व्यवस्थापनाची मूलतत्त्वे/प्रारंभीचे शब्द
‘इन द वंडरलॅण्ड ऑफ इंडियन मॅनेजर्स' या माझ्या पुस्तकाच्या यशाने त्याच्या पुढील भागाविषयी काही समस्या निर्माण झाल्या.
स्वाभाविकपणे होण्यासारखा मोह होता तो म्हणजे ‘रिटर्न टू वंडरलॅण्ड' हे पुस्तक लिहिणे. मात्र, ‘बिझनेस इज पिपल' हे एकच पुस्तक वेगवेगळ्या नावांनी बारा वेळा लिहिल्याबद्दल मीनू रुस्तमजी या माझ्या दिवंगत मित्राची मी चांगली खरडपट्टी काढली असल्यामुळे मी काहीसा पेचात सापडलो. मीनूने माझ्या बोलण्यावर प्रतिटोला दिला होता, ‘‘मित्रा, जे व्यवस्थापक पुस्तके वाचतात ना ते ती पुस्तके विकत घेत नाहीत; आणि जे व्यवस्थापक पुस्तके विकत घेतात ते ती पुस्तके वाचत नाहीत. त्यामुळे नवी पुस्तके नव्हे तर नव्या नावांची पुस्तके प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. ( काही व्यवस्थापक मंडळी तर पुस्तके विकतही घेत नाहीत आणि वाचतही नाहीत आणि ही मंडळी लेखकांसाठी खरी समस्या असतात! )
माझ्या दुस-या पुस्तकात, ‘मॅनेजेरिअल इफेक्टीवनेस' मी पंजाब कृषी विद्यापीठात दिलेल्या लाला श्रीराम स्मृती व्याख्यानांचा अंतर्भाव आहे. हे पुस्तक पंजाब विद्यापीठाने प्रकाशित केले होते. हे पुस्तक चटकन विकले गेले. पण पुनर्मुद्रण करण्यात विद्यापीठाची एक अडचण होती. छपाईचा खर्च हा 'प्रकाशनासाठीच्या अर्थसंकल्पातून' येत होता आणि विक्रीची रक्कम मात्र ‘सर्वसाधारण महसूल' या खात्यात जमा होत होती. याचा परिणाम म्हणून जरी पुस्तक विकले गेले असले, तरीही पुनर्मुद्रणासाठी निधी उपलब्ध नव्हता.
दरम्यानच्या काळात, मला माझ्या पहिल्या पुस्तकावर वाचकांकडून प्रतिक्रिया मिळत होत्या. व्यवस्थापकीय समस्यांचं मी केलेलं विश्लेषण महत्त्वपूर्ण मानले गेले होते, पण त्या समस्यांवर काहीही ‘उपाय' दिले नसल्याबद्दल एक तक्रार होती. जेव्हा ते पुस्तक लिहिले गेले तेव्हा माझ्याकडे फारसे सांगण्यासारखे काही उपाय नव्हते. १९७९ सालापासून जेव्हा मी पूर्णवेळ प्रशिक्षण कार्यक्रम घेऊ लागलो तेव्हा सहभागी होणारे या समस्यांवरील उपायांविषयी आग्रह धरीत. मी सुचविलेल्या उपाययोजनांवर पुष्कळ चर्चा होऊन पुढे त्यांच्या ध्वनिफिती व चित्रफिती झाल्या-आणि सरतेशेवटी त्यांचे हे पुस्तक तयार झाले. एकाच पुस्तकात सर्व व्यवस्थापकीय समस्यांचा परामर्श घेणे कुणालाही शक्य नाही. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणा-यांच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना उत्तर देताना मी एक उर्दू शेर ऐकवायचो.
(आयुष्यभरात मी उत्तरे देऊ शकलो नाही, इतके प्रश्न तिने एका नजरेने केले होते.)
सर्व उपस्थितांना लागू होतील, चालतील असे उपाय कुणीही सुचवू शकणार नाही. मात्र, 'हे सगळं सैद्धांतिक आहे,' ‘यासारखे आमच्या संघटनेत काही चालणार नाही, '-यासारखी विधाने काळजीपूर्वक तपासायला हवीत कारण या पुस्तकात दिलेले उपाय अनेक व्यवस्थापकांनी परिणामकारकरीत्या वापरले आहेत आणि त्यांच्या अनुभवांतून साकार झाले आहेत.
हे पुस्तक सर्व स्तरांवरील व्यवस्थापकांसाठी आहे-व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थीपासून ते कार्यकारी संचालकांपर्यंत. पण हे त्यांच्या वरिष्ठ अधिकारीमंडळींना उद्देशून लिहिलेले नाही. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर वरचेवर ऐकू येणारी एक प्रतिक्रिया म्हणजे : “कार्यक्रम छान होता-माझ्या वरिष्ठ अधिका-यांना या कार्यक्रमाला हजर राहायला हवे होते." म्हणजे त्यांना बदल हवा आहे तो 'उच्च' स्तरांवर. बदल सर्व स्तरांवर आवश्यक आहे.
विचार करण्याचे तीन प्रकार आहेत : काय घडायला हवं, काय घडेल आणि कार्य घडू शकेल. तत्त्वज्ञानी मंडळी 'हवं' वर लक्ष केंद्रित करतात; 'घडेल'चा राजकारणी उपयोग करतात; व्यवस्थापकांनी 'शकेल' वर सगळा भर द्यायला हवा. हे पुस्तक 'शकेल'वर सगळा भर देते. व्यवस्थापक त्यांच्या संघटनेत काय करू शकतील याविषयी हे पुस्तक सांगते--यासाठी इतर व्यवस्थापकांनी याप्रकारच्या समस्या कशा सोडविल्या याची उदाहरणे देते. शेवटी, आपण आज ज्याला व्यवस्थापन समजतो ते औद्योगिक जगतात २०० वर्षांहून अधिक वयाचे आहे--आणि भारतात तर १०० वर्षांहून अधिक वयाचे आहे. व्यवस्थापकाला आज तोंड द्यावी लागणारी कोणतीही परिस्थिती आदाम आणि इव्हपासून पहिल्यांदाच उद्भवलेली नसते. अनेक व्यवस्थापकांनी त्या परिस्थितीला तोंड दिलेले असेल; बहुतेक व्यवस्थापक त्यातून कसेबसे पडले असतील, इतर काहींनी उत्तमरीत्या त्या परिस्थितीला तोंड दिलेले असेल. संस्कृतमध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे : ‘सिद्धानाम् लक्षणम्, साधकानाम्.' म्हणजे जे इच्छित स्थळी पोहोचले आहेत त्यांची लक्षणे ज्यांना इच्छित स्थळी पोहोचायचे आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे आहेत.
आपल्या वरिष्ट अधिका-याने स्वतःला सुधारावे ही वैश्विक भावना आहे. आपल्या वरिष्ठ अधिका-याने करायला हव्यात अशा सुधारणांची प्रत्येकाकडे एक यादी असते. कालांतराने वरिष्ठ अधिकारी सुधारण्याची शक्यता असली तरीही ही सुधारणा खूप कमी आणि धिम्या चालीने होणे अटळ आहे. याचं कारण असं की वरिष्ठ अधिकारी हे (तुलनेने) अधिक यशस्वी झालेले असतात. आणि यश एक वाईट शिक्षक आहे. यश काही करायचा एक मार्ग शिकवते आणि इतर प्रत्येक मार्गाला हटवादी विरोध करते. व्यवस्थापकाचे मूळ काम हे आवश्यकरीत्या स्वतः आत्मपरीक्षण करून स्वत:ला सुधारणे हे आहे. एक कवी म्हणतो त्याप्रमाणे :
(आधी दुस-यांच्या गोंधळाची चिंता करण्यापूर्वी स्वत:च्या गोंधळाची काळजी घे,
त्यांना झोपू दे, आणि तुझ्या स्वत:च्या स्वप्नापासून सुटका मिळव.)
जेव्हा मी एम.बी.ए.ला शिकवीत होतो तेव्हा शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठीच्या शेवटच्या लेक्चरला मला वारंवार या प्रश्नाचं उत्तर देणं भाग झालं होतं : “सर, आम्ही आता व्यवस्थापक होणार आहोत-आम्हांला आमच्या यशासाठी तुम्ही काय ‘टिप्’ देता?
“पहिली ‘टिप्' म्हणजे टिप्स् मागू नका." मी उत्तर द्यायचो. “दुसरी आणि शेवटची टिप म्हणजे तुम्ही एक वही ठेवा. या वहीत तुमच्या अवतीभोवती चाललेल्या चांगल्या किंवा वाईट व्यवस्थापनाची नोंद ठेवा. उदाहरणार्थ, जर इतरांसमोर वरिष्ठ अधिका-याने जर हाताखालच्या व्यक्तीची प्रशंसा केली तर कृपया त्याची या वहीत नोंद करा आणि जर एखादा वरिष्ठ अधिकारी हाताखालच्या व्यक्तीवर ओरडला किंवा बरोबरीने काम करणाच्या सहकाच्याबरोबर भांडला तर त्याचीसुद्धा नोंद ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी ह्या नोंदी वाचा आणि योग्य प्रसंगी तुम्ही स्वतः यातील 'चांगले किंवा 'वाईट' व्यवस्थापन करता की कार्य ते तपासा. याने तुम्हांला गतकालीन गोष्टींचे अवलोकन करून आपण कोठे चुकलो याची समज (पश्चातदृष्टी) येईल. काही काळानंतर तुम्हांला ‘मध्यदृष्टी' प्राप्त होईल–प्रत्यक्ष कामात तुम्ही कसे, कोणत्या मार्गाने वाटचाल करीत आहात ते काम करता करता समजेल. सरतेशेवटी तुम्हांला 'दूरदृष्टी' प्राप्त होईल–समस्या आणि संधी यांची अटकळ बांधून तुमची धोरणे ठरविण्याची कुवत येईल. व्यवस्थापनातील ही खरी बिकट बाब आहे."