वाहत्या वाऱ्यासंगे/तरल संवेदनक्षम मनावर उमटलेले आल्हादकारक दवबिंदू
प्रा. शैला लोहिया यांच्या वीस लेखांचा 'वाहत्या वाऱ्यासंगे' हा संग्रह. हे लेख निसर्गवर्णनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक आणि आत्मपर स्मरणरंजनात्मक असले तरी त्यांचा बाज प्रामुख्याने ललित लेखनाचा आहे. निसर्गाच्या विविध रूपांमध्ये हरवून जाणाऱ्या, तरल संवेदनाशील मनाच्या कमलपत्रावर उमटलेले, ऋतुचक्रातील बदलत्या विभ्रमांचे, डोंगरदऱ्यांचे, पानाफुलांचे, ऊनपावसाचे आल्हादकारक दवबिंदू म्हणजे हे भावकोमल लेख. पाचही इंद्रियांच्या सजग साक्षात्कारी चेतनेतून अवघ्या आसमंताला लडिवाळपणे कवेत घेण्याची किमया येथे सहजपणे साधलेली आहे. घटापटाचा आटापिटा येथे नाही. आहे तो अगदी मोकळ्या मनाने जे दिसेल त्याला सामोरे जाण्याचा स्वच्छंद स्वागतशील भाव. श्रावण, भाद्रपद, वसंत ऋतू, आषाढघन यांच्या रंगरूपांचा मनसोक्त वेध घेताना जशी शैलाताईंची काव्यात्म शब्दकळा अनावर आवेगाने उसळून येते त्याचप्रमाणे घरातल्या देशभक्तीच्या आणि राष्ट्रसेवादलाच्या वातावरणामुळे संस्कारित झालेल्या व्यापक सामाजिक जाणीवेच्या आणि माणुसकीच्या लोलकातून पाहताना समाजात रुजलेल्या विषमतेच्या, अन्यायाच्या, रूढींच्या, अंधश्रद्धांच्या पारंपरिक जोखडाखाली घुसमटलेल्या महिलांच्या कहाण्याही त्यांना अस्वस्थ, बेचैन करून टाकतात. स्वत:च्या स्त्रीत्वाचे व सामर्थ्याचे एक उपजत भान त्यांच्यात आहे आणि सद्य:कालीन स्त्रीमुक्तिवादाच्या विविध संकल्पनांद्वारे एक सैद्धांतिक व चिंतनशील बैठक त्याला लाभली आहे, त्यामुळे या लेखांचे स्वरूप तिपेडी झालेले आहे. पस्तीसेक वर्षांच्या कालावधीत लिहिले गेलेले हे लेख; पण याच तिपेडी अंत:सूत्रांमुळे ते सर्व एकमेकांशी घट्ट बांधले गेले आहेत. एका विदग्ध, तरल सामाजिक जाणीवेने संपृक्त अशा व्यक्तिमत्त्वाच्या परीसस्पर्शाने अभिमंत्रित झालेल्या शब्दकळेचा आणि भावसमृद्धीचा हा आविष्कार वाचकाशी सहजपणे सूर जुळवतो. संवाद साधतो.
प्रा. शैला द्वारकादास लोहिया या पूर्वाश्रमीच्या शैला परांजपे. धुळे येथील समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते ॲड. शंकरराव परांजपे आणि सौ. शकुंतला परांजपे यांच्या कन्या. लहानपणापासून घरात राष्ट्रसेवादलाचे संस्कार. राष्ट्रसेवादल कलापथकाचे कार्यक्रमही त्या काळात जोरात चालत. त्या निमित्ताने वसंत बापट, सुधाताई वर्दे, शाहीर लीलाधर हेगडे, निळू फुले, राम नगरकर, इंदू लेले यांचे खानदेशातले दौरे होत, तेव्हा ॲड. परांजप्यांचे घर हे त्यांच्या अतिथ्यात कसलीही कसर राहू देत नसे. साने गुरुजी नाथ पै, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, आचार्य केळकर, मधु दंडवते, भाऊसाहेब रानडे, ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, यदुनाथ थत्ते, मधु लिमये, राष्ट्र सेवादलाचे डॉ. अंबिके, श्याम पटवर्धन यांचा खानदेशातला दौरा ॲड. परांजपे यांच्या घरापासूनच सुरू होई. परांजपे वकील होते. वकिली करीत, परंतु वकिली हा फावल्या वेळातला उद्योग असा त्यांचा जणू खाक्या होता. समाजवादी पक्ष, राष्ट्र सेवादल, कलापथक, विविध चळवळी, स्थानिक प्रश्नांवरची आंदोलने, महिला सदन, अडल्या-नडल्यांना सर्व प्रकारचे सहाय्य यातच परांजपे दांपत्य दंग असे. त्यामुळे त्यांचे घर हे सामाजिक पाहुण्यांनी बहरलेले असे आणि कार्यकर्त्यांच्या अनौपचारिक गाठीभेटींची तेथे वर्दळ असे. नवनव्या आंदोलनउपक्रमांच्या तपशीलवार योजनांवर येथेच अंतिम हात फिरे.
या वातावरणात वाढलेल्या प्रकाश व शैला या भावंडांवर सामाजिक आणि कलात्मक जाणीवांचे संस्कार लहानपणापासूनच होणे स्वाभाविक होते.
'शकुंतलाबाईना त्रास देणारा एकुलता एक डिंकाचा लाडू,' अशा छोट्या शैलाला कलापथकाच्या तालमीतले मुलींचे दमदार पदन्यास, तालाचा धुंद ठेका, लीलाधरचा खडा शाहिरी आवाज ऐकून आपणही गावे, नाचावे असे वाटावे यात नवल कसले ? आईनेही दहा वर्षाच्या शैलाला श्रीपादशास्त्रींकडे गाणे शिकायला पाठवले. आवाज चांगला होता. संगीत विशारदपर्यंत मजल गाठली. पण गायक म्हणून गाणे आत्मसात करण्याबाबत मात्र उत्साह दाखवला नाही, असे त्या स्वत:च म्हणतात. पुढे राष्ट्रसेवादल कलापथकात मात्र त्यांनी भाग घेतला.
महाविद्यालयात असतानाच त्यांनी लेखन सुरू केले. आपल्या मनातले भाव प्रकट करण्यासाठी कविता आणि ललित लेख यांचा आश्रय घेतला. १९६०-६१ मध्ये मी एस.एम. जोशी यांच्या संपादनाखाली निघणाऱ्या दैनिक लोकमित्रच्या रविवार पुरवणीचे काम पाहत होतो. शैला परांजपे यांनी कवितांबरोबर पाठवलेल्या पत्रात 'कॉलेजात शिकणाऱ्या मुलीच्या या कवितांना न वाचताच केराची टोपली दाखवू नका.' अशा आशयाचा काही मजकूर होता. त्याचे उत्तर पाठवताना मी म्हटले : चांगल्या साहित्याच्या शोधात संपादक असतात. तेव्हा संपादक न वाचताच नव्या लेखकांच्या लिखाणाला केराची टोपली दाखवतात असा चुकीचा समज बाळगण्यचे कारण नाही. त्या पत्राचे उत्तर आले. नव्या कविताही आल्या. लोकमित्रमध्ये त्यातील काही कविता प्रसिद्ध झाल्या. पुढे महाराष्ट्र टाइम्समध्येही मी रविवार पुरवणीचे काम पाहत असताना, शैलाताईचे काही ललित लेख प्रसिद्ध केले.
त्यांच्या लेखनाची शैली काव्यात्म होती. इंदिरा संतांच्या कविता, दुर्गा भागवतांचे ऋतुचक्र, पाडगावकर-बापट यांचे काव्य यांचा प्रभाव त्या लेखनात जाणवत होता. कल्पनांचा पिसारा, प्रतिमांचा पसारा, खळाळता उत्साह, चैतन्याचा प्रवाह त्यामधून जाणवत होता.
पुढे डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याशी प्रेमविवाह करून त्या सौ. शैला लोहिया झाल्या. अंबाजोगाईला स्थायिक होऊन महाविद्यालयात अध्यापन करू लागल्या. पतीपत्नी दोघेही सामाजिक बांधिलकीच्या भावनेने समर्पण वृत्तीने विविध उपक्रमांचे आयोजन करीत राहिले. मानव लोक व मनस्विनी या संस्थांद्वारे त्यांनी अंबाजोगाई परिसरातील परित्यक्तांना आधार दिला; गरीब मुलांना शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दिल्या. अवतीभवतीच्या ग्रामीण क्षेत्रात नियमित वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी योजना आखल्या. त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरही महिला बालकल्याण कार्याशी संपर्क ठेवून सतत वैचारिक व सामाजिक भूमिका अद्ययावत राहावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अंबाजोगाईला जाऊन त्यांच्या कार्याची झलक पाहण्याचा योगही मला आला. त्यांच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही गौरव झाला. आंतरराष्ट्रीय महिला परिषदांच्या निमित्ताने परदेशांचे दौरेही झाले. आत्मशोध, आत्मचिंतन अखंड चालू राहिले. आणीबाणीच्या काळात डॉ. द्वारकादास लोहिया यांना कारावास घडला.
राष्ट्रसेवादलाच्या व कलापथकाच्या माध्यमातून समूह जीवनाची सर्वस्पर्शी अनुभूती संवेदनाक्षम वयातच खोलवर रुजल्याने सामाजिक न्याय, समान संधी, सर्वधर्मसमभाव, स्त्रीपुरुष समानता, लोकशाही समाजवाद, राष्ट्राभिमान, श्रमप्रतिष्ठा यांच्याविषयीचे भावनात्मक अधिष्ठान पक्के झाले आणि सांस्कृतिक संक्रमण तळागाळापर्यंत पोचवण्यातले थ्रिलही जाणवले. "कलापथकाने आमच्या स्वप्नांना पाय दिले आणि सहजीवनाचा पाठ गिरवतानाच जीवनसाथी निवडण्यासही प्रोत्साहन दिले." तृणमूल कार्यकर्ता (ग्रास रूट वर्कर) लोकांचा सहभाग (पीपल्स पार्टिसिपेशन) वगैरे कल्पना सेवादलाच्या माध्यमातून फार आधीपासून प्रत्यक्षात आल्या होत्या. त्याच जोडीला साहित्याच्या अभ्यासामुळे एकूण जीवनाकडे आणि विशेषत: स्त्रियांच्या जीवनाकडे बारकाईने पाहून, त्यांच्या व्यथावेदनांचा वेध घेण्याचेही वळण मनाला आपोआप लाभले. बेशरमीची झाडे, उमलतीचे रंग, फुंकर हे या पुस्तकातील लेख त्याची साक्ष देतात.
शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलींचे एक शिबिर उदगीरला आंतरराष्ट्रीय बालिका वर्षानिमित्त घेतले जाते. त्यासाठी धुळे परिसरातील काही मुलींना शैलाताई घेऊन जातात. जीपमध्ये त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यातून त्या त्या मुलीच्या घरच्या परिस्थितीचीही माहिती उलगडत जाते. हेमाच्या घरची स्थिती इतकी गरीबीची की पाटीपुस्तकासाठीही तिला पैसे मिळत नाहीत. तशात मास्तर मारकुटे. पाळी सुरू झाल्याने मंगूची शाळा सुटते. सावत्र बाप, आई कामाला जाणारी, त्यामुळे मुलांकडे घरी कुणीतरी पहायला हवे म्हणून अलकाची शाळा बंद. वर्गातल्या राजूचे प्रेमपत्र आले म्हणून सरोजचे नाव शाळेतून काढले जाते.
अशा या कहाण्यांतून सामाजिक वास्तवाचा एक विदारक पट उभा राहतो. नकुशा हा चित्रपट पाहताना श्रीमंताघरच्या मोनिकाच्या मनातली अस्वस्थतेची भावना उसळून डोके वर काढते. या चित्रपटात अनेक मुलींच्या नंतर जन्माला आलेल्या आणि आईवडिलांना नकोशा वाटणाऱ्या मुलीचे जीवन दाखविले आहे. ते पाहून मोनिकाला जाणवते की, अरे मी तर खूपच सुखी आहे. नशीबवान आहे. मला हवे ते सहजी घरी मिळते. ... या मुलीला किती कष्टाने जगावे लागते. हा एक सामाजिक मानसिक धक्काच असतो आणि तो तिला वास्तव जगाचे भान देतो. घरात मुलगी होणे हे अनेक कुटुंबात आजही अपराधीपणाचे ठरते. मुलींची हेळसांड होते.
शैलाताई स्त्रियांच्या जीवनातल्या अशा अनेक दुखऱ्या भागांकडे लक्ष वेधतात. सुधारक मुस्लिम कुटुंबात वाढलेल्या मोहसिनाला बी.ए. बी.एड. झाल्यावर शिक्षिकेची नोकरी मिळते. नवरा मुंबईत इंजिनियर. मूलतत्त्ववाद्यांच्या विचारांची लाट आल्यावर सासरा तिला सांगतो : आजसे बहू बुर्का पहनके कॉलेज जाएगी. ती नाइलाजाने रस्त्यातून गोषा घालून जाते. तिचाच आदर्श ठेवून वर्गातल्या मुस्लिम मुलीही गोषा घालून येऊ लागतात. तिला भयंकर दुःख होते. आपण पराभूत झालो याची टोचणी तिला वाटते. ती शैलाताईंना म्हणते, "मॅडम, माझं बुर्का पहेननं पाहून माझ्या कॉलेजातल्या माझ्या जमातीच्या मुलीही आता बुर्का पहेलू लागल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रश्न उभे आहेत. त्यांचं दुःख मला खुप बोचते."
तिचे सुधारक मनाचे वडीलही तिला सासरशी जुळवून घ्यायला सांगतात तेव्हा ती अगदीच हताश होते.
उर्मिलाचा नवरा क्लासवन ऑफिसर. हौशी, रंगेल. प्रणयाचे रंग गडद होण्यासाठी मद्य आवश्यकच असे मानणारा. बाळंतपणासाठी माहेरी गेलेली उर्मिला म्हणते, "तीन महिन्याच्या गौतमीला घेऊन घरी आले तेव्हा लक्षात आलं की नवरा दारूच्या कवेत गेलाय आणि दारू घेतली की त्याला बाई लागतेच. मग ती कुणीही असली तरी चालते. मीही त्याच्या दृष्टीने बाईच होते. पण आई झाल्यामुळे माझ्यातले बाईपण हरवत चालले होते. त्याला जे हवं असे ते मला देता येत नसे. मग काय वाट्टेल ते ! ..." ही उर्मिलेची व्यथा आहे. तिला एकटे एकटे वाटते. गौतमीला भावंड असावे- पण ते देण्याची ताकद या दारूमुळे संपली आहे हे वास्तव लक्षात घेऊन उर्मिला म्हणते,
"माझ्या घरात परदेशी टेपरेकॉर्डर आहे, टेप आहे, मिक्सर आहे, फ्रीज आहे. खूप काही आहे... मीही आहे."
फ्रीजवर ठेवलेला चकचकीत प्लॅस्टिकचा फ्लॉवर पॉट बनून इथेच राहू का ? असा प्रश्न तिला आपल्या मैत्रिणीचा सुखी संसार पाहून पडतो. स्वत:च्या अस्तित्वाचा शोध तिला घ्यायचा आहे. हवं असलेलं घर आणि हवी असलेली पायाखालची जमीन मिळवण्यासाठी ती मैत्रिणीकडे मदत मागते आहे.
केरळमधल्या राजलक्ष्मीची समस्या वेगळीच आहे. तिचे वडील मुंबईला रेल्वेत नोकरीला. तिची आई त्रिवेंद्रमला नर्स असताना त्यांचा आंतरजातीय विवाह झाला. वडिलांनी राजलक्ष्मी व तिची आई यांची राहण्याची व्यवस्था धुळे येथे केली. वडील अचानक वारले. या मायलेकींना धुळे सोडून केरळमध्ये जाणे भाग पडले. तेथे त्या दोघी सासरच्या अपरिचित वातावरणात कशा जगात असतील असा प्रश्न राजलक्ष्मीची मैत्रीण म्हणून लेखिकेला पडतो.
ठाकर जमातीत विशीतल्या शोभाचा नवरा पन्नाशीतला. तोही क्लीनर, दीड वर्षानं तिला मूल झाल्यावर दुसऱ्या बाईला घरात आणतो. कोर्टात तिची केस स्त्री हक्क समिती लढवायचे ठरवते.
"....हम औरता तो क्या, बेशरमीकी झाड हां, किती बी तोडा किती बी कापा. अमाले पानं फुटायचीच." असं म्हणणाऱ्या सकीनाचा बिनतोड युक्तिवाद निरुत्तर करणारा आहे.
"भाबी, माँ के घरमें कौन है अपना ? इनके पल्लों में डाल दिया है. इधरीच ठीक है. आन जाणार कुठं मी? मी मेले तरी यानला बायकू भेटेल. पन पोरानला माय मिळेल का? तुम्ही एवढ्या शिकला. भाईर जाता. भासनं देता. पण दादा वसकतातच ना तुमच्या अंगावर?"
ग्रामीण स्त्रियांच्या समस्यांना हे असे अनेक पदर आहेत. ग्रामीण स्त्री ही अनेक आघाड्यांवर लढत असते. चूल सारवण, लेकरांच संगोपन, सडाअंगण, खाणंपिणं, जनावरांची देखभाल, गवऱ्या थापणं, शेतातली कामं, पेरणीसुगीची धावाधाव, लाकूडफाटा आणणं, तुरांट्या रचून ठेवणं, डाळीसाळी करणं, शेंगा फोडणं, बैलामागं उभं राहणं, शेतात दारं धरणं, बाजारात माळवं विकायला जाणं, मळणी उफणणी करणं. फाटक्या पदराचा आडोसा लेकरांना करून सावली देणाऱ्या, त्यांना वाढवणाऱ्या या बाया ही सगळी यातायात करताना स्वतः निष्पर्ण वृक्षासारख्या वठून जरठून जातात, असे सांगून शैलाताई प्रश्न करतात : जीवनात माणूस म्हणून जगताना, मनात उगवलेल्या इच्छा, आंकाक्षा, स्वप्नं इतक्या निर्मळपणे फेकून द्यायला कोणी शिकवलं यांना ? धर्मानं? समाजानं ? की त्यांच्यातल्या मातृत्वानं ?
स्त्रीजीवनाच्या अशा वेगवेगळ्या अंगांना व समस्यांना प्रत्यक्ष स्त्रियांच्याच कहाण्यांद्वारे शैलाताई स्पर्श करतात. त्या समस्यांच्या जटिलतेची जाणीव देतात. आपली पारंपरिक मानसिकता, सामाजिक व आर्थिक चौकटीची जाचकता आणि एकूणच परिस्थितीची अपरिहार्यता यांच्या प्रचंड दबावाखाली आजच्या महिलांना जगावे लागत आहे आणि शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, स्वातंत्र्य या संभाव्य उत्तरांच्या मर्यादाही ध्यानी येत आहेत.
शैला लोहिया यांच्या सामाजिक जाणिवा प्रखर आहेत, त्यांच्या काव्यात्म संवेदनाक्षमतेची तरलताही वेधक आहे. निसर्गाच्या, ऋतूचक्राच्या विविध विभ्रमांनी त्या अंतर्बाह्य प्रभावित होतात, भावनात्मक आणि वाङमयीन पारंपरिक संदर्भानी समृद्ध अशा वसंत, हेमंत, शिशिर, वर्षा इत्यादी ऋतूंचा तसेच आषाढ, श्रावण, भाद्रपद आश्विन वगैरे महिन्यांतील सणउत्सवांचा वेध घेताना त्यांची शब्दकळाही बहरून येते.
"गर्द सावळ्या आभाळाची खिल्लारे सैरावैरा भटकू लागतात, तसतशा रानातल्या जांभळी तुरटगोड गरांनी गदरायला लागतात." (जांभूळ झाडाखाली, पृष्ठ ५७)
आश्विन थंडीबरोबर रानातल्या तुरीवर पिवळा फुलोरा लागतो. नवी साळ तयार होत आलेली असते. अशा वेळी येणारा हा भुलाबाईचा उत्सव म्हणजे जणू भूमीच्या उर्वरा शक्तीच्या, तिच्यातील सर्जनशक्तीच्या सत्काराचे प्रतीकच ! ( हा भाद्रपदाचा महिना, पृष्ठ ७२)
उन्हाचे बाभूळ आता चांगलेच फोफावलंय. अशी लखलखीत उन्हे की पहाता क्षणी नजर भाजून निघावी. अशा या उन्हात दारासमोरच्या गुलमोहराचे लालचुटूक छप्पर नजरेला थोडा थंडावा देते. एक थंडगार गंधदार झुळूक घामेजल्या अंगावर कुंकर घालून जाते. मान्सून ढगाचे गडद सावळे छायाचित्रच समोर दिसले आणि माझ्या नाकाला मातीचा खमंग गंध - आकाश आणि माती यांच्या पहिल्या भेटीचा मादक गंध हुळहुळून गेला. (आंब्याच्या कोयीवरून घसरताना, पृष्ठ ७३)
मृगाच्या स्पर्शानी या काटेरी वनाला जाग येते. बोचऱ्या काट्यातून तरल चैतन्याचे पाट वाहू लागतात. त्या उन्मादाच्या भरात, गंधवती धरेच्या कणाकणातला सुगंधरस पिऊन केवडा बेहोष होतो. सरता ज्येष्ठ आणि आषाढाच्या ऐनातले ओढाळ पाणी पिऊन सुखावलेल्या पानांच्या मधोमध अपार गंधाची कळी आकारू लागते. पिवळ्याधमक सोनसळी रंगाचे झगमगीत सोनकणीस डोकावू लागते. त्या गर्भ रेशमी दडस पानांच्या सातपदरी पडद्यांमधून फुटणाऱ्या गंधलाटा कणाकणातून लहरू लागतात. केवडा म्हटला की घनदाट गंधाची लहर सुरेखच, पिवळ्या रंगाची टफेटा कापडाच्या पोताची तरतरीत पानं आणि पानांच्या दुहेरी कडांनी डोकावणारे तीक्ष्ण काटे आठवतात. (सोनकणीस पृष्ठे ८२)
आकाशमोगरी. मोगरीसारखी राजहंसी. फुलांचा बांधा उभार. पण टोकावर घेरदार कळी. मोगरीच्या कळीसारखी कबुतरी, घुमारलेली. रंगही शुभ्र, किंचित लालच झाक. पाकळ्या रेखीव, एकाला एक जोडलेल्या. दाटीवाटी नाही. जिथल्या तिथे फुललेल्या. पाकळ्या नितळ, तरीही काश्मिरी गालिच्यासारख्या दडस. दोन बोटात धरून एकेक पाकळी चिरमळायची आगि फू फू करून फुगवायची. छान फुगा फुगतो. लगेच कुणाच्या तरी कपाळावर टचकन फोडायचा. बुचाच्या फुलांतला मध देठाच्या पुंगळीतून चोखताना मज्जा यायची. लांबच लांब देठातून सुक सुक आवाज करीत मध ओढायचा. जेमतेम जिभेवर उतरेल इतकाच थेंब. पण स्ट्रॉमधून कोकाकोला पिण्यापेक्षाही त्याची लज्जत न्यारीच. (आकाशमोगरी पृष्ठ १६)
अशी ऐंद्रिय संवेदनांना कुरवाळणारी चित्रदर्शी काव्यात्म वर्णने करताना शैला लोहिया यांच्या जातिवंत निरीक्षणशक्तीची आणि तरल शब्दकळेची जणू जुगलबंदीच चालते. या निरीक्षणांना लोकसाहित्याच्या सांस्कृतिक संदर्भाची जोड मिळते आणि त्याची आवाहकता अधिकच व्यापक होत जाते. "विरहवेदनेचे विखारी अमृत मी प्याले-उर्मिलेच्या थरथरत्या हातांनी! ते पिताना ठसका लागला तेव्हा पाठीवरून हात फिरले वनवासी सीतामाईचे. सुरकुतलेले शुष्क हात. भोवंडून उडू पहाणाऱ्या जीवाला घट्ट सावरून धरले मीरेच्या एकतारीने. पुराचे पाणी वाहून जावे तशी वाहून जाणारी वर्षे. पण मी मात्र तशीच. एकाकी नुस्ती वाट पहाणारी." (मी युगविरहिणी) (पृष्ठ १०२) यासारख्या आत्मनिवेदनपर क्षणी, आणीबाणीच्या काळात गजाआड असणाऱ्या पतीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवशी आपल्यासारख्याच विरहिणीच्या रूपातल्या उर्मिला, सीता, मीरा दिसतात; आणि आपल्या व्यथावेदनेत त्यांचीच रूपे दिसतात. अशा सांस्कृतिक आणि वाङ्मयीन एकतानतेमुळे या भावभावनांचे आवाहन केवळ व्यक्तिगत न राहता, विश्वात्मक होते आणि प्रत्येक विरहिणीचे ते प्रतिनिधित्व करते.
अनेक हृद्य व आकर्षक कल्पना आणि भाव या लेखांमधून सहजपणे सूत्रात्मक अल्पाक्षरी शैलीत प्रकट होतात, आणि आपल्या मनाच्या तारांना झंकारत राहतात.
"अधमुऱ्या गोल दह्यासारखं आमचं वय होते."
"जाळीदार पडद्याआडून पल्याडचे भास जाणवावेत तसे सासर-माहेरचे वेगळेपण आम्हाला जाणवे."
"आषाढाचं नवेपण दरवर्षी नव्या तऱ्हेनं साजरं होई यक्षपत्नीच्या वेदनांचे मुके वळ आज माझ्या तनामनावर उभरले आहेत. मुक्तीचा नवा प्रत्यय प्रत्येक क्षणी देणारा तू आज दू S र गजाआड बंदिस्त... शब्द माझे..पण मनाची उलघाल तुझीच.. माझ्या प्राणातला कोमल गंधार तू कोवळ्या शब्दांनी जपला आहेस. तीव्र मध्यमाचे कणखर स्वरही माझेच प्राणांना शोष पडला. तरी विझू देणार नाही मी ते !'(६६).
त्याचबरोबर सामाजिक पातळीवर एकीकडे होणारी जागृती आणि दुसरीकडे पारंपरिक मानसिकता यांच्यात चाललेल्या संघर्षाचे व सामंजस्याचेही दर्शन व्यक्तिचित्रांमधून सहजपणे समोर येते.
"बदलल्या काळासोबत मोकळ्या आभाळाखाली येण्याऐवजी बाई अधिकच गुदमरत चालली आहे." (५९).
"मी आई झाल्यामुळे माझ्यातले बाईपण हरवत चालले होते." (५०).
"नवे विचार मनाला पटतात पण वाटतं. उरलेल्या चार दिवसांसाठी कशाला नवा रस्ता धरू?" (३४)
"पोटची लेक दूर राहिली. तू पोटची लेक होऊन सेवा करतीस. लेकीचा बाट माईला कसा गं व्हईल? आपन मानसासारखी मानसं. हातापाया सारखी. देवानं काहीतरी मागं लावलंय म्हणून जातपात पाळायची. आता देवाच्या दरात बसलेली माणसं आम्ही. आम्हांला कसला आलाय विटाळ नि चांडाळ?" (३९)
"शिक्षण वाया जात नाही. शिकली तर नवराबी शिकलेला मिळेल. नवऱ्यानं पीठ आणलं तर बाईनं त्यात चिमूटभर मीठ घालावं. म्हंजी भाकर चवदार हुती."
शैला लोहिया यांच्या व्यक्तिमत्वातील काव्यात्म संवेदनाशीलता आणि सामाजिक समस्यांबद्दलची त्यांची जाण या दोहोंचा सशक्त मेळ घालणारा हा ललित लेखसंग्रह आहे. सामाजिक क्षेत्रात केवळ विचारकल्पना मांडूनच त्या थांबलेल्या नाहीत. त्या विचारकल्पनांना पतीच्या सहकार्याने गेली तीसपस्तीस वर्षे कृतीतही आणत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्या कामाची दखल घेतली गेली आहे. त्यामुळे या लेखांतील शब्दाशब्दामागे एक प्रकारचा ठाम विश्वास आहे. स्नेहभाव आहे. वाचकांनाही त्याचे आकर्षण वाटेल यात शंका नाही.
शंकर सारडा