व्यक्ती आणि समाज यांचे परस्परसंबंध काय असावे हा प्राचीन काळापासून अत्यंत वादग्रस्त असा विषय आहे. समाजातील व्यक्तीची वैयक्तिक ध्येये व समाजाची ध्येये यांचा समन्वय घालणे आणि असे करताना या दोहींच्याही आंतरिक शक्तींच्या विकासाला पूर्ण अवसर देणे यात समाजाच्या शास्त्यांचे, नेत्यांचे, तत्त्ववेत्यांचे सर्व कौशल्य आहे. हा तोल जेव्हा ढळतो, समाजरक्षणाच्या प्रयत्नांत व्यक्तींच्या सहजगुणांची जेव्हा गळचेपी होते किंवा व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेने व्यक्ती उच्छृंखल होऊन सैराट वाग लागतात, तेव्हा समाजाचा नाश होतो.
 मानवाच्या कर्तृत्वाच्या मूलप्रेरणांचा विचार याच शास्त्रात येतो. व्यक्तीचे कर्तृत्व तिच्या आंतरिक शक्तीवर अवलंबून आहे की ते परिस्थितीवर, भोवतालच्या समाजस्थितीवर अवलंबून आहे, तिच्या बऱ्यावाईट कृत्यांची जबाबदारी तिच्यावर आहे की समाजावर, याही प्रश्नाचा समाजशास्त्रज्ञ शतकानुशतक विचार करीत आहेत. आजच्या युगात व्यक्ती ही स्वयंप्रेरित, स्वयंचल आहे असे मत सर्वत्र रूढ आहे असे बाह्यतः दिसते. पण गेल्या शंभर वर्षातील मार्क्स, फ्रॉइड इ. पंडितांनी मानवी जीवनाचा एकांगी विचार करुन व्यक्तीचे कर्तृत्व सर्वस्वी अमान्य केले आहे. मात्र आपण तसे केलेले नाही असे त्यांचे मत आहे.
 व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधीच्या या वादातूनच धर्मकारण, राजकारण व अर्थकारण या क्षेत्रांत बहुविध समस्या निर्माण होतात. मोक्ष हे व्यक्तीचे अंतिम प्राप्तव्य आहे असे बहुतेक सर्व धर्म मानतात. पण ते साध्य करताना ऐहिक संसाराकडे, समाजहिताकडे तिने किती दुर्लक्ष करावे, त्याची किती हेळसांड करावी याविषयी समाज जे धोरण ठरवील त्यावर त्याचा उत्कर्षापकर्ष बव्हंशी अवलंबून असतो. आपला धर्म कोणता, समाजधर्म कोणता हे ठरविताना मानवाला स्वतःच्या बुद्धीने निर्णय करण्याचा अधिकार आहे की नाही, का त्याने सर्वस्वी श्रुतिस्मृतींना माथा घेऊनच वर्तले पाहिजे, हा प्रश्न तर समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी आहे. बुद्धीची अवहेलना करून शब्दप्रामाण्याच्या आहारी गेल्यामुळेच भारताचे सर्व कर्तृत्व सात-आठशे वर्षे कुजून गेले होते. नव्या जगात समाजवादी समाजरचनेचा महिमा फार मानला जातो. पण अर्थसाधने शासनांच्या ताब्यात गेली की व्यक्तीचे स्वातंत्र्य संपले, व्यक्ती गुलाम झाली, असे मानणारा एक पक्ष आहे. आणि धर्मबंधने व समाजातील जातिबंधने ही व्यक्तीला अंती समाजाला जितकी घातक तितकीच ही अर्थबंधनेही घातक आहेत असे या पक्षाचे मत आहे. म्हणजे याही क्षेत्रात वैयक्तिक आणि सामाजिक यांच्या क्षेत्रांच्या मर्यादा कोणत्या हा प्रश्न उभा राहतो.
 व्यक्ती आणि समाज यांचे परस्परसंबंध काय असावे या प्रश्नातून आतापर्यंतच्या इतिहासात ज्या बहुविध समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यांचा विचार या संग्रहांतील निबंधांत केलेला आहे. वैयक्तिक धर्म व सामाजिक धर्म, वैयक्तिक हित व सामाजिक हित, व्यक्तीचे अधिकार व सामाजिक अधिकार, व्यक्तीचे कर्तृत्व व समाजाचे कर्तृत्व या संबंधीचे चितन हेच या सर्व निबंधांतील सूत्र असल्यामुळे या संग्रहाला 'वैयक्तिक व सामाजिक' असे नाव दिले आहे.
 यातील बहुतेक निबंधांतील चर्चा तात्त्विक असली तरी भारतीय समाजाचा उत्कर्षापकर्ष डोळ्यापुढे ठेवून त्या संबंधातच ती बव्हंशी केलेली आहे. आपल्या समाजात वैयक्तिक पुण्य, वैयक्तिक धर्म यांकडेच सर्वांनी लक्ष दिले व सामाजिक पुण्याकडे लक्ष दिले नाही, 'मुख्य पूजेचे आयतन, प्राणिमात्रा सुखदान' असे संतांनी मांगितले असूनही त्या सुखदानातून आपल्या स्वर्ग- मोक्षलाभाची तरतूद कशी होईल एवढीच दृष्टी आपल्या लोकांनी ठेविली; उलट गेल्या दोनतीनशे वर्षांत पाश्चात्त्य देशांत ख्रिस्ती धर्मांत जे पंथोपपंथ निघाले त्यांचे सर्व लक्ष सामाजिक पुण्याकडेच होते हा विचार पहिल्या निबंधात विशद केला आहे. डॉ. सिग्मंड, फ्रॉईड, वॉटसन, इ. मानसशास्त्रवेत्त्यांनी व्यक्तीच्या कोणत्याही कृत्याला ती स्वतः जबाबदार नसून तिच्यावर होणारे संस्कार, तिची परिस्थिती ही जबाबदार आहेत असा सिद्धान्त मांडला आहे. त्यावर श्रद्धा ठेविल्यामुळे आपल्या समाजाचा कसा अधःपात होत आहे याचे विवेचन दुसऱ्या लेखात केले आहे. 'शिवछत्रपतींचे क्रांति- कार्य' या लेखाचे विद्यार्थ्यांनी पुनःपुन्हा वाचन, मनन करावे अशी माझी त्यांना विनंती आहे. छत्रपतींनी स्वराज्यस्थापना केली एवढेच त्यांना माहीत असते. पण हे कार्य साधताना त्यांनी धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सर्व प्रकारची क्रान्ती येथे कशी केली याची त्यांना कल्पना नसते. त्या क्रान्तीवाचून छत्रपतींना स्वराज्यस्थापनेत यश आलेच नसते असे म्हणण्याइतके तिचे महत्त्व आहे. भारताच्या प्राचीन इतिहासातून शक्य तेवढे पुरावे, प्रमाणे देऊन या क्रान्तिकार्याचे स्वरूप या निबंधात स्पष्ट केले आहे.
 डग्लस जे हा एक इंग्लिश समाजवादी पंडित आहे. त्याने 'सोशॅलिझम् इन् दि न्यू सोसायटी' हा ग्रंथ नुकताच (१९६२) लिहिला आहे. समाजवादाची मूलभूत तत्त्वे मार्क्सच्या आधीच्या पंडितांनी सांगितली होती. ती समाजाला मान्य होऊन त्यामुळे त्याची प्रगतीही होत होती. त्या तत्त्वांना योग्य अवसर मिळाला असता तर गेल्या आणखी शंभर वर्षांत बरीच प्रगती झाली असती. पण दुर्दैवाने मध्येच मार्क्सचा अवतार झाला व त्याने अत्यंत अशास्त्रीय सिद्धान्त मांडून समाजवादाला अत्यंत विपरीत विकृत रूप दिले, असे या ग्रंथात जे याने विवेचन केले आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मार्क्सवाद वाचण्यास प्रारंभ केला. तेव्हापासूनच माझे हे मत झालेले आहे. 'मार्क्सचे भविष्यपुराण' हा विषय अनेक वर्षांपूर्वी मी व्याख्यानांतून मांडला होता. पुढे अधिक अभ्यासाने मार्क्सचा 'ऐतिहासिक जडवाद' व त्याचा वर्गविग्रहाविषयीचा सिद्धान्त हे अत्यंत अशास्त्रीय व भ्रामक आहेत, हे मनाशी निश्चित झाले. 'मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य' व 'मार्क्सचे भविष्यपुराण' या निबंधांत मार्क्सवादातील अशास्त्रीयता मी स्पष्ट करून दाखविली आहे.
 भारतामध्ये सध्या लाचलुचपत, वशिलेबाजी, काळाबाजार, भ्रष्टता गुंडगिरी कोणत्या थराला गेली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळे आपल्या लोकशाहीचा पायाच ढासळत आहे. ही भ्रष्टता हे लोकशाहीवरचे केवढे ंकट आहे, याची कल्पना यावी म्हणून अमेरिकेतील असल्याच 'राजकारणी' भ्रष्टतेचे सविस्तर विवेचन 'आपल्या लोकशाहीवरील नवे संकट' या लेखात केले आहे. आपल्याकडच्या या 'मवाली राजकारणा'चा विचार करताना भारतातील सत्ताधारी पक्षातील लोकांचीच वक्तव्ये मी आधारासाठी दिलेली आहेत. या सर्व वर्णनावरून आपण कोणत्या ज्वालामुखीवर उभे आहो याची कल्पना वाचकांना येईल असे वाटते. अमेरिकेतही हीच परिस्थिती आहे. पण तेथल्या लोकांच्या कर्तृत्वाची दुसरीही बाजू आपण अभ्यासिली पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, लोकसत्ता, यांचा अमेरिका हा आजच्या जगातला एकमेव आधारस्तंभ आहे. या महनीय तत्त्वांचे जगातल्या प्रत्येक देशात संरक्षण करण्याची जिम्मेदारी आपल्या शिरावर आहे, अशीच अमेरिकनांची धारणा आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ते काय काय प्रयत्न करीत आहेत, कोणत्या योजना त्यांनी आखल्या आहेत, त्याची माहिती अमेरिकेविषयीच्या दुसऱ्या लेखात दिली आहे. अमेरिका हे भांडवलशाही राष्ट्र आहे. आणि भांडवलशाही म्हणजे उन्मत्त, स्वार्थी, मदांध, आक्रमक, युद्धपिपासु सत्ता हे समीकरण आपल्या डोक्यांत बसून गेले आहे. हे समीकरण आणखी दृढ करण्याचा कम्युनिस्ट अखंड प्रयत्न करीत असतात. भारत सरकार अमेरिकेशी स्नेहसंबंध ठेवते म्हणून कम्युनिस्ट आपल्या शास्त्यांना, अमेरिकेचे लाचार गुलाम, त्यांचे बूटपुश्ये अशा चीन- रशियातून लिहून आलेल्या शिव्या हुकमाप्रमाणे देत असतात. त्यामुळे व अमेरिकेचा इतिहास आपणांस पटत नसल्यामुळे त्या थोर राष्ट्राविषयी आपल्या मनात फार विकृत समज होण्याचा संभव आहे. त्यामुळे आपलीच अतिशय हानी होईल. आपले शत्रु-मित्र आपल्याला ओळखता येऊ नयेत ही फार नामुष्कीची गोष्ट आहे. अमेरिकेच्या इतिहासाचा अभ्यास आपल्या विद्यालयातून केला जावा अशी सूचना मी केली आहे.
 'आधी समाजकारण की आधी राजकारण' हा वाद महाराष्ट्रांत एके काळी फार चिघळला होता. कमीत कमी चाळीस वर्षे या वादाने महाराष्ट्राचे रक्त आटवले आहे. वास्तविक ही दोन्ही कारणे परस्परपोषक आहेत. एकावाचून दुसरे पंगूच राहणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या विचाराने व प्रत्यक्ष कृतीने हा विचार महाराष्ट्राच्या पुढे मूर्त केला आहे. राजकारण ही तरवार असली तर समाजकारण ही ढाल आहे, असे त्यांचे मत आहे त्यांचे एतद् विषयक विचार 'समाजकारणाची बचावती ढाल' या लेखात मांडले आहेत.
 अशा रीतीने आरंभी संगीतल्याप्रमाणे वैयक्तिक आणि सामाजिक याविषयीची अनेक तत्त्वे, अनेक सिद्धान्त व अनेक वाद यांचा परामर्श या निबंधसंग्रहात घेतलेला आहे. तरुण वाचकांनी या तत्त्वांचा मूळ ग्रंथापर्यंत जाऊन कसून अभ्यास केला तर ते त्यांच्या मनोविकासाच्या दृष्टीने व भारताच्या लोकशाहीच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत हितावह होईल.

२५- ८- ६३
पु. ग. सहस्रबुद्धे