वाग्वैजयंती/नदीस पूर आलेला पाहून
<poem> (मुठा नदीस एकदा फार पूर येऊन श्रीओंकारेश्वराचे मंदिरात पाणी शिरले होते.)
(चाल : नृपममता रामावरती) विरहोत्सुक सागर झाला। प्रियसखीस भेटायाला ॥ मज गमे ॥ निजमित्र मेघ पाठविला । गिरिराज श्वशुर-सदनाला ॥ मज गमे ॥ सरिता ही सागरजाया । त्यासवे निघाली जाया॥ मज गमे ॥ आकांत । करित अत्यंत। ठेवितां तात। तिजसी उतरोनी। भूवरती तटकटिवरुनि ॥ मज गमे ॥ 1॥
तो प्रसंग जणु बघवेना । म्हणुनी रवि झांकी नयनां॥ मज गमे ॥ घन गाळिती अश्रूधारा। दुःखें नच वाहे वारा॥ मज गमे ॥ शिवमंदिरि भगिनी गिरीजा। भेटे तिस सागरभाजा॥ मज गमे ॥ यापरी। सिंधुमंदिरी। जात सुंदरी। पुर्ण जलसरिता । शिवगिरिजा दर्शनमुदिता ॥ मज गमे ॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |