वाहत्या वाऱ्यासंगे/आजीच्या प्रेमाची गोडी

आजीच्या प्रेमाची गोडी



 अत्यंत दिमाखदार इमारत पाच मजली. इमारतीसमोर अष्टकोनी हौद आणि झुरमुरत्या कारंज्याची नक्षी . अवतीभवती ट्युलिप्सची रंगबावरी वेटे.
 विद्या, एल्के आणि मी अशा तिघी त्या इमारतीच्या दरवाजाजवळ गेलो, तो दरवाजा आपोआप सरकला . हे आधुनिक तिळा उघड ,तिळा बंद प्रकरण मला नवंच होतं. प्रवेशद्वारातून आत शिरताना मनात आलं...जर या क्षणी तिळा बंद झाला तर? पण अगदी सुरक्षितपणे आत पोचलो.
 शेजारच्या काचबंद खोलीत दोन स्त्रिया काम करीत होत्या. त्यांनी आमची दखल घेतली नाही. मग पुढे चालत राहिलो. पुन्हा एका प्रशस्त पण बंदिस्त बागेत आलो होतो. मांजरीच्या चेहऱ्यासारखी, आपल्याकडे नजर रोखून बघणारी तऱ्हेतऱ्हेच्या रंगातली फुलं जिकडेतिकडे फुलली होती . जांभळी , पिवळी , तपकिरी ,गुलाबी ,लाल, अशा फिकट गडद रंगातली ती फुलं पाहून मन अक्षरशः प्रसन्न झालं. या फुलांचे नाव आहे स्टेप मदर. सावत्र आई. या फुलांचे रोखलेले डोळे आणि सिंड्रेला किंवा हिमगौरीच्या सावत्र आयांचे डोळे यातलं साम्य मी शोधू लागले.
 एवढ्यात माझी नजर गेली त्या तीन आजोबांकडे . बागेत तीन खुर्च्यात हे तिघे बसले होते. तिघेही किमान नव्वदीपलीकडे गेलेले असावेत. अगदी पिकल्या फळागत त्यांचे चेहरे .नजर शून्यात पोचलेली. भूत,भविष्य आणि वर्तमानाच्या पल्याड गेलेली.
 असणे आणि नसणे या दोहोंच्या सीमेवरील ती भकास, निर्लेप ,शून्य नजर पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. इतक्यात एक वयस्क गृहस्थ आमच्याजवळ आला. एल्के त्यांच्याशी जर्मन भाषेत बोलू लागली. आमच्याकडे पहात तो काहीतरी विशेष बोलत असावा असे वाटले. तो गेल्यावर एल्केने एक निःश्वास टाकला नि म्हटले , ते आजोबा म्हणत होते की गेल्या कित्येक वर्षात एकाच वेळी दोनतीन स्त्रियांचे इतके ताजे आणि तरुण आवाज ऐकले नव्हते . त्यांना आपली बडबड खूपच उत्तेजक वाटली . तुमच्या रेशमी साड्या खप आवडल्या त्यांना, आपल्याला शुभेच्छा दिल्यात त्यांनी!
 ऐकता ऐकता माझे डोळे भरून आले. विद्या मुकी झाली. पाश्चिमात्य देशांतील वृद्धांची समस्या मी ऐकून होते. पण त्याचे इतके आर्त आणि निरागस रूप मला प्रत्यक्षात छेदून जाईल असे वाटले नव्हते.
 वृद्धांची समस्या आपल्याही देशात आहे .पण आपल्याकडे हरेक सामाजिक जखम झाकून टाकण्याची वृत्ती आहे आणि या सर्व सामाजिक जखमा झाकल्या-पाकल्यामुळे आतल्या सात सडून चालल्या आहेत . तो वृद्धाश्रम पहाताना गेल्या वर्षी ऋषिकेशला भेटलेली आजीवाई आठवली. लक्ष्मण झुल्याच्या अलीकडे अचानक मराठी शब्द कानावर आले . 'पांडुरंगा ,आमच्या देशाला वी पाऊस पानी हाय की न्हाई तूच जाने.' आणि आमची पावलं गचकन थांवली . मागे येऊन आम्ही आजीशेजारी बसकण घेतली.
 आजी सोलापूर-उस्मानाबादच्या खेड्यातली . नवरा तरुणपणी मेला . लेकरबाळ नाही. दहापाच वर्षे दिराच्या घरात कष्टात घालवली. एक दिवस दीर म्हणाला, वैनी गावातली माणसं देवाला जाताहेत . तुमीपण जा , मी पैसा देतो. यात्रा करताकरता सगळे हरिद्वारला आले. आम्ही केदारनाथ, बद्रीनाथ करून येतो. तवर तुम्ही इथेच थांबा. असे सांगून बरोवरीची मंडळी गेली. ती परत माघारी आलीच नाहीत.
 इस्टेटीचा वाद सोडविण्याचा खास मार्ग दिरांनी शोधून काढला. ही आजी गेली पंचवीस वर्षे इथेच आहे. १० वर्षापूर्वी एक मराठी भिकारी इथे आला. दोघे धर्माचे बहीणभाऊ एकमेकांच्या आधाराने त्या परिसरात रहातात .
 आमच्या घरात शहरातल्या आणि खेड्यातल्याही - वृद्धांना पूर्वी जी सुरक्षितता आणि पत होती. तो आज आहे का? या प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर शोधून आपणही वृद्धांच्या प्रश्नांकडे नव्याने पहायला हवे.
 जर्मनीतल्या या आश्रमातील वृद्धांशी प्रत्यक्ष बोलण्याची व त्यांची निवासस्थाने पहाण्याची संधी मिळाली नाही.
 मग एल्केने आम्हाला दुसऱ्या वृद्धाश्रमात नेले. खरं तर माझ्या दृष्टीने खरा वृद्धाश्रम मी काही क्षणातच अनुभवला होता.
 एल्केच्या गावचा वृद्धाश्रमही अत्याधुनिक होता . इथे खोली पहाण्याची आणि एका वृद्ध महिलेशी गप्पा मारण्याची संधी मिळाली.
 आम्ही दारावरची वेल वाजवली तर आजी आमची वाटच पहात होत्या. आजीचे हे घर खूपच सुबक होते. दारातून आत शिरताच डाव्या हाताला सुसज्ज न्हाणीघर. उजव्या हाताला कपड्यांचे कपाट आणि त्यापलिकडे चिमुकले स्वैपाकघर . स्वैपाकघर म्हणणे अयोग्यच होईल . कुकिंग रेंज आणि त्याला लगटून एक विलक्षण गोंडस शेल्फ, त्यावर जाम, जेली, चहा , साखर यांच्या नखरेल बरण्या . शेल्फच्या खाली छोटासा फ्रीज . तळमजल्यावर जेवणाची सोय आहे . पण वेळ घालवायचा म्हणजे चहा, कॉफी वगैरे टाईमपास हवाच. एक सुबक खोली कम् दिवाणखाना कम् बेडरूम. या खोलीत आजीचे सारे कुटुंब भिंतीवर , कपाटावर विराजमान झालेले दिसले. आजींनी स्वतः खपून तयार केलेले आधे पेंटिंग्ज इ .नेटकेपणाने मांडले होते. या आजी वृद्धाश्रमातील सर्वात तरुण. म्हणजे फक्त त्र्याहत्तर वर्षांच्या आहेत. या वृद्धाश्रमात एकूण तीनशे जणांची सोय आहे. पैकी फक्त चाळीस पुरुष आहेत. बाकी स्त्रियाच आहेत . काय कारण असेल या विषम संख्येमागे? स्त्रियांच्यात जीवनशक्ती जास्त असते का? आमची परिषद ज्या समाजकेंद्रात झाली होती, त्या मौलाफगावच्या केंद्रातही खूप वृद्ध स्त्रिया वसंतऋतू घालवायला आलेल्या दिसल्या. त्या मानाने पुरुष कमीच दिसायचे. आजींनी दिलेले उत्तर असे . पुरुष शिल्लक होते कोठे?
 आज सत्तरीपुढच्या लोकांना एकाकी जीवन सोयीस्कर वाटते. त्यांची मुलं. नातवंडे , सुना , लेकी अधूनमधून भेटून जातात . सारीच मंडळी नोकरी करणारी. त्यांच्या घरात आजींना करमत नाही . इथे अधिक मनासारखे जगता येते. आजींना मिळणारा वार्धक्य भत्ता या वृद्धाश्रमाचे भाडे देण्याइतका नाही. पण उरलेले पैसे मुलं भरतात. वेळेवर पैसे दिले नाहीत वा सबबीवर येथून घालवून दिले जात नाही.
 पश्चिम जर्मनीत हिंडताना खूप वृद्ध भेटले . मोझल नदीच्या काठावरच्या एका किल्ल्याच्या परिसरात एक विलक्षण दृश्य दिसलं. एक अगदी जख्ख म्हातारी , पांगळी आणि तिला धरून चालविण्याऱ्या दोन पंचाहत्तरीच्या वृद्धा. त्या तिला गोडीने चुचकारीत तर कधी वळजवरी करीत . बहुदा त्या तिला व्यायाम देत असाव्यात . वृद्ध वृद्धांना मदत करताना पाहिले, तरी मन कसनुसले.
 आणि तो ब्रेमन स्टेशनच्या दारात भेटलेला. म्हातारवावा, सुरेख व्हावोलिन वाजवून पैसे मिळवणारा! आमच्या घरी वर्षभर आमच्यातीलच. होऊन राहिलेल्या स्कॉटलंडच्या ब्राईडी रसेलचे उद्गार मला नेहमी आठवायचे . ती म्हणायची, शैला , तुमची कुटुंबसंस्था अजूनही खूप जिवंत आणि माणुसकीची आहे. ती अधिक सुदृढ व्हायला हवी. तुम्ही आमच्या पाश्चात्य देशातील स्त्रीमुक्ती चळवळीचा अभ्यास जरूर करा. पण तुमच्या मातीतच तुमच्या समस्यांची उत्तरं शोधा. स्त्रीचे स्थान कुटुंबात खऱ्या अर्थाने अधिकारी झाले, तर वृद्ध आणि लहान मुले यांच्या ज्या समस्या आमच्या देशात निर्माण होत आहेत , तेवढ्या त्या भयानक रूपात तुमच्या देशात निर्माण होणार नाहीत.
 आमच्या या जर्मन आजी दिसायला देखण्या आणि चोखंदळ . त्यांचा निरोप घेताना विद्या म्हणाली ,"तुम्ही सांगता म्हणून तुमचे वय त्र्याहत्तर म्हणायचे एरवी पन्नाशीच्या दिसता तुम्ही." दुसऱ्याच क्षणी उत्तरल्या त्या ,"अग! चार दिवसांनी येतीस तर तुझ्यापरिस दोनचार वरिसांनी मोठी दिसले असते. महिन्याच्या वावीस तारखेला मी माझ्या ब्यूटीपार्लरमध्ये जात असते. तेथे जाऊन आले की वीस वर्षांनी तरुण होते मी!" या उत्साही आणि तरुण आजीला मनात अगदी जपून ठेवलंय मी. आणखीन तीस बत्तीस वर्षानंतर अत्तरासारखी तेवढीच तरुण सोबत!
 इलाना आणि उदो हे ग्रेव्हन ब्रॉईशजवळच्या कॅपलेन या चिमुकल्या खेड्यात राहतात. आणि दोघेही डझलडॉर्फला नोकरीसाठी येतात. उदो तिथल्या अग्निशामक दलात नोकरी करतो.. तर इलोना एका कारखान्यात टायपिस्ट आहे .आमच्या वालसदनमधील चंदाचे हे काळजीवाहू पालक...फॉस्टर पेरेंटस् . मूलबाळ नाही. अवघं मन चंदात गुंतलंय . तिला भेटायला गेल्या चार वर्षात दोन वेळा भारतात येऊन गेले . मी चार दिवस त्यांच्याबरोवर खूप मजेत घालवलं.
 गेले त्या दिवशीच उदोच्या आईचा वाढदिवस होता . ८५ वे वर्ष लागणार होतं. आई डुझलडॉर्फला एका फ्लॅटमध्ये एकटीच राहाते. संध्याकाळी उदो इलोना बरोवर मीही शुभेच्छा द्यायला गेले . पाचव्या मजल्यावरच्या सुरेख घरात आई एकटीच राहात असली तरी आज तिच्या घरातल्या टेवलावर तऱ्हेतऱ्हेचे केक्स दिसत होते. आईचा चेहेरा रेशमी सुरकुत्यांनी वहरलेला . डोळ्यातून घनदाट माया सतत झरतेय. आज तिने गुलावी रंगाच्या फुलांचा नवा फ्रॉक घातला होता . तिच्या शेजारपाजारच्या तरुण मैत्रिणींनी केक्स आणून दिले होते . आई या संपूर्ण इमारतीत भलतीच लोकप्रिय आहे. परदेशातले हे शेजारपणाचे प्रेम मला जरा थक्क करून गेले . आईला इंग्रजी ओ की ठो येत नव्हतं. पण मी तिच्याशी भरपूर गप्पा मारल्या. आईने दोनही महायुद्धे खूप जवळून अनुभवली. त्यात मुलांचे वडील रशियाच्या कैदेत . आई माहेरी मुलांसह रहायची . रेशनवर एक पाव मिळायचा. आई , तिचे आईवाबा दिवसभरात पाण्यावरोवर एक एक तुकडा खायचे. उरलेला पाव मुलांना द्यायचे. उदोला ते पाण्यावरोवर खाल्लेले पावाचे तुकडे , त्यांची चव अजून आठवते. युद्ध संपले. जर्मन स्त्रियांनी प्रचंड परिश्रम केले.
 आई सांगत होती: आपण वसलो आहोत हा भाग वॉम्बहल्ल्यांनी पूर्ण वेचिराख झाला होता. आम्ही हाताला फोड येईस्तोवर काम केले इमारती बांधल्या. गाड्या चालवल्या. रस्ते बांधले. सगळा जर्मनी पुन्हा उभा केला. या भागांशी मी इतकी एकरूप झालेय की इथून कुठेच जायची इच्छा होत नाही. उदो, इलोना, मोठा मुलगा दर आठवड्यातून दोनदा तरी येऊन जातात. शिवाय माझ्या शेजारणी, त्यांची मुल माझी काळजी घेतात. आईने तिच्या मैत्रिणींची सांगितलेली हकीगत तर काळीज कुरतडणारी या मैत्रिणीचा नवरा रशियनांच्या कैदेत होता. तो १९५५ मध्ये ११ वर्षानंतर घरी परतला. तो येण्यापूर्वी सारे कुटुंव स्वागताची प्रचंड तयारी करीत होते. पण तो आला तो एक मानसिक रुग्ण वनून स्वतःच्या कोवळ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापर्यंत त्याची मजल गेली.
 या आईच्या घरात चंदाचा उदोनी काढलेला एक हसरा फोटो नजरेत भरेल असा ठेवलेला होता. मी परतताना आजीने माझे हात घट्ट धरून ठेवले नि सांगितले. "उदो, माझा धाकटा आणि म्हणून लाडका . त्याला मूल नाही. पूर्वी खूप खिन्न असायचा. पण चंदात तो आता गुंतलाय. इलोना फार गोड सून आहे . तीही चंदाला मनापासून चहाते . मी चंदाला नात मानते . आता माझे किती दिवस राहिलेत? तू पुढच्या वर्षी एक महिन्यासाठी चंदाला सुट्टीत इथे पाठवू शकशील? मी मग अगदी शांत मनाने . मृत्यूची वाट पाहीन.."
 आजी बोलत होती. ते ऐकता माझ्या मनात येत होते, भारतातल्या असो नाहीतर पश्चिम जर्मनीतल्या , सगळ्या आज्या सारख्याच !

܀܀܀