वाटचाल/गांजवे मास्तर
गांजवे मास्तर
माझे शैक्षणिक जीवन हैद्राबाद येथे गेले. त्यामुळे गांजवे मास्तरांचे वैभवशाली राजकीय जीवन मी प्रत्यक्ष पाहिलेले नाही. मी सन १९५५ च्या जुलै महिन्यात शिक्षक म्हणून नांदेडला आलो त्या वेळी संयुक्त- महाराष्ट्राचा लढा धुमसत होता. त्यामुळे अनेक ग्रहपूर्व- ग्रह घेऊनच मी नांदेडला आलो होतो. आजच्यापेक्षा माझा स्वभावाचा तेढा- काटेरीपणा त्या वेळी अधिक होता. मात्र मी याहीपूर्वी दुरून गांजवे मास्तर यांना पाहिले होते. ऐन पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्वत्र धामधूम चालू होती. त्या वेळी 'मराठवाडा' ऑफिसमध्ये बसून आम्ही निवडणुकांच्या निकालाचे अंदाज बांधीत होतो; तेव्हा श्री. अनंत भालेराव सहज म्हणाले,
"नांदेडहून श्री. गांजवे नक्कीच निवडून येणार." अनंतरावांचे हे उत्स्फूर्त आत्मविश्वासी उद्गार हे माझ्या अंदाजाच्या विरोधी होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत जुना रजाकार गट सर्वत्र कांग्रेसविरोधी जाणार हे निश्चित होते व नांदेड शहर हे कामगार चळवळीचे फार मोठे केंद्रच होते. इतरही अनेक कारणे होती म्हणून ही जागा विरोधी पक्षाला मिळेल, असे मला वाटे. अनंतराव म्हणाले, "तुला अजून गांजवे हे काय प्रकरण आहे हेच मुळी कळलेले नाही. ते हमखास निवडून येणार." यामुळे हा माणूस कोण, कसा आहे याकरिता काँग्रेस ऑफिसवर एक चक्कर टाकून मी पाहून आलो होतो. त्या वेळच्या त्यांच्या दर्शनाने मी फारसा प्रभावित झालो नाही. पाहताक्षणीच दीपविणारे त्यांच्यात काही नाही. जे आहे ते नकळत मनात झिरपणारे व माणसाला कायमचे जिंकून टाकणारे आहे.
गांजवे मास्तरांना नंतर मी जेव्हा पुन्हा पाहिले त्या वेळी आम्ही गाडीत होतो व परभणी साहित्य संमेलनासाठी चाललो होतो. मी लहान होतो. चड्डी घातलेला एक स्वयंसेवक. मी उभाच होतो. अनंतराव, गांजवे यांचे जोरजोराने हसणे व बोलणे मी पाहत होतो. माणूस बराच दिलखुलास दिसतो असा एक अंदाज मला आला. पुढे प्रतिभा निकेतन प्रशालेमध्ये मी नोकरीच्या मुलाखतीस आलो असताना माझी व त्यांची तिसरी भेट झाली. नांदेडला पुढे मला आश्चर्याचे अनेक धक्के बसणार होते. मला खुर्ची देऊन स्वतः उभेच राहणारे हेडमास्तर व अजून शिष्टाचार न कळलेला मी ! तसेच सडकेवरील फूटपाथवर बसून तासन् तास चर्चा करणारे प्राचार्य ! राजीनामा तर देऊन पाहा, घरासमोर सत्याग्रह करतो अशी धमकी देणारे सेक्रेटरी. अशी अनेक आश्चर्ये या नांदेड शहरात मला पुढे भेटणार होती. या आश्चर्याचा प्रारंभ गांजवे मास्तरांपासून झाला. मी गरजू मॅट्रिक्युलेट म्हणून नोकरीसाठी आलो होतो. पण भाषा अजून तितकीच ताठर होती. सकाळी १० वाजता मी इंटरव्हयूला हजर झालो. मुख्याध्यापक म्हणाले, आमची शाळा सकाळी साडेसात वाजता (७|| लाच) सुरू होते. आता इंटरव्यूची वेळ संपलेली आहे. मी एकदम भडकलो. श्री. गांजवे त्या वेळी विधानसभेमध्ये मुख्य प्रतोद व आमदार होते. भडकलेले माझे बोलणे त्यांनी शांतपणे ऐकले व सौम्य हसून ते म्हणाले, " हं चला, इंटरव्हयू घेऊ" आणि जातानाच त्यांनी मला सांगितले की हे सगळे नाममात्र आहे. तुम्हाला घ्यावयाचे अधीच ठरले आहे. मला मात्र हा सर्व प्रकार फारच अनपेक्षित होता. मी त्यामुळे एकदम अस्वस्थच झालो.
सगळेच नांदेड हे असे आहे ! एखाद्यावर भाळले की भाळलेच. त्याला सारे जण सांभाळू लागतात. सांभाळून घेतात ! ज्यांनी संपूर्ण एक तप मला सांभाळण्याचे काम सतत केले आहे, त्यांपैकी गांजवे मास्तर हे एक आहेत. हे काम सोपे होते असे अजूनही वाटत नाही. गांजवे मास्तरांना व शामराव बोधनकरांना त्यासाठी फार मोठया मनस्तापातून अनेकदा जावे लागले आहे. तरीही पण गेली बारा वर्षे आता अनेक ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत. अधूनमधून लहानसहान कुरबुरी व मतभेद होतातच. ते तीव्र भाषेतही व्यक्त होतात. पण आमचे कधीही मांडण झालेले नाही की गांजवे मास्तरांचे प्रेमही कमी झालेले नाही सतत तीच प्रशांत, सौम्य समजूतदार प्रकृती ! व्यक्तीपुरता विचार न करता संस्थेचे हित-कल्याण सदा चिंतणारी तीच रीत. सार्वजनिक कार्यात व्यवहाराचा तोच नि:स्वार्थ चोखपणा. मनमोकळे हास्य. यात बदल कुठेच नाही. अगदी अलीकडे मात्र नाही म्हणायला एक बदल झाला आहे. ब्लडप्रेशरमुळे त्यांना फारसा ताण आता सहन होत नाही. चेहरा त्रासिक दिसू लागतो. पण अजून त्याचा परिणाम सत्यनिष्ठेवर झालेला नाही.
गांजवे मास्तरांचा पिंड राजकारणी नाही. मुत्सद्देगिरी, डावपेच, बोटचेपेपणा हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांचे सौजन्य व मृदुता याला दुबळेपणा समजण्याची चूक अनेकांनी अनेकदा केलेली आहे. तत्त्वाचा प्रश्न आला म्हणजे गांजवे मास्तर किती कठोर होऊ शकतात याचा मला अनेकदा अनुभव आलेला आहे. किंवा आता मास्तर कोणत्या मुद्दयावर कठोर राहू शकतील याचा अंदाजही आलेला आहे, असे म्हणण्यासही हरकत नाही. स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील अनेक असह्य यातना आणि सार्वजनिक जीवनातील अनेक अपेक्षाभंग त्यांनी पचविलेले आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक उगवते कार्यकर्ते अधःपतित होताना, अनेक सहकारी क्षुद्र बाबतीत गुरफटताना व अनेक श्रद्धास्थाने कोसळताना त्यांनी पाहिलेली आहेत. तरीही त्यांना अजून कडवटपणा आलेला नाही. माणसाचा मूलभूत असा जो चांगुलपणा त्यावरील त्यांची श्रद्धा ढासळलेली नाही. ही श्रद्धा कुठून आली असावी, तिचा उगम मात्र काही केल्या कळत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील कार्यकर्ते सर्वत्र कमाल व्यक्तिनिष्ठ आढळतात. त्यांचे एक हळवे श्रद्धास्थान असते. नुसती आठवण निघाली की ते गहिवरून जातात.
गांजवे मास्तरांना कुणाच्याच आठवणींनी असं कधी अगदी गहिवरून जाताना मी पाहिलेले नाही. जणू व्यक्तींच्या उणिवा नेहमीच त्यांनी जाणलेल्या होत्या. प्रत्यक्ष महात्मा गांधींची आठवणही त्यांनी कोरडेपणानेच सांगितली. मी एकदा सहज म्हणालो, गांधीजींचे हास्य सात्त्विक व दैवी होते असे म्हणतात. त्यावर गांजवे मास्तर म्हणाले, " म्हातारा वस्ताद आणि पक्का होता. थोडा तामसी आणि चोख दिसला. भाबडेपणा आणि हळवेपणा त्यांच्या स्वभावात नाही. जसा भडक भावनाविष्कार नाही तसा कधी पश्चात्तापही नाही. जणू सगळे उघड्या डोळ्यांनी कसे तोलन मापून घेतलेले. विनयाचासुद्धा गैरवाजवी आविष्कार नाही."
राजकारण हा ज्यांचा पिंड असतो ती माणसे ऐन क्रांतीच्या क्षणी कुठेतरी हरवून गेलेली दिसतात. कारण मुत्सद्दी मन परिस्थितीचा फायदा कसा घ्यावा याचा विचार करण्यातच गढलेले असते. निश्चयाने परिस्थिती बदलून टाकण्याची जिद्द तिथे नसते. क्रांतिपूर्वकाळात असलेल्या भ्रष्ट राजवटीशी जुळते कसे घेता येईल या विवंचनेत असणारी मंडळी क्रांतीनंतर नव्या बदलत्या परिस्थितीशी सोयीस्करपणे जुळवून घेण्याचा उद्योगच करीत असतात. जीवनातील मूलभूत श्रद्धांवर तडजोड करण्यासाठी आतुर झालेली मने नेहमीच सत्तेच्या बाजूने उभी असतात. त्यांचे फारसे नुकसान कधीच होत नसते. तडजोड न करणाऱ्यांचीच मात्र ट्रेजेडी होते. तेथे तडजोड करणाऱ्यांना व्यावहारिक यश जास्त मिळते. ते गांजवे मास्तरांसारख्यांना मिळत नाही. याविषयी खरे म्हणजे तक्रार करण्यातच अर्थ नाही. कारण हा साधा पण कठोर निसर्गनियमच आहे.
गांजवे मास्तरांचा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबात झाला. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील कडती या गावचे. काय चमत्कार पाहा ! शेवटी याही माणसाचा जिल्हा परभणीच असावा ? तेथून अगदी लहानपणीच गांजवे मास्तर पुसदला म्हणजे वऱ्हाडात बहिणीकडे शिक्षणासाठी गेले. वयाच्या पंधराव्या वर्षापूर्वीच वडिलांचे व बहिणीचे छत्र संपले व मास्तर एकाकी झाले. कठोर प्रतिकूल परिस्थितीचा खडक फोडीतच ज्यांना वाढावे लागते- लहानाचे मोठे व्हावे लागते, त्यांना स्वप्नाळू राहणे केव्हाही परवडणारे नसते. उच्च ध्येयवादाचा जप अशा मंडळींच्या तोंडी नसतो. वास्तववाद हाच त्यांचा एकमेव साथीदार असतो. या माणसांना तसे खरोखरीचे बाल्यही नसते. त्यांना अकालीच प्रौढ व समजूतदार व्हावे लागत असते. कारण लाड करणारे मुळी कुणी नसतातच. तेथून ते अकिंचन अवस्थेतच १९२४ च्या सुमारास नांदेडला आले. गोदावरीच्या या नाभीस्थानी त्यांचे पुढचे सारे जीवन गेले. परभणीशी अगर यवतमाळशी त्यांचा पुन्हा घनिष्ठ संबंध कधीच आला नाही. त्यांच्या विद्यार्थिदशेतल्या आठवणी त्यांचे गुरू मांजरमकर यांनी दिलेल्या आहेत. त्यांतील एक छातीवर दगड फोडण्याच्या प्रसिद्ध प्रयोगाची आठवण आहे. २४० पौंड वजनाचा दगड छातीवर ठेवावयाचा व घण मारून फोडायचा असा हा प्रयोग होता. या प्रयोगामुळेच गांजवे यांच्याकडे मांजरमकराने लक्ष वेधले गेले. पुढच्या काही दिवसांत आपल्या सेवाशील व ऋजू स्वभावामुळे त्यांनी श्री. रामराव मांजरमकरांना इतके मुग्ध केले की ते त्यांच्याच घरी राहू लागले. उणीपुरी सात वर्षे ते या घरीच होते. अनिकेतला सगळीच घरे स्वतःची मानणे क्रमप्राप्तच होते.
यानंतर कै. डॉ. कुर्तकोटी (शंकराचार्य) यांच्या शुभहस्ते एक पाठशाळा नांदेडला स्थापन झाली. या पाठशाळेचे सन १९२८ ला ते मुख्याध्यापक झाले. उर्दू या उलट्या लिपीशी तेव्हाही त्यांची सोयरीक जुळू शकली नाही. मधून मधून शिक्षणाचा निरोप घ्यावा लागला. पण शाळेबाहेर त्यांचा वाचनाचा छंद चालू राहिला. ही वाचनाची हौस अजूनही संपलेली नाही. तसे मास्तर बहुश्रुत आहेत. व्याख्याने ऐकण्याची हौस व जबरा उत्साह आहे. पण त्यांचे खरे वाचन जीवनग्रंथाचेच म्हटले पाहिजे. बुद्धिजीवित्व हा त्यांचा प्रकृतिधर्म नव्हे. युक्तिजीवित्व ही त्यांची वादपद्धती नव्हे.
त्या काळच्या मानाने त्यांनी संसाराची मांडणी थोडी उशिराच केली म्हटली पाहिजे. पण भोवतालच्या परिस्थितीची आव्हाने त्यांना कधी घरी रमू देत नव्हती. शाळा सुटल्यापासून ते शिकवण्या करू लागले आणि ह्या शिकवण्या त्यांना भरपूर उत्पन्न देऊ लागल्या. खरे म्हणजे येथे थांबायला हरकत नव्हती. अनिकेत, छत्रहीन मुलगा नांदेडला येतो व पदवी नसताना शिकवण्या करून २०० रुपये महिना (आजच्या काळी त्याची किंमत किती ?) मिळवतो हे कर्तृत्व थोडे नव्हते.
राजकारणाकडे गांजवे का खेचले जावेत हे कळत नाही. शामरावजी बोधनकर राजकारणाकडे का वळले हे कळू शकते. कारण रस्त्याने ते जात असले तरी अन्याय व संकटाचा शोध घेत जातात. अन्याय कुठेही, कुणावरही घडो, त्याचा प्रतिकार करण्याची आपली जबाबदारी आहे असे समजण्याचा उत्साह शामरावजींजवळ आहे. तसे गांजवे मास्तरांचे नाही. ते नेहमी शांत व विचारीच होते. त्यांच्या तरुणपणाच्या आठवणीही तशाच आहेत. सगळी चर्चा चालू असताना गांजवे स्तब्ध बसायचे. चर्चेनंतर एखादा निर्णय घेतला जाई व मग तो अमलात कोणी आणावयाचा ह्यावर चर्चा सुरू होई. मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे हा निर्णय उत्साहपूर्वक घेणाऱ्यांत गांजवे नसत. शेवटी प्रश्न येई की हे काम प्रत्यक्षपणे करणारे कोण ? गांजवे मास्तर शांतपणे उभे राहून हे आपण करू असे आत्मविश्वासपूर्वक सांगत. भाषा नेहमीच संथ व निश्चयी, पण तिला कधी खळखळाट नव्हता. मुद्दाम संकटे हुडकीत फिरावयाचे हा त्यांचा स्वभाव नाही. पण एकदा का विचारपूर्वक हे आव्हान स्वीकारावयाचे ठरले म्हणजे मग जर, तर, पण, परंतु ही भानगड नाही. हुतात्मेपणाचा आवेशही नाही. पूज्य स्वामीजींनी अशी एक आठवण नोंदविली आहे की लातूर अधिवेशनाच्या वेळी राष्ट्रध्वज उभारण्यावर बंदी घालण्यात आली. तो उभारला पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते. सगळेच मनातून चिडलेले होते. अन्यायाचा प्रतिकार झालाच पाहिजे असे सर्वांचे म्हणणे होते. येथपर्यन्त गांजवे गप्प होते. शेवटी उद्या राष्ट्रध्वज उभारावयाचा व त्याचे परिणाम भोगावयाचे हा निर्णय ठरला. मग उद्या हे दिव्य कोण करणार? या क्षणी सगळी सभा शांत झाली. कोपऱ्यातून एक तरुण शांतपणे उभा राहिला व धीम्या आवाजात म्हणाला, मी राष्ट्रध्वज उभारीन ते गांजवे मास्तर होते. येथे शामरावजी बोधनकर असते तर कसे वागले असते ? माझे स्वतःचे कल्पनाचित्र असे आहे : ' रागाने लाल झालेले शामरावजी हे सडकेवर भेटलेल्याला अन्याय समजावून सांगत आहेत. सभा तेच बोलावणार. प्रारंभीच 'हा अन्याय आहे, तो मी सहन करणार नाही. मी झेंडा उभारणारच' याची घोषणा करणार व मग सहकाऱ्यांना विचार करून निर्णय देण्यास सांगणार. तो सांगताना म्हणणार की, 'माझा निश्चय ठरला आहे, पण तुम्ही विचार करा. मीही विचार करण्यास तयार आहे. मात्र तुम्ही नको म्हणालात तरी मी उद्या ध्वज उभारणारच,' इत्यादी इत्यादी.' संकटांना सामोरे जाण्याचा त्यांचा उत्साह अमाप असतो. गल्लीत सर्वत्र दंगे होत आहेत अशा वेळी सवीना घरी जा म्हणून सांगणारे शामरावच व दंगा कुठे होतो आहे हे पाहण्यासाठी एकटे बाहेर पडणारे शामरावच ! शामराव सारखा अपेक्षाभंगाचा धक्का सहन करू शकत नाहीत. ते फार लवकर कडवट होतात. शामराव, देव, गांजवे तिघेही सेनापती, पण प्रत्येकाची तऱ्हाच निराळी. प्रत्येक आघाडीवर मला लढलेच पाहिजे म्हणणारे शामरावजी आणि म्हणाल त्या आघाडीवर सांगाल तेव्हा जातो म्हणणारे गांजवे. देवांची पद्धत कुठे लढावयाचे व केव्हा लढावयाचे याचा निर्णय स्वतः घेण्याची असे.
आर्य समाजाचे काही संस्कार मास्तरांच्या मनावर झाले असावेत, असा माझा समज आहे. आरंभापासूनच त्यांचे विचार सुधारकी वळणाचे होते. कण्व परिषदेचे ते सभासद असत. अजूनही असतील. पण अशा कार्यात त्यांना रस येत नाही. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात त्यांना फार रस आहे. नांदेड येथे पहिला पुनर्विवाह त्यांनी लावला आणि यानंतर किती धर्मकन्यकांचा भार साहिला व निस्तरावा लागला हे तेच स्वतः सांगू शकतील.
अशा प्रकारची तीन-चार उदाहरणे तर माझ्यासमोर आहेत. एका उदाहरणात तर आई, तिची मुलगी व मुलीची मुलगी यांच्या जबाबदाऱ्या निस्तरताना काय यातना झाल्या या इतिहासाचा काही भाग माझ्या नजरेसमोरचा आहे. प्रा. सौ. ताराबाई परांजपे यांनी त्यांना अगणित धर्मकन्यकांचा पिता, वत्सल पिता, असे म्हटले आहे. ते बरोबरच आहे. यातून धमक्या देणे, कोर्टात जाणे, पोलिसांचा ससेमिरा, आर्थिक झीज असे सगळे प्रकार झाले. कै. महाजनावरील धर्मसभेच्या बहिष्कारनिर्णयाला आव्हान देण्यास गांजवे मास्तर होतेच. अशा या वातावरणात कुठेतरी त्यांचे मन पेटून उठले असावे आणि ते राजकारणाकडे खेचले गेले असावे.
स्टेट काँग्रेसची स्थापना १९३८ ला झालेली. पण त्याहीपूर्वी गांजवे मास्तर राजकारणात होते. १९३५ साली परतूडला महाराष्ट्र परिषदेची पहिली बैठक झाली. या बैठकीपासूनच पू. स्वामीजींनी सूत्रे हाती घेतली. या बैठकवजा अधिवेशनाला गांजवे हजर होतेच. तेव्हा त्यांच्या मनाचा कल त्याहीपूर्वी राजकारणाकडे वळला असावा. श्री. गांजवे यांना कोणती दृष्टी मोह धालीत होती? ते हिंदुत्ववादी झाले असते, गांधीवादी झाले असते, समाजवादी झाले असते पण यांपैकी काहीही झालेले दिसत नाहीत. कोणत्याही वादाने त्यांना प्रेरित केलेले दिसत नाही. त्यांचे पाय नेहमीच वास्तवावर होते. वास्तव आव्हाने समोर होती. वादाच्या तात्त्विक जंजाळात त्यांचे मन रमण्याचा संभव कमीच होता. महाराष्ट्र परिषदेच्या सर्वच कायांत ते स्वतः हिरिरीने अग्रभागी होते. सभा भरविणे तर दूरच राहिले, पण लोकांना घरी उतरू देण्यास व जेवू घालण्यासही भीती वाटावी अशा टांगत्या तलवारीच्या काळात ही तरुण मंडळी जातीय राजसत्ता व धर्मवेडया सशस्त्र जातीय वातावरणात निःशस्त्र व निर्भयपणे हिंडत होती. त्यांच्याजवळ स्वतःच्या शरीररक्षणाचे बचावाचे साधन तरी कोणते होते ? आपल्याच मनातील ध्येयवाद व आपल्याच मनातील बेडरपणा यापलीकडे बाहेर कुठे आश्रय सापडणेच शक्य नव्हते. सन १९३८ साली मोंढा मैदानावर ते पहिले सत्याग्रही होते. दोन वर्षे सक्तमजुरी व २००० रु. दंड अशी शिक्षा त्यांना देण्यात आली. पण तिची फिकीर, शिक्षेची चिताच कोणाला होती ! दंड भरावयाचाच नव्हता, मग २००० काय व दोन लाख काय दोन्हीही सारखेच होते. आव्हान जाणीवपूर्वक व प्राणपणाने दिलेले होते. मग दोन वर्षे काय आणि जन्मठेप काय दोन्हींतही काही फरकच जाणवत नव्हता. त्यांचे सहकारी सांगतात, सत्याग्रह करताना ते आवेशाने बेभान दिसत नव्हते. शिक्षा ऐकताना त्या प्रसंगीही त्यांचा चेहरा तसाच निर्विकार होता. शिकवण्या घेण्याकरिता जाताना ते जसे डौलात जात त्याच संथपणे गावातून बेड्या घातल्या तरी तसेच चालत असत.
बहादूर-यार-जंगच्या प्रक्षुब्ध सभास्थानी वृत्तांत मिळविण्यासाठी जाणे असो की जिल्ह्याचा प्रचार दौरा असो, शामराव बोधनकरांच्या पेढीवर ते असोत की सभेत असोत, मागची चिंता त्यांनी कधीच केली नाही. जणू मनाने ते एकटे होते व एकटे राहण्याची त्यांची तयारी होती. जणू अनिकेत असणे त्यांना नवीन नव्हते, व पुन्हा अनिकेत असण्याची त्यांची तयारी होती. ममत्वाचा एकच अंकुर त्यांच्या जीवनात उगवला होता. तोही फार उशिराने उगवला. या अंकुराने त्यांना मनस्तापच दिला आणि तो कोळपून गेला. पण ती उद्विग्नता विसरण्याचे मास्तरांजवळ एकच साधन होते. त्यांनी अपत्यविरहाचे दुःख नाटयसंमेलनात जिद्दीने भाग घेऊन पचविले. हे एक अग्निदिव्यच होते. त्यातून बाहेर पडणे हे सोपे नव्हते. जीवनात कणखरपणे वागण्याचे प्रसंग थोडे नव्हते. झेंडा प्रकरण असेच कसोटी पाहणारे होते. वातावरण दोन्ही बाजूंनी तापलेले होते. १९४६ सालचा हा प्रसंग. काँग्रेस ऑफिसवर राष्ट्रध्वज डौलात फडकत होता. त्या ध्वजाखालूनच रजाकारांची उन्मत्त सशस्त्र मिरवणूक जाणार होती. म्हणजे किती कठीण प्रसंग !
माजलेल्या सत्तांधांना हे सहन होणेच शक्य नव्हते. त्यांनी ध्वज खाली घेण्याची मागणी केली. समोर हजारो क्षुब्ध सशस्त्र जातीयवादी. ते म्हणाले, ध्वज उतरवा, नाही तर कुत्र्याच्या मौतीने मरावे लागेल. गांजवे निशस्त्र असूनही निर्भय होते. शांत, कणखर आवाजात ते म्हणाले, " ते शक्य नाही. ह्या आमच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणे आमचे कर्तव्यच आहे." ओरड खूप झाली. रक्तपाताची वेळ आली. पण शेवटी ध्वज तसाच डौलाने फडकत राहिला. असेच कसौटीचे प्रसंग, भूमिगत सशस्त्र लढयाचे नेते म्हणून काम करताना व उमरखेड कॅम्प सांभाळताना आले. मास्तरांच्या निष्ठा गांधीवादी नव्हत्या याचा वर उल्लेख आलेलाच आहे. त्यांच्या निष्ठा शस्त्रबळाला वाहिलेल्या होत्या काय ? तसेही नाही. या निष्ठा अमूक एका मार्गाला वाहिलेल्या नव्हत्या, तर ध्येयवादाला वाहिलेल्या होत्या. जेव्हा सत्याग्रह ठरले ते त्यांनी चोखपणे पार पाडले. जेव्हा चळवळीत शस्त्र वापरावयाचे ठरले तिथेही ते तेवढ्याच चोखपणे वागले.
सशस्त्र चळवळीचा फार मोठा धोका यश हा असतो. यशानंतरच्या उन्मादात स्वातंत्र्यसैनिक अधःपतित होतात. खाजगी वैरे साधली जातात. त्यांच्या आर्थिक स्थितीत एकदम फार मोठा बदल होतो. सामाजिक दर्जात बदल होतो. मास्तर या मोहातून स्वच्छ हाताने बाहेर पडले. हे मी त्यांचे फार मोठे यश मानतो. त्या काळातील कार्यकर्त्यांचे काय झाले याविषयी चर्चा किंवा वाद आहेत. त्यांच्या अधःपतनाच्या खऱ्या-खोटया आख्यायिका आहेत. गांजवे मास्तरांविषयी अशी वदंतासुद्धा नाही, हे मी मोकळ्या मनाने नमूद करू इच्छितो.
प्रतिभा निकेतन, कलामंदिर, गोदातीर, इतिहास संशोधन मंदिर, या संस्थांशी त्यांचे दीर्घ संबंध आहेत. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे तर ते आरंभापासून कार्यवाह आहेत. पण मास्तरांनी कोणावर आकस धरून सूड घेतला असे कुणी म्हणणार नाही. ज्यांच्या विरोधी निर्णय मास्तरांना घ्यावे लागले तेही असे म्हणत नाहीत.
महिला शिक्षण समितीपासून नांदेड येथे झालेल्या सर्व सभा, संमेलनांपर्यंत, अगदी परवाच्या नाटयसंमेलनापयंत, गांजवे मास्तरांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारची झीज सोसली नाही असे कधी झाले नाही. या सगळ्याच ठिकाणी ते काही पदाधिकारी नसत. पुष्कळदा छोटी छोटी तरुण मंडळी पदाधिकारी असत. पण म्हणून गांजवेमास्तरांची यातायात कमी होत नसे. आणि यात गंमत अशी की, सगळ्या कामाची त्यांना मनातून हौस असते. नुसत्या राजकारणाने त्यांचे मन भारलेले नाही. उलट सत्तेच्या राजकारणाला ते फार लवकर विटले. त्यांना संगीत ऐकणे आवडते. ते स्वतः अभिजात संगीताचे कार्यक्रम व्हावेत म्हणून कष्ट घेतात. प्रसंगी खस्ता खातात. काव्यगायनाचे त्यांना वावडे नाही आणि व्याख्याने व चर्चा यांचे तर वेडच आहे. एकूण त्यांना सगळ्या प्रकारची ज्ञानकेंद्रे आवडतात.
गांजवे मास्तरांचा सगळा परिचय लिहावयाचा व एक महत्त्वाची गोष्ट लिहावयाची नाही हे काही बरे दिसणार नाही. त्यांचे काही कठोर आग्रह असतात. निझामी राजवट संपली पाहिजे हा एक असाच आग्रह होता. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हाही त्यांचा असाच आग्रह होता. खातापिताना, नेहमी जनीजनार्दनी बोलताना जे रोज महाराष्ट्र, महाराष्ट्र जपत होते त्यांच्यापेक्षा या प्रश्नी मास्तरांच्या श्रद्धा कठोर होत्या. या कठोर श्रद्धांमुळे ते प्रत्यक्ष राजकारणातून मागे फेकले गेले. हा त्यांचा त्याग असाच मोठा होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा एकीकडे तापत होता आणि मास्तर अस्वस्थ झाले होते. माझ्यासारखी माणसे तर हिंस्र भाषेतच बोलत होती. शेवटच्या क्षणी हैद्राबाद विधानसभेत 'बिल' आले. त्यात हैद्राबादचा मराठी भाषक भाग द्वैभाषिक मुंबई राज्याला जोडावा असा उल्लेख होता. विरोधी पक्षनेते कॉ. व्ही. डी. देशपांडे यांनी मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्रास जोडावा अशी उपसूचना मांडली. ही उपसुचना हैद्राबाद विधान सभेने मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाविरुद्ध मतदानाचा कौल देऊन संमत केली. ही घटना घडविण्यात मुख्यतः प्रतोद गांजवे यांनी कोणता भाग घेतला ? त्यांना कोणती प्रलोभने महाराष्ट्रातील कोणत्या मान्यवर नेत्यांनी दाखविली होती? ही सुरस, रमणीय कथा कधीतरी गांजवे मास्तरांनीच सांगितली पाहिजे. चार महिने द्वैभाषिक मुंबई राज्याच्या विधानसभेत मास्तर बसले. नव्या निवडणुका आल्या. गांजवे मास्तरांच्या नावावर वाद नव्हता. त्यांनी पुन्हा विधानसभा लढवावी असा फार आग्रह झाला. पण कुठेतरी मास्तरांना ते बोचत होते. मराठवाडा काँग्रेसपक्षात सन १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेले तिकीट निग्रहपूर्वक नाकारणारे मास्तर हे एकच गृहस्थ मजसमोर आहेत.
गांजवे निवृत्त झाले. ते फुटून बाहेर का आले नाहीत ? ते लढयाकरिता का नाही तयार झाले ? व्यक्तीचा मोह तर नव्हताच. स्वार्थही त्यांनी कधीच लाथाडला होता. मग ते गप्प का बसले ? काँग्रेसचा मोह त्यांना सुटला नाही एवढेच का ह्या प्रश्नाचे उत्तर ? मला असे वाटते की, संघर्ष करून माणूस कुठेतरी थकतो. हैद्राबाद संपलेले या जन्मी पाहू असे वाटलेही नसेल. ते त्यांनी पाहिले या कृतार्थतेने ते कदाचित थकले असतील!
गांजवे मास्तरांवर असे मी कितीतरी लिहू शकेन. स्वच्छ आणि उज्ज्वल ध्येयवाद असणाऱ्या विधायक व्यक्तींच्यावर खूपखूप लिहिले पाहिजे, असे सारखे मला वाटते. गांजवे यांच्यावर लिहिण्याचा मोह मला होताच. पण कुठेतरी थांबणे भाग आहे. मी मास्तरांची गणना संत-महात्म्यात करू इच्छिणार नाही. कारण सगळेच संत वास्तववादापासून फार दूर गेलेले असतात, असा माझा अनुभव आहे. ते राजकारणी तर नाहीतच, याविषयी मला शंका नाही. मग हा माणुसकीचा नमुना कोणत्या वर्गात घालावयाचा. मास्तर मी अमुक गटातच बसतो असा आग्रह धरणार नाहीत. खूप चर्चा होऊ देतील. सर्वानुमते जे ठरेल ते मान्य करून शांतपणे उभे राहतील व सहकाऱ्यांनी त्यांचा जो गट ठरविला त्यात ते जाऊन बसतील. 'मला काही काम आहे का हो ?' असे त्यांना विचारावे लागणार नाही. कामे त्यांच्यापुढे धावत येतील आणि मास्तर त्यांत गढून जातील. हजारोंनी विश्वासाने ज्याच्या खांद्यावर मान टाकून निर्धास्त असावे असे ते आहेत आणि इतक्यांना सावरता येईल इतके त्याचे खांदे रुंद आहेत इतके यश या माणसाला पूरे नाही का?