व्यवस्थापनाची मूलतत्त्वे/व्यवस्थापन म्हणजे काय?
व्यवस्थापन म्हणजे काय?
परंतु या शब्दाला आता प्रकाशवलय प्राप्त झाले आहे. प्रत्येक तरुण-तरुणीला व्यवस्थापक व्हायचे आहे; आणि आता व्यवस्थापकीय कारकिर्दीत प्रवेश करण्यासाठी प्रत्येक तरुण-तरुणी धडपडत आहे. मागे एकदा मी दिल्लीत असताना अशी अफवा ऐकली की लष्कराच्या जनरलना केवळ जनरल न म्हणता ‘जनरल मॅनेजर' म्हटले जावे!
जरी लोक व्यवस्थापकीय क्षेत्राकडे आकृष्ट होत असले तरीही या क्षेत्रात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो याची त्यांना काही कल्पना नसते. व्यवस्थापक मंडळीला काय मिळतं हे लोकांना ठाऊक असतं; पण व्यवस्थापनातील त्यांच्या योगदानाची माहिती नसते.
व्यवस्थापकपदावरून निवृत्त झालेल्या माझ्या अनेक व्यवस्थापक मित्रांची तक्रार असते, “निवृत्तीनंतर मी पारदर्शक झालो आहे! मी जर रेल्वेस्टेशनवर किंवा इतर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी उभा असेन आणि पूर्वी माझ्या हाताखाली काम केलेली व्यक्ती बाजूने जात असेल तर ती मला ‘आरपार' पाहते; मला चक्क ओळखतही नाही!" दुसरीकडे माझे काही मित्र म्हणतात, “माझ्या हाताखाली काम केलेली व्यक्ती मला पाहिल्यावर ‘सर, कसे आहात तुम्ही?' अशी विचारपूस करण्यासाठी रस्ता ओलांडून येतात.
ज्या कुणाला व्यवस्थापकीय पद हे समाजातील स्थानाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे. असे वाटते त्यांना आढळतं की त्यांनी त्यांची खुर्ची सोडली की ते स्थान आणि ती प्रतिष्ठा नाहीशी झाली आहे. मात्र कुणी व्यवस्थापकपद हे जबाबदारीचे आणि योगदानाचे आहे असे समजतात त्यांनी पद सोडले तरीही समाजात त्यांना मानाचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळत राहते. जबाबदारी आणि योगदान ही व्यवस्थापनाची महत्त्वाची अंगे आहेत. समाजातील स्थान आणि प्रतिष्ठा या जबाबदारी आणि योगदानाच्या पडछाया आहेत.
साध्या भाषेत सांगायचे तर व्यवस्थापनामध्ये तीन कार्याचा समावेश होतो.
० तुमची जबाबदारी काय आहे ओळखून त्याच्याशी तादाम्य पावणे.
० तुमची साधनसामग्री कोणती आहे ते ओळखणे; आणि तुम्ही स्वतः तुमची
सर्वात महत्त्वाची साधनसामग्री आहात हे जाणून घेणे.
० साधनसामग्रीविषयी प्रयोग करणे.
याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुमच्या घरातील गृहिणी.
प्रत्येक तरुणी लग्नानंतर तिची जबाबदारी ओळखून त्या जबाबदारीशी वचनबद्ध होत असते. घराला घरपण देणं ही तिची जबाबदारी असते. घर ही एक केवळ बांधकाम केलेली वास्तू असली तरी आपल्याला मानसिक पाठबळ आणि प्रेमाची ऊब मिळते. तुम्ही दार वाजविताच तुमचे स्वागत होते. कोण करतं हे? अर्थातच तुमची घरधनीण, तुमची गृहिणी. म्हणून तर संस्कृतमध्ये वचन आहे,
“गृहम् गृहिणीहीनम् कांतारात् अतिरिच्यते ।
(गृहिणीशिवाय घर म्हणजे जंगलाहूनही वाईट.)
गृहिणी घरापासून काही दिवस जरी दूर गेली तर घरच्या वातावरणात फरक जाणवतो. गृहिणी तिची घराला घरपण देण्याची ही जबाबदारी ओळखून तिच्याजवळील साधनसामग्रीचा विचार करते. बहुतेक वेळा नव-याचे उत्पन्न ही मुख्य साधनसामग्री असते. माझी खात्री आहे की बहुतेक सर्व नवरोबांनी त्यांचे उत्पन्न किती कमी आहे हे ऐकलं आहे. पण काळजीचं कारण नाही-तिच्याकडे दुसरी एक साधनसामग्री आहे. ही साधनसामग्री म्हणजे ती स्वतः. ही साधनसामग्री ती कशी वापरते ते पाहा. कमी उत्पन्न असो अगर भरपूर, घराचे घरपण घरातील उत्पन्नावर अवलंबून असल्याचं तुम्हांला कधी आढळलंय? घरपण हे गृहिणीवर अवलंबून असते. कमी उत्पन्न असलेल्या घरात तुमच्या हाती चहाचा कप दिला जातो. तुम्ही एक घोट घेता न घेता तोच दाराआडून गृहिणीचा आवाज ऐकू येतो, “आणखी साखर हवी का?" आणि साखरेशिवायही तुम्हांला गोड वाटतं. भरपूर उत्पन्न असलेल्या घरात न चुकता चहा ट्रेमध्ये येतो. किटलीत चहा असतो, दुग्धदाणीमध्ये दूध असतं, साखरदाणीमध्ये साखर असते, बरोबर चांदीचे चमचे आणि चिनीमातीच्या चकचकीत कपबश्या असतात. व्वा! काय फाइव्ह स्टार सव्र्हिस आहे! पण हे सगळं काही एवढ्या थंडपणे येतं की त्यापाठोपाठ बील येईल की काय असे वाटते! खरा परिणाम अवलंबून असतो तो त्या गृहिणीवर; चहाच्या दर्जावर नव्हे!
याचप्रमाणे प्रत्येक व्यवस्थापक त्याची जबाबदारी काय आहे ते ओळखू शकतो. जर तुमच्या संस्थेने किंवा तुमच्या वरिष्ठ अधिका-याने तुमच्या जबाबदारीची पुरेशी व्याख्या केली नसेल तर व्यवस्थापकाला त्याची स्वत:ची कल्पनाशक्ती वापरून, त्याची उद्दिष्टे विकसित करून, त्यांच्यावर विश्वासून राहण्याची संधी असते. पदाबरोबरच त्याच्याकडे कर्मचारी, विविध प्रकारची साधने, यंत्रसामग्री यासारखी काही साधनसामग्री असते. या साधनसामग्रीला एक शक्तिमान स्वरूप देण्यासाठी व्यवस्थापकाला त्यात स्वत:ची थोडी भर टाकावी लागते; प्रयोग करावे लागतात. एका यशस्वी व्यवस्थापकाला त्याच्या यशाचे रहस्य विचारण्यात आले होते.
“चांगले निर्णय," तो म्हणाला.
"तुम्ही चांगले निर्णय कसे घेता?" त्यांना विचारण्यात आले.
"अनुभवातून." त्याने उत्तर दिले.
“तुम्हांला अनुभव कसा मिळाला?"
"वाईट निर्णय घेण्यातून," त्याचं उत्तर होतं.
साधनसामग्रीविषयीचे प्रयोग करताना व्यवस्थापक काही चुका जरूर करतो. जर आत्मपरीक्षणातून तो या चुका जाणून घेत असेल तर त्या चुकाच त्याचे अनुभव होऊ शकतात आणि त्याला यशाकडे नेऊ शकतात.
त्यामुळे व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकाची जाड कातडी असणे हे फायद्याचे ठरते. जेव्हा तुमचा निर्णय चुकीचा समजला जातो (चुकीने किंवा बरोबर) तेव्हा कोणीतरी तुमच्यावर ओरडतोच. याची अपेक्षा ठेवून ते सहन करायला हवे. काही वेळा मी हाताखालच्या कर्मचा-याला त्याच्या बॉसच्या केबीनमधून रागीट चर्येने येताना पाहतो. "काय झालं?" मी विचारतो. “माझा बॉस ओरडला माझ्यावर." तो म्हणतो. “मी संस्थेच्या भल्यासाठी पुढाकार घेतला. माझ्या बॉसला ते आवडले नाही. आता मी कधीच पुढाकार घेणार नाही." मूर्ख व्यवस्थापक! दुस-या एका बाबतीत बॉसच्या केबीनमध्ये खूप आरडाओरडा होत आहे. हाताखालचा कर्मचारी बाहेर येतो. “काय झालं?" मी विचारतो. “माझ्या निर्णयावर माझा बॉस थोडासा अस्वस्थ झाला आहे." तो म्हणतो. हा चांगला व्यवस्थापक! तो चांगलं यश मिळवील.
खरं तर ओरडणारा बॉस हा धोकादायक नसतो. ब-याचदा तो ओरडतो आणि विसरून जातो. न ओरडणारा पण नोंद ठेवणारा बॉस धोकादायक असतो. हा असा बॉस झालेल्या गोष्टी कधीच विसरत नाही.
माझा शेजारी नेहमी मोठा आरडाओरडा करीत असतो. मी त्याच्या बायकोला एकदा विचारलं, “तुझ्या नव-याला झालंय तरी काय? सारखा ओरडत असतो तो."
“त्यात काय?" ती म्हणाली, “माझा एक कुत्रा आहे तो भुंकतो आणि नवरा आहे तो ओरडतो. ज्या दिवशी तो ओरडत नाही त्या दिवशी मी डॉक्टरला बोलावते!"