वेचलेली फुले


डॉ. सुनीलकुमार लवटे





वेचलेली फुले
(समीक्षा)
डॉ. सुनीलकुमार लवटे

संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८ ८१ २५ 00 ९३
drsklawate@gmail.com www.drsunilkumarlawate.in

दुसरी आवृत्ती २०१८

© डॉ. सुनीलकुमार लवटे

प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com

मुखपृष्ठ
गौरीश सोनार

अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर

मूल्य ₹३00/ओंजळीतली फुले

 'वेचलेली फुले' हा वृत्तपत्रे, नियतकालिके, ई-जर्नल्सवर वेळोवेळी प्रकाशित परीक्षणांचा संग्रह होय. मी पीएच.डी. झाल्यानंतरच्या काळात स्वास्थ्याने वाचू, लिहू लागलो. वाचलेले भावायचे. भावलेले दुस-याला सांगायची विलक्षण ओढ मी तिशीत असताना होती, असे मागे वळून पाहताना लक्षात येते. त्या ओढीतून मी वाचलेल्या पुस्तक, साहित्यकृतींबद्दल लिहीत असे. लिहिलेले वृत्तपत्र, नियतकालिकांना पाठवत असे. सन १९८0 ला जोपासलेला हा छंद सत्तरीच्या उंबरठ्यावरही तसाच नि तितकाच तीव्र आहे, याचा मला आनंद आहे. माझ्यातील वाचन, लेखनाची प्रेरणा चार दशकांनंतरही तितकीच ताजीतवानी आहे.
 वाचनाचा छंद ऐन गद्धेपंचविशीत जोशात असतो. जगातले सारे वाचावे असे वाटण्याचा तो काळ! मनाची पाटी कोरी असताना साहित्य, विचार, संस्कृतीच्या जाणिवा तेवढ्या प्रगल्भ असत नाहीत. वाचेल ते नवे असते. ते एकीकडे तुमचे डोळे विस्फारत असते, तर दुसरीकडे डोके विस्तारत राहते. 'चांदोबा', 'गोकुळ', 'कुमार', 'अमृत' मासिकांनी बालकुमार वयात माझे वाचक मन छेदी बनवले. पुढे 'मनोहर', 'माणूस', 'बहुश्रुत माला', 'समाजशिक्षण माला' या नियतकालिकांतील लेख व पुस्तकांनी माझे कुमार, किशोरवय पोसवले. तरुणपणात 'साधना', 'किर्लोस्कर', 'स्त्री', 'सोवियत लँड', 'लाइफ', 'ललित', 'नॅशनल जिऑग्राफिक' मासिकांनी वाचन कक्षा रुंदावली, प्रगल्भ केली. पुस्तक वाचन बालकुमार साहित्याकडून हेर कथा, शृंगार कथा, प्रवासवर्णन, चरित्रे असा प्रवास करत तिशीच्या जवळपास अभिजात झाला. रंजक व बोधकातील फरक उमजला तो शिक्षक झाल्याने प्राध्यापक झाल्याने वेचक वाचन पठडी बनून गेली. नेमका याच वेळी मी लिहू लागलो. पीएच.डी. मुळे वाचन, लेखनास वैज्ञानिक बैठक लाभली. समाजात वाचन संस्कृती रुजायची तर वेचक साहित्याबद्दल आवर्जून लिहायला हवे, या जाणिवेने मी वाचलेल्या साहित्यकृतीबद्दल लिहू लागलो. या लेखनाचा बाज प्रेरणा, परिचय, परीक्षण असा असला तरी ‘वाचन प्रेरणा त्याचा उद्देश होता.  हे लेखन कधी वृत्तपत्रे, नियतकालिकांकडे अभिप्रायार्थ येणा-या ग्रंथांचे परीक्षण करण्यातून घडले, कधी शिक्षक, मित्र, सहकारी, परिचितांच्या आग्रहातून, तर कधी उत्स्फूर्त? ‘जे आपणाशी ठावे ते दुस-याशी सांगावे' अशा इच्छेतून हे घडत गेले. यातून माझे विचारपूर्वक वाचन रुंदावले. छंद, मनोरंजन, जिज्ञासा म्हणून वाचणे आणि लेखनासाठी वाचणे यात अंतर असते. लेखनासाठी केलेले सहेतुक वाचन सतर्क, चोखंदळ असते. साहित्य वा लेखन कृतीचा विषय, आशय, शैली, साहित्य प्रकार, नर्मबिंदू, बलस्थान असा चिकित्सक धांडोळा घेत वाचत गेले की ते वाचन मनावर कायमस्वरूपी ठसते. परीक्षणकर्त्यांची ही खरी मिळकत असते. असे लेखन वेचलेल्या फुलांसारखे असते. पारिजात, बकुळ, जाई, जुई, मोगरा, या झाडा वेलींखाली आपसूक पडलेली फुले। अंगणात सर्वत्र सडा असतो त्यांचा! कितीही डोळे भरून पाहा, मन:पूर्वक हुंगा, ती कधीच मन भरू देत नाहीत. चाफा, गगनजाई, पारिजातक, जाई, जुई, मोगरा त्यांची कितीही फुले वेचा, लक्ष जाते ते न वेचलेल्या फुलांकडे. निसर्ग जसा समृद्ध तसे आपले साहित्य! फुलांनी भरलेले अंगण मला आकाशगंगाच वाटते! दोन्हींचे सौंदर्य व अतृप्ती एकच! कथा, कादंबरी, कविता, आत्मकथा, लेखसंग्रह, चरित्र, विवरणात्मक ग्रंथ, स्मृतिग्रंथ, अहवाल, संस्था परिचय, पुस्तिका, करुण कथा, अनुवाद, आलेख, भाषणे, सूक्तीसंग्रह, प्रवास वर्णन, चिंतनपर लेखन, नाटक, नवसाधन संवाद हे सारे आकाशगंगेतील ता-यांपेक्षा कमी का आकर्षक व वैविध्यपूर्ण असतात? वैविध्यातील वैभव म्हणजे साहित्य! हे सारे साहित्य प्रकार जीवनाचे विविध पक्ष समजावतात व जीवनाचे बहुपेडी रूपही! प्रत्येक लेखकाची लेखनाची हातोटी वेगळी. प्रत्येकाचे जग वेगळे. अगदी हौसेने लिहिणा-याकडेही सांगण्यासारखे भरपूर असते. यातून जीवनाचे संपूर्ण, समग्र प्रतिबिंब साहित्यात पडत असते. विविध प्रकारचे साहित्य वाचनच तुम्हाला समृद्ध करते. अशा सर्वांगीण साहित्य परीक्षणातून तुमचे आकलन संपन्न होते. पुस्तक परिचय, परीक्षण लेखन वाचकांना मार्गदर्शक असले, तरी परीक्षणकर्त्यास ते प्रौढ नि प्रगल्भ करते, ते त्यांच्या जाणिवा रुंदावत.
 ‘वेचलेली फुलं' समीक्षा संग्रहात मराठी, हिंदी, इंग्रजी अशा त्रैभाषिक ग्रंथांची परीक्षणे व परिचय आहे. प्रामुख्याने मात्र मराठी ग्रंथच यात आहेत. गीतकार गुलजार, सिनेदिग्दर्शक सत्यजीत रे, ज्ञानपीठ विजेते कन्नड कादंबरीकार डॉ. यू. आर. अनंतमूर्ती, समाजशास्त्र डॉ. शरदचंद्र गोखले, कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे, साहित्यिक उत्तम कांबळे, लोकसाहित्य अभ्यासक डॉ. तारा भवाळकर, बाल साहित्यिक रा. वा. शेवडे गुरुजी, नाटककार अतुल पेठे, संपादक श्रीराम पवार प्रभृती मान्यवरांच्या साहित्य कृतींची परीक्षणे यात आहे. बाबा आमटेंचा ‘ज्वाला नि फुले' काव्यसंग्रह आणि 'मी एस. एम.' आत्मकथेवरील यातील दीर्घ परीक्षण तुमच्या वाचनाच्या कक्षा रुंदावतील अशी माझी खात्री आहे. अन्य लेखकांचे ग्रंथही वाचण्याची प्रेरणा तुम्हास मिळेल. कारण त्यांचे स्वत:चे असे संदर्भमूल्य आहे. साहित्य, समाज, संगीत, संपर्क माध्यमे, राजकारण असा या ग्रंथाचा व्यापक पैस आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, कुष्ठरोग निर्मूलन, वयोश्रेष्ठांचे प्रश्न, वंचितांच्या समस्या अशा अंगांनी ही परीक्षणे, समीक्षणे तुमची मने संवेदनशील करतील असा मला विश्वास वाटतो. यातील चरित्रे, आत्मचरित्रे तुम्ही मिळवून वाचाल तर तुमचे अनुभव विश्व बदलून जाईल. मी एक सांगेन की ही सारी समीक्षणे मी आस्वादक समीक्षेच्या अंगांनी लिहिली आहेत. दोष दिग्दर्शन गौण. मी सकारात्मक व प्रोत्साहक समीक्षक आहे. वस्तुनिष्ठता म्हणजे सोनाराचा तराजू असे मी मानत नाही. पण तो लाकडाच्या वखारीतील तराजूही नाही हे मला सांगितलेच पाहिजे. ज्या वाचनाने समाज परिवर्तन घडून येईल अशा जाणिवेने केलेले हे लेखन होय. ‘फॅसिस्ट' व 'फ्युडल' दोन्ही कालबाह्य असल्याने त्यांच्या निरासाचा आग्रह या लेखनात आहे. आपण जात, धर्मनिरपेक्ष, अंधश्रद्धा मुक्त, विज्ञाननिष्ठ, समतावादी, झाल्याशिवाय तरुणोपाय नाही. हे कालभान देणारे सदर लेखन असल्याने वेचलेली फुले' हुंगली नि टाकली असे होणार नाही. यात असलेल्या अव्यक्त, अमूर्त विचार भुंग्यांचा गुंजारव एकदा का तुमच्या कानी घोंगावला की तो आजन्म तुमचा पिच्छा पुरवणारच. त्यामुळे वेचलेल्या फुलांचे वाचन शिळोप्याचा उद्योग ठरणार नाही. वॉल्ट व्हिटमननी म्हटल्याप्रमाणे 'Who touches the book, touches the heart' असे यातील ग्रंथ होत.

 २० एप्रिल २०१७
डॉ. सुनीलकुमार लवटे 
 



अनुक्रम

१. प्रयोगशीलता जोपासणाऱ्या शाळा/९
२. प्राचीन संत कवयित्रींचे वाङ्मयीन कार्य/१२
३. छंदशास्त्र व संगीताचा संबंध/१३
४. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे प्रेरक चरित्र/१४
५.फुटबॉल खेळ : तंत्र, कौशल्य व नियम/१५
६. महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचा विकास/१६
७.‘एकलकोंडा' : एकटेपणा चितारणारी कादंबरी/१७
८. 'बाभळीची फुलं' : महारोग्यांच्या व्यथांच्या कथा/१९
९. जस्मिन' : सैनिकी जीवनाधारित प्रेम कादंबरी/२१
१०. सौदामिनी' : महाराणी ताराबाईंवरील चरित्र कादंबरी/२२
११. 'गुलमोहर' : मनुष्यसंबंधांची कादंबरी/२४
१२. 'काली':अंधास आधार देणा-या डोळस कुत्रीची कथा/२६
१३. समिधा' : इस्माईलसाहेब मुल्ला स्मृतिगंध/२७
१४. सामाजिक विकासाचे प्रश्न व धोरण' : मागोवा/२९
१५. 'बालशिक्षण विचार आणि आचार' : एक अवलोकन/३१
१६. बालन्याय अधिनियम : राज्यस्तरीय चर्चासत्राचा अहवाल/३३
१७. दत्तकविधान : तत्त्व, व्यवहार व पद्धत मार्गदर्शिका/३५
१८. कुष्ठरोग्यांचे सामाजिक पुनर्वसन कार्य/३७
१९. म्हातारपण' : वयोश्रेष्ठांच्या प्रश्नांची चर्चा/३९
२०. चेतना अपंगमती विकास संस्था : परिचय/४१
२१. कुमारीमातांच्या करुण कहाण्या/४२
२२. बालिका वर्षाची ‘गाज' /४४ 


२३. ‘प्रेझेंट सर!' - अनुभवकथनातून शिक्षण/४७
२४. मुल्ला नसरूद्दीनच्या वाचनीय गोष्टी/४९
२५. 'वंचितांचे विश्व' : उपेक्षित जगाची ओळख/५१
२६. ‘अवर्स बाय चॉईस' : दत्तकसंबंधी इंग्रजी ग्रंथ/५४
२७. या मुलांनो या' : साद घालणा-या बालकथा/५६
२८. औटघटकेचे राज्य' : देशोदेशीच्या लोककथा/५७
२९. बालभाग्यविधात्री मादाम मारिया माँटेसोरी चरित्र/५८
३०. “जय मंगलमूर्ती' : गणेश पैलू दर्शन/५८
३१. 'कावळे आणि माणसं' : संघर्षशील सत्यशोधक कथा/६०
३२. ‘जागतिक घडामोडी : वर्तमानाचा साक्षेपी आढावा/६४
३३. ‘मिठू मिठू पोपट' : स्त्रीवादी विचाराचे नाटक/६६
३४. ‘समतेच्या दिंडीचे धारकरी' : समतावादी भाषणसंग्रह/६८
३५. 'त्रिवेणी' : गुलजार अल्पाक्षरी काव्य/७१
३६. ऋतु उग रही है' : स्थलांतरीत मनाच्या हिंदी कविता/७४
३७. ‘तिस-या बिंदूच्या शोधात' : स्त्री विकासाची मार्मिक समीक्षा/७७
३८. चाकाची खुर्ची' : अपंग समाजसेविकेचे आत्मकथन/८१
३९. घडण' : सामान्यांच्या धडपडीचे आत्मचरित्र/८४
४०. ‘गजाआडच्या कविता' : बंदी बांधवांचे व्यथाकाव्य/८६
४१. 'बालकुमार साहित्यसेवकाचे जीवन व साहित्य/८९
४२. संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन' : विहंगमावलोकन/९१
४३. ‘त्रिवेणी' : गुलजार काव्याचा मराठी अनुवाद/९३
४४. 'व्हॉट वेंट राँग?' : बंदीच्या बोचच्या कथा/९६
४५. ‘सार्वजनिक सत्यधर्माचे उपासक डॉ. विश्राम घोले/९९
४६. 'बंजा-याचे घर’ : बदलत्या घरांची ललित कथा/१०२
४७. ‘अवस्था' : स्वातंत्र्योत्तर काळातील दुरवस्थेचे चित्रण/१०५
४८. 'मयुरपंख' : मराठी कवितांचा हिंदी अनुवाद/१०८
४९. “भारताचा अंत' : वैचारिक असहिष्णुतेचा उतरता आलेख/११०
५०. ‘ठरलं, डोळस व्हायचंच!' : अंधश्रद्धा निर्मूलनाचे समुपदेशन/११२


५१. 'फिटे अंधाराचे जाळे' : बहुविकलांग अपत्य वाढविण्याची कथा/११४
५२. 'शिल्पकार' : प्रेरक चरित्र काव्य/११८
५३. ‘आकाशवेल' : साहित्य आणि वक्तृत्वाचा संगम/१२0
५४. `आई समजून घेताना' : आईचा संवेदी शोध/१२२
५५. हॉटेल माझा देश' : वेटर व वेश्यासंबंधांचे काव्य/१२५
५६. विभूती' : राष्ट्रपुरुषांची प्रेरक सूक्ते/१२७
५७. पालातील माणसं' : फिरस्ती जीवनाचे आत्मकथन/१२९
५८. नामदारनामा' : व्यक्तिचित्रांद्वारे आत्मकथनाचा प्रयोग/१३३
५९. नेपाळ नावाचे गूढ' : छायाचित्रात्मक प्रवासवर्णन/१३६
६०. “आमचा सरनामा' नियतीशी करार : चिंतनिका/१३८
६१. रस अनौरस : वंचित जीवनाची कादंबरी/१४१
६२. ‘भोगिले जे दु:ख त्याला' : मुस्लीम स्त्रीजीवनाचा आक्रोश/१४४
६३. “मी अनिता राकेश सांगतेय...' : साहित्यिक स्त्रीची फरफट/१४८
६४. ‘उधाण वारा' : स्त्रीच्या वय:संधीची गाथा/१५२
६५. नंबर वन' : खेळाडूंच्या अंतरकथा/१५६
६६. चरित्र ग्रंथमाला' : अभिनव उपक्रम/१६३
६७. ज्वाला आणि फुले : जहाल वेदनांची गीते/१६७
६८. ‘तोत्तोचान' : शाळा व शिक्षकांची महत्ता/१७४
६९. 'महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा' : प्रेरक चरित्र/१७७
७०. स्वप्नांच्या पडझडीनंतर' : विकल कविता/१८०
७१. ‘काश्मिरी कयामत' : आपत्तीतील माणुसकी/१८३
७२. 'मी- एस. एम' : एका सामाजिक चरित्राची राजकीय कथा/१८५
७३. राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य'/१९९
७४. रिंगणनाट्य' : दिशा आणि दृष्टीचा वस्तुपाठ/२०४
७५. ‘संवाद क्रांती' : नवसंवादाचे अंतर्मुखी विवेचन/२०९
• परीक्षित ग्रंथ व पूर्वप्रसिद्धी सूची - २१२  मुलांच्या मनात प्रयोगशीलता वाढविणा-या शाळा

 हा लेखसंग्रह एका डोळस शिक्षकांच्या सूक्ष्म निरीक्षण नि उपक्रमशील प्रवृत्तीचा आविष्कार आहे. संदर्शन प्रकल्पात शेकडो शिक्षक सहभागी झाले आहेत, परंतु महाडेश्वरांनी हे संदर्शन पर्यटन यात्रा न मानता गुणग्राहकतेस मिळालेली संधी मानली व यातून जितके अधिक मिळविता येईल तितके मिळविण्याचा व मिळालेले समाजापर्यंत पोचविण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याची प्रचिती वाचकाला पानागणिक आल्यावाचून राहात नाही. या पुस्तकास अ. के. भागवतांसारख्या विचारवंताची चिकित्सात्मक, विश्लेषणात्मक प्रस्तावना लाभली आहे. श्री. यदुनाथ थत्तेसारख्या आंतर भारतीला समर्पित झालेल्या एका ज्येष्ठ विचारकाचा पुरस्कार पुस्तकास लाभल्याने या पुस्तका एक आगळे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. चिकित्सक, चिंतक नि चेतक अशा या त्रयींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे पुस्तक केवळ वर्णनपर लेखसंग्रह न राहता दृष्टी देणारे पुस्तक बनले आहे.
 पुस्तकात गुजरातमधील बाली, मढी, बडोदा, अहमदाबाद, कोबा, आजोल, राजकोट, सणोसरा इत्यादी ठिकाणच्या विविध संस्थांमध्ये चालणाच्या उपक्रम नि प्रयोगाचे धावते वर्णन केले आहे. या विविध ठिकाणी असलेल्या संस्था बालवाडीपासून विद्यापीठ स्तरापर्यंत शिक्षण देणा-या असून त्यांचे स्वरूप व कार्यही वेगवेगळे आहे. या प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. तशाच आश्रमशाळा, कलाकेंद्र, कृषिसंशोधन प्रकल्प, नागरिक मंडळेही आहेत. प्रत्येक संस्थेचे आपले असे खास व्यक्तित्व आहे. प्रत्येक संस्थेचे कार्यक्षेत्र, अभ्यासक्रम, प्रयोग भिन्न आहेत.
 वेडछीचे ‘गांधी विद्यापीठ' नई तालीमला समर्पित विद्यापीठ आहे. अहमदाबादचे ‘श्रेयस' तर अनाथांचे आनंदवनच! आजोलचे ‘संस्कारतीर्थ वाचले की रवींद्रनाथांच्या 'शांतिनिकेतन'चे स्मरण व्हावे. सणोसराचे ‘लोक विद्यापीठ' ही लोकशिक्षणाशी व व्यक्तिविकासाशी आपले अतूट नाते स्पष्ट करणारी संस्था आहे. येथील संस्थांच्या नामाभिधानातही कल्पकता आहे. वात्सल्यधाम, संस्कारतीर्थ, कन्याश्रम, बालग्राम, श्रेयस ही नावे वाचली की आपल्या शाळा किती रूक्ष आहेत याची जाणीव होते. लेखकाने प्रत्येक संस्थेचा स्वतंत्र लेखात परामर्शघेऊन त्या संस्थेची कार्यपद्धती, स्वरूप व वैशिष्ट्ये यांचे मूल्यांकन केले आहे. चित्रशैलीमुळे या संस्था चलतचित्रासारख्या आपल्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात.
 एका अर्थाने हे पुस्तक विविध प्रयोग नि प्रकल्पाचा व्यापक संग्रह बनला आहे. ज्या शिक्षकांना आपल्या शाळांतून चैतन्याचे मळे फुलवायचे असतील अशासाठी हे पुस्तक पाथेय ठरावे. झाडूंवरही मुलांनी प्रेम करावे म्हणून तयार केलेले रंगीत झाडू, प्रामाणिकतेचा संस्कार देणारे, विक्रेता नसलेले ‘राम दुकान' जे आपले नाही ते घ्यायचे नाही याची शिकवण देणारी शाळेच्या परिसरात ठेवलेली विविध पात्रे (पॉट्स), सुलभ अवजार निर्मितीचा प्रयोग, वॉटर कर्टन असलेला अभिनय रंगमंच, मुलांच्या मनात प्रयोगशीलता वाढीस लागावी म्हणून मुक्त प्रयोगशाळा असे कितीतरी प्रयोग या पुस्तकात आपणास वाचावयास मिळतात. हे प्रयोग वाचले की आपण किती यंत्रवत झालो आहोत याचा विषाद वाटतो. आहे त्या परिसरात नि आहे त्या परिस्थितीत थोडी कल्पकता दाखवून आपल्या शाळा संवेदनक्षम बनवण्यासाठी हे पुस्तक एका मार्गदर्शकाचे काम करते नि म्हणून आपल्या सर्व शिक्षकांनी हे पुस्तक व्यवसायाचे धडे म्हणून वाचावे व संग्रही ठेवावे.
 पुस्तकाच्या शेवटच्या लेखात गुजरातमधील शिक्षण संस्थांची सर्वसामान्य वैशिष्ट्ये अंकित केली आहेत. या शिक्षण संस्थांतून आपण काय घेण्यासारखे आहे याची शिकवण हा लेख देतो. छोट्या छोट्या वाक्य रचनेची हातोटी लेखकात असल्याने या पुस्तकास ‘आँखो देखा हाल' चे स्वरूप प्राप्त झाले आहे. आकर्षक नि समर्पक मुखपृष्ठ लाभलेल्या या पुस्तकात असलेले मुद्रणदोष टाळता आले असते तर बरे झाले असते. पुस्तकाचे शीर्षक व पुस्तकातील लेख यात साधर्म्य असावे असे अपेक्षित असते. शीर्षकावरून गुजरातेतील शिक्षणसंस्थांचा परिचय व्हावा हे उद्दिष्ट स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर ‘सासणगिरीला पाहिलेले दहा सिंह' शीर्षक असलेला लेख अप्रस्तुत वाटतो. हे दहा सिंह वीस लेखात घुसल्याने विनोद निर्माण झाला आहे. हा लेख संपादनाच्यावेळी गाळता आला असता तर बरे झाले असते.
 अर्थात असल्या क्षुल्लक दोषांमुळे पुस्तकाच्या मूळ आशयाला मोठा धोका संभवतो असे नाही. या पुस्तकाचे महत्त्व त्याच्या उपक्रमशीलतेतच प्रामुख्याने सामावलेले असल्याने येथून पुढे गुजरात संदर्शनास जाणा-यांना हे पुस्तक जाणीव व दृष्टी देणारे ठरणार आहे. तसेच ते जाण्यापूर्वी एक वैचारिक ________________

पीठिका तयार करण्यास उपयुक्त ठरणार आहे. या पुस्तकाचा व्यापक आशय व उपक्रमशीलता लक्षात घेता पुस्तकाचा प्रचार नि प्रसार व्हावा म्हणून हे हिंदीसारख्या बहुप्रचारित भाषेत जाणे आवश्यक आहे. गुजरातेतील या शिक्षणसंस्था एकात्म भारताच्या निर्मितीसाठी वचनबद्ध आहेत. आंतरभारती' ही ‘एक हृदय हो भारत जननी' ब्रीदाशी आपले नाते सांगत असल्यामुळे पुढची पायरी म्हणून अनुवादाचे कार्य हाती घेईल आशा आहे. हे पुस्तक शिक्षकांतील सुप्त आदर्शास चेतना देणारे ठरेल. लोकसंग्रहातून निर्माण झालेल्या पुस्तकास लोकप्रियता लाभली नाही तरच आश्चर्य!
_____________________________________________________________________________
• गुजरातेतील उपक्रमशील शिक्षणसंस्था (लेखसंग्रह)
लेखक - शशिकांत महाडेश्वर
प्रकाशक -आंतर भारती प्रकाशनश, पुणे, ३0.
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे - ११२   किंमत १२ रु.



वेचलेली फुले/११

प्राचीन मराठी संत कवयित्रींचे वाङ्मयीन कार्य

प्राचीन मराठी संत कवयित्रीचे वाङ्मयीन कार्य व या कार्याची रसिक चिकित्सा करणारा डॉ. सुहासिनी इलेकरांचा हा प्रबंध एक संशोधनात्मक आलेख आहे. यात लेखिकेने महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई व वेणाबाई या आद्य कवयित्रींच्या काव्याचे मूल्यांकन तुलनात्मक पद्धतीने केले आहे. या कवयित्रींच्या काव्याची जोपासना समकालीन संतांनी केली आहे. लेखिकेने महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई व वेणाबाई यांच्या काव्याची तुलना अनुक्रमे चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ यांच्या काव्याशी केली आहे. कवयित्रींच्या काव्याचे असे सम्यक, मूल्यांकन अपवादानेच केले जाते. सौ. इलेंकरांनी चाकोरीबाहेर जाऊन चिकित्सक व डोळस दृष्टीने या कवयित्रींचे अध्ययन केले आहे. इस.१३00 ते १७00 या पाच शतकांच्या दीर्घ कालखंडातील ओवीबद्ध, श्लोकबद्ध व अभंग रूपात असलेल्या प्राचीन काव्याच्या अध्ययनाच्या दृष्टीने या ग्रंथाचे एक विशाल दालन अभ्यासासाठी खुले केले आहे. या ग्रंथातील विवेचन चिकित्सक असूनही कुठेही रसग्रहणाच्या दृष्टीने क्लिष्टता आली नाही. याचे सारे श्रेय लेखिकेच्या लेखन शैलीलाच द्यावे लागेल. मराठीतील या संत कवयित्रींची कविता आत्मकेंद्रित होऊन लौकिक सुखदु:खात रेंगाळत न राहता आध्यात्मिक रूप धारण करून मराठी वाङ्मयात मोलाची भर घालते, याचा प्रत्यय जाणून देणारा हा ग्रंथ प्राचीन साहित्याचे अध्ययन करणा-यास दीपस्तंभ वाटला नाही तरच नवल! या ग्रंथास नरहर कुरुंदकरांची विवेचक प्रस्तावना लाभली असून तिच्यामुळे पुस्तकाची कक्षा रुंदावण्यास मदत झाली आहे.
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________
• प्राचीन मराठी संत कवयित्रींचे वाङ्मयीन कार्य (समीक्षा)
लेखक - ले. डॉ. सुहासिनी इर्लेकर,
प्रकाशक - परिमल प्रकाशन, औरंगाबाद.
प्रकाशन वर्ष - १९८४
पृष्ठे - ३३१   किंमत - ४0 रु.


वेचलेली फुले/१२ ________________

छंदशास्त्र व संगीताचा संबंध


सामान्य रसिकांना अभिजात संगीताची गोडी वाटावी म्हणून अभिनव पद्धतीने संगीताची गती देणाच्या श्री. बाबूराव जोशींनी वाङ्मयातील छंदाचा संगीताशी असलेला संबंध प्रस्तुत ग्रंथाद्वारे स्पष्ट केला आहे. आपल्याकडे छंदशाखासारखा लयबद्ध विषय रूक्ष करून शिकविण्याची सर्वथैव अनिष्ट परंपरा रूढ आहे. स्वतः भाषा शिक्षकांची संगीतात फारशी गती नसते. यामुळे तो छंदातील लय वजा करून त्याच्या मात्रा, गण, यती इ. रचनेवरच अधिक भर देतो. काव्याच्या अध्ययन व अध्यापनातील हरवलेली लय श्री. बाबूराव जोशी यांनी या पुस्तकाद्वारे देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. व्यवसायाने वकील असणारा हा संगीतप्रेमी डॉ. माधव पटवर्धनांच्या ‘छंदोरचना'सारख्या मूलगामी ग्रंथाचे अध्ययन करून प्रत्येक छंदाची नोटेशन तयार करतो. इतकेच नव्हे, तर जिज्ञासूंसाठी त्याच्या मास्टर टेप्सही बनवतो. ही खरोखरीच प्रेरणादायी गोष्ट आहे. कला विकास हा कलेच्या व्यासंगाने, वेडानेच होतो, याचे हे पुस्तक मूर्तिमंत उदाहरण होय. शाळा, कॉलेज व विद्यापीठांतून होणाच्या छंदशास्त्राच्या अध्यापनात या पुस्तकांचा वापर झाला तर अध्ययन खचितच सरस होईल. प्रस्तुत ग्रंथात लेखकाने छंदशास्त्राची सांगोपांग चर्चा केली असून छंदातील गेयता अत्यंत सुलभ पद्धतीने विवेचित केली आहे. छंदाची गेयता लक्षात घेऊन मात्रा, जाती, यती इ. चे केलेले विश्लेषण हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य मानावे लागेल. संगीत नि छंदाच्या विविध शास्त्रीय चिन्हांचा छपाईत केला गेलेला वापर द्रष्टेपणाचेच द्योतक आहे.
_________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________ • छंदशास्त्र व संगीत (संशोधन)
लेखक - ले. श्री. बाबूराव जोशी
प्रकाशक - अजब पुस्तकालय, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष - १९८५
पृष्ठे - १९२   किंमत १६ रु.


वेचलेली फुले/१३ 

क्रांतीज्योति सावित्रीबाई जोतिराव फुलेंचे प्रेरक चरित्र

शैक्षणिक संशोधन हेच आपले कार्यक्षेत्र मानून दशकभर सातत्याने लेखन करणा-या डॉ. मा. गो. माळी यांनी महात्मा फुलेंची पत्नी सावित्रीबाईंच्या जीवन व कार्याचा परिचय देणारा हा ग्रंथ लिहून आपल्याभोवती स्वहस्ते आखलेले वर्तुळ रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. येथेही शिक्षणाचे सूत्र आहेच. संशोधनात्मक वृत्तीचा गंधही आहे, पण लेखनक्षेत्र वेगळे. सावित्रीबाईंच्या १५० व्या जन्मतिथीचा योग साधून लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे. स्त्रीमुक्ती नि स्त्री जागृतीच्या या युगात १९ व्या शतकात या स्त्रीने दाखविलेली दूरदृष्टी पाहिली की आश्चर्य वाटते. मुलींसाठी, शूद्र-अतिशूद्रांसाठी शाळा, बालहत्या प्रतिबंधक गृह इ. च्या स्थापनेने व विधवा विवाह, केशवपन बंदी इ. सारख्या आंदोलनाने या स्त्री रत्नाचे जीवन असाधारण बनते. ती केवळ महात्मा फुलेंची धर्मपत्नी न राहता सनातन समाजरचनेविरुद्ध आवाज उठवणारी एक क्रांतीज्योती सिद्ध होते! डॉ. माळी यांनी प्रस्तुत ग्रंथात दुर्मीळ फोटो, हस्ताक्षर, वंशवृक्ष इ. चा वापर करून या पुस्तकाच्या विश्वसनीयतेत मोलाची भर घातली आहे. महाराष्ट्राच्या समाज जीवनाच्या विकासाचे आकलन होण्यास हा ग्रंथ उपयुक्त ठरावा. या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

_______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________ • क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले (चरित्र)
लेखक - डॉ. मा. गो. माळी.
प्रकाशन - आशा प्रकाशन, गारगोटी
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे- १०५   किंमत - २0 रु.


वेचलेली फुले/१४ ________________

फुटबॉल : तंत्र, कौशल्य व नियम

आपल्याकडे खेळाकडे मनोरंजनाचे साधन म्हणूनच पाहिले जाते. विदेशात खेळ केवळ मनोरंजनाचे साधन न राहता त्याकडे वैज्ञानिक व तांत्रिक पद्धतीने पाहिले जाते. एखादा खेळ शिकत असताना त्याचे तंत्र, कौशल्य, व नियम माहीत असणे आवश्यक असते. विशेषतः विदेशी खेळांची अशी माहिती देशी भाषेत अभावानेच आढळते. फुटबॉलसारख्या विदेशी खेळाची माहिती मराठीत प्रथमतः तंत्रशुद्ध पद्धतीने येत आहे, ही खचितच स्वागतार्ह बाब होय. लेखक स्वतः प्रशिक्षित व कुशल खेळाडू असल्याने त्याने या खेळाचे अत्यंत सूक्ष्मतेने विवेचन केले आहे. पानागणिक आकृती, छायाचित्रे आहेत. लेखकाने इंग्रजी शब्दांना मराठी पारिभाषिक शब्द देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. लोकाश्रयातून निर्माण झालेल्या या पुस्तकास शासनाने अनुदान देणे आवश्यक आहे. खेळाडू, पंच, व हौशी सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त आहे. फुटबॉल खेळाचा इतिहास या खेळातील विविध कीर्तिमान, नियम, पद्धती इ. ची शास्त्रशुद्ध माहिती देणाच्या या पुस्तकांचा अंतर्भाव शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून व्हायला हवा.
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________ • फुटबॉल : तंत्र, कौशल्य व नियम
लेखक - श्री. जयसिंग खांडेकर
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे - १४५   किंमत - २0 रु.


वेचलेली फुले/१५ 

महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचा विकास

पशुसंपत्तीने भरलेली भारतातील खेडी उद्योग धंद्याद्वारे विकसित करायची असतील तर चर्मोद्योगाला पर्याय नाही. अशा या उद्योगाची तांत्रिक माहिती विशद करून लेखकाने महाराष्ट्रात या उद्योगाचा विकास कसा होत गेला याच विस्तृत आलेख या ग्रंथाद्वारे उभा केला आहे. लेखक स्वतः या उद्योगातूनच उभारला असल्याने व त्याने चर्मोद्योग महामंडळासारख्या संस्थेची जबाबदारी जाणीवपूर्वक उचलली असल्याने भविष्याच्या दृष्टीनेही त्याने काही योजना व उपाय यात सुचविले आहेत. छायाचित्रांच्या व सांख्यिकी माहितीच्या उपलब्धतेमुळे पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे. चर्मोद्योगावर मराठीत लिहिलेले हे पहिले वहिले पुस्तक असल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
_____________________________________________________________________________________________________________________________________________________ • महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचा विकास (इतिहास)
लेखक - श्री. नामदेव व्हटकर
प्रकाशक - यशश्री प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे - १६३   किंमत - १२ रु.


वेचलेली फुले/१६ ________________

एकलकोंडा : एकटेपणा चितारणारी कादंबरी

आजच्या मूल्य हरवून बसलेल्या समाजात मनुष्य निराश्रित, पतनोन्मुख झाल्याची जाणीव आपणास क्षणोक्षणी येते. जीवन उभारण्याची उभारी घेऊन उठलेल्या असहाय्य व्यक्तीस तर या बदलत्या समाजाचे बरे-वाईट अनुभव पदोपदी येतात. परिणामी त्या व्यक्तीस कमालीची उदासीनता, परकेपणा, एकाकीपणा निर्माण होतो. या यथार्थ अनुभूतीचा प्रत्यय देणारी आनंद यादव यांची ‘एकलकोंडा' कादंबरी पानागणिक वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य घेऊन येते. ग्रामीण परिसर, ग्रामीण पात्रे व ग्रामीण भाषा (पण ग्राम्य नव्हे) या लयीतून फुललेली ही कादंबरी मराठी ग्रामीण साहित्याच्या इतिहासात मोलाची भर घालणारी ठरावी. पानकवली गावच्या एका हातावरचे पोट असणा-या। कुटुंबातील ‘धोंडिराम'. या धोंड्याचा राम कसा होतो याची ही कथा. लहानपणीच आई-वडील वारल्यामुळे काकांच्या आश्रयाला आलेला राम स्वत:च्याच घरी परका ठरतो. पुढे एका वकिलांचा घरगडी बनतो. वकील नोकरीसाठी परगावी निघून गेल्यावर नशीब काढायला तो कोल्हापूर, पुणे, मुंबई इ. ठिकाणी जातो. हमाल किंवा कोळशाच्या वखारीत गडी म्हणून आईच्या शिकवणीनुसार प्रामाणिकपणे काम करतो. शिकत राहतो. साने गुरुजींचे साहित्य वाचून झपाटला जातो. स्वाभिमानाने उभे राहण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही हताश झालेला राम पुनश्च पानकवलीत येऊन सुखावतो. अशी एक सामान्य कथाबीज घेऊन साकारलेली ही कादंबरी निखळ आत्मकथनाने वाचकांचे हृदय गलबलून टाकते. या कादंबरीचे सारे श्रेष्ठत्व अनुभवांच्या प्रामाणिक अभिव्यक्तीत आहे. कादंबरीत कुठेही उपमा, अनुप्रास याचा सोस नसतानाही ही कथा केवळ क्रमगत घटनांच्या जोरावर उभी राहते. महाराष्ट्र टाइम्सकारांनी ‘यादव पत्रिका' अग्रलेखात ग्रामीण साहित्यातील आनंद यादवांच्या देण्याबद्दल जे मतप्रदर्शन केले होते त्याचे उत्तर म्हणूनही या कादंबरीकडे पाहायला हरकत नाही. अण्णाभाऊ साठ्यांनी मराठी साहित्यात ग्रामीण कथानकांची परंपरा निर्माण केली. या परंपरेचा वारसा घेऊन पुढे येणा-या या


वेचलेली फुले/१७

कादंबरीत कथानकाचा थाट पारंपरिक असला, तरी चिंतनमात्र खचितच यंत्रयुगोत्तर आहे.
_______________________________________________________________________________________________________ • एकलकोंडा (कादंबरी)
लेखक - आनंद यादव
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे - १00   किंमत १२ रु.


वेचलेली फुले/१८

बाभळीची फुलं : महारोग्यांच्या व्यथांच्या कथा

अजंठा, वेरूळच्या पाषाणातील भग्न शिल्पांचे सौंदर्य रसिकतेने पाहणारा मानव जिवंत माणसांतील भग्न शिल्पांना नेहमीच नाकारत आला आहे. मानवाच्या या घृणित नकारात्मक प्रवृत्तीतून उद्ध्वस्त झालेल्या महारोग्यांच्या व्यथा नि वेदनांचा उग्र दर्प देणारी ही ‘बाभळीची फुलं' डॉ. स. ग. यादव यांनी पाऊणशे पृष्ठांच्या कादंबरीच्या रूपाने वाचकांपुढे सादर केली आहे. | मर्यादित पृष्ठ संख्या व कथानकातील घटनांचे बाहल्य एखाद्या ‘अॅक्शनपॅक्ड चित्रपटाला साजेल असे बनले आहे. शुभा नि यश यांची ही अशी प्रेमकथा आहे, तशीच ती अनंतराव, रोहिणी, सावित्री इ. च्या दुव्यांमुळे एक सामाजिक आशय घेऊनही पुढे येते. शुभा नि यशच्या विवाहानंतर यश महारोगाचा बळी ठरतो. तरीही शुभा यशशी एकनिष्ठ राहते. आपल्या या शोकान्तिकेचा शोध लावताना तिच्या लक्षात येते की शंकरकाकापासून या रोगाचा फैलाव आपल्या कुटुंबात झाला आहे. आपल्या शोकान्तिकेस कारणीभूत असलेल्या या वासनाग्रस्त काकाचा खून करून ती बदला घेते. आपल्या पोटी जन्माला येणा-या मुलास बाभळीचे काटे टोचू नयेत, फुले मिळावीत म्हणून! अलीकडच्या मराठी साहित्यात वसंत कानिटकरांनी नाटकाचा विषय म्हणून महारोग्यांच्या जीवनाला स्वर दिला. कादंबरीच्या स्वरूपात डॉ. यादव यांनी त्या स्वरांना अधिक आर्द्रता देण्याचे काम केले आहे. महारोग्यांच्या जीवनाबरोबरच यात ‘समलिंगी संभोग' (होमोसेक्स) सारखा वादग्रस्त विषय हाताळण्याचे धाडस लेखकाने केले असले, तरी ते अर्नेस्ट हेमिंग्वे इतके वादग्रस्त होईल असे नाही. कादंबरीच्या आत्मकथनात्मक शैलीमुळे पात्रे व वाचक यात कुठे दरी रहात नाही. आता फक्त मी उरलो होतो एक वासनेचे झाड. एक नर, मला हवी होती एक मादी, भोगलालसा शमवायला', अशा छोट्या छोट्या वाक्यरचनेत सांकेतिकता आहे. 'डोळ्यात दिवे पेटवत होतो',


वेचलेली फुले/१९ 

मनाची माती झाली होती', सारखी आशयघन वाक्ये लेखक भाषाप्रभू असल्याची साक्ष देतात.
_______________________________________________________________________________________________________ • बाभळीची फुलं (कादंबरी)
लेखक - डॉ. स. ग. यादव
प्रकाशन - वर्षा प्रकाशन कोल्हापूर
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे - ७३   किंमत १८ रु.


वेचलेली फुले/२०

जस्मिन : सैनिकी जीवनाधारित प्रेम कादंबरी

  एच. ई. बेट्सच्या ‘ट्रिपल एको' या गाजलेल्या कादंबरीने प्रभावित होऊन लिहिलेली अश्विनी धोंगडे यांची ‘जस्मिन' ही कादंबरी. एका मुलखावेगळ्या जगात जीवन कंठणाच्या परात्मभावी स्त्रीची एक हलकीफुलकी कथा होय. ही कादंबरी एका बैठकीत संपविता येण्याइतकी लघुकाय असल्याने व पात्र नि प्रसंग ही दोन-तीनच असल्याने खरे तर तिला दीर्घकथा म्हणणेच अधिक सयुक्तिक ठरेल.
  जस्मिनचा नवरा चीनमध्ये कैदेत आहे. त्याच्या सुटकेची आता कसलीच आशा नाही. अशा स्थितीत जस्मिन सीमेलगतच्या आपल्या शेतातील छोट्या घरकुलात एकाकी दिवस काढत असते. घरात असलेल्या बंदुकीच्या आधारे ती आपल्या या सीमित राज्यात कोणासही येऊ देत नसे. सीमा सुरक्षा दलातील जसवंत नावाच्या एका सैनिकाच्या ती सान्निध्यात येते. दीर्घकालच्या पती विरहाने व सैन्यातील एकाकीपणाने दोघे एकमेकांकडे आकर्षित होतात. जस्मिनच्या सहवासामुळे जसवंतला सैनिकी जीवनाचा उबग येतो. तो सैन्यातून पळून येतो. वेश पालटून जस्मिनची बहीण रोशन म्हणून राहू लागतो. सेनादलातील लोक पाळत ठेवून जसवंतला पकडतात. त्याला पकडून चौकशीसाठी परत आणत असतानाच ती सार्जंटवर गोळी झाडते. त्यात दोघेही मृत्युमुखी पडतात. परत ती एकाकी होते.
  बर्फाळ प्रदेशाच्या निसर्गसमृद्ध पार्श्वभूमीवर उभारलेली ही कथा सौंदर्य विवरणाने अधिक काव्यात्मक करणे शक्य असतानाही लेखिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. कथेस प्रणयलीलेत डुबवण्याबाबत ती अधिक दक्ष असल्याने सैनिकास स्त्री रूप देण्याची अवास्तवताही ती निर्माण करते. कथानक आणि ते रंगविण्याची पद्धत लक्षात घेता तरुण वाचकाला रिझविण्याच्या माफक उद्देशानेच ती लिहिली असावी असे वाटते.
___________________________________________________________________________________________________________________________________________________
• जस्मिन (कादंबरी)
लेखिका - अश्विनी धोंगडे
प्रकाशन - दिलीपराज, प्रकाशन पुणे
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे - ९२   किंमत - १४ रु.


वेचलेली फुले/२१ 

सौदामिनी : महाराणी ताराबाईंवरील चरित्र कादंबरी

  'कस्तुरी', 'मत्स्यगंधा', 'लावण्यमयी' कादंब-यांच्यामुळे मराठी वाचकांना परिचित झालेल्या प्रा. शरद वराडकर यांची ‘सौदामिनी' ही पहिली ऐतिहासिक कादंबरी. स्वातंत्र्यरागिणी ताराबाईच्या जीवनावर आधारित ही कादंबरी ऐतिहासिक सत्याशी इमान राखून, त्या सत्याशी सुसंगत वाटेल इतकीच कल्पितांची मदत घेऊन लिहिली गेली आहे. सन १६७५ ते १७६१ या कालखंडाचे प्रत्ययकारी चित्र रेखाटण्याचा प्रा. वराडकरांनी केलेला प्रयत्न अभिनंदनीय होय.
  महाराणी ताराराणीच्या जन्म व मृत्यूपर्यंतच्या नऊ दशकांच्या दीर्घकालावधीच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या या कादंबरीत लेखकाने केवळ ऐतिहासिक घटनांचा तत्कालीन युगबोधच देण्याचा प्रयत्न केला नसून त्या त्या घटनांच्या अनुषंगाने प्रकटणारी राजकीय मुत्सद्देगिरी, व्यक्ती स्वभाव विशेष इ. चे प्रत्ययकारी वर्णन केले आहे. त्यामुळे अखंड मराठी साम्राज्य भगव्या झेंड्याखाली नांदावे म्हणून जीवनभर झगडणारी महाराणी ताराराणी महत्वाकांक्षी, दृढनिश्चयी, शूर अशी राणी म्हणून आपणासमोर उभी रहाते. चाळीस वर्षाचा काळ कैदेत काढून साम्राज्य रक्षणार्थ तिची होणारी तळमळ पाहिली की, वाचक क्षणभर सुन्न झाल्याशिवाय रहात नाही. ऐतिहासिक कादंबरी म्हणजे इतिहास तत्त्वे. तो इतिहासाभास असतो, हे जर समजून घेतले तर ही कादंबरी तत्कालीन समाज जीवनाचे जे चित्र घेऊन येते ते सतराव्या, अठराव्या शतकास शोभणारे असेच आहे, हे मान्य करावे लागेल. मोगलांच्या निकट संपर्काने बदललेल्या मराठी भाषेच्या रूपाचे यथार्थ प्रतिबिंब आपणास इथे पहायला मिळते. जागोजागी मोगलांच्या तोंडून प्रकटणारी वाक्ये लेखकाचे हिन्दी भाषेचे जुजबी ज्ञान प्रकट करून जातात, हे मात्र आपणास नाकारता येणार नाही. मोगल हिंदी ही उर्दूप्रचुर होती याचे लेखकास विस्मरण झाल्यासारखे वाटते. युगबोध होण्यासाठी तत्कालीन भाषा नेहमीच उपकारक असते. हे लक्षात घेतले असते तर ही कादंबरी अधिक परिणामकारक झाली असती.
 अलीकडच्या मराठी वाङ्मयात व्यक्तिप्रधान ऐतिहासिक कादंब-यांची


वेचलेली फुले/२२ 

लाट ‘मृत्युंजय', 'श्रीमान योगी', 'छावा', 'स्वामी' इ. कादंब-यांनी निर्माण केली. ‘सौदामिनी' ही या लाटेचाच एक भाग म्हणून पाहावयास हरकत नाही. ऐतिहासिक निकषावर चित्रित महाराणी ताराराणी काळ्या ढगांनी ग्रस्त झालेल्या मराठी साम्राज्यास सौदामिनीचे तेज देऊन जाते आणि म्हणून ताराराणी या कादंबरीतून ख-या अर्थाने स्वातंत्र्य सौदामिनी म्हणूनच आपल्यापुढे येते. ऐतिहासिक कादंबरीच्या सफलतेचे हे द्योतकच होय.
__________________________________________________________________________________________________________________________________________________
• सौदामिनी (चरित्रात्मक कादंबरी)
लेखक - प्रा. शरद वराडकर
प्रकाशन - अजब पुस्तकालय, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे - १६१   किंमत - १६ रु.


वेचलेली फुले/२३

गुलमोहर : मनुष्य संबंधाची कादंबरी

प्रा. अनिल सोनारांचा मूळ पिंड नाटककाराचा. सारे प्रवासी तिमिराचे ‘मालकीण मालकीण दार उघड' सारख्या नाटकांनी ते प्रसिद्धीच्या झोतात आले. ‘साधने'त वारंवार प्रसिद्ध होणा-या एकांकिका हेच सांगून जातात. ‘गुलमोहर' मुळे ते प्रथमच कादंबरीकार म्हणून आपल्या पुढे येत आहेत. असे असले, तरी यातील संवादप्रचुरता, पात्रसंबंध, कथेतील प्रसंग नाटकाशी आपली जवळीक सिद्ध करताना दिसतील.
  गुलमोहर उन्हाच्या कडाक्यात फुलतो म्हणून त्याचे ‘फूलपण' कोणी नाकारत नाही. तो फुलतो तेव्हा त्याची अर्धीअधिक पाने गळून पडलेली असतात. नानासाहेबांचे जीवन हे या गुलमोहरासारखे आहे. आपली मुलगी कालिंदी उपवर झाली तरी नानांच्या जीवनात अजून वसंतच दरवळतोय. दोन विवाहांनंतर तिस-यांचा विचार यात त्यांना गैर काहीच वाटत नाही. जीवनसूर्य वानप्रस्थाच्या क्षितिजावर विसावू पाहात असतानाही नाना लोचनच्या प्रणयलीलेतच रमून राहिलेले दिसतील. या मूळ कथेबरोबरच या कादंबरीत कालिंदी, संजय, सुधीर व मृणाल, संजय, विनय इ. च्या प्रेमाच्या त्रिकोणात्मक कथा आढळतात.
  कादंबरीतील प्रमुख व प्रासंगिक कथानकांची गुंफण पाहताना ती प्रेम नि प्रणयाच्याच धाग्यांनी प्रामुख्याने गुंफण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येईल. संवाद शैलीमुळे कथानक सतत गतिशील रहायला मदत झाली आहे. अलीकडच्या कथा, कादंब-यांत आधुनिकतेचा मुलामा देण्यासाठी इंग्रजी वाक्यांचा भडिमार करण्याची आलेली फॅशन आपणास या कादंबरीतही पाहायला मिळेल. समृद्ध नि सुधारित जीवन केवळ भाषेनेच प्रतिबिंबीत करता येते का? याचा विचार व्हावयाला हवा. यातील बरीच पात्रे अस्पष्ट वाटतात. पात्रापात्रांतील संबंध सहज लक्षात यायला हवे. तसे इथे झालेले नाही. कादंबरीच्या विशाल पटलावर पात्रे ही रेखीव, ठसठशीत चित्रित व्हायला हवी होती. पात्रानुकूल भाषा ही या कादंबरीची जमेची बाजू. ‘अमृताची गोडी कळायला जीभसुद्धा सवर्णाची असावी लागते, सारख्या वाक्यांनी कादंबरी लालित्यपूर्ण बनली


वेचलेली फुले/२४

आहे. कादंबरीसारखा साहित्यप्रकार प्रथम हाताळताना ती सदोष होणे स्वाभाविक आहे. असे असले, तरी कादंबरीचे समग्र स्वरूप लक्षात घेता नवा कादंबरीकार आकार घेत असल्याच्या आशादायक पाऊलखुणा आपणास कादंबरी वाचताना जाणवतात हे मात्र निश्चित.
___________________________________________________________________________________________________________________________________________________ • गुलमोहर (कादंबरी)
लेखक - अनिल सोनार
प्रकाशन - दिलीपराज, प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे - १६२   किंमत - १८ रु.


वेचलेली फुले/२५

काली : अंधास आधार देणा-या कुत्रीची प्रेरक कथा

'काली' ही प्रशिक्षित पाळीव कुत्र्याने त्याच्या अंध धन्याच्या केलेल्या सेवेची कहाणी आहे. श्रीमती कृष्णाबाई मोटे यांनी विविध प्रसंगांची सुंदर गुंफण करून कथा बोधप्रद तर केलीच आहे, शिवाय कुत्र्यासारख्या प्राण्यांविषयी आदर वाढविण्याचा त्यांनी केलेला प्रयत्नही स्तुत्य आहे.
  काली ही कुत्री या कथेची नायिका. मॉरिससारख्याच्या जीवनात अपघाताने अंध होऊन निराश झालेल्या माणसाच्या जीवनाला नवसंजीवन देण्याचे महत्कार्य तिने केले व पाहता पाहता ती जगविख्यात झाली. आठ वर्षांच्या अल्पावधीत अमेरिकेत येऊन कुत्रे व अंधांचे प्रशिक्षण केंद्र सुरू करून मॉरिसने अंधांना समाजजीवनात मानाचे स्थान मिळवून दिले. याचे सर्व श्रेय ‘काली’ला द्यावे लागेल.
   ‘काली' या कथेचा आत्मा सामाजिक जाणिवा समृद्ध करणे हा असल्याने या कथेची साहित्यिक निकषांच्या आधारे समीक्षा व विश्लेषण करणे सयुक्तिक होणार नाही. कालीची कथा अनेक रोमहर्षक प्रसंगांनी भरलेली आहे. ‘मोले घातले रडाया' अशी नकारात्मक भूमिका घेऊन जीवन जगणाच्या सर्वांनाच या कथेपासून बराच बोध घेता येईल. कथेत कालीच्या उत्कर्षाचा एक आलेख जसा आहे तसाच तीत मानवी प्रवृत्तीचा ताळेबंदही आहे. 'काली' ही कथा वाचनीय व चिंतनीय बनली आहे.
_________________________________________________________________________________________________________________________________________________ • काली (कथा)
लेखिका - श्रीमती कृष्णाबाई मोटे
प्रकाशक - श्री. विद्या, पुणे
प्रकाशन वर्ष - १९८६
पृष्ठे - ५२    किंमत १० रु.


वेचलेली फुले/२६

समिधा : इस्माईलसाहेब मुल्ला स्मृतिग्रंथ

  महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराचे समर्पित मोहळ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उठवले अन् खेड्यापाड्यात शाळा-कॉलेजीस् सुरू होऊन बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली झाली. या प्रचार व प्रसार कार्यात कर्मवीरांना ज्या समर्पित शिक्षणप्रेमींची साथ लाभली त्यात (पै.) इस्माईलसाहेब मुल्ला यांचा क्रम वरचा. स्वतः हलाखीचे जीवन जगून माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा ब-याचदा पूर्वीच्या जीवनाकडे पाठ फिरविण्याचीच त्याची वृत्ती असते. इस्माईलसाहेब मात्र याला अपवाद होते. आईला सुख देता न आल्याचे शल्य जन्मभर जागवत राहून सुखासीन जीवनाकडे पाठ फिरविणा-या या महामानवाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा हा स्मृतिगंध आजच्या विनाअनुदान शिक्षणप्रसार चळवळीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे.
   शिक्षण हा एक महायज्ञ आहे. या यज्ञात अनेक समिधा समर्पित होतात तेव्हा कुठे वन्ही चेतवला जातो. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे आदींनी वंचितांसाठी विद्येचे विहार खुले केले. इस्माईलसाहेब याच पठडीतले. घरात पत्नीच्या अकाली निधनाने पोरकी झालेली पोटची पोरे सांभाळण्याबरोबर त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून धुरा सांभाळली. या विधिविशारद शिक्षणप्रेमीच्या संपूर्ण जीवनाचा वेध घेण्याचा संपादकांनी केलेला प्रयत्न अभिनंदनीय व अनुकरणीय आहे.
  या स्मृतिग्रंथात राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते शाळेच्या शिपायापर्यंत सर्वांनी भावसुमनं समर्पित केली आहेत. त्यातून एक चांगला स्मृतिग्रंथ साकार झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील आजच्या परिस्थितीत तो मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो. कर्मवीरांनी लोकवर्गणीतून शिक्षण विकास केला. सध्या लोकवर्गणीतून व्यक्तिप्रतिष्ठा जोपासण्याचा नवा धंदा बरकतीत आहे.


वेचलेली फुले/२७

‘समिधे'तून उठणारा वन्ही शिक्षणाला व्यक्तीकडून, समाजाकडे, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यास प्रेरणा देईल. ‘समिधा' सर्व शाळा-कॉलेजांच्या ग्रंथालयापर्यंत नुसती पोहोचून चालणार नाही, तर तिचे वाचन, चिंतन आणि मनन होईल असा प्रयत्नही केला पाहिजे.
___________________________________________________________________________________________________________________________________________________
• समिधा (स्मृतिगंध)
संपादक : प्रा. एम.एम.शेख, सहसंपादक मा. भि. काटकर,
प्रकाशक - इस्माईलसाहेब मुल्ला समिती, सातारा,
पृष्ठे - २६0   किंमत - ६0 रु.


वेचलेली फुले/२८

सामाजिक विकासाचे प्रश्न व धोरण : मागोवा

  ‘सामाजिक विकासाचे प्रश्न व धोरण' हा समाजशास्त्र व समाजकल्याणाच्या क्षेत्रातील सुविख्यात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरदचंद्र गोखले यांनी लिहिलेला ग्रंथ अलीकडच्या काळातील एक उल्लेखनीय ग्रंथ होय. या पुस्तकात डॉ. गोखले यांनी परिवर्तनशील भारतीय समाजापुढील समस्या नि त्या सोडविण्यासंदर्भातील राजकीय, राष्ट्रीय धोरण या विषयावरील आपले विचार व्यक्त केले आहेत. भारतातील सामाजिक चळवळीचा इतिहास हा येथील राजकीय व्यक्तीच्या चिंतन व कृतीतून साकार झाला आहे. राजाराम मोहन रॉय, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, महात्मा गांधी इ. नावे या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहेत. अलीकडच्या काळात सामाजिक समस्यांची सोडवणूक ही बरीचशी राजकीय आश्रयावर अवलंबून असल्याने सामाजिक विकासाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीशी धोरणविषय बाबींचा संबंध अतूट असा होऊ पाहतो आहे आणि म्हणून सामाजिक विकासाच्या प्रश्नांचा गुंता सुटायचा असेल तर नवे धोरण, नवी नीती व नवी कार्यपद्धती अंमलात आणायला हवी, असे लेखकाचे आग्रहपूर्वक प्रतिपादन वस्तुस्थितीस धरूनच आहे, हे मान्य करायला हवे.
  या पुस्तकात बालकल्याण नि बालविकास, युवकांचे प्रश्न, वार्धक्य, गुन्हा आणि गुन्हेगारी, कुष्ठरोग, ग्रामीण पुनर्वसन, विकास माध्यमांची भूमिका इ. विविध विषयांना वाहिलेली १५ प्रकरणे असून प्रत्येक प्रश्नांची गंभीरता, ते सोडवण्याचे नवे उपाय व धोरण यांची लेखकाने समग्रपणे मांडणी केली आहे. बालकांचा आहार, आरोग्य, शिक्षणविषयक प्रश्नांच्या मांडणीत लेखकाने नियोजनातील दूरदृष्टीचा अभाव स्पष्ट करून यात अधिक दूरगामी धोरण स्वीकारण्याची केलेली विनंती विचारणीय आहे. युवकांचे आजचे प्रश्नही नियोजनाच्या अभावातून निर्माण झाल्याचे सांगून लेखक म्हणतो की रोजगाराची हमी निर्माण झाल्याशिवाय कुटुंब व सामाजिक स्वास्थ्याचा विचार करणे केवळ अशक्य आहे. वृद्धांच्या समस्येसंदर्भात वार्धक्याचे प्रश्न हे मनाच्या घडणीतून कसे निर्माण होतात याचे मार्मिक विवेचन केले आहे.


वेचलेली फुले/२९

गुन्हा आणि गुन्हेगारी या प्रश्नांकडे केवळ दंडसंहितेच्या आधाराने विचार करून चालणार नाही. दंडानुवर्ती शासन व प्रशासन आता कालबाह्य आले असून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासकीय यंत्रणेपेक्षा स्वयंसेवी संस्थांचा या प्रश्नातील जनसहभाग वाढवणे इ. उपायांवर भर देण्यात आला आहे. आपल्याकडील अभिक्षणगृह, अनाथाश्रम, स्वीकारगृह, निराश्रित मुलांची वसतिगृहे इ. संस्था आपण अकारण न्याय व पोलीस यंत्रणेच्या हवाली करून त्यांच्या प्रभावाखाली चालवितो आहोत. याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. वेळीच या संदर्भात आपण पावले उचलली नाहीत तर आजची मुले ही उद्याच्या राष्ट्र उभारणीतील दूरदर्शी गुंतवणूक आहे' असे म्हणण्याचा कोणताच नैतिक अधिकार आपणास राहणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
   हीच स्थिती ग्रामीण समाजाच्या विषमता व पुनर्वसनासंबंधीच्या प्रश्नांबाबत ही दिसून येते. ग्रामीण पुनर्वसन हा राजकीय सत्तेच्या उत्थान व पतनाचे साधन होता कामा नये. हा प्रश्न समाजकल्याणाचा एक अविभाज्य भाग व्हायला हवा, हे लेखकाचे प्रतिपादन या प्रश्नाशी आज झालेली राजकीय सांधेजोड नष्ट करण्यासंदर्भात विचारात घेण्यासारखा आहे. भूक नि संहार यांच्या मुलभूत कारणांची लेखकांनी केलेली चिकित्सा मती गुंग करणारी आहे.
   लेखकांनी विविध सामाजिक प्रश्नांसंदर्भात भविष्यकाळात घ्यावयाच्या समाजकल्याणविषयक धोरणांची चर्चा करण्याच्या उद्देशाने या ग्रंथाचा प्रपंच केला आहे. आठव्या योजनेची पुन्हा आखणी होत असताना प्रकाशित झालेला हा ग्रंथ नियोजकांनी मार्गदर्शक ग्रंथ म्हणून अभ्यासायला हवा. लेखकांनी जागोजागी आकडेवारी देऊन हा ग्रंथ अधिक वस्तुनिष्ठ बनला आहे. समाज कल्याणाची चिंता नि चिंतन करणा-या सर्व व्यक्ती नि संस्थांनी समाजकल्याणाची नवी संकल्पना विशद करणारा हा चिंतनात्मक ग्रंथ आवर्जून वाचायला हवा.
_____________________________________________________________________________________________________________________ • सामाजिक विकासावे प्रश्न व धोरण (वैचारिक)
लेखन - डॉ. शरदचंद्र गोखले
प्रकाशक - व्हीनस प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष - १९९०
पृष्ठे ३८६   किंमत १२५ रु.


वेचलेली फुले/३०

बालशिक्षण : आचार आणि विचार - एक अवलोकन

शिवाजी विद्यापीठाचा प्रौढ/निरंतर आणि विस्तार कार्य विभाग हा अनौपचारिक शिक्षण प्रक्रियेत नित्य नवे प्रयोग करून गरजेनुरूप शिक्षणविषयक पाठ्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी करणारा विभाग म्हणून ओळखला जातो. या विभागाने परिचारिका, दाई प्रौढशिक्षण इत्यादी बरोबरच अंगणवाडी, बालवाडीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचा एक धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. या प्रशिक्षणात केवळ पारंपरिक बालशिक्षणाची मूलतत्त्वे शिकविली जात नाहीत, तर या शिक्षणामागील सामाजिक दायित्व व जाणीव निर्माण करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केला जातो. या प्रयत्नाचे उदाहरण म्हणजे या विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेले पाठ्यपुस्तक ‘बालशिक्षण विचार आणि आचार' होय.
    डॉ. भालबा विभूते यांच्या कष्टपूर्वक व दूरदृष्टीने साकारलेल्या व त्यांच्या संपादनाचा कुशल स्पर्श लाभलेल्या या ग्रंथाचे आगळे असे महत्त्व आहे. भारतात बालकांविषयीच्या कोणत्याच प्रश्न व समस्येचा विचार हा पूर्ण गांभीर्याने व नियोजनबद्ध पद्धतीने झालेला नाही. गल्लीबोळात नि ग्रामीण भागातील वाड्या-वस्तींवर सुरू झालेल्या बालवाड्या म्हणजे मुलांना तीन तास डांबून ठेवणारी यातनाघरे होय. याचे रूपांतर शिशु-विहार, बालसंस्कार केंद्र, बालछंद केंद्र, सृजन आनंद मंच इत्यादी मध्ये व्हायचे तर ते शिक्षण देणारी शिक्षिका संस्कारी व प्रशिक्षित व्हायला हवी व त्यासाठी तशी दृष्टी देणारे पाठ्यपुस्तक हवे. स्वातंत्र्याच्या गेल्या चार दशकांच्या कालावधीत आपणास याची गरज वाटली नाही, यांसारखे दुर्दैव ते कोणते असणार? ही त्रुटी या नव्या पाठ्यपुस्तकाने भरून काढली आहे.
   नुकतेच प्रकाशित झालेले हे पुस्तक तसे मूळ पुस्तकाची दुसरी सुधारित आवृत्ती होय. पण एकूण पुस्तकाची पुनर्रचना पाहता ते स्वतंत्र नवे पुस्तकच म्हणावे लागेल. बालशिक्षणाची मूलतत्त्वे, व्यवस्थापन, बालकल्याण, बालमानसशास्त्र, बालआरोग्य इत्यादी क्षेत्रात आजीवन कार्य करणाच्या अनुभवी कार्यकर्त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून या ग्रंथातील लेख साकारले असल्याने


वेचलेली फुले/३१

त्याचे आगळे असे महत्त्व आहे. ब-याचदा पाठ्यपुस्तके ही पाठ्यक्रमानुवर्ती असतात. ती असणे गैर नाही. पण पाठ्यक्रमाचा मूळ हेतू विषद करणारी ती राहात नाहीत. बालशिक्षणाचा संस्कार, कल्याणविषयक दृष्टी, आरोग्यविषयक जागृकता व बालमनाची जडणघडण समजून देणारे हे पुस्तक शिक्षणाच्या प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन व विद्यापीठीय पाठ्यपुस्तकांचा व शिक्षणाचा नव्याने श्रीगणेश करायला लावणारे, तशी जाणीव देणारे असल्याने शिक्षण क्षेत्रात हे नवे परिवर्तन घडवून आणेल यात तिळमात्र शंका नाही.
____________________________________________________________________________________________________________________________________________ • बालशिक्षण : विचार आणि आचार (लेखसंग्रह),
संपादक : डॉ. भालबा विभूते
प्रकाशक - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष - १९९०
पृष्ठे १४०   किंमत २0 रु.


वेचलेली फुले/३२

बाल न्याय अधिनियम : राज्यस्तरीय चर्चासत्र अहवाल

 संशोधन व विकास केंद्र (सी.आर.डी.), मुंबई द्वारा आयोजित व समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि युनिसेफ प्रायोजित बाल न्याय अधिनियमांचा विचार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या राज्यस्तरीय चर्चासत्राचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला असून तो या अधिनियमाची अंमलबजावणी करणा-या यंत्रणा, मंत्रालय, संचालनालय, विभागीय कार्यालये, जिल्हा कार्यालये, संस्था इत्यादी मधील सर्व अधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी अभ्यासून त्याच्या अंमलबजावणीसाठी कंबर कसायला हवी. आज हा कायदा राज्यात लागू झाला असला तरी शासनाची सर्व यंत्रणा या संदर्भात केवळ कागदी घोडे नाचवत बसली आहे. ज्या संस्थांत तो राबवायचा तेथे अद्याप बरीच झाडझूड होणे गरजेचे आहे. या संदर्भात मंत्रालय व संचालनालयाची स्थिती कंबर धरलेल्या माणसासारखी अवघडलेली का व्हावी हे न कळणारे कोडे आहे. प्रश्नाविषयी केवळ आस्था नि सहानुभूती असून भागत नाही. तर प्रश्नांशी भिडून त्यांचा निचरा करण्यावर भर दिला गेला पाहिजे याची जाणीव देणाच्या चर्चासत्राचा हा अहवाल वाचनीय तद्वतच विचारणीय झाला आहे. विशेषतः या चर्चासत्रात सादर केलेले डॉ. उषा नायडू, डॉ. आशा राणे, श्री. राम बेलवडी, श्री. मिसर, श्री. जेरी पिंटो यांचे निबंध कार्यकर्त्यांना सैद्धांतिक दिशा देणारे ठरले आहेत. राज्य पातळीवर काम करणारे समाजकल्याण, न्याय, पोलीस विभागातील उच्चाधिकारी, या क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते व समाजविज्ञान संस्थातील तज्ज्ञ यांच्या विचार विनिमयातून या चर्चासत्राने बाल न्याय अधिनियमाच्या अंमलबजावणीचे जे उपाय सुचविले आहेत ते राज्य शासनाने त्वरित अमलात आणायला हवेत. अन्यथा, हजारो रुपये खर्चून आयोजित केल्या जाणा-या अशा चर्चासत्राच्या


वेचलेली फुले/३३

उद्दिष्टासच हरताळ फासल्यासारखे होईल. चर्चासत्राचे आदर्श इतिवृत्त म्हणून या दस्तऐवजाची नोंद करावी लागेल.
_________________________________________________________________________________________________________

• रिपोर्ट ऑफ द महाराष्ट्र स्टेट लेव्हल सेमिनार

ऑन ज्युव्हेनाईल जस्टिस (अहवाल)

सेंटर ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मुंबई

प्रकाशन वर्ष १९९०















वेचलेली फुले/३४

दत्तक प्रक्रिया : तत्त्व, व्यवहार, पद्धत मार्गदर्शिका

 ‘मॅन्युअल ऑन अॅडॉप्शन' हा इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन, मुंबई या संस्थेने प्रकाशित केलेला इंग्रजी ग्रंथ होय. अनाथ, निराधार बालकांना दत्तक देणाच्या संस्था व तेथील कार्यकर्ते, अधिकारी यांना वैधानिक व व्यावहारिक मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ म्हणजे या क्षेत्राची गीताच म्हटले तरी ते अतिशयोक्त होणार नाही. यापूर्वी मंगला गोडबोले यांचे एक पुस्तक ‘दत्तक घेण्यापूर्वी बाजारात आले आहे. ते प्रामुख्याने पालकांना डोळ्यासमोर ठेवून लिहिले गेले होते. एखादा ग्रंथ जेव्हा संस्था संपादित अथवा ग्रंथित करत असते तेव्हा त्या ग्रंथास व्यापकता विषय आणि आशयाची व्यापकता आपसूकच येत असते. ती या ग्रंथात आली आहे. दत्तक प्रक्रियेच्या सिद्धान्त, व्यवहार व पद्धतीचे मार्गदर्शन करणा-या या ग्रंथास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. पी. एन. भगवती यांची प्रस्तावना लाभल्याने या ग्रंथास आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दत्तक प्रक्रियेत होणा-या काळाबाजारास प्रतिबंध करणारे अनेक बाल सुरक्षाविषयक उपाय सुचविणारा महत्त्वपूर्ण निवाडा न्यायमूर्ती भगवती यांनीच दिला होता याचे वाचकांना स्मरण असेलच.
 दत्तक प्रक्रियेची तत्त्वे, बालकाचे कुटुंब, दत्तक पालक, दत्तक प्रक्रिया, दत्तक प्रक्रियेची वैधानिक बाजू इत्यादीचा सर्वांगी नि साक्षेपी ऊहापोह करणारा हा ग्रंथ दत्तक कार्य करणाच्या सर्व संस्थांत असायला हवा.
  या ग्रंथाची सर्वांत मोठी जमेची बाजू म्हणजे या ग्रंथास जोडलेली विविध परिशिष्टे होय. या परिशिष्टांमुळे हा ग्रंथ अधिक उपयुक्त झाला आहे. दत्तक प्रक्रियेचा तत्काल संदर्भ (रेडी रेफरन्स) देणारे असे याचे स्वरूप जे झाले आहे ते या परिशिष्टांमुळेच. दत्तक प्रक्रियेस आवश्यक कागदपत्रे, फॉर्स, बालकांची माहिती, पालकांची माहिती, निवेदने, या संदर्भातील महत्त्वपूर्ण निवाडे, पाठपुराव्याच्या गोष्टी अशी किती तरी मोठी जंत्री द्यावी लागेल.

वेचलेली फुले/३५

ग्रंथ प्रकाशन व संयोजनाच्या सामाजिक कार्याबद्दल आयोजक संस्थेचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे.
________________________________________________________________________________________________________________________

• मॅन्युअल ऑन अॅडॉप्शन (मार्गदर्शिका)

इंडियन असोशिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन, मुंबई

प्रकाशन वर्ष - १९९०










वेचलेली फुले/३६

कुष्ठरोग्यांचे सामाजिक पुनर्वसन कार्य

 २२ ते २५ सप्टेंबर १९८९ला क्वाललंपूर (मलेशिया) येथे संपन्न झालेल्या आशियाई परिसंवादाचा अहवाल नुकताच हाती आला आहे. आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग संघटनेद्वारा (आयएलयू) आयोजित व जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आंतरराष्ट्रीय पुनर्वसन संगठन व मलेशिया कुष्ठरोग निवारण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित ही कार्यशाळा प्रामुख्याने पुनर्वसनाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. अशियाई देशातील कुष्ठरोग्यांची अपंगता, त्यांची वर्तमान स्थिती, त्यांच्या सामाजिक पुनर्वसनाच्या शक्यतांचा शोध, कुष्ठरोगाचे सार्वत्रिक निवारण, प्राथमिक आरोग्य व उपचार सुविधा इत्यादीचा विचार करून आशियाई राष्ट्रांनी परस्पर सहकार्य करून या संदर्भात संयुक्त कृतिकार्यक्रम आखण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेने या संदर्भात अत्यंत मूलगामी स्वरूपाच्या शिफारशी केल्या असून सर्व आशियाई राष्ट्रांनी राष्ट्रीय धोरण म्हणून त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ग्रंथांच्या सुरुवातीस डॉ. शरदचंद्र गोखले यांनी आपल्या छोट्या प्रास्ताविकात या कार्यशाळेमागील भूमिका विशद केली आहे.
 या चर्चासत्राच्या उद्दिष्टांच्या विविध अंगावर प्रकाश पाडणारे महत्त्वपूर्ण निबंध सादर करण्यात आले. डॉ. एच. श्रीनिवासन, डॉ. शरदचंद्र गोखले, डॉ. टी.जे. चियंग, कु. पद्मिनी मेंडिस, श्री. इ. जे. लॉरेन्स, डॉ. अरुण गुणसेकर, श्री. रॉसुक मत्स्यू इत्यादी मान्यवरांचा त्यात समावेश होता. या चर्चासत्रात फिजी, भारत, इंडोनेशिया, कोरिया, मलेशिया, नेपाळ, पाकिस्तान, सौदी अरेबिया, थायलंड, श्रीलंका, बेल्जियम, सिंगापूर इ. देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. चर्चासत्रात अनेक देशातील कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात येऊन अनेक महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या. त्यांचे सविस्तर विवेचन करणारा हा अहवाल या विषयाचे समकालीन आकलन करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा झाला आहे. कुष्ठरोगाने विकलांग झालेल्या या सामाजिक पुनर्वसनास पर्यायी नसल्याची जाणीव देणा-या या कार्यशाळेने शासन, स्वयंसेवी संस्था यांना या संदर्भात एकत्रित प्रयत्न करण्याचे


वेचलेली फुले/३७

आवाहन केले आहे. उत्पादनक्षम उपक्रमांद्वारे कुष्ठरोग्यांचे आर्थिक स्वावलंबन केवळ अशक्य. आर्थिक स्वावलंबनाशिवाय कुष्ठरोग्याचे खरे सामाजिक पुनर्वसन होऊ शकणार नाही याची जाणीव देणारी ही कार्यशाळा आगामी वर्षात शासन व समाजास आपल्या क्रियात्मक भागीदारीस प्रवृत्त करेल अशी आशा आहे.
____________________________________________________________________________________________________________________________

• सोशल रिहॅबिलिटेशन इन लेप्रसी (अहवाल)


प्रकाशक - इंटरनॅशनल लेप्रसी युनियन,

प्रकाशन वर्ष - १९९०

















वेचलेली फुले/३८

म्हातारपण : वयोश्रेष्ठांच्या प्रश्नांची चर्चा

 समाज शिक्षण माला, पुणे; लोकशिक्षण संस्कारमाला, कोल्हापूरसारख्या पुस्तक मालिकांनी महाराष्ट्रात समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे काम केले आहे. पुण्याच्या समाज शिक्षण मालेने आपले चारशे चौयाऐंशीचे प्रकाशन नुकतेच प्रकाशित केले असून त्याचे नाव 'म्हातारपण' आहे. डॉ. शरदचंद्र गोखले हे ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एजिंग' या वृद्धत्वाचा वैश्विक पातळीवर सामाजिक अभ्यास करणाच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. म्हातारपणाचा विचार जगात किती सूक्ष्मतेने व गांभीर्याने केला जातो, हे या पुस्तकाच्या ओळीओळीत प्रतिबिंबित झाले आहे. बालपण व म्हातारपणाची भारताइतकी परवड अन्यत्र क्वचित होत असेल. हे पुस्तक म्हाता-यांइतकेच तरुणांना उद्बोधक आहे. आपले म्हातारपण सुखद व्हायचे तर आजच्या सामाजिक जीवनात मूलभूत दृष्टिकोनविषयक परिवर्तन होणे कसे गरजेचे आहे, याचे भान देणारे हे छोटेखानी पुस्तक.
 डॉ. गोखले यांच्या लेखनात ललित्याबरोबर एक सामाजिक लय असते. ते कोणत्याही भारतीय प्रश्नाकडे वैश्विक पार्श्वभूमीतून पाहात असल्याने त्यांच्या समस्या समाधानात एक ठोसपण आपसूकच येत असते. जगातील वृद्धांची संख्या, वृद्ध कल्याण योजना, वृद्धांकडे पाहण्याचा पारिवारिक व सामाजिक दृष्टिकोन यांचे वस्तुनिष्ठपण सम्यक विवेचन या पुस्तिकेत आहे. वृद्धत्वाचा प्रश्न हा मानवी प्रश्न आहे. या भूमिकेतून ते लिहिले गेले आहे. भारतातील वृद्धांची दुरवस्था पाहिली की ऑस्ट्रेलियातील वृद्धांचे जीवन रुपेरी स्वप्नांसारखे मोहक, भ्रामक वाटायला लागते. या सर्वांतून भारतीय वृद्धांची सोडवणूक व्हावी म्हणून डॉ. गोखलेंनी सुचविलेले वार्धक्य वेतन, हप्त्याहप्त्याने निवृत्ती, सर्व प्रकाशगृहे इत्यादी उपाय डॉ. गोखल्यांच्या अंतर्यामी वसलेल्या संवेदनशील समाजशास्त्राची प्रचिती देतात. आपल्या आजच्या वडील मंडळींसाठी व उद्याच्या आपल्या वार्धक्याचे पूर्वचिंतन म्हणून प्रत्येकाने आवर्जून


वेचलेली फुले/३९

वाचावे अशी ही पुस्तिका. डॉ. गोखलेंनी अशा इतर उपेक्षित राहिलेल्या सामाजिक प्रश्नांवर उदाहरणार्थ अनाथांचे संगोपन, परित्यक्त महिलांचे पुनर्वसन अशा विषयांवर पुस्तिका लिहाव्यात, त्याचे असेच स्वागत झाल्याशिवाय राहणार नाही.
__________________________________________________________________________________________

• म्हातारपण (सामाजिक)


लेखक - डॉ. शरदचंद्र गोखले


प्रकाशक - समाज शिक्षण माला, २०९५ सदाशिव पेठ, पुणे


प्रकाशन वर्ष - १९९१


पृष्ठे - ४0   किंमत - ५0 रु












वेचलेली फुले/४०

चेतना अपंगमती विकास संस्था : परिचय

 चेतना अपंगमती विकास संस्था, कोल्हापूर ही अपंगमती बालकांना जाणीवपूर्वक शिक्षण देणारी एक प्रसिद्धी पराङ्मुख संस्था, कार्य हीच प्रसिद्धी मानणारी ही संस्था गेले काही वर्षे अपंगमती बालकांना केवळ औपचारिक शिक्षण देऊन थांबली नाही. अपंगमती बालकांच्या कला, क्रीडा स्पर्धा, इतर औपचारिक शिक्षण घेणाच्या शाळांतील मुलांबरोबर अपंगमती बालकांचे समायोजन, सहली, शिबिरे, जनजागृती फे-या असे अनेक उपक्रम या संस्थेने राबवले. अपंगमती बालकांचा शिक्षणद्वारे व्यक्तिमत्त्व विकास जितका महत्त्वाचा तितकेच अपंगमती बालक व व्यक्तींविषयी असलेले सामाजिक गैरसमज दूर होणेही महत्त्वाचे आहे, हे लक्षात आल्यानंतर या संस्थेने 'चेतना' नावाची अपंगमती बालकांच्या अपंगत्वाचे विवेचन करणारी छोटीशी पुस्तिका प्रकाशित केली आहे.
 मतिमंदत्व म्हणजे नेमके काय? मतिमंद कुणास म्हणायचे? मतिमंदत्व कशामुळे होते? मतिमंदत्व टाळता कसे येईल? असलेले दूर अथवा कमी कसे करता येईल इत्यादी प्रश्नांची माहिती सुबोधपणे देऊन संस्थेने याविषयी प्रबोधन करण्याची चांगली कामगिरी पार पाडली आहे. त्याबद्दल संस्थेचे अभिनंदन!
 ही संस्था अपंगमती बालकांच्या समस्येचा गंभीरपणे व शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी ‘चेतना' नावाचे मुखपत्रही चालविते. प्राचार्य पवन खेबूडकरांच्या संपादकत्वाखाली प्रकाशित होणा-या या नियतकालिकांचा डिसेंबर १९९० ला प्रकाशित झालेला ‘जागतिक मतिमंद दिन विशेषांक' ही वरील पुस्तिकेप्रमाणे उद्बोधक आहे. प्राचार्य ए. बी. राजमाने, डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यासारख्या या क्षेत्रातील मान्यवरांचे लेख असलेला हा अंक या विषयात रस असलेल्या व या विषयाशी संबंध असलेल्या प्रत्येक व्यक्ती व संस्थेने वर्गणीदार होऊन वाचायला हवा.
________________________________________________________________________________________

• चेतना अपंगमती विकास संस्था, शेंडा पार्क, कोल्हापूर.


लेखक - पवन खेबुडकर


प्रकाशक - परिचय पुस्तिका


प्रकाशन वर्ष - १९९१








वेचलेली फुले/४१

कुमारीमातांच्या करुण कहाण्या

 कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम, पुणे संस्थेच्या कार्याची धुरा मानद कार्यवाह म्हणून सन १९५७ ते १९८४ अखेर अखंड २७ वर्षे सांभाळणाऱ्या दलितमित्र सौ. सुमती संत यांनी लिहिलेला त्यांच्या कपाळी कलंक गोंदू नका हा लेखसंग्रह म्हणजे अनाथ, निराधार, परित्यक्त माता नि मुलांच्या संगोपन संरक्षण व पुनर्वसन कार्यातील सुखद, दु:खद अनुभवांचा मार्गदर्शक अमृतकुंभ! महिला नि बालकल्याण क्षेत्रात कार्य करणाच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांनी वाचायलाच हवे असे हे पुस्तक प्रत्येक महिला व बालकल्याण संस्थेत प्राधान्याने असायला हवे. समाजकार्य, समाजशास्त्र विषयाचे अध्ययन, अध्यापन, संशोधन करणा-या महाविद्यालय, विद्यापीठ व समाजशास्त्र संस्थेची ग्रंथालये या पुस्तकाविना पूर्ण होऊच शकणार नाहीत.
 अनाथ, निराधार बालकांच्या व परित्यक्त मातांच्या जीवनात असे काही कटू प्रसंग येतात की ते प्रसंग हाता-अंगावर गोंदवलेल्या गोंदणासारखे जीवनाच्या अखेरपर्यंत साथ देत राहतात. काळ्या दगडावरील रेघेसारखे. कोणताही अपराध नसताना अनाथापणाचा ठपका घेऊन उपेक्षित जीवन जगणाच्या बालकांच्या जीवनात मातृत्वाचा स्पर्श देण्यासाठी, दत्तक देण्यासाठी करावे लागणारे दिव्य, जन्मतः अशक्त, रोगग्रस्त नि मातेच्या उबेला पारख्या झालेल्या बालकांना दाईच्या कुशीत आईची ऊब देणे, कुमारी मातांना सावरणे, सांभाळणे, स्वावलंबी करणे ही सगळीच कामे संयम व साहसाची. सौ. सुमतीबाईंनी या कामाचे धडे के. बाई (कॅथरिन डेव्हिस) यांचेकडून घेतले. ते नुसते गिरवले नाही तर फिरवलेही. त्यांच्या सातत्यपूर्ण धडपडीतून व के. बाईंच्या त्यागातून महिला सेवाग्राम साकारला. या २७ वर्षांच्या धडपडीचा आलेख म्हणजे हा लेखसंग्रह.
  संग्रहातील पहिला लेख ‘त्यांच्या कपाळी कलंक गोंदू नका' केवळ वाचनीय नाही तर तो अनुकरणीय वाटतो. कॅथरिन डेव्हिसच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन जसे या लेखात आहे तशी ही समाज कार्यकर्तीने महिला पुनर्वसनासाठी काय काय भोगले याची दर्दभरी कहाणी आहे. कर्मभूमीत उपेक्षित राहिलेल्या या महिला व बालकल्याण कार्याच्या आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकार नि जनक सेविकेचे स्मरण देणारा हा लेख प्रत्येक कार्यकर्त्यास प्रेरक ठरल्यावाचून राहणार नाही.


वेचलेली फुले/४२

 ‘शापित मातृत्व' कुमारी मातांची करुण कथा. कुमारी मातांना सोसावी लागणारी कळ लेखिकेच्या प्रत्येक शब्दांत ऐकायला येते. खरेच, मला कुणी आई म्हणेल का?' हा मातृत्वसुखास हपापलेल्या परित्यक्त भगिनींचा टाहो! सदर लेख वाचताना तो ज्याला ऐकू येणार नाही तो संवेदनाहीन. दत्तक बालकांच्या जीवन संक्रमणास वाहिलेले या संग्रहातील तीनही लेख ‘दत्तक प्रश्नाच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करणारे ठरले आहेत. 'विवाह शाप का वरदान' लेखात कुमारीमाता, अनाथ मुली यांच्या विवाहोत्तर जीवनाची शोकांतिका शब्दबद्ध करण्यात आली आहे. हे नि असे सर्वच लेख वाचनीय व चिंतनीय झाले आहेत.
 या पुस्तकास विजय मर्चेटसारख्या क्रियाशील समाजसेवकांची प्रस्तावना लाभल्याने हे पुस्तक अधिक क्रियात्मक वाटते. ब-याचदा समाजसेवा हा प्रदर्शनाचा भाग असतो. सुमतीबाईंनी तो संताप्रमाणे निष्काम कर्माचा भाग मानला. या ग्रंथाचे महत्त्व अधिक अशासाठी की, 'आधी केले मग सांगितले' या उक्तीचे ते मृत रूप होय. फिल्म इन्स्टिट्यूटमधील सिनिअर रिसर्च असिस्टंट असलेल्या सुमतीबाई डेस्टिट्यूट इन्स्टिट्यूटच्या ऑनररी सेक्रेटरी झाल्या. ‘तसल्या बायकात गरती बायकांनी फिरकूसुद्धा नये' अशी समज असलेल्या काळात त्यांनी परित्यक्त भगिनीचे अश्रू पुसले याचे मोल काही कमी नाही. समाज कल्याणाच्या योजना शासन अनुदान व लोकवर्गणी यांची सांगड घालत राबवाव्या लागतात. शासनाचे कठोर नियम व कठोर समाजाचे नियंत्रण या दिव्यातून कल्याणकारी कार्य करणे हे असिधाराव्रत खरे! पण ते सुमतीबाईंनी स्वीकारले व साकारले. सन १९८६ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक आता हाती आले. परिचयच उशिरा झाला पण, 'Better the late than hever' या न्यायाने तो दिला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने या ग्रंथास अनुदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! उपेक्षित विषयांना न्याय देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपवादानेच मान्यता व मदत मिळत असते, ती या ग्रंथास मिळाल्याचा आनंद वाटणे साहजिक होय.
________________________________________________________________________________________________________

• त्यांच्या कपाळी कलंक गोंदू नका! (लेखसंग्रह)


लेखिका - सौ. सुमती संत


प्रकाशन - उत्कर्ष, रेणुका अपार्टमेंट, पुणे

प्रकाशन वर्ष - १९८६ 

पृष्ठे - १४५  किंमत - ३0/- रु.







वेचलेली फुले/४३

बालिका वर्षाची ‘गाज

 पुस्तके विचारशील असतात पण ती कृतिशील व कृतिप्रवण ही असू शकतात हे 'गाज : बालिका वर्षाची' ही पुस्तिका वाचताना सतत जाणवेल. कोल्हापूरला सृजन आनंद शिक्षण केंद्र आहे. प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील ते चालवतात. तेथील ‘आंतरभारती'च्या साहाय्याने शिक्षणास सर्जनात्मक व आनंददायी बनवण्यासाठी ‘सृजन आनंद विद्यालय' नावाची इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण (केवळ औपचारिक नव्हे) देणारी एक शाळा ही त्या चालवतात. आपल्या सृजन आनंद शिक्षण केंद्रातर्फे त्यांनी साखराळे (सांगली) व इचलकरंजी (कोल्हापूर) येथे सार्क बालिका वर्षाच्या निमित्ताने किशोरींची दोन जाणीव जागृती शिबिरे घेतली. त्यापैकी इचलकरंजीच्या शिबिराची समग्र माहिती देणारी ही पुस्तिका.
 सार्क बालिका वर्ष साजरे केले तेव्हा त्यामागे बालिकांविषयी समाजात व खुद्द बालिकांत जाणीव जागृती घडवून आणण्याचे उद्दिष्ट समोर होते. सूर्याकडे तोंड करून हात पसरून उभी असलेली बालिका हे या वर्षाचे बोधचिन्ह होते. बोधवाक्य होते, ‘खुशहाल बालिका भविष्य देश का'. मुलीचे जीवन विशेषतः भविष्यवेधी जीवन खुशहाल, समृद्ध करायचे तर जाण यायच्या वयातच जाणीवपूर्वक जागृतीचे प्रयत्न व्हायला हवेत, याचे भान या शिबिरातील प्रत्येक गोष्टीतून जागवत. शिबिरार्थीच्या वयोगट (१६ ते १८ वर्षे) शिबिराचे विषय, मार्गदर्शक साच्यामागे एक निश्चित विचार होता. लोखंड गरम असेपर्यंतच ते आकार घेते. आकार येण्याच्या व घेण्याच्या वयात विचारांची स्पष्टता, सूक्ष्मता आली. भविष्य सुखकर होते याची जाणीव व जागृती मुलींमध्ये आल्याचे शिबिरातील प्रश्नावली, संवाद, प्रतिक्रियेतून स्पष्ट होतं.
 'थोडे प्रास्ताविक' मध्ये ना. ग. गोरे यांनी म्हटल्याप्रमाणे या शिबिरात पौगंडावस्थेतील कुमारिकांचे मानस शोधून त्यास घडविण्याचा प्रयत्न झाला. समाज व कुटुंबरचनेचा दोष म्हणून स्त्री-पुरुष भेदाच्या भिंती ज्या वयात निर्माण होतात त्याच वयात जर ढासळल्या तर झापडाचे जग पाहण्याची



वेचलेली फुले/४४

नामुष्की येत नाही. म्हणून संयोजकांनी गाणी, प्रार्थना, खेळ प्रश्नोत्तर, संवाद, प्रश्नावली लेखन इत्यादी मार्गे व प्रसंगी भाषणांनीसुद्धा मुलीच्या मनाची कवाडे खुली केली आणि मग मुलींनी केवळ गाण्यानेच नव्हे तर कृती, संवाद इत्यादीतून ‘वादळ वाट पाहू दे, समान संधी मिळू दे, नवा समाज निर्मू दे,'पासून ते ‘चक्क जोडीदार शोधायला मिळू दे,'ची मागणी केली.
 घरीदारी आपल्याकडे मुलींना मन मोकळे करण्याचे स्वातंत्र्य अपवादानेच मिळते म्हणून की काय दिलशाद मुजावरला भाषण करायला धोक्याचे वय ओलांडेपर्यंत थांबावे लागले. मुलींचे स्वत:बद्दल व स्वत:च्या जीवनाबद्दलचे विचार ब-याचदा चाकोरीबद्ध असतात. मळलेली वाट ओलांडायला भारतीय स्त्री मन तयार होत नाही, हे सिंधुताईंच्या कोड्यात ठळकपणे लक्षात येते. भारतीय स्त्री ही नेहमी अगतिक अहिल्येप्रमाणे उद्धाराच्या प्रतीक्षेत असते. नव्या काळात उद्धाराची कल्पना कालबाह्य झाली असून स्त्रीने स्वयंसिद्धा व्हायला हवे याची जाणीव करून देणा-या या पुस्तिकेचे कृतिशील वाचन व आचरण सर्वत्र व्हायला हवे.
 ही पुस्तिका वाचताना एक विचार डोकावून गेला. स्त्रीस स्वत:चे अस्तित्व जाणून घेण्यासाठी, व्यक्तिमत्त्वाची घडण करण्यासाठी पुरुषाशी तुलना करणे आवश्यक आहे का? पुरुषाची जडणघडण जशी स्वतंत्रपणे होते, तशी स्त्रीची का होऊ नये? या शिबिराची स्त्री पुरुष तुलनात्मक रचना वर्तमान व्यवस्था भेदण्याचा एक अटळ भाग म्हणून आली असेल पण तीही कितपत योग्य? तुलनात्मक विचार न्यूनगंडच सिद्ध नाही का करत? शिवाय स्त्री म्हणजे शरीर हा पुरुषी (?) विचार स्त्री संयोजकांनी गृहीत धरून शिबिराची आखणी का करावी? या सर्वांचा खुलेपणाने विचार व्हायला हवा. असे असले, तरी अशा प्रकारच्या शिबिरातूनच नवी स्त्री, स्त्रीचे नवे व्यक्तिमत्त्व विकसित होईल यात शंका नाही. गावोगावी अशी शिबिरे झाली पाहिजेत. शासनाने अशा शिबिरांना स्वत:हून अनुदान द्यायला हवे. ही पुस्तिका मुलीमहिलांनीच वाचून चालणार नाही. या पुस्तिकेचा खरा वाचक वर्ग पुरुष वर्ग व्हायला हवा. त्याचा मनोविकासच स्त्रीस सर्व प्रकारच्या जोखडातून मुक्त करून सूर्याचा लख्ख प्रकाश, आशय देईल. कुशल संयोजनाबद्दल लीलाताईंचे तर साक्षेपी संकलनाबद्दल सुमित्रा जाधव यांचे अभिनंदन.
 वर्ष येतात नि जातात... समुद्रातील लाटांची गाज (आवाज) क्षणिक, विरून जाणारी असली तरी लाटा या सतत येत राहतात. गाज सतत घोघावत



वेचलेली फुले/४५


राहते. सातत्याने निर्माण होणा-या गाजात, कुजबुजीत सर्व दूर संचारणारी शक्ती असते. ही गाज कानोकानी जावी म्हणून पुस्तिका प्रकाशनाचा केलेला प्रपंच सफळ संपूर्ण होवो.
____________________________________________________________________________________

• गाज : बालिका वर्षाची (लेख संग्रह)


लेखिका : प्रा. लीला पाटील व सुमित्रा जाधव.


प्रकाशन - अन्वय, ४८ ई. एस.टी.कॉलनी, कोल्हापूर.

प्रकाशन वर्ष - १९९१












वेचलेली फुले/४६

प्रेझेंट सर! : अनुभवकथनातून शिक्षणाचे महत्त्व

 सरोजिनी बाबर यांनी आपल्या समाजशिक्षण मालेद्वारे अनौपचारिक लोकशिक्षण व प्रबोधनाचे जे कार्य शासकीय आश्रयावर केले तेच कार्य प्राचार्य रा. तु. भगत लोकाश्रयावर करीत आहेत. म्हणून त्यांच्या पुस्तकांचे आगळे महत्त्व राहते. लोकशिक्षण हा शासकीय प्रचार न होता तो संस्कार व्हावा म्हणून प्राचार्य रा. तु. भगत यांची धडपड त्यांच्या २९ व्या प्रकाशनातही प्रतिबिंबित होते.
 ‘प्रेझेंट सर!' हे त्यांचे काहीसे आत्मकथनपर पुस्तक. पण त्याला आत्मकथा म्हणता येणार नाही. कारण आत्मकथेची समग्रता त्यात नाही. आपल्या जीवन घडणीतील निवडक प्रसंग त्यांनी या पुस्तिकेत कथन केले आहे. शिक्षणाचा गंध नसलेली घरा-समाजातून वर येणारी माणसे, त्यांचे वर येणे हे काय दिव्य असते हे या पुस्तिकेत अनेक प्रसंगाने स्पष्ट होते.
 समाज ही शिक्षणाची खरी शाळा, पोचट शिक्षण कुचकामी, आईआजीच्या कुशीतच शिक्षणाचे खरे अंकुर फुटतात, ते फुटायला ‘टू इन वन' चे दिव्य सोसावे लागते. शिक्षण म्हणजे शब्दार्थ नव्हे. शिक्षणातून एखाद्यास बहिष्कृत करण्याचा रामबाण उपाय म्हणजे नापास करणे, शिक्षणाने जोपासलेली इंग्रजी संस्कृती आदी कितीतरी विचार या पुस्तिकेत वर्णिलेल्या छोट्या छोट्या प्रसंगातून, अनुभवांचा अन्वयार्थ म्हणून समोर येतात. शिक्षण समाजापर्यंत पोहोचवणे का व कसे आवश्यक आहे, माणूस घडवणारे शिक्षण दिले गेले तर वाल्याचा वाल्मीकी होण्यास वेळ लागत नाही हे पुस्तक वाचताना प्रत्यही जाणवते. प्राथमिक व प्रौढ शिक्षण स्तरावर अशा पुस्तिकांचे वाचन व्हायला हवे. या स्तरांवर अक्षर ज्ञानावर भर देण्यापेक्षा अशी अनुभव कथने समोर




वेचलेली फुले/४७


ठेवली तर ती अधिक परिणामी होतील. 'वाचाल तर वाचाल' हे या पुस्तिकेमुळे अधिक पटते.
_____________________________________________________________________________________

• प्रेझेंट सर ! : (अनुभव कथन)


लेखक - प्राचार्य रा. तु. भगत


प्रकाशक - लोकशिक्षण संस्कारमाला, कोल्हापूर


प्रकाशन वर्ष - १९९१

पृष्ठे - ३0 किंमत - ८ रु.












वेचलेली फुले/४८

मुल्ला नसरूद्दीनच्या वाचनीय गोष्टी

 ऑस्कर पुरस्कार सन्मानित विख्यात बंगाली चित्रपट दिग्दर्शक भारतरत्न सत्यजित रे हे कथाकार नि चित्रकारही होते, ही गोष्ट फारच थोड्या लोकांना माहीत असावी. बंगाली वाङ्मयाच्या क्षेत्रात सत्यजित रे यांनी विपुल नसले तरी ठसा उमटविणारे लेखन केले याची साक्ष देणारे पुस्तक ‘मुल्ला नसरूद्दीनच्या चातुर्य गोष्टी'. मूळ बंगालीत लिहिलेल्या नसरूद्दीनच्या चातुर्यकथा हिंदीमुळे अनेक भाषेत आल्या. विलास गिते यांनी मराठी बालसाहित्यात हे रंजक व बोधक पुस्तक आणून बिरबलाच्या चातुर्यकथांची आठवण करून दिली.
  आपल्याकडे अनेक कथा या बिरबलाच्या चातुर्याची आठवण करून देतात. मुल्ला नसरूद्दीन हा तुर्कस्थानचा बिरबलच. सुमारे एक हजार वर्षांपासून मुल्ला नसरूद्दीनच्या अनेक कथा तिथे प्रचलित आहेत. तो तुर्कस्तानचा असावा, असे सांगितले जाते. त्याला एकच पुरावा उपलब्ध आहे. तिथे प्रतिवर्षी मुल्ला नसरूद्दीनची जयंती परंपरेने साजरी केली जाते. शिवाय कथेतील पात्रे, पोषाख, प्रसंग, देश, काळ, वातावरण यातून क्षणोक्षणी तुर्कस्तानचे लोकजीवन व संस्कृती प्रतिबिंबित होते.
 मुल्ला नसरूद्दीन मराठी वाचकांना परिचित झाला तो अलीकडे प्रसृत झालेल्या दूरदर्शन मालिकेमुळे. नसरूद्दीन आपल्या गोष्टीतून ज्या पद्धतीने पुढे येतो, त्यातून त्याच्या स्वभाव व चरित्राचा अंदाज बांधणे कठीण. विक्षिप्त, मूर्ख, चतुर, विद्वान, विदूषकी अशी सारी गुणवैशिष्ट्ये घेऊन येणारा हा कथानायक बहुरूपी वाटला नाही तरच नवल.
 ‘मुल्ला नसरूद्दीनच्या गोष्टी' हे छोट्या छोट्या ५६ कथांचे सुंदर पुस्तक. कुमार वयोगटातील मुलांना एका बैठकीत वाचण्यास भाग पाडणारे हे ६५ पानी छोटेखानी पुस्तक म्हणजे मुलांना सत्यजित रे यांनी दिलेली आगळी मेजवानीच. बहुरंगी मुखपृष्ठ, नसरूद्दीनच्या कथानिहाय लकबी रेखाटणारी सत्यजित रे यांची रेखाटने मुलांना पुस्तकात खिळवून ठेवतात. यातील ब-याच कथा मुलांना 'तेनालीराम'ची आठवण करून देतात.
  कुमार वयातील मुलांची तर्कबुद्धी विकसित करणे, त्यांच्यात विनोदाची


वेचलेली फुले/४९

प्रगल्भता वाढवणे, रंजनाबरोबर बौद्धिक कसरती करणे आदींच्या दृष्टीने या पुस्तकाचे मोल असाधारण, मुलांच्या वाढत्या वयात चांगले वाचायला दिले पाहिजे, असा ध्यास घेतलेल्या पालक व शिक्षकांनी या पुस्तकाची हमखास निवड करावी.
 साकेत प्रकाशनाने आपल्या दर्जेदार निर्मितीची परंपरा या पुस्तकातही पाळली. मुलांसाठी पुस्तके केवळ रंजक असून चालत नाहीत. तर ती वेधक नि आकर्षकही असायला हवी याचे प्रकाशकाने ठेवलेले भान कौतुकास्पद आहे. 'मुल्ला नसरूद्दीनच्या गोष्टी' मुलांइतक्याच प्रौढांनाही आवडतील अशा आहेत. ‘चुटक्या' च्या स्वरूपात असलेल्या या गोष्टी. त्यातील नाटकीयता, चमत्कृती यामुळे मुला, नातवांना रिझवण्यास ही उपकारक होते. ब-याचदा मुलांना नवी गोष्ट कोणती सांगायची असा प्रश्न (खरं तर यक्षप्रश्न) उभा असतो. तो सोडविण्याचा रामबाण उपाय म्हणजे मुल्ला नसरूद्दीनच्या गोष्टी!'
_________________________________________________________________________________________________________________________________________

मुल्ला नखुरूद्दीनच्या गोष्टी (कथासंग्रह)


लेखक : सत्यजित रे, अनुवाद : विलास गीते

प्रकाशन वर्ष - १९९२

पृष्ठे - ६५  किंमत - १५ रु.











वेचलेली फुले/५०

वंचितांचे विश्व : उपेक्षित जगाची ओळख

 दैनिक सकाळ, कोल्हापूर येथे मुख्य उपसंपादिका म्हणून कार्य करणाच्या कु. मीना शेटे यांचा संबंध वृत्तपत्रीय लेखन गरजेतून महिला, बाल व अपंग विकास संस्थांशी आला. प्रारंभीच्या काळात मागणी' म्हणून लिहिलेल्या लेखांनी त्यांच्या संवेदना जागवल्या व एका असाधारण बैचेनी व ध्यासातून ‘वंचितांचे विश्व' पुस्तक साकारले. साधारणपणे समाजशास्त्रीय बैठक लाभलेल्या, औपचारिकपणे समाजकार्य अध्ययन, अध्यापन नि संशोधन कार्य करणाच्या व्यक्तींनीच आजपर्यंत या विषयावर पुस्तके लिहिली. दुरान्वयानेही समाजशास्त्र नि समाज कार्य विषयाशी संबंध नसलेल्या मीना शेटे यांनी आपल्या लेखनासाठी ‘वंचितांचे विश्व का निवडले याचा शोध घेत पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आले की अनाथ, निराधार, अंध, अपंग, मतिमंद, परित्यक्ता, कुमारीमाता, हुंडाबळी, कुठरोगी, बालगुन्हेगार अशा कितीतरी प्रकारे सामाजिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या वेगवेगळ्या प्रकारे वंचित व उपेक्षित राहिलेल्यांचे दुर्लक्षित असे जग आहे. या जगाकडे अधिक डोळसपणे नि संवेदनशील बघण्याची गरज आहे हे त्यांना जाणवले. या जाणिवेतून ‘वंचितांचे विश्व' ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचा विवेचक व चिकित्सक अभ्यास करणारा ग्रंथ साकारला.
 मला आठवते, एका वर्षापूर्वी त्यांना काही कारणाने मोकळेपण लाभले. हे मोकळेपण इष्टापत्ती मानून त्यांनी हा ग्रंथ आकारला. मीना शेटे या मितभाषी, चिंतनशील व संवेदनक्षम अशा पत्रकार लेखिका आहेत. वृत्तपत्रीय लेखन हे ब-याचदा ‘रतीब' म्हणून लिहिले जाते. रतीबाच्या दुधाला सकसपणाची डिग्री लावायची नसते असा संकेत असतानाही त्या आपले प्रत्येक लेखन हे परिश्रमपूर्वक करतात. हे पुस्तक त्याचा ठळक पुरावा होय.
 कोल्हापूर जिल्ह्याला छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी प्रयत्न नि धोरणांमुळे एक सामाजिक झालर आहे. छत्रपती शाहूंनी येथे निर्माण केलेल्या सामाजिक सुधारणांमुळे सामाजिक संस्थांचे जाळे जिल्ह्यात पसरणे स्वाभाविक होते. संस्था स्थापन होतात, स्थिरावतात, विकसित होतात, पण त्या मागे



वेचलेली फुले/५१


वळून आपल्या कार्याचे मूल्यांकन व विहंगमावलोकन अपवादानेच करतात. यासाठी त्यांना रौप्योत्सावादी प्रसंगांची वाट पाहावी लागते. शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा संबंध सतत समाजधारणेशी असल्याने अशा संस्थांत सतत मूल्यांकनाची व्यवस्था असायला हवी. ती नसल्याने आपल्या कार्याचे सुवर्णमहोत्सव साजऱ्या करणाऱ्या संस्था पन्नास वर्षांच्या दीर्घ वाटचालीनंतर ही तुरुंगसदृशच राहतात. त्यांचे बंद दरवाजे सताड उघडले न जाता ते 'किलकिले' झाले, यात कार्यकर्त्यांना, संस्थांना आकाशास हात टेकल्यासारखे वाटते, हे लेखिकेचे निरीक्षण सर्वांनाच अंतर्मुख करायला भाग पडेल असा मला विश्वास आहे.
  कु. मीना शेटे यांनी 'वंचितांचे विश्व' या सामाजिक चिकित्सक ग्रंथात कोल्हापूर जिल्ह्यातील अनाथ निराधार मुले, मुली व महिलांचे संगोपन व पुनर्वसन कार्य करणाच्या संस्थांबरोबर अंध, अपंग, मतिमंद, कुष्ठरोगी, मूक बधीर, झोपडपट्याच्या, वृद्धाश्रम इत्यादीचा केवळ परिचय देण्याचे बाळबोध कार्य केलेले नाही. सर्वच संस्थांचा परिचय पार्श्वभूमी, वस्तुस्थिती व उपसंहार अशा त्रिस्तरीय पद्धतीने दिलेला आहे. प्रस्तावनेत संस्था संचालनामागील ध्येय, उद्दिष्टांची चर्चा करून परिचयान्तर्गत संस्थेचे वस्तुनिष्ठ चित्र उभे केले आहे. माझ्या दृष्टीने या ग्रंथात उभे केलेले कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे वस्तुनिष्ठ चित्रण ही या ग्रंथाची सर्वाधिक महत्त्वाची अशी जमेची बाजू होय. व्यक्ती जशी स्वत:चे वस्तुनिष्ठ रूप न्याहाळू शकत नसते तसेच संस्थांचेही असते. आपण काही तरी भव्य, दिव्य, समाज हितवर्धक व क्रांतीकारी उभारणी कार्य करतो असा आविर्भाव नि अहंकारात संस्थांना असल्यालने अपवादानेच आपल्या त्रुटींचे भान त्यांना राहत असते; असे भान करून देण्याचे कार्य हे पुस्तक करत असल्याने त्याचे योगदान असाधारण म्हणावे लागेल. उपसंहारात लेखिकेने त्रुटींच्या अनुषंगाने उपाय सुचविले आहेत. सर्व संस्थांनी त्यांचा गंभीरपणे स्वीकार केल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचा दर्जा सुधारण्यास नि उंचावण्यास खचितच मदत होईल.
 सूक्ष्म निरीक्षण, संयम, निष्कर्षाचे कठोर प्रकटीकरण, नि:पक्षपातीपणासारख्या लेखन गुणांमुळे या पुस्तकाचे मूल्य अधिक होय. लेखिकेस प्रत्येक क्षेत्राची तांत्रिक बैठक नाही, त्यामुळे चिकित्सा मर्यादा स्पष्ट जाणवते. हे असले तरी त्यामुळे पुस्तकाच्या मूळ उपयोगितेवर मात्र कुठे मर्यादा येते असे म्हणणे अन्यायाचे ठरेल.
 हे पुस्तक वाचल्यावर जाणवले की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा


वेचलेली फुले/५२
अभ्यास करून अशा पुस्तिका लिहून घेऊन प्रकाशित केल्या पाहिजे. मध्यंतरी ‘युनिसेफ'ने असा प्रयत्न केला, पण त्या पुस्तिका तांत्रिक झाल्याने उपयोगी ठरल्या नाहीत. महिला, बाल, अपंग विकास संचालनालय, महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटनांसारख्या संस्थांनी या बाबत पुढाकार घ्यायला हवा. रूक्षपणे छापलेल्या सरकारी पुस्तकांची रद्दी घालण्यापेक्षा हे कार्य अधिक परिणामकारी ठरेल. हे पुस्तक प्रत्येक सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी आपल्या ग्रंथालयात संदर्भ पुस्तक म्हणून ठेवायला हवे.
• वंचिताचे विश्व (सामाजिक लेख)

 लेखिका - मीना शेटे
 प्रकाशन - सन्मित्र, कोल्हापूर
 प्रकाशन वर्ष - १९९२

 पृष्ठे - १७५  किंमत - ६०

♦♦

अवर्स बाय चॉईस : दत्तकसंबंधी इंग्रजी ग्रंथ

 मुंबईच्या फॅमिली सर्व्हिस सेंटरच्या कार्यकर्त्या प्रा. निलिमा मेहता यांचे दत्तकत्वाद्वारे पालकत्व स्वीकारणाच्या पालकांसाठी मार्गदर्शक ठरेल असे संवेदनशील पुस्तक हाती येताच वाचून हातावेगळे केले. मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत वाचकास वाचायला भाग पडणारी पुस्तके, अपवादानेच हाती लागतात. अशा पुस्तकात ‘अवर्स बाय चॉईस' चा उल्लेख करायला लागेल.
 यापूर्वी राजहंस प्रकाशन, पुणे यांनी मंगला गोडबोले यांचे 'दत्तक घेण्यापूर्वी हे पुस्तक प्रकाशित करून दत्तकेच्छू पालकांची जिज्ञासा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे इंग्रजी मातृभाषी पालकांची अडचण लक्षात घेऊन तेरेदेस होम्स, जर्मनी या संस्थेने पुढाकार घेऊन ‘अबाऊट अॅडॉप्शन' शीर्षकाने दत्तक घेण्यापूर्वीचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला. तत्पूर्वी इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन, मुंबई' संस्थेने ‘अॅडॉप्शन मॅन्युअल' प्रकाशित केले होते. दत्तकत्वासंबंधी असलेल्या या अपवादात्मक साहित्यास आशयघन करण्याचे कार्य निलिमा मेहतांच्या नवप्रकाशित पुस्तकाने केले आहे.
 निपुत्रिक दांपत्यांच्या जीवनात दत्तक बालक येते. हे बालक त्यांनी स्वेच्छा नि हेतुपूर्वक निवडलेले असते. मुले कशी असावी याची निवड जन्मदात्या पालकांच्या हाती असत नाही. दत्तकत्वात अस्तित्ववादी तत्त्वज्ञानात आधारभूत मानला गेलेला निवडीचा अधिकार असतो. निवड ही अनेक पर्यायांतून होत असल्याने ती एक विचारपूर्वक कृती असते. अशा कृतीची शास्त्रोक्त पण भावनाशील चिकित्सा करून निलिमा मेहतांनी दत्तकेच्छु पालकांना दिलासा देण्याबरोबर कुशल मार्गदर्शनाचे कार्यही केले आहे.
 दत्तक विषयावर यापूर्वी प्रकाशित ग्रंथामध्ये सर्वार्थानी सरस ग्रंथ म्हणून ‘अवर्स बाय चॉईस' चा उल्लेख करायला लागेल. दत्तक घेण्याची इच्छा निर्माण करणारे, हृदयाला अपेक्षित साद घालणारे आशयघन कलात्मक मुखपृष्ठ, पुस्तकांची सुंदर मांडणी, या क्षेत्रात ऋषिवत मानल्या जाणा-या मदर तेरेसांचा आशीर्वाद, केंद्रीय समाजकल्याण सचिव उषा व्होरांची प्रस्तावना, लेखिकेचे मनोगत विषय मांडणी व विभागीय, समर्पक व विषय उलगडून दाखवणारी

सार्थ चित्रे, दत्तकपूर्व व दत्तकोत्तर विवेचन, दत्तकसंबंधी समग्र संदर्भ पुरविणारी अनेक परिशिष्टे, जागोजागी चित्तवेधक विचार, वचने या सर्वांमुळे हे पुस्तक सतत वाचायला, विचार करायला, हाताळायला भाग पाडते. माझ्या दृष्टीने या पुस्तकाचे आणखी यश काय असू शकते!
 या उपयुक्त पुस्तकास ‘युनिसेफ' चे सहकार्य लाभले ही आनंदाची गोष्ट. सुंदर पुस्तकावर मूल्य छापलेले नाही. ख-या अर्थाने ‘अमूल्य’, ‘अनमोल असलेल्या या पुस्तकाची लौकिक किंमत करण्याचा अधिकार वाचकावर, खरेदीदारावर सोपवून लेखक, प्रकाशकांनी एक नवा नि अनुकरणीय पासंडा पाडला आहे. वाचक या पुस्तकाचे जे मूल्य देतील ते भारतातील दत्तक प्रश्नावर खर्च केले जाणार आहे. सतत विचारांची पेरणी होऊन परिवर्तन होत नाही, पैशाची पेरणी आवश्यक असते. ती या उपक्रमामुळे शक्य होईल. त्यामुळे या विषयाशी संबंधित सर्व संस्था, कार्यकर्ते, पालक, शिक्षकांनी हे पुस्तक दत्तक विचार घरोघरी पोहोचावे म्हणून प्रकाशित व प्रसारित करण्याचे काम केले पाहिजे.
_____________________________________________________________________________

• अवर्स बाय चॉईस (मार्गदर्शिका)


लेखिका - निलिमा मेहता


प्रकाशन - फॅमिली सर्व्हिस सेंटर, युचॅरिस्टिक

काँग्रेस बिल्डिंग नं. ३, ५, कॉन्व्हेंट स्ट्रीट,

मुंबई - ४00 0३९











वेचलेली फुले/५५
‘या मुलांनो या' : साद घालणा-या बालकथा

 ब-याचदा बडबडगीते ही नुसती अनुप्रासिक व यमक साधणारी असतात. या गुण वैशिष्ट्यांबरोबर जर ती कथात्मक असतील तर मुलांच्या लक्षातही राहतात. मुलांना सतत गुणगुणायला भाग पाडणारी गीतेच खरी यशस्वी गीतं. लीला शिंदे यांचा ‘या मुलांनो या' हा बालगीत संग्रह या कसोटीवर यशस्वी म्हणायला हवा.
 उंदरांनी हैराण झालेला राजा मनीमाऊच्या मदतीने पुन्हा सिंहासन काबीज कसा करतो हे ‘सुटका' या गीतात कवयित्रीने चपखलपणे वर्णिले आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठची शिकवण देणारी ही कविता सुबोध व रंजक आहे. ‘भोपळा' व 'बक्षीस' ही गीतं अंक ज्ञानासारखा क्लिष्ट विषय सोपा करण्यास मदत करतात. “कट्टी' हे गीत घड्याळाच्या टिकटिक मागील शिकवण स्पष्ट करते, तर ‘शहाणी' कामाचे महत्त्व. अशाच इतर कविता नि गीतंही बोधप्रद आहेत.
 बडबड गीतांतील साधेपणा, सुंदर एकरंगी चित्रांची सजावट, बहुरंगी मुखपृष्ठ आदीमुळे हे पुस्तक गाण्यांसाठी, गुणगुणण्यासाठी सतत मुलांना साद घालत राहील. बालवाडी व पूर्व प्राथमिक वर्गातील मुला-मुलींना आवडेल अशी गीते असलेले हे पुस्तक नुसते नावात हाक असलेले नसून त्याचा आशय व गाभा ही नावरूप होय.


• या मुलांनो या, (बालगीते)


लेखिका - लीला शिंदे


प्रकाशन - साकेत प्रकाशन, औरंगाबाद,

प्रकाशन वर्ष - १९९३

पृष्ठे - २४  किंमत - ५ रु.






औट घटकेचे राज्य : देशोदेशीच्या लोककथा

 लोकवाङ्मय हे लिखित साहित्यापेक्षा आशय, विषय, संख्या सर्व कसोट्यांवर श्रेष्ठ ठरणारे आहे. लोककथा नाही असा देश नाही. अगदी आदिवासी प्रदेशातही त्याच्या अशा अनेक कथा, आख्यायिका प्रचलित असतात. ज्ञानदा नाईक यांनी अत्यंत कष्टपूर्वक अशा निवडक लोककथांचा संग्रह आपणापुढे सादर केला आहे. 'औटघटकेचे राज्य' असे जरी या कथासंग्रहाचे नाव असले, तरी त्यातील कथांचे राज्य वाचकांच्या मनावर अजरामर व्हावे. कथेच्या प्रारंभी लेखिकेने कथेचे मूळ (कथा कोणत्या देशाची कशी प्रचलित झाली इत्यादी) इतिहासाच्या रूपाने मांडल्याने या कथांचे आगळेपण, महत्त्व वाचकास समजते. मोठ्या कष्टाने व प्रेमाने पानात वाढलेला पदार्थ अतिथी मोठ्या श्रद्धेने खातो तशीच काहीशी स्थिती वाचकांची होते. तुर्कस्तान, अरबस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका इत्यादी पौर्वात्य देशातील प्रचलित लोककथांच्या या संग्रहात सर्वच कथा वाचनीय असल्या तरी ‘शाही हेर’, ‘औट घटकेचे राज्य’, ‘खरे शिक्षण’, ‘नवा मददगार' वाचकांना अधिक लोभस वाटल्यावाचून राहणार नाहीत. विकास जोशींच्या एकरंगी चित्रांनी हे पुस्तक सजविले गेले असल्याने ते परिणामकारक ठरेल. काही कथातून नैतिक शिक्षणही मिळते. सुटसुटीत वाक्ये, सुबोध शब्दरचना, सहज संवाद यामुळे या कथा बोधगम्य झाल्यात. पौर्वात्य संस्कृतीच्या परिचयाच्या दृष्टीनेही या संग्रहाचे आगळे असे महत्त्व आहे.


• 'औट घटकेचे राज्य' (लोककथा संग्रह)

 लेखक - ज्ञानदा नाईक,
 प्रकाशन - साकेत प्रकाशन, औरंगाबाद
 प्रकाशन वर्ष - १९९३

 पृष्ठे ८३  किंमत - २० रु.

♦♦

बालभाग्यविधात्री डॉ. मादाम मारिया माँटेसोरी चरित्र


 बाल शिक्षणतज्ज्ञ डॉ. मादाम मारिया माँटेसरी यांचे सविस्तर चरित्र मराठीत अपवादानेच लिहिले गेले आहे. अलीकडच्या काळात शिक्षणाचा घाऊक प्रसार सुरू झाला असला तरी या प्रसारात शिक्षणापेक्षा व्यापार, व्यवहार, मिळकत या मूल्यांना महत्त्व आले असल्याने बालवाड्यांची संख्या वाढूनही बालवाड्या समृद्ध कशा होतील, तेथील शिक्षण माँटेसरीच्या मूळ कल्पनेबरहुकूम कसे होईल, याची चिंता नि चिंतन करणारे लोक विरळाच. रा. वा. शेवडे गुरुजी त्यातील एक होते. ते स्वतः डॉ. माँटेसोरींचे शिष्य, बाल शिक्षणाचा मंत्र त्यांनी माँटेसोरींच्याकडून घेतला व जीवनभर ते तो जपत राहिले. अलीकडे बालवाडी शिक्षिकांना प्रशिक्षित करण्याचे एक चांगले आंदोलन सर्व महाराष्ट्रात पसरते आहे. अनुताई वाघ, निर्मलाताई पुरंदरे, लीलाताई पाटील, रा. वा. शेवडे गुरुजी या मंडळींनी या आंदोलनाची पताका आपल्या खांद्यावर घेतली नि सतत फडकत ठेवली. बालवाडी शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून शेवडे गुरुजींनी हे चरित्र लिहिले आहे.
 बालवाडी शिक्षिकांचे अल्प शिक्षण व प्रशिक्षणानंतर ज्यांना शिकायचे तो बालवर्ग अशा दोघांचे मान ठेवून गुरुजींनी या चरित्राची शेती उद्बोधक, संवादात्मक ठेवली आहे. माँटेसोरीच्या जीवनातील निवडक प्रसंगाचे चित्रण करून त्यांच्यातील शिक्षिकेचे व्यक्तिमत्त्व ठळकपणे चित्रित करण्यास लेखकास असाधारण यश मिळाले आहे.
 शेवडे गुरुजींचे हे नव्वदावे पुस्तक. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षी ते प्रकाशित झाले असल्याचे औचित्य साधून प्रकाशकाने ते अंतर्बाह्य सुंदर केले आहे. बहुरंगी मुखपृष्ठ, जागोजागी रेखाटने, ठळक छपाई यामुळे हे पुस्तक शिक्षकांइतकेच बालकुमारांनाही आवडेल यात शंका नाही. या चरित्र ग्रंथांच्या शेवटी परिशिष्ट स्वरूपात शेवडे गुरुजींनी माँटेसोरीच्या सहवासातील आठवणी शब्दबद्ध करून हे चरित्र अधिक जिवंत व वस्तुनिष्ठ बनविले आहे. बालवाडी शिक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रमात या पुस्तकांचा समावेश व्हायला हवा. प्रशिक्षित  शिक्षकांना माँटेसोरी माहीत होणे अनिवार्य असल्याने या पुस्तकाशिवाय त्यासाठी दुसरा पर्याय नाही.
 संस्कारक्षम ललित साहित्याची उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने लिहिलेले छोटेखानी पुस्तक ‘जय मंगलमूती'. रा. वा. शेवडे गुरुजींसारख्या मुलांसाठी सातत्याने लिहिणाच्या लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेली ही पुस्तिका गणेशाच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपणापुढे ठेवते. या पुस्तिकेतून शेवडे गुरुजींनी गणेशाचे मानवीकरण करून ईश्वरातील आदर्श माणसात आल्यास माणसाचा देव व्हायला वेळ लागणार नाही, असा आशावाद अप्रत्यक्षपणे व्यक्त केला आहे.
 गणपती हा आपल्या पूजेचा व आराधनेचा विषय. देव्हा-यातच त्याचे स्थान. पण त्याच्या जीवनातील मातृभक्ती, चातुर्य, बुद्धिमत्ता आपल्या जीवनात आली, तर आपले हृदयगर्भ देव्हारा झाल्याशिवाय राहणार नाही, हे पुस्तक वाचताना सतत जाणवते. अशी निर्माण होणारी जाण या पुस्तकाच्या उद्देशाची सफलता होय.
 हे पुस्तक संस्काराच्या दृष्टीने अधिक उपयुक्त व्हावे म्हणून प्रात:स्मरण, गणेश आरती, मलपृष्ठावर मंगलाष्टक आदी देऊन लेखकाने औचित्य साधले आहे.


• बाल भाग्यविधात्री डॉ. मादाम मारिया माँटेसरी

 लेखक - रा. वा. शेवडे गुरुजी,
 प्रकाशन - चंद्रकांत शेट्ये प्रकाशन मंदिर, कोल्हापूर
 पृष्ठे ९८ किंमत   २५ रुपये

 जय मंगलमूर्ती : रा. वा. शेवडे गुरुजी
 पृष्ठे : ५५  किंमत ८ रुपये

♦♦

‘कावळे आणि माणसं' : संघर्षाशील सत्यशोधक कथा


 आतड्यात पेटणारा भुकेचा अग्नी स्मशानात धगधगणाच्या चितेपेक्षा प्रबळ असतो... प्रतिष्ठेच्या बुरख्यात माणूस आपलेपण, ऋणानुबंधही झुगारतो... रांगेत रेंगाळणारे माणसाचे आयुष्य एक नवे तत्त्वज्ञान घेऊन विकसित होतेय. माणसाचे आयुष्य मृत्यू बेट झालेय... नवश्रीमंत तरुणांना पैशाच्या जोरावर दुस-याची अब्रू उसवण्याचा छंद जडलाय...पत्रकारांना मतलब असतो बातमी, प्रसिद्धी, चर्चा, अभिनंदन, श्रेय, फुशारकीचा, भले त्यात बातमीचा बळी ठरलेल्याचे काहीही होवो...कार्यकर्ते मंडळी समाजकार्याच्या धुंदीत मूळ उद्दिष्टांनाच बेमालूम तिलांजली देत असतात अशी कितीतरी जीवन निरीक्षणं नि निष्कर्ष नोंदवणारा कथाकार उत्तम कांबळे यांचा नवप्रकाशित कथासंग्रह 'कावळे आणि माणसं' म्हणजे सध्याच्या गुंतागुंतीच्या मानवी जीवन संबंध व संघर्षामागील सत्याचा शोधक वृत्तीने घेतलेला वेध होय, मूळ कवी नि पत्रकार वृत्ती असलेला हा कथाकार. रोजच्या बातमीचा वेध घेणा-या घाईच्या जीवनात प्रसंग निवडत टिपत राहतो. स्वास्थ्याने त्याच्या सुंदर कथा करतो. त्यामुळे ‘कावळे आणि माणसं' च्या कथांना सत्यकथेचे रूप येते. पत्रकाराच्या पेनमध्ये ‘शाई' नाही तर 'घाई' भरलेली असते.' असे म्हणणाऱ्यांना त्या पेनमध्ये ‘संवेदनेची डूब' व 'समाजपरिवर्तनाचा ध्यास' ही भरलेला असतो, असा आश्वासक दिलासा देणारा हा कथासंग्रह आहे. वर्तमानाच्या व्यामिश्र जीवनाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या सर्वांनी आवर्जून वाचायला हवा.
 'कावळे आणि माणसं' ही या संग्रहातील शीर्षक कथा. शिल्पाच्या दृष्टीने पाहिले तर ती दीर्घ कथा होय. पत्रकारात निरीक्षक दडलेला असतो तसा चित्रकारही. स्मशानासारखी जागा पार्थिव जीवनाचा अंत करणारी अटळ शरणस्थळी. तिच्या अनिवार्य अस्तित्वाची सतत उपेक्षाच करत आलोय! स्मशान मानव जीवन चरित्राचा अभ्यास करणा-यांसाठी एक स्वाभाविक टेहाळणी बुरूज' इथे माणसांचे खरे चेहरे दिसतात. इथं माणसांचे नक्राश्रूही ढळताना पाहतो...' ‘जिवंत असता लाथा देती, मरता घेती खांद्यावरती। जगाचा उलटा न्याय, मेल्यावरती सन्मान।।' म्हणणार्‍या कवीला दिसलेले  वास्तव कथाकार इथे टिपत राहतो नि मग त्याच्या लक्षात येतं की बेवारस मृतदेह ओढणारा रघू दारू पिऊन हे काम आयुष्यभर करत राहतो. शेवटी पिंडाच्या कावळ्याची उपेक्षाच त्याच्या पदरी येते. माणसाचा कावळा झाल्याचं चित्रण करणारी शीर्षक कथा म्हणजे वर्तमानाचे ज्वलंत क्रौर्य होय.
 ‘दगडूमामा' तशी रेखाचित्रात्मक कथा. या संग्रहातील सर्वच कथांची शैली चित्रात्मक. दीपकच्या बालपणी दगडूमामा आधार देतो. आईचे रक्षण करतो. दीपक दगडूमामाच्या आधारावर मोठा होतो नि प्रतिष्ठितही. पण हीच प्रतिष्ठेची भिंत त्याच्या आड येते व बेवारस पडलेल्या दगडूमामाचा मृतदेह त्याच्या लेखी पोलीस पंचनाम्यातील ‘एक अनोळखी पुरुष जातीचा देह' होतो असा जिव्हारी अनुभव सांगणारी ही कथा संवेदनेची डूब देऊन वाचकास अंतर्मुख करते.
 ‘रांग'सारखी कथा मध्यमवर्गीय माणसाच्या असहाय्यतेचे चित्रण करत सध्याच्या जीवनातील रांगेचं नवं तत्त्वज्ञान सांगून जाते. 'आंधळं प्रेम', 'बातमी', ‘चकवा' या संग्रहातील कथांतील पात्रे, प्रसंग हे खरे होत, पण कथाकार पात्रांची नावे, प्रसंग इत्यादींत बदल करून ते काल्पनिक रूपात समोर ठेवत असला तरी रतीबाप्रमाणे घरी येणारे वृत्तपत्र परिपाठ म्हणून नित्य वाचणाच्या व विचार करणा-या लोकांना पूर्व घटना, व्यक्तींचे चपखल स्मरण देतात. यात पत्रकारांच्या कार्यकर्त्यांच्या दायित्वाचा उभा केलेला प्रश्न अधिक महत्त्वाचा नि म्हणून चिंतनीय वाटतो. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आपल्या श्रेयवादाच्या नशेत सामान्यांचं दु:ख व बातमी प्रकाशनानंतर त्यांच्या (सामान्यांच्या) जीवनाची होणारी परवड कशी बेमालूम विसरतात त्याची बोच देणाच्या या कथा शोधक पत्रकारितेपुढे वृत्त प्रकाशानंतर पाठपुराव्याचा व खरे सामाजिक दायित्व निभावण्याची प्रेरणा देतात.
 ‘संत', 'पाऊस', 'वर्तुळ पूर्ण झालं', 'देवाची बाई'सारख्या संग्रहातील अन्य कथा समाजाचे अनेक प्रश्न चित्रित करतात. समाजातील अंधश्रद्धेमुळे भोंदु साधूचे कसे फावते, चित्रित करणारी ‘संत' कथा मोक्षानंद महाराजांना मोगरीचा मंगळ दूर करता करता राधा व समजुतानंदच्या पलायन व विवाहाने याच जन्मी मोक्षाचा साक्षात्कार घडवते. 'पाऊस' ही दारिद्र्याच्या पावसात नशिबाचे पीठ ओलावणारी हृदयद्रावक कथा होय. ‘वर्तुळ पूर्ण झालं' सारखी कथा संपत्तीचा हव्यास धरणाच्या मनोजसारख्या लोभींच्या डोळ्यात वास्तवाचे जळजळीत अंजन घालते.
 ‘दिवा लागला पणती विझली'कथा पुत्रप्राप्तीने मोक्ष शोधणा-यांना विचार करण्यास भाग पाडते. 'देवाची बाई' देवदासी समस्येवर बेतलेली कथा, माणसांच्या देवत्वामागे दडलेल्या लैंगिक दैत्यांचा मुखभंग करते.
 संग्रहातील अन्य ‘सूड', 'बर्थ डे’, ‘पमी आणि बंटी', 'परीक्षा’ ‘उपवास कथाही याच पठडीतील. 'कावळे आणि माणसं' वाचताना मला सतत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कथाकार प्रत्यक्ष घटना, पात्र, प्रसंगांना काल्पनिक कॅनव्हासवर रंगवतोय. 'माणसांचे रंग' शोधणारा कथाकार जीवन रेषांद्वारे मानवी संबंधाचे ताने-बाने विणतोय. कवी, निरीक्षक, कल्पक, चित्रकार, पत्रकारांची तमाम वैशिष्ट्ये घेऊन जाणाच्या या कथाकारांच्या कथा वाचणे म्हणजे माणसाचे ज्वलंत आयुष्य अभ्यासणं होय.
 ‘कावळे आणि माणसं' च्या कथाकाराने शिळोप्याचा वेळ घालवण्याचा ऐसपैस उद्योग म्हणून त्या लिहिल्या नाहीत. त्यामुळे वामकुक्षीच्या वेळी पहुडत वाचण्याच्या त्या कथा नाहीत. झोप लागण्यासाठी म्हणून वाचणा-यांच्या हाती हे पुस्तक गेले तर त्यांची झोप उडेल. झोप उडवणाच्या कथांची आज मला अशासाठी अधिक गरज वाटते की बंद सदनिका संस्कृतीने माणसाचे संवेदनेचे एकेक कप्पे बंद करत आणत त्यांच्या डोळ्यांवर आत्मकेंद्रिततेचे असे झापड पांघरलेय की तो आता स्वत:पलीकडे पाहायला तयार नाही. विचार करण्याची गोष्ट फार दूर.
 कधी काळी साहित्य कल्पनेतून जन्माला यायचे. अलंकारिक भाषा हे त्या साहित्याचे भूषण असायचे. त्या साहित्याच्या समीक्षेच्या मोजपट्ट्या व चौकटीही वेगळी असायची. हे सारे मोडणाच्या उत्तम कांबळे यांच्या कथांचा विचार करायला समीक्षेची नवी परिमाणे शोधणे आवश्यक आहे. या संग्रहातील सारी कथानके संक्षिप्त आहेत. त्यात छोट्या कुपीत जीवनाचा व्यापक आशय पेलण्याची क्षमता आहे. कथांतील संवाद सहज जसे आहेत तसेच ते कधी वाचकास अस्वस्थ करतात, तर कधी अंतर्मुखही. कथेतील वातावरण चित्रण हा सर्वच कथांचा गाभा होय. सान्या कथा जीवन चित्रणकेंद्री होत. कथांतील पात्रे प्रत्येक वाचकाला परिसरातील परिचितांचे स्मरण देण्याइतकी सहज, परिचित नि म्हणून स्वाभाविक. त्यांच्या चित्रणास लेखकास कृत्रिम, दुर्बोध शैलींचा आधार धुंडाळावा लागत नाही. कथांची भाषा परिनिष्ठित आहे. कुठे कुठे बोलीचा उपयोग झालाय. कथांचा उद्देश सामाजिक समस्यांचे चित्रण करत त्यांचे निराकरण असल्याने 'कावळे आणि माणसं' ही रचना सोद्देश ठरते. कथांची शीर्षके छोटी पण वेधक आहेत. मराठी नवकथेत वंचितांचे साहित्य दालन थाटायचे झाले तर हा कथासंग्रह ठेवल्याशिवाय  ते पूर्ण होणार नाही, असे असले, तरी कथांत सहजतेचे सौंदर्य यायला हवे. ते निरंतर कथालेखनानेच शक्य आहे.


• कावळे आणि माणसं (कथासंग्रह)

 लेखक - उत्तम कांबळे
 प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
 प्रकाशन वर्ष - ९९९९
  पृष्ठे १६९   किंमत १00 रु. ‘जागतिक घडामोडी : वर्तमानाचा साक्षेपी आढावा


 वृत्तपत्रीय लेखन दोन प्रकारचे असते. त्यातील वृत्त वाचनानंतर दिवसभरात घडणाच्या घडामोडी, उलाढाली व परिपाठात वाचक ते लौकिकाअर्थाने त्वरित विसरून जातो. हे विस्मरण वरवरचे असते. प्रसंगपरत्वे विस्मृतीत गेलेल्या, पण सुप्त मनाच्या कोशात तळात संथ पहुडणाऱ्या त्या वृत्तास उजाळ्याच्या रूपाने पुढे संदर्भाचे, दृष्टांताचे महत्त्व येते. ते मग गतकालाचा दाखला म्हणून वर्तमानास मार्गदर्शन करते. कधी कधी ते वृत्त चिकित्सेची कसोटी (लिटमस टेस्ट) ही ठरते. वृत्तपत्रीय दुस-या प्रकारच्या लेखनात अग्रलेख, स्तंभ व समकालीन प्रासंगिक लेख येतात. त्यांची मूळ बैठक वैचारिक असते. त्या लेखनास प्रबोधनाचे अधिष्ठान असते. शिळोप्याचा उद्योग म्हणून वृत्ते ज्या सहजतेने रचली जातात तसे या लेखनाचे असत नाही. लेखक ज्या गांभीर्याने ते लिहितात, तितक्याच गांभीर्याने वाचक ते वाचतात, विचार करतात, अंतर्मुख होतात. समाजास कार्यप्रवण करण्याचे, दिशा दाखवण्याचे, नवसमाज रचनेचे सामर्थ्य या लेखनात असते. त्यामुळे आज स्तंभ, अग्रलेख लिहायचा म्हणून अस्वस्थ असणारे कितीतरी संपादक स्तंभलेखक मी पाहिले, अनुभवले आहेत. डॉ. सुभाष देसाई अशांपैकी एक स्तंभलेखक होते. त्याचे ‘जागतिक घडामोडी' हे पुस्तक वैश्विक नवरचनेचा साक्षेपी आलेख होय.
 संपादक, स्तंभलेखक दैनिकांची रोजची वा नैमित्तिक गरज म्हणून काही लिहीत राहतात. त्यांच्या लेखन सातत्याने एक वाचकवर्ग जसा तयार होतो, तशी त्या लेखनातून एक विचारशृंखला, शैलीही आकारत राहते. महाराष्ट्रातील महावृत्तपत्रांतून महासंपादकांनी अनेक महास्तंभ चालविले ('महा' हे अलीकडचे एक नवे फॅड/प्रकरण होय) म.टा.च्या गोविंद तळवलकरांचे 'वाचता वाचता', ‘परिक्रमा', अग्रलेख ‘लोकसत्ता' च्या माधव गडक-यांचे ‘चौफेर', अरुण टिकेकरांचं ‘तारतम्य' (१/२), लोकमतच्या महावीर जोंधळेचे ‘संबळ', ‘सकाळ'च्या विजय कुवळेकरांचं ‘पैलू' हे सारे ग्रंथरूप-सुभाष देसाईंचे ‘जागतिक घडामोडी' हे दैनिक पुढारीतील स्तंभलेखनाचेचे ग्रंथरूप.
 डॉ. सुभाष देसाईंना जागतिक, राजकारण, समाजकारण, अर्थकारणाची चांगली जाण आहे. सामाजिक प्रश्न व समस्यांची त्यांना जाणीव आहे. धर्म नि विज्ञान या परस्परविरोधी विषयांवर असलेली त्यांची रुची व गती पाहता तसेच छायाचित्रण व चित्रकलेतील त्यांचा हात व डोळा लक्षात घेता त्यांचे लेखन हे व्यक्तिमत्त्वाप्रमाणे बहुआयामी व बहुरसायनी आहे हे जागतिक घडामोडी' वाचताना सहज ध्यानात येते. युद्ध, पर्यावरण, पुरस्कार, क्रांती, परिवर्तन, वैचारिक आवर्तने या सा-यांच्या वाचन, मनन, चिंतन, निरीक्षणातून फुलणारे त्यांचे लेखन हे आजच्या माहितीच्या विस्फोटाप्रमाणे अवाक् करणारे आहे. यातून लेखकाचा आवाकाही लक्षात येतो.
 वृत्तपत्रीय लेखनात ब-याचदा रतीबाची रूक्षता येण्याचा संभव असतो. डॉ. देसाई यांनी विषय वैविध्याने ती टाळली आहे. स्तंभलेखनात जागेची मर्यादा असते. तशी वेळेची पण, अल्पवेळेत समग्र संदर्भ देण्याचे डॉ. देसाईंचे ‘जागतिक घडामोडी'तील कौशल्य त्यांच्या व्यापक समजेचा परिचय करून देते. ते केवळ घटनांची नोंद करत नाहीत तर घटनेच्या अनुषंगाने उठणारी संभाव्य वैचारिक आवर्तने ते सूचित करतात. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पुढे येणाच्या संकटांच्या इशा-याचा घंटानाद त्यांच्या लेखनातून ते सुज्ञ वाचक ऐकतील त्यांना हे पुस्तक म्हणजे एकविसाव्या शतकातील बदलाची ‘ब्ल्यू प्रिंट'च वाटेल, दैनिक पुढारीसारख्या राज्यस्तरीय होऊ पाहणाच्या वृत्तपत्रास भविष्यात जो दर्जा मिळेल त्याचे श्रेय य दर्जेदार ग्रंथासही द्यावे लागेल.
 आजचे युग स्पर्धात्मक आहे. रोज सारं विश्व अल्पकाळात नि कळ दाबताच आपल्या मुठीत यावे असे ज्या वाचकांना वाटते त्यांना जागतिक घडामोडी' हा संदर्भ ग्रंथ 'गागर में सागर' वाटल्यावाचून राहणार नाहीत. १९९७-९८ या दोन वर्षांचा साक्षेपी इतिहास या ग्रंथरूपाने नोंदला गेला आहे. गेल्या दोन वर्षांतील जगाचे प्रतिबिंब ज्यांना पहायचे, अभ्यासायचे असेल अशा मराठी वाचकांसाठी आज तरी या ग्रंथाशिवाय पर्याय नाही.


जागतिक घडामोडी (लेखसंग्रह)

 लेखक डॉ. सुभाष देसाई,

 प्रकाशक - सिंहवाणी, ११-ब शिवाजी स्टेडियम,खासबाग, कोल्हापूर
 प्रकाशन - फेब्रुवारी १९९८
 पृष्ठे - १६0 किंमत - १२५ रु. (विद्यार्थ्यांसाठी फक्त १00रु.)

♦♦

मिठू मिठू पोपट : स्त्रीवादी विचाराचे नाटक


 ‘मिठू मिठू पोपट' हे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे सन १९६८ ला लिहिलेले छोटेखानी नाटक. सध्याचा समाज स्वत:ला आधुनिक म्हणवून घेतो खरा पण तो प्रवृत्ती, संस्कार, विचाराच्या अंगांनी पारंपरिकच राहिला आहे, हे दाखवणे हा नाटकाचा उद्देश होय. उदाहरण म्हणून नाटककारांनी समाजातील स्त्रीच्या स्थानाची चिकित्सा नाटकात केली आहे. विद्यमान समाजातली स्त्री विशेषतः मध्यवर्गीय स्त्री ही स्वत:ला कितीही सुशिक्षित म्हणून घेत असली, तरी ती प्रवृत्तीच्या अंगांनी, संस्कारांनी पारंपरिकच राहिली आहे. नऊवारी गेली नि पाचवारी, मॅक्सी, कमीज-कुर्ता, स्कर्ट जरी घालू लागली तरी तिने समाज, घर, कुटुंबाच्या लक्ष्मणरेषा काही ओलांडल्या नाहीत. किंबहुना, ती पूर्वीच्या स्त्रियांसारखी दांभिकच राहिली. नऊवारी नेसत चिरूट ओढणारी चित्रेनी चितारलेली यातली स्त्री ही प्रतीकात्मक असली तरी ती प्रातिनिधिक वास्तव व्यक्त करणारी होय. घर, कुटुंब, समाजाचे हुकमी संरक्षण कवच, पिंजरा तिला सोडवत नाही. पिंज-याबाहेरचे स्वच्छंदी जग ती उपभोगू इच्छिते. पण त्याच्या परिणामांना स्वीकारण्याचे बळ (मानसिक तयारी) तिच्यात नाही. परिणामी स्वच्छंद सुखाचा चोरटा आनंद घेण्यास चटावलेली आधुनिक स्त्री धड पारंपरिक पतिव्रताही राहिली नाही नि आधुनिक स्वैर स्त्रीही झाली नाही. पुरुष म्हणाल तर तो कृष्ण, विश्वामित्राची भूमिका अधिक सफाईदार नि सभ्यतेने निभावतो आहे. कच्ची डाळ, कैरी खाण्यास चटावलेला हा संभावित पोपट स्त्रीच्या सुखी संसाराचे रहस्य जाणून असल्याने त्याने मर्म ओळखल्याने तो अधिक धाडसीही झाला आहे. सुखी संसाराचे सात जन्माचे आश्वासन मागणारी स्त्री आपली पराधीनताच सिद्ध करते. पुरुष याचाच फायदा उठवत आला आहे. उठवत राहणार. जो स्त्री स्वप्रज्ञ, स्वतंत्र होत नाही.
 चित्रे यांनी आपल्या या विचारांना तमाशासारख्या हलक्या फुलक्या नाट्य प्रकाराद्वारे गंभीर प्रश्न मांडण्याचा जबाबदार प्रयत्न केला आहे. विचारांची मांडणी छोट्या छोट्या संवादाद्वारे केली असली, संवाद प्रेक्षकांना हसवणारे असले तरी त्यात अंतर्मुख करण्याची ताकद आहे. 'मिठू मिठू पोपट' ‘आंबा पिकतो रस गळतो' सारखी लोकपरिचित व प्रचलित गीतांचा चपखल उपयोग ही नाटककार चित्रेची चतुराई व विलक्षणपणाची साक्ष होय. 'सोंगाड्या', ‘कथा अकलेच्या कांद्यांची', 'गाढवाचं लग्न' सारख्या लोकनाट्यातील द्वयर्थी रचना एकाच वेळी बुद्धिजीवी व सामान्य प्रेक्षकांना साद घालतील व दाद मिळवतील. त्याचं सुयोग्य सादरीकरण होणे मात्र गरजेचे. नांदी ते भरतवाक्य या नाट्य प्रवासात पद, पोवाडे, लोकगीतं, कवितांचा स्वैर वापर करून नाटककाराने ते रंजक होईल असे पाहिले आहे. शिवाय त्याच्या संहितेत दिग्दर्शकाला स्वातंत्र्य घेण्यास भरपूर वावही ठेवला आहे. सहदेव दुबे यांचा प्रयोग हा वस्तुपाठ असला तरी तो गिरवलाच पाहिजे असे बंधन नव्या दिग्दर्शकास नाही. संगीतासही, शास्त्रीय, पारंपरिक (लोक) पाश्चात्य सर्वास वाव आहे. प्रयोग व सादरीकरणाच्या दृष्टीने ते मुक्त नाट्य होय नि म्हणून ‘नाटक' संहिता म्हणून त्याचे मोठे मूल्य आहे.
 स्त्रीला स्वत:तील सुरुंग शक्तीची जोवर जाणीव होणार नाही, ती क्रियात्मक होणार नाही, तो ती पुरुषी व्यवस्थेची गुलामच राहणार, पुरुषी वासनेचे साधनच राहणार हे सांगणारे नाटक विचार म्हणून मात्र पोपटपंचीच करणारे जुने पुराणे वाटते.


• मिठू मिठू पोपट (नाटक)
 लेखक - दिलीप पुरुषोत्तम चित्रे

♦♦

समतेच्या दिंडीचे धारकरी : सामतावादी, भाषणसंग्रह


 ‘समतेच्या दिंडीचे धारकरी' हे पुस्तक प्रा. चंद्रकांत पाटगावकर यांच्या व्याख्यानांचा लिखित संग्रह. प्रा. पाटगावकर यांनी गेल्या दहा-बारा वर्षांत सुमारे सव्वासातशे शाळा-महाविद्यालयांतून मानधन वा प्रवासखर्च न घेता ही व्याख्याने दिली. तिचा लाभ तीन लक्ष विद्याथ्र्यांना झाला. आद्य समाजक्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले, समतावादी लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतिकारी संत साने गुरुजींसारख्या समतेचा पंचप्राण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसुधारकांची जीवनगाथा प्रा. पाटगावकर आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीत विद्यार्थ्यांसमोर सादर करतात, तेव्हा विद्यार्थी श्रोते केवळ मंत्रमुग्ध होत नाहीत तर ते कार्यप्रवण होतात, हे त्यांच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य होय. व्याख्यानांना स्थल, काल व संख्येची मर्यादा असते. व्याख्यानांपासून वंचित राहिलेल्या लाखो विद्यार्थी, पालक शिक्षकांपर्यंत समतेचा विचार पोहोचवणे या ग्रंथांमुळे शक्य झाले. ती एक सामाजिक गरज होती. कल्पक प्रकाशनाने अल्पदरात हा ग्रंथ उपलब्ध करून देऊन समता संक्रमणास मोठे साहाय्य केले आहे. आज जातीय शक्ती, नवे चेहरे, बुरखे घेऊन डोळे वर करून पाहात आहेत. समतेचा विचार धारक-यांच्या सतर्कतेने परंतु नि:शस्त्र राहून ज्या समाजसुधारकांनी जपला, जोपासला व ज्यांच्या जिवानिशी प्रयत्नांमुळे या जीवनमूल्यांना जोम आला आला अशांची दिशादर्शक जीवनधारा प्रा. पाटगावकरांची ही लेखरूप व्याख्याने आपणापुढे सादर करतात. नव्या पिढीस समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, विज्ञाननिष्ठा, एकात्मतासारखी जीवनमूल्ये, प्रभावीपणे देणे काळाची गरज झाली आहे. संविधानाचे पुनर्मूल्यांकन करू पाहणाच्या शक्ती मागील दाराने मनुवाद रुजवू पाहत आहेत. अशा परिस्थितीत कोवळ्या वयात मानवतावादाचे संस्कार करणे अनिवार्य झाले असल्याने ‘समतेच्या दिंडीचे धारकरी' सारखे पुस्तक आता नवगीता, नवबायबल वा नवकुराण म्हणून उगवत्या पिढीपुढे ठेवले तरच आपण जातीय व धर्माध शक्तींचा मुकाबला समर्थपणे करू शकू.   ‘समतेच्या दिंडीचे धारकरी' मधील आद्य समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आलेखात व्याख्यात्या लेखकाने भाषणातून होणा-या संवादाचा फायदा घेऊन जोतिबांचे जीवन व कार्य संक्षेपाने व साक्षेपाने हृदयापर्यंत भिडेल अशा पद्धतीने सादर केले आहे. प्रसंगातून समाजसुधारकांचे जीवन, कार्य नि विचार व्यक्त करण्याची लेखकाची हातोटी त्याच्यातील शिक्षकाचा परिचय देते. जोतिबांची पारिवारिक स्थिती यशवंताला दत्तक घेणे, फुल्यांवर प्रभाव पाडणारे ग्रंथ, स्त्री व शूद्रांची उपेक्षा अशा कितीतरी अंगांनी प्रा. पाटगावकरांनी महात्मा फुलेंची समतादृष्टी स्पष्ट केली आहे. ते कुठेही संस्कार करण्याची भूमिका घेत नाहीत. पण ते प्रसंग ज्या जिवंतपणे आपल्या लेखनातून सादर करतात त्यामुळे न पुसून टाकता येणारा प्रभाव वाचक वा श्रोत्यांवर झाल्याशिवाय राहात नाही.

 ‘समतावादी लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती' मध्ये शाहूंनी १९१७ साली केलेला सार्वत्रिक शिक्षणाचा कायदा या लोकराजाच्या समतेच्या दूरदृष्टीचा आवाका लक्षात आणून देतो. विविध वसतिगृहे, मागासवर्गीयांच्या दरबारातील नियुक्त्या, सत्यशोधक हॉटेल, डॉ. आंबेडकरांना साहाय्य अशा प्रसंगांच्या पेरणीतून छत्रपती शाहू महाराज हे कसे सत्यशोधक, समतावादी, कर्ते सुधारक राजर्षी होते ते स्पष्ट होते. तत्कालीन संस्थानिकांच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराज कसे वेगळे होते हे बिंबवण्याचे कार्य या लेखातून अत्यंत प्रभावीपणे साध्य झाले आहे. वेदोक्त प्रकरण, आर्यसमाज, सत्यशोधक समाज, आंतरजातीय विवाह असे शाहू महाराजांचे अनेक पैलू या व्याख्यानातून स्पष्ट होतात. शाहूंचे समतावादी राजरूप आपल्यापुढे साकारते.

 ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवनधारा' रेखांकित करणारा या ग्रंथातील आलेख प्रारंभीच्या 'आई' या पाण्यासाठीच्या आर्त हाकेने आपले हृदय पिळवटून टाकतो. जो वक्ता या लेखक, श्रोता या वाचकांना हालवतो, हेलावतो तोच संस्काराची क्षमता धारण करीत असतो. प्रेमचंद, खांडेकर, साने गुरुजी, शरदचंद्र चटर्जीच्या लेखन व विचारांचा लेखकावर असलेला पगडा इथे उघड होतो. डॉ. आंबेडकरांनी परिस्थितीवर मात करून आपले जीवन कसे फुलविले ते खुलवत लेखक या भीमपराक्रमी पुरुषाचे ऊर्जस्वल जीवन वाचकांपुढे ठेवतो. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा बाबासाहेबांचा मंत्र अधोरेखित करत लेखकाने या दलितोद्धारकाचे कार्य समकालीन संदर्भाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत केले आहे.

 ‘राष्ट्रपिता महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, त्यांची सत्याग्रही वृत्ती, स्वातंत्र्यलढ्यातील विविध चळवळी यातून महात्मा गांधींची स्पष्ट होणारी समदृष्टी आपणास अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, सत्य, असंग्रह, शरीरश्रम, आस्वाद, भयवर्जन, सर्वधर्मी, समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना यांसारखी ‘एकादश व्रते' समतेचीच चळवळ होती हे प्रा. पाटगावकरांच्या या निबंधपर व्याख्यानातून कळायला मदत होते.

 ‘क्रांतिकारी संत साने गुरुजींचे जीवन म्हणजे अंतरीच्या तळमळीचा संवेदनशील संवाद. लेखकाने वाचकांना घातलेली सादही याच पठडीतील. साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर मुक्तीसाठी केलेल्या सत्याग्रहाचा लेखक एक भागीदार नि साक्षीदार. त्यामुळे साहचर्य, संपर्कातून येणारी सजीवता या लेखात आपसूक अनुभवायला मिळते.
  हा सारा लेखसंग्रह म्हणजे प्रा. पाटगावकरांसारख्या धडपडणाच्या शिक्षकांची संस्कार तळमळ. हे एक खदखदणारे समता अभियान होय. प्रा. ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, प्राचार्य राम शेवाळकर प्रभृती वर्तमान संस्कारदीपांच्या प्रस्तावनापुरस्काराने या पुस्तकास एक वेगळीच धार आली आहे. ज्या कुणा पालक, शिक्षकांना आपली मुले विद्यार्थी पुरोगामी व्हावेत असे वाटत असेल त्यांनी हा ग्रंथ त्यांच्या हाती द्यायलाच हवा.


• 'समतेच्या दिंडीचे धारकरी' (भाषणसंग्रह)

 लेखक - प्रा. चंद्रकांत पाटगावकर
 प्रकाशन - कल्पक प्रकाशन, कोल्हापूर

 किंमत ६0/- रुपये

♦♦

'त्रिवेणी' : गुलजार अल्पाक्षरी काव्य


 एकाच माणसाची किती रुपे असू शकतात! कथाकार, कवी, चित्रपट, गीत लेखक, संवाद लेखक, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, सतारवादक, मित्र, प्रेमी, पती, संस्कारी पिता नि सर्वांत महत्त्वाचे रूप म्हणजे संवेदनशील मनुष्य' या साऱ्या गुणवैशिष्ट्यांनी कुपीबद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे गुलजार. गुलजार देशाच्या फाळणीत पाकिस्तानातून भारतात आले. जीवन संघर्षाने त्यांना दोन गोष्टी बहाल केल्यात. एक जीवन जगण्याच्या जाणिवांची बेचैनी नि दुसरी ती व्यक्त करण्याची संवेदनशील प्रतिभा. गुलजारांची कविता जगणे घेऊन येते. आश्वस्त करते. आत्मिक प्रचिती देत जगण्यावरची श्रद्धा वाढवते. जगणे समजावते. अशाच छोट्या कवितांचा संग्रह आहे ‘त्रिवेणी.'

 ‘त्रिवेणी' हे संकलनाचे शीर्षक असले तरी खरे तर ते स्वरूपसूचक आहे. ‘त्रिवेणी' गुलजारांनी शोधून काढलेल्या, घडवलेल्या छंदाचे नाव. हा छंद त्रिपदी आहे. संस्कृत, मराठी, हिंदीसारख्या भारतीय काव्यात दोन, चार, पाच ओळींचे छंद विपुल, त्रिपदी छंद अपवाद. ‘गायत्री' सारखा आठ अक्षरी, त्रिपदी छंद सर्वश्रुत आहे. गुलजार मुळात कवी, गायक, संगीतकार असल्याने रियाझावर त्यांचा विश्वास आहे. किंबहुना रियाझ हीच त्यांच्या काव्याची बैठक होय. तेच त्यांचे अधिष्ठान होय. मला आठवते त्यांच्या प्रारंभिक त्रिवेणी मी तत्कालीन ‘सारिका' पाक्षिकात (नंतर ते मासिक होऊन बंद झाले.) १९७२७३ च्या दरम्यान वाचल्या होत्या. ‘सारिका' तसे कथेस वाहिलेले पाक्षिक; पण त्यात अधेमधे छोट्या काव्य नि कथारचना (लघुकथा, लघुकाव्य) प्रकाशित होत राहायच्या. तब्बल सत्तावीस, अठ्ठावीस वर्षांच्या दीर्घ रियाझाची फलश्रुती म्हणजे 'त्रिवेणी' छंदाची निर्मिती.

 ‘त्रिवेणी' हे तीन ओळींचे काव्य, हायकूसारखे छोटे. हायकूही त्रिपदी काव्यच. पण ते प्रामुख्याने निसर्गाला समर्पित. गुलजारांची ‘त्रिवेणी' म्हणजे संयुक्त नि संक्षिप्त गझलच. दोन ओळींचा एक शेर असतो त्रिवेणीत. गुलजारांनी या ओळींना गंगा, यमुना म्हटले आहे. तिसरी ओळ सरस्वतीसारखी असते. गंगा, यमुनेतून निर्माण होणारी नि परत त्यांच्यातच विलीन होणारी. त्रिवेणीची तिसरी ओळ काव्याला पूर्णत्व देते. प्रारंभिक दोन ओळींत विषय विस्तार असतो. तिस-या सारस्वत ओळीत निष्कर्ष, पूर्णत्व भरलेले असते. हा त्रिवेणी संगम छंदास पूर्णता बहाल करतो.

 'त्रिवेणी'बद्दल गुलजारांच्याच शब्दात सांगायचे झाले तर म्हणता येईल, ‘सिर्फ एहसास है ये, रुह से महसूस करो (या आहेत फक्त जाणिवा. त्या तुम्हास आत्मिक अनुभवांनीच समजतील.) त्रिवेणी गुलजारांनी हिंदीत लिहिलेले त्रिपदी काव्य होय. जीवन जाणिवांची आत्मिक प्रचिती देणा-या या त्रिवेणी तुम्हास मनुष्य जीवनाची किती तरी शोभादर्शकीय बिंबे दाखवतील. प्रेम, प्रणय, विरह, मीलन, फाळणी, जगणे, विकास, शोषण, नाती, इच्छा, आकांक्षा, पर्यावरण कोणते विषय या त्रिवेणी आपल्या कवेत नाही घेत? दुथडी भरून वाहणा-या नदीप्रमाणे या त्रिवेणी सारा आसमंत आत्मसात करताना दिसतात. या त्रिवेणी कधी अगदी सोप्या, सहज असतात.
 जिन्दगी क्या है जानने के लिए
 जिन्दा रहना बहुत जरूरी है।
  आज तक कोई भी रहा तो नहीं।
 मरण अटळ आहे. खचित म्हणून का जगण्याचा आनंद हरवायचा? यांची रचना सोपी असली, तरी त्या तुम्हास सतत बेचैन करीत राहतात. वाचकास अंतर्मुख करण्याची प्रचंड ताकद घेऊन येणा-या त्रिवेणी हर्ष, शोक, आश्चर्य सारे भाव निर्माण करतात. या त्रिवेणीत समकालीन बोध असतो. एका अर्थाने त्या काव्यात वर्तमानाची व्याख्याच असते.
 भीगा भीगा सा क्यों है यह अखबार
 अपने होकर को कल से चेंज करो ।
  ‘‘पाँच सौ गाँव बह गये इस साल।
 मथळा वाचून विकल झालेला कवी, पेपरवाला बदलून अश्रू, रक्तांनी भरलेली वर्तमानपत्रे थोडीच बदलणार. त्यासाठी गरज आहे समजा, मन बदलण्याची, दस-यांची दु:खे आपली म्हणून कवटाळणारा हा कवी साने गुरुजींइतकाच भावुक. वर्तमान युगात माणसांचे जगणे क्षणाक्षणाने मृत्यूच्या दाढेत जाणे झालेय. त्याचे चित्रण करताना कवीने केलेले व्यंग कोण नाकारेल.
 न हर सहर का वो झगडा, न शव की बैचेनी
 न चुल्हा जलता है घर में,
  न आँखें जलती है।
  मैं कितने अमन से घर में उदास रहता हूँ। जगण्याच्या परवशतेने माणसाला निष्क्रिय निर्जीव करून टाकले आहे. गुलजारांच्या त्रिवेणी प्रेम प्रणयाचा सुगंधही घेऊन येतात. कधी कधी त्या विरहाचा धूपही घालतात.  शोला सा गुजरता है मेरे जिस्म से हो कर
  किस लौ से उतारा है खुदावंत ने तुम को।
 तिनको का मेरा घर है, कभी आओ तो क्या हो ?

 त्रिवेणीची निर्मिती रूपा अॅड कंपनीने अत्यंत सुबक केली आहे. चौरस आकारातला हा काव्यसंग्रह काव्यप्रेमींना नक्कीच भुरळ घालील, असे त्यांचे अंतर्बाह्य रूप आहे. शीर्षकास साजेलसे सुबोध चौरंगी मुखपृष्ठ. गुलजारांनी हा संग्रह आपली कन्या बोस्की हिला अर्पण केला आहे. समर्पणाच्या त्रिवेणीत ते म्हणतात, या लिफाफ्यात माझे सारे अनुभव संचित आहे. कदाचित ते पुढील प्रवासात तुला उपयोगी पडेल, बोस्कीशी साधलेला हा संवाद एका अर्थाने वाचकांशी पण आहे. या त्रिवेणींचे हेच असाधारण महत्त्व आहे की त्या आपले जीवन समृद्ध, सफल करण्यास साह्यभूत होतात. त्रिवेणी वाचून प्रत्येक वाचक एक सुस्कारा सोडील नि त्यांचे जीवन सुसह्य होईल. त्रिवेणी हे जीवनस्पर्शी काव्य होय.

 गुलजारांची मातृभाषा उर्दू, त्यांच्या या हिंदी कवितेत जागोजागी अरबी, फारसी शब्द येतात. पण त्यामुळे मूळ काव्याचा आशय मुळीच झाकोळत नाही. कलेच्या दृष्टीने म्हणाल तर या शब्दांनी या काव्यास झळाळीच येते. काव्य अधिक गंभीर, चिंतनक्षम होते. गुलजार काव्यात सोप्या उपमा वापरतात. रूपक समजायला मात्र पुर्नवाचनाची अट असते. तसे गुलजारांचे लेखन सहज पडलो नि वाचले अशा श्रेणीतले मुळीच नाही. त्यामागे एक जीवनदृष्टी, जीवनबोध निश्चित आहे. गुलजारांना सामाजिक, राजकीय प्रश्नांची चांगली जाण आहे, हे त्याच्या बंद, विभाजन, भग्न मनुष्यासारख्या विषयांवरील त्रिवेणीतून स्पष्ट होते. त्रिवेणी काव्यसंग्रहात मनुष्य, निसर्ग जगण्याचे प्रश्न अशा त्रिविध रूपांचे चित्रण आहे. त्यामुळे या त्रिवेणी एकदा वाचल्या की, त्या तुमच्या मनात कायमच्या 'घर' करतात. गुलजार सूक्ष्म समाज निरीक्षक आहेत. भाव नि विचारांचा सुंदर संगम या त्रिवेणीत आढळतो. जीवन विसंगती, वैफल्य, वैषम्य सान्यावर हळुवार फुकर घालत हा कवी जगण्याची ऊर्मी फुलवतो. माणसाचे एकटेपण, अपूर्णत्व समजावत या त्रिवेणी जीवनास सुफळ, संपूर्ण करण्याची धडपड करतात. हेच या काव्याचे पाथेय नि प्रचितीही.


• त्रिवेणी - गुलजार (काव्यसंग्रह)
 प्रकाशन - रूपा आणि कंपनी, मुंबई
 पृष्ठे - १२९  किंमत - १९५ रुपये.

♦♦

‘ऋतू उग रही है' : स्थलांतरित मनाच्या कविता


 ‘जोनाकी', 'माती, पंख आणि आकाश' व दूर राहिला गाव' सारख्या साहित्य कृतीमुळे मराठी रसिकांना परिचित असलेले ज्ञानेश्वर मुळे हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी होत. परदेश सेवेत नियुक्ती झाल्याने त्यांना जपानच्या राजदूतावासात जावे लागते. टोकियोसारख्या महानगरात राहात असताना त्यांचे मन मात्र मातीकडे सतत ओढ घेत राहते. मोठ्याने ओरडता येत नाही, झाडावर दगड मारता येत नाही, आई गं म्हणून ठेच लागली तरी धीर द्यायला कोणी असत नाही, आक्काच्या पदराला तोंड नाही पुसता येत... म्हटले तर साधे हरवलेले जीवन... पण त्याने होणारी शरीर, मनाची तडफड... त्यातून कविता साकारते... त्या कवितेत स्थलांतरित पक्षाची तगमग, कासावीस क्षणोक्षणी प्रतिबिंबित होते. कधी प्रेयसीची आठवण, कधी पत्नीचा विरह, मित्राची प्रतीक्षा, ऋतूंचा बहार, बैठका, शिखर परिषदा, मंत्र्यांचे दौरे, पंचतारांकित संस्कृती या सर्वातून कवी हरवलेले पाथेय सतत शोधत राहतो. 'ऋतु उग रही है' हा ज्ञानेश्वर मुळेचा हिंदी काव्यसंग्रह. मराठी भाषा कवीने हिंदी कविता लिहिणे ही स्वागतार्ह गोष्ट असली तरी लक्ष्य भाषेचे सामर्थ्य, सार्थक्य प्रतिबिंबित व्हायचे तर ती भाषा आत्मीय व्हावी लागते. तशी ती न झाल्याने ऋतु उग रही है' मधील कविता भाव, बिंब, शिल्प सर्वांगानी वाचकास स्पर्श करत असल्या, तरी भाषिक सहजतेच्या अभावी हृदयास भिडत नाहीत, भेदत नाहीत.

 'ऋतु उग रही है'मधील अधिकांश कविता जपानमध्ये लिहिलेल्या. परदेशातील वास्तव्यात स्वदेशाचे हरवलेपण अधिक आठवत राहात, खटकत राहते, बेचैन करते. पूर्वस्मृतींना उजाळा, गतकाळातील स्मृतींची एकांत रवंथ एकटेपणाची खरी सोबत होते. या भावभूमीच्या ब-याचशा कविता. काही दिल्ली, बेळगावच्या मुक्कामात जन्मलेल्या. कवितेचा रचनाकाळ गेल्या पाच वर्षांचा. त्यामुळे या कवितेत वाचकास नुकत्याच खुडलेल्या फुलांची ताजगी नि गंध दोन्ही अनुभवास येतात. कवीचे निसर्गाशी जितके अतूट नाते तितकेच जीवन, जगण्याचे संदर्भ परिरातील वस्तू नि वास्तूशीपण! या संग्रहातील कवितेचे विषय, प्रेम, प्रणय, राजनीती, समाज जीवन असले तरी या कविता विलक्षण व्यक्तिवादी होत. परिसराची प्रतिक्रिया म्हणून जन्मलेल्या या कविता कवींचे जीवन चिंतन प्रतिबिंबित करतात. संग्रह शीर्षक कविता महानगराची गती नि गत चित्रित करते. राजधानीतील वसंत जीवनात मात्र ग्रीष्मच निर्माण करतो. 'पंचतारा जीवन'मध्ये कवी ‘गड्या आपुला गाव बरा'चा भाव निर्माण करतो. कवी राजनीतिज्ञ म्हणून बैठकीतून स्वैर संचार करतो खरा, पण त्याचे मन मात्र भटकत राहते. मन हरवलेल्या ‘प्रिय'च्या शोधात... फुजीसानचे सौंदर्य, बर्फाच्छादित शिखरे त्याला भुरळ नाही घालत... ही असते माती नि नाती. इत्यादीपासून झरणारी ऊब, आत्मीयता...

 ‘अंधेरा अच्छा लगता है, मुख्यमंत्री आ गये' सारख्या या संग्रहातील रचना गंभीर व्यंग रचना होत. कवीची जाण, प्रौढपण, देशप्रेम समज व्यक्त करणाऱ्या या रचना...
 ‘जिनका काम है प्रकाश दिखलाना
  वही लगे अंधेरा बाँटने
 सारख्या काव्यपंक्ती पुरेशा बोलक्या होत.
 कॉरिडॉर के गांधी बाबाने बंद कर ली है अपनी आँखें
 प्रकाश का अर्थ उन्होंने पाया है...
 मेरे फटे झोले से...
 म्हणणाऱ्या कवीस परिस्थितीच्या पतनाचे पुरेसे भान नि ध्यान असल्याचेच या ओळी स्पष्ट करतात. मुख्यमंत्री जपानला येतात. तिथले वैभव, यंत्रवत जीवन, स्वच्छता पाहून प्रभावित होतात. अधिका-यांना हुकूम सोडतात. ‘आपल्या गावी असे करा' अधिकारी माना डोलावतात. त्यांच्या मनात मूलभूत प्रश्न असतो.
 हाँ जी, हाँ जी सर, सब कुछ बनायेंगे
 पानी की चिंता है, वो कहाँ से लायेंगे?
  हा छोटासा प्रश्न स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांचा हिशेब पुरता करतो.  ‘अर्जी में लिखा है' कविता कलात्मक, उपमा नि व्यंगांचे अद्वैत या कवितेत चपखल प्रतिबिंबित झाले आहे. चुंबन की राजमुद्रा' शरीरी प्रेमाची कविता. पण तिला कवीने भावनेची चांगली डूब दिली आहे. या संग्रहातील अनेक कवितांत कवीचे मन विमान, पक्षी होऊन सतत हरवलेले आकाश शोधत असल्याचे जाणवते. ‘विमान... मेरा मन' कवितेच्या शीर्षकानेही ते पुरेसे लक्षात येते. 'विमान... आसमान में कविताही याच पठडीतली. ‘अस्पताल...बेलगाम' या संग्रहातील वेगळी कविता, मरण प्रतिबिंबित करणारी. निसर्ग व नियतीचे नाते जोडणारी.  श्री. ज्ञानेश्वर मुळे हे मूलतः हरवलेले जीवन शोधणारे कवी. त्यांच्या कविता एका अर्थाने स्वगत होत. आपण काय गमावले नि कमावले याचा न मांडलेला अमूर्त हिशेब त्यांच्या अवचेतन मनात सतत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करत असतो. यातून त्यांना आपल्या कवितेचे सामर्थ्य लक्षात येते नि मर्यादाही. हा कवी जमिनीवर घट्ट पाय रोवून उभा आहे. आकाशात मन झेपावत असले तर आपल्या मातीच्या पायाचे भान या कवीस आहे.

 मैंने हमेशा बचाया है अपनी कविताओं को
 अर्थहीनता से
 सारख्या ओळीतून ते जाणवते.
 ‘दुख की सारणी में क्या उगा सकता हूँ उन्मेष की कलियाँ?'

 असा प्रश्न करणारा कवी एका अर्थाने आत्मभानच स्पष्ट करतो. ‘शब्दों के शृंगार से बारिश नहीं होती' म्हणणाऱ्या कवीस आपली कविता शब्दप्रभू आहे, कलात्मक नाही याचे भान असल्याची प्रचिती देते. मराठी कवी हिंदी कविता लिहितो तेव्हा फार कमी लोकांना ही जाण असते. एका अर्थाने हे या कवीचे प्रौढत्वच होय. जाणिवेचे प्रौढत्व!

 मैं हमेशा वर्तमान हूँ' म्हणणारी ज्ञानेश्वर मुळेची “ऋतु उग रही है 'मधील कविता आधुनिक उपमाने घेऊन येणारी असल्याने अधिक जवळची वाटते. तीत इंडिका, मारुती, कॉरिडॉर, निर्मल वर्मा, गुरुदयालसिंह, दिल्ली, तोक्यो, बेळगाव, मंगोलिया सारे असते. त्यामुळे ती वैश्विक परिदृश्य निर्माण करते. ही कविता यंत्र बनत चाललेल्या मनुष्याचे मृत्यूगीत गात तुम्हास भावना, संवेदना, प्रेम, निसर्ग, आत्मीयता, मातीची ओढ, देशप्रेमसारख्या भावना जपण्याचे आव्हान करते. कवीचा हा हिंदीतील पहिला प्रयत्न पाहता तो वाचकांच्या मनात मोठ्या आशा जागवतो. मराठी कवितेस वैश्विक पटलाचे भान देणारी ही कविता मराठी कवींनी जरूर वाचायला हवी.


• ऋतु उग रही है' (काव्यसंग्रह)

 लेखक - ज्ञानेश्वर मुळे
 प्रकाशन - आलोकपर्व प्रकाशन, दिल्ली

 पृष्ठे - ११०  किंमत - १00 रु.

♦♦

'तिस-या बिंदुच्या शोधात' : स्त्री विकासाची मार्मिक समीक्षा


लोकसाहित्याच्या व्यासंगी संशोधक डॉ. तारा भवाळकर मराठी साहित्य समीक्षेच्या प्रांतात स्त्रीवादी चिकित्सक म्हणून सर्वश्रुत आहेत. गडक-यांच्या साहित्यातील स्त्री प्रतिमांचे चित्रण त्यांनी ‘प्रियतमा' (१९८५) मध्ये केले आहे. डॉ. रा. चिं. ढेरेंसारख्या ज्येष्ठ संशोधकांबरोबर त्यांनी लिहिलेले ‘महामाया' कोण विसरेल? ‘लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा' (१९८९) स्त्री मुक्तीचा आत्मस्वर' (१९९४) 'माझीये जातीच्या' (१९९५), ‘मायवाटेचा मागोवा (१९९८) सारख्या संशोधनपर समीक्षा लेखनानंतर नुकतेच हाती आलेले ‘तिस-या बिंदूच्या शोधात' (२00१) पुस्तक स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. हे पुस्तक त्यांच्या पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. एकाच दृष्टीने नि शोधाची विशिष्ट दिशा ठरवून केलेले हे वैविध्यपूर्ण लेखन एकत्र वाचण्याने समीक्षक लेखकाची दृष्टी समजून घेण्यास उपयोगी ठरते. पुस्तक वा ग्रंथरूप लेखनाचा एक फायदा असतो. लेखक आपल्या मनोगतात लेखना मागील आपली भूमिका व उद्देश वाचकांपुढे स्पष्ट करत असतो. डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या ‘तिस-या बिंदूच्या शोधात' च्या प्रारंभी निवेदन' व 'थोडी पार्श्वभूमी' शीर्षकांतर्गत जो मजकूर लिहिला आहे, तोही अशी भूमिका स्पष्ट करणारा आहे.

 डॉ. तारा भवाळकरांनी वेळोवेळी पाहिलेले चित्रपट नि नाटके, वाचलेल्या कथा, कादंबच्या, चरित्रे, आत्मचरित्रे यांची स्त्रीवादी परिदृष्टीतून केलेली चिकित्सा करणाच्या लेखांचा संग्रह ‘तिस-या बिंदूच्या शोधात' आहे. ‘शोधात या नावातच शोध सुरू असल्याचे, तो न लागल्याचे, त्यामुळे हाती पूर्ण सत्य न गवसल्याची कबुलीच लेखिका देते. स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याच्या उद्देशाने झालेल्या या लेखनात डॉ. भवाळकर माहेर नि सासरच्या परीघाबाहेर माणूस म्हणून स्त्रीची ओळख नाटक, चित्रपट, कथा, कादंबरी, आत्मकथनांतून होते का, तिच्या विकासाचा तिसरा प्रस्थान बिंदू कुठे सापडतो का, याचा शोध घेते. स्त्री पुरुषांनी आजवर केलेल्या लेखन, चित्रणातून स्त्रीवादी दृष्टीने समीक्षा, चिकित्सा, शोध घेतल्यास तिसरा विकास बिंदू अद्याप तरी हाती आलेला नाही. हे लेखन त्या दृष्टीने केलेली धडपड मात्र खचितच आहे. डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या चिकित्सेतून काढलेला स्त्री लेखनाचा हा निष्कर्ष स्त्रीवादी अंगाने लेखन करणा-या सर्वांना विचार करायला लावणारा आहे. हेच या ग्रंथाचे मोठे यश आहे.

 डॉ. तारा भवाळकर यांनी ग्रंथातील स्त्री आत्मकथनाचे सार’ लेखात पार्वतीबाई आठवलेंच्या 'माझी कहाणी' पासून ते अलीकडच्या मेधा किराणेंच्या ‘नरसाबाई' पर्यंतच्या मराठी स्त्री आत्मकथनांची चिकित्सा केली आहे. ते करताना त्या ठळक व बहुचर्चित स्त्री आत्मकथनांचाच विचार करतात. ‘स्मृतीचित्रे', 'मला उद्ध्वस्त व्हायचंय', 'नाच गं घुमा', 'आहे मनोहर तरी', ‘बंध अनुबंध' ची विस्ताराने चर्चा आहे. माझ्या जल्माची चित्तरकथा', 'जिणं आमुचं', ‘अंत:स्फोट’, ‘बिनपटाची चौकट'चे उल्लेख आहेत. मराठी स्त्री आत्मकथनात खरे तर उच्चभ्रू, मध्यमवर्गीय स्त्री लेखकांपेक्षा उपेक्षित नि सामान्य स्त्रियांनी जे लेखन केले, त्यात खरे तर तिसरा बिंदू ठळक दिसतो. डॉ. तारा भवाळकर यांनी ‘नाच गं घुमा', ‘आहे मनोहर तरी', नि ‘बंध अनुबंध' या आत्मकथनांच्या चिकित्सेत जी तटस्थता नि परखडपणा दाखवला आहे, त्याची दाद द्यायला हवी. त्यांना हे लेखन मुखवटा घेऊन केलेले दिसते. शिवाय ते सारे लौकिकांच्या डोळे दिपवणाच्या यशाचे पुरुषी व्यवस्था नाकारणारे, पती 'मित्र' नव्हता अशी खंत व्यक्त करणारे ‘गृहिणीच्या परीघातले वाटते, आणि ते खरेही आहे.

 या लेखाला जोडूनच ‘पडद्यामागचं घर' मध्ये ताराताईंनी 'मी दुर्गा खोटे', ‘चंदेरी दुनियेत', 'कशाला उद्याची बात', 'सांगत्ये ऐका', ‘जाऊ मी सिनेमात?', ‘स्नेहांकित', ‘अशी मी जयश्री', ‘जगले जशी’, ‘माझी नृत्यसाधना' सारख्या स्त्री आत्मकथनांची केलेली चिकित्सा अधिक भावते. तिसरा बिंदू इथे अधिक प्रकर्षाने हाती येतो तो अभिनेत्री लेखकांनी 'घर' नि 'मी' च्या शोधात केलेल्या खऱ्या संघर्षामुळे. या सगळ्या आत्मकथांचे स्वत:चे एक सूत्र आहे. अभिनेत्रींच्या वाट्याला आलेले भोग पुरुषी अत्याचाराचे खरे; पण यात स्त्रीची स्वत:ची काही भूमिका/भागीदारी असते का, यांचा विचार आत्मकथनात होत नाही व चिकित्सेतही. नीरक्षीर न्यायाचे मूल्यमापन विशिष्ट वाद दृष्टीने केलेल्या लेखनात दिसणे दुरापास्त असते. ते इथेही, पण डॉ. तारा भवाळकर यांनी या लेखात चित्रपटासारख्या कला क्षेत्रातील स्त्री जोखीम नव्या पिढीसाठी गांभीर्याने नोंदली आहे.  श्रीनिवास जोशींच्या ‘आमदार सौभाग्यवती' नाटकाच्या निमित्ताने केलेले परीक्षण राजकारणाच्या अवकाशातील स्त्री प्रतिमेचा नि प्रतिभेचा शोध ठरावा. स्त्री आपले ‘बाहुलीपण' नाकारून 'स्वतंत्र माणूस' म्हणून जगण्याचा प्रयत्न करते, तेव्हा पुरुष सर्व शक्तीनिशी नि सर्व मार्गांनी (साम, दाम, दंड, भेद) ती आपल्या हातातले ‘खेळणे कसे आहे, हे दाखविण्याचे सतत उद्दाम प्रदर्शन कसे करतो, याचे मार्मिक प्रत्यंतर हा लेख देतो. महाभारतातील ‘कण्वनीती असो वा ‘वर्तमानातील स्त्री आरक्षण नीती' दोन्ही मूल्यशून्यतेच्याच निदर्शक! स्त्री भावनेचे खच्चीकरण करणाऱ्या पुरुषी अहंकाराचा दर्प ठेवण्याची ऊर्मी जागवणारा हा लेख स्त्रीवादी समीक्षेतील स्फुलिंग दाखवतो.

 'तेरूओ’ आणि ‘काही दूरपर्यंत' हा गौरी देशपांडेच्या लघु कादंब-यांची चिकित्सा करणारा लेख या ग्रंथातील सर्वाधिक महत्त्वाचा व विचारगर्भलेख होय. स्त्री-पुरुष संबंध हा दोन्ही कादंबरींचा समान विषय. पण त्यातून घेतलेला वैश्विकतेचा शोध मात्र अनाकलनीय! विवाहबाह्य संबंध लेख इतिहासाच्या अंगाने व मार्गाने घेतलेला स्त्रीच्या तिस-या बिंदूचा शोध होय. यात समीक्षिकेने इतिहासाच्या तटस्थतेचे पालन केल्याने ते अधिक न्यायसंगत व न्यायसंमत सिद्ध झाले आहेत. आजवरचे पुरुषसापेक्ष जीवन विधायकतेपेक्षा विनाशांचा अनुभव देणारे. यावर विधायक उतारा म्हणजे प्रेम. तो उतारा स्त्रीच देऊ शकते, हा डॉ. तारा भवाळकरांचा ठाम विश्वास ; पण त्यासाठी कोणताही आधार देत नाहीत. त्यामुळे तो एकांगी वाटला नाही तरच नवल!

 ‘अंतरांजली यात्रा' व अग्निस्नान' हे दोन प्रायोगिक चित्रपट डॉ. भवाळकर दूरदर्शनवर पाहतात नि प्रतिक्रिया म्हणून लेख लिहितात. त्यात परीक्षणाचा भाव नाही. कथालेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार अशा तपशिलांना फाटा देऊन केवळ कथेच्या अंगाने घडणा-या स्त्री प्रतिमेचा शोध घेतात. या लेखनात सहज केलेल्या प्रवासातील अनुभवसंपन्नता जशी आहे, तसे अभिव्यक्तीतले लालित्यही! दरदर्शनवरून दाखविले जाणारे प्रादेशिक भाषांतील चित्रपट अभिरुचीसंपन्न नि म्हणून अभिजात असतात. ही या लेखाची रुजवण कला नि साहित्य संस्काराच्या दृष्टीने लाखमोलाची वाटते. 'अंतरांजली यात्रा' तील ‘डोंब' पुरुष पात्र असूनही मनात माणुसकीचा तो डोंब उसळवतो तो वाचक कधीच विसरू शकणार नाही.

 पूर्वप्रकाशित या लेखांचा संग्रह एकत्रितरित्या वाचताना विचारांची संगती लावणे जसे सोपे जाते, तसे निष्कर्षाप्रत पोचणेही सुलभ होते. आकर्षक मुखपृष्ठ सोलापूरच्या पोरे बंधूचे आहे. डॉ. तारा भवाळकरांच्या लेखनास लोकसाहित्याच्या व्यासंगाचे अधिष्ठान आहे. संशोधनाची शिस्त आहे. त्यामुळे त्यांच्या चिकित्सेत स्त्री भावुकता असते. त्यांच्या चिकित्सेत स्त्री न्यायाची धडपड दिसून येते. आपल्या लेखनातून त्या स्त्रीची बलस्थाने जशी रेखांकित करतात, तशाच त्या स्त्रीच्या कमजोर पक्षावर-घर, अपत्यसुख यावर बोट ठेवायलाही विसरत नाहीत. त्यामुळे ही चिकित्सा अधिक मर्मग्राही ठरते.


• तिस-या बिंदुच्या शोधात

 लेखक - डॉ. तारा भवाळकर
 प्रकाशन वर्ष - २00१

 पृष्ठे - १७३  किंमत - १२0 रु.

♦♦

‘चाकाची खुर्ची' : अपंग समाजसेविकेचे आत्मकथन


महाराष्ट्रास समाजसेवेची दीर्घ परंपरा आहे. महाराष्ट्रातील कल्याणकारी कार्यामागे ख्रिश्चन मिशनरींची प्रेरणा आहे. येथील पहिले संस्थात्मक कार्य मिशनच्यांनी सुरू केले. अनाथ, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, बालगुन्हेगार, महिला, परित्यक्ता सर्वांच्या कल्याणकारी संस्थांमागील प्रेरणा पाहताना हे स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ‘बालहत्या प्रतिबंधकगृहापूर्वी (१८६३) महाराष्ट्रात सुरू झालेली पहिली कल्याणकारी संस्था डेव्हिड रिफॉर्मेटरी स्कूल, माटुंगा, मुंबई (१८५७) ब्रिटिशांनीच सुरू केली होती. नंतर प्रार्थनासमाज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्नल लॉईड, कानजी द्वारकादास, मिस. एस. के. डेव्हिस यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्योत्तर काळात सर्वश्री गोदावरी परूळेकर, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, इंदिराबाई हळबे, सिंधुताई जोशी, अंबुताई मेहेंदळे, कुमुदताई रेगे, प्रभृती भगिनींनी आदिवासी कल्याण, बालशिक्षण, अनाथांचे संगोपन, मतिमंदांचे शिक्षण, पुनर्वसन, परित्यक्ता कल्याण अशा क्षेत्रात कार्य करून त्या संस्थांच्या कार्याशी आपले अभिन्न नाते जोडले. गेल्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात (आणीबाणीनंतर) नसीमा हरजूक यांनी अस्थिव्यंगांच्या पुनर्वसन क्षेत्रात केलेले कार्य उपरोक्त परंपरा वृद्धिंगत करणारे आहे, हे त्यांचे आत्मकथन ‘चाकाची खुर्ची' वाचताना लक्षात आल्यावाचून राहात नाही. सारे जग सत्तेची संगीत खुर्ची खेळण्यात दंग झालेले असताना सेवेच्या खुर्चीवर खिळून राहणे ही साधी गोष्ट नाही. सामान्यांना त्यांच्या धडधाकट शरीराने जो पराक्रम करता आला नाही, तो नसीमा हुरजूक यांनी आपल्या संस्था व कार्य सहकार्याच्या सहयोगातून करून दाखवला. त्याचा चढता आलेख 'चाकाच्या खुर्चीची पाने चाळत आपण जसे पुढे जाऊ तसा डोळ्यांपुढे मूर्त होतो. सामाजिक प्रबोधनाच्या हेतूने लिहिलेली आत्मचरित्रे मराठीत विपुल आहेत. धोंडो केशव कर्व्यांचे ‘आत्मवृत्त' (१९१५) श्री. म. माट्यांचे ‘मी व मला दिसलेले जग' (१९५७), पार्वतीबाई आठवल्यांची ‘माझी कहाणी' (१९२८), लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे' (१९३४-३६) ही सहज आठवणारी नावे. तशीच आत्मकथनेही विपुल आहेत.  जीवनाच्या संध्याछायेत लिहिली जातात. आत्मकथने जीवनाच्या उभारीत त्यात प्रबोधनापेक्षा अनुभवकथन, कृतज्ञताज्ञापन व कृतकृत्याचा भाव असतो. ‘मागच्यास ठेच, पुढचा शहाणा' असे अनौपचारिक शिक्षण व शिकवण देणाच्या चाकाची खुर्ची'सारख्या आत्मकथनाचे साहित्यापेक्षा सामाजिक मोल मोठे असते. मूल्यमापनाचे परिमाणही सामाजिकच लावणे अधिक तर्कसंगत असतं.

 नसीमा हुरजूक काही जन्मजात अपंग नव्हत्या. वयाच्या सोळाव्या वर्षी प्री डिग्रीमध्ये शिकत असताना पाठीचे दुखणे उद्भवण्याचे निमित्त झाले नि त्यांच्य कंबरेखालच्या भागाचे चैतन्य हरवले. उन्मळून पडल्यावर सुद्धा उठायची, उभी राहायची जिद्द त्यांच्यात बालपणीपासूनची, बालपणीच्या वृत्तीच प्रौढकाळी फोफावतात. तसेच झाले. पॅराप्लेजियाची शिकार झाल्या तरी त्यांनी उभारी सोडली नाही. अशात बाबूकाका दिवाण यांच्यासारखी प्रेरक व्यक्ती त्यांना जगण्याचा अर्थ समजावते नि चाकावर खिळलेल्या नसीमा हुरजूकना आकांक्षापुढे गगन ठेंगणे वाटू लागते. सुरुवातीस त्या एक संस्था स्थापन करतात. तपभर एकत्र काम करतात. पुढे स्वतंत्र चूल थाटतात. त्यांचा सामाजिक संसार, हेतूची शुद्धता व प्रयत्नांची पराकाष्ठा या दोहोंच्या बळावर सतत वाढत अपंगांचा कल्पवृक्ष बनतो. हे सारे सहज नाही घडत. पावलोपावली अडचणी, मर्यादांचे डोंगर, प्रत्येक वेळी शिखर सर करण्याची सुरसुरी, समाज व कार्यकर्त्यांच्या बळावर उशिरा परंतु यश मिळत गेले. लढल्याशिवाय हरायचे नाही' हे डॉ. अरुण लिमयेंचे ब्रीद त्यांनी अजाणतेपणी आचरले नि तोच त्यांचा जीवनधर्म बनला. आज शासनाने दिलेल्या विस्तृत जागेवर व लोकाश्रयावर कोल्हापूरच्या उचगाव उपनगरात ‘हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड' संस्था ही अपंगांचे अस्थिव्यंगांचे संगोपन, शिक्षण, सुसंस्कार, उपचार, पुनर्वसन असे संस्थात्मक नि संस्थाबाह्य स्वरूपाचे कल्याणकार्य करते. हे सारे चलत् चित्रपटासारखे आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते ते लेखिकेच्या चित्रात्मक शैलींमुळे.

 चाकाची खुर्ची' हे नसीमा हुरजूकनी लिहिलेले आत्मकथन म्हणजे ‘आधी केले मग सांगितले'अशा धर्तीचे असल्याने त्यास एक कृतिशील अधिष्ठान आहे. त्यांची लेखनपद्धती जसे घडले तसे लिहिले' स्वरूपाची असल्याने या आत्मकथनात सहजतेतले सौंदर्य आहे. त्या कोणतीही भूमिका (पोज) घेऊन लिहीत नसल्याने वाचकांना थेट भिडते. यांच्यात आपणास साहाय्य करण्याविषयी कृतज्ञतेचा भाव आहे. छोट्या छोट्या सहाय्यकांच्या नोंदीतून त्याचे मोठे मन प्रकटते. या आत्मकथनात सर्वांना शिकण्यासारखे भरपूर आहे. सर्व सुख असताना लोळत आयुष्य घालविणा-याना ही चाकाची खुर्ची' चालायची प्रेरणा देईल. सत्तेच्या खुर्चीत मशगूल असलेल्या शासनास ही ‘चाकाची खुर्ची' कमिशनकडून 'मिशन'कडे जाण्याचा मार्ग दाखवील. खुद्द अपंग बंधू, बांधवांना ही ‘चाकाची खुर्ची' कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला ही शिकवण देईल.

 उत्कृष्ट आत्मकथनाची एक कसोटी असते. ती वाचकानुगणिक अलगअलग प्रेरणा देते. चाकाची खुर्ची आत्मकथन याच पठडीतले. मुळात हे आत्मकथन दैनिक सकाळ, कोल्हापूर आवृत्ती १९९९ च्या सुमारास धारावाहिक प्रकाशित झाले होते. चाकाची खुर्ची' हे त्याचे ग्रंथ रूप. मुखपृष्ठापासून भरारी घेणारे हे आत्मकथन मलपृष्ठावर पोहचत आपणास संवेदनशील, अंतर्मुख नि कार्यप्रवण करते. मेहता पब्लिशिंग हाउसने त्याची निर्मितीही दर्जेदार केली आहे. आत्मकथनाचे प्रेरक संपादक श्री. अनंत दीक्षित यांच्या या अपूर्व लढ्यामागील प्रेरणा विशद करणारे प्रास्ताविक जीवनावरील श्रद्धा वाढवणारे ठरतं. चाकांची खुर्ची' स्वप्नांची गोफण फिरवत सारे आकाश कवेत घेऊ पाहते... स्थितीशील मनुष्य, पाखरांना सतत भरारी घेण्यास भाग पाडणाच्या या आत्मकथनाच्या प्रत्येक शब्दात हिंदीतील प्रख्यात कवी दुष्यन्त कुमारांच्या या ओळीचे बळे एकवटलय...
 ‘दुख नहीं कोई कि अब उपलाब्धियों के नाम पर,
 और कुछ हो या न हो, आकाश-सी छाती तो है।'


• चाकाची खुर्ची (आत्मकथन)

 लेखिका : नसीमा हुरजूक
 प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

 पृष्ठे - २२0,  किंमत - १८0 रु.

♦♦

‘घडण' : सामान्याच्या धडपडीचे आत्मचरित्र


 ‘घडण' प्राचार्य अरविंद सातवेकरांचे आत्मचरित्र आहे. एक सुताराचे पोर. घरची गरिबी, अशिक्षित आई-वडील. गावही निरक्षर, पोर सातवी पास होते, याचं साऱ्या गावाला अप्रूप. म्हणून मुलाला बोर्डिंगात शहरात शिकायला ठेवले जाते. हायस्कूल, कॉलेज करीत मूळचा तुकाराम सुतार पदवीधर होता. एका कथेच्या लेखक रूपाने अरविंद सातवेकर असे टोपण नाव धारण करतो. हे केवळ नामांतर नसते. असतो तो कायाकल्प व्यक्मित्त्वाचा, जीवनाचा. पुढे ते पदवीधर होऊन डी. बी. एड्. होतात. गारगोटीच्या मौनी विद्यापीठात प्राध्यापक नि पुढे प्राचार्य होऊन निवृत्त. 'घडण आत्मचरित्राचे हे संक्षिप्त कथानक. यात तुम्हास एका सामान्याचा असामान्य जीवन संघर्ष वाचावयास मिळतो.

 माणूस मोठा कसा होतो हे ज्यांना समजून घ्यायचे असेल त्यांनी ‘घडण' वाचायलाच हवे. ‘घडण'च्या लेखनाची बैठकच मुळी संस्कारपीठाची आहे. आत्मकथा हे व्यक्तीच्या गतजीवनाचे केवळ सिंहावलोकन असत नाही, तर ते भविष्यात दिग्दर्शनही असते. ‘घडण'मध्ये ती शक्ती आहे. अंतर्बाह्य सोज्वळ कथनाची शैली लाभलेले हे आत्मकथन लोभस वाटते. ते त्यातील पानागणिक भरलेल्या कृतज्ञता वृत्तीमुळे. माझी घडण अशी झाली, यांनी ती केली, असं प्राचार्य सातवेकर जेव्हा घडणद्वारे सांगत राहतात, तेव्हा ते आई-वडील डॉ. जे. पी. नाईक, डॉ. डी. वाय. पाटील यांचे ऋण आवर्जून नोंद करतात.

 घडण हे उरबडवे आत्मकथन नाही. या घडणीत आपण प्राचार्य सातवेकरांचे उत्तरायुष्य वाचतो, तेव्हा त्यात ऋणाईताच्या भावनेने केलेली विधायक परतफेडही लक्षात येते. कोल्हापूर महानगरपालिकेत जे. पी. नाईकांचे तैलचित्र लावणे, आपल्या पगारातील काही वाटा सतत कष्टकरी, गरीब विद्यार्थ्यांना देणे, या गोष्टी साधेपणातून एका मोठ्या अनुकरणाची पायवाट निर्माण करतात. ‘घडण' आत्मकथेचे साहित्यिक मूल्य समीक्षक करतीलच. मला या आत्मकथेचं सामाजिक मोल अधिक वाटते. बरीच आत्मकथने लोक वाचताक्षणी विसरतात. ‘घडण'ची कथा तुमच्या मनाकानात सतत सक्रिय कृतज्ञतेचा वसा जिवंत  राहावा म्हणून विचारांचा भुंगा घोंघावत ठेवते. अनुकरणाच्या पातळीवर वाचकास सक्रिय करण्याच्या कसोटीवर हे आत्मकथन अपारंपरिक नि म्हणून महत्त्वाचे ठरते. माणसाचे जीवन केवळ वद्य पक्षाने भरलेले नसतेच मुळी. कृष्ण पक्षाच्या झालरीशिवाय वद्याची रंगत ती कुठली? प्राचार्य सातवेकर ‘घडण' मध्ये कटू प्रसंग नोंदवतात. त्यात त्यांची शालीनता आढळते. ते खेड्यात राहूनच त्यांनी खेड्यातील मुलांसाठी अध्यापन केले. शिक्षण महाविद्यालयात सेवेची संधी मिळाली. शिक्षकांच्या नव्या पिढीची घडण करणारा हा शिल्पकार! आपल्या विद्यार्थ्यांच्या घडणीत खोट राहू नये म्हणून त्यांची धडपण असायची. ती अधिक भावते ती धडपडीतल्या भाबडेपणामुळे. प्राचार्य सातवेकरांची घडण नि जीवन म्हणजे अखंड भाबडेपण.

 ‘घडण' प्राचार्य सातवेकरांच्या जीवन, व्यक्तिमत्त्व नि कार्याचा आलेख रेखाटणारे व्यक्तिगत लेखन. आठवणी सांगत त्यांनी वाचकांशी सहज संवाद साधलाय. गतकाळचे सिंहावलोकन करताना त्यांचे मन दाटून येणे स्वाभाविक म्हणायला हवे. ‘घडण'मध्ये आंतरिक जिव्हाळा आहे. मांडणीतही साधेपणा आहे. अकारण कलात्मक, ललित करण्याच्या हव्यासापासून लेखक दूर राहिल्याने या आत्मकथेस सहजतेतले सौंदर्य लाभलंय. ते स्वान्तः सुखाय आहे. परहिताची ओढ ही या लेखनामागे स्पष्ट आहे. लोकशिक्षणाची बैठक लाभलेले हे आत्मकथन एका ऋजू व्यक्तीची निर्व्याज अभिव्यक्ती होय.


• ‘घडण' (आत्मकथन)

 लेखक - प्राचार्य अरविंद सातवेकर
 प्रथमावृत्ती - मार्च २००१
 प्रकाशक- महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर.

 पृष्ठे १६0 किंमत १00 रुपये.

♦♦

‘गजाआडच्या कविता' : बंदीबांधवांचे व्यथाकाव्य


 महाराष्ट्रातील तुरुंगात शिक्षा भोगणा-या बंदिजनांनी केलेल्या कवितांचा संग्रह आहे ‘गजाआडच्या कविता'. मुळात कविमनाची संवेदना लाभलेल्या व सध्या नाशिकच्या ‘सकाळ'चे संपादक म्हणून कार्यरत असलेल्या श्री. उत्तम कांबळेनी तो संपादित केलाय. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने तो प्रकाशित केला आहे.

 कारागृहातील बंदिजनांच्या मनाची घालमेल प्रतिबिंबित करणा-या या काव्यसंग्रहाचे साहित्यिक मूल्य तर आहेच; पण त्यापेक्षा त्याचे सामाजिक मूल्यही महत्त्वाचे वाटते. यानिमित्त आजवर महाराष्ट्र सारस्वताच्या परीघाबाहेर राहिलेल्या कवींच्या रचना केंद्रगामी झाल्या. या कवितांना आरक्षण, सवलतीचे लेबल लावून सहानुभूतीच्या कुबड्या देऊन त्यांना प्रोत्साहन, प्रशंसा देण्याची गरज नाही. कारण या बंदिजनांच्या भोगण्यातून, तुरुंगाच्या एकांतातून निर्माण झाल्यात. त्या स्वतः इतक्या प्रगल्भ नि प्रबुद्ध आहेत की त्यांच्या प्रतिभेचे मूल्यमापन केवळ भावनेच्या कसोटीवरच (खरे तर संवेदनेच्या!) शक्य आहे.

 तुझ्या एका नकारात
 आयुष्य उद्ध्वस्थ करणारा तुरुंग आहे.
 आता मी एक कैदी,
 उर्वरित आयुष्य एक तुरुंग आहे.

 नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील नरेश राठोडच्या या ओळी वाचकांच्या मनात संवेदनेचा सुरुंग पेरतात नि उडवतातही. 'काळ्याकभिन्न दगडांच्या भिंतीत कोंबलेला माणूस (हितेश शहा) ज्यांना समजून घ्यायचा आहे, त्यांना ‘गजाआडच्या कविता' वाचण्याशिवाय पर्याय नाही. तुरुंग माणुसकीला पारखे झालेले एक अमानुष बेटच म्हणायला हवे. तुरुंग माणसातील धगधगणाऱ्या निखाऱ्यांची कायद्याच्या एका फपकाऱ्याने (नि फटका-यानेही) राख करून टाकतो. क्षणात माणसाचे जीवन उद्ध्वस्त होते. होत्याचे नव्हते कसे, का केव्हा, कुठे होते ते पाहायचे तर तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही. तुरुंग ही घुसमट असते. असतो तो कोंडमारा. गुदमरलेपण काय असते हे तुरुंगातील  बंदिजनच जाणे. मनाची घालमेल तगमग, येरझाच्या हेलपाट्यातील ससेहोलपट अनुभवायची तर गजाआडच्या मनाचा गुंता समजून घ्यायला हवा. असे नसतेच मुळी की तुरुंगात फक्त गुन्हेगार असतात अन् बाहेरचे जग सावांचे असते. कायदा, साक्ष, पुरावे, जबान्यांच्या जबड्यात जे अडकतात ते तुरुंगात जातात. किती तरी छोटे मासे गिळलेले महामासे चतुर, चाणाक्षपणे कायद्याच्या जंजाळातून चकवा देत संभावितपणे फिरत असतात. म्हणून रियाझ बादशहांना म्हणावे लागते-

 जेव्हा मी या जगाचा इतिहास लिहीन,
 त्यात माझ्यावर झालेला अन्याय लिहीन,
 निर्दोषींना दोषी करार देणाऱ्या
 व्यवस्थेचा इतिहास लिहीन!

 मला ‘गजाआडच्या कवितांचे महत्त्व अशासाठी की ही कविता पारंपरिक व्यवस्थेचा बुरखा फाडू इच्छिते, नवा इतिहास रचू इच्छिते, लिहू इच्छिते. या कवितांत माणूस, देश, देव, आई, प्रेयसी, पत्नी, घर, मुले-बाळे, जशी आहेत तसे चांदणे, नक्षत्र, आकाशही आहे. सर्वस्व हरवल्यानंतरच माणसास गमावल्यांची किंमत कळते. सारे जीवन शून्य झाल्यावर माणसास पूर्ण हरवल्याची वेदना, व्यथा अस्वस्थ करते. मग रमेश खाडे लिहिते होतात-

 नाती-गोती सर्व काही
  इथं विसरून जायचे,
  फक्त आणि फक्त
 गगनच पहायचे!

 अन् तुरुंगातले प्रत्येक दिवस विदीर्ण काळीज, शून्य नजरा, हळवी मने, घेऊन वागवायचे. असे असते तुरुंगातील जिणे. या कविता आपणास तुरुंगातील जिणे समजावतात. एका नव्या अपरिचित मना, जनांची ओळख करून देतात. एकविसावे शतक साहित्याच्या संदर्भात ‘वंचितांचे शतक' राहणार आहे. आजवर ज्यांना समाजाने सारस्वतातून बहिष्कृत मानले त्यांच्या साहित्याचे हे शतक असेल. अनाथ, अंध, अपंग, देवदासी, वेश्या, तृतीयपंथी, बंदिजन, बकरे, खबरे, गोसावी, पारधीच आता साहित्याची पारध करते होतील असा आशावाद जागवणारा हा कवितासंग्रह म्हणून अधिक आश्वासक वाटतो. तो साहित्यिक निकषांवरही अधिक उमदा नि उजवा वाटतो.

 संग्रहातील कवींना शब्दांची चांगली जाण आहे. लय नि लालित्याचेही भान आहे, असे शिवाजी साळुखे ‘सायरन...कारागृहातला' कविता वाचताना येते. ही या संग्रहातील व्यवच्छेदक रचना होय. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज नाशिकच्या कारागृहात तेथील बंदिजनांच्या कविता ऐकण्यास गेले असता त्यांनी अशा संग्रहाची कल्पना मांडली. त्यामुळे कारागृहातील बंदिजनांच्या मनात कुसुमाग्रजांबद्दल अपार आस्था. ती ‘सायरन' कवितेत प्रतिबिंबित झाली आहे. अनेक अंगांनी ही कविता अंगावर येते.
 तुरुंगांना व्यक्ती संदर्भ असतो तसा इतिहासही. तुरुंगातले जीवन रोज रजा, पॅरोल, मेडिकल, पनिशमेंट, जमिनीवर बदलत असते. एका कैद्यास जामीन मिळालेला. तो जामीनदाराच्या रकान्यात कुसुमाग्रजांचे नाव लिहितो. तेच त्याचे तुरुंगातील एकमेव आशास्थान. तुरुंगाच्या भिंतींना बातम्यांचे वावडे असते. कैद्याला कळते ते केव्हाच निवर्तले. तो प्रसंग शब्दबद्ध होतो तेव्हा ‘गजाआडच्या कवितेस साहित्य, समीक्षा, समाज संवेदना, लालित्य प्रतिभा अशा कोणत्याच बेगडी परिणामांची गरज उरत नाही.  जगातले श्रेष्ठ साहित्य, अनुवाद, कविता, इतिहास, तत्त्वज्ञानाचे लेखन, तुरुंगातच झाले. 'गजाआडच्या कविता' चा संदेश घेऊन येतात. पापाचे खरे प्रायश्चित्त पश्चात्ताप असतो. तो झाला की, मग वेगळ्या शिक्षेची गरज राहात नाही. यातील अधिकांश कवितांत पश्चात्तापाचा दाह आढळतो. आपले समाजमन अजून क्षमाशील होऊ पाहात नाही. या कविता समाजाला क्षमाशील करू इच्छितात. या कविता ‘माणूस आतल्या आत किती प्रवास करतो' ते समजावितात. या कवितांत प्रेम, प्रणयाची ओढ आहे तशीच विरहाची तगमगही. ही कविता मन हे दचकून दंग होते, असे व्हावयास नको होते याची कबुली देते. यातील कविता दूर राहिलेल्या गावाशी हितगुज करते. देव देवळात नसतो... अल्ला मशिदीत नसतो... तो माऊलीच्या हृदयात असतो, म्हणणारा मातृप्रेमी कवी इथे आहे. इथल्या कवींच्या लेखी तुरुंग म्हणजे खोटारड्या जगाची खरी ओळख आहे. या कवितांत शाहिरी आहे, देशप्रेमही आहे. ईश्वराचा हताश धावा आहे. या कवितांत फुले, फांदी, पौर्णिमा नि चांदणेही भरलेले आहे. आठवणीने व्याकूळ होणाच्या ‘गजाआडच्या कविता माणूस झाला छोटा ची जाणही देत्या होतात, तेव्हा त्या वेगळ्या समेवर पोहोचतात.


‘गजाआडच्या कविता' (काव्यसंग्रह)

 संपादक - उत्तम कांबळे,
 प्रकाशन - महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई

 पृष्ठे - ४७  किंमत - ३0 रुपये.

♦♦

बालकुमार साहित्यसेवकाचे जीवन व साहित्य


 मराठी साहित्याच्या इतिहासातील सर्वाधिक उपेक्षित अंग म्हणजे बालकुमार साहित्य! म्हणूनच की काय, मराठी बालकुमार, साहित्यिकांच्या जीवनाचा व साहित्याचा वेध घेणारे पुस्तक मराठी सारस्वतात सापडणे हा कपिलाषष्ठीचा योग म्हणायला हवे. असा योग श्री. शशिकांत महाडेश्वर यांनी लिहिलेल्या ‘बालकुमार साहित्यसेवक रा. वा. शेवडेगुरुजी : जीवन व साहित्य' या पुस्तकामुळे घडून आल्याने त्याचे स्वागत करावे तेवढे थोडेच आहे.
 रा. वा. शेवडेगुरुजी गेल्या शतकाच्या उत्तरार्धातील मराठीतील ज्येष्ठ बालकुमार साहित्यिक. आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी १०८ पुस्तकांचे लेखन व प्रकाशन करून कित्येक मराठी पिढ्यांची जडणघडण केली. श्रीमती माँटेसरींचे प्रत्यक्ष शिष्य, साने गुरुजींचा आशीर्वाद व प्रेरणा, वि. स. खांडेकरांचा निकटचा सहवास, मास्टर विनायकांचे प्रोत्साहन या सर्वांमुळे शेवडे गुरुजींचे जीवन समृद्ध व संस्कारित झाले. ५0 कथासंग्रह, तीन कवितासंग्रह, पाच नाटुकली, सहा कादंबच्या, ३८ चरित्रे, पाच विविध बालग्रंथ लिहिणाऱ्या शेवडेगुरुजींनी एका पुस्तकाचा अपवाद वगळता सारे लेखन बालकांसाठी केले.
 बालसाहित्य समीक्षेच्या प्रांगणात संशोधनात्मक लेखनाचा नवा पायंडा पाडणा-या या छोटेखानी पुस्तकात लेखकाने विविध अंगानी शेवडेगुरुजींच्या जीवनाचा व साहित्याचा वेध घेतला आहे. ‘जीवन व कार्य' मध्ये जन्म, बालपण, शिक्षण, उपजीविका, साहित्यसेवा, बालसाहित्य चळवळीतील भागीदारी, कौटुंबिक जीवन, लाभलेले मानसन्मान, सर्वांचा वस्तुनिष्ठ आलेख आहे. ‘कथाविश्व' प्रकरणात कथालेखनामागील प्रेरणा नोंदवून उपलब्ध कथासंग्रहांचा परिचय देण्यात आला आहे. तिस-या भागात शेवडे गुरुजींच्या काव्य लेखनाचा आढावा आहे. गुरुजींच्या काव्यसुमनांची नावे ‘बालिश बडबड’, ‘बाळगाणी', असली तरी बालमनाचा गंभीर विचार करून त्यांना गुणगुणायला शिकविण्याच्या उद्देशाने ती लिहिली होती, हे लेखक लक्षात आणून देतो. या भागात महाडेश्वरांनी गुरुजींची काव्यवैशिष्ट्ये अधोरेखित करून पुस्तकाचे समीक्षामूल्य जपले आहे. शेवडेगुरुजींनी नाट्यप्रवेशिकाही लिहिल्या. पाच नाट्यग्रंथांत त्यांच्या तेरा प्रवेशिका संग्रहित करण्यात आल्या आहेत. या नाटुकल्यांचा आशय, मांडणी, भाषा, कथासार, देऊन त्यांचे साहित्यिक मूल्य लेखकाने आवर्जून प्रतिपादिले आहे. शेवडे गुरुजींनी कुमारांसाठी कादंबरिका लेखन करून बालवयातील वाचनवेड स्थिरस्थायी व्हावे म्हणून धडपड केली. कथा प्रांतानंतरचा मुलांचा प्रिय साहित्यप्रकार म्हणजे चरित्रे. बालवयात भाषणांची सुरसुरी भागविणारी चरित्रे प्रेरक ठरतात, हे लक्षात घेऊन गुरुजींनी अनेक चरित्रे लिहिली. श्री. महाडेश्वर यांनी या चरित्राची विषय, आशय लक्षात घेऊन विभागणी केली आहे. याशिवाय या पुस्तिकेत लेखकाने संकीर्ण लेखन, गुरुजींची साहित्य चळवळ, योगदान, जीवनपट, समग्र साहित्यसूची, गुरुजींवरील संदर्भलेख व लेखनाची माहिती देऊन हे पुस्तक माहितीच्या अंगाने स्वयंपूर्ण व समग्र बनविले आहे.

 श्री. महाडेश्वरांनी मोठ्या कष्टाने लिहिलेल्या व प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे साहित्य, संशोधनाशिवाय जसे सामाजिक मूल्य आहे; तसेच ऐतिहासिक मूल्यही आहे. शेवडे गुरुजींनी ज्या काळात पुस्तके लिहिली, त्या काळात प्रकाशक ती छापण्यास अनुत्सुक असायचे. गुरुजींनी पदरमोड करून ती छापली. दारोदार जाऊन विकली. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांना अन्य प्रकाशक लाभले. ही त्यांची बाल नि साहित्य निष्ठा. इतक्या प्रतिकूल स्थितीत मार्गक्रमण करणारे शेवडेगुरुजींनी आपल्या अमृतमहोत्सवी समारंभात लाखाची रक्कमही आंतरभारतीच्या वि. स. खांडेकर स्मारकासाठी दिली, हे सांगणारे हे पुस्तक प्रत्येक मराठी घर, ग्रंथालय, शाळेत जाऊन केवळ चालणार नाही, तर मुलांशी नाते जोडण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक शिक्षकाने ते दैनिक आचाराचा परिपाठ म्हणून अभ्यासायला हवे.


‘बालकुमार साहित्यसेवक रा. वा. शेवडेगुरुजी :

 जीवन व साहित्य (चरित्र)
 लेखक - शशिकांत महाडेश्वर
 प्रकाशन- मनोज प्रकाशन, कोल्हापूर

 पृष्ठे - ५६  किंमत - ३५ रु.

♦♦

‘संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन' : विहंगमावलोकन


 भारतीय समाज आज पुन्हा एकदा धर्म, देव, दैव, जात आदींसारख्या विज्ञानाधिष्ठित समाजरचनेस छेद देणाऱ्या विचारधारांच्या विळख्यात अडकतोय की काय अशी साधार भीती वाटू लागली आहे. धर्म, संत यांची एके काळची विश्वासार्हता लोप पावली आहे. याचे कारण समाजमनाचे राजकीयीकरण होणंच आहे. पूर्वी समाज धर्माधिष्ठित होता. समाजावर राजाचे वैधानिक अधिपत्य असलं, तरी नैतिक नियंत्रणाचा लगाम संतांच्या हाती होता. संत विचार आचारांनी स्वतंत्र होते. ते राजसत्तेसही फटकारताना मुलाहिजा ठेवत नसत. आज राजकीय पक्षांचे देशावर अधिपत्य आहे. राजकीय पक्ष विचारभ्रष्ट जसे आहेत तसे ते आचारभ्रष्टही. दुर्दैवाने त्या सर्वांचे कुणी ना कुणी बाबा महाराज, संत, महंत, आश्रयदाते, आशीर्वादी, पुरस्कर्ते व समर्थक आहेत. आजचे संतच राजकीय वळचणीत दबा धरून बसलेले आश्रित व गुलाम झाले आहेत. अशा परिस्थितीत प्राचीन संतांचे विचार ख-या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन करणारे होते. धर्मनिरपेक्ष नसले तरी परधर्म सहिष्णू होते. हे त्यांच्या साहित्यावरून सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. आज धर्म, संत, देव जातींचा वापर समाजास सर्रास दिग्भ्रमित करण्यासाठी होत असतानाच्या काळात प्राचार्य रा. तु. भगत यांनी संपादित केलेला ‘संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन' सारखा ग्रंथ डोळे उघडणारा, विवेक जागवणारा ठरतो. ग्रंथास प्राचार्य राम शेवाळकरांची प्रस्तावना आहे. तिचा बराचसा भार श्रद्धेवर खर्च झाला असला तरी संतांच्या अंधश्रद्धेचे कार्य ते नाकारत नसल्याने ती ग्रंथांच्या विषयवस्तूस पुढे नेणारी ठरली आहे.

 अंधश्रद्धा निर्मूलनानेच समाज पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, मानवतावादी, समताधिष्ठित होऊ शकेल. याबद्दल प्राचीन संतांच्या मनात शंका नव्हती. त्यामुळे ते अंधश्रद्धेवर प्रहार करण्यास मागे पुढे पाहात नसत. या ग्रंथातील कबीरांचे विचार यासंदर्भात लक्षात घेण्यासारखे आहेत. यामध्ये बावीस अभ्यासकांचे लेख आहेत. बाराव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंतच्या नऊशे वर्षांतील प्रागतिक, पुरोगामी, विचारांच्या संतांच्या साहित्याचा अभ्यास करून लिहिलेले हे सर्व लेख विचारगर्भ झाले आहेत. या ग्रंथांमुळे संत साहित्याकडे नव्या समाजरचनेस उपकारक अशा दृष्टीने पाहण्याची दिशा मिळते. ही या ग्रंथांची खरी सामाजिक कामगिरी.

 ग्रंथात सर्व ग्रंथ बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, सावता माळी, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, सेना महाराज, कबीर, रोहिदास, निळोबा, रामदास, गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा परामर्श घेऊन हे संत अंधश्रद्धा निर्मूलनाचे समर्थक कसे होते ते सप्रमाण विशद करण्यात आले आहे. लेखात संतांची वचने उदाहरणापेक्षा प्रमाणाचे, पुराव्याचे कार्य करतात. ग्रंथांची बैठक समाजास विज्ञानाधिष्ठित करण्याची आहे. त्यामुळे प्राचार्य अद्वैतानंद गळदगे यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणारा निबंध या ग्रंथाचा प्राण होय. डॉ. तारा भवाळकर, डॉ. एन. व्ही. पाटील, डॉ. शिवशंकर उपासे, डॉ. य. शं. साधू यांचे लेख निर्णायक होत. डॉ. हे. वि. इनामदारांचा लेख श्रद्धा व अंधश्रद्धेच्या सीमारेषा आखणारा आहे. कबीरांवरील अस्मादिकांचा लेख अमराठी संतांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य रेखांकित करणारा आहे.

 प्राचार्य रा. तु. भगतांनी ग्रंथाद्वारे संतांचे पुरोगामित्व वेळीच प्रकाशात आणले. हे साहित्यिक तसेच समाज मूल्यवर्धन करणारे कार्य होय. हा ग्रंथ अंधश्रद्धा निर्मूलन कार्य पुढे नेणारा, विज्ञानाधिष्ठित समाजाचा पुरस्कार करणारा. समाजात समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता रुजवणारा असल्याने त्याचे संदर्भमूल्य मोठे आहे. वर्तमानावर वेळीच प्रहार करण्याची मोठी ताकद या ग्रंथात असल्याने पुरोगामी व प्रतिगामी दोघांच्या डोळ्यांत अंजन घालून त्यांच्यात हा ग्रंथ नीरक्षीर न्याय विवेक निर्माण करणारा वाटतो.


• संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन, (लेखसंग्रह)

 संपादक : प्राचार्य रा. तु. भगत प्रकाशन चैतन्य, कोल्हापूर

 पृष्ठे २३0 किंमत - १७५ रु.

♦♦

त्रिवेणी' : गुलजारांच्या काव्याचा मराठी अनुवाद


गुलजार संवेदनशील कवी, तर शांता शेळके भावग्राही अनुवादक! या सुरेख संगमामुळेच साकारली उर्दू, हिंदी नि मराठीची ‘त्रिवेणी', त्रिवेणी हा गुलजारांनी घडवलेला त्रिपदी छंद. तीन दशकांच्या निरंतर रियाजानंतर तो समृद्ध झाला.

 शांता शेळके यांना हिंदी, उर्दची चांगली जाण होती, हे गुलजारांच्या मूळ हिंदीत लिहिलेल्या 'त्रिवेणी' या त्रिपदी गझल संग्रहाचा मराठी अनुवाद वाचत असताना लगेच लक्षात येते. त्यात त्यांचा पिंड कवयित्रीचा. त्यामुळे भाव नि भाषेचा सुरेख संगम या अनुवादात पदोपदी लक्षात येतो. हा अनुवाद हिंदी मराठीस जोडणारा दुग्धशर्करा योग होय. फाळणीनंतर जी माणसे पाकिस्तान सोडून भारतात आली, त्यापैकी गुलजार एक होत. फाळणीच्या वेदनांनी त्यांचे काव्य ओथंबलेले आहे. ते अशा त्रिपदी गझल वाचताना तीव्रतेने जाणवते.

 मी आपले सारे सामान घेऊन आलो होतो बॉर्डरच्या अलीकडे.
  माझे मस्तक मात्र कुणी कापून ठेवून दिले तिकडेच.
  माझ्यापासून अलग होणे रुचले नसेल तिला कदाचित.

 गुलजारांची ‘त्रिवेणी' नामक त्रिपदी अल्पाक्षरी गझल होय. पहिल्या दोन ओळींचा शेर असतात गंगा-यमुना. हा असतो विषय विस्तार. तिसरी ओळ असते सरस्वती. तीत गझलचा आशय अमूर्त,अव्यक्त असतो सरस्वतीसारखा गुप्त, काव्य वाचकांनी स्वानुभवांच्या समृद्धीवर स्वविवेक नि स्वतर्क इत्यादींच्या बळांवर तो जाणून घ्यायचा. त्यामुळे ‘त्रिवेणी समजायची तर कवी नि वाचक यांच्यात अद्वैत भाव, भाषा, भंगिमांचा त्रिवेणी संगम होणे पूर्वअट असते. गुलजारांची कविता अनुभवाच्या समृद्धीसह भाषांतरित करायची तर अनुवादकामध्ये ते सारस्वत कौशल्य, ती साहित्य प्रतिभा असणे अनिवार्य. ती शांता शेळकेंमध्ये होती. ज्या मराठी वाचकांना त्यांच्या 'कॉफी हाउस, प्रत्येक टेबलावर नवा पाऊस,' सारख्या हायकूचे त्रिपदींचे सौंदर्य पेलता आले, त्यांना या ‘त्रिवेणी' म्हणजे नवी पर्वणीच वाटल्याशिवाय राहणार नाही. त्रिवेणी अनुभवजन्य तशीच भावसमृद्ध! मराठी अनुवाद करताना शांता शेळके यांनी मूळ ‘त्रिवेणी'तील आशयास धक्का लावू न देता त्यांचा अनुवाद केला आहे. काही ठिकाणी तर हा अनुवाद मूळ रचनेच्याबरहुकूम झालेला आढळतो.

 वह जिससे साँस का रिश्ता बंधा हुआ था मेरा
 दबा के दाँत तले साँस काट दी उसने
 कटी पतंग का मांझा मुहल्ले भर में लुटा।
 सारख्या या हिंदी ‘त्रिवेणी' चा शांता शेळकेंनी केलेला खालील मराठी अनुवाद याचा ठळक पुरावा म्हणून सांगता येईल.

 जिच्याबरोबर श्वासाचे धागे जोडले होते मी,
 ते नातेच दातांनी धागा तोडावा तसे तोडले तिनेआणि...
 आता काटलेल्या पतंगाचा तुटका मांजा लुटला जातो आहे मोहल्ल्यात!
 ही गोष्ट अलाहिदा की जोडलेच्या ठिकाणी ‘जडले' नि ‘मोहल्ल्याच्या ठिकाणी ‘गल्लीत' शब्दांची रचना चपखल ठरली असती.

 ‘त्रिवेणी' या गुलजारांच्या नवरचित छंदांच्या संग्रहाचा मराठी अनुवाद हा शांता शेळके यांनी मराठी साहित्यास दिलेली शेवटची देणगी नि म्हणून तिचे ऐतिहासिक मूल्य राहील. हा अनुवाद गुलजारना इतका भावला की, त्यांनी तो खालील शब्दात शांताबाईंना समर्पित केला-
 शान्ताबाई,
 आप सरस्वती की तरह मिली।
 और सरस्वती की तरह गुम हो गयी।
 ये ‘त्रिवेणी' आप ही को अर्पित कर रहा हूँ।
  गुलजार.
 मूळ रचनाकाराने अनुवादकाचा केलेला असा सन्मानही माझ्यासारख्या, अन्य अनुवादक, अभ्यासकास वैश्विक घटना वाटल्यावाचून राहणार नाही. अशी दाद दर्दी कलाकारच देऊ जाणे।

 सरस्वतीच्या प्रतीकात्मक चिन्हाचे साधे परंतु आशयघन मुखपृष्ठ लाभलेला हा मराठी भाषांतरित काव्यसंग्रह मूळ हिंदी ग्रंथांच्या एक तृतीयांश किमतीत मराठी काव्यरसिकांना त्यांच्या बोलीत उपलब्ध करून देऊन मराठी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाउसने ‘मराठी पुस्तके महाग असतात' हा आरोप अपवादाने खोटा ठरवला आहे. तो नियम होईल, तर मराठी साहित्याचा प्रसार होण्यास साह्य होईल, त्रिवेणी' या भाषांतरित गझल संग्रहात विषय वैविध्य आहे. प्रेम, प्रणय, विरह, मीलन, फाळणी, जगणे, शोषण, नाती, इच्छा, आकांक्षा, पर्यावरण सारे विषय सामावून घेण्याची कुवत असलेल्या या त्रिपदीत मनुष्य, निसर्ग व जीवनसंघर्षाचा त्रिवेणी संगम आहे. उर्दू, अरबी, फारसी, शब्दांजागी समर्पक मराठी शब्दरचना करून शांता शेळके यांनी मराठी त्रिवेणी मूळ हिंदी इतक्याच दर्जेदार बनवल्या आहेत. या त्रिवेणीत जीवनाचा सुस्कारा जसा आहे, तशी जीवन सुसह्य करण्याची शक्ती पण! जे लिहाल त्याची साक्ष देईन मी बिनचूक? सारख्या ओळीतून शांताबाईंच्या मनातील अनुवादकाचा आत्मविश्वासच एका अर्थाने प्रकट झाला आहे. हा आत्मविश्वासच या अनुवादाचे आत्मबल होय. हिंदी ‘त्रिवेणी'चा मराठी अनुवाद मात्र शब्दांची टांकसाळ नसून भावनेने गुंफलेली ती मोहनमाळ होय! गुलजार नि शांता शेळके यांच्या काव्यातील भावबंधांचा धांडोळा घेणाऱ्यांना हा अनुवाद भाव नि भाषा सेतू ठरल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो.


• त्रिवेणी गुलजार (काव्यसंग्रह)

 अनुवादक - शांता शेळके
 प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

 पृष्ठे ६४ किंमत ६0 रु.

'व्हॉट वेंट राँग?' : बंदीच्या बोचण्या कथा


 तसे माझे नाव सीमा. एकोणीस वर्षांची असताना अपरिचित दिल्लीत आले. रिक्षावाल्याने फसवून बलात्कार केला. पुढे निकाह, मी अफसाना झाले. तशी घरच्यांनीही मला टाकले, आज पदरातली मुले हाच माझा जीवन आधार!

 मी मनू, वय अवघे नऊ वर्षांचे. दुकान फोडणारा माझा मित्र होता. मैत्री हाच माझा गुन्हा. मी रिमांड होममधून नुकताच बाहेर आलोय. निष्पाप मी. समाजाच्या नजरेत मात्र गुन्हेगार!

 आमचे कुटुंब तसे कुणाच्या अध्यातमध्यात नव्हते. पंजाबात दहशतवाद बोकाळला तेव्हा आमच्यासारखी कुटुंबे हकनाक शिकार झाली. पोलीस नि आतंकवादी दोघांचे आम्ही हक्काचे बळी. आज निर्वासित छावणीत निराश्रितांचे जीवन कंठतोय! माणूसपण हरवलेली माणसे आम्ही!

 या नि अशा किती तरी सामाजिक अत्याचारांच्या बळी ठरलेल्यांच्या आत्मकथांचा संग्रह आहे 'व्हॉट वेंट राँग?' शीर्षकापासून तुम्हास तो विचार करायला भाग पाडतो. भारतीय पोलीस सेवेतील उच्चाधिकारी डॉ. किरण बेदी यांनी आपल्या सामाजिक कार्यानुभवातून 'इंडिया व्हिजन फाउंडेशन' नावाची संस्था स्थापन केली आहे. ती प्रामुख्याने तुरुंगमुक्त बंदिजनांच्या पुनर्वसनाचे कार्य करते. 'नवज्योत' ही व्यसनमुक्तीची सामाजिक पुर्नस्थापना करण्याचा प्रयत्न करते. अशाच आणखी ब-याच संस्था आहेत. ‘फॅमिली व्हिजन', ‘क्राईम होम चिल्ड्रन प्रोजेक्ट' इत्यादी. या संस्था परस्पर सहकार्याने पूरक कार्य करतात. त्याच्याकडे रोज येणारी गा-हाणी किरण बेदी यांनी त्यांच्याच शब्दात आत्मकथनांच्या रूपात आपणापुढे ठेवलीत. ती वाचत असताना मन बधिर होऊन जाते. बुद्धी कुंठित होते. वाचक विचार करू लागतो - नेमके चुकले कुठे? 'व्हॉट वेंट राँग?' मध्ये अशा सदतीस दर्दभच्या कहाण्या आहेत. ज्यांना कुणाला समाजमन, शासन व्यवस्था, पोलिसी यंत्रणा, तुरुंग, रिमांड होम बदलायचे असेल त्यांना हे पुस्तक सामाजिक दस्तऐवजाचे काम करील.

 ‘आय डेअर' हे परेश डंगवाल यांनी लिहिलेले किरण बेदी यांचे चरित्र, ते वाचताना त्यांची घडण नि संघर्ष कळतो. ‘इटस् ऑलवेज पॉसिबल' तिहार तुरुंगाचा ‘तिहार आश्रम' करण्याच्या किमयेची कहाणी. ‘मजल दरमजल' ही सतत पुढच्या पावलांची छाप आपणावर टाकते. पण 'व्हॉट वेंट राँग?' मात्र आपणास अंतर्मुख होण्यास भाग पाडते. बलात्कारित, अत्याचारित, व्यसनाधीन कायद्याचे तांत्रिक बळी, निष्पाप, रमी असणे, सुंदर असण्याचा शाप भोगणाच्या भगिनी, युनियनच्या राजकारणाचे बळी ठरलेले कामगार, पोलीस खाक्याचे बळी वाचले की वाचकांच्या मुठी आपोआप वळू लागतात. या कहाण्यांतील व्यथा तुमच्या संवेदनशील मनास साद घालत पाझर फोडतात. प्रत्येक आत्मकथनाच्या शेवटी डॉ.किरण बेदी यांनी 'कुठे चुकलं?' अशी चौकट टाकली आहे. चौकटीत घटनांचे निष्कर्ष आहेत. ते विचारप्रवण होत. ते नेमके करणे आवश्यक होते. प्रत्येक कहाणीत चूक कोणाची याचा न्याय होता. तर या कहाण्या नेमक्या होत्या; पण ती कठीण गोष्ट आहे खरी. 'नवज्योत', ‘इंडिया व्हिजन', ‘फॅमिली व्हिजन'कडे समुपदेशनासाठी (काऊंसिलींग) आलेल्यांना त्यांच्याच शब्दात त्याचे जीवन लिहिण्यास प्रेरित करण्याचे मोठे काम किरण बेदी यांनी केले आहे. त्यामुळे 'व्हॉट वेंट राँग?' च्या माध्यमातून सामाजिक अत्याचारांचा एक विशाल पटल आपणापुढे उभा राहतो. ज्यांना सुखासीन जीवन लाभले त्यांना या आत्मकथा अतिशयोक्त वाटण्याचा संभव. परंतु ज्यांनी तुरुंग, रिमांड होम, स्त्री आधार केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र पाहिली, अनुभवली असतील त्यांना अजून वास्तव दूरच वाटल्याशिवाय राहणार नाही.  'व्हॉट वेंट राँग?' टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित स्तंभलेखन. नवभारत टाइम्स'मध्ये त्यांचा हिंदी अनुवादही येत राहायचा. लीना सोहनी यांनी त्याचा उत्कृष्ट मराठी अनुवाद पुस्तकरूपात सादर केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने इंग्रजी ग्रंथांच्या मराठी अनुवादाची जी चळवळ सुरू केली आहे त्यातले हे पुढचे पाऊल, या ग्रंथाचे जे साहित्यिक मूल्य आहे त्यापेक्षा मला त्याचे सामाजिक मोल अधिक महत्त्वाचे वाटते. ते अशासाठी की, या ग्रंथात बधिर समाजमनास संवेदन, सक्रिय करण्याची प्रचंड ताकद आहे. हा सामूहिक आत्मकथनपर ग्रंथ सामाजिक अत्याचारांचे अनेक नमुने वाचकांपुढे पेश करतो. लक्षात येते की, किती प्रकारचे अत्याचार असतात समाजात. निरपराधांना अभय देण्यासाठी ‘खल निग्रहणाय' ब्रीद धारण करणारी पोलीस यंत्रणा किती कुचकामी, पक्षपाती, भ्रष्ट आहे. आशावादी उदाहरण अपवाद. समाजाच्यालेखी तुरुंगात जाऊन आलेला, रिमांड होममध्ये असणारा, पोलिसांनी अटक केलेला तो गुन्हेगार हे अविचारी समाजमन भावसाक्षर, निरक्षर, न्यायविवेकी केव्हा होणार? व्यवस्थेविरुद्ध लढणा-यांच्या बाजूने आपण असंघटित होणार की नाही? निरपराधांना सामाजिक अभय केव्हा मिळणार? न्यायातील दिरंगाई केव्हा थांबणार? अशी अनेक प्रश्नचिन्हे निर्माण करणारे हे पुस्तक सामाजिक जागृतीचा व भावसाक्षरतेचा अक्षर ग्रंथ होय. महाविद्यालये, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अशी पुस्तके आता पाठ्यपुस्तके व्हायला हवीत, तरच समाज बदलू शकेल. तरुणाईपुढे विधायक कार्यक्रम आले, तरच समाजहिंसा थांबेल.

 किरण बेदी यांनी समाज बळींच्या बोचच्या आत्मकथा सादर करून वास्तववादी साहित्यशृंखला बळकट केली आहे. यातला सामूहिक आक्रोश आपण कान भरून ऐकला पाहिजे. मन भरून विचार केला पाहिजे व समाज परिवर्तनात आपली सक्रिय भागीदारी निश्चित केली पाहिजे. आपल्या निष्क्रियतेमुळे व्यवस्था मोकाट होईल, तर आपणही केव्हा तरी असे मुकाट, मौन, मतिगुंग बळी ठरू. या ग्रंथाचे जागोजागी सामूहिक वाचन झाले, तरच समाज भावसाक्षर होऊन जुलमी व्यवस्थेस लगाम बसेल. या ग्रंथ प्रपंचामागे किरण बेदींचा होराही हाच आहे.


• व्हॉट वेंट सँग ? (अनुभव कथा)

 लेखक - किरण बेदी
 अनुवाद - लीना सोहनी
 प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे

 पृष्ठे - १८४  किंमत - १५0 रु.

सार्वजनिक सत्यधर्म उपासक डॉ. विश्राम घोले


 डॉ. अरुणा ढेरे यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्माचे उपासक डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार'. या शीर्षकाचा संशोधनपर समाजचरित्र ग्रंथ लिहून डॉ. धनंजय कीर, डॉ. य. दि. फडके यांच्यासारख्या संशोधक चरित्रकार परंपरेचा सार्थ विकासच केला असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. डॉ. विश्राम रामजी व त्यांचे जावई डॉ. रघुनाथ खेडेकर यांच्या चरित्र लेखनाच्या माध्यमातून १८३३ ते १९३0 या जवळजवळ एका शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक घडणीचा व परिवर्तनाचा अप्रकाशित इतिहास या ग्रंथात आहे. ग्रंथास जोडलेली संदर्भ सूची, परिशिष्टे लेखिकेच्या श्रमाची साक्ष देतात. ‘विस्मृतिचित्रे' च्या माध्यमातून त्यांनी अनेक अप्रकाशित स्त्री चरित्रे मराठी सारस्वतास दिली. त्यांच्या या संशोधनपर चरित्र ग्रंथांमुळे चरित्रलेखनाचा नवा वस्तुपाठ निर्माण झाला आहे. महात्मा फुले व सत्यशोधक चळवळींसंबंधाने नवा साधन ग्रंथ म्हणूनही या चरित्र ग्रंथाचे वेगळेपण व महत्त्व आहे.

 डॉ. विश्राम रामजी घोले हे महात्मा जोतिबा फुले यांचे सहकारी. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष. गवळी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाने स्वकर्तृत्वावर कुशल शल्यक्रिया चिकित्सक विशारद म्हणून लौकिक मिळवला. वडिलांप्रमाणे प्रारंभी ब्रिटिश पलटणीत डॉक्टर म्हणून उमेदवारी केली. ब्रिटिशांनी मोडून काढलेल्या १८५७ च्या बंडाचे ते साक्षीदार! पण आपण सरकारी सेवेत असल्याने याबद्दल अवाक्षर काढणे त्यांनी गैर मानले. घरात व समाजात सतत विरोध असतानाही त्यांनी सामाजिक सुधारणांची पाठराखण केली. मुलींच्या शिक्षणासाठी हुजूरपागा शाळेची स्थापना, ब्राह्मणेत्तर समाज उन्नतीसाठी स्थापन केलेल्या 'डेक्कन असोसिएशन फॉर एज्युकेशन अपंग मराठाज्’ चे पदाधिकारी. कोकणातील आडगावी उद्योगशाळेची स्थापना, डॉक्टरी व्यवसायात एकोणिसाव्या शतकातील समाजजीवनाच्या (जाती-धर्मकेंद्री) पार्श्वभूमीवर ‘रोगी' हीच जात मानून सेवा, सर्व प्रकारच्या सामाजिक संस्था, उपक्रमांना सहकार्य, अर्थसाहाय्य, बांधिलकीने काम करण्यांना ‘स्वजन' मानणारे उदारमतवादी, सत्यशोधक समाजानंतर ‘सार्वजनिक सत्यधर्माची' स्थापना, प्रार्थना समाजी, एकेश्वरवादी अशी अनेकांगी वैशिष्ट्ये लाभलेले हे चरित्र डॉ. विश्राम रामजींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असा की, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापल्यावर अनेक समाजधुरीण, उच्चवर्णीयांच्या कुटाळकीचा सत्यशोधक मंडळींना त्रास व्हायचा. डॉ. विश्राम रामजींमुळे तो बंद झाला. यावरून त्यांच्या चरित्राची ओळख पटते. पुण्याचे कमिशनर असलेले डॉ. घोले तत्कालीन व्हाईसरॉयचे सर्जन होते. रावसाहेब, रावबहाद्दर पदवी संपादणारे डॉ. घोले यांना तत्कालीन सरकारने 'सरदार' पदवी द्यायचे एवढ्यासाठीच नाकारले की, त्यांच्याकडे जमीनजुमला नव्हता. या नि अशा अनेक अप्रकाशित प्रसंगांची पेरणी करत लिहिले गेलेले हे चरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या एकोणिसाव्या शतकातील समाजजीवनाचा, मनुष्यसंबंधाचा समाज सुधारणांचा जिवंत इतिहासच. तो वाचताना वाचक शंभर वर्षे मागे केव्हा जातो नि त्यात रमतो, हे त्यालाच कळत नाही. हे या चरित्रग्रंथाच्या यशाचेच चिन्ह होय. शतकापूर्वीचा काळ व व्यक्तिसंदर्भासह सजीव करण्याचे कौशल्य संशोधन श्रमाचे फळ होय.

 तीच गोष्ट ग्रंथातील ‘खेडकर परिवार' या दुस-या भागाचीही आहे. डॉ. विश्राम रामजी घोले यांची कन्या गंगूबाई हिचा विवाह डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्याशी झाला. त्यांच्या परिवाराची चरित्र कहाणी सांगणारा हा भाग. डॉ. रघुनाथराव खेडकर प्रार्थना समाजी. त्यांच्या पत्नी गंगूबाई वेदान्त प्रचारक डॉ. रघुनाथरावांनी हिंदू मिशनरी म्हणून कार्य केले. आपल्या सांगण्याप्रमाणेच त्यांनी कुशल धन्वंतरी म्हणून लौकिक मिळविला. यादव समाजाची अखिल भारतीय संघटना बांधली. पत्नी गंगूबाईही तत्कालीन समाजजीवनाच्या पार्श्वभूमीवर वेगळे जीवन जगली. मागासवर्गीय असून इंग्रजीत शिक्षण, पतीबरोबर परदेश प्रवास, अमेरिकेत एकोणिसाव्या शतकात भारतीय स्त्रीने इंग्रजीत भाषण देऊन तेथील वृत्तपत्रांची प्रशंसा संपादणे या सा-या गोष्टी काळाच्या संदर्भात केवळ अचंबित करणाच्या.

 डॉ. अरुणा ढेरे यांनी या संशोधनपर ग्रंथाने तत्कालीन व्यक्तिसंबंध, समाजजीवन, जाती व्यवस्था, धर्मातर, नवनवीन समाजाच्या (सत्यशोधक, सत्यधर्म, प्रार्थना समाज, थिऑसॉफिकल लॉज इत्यादी) स्थापना, ब्रिटिश राजकारण, स्त्री शिक्षण, ब्राह्मणेतर समाजाचा शिक्षण विकास यासंदर्भात अनेक प्रकारची नवी माहिती उजेडात आणली आहे. आजकाल बहुजन समाजोन्नतीबद्दल बरेच लिहिले बोलले जाते. अशा पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जाणून घेऊन समाजघडणीची व परिवर्तनाची ज्यांना वस्तुनिष्ठ चिकित्सा करायची आहे, त्यांना हा ग्रंथ उद्बोधक ठरतो. या ग्रंथास जोडलेली परिशिष्टे मूळ ग्रंथा इतकीच किंबहुना अधिक उद्बोधक होत. डॉ. रघुनाथराव खेडकरांचे  वडील विठ्ठल कृष्णाजी गवळी मूळचे रत्नागिरीच्या खेडचे. म्हणून ते खेडकर झाले. त्यांनी गवळी समाजाची नियमावली त्या काळी तयार केली आहे. समाजजीवनाचा अभ्यास करू इच्छिणा-यांना ही नियमावली वाचन व अभ्यास दोन्हीसंदर्भात पर्वणी ठरावी. एकोणिसाव्या शतकातील ही नियमावली. तीत म्हटले आहे ‘मुला-मुलींचे लहानपणी लग्न करू नये, एक नवरा-बायको जिवंत असताना सबळ कारणाशिवाय दुसरा-दुसरी करू नये. आपल्या जातीच्या लोकांनी लंगोटीऐवजी धोतर किंवा पंचा नेसण्याची चाल पाडावी. आपण लंगोटी नेसतो म्हणून आपणास नीच मानतात...आपली जात भगवद्गीता अध्याय १८ व ४४ या प्रमाणे वैश्य...परंतु या लंगोटीच्या योगाने आपणास चौथ्या म्हणजे शूद्रांच्या वर्गातले मानतात.

 समाजजीवनाच्या या नि अशा किती तरी पैलूवर नवा प्रकाश पाडणारा हा संशोधनात्मक चरित्र ग्रंथ. पूर्वसुरींच्या वैचारिक धारणेचा अभ्यास करण्यासंदर्भात ऐतिहासिक दस्तऐवज बनून समोर येतो. डॉ. विश्राम रामजी घोले व डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्या परिवारांची ही साद्यंत कहाणी केवळ त्या परिवाराची न राहता तत्कालीन समाजसुधारणेचे व परिवर्तनाचे एक चलचित्र बनून आपल्या डोळ्यांसमोर प्रभावीपणे उभे राहते. आज धर्मनिरपेक्ष समाजाची घडण व्हावी म्हणून धडपड करणाच्या एकोणिसाव्या शतकात पाऊणशे वर्षांपूर्वीचे जाती धर्मांनी करकचून बांधलेले जीवन वाचणे, अभ्यासणे, यासाठी मनोज्ञ ठरते की, त्या प्रतिकूल काळात महात्मा फुले, डॉ. विश्राम घोलेंसारखे समाजधुरीण नवसमाज आकारावा, शिक्षित, उन्नत व्हावा म्हणून अविश्रांत धडपडत होते. हे पाहिले की वाटते त्यांच्या शर्थीची दाद द्यावी व आजच्या रक्ताळणाच्या समाजजीवनात जाती धर्माचे निर्वैर प्रवाह वाहावेत, म्हणून नव्या संदर्भात शर्थीचे प्रयत्न करावेत.


• सार्वजनिक सत्यधर्माचे उपासक डॉ. विश्राम रामजी घोले

 आणि त्यांचा परिवार (चरित्र)
 लेखिका - डॉ. अरुणा ढेरे,
 प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे.

 पृष्ठे - २८२  किंमत - १४0 रुपये

♦♦

बंजाच्याचे घर' : बदलत्या घरांची ललित कथा


 ‘घर' या विषयाभोवती घुटमळणाऱ्या ललित लेखांचे पुस्तक आहे, ‘बंजा-याचे घर'. यशोधरा भोसलेंनी ते लिहिले आहे. पुस्तकात 'घर' विषयाची एक कथाही आहे. शेवटी 'कुणी घर देता का घर?' असा टाहो फोडणाच्या नटसम्राटांची आंतरिक घालमेल घेऊन येणारे हे पुस्तक 'घर' या विषयाशी जोडलेल्या स्त्री मनाचा गुंताही उकलते. व्हर्जिनिया वुल्फनी ‘ए रुम ऑफ वन्स ओन'ची कल्पना मांडली होती. पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमनी तीच कल्पना ‘चौथा कमरा' म्हणून स्पष्ट केली आहे. शांताबाई शेळकेंनी 'चोली का अपना दामन म्हणून समाजाच्या आसमंतातील स्त्री मनाचा अवकाश वर्णिला होता. यशोधरा भोसले आजोळ, माहेर, सासर, मित्र अशी घरांची स्थित्यंतरे अनुभवतात. जीवनात कोसळलेले आकाश पेलत यशोधरा भोसले आपले आकाश, अंगण, आसमंत निर्माण करतात. जीवनातल्या प्रतिकूल क्षणी आपली असणारी माणसे जेव्हा दुरावतात तेव्हा दगडमातीची निर्जीव वाटणारी घरेच ऊब देतात. कधी काळी स्वतः बंजारा असलेला मुख्यमंत्री यशोधरा भोसलेंसारख्या निराधार परागंदा स्त्रीस मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घर देतो तेव्हा ती आई-बाबांची पुण्याई म्हणूनच; पण या साऱ्या प्रवासात लेखिकेस सावरतात ती घरेच तेच तिचे खरे गणगोत.

 ‘बंजाच्याचे घर' जीवनाच्या अवघड वळणावर स्त्रीस बळ देणाऱ्या घराच्या घरंदाजपणाची स्वागतच होतं! घर बोलतेय की लेखिका असा कधी कधी भ्रम पडावा, अशा एकात्मिक लालित्याने लिहिलेले घरासंबंधी ललित लेख वाचताना वाचकाला स्वत:चे घरदेखील मनी-मानसी बोलू, डोलू लागल्याचा अपसूक भास होऊ लागतो. हे असते यशोधरा भोसले यांच्या ललित नि संवेदी शैलीचे यश. पुस्तक वाचताना लेखिका कधी काळी उभारीच्या वयात इंग्रजीमय झाली होती, हे खरे नाही वाटत. साऱ्या घरांच्या वर्णनामागे एक अंधूक, अलिखित सूत्र जाणवते. जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या घराने मनुष्यपण मारले. हवा, पाणी, परिसर विद्रुप, विरूप होऊ लागलेला आहे. अशा स्थितीत घराचे घरपण आपण जपले जोपासलं तरच सुख समृद्धी स्वास्थ्य संस्कार, संस्कृतीचे पंचशील सुरक्षित राहणार, हे समजविणारे हे ललित लेख! सुंदर तितकेच सामाजिक भान देणारे!

 ‘बंजा-याचे घर' लेखिकेनी ऋणमोचन भावनेने केलेले लेखन आहे. त्यात कृतज्ञता आहे, तशी कणवही. गावाकडचे घर पहिल्या भेटीतच आपले होते. कौलारू, कृष्णवेलींनी वेढलेले. आजीच्या मायेने मंतरलेले हे मातृधर्मी घर. म्हणूनच लेखिकेला त्याचं कोण अप्रूप? घर आपले असले की, यायला निमित्त लागत नाही, ते नित्यनेमाने आपणाकडे आपल्या माणसांना ओढत राहतं. जंगलाच्या कुशीत दडलेले हे घर. या घरातली माणसेही घरासारखीच आतून बाहेरून एक. साकळलेले आयुष्य मोकळे करणारे हे घर लेखिकेला म्हणून तर आप्त, स्वकीय, आत्मीय वाटत राहते. मावशी, रखवालदार भीम, त्याची मुले, सारी कशी स्वभाव गर्द मनाने हिरवी स्वभावाने गुलमोहर, बोगनच्या फुलासारखी जर्द!

 दुसरे घर लेखिकेचे गोव्यातले आजोळ, बांदोड्याचे. सभामंडप, नगारखाना, आगरशाळा, असे ऐसपैस चौसोपी. महालक्ष्मी मंदिराच्या ओव-यांनी वेढलेले. भट-भिक्षुकांच्या घरांनी घेरलेले. चिऱ्यांचा गडगा, पाण्याचे तळे...लेखिका घर सजीव करते ती शब्द वर्णनांनी नाही, तर आठवणींच्या शिंपणांनी. पोर्तुगीजी थाटाचे हे घर अगडबंब कुलूप किल्ल्यांनी पण प्राचीन असल्याच्या खुणा उठवते. उतरती कौले, अर्धगोल महिरपी दरवाजे, खिडक्या, देवळी, दगडे साच्यांनी हे घर आपणास केव्हा भूतकाळात घेऊन जाते हे कळत नाही. खेड्यातले असले तरी खानदानी कोंदणात वसलेले नि म्हणून लोभसही!

 कोवाडचे घर तिसरे. स्वामीकार रणजित देसाईंचे, हेही बांदोड्यासारखेच खानदानी घर. पण याची चेहरेपट्टी वेगळी नाही म्हटले तरी कर्नाटकी मुलखाच्या सीमेवर वसलेले. या घराने लेखिकेला हरवलेले मराठीपण बहाल केले. भाषा, साहित्य, कलेचे संस्कार भरलेले घर. पायाखालची वाळू सरकलेल्या भुसभुशीत दिवसात माय मराठीबरोबर याच घरांनी सुप्त कलेचे धुमारे फुलवले. आपल्या रणजितदादांचे तुटलेपण लेखिकेने अनुभवले ते हेच घर. साऱ्या विस्कटलेल्या आयुष्याचे धागेदोरे जोडणारे हे घर. पण कसे सुन्न... मौन... ‘याद की कोई खबर लाता नहीं' असे काव्यात्मक, भावस्पर्शी शीर्षक देऊन यशोधरा भोसले यांनी एका उद्ध्वस्त जीवनाची अबोल करुण कहाणीच पेश केली आहे.

 'कोलाज' हे चौथ घर, कोलाज ही एक चित्रशैली. आपल्या ठिगळ जोडीच्या आयुष्यात भेटलेल्या चित्रकार मित्राचे हे घर. मुकुंदनगर, चेंबूर, मुंबईचा परिसर ज्यांना माहिती आहे त्यांना कोलाज वाचताना लेखिकेच्या निरीक्षण, नि:शब्द सामर्थ्याची कल्पना यावी. 'बंजा-याचे घर' पुस्तक म्हणजे चित्रशैलीचा सुंदर नमुना. या पुस्तकाचे सारे सौंदर्य शैलीत सामावलंय.

 पत्ता हरवलेल्या घराआधीचे ‘१२ ए- रेशम' हे घर महानगरातील फ्लॅट संस्कृतीचे व्यवच्छेदक रूप. पैसा, प्रतिष्ठा सर्वत्र असलेल्या महानगरात मुख्यमंत्री मोठा की बिल्डर ? मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवण्याचे दिव्य पार केल्यानंतर मिळालेले हे घर लेखिकेला आपली जागा, आपले जग मिळवून देते.

 या पुस्तकातील प्रत्येक लेखास लाभलेली सूचक, समर्थक शीर्षक या पुस्तकाचे आगळे वैशिष्ट्य. या प्रत्येक कथात्मक लेखाच्या सुरवातीस व शेवटी मनोज आचार्य यांची रेखाटने पुस्तकास बोलकी करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठात हिरवे, निळे, पिवळे जर्द रंग ओतून निसर्गाचे गहिरेपण चित्रकारांनी असे चित्रित केलेय की, त्या घरांची ओढ वाचकांना दाटून आल्याशिवाय राहत नाही.

 ‘बंजाऱ्याचं घर' मधील पत्ता हरवलेले घर, ही एक स्वतंत्र कथा आहे. कथेची विषयक पार्श्वभूमी घर असली तरी दोन पुरुषांमधील वैश्विक संबंधाची ही कथा. एक गंभीर विषय पेलणारी कहाणी. कथात्मक ललित लेखांबरोबर देणे औचित्यपूर्ण खचितच नाही. लेखिकेने संग्रहभर कथा होईपर्यंत या कथेसाठी थांबायला हवे होते. हे पुस्तक सदरचा अपवाद वगळता समाज व व्यक्तीसंबंधीची ललित अंगांनी केलेली मांडणी असली, तरी त्यामागची सल सतत वाचकास अस्वस्थ करत राहते.


• बंजा-याचे घर - (ललित कथा)

 लेखिका - यशोधना भोसले
 प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

 पृष्ठे १७९  किंमत १५0 रुपये

‘अवस्था' : स्वातंत्र्योत्तर दूरवस्थेचे चित्रण


 कन्नड कथासाहित्यात यू. आर. अनंतमूर्तीचे एक वेगळे स्थान आहे. स्वातंत्र्योत्तर काळात कन्नड कादंबरीत नवा प्रवाह निर्माण करणाच्या यशवंत चित्ताल, डॉ. शांतीनाथ देसाई, गिरी, पी.लंकेश, कुसुमाकर, पूर्णचंद्र तेजस्वी, एस. एल. भैरप्पा यांच्याबरोबर त्यांचे नाव घेतले जाते. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कादंबच्या अनंतमूर्तीनी लिहिल्या. त्यांत ‘संस्कार विशेष उल्लेखनीय ठरली होती. त्यानंतर, ब-याच वर्षांच्या मध्यंतरानंतर त्यांनी मूळ कन्नडमध्ये लिहिलेल्या ‘अवस्था' कादंबरीचा मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. 'अवस्था' नावाने प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा अनुवाद वाचत असताना वाचक सरळ लेखकाशी भिडून जातो. उमा कुलकर्णी यांच्या अनुवादाचे हे वैशिष्ट्य होय की, वाचक अनुवादकाशी मध्यस्थी विसरून जातो. हेच या अनुवादाचे यश म्हणावे लागेल.

 ‘अवस्था' कर्नाटकातील सन १९४२ ते १९७२ या तीन दशकांच्या कालखंडातील राजकीय स्थित्यंतर, परिवर्तन, पक्षांतर, पक्षविभाजनाची पार्श्वभूमी लाभलेली चरित्रप्रधान कादंबरी होय. कृष्णप्पा हा कादंबरीचा नायक. तो आता पन्नाशीला येऊन ठेपला आहे. पक्षाघाताने विकलांग झालेल्या, चाकाच्या खुर्चीवर खिळलेल्या, तरीही आज विरोधी पक्षनेता, रयत संघटनेचा झुंझार पुढारी, संभाव्य मुख्यमंत्री म्हणून सर्वांना हवाहवासा वाटणारा हा नेता असा गलितगात्र स्थितीत पाहणे, त्याची ही अवस्था केवळ विकल, अस्वस्थ करणारी अवस्था. सारी कादंबरी अनंतमूर्तीनी पूर्वदीप्तीशैलीने (फ्लॅशबॅक) चित्रित केली आहे. कृष्णप्पा चाकाच्या खुर्चीवर खिळून आपला तरुण कार्यकर्ता नागेश याला आपली सारी रामकहाणी सांगतो आहे. कृष्णप्पाचा जीवनपट उलगडत जातो तसे आपणास समजते की, अत्यंत गरिबीतून वर आलेला कृष्णप्पा महेश्वरय्यांमुळे बी.ए.पर्यंत शिक्षण घेतो. तारुण्याच्या ऐन बहरात गौरी देशपांडे यांच्या प्रेमात पडतो खरा; पण त्यापेक्षा त्याला आकर्षण असते स्वातंत्र्य चळवळीचे. पुढे तो तेलंगणाच्या आंदोलनात सक्रिय असतो. अण्णाजी सारख्या नक्षलवाद्याच्या सान्निध्यात त्याच्या जीवनाची वाताहत होते व तो पोलिसी अत्याचारांची शिकार होतो. पोलीस अण्णाजीस नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा बळी म्हणून घोषित करून नामानिराळे होतात. ते पोलीस कोठडीत कृष्णप्पाचा अनन्वित छळ करतात. केवळ महेश्वरय्यांच्या पुण्याईने त्याची सुटका होते. बाहेर येऊन तो रयत संघटनेचे नेतृत्व करतो. आमदार, खासदार होतो. शेतक-यांच्या भल्यांसाठी कुळकायदा करण्यास सरकारला भाग पाडतो. त्यामुळे त्याला व्यापक जनमताचा पाठिंबा मिळतो व तो सर्वमान्य नेता बनतो.

 त्याचे नेतृत्व शिगेला पोहोचले असतानाच तो पक्षाघाताचा बळी ठरतो. तरीही त्याच्या लोकप्रियतेत तसूभरसुद्धा घट होत नाही. उलटपक्षी त्याच्या सर्वमान्यतेमुळे व पक्षफुटीच्या तोंडावर तो संभाव्य मुख्यमंत्री म्हणून राज्याची पहिली पसंती मिळवितो; पण व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातील क्षुद्रता त्याला शिसारी आणते व लोकनेतेपदाचा राजीनामा देऊन राजकीय निवृत्ती, विजनवास पत्करतो.

 अवस्था ही कादंबरी व्यक्ती, राजकारण, चळवळ, सार्वजनिक व्यवहार यांच्या स्वातंत्र्योत्तरकालीन पहिल्या पंचवीस वर्षांची वजाबाकी सांगणारी आहे. ऐन उभारीत धडाडी, धडपडीतून फुललेली अनेक ध्येयवादी मंडळी जीवनसूर्य डोक्यावर तळपत असताना क्षुद्रतेचे बळी ठरतात. ज्या तत्त्वांची त्यांनी आयुष्यभर पाठराखण केलेली असते त्याकडे सोईस्कर डोळेझाक ही त्यांची मजबुरी ठरते. कारण त्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात महदंतर असते खरे. कथा कर्नाटकाची असली, तरी ती भारतीय राजकीय व सामाजिक जीवनाची प्रातिनिधिक म्हणून वाचकांसमोर येते. ती अधिक भावते. कारण वास्तवाशी तिचे जवळचे नाते वाटते.

 स्त्री-पुरुष संबंध, क्रांतिकारी चळवळ, नक्षलवादी घटना, आध्यात्म, खेड्यातील जनजीवन इत्यादी माध्यमांतून अनेक विषयांचे, समस्यांचे चित्रण करणारी ही कादंबरी म्हणजे अनंतमूर्तीच्या वर्णनकौशल्याची सुंदर प्रचिती देणारी कृती. 'संस्कार'प्रमाणेच ही कादंबरीपण पात्रचित्रण, भाषा, शैली, उद्देश इत्यादी अनेक अंगांनी सरस ठरली आहे. स्वातंत्र्योत्तर राजकारणी व राजकारणाचे हुबेहूब वर्णन करणारी ही कादंबरी वाचकांना आपल्या परिसरातील राजकारण्यांशी व राजकारणाशी मेळ घालण्यास भाग पाडते. हे लेखकाच्या लेखणीचे श्रेय. फॅसिस्ट' नि फ्युडल' यांच्या संघर्षात दोघांचेही पाय मातीचेच असल्याची खात्री देणारी ही कादंबरी. वर्गसंघर्ष, वर्गहिताच्या गप्पा मारणारे पुढारी, त्यांनी सारा देश आपल्यासारखाच करून टाकल्याचे शल्य देणारी ही कथा वर्तमान राजकीय जीवनाचे क्ष-किरण चित्रच. अशा स्थितीत समाजाची शुद्ध अवस्था उपेक्षिणे केवळ मृगजळामागे धावणे खरे! कन्नड भाषेतील तरुण ज्ञानपीठ विजेत्या कथाकारांची ही कृती अनंतमूर्तीच्या प्रगल्भ प्रतिभेचीच साक्ष देते.


• अवस्था : यू. आर. अनंतमूर्ती (कादंबरी)

 अनुवाद - उमा कुलकर्णी प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे

 पृष्ठे - १४१  किंमत - ११० रु.

♦♦

‘मयुरपंख' : मराठी कवितांचा हिंदी अनुवाद


 दक्षिण महाराष्ट्रातील बहुप्रसव कवयित्री शैला सायनाकर यांनी गेले दशक आपल्या सातत्यपूर्ण काव्यलेखनाने आपलेसे केले आहे. शब्दांची काटकसर व भावांची कलाकुसर हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य. त्यांची समग्र कविता सल वागवत विकसित होत आली आहे. रक्तकमळांचे रान' (१९९३) पाणडोह (१९९७) सखी (२000) सारख्या काव्यसंग्रहातून त्यांची कविता शब्दांकडून मिथकांकडे वाटचाल करताना दिसते. त्यांचे मन भावुक नि हात कलात्मक. त्या स्वत: आपल्या कविता सुंदर रेखाचित्रांनी सजवतात. त्यांच्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ जसे त्यांचे असते तशी आतली रेखाटनेही!

 या कवयित्रीच्या मराठी कवितांचा हिंदी अनुवाद आहे ‘मयूरपंख'. अजीम यांनी तो केला आहे. शैला सायनाकरांची मराठी कविता संस्कृतधार्जिणी. तिचा अनुवाद मात्र संस्कृत, उर्दू मिश्रित भाषेत. यातील अनुवादाच्या अनेक प्रयोगांमुळे त्याला मोरपंखी सौंदर्य प्राप्त झाले आहे.

 कवितेचा अनुवाद करणारा अनुवादक कविमनाचा असेल तरच कवितेचा अनुवाद प्रभावी होतो तसा अनुभव येथे येतो.

 ‘मयूरपंख' हा शैला सायनाकर यांच्या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचा अनुवाद होय. शिवाय त्यात तितलियाँ ‘साँज ढले की बेला', 'बरसात' सारख्या स्वतंत्र रचनांचेही अनुवाद आहेत. त्रेपन्न कवितांचा हिंदी अनुवाद वाचत असताना काही ठिकाणी तो चपखल झाला; तर काही ठिकाणी अनुवादक व्याकरणिक अनुवादाच्या चक्रव्यूहात गुंतल्याचे जाणवते. कवितेचा अनुवाद लक्ष्यभाषेतील वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून व्हायला हवा; तर तो अधिक भावतो, भिडतो. अनुवादकांनी शब्द प्रामाण्यापेक्षा आशयगर्भ अनुवाद करायला हवा. श्रेष्ठ अनुवादाची कसोटी भावप्रामाण्य असायला हवी. ती असती तर हा अनुवाद अधिक उंचावला असता. ‘अनगढ राहों पर', “यह दुस्तर घाट', ‘मयूरपंख' सारख्या रचनांचे अनुवाद अनुवादाच्या विभिन्न रंगछटांचे, शैलींचे साक्षी होत. मिथक धारण करणाच्या कवितांच्या अनुवादात अनुवादकाने रूपांतर शैली वापरली असती तर ते अनुवाद मूळ कवितेइतके भावगर्भ होते. ‘मयूरपंख'लाही कवयित्रीच्या रेखाटनाचे लेणे लाभले आहे. मराठी कवितेचा हिंदी अनुवाद होणे ही आनंद व स्वागताची गोष्ट खरी; पण मराठी हिंदी वाचकांच्या अंगणात मोरनाच करणार, तर हिंदी अंगणातल्या मोरनाचांचे पदताल, स्वर, रागदारी यांचे पूर्वभान असायला हवे. अनुवादक अजीम हिंदी मातृभाषी असल्याने त्यांनी हे शिवधनुष्य ब-यापैकी पेलले आहे. काही ठिकाणी मराठी प्रभावात ते अडकतात. त्यामुळे ‘मखमल', ‘कील', 'चाव' असे प्रतिशब्द येतात. त्याऐवजी मलमल’, ‘शूल', 'प्यार' येते तर अनुवाद अनुप्रासिक सौंदर्याबरोबरच भावसुंदर झाले असते.


• मयूरपंख शैला सायनाकर (काव्यसंग्रह)

 अनुवाद - अजीम
 प्रकाशन - राजकिरण प्रकाशन, इस्लामपूर

 पृष्ठे -१३०  किंमत - ८0 रुपये

♦♦

वैचारिक असहिष्णुतेचा उतरता आलेख : ‘भारताचा अंत


 ब-याच दिवसांनी अस्वस्थ करणारे एक पुस्तक हाती लागले. या पुस्तकातील लेखात मती गुंग करण्याची विलक्षण ताकद असल्याने ते हातासरशी वाचून संपवले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या गेल्या छप्पन्न वर्षांच्या प्रवासात देशाची चिंता करणारे विचारक नेहमी इशारा देत होते की, 'देश विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आता तर ते चक्क घोषणा करते झालेत की, ‘भारताचा आता अंत झाला आहे, तरी आपण अस्वस्थ होत नाही याला काय म्हणावे? भारतातील लक्षावधी लोक निःस्वार्थी आहेत, पण ते संघटितांच्या पुढे निष्प्रभही ठरत आहेत. आपल्यात एकजूट नसल्याने त्यांना जाब विचारायची हिम्मत आपल्यात नाही असे भान देणारे, भानावर आणणारे हे पुस्तक. पुस्तकाचे नाव आहे ‘भारताचा अंत' लेखक आहेत खुशवंत सिंग ‘एण्ड ऑफ इंडिया' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. मराठीतील प्रथितयश अनुवादक चंद्रशेखर मुरगूडकर यांनी मोठ्या ताकदीने हा अनुवाद करून अनुवादित मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. भारताचा अंत' हे पुस्तक लेखसंग्रह होय. शीर्षकापासूनच ते वाचकांची पकड घेते. चंद्रमोहन कुलकर्णीचे लक्षवेधी, गंभीर, सूचक मुखपृष्ठ या पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू. चिनार प्रकाशन, पुणे यांनी अलीकडे प्रसिद्ध इंग्रजी रचनांचे मराठी अनुवाद देण्याचा जो सपाटा लावला आहे त्यातील हा एक मोठा झपाटा. पुस्तकांतील ‘ओळख' ते ‘यावर काही उपाय आहे का?' शीर्षकातील पाच लेखात ते भारतातील वैचारिक असहिष्णुतेचा उतरता आलेख स्पष्ट करतात खुशवंत सिंग हे पत्रकार, संपादक, स्तंभलेखक होते. त्यांना भारताच्या इतिहासाचे चांगले ज्ञान आहे. घटनांचे विश्लेषण करण्याची वृत्ती त्यांच्यात आहे. त्यामुळे भविष्यवेध घेण्याचे कौशल्य त्यांच्यात विकसित न होते तरच आश्चर्यः ‘भारताचा अंत' हा लेखसंग्रह एका अर्थाने भारताच्या राजकीय, धार्मिक, जातीय संस्था, पक्ष, संघटनांच्या कार्याचे केलेले तटस्थ मूल्यांकन होय. देश स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक धोका डाव्या विचारसरणीचा वाटायचा पण नेहरू जाणून होते की, भारतीय लोकशाहीला कम्युनिस्टांकडून धोका नसून धार्मिक कर्मकांडातून पुढे येऊ लागलेल्या वेडगळ कल्पनांच्या पुनरुत्थानाचा धोका संभवतो. म्हणून त्यांनी त्या वेळी सोमनाथच्या नूतन मंदिराच्या उद्घाटनाला जाणाच्या राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पत्र लिहून सांगितले होते की, 'निधर्मी राष्ट्राच्या प्रमुखाने धार्मिक बाबींमध्ये अशा प्रकारे सामील होऊ नये' दुर्दैवाने नेहरूंनंतर आलेल्या नेत्यांचा कणा तेवढा ताठ नव्हता आणि ते खंबीरही नव्हते. अशी मर्मग्राही चिकित्सा करणारे हे पुस्तक इतिहासाच्या संदर्भानी दुथडी भरून वाहात राहते. म्हणून हा लेखसंग्रह विवेकी वाचकांना अस्वस्थ करत राहतो. श्री. चंद्रशेखर मुरगूडकर यांनी प्रवाही भाषेत अनुवाद करून यास मूळ ग्रंथाचेच वैभव प्राप्त करून दिलेय. हा केवळ अनुवाद न राहता ते मूळ ग्रंथांचे पुनसर्जनच झालेय. हिंदी, पंजाबी, भाषेच्या अनुवादासंबंधी अपूर्ण आकलनांचे काही अपवाद वगळता हा अनुवाद त्यांच्या पूर्व अनुवादांपेक्षा खचितच सरस झालाय.


• भारताचा अंत (लेखसंग्रह)

 लेखक - खुशवंत सिंग
 अनुवादक : चंद्रशेखर मुरगूडकर
 प्रकाशन - चिनार प्रकाशन, धनकवडी, पुणे ४३

 पृष्ठे ८०  किंमत - ७५ रुपये

♦♦

‘ठरलं...डोळस व्हायचंच' : अंधश्रद्धा निर्मूलनाचे समुपदेशन


 ठरलं... डोळस व्हायचंच!' हे पुस्तक शीर्षकापासूनच तुम्हाला दृढसंकल्पी बनवते. मुखपृष्ठावरील निळे डोळे आणखी काही नसून बंद झापडे उघडणारी कवाडे होत. मुखपृष्ठकार चंद्रशेखर कुलकर्णीनी मोठ्या कल्पकतेने पुस्तकाचा सारा आशय प्रथमदर्शनीच लक्षवेधी बनवलाय. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे तडफदार कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सदर ग्रंथातून तरुण मित्रमैत्रिणींना घातेलेली साद, त्यांच्याशी केलेला संवाद एक विधायक असे सामाजिक समुपदेशन होय.

 एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर तरुण-तरुणींच्या मनात श्रद्धा, अंधश्रद्धा, अश्रद्धा, यांचे जे काहूर द्वंद्व आहे ते प्रश्न तुमचा उत्तर आमचे' अशा पद्धतीने दूर करून आपले जीवन वैज्ञानिक समृद्धीनी सुखकर बनले. भारतासारख्या देशात ‘विज्ञानसृष्टी' साकारली तरी इथे ‘विज्ञानदृष्टी' आकारली असे म्हणणे विसंगत ठरावे. आपली तरुणाई परंपरा नि नवतेच्या सीमेवर असताना त्यांच्या शंकांना नेमके वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक उत्तर देणे पूर्वसुरींचे कर्तव्य ठरते. डॉ. दाभोलकरांनी कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून केलेले हे मार्गदर्शन म्हणूनच महत्त्वाचे ठरते.

 घुबडाचे तोंड पाहणे अशुभ असते का? अंगात येते हे खरे का? संमोहन विद्या आहे का? फटाके उडवणे अपायकारक का? सहावे पंचेंद्रिय असते का? ज्योतिषशास्त्र हे शास्त्र की भाकीत? नशीब हा काय प्रकार आहे? सत्यनारायणाची पूजा सत्य की असत्य? होळी का करू नये? अंधश्रद्धा निर्मूलन व धर्म-अधर्म संबंध काय? वास्तुशास्त्रातील नव्या भंपकपणाला काय आधार? हे नि असे अनेक प्रश्न म्हणजे सध्याच्या विज्ञानसन्मुख होऊ पाहणाच्या तरुणांपुढील जगण्याचे यक्षप्रश्न होत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे पत्र, संवाद, समुपदेशन, अध्यापन अशा अनेक शैलींनी या पुस्तकात दिली आहेत. ज्यांना ज्यांना म्हणून आपल्या मनातील परंपरा, चाली, रूढी, भ्रम, समजुती, यातून सुटका करून घेऊन माणसाच्या प्रत्येक कृती व कर्तव्यास वैज्ञानिक अधिष्ठान द्यावे, असावे वाटते त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचायला हवे. विशेषतः शिक्षक व पालकांनी तर हे पुस्तक आधुनिक काळातील ‘आचारशुद्धी ग्रंथ' म्हणून केवळ वाचून चालणार नाही तर घरोघरी, शाळाशाळांतून पारायणाच्या पद्धतीने याचे निरंतर वाचन, चिंतन, मनन व्हायला हवे तरच उद्याचा भारत अंधश्रद्धामुक्त डोळस, विज्ञाननिष्ठा, चिकित्सक, स्वप्रज्ञ बनेल.

 आपल्या सध्याच्या शिक्षणात विषयांची गर्दी झाली आहे. या गर्दीत जगण्याचा मार्गच हरवल्यासारखी स्थिती आहे. जगण्यास उपयुक्त विषयाचे शिक्षण असायला हवे. त्यासाठी शिकणे व शिकवणे या दोन्हींची नवी मांडणी, नवा आकृतीबंध आवश्यकच नाही तर अनिवार्य झाला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाहीसारखी मूल्ये विज्ञाननिष्ठतेच्या मूल्यांशिवाय दृढ होऊ शकत नाहीत हे समजून घेतले पाहिजे. भारत हा जगाच्या पाश्र्वभूमीवर अंधश्रद्धा, रूढीबद्ध, पारंपरिक, दैवी विचारधारेवर विश्वास असलेल्या बहुसंख्याकांचा देश आहे. येथील समाज एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक विश्व समाजाबरोबर नेऊन पोहोचवायचा असेल तर ‘ठरलं...डोळस व्हायचं सारखी पुस्तके पाठ्यक्रमांच्या प्रमुख उद्देशात अंधश्रद्धा निर्मूलन' अग्रक्रमाने असायला हवा याचे भान देणारा हा ग्रंथ म्हणूनच मला वैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक सर्व दृष्टीने महत्त्वाचा वाटतो.

 या पुस्तकाचे एक बलस्थान आहे. हे पुस्तक कुणाच्या धार्मिक भावनांवर आघात करण्यासाठी हेतुतः केलेले लिखाण नव्हे. काही मतलबी मंडळी लोकांच्या धर्मभावनेवर आरूढ होऊन समाजात अपसमज, गैरसमज पसरविण्याचे पद्धतशीर प्रयत्न करत असतात. अशांमध्येही विवेक जागवण्याची विलक्षण शक्ती या लिखाणात आहे. घड्याळाचे काटे उलटे फिरवाल तर तुम्ही मध्ययुगामार्गे अश्मकालीन व्हाल. ते सुलटे फिरवाल तर तुम्ही भविष्यवेधीशास्त्राने (फलित ज्योतिष नव्हे) अवकाशही कवेत घेऊन प्रतिसृष्टी निर्माण कराल. तुम्ही ठरवायचे आहे काटे उलटे फिरवायचे की सुलटे! मग ठरले ना? डोळस व्हायचंच! त्यासाठी हे पुस्तक वाचायचेच!


• ठरलं...डोळस व्हायचंच (अनुभव)

 लेखक - डॉ. नरेंद्र दाभोलकर,
 प्रकाशन - छाया प्रकाशन, सदर बझार, सातारा-१

 पृष्ठे - १०७  किंमत - ५0 रु.

♦♦

'फिटे अंधाराचे जाळे : बहुविकलांग अपत्य वाढविण्याची कथा


 'फिटे अंधाराचे जाळे' पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र करमरकर. लग्न उशिरा झालेले. अपत्य उशिरा. जे अपत्य पोटी आले ते पक्षाघाताचा बळी. बहुविकलांग. पालक म्हणून भालचंद्र करमरकर व त्यांच्या पत्नी विद्याताई यांच्यावर आकाश कोसळल्यासारखी स्थिती. ते जिद्द हरत नाहीत. आपल्या पोटी आलेल्या वल्लरीचा सांभाळ करायचा व तिला सर्वसाधारण मुलामुलींसारखे करायचे (नॉर्मल) हा ध्यास. दुसरे मूल होऊ द्यायचे नाही असा शहाणपणाचा निर्णय ते घेतात. वैद्यकीय उपचारच प्रमाण मानतात. देवाचे अंगारे-धुपारे न करता विज्ञान व वैद्यकशास्त्राची कास धरतात. वल्लरी हे त्यांच्या कुटुंबाचे एकमात्र लक्ष्य ठरते. ‘फिटे अंधाराचे जाळे' म्हणजे पदरी आलेल्या बहुविकलांग सुकन्येस सज्ञान, सुजाण, सुशिक्षित करतानाच्या अनंत अनुभवांची प्रांजळ मांडणी. वल्लरी नुकतीच संस्कृत विषयात एम. ए. झाली. सतत ‘रायटर' घेऊन शिकलेली वल्लरी आता स्वहस्ते सी. डी. राईट करू शकते, संगणक हाताळते. प्रिंट काढते, लुनावर बसते (अर्थात बाबांच्या मागे) बोलते (सभेतही!) शिकवते (वर्गात) अन् आता तर चक्क लिहितेही!

 हे पुस्तक माणूसपण शिकवणारे पुस्तक होय. ज्यांच्या पोटी अंध, अपंग, मतिमंद अपत्य आले असेल त्यांना हे पुस्तक उमेद देते. अंधार झालाय खरा, पण सूर्य उजाडू शकतो असा आशावाद जागवणारे हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचकांच्या मनात अनेक सामाजिक प्रश्नांचे मोहोळ निर्माण करतं. हे पुस्तक आहे आत्मपरीक्षण करण्याचे. बहुविकलांग वल्लरी, एक मांसाचा गोळा होता. भालचंद्र पंत, विद्याताई व वल्लरीची आत्या या ‘गुरुत्रयी'नी या मांसाच्या गोळ्याला आकार देऊन एक बुद्धिमान, सुजाण, सुकन्या बनवले. ते असताना सर्वसामान्य माणसास या कुटुंबाच्या शर्थीचा अचंबा वाटू लागतो व आपल्या किडी-मुंगी सारख्या आयुष्याची खरे तर शरमही दाटून येते.

 हे पुस्तक अनेक सामाजिक हक्क व कर्तव्याचे द्वंद्व निर्माण करते. ज्या मुलांना अपंगत्व आलेले असते त्यांना लेखनिक घेऊन परीक्षा देता येते. विद्यार्थी/परीक्षार्थी एकदा अपंग म्हणून नोंदला गेला की, त्याला लेखनिक  द्यायची जबाबदारी ही शिक्षण, परीक्षा व्यवस्थेची असायला हवी. त्यासाठी आधीच दुर्बल असलेल्यास खेटे घालण्याची नामुष्की येऊ नये. अन्य मुलांबरोबर न्याय्य स्पर्धा करण्याचा, अधिक नि व्यक्ती गरजेनुसार विशेष सोयी सुविधा मिळण्याचा अपंग विद्यार्थ्यास हक्क आहे नि त्याची सन्मानजनक पूर्तता करणं हे संबंधित यंत्रणेचे कर्तव्य म्हणून नोंद व्हायची वेळ येऊन ठेपली आहे. भालचंद्र करमरकरांना आपली अपंग मुलगी शिकवती ठेवण्यासाठी शाळा, विद्यापीठ इत्यादीच्या प्रशासन, परीक्षा अधिका-यांच्या ज्या नाकदच्या काढाव्या लागल्या ते वाचताना हे ठळकपणे रेखांकित होते.

 सामान्य विद्यार्थी एका दिवशी दोन प्रश्नपत्रिका सोडवू शकतो. अंध, अपंग, मतिमंद (नि गतिमंदही!) विद्याथ्र्यांना ते अशक्य असतं. परीक्षेचं वेळापत्रक ठरविणाच्या शाळा, बोर्ड, विद्यापीठ यांनी याचं भान ठेवलं पाहिजे. असे विद्यार्थी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे येथे प्रवेश घेतात तेथील इमारती अपंग सुलभ (उतार, पाय-यातील अंतर, संरक्षक व आधार कठडे, प्रसाधन कक्ष वर्ग इ.) असल्या पाहिजेत. त्या ‘सार्वजनिक संस्था' या सदरात मोडत असल्याने अशा इमारतींना परवाने देताना आग्रही राहिले पाहिजे. जुन्या इमारतीतही या सुविधा करणे अनिवार्य केले पाहिजे, कारण अपंग विद्यार्थ्यांची संख्या विकसित (शायनिंग?) भारतात वाढती आहे. समाजात अनेक अंध, अपंग, मतिमंद, गतिमंद विद्यार्थी पूर्ण पुनर्वसनाचा हक्कदार आहे. त्याला लैंगिक सुख मिळाले पाहिजे. ती त्यांची इतरांप्रमाणेच मूलभूत गरज असते. अपंग मुला-मुलींतही पितृत्व, मातृत्वाची ओढ असते. अशा मुलांना अपत्य जबाबदारी पेलण्यापर्यंत सक्षम करण्याची जबाबदारी पालक, संस्था, शासन, समाजाची आहे याचे भान ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 'रोगापेक्षा इलाज भयंकर', 'न्यायाने अपंग, मतिमंद मुला-मुलींची नसबंदी, गर्भाशय काढणे यासारखे अमानुष उपाय योजले जातात. कारण आपला समाज या प्रश्नासंदर्भात व्हावा तितका भावसाक्षर झालेला नाही. सर्वांना अनिवार्य लैंगिक शिक्षणाचा वस्तुपाठ अंगिकारायची वेळ आली आहे. मध्यंतरी शिरूर येथील शासकीय मतिमंद मुलींच्या वसतिगृहातील एक मुलगी गर्भवती झाली म्हणून उर्वरित सर्व मुलींची गर्भाशये काढल्याचे निदर्शनास आल्यावरून मोठा गहजब झाला होता, तो योग्यच होता. या पुस्तकातही वल्लरीच्या वाट्यास तीच शिक्षा आल्याचे वाचून अजून अपंगांच्या संदर्भातील अज्ञानाच्या अंधाराचे जाळे फिटले नसल्याचे प्रकर्षाने लक्षात आले.

 समाजातील अपंगांच्या शिक्षण, संगोपन, पुनर्वसन क्षेत्रात अंधाराचे जाळे फिटायचे तर हे पुस्तक समाज शिक्षणाचा भाग म्हणून वाचले गेले पाहिजे.  मुलांनी मागितले ते दिले की आपण आपले पालकत्व निभावले असा एक गैरसमज व सोयीस्कर आचार धर्म रूढ़ होतो आहे. मुलांच्या शिक्षण व संगोपनासंदर्भात 'व्हॉट दे वॉन्ट' पेक्षा 'व्हॉट दे नीड' हे सूत्र पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. 'फिटे अंधाराचे जाळे' हे पुस्तक ही जाण देते.

 वल्लरीचे हे आव्हान करमरकर कुटुंबीयांनी कसे पेलले? याचा अगदी ओघवता आणि काय घडले ते जसे घडले तसे सांगण्याच्या भूमिकेतून घेतलेला आढावा पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

 कहाणी आहे जवळजवळ अडीच तपाची. या अडीच तपात वल्लरीच्या आई वडिलांनी व आत्याने शांतपणे, निश्चित अशा प्रयत्नांची दिशा ठरवली व त्यावरून अत्यंत धीराने चिकाटीने निराश न होता हा प्रयत्नप्रवास आरंभला.

 प्रत्येक गोष्टीत वाट पाहायला लागणाऱ्या करमरकरांना आपल्यासाठीही थोडी वाट पाहावी लागली. वल्लरीच्या आईला खूप सोसावे लागले. प्रसुतीला विलंब होऊ लागला. म्हणून सिझेरियनचा निर्णय घेऊन डॉक्टरांना बोलावले. पण डॉक्टर येण्यापूर्वीच अडलेली असूनही प्रसूत झाली. पण बाळ रडेचना. बाळावर उपचार सुरू केले आणि जन्मानंतर अडीच तासाने बाळ रडले. जन्म घडायला वेळ लागल्यामुळे बाळ घुसमटले आणि काळेनिळे पडले होते. बाळ रडल्यानंतर आईचा जीव भांड्यात पडला. पण यामुळे तिच्या लहान मेंदूवर पक्षाघाताचा आघात झाला आणि ती सेरेब्रल प्लासी या आजाराची शिकार झाली.

 डॉक्टरांनी हे सांगताना ‘हा एकंदरीत पेशन्सचा मामला आहे' असे म्हटले आणि तिच्या कुटुंबाने हा ‘पेशन्स' अक्षरशः मुरवला.

 वल्लरीची सर्वच प्रगती अत्यंत सावकाश होत होती. पालथे पडणे, सरकणे या क्रिया यायला खूप वेळ लागला. सारखी लाळ गळे, ती गळता येत नसे. लाळ गळणे थांबेपर्यंत ती पाच वर्षांची झाली!

 प्रत्येकच बाबतीत, प्रत्येक हालचालींसाठी खूप सराव करावा लागे. दूध पिणे, औषध पिणे, वगैरे पुढील ट्रीटमेंटसाठी पुणे गाठले. डॉ. वारीअव्वा यांनी कसून तपासणी केली आणि आश्वासक धीर दिला. ते म्हणाले, “तुमच्या मुलीला आलेला हा अॅटॅक लहान मेंदूवर आघात करून गेलाय. त्यामुळे तिला शरीराचा तोल सांभाळणे अवघड झालेय, मोठ्या मेंदूवर झालेल्या आघातात होणारी हानी कधीच न भरून येणारी असते. लहान मेंदूवरची हानी भरून निघू शकते. बहुतांश दुरुस्तही होऊ शकते. हा अॅटॅक सौम्य आहे म्हणून तिच्यात सुधारणा शक्य आहे. मात्र तुम्हाला त्यासाठी फार अगदी फार फार परिश्रम करावे लागतील आणि खूप कालावधी लागेल. पहा तुम्ही काय करू शकता! मात्र ही मोठी हर्डल रेस आहे. सुदैवाने यशाची शक्यता आहे असा माझा अंदाज आहे.

 पुण्याहून परतल्यावर एक मोठा लढा आणि प्रदीर्घकाळ चालवायची मोहीम असं समजून स्वत:च्या जीवनक्रमात बदल करून घेतला.

 तिला शिक्षण देण्याचे ठरवल्यावरही अनेक प्रयोग उपक्रम सतत केले. यातून तिची तल्लख बुद्धी, चिकाटी याचे दर्शन घडत गेले आणि जिद्दीला बळकटी आली.

 वल्लरी नेहमीच चांगल्या मार्गाने पास झाली. त्यासाठी तिने आणि आई वडील व आत्या यांनी घेतलेले कष्ट हे अपरंपार आहेत. ही प्रयत्नयात्रा प्रत्यक्षच वाचणे उचित ठरेल. समाजाला स्वत:च्या कृतीने आदर्श घालून देणारी ही कहाणी नुसती वाचावीच नव्हे तर संग्रही ठेवावी अशीच!


• फिटे अंधाराचे जाळे (अनुभव कथन)

 लेखक - भालचंद्र करमरकर
 प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
 प्रकाशन वर्ष - २00४

 पृष्ठे - १३३  किंमत - १५0 रु.

♦♦

शिल्पकार' : प्रेरक काव्यात्मक चरित्रसंग्रह


 कवी प्रा. भालचंद्र त्रिवेदी यांचा शिल्पकार' हा काव्यसंग्रह म्हणजे राष्ट्रीय नेत्यांच्या काव्यात्मक चरित्रांचाच संग्रह होय. कवीच्या मनात आधुनिक काळातील संस्कारशील, आदर्श नेत्यांबद्दल आदर आहे. आपल्या मनातील आदर व्यक्त करण्याच्या हेतूने गुंफलेली ही काव्यांजली राष्ट्रीय काव्यमाला बनली आहे. तिचे राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक महत्त्व आहे. या काव्यसंग्रहाचे संस्कारधन' म्हणून असलेले महत्त्व असाधारण आहे.

 ‘शिल्पकार'मधील चरित्र नायकांनी अनेकांच्या जीवनात काव्य फुलविले. पण त्यांच्या स्मृती समाधीवर कोणी काव्यफुले वाहिली असावीत का? असा शोध घेता लक्षात येते की, यातील गोपाळ गणेश आगरकर, डॉ. पंजाबराव देशमुख, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, प्रबोधनकार ठाकरे, बाबा आमटे, शेरपा तेनसिंग, सर विश्वेश्वरय्या यांसारख्या राष्ट्र पुरुषांवर 'शिल्पकार' मध्ये पहिल्यांदाच काव्यांजली अर्पित केली जात आहे.

 हा काव्यसंग्रह प्रारंभापासूनच आकर्षक, त्याचे मुखपृष्ठ तिरंगी ठेवून कवीने प्रथमदर्शनी त्यास राष्ट्रीय परिमाण बहाल केले आहे. अनुक्रमणिकेत राष्ट्रपुरुषांच्या जन्म व मृत्यूच्या नोंदीने ते शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त झाले आहे. संग्रहात लाभलेल्या प्रा. ग. प्र. प्रधानांच्या प्रस्तावनेमुळे पुस्तकाचे प्रशस्ती बळ तुळशीपत्राने नाही, तर भूर्जपत्रावत ऐतिहासिक झाले आहे. पुस्तकाचा आकार छोटा ठेवून हा काव्यसंग्रह छोट्या दोस्तांसाठी असल्याचे आपसूकच स्पष्ट होते.

 अशा अनेकविध वैशिष्ट्यांनी विनटलेल्या शिल्पकार'चे आंतरिक सौंदर्यही तितकेच मोलाचे. चरित्र नायकाची गुणवैशिष्ट्ये प्रा. भालचंद्र त्रिवेदींनी समर्पक शब्दात व्यक्त केली आहे. 'वक्तृत्वात पाझरे शाश्वततेचे सार' यासारख्या ओळीतून ते स्पष्ट होते. कवीस सामाजिकतेचे मोठे भान असल्याने राष्ट्रपुरुष निवडताना त्यांनी समाजकार्याची लावलेली कसोटी व सांगता लक्षात येते. ती काव्यातून मात्र प्रकर्षाने जाणवते. कर्मवीर भाऊराव पाटील यांची सारी सामाजिक कणव व्यक्त करणाच्या या ओळीच त्याच्या पुराव्याच्या रूपाने उदधृत करता येतील.

 खडकाच्या अंगी डोले पीक हिरवळीचे, नाते तुझे रयतेशी हृदय हळहळीचे!

 ‘शिल्पकार' काव्यसंग्रहात प्रत्येक राष्ट्रपुरुषाची रेखाटने देऊन कवीने हा काव्यसंग्रह सुबोध केला आहे. चरित्रांची निवड व्यापक असल्याने हा संग्रह राष्ट्रीय एकात्मतेचा वस्तुपाठ झाला आहे. जात धर्म-प्रांताच्या पलीकडे जाऊन कवी आपणास एका व्यापक नि उदार जगात घेऊन जातो.

 प्रा. भालचंद्र त्रिवेदी तसे गुजराती, पण मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व मराठी भाषिकास लाजविणारे वाटते. हे कौशल्य येते रियाजाने. यापूर्वी त्यांचे ‘दाह', 'तिमिर’, ‘मंदार', 'दीपदान' यांसारखे संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यानंतरचा हा पाचवा संग्रह अपेक्षापूर्ती करणारा ठरला आहे.


• शिल्पकार (चरित्र काव्य)

 लेखक - कवी भालचंद्र त्रिवेदी,
 प्रकाशिका - सौ. हर्षा त्रिवेदी, निपाणी

 पृष्ठे ५0  किंमत ३0 रुपये

♦♦

‘आकाशवेल : साहित्य आणि वक्तृत्वाचा संगम


 ‘आकाशवेल' हा प्राचार्य डी. जी. पी. माळी यांच्या आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालेल्या मुख्यतः भाषणांचा संग्रह आहे. शिवाय त्यात मुलाखतही आहे. पण ती अपवाद! चिंतन कार्यक्रमात प्रक्षेपित विचारांचा अंतर्भाव भाषणातच होईल. ही भाषणे विषयाच्या अंगांनी वैविध्यपूर्ण आहेत. पण मुख्यतः त्यांचा आधार मराठी साहित्यच आहे. 'रामदासांची काव्यशक्ती', ‘ज्ञानेश्वरी', 'पडघवली', 'लग्नाची बेडी', 'मराठीतील आईविषयक कविता अशी भाषण शीर्षके या दृष्टीने पुरेशी बोलकी आहेत.

 ‘आकाशवेल'चे आपले असे एक वेगळे शब्दाकाश आहे. मला काय त्याचे? चांगला माणूस कोण? सारखी चिंतने वाचकांस अंतर्मुख करतात, आजचे समाजजीवन दिवसेंदिवस बेफिकीर होत आहे. प्रत्येक जण आपल्या पावलाखालच्या जगापलीकडे पाहीनासा झालाय. बाहेरचे सामाजिक अरिष्ट जोवर उंबरा ओलांडून आपल्या घरात येत नाही, तोवर अस्वस्थ व्हायचे नाही, क्रियाशील व्हायचे नाही, अशी एक मध्यमवर्गीय मानसिकता प्रलयासारखी पसरते आहे. त्सुनामी लाटेची वाट पाहण्यात काय हाशील? समाजजीवनातील तटस्थ वृत्तीवर नेमके बोट ठेवणारी चिंतने नव्या समाजाच्या विकृत चाललेला चेहरा आपणास दाखवून अस्वस्थ करतात.

 कारागृहात जन्मलेल्या साहित्यकृती हे भाषण असेच वेगळ्या वाणाचे. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकनायक जयप्रकाश, बालचिंतक साने गुरुजी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, आचार्य विनोबा भावे हे प्रभृती देशप्रेमी तुरुंगात गेले. त्या वेळी तुरुंग आलिशान विश्रामगृहाचा नव्हता. अभाव आणि नियंत्रणाच्या काचातून या मंडळींनी आपला वाचन, विचार, लेखनाचा व्यासंग जपला. भारतातील अनेक श्रेष्ठ कृती या तुरुंगास जन्मल्या. ही ब्रिटिशांनी भारतास दिलेली देणगीच म्हणावी लागेल. अन्यथा या देशप्रेमींना लेखनाची उसंत मिळते कठीण. अशा सर्व साहित्यकृतींचा परिचय करून देणारे ‘आकाशवेल' मधील प्राचार्य माळींचे भाषण म्हणजे स्वातंत्र्यप्रेमी राजकारण्याच्या साहित्यिक व्यासंगाची आत्मीयतेने करून दिलेली ओळखच ती माहितीच्या अंगांनी दिली गेली. मुलाखत हा एक आणखी, आगळा, नजराणा. मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीतील अभिनेते निळू फुले यांची प्राचार्य डॉ.जी.पी.माळी यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे निळू फुलेंच्या समग्र जीवनाचा व्यासंगपूर्ण घेतलेला आढावा ही मुलाखत निळू फुलेंच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकते. डॉ. आ. ह. साळुंखेचे विद्रोही तुकाराम वाचल्यानंतरचे अस्वस्थपण मुलाखतकाराने योग्य शब्दांत पकडून ही आकाशवेल नव्या सामाजिक अवकाशात पोहोचवली आहे. मुलाखतीतील प्रश्न चपखल असून ते निळू फुलेंच्या अनेक अपरिचित बाबी वाचकांपुढे आणतात.

 लोकसाहित्यातील ‘लावणी' व 'गोंधळ'वरील भाषणे डॉ. माळींच्या अभ्यासपूर्ण विवेचनाचा सुंदर नमुना म्हणून सांगता येईल. डॉ. माळी हे मराठीचे विचारशील प्राध्यापक होते. 'स्वामी' कार रणजित देसाई हा त्यांच्या संशोधनाचा व आस्थेचा विषय आहे. त्यांच्यावर यात भाषण नसणे शक्यच नव्हते. रणजित देसाईंवर साहित्य प्रभावासंबंधीचे भाषण 'स्वामी' कादंबरीवरील भाषणापेक्षा अधिक उजवे सिद्ध झालेय. 'आकाशवेल'मध्ये प्राचार्य डॉ. माळींनी ‘वक्तृत्व एक कला' विषयावरील भाषण संग्रहित करून या भाषण संग्रहास सिद्धांत व व्यवहाराची एकसाथ जोड दिली आहे.

 प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी लिहिलेल्या सोबती' आणि 'रणजित देसाई जीवन आणि साहित्य या ग्रंथानंतर प्रकाशित झालेला ‘आकाशवेल' हा भाषण संग्रह मराठी साहित्य अभ्यासक वक्तृत्व कलेचे उपासक व सामान्य वाचक या तिघांनाही समानपणे संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त होईल. डॉ. माळींचे आजवरचे लिखाण मी वाचत आलो आहे. ते ब-याचदा माहितीच्या अंगांनी जात असते ते विश्लेषणात्मक होईल तर हे ग्रंथ मराठी शारदेच्या दरबारातील अनमोल नजराणे ठरतील. त्याचे लेखन प्रयत्नपूर्वक गंभीरतेने लिहिले जात असल्याने त्यांचे संदर्भमूल्य नेहमीच उच्च प्रतीचे राहिले आहे. “आकाशवेल'ने आपल्या कवेत घेतलेले ‘शब्दाकाश' त्याची भलावण केवळ ‘आकाशित शब्द' म्हणून करून चालणार नाही. माझ्या मते, “आकाशवेल'चे सामाजिक व साहित्यिक मूल्य आकाशातीत, अवकाश पेलणारे, नवे क्षितिज कवेत घेणार आणि म्हणून विचारणीय ठरते.


• आकाशवेल (भाषण संग्रह)

 लेखक - प्राचार्य डॉ. जी. पी. माळी
 प्रकाशक - स्नेहवर्धन पब्लिशिंग हाउस,

 ८६३, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३0

 प्रकाशन : २६ जानेवारी २००५

 पृष्ठे : १५९  किंमत १३० रु.

♦♦

आई समजून घेताना : आईचा संवेदी शोध


 उत्तम कांबळे यांचे ‘आई समजून घेताना' ही एका आईच्या शोधाची चित्रकथा आहे. म्हटले तर ते आईचे दीर्घ शब्दचित्र, व्यक्तिचित्र, रेखाचित्र आहे. आईच्या जगण्याची संघर्ष कथा आहे. आईपुढे शरणागत झालेल्या मुलाने घेतलेला हा शोध असल्याने त्याला वेगळे परिमाण लाभले आहे. मॅक्झिम गाँकी, साने गुरुजी, कवी यशवंत, नारायण सुर्वे यांच्या माळेत आता उत्तम कांबळे यांचे नाव घ्यावे लागेल.

 गावकुसाबाहेरचे हलाखीचे जीवन लाभलेले एक दलित कुटुंब. त्या कुटुंबातील इलिंदा एका दलिताची पत्नी होते. पती मिलिटरीत जातो. इकडे इलिंदा मुलांना सांभाळत आयुष्याचा गाडा ओढत राहते. पती व्यसनी होतो. कुटुंबाची आबाळ होते. कुंकू पुसले जाते. पण इलिंदा हिंमत उसवू देत नाही. मजुरी, चाकरी, चोरी, करून पोटच्या पाच पोरांना उजवत, जोजवत राहते. जगण्याची ज्यांच्यात जिद्द असते ती माणसे अंधारास हरवून सूर्यावरही मांड ठोकतात. दगड, प्राण्यांची नावे माणसास ठेवणाच्या समाज व्यवस्थेचं भान उत्तमला येते नि तो समाजाबरोबर आईचाही शोध घेतो.

 या साऱ्या पुस्तकातून उत्तम कांबळे यांची समजून येणारी आई ती नुसती उत्तम कांबळेची राहात नाही. ती दलित, वंचित वर्गातून शिकून सवरून प्रतिष्ठित झालेल्या शहाण्यासुरत्या नव्या पिढीची इतिहासास कवटाळून आयुष्य कंठणारी एक प्रातिनिधिक आई होते. ती समजून घेताना जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्तची ‘मदर करेज', 'द गुड वुमन' सतत आठवत राहते.

 लेखकाची आई एक लढणारी, करारी, स्वाभिमानी आई आहे. लेखक आपल्या आईची एक स्मरण साखळी आपल्यापुढे उभी करतो. ही आई बिरबलाच्या कथेतील पिल्लाच्या जीवावर उठणारी नाही. उलटपक्षी मुलासाठी जीव गहाण ठेवायला तत्पर असलेली. उत्तम कांबळे यांनी आपली आई इतिहास नि वर्तमान, शिक्षण नि अज्ञान, गरिबी आणि समृद्धी, सुशिक्षित नि समजदार यांच्या विलक्षण द्वंद्वातून उभी केली आहे. आईचा इतिहास गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा यांनी भरलेला असला तरी त्याला समंजसपणाची मऊ झालर आहे.  लेखक वर्तमानास सत्य, शिक्षणास समज, समृद्धीस प्रतिष्ठा समजणारा, प्रतिष्ठेची झूल आहे त्याची अडचण, आईला आपले अडाणीपण नेहमी प्यारे. स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराजांसारख्या समाजसुधारकांमुळे ज्यांच्या घरात ज्ञानाचा दिवा लागतो ती घरे शिक्षण, समृद्धी, प्रतिष्ठेने उजळून निघाली. अशा घरातील आई मात्र गाभा-यातल्या नंदादीपाप्रमाणे ‘जुने ते सोने' म्हणत मातृत्वाची ऊब जपत राहिली. आई समजून घेताना हा नुसता आईचा शोध न राहता ती समाजसंक्रमणातून येणारी दोन पिढ्यांची आपापल्या समजुतीवर असलेल्या श्रद्धा नि संस्कारांची संघर्ष कथा होते.

 आई समजून घेणे हे एक सामाजिक उत्खनन असते. त्यात तुमच्या हाती येतात गतकालाचे आयुष्य उसवणारे अवशेष. ते सारे जुन्या जखमांचे नवे संदर्भ असतात. उजेडवाट शोधण्याच्या मनीषेने जे वाट चालतात त्यांना अंधाराची सावली सोडता येत नाही. आईच्या गळलेल्या केसा-गुंत्यातून जिभेवर विरघळणारी ‘बुढ़ी के बाल' मिठाई अजून मिळावी म्हणून आईचे केस अधिक गळण्याची अपेक्षा करणारा मुलगा हा नव्या व्यवस्थेचा एक स्वार्थी गुलाम म्हणूनच जन्मतो. ती नवव्यवस्थेची एक अस्वस्थ नि अटळ निर्मिती असते. नातवाला कोंबडी दाखवण्यासाठी तासन्तास उभारणारी आजी झालेली आई बाप झालेल्या लेखकाला पेलत नाही. कारण आईपण पेलणे नि प्रतिष्ठेच्या बुरख्याचा तोरा सांभाळणे या मुळातच दोन वेगळ्या खाणी आहेत. हे सदरचे पुस्तक समजावते. दु:खाचे पुनर्भरण समृद्धी करू शकत नाही. त्यासाठी माणूसपण जपण्याची अटळ शर्त असते. हे समजावणारे पुस्तक अस्वस्थ शतकाची पावती होय.

 ज्यांना कुणाला स्वतंत्र भारताच्या हीरकमहोत्सवी सामाजिक संक्रमण समजून घ्यायचे आहे अशांना ‘आई समजून घेताना' पुस्तक मार्गदर्शकाचे काम करील. आई एक महाकोडे आहे. ती शेवट नसलेली एक रहस्यकथा आहे. हे पुस्तक ‘आहे रे' आणि 'नाही रे' वर्गाच्या जगण्याची संघर्ष कथा जशी आहे तशी ती विवेक जागवणारी चेतना कधीही भूतकाळ राक्षसी नखांसारखा क्रूर असतो. ज्यांना वर्तमान माणसाळता येतो तेच आईचा भूतकाळ पचवू शकतात. आई पचवणे नि पेलणे यासाठी शहाणपण नामक समाजशिक्षण आवश्यक असते. हे या पुस्तकाकडे प्रकर्षाने उमगते. अंगाई गाणारी आई मुलाच्या कानात उद्याची युद्धगाणी रुजवत असते. म्हणून ती माता धिराई. आई जशी असेल तशी तिला स्वीकारणं म्हणजे तिला सन्मानित करणे. ज्यांना आपल्या आईच्या  अशिक्षितपणाची, तिच्या भूतकाळात रमण्याची इतिहास कवटाळण्याची लाज वाटते त्यांना आईचे गोडवे गाता येणार नाहीत.

 एखादा मुलगा इतका मोठा होतो की त्याचे सुख हे सोसलेल्या आईस शिक्षा वाटू लागते. उत्तम कांबळे यांनी आपल्या सोसलेल्या आईचे हरेक सोस पुरे केले तरी त्यांना त्यांची आक्का आई सोसता आली नाही. आईला सोसणं हे येरागबाळ्याचे काम नाही. हे सांगणारे सदरचे पुस्तक आई नामक अद्याप न समजलेल्या सात अष्टमांश हिमनगाची एक अष्टमांश कथा. ती पूर्ण कशी होणार? आईचा शोध ही पिढी दरपिढी सतत चालणारी एक प्रक्रिया आहे. याचे भान देणारे हे पुस्तक प्रत्येकानं वाचायला हवे. ते स्वत:ला या पुस्तकाच्या कसोटीवर पारखण्यासाठी हे पुस्तक असा सामाजिक परीस आहे की तुम्ही स्वत:ला त्याच्या कसोटीवर जोखाल तर तुमच्या आयुष्याचे सोने होईल. एका संवेदनशील लेखकाने घेतलेला आईचा हा शोध साहित्यिक निकषापेक्षा माणूसखुणावर पारखण्याचा ऐवज होय. सचित्रतेमुळे हा शोध अधिक बोलका झाला आहे.


• आई समजून घेताना (आत्मकथन)

 लेखक - उत्तम कांबळे
 प्रकाशक - लोकवाड्मय गृह मुंबई
 प्रकाशन वर्ष - २००६

 किंमत १२५ रु.

♦♦

हॉटेल माझा देश : वेटर व वेश्यांसंबंधांचे काव्य


 माणसं माणसाशी माणसासारखी वागावीत, शेकडो वर्षांपासून सुरू असलेले माणसाचे शोषण संपावे, माणूस माणसाजवळ जावा, हॉटेलातील समतेसारखी समता प्रस्थापित व्हावी... हा देश हॉटेलसारखा समतेचा सागर बनावा' अशा ध्यासातून माणूस नि माणुसकीस केंद्र करून लिहिलेल्या कवितांचा संग्रह म्हणजे ‘हॉटेल माझा देश' प्रा. डॉ. धम्मपाल रत्नाकर या तरुण नि संवेदनशील कवीच्या या कविता तुम्हास माणुसकीचा मळा फुलविण्याच्या महत्त्वाकांक्षेने माणुसकी नसलेले नि माणसास नासवणारे जग दाखवतात. या काव्यसंग्रहाचे हे पाथेय.

 डॉ. रत्नाकर अशा हजारो देशबांधवांचे प्रतीक आहेत जे पोट भरण्यासाठी गावकुसातले जीवन सोडतात नि शहरात येतात. गावाकडच्या उपेक्षित जीवनाची उबग आल्याने जी तरुण मंडळी मृगजळामागे धावत शहरात आली त्यांना इथल्या महानरकाने उबग आणला. गावाकडची जातीयतेची उतरंड, विषमता त्यांनी अनुभवली असल्याने त्यांना हॉटेल लाईन समतेची पंढरी वाटते. त्याचे कारण हॉटेलात जात, धर्म, पंथ या पलीकडे एक माणुसकीचा पाझर झरत राहतो. डॉ. रत्नाकर आपली पडझड संपावी म्हणून हॉटेलात वेटर, कॅशियर, क्लिनर, व्यवस्थापक अशी सारी कामे करतात. या प्रवासात त्यांना जे नवे जग गवसते ते डॉ. रत्नाकर माणुसकीस गवसणी घालत तुम्हास या कवितेतून दाखवतात नि वाचक ते सारे पाहुन सुन्न होतो.

 हॉटेल आहे या कवीचा देश. 'भारत माझा देश आहे...' प्रतिज्ञेतला नयनरम्य भारत त्याला इथे गवसत नाही. त्याला लक्षात येते की ही व्यवस्था माणसास पायताणा जवळचे जीवन जगण्यास भाग पाडते. राष्ट्र, राष्ट्रध्वज या संकल्पनेवरचा त्याचा विश्वास उडून जातो. ही कविता माणूस नि घटना तुडवणाच्या या देशात ‘जातीयतेला गाढव लावायला हवे' म्हणत सरळ व्यवस्थेविरुद्ध जिहाद पुकारताना दिसते. सभ्यतेचे सारे संकेत नाकारत ही कविता हॉटेल कामगार, दलित, उपेक्षित, वेश्या यांच्या रोजच्या भाषेत आपल्या साऱ्या व्यथा, वेदना ऐकवते. इथे कष्टांना किंमत नसते. सिगारेटच्या तुकड्यासारखे तुम्हास सतत जळत रहावे लागते. मुतारीच्या डांबर गोळीसारखे वितळत  तुमच्यातल्या माणसास विरघळून टाकणा-या अमानुष विषमतेविरुद्ध या संग्रहातील प्रत्येक कविता तीव्र आक्रोश ओकत राहते. वाचून वाटते असे ‘टॉवेलचं जीवन' कुणीही यावे पुसावे- कुणाच्या वाट्यास येऊ नये.

 या कविता तुम्हास नव्या जगाची नवलाई दाखवतात. इथल्या बारक्याला समलिंगी संबंधातून थानं फुटतात, इथली भाषा शिवीशिवाय शून्य. मालक म्हणजे माणसास लागलेला जळू, भूक नसताना पैशाची मस्ती दाखवायसाठी आलेली मस्तवाल गि-हाइके, श्रीमंतीचा कैफ उतरवण्यासाठी येणारी माणसे, बाई नि ब्रॅंडीच्या बाटलीत आपली रग नोटेसारखी वेश्यांना चुरगाळत, पान चघळत, माणसावर कशी थुकतात...चोरून चुंबन घेणारी, मांडीत मांडी घालून तुमच्या मांड्या खवळून टाकणारी...इज्जतीचा लिलाव करणारी, दादा, भाई, नवरोजी असा बेरका प्रवास करणारे संभावित ... अशा माणसांचे बुरखे फाडणारी, समाजाचे खायचे दात दाखवणारी कविता तुमच्यात माणुसकीचा पाझर फोडते. अशासाठी की इथे आता माणुसकीचा मळा फुलायला हवा.

 हॉटेल, रेड लाईट एरिया, लॉज हे एक असे जग आहे की ते बाहेरून चकाकत असले तरी आतून जळत असते... इथे सारे पैशावर जोखले जाते. हे सारे वरच्या जगाचे. खालचे जग माणुसकीने प्यासे असते... तिथे वेदना हेच नात्याचं बंधन असतं. त्यामुळे वेश्या नि वेटर आपसूक भाऊ-बहीण असतात.

 ‘हॉटेल माझा देश'ची कविता भाषेच्या अंगांनी दलित कवितेच्या जवळ जाणारी ढसाळी असली तरी तिचा अंतर स्वर, जात, धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन वंचितांच्या वेदना प्रकट करणारी नि म्हणून वेगळी वाटते. आंबेडकरी कुंपणाच्या पलीकडे जाऊन वैश्विक नि निखळपणे सामाजिक न्यायाच्या कसोटीवर माणसास तोलणारी ही कविता आपणास अधिक भावते ती तिच्यातील सामाजिक संतुलनाच्या जाणिवेमुळे. तशी ही कविता एक छोटे जग दाखवणारी, तिला अनुभवाच्या मर्यादा आहेत. भाषेचे कुंपण आहे. त्यात ती अडकते पूर्व संस्कारामुळे. पण तिला नव्या क्षितिज शोधाचा ध्यास आहे. त्यासाठी या कवितेने, कवीने आता हॉटेल पल्याडले व्यापक जग धुडाळायला हवे. कुपमंडूक जग ओलांडल्याशिवाय तुम्हास वैश्विकतेचा शोध घेता येणार नाही याचे भान यायचे तर कवीन व्यापक जग वाचले पाहिजे.


• हॉटेल माझा देश (काव्यसंग्रह)

 लेखक - धम्मपाल रत्नाकर
 प्रकाशक - समृद्धी, १७०७ बी, मंगळवार पेठ, कोल्हापूर
 प्रकाशन वर्ष - २00६

 पृष्ठे - ९८  किंमत - ८0 रुपये

♦♦

'विभूती' : राष्ट्र पुरुषांची प्रेरक सूक्ते


 कवी प्रा. भालचंद्र त्रिवेदी यांची राष्ट्रीय काव्यमाला ‘विभूती' भारतभूमीच्या नररत्नांचे स्तुतीस्तोत्र आहे. आज 'बाबा' नि ‘बहन' यांचे स्तोम वाढते आहे. ईश्वरीय पूजा, अध्यात्म यापेक्षा राष्ट्रीय विभूतींची चरित्रे जर नव्या पिढीच्या हातात दिली तर उद्याची पिढी नक्कीच चारित्र्यसंपन्न होईल असा आशावाद, ध्येयवाद घेऊन प्रा. भालचंद्र त्रिवेदी सतत लिहीत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘शिल्पकार' नामक अशीच राष्ट्रीय काव्यमाला नव्या पिढीच्या हाती दिली होती. त्यात ५0 राष्ट्रीय पुरुषांची काव्यात्मक चरित्रे दिली होती. आज ‘विभूती'तून ते आणखी ४0 राष्ट्रपुरुषांची प्रेरक सूक्ते राष्ट्रीय काव्यमालेच्या रूपाने सादर करीत आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

 ‘विभूती'मध्ये त्रिवेदींनी समाजसुधारक, संत, वैज्ञानिक, राजकारणी, इतिहास पुरुष यांच्याबरोबर वर्तमानातील अण्णा हजारे, किरण बेदी यांची काव्यसुमनांद्वारे महिमा वर्णिली आहे. उद्देश स्पष्ट आहे की या सर्वांचे जीवन नव्या पिढीस आदर्शभूत ठरावे. पूर्वी गद्यात्मक चरित्रे असायची. ती घटना नि सनावळ्यांनी कधी कधी रूक्ष व्हायची. आजच्या काव्यगतीचा तसाच घाईचाही. विस्ताराजागी संक्षेपाचे, गद्याच्या जागी पक्षाचे राज्य येत आहे. कारण त्यातून थेंबात समुद्र उफाळण्याची ताकद असते. स्त्री पुरुष विभूतींची ही काव्यपूजा नव्या युगाचे संस्कारदीप अखंड तेवत ठेवतील. त्यातून नव्या पिढीस मूल्यसंवर्धन, चरित्रचर्चा, संस्कार दीक्षा रुजेल. चांगले रुजायचे तर साधनही सक्षम हवे. चरित्र नि चारित्र्यवर्धनासाठी त्रिवेदींनी काव्यसाधन निवडून संस्कार साधनेचा नंदादीप ‘विभूती'तून प्रज्वलित केला आहे. मूल्य -हासाच्या नि चारित्र्यघसरणीच्या आजच्या काळात ही काव्य कुसुमांजली संस्कार संजीवनी ठरेल, असा मला विश्वास आहे.

 ‘विभूती'ची भाषा सुबोध आहे. हे अल्पाक्षरी काव्य असले, तरी आशयघन आहे. त्यात भावुकता व बौद्धिकतेचा जसा संगम आहे, तसा चरित्र व चारित्र्याचाही! ही ‘विभूती' समाजाचे संस्कार वैराग्य हटवून त्याजागी संवेदन साक्षरता रुजवेल.


• विभूती (काव्यमाला)

 लेखक - प्रा. भालचंद्र त्रिवेदी
 प्रकाशक - हर्षा त्रिवेदी, निपाणी

 प्रकाशन वर्ष - २00७

'पालातील माणसं' : फिरस्ती जीवनाचे आत्मकथन


 आजचे मराठी साहित्य अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत पाहिले तर ते अधिक अनुभवजन्य आणि वस्तुनिष्ठ जीवन चित्रण करणारे दिसून येते. त्याचे मुख्य कारण या साहित्यातील आत्मकथेचा सशक्त प्रवाह. पूर्वी आत्मकथा या आत्मसमर्थनार्थ लिहिल्या जायच्या. या आत्मनिष्ठेस छेद दिला तो दलित आत्मकथांनी. त्यात आत्मनिष्ठा असली तरी पार्श्वभागी असलेल्या समाजवेदनांचे सामूहिक प्रभावळीचे महत्त्व त्यामुळे अधोरेखित झाले. 'बलुतं', 'उपरा', ‘उचल्या', 'कोल्हाट्याचं पोर', 'गबाळ'सारख्या आत्मकथांनी ते मराठी साहित्यात ठळक केलं.

 दलित साहित्याला ‘समूहकेंद्रित करणारे नि एका अर्थाने दलित साहित्यात नवी वाट मळणारे अनुभवसंपन्न पुस्तक म्हणजे पालातील माणसं'. ‘तीन दगडांची चूल मांडणाच्या विमल दादासाहेब मोरेंनी ते लिहिले आहे. या पुस्तकाचा बाज काही और आहे खरा. ते आत्मकथन असलं तरी रूढ अर्थाचे नाही. नंदीबैलवाले, गोसावी, घिसाडी, मांग-गारूडी, रामकोंडाडी, डवरी, फासेपारधी, गोपाळ, कोल्हाटी, वैदू, डोंबारी अशा दहा भटक्या जमातीतील स्त्रियांचे ते सामूहिक आत्मकथन आहे. यास ‘सामूहिक अनुकथन' म्हणणे अधिक उचित होईल. आपली ‘तीन दगडांची चूल मांडून झाल्यावर आपल्यासारख्या इतर भटक्या जमातीतील स्त्रियांच्या तीन दगडांच्या चुली कशा आहेत, हे जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून विमल मोरेंनी महाराष्ट्र, कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांतील भटक्या जमातींची पाले पाय तुडवत शोधली. तेथील स्त्रियांना 'मी तुमच्यातलीच आहे' असे सांगून पटवून देऊन विश्वास निर्माण केला. त्यांना बोलते केले. त्यांची खदखद त्यांच्याच भाषेत उद्धृत केली. त्यातून साकारलेले हे पुस्तक दहा वेगवेगळ्या भटक्या जमातीतील स्त्रियांचं अरण्यरुदन होय.

 ‘पालातील माणसं' वाचत असताना क्षणाक्षणाला त्यांचे माणूस नावाचे जीवन माणूस जातीला काळोख फासणारे असते, हे हळूहळू लक्षात येते. हेही लक्षात येते की स्वातंत्र्याच्या ६० वर्षांच्या वाटचालीत आपण यांच्या जगण्यात कोणतंही स्थित्यंतर, परिवर्तन आणू शकलो नाही. पालात स्त्री असणे आयुष्याचा पालापाचोळा होणे असते. ती स्त्री नसते. ती तेथील पुरुषांच्या लेखी एक रांड, रखेल नि हक्काची खरेदी केलेली गुलाम असते. शिव्यांची आरती हाच तिचा असतो उद्धार. ती विकत घेतली जाते नि विकत घेतल्याच्या गुर्मीत तिला नागवले जाते, ती आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संशयाच्या अग्निरेषेवर अग्निपरीक्षेसाठी सदैव तत्पर, साधे पालात लाल मुंग्या लागल्या तरी तिला तिचे मळभ उठलेले चारित्र्य प्रायश्चित्ताने सिद्ध करावे लागते. रोजच्या जेवणात थेंबभर गोडेतेल न वापरणाच्या या जमाती स्त्री चारित्र्याच्या शुद्धतेच्या सत्त्वपरीक्षेसाठी मात्र किलोभर तेल आणतात. उकळतात नि त्यातला पैसा काढायला लावतात. लग्न रात्री तर जुन्या कपड्यावरच पाठ लावली जाते. जुने कपडे चोरीचे, दुसरे मिळेपर्यंत पुरवावेच लागतात. सकाळचे जेवण मागून आणलेल्या तुकड्यांवर. ते मिळविण्यासाठी सूर्योदयापूर्वी उंबरे झिजवायचे. उशीर झाला तर सभ्य समाजातली सुशिक्षित, स्थिरावलेली, सुसंस्कृत माणसे शिळं पाकं सूर्योदयानंतर जनावरांच्या मुखात घालतात म्हणून या स्त्रियांनी जीव पणाला लावत आकांतानी वस्त्या, गावे पायी तुडवायची. रात्री तर्र होऊन आलेल्या पुरुषांच्या वासनेला यांनी हक्काने नेमाने बळीच पडायचे. रात्री वस्तीवर दिवा नसतो, कारण पोलीस संशयित म्हणून रोज छापे टाकतात. पोलिसांचे कुत्र्यासारखे लचके तोडणे, अंगाला झोंबणे, अवघड जागी मारणे, बाव-याला वाचवण्यासाठी या बायकांचे किडूक मिडूक विकणे रोजचे! देखणेपणाचा शाप असणारी पालातील स्त्री तीच. पाय घसरला की तिला बहिष्कृतच व्हावे लागते. जित्यापणी तिचे दिस घालणारी पालं स्त्रीपणाचे नवे पालाण तुमच्यापुढे उभे करते. वाचक निःस्तब्ध होतो तो स्वत:स माणूस म्हणवून घेण्याच्या खोट्या प्रतिष्ठेमुळे!

 ‘पालातील माणसं' भटक्या जमातीचा समाजशास्त्रीय, मानवंशशास्त्रीय लोकसंस्कृतीचा दस्तऐवज जसा आहे तसं ते एक दलित साहित्यातले ललितही! या पुस्तकात दहा भटक्या जमातीतील स्त्रियांचे जगणे-मरणे समजते. ते समजून घ्यायला मोठी हिंमत लागते खरी. या साच्या जमाती पूर्वी जंगलात राहायच्या. जगायच्या. जंगलातील कंदमुळे, जनावरे हाच त्यांच्या जगण्याचा आधार. माणसाने जंगले उद्ध्वस्त केली. यांच्या जगण्याचे आधार असलेली जनावरं नामशेष होत गेली. निसर्ग ओरबडला. पर्यावरण उद्ध्वस्त झाले. तसे यांचे पारधीपण अपारधी आणि अपराधी झाले. मग माणूस नावाच्या तथाकथित सभ्य समाजावरचा त्यांचा भरवसा उठला. ते रामभरोसे झाले. काळूबाई, ताईबाई, कडकलक्ष्मीच त्यांच्या जगण्याच्या श्रद्धा, आधार बनले. मग त्यांची संस्कृतीच ठरून गेली.

 माणूस नावाच्या प्राण्याने त्यांना जेव्हा माणूस म्हणून नाकारले तेव्हा ते पण कुत्रा नि माणसात फरक करेनासे झाले. पैशाच्या मिजाशीवर शिकारीसाठी कुत्री पाळतात तशा स्त्रियाही ते पाळू लागले. त्यांचे सारे जीवन एक लोकव्यवहार असतो. लोकभाषा हेच त्यांचे संवाद साधन. अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा हेच असतात त्यांच्या जगण्याचे आधार व भाग्योदय पण. त्यापुढे स्त्री असते अवहेलना, श्रम, अगतिकता, शोषण, अन्याय, अत्याचारासाठीची हक्काची बळी! तिला मन नसते. असते फक्त मांस. तिला मन नसतं, असतं फक्त मनगट, भाडखाऊ, ऐदी पुरुषाची मिरासदारी मुरवाय, जिरवायसाठी, तिला मन नसते. ती असते एक मादी, माता, माकडीण. हवे तेव्हा हवे तसे वापरायला नाचवायला मिळणारी. या स्त्रियांचे जीव मुठीत घेऊन जगणं असतं एक ‘गुदमर' कधीच न मोकळी वाट मिळणारे म्हणून मग विमल मोरे भेटतात तेव्हा त्या आपल्या दादल्याच्या परभारे सारे भडाभडा ओकतात. त्यांना परत ते बावन्याला कळण्याचे भय नसते म्हणून त्या सारे खरे सांगतात. हे जगणे मराठी साहित्यात वेदनेचे नवे वेद लिहीत असल्याचे जाणवते.

 सौंदर्याच्या तुमच्या संकल्पना हे पुस्तक बदलते. संस्कृतीची पारंपरिक परिमाणं धडाधड कोसळण्यास भाग पाडणारे. हे लेखन नव्या समाज उभारणीची आवश्यकता रेखांकित करते. असे भिडणारे लिहिणे भिडल्याशिवाय शक्य होत नसतं. या लेखनाची जातकुळी ‘जावे त्याच्या वंशाची आहे. हे हृदयीचे ते हृदयी घातले' असा बाज झालेले हे लेखन परदुःख सहिष्णू झाल्याखेरीज घडत नसते. विमल मोरे यांनी हे लिहिण्यात मोठे धाडस दाखवले.

 पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्धच्या शोषित मूक स्त्रियांचा सामूहिक जिहाद आहे. हे पुस्तक स्त्रीचे मडे, भूत होऊ नये म्हणून नागवणाच्या पुरुषी अहंकारावर चोळलेले मीठ अशासाठी की ही जिव्हारी, हे जहर केव्हातरी पुरुषी गळी उतरायलाच हवे. या पुस्तकाचे सामाजिक, साहित्यिक मूल्य परंपरेने पारंगत झालेल्या निकषांवर जोखणे अशक्य आहे. हे पुस्तक समजून घेणे महत्त्वाचं. वाचून ते सोडून देता येत नाही. ते तुमचा पिच्छा पुरवते. तुम्हास प्रश्नांकित करते. प्रश्नांचा तुमच्या मागे ससेमिरा लावते. हे असतं या लेखनाचे यश. ते तुम्हास नव्या जगात नेते.

 भटक्या जमातीत बाईचं जगणं कठीण, पण मरणे त्या परीस कठीण. मेल्यावरही तिला तिच्या सत्पणाची परीक्षा द्यावी लागते. जाळल्यावर राख सावरताना दागिना मिळाला नाही तर तिचं सौभाग्य प्रश्नांकित होते. मरताना सुया टोचल्या जातात भूत होऊ नये म्हणून! इथे स्त्रीला मुलगी झाली तर अरण्यरुदन! पण पाळलेल्या म्हशी, डुक्कर, गाढवाला मादी झाली की आनंदोत्सव! या साऱ्या भेदाभेदाच्या जगण्याचे चित्रण करणारे हे पुस्तक संस्कृतीचे नवे अध्याय मागते. वाचकास अडचणीत आणणारे हे पुस्तक तुम्हास स्त्रीपणाचा कळवळा देऊन थांबत नाही तर ते स्त्रीविषयीच्या कळकळीची नवी सामाजिक भावसाक्षरता तुमच्यात जागवते. हे या पुस्तकाचे सर्वांत मोठे सामाजिक व साहित्यिक योगदान.

 एकविसाव्या शतकातील मराठी साहित्य दलित, सवर्ण, स्त्री-पुरुष, वंचित, उपेक्षित, शहरी, ग्रामीण गावचे गावकुसाबाहेरचे असे भिंत बंदिस्त असणारं नाही. बर्लिनची भिंत पडली. चीनची अजस्त्र भिंतपण पडेल, अशी उदारमतवादी आश्वासक उमेद जागवणारे हे शतक. या शतकाचे साहित्य केवळ 'माणूस' या निकषावर तोलले जाईल. मानव अधिकार असेल त्याच्या जगण्याची कसोटी नि आधार. जात, धर्म, कुल, गोत्र या पलीकडे जाऊन शोषणमुक्त, अंधश्रद्धामुक्त, शिक्षित, विज्ञाननिष्ठा समाजरचनेचा नवा खेळ मांडणारे हे शतक असल्यानं विमल मोरेंनी दलित, ललित, कथन, आत्मकथन अशा मान्य चौकटींना विराम देऊन लिहिलेल्या या पुस्तकासाठी मराठी समीक्षेस नवी साहित्यिक परिमाणे शोधून काढावी लागतील. हे पुस्तक आत्मकथन की अनुकथन, व्यष्टी का समष्टी, दलित की ललित, वैचारिक की वृत्तान्तात्मक, सामाजिक की साहित्यिक असे अनंत प्रश्न उभे करणारे नि म्हणून मराठी साहित्यात मन्वंतर घडून आणणारे ठरेल. ते नव्या साहित्यशास्त्राची मागणी करेल. ते जुन्या भिंती पाडून नवे प्रवाह देईल. नवे प्रवाह मध्यप्रवाहात आणील.


• पालातील माणसं (आत्मकथन)

 लेखिका - विमल मोरे,
 प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन, पुणे
 प्रकाशन वर्ष - २००७,

 पृष्ठे - १६४  किंमत - १२०

नामदारनामा' : व्यक्ती चित्राद्वारे आत्मकथाचा प्रयोग


 अलीकडे मराठी भाषेत आत्मकथेस कथा, कादंबरीची पत लाभली आहे. त्याचे कारण तिच्यात असलेले अनुभवाचे अप्रूप जसे आहे तसे लेखनशैलीचे वैविध्यही! प्रा. कमलाकर दीक्षित यांचा ‘नामदारनामा' वाचताना ते प्रकर्षाने लक्षात येते. काही वेळा ठेवणीतल्या चिजा झाकल्या माणकांसारख्या दुर्लक्षित राहतात. त्या अडगळीत पडल्यामुळे ‘नामदारनामा' प्रकाशित होऊन सहा महिने उलटून गेले तरी वर्तमानपत्रे, मासिकांच्या संपादकांनी त्याची दखल घेऊ नये याचे मोठे आश्चर्य वाटते. आजकाल वाचक प्रशस्तीनंतर आपली पसंती देतात. पण प्रशस्तीमध्ये अस्सलपणा जोखण्याचे कसब पुस्तक परीक्षण करणा-यांमध्ये राहिलं नाही हे मात्र खरे!

 हे सारे ‘नामदारनामा' वाचताना लक्षात आले. कमलाकर दीक्षित हे इंग्रजीचे प्राध्यापक असले, तरी मराठीचे चिकित्सक वाचक व आस्वादक आहेत. त्याच्या लेखनाला एक टोक आहे. नेमकेपणाने ते आपला आशय वाचकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्यात एक बेरका निरीक्षक व खिल्लीबाज शैलीकार दडलेला आहे. प्रा. म. द. हातकणंगलेकरांच आत्मचरित्र मध्यंतरी मी असेच वाचले. ‘उघडझाप' त्याचे नाव. माणसाच्या उत्तरायणाचा काळ हा आयुष्याच्या स्मृतींची उघडझाप असते. ती लेखकांनी सुट्या सुट्या लेखांतून मांडली आहे. लेख सुटे असले तरी त्यात एका व्यक्तीच्या जीवनाचा सूत्रबद्ध प्रवास लक्षास येतो. नामदारनामाचा बाज यांच्या जवळचा असला, तरी हा बाज वेगळा आहे खरा. इथे 'व्यक्तिचित्रे' हे माध्यम घेऊन कमलाकर दीक्षितांचं जीवन स्पष्ट होतं.

 ‘नामदारनामा' शीर्षकातच ही आत्मकथा असल्याचे सूचकपणे स्पष्ट होतं. 'बाबरनामा', ‘हुमायूनामा', अकबरनामा', तसाच हा ‘नामदारनामा'. ‘नामदार' ही वतनदारी, जमीनदारी, पाटीलकी, कुलकर्णीगिरीची खानदानी श्रीमंती स्पष्ट करणारी बिरुदावली. दीक्षितांचे आजोबा या अर्थाने नामदार. तिचा पाझर कमलाकर दीक्षितांमध्येही आढळतो, हे वेगळे सांगायला नको. दीक्षितांनी 'हंस', 'अंतर्नाद' ‘दक्षिण महाराष्ट्र केसरी'सारख्या मासिक नि वृत्तपत्रातून हे लेख व्यक्तिचित्रे लिहिली. त्यातून दीक्षितांच्या समग्र जीवनाचे तपशील सूत्रबद्धपणे येतात व त्याचे आत्मचरित्र अप्रत्यक्षपणे स्पष्ट होते. पण इथे हे एका व्यक्तीचे जीवन राहात नाही. दीक्षित या साऱ्या कथेचे सूत्रपात्र होय. त्यांच्या आठवणीतून इथल्या व्यक्ती, घटना, प्रसंग जिवंत होतात व त्यातून गतकाल साकारतो. तो अस्तंगत विरलेली एक घरंदाज लोकसंस्कृती उभी करतो.

 नामदारनामा' पुस्तकांच्या सावलीत वाढलेले दीक्षितांचे बालपण स्पष्ट करतो. नंतर या कथेचे एक भरगच्च पात्र असलेल्या आजोबांचे खानदानी चरित्र उलगडत जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मणांचे वाडे हे तत्कालीन लोकसंस्कृतीचे ऐवज! त्यात सर्वसमावेशकता होती. माणुसकीचा पाझर होता. मोठेपणा होता पण कुणाचा अनादर नाही व्हायचा. तिथं घासातला घास देण्याचे औदार्य हे नामदाराचे वैभव होते. मग मित्राष्टक सुरू होते ते 'ऐने अकबरी'तून ‘नारायंड्रावांची बखर' हा 'नामदारनामा' चा आत्मा. नारायणराव हे काका. त्यांच्या जीवनाचा सारीपाट इथे मांडलेला आढळतो. माणसाचे घरंदाजी जगणे, नादिष्ट-छंदिष्ट जगणे हे ठेवणीतले. सिनेमा, तमाशा, वशीकरण, तारुण्यसुलभ हिकमती, कुरापतीतून जे लोकजीवन इथे उभे राहते ते दीक्षितांच्या विस्तारातून. वैभव व विनोदाचे नवे विभ्रम निर्माण करणा-या शैलीच्या पाऊलखुणातून, मिश्किलपणातूनही मतलबाचे, मुद्याचे सांगण्याचे दीक्षितांचे कसब पूर्वसुरीच्या विनोदी शैलीकारांना मागे टाकणारे, हरवणारे खचितच असते. हे असते या 'नामदारनामा'चे निराळेपण नि नामांकितपणही! गोजा मावशी, गुंडो अप्पाजी, गंपू इथे भेटतात. हसवतात, अंतर्मुख करतात. वाचताना तुम्हास थबकायला भाग पाडतात. नामदारनामा' म्हणून गमतीदार आहे तसा घन गंभीरपण!

 ‘नामदारनामा'तील कथा, तिच्यातील व्यक्ती नि प्रसंगात कल्पना व वास्तवाची सरमिसळ असल्याचा कबुलीजबाब हा लेखकाच्या बुजरेपणातून आला असला तरी तो एक लेखकीय बनावच म्हणावा लागेल. ही सरळ सरळ लेखकाची बखर आहे. ती त्यांनी व्यक्तिचित्रातून उलगडली आहे. ही आत्मकथा लेखनाची नवी शैली, नवा प्रयोग, नवे तंत्र म्हणून नोंद घ्यावी अशी आहे. या ‘नामदारनामा'ची अनेक वैशिष्ट्ये वाचताना लक्षात येतात. ही एका विस्तृतकाळाची तपशीलवार आशयघन लोकबखर आहे. हिची मांडणी मुलखावेगळी आहे. फर्मास व्यक्तिचित्रे रंगवण्याचा लेखकाचा बाज त्याच्या लेखनशैलीचा घरंदाजपणा घेऊन येतो, इथे नातेसंबंधाची उलघाल आहे. नमुनेदार माणसांचे मोहळ इथे भेटते. इथली माणसे वाचकाला गळामिठी मारतात. ती हृदयस्थ होतात. ‘नामदारनामा'ची भाषा अस्सल ग्रामजीवनाचे पूर्वसंचित स्पष्ट करते. कलेची अष्टदर्शने घडविण्याचे सामर्थ्य घेऊन आलेलं हे आत्मकथन गर्भश्रीमंतीत दडलेले माणूसपण समजावते. एका अस्तंगत झालेल्या सरंजामी संस्कृतीचे उत्खनन करणारे हे लेखन माणसाने हरवलेल्या माणूसपणाच्या खुणा परत हाती देते. हे असतं या ‘नामदारनामा'चे देणे. कमलाकर दीक्षितांनी अस्सल ग्रामीण म्हणी, वाक्प्रचार, संवाद इ. तून हरवलेल्या लोक जीवनास ज्या उमेदीने जिवंत केले आहे ते वाचणे म्हणजे आपली अनुभव श्रीमंती वाढवणे. किस्से- कहाणीतून, व्यक्तीवैचित्र्यातून आपली जीवन कहाणी एका व्यापक लोकसंस्कृतीच्या कॅनव्हासवर चित्रित करण्याचा हा प्रयोग मराठी आत्मकथेस पुढे नेणारा ठरेल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. हा ऐवज मात्र ज्याचा त्याने वाचून जोखणेच उत्तम. ज्यांना कुणाला आपण कालजयी (क्लासिक) वाचायलाच पाहिजे असे वाटते त्यांना 'नामदारनामा हा दीक्षितांनी दिलेला नजराणा पाहायला हरकत नाही.


• नामदारनामा (व्यक्तीचित्र संग्रह)

 लेखक - प्रा. कमलाकर दिक्षीत
 प्रकाशक - आनंद अंतरकर, पुणे.

 प्रकाशन वर्ष - २00८

♦♦



नेपाळ नावाचं गूढ' : छायाचित्रात्मक प्रवासवर्णन


 माणूस जगात असतो. जगताना विविध अनुभव घेत असतो. ते अनुभव त्याला अस्वस्थ करतात. त्या अस्वस्थतेवर त्याचा विचार होतो. त्या विचारातून एक संचित तयार होऊन, त्याच्या हाती येते. मग ते संचित व्यक्त करण्यासाठी तो तळमळत असतो. मग कधी लेखणीने तर कधी कुंचल्याने, तर कधी कॅमे-याने तो ते अभिव्यक्त करत असतो. त्यातून साकारते ती कलाकृती. मिलिंद यादव यांचेही असेच झाले. गळ्यात कॅमेरा अडकवून फिरत असताना एक बक-यांची टक्कर त्याचे लक्ष वेधते. कॅमे-यात जाते. मती, गती, युक्ती, शक्ती साऱ्यांचे संचित असलेले ते छायाचित्र दै. 'सकाळ'च्या छायाचित्र स्पर्धेत पाठवले जाते. राज्यात त्याला नंबर मिळतो. पुरस्कार म्हणून ‘सकाळ मिलिंद यांना नेपाळचा प्रवास घडवून आणतात. यादव यांना प्रवास घडला. तो त्यांनी छायांकित केला. चित्राला शब्दांची जोड मिळाली आणि त्याचं एक पुस्तक झालं. त्या प्रवास वर्णनाचे नाव...'नेपाळ नावाचं गूढ...'

 |हे पुस्तक शीर्षक नि मुखपृष्ठापासूनच वाचकांची पकड घेते. एक गूढ जिज्ञासा त्याच्या ठायी आकारते ती पाने चाळता चाळता, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. ते मुखपृष्ठापासूनच तुम्हाला नेपाळच्या प्रेमात पाडते. आकार, बांधणी, मांडणी, सजावट, मनोगत समजून घेत आपण या नेपाळ नावाच्या गूढात गढून जातो अन् मग लक्षात येते नेपाळ हे गूढ आहे खरे. हिंदू व नि बौद्ध अशा कर्मकांडी आणि कर्मकांडमुक्त, धर्मप्रणाली राजेशाही व मार्क्सवादी अशा टोकाच्या राज्यप्रणाली, सौंदर्य अन् विरूपता, हिंसा अन् अहिंसा, ज्ञान अन् अज्ञान, परंपरा अन् नवता. यांच्या संघर्षातही नेपाळ आपली लोकसंस्कृती, निसर्ग नि वैविध्य कसे टिकवून आहे याचे आश्चर्य वाटत राहते.

 नेपाळ हा निसर्गात नि मानवनिर्मित साहित्य, कला, संस्कृतीतील आखीव, रेखीव देश आहे. इथला निसर्ग त्याचे नानाविध रंग आपल्याला मोहून टाकतो. इथले सोनेरी ऊन, शुभ्र बर्फ, लोकांतील लाल रंगाचे आकर्षण, वस्त्र लाल, हिंसा लाल...हिरवाईत दडलेले लाल आकर्षण गूढ नव्हे तर काय? हे सारे मिलिंद यादव आपल्याला छायाचिताद्वारे समजावतात. यातील प्रत्येक छायाचित्र म्हणजे नेपाळच्या अभिजात निसर्ग अन् लोकसंस्कृतीचा नजराणा, हिरवी शेतं, माणसे, पोषाख, दागिने, पदार्थ, घरे, परंपरा केवळ अन् स्तूप... या सा-यांतून गूढ उकलणारा नेपाळ मूर्त होतो... नेपाळला प्रत्यक्ष भेट न देताही तो पाहण्याचा आनंद देणारं हे पुस्तक... प्रत्यक्षाहून प्रत्यक्ष प्रचिती देणारे.

 छायाचित्रांना मिलिंद यादव यांनी वर्णनांनी गुंफले आहे. त्यामुळे ती छायाचित्रे बोलकी होतात. या प्रवास वर्णनास संवादाचे रूप येते. नेपाळ छायांकित करणारा हा लेखक मुळात एक कलाशिक्षक आहे... तो पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे...लोकजीवन पाहण्याची त्याची एक दृष्टी आहे. त्यामुळे छायाचित्रावरील त्याचं भाष्य तितकेच मननीय झाले आहे. त्यातून अनेक गोष्टी कळतात. तिथे बुद्धीची समागमन करणारी एक मूर्ती सर्रास विकली जाते. (कदाचित तीच पाहून रजनीशांना ‘संभोगातून समाधी'कडे शीर्षक सुचले असावे.) नेपाळच्या रिसॉर्टमध्ये वीज नसते. शहरात वृद्धांच्या विश्रांतीसाठी खास थांबे, निवारे बांधलेले आढळतात. या नि अशा अनेक गोष्टींतून नेपाळचे गूढ आपणास उलगडत जाते.

 मराठी साहित्य आता शब्दाकडून दृश्याकडे, कल्पनेकडून वास्तवाकडे, परंपरेकडून पर्यटनाकडे अग्रेसर होत असल्याचे भान देणारे हे पुस्तक रंगीबेरंगी चित्रांच्या इंद्रधनुषी साजसज्जेमुळं इतकं मोहक, लोभस झालेय की वाचक विचार करू लागतो की नेपाळ चित्रात इतका सुंदर तर प्रत्यक्षात किती असेल? हा प्रश्न हेच या पुस्तकाचे यश. पुस्तकातील शुद्धलेखनाच्या चुका, पृष्ठ क्रमांक नसणे इत्यादी दोष दुस-या आवृत्तीत दुरुस्त झाल्यास पुस्तकाची उपयुक्तता वाढेल असे वाटते.


• नेपाळ नावाचं गूढ... (प्रकाशवर्णन)

 लेखक - मिलिंद यादव
 प्रकाशक - निर्मिती विचार मंच, कोल्हापूर

प्रकाशन वर्ष २00८  किंमत - ५00 रु.

‘आमचा सरनामा : नियतीशी करार' - चिंतनिका


 ‘आमचा सरनामा : नियतीशी करार' हा आचार्य शांताराम गरुड लिखित वीस छोटेखानी लेखांचा संग्रह आहे. यास लेखसंग्रहास म्हणण्यापेक्षा ‘चिंतनिका संग्रह' म्हणणे अधिक उचित व्हावे. १५ ऑगस्ट, १९४७ साली आम्ही भारत स्वतंत्र केला. २६ जानेवारी १९५० रोजी आपण राज्यघटना लागू करून, भारत हे 'लोकसत्ताक राष्ट्र घोषित केले. त्या राज्यघटनेच्या सरनाम्यात आम्ही भारताच्या लोकांनी घोषित केले आहे की, “आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि ह्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी या द्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करीत आहोत. सदर सरनाम्याचे वर्णन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा नियतीशी केलेला करार आहे', असे केले होते. स्वातंत्र्याच्या व भारतीय लोकसत्ताकांच्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत या सरनाम्यास अनुषंगून येथील नागरिकांनी, केंद्र व राज्य सरकारांनी ज्या गांभीर्याने राज्यशकट चालविला पाहिजे होता, तो न चालविल्याने आज पक्ष, देश, संसदीय कार्यपद्धती, निवडणूक, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, मतदान, मताधिकार इत्यादींच्या अनुषंगाने आचार्य शांताराम गरुड यांच्या मनात जी खंत, खेद, चिंता, शल्य आहे ते त्यांनी सलग वीस लेख लिहून विस्ताराने मांडले आहे.

 या पुस्तिकेचा, चिंतनिकेचा उद्देश भारतीय नागरिक, राज्यकर्ते नि राजकारण्यांत घटनेच्या सहा मूलभूत तत्त्वांप्रत जागरूकता निर्माण करून त्यांना कर्तव्यपरायण करणे हा आहे. सर्वसामान्य नागरिकांत राजकारणाविषयी ‘मला काय त्याचे पडलेय' यासारखा निराशेचा व निष्क्रियतेचा सूर व कर्तव्यच्युती दिसून येते. तिच्यावर बोट ठेवून नागरिकांना स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे जागरूक व संघटितरित्या जबाबदार व जबाबदेई नागरिक बनवणे हाच हेतू आहे. या चिंतनिकेद्वारे आचार्य गरुड यांनी एका गंभीर नागरी आचारधर्माकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 ही चिंतनिका एका अर्थाने नागरिक व राज्यकर्त्यांच्या गेल्या ६० वर्षांच्या वर्तन व्यवहारांची निरीक्षण नोंद होय. ते म्हणतात की, कोणत्याही लोकसत्ताकाचा पाया हा लोकशाहीवर अवलंबून असतो. काँग्रेस पक्षाने त्यास ‘पक्षांतर्गत लोकशाही' ची कल्पना रूढ करून सुरुंग लावला आहे. पक्षीय लोकशाहीचा दुसरा अर्थ मर्यादित विचार व मर्यादित अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असा होतो. हा एका अर्थाने लोकशाहीचा संकोचच होय. हा दोष दूर करण्यासाठी व्यापक लोकशिक्षण, लोकसंघटन, लोकजागृतीची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी की, सामान्य माणूस व विशेषतः मध्यमवर्गीय, ज्यांच्याकडे समाज प्रगल्भ करण्याची जबाबदारी असते, तो वर्ग केवळ संसारी झाल्याने राजकारणापासून अलिप्त राहिला व परिणामी निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहिला. मताधिकार' हे राजकीय शस्त्र, ‘मतदान' शब्द प्रचलित करून आपण ते नैतिक व दैविक बनवले. परिणामी, संसदीय कार्यपद्धती शिथिल झाली. कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे रोज निर्माण होणा-या पक्ष संघटना, त्यांच्या अस्मितेच्या भ्रामक कल्पनांच्या दृढीकरणामुळे संसदीय कामकाजाचे गांभीर्य संपले. अर्थवादी व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानेही सरनाम्यातील मूळ उद्दिष्टांना हरताळ फासला गेल्याची खेदपूर्वक नोंद आचार्य गरुड करतात.

 स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वाटचालीत आपण विज्ञाननिष्ठा रुजवण्याऐवजी अध्यात्मवादी विचारपद्धती' चे परोक्ष समर्थन केल्याचे शल्य त्यांनी नोंदवले आहे. सामूहिक कृतीचा अभाव हे या अपयशाचे ते कारण मानतात. समूहातही व्यक्तिव्यवहार महत्त्वाचा असतो अशी त्यांची धारणा आहे. आम्ही' मध्ये ‘मीही महत्त्वाचा असतो, हे विसरून चालणार नाही. या विस्मरणामुळे आपला प्रवास ‘देवाच्या आळंदी' ऐवजी 'चोराच्या आळंदी' चा झाला. हे केवळ लोकशाही व स्वातंत्र्याचे ‘विडंबन'च नाही तर ‘विटंबन' ही होय, अशा प्रखर शब्दांत आचार्यांनी आपला नाकर्तेपणा अधोरेखित केला आहे. गेल्या १२ सार्वत्रिक निवडणुकांतून आपण काहीच धडा घेतला नाही. त्यामुळे आपण केवळ ‘नापास'च झालो नाही, तर 'नादार' ठरलो, हे त्यांनी ज्या उच्चरवाने घोषित केले, ते ऐकून तरी आपण जागे व्हायला हवे. सरनाम्याचे मंत्रसामर्थ्य जोवर आपल्या कानीकपाळी परिणाम करणार नाही तोवर आपला राजकीय व्यवहार सुधारणार नाही. त्यासाठी नव्या स्वातंत्र्ययुद्धाचाच पुकारा आता करायला हवा. संपूर्ण स्वातंत्र्य, लोकांचे सार्वभौमत्व, खरी धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद व संघराज्यीय एकात्मता हीच या देशास खरे लोकसत्ताक बनवू शकते असा आचार्यांचा विश्वास सदर चिंतनिकेतून व्यक्त झाला आहे.

 स्वातंत्र्योत्तर काळातील नागरी व्यवहारांची परवड चिकित्सा या चिंतनिकेत आचार्य गरुड यांनी केली आहे. या पुस्तिकेत वर उधृत केलेला सरनामा छापायला हवा होता कारण, तो या पुस्तिकेचा मूळ गाभा आहे. घटनेचा सरनामा हा तिचा आत्मस्वर असतो; तोच आपण हरवला आहे, याची प्रखर जाणीव ही पुस्तिका वाचताना होते.

 सन २००० मध्ये युतीचे शासन केंद्रस्थानी असताना घटनेच्या पुनरावलोकनाचा प्रयत्न झाला. तो पुरोगामी नागरिकांच्या निकराच्या विरोधामुळे निष्प्रभ झाला. आता त्याच तिडकीने सरनाम्यातील सहा मूलभूत तत्त्वांची पाठराखण, समर्थन, रुजवण करायची वेळ येऊन ठेपल्याची धोक्याची घंटा हे पुस्तक वाजवत आहे. ती ऐकून आपण जागे झालो, तर स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी प्रवासापर्यंत आपण काही साध्य करू शकू. सावध ऐका पुढल्या हाका', असा जागर घडविणारी ही पुस्तिका अनिवार्य संदर्भग्रंथ म्हणून वाचायला हवी. स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवी वाटचालीत या देशातला सामान्य नागरिक वाचिक अर्थाने राजकीय झाला. कायिक अर्थाने तो आत्ममग्नच राहिला. सामान्यांची आत्ममग्नता ही असामाजिक कृती ठरते. ज्या देशात असे नैराश्य रुजते, तिथे लोकशाही धोक्यात येते, हे आपल्या शेजारच्या देशांच्या सद्य:स्थितीवरूनही स्पष्ट होते. त्यापसून जर आपण बोध घेतला नाही, तर आपण करंटे ठरू, याची जाणीव देणारी ही चिंतनिका आपल्या नागरिकशास्त्राच्या आचारव्यवहारांची संहिता बनेल, तर चित्र बदलल्याशिवाय राहाणार नाही.
 ‘दोस्तो, अब मंच पर सुविधा नहीं है,
 आजकल नेपथ्य में संभावना है।
 सांगणारे पुस्तक प्रत्येक जागरूक व जबाबदार नागरिकाने गांभीर्याने वाचून राजकारण, निवडणूक यांत आळस झटकून सक्रिय व्हायला हवे.


• आमचा सरनामा : नियतीशी करार (वैचारिक)

  लेखक - आचार्य शांताराम गरुड
  प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई

  पृष्ठे ६७,  किंमत ४0 रु.

♦♦



‘रस अनौरस : वंचित जीवनाची कांदबरी


 ‘‘अब्जावधी शुक्रजंतू वापरून वाया जातात, त्यातला चुकून एखादा लागू पडतो आणि माणूस जन्म घेतो, इतका माणसाचा जन्म दुर्मीळ आणि मोलाचा आहे. पुन्हा जगणेसुद्धा पुन:पुन्हा मिळणारी गोष्ट नाही. ते एकदाच मिळते आणि माणूस मेला की संपतेच. पुन्हा जन्म नाही. जन्म आणि जगणे यांचे मोल सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही माणसे दुस-या माणसाच्या जन्माला आणि जगण्यालासुद्धा हीणकस कसे ठरवतात? स्वत:पेक्षा गौण का मानतात? माणसाला माणसाच्याच नजरेत माणूस म्हणून दुर्मिळतेची किंमत का नाही ? माणसाच्या विचारात दुस-या माणसांबद्दल समभाव का नाही? सगळ्याच्या सगळ्या जर निसर्गाने फुकटात दिलेल्या शुक्रजंतूच्या अवलादी असतील, तर माणूस माणसात सरस निरस कसे करू शकतो? यांसारखे प्रश्न विचारून सामान्य वाचकांना भंडावून सोडणा-या राजन खान यांच्या ‘रस-अनौरस' या कादंबरीने आपल्या मलपृष्ठावरील उपरोक्त मजकुराने मला तिच्याकडे आकर्षित केले.

 एक निपुत्रिक जोडपे असते. आपल्या जीवनातील पुत्रप्राप्तीची अपेक्षा एका अनाथ, अनौरस मुलास सांभाळून भरून काढण्याचे प्रयत्न करते. प्रसंगपरत्वे आपल्या या सामाजिक कार्याचा टेंभाही मिरवते. मुलगा मोठा होतो. विवाहित होतो. त्याची बायको कुणाचा तरी असाचा अनाथ, अनौरस मुलगा घेऊन येते. दोघे त्याचा सांभाळ करतात. तो मुलगाही मोठा होतो. तो बाई घेऊन येतो. ती कुणाकडून तरी गरोदर राहते. मुलीला जन्म देते नि भूमिगत होते. नात आणि आजोबा एकत्र राहतात. एव्हाना अन्य सारे कारणपरत्वे काळाच्या ओघात घर सोडून निघून गेलेले असतात. पुढे ही नात मोठी होते. प्रियकराबरोबर पळून जाते. परत येते ती मुलाला घेऊन. आजोबा, नात, पणतू सर्वजण अनाथ, अनौरस असलेले. कादंबरीकाराच्याच शब्दांत सांगायचे तर म्हाता-याचे घरच असे अचाट! त्याची ही कथा.

 ही कल्पनातीत कथा राजन खान यांनी फ्लॅश बॅक शैलीने सादर केली आहे. म्हातारा लेखक आहे. प्रकाशकाला तो आपली कथाच नाही सांगत, तर आपला जन्म, जगणे, जगण्यामागच्या जाणिवा, कळलेले जीवन समजावतो.  कादंबरीकारास त्या कथेतून माणसाचा जन्म आणि जगणं समजावयाचे आहे. त्या अर्थाने ही हेतूगर्भ कादंबरी होय. जगण्याचा शोध घेत माणसाच्या मनात दुसयाबद्दल समभाव जागणवणारी, कोणी औरस-अनौरस असतच नाही मुळी, माणसाचे औरस अनौरसपण साक्षेप आहे म्हणत ही कादंबरी समाजाच्या तथाकथित सोज्वळता, सभ्यता, संभावितपणाचा बुरखा फाडते. हे या कादंबरीचं योगदान होय.

 ‘रस-अनौरस' कादंबरीत राजन खान यांनी रचलेली नि रंगवलेली सारी पात्रे कौटुंबिक आहेत. कादंबरीचा सारा प्रदेशही पारिवारिकच. कुटुंब, पात्रं वेगवेगळी खरी, पण साच्यांचे संबंध ताण-तणाव, संवाद, व्यवहार कौटुंबिक. कौटुंबिक प्रश्नांतून राजन खान समाजसमस्येचे शरसंधान करतात. पात्रांची भाषा मध्यवर्गीय. काही पात्रं निम्नवर्गीयही आहेत. तिरळ्या, किडकी इ. त्यांच्या नावातून अशा लोकांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन राजन खान अप्रत्यक्षरित्या अधोरेखित करतात. कादंबरीतील प्रकाशक वगळता सारी पात्रं अनौरस, विवाहपूर्व नि विवाहबाह्य संबंधाच्या फे-यात अडकलेली, लेखकाने त्यांना असे हेतुतः अडकवलंय. सर्वसामान्य वाचकांना प्रश्न पडेल की या अचाट घरातले सर्व असे अनौरस, अनैतिक कसे? कादंबरीकारास पारंपरिक समाजधारणेसच धक्का द्यायचा आहे. त्याच्या लेखी कोणी रस-अनौरस नाही, सारी मनुष्यनामक प्राण्याच्या फुकटात मिळालेल्या शुक्रजंतूची औलाद होय.

 कादंबरीचा नायक आज म्हातारा आजोबा असला, तरी तो मुळात अनाथ, अनौरस आहे. त्याचे जगणे आपल्या जन्माचा शोध घेणं नि वाचकांना ते समजावणे आहे. प्रकाशक या समाजव्यवस्थेचा एक मूक, तटस्थ निरीक्षक आहे. तो क्रिकेटमधील थर्ड अंपायरसारखा आहे. मात्र तो निर्णय नाही करत, तो एक सजग, संवेदनशील समाज साक्षी आहे. कादंबरीचा नायक म्हातारा खडूस असला तरी मुळात तो बुलंद आहे. त्याच्या जगण्याला स्वनिर्मित तत्त्वज्ञान नि अधिष्ठान आहे. तो कुणाची करुणा नाही भाकत. पण सतत कुटुंबाचा करुणाकल्पतरू बनून अजानवृक्षासारखा सर्वसमावेशी, पूर्वजांच्या उदारपणाचे संचित ल्यालेला एक अलिप्त योगी आहे. त्याची जगण्याची आपली अशी अनाथ शैली आहे; तसंच जीवन जगण्याचे जगावेगळे तत्त्वज्ञानही. त्याचा जन्म जरी अनाथ असला तरी जगणे अनाथ नाही. दत्तक आई-वडील, बायको, मुलगा, सून, नातू, पणतू असं भरलेले त्याचं घर आहे. यातले सख्खे असे त्याचे कोणीच नाही. पण ती त्याची माणसे आहेत. त्यांच्या आधारावरच त्याचे अनाथ आयुष्य धकत राहिले. त्याने स्वत:ला त्यांच्यासाठी वापरू दिले. माणसाने आपल्याला दुसऱ्यांसाठी वापरू दिले की मग ते प्रेम होते.

 ही कादंबरी एक नवे तत्त्वज्ञान घेऊन येते. ती तुम्हाला बुचकळ्यात पाडते. विचार करायला भाग पाडते हेच या कादंबरीचे यश होय. ती सांगते, की माणसाचं बीज कधीच अनौरस असत नाही. औरस, अनौरस या मनुष्यनिर्मित कल्पना आहेत. यातूनच एकाला हीणकस ठरवलं जातं तर दुस-याला सरस, औरस. रस-अनौरस' असं काही असत नाही. ती मात्र एक शुक्रजंतूची अवलाद असते. या कादंबरीचा हेतूच मुळात माणसांपर्यंत समभाव जागणवे आहे नि त्यात कादंबरीकार यशस्वी झाला आहे.

 ‘रस-अनौरस'मध्ये प्रसंगानुरूप प्रेम, पुण्य, वात्सल्य आहे पण कुठे कटुता, दुरावा नाही. नायकास सगळे वापरून फेकून जातात. तो मात्र वडासारखा आपल्या जीवनपारंब्यांना असे झोकून देतो की ज्याला हवं त्यांनी हवं तसं झुलावं. ना खंत ना खेद असे स्थितप्रज्ञ जीवन धारण करणारा म्हातारा एकविसाव्या शतकातील ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा' सारख्या ‘यूज अँड थ्रो' ला सशक्त पर्याय आहे. त्याचे अनुकरण अवघड असले, तरी अशक्त खचितच नाही. रस-अनौरस' कादंबरी जागतिकीकरण, बाजारवाद, भौतिकवाद यांच्या पार्श्वभूमीवर मानव संस्कृतीला दिलेला नवा उदारमतवाद आहे.

 राजन खान यांचे पात्र, प्रवेश, दृश्यचित्रण, अनवट, तशी भाषाही, ते चपखल शब्दप्रयोग करून आपल्या भाषेचा नवा बाज नि घाट स्पष्ट करतात. धकत, झिप्रट, टारलसारखे शब्द नवे घडवलेले असले तरी ते प्रसंगोचित व आशयगर्भ आहेत. अशीच आशयगर्भता शांताराम पवार यांच्या मुखपृष्ठात असली तरी त्यातलं थेटपण निर्भीड म्हणावे लागेल. लेखक व चित्रकारात असं अद्वैत अपवादाने आढळते. कादंबरीचा विषय मराठी वाचकांना नवा नाही. ‘पोरके दिवस, ‘बनपटाची चौकट', 'खाली जमीन, वर आकाश' मधून तो कधी थेट, तर कधी अप्रत्यक्षपणे आला आहे. मराठीतील वंचित साहित्य ललित कृतीने समृद्ध करण्याच्या अंगांनी पाहता या कादंबरीचे महत्त्व आहे. मागे माधव कोंडविलकर यांच्या अनाथ' कादंबरीनं, तर शरणकुमार लिंबाळेच्या ‘अक्करमाशी'ने या विषयाचा वेध घेतला आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळेच्या ‘विवाहबाह्य संबंधः नवीन दृष्टिकोन' मध्ये त्याची सर्वांगीण चिकित्साही झाली आहे. ‘खाली जमीन वर आकाश' सारख्या आत्मकथेतून मी या प्रश्नास फोडलेली वाचा राजन खान यांनी अधिक टोकदारपणे अधोरेखित केली आहे.


• रस अनौरस (कांदबरी)

 लेखक - राजन खान
 प्रकाशक - अक्षर प्रकाशन, मुंबई
 प्रकाशन वर्ष - डिसेंबर २००९

 पृष्ठे - २२८  किंमत - २२५ रुपये.

‘भोगिले जे दुःख त्याला' : मुस्लीम स्त्रीजीवनाचा आक्रोश


 नाव तिचे आशा असले, तरी तिच्या भोवतालचा आसमंत सतत निराशा, निरुत्साह, उपेक्षा नि छळानेच भरलेला असायचा. घरी वडील शिकलेले असले, तरी जामदारखान्याच्या किल्ल्या आईच्या कनवटीला सतत बांधून राहिल्याने जहाँगीर जिवंत असतानाही राज्य नूरजहाँचेच असायचे. आशाची आई अशिक्षित मुस्लीम, पारंपरिकतेचे भूत सतत अंगात भिनलेले. मुलीच्या जातीनं शिकायचे नाही, हे पक्के डोक्यात असल्याने सुशिक्षित वडिलांचा मृत्यू होताच आशाची शाळा इयत्ता ९वीतच सुटते. शाळा सुटून महिनाही गेला नसेल, शाळा सोडण्यापूर्वी भाग घेतलेल्या निबंध स्पर्धेत आशाचा जिल्ह्यात पहिला क्रमांक आल्याचे कळते. आशा बक्षिसाचा चषक घेऊन उंब-यात पाय ठेवताच मा ‘ऐशे टिनपाट बक्षीसा लई देखिवं मैने, रख जा, ऐशे गलासा में हामी उद घालतीय, उद' म्हणत चषकाचा उपयोग उदान (धूपदान) म्हणून करते... आयुष्याच्या प्रगतीच्या प्रत्येक पायरीवर आशाचा काळी, कुरूप, अपशकुनी, रडकी, चिपकली मुँह की (पालीच्या तोंडाची) टाँगे के टप के मुँह की म्हणून उद्धार होत राहायचा... धोक्याचे वय लागण्यापूर्वी लग्नाचा धक्का... अन् २० वं लागण्यापूर्वी चार मुलींची आई झालेली आशा एकीकडे वेठबिगारीवर ड्रायव्हिंग करणा-या नवऱ्यासाठी उधार उसनवार करून रिक्षा घेऊन देते तर दुसरीकडे घराच्या नरक यातनांतून मुक्तीचा, स्वावलंबनाचा उपाय म्हणून शिकत राहते. बी.ए. एम.ए. बी.एड. एम.फिल. अशी मजल दरमजल करत, आपल्याच बळावर आपली प्रकाशवाट निर्माण करणारी ‘भोगले जे दु:ख त्याला' या आत्मकथेची नायिका नि लेखिका प्रा. आशा अपराद यांचे जीवन वाचत असताना ते कुणाच्याही वाट्यास येऊ नये, असे पदोपदी जाणवत राहतं. ही जाण हेच या आत्मकथेचे यश!

 माणसाच्या विकासात आनुवंशिकता महत्त्वाची की परिस्थिती याचे कोडे अद्याप पूर्ण सुटलेले जरी नसलं तरी प्रा. आशा अपरादांचे समग्र जीवन वाचताना लक्षात येते की माणसाच्या आत आत जोवर स्वयंप्रकाश नि विकासाचे आपसूक घडणारे उद्रेक असत नाहीत, तोवर त्यांच्या अंधाच्या जीवनात विद्युल्लतेचा कल्लोळ कडाडत नसतो. नाही तर हे कसं शक्य आहे, की कुटुंबात खायची भ्रांत, शिक्षणाचे म्हणाल तर आसपास सारे सह्याजीराव नि अंगठाबहाद्दर. आशालाच शिकावेसे का वाटत राहते. ज्याच्या जीवनात यातनांचा उच्छाद असतो अशांच्याच जीवनात स्वप्नांची चंदेरी वृष्टी घडून येते... अन्यथा हे कसे शक्य आहे की रिक्षा ड्रायव्हरचा एस.टी. ड्रायव्हर झालेला आशाचा नवरा दस्तगीर आपराद निवृत्तीच्या दिवशी स्वत:च्या सँट्रोतून घरी येतो, तेही चार सुशिक्षित मुली, जावई, नातवांसह, ‘भोगले जे दु:ख त्याला' ही आत्मकथा एका मुस्लीम कन्येची करुण कथा नसून शिक्षण, प्रयत्न, साहस व चिकाटीतून कायाकल्प घडू शकतो. अशा आश्वासक संस्कारांची प्रेरक व अनुकरणीय क्रांतिकथा म्हणून पुढे येते.

 ही आत्मकथा मुस्लीम समाजजीवनातील स्त्रीशिक्षण, स्वावलंबन, पुरोगामित्व इ. स्त्रीस माणूस बनवणाच्या बदलांचे भीषण वास्तव अधोरेखित करत असले, तरी ही कथा मूलतः जात, धर्म, वंश या परंपरांना छेद देणारी माणूसपणाची व्याकूळ कहाणी आहे. प्रा. आशा आपराद यांनी ती मनस्वीपणे लिहिली आहे. ही आत्मकथा लिहिण्यामागे आपणास भोगाव्या लागलेल्या भोगांची रामकहाणी सांगून केवळ स्वत:चे मन हलके करण्याचा व्यक्तिगत स्वार्थ व संकुचित हेतू नाही. आपल्यामागून येणा-या अशा मुलींच्या जथ्यास बळ नि प्रेरणा देण्याचा हेतू आहे. आपला आत्मशोध घेत त्या दुस-याचे अंधारले जीवन उजळावे म्हणून धडपडताहेत. पुरोगामी मुस्लीम परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महिला दक्षता समितीतून त्या करत असलेले कार्य, आपल्यास दिसलेला प्रकाश दुसऱ्यांच्या जीवनातही त्या उजळू पाहत आहेत.

 आशा अपराद यांची भाषा हृदयाचा ठाव घेणारी संवेदनशील आहे. मुस्लीम परिवारातील बोली संवाद जागोजागी आल्याने मुस्लीम कुटुंबाचे जिवंत चित्र उभे राहते. ही बोली बोधगम्य व्हावी म्हणून लेखिकेने पुस्तकाच्या शेवटी शब्दार्थ परिशिष्ट जोडून आपले लेखन सुबोध बनवले आहे. लेखिकेस दैनंदिनी लिहिण्याचा छंद असल्याने ती आपल्या जीवनातील अनेक छोटे मोठे बारकावे सुसंगतपणे मांडू शकली. त्यामुळे मण्यामागे मणी ओवत जाऊन सुरेख माळ बनावी. अशी प्रसंगांची मालिका या आत्मकथेस कलात्मक ललित बनवते. कधी काळी आपल्या आईकडे, माँकडे, गहाण असलेले आपले आयुष्य ती ज्या सोशिक समजदारपणे सोडवत समृद्ध करते ते पाहिले की, स्त्रीमधील सहनशक्तीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. काही गंभीर, भीषण प्रसंगांचा मी साक्षीदार असल्याने प्रा. आशा अपरादांनी दाखवलेला संयम केवळ खानदानीच ठरतो.

 या आत्मकथेत बाप-लेकीचा संवाद, सहवास, संस्कार वाचला की उभयतांची जगण्याची ताकद उमजते. आई - 'मा'स - आशा आपराद सतत दूषण देत आल्या... त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की मुस्लीम समाजात वैधव्य येणं... त्यातून वाट काढणं... म्हणजे ‘रात्रंदिन युद्धाचा प्रसंग' असलेली आई भ्रमिष्ट, आतंकितच राहणार ना? स्वभावाला औषध नसते हेच खरे! आपल्या वडिलांबद्दलची लेखिकेची आस्था, आत्मीयता सार्वत्रिक... तिने वडिलांच्या खांद्यावर झोपणे... वेताळासारखे (पृ.६) वडिलांनी मांडीवर घेऊन झुलवत झोपवणे याचं अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलंय. लेखिकेकडे प्रसंग चित्ररूप करण्याची विलक्षण हातोटी आहे. सोन्या मारुती चौक, स्मशान वाट, पूर, टवाळखोर मुलांना कॉलेजात आई म्हणून निरुत्तर करणं, आंबेवाडीत अपरात्री चेष्टा करणा-यांना धारेवर धरणं यासारख्या प्रसंगातून ते स्पष्ट होते. चरित्रचित्रणातही त्यांचा हातखंडा लक्षात येतो. आई-वडील म्हणजे दक्षिण व उत्तर असे परस्परविरुद्ध ध्रुव. पण त्यांचे वर्णन करताना त्या देवाचे देवाला व सैतानाचे शैतानाला देऊन मोकळ्या होतात. प्रसंगवर्णनात लेखिकेची अशीच हुकमत दिसून येते. उगीच गळेकाढूपणा नाही. ज्यांना कुणाला जगण्याच्या उद्वेगाने पछाडले असेल... जे आत्महत्या करण्याच्या विचारात असतील त्यांना ही आत्मकथा या ‘जगण्यावर शतदा प्रेम करावे', असा आशावाद जागविल्याशिवाय राहणार नाही.

 चंद्रमोहन कुलकर्णी यांनी बक्षिसाचा चषक उदान करण्याचा कठोरपणा करण्याच्या आईच्या जुलमाला न कंटाळता आशा यशाचा सूर्य उगवून दाखवते. हे मोठ्या ताकदीनं चित्रित करून २७३ पानांची सारी कथा, व्यथा, गाथा एका मुखपृष्ठात रेखाटली आहे. अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती, अनेक भाव यांनी भरलेले हे आत्मकथन इतक्या संयतपणे कसे लिहिता येते, ते भोगिले जे दु:ख त्यालाच ठावे. लेखिकेने काव्य, म्हणी, विश्वविख्यात रचनांचे दाखले देत आपली कहाणी केवळ वाचनीयच केली नाही, तर ती चिंतनगर्भही केली आहे. आशाची ही आत्मकथा वाचताना मला माझ्या कॉलेजात पदवीधर झालेली फजिया आठवली. नवरा तिला रोज सोडायला नि न्यायला यायचा. घरातून ती बुरख्यात यायची. लेडिज रूममध्ये तो उतरवून चुडीदारमध्ये शिरायची. एन.सी.सी.ही तिनं केली. परत जाताना बुरखा घालून घरी जायची. एकदा मी फजियाला शेवटच्या वर्षात शिकताना विचारले, “यह चोरी चोरी शिक्षा कब तक?' फजिया म्हटली होती ‘अपना चाँद निकलने तक।' प्रा. आशा आपराद यांची ही आत्मकथा ही आत्मचंद्रांचे परंपरा क्षितिजावर उदयमान होणचं नाही कां ?


• भोगिले जे दुःख त्याला (आत्मकथन)

 लेखक - आशा आपराद
 प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
 प्रकाशन वर्ष - २00९

 पृष्ठे २७३ किंमत २२0 रुपये.

♦♦

मी अनिता राकेश सांगतेय...' साहित्यिक स्त्रीची फरपट


हिंदी साहित्यात अवघी साडेतीन नाटके लिहन अजरामर झालेले नाटककार मोहन राकेश! त्यांनी कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, निबंध, दैनंदिनी, अनुवाद अशा सर्व साहित्य प्रकारांना स्पर्श केला असला, ‘सारिका' सारख्या पाक्षिक साहित्य पत्रिकेचे संपादन केले असले, तरी त्यांची खरी ओळख राहते ती हिंदीत रंगमंचीय नाट्यलेखन परंपरा सुरू करणारा नाटककार म्हणूनच, अनिता राकेश ही त्यांची तिसरी बायको. त्यांनी हिंदीत आपली आत्मकथा, आठवणी लिहिल्या. 'चंद सतरें और’ आणि ‘सतरें और सतरे सतर म्हणजे रेष. हे आत्मकथन आठवणींच्या उभ्या आडव्या रेषांचे वस्त्र आहे. त्यात क्रमबद्धता असली तरी मूळ पाया आठवणी सांगण्याचा. आपल्या एखाद्या जिवलगाशी मन हलके करण्यासाठी केलेले हितगुज असे या आत्मकथेचे स्वरूप असल्यानं ते हृदयस्पर्शी झालेय. हिंदीच्या कविमनाच्या प्राध्यापिका रजनी भागवत त्यांनी सदर आत्मकथेचा अनुवाद केला आहे. या पुस्तकावर ‘अमुक अमुक मूळ रचनेचा हिंदी अनुवाद' असा तर्जुमा छापला नसता तर हा अनुवाद आहे, यावर कुणी विश्वास ठेवला नसता इतका अस्खलित झालाय तो!

 शीला, पुष्पा, यांच्यानंतर अनिता राकेश यांच्या जीवनात आली, ती कथाकार म्हणून आणि त्यांची जीवननायिका बनली. राकेशांच्याच शब्दात सांगायचे तर ‘अनिताने त्यांचे रेकॉर्ड खराब केले. यापूर्वी दोन वर्षांपेक्षा जास्त ते कोणा बाई (?) बरोबर राह शकले नव्हते. सहा-सात वर्षं झाली, तरी या बाईचं घर सोडायचं काही लक्षण दिसेना...!' अनिताच्या जीवनातही अनेक पुरुष आले... ऐन धोक्याच्या वयातला पहिला प्रियकर, मग राकेश नि त्यांच्यानंतर कमलेश्वर, जतीनदार, पी.के. रम्मी आणि वेळोवेळी मनात आलेले अनेक! अनितामध्ये हा गुण बहधा अनुवंशाने आलेला... तिची आईही लेखिका होती... तिच्या भोवतीपण जैनेंद्रकुमार, अज्ञेय महावीर, अधिकारी यांसारख्या मान्यवर हिंदी साहित्यकार, संपादकांचा गराडा असायचा...! मी अनिता राकेश सांगतेय...' शीर्षकाने प्रकाशित सदर अनुवादित आत्मकथेत गढूळ, ‘काळेशार पाणी' असले तरी ते अत्यंत नितळ, पारदर्शीपणे कोणताही आडपडदा  न ठेवता लिहिले गेलेय. मराठीतील लेखकांच्या पत्नींनी यापूर्वी लिहिलेल्या ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय', 'नाच ग घुमा', अजुनि चालतेचि वाट' वगैरेपेक्षा हे कितीतरी थेट असल्याने ते शैलीच्या अंगाने मराठी स्त्री आत्मकथा साहित्यास बरंच काही देऊन जातं.

 भारताच्या फाळणीचा काळ, विभाजित पाकिस्तानातून विस्थापित अनेक कुटुंबाबरोबर एक कुटुंब भारतात येते. शरणार्थी म्हणून दिल्लीतल्या सिव्हिल लाइन्समधील अँड हॉटेलमध्ये त्यांचे पुनर्वसन केले जाते... डॅडी व्यापारी. मम्मी लेखिका. दोघंही प्रयत्नशील पण यश सतत क्षितिजापारच. दोघांत भांडणे नित्याची. घरात साहित्यिक वातावरण, पंजाबी घर असल्याने परिवारावर मम्मीचा वरचष्मा. अनीता नि तिचा भाऊ आई-वडील असूनही अनाथपणाचे जीवन जगतात. कोणत्याही नशेत जगणाच्या आई-वडिलांची मुले भरल्या घरातही अनाथच असतात. फाळणी नि हे घर यांचे अद्वैत असते. फाळणी होते नि घर दुभंगते. दारिद्र्य येते. घरात आणखी एक मुलगी जन्मते नि फाळणी संपते. घरातली मोठी मुलगी अनिता वयात येते तशी लिहिती होते. लेखिका असलेल्या मम्मीस याचे अप्रूप नि कौतुकही। ‘सारिका' या प्रसिद्धी हिंदी पाक्षिकांचे (नंतर ते मासिक झालं) संपादक मोहन राकेश यांच्याशी पत्रमैत्री असते. अनिताच्या कथा ती संपादकांकडे पाठवते. मार्गदर्शक, दुरुस्ती व प्रकाशनार्थ, राकेशांचं पत्र येतं. “मीच घरी येऊन दुरुस्त करतो. ते घरी येतात. घरचेच होतात. नि दुरुस्तही! दुस-या पत्नीचा घटस्फोट होण्यापूर्वीच अनिताला पळवून नेऊन विवाह करतात. राकेश कलंदर. सतत मित्रांच्या गराड्यात. पूर्वा नि शैली अशी दोन अपत्यं अनिताच्या पदरात टाकून निवर्ततात.

 मोहन राकेश हे हिंदीतले मोठे प्रस्थ. राजकारण, पत्रकारिता जगतात हकमत. राकेश गेले तरी ‘राकेश पत्नी' या ओळखीवर जीवन तगून जावं असा माहौल असला तरी, अनिता राकेश यांचे जगणे, जगलेले खरे खरे सांगणे यांत कुठेच खोट नसणे हे या कथा नजराण्याचे खरे वैभव.

 ही आत्मकथा अनेकांगांनी आपला ठाव घेते. ती अनिताची कैफियत असल्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला पकडून ठेवते ती तिच्या करुण भोगामुळे. स्त्रीचे जगणे नव्या सुख शोधाचा कांचनमृग असतो. ती शिकार साधायला जाते नि स्वत:च शिकार होते. अनिताच्या वाट्यास जे येतं, ते कुणाच्याच वाट्यास येऊ नये...उपेक्षित बालपण, फसवलेले तारुण्य, अत्याचारित प्रौढपण व संघर्षशील उत्तरायण, एखाद्या स्त्रीच्या जीवनात येणारा प्रत्येक किरण तिरका नि तिरकसच का यावा? तिनेच म्हणून प्रत्येक वेळी का सहन करत राहायचे? पुरुष प्रत्येक वेळी नामानिराळा विश्वामित्र का? हा या आत्मकथनाने न विचारलेला, उच्चारलेला प्रश्न?

 रजनी भागवतांच्या अनुवादाचे विशेष हे की त्या मराठी अनिता राकेश होतात. त्यामुळे लेखिका नि अनुवादिका दोन्ही माहीत असलेल्या माझ्यासारख्या वाचकास ही कथा रजनी भागवतांची वाटायला लागते. इतका अस्सल परकायाप्रवेश फारच कमी अनुवादांत आढळतो. ही आत्मकथा अनिता राकेशांची एक स्मरणसाखळी आहे. तीत त्या आपल्या जीवनाचा एक एक हृदयस्पर्शी प्रसंग उत्कटपणे ओवतात. एक स्त्री इतके खरे कसे सांगते, याचं पुरुषवाचकांना आश्चर्य, नि स्त्रीवाचक अनिता राकेशांबद्दल अशासाठी चकित की स्त्रीनं मनातले सगळे सांगायचे असते का?

 ...मी प्रेम करते, दारू पिते, सिगरेट पिते, मी समलिंगी आहे (अपवाद म्हणून का असेना!) या या पुरुषांबद्दल मला हे हे वाटले...याला मी नाकारले... यापासून मी लांबच राहिले... त्याला दोन हात दूरच ठेवले...याला आकर्षण म्हणून तर त्याला गरज म्हणून जवळ केले...तद्दन अर्धसत्य, फसवे, वरवरचे लिहिणाच्या मराठी लेखक पत्नींच्या आत्मकथांच्या पार्श्वभूमीवर हे आत्मकथन उजवे अशासाठी की ते सारे नितळपणे सांगते. ना खंत, ना खेद, असा सारा लेखनाचा बाज. पदरी पडेल ते पवित्रपणे निभवायची नायिकेची जीवनशैली. इतकी बिकट परिस्थिती आली म्हणून तिने कुणापुढे हात पसरले...अगदी सासूकडेही (अम्मीजी) असे नाही. अपवाद इंदिरा गांधी, लेखन, रॉयल्टीवर ती जगते तशी राकेश यांच्या प्रतिष्ठेवरही. तेही ते प्रांजलपणे कबूल करण्यातील प्रामाणिकपणा ही या आत्मकथेची नजाकत. तोच तिचा नजराणाही. पुस्तकों चंद्रमोहन कुलकर्णीचे मुखपृष्ठ अनिता राकेश यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर या आत्मकथनाचा आरसा नि खरेखुरे प्रतीक!'

 आत्मकथा वाचताना अनेक ओळी अधोरेखित करण्याचा मोह वाचकात निर्माण करण्याचे सामर्थ्य कथेच्या आशयाबरोबर लेखिका/अनुवादिकेच्या भाषा प्रभुत्वात आहे. ओघवत्या शैलीमुळे लेखिका आपल्याजवळ बसून सांगतेय... हे शीर्षकात जसे आहे तसे निवेदनातही. लेखिका वाचता वाचता वाचकांची जिवाभावाची सखी, भगिनी होते हे या आत्मकथेचे खरे यश. आई-मुलगी एकमेकींच्या स्पर्धक होणे, सवतीची असंवाद गळाभेट, अनिताचे बच्चनांच्या घरी जाऊन न सांगता बरंच काही समजावून येणे, पोलिसांच्या नजरेतील 'नर'पण (पुरुषास स्त्री नराधम का म्हणते सांगणारं!) लेखक, संपादकांकडे येणारे लाळघोटे, प्रत्येक पुरुषाचं ‘धोबी' (रामायणातला) असणे अशा कितीतरी चीजा, जागा या आत्मकथेत भरलेल्या आहेत. त्याचे वाचन स्वतः करण्यात जो अनुभव येतो तो कबीरांच्या भाषेत सांगायचे झाले तर 'गुंगे का गुड' मुक्या माणसास गुळाची चव कळते पण सांगता येत नाही. जावे त्यांच्या वंशा' ची अनुभूती देणारा हा आठव... सांगावा तर पंचाईत... न सांगावा तर काळ सोकावेल याचं शल्य... अशी आत्मकथने मराठीत येतील तर मराठी आत्मकथा (विशेषतः स्त्री आत्मकथा) अधिक धीट होईल. म्हणून हा परिचय प्रपंच.


• मी अनिता राकेश सांगतेय...(आत्मकथन)

 लेखिका - अनिता राकेश
 अनुवादिका - रजनी भागवत.
 प्रकाशक - मेहता पब्लिकेशन हाउस, पुणे

 पृष्ठे - १७५  किंमत - १६0 रुपये.

♦♦

‘उधाण वारा' : स्त्रीच्या वयःसंधीची गाथा


 तसलिमा नसरीनचे सारे बोलणे नेहमीच नवा उधाण वारा घेऊन येते. त्यामुळे साक्षात ‘उधाण वारा' म्हणून लिहिलेले लेखन बहुचर्चित झाले नाही तरच आश्चर्य! यापूर्वी तसलिमा नसरीन यांनी १९९९ साली ‘आमार मेयेबेला नावानं आपल्या आत्मचरित्राचा पहिला भाग वाचकांना नजर केला आहे. ते आत्मचरित्र म्हणजे तिच्या कौमार्याची कथा होती. जन्मापासून ते ऋतुप्राप्तीपर्यंतच्या (१९६२ ते १९७६) आठवणी, जीवनातील विविध प्रसंग त्यांनी त्यांनी चितारले. तेव्हा विसाव्या शतकाचा सूर्य अस्तंगत होत होता. आता त्यानंतर एक दशक मागे पडले नि परत त्या आणखी एका दशकाची आपली व्यथा, कथा ‘उधाण वारा' मधून मांडत आहेत. हा 'आमार मेयेबेला चा दुसरा भाग आहे. त्यामुळे उधाण वारा' समजून घ्यायचा, तर ‘आमार मेयेबेला' वाचणे ही त्यांची आपोआप पूर्वअट होऊन जाते.

 ‘आमार मेयेबेला' मध्ये तसलिमा नसरीन यांनी पूर्वज, परिवार, जन्म, बालपण, शिक्षण, संस्कार, आई-वडील असं कौटुंबिक जग तर चित्रित केलंच आहे. पण त्यात त्यांनी एक मुलगी म्हणून होणारा आपला कोंडमारा, लैंगिक छळ, धाकदपटशा सांगत आपल्या जीवनात एक मुलगी म्हणून न्यूनगंड,भयगंड कसा निर्माण झाला त्याचे सविस्तर व प्रत्येकारी वर्णन केले आहे. बांगलादेशाच्या मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या आत्मकथेच्या पहिल्या भागात आपलं कौमार्य हेही दुसरे मुक्तियुद्धच कसे होते, ते प्रभावीपणे मांडल्यामुळे जगभरच्या वाचकांनी त्या पहिल्या भागास पहिली पसंती दिली होती. तसलिमा नसरीन यांच्या लेखनशैलीचे हे वैशिष्ट्य असते की, त्या जे लिहितात त्यात स्त्रीवादी अस्तित्व संघर्षाची अनिवार्यता येत असते.

 ‘उधाण वारा' या शीर्षकापासूनच ते आपली पकड घेते. कौमार्य ओलांडून ही मुलगी किशोरी होते...पुढे युवती... हा कालखंड म्हणजे मैत्रीचा न संपणारा वसंत ऋतूच असतो. या मैना असतात तसे मोरही! चंदना, चकमा, सजनी या आपल्या मैत्रिणींच्या सहवासात तसलिमा किशोरी होते... यातली चंदना म्हणजे तसलिमाची ‘फेवरिट’... हे ‘फेवरिट’ प्रकरण मैत्रिणींत काय असते, ते समजायला ‘आमार मेयेबेला'तून जावे लागते. ही एक भन्नाट, बिनधास्त मैत्रीण... शिक्षकांवर वात्रटिका लिहायच्या असो वा कावळे ओरडायच्या आधी भावाची सायकल घेऊन मैत्रिणीच्या घरी जाऊन तिच्या अंथरुणात शिरायचे असो... ते करावे चंदनानीच... तिच्या उधाण वाच्यात तसलिमा केव्हा सखी, सजनी, प्रियतमा, राजकन्या होऊन जाते ते कळतही नाही... चंदनाने केव्हाही मूठ उघडली की, तिच्यातून आषाढातला पावसासारखा प्रेमवर्षाव होत राहायचा. अहा ते सुंदर दिन...' वाचणे म्हणजे आपले किशोरपण पुन्हा जगणे! तसलिमाच्या लेखणीचं लालित्य नि शैलीचा पदन्यास म्हणजे सारे वर्णन!

 तसलिमा मॅट्रिकला जाते, तेव्हा चौदावे लागले होते. मॅट्रिक परीक्षेसाठी त्या वेळी पंधरा वर्षांची अट. म्हणून वडिलांनी एक वर्ष वाढवले. आई उदार, वडील कंजूस, वाढदिवस साजरा नाही करायचे. का, तर खर्च होतो. तसलिमाने तेव्हापासून वयाचा विचारच सोडून दिला. पण वय तिचा पाठलाग सोडत नव्हते. झाले, आयुष्यातले हाती आलेले पहिले प्रेमपत्र! अवघे एक ओळीचे ‘डोळे मनातली गोष्ट सांगतात... तुझा लुत्फर' तेही वडिलांना मिळावे, यासारखा धरणीकंप तो दुसरा कोणता? झाले, पहारा बसला. बडोदाच्या (मोठा भावाचा) पहा-यात शाळेत जाणे-येणे, मोठे अपराध्यासारखे वाटायचे. बरेच दिवस दुसरे पत्र न आल्याने, मग हा पहारा उठतो. आवासिक आदर्श बालिका विद्यालयाच्या चंदना, ममता, संजीदा, फाहमिदा, आसमा, नादिरा, अशरफन्निसा इत्यादी मैत्रिणींत तसलिमा आपल्या घरचा छळ विसरायचा प्रयत्न करायची.

 प्रेम, प्रणयाच्या दुनियेतून ती कवितेच्या कलाप्रांतात रममाण झाली ते वाचन वेडामुळे. कुठेही कसलाही मुद्रित, अमुद्रित शब्द दिसल्याबरोबर वाचणारी तसलिमा लिहू लागली. सबिना, रुबिना या आपल्या मैत्रीणींवर लिहिलेला लेख ‘चित्राली' मासिकात छापून आला नि तिला लिहिण्याचा छंद जडला. मासिकं, पुस्तके मिळेल ते वाचू लागली. निहाररंजन गुप्त, फाल्गुनी मुखोपाध्याय, निमाई भट्टाचार्य, माणिक बंदोपाध्याय, रवींद्रनाथ, नजरुल, शमसुर रहमान, अल् महमूद यांच्या वाचनाने प्रगल्भ झालेली तसलिमा कॉलेजमध्ये असतानाच ‘सेंजुती' हे काव्यास वाहिलेले हस्तलिखित प्रकाशित करू लागली. यातून तिला ‘रुद्र' भेटला. तो तिचा मित्र, प्रियकर नंतर पती झाला. प्रेम काहींच्या जीवनात पाऊस पडतो, तर काहींच्या जीवनात दुष्काळ. तसलिमाला मात्र प्रेमाने पश्चात्ताप दिला. ती रुद्रच्या सहवासात फुलत, बहरत होती नि एक दिवस तिच्या लक्षात येते की रुद्रच्या अंगाला डेटॉलचा वास येतोय. एव्हाना तिनं मेडिकलला प्रवेश घेतलेला असतो. त्यामुळे हा वास तिच्या परिचयाचा असतो. पाल चुकचुकते नि लक्षात येते की मधुचंद्राची पुष्पशय्या उपभोगत असताना आपली कूस फुलशय्येने (बंगालीत ‘फूल' म्हणजे ‘फोड') उजवली जात आहे. नवग्याच्या लिंगाच्या (शिश्न) टोकावरचा लाल फोड तिला न सांगताही त्याच्या बाहेरख्यालीपणा समजावतो. अन मग ती कोसळते ती कायमचीच.

 ‘उधाण वारा' वाचत असताना स्त्री जीवनाची घालमेल समजत जाते. हे सारे समजल्यावर एखाद्या स्त्रीने फारकत घेतली असती, पण ती 'रोद' (रुद्रचे हे प्रेमातले रूपांतर) ला सुधारायचे ठरवते. बंगाली भाषेत रोद म्हणजे ऊन. तसलिमाला तो सकाळ म्हणायचा. 'रोद’ नि ‘सकाळ' एकमेकांस पत्र, कविता लिहीत राहिले. रोज येणा-या रात्रीचं आकाश तरीही घेऊन येऊन नव्या ऊनांची सकाळ म्हणून! पण रात्रीच्या गर्भात नेहमी उष:काल असतोच असे नाही. एखाद्याचं जीवन वाट चुकलेल्या रस्त्याचा निबीड जंगलातील न संपणारा जीवघेणा प्रवास असतो, तो तसलिमाने या उधाण वाच्या'त मांडलाय.

 ही आत्मकथा स्त्रीची शोकात्म गाथा होय. ती स्त्रीचा आत्मशोधही आहे. स्त्रीचे हळवे मन इथे आहे नि कठोर संघर्षही! वैचरिक द्वंद्वांचा शाप घेऊन येणारे स्त्री जीवन समजून उमजून जोखिमांच्या मृगजळामागे का धावते ? यातले पुरुष नेहमी शेण का खातात? (नाना, वडील, नवरा सारे रखेल ठेवणारे एका माळेचे मणी) हा अनादि संघर्ष यात व्यापून आहे, तोच या उधाण वाच्यात सर्वत्र घोंगावतोय! ही आत्मकथा एकाच वेळी ‘वाचनीय' प्रेमकथा नि दुसरीकडे स्त्रीची शोकगाथा म्हणून विचारणीय' ऐवज ठरते ती लेखिकेच्या कुशल शैलीमुळे. पत्र, कवितांनी तिला ललित मधुर, तरल केलंय आणि त्यातील प्रश्नांनी घन-गंभीरही

 ‘उधाण वारा' स्त्रीच्या वय:संधीची गाथा आहे. कैशोर्य ते युवावस्थेचा हा प्रवास स्त्रीच्या बिकट वाट वहिवाटीचा आदिम प्रवास होय. तो वाचत असताना आपण प्रेमाच्या अथांग डोहात बुडून जातो. लेखिकेबरोबर वाचक जीवनाच्या अशा चक्रव्यूहात अडकतो की त्यातून परतीची वाटच नसते. ही आहे मानवी जीवनाची आदिम कहाणी... ‘खाये तो भी, न खाये तो भी पश्चात्ताप ठरलेलाच! तरी जगण्याची, माणसाच्या मनातली अनिवार आशादायी । ओढ, इथे वाढत्या वयाच्या साच्या पाऊलखुणा आहेत. आपण उंच झालोच, या अजून छातीला आकार न आल्याची हरहर. आपण मोठे झालोय, तरी आपणाला काही कळत कसे नाही याचे कोडे, आपले कोण नि परके कोण हे न समजणारे जग आजूबाजूला... तरी मी चालतेचि वाट... असे का? याचा शोध घेणारी अन बोध देणारी ‘उधाण वारा' कथा सर्वांनी विशेषतः जीवनाचा निर्णय घेण्याच्या वयातील तरुण-तरुणींनी अशासाठी वाचायला हवी की ती धोक्याचा इशारा देतेय... ती तुमची बोट थडकून फुटण्यापूर्वी या आत्मकथेच्या वाचनातून येणा-या प्रगल्भतेमुळे कदाचित तुम्ही वाचवू शकाल. त्यासाठी इंद्रमुक्तीची शर्त मात्र आहेच!

 या आत्मकथेत जीवनातील सर्व इंद्र भेटतात. श्रद्धा-अंधश्रद्धा, विश्वास अविश्वास, आपपरभेद, जीवन मरण, माणूस की दगड, भीती-अभीती, सारे असल्याने कालमर्यादेतही ही आत्मकथा जीवन सर्वस्व घेऊन येते. जीवनातल्या साच्या गोष्टी काही कथा, कादंब-या, सिनेमासारख्या नसतात हे लोकशिक्षण देणारी ही आत्मकथा वाचनीय, विचारणीय बनते ती तिच्यातील जीवन शिक्षणाच्या मूल्यांमुळे. तसलिमा नसरीनच्या बंडखोर व्यक्तिमत्त्वाचा शोध या आत्मकथेतून उमजतो. स्त्री स्वप्रज्ञ, स्वयंसिद्धा, स्वयंप्रेरिका होते ती पुरुषाच्या नाकर्त्या, बेजबाबदार वागण्यानं. त्या अर्थाने ‘उधाण वारा' पुरुषांसाठी अप्रत्यक्षरित्या एक ‘जागर कथा' बनते. 'मी काही खूप चांगला नाही, याचे कारण तुझे चांगले असणे आहे. ही यातील रुद्रची तसलिमाबद्दलची कबुली (पृ. २२५) म्हणजे तमाम पुरुषांच्या वतीने रुद्रने दिलेला कबुलीजबाब होय. ‘उधाण वारा' ही स्त्री दु:ख भोगाची व पुरुषाच्या सुख उपभोगाची एकाच वेळी परस्परपूरक व परस्परविरोधी असणारी अगम्य कहाणी आहे.


{{block right|• उधाण वारा (आत्मकथन)
 लेखिका - तसलिमा नसरीन
 अनुवाद - विलास गीते
 प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
 प्रकाशन वर्ष - २०१०
 पृष्ठे - ४५८  किंमत - ४00 रु.

♦♦

नंबर वन' : खेळाडूंच्या अंतरकथा


 मराठी कथा साहित्यात आजवर जीवनाच्या विविध अंगांचा वेध घेण्यात आला आहे. परंतु क्रीडा नि क्रीडांगण त्यात अपवादानेच प्रतिबिंबित झालेले दिसते. मराठी कथा साहित्यातील ही पोकळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी नंबर वन' या आपल्या कथासंग्रहाद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तो त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील अनुभवामुळे अत्यंत यशस्वी झाला आहे. मराठी चोखंदळ वाचकांना लक्ष्मीकांत देशमुख हे नाव परिचित आहे. अफगाणच्या वर्तमान तालिबानी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' कादंबरी, साधना साप्ताहिकात सुरू असलेले प्रशासननामा' हे वैचारिक सदर, ललित लेख याशिवाय त्यांच्या नावावर ‘कथांजली', 'अंतरीच्या गूढ गर्भी', 'पाणी!पाणी!', ‘अग्निपथ' सारखे कथासंग्रह जमा आहेत. त्यांचे लेखन शिळोप्याचा उद्योग असत नाही. आयुक्त, विशेष कार्यकारी अधिकारी, संचालक, जिल्हाधिकारी अशी पदे भूषवत असतात ते समाजाच्या सर्व थरातील प्रश्न व लोक समजून घेतात. या प्रक्रियेत अनेक कथाबीजे त्यांच्या हाती लागतात. त्यांच्या मनोज्ञ कथा होतात. त्यामुळे कल्पनेपेक्षा वास्तवाधारित लेखन हा त्यांचा पिंड होतो. त्यातून जन्मलेलं साहित्य नवे विश्व घेऊन उभे ठाकतं. ते वाचकांना नवे विश्व दाखवतं.

 नंबर वन' नावाप्रमाणेच खेळाडूमधील माणूसपणाचा शोध घेणारा, त्यातील संघर्ष व भावनांचे द्वंद्व चित्रित करणारा नंबर वन (पहिला नि उत्कृष्ट अशा अर्थांनी) कथासंग्रह आहे. हा 'थीम बेस्डू असा कथासंग्रह असल्याने प्रयोग म्हणूनही मराठी कथा प्रांगणात त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. ‘भारत देश ‘क्रीडा महासत्ता' का होत नाही हा लेखकाला पडलेला प्रश्न आपले सामाजिक शल्य आहे. या शल्यपूर्तीच्या ध्यासाची निर्मिती म्हणजे नंबर वन' मधील कथा ‘पढेंगे लिखेंगे तो राजा बनेंगे! खेलेंगे, कुदेंगे तो खाक होंगे।।' ही भारतीय मानसिकता दूर करायची तर खेळ हा धर्म आहे, ती वृत्ती आहे. तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो काही रिकामपणाचा उद्योग नाही असा संस्कार रुजवणे आवश्यक असल्याचे लेखकाचं मत विचारणीयच नव्हे तर अनुकरणीय आहे. सामाजिक धारणेत बदल करण्याच्या उद्देशाने हेतुतः लिहिलेल्या या कथांना जीवन व कला दोन्ही दृष्टींनी असाधारण महत्त्व आहे.

 पुण्यात सन २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. क्रीडा संचालक म्हणून लक्ष्मीकांत देशमुख यांचा त्यावेळी क्रीडा विश्वाशी जवळून संबंध येतो. खेळाडूमधील ईर्षा, जोश ते न्याहाळतात. त्यांचं जगणं, खेळाडूतील मानवी संबंध ते अनुभवतात. क्रीडा संयोजक, मार्गदर्शक, प्रशिक्षक, खेळाडू यांच्यामधील संबंधाचे बारकावे या प्रशासकातील साहित्यिक हेरतो, टिपतो अन् त्यातून अजाणतेपणी कथा आकार घेतात. क्रिकेट, बॅडमिंटन, रनिंग, स्वीमिंग, शूटिंग अशा अनेक क्रीडा प्रकारांचा फेर धरत नंबर वन'मधील कथा समग्र क्रीडाविश्व शब्दबद्ध करतात!

 संग्रहात क्रिकेटचा वरचष्मा असणं स्वाभाविक आहे. तो खेळ ब्रिटिशांचा असला तरी भारतीयांसाठी मात्र धर्म, प्राण, श्वास बनून गेलाय. “जादूचा टी शर्ट’, ‘बंद लिफ्ट', 'अखेरचं षटक’ आणि ‘ब्रदर फिक्सेशन' या कथांमधून क्रिकेट खेळ, त्यातले वैभव, ताणतणाव, मानवी संबंध यांची उकल करत भारतातील जात वास्तव, राजकारण, समाजजीवन, कथाकारांनी अधोरेखित केले आहे. या कथासंग्रहाची जनक कथा म्हणून ‘ब्रदर फिक्सेशन'कडे पाहता येईल. माणसाच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचे गारूड, भूत असे असतं की, त्यापुढे तो आंधळा होतो नि मग नवरा, नाही की अन्य कोणीही। ‘ब्रदर फिक्सेशन'ची नायिका स्वीटी. तिचा भाऊ क्रिकेटियर. त्याला ती भाई म्हणत असते. नवरा विकीही क्रिकेटियर. विकीच्या मनात भाईबद्दल ईष्र्या असते कारण त्याच्या नावावर सतत हुकमी शतके जमा होत असतात. नवरा विकी त्यापुढे फिका पडत जातो. विकीत खुन्नस निर्माण होते... तो नाबाद द्विशतक झळकवतो... भारताला विजय मिळवून देतो... मॅन ऑफ द सिरिजचा बहुमान पटकावतो... त्याला वाटते, स्विटी येईल, चुंबन, आलिंगन देईल पण ती त्याऐवजी लाडिक व जीवघेणी तक्रार करते की तू भाईला खेळू दिले नाही. कॅलेंडर इयरमध्ये एक हजार रन पूर्ण करायचे स्वप्न उद्ध्वस्त केले इ.इ... हे आंधळेपण येते ‘ब्रदर फिक्सेशन'च्या मनोधारणेतून. असंच फिक्सेशन ‘अखेरचं षटक' कथेत पत्नी, प्रेयसीच्या द्वंद्वातून मोठ्या प्रत्ययकारी रूपात चित्रित झालंय. ‘ती’ संतोषची प्रेयसी असते. परप्रांतीय, पर जात-धर्मीय म्हणून संतोषचे आई-वडील तिला नाकारतात. ती स्वधर्मीय सलीमला स्वीकारते खरी, पण पत्नी होऊनही तिच्यातली पूर्वाश्रमीची प्रेयसी जिवंत राहते. पतीचा रोमांचक खेळ पाहात ती आपल्या पूर्व प्रियकराच्या स्मृतीत त्यांची केव्हा होते ते समजत नाही... कथालेखकाने मॅच ड्रॉ करून कथा कलात्मकरित्या अंतहीन केलीय व तिचा निर्णय, कौल वाचकांवर सोपवलाय. ही कथा मराठी वाचकास रत्नाकर मतकरींच्या खेकडा'ची आठवण करून देते.

 या संग्रहातील ‘बंद लिफ्ट' ही कथा लक्ष्मीकांत देशमुख यांनी पात्रांची नावे बदलून लिहिली असली तरी ती सरळ सरळ विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर यांची आहे हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची गरज उरत नाही. क्रिकेट हा अशाश्वततेचा शाप घेऊन जन्मलेला वैभवशाली खेळ होय. त्यातील यश तुमच्यात उन्माद, अहंकार जागवतो. तो तुम्ही किती संयमाने पचवता, यशही किती नम्रतेने स्वीकारता यावर तुमचं या खेळातले अधिराज्य अवलंबून असते. क्रिकेटमध्ये माणसेच असतात. ती याच समाजातने वास्तव, वृत्ती, विचार, विकार घेऊन वागत असतात. जात, धर्म, इथंही पाठलाग करत असतो. पण ख-या खेळाच्या यशापुढे ते सारे निष्प्रभ शून्य असते. हेही तितकंच खरे! ‘बंद लिफ्ट'चा प्रतीकात्मक प्रयोग करून लक्ष्मीकांत देशमुख यांनी हॅमच्या यशाचा अश्वमेध जातीपेक्षा उन्मादाने रोखल्याचं सूचित केलेय. ही लेखकाची दूरदृष्टीही व साहित्यिक भानही म्हणता येईल. सर्वाधिक कलात्मक क्रिकेट कथा म्हणून ‘जादूचा टी शर्ट कडे पहावे लागेल. ‘हिरो वर्शिप'च्या ध्यासातून जन्मलेला हा कथासंग्रह या कथेतून आपला हेतू वाचकांप्रत प्रभावीपणे नेतो. रोहित क्रिकेटियर असतो. त्याचा मुलगा मोहितलाही क्रिकेटचे वेड असतं. त्यांना दक्षिण आफ्रिकेत होणारी मॅच ‘याची देही याचि डोळा' पाहायची असते, पण आर्थिक ओढाताणीमुळे ते शक्य नसते. दुधाची तहान ताकावर म्हणत ती तो टी.व्ही. च्या छोट्या पडद्यावर पाहात असतो. पॅडी (हे बहुधा पतौडीचे संक्षिप्त रूप... तसे असेल तर मात्र कालक्रम विसंगत!) भारताचे नेतृत्व करत असतो... भारत जिंकतो... अँकर कपिल देवला प्रतिक्रियेसाठी आमंत्रित करतो... कपिलच्या मनात या मॅचमधील पॅडीचे एका क्रिकेट फॅनकडून प्लेकार्ड घेऊन केलेले अभिनंदन पाहून आपली एक जुनी आठवण ताजी होते. तो सांगतो... मी विश्व कप जिंकला तेव्हा असाच एक मुलगा, फॅन माझे अभिनंदन करता झाला होता... त्याला मी माझा टी शर्ट, ब्लेझर काढून दिला होता. तेव्हा तो असंच काहीसं म्हटला होता की... "Today you have won the World cup for India. In future we will too..." पॅडीने मग रहस्योद्घाटन केले... “तो फैन मीच होतो. अन् वाचक सदगदित होतात हे वेगळे सांगायला नको... ही असते लेखकाची किमया... लेखणी, भाषा शैलीची कमाल! अन् प्रतिभेतून साकारलेली अपरा सृष्टीही!!  बॅडमिंटनवर आधारित दोन कथा ‘नंबर वन' मध्ये आहेत. ‘रिअल हिरो आणि शीर्षक कथा ‘नंबर वन्’ ‘दि रिअल हिरो' चा हिरो शांताराम. तसा तो क्रीडा खात्यातील एक निवृत्त कर्मचारी पण बॅडमिंटनवेडा. निवृत्त झाला तरी खेळाचे वेड त्याची पाठ सोडत नाही. सरकारी खात्यात अशी चार-दोन ध्येयवेडी माणसे असतात... ती खाती ओढत असतात... शांताराम त्यांचा प्रतिनिधी... खात्यातील सेवेतून निवृत्त पण कर्तव्य प्रवृत्तता त्याला कॉमनवेल्थच्या स्टेडियमवरील बॅडमिंटन कोर्टवर न चुकता घेऊन येत असते... मध्ये तो सुट्टीवर जातो ते परत येऊन सर्व काही पाहायचे आश्वासन देऊन. दरम्यान त्याचा मधुमेह बळावतो. एक पाय अँप्युट करावा लागतो. जखम बरी होताच स्वारी वॉकर घेऊन बॅडमिंटन कोर्टवर दत्त... हे असते खेळाचे वेड. पण आपण आता कृत्रिम पाय जोडले तरी बॅडमिंटन खेळू शकणार नाही या धक्क्याने पुरता खचतो, कोसळतो... त्याच्यात उभारी, उमेद यावी, म्हणून त्याचा सहकारी गिरीश प्रधान त्याला अपंग क्रीडा स्पर्धेत नेतो. शांतारामच्या लक्षात येते,आपण तर जीवनाच्या उत्तरायणात अपंग झालो... ही अश्राप मुले तर जन्मतः अपंग आहेत... उभे आयुष्य अपंगत्व घेऊन जगणार आहेत... मग तो सावरतो नि चक्क बॅडमिंटन खेळू लागतो... ही प्रेरक कथा प्रत्येकाने मुळातूनच वाचायला हवी. नंबर वन' ही अशीच रोमहर्षक, तितकीच मनस्वी कथा! मोनिका (सेलेस) विंबल्डनवर आपली हकमत एकावर एक सेट्स, अँडस्लॅम्स होऊन सिद्ध करते तसा सुझानचा न्यूनगंड वाढीस लागतो. पण नंबर वन' होण्याचं स्वप्न तिला झोपू देत नाही. तिचा प्रियकर असलेल्या हरमनच्या हे लक्षात यायला वेळ लागत नाही की जोवर मोनिकाचे पाय विंबल्डनच्या ग्रास कोर्टवर थिरकत राहतील तोवर सुझानचे विंबल्डन सम्राज्ञी बनणे, विंबल्डनच्या बॉल रुममध्ये सेलिब्रेशन डान्सचा मान मिळण अशक्य. तो सुझानच्या प्रेमाने आंधळा होऊन मोनिकावर जीवघेणा हल्ला करून तिला जायबंदी तर करतोच, पण विंबल्डन फायनलपासून वंचितही! सुझान विंबल्डन विजेती होती, पण तो विजय कलंकित असतो... षड्यंत्रामुळेही व आपली बहीण मेरीच्या तगमग नि चडफडाटामुळेही! विजयी चंद्र कधी कधी ग्रहणाची सावली घेऊन आला की ते शरदाचे चांदणे असले, तरी पिठूर पौर्णिमेचे तेज त्यात येतच नसतं मुळी!

 क्रीडांगण नि मृगजळ यात ब-याचदा मोठे साम्य आढळते. त्यातही रनिंगमध्ये तर अधिक! ‘फिरूनी जन्मेन मी’ आणि ‘रन बेबी रन' कथा याचीच प्रचिती देतात. ‘फिरूनी जन्मेन मी'ची नायिका मीना पाथरवट समाजातली. भटकं बालपण लाभलेल्या मीनाला जीव मुठीत घेऊन पळायचा घोर लागला तो काही तरी व्हायचे स्वप्न मिळाल्यामुळे. त्याचे असे झाले की मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील आपल्या छोट्या वाडी वस्तीवरून ती रोज मैत्रिणींबरोबर शाळेस जायची. एकदा नेहमीप्रमाणे शाळेस जाताना अचानक तिला ठेच लागते... अंगठा फुटतो... दफ्तर पडते... मागून येणारा शिवा पारधी ते घेऊन पसार होतो... मुली, मैत्रिणी ‘‘चोर चोर' म्हणून एकच गलका करतात. मीना भानावर येऊन तशा जखमी अवस्थेत पाठलाग करून पकडते. तो सराईत गुन्हेगार असतो. अनेक चोऱ्या उघडकीस येतात. त्याक्षणी कलेक्टर डॉ. विद्या योगायोगाने पोहोचतात. कौतुक करताना म्हणतात, "She will be a great runner-Athlet. A true inter national long distance runner." कलेक्टर बाईंचे प्रोत्साहन सुरेश बाबू कोचचे मार्गदर्शन यामुळे खरेच ती पुणे, दोहा, सेऊल येथील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्य ठरते. तिचं शौर्य, पराक्रम पुरुषांना लाजवणारा ठरतो नि सानियाला तिचे गुपित कळते. ती ऑलिंपिक क्वालिफाय होण्यापूर्वी तिची लिंग परीक्षा केली जाते... ठरते की मीना नाही, मर्द सिंह आहे... इथे ख-या कथेस प्रारंभ होतो... संपूर्ण कथा खेळाडूतील ईर्षा, वैर, राजकारण, समलिंगी संबंध, बायोसेक्युअॅलिटी, हार्मोनल डिस्ऑर्डर अशा अनेक आवर्तनातून खेळाचे अचंबित करणारे जग असे उभे करते की खेळाचे जग या ग्रहावरचं असूनही परग्रहासारखे चकित करून सोडते. 'रन बेबी रन' ची नायिका बेबी ही प्रतिकूल परिस्थितीतून धावपटू होत, गुरुंच्या प्रेमात पडते... ते एकतर्फी की उभयपक्षी कळण्यापूर्वीच तिचे बालाजीशी लग्न होतं. तिला धावण्यामागे धावायचे असते तर नव-याला ती केवळ बाळयंत्र म्हणून हवी असते... मीना जशी हताश होऊन ‘फिरूनी जन्मेन मी' मध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करते तशीच बेबी जाळून घेते... मीना वाचते, बेबी दगावते. अशा भिन्न कथांतून लक्ष्मीकांत देशमुख जीवनाचा ऊन पावसाचा खेळ मांडत राहतात. प्रसंग, व्यक्ती, घटना, बारकाव्यांमुळे प्रत्येक कथा नवं जग दाखवून जाते.

 शूटिंग नि स्वीमिंगवर कथा बेतून लेखकाने खेळाचे हे रिंगण रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. यातली ‘शार्प शूटर' कथा मेलो डॅमॅटिक म्हणावी लागेल. मुंबई दंगलीच्या (२००६-०७) पार्श्वभूमीवरील या कथेतील नायक व खलनायक एकच असलेला दाऊद कुरेशी ‘डी’ कंपनीचा शार्प शूटर असतो. त्याच्या हातून देवनाथ सोळंकी नावाचा तरुण मारला जातो. पोलीस दाऊदला जेरबंद करतात. देवनाथच्या जागी दाऊदला मृत घोषित करतात. दाऊदवर प्लॅस्टिक सर्जरी करून त्याला देवनाथ करतात. या जन्मांतरातून त्यांना ए.सी.पी. थोरातना दाऊदची बिंगे फोडायची असतात. त्याला ते ऑलिंपिक शूटर बनवून प्रेस समोर आणतात. त्यात सारे गुपित सांगतात... मोठा चक्रव्यूह पेलू न शकल्याने पसरट झालेली ही कथा कलात्मक होण्याची शक्यता असताही सामान्य बनून राहते. ‘प्रयासे जिंकी मना’ जलतरणपटूच्या जीवनावरील असल्याने पाण्याचा नवा तळ घेऊन येते. दीप्ती, तिचा नवरा दिलीप, मुले जयवंत, अजित सारे कुटुंब स्वीमर असते. नवरा दिलीप व मुलगा अजितचा मृत्यू पोहताना झाल्याने हादरून, हारून गेलेली दीप्ती शेवटचा मुलगा जयवंतला पाण्यापासून दूर ठेवते तरी आनुवंशिक आकर्षणाने तो पोहायला शिकतो व जलतरणपटूही होतो. आईची घालमेल मार्मिकपणे चित्रित करणारी ही कथा मानसशास्त्रीय पटलावर पसरत मानवी संबंध कथा बनते. ती क्रीडेपेक्षा जीवनस्पर्शी अधिक झाली आहे.

 'नंबर वन'मधील या साऱ्या कथांचा धांडोळा घेताना लक्षात येते की, कथालेखन ज्या विषयांवर आपली कथा बेतू इच्छितो त्याबद्दल तो भरपूर स्वाध्याय करतो. विषयाच्या सर्वांगाची तो माहिती घेतो. त्यातली तांत्रिकता तो खोलात जाऊन समजून घेतो. ‘फिरूनी नवी जन्मेन मी' कथेतील नायिका मीनामधील लैंगिकतेतून होणारे शारीरिक, मानसिक, जैविक, भावनिक बदल, वैद्यकशास्त्रातील या संबंधीचे बारकावे, संज्ञा, विधीशास्त्रातील या प्रश्नाची बाजू, शिवाय व्यक्ती म्हणून मीनाच्या मन, भावांचे तरंग, संबंधातील आकर्षणविकर्षण, त्यातील ताणतणाव त्याचा खेळ, करिअरवर होणारा परिणाम यांचा लेखकाने केलेला अभ्यास वाचकास स्तिमित करतो. क्रीडा विश्वाची स्वत:ची एक नशेची दुनिया असते. ती लक्ष्मीकांत देशमुखांना दीर्घ सान्निध्यानी अवगत झाली आहे. ती ते भाषा शैली, संवाद, पत्र, काव्य, म्हणी सर्व प्रकारच्या कला उपकरणांचा वापर करून मनोहर, ललित करतात. ते मराठवाड्यातील असल्याने असेल, त्यांच्या भाषेवर उर्दू प्रभाव दिसून येतो. खुदा, साब, बेगम, अल्ला, रोकणारे, धक्के, सैतान, चहाणं अशा शब्दांतून तो स्पष्ट होतो. इंग्रजी प्रचूर मराठी ही 'नंबर वन' ची प्रमाण भाषा वाटावी इतका तिचा सर्वत्र दखल. मराठीत एखादा एकदम नवा शब्द जसा’ ‘फिकुटला' (पृ.७७) समर्पक असला, तरी चमत्कृत वाटतो.

 काही कथांत लक्ष्मीकांत देशमुख यांनी पत्रशैलीचा चपखल प्रयोग करून नातेसंबंधाची सहज प्रस्तुती केली आहे. 'प्रयासे जिंकी मना' कथा या संदर्भात लक्षात राहते. कवितेच्या ओळींचा वापर करून कथाशय समृद्ध व ललित करण्याची लेखकाची हातोटी विलक्षण म्हणावी लागेल, ‘प्रयासे जिंकी मनातही ती दिसते व अन्यातही. कुठे फ्लॅश बॅक, कुठे वर्णन तर कुठे मनोविश्लेषण असे शैली वैविध्य या कथासंग्रहास लाभल्याने तो मनोज्ञ तसाच कलात्मक झाला आहे.

 ‘नंबर वन'मधील पात्रे परिचित वाटावी असे त्यांच्या चित्रणात साम्य आढळते. नावे नवी असली तरी पात्र पूर्वपरिचित, घटना इतिहासातील अशांमुळे या रचना उजाळा कथा' बनतात. सर्वत्र वर्णनाचे अधिक्य राहिले आहे. लेखक कथा निरूपणकार बनून जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी संवाद शक्यता असताना तिथं टाईप शैली अवतरल्याने शैलीच्या अंगाने कथांत एकसारखेपणा आढळतो. या कथांचे बलस्थान आहे ते घटना, प्रसंगांची गुंफण, पात्र संबंधाची रचना, त्यातील मनुष्य सुलभ हेवेदावे, स्पर्धा, वैर, राजकारण, भय, शंका आदी भाव भावनांचा कल्लोळ, यामुळे या कथा एकदम नवे विश्व घेऊन पुढे येतात व वाचक आपसूक त्यात गुंतून जातो. पुढे काय? असे वाटत राहण्याचे कुतूहल निर्माण करण्याचे लेखकाचे कौशल्य या कथांना वाचनीय बनवते. प्रतीकांचा उपयोग करून ‘बंद लिफ्ट'सारखी कथा आशयघन बनवण्याचे लेखकाचे कौशल्य प्रशंसनीयच म्हणावे लागेल. ते हास्य नव्हतं. हसरं रुदन होतं.' म्हणणारा हा कथालेखक भाषाप्रभू आहे. 'इंडियात जात हे असे सत्य आहे की, सवर्ण ते नाही असे समजून दडपण्याचा प्रयत्न करतात आणि पददलितांना पदोपदी त्याचा सामना करावा लागतो.' असे म्हणणारा हॅम (पृ.८३) इथलं जात वास्तव अधोरेखित करतो. ही असते लेखकाच्या वैचारिक बैठकीची निजखूण.

 कथालेखक म्हणून लक्ष्मीकांत देशमुख एक गंभीर समाजनिष्ठ चित्रकार होत. केवळ ललित लिहिणे ही त्याची प्रकृती नव्हे. समाजहितैषी लेखनाचा ध्यास घेऊन अवतरणारे त्यांचे साहित्य एकविसाव्या शतकातील नव्या कथा प्रवाहाचे प्रतिनिधित्व करत आपल्या वेगळेपणाची मुद्रा मराठी कथेवर उमटविते. मराठी कथेच्या प्रांगणात क्रीडा विश्व चित्रित करून त्यांनी नवे पण रुजवले आहे. या कथा वाचताना कला व जीवन दोन्ही अंगांनी त्या आपणास भरपूर देऊन जातात. शिवाय त्यातून मिळणारे मौलिकतेचे आश्वासन त्यातला अस्सलपणा सिद्ध करत नव्या प्रवाहाच्या पाऊलखुणा उमटविते. म्हणून नंबर वन' कथासंग्रह नव्या पिढीसाठी नवे क्षितिज दाखवणारा अभिनव नंदादीप वाटतो.


• नंबर वन (कथासंग्रह)

 लेखक - लक्ष्मीकांत देशमुख
 प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद

 पृष्ठे - १६0   किंमत - १७५

♦♦

चरित्र ग्रंथमाला' : अभिनव उपक्रम


 सत्यशोधक समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, महाराष्ट्र समाज, थियॉसॉफिकल सोसायटी अशा विविध जीवनमार्गाच्या समाज स्थापनेतून तत्कालीन समाजसुधारकांनी विविध समाजसुधारणा करून समाजास जागे केले. त्या अर्थाने एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा समाजसुधारणांच्या मशागतीचा होता. विसावे शतक हे पुरोगामी प्रबोधनाचा सूर्य घेऊन उगवले. या शतकात राजर्षी शाहू छत्रपती, प्रबोधक भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण आप्पासाहेब पवार, कॉ. संतराम पाटील ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर, रावबहादूर पी. सी. पाटील, दलित नेते दादासाहेब शिर्के, शेतकरी कामगार पक्षाचे अध्वर्यु आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, शिक्षणतज्ज्ञ, पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक प्रभृती समाजसुधारकांनी आपापल्या क्षेत्रात जे असाधारण कार्य केले त्यातून विसाव्या शतकातील कोल्हापूरची घडण पुरोगामी बनली. अशा समाजसुधारकांचे जीवन, कार्य, विचार व सामाजिक योगदान एकविसाव्या शतकातील तरुण पिढीपुढे राहावे, त्यांची आत्मकेंद्रितता दूर होऊन त्यांनी समाजशील व्हावे म्हणून कोल्हापूरच्या श्रमिक प्रतिष्ठानने चरित्र ग्रंथमालेचा समाजोपयोगी प्रकल्प हाती घेतला आहे. कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्षी शाहू छत्रपती यांचे जीवन, कार्य, समाज सुधारणा म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील समाजसुधारणांचे नेतृत्वच. त्याचे परिणाम पुढील काळात झाले. देशभर सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवून शाहू महाराजांनी सक्तीचे मोफत शिक्षण, आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाहासंबंधीचे कायदे, विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी, राधानगरी धरणाद्वारे सिंचन विकास, शाहूपुरी व्यापारी पेठेद्वारे व्यापार उदीमास चालना, शाह मिलद्वारे उद्योगविकास असे केलेले कार्य प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी शाहू चरित्रात शब्दबद्ध केले आहे.

 भास्करराव जाधव यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापुरात केली. त्यांनी वाङ्मय, धर्म, कायदा, इतिहास, समाज, शिक्षण, उद्योग, अर्थ अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत स्पर्श करणारे मोठे कार्य केले. प्रा. डॉ. छाया पवार यांनी कोल्हापूरचे शिल्पकार, मराठा शिक्षण परिषद, ब्राह्मणेत्तर पक्ष, सत्यशोधक समाजाची पुनर्बाधणी अशा विविध मार्गांनी चरित्र नायकाचे जीवनकार्य रेखाटले आहे.

 रावबहादूर डॉ. पी. सी. पाटील हे शेतकी कॉलेजचे पहिले भारतीय प्राचार्य, डॉ. मॅन यांच्याबरोबर त्यांनी कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले स्मारक उभारले व तेही प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते. हे कार्य त्यांना ‘रावबहादूर' ठरविण्यास पुरेसे आहे. प्राचार्य डॉ. विलासराव पवार यांच्या लेखणीतून साकारलेले हे चरित्र मनोज्ञ आहे.

 प्रजा परिषदेचे संस्थापक, स्वातंत्र्यसैनिक, चित्रकार, संपादक, नेते असे बहमुखी व्यक्तिमत्त्व लाभलेले भाई माधवराव बागल यांनी कोल्हापूरच्या सामाजिक व धार्मिक चळवळीची पताका सतत खांद्यावर मिरवली. महालक्ष्मी मंदिर सर्व जातीधर्मीयांसाठी खुले करणे, सत्यशोधक समाजाचा कार्यविस्तार, कामगार चळवळ, प्रजा परिषदेचे कार्य, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, शेतकरी कामगार पक्षाचे कार्य आणि पत्रकारिता या क्षेत्राच्या माध्यमातून बागल यांनी कोल्हापूरची लढाऊ प्रतिमा तयार केली. प्रा. डॉ. पी. एन. शिंदे यांच्या लेखणीने हा नायक समर्थपणे पेलला आहे.

 राजाराम कॉलेजचे प्राचार्यपद १८ वर्षे सांभाळत डॉ. बाळकृष्ण यांनी सर्वप्रथम शिवाजी विद्यापीठाचे प्रारूप समाजापुढे ठेवले. आर्य समाजाद्वारे शिक्षण संस्था, मोफत शाळा, हिंदी विद्यालय, वंचितांना शिक्षणाची संधी, शिवचरित्र लेखन अशा विविध कार्याद्वारे डॉ. बाळकृष्ण यांनी वंचित वर्गाला समाजाच्या प्रवाहात आणण्याचे क्रांतिकारी कार्य केले. डॉ. केशव हरेल यांनी बाळकृष्णांची शिक्षण व समाजविकासाप्रती असलेली अविचल निष्ठा शब्दबद्ध करून नवा इतिहास वाचकांसमोर आणला आहे.

 डॉ. बाळकृष्ण, कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार व पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक या तिघांचीही चरित्रे प्रकाशित करून कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासाचा आलेख या चरित्रातून उभा करण्यात आला आहे. जे पी. नाईक हे कोल्हापूरचे सुपुत्र. कोल्हापूरचे पहिले नगररचनाकार म्हणून विकासात त्यांचा सिंहाचा वाटा. गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठाच्या उभारणीत त्यांनी मोठी भूमिका बजावली. शिक्षण सर्वांसाठी हा विचार त्यांनी कोठारी आयोगाचे सचिव म्हणून काम करताना मांडला. भारतीय शिक्षणाचे जे प्रारूप त्यांनी तयार केले त्याची नोंद युनेस्कोने ‘थिंकर्स ऑन एज्युकेशन' अशी घेतली. त्याचे कार्य कर्तृत्व कोल्हापूरसाठी ललामभूत असेच आहे. प्राचार्य डॉ. जयंत कळके व प्रा. शिवशंकर उपासे यांनी त्यांचे हे चरित्र लिहून कृतज्ञताच व्यक्त केली आहे. थोर इतिहासतज्ज्ञ शिक्षण विभागाचे संचालक व शिवाजी विद्यापीठाचे संस्थापक, कुलगुरु म्हणून डॉ. आप्पासाहेब पवार यांनी केलेले शैक्षणिक कार्य बहुजनांच्या शिक्षणास उच्च शिक्षणाचे परिमाण जोडणे होय. डॉ. अरुण भोसले यांच्यासारख्या संशोधकांनी त्यांचे रेखाटलेले चरित्र वाचनीय झाले आहे. डॉ. पवार कुशल प्रशासक, कठोर शिस्तीचे संशोधक, विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असलेला हा चरित्र नायक शिक्षण आणि संशोधनातील दीपस्तंभ म्हणून या चरित्रातून पुढे येतो. मराठी भाषा आणि साहित्याला भारतीय ज्ञानपीठाचे पहिले पारितोषिक मिळवून देऊन कोल्हापूरचे नाव वाङ्मय क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर नोंदवण्याचे कार्य करणाच्या पद्मभूषण वि. स. खांडेकरांचे चरित्र प्रस्तुत लेखाचे लेखकाने लिहिले आहे. वि. स. खांडेकरांचे साहित्य म्हणजे जीवनासाठी कलेचे समर्थन. साहित्यातील कोणताच प्रकार त्यांनी सोडला नव्हता. हे चरित्र नायकाचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू वाचताना लक्षात येते. वि. स. खांडेकर, भाई माधवराव बागल यांचे समकालीन समाजसुधारक ‘दलितमित्र' दादासाहेब शिर्के यांनी आपल्या ‘गरुड' साप्ताहिकाद्वारे १९२६ ते ७६ अशी पाच दशके जी हक्काची लढाई केली त्याला इतिहासात तोड नाही. दलितांसाठी क्रेडिट सोसायटी स्थापून त्यांना आर्थिक उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी शिर्के यांनी दलितांना केलेले साहाय्य, मिस क्लार्क बोर्डिंगच्या माध्यमातून दलित विद्यार्थ्यांना शिक्षण, त्यांचे समाजप्रबोधन प्रा. डॉ. चंद्रकांत कुरणे यांनी विशद केले आहे.

 लाल निशाण पक्षामार्फत साखर कामगारासारख्या त्यावेळच्या असंघटितांना संघटित करून त्यांना जगण्याचा हक्क मिळवून देणारे कामगार नेते कॉ. संतराम पाटील, त्यांचे झुंजार व्यक्तिमत्त्व प्राचार्य डॉ. विलास पवार यांनी आत्मीयतेने उभारले आहे. कॉ. संतराम पाटील विद्यार्थी संघटनेतून पुढे आले. प्रज्ञा परिषदेच्या कार्यातून त्यांच्यातील कार्यकत्र्यांची घडण झाली. नवजीवन संघटनेतून त्यांचे नेतृत्व समाजमान्य झाले. शेतकरी कामगार पक्ष, कामगार किसान पक्ष आणि लाल निशाण पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास चिकित्सकपणे या चरित्रात अंकित करण्यात आला आहे.

 श्रमिक प्रतिष्ठानने तडीस नेलेल्या या चरित्र ग्रंथमालेतील आपल्यात असलेले एकमेव नायक म्हणजे प्रा. डॉ. एन. डी. पाटील, त्यांचा सहवास लाभलेल्या प्राचार्य विश्वास सायनेकरांनी त्यांचे चरित्र रेखाटले आहे. प्रा. एन. डी. पाटील म्हणजे विचार आचारांचे अद्वैत. बांधिलकीपुढे काणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची प्रतिबद्धता. शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळ, रयत शिक्षण संस्था विकास, कापूस एकाधिकार योजनेचे जनक, सहकार चळवळीच्या शुद्धीकरणाचे प्रणेते, सेझला मूठमाती देणारे, बळीराजाचा तारणहार अशा कितीतरी अंगांनी डॉ. एन. डी. पाटील यांनी गेल्या पन्नास वर्षांत जो समाज परिवर्तनाचा घणाघाती झंझावात निर्माण केला त्यातून त्यांची थोरवी प्रत्ययास येते.

 या ११ चरित्र नायकांचे जीवनकार्य चरित्र ग्रंथमालेच्या रूपाने प्रकाशित करून श्रमिक प्रतिष्ठानने मोठे औचित्य साधले आहे. जात, धर्म प्रतिवादाला गेल्या शतकात छेद देत समाजधुरिणांनी सामाजिक सलोखा निर्माण केला. त्याच्या पुनरुज्जीवनाची आवश्यकता वाटत असताना या चरित्रांचे प्रकाशन ही मोठी सकारात्मक रचना आहे. ज्यांना आपली मुले-मुली सामाजिक सलोखा सांभाळत नव्या भारताच्या उभारणीचे सूत्रधार व्हावे, असे वाटते त्यांच्यासाठी ही चरित्रे म्हणजे नवयुगाची प्रेरके होत. कॉ. गोविंद पानसरे, यांचा विचार, संपादक मंडळाची क्रियाशीलता, लेखक समूहाचे समाजभान त्यांच्या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेली चरित्रमाला एकविसाव्या शतकातील कोल्हापूर समाजशील बनवेल असा विश्वास वाटतो.


• चरित्र ग्रंथमाला (चरित्र)

 प्रकाशक - श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर
 प्रकाशन वर्ष - २०१२

 किंमत - १000 रु. (आकरा पुस्तकांचा संच)

♦♦

‘ज्वाला आणि फुले' : जहाल वेदनांची गीते


 कार्य हेच ज्यांचे जिवंत महाकाव्य होते त्या बाबा आमटे यांचे जीवन कार्य, साहित्य, वक्तृत्व सारेच काव्यभारित होते. विचार व आचार यांत सुसंगती होती. त्यांनी जे लिहिले ते सारे विचारप्रवण, कृतिकेंद्री होते. अंतर्मुख करणारे आहे. त्यांचे समग्र साहित्य कृती, विचार व कलात्मकतेचे संयुक्त रूप होतं.

 ज्वाला आणि फुले या काव्यसंग्रहाचे वर्णन वि. स. खांडेकरांनी ज्वलंत व्यक्तिमत्त्वाचा काव्यात्मक आविष्कार असं केले आहे. साहित्यिक, चिंतक, कलाकार, कार्यकर्ता म्हणून बाबा आमटे यांना समजून घेण्यासाठी ज्वाला आणि फुले वाचायला हवे.

 साने गुरुजी, वि. स. खांडेकर, खलील जिब्रान, स्टीफन झ्वाइग, प्रेमचंद, यशपाल असे अनेक साहित्यिक मला आवडतात. एखाद्या साहित्यिकाची रचना आपल्या भावविश्वात चिरस्थानी ठरण्याची अनेक कारणे असतात. ती कलाकृती गाजलेली असते, ती आपल्याला आवडते, अस्वस्थ करते. प्रेरणा देते, अंतर्मुख करते, संकटात मार्गदर्शन करते. एकांतात मित्र होते. प्रत्येक वाचनात ती ‘कॅलिडिओस्कोप' सारखे नवे काही तरी दाखवते, देते. अशी एक ना अनेक कारणे असतात. अशा जीवस्य कंठस्य साहित्यकृतीमध्ये ‘ज्वाला आणि फुले' या बाबा आमटे यांच्या काव्यसंग्रहाला अग्रस्थान आहे. हा काव्यसंग्रह म्हणजे आयुष्यातला मोठा ठेवा आहे.

 ‘ज्वाला आणि फुले' मधील कविता आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर मला भेटत राहिल्या. सन १९६३-६४ मध्ये मी आठवीत होतो. वि. स. खांडेकरांनी स्थापन केलेल्या ध्येयवादी शाळा म्हणून लौकिक असलेल्या आंतरभारती विद्यालय, कोल्हापूरमध्ये शिकत होतो'. 'माणूस', 'मनोहर', ‘साधना', 'अमृत', 'कुमार', ‘बहुश्रुत माला' सारखी नियतकालिके शाळेत येत. वर्गात अभ्यासाबरोबरच अवांतर शिकवण्यावर भर असायचा. हे वाचा, ते ऐक, हे पाहिले का? (चित्र, सिनेमा, शिष्य, देश-प्रदेश, निसर्ग असे बरेच काही त्या वेळी सांगितले जाई.) साधना साप्ताहिक चाळायचो. ते आपले वाटायचे. आमची शाळा साने गुरुजींचे स्वप्न म्हणून सुरू झालेली. ‘ज्वाला आणि फुले' मधील कविता साधनेत छापून येत. वाचल्या तर डोक्यावरून जात. पण वर्गात बाबा आमटेंचा घोष असायचा. त्यामुळे त्या कविता पाहायचो. शालान्त परीक्षा झाल्यावर त्याच सुट्टीत काही मित्रांबरोबर मी सोमनाथ श्रम शिबिरात गेलो. बाबा आमटे भेटले. चांगले पंधरा दिवस. त्या भेटीने माझा जणू कायाकल्प झाला. आपल्या पलीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा, संस्कार घेऊन परतलो. पुढे गारगोटीच्या मौनी विद्यापीठात असताना कोयना भूकंप निवारण कार्यात सहभागी झालो. त्यातून विधायक वृत्तीचा विकास झाला, असे आज वाटते. शिक्षक व्हायचे ठरवले. शिक्षकांच्या पहिल्या पगारात माझ्या मित्रांनी घड्याळ, कपडे वगैरे घेतले, मी ठरवून ‘ज्वाला आणि फुले' घेतले. पदवीधर झाल्यावर समज आल्यावर वाचलेले ते पहिले पुस्तक होते. ती त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती होती. तिला खांडेकरांच्या दोन प्रस्तावना होत्या. “ज्वाला आणि फुले' मधील कवितांचे वर्णन खांडेकरांनी ‘लोकविलक्षण आत्म्याचे उर्जस्वल शब्दविलसित' असे केले होते. या संग्रहात २४ कविता आहेत. प्रत्येक कविता नवा विचार, व्यक्ती, चरित्र, संस्कार, मूल्य, दृष्टी घेऊन येते. काव्यात्मकता, नाट्यमयता, मिथक, प्रतीक, गद्यशैली, समाज चिंतन वगैरे वैशिष्ट्ये घेऊन येते. सहका-यांशी केलेल्या संवादाची ती इतिश्री होय.

 बावनकशी अनुभवातून उतरलेली ही कविता विचार व शब्दशक्ती दोन्ही अंगांनी ज्वालामुखी ठरावी अशी. या कवितेस काव्यसमीक्षेची शास्त्रीय परिमाणे भले लागू पडत नसतील, पण ती वाचक प्रमाणित होती खरी! जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला इतिहास, पुराणाचा दाखला देत, वर्तमानाची चिकित्सा करत ती भविष्यवेध घेते. असे त्रिकालाबाधित आकलन घेऊन येणा-या ‘ज्वाला आणि फुले' मध्ये फुलांचे लालित्य जसे आहे तसेच ज्वालेतील प्रखरताही! तो कवीचा अंतर्यामी उद्गार असल्याने त्यात अनुभवजन्य तत्त्वज्ञान आपसूक असते. ‘शतकांचे शुक्र' ही पहिली कविता बाबा आमटे यांच्या काव्यलेखनाची भूमिका मांडते. या कवितेत कवीच्या काव्याचे शुक्रतंतू (जंतू नव्हे) दिसतात. माणूस शतकांचे संस्कार घेऊन जन्मतो, तशी त्याची कविताही. या कविता प्रेरणा गीतांसारख्या आहेत. त्या वाचताना आपल्याला जागोजागी थांबवतात. विचार करायला भाग पाडतात अन् पुढे कालौघात, अनुषंगिक कृतीलाही प्रवृत्त करतात. ‘शतकांचे शुक्र, द्वंद्व गीत आहे. गीत-संगीत, विचार-आचार, दृष्टांत-मिथक, व्यक्ती-चरित्र, चरित्र-चारित्र्य, अक्षर-आकृती, शब्द-अर्थ अशा द्वंद्वांचे अद्वैत त्यात दिसते. ‘ज्वाला आणि फुले' मधील कविता म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही व पंचशीलाचे खुले समर्थन. बाबा अध्यात्मापेक्षा विज्ञान श्रेष्ठ मानतात. आचार्य विनोबांबद्दल पूर्ण आदर व्यक्त करूनही त्यों सूक्ष्मात जाणे, अतींद्रिय होणं बाबांना पटत नाही. जग उड्डाण घेत असता अजूनही तुझी प्रजा स्थितच का?' असा प्रश्न करून ते स्पष्ट बजावतात,

 ‘स्थितप्रज्ञ नको आहेत आज
 आकाशगामी प्रज्ञागती हवे आहेत आता
  ‘पंखांना क्षितिज नसते' कवितेतील हा संवाद कवीच स्पष्ट करतो. धर्म, अध्यात्म यांसारख्या गोष्टी म्हणजे अफूची गोळी तद्वतच शृंखला. व्रतवैकल्ये, माणसाला आत्मवंचक बनवतात. त्यामुळे माणूसही अभागी- अभावपूजक होतो. माणसापुढे आदर्श असले पाहिजेत. ब्रह्मांड कवेत घेऊ पाहणा-या व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा, कॉनरॅड हिल्टन यांचे, जोवर माणूस विज्ञाननिष्ठ होणार नाही तोवर तो ‘आनंद पक्षी' होणार नाही, असे बाबा आमटे म्हणतात. ही कविता नव्या मनूचे आवाहन होय. या आवाहनाला आकाशभेटीच्या कर्तृत्वाचा अर्थ आहे. गाभा-यात करंजीच्या तेलाचे दिवे जाळून युगे गेली... माणसाच्या आत्म्याचे घर उजळले नाही. विश्वाचे घर कसे उजळणार? असा बाबांचा सवाल आहे.
 ‘उत्तरवाहिनी' ही कविता गंगेपेक्षा श्रमगंगा कशी श्रेष्ठ ते सांगते. तिच्यात उद्याच्या श्रमयुगाचे स्पंदन आहे. यात श्रमतंत्राचा विस्तार आहे. विध्वंसाजागी विधायक बीजे पेरणारी श्रमगंगा व श्रमवीर हवे आहेत. वांझ वैराणातून फुलवायचे आहेत, सौभाग्याचे द्राक्षमळे' म्हणून बाबा सांगतात, 'गोगलगाईच्या गतीने साथीला आलेले दैन्य पळवायचे असेल, तर अणुयुगातील नवतंत्रांचे हरण-टप्पे हवे आहेत.

 ‘वधस्तंभाच्या छायेत' यामध्ये कुष्ठपिडीतांच्या पुनर्वसन कार्यामागील आपली भूमिका ते मांडतात. अजंठा-वेरूळमधील पाषाणांच्या भग्न मूर्तीतील सौंदर्यापेक्षा हाताची बोटे, तळवे, झडल्याने निर्माण होणारे कारुण्य अधिक महत्त्वाचे असते. ‘मरण भोगुनि हसत राहती ते मृत्युंजय' म्हणून कुष्ठपीडित त्यांना धडधाकट माणसापेक्षा जास्त आश्वासक, पराक्रमी, भगीरथ वाटतात. सोमनाथच्या जंगलात बोटे झडलेली माणसे दोन तळव्यात पहार पकडून काळ्याकभिन्न पत्थराला पाझर फोडत विहीर खोदताना बघितल्यावर मी स्वत:ला स्वस्थ बसू दिलेले नाही.  ‘ज्वाला आणि फुले'मध्ये एकलव्य, विश्वामित्र, प्रॉमिथियससारखी चरित्रे, मिथके बनून भेटतात. महात्मा गांधी, आचार्य विनोबा, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रूपाने आदर्श समाजपुरुष भेटतात. रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी, नित्शे भेटतात. अन् त्यांच्याबरोबर येणारे वाद विवाद, विचारधारा, तत्त्वज्ञानही। ‘एकलव्य' हा केवळ कवितेचा नायक म्हणून येत नाही. तो असतो युगाचा प्रतिनिधी, ज्ञान नाकारल्या गेलेल्या शंबुकाचा तो सहोदर असतो. तसा हजारो वर्षे शिक्षण नाकारल्या गेलेल्या दलित, वंचित वर्गाचाही तो प्रतिनिधी बनून येतो. जन्मजात प्रतिष्ठेची कल्पना झुगारत ‘मदायत्तं तु पौरुषम्' ची मोहर उठवतो. ‘जन्मवान श्रेष्ठ की कर्मवान' असा प्रश्न विचारतो. स्पर्धेचे आव्हान स्वीकारतो नि प्रत्येक स्पर्धा जिंकत राहतो. घटापटांची उतरंड नाकारतो. ‘पाप्याचं पोर' म्हणवून घेणं ठोकरतो.

 ही कविता बाबा आमटे यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रकट करते. त्यांचा पिंड पोसला तो महात्मा गांधी, साने गुरुजी, गौतम बुद्ध यांच्या करुणेवर. पण ही करुणा अश्रू घेऊन जन्मत नाही. अश्रूचा सागर आटवायला निघालेल्या या आधुनिक अगस्तीला या गोष्टीचे मोठे दु:ख आहे की, या तिघांच्या जीवन दर्शनाचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला. बाबांना विचारशरण अनुयायी नकोत. त्यांना प्रतिबद्ध कार्यप्रवण स्वकर्तृत्त्वावर जग जिंकणारे कार्यकर्ते हवेत. ‘एकलव्य' हे त्या कांक्षेचे गर्वगीत होय.

 बाबा आमटे यांना विश्वामित्र हा आपला अंतर्यामीचा आवाज वाटतो. ‘विश्वामित्र होतं ‘भुकेचं झाडं'. त्याला संतोष नव्हता. त्याने एकामागून एक कांक्षा सिद्ध केल्या... त्यात पतन... पराभवही त्याला पत्करावा लागला. ‘विश्वामित्राच्या महापतनालाही असते मेनकेचे लावण्य' हे पतनाला येणारे सौंदर्य सृष्टीच्या निर्मितीच्या ध्यासातून आलेले असते. ज्वाची स्पर्धा स्वत:शी, त्याला जिंकणार कोण?' अशी अपराजेय सामाजिक महत्त्वाकांक्षा यातून प्रकट होते.

 बाबा आमटेंच्या वाचन-व्यासंगाचा परीघ व्यापक होता. पुरोहित ते पोप, धनुष्य ते स्कायस्क्रैपर, मनु ते कॉनरॅड, सावित्री ते तेरिश्कोव्हा, वरोरा ते वॉर्सा, गांधी ते नित्शे, झांझीबार ते बॅस्टिल, भारतीय ते मे फ्लाय संस्कृती, असे चतुरस्त्र वाचन. भारतीय समाज, संस्कृतीच्या प्रश्नांवर मांड ठोकून उभारलेला हा सामाजिक दर्यावर्दी कधी कूपमण्डूक विचार करूच शकत नाही. ज्वाला आणि फुले' मधील कविता सामाजिक प्रश्न, कृतिप्रवणता, श्रम माहात्म्य, शेतकरी, श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ, सोमनाथ श्रम संस्कार छावणी, घामाचे महत्त्व विशद करणा-या आहेत. या संदर्भात ‘जिथे आत्म्याचेही अन्न पिकेल' ‘या सीमांना मरण नाही' 'वसुंधरेचा पुत्र', 'श्रम सरितेच्या तीरावर' सारख्या कविता लक्षात येतात. आदिमानव उठला आहे' मध्ये ते अण्वस्त्रांचा प्रश्न हाताळतात. सांगाड्यांचं शहर'मध्ये औद्योगिकीकरणातील भयावह स्थितीचे वर्णन आहे. 'एक खिंड मी लढवीन' मध्ये निवृत्तीनंतरही समाजकार्य प्रवृत्त राहण्याचे जेष्ठ नागरिकांना आवाहन आहे.

 येथे नांदतात श्रमर्षी, या भूमीला क्षरण नाही
 येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानवशरण नाही
 येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही
 येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही.

 असे आनंदवनाचे वैशिष्ट्य ते नोंदवतात. ह्या ओळी वाचताना आपल्याला निष्क्रियतेची जाणीव होते. श्रम, जिद्द, अभाव, उपेक्षा यांचे वरदान ज्यांना लाभते, तेच काही करू शकतात. यातनाहीनांना पुरुषार्थ करता येत नाही. ‘अधिक करायचे तर (आधी) अधिक सोसावे लागते’ सारखी सुभाषितं ही केवळ शब्दांची फेक नसते. तर संघर्ष भोगण्यातून उडालेल्या त्या ठिणग्या असतात. त्या क्रियाशीलतेचा वन्ही प्रज्वलित करतात.

 दुस-या महायुद्धानंतर त्याच्या भीषण परिणामानंतर आपण अण्वस्त्रांचे कारखाने उभारत राहिल्याचे शल्य एक संवेदनशील कवी म्हणून व सजग सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना सतावते. जग पंचखंडी न राहता ते द्विखंडी झाले. एक श्वेत खंड, तर दुसरे अश्वेत... कृष्ण... काळे खंड... म्हणजे सारे अविकसित, विकसनशील जग. विशेषतः आफ्रिका, आशिया, शस्त्रशक्तीवर प्रगत राष्ट्रे नि:शस्त्र, गरीब देशांना गुलाम बनवू पाहतात. ‘आदिमानव उठला आहे' कवितेत त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणांचे आकलन लक्षात येते. ‘ग्रस्त स्वातंत्र्यास सलामी' ही कविता झेकोस्लोव्हाकियावरील रशियाच्या आक्रमणावर आहे. साम्राज्यवादाचा पराीव करण्यासाठी जन्मलेल्या कम्युनिस्ट राजवटींनी आक्रमक होणं हे पंचशील प्रमाण मानणाच्या बाबांना अस्वस्थ करतं. त्याचा प्रखर विरोध करताना ते म्हणतात,

 ‘साम्यवादाच्या वेदीवर हंगेरीचा बळी घेऊन
 हा नरभक्षक संतुष्ट होईल असे वाटले होते
 पण नवसंस्कृतीच्या गप्पा मारणारा हा जुनाच
 नरभक्षक अजून माणसाळलेला नाही.

 पण रणगाड्यांनी स्वातंत्र्य कधी गाडले जाते काय?' असा प्रश्न विचारत ते ‘जग आता मिटल्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही' असे ठणकावून सांगतात. अतिमानव आणि आदिमानव हा वर्तमानाचा खरा संघर्ष आहे, असे बाबा आमटेंना वाटते. ‘अतिमानवाचे परत फिरणे' कवितेत ते जगातल्या सर्व विचारधारांची चिकित्सा करतात. देववाद, दैववाद, बुद्धिवाद, अस्तित्ववाद यांच्यापेक्षा त्यांना मानवतावादच श्रेष्ठ वाटतो. सुख, सामर्थ्य, सत्ता, सौंदर्य यांना मानवी जीवनात महत्त्व असते हे खरे, पण जग संघर्षमुक्त करायचं असेल तर ‘सुताराचं पोरच' ते करू शकेल. कारण त्याचं साधेपण हेच त्याचे सामर्थ्य असतं असं स्पष्ट करून ते अहिंसेची शिकवण श्रेष्ठ ठरवतात.

 ‘एकोणिसाव्या शतकात आदिमानव गुलाम होता
 विसावे शतक हे त्याच्या मुक्तीचे शतक आहे.
 आणि एकविसाव्या शतकात
 तो जगाला तारणार आहे.'

 यातला 'तो' म्हणजे ईश्वर नव्हे. एकविसाव्या शतकाचा तारणहार, हलधर, शेतकरी, कुष्ठपीडित, दलित, वंचित, उपेक्षित आहे. त्यांचं जीवन श्रमसरितेच्या काठावर एक नवी श्रम संस्कृती, एक नवं श्रमशास्त्र, एक नवं श्रमतंत्र उभारत आहे. ते त-हेत-हेचे सामाजिक कंस काढून जग ‘कंसमुक्त' करतील, अशी त्यांची श्रद्धा आहे.

 ‘संप्रदायाचे कंस आणि वादांचे कंस
 वर्णाचे कंस आणि वर्गाचे कंस
 राष्ट्रांचे आणि संस्कृतीचे कंस
 माणूसमाणूस अलग करणारे छोटे मोठे कंस.

 ‘माझे कलियुग' कवितेत स्वत:चं कलियुग निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त करतात. इतिहास नाकारत एका नव्या भविष्यास लक्ष्य करतात.

 ‘शिवधनुष्याचा महिमा गाणारे
 ते उचलू शकत नाही
 आणि इतिहासात रेंगाळणारे
 इतिहास घडवू शकत नाही. (माझे कलियुग)

 यातून हा नवा विश्वामित्र नवी सृष्टी निर्माण करू पाहतो हे स्पष्ट होतं. या नव सृष्टीत ‘मे फ्लाय संस्कृती' ला स्थान नाही.
 ‘मे फ्लाय' ही एका उडणाच्या किड्यांची जात आहे
 त्यांना तोंडही नसते आणि पोटही नसते!
 फक्त विलासी इंद्रिये त्यांना असतात.
 रतिक्रीडा हेच त्यांच्या अस्तित्वाचे महाकारण
 तोंड आणि पोट यांच्यासाठी
 या मे फ्लाय संस्कृतीलाही
 आपल्या हातांनी काही करावे लागत नाही.'

  हे वाचताना हा कवी क्रांतदर्शी, भविष्यवेधी होता याची खात्री पटते. कारण हे शब्द लिहिले गेले, तेव्हा जागतिकीकरण' जन्मले नव्हते. इंटरनेट नव्हते.

 ‘ज्वाला आणि फुले' हे माझ्यासाठी न्यू टेस्टामेंट, नवगीता, आधुनिक बायबल, पुरोगामी कुराण आहे. माझ्यासाठी हरणाच्या क्षणांना मृत्युंजयी करणारे हे प्रेरणा गीत ठरले.

 तुम्हासही त्याचे वरदान लाभले, तर नव्या जगात ज्वाला' असणार नाहीत. असतील तर फुलेच ‘फुले'!


• ज्वाला आणि फुले (काव्यसंग्रह)

 कवी - बाबा आमटे
 प्रकाशक - साधना प्रकाशन, पुणे
 प्रकाशन वर्ष - १९६४

 पृष्ठे - १४६  किंमत - ५ रु.

♦♦

'तोत्तोचान' : शाळा व शिक्षकांची महत्ता


‘तोत्तोचान' नाव आहे एका जपानी मुलीचे. तिच्या आई-बाबांनी तिला एका शाळेत घातले. इयत्ता पहिलीमध्ये. पहिलीतील चिमुरडी पोर ती. पण तिच्या शाळेतील बाईंनी तिचे नाव शाळेतून चक्क काढून टाकले. का काढले तिला शाळेतून? तर ती बाईंच्या शिकवण्याकडे लक्ष नाही द्यायची. सतत वर्गाच्या खिडकीजवळ बसायची. तिच्या वर्गाला लागून एक रस्ता होता. लोक सतत येत-जात असायचे. ती त्यांना हाका मारायची. इकडे बाई वर्गात शिकवत असायच्या. तिकडे तोत्तोचानचे अनेक उद्योग, खोड्या सुरू असायच्या. एकदा तर तिनं रस्त्यावरून जाणा-या बँडवाल्यांना बोलावले आणि चक्क बँडबाजा वाजवायला लावला. बाईंनी तिच्या खोड्यांना कंटाळून तिचे नाव काढलं.

 पण तोत्तोचानची आई आपल्या आईसारखीच प्रेमळ होती. ती तोत्तोचानला रागावली नाही. तिला हेही कळू दिले नाही की बाईंनी तिला शाळेतून काढून टाकलंय म्हणून! तिची आई एका शाळेबद्दल ऐकून होती. त्या शाळेचे नाव होतं 'तोमोई” ती शाळा सोसाकु कोबायाशींनी सुरू केली होती. ते संगीताचे शिक्षक. युरोपमधून ते संगीत, नाच, ताल शिकून आले होते. तिथून येऊन त्यांनी एक बालवाडी सुरू केली होती. 'साईजो' तिचे नाव. या बालवाडील कोबायाशी मुलांना त्यांच्या स्वभावानुसार हसू, खेळू, बागडू देत असते. नंतर त्यांनी १९३७ साली ‘तोमोई' शाळा सुरू केली. ती सात-आठ वर्षीच चालली. १९४५ साली या शाळेला आग लागली आणि ती जळून खाक झाली. कोबायाशींनी ही शाळा स्वत:च्या पैशातून बांधली होती. शाळेचे वर्ग म्हणजे रेल्वेचे डबे. निसर्गाची त्यांना खूप आवड होती. ते आपल्या मुलांना संगीत, निसर्ग, आकाश सारे शिकवत. तोत्तोचान इथेच शिकून मोठी झाली. मोठी होऊन ती टी.व्ही. वर कार्यक्रम करू लागली. तिने एका कार्यक्रमातून तोमोई शाळा, आपले कोबायाशी गुरुजी, ते कसे शिकवत, प्रयोग करीत, प्रेम करीत हे लोकांना सांगितले. ते जगभरच्या लोकांना भावले. लोकांनी तिला आपल्या शाळेच्या आठवणी लिहायला भाग पाडले. या आठवणींचाच संग्रह म्हणजे ‘तोत्तोचान' हे पुस्तक.

 जपानची राजधानी आहे टोकियो शहर. या शहराच्या दक्षिणेस एक उपनगर आहे जियुगाओका. त्या रेल्वेस्टेशन जवळच तोमोई शाळा भरत असे. कोबायाशी त्या शाळेचे मुख्याध्यापक होते. कूऽऽ गाडीतली ही शाळा तोत्तोचानला आपल्या जुन्या शाळेपेक्षा खूप आवडत असे. तोत्तोचानची ही शाळा रेल्वेच्या डब्यात भरायची. म्हणून तोत्तोचानला कोबायाशी स्टेशन मास्तरच वाटत. शाळेत दुपारी सर्वजण मिळून डबा खात असत. गुरुजीही मुलांबरोबरच आपला डबा दुपारच्या सुट्टीत खात असत. डब्यात सर्वांनी समुद्रातला एक पदार्थ (मासे इ.) आणि डोंगरावरचा एक पदार्थ (भाजी, फळे, अंडे इ.) आणायचा प्रघात होता. आहार समतोल हवा म्हणून गुरुजींचा कटाक्ष असायचा. गुरुजी सर्वांचे जेवण पाहून मग स्वतः खात. घास बत्तीस वेळा चावून खाण्याकडे लक्ष असायचे.

 शाळेत भाषा, गणित, विज्ञान, निसर्ग, संगीत शिकवण्यावर भर असायचा. निसर्ग शिक्षणासाठी डोंगर तळी, नदी, नाले, जंगल इत्यादींना भेटी दिल्या जात. शाळेचे ‘तोमाई' हे छोटे गाणे सगळे म्हणत. त्याला संगीताची साथ असे. मुलांना शिक्षक स्वातंत्र्य देत. एकदा तोत्तोचानचा बटवा संडासात पडला. तर गुरुजींनी तिला तो दिवसभर घाणीत शोधू दिला. अट एकच होती. उपसलेली घाण तिची तिने भरायची. स्वातंत्र्यातून ते जबाबदारीची जाणीव देत. शाळेचे छोटे ग्रंथालय होते. तेही रेल्वेच्या डब्याच्या आकाराचेच. मुले मनापासून वाचत. शाळेस पुस्तके भेट देत. शाळेत पोहण्याचा तलाव होता. कोबायाशी लहान मुलांना पोहायला शिकवत. पोहताना कपडे घालायचे, न घालायचे स्वातंत्र्य ते मुलांना देत. मनमुराद डुंबणे म्हणजे पोहणे, शाळेत मुलांना बागकाम, मातीकाम शिकवले जायचे. शाळेत काम करताना मुलांना कपड्याची काळजी नको म्हणून साधे, घाण कपडे घालून आले तरी चालायचे हे विशेष! शाळेचे प्रगती पुस्तक होते. त्यावर अ,ब,क शेरे असत. पण सर्वांना सारखे वागवले जायचे. सर्वांवर बाई, गुरुजीसारखे प्रेम करत. मुलांचा अपमान होऊ नये अशी काळजी घेतली जायची. चुकून कुणी शिक्षकांनी मुलांना दुखवले तर कोबायाशी चिडत, बोलत पण मुलांसमोर नाही. उन्हाळी सुट्टीत शाळेत शिबिर असायचे. मुले शाळेतच दोन दिवस राहात. तंबू ठोकले जायचे. साहस, स्वावलंबन, सहजीवन शिकवण्यावर भर असायचा. सहल असायची. संगीत कवायत शिकवली जायची. कोबायाशींनी संगीत कवायत जपानभर पसरवली. आज ती जागतिक झाली. ऑलिंपिक्स, एशियाड, आयपीएल, विश्वकप (फुटबॉल) इत्यादीची उद्घाटने, समारोप म्हणजे संगीत कवायतीचे शानदार प्रदर्शन असते. प्रेक्षकांची रंगसंगती, रंग संगतीतून ध्वज, चिन्ह, नकाशे, आकारांची निर्मिती त्याचे जनक कोबायाशीच. कोबायाशी चांगले कवीपण होते.

 या साऱ्या आठवणीतून तोत्तोचाननी आपली शाळा व शिक्षक अमर केले. तिने लिहिलेले ‘तोत्तोचान' पुस्तक म्हणजे शाळेने जपलेल्या तिच्या निरागसपणाची जपणूक आणि विकास. ज्या शाळा हे जपतात, त्यांची मुले जगप्रसिद्ध होतात तोत्तोचानसारखी. हे पुस्तक जगातल्या अनेक भाषांत गेले. युनिसेफ या जागतिक बालक संस्थेने तिला आपला शिक्षण राजदूत बनवले. तिने जगभर मुलांचे निरागस बालपण जपण्यासाठी अनेक भाषणे, मुलाखती दिल्या. लेख लिहिले. पुस्तके लिहिली. यातून तोत्तोचाननी मुलांकडे पहाण्याची नवी खिडकी जगाला दाखवली. खिडकीजवळ बसणारी ही चिमुरडी. तिने शिक्षणाची नवी खिडकी उघडली. तुम्ही तुमच्या शाळा, शिक्षकांच्या आठवणी लिहा. प्रकाशित करा. कदाचित तुम्हीपण उद्या जगाचे राजदूत बनाल,


• तोत्तोचान लेखक - तेत्सुको कोरायानागी

 अनुवाद - चेतना सरदेशमुख गोसुवी
 प्रकाशक - नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली

 प्रकाशन वर्ष - १९९८
 पृष्ठे - १३0 किंमत - ५0 रु.

♦♦

महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील : प्रेरक चरित्र


महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई या महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत उपक्रमाद्वारे मराठी भाषा व साहित्याच्या प्रांतात मूलभूत विषय ग्रंथ, भाषांतरे, शब्दकोश, विश्वकोश, चरित्रे, समग्र वाङ्मय, गौरव ग्रंथ इ. रूपाने मोलाचे योगदान दिले आहे. या मालिकेत सदर मंडळाने अलीकडच्या काळात

 'थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा
  त्यांच्यासम आपण व्हावे, हाच सापडे बोध खरा'
 या ओळींना प्रमाण मानून ‘महाराष्ट्राचे शिल्पकार' या नावाने चरित्रमाला प्रकाशित केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर घालणा-या सर्वश्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक व शंकरराव चव्हाण यांची चरित्रे यापूर्वी प्रकाशित झाली आहेत आणि आता दैनिक लोकमत, सोलापूरचे विद्यमान संपादक राजा माने यांनी लिहिलेल्या 'महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा' या चरित्राचा समावेश झाला आहे.

 वसंतदादा पाटील हे स्वातंत्र्यसैनिक, पक्ष संघटक, सहकारी चळवळीचे खंदे कार्यकर्ते, प्रचंड लोकसंग्रह असलेला नेता म्हणून प्रसिद्ध होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ‘हॅट्रिक’ साधणारे ते एकमेव मुख्यमंत्री. वसंतदादांनी शालिनीताईंशी विवाह करण्याचा निर्णय घेतल्यावर महाराष्ट्रात मोठे वादळ उठले. त्या वेळी वि. स. खांडेकरांनी दैनिक सकाळमध्ये ‘खरेखुरे बंडखोर व्यक्तिमत्त्व' शीर्षकाचा लेख लिहन समर्थन तर केलेच, पण नैतिकतेच्या सार्वजनिक व व्यक्तिगत कसोट्यांची सीमारेषाही स्पष्ट केली होती. अशा वसंतदादांचे हे चरित्र राजा माने यांनी पूर्वदीप्तीशैलीने लिहिले आहे. चरित्र्याच्या सुरुवातीस त्यांनी वसंतदादांच्या स्वातंत्र्यलढ्यातील रोमहर्षक प्रसंगाचे वर्णन करून आपला चरित्र नायक हा ‘जीव धोक्यात घालून स्वातंत्र्यासाठी कसा झटत होता त्याचा प्रत्यय आणून दिला आहे. वसंतदादा तरुण वयातच स्वतंत्रता आंदोलनात उपजत देशप्रेमाच्या वृत्तीमुळे आकर्षित झाले. १९४२ च्या ‘भारत छोडो' आंदोलनात त्यांनी सातारा, सांगली परिसरातील भूमिगत लढ्याचे नेतृत्व केले. त्यात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंग फोडून त्यांनी आपली मर्दमकी सिद्ध केली. या लढ्याच्या रोमहर्षक नाट्याने हे चरित्र प्रारंभ करून चरित्रकार माने यांनी मोठे औचित्य साधले आहे.

 वसंतदादांचे घराणे मूळचे सांगली जिल्ह्यातील पद्माळे. पण दादांचा जन्म मात्र कोल्हापुरात. १३ नोव्हेंबर, १९१७ ला झाला. त्यांच्या आई वडिलांचे निधन प्लेगच्या साथीत झाले नि मग त्यांचा सांभाळ मामा-मामींनी केला. वयाच्या दहाव्या वर्षी ते कागलच्या मामा-मामींकडून पन्हाळ्याला आजीकडे आले. घरी पडवीतच शाळा सुरू झाली नि प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. बाल वयातच त्यांचे मन स्वातंत्र्य आंदोलनाकडे आकर्षित झाले. कुमार वयातच ते सोलापूरच्या ‘ताडी सत्याग्रहात सामील झाले. या आंदोलनात त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करत ब्रिटिश पेय चहा वर्ज्य केला. सन १९२८ मध्ये ते राष्ट्रसेवा दलाचे सैनिक झाले. सायमन कमिशनविरोधात त्यांनी सांगलीत 'बंद' यशस्वी केला. पुढे त्यांनी काँग्रेसच्या अनेक अधिवेशनात भाग घेऊन सातारा, सांगली परिसरात राष्ट्रीय काँग्रेसचे संघटन कार्य केले. मिठाचा सत्याग्रह, कसेल त्याची जमीन इ. आंदोलनांत सहभागी झाल्याने ते पूर्ण गांधीवादी बनले. १९३९ साली खादीच्या पोषाखात मालतीबाईंशी त्यांचा विवाह घरगुती पद्धतीने साध्या वातावरणात झाला. लग्न इतके साधे की खर्च होता रुपये पंधरा! वसंतदादा तुरुंगात असतानाच त्यांच्या एकुलत्या मुलीचे निधन झाले. तुरुंगातून सुटून आल्यावर त्यानी भूमिगत कार्यकर्त्यांचे संघटन करून नेतृत्व केले.

 स्वातंत्र्यानंतर ते ‘होमगार्ड'चे कमांडंट झाले. सांगली जिल्हा स्वतंत्र झाल्यावर त्यांनी जिल्हा काँग्रेस स्थापन करून तिचे नेतृत्व केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी पक्ष संघटन व रचनात्मक कार्य करत संस्थांचे जाळे विणले. त्यांच्या विविध विधायक कार्याची नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना १९६७ मध्ये ‘पद्मभूषण' किताब देऊन गौरव केला. मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, राज्यपाल अशा अनेक सन्मानाच्या जागा त्यांना लाभल्या. पण सर्व पदे, प्रतिष्ठांच्या पलीकडे ते ‘लोकनेते' म्हणूनच जनमानसात लक्षात राहिले. जिवंतपणी त्यांचा पुतळा उभारून सांगलीच्या जनतेने आपल्या आराध्य नेत्याचा गौरव केला. मुख्यमंत्री असतानाही दादा किती साधेपणाने राहात, वागत याचा अनुभव मी घेतला असल्यानं चरित्रकारांनी म्हटल्याप्रमाणे ‘जिथे दादा तिथे माणसांचे मोहोळ' हे ठरलेले असायचे. हे चरित्र त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा साद्यंत इतिहास आहे खरा; पण तो केवळ सनावळ्यांच्या जंत्रीने न भरता राजा माने यांनी अनेक दुर्मीळ संदर्भ, प्रसंग देऊन चरित्रनायक वसंतदादा पाटील यांचे व्यक्तिमत्त्व उभे केले आहे.


• महाराष्ट्राचे शिल्पकार : वसंतदादा (चरित्र)

 लेखक - राजा माने
 प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे
 प्रकाशन वर्ष - २०११

 पृष्ठे - २0६ किंमत - २२० रु.

♦♦



‘स्वप्नांच्या पडझडीनंतर' : विकल कविता


 ‘स्वप्नांच्या पडझडीनंतर' हा कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांचा नवा काव्यसंग्रह. माझे मित्र सुनील चव्हाण यांनी तो प्रकाशात आणला. मला आठवते त्याप्रमाणे चंद्रकांत पोतदार यांची कविता फुलू लागल्यापासूनच मी साक्षीदार आहे. ते उपजत हळवे आहेत. हळवेपणा एक शाप घेऊन येत असतो. तो एक गुंता असतो. तो भोव-यात अडकवतो. भोवरे अनेक प्रकारचे असतात. भाव भोवरे, शब्द भोवरे, चंद्रकांत पोतदारांची कविता त्यात अडकून राहिल्याचे स्वप्नांच्या पडझडीनंतर' च्या कविता वाचत असताना प्रकर्षाने लक्षात आले.

 कवीला आयुष्य पसारा वाटतो. असा तसा नाही, महाकाय पसारा! पसारा म्हटला की त्यात फापट व्यवहार आले. व्यवहार ही एक गुंताच खरा. हा कवी खेड्यातला. पोटासाठी गाव घरापासून परागंदा झाला. नोकरी, विवाह, कुटुंब असा त्याचाच त्यानं एक पसारा थाटला. माणूस दोन पातळीवर जगत असतो. एक असते लौकिक, भौतिक ती त्याला शरीर वस्तूंच्या जगात आकर्षिते. तिथे आत्मिक, भावनिक उमाळे फिके पडतात नि तो मृगजळामागे धावतो. त्याचा कांचनमृग होतो. उपभोगाचा ऋतू सरल्यावर त्याला त्याचे हरवलेपण खायला उठतं. मुळात तो माती, माणसात वाढलेला. गावगाडा, गोतावळा असा गुंता असतो की त्यात निसर्गाची अस्सल गाठ असते. ती सुटता सुटत नाही नि तुटता तुटत नाही. मग हरवलेला माणूस गाव, घर, माय, गोतावळा हरवल्याच्या शोकात विद्ध होऊन खेटे मारू मागतो, लागतो. पण मग त्याची अवस्था ‘न घर का न घाट का' होऊन जाते. त्याच्या हाती राहते, हात चोळणे नि उसासे टाकणे. या साऱ्या पडझडीची ही कविता. कवीच्या स्वप्नातले जग गावकूस घेऊन मायेची पाखर घेत झुलणारे होते. त्याला काळाने भौतिकात अडकवले. ‘धरले तर चावते नि सोडले तर पळते' अशी त्याची स्थिती. ही तगमग त्याला बेचैन, अस्वस्थ करते. गमावल्याचा पश्चात्ताप शब्दकळा घेऊन उमळत राहतो. हे भावबंधांचे उमाळे म्हणजे स्वप्नांच्या पडझडीनंतरच्या कविता. त्यात जखम आहे, रक्त आहे. पण ती भरेल असा विश्वास या कविता आहे. त्याच एक आश्वासक आशेवर तग धरून तो हरवलेलं शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

 ‘गाव’ आणि ‘आई'चे कवीचे स्वप्न हा या कवितेचा केंद्रीय विषय. जागतिकीकरण, तंत्रज्ञान क्रांती यात हे स्वप्न हरवलं. त्या पडझडीची झाडाझडती या कवितांच्या प्रत्येक ओळी, शब्दांतून पाझरत, झरत राहते. हतबल आयुष्याचा उच्छ्वास बनत ही कविता धाय मोकलून रडत राहते. कवी त्याला प्राक्तन म्हणतो. पण हा कवीनेच स्वहस्ते व मोहापायी केलेला गुंता होय. त्याची सल त्याला सतत उसवत राहते. व ही कविता जन्म घेते. कवीला हे पुरतं माहीत आहे की ‘इतके का सोपे असते?' दोन्ही डगरींवर पाय ठेवत प्रवास करणं! ‘कुजण्यापेक्षा तगणे बरे आणि जगण्यापेक्षा मरणे बरे' म्हणत तो कुढत, कण्हत जगत राहतो. ‘पराधीन पुत्र आहे जगती मानवाचा' असं उगीच का गदिमांनी म्हटले होते?

 माणसाचे जगणे एक हुलकावणी असते. ते त्याला मुळाशी ठेवत नाही नि कुतरओढ त्याला खंतावत राहते. गाव' नि ‘आई' या कवितेची गलबतं. ती कवीला सतत गहिवरत, गोंजारत राहतात. कवीलाही हा पान्हा जोजवत रहातो. इथेच या कवी नि कवितेची गोची आहे. डॉ. चंद्रकांत पोतदार कविता लिहायला लागल्याला किती दशके सरली, पण शब्दकळा, आशय, विषयांचा परीघ काही रुंदावला नाही. म्हणून माझ्यासारख्याला या कवी नि कवितेचे थांबणे, थबकणे खंतावत राहते. नुसते नवे शब्द, अन् तेही इंग्रजी वापरले म्हणून कविता काही नवी आधुनिक होत नसते. टाईप, प्रिंट, अपडेट, कॅनव्हास, टेंड, रिंगटोन, एसएमएस, लाइफस्टाईल सारखे ‘कितीदा केले टाइप' म्हणून ती आधुनिक होत नाही. नव्या कवितेचा टाइप, पोत तुमच्या हाती गवसला का? माणसाचे जगणे जागतिकीकरणाने, तंत्रज्ञानाने बदलले. प्रिंट मिडिया मागे पडला. इलेक्ट्रॉनिक मिडिया सरसावला. या सरसावलेल्या मिडियाने माणसाला सावरले की बहकावले ते कवितेत यायला हवे. माणसाचा विशेषतः स्त्रिचा रुंदावलेला कॅनव्हास तुमच्या कवितेत प्रतिबिंबित झाला कां? स्त्री ‘देखने की चीज' बदलून ‘सोचने का बहाना' झाली का? हे यायला हवे, तर ती नवी कविता होणार. चाकोरी बदल्याचे यथार्थ चित्रण कविता व्हायला हवी. ती न झाल्याने ही कविता तेच ते भाव, नवे शब्द, बिंब घेत स्वत:भोवती फेर घेत राहते. म्हणून ही कविता मला थांबलेल्या भाव स्वप्नांचे प्रतिबिंब वाटत राहते. उबदार ठेच, काळजाचं गाणं, डोळ्याचा समुद्र, कोंडलेले आयुष्य कळून काळ उलटून गेला. वाढलेल्या पोरीची चिंता नवी का? वर्तमान श्वासाचे तपशील, तुम्हाला किती देता आले या कसोटीवर तुमची कविता नवी होणार. ती व्हायला हवी. ग्लोबलायझेशनच्या काळात लोकलाइज होऊन राहणे म्हणजे स्थितीशीलता नव्हे का? तरल भाव महत्त्वाचे की तंत्र तरलता? हे ठरवायलाच हवे, तलवार, तालेवार कि तंज्ञवान यावरच तुमचे भविष्य ठरणार? इतिहासाच्या स्मरण रंजनात रमणाच्यांना भविष्य नसते. जे भविष्य घडवू शकत नाहीत, त्याची नव्या इतिहासातील अनुपस्थिती हाच त्याचा न लिहिलेला मृत्युलेख असतो, हे जे लोक समजून घेतात तेच अमर होतात.

 डॉ. चंद्रकांत पोतदारांनी आपली कविता नवी करायला हवी. बहुभाषी काव्य वाचनाशिवाय मराठी कवितेच्या कक्षा रुंदावणार नाहीत. हल्ली कितीतरी देशी, विदेशी कवितांच्या अनुवादांचा महापूर मला दुथडीभरून वाहताना दिसतो. प्रफुल्ल शिलेदार, विजय चोरमारे, गणेश विसपुते, मनोहर जाधव, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत भोंजाळ, लक्ष्मी नारायण बोल्ली, विलास सारंग यांनी किती तरी अनुवाद मराठीत आणलेत. हिंदीत रोज नवे येत राहते. ते कोळून प्याल्याशिवाय नव्या धारेची कविता पाझरणार नाही. गावाचा गलबला, मायेचा पाझर, भूतकाळाची सय माणूस घडवते. पण कविता नवा माणूस घडणीचे हत्यार आपण बनवणार की नाही? वाढता जातीयवाद, असहिष्णुता, धार्मिकता, अराजक जर कवीला अस्वस्थ करणार नसेल तर कवितेचे वर्तुळ रुंदावणार नाही. ते रुंदावावे असे मनापासून वाटते. हे लेखन शल्याचा शिलालेख झालाय खरा, पण इलाज नाही. दर्ज समझ में आयेगा, तो इलाज जरूर हाथ आयेगा! शुभेच्छा! शुभास्ते पंथानः सन्तु।।


• स्वप्नांच्या पडझडीनंतर (काव्यसंग्रह)

 कवी - डॉ. चंद्रकांत पोतदार
 प्रकाशक - आर्यन प्रकाशक, नेवरी (सांगली)

 प्रकाशन वर्ष - २०१५
 पृष्ठे - ८८ किंमत - १२० रु.

♦♦

काश्मिरी कयामत' : आपत्तीतील माणुसकी


 एकविसावे शतक वरदान व शापाचे छापा-काटा घेऊन आलेले असे नाणे आहे की माणसाला ते कधी स्वर्गसुख देते तर कधी नरक यातना! या शतकांनी माणसास माहिती व तंत्रज्ञान, संगणक क्रांती, जागतिकीकरण, यंत्र सुधार, काळ, काम नि वेगाने जग शून्यवत स्थिर केले. तद्वतच बेकारी, विषमता, आत्मरतता, मूल्य व नैतिकतेचे उद्ध्वस्तीकरण असे वरदान नि शाप समांतर विकसित केले. माणूस दिङ्मूढ आहे. अशा प्रतिकूल काळात ‘सरहद्द' ‘सहमत अशा स्वयंसेवी संस्था जन्माला आल्या. त्यांनी घड्याळाचे काटे उलटे फिरवू पाहणाऱ्या प्रयत्नांना आपले अरूणी बांध घालून थोपविण्याचा यथामती, यथाशक्ती प्रयत्न केला. त्यांनी आपदग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला.

 अशा कुटुंबातील अनाथ, निराधार मुलांसाठी शाळा, वसतिगृहे, सुरू करणाऱ्या संजय नहार, अधिक कदम यांनी आपल्या सरहद्द' संस्थेमार्फत काश्मीरच्या सरहद्द प्रांत, प्रदेशात जे कार्य केले ते पाहण्यासाठी पत्रकार गुरुबाळ माळी, समीर मुजावर, भारत चव्हाण, शीतल धनवडे सप्टेंबर २०१४ मध्ये काश्मीरला गेले. लहरी निसर्गामुळे संकट उभे राहिले. या काश्मीर दौ-याचा वृत्तांत गुरुबाळ माळी यांनी ‘काश्मिरी कयामत' नावाने शब्दबद्ध केला. त्याला पुस्तक रूप आले. 'कयामत' उर्दू शब्द होय. त्याचा अर्थ प्रलय। पण तो अनेकदा मृत्यू या अर्थाने योजला, वापरला जातो. सरहद्द' प्रमाणेच ‘बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन' ही स्वयंसेवी संस्था आहे. पुण्यातले तरुण ती काश्मीरसाठी चालवतात. या दोन्ही संस्थांचे या पत्रकार दौ-यास साहाय्य होतं. निसर्ग प्रकोपामुळे काश्मीर ऐन दौ-यावेळी पुरानी वेढला गेला होता. अखेरीस दौरा सुरू झाला. श्रीनगरला विमान उतरेपर्यंत पावसाचा जोर कमी झालेला. तरीही पत्रकारांना आपण करू ती पूर्व दिशा वाटत असते. इथे लक्षात आलं पत्रकारपण अळवावरचे पाणी असते.

 एका तीन मजली मशिदीत सर्व पूरग्रस्त जेरबंद होते. इथे कयामतचे एक नवे नाट्य, नवीन जीवन पत्रकार मित्रांनी अनुभवले. त्याची वित्तंबातमी ‘आँखों देखा हाल' म्हणजे ‘काश्मिरी कयामत!' एकावन्न तासांची मृत्यूशी झुंज देणारा थरारक अनुभव. निसर्गाच्या प्रकोपाचे गुरुबाळ माळी यांनी केलेले निरीक्षण हुबेहूब शब्दबद्ध केलेय. मुसलमान हिंदूचे प्राण वाचवतो तेव्हा लक्षात येते भारत, पाकिस्तान ही आपण अहंकार, आंधळेपणाने उभारलेली कुंपण! ‘जय जगत' ‘सर्व भूमी गोपाल की' हेच खरे! हे केवळ प्रवास वर्णन नाही. तो वृत्तांत नाही. तो एका संवेदनक्षम पत्रकाराच्या आपदग्रस्त मन:स्थितीतून आकाराला आलेला एक सहज, संवेदी, मनुष्यलक्ष्यी एकात्म संवाद होय.


• काश्मिरी कयामत (अनुभवकथन)

 लेखक - गुरूबाळा माळी
 प्रकाशक - चिनार पब्लिशर्स, पुणे - ४३
 प्रकाशन वर्ष - २0१५

 पृष्ठे - १२५  किंमत - २५0 रु.

'मी एस. एम.' : सामाजिक चरित्राची राजकीय गाथा


पार्श्वभूमीः

 ‘मी एस. एम.' हे समाजवादी राजकारणी एस. एम. जोशी यांचे आत्मकथन होय. ‘मनोगत' मध्ये त्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ते त्यांनी स्वत: बसून लिहिलेले नाही तर या आत्मकथनाचे शब्दांकन रामकृष्ण तथा तात्या बाक्रे यांनी केले आहे. सन १९८४ ला एस. एम. जोशी यांना ८0 वर्षे पूर्ण होत होती. ‘सहस्त्रचंद्रदर्शन योग जुळून आल्याप्रीत्यर्थ हे आत्मकथन मौज प्रकाशन, मुंबईने प्रकाशित केले. सुमारे ४४0 पृष्ठांचे हे आत्मकथन. त्यात एस. एम. जोशी यांनी जन्मापासून (१९०४) ते सन १९८० पर्यंतची सुमारे आठ दशकांची जीवनकथा वर्णिली आहे. त्यांचा मृत्यू १९८९ साली झाला. ते लक्षात घेता ती समग्र जीवन कहाणी म्हणावी लागेल. कारण सन १९८४ नंतरचा त्यांचा काळ राजकारण संन्यासाचा राहिला. आत्मकथनास समांतर ‘एस. एम.' नावाचा सर्वश्री मधु दंडवते, मधु लिमये, प्रेम भसिन, बाबा आढाव, भाई वैद्य प्रभृती मान्यवरांनी एक गौरव ग्रंथ प्रकाशित केला होता. तत्पूर्वी सन १९६३-६४ मध्ये षष्ठब्दिपूर्तीचे औचित्य साधून सर्वश्री वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, अनंत भालेराव, चंद्रशेखर धर्माधिकारी, ग. प्र. प्रधान, अ. भि. शहा, मधु पानवलकर व पन्नालाल सुराणा प्रभृती मान्यवरांनी ‘एस. एम. जोशी गौरव ग्रंथ' प्रकाशित केला होता. या साच्यातून लक्षात येते की एस. एम. म्हणजे सौजन्य मूर्ती, सच्चा माणूस, सज्जन महामानव नि सत्त्वशील महात्मा!

 “मी एस. एम.' आत्मकथा म्हणून प्रकाशित झाली असली तरी तीत जन्मापासून ते युवावस्थेपर्यंतचेच आत्मकथन आहे. सन १९२८ ते १९८0 हा सुमारे पाच दशकांचा यातील काळ ‘आत्म' हीन, ‘पर हितलक्ष्यी, समाजशील जीवनाची ती राजकीय गाथा, कथा होय. उत्तरार्धात भूमिगत असताना वा अटक झाल्यानंतर पत्नी व पुत्र भेटीचे दोन अपवाद प्रसंग सोडले तर ही कहाणी महाराष्ट्र व भारताच्या समाजवादी राजकारणाचा लेखाजोखा म्हणून, ‘चक्षुर्वैसत्यम्' म्हणून तिचे ऐतिहासिक महत्त्व आहे.  ‘राजनीती वारांगने' असे संस्कृतमध्ये लिहून ठेवले आहे. इंग्रजीत Politics is a game of squander असं म्हटले जाते तर हिंदीत ‘बाँको का क्षेत्र वर्णिले गेले आहे. अशा पाश्र्वभूमीवर लोकनायक जयप्रकाश एस. एम. जोशींबद्दल लिहिताना जेव्हा असे म्हणतात की, S. M. Joshi is not a politician. He is political revoluntionary and activist. ते खरे त्यांच्या जीवन व कार्याचे वस्तुनिष्ठ व यथार्थ मूल्यांकन वाटते किंवा आचार्य विनोबा भावे जेव्हा म्हणतात- S. M. Joshi could not make a successful politicion because he could not tell a lie तेव्हा ते एस. एम. जोशींसाठी ‘बोनाफाईड सर्टिफिकेट' मानले जाते. एस. एम. जोशी यांची ही आत्मकथा राजकारणासंबंधी पूर्वापार सारे आडाखे खोटे ठरवते म्हणून हे आत्मकथन राजकारणातील अंधारातला कवडसा म्हणून पुढे येते. ते केवळ वाचनीय न राहता विचारणीय, अनुकरणीय ठरते, हीच या आत्मकथेची सर्वांत मोठी देणगी होय.

मनोगत

 आत्मकथेच्या ‘मनोगत'मध्ये एस. एम. जोशींनी लिहिले आहे की, ‘आत्मचरित्र लिहिण्याइतकी सत्यनिष्ठा आणि लेखन कौशल्य मजकडे नाही.' पण वाचताना हे खोटे ठरते. साऱ्या गोष्टी सत्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे लिहिणे काही सोपे नाही, असे ते म्हणत असले, तरी त्याचा एक पारदर्शी वस्तुपाठ एस. एम. जोशी यांनी या आत्मकथनातून समाजास घालून दिलाय खरा हे मात्र खरे आहे की, ते एक सामान्य माणूस', ओबडधोबड, सरळसोट, खरे! राजकारण हा बुद्धिबळाचा पट मानला तर इथे साऱ्या चाली त्यातील उंटाप्रमाणे तिरक्या (तरी सरळ!) चालाव्या लागतात. एस. एम. जोशींनी पाने लपवून कधी पत्त्याचा डाव खेळला नाही. राजकारणाने सतत त्यांना लपंडाव खेळायला भाग पाडले. पदांचे कितीतरी खो या माणसाने सहन केले, पण त्याने आपल्या हरिश्चंद्राचे वस्त्रहरण होणार नाही याची सजगपणे काळजी वाहिली. ती त्यांची सचोटी होती. एस. एम. जोशी आपल्या आयुष्यात जे चांगले घडले त्याचे श्रेय परिस्थितीला देत असले, तरी तो त्यांचा विनय आहे. माणसाचा चांगुलपणा असेल तरच राजकारणाच्या खेळात सोंगट्या सुलट पडत असतात. त्यामुळेच अशक्य ते शक्य करिता सायास' म्हणून ते कठीण परिस्थितीत निवडणूक जिंकतात. हे मात्र खरे आहे की, लौकिक कसोटीवर त्यांचे जीवन अपयशी ठरले. त्यांच्यासारखा माणूस या देशाचा खरं तर राष्ट्रपती होता, तर देशाचे आजचं दुश्चरित्र घडले नसते. माणूस मोठा कोण जो अंतरात्म्याच्या आदेशाबरहुकूम चालतो, वागतो, बोलतो. त्याचं नाव एस. एम. जोशी. त्यांच्या पुढे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरूचा आदर्श होता. या सा-यांचा सहवास त्यांना लाभला नि त्या प्रभावळीत ते वाढले. लोकनायक जयप्रकाश नारायण, सेनापती बापट, आचार्य शंकरराव जावडेकर, शंकरराव देव, आचार्य स. ज. भागवत, साने गुरुजी प्रभृती सहकारी त्यांना लाभले. म्हणून त्यांचे जीवन निष्कलंक झाले. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ‘स्फटिक' या एका शब्दात समर्पक वर्णन केले आहे. ते म्हणतात, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात फार थोडी माणसे अशी आहेत की ज्यांच्याबद्दल कोणत्याही परिस्थितीत आदर वाटावा.' म्हणून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन यशवंतराव चव्हाण १ मे १९६० रोजी मुख्यमंत्री झाले तेव्हा निघालेल्या मिरवणुकीत यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीने जीपवर विराजमान होते. एस. एम. जोशी. विरोधी पक्षनेते असून एस. एम. ना जो मान मिळाला तो त्यांच्या मूल्यनिष्ठ राजकारण नि चळवळीचा सन्मान होता.

 'मी एस. एम. आत्मकथेच्या प्रारंभी एस. एम. यांच्या हस्ताक्षरातील पत्नी ताराताई यांना लिहिलेल्या एका पत्राचा परिच्छेद आहे. तो वाचला की लक्षात येते, हे आत्मकथन त्यांनी पत्नीशी केलेले हितगुज आहे. आयुष्याच्या धावपळीत तिच्याशी बोलता आलं नाही. उत्तरायणात किरणे तिरपी झाल्यानंतरचे हे मनोगत म्हणजे एका समाजपुरुषाचं भरपाई करत केलेले, स्मरणरंजन होय. हिंदीत त्याला रवंथ' या अर्थाचा परंतु अधिक सार्थक ‘जुगाली' असा शब्द आहे. त्या पत्रात एस. एम. म्हणत असले की, 'माझे जीवन काही अखंड आत्मविकासाचा इतिहास नाही, किंबहुना असंख्य लहानमोठ्या प्रमादांची ती एक साखळीच आहे. हे खोटे, एस.एम. यांचे बालपण जुन्नर (पुणे) गोळप (कोकण) सारख्या गावी गेले. वडील नाझर होते. पण एस. एम. दहा-अकरा वर्षांचे असताना ते सन १९१५ मध्ये निवर्तले. आईने नंतर सांभाळ केला. पण एस. एम. यांचे बालपण, शिक्षण हलाखीतच गेले. ते वार लावून शिकले. पुण्यात गोविंदराव जोशी, एस. एल. आपटे यांच्या घरी हरकाम्या म्हणून राहिले अन शिकले. रमणबागेतून ते मॅट्रिक झाले. न्यू इंग्लिश स्कूलमधून उत्तीर्ण होऊन त्यांनी फर्गुसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण शिक्षणाची कड काही लागली नाही. ते सन १९२८ मध्ये अर्थशास्त्र विषयात बी. ए. झाले. पण महाविद्यालयीन सारा काळ म्हणजे एस. एम. यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीचा होता. जडणघडण

 एकीकडे परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे शिक्षणासाठी त्यांना भ्रमंती करावी लागली. या भ्रमंतीच्या अनुभवातून एक प्रकारचे अकाली प्रौढत्व आलं. ‘काळ', 'केसरी' सारख्या वर्तमानपत्रांनी त्यांच्या किशोर वयातच राजकीय जागृती केली. स्त्री-पुरुष भेद, जात-धर्म भेद, ब्राह्मण-ब्राह्मणेतर भेदांनी त्यांना सामाजिक भान दिले. पुरशामामासारखा घरातील प्रौढ. त्याचा एका ब्राह्मण स्त्रीशी संबंध येतो. त्या अनुषंगाने खेड्यातील खोत एका दुस-या गृहस्थास सांगत होते, “या पुरशाला जर शेण खायचेच होते तर ते आमच्या घरी कशाला? कुळवाड्याच्या बायका काय कमी होत्या?' हे उद्गार ऐकून एस.एम.यांना उच्च नीचतेच्या समाज वास्तवाची जाणीव झाली. ब्राह्मणांच्या बायका शुचिर्भूत राहिल्या पाहिजे. कुळवाड्यांच्या न राहिल्या तरी काही बिघडत नाही. असा तत्कालीन उच्चभ्रूचा दृष्टिकोन म्हणजे जगण्याची अधम पातळीच नव्हे का? लहानपणी शेजारच्या उमाकाकू नावाच्या विधवेला दिवस जाऊन बाळ होते. त्या विधवेची दीक्षित नावाच्या गृहस्थांनी केलेली निर्भर्त्सना त्यांच्या बालमनावर परिणाम करून गेली. त्यातून त्यांच्या मनात स्त्री विषयक विविध प्रश्न व समस्यांचं काहर उभारलं. पुढे ते प्रौढ झाल्यावर राष्ट्र सेवा दलाचे प्रमुख झाले. त्याची ध्येये, उद्दिष्ट्ये, कार्यपद्धती ठरवताना स्त्री-पुरुष समानता मूल्य म्हणून स्वीकारले. आंतरजातीय, आंतरधर्मीय इतकेच नव्हे, तर आंतरभारतीय विवाहांचे एस.एम.यांनी समर्थन केले. स्वतः प्रेमविवाह करून प्रागतिक पाऊल उचलले व व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र सेवा दलाप्रमाणेच शाखा चालत. पण संघात मुलींना प्रवेश नव्हता. एस.एम.यांनी सेवा दलात मुलींना प्रवेशाचे धोरण ठेवून सेवा दल पुरोगामी बनवले. स्त्रियांना पुरुषांबरोबरीने शाखाप्रमुख केले. त्यामागे एस.एम.याची धारणा होती की, “स्त्रियांना पुरुषांबरोबरीचे स्थान मिळवून देण्यासाठी स्त्रियांहून जास्त शिक्षण (म्हणजे प्रबोधन!) पुरुषांचे झाले तरच स्त्री मुक्तीची चळवळ यशस्वी होईल. महाराष्ट्राचा स्त्री मुक्तीचा विचार सेवा दलातून विकास पावला.

 एस.एम.यांच्या जीवन विकासाच्या अवस्थांचे विभाजन ना. ग. गोरे यांनी करताना म्हटले होते की, “१९२३ ते १९३0 हा एस.एम.यांचा पानाआडच्या कळीचा काळ. १९३० ते १९३९ त्या काळीचा वाढीचा काळ. तेथपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपर्यंतचा १९६१ पर्यंतचा काळ म्हणजे एस.एम.यांची एक एक पाकळी उलगडत जाऊन फुलांचे पूर्ण फुल होण्याचा काळ. श्रीधर महादेव जोशी हे नाव धारण करणा-या व्यक्तीचे ‘एस.एम.' या समष्टीच्या नेत्यात ज्या कालखंडात रूपांतर झाले तो काळ.' पैकी प्रथम काळाचे विवेचन ‘मी एस.एम.' आत्मचरित्रात ‘एक दशकाचे समालोचन' शीर्षकांतर्गत करण्यात आले आहे. स्थूल अर्थाने पहायचे झाले तर एस.एम. पदवीधर झाले नि त्यांनी राष्ट्रीय आंदोलनात उडी घेतली. लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव त्यांच्यावर शालेय वयात होता. प्रौढपणी महात्मा गांधींचे गारूड त्यांच्यावर स्वार झाले. असहकारिता आंदोलनापासून ते राजकारणात सक्रिय झाले. ‘लोकसंग्रह' दैनिक वाचून त्यांना घडामोडी कळत. स्वामी श्रद्धानंदांची अब्दुल रशीदनी केलेली हत्या, रौलेट अॅक्ट सायमन कमिशन, यूथ कॉन्फरन्स, नेहरू भेट यातून त्यांच्यातला राजकीय कार्यकर्ता घडत गेला. युसुफ मेहरअली, काकासाहेब गाडगीळ यांनी तरुण एस.एम.ना प्रोत्साहन दिले. पंडित नेहरू पुण्यात आले असताना यूथ कॉन्फरन्समध्ये काकासाहेब गाडगीळ यांनी नेहरूंना एस.एमची ओळख करून देत म्हटलं, "He is S. M. Joshi. He wants to be Jawaharlal Nehru of Poona." नेहरू त्वरित म्हणाले होते की, "Why such a low ambition?" त्या एका छोट्या वाक्याने एस.एम.यांच्या मनात महत्त्वाकांक्षेचे स्फुलिंग पेटवले नि ते पूर्णपणे राजकारणी, कार्यकर्ते बनले. तो काळ खरे तर स्वत:च्या पायावर उभारण्याचा, घरी आईस बळ देण्याचा, पण एस.एम.यांच्या जीवनात प्रारंभापासूनच व्यष्टी विरुद्ध समष्टीचा संघर्ष द्वंद्वात समष्टीचाच विजय होत आलेला.

स्वावलंबन

 या काळात त्यांचं दैनिक केसरीमध्ये नित्य जाणे-येणे होत राहिले. राष्ट्रीय घडामोडीचे ते केंद्र. शिवाय पुण्याच्या हालचालींचेही! न. चिं. केळकर हे टिळकांनंतर केसरीची धुरा सांभाळत होते. पूर्ण वेळ काम करायचे तर राहण्या, जेवण्याची निश्चिंतता अनिवार्य होती. खाणावळीचे १८ रुपये, खोली भाडे ३ रुपये, अन्य खर्च १० एक रुपये, गरज मासिक तीस रुपयांची. काळ १९२८. केळकरांनी त्यांना केसरीचा वार्ताहर बनवून पैशाची व्यवस्था केली, तात्यासाहेब केळकरांच्या त्या मदतीवर पुढचे एस. एम. घडले, मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुण्याचे पर्वती मंदिर हरिजनांसाठी खुले करण्याचा सत्याग्रह, कायदेभंग चळवळ, मिठाचा सत्याग्रह करत १० मे १९३० ला दुसऱ्या स्वातंत्र्ययुद्धाचा पुकारा करणारे भाषण एस.एमनी केले. अलिबागला केलं, आणि त्यांना अटक झाली. ठाणे तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. या वेळी एस.एम.नी डिफेन्स न करता तुरुंगवास पत्करला. तो त्यांचा पहिला तुरुंगवास. इथे नवार विणणे, न्हावी काम करत सक्तमजुरी भोगत राहिले. इथे शंकरराव देवांचे सान्निध्य लाभले. Economic theory of leisure class वाचून एस.एम. समाजवादी' झाले.

 एस.एम.नी २२ जुलै १९३१ रोजी हॉटसनवरील गोळीबाराचे केलेले वृत्तांकन 'फ्री प्रेस' मध्ये नावानिशी छापून आले नि रातोरात ते राष्ट्रीय पत्रकार बनले. पुढे राष्ट्रीय चळवळीबरोबर शेतकरी परिषदेचे कार्य सुरू झाले. नेताजी सुभाषचंद्रांचा एस.एम.ना सहवास लाभला नि त्याने स्फुरण चढले, ते जोमाने कार्य करू लागले. दरम्यान एस.एम एल.एल.बी. झाले होते. कायद्याचा चांगला अभ्यास होता. आता त्यांची भाषणे सभांना प्रभावित करू लागली होती. ते संघटक होतेच. आता वक्ते म्हणूनही त्यांना लोक बोलावू लागले. ४ जानेवारी १९३२ ला महात्मा गांधी, राजेंद्रप्रसाद यांना अटक झाली. पाठोपाठ काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड झाली. त्यात एस.एम. होते. त्यांना येरवड्याला ठेवण्यात आले. इथे महात्मा गांधींची भेट झालीआणि ते पूर्ण कार्यकर्ते बनले. नजरकैदेचे उल्लंघन केले म्हणून एस.एम.ना दोन वर्षांची शिक्षा झाली. तो दिवस होता ४ डिसेंबर १९३४. त्यानंतर स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातही एस.एम. जोशी अनेकदा तुरुंगात गेले. अटक सत्र हा त्यांच्या जीवनाचा भाग होऊन गेला. एस. एम. जोशी यांनी स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, कामगार संघटन, काँग्रेस समाजवादी पक्ष, बिहार आंदोलन, आणिबाणी विरुद्धचा लढा अशा अनेक चळवळींतून एस. एम. जोशी यांचे मूल्यनिष्ठ राजकारण तावून सुलाखून निघाले. ते इतकं हुकूमशाही कालखंडातही इंदिरा गांधींचे एस. एम. जोशी यांना अटक करण्याचे धाडस झाले नाही. ते राजरोस आणिबाणीविरूद्ध बोलत, भाषण देत फिरले. भारताच्या राजकीय प्रवासातील अनेक धुरीणांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले ते तत्त्वनिष्ठ राजकारणामुळेच. उदाहरणच द्यायचे झाले तर मधु लिमये, चंद्रशेखर यांचे ते राजकीय गुरू बनले. 'मी एस.एम.' आत्मचरित्र या साऱ्या राजकीय विकासाचा पट मांडणारी कथा होय. ती मुळातूनच वाचायला हवी. त्याशिवाय तिच्यातील प्रांजळपण लक्षात येणार नाही.

'स्व' विसर्जन'

 ‘मी-एस.एम.' आत्मचरित्र वाचत असताना एक गोष्ट लक्षात येते की, एस. एम. जोशींनी या ग्रंथात व्यष्टीच्या माध्यमातून समष्टीचे चित्रण केले आहे. अगदी बालपणापासून ते वानप्रस्थापर्यंतचा त्यांचा प्रवास वाचताना वाचक एक गोष्टींनी अचंबित होऊन जातो की माणसास एकदा समाजाचा, देशाचा ध्यास लागला की तो पराकोटीचा खरेच सार्वजनिक होतो का? एस. एम. पदवीधर होईपर्यंत घरगुती उल्लेख येतात. आई-वडील, भाऊ-बहीण व अन्य नातलग, पण ते उल्लेख पार्श्वभूमी म्हणून येतात. ते या आत्मकथेचे केंद्र नव्हे. एस. एम. जोशींनी प्रेमविवाह केला. इतकाच प्रेमाचा उल्लेख. तीच गोष्ट संसार व अपत्याची. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव अजय होते. पत्नीचे नाव ताराबाई. चरित्र नायक प्रारंभापासूनच घरशत्रू. कधी भूमिगत म्हणून तर कधी सामाजिक राजकीय कार्य म्हणून, भूमिगत अवस्थेत तो इमाम अली बनतो. दाढी राखतो, मुसलमानी पेहराव करतो. अधी मधी भेटतो. इतक्या त्रोटक उल्लेखाने एस. एम. जोशी यांनी आपले व्यक्तिगत जीवन चित्रित केले आहे. ते लाक्षणिकच म्हणावे लागेल. तुम्ही सूक्ष्मात जाऊन उत्खनन करू पाहाल तर लक्षात येईल की, या माणसाने लाक्षणिक अर्थानेच संसार केला. ताराबाई शिक्षिका होत्या. त्या अर्थाने स्वावलंबी होत्या. घर संसार स्वावलंबी असणं म्हणजे समाजपुरुषाने व्यक्तिगत जीवनावर तुळशीपत्र ठेवणे असेल, तर तो घरच्यांवर अन्याय असे सर्वसामान्यांना वाटते. पण ज्यांनी समाज हाच आपला संसार मानला, त्या एस. एम., जयप्रकाश, सानेगुरुजी यांना व्यक्तिगत विचार हाच मुळी अपराध वाटतो. एस. एम. जोशी यांचं जीवन सार्वजनिक होते ते या परहित केंद्री जाणिवेमुळे. यातच त्यांचे असामान्यत्व आहे आणि ते या आत्मचरित्रात प्रारंभापासून ते शेवटापर्यंत पसरलेलं दिसून येतं.

राष्ट्रसेवा दल

 स्वातंत्र्य चळवळीने एस. एम. जोशींना सामाजिक व राजकीय भान दिले. हे आत्मचरित्र वाचत असताना लक्षात येते की, त्यांचे राजकीय कार्य हे समाज जाणिवांवर उभे आहे. समाजभानाचा त्यांचा पाया आहे राष्ट्रसेवा दल. ते केवळ या संघटनेचे संघटक, सर्व वेळ सेवक नव्हते. तर संस्थापकांपैकी एक होते. सेवादलाच्या ध्येय व कार्यक्रमाने एस. एम. जोशी यांच्या आंतरिक जीवनाचा कायाकल्प घडवून आणला होता. एस. एम. तरुणपणी सेवादलाबरोबर कामगार संघटन कार्य करायचे. पण ट्रेड युनियनपेक्षा त्यांना सेवादल महत्त्वाचे वाटायचे. कारण यातून आपण भारताची उद्याची जबाबदार पिढी घडवत आहोत याचे समाधान होते. या समाधानाचा पाया सेवा दलाचे ध्येय होते. ते समतेच्या मूल्यावर आधारित होते. एस. एम. जोशींना सामाजिक व राजकीय चळवळीतून एक गोष्ट लक्षात आली होती की या देशाची खरी समस्या भेदाभेद व विषमता आहे. या जाणिवेतून त्यांचा समाजवादी पिंड घडला. देशात स्त्री-पुरुष, उच्च-नीच, हिंदू-मुसलमान असे लिंग, स्थिती, धर्म, संस्कृती, जाती, पंथ भेद असून तो देशाच्या एकात्मतेतील अडथळा आहे. भाषेमुळेही देश दुभंगल्याची भावना एस.एम.यांच्या मनी होती. केवळ हिंदी राष्ट्रभाषा करून देशाचा भाषा प्रश्न सुटणार नाही. मी त्या चळवळीत असताना ते महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे अध्यक्ष होते. आम्ही आंदोलन करत होतो. मार्गदर्शन मागितल्यावर त्यांनी लिहिले होते की ‘दक्षिण व उत्तर भारतीय जोवर एकमेकांच्या भाषा शिकणार नाहीत, तोवर देश एक होणार नाही. ही दृष्टी त्यांना भारत भ्रमणातून आली होती. आंतरजातीय विवाह, एक गाव एक पाणवठा, श्रमदान, कलापथक, अभ्यास वर्ग, शिबिरे यातून ते नवा जातीधर्म निरपेक्ष, लोकशाहीवादी, विज्ञाननिष्ठ, समान, बंधुत्वाधारित भारत निर्मितीचं त्यांचे स्वप्न केवळ आदर्शवाद नव्हता तर व्यवहारावर उभा तो नवनिर्मितीचा प्रयोग व प्रकल्प होता हे राष्ट्रसेवा दल संबंधी या आत्मचरित्रातील प्रकरण वाचताना जाणवते.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन

 स्वातंत्र्य लढा तीव्र झाल्यावर आणि विशेषतः सविनय कायदेभंग, असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, भारत छोड़ो आंदोलन यामुळे सन १९४६ च्या सुमारास भारतीय स्वातंत्र्यतासेनानींना स्वातंत्र्य हे आपल्या दृष्टिक्षेपात आल्याची भावना निर्माण झाली होती. सन १९३५ नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना, स्वकीय सरकार यामुळे तर ही खात्री विश्वासात बदलत गेली होती. याच सुमारास सन १९४६ ला बेळगावात अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र' या मराठी भाषिक स्वतंत्र प्रांताची मागणी करण्यात आली. पुढे शंकरराव देवांच्या नेतृत्वाखाली ‘संयुक्त महाराष्ट्र परिषद' स्थापन झाली. या मागणीच्या आधारावर पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्रिराज्य योजनेची महागुजरात, मुंबई आणि विदर्भासह महाराष्ट्राची घोषणा झाली. परिषदा, संप, मोर्चे, अटकसत्र झाले. द्वैभाषिक राज्याची कल्पना उधळण्यात आली. गोळीबारात अनेकांचे बळी गेले. १९५६ ते १९६० हा लढ्याचा तीव्र काळ होता. शेवटी नेहरूंना १ मे, १९६० रोजी स्वतंत्र मराठी राज्याची घोषणा करणे भाग पडले. या लढ्याचे नेतृत्व एस. एम. जोशी यांनी केले होते. आचार्य अत्रे, श्रीपाद डांगे, दत्ता देशमुख प्रभृती मान्यवरांनी सामूहिकपणे हा लढा दिला म्हणून यश आले. पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीस पक्ष बनविण्याच्या कल्पनेवर मतभेद झाले व एस.एम.यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. तरी यशवंतराव चव्हाणांना एस. एम. जोशींच्या लढ्यातील योगदानाची जाणीव होती. पण एस. एम. जोशी केवळ महाराष्ट्र राज्य निर्मितीवर समाधानी नव्हते. बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह महाराष्ट्र हे त्यांचं स्वप्न होते. ते आजवर पुरे होऊ शकले नाही. सदर आत्मचरित्रातील ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलन' (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध) वाचत असताना एस.एम.नी महाराष्ट्र निर्मितीसाठी खाल्लेल्या खस्ता वाचल्या की या माणसाच्या उदार व दूरदृष्टीचे कौतुक वाटते. अन् शल्यही वाटत राहते की, त्यांना या लढ्याचे शिल्पकार म्हणून श्रेय दिले गेले नाही याचे.

कामगार चळवळ

 वर्गविग्रहाच्या साधनानेच समाजवादी क्रांतीच काय, पण सर्व सामाजिक परिवर्तने होतात, हा कार्ल मार्क्सचा सिद्धात आहे. समाजवादी विचाराचा तो पाया होय. आणि याच तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून एस.एम. सन १९३० पासून कामगार चळवळीशी जोडले गेले होते. रेल्वे कामगार संघटना, टेक्सटाइल लेबर असोसिएशन, पाचशे बारा कमांड वर्कशॉप युनियन, स्टेट बँक युनियन, खडकी अॅम्युलेनिशन फॅक्टरी युनियन, इत्यादी युनियन्स मार्फत एस.एम. यांनी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. या युनियन त्या वेळी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसशी संलग्न होत्या. त्यांच्यामार्फत वेतन वाढ, कामाचे तास, शहर दर्जा नि भत्ता, बोनस, भरती, निलंबन, कामावरून कमी करणे इत्यादी प्रश्न एस.एम.यांना हाताळावे लागले. कम्युनिस्टांशी मतभेद होऊन त्यांनी हिंद मजदूर सभा स्थापली. कामगार प्रश्नांबरोबरीने एस. एम. जोशींनी कुटुंब नियोजन, व्यसनमुक्तीसारख्या प्रश्नातही त्या वेळी लक्ष घातले होते. राष्ट्रीय दृष्टिकोन न सोडता आणि सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून एस.एम. कामगार चळवळीत उतरले होते. तो विचार व व्यवहार त्यांनी शेवटपर्यंत पाळला. त्यामुळे उच्चाधिकारी एस.एम.यांचेवर विश्वास ठेवून बोलणी, तडजोडी करीत. एस. एम. शब्द पाळीत. त्यामुळे ते ज्या युनियनचे नेते होते, त्या युनियनला एक प्रकारची क्रेडिबिलिटी' प्राप्त व्हायची. ते राष्ट्रीय राजकीय नेते असल्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, सचिव सर्व पातळ्यांवर त्यांच्या शब्दाला वजन असायचे ते नैतिक अधिष्ठानामुळे. युनियनमध्ये एस.एम. नी लोकशाही रुजवली. कामगार नेतृत्वास वाव दिला. युनियनमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवली. त्यामुळे मी-एस.एम.' मधील कामगार चळवळ : काही अनुभव' (भाग १,२) वाचत असताना एका सच्चा कार्यकर्त्यांच्या संघटन कौशल्याची प्रचिती येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'कामगार वर्गाचे हित प्रधान' हे तत्त्व. त्याच्याशी कधी एस.एम.नी प्रतारणा केली नाही. प्रत्येक वेळी यश आले असे झालं नाही. पण ध्येयाशी बांधील राहून ते शेवटपर्यंत लढत राहिले. त्याचा आधार होता एकीचे बळ व नेतृत्वावर विश्वास. राजकीय पक्ष कार्य

 काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, संयुक्त समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, जनता पक्ष अशी अनेक राजकीय पक्ष स्थित्यंतरे एस.एम. जोशी यांनी सन १९२९ ते १९८९ पर्यंतच्या सात दशकांच्या राजकीय प्रवासात पाहिली. कार्यकर्ता, स्वयंसेवक, पदाधिकारी असा सतत चढता आलेख त्यांनी अनुभवला. राजकीय पक्ष कार्य केवळ लोक संघटनेचे असत नाही. प्रश्न, समस्याकेंद्री चळवळी, निवडणुका, संसदीय कार्य, पक्षीय संघर्ष यांचा लपंडाव, खोखो, हतूतू म्हणजे राजकारण, विचार व व्यवहार यांचा मेळ घालत केलेली स्पर्धा म्हणजे राजकारण. पण एस.एम.नी तत्त्वाधिष्ठित राजकारण केले. त्यांचे भलेबुरे परिणामही सोसले. हारही मिळाले व प्रहारही! पण एस.एम.नी शेवटपर्यंत राजकारण सोडले नाही. राजकारण सोडणे म्हणजे त्यांच्या लेखी जगण्यावरची श्रद्धा सोडणे होते. प्रत्येक राजकीय वळणावर त्यांना स्वपक्षीय व विरोधकांच्या चेकमेटला तोंड द्यावे लागले. कधी फसगत झाली, कधी अनपेक्षित यश, विजय पदरी आला. आयुष्यभराच्या राजकीय लढतीनंतर उत्तरायणामध्ये एस. एम. जोशी यांना सत्ताधारी होण्याचं यश लाभले. पण राजकीय पटावर ते महात्मा गांधींप्रमाणे पदांपासून दूर राहिले. तत्त्व आणि मूल्य, प्रामाणिकपणा, पारदर्शिता, सत्यनिष्ठा या गोष्टी कितीही आदर्श असल्या, तरी पक्षीय राजकारणात त्यांचे स्थान रकान्यात असते. हे माहीत असून त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिबद्धता हेच एस. एम. जोशी यांच्या राजकीय जीवनाचं वजन होतं.

 'मी एस. एम.' आत्मचरित्रात एक हृद्य प्रकरण आहे. त्याचे शीर्षकही मनोज्ञ आहे. 'मी' चा मागोवा' यात एस. एम. जोशी यांनी आपल्या जीवनाचे सिंहावलोकन केलं आहे. त्यानुसार एस.एम. मान्य करतात की, 'माणसाच्या अंगी कितीही गुण असले, तरी त्याला यश येईल याची खात्री देता येत नाही. त्यासाठी परिस्थिती अनुकूल असावी लागते. यात त्यांनी आपल्याबाबत असलेल्या प्रवादांची चर्चा केली आहे. त्यामुळे हे आत्मचरित्र अधिक प्रांजळ झाले आहे. एस.एम.नी आपल्यावर होणा-या सात्त्विकतेच्या आरोपाची चर्चा केली आहे. ते स्वत:ला ‘सात्विक' न मानता ‘तामसी' मानतात. त्यांचा त्रागा खरं तर अन्यायाविरुद्धची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. त्यांना गैर खपत नसते ते मूल्यनिष्ठेमुळे. त्यांना दांभिकपणा अजिबात सहन होत नाही. मतभेद म्हणजे ते ‘मनभेद' यावर त्यांचा विश्वास नाही.

 आपल्या जीवनात ते पत्नीचे अनन्यसाधारण महत्त्व कबूल करतात. त्यांची लोकशाही, शांतता, अहिंसा इ. वर शेवटपर्यंत श्रद्धा होती. सन १९७२ ला ते राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात होते आणि बिहारचे आंदोलन उभं ठाकले. आणीबाणी आली. त्याच दरम्यान मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न उभारला आणि त्यांना परत सक्रिय व्हावे लागले.

बिहार आंदोलन व आणीबाणी

 बिहार हा भारतातील अधिक मागास प्रांत. प्रगती व परिवर्तनाची त्या प्रांताची गरज पाहून एस.एम.नी बिहारमध्ये राष्ट्र सेवा दल शाखा काढणे, भूमी सेना उभारणे इत्यादी कामात वाहून घ्यायचे ठरवले. ते खासदार होते, संसोपा अध्यक्ष पदातून मुक्त झाले होते. सन १९७० च्या दरम्यान ते भारत-नेपाळ सीमेवरील पूर्णिया जिल्ह्यात फिरत होते. तेथील कुर्सेला गाव निवडून त्यांनी कार्य सुरू केले.

 सन १९७४ च्या दरम्यान रेल्वे संप सुरू झाला. इंदिरा गांधींनी तो मोडून काढायचे ठरवले होते. कम्युनिस्ट त्यांच्या पाठीशी होते. याच दरम्यान गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनाला धार आली होती. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस फॉर डेमॉक्रसीच्या माध्यमातून विरोधी पक्ष संघटन कार्य सुरू होतं. इंदिरा गांधींची निवड अलाहाबाद हायकोर्टाने अवैध ठरवली होती. २५ जून १९७५ च्या दिल्लीच्या रामलीला मैदानावरील सभेत ‘जनता आ रही है, सिंहासन खाली करो' या हिंदी कवी रामधारी सिंह 'दिनकर' यांच्या ओळीतून जयप्रकाश नारायण यांनी निवडणूक, समग्र क्रांती, सेनेने अवैध निर्णय मानू नये असं केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर करून जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांचे अटक सत्र देशभर राबवले. या सर्वांविरुद्ध एस. एम. जोशी यांनी देशभर दौरे करून जागृती केली. याचा परिणाम म्हणून सन १९७७ मध्ये आणीबाणी मागे घेण्यात आली. एस. एम. जोशी या सर्व राजकीय घडामोडींचे साक्षीदार असल्याने त्यांनी आणीबाणी पर्वाचे सार्थ वर्णन 'मी- एस. एम.' या आत्मचरित्रात अत्यंत संयमाने केले आहे. त्यात स्वातंत्र्यलढ्यासाठी ऐन तारुण्यात प्राणाची बाजी लावणाच्या एस. एम. जोशी यांना सत्तरीतही अशी बाजी परत दुस-या स्वातंत्र्यलढ्यासाठी लावावी लागली. ते वाचत असताना मूल्यनिष्ठेचे महत्त्व मात्र अधोरेखित होत राहते.

जनता पक्ष व सरकार आणीबाणी मागे घेत इंदिरा गांधींनी निवडणुका घेण्याचे जसे जाहीर केले तसे विरोधी पक्षाच्या एकीकरणास गती आली. तुरुंगवासात सर्वपक्षीयांचे मनोमीलन घडण्याची एक पार्श्वभूमी होती. जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व सिंडिकेट काँग्रेस, समाजवादी विचाराचे पक्ष, जनसंघ इत्यादींनी मान्य केले त्यामुळे जनता पक्ष अस्तित्वात आला. या घडामोडीत जयप्रकाशांनी महाराष्ट्रातील एकीकरणाची धुरा सांभाळली.

 १ मे, १९७७ रोजी जनता पक्ष अस्तित्वात आला, पण निवडणुकीत बहुमत मिळूनही प्रारंभीपासूनच नेतृत्वाबद्दल मोरारजी देसाई, बाबू जगजीवन राम, चौधरी चरणसिंह यांच्यात रस्सीखेच होती. दोन वर्षांतच हा असंतोष हमरीतुमरीवर येऊन पक्ष फुटला. महाराष्ट्रात या पार्श्वभूमीवर पुलोदचा प्रयोग यशस्वी झाला. ८ ऑक्टोबर १९७९ रोजी जे. पीं. चे निधन झाले. निधनापूर्वी जयप्रकाशांनी आपल्या उत्तराधिका-यांपैकी एक म्हणून एस. एम. यांची केलेली निवड ही त्यांच्या नि जे.पीं. च्या सन १९४७ पासूनच्या पाच दशकांच्या मैत्रीचीच खूण म्हणावी लागेल.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा

 'मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर प्रकरणी मराठवाड्यातील जनतेची मी समजूत काढू शकलो नाही, हाच आयुष्यातील माझा सर्वांत मोठा पराभव होय.' अशी प्रामाणिक कबुली एस.एम.नी नामांतर' प्रकरणात या आत्मचरित्रात नोंदवली आहे. खरे तर एस.एम.जोशी यांना त्यांच्या सत्त्वशील वृत्तीमुळे अशी नामुष्की, असे पराभव अनेकदा पचवावे लागले. त्याची कबुली त्यांनी या आत्मचरित्रात जागोजागी नोंदवलीही आहे. त्या अर्थाने हे आत्मचरित्र म्हणजे एस.एस.चे एक सामाजिक, राजकीय कन्फेशनच म्हणावे लागेल. पाप, अपराध न करताही ते त्यांना द्यावे लागले. कारण समाजाने त्यांची प्रगल्भता, सदाशयता समजूनच घेतली नाही हे मान्य केले पाहिजे.

 सन १९५७ मध्ये मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे सुरू झाले. तत्पूर्वी सन १९५० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मराठवाड्यातील शिक्षणाचे मागासपण दूर करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला होता. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कवाडे खुली करण्याचा उद्देशही त्यामागे होताच. १९५७ मध्ये मराठवाडा विद्यापीठ स्थापनेच्या वेळी ज्या अनेक नावांचा विचार झाला होता. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचाही अंतर्भाव होता. सन १९७७ साली चवदार तळे, महाडचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करावे या मागणीने जोर पकडला. मागासवर्गीय अस्मिता विरुद्ध मराठवाडा अस्मिता अशा संघर्षात समन्वयाने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर तत्कालीन पुलोद सरकारने मान्य केले. त्या विरोधात मोठी दंगल झाली. त्यात दलित वस्त्यांना त्याची मोठी झळ सोसावी लागली. या प्रश्नी 'न घर का न घाट का झालेली आपली स्थिती एस.एम.नी खेदपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे. या लढ्याने परत एकदा भारतीय समाजातील दलित, सवर्ण तेढ प्रकर्षाने लक्षात येते व जातिभेदातीत भारताचे एस.एम.चे स्वप्न किती महत्त्वाचे आहे ते ही प्रकर्षाने ध्यानी येते.

'मी' चा मागोवा

'मी- एस. एम.' आत्मचरित्रातील ‘मी' चा मागोवा' हे प्रकरण अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरते. यातून त्यांच्या मानसिक व भावनिक घडणीचा उलगडा होतो व वृत्तीवर प्रकाशही पडतो. एस.एम. लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग प्रभृतींच्या प्रभावाने राष्ट्रीय चळवळीत आले. महात्मा गांधींमुळे ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय राहिले. युसुफ मेहेरअली, आचार्य नरेंद्र देव, आचार्य शंकरराव जावडेकरांमुळे ते समाजवादी बनले. महात्मा गांधींमुळे जीवनात मूल्यांचे अधिष्ठान प्राप्त झाले. सार्वजनिक नैतिकतेचा संस्कार त्यांनी धर्मसंकटातून जोपासला. आचार्य जावडेकरांना ते गुरुस्थानी मानत. एस.एम.नी जे काम हाती घेतले, त्यात जीव ओतला, काठावर उभारायचा त्यांचा स्वभाव नसल्याने झोकून देऊन कार्य करायचे. परिणामांची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही. प्रसंगी लोकक्षोभाचे ते बळीही ठरले. आपला स्वभाव ते निसर्गाची देणगी मानत. जीवनात पत्नीचे महत्त्व ते गौरवाने मान्य करतात. ‘रात गई, बात गई' म्हणत जीवनातल्या प्रत्येक कटुतेस अपयशास त्यांनी मागे टाकले आणि नित्य नव्याच्या मागे ते संक्रमण करत राहिले. निरंतर कार्यमग्नता, कर्तव्यपरायणता ही त्यांची बनलेली वृत्ती म्हणजे कार्यातून झालेला व्यक्तिमत्त्व विकास होय.

‘माणूस घेता का माणूस' कवितेत वसंत बापटांनी एस.एम.जोशींचे, त्यांच्या वृत्ती, स्वभावाचं सार्थ वर्णन करताना म्हटलं आहे-  कण्व मुनीची कणव
 अन दुर्वासाचा शाप
 यांना एकवट करून
 हा जरत्कारू घडवला आहे
 देह झिडपिडा असला
 तरी ताकद दधिचींच आहे.
 ‘मी एस.एम.' वाचताना याची तंतोतंत प्रचिती येत राहण्यातच या आत्मचरित्राचं राजकीय, सामाजिक महत्त्व आहे. मात्र ते एकदा सर्वांनी मुळातूनच वाचलं पाहिजे.


• श्री एस. एम. (आत्मचरित्र)

 लेखक - एस्. एम्. जोशी
 प्रकाशक - काँटिनेंटल, पुणे
 प्रकाशन वर्ष - १९८४

 पृष्ठे - ४३७  किंमत - ६०

♦♦

राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य


 ‘राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य' हा ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार आणि प्राचार्य अनंतराव देसाई या संपादकद्वयांनी निर्मिलेला ग्रंथराज वाचला. हा पंचखंडात्मक ग्रंथ आहे. पहिल्या खंडात गुरुवर्य शामराव देसाई यांच्यावर लिहिलेले चरित्रात्मक लेख आहेत. त्यातून राष्ट्रवीरांच्या जीवन चरित्राचा उलगडा होतो. दस-या खंडात समाजहिताच्या तळमळीपोटी गुरुवर्य शामराव देसाई यांनी ज्या विविध संस्था, संघटना स्थापल्या त्यांचा वृत्तांत आहे. त्यातून एक गोष्ट लक्षात येते की गुरुवर्य जात समर्थक नव्हते तर समाजवर्धक होते. त्यांना अभिप्रेत बहुजन समाज हा सर्व जातिधर्मातील विविधांगी पिचलेला होता. त्या सर्व समाज वर्गांना त्यांना जात, धर्म, अंधश्रद्धा, रूढी, कर्जबाजारीपणातून मुक्त करून समृद्ध जीवन बहाल करण्याचा ध्यास होता. तिसरा खंड हा ‘राष्ट्रवीर' साप्ताहिकांतील निवडक अग्रलेखांचा संग्रह होय. त्यातून राष्ट्रवीरकारांची विचारधारा स्पष्ट होते. त्यातून ते पुरोगामी प्रबोधक, समाजसुधारक म्हणून पुढे येतात. चौथा खंड 'राष्ट्रवीर'मधील स्फुटांना समर्पित आहे. स्फुट लेखन प्रासंगिक असले, तरी त्यात समकालीन इतिहास शब्दबद्ध करण्याचे जे सामर्थ्य असते, ते ही स्फुटे वाचताना लक्षात येते. पाचवा खंड संकीर्ण असून त्यात कॉ. कृष्णा मेणसे लिखित ‘गुरुवर्य शामराव गोविंदराव देसाई : जीवन आणि कार्य', एकसष्ठी समारंभ वृत्तांत थोरामोठ्यांचे गुरुवर्यांबद्दलचे अभिप्राय इ. बाबींचा अंतर्भाव आहे. एका अर्थाने हा स्मारक ग्रंथ राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई यांच्या जीवन व कार्याची निवडक माहिती देत असला, तरी सुमारे साडेचारशे पृष्ठांतून त्यांच्या चित्र, चरित्र व चारित्र्याचा तो समग्रतापूर्ण आलेख बनतो.

 गुरुवर्य शामराव देसाई यांचा जन्म ४ मे, १८९५ रोजी येळ्ळूर (जि. बेळगाव) येथे झाला. आईचे नाव उमाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते. शामराव देसाई, मुलकी पास होऊन सन १९१८ मध्ये बेळगावच्या किंग जॉर्ज स्कूलमध्ये शिक्षक झाले. तो काळ सत्यशोधक चळवळीचा होता. स्वत:चा विवाह त्यांनी त्याच पद्धतीने केला व पुढेही आंतरजातीय-धर्मीय विवाहाचे ते समर्थक राहिले. समाजकार्यास वाहून घेण्याच्या इराद्याने त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून पत्रकार होणे पसंत केले. ९ मे १९२१ मध्ये त्यांनी राष्ट्रवीर' साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू केले. समाज सुधारणा मंडळाची स्थापना (१९२३), नाभिक समाज संघटन (१९२८) मराठा शिक्षण प्रसारक मंडळ (१९३१), चर्मकार समाज तुलसीदेवी प्रतिष्ठान (१९३१), कुंभार समाज संघटना (१९४0), सत्यशोधक परिषद (१९२६) सामूहिक विवाह (१९२६), विणकर सहकारी संघ स्थापना (१९४०) शेतकरी शिक्षण समिती (१९४१), दि मराठा को. ऑप क्रेडिट सोसायटी (१९४२), जयहिंद गिरणी, चंदगड स्थापना, शिक्षण संघ, सुवर्ण औद्योगिक सहकारी संघ असे बहुविध समाजोन्नती कार्य हा त्यांच्या उदारवादी, व्यापक समाज दृष्टीचा पुरावा म्हणून सांगता येईल.

 व्यक्तिगत जीवनात जातीय भेदाचे चटके सहन करावे लागल्याने ते खरे तर जात, धर्मनिरपेक्ष बनले. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीने त्यांना देवाकडून निर्मिकाकडे नेले. तत्कालीन पुरोहितशाहीला शह देण्याच्या उद्देशाने त्यांनी बहुजन समाजाचे पुरोहित निर्माण करून ब्राह्मणशाहीस लगाम लावला. गावोगावी प्रबोधन व्याख्याने देऊन बहुजन समाजास देव-धर्म, कर्ज, अंधश्रद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न केला. सणवार, जत्रा इ. मधील वारेमाप खर्चामुळे बहुजन समाज ऋणको होतो. जत्रा बंदीसारख्या प्रयोगातून त्यांनी अनुकरणीय वस्तुपाठ समाजासमोर ठेवला. शासनकर्तेच देव-धर्माचे स्तोम वाढवत असतील तर प्रजा धर्मनिरपेक्ष कशी होणार असा त्यांना पडलेला प्रश्न त्यांच्या समाजहितकर्ता भूमिकेचे द्योतक होय. विविध जातींच्या, व्यवसायाच्या बांधवांमध्ये संघटन कार्य करून त्यांनी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. शिक्षण संस्था स्थापून शिक्षणाद्वारे नवी पिढी सुशिक्षित केली. सावकारी पाशातून बळीराजा मुक्त व्हावा म्हणून सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. बदलत्या काळात लक्ष्मी व सरस्वतीचा मेळ घालत उद्योग रूजवण्याचा त्यांचा प्रयत्न दूरदर्शितेचा होता. विणकर, कुंभार, नाभिक समाज बलुतेदारीत गुंतलेला आणि रुतलेलाही होता. त्यांना गुरुवर्य शामराव देसाई यांनी हक्क मिळवून देऊन 'माणूस' बनविले. हे त्यांचे खरे समाजऋण होत. सावकार व शासनाच्या विरुद्ध करबंदी, खंडबंदी,आंदोलन उभारून कायदेभंग चळवळीतून सत्याग्रहाचा धडा त्यांनी सर्वसामान्यांना दिला. पंचमंडळ नेमून तंटामुक्त खेड्याची कल्पना राबवली व सर्वसामान्यांच्या वेळ व पैशाचा अपव्यय थांबवून समाज सलोखा निर्माण केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ‘राष्ट्रवीर'ची भूमिका न्यायाची होती. या दृष्टीने आपण त्यांच्या जीवन आणि कार्याकडे पाहू लागलो की लक्षात येते की ‘राष्ट्रवीर'कार गुरुवर्य शामराव देसाई हे कर्ते सुधारक होते. म्हणूनच त्यांना समाजभूषण' उपाधीने समाजाने गौरविले होते. बहुजन समाजातील कर्मवीर म्हणून इतिहासाने त्यांची घेतलेली नोंद सार्थ अशीच म्हणावी लागेल.

 ग्रंथाच्या प्रथम खंडात प्रा. द. रा. दरेकर यांनी गुरुवर्यांच्या जीवनाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यातून गुरुवर्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीत स्वत:स घडविले. शिवाय किती प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी समाजकार्य केले त्याची जाणीव होते. एखादा ध्येयवेडाच अशा खस्ता खाऊनही लष्कराच्या भाकरी भाजत राहतो. या खंडात शेतकरी कामगार पक्षाचे दाजिबा देसाई, प्रजा परिषदेचे भाई माधवराव बागल, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार, इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, विचारक रा. ना. चव्हाण प्रभृती मान्यवरांचे लेख गुरुवर्यांच्या जीवनाचे विविध कंगोरे समजावत त्यांचे समग्र चरित्र व जीवन मूर्त करतात.

 दुसरा खंड गुरुवर्य शामराव देसाई यांनी पुढाकार घेऊन स्थापलेल्या संस्थांचा विकास वृत्तांत आहे. इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। अशी या संस्थांची विकास प्रथा आहे. ती वाचत असताना समाजहित किती दृष्टींनी पहायचं असतं याचा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही. कर्जबाजारी ऋणको बहुजन समाजास कर्जमुक्त धनको बनविण्याचा गुरुवर्य देसाईंचा ध्याय व ध्येय या सर्व धडपडीतून स्पष्ट होते.

 या स्मारक ग्रंथातील विचारप्रवर्तक खंड म्हणून तिस-या खंडाचे वर्णन करावे लागेल. गुरुवर्य देसाई यांनी राष्ट्रवीर' साप्ताहिकात वेळोवेळी जे अग्रलेख लिहिले त्यातील निवडक ५० अग्रलेख या खंडात संपादक महोदयांनी प्रस्तुत केले आहेत. इथे संपादकांची सव्यसाची दृष्टी दिसून येते. यात विषय वैविध्याबरोबरच भाषा आणि शैली वैभवाची संपादकांची जाण प्रशंसेस पात्र आहे. कर, राष्ट्रीयाकरण, स्वातंत्र्य, शेतकरी, समाज सुधारक, राजकारण, राष्ट्रीय चळवळ, सीमावाद, धर्म, जातीयता अशा विविध विषयांचे अग्रलेखांत पडलेले प्रतिबिंब म्हणजे राष्ट्रवीरकारांच्या व्यासंगाचा पुरावा होय. अग्रलेखांची भाषा सडेतोड असून समाजप्रबोधन त्यांचा उद्देश होता. हे वाचताना लक्षात येते व राहतेही.

 राष्ट्रवीर साप्ताहिकातील अग्रलेखांचे विषय राष्ट्रीय व व्यापक हिताचे राहिल्याने हे साप्ताहिक स्थानिक असले, तरी आशय व विचारांच्या अंगानी राष्ट्रीय स्तराचे होऊन जाते. उलटपक्षी चौथ्या खंडात जी स्फुटे प्रस्तुत करण्यात आली आहेत त्यांचे स्वरूप काहीसे स्थानिक व राज्यस्तरीय आहे. ते स्वाभाविक अशासाठी की स्थानिक वाचकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना स्वर दिल्याशिवाय छोट्या साप्ताहिकांना वाचक आश्रय लाभत नसतो. याचे भान राष्ट्रवीरकार शामराव देसाईंना पुरेपूर होते. म्हणूनच स्फुटात ते विविध कार्यकत्र्यांच्या स्थानिक भेटी, देणगी, विनंती, स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत इतिहास नोंदवत राहतात. महात्मा गांधी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बेळगाव भेटी संबंधीची स्फुटे वाचनीय आहेत. महात्मा गांधी यांनी एप्रिल १९२७ भेट दिली होती. त्या वेळी त्यांना सुमारे साडेतीन हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रम आटोपशीर आखण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले होते की, “माझ्या आजारपणात चरखा आणि अस्पृश्यता याविषयी मी बराच विचार केला. त्यात या दोन कार्यक्रमांवरील माझा विश्वास वृद्धिंगत झाला. तसेच हिंदू, मुसलमान व ब्राह्मण ब्राह्मणेतर यांच्या ऐक्याविषयीही माझा अढळ विश्वास आहे. या संबंधात कर्नाटक माझी आशा फलद्रूप करील अशी पुरी उमेद आहे. यावरून तत्कालीन वातावरण, परिस्थितीचे भान येते. या खंडात ७२ स्फुटांचा समावेश असून सन १९२१ ते १९५८ पर्यंतच्या सुमारे चार दशकांचा हा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आढावाच होतो.

 पाचव्या खंडात राष्ट्रवीरांचे कॉ. कृष्णा मेणसे लिखित चरित्र वाचनीय आहे. एकसष्टी वृत्तांतून राष्ट्रवीरांची महती अधोरेखित होते. मान्यवरांच्या श्रद्धांजलीपर अभिप्रायांतून त्यांची थोरवी समजते. ग्रंथाच्या शेवटी तीन परिशिष्ट्य संपादकांनी जोडली असून त्यात मॅजिस्ट्रेट ताकीद, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थन, लेखमालेवरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया, गुरुवर्य जीवनपट इ. पूरक माहिती पुरवून हा स्मारक ग्रंथ एक पूर्ण संदर्भ ग्रंथ बनवला आहे. शेवटी नाम व संदर्भ सूची जोडून जिज्ञासू व संशोधकांना नेमके संदर्भ शोधण्याची सुविधा पुरविली आहे. अशा प्रकारे संपादकद्वयांनी राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य' ग्रंथ सर्व प्रकारच्या व स्तरांच्या वाचकांना उपयोगी होईल याचे ठेवलेले भान लक्षात घेता, त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे.

 राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य' ग्रंथ आरंभापासून ते शेवटपर्यंत आदर्श स्मारक ग्रंथाचा वस्तुपाठ म्हणून प्रेरक व अनुकरणीय ठरला आहे. या ग्रंथावर राष्ट्रवीरकारांचे रुबाबदार बहुजनी व्यक्तित्व प्रतिबिंबित करणारे जे रेखाचित्र मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात आले आहे ते राष्ट्रवीरकारांचा करारीपणा, बाणेदारपणास शोभणारे आहे. त्याची रंगसंगती बेळगावच्या लालतांबड्या मातीची आठवण करून देते. ग्रंथाच्या प्रारंभी गुरुवर्यांचे प्रेरणास्त्रोत ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची बहुरंगी चित्रे कलापृष्ठांवर मुद्रित करून मुद्रण सल्लागार निहाल शिपूरकरांनी मोठे औचित्य साधले आहे. राष्ट्रवीरांसह त्यांच्या पत्नीची-शांताबाईंची तसबीर देऊन या युगपुरुषाची सावली केवळ स्त्री दाक्षिण्य नसून तो सन्मान, गौरवही ठरतो. हा ग्रंथ संपादकद्वयांनी गुरुवर्यांचे प्रेरक पुरुष महात्मा फुले व छत्रपती शाहूंना अर्पून त्यांच्या प्रतीचे समाजऋण व्यक्त केले आहेत. प्रकाशक संस्थेचे कार्य प्रशंसापत्र आहे. त्याची नोंद आवर्जून आरंभी संस्थेचे महत्कार्य विशद केले आहे. ऋणनिर्देशात ग्रंथ सहाय्यक छोट्या मोठ्यांचे आभार मानून ही ग्रंथ सिद्धी म्हणजे सामुदायिक सहयोगाची निर्मिती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रंथास इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांची साक्षेपी प्रस्तावना स्मारक ग्रंथाचे अंगरंग स्पष्ट करते. तद्वतच ती स्मारक ग्रंथाचा उद्देशही स्पष्ट करते. यात शेवटी केलेला एका घटनेचा उल्लेख वाचकास शल्यकारक वाटतो तो अशासाठी की, गुरुवर्य शामराव देसाई यांचा जीवन व कार्यकाळ उलटून शंभर वर्षे झाली तरी गतवर्षी सीमा भागातील जत्रांवर शंभर कोटी रुपये खर्च होतात. महाभारतापासून आपणाकडे स्वकीय पराभव परंपरा आढळते. तिला अद्याप आपण ‘ढळ' द्यायला तयार नाही, याचे भान आणि जाणीव देणारा हा ग्रंथ सीमाभागातील बांधव वाचून कृती करतील तरच ती या स्मारक ग्रंथाची फलनिष्पत्ती ठरेल. ती ठरावी अशी मनोमन इच्छा व्यक्त करतो. 'राष्ट्रवीर'कारांच्या राष्ट्रीय समाजकार्यास विनम्र अभिवादन!


• ‘राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य चरित्र

 संपादक : डॉ. जयसिंगराव पवार व प्राचार्य अनंतराव देसाई
 प्रकाशक - महाराष्ट्र इतिहास परिषद, कोल्हापूर
 प्रकाशन - २०१६

 किंमत - ५00 रु.

♦♦

'रिंगणनाट्य' : दिशा आणि दृष्टीचा वस्तुपाठ


 बंगालमध्ये असताना तिथले नाट्यकर्मी 'नाटक खेल बो’ (नाटक खेळूया) म्हणायचे. मराठीत नाट्यकर्मी ‘नाटक करूया' म्हणतात. नाटक हा मुळात खेळ आहे. ते करण्याची कृत्रिमता नाटकात आली, ती नाटकाला अभिजात बनवण्याच्या अट्टाहासातून. नाटक यामुळे रंगमंच, नेपथ्य, दिग्दर्शन, वेशभूषा, प्रकाश योजना, संगीत आणि संहितेत करकचून बांधले गेले. बर्टोल्ट ब्रेख्त, ब्रनो एकार्डट, बॉब अर्क्सट्थल, पीटर स्युमन सारख्या नाटककारांनी युरोपातील शेक्सपिअर, शॉ, इब्सेन, चेकॉव्ह प्रभृती नाटककारांच्या पारंपरिक, सांगितिक नाट्यपरंपरेस छेद देत मुक्त नाटक करत प्रायोगिक नाटकांचा मार्ग प्रशस्त केला. नाटक पुन्हा खेळ बनला. या खेळास प्रबोधन, प्रचार, प्रसाराचे माध्यम बनवले सेवोलोद मेये-होल्द यांनी. ही गोष्ट आहे १९१८ ची. विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात ‘आक्टोबर क्रांती'ने जगातील विविध क्षेत्रांत मन्वंतर घडवून आणले होते. ऑक्टोबर क्रांतीच्या पहिल्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून रंगकर्मी मेये-होल्दने मायोस्कोवस्की या नाटककाराचे ‘मिस्ट्री बुफे' हे नाटक चक्क रस्त्यावर सादर केले. त्या प्रयोगाला, खेळाला उपस्थित प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. बहुधा ते जगातील पहिले पथनाट्य असावे. साधेपणा, समकालीनता, प्रेक्षकांना साद घालणारे नि त्यांचा प्रतिसाद मिळविणारे संवाद, साधे पोषाख, रोजच्या जीवनातील प्रसंग यामुळे ते नाटक लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी लिहिलेले नाटक ठरले. त्या अर्थाने ‘मिस्ट्री बुफे' लोकनाटक झाले.

 इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते म्हणतात ना? आपल्याकडे आणीबाणीच्या काळात अगदी असेच घडले. वर्ष होते १९७५. स्थळ-मुंबईचं बोरिबंदर रेल्वेस्थानक (आत्ताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस उर्फ सी.एस.टी!) 'जागर' संस्थेने आणीबाणी विरोधी पथनाट्य सादर करायला प्रारंभ केला नि पोलीस आले. नाटक ऐन रंगात आलेले. प्रेक्षकांनी पोलिसांना उत्स्फूर्त रोखूनच नाही धरले तर बजावलेही, ‘खबरदार! रिंगण तोडून आत जाल तर रिंगणाच्या बाहेर जिवंत जाऊ नाही शकणार!' खेळ यशस्वी झाला, हे वेगळे सांगायला नको. ‘रिंगण'ची ठिणगी या घटनेत पाहता येईल. ती ठिणगी पुन्हा पेटली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने. अतुल पेठे व अजीम उर्फ राजू इनामदार लिखित 'रिंगणनाट्य' वाचताना 'रिंगण' या नाटक व गाण्यांनी आकाराला येणा-या, कार्यकर्ते, कलाकारांनी साकारलेल्या विचारगर्भ, कलात्मक, सर्जनशील नाट्यप्रकाराची प्रकृती कळते.

 अतुल पेठे व राजू इनामदारांना महाराष्ट्र ओळखतो, तो वैचारिक बांधिलकी असलेले रंगकर्मी म्हणून. या दोघांना मी 'सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम' च्या हिंदी अनुवाद, प्रयोग, तालीम नि प्रत्यक्ष खेळ अशा विविध प्रसंगी अनुभवलेले आहे. 'रिंगणनाट्य' च्या निमित्ताने त्यांना अभ्यासता आले. त्यांच्याबरोबर कार्यशाळेत सहभागी होता आले नि त्यातून माझी नाटकाविषयीची जाण प्रगल्भ होण्यास मदत झाली. हिंदीत डॉ. लक्ष्मीनारायण लाल, डॉ.शंकर शेष, मराठीत विजय तेंडुलकर, कन्नडमध्ये शिवराम कारंथ, बी.व्ही.कारंथ, या सारख्या रंगकर्मीचा अभ्यास, पैकी काहींच्या प्रत्यक्ष मुलाखती, सहवास, नाट्य समीक्षा लेखनात मला लक्षात आलेली जर कोणती एक गोष्ट असेल तर ती ही की ही सारी मंडळी नाटकाने नादावलेली मंडळी होत. त्याशिवाय तुम्हाला नवे प्रयोग, घाट सुचत नसतात.

 ‘रिंगण' हा तसा नवा नाट्यप्रकार. पथनाट्याचा हा रुंदावलेला परीघ म्हणूनही याकडे पाहता येईल. तरी ते पथनाट्यापेक्षा सर्वांगाने भिन्न होय. म्हणजे असे की, रिंगण मनोरंजनातून प्रबोधन करते. इथले कलाकार चळवळीतले कार्यकर्ते असतात. त्यांच्यात समूहद्भाव असतो. ते विचार बांधील असतात. तसे हे पण पथनाट्यासारखे ‘झिरो बजेट' नाटक, विचार हा नाटकाचा आत्मा. प्रेक्षकांवर काय बिंबवायचे ते निश्चित असते. संवाद छोटे, ते प्रेक्षक प्रतिसादी व प्रबोधकही असतात. ध्वनियंत्रणा, प्रकाश योजना, नेपथ्य, वेषभूषा असल्या पूर्वअटी नसतात. सादरीकरणात लवचिकता असते. रस्त्यावर पण नि सभागृहातही। ते सादर करता येते. प्रयोगानंतर प्रेक्षक संवाद असतो. कलाकार कार्यकर्ते असल्याने बांधील उत्तरे देतात. भाषा बोलाचालीची. प्रसंग अनुभव असतो. परिणाम सहमती असते. नाटकात गाणे, बजावणे, बतावणी सारे असते. प्रेक्षकांना खिळवून ठेवते. मला आठवते, दिल्लीच्या जागतिक पुस्तक मेळाव्यात ‘सुकरात से दाभोलकर वाया तुकाराम' हा रिंगणचा हिंदी प्रयोग असा रंगला की सारे प्रेक्षक तर जमलेच पण पुस्तक विक्रेतेही आपले स्टॉल सोडून नाटक पहात राहिले. (कारण त्या हॉलमध्ये 'रिंगण' मुळे एव्हाना अघोषित संचारबंदी लागू झालेली!) ही असते ‘रिंगण' ची ताकद. नंतर मी 'रिंगण' वर बोललो. भाषणही लोकांनी नाटकाच्या तन्मयतेने ऐकले. नंतर प्रश्न विचारले. ‘खूनी को क्यों नही अब तक पकडा?' म्हणून प्रेक्षकांचे तावातावाने विचारणे हे 'रिंगण' चे यश होते. परिणाम होता नि प्रभावही!

 ‘रिंगणनाट्य' पुस्तक तसे पाहिले तर 'रिंगण' नाट्यप्रकाराच्या निर्मितीसाठी घेतलेल्या कार्यशाळेचा वृत्तांत. पण या पुस्तकास ‘रिंगण' संहिता असे रूप येऊन गेलेय. हे पुस्तक मुखपृष्ठापासूनच वाचक व नाट्यप्रेमींची पकड घेते. मुखपृष्ठ लक्षवेधी (आकर्षक) आहे नि ‘लक्ष्यकेंद्री' (हेतुकेंद्री) ही! आसपासची पाने कार्यशाळेचे नैसर्गिक सौंदर्य दाखवतात. नाटकाप्रमाणे या पुस्तकाचा प्रारंभही 'रसिकजनांच्या रसिक मनाला वंदन आम्ही करितो' या नांदीने होते. ‘रिंगण धरण्यापूर्वी प्रस्तावनेत नाटक कार्यशाळेचा वृत्तांत देण्यापूर्वी लेखकद्वय 'रिंगण' नाट्यामागील पार्श्वभूमी विशद करतात. त्यातून ‘रिंगण विश्व उभे राहते. रिगणनाट्य एका कार्यशाळेचा वृत्तात असला तरी नाटक प्रक्रिया समजावणारी संहिता म्हणून या पुस्तकाचे आगळे महत्त्व आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन कार्य करायचे. त्यांच्या निघृण हत्येच्या कृतिशील, सनदशीर, सर्जनशील निषेधाचे साधन म्हणून 'रिंगण' चा जन्म झाला. ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम' हे नाटक प्रा. राजाभाऊ शिरगुप्पेंनी लिहिले. या संहितेस विजय पोवारांच्या दिग्दर्शनाने आकार आला. प्रा. संजय बनसोडे, प्रा. एकनाथ पाटील यांच्या पुढाकाराने इस्लामपूरच्या कार्यकर्त्या कलावंतांनी 'महाराष्ट्र अंनिस लोकरंगमंच'च्या माध्यमातून पहिले 'रिंगण' सादर केले.

 'रिंगण' नाटक 'मासूम', 'साथी सेहत', 'एफ.आर.सी.एच.', ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’, ‘नाथा', 'हॅलो मेडिकल फाउंडेशन’, ‘युनिसेफ', 'पानी', 'गोकुळ', 'परिवर्तन', 'राष्ट्र सेवादल', 'बाएफ', 'मावा', 'यशदा', 'बार्टी', ‘सर्वहरा जनआंदोलन', सारख्या अनेक संस्थांच्या कार्यशाळेच्या अनुभवातून उदयाला आलेले नाट्यरूप. अतुल पेठे यांनी 'वेटिंग फॉर गोदो', ‘सूर्य पाहिलेला माणूस', 'सत्यशोधक', ‘चौक’, ‘गोळायुग', या नाट्यकृतींचं दिग्दर्शन केलेले आहे. तसेच ‘कचरा कोंडी', 'सेझ', 'तेंडुलकर आणि हिंसा', 'नाटककार सतीश आळेकर', 'कोसला' इ. चित्रपटांना त्यांनी साकारलेय. गेली चार दशके ते नाटकाशी खिळून खेळताहेत. 'रिंगणनाट्य' पुस्तक दि. २५ ते २९ मे, २०१६ रोजी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर येथे ‘महाराष्ट्र अंनिस लोकरंगमंच'तर्फे आयोजित 'रिंगण' कार्यशाळेचा वृत्तांत आहे. यात रिंगण नाटकाच्या तीन संहिताही आहेत. हे पुस्तक एका अर्थाने नाट्य कार्यशाळेचा वस्तुपाठ म्हणूनही पाहता येते. ही या पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू होय.  अतुल पेठे, राजू इनामदार हे नाट्यकर्मी सफदर हाश्मी, बादल सरकार, हबीब तन्वीर इ. नाट्यकर्मीचे वंशज म्हणून पाहता येतील. त्यांनी घेतलेल्या पाच दिवसांच्या कार्यशाळेत प्रत्येक दिवशी 'रिंगण'च्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देण्यात आली. या कार्यशाळेचा विषय होता ‘संविधान'. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत (प्रिअँबल) सांगितलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही मूल्ये मानून 'माणूस' नावाचा समाज घडविणारे नाटक रचणे, रिंगण धरणे हा या कार्यशाळेचा हेतू होता. काही संघटना कारस्थान शाळा योजतात. तिथे हिंसू निर्माण केले जातात. इथे असे नव्हते. दर्जा व संधीचे संविधानिक आश्वासन लक्षात घेऊन सामाजिक न्यायाच्या दिशेने स्त्री-पुरुष समानता, दलितांविषयी सहानुभूती, वंचितांप्रती भावसाक्षरता, लोकशाहीवरील विश्वास, असंहितेची दृढता यावर भर देणारी व्याख्याने, लेख वाचन, चर्चा, घोषणा गाणी तयार करत ‘सापडलं रे सापडलं' सारखं रिंगण नाटक तयार करणे, त्याचं सादरीकरण व त्याला मिळालेल्या प्रेक्षक प्रतिसादाचे मूल्यमापन असे या कार्यशाळेचे नियोजन होते. नियोजनाबर हुकूम कार्यवाही हा खास अतुल पेठेकृत समर्पण व समर्पक परिणाम! या शिवाय जिज्ञासूसाठी सदर पुस्तकात संविधानविषय घोषणा, गाण्यांचा (जी शिबिरात तयार झाली) खजिना आहे. तसेच ‘ऐसे कैसे झाले भोंद' या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक रिंगण नाटकाची आणि ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम' ची मूळ संहिता वाचावयास उपलब्ध आहे. ज्यांना 'रिंगण' धरायचे आहे, कार्यशाळा योजायची आहे त्यांच्यासाठी ‘रिंगणनाट्य' पुस्तक मार्गदर्शिकाच होय.

 याशिवाय हे पुस्तक नाटकाविषयी ब-याच गोष्टी समजावते. हे कलेतून वैचारिक दृष्टिकोन विकसित करायचे साधन आहे. ते माणूस बदलाचे माध्यम आहे. सर्व काळात कलावंत, विचारक, वैज्ञानिक, विवेकवादी यांना सनातन, प्रतिगामी शक्ती सॉफ्ट टार्गेट' म्हणून पाहात आलेत. पण समाजाचा विवेक व विचार कधीच मरत नसतो व हत्येने तो संपवता येत नाही असा दृढ विश्वास हे पुस्तक देते. हे कळून आश्चर्य वाटते की भारतात फक्त महाराष्ट्र व गुजरात राज्यातच नाटक संहितेस परीनिरिक्षण मंडळ (सेंसॉर बोर्ड) कडून मान्यता मिळाल्यावरच नाटकाचे खेळ करता येतात. त्यामुळे नाटकासाठीचे सेंसॉर बोर्ड त्वरित बरखास्त करावे अशी मागणी करण्याचा सुविचार वाचक म्हणून माझ्या मनात उत्स्फूर्त झाला. तो तुमच्या मनात येईल तर ती 'रिंगणनाट्य' पुस्तकाची फलनिष्पत्ती म्हणून भविष्यकाळात नोंदवली जाईल व जावी. अशा कार्यशाळा म्हणजे कार्यकर्ते, कलावंत घडविणाच्या प्रयोगशाळा असतात. हा समूह जीवनाचा वस्तुपाठ व संस्कार असतो. 'रिंगण' नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची संहिता सामूहिक चर्चा विचार-विनिमयातून जन्मते व समूहाकडून समूहासाठी सादर होते. त्या अर्थाने 'रिंगण' हे समाजनाट्य होय. हे नाटक सर्वांना कृतिशीलतेतून सर्जनशील बनवते म्हणूनही महत्त्वाचे. हे नाटक प्रेक्षक, रंगकर्मी कलाकार, कार्यकर्ते सर्वांना एक नवी दृष्टी, नवा दृष्टिकोन देते. सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची नवी जाण विकसित करण्याचे साधन (हत्यार नव्हे) माध्यम म्हणून त्याची उपयुक्तता लाखमोलाची. 'रिंगण' नाटकांचे आजवर ५00 ठिकाणी प्रयोग झाले. त्यात २५0 कार्यकर्ते रंगकर्मी बनले. त्यातून विवेकवादी विचारधारा बुलंद होण्यास साहाय्य झाले. जीवनासाठी कला' हे वि.स.खांडेकर, प्रेमचंद, शरदचंद्र चतर्जी प्रभृतींचे सूत्र प्रत्यक्षात आले. ज्यांना आवाज नसतो त्यांना स्वर देण्याचे कार्य 'रिंगण' नाटक करते. तो दबलेल्यांचा आर्त नसतो, असतो तो हुंकार, उद्गार!

 ‘रिंगणनाट्य' पुस्तक वाचताना वाचकांना मिळणारा दिलासा उमेद जागवणारा आहे. मागं राहिलेल्या वंचित घटकांना समाजाच्या मध्य प्रवाहात आणण्याचे कार्य भारतीय राज्यघटना करते हे समाज भान, ही समाज दृष्टी हे पुस्तक देते. शिवाय एकट्या वंचित व्यक्तिसाठी विकासाचा हक्क व सामाजिक न्याय मिळवून देणारी घटना म्हणून लोकशाहीतील तिचे महत्त्व हे पुस्तक अधोरेखित करते. हे पुस्तक नाटकाचे तंत्र सांगत माणुसकीचे गाणे, तराणे ऐकवते. नाटक हा शिळोप्याचा उद्योग नसून उभारणीचे तत्त्वज्ञान होऊ शकते, असा विश्वास जागवणारे हे पुस्तक 'एक तरी ओवी अनुभवावी' या न्यायाने मी तर म्हणेन ज्यांना समष्टीगत जीवन अंगीकारायचे असेल, अशा सर्वांनी एकदा कार्यशाळेच्या मांडवाखाली काही दिवस चालवलेच पाहिजे. व्यक्तिशः मी यातून समृद्ध झालो. तुम्हीही व्हावे. कार्यशाळा ते नाटक संहितेची निर्मिती असा प्रवास उलगडणारे हे रिंगण नाट्य पुस्तक म्हणजे वेदनेचा विलाप न राहता विवेकाचा विचार बनतो. हे या पुस्तकाचे खरे योगदान होय.


• रिंगणनाट्य (नाट्य अनुभव)

 लेखक - अतुल पेठे व राजू इनामदार
 प्रकाशक - साधना प्रकाशन, पुणे
 प्रकाशन वर्ष - २०१६

 पृष्ठे - १७८  किंमत - १५0 रु.

♦♦

आत्मकेंद्री माणसास अंतर्मुख करणारे पुस्तक : ‘संवादक्रांती'


१ ऑगस्ट, २०१० ला दैनिक सकाळचा ३० वा वर्धापन दिन साजरा झाला होता. हे दैनिक आपल्या वर्धापन दिनी समकालीन महत्त्वाचा एक विषय निश्चित करून त्याच्या विविध पैलूंवर त्या त्या विषय क्षेत्रातील संबंधित मान्यवरांना लेख लिहायला लावते व त्यातून संग्राह्य अशा विशेषांकाची निर्मिती होत असते. सन २०१० च्या वर्धापन दिन विशेषांकाचा विषय होता ‘संवाद क्रांती'. तो अंक संपादित करून प्रकाशित करण्याचे कार्य सकाळ वृत्तपत्र समूहाचे विद्यमान महासंपादक श्रीराम पवार यांनी केले आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.

 ‘संवाद क्रांती' वाचत असताना जाणवलेली गोष्ट अशी की, सात वर्षांचा काळ उलटला तरी त्याचे विषय महात्म्य गतकाला (२०१०) इतकेच समकालात आहे आणि अतिशयोक्ती न करता मी सांगेन की ते भविष्य काळातही तितकेच राहील. हे पुस्तक संपादकांनी नव तंत्रज्ञानावर स्वार होऊन नव्या जगात मुलूखगिरी करायला निघालेल्या पिढीस...' अर्थातच युवा पिढीस अर्पण करून मोठे औचित्य दाखविले आहे खरे. पण तरी परंतु माझ्यासारख्या ज्येष्ठ वाचकांसाठी ते अरेबियन नाइटसच्या सुरस कथांपेक्षा कमी सरस वाटत नाही. याचे श्रेय सदर ग्रंथातील संवाद क्रांतीच्या विविध पैलूंवर लिहिणाच्या लेखकांना द्यावे लागेल. या लेखाचे विषय संपादकांनी योजनापूर्वक ठरवले होते. त्यातून त्यांची दूरदृष्टी व विषय कवेत घेण्याचा आवाका स्पष्ट होतो. दैनिक सकाळ कोल्हापूरच्या प्रारंभाच्या पहिल्या दिवसापासूनचा मी साक्षीदार व वर्धापन दिन विशेषांकांचा संग्राहक असल्याने मी सांगू शकतो की या अंकाचे विषय वेगळे असतात. आशय भविष्यलक्ष्यी असतात व त्यात वर्तमानाची मशागत करून भविष्यवेध घेण्याची ऊर्मी नि मनीषा असते. ती ‘संवादक्रांती' मध्येही प्रतिबिंबित आहे. वर्धापन दिन विशेषांक म्हणजे जाहिरात संपादनाची नामी नि हुकमी संधी असं. 'सकाळ' ने कधी त्या काळात मानले नाही. त्यामुळे या अंकांना दीर्घकालीन, मृत्युंजयी असे वाचनमूल्य, संदर्भमूल्य, आपसूकच प्राप्त होत आले आहे. ते हा ग्रंथ वाचतानाही जाणवते. हा ग्रंथ एकाच वेळी वाचक, अभ्यासक, शिक्षक, साहित्यिक, संपादक, संशोधक सर्वांच्या आकर्षण व कुतूहलाचा विषय ठरतो हे या ग्रंथाचे आगळेपण होय. संपर्क साधनांचे भलेबुरे परिणाम दिसण्याच्या वर्तमानकाळात या ग्रंथाचे प्रकाशन होणे याला पण एक प्रकारची प्रसंगोचितता प्राप्त झाली आहे.

 वर्तमानाइतकी माणसाची घुसमट पूर्वकाळात कधी झालेली नव्हती. त्यामुळे माणूस वर्तमानात अनेक परीने व्यक्त होऊ इच्छितो नि होतोही. व्हॉट्स अॅप, फेसबुक, ब्लॉग, ट्विटर, इतकी माध्यमे कमी म्हणून की काय तो ऑनलाइन जर्नल, फोरम, संकेतस्थळे सर्व ठिकाणी आपले अभिमत अभिव्यक्त करताना दिसतो. सदर ग्रंथातील लेख तीन भागात वर्गीकृत करण्यात आले आहेत. १) संवाद क्रांतीची जादू २) संवाद क्रांती आणि बदल ३) संवादविसंवाद. पैकी पहिल्या भागातील अधिकांश लेख हे संवाद परंपरेची पूर्वपिठिका सांगणारे आहेत. पूर्वी संदेश कसे पाठवत, ते देणारे हाकारे कसे होते, मग हरकारा कसा आला, तो टपाल कसा पोहोचवायचा येथपासून ते भारतात संगणक व संप्रेषण क्रांती १९८६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने कशी उदयाला आली, हे वाचणे मनोरंजक ठरते.

 दुस-या भागात संवाद क्रांतीने मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांत घडवून आणलेले बदल अधोरेखित केले आहेत. पत्रकारिता, शिक्षण, वैद्यकशास्त्र, संवाद साधने, शेती, प्रशासन, न्यायव्यवस्था, चित्रपट इ. क्षेत्रात झालेली संवाद क्रांती वाचताना वाचक आश्चर्यचकित होऊन जातो. असे नाही की संवाद क्रांतीने सारे अनुकूल बदल घडून आले. या क्रांतीने माणसाला आत्मसंवादी बनवले. तो आभासी झाला. चेहरा, हावभाव, स्पर्श, आदान, प्रदान, क्रियाप्रतिक्रियांना मुकलेला माणूस एका आभासी जगात आभासी संवाद, संपर्काने आभासी नात्यांच्या भ्रामक जगात जगू लागला. त्यामुळे तो समाज, मनुष्य, संबंधी प्रत्यक्ष संपर्क, संवादाच्या संवेदी, सहअस्तित्वाच्या जाणिवांना पारखा होत पोरका झाला. याचे शल्य तिस-या भागात चित्रित करण्यात आले आहे. आत्मीय संबंधाच्या जगाचं विसर्जन, माणसाचं गायब होणं, भाषा, बदल, मैत्रीच्या नव्या संकल्पना व संबंधाचा उदय नव्या संस्कृतीची अनुभूती होय.

 या ग्रंथात संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, संगणकीय जगताचे लेखक अतुल कहाते, दूरशिक्षण संचालक डॉ. आर.एस. तिवारी, सेवाभावी वैद्य डॉ. अनिल मडके, विधितज्ज्ञ अॅड. पृथ्वीराज कदम, समाजशील साहित्यिक राजा । शिरगुप्पे, विदेश मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, संगणक विश्वाचे प्रवक्ते डॉ. दिपक शिकारपूर प्रभृती मान्यवर लेखक म्हणून भेटत असल्याने नवा जमाना त्यांनी वाचकांच्या हृदयाशी थेट भिडवला आहे. त्यातून येणारी प्रचिती मात्र भेदक खरी!  आकर्षक मुखपृष्ठाने संवादाचे सारे विश्व सांकेतिक चिन्हांनी प्रतिबिंबित केले आहे. या प्रतिबिंबात माणूसही एक चिन्ह होऊन गेल्याचे दाखवून कलाकाराने तंत्रज्ञानावर संवेदना हाच उतारा होय, हा विचार समर्पक नि सार्थकपणे चितारला आहे. वजनरहित कागद, वाचन सुलभ टंक (फाँट) वाचनकेंद्री सजावट, विषय केंद्री लेख विभाजन, अक्षर रचना, यातून उभे राहणारे निर्मिती मूल्य या ग्रंथास ‘सकाळ' प्रकाशनाचे पारंपरिक श्रेष्ठत्व प्रदान करते.

 ‘संवादक्रांती' ग्रंथ संवाद क्षेत्रातील मन्वंतराच्या पाऊलखुणा रेखाटणारा नि भविष्याचे भान देणारा ग्रंथ होय. तो आपणास समजावतो की, 'वर्तमानपत्रांनी वाचणारा समाज घडवला, रेडिओने ऐकणारा, टीव्हीने पाहणारा, दर्शकांचा तर इंटरनेटनी जोडलेल्या सोशल साइट्सनी प्रत्येक जण आशयाची निर्मिती करेल.' हे जरी खरे असले, तरी या दृश्य परिणामांच्या मागे पडद्यामागचे जगही हा ग्रंथ आपणास दाखवतो म्हणजे असे की आता संवाद साधने माणसास ग्राहक बनवतात बातम्या वाचकाचे रूपांतर कंझ्युमर्समध्ये कसे करतात, नव्या व्यवस्थेत तूच तुझ्या यशाचा शिल्पकार धर्तीवर सेल्फ अँडिंग, अजेंडा सेटिंग, फिक्सिंग, जनमत संग्रहाचे गौडबंगालही समजवत असल्याने हा ग्रंथ केवळ जग दाखवणारा 'मॅजिक लॅटर्न' न होता, नव्या निद्रेतून जागा करणारा असा ‘आय ओपनर बनला आहे. क्राऊड सोर्सिंगमधून टेम्लेट कशी बनतात, याचा पर्दाफाश करणारा हा ग्रंथ 'लार्जर देंन साइज' बनणाच्या ससा होणा-या माणसास कासव बनण्याचा सल्ला जरी देत नसला, तरी भान नक्की देतो. परिकथेसदृश अशा नव्या आभासी जगाची ही अनुभूती एकाच वेळी तुम्हास आश्चर्यचकित करते नि अंतर्मुखही! आत्मकेंद्री होत असलेल्या माणसास अंतर संवेदी बनवण्याचे सामर्थ्य असलेला ग्रंथ या काळात तरंगणाच्या व तगू इच्छिणाच्या सर्वांनी अनिवार्यपणे वाचायला हवा असे मी आग्रहाने सांगेन, कोल्हापूर 'सकाळ' चे सहसंपादक संजय पाटोळे यांनी बांधलेली ही मोट म्हणजे नाटकामागचे नेपथ्य!


• संवादक्रांती - संपादक श्रीराम पवार (लेखसंग्रह)

 प्रकाशक - सकाळ पेपर्स प्रा. लि. ५९५,
 बुधवार पेठ, पुणे ४११ ००२
 प्रकाशन वर्ष - जानेवारी २०१७

 पृष्ठे १६0 किंमत -१६५/- रु.

♦♦

परीक्षित ग्रंथ व पूर्वप्रसिद्धी सूची


१. गुजरातेतील उपक्रमशील शिक्षण संस्था - शशिकांत महाडेश्वर
 आंतरभारती प्रकाशन, पुणे ३०, पृ. ११२ किंमत १२ रु.
 (रविवार सकाळ, ५ एप्रिल १९८१)
२. प्राचीन मराठी संत कवयित्रींचे वाङ्मयीन कार्य- डॉ. सुहासिनी इलेंकर
 परिमल प्रकाशन, औरंगाबाद, पृ. ३३१, किंमत ४0 रुपये
  (रविवार पुढारी, २४ मे १९८१)
३. छंदशास्त्र व संगीत - अॅड बाबूराव जोशी
 अजब पुस्तकालय, कोल्हापूर पृ. १९३ किंमत १६ रु.
 (रविवार पुढारी, २४ मे १९८५)
४. क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले - डॉ. मा. गो. माळी.
 आशा प्रकाशन, गारगोटी, पृ. १०५, किंमत २० रुपये
 (रविवार पुढारी, २४ मे १९८१)
५.  फुटबॉल : तंत्र, कौशल्य व नियम - जयसिंग खांडेकर
  पृ. १४५ किंमत २0 रुपये,
  (रविवार पुढारी, २४ मे १९८१)
६. महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचा विकास - नामदेव व्हटकर
 यशश्री प्रकाशन, कोल्हापूर, पृ. १६३ किंमत १२ रुपये
 (रविवार पुढारी, २४ मे १९८१)
७. एकलकोंडा - आनंद यादव
 मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे. पृष्ठे. १00, किंमत १२ रुपये
 (रविवार पुढारी, २१ जून १९८१)
८. बाभळीची फुलं - डॉ. स. ग. यादव
 वर्षा प्रकाशन, कोल्हापूर, पृष्ठे ७३, किंमत १८ रुपये
 (रविवार पुढारी, २१ जून १९८१)
९. जस्मिन - अश्विनी धोंडगे
 दिलीपराज प्रकाशन, पुणे. पृष्ठे ९२, किंमत १४ रुपये
 (रविवार पुढारी, २१ जून १९८१)
१०.  सौदामिनी - प्रा. शरद वराडकर
 अजब पुस्तकालय, कोल्हापूर, पृष्ठे १६१, किंमत १६ रुपये
 (रविवार पुढारी, २३ ऑगस्ट १९८१)
११. गुलमोहर - अनिल सोनार
 दिलीपराज प्रकाशन, पुणे, पृ. १६२ किंमत १८ रु.
 (रविवार पुढारी, २३ ऑगस्ट १९८१) १२. काली - कृष्णाबाई मोटे
 श्रीविद्या प्रकाशन पुणे, पृष्ठे ५२, किंमत १८ रुपये
 (रविवार सकाळ, १८ मे १९८६)
१३. समिधा - संपा. प्रा. एम. ए. शेख, सह. संपा. मा. भि. काटकर
 (पै. इस्माईल मुल्ला स्मृतिग्रंथ) स्मृतिग्रंथ समिती, सातारा पृष्ठे २६0, किंमत ६0 रुपये
 (रविवार सकाळ.....)
१४. सामाजिक विकासाचे प्रश्न व धोरण - डॉ. शरदचंद्र गोखले
 व्हीनस प्रकाशन, पुणे, पृष्ठे ३८६, किंमत १२५ रुपये
 (समाजसेवा त्रैमासिक, पुणे, जाने- मार्च १९९०)
१५. बालशिक्षण : विचार आणि आचार - संपादक डॉ. भालबा विभूते
 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पृ. १४0, किंमत २0 रुपये
 (समाजसेवा त्रैमासिक पुणे, जाने- मार्च १९९०)
१६.  रिपोर्ट ऑफ द महाराष्ट्र स्टेट लेव्हल सेमिनार ऑन ज्युव्हेनाईल जस्टीस -
 सेंटर ऑफ रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट, मुंबई
  (समाजसेवा एप्रिल जून १९९0)
१७. मॅन्युअल ऑन अॅडॉप्शन इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडोप्शन बॉम्बे  (समाजसेवा एप्रिल-जून ९0)
१८.  सोशल रिहॅबिलिटेशन इन लेप्रसी
 इंटरनॅशनल लेप्रसी यूनियन
 (समाजसेवा एप्रिल-जून ९0)
१९.  म्हातारपण - डॉ. शरदचंद्र गोखले
 समाजशिक्षण, माला, पुणे, पृष्ठे ४0, किंमत ५0 पैसे
 (समाजसेवा पुणे, जाने, मार्च. १९९१)
२०. चेतना - पवन खेबूडकर
 चेतना अपंगमती विकास संस्था, कोल्हापूर,
 (समाजसेवा पुणे, जाने. मार्च, १९९१)
२१. त्यांच्या कपाळी कलंक गोंदू नका - सुमती संत
 उत्कर्ष प्रकाशन, पुणे, पृष्ठे १४५, किंमत ३0 रुपये
 (समाजसेवा - एप्रिल जून १९९१)
२२. गाज : बालिका वर्षाची - लीला पाटील व सुमित्रा जाधव
 अन्वय प्रकाशन, कोल्हापूर (समाजसेवा - जुलै, सप्टेंबर १९९१) २३. प्रेझेंट सर ! प्राचार्य रा. तु. भगत
 लोकशिक्षण संस्कारमाला, कोल्हापूर पृ. ३0 किंमत ८ रुपये
 (रविवार सकाळ, ३० ऑक्टोबर १९९१)
२४. नसरुद्दीनच्या गोष्टी - सत्यजीत रे-अनु. विलास गीते
 पृष्ठे ६५, किंमत १५ रुपये
 (रविवार सकाळ, १ नोव्हेंबर १९९२)
२५.  वंचितांचे विश्व - मीना शेटे
 सन्मित्र प्रकाशन, कोल्हापूर, पृष्ठे १७६, किंमत ६0 रुपये
 प्रकाशन १९९२ (समाजसेवा, ऑक्टो.-डिसें. १९९२)
२६.  अवर्स बाय चॉइस - प्रा. निलिमा मेहता
 फॅमिली सर्व्हिस सेंटर, बॉम्बे, (समाजसेवा ऑक्टो. डिसें. १९९२)
२७. औट घटकेचे राज्य - ज्ञानदा नाईक
 साकेत प्रकाशन, औरंगाबाद, पृष्ठ ८३, किंमत २० रुपये
 (रविवार सकाळ, ३ जानेवारी १९९३)
२८. या मुलांनो या - लीला शिंदे
 साकेत प्रकाशन, औरंगाबाद, पृष्ठ २४, किंमत ५ रुपये
 (रविवार सकाळ, ३१ जानेवारी १९९३)
२९ भा ग्यविधात्री डॉ. मादाम मारिया माँटेसोरी रा. वा. शेवडेगुरुजी
 चंद्रकांत शेट्ये प्रकाशन मंदिर, कोल्हापूर पृ. ९८ किंमत २५ रुपये
३०. गलमूर्ती - रा. वा. शेवडेगुरुजी
 चंद्रकांत शेट्ये प्रकाशन मंदिर, कोल्हापूर पृ. ५५ किंमत ८ रुपये
३१. कावळे आणि माणसं - उत्तम कांबळे
 पब्लिशिंग हाउस, पुणे, पृ. १६९ किंमत १00 रुपये
 (सकाळ-सप्तरंग, ३१ जानेवारी १९९९.)
३२. जागतिक घडामोडी - डॉ. सुभाष देसाई
 सिंहवाणी प्रकाशन, कोल्हापूर पृ. १६0, किंमत १२५ रुपये
 रविवार पुढारी, बहार ९ मे १९९९)
 मिठू मिठू पोपट - दिलीप पुरुषोत्तम चित्रे (अप्रकाशित)
३४. समतेच्या दिंडीचे धारकरी - प्रा. चंद्रकांत पाटगावकर
 कल्पक प्रकाशन, कोल्हापूर किंमत ६0 रुपये.
 साधना साप्ताहिक, पुणे, १४ एप्रिल २००१)
३५. त्रिवेणी - गुलजार
 रुपा आणि कंपनी,मुंबई,पृ.१२९,किंमत १९५ रुपये
 (सकाळ,सप्तरंग,२00१) ३६. ऋतु उग रही है- ज्ञानेश्वर मुळे
 आलोक पर्व प्रकाशन, पृ. ११0, किंमत १00 रुपये.
 (सप्तरंग,१६ सप्टेंबर २००१)
३७. तिसऱ्या बिंदूच्या शोधात- डॉ.तारा भवाळकर
 २००१ (सकाळ-सप्तरंग, १६ सप्टें.२00१)
३८. तिसऱ्या चाकाची खुर्ची - नसीमा हुरजूक
 मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, पृ. २२0, किंमत १८०
 (तरुण भारत, अक्षरयात्रा, १६ डिसेंबर २००१)
३९. घडण - प्राचार्य अरविंद सातवेकर
 प्रकाशक - महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर
 प्रकाशन - २००१ पृष्ठे - १३0 किंमत - १00 रु.
४०. गजाआडच्या कविता - संपादक उत्तम कांबळे
 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
 पृष्ठ ४७, किं. ३0 रुपये
 रविवार सकाळ, २१ एप्रिल, २००२)
४१. बालकुमार साहित्य सेवक रा. वा. शेवडे गुरुजीः
 जीवन व साहित्य - शशिकांत महाडेश्वर,
 मनोज प्रकाशन, कोल्हापूर पृ. ५६, किंमत ३५ रुपये
 (रविवार सकाळ, १ सप्टेंबर २00२)
४२.  संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन - प्राचार्य रा. तु. भगत.
 चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर. पृ. २३0, किंमत १७५ रुपये
 (रविवार सकाळ, १३ ऑक्टोबर, २००२)
४३.  त्रिवेणी - गुलजार -अनु. शांता शेळके.
 मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, पृ. ६४, पाने ६0 रुपये
 (रविवार सकाळ, १७ नोव्हेंबर, २00२)
४४.  व्हॉट वेंट राँग? - किरण बेदी, अनु. लीना सोहनी
 मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे-१८४ किंमत १५0 रुपये
 (रविवार सकाळ, ८ डिसेंबर, २00२)
४५. सार्वजनिक सत्यधर्माचे उपासक : विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार
 डॉ. अरुणा ढेरे, राजहंस प्रकाशन, पुणे, पृ. २८२, किंमत १४0 रुपये
 (रविवार सकाळ, २ फेब्रुवारी २00३)
४६. बंजा-याचे घर - यशोधरा भोसले
 मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, हाउस, पुणे, पृष्ठ १७९, किंमत १५0 रुपये
 (रविवार सकाळ, २३ मार्च, २00३)
४७.  अवस्था - डॉ. यू. आर. अनंतमूर्ती, अनु. उमा कुलकर्णी
 मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, पृ. १४१, किंमत ११0 रुपये
 (रविवार सकाळ, १७ ऑगस्ट, २00३)
४८.  मयूरपंख - शैला सायनाकर, अनु. अजीम.
 राजकिरण प्रकाशन, इस्लामपूर, पृष्ठ. १३0, किं. ८0 रुपये
 (रविवार सकाळ, १२ ऑक्टोबर, २00३)
४९. भारताचा अंत - खुशवंत सिंह, अनु. चंद्रशेखर मुरगूडकर
 चिनार प्रकाशन, पुणे, पृ. ८0, किं. ७५ रुपये
 (पुढारी, बहार, २१ मार्च, २००४)
५0.  ठरलं, डोळस व्हायचंच! - डॉ. नरेंद्र दाभोळकर
 छाया प्रकाशन, सातारा, पृ. १०७ किं. ५0 रुपये
 (पुढारी बहार, २५ मार्च २00४)
५१. फिटे अंधाराचे जाळे - भालचंद्र करमरकर
 मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, पृ. १६४, किं. १२0 रुपये
 (दै. लोकमत, सप्टेंबर, २00४, मेहता ग्रंथ जगत ऑक्टो. २00५)
५२.  शिल्पकार - प्रा. भालचंद्र त्रिवेदी
 प्रकाशक - सौ हर्षा त्रिवेदी, निपाणी पृ. ५0, किं. ३0 रुपये
 (रविवार सकाळ, २० मार्च २00५)
५३. आकाशवेल - डॉ. जी. पी. माळी
 स्नेहवर्धन पब्लिशिंग हाउस, पुणे,
 पृ. १५९, किंमत १३0 रुपये
 (रविवार सकाळ, २४ एप्रिल, २००५)
५४. आई समजून घेताना - उत्तम कांबळे
 लोकवाङ्मय गृह मुंबई, किं. १२५ रुपये, प्रका. २00६
 (रविवार सकाळ, सप्तरंग १५ ऑक्टोबर, २00६)
५५. हॉटेल माझा देश - डॉ. धम्मपाल रत्नाकर
 समृद्धी प्रकाशन, कोल्हापूर. पृ. ९८, किंमत. ८0 रुपये
 (अप्रकाशित)
५६. विभूती - प्रा. भालचंद्र त्रिवेदी
 प्रकाशक सौ. हर्षा त्रिवेदी, निपाणी
 (दै. लोकमत, २५ फेब्रुवारी २00७)
५७. पालातील माणसं - विमल मोरे
 पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठ १६४, किंमत. १२० रुपये
  (रविवार सकाळ, १९ ऑगस्ट २00७)
५८.  नामदारनामा - प्रा. कमलाकर दीक्षित
 प्रका. आनंद अंतरकर, पुणे (अंतर्नाद, जुलै, २00८)
५९. नेपाळ नावाचं गूढ - मिलींद यादव
 निर्मिती विचारमंच, कोल्हापूर, किंमत ५00 रुपये
 (रविवार सकाळ, १४ डिसेंबर २००८)
६०. आमचा सरनामा : नियतीशी करार - आचार्य शांताराम गरुड
 लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृ. ६७, किंमत. ४0 रुपये
 (प्रबोधन प्रकाशन ज्योती, मे, २०१०)
६१. रस- अनौरस - राजन खान
 अक्षर प्रकाशन, मुंबई, पृ. २२८, किंमत २२५ रुपये
 (अंतर्नाद, जून, २0१0)
६२. भोगिले जे दुःख त्याला - प्रा. आशा आपराद
 मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, पृ. २७३, किंमत २२०
 (अंतर्नाद, जून २०१०)
६३.  मी अनिता राकेश सांगतेय... - अनिता राकेश,
 प्रा. अनु. रजनी भागवत
 मेहता पब्लिशिंग हाउस पुणे, पृ. १७५, किंमत १६0 रुपये
 (अंतर्नाद, जून, २०१०)
६४. उधाण वारा - तस्लिमा नसरीन
 मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, पृ. ४५८, किं. ४00 रुपये
 (मेहता ग्रंथ जगत, ऑगस्ट, २०१०)
६५. नंबर वन - लक्ष्मीकांत देशमुख
 साकेत प्रकाशन, औरंगाबाद, पृ. १६०, किंमत १७५ रुपये
 (अक्षर आयान गौरव, लक्ष्मीकांत देशमुख विशेषांक)
६६. चरित्र ग्रंथमाला श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर.
 प्रका.२०१२
 (महाराष्ट्र टाइम्स, १२ सप्टेंबर २०१२)
६७. ज्वाला आणि फुले - बाबा आमटे साधना प्रकाशन, पुणे,
 (मेहता ग्रंथ जगत (दिवाळी वाचन संस्कार अंक २०१२)
६८.  तोत्तोचान - तेत्सुको कुरुयानागी, अनु. चेतना सरदेशमुख, गोसावी
 नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली
 (खेळगडी (दिवाळी) २०१४)  ६९.  महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा - राजा माने
 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
 (लोकराज्य, मार्च २०१३)
७०. स्वप्नांच्या पडझडीनंतर - डॉ. चंद्रकांत पोतदार
 आर्यन प्रकाशन, नेवरी (जि.सांगली) पृ. ८८, किं. १२० रुपये
 (अप्रकाशित)
७१. कश्मिरी कयामत - गुरुबाळ माळी
 चिनार पब्लिशर्स, पुणे, पृ. १२४, किंमत २५0 रुपये
 (महाराष्ट्र टाइम्स, १0 सप्टेंबर २०१५)
७२. मी एस. एम. - एस. एम. जोशी, काँटिनेंटल प्रकाशन, पुणे
 प्रकाशन वर्ष १९८४, पृ. ४३७, किंमत - ६0 रु.
 (अक्षरदान दिवाळी २०१५)
७३. राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन व कार्य,
 संपादक डॉ. जयसिंगराव पवार, प्राचार्य अनंतराव देसाई
 महाराष्ट्र इतिहास परिषद, कोल्हापूर, पृ. ४६४ किं. ५00 रुपये
 (तरुणभारत २२ आक्टोबर, २०१६)
७४. रिंगणनाट्य - अतुल पेठे, राजू इनामदार
 साधना प्रकाशन, पुणे, पृ. १७८, किंमत १५0 रुपये.
 (अक्षरनामा - ई जर्नल, २२ ऑक्टोबर, २०१६)
७५. संवाद क्रांती - श्रीराम पवार
 सकाळ पेपर्स प्रा लि. पुणे, पृ. १६0, किंमत १६५ रुपये
 (सकाळ, सप्तरंग, २६ मार्च, २०१७) डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा


१. खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००६/पृ. २१०/रु. १८० सहावी आवृत्ती

२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००७/पृ. १३८/रु. १४० तिसरी आवृत्ती

३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
 निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी आवृत्ती

४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती

५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती

६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२००/तिसरी आवृत्ती

७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती

८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३०/रु.१७५/दुसरी आवृत्ती

९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२००/दुसरी आवृत्ती

१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/तिसरी सुधारित आवृत्ती

११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५०/दुसरी सुधारित आवृत्ती

१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
 साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती

१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२००/दुसरी आवृत्ती

१४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती

१५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२००/तिसरी आवृत्ती
१६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
 साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. १९८ रु. ३००/पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती
२२. वेचलेली फुले (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२० रु. ३००/पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१८५ रु.२५० /पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५०/पहिली आवृत्ती

आगामी
• भारतीय भाषा (समीक्षा)
• भारतीय साहित्य (समीक्षा)
• भारतीय लिपी (समीक्षा)
• वाचन (सैद्धान्तिक)

  • वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन