वनस्पतिविचार/पुष्पबाह्य वर्तुळे (पुष्पकोश व पुष्प मुगुट) द्वितीय वर्तुळ
आतांपर्यंत फुलांचे सर्वसाधारण वर्णन करण्यांत आले. तसेच पुष्पाधाराचाही उल्लेख करण्यांत आला. या प्रकरणांत फुलांतील बाह्य वर्तुळाचे जरा विस्तारयुक्त वर्णन करण्याचा विचार आहे.
हरितदल वर्तुळ अथवा पुष्पकोश (Calyx.) हे वर्तुळ, फुलांतील बाह्यांगास असून दलाचा रंग बहुतकरून हिरवा आढळतो. कांहीं वेळां इतर रंगही पाहण्यांत येतात. तेव्हा पाकळ्या व सांकळ्या एकाच रंगाची असून ती परस्पर भिन्न ओळखण्यास कठीण जाते. जसे, सोनचाफा, लिली, वगैरे. कांदे, लसूण, गुलछबू वगैरे फुलांमध्ये आपणांस सहा पांढरी दलें फुलांचे बाह्यांगांस आढळतात. ह्या सहा दलांपैकी तीन दले पहिल्या वर्तुळापैकी व
सांकळ्या कधी सुट्या तर कधी संयुक्त असतात. मोहोरी,शिरस,मुळे वगैरेंच्या कुलांत ह्या सुट्या असून, कापूस, जास्वंद, तंबाखू, वांगी वगैरे फुलांतही संयुक्त असतात. गुलाबाचे फुलांतही दलें अगदी पानासारखी असतात- सांकब्यास पानांप्रमाणे मात्र कोठेही देंठ असत नाही. दलें सारख्या आकाराची असतां त्यास व्यवस्थित Regular म्हणतात. जसे रानजाई, व ह्याचे उलट अव्यवस्थित Irregular म्हणतात. जसे बाहवा, तरवड, संकासूर वगैरे.
जेव्हां सांकळया सुट्या असतात,त्यावेळेस त्या किती आहेत, हे सहज मोजितां येते, पण जेव्हां त्या संयुक्त असतात त्यावेळेस पूर्णपणे त्यांची संख्या ओळखण्यास संयोगावर अवलंबून असते. काहींमध्ये संयोग बुडाशी असून टोंकाकडे दले सुटी असतात. अथवा संयोग मध्यभागापर्यंत असून अग्रांकडील भाग मोकळा राहतो. पण जेव्हां संयोग पूर्ण होऊत दलांचा जणू एक प्याला अथवा नळी बनते, तेव्हां मात्र त्यांची संख्या ओळखणे कठीण होते. त्यावर किती मध्यशिरा आहेत, हे नीट पाहून त्यांची संख्या सहज सांगता येणार आहे. कारण प्रत्येक दलास मध्यशीर असते म्हणून मध्यशिरेच्या संख्येप्रमाणे ती दले आहेत असे अनुमान काढणे चुकीचे होणार नाहीं.
संयोग कधीं सारखा असतो; अगर वांकडा तिकडा अव्यवस्थित असतो. व्यवस्थित अगर अव्यवस्थित संयोगाप्रमाणे वर्तुळास वेगवेगळे आकार येतात. कोनाकृति, ओष्ठाकृति, घटाकृति वगैरे आकार नेहमी आढळतात. ह्याचप्रकारचे
ज्याप्रमाणे पाने कमी अधिक दिवस खोडावर टिकतात, त्याप्रमाणे फुलांमध्येही दलें कांही दिवस टिकतात. नेहमींचा अनुभव असा आहे की, पराग कणांचा मिलाफ आंतील बीजाण्डाशी (Ovules ) झाल्यावर आपोआप अण्डाशय वाढू लागतो. दोन्हींचा मिलाफ होणे म्हणजे गर्भधारणा होय. गर्भधारणा झाल्याबरोबर ह्या बाह्यसंरक्षक वर्तुळांचा कांहीं उपयोग नसून ती दोन्हीं वर्तुलदलें म्हणजे सांकळ्या तसेच पाकळ्या हळु हळु कोमेजून गळून जातात. गर्भधारणा होईपर्यंत आंतील नाजुक अवयवांचे संरक्षण करणे हें मुख्य काम हीं बाह्यवर्तुळे करीत असतात. हे काम पूर्ण झाल्यावर ह्यांची जरूरी नसून ती आपण होऊन जाण्याचे मार्गास लागतात. पैकी पांकळ्या तर नेहमीच गळून जातात, पण काही ठिकाणी सांकळ्या अण्डाशयांवर चिकटून राहतात, जसे, दोडके, घोसाळी, वांगी, टोमॅटो वगैरे. लवंग, तंबाखू पेरू, डाळिंब वगैरेमध्ये ही दले, फळ तयार झाले तरी कायम राहतात. पण तेच पिवळा धोत्रा, अफू वगैरे फुलांत, फुले उमलण्याचा अवकाश, कीं ही लागलीच गळून जातात. कांही ठिकाणी ही दलें अधिक वाढून फळाभोंवती त्यांची गुंडाळी होते. जसे कपाळफोडी, रसबेरी वगैरे. नास्पाति अगर सफरचंद फळांत ह्या दलांचा मांसल भाग फळाबरोबर वाढून तो फळांत समाविष्ट होतो.
द्वितीय वर्तुळ-( Corolla) ह्या वर्तुळाचे प्रत्येक दलास पाकळी असे म्हणतात. हे वर्तुळ पुष्पकोश ( Calyx ) व पूं-कोश ( Androecium ) ह्यामध्ये असते. सांकळयापासून पाकळ्या त्यांच्या नाजुक स्वभावामुळे तसेच निरनिराळ्या रंगीतपणामुळे सहज ओळखितां येतात. विशेषेकरून हिरवा रंग पाकळ्यांत कमी असतो. जसे हिरवा गुलाब, अशोक वगैरे. कांहीं फुलांत पांकळ्यांचा रंग मनोवेधक व चित्ताकर्षक असतो. पाकळ्या चित्ताकर्षक असल्यामुळे फुलपांखरे वगैरे क्षुद्र किडे त्या रंगास भुलुन त्यावर झडप घालितात. केवळस्रीकेसर ( Pistillate ) फुलांत असले मनोहर रंग अधिक
सांकळ्याप्रमाणे आकार, शिरा, बाजू, अग्रे, वगैरे पानासारखी पाकळ्यांतही असतात. पानासारखा पाकळ्यास कधी कधी देठ असतो. जसे, मोहरी, पिंक वैगेरे. पिंक फुलांत पाकळ्या झालरीदार असतात. कधी कधी अशी झालर गुलाबी जासवंदीमध्ये आढळते. पाकळ्या सांकळ्याप्रमाणे सुट्या अथवा संयुक्त असतात. द्विदल-वनस्पतीमध्ये फुलास चार अगर पांच पांकळ्या असतात, व एकदल वनस्पतीमध्ये तीन पांकळ्या आढळतात. कांहीं फुलांत पांकळ्या सारख्या आकाराच्या असून व्यवस्थित होतात. जसे, कापूस, मोहरी, स्ट्राबेरी, नास्पाती वगैरे. पण काही फुलांत त्या सुट्या पण वेड्यावांकड्या असतात. जसे आगस्ता, पावटा, तुळस, कर्पूरी वगैरे.
आळीव, मुळे, सलघम, शिरस, तिळवण, वगैरे फुलांत पाकळ्या सुट्या असून त्यांचे व्यवस्थित स्वस्तिक बनते. स्वस्तिकाकृती पांकळ्या म्हणजे पाकळ्याची एक जोडी समोर व दुसरी आडवी असते; व एकूण ह्या पाकळ्या चार होतात. 'स्वस्तिकाकृती' (Cruciform) फुलांचा वर्ग एक निराळा केला आहे. जंगली गुलाब, स्ट्राबेरी, कापूस, सफरचंद वगैरे फुलांत पाकळ्या पांच असून त्यांचा एकंदर आकार व्यवस्थित असतो. पिंक-फुलाप्रमाणे पांकळ्यास येथे देठ असत नाही.
सुट्या अव्यवस्थित पाकळ्यासही पुष्कळ प्रकारचे आकार आले असतात. विशेषेकरून डाळीवर्गातील फुलें लक्षात ठेविण्यासारखी असतात. मागे सांगितलेच आहे की, त्यांस पांच पाकळ्या असतात. पैकी एक मोठी पाकळी जिभेसारखी उलटी लोंबती राहून दोन पंखाकृति असतात, व उरलेल्या दोन परस्पर एकमेकांस चिकटून लहान नांवेप्रमाणे त्यास आकार येतो.
संयुक्त पाकळ्यासही संयोगाप्रमाणे वेगवेगळे आकार येतात. शिवाय संयुक्त स्थितीत सुद्धा पाकळ्या व्यवस्थित असतात. जसे, भोंपळा वगैरे फुलांतील पाकळ्या संयुक्त असून त्यांची एक व्यवस्थित नळी असते. सूर्यकमळाची लहान लहान फुले ह्याच प्रकारची असतात. भोंवरी, भोंपळा, दोडका वगैरे फुलांत पाकळ्या संयुक्त झाल्यामुळे त्यास बैलाचे गळ्यांतील घंटेप्रमाणे आकार येतो. धोतऱ्याचे फूल लांबट असून तोंड रुंद असते म्हणून त्यास तेल ओतण्याकरितां बनविलेल्या नाळक्यासारखी आकृती येते. सदाफुली, कुंद, वगैरेमध्ये पांकळ्या चक्राकृति असतात.
तुळस, सब्जा, कपुरी, वगैरे फुलांत पाकळ्या संयुक्त जरी असल्या तथापि त्यास व्यवस्थित आकार येत नाही. त्यांचा आकार ओष्ठाकृति असतो. असल्या फुलांचा एक स्वतंत्रवर्ग प्रसिद्ध आहे. सूर्यकमलांतील अथवा झेंडू झिनिया वगैरे मध्ये जी बाह्यांगाकडे फुले असतात, त्यांच्या पाकळ्या संयुक्त होऊन वरील बाजूस लोंबत्या तुकड्याप्रमाणे दिसतात.
याशिवाय शेकडों संयुक्त तसेच सुट्या पाकळ्यास आकार आले असतात, त्या सर्वांचे वर्णन करणे अशक्य आहे. नेहमी पाहण्यात येणाऱ्या फुलांचेच परिक्षण केले आहे. कमी अधिक पाकळ्यांच्या वाढीप्रमाणे पांकळ्यांंसही कधी कधी उपपाकळ्या येतात. कृष्णकमले फुलांत पांकळ्या झाल्यावर आतील बाजूस पांकळ्यांंसारखी उपांगे येतात. त्यामुळे फुलांस विशेष शोभा येते. कांहीं फुलांत एक पाकळी जास्त वाढून नागाच्या फणाप्रमाणे दिसते. खालील बाजूस इतर पांकळ्या एकमेकांस चिकटलेल्या असतात. कांहीं फुलांत देंठ व पाकळीचा रुंद भाग जेथे चिकटला असतो, तेथे केंसासारखे भाग येतात. जस कण्हेर वगैरे.
सांकळ्याप्रमाणे पांकळ्यासुद्धां गर्भधारणक्रिया घडल्यावर सुकून गळू लागतात. द्राक्षामध्ये फूल उमलले असतां लागलीच पाकळ्या गळून जातात. कायम टिकणाऱ्या पाकळ्या फार क्वचित् आढळतात.
असो; याप्रकारचे फुलांतील बाह्यसंरक्षक वर्तुळांचे वर्णन संपले. यापुढे पुंकेसर व स्त्रीकेसरभागाचा विचार व्हावयाचा आहे. पुंकेसर दलांत पुरुषतत्त्व असून ते स्त्रीकेसरतत्वाशीं मिलाफ पावले असता, त्यापासून बीज अगर मुग्ध दशेंत असणारा रोपा तयार होतो. बीज तयार करणे हे फुलांचे मुख्य कर्तव्य असून ते साधण्याकरितां त्यास योग्य ते आकार येतात. बीजापासून वनस्पतींची परंपरा कायम राहते. केवलपुंकेसर फुलांपासून बीज तयार होत नाहीं. बीज उत्पन्न होण्यास अवश्य स्त्रीकेसर फूल पाहिजे. केवल-पुंकेसर फुलांतील परागकण केवल स्त्रीकेसर फुलांस उपयोगी पडतात. ते परागकण किड्याच्या साहाय्याने अथवा फुल- पांखराचे पंखास चिकटल्यामुळे स्त्रीकेसर फुलांस पोहोंचविले जातात. तसेच वारा वाहू लागला असतां परागकण उडून जेथे जरूर असेल तेथे आपोआप उपयोगी पडतात. पाण्यांचे कांठी उगवलेल्या वनस्पतीमध्ये सुद्धां परागकण, पाण्यात पडून प्रवाहाबरोबर वाहून केवल-स्त्रीकेसर फुलांस मिळतात. केवल स्त्रीकेसर फुले ऋतुकाली पुरुष तत्त्वाची वाट पाहत असतात. योग्य संधी आली की, गर्भधारणा पूर्ण होते. पाकळ्यांचे सुंदर रंग, आंतील मधोत्पादक पिंड, तसेच त्यांचा सुवास, वगैरे गोष्टीही अप्रत्यक्ष मदत गर्भधारणा घडवून आणण्यास आपआपल्यापरी देत असतात. खरोखर ह्या सर्व गोष्टीचे बारीक निरीक्षण केलें म्हणजे प्रत्येक जीवनमात्रासंबंधी त्यास अवश्य लागणाऱ्या वस्तूंची तजवीज व त्यांत दाखविलेले अगाध चातुर्य, ह्यांचे कौतुक करावे तितकें थोडेच आहे.