कृष्ण आजारी पडला म्हणून कंसाला आनंद झाला असेल, असेही तिला वाटते.

कोणत्या सवतिची दिष्ट लागली, झडपलेंच माझें मन
मीठ-मोहऱ्या-लिंबू-नारळ टाकिते उतरून
लवतो माझा डावा डोळा, याचा नाही भरवसा
मथुरेमध्ये खबर कळली तर, कंस हरकेल कसा

 या गीतातून यशोदेचे वात्सल्य प्रतीत होते. यशोदा-कृष्ण नात्यातील उत्कट नातेबंधाचं दर्शन होतं.

 वासुदेवाच्या गीतामध्ये चांगुणा कथाही आढळते. त्यात शंकरभक्तीचा महिमा दिसतो; पण असं गीत एखाद-दुसरंच दिसतं. भक्तीच्या संबंधित एक वासुदेव गीत पाहायला मिळते. त्या गीतात देवानं भक्तासाठी काय-काय केलं याचं वर्णन येतं...

भक्तासाठी तो जगजेठी, बसुन माळ्यावर
पाखरं उडवी सारंगधर॥
जनाबाईच्या घरी देवानं चाकरी धरली
याची भक्ती आवडली
दळण कांडण धुणं धुवूनी पाटी डोक्यावरी
गवऱ्या वेचून आणतो घरी

नामदेवासी म्हणे ब्राह्मण जाय तू अमंगल
बाहेर करशील तू विटाळ
गेले रावळामागे नामानं केले दगडाचे टाळ
देवानं फिरवले राऊळ
सखूबाईच्यासाठी देव सखुबाई झाली
सखू पंढरीला लावली
सावतामाळ्यासाठी देव ब्राह्मण झाला
याने पोटात साठविला
चोखा मेळ्यासंगे यानं ओढली गुरं
का अशी पीर्त भक्तावर...

 वासुदेवाची गाणी सरळ साध्या-सोप्या भाषेतली आहेत. फारशी अलंकारिकता नाही, न समजेल असं काही नाही. कलियुगात सर्व कसं चाललंय, लबाडीला ऊत आलाय. नातं नात्याला जाणत नाही. प्रेम राहिलं नाही. नीतिमत्ता लयास गेली आहे. हे सगळं सांगताना मग वासुदेव म्हणतो...

लबाड दुनिया बालंट निघाली, कशी कली फिरली
डोळ्यांवरती धुंदी चढली, वळख नाही धरली।

 या गीतामध्ये वासुदेवाचं बारीक निरीक्षण जाणवून येतं

काशी केली, यात्रा केली, मिशा काढून आला
जिवंत होते आई-बाप तेव्हा अन्न नाही दिलं दोघाला

 माणूस कसा वागायला लागलाय हे सांगताना पुढं तो म्हणतो...

हजार रुपयांचा हुंडा घेतला लेकीच्या बापानं
म्हातारा नवरा डंगरा पाहून, लेक दिली त्यानं

 जगाची नीती उलट झालीय. मुलीच्याच बापानं म्हाताऱ्या नवऱ्याकडून पैसे घेतले आणि मुलगी जणू विकलीच आणि सगळीकडे दुनियेत अशी अंदाधुंदी माजली आहे. हे जेव्हा त्याच्या ध्यानात येते तेव्हा मग वासुदेवालाही राहवत नाही. जगाला चार चांगले शब्द सुनवावेत- काही चांगला उपदेश करावा. त्यातून माणसाच्या मनाचे परिवर्तन होते का पाहावं- असं त्याला वाटलं असावं म्हणून मग एका गाण्यात तो बळीराजाला सांगतो...

बळीच्या वंशी जन्म घेतला, काळिचा धंदा सोडू नको
ऐक पराण्या, तुला सांगतो, हरी भजल्याविण राहू नको
दिली देवानं धनसंपदा, गर्व मनामधि धरू नको

चरत गायत्री शेती आली, तिच्या मुखावर मारू नको
झाली म्हातारी गाय बापा, कसाबाला तू विकू नको
मूल घातला साळमंधी, लाड त्याचा तू करू नको
वडीलबंधू बापापरमानं, मर्जी मोडून बोलू नको
पित्याच्या वंशी जन्म घेतला, त्याच्या सेवेला चुकू नको
आईच्या पोटी जन्म घेतला, वाईट वंगाळ बोलू नको
दोघा भावांचा तंटा लागला, सरकारामधि जाऊ नको

 या गाण्यात एक तळमळ जाणवून येते. माणुसकी जिती ठेवण्याचं भान या गाण्यातून प्रकट होतं.

 वासुदेवाला पहाटेच्या प्रहरी मिळणारं दान बहुतेकवेळा स्त्रीच्या हातून मिळायचं. त्या कुलवंत स्त्रिलाही गाण्यावाटे चार शब्द त्याला सांगावेसे वाटले असावेत. दारात तुळशीवृंदावन असणार. त्या तुळशीजवळच पहाटे वासुदेवाचं गाणं रंगत असणार, त्या साक्षीच्या तुळशी संबंधात वासुदेव म्हणतो

तुळस वंदावी-वंदावी
मावली संताची सावली॥
तुळशी ऐसे लावता रोप
पळून जाती सगळे दोष।
तुळशी घालित ऐसे वटी
विघ्न जातील बारा वाटा।
तुळशी घालीत ऐसे पाणी
झाली पातकाची धुणी।
तुळशी लावीत ऐसे गंधा
तुटतील येमयाचे बंधा।
तुळशी घाली प्रदक्षिणा
पाठीमागे उभा कान्हा
तुळशी ऐसे दावित निवेद
भोजना बैसले गोविंद।

 तुळशीला वंदन केल्याने, लावल्याने सगळे दोष जातात, विघ्नं नष्ट होतात, पातकांचा नाश होतो, यमबंध तुटतात. मृत्यू दूर जाईल, देव पाठीशी उभा राहील, असं वासुदेव म्हणतो.

 वासुदेव काहीवेळा वेगवेगळ्या कथा सांगत जातो. त्यात मग प्राणीही बोलके होतात; पण ते सर्व गाण्यातून ऐकताना ऐकणारा मुग्ध होतो. हरणीच्या पाडसाची कथाही काही ठिकाणी वासुदेव सांगतो.
हरणीचे पाडस सगळ्या त्याच्या कुटुंबाचा कसा जीव वाचवते, ही कथा फारच विलोभनीय आहे. हरणीला पकडल्यावर हरणी बाळाला पाजून परत येते म्हणते, पाडसाला पाजताना पाडसाला तिचे दूध कडू लागते, हे वर्णन करताना वासुदेव म्हणतो...

खपीतनं बाळ आलं
माया दुदुड धावोनी।
घाली कासेमधी तोंड
चराचरा वडू लागे दूध
"दूध का गं कडू लागं
माते मजला सांग"

 हरणी काही सांगू शकत नाही. कारण बाळाला पाजून तिला पुन्हा मरणाच्या दाढेत जायचं असतं. ती म्हणते..

"पी बाळा जलदीनं
परतून मला जायचं पटकन"

 बाळ पीत नाही. हळूच आईमागून जाते आणि म्हणते...

“आज पुनवेची हरणं कापू नका तुम्ही
नाई परमाण
करा कवळ्या मासाचं भोजन”

 त्याचे ऐकून मग सगळ्यांना दया येते. पकडणारा सगळ्यांनाच सोडून देतो. वासुदेव जेव्हा गीतामधून ही कथा सांगतो, तेव्हा ऐकणाराचे डोळे पाणावतात. समाधानानं सूपभर धान्य त्याच्या झोळीत घातलं जातं.
 एका गाण्यात कुडी जीवाशी संवाद करते आहे. कुडी जीवाला म्हणते...

तुम्हि पाटिल अन् मी धर्माची चावडी
तुम्हि दोरा अन् मी आकाशी वावडी
तुम्हि गोसावी, मी परमसुखाची मठी
तुम्हि भुजगं अन् मी पेटाऱ्यातली कुडी
माझ्या ढगात तुमची बिजली वीज कडकडी
जिव जन्माचा संगती बोलती कुडी

 वासुदेवाची प्रतिभा ही विलक्षण आहे. त्याची कल्पना वेगवेगळ्या प्रतिमा, रूपकांमधून लोकांना सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. चांगलं वर्तन करावे, माणुसकी जतन करावी, मोठ्या माणसांचा आदर करावा, चांगल्याची संगत धरावी, परोपकार करावा, याचा उपदेश तो गेली कित्येक वर्षे करत आला आहे. वासुदेव दैववादी आहे. कृष्णसखा आहे.
 श्री. गो. मं. कालेलकर यांनी लिहिल्याप्रमाणे वासुदेव ही एक धार्मिक भिक्षेकऱ्यांची गावोगावी भटकणारी जाती आहे. साधारण दक्षिण महाराष्ट्रात ते सगळीकडे आढळतात. एका ब्राह्मण ज्योतिषास कुणबी बाईपासून झालेल्या सहदेव नावाच्या मुलापासून त्याची उत्पत्ती झाली आहे. वासुदेव मराठी कुणब्याप्रमाणे दिसतात. मुलगा भिक्षा मागण्याजोगा झाला, की त्याला ते दीक्षा देतात. या दीक्षा देण्याचाही विधी असतो. मुलाच्या वयाच्या पंधरा वर्षांच्या आतच शक्यतो त्याला दीक्षा दिली जाते शुभ दिवस पाहून उपाध्यायाला बोलावतात. तो मुलाला वासुदेवाचा पारंपरिक वेश घालायला लावतो. मंत्रोच्चारासहित त्याच्या कपाळाला चंदनाचा टिळा लावतो. नंतर उपाध्यायाला दक्षिणा दिली जाते व सर्व जातबांधव बरोबर भोजन करतात.

 वासुदेवांचे भिक्षा मागण्याचे इलाखे ठराविक असतात. त्यांची गावे ठरलेली असतात. यात्राजत्रेच्या कालावधीत त्या ठिकाणी हे वासुदेव उपस्थित असतात. इतर वेळी गावोगावी फिरत असतात. आता काळाच्या ओघात ही वासुदेव जाती नष्ट होते की काय, असे वाटायला लागले आहे. काही मराठी सिनेमांत वासुदेव दाखवला आहे. त्याची गाणीही आहेत. पुढे-मागे यातच याचे दर्शन उरेल काय, अशीही भीती वाटते; पण गेली कित्येक वर्षे तो लोकांना काही देतच आला आहे. भले मग ते त्याच्या गाण्यातून का असेना. त्याच्याकडे कोणी-कधी भिकारी म्हणून पाहिले नाही. मनात आदर बाळगून लोक त्याला नमस्कार करत आले आहेत. त्याला भिक्षा देणे हे सगळ्यांना कर्तव्य वाटत राहिले. लोकसंस्कृतीत वासुदेवाचे स्थान सदैव आदराचे राहील. शेवटी तो कृष्णसखा आहे, हे कोण विसरेल.

लोकसंस्कृतीतलं सासर-माहेर

 आता पंचमीच्या सणालाही बायकांची गाणी ऐकू येत नाहीत. खेड्यातही ते प्रमाण कमी झालंय; पण पूर्वी रात्री काम आवरलं, की गल्लीतल्या बायका एकत्र यायच्या त्यात सासुरवाशिणी असायच्या. माहेरी सणासाठी आलेल्या माहेरवाशिणी असायच्या, सासवाही असायच्या तशाच पोरींच्या आयासुद्धा. आणि एकत्र येऊन मग कधी झिम्मा-फुगडी असे खेळ रंगायचे, तशीच त्या वेळी गाणीही म्हटली जायची. त्या गाण्यांना ओवीसारखी सुंदर लय असायची तसाच एक तरल भावही. बाई गायला लागली आणि त्यात माहेर आलं नाही, असं कधी व्हायचं नाही. माहेरची आठवण आणि बाईचं भरून आलेलं मन याचा सुरेख संगम व्हायचा. अगदी जात्यावर बसल्यावरही लहानपणी माहेरात आईबरोबर दळताना ओढलेलं जातं आठवायचं. तीच आठवण सासरी दळायला बसल्यावर यायची आणि मग

पहिली माझी ओवी - आईला गाईऽली
बया माझी गवळण - तुळस हाईऽली
पहिली माझी ववी - मायबापाला गाती एका
गिरजा शंकराची लेक

 कोणा गिरजा आणि शंकराची लेक जातं ओढताना मायबाप नजरेसमोर आणायची. माहेरची माणसं आठवणींच्या चौथऱ्यावर यायची. जात्याच्या गरगरण्याबरोबर कालाचा पट उलट फिरून माहेरच्या आठवणीत रमणारं मन, जातं ओढतानाचे श्रम जाणवेनासं करायचे. कधी माहेरपेक्षा आकारानं जातंही मोठं असायचं. ते पाहूनच नवीन सासुरवाशिणीचा जीव घाबरा व्हायचा. त्या वेळी तिच्याबरोबरची मोठी जाऊ वा नणंद ते जाणायची. दोघी दळायला बसायच्या आणि ओवी ओठावर यायची...

थोरल्या गं जात्याला नार झाली गं घाबरी
मायबाईच्या दुधाच्या पेलें मधाच्या घागरी

 ते थोरलं जातं मग आईच्या आठवणीनं तिनं ओठाआड केलेल्या दूधमायेनं हलकं होऊन जायचं.

 पूर्वी लहान वयात मुलींची लग्न व्हायची. अंगणात सागरगोट्या खेळता-खेळता एकदम कधी सासरी पोचलो ते त्यांना कळायचंही नाही, त्यामुळं साहजिकच आई-वडिलांची ओढ असायचीच. प्रथम सासर आवडायचं नाही, मग
सासरच्या वाटे कुचुकुचु काटे

 सारखं लोकगीत आळवलं जायचं. माहेरची आठवणींची वाटही फुलांपेक्षा मऊशार वाटायची. माहेरवरून आलेला एखादा अनोळखी पांथस्थही जवळचा वाटायचा. 'प्रभात'च्या 'संत तुकाराम' चित्रपटातली तुकारामची पत्नी आवडीही तिच्या माहेरवरून आलेल्या म्हैशीचे कोड-कौतुक करताना दाखवली आहे. मनातलं गुज जणू ती त्या म्हैशीबरोबर बोलत असते. तिला एखाद्या लेकराप्रमाणे जपत असते. हे सगळं लोकमानसाचं प्रतिबिंबच त्यात चित्रित झालं आहे.

 निवांत वेळात जेव्हा दोन सासुरवाशिणी एकत्र येतात, तेव्हा स्वतःच्या माहेराबद्दल सांगतात. कधी एखादीला कोणी बोलायला मिळालं नाही, की दाराशी आलेल्या पाखराशी ती बोलते...

रूणझुणत्या पाखरा रे
जा माझ्या माहेरा
कमानी दरवाजा रे
त्यावरी बैस जा
घरच्या आईला रे
सांगावा सांग जा
दादाला सांग जा रे
ने मला माहेरा

 माहेरला जायची ओढ मनात सतत साचून राहिलेली असते. ते अंगण, ती ओसरी, माजघर, कमानी दरवाजा सगळं आठवत असतं. मग पाखराबरोबरही निरोप धाडावा वाटतं. ते भुर्रकन उडून जाणारं पाखरू आपलं वाटायला लागतं. त्याचं कुठंही जायचं स्वातंत्र्य प्यारं वाटू लागतं. त्याच्याजवळचा निरोप चटकन पोचेल आणि कोणी तरी भाऊ आपल्याला सणाच्या निमित्तानं चार दिवस माहेरी न्यायला येईल, ही वेडी ओढ मनाला लागून राहते.

माहेराची वाट। दिसे सोनियासारखी।
कधी जाईन मी बाई। वारियासरसी

 वाऱ्यासारखं जावं आणि माहेराला पोचावं, असं तिला वाटू लागतं आणि मग ती माहेराची स्वप्न रंगवू लागते,

माहेरा जाईल। बसलं पारावरी जिला
भासा राघव विचारी। आत्याबाई कवा आली

 भाचा पारावरच बसलेला असेल तो धावून जवळ येईल. आत्या आल्याचा त्याला आनंद होईल आणि ओसरीत गेल्या-गेल्या कधी आईला भेटेन असं होईल.

तुज्या माज्या भेटीला गं। वरीस बाई लोटलं
कसं तुला गं कंठलं। मायबाई

 गळ्याला कडकडून मिठी मारताना डोळ्यांतून अश्रूधारा वाहतील. एक वर्ष मध्ये गेलंय. आईलाही मग ती विचारेल, की माझ्याशिवाय तुला हे वर्ष कसं गेलं? माझी आठवण आली असेलच. दोघींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा होतील. मग माहेरी आल्याचं कळल्याणं मैत्रिणी पटापटा भेटायला येतील. मनातलं आतलं सगळं मैत्रिणीजवळच बोलता येतं. तिथं काही आडपडदा नसतो. मैत्रिणी सासरबद्दल विचारतील. स्पष्ट काही सांगता येणार नाही; पण दडवूनही ठेवता येणार नाही आणि मग सूचकतेनं सांगता येईल,

सासरचं बाई गोत। कडुनिंबाचा गं पाला
पालामा नावासाठी गोड केला। देसाईरायाच्या...

 कोण्या देसायाची ही मुलगी माहेरचं नाव टिकून राहावं, त्याची प्रतिष्ठा टिकावी म्हणून सासरी चाललेला तो सासुरवास कडुनिंबाच्या पाल्यासारखा कडवट असला, तरी तो गोड मानून सहन करते आहे.

 खूपदा सासरची माणसं सुनेला माहेरी पाठवायची टाळाटाळ करतात. सणासुदीलाही तिला माहेर दिसत नाही. सासरची खूपशी कामे सून माहेरी गेली तर मग कोण करणार? सतत घाण्याला जुंपून घेतलेल्या बैलासारखं तिचं जिणं होतं. कवी इंद्रजित भालेराव त्यांच्या कवितेत म्हणतात

लेकीचा जलम
जसा गाजराचा वाफा
येड्या तुम्ही मायबापा
जलमा घालून काय नफा
लेकीचा जलम
कोणा घातला येड्यानं
परायाच्या घरी
बैल राबतो भाड्यानं

 सासुरवाशिणीचं हे जिणं त्यांच्या कवितेतून लक्षात येतं. हीच वेदना कोणी उषाबाई नावाची खेड्यातली बाई तिच्या ओवीतून व्यक्त करताना म्हणते...

सासुरवाशिणी तू गं वाड्यातला बैल
कधी रिकामी होशील उषाताई ।

 बाईच्या मनातली ठसठसती सासरची वेदना तिच्या मनातलं माहेर सतत जिवंत ठेवत असते.

आणि मग या वेदनेपोटी सासरच्या माणसांविषयी कधी मनात राग येतो; पण तो प्रत्यक्ष व्यक्त करता येत नाही. मग तो व्यक्त करायला आधार म्हणून तिच्या ओठावर ओवी येते,

चौघे दिर माझे नांदती।
कौलारि घर बांधती।
सासू माझी गं सागर।
नित घाली करकर।
नणंदा माझ्या गं हाणकारणी।
उठून टोला देती॥१॥
धाकली जाऊ माझी सुखवासी
कामाला हात नाई लावती
घरीच गरधंदा मी करिते
एकली पाण्याला जाते॥२॥

 आणि एवढे दिवस दिवस राबूनही पोटाला नीट जेवायला मिळेल, याची शाश्वती नाही.

भूक लागे माझ्या पोटा  परवंटा देत्ये गांठी
तुमच्या नावासाठी  बाप्पाजी हो

 पण तरीही मी तुमच्या नावासाठी म्हणजे वडिलांचं नाव जाऊ नये म्हणून इथं सगळं सहन करते.
 राजस्थानी भाषेतल्या एका लोकगीतातही सासरी केलेल्या कामाचे वर्णन येते. सगळे जत्रेला जातात. सुनेला दळायला सांगून जातात. बरोबरीच्या नणंदा खेळतात तेव्हा तिला पोळ्या करायला लावतात. इतरांना मुठी-मुठी साखर दिली जाते, तेव्हा सुनेच्या हातावर मात्र फक्त चिमटभर मीठ टेकवले जाते. इतरांना पळ्या भरून तूप वाटताना तिला चिमूटभर तेलाची धार नशिबी येते. आणि झोपायच्या वेळेला एक भाकरीचा तुकडा जेवण म्हणून मिळतो; पण तोही मांजरी पळवते आणि तिला रात्रभर उपाशी राहावं लागतं,

सोवतङी, ए मा, बाजर वाटियो
आण नै मिनडी लै गयो
मरज्यो मरज्यो, ए मिनडी, थारोडा पूत
म्हारोङो बाटियो तूं ले गयी
राताँ री निरणी वीरां री बहनडी

 एक विलक्षण कारुण्य अशा गीतातून सामोरं येतं. सासरचं वर्णन करणारी ही लोकगीतं विचार करायला लावणारी आहेत. यात वेगळं सौंदर्य आहे, तशीच जीवघेणी वेदनाही आहे.

 एका भोजपुरी लोकगीतातही सासरच्या कष्टाचं वरच्यासारखं वर्णन आहे. या दुःखाची जात इथे तिथे एकच आहे. जुनं-पानं नेसायला मिळणं, घरगड्यासाठीचं जेवण नशिबी येणं शिळं-पाकं ताटात वाढलं जाणं, हा सगळा छळ सोसताना ती म्हणते,

लोहवा जेर जइसे लोहरा दुकीनया हो ना
तोरी बहिनी जरे ससुरिया हो ना॥

 लोहाराच्या दुकानात विस्तवावर लोखंड जसे जळते, तशी तुझी बहीण सासरी करपत आहे.

 पण इतकं सगळं दुःख सोसण्याचं बळ तिच्यात कोठून येतं. सगळे कष्ट सहन करूनही ती सासरी राहते. आनंदानं सगळं सहन करते. ती कशात आनंद मानते सांगताना ती सासुरवाशिण म्हणते,

सासुचा सासुरवास  नंदबाईच्या लावण्या
नाही घेत कानी मनी  करी कंथ संपादण्या ॥
सासु सासऱ्याचं दुःख  भ्रताराचं थोडं सुख ।
नाही लेकी सारजेचं  कधी दुखत ते नख ॥

 पतीचं सुख हे सगळ्या कष्टाला विसरायला लावतं. त्यापुढे सासूचा सासुरवास नंदेच्या कळलाव्यापणाचं काही वाटत नाही. स्त्री तशी मुळात सोशिकच; पण एका मर्यादेपर्यंत तिचं सोसणं ती सहन करते; पण मग कधी तरी ती सासूलाही दटावायला कमी करत नाही. एका राजस्थानी गीतात याचा सुंदर उल्लेख येतो. ती सासूला म्हणते, जेव्हा माझा नवरा चेंडू खेळण्याइतका लहान होता, तेव्हा तुमचा होता. घोड्यावर स्वार होणारा पती हा माझा आहे. दूध पिणारा तुमचा होता, मद्य पिणारा माझा आहे. टोपी घालणारा तुमचा होता, फेटा घालणारा माझा आहे. आणि शेवटी ती म्हणते,

सासु उली पेली बातां थां सू
चित्त मन री बातां म्हां सू ए
नादान बनजी म्हारा
सासु काई हलावें कुल्हा
म्हूं न्यारा करतूं चूल्हा
नादान वनजी म्हारा

सासूबाई भले ते तुमच्याशी इकडच्या-तिकडच्या गप्पा मारोत; पण मनातलं अंतरंग ते माझ्याजवळच उघड करतात मनीचं गुज माझ्याजवळच सांगतात. उगाच का नितंब हलविता? मी आता वेगळी चूल मांडणार आहे.

यापुढे जाऊन पंजाबी लोकगीतातली तर म्हणते ,

कोठी हेड पसेरा, निक्कल सस्सीऽए घर मेरा
खायल्या बथेरा, हुण रैहंदा राँदा मेरा।

 ती सासूलाच सांगते तूच आता बाहेर निघ, हे घर माझे आहे. आतापर्यंत तू खूप खाल्लेस आता शिल्लक राहिलेले सारे माझे आहे.
 कदाचित पूर्वी संसाराचे हे हाल कष्टच त्या स्त्रियांचे जीवन व्यापून राहिले आणि त्याना प्रत्यक क्षणी माहेरची याद येत राहिली. माहेरवरून कधी कोणी नात्यातलं माणूस भेटायला आलं, की त्यांचं हृदय भरून यायचं. तेवढंच काही क्षण ऊन हळुवार बनायचं. कधी एखादीचा भाऊ सासरी बहीण कशी आहे पाहायला यायचा. जेवणखान झाल्यावर विश्रांतीच्या एखाद्या क्षणी बहीण निवांत गाठ पडायची आणि मग दोघेच असताना भाऊ बहिणीला विचारायचा, 'कशी आहेस? कसं चाललं आहे?' त्याच्या तेवढ्या प्रश्नावर बहिणीला भरून यायचं. तिनं त्याला दिलेलं लोकगीतातलं उत्तर मोठं मार्मिक आहे ती म्हणते,

काय सांगू भाऊराया! माझा सासुरवास कसा
मंगळसुत्रीचा फासा उरी रूते ठसाठसा

 त्या दोन ओळीत ती खूप काही सांगून जाते. इथे तिचा नवरा तिला जाच करत असतो, ते ती ‘मंगळसूत्राचा फासा' ची उपमा देऊन सांगते.
 स्त्रीच्या मनात प्रत्येक वेदनेच्या क्षणी माहेर जन्म घेत असते. माहेरचा परिसर, वातावरण, बालपण सगळं-सगळं तिला आठवत असतं.
 मैत्रिणीला माहेरचं कौतुक फावल्या वेळात सांगताना ती मनातल्या मनात माहेरात फिरून येत असते.

काय सांगू बाई! माहेराची बढाई
मात्या-पित्यानं लावली - येशीपासून अंबराई
इथून दिसतं माहेरीचं हिरवं रान ।
केवढं केळीबन! उतरीतो बागवान!

 माहेरची समृद्धी-संपत्ती, तालेवारपणा याचा अभिमान ऊरी दाटलेला असतो आणि तरीही तिचा सासुरवास मात्र सुटलेला नसतो. ती पुढं म्हणते,

उंच्या ओसरीला हंड्या लावल्या सवाई
भावाच्या बरोबरी मायबाईचे जांवाई
एकामागे एक येत्याल मागंपुढे

माझे ल्हाने बंधु माझ्या माऊलीचे झेंडे
सांगावा कासाराला बैस मैदानी मैदानी
बहिनी आम्ही लईजणी संग बंधवाची राणी
जाता माहाराला उंच पाऊल पडे
बापजी बयाबाई गंगासागर येती पुढे!

 माहेरचं वर्णन करताना तिची विलक्षण प्रतिभाच जणू सामोरी येते. माहेरची माणसं, भावजया, पिता, आई सगळा गोतावळा तिच्या मनात गुंजी घालतो. तिथल्या सुखात ती मनातल्या मनात पुन्हा पुन्हा न्हाऊन निघते.
 पण हेच बाईचे माहेर व तिचे तिथले कौतुक आई-बाप आहेत तोवरच आहे, याचीही तिला जाणीव आहे. त्यांच्यानंतर माहेर फक्त नावापुरतं उरणार हे तिला सतत जाणवत आहे; पण तरी भावाविषयी मात्र तिला अपार प्रेम आहे. तिथल्या भावजयांचा मात्र तिला भरवसा वाटत नाही; पण जोवर आपला बाप आणि आई जिवंत आहे, तोवर तिला काळजी नाही.
 बहिणाबाईंनीही माय-लेक आणि माहेराचं नात सांगताना म्हटलं आहे.

ऐक, ऐक योग्या ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते

 हे एक विलक्षण नाळबंध सत्य जे चिरकालासाठी टिकणारं आहे, ते त्या सांगून गेल्या आहेत. त्या मातेलाही जाणीव आहे. दूर कुठंतरी आपल्या काळजाचा तुकडा सासुरवास भोगत आहे त्यातून काही क्षणासाठी तरी त्याला विसावा मिळावा म्हणून आपणही या सासरीच्या कष्टासह इथं थांबायला पाहिजे. सासरी नांदायला पाहिजे. मायलेकीतला हा जिव्हाळा आहे त्यापाठी एक समदुःखीपण आहे. एक वेदनाही आहे.
 आणि म्हणूनच लोकगीतातली स्त्री म्हणते,

माय आहे तवर माहेर। बाप म्हणे येऊ जाऊ।
भाच्चे कवनाचे भाऊ। मना नको आशा लाऊ।
माय आहे तवर माहेर। बाप असा तसा भारी।
बंधवाची धर्मपुरी। भाचीयाची लंका दूरी।

 माहेर आणि माय याचं नात अतूट आहे. कधी बापाची माया थोडी उणी पडते कारण तो पुरुष आहे. इतर कितीही नातं-गोतं असलं तरी माय ती मायच सांगताना ती म्हणते,

मायेसारखी गं माया। येईना पुरुषाला।
संपादत नाही। दूध साळीच्या भाताला।

मायेसारखी गं माया। येईना पुरुषाला।
झाडामंदी वूरक्षाला। फूल येईना शेराला।
हजार माझं गोत। झाडीचा झाडपाला।
माय बाईच्या माझ्या। मीत चींचंच्या सावलीला।
मायेवाचून माहेर। कंथावाचूनी सासर।
सांगतं सईबाई। बाळावांचूनी गं घर।

 कोणा सईबाईच्या मनातली व्यथा या लोकगीतातून सामोरी आली अहे. मायेच्या प्रेमाची अनेक लोकगीते आढळतात. त्यामानाने सासूच्या छळाची कमी लोकगीतं आहेत. भावजयांच्या बाबतीत मात्र बरीच गाणी हेत. नणंद-भावजय नातं माहेराच्या बाबतीत महत्त्वाचे ठरतंच. कारण भावांना जरी बहिणीचं प्रेम वाटत असलं, तरी तितका प्रेमाचा ओलावा भावजयांना नणंदाबद्दल वाटत नाही. त्यांना नणंदा क़ळ लावणाऱ्या वैऱ्यासारख्या वाटतात. त्यांना वाटतं नणंदा आपला तोरा मिरवतील. माहेराहून काही ना काही सतत नेत राहतील.

भाऊ गं म्हणती  आल्या बहिणी भेटायाला
भावजया गं म्हणती  आल्या नणंदा लुटायाला॥
भाऊ गं म्हणती  बहिणीला द्यावा पाट
भावजया गं म्हणती  धरू दे नणंदा आपली वाट ।

 पण असं सगळं असूनही बहीण-भावाचं कधी वाईट चिंतत नाही. तिला एखादा तरी भाऊ असावा असं वाटतं. त्याच्याशी मनीचं गुज बोलता येईल. आईबापामागं एक वाट ओलाव्याची राहील म्हणून आईबहिणी लोकगीतातही म्हणतात,

बहिणीला भाऊ  एक तरी गे असावा
पावल्याचा खण  एका रात्रीचा विसावा

 अगदी फार दिवस नाही तरी एक रात्र तरी माहेर म्हणून त्याच्याकडे जाता येईल, ही आशा तिला वाटते. बाईच्या जातीला म्हणूनच माहेरापुढं धनदौलतीचं कौतुक वाटत नाही. माहेर नसेल तर त्याचं दुःख कुठलीच दौलतही कमी करणार नाही, म्हणून प्रत्येक सासुरवाशीण देवालाही मागताना धनदौलत । संपत्ती मागत नाही तर ती म्हणते,

देवबाप्पा नको देऊ धन तू दौलत
द्यावं माहेर खेळाया मायबापाच्या सावलीत

 स्त्रीच्या आयुष्याची सासर आणि माहेर ही दोन महत्त्वाची दालनं असतात. तिचं भावविश्वच खरंतर नात्यागोत्याभोवती बांधील असतं. सासरची माणसं तिला सांभाळायची असतात आणि माहेरच्या माणसांनी तिला सांभाळलेलं असतं. या नात्यात सगळीच वाईट नसतात; पण चढउताराचं सावट नात्यांवर पडत राहतंच. लोकजीवनात स्त्रीच्या आयुष्यात एक वेगळं सोसणं नोंदलं गेलं आहे. तिचा तो सुख-दुःखाचा हुंकार, ओवी, लोकगीतांसारख्या माध्यमातून तिनं व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे; पण त्यात कोणाबद्दलच दुष्टावा नाही, वैर नाही. मनाच्या तळवटातलं दु:ख कुठंतरी विसाव्याच्या ठिकाणी व्यक्त करावसं वाटतं. मग त्यासाठी जातं माध्यम बनतं आणि दुःखाची ओवी बनते. कधी मैत्रिणींच्या बरोबर खेळाच्या साह्यानं झिम्मा-फुगडी खेळताना, झोका चढवताना ते लोकगीत बनतं इतकंच; पण या सासर-माहेरच्या दालनात तिचं पुरं आयुष्य हिंदोळा घेत पूर्तीकडं धावत असतं.
लोककथागीतं

 माणूस हा गोष्टीवेल्हाळ प्राणी आहे. एखादी गोष्ट रंगवून सांगणे त्याला आवडते, तसेच गोष्ट ऐकणेही त्याला आवडते. त्यामुळे पूर्वापार कित्येक वर्षांपासून अनेक लोककथा अजूनही सांगितल्या, ऐकल्या जातात.
 व्यवस्थितपणे त्या कथांकडे पाहिले तर जाणवते, त्या कथांमधून त्या काळातली लोकसंस्कृती डोकावते. खूपदा अनेक चमत्कारही अशा कथांमधून आढळतात. देवांशी संबंधितही अनेक कथा आहेत. संतांशी संबंधित अनेक कथा आहेत. पशुपक्षी, भूत सैतान हे सगळे या लोककथांमधून डोकावत असतात. कोकणामध्ये वेताळ, भुतांच्या अनेक कथा आहेत. हे गावाची कशी राखण करतात हे सांगताना कोकणातील लोकरीवाज, तिथल्या माणसांची मानसिकता, तिथली सांपत्तिक स्थिती, तिथली पिकं या सर्वाची जाणीव त्यातून होते. महानुभवांच्या वाङ्मयात, लीळा चरित्रात अशा कथांचा जुना पुरावा सापडतो. त्याचप्रमाणे चक्रधरस्वामींनीही सांगितलेल्या अनेक गोष्टी आढळतात. मुस्लिम साहित्यातही अनेक गोष्टी आढळतात. त्या नुसत्या कथा नाहीत, तर त्यातून अनेक विचार मांडलेलेही आढळून येतात. कृष्णदेव उपाध्याय यांनी प्रेमाची अभिन्न भावना, अश्लीलतेचा अभाव, मानवी जीवनाच्या मूलभूत प्रवृत्तींशी अखंड साहचर्य, समृद्धी आणि मांगल्याची पवित्र भावना, सुख किंवा आनंद पर्यवसायी तसाच मीलनात कथेचा शेवट, रहस्यमयता, अद्भूतता आणि अलौकिकता याचे प्राबल्य, उत्कंठतेची प्रबल भावना आणि वर्णनातली स्वाभाविकता ही लोककथेची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
 पण जेव्हा आपण लोककथागीतांचा विचार करतो तेव्हा त्याचं एक वेगळं सौंदर्य आहे, हे जाणवून येतं. एखाद्या गीतातून लय-ताल साधत प्रभावी सादरीकरणातून कथा पोचवणं, खरं हे तर अवघड असते; पण जुन्या लोककथा गीतातून हे यशस्वीपणे सादर केले गेले आहे.  लोककथागीतांकडे पाहिलं की जाणवतं, त्या सर्वांमध्ये सर्वसामान्यांना लोभावणारी एक प्रकारची गेयता असते आणि तालासुरात ही कथा गुंफलेली असते. ही गीतं नक्की कोणी लिहिली त्यांची नावं कोठेच सापडत नाहीत, त्यामुळे या निर्मात्याच्या व्यक्तित्वाचा अभाव जाणवतो. सर्व लोककथागीतं बव्हंशी समहामध्ये गायिली जातात. ही लोककथागीतं परंपरेने वर्षानुवर्षे चालत आलीत त्यामुळे मौखिक परंपरेने जपली गेली आहेत. थोडेफार बदल त्यात झाले असतीलही; पण लोककथा गीतांमधला साधेपणा कुठेही उणावलेला नाही.
 खूपदा लोककथा गीतांमध्ये एकच घटना घेऊन त्यावर गीत रचलेले असते. उदा. द्रौपदीने थाळीतून अन्न निर्माण केले. ही घटना घेऊन त्यावर गीत बनते.
 गोंधळी, वासुदेव, वाघ्या-मुरळी, भराडी, पोतराज या लोकसंस्कृतीतल्या संस्थांनी त्यांच्या गीतामधून अनेक छोट्या-मोठ्या कथा सांगितल्या आहेत. जोगती-जोगतीणी, नंदी बैलवाला, बहुरूपी हेही लोककथा गीतं सादर करतात. लोकगीतांमध्ये कथा नसते; पण लोककथागीतांमधून कथानक असते. त्यामुळे लोककथागीतं ही मोठी असतात, प्रदीर्घ असतात. लोककथागीतांमध्ये रचनेची विविधता असते. कधी ओवी-छंद, कधी कडव्यांचे पुनरावर्तन असते. नाट्यात्मकता असते व बऱ्याचवेळा त्याला सादर करणाऱ्याच्या अभिनयाची जोडसाथ असते.
 लोककथा गीतांमध्ये पौराणिक प्रसंगावर आधारित अनेक लोककथागीतं आहेत. सीतास्वयंवर कसं काय घडलं, याचं वर्णनही एका लोककथा गीतात येतं.
 यामध्ये जनक राजाची राज्यसभा, स्वयंवराची सिद्धता आणि घडलेला प्रसंग याचे रसोत्कट वर्णन केलेले आहे.

राजा जनकाचा मंडप, सोन्याच्या दियेचे खांब
माणिक मोत्याची झालर

 स्वयंवर मंडपाला जे खांब उभे केले होते, ज्यावर दिवे लावले होते, ते सोन्याचे होते. मंडपाला लावलेली झालर मोत्याची होती. यातून जनक राजाची ऐश्वर्यसंपन्नता वर्णन केली आहे.
 स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे आले होते. त्यांचे जनकाने कसे स्वागत केले. शिवधनुष्य उचलण्याचा अनेक राजांनी प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. मग प्रत्यक्ष रावण उठला.त्याला त्याच्या ताकदीचा गर्व होता. तो उभा राहिला त्याचं वर्णन करताना म्हटलं आहे,

राजे मोठाले हारले रावन जोरानं हासला
दंड ठोकून उभा झाला
धनुष्य उचलाया गेला भार छातीवर पळला
माणदेह भईवर टाकला

 मोठ्या गर्वाने मिशीवर ताव देत उभा राहिलेल्या रावणाची फजिती झाली आणि मग शेवटी प्रभू रामचंद्र उभे राहिले

राम आखरी बसला, दरबारात उभा झाला
सरावाले परनाम केला
समदे पाव्हया लागले डोरे चित एक झाले
अंगुठ्याने फेकियेला धनुष्य वर उळवला
गमतीने झेलियेला

धनुष्य रामानं फिरवला, त्येचा खांडोर पाळला
सीता घाली वरमाला
झाला टाळ्यांचा गजर रामाचा जयजयकार
आनंदाचा वाहे पूर

 रामाने धनुष्य कसे पेलले आणि शेवटी सीतेनं त्याला वरमाला घातली आणि सीतास्वयंवर कसं घडलं, याचं उत्तम वर्णन या लोककथागीतांमध्ये येतं. हे वऱ्हाडी लोककथागीत आहे त्यामुळे तेथील प्रादेशिक भाषेचा संस्कार या लोककथागीतांवर झालेला आढळतो. छातीवर पळला, सरवाले परनाम केला, धनुष्याचा खांडोर म्हणजे तुकडा पाडला, असे विदर्भातले शब्द यात दिसून येतात.
 श्रावणबाळाची कथा तर प्रसिद्ध आहेच; पण त्यावरचे लोककथागीतही सुंदर आहे. खूपदा ही गीतं वाचली की, वाटतं यावर स्त्रीमनाचा प्रभाव आहे. कदाचित कोणा प्रतिभावंत स्त्रीनेसुद्धा ही रचली असतील. श्रावण बाळाच्या कथागीतांमधील श्रावणबाळाचा आई-वडिलांवर भक्तिभाव खूप सुंदर रीतीनं प्रकट झाला आहे. आई-वडिलांना काशीला घेऊन जाताना एका तळ्याजवळ थांबतो. आई-वडिलांना तहान लागली म्हणून पाणी आणायला जातो. तेथे दशरथ राजा शिकारीसाठी आलेला, त्याचा बाण त्याला लागतो, त्यावेळी दशरथ खाली येऊन त्याचा बाण काढायचा प्रयत्न करू लागतो, त्या वेळी या कथागीतात श्रावण बाळ त्याला म्हणतो,

बाण माझा काढू नका।
तिथं एक ईरक्ष्याचं झाड
तिथं माझा माय-बाप
त्याला पाणी जी पाजावं
मग माझा बाण काढावा.

 या कथागीतांमधील श्रावण त्याची बायको, श्रावण-दशरथ संवाद व दशरथ श्रावणाचे संवादही खूप वेगळे आहेत, ते कथागीताला वेगळा उठाव देतात.
 श्रावणबाळाचा मृत्यू झाल्यावर दशरथ त्याच्या आई-वडिलांना पाणी पाजायला जातो. त्यांना मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्यावर ते विलाप करतात. पुत्रवियोगाचे दुःख त्यांना सहन होत नाही. श्रावण बाळाचे आई-बाप दशरथाला शाप देतात.

माता कुरुंदंग आला बोलली दशरथ राजाला
तुला चौघजन पुत्र, तुला पानी न्हाई मिळायचं

 खरं तर तोपर्यंत दशरथ राजाला पुत्र नव्हता; पण शापातून त्याला पुत्र होणार, हा संकेतही येतो.

या कथागीतात ओघवती भाषा दैनंदिन जीवनातीलच आहे, प्रवाही आहे, त्यामुळे मनाची पकड घेते. गीताचा गोडवा वाढवते, अशी खूपशी लोककथागीतं मनाला स्पर्श करणारी आहेत.
 सखुबाईचे गाणे, गांधारीचा वसा, शिव-पार्वतीचा डाव, चांगुणेची गोष्ट, चंद्रावळ ही सगळी कथागीते पाहिली, की त्यामागे स्त्रीमनाची सुप्त भावना दिसून येते. शिव-पार्वतीच्या गाण्यात गिरजा शंकराच्या आठवणीने अस्वस्थ होते व भिल्लीणीचे रूप घेते, त्याचे वर्णनही मोठे विलोभनीय येते.

मन्नाचा घट केला, बेस भिल्लिणीचा घेतला
चोळी उरफाटी अंगाला, बाणाचा भाता पाठीला काय
हाती तीरकमठा घेतला, चुन्याची टिकली गालाला

 साध्या-सोप्या भाषेतले हे वर्णन कथागीताला जनमानसाच्या मनापर्यंत नेते व रमवते.
 संत सखूचे गाण्यातही तिची पांडुरंग भक्ती, तिची पूजा, सासूशी होणारा संवाद हे सगळं येत. तिच्या भक्तिमार्गात येणारे अडथळे येतात. सासूकडून तिचा छळ होतो; पण तिची भक्ती भंगत नाही या कथागीतातही

सखुबाईच्या सोबतिणी घरी आल्या सांगत सासूशी
सून सखुबाई तुमची गेली पंढरीशी
सखुबाईच्या सासूला राग आला जाऊनी सांगती पुत्राशी
हातात काठी लागे पाठी, सखू अडवली रस्त्याशी
हाणून मारून सखू आणली घराशी, दोर लावला खोलीमधी
कोंडून टाकली

 या कथागीतात छळणारे सासू-सासरे आहेत, कान भरणाऱ्या बायका आहेत. साक्षात भगवंत आणि रुक्मिणीही आहेत. या कथागीताचा शेवट सखूची स्तुती करतो

धन्य धन्य सखू सून तू भाग्याची खरी
नाना हा सिखू सखू म्हणून आठवू कुठवरी

 या कथागीतात त्या काळचे स्त्रीजीवन येते. त्यांची देवभोळी मानसिकता येते; पण त्याचबरोबर सखूच्या रूपाने एक आदर्श येतो. श्रद्धा दिसून येते हेही खरं.
 आपल्या लोकसंस्कृतीत तर कृष्णाबद्दलच्या अनेक कथा प्रचलित आहेत. अगदी वासुदेवसद्धा त्याच्या अनेक गीतांतून कृष्णमहिमा वर्णन करतो. अनेक गौळणी कृष्णाच्या आयुष्यावरील घटना व त्याचं वर्णन करतात. त्याच्या बाललीला, रासलीला, कालिया मर्दन, कंस वध अशा विषयावरच्या अनेक कथा लोककथा गीतांतूनही आल्या आहेत. मुळात कृष्ण या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. सर्वसामान्यांना तो आपल्यातला वाटतो. तो जितका दैवी आहे तितका मानुषी आहे. कृष्ण आणि त्या गवळणीवरून अनेक गीतं प्रचलित आहेत. राई आणि चंद्रावळ यांच्या संबंधात कृष्णाच्या आयुष्यावरीलच एक लोककथागीत लोकप्रिय आहे.
 राई आणि चंद्रावळ या दोन्ही कृष्णाच्याच गवळणी. दोन्ही त्याच्या आवडत्या; पण राईचे लग कृष्णाशी होते आणि चंद्रावळीचे दुसऱ्या एका गवळ्याशी होते; पण चंद्रावळींच्या मनात एकटा विचार येतो, की राईला जाऊन भेटावं. खूप दिवस तिची गाठ-भेट नाही. ती मनातला विचार सासूला सांगते. सासूला राईचे कृष्णाशी लग्न झालेय हे माहिती आहे. तिला कृष्णाविषयीच्या वेगवेगळ्या अफवा माहिती असतात. ती चंद्रावळीला सांगते,

नको गं नको चंद्रावळी
मथुरेचा कान्हा आखाळी
नारी पुरुषांच्या भोगितो

 कृष्ण हा चारित्र्याने चांगला नाही आणि तो परस्त्रीची अब्रू लुटतो, त्यामुळं तू त्याच्याकडे जाऊ नको, असं तिची सासू सांगते; पण चंद्रावळीच्या मनात राईला भेटायची उत्कट इच्छा असते. त्यामुळे दही-दूध घेऊन ती मथुरेच्या बाजारात येते. तिच्याबरोबर इतर गौळणीही असतात. ही बातमी वेशीराख्या कृष्णाला कळवतो; पण कृष्ण त्यालाच त्यांच्याकडून अशीलदान घ्यायला सांगतो; पण चंद्रावळ ही निर्भय आहे. तितकीच बंडखोरही आहे. तिला ते आवडत नाही. ती वेशीराख्याला खडसावते व बाणेदार उत्तर देते. कथागीतात ते सुंदर वर्णन आले आहे. ती म्हणते,

होऊ दे दह्याचा विकरा, होऊ दे लोण्याचा विकरा
होऊ दे तुपाचा विकरा, उरू दे बेरी ना बा शेरी
मग घालीन तुझ्या तळहातावरी,
उठा साथीच्या गवळणी, द्या गं तोंडीच्या तोंडी
उपटा माथीयाची शेंडी

 चंद्रावळ व साथीच्या गौळणी वेशीराख्याची शेंडी उपटतात, त्याची काठी पळवून त्यालाच हुसकावून लावतात. ही तक्रार घेऊन वेशीराखा कृष्णाकडे जातो. मग कृष्ण स्वत:च वेशीराख्या म्हणून येतो; पण तोपर्यंत चंद्रावळ रागाला आलेली असते. ती राईला न भेटताच जायला निघते. तेव्हा कृष्ण तिला तिनं राईला भेटावं म्हणून विनवण्या करायला लागतो. तिला न भेटता जाऊ नको म्हणतो; पण माझा पती खट आहे, मला वेळ झाला, मी जाते म्हणून जायला लागते. कृष्णाचं ती न ऐकता परत निघून येते. राईला न भेटता. कृष्णही तिच्या पतीचा अपमानकारक शब्दांनी उल्लेख करतो. त्याचा चंद्रावळीला राग येतो.
 पण नंतर कृष्ण स्वत:च राईजवळ तिचा स्त्रीवेष मागतो आणि राईचे रूप घेऊन तो चंद्रावळीला भेटायला तिच्या घरी येतो. कृष्णाने राईचे रूप घेतल्यामुळे त्याला कोणीच ओळखत नाही.
 चंद्रावळीच्या पतीला व सासूला साधा संशयही येत नाही. खूप दिवसांनी बहीण भेटायला आली, त्या दोघींना गप्पा मारता याव्यात. मनातलं गुज एकमेकींना मोकळेपणी सांगता यावं म्हणून चंद्रावळीचा पती राईरूपी कृष्णाला चंद्रावळीच्या खोलीतच झोपायला सांगतो. रात्री मग कृष्ण स्वरूपात प्रकट होतो व चंद्रावळीचा उपभोग घेतो. खूप वेळ तिच्या संगती मिळावा म्हणून कृष्ण ती रात्र सहा महिन्यांची करतो आणि नंतर गोसाव्याचे रूप घेऊन निघून जातो, असे लोककथागीतात वर्णन येते; पण कृष्णसंगतीचा काळ चंद्रावळी विसरू शकत नाही. तिचा नूर कोमेजतो. दारातली तुळसही वाळून जाते. तिचा पती तिला त्याचे कारण विचारतो तेव्हा शेवटी ती म्हणते,

गोसाव्याने युगत लावली
त्याचा हात बा लागला

 लोककथागीतांतून आलेले कृष्णाचे वर्णन व वर्तन त्याच्यातल्या रंगेल नायकाचे रूप प्रकट करते.
 या लोककथागीतात काही वर्णनं मोठी सुंदर आहेत त्यात चंद्रावळी मथुरेच्या बाजारात जातानाचे वर्णन

आणलं साथीशी नंदी, ओढलं रेशमी पठाड
घेतल्या सोनीयाच्या मेखा, घेतली रेशमांची दावी

 असं केलं आहे. चंद्रावळी हीच या लोककथा गीताची नायिका आहे. तिचं व्यक्तिमत्त्व, तिचं वागणं, तिचा वेशीराख्याबरोबरचा संवाद यातून साकार होत जातो. त्या दोघांतला संवाद चंद्रावळीचा बाणेदारपणा स्पष्ट करतो.

ती म्हणते,
'अरं तू येशीराख्या दादा, आहेस कुणाईचा कोण?' तो म्हणतो,
'मी कान्हाचा नोकर
तू कुणाईची कोण?'
ती म्हणते,
'मी गवळ्याची गवळण'

 अशी संवादांची खुमासदार पेरणी या लोककथागीतात झाल्याने ते सगळं ऐकताना माणसं रंगून जातात. या सर्वांबरोबर त्या वेळचं समाजजीवन, गवळ्यांचं जीवन, कृष्णचंद्रावळ शृंगार हे सगळंही या गीतातून सामोरी येतं.
 काही लोककथागीतांमध्ये कथा फारशी नसते. एखादी घटना आणि तिचे वर्णन असे त्याचे स्वरूप असते. वाघ्या-मुरळी मल्हारीची खूप गीते गातात. त्यात मल्हारीच्या लग्नाचं वर्णन कथागीत आहे.
 यामध्ये मल्हारीचं लग्न कुठं लागलं, सीमान्त पूजन कुठं झालं, हळद कशी लागली, तेलन पडणे समारंभ, नवरदेवाच्या जेवणाच्या पंक्ती, लग्नाचा मांडव कसा होता, नवरदेवाला म्हणजे मल्हारीचा कंकण बांधण्याचा समारंभ या सर्वांचं वर्णन येतं. लग्नाच्या मंडपाचे वर्णनात,

मांडव घातले पितळी लाखा
तांबानी मेरव सोनेरी देखा
मांडव गडावर निमनं झाड
छाया पडे धम्मा घोर
छाया खाली देव रमल!

 मल्हारीच्या लग्नाचं वर्णन करताना ऐकणाऱ्याइतकाच करणाराही रमतो. मल्हारी बाणाई, म्हाळसा यांच्या कथा रंजक आहेत. त्यात देवाचं मानुषीकरण आहे. ते लोकमानसाला जास्त भावणारं आहे. मल्हारीच्या लग्नाचा वृत्तांत सांगताना म्हटलं आहे,

नवरदेवाचे सीमांत पुजिले मालेगावात
घोडा चंदनपुरीत
नवरदेवाचे कंकण सुटले काकण बंडीत
करवल्या माहुरगडात

 सांस्कृतिकदृष्ट्या या कथागीतातून धनगर समाजातील लग्नसमारंभ कशा पद्धतीने साजरा होतो, याचे वर्णन येते. लोककथागीतामध्येच विठ्ठलाने घेतलेल्या संतपरीक्षेची ही एक सुंदर कथा आहे. ओवी रचनेत ही कथा गुंफली अहे. नामदेवाला विठ्ठलाच्या जवळीकीचा थोडा अहंकार झाला होता. आपलं विठ्ठल ऐकतो, आपल्याबराबेर तो एका ताटात जेवतो, या भावनेने नामदेवाचा अहं सुखावला होता, तेव्हा विठ्ठलालाही इच्छा झाली त्याला कुर्मदासाची भक्ती दाखवावी म्हणून प्रथम विठ्ठल आपले वाहन गरुड याला कुर्मदासाला आणण्यासाठी पाठवतो. विठ्ठल म्हणजे विष्णूच. विष्णूचं म्हणजे विठ्ठलाचं वाहन गरुड कुर्मदासाकडे येतं; पण कुर्मदास हा विठ्ठलाचा परमभक्त. तो हात जोडून गरुडाला म्हणाला,

देव पिता, माता रुक्मिण
त्यांचे तुम्ही वाहन।
पाय कसे लावू सिंहासनाला
ठेवतो चरणी मस्तकाला।

असं म्हणून कुर्मदास म्हणतो विठ्ठलाला माझा मनोभावे नमस्कार कळवा. माझ्या मनात त्याच्याविषयी असलेली अपार भक्ती आणि प्रेम आहे, आदर आहे, हे विठ्ठलाला कळवा. गरुड तो निरोप घेऊन येतो. विठ्ठल मनाशी हसतो. नामदेवाची परीक्षा घ्यायचं मनात येतं. नामदेवाचा अहंकार विठ्ठलाच्या ध्यानी आलेला असतो.

 गरुडाचा निरोप मिळाल्यावर ज्ञानदेव आणि नामदेवाला घेऊन विठ्ठल कुर्मदासाकडे निघतो

श्री क्षेत्र पंढरपूर । रुक्मिणीवर
निघाले संतपरीक्षेला
संगे ज्ञानोबा. नामदेवाला॥
एक ताटी जेवला भोजनाला।

 तिघे चालले असताना वाटेत सावता माळ्याचा मळा दिसला. हिरवागार बहरलेला मळा पाहून विठ्ठलाच्या मनी येते, नामदेवाच्या गर्वहरणाची ही चांगली वेळ आहे. विठ्ठल प्रत्यक्ष परमेश्वरच

न कळे ईश्वरी माया
गर्व उतराया।
थोडे थांबवले दोघा जणाला
सावता माळ्याच्या कुंपणाला

 विठ्ठल म्हणाला, मी थकलोय. बरेच अंतर चाललो. मला तहान लागली आहे. तुम्ही दोघे इथंच थांबा. या हिरव्यागार मळ्यात जाऊन कुठूनतरी मी पाणी पिऊन येतो. ज्ञानदेव आणि नामदेव दोघांना मळ्याच्या कुंपणापाशी उभा करून विठ्ठल सावता माळ्याकडे गेले. समोर प्रत्यक्ष परमेश्वर उभा पाहन सावतामाळी धन्य झाला. त्याला गहिवरून आले. तो विठ्ठलाच्या सामोर आला व त्याला त्याने वंदन केले. देवाने मग नाटक करायचे ठरवले आणि सावता माळ्याला तो म्हणाला,

 दोघे मिळून लागला पाठी
लूटायासाठी।
कुठेतरी जागा पाहून मजला
लपवून ठेव, थरकाप सुटला॥

 या दोनजण मिळून माझ्या पाठीमागे लागले आहेत. मला लुटण्यासाठी ते केव्हापासून माझा पाठलाग करत आहेत. आता तू कुठंतरी चांगलीशी जागा पाहून मला लपवून ठेव. भीतीनं माझ्या अंगाचा अगदी थरकाप सुटला आहे. विठ्ठलाची ही स्थिती पाहून सावता माळ्यानं क्षणभर विचार केला आणि प्रत्यक्ष परमेश्वरच सांगतोय म्हटल्यावर त्याला ते खरंही वाटलं. तो हात जोडून परमेश्वराला म्हणाला,

उस मळा लाविला घर
छपून निर्मळा
बसा तुम्ही देवा अडचणीला
ठेवतो पाळत चोरट्याला॥

 उसाचा मोठा मळा आहे त्यामध्ये लपून बसावं. या गर्द उसात तुम्ही कोणाला दिसणार नाही. मी बाहेर जाऊन त्या चोरट्यांच्या पाळतीला उभा राहतो; पण देवाला उसात लपायचं नव्हतंच. त्यानं सावता माळ्याला मला तुझ्या पोटात लपायचं आहे, अशी इच्छा प्रकट केली आणि भक्तीत स्वत:ला समर्पित केलेला सावता माळी त्या गोष्टीला लगेच तयार झाला. त्यानं लगेच स्वत:जवळच्या खुरप्यानं स्वत:चं पोट फाडलं. त्यातून देव आत गेले आणि पोट बंद झालं.
 इकडं कुंपणाजवळ बसून-बसून ज्ञानदेव व नामदेव दोघेही कंटाळले. पाणी प्यायला गेलेला विठ्ठल परतला का नाही पाहायला दोघे मळ्यात निघाले.

पाठीमागे नामा दिलगीर
येईना ईश्वर।
बरोबर घेऊन ज्ञानोबाला
निघाले दोघे चौकशीला ॥

 सावता माळ्यासमोर दोघे आले. त्याच्याजवळ विठ्ठलाला कोणी पाहिलं का? अशी चौकशी केली. तेव्हा सावता माळ्याच्या पोटात विठ्ठल होता, तोच सावता माळ्याच्या मुखातून बोलू लागला.
 'कोण रे तुम्ही? कुठून आलात? मी तुमचा स्वामी आहे माझ्यामध्येच तुमचा विठ्ठल आहे.' त्याच्या अशा बोलण्यानं नामदेवाला हसू आलं. कोणाचा कोण हा आणि म्हणतो माझ्यात तुमचा विठ्ठल आहे. कारण तेव्हा विठ्ठलाची फक्त आपल्याशीच सलगी आहे; असा अहंकार त्याच्या मनात होता; पण सोबतीला असलेल्या ज्ञानदेवाने सर्व प्रकार जाणला. ज्ञानदेवाचे लक्ष सावता माळ्याच्या पोटाकडे गेले. दाराच्या फटीत पदर अडकावा तशा पद्धतीनं सावता माळ्याच्या पोटाच्या फटीमधून विठ्ठलाचा शेला बाहेर डोकावत होता. नामदेवाचे लक्ष त्या शेल्यावर गेलं. त्यानंही विठ्ठलाचा तो शेला ओळखला. प्रत्यक्ष विठ्ठलाला सावता माळ्यानं स्वत:चं पोट कापून आपल्या पोटात लपवलं, हे पाहून सावता माळ्याची भक्ती किती श्रेष्ठ आहे, हे त्याला जाणवलं. क्षणात नामदेवाचे गर्वहरण झाल आणि तो मग सावता माळ्याला विनवणी करू लागला.

दीन होऊन लोटांगण घाली
तुमच्या हृदयाशी।

साठवले ब्रह्मांड नायकाला
एक वेळ भेट करा मजला॥

 आणि नामदेवाचे गर्वहरण झाले. हे पाहून मग स्वत: विठ्ठलच सावता माळ्याच्या पोटातून बाहेर आले. सर्वांनी विठ्ठलाला नमस्कार केला. नामदेवालाही विठ्ठलाने हे कशासाठी केलं, हे ध्यानात येतं. ज्ञानदेवही नामदेवाला म्हणतो, 'तुझं अहंकाराचं पाप आता धुवून निघालं आहे.'
 हे लोककथागीत संतपरीक्षा म्हणून प्रसिद्ध आहे. देवावरील भक्ती. देवानं भक्ताची घेतलेली परीक्षा एक वेगळा अनुबंध प्रकट करणारं आहे.

 लोकसंस्कृतीत वेगवेगळ्या अनुषंगानं अनेक लोककथागीतं प्रचलित आहेत. ही गीतं प्रसंगी माणसाचं मन रिझवतात; पण त्याचबरोबर परंपरेचा लोकजीवनाचा एक खजिना जपून ठेवतात व पुढच्या पिढीपर्यंत पोचवतात, हे नक्की.
मराठी मनावरचे गारूड : भारूड

 भजनी मंडळामध्ये काहीजण अभंग म्हणणारे असतात. काही जणांचा आवाज आणि लय गौळणी म्हणताना खुलतो, तसेच काहीजण भारूड म्हणण्यात पटाईत असतात. एखाद्या मोठ्या सार्वजनिक ठिकाणी भजनाचा कार्यक्रम असला, की अशी भारूड म्हणणारी खास मंडळी बरोबर घेतली जातातच. भारूड हा तसा नाट्याच्या अंगाने जाणाराच प्रकार. खेडेगावात लळीत' हा प्रकार आढळतो. तोही नाट्यप्रकारच. यात माणसं वेगळी सोंगे घेऊन नाट्यमय भारूड सादर करत असतात. भारुडामुळे श्रोतृवर्गात विनोद निर्माण होतो, लोक हसतात. एकजण अगोदर थोडीफार प्रस्तावना करतो आणि मग भारुडाला सुरवात करतो. दरवर्षी आषाढी-कार्तिकीला पंढरीची वारी असते. लाखो भाविक लोक या वारीत सामील झालेले असतात. 'ज्ञानबा-तुकाराम' च्या नामगजरात लोक पायी चालत असतात. जिथे पालखीचा मुक्काम पडेल तिथे रात्री जेवणं वगैरे झाली, की अशा भारुडांनाही रंग चढतो. एकाचे म्हणून झाले की दुसऱ्याने. हास्यकल्लोळ उठत राहतो. दिवसभर चाललेल्या श्रमाचाही विसर पडत जातो. वारकरी भारूड ऐकताना तल्लीन होतात, देहभान विसरतात.
 भारुडातून समाजप्रबोधन होतच असते. यातही अध्यात्माचे निरुपण असतेच; पण ते एखाद्या प्रसंगाच्या, गोष्टीच्या रूपानं सांगितलं जातं. बऱ्याच संतांनी भारुडं लिहिली आहेत. ज्ञानदेव, समर्थ रामदास, तुकाराम महाराज, संत एकनाथ, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, निळोबाराय, बहिणाबाई यांसारख्या संतांची भारुडे अजूनही म्हटली जातात. यांच्याबरोबरच नाथसंप्रदायातील महिपतीनाथ, देवनाथ, दत्त संप्रदायातील दासोपंत, महानुभाव संप्रदायातील लोकांनीही भारुडे लिहिली आहेत, तरीही संत एकनाथाची भारुडे मात्र जास्त लोकप्रिय आहेत. भारूड म्हटले, की एकनाथांचेच नाव डोळ्यांसमोर येते.
 याला कारण म्हणजे लोकसमाजातील एकनाथांचा वावर हा सूक्ष्म अध्ययन करणारा होता. माणसांचे स्वभावदोष जाणण्याची विलक्षण नजर त्यांच्याजवळ होती. त्यांचे अनुभवविश्व हे व्यापक होते. त्यांनी भरपर प्रवास केला होता, त्यामुळे त्यांनी त्यांचा हा सगळा अनुभव मनोरम रीतीने भारुडामध्ये व्यक्त केला आहे. प्रपंच आणि परमार्थ साधताना माणसाची उडणारी त्रेधातिरपीट त्यांनी भारुडातून मांडली. लौकिक आणि पारलौकिक गोष्टींचा योग्य मेळ एकनाथांनी भारुडात साधला. डॉ. रामचंद्र देखणे यांनी एकनाथांच्या भारुडांचे वर्गीकरण त्यांच्या 'भारूड आणि लोकशिक्षण' या ग्रंथात दिले आहे. ते पाहिले. की जाणवतं एकनाथांची प्रतिभा किती विलक्षण होती. जवळपास साडेतीनशे भारुडे एकनाथांनी लिहिली. प्रबोधनात्मक दृष्टिकोन ठेवताना वेगवेगळी मानवी रूपे म्हणजे कधी वासुदेवाच्या, जोशी, पांगुळ, पिंगळा, सरवदा यांच्या मुखातून भारूड वदवून लोकशिक्षण केले. फक्त ते करताना भारूड हे माध्यम म्हणून वापरले.
 वासुदेव हा पहाटेप्रहरी दारात येतो; पण त्याच्या भारूड गीतातून तो उपदेशच करतो.

कर जोडोनि विनवतो तुम्हा
तुम्ही वासुदेव वासुदेव'म्हणा
नको गुंतू विषय कामा
तूम्ही आठवा मधुसूदना
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा

 कुठल्याही विषयात गुंतू नका म्हणजे थोडक्यात आपल्या विकारावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न सामान्य माणसाने साधायचा कसा? तर त्यासाठी तुम्ही मधुसूदनाचे म्हणजे कृष्णस्मरण करा. वासुदेव वासुदेव असे नामस्मरण करा. सर्वसामान्य प्रापंची जगण्यातही वासुदेवाचे स्मरण करणे सोपे असते. एकनाथ म्हणतात,

न लगे तीर्थांचे भ्रमण
न लगे दंड मुंडण
न लगे पंचाग्नि साधन
तुम्ही आठवा मधुसूदना
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.

 त्यासाठी गावोगावी भटकत तीर्थांना भेट द्यायची गरज नाही की, कोठे जंगलात वा एकांतस्थळी सर्वांपासून प्रपंचापासून दूर जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाही किंवा व्रतवैकल्ये करून, उपासतापास करून शरीराला कष्ट द्यायचीही गरज नाही. घरात कुठेही एका ठिकाणी शांत बसून मन एकाग्र करून वासुदेवाचे, त्या नारायणाचे भक्तिभावाने क्षणभर स्मरण केले तरी पुरे आहे.
 एकनाथांचे समाजवाचन चांगले होते. आजूबाजूला बिघडत चाललेला समाज, भोंदूगिरी, राज्यकर्त्यांचे अत्याचार त्यांनी पाहिले. रयतेलाच जाणकार माणसं म्हणजे पाटील, चौगुले, महाजन वगैरे मंडळी त्रास देऊ लागली. लुटू लागली. सगळीकडे अनाचार माजू लागला. अशावेळी कोणी माणूस आता यातून समाजाला तारेल, ही इच्छा संपू लागली. दैवी अवतार घडला तरच यातून मार्ग निघेल, असं वाटू लागल्यावर एकनाथांनी कडकलक्ष्मीच्या मुखातून भारूड व्यक्त केले आणि त्या जगन्मातेलाच विनवणी केली. 'बये दार उघड' आता वेळ आली अहे. तुला सगुण रूप धारण करावे लागेल, याची विनवणी केली आहे.

उदो उदो ऐसा शब्द गाजतो
कामक्रोध दैत्यावर कोरडा कडाकडा वाजतो

ज्ञानपोत पाजळतो
बोध परडी हाती घेतो
प्रेमाचा पाऊल पुढे ठेवतो
अहं शंखासुर दैत्य बळी देतो.

 बोधाची परडी हातात घेऊन ज्ञानपोत पाजळून अहंकारी शंखासुराला बळी देत महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आहे.
 सगळ्यांचे भविष्य सांगत गावोगावी फिरणारे जोशी त्यांच्या मुखातून नाथ भारूड लिहितात.

मी आलो रायाचा जोशी
होरा ऐकाजी मायबाप
येथून पुढे बरे होईल
भक्ती सुखे दोंद वाढेल
फेरा चौऱ्यांशीचा चुकेल
धन मोकाशी
मी आलो रायाचा जोशी

 तुम्ही सद्गुरूला शरण गेलात त्यामुळे आता विषमता संपेल, अज्ञान दूर होईल, विवेक वाढीस लागेल, तुम्हाला चांगले दिवस येतील, असे भविष्यमान हा जोशी सांगतो, पण त्यासाठी सद्गुरूला शरण जाणे महत्त्वाचे आहे, हेही तो लोकमानसाच्या मनावर भारुडाच्या रूपाने बिंबवतो.
 एकनाथांनी जाती-व्यवसाय दर्शविणारी भारुडेही लिहिली आहेत. भट-भटीण, महार-महारीण, माळी, कंजारीण, वैदीण, शारीरिक व्यंगाच्या माध्यमातून म्हणजे मुका, आंधळा, बहिरा, नकटा यातून भारुडांची रचना त्यांनी केली आहे.

मुका झालो वाचा गेली॥
होतो पंडितमहाज्ञानी। दशग्रंथ षट्शास्त्रपुराणी
चारी वेद मुखोद्गतवाणी। गर्वामध्ये झाली सर्व हानी॥
जिव्हा लाचावली भोजना। दुग्धघृत शर्करा पक्वान्ना
निंदिले उपान्ना। लेणे पातळो मुखबंधना॥
या साधुसंताची निंदा केली। हरिभक्ताची स्तुती नाही केली
तेणे वाचा पंगु झाली। एका जनार्दनी कृपा लाधली॥

 एकेकाळी वाचा असून असणाऱ्या ज्ञानाचा गर्व केला. भोजनाची अति-इच्छा केली. साधुसंताची निंदा केली. हरिभक्ताची स्तुती केली नाही. परिणामी वाचा जाऊन मुकेपण आले. यातही प्रबोधन आले आहेच.
 आंधळ्यामुखी भारूड वर्णताना एकनाथ म्हणतात,

पूर्वजन्मी पाप केले। ते अधिक विस्तारिले।
विषयसुख नाशिवंत। सेविता तिमिर कोंदले।
चौऱ्याऐंशी लक्ष योनी। फिरता दुःख भोगिले।
ज्ञानदृष्टी हारपली। दोन्ही नेत्र आंधळे॥

 ज्ञानदृष्टी हरपली, की आंधळेपणाशिवाय काही उरत नाही. चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून असंख्य दुःखे भोगली आहेत. ज्ञानदृष्टी हरपल्याने जे अंधत्व आलेय मग

कवणा मी शरण जाऊ। दृष्टी देईल निर्मळ॥

 याला कोणाला आंधळे बनल्यावर शरण जावे जो निर्मळ दृष्टी देईल, असा प्रश्न निर्माण झालाय.
 मग एकनाथ म्हणतात,

धर्म जागो सद्गुरूचा। जो का परउपकारी
आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम उच्चारी॥धृ॥


 यावरही सद्गुरूशिवाय दुसरा आसरा नाही. तोच परोपकारी आहे. सद्गुरूला शरण जाणे त्याचे नामस्मरण करणे महत्त्वाचे. नाथांनी काही व्यवसायात्मक भारुडे लिहिली. त्यात सौरी, कुंटीण, जगझोडी वगैरे आहेत.
सौरीत एकनाथ लिहितात,

भोळा दादुला बाई म्या केला। संसार सारा नागविला॥१।
सौरी होऊन गेले सुख नाही झाले। पुनरपि संसारी मी हो आले
चार-पाच-सहा अठरासी रतले। त्यांचे संगे मन चावट झाले हो
एका एकी संत संग झाला। एका जनार्दनी संसार तुटला॥

 सौरी म्हणजे परमेश्वराची दासी, असा अर्थ आहे. सांसारिक सुख-दुःखांना अडचणींना संकटांना तोंड देता-देता माणूस थकतो व परमार्थाकडे वळतो; पण काम-क्रोधादी विकार पुन्हा प्रपंचाचा मोह लावतात. प्रपंचातच खेचण्याचा प्रयत्न करतात, त्या वेळी सद्गुरूची गाठ पडून त्याला सत्संग घडतो व त्यामुळे त्याची प्रपंचातून खऱ्या अथार्न सुटका होते.
 नातीगोती सांगणारी एकनाथांची भारुडे जास्त प्रसिद्ध आहेत. त्यात खाशी विनोदनिर्मिती आहे. दादला, पोर, मुलगी, वगैरेचा समावेश या नाती-गोती सांगणाऱ्या भारुडात करता येईल.

मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही॥१॥
मजाविता मला दादला नलगे बाई॥धृ॥

फाटकेंच लुगडे तुटकीसी चोळी शिवाया दोरा नाही॥२॥
जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी। वर तेलाची धार नाही॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही॥४॥
सुरतीचे मोती गुळघाव सोने। राज्यात लेणे नाही॥५॥
एका जनार्दनी समरस झाले। तो रस तेथे नाही॥६॥

 विवेक हरवलेला नवऱ्यासंगे घडलेला संसार एकनाथांनी 'दादला' या भारुडात वर्णन कला आहे.
 अविद्यारूपी पार्थिव देहात जर परमेश्वराविषयीचा अंतरीक शुद्धभाव नसेल, तर त्याला काही अर्थ नाही. परमात्म सुखाची गोडी अवीट आहे ती प्रपंचात नाही.
 'जावई' या नात्यावरचे एकनाथांचे भारुडही लोकमानसात लोकप्रिय आहे. खूप दिवसांनी जावई सासुरवाडीला येतो. जावयाचे कौतुक सासुरवाडीला होतेच. इथली सासू थोडी जास्त हुशार आहे. जावई आणि सासू यांच्या संवादातून एकनाथांनी विनोदनिर्मिती केली आहे.

लई दिसानी आला जावईबुवा..
जावयाला करीन म्हणलं पुरणाची पोळी
पण घरात पहाते तर टोपल्यात भाकरी शिळी
आता कशी करायची पोळी...
खरं सांगा, मी काय पोळी करण्याजोगी नव्हती व्हय
लई दिसांनी आले जावईबुवा...
जावयाला घेईन म्हणलं पगडी
पण घरात पहाते तर आमचीच पोरबाळं उघडी नागडी
आता कशी करायची पगडी?
खरं सांगा, मी काय पगडी करण्याजोगी नव्हती व्हय
लई दिसांनी आले जावईबुवा...
जावयाला घेईन म्हणलं कडं
पर अवचित निघालं सोनाराचं मढं
आता कसं करायचं कडं

 इथं जावयाला सासूकडून काही तरी चीजवस्तू मिळेल, चांगलंचुंगल खायला मिळेल, अशी इच्छा असते आणि हुशार सासू काही ना काही सांगून त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न करते.

एका जनार्दनी जावई आला
न आला तसाच निगून गेला

 असा या भारुडाचा शेवट होतो. इथं क्रोध अहंकाररूपी जावई, एकनाथांनी प्रतीकात्मकता वापरली आहे. हा जावई जीवरूपी सासूच्या घरी येतो; पण हा असला क्रोध अहंकाररूपी जावयाचं जास्त कोडकौतुक झालं, तर तो इथेच राहील व जीवरूप सासूच्या घरावर कायमचा कब्जा करेल आणि त्याचे अधिपत्य वाढले, तर मग जिवाचं स्वातंत्र्यच हरवेल. आत्मसुखापासून जीव दुरावेल त्यापेक्षा या असल्या जावयाचे लाड करणे न बरे त्याला काहीतरी कारणे सांगून परत पाठवणे योग्य. आत्मसुख अबाधित राखण्यासाठी क्रोध, अहंकार वगैरे विषयवासनांना दूर ठेवणे गरजेचे आहे, तेच नाथांनी या भारुडात सांगितले आहे. अशी भारुडे-कीर्तन वा भजनातून रंगविताना कोणीतरी पुरुषच सासूचे रूप घेतो व मोठ्या ठसक्यात साथीदारांच्या साह्यानं संवादाचा आधार घेत भारूड उभे करतो. त्यामुळे लोकरंजन तर होतेच; पण प्रबोधन होण्यासही मदत होते. सामाजिक वृत्तीदर्शक भारुडामध्ये जागल्या, चोपदार वगैरेंचा समावेश होतो. नाथांच्या भारुडात विलक्षण वैविध्य आहे. 'जागल्या' मधून ते समाजाला जागे करतात. जागल्या म्हणतो

रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा।
तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा।
उजेड पडताना गळा पडेल फासा॥

 हा जागल्या स्वत: जागृत आहे आणि तो लोकांच्यात ज्ञानरूपी जागृती आणण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या नगरीचे तो वर्णन करतो ती म्हणजे मानवाचा देह आहे. तो म्हणतो,

तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी।
तुमच्या रोजेला दोन लोभिष्ट नारी
त्यांच्या योगे दुःखे नगरात भारी॥

 वासना आणि तृष्णेच्या रूपानं दोन लोभिष्ट नारी तुमच्याभोवती आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दु:ख प्राप्त होत आहे, त्यासाठी
 जुन्या ठेवण्याचा तुम्ही पुर्जा काढा। त्याच्या आधारे बोलेन घडाघडा।

एका जनार्दनी धरा बळकट मेढा।
चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा॥

 प्रपंच सुखाला शाश्वत सुख मानण्याचा अज्ञानीपणा करू नका. मनुष्याला परमात्मसुखाची गोडी लावण्याचा प्रयत्न या भारुडामधून जागल्या करतो.
 काही दैवी भूमिका व भूत-पिशाच्च विषयाची भारुडेही एकनाथांनी रचली आहेत.


 नाथांचे भूत हे सगुणही व निर्गुणही दोन्ही रूपांत आहे. भूत झपाटल्यावर माणसाची कशी चमत्कारिक अवस्था होते. कोणाकोणाला भुताने झपाटल्यावर काय झाले, याचेही ते वर्णन करतात. हे झपाटणे कधी चागल्या गोष्टीसाठीही असू शकते. अढळपद प्राप्त व्हावे, ही इच्छा मनात धरून ध्रुवाने देवाची प्रार्थना केली हेही झपाटणेच आहे. दुसरे भूत स्त्रीविषयक कामासक्तीचे कुबुद्धीरूप भूत आहे.

भूत जबर मोठे गं बाई। झाली झडपड करु गत काई॥१॥
सूप चाटूचे केले देवाषी। या भूताने धरिली केशी॥२॥
लिब नारळ कोंबडा उतारा। या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रुव बाळाला। उभा अरण्यात ठेला॥५॥
एका जनार्दनी भूत । सर्वाठायी सदोदित॥६॥

 इथे नारदाला झपाटलेले भूत कामासक्तीचे कुबुद्धीरूप आहे, तर ध्रुवाला झपाटलेले भूत सुबुद्धीरूप आहे. ते शाश्वत सुखाच्या प्राप्तीने झपाटणे आहे. परमात्मसुखाच्या ओढीनं झपाटणे आहे.
 नाथांनी पशु-पक्षीविषयक जी भारुडे लिहिली त्यात 'विंचू चावला' हे भारूड खेडोपाड्यात खूपच प्रसिद्ध व लोकांना आवडणारे आहे. भजनाच्या प्रसंगात हे म्हटले नाही असे शक्यतो घडत नाही. विंचवाबरोबर गाय, पोपट, पाखरू, टिटवी, बैल या विषयावरची भारुडेही नाथांनी रचली आहेत.

विंचू चावला वृश्चिक चावला। कामक्रोध विंचू चावला।
तम घाम अंगासी आला॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला। त्याने माझा प्राण चालिला।
सर्वांगाचा दाह झाला॥१॥
मनुष्य इंगळी अति दारूण। मज नांगा मारिला तिनं।
चार सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा। तमोगुण मागे सारा।
सत्त्वगुण लावा अंगारा। विंचू इंगळी उतरे झरझरा॥३॥
सत्त्व उतारा देऊन। अवघा सारिला तमोगुण।
किंचित राहिली फुणफुण। शांत केली जनार्दने॥४॥

 माणसाला विकारापासून दूर होणे अवघड जात असते. कामक्रोधरूपी विंचू जेव्हा माणसास नांगी मारतो, तेव्हा जीवाची उलघाल होते. सर्वांगाचा दाह होतो. जीव कासावीस होतो. विंचू हे रूपक कल्पून नाथांनी या भारुडाची रचना केली आहे. इथे कामक्रोधरूपी विंचू दंशाने येणारा घाम हा तमाचा घाम आहे. मनुष्यरूपी इंगळी तर फार विषारी असं नाथ म्हणतात. इथं इंगळी हे स्त्रीरूप कल्पिले आहे.

स्त्रीरूप इंगळीने नांगी मारली, तर माणूस कामासक्त होतो. तिच्या प्राप्तीसाठी वेडापिसा होतो. बड़ी भ्रष्ट होते. अविचार मनात येऊ लागतात. तिची आसक्ती जीवाचा नाश करते. या विंचवाचा उतारा सांगताना एकनाथ म्हणतात, सत्त्वगुणाची वृद्धी केली पाहिजे. सत्त्व वाढीस लागला, की रजो व तमोगुण आपोआपच कमी होतात. वाईट विचार मनात येत नाहीत. विंचू उतरल्यावर जी काही थोडीफार फुणफुण राहील, ती गुरुमाऊलींच्या स्मरणाने शांत होऊन जाईल.
 नाथांचे हे भारूड मोठेच लोकप्रिय आहे. ग्रामीण भागात बोलीभाषेचा वापर करून शब्दरचना सोपी करण्याचा प्रयत्न करीत यात नाट्य आणून हे भारूड साभिनय रंगविण्यात येते. विचू चावल्याचा अभिनय केला जातो.

'अगं गं गं गंगं गं...
विंचू चावला...
आता काय मी करू विंचू चावला...
अगं आई मला विंचू चावला.../

 अशी शब्दरचना या भारुडात करून अभिनयाला परिपोष मिळवला जातो. त्यामुळे हे लोकांचे लक्ष वेधून घेण्यात जास्त यशस्वी ठरते.
 एकनाथांनी कोडी-कुटे यांच्या रचनेतून भारुडे लिहिताना क्षणभर मनुष्याला गोंधळात पाडले आहे, विचार करायला लावला आहे. विचारवंतांच्याही मनाला भूल पाडणारी व वेगळा आनंद मिळवून देणारी नाथांची ही भारुडे आहेत.

नाथाच्या घरची उलटीच खूण।
पाण्याला मोठी लागली तहान।
आजी म्यां एक नवल देखिले।
वळचणीचे पाणी आढ्या लागले।
हांडी खादली भात टाकिला।
बकऱ्यापुढे देव कापिला।

 यातल्या काही गोष्टी लौकिकात न घडणाऱ्या, पाण्याला तहान लागणे, वळचणीचे पाणी आढ्याला लागणे, बकऱ्यापुढे देव कापणे या सगळ्या लौकिकाच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टी; पण हेच कोडे तात्त्विक सिद्धांताच्या आधाराने सोडविण्याचा प्रयत्न केला, की अर्थाचे स्वरूप स्पष्ट होत जाते. पाण्याला तहान लागणे म्हणजे आत्म्याला परमात्म्याची ओढ लागणे. वळचणीचे पाणी आढ्यास लागणे म्हणजे जीवचैतन्य समष्टीरूप होणे. आत्मा आणि परमात्मा एकरूप होणे, त्यातला भेद संपून जाणे. हांडी खादली - भात टाकिला याचा अर्थ देहरूपी हंडीमध्ये असलेला परमात्मरूपी भात न खाता हांडीचा म्हणजे देहाचा उपभोग घेणे. बकऱ्यापुढे देव कापणे म्हणजे विषयासक्त मनाचा बळी परमेश्वरापुढे न देता देवाचाच बळी घेणे. माणूस विकाराच्या आधीन व्हायला लागला, की सगळं उलटं घडत जातं. नाथांनी हेच तर कुटात्मक भारुडातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
 नेहमीचे लोकमानसात साजरे होणारे होळी-शिमगा वगैरेसारखे सण फुगडी, पिंगा, हमामा, हूतूतू सारखे खेळ याच्या माध्यमातून ही नाथांची भारुडे पाहावयास मिळतात. नाथांची प्रतिभा किती विविध विषयांना स्पर्श करते व त्यातून समाजाला जागं करण्याचा प्रयत्न करते, हेच यातून समोर येत.
 फुगडी भारुडातली रचना करताना शब्दांनासुद्धा नादाचा घेरा प्राप्त झालाय, असं वाटत,

फु फु फु फु फुगडी गे। दोघी घालू झगडी गे।
जाऊन महाद्वारी गे। तेथे घालीन फुगडी गे॥१॥
दोन्ही हस्तक धरून गे। तेथे घालीन फुगडी गे ।
विटेवरील पाऊल येऊगे। राहो माझ्या हृदयी गे।
जेथे वैष्णवांचा भार गे। तेथे घालीन फुगडी गे॥२॥
जेथे नामघोष गे। तेथे करीन झगडीगे।
एका जनार्दनी पाहन गे। मन माझे धाले गें॥३॥

 ज्या ठिकाणी वैष्णव नामघोष करतात, तिथं घातलेली ही भाव-भक्तीरूप अविरत नामाची फुगडी आहे. या खेळाला दोन जणी लागतात. म्हणून मग भाव-भक्ती यांनी मिळून हा खेळ मांडला आहे आणि तो विठ्ठलाच्या महाद्वारात मांडला आहे.
 'शिमगा' या भारुडात त्यांनी 'शिमगा' या रूपकाचा वापर मोठा गमतीशीर केला आहे.

सत्त्व गाठी उमगा। तेणे सफळ होईल शिमगा।
तुम्ही हेच गाणे गा। तुम्ही हसू नका॥

 सत्त्व गुणाचा उदय करून ज्ञानाग्नीने चहूशुन्याची होळी पेटवून हरिनामाची बोंब प्रत्येक अवस्थेत मारली पाहिजे.

जागोजागी थांबा। अवघ्या मिळोनि मारा बोंबा।
न जळे एरंडाच्या कोंबा। तुम्ही हसू नका, हसू नका।
गावचा पाटील कोळी। काळोबाची पिकली पोळी।
तुमची पाजळू द्या होळी। तुम्ही हसू नका, हसू नका।
ओटीत घेऊनी गुलाल। सख्या मेहुणी संगे भुलाल।
तिचा नवरा मोठा जलाल। तुम्ही हसू नका, हसू नका।।

 मनावर सतत ताबा ठेवला पाहिजे, नाहीतर माणूस मग काळरूपी यमाचे खाद्य होईल. याकरिता संसारातील विषय आमिषास भुलून चालणार नाही. यासाठी इथे मेहुणीचे रूपक वापरले आहे. सुबुद्धी कायम शाबित ठेवली पाहिजे. हे सर्व झाले तर माणसाचे हसू होणार नाही. संसार सुखाचा होईल.
 एकनाथांची काही भारुडं फारशी गायली जात नसली, तरी वेगळी वैशिष्ट्यं असणारी आहेत. आशीर्वादपत्र' हे भारुडही वेगळी शब्दरचना असणारे. यात गायला लागणारी लय कमी असली, तरी अर्थाच्या दृष्टीनं हेही लोकमानसाचं वेगळं प्रबोधन करतं.
 नाथांच्या काळात वापरली जाणारी सरकार दरबारची भाषा नाथांनी यात वापरली आहे. एखादं पत्र लिहावं अशा पद्धतीची शब्दरचना यात आढळते.

चिरंजीव जीवाजीपंत ठाणेदार। वास्तव्य देहपूर।
यासी आत्मारामपंत यांचा आर्शीवाद।
पत्र लिहिणे कारण जे॥ तुम्हास देह गावची सनद।
शंभर वर्षांची देऊन पाठविले। कलम तपशील॥
गावची आबादी करावी॥१॥
कामक्रोध हे रयत त्यांचे ऐकू नये॥२॥
आशा मनशा यांची संगत धरू नये॥३॥
सदा स्वधर्मे वागणूक ठेवणे॥४॥
शांति क्षमा दया असो देणे॥५॥
ज्ञान वैराग्य भजन पूजनी आदर ठेवणे॥६॥
ही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केले।
तुम्ही तो ते विसरून। सदरीचे कलमास न अनुसरून।
वाईट वागणुकीचा रस्ता काढला॥
तो तुम्हास परिणामी बाधक होईल। सावध राहणे।
एका जनार्दनी शरण। हे आर्शीवाद पत्र ॥७॥

 प्रत्येक मनुष्याला ठराविक कालमर्यादेचे आयुष्य परमेश्वराने बहाल केले आहे. काम, क्रोध यांच्या आहारी त्याने जाऊ नये. परमेश्वराचे चिंतन आणि चांगली वागणूक ठेवून आयुष्य कार्यी लावावे. ज्ञानाची आराधना करावी. भजन पूजन करून साधना करावी; पण हे न करता वाईट वागणूक धरली तर मात्र ते चुकीचे ठरेल. सद्गुरूला शरण जाऊन वागणूक सुधारली जाते. अशा आशयाचे आशीर्वाद पत्रात्मक भारूड हे नाथांच्या वेगळ्या रचनेचे एक उदाहरण आहे.

 अशाच प्रकारची अर्जदस्त, अभयपत्र, जाबचिठ्ठी, ताकीदपत्र नावाची भारुडेही नाथांनी लिहिली आहेत.


.  आणखी नाथांचे प्रसिद्ध असणारे भारूड म्हणजे जोहार. सर्व संतांना जोहार करणारा महार ही स्वतः संतच आहे व तो परमेश्वराच्या व संताच्या सेवेकरता आला आहे.
जोहार मायबाप जोहार। सकल संतासी माझा जोहार।

मी अयोध्या नगरीचा महार। रामजी बाबाचे दरबारचा की जी मायबाप।

 वेळप्रसंगी परमात्मा धर्मरक्षणासाठी सगुण होऊन अवतार धारण करतो.अशावेळी त्या-त्या काळातले संत त्याच्या कार्यास हातभार लावतात. अधर्माचा केर झाडून परमार्थ मार्ग स्वच्छ करतात.
 इथे भारुडात रामचंद्रांचा सेवक अयोध्या नगरीचा महार, अशी भूमिका नाथांनी घेतली आहे.
 नाथांची भारुडे सर्वसामान्यांना आवडतात, त्याचे एक कारण म्हणजे संसार, नातेसबध या विषयांवरही विनोदी अंगाने त्यांनी त्यांच्या भारुडातून प्रतिपादन केले आहे.

सांगते तुम्हा वेगळे निघा। वेगळे निघून संसार बघा॥
संसार करिता शिणले भारी। सासु सासरा घातला भरी॥
संसार करिता शिणले बहु। दादल्या विकून आणले गहू॥
गव्हाचे दिवसे जेविली मावशी। मजला वेडी म्हणती कैशी॥
संसार करता दगदगले मनी। नंदा विकल्या चौघी जणी॥५॥
एका जनार्दनी संसार केला। कामक्रोध देशोधडी नेला॥

 इथे सुबुद्धीरूपी नारी जीवरूप नवऱ्याला वेगळे राहण्यास सांगते आहे. थोडक्यात, संसारापासून अलिप्त राहून तटस्थ रीतीने संसाराकडे पाहा. सासू-सासरा याचा अर्थ कल्पना आणि अहंकार असा मानला आहे. यांनी फार दुःख यातना दिल्या. या संसारात शिणल्यावर अविचाररूपी नवरा विकला आणि भावरूपी गहू विकत आणले. या गव्हाच्या पोळ्या केल्या म्हणजे भावाचे भक्तीत रूपांतर केले आणि भक्ती म्हणजे मावशी ती जेवली. संसारात फार दमणूक झाली म्हणून मग इच्छा, निंदा, चिंता आणि ममता नावाच्या चारी नंदा विकून टाकल्या. त्यांचा त्याग केला. असा संसार करताना काम, क्रोधांना देशोधडीला लावले आणि परमात्मा प्राप्तीचा प्रयत्न केला. इथे रूपके वापरून संसारसखाचे रहस्य उलगडून दाखविण्याचा नाथांनी प्रयत्न केला आहे.
 असंच आणखी नेहमी म्हणलं जाणारं नाथांचं भारूड म्हणजे.

सत्वर पाव गं मला। भवानीआई रोडगा वाहिन तुला॥१॥
सासरा माझा गावी गेला। तिकडेच खपवी त्याला॥२॥
सासू माझी जाच करती। लवकर निर्दाळी तिला॥३॥
जाऊ माझी फडफड बोलते। बोडकी कर गं तिला॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करते। खरूज येऊ दे त्याला॥५॥

दादला मारून आहुती देईन । मोकळी कर गं मला॥६॥
एका जनार्दनी सगळेच जाऊदे। एकटीच राहू दे मला॥७॥

 संसारात होरपळणारा जीव सासरारूपी अहंकार, कल्पनारूपी सासू, इच्छारूपी जाऊ, द्वेषरूपी नणंदेचे पोर आणि अविवेकरूपी दादला या सर्वांपासून मुक्तता मिळविणेचा प्रयत्न करते आहे.  लोक ही भारुडं आनंदानं ऐकतात पण त्यातली रूपकं जाणून त्याचा अर्थ ध्यानी घेणं खूप महत्त्वाचं आहे. नाथांनी त्यांच्या भारुडात अनेक रूपकं वापरली आहेत. त्या दृष्टीनं हे एक भांडारच आहे. एक खजिना आहे. एकनाथांच्या अगोदर भारुडाची रचना ज्ञानेश्वरांनी केली आहे. सामान्य माणसांना समजावी अशी भारुडे, अभंग, हरिपाठ वगैरे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली आहेत. एकनाथांइतकी भारुडे ज्ञानेश्वरांनी लिहिली नाहीत; पण तरीही अंबुला, सौरी, फुगडी, घोंगडी, वासुदेव, डौर, आंधळा, कापडी, बाळछंद, गोंधळ, पांगुळ अशा भारुडांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपदेश केला आहे. ज्ञानदेवांनी अंबुला भारूड लिहिले ते एकनाथांच्या दादला भारुडाशी साम्य दर्शविणारे आहे.

विचारिता देही अविचार अंबुला।
न साहे वो साहिला काय करू/
अंबुला विकून घेतली वस्तु
घराचा समस्त बुडविला।
उठोनि गेलिये अज्ञान म्हणाल
म्या तव कैवल्य जोडियेले।

 इथं अंबुला म्हणजे नवरा. हा अविचारी आहे. अशाबरोबर संसार करण्याचा जीवरूपी नारीला कंटाळा आला म्हणून तिनं त्याला बाजारात विकला. विकृतींचा घराचार तिनं बुडविला; पण हे अज्ञान सांडल्यामुळे तिला कैवल्याची प्राप्ती झाली आहे. नाथांनीही दादला' मध्ये हेच म्हणणे मांडले आहे.
 आंधळा भारुडात ज्ञानेश्वर म्हणतात, जे आयुष्य कधीतरी संपणार आहे, नाशवंत आहे त्याला एक ज्ञानदृष्टी मिळावी म्हणून ज्ञानदेवांनी याची रचना केली असावी. नाशवंत सुखाला कवटाळून बसल्यामुळे ज्ञानदृष्टी हरपली आणि मग पारमार्थिक दृष्टीने आंधळा बनलो.

पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुत विस्तारिले।
विषयसुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले।
चौऱ्यांशी लक्ष योनी फिरता दुःख भोगिले।
ज्ञानदृष्टी हारपली दोन्ही नेत्र आंधळे।

संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ।
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।
काम-क्रोध लोभशुनी पाठी लागली वोढाळ।
कवणा शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ॥

 कामक्रोधादी वासनेत गुंतलो आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी तळमळतो आहे. त्यात ज्ञानदृष्टी हरवली आहे, त्यामुळे दुःखात बुडालो आहे. आता या सर्वातून बाहेर पडण्यासाठी जीव तळमळतो आहे. कुणाला शरण जावे म्हणजे यातून बाहेर पडता येईल! नाथांप्रमाणे ज्ञानदेव म्हणतात. यातूनही सद्गुरूशिवाय पर्याय नाही.

कृष्णांजन एकवेळा डोळा घालिता अढळ।
तिमिर दःख गेले सुटले भ्रांति पडळ
श्रीगुरू निवृत्ती राजे मार्ग दाखविला सोज्वळ।
बापरखुमा देवीवर विठ्ठल दिनाचा दयाल।

 सद्गुरूने डोळ्यांत अंजन घालून पारमार्थिक सुखाचा खरा मार्ग दाखविला.
 ज्ञानदेवांच्या फुगडीत ते लिहितात,

फुगडी फुगे बाई फुगडी फू।
निजब्रह्म तू गे बाई परब्रह्म तूं गे।
मन चित्त धू। विषयावरी थू।
कि एक नाम मांडी। दुजाभाव सांडी।
हरि आला रंगी। सज्जनाचे संगी।
सकळ पाहे हरि। तोचि चित्ती घरी।
ज्ञानदेवा गोडी। केली संसारा फुगडी।

 यातही सर्व विषयवासनांचा त्याग करण्याचा उपदेश ज्ञानदेवांनी केला आहे. मन चित्त धूम्हणजेच ज्या काही वासना मनात वास करून देहाला त्रास देत आहेत, त्यापासून मुक्ती मिळवणे. चित्त शुद्ध करणे आणि असं चित्त शुद्ध झालं, की मग सगळा दुजाभाव आपोआप नाहीसा होईल आणि खरा परमेश्वर सामोरा येईल. हरिदर्शन घडेल, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही अद्वैताची फुगडी ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे.

घुळघुळीत वाजवी टाळ। झणझणा नाद रसाळ।
उदो जाला पाहाली वेळ। उठा वाचे वदा गोपाळ रे।
जगी जग झाले जनार्दन। उदो प्रगटला बिंबले भान रे

रामकृष्ण वासुदेवे। वैष्णव गाताती आवघे।
दिंडी टाळ प्रेमभावे। वासुदेवो मन सामावेगा॥
शांतिक्षमा दया पुरी। वासुदेवा घरोघरी।
आनंदे वोसंडो अंबरी। प्रेमे डोले त्रिपुरारिगा।

 हे ज्ञानदेवांनी वासुदेव भारुडातून प्रतिपादले आहे. नाथांचा वासुदेवही मधुसूदनाचे स्मरण करायला सांगतो तसाच ज्ञानदेवांचा वासुदेव म्हणतो, संपूर्ण जग गोपाळाला स्मरल्यामुळे जनार्दनमय होते. सर्वत्र अद्वैत दिसायला लागते. मनात प्रेमभाव निर्माण होतो. वासुदेव घरोघरी हा प्रेमभाव पोहोचवतो. भक्ती निर्माण करतो. संपूर्ण विश्व हेच जनार्दन आहे हे लोकांना पटवून देतो.
 ज्ञानेश्वरांनी पांगुळ अणि सौरीही लिहिली. मनातली द्वैतभावना नष्ट करायची. ती नष्ट करण्यासाठी विठ्ठलाचे नामस्मरण करायचे.

विठ्ठलनाम हेचि सार, जिव्हे प्रेमठसा।
अद्वैत भरिन मन भारिना तोडीन अवपाश।

 ज्ञानदेवांची सौरी विषयवासनांचा त्याग करायला सांगते,

वासना खोडीवेगी टाहो करीन रामनामे।
मा मी टाहो करील रामनामे।
पुंडलिक पेठ संताचे माहेर तिथे नाचेन मनोधर्मे।

 असं सौरीत नामदेवांनी प्रतिपादन केलं आहे.
 एकंदरीत वेदांताचा उपदेश सोप्या भाषेतून सांगण्याचा प्रयत्न ज्ञानदेवांनी भारुडामधून केला आहे.
 तुकाराम महाराजांची भाषा सोपी, रसाळ तशीच रोखठोक अशी. तत्त्वज्ञान सोपे बोलीभाषेत मांडण्याचा प्रयत्न तुकारामांनी केला. तुकाराम महाराजांनी रसाळ अभंग लिहिले, तशीच साठच्या आसपास भारुडेही लिहिली. त्यांनीही वासुदेव, पांगळा, जोहार, सरवदा, जोगी, कावडे, वारी, गोंधळ, दरवेश, मुंढा, टिपरी, मलंग, सौरी अशी भारुडे लिहिली. रचनेच्या दृष्टीने शब्दचित्रणात्मक, उपहासात्मक, वर्णनात्मक अशा तीन प्रकारांत तुकारामांची भारुडे दिसतात.

जनी वनी हा अवघा देव
वासनेचा पुसावा ठाव।
श्रीमान मग वोगळतो वासुदेव।
ऐसा मनी वसू द्यावा भाव गा...

 वासनेचे प्राबल्य वाढले, की जिवाला परमात्म्याची आठवण येत नाही. तो वासनेच्या आधीन होतो. वासना नष्ट झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही. या वासुदेवाला जे दान घालतील त्याचे जगणे धन्य होईल. ते जन्ममरणाच्या फेऱ्यातूनही सुटतील. 'आंधळा'मध्ये तुकाराम म्हणतात,

कैसा झालोसे अंध
मी माझे वाढवुनी
माया तृष्णेचा बाध..
स्वहित न दिसेची
केला आपुला वध

 पूर्वायुष्याकडे पाहताना आंधळ्याच्या लक्षात येते. ज्यांना आपले म्हटले ते दूर पळाले. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत सगळे जवळ राहिले. स्वार्थ संपल्यावर ते सगळे दूर पळाले. एकदृष्ट्या आपणच आपला वध केल्यासारखे झाले. म्हणून मग आंधळा आतापासूनच आता डोळसपणे वागायला सुरवात करा. दृष्टी देणारा विठोबा हा एकमेव आहे. त्याचे स्मरण करा, तोच ज्ञानी दृष्टी देईल.
 समर्थ रामदासांनीही कापडी, जागल्या, डबरी, जोशी, पांगुळ, वीर पांडे, दिवटा, पिंगळा, बहुरुपी, बाळसंतोष, बीजवर, वैरागी, वाघ्या, वासुदेव यासारखी भारुडे लिहिली आहेत, तसेच पशुपक्षीविषयक उंदीर, कुत्रे, गाय, सर्प व खेळ सण-उत्सव यात चेंडू, टिपरी, लपंडाव वगैरे होळी, गोंधळ सारखी भारुडे लिहिली आहेत. चेटूक, आध्यात्मिक कोडी, झडपणी वगैरे भारुडेही समर्थांनी लिहिली आहेत.
 वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारी, कुटात्मकता आणि संवादचातुर्यता ही समर्थांच्या भारुडांची वैशिष्ट्ये आहेत.
 अध्यात्म आणि भक्ती यांच्याबरोबर सर्वसामान्यांच्या जगण्यातली व्यावहारिकता ध्यानात घेऊन समर्थांनी भारुडांची रचना केलेली जाणवते.
 पांगुळ लिहिताना ते म्हणतात,

मीपणाचे मोडले पाय
म्हणोनि पांगुळ झालो।
प्रेमफडके पसरुनिया ।
कपादान मागो आलो।
ज्ञानकाठी देई करी।
वैराग्य बोली पांघराया।
राघवाचा धर्म जागो।
अधर्म रे भागो।
अज्ञान निरसुनिया।
विज्ञानी लक्ष लागो।

 अज्ञानामुळे माझी ज्ञानदृष्टी हरवली आहे. माझ्या मनात अहंकार उत्पन्न झाल्यामुळे आत्मदृष्टी हरवली. चांगला-वाईटाचा भेद करता येईना. आता यातून बाहेर पडण्यासाठी सद्गुरूकडे प्रेमभक्तीवस्त्र पसरतो आहे. जेणेकरून सद्गुरू ज्ञानाची काठी मला प्रदान करेल. माझी अज्ञानदृष्टी संपून ज्ञानदृष्टी मला लाभेल.

 समर्थांना समाजातील बऱ्यावाईट घटनांची जाणीव आहे. वाईट प्रथांवर ते भारुडाच्या माध्यमातून प्रहार करतात. पूर्वी बिजवराशी लग्न लावण्याची प्रथा होती. समर्थांच्या दृष्टीने ती समाजातील वाईट प्रथाच होती.

या जोशाचे तळपट झाले।
पेर बिजवरा दिधले।
प्रथम वर म्हणोनिया।
लटिके आम्हा चाळविले

 समर्थ त्यांच्या खेळियात म्हणतात.

खेळिया नवल कैसे झाले रे।
आपणासी आपण व्याले रे।
बाप ना माय ओगेचि होये
कर्णकुमारी पाहे रे॥

 परमात्माच प्रसवला आणि विश्वाची निर्मिती झाली. परमेश्वराला विश्वरूप आपण मानतो म्हणून आपणासी आपण व्याले रे, अशी शब्दरचना समर्थांनी केली असावी.
 समर्थांचे अनुभवविश्व व्यापक आहे, याची जाणीव त्यांच्या भारुडांमधील विषयातून होतेच; पण भावही रोखठोक प्रगल्भ आहे हेही जाणवते. प्रपंचाबरोबर परमार्थ साधण्यासाठी सर्वसामान्य माणसाचे वर्तन कसे असायला पाहिजे, त्याबद्दल समर्थांनी रूपकाचा वापर करून भारुडातून लोकप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.
 एकंदरीत भारुडे ऐकली, वाचली, पाहिली की, जाणवते भारुडांमध्ये नाट्य, अभिनय, नृत्य, संगीत यांचा विलक्षण मेळ आहे. हे सर्व साधून आले, की भारूड रंगते. भारुडात संवादाला तितकेच महत्त्व आहे त्यामुळे आशय अधिक उठावदार व स्पष्ट तर होतोच; पण परिणामकारकताही साधली जाते. एखादा माणूस बाईप्रमाणे लुगडे नेसून येतो. डोक्यावर हात मारून घेत बसतो. तेवढ्यात दुसरा कोणी येऊन विचारतो,
 'काय झालं गं डोक्यावर हात मारून घ्यायला'
 'आता काय कमी त्रास हाय का?'  'अगं कसलाबी त्रास असू दे. भवानीमाय दूर करती बघ.'
 'कसला बी त्रास?'
 'व्हय व्हय कसलाबी'
 आणि मग तो लुगडं नेसलेला भारूड चालू करतो.
 'सत्वर पाव गं मला भवानी आय रोडगा वाहीन तुला' या संवादामुळे एक खुमासदारपणा तर येतोच; पण विषयाची वाटही रिकामी होते.

 भारूड हे मराठी लोकमानसाच्या मनावरचं गारूड आहे. अशा प्रकारची रूपकात्मक रचना मराठीतच लोकाभिमुख झाली. वर्षानुवर्षे तिचा पगडा माणसांच्या मनावर आहे. भारुडातून खऱ्या अर्थाने जनजागरण होते म्हणून बऱ्याचशा संतांनी याचा उपयोग करून घेतला अहे. भारुडाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचणे सोपे होते, याची त्यांना जाणीव होती. हरिकीर्तनानंतर लळीत असायचे त्यातूनच रूपक हा नाट्यप्रकार. रूपक आणि भारूड यांचा तर खूपसा जवळ संबंध आहे. अध्यात्म सांगताना रूपकाचा वापर करून सांगितले तर ते समजायलाही सोपे पडते, त्यामुळे भारूड ही सर्वांपर्यंत पोचू शकली. खेडोपाड्यात लोकांना अजूनही भारुडे गायला ऐकायला आवडतात. त्याचं हेच तर कारण आहे. खूप काळपर्यंत भारुडे लोकमानसावर अधिराज्य राहतील, यात शंका नाही.
येळकोट

 सर्वसामान्य माणूस जेव्हा देवदेवतांचे मानुषीकरण करतो आणि त्यांचं आयुष्य स्वत:च्या नजरेतून पाहतो. त्यांचे गुण-दोष न्याहाळतो, तेव्हा त्यांचं लोकगीतांमधून मोठं मनोहरी स्वरूप पाहायला मिळतं. खंडोबा हे कितीतरी लोकांचं कुलदैवत; पण खंडोबा म्हणजेच मल्हारी, याची कथा जेव्हा लोकगीतातून ऐकायला मिळते, तेव्हा तोही तुम्हा-आम्हा सर्वांप्रमाणेच एक संसारी माणूस होता असं वाटायला लागतं आणि या आपल्या दैवतांबद्दल एक वेगळी आत्मीयता भासायला लागते. खरं तर लोककवयित्रीची एक रचना माझ्या वाचण्यात आली. खंडोबाच्या दोन बायका. एक म्हाळसा आणि दुसरी बाणाई. खंडोबाबरोबर दोघींनी एकत्र नांदण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या आयुष्यात मत्सराचे शिंतोडे उडायचे थांबले नाहीत. सवतीमध्ये जाणवणारा मत्सर तिथेही चुकला नाहीच. ती लोककवयित्री म्हणते,

बाणू - म्हाळसाच्या दोघींच्या दोन जाती
मल्हारी देवासाठी बसल्या एका ताटी
धनगराची बाणाई, वाण्याची म्हाळसा
घास गिळतु तिला कसा?

 या दोन वेगवेगळ्या जातींतून आलेल्या मल्हारीच्या बायका. एक वाणी समाजाची दुसरी धनगर समाजातील; पण दोघींच्यावर मल्हारीची प्रीती; पण त्यात काही उणे अधिक होतेय, असं दोघींना जाणवायचं. नवरा नवीन आणलेल्या बानूच्या नादाला जास्त लागलाय, असं म्हाळसाला वाटायचं. आपला चांगला सुखात संसार चाललेला असताना ही कोण आपल्या नवऱ्याच्या मागे लागून आली. असं वाटून म्हाळसा चिडायची. बाणाई म्हणजे बानूला ती म्हणायची,

आईक मी सागते तुला
चित्त दे माझ्या बोलाला
का ग तू भुललिस घेवाला
जा तू आपुल्या देशाला
झाकल्या पाठीनं जाई म्हणते घे तू ऐकून
एक्या घडीमधि तोंड बाणाई, टाकिन उतरून

 शेवटी सवती-सवतीचं भांडण. देवाच्या बायका असल्या म्हणून काय झालं. एकमेकींचा पाणउतारा करायला थोड्याच कचरणार? थोरली असली म्हणून काय झालं. म्हाळसानं असं बोलल्यावर बाणाई थोडीच गप्प बसणार! ती काही स्वतः होऊन मल्हारीच्या मागे लागून आलेली नव्हती. मल्हारीच तिच्या सौंदर्यावर भाळला होता. राजवाडा सोडून धनगरवाड्यात आला होता. त्यानं तिला मागणी घातली होती. धनगर बनून तिच्याबरोबर त्यानं काही काळ गुजारला होता. म्हाळसाचं ऐकून बाणाईचा अपमान झाला, ती चिडून म्हणाली.

तू वाण्याची हायेस म्हूण करशिल पडिभार
आम्ही धनगरणी जशा नागिणी मोठ्या शिरजोर!
तुज्या येवानं आमच्या घरी वळिली खिल्लारं
लेंड्या, लोकर कन्या मिसळी तुझाच भर्तार!

 वाण्याच्या जातीची असलीस म्हणून जास्त कौतुक करू नकोस. आम्ही धनगरणी नागिणीसारख्या आहोत. काहीही बोललेलं ऐकून घेणार नाही, अशा भाषेत तिनं म्हाळसाला प्रत्युत्तर दिलं आहे.
 खंडोबाच्या संबंधातली अशी लोकगीते खंडोबाच्या चरित्रावर प्रकाश टाकणारी आहेत. मुळात कानडी मानला जाणारा हा 'मल्लारी' देव; पण विठोबा जसा कानडी असून, महाराष्ट्रात रुजला तसाच हा 'मल्लारी' महाराष्ट्रात मल्हारी बनून नावारूपास आला.
 कोळ्याच्या जातीतही खंडोबाची भक्ती करणारे आढळतात. त्यांच्या एका लोकगीतांमध्येही मल्हारी जेव्हा प्रथम बानूला भेटला. त्याचं कोळीगीत आढळतं. इथं बानूची भानय' आणि खंडोबाचा 'खंडेराव' झालेला आहे.

चालली चालली गो भानयबाय बाऊडी पान्याला
उसलील्या निली भानयनी बुरायिल्या दुरी
मगारी बगिते गो भानयला वलवायला नाई कोनी
तवारसी येत होता गो खंडेराव देवू
तो ते बाद घोडेवर बैसला गो

 अशा कोळीगीतातून भानय व खंडेरावची वर्णनं येतात. कोळी लोकांच्यात 'मल्हारकोळी' नावाची एक उपजातीही आहे.
 अनेक लोकगीतं आणि लोककथा खंडोबाबद्दल प्रसिद्ध आहेत. खंडोबाचे प्रकटीकरण, त्याचं बानूच्या नादाला लागणं. त्यांचा म्हाळसेशी विवाह. याबद्दल अनेक गीतं ऐकायला मिळतात आणि खंडोबाच्या या कुटुंबाचं कुतूहल वाढत जातं.
 हा खंडोबा मूळचा कुठला? त्याची स्थाने कुठं-कुठं आहेत? त्याच्या यात्रा मोठ्या प्रमाणावर अजूनही भरल्या जातात. लोकमानसातला खूप मोठा भाग त्याची भक्ती करणारा आहे. वाघ्यामुरळीसारखे त्याचे उपासक निर्माण झाले आहेत. गेली कित्येक वर्षे हे त्याची उपासना तर करत आहेतच; पण समाजातही त्यांना वेगळे स्थान आहे. 'जागरण' नावाच्या विधीमधून खंडोबाच्या कर्तृत्वाचा जागर घातला जातो. लोककथा पाठीमागे ही काही पुराणोक्त इतिहास आहे, ते जाणण्याचं एक वेगळं कुतूहल आणि उताविळी या म्हाळसा-बानूच्या लोकगीतांमधून निर्माण होते.
 'मल्लारिमाहात्म्यम्' या संस्कृत ग्रंथामध्ये मल्लारी' ची अवतारकथा वर्णन केलेली आहे. आदिक्षेत्र 'प्रेमपूर' (पेंबर) हेही खंडोबाचे एक क्षेत्र मानले जाते. तशी महाराष्ट्रात जेजुरी, पाली, औरंगाबादजवळ सातारे, पुण्याजवळ कोंढापूर, इस्लामपूरजवळ पेठ, नगर जिल्ह्यात नेवासे अशी काही ठिकाणे खंडोबाची आहेत. कर्नाटकात मंगसुळी, मैलारलिंग, मैलारपूर वगैरे ठिकाणीही खंडोबाची देवस्थाने आहेत. आदिक्षेत्र प्रेमपूरच्या अनुषंगाने मल्हारीमाहात्म्यमध्ये एक अवतारकथा येते.
 कृतयुगामध्ये मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तर्षी तप आचरीत होते. त्या काळात जेव्हा ऋषी असे यज्ञ किंवा तप करत, तेव्हा दैत्य त्यात विघ्न निर्माण करत. 'मल्ल' नावाचा एक दैत्य सप्तर्षीच्या तपात विघ्न करू लागला. त्याने तपोवनाचा नाश केला. ऋषींनाही विहिरीत ढकलून दिले. यातून मार्ग व सुरक्षिततेसाठी समस्त ऋषी इंद्राकडे गेले; पण मल्ल' आणि 'मणि' या दैत्यबंधूंना ब्रह्मदेवाने अजेयत्वाचा वर दिला हे इंद्राला माहिती होते. तो काही करू शकत नव्हता. त्याने विष्णूकडे जाण्यासाठी ऋषींना सांगितले. विष्णूने शिवशंकराकडे जाण्यास सांगितले. अशारीतीने सर्व ऋषी शेवटी शंकराकडे आले. शिवाने ते ऐकून क्रोधाने जटा आपटल्या त्यातून विक्राळ महामारी निर्माण झाली. ऋषींनी तिला घृत पाजून शांत केली म्हणून तिला 'घृतमारी' म्हटले गेले. नंतर शिवशंकराने या दैत्यांच्या विनाशासाठी मार्तंड भैरवाचे रूप धारण केले. त्याच्या रूपाचे वर्णन करताना ग्रंथकारांनी गळ्यात महासर्पाचे भूषण, कानात चंडमार्तंड कुंडले, हातात डमरू, त्रिशूळ, खड्ग आणि पात्र, वक्षावर रूळणारी रूंडमाळा, मस्तकावर चंद्रकोरीने युक्त असा मुकुट, तीन नेत्र आणि भालप्रदेशावर भंडारा चर्चिलेला असा मार्तंड भैरव नंदीवर आरूढ झाला. अशा शंकरासोबत कार्तिकस्वामी होते. सप्तकोटी गणांचे सैन्य होते. प्रत्यक्ष गणेशही बरोबर होते.
 असं सैन्य समोर पाहून मल्ल दैत्य घाबरला. दोन्ही सैन्यांत युद्ध झाले. खड्गद्रष्टाला कार्तिकस्वामीने अडवले व ठार केले. गणेशाने उल्कामुखास ठार केले. नंदीने कुंतलोम्यास ठार केले. हे पाहून मंग क्रोधीत होऊन मल्ल-मणी दोन्ही दैत्य मार्तंड भैरवाशी युद्ध करण्यास पुढे आले. मग त्यांच्यात मायावी, द्वंद्व अशी युद्धे झाली. मार्तंड भैरवरूपी शिवाने मग मल्लाला जमिनीवर पाडले व त्रिशुळाने त्याचे वक्ष घायाळ केले व त्याच्या मस्तकावर पाय देणेस पाय उचलला तेव्हा मल्लाने मार्तंड भैरवाची स्तुती करून त्याला शरण आला व त्याला म्हणाला, “देवा माझे नाव तुझ्या आधी असावे व माझे शीर तुझ्या चरणाखाली निरंतर राहावे." शिवस्वरूपी मार्तंड भैरवाने ते मान्य केले. जी गत मल्लाची तीच मणीचीही झाली. शिवाने त्याला इष्ट वरदान दिले. त्याच्यावरून मल्ल' वरून मल्लारी - मल्हारी बनले व शिवाच्या या अवताराला 'मल्हारी-मार्तंड' असं म्हणू लागले. कर्नाटकात मल्लारी' व महाराष्ट्रात 'मल्हारी' असे झाले. यानंतर सप्तर्षांनी मार्तंड भैरवाला विनंती केली, 'देवा, जिथे तुम्ही मार्तंड भैरव रूप धारण केले व आमचे रक्षण केले त्या ठिकाणी तुम्ही स्वयंभू लिंगरूपाने सदैव राहावे' हे स्थान प्रेमपूर' नावाने प्रसिद्धीस आले.
 लोककथांमध्ये मल्हारी, म्हाळसा आणि बानू यांच्याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. वाघ्यामुरळी जागरणामध्ये जी अनेक गीते गातांत त्यात त्याचे वर्णन येते. म्हाळसाशी लग्न झाल्यावरही मल्हारी एकदा फिरत असताना त्याला धनगराच्या कुटुंबातली बानू दिसली. तिचं सौंदर्य पाहून तो लुब्ध झाला. म्हाळसाबरोबरचा सारीपाटाचा डाव तो मुद्दाम हरला आणि त्याने ठरवलेल्या अटीप्रमाणे तो बारा वर्षांच्या वनवासाला गेलाः पण खरंतर त्याला बानूला भेटायचे होते म्हणनच म्हाळसापासन दूर जाण्यासाठी त्याने ही अट ठेवली होती व तो मुद्दाम हरला होता. म्हाळसाला बिचारीला त्याच्या मनातल्या या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. हा मल्हारी म्हणजे खंडोबा तेथून निघाला ते भुलेश्वरला आला. भुलेश्वर म्हणजे देवांचा गुरू. त्याच्या आदेशाने मग खंडोबा धनगराचे रूप घेऊन ज्या ठिकाणी बानू होती त्या कळपात सामील झाला. तिथे त्याने सर्वसामान्य धनगरांप्रमाणे वर्तन आचरण्यास सुरवात केली. बानूच्या पित्याच्या सातशे मेंढ्या आणि शेळ्या त्याने नदीवर नेल्या आणि मग मुद्दामच त्याने त्या मारल्या, सोलल्या त्याची हाडे वेगळी केली. बानू आली तेव्हा तो म्हणाला, 'तू जर माझ्याशी लग्न करशील, तर या मेंढ्या मी जिवंत करतो.' नाईलाजाने मग बानू तयार झाली. मग खंडोबाने तिला घोड्यावर घेतले. मेंढ्या जिवंत केल्या आणि स्वत:चे मूळ रूप धारण केले. धनगरांनी त्या दोघांचे लग्न लावून दिले. खंडोबा बानूला घेऊन परतला. खंडोबाबरोबर बानूला पाहून म्हाळसा चिडली. मग खंडोबानेच तिची समजूत घातली व जेजुरीचा वरचा अर्धा डोंगर म्हाळसेला व अर्धा खालचा डोंगर बानूला वाटून दिला.
 नंतर या मूळ कथेमध्ये अनेक उपकथानके सामावली गेली असावीत. प्रतीकात्मक रूपात खंडोबाची पूजा केली जाते, तेव्हा वेगवेगळी प्रतीके पूजेसाठी वापरण्यात येतात, त्यामध्ये लिंग, तांदळा, मूर्ती, टाक, मुखवटा, ध्याने ही प्रतीके आढळतात.
 लिंग ही स्वयंभू असतात. अचल असतात तर तांदळा म्हणजे न घडविलेली उभट आकाराची, वर निमुळती होत गेलेली शिळा असते. पूर्वी कापडी मुखवटे पूजेसाठी वापरले जात. आजकाल मात्र खंडोबाचे असे मुखवटे पूजेसाठी प्रतीक म्हणून वापरल्याचे आढळत नाहीत. खंडोबाच्या मूर्ती मात्र पूजेसाठी सर्रास वापरल्या जातात. जिथे-जिथे खंडोबाची स्थाने आहेत, तिथे धातू स्वरूपातील मूर्ती भक्तांना विकत मिळतातही. देवस्थान ठिकाणाच्या मूर्ती कधी बैठ्या उभ्या तर अश्वारूढ अशा दिसून येतात. मांडी घालून बसलेल्या मूर्तीच्या गुडघ्याखाली 'मणि-मल्ल' या दैत्यांची मुंडकी दिसतात. या मूर्ती चतुर्भूज असतात. त्याच्या हातात खड्ग, त्रिशूल, डमरू व पानपात्र या वस्तू असतात. सोबत कुत्रा असतो, खंडोबाचे वाहन घोडा असते. खंडोबा हा शिवाचा अवतार मानला गेल्याने काही ठिकाणी खंडोबाच्या मूर्तीजवळ नंदीही आढळतो. घोड्यावर बसलेल्या मूर्तीत कधी खंडोबा एकटा असतो, तर कधी म्हाळसा व बानू याचे समवेत असतो. महाराष्ट्रात व कर्नाटकात खूपजणांचे कुलदैवत म्हणून खंडोबा देव्हाऱ्यात पुजला जातो त्यावेळी शक्यतो ‘टाक' या स्वरूपात त्याचे पूजन होते. हे टाक सुवर्ण वा चांदीच्या पत्र्याचे बनवलेले असतात. अश्वारूढ प्रतिमा त्या पत्र्यावर उठावाने बनविलेली असते. लग्नात वा इतर मंगल कार्यात या कुलदैवताच्या पूजनाचा खास विधी असतो. या टाकावरच्या प्रतिमेत खंडोबाच्या पाठीमागे त्याच घोड्यावर बसलेली म्हाळसाची प्रतिमाही असते.
 संस्कृत श्लोकाच्या ध्यानामधून खंडोबाचे वर्णन केले आहे. त्यात ग्रंथानुसार थोडेफार फरक आहेत. काही ध्यानात चतुर्भूज भैरवमूर्ती जिने त्रिशुल-डमरू-पारा-खड्ग धारण केले आहे. काही ध्यानात मांडीवर म्हाळसा, पांढरा घोडा, हातात खड्ग डमरू, दैत्याच्या (मल्ल-मणि) डोक्यावर पाय, सभोवती कुत्रे, भंडारा उधळलेला असंही वर्णन येतं. रा. चिं. ढेरे यांनी 'खंडोबा' या दैवतावर खूपसे संशोधन केले आहे. देवीचे भक्त म्हणून जसे गोंधळी असतात किंवा भुते असतात तसे वाघ्यामुरळी हे खंडोबाचे उपासक आहेत. गोंधळी 'गोंधळ' घालतात त्यात देवदेवतांना आवाहन करतात, तसेच वाघ्या-मुरळी हे खंडोबाचे 'जागरण' करतात. वाघ्या आणि मुरळी हे गेले कित्येक वर्षे ग्रामीण भागात खंडोबाचे जागरण करीत आहेत. लग्न असो वा एखादा नवस त्यात जागरण हे होतेच. यल्लमाला जशा देवदासी वाहिल्या जातात थोडंफार तसंच वाघ्या आणि मुरळीबाबतही आहे. खंडोबाला काही ना काही नवस बोलला जातो, तेव्हा तो पुरा झाल्यावर पहिलं मूल देवाला वाहिलं जातं. मग तो मुलगा असेल तर त्याचा 'वाघ्या' होतो व मुलगी असेल, तर तिला 'मुरळी' म्हणतात. देवदासीबाबत जे घडतं तेच मुरळीच्या प्राक्तनात असतं. शक्यतो सगळ्या दक्षिण भारतात हे वाघ्या-मुरळी आढळून येतात. या मुरळ्या लग्न करत नाहीत. खंडोबाशीच जणू त्यांचे लग्न झालेले असते. परिणामी खुप वेळा समाजाच्या घटकांकडून अशा मुरळ्या देहभोगासाठी वापरल्या जातात.
 वाघ्ये हे दोन प्रकारचे असतात. एक घरवाघ्ये आणि दुसरे दारवाघ्ये. घरवाध्ये म्हणजे एखादा नवस करून तो फेडण्यासाठी काही काळ वाघ्याचा वेष करून खंडोबाच्या जत्रा वा वारी करणारे आणि दारवाघ्ये म्हणजे कायमस्वरूपी वाघ्ये झालेले. दीक्षा घेतलेले. हे आयुष्यभर वाघ्ये बनून खंडोबाची सेवा करत राहतात. मुरळीबरोबर घेऊन ते सगळीकडे जागरणे करीत असतात. खंडोबा संबंधीत धर्मकृत्ये पार पाडत असतात. या धर्मकृत्यात जागरण करण्याबरोबर लंगर तोडणे हाही विधी असतो.
 वाघ्या-मुरळी जेव्हा जागरणे करतात, तेव्हा त्यातही नृत्याचा भाव असतो. मुरळी नाचते त्यात लावणीसदृश्यता असते. तिने नऊवारी लुगडे नेसलेले असते. कपाळाला भंडारा माखलेला असतो. नाचताना ती एका हाताने घोळ वाजवते किंवा काही ठिकाणी नाचताना देव्हाऱ्यातली लहान घंटा घेऊन नाचताना ती आढळते. वाघ्या तुणतुण्याची साथ देत असतो. ही जागरणाची गाणी मुरळीच्या नृत्यामुळे असेल; पण लोकांना आवडतात. जागरण हा एक कुलाचार असला, तरी त्यामुळे तो लोकप्रिय झाला आहे. वाघ्याच्या पोशाखात तो गळ्यात एक कातडी पिशवी अडकवतो त्यात भंडारा असतो. तो जागरणापूर्वी बसलेल्या प्रत्येकाच्या कपाळाला हा भंडारा लावत असतो. कधी त्याच्याजवळ ध्वज असतो. तो काठीलाही बांधलेला असतो. कधी दिवटी-बुधली असते, तुणतुणं असतं वा घोळ असतो.शंख. डमरू असते. यातल्या सगळ्या वस्तू नसल्या, तरी एखादी वस्तू त्याच्याजवळ असतेच.
 खरं तर मुरळी हा शब्द दक्षिणेतील राणी मरळी हिच्यावरून आलेला असावा, असं जाणकारांचं मत अहे. त्या राणीची एक लोककथा सांगण्यात येते. त्या राणीनं सर्वप्रथम स्वत:ला देवाच्या सेवेला वाहून घेतलं होतं. त्यापाठीही एक कथा आहे.
 एका वृद्ध तपस्व्याला एक लहान मुलगी सापडली. त्याने तिचा सांभाळ केला. तिचे नाव ती पहाटे सापडली म्हणून 'प्रभाती' ठेवले. ती मोठी झाल्यावर सद्गुणी, सुंदर व तपाचरणी बनली. तिची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या काळी कोप्पम प्रदेशावर ‘मरळी' नावाची स्त्री राज्य करत होती; पण ती अधार्मिक होती. प्रजेवर अन्याय अत्याचार करणारी होती. तिने स्वत:च्या राज्यातील राजपुरोहिताचा छळ करून त्याला हाकलून दिले होते. त्या राजपुरोहिताला प्रभातीची कीर्ती कळाली. त्याने प्रभातीला राणी मरळीच्या अत्याचाराबद्दल सांगितले. प्रजेच्या छळाविषयी सांगितले. ते ऐकून प्रभाती राणीचे मन वळविण्यास राजवाड्यात गेली; पण राणीने तिचा अपमान करून तिला हाकलून दिले. प्रभातीने लोकांना देवाची पूजा-अर्चा करण्यास प्रवृत्त केले. देव प्रसन्न होऊन प्रजेला भरपूर अन्नधान्य झाले. लोक प्रभातीला मानू लागले. लोकांनी देवाचे मंदिर बांधले. प्रभाती मंदिरात राहून लोकांना उपदेश करू लागली. राणी मरळीने सैनिकांना ते मंदिर उद्ध्वस्त करायला लावले; पण ते प्रभातीच्या अंगाला हात लावताच भस्मसात झाले. राणीने प्रभातीच्या अंगावर नाग सोडले; पण ते प्रभातीपुढे फणा टेकवून निघून गेले. नंतर राणीने दोन वाघ प्रभातीवर सोडले; पण ते प्रभातीच्या पायावर डोके ठेवून उलट राणीचाच पाठलाग करीत राजवाड्यात आले. राणी भयभीत झाली. केलेल्या कर्माचा तिला पश्चात्ताप झाला. प्रभाती राजवाड्यात आल्यावर राजवाड्यातले वाघ निघून गेले. राणीला प्रभातीचे सामर्थ्य समजले. ती प्रभातीला शरण गेली. राणीने मग देवाचे मंदिर उभे केले. स्वत:ला देवाच्या सेवेस आधीन केले.राणी मरळीला नृत्य, गायन यायचे. नाचून-गाऊन तिने देवाची सेवा केली. तिने देवासाठी सर्व सोडून दिले म्हणून तिला पहिली देवदासी समजतात.
 देवदासीचा उल्लेख यल्लमाचे भक्त म्हणूनही येतो, पण मरळी नावाने 'मुरळी' असा लावून ती नत्य-गायन करायची. मुरळीही नृत्य गायन करते, त्यानुरोधाने ती खंडोबाची भक्त समजून खंडोबाच्या दासींना 'मुरळी' नाव प्राप्त झाले असावे. वाघ्या-मुरळी यांच्या जागरणात नृत्य-गीत-वादन याचा समन्वय असतो. मुरळीचे नृत्य म्हणजे थोडेफार पाहणाऱ्यांना बेभान करून गुंतवून ठेवणारे असते. तिच्या पायात धुंगरू असतात. हातात घंटा घेऊन ती नाचते. वाघ्ये हातात तुणतुणे वा दमडीसारख वाद्य घेतात व मुरळीच्या नृत्याला साथ देतात. मधूनच भंडारा उधळतात आणि तोंडानं 'हाब् हाब् ' म्हणतात.
 मुरळीची गाणी पाहिली, की बरीचशी त्याची रचना लावणीसारखी वाटते कारण त्यातला ठेका व शृंगारपरिपोषक शब्दरचना कुठेतरी लावणीचा पाया असावा, असे वाटते.

वय सोळा, कोवळी काया, हडपणात घुंगरू पाया,
लागे नाचाया, लागे नाचाया, लागे नाचाया
पोर बावरी झाली पहा जेजुरीला जाया॥
नव्या नव्या वाऱ्याने हिचे भारावले अंग,
या अशा वयातच बदलू पाहे ढंग,
उतावीळ मल्हारीसंगे लगीन लावाया॥

 यात सोळाव्या वयातल्या तारुण्याचा आविष्कार, शरीरातले घडू पाहणारे बदल आणि मल्हारीच्या भेटीची आतुरता व्यक्त झाली आहे.
 वाघ्या-मुरळीच्या गाण्यात मल्हारी- बानू, म्हाळसाची कथा येते. त्यांची भेट, भांडण, संसार यांची वर्णने येतात. मुळात सवतीची भांडणं हा सगळ्यांचा श्रवणीय विनोदी विषय. लोक आनंद घेत, हसत गीते ऐकतात.

ह्या बाई जेजुरी नगरीत। कोऱ्या चांदणी महालात
म्हाळसा बानाई भांडती। ऐकून मल्हारी हासती।
सवती सवतीचे भांडण। भोळ्या भक्ताचे कांडण ।
दोघी मुरळी नाचती। बघून मल्हारी हासती।
पंढरीचे आहे रखुमाई। येथे म्हाळसा बानाई।
तिथे विटेवरी उभा। येथे घोड्यावर शोभा।
तेथे पुंडलिक निधान। येथे हेंगडी प्रधान।
तेथे बुक्क्याचे रे लेणे। येथे भंडार भूषणे।
तेथे वाहे चंद्रभागा। येथे जटी वाहे गंगा।
तेथे मृदंग विना टाळ। येथे वाघ्या मुरळीचा घोळ॥

 या मुरळी गीतामध्ये बानू आणि म्हाळसाच्या भांडणात मल्हारी हसतो आहे. वास्तविक दोघींचेही मल्हारीवर अतोनात प्रेम आहे. त्याचप्रमाणे नकळत जेजुरी आणि पंढरपूर इथले तुलनात्मक वर्णन केले आहे. पंढरीत रखुमाई आहे, तर जेजुरीत म्हाळसा-बानाई आहेत. तिथे विटेवर पांडुरंग उभा, तर इथे घोड्यावर 'खंडोबा' म्हणजे मल्हारी आहे. तेथे पंढरपुरात पांडुरंगभक्त पुंडलिक आहे, तर जेजुरीतही खंडोबावर निष्ठा ठेवणारा हेगडी प्रधान आहे. तिथे आबीर बुक्क्याला महत्त्व आहे, तर जेजुरीत भंडाऱ्याला. तिथे चंद्रभागा वाहते आहे, तर खंडोबा शिवाचा अवतार असल्यामुळे प्रत्यक्ष त्याच्या मस्तकी गंगा आहे. पंढरीत मृदंग-टाळाच्या साथीत अभंग गात भक्त तल्लीन होतात, तर इथे वाघ्यामुरळीच्या नृत्यात. मुरळीच्या आयुष्याबद्दल पाहिले, तर देवदासीसारखीच तिची अवस्था. देवाशी लग्न लावायचे आणि इतरांच्या वासनेला बळी पडायचे अशी स्थिती. अशा वेळी नाथांनी मुरळीवर लिहिलेले भारूड तिनं कसं असावं याचं रूप स्पष्ट करते.

नि:संग मुरळी झाले। या मालुचे घर रिघालें।
गळा भक्तीची भांडारी। भावाचा कोटंबा करीं।
विवेकाची मागते मी वारी। या संतांच्या चौंधा आलें।
चौहात घांट वाजती। सोहं शब्द घोळ गर्जती।
वाघ्या-मुरळी या नाचती। गुरूकृपेचे अंजन ल्यालें।
वाजे वैराग्य तुणतुणं। ते कदा नव्हे बा सुनं।।
मन घुगरू वाजे छुनछुन। नाचत जेजुरी गेले॥
गड देखिला जेजुरी। आत्मा नांदतो मल्हारी।
जाऊनी बसले मी मांडीवरी। एका जनार्दनी बोले।

 देवाच्या भक्तीसाठी मुरळी नि:संग होते; पण हा नि:संगपणा देह वासनाच्या तृप्तीसाठीच जर आचरणात आला, तर त्याला अर्थ नाही. मनातला विवेक सतत शाबीत राहिला पाहिजे. वैराग्याचा अर्थ ध्यानी घेतला पाहिजे. मन हे परमात्म्याच्या भेटीला आतुरले पाहिजे. मुरळीच्या मन-आत्म्यात मल्हारीच नांदला पाहिजे.

 वाघ्या-मुरळी गीतात गावोगावच्या काही वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या प्रतिभेत काही रचना केल्या आहेत आणि त्या रचनांमध्ये त्यांनी शेवटी त्यांची नावे गुंफली आहेत. डॉ. सरोजिनी बाबर संपादित 'एक होता राजा' या ग्रंथात त्यांनी बरीचशी वाघ्या-मुरळी गीते एकत्रित केली आहेत. यातली बरीचशी गीते लावणी वा शाहिरी ढंगाची आहेत-त्यात खंडोबाचे लग्न, म्हाळसा-बाणाईमधले भांडण, देवाच्या घरचा दसरा-दिवाळी सण, सोमवती यात्रेचे गीत. अशा वेगवेगळ्या विषयांच्या अनुरोधाने गीतरचना झाली आहे.

 खंडोबा आणि बानाई यांच्यामधला एक नाजूक प्रसंगही एका शाहिरानं गीतात वर्णिला आहे, तो म्हणतो,

मुख दावून बानू गं गेली।
स्वारी देवाची गं वेडी झाली जी॥
एकदा मध्यान्हीच्या अमलात,
देव मल्हारी निद्रागत,
बानू नार आली शयनागारात,
हिनं उशाला मांडी ग दिली।
स्वारी देवाची ग वेडी झाली॥
ह्या ग बानू नारीचं अंग,
जसं चमके ऐनाचं भिंग
देव मल्हारी झाले दंग

 बानूच्या नादानं वेडावलेला मल्हारी साहजिकच म्हाळसेला काही काळ विसरल्यासारखा होतो. त्याचे तिच्याकडे जाणे कमी होते आणि मग त्याच्या विरहाने आणि त्याचबरोबर बानाईवर जडलेल्या त्याच्या प्रेमाने म्हाळसा कासावीस होते आणि ती म्हणते,

कुठं नाही रे पडलं उणं
एकाएकी झालासी रे बैमान,
फार मन केलं रे कठीण,
नारा कसं रे बाणूनं लावलं वेड
देवा मल्हारी, सोडिला गड॥

 म्हाळसेची सैरभैर अवस्थाच शाहिरानं या गीतातून व्यक्त केली आहे. कथा, नाट्य, नृत्य याचा विलक्षण मिलाफ संगतीला तुणतुणं घोळ यासारखी वाद्यं यामुळे जागरणाच्या वेळी श्रोतृवर्ग तल्लीन करण्याची ताकद या गीतामध्ये आढळते. साधी-सोपी शब्दरचना असल्यामुळे सर्वसामान्यांना ती सहज कळत असे.
खंडोबाच्या यात्रेला काही भक्त गावातून काठी घेऊन जात. या मोठ्या काठ्या मोठ्या भक्तिभावाने मिरवत ते नेत.

देवाची घाटी कशी वाजली
भक्ताची काठी कशी चालली

 असं म्हणत ते काठी घेऊन जेजुरीला जात. याची काही गीते आढळतात.

जेजुरीगडाचं वर्णनही काही गीतांमध्ये केले आहे.
सुवर्णाची गड जेजुरी दक्षिणात कोटं
नवखंडाचे माणूस येऊन बोलती येळकोट...
काळा किल्ला गड जेजुरी दिसे शोभिवंत
देवन तुराव वरती आहे ठाणे मजबूत

 एकेकाळी समृद्ध असणाऱ्या मल्हारीच्या या जेजुरीचे वर्णन 'देवा तुझी सोन्याची जेजुरी' असे केले गेले आहे.
 मल्हारीचे लग्नाचा सोहळा कसा पार पडला, कोणते प्रसंग कोठे घडले, याचे वर्णनही एका गीतामध्ये येते. यात लग्न सुपे परगण्यात लागले, हळद शिंगणापुरात, लग्नाचे बाहुले चाळीसगावात अशी वेगवेगळ्या गावांच्या नावाची गुंफण केलेली दिसून येते.

 जी-जी काही खंडोबाची ठाणी आहेत, तिथल्या प्रादेशिकतेचे अनुरोधाने वेगवेगळे भाषिक संस्कारही या वाघ्या-मुरळी गीतावर आढळतात. कोणा बापू वाघ्या, धोंडू-ग्यानू, शंकर वाघ्या, बाळाकृष्ण, मुकिंदगुरूचा चेला, मल्ल वाघ्या अशा रचनाकारांनी ही गीतं लिहिली आहेत. खूपशी गीतं वेगवेगळ्या संशोधकांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे नवीन पिढीतील संशोधकांना त्याचा फायदा होणार आहे; पण काही गीते कदाचित काळाच्या ओघात शब्दबद्ध करण्याची राहूनही गेली असतील. आजही खंडोबा आणि जोतिबा ही कुलदैवते असणारी कुटुंबे दरवर्षी यात्रांना जातात. देव्हाऱ्यात या दैवतांची पूजा नित्यनेमाने करतात. मनातला भक्तिभाव पिढ्यान्पिढ्या अजूनही त्याच तन्मयतेने व्यक्त करतात, त्यामुळे मल्हारीचा यळकोट लोकमानसात चिरंजीव आहे.
दार उघड बया! दार उघड...

 लहान असताना रस्त्यावर कडकलक्ष्मीच्या डफाचा कडकडाट ऐकू आला, की आम्ही अंगणातून घरात पळायचो. खरं तर त्या वेळी तिच्या त्या रूद्ररूपाची भीती वाटायची. लांब केस, कपाळाला हळदी-कुंकवाचा मळवट, कंबरेभोवती हिरवे जरीचे खण, त्यात काही चोळीचे खणही असायचे. कंबरेला घुगरांची माळ असायची. तालबद्ध नाचताना ती घुगरं वाजायची, पायात मोठे जाड, मध्ये पोकळ असलेले पितळी वाळे. त्यात खडे असल्याने चालताना त्याचा आवाज यायचा. कंबरेच्यावरचे काळेशार पाठ-पोट मात्र उघडेच असायचे. ओठावर मिशाही असायच्या. ते सगळं दर्शनच उग्र असायचं. कडकलक्ष्मीलाच ‘पोतराज' म्हणतात, हे थोडं मोठं झाल्यावर कळलं; पण खेडोपाड्यांत बोली उल्लेख 'कडकलक्ष्मी' असाच करायचे. आषाढात पाऊस कमी झाला, की बऱ्याचवेळा मंगळवारी किंवा शुक्रवारी पोतराजाची फेरी गावात व्हायची.
 या पोतराजाबरोबर पाठीमागे डोक्यावर मरिआईचा देव्हारा घेतलेली स्त्री असायची. पोतराजाच्या हातातल्या डफाच्या तालावर ती तिथल्या तिथं डोलल्यागत देव्हाऱ्यासह नाचायची. शक्यतो हे दोघं एखाद्या चौकात, देवाच्या देवळासमोर किंवा वाड्याच्या मोठ्या चौकातही थांबायचे आणि मग पोतराज देवीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं देवीशी मोठमोठ्यांदा बोलणं सुरू व्हायचं. ते चालू असताना डोक्यावर देव्हारा घेतलेली स्त्री हातात डफडे घेऊन वाजवू लागते. त्या आवाजाने हळूहळू आजूबाजूच्या आयाबाया लेकरेबाळे जमा होऊ लागतात. पोतराजाच्या अंगात संचार झाल्यासारखा तो पाय नाचवत पायातल्या वाळ्याचा व कमरेच्या पुंगराचा आवाज करून नाचायला लागतो आणि मग हातात कोरडा किंवा आसूड घेतो त्याला 'कडक' असंही म्हटलं गेलं आहे. हा तीन-चार फुटांचा कोरडा हातात घेऊन गरगर फिरवायला लागतो. तो असा गोल फिरवायला लागला. की भोवतालची गर्दी चार पावलं मागं सरकायची. हा कोरडा वाद्याच्या तालावर तो न पाठीवर मारून घ्यायचा. त्या मारून घेतलेल्या कोरड्याचा फट् फट् आवाज यायला लागला, की सगळ्या लहानांना विस्मय व थोडी भीती वाटायची. हे कोरडे मारून घेताना तो देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी साद घालत राहायचा.

बया! दार उघड, दार उघड
मरिआई बया! दार उघड...

 त्या बंद दरवाजाच्या समोर मोठमोठ्यांदा त्याची ही आळवणी चालू असायची. आजूबाजूला आता गर्दी वाढायला लागलेली असायची. काहीजण कडकलक्ष्मीच्या म्हणजेच पोतराजाच्या अंगात कधी येते आणि त्याला आपण कधी प्रश्न विचारतो, या प्रतीक्षेत असायचे.
 पोतराज नंतर मग ढोलकीचा आवाज वाढवायला लागतो. जी स्त्री डोक्यावर देव्हारा घऊन आली असते, तिच्याही अंगात यायला लागते. ती घुमल्यासारखी करायला लागते. पोतराज आपल्या उघड्या घामेजल्या दंडावर दोरी घट्ट बांधतो आणि हातात दाभण घेऊन पुन्हा देवीला बये! दार उघड' म्हणून साद घालायला लागतो आणि अजून देवी दार उघडत नाही पाहून ते दाभण उघड्या दंडावरच्या नायत कचाकचा मारून घ्यायला लागतो. जिथे त्याने दाभण मारून घेतलेले असते, तेथून रक्त यायला लागते; पण पोतराजाच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेश नसतो. पाहणारे मात्र ते पाहून चित्रासारख स्तब्ध होतात; आणि मग पोतराज एवढ्यावर थांबत नाही. तो स्वत:ला जास्तीत जास्त त्रास करून घेण्याचा प्रयत्न करायला लागतो. जणू त्यामुळे देवी दार उघडेल. तो बेभानपणे स्वत:भोवती गोल गिरक्या घेत स्वत:च्या दातांनी मनगट चावून घ्यायला लागतो. शेवटी देव्हाऱ्याचा दरवाजा उघडला जातो. सभोवती जमलेल्या आया-बायांचे हात पटापट जोडले जातात. देव्हाऱ्यात मरिआईची मूर्ती असते. मग देवीला प्रश्न विचारण्याचा कार्यक्रम चालू होतो. लोकांचे प्रश्न पोतराज मोठ्या आवाजात देवीला विचारतो. जणू तो माध्यम असतो. देवी त्याच्याशी बोलत असते. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं विचारणाऱ्याला सांगत असतो. कधी पावसापाण्याविषयी विचारलं जातं, कधी सांसारिक हालअपेष्टातील प्रश्न असतात. लेकरा-बाळांच्या लग्नाबद्दल विचारलं जातं. त्याची उत्तरं पोतराज देत असतो; पण लोकांना जणू ती देवीनं दिलेली उत्तरं वाटतात. कारण त्यांच्या मते तो देवीचा संचार झालेला माणूस असतो. गावावर काही संकट येणार नाही ना? कोणती साथ गावात येणार नाही ना? हेही प्रश्न मरिआईला विचारले जातात. कारण तिचा कोप झाला तर गाव संकटात येईल, अशी भीतीही खेड्यापाड्यातल्या लोकांना असते. ही सगळी प्रश्नोत्तरे संपली, की मग जमलेल्या बाया देव्हाऱ्यातल्या देवीची पूजा करायला पुढे सरसावतात. सुपातून धान्य आणलेले असते. हळदी, कुंकू, देवीसाठी पाणीही आणलेले असते. काही खण-नारळ लिंबू यांनी देवीची ओटी भरतात. प्रत्येकाची श्रद्धा व आर्थिक स्थितीप्रमाणे देवीलाही भेट-प्रसाद दिला जातो. पोतराज हातात धान्य भरलेले सूप घेऊन ते उभे धरत चक्राकार फिरतो. धान्य गतीमुळे खाली पडत नाही. लहान पोरांना आश्चर्य वाटतं. खरं तर त्यांच्या दृष्टीनं पोतराजाच्या सगळ्याच क्रिया या विस्मयकारक असतात. भीती वाटत असली. तरी आईच्या पदराआडन ती ते सगळं पाहात असतात. हे सगळं झाल्यावर धान्य गोळा करून पोतराज पुढच्या चौकात वा गावात जात असतो.
 डॉ. श्री. द. ता. भोसले यांनी पोतराज' हा द्रविडीयन संस्कृतीमधून आल्याचे सांगितले आहे. रोगराई किंवा समूहावर येणारे अरिष्ट टाळण्यासाठी काही उपासना सुरू झाल्या. त्यात मरिआई व तिचा भक्त म्हणजे पोतराजाचा सामावेश होतो, असं ते म्हणतात. लोकसंस्कृतीने काही देवतांची उपासना लोकांना संरक्षण व सुरक्षा मिळावी म्हणून जोपासली. त्यातील मरिआई ही देवता आहे. दक्षिणेत तिला ‘मरिअम्मा' म्हणतात, तरे महाराष्ट्रात मरिआई.
 पोतराज पुरुष असूनही स्त्रीवेष धारण करतो. स्त्रीसारखे केस वाढवतो, याचे कारणही दक्षिण भागामध्ये जेव्हा देवीची आराधना करायची तेव्हा पुरुष स्त्री वेष धारण करतो, ते देवीला आवडते. जोगतीसुद्धा स्त्रीवेष धारण करून यल्लमाची पूजा व सेवा करतात.
 लोकसंस्कृतीतल्या एका कथेनुसार 'पिरहू' नावाच्या ऋषीची नागावली नावाची पत्नी होती. तिची पतिव्रता म्हणून दिगंत कीर्ती होती. एकदा ब्रह्मा-विष्णू-महेशांना तिची सत्त्वपरीक्षा पाहण्याची इच्छा झाली. त्यासाठी ते आले, तेव्हा नागावलीने त्यांचे तीन लहान बालकांत रूपांतर केले. देवांना राग आला. तेव्हा त्यांनी 'तुझे रूप नाहीसे होऊन तु कुरूप बनशील' असा शाप दिला. क्षणार्धात ती कुरूप झाली. चेहऱ्यावर देवीचे व्रण निर्माण झाले. पिरहू ऋषी परतल्यावर त्यांनी पत्नीचे हे रूप पाहिले व ते संतापले. त्यांनी पुन्हा तिलाच शाप दिला तो असा, की 'तू राक्षसी म्हणून जन्माला येशील आणि लोकांना रोगाने पछाडून त्यांनाही आपल्याप्रमाणे कुरूप बनवशील' पिरहू ऋषींच्या या शापानेच नागावली मरिअम्माच्या रूपात जन्माला आली, असा उल्लेख रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ग्रंथात केला आहे.
 ही मरिअम्मा निर्मितीची कथाही यल्लमाच्या कथेशी जोडली गेली आहे. जमदग्नी ऋषींनी त्यांच्या पत्नीला गंधर्व दर्शनातून झालेल्या मानसिक पतनासाठी शिक्षा दिली. परशुराम जो त्यांचा पुत्र होता. त्याला त्यांनी मातेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. त्याच वेळी रस्त्यावरून एक मातंग जातीची स्त्री येत होती. मरिअम्माची ही स्थिती पाहून सहानुभूतीने तिने तिला मिठी मारली. परशुरामाने दोघींची शिरे उडवली. नंतर जमदग्नीनेच प्रसन्न होऊन परशुरामाला हवा तो वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्याने 'मातेला जिवंत करा' असा वर मागितला. तेव्हा जमदग्नीने मंत्रभारित जल दिले व धडाला शीर चिकटवून त्या जलाच्या साह्याने मातेला जिवंत करण्यास सांगितले. परशुरामाने आनंदाच्या भरात मातंगीचे शिर मरिअम्माच्या धडाला (जी ब्राह्मण होती) व मरिअम्माचे शीर मातंगीचे धडाला चिकटवले. मरिअम्मा म्हणजे ब्राह्मण स्त्रीचे शीर आणि मातंग स्त्रीचे धड यापासून या मरीआई' ची निर्मिती झाली.
 मरीआई काय किंवा यल्लमा काय या दोन्ही देवींच्या उपासनेत लिंबाच्या पाल्याला महत्त्व आहे. यल्लमाचे उपासक म्हणजे जोगती आणि जोगतीणी या सुद्धा लिंब नेसून देवीची पूजा करतात. 'लिंब नेसणे' हा नवस त्यांचे भक्त काही विशिष्ट इच्छा मनात धरून करतात व ती इच्छा पुरी झाल्यावर ते लिंब नेसतात. या मरिआई वा मरिअम्माच्या उपासनेतही लिंबाच्या पाल्याचे महत्त्व आहे. लोकसंस्कृतीतील बऱ्याच कथा एकमेकात गुंफल्याप्रमाणे दिसतात. त्यांचे एकमेकांशी संदर्भ लागतात. त्यात कुठंतरी एक सूत्र सापडते. रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ग्रंथात मरिअम्माच्या उपासनेत लिंबाला महत्त्व असण्याची आणखी एक छोटी कथा सांगितली आहे. त्यात देवीची उपासना आणि लिंब या वनस्पतीचा औषधी गणधर्म या दोन्हीविषयीची सांगड घातली गेलेले आढळते. ही दक्षिणेतील कथा आहे. यातली मरिअम्मा मीळ कवी तिरूवल्लुवर याची पत्नी आहे. तिला देवीचा रोग झाला. अंगावर पुळ्या आल्या. उदरनिर्वाहासाठी तिला घरोघर भिक्षा मागायची वेळ आली. घरोघरी जाऊन भिक्षा मागताना तिच्या अंगावर माशा बसत. त्या ती हातात लिंबाच्या पाल्याचा डहाळा घेऊन हाकत असे. लिंबाच्या पाल्यातील औषधी गुणधर्माने तिच्या देवीच्या जखमा बऱ्या झाल्या असतील; पण पुढे मग तिला देवी कांजण्याची देवता म्हणू लागले.
 हळूहळू सगळीकडे अशा प्रकारचे रोग पसरवणारी देवी वा देवता म्हणून सगळे तिला घाबरू लागले. मरिआईचा कोप झाला, तर गावावर साथीच्या रोगाचे संकट येते, अशी धारणा झाली. मग ते येऊ नये, मरिआई कोपू नये म्हणून तिचा भक्त जो पोतराज त्याच्याकरवी तिची पूजाअर्चा करून तिला शांत करणे चालू आहे.
 मरिआईला संतुष्ट करण्याचा विधी मग लोकसंस्कृतीत प्रचलित झाला. एखादा मंगळवार, शुक्रवार ठरवून मरिआईचा गाडा गावातून फिरवून तो गावाबाहेर नेण्याची प्रथा चालू झाली. मंगळवार वा शुक्रवार हा देवीचा दिवस म्हणून मग तो महत्त्वाचा. या प्रथेत महार जातीतील लोकांना महत्त्व असे. प्रथम अशा प्रकारचा मरिआईचा गाडा फिरविण्यात येणार आहे, हे गावभर दवंडी पिटून कळवले जाई. हा जो मरिआईचा गाडी असे, तो महार लोक तयार करत. ते आंब्याची लाकडे तोडून सुताराकडे देत. सुतार एक छोटा गाडा व दोन मूर्ती बनवून देई. त्या गाड्यात बसवत. गावात फिरून धान्य गोळा केले जाई. दक्षिणाही गोळा करत. धान्याचे पीठ करून त्याच्या घुगऱ्या व आंबील बनवत. दक्षिणेतून लिंब व इतर वस्तू जमवत आणि मग वाजंत्री वाजवत गाडा गावातून नेत. लोक त्यापुढे नारळ फोडत. गाडा जाताना रस्त्यावर आंबीलसडा घातला जाई. घुगऱ्या विखुरल्या जात. हा गाडा गल्लोगल्लीतन फिरे. एकदृष्ट्या देवीच्या आशीर्वादाने गाव बांधला जातो, अशी यामागे धारणा. देवीचा कोप मग गावावर होत नसे. रस्त्यात नारळ, अंडी फोडली जात. गाडा कोणीतरी महार व्यक्ती डोक्यावर घेई आणि मग पोतराजाच्या सांगण्यानुसार कोणत्या विशिष्ट दिशेने गाडा गावाबाहेर घ्यायचे, ते ठरवले जाई. हा मरिआईचा गाडा फिरताना वाजंत्री शिंगे वाजवत तेव्हा पोतराज गाणी म्हणे,

आलीया मरिबाई
तिनं गाड्याचा केला साज
हाती कोरडा त्याला बाक॥
आलीया मरिबाई तिचा कळेना अनुभऊ
भल्याभल्यांचा घेती जीवू

आलीया मरिबाई॥
आलीया मरिबाई
नीचळ सोनियाची
गावाला ताकीद
ईच्या आंबील बोणीयाची॥
कापूर हिल्लाळ जगती
त्याच्या ज्योती ज्योती
जटेची मरिबाई
तिच्या पूजेला गर्दी होती॥

 अशी गीते पोतराज गात. त्यांच्या गीतात मरिआईचा महिमा गुंफलेला असायचा. शाहू महाराजांनी तिची पूजा केली, पायघड्या घातल्या, असे वर्णनही एका पोतराज गीतामध्ये आढळते.

देवामधी देव पोतराजा बळी
त्याची वनामधी माळीगं कन्या बारूलां
देवामधी देव पोतराज मोठा
त्याच्या वनामधी गोठा कन्या बारूला
बारूबाई तुझी पोतराजावर पिरती
नांदे सुखानं धरती गं कन्या बारूला
बंधू पोतराजा राखण राखे गाव
तुझ्यासंगं त्याचं नाव गं कन्या बारूला

 अशा काही गीतांमधून पोतराजाचाही महिमा डोकावतो. तो देवीचा भक्त असल्याने गावाची रदबदली तो देवीजवळ करतो. देवीला प्रसन्न ठेवतो. तिचा कोप होण्यापासून गावाला वाचवतो म्हणून मग 'बंधू पोतराजा राखण राखे गाव' असं वर्णन गीतामध्ये येतं.
 पोतराज स्त्रीरूप धारण करतो त्यामुळे त्याच्या बऱ्याचशा गाण्यात ओवी रचना आढळते. त्याचं गीतातून व्यक्त होणं, हे स्त्री मनाचा आविष्कार वाटतं. त्याची सगळी गाणी मरिआईचीच नाहीत, तर इतरही काही भक्तिरचनाही त्याच्या गीतात आहेत. लोकमानसात अशा गीताचे एक चमत्कारिक मिश्रण आढळतं. मग वाघ्या-मुरळी असो, वासुदेव असो, गोंधळी असो काही गीतं थोडी कथेच्या अंगानं जाणारी रंजनाचं सूत्र धरणारी आढळतातच. पोतराजही त्याला अपवाद नाही. पोतराज गीतात त्यानं भिल्लीणीची कथाही सांगितली आहे. जी शंकर-पार्वती संबंधातली आहे.

सोंगट्याचा डाव गिरजा म्हणती 'आठ-नऊ'

संबूदेव बोले  'गिरजा, लबाडी नकं घेऊ'
सोंगट्याचा डाव  आला एकमेकी
गिरजा नार पक्की  संबूदेवाचं डोळं झाकी!
भोळ्या शंकराचा  त्येच्या खेळाच्या छंदामंदी
गिरीजा नारीन  त्येचा जिंकून नेला नंदी!
रूसला संबूदेव  जाऊन डोंगरी घाली धूप
पितींची गिरजानार घेती भिलीणीचं रूप!
रूसला संबूदेव  जाऊन डोंगरी घाली धूनी
पिर्तीची गिरजा नार  बोले तूमावाचून नाही कुणी!
रूसला संबुदेव  जाऊन बसला तळ्याकाठी
पिर्तीची गिरजा नार  घाली जाऊन गळ्या मिठी!

 हे खरं तर शंकर-पार्वतीचं प्रीतीगीतच आहे; पण पोतराजानं आपल्या साध्या सोप्या शब्दांत कथेतून मांडलं आहे. ते ऐकताना लोकही रमून जात असतात. इतर स्थानमहात्म्य त्यात कोल्हापूर, नाशिक वगैरीचीही गीतं पोतराजाची आहेत. माता, पिता, सूर्य, पाच पांडव, सात आसरा, नवनाथ, दहा अवतार अशा विषयावरही त्यांची गीते आहेत. सरोजिनी बाबरांच्या ‘एक होता राजा' मध्ये अशी बरीच गीते त्यांनी संपादित केली आहेत.
 पोतराजाचं दक्षिणेत फार माहात्म्य होतं. तिथं तर मरिआईच्या जत्रेत रेडाबळीसुद्धा दिला जात असे. ग्रामदैवतेचे तुष्टीसाठी अशी प्रथा असावी. आधी देवीला रेडा सोडत. तो गावभर फिरत असे. नंतर योग्य मुहर्तावर त्याचा बळी देत. त्याचे शीर ग्रामदेवतेसमोर पुरले जात असे. महाराष्ट्रात काही ठिकाणी देवीच्या समोर मेंढराचा बळी दिला जात असे. मांढरदेवीच्या यात्रेतही अगदी परवापर्यंत असा बळी दिला जाई. आता ती प्रथा बंद झाली आहे. काही ठिकाणी पोतराज देवीसमोर असा मेंढराचा बळी देई व त्या मेंढराचे रक्त स्वत: घटाघट प्राशन करी, असे उल्लेखही आढळतात; पण या उग्र प्रथा हल्ली मागे पडू लागल्या आहेत. मरिआईचा गाडा गावाबाहेर नेणे वगैरे प्रथाही आता क्वचितच दिसून येतात. आता समाजप्रबोधन घडत आहे. साथीच्या रोगाचे उच्चाटन होत आहे. देवी रोग तर नाहीसा झालेला आहे. साथीच्या रोगाची मूळ कारणे लोकांना समजली आहेत. मरिआईच्या कोपामळे हे रोग उद्भवत नाहीत आणि तिच्या उपासनेने ते कमी होत नाहीत. त्यासाठी औषधोपचारांची योजना करावी लागते. हे लोकमानसाच्या ध्यानी येत चालले आहे, त्यामुळे पूर्वी वंशपरंपरेने होणारा पोतराज व्यवसायही कमी झाला आहे. पूर्वी पोतराज होण्यासाठी दीक्षा दिली जाई. त्याचाही समारंभ असे. 'गावगाडा'कार अत्रे यांनी म्हटले आहे, की 'पोतराज करताना भांग, गांजा, अफू, दारू वगैरे जितके म्हणून मादक पदार्थ आहेत, तितके पूजेला आणायला लागतात व गुरुदक्षिणा आणि जेवणावळ मिळून ५० रु. खर्च येतो.'
 आता नुसत्या पोतराजाच्या व्यवसायावर उदरनिर्वाह होणे अवघड झाले आहे. त्यांची मुले शिक्षित होऊन नोकरी-धंदा करू लागली आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस पोतराज दुर्मिळ होत जाणार आहेत.आताही शहरी भागात मुलांना दाखविण्यासाठीही कडकलक्ष्मीचे रूप दुर्मिळच आहे. खेडोपाड्यात क्वचित आया लहान मुलांना कडकलक्ष्मीची भीती घालत. आता तेही संपू लागले आहे. एकनाथ महाराजांनी प्रबोधनात्मक लिहिलेल्या भारुडात पोतराजावरचे 'दार उघड बया!' हे भारूड प्रसिद्ध आहे. त्याने लोकांच्या ज्ञानाची कवाडं उघडी केली आहेत.
 पण तरीही लोकसंस्कृतीमधला पोतराज, इतक्या सहजासहजी विसरता येणार नाही. काही काळात त्याचं महत्त्व होतंच. देवीच्या भक्तात त्याचं स्थान अढळ आहे. देवीचा महिमा त्याच्याविना पूर्ण होत नाही. त्याचं चित्र संस्कृतीच्या चौथऱ्यावर चिरंजीव आहे आणि त्याचबरोबर देवी महिमा वर्णणारं त्याचं गीतही

लक्ष्मीआई! तुझं लेणं काई
पांढरं पातळ, हिरवी चोळी
लिंबाचं नेसणं, देवात बसणं!

वारियाने कुंडल हालें

 खेड्यात दर आठवड्याला कुठं ना कुठं भजनाचा कार्यक्रम असायचाच. कधी कोणाच्या घरी, कधी एखाद्या देवळात. माणसं जेवणखाण संपवून रात्री एकत्र जमायची. कोणी पेटी वाजवायचं, कोणी तबला. टाळ मात्र बऱ्याच जणांच्या जवळ असायचे आणि मग एकापाठोपाठ एक अभंग म्हणणं सुरू व्हायचं. मृदंग वाजवणारंही कोणीतरी असायचंच आणि काही वेळानं कोणीतरी म्हणायचं, 'म्हणा रे एखादी गौळण कुणीतरी' आणि मग थोडं सुस्तावलेलं वातावरण तरतरल्यासारखं व्हायच. आता काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार, अशा अर्थानं आम्ही पोरंही डोळ्यांवरची झोप बाजूला सारून तिथल्या तिथे सावरून बसायचो आणि मग कोणी तरी 'गौळण' म्हणू लागायचं,

वारियाने कुंडल हाले। डोळे मोडित राधा चाले॥धृ॥
राधेला पाहुनी भुलले हरी। बैल दोहितो आपुले घरी॥
फणस गंभीर कर्दळी दाट। हाती घेऊन सारंगपाट॥
हरीला पाहुनी भुलली चित्ता। मंदिरी घुसळी डेरा रिता॥
मन मिळालेसे मना। एका भुलले जनार्दना॥
वारियाने कुंडल हाले॥धृ॥

 राधेच्या त्या भावाने जणू श्रोतृजनही तल्लीन व्हायचा. राधेचं चालणं, कृष्णावर भुलणं, कृष्णाच्या ओढीनं सैरभैर होणं, हे सगळं त्या गौळण गीतातून सामोरी यायचं. डोळ्यांसमोर साकार व्हायचं. मराठी माणसाच्या मनावर भूल घालायचं. अभंग हा मराठी माणसांना आवडणारा प्रकार. त्यातूनही भावमधूर, आर्त भाव प्रकट होतो, तरी या अभंगाबरोबरच आपल्या बऱ्याचशा संतांनी गौळणीची रचना केली आहे.
 या गौळणींची रचना पाहिली, की जाणवतं यात परमेश्वराशी एक खाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात मुग्धशृंगार आहे; पण मधुराभक्तीही आहे. लौकिक प्रेमाचा उत्कट साक्षात्कार या गौळणीमधून दिसतो. अभंगामधील परमेश्वर हा निर्गुण आणि निराकार असतो. बराचसा अव्यक्त असतो; पण गौळणीतून जणू तो माणसाच्या समोर साकार होतो आणि सामान्य भावभावनांशी एकरूप होतो. त्याच्याशी भांडता येतं, रूसता येतं, तक्रार करता येते. त्याच्याशी वात्सल्य भावानं सामोरी जाता येतं. त्याच्याविषयीचे मुग्ध शृंगारभाव व्यक्त करता येतात. कधी मग तो सखा बनून साथ देतो. सुख-दुःखाचा सोबती बनतो. कधी माऊली बनून वात्सल्यमिठी घालतो, कधी शृंगारभाव व्यक्त करणारा प्रियकर बनतो. त्याच्या रंगात तो रंगवून टाकतो, तर कधी आपलंच छोटं मूल बनून त्याच्या अनेकविध नाना लीलांनी तो आपलं चित्त हरपून टाकतो. त्यामुळं मराठी माणसाचं भावजीवन 'गौळण ' ही व्यापून टाकते. त्याच्या मनावर गारूड करते.
 खरं तर काहींच्या मते गाथासप्तशती व जयदेवादि कवींची 'गीत गोविंदा' सारखी काव्ये आहेत, मी मराठीत ज्या गौळणी रचना आहेत. मग त्या संतांनी केलेल्या असतो व शाहिरांनी केलेल्या असतो, ती त्यांची मूळ प्रेरणास्थाने असावीत. मराठीत ज्या राधा-कृष्णविषयक रचना ज्यात शृंगारभाव आहे, मधुराभक्ती आहे त्या 'गौळणी' नावाने प्रचलित झाल्या आहेत. प्रेमभावना ही सर्वसामान्य मनुष्याला व्यापून राहिली आहे. ती जेव्हा राधा-कृष्णाच्या रूपानं साकार होते तेव्हा माणूस भुलून जातोच. कारण ती त्याला सहज समजणारी असते. इथं ती आध्यात्म्याचं दुर्बोध वाटणारं अवगुंठन वापरत नाही. शृंगार हा सर्वांनाच आवडतो; पण तो जेव्हा राधा-कृष्णाच्या रूपानं गौळणीतून साकार होतो, तेव्हा तो भक्तीचं टोक धरून असतो, संयमित असतो.
 मराठीमध्ये जी गौळण रचना आहे, ती वैविध्यपूर्ण आहे. काळाच्या ओघात जी राजकीय, सामाजिक परिवर्तने घडत गेली, त्याचंही प्रतिबिंब तिच्यात उमटत गेलं. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या गौळणी आणि नंतर होनाजी बाळा, परशुराम यासारख्या शाहिरांनी लिहिलेल्या गौळणी पाहिल्या, की ते ध्यानात येतं. संतांच्या गौळणी रचनेत त्या-त्या संतांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव जाणवून येतो. म्हणजे ज्ञानेश्वर जेव्हा गौळणीची रचना करतात तेव्हा,

सावळी प्रतिमा घेऊनि सुकूमार
खेळत सुंदर गोकुळी रया।।
त्या रूपे वेधिलें काय करूं माये।
अवघे निर्गुणीच होय पाचारीता॥२॥

 असं ते म्हणतात. कुठेतरी यात ज्ञानदेवांची योगानुभवातून निर्माण काव्यसृष्टी जाणवते, तर नामदेवांच्या गौळणीमध्ये एक भाववेडेपण आहे.

रात्री काळी, घागर काळी
यमुनाजळे ही काळी वो माय॥१॥
बुथ काळी बिलवार काळी
गळा मोती एकावळी काळी वो माय॥२॥
मी काळी कांचोळी काळी
कांस कांसिली ते काळी वो माय॥३॥
विष्णुदास नाम्याची खामिणी काळी।
कृष्णमूर्ती बहु काळी वो माय॥४॥

 कृष्णाच्या काळेपणात गुंतलेलं, नामदेवाचं भाववेडं मन या गौळणीतून सामोरी येतं. त्या रंगात रंगलेपणाची भावना नामदेवांच्या या प्रतिमांतून साकार होते. हे भावभक्ती वेल्हाळपण हे नामदेवांचं व्यक्तिमत्त्वच होतं.

 ज्ञानदेवांची गौळण मनातल्या कृष्णाशी सुखसंवाद करते. त्याच्या मिलनाच्या कल्पनेत रंगते. बाललीलांतही रमते. कृष्ण खोड्यांनी कातावते. ज्ञानेश्वर गौळणीत म्हणतात,

पैल तो गे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगतसे॥१॥
उडरे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ
पाहणे पंढरी राऊ घरा कै येती॥२॥

 हे सांगताना ते म्हणतात, तुझ्या पायात सोन्याचे तोडे घालीन, तुझ्या तोंडी दहीभाताची उंडी देईन. दुधे भरली वाटी तझ्यासमोर ठेवीन. इतकेच काय पण रसाळ फळाची आंब्याची डहाळी तुझ्यासमोर ठेवीन

आंबया डाहाळी फळे चुंबी रसाळी
आजिचेरे काळी शकुन सांगे॥
ज्ञानदेव म्हणे जाणिज ये खुणे
भेटती पंढरी राणे शकुन सांगे।

 पंढरीरायाला भेटायला झालेली ज्ञानदेवांच्या जिवाची तगमग या गौळणीमधून दिसते. म्हटली तर ही विरहिणी आहे. जिवाची परमेश्वरभेटीची तळमळ इतकी वाढत जाते, की मग तो परमेश्वर येऊ लागल्याची लक्षणे दिसू लागतात, भासू लागतात.

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु।
मी म्हणे गोपाळु आला गे माये।
चांचरती चांचरती बाहेर निघाले।
ठकचि मी ठेले काय करू ॥१॥
मज करा का उपचारू, अधिक ताप
सखिये सारंग धरू भेटवा कां॥धृ॥

 ज्ञानदेवांचे सगळे प्राण त्या विठ्ठलानं बांधून घेतले आहेत. सगळीकडे ते सावळे पितांबर नेसलेले रूप दिसत आहे; पण अजून ते भेटत नाही.

बंधोनि ठेले मन तव जालें आनेआन
सोकोनि घेतले प्राण माजे गे माये

बापरखमादेविवरू विठ्ठल सुखाचा।
तेणे काया मनेवाचा वेधियेले॥

 तन-मनाला त्या सावळ्या रूपानं वेढून टाकलेल्या ज्ञानदेवांच्या भावस्थितीची व्यक्तता या गौळणीत आहे.
 एकनाथांच्या गौळणीत मात्र गाऱ्हाणी आहेत. कृष्णाच्या रूपाचं वर्णन आहे, तसंच विरहभावही आहे. एकनाथांनी समाजाभिमुख विचार केला आहे. त्यामुळे लोकशिक्षण आणि नैतिकतेचा विचारही गौळणी रूपात केला आहे. एखादी कृष्णकथाही गौळणी रूपानं त्यांनी साकार केली आहे.

गौळणी सांगती गाऱ्हाणी। रात्री आला चक्रपाणी
खाऊनी दही, दूध, तूप, लोणी। फोडिली अवघीं विरजणी॥
हा गे बाई कोणासी आवरेना। यशोदे बाळ तुझा कान्हा।
कोठवर सोसू धिंगाणा ॥धृ॥

 कृष्णाच्या सगळ्या खोड्या सांगताना मागून येऊन मिठी घालतो, मुख चुंबितो. कोणी सांगते, माझ्या वेणीची आणि नवऱ्याच्या दाढीची गाठ मारतो. या कृष्णखोड्यांनी वैतागून त्या गौळणी यशोदेकडे गाऱ्हाणं घेऊन येतात आणि मग एकनाथ म्हणतात,

ऐशी ऐकता गाऱ्हाणी। यशोदेनयनी आले पाणी।
कृष्णा खोड दे टाकूनी। एका जनार्दनी चरणी।
का प्रेम तया आवरेना॥

 एकनाथांची गौळण जशी वैचारिक आहे, तशीच ती रंजकपण आहे. श्रीकृष्णाचे सौंदर्य व्यक्त करताना मनात उचंबळून येणारे भाव व्यक्त होताना त्यातून वात्सल्य, भक्ती, सात्त्विकता या भावनांचाही उदय होतो. नाथांच्या गौळणी अभ्यासताना लक्षात येतं, त्यात नाट्य आहे, तसाच शब्दांना एक ठेका आहे. कदाचित त्यामुळं त्या जास्त लोकप्रिय झाल्या असाव्यात.

असा कसा देवांचा देव बाई ठकडा
देव एका पायाने लंगडा॥धृ॥
गवळ्याच्या घरी जातो। दही, दूध चोरूनी खातो।
करी दुधाचा रबडा॥१॥
शिंकेची तोडितो। मडकेची फोडितो।
पाडी नवनीताचा सडा॥२॥
वाळवंटी जाती। कीर्तन करितो।
घेतो साधुसंताशी झगडा॥३॥

एका जनार्दनी। भिक्षा वाढा बाई।
देव एकनाथाचा बछडा॥४॥

 या नादनृत्याची धुंदी श्रोत्यांवरही राहावी, अशी सुंदर शब्दरचना या गौळणीत आहे. नाथांच्या सगळ्या गौळणींचे मुखडे हे आकर्षक आणि गेय आहेत. मग ती कसा मला टाकूनी गेला राम' असू दे, की 'वारियाने कुंडल हाले' असो, की 'येई वो श्रीरंगा कान्हाबाई' असो त्यामुळे सगळीकडे भजनात नाथांच्या गौळणी जास्त प्रमाणात गायल्या जातात व लोकप्रियही आहेत. एकनाथांनी उत्तरेत भ्रमण केले होते. तेथील गोपीगीतांच्या प्रभावामुळे असेल कदाचित; पण नाथांच्या गौळणीत खट्याळ शृंगारभाव व मिश्कीलपणा जाणवल्याशिवाय राहात नाही.
 प्रत्येक संतांचं स्वभाववैशिष्ट्य त्यांच्या गौळणीरचनेत जाणवून येतच. तुकारामांची गौळण ही जास्त धीट वाटते. तिचे कृष्णावर असलेले प्रेम ती व्यक्त करते त्यामध्ये ती कामभाव दडवत नाही. तिचा मुग्धशृंगार ती धीटपणे व्यक्त करते. तुकारामांनी त्यांच्या आयुष्यात जो तीव्र लढा वेगवेगळ्या पातळीवर दिला आहे. मग तो समाजाशी असो, स्वत:चा स्वतःशी असो, समोर आलेल्या दांभिकतेशी असो वा कौटुंबिक पातळीवरचा असो, त्यामुळे त्यांच्या शब्दाला एक धार आलेली आहे. ते समाजात जे वाईट दिसतं, त्यावर त्यांच्या शब्दांचा ते कठोर प्रहार करतात; पण तरी काही गौळणीत तुकारामांची कोमल भाववृत्ती जाणवते. त्यांची गौळण श्रीकृष्णाची टोकाची भक्ती करते आहे, त्याच्या भक्तीने ती इतकी भारलेली आहे, की मग तिला देहभावाविषयी उदासीनपणा आलेला आहे. कुठल्याही कारणाने कृष्णभेटीची आस तिला लागून राहिली आहे. त्याच्या भेटीसाठी ती वेगवेगळी कारणे शोधत आहे. मग घरात असलेले पाणी ती ओतून देते व पाणी आणण्याचे कारण पुढे करून ती घराबाहेर पडते.

एकली राना गोविंदा सर्वे
गेले ठावे ते जाले॥१॥
मज न म्हणा न म्हणा शिंदळी
नाही विषम जवळी आतळले॥२॥
नव्हती देखिली म्यां वाट
म्हणोनी हा धीट संग केला॥३॥

 कृष्णभेटीची आतुरता त्याच्याशी संग करण्याची तीव्र इच्छा यातून प्रकट होते. समाजाची पर्वाही न करता गोविंदाचा सहवास मिळण्यासाठी केलेले धाडस. शेवटी मग तुकाराम म्हणतात,

आहेव मी गर्भारपणे
हे सांगणे का लागे॥

तुका म्हणे शेवटा नेलें
संपादिले उभयतां॥

 परमेश्वराची आस वाढली, की लौकिकाची पर्वा उरत नाही आणि मग तेव्हाच परमेश्वर सर्वार्थाने सामावून घेतो. सुख-दुःखाच्या पार नेतो. मागची चिंता उरत नाही. जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटून मोक्षप्राप्ती होते.
 तुकारामांच्या विरहिणीही इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या व धीट आहेत.

बाळो जन मज म्हणोत शिंदळी।
परी हा वनमाळी न विसंबे॥१॥
सांडूनी लौकिक झालिये उदास।
नाही भय आस जीवित्वाची॥२॥
नाइके वचन बोलतां यां लोकां।
म्हणे झालो तुका हरिरतां॥३॥

 परमेश्वररूपी कृष्णावर निष्ठा जडते, प्रीती जडते, तेव्हा मग कोणी काय म्हणेल, याचा विचारच उरत नाही. लौकिक प्रलाप मनावर घेत नाही कारण मन केव्हाच प्रभूचरणी लीन झालेले असते. इथे तुकारामांनी वापरलेला 'हरिरता' हा शब्द खूप सुंदर व अर्थपूर्ण आहे. परमेश्वराशी म्हणजे हरीशी रत होणे म्हणजेच उत्कट मीलनाची परिपूर्ण अवस्था प्राप्त होणे. इथे एकात्म अवस्था साध्य होते. ईश्वर व भक्त यात वेगळं काही उरत नाही आणि अशा अवस्थेला गेल्यावर मग आणखी काय हवं!
 तुकारामांच्या गौळणीमधील शब्दरचनाही सोपी आहे. सरळ आहे; पण तरीसुद्धा मनीचा भाव परखडपणे स्पष्ट करणारी आहे. आध्यात्मिक गूढतेचा क्लिष्टपणा त्यात नाही. भावगर्भता मात्र आहे, हे नक्की.
 संत निळोबांनीही जी गौळणीची रचना केली आहे, त्यात परमेश्वर प्राप्त झाल्यावरची एक तृप्ती आहे ती जाणवून येते. त्यात सात्त्विकभाव आहे. त्यात कृष्णाचे वर्णन आहे, त्याची स्तुतीही, केली आहे. त्याच्या बाललीला आहेत. त्याच्याविषयीची गोपींची गाऱ्हाणी आहेत; पण या सर्वांहनही श्रीकृष्णाचे परब्रह्मस्वरूपच त्यांच्या गौळणीमध्ये व्यापून राहिले आहे ते लिहितात,

ऐसा निजानंद परमात्मा श्रीहरी।
आम्ही लाधलों वो भाग्याच्या संसारी।
नित्य आळगू या हृदयामाझारी!
ऐशा निजबोधे निवाल्या सुंदरी वो।
यासी विवरितां परमार्थ हाती लागें .

यासी विचारतां ये सिद्धांत वोळगे या न
यासी विनविता हाचिं वरि मांगे वो॥

 शाहीर कवींनीही गौळणींची रचना केली आहे. शाहीर परशुराम, होनाजी बाळा, प्रभाकर यांनी गौळणी लिहिल्या आहेत; पण त्या लोकनाट्यातील नाटकाच्या अंगाने जाणाऱ्या त्यामुळे इथला कृष्ण हा वेगळा वाटतो. तमाशातली गण-गौळण पाहिली, की जाणवते त्यात शृंगारभाव अधिक असतो. या गौळणीमध्ये ग्राम्यभाषेचा बाज जास्त जाणवतो. परमेश्वरी अवतारापेक्षा हा कृष्ण जास्त मानुषी वाटतो. मग तो स्त्रियांची उघड छेड काढतो, कंचुकीच्या गाठी सोडतो, गोपींचे कुचमर्दन करतो. त्याच्या उनाडक्या या गवळ्याच्या उनाड पोराचं प्रतिबिंब शब्दबद्ध करणाऱ्या वाटतात. राम जोशींच्या गौळणीत असाच कृष्ण भेटत राहतो.
 पठ्ठे बापूरावांची एक गौळण आहे

श्रीकृष्णा शारंगधरा
मी लाजून धरिते करा
चला न्हेते माझ्या मंदिरा, उडवा रंग रंग रंग

 ही तशी लावणीच्या बाजाचीच. अनुप्रासाच्या माध्यमातून एक नाद यात निर्माण केलाय. यात शृंगारभाव तर आहेच; पण कामातुरताही आहे. उघड आव्हानही आहे, ते लिहितात,

चौऱ्यांशी तऱ्हेच्या चवी
चाल दावा एक एक
नवीन अनुभवीक नवलाची हवी
म्हणे पठ्ठे बापूराव कवी
भवरसाची आहे काकवी करू नये भंग भंग भंग

 पठ्ठे बापूराव हा शाहिरी परंपरेतला अखेरचा प्रतिष्ठित कवी, असं डॉ. वसंत जोशी यांनी म्हटलं आहे. ही गौळण ही अभिसारिकाच वाटते. इथे कृष्ण हा फक्त सजन आहे. लौकिकातला देखणा पुरुष आहे असं वाटते. मग गौळणीतून पठे बापूरावांनी चंद्रावळीकडे राहीच्या रूपात जाऊन शृंगार करणारा कृष्ण शब्दबद्ध केला आहे. मीलन प्रसंग खुलवला आहे.
 राम जोशी यांच्या एका गौळणीत (होरी) लिहितात,

पुरुषवेष राधा निजवेष कवटाळुनि चुंबिती।
म्हणून गोपिका शुद्ध राधेला आलंगिती।
अंगसंग रतिभंग दंगरंगामधी किती लाजती।
मनी म्हणती कामिनी नव्हे माधव सुखसंगती।

अष्टनायका कृष्ण म्हणून राधेला कवटाळीती।
काय सांगू मी तरी विचित्र होरी मज भासती।

 राम जोशी गोपिकांच्या रतिभावपूर्तीचे वर्णन अधिक खुलवतात. यातल्या गोपी सासुरवाशिणी असूनही कृष्णाच्या संगासाठी उतावीळ आहेत. या गौळणी यशोदेकडे जे गाऱ्हाणे नेतात ते कृष्ण तरण्याताठ्या बायकांची, गोपींची छेड काढतो म्हणून; पण खरं तर ते त्यांना पाहिजेच आहे. होनाजी बाळाने गोपीकृष्ण संबंधावर अधिक काव्य रचले आहे. होनाजी बाळाच्या गौळणीमध्ये कृष्णाच्या विरहाची भावनाही उत्कटपणे वर्णिली आहे.

सांगा हा मुकुंद बाई कोणी पाहिला॥धृ॥
रासक्रीडा करिता व्रजनारी होतो सखे आम्ही विषयविचारी।
टाकून गेला तो पूतनारी। कोठे गुंतून बाई कोठे राहिला ॥

 ही त्याची एक गाजलेली गौळण आहे.
 पारंपरिक मराठी लोकगीतांमध्येही खूपशा गौळणी आढळतात. त्यांचा रचियता सांगता येत नाही; पण या गौळणी बऱ्याचशा यशोदा-कृष्ण वा वात्सल्यपूर्ण भावरचनेवर आधारित आढळतात.

राधे कृष्णाला कडेवर घे गं
कडेवर घेती घरात नेती
परोपरीचा मेवा देती
बाळ बघेना मेव्याकडे

 यात राधा-कृष्ण भाव हा वात्सल्यानं परिपूर्ण आहे. कदाचित या गौळणी स्त्री-रचित असल्यामुळे असेल, यात शृंगारभाव कमी असतो. इथे बाळकृष्णांच्या क्रीडा जास्त वर्णिल्या आहेत. मग कृष्ण म्हणतो मला वाघ धरून दे, त्याचा घोडा कर, सापाचा चाबूक करून दे, घारीचा पतंग बनवून दे, चांदोबाचा चेंडू करून दे, चांदणीची लाही बनवून दे. हे सगळे कृष्णाचे बालहट्ट या गौळणीमध्ये दिसून येतात.
 आणखी एका लोकगीत गौळणीमध्ये या सगळ्या गोपी सासुरवाशिणी आहेत आणि कृष्णाच्या खोड्यामुळे त्यांना सासुबाईंचा मार खावा लागेल याचे वर्णन आहे. पहिली, दुसरी, तिसरी गौळण अशा वेगवेगळ्या गौळणी कृष्णाच्या खोड्या सांगत आहेत.

पहिलीच गवळण गं पहिलीच गवळण
पहिली गवळण गं लोटित होती वाडा
कृष्ण गेलाय मारून खडा
आता मारील गं आता माता मारील गं सासुबाई

मोठं कठीण गं मोठं कठीण
मोठं कठीण गं सबजन शाही
हरी पडलाय आमच्या डायी।

 मग कोणी सांगते त्याने (कृष्णाने) माझे दोन्ही हात धरले, कोणी म्हणते मी भांडी घासत होते. कृष्ण दांडी मारून गेला. कोणी म्हणते मी धार काढत होते आणि कृष्ण दूध पिऊन गेला, कुणी म्हणते मी ताक घुसळत होते कृष्ण लोणी खाऊन गेला, कोणी म्हणते मी चूल घालत होते, तर खेळायला फूल टाकून गेला. लोकगीतातल्या गौळणीत शृंगारभाव फारसा नाही. एकदरीत या गौळणीमधील वात्सल्यभाव जास्त प्रतीत होतो.
 संत कवयित्रीमध्ये महंदबेचे 'धवळे' प्रसिद्ध आहेत. या स्फूटरचना गौळणीशी साम्य साधणाऱ्या म्हणता येतील. कान्होपात्रा तिने आर्त विरहिणीची रचना केली आहे. मध्वमुनीश्वर, माणिकप्रभू, रमाणात्मज, अमृतराय, कृष्णकिंकर यांनीही गौळणींची रचना केली आहे.

 राधा-कृष्ण यांच्यातला प्रीतीभाव, गौळणी आणि कृष्ण यांच्यातला शृंगारभाव, यशोदा-कृष्ण यांच्यातला वात्सल्यभाव या सगळ्यांचं एक सुंदर वर्णन एकंदरीत सर्व गौळणींमधून पाहावयास मिळतं. कृष्णाबद्दलची, त्याच्या भेटीची, कधी संगाची आतुरताही जाणवते. पण सर्वांमागे त्याच्यात लीन होऊन जाण्याची भावना असतेच. भक्तीरसात न्हाऊन चिंब करणारी गौळण ही मराठी मनाचा ठाव घेणारी आहे. भावभाबड्या खेडोपाड्यांतील माणसाचं भावविश्व व्यापून टाकणारी आहे. 'वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले' कोणी म्हणायला चालू केलं, की माणूस भावविभोर होतोच. टाळ-मृदंगाच्या तालात डोलू लागतो. त्याच्या दृष्टीच्या चौथऱ्यावर कृष्णभेटीला आतुर झालेली राधा साकारू लागते आणि तो स्वत:च कृष्णमय होऊन जातो. हीच तर गौळणी गीतांची किमया आहे.
आई भवानी गोंधळा ये ...

 लग्नं पार पडली, की त्याच घरातून गोंधळाला या बरं का, अशी आमंत्रणं यायची. लग्नानंतर आणि मुंजीच्या नंतरही 'गोंधळ' हा कुलाचार अजूनही सगळीकडे पाळला जातोच. लग्न झाल्यावर नवरा-नवरी पूजेला बसून 'गोंधळ' कुलाचार विधी असतो. बऱ्याच वेळा एखादं कार्य सुफल होऊ दे म्हणून देवीला तुझ्या नावाचा गोंधळ घालीन' असा नवसही बोलला जातो आणि मग कार्यसिद्धी झाल्यानंतर नवस पूर्ण करण्यासाठी गोंधळ विधी केला जातो.
 यासाठी जे खास देवीभक्त लोक ज्यांना 'गोंधळी' म्हणतात, त्यांना पाचारण केलं जातं. हे गोंधळी लोक तुळजापूरची तुळजाभवानी आणि रेणुकादेवीचे उपासक असतात.
 रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ग्रंथात गोंधळाची प्रथा कशी उगम पावली, हे सांगताना म्हटले आहे, की परशुरामाने बेटासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर त्याचे मुंडके तोडले. ते मुंडके परशुराम आपली माता रेणुकेला दाखवायला आला; पण त्या वेळी त्याने त्या मुंडक्याच्या ब्रह्मरंध्रातून शिरांचे तंतू ओवले जेणेकरून त्यांचा 'तिंतृण तितृण' असा आवाज येऊ लागला. बेटासूराच्या धडाचे आणि शिराचे चौंडके वाजवून परशुरामाने आई रेणुकेला वंदन केले. त्यातून या गोंधळाची प्रथा निर्माण झाली असावी.
 प्राचीन काळच्या भूतमाता देवतेशी याचा संबंध काही ग्रंथांतून जोडला जातो.
 माहूर माहात्म्याविषयीच्या ग्रंथातही रेणुकेच्या उपासनेमध्ये ‘गौंडली नृत्या'चे वर्णन येते, ते गोंधळाशी साधर्म्य असणारे आहे. गोंधळाच्या विधीमध्ये ठरावीक पद्धतीने गोंधळाची मांडणी केली जाते. प्रथम एक चौरंग किंवा पाट घेतला जातो. त्यावर एक नवीन वस्त्र अंथरले जाते. त्यावर गोंधळ्यातलं नाईक म्हणवणारा प्रमुख तांदळाचा चौक भरतो, त्यावर सुशोभित दिसेल असे हळदीकुंकू घालतो. या चौकाच्या चारी बाजूचे कोपरे असतात. तिथं चार नारळ किंवा खोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या जातात. त्याचबरोबर वेगवेगळी फळं, खारीक, हळकुंड, सुपारी हेही ठेवलं जातं. या तांदळाच्या चौकामध्ये कलश स्थापन केला जातो. एका तांब्यात विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवून त्यात नारळ ठेवतात. तांब्यावर हळदी-कुंकवाच्या रेषा काढतात. तांब्यातल्या पाण्यात सुपारी, नाणं टाकतात.
 हा चौक सजल्यानंतर चौकासमोर भाताचे उंडे ठेवून त्यावर कणकेच्या पाच पणत्या वा दिवे करून ठेवतात.
 या पाटाभोवती उसाच्या किंवा शाळूच्या ताटाचे मखर उभे करून त्याला कडाकण्या टांगतात. या कडाकण्या म्हणजे गव्हाच्या पिठात साखर घालून बनवलेल्या असतात. काही ठिकाणी डाळीच्या पिठात गुळ किंवा साखर घालूनही बनवितात. दसऱ्याच्या दरम्यान नवरात्रात खेड्यात अजूनही घरोघरी अशा कडाकण्या बनवल्या जातात.
 मखराच्या मधोमध विड्याच्या पानाची घटमाळ बांधून कलशावर सोडतात. काही वेळा झेंडू वा मखमलीच्या फुलांची ही माळ अशी कलशावर सोडली जाते.
 आणि हा विधी मांडून पूर्ण झाला, की गोंधळी दिवटी पेटवतो. जुन्या कापडी चिंध्या टोकाला बांधून त्यावर तेल घालून ही प्रज्वलित केली जाते.
 हा गोंधळ घालणारे जे गोंधळी असतात ते संख्येने शक्यतो चारजण असतात. त्यांचा खास वेष असतो अंगात अंगरखा, खाली धोतर, गळ्यात कवड्यांच्या माळा, डोक्याला पगडी, बरोबर संबळ, तुणतुणं असतं.
 खरं तर गोंधळ हे एक प्रकारचं नृत्यनाट्यच असतं. तालासुरांच्या साह्यानं गीत म्हटलं जातं. लोकसंस्कृतीतल्या इतर गीतांप्रमाणेच गोंधळातली काही खास गीतं आहेत. तसा हा खास देवीच्या पूजनाचा विधी असल्यामुळं देवीसंबंधीत गीतं यात आहेतच; पण गोंधळासाठी सर्वच इतर देव-देवतांनाही गोंधळी आमंत्रित करत असतात. या गोंधळाचा प्रारंभ गणाने होतो. यातही गणेश वंदनाला महत्त्व आहेच.

मोऱ्या गणपती रे गणराजा।
किती विनवू तुला महाराजा
तेत्तीस कोटी देवदेवता।
सर्वा आधी गणनायका।
दैत्य मारून केलिस दशा।
लावले पळवून धाही दिशा॥
किती विनवू तुला म्हाराजा॥

 गणेश वंदन झाले, की देवीची स्तुती चालू होते. देवदेवतांना गाण्यातून निमंत्रण चालू होतं. जण या सर्व देवदेवतेच्या साक्षीनं गोंधळ्याला देवीचा गोंधळ उभा करायचा असतो.
 गोंधळी संबळ- तुणतुण्याच्या तालावर देवीचा गोंधळ मांडला आहे, म्हणत देवांना निमंत्रण देऊ लागतात.

मायेचा निजरूप आईचा गोंधळ मांडीला
उदे उदे गं अंबाबाई गोंधळा ये
मोरेश्वर गणा गोंधळा ये
तेहतीस कोटी देवा गोंधळा ये

पुण्याची पर्वती गोंधळा
वाईचा गणपती गोंधळा ये

 अशारीतीनं मग कृष्णा, कोयनासारख्या नद्यांना, सातारची मंगळाई, रत्नागिरीचा जोतिबा. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, कारंडीची येलूबाई, म्हसवडचा सिद्धनाथ, शिंगणापूरचा महादेव, फलटणचा राम, नाशिकचा काळाराम, कवठ्याची यमाई, वाड्याची घोलाई, जुन्नरची शिवाई अशा देवतांना गोंधळी बोलवत राहतात. त्या त्या परिसरातील देवदेवतांना त्यात जास्त सामाविष्ट केले जाते. शेवटी

साती समींद्रा,गोंधळा ये.
नवलाख तारांगण, गोंधळा ये
धरतरी माता, गोंधळा ये
आगाशी पिता, गोंधळा ये
भक्ताच्या गणा, गोंधळा ये
राहिले साहिले, गोंधळा ये

 सर्वात शेवटी कोणी राहू नये म्हणून राहिले-साहिले 'गोंधळा' ये म्हणत हे आवतनं पूर्ण होते.
 या गोंधळामध्ये कलश, लावलेल्या उसाचे मखर, तांदळाचा चौक, नाचणारे गोंधळी या सगळ्यांबाबत एका गोंधळ गीतात प्रतीकात्मक उल्लेख येतात. या गोंधळाची व्याप्ती कशी आहे, त्याचं महत्त्व केवढं मोठं आहे, हे सांगण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. गोंधळी या गीतात म्हणतो

मायेचा निजरूप छायेचा गोंधळ मांडिला
प्रथम निरांजनी निराकार आदिशक्ती अवतार
मंडप विलासी आकाशी त्रिभुवनी प्रकाश आंबेने
आकारिला सुवासिनी, गव्ह गव्ह पाचीजण
ज्याने मन गिरासले माहेर क्रोध न मद मत्सर
गोंधळ मांडिला।

 संपूर्ण पृथ्वीतलाला व्यापून राहिलेल्या निजरूप छायेचा आदिशक्तीचा गोंधळ मांडला आहे. चौक कसा भरलाय तर

चौक हा भरियला चौकोनी नवलाख तारांगणी
घट हा उभारिला, ब्रह्मरस आत्मराज कलश
घट हा उभारिला, पाच ऊस पाच तत्त्वाचा प्रकाश
माळ ही लांबवली दिवटी चंद्र-सूर्य दोन्ही उदेभानू

 आकाशव्यापी पाट जो नवलाख तारांगणांनी सजवलेला आहे त्यावर चौक मांडला आहे. तांदळाने चौक भरला जातो. तो इथं चंद्रचांदण्यानी भरला आहे. ब्रह्मांडरूपी कलश त्यावर उभा ठेवला आहे. पाच उसांचे जे मखर ते इथं अग्नि वायव्यादि पाच तत्त्वांनी उभारलं आहे. जी घटमाळ असते ती लांबवली आहे आणि चंद्रसूर्याची दिवटी प्रकाशित केली आहे. हा गीतकाराचा एक प्रकारचा अतिसुंदर असा प्रतिभाविलास आहे. कोणा भानुदास नामक गोंधळ्याची ही रचना आहे.

 या गोंधळगीत रचनाकारांच्या रचनेतही खूप वैविध्य आहे. यात देवीच्या स्तुतीपरच रचना नाहीत. कृष्ण-यशोदेचे गीत आहे, याता चेंडूफळीचं वर्णन आहे. खेळताना चेंडू कालिया डोहात गेला. बासरीनं कृष्णानं भुजंग भारीत केला. त्यावर बसून कृष्ण कालिया डोहातून बाहेर आल्याचं वर्णन आहे.

त्या मुरलीच्या नादे भुजंग झाला सावधान
वर बसुन आले गोविंद गोकुळी झाला आनंद

 कोणा पंढरपूरच्या सोपानकाका साधू यांनी हे गीत लिहिलं असावं. कारण शेवटच्या ओळीत त्यांनी तसा उल्लेख केला आहे.
 तुळजापूरच्या भवानी मातेच्या माहात्म्याचे हे एक विलक्षण सुंदर गोंधळी गीत आढळते, त्यात गाण्याच्या दृष्टीने ठेक्याचे भान ठेवून रचना केलेली आहे.
 दैत्य महिषासुराने धरित्रीला गांजले आहे. लोक हैराण झाले आहेत. अशा वेळी तेहतीस कोटी देव एकत्र आले आहेत आणि त्यांनी देवीची विनवणी केली आहे.

तेहतीस कोटी देव मिळून
केले अंबेचे स्मरण जी
निगाली गं माय तेव्हा होमातून
महिषासुर मर्दिला तिने जी
तव देवक झाले सुख, व्हई आनंदे जी दे जी
तिन ताळ करती मुख, व्हई आनंदे जी
पुढ आगिनं झाड जळती, व्हई आनंदे जी
तुझा महिमा वर्ण मुखे, व्हई आनंदे जी
डंका गेऽऽ वाजे तझ्या दर्बारी
नांदसी तुळजापुरी।

 गोंधळी म्हणतो, होमातून देवी प्रगट झाली. देवांना आनंद झाला. स्वर्ग, मृत्यू पाताळ यांना व्यापून जणू अग्नीचे झाड असल्याप्रमाणे तेजपुंज असे देवीचे रूप पाहून सर्व आनंदित झाले. या गीतात ठेक्यासाठी 'व्हई आनंदे जी' या ओळीची रचना गोंधळी म्हणताना करतात. नंतर त्याच गीतात तो देवीच्या तुळजापूर मंदिराचे वर्णन करतो. दीपमाळ ओवऱ्या कशा आहेत सांगतो. पौषात भरणाऱ्या यात्रेचे वर्णन करतो.
 गोंधळी गीते म्हणून या विधीवेळी लोकांना एकदृष्ट्या रिझवत असतात. लोकांचा मोठा समूह त्यांच्या भोवतीने बसून गोंधळ्यांची गाणी ऐकत असतात. गोंधळी पूर्वजांच्या पराक्रमाची वर्णन करणारी गाणीही म्हणतात. ही थोडी शाहिरी अंगाने जाणारी वाटतात; पण मराठेशाहीत या गोंधळ्यांनी लोकांच्यात वीररस निर्माण करण्याचे कामही केले आहे. भाटासारखी स्तुतीपर गीतेही बऱ्याच वेळा गोंधळी म्हणतात. रा. चिं. ढेरे लिहितात, की ‘पोवाडे' गायले आणि जगवले ते गोंधळ्यांनीच. आकुर्थ-शाळीग्रामानी पोवाडे मिळविले ते प्रामुख्याने गोंधळ्यांच्या मुखामधूनच.
 लोक आवडीने गोंधळ्यांची गीते ऐकतात त्यामुळे गोंधळ्याच्या गीतात काही रंजन करणारी गाणीही सापडतात. त्यात मीठमिरचीचे भांडण नावाचे गाणे मनोरंजन करणारे आहे.

मीठ मिरचीचे भांडान
ऐका रोज खटखटीनं जी
मिरची अंगी लईच ताठा
म्हनतीया मी हाई तिखटजी
त्या दोघांनी घरोघरींची
पुरविली हो पाठ जी
मिरची म्हणे माझ्यावीन
न्हाई कोण मोठं जी
झाला मिठाचा जोर
मिरची झाली खराटजी
त्या दोघांचा तंटा मिटेना
फिरा हारीकोर्ट जी
खाली पाटा न वरती वरूटा
तवा मिटतुया तंटा जी

 मिरची आणि मीठ दोन्ही स्वत:चं महत्त्व पटवत राहतात; पण त्यांचा तंटा कधी मिटतो, तर शेवटी त्या दोघांनाही एकत्रित पाट्यावर वरवंट्याखाली वाटलं जातं तेव्हा. अशी विनोदप्रचुर गाणी अधूनमधून म्हटल्यामुळे गाणी ऐकणारी लोकंही रमून जातात. लहान-थोरांना रात्ररात्र भर गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य गोंधळ्यांच्या गाण्यांत असते. गोंधळ्यांच्या गीतांमध्ये अनेक रसांचा परिपोष असतो.

गावोगावी असणाऱ्या गोंधळ्यांकडे अनेक वेगवेगळी गीते पूर्वांपार चालत आली आहेत. त्यांचे एकत्रीकरणाचे प्रयत्न झाले. सरोजिनी बाबर संपादित 'एक होता राजा' मध्ये काही लोकांकडून एकत्रित केलेली गोंधळी गीते आहेत.
 एका गोंधळ्याच्या गौळणी गीतामध्ये कृष्णाला पाहायला गौळणी निघाल्या आहेत, त्याचं वर्णन केलं आहे. त्यात ते त्याची ठकी, कासारीण सखी, धनगराची भिकी, सोनारीण संगी, चाट्याची लिंगी, सुतारीण मैना अशा प्रत्येक जातीच्या वर्णनासहित गौळणीची नावे घेतली आहेत. श्रीकृष्ण हा सर्व समाजस्तरातल्या गौळणींना प्रिय होता, हेच यातून सांगायचे आहे आणि या सगळ्यांना बोलावून

हरिपाशी जाऊ, चला मुख डोळां पाहू
त्याच्या पदी चित्त लावू
असा विचार करत्या झाल्या

 असा गाण्याचा शेवट आहे.
 नागपंचमीवरच्या एका गीतातही अशीच सर्व जाती-घटकातील स्त्रियांची नावे येतात; पण सोबत तिच्या सवयी, तिचं दिसणं वा तिच्या वागण्याचा एखादा उल्लेख देऊन तिची ओळख दिली आहे.

आली सुतारीण बबी, तिच्या बोलण्याची खुबी
हाती तपकिरीची डबी, हाक मारी खेळगडणीला
आली घिसाडीण हिरी, न्हाई पदर डोईवरी
तिची तारांबळ सारी, न्हाई कुंकू तिच्या कपाळाला
आली धनगराची नार, नाकी शेंबुड हिरवागार
रडतं काकंला प्वार, नका घेऊ तिला संगतीला
आली म्हराटीण साळी, तिची रीत साधी भोळी
न्हाई वडारणीला चोळी, कशी बोली कळायची तिला

 या सगळ्यात फक्त म्हराटीण तेवढी 'साधी भोळी' म्हटलं आहे. बाकी प्रत्येकीच्यात काही ना काही खोडी आहे. खरं तर या सर्वांना जमून वारुळाला जायचं आहे; पण कुणा एकीच्या स्वभावधर्माचं खास दर्शन यातून सामोरी येतं.
 देवांच्या दुःखाचे वर्णन असलेले आणखी एक गोंधळी गीत सापडते. त्यामध्ये शंकर आणि विष्णू दोघेही आपापली दुःखे एकमेकांना सांगत आहेत. एका ठिकाणी शंकर म्हणतात,

भार्या दोघी गिरिजा गंगा नित्य कलह होतो त्यांसी
येक मस्तकी दुजी बैसली गणपति घेऊनि कटिदेशी ।

मदभूषण जो भुजंग तो तरी टपला गणपति वाहनासी
भक्षण म्हणउनी इच्छा त्याची पुढे करावी गत कैसी ।

 उमापती शंकरांनाही दोन बायकांमुळे झालेला त्रास गोंधळी सर्वसामान्यापुढे मांडतो. देवांनाही लौकिकातली दु:खे भोगताना पाहून सर्वसामान्य माणूस अचंबित होतो. पुढे रमापती विष्णूचेही दुःख विष्णू शंकरांना सांगतात

दोघी बायका सिवाय नायका । खेद मला त्याचा भारी ।
जगत्लक्ष्मी ऐसे असता । नाही ठिकाणा संसारी ।
येक विमुका पतिच्या लेक । कोण करी तिचा ओधारी ।
चंचल दुसरी स्वभाव तिचा जाणसी की मदनारी ।
ऐशा असता स्त्रिया प्रपंची । कोण सुखी त्या माझरि
पुत्र ऐकतो शरीर विरहित । त्रिभूवन विजय संसारी ||
ऐशा या भवदुःखसमुद्री । उपाय करू मी कोसारी ॥

 दोघेही देव जणू आपापल्या जगण्याला कंटाळल्यासारखे झालेत. माणसांसारख्याच देवांनाही वेगवेगळ्या विवंचना आहेत, समस्या आहेत. त्याचं कसं निरसन करावं, हे त्यांना समजेना झालेय. निदान मनातलं दुःख कुठं ना कुठं उघड केल्यानं ते कमी तरी होईल, या भावनेनं या गाण्यामध्ये शंकर आणि विष्णू ते एकमेकांसमोर व्यक्त करताहेत. कोण्या कौलापुरी राहणाच्या कृष्णकवीचे हे गीत गोंधळी गातात.
 संतांनी लिहिलेल्या गोंधळात भारूड आणि गोंधळ साधारणत: सारखेच वाटतात. एकनाथ महाराजांनी अनेक भारुडे लिहिली. नाथांनी लिहिलेला एक गोंधळ आहे, ज्यात गोंधळाची जी मांडणी असते म्हणजे चौक भरणे, कलश ठेवणे, दिवटी लावणे या संबंधित विश्वव्यापकतेने प्रतीकात्मक विचार केला आहे. द्वैत-अद्वैत भावभक्ति, वैराग्य ज्ञान यांचा वेगळा भाव त्यातून प्रकट केला आहे.

सुदिन सुवेळ तुझा गोंधळ मांडिला वो
ज्ञान वैराग्याचा वरती फुलवर बांधिला वो ॥
चंद्र-सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो
घालूनी सिंहासन वरुते घट स्थापियेला वो ॥
उदो बोला, उदे सद्गुरू माऊलीचा वो ॥धृ॥

 नाथांनी सद्गुरू माऊलीचा गोंधळ मांडला आहे आणि त्याचे वर्णन केले आहे. ही सद्गुरू माऊली म्हणजे विठ्ठलच आहे. उसाच्या मखराऐवजी नाथांनी ज्ञान वैराग्याचा फुलवरा गोंधळावर मांडला आहे. चंद्र आणि सूर्य दोन्हीचा पोत पाजळला आहे. पुढे ते म्हणतात,

प्रवृत्ती निवृत्तीचे घालुनी शुद्धासन वो ।
ध्येय-ध्याता - ध्यान प्रक्षाळिले चरण वो ||
कायावाचामने एकविध केले अर्चन वो ।
द्वैत-अद्वैत-भावे दिले आचमन वो ॥
भक्ति वैराग्य ज्ञान याही पूजियेली अंबा वो।
सद्रूप चिद्रूप पाहूनी प्रसन्न जगदंबा वो ॥
एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो।
त्राही त्राही अंबे, तुझा दास उभा वो ॥

 नाथांनी विठ्ठल ही माऊली अणि तीच आई भवानी, जगदंबा अंबा मानली आहे. संताच्या साहित्यात अभंगाच्या सोबतीने जे गोंधळ लिहिले गेले आहेत, ते वेगळा विचार मांडणारे आहेत. महत्त्वपूर्ण आहेत.  राजेरजवाड्यांच्या काळात पेशवाईत गोंधळी लोकांना चांगली बिदागी मिळत असायची. त्यांचा मान राखला जायचा. भरपूर बिदागी दिली जायची. कधी सोन्याच्या नाण्यांच्या रूपात, कधी कडी-तोडे, गाठे, चौकडे, शेले या रूपांतही त्यांना गौरविले जायचे.

 अजूनही खेडोपाड्यांत लग्नानंतर गोंधळाची प्रथा टिकून आहे; पण गोंधळी लोकांना फक्त याच व्यवसायावर उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. पूर्वी गोंधळ्यांना मिळणारी बिदागी भरपूर असायची. राजेरजवाड्यांची त्यांना मदत असायची. या गोंधळी प्रथेला हजार वर्षांचा इतिहास आहे. पूर्वांपार चालत आलेली ही प्रथा लोकसाहित्यात या प्रथेचं वेगळं स्थान आहे, महत्त्व आहे. काळाच्या रेट्यात लोकसंस्कृतीतल्या काही प्रथा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गोंधळाची प्रथा अजून बऱ्यापैकी टिकून आहे. नाहीतर 'गोंधळी' ही जमात हळूहळू संपून जाईल वा हे लोकसाहित्यातले गोंधळ मिटून जातील. ते शब्द होऊन टिकून राहणे महत्त्वाचे आहे.
ओळख माझं हुमाण अर्थात कोडं.

 उन्हाळ्याच्या दिवसात वाड्याच्या मधल्या मोठ्या चौकात आम्ही रात्री जेवणे आटोपली, की बसायचो. लहान मुलं असायची, मोठे पुरुष असायचे. वाड्यातल्या बायका, म्हाताऱ्या सगळे जमायचे आणि मग कोणीतरी म्हणायचं, 'मी हुमाण घालतो वळकून दाखवायचं?'
 असं म्हटलं म्हणजे मग इतरांनाही तो आपल्याला आव्हान देतोय, असं वाटायचं. जणू ती एक प्रकारे हुशारीची परीक्षाच असायची. चातुर्य पणाला लागल्याप्रमाणे सगळे सावरून बसायचे. मग हमाण घालणाऱ्यालाही चैतन्य यायचं.
 “घालू का हुमाण?"
 "घाल घाल."
 कोणीतरी म्हणायचं.
 "ऐका तर,
 पाऊस नाही, पाणी नाही, रान कसे हिरवे;
 कात नाही चुना नाही तोंड कसे रंगले.”
 ते ऐकल्यावर दोन क्षण शांतता पसरायची. सगळे विचारात पडल्यासारखे व्हायचे. कोणी तरी काही सांगायचे, ते चुकायचे.
 'हरला का?'
 सांगणारा स्वत:च्या हुशारीवर खूष होऊन विचारायचा! कोणाला उत्तर न आल्याने सगळे हार पत्करल्याप्रमाणे मग होकारार्थी मान हलवायचे.
 "सांगू"
 "हो!"
 सगळ्यांचा आवाज
 “साधं उत्तर आहे 'पोपट' त्याचं सगळं शरीर हिरवं असतं आणि कात चुना न खाता चोचही पान खाल्ल्यासारखी लाल रंगानं रंगलेली."
 मग सगळे इतकं सोपं असून आपणाला कसं सुचलं नाही म्हणून हळहळल्यासारखे व्हायचे.

 पण ज्याच्याकडून हार खाल्ली, त्यालाही दुसरं हुमाण घालून हरविल्याशिवाय इतरांना गप्प राहवणार तरी कसं. आमच्यातल्याच एक पंच्याहत्तरीच्या आजीबाई अशी कोडी म्हणजेच हुमाण घालण्यात तरबेज.

 “ए! ऐक रं तू माझं हुमाण. लई हुशार असलास तर सांगशील उत्तर."
 त्या ठसक्यात म्हणायच्या,
 "तीन पायांचा मळा त्यावर बसला रामजी काळा
 त्यांनी लावला गंधाचा टिळा."
 आजीबाईंचं हुमाण अवघडच असायचं. म्हातारीही मग गालातल्या गालात हसायची. सगळे डोकं खाजवायचे. मगाचा हुमाण घालणाराही गप्प व्हायचा.
 'कारं आता सांग की! कुठं गेली तुझी हुशारी?"
 तसा मग तो सपशेल हार मानत म्हणायचा,
 'आज्ये हारलो गं सांग उत्तर'
 'हरला का समदीजण'
 आजी सगळ्यांकडून हार वदवून घ्यायच्या आणि मग सांगायच्या,
 "तीन पायांचा मळा म्हंजी चूल, त्यावर बसला रामजी काळा म्हणजे काळ्या पाठीचा तवा आणि त्यांनी लावला गंधाचा टिळा म्हणजे पांढरी गोल टिळ्यागत भाकरी."
 मग सगळेच हसायचे. वेळ कसा जायचा ते समजायचं नाही; पण आता सगळं हे आठवायला लागलं, की जाणवतं हा 'हुमाण' प्रकारही लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यातला एक अलंकारच आहे.
 विद्वत्त सभेत सुद्धा दोन विद्वान एकमेकांच्या ज्ञानाची तपासणी करतात. त्यात पूर्वी संस्कृत श्लोकातून अशी कोडी घातली जात, तोच काहीसा प्रकार नंतर खेळासारखा 'हुमाण' वा 'कोडी' बनून लोकवाङ्मयात रूढ झाला असावा. एक-दोन ओळीतच माहिती द्यायचे; पण त्यातला गूढ अर्थ मात्र वेगळा असायचा. तो कोणालाही चटकन् उमगायचा नाही. खेड्यामध्ये काही-काही लोक या खेळात तरबेज असायचे. त्यांना पटापट उत्तरं सुचायची, तसेच ते कोडी घालण्यातही तत्पर असायचे. शेतकरी त्याच्या व्यवसायानुषंगाने, तर बायका त्यांच्या व्यवहारातल्या गोष्टीचा उपयोग करून हुमाण बनवत असायच्या.
 'चुलीत गेली अन गर्भार होऊन आली.'
 म्हणजे भाकरी. जी चुलीत शेकली, की गर्भार बाईसारखी फुगते.
 'एवढीशी पोर ओझे घेई थोर.'
 म्हणजे कापडाची गोल बनविलेली चुंबळ. जी डोक्यावर घेतली, की मोठ्या भाराचे वजनही पेलता येते.
 ‘एकाच फुलाला पाच वास.'

 म्हणजे साय, दही , ताक, लोणी व तूप. दुधापासून हे पाच पदार्थ तयार होतात म्हणून एका फुलाला पाच वास.

 'आवरल्या सावरल्या निया, पसरले पाय, धरला बामन की लावली घाय.'
 याचा अर्थ जात्यावरचे दळण दळायला बसायच्या आधी बायका निया सावरतात, खोचतात.एक पाय मुडपून दुसरा पसरतात आणि धरला बामन म्हणजे खुंटा धरतात व जातं फिरवतात.
 ‘चट चट चटले चमच्याने हाटले ओळखा पाहू मी काय म्हटले?'
 याचे उत्तर म्हणजे पिठले. ते शिजताना चटचट आवाज येतो.
 ‘तीन पायांचा पांगापुंगा, वर नाचतो धागडधिंगा, मधल्या नारीचे नाव सांगा.'
 पोळपाट, लाटणे व पोळी हे याचं उत्तर. पोळपाटाला तीन पाय, लाटणे पोळी लाटताना उभे, आडवे, तिरके फिरत धागडधिंगा करत असते आणि लाटणे आणि पोळपाट यामध्ये नारीरूपी पोळी लाटली जात असते. इथे पोळीला नारीची उपमा देण्यासाठी सुद्धा स्त्रीजातीचे भरडणे व्यक्त झाले आहे.
 'सरसर गेला साप नव्हे, गडगड गेला गाडा नव्हे, गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे. '
 रहाट - विहिरीत सरसर आवाज करतो, भोवती दोरी असते जानव्यासारखी, गोल फिरताना त्याचा गडगड आवाज येतो. हे सगळं वर्णन रहाटाला लागू पडतं.
 बायकांच्या रोज घडणाऱ्या स्वयंपाकातील क्रीयांच्या अनुरोधाने अनेक हुमाण निर्माण झाले असावेत.
 ‘आंग नाचे, तंग नाचे, तंगाची घेरी नाचे, मीच नाचे, बाबू नाचे, बाबूची शेंडी नाचे.'
 खरं यावरून चटकन काही ध्यानी येत नाही; पण बारकाईनं विचार केला की, मग याचं उत्तर डेरा, रवी, ताक करणे असं आहे, हे लक्षात येते.
 बऱ्याच बायका एकत्र बसल्या, की वेळ घालवायला असल्या हुमाणांना जोर येतो. हास्याचे फवारे उडतात. एकमेकींच्या बुद्धीची थोडीफार परीक्षा होते. मनातले ताणतणावही हलके होतात. काही कोडी चंद्र, सूर्य, मक्याचे कणीस, अनेक वेगवेगळे प्राणी, फळे, वस्तू यावरून असतात. ही कोडी नक्की कोणी रचली, हे सागंता येणं अवघड आहे कारण त्या रचयित्याची नोंद कुठे सापडत नाही. यानं ऐकलं, त्यानं सांगितलं करत ती सर्वदूर पसरत राहिली आहेत. डॉ. सरोजिनी बाबर यांनी खूप प्रयत्न करून खेडोपाडीच्या लोकांच्या स्त्रियांच्या गाठी घेऊन ती एकत्र शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या भागात ती असण्याची शक्यता आहेच. त्या-त्या प्रांत भाषेनुसार या कोडी वा हुमाणांमध्ये फरक आहेत. काही कोडी पाहिली, की खरंच रचनाकाराचे कौतुकच वाटते.
 'तोंड काळे आहे पण मांजर नाही, दोन जिभा आहेत पण साप नाही, पाच पती आहेत पण द्रौपदी नाही तर असे काय ?'
 या कोड्यात रचनाकारानं खूपच चाणाक्षपणा दाखवला आहे. या कोड्याचं उत्तर आहे 'टाक'. दौतीतल्या शाईत बुडून-बुडून त्याची नीब काळी होते म्हणजे तोंड काळे होते. नीपेला दोन बारीक जिभा असतात. आणि जेव्हा टाकाने लिहायचे असते, तेव्हा तो पाच बोटांच्या आधाराने लिहावे लागते. हे सगळे सांगताना मांजर, साप, द्रौपदी नाही हेही सांगून लय साधली आहे. पाच बोटांना दिलेली पाच पतींची उपमा तर मोठी मजेशीर आहे.
 असंच आणखी एक कोडं.

रंग नाही, रूप नाही, आभाळ म्हणशील काय?
आदि नाही अंत नाही देव म्हणशील काय?
आभाळ, भूत, देव नाही, विचार करतोस काय?
सांग मला नाव आणि जीव निघून जाय.'

 यातही वरच्या कोड्यासारखीच गंमत आहे. काय शोधायचे, हे सांगताना काय नाही हे पण सांगत जाणे आहे. या कोड्याचं उत्तर ‘वारा' आहे.
 वाऱ्याला रंग-रूप नाही तसाच आदि, अंत नाही; पण हे कोडे समजायला अवघडच आहे.
 अशी खूप कोडी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह ऐकायला मिळत असतात.
 'एकाक्षरी कुमारी, नांदते मेंदूच्या मांदारी, ती मरण पावली हिरण्यकशिपू बरोबरी.'
 या हुमाणामध्ये एकाक्षरी असणारं आणि स्त्रीलिंगी असं ते नाव आहे. असं सुचवलं आहे. ती मेंदूच्या जवळपास राहते आणि तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूसारखा झाला. हिरण्यकश्यपूचा मृत्यू नरसिंहानं नखांनी केला होता. न अस्त्र, न शस्त्र असं ते हत्यार. हे हुमाण मोठ्याच चातुर्यानं रचलेलं. याचं उत्तर 'ऊ' आहे. हे एकाक्षरी आहे स्त्रिलिंगी आहे आणि ज्याप्रमाणं नरसिंहानं हिरण्यकश्यपूला नखानं मारलं त्याप्रमाणे 'ऊ' सुद्धा नखांच्या साह्यानं मारली जाते.
 ही सगळी कोडी म्हणजे माणसानं मन रिझविण्यासाठी निर्माण केलेला एक आनंद आहे. पूर्वी तमाशामध्ये सवाल-जवाब असा प्रकार असायचा, त्यामध्ये विचारला जाणारा प्रश्न हाही हुमाणासारखाच कोड्यात असायचा. ते ओळखून त्याला उत्तर दिलं जायचं. शाहिरांनी कवनांच्या रूपानं अशी अनेक पौराणिक, ऐतिहासिक व इतर विषयांवरची हुमाणं सवाल-जबाबाच्या स्वरूपात लिहून ठेवली आहेत. तोही मनोरंजनात्मक एक वेगळा दस्तऐवज आहे. अशी किती हुमाणं, कोडी आहेत, यांची संख्या सांगता येणार नाही. रचनाकारही कुठं आणि किती हेही सांगता येत नाही. अजूनही कोणीही याची रचना करू शकतं.

 डॉ. सरोजिनी बाबर यांनी त्यांच्या ग्रंथात आणखी एक वेगळ्या प्रकारचे कोडे सांगितले आहे. यामध्ये प्रश्नाचे उत्तर प्रश्नाने म्हणजे कोड्याचे उत्तर कोड्यानेच द्यायचे अशातला प्रकार आहे.

 म्हणजे एका माणसाचे जनावर चुकलेले असते. तो त्याला शोधत फिरत असतो. इकडे-तिकडे फिरताना रस्त्यावर त्याला एक दुसरा माणूस भेटतो. याला विचारावे, आपले जनावर दिसले का. असा विचार करून जनावराचा मालक त्या रस्त्यावरच्या माणसाला विचारतो, माझं एक जनावर चकलंय तुला कुठं ते दिसलं का?'
 त्यावर तो रस्त्यावरचा माणूस म्हणतो, 'अरे तुझं जनावर कसं आहे?'
 इथं हे कोडं चालू होतं. जनावर चुकलेला माणूस 'जनावर कसलं होतं' हे सांगताना तो कोड्यातच सांगतो. तो म्हणतो,
 ‘पाय पाखराचे, वाण हरणाचा आणि कंठ मोराचा असे माझे जनावर आहे.'
 यावर तो रस्त्यावर भेटलेला माणूसही चाणाक्ष आहे. त्याला ते जनावर कोणतं आहे, हे लक्षात आलं आहे; पण तोही समोरच्याला आपल्या हुशारीची साक्ष देत असावा. तोही सांगतो, 'मला तुझे जनावर कुठं आहे ते माहीत आहे, असाच गावाबाहेर जा. तुला एक झाड दिसेल, त्या झाडाखाली ते जनावर आहे.'
 आता जनावर चुकलेल्या त्या मालकालाच प्रश्न पडतो, की ते कोणते झाड ज्याखाली जनावर सापडेल. तसा प्रश्न तो रस्त्यावरच्या माणसाला विचारतो. तेव्हा तो ते झाड कोणते सांगताना म्हणतो,
 'कांड कळकाचं, पान वडाचं आन् फळ आंब्याचं, असं ते झाड आहे. त्याखाली तुझे जनावर आहे.'
 आता त्या मालकाला ते झाड ओळखून जनावर शोधायचं असतं.
 या कोड्याचं उत्तर म्हणजे दोन कोडी सोडवावी लागतात. यात प्रसंगात गुंफलेली कोडी आहेत.
 यातील पहिलं कोडं म्हणजे ते जनावर ओळखणं ते जनावर म्हणजे शहामृग किंवा सरडा. दोन्हींना ते कोडं लागू होतं आणि दुसरं कोडं म्हणजे ते झाड कोणतं? त्याचं उत्तर रूईचे झाड' आहे.

 अशाही प्रकारची कोडी घातली जातात; पण वेचक कमी शब्दांतली कोडी वा हुमाणं जास्त चटकदार वाटतात. एक मजेत वेळ घालविण्याचे साधन म्हणून जरी या कोड्याकडे पाहिले, तरी यातील चातुर्यालाही एक वेगळे मोल आहे. त्यासाठी अक्कलहुशारी, हजरजबाबीपणा व सामान्यज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे. हे मात्र नक्की. तुम्हीही कोडी तयार करण्याचा प्रयत्न करा, नक्की यशस्वी व्हाल.
ऐलमा पैलमा : हादगा

 आम्ही वाड्यात राहायचो तेव्हाची आठवण. वाड्याच्या मधल्या चौकात सगळ्या अवतीभोवतीच्या मुली हातात हात घालून गोल रिंगण करत, संध्याकाळच्या वेळी गाणी म्हणायच्या. गोल गोल फिरायच्या, त्या गाण्यांना एक खास ठेका असायचा, लय असायची. त्या छानपैकी त्या गाण्यात रमून जायच्या. मी तेव्हा लहान होतो. ऐकायला ते सगळं छान वाटायचं. आम्ही छोटी मुलं कोपऱ्यात उभे राहून ते पाहायचो. नंतर कळलं त्या सगळ्या मुलींमध्ये एका पाटावर कोणीतरी हत्तीचं चित्र काढलंय. त्याला फुलंही वाहिलीत. कळायला लागल्यावर त्याला 'हादगा' म्हणतात हे समजलं. लहानपणी आम्ही मुलं त्यानंतर मिळणाऱ्या प्रसादाची वाट पाहायचो. आमच्याकडे त्याला 'खिरापत' म्हणायचे. प्रत्येकीनं काहीतरी डब्यात बंदिस्त करून आणलेलं असायचं. गाणी म्हणून झाली, की खिरापत ओळखण्याचा समारंभ चालू. प्रत्येकजण वेगवेगळ्या पदार्थांची नाव घेत राहायची. जिची खिरापत ओळखली जायची नाही, तिला खूप अनंद व्हायचा. वेगवेगळे पदार्थ खिरापत म्हणून आम्हा लहान पोरांना खायला मिळायचे. वर्षातून काही दिवस चालणाऱ्या हादग्याची झालेली ती पहिली ओळख आणि सतत कानावर पडून लक्षात राहिलेली ‘एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू' किंवा 'नंदा-भावजया दोघीजणी' वगैरे सारखी गाणी; पण हे सगळं अगदी नकळत्या वयापासून मनात साचून राहिलेलं, ठसलेलं.
 खरं तर हादगा कधी भरवतात तर 'हस्त' नक्षत्रात. हस्त हे पावसाचं नक्षत्र म्हणून सर्वांना परिचित. हत्तीचा पाऊस म्हणजे धो-धो पडणारा पाऊस; पण त्याचंही एक महत्त्व असतंच. तशी पावसाची इतरही नक्षत्र आहेत; पण तरी हस्त नक्षत्राचा पाऊस व्हावा लागतोच कारण हा पाऊस धनधान्याची मोठ्या प्रमाणात प्राप्ती करून देतो. पिकावर या पावसामुळे कीड पडत नाही, अशी शेतकऱ्यांची समजूत आहे.
 आपले बरेचसे सण, प्रथा या ग्रामीण जीवनाशी कुठे ना कुठे तरी निगडित आहेतच. त्याला अनुसरून मग ‘हादगा' याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, की संस्कृतीच्या खुणा त्यातून समोर येत जातात. ही लोकसंस्कृती सर्वसामान्यांच्या जीवनाशी किती निगडित आहे ते जाणवतं.
 मग जाणवतं, हादगा म्हणजे हस्त नक्षत्रातल्या पावसाचं लोकमानसानं केलेलं मननीय पूजनच आहे; पण ही पूजा म्हणजे नुसतं कर्मकांड नाही. तो मनापासून आनंदानं घडणारा एक सोहळा आहे. सोळा वर्षांखालील मुलीच यात समाविष्ट होतात, त्यामुळे काहीवेळा हा कुमारी उत्सव आहे, असंही वाटतं. प्रा. द. ता. भोसले यांनी हा स्कंद पूजेचा उत्सव असावा, असंही म्हटलं आहे. महाभारताच्या वनपर्वात सोळा वर्षांखालील मुला-मुलींना पीडा देण्याचा परवाना स्कंदाने आपल्या परिवारातील देवतांना देऊन टाकलेला अहे. मातृकांचा नियंता म्हणून स्कंद पूजनीय मानला गेला, असा उल्लेख आढळतो आणि हादग्याच्या निमित्ताने हस्त नक्षत्रांची पूजा करणाऱ्या मुली सोळा वर्षांखालच्या असल्याने ही स्कंदाची पूजा असावी, यालाही आधार मिळतो.
 हादगा किंवा भोंडला याच्या पूजनविधीविषयी वेगवेगळ्या प्रथा दिसतात. प्रदेशानुसार जातीधर्मानुसार काही फरक यात झाले असावेत.
 काही ठिकाणी पाटावर डाळ-तांदळाचा हत्ती काढतात. काही ठिकाणी रांगोळीनेही हत्ती काढतात. त्याभोवती रिंगण करून गाणी म्हटली जातात.
 काही ठिकाणी हत्तीचे चित्र भिंतीवर लावतात आणि त्यासमोर फळफळावळ मांडतात. चित्राला पाना-फुलांचे हार घालतात. श्री. राजवाडे यांनी एका ठिकाणी मुली खडे वेचून आणतात व त्याचीच पानाफुलाने हादगा म्हणून पूजा करतात, असे लिहिले आहे. कदाचित कोकणस्थांमध्ये गौरीच्या वेळीसुद्धा नदीतून खडे आणून त्याचीच गौर म्हणून पूजा करतात. त्यात खड्याला महत्त्व असते, त्यातूनच ही प्रथा हादग्याच्या वेळीही आली असावी.
 काही ठिकाणी तर जिच्या घरी भोंडला वा हादगा करायचा, तिच्याकडे जाताना मुली घरातून डाळ, तांदूळ घेऊन जातात. ते जमिनीवर एकत्र पसरून त्यावर एका पुरुषाचे व एका बाईचे चित्र काढून त्याभोवती रिंगण करून गाणी म्हणतात, त्याला 'बहिलोबा' आणि 'बहिलोबाई' असे म्हणतात. धान्याच्या रूपाने ही सुद्धा समृद्धीचीच पूजा म्हटलं पाहिजे. याला भुलाई' पूजा असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. याचा एक अर्थही भिल्लाचे रूप घेतलेल्या शंकराला भुलविण्यासाठी पार्वतीने भिल्लिणीचा वेष धारण केला होता म्हणून तिला भुलाबाई किंवा भुलाई म्हटलं जातं आणि शंकराला भुलोबा. म्हणजे ही एका अर्थाने शिव-शक्तीची पूजा आहे. प्रकृती आणि पुरुषाची पूजा आहे. खानदेशविदर्भात तर भुलाई सोहळा जास्त प्रचलित आहे.
 तसा भारतीय लोकसंस्कृतीमध्ये प्रत्येक प्रतीकापाठी अर्थ लपलेला आहेच. कवड्यांच्या माळेपाठी विरक्तीचा संदर्भ येतो. तुळशीवृंदावन पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. नाग, बैल आणि घोडा ही शक्तिसामर्थ्याची व पुरुषतत्त्वाची प्रतीके आहेत. मोर हे कामतत्त्वाचे प्रतीक, तर कमळ हे स्त्रीतत्त्वाचे व जीवन उत्पादकतेचं प्रतीक, भूमी हे सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते, असा उल्लेख प्रा. द. ता. भोसले यांनी त्यांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा' या ग्रंथात केला आहे.
 हत्ती हे सुद्धा प्रजननाचे प्रतीक, तर फूल हे यौवन दशेचे प्रतीक आणि फळ हे अपत्यप्राप्तीचे प्रतीक यातून मग हादग्याकडे पाहिलं, की सुफलनाची, सृजनाची पूजा असाही अर्थ सामोरी येतो.
 हादग्याच्या गाण्यात किंवा भोंडल्याच्या गाण्यामध्येही ही प्रतीकात्मकता जाणवते. या गाण्यातील शब्दार्थही सूचक आहेत; पण गीतरचना मात्र नाद, ताल, लय सांभाळणारी. चटकन लक्षात राहून म्हणता येणारी असते. हादग्याची गाणी ऐकून-ऐकून की, एकीच्या मागून दुसरीने म्हणून आपोआप पाठ होत जातात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ही गाणी कोणी लिहिली, याचा गीतकार कोण, याचा शोध लावता येणं अवघड आहे; पण त्या गीतामधून तिथली प्रादेशिकताही डोकावत राहते.
 सगळ्या पूजांमध्ये गणेशाचं महत्त्व प्रथम असतं. त्याला प्रथम वंदन करून मग सोहळा चालू होतो. हादग्यातसुद्धा गाण्यांची सुरवात शक्यतो गणेशाला नमन करून होते.

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूनदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशिच्या दारी
पारवळ घुमते गिरिजा कपारी
पारवणी बाळाचे गुंजवणी डोळे
गुंजवाणी डोळ्यांच्या सारविल्या टिक्का
आमच्या गावच्या भुलोनी नायका

 इथं मांडायचा तो खेळ म्हटला, तर खेळातला आणि म्हटला तर प्रपंचाचा आहे. स्त्रीच्या भावनेचा विचार केला तर हा संसाराचा खेळ गावाच्या जवळ असावा. वेशीलगतच गाव मिळावं, असाही याचा अर्थ लागू शकतो. म्हणजे माहेर जवळच राहील. अधून-मधून आप्तांना भेटता येईल. ऐल-पैल म्हणजे अलीकडे पलीकडे सासर-माहेर असाही अर्थ काढता येतो आणि इहलोक आणि परलोक असाही होतो. इहलोक-परलोक म्हटलं, की हा खेळ आध्यात्म्याच्या पातळीवरचा खेळ होतो; पण तरीसुद्धा साध्या- साध्या ग्रामीण स्त्रीनं ही रचना केली, असं मानलं तर संसाराचा, जगरहाटीचा खेळ मानावं लागतं.
 या गाण्याचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे एका गीतात मधूनच चाली बदलत जातात. या ऐलमाच्या गाण्यातही ‘आमच्या गावच्या भुलोनी नायका' नंतर एकदम चाल, ठेका बदलतो. मग पुढे बदललेल्या ठेक्यात तेच गीत चालू होते.

एविन गा, तेविन गा
कांडा तिळ बाई तांदूळ घ्या
आमच्या आया, तुमच्या आया खातिल काय दुधोंडे
दुधोंड्याची लागली टाळी - आयुष्य देरे बा माळी

 तिळ आणि तांदळाला धर्मसंस्कारात खूपच महत्त्व आहे. लग्नात तांदळाच्या अक्षता असतात. तिळाची शिवामूठ वाहिली जाते. या गाण्यात तिळ-तांदळाचे दुधोंडे आयांना खायला घातलेत. त्याचा त्यांना त्रास झाला म्हणून माळ्याकडे औषध मागितले जातेय. हा माळी कोण असावा? कदाचित तो परमेश्वररूपी माळी असेल.

माळी गेला शेता-भाता पाऊस पडला येता-जाता
पडपड पावसा थेंबी थेंबी
थेंबी थेंबी आळव्या लोंबी
आळव्या लोंबती अंकणा
अंकणा तुझी सात वर्षे
भोंडल्या तुझी सोळा वर्षे

 इथंही परत हस्त नक्षत्र आणि पाऊस याचा संदर्भ येतो. पावसाला आवाहन होतं आणि सोळा वर्षे होईपर्यंत भोंडल्याच्या माध्यमातून आम्ही तुला पूजत राहू, असं सूचित केलं जातं.  इतिहासाचार्य राजवाड्यांनी भोंडल्याच्या गाण्यांवर संशोधन केलं आहे. त्या गाण्यामधून वेगवेगळे अर्थ समोर येतात. पूर्वी हे लिखित साहित्य नव्हते, त्यामुळे सांगणे, ऐकणे या प्रक्रियेतून पुढे जाताना या गाण्यांमधूनही थोडे फार फरक होत गेले; पण लय आणि ठेका मात्र सांभाळला गेला. काही गाणी खास ठेक्याचीच असल्यासारखी;

अतुला मातूला चरणी चतूला
चरणीचे सोंडे हात-पाय खणखणीत गोंडे
एक एक गोंडा विसाबियाचा नागर साडे नेसायचा
नेसा नेसा ग मावल्यांनो सात घरच्या पावण्यांनी
पावण्या गेल्या खोली चितांग टाकलं डोली
चिटक्या मिटक्या करंडफूल ते बाई फूल मी तोडीलं
हादगा देवा वाहिलं, हादग्या तुझा तुरारा

हे भुलाबाईचे गीत म्हणजे पार्वतीच्या बाळाचे गणेशाचे संदर्भ यात वाटतात. हत्तीचे तोंड कारण सोंडेचा उल्लेख आहे. असं बाळ म्हणजे गणपतीच. 'अतुला मातुला' यावरून 'उतू नको मातू नको' चा भास होतो.

मोतीयाचा भराराबाईच्या परसात लिंबारा
लिंबारा खाल्ला गाईनं, गाई गाई दूध गं
दूध दिलं बापाला, बाप्पा बाप्पा अंगारा
अंगारा दिला आजीला, आई आई लुगडं गं
लुगडं दिलं बहिणीला, बहिणी बहिणी धोतर गं
धोतर दिलं गोंडे, दे माळावरचे धोंडे घे

 गोंड्याचे उल्लेखही या गाण्यात येतात. पाळण्याला, पालखीला गोंडे असतात. लोकगीतात हे समृद्धीचं प्रतीक मानतात. या गीतामध्ये पुढे नेणे एक छान प्रकार असतो. बाप, आजी मग आई असं गीत पुढे सरकत जातं. असंच आणखी एक हादग्याचं प्रचलित गीत यात फक्त अलवार एक क्रिया आहे.

आकण माती, चिक्कण माती
खळगा तो खणावा, अस्सा खळगा सुरेख बाई
जातं ते रवावं, अस्सं जातं सुरेख बाई
सपिट्टी काढावी, अस्सं सपिटी सुरेख बाई
करंज्या कराव्या, अशा करंज्या सुरेख बाई
दुरड्या भराव्या, अशा दुरड्या सुरेख बाई
माहेरी धाडाव्या, असं माहेर सुरेख बाई
खेळाया मिळतं, असं सासर द्वाड बाई
कोंडुनी मारतं

 शेवटी या गाण्यात स्त्री मनाची ग्रामीण भागातली सासर-माहेरची सुप्त भावना व्यक्त झाली आहे. सासर-माहेर सगळ्याच लोकगीतांत सतत डोकावत राहतात. कारण ते स्त्रीचं भावविश्व आहे. तिची सुख-दुःखं त्याला बांधिल आहेत.

एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू
दोन लिंबू झेलू बाई, तीन लिंबू झेलू

 हेही असंच पुढं सरकत जाणारं हादगा गीत यात पाच लिंबानंतर

पाचाचा पानोडा, माळ घाली हणमंता
हणमंताची निळी घोडी, येता-जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे होती राणी, अगं अगं राणी इथे काय पाणी
पाणी नव्हे गंगा-जमुना, गंगा-जमुनाची बारीक वाळू
तेथे खेळे चिलार बाळू
चांदीच्या चमच्याने दूध पाजिले, मोत्याच्या गादीवर निजवले
निजरे निजरे तान्ह्या बाळा ती तर जाते सोनारवाडा
सोनारवाड्याचे दिवे जळे, लेकराची हसली गळे

 या लिंबाचा संदर्भ लिंबविधीतून आला असावा. भुलाबाईला हा विधी असतो. हे विदर्भातून आलेले गाणे असावे. आता सर्वत्र थोड्याफार फरकाने प्रचलित झाले आहे.

 काही विनोदप्रचुर गीतेही हादग्यात गायिली जातात. त्यातून फारसं काही सुचवायचं नसतं. मन हलकं करण्याचा तो एक प्रकार असतो, त्यामुळं ताण कमी होत असावा.

श्रीकांता कमळकांता अस्सं कस्सं झालं
अस्सं कस्सं वेड माझ्या कपाळी आलं
वेडियाच्या बायकोनं केल्या होत्या शेवया
आळ्या आळ्या म्हणून त्यानं टाकून दिल्या
वेडियाची बायको झोपली होती पलंगावर
मेली मेली म्हणून त्यानं, जाळून टाकली सरणावर

या गाण्यात फक्त विनोद आहे. एकीमागून दुसरीनं हे गीत म्हणताना होणारा हास्याचा खळखळाट हादग्याच्या कार्यक्रमाला एक मोकळेपणा देणारा ठरतो.
 पती-पत्नीच्या नाजूक नात्याच्या संदर्भानं आणि सासू-नणंद-सासरा या नात्यातला कडवटपणा व्यक्त करणारं

यादवराया राणी रूसून बैसली कैसी

 हे गीत ही विनोदाच्या अंगाने झुकते. सासू, नणंद, सासरा वेगवेगळे दागिने घेऊन तिला बोलवायला येतात. रूसलेल्या सुनेची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात; पण मंगळसूत्र घेऊन नवरा आल्यावर तिची नाराजी दूर होते. यात 'मंगळसूत्र' हा स्त्रीचा अत्यंत प्रिय दागिना. तिच्या भावविश्वात पवित्र असणारा. त्याचं महत्त्वही प्रकट होतंच.
 काही असलं तरी खेडोपाड्यातल्या सोळा वर्षांखालील मुलींचा 'हादगा' हा अत्यंत आवडीचा कार्यक्रम असतो. मोठ्या आयाबायाही भोवतीनं बसून कौतुकानं मुलींनी गोल फिरत गाणी म्हटलेला भोंडला पाहात असतात. त्यानिमित्तानं त्यांनाही स्वत:चे पूर्वीचे दिवस आठवत राहतात. गाणी म्हणणाऱ्या मुलींची गाणी विसरली, तर बाहेरून या आया-माया गाणी आठवून देतात. आठवून देता देता स्वत:च म्हणायला लागतात. संध्याकाळच्या वेळचा सगळा माहोलच बदलून जातो. सत्तरीच्या आजीबाईंच्या दृष्टीच्या चौथऱ्यावर त्यांचं बालपण येऊन जातं. संसारतापातल्या अडचणी, व्यथा, राग, लोभ, भांडण सगळं विसरून सगळ्या बायकांचं या निमित्तानं एकत्र येणं, गाणी म्हणणं आणि त्यातून मन मोकळं करणं, हाही हादग्याचा मोठा भाग असतो.

 शेतकरी माणसाचं भूमीशी असणारं नातं त्याला कारणीभूत ठरणारा हस्त नक्षत्राचा पाऊस, या पावसाची देवता इंद्र, या सर्वातून फुलत जाणारा निसर्ग, शेतीतून उगवून माणसांना जगवणारं धनधान्य, समृद्धी, समृद्धी देणारी माता लक्ष्मी या सर्वांचं या हादग्याशी नातं आहे. या सर्वांचं हृदय स्मरण, त्याची पूजा म्हणजे हादगा किंवा भोंडला. 'भुलाई' म्हणजे शिव-शक्तीची पूजाच म्हणून प्रकृती आणि पुरुष यांचीही पूजा असंही याचं स्वरूप आहेच. कन्नड साहित्यिक शिवराम कारंथही एका ठिकाणी म्हणतात, 'या अल्लड, निरागस, उमलणाऱ्या कन्यका गीतांबरोबर झुलताना पाहून मला जगण्याची फार मोठी शक्ती लाभते' हे सगळं पाहिलं, की वाटतं हादगा किंवा भोंडला वा भुलाई हा लोकसंस्कृतीचाच एक अनमोल ठेवा आहे. जो आमच्या माय-भगिनींनी जपला आहे. हस्त नक्षत्राला प्रारंभ झाला, की मुलींच्यात उत्साहाला उधाण येते. रोज एकीच्या घरी जमून त्या हादग्यात रमून जातात. वेगवेगळी खिरापत, जी शक्यतो कोणाला ओळखू येऊ नये, अशी बनविण्यास त्याच्या आया, आज्या त्यांना मदत करतात. मग या परकरातल्या पोरी ती खिरापत सांभाळत हादग्याला जातात, गाणी म्हणतात. ही गीतं तशी अर्थपूर्ण आहेतच; पण त्यातला नाद, ठेका, लय यामुळं ज्या अंगणात ही गीतं म्हटली जातात, ती अंगणंही जणू चैतन्याने न्हाऊन निघतात. हा लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा जपला जायला पाहिजे. खेड्यापाड्याला आता शहरी वारं लागलंय. टी.व्ही. तिथंही आलाय. आता हादग्याच्या वेळा लक्षात ठेवून एकत्रित येणाऱ्या मुलींची मानसिकता बदलतीय. त्यांना आठवून गाणी सांगणाऱ्या आया, आज्या इतर कार्यक्रमात गुंतून राहताहेत. या सर्वांतून हा ठेवा जपला जाणार का, याची भीती वाटतेय; पण हे सर्व जपणंही आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे, याची जाणीव सर्वांनीच ठेवायला पाहिजे.
लोकसंस्कृतीमधील दिवाळी

 दिवाळी दर वर्षाला येते. आनंदाला उधाण येतं. घरात गोडधोड होतं. अंगणात रांगोळ्या रंगतात. दिव्यांची आरास होते. मन सुखसमाधानानं चिंब होतं. खेड्यातली दिवाळी आम्ही पाहिलेली. आता खेडीही बदलायला लागलीत. शहरीकरणाचा वारा त्यांनाही लागलाय; पण अजून पूर्ण बदलली नाहीत. लोकसंस्कृतीचा एक तुकडा का होईना खेड्याच्या रूपानं जिवंत आहे. दरवर्षी दिवाळीत मला खेड्यात अशीच कोणीतरी सांगितलेली एक कथा आठवते.
 एका आटपाट नगरात एक छोटसं शेतकऱ्याचं घर. तिथं नवीन लग्न होऊन आलेली एक सून असते. घर खातं-पितं नांदत असणारं असं. आश्विन मासात एका पहाटे सासू शेतात जायला निघते. सुनेला सांगते, 'हे बघ, मी शेतावर निघाले, दुपारी येईन तोपर्यंत गहू-मूग दाणे काढ. गव्हाळं-मुगाळं शिजवून ठेव.'
 सून नवीन आलेली. तिनं गहू-मूग काढले; पण गव्हाळं- मुगाळं नावाची गाईची वासरं दारात होती. तिला वाटलं, तीच सासूनं शिजवायला सांगितलीत. तिनं तसं केलं. ती कापून शिजवली. सासू आल्यावर ते पाहून घाबरून गेली. तिचं काळीज उडून गेल्यासारखं झालं. देवासमोर जाऊन तिनं डोकं आपटीत म्हटलं, 'देवा सुनंकडून चुकलं. माझी गव्हाळी, मुगाळी वासरं जिवंत कर नाहीतर तुझ्यापुढं डोकं आपटून रक्ताचं शिंपण करीन. माझी वासरं जिवंत केलीस, तर सगळ्यांना साखर वाटीन.'
 देवानं तिचं ऐकलं. तिची गव्हाळी-मुगाळी वासरं जिवंत केली. वासरं गायांना जाऊन बिलगली. सासूनं देवाची मनसोक्त पूजा केली. गाय-वासरांना ओवाळलं.
 गाय-वासरांच्या श्रद्धेतून ही गोष्ट आली असावी. माणसांच्या भावनाशील मनात गाय-वासरांचं महत्त्व चिरंजीव झालं. वसुबारसेला सगळ्या गोठ्यात गाई-वासरांना ओवाळलं जातं. त्यांना गोड-धोड घास भरवला जातो. खेड्यातली संपन्नता काही पावलं गोठ्यातूनही येते. त्या सोनपावलांचं हे सश्रद्ध पूजन असावं.

दिन् दिन् दिवाळी
गाई-म्हशी ओवाळी
गाईचा वारा, बैल नवरा
बैल कुणाचा लक्षुमनाचा
लक्षुमन कुणाचा आई-बापाचा

 हे गाणं तरी खूप पूर्वीपासून लहान-थोरांच्या तोंडी आहे. यातल्या गाई-म्हशी ओवाळीची संगती अशा लोककथांतून लावली जाऊ शकेल असं वाटतं.
 खेड्यात दिवाळीच्या दिवसात तर शेणाच्या गौळणी करतात. या गौळणी मखमलीच्या फुलांनी, बांगडीच्या रंगीत काचांनी सजवतात. शेवटच्या दिवशी पांडव सभा करतात. पाच पांडव द्रौपदी बनवतात. हे सगळं पहाटे उठून शेणापासून करतात. या प्रथा हळूहळू लोप पावतील की काय, अशी भीती वाटते आहे. दारातले शेणसडे, त्यावर रांगोळ्यांचे गालीचे, गोपद्म दाराच्या दोन्ही बाजूला तेल घातलेल्या पेटवलेल्या पणत्या, त्या पहाटेचं रूप साजीवंत करायच्या.
 नरक चतुर्दशीला श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला म्हणून मग दारात शेणाच्या थापलेल्या उताण्या नरकासुरावर काही ठिकाणी केरकचरा टाकायचे. मग पहिल्या आंघोळीचं थंडीत होणारं कडकडीत पाण्याचं दमदार स्नान. उटणं चोळून घेणं, हा आवडीचा कार्यक्रम. आंघोळीनंतर देवाला, वडीलधाऱ्यांना नमस्कार. लक्ष्मीपूजनाचा तर आगळा थाट, झेंडूच्या माळा, रांगोळ्या, पक्वान्नाचं जेवण आणि पूजेनंतर फटाक्यांचा कडकडाट.
 कोणीतरी जाणतं माणूस मोठ्यांदा श्लोक म्हणायचं.

नमस्ते सर्व देवांना वरदासि हरे: प्रिया
या गतिस्त्वत्प्रपन्नानां, सा मे स्यात्तव दर्शनात् ॥

 त्याचा अर्थ त्या वेळी कळायचा नाही. मग आम्हाला जवळ बोलावून त्याचा अर्थ सांगितला जायचा. त्याचा अर्थ ‘हे लक्ष्मीमाते, तू सर्व देवांना वर देणारी आहेस. विष्णूला प्रिय आहेस. जे लोक तुला शरण येतात, त्यांना जी गती प्राप्त होते, ती आम्हाला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो.'
 लक्ष्मीपूजनाला घरच्या बायकाही ठेवणीतल्या जरीकाठी साड्या नेसायच्या. ठसठशीत दागिने अंगावर चढवायच्या. काही दागिने, पैसे, रुपये चांदीच्या ताम्हणात घालून पूजेसाठी ठेवलेले असायचे.फळे, लाह्या, फुलं मांडून ठेवलेली असायची. दागिन्याच्या पेटीतली मोत्याची नथ लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नाकात घातली जायची. पुरुष माणसंही धोतर, जाकीट, डोक्याला फरची टोपी घालून पूजेला बसत. खरं तर आम्ही लहान पोरं त्या वेळी कधी लक्ष्मीपूजन संपतंय आणि कधी फटाक्याची मोठी माळ वाड्याबाहेर लावतोय, याची वाट पाहात बसायचो. काही जण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिशोबाच्या वह्यांचेही पूजन करत; पण वहीपूजन हे बऱ्याच जणांच्यात पाडव्याला व्हायचे.
 पाडवा दिवाळी म्हणजे बलिप्रतिपदा. खेड्यापाड्यातल्या बायका नेहमी औक्षण करताना म्हणतात,

इडापिडा टळो आणि
बळीचं राज्य येवो

 या बळीराजाला विष्णूनं वामनरूप घेऊन पाताळात घातलं. खरं तर हा बळीराजा हा दातृत्वसंपन्न, कर्तव्यसंपन्न, सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करणारा. शेतकऱ्यांचा त्राता. त्या काळात सगळीकडे समृद्धी होती. प्रजा सर्वार्थानं सुखी होती. त्या बळीचं राज्य पुन्हा येवो, म्हणणाऱ्या आमच्या माय-भगिनी औक्षणावेळी त्याची अजूनही आठवण काढतात. पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते. भेटी दिल्या जातात, प्रेम जपलं जातं. हे जगण्याला आश्वासक असं निधान असतं; पण लोकगीतात मात्र पाडव्याला पतीलाच काय पित्याला व भावालाही ओवाळण्याचे उल्लेख येतात.

पाडव्याच्या दिवशी ओवाळीलं न्हाणीवर
हिला जरीचा परकर नेणत्या बाईला
पाडव्याच्या दिवशी ओवाळीले भावा बापा
मोती मागती काफा नेणती बाई माझी
पाडव्याच्या दिवशी कशाचा बार झाला?.
यानं वही गं पूजीली सावळ्या बाळानं

 खरं तर रोजच दिवाळीच्या दिवशी आंघोळीनंतर औक्षण केलं जातं. पिठाचे मुटके ओवाळून उजव्या डाव्या बाजूला टाकले जातात; पण खऱ्या औक्षणाचा थाट भाऊबीजेचाच.
 खरं तर लोकसंस्कृतीत दिवाळीतल्या भाऊबीजेला एक माहेरसण मानले आहे. भावा-बहिणीच्या काळीज नात्याचा ओला भावबंध जपणारा हा दिवस, त्यामुळं बहिणींनी लोकगीतातून जिव्हाळ्यानं जपला आहे. वर्षवर्षभर माहेराची खुणावणारी वाट या निमित्तानं खुली होते. नाहीतर निदान त्या वाटेवरून भाऊराया तरी या दिवशी गुज पुसायला येतो. आई-बापाची याद काळजी भाऊरायाकडून खुशाली समजून पुरी होते.
 कधी लेकीला दिवाळीसाठी चार दिवस पाठवा म्हणून सांगावा धाडलेला असतो. मायेची नजर लेकीच्या वाटेवर लागलेली असते. लेकीला सासरची मंडळी पाठवतील का नाही, याची मायेला काळजी असते.

दिवाळी दिवशी दही लागतं गाईला
घोर लेकीच्या मायीला

 कारण मायेला माहिती असतं, तिचं येणं हे तिच्यावर अवलंबून नाही. लेकराला जन्माला घालायचं आणि परक्याच्या घरी द्यायचं, हे स्त्री जातीचं चिरंजीव दुःख तिला त्या क्षणी सलत राहतं.
 कधी काही भावा-बहिणीच्यात झालं असेल, तर ते मनावर घेऊ नकोस. तू काही मला वाकडा बोललास, तर काही काळानंतर तुझ्याच मनाला त्रास होईल. तुझंच काळीज दुखावेल.

 सरोजिनी बाबर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात भावा-बहिणीचं हे नातं खूप समंजसपणे त्यातील ओलाव्याच्या भावबंधासहित समोर येतं. दिवाळसणाला लागलेली माहेर ओढ हे या नात्याचं निमित्त बनतं.

 भाऊबीजेला भाऊ आलाच नाही, तर मग मन खंतावतं. ताटात निरांजन घेते. मनात भावाची आठवण उजळत ती आकाशातल्या चंद्रासमोर उभा राहते. औक्षण करण्यासाठी

भाऊबीजेच्या दिवशी ओवाळीलं चांदाला
दूर देसीच्या बंधवाला आऊक चिंतीते

 जरी भाऊ आला नाही, तरी चंद्र हा बाईजातीनं हक्काचा भाऊ मानला आहे. त्याला ओवाळून ती भाऊबीज साजरी करते; पण मनात कोणताही राग न ठेवता मनातला भाव बाहेर ती व्यक्त करते.

माझ्या आयुष्याचा शालू इनीते लख लख
तुमी पांघरा बाप
माझ्या आयुष्याचा शालू इनीते जरतारीचा
घाल शंभरावरी माझ्या बापा
भावायाला माज्या मायेचा गोतावळा
माऊलीचा बाळ माया ठेवणीची चंद्रकळा

 माझ्या आठवणींची ऊब तुमच्याजवळ राहू दे. माझ्या बापाला शंभरावर आयुष्य मिळू दे. भावाला मायेचा गोतावळा लाभू दे. दिवाळीच्या संदर्भात भाऊबीजेनिमित्ताने भावा-बहिणींचं नातं वेगळ्या अर्थानं उजळून निघतं. काळीज बोलीतल्या या ओव्या अशा अनुभवातून दिवाळी साजरी करतात. ज्या बहिणी माहेरी जातात त्यांचा आनंद वेगळाच. भाऊबीज मिळते. आई- ई-बाप भेटतात. आनंदानं ऊर भरून येतो, त्याचा आनंद मग गीतातून पाझरतो.

दिवाळीची चोळी बीजेची चंद्रकळा
भाऊराया माझा फार झाला उतावळा
भाऊबीजेदिशी भावानं काय दिलं
चंद्रहारामधी बाई सोनं गुंफीयेलं
पूर्ण चंद्रबिंब दिसे पुनवेच्या दिशी
भाऊराया तुझं यश वाढेल राशी-राशी
दिवाळीच्या दिशी ताटी माझ्या मोतीसर
भाईराज माझा ओवाळीतो घरदार

 ती मनात देवाला म्हणते,

लेकीचा जन्म नको घालू शिरीहारी
मोठी कठीण चाकरी
परक्या हे गं दारी

 आणि मग खूप वाट पाहिल्यावर लेक माहेराला येते. मायेचा जीव भांड्यात पडतो. तिच्याही दिवाळीला मग खरा रंग चढतो. काही बहिणी सासरी भाऊबीजेला भावाची वाट पाहतात. वेळ जायला लागतो, भाऊ दिसत नाही. मन हुरहुरायला लागतं. आपल्याला ओवाळणी घालावी लागणार. त्यालाही काही संकट असेल. बिना ओवाळणी बहिणीच्या घरी कसं जायचं म्हणून तर तो आला नसेल का?

लागेल घालावी फार मोठी ओवाळणी
चिंता काय मनी भाऊराया?
नको धन, नको मुद्रा, नको मोतीयांचे हार
देई प्रेमाश्रुची धार भाऊराया
आवड मला बह, लुगडं नको घेऊ
अंतर नको देऊ, भाऊराया

 मला लुगडं आवडतं; ते दिलं नाहीस तरी चालेल; पण मला अंतर देत नको, असं ती मनातल्या मनात त्याला विनवते. तिला पुन्हा क्षणभर वाटतं,

वळवाचा पाऊस पडोनी ओसरला
भावाला झाल्या लेकी भाऊ-बहीण विसरला

 भावाला लेकी झाल्यावर तर तो आपणाला विसरला नाही ना? असंही तिला वाटतं. आई-बाप असेपर्यंतच मुलीची माहेरची सत्ता नंतर मग माहेर सगळं जणू भावजयीच्या ताब्यात जातं. माहेरावर आपली सत्ता उरत नाही. लोकलाजेस्तव भाऊ नेले तर नेतील; पण त्याचा काही भरवसा नाही.

वडील, भावजय परी आईच्या समान
पित्याचा तुला मान भाऊराया
माय तो माहेर बाप तो माझी सत्ता
नको बोलू भाग्यवंता भाऊराया
बहिणीशी नको आता वाकडा बोल लावू
सांभाळ तुझा तोल भाऊराया
वाकडा तुझा बोल तुझे कापील काळीज
सासरी गेल्यावर बहिणी कोठून येतील

 तिथं सगळा आनंदोत्सव असतो. ही बहीण चार दिवसांची पाहुणी म्हणून भाऊबीजेनिमित्ताने येते; पण आनंदानं घरदार उजळून जाते. दिवाळीच्या दिवशी तर खेड्यात परटिणीचाही मान असतो. वर्षभराची गावाची धुणी धुते. मात्र, दिवाळीच्या पहाटे परटीण ताटात आरती घेऊन घरोघरी जाऊन पुरुषांना ओवाळते. त्या वेळी म्हणते,

रूप्याचं ताट, सोन्याची आरती
ओवाळती माणिक मोती
घरी राज लक्ष्मी येती
वर्षा वर्षा दिवाळी
माणिक मोती ओवाळी
दिवाळीच्या सनाला

 त्या दिवशी ओवाळणीचा तिचाही मान असतो. खरं तर पूर्वीचे जे बारा बलुतेदार मानले जात, त्या सर्वांना दिवाळीची ताटं वाढून दिली जात. त्यांच्याही घरी गोडधोड पोचावं. त्यांनाही दिवाळीचा आनंद मिळावा, ही त्यापाठची भावना असे.
 अरुणा ढेरे यांच्या 'यक्षरात्र'मध्ये दिवाळीचा एक सुंदर वेगळा संदर्भ येतो. दिवाळी म्हणजे यक्षांची रात्र, त्यामुळे दिवाळीला यक्षांचीही पूजा केली जाते. कुबेर हा यक्षांचा राजा मानला जातो आणि लक्ष्मीला त्याची पत्नी मानल्याचे उल्लेख येतात. हे दोघेही 'संपत्तीचे देव' म्हणून त्यांची पूजा.
 दिवाळीला जे दीप उजळण्याची प्रथा आहे ती यमधर्मासाठी आहे, असंही मानलं जातं. दक्षिण दिशेला तोंड करून दिवे उजळवतात ते मृत्युदेव यमधर्मातलाच. एकदा यमदूतांनी विचारलं, 'आम्हाला खूप वेळा काही जणांना अकाली मृत्यू द्यावा लागतो, त्या वेळी खूप वाईट वाटतं. भरल्या संसारातून अचानक असं उठवून नेणं क्लेशदायक वाटतं. ते टाळता येणार नाही का?' तेव्हा मग यमधर्मानं आश्वासन दिलं, सांगितलं, 'धनत्रयोदशीपासून चार दिवस जो दिवे उजळील आणि दीपदान करील त्याला अपमृत्यू येणारच नाही.' त्यामुळे दिवाळीत दीपोत्सव करण्यापाठी आयुष्यवृद्धीचा एक धागा जोडला गेला असं जाणवतं.
 खरंतर सर्वसामान्य माणसांचे आयुष्य थोड्याफार कष्टात, अडचणीत जातात. सुख-दुःखाच्या पाठशिवणीचा खेळ तर चालूच असतो. वर्षातून येणारा हा दिवाळीचा सण श्रद्धायुक्त आनंद जोपासणारा असा सण असतो. चार घटका सर्वांनी एकत्रित होऊन साजरा केलेला आनंद दीपोत्सव आहे. तसा सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा करतात. राजस्थानात राम वनवासातून येण्याचा दिवस म्हणून दीपोत्सव करतात. डोंगराळ भागातले व सिंधी लोक रात्री मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक दिवाळीत रात्री द्युत खेळतात. बंगालमध्ये कालीमातेपुढे स्तोत्रे गायिली जातात. आंध्रात लक्ष्मीच्या स्वागताचा सण समजतात.

 संतांनी अभंगातून दिवाळीचे वर्णन केले आहे. ते अंतर्यामीच्या प्राणाचा दीप उजळवण्याचा सल्ला देतात, असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे.

मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळी
ते योगिया पाहे दिवाळी। निरंतर॥

 जी अविवेकाचा काळा अंधार नाहीसा करते आणि विवेकाचे ज्ञानाचे दीप उजळवते, ती 'योगियांची दिवाळी' आहे. तुकाराम महाराजांनी 'साधुसंत येति घरा तोचि दिवाळी दसरा' असं म्हटलं आहे. इथे त्यांना सत्संग अपेक्षित आहे. चांगल्या आचार-विचारांच्या सहवासात राहणे हे ते दिवाळीच मानतात.

 मुघल कारकिर्दीत अकबर बादशहा दिवाळी दिवशी महालात सर्वत्र दीपोत्सव करत असे. दौलतखान्यासमोर चाळीस फूट उंचीचा स्तंभ रोवून त्यावर मोठा दीपक पेटवत असे. असे उल्लेख ‘ऐने अकबरी'मध्ये आहेत.

 एकंदरीत दिवाळीला खास परंपरा आहे. तिचं असं वेगळं अस्तित्व आहे. तिच्याशी अनेक कथा, घटना, प्रसंग यांचा संबंध दर्शविला आहे. सर्व लोक अजूनही दिवाळीसंबंधी इतकंच म्हणतात व म्हणत राहतील. 'स्नेहल, मंगल, सोज्वल, निर्मल दिवाळी दरवर्षी या पृथ्वीतलावर अवतार घे आणि आमची मने, जीवने तेजाळून टाक.'

संदर्भग्रंथ
एक होता राजा (डॉ. सरोजिनी बाबर)
एकनाथांची भारुडे (डॉ.शरद व्यवहारे)
श्री एकनाथांची भारुडे (ले. श्री. ना. वि. बडवे भाग १व २)
भारूड आणि लोकशिक्षण (ले. डॉ. रामचंद्र देखणे)
लोकसंस्कृतीचे उपासक (ले. डॉ. रा. चिं. ढेरे)
देवदासी : यल्लमाच्या जोगतीणी (डॉ. मदन कुलकर्णी )
लज्जागौरी (डॉ.रा.चिं. ढेरे)
मुंबई इलाख्यातील नाती
संस्कृतीच्या पाऊलखुणा (डॉ. द. ता. भोसले)
हादगा भोंडला विधी आणि गाणी (सौ. शैलजा लोहिया)
लोकसाहित्यमाला (डॉ. सरोजिनी बाबर)
श्रावण-भाद्रपद (दुर्गा भागवत)
लौकिक आणि अलौकिक (डॉ.रा. चिं. ढेरे)
रामजोशीकृत लावण्या (संपा. डॉ. वि. म. कुलकर्णी, डॉ. गंगाधर मोरजे)
ओवी ते लावणी (श्रीधर रंगनाथ कुलकर्णी)
होनाजीबाळा यांच्या लावण्या (शं. तु. शाळीग्राम)
मराठी लावणी वाङ्मय (डॉ. गंगाधर मोरजे)
शाहीर हैबती (डॉ. शिवाजीराव चव्हाण)
सगनभाऊकृत लावण्या व पोवाडे (चिमणाजी जहागीरदार व गोपाळ अधिकारी)
महाठी लावणी (म. वा. धोंड)

लोक संस्कृतीचा गाभारा

डॉ. राजेंद्र माने यांच्या या पुस्तकातून आपल्या लोकसंस्कृती अतिशय सशक्त, सर्वसमावेशक आणि जिज्ञासापूर्ती करणारे लेखन केलेले आहे.
लोकसंस्कृती विषयीची उदासीनता, आपल्या संस्कृतीविषयी असणारी तुटलेपणाची भावना, लोकमानस आणि त्यांची जीवनशैली याविषयी असणारे आमचे अज्ञान दूर करण्याचे कार्य अशा ग्रंथामुळेच होऊ शकते. हे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी या ग्रंथातून आपल्या लोकसंस्कृतीचे जे दर्शन घडविले आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल.

डॉ. द. ता. भोसले

अक्षरयात्रा प्रकाशन