प्रकरण ८ वें.
---------------
पेशीजाल. ( Tissue).
---------------

 मृदुसमपरिमाण पेशी:-(Soft parenchyma) पेशींच्या बाह्य पड्याचा ज्या प्रकारचा वाढण्याचा कल असतो, त्या प्रकारचा आकार पेशीस येतो. सभोवतालची परिस्थिति तसेच अंतरसजीवतत्त्व ह्या दोन्हीवर पेशींचा आकार अवलंबून असतो. कांहीं पेशी सर्व बाजूंनी सारख्या वाढतात. अशा पेशींस समपरिमाण ( Parenchymatous ) मृदुपेशी म्हणतात. समपरिमाण पेशींच्या भित्तिका पातळ असून बहुतेक ह्यांची लांबी व रुंदी सारखी असते. कोवळ्या लुसलुशित भागामध्ये समपरिमाण मृदुपेशी आढळतात.

 लंबवर्धक पेशी:—( Prosenchyma ) जसे जसे ते भाग, लांबी, रुंदीमध्ये वाढत जातात, तसे तसे ह्या पेशींत फरक होऊन दुसऱ्या प्रकारच्या पेशी तयार होतात. काहीं पेशी दोन्ही टोकास अणकुचीदार असतात. त्यांच्या भित्तिका चिवट व कठीण असतात. जेव्हां कोवळा भाग वाढून जुना होऊ लागतो, तेव्हां समपरिणाम पेशींच्या जागी ह्या लंबवर्धक (Prosenchyma ) पेशींचा प्रादुर्भाव होतो.

 सर्व पेशींची जाडी सारखी केव्हाही आढळणे शक्य नसते. त्यांत कमीअधिक अंतरघडामोडीप्रमाणे वाढ नेहमी एक प्रकारची राहणे कठीण असते. कांहीं जागी वाढ अधिक जोमाची होऊन दुसरे जागी ती अगदी खुंटलेली


६०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
आढळते. ह्यामुळे दोन अधिक उंच वाढीच्या मध्यभागी खांचा (pits ) तयार होतात. कधी कधी असल्या सांचेस नळीसारखा आकार येतो. पेशींच्या अंतर बाजूकडील जाडी मळसूत्री, वळ्यासारखी, पट्टेदार वगैरे निरनिराळ्या प्रकारची असते. त्यापासून तयार होणा-या वाहिन्यांचा (Vessels ) आकारही त्याच प्रकारचा होतो.

 वाहिनी ( Vessels ) व पेशीजात (Tissue ) वाहिनीची कल्पना अशी करितां येईल की, डब्यावर डबे ठेवून सारखे रचित जावे, व प्रत्येक डब्याचे झांकण व बुड ही दोन्ही काढून टाकली असतां जो त्यास आकार येतो, तोच आकार वनस्पतींच्या वाहिन्यांस येतो. एकापेक्षा अधिक पेशीं एके ठिकाणी जमून परस्पर संलग्न होतात व त्यांपासून एक विशिष्ट प्रकारचे काम वनस्पतिजीवन यात्रेत घडते. अशा संघास पेशीजाल ( Tissue ) म्हणतात. |

जेव्हां वनस्पति एकपेशीमय असते, त्यावेळेस सर्व जीवनकामें त्या एकट्या पेशीस करावी लागतात. पण बहुपेशीमय वनस्पतींत श्रमविभागाचे तत्त्व पूर्णपणे अमलांत येते, त्या तत्त्वानुसार निरनिराळी कामें निरनिराळ्या पेशीजालास ( Tissues ) करावी लागतात.

 पेशीजाल होण्यांत पेशीसंयोग दोन तीन प्रकारचे आढळतात. कांहीं पेशी एकास एकसारख्या लागून त्यांचा जणू धागा ( Filament ) बनतो. जसे, शैवालतंतु वगैरे. अशा ठिकाणी हा तंतु त्याचे पेशीजाल असते. उच्च वनस्पतिमध्ये तंतुमय पेशीजाल कांही भागांत असते, म्हणजे तंतुमय जाल केवळ क्षुद्रवर्गामध्येच असते असे नाही. तर त्यांचा समावेश दोन्ही वर्गामध्ये कमीअधिक प्रमाणात असतो. कांहीं पेशी बाजूस वाढत गेल्यामुळे, त्यांपासून तयार होणाऱ्या पेशीजालांत दोन्ही लांबी व रुंदी आढळते. पण रुंदी मात्र अगदी कमी असते.

 जेव्हां पेशी तिन्ही दिशेने वाढून पेशीजाले तयार होतात, अशा वेळेस पेशी जालामध्ये लांबी, रुंदी, व जाडी ही तिन्ही येतात. उच्च वर्गातील, तसेच कांहीं क्षुद्र वर्गातील वनस्पतीमध्ये नेहमी आढळणारी पेशीजालें ह्या

प्रकारची असतात,
८ वे ].     पेशीजाल. ( Tissue).     ६१
-----

 पेशीजालांतील पोकळ्या-जेव्हां पेशीजालें तिसऱ्या प्रकारचीं बनतात, त्या वेळेस पेशी कमी-अधिक आकाराच्या असून परस्परांस सारख्या न चिकटल्यामुळे पेशी पेशीमध्ये पोकळ्या Intercellular Spaces उत्पन्न होतात; पण पेशी जेव्हां सारख्या रीतीने परस्परांस संलग्न होतात, त्या वेळेस ह्या मध्यपोकळ्या राहण्याचा संभव कमी असतो; पण जेथे वर्तुळाकृती पेशींचा संयोग होत असतो, त्या ठिकाणी पोकळ्या रहावयाच्याच. मुळ्यांचे अथवा खोडांचे वाढते कोंब सूक्ष्मदर्शक यंत्रांत पाहिले असतां पेशीजालामध्ये पोकळ्या आढळत नाहीत. कारण, येथील पेशी सारख्या असून, व्यवस्थित रीतीनें परस्पर संयुक्त होतात. पण जुन्या खोडाचा अथवा त्यांमधील भेंडाचा पातळ भाग पाहिला तर पुष्कळ मध्य पोकळया आढळतात. कारण कोणत्याही रीतीने तीन वर्तुळाकृती पेशी परस्पर जोडिल्या असता त्यामध्ये थोडी बहुत पोकळी राहणारच व असल्या वर्तुळाकृती पेशींचा भरणा जुन्या भागांत अधिक असतो. नूतन कोवळ्या भागांत ह्यांचा भरणा फार कमी असतो. व जसजसा तो भाग जुना होईल, त्या मानाने अधिकाधिक पोकळ्या उत्पन्न होतात. शिवाय वाढत्या पेशींवर कमी-अधिक दाब पडल्यामुळे पेशींचे पडदे कोपऱ्याकडे तुटून जाण्याचा संभव असतो, व जेव्हां तीन अथवा अधिक पेशी एके जागी जमतात, तेव्हां कमी-अधिक दाबामुळे त्यांचे पडदे तुटतात. त्यावेळेस या पोकळ्या आपोआप उत्पन्न होतात. पुष्कळ पोकळ्यांचा संबंध एकत्र होऊन त्यांपासून पेशीमध्य मार्ग बनत जातात. हे मध्यमार्ग वनस्पतिशरीरांत सर्वत्र खिळले असतात. विशेषेकरून पानांत अथवा पाणवनस्पतींच्या खोडांत ह्या पेशींमध्य पोकळ्या, तसेच त्यांपासून बनलेले हवापूर्ण मार्ग अधिक सांपडतात.

 वाहिनीमयजाल: -पेशी जालें वनस्पतिशरीरांत निरनिराळ्या प्रकारची असतात. पूर्वी वर्णन केलेल्या मृदु व दीर्घ पेशीजाला खेरीज वाहिनीमय ( Vascular ) जालाचा एक वेगळा प्रकार असतो. त्या जालांत फिरकीदार (Spiral ) वळेदार वाहिन्या असतात. खांचेदार ( Pitted ) फिरकीदार (Spiral ) वळेदार ( Annular ) पट्टेदार ( Reticulated ) तसेच शिडीदार (Scalariform) वगैरे पेशी कशा उत्पन्न होतात व त्यांपासून उत्पन्न होणाऱ्या वाहिन्या Vessel त्याच आकाराच्या कां होतात हे मागील प्रकरणी

६२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
सांगितलेच आहे. खांचेदार वाहिन्या खाचेदार पेशीच्या रांगेपासून तयार होतात, मात्र पेशीबाह्य पडदा गळून गेला असतो. कधी कांहीं कांहीं जागी मध्य पडदा राहून त्यास अव्यवस्थित नळीसारखा आकार येतो. द्विदल धान्य वनस्पतीच्या लाकडामध्ये ह्या वाहिन्या (Vessel) इतर वाहिन्यांशी नेहमी मिश्रित झाल्या असतात. फिरकीदार, वळेदार व शिडीदार वाहिन्या विशेषेकरून काष्ठामध्यें नेहमी आढळतात.

 लाकडाच्या बाह्य भागामध्ये चाळणीसारखे पदर आढळतात. येथील वाहिन्यांचे मध्य पइदे पूर्णपणे गळून न जातां छिद्रमय असल्यामुळे त्यांस चाळणीसारखा आकार येतो. हे मध्यपडदे अति पातळ असून पेशीपेशींचा अंतरसंबंध छिद्रांतून एकमेकांशी राहतो. तसेच छिद्रमय पडद्यावर पेशीतून पेशीघटक द्रव्यासारखा पदार्थ जमत जातो, त्यामुळे तो पातळ पडदा थोडा थोडा जाड होतो; पण छिद्रे बुजून न जातां जशीच्या तशीच कायम राहतात. चाळणीदार वाहिन्यास लागूनच दुसऱ्या पेशी असतात, त्यास चाळणीदार पेशांचे समगामी ( Companion ) ह्मणतात. ह्याचा संबंध चाळणीदार वाहिन्या तयार होत असतांना तुटला असतो. ह्या पेशी कमी रुंदीच्या असून त्यामध्ये जीवनकण व केंद्र पूर्वीसारखीच असतात. चाळणीदार पेशींमध्ये सजीवतत्त्व पूर्वी पेक्षा अधिक घन होते व जुन्या पेशींमध्ये केंद्र वगैरे असत नाहीं.

 सपुष्पवर्गामध्ये उन्हाळ्याचे अखेरीस ह्या चाळणीदार पेशींची छिद्रमय तोंडे पौष्टिक घटकद्रव्ये अधिक वाढल्यामुळे बंद होतात, व हिवाळ्यांत तीच बंद झालेली स्थिति कायम टिकते. पण पुनः वसंतऋतु सुरू झाला म्हणजे ती तोंडे आपोआप खुलू लागतात, व घटकद्रव्ये विरघळल्यामुळे नाहीशी होतात.

 वनस्पतिशरीर बहुतकरून वर वर्णन केलेल्या सर्व पेशीजालांनी भरलेले असते, ती जालें निरनिराळ्या प्रकारे एकामेकांशी मिश्रित झाली असतात. अमुक एक विशिष्ट प्रकारचे एकच पेशीजाल सापडणे कठीण असते. त्यांचा दुसऱ्या जालांशी निकट संबंध येऊन मिश्रित स्थिति आढळते.

 दुग्धरसवाहिनी जाले:-कधी कधी वनस्पतिशरीरांतून पांढरा दुधासारखा रस निघतो. ह्या प्रकारच्या रसवाहिन्या व त्यांची जालें कांहीं वनस्पतींमध्ये विशेष आढळतात, जसे करवीर, मांदारकुल, अफूचा वर्ग वगैरे. हा दुग्धरस

८ वे ].     पेशीजाल. ( Tissue).     ६३
-----
पौष्टिक असून कधी कधी आपोआप बाहेर गळलेला आढळतो. हा रस बाहेर वाया गेला असतां शरीरसंवर्धनदृष्टया तितका वनस्पतींचा तोटा होतो. कधी कधी हा दुग्धरस विषारी असतो, व त्याबरोबर निरुपयोगी द्रव्येही वाढू लागतात. व्यवहारामध्ये त्या दुग्धरसाचा फायदा होतो. त्यापासून व्यापारी जिन्नस तयार होतात. जसे अफू, रबर वगैरे.

 पिंडजाल:–कांहीं वनस्पतीमध्ये सुवासिक तेले, तसेच साखरेसारखे गोड रस उत्पन्न करणाऱ्या पेशी आढळतात. आता ही गोष्ट खरी कीं, अशा पेशीचे अस्तित्व सार्वत्रिक नसून, कांहीं विशिष्ट ठिकाणीच असते. असल्या पेशींचा एकत्र संघ झाला असता त्यास पिंडजाल ( Glandular Tissue ) म्हणतात, ह्या पेशींमध्ये सजीव तत्व कणीदार असून त्यांच्याच चांचल्यशक्तीमुळे ही द्रव्ये तयार होतात. पिंडजालाचा पेशीमध्ये पोकळ्यांशी संबंध येऊन पिंडांतून उत्पन्न होणाऱ्या पदार्थांचा सांठा ह्या पोकळ्यांत केला जातो. चोहोबाजूंनी वरील पेशी असून मध्ये पोकळी राहते, व ती पोकळी वाढत वाढत मोठी होते. फुलांतील मधुर रस, पानांतील तेलें अथवा मेण, खोडांत आढळणारे धूपादि पदार्थ, केसांतील संरक्षणाकरिता उपयोगी पडणारा विषयुक्तरस, वगैरे पदार्थांचा उगम पिंडापासून होतो. फुलांतील मधुररस, फुलपाखरे चाखण्याकरितां येतात व त्यापासून केवळ स्त्रीकेसरफुलांची गर्भधारणा होते. कारण, पांखरे स्त्रीकेसर फुलांवर बसून परस्परांचा फायदा करून देतात. किडे, मुंग्या, अगर कीटक जेव्हां वनस्पतीस त्रास देऊ लागतात, त्यावेळेस त्यांचे विषारी केस त्यांस बोचले असतां कीटकास वेदना होतात व त्यामुळे ते पुनः वनस्पतीस त्रास देण्याचे भानगडीत न पडतां दूर जातात. राळ, मेण, धूप, डिंक वगैरे पदार्थ व्यापारीदृष्ट्या उपयोगी पडतात.

पेशी जालाची रचना व मांडणी कांहीं विशिष्ट प्रकारची असते. प्रत्येक प्रकारच्या पेशीजालास काही विशिष्ट काम करावे लागते व त्या कामास योग्य अशी त्याची रचना बनते. जरी व्यवस्थित मांडणी झाली असते, तथापि सुद्धा प्रसंगानुसार निरनिराळ्या पेशीजालास आपली कामें सोडून दुसऱ्यांची कामें करावी लागतात, अथवा आपली कामें संभाळून दुसऱ्यास मदत करावी लागते.

 वाढता कोंब-वनस्पतिशरीरांतील सर्व पेशीजालांचा संबंध वाढत्या कोंबामध्ये तयार होणाऱ्या पेशींशी असतो, अथवा निदान त्यांचा उगम
६४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
असल्या वाढत्या पेशींपासून होऊन त्यास पुढे कायम व्यवस्थित स्वरूप आले असते. वाढत्या कोंबाचा पातळ भाग आडवा कापून सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहण्याकरितां पूर्वीप्रमाणे तयार करावा. कापण्याचे पूर्वी पाने सर्व काढून केवळ कोंबाचा भाग पहावयास घ्यावा. सारख्या आकाराचे समपरिमाण पेशीजाल ( Parenchyma ) सूक्ष्मयंत्रामध्ये दिसेल. पेशीतील जीवनकण अथवा केंद्रे सोडून पेशीजालरचनेकडे लक्ष्य द्यावे. ह्यांत तीन प्रकारच्या पेशीजालाच्या मांडणी कमी-अधिक फरक होत जाणाऱ्या आढळतात, कोवळ्या स्थितिमध्ये १ त्वचापदर (Dermatogen) २ अंतरालपदर (Periblem) व मध्यपदर (Plerome) अशा तीन प्रकारची पेशीजाले आढळतात. व ह्या तीन कोवळ्या जालांत इतर पोटपेशी जालांचा अंतर्भाव होतो. पहिल्या त्वचापदरापासून Dermatogen बाह्यत्वचा Epidermis केंससंरक्षक पापुद्रे अथवा आवरणे (Scales) उत्पन्न होतात. दुसरा अंतरालपदर Periblem समपरिमाण असून त्यापासून साल (Cortex) अंतरत्वचा Endodermis वगैरे उत्पन्न होतात. पानांचा उगम ह्याच अंतराल पदर (periblem) पासून होतो. तिसरा मध्यपदर (plerome) विशेष महत्त्वाचा असतो. परिवर्तुळ (Perricycle)संवर्धक पदर (Cambium)वाहिनीमय ग्रंथी (Vasculal bundle) ग्रंथ्यंतराल पदर Medullary rays, काष्ट Xylem तंतुकाष्ट (Phloem) व भेंड (Pith) ही सर्व जालें तिसऱ्या मध्यपदरा(plerome) पासून उगम पावतात, परिवर्तुळा (pericycle ) पासून परिवर्तुळापर्यंत जो वाटोळा भाग उच्च वनस्पतीमध्ये आढळतो, त्यास स्तंभ (Stele) असे म्हणतात. म्हणजे वरील सर्व जालें स्तंभामध्ये अंतर्धान पावतात, व स्तंभाचा उगम ह्या तिसऱ्या मध्य पदरापासून होतो.  प्राथमिक स्थितीत पेशीवर्धक शक्ति सार्वत्रिक असते, पण पुढे ती स्थिति राहत नाहीं. पेशीवर्धक शक्तीमुळे नवीन पेशी उत्पन्न होऊन त्यास संकीर्ण स्वरूप मिळत जाते. निरनिराळी पेशीजाले ह्या पेशीवर्धक शक्तीमुळे उत्पन्न होतात, जशी जशी ती वाढत जातील, तसेतसे त्यांस विशिष्ट संकीर्ण स्वरूप प्राप्त होते. म्हणूनच बीज पेरून कोवळ्या स्थितीत येणाऱ्या रोपड्यांत संकीर्ण जाले आढळत नाहीत. जसजसा रोपडा मोठा होत जातो त्याप्रमाणे प्राथमिक
८ वे ].     पेशीजाल. ( Tissue).     ६५
-----
पेशीजालास भिन्नभिन्न स्वरूपे मिळून निराळी पेशीजालें बनत जातात. पेशीस कायमचे रूप मिळाल्यावर तिची वर्धक शक्ति नाहीशी होते. ही वर्धक शक्ति वाढत्या कोंबांतील पेशींत अधीक असते, यामुळे वाढते कोंब सारखे वाढत असतात. ह्याच शक्तीमुळे झाडांचे सर्व अवयव उत्पन्न होतात. जुन्या स्थितीत सुद्धां कांहीं विशिष्ट पदरास वर्धक शक्ति असते, म्हणूनच त्या पदरास संवर्धक पदर (Cambium) ह्मणतात. वाहिनीमय ग्रंथीमध्यें Vascular bundle काष्ट व तंतुकाष्ट (xylem & phloem) पदराच्यामध्ये हे संवर्धक पदर Cambium आढळतात. ह्या पदरामुळे काष्ट व तंतुकाष्ट अधीक रुंद वाढून त्याबरोबर वनस्पति रुंद होत जाते. पण काही ठिकाणी हा पदर कांहीं काल राहून पुढे नाहीसा होतो. अशा ठिकाणीं दुय्यम प्रकारची रुंदीत वाढ होत नसते. हा पदर ह्मणजे पेशी नवीन उत्पन्न करण्याचा एक जणू कारखाना आहे. नवीन पेशी उत्पन्न झाल्या असतां काष्टाकडे अथवा तंतूकाष्टाकडे जमत जाऊन दोन्हींचे पदर वाढतात. संदर्धक पदरांत सजीव सत्व व इतर सचेतनकण पुष्कळ असून ते नेहमी चांचल्य स्थितीमध्ये आढळतात.

 ही दुय्यम संवर्धकशक्ति केवळ ग्रंथीतील संवर्धक पदरामध्येच असते असे नाहीं. कांही ठिकाणी सालीमध्ये ही शक्ति एखाद्या पदरांत उत्पन्न होऊन सालीची वाढ होत जाते. वनस्पतीस दुखापत झाली असतां, अथवा एखाद्याने वनस्पतीचा कांहीं भाग कापून काढला तर, ती दुखापत भरून काढण्याकरिता अशाच प्रकारची संवर्धकशक्ति दुखावलेल्या जागी उत्पन्न होऊन हळूहळू नवीन पदर उत्पन्न होतात. येणेप्रमाणे तो दुखापत आपोआप भरून जाते. तात्पर्य एवढेच सांगावयाचें कीं, गर्भाबरोबर आलेली संवर्धकशक्ति नेहमी वाढत्या कोंबाकडे असते ग्रंथींमधील संवर्धकशक्ति दुय्यम असते. ह्याच दुय्यमशक्तीचा प्रादुर्भाव अवचितप्रसंगी इतर ठिकाणीही दृष्टीस पडतो.

 पेशी रचना:-सपुष्प वर्गात तीन मुख्य जाले असून, त्यांच्या तीन विशिष्ट रचना आढळतातः-१ संरक्षक पेशी रचना. (Tegumentary tissue system ) २ साल रचना. ( Ground tissue system) ३ वाहिनीमय जाल रचना. ( Fibrovascular tissue system ) प्रथम सांगितलेलें मृदु पेशीजाल (Parenchyma) तसेच दीर्घ पेशी जाल

६६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
(Prosenchyma ) ही दोन्ही वरील दुसऱ्या अथवा तिसऱ्या रचनेमध्ये इतर जालांशी एकवटून गेलेली असतात, अथवा त्यामध्ये फरक हेत जाऊन त्यासच भिन्नस्वरूप प्राप्त होते व त्यांपासुनच वरील रचना तयार होतात.

 संरक्षक पेशी जाल रचना:–मुळ्या, खोड, पाने तसेच फुलांचे भाग ह्यात बाहेरचे अंगास विशेषेकरून एक पेशी जाडीची कातडी असते, त्यांस बाह्य अथवा उपरित्वचा ( Epidermis ) म्हणतात. ह्या पेशी साधारणपणे चतुष्कोनी अगर वाटोळ्या असून त्यांची बाह्य बाजू मजबूतीची असते. उच्च वर्गामध्ये अथवा क्षुद्रवर्गामध्ये प्रत्येक वनस्पतीस संरक्षक त्वचेची जरूरी असते. जरी ही त्वचा एक पेशी जाडीची असते, असा साधारण नियम असतो; तथापि ह्यास अपवादही आढळतात. मुळ्यावरील जे टोपीसारखे आवरण असते; त्याचा उगम ह्या पेशींपासून होतो. येथे एकापेक्षा अधिक पदर असतात. ह्या पदरांचा संबंध जमिनींतील कठीण पदार्थाशी आल्यामुळे कांहीं पदर नेहमी झिजून जाण्याचा संभव असतो, म्हणून असली आवरणे अधिक पदरांची बनलेली असतात. वड, उंबर, रबर, वगैरे झाडांच्या पानांत बाह्य त्वचा दोन अथवा तीन पदरी असते. बाह्य त्वचेच्या पेशी सारख्या चिकटल्यामुळे त्यांत मध्य पोकळ्या असत नाहींत. कोंवळ्या स्थितीत हवा अथवा उन्ह ह्यांपासून अधिक संरक्षणाची जरूरी असते. अशा वेळेस बाह्य त्वचेवर पातळ तातेसारखा पापुद्रा येतो. हा पापुद्रा त्वचेच्या बाह्यभिंत्तिकेशी संलग्न असल्यामुळे संरक्षणास दुजोरा मिळतो. ह्या पापुद्र्यावर कधी कधी मेणाचे सारवण होते. ह्यामुळे तर उष्णता अगर थंडी ह्या दोन्हींचे चांगलेच निवारण होते. शैवाल तंतू वर्गांत ( Spirogyra ) बाह्यत्वचेवर बुळबुळीत डिंकासारखें सारवण बनते. ह्याचा उगम बाह्यत्वचेच्या भित्तिकेपासून असतो. पाण्यांत उगवणाऱ्या वनस्पतींत मग ती कोवळी असो, अगर जुनी असो. तिच्या बाह्य त्वचेवर असला पातळ पापुद्रा कधीही येत नाही. कारण अशा ठिकाणी त्या पापुद्याची जरूरी नसते.

 कोवळ्या स्थितीत बाह्य त्वचेच्या पेशीमध्ये सजीव तत्त्व व सचेतन कण आढळतात, पण जुन्या स्थितींमध्ये बाह्य त्वचा बहुतेक मृत होते, अथवा झडून जाते. त्यावेळेस संरक्षणाचे काम सालीस करावे लागते. बाह्य त्वचेच्या पेशींत

८ वे ].     पेशीजाल. ( Tissue).     ६७
-----
हरित वर्ण शरीरें (Chloroplasts) बहुतकरून नसतात. परंतु काही पाण्यात उगवणाऱ्या वनस्पतीमध्ये, बाह्यत्वचेमध्येसुद्धा ती असतात. तसेच त्वचारंध्रे (Stomata ) जेव्हां तयार होतात, त्या वेळेस द्वाररक्षकपेशी ( Guard-cell ) म्हणून रंध्राजवळ असतात, त्यामध्ये हरित वर्ण शरीरे असतात.

 संरक्षक पेशीजालरचनेचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्वचा-रंध्रे होत. त्वचारंध्रा ( Stomata ) चा अंतर पोकळ्याशी संबंध असल्यामुळे, त्या द्वारे आंतील हवा व बाहेरील हवा, त्यांचा परस्पर संबंध राहतो. त्वचारंध्रे वनस्पतींच्या जीवनकार्यात फारच उपयोगी पडतात.

 बाह्यत्वचेमध्ये एका पेशीचे विभाग होऊन मध्य पडदा जाड होतो. पुढे तो आपोआप फाटून मध्ये लहान पोकळी राहते. ही पोकळी अथवा द्वार म्हणजे त्वचारंध (Stoma) होय. विभागलेल्या पेशीचा आकार अर्धचंद्राकृती असतो. त्यांत हरितवर्ण तसेंच जीवनकण, केंद्र वगैरे स्पष्ट असतात. जरी मध्ये द्वार तयार होते, तथापि त्या दोन्हीं पेशीचा संबंध टोंकांकडे राहतो. त्या पेशीद्वयास द्वाररक्षक (Guard-cell ) हे नांव योग्य आहे. द्वाररक्षक पेशी व त्वचेंतील इतर पेशी त्यांत पुष्कळ फरक असतो. बाजूच्या पेशीत केंद्र, जीवन कण, साधारण असून त्यांत द्वाररक्षक पेशीमध्ये आढळणारी हरितवर्ण शरीरें असत नाहीत,

 जेव्हां पाणी ह्या पेशीद्वारांत भरू लागते त्यावेळेस त्यांची अर्धचंद्राकृति जाऊन त्या जागी वर्तुळाकृती येते, व जसे जसे पाणी अधिक शिरते तसे तसे त्यांमधील द्वार अथवा रंध जास्त रुंद अगर मोठे होते. त्याचप्रमाणे उलट पाणी जेव्हां कमी असते त्या वेळेस ते रंध्र संकुचित होते. रंध्र रुंद होणे अथवा संकुचित होणे ह्याचा परिणाम झाडाच्या बाष्पीभवनावर (Transpiration) होतो. ह्या विषयी आपण अधिक विचार पुढे करू.

 वनस्पतीच्या शरीरावर येणाऱ्या केसांचा उगम बाह्यत्वचेपासून असतो. बाह्यत्वचेची एखादी पेशी बाह्यांगास अधिक वाढून केंस तयार होतो. केंस एक पेशीमय अथवा बहुपेशीमय असतात. मुळ्यावरील केस नेहमी एक पेशीमय असून त्याचे काम फार महत्त्वाचे असते. जमिनीतील निरिंद्रिय द्रव्ये शोषण करण्याचे काम मुळ्यावरील केसांतून होत असते. खोडावरील अथवा

६८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
पानावरील केस कधी कधी एकपेशीमय अथवा बहुपेशीमय आढळतात. त्यांच्या आकृतीप्रमाणे त्यास निरनिराळे स्वरूप प्राप्त होते. साधारणपणे केंस वनस्पतीच्या सर्व भागांत आढळतात. फुलांतील नाजुक परागवाहिनीवर ( Style ) सुद्धा केंस येतात. असल्या केसांची गर्भधारण क्रियेंत अप्रत्यक्ष मदत होते. परागवाहिनीवरील केंसास परागकण एकदा चिकटले असता निघून जाणे शक्य नसते, परागकणाची गर्भसंस्थापनेस प्रत्यक्ष जरूरी असल्यामुळे ह्या केंसाकडून त्या क्रियेस अप्रत्यक्ष मदत केल्यासारखी असते, नाहींतर गर्भधारणा मागे पडली असती.

 कोंवळा भाग उन्हाच्या अथवा थंडीच्या कडाक्याने करपून जाण्याचा संभव असल्यामुळे कोवळ्या भागांवर केंस नेहमी येतात, व त्यामुळे त्याचे संरक्षण होते.

 केंस जेव्हां जास्त कठीण व अणकुचिदार होतात, त्या वेळेस त्यास कांट्यासारखे रूप येते. गुलाबावरील कांटे अशा तऱ्हेचे बाह्य त्वचेवरील कठीण झालेले केंस होत. असल्या केसांचा अथवा कांट्याचा अंतर्भाव संरक्षक पेशीजाल रचनेत होतो. ह्या काट्यांस त्वककंटक हे नांव आहे. ह्यांचा उल्लेख पूर्वी केलाच आहे.

 साल (Cortex):-बाह्यत्वचेच्या नंतर आतील बाजूस साल सुरू होते. येथील पेशी मृदु व दीर्घ असतात. पेशीमध्ये पोकळ्यांचा भरणा येथे विशेष असतो. पेशीच्या भित्तिका पातळ किंवा जाड असतात. त्यांची रचना अवयवाप्रमाणे कमी अधिक जाडीची असते. कोंवळे खोंड, पाने, उपपुष्प, पत्रे वगैरेमध्ये रंजित शरीरें ( chloroplasts ) पुष्कळ आढळतात. पानांत बहुतेक त्यांचा भरणा असतो. दुग्धरसवाहिन्या, व पेशींमध्यनलिका सालींत आढळतात. पुष्कळ वेळां मृदुजाल व साल ही दोन्ही समानार्थी उपयोग करतात.

 सालींत स्थानभिन्नत्वामुळे दोन प्रकारची जालें असतात, १ स्तंभबाह्य ( Extrastelar ). व २ स्तंभांतर्गत (Intrastelar). स्तंभाचे बाहेरील अंगास असणारे जाल स्तंभबाह्य व स्तंभांत असणारे जाल स्तंभांतरगत होत. स्तंभबाह्यांत ( Exodermis ) अंतरालत्वचा व अंतरत्वचा (endodermis) असे दोन भिन्न पदर आढळतात. अंतरत्वचा (endodermis)

८ वे ].     पेशीजाल. ( Tissue).     ६९
-----
हा स्तंभबाह्य पदरापैकी शेवटला पदर असतो. ह्यांत सत्त्वाचे कण किंवा इतर पौष्टिक द्रव्ये असतात. हिंवाळ्याचे सुमारास असल्या सात्त्विक पदार्थांचा सांठा ह्या पदरामध्ये असतो, पण जसा वसंतऋतु सुरू होतो, त्याप्रमाणे तो सांठा कमी कमी होतो. हिवाळ्यांत पुष्कळ झाडांच्या क्रिया शिथिल असल्यामुळे नवीन अन्न फारसे तयार होत नाही. अशा वेळेस ह्या पौष्टिक साठ्यांचा उपयोग वनस्पति करीत असतात.

 कोवळ्या बुधाचा पातळ आडवा छेद सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहण्याकरितां तयार करावा. आयोडिनचा एक थेंब त्या भागांवर सोडून वर कांच झाकणी ठेवावी. आयोडिनमुळे सत्त्वाचे कण निळसर होऊ लागतात. अंतरत्वचेचा पदर जणू निळ्या रंगाच्या कणांनी गजबजलेला असल्यामुळे, सर्वापेक्षा तो स्पष्ट दृष्टीस पडतो. बाह्यत्वचेनंतर व अंतरत्वचेपूर्वी अंतरालत्वचा असते. प्राथमिक स्थितीत अंतरालत्वचेचे पदर साधे असून हळू हळू त्यांतही फरक होऊ लागतात. कधी कधी अंतरालत्वचेच्या पहिल्या पदरामध्ये वर्धकशक्ति उत्पन्न होऊन नवीन नवीन पदर बाहेरील व आंतील अंगास येत असतात. बाहेरील बाजूकडे येणारे पदर सारख्या चतुष्कोनी पेशीचे असल्यामुळे त्यांत मध्य पोकळ्या राहत नाहींत. आंतील पदर वाटोळ्या पेशीचे असून समपरिमाणी असतात. ही वर्धकशक्ति ( Meristematic power ) त्या पदरांत कायमची राहत नसते. ही शक्ति ती जागा सोडून दुसरे जागी पुनः दिसू लागते. बाहेरील बाजूकडील पदर सारखे असल्यामुळे संरक्षक होतात. बाह्यत्वचा ( Epidermis ) नेहमी टिकत नाहीं. जसे जसे आंत नवीन पदर उत्पन्न होतात, तसतशी बाह्यत्वचा मृत होते, व आंतील संबंध नाहीसा होतो, नवीन पदर ज्यास्त वाढल्यामुळे त्यांचा जोर अधिक होऊन बाह्यत्वचा फाटून गळू लागते. ती झडून गेल्यावर आंतील नवीन पदर स्पष्ट दिसतात. ह्या पदरास पुढे संरक्षण करण्याचे काम करावे लागते. कारण बाह्यत्वचा संरक्षक असते व ती गळून गेल्यावर दुसरे पदरास तिचे काम करणे भाग असते व ते काम हे पदर करू लागतात.

 त्वचारंध्रे ( Stomata ). बाह्यत्वचेवर असल्यामुळे बाह्य हवा व अंतर वायू ह्यांचा संबंध बाह्यत्वचा असतांना राहत असे. पण ती गळून गेल्यावर जेव्हां आंतील चतुष्कोनी पेशीचे पदर सारखे येतात, त्या वेळेस तो संबंध
७०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
राहणे शक्य नसते. पण ही स्थिति फार दिवस टिकत नाही. त्वचारंध्राप्रमाणे येथेही लहान लहान द्वारे त्या नवीन पदरावर येतात, हीं द्वारे हिंवाळ्यांत

आतून बंद होतात. कारण त्यांचे आतील बाजूस नवीन पेशी उत्पन्न होऊन त्यास अडोसा दिला जातो. एकदल धान्यवनस्पतींत खोडावर असले पदर व पदरभेदी द्वारे ( Lenticel ) फारशी पाहुण्यांत येत नाहीत. जें खोड दरवर्षी अधिक रुंद वाढते, त्यामध्ये ही स्थिति अवश्य असते. कॉर्क नांवाचे झाड आहे त्यांत सालीतील संवर्धक शक्तीमुळे पुष्कळ पदर उत्पन्न होतात. हें पदर मऊ असून भेंडाळ असतात. ह्यांचा व्यापारीदृष्ट्या उपयोग होतो. ह्या पदरापासून बाटलीस लागणारी बुचे तयार करतात. ह्यावरून त्या पदरास कॉर्क पदर म्हणतात व झाडासही कॉर्क वृक्ष म्हणतात. आपणही त्या पदरास कॉर्क ह्या नावाने संबोधू.

 वनस्पतीच्या दुखविलेल्या अथवा कापिलेल्या जागी संवर्धक शक्तीमुळे प्रथम मृदु पदर येत जातात. पुढे त्यावर ह्या कॉर्क पदरांचे आवरण येते.

 स्तंभांतर जालांपैकी परिवर्तुळ ( Pericycle ) ग्रंथ्यंतराल पदर ( Medullary rays ) व भेंड ( Pith ) हीं मुख्य होत. ह्यांचा उगम मध्यपदरा ( Pleome ) पासून होतो. द्विदलधान्यवनस्पतीमध्ये ही जालें स्पष्ट असतात. पण एकदल धान्यवनस्पतींत खोड बहुतेक भेंडमय असून मधून मधून वाहिनीमय ग्रंथी आढळतात.

 परिवर्तुल एकदल तसेच द्विदलधान्य वनस्पतींत बहुतेक चांगले वाढते. मुळ्यांमध्ये परिवर्तुल एक पदरी अथवा बहुपदरी असते. त्यापासून द्वितीयक मुळ्या उत्पन्न होतात. परिवर्तुळाच्या पेशी कधी कधी जाड होऊन त्यांपासून तंतू तयार होतात.

 ग्रंथ्यंतराल पदर द्विदल धान्यवनस्पतींच्या खोडांत असून मध्यभागी असणारे भेंड व बाहेरील परिवर्तुळ ह्यांचा संबंध त्यामुळे जडला जातो. एकदल वनस्पतीच्या खोडांत हे पदर असत नाहीत. कारण ते सर्वच भेंडमय असते. तसेच भेंड हीं द्विदलधान्य वनस्पतींत नेहमी आढळते असे नाहीं. कांहींमध्ये ते अधिक असते व कांहींत ते गळून जाते. भेंडाच्या पेशी बहुतेक मृदु असतात. कांहीं पाणवनस्पतींत परिवर्तुळाचा अभाव असतो. द्विदलधान्यवनस्पतींत

८ वे ].     पेशीजाल. ( Tissue).     ७१
-----
ग्रंथींची मांडणी वर्तुलाकृति व्यवस्थित असते, त्यामुळे इतर पेशीजालासही व्यवस्थित स्वरूप येते. पण एकदल वनस्पतींत अशी स्थिति नसते.

 कोंवळ्या स्थितीत वनस्पतीचे कवच ( Bark ) म्हणजे बाह्य त्वचा होय. पण ही त्वचा कायम टिकणारी नसून जसे जसे आंत कॉर्क पदर उत्पन्न होतात, तशी तशी बाह्यत्वचा गळून जाते. नवीन उत्पन्न होणा-या कॉर्क पदरांपैकीं बाह्यपदर मृत होतात. कवचामध्ये ( Bark ) बाह्यत्वचेचे मृतपदर व कॉर्क ह्यांचा समावेश होतो. सालीमध्यें ( Cortex ) संवर्धक पदर जागः जाग उत्पन्न होऊन त्यांपासून कॉर्कपदर उत्पन्न होतात, व जे जे मृतपदर असल्या संवर्धक पदराचे बाह्यांगास आढळतात, त्यांस साधारणपणे कवच ( Bark ) असे म्हणतात. ह्या दृष्टीने कवच कधीं बाह्यांगास पातळ असू शकेल अथवा तंतुकाष्ठापर्यंत खोलवर जाईल. म्हणूनच कमी अधिक साल ( Cortex ), परिवर्तुळाचे तंतु Pericylic fibre ) तसेच कठिण द्वितीय तंतुकाष्ठाचे पदर (Secondary phloem ) व सर्वांशी मिसळलेले कॉर्कपदर, ही सर्व कवचामध्ये आढळतात. असले कवच ( Bark ) द्विदल धान्य वनस्पतींत आढळते. एकदल धान्यवनस्पतीमध्ये खरे कवच असत नाहीं. त्यांत वरील प्रकारचे संवर्धक पदर ( Phellogen ) वरचेवर उत्पन्न होऊन नवीन कॉर्क तयार होत नाही. त्यांचे खोड दरवर्षी रुंद होत नाही. रुंदीपेक्षा खोडाची वाढ लांबींतच अधिक असते.

 बाह्यत्वचेनंतर पानांत लोखंडी गजासारखी सरळ पेशीजाले आढळतात. त्यांत हरितवर्ण शरीरे पूर्ण भरलेली असतात. खालील भाग ती वाकडी तिकड़ी परस्पर गुंतून त्यास स्पंजासाखा आकार येतो. वरच्यापेक्षा खालील भागीं हरितवर्ण शरीरे कमी असतात. त्यामुळे तो भाग हिरवा गार नसतो.

 वाहिनीमय ग्रंथी रचना:-( Fibrovascular tissue System ). ही सर्वांपेक्षा अधिक संकीर्ण असते, ह्यांतहीं क्षुद्रवर्गात संकीर्ण स्वरूप फार कमी आढळते. उच्च वर्गात पेशींवर अधिक कार्य घडून त्या अधिक संकीर्ण होतात. गर्भातील पेशी प्रथम साध्या असून पुढे त्या हळु हळु भिन्न स्वरूपाच्या होत जातात. संवर्धक शक्ति प्रथम सर्व साध्या पेशींत सारखी असते. पण त्यावर अधिक कार्य घडल्यामुळे त्यांचे साधे स्वरूप

७२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
नाहीसे होऊन त्यास संकीर्ण स्वरूप येत जाते, व अशाच रीतीनें ग्रंथी उत्पन्न होतात. ग्रंथी म्हणजे संवर्धक पेशींपासून अन्यरूप पावलेला विशिष्ट प्रकारच्या पेशींचा पुंजका होय. ह्या पुंजक्यांत कांहीं काष्ट ( Xylem ) व तंतुकाष्ठ ( Phloem ) पदर असतात. ह्या दोन्ही पदरांमध्ये संवर्धक पदर ( Cambium ) असून त्या योगाने नवीन नवीन पेशी दोन्ही बाजूस उत्पन्न होतात. कांहीं ग्रंथांमध्ये संवर्धक पदर असत नाहीं. असल्या ग्रंथास जें एकदा कायम स्वरूप येते त्यांमध्यें अधिक फरक पडत नाहीं. एकदल धान्य वनस्पतींत ग्रंथीं वरील प्रकारच्या आढळतात. येथील ग्रंथीस कायम स्वरूप प्राप्त झाल्यावर अधिक काष्ठ अगर तंतुकाष्ठ उत्पन्न होत नाहीं. संवर्धक पदर, काष्ट व तंतुकाष्ठ उत्पन्न करण्यांत खर्चून नाहीसा होतो. द्विदल वनस्पतीच्या खोडांत हा पदर नेहमी आढळतो. मात्र ऋतुमानाप्रमाणे त्याची संवर्धक शक्ति अधिक तेजस्वी अगर मंद असते. त्यामुळे काष्ठावर मंद अथवा तेजशक्तीची द्योतक चिन्हें राहतात. त्यास काष्ठावरील वार्षिकवर्तुळे (Annual rings ) म्हणतात.

 प्रत्येक ग्रंथीमध्ये मुख्य दोन भाग असतात. १ काष्ठ ( Xylem ) व २ तंतुकाष्ठ ( Phloem ) ह्या दोन्हींमध्ये वर सांगितलेला संवर्धक पदर ( combium ) असतो. ग्रंथांसभोंवती पेशींचे म्यान असते. म्यानांतील पेशी जाड असतात. काष्ठ पदर आतील बाजूस असुन बाह्यांगास तंतुकाष्ठ पदर असतात.

 काष्ठ पदर विशेष करून लंबवर्धक पेशीचे बनलेले असतात. पेशींची कातडी लांकडी होऊन त्यांत टणकपणा अधिक येतो. वाहिन्या (Vessels ) व तंतू ( Wood--Fibre ) असे दोन वेगळे भाग काष्ठांत असतात. तंतूच्या पेशी अरुंद, दीर्घ व उघड्या तोंडाच्या असून त्यांत रसादि पदार्थ असत नाहीत, मध्यभागाकडे असणाऱ्या भेंडा (Pith ) जवळ प्रथमकाष्ठ (Protoxylem) असते. ह्यांत वाहिन्यांचा अधिक भरणा असतो. वाहिन्यांची उत्पत्ति पेशींवर पेशी येऊन मध्य पडदे नाहीसे झाल्यामुळे होते. तसेच ज्या प्रकारच्या पेशींपासून ज्या वाहिन्या तयार होतात, त्यांस तोच आकार येतो. फिरकीदार (Spiral ) वळेदार ( Annular ) वगैरे वाहिन्या येथेच असतात, लांकडी तंतुमय भागामध्ये वाहिन्या जणू बुडून गेलेल्या असतात.

८ वे ].     पेशीजाल. ( Tissue).     ७३
-----
मऊ (Soft ) व कठिण ( Hard ) असे दोन प्रकारचे पदर तंतुकाष्ठांत असतात. मऊ तंतुकाष्ठ संवर्धक पदराजवळ असून त्यापासूनच त्याची उत्पत्ति होत असते. येथील पेशी मूदु समपरिमाणी (Parenchymatous ) असतात. ह्यामध्ये पुढे चाळणीदार नळ्या (Sieve tubes ) उत्पन्न होत जातात. ग्रंथाच्या बाह्य बाजूकडे कठिण तंतुकाष्ठ असते. ह्याच्या पेशी लंब असून जाड कातडीच्या असतात. काष्ठाप्रमाणे फिरकीदार, वळेदार वगैरे वाहिन्या नसून फक्त मृदुभागांत चाळणीदार नळ्या असतात. पेशीवर पेशी रचून मध्य पडदे पूर्णपणे न गळतां छिद्रमय होऊन त्यास चाळणीदार आकार येतो.

 संवर्धक पदरांतील पेशी द्विधा होत गेल्याकारणाने पेशींची संख्या अधिक होऊन काष्ठ व तंतुकाष्ठ ही दोन्ही वाढतात. म्हणूनच द्विदलधान्य वनस्पति अधिक अधिक रुंद होत जाते. संवर्धक पदर एकदल वनस्पतींत नसल्यामुळे खोडाची रुंदी वाढत नाहीं.

 कधी कधी तंतुकाष्ठांचे पदर ग्रंथीमध्ये दोन्ही टोंकास असतात. म्हणजे प्रथम तंतुकाष्ठ, नंतर संवर्धक पदर व पुढे काष्ठ असून पुनः तंतुकाष्ठ असते, ग्रंथीत काष्ठांचे दोन्ही अंगास तंतुकाष्ठ असते. दोडके, भोपळा, कारली वगैरे जातीच्या वेलांत असली रचना असते.

 तसेच काष्ठ ( Xylem ) व तंतुकाष्ठ परस्पर एकमेकाच्या बाजूस न आढळतां कधी कधी काष्ठाभोंवतीं तंतुकाष्ठ अथवा उलट तंतुकाष्ठाभोंवती काष्ठ माढळते. जसेः-दर्शना, फर्न, दर्शनामध्ये ग्रंथाच्या मध्यभागीं तंतुकाष्ठ असून सभोंवतीं काष्ठाचे वेष्टण असते, व फर्नमध्ये सभोंवतीं तंतुकाष्ठ असून मध्यभागी काष्ठ असते.

 खरोखर ग्रंथी सालीच्या पेशीजालात बुडालेल्या असतात. एकदल वनस्पतींत ग्रंथी भेंडाळभागांत बुडून जातात. तसेंच द्विदलवनस्पतींत मध्यभागी भेंड असून बाह्यांगास साल असते. म्हणजे ग्रंथी ह्या दोहोंमध्धे आढळतात.

---------------