वाटचाल/संगीताचा नाद
संगीताचा नाद
संगीताची आवड माझ्या जीवनात लहानपणापासून आहे, असे दिसत नाही. माझ्या वडिलांना तबल्याचा थोडासा नाद होता. एखाद्या वेळी कीर्तनाच्या कार्यक्रमात ते तबल्यावर साधा ठेका धरीत. पण यापेक्षा अधिक नाद त्यांना नव्हता. आमचे कुरुंदा गाव संगीताचे अतिशय नादी होते. माझे एक चुलते, अर्थात दूरचे चुलते-शास्त्रीय संगीताचे चांगले दर्दी होते. एक चुलत भाऊ तर अजून गातो. धाकटा भाऊ तबल्याचा चांगलाच जाणकार आहे. पण मला स्वतःला लहानपणी गाणे ऐकण्याची फारशी इच्छा झालेली दिसत नाही. गाण्याचे कार्यक्रम होत. पण मी त्यांना जात नसे. घरच्या मंडळींसह जाणे भाग पडले, तर कार्यक्रमात मी झोपी जात असे. लहानपणापासून वाच-
नाची जशी उत्कट व उदंड ओढ मला माझ्या ठिकाणी दिसते, तशी संगीताविषयी दिसत नाही. मला गुणगुण करण्याचीही सवय नव्हती. शास्त्रीय संगीत तर सोडाच, पण भावगीते, सिनेमातील गीते हीही कधी म्हटल्याचे मला आठवत नाही. आयुष्याची पहिली सोळा वर्षे अशी संगीतशून्यच गेली.
अपवादाने नियम सिद्ध होतो असे म्हणतात. त्यानुसार अपवादभूत प्रसंग सांगायचा तर असे आठवते की, लहानपणी मी गायनाच्या एका वर्गात दोन महिने जात होतो. संगीताच्या चतुर गुरुजींनी आठवड्याच्या आतच मला गाता येणार नाही हा निर्णय घेतला व मला हार्मोनियमवर वसविले. एका आठवड्यात मी दोन पट्टया मोडल्या म्हणून त्यांनी मला तबल्याकडे
वळविले. एक डग्गा मी फोडला, मग ते त्रस्त झाले. इतके तरी गुरुजींनी का सहन केले असावे ? बहुतेक रोख फी आगाऊ देणारा मी एकटाच विद्यार्थी होतो, हे त्याचे कारण असावे. पण रोख वेळेवर फी मिळते हा मोहसुद्धा माझ्या गुरुजींना दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ परवडला नाही. या अपवाद असणाऱ्या प्रसंगामुळे फक्त नियमच सिद्ध होणार. संगीत हा माझा मूळच्या आवडीचा विषय नव्हे. संगीताच्या बाबत मी असा अलमगीर बादशहाचा नातेवाईक ! मग मी संगीताकडे वळलो कसा ? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर थोडक्यात असे देता येईल की, अण्णासाहेब गुंजकराच्यामुळे मी संगीताकडे वळलो. गुंजकरांनासुद्धा याची नक्की कल्पना असेलच असे नाही.
माझे विद्यागुरू कै. भालचंद्रमहाराज कहाळेकर हे नाईक वाड्यात गोळीगुडा येथे राहत असत. वाचन व चर्चा या निमित्ताने माझा कहाळेकरांच्याकडे जवळजवळ मुक्कामच होता. कहाळेकरांचे मित्र (आता भाग्यनगर नांदेड येथे माझे शेजारी) श्री. रामभाऊ पिंगळीकर हे अण्णासाहेबांचे शिष्य. गायनवादन विद्यालयातून बाहेर पडलेल्या पहिल्या पहिल्या विद्यार्थ्यांच्या पैकी ते एक. रामभाऊ पिंगळीकर कवी होते. संगीताचे फार चांगले जाणकार व नादी होते. हैद्राबादची सारी गुणी मंडळी त्यांच्याकडे जमत. प्रसिद्ध तबलानवाज उस्ताद दाउदखां त्यांपैकी एक ! कधी कधी प्रसिद्ध पेटीवादक अंबाप्रसादही तिथे येत आणि मग गायकांचा एक मेळावाच तिथे जमे. शनिवारी रात्री ९||-१० पासून गाणे सुरू व्हायचे ते सकाळी पाच-सहापर्यंत. गाणे, गाण्यावर गप्पा-विनोद असा सगळा प्रकार सकाळपर्यंत चाले. चहाही तीन वेळा होई. सकाळी तोंड धऊन चहा पिऊनच घरी परतायचे. या मैफिलीत मित्रासाठी म्हणून कहाळेकर असत. कहाळेकरांची शागीर्दी करीत, आम्ही असू.
रामभाऊ पिंगळीकरांच्या घरी 'उगी कटकट, डोक्याला ताप' अशी कुरकुर करीत मी कहाळेकरांच्यासह असे. हळूहळू मीच संगीतात रमू लागलो. पिंगळीकरांची तान मोठी जोरकस व दाणेदार असायची. त्या तानेची आवड प्रथम निर्माण झाली. तानेकडून मग आलापीकडे मी क्रमाने आकृष्ट झालो. रामभाऊंच्या नादाने कहाळेकर, त्यांच्या नादाने मी असे गाण्याच्या कार्यक्रमासही जाऊ लागलो. कृष्णराव चोणकर, हिराबाई बडोदेकर इ. चे गाणे मी असे ऐकले. रामभाऊ पिंगळीकरांच्यामुळे मी संगीताच्या जगात प्रथम आलो. गुंजकरांच्या शिष्याचा हा माझ्या गुरूमुळे झालेला माझ्यावरील संस्कार म्हटला पाहिजे. या काळात मी हैद्राबादला होतो. अजून नांदेडला माझा व मला नांदेडचा उपद्रव नव्हता.
ही संगीताची गोडी इ. स. १९५४ साली सतत तीन दिवस, दिवसा-रात्री, पहिल्या मराठवाडा-संगीत संमेलनात कार्यक्रम ऐकण्याइतकी गाढ झाली होती. हे संमेलन नांदेडला झाले. कुमार गंधर्वांचे गाणे मी प्रथम इथेच ऐकले. बसवराज राजगुरूंचे गाणेही इथेच ऐकले. पण नांदेडच्या पहिल्या संगीत संमेलनाचा माझ्यावरील मुख्य ठसा याहून निराळा आहे. गाणे मी ऐकले, ते मला आवडले हे तर खरेच; पण त्याहून विशेष जाणवले ते निराळेच होते.
मराठवाड्यातील एका गावी तीन-साडेतीन हजार श्रोते दिवसा आठ तास आणि रात्री सहा तास असे रोजी चौदा तास शास्त्रीय संगीत हौसेने ऐकत बसू शकतात एवढी मोठी अभिजात संगीताची गोडी व रसिकता असणारा श्रोतृवर्ग इथे उपलब्ध आहे, हे मला प्रथमच जाणवत होते. सुगम संगीताचा कार्यक्रमसुद्धा तीन-चार तासांच्या नंतर कंटाळवाणा होतो हे मी रोज पाहत होतो. पैसे देऊन हौसेने, तक्रार न करता शास्त्रीय संगीत ऐकत बसणारे हे शेकडो लोक पाहणे याचा माझ्या मनावर फार खोल परिणाम झाला. इ. स. १९५४ साली पुढच्या वर्षी आपण नांदेडला नोकरीसाठी जाऊ आणि नंतर नांदेड हीच आपली कर्मभूमी होईल याची मला कल्पना नव्हती; पण मराठवाड्यातील रसिकांच्या या गर्दीचे आपण देणे लागतो याची मात्र मला जाणीव नव्याने झाली होती. दुसरी जाणवलेली बाब म्हणजे वाद्य, वादक व गायक यांची मराठवाडाभर पसरलेली लक्षणीय संख्या. माझ्या मनावर पहिल्या संगीत संमेलनाचा सर्वांत गाढ ठसा या जाणिवेचा आहे.
रामभाऊ पिंगळीकरांच्या मैफलीत मला प्रथम संगीताची गोडी लागली. हा काळ इ. स. १९५० चा! माझे गुरू कहाळेकर या बाबतीत अतिशय जागरूक होते. मला संगीताची गोडी लागते आहे, हे पाहताच त्यांनी संगीतावर माझ्याकडून काही वाचून घेण्यास, चर्चा करण्यास आरंभ केला. संगीतावरील प्राथमिक वाचन मी कहाळेकरांच्या सहवासातच केले. पिंगळीकरांचे एक फार चांगले होते. ते जरी स्वतः चांगले गायक व शास्त्रीय संगीताचे जाणते उपासक होते, तरी त्यांच्याजवळ कोणतीही गटबंदी नव्हती, कोणत्याही घराण्याचा चांगला गायक व कोणत्याच घराण्याचा नसलेला चांगला गायक त्यांना आवडे. शास्त्रीय संगीताप्रमाणेच भजन, लावणी, नाटयगीत, सिनेसंगीत यांचे ते चाहते होते. यामुळे कोणताही कर्मठपणा नसणारी मोकळी रसिकता मला आरंभापासून उपलब्ध झाली. अगदी आरंभापासून जे चांगले, त्या संगीताचा, मी चाहता झालो. पिंगळीकरांनी मला संगीताची गोडी लावली, मुक्त रसिकता दिली. कहाळेकरांनी माझी रसिकता डोळस केली.
ही सारी पूर्वतयारी सोबत घेऊनच नांदेडला मी नोकरीसाठी आलो. नांदेड मोठे अदभुत नगर आहे. या नगरीची प्रेम करण्याची शक्तीच फार मोठी. नांदेड माझ्या आणि मी नांदेडच्या प्रेमात पडलो. तो जन्मभराचा ऋणानुबंध आज पंचवीस वर्षे चालू आहे. मी नांदेडला आलो आणि अण्णासाहेब गुंजकरांच्या सहवासात आलो. रामभाऊ पिंगळीकरांना सर्वच घराण्यांचे चांगले गाणे आवडते. ते घराण्याचे बंधन मानत नाहीत, याचे पूर्वी मला नवल वाटे. गुंजकरांच्या सहवासात आल्यावर नवल संपले. अण्णासाहेब गुंजकर हे पिंगळीकरांचे गुरू. संगीताच्या क्षेत्रात जे जे काही चांगले आहे ते सर्वच आपले आहे ही भूमिका गुंजकराची. मुक्त रसिकता हे अण्णासाहेबांचे वैशिष्टय. तेच गुरूकडून शिष्यांच्याकडे आले होते. रसिकता डोळस असावी, हा गुंजकरांचा नित्य प्रयत्न असे. अण्णासाहेबांनी रसिकांची घडवलेली एक पिढी पाहून मी इ. स. १९५४ ला प्रभावित झालो होतोच. पुढे नांदेडला आल्यानंतर त्यांचा डोळसपणा, मोकळी रसिकता पाहून मी अधिकच प्रभावित झालो आणि गुंजकरांच्या सहवासामुळे सतत संगीतात काहीतरी वाचायला, विचार करायला प्रवृत्त झालो.
भरत नाट्यशास्त्रातील आणि संगीत-रत्नाकरातील संगीत विचारांचे चिंतन माझ्याकडून घडले, ते मी नांदेडला असल्यामुळे ! मी सतत संगीतातील कोणता तरी विषय घेऊन बोलावे हा गुंजकरांचा आग्रह राहिला. म्हणून एक डोळस रसिक या नात्याने मी या क्षेत्रात आहे. गुंजकरांच्या शिष्यांच्या नादी लागून मी संगीतात आलो, गुंजकरांच्या नादी लागन मी या क्षेत्री टिकलो इतकाच याचा अर्थ. एरव्ही ज्यांना उपजत संगीताची आवड असते त्या गटाचा मी सभासद नव्हतो.