शिवापराधक्षमापनस्तोत्रम्

शिवापराधक्षमापनस्तोत्रम्

संपादन

आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः ।
यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१॥

पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे घडलेले पाप मातेच्या उदरात आणून सोडते. तेथे अपवित्र विष्टा-मूत्राच्या सान्निध्यात असलेल्या गर्भाशयात आईचा जठराग्नी अतिशय सन्तप्त करतो. तेथे मला जी जी अपरिमित दुःखे त्रास देतात त्यांचे वर्णन कोण करू शकेल? हे कल्याणकारक देवाधिदेवा! हे शिवा! हे शंकरा! हे महादेवा! माझ्या अपराधांची क्षमा करा. ॥१॥

बाल्ये दुःखातिरेको मललुलितवपुः स्तन्यपाने पिपासा नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो भवगुणजनिता जन्तवो मां तुदन्ति ।
नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः शड्करं ना स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥२॥

बाल्यावस्थेत अधिक दुःख होते. शरीर मलमूत्रात लडबडलेले राहात होते आणि सारखे स्तनपान करण्याची लालसा होत असे. इन्द्रियांमध्ये कोणतेही कार्य करण्याची शक्ती नव्हती. सृष्टीधर्मानुसार उत्पन्न होणारे प्राणी (ढेकूण, डास, पिसवा, इ.) सारखे चावा घेत असत. नानाप्रकारच्या दुःखामुळे मी सतत रडतच राही. (त्या वेळीही) हे करुणानिधि शंकरा! तुमचे स्मरण करणे मला जमले नाही. हे शम्भो, माझ्या अपराधांची क्षमा करा. ॥२॥

प्रौढोहं यौवनस्थौ विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्धौ दष्टो नष्टो विवेकः सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः ।
शैवीचिन्ताविहीनं मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥३॥

पुढे मी मोठा झालो. तारुण्यात आलो. प्रौढ झालो तेव्हा पाच विषयरूपी सर्प माझ्या मर्मस्थानी डसले. त्या विषबाधेने माझा विवेक संपला आणि मी स्त्री, पुत्र, धन ह्यांचे सुख भोगण्यात मग्न झालो. त्याही वेळेस हे शंकरा! तुमचे चिन्तन स्मरण न करतां माझे ह्दय मोठ्या अभिमानाने आणि गर्वाने भरून गेले. हे देवाधिदेवा ! हे महादेवा ! हे शम्भो ! माझ्या अपराधांची क्षमा करा. ॥३॥

वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवादितापैः पापै रोगैर्वियोगैस्त्वनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् ।
मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटेर्ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥४॥

पुढे वृद्धावस्थेत इन्द्रिये, मन आणि बुद्धि ह्यांची गती कुंठित झाली. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांनी होरपळून गेलो, रोगांनी घेरले, पापांनी त्रस्त केले. तेव्हा माझे मन मिथ्या मोह आणि अभिलाषा ह्यांनी भ्रमित होऊन शंकराचे ध्यान न करता संसारातच भटकत राहिले. हे देवाधिदेवा ! हे महादेवा ! हे शम्भो ! माझ्या अपराधांची क्षमा करा. ॥४॥

नो शक्यं स्मार्तकर्म प्रतिपदगहनप्रत्यवायाकुलाख्यं श्रौते वार्ता कथं मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गे सुसारे ।
ज्ञातो धर्मो विचारैः श्रवणमननयोः किं निदिध्यासितव्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥५॥

सामान्य विहित स्मार्त कर्मे सुद्धा माझ्याकडून होऊ शकली नाहीत तर मग ब्राह्मण कुलाला विहित असलेली आणि ब्रह्मप्राप्तीचा मार्ग सुकर करणारी श्रौतकर्मे तरी कशी व्हावीत? धर्माबद्दल आस्था नाही, श्रवण-मननाचा विचार नाही, मग निदिध्यासनाची गोष्टच कशाला? हे देवाधिदेवा ! हे महादेवा ! हे शम्भो ! माझ्या अपराधांची क्षमा करा. ॥५॥

स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहतं गाड्गतोयं पूजार्थं वा कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि ।
नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥६॥

प्रातःकाळी स्नान करून आपल्याला स्नान घालण्यासाठी मी कधी गंगेचे पाणी आणले नाही किंवा पूजेसाठी गहन अरण्यात जाऊन कधी बिल्वपत्रेही आणली नाहीत. सरोवरात विकसित झालेल्या कमळांची माळही मी तुम्हाला कधी वाहिली नाही. गंध, फुलेही मी आपणास कधी अर्पण केली नाहीत. हे देवाधिदेवा ! हेमहादेवा ! हे शम्भो ! माझ्या अपराधांची क्षमा करा. ॥६॥

दुग्ध्रैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः स्नापितं नैव लिड्गं नो लिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः ।
धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥७॥

मध, तूप, दही आणि साखरयुक्त दुधाने (पंचामृताने) मी कधी शिवलिंगाला स्नान घातले नाही. चन्दन, कापूर इ. सुगंधित द्रव्यांचे तुम्हाला विलेपन केले नाही. तुम्हाला प्रिय असलेल्या कनका (धोतऱ्या)च्या फुलांनी मी कधी तुमची पूजा केली नाही. धूप, दीपही समर्पण केला नाही. अनेक रसांनी युक्त फळे आणि पंचपक्वाने ह्यांचा नैवेद्य आपणास अर्पण केला नाही. हे देवाधिदेवा ! हे महादेवा ! हे शम्भो ! माझ्या अपराधांची क्षमा करा. ॥७॥

ध्यात्वा चित्ते शिवाख्यं प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवहवदने नार्पितं बीजमन्त्रैः ।
नो तप्तं गाड्गतीरे व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यैर्न वेदैः क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥८॥

मी चित्तामध्ये कधी शिवतत्त्वाचे चिन्तन करून ब्राह्मणांना विपुल धन अर्पण केले नाही. मी कधी तुमच्या बीजमंत्राचा एक लक्ष उच्चार करून अग्नीमध्ये आहुत्या दिल्या नाहीत. व्रत, जप, तप, नियम, रुद्रपाठ किंवा वेदमंत्रांनी मी कधी गंगेच्या काठावर साधना केली नाही. हे देवाधिदेवा ! हे महादेवा ! हे शम्भो ! माझ्या अपराधांची क्षमा करा. ॥८॥

स्थित्वा स्थाने सरोजे प्रणवमयमरुत्कुण्डले सूक्ष्ममार्गे शान्ते स्वान्ते प्रलीने प्रकटितविभवे ज्योतिरूपे पराख्ये ।
लिड्गज्ञे ब्रह्मवाक्ये सकलतनुगतं शड्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥९॥

पवित्र स्थानी एकांतात बसून सूक्ष्ममार्गस्वरूप असलेल्या मस्तकातील सहस्त्रदल कमळामध्ये, जेथे प्राणवायू प्राणतत्त्वाशी तादात्म्य पावून संकलित होऊन राहतो, त्याठिकाणी अन्तःकरण शांत ठेवून मन ब्रह्मस्वरूपी लीन केले नाही. सर्ववेद ज्याचे प्रतिपादन करतात त्या परब्रह्म तत्त्वात सर्वान्तयामी शंकराला अवलोकन करून त्याचे स्मरण केले नाही. हे देवाधिदेवा ! हे महादेवा ! हे शम्भो ! माझ्या अपराधांची क्षमा करा. ॥९॥

नग्नो निःसड्गशुद्धस्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहान्धकारो नासाग्रे न्यस्तदृष्टिर्विदितभवगुणो नैव दृष्टः कदाचित् ।
उन्मन्यावस्थया त्वां विगतकलिमलं शड्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१०॥

दिगंबर, सर्वसंगविहित, शुद्ध, त्रिगुणातीत, मोहरूपी अंधकाराचा नाश करणारे, नासाग्री दृष्टी लावून पद्मासनावर बसलेले, सर्व विश्वाच्या गुणांना जाणणारे, मंगलमय ध्यानस्थ अशा स्वरूपाचे मी कधी दर्शन घेतले नाही. उन्मनी अवस्थेत कलिमल रहित अशा तुमच्या कल्याण स्वरूपाचे मी स्मरणही केले नाही. हे देवाधिदेवा ! हे महादेवा ! हे शम्भो ! माझ्या अपराधांची क्षमा करा. ॥१०॥

चन्द्रोदभासितशेखरे स्मरहरे गड्गाधरे शंकरे सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्थवैश्वानरे ।
दन्तित्वकृतसुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः ॥११॥

ज्याच्या मस्तकावर चन्द्र शोभत आहे, ज्याने मदनाला भस्म केले आहे, ज्याने मस्तकावर गंगेला धारण केले आहे, जो कल्याण करणारा आहे, ज्याचे कान आणि कंठ सर्पामुळे शोभत आहेत, ज्याच्या तृतीय नेत्रातून अग्नि प्रकट होत आहे, हत्तीचे चामडे ज्याने वस्त्राप्रमाणे पाठीवर घेतले आहे, जो त्रैलोक्याचे सार आहे, जो हर (भक्तांचे दुःख दूर करणारा) आहे अशा शंकराच्या ठिकाणी सर्व संसार दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर आपले चित्त स्थिर ठेवावे. इतर कर्माचा काय उपयोग आहे? ॥११॥

किं वानेन धनेन वाजिकरिभिः प्राप्तेन राज्येन किं किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभिर्देहेन गेहेन किम् ।
ज्ञात्वैतत्क्षणभंगुरं सपदि रे त्याज्यं मनो दूरतः स्वात्मार्थ गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वतीवल्लभम् ॥१२॥

ह्या धनाचा काय उपयोग? हत्ती, घोडे काय कामाचे? राज्य मिळाले तरी त्याने काय होणार आहे? स्त्री आहे, पुत्र आहे, मित्र आहेत, गाई, बैल, म्हशी आदि पशू आहेत, घर आहे, सर्व काही आहे पण ह्यांचा काय उपयोग? हे सर्व क्षणभंगुर आहे. तेव्हा हे मना ! ह्या सर्वांचा दुरुनच त्याग कर आणि आत्मानुभवासाठी गुरूच्या उपदेशाप्रमाणे श्री पार्वतीवल्लभ शंकराचे भजन कर. ॥१२॥

आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यावान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः ।
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१३॥

रोजच्या रोज आयुष्य नष्ट होत आहे. तारुण्य क्षीण होत चालले आहे, लक्ष्मी पाण्यावर उसळणाऱ्या लहरींप्रमाणे चंचल आहे. जीवन विद्युल्लतेप्रमाणे क्षणभंगुर आहे. म्हणून हे भक्तवत्सल शंकरा ! मी तुम्हाला अनन्यभावाने शरण आलो आहे. आता तुम्ही माझे रक्षण करा. ॥१३॥

करचरणकृतं वाककायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् ।
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ॥१४॥

हात, पाय, वाणी, शरीर, कर्म, कान, नाक, डोळे, मन ह्यांच्या द्वारे कळत न कळत जे अपराध मी केले असतील त्या सर्व अपराधांची हे करुणासागरा महादेवा ! तुम्ही मला क्षमा करा. तुमचा जय जयकार असो. ॥१४॥

॥श्रीमत् शंकराचार्याविरचितं शिवापराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम् ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.