'मेरिका हे जगाचे आशास्थान आहे' असे आत्मविश्वासाचे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष थॉमस जेफरसन (१८०० - १८०८) यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात काढले होते. आज त्यांचे वचन अक्षरशः खरे ठरले आहे. अमेरिकेच्या अभावी व्यक्तिस्वातंत्र्य, समता, लोकसत्ता यांचा जगातून बहुधा लोपच झाला असता, आणि आजच्या जगाचे चित्र आतापेक्षा फारच निराळे दिसले असते. दंडसत्तेच्या काळया घनदाट छायेतच जग आपल्याला आज पाहावे लागले असते. पण लोकसत्ता ही इतर सर्व सत्तांहून जास्त बलाढ्य व समर्थ असते हे अमेरिकेने सिद्ध करून दाखवून जगावरची ती महान् आपत्ती निस्तरून टाकली आहे. अमेरिकेच्या या यशाचे रहस्य काय त्याचा येथे विचार करावयाचा आहे.
 औद्योगिक क्रांतीनंतर जी भांडवलशाही जन्माला आली तिची अमेरिकेत अत्यंत वेगाने वाढ झाली. अल्पावधीतच तिने फार प्रचंड रूप धारण केले आणि देशातल्या नागरिकांच्या जीवनावर आपली सत्ता प्रस्थापित केली. व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, प्रजासत्ताक हे शब्द तिने शून्यवत् करून टाकले. पैशाच्या जोरावर भांडवलशहा मते विकत घेत, वृत्तपत्रे विकत घेत आणि सीनेट हाऊस ही विधिमंडळेहि विकत घेऊन या योगे हाती येणाऱ्या निरंकुश सत्तेच्या जोरावर जनतेचा रक्तशोष करीत. लवकरच भांडवलशाहीइतकी क्रूर, स्वार्थी, सैतानी, सत्ता जगात दुसरी नाही हे अमेरिकन लोकांना दिसून आले. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी आपले रक्त सांडले होते त्यांच्या लवकरच ध्यानात आले की आपण राजकीय दास्यातून मुक्त झालो असलो तरी आर्थिक दास्याच्या शृंखला आपल्या पायांवर अधिकच करकचून आवळून बसल्या आहेत. स्वातंत्र्ययुद्धाचे हे विपरीत पर्यवसान पाहून अमेरिकन नागरिक अगदी हतबुद्ध होऊन गेले. कारण हे नवे दास्य फार भयानक होते. ज्या जनतेच्या साह्याने भांडवलाशी लढावयाचे त्या जनतेलाच भांडवलशहा वश करीत. ज्या वृत्तपत्रातून लोकजागृती करावयाची ती वृत्तपत्रेच त्यांची गुलाम होत. लोकसभा, न्यायपीठे, यांची हीच अवस्था होऊन गेली. राजा उन्मत्त झाला तर त्याला पदच्युत करता येते, फाशी देता येते पण येथे कोणाला फाशी द्यावयाचे? जनतेला ? म्हणजे स्वतःलाच ?
 लोकसत्तेपुढे हा अत्यंत विचित्र पेच येऊन पडला होता. लोकांची मते, लोकसभा, वृत्तपत्रे, न्यायपीठे ही खरी लोकशाहीची शस्त्रास्त्रे. पण हीच शत्रूने काबीज केल्यावर त्याच्याशी कोणच्या शस्त्राने लढावयाचे ? लढा करता आला नाही तर लोकसत्ता ही कल्पनाच जगातून नष्ट होईल ! हा विचित्र पेच सोडवावयाचा कसा ? भांडवली शक्तीशी कोणत्या शक्तीच्या साह्याने मुकाबला करावयाचा ?
 'चारित्र्य' ही ती शक्ती होय हे या प्रश्नाला अमेरिकेने दिलेले उत्तर आहे. धनमोहातीत, नीतिभ्रष्ट, चारित्र्यसंपन्न अशी एक व्यक्ती निर्भयपणे धनसत्तेशी सामना करण्यास उभी राहताच जनतेच्या विवेकबुद्धीवरचे मालिन्य नष्ट होते, ती जागृत होते आणि तिच्या ठायी जी महाशक्ती निर्माण होते ती कोणच्याही सत्तेला सहज नमवू शकते, हा सिद्धान्त अमेरिकेच्या गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासातील पानापानावर लिहिलेला आहे.
 थॉमस जेफरसन यांनीच या लढ्याला प्रारंभ केला. ते निवडणुकीस उभे राहिले त्या वेळी धनशहांनी वृत्तपत्रांचे सर्व सामर्थ्य त्यांच्याविरुद्ध उभे केले होते. पण या चारित्र्यसंपन्न पुरुषाचा पराभव करण्यास ते असमर्थ ठरले. आणि हेच पुढे थिओडोर रूझवेल्ट (१९००-१९०८), विड्रो विल्सन (१९१२-२०) व फ्रँकलिन रूझवेल्ट (१९३२-४६) यांच्या वेळी दिसून आले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भांडवलशहा अत्यंत उन्मत्त झाले होते. निरनिराळ्या कारखान्यांनी व कंपन्यांनी आपले संघ करून मुक्तस्पर्धा हे भांडवली अर्थव्यवस्थेतील मुख्य तत्त्वच नष्ट करून टाकले आणि मग वाटेल ती भाववाढ करून जनतेच्या रक्ताचे जळवांसारखे शोषण चालविले. क्लीव्हलँड, मक्किन्ले हे अध्यक्ष अगदी दुबळे होते. त्यांना राजकीय दादांनी आपल्या हातातील बाहुली वनविली. 'चाइल्ड लेबर ॲक्ट', 'शेरमन ॲक्ट' असे अनेक जनहिताचे कायदे अमेरिकन काँग्रेसने केले होते. पण ते दप्तरातच पडून राहिले. त्यांचा अंमल करण्याचे सामर्थ्यच सरकारला नव्हते. पोलीस, न्यायालय अशा ठिकाणच्या सरकारी अधिकाराच्या जागेवर दादा लोक परस्पर नेमणुका करीत व मागून अध्यक्षांना कळवीत, आणि ते नेभळे पुरुष त्याला मान्यता देत. त्यामुळे या काळात अमेरिकेत दादांनी नुसता नंगा नाच घातला होता. 'जनतेला आम्ही पायपोसाने मोजतो' असे ते जाहीरपणे लत असत. 'लोकसत्ता', 'अमेरिकेची घटना' यांसारख्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष देण्यास त्यांना फुरसत नसे. त्यामुळे अमेरिकेतील शासन हे वॉलस्ट्रीटचे, वॉलस्ट्रीटसाठी व वॉलस्ट्रीटकृत असे होऊन गेले. पण थिओडोर रूझवेल्ट यांनी अध्यक्षपदी येताच वॉलस्ट्रीटला धडा देण्याचे ठरविले व जनहिताच्या कायद्यांचा भराभर अंमल करण्यास सुरुवात केली. निर्भय, स्वार्थातीत व चारित्र्यसंपन्न शास्ता दिसताच जनता त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि मग थोडक्याच अवधीत रूझवेल्ट यांनी दादांची हाडे मोडली. जेव्हा जेव्हा दादा उन्मत्त होत तेव्हा तेव्हा ते जनतेला हाक देत. आणि त्या शक्तीचे उग्र रूप पाहताच दादा विनम्र होत. विड्रो विल्सन यांनी हेच धर्मयुद्ध पुढे चालवून भांडवलशहांना नामोहरम केले आणि फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी आपल्या १४ वर्षांच्या कारकीर्दीत एकारलेल्या संपत्तीचा निचरा करण्याचे अनेक कायदे करून त्या उन्मत्त शक्तीला निर्जीव करून टाकले.
 जेफरसन, थिओडोर रूझवेल्ट, विल्सन व फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी धनसत्तेशी केलेल्या संग्रामाला वर धर्मयुद्ध म्हटले आहे. हा शब्द (क्रुसेड) अमेरिकन इतिहासकारांनीच वापरला आहे. जेरुसलेम या क्षेत्रासाठी झालेल्या युद्धांना धर्मयुद्धे म्हणतात. पण लोकशाहीच्या रक्षणार्थ केलेल्या या संग्रामाच्या बाबतीत तो शब्द तितकाच, नव्हे, अधिकच सार्थ आहे. कारण लोकशाही हा सर्वश्रेष्ठ धर्म असून त्याच्या रक्षणाला जेरुसलेमच्या रक्षणापेक्षा जास्त महत्त्व आहे. हे युद्ध जिंकून अमेरिकेच्या अध्यक्षांनी लोकशाहीला दिलासा दिलेला आहे. भांडवली सत्ता ही अजिंक्य ठरली असती, तिला नमविणारी दुसरी शक्ती जगात नाही असे ठरले असते तर लोकशाहीचा यापूर्वीच मृत्यू ओढवला असता. पण स्वार्थत्याग, ध्येयनिष्ठा निर्भय वृत्ती, मनोनिग्रह हे जे चारित्र्य, हा जो धर्म त्याची शक्ती श्रेष्ठतर आहे हे अमेरिकेने धर्मयुद्धे करून सिद्ध केले, व लोकशाहीच्या संरक्षणासाठी एक ढालच जगाच्या हाती दिली.
 भांडवलशहा आणि जनता यांचा हा जो दीर्घकाल संग्राम चालू होता त्यामुळे अमेरिकेत आणखी एक मोठे परिवर्तन घडून आले. अमेरिकन भांडवलदारांना सुबुद्धता प्राप्त झाली. जनता जागृत झाल्यामुळे त्यांच्या धनलोभाला तर आळा पडलाच पण कष्टकरी जनतेला, कामगारांना जास्त वेतन देऊन त्यांची क्रयशक्ती वाढली तर भांडवलाचा त्यात फायदाच आहे, हे हळूहळू त्यांच्या ध्यानात आले आणि त्यामुळे मार्क्सप्रणीत समाजवादाचा अवलंब न करता अमेरिकेला संपत्तीच्या विभजनाचा प्रश्न सोडविता आला. मार्क्सने कम्युनिझमचे तत्त्व सांगताना रक्तपाती क्रांतीवाचून, वर्गविग्रह चेतवून भांडवलदारवर्गाचा नायनाट केल्यावाचून, कामगारांची सत्ता प्रथापित झाल्यावाचून संपत्तीचे न्याय्य विभजन होणे शक्य नाही, असे सांगितले होते. पण अमेरिकन भांडवलदारांनी आपली विवेकदेवता जागृत ठेविल्यामुळे मार्क्सचा हा सिद्धान्त खोटा पडला. अमेरिकेत आर्थिक क्रांती झाली. पण ती शांततेच्या मार्गाने झाली. हेन्री फोर्ड हा त्या क्रांतीचा प्रणेता होय असे काही अर्थवेत्त्यांचे मत आहे. १९१४ साली त्याने कामगारांना २५ रु. रोज वेतन देण्यास प्रारंभ केला व ८ तासांचा कामाचा दिवस ठरविला. त्यामुळे कामगार हा गुलामगिरीतून मुक्त होऊन देशाचा एक सन्मान्य नागरिक झाला. २५ रु. रोज वेतन करण्याचा निश्चय फोर्डने स्वतःहून कसल्याही प्रकारचे बाह्य दडपण नसताना केला होता. त्यामुळे मानवाच्या सद्बुद्धीचा, विवेकशीलतेचा, समाजहिततत्परतेचा तो एक अपूर्व विजय होय असे इतिहासकार मानतात. कामगारांचे शारीराश्रम ही त्याआधी बाजारांतील क्रय-विक्रय करण्याची वस्तू होती. आणि कामगार हा आर्थिक यंत्रातील एक आरा होता. आता तो व्यक्तित्वसंपन्न, स्वतंत्र असा एक नागरिक झाला. जगाच्या इतिहासात ही फार मोठी क्रांती होय.
 संपत्तीचे न्याय्य विभजन व्हावयाचे तर समाजवादाचाच अवलंब केला पाहिजे, असे एक मत २०।२५ वर्षांपूर्वी सर्वत्र रूढ होते. अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात ते मूळ धरून आहे. मार्क्सने सांगितलेली रक्तपाती क्रांती ज्यांना मान्य नव्हती त्यांनाहि समाजवादावाचून तरणोपाय नाही असेच वाटत होते. धनोत्पादनाच्या सर्व साधनांवर समाजाची म्हणजेच सरकारची मालकी असणे यांचे नाव समाजवाद. धनिकवर्गाचा नाश करून ही मालकी प्रस्थापित करावी लागेल असे मार्क्सचे मत होते. इंग्लंडमधील समाजवादी लोकांना हा वर्गविग्रहाचा मार्ग मान्य नव्हता. हे लोकशाही मार्गानेच साधता येईल असे त्यांचे मत होते. आपल्या पंथाला ते लोकशाही समाजवाद म्हणत. पण धनसाधने सरकारने ताब्यात घेतली पाहिजेत हा आग्रह मात्र त्यांचा कायम होता. अमेरिकेने त्याची जरूर नाही असे दाखवून देऊन जगाला प्रत्यक्ष कृतीने संपत्तीच्या विभजनाचा मार्ग दाखविला. अमेरिकेत जी अर्थव्यवस्था सध्या आहे तिला भांडवलशाहीच म्हणतात पण पन्नास वर्षांपूर्वीची भांडवलशाही व ही नवी भांडवलशाही यांत जमीन- अस्मानाचे अंतर आहे. फायदा, नफा, धन हे एकच ध्येय त्या जुन्या भांडवलशाहीपुढे होते. त्यापायी सैतानाहूनही ती जास्त निर्दय व क्रूर झाली होती. कामगारांचा व एकंदर जनतेचा ती रक्तशोष करीत असे. आताच्या भांडवलशाहीचे फोर्डने म्हटल्याप्रमाणे समाजसेवा हे उद्दिष्ट आहे, पूर्वीच्या युगातले ॲडम स्मिथचे, लेसे-फेअरचे, अनिर्बंध आर्थिक स्वातंत्र्याचे तत्त्व तिने कधीच धिक्कारून टाकले आहे. समाजाच्या एकंदर अर्थव्यवहारावर शासनाचे नियंत्रण असले पाहिजे, त्यांत नियोजन असले पाहिजे हे तत्त्व तिने मान्य केले आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला कामगारांनाही वर्गविग्रह, कामगारसत्ता या तत्त्वांचा अवलंब करावा लागला नाही. आणि अशा रीतीने कम्युनिझम तर नव्हेच, पण सोशॅलिझमसुद्धा न स्वीकारता, अमेरिकेने आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. म्हणूनच 'भांडवलशाही' हे नावही आता टाकून द्यावे असा कित्येक लोकांचा आग्रह आहे. ते नाव ठेवावयाचेच असेल तर तिला 'जनतेची भांडवलशाही' म्हणावे असे काही लोकांचे मत आहे.
 हेन्री फोर्डने प्रस्थापिलेली तत्त्वे आता अमेरिकेत सर्वमान्य झाली आहेत. १९४६ साली अमेरिकेत 'रोजगार कायदा' पास झाला. त्या अन्वये जनतेच्या योगक्षेमाची, अन्न, वस्त्र, घर व शिक्षण यांची जवाबदारी सरकारवर कायद्यानेच येऊन पडली आहे. ती पार पाडण्यासाठी सरकारला अर्थव्यवहारात हस्तक्षेप करण्याचा, त्याचे नियंत्रण करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मात्र स्पर्धाशील मुक्त उद्योगांना (फ्री एंटरप्राइझ) पूर्ण अवसर देऊनच सर्व साधले पाहिजे असा तेथे दंडक आहे. अर्थसाधने शासनाच्या ताब्यात देणारा जो समाजवाद त्याचा अमेरिकन जनतेला अत्यंत तिटकारा आहे. लोकशाही समाजवाद हा 'वदतोव्याघात' आहे असे तिचे मत आहे. कारण एक अर्थव्यवहार जर शासनाच्या ताब्यात गेला तर सर्व जीवनच त्याच्या ताब्यात जाते व जनता गुलाम होते. म्हणून मुक्त उद्योग, मुक्त विनिमय हा जो भांडवली पद्धतीचा आत्मा त्याला धक्का लागता कामा नये असा अमेरिकनांचा कटाक्ष आहे. आणि भांडवली व्यवस्था व समाजकल्याण यांचा समन्वय साधता येतो हे त्यांनी प्रत्यक्षात दाखवून दिल्यामुळे लोकसुखाच्या दृष्टीने जगाचे एक पाऊल पुढे पडले आहे यात शंकाच नाही.
 जगाच्या इतिहासात अमेरिकेने तिसरीहि एक क्रांती घडविली आहे. १९४७ च्या मार्चमध्ये ब्रिटनचे एक शिष्टमंडळ अमेरिकेचे अध्यक्ष ट्रुमन यांच्याकडे गेले. युद्धात ब्रिटन विजयी झाले होते तरी त्याचा ताण तेथील अर्थव्यवस्थेला सहन न होऊन ती कोसळण्याच्या बेतात होती. ट्रुमन यांनी सीनेट व हाऊस- मधील नेत्यांना व आपल्या आर्थिक सल्लागारांना बोलावून एक बैठक घेतली व विचारविनिमय सुरू केला. त्याच वेळी इटली, फ्रान्स येथून ब्रिटनसारख्याच वार्ता येऊ लागल्या. त्यामुळे एकंदर युरोपच दारिद्र्य, उपासमार, निराशा, व अराजक यांच्या भेसूर मगरमिठीत सापडणार अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली. अशा वेळी मागल्या साम्राज्यशाहीच्या युगात काय झाले असते ? शेजारचा देश दरिद्री झाला आहे, हतबल झाला आहे, अगतिक झाला आहे हे ऐकताच श्रीमंत, बलाढ्य देश त्याच्यावर झडप घालून त्याला गुलाम करून टाकीत व त्याचा रक्तशोष करीत. कायद्याचे राज्य जगात प्रस्थापित झाले होते. पण ते देशाच्या सरहद्दींच्या आत. दोन देशांच्या संबंधात जंगली दरोडेखोरीचाच न्याय जारी होता. स्वारी, लूटमार, साम्राज्य, रक्तशोष हेच निर्बलांचे भवितव्य होते. पण आता अमेरिकेने हे साम्राज्यशाहीचे युग संपुष्टात आणले आणि हतबल, दरिद्री झालेल्या देशांना सर्व प्रकारचे साह्य देऊन त्यांना फिरून सबल व संपन्न करण्याचे ध्येय डोळयांपुढे ठेवून त्यासाठी योजना आखली. सुप्रसिद्ध 'मार्शल योजना' ती हीच. अध्यक्ष ट्रुमन यांच्या मागणीप्रमाणे अमेरिकन लोकसभेने युरोपच्या साह्यासाठी ८००० कोटी रुपये मंजूर केले आणि हे सर्व साह्य बिनशर्त करण्याची घोषणा करून एका नव्या मन्वंतराला प्रारंभ केला.
 अमेरिकेच्या या योजनेची युरोपने फार प्रशंसा केली. अमेरिकेला मनापासून धन्यवाद दिले. 'या औदार्याला तोड नाही' असे चर्चिलसाहेबांनी उद्गार काढले. पण अमेरिकन जनतेने व नेत्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितले की, यात औदार्य असे काहीच नाही. आम्ही हे आमच्या स्वार्थाच्या दृष्टीनेच करीत आहो. व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही यांचे रक्षण हे आमचे उद्दिष्ट आहे. युरोप असाच दैन्यावस्थेत राहिला तर तो कम्युनिस्टांच्या भक्ष्यस्थानी पडेल आणि मग युरोपातून ही मूल्ये हद्दपार होतील. आणि आज युरोपवर जो प्रसंग तोच उद्या आमच्यावर ! हे ध्यानी घेऊन आत्मसंरक्षणाच्या हेतूनेच आम्ही ही योजना आखली आहे.
 जगातल्या उदयोन्मुख देशांनी अमेरिकेच्या इतिहासाचा अभ्यास करणे किती अवश्य आहे ते यावरून कळून येईल. स्वातंत्र्यापूर्वी भारतात शालेय अभ्यासक्रमात ब्रिटनचा इतिहास अवश्य म्हणून विषय होता. व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य, राजसत्तेशी संघर्ष, राष्ट्रनिष्ठा, विज्ञाननिष्ठा इहवाद या तत्त्वांचे संस्कार या इतिहासाच्या अध्ययनाने मुलांच्या मनावर लहानपणीच होत असत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात दुदैवाने ब्रिटनचा इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आला आहे. माझ्या मते हा फार मोठा प्रमाद होय. भारताला आपली लोकशाही यशस्वी करावयाची असेल तर ब्रिटनच्या इतिहासाला शालेय अभ्यासात पूर्वीचे स्थान देणे अवश्य आहे. आणि त्याबरोबरच महाविद्यालयात अमेरिकेचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करणे हेही अवश्य आहे. कारण आज जगापुढे ज्या बिकट समस्या आहेत त्यांतील काहींची उत्तरे अमेरिकेला सापडली आहेत. भांडवली सत्तेशी झगडा कसा करावा, संपत्तीचे न्याय्य विभजन दंडसत्तेच्या अवलंबावाचून कसे करावे आणि राष्ट्राराष्ट्रातील संबंध स्नेहाचे, बंधुभावाचे कसे घडवावे ! याच आजच्या जगाच्या समस्या आहेत. अमेरिकेने त्या कशा सोडविल्या आहेत ते वर सांगितलेच आहे. भारताने अमेरिकेच्या इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्या जनतेलाही या समस्या सोडविण्याचा मार्ग सापडेल व अमेरिकेच्या आदर्शामुळे स्फूर्ती व शक्तीही प्राप्त होईल. म्हणून शाळांनी व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्याकडून हा अभ्यास करविण्याच्या योजना आखाव्या आणि स्वातंत्र्यप्रेम, निर्भयवृत्ती, राष्ट्रनिष्ठा, वास्तवाची अभिरुची इ. गुणांचे त्यांच्या मनात बीजारोपण करून जुन्या पिढीच्या मनाचे पोषण वाघिणीच्या दुधावर जसे झाले तसेच याही पिढीचे करण्याचे श्रेय घ्यावे.