वाटचाल/सेतु माधवराव पगडी


सेतु माधवराव पगडी



सेतु माधवराव पगडी यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आणि बहुढंगी आहे. अतिशय रसिक, ज्ञान जिज्ञासू आणि चिकित्सक असे जीवन सत्तर वर्षेपर्यंत ते जगलेले आहेत. ज्या बाबी एखाद्या महाराष्ट्रीय माणसात अतिशय दुर्मीळ आहेत अशा अनेक बाबींचा समन्वय सेतु माधवरावांच्या आयुष्यात झालेला आहे. तसे तांत्रिक दृष्टया पहायचे तर जुन्या निजाम राज्यातील बिदर जिल्ह्यातल्या एका कानडी घराण्यात आणि मध्व संप्रदायाच्या कडक वैष्णव वातावरणात पगडींचा जन्म झाला. मध्व संप्रदायाचा, कट्टर कैतिवैष्णव परंपरेचा अभिनिवेश हा तर त्यांच्या ठिकाणी नाहीच, पण कोणत्याच प्रकारचे कानडीपणही त्यांच्याजवळ नाही. सेतु माधवराव म्हणजे एका

बाजूने इतिहासाचे प्रकांड पंडित आणि दुसऱ्या बाजूने दिलखुलास गप्पागोष्टी करणारे अगदी मराठमोळे गृहस्थ असे आहेत. रसाळ वक्तृत्व आणि तेवढाच विनोदी गप्पांचा भरणा यामुळे मित्रांच्या बैठकीत पांडित्याची महावस्त्रे बाजूला ठेवून हसत-खेळत गप्पा मारीत राहणे हा त्यांचा नित्य सवयीचा भाग झालेला आहे.
म्हटले तर सेतु माधवराव कानडी, पण त्यांची सर्व हयात मराठी भाषेची उपासना करण्यात गेली. आयुष्याचा फार मोठा भाग त्यांनी प्रशासकीय सेवेत वरिष्ठ सनदी नोकर म्हणून घालविला. जुन्या हैद्राबाद राज्यात ते तहसीलदार होते. काही काळपर्यंत डेप्युटी कलेक्टर होते. पोलिस ॲक्शन झाल्यानंतर कलेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. हैद्राबाद राज्याचे ते शिक्षण खात्याचे संचालकही होते.माझ्या कल्पनेप्रमाणे हैद्राबाद राज्य विभाजनाच्या वेळी ते गृहखात्याचे मुख्य सचिव होते. पुढे ते मुंबई राज्यात काही काळपर्यंत उपसचिव म्हणून होते. आणि दीर्घकाळपर्यंत गॅझेटचे डायरेक्टर आणि साहित्य संस्कृती मंडळाचे चिटणीसही होते. प्रशासकीय सेवेत प्रदीर्घ काळ सेतु माधवरावांनी घालविला. प्रशासनाच्या या जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्या त्या त्यांनी लीलया सांभाळल्या. कोणत्याही खात्याचे काम पाहताना अमुक एक बाब सेतु माधवरावांना जमली नाही, असे कधी झाले नाही. पण त्यांच्याजवळ प्रशासनात रमणारे मन नव्हते. आपल्या सगळ्या प्रशासकीय कर्तृत्वाकडे ते स्वतःच गप्पांच्या ओघात गमतीदारपणे पाहत असताना आढळून येतात.
 प्रायः सनदी नोकर, विशेषतः जर ते अखिल भारतीय सेवेतील वरिष्ठ सनदी नोकर असतील तर आपल्या कार्यक्षेत्रात पुरेसे वाकबगार आणि तज्ज्ञ असतात, पण या मंडळींचे मनही प्रशासनातच रमलेले असते. ते शरीराने कुठेही असोत, मनाने ऑफिसमध्येच असतात. सेतु माधवराव यापेक्षा अगदी उलट होते. आपल्या खात्याचे काम बिनचूक आणि चोख करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी असे. पण या प्रशासनात त्यांचे मन कधी रमले नाही. आपण प्रशासनात फारसे रमत नसतो. प्रशासनचा भार हाताखालच्या मंडळींच्यावर सोपवून आपण गप्पा मारण्यात रमतो असे ते सांगणार. पण या सांगण्याचा तारतम्याने आपण अर्थ घेतला पाहिजे.कामाचा उरक दांडगा असल्यामुळे आणि ज्या खात्यात ते जातील तेथील सर्व जाणकारी चटकन आत्मसात करण्याची शक्ती असल्यामुळे सेतु माधव राव इतरांना जे काम करण्यास आठ तास लागतील ते चार तासांत उरकणार आणि उरलेले चार तास नानाविध विषयांवर गप्पा मारणार. प्रशासनात न रमलेले, कुशल प्रशासक, असे त्यांचे वर्णन करावे लागेल.
 जुन्या हैद्राबाद संस्थानात असताना सेतु माधवराव प्रथम ललित वाङमयाकडे वळले व काही लघुकथा आणि काही मराठवाड्यातील वाङमयाचे तात्कालिक आढावे असे त्यांच्या आरंभीच्या वाङ्मय सेवेचे स्वरूप राहिले. कवितेची आवड आणि नाटकांची आवड ही त्यांच्याजवळ आरंभापासूनच आहे. एखाद्या विषयाला हात घातला म्हणजे आवश्यक ती सामग्री वेगाने नजरेखालून घालून त्यावर लिहून मोकळे व्हायचे अशी त्यांची त्या वेळी पद्धती असे. सेतु माधवराव मुंबईला आले आणि त्यांच्या लेखनाची गती वाढली. खरे म्हणजे मुंबई राज्याने जर त्यांना काही दिले असेल तर ते इतकेच होते की त्यांना लेखनासाठी निरामय स्वस्थता दिली आणि प्रकाशनाची मनमोकळी संधी त्यांना मिळाली. वाकी त्यांचा अभ्यासाचा पिंड पूर्वीपासून तयारच होता. पण अभ्यासाचा पिंड तयार असला तरी जुन्या निजामी राजवटीत त्यांना मोकळेपणाने अभ्यास लेखन करण्याची संधी उपलब्ध झाली नव्हती, ती इथे मिळाली.
 हैद्राबाद संस्थान हे नानाविध चमत्कारिकपणांनी भरलेले संस्थान होते. या चमत्कारिकपणामध्ये सेतु माधवरावांना विकासाची फारशी संधी उपलब्ध होण्याची शक्यता नव्हती. निजामच्या राजवटीत उर्दू भाषेखेरीज इतर कोणत्याही भाषेच्या विकासाकडे आस्थेने पाहण्याची प्रथा नव्हती. मराठी हा तर रागाचाच भाग असे. सेतु माधवरावांच्या सारख्या सरकारी नोकराने मराठीतून लिहावे ही गोष्ट त्या वातावरणात कुणाला फारशी रुचण्याचा संभव नव्हता. सेतु माधवराव यांनी जर मनात आणले असते तर नानाविध उद्योग आणि उचापती यशस्वी करण्याची संधी त्यांना उपलब्ध होती. त्यांनी कटाक्षाने हा मोह टाळला. ज्या रस्त्याने जाणे सोईचेही नव्हते आणि सुलभही नव्हते त्या रस्त्याने आपले मन आवरून धरीत दीर्घकाळपर्यंत सेतु माधवराव वाटचाल करीत राहिले.
 मी असे अर्धवटच लिहिले तर मला काय म्हणायचे आहे हे नव्या मंडळींच्या नीटसे लक्षात येईल याची खात्री नाही. निजामच्या राज्यात उर्दू ही राजभाषा होती. सेतु माधवराव स्वतः फारशीचे पंडित असल्यामुळे त्यांच्या उर्दूच्या अभ्यासाला शैली आणि डौलदारपणा यांची जोड होती. संस्कृत भाषेचा जाणता आणि अभ्यासक जसा सहजगत्याच प्रौढ व डौलदार मराठीतून बोलतो तसे सेतु माधवरावांच्या उर्दूचे होते. डौलदार, प्रौढ उर्दू भाषेतून रसाळ वक्तृत्व आणि शैलीदार लेखन त्यांना सहजसाध्य होते. असा एखादा भारदस्त उर्दू भाषा बोलणारा चतुर हिंदू माणूस आपल्या राजकारणाला सोयीचा आहे इतके ध्यानात येताच जुन्या हैद्राबाद संस्थानात भारतीय राष्ट्रवादाचा द्रोह करण्याच्या मोबदल्यात एखाद्याच्या जन्माचे कोट कल्याण झाले असते. या मार्गाने जाणे सेतु माधवरावांना शक्य होते. या रस्त्याने जाण्याची आमंत्रणे त्यांना कमी आली नाहीत, पण सेतु माधवरावांनी हा मोह कटाक्षाने टाळला. आजचे जे सत्ताधिकारी आहेत त्यांना सोयीस्कर ठरेल की वर्तणूक ठेवणारा माणूस व्यवहारात नेहमीच यशस्वी होतो. सत्ताधारी बदलले म्हणजे आपल्या भूमिका बदलण्यास प्रत्यवाय नसतो. आय. ए. एस. असूनही पुढच्या काळात सेतु माधवरावांनी राजकीय नेत्यांच्या 'कृपेत राहणे' शक्यतो टाळले. आधीच्या काळातही निजामच्या कृपेत राहणे त्यांनी टाळले.
 राजकीय नेत्यांचा जो लढाऊ पिंड असतो तसा पिंड सेतु माधवरावांचा नाही. राजकारणाच्या धकाधकीत उतरण आपल्याला जमायचे, परवडायचे नाही ही खूणगाठ तरुणपणातच केव्हा तरी त्यांनी बांधून ठेवली, पण तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायचा का नाही इतका निर्णय घेऊ शकता. मनाने राष्ट्रवादी असणाऱ्या माणसाला हैद्राबादच्या राजकारणात उत्साही प्रचारक म्हणून सामील होणे शक्य नव्हते. सेतु माधवराव फारसीचे पंडित, उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व पण ते निजामच्या राजवटीत मराठीतून लिहीत बसले. वाहत्या जातीय व भारतविरोधी राजकारणात सहभागी होऊन आपला स्वार्थ साधण्याचा मोह त्यांनी कटाक्षाने टाळला.
 सेतू माधवराव मराठीचे उपासक आहेत. मराठ्यांचे आणि शिवाजीचे अभिमानी आहेत. भारतीय राष्ट्रवादाचे ते उपासक आहेत. सरकारी नोकरीत राहून यांपैकी कशावरच लिहिता येणे त्यांना शक्य नव्हते. जे लिहिण्याची मुभा होती आणि जे लिहिणे सोयीचे होते ते त्यांनी लिहिले नाही. जे लिहिणे त्यांना आवडले असते ते त्या वेळी लिहिता येणे शक्य नव्हते. म्हणून सेतु माधवराव अभ्यास करीत बसले. आणि लिहिले ते जुजबी विषयावर ! ज्या मराठीतून ते लिहू इच्छित होते ते लिखाण वाचणारे व छापणारेही दुर्मीळ होते. असा तो काळ होता. परिश्रम करून लिहावे, प्रायः आपलेच पैसे खर्च करून छापावे, पुस्तके कुणी विकत घेईल अशी खोटी आशा न बाळगता ज्यांनी ती वाचावीत असे आपल्याला वाटते, त्यांना ती भेट द्यावीत आणि साऱ्यांचा परिणाम म्हणून शासनात स्वतःविषयीच्या नाराजगीचा सूर चालू राहतो त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम भोगावेत हे सारे बिनतक्रार दीर्घ कालपर्यंत पचविणे त्यांना आवश्यक होते. ही किंमत त्यांनी मोजली, पण ते मराठीचे उपासक राहिले. निजामच्या राजवटीत त्यांनी जे मानसिक क्लेश भोगले त्यातील कडवटपणा विसरून त्या सगळ्या हकिगती विनोद म्हणून तटस्थपणे पाहण्याइतका समजूतदारपणा पुढील काळात त्यांनी अंगिकारला.
 मराठी, मराठ्यांचे राज्य, शिवाजीबाबतचा अभिमान व आत्मीयता ही मूळची बाब. त्यात पुणतांबेकरांच्या सहवासात हा मऱ्हाटपणाचा अभिमान अधिक धारदार झाला. पण या सगळ्या आपल्या अभ्यासाला एक व्यापक बैठक द्यावी लागणार आहे याची जाणीव त्यांना केव्हा तरी याच कालखंडात आलेली असते. फारशी आणि उर्दू याबाबतचा व्यासंग त्यांनी सतत चालू ठेवला. सेतु माधवराव उर्दू भाषेचे आणि फारशीचे जाणते अधिकारी विद्वान आहेत. याचा अर्थ पुष्कळदा आमच्या मित्रमंडळींना कळत नाही. उर्दू भाषेतून अस्खलितपणे वक्तृत्व गाजवता येणे इतकाच या उर्दू पांडित्याचा भाग नसतो. उर्दू भाषेचा व वाङ्मयाचा अगदी आरंभापासून आजतागायत अद्ययावत अभ्यास करणे आणि उर्दू भाषेतील गद्य, पद्य व प्रमुख वाङ्मय नजरेखालून घालणे हाही त्याचा अर्थ असतो. सर्वसाधारणपणे एम. ए. च्या वर्गाचा उर्दू शिकवणारा जो उर्दू भाषेचा अनुभवी व प्रौढ असा जाणता प्राध्यापक असतो, त्याचे उर्दूचे ज्ञान थिटे वाटावे या पद्धतीची उर्दू भाषेविषयीची निष्णातता सेतु माधवरावांच्याजवळ आहे, आणि तसेच फारशीचेही पांडित्य आहे. मराठवाडा विद्यापीठ उर्दू भाषेच्यासाठी फार प्रसिद्ध नाही. पण उस्मानिया विद्यापीठाच्याही उर्दू विभागात सेतु माधवराव पगडींशी बरोबरीच्या नात्याने बोलू शकेल असा उर्दूचा प्राध्यापक क्वचित आढळेल.
 अलिकडे मराठीच्या प्राध्यापकांची जी अडचण झालेली दिसते तीच उर्दूच्या प्राध्यापकांचीही अडचण आहे. मराठीच्या प्राध्यापकांचे प्रायः संस्कृत कच्चे असते. त्यामुळे संस्कृतात मुरलेल्या मराठीच्या अभ्यासकाशी बोलताना सर्वसामान्य मराठीचा प्राध्यापक दपकून बोलू लागतो. हाच प्रकार उर्दूच्या प्राध्यापकाबाबत आहे. उर्दूच्या सुशिक्षितांना फारशी जवळजवळ येत नाही. उर्दूचा अभ्यासक आणि तो जर फारशीचा ज्ञाता असेल तर सर्व उर्दूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांचा थोडासा भीतीचाच तो भाग असतो. सेतु माधवरावांचे उर्दू पांडित्य या प्रकारचे आहे.
 उर्दू भाषेत वाङमय समीक्षा अतिशय दुबळी आहे. सेतु माधवराव मराठीचे उपासक असल्यामुळे त्यांची रसिकता अतिशय डोळस झालेली आहे. उर्दू कवितेचा प्रसंगी डोळस आस्वाद ज्या कौशल्याने सेतु माधवरावांना घेता येईल त्या कौशल्याने सर्वच उर्दू प्राध्यापकांना तो घेता येईलच असे नाही.
 सेतु माधवरावांनी हा सगळा जो उर्दू, फारशीचा व्यासंग केला त्यांची पार्श्वभूमी उर्दू भाषेतील प्रेमकाव्याची नाही. त्याची पार्श्वभूमी महाराष्ट्राचा अभिमान ही आहे. महाराष्ट्राचा एक अभिमानास्पद असा इतिहास अभ्यासाचा वारसा आहे. महाराष्ट्रात इतिहास-पंडितांची परंपराही फार थोर आहे. पण महाराष्ट्राचे हे इतिहासप्रेम फारशीच्या ठिकाणी येऊन लंगडे पडते. मराठी इतिहास संशोधनात फारशी ही वर्माची आणि दुबळी जागा ठरलेली आहे. मराठ्यांनी आपला इतिहास केवळ बखरींच्या आधारे समजून घेऊ नये. त्यांनी अस्सल कागदपत्रांकडे वळले पाहिजे याची उत्कट जाणीव आमच्या इतिहासअभ्यासकांना राजवाडे यांच्यापासून झाली. त्यामुळे आमचे इतिहाससंशोधक समकालीन कागदपत्रांचे फार मोठे जाणते आणि चिकित्सक झालेले आहेत. पण या इतिहाससंशोधनातील एक अडचण फारशी ही आहे. अगदी आरंभीच्या काळात म्हणजे महंमद बीन कासीमच्या काळात मुस्लीम राजकर्त्यांची भाषा अरबी होती, पण पुढे महमूद गझनीपासून अकबरापर्यंतच्या काळात उत्तरेतील मुस्लीम राजकर्त्यांची राजभाषा प्राय: तुर्की राहिली. मराठ्यांचा अभिमानविषय म्हणजे शिवाजी. शिवाजी आणि पुढची मराठयांची सर्व राजवट म्हणजे स्थूल मानाने भारताच्या इतिहासातील सतरावे आणि अठरावे शतक येते. या कालखंडात मोगलांची राजभाषा फारशी झालेली होती. शिवाजी आणि मराठेशाहीशी संबंध असणारी सर्व साधने फारशीत आहेत. या कालखंडात आदिलशाही आणि कुतुबशाही यांचे सर्व कागदपत्रे फारशीतून आहेत. मोगल, आदिलशहा आणि कुतुबशहा यांची बारकाईने तपशीलवार माहिती असल्याशिवाय मराठ्यांचा साधार तपशीलवार इतिहासच लिहिता येणे शक्य नाही. म्हणून फारशी ही मराठेशाहीच्या इतिहासाच्या अभ्यासातील एक महत्त्वाची अडचण ठरलेली आहे.
 बखरींच्यावर अवलंबून राहू नये, कागदपत्रांच्याकडे वळले पाहिजे ही भूमिका अगदी बरोबर आहे. हजारोहजार असणारी मराठी साधने बारकाईने न पाहता मराठ्यांचा इतिहास सांगणे हा तर भ्रमिष्टपणा ठरेलच, पण ही मराठी साधने विचारात न घेता लिहिलेला सतराव्या, अठराव्या शतकाचा भारतीय इतिहासही असमाधानकारक आणि अपुरा राहील. या चित्राला अजून एक बाजू आहे. मराठ्यांना प्रतिस्पर्धी सत्ता म्हणून आदिलशाही आणि मोगल एका कालखंडात होते. नंतर मोगल, त्यांचे सुभेदार निझाम हैदरअली आणि इंग्रज दुसऱ्या कालखंडात होते. डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज अशी युरोपीयन सत्तांची साधने आणि सर्व फारसी साधने लक्षात न येता केवळ मराठी साधनांच्या आधारे आपण भारताचा इतिहास तर लिहूच शकत नाही, पण आपले मराठ्यांच्या इतिहासाचे ज्ञानसुद्धा दुबळे राहते. या सर्व फारशी साधनांच्या बाबत आम्ही भाषांतरांच्यावर अवलंबून आहोत. होता होईतो फारशी साधने वापरायची नाहीत. नाईलाजाने ती वापरावी लागली तर भाषांतरावर संतुष्ट राहायचे ही बाव मराठ्यांच्या इतिहासाच्या अध्ययनालासुद्धा फारशी चांगली नाही. इलियड डाउसन हाच आमचा त्राता राहावा हे काही मोठे भाग्याचे लक्षण नाही.
 ही गोष्ट नीट समजून घेऊन ज्या मंडळींनी हा दुबळेपणा दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांत प्रातिनिधिक म्हणून मी तिघाजणांचा उल्लेख करीन. पहिले ख्यातनाम मराठी कवी माधव ज्यूलियन उर्फ माधवराव पटवर्धन आहेत. माधव ज्यूलियन हे फारशीचे जाणकार होते. ज्या अर्थाने सेतु माधवराव जुनी फारशी, नवी फारशी, साहित्यकांची फारशी, राज्यव्यवहारातील फारशी, भारतातील फारशी, भारताबाहेरील मुख्यत्वे इराणची फारशी असा फारशीचा चौरस अभ्यास करणारे व केलेले पंडित आहेत, तसे माधवरावांचे नाही. माधवराव पटवर्धन हे फारशीचे जाणकार होते, प्राध्यापक होते, एवढेच खरे आहे. फारशीच्या अभ्यासात ते फार रमायला तयार नव्हते. पण त्यांनी फारशी-मराठी कोश रचलेला आहे. आणि तो फार महत्त्वाचा आहे.
 भोवतालच्या मुसलमानी अमलामुळे ही मराठीच फारशीने इतकी प्रभावित झाली आहे की, फारशी-मराठी कोशाशिवाय मराठी साधनेच वाचणे कठीण होऊन जाते. सतराव्या-अठराव्या शतकातील मराठी साधनांचा अर्थ लावण्यासाठी फारसी-मराठी कोश ही एक महत्त्वाची गरज होऊन बसलेली आहे. फारशी शब्द शुद्ध फारशी उच्चारणासह मराठीत येत नाहीत. त्यांचा उच्चार बदलतो आणि मराठीत त्या शब्दांचा अर्थही पुष्कळदा बदलतो. हा सर्व भाग लक्षात घेऊन म्हणजे अर्थसंकोच, अर्थविस्तार आणि अर्थपरिवर्तन तसेच उच्चारपरिवर्तन लक्षात घेऊन माधव ज्यूलियनांनी आपला फारशी-मराठी कोश रचला. हा कोश मराठी इतिहास संशोधनाचा महत्त्वाचा सहकारी राहिला. पण जी अडचण माधवराव दूर करीत होते ती मराठी कागदपत्रे वाचण्याची होती.
 मराठ्यांच्या इतिहासलेखकाला आवश्यक जोड म्हणून फारशी साधनांच्या भांडारात साक्षात घुसण्याचा उद्योग ज्या मंडळींनी केला त्यांच्यात ग. ह. खरे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले पाहिजे. फारशी कागदपत्रं मुळातून वाचणे आणि त्यांचा मराठी इतिहास-संशोधकांना वापर करता यावा म्हणन काळजीपूर्वक मराठी अनुवाद देणे या दृष्टीने ग. ह. खरे यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. पण खरे यांचे परिश्रम फारशी-कागदपत्रे इतक्यापुरतेच मर्यादित राहिले. यापुढील टप्पा सेतु माधवरावांनी गाठलेला आहे. जी साधने प्रकाशित आणि अनुवदित होती त्यांचा मुळापर्यंत जाऊन शोध घेणे, हे काम करीत असताना महत्त्वाची साधने मराठीत अनुवादित करणे हा उद्योग तर पगडींनी केलाच, पण त्या बरोबरच त्यांनी कागदपत्रांचाही शोध घेतला. ही प्रकाशित-अप्रकाशित वृत्तांत आणि पत्रे या दुहेरी स्वरूपाची साधने आणि मराठी साधने यांची संगती लावून मराठेशाहीचा इतिहास पद्धतशीरपणे मांडण्याचाही प्रयत्न त्यांनी केला, सेतु माधवरावांच्या रूपाने आपल्याला असा पहिला मराठी इतिहास-संशोधक दिसतो की जो व्यापक प्रमाणावर मराठी आणि फारशी साधने यांचा समन्वय करून संगती साधील आणि त्या आधारे मराठ्यांचा इतिहास अधिक साकार व संपूर्ण तर करीलच, पण त्या इतिहासाचे तितकेच सप्रमाण भाष्यही देईल.
 सेतु माधवरावांनी हे कार्य नंतरच्या काळात म्हणजे मुंबई राज्यात ते आल्यापासून मोठया नेटाने केले. हे काम त्यांना करता आले याची कारणे आहेत. मी सेतु माधवरावांचा डोळस चाहता आहे, त्यांचा आंधळा भक्त नाही. त्यांनी जे जे लिहिले ते निरपवादपणे बरोबर आहे किंवा निर्विवाद आहे असे मी म्हणणार नाही. पण या साऱ्या अभ्यासाचे एकूण मराठा इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्वही मी नाकारणार नाही. ज्ञानाच्या क्षेत्रात वादविवाद आणि मतभेद सारखेच चालू असतात. शिवाजी महाराजांची जन्मतिथी हा असा वादविषय आहे व्यक्तिशः सेतू माधवरावांनी आपले असे मत दिले आहे की, शिवाजी महाराजांचा जन्म बारा मार्च सोळाशे अठ्ठावीसला झाला असावा. सेतु माधवरावांनी शिवाजीविषयी विवेचन करताना, आरंभापासून महाराजांच्या डोळ्यासमोर राज्यनिर्मितीचे ध्येय नव्हते; क्रमाक्रमाने त्यांच्या मनाचा विकास झाला तसतशी स्वराज्याची कल्पना महाराजांच्या डोळ्यांसमोर नक्की झाली; असे मत दिले आहे. ही मते मला मान्य नाहीत. सेतु माधवरावांची मला मान्य नसणारी मते अजूनही पुष्कळ सांगता येतील. पण ज्ञानाच्या क्षेत्रात यापुढे फारसे काही बिघडत नाही त्यांनी नव्याने जुळवून दिलेल्या संगतीतील शेकडो मुद्दे आपल्याला मान्य असतात, अनेक मुद्दे अमान्य असतात, अनेक बाबतीत शंका असतात. ज्ञानाच्या क्षेत्रात ही चर्चा व मतभेदाचे प्रसंग अखंड चालूच असतात.
 पण सेतु माधवरावांच्यामुळे मोगल-मराठा संघर्षाचा एक फार मोठा पसारा अतिशय तपशिलाने आपल्या डोळ्यांसमोर साकार झाला. फारशीमधील सर्व साधने आणि कागदपत्रे ह्यांचा मराठी कागदपत्रांशी समन्वय लावून मोगल-मराठा संघर्षाचे एवढे तपशीलवार चित्र प्रथमच आपल्यासमोर उलगडत होते. जदुनाथ सरकारांनी शिवाजीचे चरित्र लिहिले ते चरित्र फार प्रसिद्ध आहे. सर्व फारशी साधने जमेला धरून आणि मराठी साधने विचारात घेऊन सेतु माधवरावांनी नव्याने इंग्रजीतून शिवचरित्र लिहिले. जदुनाथ सरकारच्या भाषेचा डौल आणि पल्लेदारपणा सेतु माधवरावांच्या चरित्र लिखाणात नाही. पण हा भाषाविलास सोडला तर असे दिसून येते की, जदुनाथांना समोर असलेला पुरावा डावलण्याची सवय आहे ; स्वतःच्या लहरीखातर पुराव्याचा चुकीचा अर्थ लावण्याची सवय आहे; जी साधने अत्यंत महत्त्वाची आणि विश्वसनीय असे ते नोंदवतील ती साधने डावलून आपणच जी साधने उत्तरकालीन अतएव अविश्वसनीय म्हणून नोंदविलेली आहेत त्यांचा स्वीकार करण्याची सवय आहे. असल्या प्रकारच्या दोषांमुळे एरवी भाषाशैलीमुळे जे चरित्र फार आकर्षक वाटते त्यात अनेक हेत्वाभास दडलेले दिसू लागतात. सेतु माधवरावांच्या चरित्रात नेत्रदीपक भाषा नाही, पण भरपूर, पद्धतशीर अशी बारकाव्याची माहिती आणि पुरावेसिद्ध विवेचनाचा सततचा प्रयास आहे. आज तरी इंग्रजीत सेतु माधवराव पगडी यांच्याइतके, शिवाजीची बारीक सारीक माहिती देणारे दुसरे अद्ययावत चरित्र नाही. डॉ. बाळकृष्णांचे चरित्र आता जुने झालेले आहे.
 सेतु माधवरावांनी केवळ शिवाजी नजरेसमोर ठेवला नाही. त्यांच्या डोळयासमोर सर्व मराठेशाही आहे. शहाजी राजांच्या राज्यापासून दुसऱ्या बाजीरावांच्या पदच्युतीपर्यंतचा सगळा इतिहास म्हणजे सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर आहे. हा मराठेशाहीचा इतिहास नीट समजून घ्यायचा असेल तर बहमनी, आदिलशाही, निजामशाही, हैदरअली व निजाम उलमुल्क आसफजहाँ आणि त्याचे घराणे एकीकडे, मोगल व रजपूत दुसरीकडे आणि युरोपियन सत्ता तिसरीकडे असा दोनशे वर्षांचा भारताचा इतिहास बारकाईने पिंजून काढावा लागतो. यासाठी सर्व साधने बारकाईने पाहावी लागतात. फारशी साधनांचा हा सर्व प्रचंड ढीग कष्टपूर्वक उपसायचा आणि तपासायचा तो महाराष्ट्र आणि मराठे यांच्या प्रेमाखातर आणि इतिहासजिज्ञासेच्या प्रेमाखातर ! म्हणून मी वर असे म्हटले आहे, या फारशी पांडित्याची पार्श्वभूमी महाराष्ट्रप्रेम आहे.
 सेतु माधवरावांनी फारशी साधनांचा मराठीतून अनुवाद हे एक महत्त्वाचे कार्य अंगावर घेतले. एकटे पाणीपत प्रकरण जरी लक्षात घेतले तर पाणीपताशी संबंधित असणारी अनेक फारशी साधने सेतु माधवरावांनी मराठीत आणली आहेत.औरंगजेबाचे समकालीन वृत्तांतकार साकी मुस्त्यारखान आणि बाबूराम सक्सेना यांचे लिखाण मराठीत आणले आहे. फारशी साधनांचा हा मराठी अनुवाद आणि सेतु माधवरावांच्या प्रेरणेने इतरांनी फारशी साधनांचे मराठीतून केलेले अनुवाद ही इतिहासाच्या अभ्यासाला मिळालेली एक देणगी आहे. आरंभीच्या काळात ज्या जाणिवा सेतु माधवरावांना नव्हत्या, त्यांची तीव्रता इतिहाससंशोधनात नंतरच्या काळात त्यांना जाणवू लागली. आपण इतिहासात मध्येच कुठेतरी एखाद्या व्यक्तीचे नाव घेतो. या व्यक्तीची संपूर्ण माहिती आपल्यासमोर नसते. उद्या जर एखाद्याने सहजगत्या असा प्रश्न विचारला की, सिद्दी जोहारच्या वेढ्यातून पन्हाळगडाहून महाराज पळाले, या सिद्दी जोहारचे पुढे काय झाले ? किंवा या कर्नूलच्या सुभेदाराचा आधीचा इतिहास कोणता? प्रत्येक व्यक्तीची सर्व उपलब्ध माहिती क्रमाने देणारे चरित्रविषयक टीपण ही एक महत्त्वाची बाब आहे. ज्या स्थळांचे उल्लेख सतत येत राहतात, त्या स्थळांचे तपशीलवार टिपण हा दुसरा भाग आहे. भूगोलाचा आणि इतिहासाचा दर क्षणाला समन्वय हा अजून एक भाग आहे. सेतु माधवरावांनी या दिशेने केलेल्या प्रयत्नांची काही महत्त्वाची फलिते आहेत.
 विजापूरच्या आदिलशाहीत पठाण पार्टी आणि दखणी मुसलमानांची पार्टी यांचा जो संघर्ष चालू होता, त्या संघर्षाचा मराठेशाहीच्या आरंभीच्या काळाशी अनुबंध सेतु माधवरावांच्या या उभे-आडवे धागे शोधण्याच्या धडपडीतून उजेडात आला. पराभूत करणे आणि समाप्त करणे या दोन बाबी वेगवेगळ्या आहेत. मराठ्यांनी आपले शत्रू जिवंत ठेवले, ते कधी समाप्त करण्याचा प्रयत्न केला नाही, ही टीका किती मर्यादेपर्यंत रास्त आहे ; दर क्षणी मराठ्यांची शक्ती किती होती या विषयीचे भानही याच लिखाणातून उदयाला आलेले आहे. सतराशे सातला औरंगजेब वारला आणि मग शाहूची सुटका झाली. या शाहूच्या ताब्यात तत्त्वतः आलेले राज्य आणि व्यवहारत: त्या राज्याची परिस्थिती याची जाणीवच आपणाला फारशी नव्हती. एकेका स्थळाचा इतिहास पाहत पाहत सेतु माधवरावांनी इ. स. १७०८ ते इ. स. १७३० या कालखंडातील मराठा राज्याचे मोठे विदारक वास्तव ठसठशीतपणे आपल्यापुढे प्रथम आणलेले आहे. शाहू आणि पेशवे यांच्या राजकारणाला आकार देणारे हे वास्तव आपण फारसे विचारात घेतलेले नाही.
 या प्रयत्नामधून सेतु माधवरावांनी पहिल्या बाजीरावांविषयी आपला अभ्यास सिद्ध केला या बाजीरावांच्याविषयी आमच्या इतिहाससंशोधकांना अभिमान पुष्कळ. पण या बाजीरावचे एखादे साधार इतिहासप्रमाण चरित्र मात्र अजूनही आपल्यासमोर उपलब्ध नाही. पहिल्या बाजीरावांच्या कार्याची तपशीलवार व बारकाईने पाहणी करणारा ग्रंथ मराठीतच काय पण इंग्रजीतसुद्धा उपलब्ध नाही. सगळे विवेचन अंदाजानेच चालले आहे. रियासतकार सरदेसाई आणि त्यानंतर अगदी अलीकडचे दीक्षितांचे चरित्र इतक्यावरच आपल्याला काम भागवावे लागते. या निमित्ताने श्री. सेतु माधवरावांना अशी विनंती करीन की, त्यांनी आता आपल्या उतारवयातील मोठा ग्रंथ म्हणून बाजीरावावर लक्ष केंद्रित करावे. सेतु माधवरावांच्या जवळ लिखाणाचा झपाटा मोठा आहे. आणि विषय अभ्यासून तयार आहे. त्यामुळे बाजीरावांचे प्रौढ चरित्र लिहिणे त्यांना मुळीच कठीण नाही. सर्व फारशी साधनांचा जाणकार बाजीरावावर लिहिण्यासाठी आवश्यक आहे. बाजीराव हे आपले दायित्व आहे, हे पगडींनी ओळखले पाहिजे.
 इतिहाससंशोधनाची आवड पगडींच्या जवळ मूळचीच होती. फारशी पांडित्य हेही त्यांनी कमावलेले होते. पण इतकेही जरी असले तरी आज जे लिखाण त्यांच्याकडून झालेले दिसते, ते त्यांच्या हातून झालेच असते असे नाही. चांगल्यातून कधी वाईट निपजते आणि वाईटातून चांगलेही निपजते. जुने हैद्राबाद संस्थान चालू राहिले असते, तर सेतु माधवरावांना एका प्रशासकीय जबाबदारीतून दुसन्या प्रशासकीय जबाबदारीत गुरफटून राहणे भाग पडले असते. मग त्यांना उसंतच मिळाली नसती. हैद्राबाद संस्थानाचे तीन तुकडे उडाले हे चांगलेच झाले. पुष्कळांना हे माहीत नाही की, सेतु माधवराव महाराष्ट्राचे आग्रही पुरस्कर्ते होते. हैद्राबादच्या साहित्य संमेलनात महाराष्ट्राचा ठराव त्यांनी आग्रहाने पुरस्कारलेला होता. मराठवाडा साहित्य परिषदेला एक व्यापक अशा मराठी आंदोलनाचे स्वरूप देण्यात त्यांचा पुढाकार होता. हैद्राबाद संस्थान संपले हे समाजाच्या दृष्टीनेही चांगले झाले, सेतु माधवरावांच्या दृष्टीनेही चांगले झाले. कारण यामुळे ते मुंबईनिवासी झाले प्रकाशनाची साधने त्यांना एकदम उपलब्ध झाली. पाहता पाहता सर्व महाराष्ट्रभर ते नामवंत वक्ते, इतिहासज्ञ आणि सिद्धहस्त लेखक म्हणून स्थिरपद झाले.
 हैद्राबाद राज्य संपले आणि नव्या मुंबई राज्यात मुंबईच्या सचिवालयात सेतु माधवराव दाखल झाले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या एका संमेलनाचा हा अध्यक्ष, मराठीतून अनेक ग्रंथ लिहिलेला हा माणूस याचा पश्चिम महाराष्ट्राला काही पत्ता नव्हता. त्यांचे अधिकृत नाव पी. सेतु माधवराव असे होते. नाटयमहोत्सवात शासनाने परीक्षक म्हणून त्यांची निवड केली. सेतु माधवराव या ठिकाणच्या गमती मोठ्या रंगून सांगतात. उरलेले दोन परीक्षक महाराष्ट्रीय होते. मराठी न येणाऱ्या या कानडी माणसाला शासनाने नेमावे ही गोष्ट उरलेल्या दोन्ही परीक्षकांना खेदाची वाटली. दोन परीक्षक आपापसात बोलत होते. काय मूर्ख सरकार, या कानडी माणसाला परीक्षक नेमले. या बिचाऱ्याला एक अक्षरही न समजता आता दहा-बारा दिवस हाल सहन करीत बसावे लागेल. अशी सहानुभूतीही या परीक्षकांना वाटली. अनुकंपा म्हणून आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीतून हे परीक्षक सेतु माधवरावांना मराठी नाटकही समजावून देत होते आणि पगडी रंगभूमीवरचे नाटक पाहत शेजारच्या या नाटकाचाही आस्वाद घेत होते. आपण ज्याला कानडी समजतो तो मराठीचा जाणता पंडित आहे हे उमगण्यास उरलेल्या दोन परीक्षकांना दोन दिवस वाट पहावी लागली. पश्चिम महाराष्ट्रातील जाणत्यांना मराठवाड्याची ही माहिती इ. स. १९५७ साली उपलब्ध होती.
 सचिवालयातील आसनस्थांना सेतु माधवराव सचिवालयात नको होते. हैद्राबाद राज्याच्या गृहखात्याचा मुख्य सचिव मुंबई राज्याच्या अर्थखात्याचा उपसचिव म्हणून सुद्धा नको होता. सचिवालयात मराठवाड्याचा माणूसच नको, अशी ही प्रेमळ भूमिका सचिवालयाची होती. म्हणून दर्जा सचिवाचा पण हातात सत्ता मात्र काही नाही. तुम्ही सचिवालयाबाहेर गॅझेट तयार करीत बसा, असे सेतु माधवरावांना सांगण्यात आले. हा एक प्रकारे आय. ए. एस. अधिकाऱ्यावर अन्यायच होता. पण सेतु माधवरावांनी वरदान म्हणून ही जागा स्वीकारली. हैद्राबाद राज्य अस्तित्वात असते तरी आणि मुंबई राज्यात न्यायबुद्धी असती तरीही सेतु माधवरावांना प्रशासनात गुरफटून टाकण्यात आले असते. सचिवालयाच्या बाहेर सेतु माधवरावांना काढणे आणि त्यांना सचिवालयात पुन्हा येऊ न देणे यात या चतुर मंडळींना यश आले. सेतु माधवराव मुंबई राज्यात प्रशासनात दीर्घ काळ होते. १९५७ ते १९६८ ही अकरा वर्षे ते मुंबईत आय.ए एस. म्हणून वावरत होते. यातला बहुतेक काळ त्यांनी गॅझेट तयार करण्यात घालविला. पण यात वाईटाचे चांगले फळ हे की, मराठी इतिहास संशोधन अधिक समृद्ध करण्याची क्षमता असणाऱ्या एका अभ्यासकाला इतिहासाला वाहून घेण्याची उसंत मिळाली.
 आता हे सगळेच इतिहासजमा झालेले आहे. जे घडून गेले त्याविषयी उगीचच खंत करण्याची माझी इच्छा नाही. आज माझ्या डोळ्यांसमोर सर्व गुणदोषांच्यानिशी जे सेतु माधवराव उभे आहेत ते महत्त्वाचे आहेत. मराठवाडा मुंबई राज्याला जोडला गेला. नंतर ज्या मराठवाड्यातील दोन-तीन मंडळींना महाराष्ट्रभर प्रतिष्ठा मिळाली आणि ज्या व्यक्तींच्यामुळे मराठवाड्याकडे एकदम आदराने पाहण्याची गरज सर्वांना निर्माण झाली, अशा मंडळीत सेतु माधवराव हे वयाने सर्वांत ज्येष्ठ असे आहेत. मराठवाड्याचा मान उजळ करणाऱ्या या मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्षाला माझे अभिवादन. सेतु माधवराव पगडी हे अभिवादन प्रेमाने स्वीकारतील अशी अपेक्षा आहे.