वैय्यक्तिक व सामाजिक/मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य
हिंदू समाजात चातुर्वर्ण्य संस्था अत्यंत दृढमूल झालेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण समाजात असतात अशी हिंदूंची श्रद्धा आहे. हे सर्व वर्णं जन्मसिद्ध आहेत. ब्राह्मण हा जन्मतःच ब्राह्मण, क्षत्रिय जन्मतःच क्षत्रिय असतो. त्या त्या वर्णाचे जे गुण ठरलेले आहेत ते जन्मतःच त्या वर्णात जन्मलेल्या व्यक्तीच्या ठायी असतात असा प्राचीन शास्त्रकारांनी सिद्धान्त केलेला आहे. आणि आपसात विवाह केल्यास ते जन्मसिद्ध गुण नष्ट होतील अशी कल्पना असल्यामुळे तसा विवाह हा हिंदुशास्त्रकारांनी निषिद्ध मानलेला आहे. असे असूनही असे विवाह होत राहिले. आणि या वर्णसंकरातून व इतरही अनेक कारणांनी सध्याच्या जाती, पोटजाती निर्माण झाल्या. त्या जातीही विशिष्ट गुणांनी संपन्न आहेत अशी श्रद्धा पुढे रूढ झाली आणि त्यातही आपसात विवाह करणे निषिद्ध ठरले. आणि अशा रीतीने हिंदुसमाजाची अनेक शकले होऊन त्याची संघटना मोडली.
विशिष्ट वर्णात आणि जातीत विशिष्ट गुण असतात हा भ्रम आहे हे इतिहासाने व अलीकडे विज्ञानवेत्त्यांनी दाखवून दिले आहे. पण आपला समाज रूढी नष्ट करण्यास अजून फारसा तयार नाही. अलीकडे जाति-पोटजाती मोडल्या पाहिजेत, वर्णव्यवस्था घातक आहे, हे मत रूढ होत चालले आहे. पाश्चात्त्यांनी निर्माण केलेली भौतिकशास्त्रे, अनुवंशाचे त्यांनी केलेले संशोधन, या नव्या शास्त्रातून निर्माण झालेला व्यक्तिवाद, त्यावर आधारलेल्या लोकसत्तेच्या कल्पना यांमुळे जन्मनिष्ठ उच्चनीचतेच्या आधारावर पोसलेली जातिव्यवस्था व वर्णव्यवस्था कोलमडून पडत असून कालांतराने तरी ती नष्ट होईल अशी आशा वाटू लागली आहे.
पण दैवविलसित असे विचित्र आहे की याच वेळी कार्ल मार्क्स याने एका नव्या चातुर्वर्ण्याची प्रस्थापना करून ठेवली आहे. अमक्या जातीचे अमके गुण ही कल्पना जुन्या चातुर्वर्ण्याच्या बुडाशी होती तर अमक्या आर्थिक स्थितीचे अमके गुण ही कल्पना नव्या चातुर्वर्ण्याच्या बुडाशी आहे. आणि जुनी चातुर्वर्ण्य व्यवस्था जितकी समाजाला घातक ठरली तितकीच ही नवी ठरणार आहे- नव्हे ठरली आहे. ब्राह्मण-क्षत्रियांच्या अंगी श्रेष्ठ गुण असणारच असे गृहीत धरून त्यांना तसे गुण अंगी नसतानाही समाजाने श्रेष्ठ पदवी दिल्यामुळे समाजाचा घात झाला. आणि त्या ब्राह्मण-क्षत्रियांचाही झाला. ब्राह्मण, विद्वान् असो की अविद्वान् असो, तो वंद्य मानलाच पाहिजे, आणि राजा कसाही असला तरी तो विष्णूचा अंश असतोच, असा मनूचा दंडक आहे. या अत्यंत भ्रामक व अशास्त्रीय आज्ञा समाजाच्या विनाशाला कारण झाल्या हे इतिहास सांगत आहे. गुण नसतानाहि ब्राह्मणाला वंद्य मानल्यामुळे त्या जातीचा अध:पात झाला आणि खालच्या वर्णाच्या ठायी गुण असूनही त्यांना ब्राह्मण-क्षत्रियांची पदवी न मिळाल्यामुळे त्यांची कर्तृत्वशक्ती कुजून गेली. मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्यामुळे हेच घडत आहे. पण जुने शास्त्री पंडित त्या चातुर्वर्ण्याला जसे अंधश्रद्धेने कवटाळून बसले होते तसेच कम्युनिस्ट शास्त्री-पंडित या नव्या चातुर्वर्ण्याला तशाच भोळ्या अंधश्रद्धेने कवटाळून वसलेले आहेत. ही नवी भोळी अंधश्रद्धा समाजाला तितकीच घातक ठरणार असल्यामुळे मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्याचे येथे विवेचन करावयाचे आहे.
मोठे भांडवलदार (बूर्झ्वा), लहान व्यापारी- दुकानदार (पेटी बूर्झ्वा), सुशिक्षित बुद्धिजीवी (इंटेलिजेन्सिया) आणि गिरणी कारखान्यांतील कामगार असे मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्यात चार वर्ण आहेत. मार्क्स त्यांना वर्ग म्हणतो. पण त्या वर्गांना त्याने वर्णरूपच दिले असल्यामुळे वर्ण शब्द तितकाच अन्वर्थक आहे. या वर्गाशिवाय मोठा शेतकरी, लहान शेतकरी, शेतमजूर असे जातिपोटजातीप्रमाणेच, अनेक वर्गापवर्ग नव्या चातुर्वर्ण्यात आहेत.
जुन्या व्यवस्थेत ब्राह्मण हा जसा सर्वश्रेष्ठ होता तसा नव्या व्यवस्थेत कामगार हा सर्वश्रेष्ठ आहे. सर्व वर्गांचा तो अग्रणी आहे. मार्क्सवादात जे अनेक महत्त्वाचे सिद्धान्त आहेत त्यांत, सध्याच्या युगात जी क्रांती व्हायची तिचा नेता कामगारच असणार, कामगारांच्या नेतृत्वाखालीच ती क्रांती यशस्वी होईल, जुनी भांडवलशाही समाजरचना नष्ट करून तिच्या जागी साम्यवादी समाजरचना निर्माण करण्यास कामगार हाच समर्थ आहे, असा एक सिद्धान्त आहे. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या मार्क्सवादाच्या आद्यग्रंथापासून आजपर्यंत झालेल्या देशोदेशींच्या बहुतेक सर्व ग्रंथांमध्ये हा सिद्धान्त आवर्जून सांगितलेला आढळतो. गेल्या शतकामध्ये जगातील बहुतेक देशांत भांडवलशाहीची सत्ता प्रस्थापित झाली होती, आशिया खंडातील चीन, तुर्कस्थान, अरबस्थान, यांसारख्या देशांत जुन्या सरंजामशाहीचे अवशेष अजूनही होते. पण तेथेही भांडवलशहांचेच अधिराज्य स्थापन झाले होते. अशा या सर्व सत्ताधीश भांडवलशहाला प्रतिकार करून त्याच्याशी सामना देऊन, लढा करून त्याचे निर्दालन करण्याचे सामर्थ्य मार्क्सच्या मते फक्त अर्वाचीन शहरांतील गिरण्याकारखान्यांतून भांडवलशाहीबरोबर निर्माण झालेला जो कामगारवर्ग त्याच्याच ठायी असू शकते. बुद्धिजीवी वर्ग, व्यापारी, शेतकरी इ. वर्ग हे या कार्याची धुरा अंगावर घेण्यास कोणत्याही दृष्टीने लायक नाहीत. धनसत्तेला वश होऊन यापैकी बहुतेक भांडवलाचे दास होतात. किंवा अज्ञान, दुफळी, उदासीनता यांमुळे या मोठ्या कार्याला लागणारे सामर्थ्य त्यांच्या ठायी निर्माण होऊ शकत नाही, असे मार्क्सचे मत होते.
मार्क्स, एंगल्स यांनी हे मत सांगितल्याला शंभर वर्षे होऊन गेली; तेवढ्या अवधीत जगाच्या एकंदर स्वरूपात जमीन-अस्मानाचे अंतर पडले आहे. अनेक देशांत क्रांत्या झाल्या, अनेक साम्राज्ये रसातळास गेली, कित्येक नवी राष्ट्रे उदयास आली. विज्ञानाची कल्पनातीत प्रगती होऊन जीवनाविषयीचा मानवाचा दृष्टिकोनच पालटून गेला; धनसत्ता, वांशिक, गुण, भौगोलिक परिस्थिती याचे नव्याने मूल्यमापन झाले, आणि या सर्वांमुळे भिन्न जमाती, वंश, वर्ग यांच्या अंगच्या सुप्त गुणांची प्रतीती आली व पूर्वी मानलेल्या कल्पना फोल ठरल्या. एवढे परिवर्तन झाल्यावर 'कामगार हाच क्रांतीचा नेता' या मार्क्समतात काही फरक पडला असेल, त्याच्या अनुयायांनी त्याला काही मुरड घातली असेल, असे वाटणे साहजिक आहे. पण तसे फारसे झालेले नाही. मार्क्सच्या मूळ तत्त्वज्ञानालाच जगातल्या पंडितांनी हटकले आहे. आणि कित्येकांनी त्याचे खंडनही केले आहे. पण मार्क्सचे अनुयायी म्हणून जगात जे प्रसिद्ध आहेत त्यांनी हे मत सोडलेले तर नाहीच. पण त्याला त्यांनी मुरडही घातलेली नाही. म्हणून त्या मताचे परीक्षण करणे अवश्य आहे.
'कामगार' हा शब्द प्रॉलिटरियट किंवा वर्किंग क्लास या अर्थी मराठीत रूढ झालेला आहे. शहरातला गिरण्या- कारखान्यातला मजूर असा मार्क्सवादाला त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. खाणी, गिरण्या, कारखाने, त्यांतील सर्व यंत्रसंभार ही सर्व धननिर्मितीची साधने होत. यांचे मालक ते भांडवलदार. आणि स्वतःच्या शरीरशक्तीवाचून ज्याच्याजवळ अर्थोत्पादनाचे, उपजीविकेचे कसलेही साधन नाही तो कामगार. शहरातला लहानसहान कारागीर व खेड्यातील शेतकरी हा कष्ट करूनच पोट भरीत असतो. तोही गरीबच असतो. पण कामगारापेक्षा तो निराळा आहे. अरी, रापी, कुऱ्हाड, करणी, चाक, गाढव, गाडा, बैल अशी काही तरी मालकीची साधने शहरातल्या इतर श्रमजीवी वर्गाजवळ असतात. आणि नांगर, कुळव, कासरे, अवजारे, बैलजोडी व थोडी जमीन अशी धनसाधने खेड्यातल्या शेतकऱ्याजवळ असतात. कामगाराजवळ यातले काहीही नसते. किंवा असे कोणतेही अर्थसाधन ज्याला नाही त्यालाच मार्क्स कामगार म्हणतो. क्रांतीचा नेता, आघाडीचा लढवय्या तो तोच. कसल्याहि प्रकारची जिंदगी अशी त्याच्याजवळ नसते. जगातल्या सर्व जिंदगीहीनांच्या मूर्धस्थानी तो असतो. आणि असा हा पूर्ण निर्धन कामगार मार्क्समताने क्रांतीचा नेता असतो.
कम्युनिस्टांचे पुढारी भाई डांगे यांनी भारताच्या प्राचीन इतिहासाची मीमांसा एका पुस्तकात केली आहे. त्यात प्रारंभी रानडे, राजवाडे, टिळक इ. महाराष्ट्रीय पंडितांनी राष्ट्राभिमानाची जी प्रेरणा भारताला दिली व त्यासाठी जी इतिहास-मीमांसा केली तिचा विचार केला आहे. इंग्रजांविरुद्ध लढण्यास त्यांनी येथल्या जाती-जमातींना सर्व वर्गांना- श्रीमंतांना, गरिबांना, कामगारांना, शेतकऱ्यांना आवाहन केले होते. यावर डांगे म्हणतात की अशा रीतीने हे सर्वच वर्ग क्रांतिकारक आहेत असे या पंडितांनी मानले, हा त्यांचा भ्रम होता. पुढच्या घडामोडीत या भ्रमाचा निरास होऊ लागला. आणि पुढच्या काळात शेतकरी व कामगार हे खरे क्रांतिकारक वगापुढे आले. बाकीच्या वर्गांनी लढा दिला असेल. पण तो स्वार्थासाठी; राष्ट्रासाठी नव्हे. हे कामगारांच्या ध्यानी आले, व मग हा वर्ग राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या संग्रामात आघाडीवर येऊन इतर वर्गांच्या हेतूंचे स्वरूप स्पष्ट करू लागला.
चिनी क्रांतीचे नेते माओ त्से तुंग, लिऊ शा ओ ची, चौ एन् लाय हे आपल्या भाषणात हाच सिद्धान्त मांडीत असतात. कामगारवर्ग ही चीनच्या क्रांतीची मूलशक्ति आहे. आमच्या क्रांतिसेनेचा तो अग्रदूत आहे. त्याच्या साह्यावाचून क्रांती यशस्वी होणार नाही. १९११ साली झालेली क्रांती अयशस्वी झाली याचे कारण हेच. त्या वेळी कामगारवर्गाने त्या लढ्यात जाणिवेने भाग घेतला नव्हता. पुढे यश येत गेले ते कामगारांच्या व कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वामुळेच होय इ. विचार नेहमी आपल्याला चीनमधून आजही ऐकू येतात.
माझ्या मते कामगारांची ही स्तुतिस्तोत्रे अंती त्यांच्याच नाशाला कारणीभूत होतील. आज चीन- रशियामध्ये तशी झालीच आहेत. तुम्ही नेते, तुमची सत्ता, तुमचे राज्य अशी कामगारांची स्तोत्रे गाऊन या देशातील सत्ताधाऱ्यांनी कामगारांना गुलामापेक्षाहि खालच्या अवस्थेला नेऊन सोडले आहे. पूर्वी याच देशात असलेले संपाचे, संघटनेचे, नोकरी सोडण्याचे, कसलेही स्वातंत्र्य आता कामगारांना तेथे नाही. तशी त्यांनी जरा चळवळ केली तर त्यांना सैबेरियातील कोंडवाड्यात इहलोकीचा नरक भोगावा लागतो. भांडवलदारांच्या विरुद्ध चिथावणी देण्यासाठी म्हणूनच केवळ अशी कामगारांची अमर्याद स्तुती मार्क्सवादी लोकांनी केली असती तर ते एकवेळ क्षम्य झाले असते. पण शेतकरी व कामगार यांच्यासंबंधी तुलना करताना मार्क्सवादी हीच वृत्ती ठेवतात. क्रान्तीसाठी शेतकऱ्यांचे साह्य कामगारांना हवे पण राजसत्ता ही कामगारांच्या हातीच राहिली पाहिजे. शेतकरी हा कामगाराच्या अधिकाराखालीच राहिला पाहिजे असा लेनिनचा दण्डक होता. (लेनिन, सिलेक्टेड वर्क्स, खंड २ रा- पृ. ८५३. फॉरिन लँग्वेज पब्लिशिंग हौस, मॉस्को) [या लेखात फॉरिन लँग्वेज पब्लिशिंग हौस, मॉस्को या संस्थेने प्रकाशित केलेल्या (१) मार्क्स-एंगल्स- सिलेक्टेड वर्क्स, खंड पहिला (२) खंड २ रा (३) लेनिन- थर्ड इंग्लिश एडिशन आणि (४) लेनिन- सिलेक्टेड वर्क्स, खंड २ रा- या चार ग्रंथांतून मी उतारे देणार आहे. एवढाली नावे पुन्हा देणे त्रासाचे असल्यामुळे दर वेळी कंसातल्या आकड्यांचा फक्त निर्देश केलेला आहे.] यामुळे कामगारवर्गाची अपरिमित हानी झाली आहे. बुद्धिजीवी वर्ग, शेतकरी, व्यापारी यांना असाध्य असलेली क्रांती आपण करणार आहो, आपल्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य आहे अशा मार्क्सप्रणीत भ्रमात कामगार राहिला तर रशियातल्या प्रमाणेच त्याची सर्वत्र स्थिती होईल अशी भीती वाटते.
कामगारांच्या ठायी खरोखरच असे काही अद्भुत सामर्थ्य असते तर ती मोठी भाग्याची गोष्ट होती. पण दुर्दैवाने तसे नाही हे गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासाकडे पाहताच सहज ध्यानात येईल. ते ध्यानी येऊन मार्क्सनिर्मित गंधर्वनगरीतून वास्तव जगात कामगारांनी उतरणे त्यांच्याच हिताच्या दृष्टीने अवश्य आहे.
१९१४ साली युरोपात पहिले महायुद्ध सुरू झाले. त्या वेळी युरोपातल्या कामगारांकडून मार्क्सवादाच्या काय अपेक्षा होत्या व त्या त्यांनी कितपत खऱ्या केल्या हे पाहणे उद्बोधक होईल. हे महायुद्ध म्हणजे लेनिनच्या मते साम्राज्यशाही युद्ध होते. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन- कोणचाही देश घ्या. तेथल्या भांडवलदारांनी हे युद्ध पेटविले होते. आपापल्या साम्राज्याचे रक्षण व विस्तार हा त्यांचा स्वार्थी हेतू त्यामागे होता. त्यात कोणाचाही जय झाला असता तरी कोणच्याही देशातल्या कामगारवर्गाचा काहीच फायदा व्हावयाचा नव्हता. म्हणून १९१२ साली व त्याच्याही आधीपासून लेनिनने युरोपांतल्या कामगारांना असा आदेश दिला होता की युद्ध सुरू होताच प्रत्येक देशातील कामगारवर्गाने आपल्या देशाच्या सरकारचा पराभव घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (४-४६). सरकारशी सहकार्य करून कामगारांनी युद्धात सामील होणे हे तर सुतराम् वर्ज्य होते. कारण राष्ट्रनिष्ठा ही संकुचित भावना आहे. कामगारांचे दुःख हे जागतिक दुःख आहे. इंग्लिश कामगाराला इंग्लिश भांडवलदार हा जवळचा नाही. तोच त्याचा शत्रू आहे. जर्मन, फ्रेंच कामगार हा त्यांचा मित्र आहे. फ्रेंच कामगारांचा हाच दृष्टिकोन असला पाहिजे. राष्ट्रभावनेला त्यांनी बळी पडता कामा नये. त्यांना आंतरराष्ट्रीय दृष्टी असली पाहिजे. याच हेतूने मार्क्सने १८६४ साली प्रथम आंतरराष्ट्रीय कामगार संघ (फर्स्ट इंटरनॅशनल) स्थापना केला होता. तो मोडल्यावर पुन्हा १८८९ साली सेकंड इंटरनॅशनलनची स्थापना त्याच्या अनुयायांनी केली होती. आणि तेव्हापासून पश्चिम युरोपातल्या देशांतील कासगारांना कम्युनिझमचे, आंतरराष्ट्रीय भावनेचे व नेतृत्वाचे शिक्षण दिले जात होते. लेनिनने हे कार्य अगदी थेट १९१४ पर्यंत युद्ध सुरू झाल्यानंतरही चालविले होते.
इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व अमेरिका ही औद्योगिक दृष्ट्या अत्यंत प्रगत अशी राष्ट्रे होती. पहिल्या तीन देशांत मार्क्स व एंगल्स यांनी स्वतःच कार्य केले होते. आणि आपल्या अनेक भाषणांतून तेथील कामगारवर्गाला त्यांनी अनेक प्रशस्तिपत्रे दिलेली होती. इंग्लंडमधील कामगारवर्ग हा तर औद्योगिक क्रान्तीचा पहिला पुत्र. तो अत्यंत वर्गजागृत, संघटित व नेतृत्वगुणांनी संपन्न असा होता. जर्मन, फ्रेंच कामगारांची थोडीफार याच शब्दात मार्क्सने स्तुती केली आहे. फ्रेंच कामगारांनी तर १८७० साली क्रांती घडवून एक दोन महिने आदर्श समाज निर्माणही केला होता. तो ७२ दिवसच टिकला हे खरे. पण क्रांतीचा प्रत्यक्ष अनुभव तेथील कामगारांना मिळाला होता, हे आपण विसरता कामा नये. असे असल्यामुळे कम्युनिस्ट क्रांती प्रथम या देशात होणार असे भविष्य मार्क्सने वर्तविले होते. तात्पर्यार्थ असा की महायुद्धात पडलेल्या ब्रिटन फ्रान्स, जर्मनी इ. देशांतील कामगारवर्ग क्रांतीला अवश्य त्या सर्व गुणांनी १९ व्या शतकाच्या अखेरीलाच संपन्न झालेला होता.
अशा या कामगारवर्गाने पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा काय केले ? त्याने मार्क्सवादाला शोभेसे काहीही केले नाही. त्या त्या देशातील कामगार, क्रांतीचा विचारही मनात न आणता, लेनिनचा संदेश दुसऱ्या कानाने सोडून देऊन राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन आपल्या साम्राज्यशाही सरकारच्या सैन्यात देशातल्या इतर नागरिकांच्या इतक्याच आवेशाने लढू लागले. आणि शेवटपर्यंत लढत राहिले. या देशांतून मार्क्सच्या संस्था स्थापन झाल्या होत्या, कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती, कामगारांच्या चळवळी कार्य करीत होत्या, असा वासही युद्ध संपेपर्यंत आला नाही. युद्ध संपल्यावर वर्ष सहा महिने मार्क्सवादी उठावणीची थोडी लक्षणे दिसू लागली होती. पण ती खोटी होती. आणि ती थोड्याच अवधीत नाहीशी झाली. १८६४ पासून पन्नास वर्षे मार्क्स, एंगल्स, लेनिन, रोझा लक्झेंबर्ग इ. नेते या कामगारांना शिक्षण देत होते. त्यांना क्रांतीचे नेते, आघाडीचे पथक इत्यादी पदव्यांनी गौरवीत होते. पण त्यांनी नेतृत्व केले नाही. आणि आश्चर्य असे की त्यानंतर पंचवीस वर्षांनी झालेल्या दुसऱ्या महायुद्धातही या क्रांतीच्या नेत्यांचा कोठे पत्ता लागला नाही.
मध्यंतरी पंचवीस वर्षांच्या काळात कम्युनिस्ट पक्ष पुन्हा सगळ्या देशात स्थापन झाले होते. रशियन क्रांतीचे यश त्यांना प्रेरणा देत होते. थर्ड इंटरनॅशनल स्थापन होऊन तिचे जाळे सर्वत्र विणले गेले होते. नेते आता जास्त अनुभवी व मुरब्बी झाले होते. पण इटली व जर्मनी या देशात सर्व कामगार ८। १० वर्षांतच फॅसिस्ट झाले. मार्क्सने कामगारांचे एक वैशिष्ट्य असे सांगितले आहे की, ते क्रांती करतात ती केवळ स्वतःसाठी करीत नाहीत. साम्राज्यशाहीच्या, भांडवलशाहीच्या गुलामगिरीतून सर्व समाज मुक्त करणे हे त्यांचे ध्येय आहे. इतर वर्ग केव्हा केव्हा क्रांतीत सामील होतात. पण ते केवळ स्वार्थी दृष्टीने. स्वतःच्या वर्गाचे कल्याण एवढीच संकुचित दृष्टि त्यांना असते. कामगारांचे तसे नाही. समाजातला प्रत्येक अन्याय, जुलूम, विषमता, पाशवी सत्ता नष्ट करणे यासाठीच कामगारांचा अवतार आहे (१.४२). धार्मिक, सामाजिक, कसलाही जुलूम ते सहन करणार नाहीत. धर्माचे तत्त्वज्ञान, वंशश्रेष्ठतेचे तत्त्वज्ञान या सर्व कल्पना भांडवलशाहीने जनतेला फसविण्यासाठी, तिला अधिकच दास्यात गुंतविण्यासाठी, तिची क्रांतिवृत्ती नष्ट करण्यासाठी पसरविलेल्या आहेत, हे फक्त कामगारच जाणतात. आणि म्हणूनच ते साम्राज्यशाहीचे कट्टे वैरी झालेले असतात. क्रांतीचे नेतृत्व करण्याचे त्यांना सामर्थ्य आलेले असते ते यामुळेच. पण १९३९ साली इटालियन व जर्मन कामगारांच्या ध्यानात हा आपला श्रेष्ठ गुण आला नाही. व ते दोघेही आपापल्या साम्राज्यशाही फॅसिस्ट सरकारच्या मागे निष्ठावंत सेवकांसारखे उभे राहिले. जर्मनीत १९३० सालापासून १९४५ साली युद्धात पराभव होईपर्यंत मार्क्सवादाने अत्यंत गर्हणीय ठरविलेल्या तत्त्वज्ञानाचा वंशश्रेष्ठता, राष्ट्रभावना, साम्राज्यविस्तार, आक्रमक राष्ट्रवाद, यांचा- नंगा नाच चालू होता. पण अत्यंत वर्गजागृत, अनुभवी, मार्क्सवादात मुरलेले आणि संघटनाकुशल असे तेथले कामगार जर्मन समाजाचे नेतृत्व करू शकले नाहीत. अत्यंत निष्ठेने वंशश्रेष्ठतेच्या कल्पना आत्मसात करून ते हिटलरच्या मागे उभे होते. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका येथे दण्डसत्ता प्रस्थापित झाली नाही. पण तेथे कम्युनिस्टप्रणीत क्रान्तीही झाली नाही. ब्रिटनमध्ये तर निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष नामशेषच झाला. कामगारांच्या नेतृत्वाची ससेहोलपट झाली. तेथे दहा दहा लाखांच्या कामगारांच्या संघटना आहेत. पण त्यांनी मार्क्सवादाचा कधीही स्वीकार केला नाही. आणि भांडवलशाहीला मार्क्सच्या दृष्टीने पाहता, त्यांनी कसलाच धक्का दिलेला नाही. फ्रान्समध्ये प्रकार थोडा निराळा आहे. पण तो जास्त लाजिरवाणा आहे. फ्रान्समध्ये बलिष्ठ व प्रभावी असा कामगारांचा पक्षच कधी निर्माण होऊ शकला नाही. दुफळी, फाटाफूट, यादवी यांनी हा पक्ष नेहमी चिरफळलेला व म्हणून बलहीन व निस्तेज असा असतो. जगातल्या सर्व कामगारांची आर्थिक स्थिती सारखी, दुःखे सारखी, त्यांचे कार्य एक, ध्येय एक; म्हणून त्यांची एकी होणारच असा मार्क्सचा सिद्धान्त आहे. फ्रान्सच्या लहानशा परिसरातसुद्धा तो खरा ठरत नाही. कारण तो मुळातच भ्रामक आहे.
रशियात १९१७ साली क्रांती झाली. त्या आधी १९०५ साली अशीच जोराची उठावणी झाली होती. या दोन्ही उत्थापनांत शहरातील कामगारवर्गच प्रामुख्याने दिसत होता हे खरे आहे. लक्षावधि कामगारांनी या वेळी संप केले. सरकारी यंत्रणा ढिली केली आणि शेवटी ही चळवळ वाढत जाऊन तीतच झारशाहीचा बळी पडला. हे सर्व खरे आहे. पण याला कामगारांचे नेतृत्व म्हणावयाचे ते कोणत्या अर्थाने ? नेतृत्व म्हणजे काय ?
नेतृत्वाचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जुन्या समाजाची रचना कोणच्या तत्त्वावर झाली आहे, कोणची धर्मतत्त्वे, अर्थतत्त्वे, वंशतत्त्वे राजकीय तत्त्वे तिच्या बुडाशी आहेत, ती तत्त्वे समाजाच्या उत्कर्षाच्या आड का येतात, दुसऱ्या कोणच्या तत्त्वाअन्वये समाजरचना करणे अवश्य आहे, तशी समाजरचना इतिहासात केली असल्यास तिला कितपत यश आले, आले नसल्यास का आले नाही, इत्यादि समाजशास्त्रातील मूलमहातत्त्वांचा अत्यंत सखोल अभ्यास करून नवसमाजनिर्मितीचे तत्त्वज्ञान सिद्ध करणे हे नेतृत्वाचे पहिले कार्य आहे. आणि त्यानंतर हे तत्त्वज्ञान निर्भयपणे समाजाला शिकविणे, त्यासाठी व्याख्याने देणे, ग्रंथ लिहिणे, संस्था स्थापणे, वृत्तपत्रे चालविणे हे दुसरे कार्य आहे. हे करीत असताना सत्ताधाऱ्यांचा रोष अर्थातच होणार. तेव्हा त्यामुळे ओढवणाऱ्या सर्व आपत्तींना- तुरुंग, हद्दपारी, फाशी, संसाराचा उच्छेद- या सर्व आपत्तींना तोंड देण्याचे धैर्य या नेत्यांच्या ठायी असले पाहिजे. इतके सर्व गुण ज्यांच्या ठायी आहेत त्यांनाच नेतृत्व करता येते. समाज त्यांच्याच मागे जातो.
आता प्रश्न असा की हे नेतृत्व कामगारांना करता येईल काय ? साडेतीन हातांच्या देहाखेरीज कसलीही जिंदगी ज्याच्याजवळ नाही, कसलेहि शैक्षणिक धन ज्याच्याजवळ नाही (तसे असले तर तो कामगार राहणारच नाही, तो कसलीतरी जिंदगी प्राप्त करून घेईलच) त्या कामगाराला जुने तत्त्वज्ञान काय, नवे काय असावयास पाहिजे याचे ज्ञान होणे शक्य आहे काय ? लेनिननेच सांगितले आहे की ते शक्य नाही. 'व्हॉट इज टु बी डन् ?' या आपल्या प्रसिद्ध लेखात त्याने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, कामगारांना स्वतः नेतृत्व कधीही करता येणार नाही. ते इतर बुद्धिजीवी वर्गांकडून आले पाहिजे. कामगार फारतर कमी तास, वेतनवाढ एवढ्यापुरत्या संघटना स्वतःहून करू शकतील. यापलीकडे त्यांची मजल जाणे शक्य नाही. नवतत्त्वज्ञान निर्माण करण्यास इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान यांचे सम्यक् आकलन होणे अवश्य आहे. हे तत्त्वज्ञान सुशिक्षित धनसंपन्न वर्गातूनच निर्माण होणे शक्य आहे. मार्क्स, एंगल्स हे स्वतः धनिक बुद्धिजीवी वर्गातलेच होते हे लेनिनने मुद्दाम येथे निदर्शनास आणून दिले आहे. रशियातही याच वर्गाने प्रथम समाजवादाचे तत्त्वज्ञान सिद्ध केले आणि नंतर कामगारवर्गात प्रसृत केले (३.१२६). कामगारांना या तत्त्वाची शिकवण देताना ओढवणाऱ्या आपत्तींना लेनिन, स्टॅलिन, ट्रॉट्स्की, झिनेव्हिफ्, रॅडेक् इ. नेते डरले नाहीत. तळहाती शिर घेऊनच त्यांनी ही आग रशियाभर पसरून दिली. आणि म्हणूनच ते नेते ठरले.
नेतृत्व याचा अर्थ असा आहे. लेनिननेच तो स्पष्ट केला आहे. आणि जगातल्या प्रत्येक देशात इतिहासाने तो दाखवून दिला आहे. ज्ञानसंपन्नता हा नेतृत्वाचा पहिला गुण आहे. हे ज्ञानधन कामगारांच्या जवळ मुळीच नसते, आणि सध्याच्या स्थितीत ते असणेही शक्य नाही. चीनच्या क्रांतीचे नेतृत्व करणारे सर्व लोक पाश्चात्त्यविद्याविभूषीत होते. त्यातले बहुसंख्य लोक पाश्चात्त्य विद्यापीठाचे पदवीधर होते. तुर्कस्थान, अरबस्थान, हिंदुस्थान, जपान, इंडोनेशिया यांपैकी प्रत्येक देशाच्या नेतृत्वाचा हाच इतिहास आहे. आणि नेतृत्वाचा जो अर्थ वर दिला आहे त्यावरून दुसरे काही असणे शक्य नाही हे सहज ध्यानात येईल. लेनिनचे जे पंधरा-वीस निकटचे सहकारी होते त्यात कामगार किंवा त्या वर्गातून आलेला असा एकही नव्हता. असे असूनही कम्युनिस्ट क्रांतीचे नेतृत्व कामगारच करू शकतील, इतरांना ते शक्य नाही हा आपला हेका सोडण्यास लेनिन तयार नाही. कारण त्या त्या वर्गाचे गुण मार्क्सने ठरवून दिलेले आहेत! तसे वेदवचन आहे.
कामगारांप्रमाणेच बुद्धिजीवी वर्गाचे गुणही मार्क्सवादाने सांगून टाकले आहेत. नेतृत्व त्यांनाच शक्य आहे इत्यादि सिद्धान्त सांगूनही हा वर्ग नेहमी भांडवलाचा दास असणार, तो क्रांतिविरोधी, प्रतिगामी वृत्तीचाच असणार, तो कामगार- क्रांतीला दगा देणार हे कम्युनिस्टांचे तत्त्वज्ञान अबाधितच आहे ! जातींच्या बाबतीत बोलताना ज्याप्रमाणे 'त्याचा जातगुणच तो' असे म्हणतात त्याचप्रमाणे त्याचा वर्गगुणच तो असे मार्क्सवादात म्हणण्याची चाल आहे. बुद्धिजीवी वर्गच नेतृत्व करू शकेल, कामगारांना ते शक्य नाही असे एके ठिकाणी म्हणून रशियातील बुद्धिजीवी वर्गाने कामगारांना दगा देऊन भांडवलाचे दास्य पत्करले असेही लेनिनने म्हटले आहे. आणि येथेच न थांवता हा त्याचा वर्गगुणच आहे असेही त्याने म्हटले आहे; (३.४१३). या संबंधात लेनिनने इतकी परस्परविरुद्ध व विसंगत विधाने केली आहेत की शास्त्रवचन व प्रत्यक्ष व्यवहार यांचा समन्वय करताना जुन्या सनातन शास्त्रीबुवांनी सुद्धा इतकी केली नसतील (पहा ३ पृ. ११५, १२६, ४१३). अमक्या वर्गाचे अमके गुण, तमक्याचे तमके असा मार्क्सप्रणीत भ्रामक सिद्धान्त अंधश्रद्धेने स्वीकारल्यानंतर दुसरे काय होणार ? जन्मावर माणसाचे गुण अवलंबून असतात हा सिद्धान्त जुन्यांनी केला होता, तर आर्थिक स्थितीवर ते अवलंबून असतात असा नवब्रुवांनी केला आहे. दोघेही सारखेच अंध, सारखेच अविवेकी !
रशियात १७ साली क्रांती झाली. त्यानंतर नवरचना करावयाची होती. त्यासाठी शास्त्रज्ञ, इंजिनीयर, डॉक्टर, तत्त्वज्ञ, पंडित यांची आवश्यकता होती. त्यांच्यावाचून जीवनाची पुनर्घटना करणे अशक्य आहे, हे लेनिनने कामगारांना स्पष्ट बजावले आहे. आता हे बुद्धिजीवी भांडवलाचे दास असल्यामुळे त्यांना विश्वासार्ह कसे मानावे, असा कामगारांपुढे- खरे म्हणजे कामगारांच्या बुद्धिजीवी नेत्यांपुढे- प्रश्न होता. त्या वेळी लेनिन म्हणाला की "आपले कार्य पाहून हे विद्यावंत लोक हळूहळू आपल्याकडे आकृष्ट होत आहेत. आणि काही दिवसांनी ते आपल्याशी समरस होतील. आपलेच होतील" (४.४४८). आता हे जर लेनिनला दिसत होते तर बुद्धिजीवी वर्गाचा जातगुणच क्रांतिविरोधी आहे, ते भांडवलदाराचे दास असतात अशी त्यांची निर्भर्त्सना पावलोपावली जी त्याने केली आहे ती कशासाठी ? काही वेळा या विद्यावंतांनी कम्युनिस्ट क्रांतीला विरोध केला होता हे खरे. पण तसा कामगारांनीही केला होता. आणि इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स येथे तर त्यांनी कम्युनिस्ट क्रांतीची पाळेमुळे खणून टाकली आहेत. यावरून आर्थिक स्थितीवर गुण अवलंबून नसतात हे लेनिनच्या व इतर कम्युनिस्टांच्या ध्यानात येण्यास हरकत नव्हती. पण भगवान् मार्क्सने हे धर्म समस्त प्रजांना, आणखी लावून दिलेले आहेत, त्याला कम्युनिस्ट काय करणार ? वचनात् प्रवृत्तिः, वचनान्निवृत्तिः। अशी त्यांची बिचाऱ्यांची स्थिति आहे ! बुद्धिजीवी विद्यासंपन्न वर्ग हा नेहमी दगलबाज, प्रतिगामी, गुलामी वृत्तीचा, लाचार असतो व कामगारवर्ग पुरोगामी, क्रांतिकारक आणि नेतृत्व- गुणसंपन्न असतो हे त्यांनी घोकलेच पाहिजे. पां वा. गाडगीळ हे मार्क्सवादी आहेत. त्यांनी 'रशियन राज्यक्रांति' या आपल्या पुस्तकात कामगारांचा पुढीलप्रमाणे गौरव केला आहे. "यांत्रिक उत्पादनाने औद्योगिक क्रांती घडून आल्यावर तिच्या पोटी उदय पावलेल्या संघटित, वर्गजागृत व कार्यतत्पर अशा मजूरवर्गाने ध्येयवादी व क्रांतिशास्त्रनिपुण अशा पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकऱ्यांचे साह्य घेऊन रशियात क्रांती घडवून आणली." यावर भाष्य करण्याची जरूर नाही असे वाटते. एका छापखान्यांतील कामगारांनी प्रकाशकाच्या साह्याने, पां. वा. गाडगिळांच्या नेतृत्वाखाली, 'रशियन राज्यक्रांति' हा ग्रंथ रचला असे म्हणण्यासारखेच हे आहे. स्तुतीच्या नावाखाली आपली ही चेष्टा चालविलेली आहे, हे कामगारांच्या सहज ध्यानात येईल.
रशियात बोल्शेव्हिकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कामगारांनी प्रचंड उठावणी केली हे खरे आहे. पण त्या उठावणीत त्यांच्याइतक्याच संख्येने सैनिकही सामील झाले होते हे आपण विसरता कामा नये. पुढे त्याच्या दसपट संख्येने रशियन शेतकरीहि या चळवळींत प्रविष्ट झाला तेव्हा क्रान्तीचे यश प्रत्यक्षांत येऊ लागले. शेतकऱ्याच्या साह्यावाचून कोणतीहि क्रान्ति कधीही यशस्वी होणार नाही हें मार्क्स व त्याचे लेनिनसुद्धा सर्व अनुयायी यांना पूर्ण मान्य आहे. शेतकऱ्यांचे साह्य मिळवा असा लेनिनने ठायी ठायी आपल्या अनुयायांना उपदेश केला आहे. असे असूनही क्रान्तीचे नेते म्हणजे कामगारच असा मार्क्सचा, लेनिनचा व एकंदर मार्क्सवाद्यांचा आग्रह मात्र कायम आहे. शेतकऱ्याला क्रान्तीचे सामर्थ्य आहे हे ते कधीही मान्य करणार नाहीत.
मार्क्सवादाने कामगारांच्या सामर्थ्याची जी भरमसाट वर्णने केली आहेत त्यांत त्याच्या कल्पनेच्या शतांश जरी तथ्य असते तरी लेनिनच्या मागून स्टॅलिनने एकंदर रशियन जनतेची जी दुर्दशा करून टाकली ती त्याला शक्य झाली नसती. कामगार हे स्वतः भांडवलशाहीच्या मगरमिठीतून मुक्त होणारच; पण येथे त्यांचे कार्य संपत नाही. ते सर्व समाजाला त्यातून मुक्त करणार. भांडवलशाही, जमीनदारी, जातीय सत्ता, धर्मसत्ता यांचा ते नायनाट करणार. कसल्याही प्रकारचा अन्याय, जुलूम, विषमता ते सहन करणार नाहीत. आपल्या संघटनेच्या जोरावर ते सर्व प्रकारची विषमता नष्ट करून समता, व्यक्तिस्वातंत्र्य या पायावर लोकायत्त समाजाची निर्मिती करणार. कामगाराचे हे ऐतिहासिक कार्य आहे. आणि रशियन कामगार ते निश्चयाने पार पाडणारच याविषयी कुणीही शंका घेता कामा नये अशी त्यांची स्तोत्रे मार्क्सवादाने गायिली आहेत.
अशा या सर्वगुणसंपन्न, सर्वसत्ताधीश कामगारवर्गाची आज रशियात काय स्थिति आहे हे पाहिले म्हणजे मार्क्सच्या सिद्धान्ताची अशास्त्रीयता आपल्या ध्यानात येते. विषमता, जुलूम, अन्याय हेच रशियाच्या शासनाचे सध्या लक्षण आहे. लक्षावधि कामगार सैबेरियात कोंडवाड्यात पशूच्याही खालच्या अवस्थेत जीवन कंठीत आहेत. सत्ताधाऱ्यांची मर्जी फिरताच कोणालाही मध्यरात्री बायकामुलांतून कुत्र्यासारखे ओढून नेऊन फाशी देण्यात येते. विरोधी पक्ष स्थापण्याची कोणालाही परवानगी नाही. मुद्रणस्वातंत्र्याचें तर नावही नाही. सर्व मुद्रण सरकारच्या नियंत्रणात आहे. कामगारांना संघटना करण्याचे अथवा साधा संप करण्याचेही स्वातंत्र्य नाही. इतकेच नव्हे तर एक नोकरी सोडून दुसरी करण्याचे वा एक प्रांत सोडून दुसरीकडे जाण्याचेही स्वातंत्र्य नाही. कामगार हा साम्राज्यशाहीचा कट्टा शत्रू. त्याच्या देखतच व त्याच्या शरीरशक्तीला वेठीला धरूनच रशियाने हंगेरी, पोलंड, रुमानिया इ. देशांवर साम्राज्य स्थापन केले आहे. तेथील जनतेला ते कितपत मान्य आहे ते तेथे वरचेवर होणाऱ्या बंडाळ्यांवरून दिसतेच आहे. रशियन कामगार व तेथील एकंदर जनता सध्या किती दीन, किती पराधीन, किती व्यक्तित्वशून्य आहे हे स्टॅलिनच्या मरणानंतर फारच स्पष्टपणे दिसून आले. स्टॅलिन हा कामगारांचा परमेश्वर होता. अनन्यभावाने ते त्याला भजत होते. त्याची स्तोत्रे गात होते. त्या स्टॅलिनवर क्रुश्चेव्हने चोर, बदमाष, डाकू, दरवडेखोर, खुनी, यांच्यावर करावे तसे आरोप केले. त्याचे पुतळे हलविले, प्रतिमा नष्ट केल्या आणि त्याचे नावहि वृत्तपत्रांतून नष्ट करून कामगारांच्या या परमेश्वराला त्याने गटारात फेकून दिले. पण सर्व रशियात या परमेश्वराचा कैपक्ष घेऊन उठण्याचे, त्याच्या बाजूने एक शब्द उच्चारण्याचे धैर्य एकाही कामगाराने दाखविले नाही. कामगारांचा कणखरपणा, त्यांचे असामान्य सामर्थ्य, त्यांची प्रतिकारशक्ती ती हीच काय ? झारशाही उलथून पाडण्याचे श्रेय घेणाऱ्या रशियन कामगारांच्या नेतृत्वानेच हे सर्व चालले आहे ना ?
वास्तविक रशियन कामगारांचा यात फारसा दोष नाही. पिढ्यान् पिढ्या ते झारशाहीच्या जुलमाखाली होते. त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी १९१७ साली संग्राम केला व त्यात यश मिळवले हेच विशेष होय. पण त्यांचे नेते मार्क्सवादी होते हे त्यांचे दुर्दैव होय. सर्वथा अशास्त्रीय व भ्रांतिष्ट अशा आर्थिक तत्त्वांचा अवलंब त्यांनी केला आणि त्यामुळे आज रशियात कामगारांची दयनीय अशी अवस्था झाली आहे. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांच्या मार्क्सप्रणीत अत्यंत विकृत कल्पना इंग्लिश, अमेरिकन कामगारांनी स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे रशियन कामगारांपेक्षा ते कितीतरी बलिष्ठ, स्वतंत्र व सुखी आहेत. व्यक्तित्वाची ती रग रशियन कामगारात कधीच निर्माण झाली नाही. ती निर्माण होण्यास दीर्घकाळ लागत असतो. पण माणसाच्या आर्थिक स्थितीवरच त्याची संस्कृती अवलंबून असते आणि ती अगदी हिशेबाने असते असल्या विकृत तत्त्वज्ञानाचा रशियन नेत्यांनी स्वीकार केला आणि त्यामुळे आज रशियन कामगार हा नेता तर नव्हेच पण त्याच्याच नावाने सत्ता चालविणाऱ्या दण्डशहांचा दास होऊन बसला आहे.
येथवर पश्चिम युरोपांतील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी हे देश आणि रशिया यांच्या इतिहासावरून मार्क्सच्या वर्गपुराणाचे परीक्षण आपण केले. कामगारांनी क्रांतीचे नेतृत्व कितपत केले, बुद्धिजीवी वर्गाचे गुण कोणचे ह्याचाहि विचार केला. आता चिनी क्रांतीचा इतिहास काय सांगतो ते पाहूं.
चिनी क्रांती ही चिनी शेतकऱ्यांनी केलेली आहे. चीनमधल्या कामगारवर्गाचा तिच्याशी फार थोडा संबंध आहे. कामगारांच्याकडे तिचे नेतृत्व कधीच नव्हते. तेथील कम्युनिस्टांनी निर्माण केलेल्या लाल सेनेशी काही बाबतीत सहकार्य करून तिला साह्य करणे येवढेच तेथल्या कामगारांचे क्रांतिकार्य ! प्रारंभी माओ, चुतेह, लिलिसान इ. नेत्यांनी मार्क्सवादाच्या पढिक ज्ञानामुळे कामगार संघटनांवर भर दिला होता. पण यात कांही अर्थ नाही हे लवकरच त्यांच्या ध्यानी आले आणि त्यांनी आपले सर्व लक्ष ग्रामीण विभागातील शेतकऱ्यांवर केंद्रित केले. त्यांची आठवी सेना ही शेतकऱ्यात जागृति निर्माण करणारी एक फार मोठी किसानसंघटना होती. तिने सर्व चीन जागृत केला आणि या जागृत किसानांच्या साह्यानेच कम्युनिस्ट पक्षाने चीनमध्ये क्रांती यशस्वी केली. आज चीनचे नेते इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे 'कामगारच येथल्या क्रांतीचे यशस्वी नेते आहेत,' अशी भाषणे करीत आहेत. पण त्यांच्या चळवळीचा इतिहास व त्यांची पूर्वीची भाषणे ही याच्या सर्वस्वी विरुद्ध आहेत. आज ते तशी भाषणे करीत असले तर सत्य लपवून दुसरे काही साधण्याचा त्यांचा हेतू असला पाहिजे. किंवा आम्ही मार्क्सवादीच आहोत हा भ्रम सोडणे त्यांना कठीण जात असले पाहिजे. ते काहीही असले तरी चीनच्या क्रांतीच्या नेतृत्वाशी तेथल्या कामगारवर्गाचा कसलाही संबंध नव्हता हे ऐतिहासिक सत्य आहे. चीनची क्रांती शेतकऱ्यांनी केली आहे. जमिनीच्या आसक्तीमुळे त्यांच्यात क्रांतिकारकत्व असणे शक्य नाही असे मार्क्स म्हणाला होता. याच श्रद्धेमुळे लेनिनने ज्यांच्यांत जागृती करण्याचा प्रारंभी फारसा प्रयत्न केला नाही, (४.४५४,५५), देशभर विखुरलेले असल्यामुळे ज्यांच्यात संघटना करणे अवघड आहे असे मार्क्सने सांगून ठेविले होते, शेतात काम करतांना तो श्रमजीवी असतो पण धान्य विकताना तो 'पेटी बूर्झ्वा' होतो आणि अशा द्विधा वृत्तीमुळे तो क्रांतीला नकळत विरोध करतो, असे ज्या शेतकऱ्याबद्दल लेनिन म्हणाला होता, (४.४७९), त्याच शेतकऱ्यांनी चीनमध्ये क्रान्ती घडवून आणली. आमची क्रान्ती आम्ही मार्क्स- लेनिन- स्टॅलिन यांच्या तत्त्वाअन्वये घडविली असे चीनचे नेते आज म्हणत आहेत, पण तो त्यांचा भ्रम आहे. चातुर्वर्ण्य या शब्दाचा मोह जसा भारतीय नेत्यांना कधी टाकता येणार नाही त्याचप्रमाणे मार्क्सवाद या शब्दाचा मोह चिनी कम्युनिस्टांना टाकता येणार नाही, असे वाटते. वास्तविक मार्क्सची आंतरराष्ट्रीय दृष्टी त्यांनी प्रारंभापासूनच सोडून देऊन राष्ट्रनिष्ठेला प्राधान्य दिले, कामगारांच्या नेतृत्वाचा छंद थोड्याशा प्रयोगानंतर सोडून दिला आणि पुनर्घटनेला लागल्यानंतर वर्गविग्रहाचे मार्क्सचे अत्यंत प्रिय तत्त्व दूर ठेविले. असे असूनही आपण मार्क्सवादी आहोत असा उद्घोष ते करीत असतात. तेव्हा त्यांचे कामगारांचे नेतृत्वही याच जातीचे असले पाहिजे हे उघड आहे.
हिंदुस्थानात कामगारांचे क्रान्तिकारकत्व कितपत अनुभवास आले हे जगजाहीर आहे. रशिया, चीन, युगोस्लाव्हिया येथे कामगारांनी नेतृत्व केले नसले तरी निदान क्रान्तीत त्यांनी बहुसंख्येने भाग तरी घेतला होता. हिंदुस्थानात क्रान्तीला विरोध हेच कामगार संघटनेचे लक्षण होऊन वसले होते. ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या एकाही लढ्यांत कामगारांनी भाग घेतला नाही. आणि १९४२ च्या लढ्यात तर ब्रिटिशांशी सहकार्य करण्यातच त्यांनी भूषण मानले. येथल्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वामुळे असे झाले असे कोणी म्हणतात. मलाही ते मान्य आहे. पण याचाच अर्थ असा की कामगार नेतृत्व करू शकत नाहीत. रशियन कम्युनिस्ट पक्षाने साम्राज्यशाही आरंभिली, तिला तेथल्या कामगारांनी साथ दिली. चिनी कम्युनिस्टांनी वर सांगितल्याप्रमाणे मार्क्सवादाचा त्याग करून राष्ट्राची पुनर्घटना केली तेव्हाही त्यांनी सांगितले ते सहकार्य कामगारांनी केले आणि हिंदी कम्युनिस्टांनी राष्ट्रीय लढ्याला विरोध करून ब्रिटिश साम्राज्यशाहीशी सहकार्य करण्याची त्यांना शिकवण दिली. तेव्हा त्याही मार्गाला ते गेले. कामगार ही शेतकऱ्यासारखीच एक प्रचंड शक्ती आहे. या शक्ती जागृत झाल्या की कोणचेही क्रांतिकार्य सिद्धीला जाते. या शक्तीच्या साह्यावाचून क्रांती यशस्वी होणे शक्य नाही. पण किसानकामगार ज्या परिस्थितीत काम करीत असतात ती परिस्थितीच अशी आहे की नेतृत्वाला लागणाऱ्या गुणसंपदेची जोपासना त्यांना करता येत नाही. लेनिन हा कामगारांचा कट्टा अभिमानी असूनही त्याने हा विचार स्पष्टपणे मांडला आहे. अर्थात् त्यालाही तात्त्विक दृष्टीने अर्थ नाही. कारण अमेरिकन व ब्रिटिश कामगारांनी अवसर सापडताच नेतृत्व करून दाखविलेच आहे. आणि भारतीय कामगारांनाही ते पुढे शक्य होईल यात शंका नाही.
असो. मार्क्सच्या सिद्धान्ताचा ऐतिहासिक दृष्टीने येथवर विचार केला. आता थोडी तत्वचिकित्सा करू.
भांडवलदार, व्यापारी, बुद्धिजीवी, जमीनदार, शेतकरी, शेतमजूर, कामगार या सर्व वर्गातून कामगार हेच फक्त खरे क्रांतिकारक, तेच क्रांतीचे नेते असे मार्क्स का म्हणाला ? इतर वर्गांच्या अंगी कोणचे अवगुण त्याला दिसले ? कामगारांच्या अंगी कोणचे विशेष गुण दिसले ?
समाजातील अर्थनिर्मितीची साधने हीच समाजाच्या संस्कृतीची निर्णायक असतात हा मार्क्सवादाचा जो पायाभूत सिद्धान्त तोच या कल्पनेच्या बुडाशी आहे. कामगारांच्या जवळ कोणच्याही प्रकारचे धन नसते. जमीन, नांगर, कुऱ्हाड, पटाशी, रांधा, चाक, इंजिने, यंत्रे यांपैकी एकाही धननिर्मितीच्या साधनांवर त्याची मालकी नसते, तो सर्वस्वी धनहीन असतो, हाच मार्क्सच्या दृष्टीने त्याचा सर्वात मोठा गुण होय. जगातील कामगारांना संघटनेचा त्याने जो संदेश दिला आहे त्यात त्यांच्या त्याच गुणाचा त्याने निर्देश केला आहे. 'या लढ्यात तुम्हाला काही गमवावे लागणार नाही. कारण दास्याच्या श्रृंखलांखेरीज गमावण्याजोगे तुमच्याजवळ काहीच नाही.' यातील तत्त्वज्ञान असे : इतर वर्गाचे काही ना काही तरी हितसंबंध प्रस्थापित राज्यात, शासनात गुंतलेले असतात. आहे ही व्यवस्था उलथून पाडली तर आपल्या त्या हिताला बाधा येईल अशी भीति या वर्गांना वाटत असते. म्हणून ते नेहमी प्रस्थापित राज्याचाच पक्ष घेतात. भांडवलदार, जमीनदार, व्यापारी हे क्रान्तिविरोधी असतात याचे कारण हेच. सरकार त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करीत असते. ते सत्ताच्युत झाले तर आपली सर्व जिंदगी जाईल हा धसका त्यांच्या मनात असतो. कामगारांना ही भीती नसते; कारण त्यांना जिंदगीच नसते. मार्क्सने त्यांना जिंदगीहीनांचा राजा म्हटले आहे. आणि जिंदगीच्या कमीजास्त प्रमाणावरच त्याने क्रांतिकारकत्वाची प्रतवारी लावली आहे. भांडवलदार, जमीनदार, हे क्रांतीचे कट्टे वैरी. पूर्ण प्रतिगामी. बुद्धिजीवी हे बहुधा त्यांचे गुलाम. शेतकरी हा गरीब असतो पण जमिनीचा तो मालक असतो. एखाद्या तुकड्यावर तरी त्याचे स्वामित्व असते. म्हणून त्याचा जीव तेथे गुंततो. आणि तेवढ्या प्रमाणांत तो क्रांतिविरोधी, प्रतिगामी वृत्तीचा असतो. जमीन नसलेला पण खेड्यात शेतीवर मोलाने राबणारा शेतमजूर हा कामगारासारखाच पूर्ण अकिंचन असतो. त्यामुळे तो मार्क्सच्या मते कामगारांचा खरा विश्वासार्ह मित्र. पण तो कामगारांसारखा स्वयंसिद्ध क्रांतिकारक मात्र नव्हे. कारण तो खेड्यांत रहातो. त्यामुळे दहा ठिकाणी विखुरलेला, पांगलेला असा असल्यामुळे तो संघटित होऊ शकत नाही. गिरण्या- कारखान्यात कामगार रात्रंदिवस एकठाय येत असल्यामुळे त्यांची संघटना करणे सहज शक्य असते. पण हा गौणभाग होय. गमविण्याजोगे काही नाही, 'स्व' कशातच नाही, हा प्रधान गुण होय. यात पहिला क्रम कामगाराचा असल्यामुळे तो खरा क्रान्तिकारक होय. बाकीचे या स्थितीच्या जवळ ज्या प्रमाणात येतील त्या प्रमाणात ते कामगाराचे मित्र व क्रांतिकारक असे मार्क्सचें तत्त्वज्ञान आहे. (१-५८३-५८५)
मार्क्सचे व आज शंभर वर्षांनंतरही त्याच्या या सिद्धान्ताचा पाठपुरावा करणाऱ्या त्याच्या अनुयायांचे मानवी स्वभावाचे अज्ञान या विचारसरणीतून अगदी स्पष्ट होते. या अज्ञानामुळेच त्यांनी मानवाला एका आर्थिक साच्यात दडपून बसविण्याचा अट्टाहास चालविला आहे आणि त्यामुळे पदोपदी मार्क्सवाद अपयशी होत आहे. काही गमविण्याजोगे नाही म्हणून माणूस क्रांतीला सिद्ध होईल ही मोठी अजब मीमांसा आहे. आणि ती क्षणभर खरी धरली तरी गमविण्याजोगे काही आहे, जिंदगी आहे, जमीन आहे, तिला धोका आहे हे दिसताच माणूस तितक्याच त्वेषाने उसळून उठतो एवढे तरी मार्क्सवादाला कळावयास हवें. इतिहासाने हे अनेक वेळा सिद्ध करून दिले आहे. कुल, वंश, धर्म, राष्ट्र, या निष्ठांसाठीही माणसे सर्वस्व त्यागास तयार झालेली आहेत. याचा अर्थाशी, धनाशी काहीही संबंध नाही. पण नाही कसा ? मार्क्समताने त्याचा घनसंबंध आहे. धननिर्मितीच्या साधनांतूनच समाजाच्या निष्ठा जन्म पावत असतात. आणि त्या साधनाचे स्वामी जे जमीनदार, सरंजामदार, भांडवलदार तेच कामगारांना भुलविण्यासाठी धर्म, वंश, राष्ट्र या निष्ठांचा प्रचार करीत असतात. कामगारांचा विशेष गुण हा की तो एकदा वर्गजागृत झाला की यातल्या कोणाच्याही निष्ठा तो मानीत नाही. तो जिंदगीपासून जसा मुक्त तसाच व त्यामुळेच असल्या सर्व प्रकारच्या निष्ठापासूनही मुक्त असतो.
पण मार्क्सच्या दुर्दैवाने कामगारांनी त्याचे हेही सिद्धान्त उधळून लावले. भांडवलदार, जमीनदार, शेतकरी यांच्या इतक्याच तीव्रपणे या निष्ठा आपल्याठायी आहेत हे त्यांनी पदोपदी दाखवून दिले. कामगार हा स्फूर्तीसाठी पूर्वेतिहासाकडे कधी पहात नाही; त्याची नजर नेहमी भविष्यकाळाकडे असते असे एक मार्क्सवचन आहे. पण त्याच्याच तत्त्वज्ञानाने प्रेरित झालेल्या सोव्हिएट रशियातील कामगारांना दुसऱ्या महायुद्धात जर्मनीशी लढण्याची स्फूर्ती यावी म्हणून स्टॅलिन हा सारखी कुटुसाफ, नेव्हस्की, पीटर इत्यादि पूर्वजांच्या पराक्रमाची गाणी गात होता. मार्क्सचे वर्गकलहाचे, कामगारजीवनाचे, कम्युनिझमचे तत्त्वज्ञान त्यांना युद्धप्रेरणा देण्यास सर्वस्वी असमर्थ ठरले. आंतरराष्ट्रीय दृष्टि हे कामगारांचे पहिले लक्षण. ते औषधालाही या युद्धात दिसले नाही. रशियन राष्ट्राच्या कडव्या अभिमानानेच ते लढत होते आणि सोव्हियेट नेते तोच अभिमान चेतवीत होते. मार्क्सच्या वचनांनी अंकित असलेले ध्वज या वेळी फेकून देण्यात आले होते. आणि रशियन राष्ट्राभिमान चेतविणारी, जर्मनीचा द्वेष भडकवणारी वचने असलेले ध्वज उभारण्यात आले होते. त्या युद्धात मार्क्स एंगल्स यांचे अत्यंत प्रिय असे जर्मन कामगार हे राष्ट्रनिष्ठा व आर्यरक्तनिष्ठा यांनी प्रेरित, नव्हे पिसाट झाले होते. रशियन कामगार आपले बंधू आहेत आणि जर्मनीचे सत्ताधारी हे खरे आपले शत्रू आहेत हा मार्क्सविचार त्यांनी रशियन कामगारांच्या रक्तांत बुडवून टाकला. आणि मार्क्सच्या तत्त्वज्ञानांत मुरत ठेवलेल्या रशियन कामगारांनीही तेच केले. नव्या भावी कम्युनिस्ट- साम्यवादी समाजरचनेचे भव्य दर्शन ही निष्ठा, त्यांना प्रेरणा देती झाली नाही, राष्ट्रवादापेक्षा ती निष्ठा श्रेष्ठ ठरू शकली नाही. अत्यंत गर्ह्य, त्याज्य, निषिद्ध अशा जर्मन-द्वेषाचाच त्यांना आश्रय करावा लागला.
वर्णद्वेष, धर्मद्वेष यांची हीच कथा आहे. कोणच्याही देशातले कामगार यातून मुक्त आहेत असे दिसत नाही. अमेरिकन कामगार इतर अमेरिकनां- प्रमाणेच तेथील निग्रोचा द्वेष करतात. शाळा, उपहारगृहे, वाहने यांत त्यांना बरोबरीने अमेरिकन सत्ताधारी बसू देत नाहीत म्हणून तेथील कामगारांनी कधीही त्यांचा पक्ष घेतला नाही. इतकेच नव्हेतर त्यांचा छळ करण्यात तेही हौसेने भाग घेतात. ब्रिटनमध्येही तेच आहे. एका हिंदी माणसाला बस- कंडक्टर म्हणून नेमतांच बाकीच्या ब्रिटिश कामगारांनी संप केला. संप हे कामगारांचे मोठे अस्त्र. त्याचा त्यांनी दुसऱ्या कामगाराची भाकरी तोडण्यासाठी उपयोग केला ! विश्वाचे कल्याण हे जे त्यांचे मार्क्सप्रणीत ध्येय त्यासाठी नाही ! जर्मन कामगार इतर जर्मन लोकांबरोबर ज्यू-द्वेषाने अंध झाले होते ही कथा काही जुनी नाही. सर्व जगाच्या शरीरावर त्याच्या खुणा अजून आहेत. आणि मार्क्सची स्मृती कदाचित् नष्ट होईल, पण यांची होणार नाही.
धर्मनिष्ठा, धर्मांधता, असहिष्णुता, परधर्मद्वेष यांतून कामगार मुक्त आहेत काय ? हिंदुस्थानात पाकिस्तानची चळवळ चालू होती. अंध धर्मश्रद्धा हाच तिचा पाया होता. मुंबई, कलकत्ता, अहमदाबाद, कानपूर इत्यादि शहरांतल्या कामगारांना त्यांच्या कम्युनिस्ट नेत्यांनी कित्येक वर्षे मार्क्सवाद शिकवला होता. आंतरराष्ट्रीय दृष्टी दिली होती. धर्माच्या अफूपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण मुस्लिम कामगारांनी पाकिस्तानला विरोध केला काय ? ते हिंदुधर्माच्या, भारतराष्ट्राच्या द्वेषापासून अलिप्त राहिले काय ? आणि आजही ती प्रगती झाली आहे काय ? क्षुल्लक कारणावरून अजूनही भारतात दंगे पेटतात. मुस्लिम कामगार त्यांचा निषेध करीत नाहीत. त्यांचा सगळा ओढा अन्यत्र आहे. उलट काश्मीरमध्ये मुस्लिम किसान आहेत. त्यांनी भारतात सामील होण्याचा अट्टाहास धरला आणि त्या वावतीत आपल्या सरकारला सक्रिय पाठिंबा दिला. कामगारांपेक्षा ते किसानच ज्यास्त क्रांतिकारक ठरले. रशियन कामगारांनीही आपली धर्मश्रद्धा मार्क्सवादाच्या डोहात अर्धशतक उभे राहिल्यानंतर पहिल्याइतकीच उज्ज्वल आहे, हे दाखवून दिले आहे. धर्मप्रचार करणे हा प्रारंभी सोव्हियेट सरकारने गुन्हा ठरविला होता पण अटीतटीचे प्रसंग येताच ते कायदे ढिले करावे लागले. आणि लोकांना लढण्यास स्फूर्ती यावी म्हणून सोव्हियेट सरकारला त्यांच्या धर्मभावनेला आवाहन करावे लागले. मार्क्सवाद हा शिळोप्याच्या वेळी उपयोगी पडतो. निकराचे प्रसंग आले की कामगार त्याला मूठमाती देतात असा इतिहास आहे.
कामगार क्रांती करतात ती केवळ स्वतःसाठी नसून सर्व समाजासाठी असते, भांडवली सत्तेपासून सर्व समाज मुक्त करणे हे कामगारांचे ध्येय असते, इतर वर्ग कधी क्रांतीत भाग घेतात पण ते स्वार्थासाठी; तो साधताच ते भांडवलदारांचे दास होतात, कामगारांना दगा देतात, असा एक विचार मार्क्सवादात नेहमी सांगितला जातो. त्याचा उल्लेख वर आलाच आहे. पण स्वार्थ साधताच कामगार तरी कामगारांशी एकनिष्ठ राहतात, क्रांतीला दगा देत नाहीत असे दिसते काय ? मुळीच नाही. कामगारांची वृत्ती याही बाबतीत इतरांहून निराळी नाही. आणि आश्चर्य असे की याला मार्क्सनेच पुरावा देऊन ठेवला आहे. इंग्लंडचे साम्राज्य वाढू लागले. तेथल्या भांडवलदारांना अमाप धन मिळू लागलें. अर्थातच त्याचा काही अंश कामगारांना देणे त्यांना प्राप्तच होते. त्यामुळे कामगारांची स्थिती जरा सुधारली आणि त्यामुळे त्यांची क्रांतिवृत्ती नाहीशी होऊ लागली. त्यांच्यावर टीका करताना मार्क्सने मार्क्सवादातील सर्वात तिरस्करणीय असा जो 'बूर्झ्वा' हा शब्द, तो वापरला आहे. हे कामगार बूर्झ्वा झाले, त्यांच्यात भांडवली वृत्ती आली, इत्यादी निर्भर्त्सना त्याने केली आहे. यावरूनच कामगार म्हणजे काही विषेशगुणसंपन्न वर्ग आहे या आपल्या सिद्धान्ताचा मार्क्सने फेरविचार करावयास हवा होता. पण आज शंभर वर्षांनी मार्क्सचे सिद्धान्त इतिहासाने फोल ठरविल्यानंतरही त्याचे अनुयायी फेरविचार करीत नाहीत; तेव्हा मार्क्सने तो केला नाही यांत नवल नाही.
कामगार, विद्याजीवी व शेतकरी यांच्याविषयी मार्क्सवादाने जे सिद्धान्त मांडले ते कसे भ्रामक व अनैतिहासिक आहेत ते येथेवर सांगितले. मोठे भांडवलदार व लहान व्यापारी- बूर्झ्वा व पेटी बूर्झ्वा- यांच्याविषयीचे त्याचे सिद्धान्त याच मासल्याचे आहेत हे वरवर पाहताही दिसून येईल. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान या पाच देशांत बड्या भांडवलदारांची सत्ता दीर्घ काळ चालू होती. त्यांपैकी पहिल्या दोन देशांतील भांडवलदार इतरांच्या तुलनेने अतिशय विवेकी व राष्ट्रनिष्ठ असे दिसतात. ते तसे असल्यामुळेच त्या देशात कोणतीही रक्तपाती क्रांती न होता संपत्तीची पुष्कळशी वाटणी होऊन समाजवाद बऱ्याच प्रमाणात आला आहे. फ्रान्सच्या भांडवलदारांनी गेल्या महायुद्धात आपल्या देशाचा विक्रयच केला. मातृभूमी त्यांनी हिटलरच्या ताब्यात देऊन टाकली. जर्मन भांडवलदार हिटलरच्या दंडसत्तेच्या आहारी गेले. भांडवलाबरोबर व्यक्तिस्वातंत्र्य उदयास येते, कारण कारखानदारांना मजुरांचा पुरवठा होणे अवश्य असते, असा एक सिद्धान्त मार्क्सवादाने ठोकून दिला आहे. जर्मनी, जपान, इटली येथला इतिहास मार्क्सचा हा सिद्धान्त मान्य करीत नाही. जपानमध्ये १९१२ नंतर सर्व सत्ता भांडवलदारांनी काबीज केली. पण व्यक्तिस्वातंत्र्य त्यांनी कधी क्षितिजावरही येऊ दिले नाही. तरी त्यांना मजुरांचा तुटवडा पडला नाही. आर्थिक स्थितीवर गुण अवलंबून असता, भांडवलदार, म्हणजे अमक्या वृत्तीचा, अमक्या गुणाचा, असा त्याचा वर्गगुण ठरलेला असता, तर सर्व देशांतले भांडवलदार सारख्या प्रवृत्तीचे दिसले असते. पण तसे मुळीच दिसत नाही. कोणी रूझवेल्ट, चर्चिल यांचे नेतृत्व पतकरून राष्ट्रनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, आर्थिक समता ही तत्त्वे मान्य करतात तर कोणी हिटलर, मुसोलिनी यांच्यापुढे नमून व्यक्तिस्वातंत्र्य, समता, यांचा खुशाल बळी देतात. त्यांचा स्वार्थ हा पराकोटीला गेलेला असतो. त्यासाठी ते वाटेल ती अनन्वित कृत्ये करतात हे खरे आहे. पण हे लक्षण कोणच्या वर्गाला लागू नाही ? चीन, रशिया, येथील सत्ताधारी कामगारांनी कोणची अनन्वित कृत्ये, कोणचे अत्याचार करावयाचे ठेवले आहेत ? थोडी शक्ती आली, थोडे रान मोकळे मिळाले की कामगार, विद्याजीवी, शेतकरी, व्यापारी, हे वर्ग वाटेल ते अत्याचार करण्यास प्रवृत्त होतात हे दरघडीला दिसून येत असतांना भांडवलदारांनाच त्या गुणाची मक्तेदारी देण्यात काय अर्थ आहे ? हाती सत्ता आहे की नाही येवढाच प्रश्न असतो. धनामुळे ती सुलभ असते येवढेच. पण संघशक्तीनेही ती मिळू शकते. आणि संघशक्तीने ती बुद्धिजीवी, कामगार, शेतकरी यांना कोणालाही मिळू शकते. ती मिळताच हेही वर्ग भांडवलदारांप्रमाणेच तिचा क्रूर वापर करतात. आज केरळमध्ये कम्युनिस्टांचे राज्य आहे, पण कामगार, विद्यार्थी यांवर गोळीबार, टाटा सारख्यांशी सहकार्य, हे तेथे चालू आहे.
पेटी बूर्झ्वा वर्गाविषयी मार्क्सची मते याच प्रकारची आहेत. जातिगुणाप्रमाणेच यांच्या वर्गगुणाविषयी तो ठाम सिद्धान्त सांगतो. दुकानदार, लहान व्यापारी, कारागीर इत्यादि व्यवसाय करणाऱ्यांचा त्याने या वर्गात समावेश केला आहे. मार्क्सच्या मते हा वर्ग अत्यंत दगलबाज आहे. कामगारांशी सहकार्य करण्यासाठी हा हात पुढे करील. पण स्वार्थ साधताच तो फुटून निघेल. याच्याशी कामगारांनी कधीच ऐक्य करता कामा नये. हा वर्ग कधी कामगारांचे हितही करतो. पण कामगारांची क्रांतिवृत्ती नष्ट व्हावी या उद्देशाने दिलेली ही लाच आहे असे समजावे. हा मध्यम व्यापारीवर्ग नेहमी अस्थिर, चंचल दोन्ही डगरीवर हात ठेवणारा, अनिश्चित मनाचा असा असतो. आणीबाणीच्या वेळी हा भांडवली सत्तेला मिळणारच म्हणून कामगारांनी यावर कधीच विसंबून राहू नये. (१.१०१, १०३, ५८४) हा वर्ग हळूहळू नाहीसा होऊन शेवटी कामगारवर्गात त्याचे रूपांतर होणार असे याच्याविषयी मार्क्सने भविष्य वर्तविले होते. (१. ४०). मार्क्सच्या इतर भविष्यांची जी गत झाली तीच याचीही झाली.
चवदाव्या-पंधराव्या शतकात युरोपात विद्येचे पुनरुज्जीवन होऊन मानवाच्या व्यक्तित्वाला काही प्रतिष्ठा प्राप्त झाली. पुढे व्यक्तिस्वातंत्र्य, समता, लोकसत्ता इत्यादि थोर तत्त्वांचा प्रसार होऊन व्यक्तित्व हे अंतिम मूल्य आहे हे सर्वत्र मान्य होऊन अखिल जगतातील मानव त्या दिशेने हळूहळू वाटचाल करू लागला. पण याच सुमारास मार्क्सवाद निर्माण होऊन त्याने या मानवी मूल्यांची होळी केली. ब्राह्मण, मराठा, वाणी, कुंभार, परीट, तेली अशा जातिवाचक नावाने पूर्वी माणसाला ओळखीत. तोच प्रकार मार्क्सवादाने पुन्हा सुरू केला. हा भांडवलदार, हा दुकानदार, हा कामगार, हा शेतकरी, हा शेतमजूर या अभिधानांनी माणसांला ओळखावे, व्यक्ती म्हणून तिला महत्त्व देऊ नये ही सनातन प्रतिगामी चाल त्याने रूढ केली. पशूंचे कळप असतात. आरंभी माणसांच्या तशाच टोळ्या होत्या. तेथून प्रवास करीत करीत मानव व्यक्तित्वापर्यंत आला होता. मार्क्सवादाने त्याला फिरून कळपसंस्कृतीकडे नेले आहे. मनुष्याला कळपातला एक म्हणूनच मार्क्सवाद ओळखतो. बूर्झ्वा, पेटीबूर्झ्वा, इंटेलिजेन्सिया (त्यातहि बूर्झ्वा इंटेलिजेन्सिया, सोशलिस्ट इंटेलिजेन्सिया, कम्युनिस्ट इंटेलिजेन्सिया), प्रॉलिटॅरियट, लंपन प्रॉलिटॅरियट, पेझंट, स्मॉल पेझंट, आर्टिझन असे अनेक वर्ग सांगून मार्क्सवादाने त्यांच्या कपाळावर, गुरांच्या कपाळी मारतात तसे, गुणवाचक शिक्के मारून टाकले आहेत आणि मागे सुलतानी वृत्तीचे क्रूर अघोरी राजे, हा अमक्या जातीचा समाज, अमक्या धर्माचा समाज म्हणूनच त्यांची कत्तल करीत; त्याचप्रमाणे रशिया, चीन, या देशांत मानवी समाजांची कत्तल करण्याची चाल आहे. १९३०, ३१ साली वुद्धिजीवी लोकांची स्टॅलिनने कशी कत्तल केली ते सर्वश्रुतच आहे. पुढे सामूहिक शेतीच्या जमान्यात शेतकऱ्यांचे त्याने असेच हत्याकांड केले. चीनमध्ये माओच्या हाती सत्ता येताच प्रारंभीच्या वर्षांत अशी अनेक हत्याकांडे झाल्याच्या वार्ता ताज्याच आहेत.
या अनर्थाला स्टॅलिन, क्रुश्चेव्ह किंवा माओ हे जबाबदार आहेत, मार्क्सवादाशी यांचा काही संबंध नाही, असे कोणी म्हणतात, ते खरे नाही. मार्क्सचे तत्त्वज्ञानच या घोर अनर्थाला कारण झालेले आहे. व्यक्तित्व, मानवत्व हे अंतिम मूल्य त्यानेच नष्ट केले आहे. भिन्न आर्थिक परिस्थितीतल्या भिन्न वर्गांचे विशिष्ट गुण असावयाचे असे ठरवून त्यांच्याविषयी अत्यंत विपरीत, अविवेकी व इतिहासशून्य असे सिद्धान्त मार्क्सने सांगून ठेवले. आणि त्याच्या जोडीला अत्यंत क्रूर व असहिष्णु अशी वृत्ती त्यानेच निर्माण करून ठेविली. धर्माला अवकळा आल्यानंतर तो जसा असहिष्णु, क्रूर, अंध बनतो तसा मार्क्सवाद मुळातच आहे. विरोधी पक्षांची वैरे मृत्यूनेच संपावयाची, क्रांती ही रक्तपातानेच व्हावयाची हे त्याचे तत्त्वज्ञान आहे. समन्वय, सलोखा, औदार्य, दिलदारी, सहिष्णुता हे मानवी संस्कृतीने वाढवीत आणलेले सद्गुण मार्क्सवादाने निर्दाळून टाकले आहेत आणि मानवाला पुन्हा एकदा कळपसंस्कृतीकडे नेण्याचा मार्ग आखला आहे.
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्याचा हा असा अर्थ किंवा अनर्थ आहे. आपल्याला लोकशाही निष्ठांची जोपासना करावयाची असेल तर जुन्या चातुर्वर्ण्या- प्रमाणेच हे नवे चातुर्वर्ण्यही आपण समूळ उच्छिन्न करून टाकले पाहिजे. तसे केले नाही तर भारतात लोकसत्ता यशस्वी करण्याची आशा कधीच धरता येणार नाही.