वि. स. खांडेकर चरित्र

डॉ. सुनीलकुमार लवटे




अक्षर

वि. स. खांडेकर चरित्र
(चरित्र)
डॉ. सुनीलकुमार लवटे

संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर- ४१६ ००७
मो. नं. ९८ ८१ २५ ०० ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in

तिसरी आवृत्ती २०१८

© डॉ. सुनीलकुमार लवटे

प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com

मुखपृष्ठ
गौरीश सोनार

अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर

मूल्य ₹२५0/ मनोगत

 ‘वि. स. खांडेकर चरित्र' मूळ रूपात सप्टेंबर, २०१२ मध्ये श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूरच्या चरित्र ग्रंथमाला'च्या प्रथम संचात प्रकाशित करण्यात आले होते. ऑक्टोबर, २०१३ मध्ये त्याचे पुनर्मुद्रण करण्यात आले होते. हे चरित्र प्रथम प्रकाशित झाले तेव्हा त्यास डॉ. अनंत व लता लाभसेटवार प्रन्यास, नागपूर आणि लाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरिकाचे रु. २५०००/- चे अर्थसाहाय्य लाभले होते. आता अक्षर दालन, कोल्हापूरतर्फे त्याची सुधारित तिसरी आवृत्ती येते आहे, त्याबद्दल आनंद असून या चरित्र प्रकाशनास वेळोवेळी साहाय्य करणा-यांचे प्रारंभीच मी आभार मानतो.
 मराठी साहित्यात यापूर्वी वि. स. खांडेकर चरित्राच्या अनुषंगाने वा. शि. आपटे, वा. रा. ढवळे, मा. का. देशपांडे, जया दडकर, प्रभृती मान्यवरांनी लिहिले आहे. अलीकडच्या काळात मी वि. स. खांडेकरांच्या समग्र असंकलित, अप्रकाशित साहित्य प्रकाशनाचा जो प्रकल्प हाती घेतला, त्यात कादंबरी, कथासंग्रह, रूपक कथासंग्रह, लघुनिबंधसंग्रह, मुलाखतसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, व्यक्तिलेखसंग्रह, पटकथासंग्रह आत्मकथनपर लेखसंग्रह अशी वीस पुस्तके प्रकाशित केली आहेत. आणखी कादंबरी, प्रस्तावनासंग्रह, समीक्षासंग्रह, वैनतेय लेखसंग्रह, विनोदी लेखसंग्रह, नाट्यछटा अशी डझनभर पुस्तके प्रतीक्षित आहेत. पैकी निम्मी प्रकाशनाधीन असून निम्मी प्रक्रियाधीन आहेत. दरम्यानच्या काळात वि. स. खांडेकरांची दोन स्मृती संग्रहालये उभारण्यात आली. त्यांत संकल्पना, संशोधन, साधनसंग्रह करण्याचे कार्य मी केले. ही संग्रहालये शिवाजी विद्यापीठ, वि. स. खांडेकर भाषा भवन, कोल्हापूर व वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान, शिरोडे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे आपणास पाहता येतील. या सर्व धडपडीत वि. स. खांडेकर चरित्राचे नवे पैलू उलगडले. काही नवे संदर्भ हाती आले. त्यामुळे चरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य झाली होती. या काळात वि. स. खांडेकरांचे पुनर्मूल्यांकन झाले होते या अनुषंगाने मी अनेक वृत्तपत्रे, नियतकालिकांमधून वेळोवेळी लिहिले होते. आकाशवाणी, कोल्हापूरहून काही व्याख्याने ही प्रक्षेपित झाली होती. त्या सर्वांचा सुधारित आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचक, अभ्यासक, संशोधकांसाठी हे पुस्तक म्हणजे अद्यतन संदर्भसाधन बनेल, असा मला विश्वास वाटतो.
 मूळ चरित्र लिहिले तेव्हा तरुण वाचकवर्ग माझ्यासमोर होता. पुनर्मूल्यांकन प्रकरणात जे सात-आठ लेख अंतर्भूत करण्यात आले आहेत, त्यात काही ठिकाणी पुस्तकाकारात द्विरुक्ती वाटली तरी त्या त्या प्रकरणाची गरज म्हणून ती आहे तशीच ठेवली आहे. संपादनात ते टाळणे खरे तर शक्य होते, पण मग तिथे उणीव भासू लागते, विषयविस्तार व विवेचनात अपुरेपण येते. त्यामुळे तुटक संदर्भ परिपूर्ण होण्यास साहाय्यही होते असे वाटल्यावरून मूळ लेखातील मजकूर तसाच ठेवला आहे.
 ‘वि. स. खांडेकर चरित्र'चे जे रूप आकाराला आले आहे, त्यामुळे खांडेकरांचं जीवन, कार्य, विचार, मूल्य, साहित्य, दृष्टिकोन इत्यादीविषयी एक व्यापक दृष्टी व आकलन विकसित होते. त्यामुळे खांडेकर हे केवळ मराठी साहित्यिक न राहता ‘आंतरभारती' रूपाने ‘भारतीय साहित्यिक बनून पुढे येतात. भारतीय ज्ञानपीठाने मराठीचा पहिला पुरस्कार सन १९७४ साठी आपल्या दशकपूर्तीच्या निमित्ताने बहाल करून मोठे औचित्य साधले आहे. वि. स. खांडेकर 'माणूस' म्हणून जितके मोठे होते तितकेच त्यांचे साहित्य ‘मानवधर्मी' होते. मानवी जीवनाच्या विविध प्रश्न व समस्यांचा ऊहापोह करताना खांडेकर जे विचार व्यक्त करतात, त्यांचे ते चिंतन मानवजातीच्या अंतिम कल्याणाचे अमर भाष्य बनून जाते. या साहित्याचे चिरंतनत्व या अजरामर चिंतनात सामावलेले आहे. ते व्यक्त करताना खांडेकर ज्या उपमा, उत्प्रेक्षा, रूपकांचा प्रयोग करतात, भाषिक सौंदर्याचा जो साज चढवितात, त्यामुळे त्यांचे साहित्य एकाच वेळी ललित, मनोहर व विचारोत्तेजक बनत असते. त्यामुळे ते वाचकावर आपल्या शब्द सौंदर्य व विचार सामर्थ्याची मोहिनी घालत त्याला अंतर्मुख करते. त्यामुळे वि. स. खांडेकर साहित्याचे वाचन शिळोप्याचा उद्योग न होता सजग परिवर्तनाचे साधन बनून पुढे येते. मर्यादांसह ते मराठी साहित्याचा अनमोल ठेवा बनते. हे चरित्र खांडेकरांच्या अशा आकलनाचे व्यक्तिपरिचायक व साहित्य मूल्यांकनाचे माध्यम बनावे म्हणून केलेला हा खटाटोप. वाचकांची खांडेकरांविषयीची आजवरची समज विस्तारत सखोलपणे त्यांच्या जीवन, साहित्य, विचार आस्वादास हे चरित्र प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे

११ जून, २०१७

साने गुरुजी स्मृतिदिन

अनुक्रमणिका


१. वि. स. खांडेकर जीवनपट : तिमिरातुनी तेजाकडे/७
२. समग्र साहित्यिक खांडेकर : अंतरीचे बोल/३३
३. पटकथाकार खांडेकर : मराठीचे मॅक्झिम गॉर्की/६२
४. समाजचिंतक खांडेकर : माणूसपणाचा शोध/९२
५. वि. स. खांडेकर : पुनर्मूल्यांकन
 अ.वि. स. खांडेकर  : संक्षिप्त समग्र मूल्यांकन/१०३
 आ.वि. स. खांडेकर : एक तपस्वी शिक्षक/१०९
 इ. वि. स. खांडेकर : सार्वकालिक साहित्यिक/११४
 ई. वि. स. खांडेकर : आंतरभारती साहित्यिक/११९
 उ. वि. स. खांडेकर : अचर्चित ललित साहित्य/१२४
 ऊ. वि. स. खांडेकर : अश्वत्थाम्याची जखम/१३५
 ए. वि. स. खांडेकर साहित्याची प्रस्तुतता/१४२
 ऐ. वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय : प्रेरणा आणि दृष्टी/१४६
६. उपसंहार/१५९

  • परिशिष्टे

 १. वि. स. खांडेकर : पुनर्मूल्यांकन लेख पूर्वप्रसिद्धी सूची/१६२
 २. वि. स. खांडेकर : जीवनपट/१६३
 ३. वि. स. खांडेकर : मान-सन्मान/पुरस्कार/१६७
 ४. वि. स. खांडेकर : साहित्यसंपदा/१६८
 ५. वि. स. खांडेकर : चित्रपट सूची/१७६
 ६. वि. स. खांडेकर : भाषांतरित साहित्यसूची/१७८
 ७. वि. स. खांडेकर : संदर्भग्रंथ सूची/१८२  भारतीय साहित्यावर मराठी भाषेची नादमुद्रा उठविणारे पहिले मराठी साहित्यिक म्हणून वि.स.खांडेकर खांडेकरांना ओळखलं जातं. विसाव्या शतकात स्वातंत्र्य, समता,बंधुता,धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या पंचशील तत्त्वांना बांधील राहून त्यांनी लेखन केले.धर्मांधता,जातिभेद, स्त्री-पुरुष असमानता, अंधश्रद्धा, दारिद्रय, अज्ञान इत्यादी त्या शतकातील प्रश्नांना प्रमाण मानून त्यांनी त्यांची उकल साहित्याद्वारे प्रभावीपणे केली. यासाठी वि.स.खांडेकर हे समाजशील साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कथा, कादंबरी,रूपककथा,लघुनिबंध, नाटक, काव्य,पत्र, समीक्षा, अनुवाद,संपादन,व्यक्तिचित्रण, पटकथा लेखन इत्यादी साहित्यप्रकारांत केवळ भरच घातली, असे नव्हे. त्यांनी रूपककथा,लघुनिबंध या साहित्यप्रकारांचे जनकत्व पेलले. भाषा व शैलीच्या प्रांतांत अलंकाराचे सौंदर्य व शैलीचे सुभाषित मार्दव त्यांनी विकसित केले. या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या समग्र साहित्यास सामाजिक चिंतनाचे रूप लाभले.पिढ्या घडविण्याचे कार्य करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांत वि.स.खांडेकरांचा समावेश होतो, तो या योगदानामुळे. त्यांनी आपल्या साहित्यातून रामायण,महाभारत,पंचतंत्र,पुराण इत्यादींमधील मिथकांचा द्रष्टा उपयोग करून घेतला. इतकेच नाही, तर त्याचा समकालीन परिस्थितीशी अन्वय लावून त्याचा नवा अर्थ सांगितला. 'ययाति' कादंबरी हे त्याचे बोलके उदाहरण होय. यामुळे वि. स. खांडेकरांचे साहित्य केवळ मराठी व महाराष्ट्रीय न राहता ते भारतीय आणि वैश्विक बनले. या त्यांच्या साहित्याच्या अभिजात कसोटी व कौशल्यामुळेच त्यांच्या साहित्य व चित्रपटांचे अनुवाद हिंदी, तमिळ, तेलगूमध्ये झाले. गुजराती, तमिळ, मल्याळम् या भाषांत तर त्यांचे समग्र साहित्य अनुवादित झाल्याने त्या भाषिकांना खांडेकर आपल्याच भाषेतील लेखक वाटतात. मराठी भाषा व साहित्यास ज्ञानपीठ पारितोषिक पहिल्यांदा मिळवून देऊन खांडेकरांनी आपल्या साहित्याचे राष्ट्रीयत्व सिद्ध केले. अशा खांडेकरांचे समग्र, सुबोध जीवनचरित्र ही मराठी साहित्यातील पोकळी होती. ती भरून काढण्याचा प्रयत्न ही काळाची गरज होती. हे चरित्र म्हणजे खांडेकर व्यक्ती आणि वाङ्मयाचा अन्वयार्थ होय.
पूर्वज
 बळवंतराव खांडेकर हे खांडेकर कुटुंबाचे ज्ञात पूर्वज होत. त्यांचे एक भाऊही होते. विष्णुशास्त्री त्यांचे नाव. हे कुटुंब मूळचे सावंतवाडीचे. तिथल्या भटवाडीत आजही त्या कुटुंबाच्या रहिवासाच्या पाऊलखुणा स्थावराच्या रूपात साक्ष देतात. पैकी बळवंतराव खांडेकर हे वकिली करण्यासाठी म्हणून कर्नाटकातील हुबळी येथे गेले व स्थायिक झाले. त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या. मुलाचे नाव आत्माराम. तो पंधरासोळा वर्षांचा असताना कॉलऱ्याने त्याच्या वडिलांचे म्हणजे बळवंतरावांचे निधन झाले. व्यवसायाशिवाय तिथे या कुटुंबाची मिळकत नसल्याने आत्माराम आपल्यासह दोन अनाथ बहिणींना घेऊन पैतृक गावी सावंतवाडीस आला. तिथे परतल्यावर आपल्या काकांशी म्हणजे विष्णुशास्त्रींशी संपत्तीच्या हक्कावरून त्याचे मतभेद झाले. तो भरल्या पानावरून उठला नि तडक सांगलीस आला. त्या काळी सांगली, कोल्हापूर या तत्कालीन घाटमाथ्यावर परुळेकर, बावडेकरांसारखी कुटुंबे कोकणातून येऊन स्थिरावली होती. कोकणातून येणाऱ्यांचे ते आधार बनत. इंग्रजी चांगले असणाऱ्यांना लगेच नोकऱ्या मिळत. कोल्हापूर, सांगली, मिरज, कुरुंदवाड, जमखंडी इत्यादी संस्थानिकांच्या राजधानीत त्या वेळी पोलिटिकल एजंटच्या कचेऱ्या असत. त्यांना सनदी कामासाठी मुन्सफ लागायचे. आत्माराम सांगलीस येऊन ओळखीच्या आधारावर शिकला, वकील झाला व मुन्सफ बनला.
 तो काळ १८५७ च्या बंडानंतरचा होता. सांगली संस्थानात तात्यासाहेब पटवर्धनांचे राज्य होते. बाबाकाका माईणकर हे दरबारी पुराणिक होते. या संस्थानाचे गणपती देवस्थान होते. त्याची पूजा-अर्चा माईणकरांकडे होती. ते देवळालगतच राहत. त्यांची सर्वांत धाकटी कन्या होती सुंदरी. ती उपवर होताच संस्थानातील आत्मारामपंत या उमद्या मुन्सफाचे स्थळ योग्य वाटून त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर वधूचे नाव रमाबाई ठेवले. आत्मारामपंत व रमाबाई यांचे कुटुंब सुखावले. त्यांना तीन मुले झाली. बळवंत, गणेश आणि शंकर. पैकी गणेश आत्माराम खांडेकर वयाच्या अठराव्या वर्षी आपल्या काकांना, सखाराम खांडेकर यांना, दत्तक गेल्याने विष्णू सखाराम खांडेकर झाला. तो दत्तक मुलगा म्हणजेच मराठीतील सुविख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर होत.
जन्म व बालपण
 वि. स. खांडेकरांचा जन्म ११ जानेवारी, १८९८ रोजी सांगली येथे त्यांच्या आजोळी झाला. गणपतीच्या देवळातच त्यांचे घर होते. तिथे जन्म झाला म्हणून त्यांचे नाव गणेश ठेवले गेले. ते आपल्या वडिलांना दादा म्हणत. वडील मुन्सफ होते. नोकरीत फिरती असायची. त्या वेळी सांगलीत आलेल्या एका अॅडमिनिस्ट्रेटरशी त्यांचं बिनसले. मुन्सफाची नोकरी सोडून ते सबरजिस्ट्रार झाले. त्यांचे घर सुखवस्तू होते. कपडा-लत्ता, खेळणी, खाऊ मिळाला नाही, असे कधी झाले नाही. घरी मोलकरीण, स्वयंपाकीण होती. वडिलांची थोरा-मोठ्यांत ऊठबस होती. त्यांची मुलांवर माया होती.गणेश शेजारच्याच मंडईमागील शाळेत जाऊ लागला. तिसरीत गेला आणि त्याचा खोडकरपणा कमी झाला. तो अभ्यास करू लागला. चौथीत दुसऱ्या क्रमांकाची तीन रुपयांची शिष्यवृत्ती पटकावून त्याने आपल्या बुद्धीची चुणूक दाखविली. त्याला कीर्तन-पुराणांचा नाद होता. हा देवळात घर असल्याचा परिणाम. तो बारा-तेरा वर्षांचा झाला असेल (सन १९११) तोच त्याला वाचन व क्रिकेटचा छंद जडला. घरी वडील आजारी असत. त्यांची शुश्रूषा तो मनापासून करायचा. त्या आजारातच वडिलांचे निधन ११ ऑक्टोबर, १९११ रोजी झाले. पोरकेपणातून त्याला नाटकाचे वेड लागले. त्या काळी सांगली संस्थानात नाटकाचे मोठे वेड होते. विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांसारख्या नाटककारांची ही नगरी, महाराष्ट्राची नाट्यपंढरीच मानली जायची. 'शारदा', ‘भाऊबंदकी', 'सवाई माधवरावांचा मृत्यूसारखी नाटके गणेशनी बालपणीच पाहिली.‘शापसंभ्रम', 'शारदा'मधील पदे त्याला तोंडपाठ होती. एकदा ती देवलांना म्हणून दाखवून त्याने त्यांची शाबासकीही मिळविली होती.
 गणेश पंधरा वर्षांचा असेल. अभ्यासात हुशार तर होताच; पण अभ्यासापेक्षा वाचनाचे वेड मोठे. अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी', दाभोळकर ग्रंथमालेतील स्पेन्सर, मिल इत्यादी, हरिभाऊ आपटे यांच्या कादंबऱ्या, शनिमहात्म्य, नवनीत, वामन पंडित, मोरोपंत यांचे काव्य, केशवसुतांची कविता, त्याने अल्पवयातच वाचल्या. वाचनाची त्याची भूक बकासुरासारखी होती. त्याचे वाचन वावटळीसारखे होते. दैनिक, नियतकालिकांचे वाचनही नियमित होते. चतुरस्त्र वाचनामुळे लेखनाची ऊर्मी होणे स्वाभाविक होते.
शिक्षण
 सन १९०७ मध्ये सांगली हायस्कूलमध्ये इंग्रजी पहिलीत प्रवेश घेतल्यापासून त्याच्या शालेय प्रगतीत उत्तरोत्तर वाढच होत गेली. शाळेतील शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर, शंकरशेठ केळकर, मुदगल गुरुजी यांचा त्याच्यावर लोभ होता नि वरदहस्तही. मॅट्रिकमध्ये असताना रा. ना. जोशी, गो. वा. केळकर, ब. रा. कुलकर्णी हे त्याचे वर्गमित्र होते. त्यावेळी सांगलीला मॅट्रिकचे केंद्र नसल्यामुळे आपल्या वर्गसोबत्यांबरोबर त्याने बेळगाव केंद्र निवडले. त्याचे चुलत मामा वासूनाना त्या वेळी बेळगाव-शहापूर संस्थानात होते. ते केंद्र निवडण्याचे हेही एक कारण होतं.
 त्या वेळी शाळा जानेवारीत सुरू होत. परीक्षांचे निकाल डिसेंबरमध्ये लागत. डिसेंबर, १९१३ च्या शेवटच्या आठवड्यात मॅट्रिकचा निकाल लागला. गणेश आत्माराम खांडेकर अहमदाबाद, बेळगाव व मुंबई केंद्रांमधून उत्तीर्ण विद्यार्थ्यांत बाराव्या क्रमांकात अव्वल आला. महाराष्ट्रातील (मुंबई इलाखा)विद्यार्थ्यांत तो आठवा होता. त्याला ५७५ पैकी ४०३ गुण मिळाले होते. तो मॅट्रिकला जाताच घरच्या मामांनी त्याला परीक्षा संपताच पोस्टात चिकटवायची खलबते सुरू केली असल्याने उच्च शिक्षणाबद्दल इच्छा असूनही तो साशंकच असायचा; पण मोठा भाऊ बळवंत त्याच्यापूर्वी मॅट्रिक होऊन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकण्यासाठी गेला असल्याने आशा होती. मॅट्रिकचे वर्ष गणेशच्या दृष्टीने धकाधकीचे होते. वडिलांच्या जाण्याने आजोबा, मामांवर सारी भिस्त होती. दुपारचे जेवण देवळात असायचे. आजोबांच्या बदली जेवणाने शाळेला उशीर व्हायचा. रात्री कधी-कधी पोह्यांवरच निभवायला लागायचे. वडिलांच्या जाण्याने आलेलं पोरकेपण, फाटके कपडे, फी न मिळणं, पुस्तके दुरापास्त. गणेश घरी मदत व्हावी म्हणून संस्कृत, गणिताच्या शिकवण्या करायचा. रुपये-आठ आणे मिळकत; पण ती मोठी वाटायचे ते दिवस! अशा दिव्यातून त्याचं मॅट्रिकला मिळालेले यश वाखाणण्यासारखे होते. दुःखं विसरायचा एकच उपाय होता - वाचन आणि अभ्यास. त्यातून वेळ मिळाला की, कृष्णाकाठी जाऊन तो एकांत संवाद अनुभवायचा.
 निकाल लागला तेव्हा गणेश वासूनानांकडे बेळगावला होता. सांगलीहून वकील झालेल्या चुलत मामा विनुदादाचे पत्र आलं. त्यात फर्ग्युसनला पाठवायची आनंदाची बातमी होती. त्या पत्राने गणेशच्या मनात स्वप्नांची नवी पहाट, नवी मनोरथे घेऊन आली. डॉक्टर, प्राध्यापक होण्याची स्वप्ने तो रचू लागला. या स्वप्नरंजनात त्याने सांगली केव्हा गाठली ते त्याचे त्यालाच कळले नाही. सांगलीत येताच तो पुण्याच्या तयारीला लागला.
 जानेवारी, १९१४ मध्ये गणेशनी फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला. पुण्यातील शालूकर बोळात असलेल्या सांगलीकर वाड्यात त्याचा मुक्काम होता. कॉलेजात गेल्यावर सलामीलाच त्याने 'उषास्वप्न'वर आधारित 'स्वप्न संगम' महाकाव्य लिहायला घेतले. हा त्याचा लेखनाचा पहिला प्रयत्न होता. षोड्शवर्षीय स्वप्नांच्या धुंदीचे ते दिवस होते. कॉलेजला आल्यावर इंग्रजी प्राध्यापक वासुदेवराव पटवर्धनांच्या प्रभावामुळे मराठी वाचनाची जागा इंग्रजीने घेतली. वाढत्या वाचनानं चाळिशीची देणगी मिळाली. चष्मा आला. बालपणापासून गणेशची दृष्टी तशी अधूच होती. उजवा -१०, तर डावा - १२ नंबरचा चष्मा. त्याने गणेशला स्कॉलर बनविले खरे! Saint's Agne's Eve, Golden Treasury, Deserted Village सारख्या रचनांनी त्याचे भावविश्व बदलले. राम गणेश गडकरी यांचे 'प्रेमसंन्यास' आणि कोल्हटकरांच्या ‘मतिविकार' नाटकांनी त्यांच्यावर गारूड केले.
 याच काळात मित्र बन्याबापू कमतनूरकरांमुळे त्यांचा राम गणेश गडकरी यांच्याशी परिचय झाला. परिचयाचे रूपांतर स्नेहात झाले. रोज साहित्यिकांचा सहवास, साहित्यिक चर्चा, वादविवाद यांमुळे युवक खांडेकरची साहित्यिक जाण प्रगल्भ होत गेली. गडकरी त्यांना वाचनाचे मार्गदर्शन करीत. गडकऱ्यांच्या सांगण्यावरूनच खांडेकरांनी या काळात कवी गिरीश, अरविंद, बालकवी यांची काव्ये वाचली. प्रेमशोधन, मानापमान यांसारखी नाटके वाचून, गडकऱ्यांंबरोबर ती किर्लोस्कर थिएटरमध्ये पाहून वाद झडणे आता नित्याचेच झालेले. इब्सेन, चेकॉव्ह, पिरांदेलो, युजेन, ओनील, टेनेसी, विलियम, आर्थर, मिलर प्रभृतींच्या साहित्यकृतींची पारायणे याच धुंदीच्या दिवसातील. World Classics, Everyman Library सीरिजमधील अनेक ग्रंथांच्या वाचनाचा हाच काळ. तिकडे लोकमान्य टिळकांचा 'केसरी', 'मराठा'सारखी वृत्तपत्रे राजकीय व सामाजिक प्रश्नांची जाण विकसित करीत होते. खांडेकरांसाठी हा काळ वाचन व विचारांच्या मशागतीचा होता. या काळात खांडेकर कविता करीत. गडकऱ्यांनी त्यांना केशवसुतांच्या कविता वाचण्यास दिल्या. त्यामुळे खांडेकरांना आपल्या कवितेतील तोकडेपणा लक्षात आला. त्यांनी गडकऱ्यांच्या सांगण्यावरून आपल्या कविता जाळून टाकल्या व नवलेखन सुरू केले. सन १९१५ मध्ये शैक्षणिक वर्षामध्ये बदल करून जानेवारी ते डिसेंबरऐवजी ते जून ते एप्रिल करण्यात आले. त्यामुळे खांडेकरांना सक्तीची सहा महिन्यांची सुट्टी मिळाली. या सुट्टीचा फायदा घेऊन खांडेकरांनी ‘रमणीरत्न' नाटक रचले. सांगलीतील या सुट्टीच्या काळात वासुदेवशास्त्री खरे यांना मिरजेत त्यांच्या घरी हे नाटक यथासांग वाचून दाखविण्यात आले. खरे शास्त्रींचा या नाटकावरचा अभिप्राय बोलका होता. ते म्हणाले, "पोरा, तुझे वय लहान आहे. हे नाटक तू लिहिले यावर नाटकवाले विश्वास ठेवणार नाहीत." या नाटकावर कोल्हटकर, गडकरी यांच्या कोट्यांचा प्रभाव स्पष्ट होता. ते लेखन म्हणजे पूर्वसूरींचं अंधानुकरण होतं. हे नाटक लिहिण्यामागे खांडेकरांचे एक भाबडे स्वप्न होते. नाटक एखाद्या कंपनीला विकायचं व कॉलेज शिक्षणासाठी पैसे जमवायचे; पण खरे शास्त्रींच्या वरील अभिप्रायामुळे ते बासनात गुंडाळून ठेवले गेले.
 जून, १९१५ ला खांडेकरांनी इंटरच्या वर्गासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा; पण त्यांची मनःस्थिती ठीक नव्हती. पैशाची चणचण, नाटकांचे झपाटलेपण, वाचनवेड या सर्वांत विरंगुळा आणि आधार होता तो राम गणेश गडकरी यांच्या सहवासाचा. त्या वेळी गडकरी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. असेच एके दिवशी ते गडकरी यांच्याबरोबर गंधर्व मंडळींच्या बिऱ्हाडी गेले होते. बालगंधर्वांनी गडकऱ्यांच्या सोबत खांडेकरांना पाहून ‘मास्तर, हा बरोबरचा मुलगा कोण?' म्हणून विचारणा केली. तेव्हा गडकरी मास्तर म्हणाले, “हा कोल्हटकरांच्या गादीचा वारस आहे. या वाक्याने खांडेकरांमध्ये साहित्यिक होण्याचे बीजारोपणच झाले.
दत्तक विधान
 अशातच एक दिवस अचानक डिसेंबर, १९१५ मध्ये पोस्टमास्तर असलेल्या मामांची तार खांडेकरांच्या हातात पडली. त्यात लिहिले होते, ‘ताबडतोब निघा. सावंतवाडीला जायचे आहे, दत्तक होण्यासाठी. या तारेने खांडेकर चक्रावून गेले. आपणास न विचारता दत्तकाचा घाट घातल्याबद्दल एकीकडे राग होता, तर दुसरीकडे दत्तकामुळे आर्थिक अरिष्ट संपेल, अशी आशाही होती; पण ते भ्रमात नव्हते. वडिलांच्या जाण्याने आलेल्या पोरक्या जीवनात वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षापासून खांडेरांनी जगात प्रेम, करुणा, सहानुभूती या गोष्टी किती दुर्मीळ असतात, याचा अनुभव घेतला होता. नात्यांच्या रोज ताणत निघालेल्या विणीतून ते आकाशातील कोरडे ढग ओळखून होते. वडील गेल्यानंतर खांडेकरांनी आपल्या काकांना मदतीचे पत्र मामांच्या सांगण्यावरून लिहिले होते. त्याचे साधं उत्तर न पाठविणाऱ्या काकांना - एका निर्दयी मनुष्याला आपण दत्तक जाणार, या कल्पनेचे काहूर या युवकाच्या मनात घोंघावत होते. आशानिराशेच्या लपंडावात कळले की, आपण ज्यांना दत्तक जाणार आहोत, त्या सखाराम काकांना १४ अपत्ये झाली होती. एक विधवा मुलगी वारणाक्का वगळता सर्व निवर्तलीत. काका अत्यवस्थ स्थितीत अथरुणाला खिळून आहेत. सावंतवाडीपासून सात-आठ मैलांवर असलेल्या नाणेली गावी त्यांचा मोठा जमीन-जुमला आहे. तो सांभाळण्यासाठी त्यांना वारस हवाय. शिवाय ते अंधश्रद्ध होते. भुताखेतांवर त्यांचा विश्वास होता. आपल्या बोकांडी बसलेला समंध (भूत, पिशाच) उतरायचा तर तरंगांनी (गुरव) सांगितल्याप्रमाणे दत्तकास पर्याय न राहिल्याने ते तयार झाले व दत्तक विधी १३ जानेवारी, १९१६ रोजी सावंतवाडीतील वडिलार्जित घरी पार पडून ते विष्णू सखाराम खांडेकर' झाले.
 दत्तक विधान पूर्ण झाल्यावर खांडेकर पुण्यास शिक्षण घेण्यासाठी म्हणून परतले. परतताना दत्तक वडिलांनी वाटखर्च देण्याचेही औदार्य दाखविले नाही. पुण्यात उतरले तेव्हा टांग्याने जाण्याइतपतही पैसे त्यांच्या खिशात नव्हते. आता त्यांची स्थिती 'न घर का, ना घाट का' अशी उपेक्षित झाली होती. दत्तक वडील स्पष्ट होते. दत्तक मुलानं शिक्षण सोडून शेती, सावकारी पाहावी अशी त्यांची अपेक्षा होती. तिकडे आजोळी आजोबा वृद्ध झाल्याने त्यांचा हात आखडला होता. ते आई व भाऊ शंकरचा सांभाळ करायचे. या जबाबदारीमुळे ते दत्तकपुत्र झाल्याने आजोळी परके झाले होते. आजोळच्या माणसांची अपेक्षा होती की, आता दत्तक घरानं माझं पाहावं.
 खांडेकर विचित्र कात्रीत सापडले होते. दत्तक विधानानंतर परिस्थिती अधिक बिकट झाली. अभ्यासातील लक्ष उडाले. परीक्षेला न बसल्याने टर्म बुडाली. मन रमविण्यासाठी वाचन व नाटक पाहणेच हाती होते. या काळात खांडेकरांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे 'वीरतनय' नाटक पाहिले. योगायोगाने प्रयोगाच्या वेळी गडकरी भेटले. त्यांना खांडेकर परीक्षेला न बसल्याचे कळताच ते रागावले. त्यामुळे खांडेकरांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी मुंबईमार्गे कोकणात जाणे किफायतशीर होते. भाऊच्या धक्क्यावरून बोटीने ते वेंगुल्यला आले. तेथून सारवट गाडीने त्यांनी सावंतवाडी गाठली.
 दत्तक घरी काकीची- बयावहिनीची हुकुमत चालायची; पण तिने कधी वैरभाव केला नाही. नवे गाव, मित्र नव्हते. 'पुस्तक माझा सखा' म्हणत खांडेकरांनी या काळात 'मूकनायक', 'सुदाम्याचे पोहे', शेरेडनची नाटके वाचली. मोती तलाव, नरेंद्र डोंगर, चिवार टेकडी, आकेरीचे मेट, मळगावचे मेट ही निसर्गस्थळे खांडेकरांसाठी विरंगुळा बनली. सावंतवाडीच्या श्रीराम वाचनालयात वर्तमानपत्रे, मासिके वाचणे जीवनक्रमाचा भाग होऊन गेला होता. दिवस कंठणे कठीण झाले तरी नाणेली या दत्तक गावाहून सांगावा काही येईना. महिना उलटून गेल्यावर मात्र दत्तक आई व बहिणीचा निर्वाणीचा निरोप आला. नाणेलीस खांडेकरांचे जाणे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखेच होते; पण दत्तक बहीण वारणाआक्काच्या मायेने सारे निभावून जाऊ लागले. तिच्या ‘भाऊ' पुकारणीने खांडेकरांचे पोरकेपण सरले व जीणे सुसह्य होत गेले.
 इच्छेविरुद्ध जगणे, विचार करणे, मन न लागणे या सर्वांची परिणती हिवतापात झाली आणि खांडेकर पुरते गारद झाले. नाणेलीच्या वास्तव्यात इथलं दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धा, इत्यादी गोष्टीही धक्का देणाऱ्या ठरल्या. पुण्याच्या वास्तव्यात थोरामोठ्यांचे सान्निध्य, सहवास लाभल्याले सुधारक मनास हे सारे नवे होते. खेड्याचे हे दर्शन विफल करणारे होते. दारिद्र्यातही चातुर्वर्ण्य आहे. किंबहुना चातुर्वर्ण्यापलीकडचा पंचम वर्ग आहे', या जाणिवेने ते सतत अस्वस्थ असत.
 थोडे बरे वाटताच राहिलेली टर्म पूर्ण करण्याकरिता म्हणून खांडेकर परत पुण्यात आले; पण प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना परतणे भाग पडले. १९१७,१८ ही दोन वर्षे प्रकृतीच्या कुरबुरीतच गेली. या काळात बांबुळी येथे खांडेकरांचा मुक्काम होता. सोबत दत्तक बहिणीची सावली होती. प्रकृतीस उतार पडावा म्हणून येथील ब्रह्मेश्वर मंदिरात व्रत-वैकल्ये, अनुष्ठाने होत. खांडेकरांचा त्यावर विश्वास नव्हता. केवळ घरच्यांच्या मायेपोटी ते सारे निमूटपणे करीत. १९१८ साल सरता-सरता प्रकृतीत बराच फरक पडला.
साहित्य सृजनारंभ
 सन १९१९ वर्ष उजाडले; पण खांडेकरांचा आराध्य सूर्य मावळला. २३ जानेवारीला राम गणेश गडकरी यांचं दुःखद निधन झाले. खांडेकरांच्या आयुष्यातील पोकळी रोज या ना त्या कारणाने वाढतच निघाली होती. वेळ घालविण्यासाठी परिसरातील मुलांना घरच्या सोप्यावर ते इंग्रजी शिकवू लागले. खांडेकरांनी याच काळात भटवाडीत छोटेसे वाचनालय सुरू केलं. त्यामार्फत सभा, भाषणं असे लुटूपुटूचे समाजकार्य त्यांनी सुरू केले. याच काळात मेघशाम शिरोडकरांसारखा ध्येयवेडा मित्र भेटला. ओळख स्नेहात बदलली. वाचनातून तयार झालेले सुधारक मन व भोवतालची पारंपरिक वृत्ती व व्यवहाराच्या विसंगतीने खांडेकर सतत बेचैन असत. एकदा त्यांनी या विसंगतीवर बोट ठेवत लिहायचं मनावर घेतले. दरम्यान 'नवयुग' मासिकात प्रकाशित झालेला ग. त्र्यं. माडखोलकर लिखित लेख 'केशवसुतांचा संप्रदाय' खांडेकरांच्या वाचनात आला. त्यात माडखोलकरांनी गोविंदाग्रज (गडकरी) यांच्या ‘दसरा' कवितेवर कोरडे ओढले होते. त्यांचे आरोप खोडून काढणारा एक लेख खांडेकरांनी लिहिला. 'तुतारी वाङ्मय व दसरा' असे त्याचे शीर्षक होते; कारण मूळ लेखात माडखोलकरांनी ‘दसरा कविता म्हणजे केशवसुतांच्या ‘तुतारी'चे अधम ‘अनुकरण' असल्याचे विधान केले होते. लेखासोबत आपली नवरचित कविता ‘होळी', 'आदर्श' या टोपणनावावर पाठविली होती. दोन्ही रचना 'नवयुग'मध्ये प्रकाशित झाल्या. याच दरम्यान बरेच दिवस मनात खदखदत असलेल्या वेगळ्या विसंगतीवर खांडेकरांनी एक लेखमाला लिहायचे ठरवून त्याची पहिली खेप ‘उद्यान' मासिकाकडे धाडली. ती प्रकाशित झाली. मग लेखन, प्रकाशन नित्याचे झाले. ‘उद्यान'चे संपादक ग. वि. कुलकर्णी यांच्या प्रोत्साहनामुळे ‘श्रीमत्कालिपुराण' लेखमाला चांगली चालली. या सदरात प्रकाशित लेख ‘महात्मा बाबा' गाजला, तो सावंतवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबा बाक्रे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या फिर्यादीमुळे. या प्रकरणाचा एक फायदा झाला. जरी ते लिखाण आदर्श' टोपणनावाने होत असले तरी त्याचे लेखक भटवाडीतील वि. स. खांडेकर होत, हे जगजाहीर होते. या चर्चेने लेखक म्हणून वि. स. खांडेकरांचे नाव सर्वतोमुखी झाले होते.
शिरोड्याच्या शाळेत
 एप्रिल, १९२० ची गोष्ट असेल. सावंतवाडीपासून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावरील शिरोड्याहून घनश्याम आजगावकर नावाचे शिक्षक एक दिवस वि. स. खांडेकरांच्या भटवाडीतील घरात दत्त झाले. त्यांना एका शिक्षकाची गरज होती. ते शिरोड्याला ‘ट्यूटोरियल इंग्लिश स्कूल चालवित. विशीतला हा तरुण इंग्रजी वाचतो, व्याख्याने देतो,मासिकात लिहितो,हे ते ऐकून होते. तत्पूर्वी खांडेकरांना मालवण, वेंगुर्ल्याहून अशी निमंत्रणं आली होती; पण राष्ट्रीय आंदोलन, लोकमान्य टिळकांचे विचार, राष्ट्रीय शिक्षणाचा ध्येयवाद, इत्यादींमुळे खेड्यात जायचे त्यांनी यापूर्वीच निश्चित केले होते. बाबाकाकांच्या निधनाने सांगलीची वाट बंद झाल्यात जमा होती. तिकडे नाणेलीत जाऊन दत्तक वडील बापूंच्या तडाख्यातून सुटायचे होते. शिरोडे खेडे असल्याची खात्री करून घेतली. आक्का आणि काकींच्या संमतीने आजगावकर मास्तरांना होकार दिला. जीवनात स्वातंत्र्य व स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू केला. शिरोड्याला जाणे हे त्यांच्या दृष्टीनं नव्या जीवनाची, स्वतःच्या ध्येय, स्वप्नांची नवी पहाट होती. म्हणून पहाटेच त्यांनी शिरोड्याचा रस्ता धरला. मनात प्रश्नांचं काहूर होतं. ‘माझे इतर सर्व जाऊ दे; पण एक बुद्धी तेवढी माझ्यापासून जाऊ देऊ नकोस. तिची मला सोबत राहू दे.' असं आर्य चाणक्याप्रमाणे मनास बजावत ते शिरोड्याला पोहोचले.
 शिरोडे छोटे खेडे होते. हजार-पंधराशेची वस्ती.अरबी समुद्राचा सुंदर किनारा लाभलेलं तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातलं गाव. आता त्याचा समावेश नव्याने झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आला आहे. रेडी, तिरोडा, आजगाव, आरवलीसारखी गावं मिळून शिरोडा पंचक्रोशी होते. तिथल्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अ. वि. बावडेकर यांनी १ जानेवारी, १९१५ रोजी ट्युटोरियल न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. अवघ्या वर्षाचं आयुष्य असलेली ही शाळा खांडेकर आले तेव्हा बाल्यावस्थेत होती. १००-१२५ विद्यार्थी होते. बावडेकर मास्तरांनी परगावी येऊन सुरू केलेली ही शाळा. गावची शिक्षणाविषयी आस्था असलेली स.ग.प्रभू,आप्पा नाबर,गजानन कामत, ग. सी. खटकटे, आदी मंडळी विद्यार्थी जमवायला खांडेकरांना मदत करीत. शाळेला स्वतःची इमारत नसल्याने ती तीन ठिकाणी भरे. महादेव नाबरांचे घर, कोटणीसांचे घर, बाजारातील निखर्ग्याची माडी अशी शाळेची त्रिस्थळी यात्रा असायची. अ. वि. बावडेकर, घ. आ. आजगावकर, वि.स.खांडेकर,शं.प.शिनारी, भि. ना.दळवी या गुरू पंचायतांनी शाळेचा संसार चालवायचे ठरलं; पण बावडेकर मास्तर येऊ न शकल्याने वि.स.खांडेकरांनाच शाळेच्या मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळणे भाग पडले.
 शाळेत खांडेकर इंग्रजी, संस्कृत, बीजगणित शिकवित. जे जे ठाऊक आहे, ते ते सांगावं या भावनेने त्यांचे शिकवणे असायचे. सांगली, पुणे इत्यादी घाटावरची शहरे सोडून कोकणात आल्यावर नाणेली, बांबुळी परिसरातलं दुःख, दारिद्र्य त्यांनी पाहिले होते. शिरोड्याची स्थिती त्यापेक्षा वेगळी नव्हती. अठरापगड जातींचा समाज त्यांनी इथंच येऊन पहिल्यांदा अनुभवला ‘‘पांढरपेशांच्या चार भिंतींच्या आत आयुष्यातील पहिली वीस वर्षे गेल्यामुळे घरट्याबाहेर कधीही न पडलेल्या पाखराच्या पिलासारखी आपली स्थिती आहे, हे या मुलांना शिकवताना माझ्या लक्षात येऊ लागलं. समाजाचा एक फार मोठा श्रमजीवी वर्ग कसा जगतो, कसा राहतो, त्यांची सुख-दुःखे काय असतात याचे प्रत्यक्ष ज्ञान मला नव्हतेच; पण हे सारे जीवन वाङ्मयात प्रतिबिंबित झालेले मी पाहिले नव्हते. त्यामुळे माझे मन अस्वस्थ झाले. आपण अगस्ती ऋषी भले नाही होऊ; पण टिटवी होता आले तरी पुरे, या अपेक्षेने ते कामाला लागले. जग बदलायचा ध्यास त्यांनी घेतला.
 पहिल्या पंधरा दिवसांचा पगार २० रु. हाती आला. नोकरी म्हणून केलेली ती पहिली कमाई होती. तिथल्या निसर्गानं खांडेकरांना भुरळ घातली. सुरूची बाग, भिके डोंगरी, मीठागर, काजी, सारं पाहताना शहरातून आलेला हा तरुण शिक्षक रोमांचित व्हायचा. तांबड्या मातीत रंगलेले जेमतेम गुडघे झाकणारे धोतर, धोतराचा साजेसा तांबूस सदरा, वर जुना पुराणा कोट, डोक्यावर टोपी, डोळ्यांवर चांदीच्या काड्यांचा जाड काचेचा चष्मा, एका हातात छत्री, तर दुसऱ्या हातात पिशवी, पिशवीत पुस्तकं अशा वेशात खांडेकर मास्तरांचा सर्वत्र संचार असायचा.
 शाळेला स्वतःची इमारत नव्हती. इमारत बांधकामासाठी त्यांनी निधी उभारायला सुरुवात केली. खांडेकर मास्तर, आप्पा नाबर, अन्य शिक्षक बाजार, जत्रांमधून फंडाची पेटी फिरवित. घरोघरी जाऊन खांडेकर प्रकृतीची पर्वा न करता उंबरे झिजवू लागले. सभा होत. जुना अनुभव लक्षात घेऊन विरोधही व्हायचा; पण खांडेकरांना ध्येयवादाने पछाडले होते. सन १९२५ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्या वेळी शिक्षकांना ७५-८० रुपये पगार असायचा. त्यां पैकी प्रत्यक्षात निम्माच मिळायचा. त्या काळात प्रत्येक शिक्षकाने इमारत फंडास १००० रुपयांची देणगी देऊन आपली निष्ठा व्यक्त केली होती. त्या काळात इमारतीस २५,००० रुपये खर्च आला होता. त्याचा सविस्तर जमाखर्च खांडेकरांच्या हस्ताक्षरात उपलब्ध असून तो कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयात पाहताना खांडेकरांच्या समर्पण व त्यागाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.
 शिक्षक म्हणून खांडेकर विद्यार्थ्यांना आईसारखा जीव लावित. त्यांच्या विचारांप्रमाणे आचाराचे संस्कारही विद्यार्थ्यांवर घडत. एकदा खांडेकर आपल्या एका विद्यार्थांला घेऊन सावंतवाडीला गेले होते. काम संपेपर्यंत रात्र झाली. सोबत खांडेकरांचे स्नेही होते. त्यांना घरी आग्रहाने जेवण्यास नेलं. मित्र सनातनी होते. जातपात पाळायचे. मित्रांनी विद्यार्थी वेगळा बसविला. दारावरील पायरीवर शेणगोळा ठेवला. संकेत हा की, भोजन झाल्यावर विद्यार्थ्यानं आपली जागा सारवावी. खांडेकरांच्या ते लक्षात आलं. आपले नि विद्यार्थ्यांचे जेवण होताच खांडेकरांनी शेणगोळ्यात हात घातला. मित्र खजील झाला. त्याने प्रतिबंध केला; पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत मात्र आपल्या शिक्षकांच्या आचारधर्म नि आदेशामुळे पाणी आलं. असेच एकदा शाळेची सहल गेली होती. मुलगा समुद्रात बुडतो हे बघून खांडेकर मास्तरांनी समुद्रात मारलेली मुसळी त्यांच्या कर्तव्य व बांधीलकीची परिसीमा होती. एक आजारी विद्यार्थी खांडेकर मास्तरांना बघायचा धोशा लावतो व खांडेकर त्याच्या इच्छेचा आदर करतात. अशा अनेक कहाण्यांतून खांडेकरांचे विद्यार्थिप्रेम सिद्ध होते.
 खांडेकर वेगवेगळ्या प्रसंगी विद्यार्थ्यांसमोर भाषणे करीत. त्यातून विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व रुंदावयाचे. स्नेहसंमेलन, वादविवाद, प्रदर्शन, थोरामोठ्यांच्या भेटी, त्यांचे विद्यार्थ्यांशी हितगुज, पुस्तकांवर चर्चा, ग्रंथालय विकास अशा चतुर्दिक मार्गांनी ते विद्यार्थ्यांना अधिकाधिक देऊन अभ्यासाबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची काळजी घेत. काकासाहेब कालेलकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, न. चिं. केळकर, बा. भ. बोरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा कितीतरी महनीय व्यक्ती त्यांनी शाळेत आणल्या व विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणला.
 गावातील राजकारणात भाग घ्यायचे त्यांनी कटाक्षाने टाळले. तरी काही मंडळी विरोध करीत राहायची. खांडेकरांनी शेवटपर्यंत शाळेस संस्कारकेंद्र म्हणून सुरक्षित व अलिप्त ठेवले. त्यामुळे त्यांची शाळा माणूस घडविणारं संस्कृतिकेंद्र बनून राहिली.
'वैनतेय'चे संपादन
 पुणे सोडून सावंतवाडीला आल्यानंतरच्या काळात वि. स. खांडेकरांनी साहित्यक्षेत्रात लेखन, व्याख्याने, वाचनालय इत्यादी स्वरूपात जे प्रयत्न आणि धडपड सुरू केली होती, त्या १९१९ च्या दरम्यानच्या काळात भेटलेला ध्येयवादी मित्र मेघःश्याम शिरोडकर. त्याने महात्मा गांधींच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शिक्षण सोडून राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली होती. पुढे तो पुण्याच्या राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या टिळक महाविद्यालयातून पदवीधर झाला. परत गावी आला, तेव्हा सावंतवाडी संस्थान होते. लोकांचा कैवार घेणारे, त्यांची दुःख वेशीवर टांगणारं. संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारं वृत्तपत्र असावे असे त्याच्या मनाने घेतले आणि एक साप्ताहिक प्रकाशित करायचे ठरले. खांडेकरांनी त्यांना लेखनसाहाय्य करण्याचे मान्य केले. खांडेकर त्या वेळी आत्मरंजनासाठी काव्य, विनोद, कथा असं लिहीत होतेच.  त्याला प्रकट व्हायला आणखी एक माध्यम मिळाले. 'वैनतेय'च्या पहिल्या अंकापासून (२९ ऑक्टोबर, १९२४) ते १९३७ पर्यंत खांडेकरांनी 'वैनतेय'मध्ये नियमित लेखन केले.
 मेघःश्याम शिरोडकर ‘वैनतेय'चे संपादक झाले, तर वि. स. खांडेकर सहसंपादक. वाङ्मय विभागाचे ते मुख्यतः संपादक असले तरी साप्ताहिकाची जी गरज पडेल ते लेखन त्यांनी केले. मुद्रणाची जबाबदारी भाऊसाहेब सप्ते यांच्यावर सोपविण्यात आली होती. साप्ताहिकासाठी ‘वैनतेय' हे नाव वि. स. खांडेकरांनीच सुचविले. याचा अर्थ गरुड. हे नाव निवडताना त्यांच्यापुढे दोन गोष्टी होत्या. दक्षिण कोकण हा डोंगरांनी वेढलेला भूप्रदेश. त्या डोंगराच्या खडकावर बसून सूर्याकडे टक लावून पाहणाऱ्या गरुडासारखा आपणास सामाजिक, राजकीय प्रश्नांचा वेध घेता आला पाहिजे. दुसरे म्हणजे मेघःश्याम शिरोडकर, न. चिं. केळकर, शिवरामपंत परांजपे अशा गुरूंपासून वृत्तपत्रीय प्रेरणा घेऊन आलेले. त्यांच्यापुढे 'केसरी'चा आदर्श होता. केसरी म्हणजे सिंह, प्राण्यांचा राजा, तर गरुड हा पक्ष्यांचा. त्यामुळे ‘वैनतेय' नाव निश्चित करण्यात आले.
 ‘वैनतेय'चे ध्येय, धोरण प्रतिबिंबित करणारा एक श्लोकही खांडेकरांनी लिहिला होता. तो गरुडाच्या चित्राबरोबर प्रत्येक अंकाच्या डोक्यावर छापला जायचा. तो श्लोक असा होता -

"वसे दास्यी माता, नयनसलिली मग्न जनता
असे पंगु भ्राता, अहिकुलछले भीत जनता
नसे साह्या कोणी, अमृत लपले स्वर्गभुवनी
हसे माता आणी, विहगपति शत्रूस बघुनी"

 यातील ‘वसे दास्यी माता' हे भारतमातेच्या पारतंत्र्यास उद्देशून होते. ‘अहिकुल भीत जनता'चा संबंध आपल्याच समाजाचा एक भाग दुसऱ्यावर हुकमत गाजवतो - स्वातंत्र्याप्रमाणे त्यापासून ही मुक्ती मिळावी असे सुचविणारा होता.
 वैनतेय साप्ताहिकाचा पहिला अंक २० ऑक्टोबर, १९२४ रोजी प्रकाशित झाला. सावंतवाडीचे रावबहादूर बापूसाहेब महाराजांचा राज्याभिषेक समारंभ याच दिवशी होता. त्यानिमित्त पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. १९२४ ते १९३२ या कालखंडात वि. स. खांडेकरांनी अग्रलेख, स्तंभलेखन, स्फुट टिपणं तर लिहिलीच; पण प्रसंगी बातमीपत्रेही लिहिली. ‘समुद्रमंथन', ‘गाजराची पुंगी', 'रत्ना प्रसवा', 'गाढवाची गीता’, ‘गाढवापुढे गीता', ‘परिचयाची परडी, ‘कणसाचे दाणे', ‘रानफुले' अशी विविध सदरे खांडेकरांनी लिहिली. 'वाङ्मय विचार विभागाचे संपादन खांडेकर करीत. राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा तत्कालीन अनेक प्रश्नांवर खांडेकरांनी अक्षरशः शेकडो पाने भरतील इतका मजकूर लिहिला. कधी स्वतःच्या नावाने, कधी अनामिक, तर कधी विहंगम, आदर्श, कुमार, इत्यादी टोपणनावांनी, याशिवाय त्यांनी 'वैनतेय'मध्ये कथा, लघुनिबंध, लेख, विनोदी साहित्य, नाट्यछटा, कविता असं अनेकांगी साहित्यलेखन केलं. वि. स. खांडेकरांचा पहिला लघुनिबंध ‘वैनतेय'च्या २२ फेब्रुवारी, १९२७ च्या अंकात ‘रानफुले' सदरात ‘निकाल द्या' (How's that) शीर्षकाने प्रकाशित झाला होता. लघुनिबंधकार म्हणून खांडेकरांनी मराठी साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची गंगोत्री वैनतेय' होती. पुढे पाच दशके खांडेकर लघुनिबंध लिहीत राहिले. या काळात त्यांनी सुमारे पावणे दोनशे लघुनिबंध लिहिले.
 वैनतेय साप्ताहिक डेमी आकारात (Tabloid) छापले जायचे. त्या काळी विविध वृत्त, धनुर्धारी, नवयुग याच आकाराची असत. 'वैनतेय'मधील वैविध्यपूर्ण लेखनामुळे साहित्यिक,संपादक,समीक्षक, स्तंभलेखक म्हणून वि.स.खांडेकरांचा लौकिक सर्वदूर पसरला. या संपादन कार्यामुळे वृत्तपत्र हे लोकजागृतीचे व लोकशिक्षणाचे प्रभावी साधन असल्याची खात्री खांडेकरांना झाली. त्यांना शाळेप्रमाणेच वर्तमानपत्र हे सांस्कृतिक साधन वाटू लागले.'वैनतेय'च्या माध्यमातून खांडेकरांनी जातीय सलोखा, प्रबोधन, समाजास पुरोगामी बनविण्याचे कार्य केले. गैर गोष्टींवर प्रहार करण्यात ‘वैनतेय'नं कधी कुचराई केली नाही. सदसदविवेकाचा कौल सार्वजनिक जीवनात निर्माण करण्याचे कार्य यामुळे खांडेकर करू शकले.'वैनतेय'चं ग्राहक क्षेत्र मर्यादित असले तरी त्याचा वाचक, ग्राहक चोखंदळ व चिकित्सक होता. यामुळे बुद्धिवादी व विवेकशील वर्गाशी आपल्या साहित्याद्वारे खांडेकर नाळ जोडू शकले. अंधश्रद्धा निर्मूलन विचारास हातभार लावून खांडेकरांनी समाज पुरोगामी, वैज्ञानिक बनविण्याचा प्रयत्न केला.
प्रथम प्रकाशित पुस्तक  वि.स.खांडेकरांना लेखनाचा छंद बालपणापासूनच; पण त्यांचे लेखन सन १९१९ पासून विविध नियतकालिकांत प्रकाशित होत राहिले. उद्यान, नवयुग,वैनतेय,ज्योत्स्नासारख्या नियतकालिकांतून ते प्रकाशित होत राहिलं. कथा,कविता, विनोद,परीक्षण,लेख असे त्याचे स्वरूप असायचं; पण पुस्तकरूपी प्रकाशन होण्यास मात्र १९२८ वर्ष उजाडावे लागलं.  त्याचे असे झाले की, सन १९२६ मध्ये माधवराव जोशी यांनी ‘म्युनिसिपालिटी' हे नाटक लिहिले. ते रंगमंचावरही आले. प्रेक्षकांच्या पसंतीसही ते उतरले; पण त्या नाटकामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची काळी आणि डावी बाजूच तेवढी प्रकाशात आली. या संस्थेचे कल्याणकारी व विकासाचे कार्यही महत्त्वाचं आहे व ते समाजापुढे यायला पाहिजे, असे एका प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्याला वाटले. त्यानं स्पर्धा जाहीर करून एक हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सकारात्मक नाटक लिहिण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रकाशित केली. ती वि. स. खांडेकरांच्या वाचनात आली. त्या वेळी खांडेकरांना २५ रु. पगार होता. त्यांना नाटक लिहिण्याचा झटका आला. त्याच्या मुळाशी अर्थातच बक्षिसाचे प्रलोभन होते. स्पर्धा झाली. बक्षीसपात्र नाटक काही संयोजकांना मिळाले नाही. या परीक्षण मंडळात बेळगावचे नाट्यरसिक व मर्मज्ञ होते भाऊसाहेब सोमण. ते ‘किरात' या टोपणनावाने त्या वेळी लिहीत. ते केशवसुतांचे मित्र व चाहते होते. त्यांना वि. स. खांडेकरांचे नाटक ‘संगीत रंकाचे राज्य' आवडले. त्यामुळे बेळगावचे नाट्यप्रेमी डॉ. के. वा. साठे व पु. ल. ओगले यांना ते रंगभूमीवर यावे, असे वाटले. डॉ. के. वा. साठे यांचा नाट्यकला प्रसारक संगीत मंडळी, सांगलीशी संपर्क व परिचय होता. त्यांच्या शिफारशीवरून ‘संगीत रंकाचे राज्य' नाटक निवडले गेले. त्याचा पहिला प्रयोग सांगलीच्या सदासुख नाट्यगृहात १६ मे, १९२८ रोजी झाला. यात कमलाबाई कामत यांनी नायिका उषाची, तर शि.ह.परांजपे यांनी प्रदोषची भूमिका केली होती.परांजपे त्या वेळी ‘प्रेमसंन्यास'मध्ये 'गोकुळ'ची भूमिका करीत.नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी वि. स. खांडेकर यांचा सत्यबोध हुदलीकर यांच्या हस्ते जरीचा रुमाल व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला होता.
 हे नाटक पुस्तकरूपात प्रकाशित होईल,असे वि.स.खांडेकरांना कधी वाटले नव्हते; पण खांडेकर सांगली हायस्कूलला शिकत असताना त्यांच्या पुढे-मागे वामन वासुदेव अतीतकर नावाचे वर्गमित्र होते.ते बी. ए. होऊन विजापूरकरांच्या समर्थ विद्यालयाचे आजीव सेवक झाले होते. संस्थेचा ‘समर्थ भारत' छापखाना होता पुण्याच्या सदाशिव पेठेत. त्यांना वाटले की, आपण हे नाटक प्रकाशित केले, तर संस्थेस चार पैसे मिळतील. म्हणून त्यांनी ते सचित्र प्रकाशित केले. सन १९२८ ला प्रकाशित ‘संगीत रंकाचे राज्य' या नाटकाची किंमत होती १रुपया. या नाटकास मुरुड-जंजिऱ्याचे बा. अ. भिडे यांची प्रस्तावना आहे. नटवर्य केशवराव दाते यांनी पुण्यात हे नाटक पाहून त्याची नायिका श्रीमती कमलाबाई यांच्या अभिनयाची प्रशंसा करणारे एक पत्र खांडेकरांना लिहुन नव्या नाटकाची मागणी केली होती. यावरून ‘संगीत रंकाचे राज्य' किती यशस्वी होते, याची कल्पना येऊ शकते. खांडेकरांनी प्रतिसाद म्हणून त्यांना आपले ‘मोहनमाळ' नाटक पाठविल्याचे उल्लेख पत्रव्यवहारात आढळतात. केशवराव दाते व खांडेकर यांच्यात सन १९२९ पासून १९७१ पर्यंत पत्रव्यवहार दिसून येतो. त्यातून केशवराव दाते खांडेकरांना नाट्यदोष दाखवीत व मार्गदर्शन करतानाही आढळून येते. वि. स. खांडेकर केशवराव दातेच्या सूचनांचा आदर करीत. एका पत्रात त्यांनी केशवरावांना लिहिले आहे की, "आपले दोषदिग्दर्शन सौम्य झाले आहे, हे मी जाणून आहे; पण निर्जीव स्नेहदेखील जिथे मृदुत्वाबद्दलच प्रसिद्ध आहे, तिथे सुहृदयाचा स्नेह अकारण मृदू व्हावा यात नवल काय? (१) रसहानिकारक रहस्ये,(२) विनोदी पात्रांची लांबण, (३) कोटिक्रमाचा अतिरेक हे तिन्ही दोष कोल्हटकर गडकऱ्यांच्या परंपरेत माझे लेखन वाढल्यामुळे उत्पन्न झाले आहेत. देवल-खाडिलकरांच्या औषधाने हे विष निरुपद्रवी करण्याचा मी यापुढे शक्य तो प्रयत्न करणार आहे."
 वि. स. खांडेकरांचा जन्म व बालपण नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत गेले. देवल,खाडिलकरांसारखे नाट्यक्षेत्रातील पूर्वसूरी व कोल्हटकर-गडकरी यांच्यासारखे त्यांचे समकालीन ज्येष्ठ साहित्यकार यांच्या नाट्यवाचन व रंगभूमीवरील त्यांच्या नाटकांचे सादरीकरण पाहून आपणही नाटककार व्हावे, असे स्वप्न खांडेकर बालपणापासून पाहायचे. ‘शनिमाहात्म्य' वाचल्यानंतर त्यावर आधारित नाटक लिहिण्याचा प्रयत्न खांडेकरांनी केल्याचे उल्लेख आढळतात. पुढे १९१८-१९ च्या दरम्यान पुणे सोडून कोकणात आल्यावर प्रकृति अस्वास्थ्यामुळे ते बांबुळीत होते. निवांतपणा होता. लेखन, वाचनाशिवाय पर्याय नव्हता. त्या वर्षभराच्या कालावधीत व नंतरच्या तीन-चार वर्षांत हौस म्हणून त्यांनी ‘शीलशोधन', ‘मोहनमाळ','शांतिदेवता', ‘मृगलांछन', स्वराज्याचे ताट' यांसारखी नाटके लिहून ती समकालीन नाटकाकारांना अभिप्रायार्थ पाठविली होती, पैकी ‘स्वराज्याचे ताट' नाटक स्त्रीपात्र विरहित होतं. ते १९२५ च्या दरम्यान शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी लिहिलेलं ऐतिहासिक नाटक होतं, तर अन्य चार पौराणिक होती. या सर्वांतून खांडेकरांचा प्रारंभिक लेखनपिंड हा नाटककाराचा होता, हे स्पष्ट होते; पण तो काळ (१९२०-३०) हा मराठी संगीत नाटकांच्या ओहोटीचा असल्याने एक प्रकारे तो संधिकाल होता. नाट्य कंपन्या बंद पडत होत्या. राजाश्रय संपत आलेला. चित्रपटांच्या आगमनामुळे नाटकांचा जनमानसावरील प्रभाव कमी होत चाललेला. त्यामुळे खांडेकर कथा, कादंब-यांकडे वळले असावेत.
 ‘संगीत रंकाचे राज्य'चा मुख्य विषय स्थानिक स्वराज्य असला तरी त्यात स्त्री-पुरुष प्रीतिभाव, प्रेमातील संयोग-वियोग इत्यादींचं चित्रण प्रभावीपणे आले आहे. हे मूलतः संगीत नाटक असल्याने यात २५ गाणी आहेत. नाटकाची शैली कोटिबाज, विनोदाकडे झुकणारी. Dramatic Irony असं. प्रा.प्र.ना.परांजपेंसारखे समीक्षक त्यांचे वर्णन करतात. खांडेकर जरी नाटककार होऊ शकले नाही तरी नाट्यसमीक्षक म्हणून पुढे त्यांचा लौकिक झालेला आढळतो. एवढे मात्र खरे की, नाटक हा त्यांच्या वाचन व व्यासंगाचा विषय होता. पुढे खांडेकरांनी तो जन्मभर जपला.
विवाह
 सांगलीला ‘संगीत रंकाचे राज्य' नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर वि.स.खांडेकर आपल्या आजोळीच मे महिन्याच्या सुट्टीसाठी होते. या काळात सदर नाटकाच्या प्रकाशनाचा योग जुळून आल्याने त्यांनी तिथेच बसून दि. २६ मे, १९२८ रोजी नाटकासंबंधी आपली भूमिका ‘राज्याचा इतिहास' शीर्षकाने लिहिली. बा. अ. भिडे यांची प्रस्तावना वि. स. खांडेकरांनी अगोदरच घेऊन ठेवली होती. (२२ मार्च,१९२८). नाटक मार्गी लागल्याने खांडेकरांची प्रकृती सुधारू लागली होती. दत्तक बहिणीने लग्नाचे टुमणे लावल्याने व वयाने तिशी गाठल्याने लग्न करण्यास खांडेकरांनी तत्त्वतः तयारी दर्शविली. तरी लग्नास होणाच्या हजार-पंधराशे रुपयांच्या खर्चाची त्यांना विवंचना होती. मग स्नेही दत्ताराम घाटे यांच्या भरोशावर हातउसने घेऊन लग्न करण्याचे ठरले.
 घरी पत्नी म्हणून येणाऱ्या वधूबद्दल खांडेकरांची स्वतःची अशी धारणा होती. फार शिकलेली नसली तरी चालेल; पण आपण ज्या कोकणातील खेड्यात राहतो, तिथे आपल्यासारख्या शिक्षकाचा ओढग्रस्तीचा संसार सांभाळणारी ती असावी. याच होऱ्याने त्यांनी अन्य स्थळे नाकारून बेळगाव-खानापूरजवळील आसोग्याच्या मणेरीकरांची कन्या मनूचे स्थळ पसंत केले. मे, १९२८ मध्येच आक्का व दत्तक आईच्या संमती व उपस्थितीत आसोग्याला वधूपरीक्षा झाली. १६ जानेवारी, १९२९ रोजी आसोगे मुक्कामीच निवडक पाहुणे व मित्रांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.
 विवाहानंतर खांडेकरांनी पत्नीचे नाव ‘उषा' ठेवले. ते त्यांच्या संगीत रंकाचे राज्य'च्या नायिकेचे होते. मनाची नायिका प्रत्यक्षात मिळाल्याचीच ती साक्ष होती. विवाह साधेपणी, कर्मकांडास फाटा देऊन करण्यात आला. लग्नातील भोजनाच्या वेळी पंक्तिभेद (जातिभेद) होणार नाही, याचे आश्वासन घेऊन केलेला हा विवाह म्हणजे खांडेकरांच्या आचार-विचारांतील अद्वैत सिद्ध करणारा वस्तुपाठच ठरला. त्यानंतर लग्नविधी आवरल्यावर यथावकाश त्यांनी शिरोड्यास संसार थाटला. तो पाहण्यासाठी (लग्न चुकल्याची चुटपूट दूर करण्याच्या हेतूने) गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर मे, १९३० च्या पहिल्या आठवड्यात शिरोड्यास मुद्दाम आले व शिष्यास आशीर्वाद देऊन गेले.
मिठाचा सत्याग्रह
 भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वांत मोठे व दीर्घकालीन (१९३० ते १९३४) जनआंदोलन म्हणून मिठाचा सत्याग्रह ओळखला जातो. मिठावरच्या कराचा भार गरिबातील गरीब भारतीयांवर पडत असे. लहरी पावसामुळे लाखो शेतकरी कर भरू शकत नसत. करबंदी आंदोलनाचा भाग म्हणून मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. त्याची सुरुवात गुजरातमधील दांडीयात्रेने झाली. ६ एप्रिल, १९३० रोजी दांडी येथे कायदा भंग करून मीठ तयार करण्यात आले. त्यात महात्मा गांधींजींना अटक करण्यात येऊन पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. त्याच दिवसापासून महाराष्ट्रातही मिठाचा सत्याग्रह विलेपार्ले (मुंबई) येथे सुरू करण्यात आला. कायदेभंगाची चळवळ महाराष्ट्रात संघटित रीतीने व शिस्तीने व्हावे म्हणून महाराष्ट्र कायदेभंग मंडळ स्थापन करण्यात आले. त्या मंडळातर्फे शिरोडे येथे १२ एप्रिल ते १५ एप्रिल, १९३० या कालावधीत राज्यस्तरीय मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. त्याचे नेतृत्व मामासाहेब देवगिरीकर व धर्मानंद कोसंबी यांच्याकडे होते. शिरोडे गाव गोवा व महाराष्ट्राची सरहद्द असल्याने व तिथे मिठागरे असल्याने शिरोड्याची निवड करण्यात आली. गोव्यात तेरेखोल येथे पोर्तुगीजांविरुद्ध, तर महाराष्ट्रात शिरोडे येथे ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह करण्यात आला. ५०० जणांनी त्यात भाग घेतला. ३०० जणांना अटक करण्यात आली. उरलेले जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 वि. स. खांडेकर या सत्याग्रहात सक्रिय सहभागी झाले होते. त्यांचे सहकारी अप्पा नाबर यांचे मिठागर सत्याग्रहासाठी निवडण्यात आले होते. त्यांचे दुसरे एक सहकारी व ‘वैनतेय'चे संपादक मेघश्याम शिरोडकर या सत्याग्रहाम सामील होते. वि. स. खांडेकरही यात सामील होणार होते; पण सरकारी मदत घेणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांच्यावर बंधन होते; परंतु स्वयंसेवक, व्यवस्थापन, इत्यादींमध्ये ते सक्रिय होते. अप्पा नाबरांच्या घरावर अटकेनंतर जप्ती आली होती. हृदयाची हाक' कादंबरीच्या मानधनाची रक्कम देऊन खांडेकरांनी अप्पा नाबरांचे घर वाचविले. खांडेकरांनी ‘वैनतेय'मध्ये सत्याग्रहाची बातमीपत्रे लिहिली. सभांत भाषणे केली. सत्याग्रहात भाग घेऊ न शकल्याचे शल्य त्यांनी जीवनभर गांधीवादी विचार-आचाराचा वसा जपून भरून काढले. गांधी जन्मशताब्दीस विपुल लेखन केले. त्याचे संकलन, संपादन ‘दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी नावाने मी केले असून ते प्रकाशित झाले आहे.
विविधांगी लेखन
 वि. स. खांडेकरांनी सन १९३० ते १९३५ या कालखंडात केवळ विपुल लेखन केले असे नाही, तर जे लेखन केले ते विविधांगीही होते. 'संगीत रंकाचे राज्य' सन १९२८ ला प्रकाशित झाल्यावर लगेच १९२९ मध्ये ‘नवमल्लिका' हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. दरम्यान, खांडेकरांना वक्ते म्हणूनही आमंत्रित केले जाऊ लागले होते. त्या काळी ‘भारत गौरवमाला' वाचकांच्या पसंतीस उतरली होती. मंगेशराव कुलकर्णी त्यासाठी खूप मेहनत घेत. खांडेकरांचे स्नेही गं. दे. खानोलकर त्या वेळी भारत गौरवमालेत काम करीत. त्यांच्या सांगण्यावरून खांडेकरांनी आपली पहिली कादंबरी ‘हृदयाची हाक' लिहिली व एप्रिल, १९३० मध्ये लगेच ती प्रकाशितही झाली. एव्हाना वि. स. खांडेकर बहुप्रसव साहित्यिक म्हणून वाङ्मय वर्तुळात सर्वपरिचित झाले होते. तत्कालीन नियतकालिकांत ते नियमित लिहीत. या काळात त्यांनी ३ लेख, ५ कविता, ११ परीक्षणे, १९ कथा, ३ लघुनिबंध लिहिले. शिरोड्यातील निसर्ग व खेड्यातील निवांत जीवन हे त्याचं कारण होतं. सन १९३१ मध्ये 'कांचनमृग' कादंबरीनंतर लगेचच त्यांचे ‘गडकरी : व्यक्ती व वाङ्मय' प्रकाशित झाले. सन १९३२ मध्ये त्यांचे ‘आगरकर चरित्र' वाचकांच्या हाती आले. नंतर ‘उल्का (१९३४), ‘दोन ध्रुव' (१९२४) या कादंबऱ्या व ‘दत्तक व इतर गोष्टी (१९३४) चे प्रकाशन झाले.
 यामुळे वि. स. खांडेकर मान्यताप्राप्त साहित्यिक बनले. बडोद्याच्या साहित्य संमेलनात कथा विभागाचे अध्यक्षपद त्यांना लाभले. पुढे सन १९३५ ला तर ते पहिल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. पाठोपाठ त्यांना पुण्याच्या शारदोपासक संमेलनाच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद मिळाले. नंतर ते मुंबई मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष झाले. त्यांचे विचार व मते यांना एक प्रकारची मान्यता लाभून ते मराठी साहित्यरसिकांचे प्रिय लेखक, वक्ते, विचारक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार म्हणून सन्मानित झाले. त्यांच्या साहित्य विचारांतील गांभीर्य, नवता व भाषेतील सौंदर्य यांची विलक्षण मोहिनी मराठी भाषा व साहित्यात निर्माण झाली होती. मराठी वाचक ‘वि. स. खांडेकर' शीर्षक दिसताच प्रथम पसंतीने त्यांना वाचू लागला.
चंदेरी दुनियेत पदार्पण
 वि. स. खांडेकरांच्या घरी २० जानेवारी, १९३६ रोजी पुत्ररत्न झाले. सर्वत्र आनंदीआनंद होता. वि. स. खांडेकर यांनी मुलाचे नाव अविनाश ठेवून जीवनावरची दुर्दम्य आस्थाच व्यक्त केली होती. तशातच मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांनी खांडेकरांना चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचे आमंत्रण दिल्याने अनपेक्षितपणे त्यांच्यापुढे साहित्याचे नवे दालन व माध्यम खुले झाले. प्रथम त्यांनी या निमंत्रणाकडे दुर्लक्ष केले होते ते या साशंकतेने की, हे काम त्यांना आपल्या आवाक्याबाहेरचे वाटायचे; पण मग आग्रहामुळे त्यांनी प्रयत्न करायचे ठरवून ‘छाया' ही पहिली पटकथा 'हंस'ला दिली व ती निर्माता व दिग्दर्शकांच्या पसंतीला उतरल्याने लगेचच मुहूर्त करून तिचे छायाचित्रण सुरू झाले. सहा महिन्यांत चित्रपट तयार होऊन तो २० जून, १९३६ रोजी मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर, लीला चिटणीस, इंदिरा वाडकर, अनंत मराठे यांच्या या बोलपटात भूमिका होत्या. पांडुरंग नाईक यांचे चित्रीकरण होते. अण्णासाहेब माईणकरांचे यास संगीत लाभले होते. हिंदीत डब करून तो प्रकाशित करण्यात आला होता.
 वि. स. खांडेकर १९३६ ते १९६२ पर्यंत चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत होते. खांडेकरांनी मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू अशा भाषांत सुमारे २८ चित्रपटांच्या पटकथा, संवाद आणि गाणी लिहिली. त्यांच्या पहिल्या चित्रपटास गोहर सुवर्णपदक, तर अंतिम ‘माणसाला पंख असतात'ला भारत व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला होता. साहित्याप्रमाणेच खांडेकर चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. त्यांना भारतीय साहित्यिक बनविण्यात चित्रपटांचाही मोठा वाटा आहे. आपल्या चित्रपटांतून खांडेकरांनी अनेक सामाजिक समस्यांचे चित्रण केले, तसेच विनोदी कथा लिहून मनोरंजनही. त्यांच्या अनेक चित्रपटांच्या गाण्यांना मोठी पसंती लाभली होती. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विस्तृत आढावा पुढे घेण्यात आला असला तरी एकमात्र निश्चित की, साहित्याप्रमाणेच त्यांचे चित्रपटही संस्कार, मूल्ये, आदर्श प्रबोधन, इत्यादींची पाठराखण करीत होते.
गृहस्थ जीवन
 अविनाशच्या जन्मानंतर (१९३६) ६ ऑगस्ट, १९३७ ला कन्या मंदाकिनीचा जन्म झाला. तिला बाळलेणे द्यायचे म्हणून वि. स. खांडेकरांनी आपल्याला मिळालेलं गोहर मेडल मोडले. चित्रपट व शाळा यांची कसरत त्यांना जमेनाशी झाली; कारण चित्रपटाच्या कामासाठी वारंवार कोल्हापूर, पुणे, मुंबई असा प्रवास करणं जिकिरीचं झाले; म्हणून खांडेकर सपरिवार सन १९३८ च्या प्रारंभी कोल्हापुरी आले. त्यांनी शाहूपुरीतील मास्टर विनायकांच्या बंगल्यात आपलं बिऱ्हाड थाटले. आजच्या राजारामपुरीतील कन्येनं बांधलेल्या नंदादीप' निवासस्थानी कायमचे राहण्यास येण्यापूर्वी खासबाग इथे मूग यांच्या घरी, नंतर राजारामपुरीत ‘मुक्ताश्रम' येथे खांडेकर राहत. या काळात त्यांना कल्पलता (१९३९), सुलभा (१९४१) आणि मंगल (१९४४) या कन्यारत्नांचा लाभ झाला. खांडेकरांचे आपल्या मुलांवर प्रेम होते. आपलं लेखन, वक्तृत्व, संपादन, संमेलने, चित्रपट या सर्वांतून वेळ काढून मुलांवर संस्कार करणे, शंकासमाधान, गोष्टी सांगणे खांडेकर आवर्जून करत.
 गृहस्थ जीवनाचे संस्कार वि. स. खांडेकरांवर आजोळी असल्यापासूनच होत राहिले. त्यांचे वडील अकाली निवर्तले. त्या काळातही पोरवयातील खांडेकर आपल्या अर्धांगवायू झालेल्या वडिलांची सेवाशुश्रूषा करीत. आल्या-गेल्याचं स्वागत हे त्यांच्या समाजशील स्वभावातच होतं. जे घरी तेच दारी. मित्रांना सदैव मदत करीत. मित्रही त्यांना मदत करायचे.विद्यार्थ्यांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांचा मनुष्यसंग्रह मोठा होता. त्यांत साहित्यिक, साहित्यप्रेमी यांचा समावेश मोठा होता. त्यांच्या चेहऱ्यावर व्यथेचं चिन्ह कधी उमटत नाही. बोलण्यात कधी दुःखाचा उद्गार नाही. सगळं सोसायचं. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत राहायचं, ही वृत्ती. ते सोशिक होते. गृहस्थ धर्म पाळणारे होते. इतरांपेक्षा अधिक सहनशील होते. लेखन करताना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या टाळल्या, असे त्यांच्याकडून कधी झाले नाही. मुले, मुली लहान असताना ताप यायचा. खांडेकर सहासहा तास मुलींना खांद्यावर घेऊन शतपावली करीत, औषधोपचार करीत. प्रसंगी लेखन बाजूस सारत. लेखनिकाला सुट्टी देत; पण मुलांचे करण्यात कुचराई करीत नसत.
 वि. स. खांडेकर उपजत शिक्षक होते. शिरोड्याच्या शाळेत संस्कृत, इंग्रजी, बीजगणित, भूमिती पडेल ते विषय त्यांनी शिकविले होतेच. मुली शिकत असताना मॅट्रिकपर्यंत ते घरी त्यांना संस्कृत, इंग्रजी, बीजगणित शिकण्यास मदत करीत. तीच गोष्ट मुली एम. ए. करतानाही. खाडिलकरांची नाटके खांडेकर त्यांना शिकवीत. मुलींच्या अगोदर बायकोने शिकावे, वाचावे, असा त्यांचा प्रयत्न होता. ते पत्नी उषाताईंना सुरुवातीच्या काळात वाचूनही दाखवीत; पण उषाताईंचा ओढा शिक्षणापेक्षा संसाराकडे अधिक होता. त्या स्वयंपाकात सुगरण, राहण्यात टापटीप होत्या. घर नीटनेटकं ठेवण्यात त्या दक्ष होत्या. पत्नीच्या निधनानंतर (२६ ऑक्टोबर, १९५८) खांडेकरांनीच मुला-मुलींचा सांभाळ केला. पत्नीबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना सदैव भरलेली असायची.
 त्यांच्या वृद्धापकाळात मोठी मुलगी मंदाकिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्या नोकरी सांभाळून वि. स. खांडेकरांचे सारे करीत. लेखनिक, लोकांचे येणे-जाणे, पुढे वि. स. खांडेकरांचे वृद्धत्व, अंधत्व साऱ्या समरप्रसंगी त्या खांडेकरांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या. पत्नी निवर्तल्यानंतरही त्यांना जे १८, १९ वर्षांचं आयुष्य लाभले, त्या काळात मंदाताईच त्यांच्या पालक होत्या.
 वि. स. खांडेकर आचार, विचारांनी खरे पुरोगामी होते अन् खरे तर ‘नास्तिक होते. देवावर त्यांचा विश्वास नव्हता... घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे कधीही झाली नाही. धार्मिक विधीही होत नसत. सकाळ, संध्याकाळी फिरण्याचा खांडेकरांना छंद होता. फिरायला जाताना कोणीतरी नेहमी त्यांच्याबरोबर असायचे. दत्ताराम घाटे, कवी यशवंत, बा. भ. बोरकर, कवी गिरीश, नाटककार वसंत कानेटकर, प्रभृती मित्र, साहित्यिकांचे घरी येणे-जाणे, राहणे असायचे.
 टपाल वाचणे, उत्तरे लिहिण्याचा खांडेकरांना छंद होता. येणाऱ्या टपालाला उत्तर देण्याचा त्यांचा प्रघात व कटाक्ष होता. सामाजिक भावनेने विद्यार्थी, संस्था, उपक्रमांना ते मदत करीत. त्यांच्याकडे वाचक, स्नेही,आप्त, मार्गदर्शनासाठी येत. वेळ, प्रकृतीची तमा न बाळगता खांडेकर सर्वांशी हितगुज करीत. लहान-मोठा, आपपर असा भेद ते बाळगत नसत. माणूसप्रेमी, समाजशील गृहस्थ खांडेकर सर्वांचे सुहृद होते.
साहित्य-समाजाचे नेतृत्व
 बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषा व साहित्याचे केंद्र म्हणून बडोद्याचे महत्त्व प्रारंभापासूनच राहिले आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजाश्रयाचे ते फळ होय. सन १९३४ च्या २५ डिसेंबरला म्हणजे नाताळात तेथील मराठी साहित्य संमेलनाचे १९ वे अधिवेशन योजले होते. त्या वेळी वेगवेगळ्या साहित्यप्रकारांना वाहिलेली शाखासंमेलने घेण्याचा प्रघात होता. या संमेलनात पां. वा. काणे (भाषा), महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (इतिहास), माधव ज्यूलियन (काव्य), इत्यादींबरोबर वि. स. खांडेकरांची कथासंमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्या वेळी वि. स. खांडेकर होते अवघे ३६ वर्षांचे. कथासाहित्यातील त्यांची उमेदवारी होती अवघ्या १५ वर्षांची; पण या काळात त्यांच्या अनेक कथा नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. शिवाय नवमल्लिका', 'दत्तक'आणि इतर कथा', 'जीवनकला’, ‘ऊनपाऊस' यांसारखे कथासंग्रह प्रकाशित झाले होते. वाचकांची त्या कथांना, भाषा व शैलीच्या नवेपणामुळे मोठी पसंती लाभली होती. ही निवड त्याचीच पोचपावती होती. या निवडीने वि. स. खांडेकरांना साहित्यवर्तुळात मान्यताप्राप्त साहित्यिक म्हणून सन्मान लाभला. तेथून सन्मानाची शृंखला आजीवन सुरूच राहिली. त्यानंतर त्यांना गोमंतक साहित्य संमेलन, मडगाव (१९३५), शारदोपासक साहित्य संमेलन, पुणे (१९३५), मुंबई व उपनगर साहित्य संमेलन, दादर (१९३५), सोलापूर प्रांतिक साहित्य संमेलन (१९३६), दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, जमखंडी (१९४0), अशी एकापाठोपाठ एक अध्यक्षपदे मिळत राहिली. सन १९४१ला तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचा (आजचे अखिल भारतीय साहित्य संमेलन) रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळून चाळिशीचत ते मराठी साहित्य, संस्कृती, भाषेचे अग्रणी नेते बनले.
 त्यानंतरच्या १९७५ पर्यंतच्या पस्तीस वर्षांत कोणत्याही मोठ्या साहित्यिक उपक्रमाचे अध्यक्षपद वि. स. खांडेकरांकडे असणार हे ठरूनच गेलेलं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, भा. रा. तांबे, केशवसुत यांची जन्मशताब्दी, नटवर्य केशवराव दाते सन्मान असे कितीतरी उपक्रम वि. स. खांडेकरांच्या नेतृत्वाने व सक्रिय सहभागाने पार पडले. निधी संकलन, स्मारक ग्रंथ संपादन, अध्यक्षीय भाषण, इत्यादींतून वि. स. खांडेकरांचे साहित्यिक समाजाचं अनभिषिक्त सम्राटपण सिद्ध होत गेले व मान्यता पावलं.
पुरस्कार व सन्मान

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर सन १९२० च्या दरम्यान महात्मा गांधीजींकडे आले. याच वेळी वि. स. खांडेकर यांनी लेखक म्हणून प्रवेश केला. भारतीय राजकारणातील गांधीयुगाचा काळ हा वि. स. खांडेकरांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व विकसित होण्याचा काळ होता. ज्याला स्थूलमानाने टिळकयुगानंतरचा स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणता येईल, त्या काळात १२ कादंबऱ्या, २० कथासंग्रह, ७ लघुनिबंधसंग्रह, २ रूपककथा संग्रह, ५ लेखसंग्रह, १ व्यक्ती व वाङ्मय, १ चरित्र, १५ पटकथा असे विपुल लेखन करून खांडेकर मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक म्हणून समाजमान्य होते. सन १९३७ साली त्यांच्या 'छाया' बोलपटाच्या कथेस कलकत्ता चित्रपट पत्रकार संघाचं ‘गोहर सुवर्णपदक' लाभले होते. भारतातील चित्रपटसृष्टीचा पहिला पुरस्कार म्हणून त्याचं असाधारण नि ऐतिहासिक महत्त्व असले, त्यांना अनेक साहित्य संमेलनाची अध्यक्षपदं चालून आली असली तरी त्यांच्या साहित्यकृतीस स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण होईपर्यंत मात्र नामांकित असे पुरस्कार लाभले नव्हते. नाही म्हणायला कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्या पत्नी रमाबाई आपटे यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ ठेवलेले ‘कै. ह. ना. आपटे पारितोषिक' सन १९४२ व १९४३ ला वि. स. खांडेकरांना त्यांच्या ‘क्रौंचवध' कादंबरीस मिळाले होते. ते पारितोषिक स्वीकारावे म्हणून रमाबाईंनी लिहिलेले २६ मे, १९४३ चे पत्र मोठे हृद्य होते. ते त्यांच्या आनंदाश्रमातून लिहिले गेले होते.
 सन १९६० ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शासनातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली व वि. स. खांडेकरांच्या ‘ययाति' कादंबरीस तो दिला गेला. ययाति' कादंबरी मराठी साहित्याची अभिजात साहित्यकृती म्हणून तिला साहित्य अकादमी (१९६०) व भारतीय ज्ञानपीठ (१९७४) असे पुरस्कार लाभले. मराठी भाषा व साहित्यास पहिले ज्ञानपीठ मिळवून देण्याचे कर्तृत्व वि. स. खांडेकरांचेच. 'ययाति' कादंबरी आजही मराठी वाचकांची पसंती म्हणून धृवपद टिकवून आहे.
 वि. स. खांडेकरांनी मराठीत चतुरस्त्र लेखन केले. त्यांचे साहित्य व चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, गुजराती, कन्नड, मल्याळम, आदी भाषांत अनुवादित झाले. काही साहित्यकृती रशियनसारख्या भाषेतही गेल्या. यामुळे वि. स. खांडेकर केवळ मराठी साहित्यिक न राहता ते भारतीय साहित्यिक झाले. भारतीय ज्ञानपीठ पारितोषिकाने त्यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी भारत सरकारने सन १९६८ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले. त्याच वर्षी साहित्य अकादमीने साहित्यिक योगदानाची नोंद घेऊन त्यांना ‘महदत्तर सदस्यत्व' (फेलोशिप) बहाल केले. या विविध पुरस्कारांच्या निमित्ताने भारतभर त्यांचे सत्कार व सन्मान झाले. षष्ट्यब्दी गौरव, अमृतमहोत्सव झाले. अनेक विशेषांक, गौरव अंक प्रकाशित झाले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने त्यांना डी. लिट. पदवी प्रदान केली (१९७६), जन्मशताब्दी वर्षात भारत सरकारने १९९८ मध्ये खांडेकरांचे स्मृती तिकीट प्रकाशित केले. १९७५ च्या नागपूर येथे संपन्न पहिल्या विश्व हिंदी संमेलनात भारतीय श्रेष्ठ साहित्यिक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. या नि अशा अनेक घटनांतून वि. स. खांडेकरांचे साहित्यिक श्रेष्ठत्व राजमान्य आणि लोकमान्य झालं.
अंधत्व, वृद्धत्व आणि मृत्यू
 वि. स. खांडेकर बालपणापासूनच कृश होते. सतत ताप इत्यादी विकारांनी ग्रस्त असत. दृष्टी अधू असल्याने बालपणीच चष्मा लागला होता. तरुणपणी हिवतापाने ग्रस्त झाल्याने दीर्घकाळ उपचार व विश्रांतीसाठी बांबुळीला दत्तक बहीण वारणा आक्काबरोबर राहावे लागले होते. पुढे शिरोड्यास शिक्षक असताना ते सर्पदंशाने बेजार झाले होते. रक्तदाबाचा विकारही होता. त्यांच्या पत्रव्यवहारात, लेखात, मुलाखतीत, प्रस्तावनेत त्यांच्या प्रकृति अस्वास्थ्याचे उल्लेख सर्वत्र आढळतात. शिवाय पत्नी व मुलांचे आजारपण होतेच. ही सर्व अडथळ्यांची शर्यत पार करीत वि. स. खांडेकरांनी आपले वाचन, चिंतन, मनन, लेखन, वक्तृत्व, सांस्कृतिक कार्य यांत सातत्य ठेवले. ते त्यांनी या अविचलपणे केले त्यांतून ‘शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन। शब्दें वाटू धन जनलोकां।।' हा तुकारामांचा वस्तुपाठ त्यांचा आचारधर्मच होता हे प्रत्ययास येते.
 सन १९७१ साल संपत आले, तसे उजव्या डोळ्याने जे वाचता यायचे तेही येईनासे झाले. वृद्धत्व आणि अशक्तपणामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे धोक्याचे होते; पण वाचनच प्राणवायू असलेल्या खांडेकरांना शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. मागच्या ऑपरेशनचा अनुभव काही चांगला नव्हता; पण नाइलाज म्हणून १५ फेब्रुवारी, १९७२ रोजी डॉ. परांजपे यांच्याकडे ऑपरेशन झाले; पण पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढत गेली. डोळा काढण्यावाचून गत्यंतर ठरले नाही अन् जगाला प्रकाश देणारा हा साहित्यऋषी स्वतः मात्र अंधारसोबती झाला. पूर्ण अंधत्व आले.
 तरी वि. स. खांडेकरांनी लेखन, वाचनाची कास सोडली नाही. प्रवास, फिरणे बंद झाले तरी घरी शतपावली चालायची. तशातच त्यांनी १९७५चे कऱ्हाडचे अखिल भारतीय साहित्य संमेलन, ज्ञानपीठ पारितोषिक समारंभ व त्याप्रीत्यर्थ दिल्ली, मुंबई, पुणे, कोल्हापूरचे सत्कार समारंभ त्यांनी केवळ लोकांच्या प्रेमामुळे पेलले.
 ऑगस्ट, १९७६ मध्ये त्यांची प्रकृती वृद्धापकाळामुळे ढासळत गेली. ऑगस्टच्या शेवटी त्यांना मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. उपचार घेत असतानाच त्यांचे २ सप्टेंबर, १९७६ रोजी मिरज येथे दुःखद निधन झाले. नंतर त्यांची कोल्हापुरात 'न भूतो न भविष्यती' अशी अंत्ययात्रा निघाली. त्यात मी एक पाईक होऊन अंतिम श्रद्धांजली अर्पण केली होती.
 मला खांडेकरांचा सहवास सन १९६३ पासून लाभला तो त्यांनी स्थापन केलेल्या आंतरभारती विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून. नंतर त्याच शाळेत मी हिंदी शिक्षक झालो. त्या काळातही सतत भेटणे, बोलणे होत राहायचे. त्यांच्या आचार, विचारांचे व साहित्याचे संस्कार मजवर झाल्यानेच मी मूल्यनिष्ठ जीवन जगू शकलो, अशी माझी विनम्र धारणा आहे. त्यांच्या या ऋणाची परतफेड म्हणून शिवाजी विद्यापीठ व खांडेकर कुटुंबीय यांच्या मदतीने वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय सन २००२ ते २००४ मध्ये शिवाजी विद्यापीठात उभारू शकलो. सन २००१ ला त्यांच्या निधनास २५ वर्षे झाली. रजत स्मृती म्हणून त्यांच्या असंकलित व अप्रकाशित साहित्याचे संपादन केलं. कथा, कादंबरी, लघुनिबंध, आत्मकथा, वैचारिक लेख, मुलाखती, समीक्षात्मक लेखसंग्रह, पटकथा अशी २० नवी पुस्तके प्रकाशित झाली. व्यक्तिचित्रे, भाषणे, विनोदी लेख, 'वैनतेय'चं लेखन अशी आणखी पाच पुस्तके प्रकाशित करून त्यांची रजत स्मृती पूर्ण होईल. हे चरित्रलेखनही त्यांच्या मजवरील संस्कारांचीच उतराई होय.  वि. स. खांडेकर हे मराठीतील समग्र साहित्यिक होत. त्यांनी वैविध्यपूर्ण आणि विपुल साहित्यलेखन केलं. कथा, कादंबरी, रूपककथा, पटकथा, नाटक, निबंध, लघुनिबंध, कविता, अनुवाद, संपादन, व्यक्तिचित्र, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र, पत्र, मुलाखत, वैचारिक लेख, भाषणे, विनोद अशा साहित्याच्या सर्व प्रांतात त्यांनी लेखन केले. असा चतुस्त्र साहित्यिक मराठीत विरळाच म्हणावा लागेल. वि. स. खांडेकरांच्या साहित्याचे जितके अनुवाद भारतीय भाषांत झाले, तितके क्वचितच कुणा मराठी साहित्यिकाचे झाले असावेत. त्या अंगांनी पाहिले तरी भारतीय साहित्यिक होण्याचा सन्मान प्राप्त करणारे मराठी साहित्यिक म्हणूनही वि. स. खांडेकरांचे स्थान आगळं नि असाधारण मानावं लागेल. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी नाटक व पटकथेचा विचार या चरित्रात अन्यत्र आला असल्याने द्विरुक्ती टाळण्याच्या उद्देशाने त्या दोन पैलूंचा अपवाद करून इथे अन्य लेखनसमग्रतेचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. हेतू हाच की, साहित्यिक खांडेकरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा परिचय व्हावा व साहित्याचे स्थूल रूपही लक्षात यावे.
 वि. स. खांडेकरांच्या साहित्यातील वैविध्य व व्यापकता यांचा शोध घेता लक्षात येते की, त्यांचे वाचनही तसेच अष्टावधानी होते. इंग्रजी, संस्कृत, हिंदी, जर्मन, फ्रेंच, इत्यादी साहित्याचे त्यांचे वाचन बहुआयामी होते. वाचनाबरोबर त्यांनी स्वतःचं असं स्वतंत्र चिंतन विकसित केलं होतं. ते माणसातील विषमता, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा यांबाबत सतत चिंतेत असायचे. सर्वस्पर्शी व सर्वंकष समानता हे त्यांचं स्वप्न होतं. बिकट वास्तवांनी सदैव व्यथित हा लेखक, सर्वोदयी समाजाचा त्याला नित्य ध्यास होता. निरंतर अस्वस्थता जोपासणारे साहित्यिकच नव्या समाजाची स्वप्नं पाहू शकतात, हे खांडेकरांच्या व्यक्ती व वाङ्मयाचा अभ्यास करताना प्रकर्षाने प्रत्ययास येते. जीवन व कलेचं अद्वैत हे त्यांच्या समग्र साहित्याचे वैशिष्ट्य सांगता येईल. पांढरपेशा मध्यमवर्ग हा त्यांच्या जीवनाचा परीघ असला तरी त्यांच्या साहित्यविषय व आशयास असं कुपमंडूक कुंपण नव्हते. वैश्विक मनुष्यजीवन मूल्याधारित होऊन ते विकसित व्हावे व सतत उन्नत, उर्ज्वस्वल होत राहावे अशी धडपड करणारा, ध्यास घेतलेला हा लेखक, त्याची माणसाविषयी असलेली तळमळ त्यांच्या साहित्यातील समग्र पटलावर सतत संवेदी जागरूकता व्यक्त करते.
कादंबरीकार
 सन १९३० साली ‘हृदयाची हाक' लिहून वि. स. खांडेकरांनी मराठी कादंबरीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं ते भीतभीतच. त्यांच्याच शब्दांत सांगायचं, तर 'महाराष्ट्र शारदा मंदिराच्या कादंबरीच्या दालनात मी आज भीतभीतच पाऊल टाकीत आहे. हरिभाऊ आपट्यांपासून प्रो. फडक्यांपर्यंतच्या काळात अनेक कुशल लेखकांनी विभूषित केलेल्या या वाङ्मयविभागात प्रवेश करताना नावीन्याच्या आनंदाच्या छायेपेक्षा अपयशाच्या भयाची सावली मनावर अधिक पसरली, तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. तथापि आजच्या सुरवंटांचीच उद्या फुलपाखरे होतात, हा सृष्टीनियम ध्यानात आणून मी हे धाडस केले आहे. अन् झालंही तसंच. ययाति'ला ज्ञानपीठ मिळवून त्यांनी आपल्या कादंबरीकाराचं फुलपाखरू झाल्याचं पुढे सिद्ध केलं.
 पैसा, सत्ता, संपत्ती, ज्ञान, कीर्ती, प्रसिद्धी अशा अनेक हाका घालत मनुष्य जगत असतो; परंतु त्याने त्याचे समाधान होत नाही. त्याची खरी भूक असते प्रेमाची. ही हृदयाच्या हाकेतूनच मिळते, हे खांडेकरांनी कमल आणि दिवाकर, कुसुम आणि प्रभाकर तसेच डॉ. भागवत अशा तीन प्रेमी युगुलांतून, त्यांच्या दांम्पत्यजीवनातून अनुभवाचा पैस विस्तारत स्पष्ट केलं आहे. ही त्यांची पहिलीच कादंबरी असल्याने या कादंबरीच्या कलात्मक मर्यादा लक्षात घेतल्या तरी तिच्यातील हा विषय व आशयाच्या अंगांनी तिने वाचकांशी केलेल्या हार्दिक संवादामुळे ती यशस्वी ठरली आणि त्यामुळेच खांडेकर ‘कांचनमृग' (१९३१) लिहिण्याचे धाडस लगेच करू शकले.
 ‘कांचनमृग' लिहिताना त्यांचा आत्मविश्वास दुणावल्यामुळेच असेल कदाचित, त्यांनी 'कांचनमृग'च्या छोट्या प्रस्तावनेत आपल्या आगामी कादंबरी लंकादहन'ची घोषणा केली. वि. स. खांडेकरांनी आपल्या कादंबऱ्यांच्या प्रस्तावनांमधून चांभाराचा देव', 'फुलपाखरे', 'वर्षाकाल', ‘नवी स्त्री', 'छाया', 'मत्स्यगंधा', ‘अजिंक्य’, ‘वटपत्रे', 'वानप्रस्थ’, ‘बुद्ध आणि हिटलर', 'शिलालेख', 'तिसरी भूक’, ‘वृंदावन' यांसारख्या अनेक कादंबऱ्यांचे संकल्प जाहीर केले आहेत. पैकी ‘नवी स्त्री' अपूर्ण स्वरूपात मीच संपादित करून प्रकाशात आणली आहे. 'वृंदावन' पूर्ण झाल्याचे संकेत त्यांच्या पत्रलेखनात आढळतात. त्याचे एक प्रकरण ‘सतीच्या घाटावर' प्रकाशित आहे, तर ‘वटपत्रे'ची ११ प्रकरणे वटपत्रेचा मजकूर पत्ररूप असून वैचारिक आहे, कादंबरीचा नाही. खांडेकरांच्या मनात अनेक कथाबीजे, विचार सदैव थैमान घालत असत. म्हणून अनेक लेखसंकल्प ते जाहीर करीत. काही सिद्ध होत, तर काही स्वप्न बनून राहत.
 ‘कांचनमृग' कादंबरीची निर्मिती महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला घोषणेतून झाली. केवळ शहरांचा विकास करणे म्हणजे कांचनमृगामागे धावणे वाटणाच्या खांडेकरांनी या कादंबरीच्या नायकाचे, सुधाकराचे चरित्र त्या अंगाने गुंफले आहे. तो सुखवस्तू, शहरी, गृहस्थ तेथील सुखासीन जीवनाला कंटाळतो आणि खेड्यात जाऊन ग्रामसुधारणा करण्याची धडपड करतो. शाळा काढतो. समाजसेवा करतो; पण तेथील गावगुंड त्याला विरोध करतात, त्रास देतात, तरी तो आपल्या ध्येयवादी निष्ठेवर अटळ राहतो. स्वतः पुनर्विवाह करतो. आदर्श घालून देतो; पण शेवटी आपण मृगजळामागे धावतो आहोत, या विचाराने निराश होतो. आदर्श विचार व व्यवहाराच्या पाठपुराव्यानेच माणसाचा कांचनमृग होणे थांबेल, असा संदेश ही कादंबरी देते. या कादंबरीने एक प्रभावी जीवनसूत्र सांगण्याचा जो प्रयत्न केला, तो आज आठ दशके लोटली तरी चिरंतन वाटतो. खांडेकरांच्या कादंबऱ्यां आजही एकविसाव्या शतकातील नवी पिढी वाचते याचे रहस्य त्यांतील चिंतनगर्भ मूल्यांनाच द्यावे लागेल.
 यानंतर सन १९३४ मध्ये खांडेकरांची ‘दोन ध्रुव' प्रकाशित झाली. खांडेकर सन १९२० मध्ये शिरोड्यास शिक्षक म्हणून गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी कोकणचं दारिद्रय, अज्ञान, विषमता, अंधश्रद्धा पाहिली. सांगली, पुण्याचे आजवर पाहिलेले सुखवस्तू जीवन व हे यांत दोन ध्रुवांचं अंतर असल्याचं त्यांना जाणवले. त्या जाणिवेची निर्मिती म्हणजे ही कादंबरी. ‘एक हळव्या खेडवळ जिवाचा आर्त वाङ्मयीन उद्गार' असे खांडेकरांनी स्वतःचे केलेले वर्णन किती सार्थ आहे, हे कादंबरी वाचताना लक्षात येते. कथानायक रमाकांत सर्वसाधारण असलेल्या वत्सलाशी लग्न करतो.  जीवनात आलेल्या सुरंगा, सुलोचना, विद्याधर, कृष्णा, दादासाहेब, आदींमुळे जीवनातील दरी, अंतर त्याला उमगतं. समाजातील विषमता केवळ सर्वस्पर्शी समतेनेच येऊ शकेल, असा आशावाद जागवणारी ही कादंबरी खांडेकर पठडीतील आदर्शोन्मुख वास्तववादी साहित्यकृती होय. या कादंबरीत खांडेकरांनी जीवनातील विविध क्षेत्रांतील ‘दोन ध्रुव' चित्रित केले आहेत.
 वि. स. खांडेकरांची सर्वाधिक आवडती कादंबरी म्हणजे सन १९२४ साली प्रकाशित ‘उल्का' होय. ती त्यांनी ऑक्टोबर, १९३३ मध्ये लिहिली. चप्पल आहे, पण छत्री नाही अशी कुरकुर करणारा मध्यमवर्ग एकीकडे व दुसरीकडे दोन वेळची भाकरी न मिळणारा समाज. ‘दोन ध्रुवां'मधील तळमळ, तगमग या कादंबरीतही आढळते. जगातील दुःखे नुसत्या पवित्र इच्छेने नाहीशी होत नाहीत; ती त्यागाने, सेवेने, संघटनेने आणि कर्तृत्वानेच दूर करावी लागतात. हे सांगण्यासाठी त्यांनी या कादंबरीत अन्यायाशी प्राणपणाने लढणाच्या चंद्रकांत या तरुणाची निर्मिती केली. ही निर्मिती म्हणजे खांडेकरांचे Catharsisच होय. लोक या रचनेस राजकीय कादंबरी मानत असले तरी खांडेकर मात्र ते साफ नाकारतात. प्रा. ग. प्र. प्रधानांनी मात्र आपण ही कादंबरी तरुणपणी वाचली व आपण राजकीय, सामाजिक चळवळीत आले पाहिजे, असे वाटून उडी घेतल्याचे कबूल केले आहे. उल्का ही नायिका. खेड्यात वाढलेली. वडिलांच्या संस्काराने समाजसेवेत येते. वसंतशी होणारा विवाह टळतो. ती माणिकरावांच्या प्रेमात पडते. शेवटी बाबूराव पंडित या जमीनदाराशी तिचा विवाह होतो. चंद्रकांतसोबत ती कामगारांचा लढा लढते. भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर ट्रस्ट करून समाजसेवा चालू ठेवते. या सर्वांमागे गांधीजींची विश्वस्त संकल्पना असल्याचे दिसते. महात्मा गांधींच्या विचार व कार्याच्या खांडेकरांवरील प्रभावाचा परिणाम म्हणूनही या कादंबरीकडे पाहिलं पाहिजे.
 वैचारिक द्वंद्व हे वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य. ते रचनांच्या शीर्षकातही बऱ्याचदा प्रतिबिंबित होत राहते. दोन मने' अशा शृंखलेतीलच एक कडी होय. ‘समतेची प्रामाणिकपणे पूजा करणाच्या नव्या समाजावर दृष्टी ठेवून साहित्यिकारांनी स्वतंत्र देशाची स्वप्ने पाहायला हवीत. असं आवाहन करणारी ही कादंबरी. बॅ. बाळासाहेब देशमुख निर्मलाशी विवाहबद्ध होतात. ती सोज्ज्वळ स्त्री असते. तिच्याशी संसार करीत असताना चपला नावाच्या सिनेनटीच्या प्रेमजाळात अडकतात. निर्मलेचा त्याग व चपलेचा उपभोग यांत शेवटी त्यागाचा विजय होतो. श्री व चपला या दोन मनांची ही कथा होय. सुबोध, ललिता,प्रो. आगटे, इत्यादी पात्रे कथेचा पट खुलवीत उद्देशाप्रत या कथेस नेतात.  या कादंबरीचे अनेक भाषांत अनुवाद झाले. त्या भाषिकांत ही कादंबरी त्यांची भाषिक कादंबरी मानली गेली, इतके तिचे अनुवाद प्रभावी ठरले.
 व्यवहार आणि ध्येयवाद, तरल प्रीती आणि उत्कट भक्ती, आत्मप्रेम व मानवधर्म, इत्यादी धाग्यांनी हिरवा चाफा'चा जीवनपट विणलेला आहे. तात्यासाहेब कालेलकरांची कन्या सुलभा, ती डॉक्टर होते. तिचा प्रियकर विजय बॅरिस्टर असतो; पण ती विवाह मात्र करते घरातील मोलकरणीच्या मुलाशी. तोही तुरुंगात. सुलभाचा भाऊ मनोहर वाममार्गी होऊन नायकिणीच्या नादाला लागतो. नायकिणीचा खून होतो. पापभिरू मनोहर तेथून पळ काढतो; पण ‘नायकिणीचा' अशीच त्याची समाजलेखी ओळख राहते. तो आपल्या वडिलांच्या रखेलीच्या मुलीशी संधान बांधतो. त्यामुळे अधिक दुःखाच्या गर्तेत अडकतो. प्रेमभाव हा हिरवा चाफा असतो. त्याच्या अभावी माणसाचं जीवन शोकात्म कसे बनते, हे खांडेकरांनी सन १९३९ साली लिहिलेल्या या कादंबरीतून दाखवून दिले आहे.
 वि. स. खांडेकर शिरोडा सोडून कोल्हापुरी आले, ते ‘हंस पिक्चर्स'च्या पटकथा लिहिण्यासाठी म्हणून. त्या काळात त्यांनी अशा अनेक पटकथा लिहिल्या की, ज्यांच्या नंतर कादंब-याही झाल्या. या पठडीत ‘रिकामा देव्हारा',‘सुखाचा शोध', 'अश्रू'सारख्या कादंब-या येतात. 'देवता' चित्रपटाच्या निर्मितीआधी तिचे झालेले कादंबरी रूप म्हणजे ‘रिकामा देव्हारा'. आधी कादंबरी प्रकाशित झाली. (१९३४). ती गाजली. मग तिचा मराठी चित्रपट झाला (१९३९). तोही यशस्वी झाला, म्हणून मग 'देवता','मंदिर' नावाने १९४८ मध्ये हिंदीत प्रकाशित झाला. कादंबरी व चित्रपट क्रम उलटेसुलटे होत राहिले.
 अशोकचे वडील मुलगी शोभेल अशा सुशीलेशी विवाह करतात. मुलगा त्याला विरोध करतो. वडिलांना समजावतो की, स्त्री भोग्या नसून देवता आहे. स्त्रीस प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या इराद्याने लिहिलेली ही कादंबरी. स्त्रीचं घरात तेच स्थान हवे, जे मंदिरात देवतेच्या मूर्तीचं. ते नसेल, तर घर हा रिकामा देव्हारा ठरतो. "आर्थिक उलथापालथीमुळे मध्यमवर्गातील स्त्री घराबाहेर पडली, नोकरी करू लागली, सर्रास पुरुषांत मिसळू लागली. यात वावगे असे काहीच झाले नाही; पण ही स्त्री तिच्या शीलाच्या दृष्टीने धड ना पौर्वात्य, ना पाश्चात्त्य अशा आजच्या समाजात सुरक्षित आहे का? असा प्रश्न खांडेकर या कादंबरीतून विचारतात तेव्हा मात्र वाचक अंतर्मुख होतो. मला वाटतं, हेच या कादंबरीचं यश आहे.
 ‘सुखाचा शोध' ही खांडेकरांची आठवी कादंबरी. ती प्रथमतः सन १९३४ मध्ये प्रकाशित झाली. पुढे या कादंबरीवर ‘हंस पिक्चर्स'ने सन १९३९ ला याच नावाने चित्रपट काढला तेव्हा या कादंबरीची सचित्र आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. छायाचित्रे अर्थातच चित्रपटातील होती. ही चित्र आवृत्ती त्या वेळी चित्रपटगृहांत विक्रीस उपलब्ध होती. प्रेक्षक चित्रपटाच्या तिकिटाबरोबर कादंबरीही खरेदी करीत. या कादंबरीचे कथानक खांडेकरीय होते. मानवी जीवन सुख आणि दुःखांनी भरलेले आहे. माणूस सतत सुखाच्या शोधात असतो. सर्व प्रकारची सुखं मिळाली की माणूस अतृप्त का राहतो, याचा शोध घेत खांडेकर सांगतात की, 'सुख निरपेक्ष सेवेत आहे, सुख जिवाला जीव देणाच्या माणसावर प्रेम करण्यात आहे.' कादंबरीची नायिका माणिक समाजसेविका असते. सुयोग्य मार्गदर्शकाअभावी ती निराश होऊन आपल्या भावनांना तिलांजली देते. याविरुद्ध आनंद आणि उषा एकमेकांवर प्रेम करीत असल्याने त्या जोरावर उषा आनंदाला माणसात आणते, सुधारते. कष्टाने माणसाचे जीवन सुसह्य होते, हे सांगणारी सदर कादंबरीही अनेक भाषांत अनुवादित झाली आहे.
 ‘पांढरे ढग' ही खांडेकरांच्या आजवरच्या कादंबरींपेक्षा वेगळी असल्याने तिचे खांडेकरांच्या कादंबरी लेखनविकासात महत्त्वाचे स्थान आहे. एक तर या कादंबरीने भाषिक वळण घेऊन ती अलंकारमुक्त अशी सहज आणि म्हणूनच प्रभावी ठरली. दुसरे असे की, आजवरच्या कादंब-यांत खांडेकर शोषितांची बाजू घेत. निम्नवर्गीय चित्रण करीत. यात मध्यमवर्ग चित्रणाचा केंद्र आहे. त्या वर्गातील दलितांचे चित्रण करताना अभयसारखा बुद्धिमान; परंतु भावनाशील तरुण चित्रित करून नायकाची पठडी पण खांडेकरांनी बदलून टाकली. सत्त्वशून्य आणि ध्येयशून्य होत चाललेल्या मध्यमवर्गाला दिशादिग्दर्शन करण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या या कादंबरीत अभयची धडपड हा खांडेकरांच्या स्वप्नातील देशघडणीचा प्रयत्न होय. सन १९३९ साली प्रकाशित ही कादंबरी ‘समाज सुखी करायला आधी सामाजिक मन निर्माण केले पाहिजे. मानवी हक्कांकरिता झगडायला, लढायला, प्रसंगी मरायलाही ज्या वेळी तयार होईल त्याच वेळी आजचे बिकट प्रश्न सुटतील." असे ठामपणे सांगते.
 सामाजिक विचारांच्या कादंबऱ्यांत आलेला विषयांचा तोचतोचपणा दूर करण्यासाठी रुचिपालट म्हणून लिहिलेली कादंबरी ‘पहिले प्रेम’ विषय म्हणून वाचकांच्या पसंतीस न उतरती तर आश्चर्य! प्रत्येक व्यक्ती पहिल्या प्रेमाच्या अनुभवातून जात असल्याने या विषयास त्रिकालाबाधित व विश्वव्यापी अनुभवाचे रूप आले आहे. आकर्षक मुखपृष्ठ व शीर्षक लाभलेली ही कादंबरी सन १९४० साली प्रसिद्ध झाली. पहिले प्रेम हेच खरे प्रेम' असे आजवर सर्वांनी सांगितले. स्टीफन स्वाइग असो वा शरच्चंद्र चतर्जी असो! पण खांडेकर मात्र असे मानतात की, पहिल्या प्रेमाला आजवर अवास्तव महत्त्व दिले गेले. हे खरे आहे की, "पहिल्या प्रेमाचा आत्मा सौंदर्य आहे; पण जीवनाला उजळणाऱ्या शांत प्रीतीचा उदय नुसत्या सौंदर्यातून होत नाही. त्या सौंदर्याला सामर्थ्याची नि साधुत्वाची जोड लागते." ही खांडेकरांची चिंतनप्रधान कादंबरी असल्याने कथानक, पात्रे, प्रसंग केवळ निमित्त होतात. पत्र, काव्य, सुभाषितयुक्त भाषा, इत्यादींमुळे ही कादंबरी विषयास अनुकूल अशी रोमँटिक बनविण्याचा खांडेकरांचा प्रयत्न म्हणजे आजवरच्या त्यांच्या कादंबरीलेखनास दिलेला छेद होय.
 वि. स. खांडेकर आता कादंबरीलेखनाचे वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. आता हेच पाहा, ना.'जळलेला मोहर' ही सन १९४१ ची कादंबरी अगोदर त्यांनी तिची काही प्रकरणे 'पारिजातकाची फुले' नावाने पाच भागांत प्रकाशित केली. वाचकांच्या प्रतिक्रिया अजमावून मग ती एकजिनसी लिहिली. मुळात या कादंबरीची प्रेरणा त्यांना पिरंदेदल्लो यांच्या 'सिक्स कॅरॅक्टर इन सर्च ऑफ अॅन ऑथर' या नाटकातून मिळाली. कादंबरीची नायिका कुसुम काव्यवेडी असते. त्या वेडातच ती लग्न करते; पण तिचा पती विसंगत वागणारा निघतो. समाजात वेश्यांचा उद्धार करणारा तिचा नवरा मात्र घरात तिच्याशी तुटक व तुसडा वागतो. त्यामुळे कुसुम वैतागते. इतकी की, पतीने वधू पाहिजे' जाहिरात देऊनही तिच्यावर त्याचा कसलाही परिणाम होत नाही. उलटपक्षी असे लग्न झालेच, तर आपण सुखी होऊ असं कुसुमला वाटणे म्हणजे जीवनातील मोहर जळल्याच्याच पाऊलखुणा नव्हे का? ‘पांढरे ढग'प्रमाणे या कादंबरीचे शीर्षक सूचक व प्रतीकात्मक आहे.
 ‘प्राचीन काळी महर्षी वाल्मीकींची प्रतिभा क्रौंच पक्ष्याच्या क्रीडामग्न जोडप्याला पाहून भग्न झाली होती ना? त्या जोडप्यातील नराचा भिल्लाने वध केलेले पाहून महर्षीनी रागाने त्याला शाप दिला होता ना? भोग आणि त्याग, काव्य आणि कृती, बुद्धी आणि भावना या जोडप्यापैकी, कुणावरही तसा प्रसंग आला तर तुम्ही तेच करा; आणि एक गोष्ट विसरू नका. कालचे शाप शब्दांचे होते, आजचे शाप कृतीचे असले पाहिजे." असे बजावत लिहिलेली ‘क्रौंचवध' कादंबरीची कथा वि. स. खांडेकरांनी सुलोचना व दिनकरभोवती गुंफली आहे. दादासाहेब संस्कृतचे प्राध्यापक असतात. आपली मुलगी सुलोचनाने राजकारणारत भाग घेणे त्यांना पसंत नसते. तिचा मित्र दिनकर समाजकारण, राजकारण करीत तुरुंगात जातो. सुलोचना इकडे भगवंतराव शहाण्यांशी लग्न करते. तुरुंगातून सुटलेला दिनकर शेतकरी संघटना बांधतो. परत त्याला अटक होऊन फाशीची शिक्षा फर्मावली जाते; परंतु भगवंतराव शहाण्यांमुळे त्याला जीवदान मिळते. अशी कथा गुंफत खांडेकर ही कादंबरी आपल्या उद्दिष्टाप्रत पोहोचवितात. राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात सन १९४२ साली लिहिलेल्या या कादंबरीमागे वातावरणाचा असणारा प्रभाव वाचताना स्पष्ट जाणवतो.
 दुसऱ्या महायुद्धानंतर साऱ्या जगाचेच संदर्भ बदलून जातात. युद्धाच्या महाविनाशकारी प्रत्ययाने खांडेकर कथा, पटकथा, संपादन, इत्यादी कार्य करीत राहिले तरी कादंबरीलेखन मात्र थंडावलं. खांडेकर वृद्ध झाले', ‘त्यांची प्रतिभा आटली' अशी आवई उठत राहिली. या सर्वांना उत्तर देत त्यांनी ११ वर्षांनंतर लिहिलेली कादंबरी म्हणजे 'अश्रू'. सन १९५४ ला ती प्रकाशित झाली. या काळात त्यांचं मन अस्वस्थ होतं. त्यातून एक नवा आशावाद, उमेद घेऊन ते लिहिते होतात. भारताच्या संस्कृतीचा वारसा मध्यमवर्गाने जपला असून हाच वर्ग उद्याच्या सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करील, असं सांगणारी ही कादंबरी. ‘अश्रू' एका शिक्षकाची कथा आहे. शंकर सरळमार्गी, कष्टाळू शिक्षक आहे. गरीब विद्याथ्र्यांबद्दल त्याच्या मनात विलक्षण आस्था असते. मूल्यांना सर्वतोपरी मानणारा हा शिक्षक प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवतो. बहिणीच्या लग्नात अडचण येऊनही गैरमार्गास तो जात नाही. कारण त्याला माहीत असते की, सरळ राहिल्यानं श्रीमंत जरी नाही होता आलं, तरी समाधानी मात्र नक्की राहता येतं. केवळ या मूल्यधारणेवर तो तगतो. हे दाखवून खांडेकर पुन्हा एकदा आदर्शवादाचं समर्थन करतात. याच कथेवर ‘दानापानी' या हिंदी चित्रपटाची निर्मिती सन १९५३ मध्ये करण्यात आली होती. अगोदर चित्रपट आला व नंतर कादंबरी.
 'ययाति' हा वि. स. खांडेकरांच्या कादंबरी लेखनकलेचा चरमबिंदू होय. ही कादंबरी त्यांनी १९५९ ला लिहिली. सन १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ही स्थापना होताच राज्य शासनाने मराठी साहित्यातील उत्कृष्ट वाङ्मयीन रचना म्हणून या कादंबरीचा गौरव केला. पाठोपाठ तिला त्याच वर्षाचं साहित्य अकादमी पारितोषिकही लाभलं अन् पुढे सन १९७४ चे भारतीय ज्ञानपीठ पारितोषिक संपादून भारतीय साहित्यातील श्रेष्ठ साहित्यिक कृती म्हणून सन्मान झाला. या साऱ्या यशाचं श्रेय जातं,वि. स. खांडेकरांच्या भारतीय मिथकांचे समकालीन संदर्भ शोधून त्याचं गूढ-गंभीर चिंतन व्यक्त करण्याच्या ऋषिपणास. ययाति'ची मूळ कथा महाभारतातील. पुढे ती अनेक पुराणांत आढळते. खांडेकरांनी मूळ कथेत बदल करून ते वर्तमानाशी जोडले. ही 'ययाति'ची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा तर कचाची भक्तिकथा होय. या कथेचा मोह कुसुमाग्रजांना झाला, तसाच तो हिंदीतील प्रसिद्ध कवी कादंबरीकार भगवतीचरण वर्मीनाही. कुसुमाग्रजांनी 'ययाति आणि देवयानी' हे नाटक लिहिलं, तर वर्मांनी ‘चित्रलेखा' कादंबरी. दोन्ही प्रेक्षकांनी, वाचकांनी पसंत केली. तिचं सामर्थ्य मात्र मूळ कथेतच आढळतं.
 यती नि ययाती ही नहूष राजाची मुलं. अगस्त ऋषींच्या शापामुळे त्यांची ताटातूट होते. ययाती शूर, वीर, साहसी, तो भावाच्या शोधार्थ निघतो. प्रवासात त्याची देवयानीशी गाठ पडते. तिच्याशी तो लग्न करतो; पण सुखी नाही होत. सुख त्याला शर्मिष्ठेकडून मिळतं. त्या रागाने देवयानी राणी शर्मिष्ठेला दासी बनवून बंदी बनविते. ययाती तिची सुटका करतो. तेव्हा कच आणि यती तिच्या मदतीला धावून येतात. ययातिपुत्र पुरू मोठा होऊन सर्व विद्यांत प्रवीण होतो. यदूला दस्यूच्या तावडीतून सोडवितो. शुक्राचार्यांच्या शापामुळे जख्ख म्हाताच्या झालेल्या वडिलांना आपलं तारुण्य देतो. आपला भाऊ व आई परत मिळावी म्हणून राज्याचा हक्क सोडतो; पण देवयानी त्याला सिंहासनारूढ करते. अशी कथा असलेली ही कादंबरी कथा म्हणून ती परिचित असली तरी तिचं नवपण कादंबरीत येणाच्या तत्त्वज्ञानात आहे व ते वर्तमान मानवी प्रवृत्तीवर बोट ठेवणारंही! "कामवासना ही अन्नाच्या वासनेइतकीच स्वाभाविक वासना आहे. अन्नाच्या गरजेइतकीच आवश्यक गरज आहे. तिचे मानवी जीवनातील अस्तित्व, तिचे सौंदर्य, तिचे सामर्थ्य ही सर्व मला मान्य आहेत; पण मनुष्याची कुठलीही वासना या स्वरूपातच राहिली, तर तिचे उन्मादात रूपांतर होण्याचा संभव असतो." असं सांगणारी कादंबरी म्हणजे वर्तमानाचं उपनिषदच नव्हे का? म्हणून तर प्रा. नरहर कुरुंदकर म्हणतात, "खांडेकरांची ‘ययाति' ही अशी आधुनिक माणसाच्या नव्या आकांक्षांची कथा आहे." नाट्यरूपांतर, नभोनाट्य, अनुवाद, इत्यादींमुळे ही कादंबरी सर्वदूर पोहोचली.
 यानंतर सन १९६७ मध्ये खांडेकरांनी 'अमृतवेल' लिहिली. तिचेही अनुवाद झाले. टी.व्ही. सीरियलही झाली या कादंबरीवर. प्रेम मानवी जीवनातील अमृतवेल असून नवस्वप्नांचा ध्यास असेल तर ती बहरल्याशिवाय राहत नाही, अशी उमेद ही कादंबरी वाचकांना देते. 'Passion and compassion must go hand in hand' हे या कादंबरीचे सूत्र आहे. शेखरच्या मृत्यूनं नंदाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. पहिल्या प्रेमाची बळी नंदा पुढे देवदत्तच्या आहारी जाते. सुखाची स्वप्ने पाहते; पण स्वप्नभंगाचं शल्यच तिच्या पदरी येतं. कादंबरीतील वसुंधरा, मोहन, मधुरा, गंगाराम, सावित्री, बापू सर्व वेगवेगळ्या दुःखांचे बळी; कारण ते संकीर्णतेत गुरफटलेले. स्वप्रेम, स्वार्थापेक्षा दुसऱ्याचं दुःख कवटाळणे हीच दोन हृदये, माणसे जोडणारी जवळची वाट आहे, हे ‘अमृतवेल'च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न खांडेकर करतात. प्रस्तावना नसलेल्या दोन कादंबऱ्यांतील ही एक होय; कारण ही कादंबरी म्हणजेच खांडेकरांच्या विचारधारेची दीर्घ प्रस्तावना होय. मधुसूदन कालेलकरांनी ‘अमृतवेल'चं नाट्यरूपांतर केले होते.
 वि. स. खांडेकरांच्या लेखनातील शेवटची कादंबरी म्हणून ‘सोनेरी स्वप्नं भंगलेली' (१९७७)चे महत्त्व आहे. ती अपूर्ण कादंबरी होय. मराठीत ती अपूर्ण असली तरी हिंदीत ती पूर्ण स्वरूपात मी अनुवादित केली आहे. त्यानंतर अशीच अपूर्ण; परंतु पुस्तकरूप न झालेली ‘नवी स्त्री' मी संपादित करून प्रकाशात आणली. खांडेकरांच्या पिढीनं स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतंत्र भारताची स्वराज्याची सोनेरी स्वप्ने पाहिली होती. स्वातंत्र्यानंतरच्या २५ वर्षांत ती धुळीला मिळाली. त्याचे शल्य, तो स्वप्नभंग खांडेकरांनी नानांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. पत्र, रूपककथांचा वापर करून ‘सोनेरी स्वप्नं भंगलेली कादंबरी कलात्मक करण्याचा प्रयत्न खांडेकरांनी केला आहे.
{gap}'नवी स्त्री' (१९५०) ही वि. स. खांडेकरांची अपूर्ण रचना असली तरी तिचे स्वरूप पाहता एक पूर्ण ‘स्त्री प्रबोधन गीता' म्हणून तिचे असामान्य महत्त्व आहे. नव्या स्त्रीने कायदा जाणायला हवा. तिने नुसते शिक्षित होऊन भागणार नाही, तिनं सुजाण व्हायला हवं. तिच्या मनाची घडण सामाजिक व्हायला हवी. घरचा परस सोडून तिचे अंगण विस्तारायला हवे. ती बाहुली राहून चालणार नाही. स्त्री पुरुषाप्रमाणे स्वातंत्र्य घेऊन जन्माला आली असताना तिला दुय्यम स्थान, गुलामीचं, बंधनाचं जीवन का? स्त्री पुरुषाची सखी केव्हा होणार? असे प्रश्न व विचार खांडेकरांच्या मनात घोळत असताना लिहिली गेलेली ही कादंबरी आज सहा दशके उलटून गेली तरी प्रस्तुत वाटत राहते, यातच कादंबरीचे महत्त्व सामावलेले आहे. खांडेकरांना ‘दबळे ललित लेखक' म्हणून हिणवणाऱ्या समीक्षकांना ही कादंबरी खांडेकरांच्या क्रांतदर्शी तत्त्वचिंतकाचा पैलू दाखविल.  कादंबरी लेखक म्हणून खांडेकर मराठी साहित्यात जवळ-जवळ पाच दशके सक्रिय राहिले. या सातत्यपूर्ण लेखनाने खांडेकरांनी मराठी कादंबरी इतिहासात आपलं युग निर्माण केलं. विचारक म्हणून कादंबरीकार खांडेकर गांधीवादी, समाजवादी सिद्ध होत असले तरी शैलीकार म्हणून ते आदर्शोन्मुख वास्तववादी वाटतात. आलंकारिक भाषा, वैचारिक विवेचन, मध्यमवर्गीय पात्रे घेऊन येणाऱ्या कादंबऱ्या वाचकास केवळ अंतर्मुख करीत नाहीत, तर कृतिशील होण्याची त्या प्रेरणा देतात. पुराणातील मिथकांचा वापर करून वर्तमान संदर्भाना ते जोडण्याचं खांडेकरांचे कौशल्य कलात्मक व भविष्यलक्ष्यी वाटतं. त्यामुळे पिढी घडविण्याचे कार्य त्यांच्या कादंबऱ्या करतात. विशेषतः ‘ययाति'सारखी कादंबरी तर एक चिरंतन विचार घेऊन येत असल्यानं कालजयी वा अमर कृती म्हणून वाचक सर्वेक्षणात अग्रेसर राहते. वि. स. खांडेकरांनी आपल्या या १७ कादंबऱ्यांतून वेळोवेळी मानवी प्रश्नांची जी उकल करण्याचा प्रयत्न केला आहे, तो पाहता लक्षात येते की, त्यांना सतत मनुष्य विकासाचा ध्यास होता. मनोरंजनाऐवजी प्रबोधन, कलेऐवजी जीवन, अलंकारितेऐवजी सुबोधतेचा वेध घेत राहणारे कादंबरीकार खांडेकर विकास व प्रयोगाची नित्य नवी क्षेत्रे व शिखरे पार करताना जेव्हा दिसतात तेव्हा लक्षात येते की निरंतर अस्वस्थता, असमाधान हाच त्यांच्या कादंबरी लेखनाचा स्थायीभाव होता.
कथाकार
 वि. स. खांडेकर यांनी सन १९१८ साली ‘घर कुणाचे?' ही गोष्ट लिहून कथाक्षेत्रात पदार्पण केले. ही कथा ऑगस्ट, १९२३ च्या 'महाराष्ट्र साहित्य' मासिकात ‘अंदर की बात राम जाने' सदरात प्रकाशित झाली होती. त्या वेळी कादंबरीसदृश दीर्घकथा (गोष्ट) लिहिण्याचा प्रघात होता. अशी प्रकरणे लिहून पुढे त्यांची एक कादंबरी करण्याचा खांडेकरांचा मनसुबा होता. खांडेकरांनी सन १९२९ पासून मृत्यूपर्यंत (सन १९७६) कथा लिहिल्या. सुमारे ३५ मौलिक कथासंग्रह (द्विरुक्ती गृहीत धरल्यास ४३ कथासंग्रह) (कृपया परिशिष्ट १ (साहित्यसंपदा) पाहावे,) प्रकाशित झाले. सुमारे ३०० कथा खांडेकरांनी लिहिल्या व प्रकाशित केल्या; पण ‘घर कुणाचे' ही पहिली कथा काही कोणत्या संग्रहात येऊ शकली नव्हती. कथेचे ग्रह, या विलंबाचे कारण खांडेकरांनी असं स्पष्ट केले असले तरी तिची ग्रहदशा बदलून मी सन २००३ मध्ये ‘रजत स्मृती पुष्प' प्रकल्पांतर्गत संपादित व प्रकाशित केलेल्या 'भाऊबीज' कथासंग्रहात तिचा आवर्जून समावेश केला आहे, तो एवढ्याचसाठी की, पुढे ज्या खांडेकरांचा उल्लेख अनेक समीक्षकांनी मराठी कथेचे अनभिषिक्त सम्राट' म्हणून केला, अशा कथाकाराची पहिली कथा होती तरी कशी, हे जिज्ञासू वाचक, अभ्यासक, संशोधक आणि समीक्षकांनाही कळावे.
 वि. स. खाडेकर पुढे दहा वर्षे विविध नियतकालिकांतून कथा लिहीत राहिले.सन १९२९ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह ‘नवमल्लिका' प्रकाशित झाला. मल्लिका' म्हणजे जाईचे फूल. अशी नऊ फुले यात होती. ती नवीही होती; म्हणून ‘नवमल्लिका' शीर्षक. यातील कथा अनेक तऱ्हेच्या.खांडेकरांच्याच भाषेत सांगायचं तर,'आजीबाईचा बटवा', ‘बाळगोपाळांचा खिसा’, ‘नऊ धान्याची खिचडी', 'गारुड्याची पोतडी','नवपुष्पांचा हार अगर ‘इंद्रधनुष्य' यांतील कोणतीही पदवी' या कथासंग्रहास देता येईल. ‘नवमल्लिका'कथासंग्रह खांडेकरांनी विद्यार्थी डोळ्यांपुढे ठेवून प्रकाशित केला होता; त्यामुळे या कथासंग्रहातून तरुणांच्या भावना व प्रौढांचे विचार चित्रित करणाऱ्या गोष्टी मुद्दाम वगळण्यात आल्याचे प्रस्तावनेत नमूद आहे. जांभळीची शाळातपासणी'सारखी महत्त्वाची कथा याच संग्रहातील.
 मराठी कथेचा प्रारंभ भाषांतराने झाला असे मानले जाते. सिंहासन बत्तीशी (१८१४), हितोपदेश (१८१५), पंचतंत्र (१८१५), इसापनीती (१८२८), वेताळ पंचविशी (१८३०) या ग्रंथांची सुरस मराठी भाषांतरे आली मग बोधकथा, नीतिकथा आल्या. पाठोपाठ अनेक बखरी प्रकाशित झाल्या; पण अस्सल वा अव्वल मराठी कथा लिहिली ती वि. सी. गुर्जर यांनी. त्या कालखंडात (१९१० ते १९३०) ह. ना. आपटे, कृ. के. गोखले, काशीबाई कानेटकर, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के कथा लिहीत. साहित्यसम्राट केळकर, नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, निबंधकार व ‘काळ'कर्ते शि. म. परांजपे, कादंबरीकार वा.म.जोशीही गोष्टी लिहीत. खांडेकरांसमोर ही कथापरंपरा असल्याने त्यांनीही सुरुवातीस गोष्टी लिहिल्या. त्यांचा पिंड शिक्षकाचा असल्याने केवळ मनोरंजन हा त्यांच्या कथालेखनाचा उद्देश कधीच राहिला नाही. रंजकतेबरोबर जीवन चिकित्सा, दृष्टिकोन, मानवी मूल्ये, समाजाचे प्रश्न सर्वांची मोट बांधत ते कथा लिहीत राहिले. त्यांच्यापुढे पांढरपेशा मध्यमवर्ग असायचा; कारण तोच त्या वेळचा वाचक होता. त्यांच्या शबल व सबल दोन्ही गोष्टींची खांडेकरांना जाण होती. हा वर्ग साहित्याद्वारे प्रबुद्ध झाला, तर समाजबदलास वेळ लागणार नाही, याची त्यांना खात्री होती.
 सन १९२६ नंतरचा काळ हा मराठी नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता. ज्योत्स्ना', 'किर्लोस्कर', 'ध्रुव', 'प्रतिमा', 'यशवंत'सारखी नियतकालिके 'मनोरंजन' कालखंडाप्रमाणेच कथेस महत्त्व देत होती. त्या नियतकालिकांत वेळोवेळी खांडेकरांच्या कथा प्रकाशित होत.त्यामुळे खांडेकर नियमित कथा लिहू लागले. त्यांच्याबरोबरीने प्रा. ना. सी. फडकेही लिहीत. सन १९४१ पर्यंत त्यांच्या कथांचा ओघ वाहता होता. या कालखंडात ‘दत्तक व इतर कथा',‘जीवनकला',ऊन-पाऊस', ‘दवबिंदू', ‘विद्युत्प्रकाश', 'नवचंद्रिका', ‘अबोली',‘पूजन’,‘फुले आणि दगड',‘नवा प्रातःकाल’, ‘समाधीवरली फुले', 'पाकळ्या', ‘पहिली लाट', ‘सूर्यकमळे', 'घरट्याबाहेर' असे तब्बल १५ कथासंग्रह प्रकाशित झाले. या संग्रहांत प्रकाशित ‘आंधळ्याची भाऊबीज',‘भावाचा भाव’, ‘शिष्याची शिकवण' इत्यादी कथा गुर्जरांच्या परंपरा व प्रभावाच्या म्हणून सांगता येतील. यातील कथा विकासोन्मुख असल्या तरी त्यात पाल्हाळ, अद्भुतता, अतिशयोक्ती, इत्यादी दोष होते. भाषा कोटीबाज, आलंकारिक होती.
 सन १९४१ ते १९४६ अशी चार-पाच वर्षे त्यांनी कथालेखन केले नाही. त्यामुळे 'खांडेकरांनी लघुकथा लेखनातून संन्यास घेतला', 'खांडेकर म्हातारे झाले', 'कथेचे खांडेकर युग संपले' असे तर्कवितर्क होत राहिले. सन १९४६ साली ‘तीन जगे' कथा लिहून या तर्क-वितर्काना खांडेकरांनी विराम दिला. पुढे १९४८ मध्ये त्यांचा ‘सांजवात' कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याला लिहिलेल्या दोन शब्द’ प्रस्तावनेत या मौन कालखंडाचे स्पष्टीकरण आहे. नव्या भारतीय समाजाचा पाया म्हणून जी सामाजिक मूल्ये गृहीत धरून मी १९३० ते १९४० या दशकात लेखन केले, ती माझ्या डोळ्यांदेखत धाडधाड ढासळत होती... लेखक या नात्याने आपल्या पाया खालची वाळू पदोपदी वाहून जात आहे, तिथे एक खोल खड्डा निर्माण होत आहे, या जाणिवेने माझे दुबळे मन बेचैन होऊन गेले... माझे पूर्वीचे सारे आवडते विषय मला एकदम जुने वाटू लागले... मानवतेच्या मूलभूत नात्यावरच घाव घालणाऱ्या नव्या बिकट प्रश्नांची ललित लेखक या नात्याने आपली कुवत ओळखून आपण कशी झुंज घ्यावी, याचा विचार करण्यातच माझे दिवस जाऊ लागले." ‘सांजवात'पाठोपाठ ‘हस्ताचा पाऊस', 'प्रीतीचा शोध' आले.
 पण असे नव्हते की, वरील कालखंडात खांडेकर लिहीतच नव्हते. उलटपक्षी याच काळात वि. स. खांडेकरांनी ‘कलिका’ आणि ‘मृगजळातील कळ्यांद्वारे रूपककथेसारख्या सर्वस्वी नव्या कथाप्रकाराची मौलिक भर मराठी कथेच्या विकास व इतिहासात घातली. प्रतीक, सूचकता, अल्पाक्षरिता,आलंकारिकता, चमत्कृती, निसर्ग पात्रे (प्राणी, पक्षी,चंद्र, सूर्य, तारे, झरे, इत्यादी) द्वारे मानवी जीवनाचा शोध घेणाऱ्या कलात्मक कथा खांडेकरांनी लिहिल्या याच काळात.
 यानंतरही खांडेकर सन १९७६ पर्यंत कथा लिहीत राहिले. या कालखंडातील (१९४६ ते १९७६) आणखी पाच कथासंग्रह ‘भाऊबीज', ‘स्वप्न आणि सत्य', ‘विकसन’ आणि ‘सरत्या सरी' व रूपककथांचा एक संग्रह ‘क्षितिजस्पर्श' प्रकाशित झाले. ते मीच संपादित केले आहेत. या कालखंडातील खांडेकरांच्या कथा ओ हेन्रीचे कलाटणी तंत्र, चेकॉव्हची चिकित्सा, फ्रॉइडचे मनोविश्लेषण, मार्क्सचे तत्त्वज्ञान, गांधींची मूल्यधारणा, समाजवादाचे पंचशील यांतून प्रौढ व कलात्मक होत गेली. या कालखंडातील कथांनी वाचकांच्या रंजनाऐवजी प्रबोधन करून त्यांना अंतर्मुख केले. या दीर्घकाळ मनात रेंगाळणाच्या कथा ठरल्या. पूर्वीच्या कथा मन मोहवून टाकणाच्या असायच्या. कल्पना, भावना व विचारांचा त्रिवेणी संगम आपणास उत्तरार्धातील कथांत अनुभवायला मिळतो. पूर्वार्धातील कथा वेधक होत्या. त्या उत्तरार्धात भेदक बनल्या. सन १९७३ मध्ये वि. स. खांडेकरांची दृष्टी पूर्णपणे निमाली. त्यानंतरही ते लिहीत राहिले. यावरून कथेवरचे त्यांचं प्रेम स्पष्ट होते. या कालखंडात त्यांनी अनेक कथांतून पूर्वदीप्ती (फ्लॅशबॅक) शैलीचा उपयोग करून कलाकुसर अधिक मनोवेधक बनविली. ‘प्रीती’ उदाहरण म्हणून पाहता येईल. या संदर्भात ‘विकसन संग्रहातील कथा खांडेकरांच्या उत्तरायणातील. इथे खांडेकर कथेकडे अधिक जाणिवेने पाहतात असे लक्षात येते. सरत्या सरी'मधील त्यांच्या कथा सन १९७४ ते १९७६ च्या. त्या जीवनस्पर्शी, चिंतनप्रधान, चरित्रकेंद्री होत. विदेशी कथांच्या वाचनाने त्यांनी आपले तंत्र व मंत्र दोन्ही बदलून यंत्र बनणारा माणूस ‘मनुष्य'च कसा राहील याची काळजी घेत कथा लिहिल्या..
 समग्रतः कथाकार वि. स. खांडेकर हे रंजकतेपेक्षा बोधप्रद लेखन करणारे साहित्यिक. आपली कथा काल आणि आजपेक्षा उद्या अधिक कसदार कशी होईल, याचा ध्यास त्यांना होता. आपणाला कसदार लिहिता का येत नाही म्हणून मौन पत्करणारा हा कथाकार एक गंभीर लेखक होता. आपली प्रत्येक कथा प्रत्येक वाचकाचा कायाकल्प कसा करेल, हे त्यांनी पाहिलं. 'नीच कोण?', 'प्रेमलक्ष्मी'सारख्या प्रकरण कथा लिहिणोर खांडेकर शेवटी ‘मृत्यूसारखी रूपककथा लिहितात. ती इतकी अल्पाक्षरी, प्रतीकात्मक, चिंतनगर्भ होते की, वाचताना ही कथा आहे की काव्य असा प्रश्न पडावा. कथा आणि काव्याचा मिलाफ घडविणारी खांडेकरांची रूपक शैली म्हणजे मराठी सारस्वतात उघडलेलं नवं दालन! खांडेकर मराठी कथेचे अनभिषिक्त सम्राटच नव्हते, तर मराठी कथेचे ते शिल्पकारही होते, याची साक्ष देण्यास त्यांची ‘बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी' कथा पुरे!
लघुनिबंधकार
 लघुनिबंध हा मराठी साहित्यातील आधुनिक ललित वाङ्मयप्रकार होय. मराठीत प्रा. ना. सी. फडके त्यांचे प्रवर्तक असले तरी त्याचे संवर्धन वि. स. खांडेकरांनी केले. प्रा. ना. सी. फडके यांनी त्याला ‘गुजगोष्टी' असे नाव दिले होते. हा वाङ्मय प्रकार इंग्रजीतून मराठीत आला. इंग्रजीत लघुनिबंध लिहिण्याची परंपरा फ्रेंच निबंधकार माँटेन (१५३३-१५९२) पासून मानली जाते. इंग्रजीत चार्लस लॅब यांनी (१७७५-१८३४) तो रूढ केला. ल्युकास, गार्डिनर, लिंड, बेलॉक, मिल्ले, चेस्टरटन, प्रीस्टली अशी लघुनिबंधकारांची मोठी फळी इंग्रजीत आढळते, तशी ती मराठीतही. फडके, खांडेकरांशिवाय अनंत काणेकर, गो. नि. दांडेकर, बा. भ. बोरकर, र. गो. सरदेसाई, वा. भ. पाठक, शंकर साठे, य. गो. जोशी, रघुवीर सामंत ही अशी काही नावे सांगता येतील.
 वि. स. खांडेकरांच्या लघुनिबंध लेखनाचा प्रारंभ साप्ताहिक ‘वैनतेय'मध्ये प्रकाशित ‘निकाल द्या' (How's That) ने झाला. तो २२ फेब्रुवारी, १९२७ रोजी प्रकाशित झाला. त्यांचा शेवटचा लघुनिबंध 'शब्द आणि शब्द’ ‘अरुंधती' मासिकाच्या दिवाळी अंकात सन १९७६ ला प्रकाशित झाला. लघुनिबंध लेखनाच्या ५० वर्षांच्या वाटचालीत खांडेकरांनी सुमारे पावणेतीनशे निबंध लिहिले. पैकी ‘वायुलहरी' (१९३६), ते ‘रिमझिम (१९६१) पर्यंत प्रकाशित त्यांच्या ११ लघुनिबंध संग्रहांत २१३ निबंध संग्रहित आहेत. उर्वरित ६४ निबंध खांडेकरांच्या रजत स्मृतिप्रीत्यर्थ मी संपादित केलेल्या ‘रानफुले' (२००२), ‘अजून येतो वास फुलांना (२००३), ‘मुखवटे' (२००४) आणि ‘सांजसावल्या' (२००४) मध्ये आहेत. वि. स. खांडेकरांच्या समग्र लघुनिबंध संग्रहाची सूची ग्रंथाच्या शेवटी जोडलेल्या साहित्यसंपदा'मध्ये (परिशिष्ट ३ पाहा) आहे.
 वरील संग्रहांशिवाय खांडेकरांचे चांदण्यास', ‘अविनाश', 'मंदाकिनी', ‘मंजिच्या', 'कल्पलता', 'तिसरा प्रहर', 'मंझधार’, ‘झिमझिम' इत्यादी जे लघुनिबंध संग्रह आहेत, त्यांतील निबंध वाचताना लक्षात येते की, या निबंधांचा नायक लेखक स्वतः असतो. तो वाचकांशी गुजगोष्टी करतो. त्यातून तो स्वतःच्या आवडीनिवडी, फजिती, प्रसंग, सामाजिक समस्या, इत्यादींवर भाष्य किंवा संवाद करतो. आपल्या लघुनिबंधांचा प्रारंभ खांडेकर विविध प्रकारे करीत असले तरी त्यात चिंतन भरलेलं असतं. यात एक प्रकारची स्वयं केंद्रितता असते. या निबंधात तत्त्वचिंतनाबरोबरने समाजचिंतनही प्रगटते. त्यात निसर्गवर्णनही येते. या निबंधातून खांडेकरांचा वाचनव्यासंग उमगतो. भवभूती पासून स्टीफन झ्वाइगपर्यंत, ‘सौभद्र'पासून ‘बिवेअर ऑफ पिटी'पर्यंत खांडेकरांच्या वाचनाचा झोला आपण अनुभवतो. या निबंधातही खांडेकरांचे लेखनदोष डोकावतात; पण ती लेखकाची लेखनलकब म्हणून येते. खांडेकरांनी आपल्या समग्र लेखनात विविध प्रयोग केले, तसे लघुनिबंधातही कधी त्यांनी स्वतंत्र निबंध लिहिले, तर कधी पात्रांद्वारे. उदा. स्वराज्य साप्ताहिक प्रकाशित निबंध (‘मुखवटे'मध्ये संग्रहित) या संदर्भात पाहणे औचित्यपूर्ण ठरेल.
 वि. स. खांडेकरांनी आपल्या काही लघुनिबंध संग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावनांतून (विशेषतः ‘हिरवळ') वा ‘प्रदक्षिणा' मधील त्यांच्या लेखातून त्यांचा लघुनिबंध उद्भव, विकास, स्वरूप, तंत्र, इत्यादींचा अभ्यास स्पष्ट होतो. या अभ्यासामुळे व वाचनामुळे ते सरस लघुनिबंध लिहू शकले. डॉ.आनंद यादव यांनी त्यांच्या लघुनिबंधांची चांगली चिकित्सा केली आहे. त्यानुसार निसर्गचित्रण, सखोल चिंतन, कल्पनाविहार, समृद्ध अनुभव, शैलीवैविध्य, आलंकारिक भाषा, इत्यादींमुळे खांडेकरांचे लघुनिबंध वाचनीय ठरल्याचे स्पष्ट होते.
 वि. स. खांडेकरांचे 'वैनतेय', 'अखंड भारत’,‘ज्योत्स्ना', ‘स्वराज्य इत्यादी नियतकालिकांतून केलेल्या स्तंभलेखनामुळे ते विपुल व विविध लघुनिबंध लिह शकले. बहारीचा प्रारंभ, वैचित्र्यपूर्ण विकास आणि तात्त्विक शेवट यांमुळे त्यांचे निबंध वाचकांना अंतर्मुख करीत राहिले. त्यांच्या निबंधात साध्या विषयातून मोठा आशय सांगण्याचे सामर्थ्य आढळतं. कल्पनाविलास, संवादशैली, भाषासौंदर्य, सुभाषितांची पेरणी, चमत्कृती, जिव्हाळा, इत्यादींमुळे हे निबंध कलात्मक झाले आहेत. खांडेकरांच्या निबंधांत विषय, ओघ, मांडणी, कल्पना,भावना, तत्त्व, भाषा, निष्कर्ष असा अष्टावधानी गोफ गुंफलेला असतो. ‘लघुनिबंध हा वैचित्र्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा, विकसित रसिकतेचा आणि अनुभवसंपन्न आत्म्याचा आविष्कार आहे. अशी खांडेकरांनी केलेली लघुनिबंधाची व्याख्या लक्षात घेता त्यांचे निबंध हा मराठी साहित्याचा अनमोल ठेवा सिद्ध होतो. अनिर्बध विषयांत, मुळापेक्षा खोडावर भर, इत्यादींसारखे दोष वगळता हे लघुनिबंध म्हणजे विशिष्ट आत्मनिष्ठेचे प्रकट चिंतन होय. साहित्यकार खांडेकरांची जीवनदृष्टी समजून घ्यायचे अमोघ साधन म्हणून त्यांच्या लघुनिबंधांचे असाधारण महत्त्व आहे. कवी आणि गीतकार
 एखादा साहित्यकार चतुरस्त्र लेखन करतो, त्यातील विशिष्ट साहित्यप्रकार वाचक, समीक्षक पसंत करतात. तो लेखक त्या साहित्य प्रकाराचा प्रतिनिधी म्हणून सर्वपरिचित राहतो. वि.स.खांडेकरांनी कथा, कादंबरी, नाटक, निबंध, रूपककथा, चरित्र, आत्मचरित्र, पटकथा, व्यक्तिचित्रे, पत्रे, भाषणे ,मुलाखती, भाषांतर, समीक्षा लिहिल्या, असं सांगितल्यावर कुणाला आश्चर्य वाटत नाही; पण खांडेकर कवी व गीतकार होते असे म्हटल्यावर ऐकणाऱ्यांच्या वा वाचणाऱ्यांच्या भुवया उंचावतात याचे कारण त्यांची प्रचलित ओळख ही कादंबरीकार आणि कथाकार म्हणून असणे होय.
 खरे तर वि.स.खांडेकर साहित्याच्या क्षेत्रात सन १९१९ ला आले ते समीक्षक आणि कवी म्हणून. जुलै,१९१९ च्या'नवयुग'च्या अंकात ‘तुतारी वाङ्मय व दसरा' हा टीका लेख व ‘होळी' ही कविता प्रकाशित झाली होती. वि.स.खांडेकर प्रारंभीच्या काळात ज्या कविता करीत, त्या ‘कुमार' या टोपणनावाने प्रकाशित होत. हा प्रघात सन १९२८ पर्यंत सुरू होता. ‘लोकमित्र'च्या एप्रिल, १९२८ च्या अंकात प्रकाशित 'मानवी आशा' शीर्षक कविता ‘वि. स. खांडेकर' नावाने प्रथम प्रकाशित झाली. मृत्यूपर्यंत ते कविता लिहीत राहिले. त्यांची शेवटची प्रकाशित कविता कवी कुसुमाग्रज संपादन करीत असलेल्या 'कुमार' मासिकात सन १९७५ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. तिचे शीर्षक होते ‘शाप नव्हे हा!' डॉ. अविनाश आवलगावकर यांनी खांडेकर जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या समग्र कविता व गीते संपादित करून प्रकाशित केली आहेत. यांची संख्या १३७ आहे. याशिवाय माझ्या संशोधनात हाती आलेल्या काही प्रकाशित, अप्रकाशित अशा २० कविता आहेत. सुमारे २०० कविता व गीते लिहिलेल्या खांडेकरांची ओळख साहित्यरसिक व अभ्यासकांना न होणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.
 ‘पहिली पावलं' हे वि.स.खांडेकरांचं साहित्यिक आत्मकथन मी संपादित केलं आहे. ते मराठीतलं पहिलं साहित्यिक आत्मकथन असावं. त्यात कवितेतलं पहिलं पाऊल सांगणारा लेख आहे. तो अभ्यासताना लक्षात येतं की, बालवयातच खांडेकरांवर कवितेचे संस्कार झाले. बालपण गणपतीच्या मंदिरात गेल्यानं अभंग, ओव्या, कीर्तन, प्रवचनांचा नकळत बालमनावर प्रभाव होता. शाळेत जाऊ लागल्यावर गुरुजींनी शिकविलेली “आई, थोर तुझे उपकार' कविता चिरस्मरणीय ठरली, ती गुरुजींच्या डोळ्यांत शिकवताना पाणी उभारले म्हणून. इंग्रजी शाळेत गेल्यावर अन्य कवींबरोबर वर्डस्वर्थ भेटला. मग गोल्डस्मिथ, शेले, कीट्स, स्कॉटशी मैत्री झाली. मराठी नवनीत' हाती आले. प्राचीन कवी भेटत गेले. ‘काव्यदोहन' वाचलं नि ‘तुतारी' विशेष भावली. मग ‘केशवसुतांची कविता' भेटली. तिनं विशेष प्रभावित केले, म्हणून खांडेकर घर सोडून शिरोड्याच्या शाळेस गेले. तेव्हा त्यांच्या पिशवीत एकमेव पुस्तक होतं व ते 'केशवसुतांची कविता.' या कवितेने त्यांच्या एकांत व पोरक्या दिवसांत त्यांना विशेष साथ दिली. त्यांचा कविपिंड पोसला तो गोविंदाग्रज, बालकवी, चंद्रशेखर, रेंदाळकर, प्रभृती कवींमुळे.
 वि. स. खांडेकरांच्या कविता ‘उद्यान','महाराष्ट्र साहित्य', 'नवयुग', ‘अरविंद','लोकमान्य', 'प्रमोद’, ‘सुमन', 'मनोरंजन', 'रत्नाकर', 'यशवंत' इत्यादी नियतकालिकांतून सन १९३०-३१ पर्यंत नियमित प्रकाशित होत होत्या. भा.रा.तांबे, गिरीश, यशवंत, गोविंद, मनमोहन,काव्यविहारी, इत्यादी कवी हे खांडेकरांचे समकालीन कवी. खांडेकरांवर प्रारंभी केशवसुत, गोविंदाग्रज यांच्या कवितांचा प्रभाव होता. त्यांनी सामाजिक,राष्ट्रीय,सांस्कृतिक विषयांवर कविता लिहिल्या तशा व्यक्तींवरही लिहिल्या. झेंडा, बालविधवा, भाऊबीज, शिव-निर्माण, आगरकर या शीर्षकांवरून ते स्पष्ट होईल. कविता प्रकारच्या दृष्टींनी पाहिले तर प्रेमकविता, निसर्गकविता, वीरगीते, बालगीते, चित्रपट गीते, सुनीत, व्यक्तिकविता अशा तऱ्हेतर्हेच्या कविता खांडेकरांनी लिहिल्या.
 या काळात रविकिरण, तुतारी, इत्यादी कविमंडळे होती; पण खांडेकर त्यांत नव्हते. त्या काळात ते कविता समीक्षक म्हणून अधिक गाजले. खांडेकरांचा मूळ पिंड हा कवीचा, हे त्यांच्या आलंकारिक भाषेमुळे स्पष्ट होत असले तरी फार प्रभावी कविता ते देऊ शकले नाहीत; याचे कारण त्यांची कविता बऱ्याचदा तंत्र सांभाळण्यात हरवून जाते. त्यांच्या कवितेचे समीक्षक व रविकिरण मंडळातील गेय कवी रा. अ.काळेले यांनी म्हटले ते खरे आहे की, "खांडेकरांच्या कवितेत केशवसुतांचा संवेग आहे; पण आवेगी बेगुमानपणा नाही. गोफणीने हाणाहाण करताना खांडेकरांच्या कवितेच्या गोफणीतले दगड मऊ पडतात." असे असले तरी खांडेकरांची कविता समकालीन संदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
 त्यांच्या कवितेचा गाभाघटक अन्य साहित्यप्रकाराप्रमाणे जीवनमूल्य, समाज परिवर्तन, माणसाची घडण हाच राहिला आहे. त्यांची कविता त्यांच्या साहित्याप्रमाणेच पुरोगामी आहे. गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद, मानवतावाद इत्यादी विचारधारांशी नातं जोडणारी ही कविता अंतिमतः मानवहितकारी कविता म्हणून लक्षात राहते.  सिनेगीतकार म्हणून वि. स. खांडेकर मराठी चित्रपटसृष्टीत आले सन १९३६ साली. 'छाया' चित्रपटाची त्यांनी पटकथा लिहिली तशी गीतेही. ही परंपरा ‘सूनबाई' (१९६२) चित्रपटापर्यंत चालू राहिली. या काळात त्यांनी १०० चित्रगीते लिहिली त्यातील अधिकांश गीते संकलित करून त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न सिनेगीतकार गंगाधर महांबरे यांनी खांडेकर जन्मशताब्दीनिमित्ताने केला आहे. ही सर्व गीते ऐकत, वाचीत असताना लक्षात येतं की, खांडेकरांनी प्रेक्षकांची मने व्याकुळ करणारी गीते लिहिली. सिनेगीत असल्यानं ती गेय होती हे वेगळं सांगायची गरज नाही. खांडेकरांना अलंकार, छंद, वृत्तांचे चांगले ज्ञान होते, हे या गीतांवरूनही लक्षात येते. त्यांची गीते श्रोत्यांना, प्रेक्षकांना,वाचकांना अंतर्मुख करतात. कथात्मक वा अन्य साहित्याप्रमाणे खांडेकरांच्या गीतांत मांगल्य, पावित्र्य, चारित्र्य, विवेक, ध्येय, सद्भावना इत्यादी भाव भरलेला आढळतो. चित्रपटांतील गीते बहुधा कथेत रंग भरण्यासाठी, चित्रपट रंगतदार होण्यासाठी, तर कधी गंभीर प्रसंगांतून प्रेक्षकांना हलके-फुलके भाव, वातावरणात नेण्यासाठी येत असतात. तशीच खांडेकरांच्या पटकथांत ही गीते येतात. पदे, भावगीते, द्वंद्वगीते, समूहगीते, नृत्यगीते, अभंग इत्यादी प्रकारांच्या रचनांनी खांडेकरांनी आपलं गीतवैविध्य जपलं.‘घरि एकच पणती मिणमिणती'सारखं काव्य, गीत आजही लोकांच्या मनी-मानसी असणं हे त्यांच्यातील यशस्वी गीतकारांचे प्रमाणपत्र म्हणून दाखविता येतं. दादा चांदेकर, हृदयनाथ मंगेशकर, दत्ता डावजेकर, सलील चौधरी यांसारखे संगीतकार खांडेकरांच्या गीतांना लाभले. रत्नप्रभा, इंदिरा वाडकर, सर्व मंगेशकर बंधु-भगिनी हे त्यांच्या गीतांचे गायक होते.
व्यक्ती चरित्रकार
 वि. स. खांडेकरांनी व्यक्तिचरित्रपर लेख, चरित्र आणि व्यक्ती व वाङ्मय असं परिचयपर व समीक्षात्मक लेखनही विपुल प्रमाणात केलं आहे. या लेखनाचा प्रारंभ नवयुग (फेब्रुवारी, १९२०) मध्ये प्रकाशित राम गणेश गडकरी यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रकाशित ‘हा हन्त हत्न' शीर्षक व्यक्तिपरिचय लेखाने झाला. खांडेकरांनी असे ८० हून अधिक व्यक्तिलेख लिहिले. त्यांचे औचित्य स्मरण, गौरव सन्मान मृत्यू, कार्यस्मरण, शताब्दी, अमृतमहोत्सव, षष्ट्यब्दीपूर्ती, मानपत्र, व्यक्तिगत कृतज्ञता इत्यादींचे. असे ते विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, गौरवग्रंथ यांत प्रकाशित होत. यांपैकी काहींचा समावेश त्यांनी गोकर्णीची फुले', 'ते दिवस, ती माणसे', 'रेषा आणि रंग','रंग आणि गंध'मध्ये केला आहे. याशिवाय पन्नासएक असंकलित व्यक्तिपर लेख माझ्या संग्रही आहेत. त्यांतील निम्मे व्यक्तिपरिचयपर असून उर्वरित कार्य, साहित्यसमीक्षापर आहेत. लवकरच त्यांनाही ग्रंथरूप देण्याची योजना आहे. अशा लेखांत जीवनपट, व्यक्तिस्वभाव, लकबी, व्यक्तिमत्त्व, विचारकार्य, साहित्य अधोरेखित करून खांडेकरांनी चरित्रनायकाचे योगदान स्पष्ट केले आहे. अशा लेखांत संत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कवी, कलाकार, राज्यकर्ते, समाजसेवक इत्यादींचा समावेश आहे. असे लेख ते १९७५ पर्यंत लिहीत राहिले. अशा व्यक्तींपैकी काहींच्या आठवणी पण खांडेकरांनी शब्दबद्ध केल्या आहेत.उदा.राम गणेश गडकरी.
 गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य, कर्तृत्व व विचारांचा खोल असा प्रभाव खांडेकरांवर होता. तो व्यक्त करण्यासाठी सन १९३२ मध्ये आगरकर चरित्र लिहिले. असे संपूर्ण चरित्र जरी नसले तरी एका व्यक्तीवर अनेक लेख लिहन खांडेकरांनी त्यांच्या जीवन व विचारांविषयीची आपली असीम आस्था नि आदर व्यक्त केला आहे. अशा व्यक्तींत नाटककार खाडिलकर, कोल्हटकर, देवल, केळकर यांचा समावेश होतो. पैकी कोल्हटकरांविषयीचा आदर त्यांनी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत (१९७२) 'निवडक कोल्हटकर', ‘समग्र कोल्हटकर' (भाग १ व २) ग्रंथ सिद्ध करून व्यक्त केला आहे. तत्पूर्वीही खांडेकरांनी सन १९३२ मध्ये कोल्हटकर लेखसंग्रह'चे संपादन केले होते. असेच पुस्तक नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांवर संपादित करणे शक्य आहे. महात्मा गांधी (जन्मशताब्दी वर्षात (१९६९) लिहिलेल्या लेखांचे पुस्तक नुकतेच मी वानगीदाखल संपादित केले असून जाणकारांनी त्याचे स्वागत केले आहे.
 याशिवाय मराठी साहित्याच्या व्यक्ती आणि वाङ्मय'स्वरूपाचं चरित्र व समीक्षांचे संपादन आणि लेखन ही खांडेकरांनी मराठीला दिलेली अमोघ देणगी होय.‘गडकरी : व्यक्ती आणि वाङ्मय' (१९३२), ‘वा. म. जोशी : व्यक्ती आणि विचार' (१९४८), ‘आगरकर : व्यक्ती आणि विचार' (१९४९), 'केशवसुत : काव्य आणि कला' (१९५६) सारख्या साहित्यकृती या संदर्भात लक्षात घेण्यासारख्या आहेत. वि. स. खांडेकर हे मराठी साहित्यातील एकमेवाद्वितीय असे व्यक्ती होत की, ज्यांनी दुसऱ्या साहित्यिकांची मनस्वी भलावण केली. आपल्या स्वागतशील स्वभाव वृत्तीचा खांडेकरांनी पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, रणजित देसाई, मंगेश पाडगावकर, प्रभृतींना आपल्या विविध कृतींतून करून दिलेला परिचय माझ्यासारख्या अभ्यासकाला नेहमीच अनुकरणीय वाटत आला आहे. खांडेकर मित्र आणि माणूस म्हणून वा. रा. ढवळे यांना मोठे वाटतात ते यामुळेच.
 व्यक्ती-विचार, चरित्र, कार्य, वाङ्मय अशा चतुर्दिक मार्गांनी थोरामोठ्यांचा खांडेकरांनी केलेला गौरव म्हणजे अशा माणसाचं चिरंतन व स्मरण इतिहासबद्ध करणंच होय. आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, शास्त्रज्ञ अल्बर्ट श्वाइट्झर, समाजसेवक एस.एम.जोशी, बाबा आमटे, साने गुरुजी, रवींद्रनाथ टागोर, कथाकार चेकॉव्ह अशी नावं त्यांच्यावरील अविस्मरणीय लेखांमुळे सहज आठवतात. ही खांडेकरांच्या गुणग्राहक वृत्तीची निशाणी म्हणूनही नोंदवावी लागेल. हा वारसा त्यांनी आपले लेखन गुरू नाटककार, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व राम गणेश गडकरी यांच्याकडून घेतला आणि ‘घेतला वसा टाकू नये' म्हणत जपला. खांडेकरांचं हे लेखन 'यशवंत',‘ज्योत्स्ना', ‘प्रतिभा', 'मनोहर','किर्लोस्कर इत्यादी मासिकांतून व 'लोकसत्ता', 'महाराष्ट्र टाइम्स','केसरी'सारख्या दैनिकांतून प्रकाशित होत राहिलं. या दैनिक वा नियतकालिकांनी खांडेकरांच्या उपरोक्त लेखांना मुखपृष्ठीय प्रसिद्धी देऊन त्या लेखनस्तरावर एका अर्थाने शिक्कामोर्तब केलं होतं. व्यक्तिचरित्रपर लिखाण खांडेकर मनस्वीपणी करीत. त्यासाठी बहुमुखी वाचन करीत. संदर्भ गोळा करणे, टिपणे काढणे, स्वतःची मते नोंदविणे या सर्वांतून खांडेकरांची संशोधन वृत्ती प्रत्ययास येते. त्या काळी असं लेखन म्हणजे खांडेकरांचं मान्यतापत्र मानले जायचे.
समीक्षक
 जुलै, १९१९ च्या 'नवयुग' मासिकात प्रकाशित झालेल्या ग. त्र्यं. माडखोलकरांच्या 'केशवसुतांचा संप्रदाय' लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिलेला वि. स. खांडेकरांचा लेख ‘तुतारी वाङ्मय व दसरा' 'नवयुग' च्या सप्टेंबर, १९१९ च्या अंकात प्रकाशित झाला. या लेखांनी त्यांना समीक्षक, टीकाकार बनवलं. या लेखामुळे अनेक मासिकांनी त्यांना पत्रे पाठवून टीकासाहित्य मागितलं. 'महाराष्ट्र साहित्य', 'रणगर्जना' मध्ये खांडेकरांचं प्रारंभिक टीकसाहित्य प्रकाशित झालं. १९२४ ला सुरू झालेल्या वैनतेय' साप्ताहिकात त्यांनी चालविलेल्या परिचयाची परडी' सदरात त्यांनी अनेक ग्रंथांचे परीक्षण केले. ते तत्कालीन समीक्षक, साहित्यकार, संपादकांना भावले. सततच्या लेखनाने खांडेकर समीक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. १९२० ते १९३० च्या दशकात त्यांनी विपुल समीक्षालेखन केले; पण ते शब्दप्रभू अधिक नि विचारगर्भ कमी, असं होतं.  त्यांनी १९३२ साली लिहिलेल्या ‘गडकरी : व्यक्ती आणि वाङ्मय नि ‘आगरकर : चरित्र, व्यक्ती व कार्य' सारख्या ग्रंथांनी समीक्षक खांडेकरांची चिकित्सक, अभ्यासू समीक्षक म्हणून मराठी वाचकांना ओळख झाली. ‘वनभोजन' (१९३५), ‘धुंधुर्मास' (१९४०), ‘मराठीचा नाट्यसंसार (१९४५), 'वामन मल्हार जोशी : व्यक्ती आणि विचार' (१९४८), रेषा आणि रंग' (१९६१), 'रंग आणि गंध' (१९६१), सारख्या ग्रंथांनी खांडेकरांच्या समीक्षालेखनाचे नवे विक्रम स्थापित केले. खांडेकरांची भाषणे ही त्यांच्या प्रगल्भ समीक्षकाची मौखिक प्रतिमाने होत. वरील ग्रंथांतील काही लेखसंग्रह होत. त्यात अनेक समीक्षात्मक लेखांचा अंतर्भाव आहे. याशिवाय वि. स. खांडेकरांनी वेळोवेळी विविध मासिके, साप्ताहिके, दैनिकांतूनही पुस्तक परीक्षणे लिहिली, समीक्षात्मक लेख लिहिले. अशा असंकलित परीक्षण नि लेखांची संख्या १५0 च्या घरात आहे.
 खांडेकरांचे प्रारंभिक टीकालेखन आक्रमक होते. त्यात आशयापेक्षा अभिनिवेश अधिक असायचा.पुढे ते अधिक चिकित्सक झाले. त्यांच्या समीक्षालेखनात व्यक्तिद्वेष वा मत्सराची भावना नसायची. वाङ्मयाचा प्रवाह शुद्ध ठेवण्याची धडपड असायची. पुढे त्यांनी अंतर्मुख करणारे टीकालेखन केले. खांडेकरांचं समीक्षालेखन बहुमुखी जसं होतं (शैलीच्या रूपानं!) तसं ते साहित्य रूपाच्या निकषांवर वैविध्यपूर्णही होतं. खांडेकरांनी समीक्षेतून साहित्य नि माणसांत अद्वैत निर्माण केलं. खांडेकरांचं समीक्षा लेखन प्रांजळ आहे. विविध भाषा व साहित्याच्या अभ्यासामुळे खांडेकरांच्या समीक्षालेखनास तुलनात्मकतेचा स्पर्श आहे. विश्वपटलावर मराठी साहित्य कुठं आहे, याचं भान त्यांचं समीक्षालेखन देतं. त्यांचं टीकालेखन निश्चित निष्कर्ष वाचकांपुढे ठेवून प्रतवारी निश्चित करतं. त्यामुळे ते अधिक निर्णायक झालं आहे. खांडेकर आपल्या समीक्षालेखनातून सत्यान्वेषण करतात. त्यात त्यांचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्पष्ट होतो. खांडेकरांची समीक्षा विश्लेषक, विवरणात्मक, पृथक्करणात्मक, संश्लेषणात्मक अशा अनेक शैलींनी आकारते, फेर धरते.
 खांडेकरांची समीक्षा विचारयुक्त, उपरोधिक, हार्दिक, कल्पक अशा अनेकविध गुणांनी युक्त असली तरी कधी-कधी ती पाल्हाळीक आणि अनावश्यक विस्तृत होत राहते. असे असले तरी खांडेकरांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे व कलात्मक लेखनामुळे ती मराठी समीक्षेत एक नवी वाट निर्माण करणारी, नव्या पिढीस मार्गदर्शन करणारी, प्रेरक नि म्हणून वाचनीय होते.  वि. स. खांडेकरांनी आपले लेखनगुरू नाटककार रा. ग. गडकरी यांच्या निधनानंतर (२३ जानेवारी, १९१९) पहिल्या स्मृतिदिनी गडकऱ्यांवर एक चरित्रात्मक लेख लिहिला. नंतर वर्षभराने ‘प्रेमसंन्यास'वर लिहिला. दोन्ही लेख वाचकांनी पसंत केले व खांडेकरांनी गडकऱ्यांच्या सर्व वाङ्मयाचे विवेचन करावे, असे सुचविले. त्यानुसार सिद्ध झालेला प्रथम नाट्यविषयक समीक्षाग्रंथ म्हणजे 'गडकरी : व्यक्ती आणि वाङ्मय' (१९३२). यामुळे खांडेकर नाटकाचे अभ्यासक व समीक्षक म्हणून सर्वश्रुत झाले. त्यानंतर त्यांनी मराठीचा नाट्यसंसार' ग्रंथ लिहिला. यात त्यांनी मराठी नाट्यवाङ्मय व रंगभूमीचा आलेख रेखाटला. १९५७ च्या सातारा इथे भरलेल्या नाट्यसंमेलनाचे वि. स. खांडेकर हे अध्यक्ष होते. त्या निमित्ताने केलेले भाषण, डॉ. भालेरावांवरील लेख. रा. ज. देशमुख (प्रकाशक) यांची ‘नियती' शीर्षक टिपणी समाविष्ट करून या ग्रंथाची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. पुढे खांडेकरांनी 'निवडक कोल्हटकर' (१९७२) चे साक्षेपी संपादन केले. त्यात त्यांनी कोल्हटकरांच्या निवडक साहित्याचा नजराणा नाट्यदर्शन, विचारदर्शन, विनोददर्शन अशा त्रिखंडांत सादर केला. यापूर्वी खांडेकरांनी १९३२ मध्ये ग. त्र्यं. माडखोलकर व गं. दे. खानोलकरांच्या सहाय्याने ९२२ पृष्ठांचा ‘कोल्हटकर लेखसंग्रह' शीर्षक बृहत् ग्रंथ मराठी अभ्यासकांना उपलब्ध करून दिला होता. पुढे खांडेकरांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासाठी ‘समग्र कोल्हटकर'चे दोन खंडांत संपादन केले. प्रथम खंड १९७२ साली, तर दुसरा १९७५ साली प्रकाशित झाला. हे खंड म्हणजे 'निवडक कोल्हटकर'ची सुधारित आवृत्तीच होय. मूळ ग्रंथात १८ लेख समाविष्ट करून तो ग्रंथ अद्यतन करण्यात आला होता.
 वि. स. खांडेकर स्वतः नाटककार तर होतेच; पण मराठी नाटक, चित्रपट यांबद्दल त्यांचं सतत वाचन, चिंतन व लेखन होत राहायचं. वेळोवेळी त्यांनी लिहिलेले नाट्यविषयक समीक्षात्मक लेख त्यांच्या ‘वनभोजन' (१९३५), ‘धुंधुर्मास' (१९४०), ‘गोकर्णीची फुले' (१९४४),‘फुले आणि काटे' (१९४४), गोफ आणि गोफण' (१९४६), 'रेषा आणि रंग' (१९६१) व रंग व गंध' (१९६१) मध्ये संग्रहित आहेत. याशिवाय १९२७ ते १९७२ या कालखंडात लिहिलेले; परंतु अद्याप असंकलित राहिलेले काही लेख आहेत. ते वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहेत.
 या समग्र लेखन, संपादनातून वि. स. खांडेकरांची नाटकविषयक दृष्टी व चिंतन स्पष्ट होते. पुढे खांडेकर पटकथा लेखक म्हणून यशस्वी झाले, त्यामागे नाट्यसमीक्षक म्हणून त्यांनी केलेला रियाज उपयोगी ठरला. प्रस्तावनाकार
 वि. स. खांडेकरांनी आपल्या पुस्तकाला ‘दोन शब्द', 'चार शब्द', ‘पार्श्वभूमी' अशा शीर्षकांनी प्रस्तावना लिहिली नाही, असं पुस्तक अपवाद म्हणावं लागेल. खांडेकरांनी स्वतः लिहिलेला, संपादित केलेल्या शंभरएक, पुस्तकांशिवाय इतर अनेकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या अन्य त्रेसष्ठ प्रस्तावनांची सूची जया दडकरांनी आपल्या ‘वि. स. खांडेकर वाङ्मय सूची'मध्ये नोंदविली आहे. इतक्या बहुल संख्येने प्रस्तावना लिहिणारे खांडेकर मराठी साहित्यातील या संदर्भातील विक्रमी लेखक म्हणून ओळखले जातात. एखाद्या लेखकाच्या प्रस्तावना विचारणीय आणि नोंद घेण्यासारख्या, चिकित्सक वाटाव्यात, हे त्या प्रस्तावनांचे महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेसे ठरावे. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी वि. स. खांडेकरांच्या उल्लेखनीय प्रस्तावना संपादित करून त्या विचारधारा' (१९९३) या ग्रंथाच्या रूपात सादर करणे हीदेखील मराठी साहित्याच्या क्षेत्रातील एकमेवाद्वितीय घटना असावी.
 खांडेकरांच्या प्रस्तावना मराठी साहित्यात अनेक अर्थांनी लक्षणीय ठरल्या आहेत. एक तर खांडेकरांनी कथा, कादंबरी, निबंधसंग्रह, नाटक, कविता, संपादित ग्रंथ अशा विविध प्रकारच्या ग्रंथांना व इतरेजनांच्या पुस्तकांना लिहिल्या आहेत. त्यात मूळ कृतीचे सौंदर्य, वैशिष्ट्य, पार्श्वभूमी, लेखनामागची भूमिका विशद करण्याचा प्रयत्न असतो. खांडेकर पूर्वचिंतन करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रस्तावना लिहितात. खांडेकरांची प्रस्तावना बहुधा विश्लेषणात्मक शैलीने लिहिलेली असते. त्यांच्या प्रस्तावना मूळ कृतींप्रमाणे लालित्यपूर्ण व जीवनलक्ष्यी असतात. चिंतनशीलता हे त्यांचे अंगभूत वैशिष्ट्य असते. त्यांचे स्वरूप निबंधसदृश असते. त्यांच्या प्रस्तावनांमुळे वाचकास मूळ कृती समजणे सोपे जाते. त्या कलात्मक असतात, तशा विचारगर्भही! खांडेकरांच्या प्रस्तावनेचं मराठी साहित्यात व्यवच्छेदक असं स्थान आहे. त्यांच्या प्रस्तावनांतून खांडेकरांचं शिक्षक, समाजचिंतक रूप प्रकट होतं. खांडेकरांच्या प्रस्तावना मूळ साहित्याइतक्याच दर्जेदार आहेत.
संपादक  एखाद्या समकालीन अथवा पूर्वसूरी व्यक्ती अथवा व्यक्तींचे साहित्य प्रकाशनार्थ निवडून, ते सुधारून, संस्कारित करून, क्रम लावून आवृत्तीयोग्य ग्रंथ वा नियतकालिक तयार करणारा तो संपादक. वि. स. खांडेकरांनी शिरोड्यात ट्यूटोरिअल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करताना वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या हस्तलिखिताच्या संपादनातून या कार्याचा प्रारंभ केला. पुढे ४ नोव्हेंबर, १९२४ मध्ये सावंतवाडीहून ‘वैनतेय' साप्ताहिक सुरू झाले. त्याच्या सहसंपादकांपैकी खांडेकर एक होते. विशेषतः त्यातील वाङ्मय विभागाचे ते संपादन करीत असत. या साप्ताहिकात संपादनाबरोबर बातमीदार, स्तंभलेखक म्हणूनही खांडेकरांनी लेखन केलं. अनेक अग्रलेख, परीक्षणे लिहिली. पटकथा लेखक म्हणून शिरोडे सोडून कोल्हापूरला जाईपर्यंत (१९३६-३८) 'वैनतेय'मध्ये ते लिहीत राहिले.
 याच दरम्यान ते ‘प्रतिभा'च्या संपादनकार्यात सक्रिय होते. सन १९३६ ते ३८ कालखंडात त्यांनी ज्योत्स्ना' मासिकाचे संपादन केले.
 ग्रंथ संपादनाच्या क्षेत्रातील कार्यास त्यांनी 'गडकरी : व्यक्ती व वाङ्मय' (१९३२) ने प्रारंभ केला. पुढे ‘आगरकर : व्यक्ती आणि विचार (१९४५)', ‘वामन मल्हार जोशी : व्यक्ती आणि विचार' (१९४८), ‘निवडक कोल्हटकर' (१९७२), ‘समग्र कोल्हटकर' (भाग १ व २), (१९७२ व ७५), ‘एस. एम. जोशी गौरवग्रंथ' (१९६४) सारख्या ग्रंथांचे संपादन करून खांडेकरांनी मान्यवर साहित्यकारांचे व्यक्तित्व, विचार व साहित्य सम्यक स्वरूपात सादर करून आपल्या संपादन कौशल्याची प्रचिती दिली.
 वि.स.खांडेकरांनी मराठी साहित्यातील मान्यवर कथाकारांच्या उल्लेखनीय कथांचे संग्रह संपादित करून त्यांना दीर्घ प्रस्तावना लिहून मराठी कथेचा आपला व्यासंग सिद्ध केला. चिं. वि. जोशी, वि. वि. बोकील,दिवाकर कृष्ण, द.र.कवठेकर,यांच्या कथांचे संग्रह खांडेकरांनी संपादित केले. शिवाय काही प्रातिनिधिक कथाकारांच्या कथांचेही. मुक्या कळ्या'(१९४७),‘गुदगुल्या'(१९४८),‘गारा आणि धारा'(१९४८), ‘पाच कथाकार' (१९४९), ‘इंद्रधनुष्य' (१९४९), 'निवडक दिवाकर कृष्ण' (१९६९) हे कथासंग्रह वि. स. खांडेकरांनी संपादित करून मराठी कथेचे प्रातिनिधिक रूप व वैशिष्ट्ये प्रस्तुत करण्याचे ऐतिहासिक कार्य केले.
 कथांप्रमाणेच खांडेकरांनी काही कादंबऱ्या संपादित स्वरूपात मराठी वाचकांनी सादर केल्या. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी एखादी कादंबरी सुलभरीत्या संक्षिप्तपणे सादर करण्याची खांडेकरांची धडपड असायची. साने गुरुजी,वा.म.जोशी यांच्या ‘आस्तिक' (१९४९),‘रागिणी' (१९५९),‘सुशीलेचा देव' (१९५३) सारख्या कादंबऱ्या खांडेकरांच्या संपादनाची उदाहरणे होत.  असे संपादन खांडेकरांनी निबंध व लघुनिबंध संग्रहाचेही केले. ‘नवे किरण' (१९४७) सारखा अनंत काणेकरांच्या लघुनिबंधाचा सुंदर संग्रह खांडेकरांनी संपादित केला. शिवाय प्रातिनिधिक लघुनिबंधकारांचे ‘वासंतिका (१९४९) व ‘पारिजात' (१९४९) सारखे संग्रह संपादित करून आपला लघुनिबंधविषयक दृष्टिकोन स्पष्ट केला. मराठी लघुनिबंधांचे जनक प्रा.ना.सी. फडके असले तरी तो मराठी साहित्यात रुजवायचे, फुलवायचे, विकसित करण्याचे श्रेय खांडेकरांनाच दिले जाते. या संग्रहाच्या प्रस्तावना लघुनिबंधविषयक खांडेकरांची जाण व जाणीव स्पष्ट करतात.
 लघुनिबंधाप्रमाणेच वि.स.खांडेकरांनी काही निबंधसंग्रहही संपादित केले. शि.म.परांजपे यांच्या ‘अग्निनृत्य' (१९४७) शिवाय त्यांनी प्रातिनिधिक निबंधकारांचा एक संग्रह ‘समाजचिंतन' (१९६३) नावाने सिद्ध केला. खांडेकर,साहित्य व समाजाचा अभिन्न संबंध मान्य करीत. ते स्वतः श्रेष्ठ निबंधकार होते. अशा संकलनांच्या संपादनातून खांडेकरांचा समाज व साहित्यविषयक दृष्टीचा परिचय होतो.
 खांडेकरांचा काव्यविषयक व्यासंग सर्वश्रुत आहे. ते जसे कवी होते तसे चित्रपट गीतकारही. मराठी प्राचीन व अर्वाचीन काव्याचा त्यांचा अभ्यास होता, हे ‘तारका' (१९४९) व 'काव्यज्योती' (१९३९) च्या संपादनातून प्रत्ययास येते. खांडेकर नव्या विचारांचे स्वागत व समर्थन करणारे समाजशील साहित्यकार होते. त्यामुळे त्यांनी केशवसुतांची भुरळ न पडती तरच आश्चर्य! 'केशवसुत : काव्य आणि कला'सारख्या ग्रंथांचं त्यांचे व्यासंगपूर्ण संपादन म्हणजे मराठीतील संपादन क्षेत्राचा एक आदर्श असा वस्तुपाठच होय, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खांडेकरांनी ‘मंगल वाचनमाला' या पाठ्यपुस्तकाचे साक्षेपी संपादन केले आहे.
अनुवादक
 वि.स.खांडेकर साहित्यकार होते; पण त्या आधी ते सव्यसाची वाचक होते. मराठीशिवाय संस्कृत नि इंग्रजीची त्यांना चांगली जाण होती. इंग्रजीत भाषांतरित झालेलं जर्मन,फ्रेंच,रशियन, अरेबिक साहित्य ते आवर्जून वाचत. त्या काळात (स्वातंत्र्यपूर्व) विदेशी साहित्य सामान्यांना सहज उपलब्ध होणे दुरापास्त असायचे. अशा काळात वि.स.खांडेकरांनी भारतीय विशेषतः बंगाली नि विदेशी (इंग्रजी, जर्मन, अमेरिकन) भाषांतील साहित्यकारांच्या स्वतःला भावलेल्या कथा,कविता नि पत्रांचा मराठी वाचकांसाठी वेळोवेळी अनुवाद केला. त्यातून तीन अनुवाद कृती साकारल्या. दोन कथासंग्रह व एक पत्रसंग्रह. अशा रूपात लेखन करून खांडेकरांनी आपल्या अनुवाद क्षमतेचा परिचय दिला. संस्कृतमध्ये कालिदास, बंगालीतील रवींद्रनाथ टागोर, शरद्चंद्र, हिंदी प्रेमचंद हे त्यांचे आवडते लेखक. विदेशी लेखकांपैकी ओ हेन्री, मोपाँसा, चेकॉव्ह,अन्स्ट टोलर, गॉल्सवार्दी, टॉलस्टॉय, खलील जिब्रान, सॉमरसेट मॉम, हर्बर्ट बेट्स, यांच्या साहित्याचं त्यांनी विपुल वाचन केले होतं.
 ‘सुवर्णकण' (१९४४) हा खलील जिब्रानच्या ३५ रूपककथा नि कवितांचा अनुवाद. 'वेचलेली फुले' (१९४८) मध्ये पण जिब्रानच्या रूपककथांचे अनुवाद आहेत. ‘सुवर्णकण' हा 'Madman'वर बेतले आहे. तर, ‘वेचलेली फुले'मधील कथा 'The fore Runner' (अग्रदूत) मधील निवडक रचना होती. ‘तुरुंगातील पत्रे' हे अन्र्स्ट‌‍ टोलर या जर्मन साहित्यकाराच्या 'Letters From Prison' मधील पत्रांचा मराठी अनुवाद होय. ‘तुरुंग हा भोग नसून भाग्य आहे, असं स्टीफन झ्वाइगला समजाविणा-या टोलरची जीवनदृष्टी या पत्रातून स्पष्ट होते. अन्र्स्ट टोलरच्या I was German' या आत्मकथेचा अनुवाद करण्याची खांडेकरांची इच्छा होती; पण ती अपूर्णच राहिली. टोलरच्या एका कथेचा केलेला अनुवाद ‘सत्य आणि सत्य' मराठी वाचकांच्या परिचयाचा आहे. इसाप, विष्णुशर्मा, टर्जिनिव्ह, इब्सेन, स्टीफन, स्वाईग, कॅपेक हे खांडेकरांचे प्रिय लेखक. त्यांच्या रचनांचे अनुवाद संकल्प खांडेकर नित्य करीत राहायचे.
वक्ते
 वि.स.खांडेकर साहित्यकार म्हणून जसे श्रेष्ठ होते, तसे वक्ते व विचारक म्हणूनही. आपल्या महाविद्यालयीन जीवनात ऐकलेल्या भाषणांमुळे प्रभावित होऊन भाषण करण्याची मनी ऊर्मी असूनही खांडेकरांनी संकोची स्वभावामुळे विद्यार्थिदशेत कधी भाषण केले नाही. सन १९२० साली ते कोकणातील शिरोड्यात शिक्षक म्हणून रुजू झाले. मुख्याध्यापक, शिक्षक या नात्यानं वर्गातील अध्यापनाशिवाय शाळेतील छोट्या-मोठ्या समारंभातील भाषणांनी त्यांची भीड मोडली व ते धिटाईनं भाषणे करू लागले. एकदा शाळेत त्यांनी न्यायमूर्ती रानडे या पुण्यतिथीच्या निमित्ताने इंग्रजीत भाषण दिले. त्याचा वृत्तान्त सावंतवाडीहून प्रकाशित होणाऱ्या ‘वैनतेय' साप्ताहिकात छापून आला होता. तो श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या वाचनात आला. त्याच दरम्यान ते (कोल्हटकर) मुंबई, पुणे,नाशिकच्या दौऱ्यावर असताना खांडेकर त्यांच्यासोबत होते. नाशिक मुक्कामी वसंत व्याख्यानमाला सुरू होती. त्यांना वक्त्याची गरज होती. कोल्हटकरांनी खांडेकरांची शिफारस केली. १९२६ च्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत ‘मराठी नाटक विषयावर नदीकाठी कोल्हटकरांच्या अध्यक्षतेखाली झालेले व्याख्यान त्यांचे पहिले जाहीर व्याख्यान हे होय. पुढे शिरोड्याच्या पंचक्रोशीशिवाय सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, म्हापसा, पणजी, मडगाव, पुणे, मुंबई सर्वत्र त्यांची भाषणे होत राहिली. लेखनाप्रमाणे सार्वजनिक भाषणही समाजमनाशी सुसंवाद साधण्याची एक प्रभावी साधना आहे, अशी खांडेकरांची धारणा होती. पूर्वी कीर्तनकार, प्रवचनकार प्रबोधनाचे कार्य करीत. ते कार्य वर्तमान युगात व्याख्याते करतात, असे ते मानत. खांडेकरांना परिस्थितीने वक्ता बनवले. सभा, समारंभ, संमेलने, व्याख्यानमाला, परिसंवाद, चर्चासत्रे यांतून त्यांच्यातील वक्ता आकारला.
 सन १९३४ ते १९५९ या कालखंडातील साहित्य, नाट्य, पत्रकार, ग्रंथकार इत्यादी संमेलनांत अध्यक्ष म्हणून केलेल्या व काही अपरिहार्य कारणांमुळे होऊ न शकलेल्या अशा विचारप्रवर्तक भाषणांचे तीन संग्रह प्रकाशित आहेत - ‘सहा भाषणे' (१९४१), ‘तीन संमेलने' (१९४७), ‘अभिषेक' (१९६१) याशिवाय सुमारे ४0 भाषणे असंग्रहित असल्याची नोंद ‘खांडेकर वाङ्मय सूची'त आहे. त्यानंतरच्या कालखंडातील महत्त्वपूर्ण भाषणे म्हणून उल्लेख करावा अशा भाषणांत ज्ञानपीठ पुरस्कार' (२६ फेब्रुवारी, १९७६), ललित पारितोषिक वितरण समारंभ' (१९६७), ‘साहित्य अकादमी महदत्तर सदस्यत्व प्रदान सोहळा' (१९७०), ‘डॉक्टर्स ऑफ लेटर्स' पदवी प्रदान सोहळा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (१९ मे, १९७६) यांचा उल्लेख करावा लागेल.
 वि. स. खांडेकर प्रभावी वक्ते होते. त्यांची भाषणे विचारगर्भ असत. त्यात श्रोत्यांशी संवाद साधण्याची विलक्षण शक्ती असायची. 'हे मी तुम्हाला सांगतो...' म्हणत ते आपले विचार श्रोत्यावर ठसवीत. काही बोलायचे म्हटले की, आधी उजव्या हाताने डावे मनगट चोळायचे. साधे पण कमी बोलायचे. भाषणे बहुधा आलंकारिक असत. जग,जीवन,संघर्ष, समाज, परिवर्तन, समता हे विषय भाषणात आपसूक असायचे. भाषणात कोट्या करायचे; पण स्वतः गंभीर असायचे. विषय कोणताही असला तरी त्याला समाजचिंतनाची डूब असायची.
पत्रलेखक
 ‘मनुष्य हा समाजशील प्राणी आहे', ही व्याख्या माणसाचे लक्षण अधोरेखित करीत असली तरी खरं तर समाजशीलता हे माणसाचं जीवनलक्ष्य असायला हवं, असं ती सूचित करते, असं मला वाटतं. ते वाटण्याला एक दृष्टान्त माझ्यासमोर आहे. तो वि. स. खांडेकरांचा मनुष्यसंग्रह व पत्रव्यवहाराचा. वि. स. खांडेकर लेखक म्हणून आपणापुढे येतात ते १९१९ पासून. त्यांचं लेखन प्रकाशित होऊ लागल्यापासून त्यांचा समाजसंपर्क वाढला. सन १९२० पासून वि.स.खांडेकरांनी लिहिलेली व त्यांना इतरेजनांनी लिहिलेली पत्रे आढळतात. ‘दीपगृह'मध्ये संग्रहित आहेत ती फक्त वि. स. खांडेकरांनी इतरेजनांना लिहिलेली; पण खांडेकरांना इतरेजनांनी लिहिलेली शेकडो पत्रे विविध ठिकाणी पत्रसंग्राहक, चित्रपट, दप्तर, नियतकालिक, वृत्तपत्रे कार्यालय, साहित्यिक, पुराभिलेख, जुनी वृत्तपत्रे, कौटुंबिक पत्रसंग्रह यांत आढळून येतात. त्यातूनही खांडेकरांचं 'माणूस' म्हणून विलोभनीय व्यक्तिमत्व पुढे येतं.
 पत्रसंवाद हा वि.स.खांडेकरांच्या जीवनशैलीचा एक अभिन्न भाग होता. रोज येणाऱ्या टपालाची ते वाट पाहत. पोस्टमनविषयी त्यांना आस्था होती, हे साहित्यातून लक्षात येतं. येणाऱ्या प्रत्येक पत्रास उत्तर पाठवायचा त्यांचा प्रघात होता. आलेल्या पत्रावर उत्तर पाठविल्याची नोंद करण्याची त्यांची सवय दिसते. उत्तरे पाठविलेल्या पत्राची प्रत वा मुद्दे ते जपून ठेवत. वाचकांना उत्तर देत तशी संपादक, प्रकाशकांनाही किंवा समकालीन साहित्यिकांशी त्यांची दीर्घकाळ पत्रोत्तरी चालायची. सगळ्यांशी त्यांचे सबंध लेखकापलीकडे जाऊन मनुष्यकेंद्री होत. वि.स.खांडेकरांनी इतरेजनांना लिहिलेली केवळ १४५ पत्रे ‘दीपगृहात आली असली तरी त्यांनी शेकडो पत्रे लिहिली होती व तेवढीच त्यांना आली असावीत, असं संशोधनातून लक्षात येते. वि.वि.पत्कींच्या हाती सन १९७६ ला सुमारे २००० पत्रे आली होती, यावरूनही हे स्पष्ट होते. खांडेकरांची पत्रे म्हणजे जिव्हाळ्याचा संवाद असायचा. पत्रातील प्रांजळपण लक्षणीय होतं. भाषा संवादी होती. संबोधन व स्वनिर्देशातून खांडेकर पत्रलेखकाविषयीचा आपला आदर, प्रेम, स्नेह, संबंध, नाते व्यक्त करीत. पत्रात कौटुंबिक उल्लेख खुशाली असायची. प्रकृतीची कुरकुर अधिकांश पत्रात आढळते. प्रारंभी पत्र स्वतः लिहीत नंतर लेखनिक आले. पण स्वाक्षरी करीत ते १९७३ पर्यंत, म्हणजे दृष्टी जाईपर्यंत.  आजवर वि. स. खांडेकर हे साहित्यिक म्हणून सर्वश्रुत आहेत; पण त्यांनी मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपट क्षेत्रांत पटकथा, संवाद, गीतलेखन करून जे भरीव असे योगदान दिले आहे, ते मराठी साहित्य अभ्यासकांनाही अपरिचित राहिले आहे. त्यांच्या पटकथा आजवर उपलब्ध नसणे, हे त्याचे प्रमुख कारण होते. त्या आता हाती आल्याने चंदेरी दुनियेतील खांडेकरांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेणे शक्य झाले आहे. सर्वस्वी अस्पर्शित या क्षेत्राच्या माहितीमुळे खांडेकराच्या जीवन व कार्याला समग्र रूप येईल, असे वाटल्यावरून ‘पटकथाकार खांडेकर' इथे उभे करण्याचा प्रयत्न आहे. ते वाचले की, आपल्या लक्षात येईल की, वि.स.खांडेकर हे मराठीतील मॅक्झिम गॉर्की होते. गॉर्कीप्रमाणे त्यांनी मानवी जीवनाचा सर्वांगी वेध घेण्याचा प्रयत्न केला होता.
पवित्र गुन्ह्याची कथा : 'छाया'
 चित्रपटसृष्टीत वि. स. खांडेकरांचं येणं अगदी अनपेक्षित असं होतं. ‘क्रिकेटच्या कसोटी सामन्यात अनपेक्षितपणे एखाद्या नवख्या खेळाडूची निवड व्हावी तसं. दिग्दर्शक मास्टर विनायक, अभिनेते बाबूराव पेंढारकर व कॅमेरामन पांडुरंग नाईक यांनी 'कोल्हापूर सिनेटोन' कंपनीस रामराम ठोकून हंस पिक्चर्स' नावाची स्वतंत्र कंपनी सन १९३६ च्या प्रारंभी काढली. ही मंडळी ध्येयवादी होती. मराठी चित्रपटसृष्टीस नवं वळण द्यावं, असा त्यांचा ध्यास होता. तो काळ पौराणिक चित्रपटांचा होता. नवशिक्षित, मध्यमवर्गीय प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून ध्येयधुंद, उदात्त असं काही करण्याचा या मंडळींचा ध्यास होता. लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे, साने गुरुजींची 'श्यामची आई', शरदचंद्र चतर्जीचे सारे साहित्य - विशेषतः 'देवदास', ‘श्रीकांत', 'चरित्रहीन'सारख्या कादंबऱ्या, वि.स.खांडेकर यांच्या उल्का', 'दोन ध्रुव'सारख्या रचना, आचार्य अत्रे यांची ‘साष्टांग नमस्कार’,‘भ्रमाचा भोपळा' सारखी गंभीर व सामाजिक समस्याप्रधान नाटके यांचा प्रभाव व संस्कार घेतलेली ही मंडळी. मास्टर विनायक तर पूर्वाश्रमीचे शिक्षकच. शिक्षणक्षेत्राचा निरोप घेऊन चित्रपटसृष्टीत जाताना आपल्या निरोपाच्या भाषणात मास्टर विनायक आपल्या विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले होते, ‘माझा शिक्षकाचा पेशा बदलला जाणार नाही. यापुढे काळ्या फळ्याची जागा रुपेरी पडदा घेईल. त्यामुळे काही नवं करण्याच्या उद्देशाने त्यांनी वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे यांच्याशी संपर्क साधला. हे दोन्ही लेखक असले तरी ते मुळात शिक्षकच होते. आचार्य अत्रे या वेळी ‘उद्याचा संसार' नाटक लिहिण्यात व्यग्र होते; त्यामुळे ‘हसं'नी वि. स. खांडेकरांशी त्यांचे सांगलीचे मामेभाऊ श्री. बाबूराव माईणकरांमार्फत संपर्क साधला. ही सप्टेंबर, १९३५ ची गोष्ट. निरोप पोहोचला तरी आपणास बोलपटाची कथा लिहिणे जमणार नाही, म्हणून वि. स. खांडेकरांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पुढे मास्टर विनायकांनी दि. १२ डिसेंबर, १९३५ रोजी पत्र लिहून खांडेकरांना गळ घातली. त्यात लिहिले होते, ‘आपणास कळले असेलच की, आम्ही कोल्हापूर सिनेटोन सोडली व मी व बाबूराव पेंढारकर दोघंही नवीन कंपनी काढणार आहोत. जवळजवळ नक्की झाले आहे माझी इच्छा - फार दिवसांपूर्वीची होती की, आपले कथानक screen वर यावे. याच दरम्यान बाबूराव पेंढारकरांनीही खांडेकरांनी लिहिले होते. उत्तरादाखल खांडेकरांनी ‘चांभाराचा देव' कथेवर आधारित 'अमृत' ही बोलपटयोग्य कथा सुचविली. ती खर्चिक होती. तिचे बाह्यचित्रण (Outdoor shooting) कोकणात करणे गरजेचे होते. कंपनी नवीन. एवढा भार सोसणं अशक्य होतं. मग बाबूरावांनी ३१ डिसेंबर, १९३५ रोजी उत्तरादाखल वि. स. खांडेकरांना लिहिलं होतं. त्यातून ‘हंस'त्रिमूर्तीची चित्रपट निर्मितीमागील भूमिका स्पष्ट होते.

मंगळवार पेठ,

कोल्हापूर

ता.३१-१२-३५

कृ. सा. न. वि. वि.  आपले ता. ३० चे पत्र वाचले. आपण लिहिता त्याप्रमाणे अस्पृश्यता, मद्यपान निषेध व आर्थिक विषमतेचे दुष्परिणाम या कथानकात दाखविता येतील व त्याबद्दल मी - विनायक आज रात्री विचार करून आपणास उद्या अगर परवा पत्राने कळवीत आहे. आज विनायकचे Songs of Life मधील एक गाणे retake करण्याकरिता त्याला कंपनीकडून बोलावणे आल्याने हे काम रात्रीवर ढकलणे भाग पडले.
 पण या दोन दिवसांत आपणास याहूनही अधिक मध्यमवर्गाचे जीवनभागावर ज्यात मुख्यः करुणरसाला भरपूर वाव मिळेल, असा कथाभाग सुचविता आल्यास बरे होईल. तेव्हा त्या बाबतीत प्रयत्न करावा, असे मला वाटते, क. हे. वि.

आ. बाबूराव

 ता. क. : थोडक्यात असे म्हणू इच्छितो की, पिक्चर पाहून प्रेक्षक डोळे पुशीत बाहेर पडले पाहिजेत व ती उदासीनता घरी जाईपर्यंत स्थिर राहिली पाहिजे.
 या पत्रावरून 'हंस'ची चित्रपटनिर्मितीमागील ध्येयवादी भूमिका पुरेशी लक्षात येते. हे पत्र नि मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर, प्रभृतींमधील चर्चेनुसार मग ‘उल्का’, ‘दोन ध्रुव', 'दोन मने'च्या मनोभूमिकेच्या ‘छाया बोलपटाची कथा तयार झाली. ही पहिली पटकथा व तिचे संवादलेखन वि. स. खांडेकरांनी मास्टर विनायक व र. शं. जुन्नरकर यांच्या मदतीने पूर्ण केले. जानेवारी, १९३६ च्या पहिल्या तीन आठवड्यांत हे लेखन डॉ. भडकमकर यांच्या पुण्यातील बंगल्याच्या तिस-या मजल्यावर करण्यात आले.४६
 'छाया'बोलपटाचा मुहूर्त ५ मार्च, १९३६ रोजी पुण्याच्या सरस्वती सिनेटोनमध्ये करण्यात आला. या प्रसंगी ज्ञानप्रकाश'चे संपादक काकासाहेब लिमये, आचार्य अत्रे, कवी गिरीश, राजकवी यशवंत, माधव ज्यूलियन, तळवलकर, प्रभृती साहित्यिक व पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.चिन्मुळगुंद सपत्निक उपस्थित होते. तीन महिन्यांत या बोलपटाचे चित्रीकरण पूर्ण करून तो २० जून, १९३६ रोजी मुंबईच्या मॅजिस्टिक सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. सुरुवातीच्या खेळात अन्य मान्यवरांबरोबर 'महाराष्ट्र शारदा'चे श्री. रा. टिकेकर उपस्थित होते. 'छाया' प्रदर्शित झाल्यावर बाबूराव पेंढारकरांनी खांडेकरांना दि. २५ जून, १९३६ रोजीच्या पत्रावर लिहिले होते की, ... सर्व वर्गाला स्टोरी, Treatment, acting and songs फारच आवडले. End खेरीज कसलाच दोष कोणीही काढीत नाही.' बद्दलसुद्धा वरच्या क्लासला हा End फारच आवडला. काही वर्गाला मात्र मुलाचे काय झाले ते थोडे दाखवावे असे वाटते. यामागे ‘छाया'च्या कथानकाचा संदर्भ आहे. 'छाया'ची कथा ही सामाजिक समस्येवर आधारित आहे. एकीकडे जिवाभावाची नाती जपण्याची अगतिकता, तर दुसरीकडे प्रामाणिकता, शूचिता यांचं बंधन. या द्वंद्वात माणुसकीपेक्षा पैसा श्रेष्ठ ठरतो. गरिबास जीव अस्तित्व टिकविण्यासाठी शरीरविक्रयाचं पाप करावं लागतं, ते पवित्र नातं जपण्यासाठी; म्हणून खांडेकरांच्या 'छाया' बोलपटाच्या इंग्रजी विवरण पुस्तिका, जाहिराती इत्यादींमध्ये 'छाया'चा अनुवाद 'Holy Crime' असा करण्यात आला होता नि त्याच्यावर मोठं वादळ झाले होते. विविध वृत्त'नी भलावण केली होती, तर ‘मालव साहित्य'नी खरपूस समाचार घेतला होता. चित्रपटसृष्टीत 'छाया' बोलपटाचं संमिश्र स्वागत झालं तरी लौकिक अर्थाने हा बोलपट यशस्वीच म्हणायला हवा. या बोलपटास चित्रपटसृष्टीतील पहिले पारितोषिक म्हणून गणले गेलेले ‘गोहर सुवर्णपदक' लाभले. ते कलकत्ता प्रेस असोसिएशनकडून देण्यात आले होते. उत्कृष्ट कथाकथनासाठी मिळालेले हे पारितोषिक गोहर या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्रीचे स्मरण म्हणून त्या वेळी बहाल करण्यात आले होते. ते कन्यारत्न जन्मल्यावर बाळलेण्यासाठी खांडेकरांना नाइलाजाने मोडावे लागले होते.
 ‘छाया' हा मराठीतील पहिला शोकात्म सामाजिक बोलपट. तो कृष्णधवल होता. तो हिंदीतही ध्वनिमुद्रित (Dub) करून प्रकाशित करण्यात आला होता. ‘छाया'च्या हिंदी रूपांतरणाचे काम पंडित इंद्र यांनी केले होते. यातील दोन गाणी बा.भ.बोरकरांची होती. “अंधेरी नगरी' या हिंदी बोलपटाचा यावर प्रभाव होता. वि. स. खांडेकर यांनी आपल्या या कथेतून भावना व विचारांचे द्वंद्व, छाया व प्रकाश जोडीद्वारे व्यक्त केले होते. एका अर्थाने हा मेलोड्रामा होता. या चित्रपटाने 'हंस'च्या निर्मात्यांना मोठी उमेद दिली. स्वतः खांडेकर हा चित्रपट पाहून खुश झाले होते. या चित्रपटाच्या यशात वि. स. खांडेकरांच्या कथेचा जितका वाटा होता, तितकाच मास्टर विनायकांच्या दिग्दर्शनाचा होता. ‘विनायकांची वृत्ती व खांडेकरांची प्रकृती या दोहोंचा मेळ चांगला बसण्यासारखा होता. मास्टर विनायकांचे वि. स. खांडेकर हे श्रद्धास्थान होते; त्यामुळे त्यांच्या चित्रपटात मास्टर विनायकांची कला ऐन बहरात येत असे, याचे सुंदर प्रत्यंतर ‘छाया' पाहताना प्रेक्षकांना आले. ‘प्रेमिकांची जलाशयात मिसळणारी प्रतिबिंबे, दुःखदायक घटनेचे वृत्त देणारे वृत्तपत्र, कागदाचे बाहेर फेकलेले चिठोरे, वाऱ्याच्या झोताने पुन्हा खोलीतच पसरून जाण्यातील सूचकता, बदाम राणीवर किलवर गुलाम फेकून निर्माण केलेला छायाच्या जीवनातील विसंवादी सूर, शीलभ्रष्ट झालेल्या प्रसंगाची तीव्रता दाखविण्यासाठी मुसळधार पावसात दाखविलेला विजांचा कडकडाट या सर्व नव्या नाण्यांची (प्रतीकांची) टांकसाळ प्रथम विनायकांनी उघडली असं म्हटलं गेलं, ते खरं आहे. या साऱ्या दृश्यांत कल्पना विनायकांची असली तरी ती साकारली मात्र पांडूरंग नाईक यांच्या द्रष्ट्या कॅमेऱ्यामुळे, हे विसरून चालणार नाही.
पाकळ्या या गळाल्या पाहुनि ‘ज्वाला'
 ‘छाया'नंतर वि. स. खांडेकरांचा दुसरा बोलपट होता ‘ज्वाला'. तोही मराठीबरोबर हिंदीत ध्वनिमुद्रित करण्यात आला होता. चंद्रमोहन' या गाजलेल्या हिंदी अभिनेत्यासाठी ज्वाला'ची कथा लिहिली गेली. 'ज्वाला'चे कथानक शेक्सपिअरच्या 'मॅकबेथ' नाटकावर आधारित होते. चंद्रमोहन हिंदीभाषी होते. त्यांच्या सदोष उच्चारांमुळे तो मराठी प्रेक्षकांची पकड घेऊ शकला नाही. खांडेकरांच्या मूळ कथेत व्यावसायिक तडजोडीतून अनेक बदल करण्यात आले. या कथेच्या यशापयशाबद्दल बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक व वि. स. खांडेकरांनी लिहिलं आहे. मोठ्या खर्चाचा (Big Budget) अपयशी चित्रपट असं याचं वर्णन करता येईल. ज्वाले'मध्ये 'हंस'चे पंख होरपळले, अशी खोचक प्रतिक्रिया आचार्य अत्रे यांनी त्या वेळी दिली होती. या चित्रपटनिर्मितीस कोल्हापूर संस्थानाने माणसे, साहित्य, रिसाला (घोडदळ), आदी देऊन मोठं साहाय्य केलं होतं. चित्रपटासाठी भव्य सेटची निर्मिती करण्यात आली होती. मराठी चित्रपटसृष्टीत काही भव्य-दिव्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेने मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांनी मोठे कष्ट घेतले; पण परस्पर समन्वय नसल्याने त्यात अपयश आले. ‘ज्वालापूर्वी मराठी चित्रपटांची श्रेयनामावली (Titles) इंग्रजीत असायची. या चित्रपटाने मराठी श्रेयनामावलीची प्रथा सुरू केली. ही सूचना स्वातंत्र्यवीर सावरकरांची. 'हंस' भेटीत त्यांनी ती व्यक्त केली होती. स्वतंत्र संगीत दिग्दर्शक (Arranger) मुक्रर करण्याची परंपराही याच चित्रपटाने सुरू केली. १६० मिनिटांचा हा कृष्णधवल बोलपट. यामध्ये खांडेकरांनी मेलोड्रामाऐवजी 'फैंटसी'चा प्रयोग करून कथानकात रंगत आणली होती; पण सदोष निर्मितीमुळे बोलपट पकड घेऊ शकला नाही. हा एक विचारप्रधान बोलपट होता.
 वि. स. खांडेकरांनी ‘ज्वाला'च्या कथेद्वारे माणसाने षड्रिपूमुक्त असण्याच्या आवश्यकतेवर भर दिला होता. पाकळ्या या गळाल्या पाहुनि ज्वाला' हे मंगलची भूमिका निभावणाऱ्या रत्नप्रभेने गायलेले गीत त्या वेळी गाजले होते. हा काळ गायकीचा होता. अभिनेत्रीची निवड सौंदर्याबरोबर गळ्याच्या आधारावर व्हायची. पार्श्व आवाजाची (Play Back) परंपरा त्या वेळी नव्हती. तत्पूर्वी ‘धर्मवीर'मधील रत्नप्रभाची गाणी गाजल्याने तिची योजना ‘ज्वाला'मध्ये मुद्दाम करण्यात आली होती. १ एप्रिल, १९३८ रोजी हा बोलपट मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये मोठ्या दिमाखाने प्रदर्शित करण्यात आला होता. भव्यता व कलात्मकता यांचा सुंदर मिलाफ झालेला हा चित्रपट. या चित्रपटाची जाहिरात म्हणजे शब्दांची मनोरम आतषबाजी. हंसचे कलासामर्थ्य, खांडेकरांचा प्रतिभाविलास, विनायकांचे दिग्दर्शनपटुत्व,चंद्रमोहनची अभिनयपराकाष्ठा, रत्नप्रभेचे गानमाधुर्य, पांडुरंग नाईक यांचे प्रतिभानैपुण्य या सर्वांचा देदीप्यमान विलास म्हणजे हंस चित्र ‘ज्वाला'. अशी आकर्षक जाहिरात त्यावेळी केली जायची. अशा जाहिरातीचे अनेक नमुने मिळतात. १ एप्रिल, १९३८ रोजी सुरू झालेल्या चित्रपटाने निर्मात्यांना ‘एप्रिल फूल' केले खरे‌. ‘अंगार'च्या रूपाने खांडेकरांनी या कथेत महत्त्वाकांक्षी शूराचे, सेनापतीचे चरित्र रेखाटले आहे. महत्त्वाकांक्षेची ज्वाला माणसाला आंधळी बनविते, त्याचे अधःपतन सुरू होते व त्या ज्वालेतच त्याची शोकांतिका होते, असे चित्रण करणारा हा बोलपट.
दुःख सोसणाऱ्या चरित्रांची मालिका : देवता
 ज्वाला'मुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व प्रेक्षकांचा रुचिपालट करण्याच्या इराद्याने 'हंस'ने आचार्य अत्रे यांच्या कथेवर आधारित ‘ब्रह्मचारी' व 'ब्रांडीची बाटली' हे बोलपट काढले. त्यानंतर हंस पिक्चर्सनी वि. स. खांडेकरांची कादंबरी ‘रिकामा देव्हारा'वर आधारित 'देवता'(१९३९) हा बोलपट प्रदर्शित केला. फेब्रुवारी १९३९ मध्ये मुंबईच्या 'वेस्ट एण्ड' सिनेमात प्रदर्शित या बोलपटाचे वैशिष्ट्य म्हणजे बोलपटावर आधारित कादंबरी ‘रिकामा देव्हारा' एक रुपयास तिकीटघरात विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली होती. या चित्रपटाच्या जाहिरातीची जबाबदारी शामराव ओक यांच्यावर सोपविण्यात आली होती. बाबूराव पेंढारकरांनी मराठी चित्रपटात आजवर केलेल्या सर्व भूमिका खलनायकाच्या होत्या. ‘देवता'मध्ये बाबूराव पेंढारकरांना प्रथमच नायकाची भूमिका मिळाली होती. ती त्यांच्या इच्छेचा आदर म्हणून देण्यात आली होती. हे लक्षात घेऊन 'देवता'च्या जाहिरातीत लिहिले जायचे, ‘पडद्यावरील बदमाश सुधारला!' या चित्रपटाचे गीतलेखन ग. दि. माडगूळकरांनी केले होते. मराठी अभिनेत्री व गायिका इंदिरा वाडकर यांचा हा गाजलेला बोलपट. १४८ मिनिटांचा हा बोलपट कृष्णधवल होता. वि. स. खांडेकरांनी आपल्या साहित्यात कला व जीवनाच्या श्रेष्ठत्वाबद्दल एक विशिष्ट भूमिका घेऊन - ‘जीवनासाठी कला'चे लेखन केले. 'देवता'चे कथानक याच पठडीतले. वि. स. खांडेकरांचे चित्रपट म्हणजे दुःख सोसणाऱ्या चरित्रांची मालिकाच. 'देवता'मध्येही याचा प्रत्यय येतो. 'देवता'चं कथानक तसं विचारप्रधान. कौटुंबिक चित्र म्हणून ते गाजलं. 'देवता'चं कथानक हे अनेक नाट्यपूर्ण घटनांची शृंखला आहे. या नायिकाप्रधान बोलपटात ‘सुशीला' एक आदर्श स्त्रीचरित्र म्हणून खांडेकरांनी चित्रित केली आहे. स्त्रीला समाज मारून मुटकून देवता कसा बनवतो, याचं हृदयद्रावक चित्रण या चित्रपटात करण्यात आलं होतं. त्या वेळी हा चित्रपट स्त्री-प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरला होता. यातील गाणी अधिक लालित्यपूर्ण झाल्याने त्या वेळी ती घरोघरी गुणगुणली जात होती.
 या चित्रपटात मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकरांच्या अभिनयाची जुगलबंदी संस्मरणीय ठरली. दिग्दर्शक मास्टर विनायकांनी ‘छाया'प्रमाणे येथेही आपले कौशल्य पणाला लावले. चित्रपटातील अभिनयाबद्दल मूल्यांकन करताना म्हटलं गेलं, “छाया' चित्रपटातील विदारक कारुण्य जितक्या प्रभावीपणे विनायकाने चित्रित केले तितक्याच तन्मयतेने त्याने 'देवता' चित्रित केले. लेखकाला अभिप्रेत असणारे प्रसंग त्याने अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपुढे ठेवले. समाजातील अन्यायाला वाचा फोडणारा, जीवनमूल्ये जिवापाड जपणारा आणि क्वचित आपल्या प्रेयसीशी एकांतात रमणारा नायक विनायकांनी बाबूरावांकरवी उभा केला. या चित्रपटात विनायकाने अगदी छोटी; परंतु अद्वितीय भूमिका केली ती कॉलेजच्या प्राचार्यांची! 'देवता' चित्रपटातील त्या एकाच लहानशा दृश्यात शिस्तप्रिय प्राचार्यांचे सर्व बारकावे त्याने असे रूपास आणले की, विनायकाच्या उत्कृष्ट भूमिकेत या छोट्या भूमिकेची गणना होऊ लागली."
 'देवता'च्या यशस्वी वाटचालीनंतर ‘मंदिर' नावाने हा बोलपट हिंदीत सन १९४७ साली चित्रित करण्यात आला. डब न करता याची स्वतंत्र निर्मिती करण्यात आली. मुळात ‘सूना मंदिर' नावाने हा चित्रपट काढायचे ठरले होते; पण नंतर सुलभतेसाठी त्याचे नामकरण फक्त ‘मंदिर' करण्यात आले. १६ जानेवारी, १९४७ रोजी मुंबईच्या राजकमल स्टुडिओत याचा मुहूर्त झाला. पुढे नव्याने झालेल्या ईस्टर्न स्टुडिओत ‘मंदिर'चे सारे चित्रीकरण झाले. शांता आपटे व शाहू मोडक यांची भूमिकेसाठी खास निवड करण्यात आली होती.
‘रम्य ते बघुनिया वेड लागे'असा :‘सुखाचा शोध'
 आनंद हा परोपकारी व निःस्वार्थी तरुण. घरासाठी झटणारा तसेच इतरांना हात देणारा.या भावनेने एका विधवेस तो आधार देऊन घरी आणतो. विवाह झाल्यावर त्याची पत्नी माणिकबद्दल मोहभंग तो पचवू शकत नाही. परिणामस्वरूप नटीच्या जाळ्यात अडकतो. पुढे मद्यपी बनतो; पण सुखी काही होत नाही. शेवटी विधवा उषेस स्वीकारतो व सुखी होतो. असं कथानक घेऊन येणारा ‘सुखाचा शोध' बोलपट खांडेकरीय परंपरा जपणारा, आदर्शवादी, विचारप्रधानही आहे. तो सप्टेंबर, १९३९ मध्ये पुण्याच्या मिनर्व्हा'मध्ये प्रदर्शित झाला. पुढे या बोलपटाधारित ‘सुखाचा शोध' कादंबरी नोव्हेंबर, १९३९ च्या मध्यास प्रकाशित झाली. तिच्या पहिल्या आवृत्तीत चित्रपटातील काही दृश्यांची छायाचित्रेही अंतर्भूत करण्यात आली होती. या बोलपटाचे प्रेक्षकांनी चांगले स्वागत केले. ‘सुखाचा शोध' पटाचे समीक्षण करताना तारानाथनी प्रेक्षकांच्या चित्रपट पाहतानाच्या होणाऱ्या मनःस्थितीचे काव्यात्मक वर्णन करीत म्हटले होते, जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे' अशी प्रेक्षकांची स्थिती होऊन जाते. तर वि.स.खांडेकरांच्या कथाकाराचं या चित्रपटात पणाला लागलेलं कौशल्य लक्षात घेऊन श्यामराव ओकांनी खांडेकरांना ‘महाराष्ट्राचे मॅक्झिमम (मॅक्झिम) गॉर्की संबोधलं होतं. चित्रपटात संकलनाचा अभाव खटकतो. त्यापेक्षा कादंबरी सरस आहे, अशी त्या वेळच्या वाचक, प्रेक्षकांची प्रतिक्रिया होती. या काळात 'प्रभात'सारख्या कंपन्यांचे 'माणूस','माझा मुलगा यांसारखे बोलपट बाहेर पडत होते; पण खांडेकरांच्या पटकथांचे चांगले स्वागत व्हायचे. सुखाचा शोध'मधील माणिक शिक्षित, अहंकारी तर उत्तरार्धात नायिका उषा सुसंस्कृत देवता. खांडेकरांची प्रत्येक पटकथा म्हणजे निषेध आणि विवेकाचा चारित्रिक संघर्ष असतो. तत्कालीन एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये घरच्या कर्त्या पुरुषाच्या कुतरओढीचे मार्मिक चित्रण खांडेकरांनी या कथेत केले आहे. 'सुखाचा शोध' चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित करण्यात आला होता. हिंदीत तो ‘मेरा हक' शीर्षकाने प्रदर्शित करण्यात आला होता. हिंदी प्रेक्षकांनी या कथेचं मराठीप्रमाणेच स्वागत केलं. पूर्वार्ध आणि उत्तरार्धात स्वतंत्र नायिकेच्या या चित्रपटाच्या कथानकात केलेल्या प्रयोगाने चित्रपटसृष्टीत बहुनायक, नायिकांची प्रथा सुरू झाली. तिचे अनुकरण आज हिंदी चित्रपटात दिसते.
मराठी चित्रपटाचे 'नवयुग'  सन १९४० उजाडता-उजाडता 'हंस'ची आर्थिक स्थिती मोठी हलाखीची झाली होती, हे मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर व वि. स. खांडेकरांच्या दरम्यान झालेल्या पत्रव्यवहारावरून पुरेसं स्पष्ट होते. म्हणून मग सहकारी तत्त्वावर फिल्म कंपनी काढायची टूम निघाली आणि त्याचं नेतृत्व आचार्य अत्र्यांकडे गेलं. १ फेब्रुवारी, १९४० रोजी 'नवयुग चित्र'ची स्थापना करण्यात आली. 'हंस'ने आजवर खांडेकरांच्या ज्या कथांवर चित्रपट काढले, त्यांचे स्वतःचं असं एक आगळे वैशिष्ट्य होतं. सिनेसमीक्षक मो. बा. केळकरांच्याच शब्दांत सांगायचे, तर ‘खांडेकरांची कथानके भावनाप्रधान, ध्येयवादी, ‘जीवनासाठी कला' या संप्रदायाशी निगडित झालेली, कल्पनाविलासाने आणि शाब्दिक सौंदर्याने नटलेली असत. 'नवयुग चित्र'च्या स्थापनेनंतर स्वतःची नवी ओळख करून देण्याच्या उद्देशाने मनोरंजनपर चित्रपटाचे धोरण ‘नवयुग चित्र'ने स्वीकारले. यापूर्वी ‘पहिला पाळणा'सारखा विनोदी चित्रपट ब-यापैकी चालला होता. प्रेक्षकांची अभिरुची बदलत निघाली होती. हलकंफुलकं दिलं, तर युद्धग्रस्त वातावरणात लोकांना भावेल म्हणून विनोदी चित्रपट काढायचं ठरलं. यामागे अत्र्यांच्या ‘ब्रह्मचारी' (१९३८) व ब्रान्डीची बाटली' (१९३९) या यशस्वी, विनोदी पटांची प्रेरणा व अनुभव होता. या काळात आचार्य अत्रे यांच्याप्रमाणे चिं. वि. जोशी हे विनोदी लेखक म्हणून सर्वपरिचित झाले होते. विशेषतः त्यांच्या 'चिमणरावाचे चऱ्हाट' कथासंग्रहानं मराठी वाचकांवर मोहिनी घातली होती. त्यातील कथा घेऊन वि. स. खांडेकरांनी मराठी पटकथा व संवाद तयार करावे असे ठरले. वि. स. खांडेकरांनी ‘चिमणरावांचं चऱ्हाट'मधील 'लग्नसराई' व 'बोळवण' या दोन कथांवर आधारित 'लग्न पाहावे करून' ही पटकथा लिहिली.
 मराठी लॉरेल-हार्डी चिमणराव -गुंड्याभाऊंचा 'लग्न पाहावं करून' ‘नवयुग चित्र'या महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी तत्त्वावर चित्रपट कंपनीतर्फे पहिला चित्रपट म्हणून वि. स. खांडेकरांनी चिं. वि. जोशी यांच्या उपरोक्त कथांवर आधारित लिहिलेल्या 'लग्न पाहावे करून' या पटकथेची निवड करण्यात आली. ऑगस्ट १९४० च्या दुस-या आठवड्यात ‘लग्न पाहावे करून'चा मुहूर्त करण्यात आला. चिमणरावाच्या भूमिकेसाठी दामूअण्णा मालवणकर, तर गुंड्याभाऊंसाठी विष्णुपंत जोग यांची निवड करण्यात आली. लॉरेल-हार्डीसारखी ही जोडी प्रेक्षकांच्या मनात उतरविण्यात विनायक यशस्वी झाले. खांडेकरांनी तयार केलेलं कथानक, संवाद व गीते प्रभावी झाली. मराठी चित्रपट व साहित्यात चिमणराव, गुंड्याभाऊ अमर करण्यात या चित्रपटाचा मोठा वाटा आहे. त्या काळात पटकथा लेखकास फार अल्प मानधन दिले जाई. चिं. वि. जोशी यांना 'नवयुग चित्र'ने उपरोक्त गोष्टींसाठी अवघे पाचशे रुपये दिल्याचे चि. वि. जोशी व वि. स. खांडेकरांमधील पत्रव्यवहारातून स्पष्ट होते. याबद्दल दोघेही नाराज होते. वि. स. खांडेकरांनी चिं. वि. जोशी यांना २६ जून, १९४१ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, 'चित्रपट मंडळ्या व लेखक यांच्या व्यावहारिक संबंधात सुधारणा होणे जरूर आहे. ती सुधारणा आम्ही लेखकांनीच आपले महत्त्व पटवून देऊन हळूहळू घडवून आणली पाहिजे.  ‘लग्न पाहावे करून'सारख्या विनोदी पटांनी एक क्रांती केली. चित्रपटात आजवर सहायक भूमिका करणारे चित्रपटांचे नायक झाले. दामूअण्णा मालवणकर, विष्णुपंत जोग यांच्या भूमिका या संदर्भात अविस्मरणीय ठरल्या. वि. स. खांडेकर विनोदीही लिहू शकतात, यावर प्रेक्षकांचा विश्वास बसत नव्हता, हेच त्यांच्या लेखणीचे यश होते. फार कमी लोकांना या गोष्टीची कल्पना असावी की, त्याचं प्रारंभिक लेखन विनोदी व कोटीबाज शैलीचं होतं. चिं. वि. जोशींच्या कथेवर आधारित हा पहिला बोलपट. या बोलपटात फोटो दाखवून लग्न ठरविण्याच्या तत्कालीन पद्धतीचं विडंबन सादर करण्यात आलं होतं. उपहासात्मक कथालेखनाचा हा आविष्कार वि. स. खांडेकरांच्या लेखनशक्तीचा विस्मयकारी प्रत्यय देऊन जातो. ‘लग्न पाहावे करून'ची कथा सुखान्त. या हास्यरसपूर्ण पटाने मनोरंजनाची एक आगळी वाट मराठी चित्रपटात रूढ केली आणि रुजविलीही! १५० मिनिटांचा हा कृष्ण-धवल पट; त्या काळी एक यशस्वी चित्रपट म्हणून गणला गेला होता. असं असलं तरी काही चित्रपट समीक्षकांनी लग्न पाहावं करून'मधील दिग्दर्शन व अतिरिक्त (अतिरेकी) अभिनयाबद्दल त्या वेळी नाराजीही व्यक्त केली होती; पण हा दोष पटकथांचा नसून बॉक्स ऑफिसकडे डोळा ठेवून चित्रपटनिर्मितीची तत्कालीन अगतिकता त्यास कारणीभूत होती, हे आपणांस विसरून चालणार नाही. त्या काळी विश्राम बेडेकरांनी दिग्दर्शित केलेला विदूषक'सारखा दर्जेदार पटही समीक्षकांपुढे होता.

झाली ज्याची उपवर भगिनी
कन्या अथवा भाचि, मेहुणी
लग्न जमविण्या खटपट करणे
त्यास वाटते नको ते जिणे।।

म्हणून करण्यात आलेल्या 'लग्न पाहावं करून'च्या काव्यात्मक जाहिरातीने चित्रपट कथेचा उद्देश प्रेक्षकांसमोर ठेवून प्रथमदर्शनीच त्या वेळी ठाव घेतला होता आणि आपल्याकडे आकर्षित करायची किमयाही करून दाखविली होती. कोकणप्रेमाचे अपत्य 'अमृत'
 'हंस'ची स्थापना करून वि.स.खांडेकरांच्या कथेवर बोलपट काढायचा ठरल्यानंतर खांडेकरांनी सुचविलेली तशी ही पहिली कथा; परंतु त्या वेळी कोकणच्या पाश्र्वभूमीवर चित्रित या कथेच्या बाह्यचित्रणास मोठा खर्च यायचा, म्हणून ती मागे पडली होती, हे मागे स्पष्ट केले आहेच. लग्न पाहावं करून'च्या यशानं ही कथा पेलण्याचे सामर्थ्य मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांना दिले. लपंडाव' व 'लग्न पाहावं करून'च्या निर्मितीनंतर आचार्य अत्रे 'नवयुग'मधून बाहेर पडले. मग उभयतांनी स्वास्थ्याने 'अमृत'ची निर्मिती केली.
 वि. स. खांडेकरांच्या मूळ संकल्पित (अप्रकाशितही) चांभाराचा देव' कथेवर, कादंबरीवर आधारित 'अमृत'चे कथानक आहे. बाप्पा कोकणातील सावकार, स्वभावानं तसा खाष्ट. गरिबांची पिळवणूक करून तो श्रीमंत होतो. त्याचा एकुलता एक मुलगा विलास विनासायास आलेल्या संपत्तीमुळे व्यसनाधीन होतो. गावातील कृष्णा चांभाराच्या पत्नीवर त्याचा डोळा असतो. एका गोळीबारात कृष्णाची मुलगी जाईचा मृत्यू होतो. बाप्पा कृष्णावर आळ घेतो. कृष्णाची तुरुंगात रवानगी होते. पत्नी सीता सुडाने पेटते. तिच्या नादी लागलेल्या विलासचं बिंग फुटते. बाप्पाला आपण माडाच्या अमृताचे विष (माडी) केल्याचा पश्चात्ताप होतो. तो माडीचा व्यवसाय बंद करून व्यसनी गावास वरदान देतो - अशी ‘अमृत'ची सुखान्त कथा. हे कथाबीज अस्पृश्यतोद्धार, दारूबंदी इत्यादी तत्कालीन प्रबोधनपर प्रश्नांवर आधारित आहे. या कथेचा लोकशिक्षणाचा उद्देश स्पष्ट दिसून येतो. आदर्शवाद, समाजवाद ही या पटकथेची वैचारिक बैठक म्हणून सांगता येईल. या बोधप्रद कथेचे संवाद प्रभावी आहेत. १५३ मिनिटांचा हा कृष्णधवल बोलपट हिंदीतही चित्रित करण्यात आला होता. मराठीपेक्षा हिंदीत तो अधिक चालला. २४ मे,१९४१ रोजी त्याचा पहिला खेळ मुंबईच्या न्यू वेस्टएंड सिनेमात झाला होता. कर्फ्यूमुळे मुंबईत त्याचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले होते. कोकणातील जातिभेदांवर बेतलेल्या या कथेचे चित्रीकरण वालावल, धामापूर, मालवण येथे करण्यात आले होते. मास्टर विनायक, बा. भ. बोरकर, प्रभृतींनी लोकेशनची निवड केली होती. 'अमृत'मधील ‘गमे सखी अंध मला हा शृंग' हे युगुलगीत धामापूरच्या तळ्याकाठच्या खडकावर चित्रित करण्यात आले होते. नटवर्य गोपीनाथ सावकर यांनी 'अमृत'साठी कोकणी लोकगीत लिहिले होते. बा. भ. बोरकरांनी त्यासाठी गोव्याहून खास लोकवाद्ये आणली होती. या नि अशा अनेक प्रयत्नांमुळे 'अमृत' ही खांडेकरांची श्रेष्ठ पटकथा म्हणून प्रसिद्ध पावली. या कथेची सारी पार्श्वभूमी ग्रामीण होती. मराठी ग्रामीण चित्रपट विकासाच्या प्रारंभिक पाऊलखुणा उठविण्याचे श्रेय वि. स. खांडेकरांच्या या कथेस दिलं जातं. 'अमृत' कथेतील नाट्यमयता लक्षात घेऊन बालमोहन नाटक मंडळींनी खांडेकरांकडे ‘अमृत'च्या कथेच्या आधारे नाटक लिहिण्याचा प्रस्ताव ठेवला होता; पण तो काही फळास आला नाही.
 ‘कोकण आणि दारिद्र्य यांची अभेद्य सांगड या चित्रानं आकाराला आलेली दिसते... यात विनायकांनी आपल्या दिग्दर्शनातील सर्व कसब पणास लावलेले दिसते. खांडेकरांनी 'नव्या युगाची नव्या जगाची नौबत वाजे रे' सारख्या समूहगीताची योजना कथेच्या शेवटी करून ‘अमृत' हा बोधपट असल्याच्या धारणेवर एका अर्थाने शिक्कामोर्तबच केले होते. या चित्रपटातील बाबूराव पेंढारकरांनी रंगविलेली कृष्णा चांभाराची भूमिका प्रभावी होती. ललिता पवारनी साकारलेली सीता, साळवींचा बाप्पा या भूमिकाही अशाच. दृश्य चित्रणातील कलात्मकतेमुळेही त्या काळी ‘अमृत'चा मोठा गाजावाजा झाला होता. कोकण नि विशेषतः शिरोडा हा खांडेकरांचा नर्मबिंदू, त्याचं कारण तिथलं अज्ञान आणि दारिद्र्य. कोकणचं हे वास्तव खांडेकरांच्या डोक्यात सतत थैमान घालत राहिले. या मंथनातून निर्माण झालेलं कथारत्न म्हणजे 'अमृत'. गरिबी-श्रीमंतीचा 'संगम' ‘रक्तापेक्षा मायेचे नाते मोठे', 'विषमता हे देव नसण्याचे लक्षण', ‘गरिबांच्या सेवेसाठी खेड्यात चला', इत्यादी सुभाषिते घेऊन सत्पक्षाचे समर्थन करणारी सोज्ज्वळ कथा असं 'संगम' पटकथेचं वर्णन करता येईल.
 आजवरच्या खांडेकरांच्या कथांच्या तुलनेत ‘संगम'ची कथा काहीशी दीर्घ, गुंतागुंतीची व अनेक उपकथांचा संगम साधणारी. ‘सब मर्ज की एक दवा न्यायाने खांडेकरांनी 'संगम' कथेद्वारे अनेक प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेमकथा, संघर्षकथा, अशा अनेकांगांनी विकसित होणारी ‘संगम' ही आदर्शवादी कथा. गरिबी आणि श्रीमंतीच्या संगमानेच समाजवाद अवतरेल, असा आशावाद ही कथा प्रेक्षकांच्या मनात रुजवते. 'अमृत' कथेप्रमाणे इथंही ग्रामीण पार्श्वभूमी आहे; पण जोडीला शहरही. कथा,पात्र,विचार,प्रदेश सर्वांचा संगम साधणारी ही कथा खांडेकरांच्या समन्वयवादी वृत्तीचा ठळक पुरावा म्हणून आपल्यासमोर येते.
 ‘अमृत'प्रमाणेच 'संगम' मराठीबरोबर हिंदीतही रूपांतरित (Dub) करण्यात आली होती. आजवरचे खांडेकरांचे सारे मराठी पट पंडित इंद्र यांनी रूपांतरित केले होते. मात्र ‘संगम'ची पटकथा व गीते हिंदीतील प्रख्यात कथा-कादंबरीकार अमृतलाल नागर यांनी रूपांतरित केली होती. त्यासाठी अमृतलाल नागर काहीकाळ कोल्हापुरी येऊन राहिल्याची आठवण त्यांनीच मला सन १९७८-७९ च्या माझ्या लखनौ मुक्कामात सांगितली होती. त्यांना मराठीची जाण होती. ते मुंबईतही राहिले होते. कोल्हापूरवर आधारित त्यांच्या काही हिंदी कथाही आहेत.
 ‘संगम'मध्ये कविवर्य भा.रा.तांबेंचं एक गीत ‘ते दुध तुझ्या या घरातले' घेण्यात आले होते. 'संगम'ची कथा म्हणजे झरा(निसर्ग) नि झोपडी (समाज)चा सुंदर मिलाफच होता, हे या गीतयोजनेनं स्पष्ट होतं. पात्र, प्रसंगांची रेलचेल असलेलं कथानक खांडेकरांनी विलक्षण कौशल्यानं गुंफलं होतं. कुंदा, काकी, इनामदार, मुकुंद,गार्ड, मावशी, कुंदाची आई, मोलकरीण, शेतकरी, भैयासाहेब, शांता, पुंडोपंत, मंजू, बाबूराव,पोलीस, काका इतक्या मोठ्या संख्येनं पात्रं पेलणारी ही खांडेकरांची पहिली कथा. ‘संगम'च्या निमित्ताने आळेकरांनंतर पहिले दिग्दर्शक म्हणून र.शं.जुन्नरकर खांडेकर यांच्या कथेस लाभले. पांडुरंग नाईकांच्या सातत्यानंतर पहिल्यांदाच खांडेकरांच्या कथेस अण्णासाहेब गुणेंसारखा नाईकांइतकाच गुणी, तोलामोलाचा छायाचित्रकार लाभला. सुंदराबाईंसारख्या गाजलेल्या (चार्ली चॅपलिनची प्रशंसा मिळविलेल्या) अभिनेत्रीची यातील मावशीची भूमिका सर्वांना भावली होती. मीनाक्षी व विनायकच्या जोडीनं गरिबी-श्रीमंतीचा समाजवादी संगम साकारला होता.
चंदनवाडचे सरंजामी सरकारी पाहुणे
 ‘अमृत' आणि 'संगम' या सामाजिक कथांच्या निर्मितीनंतर 'नवयुग चित्र'ने एकदा विनोदी चित्रपट काढण्याचं ठरवलं. लग्न पाहावं करून'चं यशही यामागे होतं. मग वि. स. खांडेकरांनी चिं.वि. जोशींच्या 'चिमणरावाचं चऱ्हाट'मधील ‘रावसाहेब चिमणराव - स्टेट गेस्ट' या कथेवर आधारित पटकथा तयार करून सरकारी पाहृणे' नावाने ती सादर केली. ‘चिमणराव'मधील । अन्य दोन कथांचाही या पटकथेस आधार आहे; कारण चिं. वि. जोशींना प्रत्येक कथेस रु. २५०/- प्रमाणे रु. ७५०/- मानधन व १०० फ्री पास देऊन करार केल्याची नोंद पत्रव्यवहारात सापडते. मास्टर विनायकांच्या दिग्दर्शनाखालीच खांडेकरांची ही पटकथा घेण्यात आली तरी निर्मितीची ही टीम नवी होती. गीतकार म्हणून राजकवी यशवंत, चित्रीकरण वासुदेव कर्नाटकींचं तर संगीत दत्ता डावजेकरांचं. अशा नव्या बाजात भूमिकांचा साज मात्र जुन्या जोडगोळीकडेच होता - दामूअण्णा मालवणकर नि विष्णुपंत जोग.
 दिनांक ८ जानेवारी, १९४२ रोजी ‘सरकारी पाहुणे'चा मुहूर्त करण्यात आला. ‘सरकारी पाहुणे'चा पहिला खेळ ११ जून,१९४२ रोजी झाला. ‘लग्न पाहावं करून'पेक्षा वरचढ ठरलेल्या या पटकथेत खांडेकरांनी संस्थानिकांची दिवाळखोरी, खोटा बडेजाव इत्यादींचं उपहासात्मक चित्रण केलेय. आचार्य अत्र्यांच्या मदतीशिवाय साकारलेला हा बोलपट ‘नवयुग'साठी एक आव्हान होते. ते मास्टर विनायक व पेंढारकरांनी यशस्वीपणे पेलून दाखविले. काळाचे प्रभावी चित्रण करणारी पटकथा म्हणून खांडेकरांच्या या पटकथेकडे पाहिलं जातं. या पटकथा लेखनास अच्युतराव रानडे यांनी खांडेकरांना साहाय्य केल्याच्या नोंदी पत्रव्यवहारात आहेत. सरकारी पाहुणे' या कथेद्वारे वि. स. खांडेकरांनी महायुद्धपूर्व सरंजामी, दरबारी वातावरण व व्यवहारांचे जिवंत चित्रण केले आहे. १६४ मिनिटांच्या या कृष्ण-धवल हास्यपटात मास्टर विनायक हे प्रथमच निर्माते म्हणून आपणासमोर येतात. आजवर प्रेमगीते सादर करणाच्या जोगांनी शास्त्रीय संगीत असलेला तराणा यशस्वी रीतीने पेश केला तो याच बोलपटात. हास्य (Humour) आणि उपहास (Satire) यांचा सुंदर संगम म्हणून खांडेकरांच्या या पटकथेचे 'न भूतो न भविष्यती' असे स्वागत झाले. अत्र्यांची उणीव भासू न देण्याच्या कौशल्यातच खांडेकरांचं सारं श्रेष्ठत्व या कथेतून सिद्ध होतं.
मधु-मालतीची प्रेमकथा 'तुझाच'
 काल्पनिक कथेवर आधारित सुखान्त रंजक पटकथा असे 'तुझाच' बोलपटाच्या कथेचे वर्णन करता येईल. ही एक सुमार कथा होती. 'हंस' काय किंवा नवयुग' काय, त्यांचे चित्रपट मुहूर्त पाहूनच सुरू केले जात. काळे नावचे दरबारी ज्योतिष हे 'हंस'चे सल्लागार होते. ‘तुझाच'चा मुहुर्तही त्यांच्या सल्ल्यावरून पक्का करण्यात आल्याचा पुरावा र. श. जुन्नरकरांनी वि. स. खांडेकरांना लिहिलेल्या एका पत्रात उपलब्ध होतो. त्यात ते म्हणतात, “काळे ज्योतिषी यांच्या सांगण्यावरून १३ तारखेचा मुहूर्त शुक्रवार,१३ तारीख व शिवरात्र असूनसुद्धा विनायकरावांनी मान्य केला आहे. तेव्हा ठरल्याप्रमाणे मी त्या दिवशी सुरुवात करणार आहे.'
 'तुझाच'ही एक भावनाप्रधान प्रेमकथा. बाळासाहेब गोखले कापड मिलचे मालक असतात. मुंबईला त्यांची डेक्कन क्लॉथ मिल असते. ते पत्नीच्या नृत्यप्रेमामुळे मालती नावाच्या नर्तकीच्या संपर्कात येतात नि तिच्यात गुंततात; पण त्या नर्तकीचे प्रेम असते मधू नावाच्या कवीवर. तो पूर्वी बाळासाहेबांच्या मिलमध्येच कार्यालयात कामाला असतो. पतीची परीक्षा पाहायची म्हणून बाळासाहेबांची पत्नी आक्काताई कविमित्रास घरी ठेवून घेते, तेव्हा बाळासाहेबांच्या लक्षात येतं की मधु-मालतीचं प्रेम आहे. ते लक्षात येतं एका पत्रावरून, ज्यात शेवटी लिहिलेलं असतं, 'तुझाच मधू' इंग्रजीत या पटकथेचं नामकरण 'Ever Your's' करण्यात आलं होतं. ते पटकथेच्या पुस्तिकेवर छापण्यात आले होते.
 प्रेम आणि माया यांतील अंतर सांगणारी ही प्रेमकथा. 'संगम'प्रमाणे याचं दिग्दर्शन जुन्नरकरांकडे होतं. 'संगम'प्रमाणेच याचे थंडे स्वागत झाले. बाबूराव गोखल्यांसारखा नवा गीतकार ‘तुझाच' ला लाभला. या बोलपटात शाहीर अमर शेखांची एक छोटी भूमिका होती. 'स्नेहांकिता'कार स्नेहप्रभा प्रधान यांना अभिनेत्री म्हणून मान्यता देणारा हा बोलपट. ‘तुझाच'च्या दोन छापील पटकथा उपलब्ध आहेत. एक संक्षिप्त तर दुसरी दीर्घ. युद्धकाळात फिल्मचा तुटवडा असल्याने हा चित्रपट मग कमी लांबीचा (११,५०० फूट) करण्याचे ठरले, हे त्याचे कारण असावे असे पत्रव्यवहारावरून लक्षात येते. यातील संवाद हलकेफुलके होते. यातील खांडेकरांच्या इनमिनतीन गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली होती. ‘पाही कान्हा रोखुनि गाली सारखं गीत रसिकांच्या यातील विशेष पसंतीला उतरलं होतं. युद्धकाळामुळे तयारी होऊनही हिंदीऐवजी फक्त हा चित्रपट मराठीतच काढला होता, हे। पत्रव्यवहारातून स्पष्ट होतं हिंदी पटाची गाणी लिहून, चाली लावून तयार होती.
मतभेद म्हणजे मनभेद नव्हे!
 ‘वास्तविक सांपत्तिकदृष्ट्या 'हंस पिक्चर्स' यशस्वी व्हायला हवी होती. तथापि, विनायकांच्या पेशवाई थाटामुळे ते काही होऊ शकले नाही... पुढे एकोणचाळीस साली अभ्यंकर, राजगुरूंच्या साहाय्याने मी ‘नवयुग चित्र लिमिटेड' कंपनी स्थापन केली... तथापि 'नवयुग चित्रपट' या संस्थेला आमच्या ऐक्याचा आणि सहकार्याचा लाभ फार दिवस मिळू शकला नाही. ‘पटनिर्मितीचा सर्वाधिकार एकट्या मजकडे पाहिजे' असा पहिल्या चित्रानंतर विनायकाने हट्ट धरला. बाबूराव पेंढारकर आणि त्यांचे वैयक्तिक मतभेद विकोपाला गेले आणि त्याचा परिणाम असा झाला की, आधी कंपनीतून मी गेलो, नंतर बाबूराव निघाले आणि शेवटी ती कंपनी स्वतः विनायकाला पण सोडावी लागली.' असं 'हंस' व 'नवयुग' प्रवासातील पहिल्या दिवसापासूनचे साक्षीदार असलेले आचार्य अत्रे जेव्हा सांगतात, तेव्हा त्याला चक्षुर्वैसत्यमचं रूप येतं. ‘तुझाच'ची निर्मिती संपत आली असतानाच्या काळात तर विनायक व बाबूराव पेंढारकर यांच्यातील मतभेद विकोपाला गेले होते. विनायक पराकोटीचे अस्वस्थ होते. वि. स. खांडेकरांना लिहिलेल्या एका पत्रात विनायक म्हणतात, .... “अगदीच विस्कळीत झाले आहेत विचार! - वाटतं की पुन्हा नवीनच मांडावा संसार! - भोवतालचे विचार पटत नाहीत! - ते आपलेच आहेत, असं मानून काम करणं जमत नाही! मग खूप कुचंबणा होते. हे माझे विचार नव्हेत, असं म्हणायलासुद्धा व्यवहार मनाई करतो. नाही पण दुसरं काही करणं शक्य नसतं, तर ही गुलामगिरी ठीक होती. मी का सहन करावे हेच कळत नाही.
 या मतभेदातून मग मास्टर विनायकांनी स्वतंत्र संसार थाटून स्वतःचे ‘प्रफुल्ल चित्र' सुरू केलं; पण निर्माता, दिग्दर्शक, लेखक यांच्यातील विसंवाद व मतभेद जुनेच होते. शिवाय काही वेळा ते विकोपाला जायचे हे वि. स. खांडेकरांच्या एका प्रदीर्घ पत्रावरून स्पष्ट होईल. असे असले तरी विनायक व खांडेकरांचे संबंध अतूट राहिले ते मास्टर विनायकांच्या मनात खांडेकरांविषयी असलेल्या भक्तिभाव व श्रद्धेमुळेच. मतभेद होते; पण मनभेद नव्हते. यामुळे प्रफुल्ल'चे पहिले चित्र खांडेकरांच्या कथेचे असणं यात आश्चर्य नव्हतेच मुळी. विनायक प्रेमापोटी खांडेकरांनी ‘प्रफुल्ल चित्र'ला कथा दिली ती आजवरच्या कथेपेक्षा निराळी, नाट्यपूर्ण व नवलविशेष असलेली होती.
कुमारी मातेचे असले तरी ते 'माझं बाळ'
 त्या कथेचे नाव होते ‘माझं बाळ.' सन १८९६ साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती. तिथे त्यांनी कुमारी मातांना आश्रय देऊन बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले होते. त्यांनी केलेला विधवाविवाह व सुरू केलेले हे पुरोगामी कार्य यांमुळे तत्कालीन सनातन्यांनी त्यांच्यावर भ्रूणहत्येचे कुभांड रचले. वि. स. खांडेकरांसारख्या समाजशील, संवेदनशील लेखकाचं मन या साऱ्या व्यवहारात न द्रवतं तरच आश्चर्य! खांडेकर कर्वे यांचे कार्य जाणून होते. आपल्या ‘वैनतेय' मध्ये त्यांनी कर्वे यांच्याबद्दल भरभरून लिहिलेही होते. ते कर्वे यांना गुरू मानत. त्यांच्या सामाजिक कार्याचं व समाजसुधारणेचं महत्त्व कळावं म्हणून लिहिलेली ‘माझं बाळ'ची पटकथा समस्याप्रधान होती.
 शशी व रवींद्रचं एकमेकांवर प्रेम असते; पण शशीला दिवस जाताच तो विश्वामित्री पवित्रा घेतो. निराधार शशी अनाथाश्रमात आश्रय घेते. आपली कन्या शकुंतलेला आश्रमाच्या स्वाधीन करून, नर्सिंगचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहते. तिच्या दवाखान्यात व्यसनाधीन नामांकित वकील मनोहर उपचारार्थ दाखल होतो. शशी आपल्या शुश्रूषेने त्याला सुधारते. तो परत वकिली सुरू करतो. तेव्हा त्याच्याकडे भ्रूणहत्येची अनाथाश्रमाविरुद्धची केस येते. तो आश्रम संचालक अण्णांचे वाभाडे काढतो तेव्हा शशी उत्स्फूर्त साक्ष देऊन आपला पूर्वेतिहास व अण्णा नि आश्रमाचे कार्य स्पष्ट करते. मनोहर वकीलपत्र मागे घेऊन शशीच्या अनौरस कन्या शकुंतलास 'माझं बाळ' म्हणून स्वीकारतो.
 अशी कथा धारण करणाच्या या चित्रपटाचा पहिला खेळ ३ जुलै, १९४३ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमागृहात झाला. पुण्यात २२ जुलै, १९४३ रोजी तर या चित्रपटाचे प्रदर्शन महर्षी कर्वे यांच्या उपस्थितीत करून मोठे औचित्य साधले गेले होते. चित्रपट पाहताना अण्णासाहेब कर्वे यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. ते अश्रू वि. स. खांडेकरांच्या कथेस लाभलेला मोठा पुरस्कारच होता. मास्टर विनायकांचे उत्कृष्ट दिग्दर्शन या पटास लाभले. अनेक अंगांनी हा बोलपट सर्वश्रेष्ठ ठरला. दादा साळवी यांनी साकारलेली अॅड. मनोहरची भूमिका दादांचा ‘लाईफटाइम रोल म्हणून गणली गेली. ती भूमिका पाहून सुविख्यात कायदेपंडित बॅरिस्टर नरिमन म्हणाले होते की, ‘मराठी भाषा' ही कोर्टाची भाषा होऊ शकेल की नाही, याबद्दल मी साशंक होतो; पण 'माझं बाळ' पाहून माझी खात्री झाली की, मराठी भाषा ही इंग्रजी भाषेइतकीच प्रभावी भाषा आहे. हे तर बँ. नरिमननी खांडेकरांच्या भाषेस बहाल केलेले प्रमाणपत्रच होते. “माझं बाळ पाहून वि. स. खांडेकरांवर पत्रांचा वर्षाव करणाऱ्यांत श्री.ज.जोशी, गजानन जहागीरदार, प्रभृती साहित्यिक, अभिनेते, कलावंत होते. मास्टर विनायकांनी ही कथा प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी म्हणून योजलेली समीपदृश्ये (Close ups) मोठी कलात्मक होती. माधव बुलबुले यांनी कॅमेऱ्याच्या नव्या तंत्राचा केलेला उपयोग प्रभावी ठरला. खांडेकरांच्या या कथेनं विनायकांना यशस्वी निर्माता बनविले. या चित्रपटाची निर्मिती कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोनमध्ये करण्यात आली होती. १२० मिनिटांच्या या कृष्णधवल बोलपटाने परत एकदा सामाजिक कथेचे महत्त्व अधोरेखित केलं. बोलपटाचा विषय प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत भिडावा म्हणून माधव ज्युलियन यांच्या ‘प्रेमस्वरूप आई कवितेचा द्रष्टा वापर या चित्रपटात केला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात हे गीत स्वतः माधव ज्यूलियन यांनी गायलं होतं. तेव्हा हे गीत प्रत्येकाच्या ओठी होतं. या चित्रपट कथेत मंगेशकर भावंडांनी अनाथ मुला-मुलींची केलेली भूमिका संस्मरणीय ठरली होती.
 वि. स. खांडेकरांच्या या प्रभावी कथेबद्दल त्यांचे अभिनंदन करताना सुविख्यात चरित्र अभिनेते गजानन जहागीरदार यांनी आपल्या पत्रात लिहिलं होतं, 'In this picture you seem to have taken a deep break, open your shoulders and swing your bat in utter abandon, making for a clear boundry. Accept my warmest Shake-of-hands for this.' या उद्गारांतील औदार्य व अभिमान प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाचं प्रतिबिंबच म्हणावा लागेल. कुमारी मातांसंबंधी ‘माझं बाळ'च्या कथेनं समाजात भावजागर घडवून आणला. या कथेने अनाथ, निराधारांच्या संगोपन, पुनर्वसन कार्यासंबंधी समाजमन सक्रिय केले. समाजाचा संवेदनासूचकांक वर्धिष्णू करण्याचं केलेलं ऐतिहासिक कार्य ही या पटकथेची सर्वांत मोठी सामाजिक कमाई होती.
मानवी मूल्यांची 'सोनेरी सावली'
 मराठी चित्रपटांच्या इतिहासात वि. स. खांडेकरांच्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्द व कर्तव्याबद्दल जे लिहिलं गेलं आहे, ते 'छाया' (१९३६) ते ‘माझं बाळ' (१९४३) पर्यंतच्या प्रवासाबद्दलच. याचं कारण यानंतरच्या पटकथा, गीते, संवाद यांबद्दलची सामग्री व कागदपत्रे, पत्रव्यवहार उपलब्ध नसणं हे असावं. शिवाय खांडेकरांबद्दल जे लिहिले गेले ते 'हंस', 'नवयुग', फार तर 'प्रफुल्ल'पर्यंत; पण तेही विनायक आणि पेंढारकरांसंदर्भात; पण त्याशिवाय व त्यानंतर (१९४३) खांडेकर १९६२ पर्यंत चित्रपटसृष्टीत होते नि या काळात त्यांनी काही चांगल्या कथा मराठी चित्रपटसृष्टीस दिल्या. या काळातच त्यांचे अनेक हिंदी बोलपटही प्रदर्शित झाले. वि. स. खांडेकरांच्या चित्रपटविषयक कार्याच्या समग्र मूल्यांकनासाठी म्हणून तर ‘अंतरीचा दिवा' या ग्रंथाचा खरा घाट मी घातला आहे. या ग्रंथात खांडेकरांच्या चित्रपटविषयक कार्याचा आलेख रेखाटण्याचा प्रयत्न आहे. पुढील विवेचन हा त्याचाच एक भाग होय.
 सी. रघुवीर यांच्या ‘रघुवीर चित्र निकेतन, मुंबई'साठी वि. स. खांडेकर यांनी ‘सोनेरी सावली' ही पटकथा लिहिली. डिसेंबर, १९५३ मध्ये प्रदर्शित या बोलपटाची कथा खांडेकरांनी पूर्वदीप्ती शैलीत (Flash Back) विकसित केली आहे.
 बाळासाहेब फौजदारी वकील म्हणून प्रख्यात असतात. त्यांनी कष्टाने मिळविलेल्या संपत्तीमागे जे भोगले, ते मागे सारून सुखाच्या सोनेरी सावलीत जगण्याची महत्त्वाकांक्षा असते. महत्त्वाकांक्षेच्या कैफात बाळासाहेब मानवी मूल्यांना पायदळी तुडवितात. हा कैफ इतका चढतो की, एक दिवस ते आपल्या बहिणीवरच हात टाकतात. वस्तुस्थिती कळेपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेले असते. हाती राहतो तो फक्त पश्चात्ताप आणि सर्व असून नसल्याचं आयुष्य भरून पुरेल इतकं शल्य!
 वि. स. खांडेकरांच्या या पटकथेसाठी राजा बढे यांनी गीतं लिहिली होती. दत्तोपंत कोरगावकरांचं याला संगीत लाभलं होतं. सी. रघुवीर याचे निर्माता-दिग्दर्शक होते. खांडेकरांना ठरलेलं मानधन न दिलं गेल्यानं मामला कोर्टनोटिसीपर्यंत गेल्याचे पत्रव्यवहारातून स्पष्ट होतं. मुंबईच्या अशोक स्ट्रडिओ आणि मुव्ही आर्ट सेंटरमध्ये या पटाची निर्मिती झाली होती. मीनाक्षी, कृष्णराव चोणकर, राजा नेने यांची भूमिका लाभलेला हा बोलपट फार काही यशस्वी ठरला नाही. ‘विनायकांच्या पश्चात माझा कथा पेलणारा दिग्दर्शक मला आढळला नाही.' या वि. स. खांडेकरांच्या विशादपूर्ण उद्गारांची प्रचिती देणारा हा चित्रपट!
 या चित्रपटाच्या पुस्तिकेत ‘सोनेरी सावली'चं कथासार देण्यात आलं आहे. शिवाय खांडेकरांनी ही पटकथा संवादाच्या रूपात लिहून, शिवाय ती दृश्यांच्या रूपातही सादर केली होती. तिचा उपलब्ध खर्डा अशासाठी आवर्जून दिला आहे की, पटकथा, संवादलेखनानंतर निर्मितीच्या दृष्टीने दिग्दर्शकाच्या सोईसाठी म्हणून दृश्यनिहाय कथेची मांडणी होत असते. त्यात दिग्दर्शक व लेखक मोठी मेहनत घेत असतात. ही रचना Titles, cut, inter cut, Quick Disolve, Mix, Fed out, Fed-in अशा निर्मितीतंत्राच्या अंगाने कशी लिहिली जाते, याची माहिती या क्षेत्राचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना या पटकथेच्या वाचनातून होईल आणि त्यातून खांडेकरांची या क्षेत्रातील तांत्रिक कुशलता प्रत्ययास येईल.
‘अंतरिचा' ज्ञान ‘दिवा' मालवू नको रे!
 हृदयनाथ मंगेशकरांनी संगीताच्या क्षेत्रात उमेदवारी करीत निर्मितीच्या क्षेत्रात मुशाफिरी करण्याचे ठरविल्यानंतर त्यांना वि. स. खांडेकरांची आठवण न होती तरच आश्चर्य! मंगेशकर कुटुंब खांडेकरांच्या संस्कारांत नि त्यांच्या देखत मोठं झालं. मुळात या कुटुंबाच्या चित्रपट प्रवेशास मास्टर विनायक, वि. स. खांडेकर, दीनानाथ मंगेशकर यांचे प्रारंभीपासूनचे ऋणानुबंधच कारणीभूत होते. तेव्हा हृदयनाथ मंगेशकरांकडून मागणी होताच खांडेकरांनी त्यांना ‘अंतरिचा दिवा' पटकथा देणं स्वाभाविकच होतं.

ससेहोलपट होते. मुलगा बेकार, उपवर मुलीचं लग्न ठरत नाही. हे सारं पैशाअभावी होतंय, हे लक्षात आल्यावर मुलगा आनंद पेटून उठतो व मीरेचं लग्न करण्याचं ठरवितो. स्वामी नामक गुंडाशी संधान बांधून परिस्थितीवर विजय मिळवित असताना आशाच्या प्रेमात पडतो. आशा कुमारी माता होणार, हे लक्षात आल्यावर तिला घर पारखे होते. याच दरम्यान पोलीस आनंदला अटक करतात आणि मग बापू मास्तरांनी जपलेल्या मूल्यांच्या नंदादीपाचं काय होतं, याची उत्कंठा लावणारं हे कथानक.
 या चित्रपटास माधव शिंदेंचं दिग्दर्शन लाभलं. दादा साळवी, सीमा, सूर्यकांत, इंदिरा चिटणीस यांच्याबरोबर नवतारका उमाही यात अवतरली होती. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व मंगेशकर कुटुंबीय यात एकत्र येऊन गायले. यातील गीतसंगीत गाजले. या चित्रपटाने चांगला धंदा केला तरी तो फार प्रभाव दाखवू शकला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समीक्षक, परीक्षकांनी त्याचं केलेलं स्वागत कळायला हृदयनाथ मंगेशकरांनी खांडेकरांना लिहिलेल्या पत्रातील पुढील मजकूर पुरेसा आहे... ‘चित्रपट मुंबईत उत्तम धंदा साधतोय; पण वृत्तपत्रांनी नेहमीच्या पद्धतीने आमच्यावर टीकेची झोड उठवली. आपल्याशी साहित्यिक दृष्टीने ते काही बोलू शकत नाहीत, मग बरोबरी करणे दूरच राहिले. मग चित्रपरीक्षणामध्ये तुम्हांला एक कोपरखळी मारता आली तर काय बिघडले? या न्यायाने सर्व वृत्तपत्रांनी आपापली लेखणी चालवली आहे. असल्या टीकेची मी पर्वा करत नाही आणि आपण तर करमणुकीचे एक साधन म्हणूनच असली परीक्षणे वाचत असाल. असो.'
 सोहिरोबानाथ आंबिये यांच्या ‘अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे' हा अभंग निर्माता व लेखकांनी पटकथेत वापरून मोठे औचित्य साधले आहे. त्यामुळे कथेची शिकवण प्रभावी होण्यास मोठे साहाय्य झाले आहे. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत याची निर्मिती होत असताना शेजारच्या शाहू दयानंद मोफत मराठी शाळेत मी चौथीत शिकत होतो, असे आठवते. शाळा चुकवून खेळगड्यांसह याचे चित्रीकरण पाहिल्याचे स्मरणात आहे.
होय, माणसाला(ही) पंख असतात
 ध्येय, धुंदीचे पंख माणसास नसते, तर त्याचे जीवन आजच्याइतके रम्य खचीतच झालं असतं, असं सूचित करणारी माणसाला पंख असतात' ही खांडेकरांची शेवटची पटकथा.
 कवी अरविंद 'कमल' या टोपणनावाने कविता लिहीत असतो. काव्यप्रेमी मंजिरी कमलच्या कवितेची रसिक असते. कमल आपली मैत्रीण असल्याची बतावणी केल्याने मंजिरी अरविंदच्या प्रेमात पडते.  अरविंदच्या घरी पहिल्यांदा मंजिरीचा स्वीकार होतो; पण ती हरिजन असल्यानं तिला नाकारलं जातं. मंजिरी व अरविंद विरोध झुगारून आंतरजातीय विवाह करतात. स्वतःला हरिजनोद्धाराच्या कामात झोकून देतात.
 अशी ध्येयवादी कथा घेऊन येणाऱ्या चित्रपटास भारत व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला आहे. ही कथा म्हणजे 'अमृत'ची सुधारित आवृत्तीच. खांडेकरांच्या पहिल्या व शेवटच्या चित्रपटास पुरस्कार लाभणे हा एक सुखद योगायोग! मीना मंगेशकर (खडीकर) या बोलपटामुळे संगीत दिग्दर्शक झाल्या. उषाकिरण व सूर्यकांतच्या त्या वेळच्या गाजलेल्या जोडीचा लाभलेला अभिनय हे या चित्रपटाचं यशाचं एक श्रेय म्हणून सांगता येईल. पी. सावळाराम यांची गीतं व संत नामदेवांच्या अभंगांनी नटलेला हा चित्रपट लता व हृदयनाथ मंगेशकरांचा गळा लाभल्यानं अधिकच प्रभावी झाला होता.
‘सूनबाई'ची निर्मल गाणी
 मराठी चित्रपटसृष्टीशी खांडेकरांचा शेवटचा दुवा म्हणून ‘सूनबाई चित्रपटाचा उल्लेख करता येईल. १९६२ मध्ये ‘सुरेल चित्र'ने तयार केलेल्या बोलपटांसाठी खांडेकरांनी गीतं लिहिली होती. त्या गीतांना सुप्रसिद्ध बंगाली संगीतकार सलील चौधरी यांनी चाली लावल्या होत्या. या चित्रपटाची कथा द. र. कवठेकरांच्या 'रुपेरी कडा' कादंबरीवर आधारित होती. यातील खांडेकरांची गाणी गाजली. भावविभोर निर्मल गाण्यांमुळे ‘सूनबाई'स मराठी प्रेक्षकांनी पसंती दिली होती.
खांडेकरांच्या हिंदी पटकथा
 वि. स. खांडेकरांच्या पटकथांवर हिंदीमध्ये 'छाया' (१९३६), ‘ज्वाला (१९३८), ‘मेरा हक' (१९३९), 'संगम' (१९४१), 'अमृत' (१९४१), ‘बड़ी माँ' (१९४५), ‘सुभद्रा' (१९४६), ‘मंदिर' (१९४८), ‘विश्वामित्र (१९५२), ‘दानापानी' (१९५३) असे तब्बल दहा चित्रपट प्रदर्शित झाले होते, हे वाचून मराठी भाषिकांना आनंद झाल्यावाचून राहणार नाही. पैकी छाया, ज्वाला, मेरा हक, संगम, अमृत, मंदिर सारखे चित्रपट मूळ मराठी पटकथांवर बेतलेले होते. पैकी काही डब होते, तर काहींची निर्मिती स्वतंत्र होती. या सर्व चित्रपटांची चर्चा (हिंदी रूपांतरासंबंधी) यापूर्वी, त्या त्या मूळ चित्रपटात करण्यात आली आहे; परंतु याशिवाय जे चार स्वतंत्र हिंदी चित्रपट राहतात, त्यांची चर्चा समग्र मूल्यांकनाच्या दृष्टीने आवश्यकच नाही तर अनिवार्य असल्याने पुढे करण्यात आली आहे.

बड़ी माँ
 ‘बड़ी माँ' वरील हिंदी चित्रपटांपैकीच एक होय. 'बड़ी माँ'ची कथा दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. दुर्गादासला एक मुलगा असतो. दिनेश त्याचं नाव. दुर्गादासला त्याची कोण काळजी! कारण तो युद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत लंडनमध्ये असतो. दुर्गादास हा घनश्यामचा ऋणको असतो. आपली मुलगी उषाशी दुर्गादास जर आपल्या राजेंद्रचे लग्न करील, तर आपण त्यास कर्जमुक्त देऊ, असं घनश्याम सुचवितो. राजेंद्र त्या वेळी मोना नामक नृत्यांगनेच्या साहाय्याने जपानसाठी हेरगिरी करीत असतो. जपानी सेना जेव्हा दिनापूरवर हल्ला चढवते, तेव्हा राजेंद्र स्वतंत्रतासेनानी बनून दिनेशच्या मदतीने पाडाव करतो, अशी युद्धकथा घेऊन येणारा बोलपट देशात ‘बड़ी माँ'च्या रूपाने चित्रित करून खांडेकर आपल्या बोधप्रद कथापद्धतीवर जणू शिक्कामोर्तबच करतात. सदरची कथा दुस-या महायुद्धावर आधारलेली आहे, हे वेगळे सांगायला नको.
 विनायकांच्या 'प्रफुल्ल पिक्चर्स'ने निर्मिलेला हा १२२ मिनिटांचा हिंदी बोलपट. यासाठी झिया सरहदी, राजा बढे, दिनकर द. पाटील, अंजूम पिलिभित्ती यांची गीते घेण्यात आली होती. माधव बुलबुलेंनी यांचे चित्रीकरण केलं, तर संगीत दिलं होतं के. दत्ता यांनी. यात नूरजहाँ, लता मंगेशकर, सितारा देवी, दामूअण्णा मालवणकर, प्रभृतींच्या भूमिका होत्या. लता मंगेशकरांना गायिका बनविणारा चित्रपट म्हणून याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचं असं झालं की एका दृश्यात नूरजहाँला एक तान छेडायची होती. मास्टर विनायकांच्या काही ती पसंतीला उतरेना. त्यांनी उपस्थित असलेल्या व तेव्हा संगीताची तालीम घेत असलेल्या लतास ती तान ऐकविण्यास सांगितली. विशेष म्हणजे पहिल्याच शॉटमध्ये दृश्य ओके झालं. या घटनेनं नूरजहाँ व लताची घनिष्ठ मैत्री झाली. महायुद्धाच्या टंचाईग्रस्त परिस्थितीवर मास्टर विनायक यांनी मोठ्या जिद्दीने व शर्थीने चित्रपट पूर्ण केला. या पटाची निर्मिती मुंबईत ताडदेव येथील त्या वेळच्या सेंट्रल स्टुडिओत करण्यात आली. आज तिथं वातानुकूलित व्यापारी संकुल उभं आहे. ही पटकथा इतकी यशस्वी झाली की, विनायक त्यातून मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आपला ‘आशीर्वाद' बंगला बांधू शकले. हा आशीर्वाद खांडेकरांचा होता, हे काय सांगायला हवे? पण याबाबत मात्र मतभेद आहेत.
सुभद्रा
 ‘बड़ी माँ नंतर लगेचच हिंदी ‘सुभद्रा' प्रदर्शित झाला. ‘बड़ी माँ प्रमाणेच यालाही महायुद्धाची, तत्कालीन दंग्याची मोठी झळ लागल्याचं बोललं जातं.  'शांती शब्दाने नाही, त्यागानेच प्राप्त करता येते.' असा संदेश देणारा हा बोलपट. सन १९४६ साली तो मुंबईच्या रॉक्सी सिनेमात प्रदर्शित झाला. १२२ मिनिटांचा हा कृष्णधवल चित्रपट मास्टर विनायकांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट म्हणून त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. 'प्रफुल्ल चित्र'च्या बोलपटासाठी पंडित इंद्र यांनी गीतं लिहिली होती. याला वसंत देसाईंचं संगीत लाभलं होतं. शांता आपटे, लता मंगेशकर यांच्या यात भूमिका होत्या. माधव बुलबुले यांचा कॅमेरा यावर फिरला होता.
 तसा हा पौराणिक चित्रपट. खांडेकरांनी कृष्ण-बलराम संवादाच्या आधारे याची पटकथा तयार केली होती. मास्टर विनायकांचे हे पहिले व शेवटचे पौराणिक चित्र. प्रेम-अदीब यांनी कृष्णाची, दादा साळवी यांनी बलरामाची, ईश्वरलालनी अर्जुनाची, तर शांता आपटे यांनी सुभद्राची भूमिका केली होती. सुभद्राच्या विवाहावर बेतलेलं ‘सुभद्रा'चं कथानक. सुभद्राचा विवाह कुणाशी करायचा, यावर कृष्ण-बलराममध्ये वाद होतो. कृष्ण अर्जुनास पसंती देतो, अशी सर्वपरिचित कथा घेऊन येणारा पट. यास युद्धाची झळ लागली. या चित्रपटातील शांता आपटे व लता मंगेशकर यांनी गायलेलं 'मैं खिली-खिली फुलवारी' हे दुर्मीळ द्वंद्वगीत लोकांना फार आवडलं होतं.
 मास्टर विनायकांनी वि. स. खांडेकरांच्या कथाना मूर्त रूप दिलं. ते खांडेकरांसारखेच ध्येयवादी व संवेदनशील. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे देशप्रेम धगधगत राहिलं. त्यांना मृत्यू आला तो राष्ट्रध्वज पाहतच. स्वातंत्र्यदिन पाहिला... ते त्यांचं एक स्वप्न होतं... देश स्वतंत्र झाल्यानंतरचा पहिला स्वातंत्र्यदिन... त्यांची विष्णुपंत जोगांनी सांगितलेली आठवण मोठी हृद्य आहे... मास्टर विनायक आजारी होते. तरी काठी टेकत स्टुडिओत आले... स्वतः ध्वजारोहण केलं... ‘सुभद्रा'चा फलक लावला... कोण आनंद होता त्यांच्या चेह-यावर...! विष्णुपंतांना म्हणाले, 'अहो, स्वराज्य मिळालं, बरं का! आता बघा मी कसे बोलपट काढतो ते! आतापर्यंत ही इंग्रजांची बंधनं सांभाळून बोलपट काढायला लागायचे. आता जे मला लोकांना खरोखर दाखवायचं आहे ते मी दाखवू शकेन! असं काही दाखवीन की लोक हरखून गेले पाहिजेत!
 पण ते घडायचं नव्हतं, १९ ऑगस्ट, १९४७ लाच त्यांची प्राणज्योत मालवली आणि खांडेकरांच्या पटकथांना कलात्मक साज चढवून त्यात भावनांचा गोफ गुंफणारा कलाकार हरपला. त्यानंतर खांडेकरांचे दोन हिंदीपट आले; पण त्यांना ‘विनायक टच' काही लाभला नाही.
 नंतर विनायकांचा स्पर्श लाभलेला 'देवता'वर आधारित मंदिर' हा हिंदी बोलपट दिनकर द. पाटील यांच्या साहाय्याने प्रकाशित झाला. मग आला ‘विश्वामित्र' (१९५२).
विश्वामित्र
 मास्टर विनायकांनंतर वि. स. खांडेकरांच्या कथेस तेवढ्याच तोलामोलाचा कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यासारखा दिग्दर्शक लाभावा, यासारखी अभिमानाची गोष्ट ती दुसरी कोणती असणार? ‘विश्वामित्र'ची कथा तशी पौराणिकच. ‘सुभद्रा'नंतरची वि. स. खांडेकरांची ही दुसरी पौराणिक पटकथा. ‘विश्वामित्र' या कथेचा नायक. तो कान्यकुब्जचा राजा. एकदा तो शिकारीच्या नादात वसिष्ठ मुनींच्या आश्रमात जातो. तिथे त्याला कामधेनूच्या अलौकिक शक्तीचा प्रत्यय येतो. तो कामधेनू हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो; पण हरतो. मग तो कामधेनू प्राप्तीसाठी शंकराची तपश्चर्या करतो. त्याला सर्वसिद्धी प्राप्त होते. तरी तो ब्रह्मर्षी बनू शकत नाही; कारण त्याच्यात आत्मशुद्धीचा अभाव असतो.
 ही पारंपरिक कथा घेऊन वि. स. खांडेकरांनी आत्मशुद्धीचं महत्त्व, रतीचं तारुण्य, सौंदर्य आणि तपोबलाचं सामर्थ्य यांचं द्वंद्व या साऱ्या संघर्षात चारित्रिक श्रेष्ठता, शुचिता इत्यादी मूल्यांचे महत्त्व या कथेद्वारे रेखांकित केले आहे.
 वसंतराव पवार निर्माते असलेला हा हिंदीपट बी. एम. आर्टस लिमिटेडसाठी तयार करण्यात आला होता. यात सप्रू, शीला नाईक, जोग, सुधाबाई आपटे, भगवान, किरणबाला इत्यादींच्या भूमिका होत्या. मनोहर खन्ना यांनी याचे संवाद व गीते लिहिली होती. त्यांना स्वरसाज चढविला होता आशा भोसले, सुधीर फडके, मोहनतारा, अजिंक्यसारख्या गायकांनी. ‘बावरे नयन' फेम दादा माचवे यांनी याचं चित्रीकरण केलं होतं. पार्वतीकुमारनी नृत्यांचं दिग्दर्शन केलं होतं. भूपाळी, आरती, गीत, नृत्य इत्यादींनी हा चित्रपट कलात्मक बनविण्याचा प्रयत्न केला होता. सप्रू यांनी विश्वामित्र व शीला नाईक यांनी मेनका यांच्या भूमिका अप्रतिम वठल्या होत्या. ट्रिक सीन्स हे या चित्रपटाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य होतं. याच्या निर्मितीसाठी बाबूराव पेंटर यांनी भव्य सेट्स तयार करून आपलं कलामहर्षीपद पणाला लावलं होतं.
दानापानी
‘दानापानी' हा हिंदी बोलपट. याची मूळ पटकथा वि. स. खांडेकरांनी मराठीत लिहिली. ती इथे सविस्तर देण्यात आली आहे.  सन १९५३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचं दिग्दर्शन व्ही. एम. व्यास यांनी केलं होतं. यात मीनाकुमारी व भारतभूषण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शिवाय चित्रा, शशीकपूर, वास्ता, वीरा, राधाकिशन यांनीही या बोलपटात विविध भूमिका केल्या होत्या. मोहन ज्युनिअर यांचं या बोलपटास संगीत होतं. पुढे याच पटकथेवर आधारित 'अश्रू' कादंबरी खांडेकरांनी लिहिली. ती गाजली.
 ‘समस्येचे स्वरूप स्पष्ट करणे हे लेखकाचे काम. ती सोडविणे हे राजकीय पुरुषांचे आणि समाजशास्त्रज्ञांचे काम,' असे नाटककार इब्सेन म्हणत असे. त्या भूमिकेतून खांडेकरांनी या पटकथेत शंकर नावाच्या शाळा शिक्षकांच्या चरित्रातून मध्यमवर्गाच्या अनेक समस्या नि चारित्रिक गुणवैशिष्ट्यांची चर्चा केली आहे. शंकर हा तत्त्वनिष्ठ शिक्षक, आर्थिक विवंचनेत असूनही प्रलोभनांना बळी न पडता मूल्यरक्षण, आदर्श यांची पूजा बांधत जीवनभर संघर्ष करीत राहतो. मध्यमवर्गापुढे आर्थिक व सांस्कृतिक समस्यांचा संघर्ष सतत पिंगा घालीत असतो. या मूल्यांची शकले परस्परविरुद्ध फेकली गेल्याने हा वर्ग समाजाच्या दृष्टीने निष्प्रभ ठरतो. 'स्व' की 'पर'हित या द्वंद्वात नेहमीच या वर्गावर परहिताची मोहिनी राहिली व तीच त्याच्या शोकांतिकेस कारणीभूत होत राहते. याची मांडणी खांडेकरांनी आपल्या पठडीत राहून केली आहे. जगात मूल्य, संस्कृती, संस्कार यांचे स्थायित्व शंकरसारख्या सामान्य माणसाच्या ‘पावलापुरता प्रकाश' या आचारधर्मावरच टिकून आहे. कालौघात समाजात बदल होतात; पण मूल्ये अटळ राहतात, ती शंकरसारखी सामान्य माणसं प्रत्येक काळात संघर्षाच्या झंझावातातही मूल्यास चिकटून राहतात म्हणून. ही पटकथा बोधप्रद असून आदर्शवादी आहे.

तेलुगू व तमिळ चित्रपट
‘धर्मपत्नी'
 वि. स. खांडेकर हे विविध भारतीय भाषांत भाषांतरित झालेले ‘आंतरभारती लेखक' होते. हा बहुमान फारच थोड्या मराठी भाषी साहित्यिकांना लाभला. जे साहित्याचं, तेच चित्रपट क्षेत्राचंही. मराठी, हिंदीबरोबरच तेलुगू व तमिळ भाषांत चित्रपटासाठी कथा देणारे खांडेकर हे बहुधा एकमेव मराठी कथाकार असावेत. त्यांच्या बहुतांशी साहित्याचा का. श्री. श्रीनिवासाचार्य यांनी तमिळ भाषेत अनुवाद केल्याने खांडेकर तमिळ वाचकांना चांगलेच परिचयाचे होते. ते लक्षात घेऊन हा चित्रपट मुळात तेलुगूमध्ये असला तरी तमिळमध्ये डब करण्यात आला होता.
चक्रपाणी यांनी याचे तेलुगू संवाद तयार करून चित्रपटनिर्मितीतील आपला तोटा भरून काढण्यासाठी या पटाची निर्मिती तमिळमध्येही केली होती.
 ‘फेमस फिल्म'साठी चक्रपाणी यांनी याची निर्मिती केली होती. १९४० साली प्रकाशित तेलुगू, तमिळ चित्रपट ‘धर्मपत्नी’ कृष्ण-धवल चित्रपट होता. त्याचं इंग्रजी टोपणनाव ‘पतिव्रता' ठेवण्यात आलं होतं. १७० मिनिटांचा हा बोलपट. याची कथा खांडेकरीय पद्धतीची. हा एक मेलोड्रामा होता. सुस्वभावी वेश्या, न सुधारणारा दुष्ट गुंड व चंचल तरुण यांच्या चारित्रिक संघर्षाची ही कहाणी.
 श्रीदेवी नावाची एक वेश्या असते. ती राधा नावाच्या एका अनाथ मुलीचा सांभाळ करते. ती मोठी झाल्यावर मोहनशी तिचे लग्न ठरवते; पण दुसरीकडे आनंदराव नावाच्या एका गुंडाचा राधावर डोळा असतो. तो मोहनच्या वडिलांचे व श्रीदेवीचे जुने प्रेमसंबंध उकरून काढतो. परिणामी अपेक्षेप्रमाणे मोहनचे लग्न मोडते. मग मोहन स्वतंत्र विचारांच्या उमाशी लग्न करतो. आनंदराव मोहनवर खुनाचा आळ घालून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो; पण त्याला यश येत नाही. उमा श्रीदेवी व मोहनच्या वडिलांचे पुनर्मिलन घडवून आणते.
 या बोलपटाचे दिग्दर्शन पी. पुलैया यांनी केले होते. तमिळ गीतं रचली होती दैव गोपालन यांनी. संगीत होतं तिमीर बरन यांचं. त्यांना अण्णासाहेब माईणकरांनी साहाय्य केले होते. या बोलपटात पी. भानुमती व ए. नागेश्वर राव यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नागेश्वर राव यांचा हा पहिला बोलपट. याशिवाय या बोलपटात शांताकुमारी, पेड्डापुरमराजू, लक्ष्मीनाथ सिंह, हनुमंतराव, आदिनारायणैया इत्यादी कलाकारांच्या भूमिका होत्या.
 या चित्रपटाची निर्मिती ‘हंस पिक्चर्स'नी, फेमस फिल्समासाठी करून दिली होती. त्याचे अधिकांश चित्रीकरण कोल्हापूर व परिसरात झालं होतं. यामागे एक इतिहास आहे. सन १९३९ मध्ये वि. स. खांडेकर आणि फेमस सिने लॅबोरेटरी यांच्यामध्ये करार झाला होता. त्यानुसार ‘धर्मपत्नी हा मुळात हिंदीमध्ये काढण्याचे ठरले होते. खांडेकरांनी मराठी कथा, संवाद, गाणी लिहायची. कंपनीनं त्याचा हिंदी तर्जुमा करायचा. खांडेकरांना रु. १५००/- इतकं घसघशीत मानधन देऊ केलं होतं. त्या वेळी खांडेकरांना पटकथेसाठी ५००/- रुपये मिळत असायचे. शिवाय चित्रपट सलग जितका अधिक चालेल तितक्या प्रमाणात लेखकास लाभ देण्याचं ठरलं होतं. प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्र बिदागी निश्चित करण्यात आली होती. मूळ योजनेनुसार हिंदी, मराठी, ऊर्दू, गुजराती, तेलगू अशा पाच भाषांत हा चित्रपट काढण्याची कल्पना होती.
 याच्या मराठी निर्मितीची जबाबदारी भालजी पेंढारकरांवर सोपविण्यात आली होती. त्याची निर्मिती पुण्यात करण्याचे ठरले होते. मुहूर्तही ठरल्याची नोंद आहे. पण ते बारगळले. पुढे भालजींनी आपणास स्वतंत्र कथा द्यावी म्हणून केलेला गळ घालणारा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. तेही घडले नाही. त्यामागे व्यावसायिक स्पर्धा (हंस/प्रभाकर चित्र) हे कारण असावे. ‘धर्मपत्नी'च्या कथानकावर आधारित कादंबरी प्रकाशनाची तरतूद ही 'फेमस'च्या करारात आढळते. त्यासाठी वि. स. खांडेकरांना स्वतंत्र मानधनाची योजना होती. मराठी, हिंदीऐवजी हे चित्र तमिळ, तेलुगूत आले, हा विचित्र योगायोग म्हणावा लागेल.
परदेसी
 वि. स. खांडेकरांच्या चित्रपट इतिहासात सन १९५३ हे सुवर्ण वर्ष मानावे लागेल; कारण या वर्षात ‘सोनेरी सावली' (मराठी), ‘विश्वामित्र व दानापानी' (हिंदी) आणि ‘परदेसी' (तेलुगू व तमिळ) असे पाच चित्रपट प्रदर्शित झाले व तेही विविध भाषांत. या वर्षात प्रदर्शित वरील चित्रपटांमुळे खांडेकर भारतीय पटकथाकार झाले व हे सर्व चित्रपट चांगले चालले.
 ‘परदेसी' चित्रपटाची मूळ कथा वि. स. खांडेकरांची. हा मुळात तेलुगूत निर्मिलेला चित्रपट तमिळमध्ये ध्वनिमुद्रित (डब) करण्यात आला होता. 'धर्मपत्नी' (१९४१) चित्रपटाच्या धर्तीवर तो निर्माण करण्यात आला होता. हा नाट्यपट (ड्रामा फिल्म) होता. ३५ मि. मि. फिल्मवर तयार करण्यात आलेला हा मोनोपट. १९० मिनिटांचा होता. सर्वांसाठी (यू) त्याचे प्रदर्शन होते. १ जानेवारी, १९५३ रोजी तो प्रदर्शित झाला होता.
 याची पटकथा अनैतिक संबंधावर आधारित होती. हा मेलोड्रामा होता. चंद्रम त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सर्वांसमोर येतो. सर्वपरिचित होतो. आपल्या बालमित्रांच्या विधवा पत्नी व मुलास हातभार लावतो. या प्रयत्नातून त्याला नोकरी मिळते. दरम्यान एका पर्यटनस्थळी तो गेला असताना त्याची भेट लक्ष्मी नावाच्या फुलं विकणाच्या बाईशी होते. तिचे वडील जुन्या विचारांचे असतात. ते त्यांच्या प्रेमविवाहास नकार देतात. वडिलांचा विरोध न जुमानता चंद्रम व लक्ष्मी लग्न करतात, काही दिवस एकत्र राहतात नि अचानक एक दिवस चंद्रम गाव सोडून पळून जातो. लक्ष्मीला निराधार झाल्यासारखे वाटते. तिला निराधार व अनाथ पाहून तिच्या घराला काही हितशत्रू आग लावतात. ती बेघर होते. तशात तिच्यावर दावा लावला जातो. तिचं जगणे कठीण होते.  दरम्यान अचानक चंद्रम प्रकटतो. त्याचा समज असतो, की बायको मेलेली आहे; पण ती आपल्या मुलीसह प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करीत जगताना पाहन तो शरमिंदा होतो. पुढे लक्ष्मीची मुलगी चंद्रमच्या दत्तक मुलाच्या प्रेमात पडते. गावात वदंता असते की, हा मुलगा चंद्रमचाच आहे. बालमित्राच्या विधवा पत्नीस तो त्याच्यापासूनच झालेला आहे. अनौरस संततीस समाजमान्यता देण्याच्या सदाशयातून लिहिली गेलेली कथा ‘माझं बाळ' या खांडेकरांच्या मराठी चित्रपटाची आठवण करून देते. काही झालं तरी जगलंच पाहिजे,' अशी उभारी देणारी हा अनुबोधपट होय.
पटकथाकार खांडेकर
 वि. स. खांडेकर सन १९३६ ते १९६२ या सुमारे २५ वर्षांच्या कालखंडात पटकथाकार, संवादलेखक आणि गीतकार म्हणून सक्रिय होते. या काळात मराठीत १४, हिंदीत १०, तर तेलगू-तमिळमध्ये प्रत्येकी २ अशा २८ चित्रपटांची निर्मिती झाली. 'छाया' (१९३६), 'ज्वाला' (१९३८), ‘देवता' (१९३९), ‘सुखाचा शोध' (१९३९), 'लग्न पाहावं करून (१९४०), 'अमृत' (१९४१), 'संगम' (१९४१), ‘सरकारी पाहुणे (१९४२), ‘तुझाच' (१९४२), ‘माझं बाळ' (१९४३), ‘सोनेरी सावली (१९५३), ‘अंतरीचा दिवा' (१९६०), माणसाला पंख असतात' (१९६१), ‘सूनबाई' (१९६२) (फक्त गाणी) हे मराठीत त्यांच्या पटकथा, संवाद, गीतांवर निघालेले बोलपट. त्यांच्या अनेक पूर्व कथा, कादंबऱ्यांच्या पटकथा झाल्या. काही त्यांनी चित्रपट व्यवसायाची गरज पाहून लिहिल्या. मूळ कथांत व्यावसायिक गरज म्हणून त्यांनी बदल केले, करून दिले. ‘छाया' (१९३६), ‘ज्वाला' (१९३८), 'मेरा हक' (१९३९), 'संगम' (१९४१), 'अमृत' (१९४१), ‘बड़ी माँ' (१९४५), ‘सुभद्रा' (१९४६), ‘मंदिर' (१९४८), ‘विश्वामित्र' (१९५२), ‘दानापानी' (१९५३) हे त्यांचे कालानुक्रमिक हिंदी चित्रपट. या चित्रपटांच्या मूळ कथा, संवाद, गीते वि. स. खांडेकरांची. त्यांचं हिंदी रूपांतर, अनुवाद पंडित इंद्र, अमृतलाल नागरांनी केलं. तेलगू व तमिळमध्ये त्यांचे प्रदर्शित बोलपट होते‘धर्मपत्नी' (१९४०), 'परदेसी' (१९५३). ‘धर्मपत्नी'चे रूपांतरण, संवाद चक्रपाणी यांनी केले होते.
 या साऱ्या पटकथांचे स्वतःचे असे वैशिष्ट्य होते. अधिकांश पटकथा मूळ होत्या, तर एक-दोन आधारित. विषयांच्या अंगांनी अधिकांश कथा सामाजिक, काहीएक पौराणिकही. साऱ्या कथा माणुसकी, समता, समाजवाद, मूल्य महिमा, आदर्शवाद, बोध, ध्येय इत्यादींची जपणूक करणाऱ्या,त्यांच्या पटकथांमागे समाज बदलण्याचं ध्येय नि ध्यास होता.  त्या रंजक करण्यासाठी त्यांनी प्रेम, प्रणयही चित्रित केला; पण ते त्यांचं लक्ष्य नव्हतं. चित्रपट यशस्वी करण्याचे साधन म्हणून, पट रंजक व्हावा म्हणून केलेला तो प्रयत्न असायचा. आधारित कथा मात्र त्यांनी निखळ मनोरंजनासाठी लिहिल्या. पटकथांमध्ये चारित्रिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक द्वंद्व ठरलेले. अधिकांश कथा शोकात्म होत्या, तर काही सुखान्तही. द्वंद्वात सुष्ट, सतुपक्षांची सरशी ठरलेली. वि. स. खांडेकरांनी आपल्या पटकथा मेलोड्रामा, फँटसी, सटायर म्हणून लिहिल्या. कथा जशी घडली तशी लिहिण्याचा त्यांचा प्रघात होता. अपवाद म्हणून एखादी पूर्वदीप्ती शैली विकासाची कथाही आढळते. त्यांच्या पटकथा एक विशिष्ट खांडेकरी वळणवाट घेऊन येतात, विकसित होतात.
 चित्रपटातील खांडेकरांचे संवाद छोटे, सहज आहेत. त्यांत विचार, विवेक, सिद्धान्त आपसूक असतातच. त्यांची साहित्यातील सुंदर शब्दकळा इथेही भेटते. अनुप्रास, उपमा हा संवादाचा अविभाज्य भाग असतो. संवादात खोच, कोपरखळी, कोटीही असते. संवादातून कथाविकास, चरित्रचित्रण होत राहतं. नाटककाराचा मूळ पिंड असलेले खांडेकर कथेत संवादातून चपखलपणे नाटकीय प्रसंगांची पेरणी करीत ती खुलवित राहतात.
 प्रसंगानुरूप गीत, गाण्यांची रचना करण्यात वि. स. खांडेकर वाकबगार आहेत. प्रसंगानुकूल गीतरचना हे त्यांच्या चित्रकथांचं वैशिष्ट्य. त्यांची गीते प्रेम, प्रणय, निसर्ग, भाव वर्णन करीत विकसित होतात. गीतं लयबद्ध असतात तशी नादमधुरही. ती छंदयुक्त अधिक. काही कथांत त्यांनी अन्य प्राचीन व समकालीन कवींच्या रचनांचा उपयोग करण्याचा द्रष्टेपणा दाखविला. या रचनेने त्यांचे चित्रपट बोधगम्य व रम्य होण्यास साहाय्य झालं आहे.
 वि. स. खांडेकरांचे साहित्यिक, सामाजिक लेखन पाहिले की, रशियन कथालेखक मॅक्झिम गॉर्कीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दोघांच्या जीवन व साहित्यात आश्चर्यकारक साम्य दिसून येते. दोघांना घरच्या आधाराअभावी अल्पवयात जीवनसंघर्ष करावा लागला. दोघांना गरिबांचा आरंभीपासून कळवळा. शालेय शिक्षण दोघांचे जुजबी; पण वाचन जबर. शिकणं हाच दोघांपुढील वाचण्याचा एकमेव मार्ग. दोघं विचारानं समाजवादी, धर्मनिरपेक्ष. दोघेही साहित्यकार. दोघांनी कथा, कादंबच्या आत्मकथा, नाटकं लिहिली. दोघांनी टोपणनावांनी लिहिले. खांडेकरांनी कुमार, आदर्श, एक शिक्षक नावांनी. गॉर्की हेच त्यांचे टोपणनाव.
त्यांचे मूळ नाव,अल्यिक्सेई मक्स्यीमव्हिच प्येश्कॉव्ह. दोघांच्या साहित्यकृतींचे अनेक भाषांत अनुवाद झाले. दोघांच्या साहित्यातील पात्रे सामान्य; पण ध्येयवादी. दोघांचा लेखनाचा प्रभावकाळ विसाव्या शतकाचा पूर्वार्ध. दोघांनी समाजवादी वास्तववाद स्वीकारला; पण खांडेकर कल्पनेत अधिक रमायचे. दोघांनी आपल्या साहित्य आणि विचारांनी पिढीस भारावून टाकले होते. दोघांच्या साहित्यात दोष होते; पण गुणांची सामाजिक बलस्थाने इतकी मजबूत होती की, त्यांना जीवन जगण्यासाठी कधी कलेचं कातडं पांघरावं लागलं नाही. म्हणून वि. स. खांडेकरांमध्ये मॅक्सिमम मॅक्झिम गॉर्की दिसून येतो. गॉर्कीचा एक अर्थ दुःखी आहे. दोघेही जन्मभर दुःखीच होते. त्यांना आपल्या स्वप्नातलं जग पाहता आले नाही; पण बदलाच्या पाऊलखुणांनी दोघांना आश्वस्त केले होते. त्यातून त्यांना जगण्याची उमेद नक्कीच मिळाली होती.  माणूस घडतो वाचनाने, तसाच तो पूर्वसूरींच्या प्रभावानेही आकारत असतो. वि. स. खांडेकरांचा साहित्यिक पिंड विविधांगी वाचनाने घडला. हे वाचन भारतीय होतं, तसं पाश्चात्त्यही. त्यांच्या साहित्यातील आशयात भारतीय प्राचीन साहित्य व पूर्ववर्ती लेखकांच्या साहित्यसंपदेचा प्रभाव होता तर कलेवर इंग्रजी साहित्याचा. विचार म्हणून माणुसकी, समाजवाद, गांधीवाद, मार्क्सवाद यांवर त्यांची भिस्त होती. हरी नारायण आपटे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, स्टीफन झ्वाइग, तुर्गनेब, चेकॉव्ह असा त्यांच्या वाचन व प्रभावाचा पैस असल्याने विषमता, दारिद्रय, अज्ञान, समानता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, समाजवाद हे त्यांचे चिंता आणि चिंतनाचे विषय असायचे. हे चिंतन पुस्तकांच्या प्रस्तावना, वैचारिक लेख, पात्र संवाद, कथाविस्तार इत्यादींमधून प्रकट होत राहतं. दलित, शोषित स्त्रिया, सर्वांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आस्था भरलेली होती. या आस्थेपेक्षा महात्मा गांधींच्या प्रभावाने ते शिरोडे खेड्यात जाऊन शिकवू लागले. ‘पावलापुरता प्रकाश' या न्यायानं त्यांनी ध्येयवाद, नैतिकता, सदाचार, सभ्यता इत्यादी जपली.
खेडे
 'कांचनमृग' कादंबरीत त्यांच्या खेड्याकडील आस्थेचे दर्शन घडते. ‘शहराची सुधारणा करून देशाची उन्नती करणे हा कांचनमृग आहे. खेडी सुधारतील तेव्हाच देश सुधारेल. शहरे हिंदमातेची वस्त्रे मानली, तर खेडी ही तिची हाडे आहेत. ही हाडे एकसारखी झिजत असताना नुसती सुंदर वस्त्रे परिधान करून तिच्या मुखावर तेज येणार नाही', या विधानातून त्याचा प्रत्यय येतो. ‘उल्का' तर त्यांची ध्येयवादी कादंबरी. तीमध्ये खांडेकरांनी स्त्रीजीवन, त्याग आणि आर्थिक विषमतेचे हृदयद्रावक चित्र उभे केले आहे.
 खेड्यात खरीखुरी सुधारणा झाली का? काडीइतकीदेखील नाही. शिक्षण हे पाणी! ते समाजवृक्षाच्या मुळाशी घातले की, काम झाले असे मला वाटते! पण या वृक्षाच्या मुळाला लागलेली जातिद्वेषाची, विषमतेची आणि पैशाच्या गुलामगिरीची कीड त्याला थोडीच वाढू देणार? ही कीड मेली पाहिजे - मारली पाहिजे! म्हणणाऱ्या खांडेकरांमधील समाजचिंतकाच्या मनातील खेड्यातील समाजाविषयी तळमळ वाचकास अंतर्मुख करते. खेड्यातील दुरवस्थेचे झालेले दर्शन वि. स. खांडेकरांनी आपल्या अनेक कथा, कादंबरी, चित्रपट कथा इत्यादींतून तीव्रतेने व्यक्त केले आहे, त्याचा प्रत्यय त्यांना कोकणात शिरोडा येथे शिक्षक म्हणून कार्य करताना कोकणच्या झालेल्या दर्शनात आलेला होता.
धर्म
 वि.स.खांडेकर स्वतः निधर्मी, नास्तिक होते. समाज धर्मनिरपेक्ष असावा, अशी त्यांची धारणा होती, ती धर्म माणसा-माणसांत भेदभाव करतो म्हणून. माणुसकी हाच खरा धर्म मानणारे खांडेकर सांगतात, “हृदयाने हृदयाला ओळखणे हाच जगातील सर्वश्रेष्ठ धर्म असतो... धर्म पागोट्यांत अगर बाराबंदीत नाही; धर्म सोवळ्याने शिजवलेल्या अन्नात नाही, महारांची सावली पडू नये म्हणून रस्त्यावर उड्या मारीत जाण्यातही धर्म नाही. जगातील प्रत्येक जीव आपल्या प्रमाणेच आहे, सुख-दुःख, मान-अपमान, नीती-अनीती या सर्वांची त्यालाही आपल्याइतकीच गरज आहे. दुस-याच्या अज्ञानाचा, दारिद्र्याचा अगर पारतंत्र्याचा फायदा घेऊन त्याच्या जीवावर आपण गबर होणे पाप आहे, हे ज्याला कळते आणि थोडेफार वळते तोच खरा धर्मनिष्ठ! देव, धर्म, कर्मकांड, पोथीनिष्ठा, उच्च-नीचता या सर्व माणुसकीला कलंक लावणाऱ्या गोष्टी असल्याने खांडेकरांनी जागोजागी अशा बाबींचा विरोध करून त्या निषेधार्ह मानल्या आहेत.
दारिद्र्य व अज्ञान
 वि. स. खांडेकर यांचे बालपण व शिक्षण सांगली, पुणे अशा पांढरपेशा व मध्यमवर्गीयांच्या शहरात झाले. शिक्षक म्हणून कोकणात गेल्यावर त्यांनी खरा भारत पाहिला - अनुभवला. दारिद्र्य काय असते? अज्ञानामुळे माणसं अगतिक होऊन अंधश्रद्धेचे बळी कशी ठरतात, हे त्यांनी अनुभवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या विश्वात दोन जगे आहेत. एक गरिबांचे अन् दुसरं श्रीमंतांचे. समाजातील हे दोन ध्रुव आहेत. गरिबांचे हलाखीचे जीवन पाहून विफल होणारे खांडेकर प्रश्न करतात, “ही कष्ट करणारी माणसे किती हलाखीचे जीवन जगत आहेत! कदाचित पिढ्यानपिढ्या हे असेच चालत आलेले असेल!  पण काळाचे शिक्कामोर्तब असले म्हणून काही कुठलाही अन्याय न्याय ठरू शकत नाही! धड पोटभर अन्न नाही, धड अंगभर वस्त्र नाही, धड मुला-बाळांना उद्या चार घास सुखाने मिळतील, अशी आशा नाही, कसलाही बौद्धिक आनंद नाही, कसलेही सुख नाही, सुखाची पुसट आशासुद्धा नाही. अशा स्थितीत पिढ्यानपिढ्या घाण्याला जुंपलेल्या बैलांप्रमाणे राबत आलेल्या या माणसांनी, आपल्या निढळाच्या घामाने मातीत मोत्याचे दाणे पिकविणाऱ्या या कष्टकऱ्यांंनी, किती दिवस राहायचे? अनंत अज्ञानाची, पशुतुल्य जीवनाची ही जबरदस्त शिक्षा त्यांना कुणी दिली? यांनी समाजाचा असा कोणता गुन्हा केला आहे? तेव्हा त्यांचा विषमतेवरील राग समजण्यासारखा असतो.
हरिजनोद्धार
 समाजातील जातीयता नष्ट व्हायची, तर वरवरच्या सुधारणा कामी येत नसतात. त्यासाठी जनमानसात आंतरिक बदल घडून येणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य असते. आगरकर, गांधींसारखे समाजसुधारक होते म्हणून हरिजनांच्या स्थितीत थोडाफार बदल घडून आला; पण या वरवरच्या बदलाने वि. स. खांडेकर समाधानी नव्हते, हे त्यांच्या या विचारांवरून सहज लक्षात येतं. 'आगरकरांसारख्या अद्वितीय पुरुषाने अट्टहास केला आणि नंतर गांधींसारख्या अलौकिक पुढाऱ्याने चंग बांधला म्हणून हरिजनांविषयी बरीचशी सहानुभूती उत्पन्न झाली आहे; पण सहानुभूती ही पाण्यासारखी आहे. उलट प्रत्यक्ष कृती हे अन्न आहे. नुसत्या पाण्यावर मनुष्य फार दिवस जगू शकत नाही. हरिजनांचीही आता तीच स्थिती झाली आहे.' वर्तमानपत्रातले लेख, सभांतली भाषणे आणि मासिकांतील गोष्टी यांवरून त्यांच्या उद्धाराविषयी समाजाला फार तळमळ लागली असे वाटते; पण आज तुकाराम असता तर हे सारे पाहून ‘बोलाची कढी, बोलाचाच भात! जेवुनिया तृप्त कोण झाला?' असा रोकडा सवाल या साऱ्या सुधारकांनी केला असता हे कोण नाकारेल?
पांढरपेशा मध्यमवर्ग
 समाज तीन वर्गात विभागला आहे, निम्न, मध्यम आणि उच्च! खालच्या वर्गातील माणसं शिक्षित होतात नि मध्यमवर्गीय बनतात. त्यांचं मध्यमवर्गीय होणं, त्यांचा भौतिक विकास असतो. शिक्षण व पैशाने माणसाचं जीवन समृद्ध होत असेल; पण सभ्य नाही. समाजसभ्यता वर्गीय जाणिवांवर उभी असते. बहुजन अभिजन होणं गैर काहीच नाही. त्याचसाठी तर असतो सारा अट्टहास!  पण आपला विकास झाल्यावर आपण ज्या वर्गातून प्रवास करीत तेथे आलो, त्या सहबांधवांविषयी आपल्या मनात किती सहानुभूती राहते, त्यांसाठी आपण काय करतो, याचा हिशेब कृतीतून मांडल्याशिवाय आपला विकास सिद्ध होत नाही, या विचारावर खांडेकर ठाम होते. मध्यमवर्गीयांची तटस्थता, निष्क्रियता, स्वकेंद्रितता यांबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची नाराजी असायची. ती व्यक्त करताना ते म्हणतात, “आपली भाषा, आपला धर्म, आपला वेष, आपली अंतर्मुख संस्कृती आणि या सर्वांपेक्षाही अधिक महत्त्वाचा असलेला असा अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या पंखांत रुतलेला आपला बहुजन समाज यांकडे पाठ फिरवून इंग्रजी राज्यातील कारकुनापासून कारभाऱ्यापर्यंतची कामे इमाने इतबारे करण्यात या काळात मध्यमवर्गाची बरीचशी बुद्धी खर्च पडू लागली. नकळत या वर्गाच्या आशाआकांक्षा संकुचित झाल्या. विलास म्हणजे विकास, ज्ञान म्हणजे पोपटपंची, कार्य म्हणजे सभासंमेलनांतून ऐटीत करायची भाषणे, असली समीकरणं त्यांच्या अंगवळणी पडली. गेल्या शतकात इंग्रजी राजवटीने निर्माण केलेल्या मोहिनीने या वर्गाच्या आत्म्याला गाढ मोहनिद्रा आणली!"
पहिले प्रेम
 याच नावाने लिहिलेल्या अन् सन १९४१ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीस वि. स. खांडेकरांची ‘पार्श्वभूमी' म्हणून सुमारे ५० पानांची दीर्घ प्रस्तावना आहे. त्या कादंबरीइतकीच ती आकर्षक आहे. प्रेम हा मनुष्यजीवनाचा स्थायीभाव आहे. 'पहिले प्रेम' अविस्मरणीय असते. त्याची सर कशालाच येत नाही, हे जरी खरे असले तरी अशा प्रेमभंगाने खचणाऱ्यांची, आत्महत्या करणाऱ्यांची व जीवनभर हताशपणे जगणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पहिले प्रेम अन् आयुष्यभर मिळणारे प्रेम यांत श्रेष्ठ कोणते ? ब-याचदा या प्रश्नाचा कौल आजवरच्या कवी, चिंतक, लेखकांनी पहिल्या प्रेमाच्या बाजूने दिला असला तरी खांडेकरांना मात्र तो मान्य नाही. तरुणांची असहमती मान्य करूनही खांडेकर या कादंबरीत आपल्या धारणेवर अविचल उभे दिसतात; कारण भावना व वास्तव यांत हितकारी, चिरस्थायी काय, हे त्यांच्यातील तत्त्वचिंतकाला जीवन अनुभवातून उमगलेलं ते सत्य आहे. ते उलगडून सांगताना म्हणतात की, ‘पहिल्या प्रेमातल्या दिव्यत्वाला अथवा आभासात्मक उत्कंठतेला भुलून जाऊन आजच्या मध्यमवर्गीय तरुणाने स्वतःचे मानसिक हाल करून घेणे हा एकप्रकारचा वेडेपणा आहे. प्रेम करणे हा तरुणांचा हक्क आहे. त्याने देशावर प्रेम केले पाहिजे आणि आपल्या आवडीच्या एखाद्या मुलीवर अगर मुलावरही प्रेम केले पाहिजे,समाजात प्रेम केले पाहिजे, आपल्या कुटुंबावर प्रेम केले पाहिजे; पण हे प्रेम परिस्थितीमुळे विफल झाले की, आपल्या आयुष्यातला सर्व रस संपला म्हणून हताश होणं हा मनाचा दुबळेपणा आहे! प्रेम आणि जीवन यांच्या परस्परसंबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका संकुचित असून चालणार नाही.
कामवासना
 वि. स. खांडेकरांची 'ययाति' म्हणजे भोग आणि त्यागाची द्वंद्वकथा होय. व्यापक समाजचिंतन व्यक्त करणारी कादंबरी म्हणून मराठी साहित्यात तिचे आपले असे महत्त्व आहे. मानवी जीवनातील भावभावनांचे महत्त्व ती अधोरेखित करते. मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रिये हे घोडे, उपभोगाचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रिय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे... इंद्रियरूपी घोड्यांना मनाच्या लगामाचं बंधन सतत हवे... मनावर बुद्धीचे नियंत्रण हवे. बुद्धी आणि मन दोन्ही मिळून संयमाने हा रथ चालवू शकतात. या कादंबरीतील हे शेवटचे शब्द, "सुखात, दुःखात । सदैव एक गोष्ट लक्षात ठेव. काम आणि अर्थ हे महान पुरुषार्थ आहेत. मोठे प्रेरक आहत. जीवनाला पोषक असे पुरुषार्थ आहेत; पण हे स्वैर धावणारे पुरुषार्थ आहेत. हे पुरुषार्थ केव्हा अंध होतील, याचा नेम नसतो! त्यांचे लगाम अष्टौप्रहर धर्माच्या हातात ठेव." ते असे बजावतात तेव्हा ती धोक्याची घंटीच वाजवत असतात. खांडेकरांनी आपल्या समग्र साहित्यातून विविध प्रकारच्या दुष्ट तत्त्वांचा (Evils) निर्देश करीत माणसास त्यापासून मुक्त, दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. असे सल्ले त्यांच्या साहित्यात ठायीठायी विखुरलेले आहेत. माणूस सत्शील, सभ्य, मूल्यवान, नैतिक राहायचा तर त्यानं काळाची आव्हाने समजून घेऊन स्वतःला सावरत संयमानंच जगायला हवं. 'तेन त्यक्तेन भुजितः' या गीतेतील श्लोकाप्रमाणे खांडेकर त्यागासह भोगाचे महत्त्व विशद करतात.'ययाति'तून त्यांना हेच सूचित करायचं आहे की, 'वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात वासनांचे आणि विकारांचे नियंत्रण किंवा उदात्तीकरण करणारा मानव जोपर्यंत निर्माण होणार नाही, तोपर्यंत मानवतेला सुख आणि शांती यांची प्राप्ती होण्याचा संभव नाही.'
सेवा आणि सुख
 सुख ही मानवी भावना आहे. भावनेचा मूलभूत गुणधर्म असतोच मुळी अतृप्ती, असमाधान. सुखामागे धावणे म्हणजे मृगजळाचा पाठलाग करणे होय.  सुख म्हणजे केवळ स्वहित नव्हे. अन्य जनांचे सुख ते आपले सुख मानण्यातील उदारता अनुभवायला तुमचं मन तसं उमदं असायला हवं. वि. स. खांडेकरांनी आपल्या ‘सुखाचा शोध’ आणि ‘जळलेला मोहर' या कादंबऱ्यांंतून हे परोपरीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 'सुख निरपेक्ष सेवेत आहे, सुख जिवाला जीव देणाऱ्या माणसांवर प्रेम करण्यात आहे." असे सुखाचा शोध लावणारे खांडेकर ‘जळलेला मोहर'मध्ये समजावतात, ‘माणसाचा जन्म नुसता सुखासाठी नाही; कर्तव्यासाठी आहे. सेवेसाठी आहे. ज्याला सेवा करायची असेल, त्याला जग मोकळं आहे. सेवेचं सुख हेच अमर सुख आहे... स्त्री-पुरुषांनी कितीही शरीरसुख उपभोगलं तरी त्यांचं कधीही पूर्ण समाधान होणार नाही! याच सुखाच्या मागं माणूस लागला की तो पशू होतो. सेवेतल्या सुखाची गोडी ज्याला कळली तो देव होऊ लागतो. शेवटी माणसानं ठरवायचं की, आपणाला देव व्हायचंय, माणूस व्हायचेय की पशू!
पाशवी शक्ती
 या जगात जी काही दुःखे निर्माण झाली, त्या सर्वांचे मूळ एक तर अहंकारात आहे नाही तर अत्याचारात. शक्ती, सत्ता, संपत्तीचा दर्पच दुःख निर्माण करतो. ही परंपरा प्राचीन आहे. अश्मयुगही त्याला अपवाद नाही आणि आधुनिकपण. याचे कारण त्याचा उगम माणसाच्या अतृप्ततेत आहे. ‘उत्तररामचरित्र'मध्ये एक कथा आहे, क्रौंचवधाची. खांडेकरांनी अशा अनेक कथांना आधुनिक संदर्भ देऊन त्या कथांवर नवभाष्य केले आहे. ‘क्रौंचवध', 'ययाति'सारख्या कादंबऱ्या व रूपक कथांत मिथकीय तत्त्वांचा उपयोग करून खांडेकर कलाकार, तत्त्वचिंतकांची प्रतिभासंपन्नता सिद्ध करतात. ‘क्रौंचवध' कादंबरीचा उत्तरार्ध समाजचिंतनाच्या दृष्टीने पर्वणीच बनून प्रगटतो. ‘क्रौंचवधाचे चित्र... या चित्रात क्रौंच पक्ष्यांच्या जोडप्यातील नराचा आपल्या बाणाने वध करणारा निषाद आहे... जगातील प्रत्येक अन्याय या रानटी भिल्लाच्या रूपाने चित्रकाराने प्रकट केला आहे. त्या निषादापाशी धनुष्यबाण आहेत. प्रत्येक अन्यायाच्या पाठीशी अशीच पाशवी शक्ती उभी असते. ही शक्ती बुद्धीला विचारीत नाही किंवा भावनेला भीक घालीत नाही. संहारक उन्मादाच्या नादात ती तांडवनृत्य करीत सुटते. तिच्या उन्मत्त टाचांखाली चिरडले जाणारे निरपराधी जीव तडफडत, चित्कारत राहतात; पण त्या चित्कारांनी अन्यायी हृदयाला थोडासुद्धा पाझर फुटत नाही. फुटणार कुठून? विनाशातच त्याला आनंद होत असतो. सौंदर्याची मूर्ती छिन्नविच्छिन्न करण्यातच त्याला पुरुषार्थ वाटतो.  पाशवी शक्तीच्या प्रदर्शनातच त्याच्या अहंकाराचे समाधान होते. खांडेकरांच्या चिंतनात कालजयी वृत्ती असते. ते सर्व काळात लागू होतं. इथे नुसतं ‘निषाद'च्या जागी ‘कसाब' शब्द घालून वाचा म्हणजे ते वर्तमानाचं चित्र होऊन जाईल. (बाणाच्या जागी बंदूक ओघानं येईलच!)
सामाजिक भावना
 माणूस जगतो कशावर? अन्नावर की आशेवर? याचं उत्तर ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार भिन्न असलं तरी हे खरं आहे, की उदरभरण म्हणजे जीवन नव्हे! जीवन ही त्यापलीकडची गोष्ट आहे. जीवनात भावनेची जोड असते, म्हणून माणसाचं जगणं सुसह्य होतं. मनुष्य स्वतःपलीकडे पाह लागतो तो सामाजिक जाणीव झाल्यावर. ही जाणीव त्याला काव्य, अश्रू आणि भावनेतून मिळत असते. ती कधी शब्दांतून तर कधी कृतीतून उमजते, हे खांडेकर ‘क्रौंचवध'मध्ये ज्या ताकदीने स्पष्ट करतात त्यातून त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य आणि साधुत्व स्पष्ट होतं. ते म्हणतात, ‘सामाजिक भावना हा विकासशील मानवी जीवनाचा आत्मा आहे. ही भावना नेहमी तीन प्रकारांनी प्रगट होते, शब्दांनी, अश्रूनी आणि कृतींनी. काव्य हे या भावनेचे पहिले सुंदर रूप; पण काव्यातील शब्द कितीही सुंदर असले तरी शेवटी ते वाऱ्यावरच विरून जातात. अश्रू हे या भावनेचं दुसरं रमणीय रूप! पण माणसाच्या क्षुब्ध हृदयसागरातून बाहेर येणारे हे मोती शेवटी मातीमोलच ठरतात! डोळ्यांतील पाण्याने मनुष्य स्वतःतील हृदयातील आगसुद्धा शांत करू शकत नाही, मग जगातील वणवा तो काय विझवणार? सभोवताचे दुःख पाहून व्याकुळ झालेले माणसाचं मन हलके करण्यापलीकडे शब्द आणि अश्रू यांच्यात सामर्थ्य असत नाही.
 या भावनेचे तिसरे स्वरूपच मानवी प्रगतीला उपकारक होऊ शकते. या स्वरूपात ती तोंडाने किंवा डोळ्याने बोलत नाही. ती नेहमी हातानेच बोलते. स्वतःचे रक्त शिंपून ती इतरांचे जीवन फुलविते.
 ‘शब्द, अश्रू आणि रक्त! तिघांच्या उगमाचे स्थान एकच; पण त्यांची जगे किती भिन्न?
माणूस, मूल्य आणि संस्कृती
 वि. स. खांडेकरांच्या साहित्याचे सार आणि ध्येय तीन शब्दांत सांगायचे तर वरील तीन शब्दांशिवाय चौथा शब्द सांगता येणार नाही. माणूस आणि मूल्य यांचा संघर्ष सनातन असल्याने त्याचे चित्रण खांडेकरांनी अनेक परींनी केले आहे. संस्कृती फक्त मनुष्याचीच असते आणि तिचे अधिष्ठान असते मूल्य! मूल्यांशी प्रतारणा माणसात निर्माण केली ती कांचनमृगाच्या हव्यासाने. तो हव्यासच त्याला हिंस्त्र बनवितो हे त्रिकालाबाधित सत्य होय. 'जगातले मुत्सद्दी मानवतेला सुखी करण्याकरिता युद्धाच्या खाईत केव्हा लोटतील याचा नेम नाही. जगात व्यापारी मनुष्याच्या सुखसोई वाढविण्याचे सोंग करून मायेचा बाजार कसा मांडतील आणि किती लुबाडतील याला मर्यादा नाही. जगातला दंभ सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याच जिवावर प्रत्येक क्षेत्रात किती काळ चरत राहील, हे सांगणे कठीण आहे. अशा स्थितीत माणुसकीचा आधार एकच आहे - तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस'.
करुणा
 ‘बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी' नावाची वि. स. खांडेकरांची एक सुंदर रूपककथा आहे. त्या कथेत हे महात्मे परत पृथ्वीतलावर अवतरले तर त्यांना ‘हेचि फळ काय मम तपाला' असा पश्चात्ताप झाल्याशिवाय कसा राहणार नाही, याचे खोचक नि मार्मिक वर्णन आहे. खांडेकर एक कादंबरीही लिहिणार होते - ‘बुद्ध आणि हिटलर' तिचं शीर्षक होतं. त्याचा कच्चा खर्डाही तयार होता. दीनानाथ दलाल खांडेकरांच्या कादंबऱ्यांची मुखपृष्ठे तयार करीत. या संकल्पित कादंबरीचं मुखपृष्ठही तयार झालं होतं. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयात ते दिमाखात प्रदर्शित करण्यात आलं आहे. खांडेकरांचं समग्र सामाजिक चिंतन म्हणजे करुणेविरुद्ध असलेल्या क्रौर्याच्या निर्दालनाची शिकस्त! कामभावना माणसास हिंस्त्र पशू बनवते तसे क्रौर्यही! क्रौर्य संपायचं तर करुणेचं साम्राज्य सर्वत्र नांदायला हवं. जिथे करुणेची पावले उमटतात त्याच अंगणात सात्त्विकता नि संस्कृती वास्तव्य करते. जीवनाची ‘अमृतवेल' बहरायची तर करुणेस पर्याय नाही. हे विशद करताना खांडेकर म्हणतात, 'मनुष्य स्वभावतः क्षुद्र आहे, स्वार्थी आहे, अहंकारी आहे; सुखलोलुप आहे; नाना प्रकारच्या वासनांत बरबटलेला आहे. संस्कृतीने बहाल केलेले सात्त्विक मुखवटे चढवून आजकाल तो जगात वावरत आहे! पण मुखवट्यांनी काही मन बदलत नाही! माणसाच्या उद्दाम मनोविकारांना उत्कट करुणेची जोड मिळायला हवी! ‘तत! त्वमसि!' असं वाटायला लावणारी करुणा! ही करुणा नसेल, तर मनुष्य पशू होईल! Passion and Compassion must go hand in hand. माणसाचं मन बदललं तरच जग बदलेल! त्यातलं दुःख कमी होईल. जग करुणेने, सत्शीलतेनी बदलण्याची धडपड हा खांडेकरांच्या समाजचिंतनाचा पायाच होता. शिक्षण आणि संस्कार
 एक शिक्षक म्हणून आपले जीवन सुरू करणाच्या खांडेकरांनी आपल्या चित्रपट आणि साहित्यातून समाजशिक्षकाची भूमिका कधी सोडली नाही. ‘जीवनासाठी कला' हे त्यांच्या साहित्याचं सूत्र होतं. त्यामुळे आपल्या समाजचिंतनातही त्यांनी कधी आपल्या या भूमिकेचा, ध्येयाचा विसर पडू दिला नाही. त्यांची शेवटची कादंबरी ‘सोनेरी स्वप्ने भंगलेली'. शीर्षकातच या समाजशिक्षकाची जीवनभराची खंत प्रतिबिंबित आहे. शिक्षण ही औपचारिक प्रक्रिया नाही. शिक्षण माणसाचा कायाकल्प घडविते, यावर त्यांचा विश्वास होता. संस्कारांचे सामर्थ्य शिक्षणातच असल्याने पिढी घडविण्याचे ते प्रभावी साधन मानत. म्हणून त्यांनी सदर कादंबरीत एका पत्रात शिक्षण व संस्कारसंबंधात विस्तृत विवेचन करताना म्हटलं आहे, ‘अलीकडची माणसं खूप शिकतात, ज्ञान-विज्ञान मिळवितात. त्यामुळे त्यांचे बाह्य जीवन बदलते; पण ती सुसंस्कृत होतात का? सुसंस्कृत व्हायला माणसाला स्वतःच्या पशुत्वावर विजय मिळवावा लागतो. अंतरंगातल्या संघर्षात सात्त्विक मनाच्या बाजूने उभे राहायला आत्मा समर्थ करणे ही सोपी गोष्ट नाही, ते सामर्थ्य येते व्रतस्थतेने; पण तपस्या आणि व्रतस्थता हे दोन्ही शब्द अनिर्बंध. चैन म्हणजे सुखी जीवन असे मानणाऱ्या आधुनिक जगाला ते परके झाले आहेत.'असे स्पष्ट करून खांडेकरांनी जीवनभर केलेली तपस्या व पाळलेलं व्रत हे समस्त मानवजातीच्या कल्याण व विकासासाठी होतं, हे लक्षात यायला वेळ लागत नाही.
नवी स्त्री
 स्त्री-पुरुष समानतेचं समर्थन करणाऱ्या वि. स. खांडेकरांनी स्त्रीशिक्षण, स्त्रीविकास, स्त्री-पुरुष समानता इत्यादी विषयांवर आपले विचार व्यक्त केले आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर व स्त्रीशिक्षणाचा प्रसार झाल्यावर स्त्रीमध्ये दिसून येणाऱ्या बदलांबाबत खांडेकर चिंतित होते; अशासाठी की, स्त्री-पुरुष समानता ही समाज संतुलनाचाही अविभाज्य भाग आहे. स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे अनिर्बंंधता नव्हे. नव्या स्त्रीमध्ये ती दिसताना पाहून जागे करीत खांडेकर म्हणतात, 'आमच्या पिढीला मुलींच्या मनात स्त्रीशिक्षणाच्या कल्पना असत.स्त्रीस्वातंत्र्याच्या अनिर्बंंध कल्पना मात्र सहसा आढळत नसत. त्या आता जीवनात शिरल्या आहेत. समतेचे खरेखोटे विचार, शिकलेल्या मुलींच्या महत्त्वाकांक्षेला आवाहन देत आहेत. अशा वेळी... सुशिक्षित मुलींच्या विवाहाचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नये...
 नव्या-जुन्या स्त्रीतील फरक स्पष्ट करत ते म्हणतात, “जुन्या, अशिक्षित बायकांपेक्षा नव्या सुशिक्षित स्त्रिया असंतुष्ट आहेत, असमाधानी आहेत. जुन्या बायकांचं सुख हे अज्ञानातलं होतं... ते थोडेफार खरंही आहे; पण नव्या, सुशिक्षित स्त्रियांची दुःखं मात्र ज्ञानातून उद्भवली आहेत, असं मला वाटत नाही. प्रौढ, शिकलेल्या मुली पूर्वीच्या बायकांप्रमाणे पतीशी किंवा संसाराशी समरस होऊ शकत नाहीत. त्यांचा अहंकार अधिक जागृत झालेला असतो. आपल्या मतांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा त्यांना स्थानी-अस्थानी अभिमान वाटतो; पण त्या एक गोष्ट विसरतात - अहंकार हा प्रीतीचा सर्वांत मोठा शत्रू आहे." खांडेकरांच्या या विचारांशी सर्वच सहमत होतील, अशातील भाग जरी असला तरी त्यामागची व्यापक समाजहित भावना कोणीही निर्विवाद मान्य करील.
 वि. स. खांडेकरांच्या सर्व साहित्यप्रकारातील लिखाणात अशा प्रकारचे समाजचिंतन आढळतं. खांडेकरांनी आपल्या साहित्याला रंजनाबरोबर उद्बोधनाचे साधन म्हणून वापरलं. त्यांच्या साहित्यात कलात्मक सौंदर्य जितकं उच्चकोटीचं तितकंच समाजभानही. त्यांचा मूळ पिंड हा तत्त्वचिंतकाचा. मानवी कल्याणाचा ध्यास लागलेले खांडेकर वाचीत असताना असं कधीकधी वाटू लागतं की, हा माणूस घेऊन येणारी कथानकं, पात्र केवळ निमित्त आहेत. ती त्यानं द्रष्टेपणानं उभारलेली अपरासृष्टी आहे. त्यातील पात्र कथाकारांच्या कळसूत्री बाहुल्या आहेत. त्या बाहुल्या तो आपल्या बोटांवर लीलया नाचवतो. त्याची पात्रे जी पोपटपंची करतात, त्यामागे बोलविता धनी कोणी दुसरा आहे... तो आपले विचार, भूमिका, अधिष्ठान सोडायला तयार नाही... त्यानं समाजप्रबोधनाचं स्वीकारलेलं बिरूद तो टाकायला तयार नाही... तो दृढसंकल्प आहे... भीष्मप्रतिज्ञा आहे. समाजचिंतकाचं ध्रुवपद हेच त्याचे अढळ असं बलस्थान आहे. आजवर वि. स. खांडेकरांच्या अभ्यासक, समीक्षक, संशोधकांनी त्यांच्या साहित्यिक सौंदर्यावरच भर दिला व प्रसंगी त्यांच्या सौंदर्य अतिरेकाबद्दल (आलंकारिक भाषा इत्यादी) दुषणेच दिली. त्यांनी कधी त्यांच्या समाजचिंतक भूमिकेचा, योगदानाचा गंभीरपणे विचार केला, असे दिसत नाही. त्यामुळे या चरित्र ग्रंथाचे शीर्षकच मुळी ‘समाजशील साहित्यिक' अशा विशेषणरूपाने येतं, त्यामागे या पक्षाकडे लक्ष केंद्रित करण्याचा उद्देश आहे. शिवाय ही चरित्रमाला आम्ही 'शिळोप्याचा उद्योग' वा 'मिळकतीचा उपक्रम' म्हणून हाती घेतलेला नाही. या चरित्रलेखन प्रकाशनाचे भान खांडेकरांच्या साहित्यभान व भूमिकेशी सुसंगत आहे. म्हणून वि. स. खांडेकरांचं समग्र साहित्य एक व्यवच्छेदक लक्षण घेऊन येतं, असं मला कायम वाटत आलं आहे. खांडेकर वाचून तुम्ही विसरू शकत नाही. कलात्मकता व तत्त्वचिंतकता यांचं अद्वैत घेऊन जाणारं खांडेकरी साहित्य वाचकांच्या मनात विचारांचा भुंगा लावतं. ते त्याला पोखरतं, प्रेरित करीत कधीतरी कृतिप्रवणही करतं. तेच त्यांच्या साहित्याचं श्रेय आहे आणि प्रेयही!

प्रकरण पाचवे
वि. स. खांडेकर : संक्षिप्त समग्र मूल्यांकन

(अ) वि. स. खांडेकर :
कोल्हापूरच्या सांस्कृतिक घडणीचे शिल्पकार

 वि. स. खांडेकरांचा आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक जगताचा संबंध सन १९३० नंतर निर्माण झाला. सन १९३३ च्या प्रारंभी वि. स. खांडेकरांचे एक व्याख्यान राजाराम कॉलेजमध्ये झाले. ते खांडेकरांचे कोल्हापूरातले बहुधा पहिले व्याख्यान असावे. नंतर त्यांचे कोल्हापुरला येणे-जाणे सुरू झाले. ते चित्रपटांसाठी पटकथा लिहू लागले. त्यानंतरचे खांडेकरांचे मराठी चित्रपटसृष्टीतलं आगमन अनपेक्षितच म्हणावे लागेल. चित्रपट दिग्दर्शक मास्टर विनायक, अभिनेते बाबूराव पेंढारकर आणि कॅमेरामन पांडुरंग नाईक यांनी ‘कोल्हापूर सिनेटोन'पासून फारकत घेऊन ‘हंस पिक्चर्स'ची स्थापना केली होती. ही घटना सन १९३६ ची. नवशिक्षित प्रेक्षकांसाठी ध्येयधुंद सिनेमा काढून पदार्पणातच नावलौकिक कमावण्याचा त्यांचा मनसुबा होता. त्यांच्यापुढे आचार्य अत्रे आणि वि. स. खांडेकरांचे नाव होते. अत्रे त्या वेळी ‘उद्याचा संसार' नाटकात मग्न होते. म्हणून त्यांनी खांडेकरांना गळ घातली. त्यांनी 'छाया' ही आदर्शवादी कथा लिहून दिली. तो चित्रपट गाजला. त्याला चित्रपटसृष्टीचे पहिले ‘गोहर' सुवर्णपदक मिळाले. मग त्यांनी खांडेकरांकडे आणखी कथेची मागणी केली. पटकथा लिहायची म्हणजे निर्मितीपर्यंत अनेकदा चर्चा करावी लागते. खांडेकरांना प्रत्येक वेळी शिरोड्याहून येणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रासाचं होऊ लागले म्हणून हंस कंपनीने त्यांना कोल्हापुरात स्थायिक व्हायचं निमंत्रण दिले. त्यानुसार खांडेकर सन १९३८ ला कोल्हापूरला आले आणि मग कोल्हापूरच त्यांची कर्मभूमी बनली.  कोल्हापुरात पटकथा लेखनाबरोबर त्यांची साहित्यसाधनाही सुरूच होती. इथे त्यांचा परिचय स्कूल अँड कॉलेज बुक स्टॉलच्या दा. ना. मोघेशी झाला. ते पुस्तके प्रकाशित करीत. 'देवता' चित्रपटाच्या पटकथेवर आधारित ‘रिकामा देव्हारा' ही कादंबरी दा. ना. मोघंनी प्रकाशित केली. त्या वेळी ही कादंबरी चित्रपटगृहातही सिनेमाच्या तिकिटाबरोबर लोक विकत घेत. त्या काळी लोकांना चित्रपटाची पटकथा पुस्तिका, गाण्यांची पुस्तिका प्रचार, प्रसार, जाहिरात म्हणून दिली जायची. पुढे तर ‘सुखाचा शोध' चित्रपटावर आधारित कादंबरी चित्रपटातील छायाचित्रांसह प्रकाशित झाली व मराठी चित्रपटाच्या निर्मितीशी साहित्य जोडले गेले. यातून महाराष्ट्रात साहित्य आणि चित्रपट हातात हात घालून चालू लागले. या सांस्कृतिक अध्यायाचे जनक वि. स. खांडेकर ठरले.
 कोल्हापूरच्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्याची शिलेदारी वि. स. खांडेकरांकडे चालून आली. त्या काळात खांडेकर शाळा, महाविद्यालयांतून वाङ्मय मंडळ उद्घाटन, साहित्यिक चर्चाना उपस्थित राहत. करवीर नगर वाचन मंदिर, राजाराम कॉलेज, करवीर साहित्य सभा ही सांस्कृतिक केंद्रे म्हणून सक्रिय होती. कोल्हापुरात ना. सी. फडके, कवी माधव ज्यूलियन, डॉ. व्ही. के. गोकाक यांच्यासारखी मंडळी होती. करवीर नगर वाचन मंदिरात साहित्यिक कार्यक्रम होत. राजाराम कॉलेजमध्येही व्याख्यानांचे सत्र चालायचे. करवीर साहित्य सभा नवोदितांचे साहित्य प्रकाशित करीत असे. या काळात 'करवीरच्या कळ्या' हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता. या सा-यांत वि. स. खांडेकरांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन, मदत होत राहायची.
 वि. स. खांडेकरांमुळे अनेक साहित्यिक कोल्हापुरी येत राहिले. ग. त्र्यं. माडखोलकर, के. नारायण काळे, आचार्य शं. द जावडेकर, आचार्य स. ज. भागवत, प्रा. वा. म. जोशी ही अशी काही नावे सांगता येतील. नंतरच्या काळात शंकरराव किर्लोस्कर, ना. धों. ताम्हनकर, बा. भ. बोरकर, मामा वरेरकर, वि. द. घाटे, चि. त्र्यं. खानोलकर, प्रभृती साहित्यकार नित्य कोल्हापुरात येत राहिले ते खांडेकरांमुळेच. वि. स. खांडेकर यांच्या प्रोत्साहन, प्रेरणेने रणजीत देसाई, विजया राजाध्यक्ष, सुमती क्षेत्रमाडे, कवी सूर्यकांत खांडेकर, रा. वा. शेवडे गुरुजी, इत्यादी सारस्वत उदयाला आले आणि घडले.
 ‘भारत छोडो' आंदोलनामुळे कोल्हापुरात समाजवादी युवक सभा, राष्ट्रसेवा दल, स्टुडंट युनियनसारख्या संघटनांची स्थापना होऊन राष्ट्रीय चळवळ जोर धरू लागली. त्यांच्या शिबिर, उपक्रमांतून खांडेकरांची बौद्धिके, व्याख्याने नित्य होत राहिली. त्या वेळी भाई माधवराव बागल यांनी ‘अखंड भारत' नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. वि. स. खाडेकरांची ‘वटपत्रे' ही पत्रात्मक कादंबरी या साप्ताहिकांतून क्रमशः प्रकाशित होत होती. ती अद्याप अप्रकाशित आहे. कोल्हापूरच्या सर्वच वृत्तपत्रांतून वि. स. खांडेकर लिहीत होते. स्वातंत्र्योत्तर काळात नामदेवराव व्हटकर हे दलित कार्यकर्ते ‘दलित सेवक' नियतकालिक प्रकाशित करीत असत. त्यातही खांडेकर अस्पृश्यता निर्मूलनासंबंधी लिहीत. अशा लेखांचे एक पुस्तक ‘ध्वज फडकत ठेवूया' सन १९७५ ला प्रकाशित झाले. या पुस्तकाने दलित साहित्यास मोठी प्रेरणा देण्याचं ऐतिहासिक कार्य केले.
 वि. स. खांडेकरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भाई माधवराव बागल यांच्यावर लेख लिहून त्यांच्या पुरोगामी कार्य कर्तृत्वाचा गौरव केला । होता. यशवंतराव चव्हाण कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना वि. स. खांडेकरांचे साहित्य नित्य वाचीत. आपली घडण करण्याचे श्रेय ते वि. स. खांडेकरांना देत आले आहेत.
 महाराष्ट्राच्या स्वतंत्र राज्यनिर्मितीनंतर मराठी भाषा व साहित्यास प्रोत्साहन देणाच्या ज्या अनेक घटना घडल्या त्यांतून एका नव्या सांस्कृतिक पर्वाचा शुभारंभ झाला. उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कारांचा प्रारंभ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, शिवाजी विद्यापीठ निर्मिती या सर्वांत वि. स. खांडेकरांची भूमिका साहाय्याची राहिली. सन १९६२ ला शिवाजी विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांत वि. स. खांडेकर होते. शिवाजी विद्यापीठांत त्यांची अनेक व्याख्याने झाली. विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात वेळोवेळी खांडेकर साहित्याचा अंतर्भाव करून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला. वि.स.खांडेकरांना भारतीय ज्ञानपीठाचे मराठीस मिळालेले पहिले पारितोषिक लाभले. शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट्. पदवी बहाल करून गौरविले.
 वि. स. खांडेकरांनी समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आचारधर्म म्हणून स्वीकारली होती. ती स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलेल्या नव्या पिढीत रुजावीत म्हणून आंतरभारती शिक्षण मंडळाची स्थापना केली व आंतरभारती विद्यालय सुरू केले. त्याच्या माध्यमातून वि. स. खांडेकरांनी संस्कारशील शिक्षणाचा प्रारंभ कोल्हापुरात केला.
 वि. स. खांडेकरांनी कोल्हापुरात राहून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीस गती दिली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्मशताब्दी, कवी भा. रा. तांबे गौरव समिती, इत्यादी माध्यमांतून खांडेकरांनी मौलिक ग्रंथसंपादने, हस्तलिखित इत्यादी संकलनाद्वारे मराठी साहित्य समृद्ध करण्यात मोलाचे योगदान दिले.
 स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचं नेतृत्व वि. स. खांडेकरांकडे होतं. तेव्हा भारताचे बौद्धिक आणि कूट धुरीणपद आचार्य विनोबा भावे करीत होते. भारताने जी स्वप्ने घेऊन स्वातंत्र्य प्राप्त केलं होतं ती स्वप्ने स्वराज्यकाळात एकामागोमाग एक धुळीला मिळत जात होती. वि. स. खांडेकरांसारखा संवेदनशील लेखक या स्थितीत अस्वस्थ आणि व्यथित होता. सन १९५८ ची गोष्ट असेल. भूमिहीन शेतकऱ्यांंना जमीनदारांनी आपल्याकडील अतिरिक्त, अनावश्यक जमीन दान करावी म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी भारतभर पदयात्रा काढली होती. मे, १९५८ मध्ये विनोबांचा कोल्हापूर दौरा होता. वि. स. खांडेकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील साहित्यिकांनी भेट घेऊन मार्गदर्शन मागितले होते. आचार्य विनोबांना एक प्रश्नावली अगोदरच पाठविण्यात आली होती. ती आजही आपणास शिवाजी विद्यापीठातील वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयात वाचावयास मिळते. या भेटीप्रसंगी महाराष्ट्रातून नामवंत साहित्यिक दुर्गा भागवत, विंदा करंदीकर, दि. के. बेडेकर, विश्राम बेडेकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, प्रभृती साहित्यिक उपस्थित होते. भेट जयसिंगपूरला झाली. विनोबा दीड तास साहित्यिकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. प्रश्न वि. स. खांडेकरांनी तयार केले होते. गंभीर गोष्ट अशी की, विनोबांच्या उत्तरांकडे आपण पाठ फिरविली आहे. आजच्या भारताच्या स्थितीचं रहस्य या उत्तरांत आहे.
 वि. स. खांडेकरांच्या नेतृत्वाखाली किती तरी सार्वजनिक, सांस्कृतिक सोहळे कोल्हापूरने अनुभवले. गानकोकिळा लता मंगेशकर असा जो उल्लेख आज सर्रास आपण करतो, त्याची सुरुवात कोल्हापूरातून झाली. लता मंगेशकर यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले ते वि. स. खांडेकरांच्या ‘माझं बाळ'पासून व तेही कोल्हापुरातच. लता मंगेशकरांनी चित्रपटाला पहिला आवाज दिला, तो कोल्हापुरातच. त्यांचा सन १९६८ साली कोल्हापूर नगरपालिकेतर्फे मानपत्र देऊन खासबाग मैदानात भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. नगराध्यक्ष एम. के. जाधव होते. त्या वेळी वि. स. खांडेकरांनी हृद्य भाषण केले होते. सत्कारास उत्तर देताना लता मंगेशकर यांनी कोल्हापूर, मास्टर विनायक, वि. स. खांडेकर यांचे ऋण व्यक्त करीत एक अविस्मरणीय, कृतज्ञतापूर्वक भाषण केलं होतं. ते भाषण त्यांच्या गाण्याइतकंच सुरेल होतं.
 सन १९५३ ला आचार्य अत्रे यांनी 'श्यामची आई' चित्रपट काढला. त्या चित्रपटास सुवर्णपदक मिळालं होतं. कोल्हापूरच्या बिंदू चौकात आचार्य अत्रे यांचा जाहीर सत्कार भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्याचे अध्यक्षपद वि. स. खांडेकरांकडे होते. वि. स. खांडेकर आणि आचार्य अत्रे यांनी हंस, प्रफुल्ल, नवयुग, इत्यादी चित्रपट कंपन्यांसाठी आलटून-पालटून पटकथा लिहिल्या होत्या. त्यामुळे अत्रे आणि खांडेकरांमध्ये मैत्र होते. त्याची जाहीर प्रचिती कोल्हापूरकरांनी अनुभवली होती.
 असाच एक प्रसंग आठवतो. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा अमृतमहोत्सवी जंगी सत्कार करायचा म्हणून चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, एक झाले. भालजींनी या सत्कारास विनम्रपणे, कृतज्ञतापूर्ण नकार दिला; पण पंचाहत्तरावा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला. त्या दिवशी त्यांनी पाच ज्येष्ठांचा आदरपूर्वक सत्कार करून, त्यांचे आशीर्वाद घेऊन वाढदिवस साजरा केला. त्या ज्येष्ठांत वि. स. खांडेकर एक होते.
 आज कोल्हापूरला चित्रपट, कला, साहित्य, संगीत, शिक्षणाचा जो समृद्ध वारसा लाभला आहे, त्यात वि. स. खांडेकरांचं योगदान अविस्मरणीय असं राहिलं आहे. आज कोल्हापूरला साहित्यिकांची जी मोठी परंपरा दिसते, तिचा पाया वि. स. खांडेकरांनी आपल्य ध्येयशील साहित्यातून घातला आहे. वि. स. खांडेकर माणूस, साहित्यिक, समीक्षक म्हणून स्वागतशील होते. त्यातून अनेक साहित्यिकांना प्रोत्साहन, प्रेरणा मिळाली आहे.
 | आज लोक कोल्हापूरची आठवण, स्मरण ज्या अनेक गोष्टींसाठी करतात, त्यात एक कृतज्ञ स्मरण वि. स. खांडेकरांचे असते. कोल्हापूरने वि. स. खांडेकरांना हजारोंच्या उपस्थितीत गौरविले. कोल्हापूरने मोठ्या जनसंख्येने दोन हृद्य सोहाळे अनुभवले. एक ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतरचा शाहू कुस्ती मैदानातील विक्रमी उपस्थितीचा गौरव सोहळा... त्याला सारे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ उपस्थित होतं आणि शेवटची निरोप यात्रा... महानिर्वाण... त्यालाही हजारो लोक उपस्थित होते... शासकीय इतमामाने, नागरी सन्मानाने त्यांनी घेतलेला निरोप... त्यांना कोल्हापूरने दिलेला निरोप कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनातील मैलाचा दगड ठरावा असा...

चंदनाच्या चितेवर त्यांना लाभलेली चिरशांती... चित्र विश्रांती... तो एक विकल करणारा सूर्यास्त होता; पण त्या सूर्यास्ताने भविष्यात अनेक सूर्य जन्माला घातले. आजही कोल्हापूरचे सांस्कृतिक संचित तसेच वृद्धिंगत होत आहे. (आ) वि. स. खांडेकर : एक तपस्वी शिक्षक


 सन १९१६ ते १९२० हा ऐन तारुण्याचा काळ वि. स. खांडेकरांच्या जीवनातील विलक्षण संघर्षाचा आणि वैचारिक घालमेलीचा होता. सन १९१३ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांंत ते बारावे आले होते. त्या वेळचा महाराष्ट्र म्हणजे गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र मिळून विशाल महाराष्ट्र होता, हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. मॅट्रिक होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात जानेवारी, १९१४ मध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण देण्याची घरची स्थिती नसल्याने त्यांना त्यांचे नाणेली (सावंतवाडी)तील काका सखारामपत खांडेकरांना दत्तक देण्यात आले. त्यांची सावकारी होती. मोठा जमीनजुमला होता; पण झाले उलटे. त्यांना मूलबाळ नसल्याने सावकारी व शेती पाहायला वारस हवा होता. वि. स. खांडेकरांना तर शिकायचे होते. पुण्याच्या मुक्कामात वाचन विस्तृत झालेले. नाटककार राम गणेश गडकरींचा सहवास लाभल्याने साहित्य, संगीत, काव्य, मनोरंजन, राजकीय, राष्ट्रीय परिस्थिती याविषयीचे त्यांचे आकलन विस्तारलेले होते. टिळक, आगरकर, महात्मा गांधी यांच्या विचार व ध्येयाचा विलक्षण परिणाम त्यांच्यावर झालेला होता.
 शिक्षण मिळणार नसेल तर स्वावलंबी होऊन स्वतंत्र जीवन जगावे या विचाराने ते पुण्याहून सावंतवाडीस परतले. इथे मेघश्याम शिरोडकरांसारखा तरुण, ध्येयवादी समविचारी तरुण भेटला. ग्रंथालय चालविणे, व्याख्याने योजणे, मित्रांना वाचलेले समजावून सांगणे या धडपडीतून त्यांच्या बुद्धिमत्तेचा गवगवा परिसरात झालेला. ते उपचारासाठी म्हणून बांबुळी मुक्कामी असताना त्यांची महती घनश्याम आजगावकर यांच्या कानी पडली. ते शिरोड्याच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते.  त्यांच्या शाळेत जून, १९२० पासून पाचवीचा वर्ग सुरू होणार होता. त्यांना इंग्रजी व संस्कृत शिक्षकाची गरज होती. एप्रिलच्या प्रारंभी त्यांनी खांडेकरांना गाठले. एव्हाना खांडेकरांचे लेख, कविता विविध मासिकांतून प्रकाशित होऊ लागल्याने लेखक म्हणूनही लोक त्यांना ओळखू लागले होते.
 वि. स. खांडेकरांनी शिरोडा हे खेडे आहे, याची खात्री करून घेतली. ते १२ एप्रिल, १९२० रोजी सावंतवाडीहून चालत शिरोड्याला आले. त्यांच्यासोबत त्यांचे उपाध्याय अनंत ढोरे होते. हातात एक पिशवी होती. पिशवीत दोन पुस्तके होती. पैकी एक होते ‘केशवसुतांची कविता'. शिरोड्याच्या एकटेपणात या पुस्तकाने साथ दिली व सामर्थ्यही. पावणेसहा फूटांची उंच, कृश देहयष्टी, शर्ट, कोट, धोतर, टोपी असा स्वदेशी पेहराव. डोळ्यांवर चांदीच्या काडीचा जाड भिंगांचा चष्मा. पायी चप्पल. हातात छत्री. अशा अवतारात शिरोड्यात आलेल्या खांडेकर मास्तरांना पाहण्यात लोकांना मोठं औत्सुक्य होतं. ‘ह्योरे काय शिकयतलो पोरांक?' असा प्रश्न सर्वांच्या चेह-यावर होता.
 दुस-या दिवसापासून प्रत्यक्ष शिकविण्याचे काम सुरू झाले. तत्पूर्वी पंधरा दिवसांसाठी खांडेकर मास्तरांची राहायची सोय शाळेने नाबरवाड्यातील बापू खांडेकरांच्या घरी केली होती. मे महिन्याच्या सुट्टीपूर्वी शाळा अजून पंधरा दिवस चालणार होती. दुसरीचे इंग्रजी व चौथीचे संस्कृत, कुणाचं मराठी तर कुणाचे गणित असं पडेल ते खांडेकर मास्तर शिकवित राहिले. या काळात त्यांची ओळख शिवारी मास्तर, अप्पा नाबर, डॉ. राजाध्यक्ष, प्रभृतींशी झाली. शाळा सुटल्यावर खांडेकर सहकाऱ्यांसह शिरोडा, आरवली, रेड्डीचा परिसर पाहून इथलं वातावरण, लोक, निसर्ग व प्रश्न समजावून घेत होते.
 शिरोड्याचा परिसर रमणीय होता. शाळेच्या विद्यार्थ्यात नाबर, नाडकर्णी, बावडेकर, कालेलकर यांच्या बरोबरीने गावडे, परब, तांडेल, नाईक, आरोंदेकर नावे भेटत. शाळेत सर्व जातिंची मुले पाहून खांडेकर सुखावले. हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागले की, आपले विद्यार्थी पाडपी, भारेवाले, गाबतिणी, शेतकरी यांचे अधिक आहेत. ती त्यांच्या घरातली शिकणारी अशी पहिली मुले होती. समाजाच्या या शिलावस्थेचे चित्र पाहून खांडेकरांमधील शिक्षक व लेखक एकाच वेळी प्रेरणा, संवेदना, ध्येयाच्या हिंदोळ्यावर झोके घेत राहायचा.  शाळेत मुलींची संख्या लक्षणीय होती.म्हणून प्रयत्न करणाऱ्या खांडेकरांना ग्रामस्थ परभारे म्हणत राहायचे, "ह्यो आमका समाजना नाय, पण नयीन आसा. बरां लागतां! ह्यो मास्तर पोरांबरोबरी पोरींकय शिकूक सांगताहा मरे! मुलींका शाळेत धाडा म्हणताहा! ह्या खांडेकर मास्तरांक आणि आबा नाबराक, लागलाहा खूळ! समाजशेवा करतहत! डोंबलाची समाजसेवा!" इतक्या उपेक्षेनंतरही खांडेकर शाळेत शिकवित राहिले. प्रयत्न करीत राहिले.
 वि. स. खांडेकर शिरोड्याला शिक्षक म्हणून आले ते स्वतःचे सुखदुःख विसरून; मनात, उराशी ध्येय बाळगून. पिढ्यानपिढ्या ज्यांच्या दाराशी शिक्षणाची गंगा कधीच गेली नव्हती, अशा मुलांना शिकवायच्या इराद्याने ते आले होते. गेली चार वर्षे (१९१६ ते १९२०) खेड्यातील लोकांसाठी काही करण्याचा ध्यास त्यांच्या मनाने घेतला होता. शिरोड्याने ती संधी दिली. महात्मा गांधींनी सन १९१८ साली निळीच्या मजुरांसाठी केलेला सत्याग्रहाचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडला होता. असे काहीतरी अद्भुत, नवे, सांस्कृतिक परिवर्तनाचे काम करण्याची त्यांच्या मनात ऊर्मी सुरसुरत होती. आगरकर, केशवसुतांचे निबंध नि काव्य अस्वस्थ करीत होते-

गत शतकांची पापे घोरे।
क्षाळायाला तुमची रुधिरे।
पाहिजेत रे, स्त्रैण न व्हा तर।

सारख्या केशवसुतांच्या कवितेच्या ओळी सामाजिक प्रायश्चित्त घेण्याची एक प्रकारे प्रेरणाच देत होत्या. यातून त्यांनी शिरोड्याला राहायचा बेत पक्का केला.
 पण व्यवहारतः हे सोपे नव्हते. वाचनाची भूक भागविणारी छोटी लायब्ररी गावात होती; पण वाचलेले कुणाशी बोलण्या-चर्चिण्याची सोय नव्हती. आक्काला घेऊन घर थाटले होते; पण तुटपुंज्या पगारात ओढाताण होत राहायची. वीस रुपये पगार हाती यायचा. तोही हप्त्याने मिळायचा. एखाद्या हप्त्यात तांबडे पैसेही घ्यावे लागत. कोकणाचं अठरा विश्वे दारिद्रय, माणसांचे पशुवत जिणे, जातीयता, अंधश्रद्धा, अज्ञान या सर्वांपुढे त्यांना आपले दुःख कसपटाप्रमाणे वाटायचे. पायपीट करून येणारी पंचक्रोशीतील उपाशी मुलं त्यांच्या डोळ्यांतील ज्ञानपिपासेपुढे ते सारी प्रतिकूलता मागे टाकून शिकवित राहत. शाळा मारुती मंदिर, निखारगे माडी, कोटणीस माडी अशी त्रिस्थळी भरायची. शिकविण्यात व्यत्यय नित्याचा; पण तरी त्यावर मात करून ते शिकवित राहत.
 अप्पा नाबरांनी शाळेला जागा देऊ केल्यानंतर इमारत उभारणीसाठी संस्था व शाळेच्या शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले. त्याला संमिश्र प्रतिसाद लाभला. शाळेचे हितचिंतक मुंबईकर, माजी विद्यार्थी धनिक देणगीदारांचे पाठबळ लाभले. स्थानिकांपैकी काही व्यापारी मंडळींचा विरोध असे तो शाळा कुणाची? या प्रश्नावर. प्रसंगी धमक्या येत. ‘शाळा जाळू. समुद्रावर एकटे फिरायला जाता. मारू.' पण त्यापेक्षा सकारात्मक समर्थन मोठे होते. म्हणून इमारत उभी राहिली. याच काळात ‘गरीब विद्यार्थी फंड' उभारला गेला. पुढे ‘माजी विद्यार्थी मंडळ' अस्तित्वात आले. व्याख्यानमाला सुरू झाली. सहभोजनाचे कार्यक्रम झाले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, न. चिं. केळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी बा. भ. बोरकर, आचार्य प्र. के. अत्रे, मास्टर विनायक, अभिनेते बाबूराव पेंढारकर, मामा वरेरकर, कवी यशवंत अशी अनेक मंडळी शाळेस भेट देत गेली. शाळेची प्रसिद्धी महाराष्ट्रभर पसरली. शाळेस प्रतिष्ठा मिळाली ती सहली, काव्य संमेलने, पोहोण्याचे वर्ग अशा अनेक उपक्रमांतून, गावजत्रांतून शाळेला मदत मिळत गेली. भास्कर गोठोस्कर, व्ही. डी. दाभोळकर, डॉ. भि. अ. परब, चं. वि. बावडेकर, प्रा. वि. वि. दळवी, जयवंत दळवी, ब्रह्मानंद नाडकर्णी, प्राचार्य वा. श. नाबर, प्रभृती मान्यवर विद्यार्थी खांडेकरांच्या श्रमाचे फळ होय.
 शिरोड्यातील वास्तव्यातील चढउतारात खांडेकरांना तारले ते त्यांच्या साहित्यलेखनाने. 'नवयुग', 'महाराष्ट्र साहित्य'सारख्या मासिकांतून त्यांनी लिहिलं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा नि त्यांचा परिचय व्हायला ‘वैनतेय' साप्ताहिकाचे संपादन, लेखन कारणीभूत ठरले. न. चिं. केळकर त्यांना ‘गाढवाच्या गीता'मुळे ओळखू लागले; तर ‘घर कोणाचे?' कथेमुळे कोल्हटकर. 'आदर्श', 'कुमार' या टोपणनावाने त्यांनी 'होळी'सारख्या अनेक कविता रचल्या.भालेरावांच्या ‘अरविंद' मासिकातून ते समीक्षक झाले. कवी विनायकांवर लिहिलेला ‘गाण्यांचे गाणे' लेख अनेकांना भावला. ‘निबल द्या' लघुनिबंधाने खांडेकरांना लघुनिबंधक बनविले; तर 'छाया', ‘ज्वाला' चित्रपटांनी पटकथाकार. शिरोड्यात असतानाच वि. स. खांडेकर बडोदे, मडगाव येथे संपन्न साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. व्याख्याते म्हणून त्यांचा लौकिक मुंबई, पुण्यापर्यंत पोहोचला होता.
 शिक्षक म्हणून वि. स. खांडेकरांनी अभ्यासक्रमाबाहेर जाऊन शिकवत आपल्या विद्यार्थ्यांचा पिंड घडविला. गरीब, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांकडे ते आपुलकीने लक्ष देत. त्यांना नादारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत. काही गरीब विद्यार्थ्यांना तर ते आपल्या घरी ठेवून घेत असत. मुलांबरोबर मुलींना शिकता यावे म्हणून ते सर्व ते प्रयत्न करीत.  पालकांची मने वळवीत. घरी जाऊन विनंती करीत. मुलींना बाजाररस्त्याने शाळेस येणे जड जायचे. त्या आडवाटेने शाळेत येत असत. वि. स. खांडेकरांनी केशवसुतांची कविता 'तुतारी' ‘सावळ्या तांडेलाची गोष्ट', ‘फ्रेंच राज्यक्रांती विद्यार्थ्यांना शिकविली. त्या शिकवणीने विद्यार्थ्यांची आयुष्यभर पाठराखण केली. मुलांसाठी ग्रंथालय, जिमखाना, क्रिकेट, बालवीर पथके (स्काऊट) सुरू केले. सुट्टीतील वर्ग हे खांडेकर मास्तरांचे आगळे वैशिष्ट्य! या तासांना घंटेचे बंधन नसायचे. मनसोक्त शिकविण्याकडे त्यांचा कल असायचा. शिकविताना अवांतर म्हणून सांगितलेल्या गोष्टींमुळे विद्यार्थी बहुश्रुत होत. शिकवणं हितगुज असायचे. ऐकत विद्यार्थ्यांची समाधी लागायची.
 वि. स. खांडेकर सन १९३८ ला चित्रपट लेखनासाठी कोल्हापूरला गेले. नंतर एक-दोनदा शिरोड्याला येणे घडले ते समारंभ, सत्काराच्या निमित्ताने. सन १९७१ ला ते शिरोड्यात अनेक वर्षांनी आले. निमित्त ‘वैनतेय' सत्काराचं. त्यास जोडूनच ते शिरोड्यात आले होते. शिरोडकरांनी त्यांची मोठी सवाद्य मिरवणूक काढली. मोठा जाहीर सत्कार केला. आरवलीच्या घरी येऊन ते सुखावले. म्हणाले, 'आज खूप वर्षांनी आरवलीतल्या घरी आलो. ‘उल्का', 'वत्सला' पुन्हा भेटल्या. (या नायिका याच घरात जन्मल्या) ते हिरवेगार दिवस आयुष्याच्या हिवाळ्यात फुलले. आजच्या शिरोड्यावर एक कादंबरी लिही असे कानांत गुणगुणत निघून गेले.' जाहीर सत्कारास उत्तर देताना त्यांनी शिरोडकरांना आवाहन केले, ‘जे बदलायचे, घडवायचे ते स्वतः; भारतीय जीवनातील द्वितीय पुरुष आता संपवा. विज्ञानाच्या झंझावाताने माणुसकीचा दिवा विझू देऊ नका.' ही त्यांची शिकवण अमलात आणणे हेच या शाळेच्या शताब्दी वर्षाचे लक्ष्य असले पाहिजे. तोच आपला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संकल्प व आचारधर्म बनायला हवा. (इ) वि. स. खांडेकर : सार्वकालिक साहित्यिक


 मराठी भाषा व साहित्यास पहिले भारतीय ज्ञानपीठ मिळवून देणारे साहित्यिक म्हणून मराठी सारस्वतात वि. स. खांडेकरांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते भारतीय साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे एक महत्त्वपूर्ण साहित्यिक होत. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, रूपककथा, पटकथा मराठीपलीकडे कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, सिंधी, उर्दू, बंगाली इ. भारतीय भाषांत अनुवादित झाल्या आहेत. पैकी गुजराती, तमिळमध्ये तर खांडेकर त्या भाषेचे लेखक म्हणून ओळखले जातात. याचं कारण त्यांच्या साहित्यातील समाजभान, मूल्यनिष्ठा, मिथकांची आधुनिक चिकित्सा, भाषासौंदर्य होय. हे वर्ष त्यांच्या चित्रपट सृष्टीच्या पदार्पणाचे अमृतमहोत्सवी वर्ष होय. त्यानिमित्ताने वि. स. खांडेकरांच्या साहित्याचं मृत्युंजयी स्वरूप समजून घ्यायला हवं.
 ही गोष्ट असावी सन २००१ ची. ते वि. स. खांडेकरांचे ‘रजत स्मृती वर्ष' होते. माझ्या हाती जया दडकर यांनी संपादित केलेली ‘वि. स. खांडेकर वाङ्मय सूची' आली. ती अभ्यासत असताना असं लक्षात आलं की, खांडेकरांचे बरेच साहित्य असंकलित आहे. ते मिळवून संपादित, प्रकाशित करण्याचा विचार मनात आला. मी वि. स. खांडेकरांची कन्या श्रीमती मंदाकिनी खांडेकर यांच्याकडे ही कल्पना मांडली. त्यांनी प्रकाशनाची परवानगी तर दिलीच; पण वि. स. खांडेकरांचं अप्रकाशित काही साहित्यही उपलब्ध करून दिले. त्यामुळे मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणेच्या अनिलभाई व सुनीलभाई मेहतांमुळे गेल्या दशकात मराठी वाचकांना मी खांडेकरांची नवी पुस्तके उपलब्ध करून देऊ शकलो. त्यात १ कादंबरी, ४ कथासंग्रह, १ रूपक कथासंग्रह, ४ लघुनिबंधसंग्रह, ३ वैचारिक लेखसंग्रह, २ आत्मकथने, १ मुलाखतसंग्रह, १ पटकथासंग्रहाचा समावेश आहे.  या नवप्रकाशित साहित्याच्या नव्या आवृत्त्याही सतत प्रकाशित होत आहेत. यावरून वि. स. खांडेकर हे एकविसाव्या पिढीच्या वाचकांचेही लेखक आहेत हे सिद्ध होतं. वि. स. खांडेकरांच्या जीवन व साहित्याचा पुनर्शोध घेत एक तप मागे पडले. या पुनर्शोधात माझ्या असं लक्षात आलं आहे की, खांडेकर हे सार्वकालिक (Perpetual) साहित्यकार होत. त्यांचं हे सार्वकालिकत्व त्यांच्या लेखनसमग्रतेतूनही येतं. खांडेकरांनी कथाकादंबरीशिवाय लघुनिबंध, रूपककथा, भाषांतर, संपादन, नाटक, कविता, पटकथा, आत्मकथा, वैचारिक, समीक्षा, व्यक्तिलेख, स्तंभलेखन, चरित्र, व्यक्ती आणि वाङ्मय, पत्रलेखन, मुलाखती अशा विविध रूपांतून आपले विचार, साहित्य, दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. साहित्यिक खांडेकर चतुरस्त्र साहित्यिक म्हणून पुढे येतात, ते या बहुआयामी लेखनामुळे. खांडेकरांच्या कादंबऱ्या आपणास समाजवाद, गांधीवाद, आदर्शवाद समजावत समानता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षतेसारखी जीवनमूल्ये देतात. ‘क्रौंचवध' कादंबरीत निषाद क्रौंच पक्ष्याचा वध करतो. त्या निषादापाशी धनुष्यबाण आहेत. प्रत्येक अन्यायाच्या पाठीशी अशीच पाशवी शक्ती उभी असते. ही शक्ती बुद्धीला विचारीत नाही किंवा भावनेला भीक घालीत नाही. संहारक उन्मादाच्या नादात ती तांडवनृत्य करीत सुटते. तिच्या उन्मत्त टाचांखाली चिरडले जाणारे निरपराधी जीव तडफडत, चित्कारत राहतात; पण त्या चित्कारांनी अन्याय्य हृदयाला थोडासुद्धा पाझर फुटत नाही. फुटणार कुठून? विनाशातच त्याला पुरुषार्थ वाटतो. पाशवी शक्तीच्या प्रदर्शनातच त्याच्या अहंकाराचे समाधान होते. या खांडेकरांच्या कालत्रयी चिंतनाचं सार्वकालिकत्व ज्यांना अनुभवायचे असेल त्यांनी ‘निषाद'च्या जागी कसाब घालून वाचलं तरी पुरे. (मग बाणाची जागा बंदूक आपोआप घेईलच!)
 खांडेकरांच्या कथा आजही वाचल्या जातात; कारण वैश्विक कथेची सर्व वैशिष्ट्य त्यांत आढळतात म्हणून. ओ हेन्रीचे कलाटणी तंत्र (नाट्य), चेकॉव्हची चिकित्सा शैली, फ्रॉइडचे मनोविश्लेषण, मार्क्सचे द्वंद्व, सामाजिक घालमेल (दोन पतंग, ऊन-पाऊस, स्वर्ग आणि नरक इत्यादी कथा) महात्मा गांधींची मूल्यधारणा, समाजवादाचे पंचशील घेऊन येणारी खांडेकरांची कथा माणसाच्या सार्वकालिक समस्या चित्रित करते. तीच गोष्ट रूपक कथांची. 'बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी' असो वा शेवटची ‘मृत्यू' किंवा अगदी प्रारंभीची ‘चकोर आणि चातक' सर्वांत कला आणि विचाराचे अद्वैत, कल्पनाविलासातील तार्किकता, भाषासौंदर्य यांमुळे खांडेकरांच्या रूपककथा पंचतंत्रातील निसर्ग आणि इसापनीतीतील बोध घेऊन अवतरतात.त्यात मनोरंजकताही असते व वाचकास अंतर्मुख करण्याची शक्तीही!  वि. स. खांडेकर भारतीय साहित्यिक जसे होते, तसे भारतीय पटकथाकारही ! त्यांनी मराठी १४, हिंदी १०, तमिळ २, तेलगू २ अशा तब्बल २८ चित्रपटांसाठी पटकथा लिहून मराठी साहित्यिकांत एक कीर्तिमान स्थान स्थापित केलं आहे. या पटकथांचा संग्रह ‘अंतरीचा दिवा' नुकताच प्रकाशित झाला आहे. तो वाचताना आपल्या लक्षात येते की, खांडेकर गंभीर सामाजिक पटकथा जशा लिहीत तशा विनोदीही! चिं. वि. जोशींचा ‘चिमणराव' आणि 'गुंड्याभाऊ' खांडेकरांनी ‘सरकारी पाहुणे'व'लग्न पाहावे करून'सारख्या चित्रपटांतून मराठी मनात चिरंजीव केला. त्यांच्या ‘माझं बाळ' चित्रपटाने कुमारी माता व त्यांच्या मुलांना सामाजिक न्याय तरी दिलाच; पण महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 'भारतरत्न' मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. याच चित्रपटात मंगेशकर भावंडं बाल अभिनेते म्हणून पडद्यावर आली. दानापानी, सुभद्रा, विश्वामित्र, बड़ी माँ हे गाजलेले हिंदी चित्रपट. त्यांच्या पटकथा खांडेकरांनी लिहिल्या होत्या, हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटतं; कारण खांडेकरांच्या चित्रपटसृष्टीतील कार्यकर्तृत्वाचा इतिहास आजवर झाकोळलेलाच राहिला होता. तो ‘अंतरीचा दिवा'मुळे प्रथमच प्रकाशात आला. यातील मराठी-हिंदी चित्रपट अधिकांशतः मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांच्या निर्मिती, दिग्दर्शन व अभिनयामुळे एक नवे पर्व निर्माण करून गेले. आज मराठी चित्रपटसृष्टीची शताब्दी साजरी होत असताना त्याचे ऐतिहासिक मोल महत्त्वाचे ठरले. खांडेकरांच्या साहित्याने जशी पिढी घडवली, तसेच या चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांची अभिरुची सुसंस्कृत केली. खांडेकरांनी पटकथांबरोबर चित्रपटसंवाद,चित्रपट गीतेही लिहिली. चित्रीकरणासाठी आवश्यक दृश्यनिहाय कथालेखन, फ्रेम साठी आवश्यक Cut, inter-cut, Quick Disolve, mix, Fed out, fed in चे तंत्र खांडेकरांना चांगले अवगत होते. भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सिने पारितोषिक ‘गोहर मेडल' खांडेकरांच्या पहिल्या ‘छाया' पटकथेस लाभले होते, यावरूनही हे स्पष्ट होते. हृदयनाथ मंगेशकर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आले ते खांडेकरांची ‘अंतरीचा दिवा' पटकथा घेऊनच. खांडेकरांचे चित्रपट प्रेक्षकांना भावविकल करीत असत. चित्रपटगृहात तिकिटांबरोबरच खांडेकरांच्या पटकथेच्या कादंबऱ्याही विकल्या जात. हे वैभव लाभलेले खांडेकर हे मराठीतील एकमेव साहित्यिक होत.
 वि. स. खांडेकरांच्या या पुनर्शोधात त्यांची जीवन व साहित्यविषयक अनेक साधने, छायाचित्रे, हस्तलिखिते माझ्या हाती आली. खांडेकर कुटुंबीयांनी पद्मभूषण, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी पुरस्कार, सन्मानपत्रे, मानपत्रे इत्यादी मूळ मौल्यवान वस्तू भेट दिल्या. त्यातून भारतातलं साहित्यिकाचं पहिलं शास्त्रोक्त स्मृती संग्रहालय शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या सहकार्यानं तिथंच उभारण्यात आलं आहे. एखाद्या विद्यापीठाने निर्मिलेलं हे साहित्यिकाचं पहिलं स्मृतिसंग्रहालय असावं. इथे कान कोरण्यापासून कर्ण्यापर्यंत लेखकाच्या वापरातील सर्व वस्तू आपणास पाहण्यास मिळतात. जन्मकुंडली ते मृत्यू असा एका लेखकाचा सजीवप्रवास अनुभवण्यासाठी प्रत्येक साहित्यप्रेमींने हे संग्रहालय पाहिलंच पाहिजे. त्याची एक-दोन उदाहरणं पुरेशी ठरावीत. भारताच्या नियोजन मंडळाचे सदस्य असताना डॉ. भालचंद्र मुणगेकर हे संग्रहालय पाहण्यास आले होते. संग्रहालयात खांडेकरांचे भाषण त्यांच्याच आवाजात ऐकवले गेले... ते ऐकत ओक्साबोक्शी रडत राहिले. कवी ग्रेस पाहण्यास आले होते... भावुक झाले. मला म्हणाले, “यार, क्या हमारी कब्र भी ऐसे शानो-शौकत के काबील होगी?" आणि कितीतरी वेळ नंतर डोळे मिटून त्यांचे मौन... मोठे बोलके होते. तिथली लेखकाची पडवी पाहत असताना असे वाटते की, आत्ताच खांडेकर काही लिहून उठून गेले असावेत. संग्रहालयाचा प्रवेशापासून ते शेवटपर्यंतचा प्रत्येक क्षण म्हणजे खांडेकर युगाची अनुभूती. समग्र छायाचित्रे, पुस्तके, पदव्या, मार्क्सलिस्ट, मस्टर, रेल्वे तिकिटं, इन्कम टॅक्स रिटर्न, चेकबुक, विमा पावत्या, स्मृती तिकिटें, भेटवस्तु, चित्रपट छायाचित्रे, हस्ताक्षरे ,वाचलेली, खुणा केलेली वर्तमानपत्रे, वह्या, पुस्तके, खर्डे पाहणं म्हणजे लेखक शेजारीच असल्याचा भास! शेक्सपियरचे स्मृती स्मारक ज्यांनी ज्यांनी पाहिले, त्यांना इथे त्याची हटकून आठवण येते! कोल्हापूर आता संग्रहालयाची नगरी झालीय! त्यात हे न चुकता पाहावे असे आधुनिक संग्रहालय! याचे महत्त्व अशासाठी की, हे पाहिलेल्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण लेखक झाले पाहिजे. मोठ्यांना रुखरुख लागते, आपण लेखक झालो असतो तर...' हेच या संग्रहालयाचं यश!
 मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रांतात एका लेखकाचे सारे लेखन ग्रंथबद्ध होणे, त्याच्या समग्र साहित्याचे संशोधन होणे, त्याच्या अधिकांश साहित्याची भाषांतरे... तीही विविध भाषांत होणे, संपूर्ण संग्रहालय उभारणे, त्याला राष्ट्रीय मान-सन्मान लाभणे यातच त्या लेखकाचं थोरपण दिसून येते. हे वर्ष यशवंतराव चव्हाण यांचे शताब्दी वर्ष आहे. वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतरच्या सत्कार समारंभात ते म्हणाले होते की,“सामाजिक आशय असल्याशिवाय वाङ्मय परिणामकारक होत नाही, चिरस्थायी होत नाही,अक्षयही होत नाही..." कला ही जीवनाभिमुख असली पाहिजे, हा विचार ३०-३५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा थोर पुरुष आपल्यापुढे बोलतो आहे... आज एका अर्थाने त्या विचारांना मान्यता प्राप्त झाली आहे. ललित लेखकाजवळ भविष्याचा वेध घेणारी प्रतिभा असली पाहिजे... खांडेकरांच्या रूपाने मराठी साहित्याला ही भविष्यवादी दृष्टी आहे हे स्पष्ट झाले आहे. जर प्रतिभावान लेखकाचे विचार तामिळनाडूच्या माणसाला समजतात, काश्मिरी माणसाला समजतात तर ते जगातील कुठल्याही भाषेतील माणसाला समजणे शक्य आहे. अशा प्रतिभावान लेखकाचे विचार इंग्रजीसारख्या भाषेत मांडले गेले असते तर कदाचित त्यांना 'नोबेल प्राइज' मिळाले असते!
 या सर्व तपशिलांपलीकडे जाऊन मला पुनर्शोधात सापडलेले वि. स. खांडेकर 'माणूस' म्हणून अधिक मोठे वाटतात. ‘ध्वज फडकत ठेवू या' सारखे पुस्तक लिहून त्यांनी दलित व्यथांची तळी उचलली. 'नवी स्त्री'सारखी कादंबरी लिहून आधुनिक स्त्रीचे सुजाणपण अधोरेखित केले. अनेक समाजधुरिणांवर गौरव लेख लिहून त्यांचे जीवन महाराष्ट्राचा आचारधर्म बनविला. आपल्या संवादी वक्तृत्वाने महाराष्ट्रीयांची मनें कृतिप्रवण केली. दृष्टी गमावली तरी साहित्यसाधनेत जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लिहीत राहणारा हा शब्दतपस्वी... त्याने आयुष्यभर वाचन, चिंतन, मनन, लेखन, संवादाची पंचसूत्री अविचल निष्ठेने जपत महाराष्ट्र समाज घडविला. त्याला भले कोणी आलंकारिक, पाल्हाळी लेखक म्हणत राहील; पण त्यांच्या उल्लेखाशिवाय आधुनिक मराठी भाषा व साहित्याचा इतिहास पूर्ण होणार नाही, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य होय; म्हणून वि. स. खांडेकर सार्वकालिक लेखक होत. (ई) वि. स. खांडेकर : आंतरभारती साहित्यिक

 मराठी भाषेस भारताचा ‘आंतरभारती पुरस्कार' मानले जाणारे ‘भारतीय ज्ञानपीठ' प्रथम मिळवून देणाऱ्या वि. स. खांडेकरांची आज ११७वी जयंती आहे. त्यानिमित्ताने वि.स.खांडेकरांचं आंतरभारती साहित्यिक म्हणून असलेलं स्वरूप,योगदान,महत्त्व समजून घेणं प्रसंगोचित होईल. वि. स. खांडेकरांनी मराठीत १७ कादंबऱ्या, ४३ कथासंग्रह, ४ रूपककथा संग्रह, १५ लघुनिबंधसंग्रह,१ प्रस्तावना संग्रह, ११ लेखसंग्रह,४ व्यक्ती आणि वाङ्मय ग्रंथ,४ व्यक्तिचित्रसंग्रह, १ चरित्र,३ आत्मचरित्रे, ४ अनुवाद ग्रंथ, १ पत्रसंग्रह, १ काव्यसंग्रह, ४ भाषणसंग्रह,१ मुलाखत संग्रह, १ नाटक, २५ संपादक ग्रंथ, ५ समीक्षा ग्रंथ,१ पटकथा संग्रह, १ वृत्तपत्र लेखसंग्रह असे सुमारे १५० ग्रंथांचे योगदान देऊन आपल्या साहित्य व लेखणीचं बहुविध व समग्र रूप सिद्ध केले आहे. वरीलपैकी अधिकांश ग्रंथ प्रकाशित असून, काही लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहेत. खांडेकरांच्या वरील साहित्यापैकी काही साहित्य इंग्रजी, हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलुगू, सिंधी, गुजराती, बंगाली, कन्नड इ. भाषांत अनुवादित झाले असून, त्या अनुवादित भाषांमध्ये खांडेकर त्या भाषेचे साहित्यिक म्हणून ओळखले जातात, हे ऐकून मराठी वाचकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
 उदाहरणच द्यायचं झालं तर तमिळ भाषेचं देता येईल. का. श्री. श्रीनिवासाचार्य हे खांडेकरांचे तमिळ अनुवादक. त्यांनी खांडेकरांच्या जवळजवळ सर्वच कथा-कादंबऱ्यांचे तमिळ भाषेत भाषांतर केले आहे. त्यांना खांडेकरांमुळेच भाषांतरकार असून साहित्यकाराचा सन्मान तमिळ जनतेने दिला. खांडेकरांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर मराठीपेक्षा अधिक उत्साहाने तमिळ जनतेने आनंद उत्सव साजरा केला.  मराठी व तमिळ भाषेत खांडेकरांच्या परिचयासंबंधी सार्वमत घेतले तर तमिळ भाषिक अधिक संख्येने निघतील, इतके खांडेकरांचे वाचक तमिळमध्ये आढळतात. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी. एन. अन्नादुराय यांनी सन १९४६ च्या दरम्यान ‘द्रविनाडु' या वृत्तपत्रात खांडेकरांच्या साहित्यातील उतारेच्या उतारे प्रकाशित केले होते. सन १९६५ नंतर तामिळनाडूमध्ये ‘द्रविड कळघम' आणि 'द्रविड़ मुनेत्र कळघम' ही तमिळ अस्मिता चळवळ सुरू झाली. तिचं नेतृत्व सी. एन. अन्नादुराय करत होते. त्या काळात ते आपल्या चळवळीच्या प्रचारार्थ खांडेकरांच्या विचारांचे दाखले मुखोद्गत सादर करीत. त्या चळवळीचं बळ खांडेकरी साहित्य होतं. आजही श्रीलंका, सिंगापूर, मलेशियामध्ये जी तमिळ ज्येष्ठ नागरिकांची पिढी आहे, त्यांची वाचक म्हणून पहिली पसंती खांडेकरच आढळून येते. तमिळमधील श्रेष्ठ कादंबरीकार व समीक्षक डॉ. मु. वरदराजन यांच्या लेखनावर खांडेकर शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे तमिळमध्ये खांडेकर आणि डॉ. मु. वरदराजन यांच्या साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करणारे संशोधन झाले आहे. तमिळ साहित्यिक पुदुमैप्पित्तन तर एकदा म्हणाले होते की, ‘महाराष्ट्र म्हणजे शिवाजी आणि खांडेकर.' डॉ. मु. वरदराजन मद्रास विद्यापीठाच्या तमिळ भाषा, साहित्य विभागाचे प्रमुख. पुढे ते मदुराई विद्यापीठाचे उपकुलपती झाले. त्या वेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठात आल्यावर वि. स. खांडेकरांची आवर्जून भेट घेतली होती. तामिळनाडूत परतल्यावर त्यांनी ‘कलैमहळ' मासिकात लेख लिहून ‘खांडेकर म्हणजे रूपक-निधी' अशी भलावण केली होती. सन १९४० ते १९५० दशकात तमिळ भाषिकांवर खांडेकरांच्या कथा-कादंबऱ्यांंनी गारूड केलं होतं. त्या काळात तमिळ भाषेत ‘चिरंजीवी' नावाचे मासिक प्रसिद्ध होते. (आता चिरंजीवी अभिनेता प्रसिद्ध आहे तसे!) त्या मासिकावर तत्कालीन मद्रास सरकारने अश्लील साहित्य प्रकाशित केल्याचा आरोप करीत खटला भरला होता. संपादकांनी आपण प्रकाशित केलेले साहित्य अश्लील नसल्याचे सांगत वि. स. खांडेकरांच्या ‘जळलेला मोहर' कादंबरीचा तमिळ अनुवाद ‘कारुगिय मोट्ट' ची प्रत सादर केली. ती ग्राह्य मानून न्यायालयाने संपादकांची निर्दोष मुक्तता केली होती. ‘कलैमहळ' मासिकाचे संपादक आणि विख्यात तमिळ समीक्षक, निबंधकार के. व्ही. जगन्नाथन यांनी तमिळ भाषेत खांडेकरांच्या साहित्यावर विपुल टीकालेखन केले आहे. वि. स. खांडेकरांच्या ‘सुखाचा शोध' कादंबरीचा तमिळ अनुवाद ‘सुगम अँगे' शीर्षकाने प्रसिद्ध झाल्यावर त्याची मोठी चर्चा झाली. मोठा बोलबाला झाला.  ‘सुगम अँगे'च्या अखंड पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्या कादंबरीच्या ‘उषा' नायिकेने तत्कालीन तरुण वाचकांना इतकं वेड लावलं की, १९४0 ते १९६० या दोन दशकांत आपल्या पत्नीचं नाव उषा ठेवण्याची मोठी लाट तत्कालीन प्रांतात आली होती. एका तरुणाने शेकडो पत्रे लिहून उषाचा शोध घेण्याचा आटापिटा केल्याचं सांगितलं जातं. खांडेकरांच्या १० कादंबऱ्या व सुमारे १०० कथांची तमिळमध्ये भाषांतरे उपलब्ध आहेत. तमिळ कथा, कादंबऱ्यांच्या इतिहासलेखनात ‘खांडेकरी साहित्य' असा स्वतंत्र कालखंड आजही नोंदविला जातो, यावरून खांडेकर साहित्याचे तमिळ भाषेतील महत्त्व लक्षात येते.
 जे कार्य का. श्री. श्रीनिवासाचार्य यांनी तमिळमध्ये केलं तसंच विपुल भाषांतर गोपाळराव विद्वांस यांनी गुजरातीत केलेलं दिसतं. विद्वांस यांनी सन १९४४ ला ‘क्रौंचवध' कादंबरीचे गुजरातीत भाषांतर केले. सन १९५२ ला त्या अनुवादाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली, तेव्हा गुजराती कादंबरीकार कै. रमणलाल व. देसाई यांनी खांडेकरांचं गुजरातीतील महत्त्व अधोरेखित करताना लिहिलं आहे, ‘मराठी कादंबरीकार श्री. खांडेकर हे गुजराती बहुजन समाजात अतिशय प्रिय झाले आहेत. परभाषेतील लेखक जेव्हा आपणास असा प्रिय वाटू लागतो, तेव्हा त्या लेखकापाशी काही त्याचे असे मूलभूत स्वत्व आहे, महत्त्व आहे, खरीखुरी मानवता त्यांच्या अंगी मुरलेली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.' गुजराती भाषेत वि. स. खांडेकर साहित्याच्या भाषांतराचा प्रारंभ सन १९३९ मध्ये कै. हरजीवन सोमैया यांनी केला. त्यांनी 'दोन ध्रुव' कादंबरी गुजरातीत अनुवादिली; पण खांडेकरांना गुजरातीत मान्यता मात्र मिळवून दिली ‘क्रौंचवध' कादंबरीने. सन १९४४ ला तिचे भाषांतर प्रकाशित झाल्यावर ‘जन्मभूमी' या गुजराती प्रमुख वृत्तपत्राने आठ कॉलम समीक्षा प्रकाशित करून ‘क्रौंचवध' प्रत्येक गुजराती घरात पोहोचवली. या भाषांतराची ही एक गंमत सांगितली जाते. ‘क्रौंचवध' गुजराती भाषांतर प्रकाशित केले, ते गुजरातीतील प्रथम क्रमांकाचे प्रकाशक आर. आर. शेठ आणि कंपनी यांनी. त्यांनी करार केला १००० प्रती प्रकाशित करण्याचा; पण प्रत्यक्षात छापल्या मात्र ५०० प्रती. गुजराती वाचकांना त्या वेळी भाषांतरे वाचण्याची सवय नव्हती. भाषांतर चालेल की नाही अशी शंका प्रकाशकांच्या मनात; पण त्यांना नंतर मात्र ‘क्रौंचवध'च्या अनेक आवृत्त्या वाचक पसंतीमुळे प्रकाशित कराव्या लागल्या, गुजरातीत आजमितीस १३ कादंबऱ्या, १० लघुकथासंग्रह, २ रूपक कथासंग्रह, २ लघुनिबंधसंग्रह शिवाय १ सुभाषित संग्रह भाषांतरित रूपात प्रकाशित आहे.  खांडेकरांच्या कथा, कादंबऱ्यांत सुभाषितवजा वाक्ये इतकी प्रभावी असतात की वाचकांना ती अधोरेखित करण्याचा मोह आवरता येत नाही. 'मुंबई समाचार' दैनिकाचे संपादक कै. मिनुभाई देसाई यांनी तर गुजराती भाषांतरित कथा, कादंबऱ्यांतील खांडेकरांची सुभाषिते एकत्रित करून सन १९५३ मध्ये ‘सुवर्ण रेणु' प्रकाशित केले. ते गुजराती वाचकांना इतके भावले की लगेच १९५५ ला प्रकाशकांना त्याची दुसरी आवृत्ती काढणे भाग पडले. तमिळ भाषेप्रमाणेच गुजराती वाचक वि. स. खांडेकरांना आपले वाटतात.
 तमिळ, गुजरातीप्रमाणेच हिंदीतही वि. स. खांडेकरांची विपुल भाषांतरे झाली आहेत. १३ कादंबऱ्या, ७ कथासंग्रह, ३ लघुनिबंधसंग्रह 'ययाति'वर आधारित 'नाटक' हिंदीत उपलब्ध आहे. शिवाय २ रूपक कथासंग्रहांची भाषांतरे झाली आहेत. विशेष म्हणजे खांडेकरांची शेवटची कादंबरी ‘सोनेरी स्वप्ने भंगलेली' मराठीत अपूर्ण आहे; पण खांडेकरांच्या प्राप्त खड्र्याच्या आधारे ती पूर्ण करून मी हिंदीत ‘स्वप्नभंग' शीर्षकाने सन १९८१ मध्ये प्रकाशित केली होती. वि. स. खांडेकरांचे तत्कालीन मराठी प्रकाशक देशमुख आणि कंपनी यांनी तर हिंदीतील खांडेकर वाचकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन हिंदी भाषांतरे प्रकाशित करणारे मराठी प्रकाशक म्हणून लौकिक मिळविला होता. इतकेच नव्हे तर हिंदी वाचकांना खांडेकरांचा आणि त्यांच्या साहित्याचा परिचय करून देणारी २५ पानी पुस्तिका (कॅटलॉग) हिंदीत प्रकाशित केली होती. ही सारी भाषांतरे रा. र. सरवटे यांनी केली होती.
 वरील भाषांशिवाय मल्याळी, कन्नड, इंग्रजी, बंगाली या भाषांत वि. स. खांडेकरांच्या साहित्याची भाषांतरे झाली आहेत. तेलगूमध्ये तर 'ययाति' कादंबरीचा अनुवाद भारताचे माजी भूतपूर्व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी केला आहे. ते तेलगू भाषिक असून, अस्खलित मराठी बोलत. कराड इथे त्यांनी केलेल्या सन २00३ मध्ये भरलेल्या ७५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना प्रसंगीच्या भाषणातून त्यांचे मराठी वाचन किती प्रगल्भ होते याचा प्रत्यय त्यांनी आणून देऊन मराठी श्रोत्यांना थक्क करून सोडले होते. कोट्यायम (केरळ)चे सुप्रसिद्ध मल्याळी प्रकाशक डी. सी. बुक्स यांनी नरसिंहराव यांचे वरील भाषांतर प्रकाशित केले होते.
 वि. स. खांडेकर केवळ कथा, कादंबरीकार म्हणून आंतरभारती साहित्यिक म्हणून प्रसिद्ध नव्हते; तर भारतीय चित्रपटसृष्टीत पटकथाकार म्हणून त्यांचा लौकिक होता.  खांडेकरांच्या पटकथांवर मराठी, हिंदी,तमिळ, तेलुगू भाषांत तब्बल २८ चित्रपटांची निर्मिती झाली होती. भारतीय चित्रपटसृष्टीत पुरस्काराची परंपरा सुरू झाली. सन १९३६ मध्ये. ती सुरू केली ‘कलकत्ता जर्नालिस्ट असोसिएशनने'. त्या वर्षीचे पटकथेचे ‘गोहर सुवर्णपदक' वि. स. खांडेकरांच्या 'छाया' चित्रपटास मिळाले होते. वि. स. खांडेकरांच्या पटकथांवर १४ मराठी, १० हिंदी, २ तमिळ, २ तेलगू चित्रपटांची निर्मिती झाली होती. ‘बड़ी माँ' या हिंदी बोलपटातून लता मंगेशकरांनी हिंदी पार्श्वगायिका म्हणून आपली कारकिर्द सुरू केली. लता मंगेशकरांसह सर्व भावंडांनी चित्रपटसृष्टीतील पहिला अभिनय, ‘स्क्रीन एंट्री' मिळवली, ती वि. स. खांडेकरांच्या 'माझं बाळ' चित्रपटातून. ‘दानापानी' या गाजलेल्या हिंदी चित्रपटाची पटकथा खांडेकरांची होती. त्यात भारतभूषण आणि मीनाकुमारीशिवाय शशी कपूरची भूमिका होती. सन १९५३ हे वि. स. खांडेकरांच्या चित्रपटाच्या दृष्टीने ‘आंतरभारती वर्ष' होतं असं म्हणावं लागेल. त्या वर्षी खांडेकरांचे मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू सर्व भाषांत चित्रपट प्रदर्शित झाले होते.
 वि. स. खांडेकर साहित्यिक म्हणून ‘आंतरभारती' मान्यता मिळवू शकले त्याचे रहस्य शतक उलटले तरी त्याचं साहित्य वाचलं जाण्यात जसं आहे, तसं ते साहित्यातील नैतिकता, मूल्यनिष्ठा, मानवता, गांधीवाद, समाजवाद यांच्या वैचारिक अधिष्ठानाबरोबर भाषासौंदर्य, सुभाषित शैली, अलंकार उपमा आणि रूपक, मिथक, प्रतीकांचा चपखल उपयोग करण्याच्या कलात्मकतेत सामावलेले आहे. त्यांच्या साहित्यात भाव, काव्य, भविष्यदृष्टी यांचा असलेला समन्वय भारतीय संस्कृतीचा स्वर बनून जातो; म्हणून ते सार्वभौमिक भारतीय साहित्यिक बनतात. अशी आंतरभारती प्रतिष्ठा लाभलेले खांडेकर मराठी साहित्यसृष्टीतील अपवादस्वरूप लेखक होत. त्यांच्या या आंतरभारती प्रतिष्ठेची नोंद भारतीय ज्ञानपीठाने बहाल केलेल्या प्रशस्तीपत्रात आवर्जून करण्यात आली आहे. त्यांचं ‘ययाति' कादंबरी असो वा ‘कांचनमृग', त्या मानवास नित्यनूतन जीवनदृष्टी व मूल्यनिष्ठा देत प्रलोभन, पाप, पैसा इत्यादींनी येणाऱ्या स्खलनशीलतेपासून नित्य दूर राहण्याची शिकवण देतात; म्हणून खांडेकर आंतरभारती साहित्यिक ठरतात. (उ) वि. स. खांडेकरांचे अचर्चित ललित साहित्य
 वि. स. खांडेकर मराठी साहित्यातील बहुप्रसव लेखक होते. त्यांचे साहित्य त्यांच्या हयातीत तर बहुचर्चित राहिलेच; पण त्यांचे निधन (२ सप्टेंबर, १९७६) होऊन आज सुमारे चार दशके उलटली तरी वाचक ते वाचतात, हे त्यांच्या नित्य नवप्रकाशित आवृत्त्यांवरून लक्षात येते. अन्य भारतीय भाषांत विशेषतः तमिळ, गुजराती, मल्याळम, हिंदी, कन्नड, सिंधी इत्यादींमध्ये खांडेकरांचे विपुल असे ललित साहित्य भाषांतरित झाले आहे. त्यातूनही त्यांच्या साहित्याचे अभिजातपण लक्षात येते. वि. स. खांडेकरांच्या हयातीत १६ कादंबऱ्या, ४० कथासंग्रह, ११ लघुनिबंध संग्रह, ३ रूपक कथासंग्रह, १ नाटक, ५ व्यक्ती व वाङ्मय (चरित्र/ समीक्षा), १ आत्मकथा असे विपुल ललित साहित्य प्रकाशित होऊनही बरेचसे त्यांचे ललित साहित्य असंकलित, अप्रकाशित होते.
 एकविसावे शतक उजाडत असतानाच्या काळात म्हणजे सन २००१ हे साल त्यांचे ‘रजत स्मृतिवर्ष होते. त्यांना निवर्तून २५ वर्षे उलटत असतानाही माझ्यासारख्या वाचकावर त्यांच्या साहित्याचे चढलेले गारूड उतरलेले नव्हते, हे आज त्यानंतरच्या तपभराचा काल उलटूनही माझ्या चांगले लक्षात आहे. विसावे शतक सरत असताना जया दडकर यांनी तयार केलेली ‘वि. स. खांडेकर वाङ्मय सूची' माझ्या हाती लागली. तत्पूर्वी मी त्यांचे ‘एक लेखक आणि खेडे' हे वि. स. खांडेकरांचं पुस्तक वाचलेले होते. माझ्या असे लक्षात आले की, वि. स. खांडेकरांचे बरेच साहित्य असंकलित आहे. हे असंकलित ललित साहित्य ग्रंथरूप का झाले नाही याचा शोध घेता हे स्पष्ट झाले की, त्या काळात जुने साहित्य मिळविणे मोठे कठीण होते. आजच्यासारखे झेरॉक्स तंत्र नव्हते. कित्ता (कॉपी) करायला, उतरवून काढायला माणसे मिळत नसंत. शिवाय लेखकाची अनास्था हेही कारण असावे. वि. स. खांडेकरांचे आज ज्याला आपण विपुल साहित्य म्हणून गौरवितो त्यांच्या संकलन, संपादन, प्रसिद्धी, प्रकाशन, प्रचार, प्रसारात, खांडेकर साहित्याचे तत्कालीन प्रकाशक रा. ज. देशमुखांचे ‘खांडेकर प्रेम' हे एक कारण होते, ते मात्र इतिहासाला नाकारता येणार नाही.
 वि. स. खांडेकरांचे उर्वरित असंकलित, असंपादित, अप्रकाशित साहित्याचे संपादन करण्याच्या इराद्याने मी ते संकलित करण्यास सुरुवात केली आणि ‘रजत स्मृती वर्षी २५ पुस्तके होतील इतके साहित्य वर्षाच्या अविरत मेहनतीतून माझ्या हाती आले. सर्व वर्तमानपत्रे, मासिके, बंद पडलेल्या मासिकांचे जुने अंक जुन्या ग्रंथालयांतून, खांडेकर कुटुंबीयांच्या संग्रहातून, शिवाय खांडेकरप्रेमी, लेखनिक सर्वांकडून विपुल ललित साहित्य हाती आले. सन २००१ सालीच आणि रजत स्मृती दिनीच खांडेकरांचे पहिले स्मृती पुष्प ‘नवी स्त्री' या कादंबरीचे प्रकाशन झाले आणि वि. स. खांडेकरांच्या नवसाहित्याचा, अचर्चित, अस्पर्शित, राहिलेल्या आणि वर्तमान, नव्या पिढीसाठी नव्या साहित्यप्राप्तीचा नवा अध्याय सुरू झाला. गेल्या तपभराच्या काळात १ कादंबरी, ४ कथासंग्रह, १ रूपककथा संग्रह, १ मुलाखत संग्रह, ३ वैचारिक लेखसंग्रह, ४ लघुनिबंध संग्रह २ आत्मकथनात्मक लेखसंग्रह, ३ व्यक्तिलेखसंग्रह अशी २० ललित पुस्तके प्रकाशित झाली. आणखी २ समीक्षा ग्रंथ, १ विनोदी लेखसंग्रह, १ भाषणसंग्रह, २ वैनतेय लेखनखंड, २ कादंबऱ्या, १ प्रस्तावना संग्रह, १ संकीर्ण अशी १२ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. शिवाय ही रोज नवे नवे साहित्य उत्खननात हाती येतच आहे. 'वृंदावन', ‘वटपत्रे', 'पत्रे'ची हस्तलिखिते इथे-तिथे पसरून आहेत. परीक्षणे, प्रस्तावना, समीक्षा तर इतक्या आहेत की कित्ता करता-करता माणूस दमून, संपून जाईल. इतकी खांडेकरांची विपुल साहित्यसृष्टी.
 वि. स. खांडेकरांचे जे प्रचलित, चर्चित ललितसाहित्य आहे त्याबद्दल इतके बोलले, लिहिले, समीक्षिले, संशोधन केले गेले आहे की ते त्याबद्दल लिहिणे म्हणजे शिळ्या कढीला नवा ऊत आणण्यासारखे होईल. मी ज्या ‘अचर्चित ललित साहित्या'बद्दल लिहू पाहतो आहे, तेही लेखन काळाच्या दृष्टीने जुने असले तरी मराठी साहित्य इतिहास, मराठी साहित्य समीक्षा, मराठी साहित्याभ्यास या क्षेत्रात त्यांची नोंद घेण्यात आलेली दिसत नाही. (ही तक्रार नव्हे, वस्तुस्थिती म्हणून त्याकडे पाहण्याच्या दृष्टीने!) जगभर साहित्य संशोधन, समीक्षा, अभ्यास ही निरंतर प्रक्रिया मानली जाते. त्यातूनच ‘रायटर्स अॅट वर्क’, ‘इब्सेन्स वर्कशॉप', चेकॉव्हची पत्रे' अशी पुस्तके जन्माला येत असतात. जी. ए. कुलकर्णी त्यांच्या साहित्य समीक्षेपेक्षा ‘जी. एं.ची निवडक पत्रे' (भाग १, २, ३, ४), ‘प्रिय जी. ए.',"जी. एं.ची पत्रवेळा' मधून अधिक समजत. त्यांच्या साहित्याच्या लालित्याचे रहस्य उमजते, समजते ते अशा ग्रंथांतून. तीच गोष्ट प्रा. नरहर कुरुंदकरांची. ‘निवडक पत्रे (जया दड़कर) मधून त्यांच्या साहित्याचे ललितपण समजायला मदत होते. रायटर्स अॅट वर्क' मालिकेतील मराठी पुस्तके म्हणजे प्रभाकर अत्रेचे ‘कथा सृजनाची' आणि मो. ग. रांगणेकर संपादित 'मी आणि माझे लेखन'. एका पिढीचे आत्मकथन', ‘दुस-या पिढीचे आत्मकथन' मधूनही बहुचर्चित मराठी साहित्यिकांच्या साहित्यातील ललित तत्त्व उलगडते; पण मुळातून ‘ललित साहित्याचे स्वरूप समजून घ्यायला, त्याची सैद्धान्तिक बैठक कळायची तर प्रा. ना. सी. फडके यांचे प्रतिभा साधन’, ‘प्रा. बा. सी. मढेकरांचं ‘वाङ्मयीन महात्मता', प्रा. रा. ग. जाधवांचे वाङ्मयीन निबंध' आणि डॉ. वा. के. लेलेंचे ‘ललित लेखन व शैली'सारखी पुस्तके अभ्यासल्याशिवाय 'ललित' संकल्पना स्पष्ट होत नाही.
 साहित्याची समीक्षा करीत असताना ती दोन अंगांनी केली जाते (१) आशयानुवर्ती (२) अभिव्यक्ती चिकित्सा. सर्वसाधारण समीक्षकांचा कल आशयकेंद्री समीक्षेकडे राहतो कारण अशी परीक्षणं, समीक्षा करणे म्हणजे परिचय देणे असते. अभिव्यक्तीच्या अंगाने होणारी समीक्षा एक तर सैद्धान्तिक बैठकीवर आधारित असते; शिवाय ती कलात्मकही असते. विश्लेषण तिचा आधार असतो. ती वर्णनापेक्षा उदाहरण, दृष्टान्तकेंद्री या अर्थांनी सूक्ष्म असते. वृत्तपत्रीय चौकटीत कलात्मक समीक्षेस कमी वाव राहत असल्याने समीक्षात्मक, संशोधनात्मक ग्रंथच अशा समीक्षेस पैस उपलब्ध करून देत असतात. वि. स. खांडेकरांच्या वरील नवसंपादित ग्रंथांतून समोर येणारे ललित साहित्य, त्याचे लालित्य पाहायचे झाले तर ते सैद्धान्तिक आधारांवर, निकषांवर करणेच श्रेयस्कर.
 मराठीत आपण 'ललित साहित्य' किंवा 'साहित्याचे लालित्य' म्हणतो तेव्हा त्याचे ‘ललितत्व' पाहणे, अभ्यासणे अपेक्षित असते. स्थूलरूपाने प्रतिभेने निर्मित साहित्य आपण 'ललित' मानतो. इंग्रजीत त्याला 'Graceful Literature' म्हणून संबोधले जाते. इंग्रजीत Grace शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना मार्मिकतेने म्हटले गेले आहे की, 'Grace is a beauty being the outward but the sign of inward.' त्या अंतःसौंदर्यामुळेच ललित साहित्य सुंदर, आल्हाददायक, आकर्षक असते. मराठीत 'ललित' म्हणविणाऱ्या साहित्यास इंग्रजीत Graceful Literature' शिवायही अनेक पर्यायवाची शब्द वापरण्यात येत असतात. जसे की Creative writing, Artistic writing, Literature, memorable writing, Imaginative writing. अशा विविध छटांच्या शब्दांतूनही ललित साहित्याचे घटक, वैशिष्ट्ये लक्षात येत असतात. त्या सर्वाधारे वि. स. खांडेकरांच्या नवसंपादित परंतु अचर्चित ललित साहित्याचे लालित्य समजून घेणे वेधक ठरते.
 ‘नवी स्त्री' ही वि. स. खांडेकरांची सन १९५० ला 'वसंत' मासिकात क्रमशः लिहिलेली कादंबरी; पणती पुस्तकरूपात प्रकाशित झाली ती सन २००१ ला. योगायोगाने ते ‘महिला सबलीकरण वर्ष, होते. खांडेकरांना अपेक्षित नवी स्त्री केवळ आधुनिक, सुशिक्षित नको होती. नव्या स्त्रीच्या संस्कारीकरणात तिची 'माणूस' म्हणून घडण ते अपेक्षित होते. केवळ वज्रमुठीनं वा ‘इन्किलाब झिंदाबाद'च्या घोषणा देत नव्या स्त्रीस आधुनिक होता येणार नाही. तिला आपल्या हक्कांची जाणीव हवी, कायद्याचे ज्ञान हवे. १४४ कलम तिला माहीत हवे म्हणणारे खांडेकर द्रष्टे साहित्यिक म्हणून ५० वर्षे पुढे होते. आजही इंडियन पिनल कोडची कलमे एल. एल. बी. झालेल्या स्त्रिया अपवादानेच सांगू शकतील. नवी स्त्रीचे कथानक खांडेकरांच्या मनात अंकुरले ते कोकणातील स्त्रीचे दैन्य, दारिद्र्य, दुःख, अत्याचार पाहून पिळवटून. घराचा उंबरठा लक्ष्मणरेषा मानून पिचणारी श्रमजीवी स्त्री त्यांनी पाहिली, अनुभवली व मग त्यांच्या मनात ‘नवी स्त्री'ची नायिका ‘ललिता' जन्मली. पुनर्विवाह करणे, पदवीधर होणे, नवऱ्याबरोबर फिरायला जाणे त्या वेळी (१९५०) ‘शतकृत्य' समजले जायचे. अशा काळात खांडेकर या कादंबरीतून प्रौढविवाह, प्रेमविवाह, आंतरजातीय विवाहाचे समर्थक होतात. तत्कालीन स्त्रीचे खांडेकरांनी केलेले ललित वर्णन म्हणजे, या क्षणी आकाशात आनंदाने हसणारी, पण दुसऱ्याच क्षणी खळकन तुटून पाषाण होऊन पृथ्वीवर पडणारी तारका!' ‘नवी स्त्री'मधील पात्रे नायिका ललिता, तिचे वडील तात्यासाहेब, मित्र दिवाकर सर्व जण समाजवादी समाजरचना अवतरावी म्हणून प्रयत्नशील असतात. तिकडे दुसरीकडे मगनभाई, काकासाहेब, कमलाकर भांडवलशाही समर्थक. अशा संघर्षात शिक्षित ललिता व्यष्टीपेक्षा समष्टी श्रेष्ठ मानून त्यागमय जीवन घेऊन उभी राहते. स्वतःबरोबर समाजास बदलायचा तिचा ध्यास म्हणजे गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद इत्यादी तत्त्वज्ञानातून उभारलेल्या विविध सामाजिक, राजकीय चळवळींतील स्त्रीसहभाग व नेतृत्वाचे प्रतीक. स्त्रीची पुरोगामी घडण चित्रित करण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या कादंबरीतील खांडेकरांची शब्दकळा कलात्मक, सूचक व समर्पक म्हणायला हवी. 'रामराज्य', ‘स्थितप्रज्ञ', ‘आझाद स्टोअर्स', ‘कम्युनिस्ट' शब्दांतून कालबोध, तत्त्व, गर्भितार्थ सूचित करण्याचं खांडेकरांचं कौशल्य कलात्मक, वाक्यांतून अलंकार पेरणी ही खांडेकरी भाषेची स्वतःचीच ओळख. संवादात 'हॅलो ललिता' म्हणत खांडेकर ही कादंबरी काळापुढे पन्नास वर्षे नेतात. (त्या काळात असं म्हणण्याची शामत व परंपराही नव्हती!) नायिका ललिताचं चित्रण म्हणजे संवेदनात्मक अनुभूतिपूर्ण शब्दचित्र! त्याचे लालित्य वर्णन करायचे तर ती आर्षप्रतिभाच (Archetypal Image) समाजजीवनातील प्रश्नांचा संबंध विधिशास्त्रास जोडून खांडेकर आपल्या या कादंबरीच्या निर्देशात्मक कक्षा रुंदावतात. या कादंबरीत आशय आणि अभिव्यक्तीची अभिन्नता कादंबरीस भावपातळीवरही एका नव्या उंचीवर आणून ठेवते व वाचकांच्या अपेक्षा उंचावते, परिष्कृत करते. हेच या कादंबरीचं कालोचित यश म्हणायला हवं.
 रजत स्मृती प्रकल्पातून वि. स. खांडेकरांचे चार कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. स्वप्न आणि सत्य' (२००२), ‘विकसन' (२००२), ‘भाऊबीज' (२००३) आणि ‘सरत्या सरी' (२००३) हे ते चार कथासंग्रह असून वाचकांना त्यातून सुमारे ४0 नव्या कथा उपलब्ध होतात. सन १९३० ते १९७६ अशा सुमारे पाच दशकांच्या काळातील या कथा. मराठी समीक्षेत आणि संशोधनात अचर्चित या कथांचं ऐतिहासिक महत्त्व आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘स्वप्न आणि सत्य'मधील ‘स्वप्नातले स्वप्न' कथेचं देता येईल. ही मूळ कथा 'यशवंत' मासिकाच्या ऑक्टोबर - नोव्हेंबर १९३२ च्या अंकात प्रकाशित झाली होती. कथा आहे तत्कालीन हिंदू-मुस्लिम दंग्यांवर आधारित. या कथेचा उत्तरार्ध म्हणजे खांडेकरांची गाजलेली चकोर आणि चातक' ही रूपककथा. आजवरच्या सर्व मराठी प्राध्यापकांनी ती केवळ रूपक, प्रतीक, मिथक, सौंदर्य अंगांनी तिची चर्चा, समीक्षा, संशोधन अभ्यास केला; पण 'स्वप्नातले स्वप्न' ही मूळ कथा वाचली की तिचा सामाजिक, राजकीय संदर्भ उलगडतो. वि. स. खांडेकर मराठीतील श्रेष्ठ ललित कथाकार ठरतात ते त्यांनी रूपक, प्रतीक, मिथक इत्यादी माध्यमांतून केलेली वर्तमानाची चिकित्सा अन् तीपण कलात्मकरित्या. पण त्यांच्या कलेला सामाजिक किनार असायची, राजकीय संदर्भ असायचे, याची फारशी चर्चा ययाति' कादंबरीचा अपवाद वगळता झाली नाही. विषयाच्या अंगांनी पाहायचे झाले तर 'भाऊबीज' या एका सण, विषयावर ‘आंधळ्याची भाऊबीज', 'फकिराची भाऊबीज', ‘मराठ्यांची भाऊबीज', 'भाऊबीज' अशा चार कथा का लिहाव्यात तर त्याचं कारण त्यांना बहीण नसणे. विविध वृत्त'मध्येही त्यांची ‘भाऊबीज व प्रगती' कथा प्रकाशित आहे. लेखकाचं लेखन एका अर्थाने व्यक्तिगत शल्याचे उन्नयन असते हे यावरून उमजते. ‘ते दिवस, ती माणसे'मधील ‘आक्का' वाचली की हे लक्षात येतं. या साऱ्या नवकथांतून खांडेकरांच्या कथांची एक चित्राकृती (Pattern) किंवा आकृतिबंध लक्षात येतो. ‘सरत्या सरी'मधील कथा खांडेकरांनी दृष्टी गमावल्यावर लिहिल्या खऱ्या; पण त्या लेखकाच्या चर्मचक्षूपेक्षा अंतर्चक्षुच प्रबळ, प्रभावी असतात हे सिद्ध करणाच्या ठरल्या. कोल्हटकर, गडकरी, गुर्जर पठडीतील कथालेखनाने सुरू झालेला खांडेकरीय कथांचा प्रवास उत्तरार्धात ओ हेन्री, मोपाँसा, चेकॉव्ह, गॉल्सवर्दी, टॉलस्टॉय, खलील जिब्रान, मॉमशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, हे पाहता खांडेकर एक ललितकथालेखक म्हणून आत्मनिष्ठ, मनस्वी लेखन करणारे, अलंकार, प्रतीक, मिथकांद्वारे नवविचारांचे सर्जन करणारे तद्वतच कथातंत्राचे नवनवे प्रयोग करणारे (उदाहरणार्थ त्यांच्या रूपक कथांचे योगदान) म्हणुन युगप्रवर्तक कथाकार सिद्ध होतात. मानवी जीवनाची चिकित्सा करीत ते परिष्कृत करण्याचा या कथाकाराचा ध्यास एका बहुश्रुत कलाकाराचा होता. मराठी साठोत्तरी कथेत कलात्मक योगदान देणा-या ललित, मनोहारी कथा म्हणून खांडेकरांच्या ज्या रूपककथांचा उल्लेख करण्यात येतो, त्यांचं प्रतिबिंब ज्यांना पाहायचे असेल त्यांना सन १९५९ ते १९७६ या कालखंडात लिहिलेल्या रूपककथांचा संग्रह ‘क्षितिजस्पर्श' (२००२) वाचायला हवा. या कथा म्हणजे गद्य काव्यच. अल्पाक्षरी तरी अपरासृष्टीत नेणाऱ्या. परिणामकारकता, संयम, ध्वनिवैविध्य, विशाल दृष्टिकोन, प्रज्ञा आणि प्रतिभेचा संगम म्हणून या कथांचं ललितसौंदर्य आगळं. निसर्ग आणि माणूस यांचा मिलाफ साधणाऱ्या या कथांची सारी क्षमता त्यातील ‘ध्वनितात' सामावलेली असते. तेच या कथांचं खरं ललितसौंदर्य. त्या तुम्हास सहज नाही वाचता येत. वाचून सोडून दिल्या असं या कथांचं होत नाही. त्या जीवन व कला दोन्ही अंगांनी वाचकास चमत्कृत करतात नि अंतर्मुखही. आशय आणि अभिव्यक्तीचं अद्वैत ज्यांना अनुभवायचं त्यांनी या कथा एकदा वाचल्या पाहिजेत. विशेषतः या संग्रहातील ‘कवी आणि मुंगी', ‘वृद्ध प्राजक्त', 'बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी’, ‘मृत्यू' सारख्या रूपककथा प्रा. बा. सी. मर्ढेकरांनी वर्णिलेल्या वाङ्मयीन आत्मनिष्ठा (sincerity), तादात्म्य आणि महात्मता (sense of value) निकषांवर मराठी ललितसाहित्याचा चर्मोत्कर्ष दर्शविणाऱ्या ठरतात.
 प्रा. ना. सी. फडके यांनी ‘गुजगोष्टी' रूपात लघुनिबंध लिहिण्यास प्रारंभ केला. जनक म्हणून त्यांचे महत्त्व आहेच; पण हा साहित्यप्रकार ललित अंगांनी विकसित करण्याचे श्रेय मात्र वि. स. खांडेकरांनाच द्यावं लागतं. खांडेकरांच्या हयातीत ‘वायुलहरी' (१९३६) ते 'झिमझिम' (१९६१) असे अकरा लघुनिबंध संग्रह प्रकाशित झाले. त्यातून २०० लघुनिबंध संकलित झाले होते. त्याशिवाय सुमारे ७० लघुनिबंध असंकलित राहिल्याने एका परीने अचर्चित राहिले. या लघुनिबंधांचे संग्रह आजमितीस जिज्ञासू साहित्यरसिक, वाचक, अभ्यासक, संशोधकांना उपलब्ध असून ते ‘रानफुले (२००२), ‘अजुनि येतो वास फुलांना' (२००३), ‘मुखवटे' (२००४), ‘सांजसावल्या' (२००४) शीर्षकांनी प्रकाशित आहेत. विशेष म्हणजे या सर्व नवसाहित्याच्या चार-पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्याने त्यांना नवा वाचकही पसंत करतो असे दिसते. सन १९२७ ला वि. स. खांडेकरांनी आपला पहिला लघुनिबंध ‘निकाल द्या' (How's that) सावंतवाडीहून प्रकाशित होणाऱ्या व मेघश्याम शिरोडकर संपादित असलेल्या साप्ताहिक ‘वैनतेय'मध्ये ‘रानफुले' सदरात प्रकाशित केला. सन १९७६ पर्यंत ते अव्याहतपणे लघुनिबंध लिहीत राहिले. त्यांचा शेवटचा प्रकाशित लघुनिबंध म्हणजे ‘शब्द आणि शब्द' तो ‘अरुंधती' मासिकाच्या सन १९७६ च्या दिवाळी अंकात प्रकाशित आहे. याशिवाय काही अप्रकाशित लघुनिबंध माझ्या साहित्यिक उत्खननात हात आले. तेही ‘सांजसावल्या'मध्ये वाचण्यास उपलब्ध आहेत. मराठी लघुनिबंधांची ललित वैशिष्ट्ये या लघुनिबंधांत आढळतात. रस, रंग, रूप, गंध, संगीत आणि संवेदनांनी ओथंबलेले हे। लघुनिबंध म्हणजे मराठीचे देशीकार लेणेच. या रानफुलांना गावरान मेव्याचं महत्त्व. डोंगरची मैना म्हणून बिरूद मिरवणारी करवंद मिठास असतात तशी तुरटही. ती मिळवायला काटे टोचून घ्यावे लागतात. हे लघुनिबंध आपल्या रोजच्या छोट्या घटनांमागील व्यापक जीवनार्थ सांगतात. विसंगतींवर बोट ठेवतात. न सांगता येणारी कळ व्यक्त करतात. त्या जुन्या घटनांचे नवे अर्थ अधोरेखित करीत समाजमनाची मशागत करतात. ललित साहित्य नुसते चमत्कृती घेऊन नसते येत. ते पुरोगामी समाज परिवर्तन घडविते. ते नुसतं सुंदर आणि कलात्मक नसते. आशयाच्या अंगानी उत्तुंग भरारी घेणारे असते. टेनिसनच्या शब्दांत सांगायचं तर, 'The old order change the yielding place to new one' असं असलेलं खांडेकरांच्या लघुनिबंधांचं सामर्थ्य व मर्म म्हणजे निबंधसौंदर्याचा नजराणा. विशिष्ट आत्मनिष्ठता खांडेकरांच्या लघुनिबंधात असते; पण पाल्हाळिकतेचा दोषही त्यांत कधी आढळतो. बहारीचा आरंभ, वैचित्र्यपूर्ण विकास, तात्त्विक वा निष्कर्षवजा शेवट अशी विभागणी घेऊन येणारे हे लघुनिबंध वाचक व लेखकांत एक हितगुज निर्माण करतात. वाचकांना ते खिळवतात. सहज मोठं जीवनसत्य सांगतात. रंजक पण त्याच वेळी विचारोत्तेजक असणारे हे निबंध वाचकाला प्रत्येक वेळी नवं स्वप्न देत नव्या सत्याकडे नेतात. ‘चरमसत्याचा आविष्कार (Eternal Expression) या कसोटीवरही हे लघुनिबंध कालत्रयी (Classics) ठरतात.
 आत्मकथनात्मक लेखनही ललित साहित्यच असते. एका पानाची कहाणी' हे खांडेकरांच्या जीवनाचा पूर्वार्धच व्यक्त करतं; पण वेळोवेळी खांडेकरांचे अनेक आत्मपर लेख, मुलाखती, भाषणे असे विविधांगी साहित्य उपलब्ध आहे; पण ग्रंथरूप नाही. पैकी पहिली पावलं' हे त्याचे मराठीतील पहिले साहित्यिक आत्मकथन मानावे लागेल. 'वैखरी' मासिकातून त्यांनी ‘पहिली पावलं' सदर लिहिले. त्यातून त्यांनी कथा, कादंबरी, रूपककथा, पटकथा, लघुनिबंध, समीक्षा, भाषांतर, नाटक, वक्तृत्व, संपादन असे बारा लेख लिहिले. ते 'वैखरी'शिवायही अन्यत्र प्रसंगोपात लिहिलेत. (हंस, वसंत, ललित इत्यादी) अशा लेखांचा गुच्छ म्हणजे ‘पहिली पावलं (२००७). सन १९८८ मध्ये विजय तेंडुलकरांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. साहित्यातून सत्याकडे'. त्याची एक सचित्र जाहिरात 'ललित'च्या रौप्यमहोत्सवी अंकात (ऑगस्ट, १९८८) मध्ये पाहावयास मिळते. त्यात तेंडूलकरांच्या छायाचित्राखाली त्यांचेच एक वाक्य आहे - 'हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे माझे आत्मवृत्तच आहे... याशिवाय खांडेकरांच्या आणखी एक अचर्चित आत्मकथनपर लेखसंग्रह प्रकाशित आहे. ‘सशाचे सिंहावलोकन' (२००७) असे त्याचे शीर्षक, या शीर्षकातच उत्कट लालित्य, प्रतीकात्मकता, मिथक भरलेले आहे. (आचार्य अत्रेच्या नेहरूंवरील ‘सूर्यास्त' पुस्तक शीर्षकासारखीच ही सूचकताही! यात खांडेकरांनी लिहिलेल्या जीवन व लेखनविषयक आत्मपर लेखांतून आजवर न उलगडले गेलेले उमगते. या दोन्ही आत्मकथनांतील लेखशीर्षके ‘मी वाङ्मयाकडे का आकर्षित झालो?', 'मी लेखक कसा झालो?', 'माझ्या आयुष्याचा माझ्या लेखनावर परिणाम', 'माझ्या आयुष्यावर परिणाम करणारे ग्रंथ', 'मी लेखनाकडे कसा वळलो ?' 'माझ्या जीवननिष्ठा' अशी अनुक्रमणिका वाचत वाचीक ही पुस्तके केव्हा वाचू लागतो हे त्याचे त्यालाच कळत नाही. लेखक/कवी असतो कसा आननि?' अशी जिज्ञासा चाळवणारी पुस्तके अचर्चित राहतात. ती आपले वाचन मर्यादित असल्याचेच एका परीने सिद्ध करतात. ‘ऋतू न्याहाळणारं पान' (२००८) या खांडेकरांच्या मुलाखतींच्या संग्रहाच्या वाचनातूनही त्यांची साहित्यविषयक भूमिका, साहित्याचे सामर्थ्य व मर्यादा, त्यांच्यावर झालेल्या टीकांना उत्तरे म्हणूनही त्यांचे विवेचन, विश्लेषक महत्त्व नाकारता येणार नाही.मराठी साहित्यसमीक्षेने ललित साहित्य असताही उपेक्षिलेले क्षेत्र म्हणजे पटकथा लेखन. आजच्या प्रसारमाध्यमांच्या युगात त्याचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. चित्रपट, दूरदर्शन सीरियल्स मुळात कथा असतात. त्या संवादरूपात लिहिल्या जातात. त्यांना दृक्-श्राव्य रूपात सादर केले जाते. मराठीत कथा, कादंबरी, नाटकांचे चित्रपट, पटकथा, धारावाहिक कथा होण्याची मोठी परंपरा आहे. मास्टर विनायकांनी वि. स. खांडेकरांना घेऊन सामाजिक, साहित्यिक कृतींवर आधारित चित्रपट निर्मितीची परंपरा सुरू केली. आचार्य अत्रे यात सामील झाले व मराठी चित्रपटांना व्यावसायिक यश लाभलं. नंतर असं यश विजय तेंडुलकरांना लाभलं. अलीकडे विश्वास पाटील असे प्रयत्न करताना दिसतात.
 वि. स. खांडेकरांच्या पटकथांवर मराठी १४, हिंदी १०, तमिळ २, तेलुगू २ असे तब्बल २८ चित्रपट निघाले. भारतीय चित्रपटांना, पटकथांना पुरस्कार देण्याची परंपरा बंगालच्या ‘गोहर मेडल'ने सन १९३६ साली सुरू केली. तेव्हाचे पटकथेचे पहिले ‘गोहर सुवर्णपदक' वि. स. खांडेकरांच्या ‘छाया' या पहिल्या पटकथेने पटकावले होते, हे किती मराठी मने जाणतात? या २८ पटकथांचा संग्रह ‘अंतरीचा दिवा' (२०१२) बाजारात आला आणि काही महिन्यांतच त्याचे पुनर्मुद्रण करणे प्रकाशकाला भाग पडल्याचे मी ऐकून आहे. असा पटकथासंग्रह आचार्य अत्रेच्या ‘चित्रकथा' (१९५८) नावाने प्रकाशित झाला होता; पण पटकथांचा ललित वाङ्मय म्हणून केलेला अभ्यास, संशोधन, समीक्षा विरळाच म्हणावी लागेल. 'अंतरीचा दिवा' पटकथासंग्रहास एक विस्तृत अशी प्रस्तावना असून तीद्वारे यापूर्वीच या ओळीच्या लेखकाने खांडेकरांच्या पटकथांच्या ललित सौंदर्यावर प्रकाश टाकला आहे. मूळ पटकथा वाचनीय तर आहेत; पण मोठ्या कष्टाचे काम ते. यात मला समीक्षकांपेक्षा चित्रपटप्रेमी वाचक आघाडीवर दिसतात. ‘अंतरीचा दिवा'मध्ये 'सोनेरी सावली'ची पटकथा मुद्दाम तांत्रिक अंगाने प्रकाशित केली आहे. माझ्या साहित्यिक उत्खननात ती मला चक्क वि. स. खांडेकरांच्या हस्ताक्षरातच उपलब्ध झाली होती. ती पाहताना माझ्या असे लक्षात आले की, पटकथाकारास चित्रपट निर्मितीचे तंत्रही अवगत असावे लागते.कथा नुसती संवादरूप लिहिली की झाले असे नसते. त्याला कॅमे-याची फ्रेम माहीत हवी. संवाद, प्रसंगांचे दृश्यभाग करता यायला हवेत. इतकेच नव्हे तर कॅमेरा, दृश्य, प्रकाश दृश्यमिश्रण, इत्यादींचे म्हणजे Fede in, Exterior, Mix, Cut, Inter cut, Quick Dissolve, Fede out, HR माहीत हवे, तरच पटकथाकार ललित, सुंदर चित्रपट बनवू शकतो. हे ज्ञान व तंत्र वि. स. खांडेकरांना अवगत होते म्हणून ते 'छाया', ‘ज्वाला', ‘देवता', ‘सुखाचा शोध', 'माझं बाळ', 'अंतरीचा दिवा', 'माणसाला पंख असतात'सारख्या श्रेष्ठ ललित पटकथा लिहू शकले. खांडेकरांनी चित्रपटांसाठी गाणी, गीते पदेही लिहिली होती, हे फार कमी लोक जाणून असावेत. ‘अंतरीचा दिवा' हा सचित्र पटकथा संग्रह असून तो मराठी चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक ऐवज म्हणूनही महत्त्वाचा ठरतो. त्यांचे अन्य भाषी चित्रपट भाषांतरित, ध्वनिमुद्रित निर्मिती होती. काही स्वतंत्रही निर्मिले गेले. छोटे संवाद, सुंदर शब्दकळा, संवादात अलंकारांची पेरणी, नादमधुर भाषा, काव्यात पदलालित्य, दृश्यांची प्रत्ययकारी गुंफण यांमुळे या पटकथा ललित अंगांनी श्रेष्ठ ठरल्या होत्या. वि. स. खांडेकर कोटीबाज लेखक म्हणून उदयाला आले होते. (१९१९) त्याचा फायदा त्यांना सरकारी पाहणे', 'लग्न पाहावं करून'सारख्या विनोदी पटकथा लिहिताना झालेला दिसतो. कथाविकास, चरित्रचित्रण, दिग्दर्शन, प्रसंगांची चपखल रचना ही त्यांच्या पटकथांची ठळक ललित वैशिष्ट्ये होत. आशय व अभिव्यक्तीचा संगम हे खांडेकरांच्या वैविध्यपूर्ण ललित वाङ्मयात सर्वत्र दिसून येते. विचार व भावनांची सखोलता (Profondita dell's anima) आणि आशयघनता व व्यापकता (Largeness of soul) अशी वाङ्मयीन महात्मतेची व ललित साहित्याच्या श्रेष्ठत्वाची जी लक्षणे जगभर मानली गेलीत, त्या निकषांवरही वि. स. खांडेकरांच्या साहित्याचे लालित्य प्रत्ययकारीच म्हणायला हवे.
 ग्रॅहम हाउ (Graham Hough) चे एक सुंदर समीक्षात्मक पुस्तक आहे। 'Style and Stylistics' नावाचे. त्यात त्याने म्हटलंय - 'The organic unity of a work of literature is not something readymade; it is not an entire and perfect chrysolite (Holst, f14SII) found lying about in nature; it is something achieved.' (page - 11) साहित्य, विशेषतः ललित साहित्य ही एक सेंद्रिय संघटित कृती होय. ती तयार नसते. तयार करावी लागते. प्रयत्नसाध्य कारिगिरी असे तिचे वर्णन करता येईल. वि. स. खांडेकरांच्या या अचर्चित ललित साहित्याचा कालपट लेखन प्रारंभापासून (१९१९) ते मृत्यू (१९७६) पर्यंतचा सुमारे सहा दशकांचा. या काळात खांडेकरांनी निरंतर ऊर्जस्वल लिहिण्याचा प्रघात ठेवला. त्यास बैठक बहुभाषी वाचनाची होती तशी बहुश्रुततेची. पूर्वसुरींचे ऐकायचे, वाचायचे, पाहायचे. प्रारंभी अनुकरण होते. मध्यंतरी स्वातंत्र्य घेतले. उत्तरायणात नवी वाटच निर्माण केली. 'ययाति'ला मराठीचे पहिले ज्ञानपीठ हे लौकिक यश; पण ललित यश म्हणाल तर शतक उलटले तरी वाचक तुटला नाही. आज तो मोबाईल व टॅबवरही ‘खांडेकर' वाचतो, हे त्यांच्या ललित साहित्याचे खरे श्रेय व प्रेय। (ऊ) वि. स. खांडेकर साहित्य : अश्वत्थाम्याची जखम
 वि. स. खांडेकरांबद्दल लिहिताना कुसुमाग्रजांनी त्याचं वर्णन ‘दुर्मीळ आर्ष अधिकार असलेला समाजपुरुष' म्हणून केलं आहे. ते खरं आहे. खांडेकरांचं समग्र जीवन आणि साहित्य म्हणजे विचार आणि व्यवहार यांची अभिन्नता. मी शाळकरी वयात असताना खांडेकरांच्या संपर्कात आलो. संस्कारक्षम शिक्षण देण्याच्या इराद्याने त्यांनी कोल्हापुरात आंतरभारती विद्यालय सुरू केलं होतं. त्यातील पहिल्या विद्यार्थ्यात मी होतो. पहिल्याच वर्षी मी शाळेच्या विद्यार्थी मंत्री मंडळात वादविवाद मंत्री झालो होतो. एका कार्यक्रमाला खांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. त्यांना आणायला आमचे मुख्याध्यापक जी. एस. गोंधळी व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी रिक्षा घेऊन त्यांना आणण्यासाठी राजारामपुरीच्या ‘मुक्ताश्रम'मध्ये गेल्याचं आठवतं. रिक्षा तेव्हा कोल्हापुरात नुकतीच सुरू झाली होती. एरव्ही खांडेकर टांग्याने वा पायी जात-येत असत. रिक्षात बसल्यावर ते आमच्या सरांशी बोलत होते. टांगा जाऊन रिक्षा येणं म्हणजे काय ते समजावत होते. गती, यंत्र, बेकारी, पोटावर पाय असं काही-बाही बोलत होते. आज माझ्या लक्षात येते, ती त्या वेळी ऐकलेल्या हितगुजाची संगती. काळसुसंगत लेखन, वाचन, बोलणं यांमुळे कळत्या वयात मी त्याच्या निकट सान्निध्यात आलो, ते त्यांच्याच - त्या माझ्या शाळेत शिक्षक होऊन. परत तोच अनुभव. मूल्य आणि व्यवहार यांच्या फारकतीविरुद्ध मी बंडाचा झेंडा घेऊन उभारलो, तेव्हा खांडेकरांचं तत्त्वांच्या पाठीशी उभारणं, यामुळे लेखक अधिक एक सच्चा माणूस म्हणून मी त्यांच्या मोहात पडलो.
 आणीबाणीच्या काळातच खांडेकर निवर्तले. मी प्राध्यापक झालो. त्यांच्या साहित्याच्या अनुवादाचं गारुड माझ्यावर असण्याचा तो काळ! नुकताच हिंदीत पीएच. डी. झालेला मी. काही पुस्तकं दिल्लीहून प्रकाशित झालेली. मी खांडेकरांनीच निवडून दिलेल्या काही कथांचे हिंदीत अनुवाद केले. 'वि. स. खांडेकर की श्रेष्ठ कहानियाँ' नावाने ते प्रकाशित झाले. इतकेच नव्हे तर भारत सरकारचा उत्कृष्ट अनुवाद पुरस्कारही त्याला लाभला. माझं बळ वाढलं. मी खाडेकरांची शेवटची कादंबरी ‘सोनेरी स्वप्नं भंगलेली...'चा हिंदीत अनुवाद केला. त्या अनुवादाचं एक आगळं वैशिष्ट्य होतं. खांडेकरांच्या अचानक निधनाने ती अपूर्ण राहिलेली; पण घरी चर्चा होती. लेखनिकांशी चर्चा असायची. त्या आधारे ती मी पूर्ण करून अनुवादली. त्यामुळे मराठीत ती अपूर्ण असली तरी हिंदी वाचक ती पूर्ण वाचतात. तिचं हिंदीत चागलं स्वागत झालं. 'स्वप्नभंग'नंतर ‘ठंडी हवा और अन्य कहानियाँ' नावाने ‘श्रेष्ठ कहानियाँ ची दुसरी आवृत्ती बाजारात आली होती. एव्हाना १९९५ साल उजाडलं होतं व खांडेकर जन्मशताब्दी तोंडावर आलेली. जन्मशताब्दीनिमित्त काय करता येईल असा विचार करताना लक्षात आलं की, खांडेकरांचे कथा, कादंबरी, रूपककथांचे अनुवाद हिंदीत आहेत; पण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील प्रगल्भ नि कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ रूपककथा अद्याप हिंदीत गेलेल्या नाहीत. मी अशा रूपककथा ‘सारिका', 'भाषा', 'समकालीन भारतीय साहित्य'सारख्या मान्यवर नियतकालिकांकडे भाषांतरित करून पाठविल्या. त्या भाषांतरांचेही उत्साहवर्धक स्वागत झाले. मग मी जन्मशताब्दी वर्षात ‘शांति' या रूपककथांचा संग्रह हिंदीला दिला.
 आता मला खांडेकरांचा 'नाद'च लागला होता. माझ्या लक्षात आलं की, मराठीत खांडेकरांचे विपुल साहित्य प्रकाशित असलं तरी बरंच साहित्य अप्रकाशित, असंकलित आहे. एव्हाना सन २००० उजाडलं होतं आणि खांडेकरांच्या निधनाला बघता-बघता २५ वर्षे होणार होती. २००१२ हे ‘खांडेकर रजत स्मृतिवर्ष' होतं. मी अप्रकाशित, असंकलित साहित्य वाचून, अभ्यासून, दुर्मीळ लेखन मिळवून २५ ग्रंथ प्रकाशित करण्याचा संकल्प केला. या ओळी लिहीत असताना मला सांगण्यास आनंद वाटतो की, मी तो पूर्ण केला. १ कादंबरी, ४ कथासंग्रह, ४ लघुनिबंधसंग्रह, ३ वैचारिक लेखसंग्रह, १ मुलाखत संग्रह, २ आत्मकथनात्मक पुस्तके, १ पटकथासंग्रह, ३ व्यक्तिलेख संग्रह, १ रूपककथा संग्रह, अशी २० पुस्तके प्रकाशित असून बहुतेकांच्या किमान दोन-तीन आवृत्त्या आल्या आहेत. अजून १ विनोदी लेखसंग्रह, २ समीक्षा संग्रह, २ वृत्तपत्रीय लेखसंग्रह, २ कादंबऱ्या, १ प्रस्तावना संग्रह, १ परीक्षण संग्रह; शिवाय बृहद् स्मारक ग्रंथ संपादित असून लवकरच ते सारे साहित्य उत्सुक वाचकांच्या हाती येईल. वि. स. खांडेकरांच्या मी घेतलेला हा पुनर्शोध! यात माझ्या हाती अनेक दुर्मीळ चिजा, कागदपत्रे, पत्रव्यवहार आला. खांडेकर कुटुंबीयांनी मूळ पुरस्कार (अकादमी, ज्ञानपीठ, पद्मभूषण) मानपत्रे, रोजच्या वापरातील वस्तू असं अमूल्य वारसाधन, ऐवज देऊ केल्याने शिवाजी विद्यापीठात भारतातील लेखकाचं पहिलं शास्त्रोक्त वस्तुसंग्रहालय उभारलं गेलं. आता तर संग्रहालय निर्मिती हा माझा छंदच होऊन बसला आहे. महर्षी कर्वे स्मृती संग्रहालय, हिंगणे (पुणे), साने गुरुजी स्मृती संग्रहालय, राष्ट्रीय स्मारक केंद्र, वडघर (रायगड), कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालय, बार्शी, यशवंतराव चव्हाण स्मृती संग्रहालय, नाशिक यांची उभारणी, संशोधन, साधनसंग्रह निर्मितीत माझी छोटी-मोठी भूमिका राहिली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक संग्रहालय उभारणीच्या दृष्टीने संशोधन, साधनसंग्रह सुरू आहे.
 महर्षी कर्वे, साने गुरुजी, कर्मवीर जगदाळे, यशवंतराव चव्हाण आणि साहित्यिक खांडेकर ही सारी मंडळी, त्यांचे कार्य, जीवन, विचार आणि मी यांत मला माझ्या जीवनशल्यांची पूर्तता आढळत आली आहे आणि या सर्वांचा एकमेकांशी भावात्मक ऋणानुबंध आहे. हा परीघ रुंदावून यात मला आवर्जून महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे घ्यावेसे वाटतात. अनाथ, निराधार, वंचित, उपेक्षित, दलित, विधवा, परित्यक्त, अनौरस, कुमारी माता यांचे या सर्वांनी केलेलं उन्नयन त्याशी माझ्या जीवनाची नाळ जोडलेली आहे, असे आतून कुठून तरी वाटत राहते। अन् मी धांडोळा घेत, हंगत, पुनर्शोध घेत भटकत, पायपीट, हमाली, पदरमोड करीत राहतो. हे सारं करताना मी कुणाचा रुपया घेतलेला नाही... मिळवलेला नाही, हे सांगितलं पाहिजे.
 वि. स. खांडेकरांचे जीवन, साहित्य, विचार, कार्य अभ्यासत असताना माझ्या लक्षात येते की, खांडेकर मानवी जीवनाचे विचक्षण वाचक, टीकाकार, भाष्यकार आहेत. ते जीवनचिंतक, तत्त्वज्ञ आहेत. त्यांचं साहित्य मला काय देतं, शिकवतं, सांगायचं झालं तर त्यांचेच शब्द उसने घेऊन म्हणावं लागेल की, 'वाङ्मय हे विचार, कल्पना, मनोरंजनाचे क्षेत्र नसून ते जीवनकर्तव्य शिकविणारे साधन होय.' या वाक्याचा भुंगा माझ्या कानांत गुंजारव करीत असतो आणि मग मी अनाथांचे संगोपन, पुनर्वसन, शिक्षण, सुसंस्कारासंबंधी छोटी-मोठी लुडबूड करीत राहतो. कधी बालकल्याण संकुल उभार. कधी राज्याचं बालक धोरण बनव. कैलास सत्यार्थीबरोबर बालमजुरीविरोधी ग्लोबल मार्च काढ. राज्यातील अनाथ मुलांचे क्रीडा मेळावे भरव. शहरात ग्रंथोत्सव, साहित्य संमेलने, नवलेखक शिबिरे घे. यामागे खांडेकरांचं साहित्य, पात्र, विचार काहीतरी असतंच आणि खरं सांगायचं तर एक द्वंद्व, संघर्ष घोंघावत असतो... खांडेकर माझे बिनभिंतीतील शाळेचे शिक्षक. मला त्याचं साहित्य ‘गैर'शी पंगा घेण्याचं, संभावितांशी हुज्जत घालण्याची प्रेरणा देतं. ते सारखं बजावत राहतं... ‘गैर दुरुस्त होऊ शकतं. दुरुस्त करताना किंमत मोजावी लागते. स्थानांतर करावं लागतं. पदत्याग करावा लागतो; पण 'Wrong can be righted'चा माझा विश्वास रोज दुणावतो. खांडेकरांचं साहित्य वाचकात विवेक जाणवतं. दलित, वंचित, पीडितांप्रती दया, करुणा, सहानुभूतीपलीकडे जाऊन ते तुम्हाला कर्तव्यपरायण, कृतिप्रवण करतं. त्यांचे नायक, नायिका म्हणजे ध्येयवादाचा घोर लागलेली भुतं! मीपण मग निशाचर, भूत होतो. रात्ररात्र खांडेकर वाचीत बसतो. रोज नवं मिळतं. हा माझ्या जीवनाचा आता ‘कॅलिडिओस्कोप झालाय. लोक खासगीत, माघारी ‘याला खांडेकरांनी झपाटलंय', 'समंधाची बाधा झालीय' असं काहीबाही बोलत राहतात. मी ऐकून सुखावतो. माझं तपमान डिग्रीनी अंमळ वधारतंच.
 खांडेकर मला स्टीफन झ्वाइगच्या 'Beware of Pity' वत दयेपासून दूर राहण्याची शिकवण देतात. लोकांची तक्रार असते... याला माणसाळता येत नाही, पाळता येत नाही, गुलाम करता येत नाही. हा हाताला नाही लागत. भरोशाचा गडी नाही. हुकमी मत याचं कधीचं नसतं. नेहमी हा ‘नोटा (Note of Descent, None of the above) चं बटण दाबतो नि एकटा राहतो. व्यवच्छेदक राहणं या काळात अवघड होऊन बसलंय. हा काळ एकतर तुम्ही प्रकाशित रहा' अशी शिकवण देतो. नाही तर तुमच्या मयताला कुत्रंही येणार नाही, असं बजावतो. तरी तुम्ही मूल्यांची लढाई हरता कामा नये याचं बळ खांडेकरी साहित्य देतं. त्याचं सारं साहित्य म्हणजे मूल्यांची पखरणच! नैतिकता, सचोटी, पारदर्शिता, धर्मनिरपेक्षता, विवेक,अंधश्रद्धामुक्तता, जाती अंत जपणं म्हणजे गोळ्या खाऊन मरणं. खांडेकरांचं साहित्य काळाबरोबर बदलण्याचा संदेश देतं. माणसाचा 'ययाति' होऊ न देणं हे त्याचं ध्येय. माणुसकीची ‘अमृतवेल' सुकू नये ही त्याची धडपड. चांभाराचा देव' पुजणारं 'अमृत' पाजावं खांडेकरांनीच. जीवन जगत असताना परिस्थिती माणसास ‘पवित्र पाप' करायला भाग पाडते, समजावणारा त्यांचा ‘छाया' बोलपट असो वा ‘कुमारी मातेचं बाळ माझं बाळ' बनवणारं समाजशिक्षण असो... खांडेकर महात्मा फुले, महर्षी कर्वेचे उत्तराधिकारी बनून पुढे सरसावतात. म्हणून मी त्यांचं अनुगमन करतो. 'रडका लेखक' म्हणून उपहास करणा-यांना साने गुरुजींचा पाझर येणार तरी कुठून? दुस-याच्या पोटी जन्मलेल्या बाळासाठी आपली भरली छाती रिकामी करणारी पन्हा धाय ज्याला माहीत असते त्यालाच परहितार्थ समर्पणाचा अर्थ उमजणार. संवेदना सूचकांक सतत सजग नि सर्वोच्च ठेवणारं खांडेकरी साहित्य वाचणं वेगळं नि जीवन पाथेय, इप्सित म्हणून स्वीकारणं वेगळं.
 अलीकडेच मी वि. स. खांडेकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या व्यक्तिलेखांचे तीन संग्रह संपादित करून प्रकाशात आणलेत. साहित्यशिल्पी', ‘समाजशिल्पी’ आणि ‘जीवनशिल्पी' शीर्षकं आहेत त्यांची. खांडेकरांनी पूर्वसूरी व समकालीन साहित्यिकांबद्दल समन्यायी लेखन केलं. पूर्वसुरींबद्दल आदर, कृतज्ञता, तर समकालीनांबद्दल प्रीती, सद्भाव. हे सारं येतं जीवनाबद्दल असलेल्या आस्थेतून आणि जीवन ऊर्जस्वल बनविण्याच्या ध्यासातून. कोल्हटकर, खाडिलकर, देवल, हरिभाऊ, केळकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन खांडेकर लिहितात. आगरकर टिळक, गांधी यांच्या राजकीय सुधारणा विषय कार्यक्रमांबद्दल त्यांना आदर असतो. तो समाज पुढे नेण्याच्या त्यांच्या धडाडी आणि धडपडीमुळे. अल्बर्ट श्वाइत्झर असो वा डॉ. शंकरराव भिसे असो; त्यांची विज्ञाननिष्ठ वृत्ती त्यांना हवीहवीशी वाटत; कारण परंपरा गाडल्याशिवाय विज्ञानमूल्ये अवतरणार नाहीत याची खांडेकरांना खात्री असते. खांडेकर महर्षी शिंदे, राजर्षी छ. शाहूंबद्दल लिहितात, तेव्हा त्यांना माहीत असतं की, बहुजन समाज पुढारल्याशिवाय देश सुधारणार नाही.
 सामान्यांच्या मनातील छोट्या-छोट्या शंकांना खांडेकरी साहित्य समुपदेशकाच्या भूमिकेतून मदत, मार्गदर्शन करीत राहतं. म्हणून त्यांना जाऊन तीन दशके लोटली तरी खांडेकरी साहित्याचे पारायण पिढी-दरपिढी होत राहते. आवृत्त्यांवर आवृत्त्या येणं हे कशाचं लक्षण? मागे मी प्रा. ग. प्रधान यांना प्रत्यक्ष भेटून मी संपादित केलेली काही पुस्तके भेट द्यायला गेलो होतो. आता ‘साधनेचे कार्यालय असणाऱ्या घरात पत्नी आजारी होती. प्रधान सर शुश्रूषा करीत होते. वय वर्ष ८१ होतं. पुस्तकं देऊन परतलो. दोनच दिवसांत पत्र आलं. 'तुमच्या संपादित केलेल्या पुस्तकांनी मी ८१ वयाचा वृद्ध एकदम १८ वर्षांचा तरुण झालो. खांडेकरांची ‘उल्का' कादंबरी मी १८ व्या वर्षीच वाचली आणि मी ध्येयवादी झालो. ८१ व्या वर्षीही तो ध्येयवाद अटळ आहे. हे खांडेकर साहित्याचे सामर्थ्य मलाही काही तरी विधायक खटाटोप करण्याचा मंत्र देत राहतं.
वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतरच्या एका सत्कारात यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, आमची पिढी खांडेकर साहित्य वाचीत घडली. पिढी घडविण्याचे हे सामर्थ्य केवळ खांडेकरांच्या साहित्यातच नव्हतं, तर व्यक्तिमत्त्वातही होतं. शुद्ध आचरण, नैतिकता, हळवेपणा (याला काहीजण भाबडेपणा म्हणतात) यामुळे खांडेकर अनुकरणीय ठरतात, हे आपणास विसरता येणार नाही. ‘दोन ध्रुव', 'दोन मने'सारख्या कादंबऱ्या म्हणजे खांडेकरांच्या साहित्यिक मनातलं समाजद्वंद्वाचं मूर्त रूप! हिंदूमुस्लिम, दलित-सवर्ण, आस्तिक-नास्तिक, गांधीवाद-मार्क्सवाद, गरीबश्रीमंत या साच्या संघर्षातून आपणास उन्नत, प्रगत, मानव समाज घडवायचा आहे, हे मी तुम्हाला सांगतो' म्हणत खांडेकर ज्या निकराने आपली जीवनदृष्टी वाचकांत उतरवतात, त्यामुळे पिढी घडवण्याचं कार्य त्यांच्या साहित्यातून होत राहतं. मला जे खांडेकरांचं आकर्षण आहे, ते या विधायक सामाजिक अभियांत्रिकीच्या खांडेकरीय खटाटोपाचं. जातींना पुन्हा टोक येण्याच्या वर्तमानकाळात ते बोथट करण्याचे हत्यार परत खांडेकर साहित्यच ठरेल, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. नवी पिढी ही जातिअंत, निधर्मिता, परधर्मसहिष्णुता, वैश्विकता, स्त्री-पुरुष समानता, आर्थिक समाजवाद मानणारी बनेल, ती केवळ खांडेकर साहित्यावर पोसली तर ‘फिरुनि जन्मेन मी' असं आवर्तनकारी मूल्यबळ नि निष्ठा घेऊन जन्मलेलं हे साहित्य एका बहश्रुत, व्यासंगी, विवेकी लेखकाची हेतुपूर्वक निर्मिती आहे. ‘तेन त्यक्तेन भुजितःचा उपनिषदातील संदेश देणारं साहित्य गांधीवादावर माक्र्सचं कलम करण्याची कल्पना आपल्या कथानक, नायक-नायिका चरित्र, संवादातून व्यक्त करीत राहतं. त्याचा मला लागलेला घोर जागतिकरणातही माणूस यंत्र होणार नाही याचा विश्वास देत राहतं नि म्हणून मी या पुनर्शोधा ... चक्रव्यूहात अडकून राहतो. मला परतीचा मार्ग नकोच आहे.
  हा अमर मानवी प्रतिभेचा शृंगार
  तो उन्मन होता अथवा रचनाकार
 म्हणत कुसुमाग्रजांनी ज्या समाजपुरुषाची कल्पना केली, ते म्हणजे वि. स. खांडेकर! ही प्रतिमा त्यांच्या बहुविध साहित्यातून दिसून येते. त्यांचं ‘रंकाचं राज्य' नाटक म्हणजे राजा जाऊन प्रजा येणं समजावतं. ‘रिकामा देव्हारा' कादंबरीतील सुशीलेचं चरित्र शरच्चंद्रांच्या नायिकांपेक्षा कमी श्रेष्ठ नाही. ‘हिरवा चाफा' कादंबरीचे नायक, नायिका मुकुंद आणि सुलभाची कथा म्हणजे 'स्व'च्या पलीकडे जाऊन 'पर'दुःख आपलं मानण्याचा संस्कार. खांडेकरांची ‘कांचनमृग' कादंबरी मला समजावत राहते की, ‘शिक्षणामुळे बुद्धीचा विकास होतो; पण माणसाचं हृदय कोरडं राहिलं तर दुःखच वाट्याला येणार.' म्हणून मग घरासमोर उन्हा-पावसात थांबलेल्या पांथस्थास मला घरात घ्यावंसं वाटतं. त्याला नॅपकिन, टॉवेल देऊन, चहा-सरबत देऊन मदत करावी असं उफराट' वागावं वाटतं ते स्वतःचा । ‘कांचनमृग' होऊ द्यायचा नाही म्हणूनच! 'दत्तक आणि इतर गोष्टी माझ्या लेखी केवळ गोष्टी राहत नाहीत. त्यांतील ‘चकोर आणि चातक' कथा मला केवळ रूपककथा म्हणून कलात्मक वाटत नाहीत तर समाजाचे दोन ध्रुव जोडणारी ‘सेतुकथा' वाटत राहते. नवा प्रातःकाल’, ‘निर्माल्य'सारख्या कथा मला रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल' म्हणून प्रयत्नांचं बळ बांधतात. गार वारा' कथा मला त्यागी बनविते. ‘दवबिंदू' लघुनिबंध संग्रहातील ‘मनातील भुते लघुनिबंध मनातील अनेक द्विधा क्षणी त्यातील डॉ. शांताराम लक्षात ठेवण्यास भाग पाडतो. खांडेकरांचं वक्तृत्व मी कितीदा तरी ऐकलंय. माझ्या लक्षात राहिलंय त्या माणसाचं सतत अस्वस्थ राहणं; म्हणून मी अश्वत्थाम्याची जखम घेऊन वणवण करीत आहे.

(ए) वि. स. खांडेकर साहित्याची प्रस्तुतता

 मराठी भाषा आणि साहित्यास भारतीय बनविण्याचं ऐतिहासिक कार्य वि. स. खांडेकरांनी केले. भारतीय ज्ञानपीठाचा मराठीस लाभलेला पहिला पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांच्या 'ययाति' कादंबरीने भोगलोलुप होत चाललेल्या समाजास त्यागाची शिकवण दिली. वि. स. खांडेकर मराठी साहित्यक्षितिजावर अवतरले सन १९१९ मध्ये. सन १९७६ ला त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते अखंड लिहीत राहिले. सुमारे सहा दशकांच्या लेखनकाळात वि. स. खांडेकरांनी प्रचुर नि बहुआयामी लेखन केले; त्याच्या जीवनात त्यांनी विपुल लेखन केलं. पण हयातीत म्हणाल तर १६ कादंब-या, ३९ कथासंग्रह, ११ निबंधसंग्रह, ३ रूपककथा संग्रह, १ प्रस्तावना संग्रह, ८ लेखसंग्रह, ४ व्यक्ती आणि वाङ्मय ग्रंथ, १ व्यक्तिलेख संग्रह, १ चरित्रग्रंथ, १ आत्मचरित्र, ३ भाषांतरे, ३ भाषणसंग्रह, १ नाटक, ३५ संपादित ग्रंथ अशी सुमारे सव्वाशे पुस्तकं प्रकाशित झाली. सर्वसाधारणपणे लेखकाबरोबरच त्याच्या लेखन-प्रकाशनाचा ओघ थांबतो असं आपण पाहतो; पण वि. स. खांडेकर हे मराठीतील अपवाद लेखक म्हणायला हवेत. त्यांच्या निधनाला सुमारे ३० वर्षे होत आली. त्यांच्या पूर्वप्रकाशित साहित्याच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. एकट्या ‘ययाति' कादंबरीची पस्तिसावी आवृत्ती सध्या विकली जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांचं अप्रकाशित, असंकलित साहित्य शोधून काढून संशोधक, संपादक वर्तमान पिढीनं न वाचलेलं साहित्य संपादित करून प्रकाशित करीत आहेत. खांडेकरांच्या मृत्यूनंतर असे नवसाहित्य किती प्रकाशित झाले? असे पाह लागलो तर लक्षात येते की, १ कादंबरी, ३ व्यक्तिलेखसंग्रह, २ आत्मचरित्रात्मक पुस्तके, १ मुलाखतसंग्रह, १ पटकथासंग्रह, २ कवितासंग्रह, १ सचित्र चरित्रपट, १ चरित्रग्रंथ असे २५ ग्रंथ प्रकाशित झालेत अन् त्यांच्याही आवृत्त्यांवर आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. अजून १ विनोदी लेखसंग्रह, १ भाषणसंग्रह, २ समीक्षा ग्रंथ, २ वृत्तपत्रीय लेखनसंग्रह, २ अपूर्ण कादंबऱ्या, १ निवडक प्रस्तावना संग्रह, १ परीक्षण संग्रह, १ स्मारकग्रंथ असे डझनभर ग्रंथ संपादित झाले असून ते प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि नवा वाचक त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे.
 वि. स. खांडेकरांच्या साहित्यात अशी कोणती गोष्ट आहे की जिने कालच्या वाचकांना रिझवलं; आजच्या वाचकांना ते वाचणं आवश्यक वाटतं आणि कदाचित उद्याच्या वाचकांचंही ते आकर्षण असेल? वि. स. खांडेकरांच्या साहित्यपरंपरेच्या पार्श्वभूमीवर वेगळं ठरतं. खांडेकरांच्या लेखनाचं आपलं असं वेगळेपण आहे. वाचक ते वाचतो, तेव्हा आपला एक वडील माणूस जवळ बसवून चार हिताच्या गोष्टी ऐकवितो असा विश्वास ते निर्माण करतं. आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही अंगांनी ते सुसंस्कृत, सभ्य वाटत राहतं. उदाहरणच सांगायचं झालं तर खांडेकरांच्या कादंबऱ्यांत प्रेम असतं; पण त्यात कामुकता नसते. ते वाचीत असताना विचक्षणपणे लक्षात येतं की, अरे हे खांडेकरांचंच असलं पाहिजे. विशेषतः त्यातलं भाषासौंदर्य! विजेची चमक दाखविणाऱ्या कल्पना कराव्या उपमा द्याव्यात, सुभाषितवजा वाक्यांची फेक असावी ती खांडेकरांची! काही लोक त्याला कृत्रिम म्हणतात; पण कला नि कृत्रिमता या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. ‘भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आला नाही, तर त्याला भविष्याच्या गरुडपंखांचे वरदानही लाभले आहे. अशी वाक्ये वाचकांना एकाच वेळी त्यातील सौंदर्याने दिग्भ्रमित करतात आणि दुसरीकडे जगण्यावरील श्रद्धा वाढवित सामान्य, हताश वाचकांना जगण्याची उमेदही देतात. खांडेकरांच्या साहित्याचं खरं बलस्थान त्यांचं मूल्यशिक्षण होय. सदाचार, नैतिकता, अहिंसा, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता, पुरोगामीपणा या अशा गोष्टी आहेत की ज्यांचे महत्त्व केवळ कालातीत म्हणावं लागेल. ‘लास्टिंग ह्युमन व्हॅल्यू' कोण नाकारेल? शिवाय खांडेकरांचं लेखन, जीवन म्हणजे विचार आणि कृतींचं अद्वैत. ते महर्षी धोंडो केशव कर्वेवर गौरवलेख, चित्रपट (माझं बाळ) कथा लिहून ते थांबत नाहीत. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था, पंढरपूरचा अनाथाश्रम यांना नियमित भाऊबीज पाठवित. बाबा आमटेंना स्वतः भेटायला जाऊन नम्रतेने नमस्कार करणारे आणि नंतर त्यांच्या “ज्वाला आणि फुले' काव्यसंग्रहास स्वतः प्रस्तावना लिहिणारे खांडेकर ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा.' म्हणत जो आचारधर्म पाळतात, तो वाचकांच्या चोखंदळ, चिकित्सक नजरेत चिरंतन बसलेला असतो.
 खांडेकरांचे लघुनिबंध असोत वा रूपककथा. साध्या गोष्टी, प्रसंग, वस्तूतून चिरकालीन सत्य अधोरेखित करण्याचे सामर्थ्य हे खास खांडेकरी म्हणायला हवं. म्हणून त्यांचे साहित्य केवळ मराठीत वाचलं जात नाही, तर समग्र भारतीय भाषांत तिची भाषांतरे आढळतात. सिंधी, पंजाबी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ, गुजराती, हिंदी, इंग्रजी... कोणत्या भाषेत खांडेकर नाहीत हा संशोधनाचा विषय ठरावा. प्रेमचंद, शरदचंद्र, रवींद्रनाथ यांच्याप्रमाणेच खांडेकरी साहित्य भारतभर वाचलं जातं. विशेष म्हणजे त्या भाषेतही भाषांतरांच्या आवृत्त्या आजही प्रकाशित होतात. तमिळ, गुजरातीत तर खांडेकर त्यांच्या भाषेतीलच लेखक मानले जातात. तमिळ व मराठी वाचकांचा कौल घेतला तर माझी खात्री आहे की, तमिळ भाषिक मते खांडेकरांना अधिक मिळतील. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादराय यांना खांडेकरांच्या कादंबऱ्यांचे उतारेच्या उतारे पाठ होते. त्यांच्या 'द्रविड कळघम', 'द्रविड मुनेत्र कळघम' पक्षाची चळवळ खांडेकर विचारांवर उभी राहिली आहे. तमिळ साहित्य इतिहासात ‘खांडेकर साहित्य युग/अध्याय म्हणून अभ्यासले जाते. खांडेकरांचे तमिळ अनुवादक का. श्री. श्रीनिवासाचार्य तर तमिळमध्ये लेखक म्हणून ओळखले जातात, ते केवळ खांडेकरांच्या भाषांतरामुळे. अशीच परिस्थिती मी गुजरातमध्ये प्रत्यक्ष अनुभवली आहे. सन १९४४ पासून आजअखेर खांडेकर गुजरातीत वाचले जात आहेत. त्यांनाही खांडेकर आपले वाटतात. त्याचं छोटं उदाहरण सांगता येईल. तेथील एक समीक्षक आहेत - डॉ. सुरेश दलाल. त्यांच्या खांडेकरांवरील एका लेखाचंच शीर्षक आहे मुळी ‘मराठी भाषेतील गुजराती कादंबरीकार' तमिळ आणि गुजराती भाषांत खांडेकरांच्या जवळजवळ सर्व कथा, कादंब-या भाषांतरित झाल्या आहेत. श्रीलंका, रशिया, मलेशियामध्ये खांडेकर साहित्यावर संशोधन, समीक्षा आहे. रशियात ‘ययाति' भाषांतरित झाली आहे. देश, प्रदेशाच्या सीमा ओलांडणारं खांडेकरी साहित्य त्या मातीत रुजतं ते त्याच्या वैश्विक सामर्थ्यामुळेच ना?
 वि. स. खांडेकरांनी आपल्या साहित्यातून 'रामायण', 'महाभारत', ‘पुराण' इत्यादींमधील पात्रं घेऊन त्यांची मिथके वर्तमानाशी जोडली. म्हणून प्राचीन व आधुनिकतेचा सेतू निर्माण करणारं हे साहित्य जुन्या, नव्या पिढीस वाचनीय ठरतं. खांडेकर पाश्चात्त्य साहित्याचे व्यासंगी वाचक व अभ्यासक होते. टॉलस्टॉय, स्टीफन झ्वाइग, हेमिंग्वे, शेक्सपीअर, खलिल जिब्रान, अर्नेस्ट टोलर, शेले, कीट्स, बायरन, आदी कथाकार, नाटककार, कवी खांडेकरांनी चांगले वाचले होते. खलील जिब्रान, अर्नेस्ट टोलरच्या रूपककथा, पत्रे यांची भाषांतरे ‘सुवर्णकण’, ‘सोनेरी सावल्या', ‘वेचलेली फुले', 'तुरुंगातली पत्रे'च्या रूपांनी उपलब्ध आहेत. दुसरीकडे ‘शाकुंतल', ‘उत्तररामचरित्र', 'शारदा' यांच्या सौंदर्याची खांडेकरांना जाण असते. 'मॅकबेथ', 'हॅम्लेट', ‘प्रॉमिथिअस’, ‘ज्यूलियस सिझर त्यांना माहीत असतो. साहित्यिक श्रेष्ठत्वाच्या पाऊलखुणा चोखळणारे खांडेकर वैश्विक दर्जाचं लेखन करू शकले ते चतुरस्त्र वाचन, व्यासंगामुळे. या साऱ्यांचं एक वैचारिक अधिष्ठान खांडेकरी साहित्याला लाभलेलं असतं. त्यामुळे वाचक आपण एक प्रगल्भ, अभिजात साहित्य वाचतो या भावनेनं खांडेकरांच्या साहित्याकडे गांभीर्याने पाहतो. वाचकांचे खांडेकर वाचन हा शिळोप्याचा उद्योग न राहता वेळेचा सदुपयोग म्हणून जीवनदृष्टी देणारं ठरतं. पूर्वपश्चिम, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, प्राचीन-आधुनिक असा सेतू खांडेकर सतत बांधत एक वैश्विक अभियांत्रिकी रचत जातात. त्यातून वाचक मराठी न राहता भारतीय, जागतिक आपसूकच होतो. “आपणासारिखे करुनि सोडावे सकळजन' हा खांडेकरीय साहित्याचा वस्तुपाठ... त्यातच खांडेकर साहित्याची वाचनीयता, अविस्मरणीयता, अमरता सामावलेली आहे; म्हणून खांडेकर काल वाचले जात होते, आज वाचले जात आहेत, उद्या वाचले जातील ही तर काळ्या दगडावरची रेघ! त्याला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. (ऐ) वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय : प्रेरणा आणि दृष्टी
 मराठी भाषा व साहित्यास पहिला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे पद्मभूषण वि. स. खांडेकर हे सर्व भारतीय भाषांत मानाचे स्थान मिळविलेले श्रेष्ठ साहित्यिक होते. त्यांनी आपल्या कथा, कादंबरी, लघुनिबंध, रूपककथा, वैचारिक लेख,व्यक्तिवाङ्मय, व्यक्तिचित्र, चरित्र, आत्मकथा, भाषांतर, काव्य, संपादन, पटकथा, भाषणे, मुलाखती, विनोदी लेख, नाटक असे विविधांगी लेखन करून मराठी साहित्यात केवळ मोलाची भरच घातली असे नाही, तर त्यांनी आपल्या भाषा, शैली, विचारांचा खोल ठसा मराठी साहित्यावर उमटविला. जीवनासाठी कला' विचाराची भूमिका घेऊन केलेलं त्यांचं समग्र लेखन म्हणजे मानवी जीवनातील प्रश्नांचा समाजशील वेध असायचा. इंग्रजीतील शेक्सपीअर, रशियातील मॅक्सिम गॉर्की, बंगालीतील शरद्च चटर्जी, तर हिंदीतील प्रेमचंद म्हणता येईल असे त्यांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व, आज त्यांचा लेखनकाळ सरून सुमारे चार दशकांचा कालावधी लोटला तरी त्यांच्या साहित्यवाचकांचा ओघ क्षीण झाला नाही. त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. याचे कारण त्यांच्या साहित्यविचारात असलेले जीवनमूल्य, संस्कार, शिक्षण, जीवनदृष्टी देणारे त्यांचे साहित्य लोक स्वास्थ्याने वाचणे पसंत करतात, ते त्यांच्या साहित्यात असलेल्या पिढी घडविण्याच्या सामर्थ्यामुळे.
 अशा साहित्यसम्राटाचे एक स्मृती संग्रहालय उभारण्याचा संकल्प शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरनं एकविसाव्या शतकाच्या प्रारंभिक वर्षातच म्हणजे सन २००१ ला सोडला. २ सप्टेंबर, २००१ रोजी वि. स. खांडेकरांच्या निधनाला २५ वर्षे पूर्ण होत होती. ते वर्ष ‘खांडेकर रजत स्मृती वर्ष' होते. त्याचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाने दोन कामे केली. एक, विद्यापीठातील सर्व भाषा विभागांसाठी बांधलेल्या इमारतीचे, भाषाभवनाचे अनौपचारिक उद्घाटन माझ्या नि तत्कालीन कुलगुरू डॉ. मु.ग.ताकवले यांचे संयुक्त हस्ते करून त्या इमारतीचे ‘वि.स. खांडेकर भाषा भवन' असे नामकरण केले. त्या दिवशी शिवाजी विद्यापीठाने रजत स्मृती दिनाचे औचित्य साधून 'खांडेकरांचे अप्रकाशित साहित्य' विषयावर माझे भाषण आयोजित केले होते. भाषणाच्या ओघात मी या भवनात वि. स. खांडेकरांचे स्मृती संग्रहालय उभारणे औचित्यपूर्ण ठरेल, असा विचार मांडला होता. तो शिवाजी विद्यापीठाने उचलून धरला. खांडेकर कुटुंबीयांनी आणि विशेषतः खांडेकरांच्या कन्या मंदाताईंनी त्यासाठी सर्व ते साहाय्य, साधनं देण्याचे मान्य केले. याचे प्राथमिक श्रेय शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन मराठी विभागप्रमुख व लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांना द्यायला हवे.
 स्मृती संग्रहालयाची कल्पना माझ्या मनात येण्याचे हेही कारण होते. सन १९९७-९८ हे ‘वि. स. खांडेकर जन्मशताब्दी वर्ष' होते. त्या वर्षात जया दडकर यांनी केलेली ‘वि. स. खांडेकर वाङ्मय सूची' माझ्या हातात आली. ती प्रकाशित होऊन तप उलटून गेले होते. त्यात वि. स. खांडेकरांच्या अप्रकाशित, असंग्रहित साहित्याची नोंद आणि सूची होती. हे सर्व एकत्र करण्याची आणि त्याची पुस्तकं करण्याची कल्पना माझ्या मनात आली. ते सारं साहित्य मी शोधू लागलो, मिळवू लागलो. मंदाताई खांडेकरांनी त्यांच्या संग्रही असलेले सारे साहित्य देण्याची तयारी दर्शविली, तसा माझा उत्साह वाढला. सुमारे ३००० पानं छापून होतील असा मजकूर मी जमविला. महाराष्ट्रातील सारी ग्रंथालयं, विद्यापीठं, वर्तमानपत्रांच्या कचेऱ्या जुन्या बंद झालेल्या मासिकांची दप्तरं, व्यक्ती, संस्था असा शोध घेत सारा महाराष्ट्र पालथा घातला. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. द. ना. धनागरे यांनी यासाठी सन १९९७-९८ मध्ये पत्र देऊन मोठी मदत केली होती. एव्हाना ‘वि. स. खांडेकर रजत स्मृती वर्ष' तोंडावर आलं होतं. मी उपलब्ध मजकुरातून २५ पुस्तकं होतील, अशी योजना आखली. मंदाताई खांडेकर,अनिलभाई मेहता, सुनील मेहता यांनी प्रकाशनास संमती दर्शविली.या साऱ्या शोधात वि.स.खांडेकरांच्या जीवनासंबंधी अनेक संदर्भसाधने, हस्तलिखिते, छायाचित्रे, खर्डे, दैनंदिनी, मानपत्रे, पत्रे, मुलाखती, ध्वनिफिती, चित्रफिती, चित्रपट साधने (पोस्टर्स, बॅनर्स, जाहिराती, पुस्तिका, गाणी, पत्रव्यवहार इत्यादी) माझ्या हाती आली होती.
 शिवाजी विद्यापीठाने असे संग्रहालय उभारण्यामागे विद्यापीठाच्या स्थापनेपासून वि. स. खांडेकरांचा घनिष्ठ संबंध होता. मराठी ज्ञानभाषा व्हावी, अशी खांडेकरांची भूमिका होती. तत्कालीन मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांनी स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी हे राज्य मराठ्यांचे की मराठीचे अशी पृच्छा केल्यानंतर निःसंदिग्ध शब्दांत 'मराठीचे' असं उत्तर देऊन कृतिशील कार्यक्रमाचा धडाका लावला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या पाठोपाठ त्यांनी मराठी भाषा ज्ञानभाषा करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा संकल्प सोडला होता. या विद्यापीठाच्या निर्मितीच्या वेळी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्यांत वि. स. खांडेकरांचा समावेश आवर्जून केला होता. शिवाजी विद्यापीठाच्या अनेक समारंभांत वि.स.खांडेकरांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले जायचे. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात वि. स. खांडेकरांच्या साहित्याचा अंतर्भाव असायचा. साहित्य अकादमीचं महदत्तर सदस्यत्व (फेलोशिप) खांडेकरांना द्यायचे जाहीर झाल्यानंतर ते स्वीकारण्यासाठी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते नवी दिल्लीस जाऊ शकत नव्हते. अकादमीने ते कोल्हापुरात बहाल करायचे ठरल्यावर शिवाजी विद्यापीठाने पुढाकार घेऊन तो समारंभ दिमाखदार सोहळ्यात पार पाडला. जन्मशताब्दी सोहळाही पुढाकार घेऊन साजरा केला. खांडेकरांचं स्मृती तिकीट निघावं म्हणून पाठपुरावा, पत्रव्यवहार, प्रकाशन सोहळा हे सर्व विद्यापीठानं केलं. या पाश्र्वभूमीवर स्मृती संग्रहालय उभारणं सुसंगतच म्हणावं लागेल.
 या संकल्पित वस्तुसंग्रहालयाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने एक प्रकल्प समिती नेमली.तीन भाषा विभाग प्रमुखांसह त्यात माझाही समावेश केला. सर्वश्री. डॉ. चंद्रशेखर जहागीरदार (इंग्रजी), डॉ. रवींद्र ठाकूर (मराठी), डॉ. अर्जुन चव्हाण (हिंदी) यांनी पहिल्या सभेतच या समितीचे समन्वयक बनवून माझा गौरव केला. पुढे आम्ही वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पं. ना. पोतदार व वास्तुशिल्पी विजय गजबर यांच्या साहाय्याने एक कृती प्रकल्प सादर केला. त्याला शिवाजी विद्यापीठाने तत्त्वतः मंजुरी देऊन ३.५ लाख रुपये मंजूर केले आणि अचानक डॉ.मु.ग.ताकवले यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त कानी आले. ते,मी,प्रकुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वृत्त आले त्या दिवशी एकत्र होतो.अनौपचारिक गप्पांत मी संग्रहालयाबद्दल काळजी व्यक्त केल्यावर डॉ. ताकवले यांनी संग्रहालय स्थापन केल्याशिवाय पदभार सोडणार नाही, असे आश्वासन दिले, पण त्यांच्या हातांत चोवीस तासही उरले नव्हते. मी अधिकच चिंता व्यक्त केल्यावर त्यांनी मला सायंकाळी घरी भेटायला सांगितले. मी घरी गेलो आणि त्यांनी संग्रहालय स्थापनेचा संचालक म्हणून नियुक्तीचा आदेशच माझ्या हाती दिला. क्षणभर मला खरंच वाटलं नाही. मग मी आणखी एक विनंती केली की, पदभार सोडण्यापूर्वी आपण साधनसंग्रहाचा अनौपचारिक समारंभ करू. त्यांनी होकार दिला. ११ मार्च, २००४ रोजी ते सकाळी ११.०० वाजता पदभार सोडणार होते. १०.०० वाजता त्यांच्या दालनात वि. स. खांडेकरांचं पद्मभूषण प्रशस्तीपत्र व ‘अश्रू' कादंबरीची हस्तलिखित प्रत प्रदान करण्यात आली. ती स्वीकारून त्यांनी पदभार सोडण्याच्या सोहळ्यास जाणे पसंत केले व संग्रहालयास मूर्त स्वरूप आले.हे त्यांच्या वि.स.खांडेकरांविषयीच्या आदरामुळेच घडले होते.
 वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय प्रत्यक्ष साकारले ते मात्र त्यांचे उत्तराधिकारी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुखे यांच्या उदार व धडाडीच्या वृत्तीमुळे. मध्यंतरीच्या काळात संग्रहालय उभारणीस आश्वासन देणाऱ्या काही व्यक्तींच्या गैरसमज, असहकार, कुरापती इत्यादींमुळे संग्रहालय उभारणीपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. कुलगुरू डॉ. साळुखे यांना हे व्हावे असे आजून वाटत होते. मी त्यांना पुरस्कार, मानपत्रे, छायाचित्रे त्या आदींच्या प्रतिकृतींतून हे साकारता येईल असे पटवून दिले. त्यांनी संमती दर्शवताच मी भारतीय ज्ञानपीठ, नवी दिल्ली; साहित्य अकादमी, नवी दिल्ली, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक; ‘वि. स. खांडेकर सचित्र चरित्रपट'चे लेखक जया दडकर, इतिहास संग्राहक सदानंद कदम, तिकीट संग्राहक दत्ता धर्माधिकारी, ‘आकाशवाणी'चे पुराभिलेख संग्रहालय, मुंबई; राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, पुणे; मेहता पब्लिशिंग होऊस, पुणे; विविध मासिके, वृत्तपत्रे, पत्रसंग्राहक इत्यादींशी संपर्क साधून काही मूळ साधने, तर काहींच्या प्रतिकृती बनविल्या. या कामी पं. ना. पोतदार, विजय गजबर, ठेकेदार मनोहर सुतार चित्रकार संजीव संकपाळ, अतुल डाके, संग्रहालयाचे विशेषाधिकारी एम. पी. तथा बाळासाहेब निचिते, प्रभृतींचे जे साहाय्य लाभले ते कधीच विसरू शकणार नाही. या संग्रहालयाची ही खरी शिलेदार मंडळी. पुढे दशकभराच्या कालावधीनंतर खांडेकर कुटुंबीयांनी मूळ पुरस्कार, मानपत्रे, वस्तू इत्यादी उदार अंतःकरणाने प्रदान करून हे संग्रहालय मूळ वस्तूंसह समृद्ध केले. त्यांचेही ऋण अविस्मरणीय म्हणावे लागतील.
 पूर्णरूप आलेले आणि साहित्यप्रेमी विद्यार्थी, साहित्यिक, वाचक, संशोधक, प्राध्यापक, पत्रकार, समीक्षक, संपादकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय'चा संकल्पक, संशोधक, संग्राहक म्हणून त्याच्या निर्मितीच्या अनेक प्रेरणा होत्या. शालेय विद्यार्थिवयात मी वि. स. खांडेकरांनीच सुरू केलेल्या आंतरभारती विद्यालय, कोल्हापूरमध्ये शिकलो. त्या काळात खांडेकरांचा सहवास लाभला. त्यांनी आम्हास प्रत्यक्ष शिकवलं. त्यांची अनेक भाषणे ऐकली. अन्य अनेक साहित्यिकांचीपण. महाविद्यालयाच्या शिक्षणकाळात मी त्यांच्या समग्र साहित्याचे वाचन करीत राहिलो. नंतर शिक्षक होऊन त्यांच्याच शाळेत म्हणजे आंतरभारती विद्यालयात शिक्षक झालो. पुढे त्यांच्या कथा, कादंबरी, रूपककथांचे अनुवाद केले. नंतर त्यांच्या समग्र अप्रकाशित साहित्याचं संकलन, संपादन, संस्कार करून २५ पुस्तकांची निर्मिती केली. त्यातही कथासंग्रह, रूपककथा संग्रह, लघुनिबंधसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, व्यक्तिचित्र संग्रह, आत्मकथनात्मक ग्रंथ, मुलाखत संग्रह, भाषणसंग्रह, पटकथासंग्रह, विनोदी लेखसंग्रह, समीक्षात्मक लेखसंग्रह अशी विविधता व समग्रता होती. यातून माझ्या असे लक्षात आले की, वि. स. खांडेकर केवळ साहित्यिक नव्हते, तर ते विचक्षण असे समाजशिक्षक होते. हे संग्रहालय उभारत असताना अशी भूमिका होती की, ते पाहताना पुढच्या पिढीला लेखनाचं महत्त्व, जीवनात मूल्यांची प्रस्तुतता, सामाजिक समस्यांचं भान येऊन प्रत्येक प्रेक्षक, दर्शक हा समाजशील, विधायक वृत्तीचा, धर्मनिरपेक्ष, वैज्ञानिक दृष्टी धारण करणारा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही निष्ठा मानणारा, साहित्य व भाषाप्रेमी नागरिक घडावा. या स्मृती संग्रहालयाचं अनौपचारिक उद्घाटन आम्ही आंतरभारती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रथम प्रवेशानं केलं. वस्तुसंग्रहालय पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली, “आम्ही लेखक सर्व वाचले. शिक्षकांनी प्रतिक्रिया दिली, “आम्ही शिक्षक असल्याचा आज सार्थ अभिमान वाटला.' साहित्यिक मधू मंगेश कर्णिक म्हणाले होते, ‘आमच्या केशवसुत स्मारकाचं हे पुढचे पण भव्य असं पाऊल आहे. कवी ग्रेस यांनी अंतर्मुख होऊन प्रश्न केला होता, ‘माझं होईल का असं संग्रहालय?' या वेळोवेळच्या साच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद निर्मितीमागील प्रेरणांचीच पोहोच होय.
 वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय हे मराठी साहित्याचे राऊळ आहे. त्याच्या दर्शनीच आपणास मराठी मुळाक्षरांचा अक्षरवृक्ष भेटतो. ते आहे आपल्या मराठी राजभाषा विभागाचं तसं पाहिलं तर बोधचिन्ह; पण ते आपणास भान देतं वि. स. खांडेकरांच्या साहित्याच्या समग्रतेचं! ‘अ’ ते 'ज्ञ' ह्या मराठी भाषेच्या ५२ मातृकांचं प्रतिबिंब म्हणजे वि. स. खांडेकरांचं प्रतिबिंब. त्यात मराठी भाषेचे अलंकार, समास, ध्वनी, स्वर, व्यंजन, व्याकरण, छंद, शब्द, विभक्ती, प्रत्यय, पद, अर्थ, काळ, उच्चार, व्युत्पत्ती... काय नाही सापडत? त्या समग्रतेचं ते प्रतीक! आणि त्याच्याबरोबर समोर स्थानापन्न आहे वि. स. खांडेकरांचा अर्धपुतळा. अर्धपुतळाच का? पूर्णाकृती पुतळा उभारता आला असता; पण आमची धारणा आहे की, वि. स. खांडेकर - व्यक्ती, विचार व साहित्यिक पूर्ण समजून घेणे - येणे अशक्य! त्या आस्वादक अपूर्णतेचं पूर्ण प्रतीक म्हणून अर्धपुतळा. तो कशावर उभा आहे माहीत आहे? पेनाच्या निबेच्या टोकावर; कारण वि. स. खांडेकरी सारं चित्र नि चरित्र उभं आहे लेखणीच्या आधारावर मग आपण प्रत्यक्ष संग्रहालयात प्रवेश करतो ते प्रवेशद्वार दुसरं-तिसरं काही नसून आहे ते प्रचंड बुकशेल्फ! एकीकडे 'ययाति' (श्रेष्ठ कादंबरी) व उ:शाप (श्रेष्ठ कथासंग्रह), तर दुसरीकडे ‘हृदयाची हाक' (पहिली कादंबरी) व 'वन्हि तो चेतवावा' (वैचारिक लेखसंग्रह... संग्रहालय सुरू होतानाचं प्रकाशित शेवटचं पुस्तक.) त्यावरचा ब्लर्ब वाचाल तर तो म्हणजे खांडेकरांच्या साच्या जीवन व विचाराचं बोधामृत! खांडेकरांच्या साहित्याच्या अपरासृष्टीचं ते प्रतिबिंब आपणास पाहायला मिळतं प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना लावलेल्या आरशांमध्ये! तिथं प्रेक्षकांना दिसतात अगणित पुस्तकं नि त्यात प्रेक्षकांचे चेहरेही! ही असते लेखक व वाचकाची गळाभेट, मनोमिलन, अद्वैतता! पुढे दोन भव्य काचेचे दरवाजे आपल्या स्वागताला उभे असतात... त्यांवर दोन मोठी पेन्सिल्सची हँडल्स. क्षणभर ‘सलाऽऽमी शस्त्र'चा पुकारा करीत उभे जणू रक्षकच! हो रक्षकच... कारण इथं वर लावलेत व्हिडिओ कॅमेरे, सेन्सर, गजर आणि बरंच काही. ही असते । आतल्या अमूल्य वारसा, ठेवा, संग्रहाची टेहळणी, सुरक्षा व डोळ्यांत तेल घालून केलेली, घेतलेली काळजी. हँडल्स पेन्सिलीचीच का? तर खांडेकरांना टाक, दौतींनी लिहिण्यापेक्षा पेन्सिलनं लिहिलेलं आवडायचं; कारण का, तर दौतीत टाक बुडवून लिहायला वेळ लागतो, विचार, कल्पनेत खंड पडतो. पेन्सिलने कसं झरझर अखंड लिहिता येतं... विचार, कल्पनेच्या गतीनी. आणि पेन्सिल पण अशी-तशी नाही. ताजमहाल ब्रँड, बव्हेरिया मेड (जर्मन). दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी युद्धग्रस्त होता, पेन्सिलचा कारखाना बंद पडलेला; पण त्यांचे प्रकाशक त्यांना जगातून हुडकून त्या पुरवायचे अन् खांडेकरांचाही तसा हट्ट असायचा.
 वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या दालनात आपण एक पायरी उतरून प्रवेश करतो तेव्हा आपणापुढे उभं ठाकतं एक भव्य भित्तिचित्र(म्युरल). आपण जे संग्रहालय पाहणार असतो त्याची असते ही एक झलक! चित्रकार संजीव संकपाळ व अतुल डाके यांनी जिवाभावाने उभारलेले उठावचित्र म्हणजे खांडेकरांच्या जीवनकार्याचा मौन परंतु बोलका इतिहास. हे भित्तिचित्र आपणास समजावतं... खांडेकरांनी मराठी भाषा व साहित्यास पहिलं ज्ञानपीठ मिळवून देऊन भारतीय भाषांच्या मध्यप्रवाहात आणलं. वि. स. खांडेकरांनी एकीकडे मोरपिसासारखं मनोहारी, मऊ, मुलायम ललित लिहिलं आणि दुसरीकडे मशालीसारखं प्रखर, प्रगल्भ, वैचारिकही. त्यांच्या साहित्यात प्रेम, प्रणय, प्रश्न, प्रहसन (व्यंग, विनोद) सारं आढळतं. खांडेकरांच्या साहित्याचे अनुवाद अनेक भाषांत झालं, खांडेकरांनी अनेक चित्रपट कथा लिहिल्या म्हणून यात फिल्म, कॅमेरा इत्यादी खांडेकरांचं आरंभिक लेखन कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर लाटा, सूर्य, ताडमाड पाहत निरखत झालं. त्याचं प्रतिबिंबही यात पाहण्यास मिळतं. शिवाय खांडेकरांनी माणसाच्या झालेल्या कांचनमृगाची केलेली संभावना व ‘चकोर आणि चातक'च्या प्रतीकातून केलेला माणसाचा झालेला ‘क्रौंचवध'. हे असते ' म्युझियम अॅट एक ग्लान्स.'
 मग सुरू होते एका साहित्यऋषीची जीवनयात्रा! जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा खडतर अखंड प्रवास! वंशवृक्ष, पूर्वज, जन्मघरातून कळते जन्मकथा. बालपण, शिक्षण सांगलीत. सांगली हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. सन १९१३ साली बेळगाव केंद्रातून मुंबई इलाख्यात बारावे, महाराष्ट्रात आठवे, तर बेळगाव केंद्रात दुसरे आलेले गणेश आत्माराम खांडेकर (हे त्यांचं जन्मनाव!) त्यांची चक्क रिझल्ट शीट, एक्झाम रोल पाहत आपण विसाव्या शतकाच्या उदयकाळी पोहोचतो ते कळतही नाही. सन १९१६ साली खांडेकर आपले काका सखाराम खांडेकर यांना दत्तक गेले अन् विष्णू सखाराम खांडेकर (हे त्यांचं दत्तक नाव!) झाले. सावंतवाडीच्या भटवाडीतील ज्या घरात दत्तक समारंभ पार पडला ते घर, त्यांचे दत्तक वडील सावकारी करीत. त्या सावकारीचे दस्त (कागदपत्रे) ठेवण्याची पेटी, दत्तक वडील मोडी लिपीत लिहीत. त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र (मराठी भाषांतरासह!) पाहत वाटू लागतं की, दत्तक समारंभ संपन्न होतो आहे नि आपण अक्षता टाकतो आहोत... साक्षीदार म्हणून! वि. स. खांडेकर जेव्हा दत्तक गेले तेव्हा ते फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे शिकत होते. तिथे त्यांची भेट मराठीतील विख्यात नाटककार राम गणेश गडकरी यांच्याशी झाली.  साहित्यिक गप्पा रंगत ती गडकऱ्यांची माडी, गडकऱ्यांबरोबर ज्या किर्लोस्कर संगीत थिएटरमध्ये अनेक नाटकं पाहिली ते सारं पाहत आपण गुरुशिष्याचा हृदयंगम संवाद ऐकतो आहोत असा भास होतो. इथंच आपली भेट वि. स. खांडेकरांचे गुरुत्रयी सर्वश्री. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाकर तथा काकासाहेब खाडिलकरांशी होते. यांचा वारसा घेऊन खांडेकरांनी ‘संगीत रंकाचे राज्य' नाटक लिहिले होते. जी गोष्ट गुरूंची तीच ग्रंथांचीही. खांडेकरांनी आपल्याला लेखक, साहित्यिक बनविणारे चार ग्रंथ विशद केले होते - ‘अरेबियन नाइट्स' (दहावे ते अठरावे शतक पूर्व), 'रामायण' (दोन हजार वर्षापूर्व), ‘सुदाम्याचे पोहे' (१९१०), आणि शिरोडे (गाव). हे गावही समुद्र, मिठागरे, चर्च इत्यादींनी साकारले आहे. ही चार पुस्तके म्हणजे खांडेकरांच्या साहित्यातील कल्पना, मिथक, विनोद आणि समाजवास्तवाचं मूर्त दर्शन! हे सर्व पाहत प्रेक्षकांना वि. स. खांडेकरांच्या साहित्यिक म्हणून घडण्याची पूर्वपीठिका, संस्कार, सहवास यांची जाणीव होते अन् लक्षात येतं, लेखक असाच नसतो घडत.
 वि. स. खांडेकरांना शालेय वयापासून लिहिण्याचा छंद असला तरी लौकिक अर्थाने ते लेखक झाले सन १९१९ मध्ये. 'नवयुग' मासिकाच्या ऑगस्ट-सप्टेंबर अंकात 'तुतारी वाड्मय व दसरा' (टीकालेख) आणि ‘होळी' (कविता) प्रकाशित होऊन खांडेकर औपचारिकपणे लेखक झाले. थोड्याच दिवसांत कथा, कादंबरी, रूपककथा, लघुनिबंध, नाटक अशी साहित्यिक सप्तपदी घालत लेखक खांडेकरांचा साहित्यिक विकसित झाला. ती सारी सप्तपदी मूळ रूपांत पाहत, वाचीत प्रेक्षक पुढे जातात अन् । ‘शिरोडा पर्व' सुरू होते, सुरू होतो गांधीयुगाचा ओनामा! दत्तक वडिलांच्या हात आखडता घेण्याने खांडेकर फर्गुसनमधील शिक्षण सोडतात आणि ट्युटोरियल इंग्लिश स्कूलचे शिक्षक होणे पसंत करतात. यामागे स्वावलंबनाचा ध्यास असतो. अन् असतो टिळक, आगरकर, गांधींचा ध्येयवाद, राष्ट्रवादही. शिक्षक म्हणून आगमन झाले तरी त्यांची नियुक्ती मात्र हेडमास्तर म्हणून होते. शाळेचे त्रिस्थळी भरणारे वर्ग पाहून खांडेकर पैसाफंड योजना राबवितात. ८० रुपये पगार असताना प्रत्यक्षात हातात पडत ३५-४० रुपये. सन १९२५ साली सुमारे २५००० रुपयांची लोकवर्गणी जमविण्याचा पुरुषार्थ खांडेकर व त्यांचे सहकारी आप्पा नाबर, चं. वि. बावडेकर, शिनारी, दळवी, आजगावकर, प्रभृती करतात ते स्वतःची रु. १००० ची देणगी देऊन. खांडेकरांच्या हस्ताक्षरातील इमारत बांधकामाचा जमाखर्च, शिक्षकांचे हजेरीपत्रक (त्या वेळी मस्टरवर शिक्षक सह्या करीत नसत, तर हेडमास्तर शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रमाणे P,P,P करीत हजेरी मांडत), पगारपत्रकावर असलेली व्हिक्टोरिया राणीची तिकिटे व तुटपुंजा पगार या सर्वांतून त्या वेळचं शिक्षण जगत जिवंत होतं. विद्यार्थी थोराड असत. शिक्षक व विद्यार्थी सर्वच टोपी, सदरा, धोतर, कोट असा वेश परिधान करीत. विद्यार्थी उभे व शिक्षक खुर्चीवर बसलेले हाच काय तो दोघांतील फरक. हे सर्व चित्र आज पाहत असताना पूर्वी शिक्षण क्षेत्र किती प्रतिकूल होतं व शिक्षक कसे राष्ट्रीय भावनेने शिकविण्याचे कार्य व्रत, सतीचं वाण म्हणून करीत हे जाणवून प्रेक्षक शहारतात व अंतर्मुख होतात; तर आजचे शिक्षक खजिल! अशी प्रतिक्रिया निर्माण करणंच या वस्तुसंग्रहालयाचा उद्देश होता.
 'केसरी'कार लोकमान्य टिळक, ‘सुधारक'कार गोपाळ गणेश आगरकर, ‘निबंधमाला'कार विष्णुशास्त्री चिपळूणकर 'काळ'कर्ते शिवराम महादेव परांजपे प्रभृतींच्या लेखन व पत्रकारितेमुळे महाराष्ट्रात राष्ट्रीय बाण्याची वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके निघण्याची, प्रकाशित होण्याची समृद्ध परंपरा महाराष्ट्रास लाभल्याने त्याचे लोण सावंतवाडीसारख्या तत्कालीन छोट्या संस्थानातही येऊन न पोहोचले असते तरच आश्चर्य!
 ‘खींचो न कमान को, न तलवार निकालो।।
 जब तोप मुकाबिल हो, तो अखबार निकालो।।'
सारख्या ओळी त्या वेळच्या कृतिशील तरुणांना प्रेरणा देत होत्या. यामुळे मेघश्याम शिरोडकरांनी एक साप्ताहिक सावंतवाडीला सुरू करण्याचं ठरविल्यावर त्यांनी वाङ्मय विभागाचे संपादक म्हणून खांडेकरांची निवड केली असली तरी खांडेकर बातम्या, सदरे (स्तंभ), पुस्तक परिचय, अग्रलेख, स्फुट असं सर्वंकष लेखन करीत. त्या सर्वांचे प्रातिनिधिक दर्शन, वाचन करताना प्रेक्षक हेलावून जातो व खांडेकरांच्या राष्ट्रीय चळवळीतील अक्षर योगदानापुढे नतमस्तक होतो. प्रेक्षकांत वर्तमानकाळात असा राष्ट्रीय बाणा निर्माण करण्याची प्रेरणा या प्रदर्शनामागे स्पष्ट होते.
 वि. स. खांडेकरांचं पहिलं प्रकाशित पुस्तक एक नाटक होतं 'संगीत रंकाचे राज्य' (१९२८). या नाटकाचं वैशिष्ट्य असं की, ते प्रथम रंगमंचावर सादर झालं आणि नंतर त्या नाटकाला पुस्तकरूप आलं. या नाटकाची मनोवेधक छायाचित्रे आपणास विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या नाटकाचं भान देतात. हे नाटक यशस्वी झालं आणि खांडेकरांचे दोन्हीचे चार हात झाले. आपल्या पत्नीचं त्यांनी ‘उषा' नाव ठेवलं. “संगीत रंकाचे राज्य'ची नायिका उषाच होती. बहुधा ती मनपसंतीची खूणच. या सर्वांतून खांडेकरांचं व्यक्तिमत्त्वही स्पष्ट होतं. या लग्नाचं निमंत्रण खांडेकरांनी साधं पोस्ट कार्ड लिहून आप्तांना धाडलं होतं. ते मोडी लिपीत होतं. सोबत पत्राचा मराठी तर्जुमा दिल्यानं खांडेकरांचं साधेपण उजळतं, उमजतं.
 हे साधेपण अधिक स्पष्ट होतं ते या वस्तुसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या लेखकाच्या पडवीतून! शिरोड्याला असताना खांडेकर आरवलीच्या रेग्यांच्या घरी राहत. दोन सोप्यांचं घर. वरती नळ्याची, अर्धगोलाकार काळी कौलं. भिंती, जमीन सारवलेली. समोर अंगणात तुळशी वृंदावन. कोकणचा हा फिल साऱ्या म्युझियमभर पसरलेला. भिंती सारवलेल्या. छत काजळ धरलेलं. धुरकट. चूल, चिमणीच्या धुरानं माखलेलं. निर्मितीमागील वास्तुशिल्पी व वस्तुसंग्रहालय तज्ज्ञांची कलात्मक दृष्टी केवळ थक्क करणारी व कोकण सजीव करणारी. वि. स. खांडेकरांच्या शेजारीच मराठीतील प्रख्यात कथाकार, नाटककार (ठणठणपाळ) जयवंत दळवी राहत असत. त्यांनी खांडेकरांच्या पडवीचं मनोज्ञ वर्णन केलंय, ‘दर्शनी । पडवी स्वच्छ सारवलेली, त्यावर गादी घातलेली, दोन तक्के भिंतीला टेकलेले. शेजारी आरामखुर्ची, खुंटीला टांगलेला कंदील आणि कोपऱ्यात बांबूची काठी. गादीशेजारी तिवई, त्यावर एक चिमणी आणि पुढ्यात उतरते, बैठे मेज... ज्यावर भाऊ सतत काहीतरी लिहीत, वाचीत बसलेले असत...' यातील भाऊ वगळता सर्व जसंच्या तसं... तेही भाऊ खांडेकरांच्या अस्सल कपडे, जोडे, जाकीट, घड्याळ, पाकीट, चष्मा, पेन्सिल, कागद, इत्यादींसह... वाटतं नुकतंच काहीतरी लिहून क्षणापुरते दरवाजा लोटून आत गेले असावेत. प्रेक्षक खांडेकरमय होणं, लेखक, वाचक, प्रेक्षक एक होणं... क्षणभर भावविभोर होऊन थबकणं, घुटमळणं, विचार करणं होत नाही असा प्रेक्षक, दर्शक विरळा! लेखक जिवंत करण्यातच या वस्तुसंग्रहालयाचं सार्थक!
 एक पाऊल पुढे टाकत प्रेक्षक एकदम जातात चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत! खांडेकरांनी मराठी, हिंदी, तमिळ, तेलगूत एक नाही ‘दोन नाही' तब्बल अठ्ठावीस पटकथा लिहिल्या, असंख्य गाणी, संवादही! खांडेकरांच्या चित्रपटांची छायाचित्रे, कथापुस्तिका सारं अस्सल! खांडेकरांचे चित्रपट ज्या कादंबऱ्यांवर बेतलेले असायचे, त्या कादंबऱ्या लोक सिनेमा तिकिटाबरोबर खरेदी करीत हे ऐकून प्रेक्षक अचंबित होतात ते कालप्रगल्भ समाजजीवन अनुभवून! ही असते अभिरुची, चोखंदळपणा व जगण्याची खानदानी नजाकत! वस्तुसंग्रहालयात सिनेमा पाहण्याचीही सोय असल्याने हे संग्रहालय एकाच वेळी दोन भिन्न शतकांत अनुबंध निर्माण करीत भूतकाळाला वर्तमानाशी आपसूक जोडते.
 मग सिलसिला सुरू होतो साहित्य संमेलनांचा आणि तत्कालीन साहित्यिक सहवास, संबंध व संवादाचा! ते दर्शन असतं तत्कालीन, सहिष्णू साहित्यविश्वाचं नि मूल्य, संस्कार, सद्भाव संवर्धनाचंही! सन १९४१ साली सोलापूरला रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलन पार पडलं. किती साधेपणाने ... अनौपचारिकपणे! अन् १९७५चं आणीबाणीतलं गाजलेलं ५१वं साहित्य संमेलन... जय प्रकाशांच्या प्रकृतीस स्वास्थ्य लाभावं म्हणून हात जोडून उभे सर्व मंत्री, साहित्यिक, प्रेमी... ऋषीच्या प्रार्थनाशब्दांतील शक्तीची साक्ष! तेवढ्यात या संमेलनातील खांडेकरांच्या भाषणाचा विचार आसमंत व्यापून टाकतो तोही त्यांच्याच आवाजात. ही असते ‘आकाशवाणी'ची भेट. हे संग्रहालय पाहत असताना आपण काया, वाचा, मने खांडेकर होऊन जातो. दृक, श्राव्य दोन्ही माध्यमांचा, अंधारप्रकाशाचा केलेला इथला उपयोग म्हणजे वस्तुसंग्रहालयशास्त्राचा आदर्श वस्तुपाठच! वेगवेगळ्या छायाचित्र शृंखलेतून समजत जातं... ‘गीतरामायण'कार कवी ग. दि. माडगूळकर हे खांडेकरांचे पहिले लेखनिक होते. रणजित देसाई शिष्य, मानसपुत्र होते. पु. ल. देशपांडेंना हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड सी'चा अनुवाद संकल्प बहाल केला होता. आचार्य विनोबांची खांडेकरांनी मुलाखत घेतली होती, कुसुमाग्रजांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे खरे प्रकाशक वि. स. खांडेकर होते, केशवसुतांची कविता त्यांच्याच हस्ताक्षरात प्रकाशित करण्याचा हट्ट खांडेकरांचा... एका अर्थाने महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीचा विशाल स्मृतिपट उलगडत । कानकोरण्यापासून कण्र्यापर्यंतच्या सर्व वापरातील वस्तू दर्शक दंग होऊन जातो. पत्रा, कच्चे खड़े, इन्कमटॅक्स रिटर्नस, रेल्वे तिकिटं, विशेषांक, समग्र साहित्याच्या पहिल्या प्रती, अनुवादित साहित्य, संशोधन प्रबंध निरखत आपण पोहोचतो पुरस्कार, सन्मान, मानपत्रांच्या दुनियेत... अन् आपण किती श्रेष्ठ साहित्यिकाच्या सान्निध्यात आहोत हे अनुभवून वस्तुसंग्रहालय पाहण्यातील धन्यता अनुभवण्यास मिळते. आपण वळतो... समोर असते एक हृदयद्रावक रूपककथा... शेवटची रचना... तिचं शीर्षक असतं मृत्यू... अन् लेखकाची शोकयात्रा, श्रद्धांजली संदेश, मृत्युलेख वाचीत प्रेक्षकांची पावलं आपल्या काढून ठेवलेल्या पादत्राणांकडे वळतात... इतक्या मोठ्या साहित्यिकांचं हे स्मारक असतं साहित्यतीर्थ... तिथं अनवाणी जाण्यातही प्रेक्षक लेखकाप्रती देवसदृश भक्तिभावच व्यक्त करीत असतात... ही असते इथल्या वातावरणनिर्मितीची नांदी व भैरवीही।
 या संग्रहालयाची अशी रचना, मांडणी व सजावट करीत असताना माझ्या मनात ज्या प्रेरणा व दृष्टी होती, तिचा विचार व्हायला हवा. एकविसावं शतक हे आत्मकेंद्री वृत्तीच्या माणसांचं शतक बनत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजमन सतत समाजशील बनविण्याचे आव्हान आपणासमोर आहे, हे लक्षात घेऊन सदरचे वस्तुसंग्रहालय पाहिले की प्रेक्षक त्या विचाराचे होतील असा उभारणीत प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी साधेपणाचे सूत्र सर्वत्र पाळण्यात आले आहे. इथल्या बनावटीत सर्व वस्तू भारतीय निर्मितीच्या वापरण्यात आल्या आहेत. स्वतः वि. स. खांडेकर अत्यंत साधे राहत. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांतील अनेक नायक, नायिका, पात्रे गांधीवादाचं समर्थन करताना आढळतात. महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षात (१९६९) वि. स. खांडेकरांनी लिहिलेल्या विविध लेखांचं एक चांगलं पुस्तकच मी संपादित केलं आहे. दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी' त्याचं नाव. ते तुम्ही मिळवून अवश्य वाचा. या गांधीविचारांचा प्रभाव वस्तुसंग्रहालयभर तुम्हांस अनुभवता येईल. सजावटीचं पार्श्व कापड खादीचं, भिंती सारवलेला फिल देणारा, रंगसंगती, मंद प्रकाश, पडवी, कौलं साऱ्यातून ते तुम्ही अनुभवाल. पडवीत एकमेव तसबीर आहे ती महात्मा गांधींची!
 वि. स. खांडेकर पंडित नेहरूंच्या पंचशील तत्त्वाचे भोक्ते होते. स्वातंत्र्य,समता,बंधुता, विज्ञाननिष्ठा व लोकशाही यांचा पुरेपूर उद्गार तुम्हास वस्तुसंग्रहालयात प्रतिध्वनित होत राहतो. मिठाच्या सत्याग्रहाचे छायाचित्र, ऐकवलं जाणारं भाषण, साहित्यग्रंथ, मांडणी, प्रतिसाद व्यवस्था यांतून ही मूल्ये ध्वनित होत राहतात.
 वि.स.खांडेकर समाजवादाचे पाईक होते. या विचाराचे अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या अर्नेस्ट हेमिंग्वे, खलिल जिब्रान, अर्नस् टोलरची छायाचित्रे... त्यांची उपस्थिती सूचक व बोलकी आहे. पत्रातही विनोबांचं प्रतिबिंब... ‘जय जगत्'कडे नेणारं!
 शिक्षकी व्यवसायाचं ‘रोल मॉडेल' खांडेकरांच्या माध्यमातून हे संग्रहालय प्रेरकपणे उभं करतं. ते आजच्या ‘धंदा' होऊ पाहणाऱ्या शिक्षणास संस्कारसाधन बनविल व पोटार्थी होणाऱ्या शिक्षकास ते ध्येयवादी बनवेल तर विद्यार्थ्यांना देशप्रेमी, समाजशील नागरिक! साहित्य वाचकांची अभिरुची रंजकतेकडून अभिजाततेकडे (क्लासिक) वळविण्याचा प्रयत्न इथे आढळेल. खांडेकरांच्या यच्चयावत साहित्यकृतींच्या देखण्या मांडणीचा हाच प्रभाव! पदवी शिक्षणाची मिळते त्यातून? चालतं; पण डी. लिट्.सारखी पदवी वि. स. खांडेकरांसारख्या समर्पितास बहाल केली जाते... त्या प्रदर्शनातून, अभिव्यक्तीतून समाज पुढे जातो. हे वस्तुसंग्रहालय असं समाज परिवर्तन करणारं, समाज पुढे नेणारं साहित्यतीर्थ... संस्कारतीर्थ!
 वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय सुरू होऊन सात वर्षे झाली. क्षणात प्रभावी प्रसार, प्रचार करणाच्या माध्यमयुगात हरएक प्रयत्न करूनही प्रेक्षकांची संख्या १५००० च्या वरचा आकडा ओलांडू शकली नाही. महाराष्ट्र शासन कोल्हापूर 'तीर्थस्थान' म्हणून विकास करीत आहे. समाजमन संस्कारी, समाजशील, पंचशील व्हावं म्हणून त्यात या संग्रहालयाचा अंतर्भाव नको का व्हायला? 'गुगल'वर नुसतं ‘म्युझियम' शब्द टाइप करा तुम्हाला ‘खांडेकर म्युझियम' भेटणारंच. 'यू ट्यूब'वर सारं खांडेकर म्युझियम आतून एका क्लिकसरशी शांतपणे पाहता येतं. गंमत म्हणजे हे म्युझियम जगातील जितक्या लोकांनी पाहिलं तितकं भारतातील नाही. ही आपली सांस्कृतिक दिवाळखोरीच नव्हे का? कोल्हापुरात रोज सरासरी ५००० पर्यटक येतात... ते काय पाहतात? त्यातून प्रेक्षकांचे चरित्र नोंद होतं. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचं हे काम नाही का? एकट्या ओपल हॉटेलचा अपवाद वगळता 'वर्थ सीन प्लेसीस' म्हणून कुठंही याची नोंद नाही. विद्यापीठांनी पण आक्रमक प्रचारतंत्र, पर्यटन सुविधा म्हणून संग्रहालयाकडे पाहणं, सुट्टीच्या दिवशी ते सुरू राहील अशी व्यवस्था करणं, आपले सर्व विद्यार्थी, प्राध्यापक पाहतील असं तंत्र विकसित करणं, संग्रहालयात खांडेकर साहित्य (ग्रंथ) विक्रीस उपलब्ध करणं, माहितीपत्रकं सचित्र, बहुरंगी करणं, संग्रहालय छायाचित्र संच विक्री केंद्र, खांडेकर तिकिटं, छायाचित्र भेट देणं (सोव्हिनिअर्स) अशी तंत्रे आत्मसात करायला हवी. कँपसवर होणारी चर्चासत्रे, मेळावे यांतील सारे लोक, पाहुणे पाहतील तरी याचा मोठा प्रचार प्रसार होईल. नाभीत नुसता कस्तुरीगंध असून काय उपयोग? वारे निर्माण झाले तरच दरवळ पसरणार ना? 'कस्तुरी कुंडल बसै, मृग ढुँडै बनमाही’, ‘अमृत घट भरले तुझ्या घरी, का वणवण फिरशी बाजारी' हे चित्र बदललं तर महाराष्ट्राचं चरित्र बदलणार! कमलेश्वरांची एक कथा आहे. 'छोटे महाराज'. तो रेवडी विकायचा व्यवसाय करायचा; पण शब्द उच्चारायचा नाही. शेवटी त्यास त्या रेवड्या स्वतःसलाच खाऊन संपवाव्या लागल्या. घोडा फिरवला नाही की अडतो. पान फिरवलं नाही की सडतं. भाकरी फिरवली नाही की करपते. संग्रहालय फिरवलं नाही की बंद करावं लागतं. ते बंद होऊ नये म्हणून भेटा, भेट द्या. प्रकरण सहावे
उपसंहार

 एकोणिसाव्या शतकाचा सूर्यास्त होत असताना एका गरीब पुरोहिताच्या घरी वि. स. खांडेकरांचा जन्म झाला. वडील मुन्सफ होते; पण पित्याचे छत्र फार दिवस लाभले नाही. पोरके खांडेकर दत्तक गेले आपल्या काकांना. शिक्षण मिळेल या आशेनं झालेलं दत्तकविधान मृगजळ ठरलं. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील शिक्षण सोडून त्यांना दत्तक गावी सावंतवाडीला परतावं लागलं. प्रकृति अस्वास्थ्यामुळे बांबोळीत वास्तव्य करून स्वास्थ्य लाभ होत असतानाच शिरोड्याच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करण्याची संधी मिळाली. पूर्वीचे मुख्याध्यापक हजर न झाल्याने शिक्षक होण्यास गेलेल्या वि. स. खांडेकरांना मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळावी लागली. केवळ शिकवायचं काम केलं तर खांडेकर कसले? वाचन, साहित्यिक सहवास, राष्ट्रीय आंदोलन, स्वतःची अशी ध्येयवादी दृष्टी, खेड्याचं दैन्य, दारिद्रय, अज्ञान पाहून विफल झालेलं मन या साऱ्यामुळे अभ्यासक्रमापलीकडे विद्यार्थांना बहि:शाल व पाठ्यपुस्तक देता यावं म्हणून अनेकविध उपक्रम खांडेकरांनी केले. व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, स्मृतिदिन, राष्ट्रीय सण-समारंभ,स्नेहसंमेलन, नाटक सर्व केलं. भरीस भर म्हणून शाळाही बांधली. पदरमोड व पंचक्रोशीत पायपीट करून.
 सन १९२० ते १९३५ हा त्यांचा काळ शिक्षक म्हणून जसा महत्वाचा तसा वाचन व्यासंग व लेखन रियाझ म्हणूनही! याच काळात पुणे मुक्कामी आलेला नाटककार गडकरी यांच्याशी त्यांचा संपर्क वृद्धिंगत झाला. साहित्य जसे प्रकाशित होऊ लागले तसा लोकसंपर्क वाढला व लेखक म्हणून मान्यताही वाढत गेली.  नियतकालिकांतील नियमित लेखनाची फलश्रुती म्हणून नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध संग्रह प्रकाशित झाले. नियमित पुस्तक परीक्षणांनी समीक्षक म्हणूनही मान्यता दिली तरी लौकिक मिळाला तो कथाकार म्हणून. परिणामी चित्रपटसृष्टीत पटकथा लेखक होण्याची संधी मिळाली. कर्मभूमी बदलली. शिरोड्याची जागा कोल्हापूरने घेतली व त्यांच्या प्रतिभेस व्यापक क्षितिज मिळालं.
 मान-सन्मान, पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, प्रभावी वक्ते, संपादक, अनुवादक अशा यशांच्या कमानी आकाशस्पर्शी झाल्या व ते । साहित्य अकादमी, पद्मभूषण, ज्ञानपीठ इत्यादी सन्मानांनी राष्ट्रीय साहित्यकार झाले. यात त्यांच्या साहित्य व चित्रपटांचा विविधभाषी अवतारांचाही वाटा महत्त्वाचा होता.
 वि. स. खांडेकरांनी साहित्यिक म्हणून पिढ्या घडविण्याचे कार्य केलं. त्या कार्याचं महत्त्व त्यांच्या साहित्याच्या मथितार्थात आहे. खांडेकरांनी मराठी भाषा व साहित्यास पहिले ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून दिल्याबद्दल त्यांचा एक जंगी जाहीर सत्कार कोल्हापुरात झाला होता. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, प्रत्येक शास्त्राचे वेगळे महत्त्व आहे. व्यक्तिशः मी असे मानतो की, शेवटी माणुसकीचे शास्त्र समजल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. त्याशिवाय लेखकाला आपल्याच अनुभूतीचा अर्थ समजणार नाही. मग तो अभिव्यक्ती कसली करणार? समाजजीवनाच्या आधाराशिवाय सर्व शास्त्रे अधुरी राहतील आणि म्हणून सामाजिक आशय असल्याशिवाय वाङ्मय परिणामकारक होत नाही, चिरस्थायी व अक्षय होत नाही. या व्याख्यानातून त्यांनी खांडेकरांच्या साहित्याचा सामाजिक आशय अधोरेखित करून त्यांचे चिरस्थायित्व व अक्षरसाहित्य म्हणून असलेलं महत्त्व स्पष्ट केलं होतं.
 ज्ञानपीठ पारितोषिक स्वीकारताना केलेल्या भाषणाच्या समारोपात खांडेकर म्हणाले होते, ‘साहित्य केवळ दैहिक दुःखाचं आणि त्याच्या हर्षोल्हासाचं चित्रण करतं; पण वास्तवात त्याच्या प्राणात वसत असलेल्या दीपशिखेला चेतवणं हा त्याचा उद्देश असतो. काळाबरोबर जीवनाची मूल्यंही बदलतात. त्या परिवर्तनाचं स्वागत करणे हे साहित्याचे कर्तव्य आहे आणि युगाप्रमाणे जीवनमूल्यांची स्थापना करणं हेही साहित्यिकाचंच कर्तव्य आहे. यातून त्यांनी विशद केलेली साहित्यविषयक भूमिका म्हणजे आपल्या जीवन व वाङ्मयाचं केलेलं विहंगमावलोकन होय. वि. स. खांडेकरांनी जीवनभर एक विशिष्ट भूमिका, विचारधारा व दृष्टी घेऊन साहित्यलेखन केलं. ते त्यांना समाजशील पुरोगामी साहित्यिक ठरवतं. खांडेकर बोलके सुधारक नव्हते, तर कृतिशील विचारक होते. दलित विद्यार्थ्यांना घरी ठेवणं, सहभोजन, महर्षी कर्वे यांना न्याय देण्यासाठी ‘माझं बाळ'सारखी पटकथा लिहिणं, स्वतःचं पोरकंपण स्मरून पंढरपूरच्या बालकाश्रमाला नियमित भाऊबीज पाठविणं, दत्तधाम, अमरावतीच्या शिवाजीराव पटवर्धनांना किंवा वरोऱ्याच्या बाबा आमटे यांना आनंदवनास साहाय्य करणं, या सर्वांतून त्यांची कृतिशील सामाजिक बांधीलकी वेळोवेळी सिद्ध झालेलीच आहे. म्हणून शिवाजी विद्यापीठ केवळ डी. लिट्. देऊन न थांबता त्यांच्या जीवनकार्याचं स्मृतिसंग्रहालय उभारतं. असा मान मिळविणारे ते पहिले भारतीय लेखक ठरावेत यातच त्यांचा शिखर सन्मान होय. असं असलं तरी वि. स. खांडेकरांनी आपल्या साहित्यातून कल्पना, मूल्य, आदर्शाचा जो आरसेमहाल कल्पिला, तो सत्यात केव्हाच उतरू शकला नाही. प्रत्येक अभिजात लेखकाच्या प्रतिभेला लाभलेला तो चिरंतन शाप असावा. खांडेकरांचा काळ उलटल्यालाही तीन दशके लोटली. परिस्थिती बदलली तर नाही. हेच पहा ना! अगदी अलीकडे म्हणजे २००६ साली ओव्हान पामुक या तुर्कस्थानी कादंबरीकारास साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं. ते स्वीकारताना केलेल्या भाषणात तोही कबूल करतो, ‘जीवनातील सौंदर्यपूर्ण गोष्टींवर व त्यातील समृद्धता शब्दबद्ध करण्याची प्रक्रिया उल्हासदायक असते म्हणून मी लिहितो; कारण मला एका विशिष्ट ठिकाणावर जायचे असते; पण तिथे मी पोहोचू शकत नाही. स्वप्नातील आभास निर्माण करणाच्या अपशकुनांपासून मला पलायन करायचे असते म्हणून मी लिहितो. सुखी होण्याचा माझा प्रयत्न कधीच सफल झाला नाही; सुखी होण्यासाठी मी लिहितो. लेखकाचं सुखी होणं म्हणजे त्याची स्वप्नं साकारणं असतं; पण तो क्षण त्याच्या कधीच हाती येत नाही. काळ मनाप्रमाणे चंचल असतो. बदल हे शेवरीच्या कापसासारखे मृदू, मुलायम व हवेत उडणारे असतात. त्यांना मुठीत घेऊन बांधता येत नाही व स्थायी करता येत नाही. ‘बदल' या शब्दातच बदल सामावलेला असल्याने त्याचं सापेक्षत्व काळाबरोबर, व्यक्तिनिहाय व निसर्गानुरूप बदलत राहतं. म्हणून एक चरित्र समकाल प्रभावित करतं; पण स्थायित्व त्यास लाभत नाही. हे सृष्टीचं अस्थायित्व नवे विचार, कल्पना व साहित्यरूपी निर्मिती करतं. चरित्र नि चारित्र्य दोन्ही परिवर्तनशील असल्यानं काळ नित्य नव्या चरित्रांची अपेक्षा करीत असतो. परिशिष्ट-१
वि. स. खांडेकर : पुनर्मूल्यांकन लेख : पूर्वप्रसिद्धी सूची

१. वि. स. खांडेकर : संक्षिप्त समग्र मूल्यांकन
  (आकाशवाणी, कोल्हापूर प्रक्षेपित ‘ह्यांनी घडवलं कोल्हापूर
  भाषणमालेतील व्याख्याने एकत्रित रूपात - प्रसारण २३,
  ३0 जुलै, २०१४, ६, १३, १७ ऑगस्ट, २०१४ रात्री. ८.१५ वाजता)
२. वि. स. खांडेकर : एक तपस्वी शिक्षक
  (वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान, शिरोडे, ता. वेंगुर्ला,
  जि.सिंधुदुर्ग शताब्दी स्मरणिका - १३ मे, २०१६)
३. वि. स. खांडेकर : सार्वकालिक साहित्यिक
  (दै. लोकमत, मंथन पुरवणी, दि. १९ सप्टेंबर, २०१२)
४. वि. स. खांडेकर : आंतरभारती साहित्यिक
  (दै. दिव्य मराठी, रसिक पुरवणी, आंतरभारती माला',
  दि. ११ जानेवारी, २०१५)
५. वि. स. खांडेकरांचे अचर्चित ललित साहित्य
  (पंचधारा त्रैमासिक, हैदराबाद - एप्रिल, २०१४ ते जून २०१५
  ज्ञानपीठ विजेते साहित्यिक विशेषांक)
६. वि. स. खांडेकर साहित्य : अश्वत्थाम्याची जखम
  (अंतर्नाद मासिक, पुणे, सप्टेंबर, २०१५)
७. वि. स. खांडेकर साहित्याची प्रस्तुतता
  (दै. लोकमत, मंथन पुरवणी, २० जून, २०१५)
८. वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय : प्रेरणा आणि दृष्टी
  (जडणघडण मासिक, पुणे, दिवाळी - २०१३) परिशिष्ट - २
वि. स. खांडेकर : जीवनपट

१८९८ : गणेश आत्माराम खांडेकरांचा सांगली येथे जन्म,
 बालपण व प्राथमिक शिक्षण
१९११ : खांडेकरांच्या जन्मदात्या वडिलांचे निधन
१९१३ : मॅट्रिकची परीक्षाच आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण
१९१३ : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल.
१९१४ : ‘रमणीरत्न' हे पहिले नाटक लिहिले.
१९१५ : स्वतः गडकऱ्यांनी कोल्हटकरांच्या गादीचा वारस,
 अशी बालगंधर्वांना खांडेकरांची ओळख करून दिली.
१९१६ : फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंटरच्या वर्गात प्रथम.
१९१६ : ‘गणेश आत्माराम खांडेकर यांचा ‘विष्णू सखाराम
 खांडेकर' या नावाने दत्तकविधी व त्याच वेळी
 कोकणाशी पहिला संबंध आला. १३ जानेवारी.
१९१७ : कोकणामधील नानेलीला हजर.
१९१९ : खांडेकरांनी ‘उद्यान','नवयुग'मधून लेखनाला सुरुवात केली.
१९१९ : 'नवयुग' (ऑगस्ट/सप्टेंबर)च्या अंकात 'तुतारी
 वाङ्मय व दसरा' हा पहिलावहिला लेख प्रसिद्ध झाला.
१९१९ : ‘श्रीमतकलिकपुराण' ही पहिली विनोदी लेखमाला 'उद्यान'
 ऑक्टोबरमध्ये ‘आदर्श' या टोपण नावाने प्रसिद्ध झाली.
१९२० : खांडेकरांना शिक्षक म्हणून शिरोड्याला बोलाविण्यात आले.
१९२०-२५ : या काळात कविता, टीका व विनोदी लेख लिहिण्यात
 खांडेकर मग्न
१९२० : गडकऱ्यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त ‘हा हन्त
 हन्त' हा लेख प्रसिद्ध (फेब्रुवारी/नवयुग)
१९२१ : शिरोडे येथील शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी
 खांडेकर प्रयत्नशील
१९२३ : 'महाराष्ट्र साहित्य' ऑगस्टमध्ये ‘घर कुणाचे' ही
 पहिली कथा प्रसिद्ध
१९२४ : सावंतवाडी येथील 'वैनतेय'मध्ये लिखाण.
१९२५ : शिरोडे येथील शाळेची इमारत उभी केली.
१९२५ : शिरोड्यामधील शाळेच्या स्नेहसंमेलनाकरिता ‘स्वराज्याचं
 ताट' हे नाटक लिहिले.
१९२५ : भाऊसाहेब नियमितपणे कथा लिहू लागले.
१९२८ : ‘संगीत रंकाचे राज्य' हे पहिले नाटक ग्रंथरूपात प्रसिद्ध.
१९२८ : सांगली येथे नाट्य कलाप्रसारक मंडळाने संगीत रंकाचे
 राज्य' या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
१९२९ : खांडेकरांचा बेळगाव येथे १६ जानेवारी रोजी विवाह.
१९२९ : 'नवमल्लिका' हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध
१९३० : खांडेकरांची ‘हृदयाची हाक' ही पहिली कादंबरी प्रसिद्ध
१९३० : कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मुद्दाम काही दिवस
 शिरोड्यास येऊन राहिले.
१९३३ : शिरोड्यामध्ये फुरसे चावल्याने खांडेकर आजारी.
१९३४ : रघुवीर सामंतांनी 'पारिजात' मासिक सुरू करावयाचे
 ठरविले. खांडेकर आणि वा. ल. कुलकर्णी त्यांना
 संपादनकार्यात मदत करीत.
१९३४ : बडोदे येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (कथा विभाग)
१९३५ : मराठी चित्रपट कथा लिहिण्यास प्रारंभ
१९३५-७५ : या काळात खांडेकरांनी आत्मकथनपर लिखाण केले.
१९३५ : दादर येथील मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 (अधिवेशन)
१९३५ : मडगाव येथील गोमंतक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 (अधिवेशन पहिले) १९३५ : पुणे येथील शारदोपासक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 (अधिवेशन चौथे)
१९३६ : ‘हंस पिक्चर्स'साठी पहिला बोलपट लिहिला. 'छाया'.
१९३६-६२ : या सव्वीस वर्षांत‘छाया',‘ज्वाला','देवताअमृत'
 आणि ‘माझं बाळ' यासारख्या २८ चित्रपटांसाठी कथा लिहिल्या.
१९३६ : सोलापूर येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (अधिवेशन
 पहिले)
१९३६ : ‘ज्योत्स्ना' मासिकाचे संपादन.
१९३६ : ‘ज्योत्स्ना' मासिकात ‘साहित्यिकांचे हितगुज' हे सदर
 सुरू केले.
१९३६ : मे महिन्यात ‘ज्योत्स्ना' मासिकाचा पहिला अंक भाऊसाहेब
 आणि दौंडकर यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध.
१९३६ : 'छाया'च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटकथेबद्दल भाऊसाहेबांना'गोहर'
 सुवर्णपदक मिळाले.
१९३९ : उज्जैन येथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष.
१९४१ : जमखंडी येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 (अधिवेशन दुसरे)
१९४१ : सोलापूरच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.
१९४१ : ‘कलिका' हा पहिला रूपककथासंग्रह प्रसिद्ध.
१९४६ : मिरज येथील दक्षिणी संस्थान पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष.
१९४७ : बडोदे येथील मराठी ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष.
१९४९ : इंदूर येथील शारदोत्सव, महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष.
१९५५ : मुंबई व उपनगर साहित्य संमेलन, डोंबिवलीचे अध्यक्ष.
१९५७ : सातारा येथील मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष. (अधिवेशन  चौथे)
१९५८ : सौ. उषाताईंचे (पत्नी) निधन. २६ ऑक्टोबर
१९५९ : मिरज येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 (अधिवेशन एकेचाळिसावे)
१९६८ : ‘पद्मभूषण' किताब खांडेकरांना बहाल करण्यात आला.
१९७२ : डोळ्यांचे (मोतीबिंदू) ऑपरेशन.
१९७४ : कोल्हापूर येथे खांडेकरांचा अमृतमहोत्सव सोहळा साजरा झाला.
१९७४ : खांडेकरांना 'ज्ञानपीठ' पारितोषिक बहाल.
१९७५ : कराड येथे झालेल्या ५१व्या साहित्य संमेलनप्रसंगी उपस्थिती.
१९७६ : २ सप्टेंबर रोजी मिरज येथे मृत्यू.
परिशिष्ट - ३
वि. स. खांडेकर : मानसन्मान/पुरस्कार

१९३४ : महाराष्ट्र साहित्य संमेलन (बडोदे), कथाविभागाचे अध्यक्षपद
१९३५ : गोमंतक साहित्य संमेलन (मडगाव), अध्यक्षपद
१९३५ : पुणे शारदोपासक संमेलनाचे अध्यक्षपद
१९३५ : मुंबई व उपनगर साहित्य संमेलन (दादर), अध्यक्षपद
१९३६ : सोलापूर प्रांतिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
१९४० : दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन (जमखिंडी), अध्यक्षपद
१९४१ : महाराष्ट्र साहित्य संमेलन २५वे अधिवेशन (सोलापूर), अध्यक्षपद
१९४९ : महाराष्ट्र साहित्यसभा (इंदूर), शारदोत्सव, अध्यक्षपद
१९५५ : मुंबई उपनगर साहित्य संमेलन (डोंबिवली), अध्यक्षपद
१९५७ : मराठी नाट्यसंमेलन (सातारा), अध्यक्षपद
१९६० : महाराष्ट्र शासनाचे 'ययाति' कादंबरीला पारितोषिक
१९६० : साहित्य अकादमीचे 'ययाति' कादंबरीला पारितोषिक. हस्ते :
 पंडित जवाहरलाल नेहरू
१९६८ : भारत सरकारची ‘पद्मभूषण' पदवी व साहित्य अकादमीचे
 महदत्तर सदस्यत्व (फेलोशिप)
१९७५ : अखिल भारतीय हिंदी संमेलनात (नागपूर) सत्कार
१९७५ : भारतीय ज्ञानपीठाचा १९७४ सालासाठी पुरस्कार
१९७६ : नवी दिल्ली येथे त्या प्रित्यर्थ सत्कार (२६ फेब्रुवारी १९७६)
१९७६ : शिवाजी विद्यापीठाची डी. लिट. पदवी
परिशिष्ट -४
वि. स. खांडेकर : साहित्यसंपदा

    कादंबरी
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
हृदयाची हाक १९३०
कांचनमृग १९३१
दोन ध्रुव १९३४
उल्का १९३४
दोन मने १९३८
हिरवा चाफा १९३८
रिकामा देव्हारा १९३९
सुखाचा शोध १९३९
पांढरे ढग १९४०
१० पहिले प्रेम १९४०
११ जळलेला मोहर १९४१
१२ क्रौंचवध १९४२
१३ अश्रू १९५४
१४ ययाति १९५९
१५ अमृतवेल १९६७
१६ सोनेरी स्वप्ने भंगलेली (अपूर्ण) १९७७
१७ नवी स्त्री (अपूर्ण)
संपादक : डॉ. सुनीलकुमार लवटे   २००१
    कथासंग्रह
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
नवमल्लिका १९२९
दत्तक व इतर कथा १९३४
जीवनकला १९३४
ऊन-पाऊस १९३७
दवबिंदू १९३५
विद्युत प्रकाश १९३७

अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
नवचंद्रिका १९३८
अबोली १९३८
पूजन १९३८
१० फुले आणि दगड १९३८
११ नवा प्रातःकाल १९३९
१२ समाधीवरची फुले १९३९
१३ पाकळ्या १९३९
१४ पहिली लाट १९४०
१५ सूर्यकमळे १९४१
१६ घरट्याबाहेर १९४१
१७ कल्चर्ड मोती १९४२
१८ स्त्री आणि पुरुष १९४४
१९ पहिल्यावहिल्या १९४४
२० कालची स्वप्ने १९४४
२१ आजची स्वप्ने १९४४
२२ चंदेरी स्वप्ने १९४७
२३ सांजवात १९४८
२४ अश्रू आणि हास्य १९४९
२५ हस्ताचा पाऊस १९४९
२६ प्रीतीचा शोध १९५२
२७ प्रसाद १९५७
२८ मुरली १९६०
२९ पाषाण पूजा १९६०
३० उःशाप १९६४
३१ ढगाआडचं चांदणं १९७२
३२ मराठी पॉकेट बुक १९७६
३३ निवडक कथा - १,२,३       १९७६
३४ घरटे १९७६
३५ अस्थी १९७६
३६ मध्यरात्री १९७६
३७ सूर्यास्त १९७६
३८ यज्ञकुंड १९७८


अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
३९ मृगजळातले कमळ आणि इतर कथा १९७९
४० स्वप्न आणि सत्य
(संपादक - डॉ. सुनीलकुमार लवटे) २००२
४१ विकसन (संपादक - डॉ. सुनीलकुमार लवटे) २००२
४२ सरत्या सरी (संपादक - डॉ. सुनीलकुमार लवटे)    २००३
४३ भाऊबीज (संपादक - डॉ. सुनीलकुमार लवटे) २००३
लघुनिबंध संग्रह
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
वायुलहरी १९३६
चांदण्यात १९३८
सायंकाल १९३९
अविनाश १९४१
मंदाकिनी १९४२
मंजिऱ्या १९४४
कल्पलता १९४५
हिरवळ १९४७
तिसरा प्रहर १९४८
१० मंझधार १९५९
११ झिमझिम १९६१
१२ रानफुले (संपादक- डॉ. सुनीलकुमार लवटे) २००२
१३ अजून येतो वास फुलांना (संपादक- डॉ. सुनीलकुमार लवटे)  २००३
१४ सांजसावल्या (संपादक- डॉ. सुनीलकुमार लवटे) २००४
१५ मुखवटे (संपादक- डॉ. सुनीलकुमार लवटे) २००४
रूपक कथासंग्रह
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
कलिका १९४३
मृगजळातील कळ्या १९४४
वनदेवता १९६०
क्षितिजस्पर्श (संपादक - डॉ. सुनीलकुमार लवटे    २००२



प्रस्तावना संग्रह
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
विचारधारा (संपादक : वि. वा. शिरवाडकर)   १९९३
लेखसंग्रह
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
वनभोजन १९३५
धुंधुर्मास १९४०
फुले आणि काटे १९४४
गोकर्णीची फुले १९४४
गोफ आणि गोफण १९४६
रेषा आणि रंग १९६७
रंग आणि गंध १९६१
ध्वज फडकत ठेवू या १९७५
दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी
(संपादन - डॉ. सुनीलकुमार लवटे)     २००४
१० वन्हि तो चेतवावा
(संपादन - डॉ. सुनीलकुमार लवटे) २००४
११ अज्ञाताच्या महाद्वारात
(संपादन - डॉ. सुनीलकुमार लवटे) २००४
व्यक्ती आणि वाङ्मय
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
गडकरी : व्यक्ती आणि वाङ्मय १९३२
वा. म. जोशी : व्यक्ती आणि विचार     १९४८
आगरकर व्यक्तिविचार १९४९
केशवसुत : काव्य आणि कला १९५६
व्यक्तिचित्रे
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
ते दिवस, ती माणसे व आठवणी १९६१
समाजशिल्पी, साहित्यशिल्पी, जीवनशिल्पी   
(संपादन - डॉ. सुनीलकुमार लवटे) २०१५


    चरित्र
अ. क्र.  नाव प्रकाशन वर्ष
आगरकर : चरित्र, व्यक्ती व कार्य      १९३२
    आत्मचरित्र
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
एका पानाची कहाणी १९८१
पहिली पावलं
(संपादन-डॉ.सुनीलकुमार लवटे) २००७
सशाचे सिहांवलोकन
(संपादन-डॉ.सुनीलकुमार लवटे)   २००७
    अनुवाद
    अनुवादित रूपककथा
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
सुवर्णकण १९४४
सोनेरी सावल्या १९४६
वेचलेली फुले १९४८
    अनुवादित पत्रसंग्रह
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
तुरुंगातील पत्रे : अर्नेस्ट टोलर १९४७-४८
    काव्य
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
वि.स.खांडेकरांची कविता
(संपादन : अविनाश आवलगावकर) १९९९
वि.स.खांडेकरांची चित्रगीते
(संपादन : गंगाधर महांबरे) १९९८
    भाषणे
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
सहा भाषणे १९४१
तीन संमेलन १९४७
अभिषेक १९६१


    मुलाखती
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
ऋतू न्याहाळणारे पान
(संपादन - डॉ. सुनीलकुमार लवटे) २००८
    नाटक
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
संगीत रंकाचे राज्य १९२८
    संपादन
    कथासंग्रह
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
गुदगुल्या - चिं. वि. जोशी १९४८
गारा आणि धारा : वि. वि. बोकील १९४८
पाच कथाकार : (दिवाकर, खांडेकर,
य. गो. जोशी, चोरघडे, गोखले) १९४९
जाई जुई : य. गो. जोशी १९४९
इंद्रधनुष्य : (आपटे/दिवाकर/सुखटनकर/टागोर   
य. गो. जोशी/सरदेसाई/चोरघडे) १९४९
निवडक दिवाकर : दिवाकर कृष्ण १९६९
मुक्या कळ्या : द. र. कवठेकर १९४७
रंगदेवता : वि. स. खांडेकर १९५३
    कादंबरी
अ.क्र. नाव प्रकाशन वर्ष
आस्तिक : साने गुरुजी १९४९
रागिणी : वा. म. जोशी १९५२
सुशीलेचा देव : वा. म. जोशी १९४३
    लघुनिबंध संग्रह
अ.क्र. नाव प्रकाशन वर्ष
नवे किरण : अनंत काणेकर १९४७
वासंतिका : संपादित निवडक लघुनिबंध संग्रह १९४७
पारिजात : संपादित निवडक लघुनिबंध संग्रह १९४९
पांढरी शिडे : अनंत काणेकर १९५७


    निबंधसंग्रह
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
अग्निनृत्य : शि. म. परांजपे १९४७
समाजचिंतन : निवडक निबंधसंग्रह १९६३
    काव्य संग्रह
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
तारका: स. खांडेकर संपादित १९४९
काव्यजोती वि. स. खांडेकर संपादित काव्यसंग्रह १९३९
पाणपोई - यशवंत - संपादन : वि. स. खांडेकर    १९५१
    नाट्यसमीक्षा
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
निवडक कोल्हटकर १९७२
कोल्हटकर लेखसंग्रह १९३२
मराठीचा नाट्यसंसार १९४५
    गद्यपद्य संग्रह पाठ्यपुस्तक
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
मंगलवाचन (खांडेकर/ठोकळ) १९५१-५२
    गौरवग्रंथ
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
एस. एम. जोशी गौरवग्रंथ १९६४
समग्र कोल्हटकर   खंड १ १९७२
      खंड २ १९७५
    मासिक
अ.क्र.  नाव प्रकाशन वर्ष
ज्योत्स्ना १९३६-४०


साप्ताहिक
अ. क्र.   नाव प्रकाशन वर्ष
वैनतेय           १९२४-३०
पटकथा संग्रह
अ. क्र.   नाव प्रकाशन वर्ष
नाव अंतरीचा दिवा
(संपादक : डॉ. सुनीलकुमार लवटे)     २०१२
पत्रसंग्रह
अ. क्र.   नाव प्रकाशन वर्ष
नाव दीपगृह - संपादक : वि. वा. बोकील    १९८०

***

परिशिष्ट - ५ वि. स. खांडेकर : चित्रपट सूची

    मराठी    
अ.क्र. चित्रपट प्रदर्शन
छाया १९३६
ज्वाला १९३८
देवता १९३९
सुखाचा शोध १९३९
लग्न पाहावं करून १९४०
अमृत १९४१
संगम १९४१
सरकारी पाहुणे १९४२
तुझाच १९४२
१० माझं बाळ १९४३
११ सोनेरी सावली १९५३
१२ अंतरीचा दिवा १९६०
१३ माणसाला पंख असतात १९६१
१४ सूनबाई (फक्त गाणी) १९६२
    हिंदी
अ.क्र. चित्रपट प्रदर्शन
१५ छाया १९३६
१६ ज्वाला १९३८
१७ मेरा हक (सुखाचा शोध) १९३९
१८ संगम १९४१
१९ अमृत १९४१
२० बड़ी माँ १९४५
२१ सुभद्रा १९४६
२२ मंदिर (रिकामा देव्हारा) १९४८
२३ विश्वामित्र १९५२
२४ दानापानी १९५३




    तमिळ
अ. क्र.   चित्रपट प्रदर्शन
२५ धर्मपत्नी १९४०
२६ परदेसी १९५३
    तेलुगू
अ. क्र.   चित्रपट प्रदर्शन
२७ धर्मपत्नी १९४०
२८ परदेसी १९५३

◼◼




________________

परिशिष्ट - ६ वि. स. खांडेकर : भाषांतरित साहित्यसूची तेलुगू मूळ रचना विधा । | अनुवाद अनुवादित अनुवादक प्रकाशक प्रकाशन वर्ष भाषा शीर्षक ययाति | कादंबरी | इंग्रजी ययाति | व्ही. पी. कुलकर्णी ओरियन्ट पेपर बॉक्स, | १९७८ ३६ कॅनॉट प्लेस, नई दिल्ली हिंदी | - मो. ग. तपस्वी राजपाल अँड सन्स | | १९८0, २00२ नई दिल्ली १९७८ रशियन मारियम साल्गानिक मल्याळी प्रो. पी. माधवन पिल्लई | १९३८ । पी. व्ही. नरसिंहराव डी. सी. बुक्स, कोट्टायम, केरल | दोन ध्रुव | कादंबरी | कन्नड दोन ध्रुव | व्ही. एम. इनामदार प्रमुख इंग्रजी विभाग | १९३८ बंगलोर विद्यापीठ गुजराती दोन ध्रुव | गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ अँड || १९५६, १९६१, कंपनी, अहमदाबाद । | १९६८ गुजराथी दोन ध्रुव | हरजीवन सोमैया १९३९ तामिळ इरू ध्रुवड; गुळ | का. श्री. श्रीनिवासाचार्य | - १९४५, १९४८ बंगाली दुई ध्रुव भूपेंद्रकिशोर रक्षित रॉय १९५५ क्रौंचवध | कादंबरी | कन्नड क्रौंचवध रामस्वामी अयंगार। गुजराथी क्रौंचवध गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ आणि | १९४४, १९४७ कंपनी, अहमदनगर | १९५२ तमिळ क्रौंचवधम | का. श्री. श्रीनिवासाचार्य हिंदी क्रौंचवध | वा. वि. भावे देशमुख आणि कं., | १९४४, १९४७ १९५२ मो. ग. तपस्वी विद्या प्रकाशन,नई दिल्ली उल्का | कादंबरी | गुजराथी उल्का | गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ अॅन्ड १९४६, १९५४ कंपनी, अहमदाबाद तमिळ |अॅरिनट्चत्रम | का. श्री. श्रीनिवासाचार्य | हिंदी उल्का | प्रभाकर माचवे देशमुख आणि कं. पुणे । सुखाचा | कादंबरी | गुजराथी वर-वहु-अमे | बिपिन जव्हेरी/कांती | आर. आर. शेठ अँड कं १९४८ शोध वडोदरीया तमिळ सुगम अॅगे। का.श्री.श्रीनिवासाचार्य १९४३, १९४४ १९५0, १९५५ १९६0 हिंदी सुख की खोज | रा. र. सरवटे देशमुख आणि कं., पुणे जळलेला | कादंबरी | गुजराथी दाझेला हैया | गो. ग. विद्वांस १९४७, १९५३ मोहर १९५८, १९६४ १९७८ तमिळ कारूगिय मोट्ट | का. श्री. श्रीनिवासाचार्य १९४३, १९४६ १९५३, १९७१ हिंदी झुलसी मंजरी | रा. र. सरवटे | देशमुख आणि कं. पुणे | १९५७ हिरवा | कादंबरी | गुजराथी सुलभा गो. ग. विद्वांस १९४७, १९६६ १९५६, १९७८ पुणे । चाफा वि. स. खांडेकर चरित्र/१७८ ________________

गया-प्रकर्ष |मूळ रचना विधा | अनुवाद |अनुवादित अनुवादक प्रकाशक प्रकाशन वर्ष भाषा शीर्षक तमिळ मनोरंजितम का. श्री. श्रीनिवासाचार्य | १९५0, १९५४ १९६४ हिंदी हरा चंपा | रा. र. सरवटे १९५७ रिकामा || कादंबरी | गुजराथी सुना मंदिर | गो. गं. विद्वांस आर. आर. शेठ अँड | १९४७, १९५६ देव्हारा कं., अहमदाबाद | १९८0 तमिळ बॅरूड कोयिल | श्री.निवासाचार्य १९४२, १९५२ १९५६ हिंदी सुना मंदिर उपाध्याय व माणिक | देशमुख आणि कं., पुणे | १९५६ - लाला, परदेसी पहिले प्रेम | कादंबरी | गुजराती |पहेली प्रीत | गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ अँड | १९४९, १९५६ कं., अहमदाबाद १९६१, १९६६ १९८0 तमिळ पुयलुम पडगुम | कां. श्री. श्रीनिवासाचार्य १९४३, १९४९ १९५४, १९५८ १९७0 हिंदी पहला प्रेम | रा. ग. सरवटे देशमुख आणि कं., पुणे दोन मने कादंबरी | गुजराथी छाया-प्रकष | गो. ग. विद्वांस । आर. आर. शेठ अँड १९५0, १९६२ कं., अहमदाबाद | १९८0 तमिळ इरू मनम्। | | का. श्री. श्रीनिवासाचार्य १९५१, १९५६ १९६१ हिंदी दो मन माणिकलाल परदेशी | देशमुख आणि कं. पुणे | १९५७ पांढरे ढग | कादंबरी | गुजराथी |आषा मिनारा | गो. ग. विद्वांस | १९५0, १९५६ १९३..., १९८0 तमिळ बँप्रमुगिल का. श्री. श्रीनिवासाचार्य | १९५३, १९६0 १९६८ हिंदी रूपहले बादल | रा. ग. सरवटे देशमुख आणि कं. पुणे | १९५७ | अश्रू | कादंबरी | गुजराथी अश्रू | गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ अँड | १९५४, १९५९ कं., अहमदाबाद | १९६६, १९७५ तमिळ कान्निर का. श्री. श्रीनिवासाचार्य अमृतवेल | कादंबरी | गुजराथी अंतरनी ओळख | ग. गो. विद्वांस आर.आर.शेठ आणि कं. हिंदी मोगरा फूला | रा. र. सरवटे सस्ता साहित्य मंडळ नई दिल्ली। सोनेरी स्वप्ने कादंबरी | गुजराथी सोनेरी स्वप्न | गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ आणि | १९८१ भंगलेली कं., अहमदाबाद हिंदी स्वप्नभंग | | डॉ. सुनीलकुमार लवटे विद्या प्रकाशन मंदिर, | १९८४ नई दिल्ली हृदयाची | कादंबरी | हिंदी हृदय की पुकार | रा. र. सरवटे विद्या प्रकाशन मंदिर, हाक. । नई दिल्ली । वि. स. खांडेकर चरित्र/१७९ ________________

कथासंग्रह अनुवादित भाषा कन्नड गुजराथी गुजराथी गुजराथी गुजराथी | गुजराथी गुजराथी कथासंग्रह अनुवादित अनुवादक प्रकाशक प्रकाशन वर्ष शीर्षक दृष्टिलाभ व्ही. एम. इनामदार | १९३७ केवडानी काटा | वाडीलाल देसाई आर. आर. शेठ अॅन्ड | १९४४ कं., अहमदाबाद नूतन प्रभात गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ अॅन्ड | १९४९ कं., अहमदाबाद संध्यादीप गो. ग. विद्वांस । आर. आर. शेठ अॅन्ड | १९४९ कं., अहमदाबाद स्वप्नसृष्टी | | गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ अॅन्ड | १९५० कं., अहमदाबाद मधरात गो. ग. विद्वांस आर. आर. शेठ अॅन्ड | १९५२ कं., अहमदाबाद सोनेरी छाया । गो. ग. विद्वांस आर.आर.शेठ अँड || १९५२ कं., अहमदाबाद चकलीनों मालो | गो. ग. विद्वांस आर.आर.शेठ अँड | १९५४ कं., अहमदाबाद | गो. ग. विद्वांस । | आर.आर.शेठ अँड १९५५ कं., अहमदाबाद टिलडी गो. ग. विद्वांस आर.आर.शेठ अँड | | १९५९, कं., अहमदाबाद गो. ग. विद्वांस आर.आर.शेठ अँड कं., अहमदाबाद तेज घलाका | गो. ग. विद्वांस आर.आर.शेठ अँड | | १९६७ कं., अहमदाबाद वारा फेरा | | गो. ग. विद्वांस आर.आर.शेठ अँड | १९७५ कं., अहमदाबाद कुटुक्कु वेळिये | का. श्री. श्रीनिवासाचार्य १९४३, १९५० गुजराथी गुजराथी जानकी | गुजराथी | गुजराथी वमल | गुजराथी गुजराथी तमिळ | तमिळ अरम्बु का. श्री. श्रीनिवासाचार्य तमिळ करूप्पु का. श्री. श्रीनिवासाचार्य तमिळ । ओडुम रेयिलेले | का. श्री. श्रीनिवासाचार्य | तमिळ कोडैमळे | | का. श्री. श्रीनिवासाचार्य तमिळ कळ्ळककादलि | का. श्री. श्रीनिवासाचार्य १९४५, १९५0 १९५६ १९५0, १९५१ १९५३, १९६७ १९५0, १९५२ १९५४, १९५८ १९५१, १९५५ १९६६ १९५१, १९५४ १९६६ १९५१, १९५८ १९५२, १९५६ १९६७ १९५0, १९५१ १९५३, १९६७ १९५0, १९५२ १९५४, १९५८ १९५१, १९५५ | १९६६ | तमिळ | तमिळ जमींदार माप्पिलै| का. श्री. श्रीनिवासाचार्य कण्णडि अरण्मनै | का. श्री. श्रीनिवासाचार्य तमिळ । कुरूप्प रोजा | का. श्री. श्रीनिवासाचार्य तिमिळ । ओडुम रेयिलेले | का. श्री. श्रीनिवासाचार्य तमिळ कोडैमळे का. श्री. श्रीनिवासाचार्य वि. स. खांडेकर चरित्र/१८0 ________________

प्रकाशक प्रकाशन वर्ष कथासंग्रह अनुवादित भाषा | तमिळ कथासंग्रह अनुवादित | अनुवादक शीर्षक कळ्ळक्कादलि | का. श्री. श्रीनिवासाचार्य १९५२, १९५६ १९६७ १९५१, १९५८ तमिळ । जमीनदार का. श्री. श्रीनिवासाचार्य मप्पिळळे कण्णाडि अरण्मनै | का. श्री. श्रीनिवासाचार्य तमिळ | | ४| | तमिळ | तमिळ | तमिळ तमिळ इरूपदु जून | का. श्री. श्रीनिवासाचार्य मिस लीला | का. श्री. श्रीनिवासाचार्य नन्दवनम | का. श्री. श्रीनिवासाचार्य कवियुग कलियुम | का. श्री. श्रीनिवासाचार्य १९५२, १९५६ १९६७ १९५२ १९५२ १९५३ १९५५, १९६२ १९६८, १९७३ | | तमिळ १९६३ | तमिळ | क्युकन्निकै | का. श्री. श्रीनिवासाचार्य वनदेवताई | का. श्री. श्रीनिवासाचार्य कोडाई मसाई | का. श्री. श्रीनिवासाचार्य प्रिती की खोज | रा. र. सरवटे संध्यादीप | रा. र. सरवटे | | देशमुख आणि कं., पुणे देशमुख आणि कं., पुणे | तमिळ तमिळ । | तमिळ | कालची स्वप्ने । | हिंदी हिंदी हिंदी हिंदी | | विगत स्वप्न | रा. र. सरवटे फूल और पत्थर | रा. र. सरवटे | रा. र. सरवटे वि.स.खांडेकर | डॉ. सुनीलकुमार की श्रेष्ठ कहानियाँ | लवटे पूजा । देशमुख आणि कं., पुणे देशमुख आणि कं., पुणे देशमुख आणि कं., पुणे विद्या प्रकाशन मंदिर, | | १९८३, १९९८ नई दिल्ली रूपक कथासंग्रह अनुवादक ।। प्रकाशक प्रकाशन वर्ष मूळ रचना | अनुवाद भाषा कलिका | हिंदी वनदेवता अनुवादित शीर्षक कलिका रा. र. सरवटे डॉ. सुनीलकुमार शांति देशमुख आणि कं., पुणे राधाकृष्णा प्रकाशन नई दिल्ली । १९९७ लवटे रूपककथा (अनुवाद) | अनुवादक मूळ रचना अनुवाद | प्रकाशक प्रकाशन वर्ष भाषा अनुवादित शीर्षक सुवर्ण रेणु १. सुवर्ण गुजराथी | मीनु देसाई ।। १९५३, १९५५ आर. आर. शेठ अँड कं., अहमदाबाद कण सिंधी दिल ते आहिन | जखम हजारिन प्रकाशक प्रकाशन वर्ष मूळ रचना | अनुवाद भाषा १. रिकामा | मल्याळी देव्हारा नाट्य रूपांतर अनुवादित ।। अनुवादक शीर्षक वेरूळ कविल वि. स. खांडेकर चरित्र/१८१

परिशिष्ट -७
वि. स. खांडेकर : संदर्भ ग्रंथ सूची

* चरित्र

१. एक लेखक, एक खेडे : जया दडकर (पॉप्युलर प्रकाशन, मुंबई)
२. वि. स. खांडेकर : सचित्र चरित्रपट : जया दडकर (देशमुख
आणि कंपनी)
३. वि. स. खांडेकर : डॉ. ललिता कुंभोजकर (राष्ट्रीय चरित्रमाला,
पुणे)
४. वि. स. खांडेकर : ओळख आणि अभ्यास - वा. शि. आपटे
(श्री गणराज प्रकाशन, पुणे)
५. वि. स. खांडेकर : जीवन आणि आठवणी : रा. वा. शेवडे
गुरुजी (मेहता, कोल्हापूर)
६. आता फक्त आठवणीच : रा. वा. शेवडे गुरुजी (शिवसागर
प्रकाशन, कोल्हापूर) १९७८
७. वि. स. खांडेकर : दुर्मीळ अश्रू ओघळलेले मोती - रा. वा.
शेवडे गुरुजी (शिवसंस्कार प्रकाशन, कोल्हापूर)
८. वि. स. खांडेकर : चरित्र आणि वाङ्मय - मा. का. देशपांडे
(सुलभ कॉलेज बुक स्टॉल, कोल्हापूर)
९. खांडेकर : मित्र आणि माणूस - वा. रा. ढवळे (कॉन्टिनेन्टल
प्रकाशन, पुणे)
१०. विष्णू सखाराम खांडेकर : म. द. हातकणंगलेकर (साहित्य
अकादमी)
११. Vishnu Sakharam Khandekar - M. D. Hatkanaglekar,
Sahitra Akaademi, New Delhi
१२. भाऊ (कादंबरी) - डॉ. वि. य. कुलकर्णी (इंद्रायणी प्रकाशन,
पुणे, १९७७)
१३. वि. स. खांडेकर : एक ध्येयवादी शिक्षक - डॉ. सुनीलकुमार
लवटे
१४. भाऊंच्या सहवासात : राम देशपांडे, अजब पब्लिकेशन, कोल्हापूर
(२००७)
१५. वि. स. खांडेकर चरित्र : डॉ. सुनीलकुमार लवटे - श्रमिक





  प्रतिष्ठान, कोल्हापूर (२०१२)

 * वाङ्मय सूची
 १. वि. स. खांडेकर वाङ्मय सूची - जया दडकर (देशमुख आणि
  कंपनी, पुणे), १९८४

 * गौरव ग्रंथ
 १. Maharashtra : A Profile -A. K. Bhagwat (Amrit Mahotsav
  Satkar Samiti, Kolhapur)
 २. वि. स. खांडेकर गौरविका - संपादन संभाजी जाधव, प्रा. म.
  अ. कुलकर्णी, कोल्हापूर

 * वि. स. खांडेकर विशेषांक
 १. ललित (वि. स. खांडेकर गौरवांक, फेब्रुवारी, १९७६)
 २. ललित (वि. स. खांडेकर जन्मशताब्दी विशेषांक, मे १९९७)
 ३. झंकार (साहित्य संमेलनांक, १३ एप्रिल १९४१)
 ४. महाराष्ट्र साहित्य पत्रिका (ऑक्टोबर, ७५ ते मार्च ७६)
  स्वराज्य (१० एप्रिल, १९७६)
 ६. किर्लोस्कर (ऑक्टोबर, १९७६)
 ७. अनुराधा (मार्च, १९७६)
 ८. माणूस (२८ जुलै, १९८२)
 ९. दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका (ऑक्टो/नोव्हें/डिसें.-१९७६)
 १०. शिवराज्य - १ जानेवारी, १९९९ (महाराष्ट्र शासन)
 ११. वि. स. खांडेकर जन्मशताब्दी स्मरणिका-१९९७-९८
  (आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर)
 १२. रुद्रवाणी (जानेवारी, १९७०)
 १३. आरती (जाने/फेब्रु.-१९९८)

 * समीक्षा ग्रंथ:
 १. गाभारा - संपा. डॉ. मु. श्री. कानडे/भालचंद्र खांडेकर (अनमोल
  प्रकाशन, पुणे, १९७८)
 २. साहित्यिक खांडेकर - डॉ. एस. एस. भोसले (अजब पुस्तकालय,


कोल्हापूर, १९८०)
३. खांडेकर : व्यक्ती आणि साहित्य - डॉ. एस. एस. भोसले (दा.
न. मोघे स्कूल अँड कॉलेज)
४. वि. स. खांडेकर, साहित्य विचार - डॉ. विजय निंबाळकर
(मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे)
५. भाऊंच्या अष्टकन्या - खटावकर, सुलभ प्रकाशन
६. खांडेकरांचे समाजचिंतन - डॉ. वि. य. कुलकर्णी, कृ. पं.
देशपांडे, चारूदत्ता प्रकाशन, पुणे (१९७९)

☐☐



डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा


१.  खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००६/पृ. २१०/रु. १८० सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००७/पृ. १३८/रु. १४० तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती
५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२०० /तिसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३०/रु.१७५/दुसरी आवृत्ती
९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२००/दुसरी आवृत्ती
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/तिसरी सुधारित आवृत्ती
११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५०/दुसरी सुधारित आवृत्ती
१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२००/दुसरी आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती
१५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२००/तिसरी आवृत्ती
१६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)

 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
 साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. १९८ रु. ३०० /पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५/
पहिली आवृत्ती वेचलेली फुले (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२0 रु. ३०० / पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)  अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१८५ रु.२५० /पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५०/पहिली आवृत्ती

आगामी
• भारतीय भाषा (समीक्षा)
• भारतीय साहित्य (समीक्षा)
• भारतीय लिपी (समीक्षा)
• वाचन (सैद्धान्तिक)

  • वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन