वाहत्या वाऱ्यासंगे/सेवादलाचा संस्कार

 संस्कार सेवादलाचा



 खूप खूप वर्षापूर्वीची पहाट. मंद निळ्या रंगाचा झुंजुरका उजेड . झाडांचे डोळे अजून उघडायचे आहेत. अशावेळी दुरून जवळ येत जाणारा ठोस आणि स्पष्ट आवाज , जोडीला पावलांची दमदार लय.

कदम कदम वढाये जा
खुशीके गीत गाये जा ...

 अर्धमिटल्या झोपेतून मी झडझडून जागी होई आणि खिडकीच्या जाळीला नाक टेकवून वाहेर पहात राही . गाण्याचे सूर जसजसे जवळ येत , तशी जाळीच्या बेचकीत छोटे छोटे पंजे अडकवून खिडकीतून डोकं वाहेर काढून ते स्वर नजरेआड जाईस्तो पाहत राही. पांढरेशुभ्र सदरे आणि खाकी विजारी घातलेला तो गाता जत्था. त्यात दशरथ तात्या, आई आणि पपा असत. पुढ्यात नेनेकाका असायचे. त्यांचे ताठ लयदार चालणे , हनुवटीच्या सरळ रेषेतून व्यक्त होणारा आत्मविश्वास . मी जेमतेम चारपाच वर्षांची . राष्ट्रसेवादलाच्या प्रभातशाखेच्या प्रभातफेरीचे ते गोंदवण, माझ्यावरचा पहिला कळता संस्कार.
 चढती दुपार, खानदेशी उन्हाळ्याची. डॉक्टर अष्टपुत्रेबाईंच्या घराच्या मागच्या माडीतला तिसरा मजला. तिथे सेवादलाचा वौद्धिक वर्ग असे. आचार्य केळकर, मधुभाई लिमये किंवा आणखी कोणी बौद्धिक घेताहेत. पेशंटस् संपवून कधीमधी बाईही तिथे येई. आईपण असे. मी नि वसू जिन्याच्या शेवटच्या पायरीवरून आत डोकावून पाहतोय. पोटात भूक उसळलेली. पण वाईसमोर वोलायची हिंमत नाही. साऱ्यांचे नितान्त गंभीर चेहरे. मग हलक्या पावलांनी माडी उतरून जाणे ...
 तो दिवस स्वच्छ आठवतोय. संध्याकाळची वेळ, जिनिंग मिलच्या पटांगणात शाखा भरलेली. इतक्यात कोणीतरी मुलगा धावत आला. त्याने शाखानायकाच्या कानात काहीतरी सांगितले. मुली रडताहेत. राष्ट्रपिता महात्माजींच्या निघृण खुनाची वार्ता होती ती. सगळे भराभरा पांगले. बाईचे घर दोन मिनिटांच्या अंतरावर होत. पण रस्ता पार होईना. तिच्या घरासमोर गर्दी. त्या भयानक बातमीने दशरथ तात्या बेशुद्ध पडले होते.
 मग सगळीकडे गोंधळ. वाईच्या घरासमोर चिडलेल्या लोकांचा जमाव कुणा एकाच घर पेटवायला आलेला. हो वाई तरतरा त्या घरासमार ढालीसारखी उभी राहिली. घर वाचलं.
 एखादी रविवारी सकाळ. सार्वजनिक संडास सफाईचा कार्यक्रम सेवादलाने ठरवलेला, सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा असलेली माणसे अशा कार्यक्रमात पुढे असत. आईपपांचे शेपूट म्हणून मीही जाई. सर्व सैनिक मन लावून सफाई करीत. मैल्यात बुडवलेले हात मला आयुष्यभराची समृद्धी देकन गेले.
 एखाद्या सकाळी टपऱ्या स्टेशनवॅगनमधून नाहीतर टांग्यातून वसंत वापट. सुधाताई वर्दे, आवावेन , लीलाधर हेगडे आणि भुगी , श्यामी अशा मुली उतरत . शहादा वा नंदुवार असे कलापथकाचे कार्यक्रम असत . ही मंडळी आली की आई तर खूश असेच, पण मीही वहरून जायची. पुढच्या हॉलमध्ये त्यांच्या तालमी चालत. मुलींचे लवलवून नाचणे , तालाचा धुंद ठेका , लीलाधरचा खडा आवाज ... मला मनोमन वाटे, आपणही गावे , मनमुक्त नाचावे . पण बहुधा सगळ्यांनाच वाटे की मी म्हणजे शकुंतलावाईंना त्रास देणारा एकुलता एक डिंकाचा लाडू . श्यामीमुगीच्या भाग्याकडे मी आसुसल्या नजरेने पाही. कलापथक हे माझ्या लेखी एक रंगीत स्वप्न होते.
 असे शेकडो प्रसंग आज डोळ्यासमोर आकारताहेत. आई-पपांनी सेवादल शाखेवर जाण्यासाठी कधीही सक्ती केली नाही. आईला मात्र मनोमन वाटे की मी रोज शाखेत जावे. ती अनेक वर्षे शहरप्रमुख होती. मी हट्ट केला वा मूर्खासारखी वागले की ती पाठीत धपाटे घाली. चिमटे चारोळ्या देई. अशा वेळी मी संतापून म्हणे , "समितीत जाईन!"
 आणि एकदा खरंच गेले. पण गुदमरायला झालं. पुन्हा फिरकले नाही. एवढं खरं की मग मात्र सेवादलाची झाले ती माझ्या निर्णयाने. माझा ओढा शाखेपक्षा कलापथकाकडे जास्त असायचा आणि इंदूताई लेले अशी शिस्तीची की ती शाखेत न येणाऱ्या मुलींना नाचात घेत नसे. सेवादलात वशिला नसेच. वाईंची मुलगी म्हणून सुट नव्हती. तेव्हा शाखेचा भोज्जा अधुनमधुन शिवावाच लागे.
 इंदूचा तो तेजदार लखलखीत आवाज. जणू आरपार कापीत जाई. ती पोवाडा म्हणायला लागली की नवरसांचे शोभादर्शक जणू तिच्या कातीव गोऱ्या चेहऱ्यावर भिरभिरायचे. महात्माजींच्या पोवाड्यातला त्यांच्या खुनाचा प्रसंग. प्रेक्षकांच डोळे भरून येत , हुंदका गळ्यात दाटे .

स्वातंत्र्य सूर्य उगवला
अही पूर्वेला , हिंद देशाला ...
सोन्याचा दिवस अहा आला SS

 या पोवाड्याची दाणेदार तान कानांत आजही स्वच्छ जागी आहे. वसंत वापटांच्या शब्दांवर लीलाधर हेगडेंनी स्वरांची किमया चढवली हे खरेच, पण वापटांच्या शब्दातले वेभान सामर्थ्य लहान वयात असंख्य खानदेशी सैनिकांपर्यंत पोचवले इंदू लेलेने! अन्नदाता, विजली, भारतभूमी नमन अशी नृत्ये असंख्य राष्ट्रीय गीते, खुला स्वर आणि मनमोकळा लयदार नाच. हो नाचच. नृत्य म्हटले को वंधनाची अदृश्य रेखा असतेच, पण आदिम जीवनात निसर्गाशी दोस्ती जमविण्यासाठी, मनातला आनंद उधळून देण्यासाठी माणसाने ज्या उत्स्फूर्त आणि स्वयंभू हालचाली केल्या, त्यांचा ताजेपणा सेवादल कलापथकानेच जाणला. विविध प्रकारची लोकनृत्ये. लोकगीते हजारो मुलांना शिकवली. आयुष्यभर अत्तरासारखा जपता यावा असा निरामय आनंद अक्षरशः वाटला.
 राष्ट्रसेवादलाने सांस्कृतिक संक्रमण खऱ्या अर्थाने समाजाच्या तळागाळापर्यंत पोचवले. एरवी संगीत, नृत्य, नाट्य या कला मध्यम वा उच्च मध्यमवर्गीयापर्यंत मर्यादित असत. त्यासाठी पैसा खर्च करणे सामान्यांना कुठे परवडणार? पण गावोगावच्या कलापथकांनी सर्व जातीजमातीच्या सर्व स्तरावरील मुलांना सांस्कृतिक व्यासपीठ दिले.
 महाविद्यालयात असताना पुणे शहर कलापथकात काम करायला मिळाले. निळू फुले . रामभाऊ नगरकरांच्या बरोवर मी काम केलंय असे सांगताना मनही लठ्ठमठ्ठ होऊन जाते. महाराष्ट्र दर्शनच्या संचातला एक चिमुकला खिळा मीही होते. समूहजीवनाचा तो शब्दातीत अनुभव. टिंवाटिंवातून रांगोळी तयार होते तसे अनेक प्रसंग अनुभव. आयुष्याच्या अंगणात उमललेले एक भुईकमळ ! लग्नानंतर अंबाजोगाईसारख्या चिमुकल्या गावात आल्यावर आम्ही कलापथक उभे केले. १९६३ ते ७५ सलग तेरा वर्षे गणेशात्सवात कार्यक्रम केले.
 सरत्या आषाढात मनातल्या हलग्या वाजायला लागत. श्रावण कसा संपे कळत नसे . चाळीसपन्नास जणांचा शिस्तवद्ध जत्था . विविध लोकनृत्ये , संगीतिका, राष्ट्रीय गीते , वगनाट्ये कलापथकाने सादर केली. महाराष्ट्र दर्शनच्या धर्तीवर 'मराठवाडा दर्शन ' लिहिले. प्रा. रा.द. अरगडे , प्रा. चंद्रकांत भालेराव यांनी नवनवी वगनाट्ये लिहून दिली. शिस्त अशी की नऊ म्हणजे नऊला ढोलकीवर थाप पडायची. डोळ्यासमोर वापटकाकांचा आदर्श असायचा. एकदा अध्यक्षमहोदय उशिरा आले. आमचा कार्यक्रम मात्र वेळेवर चालू झाला. वगातील विनोद दर्जेदार असे . जीवनातील व्यंगावर बोट ठेवणारा, न टोचता, खुदखुदवणारा विनोद . अंतर्मुख करणारा. आमच्या कार्यक्रमांना महिलावर्गाची खचाटून गर्दी होई . प्रेक्षकातून उर्मट शिट्टी आली तर दुसऱ्या क्षणी कार्यक्रम वद होतो याचा धाक प्रेक्षकाना होता . हजारो प्रेक्षक कार्यक्रम पाहताना शिस्त सोडीत नसत.
 प्राध्यापक , वकील , दुकानदार शिक्षक चपराशी डांक्टर्स, विद्यार्थी, गृहिणी कलापथकाच्या रंगमंचावर काम करीत. जातपात पाळू नका , सर्वधर्मसमभाव पाळावा . आपण सारे भारतीय आहोत वगैर घोषणा किती अर्थपूर्ण ! आम्ही सर्वजण हे सारे शब्द नकळत आपोआप जगत होतो. रामदासाची भूमिका अमर हबीब करत असे. तर शास्त्रीबुवांचा ताठा जगन्नाथ जोगी उभा करीत असे. जोशी गुरुजी ढोलकीवर थाप मारीत नि सर्वांच्या अंगावर रोमांच उभे रहात. दवाखान्यातील शस्त्रक्रिया विभागात काम करणारे महिंद्रकर व्हायोलीन वाजवात. खाेगरेगुरुजी नाहीतर शेषरावांची बोटे वाजाच्या पेटीवर फिरु लागली की तो चौकोनी लाकडी ठोकळा फुलांच्या डहाळीसारखा मस्त झुलू लागे. दरवळू लागे. सगळे एकमेकांच्या डब्यातले खात . दुपारी चार वाजता ट्रकमधून धावतपळत दूSSSर वर परभणी . नाहीतर सेलू, गेवराई, जिंतूर वा हिंगोली अशा ठिकाणी पाेचायचे. रात्रभर कार्यक्रम करायचा. अंबाजोगाईला पोचेपर्यंत पहाट व्हायची. दोन तासात जो तो कामावर हजर. ही सारी धडपड पैशाची अपेक्षाही न करता केवळ 'स्वान्तः सुखाय.' सेवादलाचे स्पिरिट आपोआप सर्वांच्यात घर करी. पहिल्या वर्षी कलापथकात काम करणाऱ्या कलाकारांची मुले आता शाळाकॉलेजात आहेत. त्यांची सतत तक्रार असते . आम्हाला जो आनंद मिळाला तो आमच्या लेकरांना मिळत नाही. कलापथक पुन्हा सुरू करा.
 या कलापथकाने आमच्या स्वप्नांना पाय दिले. सेवादल ,अण्णा गुरुजी यांनी जे विचार दिले . त्यांची प्रयोगशाळा म्हणून 'मानवलोक' चा प्रयोग १९८२ साली सुरू केला . कलापथकातून , शेकडोंच्या प्रयत्नातून जमलेल्या पैशातून १२५ वाय ८० चा एक जमिनीचा तुकडा खरीदला. त्यावर हा नवा संसार थाटला. या प्रयोगाचे साथीदार सारे सेवादल सैनिकच .
 सेवादलाने श्रमाची प्रतिष्ठा, शक्ती मनावर कोरली, लहानपणी अनुभवलेले वाडजईच्या किंवा मोराण्याच्या सेवापथकाचे क्षण आजही आठवणीत आहेत . कुदळ, फावडी, घमेली घेऊन काम करणारे सैनिक गावातली माणसेही सहभागी होत . दोनचार कुदळी मारून नि एखाद दुसरे टोपले भरून रेशमी तळव्यांवर फोड येत . पण आपलच खरखरीत हात न्याहाळताना काही वेगळेच वाटे.
  तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून
  उद्या पिकंल सोन्याचं रान ...
  किंवा
  एक तास, एक तास, या देशाला एक तास ...
 यासारखी गाणी सेवादल मैनिक गात तेव्हा तो आवाज केवळ ओठातून निघायचा नाही . तो जणू धमन्यातून. आतल्या मनातून निघत असे. आदरणीय एम एम जोशी पूज्य भाऊ रानडे, डॉक्टर अंबिके, यदुकाका थत्ते, भाई वैद्य, प्रधान मास्तर, श्याम पटवर्धन, सिंधुताई मसूरकर अशी मोठी माणसेही रस्त्यावर येऊन काम करीत. आमच्या 'मानवलोक' मध्ये दर गुरुवारी श्रमदान असतेच . कार्यवाहापासून सर्वजण मग्न होऊन काम करतात. सावित्री महिला वसतिगृहातील मुलीऺची अत्यल्प दरात रहाण्या जेवणाची सोय आहे. मात्र रोज एक तास श्रमाचं काम केले पाहिजे हा नियम आहे. एका विद्यार्थिनीला संडास सफाईची लाज वाटे. ते काम करण्यास तिने नकार दिला. पण समूह जीवनाचा भाग म्हणून जगताना तिची तिलाच चूक उमगली. आज ती हे काम मन लावून करते.
 अलीकडे सतत मनात येतेच की राष्ट्रसेवादलाने सेवापथक आणि कलापथक या दोन विभागांवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे होते. नेमके का आणि कसे हुकले, याचा चिकित्सक जमाखर्च मोठ्या मंडळींनी मांडायला हवा. हे दोनही विभाग तालुका पातळीवर जाणीवपूर्वक उभे करायला हवेत.
 सामाजिक न्यायाच्या भूमिकेशी वांधील असणाऱ्या सर्व पक्षांचे आणि संघटनांचे कार्यकर्ते आज खंत व्यक्त करतात. उद्याच्या भवितव्यासाठी राष्ट्र सेवादलाची गरज त्यांना जाणवते. सामाजिक जाणिवा असलेले, स्वनिर्णयाचे सामर्थ्य असलेले सुजाण तरुण आज कार्यकर्ते म्हणून मिळत नाहीत. हा स्रोत थांबलाय याचे भान त्यांना आता आलय.
 महाविद्यालयातून राष्ट्रीय सेवा योजना राबवली जाते. प्राध्यापक त्याच उत्साहाने रस घेणारे असतील तर ठीक , एरवी अनेक ठिकाणी थातुरमातूर काहीतरी केले जाते.
 पीपल्स पार्टीसिपेशन , ग्रासरुट वर्कर्स , सस्टेनेबल फार्मिंग , श्रमशक्ती . विमेन्स' एमॅन्सिपेशन , वगैरे शब्दांची नाणी आज तेजीत आहेत . पण ही नाणी जेव्हा नव्हती तेव्हा हे सर्व प्रयोग राष्ट्रसेवादलाने केले. नुसते केले नाहीत. तर आग्रहपूर्वक केले.
 आज पूज्य भाऊ रानडे नाहीत. मातृप्रतिष्ठा ही गोष्ट त्यांनीच शिकवावी. नाचून थकलेल्या पायांना शास्त्रीय पद्धतीने तेल चोळणारे भाऊ ... त्यांचे हात आईचे होते. खेड्यातल्या सभेत महिला नसतील तर खवळून आरडाओरडा करीत. शेवटी सरपंचांना म्हातारी माय सभेत आणून वसवावी लागे. महिला असल्याशिवाय भाऊ सभा सुरु होऊ देत नसत. स्त्रियांना झुकते माप देण्याची भूमिका सेवादलाने नेहमीच घेतली. नैतिक विश्वास रुजवला. चाळीस वेचाळीस वर्षांपूर्वी आपल्या किशोरवीन वा तरूण मुलींना पालक सेवादलात वा कलापथकात विश्वासाने पाठवीत. सहजीवनाचा पाठ गिरवताना काहींनी जीवनसाथीही निवडले. मधु दंडवते-प्रमिलाताई, सदानंद वर्दे -सुधाताई, यदुनाथ थत्ते-जान्हवीताई अशा अनेक जोड्या महाराष्ट्रभर पसरलेल्या. चारदोनांचे सूर कदाचित जमलेही नसतील. शक्यता आहे . पण बहुतेकांच्या जीवनात आज जो प्रसन्न ताजेपणा आहे ,त्याचे श्रेय सेवादलालाच आहे. सेवादलाने महिलांची वेगळी शाखा काढली नाही. कुठे असली, तरी ती अपवादात्मक. स्त्रिया या समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या आणि पुरुषांच्या माथ्यावरचे आभाळ एक आहे. पायाखालची जमीनही एक आहे. मग स्त्रियांसाठी वेगळी शाखा कशाला?
 स्त्री-पुरुषांनी एकमेकांचे सुजाण सहकारी असायला हवे. जीवनातील सर्व क्षेत्रात सहकारी म्हणून निर्भयपणाने वावरायला हवे. ही सुस्पष्ट भूमिका सेवादलाने जाणतेपणाने घेतली होती. आगरकरांच्या महाराष्ट्रात मुलींचे हाल त्यामानाने किंचित कमी. मोकळेपणाही कांकणभर अधिक. त्यामुळे आम्ही पोरी विनधास्त वावरत असू . परंतु विहार वा उत्तरप्रदेश वगैरे प्रांतातील कलापथक दौऱ्याच्या वेळी कधी कधी ताप होई. अशा वेळी मात्र महाराष्ट्राचे खरे दर्शन आतल्या डोळ्यांना स्पर्शून जात असे.
 खेळाच्या मैदानावर अर्धी विजार आणि शर्ट खोवून खेळणाऱ्या मुली राष्ट्र सेवादलाने तीस वर्षापूर्वी तालुक्याच्या गावातही निर्माण केल्या. लोकशाही समाजवाद, विज्ञाननिष्ठा, सर्वधर्मसमभाव, समान संधी, जातीनिरपेक्ष असा एकसंध समाज, स्त्री-पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा इत्यादी सामाजिक न्यायावर आधारलेली जीवनमूल्ये सैनिकांच्या मनात सतत आणि सहजपणे गोंदविली. ज्या काळात राजकारणाला आणि समाजकारणाला व्यवहाराची भाषा कळत नव्हती, तेव्हा सेवादल महाराष्ट्रभर रुजले. फोफावले. राजकारणाला ते गैरसोयीचे वाटले नाही. मागास माणसास न्याय, संधी आणि समृद्धी देण्याची वांधिलकी देशातील एकूण राजकारणाने वा समाजकारणाने स्वीकारली होती, तोवर उत्तम वक्ते, अभ्यासू नेते ,मनस्वी कार्यकर्ते सेवादलाने भारतीय राजकारणाला पुरवले . आज राजकारण हा किफायतशीर धंदा वनला आहे . मूल्य विचारांचे न राहता 'व्यक्तिकेंद्री' झाले आहे . व्यवहाराची गणिते मांडून ते खेळले जाते. गेल्या पंधरावीस वर्षात झालेल्या या वदलाचे दृश्य परिणाम गेल्या पाच वर्षांपासून सर्वांनाच जाणवू लागले आहेत. एकूण समाज सांस्कृतिक समृद्धीकडे जाण्याऐवजी त्यातील सार्वत्रिक उद्ध्वस्त रितेपणा पदोपदी जाणवतो आहे. आपण पूर्वजांच्या कर्तृत्वावर सांस्कृतिक टिमकी भरपूर वडवून घेतलीय .एक प्रसंग आटवतो. शिक्षकांच्या उन्हाळी प्रवोधन वर्गात जर्मनीतील अनुभव सांगण्यासाठी मला वोलावले होते . भाषणानंतर प्रश्नोत्तरे रंगली . एका शिक्षकाने प्रश्न विचारला , "पाश्चात्य देशांत गेल्यावर , भारतीय संस्कृतीची समृद्धी पावलोपावली जाणवली असेल ना?"
 प्रश्न तसा नेहमीचाच, पण नेमका. मी म्हटले. हो जाणवली ना. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांच्या शोधनातून , परिश्रमातून जे ज्ञान मिळवले , कला आणि विज्ञान निर्माण केले , त्या समृद्धीचे कौतुक जगभरची माणसे करतात. पण मला एक भीती पडलीय. अजूनही दलित माणसाने चार पैसे कमावले , घर वांधले वा गाडी घेतली की आपण मनोमन अस्वस्थ होतो . खेड्यातल्या मंदिरात दलित आजही जाऊ शकत नाही . सामूहिक वहिष्काराची वा मारहाणाची प्रकरणे सर्वत्र होत असतात . हुंड्यापायी हजारो कोवळ्या पोरींची लग्ने विजोड वरांशी लावली जातात , शेकडो मुली जाळल्या जातात . धर्माच्या नावानं तरुण पोरींची लग्ने देवाशी लावून त्यांना बाजारात वसवले जाते तर ,आणखी दोनशे पाचशे वर्षानंतर आपल्या भावी पिढ्यांनी कोणता सांस्कृतिक वारसा मिरवावचा? सांस्कृतिक वारसा मिरवताना आपण पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत; त्यांचा विचार अधिक महत्त्वाचा!
 गतकाळातल्या मोडक्या गढ्या इलेक्ट्रॉनिक झगमगाटाने नटवून त्यांचे सांस्कृतिक गोडवे गाणांची आज चलती आहे. सामाजिक जखमांच्या मूळ कारणांपर्यंत पोचवणारी क्ष-किरणांकित नजर तरुणांना प्रदान करणारी सांस्कृतिक पोटे मोडकळीला आली आहेत. अशा वेळी सेवादलाच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा , पडझडीचा , धडपडीचा , चिकित्सक आढावा घ्यायला हवा.
 सेवादल ही शेवटच्या माणसाला कवेत घेणारी सांस्कृतिक चळवळ आहे. तिचा राजकारणाशी जरूर संबंध आहे. मात्र तो पक्षीय राजकारणाशी नाही . सामाजिक न्याय , समान संधी, विज्ञाननिष्ठा , सर्वधर्मसमभाव , स्त्रीपुरुष समानता , लोकशाही समाजवाद , राष्ट्राभिमान या मूल्यांशी मात्र निश्चितच आहे.
 'मानवलोक ' ने सेवादलाच्या शाखा खेड्यांतून सुरू केल्या. आज २५ खेड्यात शाखा आहेत . हजारो मुले सायंकाळी मैदानावर जमतात . या शाखा उद्या आणखीन वाढवण्याची जिद्द आम्ही धरली आहे. या शाखांना जोडून आम्ही संस्थेच्या वतीने रात्रीच्या अभ्यासिका सुरू केल्या आहेत . दिवावत्ती, जागा आणि पुस्तके या सोयी असलेल्या अभ्यासिकांमुळे मुलांचा शैक्षणिक दर्जा तर उंचावलाच , परंतु अर्ध्यातून शाळा सोडलेली मुले तेथे नियमित येऊ लागली . शाळेत जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. राष्ट्रसेवादल खेड्यांतून आणि झोपडपट्ट्यातून अशा अभ्यासिकाही चालवू शकेल .
 आज समाजातला सार्वजनिक विवेक संपलाय. क्षुल्लक कारणांवरून रक्तपात घडताहेत . जात, धर्म यांच्या मागील अंधश्रद्धा आणि रुढीप्रियता कमी झाली असली तरी या दोन गोष्टींचा वापर करून राजकारणाचे डाव मांडता येतात , हे पुढाऱ्यांच्या लक्षात आल्याने विकृत , गुंतागुंतीची जातीयता आणि धर्मवेडेपणा यांची वाढ होतेय .
 आणि म्हणूनच राष्ट्रसेवादलाच्या शाखा , सेवापथके , वौद्धिकवर्ग , कलापथके यांची गरज नव्याने निर्माण झाली आहे .

कश्मिर हो या कन्याकुमारी
भारतमा एक हमारी
गर्वसे कहो हम भारतीय है
प्यारसे कहो हम इन्सान है ...

 या सारख्या घोषणांनी गाव दुमदुमून जाते.

... आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई
धर्म वेगळा नाही आम्हा, जात वेगळी नाही ...
... जोडो भारत, जोडो भारत नवयुगने ललकारा है
भारत हमको प्यारा है ...

 अशा गाण्यांच्या लकेरी आभाळात भिरभिरतात. सहलीला निघालेल्या मुलामुलींच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा उत्साह . शाखेत येणाऱ्या मुलामुलींची वाढती संख्या पाहून मनोमन पटते की ग्रामीण भागातील मुलांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे ऐतिहासिक काम सेवादल करू शकेल . पण ते करण्याचे बळ आज सेवादल सैनिकात उरले आहे का?

܀܀܀