वनस्पतिविचार/स्कंध अगर खोड
मूळ व स्कंदः-बीजांतून वर उगवणारा कोंब हा प्रथम खोड होय. साधारण नियम असा आहे की, मुळ्या जमिनीत शिरून खोड हवेत वाढते. हा नियम सार्वत्रिक लागू पडतो असे नाही. मुळ्यांवर पाने कधी येत नाहीत, तसेच पानाप्रमाणे अथवा कोवळ्या खोडाप्रमाणे मुळ्यांत हरितवर्णपदार्थ Chlorophyll नसतो, सूर्यप्रकाश टाळून जमिनीत घुसणे हा मुळ्यांचा
साधारण धर्म आहे. मुळ्यांवर बुडाकडून अग्राकडे दुय्यम मुळ्या येतात. खोडावरील फांद्यांची जागा नक्की ठरविता येते. त्या जागेस कांडे अथवा सांधा म्हणतात. सांध्याखेरीज इतर जागेवर फांद्या कधीही येत नाहीत. दोन कांड्यांचे अंतर कमी-अधिक असते. विशेषेकरून तृणजातींमध्येही ही स्पष्ट दिसतात.
आवरणे:-खोडावर पानांचे पोटीं (Axil ) नेहमी एक कळा असते. ह्या कळीभोंवतीं आवरणे असून त्यांचा उपयोग शीतोष्णापासून कळीचे संरक्षणाकडे होतो. कळी वाढू लागली असतां हीं आवरणे आपोआप गळून जातात. तसेच खोडाचे वाढते अग्रही ह्याचप्रकारे आवरणांनी आच्छादित असते. आवरणे गळल्यावर आंतील पानांवर पाने असलेला वाढता कोंब दिसू लागतो. कोंब वाढू लागला म्हणजे पाने आपोआप खाली सुटून तो पुनः पूर्वीप्रमाणे आंतून उत्पन्न होणाऱ्या कोवळ्या पानांनी वेष्टिला जातो. शीतप्रदेशांत हिंवाळ्यामध्ये ह्या कळ्यांची वाढ बहुतेक थांबते. अशावेळी थंडीपासून त्यांचे संरक्षण होणे जरूर असल्यामुळे असली आवरणे नेहमी त्या कळ्यांवर येत असतात.
ही आवरणे जाड असून त्यांवर मेणासारखा चिकट पदार्थ जमतो. ह्या चिकट मेणामुळे थंडीचा परिणाम आंतील नाजुक भागांवर होऊ शकत नाहीं, नाहींतर थंडीमुळे तो वाढता कोंब केव्हांच करपून गेला असता. फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यांत पिंपळाचे अथवा वडाचे झाडाखालून गेले असतां शेकडों गळलेली आवरणे आढळतात. कारण तो काल वसंतऋतूचा असल्यामुळे कळ्या फुटून उमलू लागतात. शिवाय थंडीसुद्धा कमी होत असते. जेथे झाडाच्या कळ्यांचा अत्युष्ण अथवा अती शीत हवेशी सबंध येत नाही, तेथे आवरणाची जरूरी नसते. आवरणे येणे, न येणे, हे झाडांच्या परिस्थितीवर अवलंबून असते. जेथे ज्यांचा उपयोग तेथे त्या पदार्थांचे अस्तित्व, निरुपयोग तेथे त्याचा अभाव, असा सार्वत्रिक नियम आहे.
फांद्यांची उत्पत्तिः–बुंध्यावरील पानाचे पोटीं कळ्या वाढू लागल्या ह्मणजे पान गळून जाते, अथवा तसेच राहते. शिवाय सर्व कळ्या वाढल्याच पाहिजेत असा नियम नाहीं, कांहीं कळ्या वाढतात व कांहीं आपोआप गळून जातात, अथवा अन्य कारणांनीं कांहीं नाहीशा होतात. कळ्याफांदीची व्यवस्थाः —क्षुद्र वनस्पतीमध्ये व उच्च वनस्पतीमध्ये फांद्याची व्यवस्था निरनिराळ्या प्रकारची आढळते. क्षुद्र वनस्पतीमध्ये फांद्यांची व्यवस्था ' द्विपाद ' (Dichotomous) असते म्हणजे अग्रावरीळ कळी द्विधा होऊन त्यापासून सारख्या दोन फांद्या तयार होतात व प्रत्येक तयार झालेल्या फांदीपासून पुनः पूर्ववत् दोन फांद्या बनतात. कधी कधी तयार होणाऱ्या दोन फांद्या पैकी एकच वाढते व दुसरीची वाढ खुंटून जाते. त्याजागी फांदी असल्याबद्दल एखादी खूण मात्र राहते. फांदीच्या वाढीची दिशा उजवीकडून डावीकडे असते. एका ठिकाणी दोन्हीचे मिश्रण सहसा कधी होत नाहीं.
एकपादः-Monopodial उच्च वनस्पतींच्या फांद्यांची व्यवस्था ' एकपाद' Monopodial असते. ह्या व्यवस्थेचे मुख्य दोन पोटभेद आहेत. (१) अनियमित ( Racemose ) (२) नियमित. १ अनियमितः--येथे फांद्याची वाढ नेहमी बुंध्यावर सारखी होत असते. सर्वात लहान फांदी शेवटी अग्राकडे असून जुनी फांदी बुडाकडे असते. मुख्य खोड सर्व फांद्यांपेक्षा मोठा असतो. जसे सुरू, बकाणा, वेळू इत्यादि मुख्य वाढणारा कोब सारखा अग्राकडे वाढत राहून त्याचे नियमन होत नाही. म्हणूनच अशा व्यवस्थेस अनियमित व्यवस्था हे नांव पडले आहे. एकदलधान्य वनस्पतींत विशेषेकरून फांद्या मोठ्या वाढत नाहींत, पण त्यांमध्ये फांद्यांची व्यवस्था अनियमित असते. द्विदलधान्य-बनस्पतीमध्ये दोन्ही नियमित अथवा नियमित व्यवस्था आढळतात. ३ नियमित फांद्यांची व्यवस्था:-(Definite or Cymose) येथे खोडाच्या वाढत्या कोंबाची वाढ प्रथम खुंटते व बाजूकडे नवीन कळ्यापासून निराळ्या फांद्या तयार होतात. मुख्य खोडाची लांबी इतर फांद्यांपेक्षा कमी असते. नियमित व्यवस्थेमध्येसुद्धा दोन पोटभेद करितां येतात. विंचू नांवाच्या वनस्पतीस दोन
दुधी वगैरेमध्ये मुख्य अग्रावरील कळीची वाढ खुंटून त्यांचे जवळील पानांचे पोटी जी कळी असते, तीच मोठी होऊन जणू मुख्य खोड आहे किं काय, असे वाटू लागते. येथील खोड फांद्यावर फांद्या ठेवून बनला असतो. हे ओळखण्याची सोपी युक्ती म्हणजे त्या पानांत दुसरी कळी असल्याची खूण नसते. जेव्हा फांद्या सरळ वाढतात, त्या वेळेस ही व्यवस्था अनियमित वर्गापैकी असावी, असे वाटते. पण वास्तविक तशी स्थिति नसते. कारण पानाचे पोटी कळी नसते किंवा कळी असल्याची खूणही नसते. पानाचे पोटीं कळी असणे अवश्य आहे. येथे पानाचे पोटांत निराळी कळी नसून त्या कळीची फ़ांदी वाढली आहे अशी खात्री पटते. तसेंच वर वाढलेला भाग हा मुख्य खोड नसून ती फांदी वाढली आहे, हे सहज लक्ष्यांत येते.
हा प्रकार अनियमितापैकी आहे, असे जरी प्रथम वाटते, तथापि पानाचे पोटी कळीचे अभावामुळे तो अनियमित नसून नियमित आहे, असे निश्चित ठरते. अशा प्रकारास ‘एकमार्गी नियमित ' (Sympodial) असे नांव फांदीचे मांडणीमुळे योग्य दिसते.
कित्येक पानांचे पोटांत एक कळी अथवा भुगारा न निघतां दोन किंवा तीन भुगारे निघतात, व ते वाढून त्याच्या दोन किंवा तीन फांद्या तयार होतात. अशा वेळेस कळ्या जास्त झाल्या असतां पानांचे पोटाबाहेर ढकलल्या
आगंतुक कळ्याः –ह्या ठिकाणी अस्थानोद्भूत ( adventitious) कळ्यांचा निर्देश करणे जरूर आहे. कारण भुगारे किंवा कळ्या म्हणजे मुग्ध दशेत असणा-या फांद्या होत. म्हणूनच अस्थानद्भूतकळ्या ह्या अस्थानोद्भूत फांद्या आहेत.
शिसू वगैरे झाडांत मुळ्यावर कळ्या वाढून त्यांच्या फांद्या बनतात. शिसू झाड मुळापर्यंत कापून टाकिलें व केवळ मुळे जरी सोडली, तथापि मुळावर कळ्या वाढून ते झाड़ पूर्ववत वाढते. खरोखर मुळ्यांचा धर्म कळ्या उत्पन्न करणे हा नाहीं. ते काम खोडाने करावे असा साधारण नियम असून असलें अपवाद कधी कधी दृष्टीस पडतात.
ह्याच प्रकारे गुलाबवर्गाच्या झाडामध्ये मुळ्यापासून अस्थानोदूत कळ्या उत्पन्न होऊन त्यांच्या फांद्या बनतात. कळ्यांची उत्पात मुळ्याप्रमाणे आंत खोल होऊन, मुळ्यांचे अंग फोडून त्या बाहेर येतात.
तसेंच झाडावरील फांद्या, डहाळ्या व पाने कापून केवळ झाडाचा उभा सोंट ठेविला असतां एखादे वेळेस सोंटावर नवीन कळ्या उत्पन्न होतात. ह्या कळ्यांसही अस्थानोद्भूत म्हणण्यास हरकत नाहीं.
बलाबलताः–वनस्पतींच्या बलाबलतेप्रमाणे त्यांची खोडे लहान मोठी होतात. कांहींचे खोड मजबूत असून सरळ उभे राहतात. जसे कापूस, मोठी झाडे, तूर इत्यादि. कांहींचे खोड मजबूत व टणक नसल्यामुळे जमीनीवर पसरतात. जसें रताळी, खरबूज वगैरे. कित्येक निर्बल वनस्पति दुसऱ्या झांडांचा अथवा भिंतीचा आश्रय घेऊन वर चढतात. कांहीं ठिकाणी वर चढण्याकरिता तंतूसारखे धागे असतात, पण कांहीं खोड स्वतः आश्रयाभोंवतीं विळखेकरून वर जातात. तंतूमय धागे अशा ठिकाणी येत नाहीत.
आंबा, फणस, पिंपळ वगैरेमध्ये खोड मजबूत असून दरवर्षी थोडा थोडा मोठा होत असतो. शिवाय ही झाडे पुष्कळ वर्षे टिकून प्रतिवर्षी योग्य ऋतूत त्यास फुले व फळे येतात. अशा मोठ्या झाडास ‘वृक्ष' (tree) ही संज्ञा योग्य आहे. साखरलिंबु, करवंदी, तोरणी, कांटेऱ्या बोरी, वगैरेचे खोड इतके मोठे
नसून ते जमीनीतून वर येतांना जणू दोन चार झाले आहेत असे वाटतात. ही झाडे सुद्धा बरीच वर्षे टिकतात, पण वृक्षा इतकी जुनी राहत नाहींत. अशा ' झुडे' (shrub) म्हणणे बरे दिसते. ह्यापेक्षा लहान झाडास झुडुप (bush) म्हणावे. जसे तुळशी, धोत्रे, कापूस वगैरे.
वरील तिन्ही प्रकारच्या खोडांपेक्षा टणकपणा कमी असून, लवचीक जास्त असणारे खोड जाई, द्राक्षे, वगैरेमध्ये आढळते. हे खोड अधीक हिरवट असते. पालक, शाकभाज्या, हरभरे, मूग, इत्यादिकांची खोडे ह्याच वर्गात पडतात. असल्या वनस्पतीस रोपड़ीं' (herb) हे नांव साजेलसे वाटते, कांहीं रोपडी पांच सहा वर्षे टिकून प्रतिवर्षी त्यास फुले येतात, पण कांहीं जास्त दिवस न टिकतां एका ऋतूंमध्ये त्यांची उत्पत्ती, पोषण व मरण, ही तिन्ही संपतात. म्हणजे बीजापासून वनस्पति उगवून वाढू लागतात, पुढे त्यास फुलें व फळे येऊन वाळतात, आणि एका ऋतूंत त्यांचा जीवनक्रम सर्व आटोपतो. म्हणून त्यास वर्षायु (annual) ह्मणतात.
कांदे, लसूण, मुळे, गाजर, चुकंदर वगैरेमध्ये खोड द्विवर्षायु (biennial) असते. म्हणजे ते दोन ऋतू अगर दोन वर्षे टिकते. पहिले वर्षी फुले अथवा फळे त्यावर न येतां मुळ्या, व पाने चांगली पुष्ट होतात. ऋतूचे अखेरीस पाने व हवेमध्ये वाढणारा कोंब वाळून जातात. दुसरे ऋतूंमध्ये पुनः नवीन कोंब वाढून पाने वगैरे येऊ लागतात. शेवटीं फुले व फळे तयार होतात. फुले व फळे येण्यास दोन ऋतू लागतात, म्हणून असल्या वनस्पतींस द्विवर्षायु ( biennial ) म्हणण्याची चाल आहे. काही वेळां द्विवर्षायू म्हणून मोडिल्या जाणाऱ्या वनस्पति एकाच ऋतूंत आपला जीवनक्रम संपवितात. अशा वेळी त्या द्विवर्षायु न राहतां वार्षिक होतात. विशेषे करून उष्णप्रदेशांत द्विवर्षायु वनस्पति कमी असतात; अथवा द्विवर्षायु बहुधां वार्षिक होतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे.
दोन ऋतूंपेक्षा जास्त दिवस टिकणान्या वनस्पतीस ' बहुवर्षायु ' (perennial ) म्हणतात. कारण दरवर्षी त्यास फुले व फळे येतात. वर्षायु अथवा द्विवर्षायु वनस्पतींस एकदां फुले व फळे आली असता ती नेहमी वाळून जातात. म्हणजे फुले व फळे येणे हे त्यांच्या मृत्यूचे लक्षण आहे. पण
वेळू, चिवे वगैरे वनस्पति द्विवर्षायु व बहुवर्षायु प्रकारांचे मध्य प्रकारामध्ये पडतात. फुले व फळे वेळूस एकदांच येतात व ती आली म्हणजे वेळू सुकू लागतो. हे लक्षण वर्षायु अगर द्विवर्षायुमध्ये आढळते. पण कित्येक ऋतूपर्यंत त्यास फुलें अथवा फळे येत नाहीत. पुष्कळ वर्षे टिकणे हे लक्षण बहुवर्षायूचे आहे. तेव्हां त्यास केवळ द्विवर्षायु अथवा बहुवर्षायु म्हणता येणार नाहीं.
वरील वृक्ष, झुडे, झुडपे, ही सर्व बहुवर्षायु आहेत. फक्त रोपड्यांचा प्रश्न मात्र राहतो. कारण त्यांचे खोड पुष्कळ ऋतु टिकण्याजोगे नसते. रोपड्यांपैकी सुद्धा कांहीं बहुवर्षायु असतात. जसे-जाई, द्राक्षे, मोगरा, जुई इत्यादि. बाकीची बहुधा वर्षायु असतात. द्विवर्षायु फार थोडी आहेत. कारण त्यांमध्ये विशिष्ट प्रकारची मांसल मुळे असावी लागतात, बाजरी, मका, गहू, हरभरे, जव, मेथी, वगैरे सर्व वर्षायु आहेत. ती आपली सर्व कामें एक ऋतूत संपवितात.
धांवती फांदीः–स्ट्राबेरी अगर ब्रह्मी वगैरेमध्ये खोड दोन प्रकारचे असते. पहिल्याप्रकारचे खोड एके जागी उभे असून जमिनींत त्याची मुळे सुटली असतात. ह्या खोडाची एक फांदी जास्त वाढून जमीनीवर पसरत जाते व तीजपासून पुनः दुसरे जागी मुळ्या फुटून तिचा एक रोपा तयार होतो. असल्या फांदीस धांवती फांदी Runner म्हणतात. स्ट्राबेरीचा रोपा प्रथम एक जरी असला, तरी अशारीतीने धावत्या फांदीपासून पुष्कळ रोपे तयार होतात. धांवत्या फांदीपाशीं मुख्य रोप्याचा संबंध तोडून टाकिला असता हीं तयार झालेली रोपें स्वतंत्रपणे आपला जीवनक्रम चालवू शकतात.
कित्येक वनस्पतीचे खोड प्रथम जमिनीबाहेर हवेत वाढून त्यास लांब फांद्या येतात. ह्या फांद्या हवेत सरळ राहण्याची ताकत नसल्यामुळे जमिनीकडे वाकून जमिनीशी चिकटतात व चिकटलेल्या जागी मुळ्या सुटतात. मुळ्या जमिनीत रुजल्या असत त्यापासून इतर रोपे तयार करता येतात. जसे गुजबेरी, जाई, वगैरे.
जाईमध्ये नैसर्गिक दाबाचे कलम बनते. फांदी वांकविण्याची जरूरी नसून तो आपोआप जमिनीवर टेकून तेथून मुळ्या फुटतात. लिंबू वगेरे वनस्पति मध्ये कृत्रिम कलमें करावी लागतात. हाच काय तो दोहोंतील फरक.
घायपतीचा बुंधा थोडासा जमिनींत आडवा वाढून नंतर बाहेर हवेत उभा वाढू लागतो. पाने जमिनीवर वाढून त्यांचा गुच्छ बनतो. अशा प्रकारच्या फांद्या जमिनीवर पसरणाऱ्या तृणजातींतही आढळतात. जाईमध्ये खोड प्रथम जमिनीवर वाढून नंतर जमिनींत शिरते पण घायपतीमध्ये ते जमिनीत वाढून नंतर हवेमध्ये वाढते.
मूळ कोष्ठ Root stock:-कांस, मुंज, नागरमोथी, हळद, आले, वगैरेमध्ये खोडे जमिनीत वाढून त्यांच्या फांद्या बाहेर हवेत येतात. हे खोड जमिनीत असल्यामुळे, त्यास मुळ्या समजण्याचा संभव आहे, पण त्या मुळया नसून खरोखर खोडे आहेत. त्याजपासून फांद्या जमिनीबाहेर वाढतात; शिवाय खाली जमिनीत निराळ्या मुळ्या सुटलेल्या असतात. कधी कधी त्यांचा वाढता कोंब जमिनींत आडवा पसरत जातो. संरक्षक पापुद्रे किंवा आवरणे कोंबावर येतात. पृष्ठभागावर पुष्कळ जागी फांद्या असल्याविषयी सूचक चिन्हें अगर खुणा आढळतात. असल्या खोडामध्यें पौष्टिक अन्न सांठविले असून ते त्यास योग्यवेळी उपयोगी पडते. असल्या खोडास मूळकोष्ठ( Root stock, or Rhizome) हे नांव मूळाशी असलेल्या सादृश्यामुळे पडले आहे. तरवार, फर्न, सालोमनसील वगैरे वनस्पतींची खोडे ह्या वर्गामध्ये पडतात. फांद्या,
ग्रंथीकोष्ठः-(Tuber) बटाटे, गोराडू, हातिचक्र इत्यादिकांचे खोड दोन प्रकारचे असून एक जमिनीत व दुसरे हवेमध्ये वाढते. बटाट्याचा रोपा मुळ्यांसहित उपटून पाहिला असता असे आढळेल की, जमिनीबाहेर हिरवट रंगाचे खोड असून आंत गांठीसारखे भाग पांढऱ्या फांद्यांच्या अग्राजवळ वाढले असतात, प्रथम जमिनीमध्यें पांढरी फांदी थोडी वाढून तिची अग्रे सुजू लागतात व वाढता वाढतां त्यांचे वाटोळे गोळे बनतात, व हेच वाटोळे गोळे बटाटे होत. बटाट्यावर खोलगटजागेत मुग्ध कळ्या अगर डोळे असून हे डोळे, बटाटे पेरिले असतां उगवतात. बटाट्याची रोपे बी पेरून तयार न करितां हे बटाटे पेरून नेहमीं पाक काढण्याची वहिवाट आहे. बटाट्याच्या फांद्या स्वतंत्ररीतीनें अन्न मिळवेपर्यंत त्यांतील सांठविलेल्या अन्नावरच त्यास रहावे लागते. मुळे निराळी असलेली दृष्टीस पडतात. साधारण लोकांचा समज असा आहे की, बटाटे जमिनीत वाढणाऱ्या मोठ्या मुळ्या आहेत, पण त्यावर असणाऱ्या डोळ्यांचा विचार केला असता हा समज चुकीचा ठरतो. गोराडू हातिचक्र वगेरे उदाहरणे ह्याच प्रकारची आहेत. अशा प्रकारच्या जमिनीतील गोळ्यासारख्या खोडास ' ग्रंथीकोष्ठ, (Tuber) असे म्हणतात.
सकंदकोष्ठः-(Corm) सुरण, आळवाचे गड्डे, घुंया किंवा बंदा वगैरेमध्ये खोड वरीलप्रमाणे जमिनीत वाढून चांगले पोसते, तसेच हवेमध्ये वाढणारी निराळी, हिरवी फांदी असून, त्यावर पाने येतात. जमिनीत खोडावर प्रत्येकीं तीन किंवा चार उभे डोके वाढून, त्यावर संरक्षक आवरणेही येतात. बटाट्याप्रमाणे येथेही अन्नाचा सांठा केलेला असून भाजीमध्ये ह्यांचा उपयोग होतो. खालील बाजूकडे मुळ्या असतात. अशा प्रकारच्या खोडास ‘सकंदकोष्ठ । (Corm) म्हणतात. कोकस, ग्लॅडिओलस वगैरे उदाहरणे ह्या सदराखाली येतात.
कंदः-(Bulb) कांदे, लसूण, केळी, चवेळी वगैरेमध्यें बुधा कोठे आहे, हें प्रथम समजत नाही. तो मध्यभागी असून त्यावर पानांची आवरणे गुंडाळलेली असतात. आवरणे व पाने सोडवून टाकली असता आतील बुंधा दृष्टीस पडतो,
येथे एक विशेष गोष्ट लक्षात ठेवावी की, सकंदकोष्ठ (Corm) अगर कंद ( Bulb ) ही केवळ एकदलधान्य वनस्पतिमध्ये आढळतात. द्विदलधान्य वनस्पतिमध्ये असली खोडें विरळा असतात.
कंदकः--(Bulbil) घायपातीचा एक मुख्य सोंट वाढून त्यावर फुलें येतात. ती फुले पक्व होऊन गळून जातात. फुलांच्या देंटावर निराळ्या कळ्या उत्पन्न होऊन त्यांची लहान रोपटी झाडावरच तयार होतात ही रोपटी खाली पडली असता त्यापासून मुळ्या जमीनीत शिरून स्वतंत्र घायपातीची झाडे तयार होतात. शेताच्या कुंपणाभोंवती घायपात लावण्याकरितां हीं तयार असलेली रोपटी लावावीत. ह्याची झाडे, बीजे पेरून उत्पन्न होण्यास वेळ लागतो. शिवाय बीजे फारसी तयार होत नाही म्हणूनच सृष्टिदेवतेने आयती रोपटी झाडावर तयार केली असतात. ह्या रोपट्यास 'कंदक' (Bulbil) हे नांव कंद सादृश्यामुळे दिले आहे. विशेषेकरून हीं कंदकें एकदलधान्यवनस्पतिमध्ये असतात.
पर्णकोष्ठ-( Phylloclade ) वास्तविक बुंधा अगर फांदी असून त्यांचे स्वरूप बदलल्यामुळे ते दुसरे प्रकार आहेत, असे वाटण्याचा संभव असतो. जसे, निवडुंगाची हिरवीं मोठी पाने. हीं जाडपाने खरोखर पानें नाहींत तर ती शास्त्रीयदृष्ट्या पानासारख्या फांद्या आहेत त्यावर कोंवळ्या स्थितीत येणारी लहान पाने तसेच कांटे व लाल तांबडी बोंडे, ह्यावरून खात्री पटते कीं; ती पाने नसून त्या फांद्या आहेत. केवळ पानांवर अशा प्रकारची फळे वगैरे कधी येत नाहींत. ही गोष्ट खरी की, पानाप्रमाणे ह्या जाड भागांमध्ये हिरवा रंग, पूर्ण वाढतो व त्यामुळेच ती पाने आहेत असे वाटते. सृष्टिदेवतेने त्या जाडभागांत हरिद्वर्ण पदार्थ (Chlorophyll) उत्पन्न करून पानाची सोय केली असते. वास्तविक नेहमी पानांत हरिद्वर्ण पदार्थ असतो. पण येथे पाते लवकर गळून गेल्यामुळे ही तजवीज करणे भाग पडते, जर हरिद्वर्ण पदार्थ त्या भागांत उत्पन्न केला नसता तर हवेतून कार्बन आम्ल शोषून घेण्यास पंचाईत पडली असती. कार्बन आम्लवायू शोषण्यास ह्या हरिद्वर्ण पदार्थाची अवश्य जरूरी
रसकस-( Ruscus ) नांवाची ह्या प्रकारचीच एक वनस्पती आहे. येथे साधारण लोकांस जी पाने वाटतात ती खरीं नसुन पानासारख्या फांद्या आहेत. ह्या पानाच्या मध्यशिरेवर मध्यभागी एक कळी येते. ही कळी पुढे वाढून त्यावर फुले येतात. ह्या कळीमुळे ती खरी पानें नाहींत ह्याची साक्ष पटते. शिवाय खरी पाने पापुद्र्यासारखी अपूर्ण स्थितीत वरील हिरव्या भागाचे बुडी येतात. अॅस्परेंगसमध्ये अशा प्रकारची पाने आढळतात. असल्या पानाप्रमाणे दिसणाऱ्या फांदीस ‘पर्णकोष्ठ' (Phylloclade) म्हणतात.
कंटककोष्ठ (Thorn ) लिंबू, बेल, ग्लेडिटसचिया वगैरेमध्ये पानाचे पोटी कळीचे जागी एक जाड कांटा वाढतो. हा कांटा ज्या अर्थी कळीचे जागी आला असतो, त्या अर्थी तो कळी अथवा अन्य स्वरूप प्राप्त झालेला मुगारा असला पाहिजे. कधी कधी कांटा जास्त वाढून दुसरे लहान कांटे अगर लहान लहान पाने त्यावर येतात. एवढेच नव्हे तर फुले व फळेही त्यावर येतात. तेव्हा हे कांटे म्हणजे एक प्रकारच्या फांद्या होत. अशा खोडांस अगर फांद्यास ' कंटककोष्ठ' ( Thorn ) म्हणतात.
कंटककोष्ठ (Thorn), कंटकपर्ण (Spine) व त्वककंटक (Prickle) ह्मा तिन्हीमध्ये पुष्कळ फरक आहे. कंटककोष्ठ हे खोड अथवा फांदी आहे. कंटकपर्ण हे एकप्रकारचे कांटेरी पान असते. तसेच त्वककंटक हे बाह्य त्वचेपासून ( Epidermis) कठीण, अणकुचिदार झालेले भाग आहेत. जसे गुलाबावरील कांटे इत्यादि. हे कांटे झाडून टाकले असतां गळून जातात, त्यांचा उगम खोल नसून बाह्य असतो.
सूत्रकोष्ठ-(Tendril) कृष्णकमळावरील पानाचे पोटी सूत्रे अगर धागे येऊन ते त्यास वर चढण्यास उपयोगी पडतात. कळीचे जागी असले धागे असल्यामुळे त्यास फांद्या समजणे योग्य आहे. भोंपळे, द्राक्षे वगैरे झाडामध्ये असले धागे येतात. ह्या धाग्यास ‘सुत्रकोष्ठ' (Tendril ) म्हणतात.
पाणवनस्पतीः-पाण्यांत वाढणा-या वनस्पतींचे खोड टणक अगर कठीण नसते. बुंध्यात काष्ठ (Wood ) अथवा काष्ठतंतू (Wood fibres) फारसे वाढत नाहींत. बुंध्यामध्ये वायूयुक्त नळ्या ( Air canals ) पुष्कळ असल्या कारणाने वनस्पतींचें शरीर हलकें व पाण्यावर तरण्याजोगे होते. कमळाचा बुंधा चिखलात रुतून तेथेच त्याच्या मुळ्या सुटतात. बुंध्यापासून लांब दांडी निघून पाने पाण्याचे वरचे भागावर पसरतात. व्हलिसिनेरिया वनस्पतींत बुंधा चिखलांत वाढून पाने पाण्यामधून उभी सरळ वाढतात. कित्येक वनस्पतींत खोड पाण्याचे पृष्ठभागांवर तरंगत राहते, व पाणी वाहते असले तर त्याबरोबर तें वाहत राहते. जसे, शैवाल तंतू ( Spirogyra).
शिंगाडा, पाणवनस्पती आहे. ह्याची लागवड उत्तर हिंदुस्थानांत पुष्कळ ठिकाणी पाणथळ जागेत, अगर तलावांत करितात मुंबई, ठाणे वगैरे ठिकाणच्या पुष्कळ लोकांनी ह्याचे खोड चिखलांत कसे रुजते, जागजागी मुळ्या कशा सुटतात, फुले कशी येतात, वगैरे पाहिलेच असेल.
जमिनीवर पसरत जाणारी व पाण्यांत सरळ वाढणारी खोडे, ही दोन्हीं सारखी आहेत,असे म्हटल्यास हरकत नाहीं, जमिनीवर पसरलेल्या फांदीवर जागजागी कांड्यांतून मुळे सुटतात व वरील बाजूस पाने येतात, त्याचप्रमाणे पाण्यातील वाढत्या फांदीवर कांड्यांपासून मुळ्या सुटतात, व वरील बाजूस पानें यतात. फक्त दोन्हीमधील फरक म्हणजे एकाचे वाढण्याचे स्थान पाणी व दुसऱ्याचे स्थान जमीन. पाणी आटू लागले असतां पाणवनस्पती बुडाकडे चिखलावर पसरत जातात, व पुढे पाणी नाहीसे झाले म्हणजे त्या पाण्यांतील वनस्पती व जमिनीवर पसरणाऱ्या वनस्पती ह्या दोहोंत अंतर दिसत नाही.