वाहत्या वाऱ्यासंगे/उत्तरांच्या शोधातले प्रश्न

उत्तरांच्या शोधातले प्रश्न


 त्या गावढ्या गावात रेखीव अक्षरात इंग्रजी सही ठोकणारी बाई सापडेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. रेणुका जी. शर्मा या बाईला पहाण्याची खूप उत्सुकता दाटली माझ्या मनात. आमच्या माताबालसंगोपन प्रकल्पाच्या वतीने सामशाला बैठक होती. गावातल्या बायका झाडून जमा झाल्या. आता एवढ्या बाया गुणिले पाचपट मुले ! शेवटी मी बारक्या पोरांना गाणी गोष्टी सांगून घुलवले आणि माझ्या इतर मैत्रिणींनी बैठक घेतली. आलेल्या महिलांची यादी केली च सह्या घेतल्या. सह्या कसल्या ? अंगठेच ! तर, त्या अंगठ्याच्या घेऱ्यात ती सुरेख सही पाहून मी चकित झाले. रेणुका सहीइतकीच आखीव रेखीव होती.
 "मी पी.यू.सी. झालेय ताई. पण आता मात्र सहीपुरतं इंग्रजी शिल्लक राहिलंय माझ्याजवळ." ती दुखरं हसू ओठावर आणीत म्हणाली. तिच्या कडेवरचं बाळ खूपच रडायला लागलं. मग घाईघाईनं तिला निघावंच लागलं.
 "कधी आलात औरंगाबादला तर जरूर या घरी. ही भेट काही खरी नाही हं !"
 मीही तिला मनापासून निमंत्रण दिले.
 त्यानंतर कधीतरी तिची आठवण यायची. पण थोडीफार मीही विसरून गेले होते तिला .
 एक दिवस धुवट पायजमा, डोक्यावर टोपी, कपाळावर गंधाची टिकली, गळयात सोनसाखळी, अशा वेशातला तरुण दबकत दबकत घरी आला. आणि त्यानं चिठ्ठी दिली,


 आदरणीय दीदी,
 तुमची नेहमीच आठवण येते. पण घराच्या व्यापातून कुठली आलीय सुटका ? येत्या रविवारी आमच्या शेतावर हुरडा खायला मुलांसह या. दुपारचं जेवण माझ्या घरीच घ्या, मी मनापासून वाट पहातेय.

तुमची
रेणुका जी शर्मा.

 मला वाटलं दुकानातल्या मुनीमावरोवर दिली असेल चिठ्ठी.
 "बाईंना सांगा मी निश्चित येण्याचा प्रयत्न करते. पण वाट पाहू नका. त्याच्याजवळ तोंडी निरोप दिला, तशी आग्रहाच्या स्वरात तो म्हणाला. "सचिनच्या ममीनं लई आग्रेवानं बोलिवलंय. तिचा हिरमोड करू नका. जरूर या. येताव आम्ही. " तो छपरी मिशीवाला तरुण चहापाणी न घेताच निघून गेला.
 रविवारी रेणू आमची वाटच पाहात होती. तिच्या उत्साहाला उधाण आले होते. सारखी हसत होती आणि धावतपळत होती. ऊस आणा, हुळा आणा, कोवळी वाळकं आणा.. असा घोष चालला होता. मी त्या वातावरणाने काहीशी सुखावून गेले.
 "रेणू, या आडगावात तुला पाहून खूप आश्चर्य वाटलं आणि वरंही वाटलं. अशा गावात खूप काम करू शकशील तू. पण इथवर पोचलीस कशी ? "
 "दीदी, धनवान माणसांच्या दानधर्म करण्याच्या रीतीही अशा असतात की त्या

ओझ्याखाली माझ्यासारखीचा वळी सहजपणे दिला जातो." रेणू वरकरणी हसत होती, पण स्वर दुखावलेला होता.
 " मी नाही समजले तुझ्या बोलण्याचा अर्थ." मी म्हणाले. खरोखरच मला तिचे बोलणे उमगले नव्हते.
 "दीदी कशाला जुन्या जखमा उकरून काढू मी? तुम्ही भेटलात. आलात. कित्येक विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्यात जीव सुपाएवढा झालाय माझा. आज आनंदाचा दिवस आहे. आज नकोत त्या जुन्या आठवणी ! एकेकदा राख फुंकरून निखारा फुलवला की तो लवकर शांत होत नाही.." रेणुकाला स्वतःविषयी बोलण्याची इच्छा नव्हती. मीही विषय बदलला.
 त्या दिवशी निमंत्रणाची चिठ्ठी द्यायला आलेला तरुण तिचा नवरा होता. तो स्वतः हुर्डा भाजायला बसला होता. अत्यंत नरम आणि गोड असा मऊचा हुर्डा खोवऱ्याची चटणी. साईचं दही कोवळा वाळकं. ओला टहाळ. रानातला मेवा समोर होता. माझी मुलं या नव्या मावशीवर खूश होती. माझं मन मात्र रेणूच्या मनाचा वेध घ्यायला उत्सुक होतं. तिच्या तुटक वोलण्याने

आतून हबकले होते.
 चतुर रेणूच्या ते लक्षात आले असावे. तिने हलक्या आवाजात मला विनवले. "दीदी, नाराज नका होऊ. औरंगाबादला येईन तेव्हा डोक्यावरचं ओझं तुमच्याच समोर मोकलून बसणारेय मी. डोक्याला हा भार कधी कधी पेलवत नाही. खूप बोलायचंय मला तुमच्याशी. खूप"
 आणि एक दिवस खरोखरच रेणू आली. मुलं घरी ठेवून आली. रात्रभर राहिली. रेणू बोलत होती नि मी ऐकत होते.
 "...मी आइच्या पोटात होते तेव्हाच माझे वडील वारले. जेमतेम सोळा वर्षाची होती आई. ब्राम्हणाची जात आधीच सनातनी त्यात तिच्या माहेरी दारिद्र्य ती अडाणी बाई काय नोकरीधंदा करणार होती ? तिने हाती पोळपाटलाटणे धरले. मारवाडी समाजात ब्राह्मणांना खूप मान देतात. ज्या घरी ती स्वैपाकाला राहिली, त्या शेटजींनी तिला वहीण मानले. घरच्या स्त्रिया तिला रसोईवाल्या बाईजी या नावाने वोलवीत. मान देत. हे काम इज्जतीचे होते. त्यांच्याच वाड्यात एक खोली आम्हा मायलेकींना दिली होती. त्या घरच्या लेकरांबरोबरच माझेही नाव शाळेत घातले गेले. वर्गाची एकेक पायरी सहजपणे चढत गेले. लहानपणापासूनच मला घरकामाचा फार कंटाळा. अभ्यास मात्र मनापासून आवडे. दरवर्षी वर्गात मी पहिली येई. पण माझ्या हुशारीचं कवतीक ना माझ्या आईला की ना तिच्या मालकिणीला . लेकीच्या जातीनं कसं भरपूर काम करावं, शिळंपाकं खाण्याची सवय ठेवावी असं त्यांना वाटे. मी कळती झाल्यावर माझ्या लक्षात आले की जर मी कामाला हात लावला नाही तर माझं शिक्षणही बंद होईल. त्या धास्तीने मी घरकामही रेटून करू लागले. रात्री अभ्यासासाठी जागू लागले. दहा माणसांचं घर. त्यातून बड्या मालदाराचं. नेहमीच पैपाहुण्यांनी भरलेलं. त्यातून आमचा समाज धार्मिक. बारा महिन्यांचे अठरा सण. व्रतवैकल्यांची तर खैरात असे. माझी आई मला पूजापाठ कसा करायचा, कहाण्या कशा सांगायच्या, कोणत्या व्रताला कोणता स्वैपाक करायचा, त्याची बारकाईने माहिती देई. त्या तसल्या वातावरणात मी सातवीला वोर्डात पहिली आले. मालकांचा धाकटा मुलगा पुण्याच्या लॉ कॉलेजला शिकायला होता. त्याला माझ्या हुशारीचे अप्रुप वाटे. तो सुट्टीला येताना माझ्यासाठी पुस्तकं आणी.. मॅट्रिकला ७९% गुण मिळवून मी पास झाले. हट्टाने कॉलेजला गेले. मालकांचा मुलगाही वकिली करू लागला होता. त्याच्याहून मोठा मुलगा दुकानावर असे. दुकानाच्या प्रचंड नफ्यापुढे वकिलीचे पैसे त्यांना चिरीमिरीसारखे वाटत. "म्हाका वकिलसाव दिनभर वड्डीबड्डी किताबां बाँचर थक जावे. कोरटमा जार आया की, व्याका काळा कोटमा देखण जावाँ तो दसकी पत्ती भी कोनी मिलवाकी .( आमचे वकीलसाहेब जाडजाड पुस्तकं घेऊन बसतात, पण कोर्टातून आल्यावर खिसा चाचपावा तर दहाची नोट देखील त्यात सापडत नाही !") अशी कुचेष्टा त्यांची भाभी आणि इतर मंडळी करीत. त्यांच्या मनात माझ्याविषयी नाजूक भाव असावा. एक दिवस तो कॉलेजच्या कॉर्नरवर मला भेटायला आला. पण काय बोलावं हे त्यालाही कळलं नाही आणि मलाही कळलं नाही. हृदयातील ती वेगवान थरथर ... प्रचंड वादळात सापडलेल्या सायलीच्या वेलीसारखी. ती मात्र अजून आठवते. "
 वोलता बोलता रेणू क्षणभर थांबली.
 "आम्ही कॅन्टीनमध्ये चहा प्यायलो. आणि काही नाही. बस्स ! परीक्षा जवळ येत होती. डॉक्टर होण्याची नशा माझ्यावर चढत होती. थंडीचे दिवस संपले होते आणि शेटजींना पुण्य कृत्य करण्याची लहर आली. शेटजींना. विशेषकरून शेटाणीजींना. त्यांना चार लेकी . त्याही शादीशुदा . आपल्या हिंदू समजुतीनुसार पंचकन्यांचे कन्यादान केले की फार मोठे पुण्य लाभते. मोक्षमार्गातील अडथळे दूर होतात म्हणे! आणि आवश्यक असलेली पाचवी लेक घरातच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आयुष्यभर त्यांच्याच अन्नावर वाढलेल्या आम्ही मायलेकी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. विरोध करण्याची कल्पनाही आईला सहन झाली नसती. आणि मी?
 माझं मन खूप फडफडले, तडफडले. आकाशात झेपावण्यासाठी पंखात जरा कुठे बळ येतेय असे जाणवत असतानाच पंख कापून काढावेत तशी मी. माथ्यावर अथांग पण सुन्न आभाळ. माझी आई मात्र खूप खूश होती. तिला वाटे की ती रांडमुंड बाई. पाठीला आधार नाही. पोटाला लेक मुलगा नाही. माहेर नाही. त्यात पदराशी न्हातीधुती लेक. 'तिच्यासाठी कोण शोधणार चांगला मुलगा? पुन्हा हुंड्यासाठी पैंकाअडका कुठून आणणार? शेटाणीजींच्या उपकाराखाली ती पार वाकून गेली होती.
 मीही मुकाट्याने बळी जायचे ठरवले. आधाराची आशा असेल तर आकान्ताला अर्थ! पण जिथे आधारच नाही तिथे तमाशा कशाला करायचा? सगळ्या सोपस्कारांना मी सामोरी गेले. समोर आला त्याला माळ घातली तो कोण? कसा? काही चौकशी केली नाही. सचिनचे बाबूजी चौथी पास आहेत. त्यांना मायबाप नाहीत. म्हाताऱ्या आज्याने सांभाळ केला. घर आहे. पंधरा एकर पाण्याखालची शेती आहे. वाड्यात दुकान आहे किराणासामानाचं.
 नांदेडसारख्या शहरातून या आडगावात सामशाला आले. आजेसासरा एवढा खडूस की रोज चहासाखर काढून ठेवी. सर्व सामानाला कुलूप लावी. मी पुस्तक वाचलेलं खपत नसे. एकदा मासिक वाचत होते, तर हातातला अंक चुल्हाणात फेकून दिला त्यांनी. सचिनचे वडील समंजस आहेत. त्यांना माझ्या शिक्षणाबद्दल आदर आहे. गेल्या आठ वर्षात मीही या घरात रुळले आहे . उरातल्या जखमा झाकून जगायला शिकले आहे.
 पण... पण कधी कधी जीव इतका गुदमरून जातो की, तुळशीवृंदावनाच्या तळाशी पुरलेली स्वप्नांची भुतावळ समोर येऊन नाचू लागते. शेटजी आणि शेटाणीजीला पुण्य मिळालं की नाही ते देवच जाणे! पण, मी शिकले असते तर आज कुठे असते? कोण झाले असते?"
 गाडीला ब्रेक बसावा तशी रेणू थांबली.
 मी डॉक्टर नक्कीच होऊ शकले असते. माझा नवरा कसा असेल? माझं घर कसं असेल?
 माझ्यासमोर उत्तरांच्या शोधातले अनुत्तरित प्रश्न होते. कुणाजवळ आहेत त्यांची उत्तरं?

܀܀܀