विज्ञान-प्रणीत समाजरचना/लोकसंख्येची वाढ व नियमन
सन १७९८ मध्ये माल्थस नावाच्या पंडिताने लोकसंख्येवरील आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. व त्याने विचारी लोकांना लोकसंख्येसंबंधींच्या एका भयानक प्रश्नाची जाणीव करून दिली. त्याने सांगितले की जमिनीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नवस्त्राला मर्यादा आहे. दहाच्या ऐवजी वीस माणसे तेवढ्याच जमिनीत खपली, व त्यांनी साधनसामुग्री दुप्पट वाढविली, तर पूर्वीच्या दुप्पट अन्नवस्त्र निर्माण होते, हे खरे; पण विसाच्या ऐवजी तीस खपली तर तिप्पट उत्पन्न होईल हे खरे नाही. कोठे तरी याला मर्यादा पडतेच. व मग जास्त श्रम किंवा खते यांचा उपयोग होत नाही. जमिनीच्या या स्वभावामुळे नवीन जन्माला आलेला मनुष्य आपल्यापुरते अन्नवस्त्र निर्माण करू शकणार नाही. व अशा रीतीने अन्नाचा तुटवडा पडत जाईल. ज्या मानाने प्रजेची वाढ होते, त्या मानाने अन्नवस्त्राची वाढ कधीच होणे शक्य नाही. प्रजा भूमितिश्रेढीने वाढते, तर अन्न, गणितश्रेढीने वाढते. तेव्हा लवकरच आता अशी वेळ येईल की माणसांना खावयास अन्न नाही. ही आपत्ती टाळण्यासाठी लोकसंख्येचे नियमन करणे अत्यंत आवश्यक आहे.
मागल्या काळी रोगराई, दुष्काळ इत्यादी आपत्तीमुळे लोकसंख्येवर नियंत्रण पडे. व शिवाय अनेक देशांतील लोकांत बालहत्त्येची चाल अगदी सर्रास चालू होती हल्ली विज्ञानाने माणसांना पहिल्या दोन आपत्तींपासून बचावले आहे. व बालहत्त्येची चाल तर कायद्यानेच बंद केली आहे. त्यामुळे व गेल्या शतकांत उत्पादनाची यांत्रिक साधने वाढल्यामुळे प्रजावाढीस मर्यादा राहिली नाही. व काही देशांतील संख्या पाच पाच पटीने वाढली. १८०१ साली इंग्लंडची संख्या सुमारे ९० लक्ष होती ती १९२१ साली तीन कोटी अठ्याहत्तर लक्ष झाली. विचारी लोकांचे याकडे पन्नाससाठ वर्षांपूर्वीपासून लक्ष गेलेले आहे. व संततिनियमनाची चांगली साधनेही अलीकडे सापडली आहेत. त्यामुळे पूर्वीची नियमने जरी बंद झाली तरी या नव्या उपायांनी लोकसंख्येच्या वाढीस आळा बसू लागला.
पण या नवीन पद्धतीमध्ये एक फारच मोठा दोष लोकांना दिसू लागला. नवी साधने घेण्याला मन अनुकूल होणे, पैसे देऊन ती घेणे व वापरणे हे समाजातल्या शिकलेल्या लोकांनाच तेवढे आरंभी शक्य होते. अडाण्यांना ते पटतही नसे व त्यांना ते शक्यही नव्हते. पण यामुळे समाजावर एक भलतीच आपत्ती आली. शिकणाऱ्या, महत्त्वाकांक्षी व संस्कृत लोकांचीच प्रजा तेवढी कमी होऊ लागली. अडाणी, मंद लोकांची प्रजा पूर्वीच्याच भरमसाट गतीने वाढत होती. त्यामुळे समाजांत नाकर्त्या लोकांचे प्रमाण वाढून तो अधोगतीला चालल्याची स्पष्ट लक्षणे दिसू लागली. तेव्हा संततीच्या बाबतीत मानवाने हात घालणे चूक आहे, असे काही लोक म्हणू लागले. रोगराई, दुष्काळ ही निसर्गाची नियमने योग्य आहेत. रोग हटवणे, पीडितांना मदत करणे इत्यादी जे उपाय मानव करीत आला आहे, त्याने समाजाची हानी होत आहे, असे या पक्षाचे मत आहे.
आज या विषयावर अनेक विचार आपणास ऐकावयास सापडतात. माल्थसने दाखविलेले वाढीचे प्रमाण तेथल्या विशिष्ट परिस्थितीत व त्या काळातच फक्त होते. ते नेहमींचे नाही तेव्हा त्याला भिण्याचे कारण नाही, असे काही म्हणाले. काही शास्त्रज्ञ म्हणाले की, जमिनीतून अन्न किती निघेल याला सांगितलेल्या मागल्या मर्यादा शास्त्राच्या साह्याने खूपच वाढविता येतील. कोणी अर्थशास्त्री म्हणतात की, आज अन्न कमी असे वाटते ते खरे नाही. अन्न वाटेल तितके आहे. त्याची वाटणी योग्य होत नाही, म्हणून हे सर्व दुःख आहे. संततिनियमन एकदा मान्य केले तर लोक त्यापासून कधीच परावृत्त होणार नाहीत व मग तो देशच अजिबात नाहीसा होईल अशीही भीती काहीनी व्यक्त केली. आपण संख्या कमी केली तरी आपल्या शेजारचे राष्ट्र तसे करणार नाही व मग लढाईच्या वेळी आपला पराजय होईल, असे राजकीय प्रश्नही यांत उपस्थित झाले. लोकसंख्येवर नियंत्रण आवश्यक असल तरी ते मानवाने घालणे हे हानिकारक असून तो प्रश्न निसर्गावर सोपविणे योग्य आहे असेही एक मत असल्याचे वर सांगितलेच आहे. धर्मदृष्ट्या हे पापकृत्य आहे असे धार्मिक लोकांनी सांगितले. आपली प्रजा पोसण्याचे सामर्थ्य नसणे म्हणजे नामर्दपणा आहे, असा धि:कारही कोणी केला. अशा तऱ्हेने धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, जीवनशास्त्र, राजकारण इत्यादी अनेक शास्त्रांतून या नियमनासंबंधी अनुकूल-प्रतिकूल चर्चा सुरू झाली. त्यांपैकी जीवनशास्त्र व राजकारण यांचे आक्षेप फार महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांचा या लेखात प्रामुख्याने विचार करावयाचा आहे.
आज लोकसंख्येच्या बाबतीत समाजापुढे दोन प्रश्न आहेत. अन्न कमी पडेल, इतकी लोकसंख्या न वाढू देणे हा एक, व ती न वाढू देण्यासाठी अशी नियमने शोधून काढावयाची की त्यामुळे उत्कृष्टांची प्रजा वाढून निकृष्टांची कमी होईल, हा दुसरा.
नैसर्गिक निवड.
या दोहोला नैसर्गिक निवड (Natural Selection) हा एकच उपाय आहे असे काही पंडितांचे मत आहे. हे क्रॅफ्ट हा त्यांत विशेष प्रमुख आहे. डार्विनिझम व रेस-प्रोग्रेस या आपल्या पुस्तकांत ह्याने आपले विचार अगदी निर्भयपणे मांडले आहेत. रोगराई, दुष्काळ, थंडी, वारा हे समाजाचे शत्रू नसून मित्र आहेत. योग्य ती माणसे जगवून बाकीची मारून टाकणे हे काम निसर्ग रोगजंतूच्या सहाय्याने चांगले करू शकतो. आपण वैद्यकी ज्ञानाने रोगजंतू मारीत आणल्यामुळे समाजाची हानि होत आहे, असे त्याचे मत आहे. तो म्हणतो, बॅसिलस ट्युबरक्युलोसिस हा क्षयजंतु मानवाचा मित्र आहे. कारण तो दुर्बल लोकांनाच ग्रासतो. समर्थांना काही करू शकत नाही. (पान ५७) त्याचप्रमाणे महारोग. Hideous as are its aspects, it must be looked upon as a friend of humanity; for the microbe of leprosy feeds upon those who are debilitated from conditions under which wealthy and strong racial development is impossible. (दुर्बळांचा तेवढा नाश करीत असल्यामुळे क्षयाप्रमाणेच महारोगही मानवाचा मित्र आहे. (पान ५१) त्याच्या मते दारू ही पण समाजाची मैत्रीण आहे. चंचल, अस्थिर प्रकृतीच्या लोकांना व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनाच ती प्यावीशी वाटते. ती जर बंद केली तर हे. लोक मरण्याचे साधनच नाहीसे केल्यासारखे होईल. (पान ७५) रा. गो. म. जोशी यांनी याच तऱ्हेची मते आपल्या हिंदूचे समाजरचनाशास्त्र या ग्रंथात प्रगट केली आहेत. बालमृत्यू पुष्कळ होणे हे समाजाला हितप्रद आहे असे ते म्हणतात, (पान ३३३). आहे ती लोकसंख्या टिकविण्यास प्रत्येक जोडप्यास दोन तरी मुले झाली पाहिजेत. त्यांना तेवढीच मुले झाली तर ती दुर्बल व हीन प्रतीची असली तरी दोन्ही जगविणे त्यांना प्राप्तच आहे. त्यांत निसर्गाला निवड करल्यास वाव नाही. त्यांना जर पाच सहा मुले झाली तर त्यांतली दुर्बल, नालायक तेवढी निसर्ग मारून टाकून सबल तेवढी ठेवील व त्यामुळे समाजांत कर्त्या पुरुषांचे प्रमाण वाढेल. अशी ही विचारसरणी आहे. तेव्हा प्रत्येकाने शक्य तेवढी प्रजा निर्मून निसर्गाच्या निवडीला वाव देणे हे त्यांचे कर्तव्य आहे हे ओघानेच आले. जीवांचे कृत्रिम तऱ्हेने रक्षण करणे जोशांना मान्य नाही. अनाथ विद्यार्थीगृहासारख्या संस्थांना त्यांचा विरोध आहे. शाळेतल्या सर्व विद्यार्थीना दूध मिळण्याची व्यवस्था करून काही एक उपयोग नाही असं त्यांना वाटते. नैसर्गिक निवडीचा पूर्ण अंमल होऊ दिल्यास 'अशा समाजांतील स्त्रीपुरुष काटक, बलवान्, शूर, उद्योगी, साहसप्रिय असेच निर्माण होतील' असे ते म्हणतात (पान १२०).
जोशांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. ते अमुक म्हणतात असे बोलण्याची सोयच त्यांनी ठेवली नाही. गीतेप्रमाणेच आपल्याही ग्रंथांतून वाटेल ती मते निघावी अशी त्यांची महत्त्वाकांक्षा दिसते. तुम्ही नैसर्गिक निवडीवर सर्व भर देता असे कोणी म्हटल्यास, रॅशनल म्हणजे मानवकृत निवडही मला मान्य आहे, असे म्हणून त्यालाही ते आधार काढून देतील. तरी पण अनाथ विद्यार्थीगृहाच्या व एकंदर कृत्रिम तऱ्हेने पिण्ड जगवण्याच्या आपण का विरुद्ध आहो, हे ते मुळीच सांगणार नाहीत. दोन चार मुले झाल्यावर मग संततिनियमन करू असे कोणी म्हणतील, तर संततीपैकी पहिल्या दोन तीन मुलात वेड लागणे, गुन्हेगारी, क्षयरोग, मनोवैक्लव्य ही जास्त प्रमाणात असतात असे हे सांगतील. (पान ३३१) पण पुढे बालविवाहाचे फायदे सांगताना चटकन् मोहरा फिरवून असेही सांगतील. की, 'कोणाही मनुष्याची जी काही संतती शिल्लक राहते, त्यामध्ये आधी झालेल्यांची जीवनशक्ती पुढे झालेल्या मुलांच्या जीवनशक्तीपेक्षा जास्त असते. आणि आधी झालेल्या संततीची संततीही पुढे झालेल्या संततीच्या संततीपेक्षा जास्त सुदृढ असते.' (पान ३६५)
असो. तर नैसर्गिक निवड व्हावी, अशा मताच्या लोकांचे म्हणणे काय आहे, हे वरील विवेचनावरू ध्यानांत येईल. क्षय, महारोग, दारू हे समाजांचे मित्र आहेत. बालमृत्यु पुष्कळ असणे चांगले आणि लोकांना दुधासारखे सकस अन्न पुरवून किंवा अनाथ विद्यार्थीगृहासारख्या संस्था चालवून जीवांचे कृत्रिम रीतीने रक्षण करणे हे समाजाला घातुक आहे. कारण त्यामुळे निसर्गाच्या निवडीला वाव मिळत नाही, अशा मताचा हा पक्ष आहे.
मला वाटते नैसर्गिक निवड या तत्त्वाचा अर्थ नीट न समजल्यामुळे वरच्यासारखी विपर्यस्त विधाने लोक करू शकतात. हे तत्त्व प्रथम डार्विनने सांगितले. एका जीवकोटीपासूनच अनेक जीवकोटी झाल्या, मत्स्यकच्छादि जीवकोटीमध्ये फरक पडत जाऊनच आजचा मानव झाला; मानवाच्या मागली अवस्था माकड ही होती, इ. त्याच्या प्रसिद्ध उत्क्रान्तिवादांत येणाऱ्या गोष्टी आता सर्वांच्या परिचयाच्या आहेत. एका जीवकोटीपासून दुसरी जीवकोटी तयार होणे याचेच नांव उत्क्रान्ति ही जी उत्क्रान्ति निसर्गात घडून येते, ती घडतांना नैसर्गिक निवड या तत्त्वाची अंमलबजावणी होत असते. एक उदाहरण घेऊन याचा अर्थ स्पष्ट करू. लांडग्याच्या वर्गात कुत्रा हा प्राणी आहे. लांडग्याचा कुत्रा होणे ही उत्क्रान्ति आहे. चमत्कार कसा होतो ते आता पाहू.
आपणास हे ठाऊक आहे की एकाच आईबापांच्या संततीत पुष्कळ फरक असतो. दोन सख्खे भाऊ एकमेकांपासून अगदी भिन्न गुणांचे असतात. माधवराव व नारायणराव पेशवे हे उदाहरण प्रसिद्ध आहे. लांडग्यामध्येही असेच होणार. कांही अगदी भयंकर क्रूर, कांही जरा गरीब, असा फरक पडणारच. आता हे लांडगे मनुष्याच्या नजीक आल्यावर मनुष्य अर्थातच क्रूर लांडग्यांना मारून टाकणार. त्यामुळे गरीब तेवढे शिल्लक राहाणार व त्यांचीच पुढली पिढी होणार. त्या पिढीत पुन्हा क्रूर, गरीब असा फरक होणारच. अर्थात क्रूरांचे प्रमाण यांत कमी होईल हे उघडच आहे. या पिढीतलेही क्रूर लांडगे मनुष्य मारून टाकीत. असे होत होत काही शतकांनी त्या प्रांतात गरीब लांडगेच फक्त राहतील. मनोरचनेत ज्याप्रमाणे फरक पडत जातात, त्याचप्रमाणे शरीररचनेतही पडतात. व ज्याची शरीररचना भोवतालच्या परिस्थितीत टिकण्यास जास्त अनुकूल ते टिकतात व बाकीचे मरतात. मनोवृत्ती व शरीर रचना यांमध्ये अकारण फरक पडत जाऊन, भोवतालच्या परिस्थितीच्या दृष्टीने ज्यांची शरीर व मनोरचना टिकण्यास योग्य ते टिकणे व बाकीचे मरणे व अशी प्रक्रिया हजारो वर्षे चालून, लांडग्याचा कोल्हा किंवा एका माशांचेच निरनिराळे प्रकार हे निर्माण होतात. सृष्टीतल्या या प्रक्रियेलाच डार्विनने नॅचरल सिलेक्शन किंवा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असे नांव दिले आहे.
येथे अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. ती ही की सिलेक्शन किंवा फिटेस्ट या शब्दांनी आपल्या मनांत जो श्रेष्ठ, समर्थ, वरच्या दर्जाचा असा अर्थ येतो तसा डार्विनच्या मनात पुसटसुद्धा नाही. त्या परिस्थितीत जगण्यास योग्य इतकाच अर्थ आहे. सशासारखा एक बारीक प्राणी आहे. त्या जातीत काही गवताच्या रंगाचे असतात; कांही काळे व काही पाढरे असेही असतात. भोवती गवत वाढले की घार गिधाड वगैरे प्राण्यांना गवतांच्या रंगाचे प्राणी निवडून दिसत नाहीत. काळे व पांढरे प्राणी मात्र भिन्न रंगामुळे त्यांच्या नजरेत भरून त्यांना ते खाऊन टाकतात. येथे नैसर्गिक निवडीने जे शिल्लक राहिले त्याच्यांत श्रेष्ठपणा कोणचाच नव्हता. त्या परिस्थितीत ते 'फिटेस्ट' इतकेच. हिरवे व पांढरे किडे झाडावर असले तर बर्फ पडल्याबरोबर हिरवे किडे पक्ष्यांना दिसू लागतात व त्यांचा फन्ना उडतो. उलट बर्फ जाऊन पालवी फुटली की पांढरे मरतात. हे नॅचरल सिलेक्शन आहे. यावरून निसर्ग ज्यांना निवडील ते साहसी, शूर, उद्योगी, काटक असे असतील हे म्हणणे अगदी भ्रामक आहे हे ध्यानांत येईल. म्हणजे निसर्गशक्ती ही आंधळी आहे. तिच्या मारामारीत समाजदृष्टीने आपण ज्यांना चांगले म्हणू तेच टिकतील असे नाही. त्यांच्या योग्य परिस्थिती आली तर तेही टिकतील. पण तेच टिकतील असे नाही. अत्यंत दुर्बल, अत्यंत घाणेरडे, असेही टिकतात. जीवनशास्त्रांतील अनेक तज्ज्ञांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. (१) सायन्स ऑफ लाइफ मध्ये ज्यूलियन हक्सले म्हणतो- Evolution has achieved much that is definitely bad. It has brought into being, not only strong, beautiful and intelligent creatures, but also degenerate parasites and loathsome diseases. (उत्क्रांतीमध्मे प्रबल, सुंदर, व बुद्धिमान प्राणीच वर आले असे नसून अत्यंत किळसवाणे रोगजंतू व अधम परपुष्ट प्राणीही टिकले आहेत- पान ३८७).
(२) आयडिया ऑफ प्रोग्रेस या निबंधात डीन इंगने सांगितले आहे की, Survival of the fittest does not mean that the most virtuous, or the most useful or the most beautiful survive. There is no moral of aesthetic judgement pronounced on the process of any part of it, जीवनार्थं कलहांत समर्थनम टिकून राहातात. याचा अर्थ असा नव्हे की, जे सुंदर, उपयुक्त, गुणशाली असेल तेच टिकेल. नीती किंवा रसिकता या दृष्टीने या (नैसर्गिक निवडीच्या) पद्धतीवर काही एक मत सांगता येणार नाही.
नॅचरल सिलेक्शनचा अर्थ जर बरोबर ध्यानांत आला तर नैतिक मूल्य (Moral Value) मनात धरून आपण ज्या चांगल्या वाईटाच्या किंवा श्रेष्ठ- कनिष्ठाच्या कल्पना करतो तसल्या कल्पना येथे अगदी गैरलागू आहेत असे ध्यानात येईल. मानवप्रजा निसर्गाच्या हवाली केली म्हणजे नैसर्गिक निवडीला जर इतर सृष्टीप्रमाणेच मानव सृष्टींतही पूर्ण वाव दिला, तर शिवाजी, बाजी, टिळक, रानडे असली माणसेच फक्त टिकतील अशी जी आपली कल्पना आहे ती अगदी चुकीची आहे. जोशांना हे म्हणणे अगदी पूर्णपणे मान्य आहे. 'अनेकविध पिंड निर्माण करून त्यांतले प्रबल तेवढे शिल्लक ठेवणे अशी सृष्टीची प्रक्रिया दिसते. येथे प्रबल या शब्दाने जीवनक्षम एवढाच अर्थ अभिप्रेत आहे. मग तो कोणत्याही कारणाने जगलेला असो' असे त्यानीच म्हटले आहे. (पान १२८). पण नॅचरल सिलेक्शनचा हा खरा अर्थ त्यांना मान्य असण्याचा काही एक उपयोग नाही. कारण याच्याबरोबर उलट व चुकीचा अर्थ तोही त्यांना मान्य आहे. निसर्गाच्या निवडीत जे टिकतील ते काटक, बलवान, शूर, उद्योगी, साहसप्रिय असेच असतील असे त्यांनी म्हटल्याचे वर सांगितलेच आहे.
नैसर्गिक निवड या तत्त्वाचा खरा अर्थ ध्यानांत आला म्हणजे हेक्रॅफ्ट, स्नो, जोशी, वगैरे पंडितांनी सांगितलेला प्रत्येक मुद्दा कसा चुकीचा आहे हे ध्यानांत येईल. हेक्रॅफ्ट म्हणतो क्षयजंतु, महारोगजंतु दुर्बलांनाच तेवढे मारतो, प्रबलांना तो काही करू शकत नाही पण या म्हणण्याला काडीचाही अर्थ नाही. दुर्बल म्हणजे कोण ? शरीराने दुर्बल तो, का मनाने दुर्बल तो ? कित्येक बुद्धिमान व कर्ते पुरूष हे शरीराने अगदी दुर्बल असतात. हॅवलॉक एलिसने एक हजार कर्त्या पुरुषांच्या कुलांचा अभ्यास करून असे सांगितले की शरीर- दौर्बल्य हे या कर्त्या पुरुषांचे वैशिष्ट्यच दिसले. एलिसचा हा सिद्धान्त नियम म्हणून घ्यावा असे मी म्हणत नाही. पण विशिष्ट उदाहरणे म्हणून त्याकडे पाहिले तरी तो अगदी निर्णायक आहेत. कारण त्यान म्हटले आहे की या हजारांपैकी चाळीस लोक क्षयाने लहानपणीच मेले. सुमारे साठ लोक जन्मभर क्षयी होते. क्षय प्रबलांना काही करू शकत नाही हे खरे मानले तरी शरीराने प्रबल, एवढाच अर्थ करावा लागेल. मानाने प्रबल पण शरीराने दुर्बल अशा लोकांना क्षय मारू शकतो. आणि समाजाला यांची जरूर निःसंशय आहे. तेव्हा क्षयरोग मोकळा सोडावा की काय याचा समाजाने विचार करावा.
दुसरे असे की काही लोक लहानपणी दुर्बल असतात. व मोठेपणी शरीरानेसुद्धा राक्षसासारखे होतात. बेंथम, बर्क, डिकन्स हे लोक असे होते. आणखी एकशे तीस लोकांची उदाहरणे एलिसने दिली आहेत. त्यांत न्यूटन आहे. ज्या रेड इंडियनांचा जीवनक्रम जोशांनी वाखाणला आहे; त्यांत हे बिचारे केव्हाच मरून गेले असते. दुर्बल ते मरतात या म्हणण्यात फसवेगिरी आहे. दुर्बल कोण हे आधी कोणी सांगत नाही. दुर्बल ते मेले असे म्हणावे, का मेले ते दुर्बल असे म्हणावे, याचे उत्तर या पंडितांना देता येणार नाही.
निसर्गाप्रमाणे आपला जीवनक्रम ठरवावा असे पुष्कळ लोक सांगत असतात. पण या सांगण्याला काहीच अर्थ नाही. प्रश्न असा येईल की गाढवाप्रमाणे आपला जीवनक्रम ठरवावा का वाघाप्रमाणे ? क्षयजंतूप्रमाणे का दह्यातल्या जंतूप्रमाणे ? सर्वच निसर्गातले. उत्क्रान्तीमधली प्रणाली पाहून ठरवावे असे कोणी म्हणेल; पण हे सर्व त्या प्रणालीचा अर्थ बसवण्यावर अवलंबून आहे. असे दिसून येईल. अनंत जीव निर्माण करणे व फारच थोडे शिल्लक ठेवणे हे निसर्गात दिसते. म्हणून मानवानेही तसे करावे असे काही म्हणतात. उलट उत्क्रांतीकडे पाहिले तर वनस्पती, जंतु, जलचर, स्थलचर, या पायऱ्यावर उत्तरोत्तर प्रजा कमी करून तिच्या संगोपनाकडे जास्त लक्ष देणे हीच पद्धती दिसते असे दुसरे म्हणतात. अर्थात मानव ही शेवटची पायरी असल्यामुळे तेथे प्रजा कमी करून संगोपन शक्य तितके जास्त करणे हे ओघानेच आले. नैसर्गिक व कृत्रिम या शब्दांना बोलण्याच्या सोयीपुरता अर्थ आहे. पण आपण जर तो शास्त्रात आणू लागलो तर पदरी वेडेपणाच बांधून घ्यावा लागेल. कृत्रिम तऱ्हेने पिंडाचे रक्षण करू नये म्हणजे काय ? इस्पितळे, अनाथगृहे ही कृत्रिम, मग घरे बांधणे व कपडे घालणे हे कृत्रिम नव्हे काय ? जेनिंग्ज म्हणतो ज्या क्षणी मानवाला अग्नीचा उपयोग ध्यानात आला तेव्हाच त्याने निसर्गनिवडीत हात घातला आहे. कारण तेव्हापासून थंडीवाऱ्यापासून मनुष्य आपले व आपल्या मुलांचे रक्षण अग्नीच्या साह्याने म्हणजे कृत्रिम तऱ्हेने करू लागला. कृत्रिमता टाकून द्यावयाची असेल तर नग्न होऊन झाडाखाली राहणे याशिवाय गत्यंतरच नाही. पण हा सगळा वेडेपणा मानवाला निसर्गाबाहेर टाकण्यामुळे होत असतो. वास्तविक मानव हा निसर्गातलाच आहे व किड्यांचे किंवा पक्ष्यांचे कृत्य जितके नैसर्गिक तितकेच मानवाचेही कृत्य नैसर्गिक समजण्यास मुळीच हरकत नाही. एलिस म्हणतो - संततिनियमन हे पूर्ण नैसर्गिक असून ती उत्क्रान्तीमधली एक पायरीच आहे !
बालमृत्यू पुष्कळ होणे चांगले, त्याने नैसर्गिक निवडीस वाव मिळून नालायक जीव मारले जातात व लायक तेवढेच शिल्लक राहातात. म्हणून प्रत्येकाने शक्य तितकी जास्त मुले होऊ द्यावी वगैरे या पंडिताचे सांगणे असेच भ्रामक आहे.
रशियामध्ये सर्वात जास्त बालमृत्यू होतात (१९१७ पूर्वी) व नार्वेमध्ये सर्वांत कमी होतात. तरी रोगाने जास्त संहार रशियांतच होतो. जन्मलेल्या बालकांपैकी शेकड़ा पन्नास बालके रशियांत मरतात. तेव्हा ही निवड फारच कसोशीने होते, असे दिसते; व उरलेली प्रजा मोठी सुदृढ असेल असे वाटते. पण या उरलेल्या पैकी लढाईच्या कामांस शेकडा ३७ इतकेच लायक ठरले. एलिसने म्हटले आहे की, Natural selection is not a satisfactory operation from any point of view. It kills off the unfit no doubt, but it goes further and tends to render the fit unfit. (नैसर्गिक निवड ही कोणच्याही दृष्टीने चांगलो नाही. ती नालायकांना मारते हे खरे, पण लायकांना नालायक करून ठेवते हेही तितकेच खरे आहे.) डॉ. जॉर्ज कार्पेन्टरचे असेच मत आहे. सर फ्रेंन्सिन गाल्टन आपल्या आत्मचरित्रांत असेच म्हणतो (पा. ३२२-२३) Natural selection rests upon exceessive production and wholesale destruction. Eugenics rests upon bringing no mordr individuals into the world than can be properly cared for and those only of the best stock. (असंख्य प्रजा निर्माण करणे व सर्रहा संहार करणे ही नैसर्गिक निवड, जेवढ्यांचे संगोपन नीट करणे शक्य आहे तेवढ्याच उच्च कुळातल्या मुलांना जन्माला आणणे याचे नाव सुप्रजाशास्त्र)
लिओनार्ड डार्विन म्हणतो की, Parents ought not to bring more children in the world than they can reasonably hope to bring up in accordance with certain standard of living (what is Eugenics?)
कार सांडर्स याने आपल्या पॉप्युलेशन पुस्तकात असे दाखवून दिले आहे की, राष्ट्राला प्रजा कमी करणे असले तर संततिनियमन आवश्यक आहेच; पण वाढवावयाची असेल तरीही ते आवश्यक आहे. कारण ज्या स्त्रियांना जास्त मुले होतात; त्यांची जितकी मुले जगतात, त्यापेक्षा ज्यांना कमी होतात त्यांची जास्त जगतात. म्हणजे दहांपैकी चार जगली तर सातांपैकी पाच जगतात. याचे कारण अगदी उघड आहे. दोन अपत्यांमध्ये जितके अंतर जास्त तितकी मातेची प्रकृती जास्त चांगली राहून त्यामुळे अपत्यांचे संगोपनही तिला जास्त चांगले करता येते. मागल्या काळी जेव्हा संततिनियमनाची आर्वाचीन साधने नव्हती, तेव्हा कित्येक जमातीत बालहत्येची चाल सर्रास चालू होती. त्यापेक्षा अर्वाचीन पद्धती बरी हे कोणाही सुज्ञ व अनाग्रही माणसाला पटेल असे वाटते.
वरील सर्व विवेचनावरून असे ध्यानांत येईल का, कोणाच्याही काळी व स्थळी लोकसंख्येवर नियमन ठेवणे हे समाजाचे कर्तव्य आहे. ते नैसर्गिक पद्धतीने होऊ द्यावयाचे की आपण करावयाचे एवढाच प्रश्न. त्यालाही आपण तज्ज्ञांच्या आधारे उत्तर काढलेच आहे नैसर्गिक निवड ही आंधळी आहे. ती वाटेल त्याला मारील. तेव्हा ती टाकून देऊन सुप्रजेचा अभ्यास करून मानवाने आपल्या हातात ही व्यवस्था घेतली पाहिजे. यानेच भावी पिढी सुदृढ कार्यक्षम होईल.
अन्न कमी पडेल इतकी प्रजा वाढू देऊ नये, या दृष्टीने विचार झाला. आता समाजातील कर्त्या पुरुषांची प्रजा कशी वाढेल व नाकर्त्यांची कमी कशी होईल, हा जो लगतचा उत्तरार्ध त्याचा अगदी थोडक्यांत विचार करू. अलीकडे वेडे, दुर्बल नाकर्ते, असल्या लोकांना निरपत्य करून टाकण्याचे अगदी सोपे वैद्यको उपाय निघाले आहेत. त्याचा अवलंब जर्मनी व अमेरिकेतील काही संस्थाने, येथे केला जात असून तो सफल होत आहे असे दिसून येते. त्याच प्रमाणे कर्त्या, बुद्धिमान तरुणावर सरकारने लक्ष ठेवून त्यांच्या मागची संसाराची काळजी नाहीशी करण्याची जर त्यांनी व्यवस्था केली, तर त्याच लोकांची प्रजा कमी होणे ही जी आपत्ती तीही नाहीशी होईल. गाल्टन वगैरे पंडित आज कित्येक वर्षे हा उपदेश करीत आहेत. पण साम्यवाद, लोकशाही यांच्या पुरस्कर्त्यांना तो पटत नाही. राजकीय अधिकार त्यांच्याच हाती असल्यामुळे पंडितांचा उपदेश अजून तरी वाया जात आहे असे कष्टाने म्हणावे लागते.
नैसर्गिक निवडीच्या पुरस्कर्त्यांना आणखी एक मुद्दा सुचवावासा वाटतो. क्षयजंतु आपला मित्र आहे, बालमृत्यु पुष्कळ होणे चांगले, हे सांगतांना समाजाची सुदृढता वाढविण्याचेच मार्ग आपण सांगत आहो अशा भ्रमात राहून ते समाजाच्या दुसऱ्या एका फार मोठया शक्तीवर घाव घालीत आहेत, हे त्यांच्या ध्यानात येत नाही. एका माणसाला दुसऱ्याबद्दल आपलेपणा वाटणे व दोघांनी एकमेकाला संकटांत मदत करणे, या आद्य भावनेवरच तर समाज उभारलेला आहे. क्षयरोग पसरू द्यावा, बालमृत्यु होऊ द्यावे, असे जर समाजाला पटले तर प्रेम, दया, स्नेह, सहानुभूती या समाजधारणेच्या ज्या आद्य शक्ती त्याच ओहटीस लागतील. हा विचारही अनेक पंडितांनी सांगितला आहे. पण सामान्य माणसालाही आपला आपण विचार करून तो समजण्याजोगा असल्यामुळे अवतरणे देऊनच तो पटवून द्यावा असे वाटत नाही. आपल्याला पुष्कळ मुलं होऊन त्यांतली पुष्कळ मरणे हेच समाजाला आवश्यक आहे, हे ज्या स्त्रीला पटेल तिचे वात्सल्य काय प्रकारचे होईल याची कल्पनाही करवत नाही. माझ्या माहितीचे एक समाजशास्त्री आहेत. आपल्या घराण्यात या पिढीला पुत्रसंख्या का कमी हे ते मला सांगत होते. ते म्हणाले, 'माझ्या धाकट्या भावाने लग्नच केले नाही, वडीलबंधू लवकरच वारले व माझ्या मुलांच्या बाबतीत 'डेथ रेट' जास्त झाला. आपल्या स्वतःच्या अपत्यांच्या बाबतीत सामाजिक अभ्यासकाच्या निर्विकार मानने हा गृहस्थ बोलू शकतो, हे पाहून माझ्या अंगावर अगदी शहारे आले. समाजांतल्या स्त्री-पुरुषांचे वात्सल्यच या पद्धतीने नष्ट होत असेल, तर सुप्रजाशास्त्राचे सगळे नियम पाळूनही तो समाज पृथ्वीतल'वरून लववकरच नाहीसा होईल यांत शंका नाही. मला तर आणखी असे वाटते की जरी तो नाहीसा होणार नसेल तरी त्या समाजांत जगण्यामध्ये सौंदर्य तरी काय ? प्रेम, दया, वात्सल्य या समाज जगवण्याच्याच केवळ शक्ती आहेत असे नव्हे. संसाराला त्यांनीच रम्यता येते. व जीवनशास्त्राच्या नादी लागून भावी पिढया सुदृढ करण्यासाठी आमचे जीवित जर असे वाळवंट करावयाचे असेल तर Eugenics and other evils हे नांव पुस्तकाला देण्यात चेस्टरटनने जी मनोवृत्ती दाखविली ती खास समर्थनीय आहे असे म्हणावे लागेल.
पण सुदैवाने असे काही नाही. काही पिसाट लोक सोडून दिले तर या क्षेत्रांतले पंडित अत्यंत समंजस बुद्धीनेच याचा विचार करतात. व आपणास विचित्र वाटेल, आपल्या मृदु, नाजुक भावनांना धक्का बसेल असे सुप्रजाशास्त्रात ते काहीही सांगत नाहीत.
प्रजा जास्त होणे व ती लवकर होणे याने आणखी एक तोटा होतो. याने समाज नेहमी अस्थिर अवस्थेत राहातो. पिढ्या लवकर पालटतात व नवीन जीव सारखे येत राहातात. त्यामुळे समाजाच्या शारीरिक व मानसिक रचनेत सारखी हालचाल सुरू राहते. स्थिरता येणे शक्यच होत नाही. व ही अवस्था समाजाला फार अनिष्ट आहे. थारेपालट व्हावी हे खरे; पण तिलाही काही मर्यादा आहेच. एकदा बसविलेले थर काही काल तरी स्थिर टिकले म्हणजेच त्यांचे कार्य ते करू शकतील. वारंवार घडी उसकटणे हे केव्हाही अनिष्टच ठरेल. A community which is reproducing itself rapidly must always be in an unstable state of disorganization highly unfavourable to the welfare of its members and especially of the new comers. A community which is reproducing itself slowly is in a stable and organized condition which permits it to undertake adequately, the guardianship of new members. (एसिल; टास्क ऑफ सोशल हायजीन्. पान १५१) या मताचा जाणत्या लोकांनी अवश्य विचार केला पाहिजे.
लोकसंख्येची वाढ व तिचे नियमन यांचा जीवनशास्त्रदृष्ट्या येथवर विचार झाला. आता हिटलरादि राजकारणी पुरुष या बाबतीत जे विचार प्रगट करीत आहेत व जे धोरण ठेवीत आहेत, त्याचा विचार करावयाचा आहे.
आज युरोपांत लोकसंख्या वाढविण्याचा कित्येक राष्ट्रांतील लोकांना नुसता ध्यास लागल्यासारखा दिसतो. मुसोलिनीने सोळा वर्षांचे मुलगे व चौदा वर्षाच्या मुली आणून वीस हजार लग्ने लावून दिली. हिटलरने तीन लक्ष लग्नांचा संकल्प सोडला आहे. फ्रान्समध्ये अनेक पुत्र प्रसवणाऱ्या स्त्रीला बक्षीस आहे. या व यासारख्या बातम्या वाचून युरोपात काही भयंकर वंशक्षय झाला आहे की काय असे आपल्याला वाटू लागते. इंग्लंडात व अमेरिकेत संततिनियमनामुळे आणि उशीरा लग्नामुळे प्रजा जशी वाढावी तशी वाढत नाही अशी काही लोकांची तक्रार आहे. लोकसंख्या जगावयास हवी असल्यास प्रत्येक जोडप्यास निदान चार तरी मुले व्हावयास पाहिजेत. त्या ठिकाणी नव्या सुशिक्षित जोडप्यास सरासरी ३ होत नाहीत. तेव्हा लवकरच युरोपची लोकसंख्या नष्ट होईल अशी भीतीही काहींनी प्रगट केली आहे. हे सर्व वाचले म्हणजे मोठी मौज वाटू लागते. १८०० च्या सुमारास माल्थसला भीती वाटली की लोकसंख्या भूमिती श्रेढीने वाढणार आता कसे करावे ! त्याला सवाशे वर्षे झाली नाहीत, तो लोकसंख्या अजिबात नष्ट होणार की काय अशी भीती काही लोकांना वाटू लागली. माल्थसला दिसले वाढीचे प्रमाण तेवढयाच काळापुरते व तेवढयाच स्थळापुरते खरे होते, पुढे ते खरे ठरले नाही, व त्याची भीतीही निराधार ठरली, हे ध्यानात घेऊन या नव्या लोकांनी तरी उलट बाजूची अनुमाने काढताना थोडा धीर धरावयास हवा होता. एक दिवस एकाद्याने लंघन केले तर लगेच 'असे तू रोज करीत गेलास तर तू मरशील, सावध रहा' असे त्याला बजावण्यासारखेच हे आहे. वाढीचे प्रमाण जसे नेहमी टिकत नाही तसेच ऱ्हासाचेही टिकत नाही. वाढावयांस वाव मिळाला तर लोकसंख्या किती झपाट्याने वाढू शकते, हे ज्याने पाहिले आहे, त्याला ऱ्हासाची भीती बाळगण्याचे वास्तविक मुळीच कारण नाही. १८०० ते १९२० या कालांतली निरनिराळ्या देशांची लोकसंख्या कशी वाढली व आज प्रत्येक देशाच्या क्षेत्रफळाशी लोकसंख्येचे प्रमाण काय आहे हे पाहिले, तर या प्रश्नावर पुष्कळच प्रकाश पडेल.
पुढे कोष्टक दिले आहे त्यातील आकडे लक्षांत घेतले तर लोकसंख्येसंबंधी जे अवास्तव गैरसमज पसरविण्यांत येत आहेत, ते जरा दूर होतील. हिंदुस्थानची लोकसंख्या फार आहे म्हणजे प्रमाण फार आहे असे सर्वांना वाटते. पण ज्या फ्रान्ससंबंधी आपण अगदी हाहाःकार ऐकतो, तेथले लोकसंख्येचे प्रमाण हिंदुस्थानपेक्षा थोडेसे जास्तच आहे. ज्या अमेरिकेच्या सामर्थ्याबद्दल आपणास संशयसुद्धा येत नाही, तेथले प्रमाण हिंदुस्थानच्या एक चतुर्थांशही नाही. इंग्लंडमध्ये दर चौ. मैली ६४९ लोक आहेत. आता प्रश्न असा येतो की जरी सध्या काही जोडप्यांचे संततीचे प्रमाण इष्ट प्रमाणापेक्षा अगदी कमी पडले तरी बिघडले काय ? शंभर वर्षापूर्वी हे प्रमाण २३९ होते तेव्हा इंग्लंडच्या वैभवात काय कमी होते ? त्यांच्या आधीच म्हणजे मैली १७५ प्रमाण असतानाच इंग्लंडने साम्राज्य उभारीत आणले होते. आणि मैली ३४६ लोकसंख्या झाली तेव्हा, -म्हणजे आज जर्मनी किंवा इटलीइतके प्रमाण होते तेव्हा- साम्राज्य पुरे झाले होते. बरे एकदा लोकसख्या कमी झाली म्हणजे पुन्हा वाढू शकणार नाही असे नाही. संपत्ती- समृद्धी आली व वाढावयास वाव असला तर पन्नास किंवा पंचवीस वर्षांत प्रजा दुप्पट होऊ शकते, हेच तर माल्थसने दाखविले असे असतांना संततीचे आज जे प्रमाण आहे, तेच प्रजा कितीही कमी झाली तरी तसेच राहील, लोक ऐकणार नाहीत अशी पोक्त भाषा काही लोक वापरताना ऐकले म्हणजे ही भावी पिढ्यांची फाजील, आपल्या अधिकाराबाहेरची काळजी आहे असे वाटते. लोकसत्ता, स्त्रीस्वातंत्र्य, साम्यवाद इ. अगदी दृढमूल व दुर्भेद्य विचारांना हिटलर, मुसोलिनी यांनी कलाटणी दिलेली आपण पाहतोच. तेव्हा ६४९ वरून लोकसंख्येचे प्रमाण ६४८ वर आले व आणखी खाली जाणार असे दिसू लागले की लगेच हाहा:कार करून टाकण्यात काही अर्थ आहे, असे मला वाटत नाही.
x अमेरिकेत बाहेरून लोक पुष्कळ येतात. म्हणून हे वाढीचे प्रमाण धरता येणार नाही.
लोकसंख्या कमी होत आहे, अशी तक्रार करताना दर चौ. मैली अमुक एक लोकसंख्या असलीच पाहिजे, असे जणू काही आधी ठरवून ते लोक लिहीतात' असे वाटते. पण मनांत नक्की ठरविणे काहीच शक्य नाही. कारण इंग्लंडप्रमाणे ६४९ असावी, का जर्मनीप्रमाणे ३४६ असावी, का अमेरिकेप्रमाणे ४५ असावी. याचे उत्तर कसे देणार ? कार साँडर्स हा नियमनाचा कट्टा पुरस्कर्ता आहे. त्याने सांगितले आहे की सायन्सच्या प्रगतीच्या विशिष्ट पायरीला लोकसंख्येचे एक विशिष्ट प्रमाण आवश्यक आहे. त्याहून कमी किंवा जास्त चालणार नाही. कमी झाले तर ती सायन्सची उभारणी लोकांना पेलणार नाही व परागती होईल. जास्त झाले तर सरासरी माणशी उत्पन्न कमी होऊन दुसऱ्या बाजूने परागती होईल. या म्हणण्यातला मथितार्थ मान्य होण्याजोगा आहे. पण त्याचा उपयोग असा काहीच नाही. कारण ते प्रमाण कोणचे हे सांगणे शक्य नाही असे त्यानेच म्हटले आहे. आणि आपण स्वतः काही पाहू लागलो तर ६४९, ३४६, व ४५ इतकी भिन्न प्रमाणे असली तरी सायन्सच्या प्रगतीला बिलकूल अडथळा येत नाही असे स्पष्ट दिसते.
राष्ट्रांमध्ये कर्त्यपिक्षा नाकर्त्याचे प्रमाण वाढू नये, याबद्दल कोणत्याही काळी व कितीही लोकसंख्या असली तरी लोकांनी दक्ष असले पाहिजे याबद्दल वाद नाही. पण ते आपापसांतले प्रमाण आहे. पण इग्लंडमध्ये ६४९ प्रमाण आहे म्हणून सायन्स, व्यापार या बाबतीत अणुमात्र प्रगती नसताना हिंदूस्थानाने लोकसंख्यावाढीची काळजी करावी हे अगदी असमंजस आहे असे वाटते.
लोकसंख्येच्या वाढीच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण होतात. त्यांचा विचार आपण करूच. पण तो प्रश्न बाजूला ठेवला तर राष्ट्राची अंतर्गत सुधारणा, सायन्सची प्रगती, किंवा संस्कृतीची जोपासना यासाठी लोकसंख्येचे एक विशिष्ट प्रमाण आवश्यक आहे, असे मुळीच वाटत नाही. दर मैली ८६ या प्रमाणवर इंग्लंडने १६०० साली जग आक्रमणासाठी बाहेर पाऊल टाकले. व दर मैली ३४६ या प्रमाणावर १८६१ साली ते आक्रमण पुरे केले. तेवढ्या अवधीत शेक्सपीअर, बर्क, न्यूटन, डार्विन यांची संस्कृति निर्माण होण्यास अडचण पडली नाही; किंवा साम्राज्यवाढीस खळ पडला नाही. पराक्रमाबरोबर लोकसंख्या वाढत गेली हे खरे, पण एक तर ती आवश्यकच होती असे अमेरिकेकडे पाहिले तर म्हणावेसे वाटणार नाही. दुसरे असे की सायन्स, साम्राज्य व समृद्धी यांच्या वाढीबरोबर लोकसंख्या वाढली एवढे तरी निदान लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे ते काहीच नसतांना लोकसंख्या वाढविणे हे चूक आहे हे ध्यानांत येईल; तिसरे म्हणजे इंग्लंडवरून कांही अनुमान बसवावे असे वाटलेच तर मैली ३४६ प्रमाण आवश्यक आहे एवढेच फार तर म्हणता येईल. ६४९ प्रमाण झाले तरीही लोकसंख्येबद्दल ओरड कायम ठेवणे म्हणजे अशी ओरडण्याची लोकांना संवय लागली आहे इतकाच त्याचा अर्थ आहे, यापलीकडे काही नाही. हा विचार ध्यानांत घेतला म्हणजे ज्यांची लोकसंख्या आजच मैली ३४६ आहे त्या जर्मनी किंवा इटाली या देशांची ओरड अगदी फुकट आहे, तोफेला बळी निर्माण करण्यापलीकडे त्यांच्या मनात दुसरे काही नाही, असे वाटू लागते व त्याचाच म्हणजे लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा आता विचार करावयाचा आहे.
लोकसंख्या हे राष्ट्राचे सामर्थ्य आहे व शेजारचे राष्ट्र जर लोकसंख्या वाढवील, किंवा ती आधीच वाढलेली असेल, तर प्रसंग आल्यावर रक्षण करण्यासाठी आपलीही लोकसंख्या वाढविली पाहिजे असे कोणाही जबाबदार माणसास वाटणे साहजिक आहे. पण हा विचार वरवर वाटतो तितका सोपा नाही. निवळ लोकसंख्येच्या जोरावर एकादे राष्ट्र पराक्रमी ठरेल असे कोणीही म्हणत नाही. इंग्लंड- हिंदुस्तान, जपान- चीन किंवा इंग्लंडमधलेच शे-दोनशे भांडवलवाले व लाखो मजूर ही उदाहरणं याबाबतीत अगदी निर्णायक आहेत व ती सर्वांना मान्यही आहेत. म्हणून लोकसंख्या हे सामर्थ्य आहे असे सांगताना Other things being equal म्हणून एक शब्दप्रयोग करीत असतात. त्याचा अर्थ असा की इंग्लंड व हिंदुस्थान या देशांमध्ये म्हणजे ज्यांच्यात राज्ययंत्र विज्ञान, शिस्त, एकरक्तता इत्यादी प्रत्येक बाबतीत जमीनअस्मान फरक आहे. तेथे लोकसंख्या हे सामर्थ्य विचारांत घेण्याजोगे नाही हे खरे; पण जेथे या इतर गोष्टी म्हणजे राज्यव्यवस्था, विज्ञान वगैरे गोष्टी दोन्ही देशांत सारख्या असतील तेथे मात्र लोकसंख्या हीच निर्णायक ठरेल. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स व जपान ही राष्ट्रे संस्कृतीच्या किंवा कर्तृत्वाच्या दृष्टीने अगदी सारखी आहेत. तेव्हा यांच्यामध्ये जर लढाई जुंपली तर तेथे मात्र लोकसंख्याच निर्णायक ठरेल असे कांही लोकांचे म्हणणे आहे.
पण याही म्हणण्यांत फारसा जीव नाही असे ध्यानात येईल. जगात दोनच राष्ट्रे भांडत असली तर कदाचित् हे म्हणणे खरे धरता येईल. पण पुष्कळ राष्ट्रे किंवा चारपाच राष्ट्रे जरी जगात महत्त्वाकांक्षी व वर्धिष्णु असली तर दोनच राष्ट्रांमध्ये ती सहसा युद्ध होऊ देत नाहीत. आपण त्यांत पडतात. कारण त्यांना सत्ता समतोल ठेवावयाची असते. तेव्हा एखाद्या राष्ट्राची लोकसंख्या जरी दोन कोटींनी कमी असली तरी ती वाढविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या बाजूला युद्धांत इतर राष्ट्रे कशी वळवून आणता येतील, याचा प्रयत्न करणे हे जास्त आवश्यक आहे. कारण एक तर कोटीने लोकसंख्या वाढविणे ही कांही गंमत नव्हे. त्यासाठी स्त्रीला किती दुःख सहन करावे लागते राष्ट्राला किती खर्च सोसावा लागतो, व राहणीचे मान कसे उतरवावे लागते याची फारच थोड्यांना कल्पना असते व इतके करूनही दुसऱ्या राष्ट्रातल्या मुत्सद्यांनी दोन तीन कोटीचे एक राष्ट्र जरा आपल्या बाजूला वळवून घेतले तरी यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडणार. तेव्हा 'इतर गोष्टी सारख्या असल्या तर' युद्धामध्ये लोकसंख्या निर्णायक होईल हे खरे पण त्यासाठी आपली लोकसंख्या वाढविणे हा उपाय नाही. तर दोस्तीचे तह घडवून आणणे यावर सर्व मदार आहे. दोस्तीचे तह घडवून आणणे ही गोष्ट कठीण असली तरी अशक्य तर नाहीच. कारण सत्तेचा समतोलपणा या तत्त्वामुळे प्रत्येक बाजूला मिळायला काही राष्ट्र उत्सुक असणारच. राष्ट्राराष्ट्रांतली भांडणे राष्ट्रसंघ मिटवू लागला तर लोकसंख्येच्या वाढीचा प्रश्नच नाही पण ती कल्पना मृगजळ म्हणून सोडून दिली तरीसुद्धा युद्ध प्रसंगासाठी, तोफेला बळी म्हणून प्रजा वाढवून ठेवण्याचा फारसा उपयोग नाही. निदान त्यासाठी जी किंमत द्यावी लागते तितका तर खासच नाही. कारण एक दोस्त इकडला तिकडे झाला तरी कोटी दोन कोटींचा फरक चटकन् पडतो. युद्धप्रसंगी एक चतुर मुत्सद्दी कोटी दोन कोटींचे काम सहज करू शकेल.
अन्नाचा पुरवठा असेल, राहणीचे मान कमी करावे लागणार नसेल, तर लोकसंख्या वाढविण्यास कांहीच हरकत नाही पण तसे नसताना, लोकसंख्या वाढविण्याचा अट्टाहास हा केवळ राक्षसी प्रवृत्तीचाच द्योतक आहे. कारण त्यामुळे युद्ध हे अपरिहार्य होऊन बसते. ही काही मोठी आपत्ती आहे असे काही लोकांना वाटत नाही. उलट ते म्हणतात, संततिनियमन करून प्रजा कमी करण्याचा नामर्द उपाय अवलंबिण्यापेक्षा वाटेल तितकी प्रजा निर्माण करून, साम्राज्यमहत्वाकांक्षेने तिला भारून देऊन युद्धात तिला मरण्याला सवड देणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
युद्धासंबंधी घरी बसून गप्पा मारणाऱ्या लोकांना हे बोलणे शोभेल किंवा भांडवलवाल्यांच्या हातातली बाहुली म्हणून राज्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे बोलणे शोभेल. पण ज्याने या बाबतीत कळकळीने विचार केला आहे त्याच्या असे ध्यानांत येईल, की प्रजेच्या नियमनाला युद्ध हा उपाय अत्यंत भयंकर आहे. संततिनियमनाने होणारी प्रजा सुदृढ होते. नैसर्गिक निवडीने सुदृढही टिकतात व दुर्बलही टिकतात पण युद्धांमध्ये मात्र शूर. धाडसी, कर्ते, व प्रबल लोक तेवढेच नेमके मारले जाऊन दुर्बलांचे प्रमाण देशात एकदम भलतीकडे वाढते. युद्धावर उत्तम तेवढेच लोक निवडून पाठवून द्यावे लागतात. व त्यांनाच मरावे लागते तेव्हा संततीनियमन करून प्रजा कमी करण्यापेक्षा लढाई करून मेलेली काय वाईट हा विचार क्षणभरही टिकणार नाही.
पण या सर्व विचाराच्या बुडाशी Other things being equal हे जे विचार करण्यापुरते गृहीत धरले आहे तेच भ्रामक आहे. कारण असे कधीच नसते. इंग्लंड, जपान, फ्रान्स, जर्मनी, इटली यांना समबल मानणे हे अगदी भ्रामक आहे. म्हणजे अमुक देश श्रेष्ठ असे आज मुळीच सांगता येणार नाही. पण प्रत्येकाची परिस्थिती, भौगोलिक रचना, राज्यव्यवस्था, स्त्रीपुरुष- संबंध, कर्त्या पुरुषांचे प्रमाण, आर्थिक व्यवस्था या इतक्या भिन्न आहेत की, या सर्वांचा समुच्चय युद्धप्रसंगी अगदीच भिन्न प्रकारचा होत असतो. आणि ही राष्ट्रे सारखी धरली तरी अमुक एका विशिष्ट प्रसंगी कशी आहेत, हा विचार पुन्हा महत्त्वाचा ठरतो. १८०० ते १८१० च्या सुमारास फ्रान्समध्ये जर्मनीपेक्षा पंचवीस तीस लक्ष लोकच जास्त होते. पण एकट्या नेपोलियनच्या शक्तीमुळे फ्रान्सने जर्मनीलाच काय पण सर्व युरोपला धूळ चारली. उलट १८७० साली जर्मनी ४ व फ्रान्स ३।।। कोटी असा फरक असताना, म्हणजे लोकसख्या जवळजवळ सारखी असताना जर्मनीने फ्रान्सचे निर्दाळण केले. पंचवीस-तीस लक्षाच्या फरकाने असे झाले असे म्हणावयाचे असल्यास मग ती आपत्ती कधीच टाळता येणार नाही असे होईल. कारण अगदी माणसाला माणूस बरोबर असे दोन राष्ट्रांत कधीच होणार नाही. १९१४ साली जर्मनीने केमिस्ट्रीला लढाईत घेतली व दोस्तांची सैन्ये शेतकऱ्याने गवत कापावे तशी आरंभी कापली असे लॉइड् जार्जनेच आपल्या आठवणीत म्हटले आहे. तेव्हा Other things equal हे कधी काळी शक्य आहे हेच खोटे आहे. लोकसंख्येपेक्षा त्या इतर गोष्टीच निर्णायक ठरतात. म्हणून लोकसंख्या वाढविण्यापेक्षा विज्ञान. शिस्त, शिक्षण, यांच्या साह्याने लोकांना समर्थ करून ठेवणे हा एकच उपाय राष्ट्रधुरीणांना शिल्लक आहे. अर्थात पुष्कळ वेळा राष्ट्रधुरीण हे भांडवलवाल्यांच्या ताब्यात असतात व म्हणून त्यांना लढाई हवी असते. पण तो प्रश्न अगदीच निराळा. कारण भांडवलवाले हे राष्ट्रहिताचा विचार कधीच करीत नसतात. अप्टन सिंक्लेअरचे 'ब्रास चेक' हे पुस्तक व लॉइड जार्जच्या आठवणी या वाचाव्या. म्हणजे या मुद्यावर जास्त प्रकाश पडेल.
संततिनियमनाचा प्रश्न हा सामाजिक आहे, खाजगी नाही म्हणून व्यक्तीला या बाबतीत स्वतंत्रपणे काही ठरविण्याचा अधिकार नाही हे म्हणणेही खोटे. कारण समाजाला पुत्र देऊन त्याने जसे ऋण फेडावयाचे असते तसे स्वतः मोठ्या पदाला जाऊन व्यक्तीचे महत्त्व वाढवूनही फेडावयाचे असते. या दोहोमध्ये बांधा आल्यास ज्याचा त्याने निकाल करावा हे अगदी योग्य आहे. सर्व पृथ्वीतले धान्य मोजले तर प्रत्येकाच्या वाट्याला खूप येईल, तेव्हा संतति- नियमन करण्याची जरूर नाही हा उपदेशही त्या माणसाला करणे अयोग्य आहे. कारण या तात्त्विक विचारावर त्याची भूक भागत नाही, व त्याच्या अपत्याला कोणी दूध देत नाही. ती वाटणी कधीच सारखी होणे शक्य नाही. व दहापाच हजार वर्षांनी झाली तर तेव्हा तो उपदेश करण्यास काहीच हरकत नाही.
दहा अपत्यांना जन्म देऊन त्यातली चार पाच जगणे या आपत्तीने स्त्रीला केवढे शारीरिक व मानसिक कष्ट सोसावे लागतात, व ते बंद झाल्यास तिच्या सुखात केवढी भर पडेल, याची ज्याला कल्पना येईल तो लोकसंख्येच्या वाढीवर नियमन घालावे असे एकट्या त्या विचाराच्या बळावरच म्हणावयास तयार होईल. मग भावी पिढी सुदृढ होणे, हवी तर लोकसंख्याही वाढविता येणे व राष्ट्रावर येणाऱ्या अनेक आपत्ती, बालहत्येसारख्या रानटी उपायाशिवाय टाळता येणे इत्यादी अनेक शक्यता यात दिसल्यावर तो लोकसंख्येच्या वाढीवर मानवाचे नियंत्रण असावयास पाहिजे या विचारास आनंदाने संमती देईल यात तिळमात्र शंका नाही.
लोकसंख्येची वाढ व नियमन.

देशाचे नाव | दर चौरस मैली माणसे | १९२० नंतर मोजलेली लोक सं. | लाकसंख्या १८०० साली | लोकसंख्या १९१० साली | |
---|---|---|---|---|---|
कोटी | लक्ष | ||||
इंग्लंड व वेल्स | ६४९ | ३ | ७८ | ९० लक्ष | ३ कोटी ७८ लक्ष |
जपान | ४१३ | ६ | ५० | ||
जर्मनी | ३४६ | ७ | ० | २।।। कोटी | ६॥ कोटी |
इटली | ३४६ | ४ | ११ | १।।। कोटी | ३ कोटी |
फ्रान्स | १९८ | ४ | १८ | ||
हिदुस्थान | १९५ | ३५ | २८ | ||
अमेरिका | ४५ | १२ | २७ | ६ लक्ष | ९। कोटी x |
अफगाणिस्थान | २४ | ० | ६३ | ||
रशिया (सैबेरिया धरून) | १९ | १६ | १० | ४ कोटी | १४ कोटी |
इराण | १३५ | ० | ९० |