डॉ. रा. चिं. ढेरे



माझे मित्र डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या वाङ्मय सेवेच्या गौरवासाठी त्यांचा एक गौरव ग्रंथ पुण्याहून आज प्रकाशित होत आहे. रामचंद्र ढेरे या एका सामान्य प्रूफ-करेक्टर चे रूपांतर गेल्या पंचवीस वर्षांत क्रमाक्रमाने महाराष्ट्रातील ज्येष्ठ व मान्यताप्राप्त विद्वानात झालेले आहे. ढेरे यांच्या रूपाने माझ्या पिढीतील अभ्यासकांमधून एक मानदंड निर्माण झाला आहे. याबद्दल ज्ञानावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही मराठी वाचकास आनंदच वाटेल. लौकिक दृष्टीने विचार करावयाचा तर अनेक पारितोषिके मिळवून ढेऱ्यांनी राज्य शासनाची मुद्रा आपल्या यशावर जडविली आहे. प्रथम पीएच्. डी. आणि नंतर डी. लिट. या उपाधी हस्तगत करून त्यांनी

विद्यापीठाची मान्यताही मिळविली आहे आणि सतत ग्रंथ प्रकाशनाच्या द्वारे सर्व सामान्य अभ्यासकांची मान्यताही मिळविली आहे. यू. जी. सी. च्या शिष्यवृत्तींचाही लाभ झालेला आहेच. या दृष्टीने पाहावयाचे झाले तर ढेरे आता कीर्ती व मान्यतेच्या शिखरावर आहेत.
पण याखेरीज अजून काही पाहण्याचे दृष्टिकोन असतात. त्या दृष्टीने पाहिले, तर गेल्या पंचवीस वर्षांत ढेरे यांच्यात फार काही बदल झाला आहे, असे दिसत नाही. प्रूफ-करेक्टर ढेरे आणि डॉ. ढेरे यांच्यातील साम्य माझ्या मते फार महत्त्वाचे आहे. या साम्याच्या मानाने मतभेद फार गौण स्वरूपाचे आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे ढेरे आणि मी यांची पहिली भेट नांदेड मुक्कामी कुठे तरी इ. स. १९५८-५९ मध्ये माझ्या घराच्या दरवाजात झाली. त्या पहिल्या भेटीच्या वेळी ढेरे अजून पदवीधर झालेले नव्हते. दोन्ही डॉक्टरेट अजून फार दूर होत्या. नुकतेच एक अभ्यासू तरुण म्हणून ते उदयाला येत होते. साधना प्रेसमध्ये प्रूफ-करेक्टर म्हणून पूर्वी ते काम करीत असत. नव्यानेच ती नोकरी सोडून देऊन ते मोकळे झाले व यापुढे मोकळे राहण्याचा विचारच त्यांच्या मनात पक्का बसला होता. मलाही ढेरे यांच्याविषयी जुजबी माहितीपेक्षा अधिक काही माहिती नव्हती आणि ढेरे यांना माझी काही माहिती असण्याचा संभवच नव्हता. कारण ज्या काळातली गोष्ट मी सांगतो आहे, त्या काळात माहिती असावी असे काहीच माझ्याकडे निर्माण झालेले नव्हते.
 या भेटीविषयी माझे स्मरण असे आहे की, मी कुठे तरी बाहेर जाण्यास निघालो होतो. दारातच ढेरे यांची गाठ पडल्यावर दोनचार औपचारिक वाक्ये मी बोललो. ढेरे यांना घरी या म्हणण्याची गरज काही त्या वेळी वाटली नाही. तसे पाहिले, तर मीही पदवीधर नव्हतो, प्राध्यापक नव्हतो. माझ्या नावे कोणते पुस्तक नव्हते. मॅट्रिक अन्ट्रेन्डच्या पगारावर काम करणारा मी एक साधा मास्तर. ढेरे यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली होती आणि त्यांना पारितोषिकेही मिळाली होती. तेव्हा आपल्यापेक्षा मोठा लेखक, न बोलवता घरी आला आहे तर किमान सभ्यतेने मी वागायला काहीच हरकत नव्हती. मैत्री नसेल, पण कोणतेही भांडणही नव्हते. पण हे त्या वेळी झाले नाही. औपचारिक बोलणी आणि दारावरूनच वाटेलावणी इतकेच या वेळी घडले. ढेरे यांच्यावर या घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही. कारण त्यापेक्षा अतिशय कडू गोळ्या त्यांनी वर्षानुवर्षे गिळल्या आहेत. त्याचा फारसा परिणाम त्यांच्या मनावर उरत नाही.
 मी आणि ढेरे इ. स. १९६२-६३ ला एम. ए. ला होतो. ते पुणे विद्यापीठात होते व मी मराठवाडा विद्यापीठात होतो. त्यानंतर प्राध्यापक होण्याच्या मानसिक नयारीत मी होतो. एम. ए. झाल्यानंतर ढेरे यांनीही प्राध्यापक व्हावे, ही सर्वांच्यासह माझीही इच्छा होती. हळूहळू मनाने प्राध्यापक होण्यासाठी ढेरेसुद्धा तयार होत होते. या वेळेपर्यंत आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र झालो होतो. ती मैत्री आज अठरा वर्षे सतत चालू आहे, घनिष्ठ होत आहे. हे झाले कसे, हे मी विसरून गेलो ५९ मध्ये तिन्हाईतपणा होता, ६२ मध्ये मैत्री होती. हा बदल क्रमाक्रमानेच भेटताना, बोलताना झालेला असणार, पण तो आठवत नाही. आता उगीच स्मरणाला ताण देण्यात अर्थ नाही. पण ६२ साली आम्ही मित्र होतो हे मात्र खरे.
 ढेरे यांचा परमेश्वरावर विश्वास आहे. ते नास्तिक नाहीत, कधीच नव्हते. तेव्हा असे म्हणणे भाग आहे की देवाने त्यांच्या कुंडलीत एम. ए. होणे लिहिले नव्हते. प्राध्यापक होण्याचा योग नव्हता. ढेरे यांच्या डोक्यात सणक भरली. का भरली ? एम. ए. वर पाणी सोडून देऊन त्यांनी त्या पदवीचा नाद कायमचा का सोडला, याची सर्व माहिती मला आहे, पण ती सर्व हकिकत ऐकूनही माझे हे मत आहे की ढेरे यांनी संतापाने पदवी सोडून दिली. ज्यांनी त्यांच्यासाठी प्राध्यापकाच्या जागा धरून ठेवल्या, त्यांना थोडेफार दुःख झाले हे खरे, पण आज असे वाटते की चला, झाले ते फार वाईट झाले नाही. ढेरे यांनी एम. ए. सोडली, पण विद्यापीठाने त्यांना विशेष संधी देऊन पीएच्. डी. ची पदवी प्रदान केली. पुढे ते डी. लिट्. ही झाले. प्राध्यापक होऊन ज्ञानाची उपासना विसरण्याच्या जगात, प्राध्यापक न होता ज्ञानमुग्ध जीवन जगण्याचा योग त्यांना आला, हे चांगलेच झाले.
 ढेरे यांचा स्वभाव निर्दोष आहे, असे माझे मत कधीच नव्हते आणि नाही. उलट, त्यांचे बहुतेक सगळे ठळक दोष मला माहीत आहेत आणि त्या दोषांवरसुद्धा मी प्रेम केलेले आहे. आपली बाजू बरोबर असूनसुद्धा तिच्यासाठी भांडणे त्यांना शक्य होत नाही. ढेरे यांच्यासाठी त्यांच्या बाजूने भांडण्यास त्यांचे मित्र सिद्धता करतात आणि ऐन वेळी ढेरे हातपाय गाळून बाजूला होतात. आपल्यावर अन्याय झाला तर घरी बसून कुरकुरावे व सोसावे, पण भांडून आपले म्हणणे बरोबर असले व त्याविरुद्ध उगीचच रान पेटवले गेले तरी आपणास जे सत्य वाटते, त्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याचे सोडून फक्त सोसावे, अशी अकारण सोशिकता ढेरे यांच्याकडे आहे. हा माझ्या मते दोष आहे, पण ढेरे यांच्यात तो आहे. याखेरीज भिडस्तपणा हाही दोष आहे. कुणी तरी येतो, प्रस्तावनेची गळ घालतो. ढेरे भिडस्तपणे होकार देतात. शब्द पाळणे त्यांना शक्य नसते. मग दोष मान्य करावा लागतो. तो ते मान्य करतात. भांडखोर माणूस अशी जर एखाद्याची प्रसिद्धी झाली, तर तो माणूस समोर सज्जनपणे बसला तरी ढेरे अस्वस्थ होतात. पापभीरू, भिडस्त व सोशिक माणसांचे जे दोष असतात, ते सर्व ढेरे यांच्याजवळ आहेत. त्या दोषांचा आम्हा मित्रांना त्रासही होतो, पण जे आहे ते असे आहे, त्याला इलाज नाही.
 जर दोषांचा पसारा इतकाच मर्यादित असता, तरी तो चालला असता. अशा भिडस्त माणसाने फार हळवे व फार मानी तरी नसावे. आमचे मित्र रामचंद्र चिंतामण पुरेसे हळवे आहेत. भरपूर मानी आहेत. फार लवकर घायाळ होतात आणि शिवाय भिडस्त व सोशिक आहेत. असा माणूस दरवेळी आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना, आपल्या मित्रांना आणि स्वतःलाही अन्याय होईल असे वागतो. ढेरे या माणसाचे हे दोषही प्रेम करण्याजोगे वाटावेत, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.
 ढेरे यांनी आपल्या कक्षा आखून घेतलेल्या आहेत. प्राचीन मराठी वाङ्मय, त्याच्या अभ्यासातून निर्माण होणारे प्रश्न आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास व त्यातून निर्माण होणारे प्रश्न एवढ्या कक्षेतच ढेरे वावरत असतात. ही मर्यादा ओलांडून ते इकडेतिकडे फारसे जात नाहीत. या आपल्या मर्यादेतसुद्धा पुरावा व त्यावरून निघणारी अनुमाने याबाहेर जाऊन मीमांसा करण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. महानुभावाचे उत्तरकालीन ग्रंथ आपले दर्शन न्यायदर्शनाचा भाग म्हणून मानतात. ढेरे याची अचूकपणे नोंद घेतात. आपण न्यायदर्शनाचा भाग आहो, ही महानुभावांची भूमिका वाटते तेवढी उत्तरकालीन नाही, याची नोंद करतात आणि थांबतात. प्राधान्याने शैव असणारे न्यायदर्शन संपूर्णपणे वैष्णव असणान्या महानुभावांनी स्वतःचा गट म्हणून मान्य का करावे अगर दर्शनांना आपले पूर्वसूरी नोंदविण्याची गरज का भासावी, या चर्चेत ते जात नाहीत. आपली मर्यादा पुराव्यांची जुळवणी करणे, सामान्यपणे दुर्लक्षित राहिलेल्या अर्थपूर्ण पुराव्यांकडे लक्ष वेधणे व त्यामुळे जी नवी संगती उपलब्ध होईल त्यावर प्रकाश टाकणे इतकीच आहे, असे ते मानतात.
 ढेरे असे या मर्यादेत का वागतात, याविषयी माझी काही मते आहेत. ही मते खरी की खोटी हे सांगता येत नाही. त्यांच्या मनाचा कल अभ्यास करणे, पुरावा शोधणे, याकडे आहे. मीमांसा निरनिराळ्या वादांच्याकडे जाते व नेते. हे वाद आणि आग्रह ढेरे यांना टाळावयाचे असतात. त्यांचा कल हा वाद टाळण्याकडे असल्यामुळे मीमांसा टाळण्याकडे त्यांची प्रवृत्ती आहे, अशी माझी समजूत आहे. ही समजूत खरी की खोटी, हे कोण सांगणार ? स्वतः ढेरे यांनाही हे सांगता येणार नाही. कारण आपल्या मनाचे कल अमुक प्रकारचे का असावेत, याविषयी आपण स्वत: केलेले स्पष्टीकरणसुद्धा बरोबर असेलच, याची खात्री देता येत नाही.
 ढेरे वाद-विवाद, भांडणे यांच्यापासून दूर राहू इच्छितात. पण त्यांची ही इच्छा फलद्रूप होण्याचा संभव फार कमी आहे. तुम्हाला एक पुरावा दिसतो. या पुराव्याकडे आजवर लक्ष गेलेले नसते. तुम्ही तो पुरावा समोर ठेवता, त्याचा अर्थ सांगता. इतिहासाची खरी अडचण या ठिकाणी असते. इतिहास संपूर्णपणे मृत नसतो. तो अर्धा बेशुद्ध व अर्धा जिवंत असतो. तुमचा पुरावा प्रांताचा अभिमान, धर्माचा अभिमान, जातीचा अभिमान यांच्याविरोधी जाऊ लागला की भांडण सुरू होणारच. एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दनस्वामी यांना मोक्षोपदेश करणारा कुणी मुसलमान परंपरेतला माणूस आहे, असे ढेरे सांगणार व 'पुरावा बरोबर आहे की नाही हे निर्विकारपणे तपासा' असे आवाहन करणार. वारकऱ्यांना व हिंदूधर्माभिमानी मंडळींना या मुद्दयावर निर्विकार राहणे शक्यच नसते. तुम्ही जर महानुभाव पंथ- प्रवर्तक चक्रधर आणि मुकुंदराजांचे आजेगुरू हरिनाथ या दोन्ही व्यक्ती वेगळया नसून, तो एकच माणूस आहे, असे म्हणणार असाल तर महानुभव धर्माचे अभिमानी व मुकुंदराजांचेही अभिमानी गप्प बसून ते कसे मान्य करतील ? पंढरीच्या विठोवाबावतने वादळ असेच घोंघावत उठले. तुम्ही संशोधन करणार असाल, जर पुरावा आणि सत्य यांच्याशी प्रामाणिक राहणार असाल तर समाजाच्या श्रद्धेशी कुठे तरी भांडण येणारच.
 संशोधन आणि चिकित्सा यांचे श्रद्धा आणि परंपरा यांच्याशी भांडण होणारच. ते टळणारे नाही. श्रद्धेच्या विरुद्ध जाणारा पुरावा विकारवश न होता सत्यजिज्ञासेने तपासून घ्या हे म्हणणे समूहमन सहज कबूल करणार नाही. आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत अशी आहे की, मी ' हा माझ्या श्रद्धेच्या व हितसंबंधांच्या विरोधी जातो म्हणून मान्य करणार नाही,' असेही कुणी स्पष्टपणे कबूल करणार नाही. संशोधनाचा आव आणूनच परंपरेच्या रक्षणार्थ युक्तिवादाची फौज उभी राहते. ढेरे यांची इच्छा असो वा नसो, त्यांना वादाच्या धुमाळीत उभे राहणे भाग आहे. एक पर्याय आहे तो म्हणजे संशोधन थांबविणे. पण हा पर्याय ढेरे यांनी ठरविले तरी त्यांना अमलात आणणे शक्य नाही.
 शोधणे, संगती लावणे आणि हे करताना तहानभूक विसरणे, मानापमान विसरणे, प्रकृतीचे स्वास्थ्यही विसरणे आणि काही हाती लागले की त्या धुंदीत व आनंदात तल्लीन होणे हा ढेरे यांचा प्राणभूत स्वभाव आहे. त्याशिवाय ते जगूच शकणार नाहीत. म्हणून संशोधन थांबविणे शक्य नाही. मग दर वेळी नव्या रणमैदानात आपण उभे आहोत असा प्रत्यय येणे यालाही पर्याय नाही. कुणाशी भांडू न इच्छिणाऱ्या सोशिक माणसावर नेहमीच भांडणे भाग आहे अशा जागी थांबण्याची पाळी यावी, यात दोष असला तर परमेश्वराचा आहे आणि लाभ आम्हा सर्वांचा आहे. पांडुरंगाने ढेरे यांच्यासारख्या चार-दोन चुका दर पिढीला केल्या पाहिजेत असे मी मानतो.
 ढेरे हे माझ्या पिढीतले प्राचीन मराठी वाङमयाचे व संस्कृतीचे अद्वितीय आणि असामान्य संशोधक आहेत. त्यांच्या बरोबरीचे नाव माझ्या पिढीत नाही. आता ही इतकी निर्विवाद गोष्ट आहे की त्यावर कुणी वाद करणार नाही. पण याचा अर्थ ढेरे सांगतात ती प्रत्येक बाब सर्वांना प्रमाणच मानली पाहिजे, असा नाही. ढेरे स्वतःही तसे मानीत नाहीत. संशोधनात मतभेद असतातच, पण निदान संशोधकांनी शास्त्राची शिस्त पाळून सभ्यपणे ते मांडावेत, ही अपेक्षा असते. नवा पुरावा उपलब्ध झाला तर संशोधकालाच आपली जुनी मते बदलून घ्यावी लागतात. ढेरे यांनाही ते करावे लागते. आपण आपल्या विरोधी उभे राहणे त्याला धैर्य लागते. ते ढेरे यांच्याजवळ भरपूर आहे.
 ढेरे यांचे हे मत बरोबर की ते मत बरोबर, यावर मतभेद होण्याचा संभव आहे. पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीबाबत जो वाद चालू आहे, त्यात ढेरे यांची बाज बरोबर आहे, असे मी मानतो. इतर कुणाला हे पटणार नाही. संशोधकांचे मूल्यमापन करताना हा मुद्दा गौण असतो. एखादे मत, एखादी भूमिका आपणास पटते की नाही, यावर संशोधकांचे मूल्यमापन होत नसते. कोणत्याही मोठ्या संशोधकाचे मूल्यमापन करताना त्याने स्वीकारलेल्या दिशांचे महत्त्व, त्या दिशांचे अचूकपण लक्षात घेऊन मूल्यमापन करावे लागते. माझ्या मते ढेरे हे असे दिशा स्थापित करणारे ज्येष्ठ नेते आहेत. त्या दिशांच्या महत्त्वावर ढेरे यांचे मोठेपण उद्या शिल्लक राहील.
 मला या दृष्टीने विचार करताना असे वाटते की, ढेरे यांची अभ्यासपद्धती तीन दिशा स्थापन करीत जात आहे. या तीनही दिशा वाङमयेतिहासाच्या व सांस्कृतिक अभ्यासाच्या क्षेत्रांत अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहेत. प्रथम म्हणजे वाङ्मयीन दृष्ट्या अगर धर्म-संप्रदायदृष्टया जी माणसे नेतृत्वपदी आहेत अगर मोठी आहेत, त्यांनी न नोंदविलेली माहिती दुय्यम-तिय्यम दर्जाच्या लेखकांच्या लिखाणात नोंदविलेली असते व या अप्रसिद्ध लेखकांच्या लेखनाला प्रक्षेपांची बाधा फारशी झालेली नसते. यामुळे वाङ्मयीनदृष्टया सामान्य असे लिखाण सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अतिशय असामान्य महत्त्वाचे ठरते. प्राचीन मराठीतील दुय्यम-तिय्यम दर्जाच्या अप्रकाशित ग्रंथांचे महत्व साधन म्हणून प्रस्थापित करण्याची प्रक्रिया ढेरे यांच्या अभ्यासातून सतत चालू आहे. ही दिशा महत्त्वाची आहे. दुसरे म्हणजे उत्तरकालीन पुरावा सतत पूर्वकालीन गूढे उकलण्यासाठी वापरीत आहेत आणि या पुराव्याचे महत्त्व नव्याने लक्षात येत आहे. सगळयात 'चक्रपाणि ' हा प्रबंधच या पद्धतीच्या विवेचनाचा एक नमुना आहे. दुसरी बाब म्हणजे ढेरे सांस्कृतिक इतिहासातील माहिती वाङ्मयाच्या विवेचनासाठी, वाङ्मयाच्या आकलनासाठी नव्याने वापरीत आहेत. मुरारीमल्लाच्या 'बालक्रीडे' ची प्रस्तावना या दृष्टीने पाहण्याजोगी आहे. वाङ्मयाचा लोकतत्त्वीय अभ्यास, वाङमयाच्या आकलनापुरता मर्यादित न ठेवता वाङ्मयाच्या मूल्यमापनातील एक घटक म्हणून स्थापित करण्याचा हा महत्त्वाचा प्रयोग आहे. इतर संशोधकांनी रूढ केलेल्या पद्धतीचे अनुयायी म्हणून ढेरे आहेतच, पण मराठीपुरते या वर नोंदविलेल्या तीन पद्धतींचे ते प्रमुख नेतेही आहेत. ढेरे यांच्याबाबतचे हे मूल्यमापन मी विचारपूर्वक केलेले आहे. पण ते सर्वांना पटावे, असा माझा आग्रह नाही.
 ढेरे हा माझ्या प्रेमाचा, मैत्रीचा व कौतुकाचा विषय आहे. त्यांच्याविषयी एखादे छोटे पुस्तक बनू शकेल इतके तर मी नक्कीच लिहू शकेन, पण या वेळी तसे तपशिलाने लिहिण्याचा विचार नाही. अजून त्यांच्याकडून खूप खूप लिखाणाच्या अपेक्षा आहेत. आताच ढेरे : व्यक्ती आणि वाङ्मय' याबाबत लिहिण्याची मी घाई करणार नाही. पण एक नोंद केली पाहिजे- ढेरे यांना आपण गरजेपेक्षा जास्त
 वा...९ श्रेय देण्याची चूक करू नये. कारण आज जे ढेरे म्हणून आपणासमोर ज्ञानी पंडित उभे आहेत त्यांच्या निर्मितीत व त्यांना उभे ठेवण्यात डॉक्टरीणबाईंचा वाटा फार मोठा आहे. न्याय म्हणून सौ. ढेरे यांचे श्रेय त्यांचे त्यांना दिले पाहिजे. नाही तर विनयगुणाचा फायदा घेऊन ढेरे गप्प बसणार व हे सर्व श्रेय त्यांचे मानणार हे बरोबर नाही. सौ. ढेरे यांनी हा माणूस सांभाळून मराठी संशोधनाची फार मोठी सेवा केली आहे. खरे आभार त्यांचे मानायला हवेत.