समर्थ रामदास स्वामींचे हे पत्र संभाजी राजांस लिहिले आहे.

अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी||१||

काही उग्रस्थिती सोडावी| काही सौम्यता धरावी| चिंता लागावी परावी अंतर्यामी||२||

मागील अपराध क्षमावे| कारभारी हाती धरावे| सुखी करुनि सोडावे| कामाकडे||३||

पाटवणी तुंब निघेना| तरी मग पाणी चालेना| तैसे सज्जनांच्या मना| कळले पाहिजे||४||

जनांचा प्रवाहों चालिला| म्हणजे कार्यभाग आटोपला| जन ठायी ठायी तुंबला| म्हणजे खोटे||५||

श्रेष्ठी जे जे मेळविले| त्यासाठी भांडत बैसले| मग जाणावे फावले| गनीमासी||६||

ऐसे सहसा करू नये| दोघे भांडता तिसय्रासी जाए| धीर धरून महत्कार्य| समजूनि करावे||७||

आधीच पडली धास्ती| म्हणजे कार्यभाग होय नास्ती| याकारणे समस्ती| बुद्धी शोधावी||८||

राजी राखिता जग| मग कार्यभागाची लगबग| ऐसे जाणोनिया सांग | समाधान राखावे||९||

सकळ लोक एक करावे| गनिमा निपटुन काढावे| ऐसे करीता कीर्ति धावे| दिगंतरी||१०||

आधी गाजवावे तडाके| मग भूमंडळ धाके| ऐसे न होता धक्के| राज्यास होती||११||

समय प्रसंग ओळखावा| राग निपटुन काढावा| आला तरी कळो न द्यावा| जनांमध्ये||१२||

राज्यामध्ये सकळ लोक| सलगी देवून करावे सेवक| लोकांचे मनामध्ये धाक| उपजोचि नये||१३||

बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे| कष्ट करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||

आहे तितुके जतन करावे| पुढे आणिक मेळवावे| महाराष्ट्र राज्य करावे |जिकडे तिकडे||१५||

लोकी हिम्मत धरावी| शर्तीची तरवार करावी| चढ़ती वाढती पदवी| पावाल येणे||१६||

शिवरायास आठवावे| जीवित्व तृणवत मानावे| इहलोकी परलोकी राहावे| कीर्तीरुपे||१७||

शिवरायांचे आठवावे रूप| शिवरायांचा आठवावा साक्षेप| शिवरायांचा आठवावा प्रताप| भुमंडळी||१८||

शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांची सलगी देणे| कैसी असे||१९||

सकळ सुखांचा त्याग| करुनी साधिजे तो योग| राज्यसाधनेची लगबग| कैसी केली||२०||

त्याहुनी करावे विशेष| तरीच म्हणावे पुरूष| या उपरी आता विशेष| काय लिहावे||२१||

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.