विज्ञान-प्रणीत समाजरचना/विषयप्रवेश

विज्ञान -प्रणीत समाजरचना.

विषय-प्रवेश.

 समाजशास्त्र हा शब्द नवीन असला तरी ही कल्पना जुनीच आहे. हिंदुस्थान, चीन, इजिप्त वगैरे पुराण राष्ट्रांचा अतिप्राचीन इतिहास जरी पाहिला तरी, त्यातही ज्याला आपण सध्या समाजशास्त्र म्हणू, त्यासारखे विशिष्ट हेतू मनात धरून माणसांच्या वर्तनाला वळण घालणारे काही नियम केलेले आढळून येतातच; आणि हे अगदी स्वाभाविकच आहे. माणसे संघाने राहू लागली म्हणजे मग तो संघ कितीही लहान असला, तरी त्या संघातील व्यक्तींचे परस्परांशी संबंध कसे असावे, यांसंबंधी काही ठरलेले धोरण असणं अत्यंत आवश्यक असते. सर्वांनी मिळून काही शिकार केली किंवा काही फळे जमविली, तर ती वाटावी कशी, ज्याला जशी भूक असेल तितकी त्याने घ्यावी की ज्याने जास्त अक्कल दाखविली असेल त्याला जास्त मिळावी यासंबंधी काही नियम हवेतच. अर्थशास्त्र येथूनच सुरू होते. आपापसात काही भांडण झाले तर कोणाचे ऐकावे, किंवा सर्व संघाचेच दुसऱ्या संघाशी भांडण झाले तर धोरण काय असावे, असले राजकारणाचे नियमही तेथे असतात. स्त्री-पुरुष संबंधांचे नियंत्रण करणारेही नियम त्या प्राथमिक अवस्थेत आवश्यक असतात. सारांश समाजशास्त्र म्हणून ज्याला आपण म्हणू. त्यासारखे काही शास्त्र अगदी ढोबळ स्वरूपाने का होईना, पण समाजाच्या प्राथमिक अवस्थेतही असणे अगदी अपरिहार्य आहे.
 समाज जसजसा वाढू लागतो व सुसंस्कृत होऊ लागतो, तसतसे त्यांचे समाजशास्त्रही परिणत स्वरूपाला येऊ लागते. मनूची स्मृति किंवा ॲरिस्टॉटलचे पॉलिटिक्स् हे ग्रंथ समाजशास्त्रावरचेच आहेत; आणि ज्या समाजात माणसांचे बहुविध क्षेत्रांतले व्यापार फारच प्रौढ दशेला गेलेले आहेत. अशा समाजासाठी ते सांगितलेले आहेत हे ते वाचताच अगदी स्पष्टपणे दिसून येते.
 पण वरील दोन्ही ग्रंथापेक्षाही आजचे समाजशास्त्र फार व्यापक आणि फार निराळ्या स्वरूपाचे होऊ पहात आहे. तेव्हापेक्षा संख्येने समाज फार वाढला आहे हे तर आहेच; पण आणखीही अनेक कारणे आहेत. माणसांच्या हालचालीची क्षेत्रे पूर्वीपेक्षा अनंत पटीनी आता वाढली आहेत. पूर्वी कधीच आला नसेल इतका दूरदूरच्या राष्ट्रांशी संबंध आता हरघडी येतो. इहलोक व परलोक यांच्या कमीअधिक महत्त्वासंबंधी लोकांचा दृष्टिकोन विज्ञानाने पार बदलून गेला आहे. मानवाचे व देवाचे नाते बदलले आहे, इतकेच नव्हे तर व्यक्तींव्यक्तीचे एकमेकाशी असलेले व शेवटी व्यक्तीचे समाजाशी असलेले नातेही आता बदलत आहे. जुने समाजशास्त्र आमूलाग्र बदलून जाण्यास आणखीही एक कारण झाले आहे. या मध्यंतरीच्या काळात व विशेषतः गेल्या एक-दोन शतकांत आधिभौतिकशास्त्रांनी मानवाच्या ज्ञानात कल्पनातीत भर टाकली आहे. आनुवंशशास्त्र, सुप्रजाशास्त्र, भूस्तरशास्त्र, मानवशास्त्र, जीवनशास्त्र, मानसशास्त्र, मनोविश्लेषणशास्त्र इत्यादि अनेक शास्त्र व त्यांच्या अनेक शाखा-उपशाखा यांनी मानवासंबंधाची अनेक प्रकारची नवीन माहिती उपलब्ध करून दिली आहे. आणि त्यामुळे जुन्या व आता चुकीच्या ठरलेल्या माहितीच्या आधारे रचलेले नियम अर्थातच त्याज्य ठरून त्या जागी नवे नियम करणे आवश्यक होऊन बसले आहे.
 समाजाचा अभ्यास करण्याच्या पद्धतीतही एक फार महत्त्वाचा फरक अलीकडे पडला आहे. बालविवाहाने जास्त मृत्यू होतात. संकराने निर्वंश होतो, बुद्धिमान वर्ग किंवा श्रीमंतवर्ग लवकर नष्ट होतो; ही व यासारखी कोणतीही विधाने करावयाची असली तरी त्यासाठी त्या त्या समाजांत जाऊन तेथे झालेले परिणाम आकड्यांनी मोजून मगच निर्णय करावयाचा, अशी पद्धत अलीकडे रूढ होत चालली आहे. या पद्धतीला आकडेशास्त्र असे म्हणण्याची चाल पडत आहे. ते कितपत युक्त आहे, हे मला सांगता येत नाही. पण ही पद्धत समाजाच्या अभ्यासाला अत्यंत उपकारक झाली आहे, याबद्दल मात्र शंका नाही. आपल्या आसपास दृष्टी टाकून तेवढ्यावरूनच निर्णय काढण्याची माणसांना सवय झालेली असते. असले निर्णय किती भ्रामक असतात, ते आकडेशास्त्राने दाखविले आहे.
 ज्ञानामध्ये भर पडली व अभ्यासाच्या नव्या आणि उत्तम पद्धती सापडल्या, यांमुळे समाजशास्त्राचा अभ्यास जास्त सूक्ष्म तऱ्हेने व जास्त निश्चितपणे करता येऊ लागला हे खरे; पण या दोन कारणांमुळेच समाजशास्त्राचा व्याप अलीकडे अत्यंत वाढला आहे. बुद्धिबळाच्या खेळात एकादे प्यादे जरी हलवावयाचे असले तरी त्या हलविण्याने पुढे काय काय परिणाम होतील, म्हणजे कोणाचा जोर निघून जाईल कोण मरू शकेल, नवा जोर कोणाला येईल, रिकाम्या पडलेल्या घरात प्रतिपक्षाचे कोणते मोहरे घुसू शकेल, ते काय अनर्थ करील, शह कोणाला बसतील, इत्यादि परिणाम- परंपरा ज्याच्या ध्यानात येते, त्याला ते प्यादे हलविताना फार विचार करावा लागतो. ज्याच्या या भानगडी ध्यानात येत नाहीत, तो चटकन् ते पुढे सारून मोकळा होतो. पण मग त्याचे परिणामही त्याला भोगावे लागतात. समाजशास्त्राचे काहीसे तसेच झाले आहे.
 मानवीसमाज किती प्रकारांनी हलतो, मनुष्याच्या मनाला प्रेरणा देणाऱ्या किती प्रकारच्या शक्ती आहेत. यांसंबंधी आज कितीतरी व्यापक प्रमाणावर अभ्यास चालू आहे. मानवाच्या प्रत्येक हालचालीच्या बुडाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने अर्थशास्त्राचा म्हणजे भाकरीचा प्रश्न असतो, असे काही लोक म्हणतात. अशोकाने अहिंसा स्वीकारली किंवा शिवाजीने स्वराज्य स्थापना केली, याला मुळात भाकरीच कारण असली पाहिजे, असे या पक्षाचे मत आहे. उलट प्रत्येक गोष्टीच्या बुडाशी कामविकार असतो असे म्हणणारा दुसरा एक पंथ आहे. आईच्या अंगावर स्तनपान करणाऱ्या बालकाच्या मनातही कामप्रेरणाच असते, म्हणजे भाकरीच्या बुडाशीही कामप्रेरणा असते, असे सांगणारे काही पंडित आहेत. अर्थात् मानवी हालचालीची जो जशी भिन्न उपपत्ती लावील, तसे त्या समाजाच्या कल्याणासाठी त्याने सांगितलेले उपायही भिन्न असणार हे उघड आहे. अर्थ व काम याप्रमाणेच आनुवंशानेच माणसाचे भवितव्य ठरत असते, असे समजणाराही एक पंडितवर्ग आहे. डार्विन हा सृष्टीशास्त्रज्ञ का झाला, पाश्चर वैद्य का झाला, याची कारणे त्यांच्या पूर्वजांच्या रक्तातच सापडतात असे त्यांना वाटते. यांचे वडील, पितामह, प्रपितामह, यापैकी कोणीतरी पूर्वज सृष्टीशास्त्रज्ञ व वैद्य असलाच पाहिजे; तो नसला तर त्यांच्या आईकडचा कोणीतरी पूर्वज तसा असला पाहिजे, असे सांगितल्यावाचून या लोकांचे समाधान होत नाही. हे जसे व्यक्तीचे तसेच समाजाचेही भवितव्य रक्तावर अवलंबून आहे. मोठ्या रक्ताच्या कुळातच मोठी माणसे होणार. यस्मिन् कुले त्वमृत्पन्नः गजस्तत्र न हन्यते । या प्रकारचे यांचे तत्त्वज्ञान आहे. उलट बिहेवियरिस्ट नावाचा एक अमेरिकेत पंथ आहे, त्याचे मत असे आहे की, आनुवंश वगैरे तर काहीच नाही; पण अमुक मुलगा बुद्धिमान, अमुक मंद यालाही काही अर्थ नाही. योग्य परिस्थितीत व योग्य संस्कार घडवले तर वाटेल त्या मुलाला वाटेल त्या उच्चनीच स्थितीला नेऊन पोचविता येईल. उत्क्रांतीवादी नावाचा आणखी एक पक्ष आहे. त्यांच्या मताप्रमाणे मानवाचा व एकंदर सर्वच गोष्टीचा हळूहळू विकास होत जाण्याची सृष्टीरचनेतच योजना आहे. म्हणजे मानवाने प्रयत्न कितीही केला, तरी उत्क्रांतीच्या त्या पायरीपर्यंत सृष्टीक्रमाने तो आला नसला तर त्याला इष्ट कार्यात कधीच यश यावयाचे नाही. झाड जसे अकाली फुलत नाही, व फळं धरीत नाही, खतपाणी घालून कितीही निगा राखली तरी आतून क्रमाने विकास होत तयारी झाली म्हणजे मगच योग्य हंगामी त्याला फळे-फुले येतात, त्याचप्रमाणे समाजाचे आहे. त्या त्या काली सर्व गोष्टी क्रमानेच घडत जातात आणि हा सृष्टीचा क्रम पाहिला तर उत्तरोत्तर मानवाची उन्नती होत जावी असा आहे असे या पंथाचे म्हणणे आहे. याशिवाय भौगोलिक परिस्थिती, परमेश्वरी कृपा, पूर्वकर्म इत्यादि माणसाची भवितव्ये ठरविणाऱ्या अनेक शक्ती आहेत असे सांगितले जाते. यात वाईट एवढंच आहे की, प्रत्येकजण आपापली उपपत्ती पूर्णपणे खरी व इतरांची चुकीची असे समजून अगदी एकांतिकपणा करतो. आणि त्यामुळेच सर्व नुकसान होते. वस्तुस्थिती अशी आहे की, भाकरी, कामविकार, संस्कार, आनुवंश, उत्क्रांती, भौगोलिक परिस्थिती आणि यदृच्छा (म्हणजे मानवांना ज्याचे आकलन झाले नाही अशा शक्ती) या सर्वच मानवाचे भवितव्य ठरवीत असतात. आणि म्हणून समाजशास्त्रज्ञांना या सर्व शक्ती विचारात घ्याव्या लागतात. आणि एवढ्यानेच हे भागत नाही. या सर्व शक्ती निरनिराळ्या काळी निरनिराळ्या प्रमाणात मानवी मनांवर कार्य करीत असल्यामुळे त्या त्या विशिष्ट काळचा अभ्यासही करावा लागतो. धर्माचा मागल्या काळी लोकांवर विलक्षण पगडा असे. मनस्मृतीमध्ये जे दंडक घालून दिले आहेत त्यासंबंधी विवेचन करताना पुष्कळ वेळा हे मोडले तर चांडाळयोनी प्राप्त होईल, नरकात जावे लागेल असे सांगितलेले आढळते. आणि माणसांना ते शेकडोशे वर्षे खरे वाटत असे; आणि अजूनही पुष्कळांना तसे वाटते. अलिकडे विज्ञानाचा पगडा जरा जास्त होऊ लागला आहे. यावरून निरनिराळ्या काळी निरनिराळ्या शक्ती माणसाला हलवीत असतात हे उघड दिसून येईल. या सर्वांचा विचार करून समाजशास्त्रज्ञाने मानवाला त्याच्या कल्याणाचा मार्ग दाखवायचा असतो. म्हणूनच हे कार्य फार जबाबदारीचे आहे.
 गेल्या शंभर दीडशे वर्षांत या क्षेत्रात युरोपमध्ये फार मोठे कार्य झाले आहे. ऑगस्टस् कोंट या फ्रेंच पंडिताने १८३८ साली प्रथम (सोशिऑलजी) समाजशास्त्र हा शब्द वापरला. हर्बट स्पेन्सरने तो पूर्ण रूढ केला. लेस्टर बार्ड हा अमेरिकन पंडित आहे. न्यूटन, फ्राईड यांची आपापल्या क्षेत्रात योग्यता आहे तितकीच समाजशास्त्रात यांची आहे असे काहींचे मत आहे. समाजशास्त्राची अंगोपांगे पाहिली तर आज हजारो नाणावलेले शास्त्रज्ञ या क्षेत्रात काम करीत आहेत असे दिसून येईल.
 इकडील कांही पंडितांच्या मते हिंदूंनी मागे जो समाजशास्त्राचा अभ्यास केला आहे व अनेक स्मृतीमधून व विशेषतः मनुस्मृतीत जो प्रगट झाला आहे तो अगदी पूर्ण असून जशाचा तसा आजच्या समाजाचे प्रश्न सोडविण्यास पुरेसा आहे. हे मत कसे भ्रामक आहे, हे पुढील शेदीडशे पानांच्या प्रबंधात, ठायी ठायी दाखविलेच आहे. पण त्या संबंधात एक स्पष्टपणे खुलासा करणे अवश्य वाटते, तो येथे करीत आहे.
 (१) येथे असलेल्या निरनिराळ्या जाती तितक्या भिन्न गुणांसाठी टिकवून धरणे अवश्य आहे म्हणून त्यांनी आपआपसात लग्ने करू नयेत; (२) जितका पैसा (म्हणजे अन्न) असेल तितकीच माणसे निर्माण व्हावी व वरच्या गटांतील संख्या वाढून खालच्या गटांची संख्या कमी व्हावी, हे श्रेयस्कर असल्यामुळे या जातींनी एकमेकांचे धंदे करू नयेत, आणि (३) निसर्गाच्या निवडीला योग्य वाव मिळण्यासाठी शक्य तितकी जास्त प्रजा व्हावी या दृष्टीने व इतरही अनेक दृष्टीने समाजात बालविवाह व्हावेत हे हिंदूच्या सर्व समाजशास्त्राचे तात्पर्य आहे.
 आणि या नियमाअन्वये वागल्याने आज भोवतालच्या अनेक संस्कृती... नाश पावल्या असताना हिंदू टिकून राहिले आहेत असे या लोकांचे म्हणणे आहे.
 यांपैकी प्रत्येक विधानाची स्वतंत्रपणे चर्चा करून ते कसे असिद्ध आहे, ते दाखविलेच आहे. येथे पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की भिन्न रक्त म्हणज काय, व येथे असलेल्या प्रत्येक जातीचा विशिष्ट गुण कोणता हे स्पष्टपणे त्या पंथाच्या लोकांनी दाखविल्यावाचून त्यांच्या मताला म्हणजेच हिंदूंच्या जातिव्यवस्थेला काडीचाही अर्थ नाही. माझा लेख प्रसिद्ध झाल्यावर या विषयावर दोनतीन ठिकाणी वादविवाद झाला. पण या प्रश्नाचे उत्तर देण्याचे दर ठिकाणी टाळले गेले. तेव्हा वाचकांनी एवढे नेमके ध्यानात ठेविले पाहिजे की पंधराशे जातींचे पंधराशे विशिष्ट गुण स्पष्टपणे दाखविल्यावाचून जातिव्यवस्थेला काहीही अर्थ नाही. वृत्तिसंकर व बालविवाह यांचा विचार पुढे केलाच आहे. पण हिंदू जगले म्हणजे काय? या प्रश्नाची थोडी चर्चा करणे अवश्य आहे. 'रक्त भिन्न म्हणजे काय,' या विचारात जसा घोटाळा आहे, 'तसाच जगणे म्हणजे काय' या विचारातही घोटाळा आहे. आणि या दोन बाबतीत हेतुपुरस्सर घोटाळा करूनच त्यावर सनातनपंथाची अर्वाचीन उभारणी करण्यात आली आहे.
 जगणे याचे दोन अर्थ होतात. एक स्वाभिमानाने पूर्वजांचा लौकिक कायम ठेवून जगणे असा अर्थ होईल; आणि दुसरा फक्त टिकून राहाणे, न मरणे, पूर्वीचे सत्त्व नाहीसे झाले असूनही केवळ शरीराने जगणे असा अर्थ होईल. आणि याच अर्थाचा घोटाळा सनातनी लोक करीत असतात. आपण या दोन्ही गोष्टींचा विलगपणे विचार करू.
 हिंदू आपल्या पूर्ण वैभवानिशी आतापर्यंत टिकून आहेत, असे स्पष्टपणे जुन्या पक्षालाही- काही वेडगळ लोक सोडून दिल्यास- म्हणता येणार नाही. वैभव नसताना नुसते टिकून रहाणे, हीही काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही. अजिबात मरण्यापेक्षा ती चांगलीच आहे. आणि भोवतालच्या मिसरी, बाबीलोनी इत्यादि संस्कृती नष्ट झाल्या तरी हिंदू टिकून राहिले, नुसते जीव धरून का होईना पण टिकून राहिले, यात काही तरी विशेष आहे, हे मान्य केलेच पाहिजे. पण याचा संबंध लोक जातिभेद आणि वर्णाश्रमव्यवस्था यांशी जो जोडतात, तो मात्र मान्य होणे शक्य नाही. वर्णाची व जातींची कडक व्यवस्था आज तीन हजार वर्षेच आहे. त्याच्या आधी वेदाच्या संकलनापासून जरी काळ मोजला, तरी तीन हजार वर्षे हिंदू लोक जातिव्यवस्थेच्या अभावी टिकून होतेच! आणि त्यावेळेसही शक, यवन, पणी इत्यादि परकीयांच्या स्वाऱ्या या देशावर होतच होत्या. तेव्हा जातिव्यवस्थेनंतर जसे हिंदू टिकले, तसेच ते आधीपण टिकून राहिले होते. म्हणजे हिंदू टिकले असे म्हणावयाचे असेल, तर ते आज सहासात हजार वर्षे टिकले आहेत. पण मनूचे गोडवे गाण्याच्या भरात थापा देण्यास सोकावलेले लोक हिंदु दोनतीन हजार वर्षे टिकले आहेत, असे म्हणतात. कारण वर्णव्यवस्था नसताना हिंदू आधी टिकले होते. हे सांगणे त्यांना गैरसोयीचे असते.
 दुसरे असे की इतक्या पुरातन काळापासून टिकले आहेत, असे फक्त हिंदूच आहेत असे नाही. चिनी व जपानी लोक असेच टिकून राहिले आहेत. चिन्यांचा इतिहास तर इसवीसनापूर्वी चारहजारपर्यंत मागे पोचविता येतो. ज्यू लोकांची तीच स्थिती आहे. गेल्या दोन हजार वर्षात ज्यू लोकांचा जेवढा छळ झाला, तेवढा दुसरा कोणाचाच झाला नसेल. तरी ते टिकून आहेतच. पण या चिनी व ज्यू लोकांत वर्णव्यवस्था मुळीच नाही, तेव्हा टिकण्याचा आणि वर्णव्यवस्थेचा संबंध जोडणे केवळ हास्यापद होय. आणि केवळ टिकून राहाणे यातच पराक्रम असेल तर आफ्रिकेतल्या अनेक रानटी जाती टिकून राहिल्या नाहीत काय? आणि इतकेच काय- जगातले सर्व लोक टिकून राहिले नाहीत काय? हिंदू हिंदूस्थानात आले तेव्हा ही सध्याच्या हिंद्वेतर लोकांचे पूर्वज कोठे तरी कोणच्या तरी नामरूपाने होतेच. हिंदूंची कारकीर्द सुरू झाल्यानंतर ते माकडाच्या योनीतून मनुष्ययोनीत आले असे म्हणता यावयाचे नाहीत. त्याच्या आधीच कित्येक सहस्रके हिंदूंप्रमाणेच ते मनुष्ययोनीत आलेलं होतेच. आणि ते आतापर्यंत टिकूनही राहिले आहेत.
 येथे काही लोक असे म्हणतील की, हिंदूचे जगणे व इतरांचे जगणे यांत फरक आहे. कारण हिंदूंनी फार मोठी संस्कृति निर्माण केली आहे. हे उत्तर जर खरे असेल तर याचा अर्थ स्पष्टपणे असाहोतो की केवळ जगण्याला महत्त्व नसून संस्कृतीला महत्त्व आहे. माझ्या मताने रामायण, महाभारत, यांसारखी महाकाव्य रचणे; सांख्य, योग्य वेदान्त यासारखी दर्शने लिहून, जगाच्या आदिकारणांचा ठाव पाहणे; गणित, रसायन, वैद्यक, ज्योतिष यांसारखी शास्त्रे हस्तगत करणे, अर्जुन, समुद्रगुप्त यांनी केले तसे दिग्विजय करणे; नृत्य नाटय, गायन, शिल्प इत्यादि कलांची जोपासना करणे; आणि कोणापुढे मान न वाकविता स्वातंत्र्याने राहणे ही मोठ्या संस्कृतीची मुख्य लक्षणे आहेत. आणि या दृष्टीने पाहिले आणि संबंध हिंदुस्थानचा विचार केला तर, गेल्या पाचसातशे वर्षात आपली स्थिती फार खालावली आहे असे कोणाही समंजस माणसाला मान्य करावे लागेल. महाराष्ट्राचाच फक्त इतिहास थोडासा उज्ज्वल आहे. पण तो चातुर्वण्याचे सर्वं नियम झुगारून 'प्रत्येकाला वाटेल ती संधी' या तत्त्वान्वये चालल्यामुळेच उज्ज्वल झाला आहे, हे या प्रबंधात एकदोन ठिकाणी दाखविलेच आहे.
 यावरून असे दिसेल की केवळ जगणे यात काही पराक्रम नाही. जगातले सर्व लोक तसे जगून आहेतच. संस्कृतीसह मानाने जगणे असा अलीकडच्या जगण्याचा अर्थ असेल तर ते हिंदूंना साधलेले नाही. जेव्हा साधले होते तेव्हा चातुर्वर्ण्य नव्हते. मध्यंतरी थोडेसे पुन्हा साधले तेव्हा चातुर्वर्ण्य मोडल्यामुळेच ते साधले. अर्धवट संस्कृतीने कसेबसे टिकून रहाणे असा जरी जगणे या शब्दाचा अर्थ केला तरीही चातुर्वर्ण्याचे समर्थन करता येणार नाही. कारण चिनी व ज्यू हे चातुर्वर्ण्यरहित समाज तसे टिकलेले आहेतच.
 यावरून निष्कर्ष असा निघतो की मन्वादि स्मृतिकारांनी हिंदूंना सांगितलेले समाजशास्त्र हे मुळीच यशस्वी ठरलेले नसून ते आमूलाग्र बदलावयास पाहिजे. ते बदलून कोणच्या नव्या तत्त्वावर समाजरचना करावयास पाहिजे याचे विज्ञानाने जे उत्तर दिले आहे ते मराठीत सांगण्याचा प्रयत्न मी पुढील प्रबंधात केला आहे.
 आनुवंश, रक्तसंकर, वृत्तिसंकर, लोकसंख्येचे नियमन, समाजाचे अंतिम ध्येय, राष्ट्रकल्पना, भौतिकशास्त्रे व धर्म, विवाहसंस्था, गृहसंस्था पश्चिमेच्या उत्कर्षाचे रहस्य इत्यादि अनेक प्रश्न येथे विचारासाठी घेतले आहेत. आणि अनेक युरोपीय व अमेरिकन शास्त्रज्ञांनी या बाबतीत जो अभ्यास केला आहे त्याच्या आधारे त्याचे विवेचन केले आहे. त्यांनी दिलेले अनेक निर्णय आपल्या समाजाला कसे लागू पडतात, याची चर्चाही केली आहे. त्यांच्या पुष्टीकरणार्थ आपल्या समाजाच्या इतिहासातील उदाहरणे दिली आहेत. तेवढ्यावरून वाचकांना समाजशास्त्राच्या मूलभूत तत्वांची बरीच कल्पना येईल असे वाटते.