वाटचाल/माझे मार्क्सवादी गुरू-भालचंद्रमहाराज कहाळेकर

माझे मार्क्सवादी गुरू-भालचंद्रमहाराज कहाळेकर



माझे विद्यागुरू भालचंद्र शंकर कहाळेकर वयाच्या ५८ व्या वर्षी आकस्मिकपणे २८ मे १९७५ ला वारले. वाचकांच्यासाठी त्यांच्यासंबंधी मी काही लिहू इच्छितो. कै. कहाळेकरांना मराठवाड्यात त्यांचा विद्यार्थीवर्ग 'महाराज' ह्या नावाने ओळखीत असे. महाराजांनी जवळजवळ काहीच लिहिलेले नाही. इतस्ततः तुरळकपणे विखुरलेले त्यांचे स्फुटलेख आणि टिपणे संख्येने फार थोडी आहेत. औपचारिक लिखाणच त्यातून आहे. त्यामुळे महाराष्ट्राने केवढा मोठा प्रकांड पंडित आणि पूरोगामी विचारधारेचा पुरस्कर्ता गमावलेला आहे ह्याचे भान होणे कठीणच आहे. अशा वेळी आम्ही जे त्यांचे शिष्य आणि विद्यार्थी ह्यांनी काही लिहिणे आव-

श्यक आहे. त्यांच्या एकूण व्यासंगाचा व्याप आणि खोली आम्ही सांगू शकू असे नाही. पण निदान ह्या माणसाची काही ओळख तर त्यामुळे होईल. आता याहून अधिक काही करणे शक्य नाही.
कै. महाराज हे परंपरेने नांदेड जिल्ह्यातील कहाळा ह्या गावचे रहिवासी. शाक्तांच्या गाणपत्य सौर ह्या परंपरेतील व समत मठाचे अनुयायी. पण त्यांचे वडील शंकरमहाराज कहाळेकर परभणीला स्थायिक झाले. शंकरमहाराज हे संस्कृतचे पंडित, आयुर्वेदाचे तज्ज्ञ व सनातनी मतांचे होते, ते अग्निहोत्री होते. भालचंद्रमहाराज हे त्यांचे सर्वात वडील पुत्र. भालचंद्र महाराज आधुनिक विद्याविभूषित म्हणजे M. A., LL. B. होते. मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी, उर्दू ह्या भाषांच्यावर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांना कामापुरते तेलगु-कानडीही येई. इ. स. १९५० साली मराठीचे प्राध्यापक म्हणून ते हैद्राबादला आले व त्यानंतर गेली २५ वर्षे हैद्राबादलाच ते स्थायिक होते. अलीकडे चार-पाच वर्षे त्यांची प्रकृती नादुरुस्तच असे. रक्तदाब आणि हृदयदौर्बल्य ह्यांनी ते आजारी होते. मे महिन्यात ते वारले. हा त्यांचा थोडक्यात लौकिक परिचय म्हणता येईल.
 हैद्राबाद संस्थानातील जनतेच्या आंदोलनांचा इतिहास उर्वरित महाराष्ट्रापेक्षा थोडा निराळा आहे. पुष्कळदा पश्चिम महाराष्ट्रातील मंडळींना तो चटकन ध्यानात येत नाही. ह्या जनता आंदोलनाची प्रमुख तीन वैशिष्टये आपण नेहमी समजून घेतली पाहिजेत. पहिली बाब अशी की हैद्राबाद संस्थान हे भारतातले अतिशय प्रतिगामी व मागासलेले संस्थान. ह्या संस्थानात जागृतीला आरंभ इ. स. १९२५ च्या आसपास होतो. पोलिस ॲक्शन होऊन भारतात हे संस्थान इ. स. १९४८ च्या उत्तरार्धात विलीन होते. स्थूलमानाने ह्या २५ वर्षांत मराठवाड्यात ज्या सर्व चळवळी झाल्या त्या पश्चिम महाराष्ट्रात इ. स. १८५० ते इ. स. १९५० ह्या शंभर वर्षांत झाल्या. त्याचा परिणाम असा होतो की चिपळूणकरांच्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षणाला आरंभ करू इच्छिणाऱ्या भावनात्मक राष्ट्रवाद्याच्या शाळेत पुढच्या पाच वर्षांच्या आत आग्रही मार्क्सवादी शिक्षक मार्क्सवाद शिकवताना दिसतात. आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते वाचनालये चालविताना, साहित्य परिषदा उभारताना आणि सभा-संमेलनांतून सनातन्यांच्या शेजारी वावरताना दिसतात. ह्या आंदोलनाचे दुसरे वैशिष्ट्य असे की, संस्थानिक मुसलमान, सरकारी नोकरीत मुसलमानांची प्रचंड संख्या, राज्यभाषा उर्दू आणि सरकारी पाठिंबा असणारी मुस्लिम जातीयवाद्यांची इत्तेहादुल मुसलमीन ही अत्याचारी संघटना असे सगळे वातावरण हिंदुत्ववादी राजकारणाला पोषक होते. पण हैद्राबादेत हिंदू जातीयवाद बलवान झाला नाही. सेक्युलर राष्ट्रवादी आणि पुरोगामी असेच नेतृत्व बलवान राहिले. ह्या आंदोलनाचे तिसरे वैशिष्ट्य हे की जनतेचे राष्ट्रवादी नेते मोठ्या प्रमाणात मार्क्सवादी होते. इ. स. १९४५ नंतर ह्या मार्क्सवादाचा एक गट काँग्रेसबाहेर कम्युनिस्ट पार्टी म्हणून काम करू लागला व एक काँग्रेसमध्येच राहिला. व ह्या दोन गटांचे स्नेहसंबंध घनिष्ट राहिले. म्हणून हैद्राबाद संस्थानात व्यावहारिक शिस्त म्हणून पूर्णपणे खादीघारी असणारे, वैचारिक निष्ठा मार्क्सवादाशी असणारे, आपला राष्ट्रवाद पुरोगामी आंतरवादाशी सुसंगत ठेवणारे खूप कार्यकर्ते सापडतात. भाई गोविंददास श्रॉफ हे अशा मंडळींपैकीच. ह्या वर्तुळातच महाराज स्वातंत्र्यपूर्व काळात रमले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी वैचारिक क्षेत्र स्वतःसाठी निवडले.
 मराठी अध्यापन, हैद्राबादचे मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठवाडा साहित्य परिषद ह्या वर्तुळातच ते काम करीत राहिले. विशेषत: मराठवाडा साहित्य परिषदेचे ते प्रमुख कर्णधार होते. साहित्याच्या क्षेत्रात मराठवाड्याचे मागासलेपण पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. साहित्याच्या क्षेत्रात आज मराठवाडा एकदम पश्चिम महाराष्ट्राच्या शेजारी येऊन उभा राहिलेला दिसतो. याचे श्रेय प्रामुख्याने महाराजांचे आहे. खादीच्या कपड्यात गुंडाळलेली त्यांची ठेंगणी मूर्ती प्रथमदर्शनी उग्र भासत असे. ते प्रथमदर्शनी कठोर, तुसडे आणि राखीव मन असलेले असे वाटत व दिसत. जसजसा त्यांचा परिचय वाढे तसतसे हे जाणवे की, आपण प्रखर चारित्र्य व प्रखर तत्त्वनिष्ठेच्या पण मूलतः वत्सल आणि प्रेमळ माणसाच्या सहवासात आलो आहोत. त्यांच्या अध्यापनाचे क्षेत्र जरी मराठी असले, तरी अध्ययनाला कोणत्याही मर्यादा नव्हत्या. एका बाजूला अर्थशास्त्र व राजकारण, तर दुसन्या बाजूला धर्म-तत्त्वज्ञान व संस्कृती असा त्यांचा चौरस संचार असे. भाषाशास्त्र, इतिहास, व्याकरण, पौर्वात्य, पाश्चिमात्य समीक्षा हा तर खास प्रांत असल्यासारखा दिसे. नानाविध विषयांचा एवढा प्रचंड धर्म व अद्ययावत् व्यासंग त्यांनी केव्हा केला हे गूढ मला कधीही उकलले नाही. हे उघडच आहे की, माझ्या विचारांच्यावर त्यांचा ठसा अगदी गाढ होता. पुष्कळ वेळा तर त्यांनी मांडलेली मते जशीच्या तशी माझ्या लेखनात आलेली आहेत.
 तसे त्यांचे घराणे हे महाराज घराणे. त्यामुळे भालचंद्र हे अभिधान तर त्यांना चिकटलेले होतेच. पण रूढ अर्थाने महाराजपणाशी त्यांचा संबंध नव्हता. धर्म-परंपरेच्या कोणत्याही चालीरीतीशी त्यांचा संबंध नव्हता. त्यांना मनाचा परंपरावादही मान्य नव्हता. रूढ धर्माशी त्यांचा संबंधही येणे शक्य नव्हते कारण ते मूलतः मार्क्सवादी होते. प्रत्यक्ष राजकारणाच्या लढ्यात उभा असणारा मार्सवादी निराळा असतो. त्याची बोलण्याची शैलीही निराळी असते. पण सांस्कृतिक व ज्ञानाच्या क्षेत्रात असणारा मार्क्सवादी निराळा असणे भागच असते. कै. बेडेकरांच्या विषयी ह्यामुळेच त्यांना गाढ ममत्व होते. पण बेडेकरांच्यापेक्षा त्यांचे मार्क्सवादी आग्रह तीव्र असत. माक्र्सवादी असल्यामुळे ते जडवादी व इहलोकवादीही होते. कोणत्याही भाबडेपणाला, भोळेपणाला तिथे जागा नव्हती. मराठवाडा ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांत अद्ययावत् असावा असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळेच आमच्या आधुनिकतावादी व्यासपीठाचे महाराज ह्या अर्थाने त्यांना 'महाराज' म्हटले जाई. त्यांचा परलोकावर कधी विश्वासच नव्हता. म्हणून ते जन्ममृत्यूच्या चक्रातून आमची सुटका करतील ही आशाही नव्हती. ते कोणत्याही सत्तापदावर नव्हते त्यामुळे इहलोकीच्या दुःखचक्रातून सुटका करण्यासाठी त्यांचा उपयोगही नव्हता. ते होते ज्ञानपीठ. सदैव धगधगते.
 महाराज मार्क्सवादी आहेत ही गोष्ट प्रायः ध्यानात येत नसे. ह्याची कारणे तीन होती. एक तर समोरचा माणूस ज्या विषयावर बोलत असे त्याच विषयावर ते बोलत. ही चर्चा करणारे भाषाशास्त्र, व्याकरण, इतिहास, वाङ्मय ह्यावर चर्चा करीत असत. आलेल्या प्रत्येक माणसाला राजकारणाच्या चर्चेत ओढून नेण्याची त्यांची प्रथा नसे. राजकारणावर बोलताना मात्र बारकाईने पाहणान्याला त्यांची मूलतः मार्क्सवादी बैठक चटकन कळे. वरवर चर्चा करणाऱ्यांना तीही लक्षात येत नसे. ह्या संदर्भात ते नेहमी दोन मुद्दे सांगत. ते म्हणत, लोकांना विचार कसा करावा हे शिकवा. जर विचार कसा करावा हे त्यांना जमले तर सत्यापर्यंत आपला प्रवास तेच करतील. मला माझी मते लादण्याची घाई नाही. कधी ते लेनिनचे वाक्य सांगत. त्याचा आशय जीवनाची संपूर्ण गुंतागुंत ध्यानी घ्या असा होता. दुसरे म्हणजे मार्सची व मार्क्सवाद्यांची परिभाषा ते कटाक्षाने टाळीत असत. त्यांचे म्हणणे असे की समोरचा माणूस मार्क्स आणि लेनिन ह्या नावाला बुजणारा असा मध्यमवर्गीय आहे. त्याला या मार्क्सवादी प्रवाहापर्यंत आणावयाचे असेल तर परिभाषा टाळा. दरवेळी उठल्या बसल्या मी द्वंद्वात्मक भौतिक वादातून किंवा ऐतिहासिक भौतिक वादातून ह्या प्रश्नाकडे पाहतो हे सांगण्याची काय गरज आहे ? तुम्हाला तुमचा मुद्दा वेगळ्या भाषेतही सांगता येतो. मत महत्त्वाचे आहे. परिभाषा महत्त्वाची नाही. परिणामी ते मार्क्सवाद सांगत आहेत हे पुष्कळदा कळतच नसे. ते म्हणत, समजा तुम्ही एखाद्या उजाड रानात गेलात, तर एक म्हणजे उन्हापासून बचाव व्हावा ह्यासाठी आपण आडोसा उभारू. दुसरे म्हणजे हळूहळू उन्हातून वावरण्याची सवय वाढवू. भोवतालच्या वस्तू आपली गरज भागविण्यासाठी वापरू. आपल्या गरजांनाही वळण लावू. असा कार्यक्रम दुहेरीच असणार ना? आणि ह्या दोन्ही बाबी परस्परावलंबी आहेत. विचार असा दुहेरी करावा म्हणजे सर्वांगीण व संपूर्ण होतो. डायलेक्टीकल मेथड ही अधिक परिपूर्ण व निर्दोष आहे असे ते म्हणत आहेत, हे विद्यार्थी विसरून जात.
 तिसरी बाब अशी की, त्यांच्या बोलण्यात मार्क्सवाद नसणाऱ्यांची मते उल्लेखिली जात. कौटिल्य अर्थशास्त्रातील 'अर्थमलो धर्म कामो' हे सूत्र ते घेत व कौटिल्याचे म्हणणे कसे बरोवर आहे हे सांगत. सरंजामशाहीच्या मानाने भांडवलशाही अधिक बेजबाबदार, क्रूर व निर्दय असते याचा ते खुलासा करीत, तरीसुद्धा भांडवलशाही प्रगत अवस्था का मानावयाची हे ते सांगत. पण हे सांगताना आपण 'कॅपिटल' चा एक भाग सांगतो आहोत असे ते म्हणत नसत. या व अशा पद्धतीमुळे ते जडवादी आहेत, मार्क्सवादी आहेत हे अनेकांना जाणवत नसे. ते म्हणत; जे मार्क्सवादी नाहीत त्यांनी उपलब्ध करून दिलेला प्रचंड पुरावा जर आपण तपासून त्याची संगती लावली, तर पुन्हा मार्क्सवादच सिद्ध होतो. एखादी बाब मार्क्स सांगतो म्हणून ती खरी आहे अशी भक्तांची भूमिका घेण्याची मला गरज नाही. ज्या बाबी समोरच्या पुराव्याने आपण सत्य मानू, त्या केवळ मार्क्सने सांगितल्या म्हणून खोटया समजावयाच्या हा हटवाद जर मंडळींनी सोडला तरी ते पुरे आहे. अर्थातच हेही खरे आहे की, महाराज मार्क्सवादी होते हा आमच्या आकर्षणाचा प्रमुख मुद्दा नव्हता. त्यांचा नानाविध विषयांचा प्रचंड व्यासंग व तर्कप्रधान अशी अलौकिक बुद्धिमत्ता हेच त्यांचे प्रमुख आकर्षण होते.
 महाराज असे मानीत की, मागासलेल्या प्रदेशात परंपरावाद प्रभावी असतो. जे प्रश्न पन्नास वर्षांपूर्वी इतरांनी चर्चिले ते प्रश्न आज आपण चर्चितो. त्याचे उदाहरण म्हणून ते मराठी कवितेकडे बोट दाखवीत. ही रोमँटिक भूमिका घेणारी मराठी कविता युरोपात रोमँटीसिझम मागे पडल्यानंतर इथे वाढली. आधीच भारतीय मन मागासलेले आहे. त्यात पुन्हा आपण इतरांच्या मागे हे घडणे बरोबर नाही. म्हणून त्यांनी नवकाव्य, नवकथा, नवटीका ह्यांची अखंड चर्चा मराठवाड्यात चालू ठेवली. मर्ढेकरांच्या कवितेवर चर्चा आणि परिसंवाद त्यांच्यामुळे इ. स. १९५१-५२ पासूनच सुरू झाले. ते नवकाव्याचे समर्थक होते. पण हे समर्थन करताना मराठी कवितेला मध्यमवर्गीय मनाची मर्यादा कशी पडली आहे ते स्पष्ट करीत. हा अद्ययावतपणाचा आग्रह केवळ वाङमयात नव्हे, तर सर्वत्रच ते ठेवीत.
 मर्ढेकर मराठी सौंदर्यशास्त्राच्या प्रौढावस्थेतील प्रथम पदन्यासाचे प्रतिनिधी होते. मर्ढेकर पूर्णपणे कलावादी म्हणून कम्युनिस्ट व मार्क्सवादी ह्यांच्या वाङ्मयीन भूमिकेचे विरोधक. आणि कहाळेकर हे मर्ढेकरांचे समर्थक. आम्हाला त्या वेळी हा विसंवाद वाटे. महाराज म्हणत, तूर्त वर्ष दोन वर्ष मी फक्त मर्ढेकर समजावून देणार आहे. मर्ढेकरांच्यामुळे जागतिक वैचारिक भूमिका पराभूत होतील असे वाटण्याचे कारण नाही. आपण बेडेकरही चर्चेसाठी समोर ठेवीतच आहोत. वर्ष दोन वर्षाने हा अभ्यास पचनी पडला म्हणजे मर्ढेकरांच्या मर्यादा मी सांगीन. त्या सांगताना आपोआपच मार्क्सवाद्यांना कलांच्याविषयी खरोखरच काय म्हणावयाचे आहे त्याची चर्चा होईल. महाराज मार्क्सवादी असल्यामुळे साहित्य समीक्षेत ते जीवनवादी होते. मराठी साहित्य समीक्षेवर कलावाद्यांचा प्रभाव सार्वत्रिक आहे. ते प्रामुख्याने कलावादी भूमिका सुसंगतपणे मांडणे किती अशक्य आहे ते दाखवीत. मार्क्सवाद्यांनी राजकारणाव्यतिरिक्त समाजजीवनाच्या इतर सर्व शाखा आणि सांस्कृतिक जीवन ह्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुरोगामी विचार जीवनात बलवान करणे कठीण झाले आहे असे ते म्हणत. एक नवा माणूस, नवा समाज निर्माण करण्याची प्रक्रिया फक्त राजकीय पातळीवरून यशस्वीरीत्या हाताळता येईल असे जर कुणी समजत असेल तर ती एक भ्रामक बाब ठरणार आहे असे त्यांना वाटे.
 त्यांची चर्चा करण्याची ठरलेली पद्धत असे. समोरचा माणूस जे मत मांडील त्यातील कच्चे दुवे ते हुडकून काढीत व खंडन करीत. काल मांडलेली भूमिका जरी आज आपण मांडली तरी ते खंडनच करीत. ते म्हणत, खंडन काय कशाचेही करता येते. मुद्दाम एखाद्या मताचा विपर्यास केला की खंडन सोपे होते. समोरच्या माणसाला प्रस्तुत मुद्दे कोणते; अप्रस्तुत बाबी कोणत्या, विपर्यास कोणता हे कळावे; प्रत्येक प्रश्नातील गुंतागुंत कळावी असा त्यांचा प्रयत्न असे. ह्या चर्चांच्यामधून विद्यार्थी विचार कसा करावा हे शिकत असत. ही चिंतनक्षमता वाढविणे, विचारांना दिशा देणे ह्यात त्यांना फार रस होता.
 भारतीय कम्युनिस्टांशी त्यांचे मतभेद होतेच. प्रत्यक्ष राजकारणात ते नसल्यामुळे त्याला जाहीर वादावादीचे रूप आले नाही इतकेच. ह्यातील तुरळक मतभेद नोंदविण्यात अर्थ नाही. पण महत्त्वाचे मतभेद नोंदविणे योग्य होणार नाही. ते असे मानत की, भारतीय राष्ट्रवादाला आरंभापासून साम्राज्यवादविरोधाचा व आर्थिक वस्तुस्थितीचा एक पदर होता. मागासलेल्या देशातील स्वातंत्र्यचळवळीत सांस्कृतिक राष्ट्रवाद बलवान व प्रभावी असा असणारच. अशा ह्या वातावरणात भारताच्या स्वातंत्र्यलढयात सर्व शक्तीने बिनशर्त सामील होणे व ह्या लढयाचे साम्राज्यवादविरोधी रूप एकीकडे व आर्थिक रूप दुसरीकडे बलवान करीत नेणे कम्युनिस्टांना अगत्याचे वाटायला हवे होते. त्यामुळे भारतीय राष्ट्रवादाचे नेतेच कम्युनिस्ट झाले असते. परिणामी भारतीय स्वातंत्र्यलढा अधिक प्रखरपणे समाजवादी रूप धारण करू शकला नाही. ते म्हणत, जनतेच्या चळवळी जेथे असतात तेथे नेत्यांच्या भूमिका पाहून चळवळीपासून दूर राहणे चुकीचे असते. चळवळीत सर्व सामर्थ्याने घुसून तिला इष्ट वळण लावणे व नवे नेतृत्व आणणे महत्त्वाचे असते.
 त्यांचा दुसरा मुद्दा अखंड भारताच्या संदर्भात होता. भारत हे एक राष्ट्र होते व आहे असे त्यांचे मत नव्हते. पण येथे प्रयत्नपूर्वक एक राष्ट्र उभे करता येईल असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांच्या अखंड भारताच्या भूमिकेला सांस्कृतिक राष्ट्रवादाची पार्श्वभूमी नव्हती. महाराज म्हणत, मुसलमान हे एक राष्ट्र आहे. अल्पसंख्याक नव्हते म्हणून त्यांना स्वतंत्र राष्ट्र होता आले पाहिजे ही मुस्लिम लीगची भूमिका उघडच धार्मिक राष्ट्रवादाची भूमिका होती. अशी भूमिका घेऊन फुटून निघालेला तुकडा आपल्या अस्तित्वासाठी जागतिक साम्राज्यवाद्यांच्या हातचे खेळणे होणारच. छोटे छोटे निरनिराळे तुकडे पाडावे म्हणजे सगळेच दुर्बळ होतात. त्यांना साम्राज्यवाद्यांच्या हातातले बाहुले होण्याशिवाय पर्याय नसतो. राजे असणारी, सरंजामशाही मनोवृत्तीचे शासन असणारी संस्थाने जर स्वतंत्र राष्ट्रे झाली असती तर ह्या संस्थानांच्यामध्ये एक एक लष्करी तळ आलाच असता. आजही जर काश्मीरचे स्वतंत्र राष्ट्र झाले तर तो साम्राज्यशाहीचाच तळ होईल. जागतिक साम्राज्यशाहीला सोयीची असणारी बाब ही पुरोगामी मंडळींना विरोधाची व गैरसोयीची वाटावी ही अपेक्षा असते. जर पुरोगामी राजकीय विचारधारा सांस्कृतिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद्यांची सोय ह्यातून निर्माण झालेल्या भूमिकांशी समरस होऊ लागल्या तर कुठेतरी घोटाळा होतो आहे हे समजून घेतले पाहिजे.
 प्राचीन भारतीय वाङमय, कला, इतिहास, धर्मपरंपरा ह्यांच्याकडे मार्क्सवादी चिकित्सापूर्वक पाहण्याचा थोडा फार प्रयत्न करतात, असे त्यांना वाटे. ह्यामुळेच राहुल सांकृत्यायन, दामोदर कोसांबी, देवीप्रसाद चट्टोपाध्याय ह्यांच्याविषयी त्यांना ममत्व होते. राजकारणाच्या झगड्यात उभे राहणाऱ्यांनी अभ्यास न करता इतर क्षेत्रांबाबत मते देण्याचा प्रयत्न केला तर त्यातून ठोकळेबाज भूमिका निर्माण होतात. म्हणून अधिक योग्य मार्ग त्या त्या ज्ञानक्षेत्राचे तज्ज्ञ आणि अभ्यासू असे मार्क्सवादी पंडित निर्माण करणे व त्यांना जाणकारीने बोलू देणे हा आहे. धर्माच्या चिकित्सक अभ्यासात त्यांना रस होता. कारण अंधश्रद्धांच्या जपणुकीचा 'धर्म' हा बालेकिल्ला असतो. भारतातील किती धर्मसंप्रदायांची आपण तपशिलाने ऐतिहासिक चर्चा केली आहे ह्याचा मार्क्सवाद्यांनी विचार केला पाहिजे असे ते म्हणत. राजकारणाच्या सोयीसाठी जेव्हा आपण धर्मचिकित्सा स्थगित ठेवतो त्या वेळी धार्मिक राजकारणाची तर आपण सोय पाहत नाही ना ह्याचा विचार करणे भाग असते.
 समाजवादी समाजरचना ही नैतिक आणि आध्यात्मिक समाज रचना आहे असे त्यांना वाटत असे. त्यामुळे अध्यात्म आणि नीती ह्याचा मावर्सवादाशी व समाजवादाशी जेवढा घनिष्ट संबंध आहे, तेवढा इतर कुणाचा असू शकणार नाही, असेही त्यांना वाटे. इ. स. १९५०-५२ च्या सुमारास राजकारणात माझा संबंध लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स ह्या गटाशी होता आणि ह्या गटाचे सर्व नेते कहाळेकरांना ओळखणारे, त्यांना मानणारे होते. त्यांतले काहीतर त्यांचे निकट मित्र होते; आंतरराष्ट्रीय राजकारणात साम्राज्यशाहीविरोध व शांततेचा पुरस्कार, अंतर्गत राजकारणात समाजवादी अर्थरचनेचा पुरस्कार करणारा व मार्क्सवादी असणारा हा एक स्थानिक गट होता. आम्ही नव्या भूमिकेने भारावलेलोही होतो. अतिरेक व आग्रही भूमिकाही प्रतिपादन करीत होतो. जास्त जहाल बोलणारा जास्त शुद्ध क्रांतिकारक वाटावा असे त्या वेळचे आमचे मत होते. समाजरचनेचा मूलभूत आधार आर्थिक असतो ह्यावर आमचा आग्रह होता. त्यामुळे नीती, अध्यात्म, हे सगळे शब्द आम्हाला नावडते होतेच, पण ह्या शब्दांना थोडा परंपरावादाचा प्रतिगामी गंध आहे असेही आम्हाला वाटे. त्या काळी ह्या प्रश्नावर महाराजांशी आमचे प्रचंड व तीव्र वाद होत. कहाळेकरांचा मुद्दा असा असे : वेगाने देशभर उठाव करून सत्ता हाती घेणे व क्रांती तातडीने घडवून आणणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते काय? तसे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उठावाला सिद्ध व्हा. आम्ही त्यात सहभागी होऊ. अजून उठाव करण्याजोगी पूर्वतयारी झालेली नाही, अशी तयारी नसताना उठाव करणे हा आततायीपणा ठरेल, (ते साहसवाद, ॲडव्हेंचरीझम असे शब्द टाळीत) असे तुम्हाला वाटत असेल तर आपण पूर्वतयारीच्या दृष्टीने संघटना, संघर्ष, ह्यांचा विचार करू. समाजवादी समाजरचनेत जी आर्थिक रचना असेल तिथे तर आपला विरोध नाहीच. मग अशा वेळी तुमचा आमचा विरोध राहतो कुठं. मी समाजवाद ही नैतिक व आध्यात्मिक चळवळ आहे असे मानतो. तुम्ही ती अनैतिक चळवळ आहे असे माना. कहाळेकरांचा मुद्दा त्या वेळी आम्हाला पटला नाही. पण नंतर म्हणजे इ. स. १९५५-५६ नंतर क्रमाने ह्या मुद्दयाचे महत्त्व पटू लागले. आज तर ह्या मुद्द्यावर मी त्यांच्याइतकाच आग्रही झालो आहे. घडते काय की नीती आणि अध्यात्म हे प्रतिगामी विचारांचे लाडके शब्द आहेत म्हणून समाजवाद्यांचे नावडते शब्द झाले आहेत. एका चुकीच्या पद्धतीने प्रतिगामी लोक वापरतात म्हणून त्याचा खरा अर्थ शोधणे टाळता कसे येईल? आपण कधीतरी हा प्रश्न विचारायला हवा की, एखादी वाद नैतिक अगर अनैतिक कशामुळे ठरते ? एखादी भूमिका आध्यात्मिक का ठरते ? न्याय ही कल्पना जर नैतिक नसेल तर ह्या जगात नैतिक काही राहू शकेल का? निर्भय स्वातंत्र्य हे जर अध्यात्माच्या उद्दिष्टांचा भाग नसेल तर कोणती प्रार्थना आध्यात्मिक राहू शकेल का ? न्याय्य समाजरचना निर्माण करणे आणि भीतीमुक्त माणूस प्रत्यक्षात आणणे ह्यासाठी चालू असणारे आंदोलन हे जगातले सवांत महत्त्वाचे नैतिक आंदोलन मानणे माग आहे. मागच्या ऋषिमुनींनी समाजरचना व अर्थरचना ह्यांना धक्का न लावता व्यक्तिश: आपल्या जीवनाची नैतिक व आध्यात्मिक रचना करण्याचा प्रयत्न केला. यात आपण सर्व अर्थरचनाच, समाजरचनाच बदलून माणसाच्या सर्वच जीवनाची नैतिक पुनर्रचना करू पाहतो आहोत. समाजवाद ही नव्या संस्कृतीची नांदी ठरणार. ती नैतिक चळवळ असणे भाग आहे. हा मुद्दा कधीतरी सविस्तर लेख म्हणून मांडण्याचा माझा विचार आहे. तो थोडक्यात मांडला म्हणजे समजापेक्षा गैरसमज जास्त होतात. कै. महाराजांच्याविषयी मी अजून पुष्कळ सांगू शकेन. तपशिलाने निरनिराळ्या ग्रंथांच्याविषयी सांगता येईल. पण त्या प्रयत्नात मी पडणार नाही. माझा हेतू फार मर्यादित आहे. नानाविध विषयांचा गाढ व्यासंग असणारा, प्रखर बुद्धिवादी, कोणत्याही प्रकारची पोथीनिष्ठा नसणारा एक चारित्र्यवान व पुरोगामी विचारवंत आपण गमावला आहे. इतके सांगून मी थांबणार आहे. कहाळेकरांनी स्वत: काही लिहिलेले नसले तरी त्यांनी एक पिढीच्या पिढी घडविली. एक वातावरण निर्माण केले; ते काही मावळणारे नाही. महाराजांच्या निधनामुळे माझी वैयक्तिक हानी तर फार मोठी झाली आहे. कारण ह्या माणसाच्या सावलीखाली आम्ही २५ वर्षे होतो. पण ह्या व्यक्तिगत हानीपेक्षा मोठी हानी मराठवाड्याची, तेथील पुरोगामी सांस्कृतिक व वैचारिक चळवळीची झाली आहे.